Saturday 25 November 2017

नव्या गांधींकडे पक्षाची धुरा!

*नव्या 'गांधीं'कडे पक्षाची धुरा*

"पक्षाची धुरा हाती घेतल्यानंतर राहुल गांधी कुणाच्या डोळ्याने हा देश पाहणार आहेत. कोणत्या दृष्टीनं पाहणार आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी भारत फिरून पहावा अशी आपली इच्छा असली तरी त्यांचे सल्लागार त्यांना काय सल्ला देणार हे महत्वाचं आहे. नव्यानं 'कमर्शिअल अडव्हायझर' असलेल्या प्रशांत किशोर त्यांना काय करायला लावणार हे पहावं लागेल. असं असलं तरी राहुल गांधींनी पहावं असं या देशात खूप काही आहे. कालाहंडी, मेळघाटात अजूनही तोच भारत आहे. जो महात्माजी, नेहरु आणि इंदिराजी यांच्या काळात होता. नथुराम, रझाकार, सु-हावर्दी यांच्या वारसदारांच्या 'सातबारा'वर अजून आळं झालेलं नाही, म्हणजे ती परंपरा खंडित झालेली नाही. लोकशाही क्रान्तीवाले लाल सलाम वीर आता बंदूक क्रान्ती करायचीय, असं म्हणताहेत. पूर्वी एकाच निजामाने स्वतंत्र राष्ट्राचा हट्ट धरला होता. आता सर्वच राज्यात निजामांचे वारस निपजले आहेत. महात्मा गांधींसाठी बिर्ला हे एक साधन होतं. आताचे बिर्ला सोनिया-राहुल गांधींना साधन मानतात. गांधीजी, पंडित नेहरु आणि इंदिराजींनी कार्यकर्त्यांच्या नजरेतून आणि त्यांना बरोबर घेऊन हा देश पाहिला. त्याबाबतीत राहुल गांधींना अनुकरण करावं लागणार आहे. पण त्यांच्या पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं केव्हाच श्राद्ध घातलं गेलंय. राहुल गांधींना भारत समजून घ्यायला ती एक मोठीच अडचण ठरणार आहे!"
-------–-----------------------------------


*शे*सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाची धुरा आता राहुल गांधी या 'नव्या गांधी' कडे सोपविली जाणार आहे. ते गेली दहा बारा वर्षे तसे राजकारणात आहेत पण त्यांचा म्हणावा तसा प्रभाव जनमानसात फारसा दिसत नाही. पण आता गुजरातमध्ये होणाऱ्या निवडणुक प्रचारात त्यांना थोडासा सूर सापडल्याचे दिसताच पक्षधुरीणांनी त्यांच्या मस्तकावर 'अध्यक्षपदाचा मुकुट' चढवायचं ठरवलं आहे. पण ही जबाबदारी स्वीकारताना त्यांना भारत, त्यातली माणसं आणि विशेष म्हणजे पक्ष समजला आहे का? त्यांना समजून घेतलं आहेका? गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे ही सूत्रं आल्यानंतर महात्मा गांधींनी गोखले यांना संपून भारत समजून घेण्याची सूचना केली होती. त्या सुचनेनंतर त्यांनीभारतयात्रा केली. तेव्हा कुठे त्यांना भारत थोडाफार समजला. गांधीजींनी आपल्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला भारतभ्रमण करण्याचा सल्ला दिला. पंडित नेहरूंनीही भारताचा अनुभव घेतला. इंदिरा गांधींनीही काँग्रेसच्या सरचिटणीस, अध्यक्ष असताना तेच केलं. मात्र गेल्या चाळीस-पन्नास वर्षात काँग्रेसच काय, सर्वच राजकीय पक्षांच्या नेतृत्वाला कधी भारत देश प्रत्यक्षात समजून घ्यावासा वाटला नाही. काहींच्या भारतयात्रा भारताला जागे करण्याऐवजी पेटवणाऱ्या ठरल्या. खऱ्या भारताचं सर्वांनाच विस्मरण झालेलं आहे. अशावेळी राहुल गांधींकडे काँग्रेस पक्षाच्या धुरा येते आहे. त्यांनी गोपालकृष्ण गोखले, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांनी मार्गक्रमण केल्याप्रमाणे भारतभ्रमण करायला हवं आहे. राहुल गांधींना भारत समजेल तो दिवस त्यांच्या पक्षानं धन्य व्हावा असा असेल!

*देशाचा शोध आणि बोध नाही*
भारत हा खंडप्राय देश आहे. एखाद्या राजकीय पक्षानं लोकशाही पद्धतीनं एवढ्या मोठ्या भूप्रदेशावर राज्य करावं असं जगात फक्त इथंच घडलं आहे. अनेक भाषा अनेक राज्य, त्यांची भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता, हे या देशाचं वैशिष्ट्य आहे. काँग्रेससारख्या एका पक्षानं ही विविधता आपल्या पोटात सामावून घेणं, ही बाब वाटते तेवढी सोपी नव्हती. तरीही या पक्षानं काही काळ हे शक्य करून दाखवलं. अर्थात हे शक्य कशामुळे झालं? तर त्यावेळच्या नेतृत्वाला भारत समजला होता! भारतानं त्या पक्षाला, त्यांच्या नेतृत्वाला समजून घ्यावं असा तो काळ होता. आज ती बाब भूतकाळ झाली आहे. काँग्रेसपक्षांची विद्यमान अवस्था त्यांना नव्या भारताचा शोध न लागल्यामुळे आणि बोध न झाल्यानेच झाली आहे. आज राहुल गांधींनी भारत समजून घ्यायचा, तर त्यांना ते शक्य होईल का? या गांधींना भारतानं समजून घ्यावं का? यासारखे प्रश्न निर्माण होऊ शकतात. पत्रकार मार्क टूली वा 'अंतरनाद' मासिकाचे भानू काळे हे आपल्या पुस्तकाचे म्हणतात तसा आजचा भारत खूपच बदललेला आहे. तो समजून घ्यायचा तर, सुरुवात मुळाक्षरापासून करावी लागेल.

*राष्ट्र संकल्पनाच धोक्यात आणली*
महात्मा गांधीजींनी जेव्हा भारताचं नेतृत्व केलं. नेहरू घराण्याने जेव्हा या देशावर राज्य केलं. तेव्हा या देशात 'राष्ट्र' या संकल्पनेचं अस्तित्व जाणवावं इतकं प्रबळ होतं. 'राष्ट्र' हाच लोकांचा, त्यांच्या नेत्यांचा अनेक बाबतीत प्राधान्यक्रम होता. काश्मीरचे शेख अब्दुल्ला असोत नाहीतर आसामचे गोपीनाथ बार्डोलोई असोत, त्यांनी देश एकसंघ होण्यासाठी केलेले प्रयत्न आजच्या मेहबुबा मुफ्ती वा सोनोवाल यांना माना खाली घालायला लावणारे आहेत. 'देश आधी नंतर राज्य' हे त्यांचं म्हणणं नेमकं उलट झालं आहे. के. कामराजांच्या राज्यात द्रमुकच्या करुणानिधींना वा अण्णा द्रमुकच्या राज्यकर्त्यांना राष्ट्रहितापेक्षा प्रथम राज्यहित महत्वाचं वाटतं. आणि सरदार पटेलांचे वारसदार नरेंद्र मोदी हे आजवर राज्यालाच महत्व देत होते. असं का होतं हे राहुल गांधींना समजून घ्यावं लागेल. त्यात आपल्या पक्षाच्या चुका किती, हे शोधावं लागेल. प्रादेशिक भावना आणि कट्टरतावादाचं खतपाणी आपल्याच पक्षानं पुरवलं नाही ना? हे तपासून पाहावं लागेल.

*पक्षाचा 'कार्यकर्ता'च मेला आहे!*
राहुलजींच्या काँग्रेस पक्षानं एकेकाळी या देशातल्या सर्व राज्यात राज्य केलं होतं. काँग्रेस हा एकच पक्ष असा होता, की जो देशभर राज्य करीत होता. आज ती स्थिती राहिलेली नाही. ईशान्य भारतातल्या राज्यात या पक्षाला उमेदवार मिळत नाहीत. उत्तरेतल्या बड्या राज्यात पक्षाची संघटना नाही.  देशभरात अत्यंत दयनीय अवस्था आहे. ही अवस्था का झाली? आज पक्षाच्या नेतृत्वाला भारत समजून घ्यावा लागतो, तो नकाशाच्या आधारे आणि माणसांशी संपर्क करावा लागतो तो मध्यस्थाच्या करवी, पक्षाची संघटना चालवावी लागते, ती नोकर-निष्ठावंतांच्या आधारे! आताशी पक्ष मूळ स्वरूपात राहिलेला नाही. पक्षातला कार्यकर्ता मेला आहे. त्यामुळे सोनिया-राहुल यांच्यापर्यंत खरा भारत पोहोचतच नाही. खऱ्या भारताचं प्रश्न त्यांना समजतच नाहीत. त्यावरची उत्तरं सुचत नाहीत. परिणामी, वास्तव बदलत नाही. काँग्रेसपक्षापुढं जे थिजलपण आलं आहे, ते त्यामुळेच! त्यात पुन्हा सोनिया-राहुल यांच्या अनुभवाचे, क्षमतेचे, मानसिकतेचे असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळेही त्यांना भारत समजत नाही.

