Friday 24 July 2020

राममंदिर निर्माणातील राजकीय अंत:प्रवाह

"येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोद्धेतील रामजन्मभूमीच्या वादानंतर उभारण्यात येणाऱ्या राममंदिराचे भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यानिमित्तानं प्रधानमंत्र्यानी भूमिपूजन करावं की नाही याबाबत चर्चा सुरू झालीय. भारताची 'धर्मनिरपेक्ष' भूमिकेला यामुळं धक्का लागेल असं काहींचं म्हणणं आहे. राममंदिरासाठी रथयात्रा काढणारे अडवाणी आजही कोर्टात खेटे घालताहेत. त्यांना यात फारसं महत्व दिलं जात नाही अशी खंत त्यांच्या समर्थकांना वाटतेय. २०२०-२१ मध्ये बिहार आणि बंगालच्या विधानसभा निवडणुका होताहेत तिथं हिंदुत्वाचा प्रचार व्हावा, भाजपला त्या जिंकता याव्यात यासाठी मंदिराच्या भूमिपूजनाचा घाट घातला गेलाय असं त्यांच्या विरोधकांना वाटतंय. तर राज्यात उद्धव ठाकरे यांनी राममंदिर हा आमच्या आस्थेचा प्रश्न आहे. असं म्हणत आम्ही राममंदिर भूमिपूजनाला जाणार आहोत असं स्पष्ट केलं आहे. राममंदिराच्या निर्माणाचा हा समारंभ धार्मिक न राहता त्यात राजकीय अंत:प्रवाह असल्याचं दिसून येतंय!"
-------------------------------------------------------------

*श्री* राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भूमिपूजनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रण दिलंय. दरम्यान या निमंत्रणाच्या निमित्तानं स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमधील सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण करताना तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू सहभागी झालेले नव्हते यावरून नव्यानं चर्चा सुरू झालीय. कारण नेहरूंनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणापासून स्वतःला दूर ठेवलं होतं. हे इथं लक्षांत घ्यायला हवं! पण आजची स्थिती आणि तत्कालीन परिस्थिती अत्यंत वेगळी आहे. आपण एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालो तर भारताची 'धर्मनिरपेक्ष' म्हणून जी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न तत्कालीन सरकारनं चालविला होता, त्याला धक्का लागेल अशी भावना प्रधानमंत्री नेहरू यांची होती त्यामुळं त्यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण कार्यक्रमात सहभागी होण्याचं टाळलं होतं. पण आजची परिस्थिती तशी नाही. हिंदुत्वाचा जयघोष करीत, हिंदुराष्ट्राचं स्वप्न पहात सत्तेवर आलेल्या भाजपेयींना राममंदिर निर्माणात रस आहे. किंबहुना 'याचसाठी केला होता अट्टाहास!' अशी मानसिकता असल्यानं त्याचे धुरीण म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोद्धेतील रामजन्मभूमीवर उभारण्यात येणाऱ्या भव्य राममंदिराच्या भूमिपूजनात सहभागी होऊ शकतात! त्यामुळं पुन्हा एकदा सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माण कार्यक्रमात सहभागी तत्कालीन प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू सहभागी न झाल्याच्या चर्चेनं पुन्हा एकदा जोर धरलाय. प्रश्न असा उठतो की, प्रधानमंत्री नेहरू यांनी तिथं जाण्याचं कोणतं कारण होतं? राजकीय की, आणखी काही?

*सरकारनं नव्हे तर ट्रस्टनं पुनर्निर्माण करावं:नेहरू*
इथं सांगितलं पाहिजे की, स्वातंत्र्यापूर्वी गुजरातमधल्या पाकिस्तानच्या सीमेवरील हिंदूबहुल लोकसंख्या असलेल्या जूनागढ संस्थानच्या मुस्लिम नबाबानं १९४७ मध्ये पाकिस्तानशी आपलं संस्थान जोडण्याचा, पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला होता. पण भारतानं नबाबांच्या हा निर्णय फेटाळला आणि संस्थान भारतात विलीन करून टाकलं. त्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी या संस्थानात असलेल्या सोरटी सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण करण्याची घोषणा केली. परंतु ५ डिसेंबर १९५० रोजी पटेलांचं निधन झालं. भाजपेयीं ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण संदर्भात लिहिलं होतं की, "सरदार वल्लभभाई पटेल यांना या मंदिराच्या पुनर्निर्माण साठी त्यांना महात्मा गांधी यांच्या आशीर्वादाबरोबरच जवाहरलाल नेहरूंचं समर्थन आणि के. एम. मुन्शी आणि काकासाहेब गाडगीळ यांचा सहयोग त्यांनी मिळवला होता. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते की, सरकारऐवजी लोकांनी मंदिर पुनर्निर्माण करण्यासाठी निधी उभा केला तर ते चांगलं होईल. त्यानंतर सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कामासाठी एक स्वतंत्र ट्रस्टची स्थापना केली गेली आणि लोकांकडून निधी उभारला गेला होता!" प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांचं असं मत होतं की, सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्यासाठी सरकारची कोणतीच भूमिका असता काम नये. हे काम ट्रस्टनं करायला हवंय. त्यानंतर ५ मार्च १९५० रोजी ट्रस्टचं काम सुरू झालं आणि जुनागढचे महाराज जामसाहेब यांनी त्या मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कामाची पायाभरणी केली. शिलान्यास समारंभ झाला. १९५१ पर्यंत मंदिराचा बेस आणि गर्भगृह तयार झालं होतं.

*विरोधानंतरही राष्ट्रपती भूमीपूजनात सहभागी*
एका वृत्तानुसार के. सी. मुन्शी यांनी १९५१ मध्ये सोमनाथ मंदिराच्या उदघाटनासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. त्यावेळी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंनी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांना एक पत्र लिहून मिळालेल्या आमंत्रणाबाबत आपण पुनर्विचार करावा. त्यांनी त्या पत्रात म्हटलं होतं की, "भारत हा एक धर्मनिरपेक्ष देश आहे. राष्ट्रपतींनी एखाद्या मंदिराच्या कार्यक्रमात जाण्यानं लोकांमध्ये वेगळा संदेश जाईल आणि त्याचे वेगवेगळे अर्थ आपापल्या पद्धतीनं लोक काढतील. तेव्हा आपण या आमंत्रणाबाबत पुनर्विचार करावा!" वरिष्ठ पत्रकार साकेत गोखले यांनी ट्विट केलं आहे की, "२ मे १९५१ रोजी पंडित नेहरूंनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्याना एक पत्र लिहलं त्यात म्हटलं होतं की, सोमनाथ मंदिराच्या उदघाटनाचा कार्यक्रम हा सरकारी नाही आणि भारत सरकारला त्याबाबत काही देणंघेणं नाही. आपल्या असं कोणतीही गोष्ट करायलाच नको की, ज्यामुळं एक 'सेक्युलर स्टेट' च्या आपल्या मार्गावर अडचणी निर्माण होतील. हाच आपल्या राज्यघटनेचा आधार आहे. म्हणून देशाच्या 'सेक्युलर केरेक्टर' ला धक्का पोहचेल अशा कोणत्याही बाबींपासून त्या त्या सरकारनं स्वतःला दूर राखायला हवंय! पंडित नेहरुंच्या त्या पत्रातला सल्ला डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी मानला नाही. ११ मे १९५१ रोजी सोमनाथ मंदिर पुनर्निर्माणाच्या उदघाटनात त्यांनी सहभाग घेतला. त्यावेळी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद म्हणाले होते की, "पुनर्निर्माणाच्या मार्गावरील सोमनाथ मंदिरानं हे दाखवून दिलंय की, पुनर्निर्माणाची ताकद ही उध्वस्ततेचा ताकदीपेक्षा अधिक जास्त असते हे जगाला दाखवून देण्याची ही एक संधी असल्यानं मी इथं आलोय!" परंतु नेहरूंनी स्वतःला सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धार आणि पुनर्निर्माणाच्या बाबतीत वेगळं ठेवल होतं, कारण देशाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर कुणालाही बोट दाखविण्याची संधी मिळू नये! असं त्यांचं मत होतं

*राममंदिर भूमिपूजनात राजकीय डावपेच!*
अयोध्येतील राममंदिराच्या भूमिपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यामागं अनेक राजकीय अंत:प्रवाह आहेत. ५ ऑगस्ट हा जम्मू-कश्मीरचा विशेष घटनात्मक दर्जा रद्द केल्याच्या घटनेचा पहिला स्मरणदिवस आहे. राज्यघटनेतील कलम ३७० रद्द करण्याची संघ परिवाराची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी याच दिवशी पूर्ण करण्यात आली होती. राममंदिराची मागणीही संघानं गेल्या अनेक दशकांपासून लावून धरलेली आहे. या दोन घटनांमध्ये अशा पद्धतीनं दुवा साधून एक स्पष्ट राजकीय संदेश दिला जात आहे. ३ किंवा ५ ऑगस्ट या दोन दिवसांची भव्य ‘भूमिपूजन’ सोहळ्यासाठी शिफारस करताना, रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी हे दोन ‘शुभ’ दिवस असल्याचं नमूद केलं आहे. मात्र, हे दोन दिवस नेमके का ‘शुभ’ आहेत याचं तपशील ट्रस्टच्या प्रवक्त्यानं दिलेलं नाही. देशात कोरोना विषाणूच्या साथीचं थैमान अद्याप सुरू असताना आणि अनलॉकच्या दुसऱ्या टप्प्यातही धार्मिक आणि अन्य सोहळ्यांवर बंदी असताना ५ ऑगस्टला भूमिपूजनाचा घाट घातला जात आहे, यामागील राजकीय डावपेच दुर्लक्ष करण्याजोगं नाहीत. कोरोनाच्या साथीमुळं मोठ्या सार्वजनिक संमेलनांवर तर बंदी घालण्यात आलीच आहे, शिवाय ६५ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना अत्यावश्यक किंवा आरोग्याच्या कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. मात्र, या सोहळ्याला उपस्थित राहणं अपेक्षित असलेल्यांपैकी किमान १००-१५० जणांचं वय ६५ वर्षांहून अधिक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे दोघेही ६९ वर्षांचे आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंदिराच्या प्रकल्पाचं भूमिपूजन ‘अत्यावश्यक’ कसं हे समजणं कठीण आहे.  अर्थात ‘राजकीय’ दृष्टीनं ते अत्यावश्यक समजलं जाऊ शकतं. दरम्यान राममंदिराची पूजा रोखण्यासाठी सागर गोखले या दिल्लीतील पत्रकारानं अलाहाबाद हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती पण न्यायालयानं ती फेटाळलीय. राममंदिराचं भूमिपूजन हे कोविड १९ अनलॉक-२ च्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन होत आहे. भूमीपूजनासाठी जवळपास ३०० लोक एकत्र येणार आहेत हे कोविड १९ च्या नियमांच्या विपरीत आहे. म्हणून भूमिपूजन समारंभ रोखण्यात यावं असं या याचिकेत मागणी केलीय. या समारंभाने कोरोनाचं संक्रमण वाढणार आहे. याच कारणामुळं बकरी ईदच्या सामूहिक नमाजला परवानगी नाकारलीय. या याचिकेत राममंदिर ट्रस्टबरोबरच केंद्र सरकारलाही पक्षकार बनवलं गेलं होतं. त्यामुळं भूमीपूजनातील मार्ग मोकळा झालाय!

*बिहार-बंगालच्या निवडणुका डोळ्यासमोर*
बिहारमध्ये याचवर्षी म्हणजे २०२० मध्ये, तर पश्चिम बंगालमध्ये २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका आहेत हे लक्षात घेता राममंदिराच्या बांधकामाच्या दृष्टीनं एक ठोस पाऊल उचललं गेल्यास त्यातून मोठा फायदा उचलता येईल अशी आशा भाजपला वाटत आहे. या दोन्ही राज्यांतील निवडणुकांमध्ये पक्षाचा भर हिंदुत्ववादावर असणार हे निश्चित आहे. ज्या जमिनीवर एकेकाळी बाबरी मशीद उभी होती, त्याच जागेवर राममंदिर उभे राहिले तर २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतही फायदा निश्चित आहे. ट्रस्टच्या सदस्यांची शनिवारी अयोध्येत माजी वरिष्ठ सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. ट्रस्टचे ११ सदस्य अयोध्येत उपस्थित होते, तर उर्वरित ४ सदस्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून भाग घेतला. उत्तर प्रदेशाच्या केडरमधील आयएएस अधिकारी मिश्रा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे माजी प्रधान सचिव होते आणि त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. यांमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ट्रायच्या अध्यक्षपदाचाही समावेश होतो. त्यापूर्वी त्यांनी उत्तर प्रदेशातील दोन भिन्न विचारसरणीच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केलं आहे. समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव आणि भाजपचे कल्याणसिंह हे ते दोन मुख्यमंत्री. विरोधाभास म्हणजे १९९० मध्ये अयोध्येत आलेल्या हिंदुत्ववादी कारसेवकांवर गोळीबाराचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंहांनी दिले, त्यावेळी मिश्रा त्यांचे प्रधान सचिव होते. २०२० च्या सुरुवातीला त्यांच्यावर ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली. मंदिराच्या बांधकामाचे काम या ट्रस्टकडं सोपवण्यात आलं आहे. मिश्रा यांनी स्वत:ला प्रसारमाध्यमांपासून दूर ठेवलंय. ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि सदस्य कामेश्वर चौपाल हेच घोषणा करण्यासाठी पुढं आले आहेत.

*चंद्रकांत सोमपुरा हे राममंदिराचे आर्किटेक्ट*
“आम्ही ३ ऑगस्ट आणि ५ ऑगस्ट हे दोन दिवस भूमिपूजनासाठी सुचवले आहेत आणि आता यातील कोणती तारीख पंतप्रधानांना जुळते हे बघून पंतप्रधान कार्यालयानं निर्णय घ्यायचा आहे. कारण, भूमिपूजनाच्या दिवशी पंतप्रधान इथं यावेत अशी आमची अत्यंत उत्कट इच्छा आहे,” असं चौपाल यांनी सांगितलं आहे. लक्षणीय बाब म्हणजे चौपाल यांचा अयोध्या मंदिराशी १९८९ सालापासून संबंध आहे. काँग्रेस सत्तेत असताना त्यांना मंदिराचा ‘शिलान्यास’ करण्यासाठी खास बोलावण्यात आलं होतं. अयोध्येतील राममंदिराची कोनशिला ठेवण्यासाठी सामाजिकदृष्ट्या तथाकथित वंचित समाजातील व्यक्तीला मान दिल्याचा दावा काँग्रेसचे नेते त्यावेळी करत होते. मंदिराच्या बांधकामासाठी तयारीचा भाग म्हणून संपूर्ण ६७ एकरांचा भूखंड कशा पद्धतीनं समतल करण्यात आला हे राय यांनी सांगितलं. त्यांनी सांगितल्यानुसार, लार्सन अँड टुब्रो या अग्रगण्य बांधकाम कंपनीला यापूर्वीच मातीची तपासणी करण्याचं काम देण्यात आलं होतं. मंदिराचा मूळ आराखडा तयार करणारे आर्किटेक्ट चंद्रकांत सोमपुरा या आराखड्यावर ट्रस्टनं केलेल्या सूचनांच्या आधारे शेवटचा हात फिरवत आहेत. ते म्हणाले, “अंतिम आराखड्यानुसार, आता मंदिराला पाच कळस असतील. सुरुवातीच्या आराखड्यात तीन कळस सुचवण्यात आले होते. मंदिराची उंचीही वाढवण्याची शिफारस करण्यात आली आहे. मूळ आराखड्यात मंदिराची उंची १२८ फूट होती, ती आता १६१ फूट करण्यात आली आहे.” भारतातील अनेक ठळक मंदिरांच्या रचनेचं श्रेय सोमपुरा यांच्या कुटुंबाकडे जातं. सोमपुरा यांचे वय आता ८०च्या घरात आहे पण मंदिराच्या आराखड्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी ते उत्सुक आहेत. राय यांनी सांगितल्यानुसार, “मंदिरासाठी मोठ्या प्रमाणात लागणारे दगड कोरून सज्ज करण्यात आले असल्याने मंदिराचं बांधकाम ३६ ते ४२ महिन्यांत पूर्ण होऊ शकतं.” याचा अर्थ अयोध्येतील राममंदिर २०२३ सालाच्या मध्यास किंवा अखेरीस पूर्णत्वाला जाईल. अर्थात २०२४ साली होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या सहा महिने आधी हे मंदिर उभं राहिलेले असेल. राममंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यास निवडणुकीच्या निकालावर त्याचा कसा परिणाम होतो याचा अंदाज तर कोणीही बांधू शकेल!

चौकट
*राममंदिराबाबत शिवसेनेचा अधिकार मोठा*
एका वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत शिवसेना विषयाचे अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी रामजन्मभूमी आणि हिंदुत्व या विषयावर बोलताना रामजन्मभूमी आणि हिंदुत्वावर भारतीय जनता पक्षापेक्षा शिवसेनेचा जास्त अधिकार आहे असं प्रतिपादन केलं. आपलं म्हणणं स्पष्ट करताना अकोलकर यांनी सांगितले की, "१९८७ साली मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेनं रमेश प्रभू यांना उभं केलं होतं तर त्या निवडणुकीत शिवसेनेला विरोध करताना भाजपनं पुलोदचा घटकपक्ष असलेल्या जनता दलाच्या उमेदवाराला पाठींबा दिला होता. विलेपार्लेच्या त्या निवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा 'गर्वसे कहो हम हिंदू हैं।' अशी घोषणा दिली आणि ती घराघरात पोहोचविली. त्यांनी निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला. त्यानंतर १९८९ साली पालमपूर इथं झालेल्या भाजपच्या अधिवेशनात लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजनांनी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाला पाठींबा देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तोपर्यंत भाजपनं रामजन्मभूमी वा हिंदुत्वाचा पुरस्कार केलेला नव्हता. विश्व हिंदू परिषद आणि तत्सम काही हिंदुत्ववादी संघटना रामजन्मभूमीसाठी आंदोलन करीत होती. त्यावेळी भाजप याकडं दुरूनच पहात होती. त्यानंतर १९९० मध्ये अडवाणी यांनी रथयात्रा काढली, १९९२ मध्ये बाबरी मशिद पाडली गेली. त्यावेळीही भाजप नेत्यांनी कच खाल्ली, तेव्हा शिवसेनाप्रमुख ठाकरे यांनी ' जर बाबरी शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्यांचा मला अभिमान आहे!' असं म्हणून जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे राममंदिराबाबत शिवसेनेचा अधिकार भाजपपेक्षा अधिक आहे. भाजपचा बेस-कक्षा मोठी असल्यानं त्याला व्यापक स्वरूप आलं. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणतात ते खरं आहे. राममंदिराबाबत त्यांचा अधिकार मोठा आहे!" अकोलकरांच्या या माहितीनं भाजपेयींना हे लक्षांत आलं असेलच. इथं आणखी एक महत्वाचं की, निवडणुकीत हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून शिवसेनाप्रमुखांचा निवडणुकीतील 'मतदानाचा अधिकार' सहा वर्षांसाठी गोठविला होता!

