Saturday 29 January 2022

आता वाजले की, बारा....!

"राज्यातल्या बारा आमदारांचं विधिमंडळानं केलेलं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवलंय. हा ऐतिहासिक निर्णय म्हणायला हवा. तसाच तो वादाचा आणि संविधानाच्या चौकटीला आव्हान देणारासुद्धा म्हणायला हवा. या निर्णयाचा देशातल्या विधिमंडळांच्या अधिकारावर दूरगामी परिणाम करणारा आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहाला तसंच देशातल्या विविध राज्यातल्या विधिमंडळालाही 'निलंबित सदस्यांच्या' बाबतीत हा निर्णय दिशादर्शक आणि मार्गदर्शक ठरणारं आहे. कायदेमंडळ आणि न्यायालय यांच्यातल्या अधिक्षेपाचासुद्धा ठरणार आहे कार्यपलिका आणि न्यायपालिका यांच्यातल्या वादाला आता नव्यानं फोडणी मिळणार आहे. विधिमंडळ अध्यक्षांचा निर्णय अंतिम की, न्यायालयाचा निर्णय यावर आता कायदेशीर काथ्याकूट होणार आहे; कायदेमंडळातलं कामकाज न्यायालयाच्या अंतर्गत येऊ शकतो का हा देखील वादाचा मुद्दा आहे. म्हणजे आगामी काळात हा वाद आता आणखीनच रंगणार हे खासच..!"
---------------------------------------------------

*रा* ज्य विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या १२ भाजपा आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवलंय. गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात ज्या अनेक मुद्द्यांवरून राजकारण रंगलंय, आरोप-प्रत्यारोप होताहेत आणि एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न झालेत, त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे १२ आमदारांच्या निलंबनाचा! विधिमंडळाच्या अधिवेशना दरम्यान भाजपच्या १२ आमदारांनी गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवून त्यांना निलंबन करण्यात आलं होतं. हे निलंबन तब्बल एका वर्षासाठी करण्यात आलं होतं. तत्कालीन तालिका अध्यक्ष आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या या निर्णयाचा भाजपकडून तीव्र विरोध केला जात होता, तर राज्य सरकारकडून समर्थन केलं जात होतं. हा वाद अखेर सर्वोच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालयानं आता हे निलंबन रद्द ठरवलंय. ५ जुलै रोजी विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती. त्यावेळी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत इम्पेरिकल डेटावरून मुद्दे मांडत असताना केंद्रानं ओबीसींसंदर्भातला डेटा जाहीर करावा, अशी मागणी केली होती. मात्र, त्यावर तीव्र आक्षेप घेत भाजपच्या आमदारांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. अनेक विरोधी पक्षाचे आमदार वेलमध्ये येऊन घोषणाबाजी करू लागले. काही आमदारांनी अध्यक्षांसमोरचा माईक हिसकावण्याचा, तसेच राजदंड पळवण्याचा देखील प्रयत्न केल्याचा दावा नंतर भास्कर जाधव यांनी केला. या प्रकारामुळं सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृह काही काळासाठी तहकूब केलं. तसंच, विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आपल्या दालनात बोलवून सभागृह चालवण्याच्या दृष्टीनं सल्लामसलत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी तिथं मोठा गोंधळ आणि शिवीगाळ भाजपच्या आमदारांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा भास्कर जाधव यांनी केला होता.