*तेवढा वकुबच उरला नाही*
महात्मा गांधी, पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांना भारत कळला होता. कारण त्यांच्या क्षमता, ग्रहणशक्ती मुळातच अतिव्याप्त होत्या. प्राच्यविद्या, तत्वज्ञान आणि इतर सामाजिक शास्त्रांच्या माध्यमांतून त्यांनी भारताला समजून घेण्याची एक पद्धती विकसित केली होती. त्यामुळे या देशातल्या लोकांच्या भावभावना त्यांना चांगल्याच परिचित होत्या. या घराण्याविषयी मोठं आकर्षण आणि प्रेम जनमानसात अनेक वर्षे टिकून होतं. नेता कधी पक्षांपेक्षा मोठा असत नाही. मात्र हे तिघेही त्याला अपवाद ठरले. परिणामी, प्रसंगी पक्षसंघटनेला बाजूला ठेऊन ते लोकांशी संवाद साधत होते. त्यामुळेच इंदिरा गांधी यांना १९७१ आणि १९८० चे राजकीय विजय नोंदविता आले. भारत त्यांना कळला होता आणि भारतानेही त्यांना समजून घेतलं होतं. राहुल गांधींकडे पक्षाची धुरा सोपविली जाणार आहे त्यांना हा सारा संदर्भ कधीच विसरता येणार नाही. भारत समजून घ्यायचा तर भारताच्या लोकांचा इतिहास माहिती हवाच. मात्र त्यांच्या विद्यमान अवस्थेवर उपाय तो कोणता? हे ही त्या व्यक्तीला कळायला हवं. त्याबाबतीत राजीव गांधी अपुरे पडले होते. सोनिया गांधींना त्या बाबतीत नैसर्गिक मर्यादा होत्या आणि आहेत. तेवढा वकूबही नव्हता. तूर्तास राहुल गांधी तो वकूब प्राप्त करत आहेत, असं समजून चालावं लागेल. मात्र राहुलजींच्या भोवतीचं पर्यावरण, वर्तुळ त्यांनी भारत समजून घ्यावा असं नाही. त्याबाबतीत अनेक मुद्दे मूलभूत स्वरूपाचे असे आहेत.

*पक्ष संघटनाच उरली नाही*
काँग्रेस पक्षानं या देशात संसदीय लोकशाहीरूपी राजसत्ता आणली, हे त्या पक्षाचं ऐतिहासिक काम आहे. त्या लोकशाहीत कल्याणकारी राजव्यवस्थेचा संकल्प त्यांनी प्रत्यक्ष अस्तित्वात आणून दाखवला. भारत समजून घेतल्याने आणि त्या भारताला काय हवं आहे? हे नेतृत्वाने ओळखल्याने असं घडलं होतं. आता मात्र तसं नाही. राहुल गांधींना भारत समजून घ्यायचा, तर त्यांच्याच पक्षानं बदललेलं वास्तव मुळापासून समजून घ्यावं लागेल. आज या पक्षाला संसदीय लोकशाहीबद्धल सर्वाधिक प्रेम आहे, मात्र पक्ष संघटना नाही. लोकांना कल्याणकारी राज्यच हवं आहे. मात्र आजच्या काँग्रेस पक्षालाच तो कार्यक्रम जुनाट वाटतो. सरकार पुरस्कृत विकास, असं या पक्षानं आपलं तत्वज्ञान बनवलं आहे. 'पक्षाला भारत कळत नाही आणि त्यामुळेच भारत या पक्षाला जुमानत नाही!'

*कार्यकर्त्यांचं श्राद्ध घातलं गेलंय*
राहुल गांधी कुणाच्या डोळ्याने हा देश पाहणार आहेत. कोणत्या दृष्टीनं पाहणार आहेत हे महत्वाचे आहे. त्यांनी भारत फिरून पहावा अशी आपली इच्छा असली तरी त्यांचे सल्लागार त्यांना काय सल्ला देणार हे महत्वाचं आहे. नव्यानं 'कमर्शिअल अडव्हायझर' असलेल्या प्रशांत किशोर त्यांना काय करायला लावणार हे पहावं लागेल. असं असलं तरी राहुल गांधींनी पहावं असं या देशात खूप काही आहे. कालाहंडी, मेळघाटात अजूनही तोच भारत आहे. जो महात्माजी, नेहरु आणि इंदिराजी यांच्या काळात होता. नथुराम, रझाकार, सु-हावर्दी यांच्या वारसदारांच्या 'सातबारा'वर अजून आळं झालेलं नाही, म्हणजे ती परंपरा खंडित झालेली नाही. लोकशाही क्रान्तीवाले लाल सलामीवीर आता बंदूक क्रान्ती करायचीय, असं म्हणताहेत. पूर्वी एकाच निजामाने स्वतंत्र राष्ट्राचा हट्ट धरला होता. आता सर्वच राज्यात निजामांचे वारस निपजले आहेत. महात्मा गांधींसाठी बिर्ला हे एक साधन होतं. आताचे बिर्ला सोनिया-राहुल गांधींना साधन मानतात. गांधीजी, पंडित नेहरु आणि इंदिराजींनी कार्यकर्त्यांच्या नजरेतून आणि त्यांना बरोबर घेऊन हा देश पाहिला. त्याबाबतीत राहुल गांधींना अनुकरण करावं लागणार आहे. पण त्यांच्या पक्षाच्या खऱ्या कार्यकर्त्यांचं केव्हाच श्राद्ध घातलं गेलंय. राहुल गांधींना भारत समजून घ्यायला ती एक मोठीच अडचण ठरणार आहे!

*दरबारी नेता की, जनाधार असलेला कार्यकर्ता*
राहुल गांधी यांनी खरंच भारत समजून घेतला अन त्यांना तो समजला, तर ते काँग्रेस पक्षाच्या हिताचं होईल. कारण सर्वसामान्यांना हवी असलेली जी विश्वासार्हता हवी आहे, त्या बाबतीत या घराण्यातील व्यक्तीला अजून तरी पर्याय नाही. भारत समजणं म्हणजे या देशातले लोक समजणं. त्यांचे प्रश्न समजून घेण्यासारखं आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाला लगेचच या देशात बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र, त्यांच्या शोध-बोधातून अनेक समस्यांचं निराकरण होईल आणि काही समस्यां नव्यानं निर्माण होणार नाहीत. लोकशाहीवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ होईल. आज आपल्यासमोर विकासाचं प्रतिमान जागतिकीकरणाचं आहे. ते सर्व लोकांच्या हिताचं नाही हे स्पष्टच आहे. राहुल गांधींच्या भारतगमनातून, शोध आणि बोधातून कदाचित नव्या प्रतिमानाच्या पर्यायाचा विचार केला जाईल. लोकांच्या प्रगतीचं उलट फिरलेलं चाक पुन्हा सुलट केलं जाऊ शकतं. त्या पर्यायावर काँग्रेसला यावंच लागेल. कारण, विद्यमान व्यवस्थेत आपल्याला काहीच स्थान नाही, याबाबतीत काँग्रेसच्या मूळच्या जनाधारांना पक्की खात्री आहे. परिणामी, ते या पक्षापासून दूर गेलेत. राहुल गांधींनी भारत समजून घेताना आपला पक्षही कळेल. 'दरबारी नेता श्रेष्ठ की, जनाधार असलेला कार्यकर्ता मोठा', यातला फरक उमजून येईल. त्याचा त्यांच्या पक्षाला संघटनात्मक लाभच होईल. भारताची अव्यक्त ओळख वर्णनापलीकडची आहे. त्यांचं दर्शन राहुलना झालं तर? हा देश निश्चितच पुढं जाईल. पण राहुल गांधींना भारताचा शोध घेण्याचा मार्ग स्वतःलाच शोधायचा आहे.


*चौकट*

*जात वास्तव समजून न घेतल्याने काँग्रेसची ही अवस्था*

"एक काळ असा होता की, काँग्रेस पक्षात होणारा धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार वादातीत होता, अयोध्या प्रकरणानंतर मात्र या काँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेबद्धल गंभीरप्रश्न निर्माण केले गेले. या देशातील अल्पसंख्य या पक्षावर विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. बहुसंख्य त्याच मुद्द्याच्या बाबतीत या पक्षाचा द्वेष करतात. काँग्रेसचा ढोल असा दोन्हीबाजूनं फुटला आहे. तो त्या पक्षाला, त्या नेतृत्वाला देश न कळल्यामुळेच! त्याच बरोबर या पक्षानं 'जात वास्तव' समजूनच घेतलं नाही. राहुल गांधींनी, भारत समजून घ्यायचा तर, या देशातल्या जाती-पाती पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत. अन्यथा त्यांचा पोहरा कोरडाच राहील. या बाबतीत काँग्रेसपक्ष सपशेल नापासच ठरला आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांना ते भान चांगलं होतं. त्यांनी जाती तोडल्या नाहीत. मात्र त्या जाती एकमेकांच्या अंगावर जाणार नाहीत, याची काळजी घेतली. त्यांच्या बुद्धिबळात प्रत्येक जातीला स्वतःच एक घर होतं, त्यात त्या जाती आत्ममश्गुल होत्या. इंदिराजींच्या पश्चात हा पट उध्वस्त झाला. भारत समजून घ्यायचा, तर राहुल गांधींना जातींचं पुस्तक 'हँडबुक' म्हणून सतत जवळ ठेवावं लागेल!"


- हरीश केंची
९४२२३१०६०९

Tuesday 21 November 2017

बाळासाहेबांचा तिसरा डोळा...!

