Saturday 27 May 2017

दार उघड, बाबा दार उघड...!

*दार उघड, बाबा दार उघड...!*

इन्ट्रो......
" नमोजींच्या छावणीचा हा दरवाजा असा तसा नाही. नागपूरच्या रेशीमबागेतील मोहनराज वृक्षापासून बनवलेला आणि गुजराती कच्छी बुट्टया बुट्टयांनी शोभिवंत केलेला भव्य सुंदर दरवाजा, साक्षात भूलोकीच्या स्वर्गाचाच दरवाजा म्हणा ना! ह्या दरवाज्यातून जे भाग्यशाली भाविक आत जातील, ते आपली अस्मिता गमावून....अभिमान गमावून.... स्वतंत्रता गमावून 'स्वर्गस्थ' होतील! ह्या भव्य दरवाज्यावर प्रगतीच्या पर्वातील पराक्रमाची चित्रे कोरलेली असून त्यात कोठे कोठे रक्ताचा लाल रंग भरला आहे.गुजरातच्या सुवर्ण रसांनी, विधायक विचारांची स्वप्ने दरवाजावर रेखाटली आहेत. ह्यावरील एक चित्र आहे विकासपर्व-मन की बात सांगणाऱ्या अक्षरांनी, शब्दांनी अंकीत झालेल्या मजबूत राजदंडाचे...!"

सध्या भाजपेयींकडे उभ्या महाराष्ट्रातून 'इनकमिंग' मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कोणताही विधिनिषेध न पाळता, सर्व पक्षातील गणंगांना, आयारामांना पायघड्या घातल्या जात आहेत. समाजातल्या साऱ्या वाल्यांना वाल्मिकी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याने सारे वाल्यांना आता भरते आले आहे. त्यांच्या या आगमनासाठी 'नमो दरवाजा' ठोकून ठाकून उभा केला आहे आणि या दरवाज्याबाहेर 'दार उघड बये दार उघड' अशी आळवणी करीत दार ठोठावले जात आहे. अनेकांनी अशी अनेक दारे पाहिली असतील. काही शरदाच्या चांदण्यातील दरवाज्यातील असतील तर काही सोनियांच्या दरवाज्यातील असतील. अशा 'दारकरीं'ची सोय लावताना 'नमो दरवाजा'ही अडचणीत येऊ शकतो. याचं भान राहिलेलं नाही.

तुम्ही तुमच्या जीवनात नानाप्रकारचे दरवाजे पाहिले असतील. शनिवारवाड्यासारख्या जुनाट वाड्याचे, रायगडासारख्या दणकट किल्ल्याचे..! काही भक्कम लाकडी तर काही आधुनिक लोखंडी! काही दोन पंख्याचे तर काही चार पंखाचे तर काही बिन पंखाचे.... नाटकाच्या पडद्याप्रमाणे गुंडाळले जाणारे! आत काय चालले आहे ह्याचा मुळीच थांगपत्ता न लागू देणारे, मुरब्बी राजनीतिज्ञासारखे मख्ख; तर काही आपल्याच फटी फटीतून आतला तमाशा पाहू देणारे चहाडखोर! काही दरवाजे उदार, नेहमी खुले राहणारे तर काही खाशांनाच प्रवेश देणारे.

पण हा अलीकडेच वृत्तपत्रात गाजत असलेला नमोजींच्या छावणीचा दरवाजा असा तसा नाही. हा 'नागपुरी रेशीम बागे'च्या मोहनराज वृक्षापासून बनवलेला आणि गुजराती कच्छी बुट्टया बुट्टयांनी शोभिवंत केलेला भव्य सुंदर दरवाजा, साक्षात भूलोकीच्या स्वर्गाचाच दरवाजा म्हणा ना! ह्या दरवाज्यातून जे भाग्यशाली भाविक आत जातील, ते आपली अस्मिता गमावून...अभिमान गमावून...स्वतंत्रता गमावून...'स्वर्गस्थ'च होतील! ह्या भव्य दरवाज्यावर प्रगतीच्या पर्वातील पराक्रमाची चित्रे कोरलेली असून , त्यात कोठे कोठे रक्ताचा लाल रंग भरलेला आहे. गुजरातच्या सुवर्णरसांनी विधायक विचारांची स्वप्ने दरवाज्यावर रेखाटली आहेत. ह्यावरील एक चित्र आहे 'जग हे बंदिशाला' हा महान वेदांत सूचित करणाऱ्या दृश्याचे चित्र, दुसरे चित्र आहे 'विकासपर्व-मनकी बात' सांगणाऱ्या अक्षरांनी अंकित झालेल्या मजबूत राजदंडाचे! औद्योगिक प्रगती सूचित करणाऱ्या एका मोटारीच्या कारखान्याचे चित्र या दरवाज्यावर शोभते आहे...! हा पश्चिमपथावरील दगडाच्या पायावर दक्षिणेला उभा असलेला उत्तराभिमुखी असून दिल्लीकडे नजर रोखीत आहे! नमोजींचा दुर्ग जसा गुजरात-महाराष्ट्र-मध्यप्रदेशातील कारागिरांनी मुख्यतः बांधला, हा दरवाजाही राजस्थानी, उत्तरप्रदेशींनी तयार केला, असा हा आगळा वेगळा दरवाजा! विरोधकांचा काटा काढण्यात कुशल असलेल्या फत्तेहपुर शिक्रीचा 'बुलंद दरवाजा' ज्याच्यापुढे ठेंगणा वाटेल असा हा दरवाजा!

या दरवाज्याच्या देवडीवर काही दिवसांपूर्वी बराच शुकशुकाट होता. पण आता त्याला पुनश्च 'अटल वैभव' येऊ लागले असल्याने देवडीवर याचकांच्या टोळ्या झांजा वाजवत भजन म्हणताहेत....
जय देव जय देव।
जय साहस चतुरा।
सत्तादायक देई।
आम्हा हार तुरा।।
महंमद गझनीने सोरटी सोमनाथच्या मंदिराची दुर्दशा केली, पण येथे ते शक्य नाही. कारण नमोजींच्या केसाला साक्षात शत्रूनेच नव्हे तर न्यायदेवतेने जरी थोडासा धक्का लावला, तरी सारा मुलुख पेटवून देण्याची प्रतिज्ञा केलेले वीर हातात पेटते पलिते घेऊन दरवाजावर पहारा देत खडे आहेत! इतका आकर्षक दरवाजा ह्यापूर्वी कोणत्याही दुर्गाला, देवळाला, महालाला किंवा मंदिराला लाभला असेलसे वाटत नाही. मग नवल कसले की, उर्दू शायरीतील आशिकाप्रमाणे बिस्तर बिच्छा दिया है।
तेरे दरके सामने।।
असे गर्जत शेकडो महाभागांनी ह्या दरवाज्यासमोरच्या पायऱ्या पायऱ्यावर आपले बाड बिस्तारे ठेवले आहेत!
खरोखरच
नमोजींच्या दारी।
उभा क्षणभरी।
तेणें मुक्तीचारी।
मिळविल्या।।
अशा भावनेने ज्या दरवाज्यापुढे याचकांच्या झुंडी लोटत आहेत.

त्याला उर्दू शायरीच्या नायिकेच्या दरवाज्याची शान प्राप्त झाल्यास आश्चर्य नाही. उर्दू शायरीतील लाचार प्रेमीक कित्येकदा म्हणतो, 'तुझ्या मैफिलीत', 'तुझ्या इन्नर केबिनेट'मध्ये मला प्रवेश मिळाला नाही तर हरकत नाही, मला तुझा द्वारपाल तर करशील ना? करून तर पहा. मग....
गैर को आने न दू।
तुंमको कहीं जाने न दू।
काश! मिल जाये तुम्हारे।
दरकी दरबानी मुझे।।
(कोणत्याही गैर माणसाला, पुरोगामी व्यक्तीला आंत येऊच देणार नाही. भाग्यवशात तुमच्या दरवाजाचा दरबान झालो तर!)
साधारणतः ही अशीच लाचारी ह्या नमोजींच्या दरवाज्यापुढे घोंघावत आहे.... अरे पण हे काय? ह्या दरवाज्यापुढे कणखर सह्याद्रीचे नरशार्दूल?  अश्वमेघाचा घोडा अडविण्याची ज्यांची ताकद, ते देखील ह्या दरवाज्यापुढे जमा होऊन दीनवाणी आराधना करताहेत, दार ठोठावत आहेत! आणि म्हणताहेत....
'दार उघड बाबा दार उघड...!'
तुमच्यापाशी एकरूप एकदिल होण्यासाठी आम्ही आलो आहोत, दार उघड बाबा दार उघड! एकट्याच्या बळावर शत्रूचा नि:पात करणे शक्य होणार नाही, तुझ्या पाठबळाची आम्हास जरुरी आहे, म्हणूनच दार उघड बाबा दार उघड! कोणत्याहि ऐहिक लाभासाठी नव्हे, तर देशाच्या परमकल्याणासाठीच आम्हास तुझ्या दिलाजमाईची प्यास लागली आहे. हे लक्षात घे अन दार उघड बाबा दार उघड!... काय? तुझे खासे खासे भक्तशिरोमणी... तुझे औरस भक्त म्हणताहेत, दिलजमाई नको, ऐक्य नको, काहीही नकोच संपूर्ण शरणागती हवीय? तो पर्यंत दरवाजा बंद?... छे... छे, हे खरे वाटत नाही. खरेच का तुम्ही दरवाजा खोलणार नाहीत! कोणी म्हणताहेत,... तुम्ही दरवाजा बंद केलात, अगदी आतून कडी लावून बंद केलाय. कारण तुम्हाला ऐक्यभावाची तळमळच नाही, स्वतःचा भाव वाढवून घेण्याची हाव आहे! तुला समान दर्जाची सन्मान्य मैत्री नकोच आहे. अशांना तुम्ही आंत घेताय जे तुमचे कायमचे बंदे गुलाम होऊन, आपले सारे व्यक्तिमत्व विलीन करण्यास सिद्ध होतील! मोठया मासळीने छोटी मासोळी गिळणे म्हणजेच खरी एकरूपता, अशी एकरूपतेची तुमची व्याख्या आहे!.. पण या कुत्सित टीकेवर आम्ही विश्वास का ठेवावा? तुम्ही तुमचा शानदार दरवाजा कायमचा बंद केलात, ह्यावर आमचा विश्वासच बसत नाही. आमचे काही व्यवहारपंडित आम्हास धीर देताहेत. 'निराश होऊ नका, नमोजी दिलदार आहेत, समंजस आहेत, ऐक्यभावाचे ते स्वागत करणारे आहेत. त्यांचा दरवाजा बंद असतो, वस्तुत: तसा तो बंद नाही, केवळ 'जयघोषा'चा त्रास होऊ नये म्हणून तो लोटून घेतलाय, इतकंच! भक्तांची दिंडी आत घेण्यासाठी दिंडी दरवाजा खचितच उघडा, खुला होईल...! ह्या आमच्या पंडित मित्रांचा आशावाद सार्थ करण्यासाठी दार उघड बाबा दार उघड..! किमानपक्षी दिंडी दरवाजा तरी उघड...!

जर तुम्ही खरोखरीच दरवाजा कायमचा बंद केलास तर....!
आमच्या नशीबाचाच दरवाजा बंद झाला, असं म्हणणं भाग आहे. पण आमच्या नशीबाची बात राहू द्या, आम्हास वैयक्तिक स्वार्थ कसा तो ठाऊक नाही. गोरगरिबांच्या कल्याणासाठीच आम्हास सहकार्य द्या, दार उघड बाबा दार उघड...! तुम्ही दीर्घद्वेषी ठरू नयेत म्हणून, यासाठी तरी दार उघड बाबा दार उघड...! तुम्ही सदभावनेला सदभावनेनं प्रतिसाद देत नाहीत, आपला हेका सोडत नाहीत. अशी तुमची बदनामी टाळण्यासाठी तरी दार उघडा...! ऐक्यभावाची तुमची गंगा आमच्या आदरभावाच्या यमुनेला मिळावी आणि साऱ्या दुनियेचे प्रयाग क्षेत्र व्हावं याकरिता हे दलितदैन्य दाहक, हिंदुजन त्राता सहकार्याचा दरवाजा उघडा...!
ओम नमोजी आद्या।
संघ प्रतिपाद्या ।।

- हरीश केंची

Saturday 13 May 2017

आंबेडकरी विचार गुदमरतोय...!

*आंबेडकरी विचार गुदमरतोय...!*

इन्ट्रो.......

"आज संविधानासमोर धोका निर्माण झाला असताना आंबेडकर चळवळीने त्याविरोधात तीव्र संघर्षाला सज्ज होण्याची गरज असताना 'आंबेडकरी' म्हणवून घेणारे नेते मात्र संविधानाच्या मारेकऱ्यांच्याच कळपात अधिक संख्येने सामील झालेले दिसावेत ही चळवळीची शोकांतिका आहे. पुण्यामुंबईत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सेना-भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढले आणि पक्षाचं अस्तित्व संपवायला हातभार लावला. खरं तर आंबेडकरी विचार हा देशाचा श्वास आहे. तो श्वासच आता कोंडला जातो आहे. त्याने आंबेडकरी विचार, चळवळ आणि लोक गुदमरू लागले आहेत. त्यांची घुसमट होऊ लागली आहे. कोंडणारा संविधानाचा श्वास मोकळा व्हायला हवाय. आंबेडकरी जनता त्याची वाट पाहतेय."

