Friday, 6 July 2018

वारी संतविचार हारी...!

"प्रसिद्धीमाध्यमांच्या अतिरेकानं वारी हा एक इव्हेंट झालाय! त्यामुळं राजकारणी यात सहभागी होण्याचा देखावा मांडतात. सत्ताधाऱ्यांचा, राजकारण्यांचा हा वारीतला सहभाग अगदीच दुर्लक्षिण्यासारखा नाही. तथापि, त्यांच्या या वारी सहभागात संतविचार आहे का? याची तपासणी जरूरच केली पाहिजे. पंढरपूरच्या वारीची वाट निश्चित करणारे ज्ञानेश्वर आदि संतमंडळी नामदेवांसारख्या सच्च्या भक्तांच्या भेटीच्या ओढीनं पंढरपुरास गेले होते. देवापेक्षा भक्त मोठा, अशी विचारदृष्टी त्यामागे होती. संत तुकारामही अशाच विचारदृष्टीने पंढरपूरला गेले. म्हणूनच *देव पाहावयास गेलो। देव होऊनिया ठेलो।।* असं ते सांगू शकले. सत्ताधारी आणि इतर राजकारणी संत नाहीत. पण संतविचारानं तरी ते विठ्ठल दर्शनाला जातात का? वारीत सामील होतात का? राजकीय नेतेच कशाला, वारकरी तरी संतविचारांनी वागतात का? असे प्रश्न, भक्तमंडळींना कीर्तन-प्रवचन-भजनात आपल्या फेसाळ-रसाळ वाणीनं नादवून, भवसागर पार करण्याची हिंमत देतो, असा आव आणणाऱ्या सद्गुरू-बुवा-महाराजांना तरी पडतात का? वर्तमान काय आहे?"
------------------------------------------------
*विश्वबंधुत्वाचा आग्रह धरणारी वारी !*
पंढरपूरकडं निघालेल्या वारीनं भक्तीभावाचं महादर्शन घडवलंय. मृगाच्या पावसानं धरणीवर वर्षाव केला की, लाखो वारकऱ्यांच्या तनामनांत विठ्ठलभेटीची ओढ अंकुरायला लागतं. अगदी थकल्या भागल्या देहातही तरतरी येते. घर-संसारातल्या वेदना-संवेदना विसरण्याचं बळ येतं. जणू *लटिका व्यवहार, सर्व हा संसार। वाया येरझार, हरिवीण ।।* असं त्यांना वाटायला लागतं. आणि पाहता पाहता ज्येष्ठ अष्टमीच्या मुहूर्तावर देहू आळंदीहून लाखो वारकरी *माझीया जीविचे आवडी। पंढरपुरा नेई गुढी।।* या निश्चयानं संतकाव्य गात गात पंढरीच्या दिशेनं निघतात. गेली साडेसातशेहून अधिक वर्षे आषाढी-कार्तिकी एकादशीच्या विठ्ठलदर्शनासाठी निघणाऱ्या या वाऱ्या महाराष्ट्र संस्कृतीचं दर्शन घडवीत असतात. 'विठोबा रखुमाई' चा गजर करीत जातीभेद गाडणारा, विश्वबंधुत्वाचा आग्रह धरणारा हा येरझारा संत ज्ञानेश्वर-नामदेव यांच्यापासून सुरू आहे.