*बाळासाहेबांचा तिसरा डोळा*
"बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत एकीकडे रांगडेपण आहे आणि लुसलुशीत, अकृत्रिम अशी नजाकतसुद्धा! काळ्या दगडावर पांढरी रेघ तसा बाळासाहेबांचा आकृतिबंध. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय एकाही रेषेची लुडबुड नाही. सगळं चित्र एकदम कसं रेखीव आणि आखीव! व्यंगचित्राची गेगलाईन चमकदार आणि टवटवीत. भाषा कधी कुरकुरीत तर कधी करकरीत. कधी मोरपिसासारखी हळुवार, तर कधी चाकूच्या रेशीमपात्यासारखी...! विद्रोहाला कैकदा व्यंगाची मैत्री भावते असं म्हणतात, बाळासाहेबांबाबत हेच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची व्यंगचित्रं आणि त्याच्या कॅप्शन्सही याच कुळातलं. व्यंगाचा आधार घेऊन एका भेसूर, विद्रुप सत्याचं दर्शन घडवणारं! 'मी व्यंगचित्रकाराच्या हलकट नजरेतून सारं काही पाहतो' असं बाळासाहेब अनेकदा म्हणत असत. खरं तर त्यांच्याकडं 'थ्री डायमेंशनल' अशी नजर होती. आजूबाजूच्या भल्याबुऱ्या वास्तवातलं भेदक टिपणारी ही दृष्टी म्हणजे बाळासाहेबांचा 'तिसरा डोळा' !."
-------------------------------------------
*बा*ळासाहेब ठाकरे हे श्रेष्ठ दर्जाचे व्यंगचित्रकार होते. ते केवळ महाराष्ट्रातले, देशातलेच नाही तर जागतिक स्तरावर ते राजकीय व्यंगचित्रकार म्हणून ओळखले गेले. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रात मारलेल्या फटकाऱ्यात, अग्रलेखापेक्षा अधिक अर्थपुर्णता होती, मार्मिकता होती आणि चिमटेही होते. त्यांच्या व्यंगचित्रांना जागतिक मान्यता मिळाली पण त्यांच्या व्यंगचित्रकारितेची योग्य ती कदर करण्यात महाराष्ट्राने करंटेपणाच दाखविला असं खेदानं म्हणावं लागतं. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेचे शिक्षण कोणत्याही एका आर्ट स्कुलमध्ये झाले नाही. त्यांचा जन्मजात कल चित्रकलेकडे आणि व्यंगचित्रकलेकडे होता. त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेबांची चित्रं पाहून त्यांना आर्ट स्कुलमध्ये दाखल करणार होते. पण त्यांचे मित्र बाबुराव पेंटर यांनी प्रबोधनकारांना सांगितलं, 'दादा, मुलगा चित्रकार व्हायला हवा असेल तर त्याला आर्ट स्कुलमध्ये दाखल करू नका!' मग प्रबोधनकारांनी आपल्या नजरेखालीच बाळासाहेबांची व्यंगचित्रकलाची साधना सुरू झाली. त्याकाळी दादांची आंदोलने, समाजकार्य, लेखन, व्याख्याने सुरू होती. त्यामुळे बाळासाहेबांनी घरीच एकलव्याप्रमाणे व्यंगचित्रकलेची साधना केली. त्यात त्यांचे 'द्रोणाचार्य' होते, डेव्हिड लो, बॅन बेरी, दीनानाथ दलाल आणि त्यांचे वडील!

*ठाम, ठोस, स्वच्छ व्यंगचित्रं*
शिवसेनेच्या स्थापनेपूर्वी जी चळवळ बाळासाहेब मार्मिकमधून चालवीत होते. त्याने अनेक तरुण प्रभावित झाले होते, त्यापैकी मी सुद्धा होतो. मार्मिकमध्ये माझे आवडते सदर म्हणजे 'रविवारची जत्रा' ! अंकातल्या मधल्या दोन पानांवर बाळासाहेबांनी रेखाटलेली पांच सहा व्यंगचित्रं असत. त्यांचे विषय प्रामुख्यानं राजकारणातले असत. ते जाणून घेणं खूपच औत्सुक्याचे होते. मराठी माणसांच्या न्याय हक्काच्या चळवळीनं जसे तरुण आकर्षित झाले होते तशीच काही मंडळी व्यंगचित्रातूनही बाळासाहेबांकडे आकर्षित झाले होते. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या त्यावेळच्या दादरच्या घराबाहेर गर्दी होत असे. त्या गर्दीत मी एक होतो. बाळासाहेबांचं दादरचे ते छोटंसं घर, त्या घराच्या मागच्या बाजूला छोटीशी पडवी होती, आजूबाजूला हिरवंगार वातावरण, त्यातही डवरलेला हिरवा चाफा. यांच्या सानिध्यात बाळासाहेब बऱ्याचदा याच पडवीत मांडी घालून व्यंगचित्रं काढायला बसत. चित्र काढण्यासाठीचा बोर्ड, पेन्सिल, पांढरा स्वच्छ कागद, काळीभोर शाई, ब्रश, चारकोल हे त्यांचं सामान. पांढरा स्वच्छ कागद त्यावर ब्रशने फटकारे मारल्यावर जिवंत होई, ते पाहताना विलक्षण मजा यायची. एकदा का फटकारा मारला की मारला! पुन्हा रिटचिंग नाही. ठाम विचार स्पष्ट कल्पना, स्वच्छ चित्रांकन आणि आत्मविश्वासानं मारलेले फटकारे हे त्यांचे वैशिष्ट्य! त्या काळातले राजकारणी त्यांच्या गुणदोषासहित आम्हाला समजायचे. हा राजकारणी गमतीशीर आहे, हा नेता बदमाष वाटतो, हा कपटी आहे, हा खडूस, हा लुच्चा दिसतो....हा साधा सरळ, याचे डोळे घारे आहेत, याचं नाक मोठं आहे, याचे कारण मजेशीर आहेत. एवढं कशाला, ती व्यक्ती अगदी पाठमोरी असली तरी ओळखता यायची. कोणतीही व्यक्ती कोणत्याही अँगलने तिच्या हावभावासह रेखाटण्यात त्यांचा हातखंडा! चित्रात जवळच्या अंतरावरचे, दूरचे, मागे पुढे असल्याचा अंतराचा आभास कमीतकमी रेषांत ते लीलया दाखवीत. 'मार्मिक'पणा हा त्यांचा स्वभावातच मुरलेला त्यामुळे प्रत्येक व्यक्ती, घटना, घडामोडी याकडे त्याच दृष्टीनं पाहात असत.

*'महाराष्ट्रसेवक' बाळासाहेब*
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र अस्तित्वात आला तरी मराठी आणि मराठी तरुणांवरील अन्याय दूर झालेला नव्हता. ही मराठी माणसाची दुखरी नस बाळासाहेबांनी पकडली मार्मिक सुरू झाल्यानंतर त्या मराठीच्या जखमाला त्यांनी वाट करून दिली. मुंबईत मराठी माणसाला नोकऱ्या न मिळणे, सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या इथं वरिष्ठ व्यवस्थापक हे दक्षिण भारतीय असल्याने ते मराठी तरुणांची भरती करण्याऐवजी त्यांच्या प्रांतातील म्हणजे दक्षिणेकडील तरुणांची भरती करीत. या विषयाचा त्यांनी मार्मिकमधून पाठपुरावा सुरू केला. ते मोठाल्या कंपन्यात वरिष्ठ पदावर असलेल्या दाक्षिणात्य अधिकाऱ्यांची नांवेंच मार्मिकमधून प्रसिद्ध करू लागले. ती वाचून मराठी तरुण त्यांच्याभोवती गोळा होऊ लागले. यातून चळवळ सुरू झाल्यासारखे वातावरण तयार झाले. यातून उदयास आली 'शिवसेना'! त्यावेळी बाळासाहेबांनी सूत्र ठरवले होते ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण! या सुत्रानुसार काम सुरू झाले. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांनी स्वतःसाठी जे विशेषण वापरलं ते 'शिवसेनाप्रमुख' हे नव्हते. तर ते होते 'महाराष्ट्रसेवक'!

*थेट व्यंगचित्रांची रंगत*
बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रं अगदी थेट स्वरूपाची आहेत. त्या त्या व्यक्तीला उपहासाचा विषय बनवीत व्यंगचित्रं काढीत. आजही राजकीय व्यक्तींची व्यंगचित्रं प्रसिद्ध होत असतात. पण ती थेट नसतात, इनडायरेक्ट असतात. राजकीय व्यक्ती त्यात थेट दाखवलेल्या वा काढलेल्या नसतात. व्यक्तींवर थेट कॉमेंट्स नसते, असते ती अप्रत्यक्ष कॉमेंट! बाळासाहेबांनी व्यंगचित्रकारितेच्या काळात म्हणजे १९६० ते १९८५ या दरम्यान काढलेली थेट व्यंगचित्रं बघितली की अग्रलेखाची ताकद असलेली व्यंगचित्रं यापुढच्या काळात बघायला मिळाली नाहीत याची खंत वाटते. बाळासाहेबांनी महाराष्ट्राच्या संदर्भात जे विषय प्रथमपासून हाती घेतले त्यांचे स्वरूप आज फार मोठे झाले आहे. मुंबईचे नागरी प्रश्न, पाकिस्तानच्या कारवाया, बांगलादेशींची घुसखोरी, अल्पसंख्याकासाठी चाललेलं राजकारण, परप्रांतीयांचे लोंढे आणि त्यांच्या कारवाया, यासारखे विषय बाळासाहेबांना चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच जाणवले होते. हेच विषय परप्रांतातील नेत्यांनाही आता जाणवू लागले आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून असताना शीला दीक्षित यांनी अगदी जाहीरपणे कांहीं दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या की, दिल्लीच्या नागरी समस्या परप्रांतियांच्या लोंढ्यामुळे वाढत चालल्या आहेत. आजकाल राजकारण्यांवर थेट व्यंगचित्र काढलेली फारशी दिसतच नाहीत. यांचं कारण राजकारणी असंवेदनशील झाले आहेत. त्यांच्या त्या वाढत्या झुंडशाही आणि गटातटाच्या दहशतीमुळेदेखील व्यंगचित्रकार ते काढायला धजावत नाहीत. कोणत्या व्यंगचित्रामुळे कोण दुखावेल हे सांगता येत नाही. हल्ली राजकीय नेतेही खूप झाले असून त्यांनी पोसलेले 'कार्यकर्ते'ही खूप असतात. एखाद्या वृत्तपत्राने आमच्या नेत्याचा उपहास करणारे व्यंगचित्र छापलं की, लगेच काढा मोर्चा, करा मोडतोड, काचा फोडा, आग लावा आणि जा पळून! नेतेच अशा असंस्कृत प्रकारांना उत्तेजन देतात आणि बाहेरून अशा घटनांचा ढोंगीपणाने निषेधही करतात. वृत्तपत्रांच्या, नियतकालिकांच्या मालकांना राजकारण्यांची नाराजी ओढवून घ्यायची नसते. अशा राजकारण्यांच्यामार्फत मालकांनाही अनेक कामे सरून घ्यायची असतात. काही वृत्तपत्रांचे मालकच हल्ली राजकारणी असतात. व्रतस्थ पत्रकारिता संपुष्टात आली असून व्यापारवृत्तीच्या पत्रकारितेचे दिवस कधीच सुरू झाले आहेत. यामुळे संपादकच व्यंगचित्रकाराला म्हणतात, नको रे बाबा, डायरेक्ट व्यंगचित्र! तू इनडायरेक्ट टोमणाच मार काय मारायचा आहे तो..! पंचवीसेक वर्षात काळ आणि वातावरण किती बदललं! समाज अधिक शिक्षित होण्याची, शिक्षण प्रसाराची प्रक्रिया एकीकडे सुरू असतानाच तो अनुदार, असमंजस, वैचारिकदृष्ट्या अनपढ होण्याची प्रक्रियाही दुसरीकडे सुरू आहे. बाळासाहेबांनी रेखाटलेली बोचरी व्यंगचित्रं बघून नेहरू, इंदिराजी, चव्हाण, पवार यांनी बाळासाहेबांना दम दिल्याचे समजले नाही. मात्र ती व्यंगचित्रं बघून त्यांनी बाळासाहेबांचं कौतुकच केलं होतं. आजच्यापेक्षा पंचवीस तीस वर्षांपूर्वी अभिव्यक्ती स्वातंत्र्य अधिक होतं, असंच आजचं समाजचित्र सांगतं.