“सभागृहात गोंधळ झाला की, अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रमुख नेते बसतात. त्याच्यावर तोडगा काढतात. एकदा सभागृहाच्या बाहेर गेल्यावर मी व्यक्तिगत कुणाशीही कटुता ठेवलेली नाही. प्रत्येकाशी भेटतो आणि बोलतो. मी केवळ अधिवेशन चालविण्याकरिता तालिका अध्यक्ष आहे. मी दालनात बसलेलो असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस रागात आले. ते इथंच चिडलेले होते. मी त्यांना बोललो या बसा. ते रागवलेले होते. चंद्रकांत दादाही आले. मी त्यांना माझ्या बाजूच्या खुर्चीत बसवलं. इतर आमदारांनाही मी बसण्याची विनंती केली. मी त्यांना बोललो आपण यातून मार्ग काढू. मात्र विरोधी पक्ष शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी या बाजूचे अनेक आमदार आतमध्ये आले. मला आई बहिणीवरुन शिव्या देऊ लागले. घुसले तर घुसले, काही आमदारांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. जसे गावगुंड असतात. तसे आमदार अंगावर आले. मी त्यांना सांगत होतो यांना आवरा. पण त्यांना आवरत नव्हते. तुम्ही ५०-६० जण आले तर मी एकटा आहे. मी मागे हटणार नाही. मी मागे हटलो नाही. ही स्थिती महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे”, असं भास्कर जाधव यांनी नंतर सभागृहात बोलताना सांगितलं होतं. दरम्यान, या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांनी झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच कारवाई करण्यात येऊ नये, अशी विनंती केली. या प्रकारानंतर महाराष्ट्राचे संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी भाजपच्या १२ आमदारांवर गैरवर्तनाचा आरोप करत त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव आणला. हा प्रस्ताव संमत करत या १२ आमदारांचं १ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं. दरम्यान या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला परखड शब्दांत सुनावलं आहे. 'आमदारांचं १ वर्षासाठीचं निलंबन हे त्यांच्या हकालपट्टीपेक्षा वाईट आहे. कारण या काळात त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शिल्लक राहणार नाही. जर हकालपट्टी होणार असेल तर ती जागा भरण्याची यंत्रणा असायला हवी. १ वर्षासाठी आमदाराचं निलंबन ही त्या मतदारसंघाला दिलेली शिक्षा आहे. उपलब्ध कायद्यानुसार विधीमंडळाला ६० दिवसांपेक्षा अधिक काळासाठी लोकप्रतिनिधींना निलंबित करण्याचा अधिकार नाही...!' असं न्यायालयानं नमूद केलंय. दरम्यान, न्यायालयानं आमदारांचं निलंबन रद्द केल्यानंतर देखील भास्कर जाधव यांनी विधिमंडळाच्या अखत्यारीतला हा विषय असल्याचं सांगत होऊ घातलेल्या राजकीय वादाचं सूतोवाच केलं आहे. त्यामुळं या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकीय नाट्य रंगताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

संविधानाचे अभ्यासक ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्यामते '१२ आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं. हा निर्णय असंवैधानीक आहे. सभागृहातल्या कामकाजाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देता येत नाही आणि त्यावर निर्णय देण्याचा अधिकारही सर्वोच्च न्यायालयाला नाही. सभागृह, मग ते देशाची संसद असो की राज्याची विधानसभा असो, "नेशन विदिन नेशन" या तत्वावर चालते. सभागृहातल्या लोकांवर निर्णय देण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही. महाराष्ट्राची विधानसभा हा निर्णय मान्य करते का? हे पाहावं लागेल. आमच्या मतानुसार हा निर्णय असंवैधानीक असून अधिकारक्षेत्र नसताना दिलेला आहे...!' अद्याप न्यायालयाचा संपूर्ण निकाल आलेला नाही त्यात नेमकं काय म्हटलं आहे त्यावर आताच काही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही अशी भूमिका सत्ताधारी पक्षांनी घेतलीय तर विधिमंडळाच्या आवारात कुणाला येऊ द्यायचं वा द्यायचं नाही हा सर्वस्वी विधिमंडळ अध्यक्षांचा निर्णय असतो असं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं १२ आमदारांचं निलंबन रद्द करणं आणि सरकारनं सुचवलेल्या विधान परिषदेच्या १२ आमदारांची राज्यपालांनी रोखलेली नियुक्ती यांचा परस्पर संबंध असल्याचं वरकरणी दिसतं. जर एक वर्षासाठी केवळ आमदारांच्याच नव्हे तर त्यांच्या मतदारसंघातल्या नागरिकांच्या हक्कावर गदा आहे. त्यांची कामं वर्षभरासाठी रोखून धरली गेली आहेत असं न्यायालयानं म्हटलं आहे. तर मग जवळपास गेली दोन वर्षे राज्यपालांनी विधानपरिषदेतल्या १२ आमदारांची नियुक्ती रोखून त्यांच्या अधिकारावर, त्यांच्या मतदारांवर अन्याय केलेला नाही का? असा युक्तिवाद सत्ताधारी पक्षाकडून केला जातोय. या साऱ्या प्रकरणाला पक्षीय राजकारणाची, केंद्र आणि राज्य सरकारातल्या विरोधाची किनार आहे. त्याशिवाय राज्य सरकारनं न्यायालयात सरकारची बाजू मांडण्यासाठी जी वकिलांची फौज उभी केलीय ती सतत कुचकामी ठरलेली दिसते. सरकारच्या विरोधातल्या साऱ्या खटल्यांचे निकाल, निर्णय सरकारच्या विरोधात जात आहेत. न्यायालयात सरकारची एकही बाजू टिकत नाही. मग ते मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो वा इतर खटले असोत. प्रत्येक खटल्यात सरकारला नमतं घ्यावं लागलं आहे. हा न्यायालयाचा दृष्टिकोन आहे की, सरकारी वकिलांचं अपयश हे पाहावं लागेल. सरकारतल्या संबंधितांनी याचा गंभीर विचार करायला हवाय. हे वेळीच रोखलं गेलं नाही तर सरकारचे सर्व निर्णय वा धोरणं ही न्यायालयात जाऊन अडकतील. त्यामुळं सरकारला काम करणं अशक्य होईल.