हरीश केंची
९४२२३१०६०९

शिवसेना अन राष्ट्रवादीनं एकत्र ..!

"महाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. नुकतंच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे स्मारकात भेट झालीय, याला अनेक कंगोरे आहेत. याला वेगवेगळे अर्थ आहेत, महाराष्ट्राची सत्ता ही तीन पक्षाची असताना यातल्या काँग्रेसला विश्वासात घेतलं जातं नाही असं म्हटलं जातंय. त्या पार्श्वभूमीवर आगामी राजकारणासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यायचं ठरवलंय. रायगडमध्ये या दोन्ही पक्षात वाद होते. हे वाद मिटविण्यासाठी ही बैठक झाली असली तरी आगामी राजकारण कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे संकेत या निमित्तानं मिळताहेत. राज्यात सेना-भाजप ही युती संपुष्टात आल्यानंतर हे नवीन समीकरण अस्तित्वात येत आहे. २५-३० वर्षांपूर्वी खरं ते घडलं असतं पण बाळासाहेब ठाकरे-शरद पवार या दोन लोकनेत्यांना भाजपनं जाणूनबुजून एकमेकाविरोधात लढवून आपला कार्यभाग साधला होता. या दोन पक्षांनी एकत्र यावेत असं मराठी माणसाला जे वाटत होतं ते आता प्रत्यक्षात येतंय!"
-------------------------------------------------------------------

*रा*ज्याच्या राजकारणाचा, प्रादेशिक अस्मितेचा, मराठी माणसाच्या प्राधान्याचा विचार करता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रसंगी भाजपेयींची साथ सोडलीय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्यानं सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला जशी शिवसेनेची साथ नकोशी झालीय, तशीच शिवसेनेला भाजपची! त्यामुळेच सत्तासाथीदार होता तरी भाजप शिवसेनेला फारशी किंमतच देत नव्हती. २०१४ मध्ये सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तांत्रिकदृष्टया शिवसेना विरोधीपक्षातच होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि शिवसेनेला झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. पण महाआघाडीत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर, ते भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? असं वाटल्यानं शिवाय राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला आहे म्हणूनच उद्धव ठाकरे-अजित पवारांची भेट झालीय. शरद पवारांनी मात्र आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिलेला नाही.

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे नाही म्हटलं तरी दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसतेय. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं.

*भाजपेयींचा कुटील डाव*
महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग.वा.बेहेरे, विद्याधर गोखले, दि.वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं.  त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्याने भाजपेयींनी नाना मार्गाने शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आज घडलंही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*भाजपेयींना सेना-राष्ट्रवादीला एकमेकाविरोधात*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. १९९९ मध्ये राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हा पासून भाजपनं हा शिवसेनेच्या विरोधात सवतासुभा उभा केला. त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केलीच शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. भाजपच्या ह्या कुटिल डावाला अप्रत्यक्षरीत्या साथ देण्यासाठी मनसेचे राज ठाकरे आणि काँग्रेसचे नारायण राणे यांनी शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. राज आणि राणे दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच, या दोघांनी पवारांचा आशीर्वाद घेऊनच आपली राजकीय वाटचाल सुरू केली होती. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई महापालिका आपल्याकडं राखली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेला घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं आज केलाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. अजित पवारांची उद्धव ठाकरे यांची झालेली भेट हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल म्हणावं लागेल!

*प्रारंभी समाजवादींशी युती*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. मुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर हिंदुत्वाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी आपलं हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचं नाही तर प्रबोधनी हिंदुत्व असल्याचं म्हटलं होतं. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची संभ्रमावस्था झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागलं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. शिवसेनेतल्या काहींना मात्र भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवायचंय त्यामुळं काहीजण अस्वस्थ होतील पण शिवसैनिकांना हे हवंय! हा

*शिवसेनेमुळे पवार काँग्रेस सोबत!*
२०००साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केलं असल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या राणे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. सत्ता हाती ठेवण्याचं वा सत्तेवर अंकुश ठेवण्याची शिवसेनेची संधी त्यावेळी हुकली. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेनेनंही हा निर्णय घेतलाय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे स्वयंघोषित 'चाणक्य' आणि शिवसैनिक यांनाही सेना-राष्ट्रवादी यांनी एकत्र यावं असं वाटतं हे इथं महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*कोकणातील वादातून आघाडी झालीय*
सेना-राष्ट्रवादी सत्तेत असताना रायगडच्या पालकमंत्री पदावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मतभेद झाले होते. ते मतभेद दूर करावेत, समेट घडवून आणावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक इथं बैठक बोलावली. या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह कोकणातील शिवसेनेचे आमदार आणि खासदार उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उद्योग आणि पर्यटन राज्यमंत्री आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. अलिबाग जिल्हयात उभय पक्षात निर्माण झालेला वाद दूर करण्यासाठी ही बैठक झाली. कार्यकर्त्यांनी परस्परांवर कुरघोडी सुरु ठेवल्यानं या जिल्हयात कमालीचा ताण आहे. आज भारत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी या सेना तर पालकमंत्री आदिती तटकरे ,अनिकेत तटकरे, सुरेश लाड यांच्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी समेटाची बैठक घडवून आणली. त्या त्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात ढवळाढवळ न करता कामं करावीत, असा निर्णय घेण्यात आला. रायगड जिल्हा ही आता सेना आणि राष्ट्रवादी या दोन घटक पक्षातील सत्ता समीकरणाची नांदी ठरणार आहे. अलिबाग परिसरात शेकापनं सध्या राष्ट्रवादीसोबत रहायचं ठरवलं होतं पण नव्या सत्ता समीकरणात दोघांनी एकदिलानं काम करण्याचा निर्णय घेतलाय. या लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यात काटे की टक्कर झाली होती. ही स्पर्धा संपवून आता साहचर्याचे युग निर्माण करायचं ठरलंय. हा प्रयोग यापुढं महाराष्ट्रात सर्वत्र राबवला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री परस्परांच्या जवळ आले असून ही युती राज्याचे नवे भवितव्य ठरू शकेल.
------------------

- हरीश केंची
९४२२३१०६०९


Friday 17 July 2020

शरद, नारद, पारध आणि गारद!

"राजकीय नेत्यांच्या मुलाखती या काही नव्या नाहीत. पण राजकीय नेता त्याच्या मुलाखतीचा काळ, वेळ आणि वातावरण यावर ते अवलंबून असतं. शरद पवारांची मुलाखत संजय राऊत यांनी घेणं याला एक विशेष महत्व आहे. तीन भागांतल्या या मॅरेथॉन मुलाखतीत पवारांनी लोकांच्या मनात सरकारबद्धल असलेल्या शंकांना, भाजप आणि त्यांच्या नेत्यांच्या आरोपांना, टीकांना परस्पर उत्तरं दिली आहेत. या मुलाखतीतील तिसरा भाग अत्यंत रंगतदार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरद पवार यांनी आपल्या भात्यातून बाण सोडत चांगलीच टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर कधीही जाणार नाही हेही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. एकूण काय तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं संवर्धन आणि मधल्या काळात सरकारच्या पातळीवर जे मतभेद निर्माण झाले, त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचं दिसलं. याशिवाय मुलाखतीतून सरकारच्या तीन पक्षांमधील वातावरण चांगलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे!"
--------------------------------------------------


*मुं* बईत १९९३ साली झालेले बॉम्बस्फोट, त्यानंतर उसळलेली दंगल, या काळात 'सामना'तल्या अग्रलेखातून, बातम्यांतून जे काही प्रसिद्ध होत होतं. जी जहाल भाषा वापरली जात होती, त्याची खूपच चर्चा त्यावेळी होती. मुख्यमंत्री असलेले शरद पवार यांना पुण्यातल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारानं 'सामना'तल्या अग्रलेखातल्या भाषेबाबत सवाल केला. त्यावर उत्तर देताना पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टीका केली. त्यातील भाषेचा उल्लेख करताना त्यांनी म्हटलं होतं की, "महाराष्ट्रात यापुढे 'संजय राऊत संस्कृती' वाचायला मिळेल...!" 'सामना'च्या पत्रकारितेवर टीका करणारे तेच शरद पवार आज संजय राऊत यांनाच मुलाखत देते झाले. तर शरद पवारांचा 'बारामतीचा म्हमद्या' पासून 'अफझलखान' पर्यंतची शेलकी विशेषणं वापरून उल्लेख करणारा 'सामना' पवारांचीच मुलाखत घेता झालाय! हा सारा काळाचा महिमा म्हणायला हवा. राजकारणात कधी कुणी कायमचा मित्र नाही की शत्रू, हेचं खरं!. 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची 'एक शरद सगळे गारद' या शिर्षकाखाली तीन दिवसांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. ती सर्व मराठी दूरचित्रवाणीवरच्या वाहिन्यांवरून दाखविली गेली. त्यामुळं राज्यातील राजकारणात चर्चेचं वादळ उठलं. उलटसुलट मतं व्यक्त झाली!

*पवारांच्या भूमिकांना विशेष महत्व*
राजकीय नेते आणि सेलिब्रिटिंच्या मुलाखती हा प्रकार प्रसिद्धीमाध्यमासाठी काही नवा नाही. अशा मुलाखती होतच असतात. निवडणुकांच्या काळात तर राजकीय नेत्यांच्या मुलाखतींना बहर आलेला असतो. एखाद्या मोठ्या नेत्यानं मुलाखत दिल्यानंतर त्यातील वक्तव्यामुळं अनेकदा वादळंही उठतात. देशात यापूर्वी असं अनेकदा झालंय. मात्र, शरद पवारांच्या झालेल्या या मुलाखतीची सर्वत्र जोरदार चर्चा होती. ही चर्चा फक्त प्रसिद्धिमाध्यमातच होती असं नाही तर देशभरातल्या राजकीय वर्तुळातही होती. शरद पवार हे तसे काही वादग्रस्त किंवा सनसनाटी वक्तव्य करणारे नेते म्हणून ओळखले जात नाहीत. तरीही त्यांच्या मुलाखतीबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. अर्थात याला कारणंही बरीच होती. बदललेल्या महाराष्ट्रात आणि देशातही बदललेल्या राजकीय परिस्थितीत पवारांच्या प्रत्येक भूमिकेला कमालीचं महत्त्व आहे. मागच्या काही महिन्यात शरद पवार-उद्धव ठाकरे आणि शिवसेना या तिन्हींच्या मधला दुवा संजय राऊत राहिलेले आहेत आणि काँग्रेस - शिवसेना या दोघांना जोडण्याचं काम शरद पवारांनी केलेलं आहे. ही तिघांची आघाडी जुळवण्यासाठी शरद पवार हा जसा मुख्य दुवा राहिला, त्यांच्या पाठोपाठचा दुसरा महत्त्वाचा दुवा संजय राऊत राहिलेले आहेत. संजय राऊत आणि शरद पवार यांचे संबंध पूर्वीपासूनच चांगले राहिलेले आहेत. दोघेही परस्परांचं फार कौतुक करत आलेले आहेत. आणि पवारांचे ठाकरे घराण्याशीही खूप चांगले संबंध आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनाही 'सामना' चालवताना थोडा अधिक बॅलन्स साधावा लागलाय, मतांना मुरड घालावी लागलीय. अन्यथा, या आघाडीमध्ये बिघाडी निर्माण करण्याचं काम जाणतेपणानं किंवा अजाणतेपणानं 'सामना'तूनच होऊ शकतं. हे इथं लक्षांत घ्यायला हवंय. त्यादृष्टीनं या मुलाखतींकडे पाहायला हवं!

*फडणवीसांचं म्हणणं खोडून काढलं*
महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात शरद पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. गेले सात महिने हे सरकार राज्यात सत्तेवर आहे. उद्धव ठाकरे हे सरकारचं नेतृत्व करताहेत. वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेले आणि सत्तेचा मोठा अनुभव असलेले काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते तुलनेनं नवख्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताहेत. त्यातून आघाडीत सातत्यानं कुरबुरी होत असतात. शरद पवार हे वेळोवेळी प्रत्येक प्रश्नावर मध्यस्थी करताना दिसतात. शिवाय, राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि सरकारला सल्ले देत आहेत. हे सगळं नेमकं काय गौडबंगाल आहे यावरही मुलाखतीत पवार बोलले आहेत. महाराष्ट्रात भाजपला वगळून एखादं सरकार येईल असं निवडणुकीच्या निकालानंतरही काही दिवस कुणालाही वाटलं नव्हतं. पडद्याआड बऱ्याच घडामोडी होऊन अखेर ते सरकार प्रत्यक्षात आलं. मात्र, त्यावेळच्या घडामोडींबद्धलच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत. विरोधी पक्षातले नेते अजूनही अधूनमधून याबाबत बोलत असतात. अलीकडेच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत असा गौप्यस्फोट केला होता की, 'शरद पवार यांनी स्वत: भाजपशी युतीचा प्रस्ताव दिला होता...!' पवारांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलंय. फडणवीस राष्ट्रीय राजकारणात नाहीत त्यामुळं त्यांना यातलं फारसं माहीत नाही, उलट भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानं आपल्याला प्रस्ताव दिला होता, असं सांगत फडणवीसांना उघडं पाडलं! कदाचित पवारांचं हे म्हणणं ऐकून फडणवीसांनी दिल्ली गाठलेली दिसतेय. राज्यातल्या साखर उद्योगाबाबत अमित शहांशी चर्चा केल्याचा बातम्या प्रसिद्ध झाल्यात. शरद पवार हे देशाचे संरक्षणमंत्री राहिलेले आहेत. गेली अनेक वर्षे ते दिल्लीच्या राजकीय वर्तुळात वावरत आहेत. देशातील सर्वच पक्षाच्या नेत्यांमध्ये त्यांच्याबद्धल एक आदराची भावना आहे. त्यामुळं महाराष्ट्राशिवाय देशपातळीवरील विषयांवर त्यांनी व्यक्त केलेली मतं ही महत्त्वाची ठरतात. त्यातील देशाच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी घटना म्हणजे अयोद्धेतलं राम मंदिर आंदोलन. पवार हे या आंदोलनाबद्धलही बोलले आहेत. त्याच अनुषंगानं त्यांनी भाजपविषयी देखील मतं मांडली आहेत.

*उद्धव ठाकरे यांच्याबद्धलची ग्वाही*
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिमेचं संवर्धन आणि मधल्या काळात सरकारच्या पातळीवर जे मतभेद निर्माण झाले, त्याचं डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून झाल्याचं टीकाही होतेय. याशिवाय शरद पवारांची सामनातील मुलाखतीत सरकारच्या तीन पक्षांमधील वातावरण चांगलं आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते योग्य आहे. असंही म्हटलं गेलंय.
महाविकास आघाडीचं सरकार स्थिर राहणार नाही, असा समज पसरवण्यात भाजप यशस्वी झालं होतं. हाच समज शरद पवारांनी या मुलाखतीतून दूर केलाय. याउलट शिवसेना सोबत नसती, तर भाजपला ४० ते ५० जागा मिळाल्या असत्या, असं म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं स्थान कमी करण्याचा प्रयत्न केलाय. सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस ट्रोल होताहेत असं दिसून आल्यावर भाजपेयींनी नारायण राणेंना आपलं कार्यालय खुलं करून दिलंय. त्यांनी नेहमीच्या शैलीत मुख्यमंत्री सरकार, शिवसेना, संजय राऊत यांच्यावर टीका करताहेत. पवारांनी या मुलाखतीत विधानसभेत भाजपच्या आमदारांची जी १०५ संख्या झाली, त्यात शिवसेनेचं योगदान मोठं आहे. त्यातून तुम्ही शिवसेना वजा केली तर हा आकडा तुम्हाला ४०-५० च्या आसपास दिसला असता, असं म्हटलंय. भाजपची मंडळी सांगतात की आम्हाला शिवसेनेनं दुर्लक्षित केलं किंवा सत्तेपासून दूर ठेवलं, पण ज्यांनी भाजपाला १०५ पर्यंत पोहोचवलं, त्यांना भाजपनं गृहीत धरलं. असं शरद पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलंय. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. विधानपरिषद निवडणूक असो, पोलीस आयुक्तांच्या बदल्या असो की पारनेरमधील नगरसेवकांचं प्रकरण असो, या तिन्ही घटननांच्या काळात पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले होते. काँग्रेसच्या काही नेत्यांनी तर सरकारमध्ये आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रारही केली होती. असं असलं तरी या मुलाखतीतून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकजूट आहे, असा इशारा काँग्रेसला देण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय आमच्यात मतभेद असले, तरी ते काही सरकार तुटेपर्यंत असणार नाहीत, अशीही सारवासारव करण्याचा प्रयत्न झाल्याचा दिसतो. शिवाय या मुलाखतीतून शरद पवार शिवसेनेच्या म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहेत, असा इशारा काँग्रेसला देण्यात आलाय. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या पक्षांमधील मतभेदांविषयी, "लॉकडाऊनसंदर्भात माझे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काहीएक मतभेद नाहीये, असं पवारांनी स्पष्ट केलं. "या सगळ्या काळात माझा मुख्यमंत्र्यांशी उत्तम संवाद होता आणि आजही आहे. प्रसिद्धी माध्यमांत काय आलंय ते येऊ द्या. दोन-तीन दिवसांत मी वाचतोय की, आमच्यात म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मतभेद वाढताहेत, अशा बातम्या आहेत. त्यात यत्किंचितही सत्य नाही. पण बातम्या येताहेत. येऊ द्या." असं पवारांनी म्हटल्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये विसंगती निर्माण झाल्यामुळेचं ही मुलाखत घ्यावी लागली, अशी टीका यावेळी झालीय.