 *इगो हा सार्वत्रिक प्रॉब्लेम*

'समतेचं तत्वच विषमतेच्या संसर्गापासून दूर नाही' असं साम्यवादाचे कडवे भाष्यकार मांडत आले आहेत. समानतेत विषमता आहे की नाही, हा भाग वादाचा असेलही. मात्र समतेचे तत्वज्ञान मांडणाऱ्याच्यात मोठं विभाजन आहे, हे नक्की. म्हणजे ज्याच्या हातात रेणू असेल, तर ते त्याचा अणू करण्याएवढे विभाजनात माहिती आहेत. जे जे पुरोगामी, समानतावादी म्हणवतात त्यांचा स्व:ताचा, त्यांच्या संघटनेचा आणि त्या दोघांचा मिळून इगोचा एक प्रॉब्लेम सार्वत्रिक आहे. समतेसाठी त्यातली दोन माणसं कधीही एकत्र येत नाही. आली तरी ती एका जागेवर कायम राहात नाहीत. भारतातला त्यांचा इतिहास मोठा आहे. तो लक्षात असूनही रिपब्लिकन पक्षाचं, म्हणजेच दलित समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याच एकत्र येणं महत्वाचं असतानाही ते होत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या विशाल माणसाच्या नावावर तयार झालेला, दबलेल्या लोकांसाठीचा हा पक्ष अहंगंडाच्या बाबतीत विशाल आणि लोकांच्या कल्याणाबाबतीत आखुडच राहिला आहे. ज्येष्ठ कविवर्य बा.भ.बोरकर यांनी आपल्या एका ललित लेख संग्रहात एक वाक्य लिहिलं आहे. ते असं आहे - 'जेव्हा एखाद्या स्थानावरून गुरु जातो. त्यावेळी तिथं गुरं हुंदडतात' रिपब्लिकन पक्षातली फाटाफूट ही गुरांचं अस्तित्व स्पष्टपणे जाणवून देणारी होती. आज महापालिकेच्या निवडणुकात कोण आणि कसे हुंदडत आहेत, हे दिसतंच आहे.

*नेते सत्तेच्या वळचणीला*

महाराष्ट्रातील आंबेडकर चळवळीचं काय चाललंय आणि काय होणार आहे, याचा अंदाज आजपर्यंत कुणालाच घेता आलेला नाही. आंबेडकरी चळवळीतले नेते सत्तेच्या वळचणीला राहण्यात धन्यता मानणारे आहेत आणि सत्ता बदलली की, ते आपली दिशा बदलतात. सत्तेच्या तुकड्यासाठी लाचार बनून स्वाभिमान, आत्मसन्मान गहाण टाकतात.
आंबेडकरी चळवळ आताशी फोफावली आहे.आंबेडकरी विचारांची ही संकल्पना आता केवळ पूर्वाश्रमीच्या महार किंवा आताच्या बौद्ध समाजापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही साधी गोष्टसुद्धा आंबेडकरी चळवळीतले नेते लक्षात घेताना दिसत नाहीत. गेल्या काही वर्षात अनेक गावातून सर्व जाती धर्माचे उत्सव गावाने एकत्रितपणे साजरा करण्यास सुरुवात झालीय. त्यात आंबेडकर जयंती सुद्धा आहे. परंतु अशी गावं फार थोडी आहेत. बाकी सगळीकडे आंबेडकर जयंती हा बौद्धांचा उत्सव म्हणूनच मर्यादित राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या नेत्याला ज्याने देशाला संविधान दिलं, त्यांनाही आपण संपूर्ण समाजाचे करू शकलेलो नाही. हा दोष दलितेतर समाजाकडे जसा जातो तसाच तो आंबेडकरांना जातीच्या चौकटीत बंद करणाऱ्या समाजाकडेही जातो.

*बाबासाहेबांचे अनुयायी कोण?*

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी म्हणजे नक्की कोण, असा प्रश्न उपस्थित केला तर, त्याचं नेमकं उत्तर काय देता येईल? खरोखरच कुणाला म्हणायचं आंबेडकरांचे अनुयायी? जे जयंतीच्या मिरवणुकीत सामील होतात ते सारे अनुयायी असतात का? किंवा त्यातल्याही लोकांची त्यांच्या त्यांच्या विशेषत्वानुसार विभागणी करूनही विचार करता येतो. प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजा ढाले, अर्जुन डांगळे, राजेंद्र गवई आदि जे महाराष्ट्रातील दलित चळवळीचे नेते आहेत, त्यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? उत्तरप्रदेशसारख्या राज्यात बाबासाहेबांचे विचार रुजविणारे आणि त्या बळावर राज्यातील सत्ता मिळविणारे दिवंगत कांशीराम आणि बसपाच्या अध्यक्ष मायावती यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? डॉ. नरेंद्र जाधव किंवा डॉ.भालचंद्र मुणगेकर यांना बाबासाहेबांचे अनुयायी म्हणता येईल का? पुतळा विटंबनेनंतर काचा फोडणाऱ्यांना बस, रेल्वेची जाळपोळ करणाऱ्यांना अनुयायी म्हणायचं का? की बाबासाहेबांच्या वैचारिक भूमिकेशी एकरूप होऊन त्यांना अनुसरून वाटचाल करणाऱ्यांना अनुयायी म्हणायचं? इथे उल्लेख केलेले सारेचजण स्वतःला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणवून घेतात. जीवनाच्या अखेरच्या काळात शिवसेनेच्या छावणीत गेलेले नामदेव ढसाळही बाबासाहेबांना उद्देशून, 'तुझं बोट धरून चालतो आहे' असं म्हणत होते. अर्थात आपण कुणाचे अनुयायी आहोत, हे सांगण्याचा अधिकार ज्याला-त्याला आहे, तरी यातल्या कितीजणांना सच्चे अनुयायी म्हणता येईल? सत्तेच्या चाव्या दलितांनी आपल्या हातात घेतल्या पाहिजेत, हे बाबासाहेबांचं विधान कवटाळून सत्तेसाठी 'हाथी नही गणेश' म्हणत हव्या त्या तडजोडी करणारा बहुजन समाज पक्षही आपणच बाबासाहेबांचे अनुयायी असल्याचं सांगतो.

*आठवले तिष्ठत राहिले*

बहुतेक आंबेडकरी नेत्यांनी जातीयवाद्यांशी घरोबे केल्यानंतरही धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहिलेले रामदास आठवले शेवटी शिवसेनेसोबत गेले. आणि शिवसेना भाजप युतीची फाटाफूट झाली, तेव्हा त्यांनी भाजपची सोबत पसंत केली. राज्यात सत्ता नाही मिळाली., तरी केंद्रात भाजपची सत्ता आहे, केंद्रात मंत्रिपद देण्याचं आश्वासन त्यांना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी दिलं होतं. त्या आशेवर ते भाजपसोबत गेले. मध्यप्रदेशच्या कोट्यातून ते राज्यसभेवर गेले. आणि मोठ्या प्रतीक्षेनंतर भाजपनं त्यांना मंत्रिपद दिलं. सत्तेसाठी लाज सोडून काहीही तडजोड केल्यानंतर अशीच वेळ येते, हा धडा खरं तर, बाकीच्या दलित नेत्यांनीही घ्यावयास हवा

*आंबेडकरांचे ब्रॅण्डनेम*

प्रकाश आंबेडकरांकडे 'आंबेडकर' हे ब्रॅण्डनेम आहे त्यांची प्रारंभीच्या काळातली राजकीय वाटचाल संशयास्पद होती परंतु अलीकडच्या काळात त्यांना वस्तुस्थितीचं नेमकं आकलन झालं असल्याचं दिसून येतं. मात्र नेतृत्व करायचं तर अहंकार बाजूला ठेऊन सगळ्यांना सोबत घेण्याची तयारी लागते.एकट्यानं लढण्याऐवजी अनेकांची साथ असेल, तर लढाई अधिक जोमाने लढता येते हा धडा प्रकाश आंबेडकरांना ठाऊक आहे पण अद्यापि गिरवलेला नाही.

*व्यापक भूमिका हवी*

जोगेंद्र कवाडे यांनाही धर्मनिरपेक्ष भूमिकेतील सातत्य टिकविता आलेलं नाही. या सगळया नेत्यांनी सत्तेसाठी तडजोडी स्वीकारल्या; परंतु त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे आंबेडकरी चळवळ जातीच्या चौकटीत बंदिस्त केली. रिपब्लिकन पक्षाला अन्य समाजघटकामध्ये स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. प्रकाश आंबेडकरांनी केलेला 'भारिप-बहुजन महासंघ' चा प्रयोग हा राज्यातील एक वेगळा प्रयोग होता.परंतु तो अधिक व्यापक बनू शकला नाही. खरं तर अशाच प्रकारचा पर्याय नव्याने उभा करण्यासाठी प्रयत्न करावयास हवेत. मराठा, ओबीसी घटकांना जोडून घेऊन आंबेडकरी समाजाने व्यापक धर्मनिरपेक्ष आघाडी उभी करायला पाहिजे. नेत्यांनी अहंकार बाजूला ठेऊन प्रयत्न करायला हवेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर(१२५) रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही वेगळा प्रयोग झाला तर तो देशाच्या पातळीवर दिशादर्शक ठरू शकेल. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हिंदुत्ववाद्यांच्या उन्मादी राजकारणाला त्याद्वारे चोख उत्तर देता येईल. भारतीय संविधानावर आलेलं संकट परतून लावता येईल.

*सच्चा नेता मिळाला नाही*

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे आजही लाखो लोकांना प्राणांहून प्रिय आहेत. अशा बाबासाहेबांचं नाव घेऊन त्यांना काही स्वार्थ साधायचा नसतो. संघटना चालवायची नसते की राजकारण करायचं नसतं. ज्या महामानवानं आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं, गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढलं; त्यांना अभिवादन करण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता लाखो लोकांची गर्दी दीक्षाभूमीवर किंवा चैत्यभूमीवर उसळते. रापलेल्या चेहऱ्याची, डोळे पैलतीरीला लागलेली ही माणसं ज्या निष्ठेनं आलेली असतात तेवढीच निष्ठा नव्या पिढीच्या ठायीही दिसते. शाळकरी मुलांपासून कॉलेजच्या तरुण-तरुणींपर्यंत सारे वयोगट असतात. कोणत्याही अपेक्षा न ठेवता येणाऱ्या यास गर्दीला बाबासाहेबांच्यानंतर त्यांच्या विचारधारेचा एकही सच्चा नेता मिळू नये ही खरं तर शोकांतिकाच!

*पक्षाचं अस्तित्व अडचणीत*

आज संविधानासमोर धोका निर्माण झाला असताना आंबेडकर चळवळीने त्याविरोधात तीव्र संघर्षाला सज्ज होण्याची गरज असताना 'आंबेडकरी' म्हणवून घेणारे नेते मात्र संविधानाच्या मारेकऱ्यांच्याच कळपात अधिक संख्येने सामील झालेले दिसावेत ही चळवळीची शोकांतिका आहे. पुण्यामुंबईत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते सेना-भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढले आणि पक्षाचं अस्तित्व संपवायला हातभार लावला. खरं तर आंबेडकरी विचार हा देशाचा श्वास आहे. तो श्वासच आता कोंडला जातो आहे. त्याने आंबेडकरी विचार, चळवळ आणि लोक गुदमरू लागले आहेत. त्यांची घुसमट होऊ लागली आहे. संविधानाचा श्वास मोकळा व्हायला हवाय. आंबेडकरी जनता त्याची वाट पाहतेय.

- हरीश केंची

 *चौकट*

*राजकारणातली छत्री*

आंबेडकरी जनतेवर अन्याय, अत्याचार होत असताना मात्र सर्वच नेते ते रोखण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत नाहीत,  पण आपण आंबेडकरी जनतेचे संरक्षण करतो आहोत, असा देखावा मात्र उभा करताहेत. आचार्य अत्रे संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या काळात एक चावट गोष्ट सांगायचे. काँग्रेसवाले महाराष्ट्रावर अन्याय होत असताना गप्प बसले नव्हते, ते आपल्या मार्गाने विरोध, नाराजी व्यक्त करीत होते. हा काँग्रेसी नेत्यांचा दावा हास्यास्पद ठरविण्यासाठी आचार्य अत्रे ही गोष्ट सांगायचे, ' एका इसमाच्या बायकोला भर दुपारी एका गुंडापुंडाने धरले. नवऱ्याच्या कानफटात वाजवून त्यानं त्याला आपली छत्री धरून पुढे उभे केले आणि त्या आडोशाआड तो करायचे ते करू लागला. बायको चवताळली, ती चावून, ओरबाडून प्रतिकार करीत होती. नवरोबा उघडी छत्री इकडे तिकडे हलवत शुंभासारखा ही झुंज बघत होता. अखेर तो गुंड त्या महिलेच्या चंडिका अवताराने घाबरून ढुंगणाला पाय लावून पळाला. स्व:ताला सावरत ती महिला संतापून नवऱ्याला म्हणाली 'मी एवढी त्याच्याशी झुंजत होते आणि तुम्ही नुसती छत्री हलवत उभे होता, काय म्हणायचं तुम्हाला? त्यावर तो नवरा म्हणाला, 'अग मी नुसता उभा नव्हतो. त्याला उन्हाचे चटके बसावेत म्हणून मी सारखी छत्री नव्हतो का हलवत?' काँग्रेसवाले हे असा प्रतिकार करत होते. सामान्य जनता जेव्हा जिवाच्या कराराने लढतात, तेव्हा काँग्रेसी नेते छत्री हलवत असतात. आचार्य अत्रे यांची ही गोष्ट, त्यांना ते हयात असते तर पुन्हा सांगावी लागली असती. आंबेडकरी जनतेवर चहुबाजूंनी अन्याय अत्याचार होतो आहे, त्यांचे धिंडवडे निघत असताना सध्याची नेते मंडळी छत्री हलवीत असतात असं कुणी म्हटलं तर...!

Saturday 6 May 2017

मुस्लिमांचं नेमकं कुठं चुकतंय?