ज्येष्ठ विधिज्ञाच्या मते सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निर्णय योग्य आहे. कारण आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल निलंबन करण्याचा अधिकार जरी विधीमंडळाला असला तरी मूलभूत तत्वांचा या निलंबनावेळी विचार करणं गरजेचं असतं. दीर्घकाळासाठी जर निलंबन केलं तर त्या मतदारसंघावरही अन्याय होतो. हेच सर्वोच्च न्यायालयानंही नमूद केलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता विधीमंडळाला काहीही करता येत नाही. संविधानाच्या अनुच्छेदाचा अन्वयार्थ लावण्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे. विधीमंडळानं घेतलेला निलंबनाचा निर्णयच सर्वोच्च न्यायालयानं रद्द ठरवला आहे. एखाद्या आमदारांचा सभागृहात अनुपस्थित राहण्याचा कालावधी ६० दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. या नियमाचंही उल्लंघन झाल्याचं कोर्टाने म्हटलय. यात मूलभूत रचनेबाबत अनेक मुद्दे सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित करत एक वर्षांसाठीचं हे निलंबन बेकायदेशीरपणे करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळं या निर्णयात विधीमंडळाला काहीही करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय विधीमंडळाला मान्य करावाच लागेल. हे निलंबन केवळ पावसाळी अधिवेशनापुरतं असायला हवं असं न्यायालयानं म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाचे जस्टीस ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वातील पीठानं जस्टीस सी. टी. रवीकुमार यांच्या साथीनं या प्रकरणी निर्णय दिलाय. या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टानं म्हटलं की, एका वर्षाच्या निलंबनासाठी आणि सदस्याला पुढच्या अधिवेशनातही सहभागी होता येऊ नये यासाठी तशा प्रकारचं ठोस कारण असणं गरजेचं आहे. अशा प्रकारचं निलंबन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी असू शकत नाही, त्यामुळं हे घटनाबाह्य असल्याचं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं. एखाद्या आमदाराला सभागृहात अनुपस्थित राहण्यासाठी ६० दिवसांची मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ती ओलांडल्यास ती जागा रिक्त होत असते. त्या मर्यादेचंही यात उल्लंघन झाल्याचं न्यायालयानं म्हटलंय. एखादी जागा किती काळ रिक्त राहू शकते? जास्तीत जास्त सहा महिन्यांची मर्यादा त्यासाठी असू शकते. पण आपण लोकशाहीच्या संसदीय मतदारसंघाबाबत बोलत आहोत. त्यामुळं १२ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं जात नसेल तर हा मूलभूत रचनेला धक्का नाही का? असा सवाल पीठानं उपस्थित केला. निलंबनाचा निर्णय हा केवळ ६ महिन्यांपर्यंत असू शकतो, त्यानंतर तो घटनाबाह्य ठरू शकतो, असं कोर्टानं म्हटलं. पीठानं वकील आर्यमा सुंदरम यांच्या युक्तीवादाचीही दखल घेतली. सदस्यांच्या निलंबनाचा काळ ठरवण्याबाबत नियम करण्याचा अधिकार सभागृहाला असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता. त्यावर सभागृहाचे नियम हे संविधानाशी सुसंगत असले तरी जास्तीत जास्त कालावधी हा सहा महिन्यांचाच असू शकतो, असं न्यायालयानं म्हटलं.