महाआघाडी सरकारला ७ महिने पूर्ण झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून अधिकार दाखवायला सुरुवात केलीय. पोलीस आयुक्तांच्या बदल्यावरून ते स्पष्ट दिसून आलंय. पण, उद्धव ठाकरे यांना हे सरकार टिकवायचं असेल, तर त्यांना बहुमताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत म्हणा, की भाजपसोबत म्हणा, कुठेही गेले तरी त्यांना दुय्यम स्थानच स्वीकारावं लागणार आहे. सध्या कोरोनाचा काळ सुरू आहे. सरकार त्यात व्यस्त आहे. जेव्हा केव्हा ते मुख्यमंत्री म्हणून अधिकार गाजवायला सुरुवात करतील, त्याक्षणी तिन्ही पक्षांमध्ये विसंगती सुरू होतील आणि ह्या सरकारला धोका निर्माण होईल. यासाठी पवारांना दक्ष राहावं लागेल. राज्य सरकारवर जे जे म्हणून काही आरोप भाजपकडून करण्यात आले, त्यावर शरद पवारांच्या तोंडून या मुलाखतीत उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. याशिवाय या मुलाखतीची सोशल मीडियावर टीझर टाकून एक हवा तयार करण्यात आली होती, त्यामुळं सर्वच थरातून उत्सुकता निर्माण झाली होती. सामना आणि इतर वृत्तवाहिन्यांसाठी ही मुलाखत घेतली जात असल्याचं सांगण्यात आलं. इतर इलेक्ट्रॉनिक्स मराठी प्रसार माध्यमांनीही ही मुलाखत जशीच्या तशी वापरली. त्यामुळे मग ही मुलाखत आहे की, नियोजित प्रचार आहे, अशी शंका उपस्थित केली गेली. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस प्रमाणेच महाविकास आघाडीचेही शिल्पकार आहेत. मुलाखतींच्या पूर्वी ते दोनदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटले आहेत. दुसरीकडे भाजपसारखा प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्यामुळे माध्यमं शरद पवार जे म्हणतील ते दुर्लक्षित करू शकत नाहीत. माध्यमांना ही मुलाखत वेळेवर आणि आयती मिळाली आणि त्यांनी ती वापरलीही. जर ती सामनाकडून नसती मिळाली, तर त्यांनी ती दुसरीकडून मिळवली असती. तसं पाहिलं तर या मुलाखतीत फारसं विशेष असं काही नव्हतं, पण या मुलाखतीचं राजकारण मात्र उत्तमरीत्या करण्यात आलं होतं. त्यातून जो संदेश द्यायचा, तो स्पष्टपणे देण्यात आलाय.

*मुलाखतीतून प्रचार मोहीम राबविली*
शरद पवारांच्या मुलाखतीतून हे स्पष्ट झालं की, राज्यात सत्तेवर आलेली ही आघाडी इतकी अनैसर्गिक आहे की, ती टिकण्यासाठीच्या काही अंगभूत मर्यादा आहेत. उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या सगळ्या नेत्यांना अन्य दोन पक्षांशी जुळवून घेणं हीच मुळात अवघड गोष्ट आहे. पण जुळवून घ्यावं लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सुद्धा आपापले मतलब बाजूला ठेवून, भाजप या प्रबळ विरोधी पक्षापासून बचाव करण्यासाठी काही काळ तरी राज्य सरकारला स्वस्थता मिळू दिली तर आघाडीला फायदा होईल. त्यासाठी पहिलं मुख्य काम म्हणजे त्यांनी कमी बोललं पाहिजे. मग राष्ट्रवादीतले भुजबळ किंवा अजित पवार असतील किंवा उद्धव ठाकरे स्वतः आणि संजय राऊत असतील, त्या सर्वांनी कमी बोलणं, काहीवेळा अजिबात न बोलणं किंवा जे बोलायचं ते जबाबदारीनं आणि संसदीय आणि संवैधानिक भाषेमध्ये बोललं पाहिजे. यामुळे ही आघाडी जास्त दिवस टिकू शकेल. फक्त नीट 'बोलण्या'मुळेही या आघाडी टिकवता येऊ शकेल. एकीकडे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचं चित्र असताना दुसरीकडे महाविकास आघाडीत कोणतेच मतभेद नाहीत, असं स्पष्टीकरण महाविकास आघाडीचे प्रणेते शरद  पवार यांनीच केलं आहे. विशेष म्हणजे शरद पवार यांची ही मुलाखत महाविकास आघाडीचे दुसरे प्रणेते संजय राऊत यांनी घेतली असून त्याचं टायमिंगही लक्षात घ्यायला हवं. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येऊन सात महिने झाले आणि या सरकारमधील विसंवाद, असमन्वय समोर येऊ लागला. सुरुवातीला काँग्रेसनं तक्रारीचा सूर लावला. सरकारमध्ये निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतलं जात नाही, काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यातील निर्णय परस्पर घेतले जातात, अशी तक्रार काँग्रेसनं लावली. खरं तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या खात्यातही अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्याची तक्रार मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रीमंडळ बैठकीतच केली होती. मात्र काँग्रेसची नाराजी जास्त होती, कारण काँग्रेस सरकारमध्ये असूनही निर्णय प्रक्रियेत नव्हती. याबाबत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाण त्यांच्या कानी घातलं. काँग्रेसची ही तक्रार ताजी असतानाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील संघर्षही वाढू लागला. मुंबईत लॉकडाऊन कडक करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल गृहमंत्री अनिल देशमुख अंधारात होते, तर पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीला दणका दिला. हे  प्रकरण शांत करण्यासाठी थेट शरद पवार आणि अनिल देशमुखांना मातोश्री गाठावी लागली होती. या सगळ्यावर भाजपचे नेते वारंवार टीका करत आहेत, हे सरकार अंतर्विरोधामुळे कोसळेल अशी विधानं देवेंद्र फडणवीस करताहेत. महाविकास आघाडीतील चव्हाट्यावर येणाऱ्या या मतभेदांमुळे साहजिकच संजय राऊत अस्वस्थ असणार, कारण महाविकास आघाडी स्थापन करण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. त्यामुळे हे मतभेद दूर व्हावेत आणि या वादावर पडदा पडावा, तसंच महाविकास आघाडी भाजपविरोधात भक्कम आहे हा संदेश देण्याचा प्रयत्न या मुलाखतीतून केला गेला. पवार-राऊतांनी जशी आघाडी एकत्र आणली तशी ती टिकवण्यासाठीही या दोन्ही नेत्यांना डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील मतभेदांच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही मुलाखत होणं, या मुलाखतीत शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं कौतुक करणं, महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचं सांगणं यालाही एक वेगळं महत्त्व आणि कारण आहे
हरीश केंची
९४२२३१०६०९

नेहरूंची निवड : वास्तव आणि इतिहास

"संसदेत ३७० कलमावर बोलताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले की, "स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरूंऐवजी वल्लभभाई पटेल यांना प्रधानमंत्री बनवलं गेलं असतं तर देशाचं चित्र वेगळं असतं...!" मोदी वा इतर भाजपेयीं नेते देशातल्या प्रत्येक समस्येला नेहरूंना जबाबदार धरत त्यांच्यावर टीका करतात. पण संविधानातल्या लोकशाही मूल्यांसाठी म्हणजे धर्मनिरपेक्षता, व्यक्तिस्वातंत्र्य, विज्ञाननिष्ठा, तंत्रज्ञानातील स्वयंपूर्णता-आत्मनिर्भरता यासाठी नेहरू आयुष्यभर झटले. भारतीयत्वाची आणि पर्यायानं भारताची आजची ओळख जगासमोर निर्माण करण्यात नेहरूंचा मोठा वाटा आहे. भारताला हिंदुराष्ट्र करण्याची सत्ताधाऱ्यांची मनीषा आहे. पण जोवर नेहरूंनीतीचा प्रभाव जनमानसावर आहे तोवर हे शक्य नाही म्हणून पदोपदी नेहरूंचा उद्धार केला जातोय. स्वातंत्र्योत्तर काळात तत्कालीन परिस्थितीत नेहरूंची केलेली निवड ही केवळ महात्मा गांधीजींनीच केली असं नव्हे तर रवींद्रनाथ टागोर, भगतसिंह, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचीही पसंती नेहरुच होते. त्या निर्णयाचं समर्थन खुद्द वल्लभभाई पटेल आणि गव्हर्नर जनरल सी.राजगोपालाचारी यांनीही केलं होतं. त्यामुळं सध्या नेहरूंवर केले जाणारे हल्ले म्हणजे हे त्या सगळ्यांवर केले जाणारे हल्ले आहेत! अगदी वल्लभभाई यांच्यावरही! पण हे सारं लक्षांत कोण घेतो? नेहरूंबाबत भ्रम निर्माण करून नव्यापिढीच्यासमोर त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न 'भक्तां'कडून केला जातोय. नेहरूंची निवड कधी, कशी आणि का झाली याचा घेतलेला हा धांडोळा!"
------------------------------------------------------------


*पं* डित जवाहरलाल नेहरू यांनी एकदा डॉ. राजेंद्रप्रसाद यांना लिहिलेल्या एका पत्रात त्या पांच जणांची नावं नमूद केली होती, जी महात्मा गांधींच्या अत्यंत जवळ होते. त्या दोघांशिवाय सी. राजगोपालाचारी म्हणजेच राजाजी, सरदार वल्लभभाई पटेल आणि मौलाना अबुल कलाम आझाद हे देखील गांधीजींचे अत्यंत विश्वासू सहकारी होते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात भारताचं नेतृत्व करण्यासाठी केवळ नेहरू हेच एकमेव पर्याय होते का? असा प्रश्न काही दशकापासून भारतीय बुद्धिजीवी लोकांना सतत भेडसावत होता. माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहनसिंह यांच्यासमवेत एकाच व्यासपीठावर आलेल्या तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी असं मत व्यक्त केलं होतं की, "देशांत कायमच एक तक्रार केली जातेय, देशाला ही एक वेदना राहिलीय, प्रत्येक देशवासियांच्या मनांत शल्य सलतं आहे की, स्वातंत्र्यानंतर नेहरूंऐवजी जर देशाचे प्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल झाले असते तर, देशाची प्रतिमा वेगळी बनली असती, देशाचं चित्रं वेगळं दिसलं असतं, शिवाय देशाचं नशीबही वेगळं असतं!" त्यांच्या या वक्तव्यानं काँग्रेसच्या, नेहरुवाद्यांमध्ये जणू भूकंप आला असं काही नाही. हे काही नवं वक्तव्य नव्हतं, यापूर्वीही अशी वक्तव्य अनेकदा केली गेली होती! प्रारंभी नेहरूंनी लिहिलेल्या ज्या पत्राचा उल्लेख केलाय, त्यात ज्या पांच नेत्यांचा गांधीजींचे निकटवर्तीय सहकारी म्हणून म्हटलंय. त्या प्रत्येकाशी गांधींनी नेहरूंना आपला उत्तराधिकारी नेमण्यापूर्वी चर्चा केली होती. याशिवाय त्या प्रत्येकाचा त्यादृष्टीनं विचारही केला होता. त्या परिस्थितीत या प्रत्येकाचं मूल्यमापन कसं झालं होतं, नेहरूंची निवड कशी झाली याचं विश्लेषण करू या.

*गांधीजींची आवड राजाजीही होते*
जवळपास ४० वर्षांपूर्वी, सी. राजगोपालाचारी जे भारताचे अखेरचे गव्हर्नर जनरल होते. ते जवाहरलाल नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांचे स्वातंत्र्यलढ्यातील सहकारीही होते. त्यांनी नेहरू-पटेल यांच्याबद्धल आपल्या नियतकालिकेत 'स्वराज्य' मध्ये सविस्तरपणे लिहिलंय. राजाजींनी त्यात म्हणतात," मलाही निःसंदेहपणे असंच वाटत होतं की, जवाहरलाल नेहरूंना परराष्ट्रमंत्री आणि वल्लभभाई पटेलांना प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी द्यायला हवीय. पण मला असं वाटत असलं तरी एकूण राजकीय परिस्थिती आणि त्यातील त्रुटी पाहता जवाहरलाल नेहरु हे त्या दोघांमध्ये अधिक प्रबुद्ध व्यक्ती होते. त्यामुळं नेहरू प्रधानमंत्री होणं हे देशाच्या दृष्टीनं श्रेयस्कर ठरलंय!" (स्वराज्य दि. २७ नोव्हे.१९७१) जर आपण इतिहासाची पानं उलटली अन त्याचा सखोल अभ्यास केला तर, नरेंद्र मोदी आणि राजाजी यांचं आकलन, मतं आणि दावा उलटून टाकू शकतो. आपल्यासमोर इतिहासाची एक वेगळी प्रतिमा दिसून येते. महात्मा गांधीजींनी सर्वप्रथम राजाजींना आपला उत्तराधिकारीच्या रुपात १९२७ मध्ये पाहिलं होतं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की, " माझे सी. राजगोपालाचारी हे एकमात्र संभावित उत्तराधिकारी आहेत!" ते वर्ष असं होतं की, महात्मा गांधी यांचे पुत्र देवदास आणि राजाजींची कन्या लक्ष्मी हे लग्न करणार होते. याची त्या दोन्ही नेत्यांना कल्पना होती. देवदास आणि लक्ष्मी या दोघांच्या वडिलांनी आपल्या मुलांना आपलं प्रेम सिद्ध करण्याबाबत सांगितलं होतं. पण त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावाला नकारही दिला नाही. जर हा विवाह झाला असता तर राजाजी हे गांधी परिवाराशी संलग्न झाले असते. त्यावेळी गांधीजींनी राजाजींना आपला उत्तराधिकारी नेमलं तर आपण आपल्याच परिवारातल्या एका सदस्यालाच नेमलं असा अर्थ काढला गेला असता, ते गांधीजींना नको होतं. याशिवाय भारतातल्या बहुसंख्य लोकांची बोलीभाषा ही हिंदी आहे आणि राजाजींना हिंदी फारसं चांगलं येत नव्हतं ही देखील एक मोठी अडचण होती. देशभरात संपर्क असलेल्या गांधीजींशिवाय दुसरा कुठलाही नेता भारतातल्या अंतर्गत समस्यांबाबत फारसा जागरूक नव्हता, ज्ञात नव्हता अगदी राजाजीही! संपर्कासाठी मोठ्याप्रमाणात अशिक्षित असलेल्या देशात भाषेचं महत्व किती आहे हे गांधीजी जाणत होते. त्यामुळं इथं हिंदीचं महत्व आहे. आणि राजाजी मात्र हिंदी भाषेशी फारसे अवगत नव्हते. नेहरूंनी एका मुलाखतीत राजाजींबाबत असंही म्हटलं होतं की, "ते नेहमी गर्दीला घाबरत असत, त्यांच्या गोंधळापासून ते सतत दूर राहात. त्यामुळं आम्हाला जबरदस्तीनं राजाजींना घेऊन आंदोलनाला जावं लागत असे. शिवाय ते त्यांच्या व्यक्तिगत जीवनात इतके व्यस्त असत की, लोकांना सहजगत्या त्यांच्याजवळ जाता येऊ शकत नव्हतं. ते लोकांना चांगल्याप्रकारे भेटत पण त्यांच्याकडं ते फारसे व्यक्त होत नसत. त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध ठेवत नसत!" (पृष्ठ क्र. ५५-५६, पंडितजी-पोटानेविशे, रामनारायण चौधरी संपादित, करिमभाई वोरा द्वारा अनुवादित)

*वल्लभभाई पटेलांचं वय म्हातारपणाकडं झुकलेलं*
राजाजींनंतर आता आपण सरदार वल्लभभाई पटेलांविषयी बोलू या! पटेलांना एकदा मौलाना शौकत अली यांनी 'बर्फातला ज्वालामुखी' असं संबोधलं होतं. सरदार हे काँग्रेस पक्षाचे सर्वात मोठे, वरिष्ठ आयोजक आणि संचालक होते. पण नेहरुंच्या तुलनेत पटेलांची स्थिती काहीशी प्रतिकूल होती. कविवर्य रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या बुद्धिजीवी लोकांच्या दृष्टीनं "युवा भारताच्या सिंहासनावर त्यांचा निःसंदेह अधिकार होता.' कारण त्यांचा 'दृढसंकल्प अदम्य आणि साहस अतूट होतं.' आणि देशाला एका विशिष्ठ उंचीवर नेण्यासाठी 'नैतिक सत्य आणि बौद्धिक चरित्र याचं अभूतपूर्व असं पालन करण्याची क्षमता त्यांच्यात होती!" आणखी एक गोष्ट गांधीजी जाणत होते की, पटेल दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारतील पण त्यांना हे ही माहिती होतं की, नेहरूंचा विद्रोही स्वभाव आणि अपार लोकप्रियता हे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारायला अडचणी निर्माण करणारं आहे. महात्माजींनी एकदा म्हटलं होतं की, "जवाहर दुसऱ्या क्रमांकाचं स्थान स्वीकारणार नाही." ( ले.राजमोहन गांधी, द गुड बोटमन पृष्ठ ३७९) नेहरूंचं सेक्युलर आऊटलूक होतं त्यामुळं ते सर्वसमावेशक ठरत होते. सरदार पटेलांना अल्पसंख्याक समाज त्यातही विशेषतः मुसलमान समाज हा 'हिंदू नेता' म्हणूनच पाहात होता. नेहरूंना अल्पसंख्याकांसह सर्व समाजाचे लोक एक धर्मनिरपेक्ष नेत्याच्या रुपात पाहात होते. फाळणीनंतर या समाजांना पटेलांच्या तुलनेत नेहरूंबाबत अधिक विश्वास वाटत होता. पण गांधीजींना ही खात्री होती की, सरदारांजवळ सर्वांना सामावून घेण्याऐवढं विशाल मन आहे. ते कुणाचाही दुस्वास करत नाहीत. ('पटेल ए लाईफ', ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ४६५). त्यांना हे देखील माहिती होतं की, हिंदू-मुस्लिम ऐक्याविषयी नेहरूंची प्रतिबद्धता इतरांच्या तुलनेत जरा अधिक होती. पटेलांच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय विषयांवर नेहरूंची विषेश पकड होती. हे माहिती असल्यानं सरदार पटेल म्हणाले होते, "पंडित नेहरूंनी नेहमीच असा विचार व्यक्त केला होता की, भारतातल्या समस्यां ह्या जागतिक समस्यांचा एक हिस्सा आहे, परंतु अशावेळी एकमात्र योग्य व्यक्ति जो भारताच्या आशा-आकांक्षांना प्रभावीपणे प्रतिनिधित्व करू शकेल, आणि ती व्यक्ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू...! ( पटेल-नेहरू ऍग्रिमेंट विथ डीफरन्स १९३३-१९५०, संपादक नीरजा सिंह, पृष्ठ २६-२७) गांधीजींनी उत्तराधिकारी नेमण्याबाबत आपलं मत व्यक्त करताना याशिवाय वेगवेगळ्या अप्रत्यक्ष संदर्भावरही जोर दिला होता. १३ वर्षांपूर्वी गांधीजींना जाणवलं होतं की, पटेल आता म्हातारे होताहेत त्यावर पटेल म्हणाले होते की, "मला आता म्हातारपण आलंय!" (नवजीवन, १५ डिसेंबर १९२९, महात्मा गांधीके संग्रहित कार्य, खंड ४८, पृष्ठ ९२) त्याच्या अकरा दिवसानंतर जवाहरलाल नेहरूंना काँग्रेस अध्यक्ष म्हणून निवडलं गेलं. गांधीजींनी त्यावेळी व्यक्त केलेल्या भाषणातून हे स्पष्ट होतं की, त्यावेळीच त्यांनी नेहरूंना आपला उत्तराधिकारीच्या रुपात पाहिलं होतं. त्यांनी आपल्या प्रभावात त्यांना सावरणं सुरू केलं होतं. उत्तराधिकारीना आपलं स्वतःचं मन असावं तरी देखील त्याची नाळ भारताच्या लोकांशी जुळलेली असावी ती अलग होता काम नये. असं गांधीजींना वाटत होतं.