  1.  *मुस्लिमांचं नेमकं कुठं चुकतंय?*

भारतात मतांसाठी मुस्लिमांचं लांगुलचालन करणारे सर्व पक्षीय राजकारणी मुस्लिमांचं कधीच भलं करु शकत नाहीत. शिक्षणातून मुस्लिमांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकेल. परंतु याबाबतही मुस्लिमांची स्थिती शोचनीय आहे. या दुरावस्थेतून मुस्लिमांची सुटका कशी होणार? कोण करणार? कुणाचीही वाट पाहण्यापेक्षा राजकारण्यांच्या जहाल विचारांना जवळ करण्याऐवजी शिक्षणाला जवळ केल्यास उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम तरुण-तरुणी शिक्षणाची कास धरतील काय?

*निवडणुकांत मुस्लिमांना महत्व*

राज्यात नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. पाठोपाठ उत्तरप्रदेशसह पांच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यात. या निवडणुकात मुस्लिमांच्या मतांना खूप महत्व प्राप्त झालं होतं. उत्तरप्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या वीस टक्के आहे. मुस्लिमांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली, तरी उत्तरप्रदेशात मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही, बरेचसे मुस्लिम मागास आणि गरीब आहेत. उत्तरप्रदेशच नव्हे तर भारतातल्या सगळ्याच राज्यातील मुस्लिमांची हीच स्थिती आहे.

*नॉलेजपासून मुस्लिम दूर*

मुस्लिमांची ही दुर्दशा होण्याचं सर्वात प्रमुख कारण शिक्षणाचा अभाव हे आहे. अनेक मुस्लिम कुटुंबिय आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घ्यायला पाठवतात. तिथे कट्टरपंथीय मौलवी त्यांना इस्लामच्या नावाने भडकवतात. 'नॉलेज इज द पॉवर' हे नव्या युगाचं सूत्र आहे. परंतु अशा नॉलेजपासूनच मुस्लिम दूर राहतात. त्या ऐवजी ते राजकारण्यांच्या नादी लागतात. परंतु कोणताच राजकारणी आपला उद्धार करु शकत नाहीत हे त्यांना उमगत नाही. शिक्षणाचा फायदा कसा होईल, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अझीम प्रेमजी! अझीम यांच्या वडिलांचा तांदूळ आणि तेल-तुपाचा व्यवसाय होता. त्यांनी दाढी वाढविलेली नसली तरी ते कट्टर मुस्लिम होते, पण त्यांनी अझीम यांना खूप शिकवलं. आज अझीम यांचं नांव फॉर्ब्जच्या बिलियॉनरच्या यादीत पोहोचलं आहे. अझीम यांच्यामुळे त्यांच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा होतोय. या कर्मचाऱ्यामध्ये केवळ मुस्लिमच आहेत असं नाही. कारण आऊटसोर्सिंगसारख्या कामात धर्म किंवा जात नव्हे, तर तुमचं शिक्षण हीच तुमची पात्रता असते.

*ज्ञान हीच सत्ता*

आज भारतातील नव्हे, तर पाकिस्तानामधील मुस्लिमानीही आत्मपरीक्षण करायला हवं. 'ज्ञान हीच सत्ता' असा विचार करून भारत पाकिस्तानातील मुस्लिम एकत्र आले, तर त्यांची अफाट प्रगती होईल. भारत-पाकिस्तानाचा जगभर डंका वाजेल. पण परिस्थिती खूप वेगळी आहे. खरं शिक्षण घेण्याऐवजी मुस्लिम धार्मिक शिक्षणाच्या मागे जाताहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकत असलेलेही मदरशांकडे वळत आहेत. दाढी ही त्यांना आपली आयडेंटिटी वाटते. आता दाढी ठेवल्याने कुणाची कार्यक्षमता वाढलीय का? धर्म मनात असला पाहिजे, त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही.

*स्त्री शिक्षण खूपच दूर राहिले*

मुस्लिमांचं दुखणं मांडणारी काही पुस्तकं वाचण्यात आली. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे, ' फ्रंटलाईन पाकिस्तान-द स्ट्रगल विथ मिलिटन्ट इस्लाम'.झाहिर हुसेन त्याचे लेखक आहेत. 'डेस्पिरिटली सिंकिंग पेराडाईज' या दुसऱ्या पुस्तकाचे झियाउद्दीन सरदार हे लेखक आहेत. तर तिसरं पुस्तक आहे, डॉ. रफिक झकेरीया यांचे 'इंडियन मुस्लिम-व्हेअर हॅव दे गॉन रोंग?'. डॉ.झकेरीया यांनी आपल्या पुस्तकात मुस्लिमांमध्ये असलेल्या शिक्षणाच्या दुरावस्थेविषयी आकडेवारी आणि विश्लेषण दिलंय. ते भारत आणि पाकिस्तानातील प्रत्येक मुस्लिमांनी वाचण्यासारखे आहे. 'पाकिस्तान प्रेस इंटरनेशनल'चे लेखक आमिर लतीफ म्हणतात , "पाकिस्तानात शिक्षणाची अवस्था अलार्मिग आहे. धोक्याचा इशारा द्यावा, अशी आहे. सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात शिक्षणाचं प्रमाण केवळ ४६ टक्के आहे. तर मुलींच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण केवळ २६ टक्के आहे. प्रौढ स्त्रिया आणि लहान मुलींचा यात समावेश केला, तर हेच प्रमाण १२ टक्के आहे. युरोपात शंभर टक्के साक्षरता आहे. अमेरिकेत ९९ टक्के लोक साक्षर आहेत. तर स्त्रीसाक्षरतेचं प्रमाण शंभर टक्के आहे. पाकिस्तानात १ लाख ६३ हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यातील केवळ ४० हजार शाळांमध्येच मुलींना शिक्षण दिलं जातं. नॉर्थवेस्ट फ्रॅंटीयर मध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. पाकिस्तानातील ९५ टक्के लोक इस्लामचं पालन करतात. इस्लाममध्ये स्त्री आणि पुरुषासाठी समान शिक्षणतत्व आहे.पण तरीही मौलवींचा मुलींना शिकण्यास विरोध असतो. पाकिस्तानात एकास बाजूला शाळांची संख्या वेगाने कमी होत असतानाच, दुसऱ्या बाजूला मदरशांची संख्या वाढत चालली आहे. झाहिर हुसेन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, '१३ हजार मदरशांपैकी १५ टक्के मदरशांमध्ये फंडामेंटालिझम आणि टेररिझम याचं शिक्षण दिलं जातं. मदरशात इंग्रजी शिकविण्यात येत नाही. तिथे केवळ अरबी भाषेत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे मुलांना आधुनिक ज्ञान मिळत नाही. आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी न पाठवू शकणारे गरीब आई वडील या मदरशांच्या चक्रात सांपडतात.

*हलाखीचे करुण चित्र*

थोड्याफार फरकाने हीच स्थिती भारतातही आहे. रफिक झकेरीया यांच्या पुस्तकात भारतीय मुस्लिमांच्या हलाखीचे करुण चित्र आहे. आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात भारताने मुसंडी मारलीय. पण आऊटसोर्सिंगमध्ये १ टक्काही मुस्लिम नाहीत. भारतात जवळपास २० कोटी मुस्लिम आहेत. बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांची संख्या मोजली, तर हा आकडा आणखी फुगेल. पण त्यातील एक टक्का मुस्लिमांचाही खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही. अझीम प्रेमजी (विप्रो), हबीब खोराकीवाला (वोकहार्ड), युनूस गफूर(हिंदुस्तान इंक) अशी काही मोजकी नावं उद्योगक्षेत्रात आहेत. पण उर्वरित मुस्लिमांची अवस्था भयानक आहे. अर्थात, पाकिस्तानी मुस्लिमांच्या तुलनेत काही बाबतीत भारतीय मुस्लिमांची अवस्था बरी आहे. समजूतदार मुस्लिम आपल्या मुलांना शिकवतात. मुलीही भारतात उच्च शिक्षण घेत आहेत. सर्व क्षेत्रात त्या उतरत आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे , त्यामुळे हरखून जाण्याची गरज नाही.

*उच्च शिक्षणाचा अभाव*

भारतात पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये फक्त ६.२१ टक्के मुस्लिम आहेत. एमएस्सी आणि एमकॉम ची डिग्री मिळविणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्याचं प्रमाण ९.११ टक्के आहे. प्रोफेशनल डिग्री कोर्समध्ये केवळ ३.४१ टक्के मुस्लिम आहेत. तर एलएलबी आणि इंजिनिअरिंग मध्ये ५.३६ टक्के मुस्लिम आहेत. जे मुस्लिम शिकले त्यांची प्रगती झालीय. नोकरी, उद्योग, राजकारण या सगळ्याच क्षेत्रात मुस्लिम निव्वळ शिक्षणाच्या अभावामुळे पिछाडीवर आहेत. भारतात मुस्लिमांची संख्या वीस कोटी असल्याचं सांगितलं जातं असलं, तरी लोकसभेत केवळ सतरा मुस्लिम खासदार आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या ८३ इतकी हवी होती. राज्यसभेतील २५० सदस्यांपैकी ११ मुस्लिम आहेत. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाविषयी लिहिण्यासारखी स्थिती नाही.

*सनदी अधिकारी जवळपास नाहीतच*

आयएएस सारख्या उच्च दर्जाच्या नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ ३.२७ टक्के आहे. आयपीएसमध्ये २.७ टक्के मुस्लिम आहेत. आयएफएसमध्ये मुस्लिमांचा वाटा ३.३७ टक्के आहे. भारत सरकारची कार्यालयं आणि चौदा राज्यांच्या सरकारी नोकरीत एकूण ७५ हजार ९५३ कर्मचारी आहेत. यात मुस्लिमांची संख्या ३ हजार ३४६ आहे. ही आकडेवारी सुशिक्षित मुस्लिमांचं डोकं फिरावणारी आहे. पण मुस्लिमांच्या या स्थितीला जबाबदार कोण आहेत? सौदी अरेबियासारखे देश भारतातील मुस्लिमांना भरपूर मदत करतात. पण आपलं भलं आपणच करु शकतो, हे जोपर्यंत मुस्लिमांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणं अवघड आहे.

*खुदीको कर बुलंद इतना*
*की खुदा अपने बंदेसे पुछे,*
*बता तेरी रझा क्या है।*

हे मुस्लिमांनी लक्षात ठेवायला हवं....!

*जातीवर आधारित आरक्षण हवंय*

भारतातील अल्पसंख्याकांची, विशेष करून मुसलमानांची सामाजिक व आर्थिक स्थिती तपासण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती सच्चर यांच्या समितीची नियुक्ती केली होती या समितीच्या अहवालातून भारतातील मुसलमानांची स्थिती दलितांपेक्षा वेगळी नसल्याचं जाहीर झाल्याने मुस्लिमांना आरक्षण देण्याची आणि शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी विशेष सवलत-सुविधांची तरतूद करण्याची चर्चा सुरू झाली आणि मुस्लिमांना आरक्षण व शैक्षणिक सुविधा-सवलत हा वादाचा मुद्दा बनला. भाजपने या तरतुदींना विरोध करताना तत्कालीन प्रधानमंत्र्यांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. सत्ता हाती आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाला असला तरी 'मुस्लिम विरोध' हे भाजप परिवाराचं राजकीय हत्यार आहे. इतर मुद्दे थंड पडल्याने तो मुद्दा तापविला गेला, पण फारसे यश लाभले नाही. विरोधाने वास्तव बदलणार नाही. भारतातील मुस्लिम समाजाची दशा तपासण्यासाठी सरकारी व खाजगी संस्था -संघटनांनी त्यापूर्वी बऱ्याचदा प्रयत्न केलेत. नोकरी धंद्यातील मुस्लिमांच्या संख्येच्या प्रमाणाची आकडेवारीही जमविण्यात आली ती इतर समाजाच्या तुलनेत खूपच कमी आहे.शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा अभाव हे त्याचं मुख्य कारण आहे. सच्चर कमिटीच्या अहवालात यापेक्षस्स वेगळे मुद्दे पुढे आलेले नाहीत. पण या अहवालामुळे मुस्लिमांत मोठ्या प्रमाणात गरिबी असून सर्वात जास्त मागास मुस्लिम समाज आहे. यावर सरकारी शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारी नोकरीप्रमाणेच पोलीस आणि सैन्यात मुस्लिमांची संख्या खूपच कमी आहे. जे आहेत, त्यातील बरेचसे कनिष्ठ पदावर काम करतात. रॉ आणि सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणात मुस्लिमांची संख्या शून्य आहे. ही अल्पताच मुस्लिमांना स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यास हातभार लावते का? ह्याचाही विचार व्हायला हवा. स्वतंत्र ओळख निर्माण करणारा समाज नेहमीच कट्टरतेकडे झुकतो. त्यात अशिक्षितपणाची आणि गरिबीची भर असेल, तर कट्टरतेकडून गुन्हेगारीकडे वळणे सहजपणे होते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. मीडियातून जे गुन्हेगारी विषयक वृत्त प्रसिद्ध होतं, त्यात निम्म्याहून अधिक नावं मुस्लिमांची असतात. मुस्लिम समाज आज गरिबी आणि गुन्हेगारी, अशा दोन्ही दूषणाने त्रस्त आहे. नोकरीतील आरक्षण आणि नोकरी धंद्यातील सवलती या त्रस्ततेतून सुटण्याची धडपड करणाऱ्या मुस्लिमांसाठी सहाय्यकारी ठरतीलच. परंतु आरक्षण अथवा सोयी सवलती ही बाह्य मदत आहे. ती समाज विकासासाठी फारशी प्रभावी ठरत नाही. ती प्रभावी ठरविण्यासाठी मुस्लिम नेत्यांनाच समाज सुधारणेचं वारं समाजात खेळवावं लागेल.