आमदारांच्या निलंबनाचा निर्णय हा सरकारचा नाही तर विधीमंडळाचा होता. विधीमंडळाला सुप्रीम कोर्टाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यावर अंतिम निर्णय घेतील. कोर्टाचा आदेश आणि विधीमंडळाचे अधिकार याबाबतचा जो काही अभ्यास करायचा असेल तो विधीमंडळ सचिवालय करेल. संविधानाची निर्मिती करताना कार्यपलिका आणि न्यायपालिका यांच्या कामाची जी सांगड घातलीय त्यामुळं दोघांनाही एकमेकांवर कुरघोडी करता येणार नाही अशी तरतूद केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पहिला मुद्दा संविधानानं कायदेमंडळ म्हणजेच संसद, विधिमंडळ आणि न्यायालय यांच्या अधिकाराबाबत जे म्हटलं आहे त्यात या निर्णयानं विधिमंडळाच्या कामकाजात अधिक्षेप ठरणारं आहे. विधिमंडळातल्या कामकाजाबाबत अध्यक्षांचा निर्णय हा अंतिम समजला जात असल्यानं न्यायालयानं त्यांचा निर्णय रद्दबातल ठरवणं हा वादाचा मुद्दा ठरणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय यासारख्या इतर खटल्यांमध्ये 'मार्गदर्शक' ठरणारा आहे. शिवाय देशातली विविध राज्यातली विधिमंडळ आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात सदस्यांच्या केलेल्या निलंबनाबाबत दिशा देणारा ठरणारा आहे. भारतीय संविधानानं संसद, विधिमंडळ आणि न्यायालय यांच्या कामाच्या, अधिकाराच्या मर्यादेच्या आणि संकेताच्या बाबी स्पष्ट केलेल्या आहेत. आता या निर्णयामुळे याबाबतची चर्चा होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या निर्णयामुळे संविधानाची चौकट मोडली गेलीय हे सत्ताधाऱ्यांचं कितपत योग्य आहे हे ही ठरणार आहे त्यासाठी निलंबन रद्द करण्याच्या संपूर्ण निकालाची प्रत समोर येत नाही त्यावर अद्याप काही म्हणणं योग्य ठरणार नाही, मात्र एक निश्चित की, या प्रकरणामुळे आणखी नव्या वादाला प्रारंभ होईल!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

*'दंड... का... रण...!'*
*भाजपचं धनुष्य अन कोर्टाचा बाण*
*सरकारवर न्यायालयीन घाव...!*

Friday 28 January 2022

दारा शुकोह स्मृती पुरस्कार हवा...!