*लोकांची मनही नेहरूंनी जिंकली होती*
गांधीजींवर नेहमीच आरोप केला जातो की, त्यांनी भारतात जवाहरलाल नेहरूंना नेहमीच अधिक प्रोत्साहन दिलंय. यात काही तथ्य नाही. आपल्या व्यक्तिगत पसंतीबरोबरच लोकांची मनही नेहरूंनी जिंकली होती. ऑगस्ट १९२९ मध्ये गांधीजींनी मोतीलाल नेहरू यांना एक पत्र लिहून स्पष्ट केलं होतं की, "मी कधीही त्याला भारतावर थोपणार नाही, त्यासाठी जबरदस्तीही करणार नाही!" (मेरे पत्र, ले. एम.के.गांधी, संपादक प्रा. प्रसून, पृष्ठ ४०) गांधीजींनी १९२९ मध्ये असं केलं नाही. आणि १९४६ मध्येही निश्चितपणे असं केलं नाही, हे खरं आहे. ज्यावेळी बहुसंख्य प्रांतीय कार्यसमितीनं सरदार पटेलांना काँग्रेस अध्यक्ष बनविण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचं उत्तर एक पटेल समर्थक नेता डी.पी.मिश्रा यांनी दिलंय. त्यांनी लिहिलं होतं, "जेव्हा आम्ही हिंदी पट्ट्यातील काँग्रेस समित्यांचे सदस्य होतो तेव्हा काँग्रेसच्या कार्यसमितीनं पटेलांना अध्यक्ष म्हणून मनोनीत केलं होतं. आमचं त्यावर काहीच म्हणणं नव्हतं. नेहरूंना भविष्यातील मोठ्या जबाबदारीचं पद देण्यापासून वंचित करायचं नव्हतं. वयानं छोटे असतानाही नेहरूंना तीनवेळा काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून त्यापूर्वी नेमलेलं होतं. त्यामुळं पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्याकडं दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी सोपविण्यात यावी. असं आम्हाला वाटलं! स्वातंत्र्यानंतर मुक्त भारताच्या जबाबदारीचा तिथं संबंध होता. आम्हाला असं वाटत होतं की, महात्मा गांधींद्वारा आपला उत्तराधिकारी म्हणून नेहरूंना घोषित केल्यानंतर स्वातंत्र्याच्या पहाटे त्या महत्वाच्या पदाची गरिमा वाढविण्यासाठी कटिबद्ध राहावं लागेल. यासाठी जेव्हा सरदार पटेलांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली, त्यामुळं तेव्हा आम्ही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही!" (पटेल ए लाईफ, ले.राजमोहन गांधी, पृष्ठ ३७२ ). नेहरू पटेलांना म्हणतात, "जवळपास ३० वर्षापर्यंत मी कोणतीही औपचारिकता मानली नाही. मी माझं कर्तव्य आपल्या नेतृत्वाखालीच होईल. मला आशा आहे की, माझ्या जीवनातील उरलेल्या काळासाठी आपल्याकडं माझ्यासाठी निर्विवाद निष्ठा आणि प्रामाणिकता असेल. भारतात कोणत्याही व्यक्तीनं इतका त्याग केला असेल जेवढा तुम्ही केला आहे. आमचं संयोजन अतूट आहे आणि यातच आमची ताकद आहे!" ( नेहरु-पटेल ऍग्रिमेंट विथ डीफरन्स १९३३-१९५०, सं. नीरजा सिंह, पृष्ठ १६ ) त्यानंतर सरदार पटेलांनी अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी हे स्पष्ट केलं होतं की, भारताचं नेतृत्व करण्यासाठी नेहरू हेच योग्य व्यक्ती आहेत! पटेल म्हणतात, "या परिपेक्षात स्वातंत्र्यानंतरच्या प्रारंभीच्या अडखळणाऱ्या काळात आम्हाला मार्ग दाखविणारे प्रकाशवान व्यक्ती व्हावेत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जेव्हा भारताला एकापाठोपाठ एक संकटांना सामोरं जावं लागलं, तेव्हा त्यांनाच आमच्या आशाआकांक्षाचं रक्षक, आमच्या श्रेष्ठतम स्वातंत्र्यसेनानींना व्हायचं होतं. माझ्याशिवाय इतर कुणालाच चांगलं माहिती नाही की, आमच्या अस्तित्वाच्या मागील काही वर्षातल्या कठीण काळात देशासाठी त्यांनी किती मेहनत केलीय, कष्ट उपसलेत!" (नेहरू अभिनंदन ग्रंथ, १४ ऑक्टोबर १९४९)

*पटेलांनी मानलं नेहरुच योग्य व्यक्ती*
आणखी एका प्रसंगी सरदार पटेलांनी महात्मा गांधी यांचा निर्णय योग्य ठरवला होता. गांधीजींनी नेहरूंना आपला उत्तराधिकारी नेमलं होतं त्यावेळी पटेल म्हणतात, "गांधीजींच्या मृत्यूनंतर आम्ही अनुभवलं की, आमच्या नेत्यांची निवड आणि निर्णय अगदी योग्य होता. (पटेल ए लाईफ, ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ४९०) त्यामुळं पटेलांनी नेहरूंसाठी उच्चारलेले शब्द भारतीय लोकांच्या बरोबरच त्यांच्या मनातलेही विचार होते. जे जवाहरलाल नेहरूंना महात्मा गांधी यांच्यानंतरचा 'भारताचा नेता' या रुपात पहात होते. अखिल भारतीय काँग्रेस महासमितीच्या बैठकीत गांधीजींनी केवळ सरदार पटेलांचंच नव्हे तर राजाजीचं नावही घेतलं होतं. राजाजींनाही असंच वाटत होतं की, नेहरू हेच भारताचं नेतृत्व, प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वात योग्य व्यक्ती आहेत. असं असलं तरी तेही गांधीजींप्रमाणेच नेहरू-पटेल या संयुक्त नेतृत्वाच्या पक्षात होते. याबाबत २९ ऑक्टोबर १९४८ रोजी सरदार पटेलांना लिहिलेल्या पत्रात राजाजी स्पष्ट करताना म्हटलं होतं की, "आमचे प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी जगातल्या विविध देशातल्या राजनेत्यांकडून प्रशंसा प्राप्त केलीय, शिवाय ते भारतातही लोकप्रिय आहेत. त्यांच्या उद्देशांप्रति असलेली इमानदारी याला कोण विरोध करू शकणार आहे? ते आमच्यासाठी शक्तीचं प्रतीक आहेत, तुम्ही आणि ते परराष्ट्र आणि देशांतर्गत सगळ्या अडचणी दूर करू शकता. परमेश्वराचा आशीर्वाद तुम्हा दोघांवर कायम राहो. कारण भारत मजबूत आणि सशक्त व्हावा आणि शांततेसाठी एक शक्ती बनो!" ( सरदार पटेल सिलेक्टेड कोरिस्पॉन्ड्स, १९४५-१९५०, खंड २ सं. विद्याशंकर, पृष्ठ ३६८) भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून केलेल्या अंतिम भाषणातही राजाजींनी पुन्हा संयुक्त नेहरू-पटेल नेतृत्वाबाबत मत व्यक्त केलं होतं आणि त्या दोघांच्या कार्यकर्तृत्वाचा, ताकदीचा उल्लेख केला होता. "प्रधानमंत्री आणि त्यांचे सर्वप्रथम सहकारी, उपप्रधानमंत्री हे दोघे मिळून एक असा अधिकार गाजवतील जे भारताच्या दृष्टीनं देशाला समृद्ध करणारं असेल....एकजण सार्वभौमिक प्रेम मिळवील तर दुसरे सार्वभौमिक विश्वास!" (राजाजी ए लाईफ ले. राजमोहन गांधी, पृष्ठ ३१२) राजाजीचं म्हणणं होतं की, नेहरूंनाच प्रधानमंत्री बनवलं जावं. १९७१ मध्ये नेहरूंची कन्या इंदिरा गांधींना असलेल्या त्यांच्या विरोधामुळं राजाजी इतिहासात पुन्हा परततात आणि नेहरूंच्या ऐवजी पटेलांना पसंत करतात. नेहरूंशी आर्थिक विषयांबाबत टोकाचे मतभेद असतानाही, नेहरु प्रधानमंत्री असताना अशाप्रकारचं मतप्रदर्शन राजाजींनी कधीही केलेलं नव्हतं हे इथं नमूद करायला हवंय. नेहरुंच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले होते, "माझ्याहून अकरा वर्षाहून लहान, पण देशासाठी अकरापट अधिक महत्वपूर्ण, अकराशे पट देशात अधिक लोकप्रिय असे श्री नेहरू अचानक आपल्याला सोडून गेले...! मी या सगळ्या दहा वर्षांत नेहरूंशी भांडलोय, वाद घातलाय, ज्याला मी सार्वजनिक नीतींना दोषी मानतोय परंतु, मी हेही जाणतो की, ते एकटेच त्या साऱ्या बाबी ठीकठाक करीत. दुसरं कुणी नाही. आता ते नाहीत. मला माझ्या लढ्यात कमकुवत करून टाकलंय. एक जानी दोस्त मी गमावलाय. आपल्या सगळ्यांमध्ये सर्वाधिक सभ्य असे ते एकटेच होते. आपल्यात आजही अनेक लोक सभ्य नाहीत...! (राजाजी ए लाईफ, के. राजमोहन गांधी, पृष्ठ ४०७) म्हणू हे स्पष्ट आहे की, केवळ महात्मा गांधीच नव्हे तर रवींद्रनाथ टागोर, भगतसिंह, आणि सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचीही पसंती नेहरु हेच होते. या साऱ्यांनी आमच्या प्रयत्नांना आकार देण्याचं स्वप्न पाहिलं. आणि त्या निर्णयाचं समर्थन वल्लभभाई पटेल आणि राजाजी यांनी केलं होतं. त्यामुळं सध्या नेहरूंवर केले जाणारे हल्ले त्या सगळ्यांवर केलेले हल्ले आहेत! असं मानणं योग्य ठरेल!

हरीश केंची
९४२२३१०६०९

-

Saturday 11 July 2020

काँग्रेसला रचनात्मक दुरुस्त्यांची गरज

"आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीतही काँग्रेसची एवढी दुर्गती झाली नव्हती. जनाधार नसलेल्या लोकांच्या हाती काँग्रेसची सूत्रं गेल्यानं ही पाळी आलीय. आपसातली गटबाजी थांबत नसल्यानं एकेकाळचे कट्टर काँग्रेसी भाजपमध्ये गेले आहेत. भाजप हाऊसफुल्ल झाल्यानं शिवसेनेत जात आहेत. राहुलबाबानं खरं तर लोकसभा पराभवाची कारणे शोधून नव्यानं कामाला लागायला हवं होतं. पराभवामुळं काँग्रेसची जेवढी नाचक्की झाली नाही तेवढी राहुलबाबाच्या घरी बसण्यानं झाली. ‘एक्स्पायरी डेट’ संपलेल्या औषधासारखी काँग्रेसची अवस्था झालीय. ‘एक्स्पायरी’ झालेले औषध जसं काम करत नाही, तसं काँग्रेसचं झालंय. तुम्ही लिहून ठेवा, आणखी किमान दोन निवडणुका मोदींच्या बाजूने आहेत. गांधी नावाचा करिष्मा पक्षानं स्वतःच्या करणीनं संपवलाय. प्रियांका याही फुसका बार निघाल्या. काँग्रेसला ह्या जीवघेण्या आजारातून उठवेल असा नेताच आज काँग्रेसकडं नाही. काँग्रेस कुठल्याही कामाचा उरला नाही. कुणाला निवडून आणू शकत नाही तो पक्ष काय कामाचा? पक्षाला आता रचनात्मक दुरुस्त्यांची गरज आहे!"
--------------------------------------------------------------

*लो* कसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची कामगिरी अगदीच सुमार झाली. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा त्यांच्याच मतदारसंघात अमेठीतला पराभव पक्षाला भारी पडला. काँग्रेसचा असा दारुण पराभव पाहून राहुल गांधी यांनी आपला काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तो परत मागे घेण्यास ते नकार देत होते. तर काँग्रेस कार्यकारिणी समिती त्यांचा राजीनामा घेण्यास तयार नसल्यानं संभ्रम निर्माण झाला. अखेर पुन्हा एकदा काँग्रेसची गेलेली सत्ता मिळविणाऱ्या सोनिया गांधीकडं पक्षाची धुरा दिली गेली. घराणेशाही ही केवळ काँग्रेसमध्ये नसून ती भाजपमध्येही आहे. पण काँग्रेस पक्षावर तो एकाच घराण्याचा मालकी पक्ष असल्याचा आरोप केला जातो. या पक्षाची धुरा गांधी घराण्यातील पाचव्या पिढीकडे आली होती आणि भाजपनं हा घराणेशाहीचा मुद्दा लोकसभा निवडणुकीत तरुणांवर विशेषत: असा तरुण ज्याला नेहरु-गांधी घराण्याच्या वारसाबद्धल, त्यांच्या इतिहासाबद्धल फारशी माहिती नाही, याच्या मनावर बिंबवला आणि अभूतपूर्व यश मिळवलं. एकूणात काँग्रेसपुढं प्रश्न आहेत. हा पक्ष नेहरु-गांधी घराण्याशिवाय जगू शकतो का? की गांधी घराण्यामुळे हा पक्ष तग धरू शकतो?

*ढुढ्ढाचार्यांना दूर ठेवावं लागेल*
काँग्रेसच्या पराभवाबद्धल बरीच कारणीमीमांसा झाली आहे; पण हा पक्ष स्वत:मध्ये संजीवनी आणू शकतो वा हा पक्ष गांधी घराण्याला सोबत घेऊन वा त्यांना वगळून पुनरुज्जीवित होऊ शकतो, या मुद्द्यांकडं दुर्लक्ष झालेलं दिसतं. हा मार्ग तसा दीर्घपल्ल्याचा आहे. इंदिरा गांधी यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या पक्षाच्या रचनेत बदल करण्याची, घराणेशाहीपासून मुक्त करण्याची चांगली संधी मिळाली होती. त्यावेळी पक्षात शीर्षस्थानी सत्तेत विभागणी आणि खालच्या स्तरावर अधिकारांची पुनर्रचना झाली असती तर कदाचित काँग्रेसवर आता संघटनात्मक पातळीवर जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते कदाचित झाले नसते. पण तसं काही झालं नाही. राजीव गांधींनी पक्षाची सूत्रं हाती घेतली पण त्यांनाही संघटनेच्या रचनेत काही सुधारणा करता आल्या नाहीत. ९० च्या दशकांत नरसिंहराव आणि सीताराम केसरी हे दोन अध्यक्ष गांधी घराणेतर अध्यक्ष म्हणून निवडून आले. १९९८ मध्ये पक्षानं सोनिया गांधी यांना अध्यक्ष म्हणून आणलं आणि पुन्हा गांधी घराण्याकडं सूत्रं दिली. त्यावेळी पक्षानं स्वत:ची देशव्यापी ताकद लक्षात घेऊन स्वत:चं सामूहिक नेतृत्व पणास लावून त्यावर विश्वास ठेवून नेतृत्व निवडलं असतं तर आज जो हिंदू बहुसंख्याकवादाचा फटका पक्षाला बसला आहे तो बसला नसता. आता पक्ष कार्यकारिणी गांधी घराण्याला पक्षापासून दूर ठेवून पक्षातून लोकशाही नेतृत्व उभं करू शकतं. काँग्रेसवर गांधी घराण्याचा जो रिमोट कंट्रोल आहे तो काढून घेऊ शकतं. ही रचना पक्षाला दोन दृष्टीकोनातून कामी येऊ शकतं. एकीकडं ते गांधी घराण्याचं नाव घेऊ शकतात आणि दुसरीकडं पक्षात सत्ताधिकाराची विभागणी करू शकतात. अशानं पक्षात जी चापलुसगिरीची, भाटगिरीची परंपरा आहे ती थांबेल आणि गांधी घराण्याकडं बोट दाखवण्याची जी पद्धत आहे ती थांबेल. पक्ष कार्यकारिणीनं पक्षात वर्षानुवर्षे जे ढुढ्‌ढाचार्य म्हणून बसले आहेत, जे निवडणूक जिंकू शकत नाहीत, अशा नेत्यांना पक्षाबाहेर बसवण्याची आज नितांत गरज आहे.

*पक्षाच्या कार्यकारिणीचा कालोत्तर ऱ्हास*
काँग्रेस कार्यकारिणी समिती ही प्रत्येक अध्यक्षाच्या कार्यकाळात वेगळ्या स्वरुपाची होती. जवाहरलाल नेहरु यांच्या काळात पक्षात लोकशाही होती, अनेक दिग्गज नेतेही होते. या नेत्यांचं नेहरुंशीही मतभेद होते. पण १९६७ नंतर इंदिरा गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यकारिणीची ताकद कमी केली. १९७१च्या विजयानंतर इंदिरा गांधी यांच्याकडं पक्षाची सर्व सूत्रं आली. विविध राज्यात प्रदेश काँग्रेसही इंदिरा गांधी यांच्या ताब्यात आल्या. त्यामुळं पक्षात हायकमांड संस्कृती तयार झाली. आता ही संस्कृती आणि कार्यकारिणीची एकूणच देशातील रचना बदलण्याची वेळ आली आहे. सध्या हा पक्ष अधिकारांची विभागणी नसल्यानं गोंधळलेला आहे. पक्षात खालून वर संवादाचा कुठलाच मार्ग नाही. पूर्वी हा संवाद असल्यानं प्रदेश अध्यक्षाच्या निवडणुका होताना सामान्य स्तरावरचा कार्यकर्ता त्या निवडणूक प्रक्रियेशी जोडला जायचा. त्यामुळं पक्षाची यंत्रणा मजबूत असायची. आणीबाणीच्या काळात हे सर्व उध्वस्त झालं. पंतप्रधानाच्या हातात पक्षाची सर्व पातळीवरची सूत्रं गेली. अगदी काँग्रेस कार्यकारिणी समितीपासून संसदेतील पक्ष समिती, कॅबिनेट मंत्री असा हा प्रकार होता. एका अर्थानं पक्षाची रचना पिरॅमिडसारखी झाली.