*भक्तीप्रेमाचा गौरव करणारी वारी*
शके १२१२ मध्ये 'ज्ञानेश्वरी'ची पूर्णता झाल्यानंतर ज्ञानदेवांनी गुरु निवृत्तीनाथांची आज्ञा घेऊन तीर्थयात्रेचा बेत निश्चित केला. त्यांच्यासाथीला चोखामेळा, नरहरी सोनार, गोरा कुंभार, विसोबा खेचर ही संत मंडळी होती. त्यात नामदेवही सहभागी व्हावेत, अशी ज्ञानदेवांची इच्छा होती. नामदेव पंढरपुरात राहतात. ते साक्षात्कारी विठ्ठलभक्त आहेत, ह्याची ज्ञानदेवांना माहिती होती. त्यांना साथीला घेताना पंढरीची यात्राही घडावी, असाही हेतू ज्ञानदेवांच्या नामदेव भेटीमागे होता. ज्ञानदेवांच्या या पंढरपूर भेटीनं सदगदित झालेले नामदेव म्हणतात...
*नामयाच्या भेटी, ज्ञानदेव आले।*
*लोटांगण घातले, नामदेव।।*
*ऐसिया पतितांचा, करावा उद्धार।*
*या लागी अवतार, तुमचा जगी।।* यावर नामदेवांच्या भक्तीप्रेमाचा गौरव करताना ज्ञानदेव म्हणतात...
*ज्ञानदेव म्हणे, तू भक्त शिरोमणी।*
*जोडीले जन्मोनी, केशव चरण।।*
*धन्य तुझा जन्म, धन्य तुझे कुळ।*
*धन्य तुझं राऊळ, जवळी वसे।।*

*लोकदेव विठोबाचा लोकमेळा*
लोकदेव विठोबा अठ्ठावीस युगे पंढरपूरक्षेत्री निवास करीत असला, तरी त्याच्या दर्शनाचं महत्व ज्ञानदेव-नामदेव यांच्या या भेटीनंतरच वाढलं. ते गेली साडेतीनशे वर्षांहून अधिक काळ टिकून आहे. आळंदी-देहू ते पंढरपूर हा विठुनामाच्या गजरात आणि संतकाव्य गात-गात-चालत केलेला महिनाभराचा प्रवास त्रासाचा असला; तो सत्संगानं सुसह्य होतो. ऊन-पावसाचा मारा आणि बेफाट वारा सोसण्यातही आनंद मिळतो; अडचणींवर मात करण्याची हिंमत बळावते, असा अनेक वारकऱ्यांचा अनुभव आहे. हे बळ पांडुरंगकृपेनं प्राप्त होतं, तोच नाना अडचणी-अडथळे आणून आपल्या भक्तीची परीक्षा घेत असतो. अशीही वारकऱ्यांची श्रद्धा असते. ही श्रद्धाच त्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांना पंढरीची ओढ लावत असते. ही वारी जेव्हा पंढरपुरात पोहोचते, तेव्हा दीड लाख लोकवस्तीची पंढरी बारा-पंधरा लाखाच्या लोकमेळ्यानं गच्च भरते. आषाढी-कार्तिकी एकादशीला दीड-दोन लाख भाविकांना विठ्ठलमूर्तीचं दर्शन लाभतं. हा दर्शन लाभ न मिळणाऱ्यांना मात्र विठ्ठल मंदिराच्या कळसाचं दर्शनही समाधान घेण्यास पुरेसं असतं. तेवढया दर्शनानं अनेकांच्या मुखातून *तुझिये संगतीचे। नित्य सुख घ्यावे। सार्थक करावं, संसाराचं।।* असे बोल निघतात. लोकदेव विठोबाचा आणि वारीचा महिमा असा अगाध आहे. तो जपणारे आजच्या आधुनिक युगातही भरपूर आहेत. मात्र त्या भक्तिसागरात डोळसपणे पोहणारे किती? कारण या वारीत घराण्याचा वारसा चालत राहावा यासाठी नाईलाजानं वारीच्या वाटेनं चालणारे छोटे-मोठे वारकरी असतात.