*'महाराष्ट्रभूषण' गौरव केला जावा*
एक व्यंगचित्रकार, एक संघटक, एक राजकीय नेता म्हणून बाळासाहेबांना कोणते विषय आणि प्रश्न महाराष्ट्राच्या दृष्टीनं जवळचे आणि जिव्हाळ्याचे वाटत असत, त्याची कल्पना त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रावरून येते. स्वतः बाळासाहेब यांनी फारसं लेखन केलेलं नाही पण त्यांची व्यंगचित्रं हेच त्यांचे वैचारिक लेख आहेत. त्याद्वारेच ते आपली मतं, विचार, भूमिका मांडत होते. गेल्या अर्धशतकात महाराष्ट्राच्या वैचारिक आणि सांस्कृतिक जीवनावर तथाकथित पुरोगामी, डावे आणि समाजवादी यांचा वरचष्मा राहिलाय. वृत्तपत्रसृष्टीत आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांवर याच मंडळींचा वरचष्मा आहे. या मंडळींनी बाळासाहेबांची प्रतिमा सातत्याने संकुचित विचारांचा, प्रतिगामी, धर्मवादी व्यक्ती अशीच रंगविली.या साऱ्यांमुळे मला एका गोष्टीची फारच रुखरुख लागून राहिलीय, ती म्हणजे बाळासाहेबांची उत्तमोत्तम व्यंगचित्रं आणि सर्वसाधारण वाचक यांच्यात पडलेलं अंतर! हे अंतर पडल्यामुळे महाराष्ट्रातल्या मत बनविणाऱ्या, ओपिनियन मेकर्स लोकांनी म्हणजे प्रसिद्धी माध्यमातील लोक, पत्रकार, प्राध्यापक, विचारवंत, अभ्यासक, या मंडळींनी समाजातल्या शिक्षितवर्गावर आपल्या मतांचा, निकषांचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव जो टाकायला हवा होता तो टाकला नाही. बाळासाहेबांची एक श्रेष्ठ दर्जाचा व्यंगचित्रकार अशी प्रतिमा तयार करण्यात रस दाखविला नाही. श्रेष्ठ राजकीय  व्यंगचित्रकार म्हणून तामिळनाडूतुन महाराष्ट्रात आलेल्या आर.के.लक्ष्मण यांचं जेवढं कौतुक महाराष्ट्रानं केलं, त्याच्या पावपटही कौतुक राजकीय व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांच्या वाटेला आलेलं नाही. महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी वर्गानं बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारितेचा यथोचित गौरव न करून करंटेपणाच दाखविला. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकारितेचा गौरव करण्याच्या भावनेतून महाराष्ट्र सरकारने त्यांना मरणोत्तर 'महाराष्ट्रभूषण' पुरस्काराने सन्मानित केले तर ते अधिक उचित ठरेल!

*व्यंगचित्रांची पुस्तके यावीत*
बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांची पुस्तके निघायला हवीत. काही वर्षांपूर्वी बाळासाहेबांच्या हयातीतच नाटककार प्र.ल.मयेकर यांच्या पुढाकारानं ' कुंचला आणि पलीत' हे त्यांच्या व्यंगचित्रांचं छोटेखानी पुस्तक निघालं होतं. अलीकडेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या परिश्रमानं 'फटकारे' नावाचं पुस्तक निघालंय. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत बाळासाहेबांनी म्हटलंय की, 'माळ्यावर टाकलेली आपली अनेक व्यंगचित्रे वाळवीनं खाऊन टाकली' हे वाचून खूप वाईट वाटलं. बाळासाहेबांची मार्मिक,बोचरी, बिनधास्त व्यंगचित्रे वाळवीनं खाऊन टाकल्याने महाराष्ट्राचं किती मोठं नुकसान झालंय हे शब्दात सांगता येणार नाही. प्रबोधनकारांची 'प्रबोधन' साप्ताहिकाचे अनेक अंक वाळवी लागल्याने नष्ट झाले होते पण सांगलीतल्या काकडवाडीतील काकडे नावाच्या गृहस्थाकडे ते अंक सापडले अन प्रबोधनकारांचा खजिना खुला झाला. तसंच बाळासाहेबांची व्यंगचित्रे वाचकांकडून मागवून पुस्तके काढायला हवीत. 'एका व्यंगचित्रकाराच्या नजरेतून स्वतंत्र भारताचा राजकीय इतिहास' लोकांसमोर येऊ शकेल. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांमध्ये एकीकडे रांगडेपण आहे आणि लुसलुशीत, अकृत्रिम अशी नजाकतसुद्धा! काळ्या दगडावर पांढरी रेघ तसा बाळासाहेबांचा आकृतिबंध. कुठेही उधळमाधळ नाही. कारणाशिवाय एकाही रेषेची लुडबुड नाही. सगळं चित्र एकदम कसं रेखीव आणि आखीव! व्यंगचित्राची गेगलाईन चमकदार आणि टवटवीत. भाषा कधी कुरकुरीत तर कधी करकरीत. कधी मोरपिसासारखी हळुवार, तर कधी चाकूच्या रेशीमपात्यासारखी...! विद्रोहाला कैकदा व्यंगाची मैत्री भावते असं म्हणतात, बाळासाहेबांबाबत हेच म्हणावं लागेल. बाळासाहेबांची व्यंगचित्रं आणि त्याच्या कॅप्शन्सही याच कुळातलं. व्यंगाचा आधार घेऊन एका भेसूर, विद्रुप सत्याचं दर्शन घडवणारं! 'मी व्यंगचित्रकाराच्या हलकट नजरेतून सारं काही पाहतो' असं बाळासाहेब अनेकदा म्हणत असत. खरं तर त्यांच्याकडे 'थ्री डायमेंशनल' अशी नजर होती. आजूबाजूच्या भल्याबुऱ्या वास्तवातलं भेदक टिपणारी ही दृष्टी म्हणजे बाळासाहेबांचा 'तिसरा डोळा' !.
- हरीश केंची.



लेखातील व्यंगचित्रे 'फटकारे' या पुस्तकातून साभार....!





Saturday 18 November 2017

गुजराती विकासाधिष्ठित राष्ट्रवाद...!



*गुजराती 'विकासाधिष्ठित राष्ट्रवाद!'*

"नरेंद्र मोदींच्या राजकारणातल्या कर्तृत्वानं अफाट रूप धारण केलं आहे. सर्व प्रस्थापित समीकरणांना त्यांनी खोटं ठरवलंय. तो एक यशाचा नमुना ठरलाय. भाजपमध्ये एवढं कर्तृत्व आजवर कुणालाही दाखविता आलेलं नाही. त्यामुळं मोदी त्या विचारांच्या दृष्टिकोनातून कौतुकास पात्र आहेत. मात्र यशाचा हाच फार्म्युला कायम ठेवून आणि ते ज्या मुद्द्यांचा पुरस्कार करून चालतात. ते घेऊन सततची वाट चालता येईल, असं नाही. अनेक जातींचा एकत्र गोफ गुंफून एका जाती-धर्माचा समुदायाचा द्वेष करणं, हे लोकशाहीतल्या राजकीय पक्षाचं लक्षण नसतं. द्वेषाचं रूपांतर हिंसेत होणं, हे तर कदापीच समर्थनीय नसतं. त्यातून हिटलर वा मुसोलिनी वा त्यांची संस्कृतीचं तयार होते. त्यातून काही प्रश्न सुटण्याऐवजी अनेक प्रश्न निर्माण होतात. मोदींची आजवरची वाटचाल परिस्थितीनुरूप घडलं असं म्हटलं, तर काही समजून घेता येतं. परंतु मोदींचं गतकर्तृत्व हा विषय कधीच समर्थन करण्यासारखा नाही. त्यांच्या कर्तृत्वाचं 'कल्चर'च करायचं असेल, तर ती बाब नागर समाजाला परवडणारी नाही. ती अमानवीकरणाकडे जाणारी वाट ठरू शकते. तूर्तास मोदींनी पहिले पाढे पुन्हा घोकू नये, एवढंच आपण म्हणू शकतो."
------------------------------------------

*ज*नसंघ ते जनतापक्ष आणि त्यानंतर पस्तीस वर्षात भारतीय जनता पक्ष हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय शाखेचं नांव आहे. या शाखेनं वेळेवेळी आपलं नांव बदललं आहे. नेते बदलले आहेत. चेहरे बदलले आहेत. मात्र विचाराचं सूत्र कधीच हरवलेलं नाही. ते हरवत चाललंय असं अधून मधून चित्र निर्माण केलं जातं. मात्र त्याचवेळी ते अधिकच घट्ट केलं जातं. २००४ च्या लोकसभेच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी यांनी भाजपला 'कायाकल्प' करण्याची संधी दिली. त्यावेळी मोदींनी गुजरात राज्य पुन्हा जिंकून आपण राष्ट्रीय दर्जाचे नेते आहोत हे सिद्ध केलं. त्या विजयानंतर मोदींचा पक्षातला दर्जा उंचावला गेला. त्याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राजकीय शाखेच्या नेतृत्वाचा आणि पुढील पंचवीस-तीस वर्षाच्या कार्यक्रमांचा प्रश्न त्यांनी मिटवून टाकला. इतरमागास समाजातला एक नेता आपला कार्यक्रम इतका यशस्वी करून दाखवतो, याबद्धल संघाला त्यावेळी प्रचंड आनंद झाला असावा. संघाच्या या नव्या संकल्पनेचं नांव होतं 'विकासाधिष्ठित राष्ट्रवाद'. संघाच्या या संकल्पनेची वरून दाखवत नसले तरी बिनचूक अंमलबजावणी सत्तेत असलेले संघीय करीत आहेत.