*गटबाजीनं पक्ष पोखरला गेलाय*
१९७२ नंतर पक्षात विविध भागातील प्रतिनिधित्वाची परंपरा लयास जाऊ लागली. पक्षातील निवडणुका थांबल्या आणि थेट नेमणुका होऊ लागल्या. एकेकाळी काँग्रेसचा गड समजल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशातील सुमारे ८ हजाराहून अधिक सहकारी सोसायट्यांमध्ये १९७७ पासून एकदाही निवडणूका झालेल्या नाहीत. वास्तविक सहकारी सोसायट्या या विधानसभा मतदारसंघाशी जोडलेल्या असतात. ती रचना संपुष्टात आली. १९७७मध्ये पक्षाचा दारुण पराभव झाल्यानंतर प्रदेश, जिल्हा स्तरावर निवडणुका घेणं बंद झालं. इंदिरा गांधी यांचे चिरंजीव संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूथ काँग्रेस हा त्यांनाच मानणाऱ्यांचा अड्‌डा बनला.१९७० ते १९८० दरम्यान इंदिरा गांधी यांच्या हाती पक्षाची सर्व सूत्रं आल्यानंतर त्यांनी अनेक प्रभावशाली नेत्यांचे पत्ते कापले. आपल्या मुलाला आपला वारसदार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नानं हा पक्ष त्या घराण्याच्या ताब्यात गेला.
२००० सालानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसमध्ये पुनरुज्जीवन करण्यासाठी काही प्रयत्न हाती घेतलं. त्यांनी निवडणुका घेण्यास सुरवात केली त्याचं यश मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमधील विजयातून दिसून आलं. पण या प्रयत्नांचा वेग अतिशय संथ आहे. अजूनही पक्ष निवडणुकांपेक्षा गटातटाच्या राजकारणावर अवलंबून आहे.

*तरुण नेतृत्वाला जाणीवपूर्वक डावललं*
आज काँग्रेसचा देशात कोणत्याही राज्यात गेल्यास जो निवडणूक हाताळू शकतो किंवा जिंकू शकतो असा स्वत:चा मतदार असलेला एखाद दुसराच नेता दिसून येतो. स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेसकडं यशवंतराव चव्हाण, कामराज, बी. सी. रॉय असे दिग्गज नेते होते. पण इंदिरा गांधींच्या काळात त्यांच्या राजकीय हस्तक्षेपानं काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेतृत्व संपुष्टात येत गेलं. गेल्या काही दशकात शीला दीक्षित, दिग्विजय सिंह, अमरिंदर सिंग असं नेतृत्व उभं झालं होतं. पण यूपीए सरकारच्या काळात पक्षानं राहुल गांधी यांना आव्हान नको म्हणून तरुण नेत्यांची फळी जन्मास येऊ दिली नाही. जे तरुण नेते आहेत उदा. मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे, राजस्थानमधून सचिन पायलट, मुंबईतून देवरा अशांकडे पक्षाचं नेतृत्व दिलं नाही. एकंदरीत काँग्रेसला तरुण नेते घडवावे लागतील जे यापुढं पक्षाला पुढं नेऊ शकतील. गेल्या वर्षी तेलंगणा राज्यात काँग्रेसचे १८ पैकी १२ आमदार तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाकडे गेले त्याचे एक कारण म्हणजे या आमदारांना आता मंत्रिपदे आणि सत्ता हवी होती. त्याचबरोबर पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा राज्याशी संवाद नसल्याचंही हे द्योतक आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसनं घराणेशाहीचा आरोप होत असतानाही प्रियंका गांधी यांना प्रचारात उतरवलं पण त्याचा पक्षाला फायदा झाला नाही. आगामी काळात प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार म्हणून काँग्रेस त्यांना पुढं आणण्याचा प्रयत्न केला तरी पण त्याचवेळी पक्ष अन्य तरुण नेतृत्वाला पुढं आणणार नसेल तर या प्रयत्नांना फार यश मिळेल असं आज तरी वाटत नाही.

*पक्षानं पुनर्रचनेवर भर दिला पाहिजे*
सध्याच्या घडीला काँग्रेसला पक्षाच्या पुनर्रचनेवर भर द्यावा लागेल. निवडणुकांच्यापूर्वी सामान्य मतदाराला जोडून घेणं, त्याच्याशी संवाद साधणं असे प्रयत्न त्यांना करावं लागतील. स्वातंत्र्य चळवळीत हा पक्ष म्हणजे एक जनचळवळ होती. आता पक्षाला स्वत:च्या कार्यकर्त्यांचं संघटन बांधावं लागेल. जाळं तयार करावं लागेल. भाजपची स्वत: कार्यकर्त्यांची फळी आहे. तेथे ‘पन्ना प्रमुख’ म्हणजे बूथ मजबूत करणारा कार्यकर्ता तयार आहे. काँग्रेसनं जिल्हा-तालुका पातळीवरील पक्ष नेतृत्वाला स्वायत्तता आणि अधिकार दिले पाहिजेत. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणात लोकसभा निवडणुकातील निराशजनक कामगिरीमुळं पक्षांतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत आणि त्यावर कुणाचा अंकुश राहिलेला नाही, अशानं पक्षाची प्रतिमा डागाळू शकते. एकूणात पक्षाच्या रचनेत बदल केल्यास पक्षामध्ये जिवंतपणा येऊ शकतो. राहुल गांधी यांच्यापुढं हा पक्ष सोडून जाण्याचा पर्याय आहे किंवा हा पक्ष एका घराण्याची मालकीचा न राहता तो लोकशाहीवादी पक्ष कसा करता येईल यासाठी त्यांना कसून प्रयत्न करावं लागतील. हे सर्व सोपं नाही. एका मोठ्या शस्त्रक्रियेची गरज आहे. ती न केल्यास पक्ष टिकण्याची शक्यता मावळत जाईल आणि देशाचं फार मोठं नुकसान होईल. जिवंत लोकशाहीसाठी खंबीर असा विरोधी पक्ष असावा लागतो. भारतासारख्या देशात जिथं एकाधिकारशाही आणि हिंदु बहुसंख्याकवाद फोफावत आहे अशावेळी प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. काँग्रेसनं अनेक मन्वंतरं पाहिली आहेत त्यांनी आपल्यात सुधारणाही केल्या होत्या. या घडीला त्यांनी तसे प्रयत्न केल्यास या पक्षाला उभारी येईल. अन्यथा राष्ट्रीय स्तरावर असलेल्या पक्षाचं अस्तित्व धोक्यात येईल!
-हरीश केंची
९४२२३१०६०९




प्रज्ञासूर्यावर हल्ला!

"तमाम आंबेडकरी जनतेचं श्रद्धास्थान असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईच्या दादरमधील निवासस्थानात 'राजगृह'मध्ये शिरत मंगळवारी दोघा अज्ञातांनी तोडफोड केली. मंगळवारी ७ जुलैला संध्याकाळी हा प्रकार घडलाय. यामध्ये घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरे, कुंड्या आणि खिडक्यांचं नुकसान झालंय. दादर पूर्व भागात असणारं 'राजगृह' हे निवासस्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खास त्यांच्या पुस्तकांसाठी बांधलं होतं. आता या इमारतीत तळमजल्यावर बाबासाहेबांच्या घराच्या खोल्यांमध्ये त्यांनी वापरलेल्या वस्तूंचं संग्रहालय करण्यात आलेलं आहे. यामध्ये त्यांच्या वापरातल्या विविध वस्तू - भांडी, चालताना वापरण्याच्या विविध छड्या, त्यांचा चष्मा आणि त्यांनी तयार केलेल्या संविधानाची प्रत आहे. चैत्यभूमीवर जाणारा प्रत्येकजण इथं राजगृहावर डॉ. बाबासाहेबांचं वास्तव्य असलेल्या निवासस्थानाची अनुभूती घेत असतो. तिथं त्यांच्या अस्तित्वाचा भास होतो अशी त्यांची भावना असते. ते तिथं नतमस्तक होतात. त्या राजगृहाची ही माहिती!"
---------------------------------------------------------

*म*हाराष्ट्रात एक घर आहे. या घरात सुमारे ५०,००० हून अधिक पुस्तकं आहेत. त्यामध्ये राजकारणावर ३ हजार, कायद्यावर ५ हजार, अर्थशास्त्रावर १ हजार, तत्वज्ञानावर ६ हजार, युद्धशास्त्रावर ३ हजार, धर्मशास्त्रावर २ हजार अशा विविध विषयांवरील पुस्तकांची अशी बरीच संख्या आहे. तुम्हाला या घराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर एक गोष्ट विशेष करून सांगावीशी वाटते ती म्हणजे, या घरातील पुस्तकांचं ज्ञानसंपन्न असं ग्रंथालय हे त्याकाळचं जगातील सर्वांधिक व्यक्तिगत पुस्तकं असणारं ग्रंथालय होतं. हे साधं घर नसून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह आहे. काही दिवसांपूर्वी या राजगृहावर एका माथेफिरूनं हल्ला केला. बंगल्याच्या आवारात कुंड्या फोडून नुकसान केलं. वाईट या गोष्टींच वाटतं की ज्या घरात ६ हजाराहून अधिक तत्वज्ञानाची पुस्तकं आहेत त्या घरावर हल्ला करण्यात आलाय. यातील एक पान जरी या माथेफिरूनं वाचलं असतं तर त्यांच्याकडून नक्कीच असं कृत्य झालं नसतं. असो.

राजगृहावर करण्यात आलेल्या या भ्याड हल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी सर्व आंबेडकरी जनतेला आवाहन करत शांतता राखण्याची विनंती केलीय. बाबासाहेबांच्या विचारांना प्रमाण मानून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सर्वजण घेत आहेत. पण या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर “राजगृह” ही नेमकी वास्तू कशी आहे हे सांगण्याचा हा प्रयत्न. ब्रिटिशकाळात मुंबईत जॉर्ज पंचम यांच्या स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया बांधण्यात आलं, इतिहासात शहाजहानं मुमताजसाठी ताजमहल बांधल्याची नोंद आहे. आपल्यासारखी माणसं राहण्यासाठी घर बांधतात पण पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस हा खऱ्या अर्थानं महामानवच असतो. डॉ. बाबासाहेब हे महामानव होते म्हणून त्यांनी आपल्या पुस्तकांसाठी घर बांधण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते सत्यातही उतरवलं. बॅरिस्टर झाल्यानंतर देखील बाबासाहेबांची आर्थिक स्थिती तशी बेताचीच होती. १९३० सालापासून त्यांच्या प्रॅक्टिसमुळे या स्थितीत थोडाफार फरक पडत गेला. आर्थिक पातळ्यांवर स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी मुंबईत दोन घरं बांधण्याचा मनोदय केला. त्यापैकी एक घर हे खास पुस्तकांसाठी असणार होतं तर दुसरं घर हे राहण्यासाठी असणार होतं. त्यासाठी दादरच्या हिंदू कॉलनीत त्यांनी दोन प्लॉट घेतले. ९९ क्रमांकाचा आणि १२९ क्रमांकाचा प्लॉट त्यांनी विकत घेतला. १९३१ मध्ये बांधकामास सुरवात करून १९३३ साली त्याचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं. तर ९९ क्रमांकावर असणाऱ्या प्लॉटवर १९३२ साली बांधकाम सुरू करण्यात आलं. ९९ क्रमांकावरील बंगल्याचं नाव त्यांनी चार मिनार ठेवलं. मात्र पुढे ९ मे १९४१ साली त्यांनी चारमिनार ही इमारत विकली. कशासाठी तर ग्रंथ विकत घेण्यासाठी. १२९ क्रमांकाच्या प्लॉटवर बांधण्यात आलेल्या सुरेख दुमजली इमारतीचे नाव बाबासाहेबांनी गौतम बुद्ध यांच्या राजमहालावरून “राजगृह” असं ठेवलं.

माणसं घरात पुस्तकं ठेवतात. पण राजगृहाची रचना पाहिली तर बाबासाहेब पुस्तकांमध्ये राहायचे हे दिसून येतं. आपलं सुरेख ग्रंथालय त्यांनी बांधताना न्यूयॉर्कमधील ग्रंथालयाचा अभ्यास केला होता. त्यासाठी मोठमोठे खांब आणि स्वच्छ प्रकाश येणाऱ्या खिडक्या बांधण्यात आल्या होत्या. अशा या राजगृहाचं बांधकाम पूर्ण होताच त्यांनी रमाईला इथं आणलं होतं. रमाई हे घर पाहताच म्हणाल्या होत्या हे घर नाही तर एका महान विद्वानाचं भव्य असं ग्रंथ भांडार वाटतं. पुढं इथंच बाबासाहेबांनी अनेक ग्रंथ लिहले. भारताचं संविधान तयार होण्याचं किंवा 'बुद्ध आणि त्यांचा धम्म' हे पुस्तक लिहिण्याचं राजगृह साक्षीदार राहिलं आहे.  बाबासाहेबांनी आपल्या पुस्तकांसाठी इंग्लंडच्या ठक्कर कंपनीतून ग्रंथालय कार्ड बनवून घेतली होती. बाबासाहेबांच्या अचूक स्मरणशक्तीमुळे ५० हजार पुस्तकांमधून त्यांनी ती अचूक सापडत असत. तासन् तास ते ही पुस्तकं वाचत बसत असत. इतक्या पुस्तकांमधून ते अचूक संदर्भ सांगत असत. एका विद्वान माणसानं पुस्तकांसाठी म्हणून हे घर बांधलं होतं. शेवटी इतकंच सांगावासं वाटतं की, या पुस्तकांमधील कोणतंही एक पुस्तक आणि कोणतीही एक ओळ वाचण्याचं धैर्य माथेफिरूंनी दाखवलं असत तर असा भ्याड हल्ला करण्याचं धाडस त्यांचं झालं नसतं.

राजगृह असं आहे

बाबासाहेबांचं मुंबईतलं निवासस्थान म्हणजे दादरच्या हिंदू कॉलनीतलं राजगृह. बाबासाहेबांनी मुंबईमध्ये स्थायिक व्हायचं ठरवल्यानंतर दादरमधली ही वास्तू बांधून घेतली होती. बाबासाहेबांकडे पुस्तकांचा मोठा संग्रह होता आणि त्यांनी या पुस्तकांसाठी हे घर खास बांधून घेतलं होतं. १९३१ ते १९३३ दरम्यान बाबासाहेबांनी ही वास्तू बांधून घेतली. राजगृहाच्या तळमजल्यावर बाबासाहेबांचं वास्तव्य होतं. आज राजगृहाच्या तळमजल्यावरच्या दोन खोल्यांमध्ये आज वस्तुसंग्रहालय आहे. डॉ. आंबेडकरांनी आणि रमाईंनी वापरलेल्या विविध वस्तू इथं ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये त्यांच्या वापरातलं फर्निचर, पितळेची भांडी, बाथटब या गोष्टी आहेत. या सगळ्यासोबतच बाबासाहेब ज्या खोलीत बसून काम करत तिथं त्यांचं टेबल, त्यांच्या संग्रहातली काही पुस्तकं ठेवण्यात आली आहेत. डॉ. आंबेडकरांना विविध प्रकारच्या चालताना वापरायच्या छड्या जमवण्याचाही छंद होता. वेगवेगळ्या मुठींच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणांहून त्यांनी आणलेल्या या छड्याही राजगृहातल्या या संग्रहात ठेवण्यात आल्या आहेत. सोबतच या खोलीतल्या टेबलावर बाबासाहेबांनी लिहीलेल्या भारतीय संविधानाची प्रत आणि त्यावर त्यांचा चष्माही ठेवण्यात आलाय. शेजारच्या खोलीत बाबासाहेबांच्या आयुष्यातले विविध क्षण दाखवणारे फोटोग्राफ्स आहेत. राजगृहातल्या याच संग्रहालयात बाबासाहेबांचा अस्थिकलशही ठेवण्यात आला आहे.

त्यांच्या निधनानंतर दादरच्या हिंदू कॉलनीतल्या याच राजगृहावर बाबासाहेबांचं पार्थिव आणण्यात आलं होतं. ज्या राजगृहाच्या पोर्चमध्ये बाबासाहेबांची गाडी दिमाखात शिरायची, तिथंच त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं आणि नंतर इथूनच ७ डिसेंबरच्या दुपारी बाबासाहेबांचा अखेरचा प्रवास सुरू झाला. दादर चौपाटीला ज्या जागी बाबासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले तिथं नंतर एक स्तूप उभारण्यात आला. स्तूप म्हणजेच चैत्य. म्हणूनच आता या जागेला चैत्यभूमी म्हणून ओळखलं जातं. अंत्यसंस्कारांनंतर बाबासाहेबांच्या अस्थी राजगृहात आणण्यात आल्या. हा अस्थिकलश आजही राजगृहात आहे. राजगृहाच्या वास्तूतलं तळमजल्यावरचं हे संग्रहालय सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुलं असतं तर वरच्या मजल्यावर आंबेडकर कुटुंबीय राहतात. ६ डिसेंबरला दादरमधल्या चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी येणारे अनेकजण राजगृहावरही येऊन जातात.

बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रेम केलं ते पुस्तकांवर! जेव्हा त्यांच्याजवळ असलेल्या पुस्तक संग्रहाला चाळीतील लहान घर अपुरं पडायला लागलं, तेव्हा बाबासाहेबांनी नवं घर बांधायचं ठरवलं. १९३० साली त्यासाठी बाबासाहेबांनी दादरला जागा विकत घेतली. पुढं बॅरिस्टरीतून कमावलेल्या पैशातून बाबासाहेबांनी घराचं काम सुरू केलं. बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा कालखंड काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी केल्या गेलेल्या आंदोलनासाठी ओळखला जातो. १९३० ला नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी बाबासाहेबांनी सुरू केलेलं आंदोलन जवळपास सहा वर्षं सुरू होतं. याच काळात बाबासाहेब बौद्धधर्माकडे आकृष्ठ होत होते. एकीकडं सत्याग्रह सुरु होता तर दुसरीकडं घराचं काम. दोन्ही जेव्हा पूर्ण व्हायला आलं तेव्हा बाबासाहेब एका ठोस निर्णयापर्यंत पोहचले होते. तो निर्णय म्हणजे बौद्ध धर्म स्वीकारण्याचा निर्णय. त्याची सुरुवात बाबासाहेबानी त्यांच्या नव्या घरापासून करायची ठरवलं. या नव्या घराला बाबासाहेबांनी नाव दिलं राजगृह. राजगृह हे नाव भारतातील बौद्ध धर्माच्या सुवर्णकाळाशी नातं सांगणारं होतं.

राजगृह अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार
भारतात मगध साम्राज्य जेव्हा शिखरावर होतं तेव्हा आत्ताच्या बिहारमधील नालंदा इथं बौद्ध राज्यांच्या राजधानीचं नाव राजगृह होतं. बिंबिसार आणि अजातशत्रू या राज्यांची ही राजधानी होती. सम्राट अशोकानंही इथं भेट दिली होती. एवढंच नाही तर तथागत गौतम बुद्ध हे देखील राजगृह या ठिकाणी राहिले होते. असे अनेक ऐतिहासिक संदर्भ लाभलेल्या राजगृहाचं नाव बाबासाहेबांनी आपल्या नव्या घराला द्यायचं ठरवलं. अर्थात पुढं या दादरचं हे नवं राजगृह देखील अनेक ऐतिहासिक घडामोडींचं साक्षीदार बनणार होतं. घराचं काम १९३३ ला पूर्ण झाल्यावर बाबासाहेब रमाई आंबेडकरांबरोबर इथं राहायला आले. बाबासाहेबांना त्यांचे आवडते ग्रंथ व्यवस्थित ठेवता यावेत आणि गरज पडेल तेव्हा त्यांचा उपयोग करता यावा यासाठी सोईस्कर ठरेल अशी या घराची बाबासाहेबांनी रचना करून घेतली होती.

राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह
बाबासाहेबांच्या आंदोलनाची आणि सामाजिक लढ्याची सूत्रं आता या राजगृहातून हलायला लागली. पण थोड्याच कालावधीत म्हणजे मे १९३५ ला रमाबाई आंबेडकरांचं इथं निधन झालं. पुढं हे राजगृह म्हणजे बाबासाहेबांचं ज्ञानगृह बनलं. बाबासाहेबांनी त्यांच्या अनेक महत्वाच्या ग्रंथांचं लेखन इथं केलं. 'एनिहिलेशन ऑफ कास्ट वेटींग फॉर व्हिजा' हे ग्रंथ इथंच आकाराला आलं. बाबासाहेबांनी त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना करण्याचा निर्णयही इथंच घेतला. पुढं बाबासाहेबांचं तब्ब्ल बावीस वर्ष या राजगृहात वास्तव्य राहिलं. या राजगृहातील पुस्तकांचा संग्रह हा गुणात्मक आणि संख्यात्मक दृष्ट्या देखील उच्च दर्जाचा होता. पुढं हे राजगृह आंबेडकर कुटुंबीयांचं मुंबईतील निवासस्थान म्हणून ओळखलं गेलं. पण या राजगृहाची खरी ओळख ही ज्ञान आणि ऊर्जेचं केंद्र म्हणूनच इतिहासात नोंद झालीय. कोणी कितीही प्रयत्न केला तरी त्यावर ओरखडाही पडणं शक्य नाही!
हरीश केंची
९४२२३१०६०९

सत्तेचा साज, भिक्षुकशाहीचा माज

अडल्याचे तेल आणले । सासूबाईचे न्हाणे झाले
मामंजीची शेंडी झाली । उरले-सुरले झाकून ठेवले
ते येऊन मांजराने सांडले । वेशीपर्यंत ओघळ गेला
पाटलाचा रेडा । त्यात वाहून गेला -


या दृष्टांताप्रमाणे सत्ताधारी भाजपेयीं कारभारी देशात , राज्यात वागत आहेत. त्यांच्या आगाऊ-आचरट तोंडाळपणानं 'अतिरेक' या शब्दांचीही सीमा ओलांडलीय. मंत्री, आमदार, खासदार तर अकलेचे तारे तोडतात, की त्यापुढे तंतुवाद्येही फिकी पडावीत. 'ज्यांना नरेंद्र मोदींना मतं द्यायची नाहीत, त्यांनी पाकिस्तानात निघून जावं' इथून सुरू झालेला वाचाळवीरांचा थुकवडा अजूनही गटारासारखा झरतो आहे. आता तर गोपीचंदानं आपल्या तोंडातली थुंकी समाजमनाच्या सूर्यावर उडवण्याचा प्रयत्न केलाय. पण त्या थुंका त्यांच्याच तोंडावर पडल्या. त्या चाटून पुसूनच माफी मागण्याची वेळ आली. अशा थुकरटात नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांची भर पडलीय. नुकतंच त्यांनी शरद पवारांवर टीका करताना 'शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना!' असं म्हटलंय. टीका करण्याचं तसं काही कारण नव्हतं, पण त्यांनी पोटातलं ओठावर आणून आपला कार्यभाग साधलाय. हा त्यांचा कृतघ्नपणा आहे. 'मला असं काही म्हणायचं नव्हतं, बोलण्याच्या ओघात बोललो!' अशी चलाखी करत माफी मगितलीय. अशा चलाख्यांची मोठी चळत राजकारणात आणि भाजपत आहे. हा योगायोग नाही तर, सत्तेचा अवगुणच आहे. जिभेला हाड नसतेच; पण तिच्यावर टाळा नसल्यासारखं बोलायचं; वर मला तसं बोलायचं नव्हतं, कुणाला दुखवायचं नव्हतं, माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला' असं म्हणत त्यांनी माफी मागितली. पण त्यांच्या वक्तव्याची सारवासारवी देवेंद्र फडणवीस-चंद्रकातदादा पाटील यांनी करायचं काही एक कारण नव्हतं. हे सारं म्हणणं आणि बाजू घेणं हा सारा चलाखीचा आणि लोकांत परस्पर विरोधी मतांचा झगडा लावणारा मामला आहे. मराठा-धनगर असा वाद रंगवण्याचा मानस असल्याचं नाकारता येत नाही.

केवळ पडळकरच नाही यापुढे रावसाहेब दानवे, राम कदम, प्रशांत परिचारक, अतुल भातखळकर, महादेव जानकर, सदाभाऊ खोत, रमेश पोखरियाल, नेपाळ सिंग, अनंत हेगडे, अनिलकुमार वीज, सत्यपालसिंह, साक्षी महाराज, गिरीराज सिंग आणि हो आपले रामदास आठवले हे असे एक से बढकर एक महामानव अनेकदा माध्यमामध्ये जागा व्यापत असतात. दहीहंडीच्या कार्यक्रमात राम कदम म्हणाले होते, 'तुम्हाला एखादी मुलगी आवडली, तुम्ही तिला प्रपोज केलं, तुमच्या आई वडिलांना आवडली, तर मी ती मुलगी पळवून आणून तुम्हाला देईन!' अगोदर बातमी कुठे आली नाही, दिसली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड यांनी या वक्तव्याचा व्हिडिओ अपलोड केला, त्यानंतर मुख्य माध्यमांनी त्याची दखल घेतली. राम कदम यांच्या अकलेची हंडी फोडण्यापर्यंत या प्रकारचा भ्रष्टाचार झाल्याचे कदम यांनी तातडीने जाहीर केलं नाही. त्यांची बाजू सावरायला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना पुढे यावे लागले. हे त्या पक्षाचे खायचे आणि दाखवायचे दात एकच असल्याची साक्ष आहे. मोठा गदारोळ झाल्यानंतर सपशेल माफी मागितली. सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेत तोंडावर पडले प्रशांत परिचारक! ते तिकडे म्हणाले, 'सीमेवर सैनिक वर्षं वर्षभर असतात, इकडे गावाकडे त्याला मुलगा झाल्यावर तो तिकडे पेढे वाटतो!' या वक्त्यव्यातून त्यांनी सैनिकांच्या प्रती स्वतःची भावना व्यक्त केली. तरीही त्याचा पक्षातील जबाबदार व्यक्तींनी त्यांना खडसावले नाही. यांच्या निलंबनाचा कालावधी कमी करण्याचा प्रयत्न झाला. छत्रपतिंचा आशिर्वाद आहे असं म्हणत सत्तेवर येणाऱ्या भाजपच्या अहमदनगरचा उपमहापौर काय बोलला हे सारेच जाणतात. शिवछत्रपतींचा उपमर्द करणार्यांचा साधा निषेधही जेला गेला नाही. सोलापूरचे माजी खासदार शरद बनसोडे यांची व्यक्तव्य पुन्हा सांगण्याची गरज नाही. पार्श्वभूमीवर आमदार पडळकर यांना कसं पाहायचं?

पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित विकास आघाडी यांच्यावतीनं सांगलीत लढविली होती. त्यापूर्वी ते महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षात होते, त्यांनी निवडणुकीपूर्वी वंचितमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी गुजरातचे पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांना प्रचारासाठी आणलं होतं. यादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली होती. गोपीचंद पडळकर शिवराळ भाषेत मोदींवर टीका करत होते. अशा नेत्याला भाजपने विधान परिषदेची संधी दिली आहे. यातून भाजपचं सध्याचं राजकारण दिसून आलंय. विधानसभेच्या वेळीही पडळकर यांना अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी याबाबत बोलताना आपण फक्त जनसामान्यांचा आवाज लोकांसमोर मांडत असल्याचं, तसंच धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण पडळकर यांनी दिलं होतं. पण पडळकर यांच्या निवडणुकांना हजारो-लाखोंची गर्दी होत असूनसुद्धा त्याचं मतांमध्ये रुपांतर झाल्याचं आतापर्यंत कधीच दिसून आलं नाही. त्यामुळे लोकांमधून निवडून येण्याची संधी पडळकर यांच्या वाट्याला अद्याप आलेली नाही. पडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोडं पाहावं लागलं आहे

२०१९ च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याच्या नामुष्की ओढवली होती. निवडणुकीत अजित पवार यांना १ लाख ९५ हजार ६४१ म्हणजे जवळपास दोन लाख मतं मिळाली. तर पडळकर यांना केवळ ३० हजार ३७६ मतांवर समाधान मानावं लागलं होतं. तर २०१९ एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीस उभे होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली होती. पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागलां होता. याशिवाय २०१४ आणि २००९ मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. यात २०१४ मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर २००९ ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती, पण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही. उलट त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याचं दिसून येईल. अखेर विधान परिषदेच्या माध्यमातून आता पडळकर यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आहे.

कट्टर हिंदुत्ववादी संघटना असलेल्या 'शिवप्रतिष्ठान संस्थाना'चे प्रमुख संभाजी भिडे यांच्याशी तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत पडळकर यांचा संबंध असल्याचा आरोप पडळकर यांच्यावर वारंवार होत आला आहे. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगाव दंगल प्रकरण घडल्यानंतर आणि त्यामध्ये संभाजी भिडेंचं नाव आल्यावर प्रकाश आंबेडकर यांनी भिडेंना या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हटलं होतं. लोकसभा निवडणुकीत पडळकर यांना वंचितची उमेदवारी मिळाल्यानंतर याच संभाजी भिडे यांच्यासोबतचे आणि संघाच्या गणवेशातील फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण या दोन्ही संघटनांशी आपला काहीएक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण गोपीचंद पडळकर यांनी त्यावेळी दिलं होतं. तसंच सांगली जिल्हातील सर्वपक्षीय नेत्यांचे संभाजी भिडे यांच्याशी संबंध आहेत. तसेच संबंध आपलेही आहेत. ते दोषी असतील तर कारवाई व्हायला हवी, असं ते म्हणाले होते. पण हिंदुत्ववादी राजकारणाच्या अवतीभोवतीच पडळकर यांच्या राजकारणाला सुरूवात झाल्याचं दिसून येतं. पडळकर यांचे भिडे गुरूजी यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत. त्यांच्या अनेक कार्यक्रमांमध्ये पडळकर दिसले आहेत. पडळकर यांचा पाया हिंदुत्त्ववादी राजकारणाचा आहे. याचा त्यांना भाजपमध्ये फायदा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गोपीचंद पडळकर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू असल्याने त्यांना भाजपमध्ये संधी मिळत आहेत. सध्याच्या भाजपच्या राजकारणात फडणवीसांचा वरचष्मा असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांनी आपल्या स्पर्धकांना अलगद बाजूला केलं आहे. त्यांनी अनेक नव्या फळीच्या नेत्यांना पुढे आणलं आहे. नव्या नेत्यांना संधी देऊन नेतृत्व आपल्या हातात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून पडळकरांची निवड करण्यात आलेली असू शकते. भारतीय जनता पक्षाकडे सध्या मोठा धनगर चेहरा नाही. पूर्वी प्रकाश शेंडगे काही काळ होते. पण ते बाजूला झाले. राम शिंदे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. ज्याप्रकारे आयात मराठा नेत्यांना भाजपने मोठ्या प्रमाणात संधी दिली. त्याचप्रमाणे धनगर समाजातील पडळकर यांना राजकीय समीकरण डोक्यात ठेवून संधी देण्यात आल्याची शक्यता आहे.

चौकट
*उद्धव ठाकरे, फडणवीस यांना शुभेच्छा*
सध्या आघाडी सरकारचे शिल्पकार, शरद पवार यांना सतत दक्ष राहावे लागत आहे. कारण हे सरकार आपसातील मतभेदांमुळे कोसळायला हवंय, अशी तीव्र इच्छा फडणवीस आणि दरेकर यांची आहे. फडणवीस यांची उर्जा वाखाणण्याजोगी आहे. दरेकरही त्यांच्या पाठोपाठ फिरताहेत. आशिष शेलार आणि राम कदम हे डफली घेऊन सरकारच्या नावानं होळीचा शिमगा साजरा करीत आहेत. फडणवीस सत्ता हातातून निसटल्यानं कासावीस झालेले आहेत. पण त्यांना याची लाज वाटत नाही, की आपण इतर छोट्या राजकीय पक्षांप्रमाणे, शिवसेनेलाही संपवायला निघालो होतो. शिवसेनेनं अनेकदा प्रामाणिकपणे, सहकार्य केले होते. परंतु भाजप जणू बाळासाहेब जाण्याचीच वाट पाहत होती. कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी ही अविश्वसनिय आघाडी होईल, असं स्वप्नातही फडणवीसांना वाटलं नव्हतं. त्यामुळंच त्यांचा तिळपापड झाला आहे. फडणवीस एवढे उध्दट आणि किंचाळणारे असतील असं वाटलं नव्हतं. त्यांनाही हे ठाऊक आहे, की आपण सत्तेवर असतो तरी सध्याचं सरकार जे करतंय, त्यापलिकडे आपण फार काही करु शकलो नसतो. परंतु सत्ता हातातून निसटल्याचं शल्य, त्यांना बोचतंय. त्यांनी फार मनाला लावून घेतलंय. त्यामुळंच सरकारला कोंडीत पकडण्याची, एकही संधी ते सोडत नाहीत. एक विरोधी पक्ष नेता कसा असावा, याचं आदर्श उदाहरण आहे. खरोखरच ते याही परिस्थितीत, सरकारला जेरीस आणता येईल, तेवढं आणत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे अचानकपणे घेतलेली जबाबदारी चांगली पार पाडत आहेत. त्यांचा संयम आणि विवेक वाखाणण्याजोगा आहे. ते फडणवीस आणि दरेकर यांच्या टीकेमुळे बिथरले नाहीत, की आततायीपणा दाखवत नाहीत. त्याचबरोबर आघाडीतील बेताल मंत्र्यांना जाहीरपणे न खडसावता त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून प्रश्न सोडवताहेत. शरद पवारांवर फार मोठी जबाबदारी आहे. कारण सरकारचे शिल्पकार तेच आहेत. सरकार पडलं तर,त्यांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्हं उभं राहिल. आणि आयुष्याचा मावळतीला ते अपयश पदरात घेऊ इच्छित नाहीत. सरकार पडणं, राहणं यापेक्षाही त्यांच्या जाणतेपणाची कसोटी पाहणारा काळ आहे. त्यामुळंच हे सरकार पाच वर्षे चालेलच, पण फडणवीस यांचे रंग, या निमित्तानं दिसले. त्याचबरोबर तावडे, खडसे, मुंढे, बावनकुळे, मुनगंटीवार यांना सत्ता असो वा नसो कटवायचंच होतं हेही स्पष्ट झालं. नागपूरचे त्यांचे सत्तेतील स्पर्धक मित्र नितीन गडकरी, हे मात्र अधूनमधून चावे घेत राहतात. त्यामुळं फडणवीस दुखावले जातात. पण तरीही त्यांचा संयम, वाखाणण्याजोगा आहे. उध्दव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाही आपापल्या भूमिका योग्य प्रकारे निभावताहेत त्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही अशीच कामगिरी बजावतील यासाठी राज्याचा नागरिक म्हणून शुभेच्छा!

हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 4 July 2020

स्मृती जॉर्ज फर्नांडिसांची...!

"आज चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झालाय. १९६२ च्या युद्धातली भारताची स्थिती अवघड बनलेली होती. चीनचं गुरगुरणं सुरूच होतं. अटलजींच्या मंत्रिमंडळात जॉर्ज फर्नांडिस हे संरक्षणमंत्री होते त्यांनी सीमेवर दौरा केला तेव्हा त्यांना लष्कराच्या दळणवळणाच्या समस्या लक्षांत आल्या त्यांनी मग लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत लष्कराच्या वाहनांना ये-जा करता यावी म्हणून पक्की सडक तयार करण्याचा आराखडा तयार करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली. त्यांच्या या दूरदृष्टीमुळं आजच्या सत्ताधाऱ्यांना चीनला धमकावणं शक्य झालं आहे. मात्र त्यांचा आज सरकारला विसर पडलाय, त्यांचा कुठेही उल्लेख होत नाही. जॉर्ज हे एक वादळी व्यक्तिमत्व होतं. साधासुधा माणूस पण सामान्यांना आपलंसं वाटणारं व्यक्तिमत्त्व आज आपल्यात नाही पण चीनच्या कुरापतीनं त्यांची आठवण येणं स्वाभाविक आहे.!"
-------------------------------------------------------

कर्नाटकात जन्म घेऊन मुंबईला आपलं कार्यक्षेत्र बनवलं. पण आपल्या राजकीय व्यक्तिमत्वाला घुमारे आणले ते उत्तरेकडे! निवडणुका लढवल्या त्या बिहारमध्ये! खऱ्या अर्थानं अखिल भारतीय नेतृत्व म्हणता येईल असा हा राष्ट्रीय नेता! जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व महाभारतातल्या कर्णासारखं किंवा बर्बरिकसारखं म्हणता येईल असं! किंवा ग्रीक शोकांतिकेतील व्यक्तिरेखेशी तुलना करायची झाल्यास होमरच्या इलियाड या महाकाव्यातल्या आकिलीससारखं होतं. प्रचंड ऊर्जा असलेला, संघर्ष आणि त्यागातून उभा राहिलेला हा माणूस संपूर्ण भारतातील गरिब-शोषित, कामगार-शेतकरी, दलित-अल्पसंख्याकांच्या मनावर अधिराज्य गाजवू शकेल असा होता. अल्पसंख्य ख्रिस्ती समाजात जन्माला येऊनही केवळ स्वकर्तृत्वावर जॉर्ज फर्नांडिस बहुसंख्याक हिंदू असलेल्या भारतात प्रधानमंत्री बनण्याची क्षमता असणारा माणूस होता. कर्णासारखा धनुर्धारी आणि कवचकुंडलाचं वरदान लाभलेला…! पण राजकीय लढाईत अनैतिकतेच्या बाजूनं कुरुक्षेत्रात उतरलं तर दारूण अंताशिवाय हाती काही लागत नाही. जॉर्ज यांच्याबाबतीतही अगदी असंच झालं.