*राजकारण्यांनाही वारीचा मोह*
'विठ्ठल सोवळं' पुढं करीत चलाखीनं पंक्तीभेद, जातीभेद जपणारेही असतात. महिलांवर असभ्यतेचा वार करून तो 'विठ्ठलाची आण' घालून पचवणारे वारकरी असतात आणि हभपबोवादेखील असतात. 'करून करून भागले वारीला लागले, पण इंद्रियांचं वळण नाही बदलले', अशा चालीचेही असतात. अशा अपप्रवृत्तींना पचवत पचवत वारी विठ्ठल चरणी विसर्जित होते. तेव्हा त्यात उरतो, तो निव्वळ नितळ भक्तिभाव! ह्या भक्तिभावाच्या दर्शनासाठी सत्ताधीशही येतात. लोकशक्ती एकीकडं आणि सत्ताभक्ती दुसरीकडं हा विरोधाभास जनता-जनार्दनाला नेहमीच पाहावा-अनुभवावा लागत असतो. याउलट चित्र आषाढी एकादशीला लोकदेव विठोबापुढं असतं. 'शासकीय पूजे' साठी मुख्यमंत्री विठ्ठल मंदिरात येतात. लोकदेवापुढं नतमस्तक होतानाच ते लोकांच्या भक्तिभावाला नमस्कार करतात. ह्या थेट दर्शनात बऱ्याच आजी-माजी सत्ताधाऱ्यांचा समावेश असतो. परंतु, या लोक-देवदर्शनात वारीचं समाधान नसतं. सत्ताधाऱ्यांची, राजकारण्यांची ही वारी अगदीच दुर्लक्षिण्यासारखी नाही. तथापि, त्यांच्या या वारीत संतविचार आहे का? याची तपासणी जरूरच केली पाहिजे. पंढरपूरच्या वारीची वाट निश्चित करणारे ज्ञानेश्वर आदि संतमंडळी नामदेवांसारख्या सच्च्या भक्तांच्या भेटीच्या भेटीच्या ओढीनं पंढरपुरास गेले होते. देवापेक्षा भक्त मोठा, अशी विचारदृष्टी त्यामागे होती. संत तुकारामही अशाच विचारदृष्टीने पंढरपूरला गेले. म्हणूनच *देव पाहावयास गेलो। देव होऊनिया ठेलो।।* असं ते सांगू शकले. सत्ताधारी आणि इतर राजकारणी संत नाहीत. पण संतविचारानं तरी ते विठ्ठल दर्शनाला जातात का? वारीत सामील होतात का? राजकीय नेतेच कशाला, वारकरी तरी संतविचारांनी वागतात का? असे प्रश्न, भक्तमंडळींना कीर्तन-प्रवचन-भजनात आपल्या फेसाळ-रसाळ वाणीनं नादवून, भवसागर पार करण्याची हिंमत देतो, असा आव आणणाऱ्या सद्गुरू-बुवा-महाराजांना तरी पडतात का? वर्तमान काय आहे?

*संतांनी काय सांगितलं?*
वारीचा मार्ग केवळ चालून पार करण्याचा नाही. तो संतविचारानं जीवनभर वाटचाल करण्याचाही आहे. त्या विचारानं वारी आणि विठ्ठलभक्ती केली, तरच सन्मार्ग होतो; सत्संगाचा लाभ होतो. वारकरी संप्रदायातल्या संतांनी फक्त भक्ती शिकवलेली नाही. तर जिथं मानवतेला काळिमा फासणारा, फसवणारा व्यवहार आहे. अशा नाठाळावर काठी हाणण्याची शक्तीही दिली आहे. ही शक्ती दाखविण्यासाठीच संतांनी समाजभेद करणाऱ्या जातीसंस्थेस, उच्च-नीचतेस, त्यासाठीच्या सोवळ्या उपासनेस कडाडून विरोध केला आहे. यासाठी जातीभेद, वर्णभेद प्रत्यक्ष विठोबालाही मान्य नसल्याची साक्ष काढून संत नामदेव म्हणतात... *नाही यातिकुल, उंचनीच भेद। भाव एक शुद्ध, पाहतसे।।* तर संत एकनाथ म्हणतात... *गुण अवगुण, हे दोनही प्रमाण, यातीशी (जातीशी) कारण, नाही देव।।* हेच एकनाथ यांच्या आधी चारशे वर्षे जातीसंस्थेनं अस्पृश्य ठरवलेले संत चोखामेळा सांगतात... *नाही देह शुद्ध, याती अमंगळ। अवघे ओंगळ गुणदोष।।* तुकोबांनी तर जातीसंस्थेवर जबरदस्त प्रहार करताना वर्णवर्चस्वाची सोवळी अक्षरशः टरकावली आहेत. वारकरी संप्रदायातल्या सर्वच संतांनी जातीभेद करणाऱ्या जातीसंस्थेच्या विरोधासाठी आपलं आयुष्य खर्च केलं आहे. महात्मा बसवेश्वरांनी तर त्यासाठी आपला जीव दिला. असं असतानाही पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीला मायेसाठी वर्षानुवर्षे जातिनिशी कवटाळणारे बडवे-उत्पात वारकऱ्यांना सलत नाहीत. 'बडवे-उत्पात हटाव' मोहिमेप्रमाणेच जातीयतेचा माज उतरवणाऱ्या आरक्षण समर्थनाच्या चळवळीपासून वारकरी दूर आहे. किंबहूना, जाती-धर्मवाद माजवणाऱ्यांच्याच ताब्यात आज वारकरी संप्रदाय आहे. ही संतविचारांची केलेली दगाबाजी आहे.