*गुजरातचा राजकीय पट*
गुजरात राज्याच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. प्रसारमाध्यमातून प्रचार मोहिमेत काँग्रेस पक्ष आघाडी घेत असल्याचं चित्र उभं नेहमीप्रमाणे केलं जातं आहे. पण पूर्वीच्या निवडणुका विचारात घेतल्या तर प्रत्यक्षात तसं काही घडलेलं नाही. आणि घडत नव्हतं. आताही असंच घडेल अशी शक्यता आहे. यापूर्वीचा गुजरातमधील चार निवडणुकात घेतले गेलेले सर्व एक्झिट पोल आणि प्री-पोल सर्व्हे फोल ठरलेले आहेत. *वास्तवाच्या दूर जाऊन किंवा चुकीची गृहीतकं मनी ठेवून विश्लेषण केलं, तर निष्कर्ष चुकीचा ठरतो, असं अनेकदा दिसून आलंय. खुद्द काँग्रेसचं आणि सर्वेक्षण करणाऱ्यांचे निष्कर्ष का चुकले? गुजरातचा निकाल असा का लागला?* हे समजून घेण्यासाठी परंपरागत दृष्टीनं विचार करून उपयोग नाही. त्यासाठी वास्तवाला भिडलं पाहिजे. आजवरचा गुजरातचा राजकीय पट समजून घेतला पाहिजे. अन्य राज्यात अनेक पक्ष अस्तित्वात आहेत. महाराष्ट्रात तर किमान सहा प्रमुख पक्ष आहेत. गुजरातमध्ये तसं नाही. तिथं जनता दल संपल्यानंतर फक्त काँग्रेस आणि भाजप असे दोनच पक्ष आहेत. कधी काळी हे राज्य काँग्रेसला मानणारं होतं. मात्र जसं जसं या पक्षाचं नेतृत्व दुबळ होतं गेलं आणि राज्यातलं नेतृत्व संपत गेलं, तेव्हापासून काँग्रेसचा पाया खचत गेला. या पक्षानं १९८५ मध्ये बहुमत मिळवलं होतं. ५५ टक्के मतंही मिळवली होती. मात्र त्यानंतरच्या १९९०च्या निवडणुकीत या पक्षाची सत्ताच गेली. गेल्या २५ वर्षात या पक्षाला तिथं बहुमत मिळालेलं नाही. आता तर मतांची टक्केवारी २८ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी इतरत्र कमी होते अन वाढते. गुजरातेत ती सातत्याने कमी का होतेय? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेसच्या विद्यमान अवस्थेवर प्रकाश टाकतं. गुजरातवर अनेक वर्षे माधवसिंह सोळंकी, अमरसिंह चौधरी यांचं राज्य होतं. क्षत्रिय, ओबीसी, मुस्लिम आणि आदिवासी यांच्या जातींचा समूह एकत्र करण्यात या दोघांना यश आलं होतं. केंद्रीय नेतृत्व या दोघांना एकमेकांच्या विरोधात वापरून वर्चस्वही ठेवत होतं. चिमणभाई पटेलांनी या समीकरणांचा १९९०मध्ये सर्वप्रथम पराभव केला. भाजपची या प्रयत्नात पटेलांना साथ होती. उत्तरप्रदेशातलं काँग्रेसचं ठाकूर-ब्राम्हण-मुस्लिम असं जे समीकरण होतं, ते जसं नेमकं १९९० मध्ये उध्वस्त झालं. तसं गुजरात काँग्रेसचं त्यावेळी झालं आहे.

*अकार्यक्षम अहमद पटेल*
सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल हे गुजरातचे. ते सोनिया गांधी यांना काय राजकीय सल्ला देत असतील, हे त्या दोघांनाच माहीत. तथापि, गुजरातच्या बाबतीत पटेलना काहीच समजत नसावं किंवा समजत असल्यास त्यावर उपाययोजना करण्याची त्यांची क्षमता नसावी. त्यामुळेच काँग्रेसला या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अहमद पटेलांनी पक्षासाठी कितीही पैसा गोळा केला, तो कितीही ओतला; शंकरसिंह वाघेला यांच्यापासून केशुभाई पटेल आणि दिनशा पटेलांपासून कांशीराम राणा यांच्यापर्यंत सर्वजण त्यांचे खातेदार असले, तरीही कांहीच उपयोग होणार नव्हता आणि आजवर झालंही तसंच!

*भाजपचा चेहरा मोदीच!*
गुजरातची दंगल ही त्यानंतरच्या काळात राजकारणाचा विषय राहिलेला होता. त्या दंगलीचे उपविषय प्रत्येक निवडणुकीत समोर आले होते. आताही ते येताहेत. गोध्रापासून सोहराबुद्दीन प्रकरणापर्यंत अनेक विषयांची पुनरुक्ती होणं हे अपरिहार्य असलं, तरी त्यामुळं काही राजकारण बदलणार नव्हतं आणि नाही. उलट असे मुद्दे कधीही उलटे-सुलटे परिणाम करू शकतात, हे लक्षात घेतलं गेलं नाही असंच आज पण घडतंय. गुजरातमधल्या दंगलींचा पुरस्कार हा भाजपसाठी त्या राज्यात उपयोगाचा ठरत आलाय. असं असताना काँग्रेसनं ते कारण आणखी घट्ट केलं. या कारणांचा काँग्रेसला देशात अन्यत्र विशेषतः मुस्लिम मतांसाठी उपयोग झाला असेल, मात्र त्यामुळे हिंदूंना आपण अधिक संख्येने तिकडं ढकलत आहोत, हे लक्षांत घेतलं गेलं नाही. सोनिया गांधींचं 'मौत के सौदागर' हे विधान त्यामुळेच मोदी यांना आक्रमक होण्यासाठी मदतदायी ठरलं. एकूणच जातीयवाद कसा समजून घ्यायचा? त्याचा कसा मुकाबला करायचा? हे काँग्रेस पक्षाला उमगलेलं नाही. खरं म्हणजे, आजचं राजकारणच काँग्रेसपक्षाला उमगलेलं नाही, आजचं गुजरातमधलं राजकारण काँग्रेसपक्षांच्या नेतृत्वाला कळतं का? हाच खरा मुद्दा आहे. आजही इंदिरा गांधीसारखं कर्तृत्व आणि राजीव गांधींएवढं बहुमत आणि पंडित नेहरूंएवढा जनाधार आपणास आहे असं समजून या पक्षाचे कारभारी मस्तीत वागतात. नेतृत्वाचा भ्रम जोपासतात. भ्रमाचे भोपळे पुनः पुन्हा फुटताहेत, ते त्यामुळेच!, त्या तुलनेत भाजपचं राजकारण सामूहिक हुशारीने आणि पुन: पुन्हा फोफावणार आहे. जातीयवाद हे त्यांच्या विचाराचं सूत्र आहेच. मात्र तो जातीयवाद ते बेमालूमपणे व्यवहारात आणतात.भाजपातील अतिमागासवर्गाचे नेते जेव्हा त्यांची भाषा बोलतात तेव्हा त्यांचा राजकारणाला व्यापक आधार मिळणार आहे. हे गृहीत धरायचं असतं. *मोदी जातीनं कोण आहेत? हा प्रश्न समाजशास्त्रज्ञानी चर्चेस घ्यावा. भाजपच्या लेखी मोदी कोणता कार्यक्रम राबवताहेत? ते कोणती भाषा बोलताहेत, हेच महत्वाचं असतं. संघाच्या राजकीय यशाचं हे सर्वात उत्तम उदाहरण आहे. दंगलीला पाठीशी घालणारा आणि विकासाची भाषा बोलणारा असाच चेहरा त्यांना हवा होता तो त्यांना मिळाला आहे.*

*महाजनी खेळी मोदींच्या पथ्यावर*
मोदींनी गुजरातमध्ये दोनतृतीयांश बहुमत मिळाल्यानंतर त्यांना महाराष्ट्रामध्ये आणलं होतं. काही सभाही घ्यायला लावल्या होत्या. तेव्हा मोदी महाराष्ट्रात फारसे परिणामकारक ठरले नव्हते. शिवाय प्रमोद महाजनांना मोदींचा महाराष्ट्रातला हस्तक्षेप मान्य नव्हता. कारण मोदी गुजरातेत येण्यापूर्वी दिल्लीच्या राजकारणात होते. पक्षाचे सरचिटणीस आणि प्रवक्ते होते. दिल्लीतील पत्रकारांशी चांगले संबंध होते. मोदींचा दिल्लीतला वाढता प्रभाव महाजनांना अडचणी निर्माण करणारा ठरत होता. म्हणून महाजनांनी गुजरातेतला निर्माण झालेला चिमणभाईविरुद्धच्या असंतोषाची संधी साधली आणि गुजरामधील नेतृत्व बदलाचा डाव टाकला. दिल्लीत वरचढ होऊ लागलेल्या मोदींना ते गुजराथी असल्यानं त्यांना गुजरातेत पाठविण्याचा निर्णय पक्षाला घ्यायला लावला.पक्षावर महाजनांची पकड होती. मोदी गुजरातेत जायला तयार नव्हते. मग महाजनांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना भरीला टाकलं. त्यांनी मोदींना 'तू गुजरातेत जावं हा माझा आदेश' असल्याचं सांगितल्यानं मोदींना गुजरातेत जावं लागलं. ते जरा नाखुषीनच तिथं गेले पण जाताना महाजनांना त्यांनी बजावलं होतं. 'मी जातोय गुजरातेत, पण मी जोवर तिथं आहे, तुम्ही तिकडं फिरकायचं नाही!' दुर्दैवाने थोड्याच दिवसात महाजनांचं निधन झालं. मोदींच्या कार्यकाळात महाजन गुजरातेत गेले नाहीत. मोदींना महाजनांवर राग होताच त्याचा अनुभव गोपीनाथ मुंडे यांच्यासह अनेकांनी घेतला होता. पण नाराजीनेच गुजरातेत गेलेल्या नरेंद्र मोदींच्या प्रारब्धात दिल्लीचं राजकारण होतं आणि त्याचा मार्ग गुजरातेतून होता. हे काळानचं सिद्ध केलं.