*कट्टरतावादाशी झुंजावं लागेल*

मुल्ला मौलवींनी मुस्लिमांमध्ये वाढवलेली कट्टरता, धर्मांधता वितळावी लागेल. आज भारतातील मुस्लिमांच नेतृत्व शिक्षित आणि लोकशाहीवादी मुस्लिम नेत्यांनी आपल्या ताब्यात घ्यायला हवं. दलितांना डॉ.आंबेडकर यांच्यासारखा पुढारी मिळाला; तसेच पुढेही आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे नेते मिळाले. म्हणूनच दलित आणि बौद्ध समाज आज विकासाच्या वाटेने चालताना दिसतोय. आपल्या सर्वांगीण विकासासाठी झगडताना दिसतोय. मुस्लिम समाजातही असं चित्र लोकशाहीवादी मुस्लिमांना तयार करावे लागेल. त्यासाठी मुल्ला मौलवींच्या कट्टरतावादाशी झुंजावं लागेल. भारतीय संविधानानुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. ज्या सवलती-सुविधा व दिलं जातं, ते जातिनिशी त्यांना दलित-आदिवासी म्हणून मागास गणलं ठेवलं गेलं, त्यांना सामाजिक न्यायहक्काच्या जाणिवेतून दिलं जातं. ह्याच जाणिवेनं ते बौद्ध व दलित ख्रिस्तीना दिलं जातं. मुस्लिमांनाही त्याच आधारावर दिलं पाहिजे. कारण जातीभेद मानत नसला, सर्वांकडे समान दृष्टीने पाहात असला, तरी भारतीय मुस्लिमांत पाचशे वर्षापूर्वी धर्मातर झालं, तरी जातीभेद कायम आहेत. शिंपीचा दर्जी झाल्याने आणि खाटिकाचा कसाई झाल्यानं जातीभेद संपले नाहीत. त्याचे परिणामही कायम आहेत. अशांनाच आरक्षणाची आणि शिक्षणातील सवलती, सुविधांची गरज आहे त्यांना तो लाभ मिळू नये. यासाठी मुस्लिमांत स्वतःला उच्च समजणारे परंपरावाद्यांना पुढे करून मुस्लिम म्हणून आरक्षण मिळावं असा आग्रह धरीत आहेत. हा आग्रह मोडून काढून जातिनिशी मागास ठेवलेल्या मुस्लिमांपर्यंत आरक्षणाची व सरकारी लाभाची तरतूद पोहोचविणे, हे सर्वपक्षीयांचे आणि लोकशाहीवाद्यांचे कर्तव्य आहे.
- हरीश केंची
 इन्ट्रो......
"भारतात मतांसाठी मुस्लिमांचं लांगूनचालन करणारे सर्व पक्षीय राजकारणी मुस्लिमांचं कधीच भलं करू शकत नाहीत. शिक्षणातून मुस्लिमांचं सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकेल परंतु याबाबतही मुस्लिमांची स्थिती शोचनीय आहे. या दुरावस्थेतून मुस्लिमांची सुटका कशी होणार? कोण करणार? कुणाची वाट पाहण्यापेक्षा राजकारण्यांच्या जहाल विचारांना जवळ करण्याऐवजी शिक्षणाला जवळ केल्यास उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम तरुण-तरुणी शिक्षणाची कास धरतील काय?"

पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत...!

 *पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत*

इन्ट्रो......
"स्त्रीमुक्तीची चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातील पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत असं मानण्याइतपत त्याचं मानसिक अधःपतन झालं आहे."
[5/4, 1:10 PM] Harish Kenchi: स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला मोठ्याप्रमाणात निवडून आल्या आहेत. विधिमंडळात आणि संसदेत महिलांना आरक्षण ठेवण्याबाबतचा विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून दिल्याने राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले आहे. हे आपण सगळेच जाणतो. त्यापूर्वी त्याचे प्रमाण अत्यंत अल्प असेच होते. स्त्रिया राजकारणात वा समाजकारणात दिसल्या म्हणजे त्या स्त्री मुक्ती चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. असंच मानलं जात होतं. किंबहुना राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच काहीसा नकारात्मक होता. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या महिला कार्यकर्त्यांबाबत आक्षेप घेतला जायचा. स्त्रीमुक्ती चळवळ ही संसार मोडण्यासाठी आहे, कुटुंबसंस्था उदध्वस्त करणारी आहे, या समजुती कशा पसरल्या कुणास ठाऊक? पण पसरल्या होत्या हे मात्र निश्चित! स्त्रीमुक्ती चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी, समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे.
आत्मसन्मानाची भावना पुरुषांमध्ये आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातले पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे. भारतीय पुरुषाला गुलामी प्रिय आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत, असं मानण्याइतपत त्यांचं मानसिक अध:पतन झाले आहे.

मध्यन्तरी एका महिलेने झाशीच्या राणीच्या नवऱ्याबद्धल गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मध्ये असलेल्या काही गोष्टी एका लेखात मांडल्या होत्या. झाशीच्या राणीचा नवरा गंगाधरपंत हा स्त्रीवेष करीत असे. या पुस्तकातच आपण असे का वागतो, याची गंगाधरपंतांना वाटणारी जीवघेणी खंतही व्यक्त केली आहे. आपण अशाप्रकारे स्त्रीवेष करून स्त्रीसारखे वावरता हे खरे का? असा प्रश्न या गंगाधरपंतांना करण्यात आला. ते फार महत्वाचे आहे. 'मी तर लहानसा मांडलिक आहे. परंतु इंग्रज बहाद्दरांपुढे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर देशात जितके राजे रजवाडे आहेत, तितक्यांनी तुम्हापुढे बांगड्याच भरल्या आहेत. कोणी शूर तुम्हापुढे नाही. बांगड्या भरल्याच नाहीत असा पुरुष पृथ्वीवर नाही. तुम्ही दिपांतरीचे असता आपल्या पराक्रमाने आमच्या द्वीपात येऊन आम्हास कैद केले.' म्हणजे इंग्रजांच्या पराक्रमापुढे सगळ्याच मोठमोठ्या पुरुषांनी बांगड्या भरून हार खाल्ली. तर माझ्यासारख्या छोट्याशा राजाने स्त्री वेष करून वावरायचे ठरविले , तर त्यात गैर काय? असा प्रश्न गंगाधरपंतांनी उपस्थित केला. आत्मसन्मान विसरून लाचारीचे, अवहेलनेचे जीवन जगणारे, अन्याय सहन करीत जगणारे हजारो पुरुषसिंह आपल्या अवतीभोवती असताना इथे फक्त स्त्रीमुक्तीचाच विचार व्हावा हे कितपत योग्य आहे?

विभावरी शिरूरकर यांच्या साहित्यावर पुण्या-मुंबईत साठ सत्तर वर्षांपूर्वी मोठ्या जोरदार चर्चा, वादविवाद होत, असं माझ्या वाचनात आलं आहे. त्या काळात एका स्त्रीने आपल्या सर्वगुणसंपन्न नवऱ्याचं नाक कापण्यासाठी काय केले होते, हे ऐकलं, तर आजच्या कैक पुरोगामी पुंगवांनाही फेफरे येईल. ही गोष्ट कुण्या ऐऱ्या गैऱ्याने सांगितलेली नाही. 'निस्पृह' या टोपण नावाने तेव्हा लिखाण करणाऱ्या दत्तो अप्पाजी उर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी ही पुणे संस्कृती सादर केली होती.  दाजीसाहेबांनी लिहले होते, 'आपला नवरा व्यभिचारी आहे, बाहेरच्या बायांस आपल्या घरी आणून आपल्या देखत तो त्यांच्याशी हैदोसधुल्ला घालीत असतो, या रागावर पुण्याच्या एका सुखवस्तू, श्रीमंत गृहस्थाच्या पत्नीने घरासमोरच त्यांच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसायाचे दुकान उघडले होते!'  स्त्री मुक्तीची ही एवढी जबरदस्त धडक सत्तर वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका स्त्रीने दिली होती हे कुणाला खरे तरी वाटेल का? उनाडपणे वागणार्या पुरुषांना ताळ्यावर आणण्यासाठी काय करावे, हा प्रश्न स्त्रियांना नेहमीच सतावत आला आहे.

विभावरी शिरूरकरांनी आपल्या साहित्यातून हा प्रश्न उभा केला आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुशिक्षित पांढरपेशा वर्गात वादळच निर्माण केले होते. पतीने टाकून दिलेल्या स्त्रीने काय करावं , याबद्धल त्या काळातल्या विद्वानांनी जे काही विचार व्यक्त केले आहेत,  ते आज वाचताना मोठी मौज वाटते. आता घटस्फोटाचा कायदा झालाय. स्त्रीला नवऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वतःला मुक्त करून घेण्याची इच्छा असेल, तर घटस्फोट घेऊ शकते अथवा घटस्फोट घेण्याचे नाकारून नवऱ्याला धडाही शिकवू शकते. पण सत्तर वर्षांपूर्वी हे शक्य कोटीतले नव्हते. पुरुष त्याला हवं तसं वागत होता. पण स्त्रीला मात्र असे वागणे शक्य होत नव्हते.
सुप्रसिद्ध समाजसुधारक विद्वान श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या परिस्थितीवर लिहिताना उनाड स्त्रियांशी संबंध तोडून टाकण्याचे तोडगे पुरुषांनी काढलेले आहेत. त्याच पद्धतीचा अवलंब स्त्रियांनी करावा असे स्पष्टपणे सुचविले होते. केतकरांनी ह्या तोडग्याची त्यांच्या कानावर आलेली कथा आपल्या लेखात दिलीय, ती अशी- ' वऱ्हाड मध्ये एके ठिकाणी जेव्हा एका ब्राह्मणाची  बायको मुसलमानाबरोबर पळून गेली, तेव्हा तिचा कायमचा संबंध तोडून टाकण्यासाठी पालाश विधी केल्याचं मला ठाऊक आहे. सुमारे १९०२-०३ साली मुक्काम येथे एका भिक्षुकाच्या घरी या प्रकारचा विधी झालेला होता. तो मला पाहायला मिळाला नाही; पण पालाश विधीचे वर्णन ब्रह्मकर्माच्या पोथ्यातून आढळते. यावरून पळसाचा एक कृत्रिम पुरुष करून त्याचे दहन करण्याचा हा विधी आहे असे दिसते. या 'पालाश प्रतिकृती दाहविधी' मध्ये कृत्रिम पुरुषांच्या ठायी मंत्रयुक्त पद्धतीनं अस्थीमांसयुक्त शरीराची भावना कशी स्थापित करावी हे दिले आहे. 'यस्य अस्थिनी न लभ्यते तस्य पर्णशरदाह:' असे विधीवाक्य सांगितले आहे. मृत मनुष्य नसता त्यास मृत कल्पून त्याचा अंत्यविधी करणे ही गोष्ट समाजात पूर्वीपासून चालू होती असे दिसते. घटस्फोटाचा विधी मी पाहिला नाही पण काशीला झालेला मी ऐकला आहे.

खुद्द बिथोर येथे पेशव्यांच्या घराण्यामध्ये एक उनाड स्त्री निघाली आणि नवऱ्यास टाकून अन्य पुरुषासोबत राहू लागली . तेव्हा त्या स्त्रीशी संबंध नाहीसा करण्यासाठी घटस्फोटाचा विधी केला होता, असे ऐकतो. या विधीची एकंदर योजना मला परिचित नाही. त्या विधीचे वर्णन मिळाले ते संस्कारज्ञ ब्राह्मणांकडून न मिळता सामान्य मनुष्याकडून मिळाले. 'नदीच्या काठी हा विधी झाला. स्त्रीच्या डोक्यासारखे रूप मडक्याला दिले होते आणि नदीच्या काठी जाऊन दगडावर ते मडके आपटले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी शिमग्यातल्याप्रमाणे शंखनाद केला आणि नवऱ्याने काही दिवस सुतक धरलं' या सगळ्यापासून आपण खूप पुढे आलो आहोत. पण नव्या काळात नवे प्रश्न , नवी बंधने, नवे जाच निर्माण झालेच आहेत. स्त्रीमुक्तीसुद्धा बुरसटलेली वाटू लागलीय कित्येक जणींना!

Thursday 4 May 2017

व्यक्तिगत चारित्र्याची चाड हवी!

*व्यक्तिगत चारित्र्याची चाड हवी!*

राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. सध्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जाते आहे कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.

देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य धोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं साऱ्या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावे लागतात आणि सहसा ते सर्व असतातही.

दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे,  हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. अढीतल्या आंब्याप्रमाणे हळूहळू समाज नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, " वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे.त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे." आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागली आहे. याउलट याचं जसं पचलं तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको? अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होत आहे आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनात उलटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, टी आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत.आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य धोरणे, वैचारिक बैठक, तत्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम' यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. उत्तरप्रदेशातील निवडणुकांसाठी एन.डी.तिवारी सारख्या भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्चर्य वाटायला नको.

-हरीश केंची

उद्भवजींच्या स्वयंतेजाची पुनरपरिक्षा

*उद्धवजींच्या स्वयंतेजाची पुनर्परीक्षा*

गोरेगावच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णय घेतला. आगामी काळात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी घेतलेला युतीचा निर्णय आज त्यांनी मोडून  टाकला. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात घेतलेल्या ह्या धाडसी निर्धाराने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचे 'शिवसेना पक्षप्रमुख' पण सिध्द झालं आहे. या सिद्धतेला विधानसभा निवडणुकीत कस लागला होता. त्या सत्वपरिक्षेत त्यांचं स्वयंतेज झळाळून आलं होतं. महापालिकेच्या निवडणुकीत या स्वयंतेजाची पुनः परीक्षा होणार आहे.

शिवसेनेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही. बाळासाहेबांच्या राजकारणाचा स्वतःचा असा खास ठाकरे टच होता, त्याची उणीव जाणवू न देता शिवसेनेची वाटचाल होणे अवघड काम होतं. ते आव्हान उद्धव ठाकरे यांनी त्याच ताकदीने पेलेल्याचं आज दिसून आलं. प्रजासत्ताकदिनी उद्धवजींचं भाषण हे थेट बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करून देणारे होते. त्याच धाटणीचे होते. नेमके शब्द, ठोस निर्णय, तोच प्रहार,  घणाघाती टीका जसं शिवसैनिकांना हवं अगदी तसं तडाखेबाज असं त्यांचं भाषण झालं.
भाजपने युती तोडल्यानंतर विधानसभा निवडणुकीत जे यश बाळासाहेबांच्या पश्चात मिळवलं,त्या यशाने ते मस्तावले नाहीत; तर अधिक सावध झाले. म्हणूनच २५ वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने यशाच्या मस्तीत शिवसेनेला चेपण्याचा डाव टाकला. पण राजकीय अनुभवाने समृद्ध असलेल्या उध्दव ठाकरे यांनी तो शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या सांघिक बळावर उधळून लावला. बाळासाहेब असते तर जसे वागले असते तसे उध्दव ठाकरे यावेळी वागले. असं शिवसैनिकांना जाणवले . पक्षप्रमुखाचं तेज त्यांनी आपल्या निश्चयी वाणीने आणि राजकीय खेळीनं बावनकशी असल्याचं दाखवलं.
भाजप संधी मिळेल तेव्हा 'शत प्रती शत' चा नारा लावते. भाजपेयीत झालेला हा बदल अनपेक्षित नाही. कारण आपल्या विचारांची सत्ता निर्माण होण्यासाठी आपदधर्म म्हणत कुणाशीही दोस्ती करण्याची तयारी ठेवूनच भाजप मोठा झाला आहे. भाजप कितीही डांगोरा पिटत असला तरी, हा काही स्वतःच्या विचारावर विस्तारलेला पक्ष नाही. सत्तेपासून कटाक्षाने दूर राहून दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाचा ध्यास जपणारा संघ ते सत्तेसाठी सुखराम बुटासिंग पासून एन.डी.तिवारींपर्यंतच्या भ्रष्टाचारी लोकांची साथ घेणारा असा भाजप असा प्रवास आहे. या प्रवासात शिवसेनेनं दिलेली साथ तशी महत्वपूर्ण आहे. रा.स्व.संघ परिवाराचा विचार महाराष्ट्राच्या मातीत उगवला पण कधी फोफावला नाही, विस्तारला नाही. अशा संघ विचाराच्या शाखांना बहर आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय हे विसरून चालणार नाही. ठाकरे यांचा ऋण भाजप आता आपल्या प्रकृती धर्मानुसार फेडतोय. भाजपच्या या प्रकृती धर्माचे मर्म सांगणारी बोधकथा कदाचित आपल्याला माहिती असेल पण ती आज आठवणीसाठी पुन्हा सांगतो. कारण ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, त्याच रूप धारण करायचं, हे भाजपचं वैशिष्ठय झालंय. गोष्ट पुराणातली आहे. भाकड असली तरी बोधप्रद आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याचा आकार धारण करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली होती. मुळात हा प्राणी शेळपट पण बुद्धीचातुर्याने त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठया प्राण्याचं भय दाखवायचा आणि आपण दोघे एकत्र आलो तर मोठ्या प्राण्याला गारद करु अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्या सारखा आकार धारण करायचा. असं खात खात शेळीच्या वाघोबा झाला. अशाप्रकारे प्रादेशिक पक्षांना काँग्रेसचे भय दाखवीत त्याच्याशी दोस्ती करीत, त्याचे गुण अवगुण आपल्यात भिनवीत भाजपने आपली ताकद वाढविलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला, समाजवादीही झाला. सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेस झालाय. अगदी भगवी काँग्रेस बनलाय. शिवसेनेच्या दोस्तीने भाजपने आपली संघटनशक्ती वाढविली त्यासाठी भाजपने आपल्यात शिवसेना रुजविली.
कालपर्यंत शेळी असलेला भाजप आज डरकाळी फोडत आपण वाघ झाल्याचे साक्ष देतोय.
सत्तेचं चाटण मिळालेल्या भाजपने 'शत प्रति शत' बरोबरच 'अब सब महाराष्ट्र' अशा घोषणा द्यायला सुरुवात केलीय. भाजपने शिवसेनेला जी वागणूक दिली ते पाहता बाळासाहेब असते तर, त्यांनी हा कमळातला भुंगा भुणभुण सुरु करतानाच चेचला असता, तसा तडाखा उध्दव ठाकरे यांनाही देता आला असता, पण त्यातून फक्त शिवसेनेची ताकद दिसून आली असती. पण उध्दव ठाकरेंनी प्रचंड संयम दाखवला. त्यासाठी प्रसिद्धीमाध्यमातून टीकाही सहन केली. शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विचारांबद्धल मतभेद असतील; पण त्यांच्या अशा या स्वतंत्र स्टाईलमुळेच गेली काही वर्षे शिवसेनेची ताकद वाढतेय. विधानसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं ते पाहता बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेची ताकद टिकून राहावी हा मतदारांचा अट्टाहास दिसून येतो. हे महाराष्ट्राचं जनमत उध्दव ठाकरे यांनी ओळखलं; म्हणूनच त्यांनी कशाचीही फिकीर न करता युती तोडण्याचा निर्धार व्यक्त केला. भाजपच्या स्वार्थीपणावर, विश्वासघातकीपणावर कठोर शब्दात टीका करु शकले. त्यांची ही भाजपवरची टीका मराठी, महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान दाखवणारा ठरला. युतीला २५ वर्षे झाली तरी जिथे शिवसैनिकांनी स्वीकारली नाही तिथे मुंबईकर कशी स्वीकारणार? बाळासाहेब ठाकरे यांनी जिवंतपणी मिळवलेलं प्रेम आणि लोकांची साथ आपल्या नंतर अधिक वाढविली. ती वाढती राहणार आहे, या वाढीला प्रबोधनकार ठाकरे यांचा समाज सुधारणेचा वसा आणि वारसा आहे. शिवसेना नेतृत्वाने दणका भाजपला चांगलाच लागलाय, ते हा दणका विसरणार नाहीत महापालिका निवडणुकीत परतफेड करतील. त्यावेळी शिवसेना नेतृत्व त्याचा कसा बंदोबस्त करते यावर शिवसेनेची भाजपवरची सरशी अवलंबून आहे. सत्ता ही त्यापुढची गोष्ट आहे.

-हरीश केंची.

नथुरामाचे नाटक व्हायलाच हवे!

*नथुरामचे नाटक व्हायला हवे!*

सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे राजकारणाला उधाण आलं आहे. इतके दिवस नथुरामाचे प्रयोग सुरु असताना, त्याला दररोज फाशी दिली जात असताना फारशी कुणी दखल घेतली नाही. पण अचानकपणे कोल्हापुरापासून नागपुरापर्यंत सर्वत्र या नाटकाला विरोध होतो आहे. नथुरामाचे प्रयोग होऊ नयेत म्हणून आंदोलन होताहेत. परंतु नथुरामाचे प्रयोग होणं आणि ते अधिकाधिक लोकांनी पाहणं समाजहिताचेच आहे. सडक्या विचाराला धर्मकृत्याचा, देशहिताचा टिळा लावत बुद्धिवान माणूस नि:शस्त्र माणसाचा खून करण्यापर्यंतचे पशुत्व कसे अंगिकारतो याची साक्ष देणारं हे नाटक आहे. मुस्लिम अनुनयाला कडवा विरोध करणारे भाजपेयींचे आजवरचे राजकारण पाहता नाटक बचाव ची जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी होती, अशी नथुरामवाद्यांची इच्छा होती. पण नथुरामला त्यांनी झटकले. ते शिवसेनेने उचलले.

निश्चय आणि निर्भयता म्हणजे गांधीजी! त्यांना महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याच बीज सापडलं. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे म्हणून गांधीजींनी गुजरातेतला साबरमतीचा आपला आश्रम बंद करून तो महाराष्ट्रात वर्ध्याला आणला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं. लोकमान्य टिळकांचा जयघोष करीत ते स्वातंत्र्याचा मंत्र देशाच्या खेड्यापाड्यात गेले , अशा नि:शस्त्र गांधींचा खून मराठी माणसाने करावा यासारखं अमानुष कृत्य अन्य नाही. हे भाकड विचाराने केलेलं भेकड कृत्य संतांची, वीरांची, बुद्धिमंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावरचा कलंक आहे या क्रूरकारम्याला आणि त्याच्या कृत्याची तरफदारी करणाऱ्यांना महाराष्ट्राने कधीच आपलं मानलं नाही.

न्यायदेवतेच्या दरबारात नथुरामला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. तिथे नथुराम खुनी ठरलेला असतानाही त्याने 'गांधी वध' केला असा शंख करणारे नथुरामाचं भूत पुन्हापुन्हा उठवून हिंदुत्ववादी म्हणवणारयांच्या निष्ठेचा कस जोखत असतात. मुसलमानांना खुश करण्यासाठी गांधीजींनी हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे तुकडे केले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारताला भाग पाडले. गांधींनी आपला जीव पणाला लावून स्वतःला देशापेक्षा मोठे केले. त्यामुळे फाळणी झाली. हिंदूंचे बळी गेले. हिंदूंवर अत्याचार झाले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले. या साऱ्याला गांघीच जबाबदार होते, म्हणून नथुरामाने त्यांना खतम केले, असा नथुरामवाद्यांचा युक्तिवाद असतो. नथुरामाचं हेच नाटक आहे. त्यात पाहणाऱ्याचा भावनिक उद्रेक होण्यासाठी गांधी द्वेषाचा मसाला मिसळला आहे. त्यातल्या काही भाकड संवादावर नथुरामभक्तांच्या टाळ्या पडतात. अर्थात या टाळीबाजांनी आजवर यापेक्षा कोणता पुरुषार्थ गाजवलाय?

महात्मा गांधींजींच्या राष्ट्रकर्तृत्वावर शिंतोडे उडविणारं नाटक आताच रंगभूमीवर आलेलं नाही, शिवसेना- भाजपची राजवट होती तेव्हाही १९९८ दरम्यान हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. काँग्रेसने गांधींना खुंटीला लावून गांधीवादाला आपल्यापासून दूर लोटलं असलं तरी लोक गांधींची काँग्रेस म्हणत काँग्रेसला मतदान करतात, जीवदान देतात. नेत्यांना बदनाम करून काँग्रेस संपणार नाही, हे स्पष्ट झाल्याने गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची मापं काढण्याचा हा प्रकार सुरु असतो. ही विचारवादाची लढाई आहे. त्यात नेहमी गांधीवादाचाच विजय होतो, ही गांधीजींच्या देशत्यागाची किंमत आहे. ती काँग्रेसवाले वसूल करीत होते आता भाजपेयी करताहेत, तो त्यांचा नीचपणा आहे. गांधी बनिया होते , त्यांच्यामागे बहुजन समाज प्रचंड होता. त्यामुळे त्याचे राजकारण -समाजकारण प्रभावी होत होते. त्याचा सल बुद्धिबळावर राजसत्ता मिळवू पाहणाऱ्याच्या मनात होताच. कारण आपल्याच नादानीमुळे पेशवाई बुडाल्याने सत्तेचे चाटण मिळविण्याची त्यांना संधी हवी होती, परंतु गांधीजींनी राजकारणाचं सार्वत्रिकारण केल्याने सत्तेचे लगाम आपल्याहाती येणार नाहीत, याची खात्री पटल्याने त्यांनी गांधीद्वेषाचे विष पसरवायला सुरुवात केली.

फाळणीच्या वेदनेने आपण गांधींना मारले हे नथुरामाचे म्हणणे खोटारडेपणाचे आहे. गांधींना ३० जानेवारी १९४८ ला नथुरामने संपविले. पण त्यापूर्वी १४ वर्षे त्यांना मारण्याची संधी नथुरामीवृत्ती शोधात होती. जून १९३४ मध्ये गांधींवर पुण्यात बॉम्बहल्ला झाला होता. जुलै १९४४ मध्ये गांधींच्या अंगावर सुरा घेऊन जाणाऱ्या नथुराम गोडसेला पाचगणीला पकडले होते. ऑगस्ट १९४४ मध्येही असाच प्रसंग सेवाग्राम आश्रमात घडला. त्यानंतर २९ जून १९४६ रोजी गांधींच्या मुंबई-पुणे प्रवासात नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी मोठमोठया दरडी टाकल्या होत्या. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. गांधी बचावले, ह्या साऱ्या घातपातात नथुराम संशयित आरोपी असल्याचं सिद्ध झालं आहे. या काळात हिंदुस्तानच्या फाळणीची चर्चा सुरु नव्हती. त्यामुळे गांधींना फाळणीसाठी दोषी ठरवून त्यांचा खून करणाऱ्याच्या  फाशीला हौतात्म्याचा टिळा लावण्यासाठी आटापिटा करणे ही देखील नथुरामी विकृतीच आहे. नथुराम जिवंत असताना कुणी ऐकलं नाही, त्याच्या मागं कुणी जमलं नाही. अशांच्या खुनाशीपणाची पुस्तकं वाचून, नाटकं पाहून कोण नथुराम बनणार? गांधीवादाचा स्वीकार केल्याशिवाय कुठल्याही राजकीय विचाराला सत्तास्थान लाभणार नाही , सत्य आणि अहिंसा ही गांधीवादाची मूलतत्त्व आहेत. त्याचा धिक्कार करून कुणी राजकारण , समाजकारण, सत्ताकारण, करू शकत नाहीत. हाच गांधींचा विजय आहे. गांधींचा हा मोठेपणा पचत नाही, असे वांतीकारक काय क्रान्ती करणार? नथुरामही त्यातलाच! तो नीट कळण्यासाठी 'नथुराम'चं नाटक व्हायला हवं. त्यामुळे देशहिताच्या बुरखा घालून सत्य, अहिंसेचा खून करण्याची संधी शोधणारे आजचे छुपे नथुराम तरी ओळखता येतील.