*विचारानं वारी झाली तर सन्मार्ग दर्शन*
वारकरी संतांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी, ढोंगबाजी यावरही प्रखर हल्ला केला आहे. गुरुबाजीचीही चिरफाड केली आहे. लोभी गुरुची ओळख सांगताना संत एकनाथ म्हणतात... *जे का अपेक्षुनिया वित्त, चतुर्वर्ण्य उपदेशीत।*
*ते धनलोभे लोलुपपथ, नाही घेईजेत गुरुत्वेह।।*
तर ढोंगी गुरुची हजेरी घेताना संत तुकोबा म्हणतात...
*डोई वाढवुनी केश, भुते आणिती अंगास।*
*तरी ते नव्हती संतजन, तेथे नाही आत्मखूण।।*
कर्मकांडी भक्तीत शिष्य, भाविकांना गुंतवून धन जमविणाऱ्या बुवा-बापू, महाराज-गुरूंबद्धल संत नामदेव म्हणतात... *द्रव्याचिये आशे, हरिकथा करी। ते नर नयनी, पाहू नये।।* अशाबद्धल तुकोबा म्हणतात... *मुखे सांगे ब्रह्मज्ञान। जनलोकांची कापतो मान।।* अशा मानकाप्यांना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी 'अंधश्रद्धा विरोधी कायदा' झाला. वारकऱ्यांनी आग्रहानं संतविचार जागवायला हवं. त्या विचारानं वारी झाली, वारीचं गुणगान झालं. तर आणि तरच सन्मार्गाचं दर्शन होईल. तेच दुर्लभ आहे. जे नको करण्यात-दाखवण्यात विठ्ठलभक्त गुंतल्यामुळंच राजकारण्यांनाही वारी आपलीशी वाटू लागलीय!

चौकट.....!