*नेतृत्वहीन भाजपला नेतृत्व मिळालं*
गुजरातेत मोदींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन महाराष्ट्रातल्या भाजपेयींनी मुंबईत आणि महाराष्ट्रभर पसरलेला गुजराती समाज नव्यानं भाजपशी जोडला जाण्याची शक्यता आहे हे जाणलं. महाजनांच्या निधनानंतर नेता नसणारा, आधार नसलेला पक्ष अशी भाजपची स्थिती झाली होती. केंद्रात वा राज्यात सत्ता नाही, कोणताही परिणामकारक कार्यक्रमही नाही. त्यामुळं कार्यकर्तेही हतबल झाले होते. भाजपचा गुजरातेतला मोदींच्या नेतृत्वाखाली मिळालेला विजय त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साह संचारला होता. त्यावेळी महाराष्ट्रातलं भाजपचं स्वरूप मुंडे-गडकरींचा पक्ष अशी झाली होती. मोदींच्या विजयानं ते स्वरूप, वा राज्यातील पक्षाची ओळख बदलण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते, असा विचार पक्षाच्या 'थिंग टॅन्क' मध्ये सुरू झाला. दरम्यान गडकरी दिल्ली पक्षाध्यक्ष म्हणून गेले. पक्षाच्या थिंक टॅन्कच्या विचाराला आकार येताचमोदींच्या लोकप्रियतेचा वापर करण्याचे पक्षानं निश्चित केलं. नवा शोध सुरू झाला, नवं नेतृत्व आकाराला आलं. पक्षाची राज्याची धुरा देवेंद्र फडणवीसांकडे आली. त्यानंतर मोदींनी दिल्लीतली सत्ता खेचून आणली. गुजरातेतलं नेतृत्व देशाचं नेतृत्व बनलं. राज्यात उत्साह संचारला, शिवसेनेशी युती संपुष्टात आली. महाराष्ट्रातही भाजपेयी मजबूत बनले, पक्षाच्या नेतृत्वापाठोपाठ देवेंद्र फडणवीसांकडे राज्याचं नेतृत्वही आलं! हे सारं घडलं ते गुजरातच्या निवडणुकीच्या निकालातून!

*मतदारांपुढे भावनिक प्रश्न*
देशातील राजकारणावर मोदींचं निर्विवाद असं वर्चस्व निर्माण झालंय.  त्याची सुरुवात गुजरातमधून झाली आहे हे वास्तव विरोधीपक्षांच्या नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळं काँग्रेसनं गुजरातच्या निवडणुकांना लक्ष्य केलं आहे. राहुल गांधींच्या वाऱ्या तिकडं सुरू आहेत. प्रशांत किशोर यांच्या राजकीय प्रचार मोहिमेतून मोदींना गुजरात आणि देशात यश मिळालं. नितीशकुमारांना बिहारमध्ये मिळालं. त्या प्रशांत किशोर यांच्या निवडणूक प्रचार तंत्राचा वापर राहुल गांधी आणि काँग्रेसनं आरंभलाय. तसा त्यांनी प्रशांत किशोरांचा उत्तरप्रदेशाच्या निवडणुकीत केला होता तिथं ते अपयशी ठरले, तरी देखील त्यांचाच सल्ला घेत, त्यांच्याच तंत्राचा वापर करीत राहुल यांनी गुजरातेत प्रचार मोहीम चालविलीय. त्याला प्रसिद्धीमाध्यमे भरघोस प्रसिद्धी देताहेत. याने भाजपेयी थोडेशे सावध झाले आहेत. मोदी आणि अमित शहा यांनी विशेष लक्ष द्यायला सुरुवात केलीय. कोणतीही रिस्क त्यांना घ्यायची नाही या जिद्दीनं ते उतरले आहेत. गुजराती मतदारांच्या दृष्टीनं हा भावनिक असा प्रश्न निर्माण झालाय. ज्याच्याकडे देशाने नेतृत्व सोपवलयं त्या आपल्या गुजराती माणसांच्या पाठीशी उभं राहायचं की निर्माण झालेल्या वातावरणाबरोबर जायचं!

*चौकट*

 *लैंगिक व्हिडीओ क्लिप*
गुजरातला काँग्रेसमुक्त करणारा समाज म्हणून पाटीदार-पटेल यांच्याकडे पाहिलं जातं. त्या समाजानं आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करून रान पेटवलं होतं, भाजपच्या विरोधात शस्त्र उगारलं होतं. हा समाज आता भाजपच्या विरोधात जातोय असं चित्र निर्माण झालंय.  त्यांच नेतृत्व २३वर्षीय हार्दिक पटेल या तरुणाकडं आहे. त्या हार्दिक पटेल याच्या लैंगिक व्हिडीओ क्लिप्स सध्या गुजरातेत पसरविल्या जात आहेत. त्या भाजपनं तयार केल्या आहेत असा आरोप हार्दिक आणि इतरांनी केला आहे. भाजपकडे तसा व्हिडीओ क्लिप करण्याचा इतिहास आहेच. मोदींना विरोध करणाऱ्या सुनील जोशी या संघ प्रचारकाची अशीच लैंगिक व्हिडीओ क्लिप केली होती. गुजरातचा प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस राहिलेल्या जोशींना अखेर राजकारणातून हद्दपार व्हावं लागलं आहे. तसं करण्यासाठी मोदी आग्रही होते हे विशेष...!

Saturday 11 November 2017

शिवसेना आणि राष्ट्रवादीनं एकत्र यावं!

*शिवसेना अन राष्ट्रवादीनं एकत्र यावं..!*

"महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. दोन्ही नेत्यांनी आपली भेट झाल्याचं प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं, पण या भेटीत काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात राहिलंय. पवारांनी राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरात बोलताना सांगितलं की, 'उद्धव ठाकरे सत्तेत राहण्याच्या मनःस्थितीत नाहीत, त्यांना पक्ष मजबूत करायचाय!' राज्यातील भाजपच्या सत्तेला पाठींबा देण्याबाबत मात्र त्यांनी शिवसेनेला गुगली टाकलीय. 'आधी पाठींबा काढा मग आम्ही आमचा निर्णय घेऊ!' असं सांगितल्याचं स्पष्ट केलंय. शरद पवार हे एखादं मत व्यक्त करतात तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात. त्यातून वेगवेगळे अर्थ काढले जातात, पण पवारांना जे काही सुचवायचं असतं ते आगामी राजकारणाची नांदी असू शकते, असं काही राजकीय निरीक्षकांचं मत आहे. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता, पवारांचं मत गांभीर्यानं घ्यायला हवंय. सत्तासाथीदार असलेली शिवसेना ही बाहेर विरोधीपक्ष म्हणूनच  वावरताना दिसते आहे.त्यामुळं आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सख्य घडलं तर आश्चर्य वाटायला नको."
-------------------------------------------------------------------


*रा*ज्याच्या राजकारणाचा, प्रादेशिक अस्मितेचा, मराठी माणसाच्या प्राधान्याचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रसंगी भाजपेयींची साथ सोडण्याची तयारी दिसतेय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्याने सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला शिवसेनेची साथ नकोशी झालीय. त्यामुळेच सत्तासाथीदार असला तरी भाजप शिवसेनेला फारशी किंमतच देत नाही. सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तांत्रिकदृष्टया शिवसेना आजही विरोधीपक्षातच आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि शिवसेनेला झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जर शिवसेनेनं घेतला तर राष्ट्रवादीचा 'अदृश्य हात' पुन्हा भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला वाटत असल्यानेच उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी मात्र आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिला नाही.

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसते आहे. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं.

*भाजपेयींचा कुटील डाव*
महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग.वा.बेहेरे, विद्याधर गोखले, दि.वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं.  त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्याने भाजपेयींनी नाना मार्गाने शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आजही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*राज्याचे तुकडे होण्याची भीती*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. पवार हे चाणाक्ष आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीच्या काळात 'शिवसेनेलाच यश मिळेल!' असं वक्तव्य करून त्यांना जो संदेश द्यायचा होता तो त्यांनी त्यावेळी दिला होता. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे. मुंबईत भाजपची सत्ता आली तर महाराष्ट्राचे तुकडे पडतील. विदर्भ हा भाजपच्या अजेंड्यावर आहेच, उद्या मुंबईदेखील वेगळी करतील हा धोका असल्याने त्यांनी शिवसेनेला महत्व दिले होते. वडीलकीचा सल्लाही दिला होता.

*शिवसेनेचा अस्तित्वाचा लढा*
राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हा पासून भाजपने हा शिवसेनेच्या विरोधात सवतासुभा उभा केला त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी अलीकडच्या मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केलीच शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. भाजपच्या ह्या कुटिल डावाला अप्रत्यक्षरीत्या साथ देण्यासाठी मनसेचे राज ठाकरे आणि काँग्रेसचे नारायण राणे यांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. राज आणि राणे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, या दोघांनी पवारांचा आशीर्वाद घेऊनच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई महापालिका आपल्याकडं राखली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं करायला हवाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. पवारांची त्यांनी घेतलेली भेट हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल व्हावं!

*प्रारंभी समाजवादींशी युती*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची आजची संभ्रमावस्था निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागणार की भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवायचं हा त्यांच्यापुढचा महत्वाचा प्रश्न आहे.

*शिवसेनेमुळे पवार काँग्रेस सोबत!*
२०००साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केलं असल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. सत्ता हाती ठेवण्याचं वा सत्तेवर अंकुश ठेवण्याची शिवसेनेची संधी त्यावेळी हुकली. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच!