नथुरामाच्या खुनशीपणामुळं नि:शस्त्र महात्म्याचा खून झाला तसा हजारो निरपराधांच्या संसाराचा नाश झाला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची होरपळ झाली; वर महात्मा गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राष्ट्राने थोपलं. एका गोळीत इतके ऐतिहासिक क्रौर्य करणाऱ्या नथुरामला नाटकातही फासावर लटकलेलं दाखवलं आहे. म्हणजे या नाटकाचे जेवढे प्रयोग होतील तेवढ्यांदा 'नथुराम' फासावर लटकलेला पाहायला मिळेल. तेव्हा याचे प्रयोग व्हायला हवेत.

-हरीश केंची

भाजपची भगवी काँग्रेस झालीय

*भाजपची भगवी काँग्रेस झालीय!*

इन्ट्रो......

"महाराष्ट्राच्या राजकारणात आता रंग भरू लागलाय. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तासुंदरीसाठी सुंदोपसुंदी सुरु झालीय. कधी स्वतंत्र्यरित्या तर कधी सत्ताकांक्षी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या साथीनं आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. यात कोण अधिक भ्रष्टाचारी, कोण अधिक दुराचारी यावर एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. या दोघांच्या तुलनेत इतर पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. पण मतदार शांतपणे सारे काही न्याहाळतो आहे."

काँग्रेस हा लुटारूंचा पक्ष तर आमचा समाज सुधारकांचा. असा टेंभा भाजप नेहमीच मिरवत आलीय. त्याच स्टाईलीत काँग्रेसमध्ये बेशिस्त, बेजबाबदार, बदमाश भरलेत. आमच्या पक्षात मात्र निष्ठावान, शिस्तप्रिय, सेवाभावी कार्यकर्ते असा दावाही केला जातोय. काँग्रेसमधला गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ हा नेहमी रंगणारा खेळ! हे चालायचंच असं लोकांनी मानलं होतं. एकंदरीने काँग्रेसपक्ष, त्यातले वाद,त्यातले गोंधळ, त्यातली गटबाजी, त्यातली घराणेशाही सगळं काही आपल्याला सुपरिचित आहे. पण शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी कार्यकर्त्यांचं संघटन असं ज्यांच्याबद्धल गोड गोड स्वप्न रंगवलं जात होतं, त्यांनी आता काँग्रेसला प्रभावी पर्याय देण्याचा चंग बांधला आहे.
राजकीय पक्षाला एक चेहरा असतो, भाजपचा चेहरा हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष! भाजपचा आमदार नगरसेवक कधी फुटणार नाही, कार्यकर्ता पदासाठी कधी भांडणार नाही, असा एक नावलौकिक होता. व्यंग्यचित्रकारांनी शेंडीवाला भटजी वा  ढेरपोट्या शेठजी असं भाजपचं प्रतीक ठरवलं होतं. त्यातही पवित्रता आणि सुसंस्कृतता व्यक्त व्हायची. सर्वच क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच. एकेकाळी काँग्रेसवाल्यांनी हाताळलेले 'व्यवहारवादी' यशवंत राजकारण आता भाजप मोठ्या ताकदीने हाताळत आहे.

त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे सध्या इन्कमिंग जोरात सुरु आहे. कसलाही विचार न करता, विधिनिषेध न बाळगता आपलं साधनसुचितेचं धोरण बाजूला सारून इतर पक्षातल्या सत्ताकांक्षी मंडळींना त्यात गुन्हेगारही आले, त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपेयी मुख्यमंत्री सरसावले आहेत. हे असं का घडतंय, कोण घडवतयं हे आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की, भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी 'पक्षविस्तार' या गोंडस नावाखाली दुकान मांडलंय. त्यांनी ती 'भगव्या काँग्रेस' च्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे पक्के राजकारणी, त्यांनी त्यांचं गल्ल्यावरचं डोकं इथं वापरलंय. अगदी व्यापारी हिशेबाने पक्षाची वाटचाल सुरु ठेवलीय. आजवर राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर भाजप हा इतर सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत तसा अस्पृश्य गणला जात होता. ते संपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी नगरपालिका, महापालिका स्तरावर जी 'शेठजी भटजी' यांचा पक्ष अशी जी प्रतिमा निर्माण केली गेलीय ती संपविण्याचा चंग बांधलाय. सर्वच पक्षातील सर्व तऱ्हेची मंडळी गोळा केली जाताहेत. त्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत 'नगराध्यक्ष' थेट लोकांतून निवडून आणणे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या माध्यमातून निवडणूक. हा सारा प्रकार म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपची स्थिर आणि कायमची अशी मतपेढी निर्माण करणे. याशिवाय नव्याने आलेली आणि सत्तेमुळे भारावलेली अशी वय वर्ष ४० ते ५० या मध्यमवयीन मतदारांच्या दुसऱ्या पिढीसाठी सुरक्षित असे वातावरण तयार करणे. त्याचबरोबर तिसऱ्या पिढीतले म्हणजे ३० ते ४५  या वयोगटातील तरुणांसाठी सत्तेबाबत पोषक अशी स्पर्धा निर्माण करणे. याचबरोबर मोदी आणि शहा यांना पक्ष स्वयंपूर्ण करायचा आहे. पूर्वीचा जनसंघ वा आत्ताचा भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची राजकीय शाखा वा अंग म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे पक्षाला मतदारांच्या थेट संपर्कासाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पक्षाचं हे परावलंबित्व झुगारुन यापुढे स्वतः ची अशी स्वतंत्र संपर्क प्रणाली उभी करणे, ज्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क राहील आणि पक्ष संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहणार नाही अशी दक्षता घेतली जाते आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात सत्तेचा वापर, साम,दाम,दंड,भेद अशी सर्व आयुधे वापरून ग्रामीण नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी लक्ष घातलंय, सर्वप्रथम जसे जमेल तसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधली सत्तास्थान बळकावणे. आजवर भाजपपासून दूर राहिलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये भाजपच्या नेतृत्वाबाबत आकर्षण निर्माण व्हावं म्हणून पक्षाला आणि पक्षाची उमेदवारी देताना संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना दूर ठेवून, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून वाटचाल करणे. जिथे अरे का का रे करावे लागणार आहे तिथे 'साधनसुचिता' गुंडाळून ठेवून तिथे तशाच प्रकारच्या गुंडाला उमेदवारी देणे, यापूर्वी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रादेशिक पक्षाशी युती, आघाडी केली आहे, तिथे त्या पक्षाची ताकद ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवणे. याचा अर्थ ज्या प्रादेशिक पक्षाची युती करायची त्यांचे गुण अवगुण आपल्यात भिनवायचे प्रसंगी त्या पक्षाप्रमाणेच रूप धारण करून मतदारांसमोर जायचे. आणि पक्षविस्तार करताना सत्तेसाठी म्हणून काँग्रेसच्या वाट्यावर वाटचाल करणे. ही धोरणं ठरलेली दिसतात.

पैशाचा भाजपला आता तोटा नाही, त्यांचे कट्टर घडवलेले कार्यकर्ते अजूनही प्रत्यक्ष पटावर येण्याचा हट्ट न धरता मागे राहूनच कार्य करीत आहेत. खरं तर सत्तानाश घडवण्याचा कटू अनुभव 'जनता प्रयोगा'त एकदा झालाय भाजप तो पुन्हा करणार नाही. स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी प्रसंगी 'भगवी काँग्रेस' होण्यासाठी त्यांची चाललेली ही वाटचाल आपण पाहतोच आहोत.

- हरीश केंची

महात्मा फुलेंचे विचार

सत्य तोच धर्म करावा कायम।
मानावा आराम। सर्वाठायी।
मानवांचा धर्म, सत्य हीच नीती।
बाकीची कुनीती। जोती म्हणे।।
यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचे हे विचारवैभव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. महात्मा फुलेंची जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. याची जाणीव खरं तर व्हायला हवी होती, महात्मा फुले यांच्या निवासस्थानी समताभूमीवर आणि आंबेडकरांच्या स्मारक परिसरात जमलेली गर्दी ही दांभिकपणा स्पष्ट करणारीच जाणवत होती. वैयक्तिक स्वार्थासाठी महात्माफुलेंचा वापर करण्या सरसावल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवला आहे. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखे आहे ते मिरवलं जातं आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच आहे. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसऱ्या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला जोतिबा फुले कळले नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळ कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून फुले आणि आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. त्यांना राजकारणाची, आपल्या जातीची, स्वार्थाची चिंता आहे. जोतिबांच्या आणि भीमरावांच्या विचारांचे त्यांना सोयर सुतक नाही. वास्तविक फुले-आंबेडकरांचा विचार केवळ तळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातील अनेक सामाजिक विकासाची बीजेही फुले-आंबेडकरांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेले आहेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेते, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु अतिरेकी शिवराळपणामुळे ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडे सरकली आणि ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली.

या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळे जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवली? ते सांगायची आवश्यकता नाही. आज महाराष्ट्रात जे घडते आहे ते पाहिले तरी याची जाणीव साऱ्यांनाच होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिबा फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचे ऋण जाहीरपणे मानले होते. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणार्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतविले. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्याच विचार आपले सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहे. हा फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवत आहे. दलित वस्त्या बळकट झाल्यात. मोठ्या प्रमाणात स्त्रिया सुशिक्षित होऊ लागल्या, कमावत्या झाल्या तरी, बहुतांश संसारात त्यांचं स्थान दुय्यम आहे. स्त्री अजूनही उपभोगाची वस्तू आहे, अशीच भावना समाजात आहे. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्या आहेत. लांबल्या आहेत. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसत आहे. तरीदेखील फुले-आंबेडकर यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदलली आहे. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागले आहेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केला आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी वाईट म्हणून ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या गाडण्याऐवजी त्या डोक्यावर घेऊन मिरवण्यातच ते धन्यता मानत आहेत. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा...!

-हरीश केंची

राजकारण गरजेचे आणि बेरजेचे

*राजकारण गरजेचे अन बेरजेचे...!*

भारतातल्या कोट्यवधी माणसांचे दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झाले आहे. कारण असे एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसे असते, वा कसे असावे?' ह्या परिसंवादाशी कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसे चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतः ला क्रियाशील राजकारण फारसे जमले नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचे 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात!  राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असे आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणे आणि त्यांचे ऐकणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणे हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!

राजकारण गरजेचे असते हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असते, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणे! असे राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहते. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनेही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरते. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा जेला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे. 'जो बहुतांचे सोसेना। त्यास बहुत लोक मिळेना।।' एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना। महत्व आपुले।।' अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच ' हिरवटाशी दूरी धरावे। युद्ध कार्यास ढकलावे। नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सारांश, जीवणाप्रमाणेच राजकारणाचे धेय्य निश्चित ठरविता येईल; पण त्या धेय्याच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचे, गुणाकाराचे पण वेळप्रसंगी वजाबाकीचे आणि भागाकाराचे देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेराजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवात नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत.इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राचाही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार?

शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतः शी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गतारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं.
- हरीश केंची.

सुष्टांचा राजकारणात सहभाग हवा

*सुष्टांचा राजकारणात सहभाग हवा!*

इन्ट्रो.......
"शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गटारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं."
*राजकारणावर चर्चाच!*
भारतातल्या कोट्यवधी माणसांचे दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झाले आहे. कारण असे एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसे असते, वा कसे असावे?' ह्या परिसंवादाशी फारसे कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा पण करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसे चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतःला क्रियाशील राजकारण फारसे जमले नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचे 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास कामाच्या निमित्ताने जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात!  राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असे आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणे आणि त्यांचे ऐकणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणे हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग!

*गरजेचे राजकारण*
राजकारण गरजेचे असते हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असते, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणे! असे राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहते. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनेही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरते. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा जेला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे.
'जो बहुतांचे सोसेना।
त्यास बहुत लोक मिळेना।।'
एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना।
महत्व आपुले।।'
अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच
'हिरवटाशी दूरी धरावे।
युद्ध कार्यास ढकलावे।
नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।'
असा इशाराही त्यांनी दिला आहे.

*राजकारणाचे चक्रव्यूह*
सारांश, जीवनाप्रमाणेच राजकारणाचे ध्येय निश्चित ठरविता येईल; पण त्या ध्येयाच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचे, गुणाकाराचे पण वेळप्रसंगी वजाबाकीचे आणि भागाकाराचे देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेरजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवत नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत. इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राच्याही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार?

*सज्जनांचा वावर हवा*
शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर राजकारणात वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतःशी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गटारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला, तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राष्ट्रीय राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं.
*विधिनिषेध राहिलेला नाही*
राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. सध्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा चर्चा झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना तेव्हा पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जाते आहे, कुणालाही स्वीकारले जाते, याचा कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.

*राजकीय चारित्र्याची चर्चा*
देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य धोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं साऱ्या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावे लागतात आणि सहसा ते सर्व असतातही.

*शील आणि चारित्र्य*
दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे,  हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. अढीतल्या आंब्याप्रमाणे हळूहळू समाज नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, " वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे.त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे." आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागली आहे. याउलट याचं जसं पचलं तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको? अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होत आहे आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनात उलटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, टी आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत.आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य धोरणे, वैचारिक बैठक, तत्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम' यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्चर्य वाटायला नको.
- हरीश केंची

मुस्लिमांचं नेमकं चुकत कुठं?