*'पालख्या पंढरपुराकडे निघाल्या...'*
अगदी लहानपणापासून हे तीन शब्द ऐकत आलो आहे आणि या शब्दांबरोबरच मनाची पालखी चंंद्रभागेतीरी पोहोचवत आलो आहे. पालखीचं दर्शन ही एक पर्वणी होती. आमचं तेव्हा छोटंसं दुकान लक्ष्मीरोडवर होतं. आताचं लक्ष्मीरोडच स्वरूप तेव्हा नव्हतं. त्यामुळे या पालख्या जणू आमच्या अंगणातूनच जायच्या. मुंग्या एका मागे एक जाव्यात तशी वारकऱ्यांची रांग रस्त्यावर लागलेली असायची. अंगावर धोतर-सदरा-गांधी टोपी अथवा मुंडासं. खांद्याला एक पडशी. कुणाच्या हाती भगवी पताका. त्यावेळी एकदम भगवे झेंडे दिसायचे ते फक्त पालख्यांबरोबरच. बायकांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन. हे वारकरी दोन तऱ्हेचे असायचे. एक बाजूच्या गर्दीवर डोळे लावून चाललेले, तर दुसरे पंढरीकडेच डोळे लागलेले. जमलेले भाविक आपल्या कुवतीप्रमाणे डाळ, चुरमुरे, लाडू, केळ, मुसुबं, अथवा पैसा, ढब्बू पैसा वारकऱ्यांना वाटायचे. ह्या वाटपाजवळ  झुंबड उडायची. मिळेल ते पडशीत टाकून पुढं कुठं कुणी काही वाटतंय का हे बघत गर्दीवर डोळे लावणारे पुढं धावत असायचे. पंढरीकडे डोळे लागलेल्यांना हा वाटपाचा मोह दिसायचा नाही. विठ्ठल...विठ्ठल या नामघोषाशी पायाची गती जुळवून ते चालत असायचे. मग केव्हातरी आली...आली.... अशी कुजबुज उठायची. पहिल्यांदा यायचा पालखीबरोबरचा घोडा. त्याला हात लावायची झुंबड उडायची. तो सारखा फुरफुरत नुसता नाचत असायचा. लाल वुलनचा शेरवानीवजा लांब कोट घातलेला मुंडासेधारी ह्या घोड्याला सांभाळत असायचा. एका हाताने तो घोडा धरायचा. दुसरा हात त्या घोड्याला म्हणून लोक जी दक्षिणा द्यायचे त्याने भरलेला असायचा. थोड्या थोड्या अंतराने हातावरची जमा लालकोटाच्या खिशात जायची. ह्या घोड्यामागे असायची पालखी. तिच्याभोवती तर नुसती रेटारेटीच व्हायची. लहान पोरांना पालखीत काय आहे ते दिसायचंच नाही. ज्यांना कुणाच्या खांद्यावर बसायचं भाग्य मिळायचं त्यांची गोष्ट वेगळी. तुळस-बुक्का यांचा मनाचा गाभारा बनवणारा सुवास पालखीबरोबर यायचा. पालखीसाठी हलवायांची दुकानं लागायची. गोडी शेव ज्याला कोकणात खाजे म्हणतात, बत्तासे, चणे, कुरमुरे, लाडू यांच्या टोपल्या भरभरून दुकानांतून मांडलेल्या असायच्या. त्यावर माशांची झुंबड असायची. उघडं-वाधडं खायचं नाही ही शिस्त घरात असल्यानं हातात पैसा कधी पडायचाच नाही, पण हलवायाच्या दुकानासमोरच्या गर्दीत घुसून निष्पाप चेहरा करून टोपलीच्या जवळ चिकाटीने उभं राहिलं तर अधूनमधून एखादी गोडी शेव, मूठभर शेंगदाणे वा चुरमुरे लंपास करायला मिळत. हे चोरून खाणं त्या सगळ्याची गोडी आणखी वाढवत असे. पालखी डोळ्यापुढून पाच मिनिटात जात असे, पण ती येऊन जाईपर्यंत दोन चार तास सहज जात आणि तिची आठवण करण्यात वर्षही सहजपणे जात असे. 'पालख्या पंढरपूराकडे निघाल्या' ही बातमी वाचली की, अजूनही तो तुळस-बुक्क्याचा सुगंध अवतीभवती दरवळतो. गोड्या शेवेची गोडी जिभेवर येते आणि विठ्ठल-विठ्ठल-ज्ञानोबा तुकारामाची धून मनातून उठते. पंढरपूरला ज्या ज्या वेळी मी गेलो आहे, त्यावेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाने स्वतःला हरवून गेल्याचा अनुभव मीही घेतला आहे. 'तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला'... अशी वेडी ओढ माझ्याही मनाला लागलीय. आज कितीतरी वर्ष मी ठरवतोय. पालखीबरोबर पंढरपूरला जायचं, तेवढं मात्र अजून जमलेलं नाही. पालख्या निघाल्या हे वाचलं की, आपण मात्र निघू शकत नाही ह्या जाणिवेनं मी अजून बेचैन होतो. यंदाही झालोय. खरोखरच ही पंढरपूरची वारी मराठी माणसाचा एक विशेष आहे.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

शिवसेनेचे मित्र आणि महाराष्ट्रधर्म...!

"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...