*एकत्र यावं ही मराठी मनाची मनिषा*
या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेना काय करते हे पाहावं लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे स्वयंघोषित 'चाणक्य' आणि शिवसैनिक यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*चौकट*

*...तर राजकारणाला वेगळं वळण!*
चेंबुरच्या 'नाऱ्या'ला महाराष्ट्राचा सर्वसत्ताधीश बनवून 'नारायणराव राणे' असं नांव, प्रतिष्ठा, सत्ता, पैसा आणि वैभव सारं काही शिवसेनेनं मिळवून दिलं. त्याच शिवसेनेला संपविण्याचा विडा राणेंनी उचललाय. हा आपल्या राजकीय जन्मदात्या आईशी केलेला व्याभिचार म्हणावा लागेल! मित्रपक्ष म्हणविणाऱ्या भाजपने शिवसेनेवर शरसंधान साधण्यासाठी राणेंचा खांदा वापरण्याचं ठरवलंय. शिवसेनेसाठी दुखरी नस ठरलेल्या राणेंना सत्तेत सहभागी करून घेतानाच त्यांना मंत्रिपद बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेवर निवडून आणण्याचाही निर्धारही भाजपनं केलाय. हा अंदाज आल्यानेच शिवसेनेने शरद पवारांची भेट घेतली असावी. राणेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल अशी शक्यता आहे. याचे संकेत काल शिवसेनेचे नेते जलसंधारण मंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात दिले आहेत. असं घडलं तर राज्यात असलेलं सरकार अल्पमतात येईल. अशावेळी पुन्हा 'अदृश्य हात' धावून येईल की, सरकार गडगडेल हे ठरेल! म्हणजेच 'राणे इन अँड शिवसेना आऊट' असं घडेल अन राज्यात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता निर्माण होईल. हे जरी घडलं नाही तरी विधान परिषदेच्या निवडणुकीतुन राणेंना निवडून यावं लागेल त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले तर राणेंचा पराभव होऊ शकतो आणि त्यांना सत्तेपासून दूर ठेवता येईल. असं झालं अन तीन पक्षाची नवी आघाडी अस्तित्वात आली तर  महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेनं वळण घेईल....!
------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 4 November 2017

राहुल गांधींनी नेतृत्व सिद्धता...!


 *राहुल गांधींची नेतृत्वसिद्धता...!*

"'राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात' असं प्रशस्तीपत्र शिवसेनेच्या संजय राऊत यांनी नुकतंच जाहीरपणे दिलंय. ज्या राहुल गांधींची आजवर 'पप्पू' म्हणून हेटाळणी केली त्याच पप्पूमध्ये आता नेतृत्वाचे गुण दिसू लागली आहेत. ते देशाचं 'आशादायक' नेतृत्व असल्याचं विरोधकांना वाटू लागलंय. याचं कारण देशातील विरोधी पक्षाकडे भारतीय मतदारांकडे जाण्यासाठीचं स्वच्छ, उमदं आणि तरुण देशव्यापी व्यक्तिमत्व उरलेलं नाही. त्यामुळं राहुलना विरोधीपक्षातून पाठबळ मिळते आहे. राहुलनं देखील आपल्या वागण्यात आणि विशेषतः बोलण्यात आमूलाग्र बदल केलाय. उडवाउडवीची वा उगाच टीकेची वक्तव्ये आताशी करताना दिसत नाही. अमेरिकेतील भाषणापासून गुजरातमध्ये केलेल्या भाषणाकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्यात परिपक्वता दिसून येतंय. केवळ टीका न करता मुद्देसूद विरोध आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याचं कसब राहुलनं साधल्याचं जाणवतं. आगामी काळात देशाचं नेतृत्व करतील वा ना करतील पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ते योग्य आणि सिद्ध झालेत हे मात्र निश्चित!"
---------------------------------------------
[11/3, 8:30 PM] Harish Kenchi: *काँ*ग्रेस पक्षांचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना अध्यक्षपदावर बसविण्याची तयारी गेल्याकाही वर्षांपासून त्यांच्या समर्थकांनी चालविली होती. पण काही ना काही कारणं निघायची, बहुदा ती सारी नकारात्मकच असायची त्यामुळेच राहुल पक्षाध्यक्षपदावर आजवर आरूढ होऊ शकले नाहीत. पण आता मात्र 'ती' वेळ येऊन ठेपली आहे. लौकरच ते पक्षाध्यक्ष होतील. नेते वारंवार सोनियाजींना विचारत पण त्यांनी कधी त्यावर प्रतिक्रिया दिली नव्हती पण नुकतेच त्यांनीही या नेत्यांना 'आता तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आलीय!' असं म्हटलं आहे. याचाच अर्थ सोनियांनी राहुलना पक्षाध्यक्ष करण्यासाठीची संमती दिलीय.

*परिपक्वता दिसू लागली*
आजवर केवळ विरोधीपक्षातील लोकच नव्हे तर काँग्रेसमधीलही काहीजण राहुल यांच्याबाबतीत नकारात्मक बोलत, किंबहुना ते टिंगलटवाळीच करीत. त्यांना वक्तृत्व नाही, नीटसं बोलताही येत नाही. राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे त्यांच्यातला उथळपणा अनेकदा उघडकीला आलाय. असे अनेक आक्षेप घेतले जात होते. पण आता ही परिस्थिती बदलल्याचे जाणवतेय. गेल्या महिन्यात अमेरिकेतील लोकांशी राहुल गांधी यांनी जो संवाद साधला, तिथून परतल्यानंतर गुजरात दौऱ्यात त्यांनी जो प्रचार केला आहे तो पाहता त्यांच्यात खूप बदल झाल्याचं दिसलं. राहुलची भाषा, वक्तृत्वशैली, देहबोली वेगळीच दिसली. त्यांच्यातला उथळपणा आता दूर झाल्याचं आणि त्यांच्यात परिपक्वता आल्याचं जाणवलं. लोकांमध्येही त्यांची प्रतिमा बदलली गेल्याचं जाणवलं. विरोधीपक्ष त्यातही प्रामुख्यानं भाजपेयी राहुल यांची टिंगलटवाळीची, टीकास्त्र सोडण्याची, प्रहार करण्याची एकही संधी सोडत नव्हते. 'बच्चा', 'पप्पू' अशी संभावना भाजपेयी करीत. आताशी बदललेल्या वातावरणात राहुलनी केलेल्या प्रत्येक आरोपांची  टिंगलटवाळी न करता अत्यंत गांभीर्यानं भाजपेयी उत्तरे देताहेत. यात एक विशेष बाब ही की, गुजरातमध्ये काँग्रेसपक्षांची खिंड एकटे राहुल गांधी स्थानिक नेत्यांच्या साथीनं लढविताहेत तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यासह सर्व राष्ट्रीय नेत्यांची फौज भाजपने आपल्या प्रचारासाठी मैदानात उतरविली आहे.

*संयत पण प्रसंगी आक्रमक*
गुजरातमध्ये झालेल्या गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत काँगेसपक्ष अत्यंत मरगळलेल्या अवस्थेत होता. त्यांच्यातली जिद्दच संपली होती. निवडणूक लढवायची म्हणून लढविली जायची त्यात विरोध करण्याची ताकद, क्षमता, उत्साह वा सातत्य नसायचे. पण राहुल गांधींचा नुकताच झालेला प्रचाराचा झंझावाती दौरा आणि त्यांना मिळणारा लोकांचा प्रतिसाद पाहून कार्यकर्त्यांमध्ये आता आवेश, जोश, जिद्द आणि उत्साह ओसंडून वाहतो आहे. ते त्वेषाने बाहेर पडले आहेत. राहुल गांधी गुजरातच्या वेगवेगळ्या भागात फिरताहेत. गेल्या महिन्यात गुजरातची दोनदा वारी त्यांनी केलीय. या दौऱ्यात त्यांनी लोकांशी थेट संवाद साधला, आपल्या भाषणात त्यांनी त्यांना सामावून घेतलं.  पूर्वी कधी दिसला नाही तो जोश, ठोस आणि ठामपणा यावेळी दिसला. पूर्वीची त्यांची भाषण म्हणजे त्यांचं ते केवळ जोरात आरडाओरड, आकांडतांडव असे, कधी कधी तर ते अगदीच बालिश वाटत. पण सध्याच्या त्यांच्या भाषणात आमूलाग्र बदल झाल्याचं जाणवलं. आता ते संयमाने, शांतपणे, संयतपणे लोकांशी संवाद साधतानाच मध्येच आक्रमक होऊन भाजप सरकारवर टीका करताना दिसले. पूर्वी ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजप यांना लक्ष्य करताना टोकाची आणि एकांगी टीका करीत. पण आता त्यांनी आपली भाषणशैली पूर्णपणे बदललीय. ते आपल्या भाषणातून मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं, धोरणाचं वरवर कौतुक, स्तुती करीत त्यातील फोलपणा कसा आहे हे लोकांसमोर मुद्देसुदरित्या मांडताहेत. साधे, सोपे, स्वच्छ आणि माफक शब्द वापरून ते लोकांसमोर जाताना दिसताहेत.

*अकार्यक्षमतेची कबुली*
आपल्या बदललेल्या भाषणशैली बरोबरच राहुल गांधींनी आपल्यामध्येही बदल केलाय, एक नवा गुण अंगीकारलाय जो राजकारणी सहसा स्वीकारत नाहीत, तो म्हणजे गतकाळात पक्षाकडून झालेल्या चुकांची, गैरकारभाराची कबुली! अमेरिकेत केलेल्या भाषणापासून हे प्रामुख्यानं दिसलं. तिथं ते म्हणाले होते की, 'बेरोजगारी, बेकारीबाबत पक्षाचं अक्षम्य असं दुर्लक्ष झालंय, आपण काहीही केलं, कसंही वागलो तरी लोक आपल्यालाच निवडून देतात असा गर्व पक्षातल्या नेत्यांना झाला होता.  त्याशिवाय विरोधीपक्ष विस्कळीत असल्याने आपल्यालाच सत्ता मिळेल अशा भ्रमात पक्षाचे नेते होते.  त्यामुळेच २०१४च्या निवडणुकीत काँग्रेसपक्ष प्रचारात आणि प्रसिद्धीत भाजपला सडेतोडपणे उत्तर देण्यासाठी जिंकण्याच्या जिद्दीनं मैदानात उतरलाच नाही. परिणामी लोक काँग्रेसपक्षापासून दूर गेले. अशी कबुली त्यांनी तिथं दिली होती. झालेल्या पराभवातून पक्ष आता खूप काही शिकला आहे आणि झालेल्या चुका सुधारण्यासाठी पक्षानं कंबर कसलीय. निवडणुकीत भाजपनं प्रचारासाठी जी जी आयुधं वापरली ती सारी आयुधं वापरून आम्ही येणाऱ्या या निवडणुकांना सामोरं जातोय. असंही त्यांनी तिथं स्पष्ट केलं.