*मुस्लिमांचं नेमकं कुठं चुकतंय?*

भारतात मतांसाठी मुस्लिमांचं लांगुलचालन करणारे सर्व पक्षीय राजकारणी मुस्लिमांचं कधीच भलं करु शकत नाहीत. शिक्षणातून मुस्लिमांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होऊ शकेल. परंतु याबाबतही मुस्लिमांची स्थिती शोचनीय आहे. या दुरावस्थेतून मुस्लिमांची सुटका कशी होणार? कोण करणार? कुणाचीही वाट पाहण्यापेक्षा राजकारण्यांच्या जहाल विचारांना जवळ करण्याऐवजी शिक्षणाला जवळ केल्यास उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. मुस्लिम तरुण-तरुणी शिक्षणाची कास धरतील काय?

*निवडणुकांत मुस्लिमांना महत्व*

राज्यात नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका झाल्या. पाठोपाठ उत्तरप्रदेशसह पांच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्यात. या निवडणुकात मुस्लिमांच्या मतांना खूप महत्व प्राप्त झालं होतं. उत्तरप्रदेशात मुस्लिमांची लोकसंख्या वीस टक्के आहे. मुस्लिमांची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली असली, तरी उत्तरप्रदेशात मुस्लिमांची स्थिती फारशी चांगली नाही, बरेचसे मुस्लिम मागास आणि गरीब आहेत. उत्तरप्रदेशच नव्हे तर भारतातल्या सगळ्याच राज्यातील मुस्लिमांची हीच स्थिती आहे.

*नॉलेजपासून मुस्लिम दूर*

मुस्लिमांची ही दुर्दशा होण्याचं सर्वात प्रमुख कारण शिक्षणाचा अभाव हे आहे. अनेक मुस्लिम कुटुंबिय आपल्या मुलांना शाळेत पाठविण्याऐवजी मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण घ्यायला पाठवतात. तिथे कट्टरपंथीय मौलवी त्यांना इस्लामच्या नावाने भडकवतात. 'नॉलेज इज द पॉवर' हे नव्या युगाचं सूत्र आहे. परंतु अशा नॉलेजपासूनच मुस्लिम दूर राहतात. त्या ऐवजी ते राजकारण्यांच्या नादी लागतात. परंतु कोणताच राजकारणी आपला उद्धार करु शकत नाहीत हे त्यांना उमगत नाही. शिक्षणाचा फायदा कसा होईल, याचं उत्तम उदाहरण म्हणजे अझीम प्रेमजी! अझीम यांच्या वडिलांचा तांदूळ आणि तेल-तुपाचा व्यवसाय होता. त्यांनी दाढी वाढविलेली नसली तरी ते कट्टर मुस्लिम होते, पण त्यांनी अझीम यांना खूप शिकवलं. आज अझीम यांचं नांव फॉर्ब्जच्या बिलियॉनरच्या यादीत पोहोचलं आहे. अझीम यांच्यामुळे त्यांच्या एक लाखाहून अधिक कर्मचाऱ्याचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फायदा होतोय. या कर्मचाऱ्यामध्ये केवळ मुस्लिमच आहेत असं नाही. कारण आऊटसोर्सिंगसारख्या कामात धर्म किंवा जात नव्हे, तर तुमचं शिक्षण हीच तुमची पात्रता असते.

*ज्ञान हीच सत्ता*

आज भारतातील नव्हे, तर पाकिस्तानामधील मुस्लिमानीही आत्मपरीक्षण करायला हवं. 'ज्ञान हीच सत्ता' असा विचार करून भारत पाकिस्तानातील मुस्लिम एकत्र आले, तर त्यांची अफाट प्रगती होईल. भारत-पाकिस्तानाचा जगभर डंका वाजेल. पण परिस्थिती खूप वेगळी आहे. खरं शिक्षण घेण्याऐवजी मुस्लिम धार्मिक शिक्षणाच्या मागे जाताहेत. शाळा, कॉलेजमध्ये शिकत असलेलेही मदरशांकडे वळत आहेत. दाढी ही त्यांना आपली आयडेंटिटी वाटते. आता दाढी ठेवल्याने कुणाची कार्यक्षमता वाढलीय का? धर्म मनात असला पाहिजे, त्याचं प्रदर्शन करण्याची गरज नाही.

*स्त्री शिक्षण खूपच दूर राहिले*

मुस्लिमांचं दुखणं मांडणारी काही पुस्तकं वाचण्यात आली. त्यापैकी पहिलं पुस्तक आहे, ' फ्रंटलाईन पाकिस्तान-द स्ट्रगल विथ मिलिटन्ट इस्लाम'.झाहिर हुसेन त्याचे लेखक आहेत. 'डेस्पिरिटली सिंकिंग पेराडाईज' या दुसऱ्या पुस्तकाचे झियाउद्दीन सरदार हे लेखक आहेत. तर तिसरं पुस्तक आहे, डॉ. रफिक झकेरीया यांचे 'इंडियन मुस्लिम-व्हेअर हॅव दे गॉन रोंग?'. डॉ.झकेरीया यांनी आपल्या पुस्तकात मुस्लिमांमध्ये असलेल्या शिक्षणाच्या दुरावस्थेविषयी आकडेवारी आणि विश्लेषण दिलंय. ते भारत आणि पाकिस्तानातील प्रत्येक मुस्लिमांनी वाचण्यासारखे आहे. 'पाकिस्तान प्रेस इंटरनेशनल'चे लेखक आमिर लतीफ म्हणतात , "पाकिस्तानात शिक्षणाची अवस्था अलार्मिग आहे. धोक्याचा इशारा द्यावा, अशी आहे. सरकारी आकडेवारीनुसार पाकिस्तानात शिक्षणाचं प्रमाण केवळ ४६ टक्के आहे. तर मुलींच्यामध्ये साक्षरतेचं प्रमाण केवळ २६ टक्के आहे. प्रौढ स्त्रिया आणि लहान मुलींचा यात समावेश केला, तर हेच प्रमाण १२ टक्के आहे. युरोपात शंभर टक्के साक्षरता आहे. अमेरिकेत ९९ टक्के लोक साक्षर आहेत. तर स्त्रीसाक्षरतेचं प्रमाण शंभर टक्के आहे. पाकिस्तानात १ लाख ६३ हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यातील केवळ ४० हजार शाळांमध्येच मुलींना शिक्षण दिलं जातं. नॉर्थवेस्ट फ्रॅंटीयर मध्ये मुलींच्या शिक्षणावर बंदी आहे. पाकिस्तानातील ९५ टक्के लोक इस्लामचं पालन करतात. इस्लाममध्ये स्त्री आणि पुरुषासाठी समान शिक्षणतत्व आहे.पण तरीही मौलवींचा मुलींना शिकण्यास विरोध असतो. पाकिस्तानात एकास बाजूला शाळांची संख्या वेगाने कमी होत असतानाच, दुसऱ्या बाजूला मदरशांची संख्या वाढत चालली आहे. झाहिर हुसेन यांनी आपल्या पुस्तकात लिहिलंय, '१३ हजार मदरशांपैकी १५ टक्के मदरशांमध्ये फंडामेंटालिझम आणि टेररिझम याचं शिक्षण दिलं जातं. मदरशात इंग्रजी शिकविण्यात येत नाही. तिथे केवळ अरबी भाषेत शिक्षण दिलं जातं. त्यामुळे मुलांना आधुनिक ज्ञान मिळत नाही. आपल्या मुलांना शाळेत शिकण्यासाठी न पाठवू शकणारे गरीब आई वडील या मदरशांच्या चक्रात सांपडतात.

*हलाखीचे करुण चित्र*

थोड्याफार फरकाने हीच स्थिती भारतातही आहे. रफिक झकेरीया यांच्या पुस्तकात भारतीय मुस्लिमांच्या हलाखीचे करुण चित्र आहे. आउटसोर्सिंगच्या क्षेत्रात भारताने मुसंडी मारलीय. पण आऊटसोर्सिंगमध्ये १ टक्काही मुस्लिम नाहीत. भारतात जवळपास २० कोटी मुस्लिम आहेत. बांगलादेशातून आलेल्या निर्वासितांची संख्या मोजली, तर हा आकडा आणखी फुगेल. पण त्यातील एक टक्का मुस्लिमांचाही खऱ्या अर्थाने विकास झालेला नाही. अझीम प्रेमजी (विप्रो), हबीब खोराकीवाला (वोकहार्ड), युनूस गफूर(हिंदुस्तान इंक) अशी काही मोजकी नावं उद्योगक्षेत्रात आहेत. पण उर्वरित मुस्लिमांची अवस्था भयानक आहे. अर्थात, पाकिस्तानी मुस्लिमांच्या तुलनेत काही बाबतीत भारतीय मुस्लिमांची अवस्था बरी आहे. समजूतदार मुस्लिम आपल्या मुलांना शिकवतात. मुलीही भारतात उच्च शिक्षण घेत आहेत. सर्व क्षेत्रात त्या उतरत आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे , त्यामुळे हरखून जाण्याची गरज नाही.

*उच्च शिक्षणाचा अभाव*

भारतात पदवी संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यामध्ये फक्त ६.२१ टक्के मुस्लिम आहेत. एमएस्सी आणि एमकॉम ची डिग्री मिळविणाऱ्या मुस्लिम विद्यार्थ्याचं प्रमाण ९.११ टक्के आहे. प्रोफेशनल डिग्री कोर्समध्ये केवळ ३.४१ टक्के मुस्लिम आहेत. तर एलएलबी आणि इंजिनिअरिंग मध्ये ५.३६ टक्के मुस्लिम आहेत. जे मुस्लिम शिकले त्यांची प्रगती झालीय. नोकरी, उद्योग, राजकारण या सगळ्याच क्षेत्रात मुस्लिम निव्वळ शिक्षणाच्या अभावामुळे पिछाडीवर आहेत. भारतात मुस्लिमांची संख्या वीस कोटी असल्याचं सांगितलं जातं असलं, तरी लोकसभेत केवळ सतरा मुस्लिम खासदार आहेत. लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या ८३ इतकी हवी होती. राज्यसभेतील २५० सदस्यांपैकी ११ मुस्लिम आहेत. महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाविषयी लिहिण्यासारखी स्थिती नाही.

*सनदी अधिकारी जवळपास नाहीतच*

आयएएस सारख्या उच्च दर्जाच्या नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ ३.२७ टक्के आहे. आयपीएसमध्ये २.७ टक्के मुस्लिम आहेत. आयएफएसमध्ये मुस्लिमांचा वाटा ३.३७ टक्के आहे. भारत सरकारची कार्यालयं आणि चौदा राज्यांच्या सरकारी नोकरीत एकूण ७५ हजार ९५३ कर्मचारी आहेत. यात मुस्लिमांची संख्या ३ हजार ३४६ आहे. ही आकडेवारी सुशिक्षित मुस्लिमांचं डोकं फिरावणारी आहे. पण मुस्लिमांच्या या स्थितीला जबाबदार कोण आहेत? सौदी अरेबियासारखे देश भारतातील मुस्लिमांना भरपूर मदत करतात. पण आपलं भलं आपणच करु शकतो, हे जोपर्यंत मुस्लिमांच्या लक्षात येत नाही तोपर्यंत त्यांची प्रगती होणं अवघड आहे.

*खुदीको कर बुलंद इतना*
*की खुदा अपने बंदेसे पुछे,*
*बता तेरी रझा क्या है।*

हे मुस्लिमांनी लक्षात ठेवायला हवं....!

*जातीवर आधारित आरक्षण हवंय*

भारतातील अल्पसंख्याकांची, विशेष करून मुसलमानांची सामाजिक व आर्थिक स्थिती तपासण्यासाठी केंद्र सरकारने न्यायमूर्ती सच्चर यांच्या समितीची नियुक्ती केली होती या समितीच्या अहवालातून भारतातील मुसलमानांची स्थिती दलितांपेक्षा वेगळी नसल्याचं जाहीर झाल्याने मुस्लिमांना आरक्षण देण्याची आणि शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी विशेष सवलत-सुविधांची तरतूद करण्याची चर्चा सुरू झाली आणि मुस्लिमांना आरक्षण व शैक्षणिक सुविधा-सवलत हा वादाचा मुद्दा बनला. भाजपने या तरतुदींना विरोध करताना तत्कालीन प्रधानमंत्र्यांवर मुस्लिम तुष्टीकरणाचा आरोप केला होता. सत्ता हाती आल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल झाला असला तरी 'मुस्लिम विरोध' हे भाजप परिवाराचं राजकीय हत्यार आहे. इतर मुद्दे थंड पडल्याने तो मुद्दा तापविला गेला, पण फारसे यश लाभले नाही. विरोधाने वास्तव बदलणार नाही. भारतातील मुस्लिम समाजाची दशा तपासण्यासाठी सरकारी व खाजगी संस्था -संघटनांनी त्यापूर्वी बऱ्याचदा प्रयत्न केलेत. नोकरी धंद्यातील मुस्लिमांच्या संख्येच्या प्रमाणाची आकडेवारीही जमविण्यात आली ती इतर समाजाच्या तुलनेत खूपच कमी आहे.शिक्षण आणि उच्च शिक्षणाचा अभाव हे त्याचं मुख्य कारण आहे. सच्चर कमिटीच्या अहवालात यापेक्षस्स वेगळे मुद्दे पुढे आलेले नाहीत. पण या अहवालामुळे मुस्लिमांत मोठ्या प्रमाणात गरिबी असून सर्वात जास्त मागास मुस्लिम समाज आहे. यावर सरकारी शिक्कामोर्तब झालं आहे. सरकारी नोकरीप्रमाणेच पोलीस आणि सैन्यात मुस्लिमांची संख्या खूपच कमी आहे. जे आहेत, त्यातील बरेचसे कनिष्ठ पदावर काम करतात. रॉ आणि सीबीआय सारख्या महत्वाच्या यंत्रणात मुस्लिमांची संख्या शून्य आहे. ही अल्पताच मुस्लिमांना स्वतः ची वेगळी ओळख निर्माण करण्यास हातभार लावते का? ह्याचाही विचार व्हायला हवा. स्वतंत्र ओळख निर्माण करणारा समाज नेहमीच कट्टरतेकडे झुकतो. त्यात अशिक्षितपणाची आणि गरिबीची भर असेल, तर कट्टरतेकडून गुन्हेगारीकडे वळणे सहजपणे होते. त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत. मीडियातून जे गुन्हेगारी विषयक वृत्त प्रसिद्ध होतं, त्यात निम्म्याहून अधिक नावं मुस्लिमांची असतात. मुस्लिम समाज आज गरिबी आणि गुन्हेगारी, अशा दोन्ही दूषणाने त्रस्त आहे. नोकरीतील आरक्षण आणि नोकरी धंद्यातील सवलती या त्रस्ततेतून सुटण्याची धडपड करणाऱ्या मुस्लिमांसाठी सहाय्यकारी ठरतीलच. परंतु आरक्षण अथवा सोयी सवलती ही बाह्य मदत आहे. ती समाज विकासासाठी फारशी प्रभावी ठरत नाही. ती प्रभावी ठरविण्यासाठी मुस्लिम नेत्यांनाच समाज सुधारणेचं वारं समाजात खेळवावं लागेल.