मंगलोर जवळच्या दक्षिण कन्नड भागातून मुंबईत नशीब कमवायला आलेल्या तरुण जॉर्जकडं मुंबईच्या रस्त्यांवर झोपण्यासाठी पसरण्याची पथारीही नव्हती. शिक्षणात फारसा काही उजेड पाडू न शकलेल्या या तरुणाला वाचनाची मात्र प्रचंड आवड होती. कन्नडसोबतच इंग्रजी भाषेतील जे मिळेल ते अधाशासारखे वाचण्याच्या या त्याच्या छंदातूनच त्याची लोकशाही समाजवादाच्या तत्त्वज्ञानाशी जुजबी ओळख झाली होती. यातूनच मुंबईत आल्यावर ते समाजवादी कामगार नेते पी. डिमेलो यांच्या संपर्कात आले. जॉर्जच्याच मँगलोरमधून आलेल्या डिमेलो यांना त्यांच्यातील ठिणगी जाणवली आणि त्यांनी त्याला डॉक वर्कर्स युनियनच्या कामात सामावून घेतलं. जॉर्ज फर्नांडिस हे व्यक्तिमत्व बनण्याची ती पहिली पायरी होती. डॉक वर्कर्स युनियनमध्ये काम करतानाच त्यांचा संपर्क मुंबई महापालिका कामगारांशी आला. महापालिका कामगारांच्या प्रश्नावर लढणारी कुठलीच आक्रमक संघटना तोवर अस्तित्वात नव्हती. विशेष म्हणजे मुंबई स्वच्छ करणाऱ्या सफाई कामगारांची अवस्था तर खूपच वाईट होती. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या 'पिछडा पावे सौ मे साठ' या नीतीवर काम करणाऱ्या जॉर्ज यांनी महापालिकेतील या प्रामुख्यानं दलित समाजातील कचरा कामगारांचं संघटन उभं करण्याचा विडा उचलला आणि १९५५ साली मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनची स्थापना झाली. त्यानंतर मग बेस्ट वर्कर्स, मुंबईतील रेस्टॉरंट कामगार, छोट्या-मोठ्या दुकानात काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी बॉम्बे लेबर युनियन, मग टॅक्सीमेन्स असा प्रवास वेगानं झाला. जॉर्ज त्या काळी रात्री १२ वाजता बोरिबंदरच्या आझाद मैदानावर हॉटेलमधील आणि छोट्या दुकानातील गुमास्ता कामगारांची सभा घेत असत. काम संपवून कामगार खांद्यावर लाल बावटा टाकून साथी जॉर्ज फर्नांडिस झिंदाबादचे नारे देत आझाद मैदानात जमत. त्यांच्या कामाचा शिण जणू जॉर्ज यांच्या भाषणानं पार उतरून जात असे. न थकता दोन-तीन तास देशातील राजकारण, काँग्रेसची भांडवली निती, आंतरराष्ट्रीय राजकारण, साम्राज्यवाद या साऱ्या बाबी कामगारांशी व्यक्तीगत चर्चा केल्याप्रमाणे जॉर्ज भाषण देत. कामगारांच्या मनात व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोहाचं स्फुल्लिंगच ती भाषणं पेटवत असत. ती सभा संपली की तिथेच सायकलवर फिरणाऱ्या किंवा पहाटेपर्यंत चालणाऱ्या स्टॉलवर चहा आणि इडली खावून संघटनेतील इतर साथींसोबत चर्चा चाले. तोवर सकाळचे पाच वाजलेले असत. म्युनिसिपल कामगारांचा जथ्था त्याच आझाद मैदानात जमे. सकाळी कामावर जाण्यापूर्वी ते त्यांचा नेता जॉर्ज फर्नांडिसला ऐकायला आलेले असत. मग त्यांच्यापुढं पुन्हा सारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारण-अर्थकारणाचे संदर्भ खुले केले जात.

जॉर्ज यांनी कामगार संघटना या केवळ वेतनवाढ आणि त्यातून निर्माण होणारे कामगार पुढाऱ्यांचे हितसंबंध इतक्यापुरती चालवली नाही. त्यांनी कायम कामगारांना राजकीय प्रक्रियेत सक्रीय व्हायला उद्युक्त केलं. जॉर्ज यांच्यावर डॉ. लोहिया यांच्या विचारसरणीचा प्रचंड़ प्रभाव होता. डॉ. लोहिया हे कट्टर लोकशाही समाजवादी! आचार्य नरेंद्र देवांप्रमाणे मार्क्सवादाचा अभ्यास करणंही त्यांच्यासाठी त्याज्यच जणू! त्यामुळे जॉर्ज यांनाही कायम मार्क्सवाद आणि मार्क्सवाद्यांचं वावडंच. पण तरीही त्यांनी मार्क्सवादी धाटणीनं कामगारांना एक राजकीय शक्ती म्हणून उभं केलं. त्यातूनच 'मुंबई बंदचे सम्राट' म्हणून ते पुढे आले. प्रिमियर कंपनीत आर. जे. मेहता यांच्या नेतृत्वाखाली १९५८ साली झालेल्या वेतनवाढीच्या संपाला त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील कामगारांनी पाठिंबा द्यावा यासाठी मुंबई बंदचं आवाहन केलं. बेस्ट आणि टॅक्सी या वाहतुक क्षेत्रातील कामगारांनी आपल्या नेत्याच्या या आवाहनाला शंभर टक्के प्रतिसाद दिला. मुंबई एकही दगड न पडता १०० टक्के मुंबई बंद झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रसार माध्यमांनी जॉर्ज यांना 'बंद सम्राट' ही पदवी बहाल केली. जॉर्ज यांची संसदीय राजकारणातील वाटचाल ही मात्र लोहियांच्या काँग्रेसविरोधी धोरणाबरहुकूमच राहिली. त्यांनी १९६७ साली मुंबई काँग्रेसचे नेते आणि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट स. का. पाटील यांना धूळ चारली. `तुम्ही स. का. पाटील यांचा पराभव करू शकता’ या घोषवाक्यासह त्यांनी सुरू केलेला कल्पक प्रचार हे त्या निवडणुकीचं वैशिष्ठ्य होतं. एका बाजूला प्रचंड संघटन शक्ती, पैसा, मुंबईतील गुंडगिरीची साथ या विरुद्ध कामगार संघटना आणि काही कल्पक मित्रवजा शिष्यांचे टोळकं, याच्या जीवावर जॉर्ज यांनी चक्क सदोबा पाटलांना  धूळ चारली. अर्थात यात सदोबा पाटलांच्या विरोधात असलेल्या इंदिरा गांधी आणि यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांना आतून साथ दिल्याचं त्यावेळी बोललं गेलं. या निवडणुकीनंतर समाजवाद्यांमध्येच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकारणात जॉर्ज यांचं नाव ओळखलं जाऊ लागलं. त्याचीच परणती जॉर्ज यांना ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचं अध्यक्षपद देण्यात झाली. १९७३ साली जॉर्ज यांच्या हातात रेल्वे कामगारांचं हे मोठं संघटन आलं. रेल्वेच्या कामगारांच्या प्रचंड समस्या होत्या. सरकारकडं पुरेसा निधी नव्हता. त्यामुळं वेतन अपुरं. मात्र दुसऱ्या बाजूला ठेकेदारांचा रेल्वेच्या कंत्राटांमध्ये सुळसुळाट आणि त्यातून पैशाची देवाण घेवाण हे सर्रास सुरू होतं. जॉर्जनं संप पुकारला. संपूर्ण देशातील रेल्वे बंद! दिवस होता ८ मे १९७४! जॉर्ज फर्नांडिस का बंद मतलब बंद. देशातील लाखो कामगार या संपात उतरले. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता सगळ्या मोठ्या शहरांमधील रेल्वे सेवा बंद झाली. जॉर्ज यांना अटक करण्यात आली. २० दिवसांनी संप मागे घेतला गेला. पण इंदिरा गांधी यांची मानसिकता आणीबाणीपर्यंत नेण्याच्या दिशेनं ही पहिली ठिणगी होती.

पुढे आणीबाणी जाहिर झाल्यावर जॉर्ज भूमीगत झाले. त्यांनी पत्रकं काढणं, कार्यकर्त्यांच्या छोट्या छोट्या सभा घेणं, सरकारविरोधी आंदोलनाच्या नवनव्या क्लृप्त्या योजणं अशी कामं सुरू ठेवली. मात्र देशभरात ज्येष्ठ तसेच मधल्या फळीतील असंख्य समाजवादी कार्यकर्त्यांची झालेली धरपकड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. इंदिरा गांधी मूळापासून हादरल्या पाहिजेत असं काही करी करायला हवं, हेच त्यांच्या मनात घोळत होतं. त्यातूनच मग बडोदा डायनामाईट प्रकरण घडलं. बडोद्याजवळच्या हालोल खाणीतून डायनामाईट मिळवून त्याचं देशात निरनिराळ्या ठिकाणी स्फोट करण्याचं योजलं गेलं. मुंबईतील सायन येथील गांधी मार्केट इथं एक स्फोट झालाही. यातून जॉर्ज यांच्यावर काहीजणांनी नक्षलवादी असल्याचाही ठपका ठेवला होता. मात्र मार्क्सवादाशीच वाकडं असलेल्या जॉर्ज यांना नक्षलवादाशी काहीही देणं घेणं नव्हतं. जॉर्ज यांना अटक झाली. पोलिसांनी बेदम चोप दिला. त्यांना बिहारमधील मुजफ्फरपूर येथील तुरुंगात डांबण्यात आलं. चोवीस तास दंडाबेडी ठोकण्यात आली. आणीबाणी उठली तरी जॉर्ज सुटले नव्हते. त्यांनी तुरुंगातूनच निवडणुकीचा अर्ज भरला आणि पोस्टरवर त्यांचा दंडाबेडीतला फोटो झळकला. त्यांच्या समर्थकांनी घोषणा दिली… `जेल का ताला टुटेगा जॉर्ज फर्नांडिस छुटेगा !’.
जॉर्ज प्रचंड बहुमताने निवडून आले आणि केंद्रात उद्योग मंत्री झाले. पुढं त्यांनी कोकाकोला आणि आयबीएमसारख्या कंपन्यांना त्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून देशातून हाकलंल. त्यांच्या आक्रमक समाजवादी विचारसरणीवर त्यामुळं शिक्कामोर्तबच झालं. पण जनता पार्टीचा प्रयोग लवकरच फसला. मधु लिमयेंनी जनता पक्षात राहूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सदस्यत्व ठेवलेले नेते आणि कार्यकर्ते यांच्या निष्ठेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. संधीचा फायदा काँग्रेसनं उठवला आणि यशवंतराव चव्हाणांच्या माध्यमातून सरकारवर अविश्वास ठराव आणला. जॉर्ज यांनी पहिल्या दिवशी या ठरावाला विरोध करणारं जोरदार भाषण संसदेत केलं. जॉर्ज यांच्या भाषणाची सर्वत्र खूप चर्चा झाली. मात्र त्यांना त्याच संध्याकाळी मधु लिमये यांनी भेटायला बोलावलं आणि त्यांची भूमिका बदलली. त्यांनी परत दुसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधात तितक्याच जोशात भाषण केलं. सरकार पडलं. यानंतर जॉर्ज पुन्हा प्रकाश झोतात आले ते व्ही. पी. सिंग यांच्या कालावधित! व्ही. पी. सिंग यांना घोड्यावर बसवण्यात त्यांची मोठी भूमिका होती. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याचा विरोध या लोहियांनी दिलेल्या धड्यांमुळं बोफोर्सच्या आरोपांचं कोलित त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. व्ही. पी. सिंग यांचं सरकार आलं आणि जॉर्ज त्यात रेल्वे मंत्री झाले. मात्र ते सरकारही लवकरच कोसळलं. त्यानंतर आलेल्या देवेगौडा आणि गुजराल या सरकारमध्ये मात्र जॉर्ज मंत्री नव्हते. बिहारमधील त्यांचे शिष्य असलेल्या नितीश आणि लालू यांच्यातील स्पर्धा तीव्र झाली होती. जॉर्ज तुलनेनं कमी जनाधार असलेल्या नितीश यांच्या बाजूनं उभे राहिले होते. पुढं बाबरी मशिद पाडण्यात आली. देशभरात दंगे उसळले. जॉर्ज सर्वत्र या हिंसाचाराच्या विरोधात भाषण देत फिरत होते. मात्र त्याच वेळी त्यांनी जनता दल फोडून त्यातून समता पार्टी स्थापन करायचं नक्की केलं होतं. १९९३-९४ साली त्यांनी समता पक्षाची स्थापना केली देखील. स्थापनेपासूनच त्यांनी वाजपेयी-अडवाणींशी सूत जुळवलं. जॉर्ज यांच्या लढाऊ, धर्मनिरपेक्ष कारकिर्दीला ग्रहण लागायला इथूनच सुरुवात झाली. लालू यांची बिहारमधील वाढती लोकप्रियता नितीश यांच्यापेक्षा जॉर्ज यांच्या डोळ्यात खुपू लागली होती. त्यातूनच देवेगौडा आणि गुजराल यांच्या मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळालं नव्हतं. उत्तर भारतातल्या गंगेच्या खोऱ्यातील राजकारणात जॉर्ज यांचं स्थान मोठं असलं, तरी ज्या पिछड्यांच्या नावावर त्यांनी राजकारण केलं होतं, त्या पिछड्या समाजातील कार्यकर्ते आता स्वतः नेता बनण्याच्या स्पर्धेत उतरले होते. ते जॉर्ज यांना पचत नव्हतं.

जॉर्ज यांनी समता पक्षाची स्थापना केली आणि ते भाजपच्या वळचणीला गेले ते कायमचेच. बाबरी विध्वंसानंतर ते वाजपेयी मंत्रिमंडळात सामील झाले. संरक्षणमंत्री झाले. इतकंच कशाला तर त्यांनी गुजरातमध्ये गोधरा कांडानंतर झालेल्या मुस्लिमांच्या कत्तलींनंतरही वाजपेयी आणि गुजरातमधील मोदी सरकारचं संसदेत जोरदार समर्थन केलं. गुजरात दंगलीत झालेल्या मुस्लिम महिलांवरील अत्याचाराची संसदेत चर्चा झाली, तेव्हा जॉर्ज म्हणाले की, बलात्कार कुठे होत नाहीत, आणि यापूर्वी कधी बलात्कार झालेच नाहीत का? बलात्काराचं इतकं अवडंबर माजवून तुम्ही लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला खाली खेचण्याची भाषा कशी काय करू शकता…? जॉर्ज यांच्या या भाषणानं त्यांचा लढाऊ बाणा, त्यांची उरली सुरली धर्मनिरपेक्ष प्रतिमा सगळे एका क्षणात मातीत मिळाले.
यानंतर इंड़िया शायनिंगच्या नाऱ्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या वाजपेयी सरकारला लोकांनी धूळ चारली. ज्या बिहारच्या मातीत जॉर्ज यांनी लालू- नितीशसह अनेकांना राजकीय धडे गिरवायला शिकवलं होतं, ज्या मुजफ्फरपूरमधील तुरुंगात त्यांना आणीबाणीनंतर ठेवण्यात आलं होतं आणि त्याच मुजफ्फरपूरमधून त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा धुव्वा उडवत जनता पार्टीचा नेता म्हणून संसदेत प्रवेश केला होता, त्याच मुजफ्फरपूरमध्ये जॉर्ज यांना पराभवही चाखावा लागला. जॉर्ज यांची राजकीय कारकीर्द खरंतर तिथेच संपली होती. त्यानंतर त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया झाली. पुढे त्यांना अलझायमर या असाध्य रोगानं ग्रासलं. ते राजकीय आणि सामाजिक विजनवासात गेले. त्यांना अशाही अवस्थेत नितीश यांनी राज्यसभा सदस्यत्व दिलं. मात्र त्यांना सदस्यत्वाची शपथ आणि नोंदवहीत करावयाची स्वाक्षरी करणं ही जमत नसल्याचं टीव्हीवर पाहणं त्यांच्या चाहत्यांच्या नशिबी आलं. अशाच अवस्थेत त्यांनी हिंदुत्ववाद्यांशी केलेल्या तडजोडीबाबत लालू यांनी त्यांना भर संसदेत जोरदार सुनवलं होतं. क्या टुकूरटकूर देखते हो?, असं लालू यांनी त्यांना म्हटल्यावर जॉर्ज यांच्या चेहऱ्यावर जेव्हा कॅमेरा गेला तेव्हा त्यांचा चेहरा धारातिर्थी पडलेल्या कर्णासारखा निरागस दिसत होता. प्राणपणानं लढूनही लढाईत धारातिर्थी पडलेला वीर चुकीच्या मार्गावर चालल्याने हृदयात साठलेलं सगळं हलाहल एका क्षणात देहातून बाहेर पडल्यावर जसा निरागस दिसावा, अगदी तसा. बास! हा त्यांच्या बाबतीतला आठवणीत राहणारा शेवटचा प्रसंग. त्यानंतर त्यांना अल्झायमरनं इतकं ग्रासलं की अधे मधे त्यांच्या बिघडणाऱ्या तब्येतीच्या केवळ बातम्या कानावर यायच्या. ते दिसले कधीच नाहीत. कर्ण असो वा बार्बरिक किंवा आकिलीज हे महान योध्ये होते हे जगाने मान्यच केलं आहे. मात्र त्यांनी लढाईत जी बाजू घेतली ती अनैतिकतेची होती. जॉर्ज यांचं नेमकं तेच झालं. ज्या धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या आधारावर त्यांना लोकांनी नेता बनवलं होतं, त्याच धर्मनिरपेक्ष विचारधारेला त्यांनी हरताळ फासला. त्या विचारधारेशी त्यांनी फंदाफितुरी केली. जॉर्ज यांच्यासारखा लढवय्या विरळाच. पण दुर्दैवानं `फितुर लढवय्या’ हे बिरुद त्यांच्यापासून कुणीच वेगळं करू शकणार नाही. त्यांच्या लढवय्या बाण्याला सलाम करतानाच त्यांच्या फितुरीची सल कायम मनात डाचत राहील, व त्यांच्या त्या धर्मनिरपेक्षतेसोबतच्या फितुरीला आम्ही कायम प्राणपणाने विरोध करत राहू इतकेच त्यांच्या निधनानंतर सांगणे महत्त्वाचे आहे.


नेहरूं आणि इंदिराजी...!