*सॉफ्ट हिंदुत्वाचा स्वीकार*
पूर्वी भाषण करताना वा प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना आपल्या वक्तव्याच्या हेडलाईन्स कशा होतील अशा दृष्टीनं राहुल आरोप करीत. आता ते त्यांनी सोडून दिल्याचं दिसतंय. केवळ टीका न करता त्या योजना कशा साकार होतील हे ते मांडतात. काँग्रेसपक्ष सत्तेवर आल्यास जीएसटी बाबत पुन्हा नव्याने समीक्षा करू, शेतकऱ्यांना, ग्रामीण भागात सेवा सुविधा पुरवू, तरुणांसाठी रोजगार उभा करू अशी आश्वासने ते देताहेत. व्यापारी, शेतकरी, तरुण, महिलांच्या प्रश्नांना हात घालतानाच, ते जिथे जातील तिथल्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतात. आदिवासींबरोबर नृत्यही करतात.  हे सारं करताना सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून काँग्रेसपक्ष देखील 'सॉफ्ट हिंदुत्व' स्वीकारत असल्याचं दाखवून देतात.

*आत्मविश्वास वाढलाय*
राहुल गांधींमध्ये जो प्रामुख्यानं बदल जाणवतोय तो म्हणजे त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास! पूर्वी त्यांच्यात तो फारसा जाणवत नव्हता. सध्याचं देशातलं बदललेलं वातावरण, राजकीय स्थिती आणि वास्तविकता याचं भान त्यांना आल्याचं दिसलं. अमेरिकेत बोलताना त्यांनी  म्हटलं की, 'जर पक्षाची इच्छा असेल तर आपण प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार व्हायला तयार आहोत!' यापूर्वी असं म्हणण्याचं धाडस त्यांनी कधी दाखवलं नव्हतं. त्यांचं हे वक्तव्य त्यांच्यात वाढलेला आत्मविश्वास दाखवतो. काही दिवसांपूर्वी अमेठीत ते म्हणाले होते, 'देशात प्रामुख्यानं ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी आणि तरुणांच्या प्रश्नावर सरकारनं काम करायला हवंय. मोदी सरकार जर हे करू शकत नसतील तर आम्ही हे सारे प्रश्न सहा महिन्यात सोडवून दाखवू!' हा आत्मविश्वास त्यांच्यात प्रथमच दिसून आला होता. नोटांबंदीवर राहुलनी जेव्हा टीका केली होती तेव्हा भाजपेयींनी त्यांची टिंगलटवाळी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना त्यांनी शांतपणे सांगितलं की, आपण माझी हवी तेवढी टिंगल करा पण मी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरं तरी द्या ना!

*कार्यकर्त्यांत उत्साह वाढला*
राहुल गांधी हे त्यांना लिहून दिलेलं भाषण वाचतात, अशी टीका भाजपेयी करतात. हे जरी खरं असलं तरी ती लिहून दिलेली स्क्रिप्ट कशी वाचायची, कधी, कोणत्या शब्दावर जोर द्यायचा, कोणत्या नाही ते त्यांनाच ठरवावं लागतं. त्यामुळे भाषणात जोश, आवेश आणि स्पष्टता दिसून येते. सगळेच राजकारणी स्क्रिप्टशिवाय बोलू शकतात असं नाही, लिहलेलं वाचणं असू द्या नाही तर ते तोंडपाठ केलेलं असू द्या, वा उस्फूर्तपणे केलेलं भाषण असो, ते तेव्हाच परिणामकारक समजलं जातं जेव्हा ते श्रोत्यांपर्यंत लोकांपर्यंत जाऊन भिडतं! राहुल यांच्या भाषणांना आता लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे याही पेक्षा कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे हे ही काही कमी महत्वाचं नाही.

*सोशल मीडियात आगमन*
राहुल गांधींमध्ये आणखी एक बदल झालाय. तो म्हणजे त्यांचं झालेलं सोशल मीडियावर झालेलं आगमन! आतापर्यंत भाजपेयी आणि नरेंद्र मोदींसाठी सोशल मीडिया हे अत्यंत महत्वाचं प्रचार आणि प्रसिद्धीसाठीचं प्रभावी माध्यम राहिलं आहे. आता राहुलनेही मोदींप्रमाणेच ही नीती वापरायचं ठरवलंय. प्रधानमंत्र्यांचा गुजरात दौरा असो, अमित शहांच्या मुलाच्या व्यवसायावर झालेला आरोप असो, पाकिस्तानबाबत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पचं निवेदन असो, वा भूकबळींच्या यादीत भारतातील भूकबळी वाढल्याची नोंद असो, प्रत्येक प्रसंगात राहुलने मोदींना सवाल करीत टीका केलीय. राहुलच्या ट्विटला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळतोय आणि फॉलोअर्सची संख्या सतत वाढत आहे.यात राहुलच्या सोशल मीडियाच्या टीमचा मोठा हात आहेच. पण आता सर्वांनाच ठाऊक आहे की, सर्वच राजकीय नेत्यांच्या सोशल मिडियावरची हजेरी ही त्यांची टीम सांभाळत असतात. राहुलना मिळणारा हा प्रतिसाद मतांमध्ये रूपांतर होईल की नाही हे आगामी निवडणुकीत कळेल!  आता काँगेसची नेते मंडळी म्हणू लागलीत की, 'राहुलने यापूर्वीच पक्षाची धुरा सांभाळायला हवी होती!' ते आज जी परिपक्वता दाखविताहेत यावरून त्यांची पक्षाध्यक्ष होण्याची हीच खरी वेळ आहे.

हिमाचल प्रदेशात मुख्यमंत्री वीरभद्रसिंह हे भ्रष्टाचाराच्या आरोपात गुरफटले आहेत. त्यामुळे तिथली सत्ता गेली तरी त्याला राहुलना जबाबदार धरलं जाणार नाही. गुजरातेत काँग्रेसपक्ष दोन दशकाहून अधिककाळ सत्तेपासून दूर आहे. आणि काँग्रेस सत्ताभ्रष्ट झाल्यापासून गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला बनलाय. तेव्हा इथं जर काँग्रेसचा जय झाला तर ते यश राहुल यांचं असेल. आणि पराभव झालाच तर त्याचं खापर मात्र राज्याच्या पक्ष संघटनेवर फुटेल! त्यामुळे या दोन राज्याच्या निवडणुकीत राहुल गांधींना गमावण्यासारखं काहीच नाही. एवढं मात्र खरं की, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींची बदलणारी प्रतिमा ही काँग्रेससाठी संजीवनी ठरेल. लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी देशात आगामी दोन वर्षात देशातील अनेक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकीसाठी काँग्रेसपक्ष राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली उतरू शकेल. विरोधी पक्षातील नेते म्हणत होते की, राहुल अद्यापि बालिश आहे तो 'मोठा' कधी होणार आहे? पण आता तेच नेते समजून गेले असतील की, राहुल आता केवळ आता केवळ मोठेच झाले नाहीत तर त्यांच्यासाठी ते एक आव्हान ठरताहेत!

*विरोधकांचंही आशादायक नेतृत्व*
राहुल गांधी देशाचं नेतृत्व करू शकतात' असं प्रशस्तीपत्र शिवसेनेच्या संजय राऊत यांनी नुकतंच जाहीरपणे दिलंय. ज्या राहुल गांधींची आजवर 'पप्पू' म्हणून हेटाळणी केली त्याच पप्पूमध्ये आता नेतृत्वाचे गुण दिसू लागली आहेत. ते देशाचं 'आशादायक' नेतृत्व असल्याचं विरोधकांना वाटू लागलंय. याचं कारण देशातील विरोधी पक्षाकडे भारतीय मतदारांकडे जाण्यासाठीचं स्वच्छ, उमदं आणि तरुण देशव्यापी व्यक्तिमत्व उरलेलं नाही. त्यामुळं राहुलना विरोधीपक्षातून पाठबळ मिळते आहे. राहुलनं देखील आपल्या वागण्यात आणि विशेषतः बोलण्यात आमूलाग्र बदल केलाय. उडवाउडवीची वा उगाच टीकेची वक्तव्ये आताशी करताना दिसत नाही. अमेरिकेतील भाषणापासून गुजरातमध्ये केलेल्या भाषणाकडे लक्षपूर्वक पाहिले तर त्यात परिपक्वता दिसून येतंय. केवळ टीका न करता मुद्देसूद विरोध आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याचं कसब राहुलनं साधल्याचं जाणवतं. आगामी काळात देशाचं नेतृत्व करतील वा ना करतील पण काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी ते योग्य आणि सिद्ध झालेत हे मात्र निश्चित!

*चौकट*

*दोन गुजराथी! देशात साथी!!*

आज देशाची सूत्रं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन गुर्जर बांधवांकडं आहेत. त्यांनी आपली उपयोगिता आणि उपद्रवता सिद्ध केलीय. त्यांच्या 'काँग्रेसमुक्त भारत' या घोषणेचं साऱ्या भारतानं स्वागत केलं. प्रसिद्धीमाध्यमाची सारी आयुधं वापरीत त्यांनी आपलं। नेतृत्व सिद्ध केलंय. देशात मुशाफिरी करताना आपल्या घराकडं नाही म्हटलं तरी थोडं दुर्लक्षच झालंय. याची जाणीव त्यांना झालेली दिसतंय म्हणूनच त्यांच्या गुजरातच्या फेऱ्या वाढल्यात. याचा गैरअर्थ विरोधीपक्ष आणि प्रसिद्धीमाध्यमांनी काढलाय. पण गुजराती जनतेला आपला गुजराती माणूस देशावर राज्य करतोय ही त्यांना सुखावणारी, भावणारी गोष्ट आहे. त्यामुळे ही जनता त्यांच्यामागे ठामपणे उभी राहील असं चित्र दिसतंय. पूर्वी स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी आणि वल्लभभाई पटेल या दोघा गुजरातींनी जसे योगदान दिलं आहे.तसं आता सुराज्यासाठी हे दोघे गुजराती झटताहेत असं त्यांना वाटतंय. तसं गुजरातींना वाटावं यासाठी सारे भाजपेयी झटताहेत.
--------------------------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९

आता लागणार साक्षमोक्ष...!

"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...