*कट्टरतावादाशी झुंजावं लागेल*

मुल्ला मौलवींनी मुस्लिमांमध्ये वाढवलेली कट्टरता, धर्मांधता वितळावी लागेल. आज भारतातील मुस्लिमांच नेतृत्व शिक्षित आणि लोकशाहीवादी मुस्लिम नेत्यांनी आपल्या ताब्यात घ्यायला हवं. दलितांना डॉ.आंबेडकर यांच्यासारखा पुढारी मिळाला; तसेच पुढेही आंबेडकरांच्या विचाराने वाटचाल करणारे नेते मिळाले. म्हणूनच दलित आणि बौद्ध समाज आज विकासाच्या वाटेने चालताना दिसतोय. आपल्या सर्वांगीण विकासासाठी झगडताना दिसतोय. मुस्लिम समाजातही असं चित्र लोकशाहीवादी मुस्लिमांना तयार करावे लागेल. त्यासाठी मुल्ला मौलवींच्या कट्टरतावादाशी झुंजावं लागेल. भारतीय संविधानानुसार धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही. ज्या सवलती-सुविधा व दिलं जातं, ते जातिनिशी त्यांना दलित-आदिवासी म्हणून मागास गणलं ठेवलं गेलं, त्यांना सामाजिक न्यायहक्काच्या जाणिवेतून दिलं जातं. ह्याच जाणिवेनं ते बौद्ध व दलित ख्रिस्तीना दिलं जातं. मुस्लिमांनाही त्याच आधारावर दिलं पाहिजे. कारण जातीभेद मानत नसला, सर्वांकडे समान दृष्टीने पाहात असला, तरी भारतीय मुस्लिमांत पाचशे वर्षापूर्वी धर्मातर झालं, तरी जातीभेद कायम आहेत. शिंपीचा दर्जी झाल्याने आणि खाटिकाचा कसाई झाल्यानं जातीभेद संपले नाहीत. त्याचे परिणामही कायम आहेत. अशांनाच आरक्षणाची आणि शिक्षणातील सवलती, सुविधांची गरज आहे त्यांना तो लाभ मिळू नये. यासाठी मुस्लिमांत स्वतःला उच्च समजणारे परंपरावाद्यांना पुढे करून मुस्लिम म्हणून आरक्षण मिळावं असा आग्रह धरीत आहेत. हा आग्रह मोडून काढून जातिनिशी मागास ठेवलेल्या मुस्लिमांपर्यंत आरक्षणाची व सरकारी लाभाची तरतूद पोहोचविणे, हे सर्वपक्षीयांचे आणि लोकशाहीवाद्यांचे कर्तव्य आहे.
- हरीश केंची

पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत

*पुरुषही मुक्तीच्या प्रतीक्षेत*

इन्ट्रो......
"स्त्रीमुक्तीची चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातील पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत असं मानण्याइतपत त्याचं मानसिक अधःपतन झालं आहे."
[5/4, 1:10 PM] Harish Kenchi: स्थानिक स्वराज्य संस्थेत महिला मोठ्याप्रमाणात निवडून आल्या आहेत. विधिमंडळात आणि संसदेत महिलांना आरक्षण ठेवण्याबाबतचा विषय गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांसाठी राखीव जागा उपलब्ध करून दिल्याने राजकारणात महिलांचे प्रमाण वाढले आहे. हे आपण सगळेच जाणतो. त्यापूर्वी त्याचे प्रमाण अत्यंत अल्प असेच होते. स्त्रिया राजकारणात वा समाजकारणात दिसल्या म्हणजे त्या स्त्री मुक्ती चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत. असंच मानलं जात होतं. किंबहुना राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच काहीसा नकारात्मक होता. स्त्रीमुक्ती चळवळीतल्या महिला कार्यकर्त्यांबाबत आक्षेप घेतला जायचा. स्त्रीमुक्ती चळवळ ही संसार मोडण्यासाठी आहे, कुटुंबसंस्था उदध्वस्त करणारी आहे, या समजुती कशा पसरल्या कुणास ठाऊक? पण पसरल्या होत्या हे मात्र निश्चित! स्त्रीमुक्ती चळवळ ही महिलांमध्ये आत्मसन्मानाची आणि भ्रातृभावाची भावना जागृत करण्यासाठी, समाजात स्रीबद्धल सन्मानाची भावना जागृत व्हावी, यासाठी आहे.
आत्मसन्मानाची भावना पुरुषांमध्ये आहे आणि स्त्रीमध्ये तेवढी किंवा जेवढी हवी तेवढी नाही असं समजणं कितपत योग्य आहे? स्त्रीमुक्तीची चळवळ करणाऱ्या महिलांना या देशातले पुरुष खरोखरच मुक्त आहेत असं वाटतं? भारतीय पुरुष हा भारतीय स्त्रीपेक्षा अधिक गुलामी वृत्ती जोपासणारा आहे. त्याच्यामध्ये पुरुषत्वाची वानवाच आहे. भारतीय पुरुषाला गुलामी प्रिय आहे, नव्हे गुलामीमध्येच आपण सुरक्षित आहोत, असं मानण्याइतपत त्यांचं मानसिक अध:पतन झाले आहे.

मध्यन्तरी एका महिलेने झाशीच्या राणीच्या नवऱ्याबद्धल गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' मध्ये असलेल्या काही गोष्टी एका लेखात मांडल्या होत्या. झाशीच्या राणीचा नवरा गंगाधरपंत हा स्त्रीवेष करीत असे. या पुस्तकातच आपण असे का वागतो, याची गंगाधरपंतांना वाटणारी जीवघेणी खंतही व्यक्त केली आहे. आपण अशाप्रकारे स्त्रीवेष करून स्त्रीसारखे वावरता हे खरे का? असा प्रश्न या गंगाधरपंतांना करण्यात आला. ते फार महत्वाचे आहे. 'मी तर लहानसा मांडलिक आहे. परंतु इंग्रज बहाद्दरांपुढे पूर्व पश्चिम दक्षिणोत्तर देशात जितके राजे रजवाडे आहेत, तितक्यांनी तुम्हापुढे बांगड्याच भरल्या आहेत. कोणी शूर तुम्हापुढे नाही. बांगड्या भरल्याच नाहीत असा पुरुष पृथ्वीवर नाही. तुम्ही दिपांतरीचे असता आपल्या पराक्रमाने आमच्या द्वीपात येऊन आम्हास कैद केले.' म्हणजे इंग्रजांच्या पराक्रमापुढे सगळ्याच मोठमोठ्या पुरुषांनी बांगड्या भरून हार खाल्ली. तर माझ्यासारख्या छोट्याशा राजाने स्त्री वेष करून वावरायचे ठरविले , तर त्यात गैर काय? असा प्रश्न गंगाधरपंतांनी उपस्थित केला. आत्मसन्मान विसरून लाचारीचे, अवहेलनेचे जीवन जगणारे, अन्याय सहन करीत जगणारे हजारो पुरुषसिंह आपल्या अवतीभोवती असताना इथे फक्त स्त्रीमुक्तीचाच विचार व्हावा हे कितपत योग्य आहे?

विभावरी शिरूरकर यांच्या साहित्यावर पुण्या-मुंबईत साठ सत्तर वर्षांपूर्वी मोठ्या जोरदार चर्चा, वादविवाद होत, असं माझ्या वाचनात आलं आहे. त्या काळात एका स्त्रीने आपल्या सर्वगुणसंपन्न नवऱ्याचं नाक कापण्यासाठी काय केले होते, हे ऐकलं, तर आजच्या कैक पुरोगामी पुंगवांनाही फेफरे येईल. ही गोष्ट कुण्या ऐऱ्या गैऱ्याने सांगितलेली नाही. 'निस्पृह' या टोपण नावाने तेव्हा लिखाण करणाऱ्या दत्तो अप्पाजी उर्फ दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी ही पुणे संस्कृती सादर केली होती.  दाजीसाहेबांनी लिहले होते, 'आपला नवरा व्यभिचारी आहे, बाहेरच्या बायांस आपल्या घरी आणून आपल्या देखत तो त्यांच्याशी हैदोसधुल्ला घालीत असतो, या रागावर पुण्याच्या एका सुखवस्तू, श्रीमंत गृहस्थाच्या पत्नीने घरासमोरच त्यांच्या नाकावर टिच्चून वेश्या व्यवसायाचे दुकान उघडले होते!'  स्त्री मुक्तीची ही एवढी जबरदस्त धडक सत्तर वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका स्त्रीने दिली होती हे कुणाला खरे तरी वाटेल का? उनाडपणे वागणार्या पुरुषांना ताळ्यावर आणण्यासाठी काय करावे, हा प्रश्न स्त्रियांना नेहमीच सतावत आला आहे.

विभावरी शिरूरकरांनी आपल्या साहित्यातून हा प्रश्न उभा केला आणि त्या निमित्ताने महाराष्ट्रात सुशिक्षित पांढरपेशा वर्गात वादळच निर्माण केले होते. पतीने टाकून दिलेल्या स्त्रीने काय करावं , याबद्धल त्या काळातल्या विद्वानांनी जे काही विचार व्यक्त केले आहेत,  ते आज वाचताना मोठी मौज वाटते. आता घटस्फोटाचा कायदा झालाय. स्त्रीला नवऱ्याच्या जाचाला कंटाळून स्वतःला मुक्त करून घेण्याची इच्छा असेल, तर घटस्फोट घेऊ शकते अथवा घटस्फोट घेण्याचे नाकारून नवऱ्याला धडाही शिकवू शकते. पण सत्तर वर्षांपूर्वी हे शक्य कोटीतले नव्हते. पुरुष त्याला हवं तसं वागत होता. पण स्त्रीला मात्र असे वागणे शक्य होत नव्हते.
सुप्रसिद्ध समाजसुधारक विद्वान श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी या परिस्थितीवर लिहिताना उनाड स्त्रियांशी संबंध तोडून टाकण्याचे तोडगे पुरुषांनी काढलेले आहेत. त्याच पद्धतीचा अवलंब स्त्रियांनी करावा असे स्पष्टपणे सुचविले होते. केतकरांनी ह्या तोडग्याची त्यांच्या कानावर आलेली कथा आपल्या लेखात दिलीय, ती अशी- ' वऱ्हाड मध्ये एके ठिकाणी जेव्हा एका ब्राह्मणाची  बायको मुसलमानाबरोबर पळून गेली, तेव्हा तिचा कायमचा संबंध तोडून टाकण्यासाठी पालाश विधी केल्याचं मला ठाऊक आहे. सुमारे १९०२-०३ साली मुक्काम येथे एका भिक्षुकाच्या घरी या प्रकारचा विधी झालेला होता. तो मला पाहायला मिळाला नाही; पण पालाश विधीचे वर्णन ब्रह्मकर्माच्या पोथ्यातून आढळते. यावरून पळसाचा एक कृत्रिम पुरुष करून त्याचे दहन करण्याचा हा विधी आहे असे दिसते. या 'पालाश प्रतिकृती दाहविधी' मध्ये कृत्रिम पुरुषांच्या ठायी मंत्रयुक्त पद्धतीनं अस्थीमांसयुक्त शरीराची भावना कशी स्थापित करावी हे दिले आहे. 'यस्य अस्थिनी न लभ्यते तस्य पर्णशरदाह:' असे विधीवाक्य सांगितले आहे. मृत मनुष्य नसता त्यास मृत कल्पून त्याचा अंत्यविधी करणे ही गोष्ट समाजात पूर्वीपासून चालू होती असे दिसते. घटस्फोटाचा विधी मी पाहिला नाही पण काशीला झालेला मी ऐकला आहे.

खुद्द बिथोर येथे पेशव्यांच्या घराण्यामध्ये एक उनाड स्त्री निघाली आणि नवऱ्यास टाकून अन्य पुरुषासोबत राहू लागली . तेव्हा त्या स्त्रीशी संबंध नाहीसा करण्यासाठी घटस्फोटाचा विधी केला होता, असे ऐकतो. या विधीची एकंदर योजना मला परिचित नाही. त्या विधीचे वर्णन मिळाले ते संस्कारज्ञ ब्राह्मणांकडून न मिळता सामान्य मनुष्याकडून मिळाले. 'नदीच्या काठी हा विधी झाला. स्त्रीच्या डोक्यासारखे रूप मडक्याला दिले होते आणि नदीच्या काठी जाऊन दगडावर ते मडके आपटले. तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी शिमग्यातल्याप्रमाणे शंखनाद केला आणि नवऱ्याने काही दिवस सुतक धरलं' या सगळ्यापासून आपण खूप पुढे आलो आहोत. पण नव्या काळात नवे प्रश्न , नवी बंधने, नवे जाच निर्माण झालेच आहेत. स्त्रीमुक्तीसुद्धा बुरसटलेली वाटू लागलीय कित्येक जणींना!

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अ...