"गेली सहावर्षे सतत भारतीय जनता पार्टीनं नेहरू आणि इंदिरा गांधी पर्यायानं काँग्रेसवर टीकास्त्र सोडलेलं आहे. देशातल्या प्रत्येक समस्यांना नेहरूंचं धोरण जबाबदार आहे असं म्हणत जनतेच्या मनातली नेहरूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चालवलाय. नेहरूंची आंतरराष्ट्रीय धोरणं, विकासाच्या विविध योजनांनी भारताला एक प्रगत राष्ट्र म्हणून जगात सन्मानानं उभं राहता आलंय हे विसरता कामा नये. इंदिरा गांधींनी नेहरूंची धोरणं राबवितच एक सक्षम आणि सदृढ राष्ट्र म्हणून देशाची ओळख निर्माण केलीय. पण दुसऱ्याची रेघ पुसून आपली रेघ मोठी करण्या
चा प्रयत्न जो चालवलाय तो यशस्वी होणार नाही. कारण नेहरूंच्या धोरणांनीच देशाला जागतिक राजकारणात वाटचाल करावी लागणार आहे. तेव्हा नेहरू-इंदिरा यांच्यावर टीका, टिंगलटवाळी न करता त्यांना समजून घेतलं, जाणून घेतलं तर देशाची वाटचाल अधिक गतीनं होईल!"
------------------------------------------------------------------


*भा* रताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचं बहुचर्चित पुस्तक 'लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर.…!' या पुस्तकाचा हिंदी अनुवाद प्रेमचंद यांनी केलंय. हे वाचल्यानंतर सध्या जे नेहरूंवर टीका करताहेत त्यांची कीव करावीशी वाटते. त्यांचा रागही येतो. अशा संवेदनशील, धोरणी, प्रगतिशील, देशाच्या विकासात झोकून घेणाऱ्या प्रधानमंत्र्याचं विशेष कौतुक करावंसं वाटतं. पण सध्या त्यांच्यावर आकसाने जी वक्तव्य केली जाताहेत त्यानं खरं तर वाईट वाटतं. हे पुस्तक पं. नेहरूंनी आपली कन्या इंदिरा प्रियदर्शनी हिला लिहिलेल्या पत्रांवर आधारित आहे. ही जी पत्रं लिहली आहेत त्यावेळी तिचं वय जवळपास दहा वर्षाचं होतं. त्या पुस्तकात नेहरूंनी लिहिलंय, "तू जेव्हा माझ्यासोबत असतेस तेव्हा सतत प्रश्न विचारून तू मला भंडावून सोडतेस; अशावेळी तुझ्या प्रश्नांना मी माझ्यापरीनं उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो. पण आता तू मसुरीत आहेस आणि मी अलाहाबाद इथं आहे. त्यामुळं पूर्वीसारखं आपण एकमेकांशी प्रत्यक्ष बोलू शकत नाही. तू प्रश्न विचारू शकत नाहीस आणि मी उत्तरं देऊ शकत नाही. तेव्हा मी आता असं ठरवलंय की, कधी मधी तुझ्याशी पत्रांद्वारा संवाद साधू शकेन. तुला जगातल्या अनेक लहानमोठ्या गोष्टी कळविन. जगाच्या पाठीवर जी छोटी-मोठी राष्ट्रे आहेत त्यांची ओळख तुला लहान लहान गोष्टींच्या माध्यमातून लिहून करून देईन." ते पुढे लिहतात, "तू हिंदुस्थान आणि इंग्लंडमधील सध्याच्या घडामोडी इतिहासात वाचल्या असशील. परंतु इंग्लंड हा एक छोटासा भूभाग-टापू आहे तर हिंदुस्थान जो एक विशाल, मोठा खंडप्राय देश आहे, असं असलं तरी जगाच्यादृष्टीनं तो एक छोटासा भाग आहे. जर तुला जगाची माहिती घेण्याची इच्छा असेल तर, तुला या सर्व देशांचा आणि त्या सर्व जातींचा जे या देशात वास्तव्य करतात, त्यांचीही माहिती घेणं, त्यांच्या समस्यांकडं सहानुभूतीनं पाहावं लागेल; केवळ त्या एका छोट्याशा देशाचाच नव्हे ज्या देशात तुझा जन्म झालाय! मला माहिती आहे की, या अशा छोट्या छोट्या पत्रातून खूपच त्रोटक माहिती तुला देऊ शकेन. पण मला आशा वाटते की, या थोड्या छोट्याशा माहितीची पत्रंही तू उत्सुकतेनं वाचशील आणि समजशील की, जग हे एक आहे, आणि त्यात जे सर्व लोक राहतात ते आपले बांधव आहेत. तू जेव्हा मोठी होशील तेव्हा जगाला आणि त्यातल्या लोकांना मोठमोठ्या पुस्तकांतून, ग्रंथातून पाहशील, वाचशील. त्यात तुला इतका आनंद मिळेल की, तो इतर कुठल्याही कथा-कादंबऱ्यातून मिळणार नाही!"

*परदेशी बाहुली जाळून टाकली*
इंदिराजींच्या लहानपणीच्या आठवणींमध्ये पहिली आठवण आहे ती घरातील परदेशी भरजरी वस्त्रं जाळून टाकल्याची. जाळण्यासाठी कपड्यांचा ढिगारा करण्यात आला होता. तो त्यांना बघायचा होता म्हणून त्यांनी आजोबांकडे विनवणी केली आणि आजोबा त्यांना तिथं घेऊन गेले. एकदा कोणीतरी त्यांच्यासाठी पॅरिसवरून भरजरी वस्त्रं आणली होती. पण आम्ही केवळ खादी वापरतो, असं सांगून त्यांच्या आई कमला नेहरूंनी ती परत केली. आईनं त्यांना विचारले की, ‘‘इंदू, तुझ्यासाठी ही भेट आणली आहे. तुला हवी असेल तर ती तू स्वीकारू शकतेस. पण तो कपड्यांचा ढिगारा आठव ज्यात परदेशी कपडे जाळून टाकले होते. आम्ही सारे खादी वापरत असताना तुला हे कपडे वापरायचे आहेत का?’’ तेव्हा छोटय़ा इंदूनं त्यास नकार दिला. त्यावर आलेली पाहुणी म्हणाली, ‘‘मग तू परदेशी बाहुली वापरतेस तिचं काय?’’ ती बाहुली इंदिराजींची आवडती होती. तरी त्यांनी ती गच्चीवर नेऊन जाळून टाकली.

*राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचून भारावून जात*
इंदिराजींचे आजोबा पं. मोतीलाल नेहरू आणि वडील जवाहरलाल हे दोघेही राजकारणात सक्रिय होते. इंदिराजी चार वर्षांच्या असताना या दोघांना तुरुंगात टाकण्यात आले. काँग्रेसच्या नियमाप्रमाणे त्यांनी दंड न भरल्यामुळे घरातील फर्निचर न्यायला पोलीस आले. इंदिराजींची लहान असतानाची ‘आनंदभवन’ची ही आठवण. ‘आनंदभवन’ या ४८ खोल्या असलेल्या प्रचंड मोठ्या घरात त्या राहत होत्या. बालपणीच राजकारणाची त्यांना ओळख झाली. काँग्रेसनं देशभर आंदोलन केले तेव्हा त्यांनीही स्वत:ची ‘वानरसेना’ काढली. पं. नेहरूंनी त्यांना पत्रात गमतीनं लिहिलं की, ‘या वानरसेनेतल्या सर्वानी शेपट्या लावाव्यात आणि अधिकारानुसार शेपट्याची लांबी कमी-जास्त व्हावी!’ वानरसेनेचे प्रमुख असलेल्या इंदिराजींचं वेळापत्रक पुपुल जयकर यांनी त्यांच्या चरित्रात दिलंय. ते वाचताना कळतं, की त्याही काळात त्या किती व्यग्र असत. अलाहाबादमधल्या रोमन कॅथलिक शाळेत त्या शिकत होत्या. ज्यात प्रामुख्यानं ब्रिटिशधार्जिणी मंडळी होती. या मंडळींना भारतीय सण आवडत नसत. पुढं इंदिराजींचं शिक्षण शांतिनिकेतनमध्ये करावं का, असा प्रश्न पं. नेहरूंनी आपल्या केंब्रिजमधल्या एका सहकाऱ्याला पत्रातून विचारला. त्यावर त्याचं उत्तर आलं की, आधी तिला जहांगीर वकील आणि त्यांच्या पत्नीनं चालवलेल्या पुण्यातील ‘चिल्ड्रन्स ओन स्कूल’मध्ये पाठवावं. या शाळेत त्यांना टाकण्यात आलं. मात्र, तिथं त्यांना एकाकी वाटू लागले. कारण ‘आनंदभवन’मध्ये त्यांची स्वत:ची वेगळी खोली होती, तर इथे त्यांना अन्य मुलांच्यात राहावं लागत होतं. इंदिराजींवर उत्तम वाङ्मयाचे संस्कार जवाहरलालनी केलं. ‘अ‍ॅलीस इन वंडरलँड’पासून गॅरीबाल्डीच्या चरित्रापर्यंत अनेक पुस्तकं त्यांना वाचायला दिली. टेनिसनची ‘इन मेमोरियम’ ही कविता त्यांची आवडती होती. राष्ट्रपुरुषांची चरित्रे वाचताना त्या भारावून जात. त्याचा खोलवर संस्कार त्यांच्यावर झाला. पुण्यातील शाळेत १९३२ साली त्या दाखल झाल्या. १९३४ साली मॅट्रिक झाल्यावर त्या शांतिनिकेतनला गेल्या.

*पत्रातून इंदिराजींवर राष्ट्रीय संस्कार*
या पुस्तकातील नेहरूंची पत्रं पाहिली की, नेहरूंची रचनाधर्मीता, कल्पनाशीलता, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक वृत्ती याचा अंदाज येतो. ते किती साधे, सरळ आणि उच्च विचार करणारे होते हे दिसून येतं. आज त्यांच्याबाबत जे काही बोललं जातंय, नको ती बडबड केली जातेय. ते बोलणाऱ्यांनी आधी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. नेहरूंचं व्यक्तिमत्व हे एखाद्या ग्रंथापेक्षा कमी नाही. ज्या कुणी नेहरूंना समजून घेतलंय, त्यांचा आचार-विचार पाहिलाय अशांची जगण्याची पद्धतच बदलून गेलीय! हे इथं नमूद करायला हवंय! इंदिराजींना लिहलेल्या आपल्या पत्रांच्या साहाय्यानं नेहरूंनी एका प्रसंगात सांगितलं आहे की, ' जगातल्या देशांचा इतिहास वाचायला लागशील तेव्हा लक्षात येईल तेव्हा सर्व मोठमोठ्या कामांची, वस्तुस्थितीची माहिती मिळेल, जी चीननं, रशियानं केली आहेत. त्याकाळी युरोपात जंगली आदिवासी लोक असत. तुला हिंदुस्तानच्या त्या वैभवशाली कालखंडाचीही माहिती मिळेल ज्यावेळी रामायण आणि महाभारत लिहिलं गेलं, आणि तुझ्या लक्षांत येईल की, हिंदुस्थान हा किती बलवान आणि धनवान देश होता. आज आपला देश खूप गरीब आहे आणि एक विदेशी जातीचे लोक आपल्यावर राज्य करीत आहेत. आम्ही आमच्याच देशात स्वतंत्र नाही आहोत, जे काही आम्ही करू इच्छितो आहोत ते करू शकत नाहीए. पण अशी परिस्थिती आमच्यवर कधी कायमरित्या नव्हती. जर आम्ही एकत्रितपणे स्वातंत्र्यासाठी झगडू तर आपला देश पुन्हा एकदा स्वतंत्र होऊ शकतो. ज्याआधारे आम्ही आमच्या देशातील गरिबांची स्थिती बदलू शकतो आणि त्यांना भारतात राहणं सुसह्य होईल जसं की, युरोपातील काही देशात लोक राहताहेत!"

*पत्रातून आपल्या मुलीशी नेहरूंचा संवाद*
सध्याच्या वातावरणात नेहरू यांच्यासारख्या नेत्याची आज देशाला मोठी गरज आहे. पण आजच्या या त्यांच्याबद्धलच्या नकारात्मक वातावरणात हे सहज शक्य नाहीये. आज देशात नेहरूंच्या नेतृत्वगुणांच्या जवळपास जाणारा नेता दिसत नाही, पण अशीच माणसं आज नेहरूंवर टीकाटिपणी करताहेत की, ज्यांनी कधी नेहरूंना समजूनच घेतलं नाही. आज देशात जो विकास झालाय त्याची पायाभरणी नेहरूंनी केलीय, हे विसरता कामा नये. नेहरुंची दूरदृष्टी हीच आजच्या हिंदुस्थानच्या या या विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी सहाय्यभूत आणि कारणीभूत ठरलेली आहे. आजचे काही नेते नेहरूंना ते अहंकारी आणि घमंडी असल्याची टीका करतात. पण त्यांना हे माहीत नाही की नेहमीसारखं बनण्यासाठी त्यांना किती मेहनत घ्यावी लागेल. नेहरूंचे सचिव असलेले एम.ओ.मथाई यांनी आपल्या पुस्तकात 'रेमिनीसेन्सेस ऑफ नेहरू' यात लिहिलंय की 'नेहरू इतके सुसंस्कृत होते की त्यांना अहंकारी म्हणणं त्यांच्यावर अन्याय करणारं ठरू शकतं. पण त्यांना कुठल्या गोष्टीचा धीर धरता येत नव्हता, ते आपल्या उद्दिष्टासाठी अधीर असत. त्याचबरोबर मूर्खांना ते आपल्याजवळही उभं करत नसत. त्यांना सहन करत नव्हते. त्यामुळंच अशी मंडळी त्यांच्यावर टीका करीत!'

*नेहरूंचे किस्से*
नेहरूंच्या रागाबद्धल माजी परराष्ट्रमंत्री नटवरसिंह यांनी एक किस्सा सांगितला होता. 'एकदा नेहरू त्यांच्यावर एका गोष्टीवरून खूपच रागावले होते, त्यांनी माझी खरडपट्टी काढली होती. त्याच कारणही तसंच होतं. नेहरूंनी नेपाळचे नरेश महेंद्रना लिहलेलं एक पत्र परराष्ट्र मंत्रालयातील मुख्यसचिवांना न दाखवता आपण ते आपल्या कपाटातच ठेऊन दिलं होतं. त्यावेळी नटवरसिंह हे मुख्यसचिवांचे सहाय्यक होते. ते आठवून सांगतात की, संध्याकाळी साडेसहा वाजता नेहरूंचं नेपाळ नरेश महेंद्र यांना लिहिलेलं पत्र माझ्याक विमानाला उशीर झाला. मुख्यसचिव परदेश दौऱ्यावर गेल्यानं ते त्यांना दाखवलं गेलं नाही. साहजिकच ते नेपाळ नरेशापर्यंत पोहोचलं नाही!" नेहरुंच्या कालखंडातील एक ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजेंद्र माथूर यांनी आपल्या 'बगावती शिष्यतंत्र' या लेखात लिहिलंय की, 'नेहरूंसारखा सैनिक महात्मा गांधींना त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात मिळाला नसता तर, १९२७-२८ नंतर भारतातील तरुणांना त्यांच्या बंडखोरवृत्तीतून आणि नाराज वातावरणातून गांधीजींच्या आंदोलनात खेचून आणण्याचं काम नेहरूंशिवाय कुणीच केलं नव्हतं. नेहरूंनी त्या सर्व तरुणांना एकत्र केलं होतं की, जे गांधीजींच्या भूमिकेवरून, त्यांच्या कार्यपद्धतीवरून नाराज झाले होते. त्यांनी तीसच्या दशकातील त्या तरुणांना सावरलं होतं. त्याकाळात बालकेशिव क्रांतीनं प्रभावित होऊन काँग्रेसमधल्या शांतवृत्तीच्या कार्यकर्त्यांना एक हत्यार बनविण्याचा विचार करीत होते. पण नेहरूंनी हे सारं काम काँग्रेसच्या कार्यपद्धतीत, केमिस्ट्रीत राहून त्याचा सन्मान करीत केलं होतं. जर १९३२-३३ मध्ये सनकी लोहियावादींप्रमाणे वागले असते आणि आपली वेगळी समाजवादी पार्टी बनवून गांधीजींशी असलेलं नातं तोडलं असतं तर सुभाषचंद्र बोस यांच्यासारखं तोडले गेले असते. त्यानं समाजवादाचं त्यात काही भलं झालं नसत. हो पण गांधीजींची फौज नक्कीच कमकुवत झाली असती! गांधीजींशी असहमत असतानाही नेहरूंनी गांधींजीसमोर आत्मसमर्पण केलं, कारण आपल्याला समजून येऊ न शकणाऱ्या जादूसमोर व्यक्त केला जाणारा भारतीय भक्तिभाव नेहरूंमध्ये शिल्लक होता. आपल्या सतत बिघडणाऱ्या पण आवडत्या शिष्याला समजून घेणं, त्यांचं लाड करणं हे गांधीजींना येत होतं. हे सारे प्रांग इथं यासाठी उद्धृत करतोय की, नेहरूंबद्धल त्यांना जाणून घेण्याची जिज्ञासा लोकांमध्ये वाढीला लागावी. सध्याच्या राजकारण्यांकडून नेहरूंची जेली जाणारी बदनामी, त्यांच्याबाबत केला जाणार अपप्रचार यामुळं नेहरूंबद्धल त्यांचा गैरसमज होऊ नये. नेहरूंना समजून घ्या जाणून घ्या....!

*इंदिराजींनी कामाचा ठसा उमटविला*
इंदिराजीकडे जे लोक केवळ नेहरूंची मुलगी म्हणून पाहतात. कारण त्यांना घराणेशाहीचा आरोप नेहरूंवर करायचा असतो. तर काही प्रखर लोकशाहीवादी जवाहरलाल नेहरूंच्या विचारांना तिलांजल्या देणाऱ्या वृत्तीच्या नेत्या म्हणूनही पाहतात आणि पुन्हा घराणेशाहीचा आरोपही करतात. आपल्या वडिलांनी काँग्रेससाठी कार्य केले देशासाठी कारावास भोगला म्हणून नेहरूंच्या त्याच कर्तृत्वावर त्या स्वार झाल्या, असं म्हणणाऱ्या अनेकांना हे माहीत नसते की त्यांनी स्वतंत्रपणे अडीच वर्षे कारावास भोगला आहे. नेहरू स्वातंत्र्यसंग्रामात वयाच्या २७व्या वर्षी आले. मात्र इंदिराजींचा सहभाग हा वयाच्या १३व्या वर्षापासून आहे. त्यांचं बालपणदेखील स्वातंत्र्यसंग्रामात होरपळून निघालेले आहे. नेहरूंनी आयुष्याच्या सुरुवातीचा एक कालखंड तरी सुखात काढला, पण इंदिरेने बालवयातही पारतंत्र्याच्या झळा सोसल्या आहेत. हजारो भारतीयांचे कल्याण पाहणाऱ्या बापाचा सहवास एक बाप म्हणून त्यांना कधीच मिळाला नाही. विशेष म्हणजे नेहरूंच्या हयातीत इंदिराजी ना राज्यसभेच्या सदस्य होत्या ना लोकसभेच्या! त्यातूनच विलक्षण असे धाडसी व्यक्तिमत्व तयार झाले आहे. ज्याचा ठसा त्यांनी भारतीय अथवा भारतीय उपखंड नव्हेतर जगाच्या राजकारणावर निडरपणे उमटवलेला आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९




आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...