"केंद्र सरकार एनआरसी राबविण्याच्या तयारीत आहे. शिवाय २०२४ च्या निवडणुकांपूर्वी समान नागरी कायद्याची सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे. याबरोबरच एक सांस्कृतिक उपक्रमाचं नियोजन सरकार करतेय. ते म्हणजे धर्माध कर्मठांच्या रोषाला बळी पडून राजधानीत ज्याची धिंड काढून शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी ज्यानं अक्षरशः स्वजनांचे शिव्याशाप खाल्ले नि अखेर मरण पत्करलं, अशा शहाजहानपुत्र आणि औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोह यांची स्मृती जागविण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी त्याला दफन केलेल्या कबरीच्या धांडोळा घेतला जातोय. पण सरकारनं केवळ त्यावरच नं थांबता त्यांची साहित्यसंपदा प्रकाशित करावी याशिवाय दारा शुकोह यांच्या नावानं एखादा सन्मान सुरू करावा!"
--------------------------------------------
*कें* द्र सरकारातले काही अधिकारी सध्या मोगल काळातल्या एका मुस्लिम व्यक्तीची कबर शोधताहेत. या मुस्लिम व्यक्तीचं नाव आहे दारा शुकोह...! मात्र या कामाची प्रसिद्धी सरकार फारशी करत नाही. दारा शुकोहला एक खुल्या विचाराचा मुस्लिम नेता समजलं जातं. दारानं हिंदू धार्मिक ग्रंथांचा अनुवाद केला होता. ज्यात उपनिषदं आणि भगवद्गीताचा समावेश आहे. या ग्रंथांचं त्यानं फारसी भाषेत अनुवाद केलाय. ज्यामुळं जास्तीतजास्त लोकांपर्यंत ते पोहोचलं जाईल. अशी त्यांची इच्छा होती. सध्या ज्यांची कबर सरकार शोधतेय त्यांची कोणतीच माहिती आजतरी कुठंही उपलब्ध नाही. पण त्याचं शोधकार्य सध्या जोमानं सुरू आहे. त्यांना सरकार 'सच्चा मुसलमान' म्हणून गौरव करणार आहे. या शोधकार्यासाठी केंद्र सरकारनं समिती स्थापन केलीय. गेली सहा महिने त्या कबरीचा शोध समिती घेतेय. पण हे शोधकाम अत्यंत अवघड आणि जटीलआहे. ज्या मोगल काळात जे कोणी मुस्लिम राज्यकर्ते मारले गेले त्यांना देशात वेगवेगळ्या ठिकाणी दफन करण्यात आलं होतं. हुमायूनच्या मकबऱ्याजवळ सर्वाधिक कबरी आहेत. म्हणजे जवळपास दीडशेच्या आसपास कबरी आहेत. त्यातल्या अनेक कबरींवर त्या कुणाच्या आहे हे लिहिलेलं वा नोंदलेलं नाही. त्यामुळं कोणती कबर ही दारा शुकोह यांची आहे हे शोधणं अतिकठिण होऊन बसल्याचं समजलं जातंय. दारा शुकोहची हत्या केल्यानंतर त्यांचं धड हुमायूनच्या मकबरेजवळ दफन केलं गेलं. जिथं बादशहा अकबर यांचे पुत्र दानियाल आणि मुराद यांना दफन केलं होतं. त्यानंतर तैमुर वंशाच्या शहजादांना दफन केलं होतं. आणि दारा शुकोह याचं मुंडकं ताजमहालच्या परिसरात कुठंतरी दफन केलं. फ्रेंच इतिहास संशोधक आणि लेखक बरनियर आपल्या पुस्तकात म्हणतात, की औरंगजेब यांचं म्हणणं होतं की, जेव्हा कधी शहाजहानची नजर आपल्या बेगमच्या मकबरेवर पडेल तेव्हा त्याला हेही लक्षात येईल की आपल्या पुत्राचं मुंडकं देखील तिथं सडत पडलंय! यामुळं दाराच्या कबरीच्या शोध घेणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिलाय. त्याची नेमकी कबर आहे तरी कुठं? त्याचा ठावठिकाणा फारसा लागत नाहीये! दारानं कुराण, इतिहास, पर्शियन भाषेतल्या कवितांचा चांगला अभ्यास केला होता. तो एक चांगला साहित्यप्रेमीही होता. पण त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ औरंगजेब हे दोघेही क्रूर शासक होते. १६२७ मध्ये दारा शुकोहचे आजोबा जहांगीर यांचं निधन झालं, त्यानंतर दारा शुकोहच्या वडिलांनी सत्ता सांभाळली. त्यांनाच नंतर शहाजहान म्हणून ओळखलं गेलं. त्यानं मोगल सैन्यात काम केलेलं होतं. त्याला अलाहाबादचा सुभेदार म्हणजेच गव्हर्नर म्हणून नेमलं होतं. नंतर मुलतान, काबूलची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्यानंतर स्वतःची सत्ता वाचविण्यासाठी औरंगजेबनं भाऊ दारा शुकोह यांची हत्या केली. त्यापूर्वी दारानं शीख धर्मगुरू हर राई यांच्याशी मैत्री केली होती. शिवाय अनेक हिंदू धर्मगुरूंशीही मैत्री केली होती. तो त्यांच्याशी धार्मिक आणि वैचारिक विषयावर विचारविनिमय करीत असे.
*धर्माची कुरघोडी राज्यकारभारावर होऊ नये*
युरोपच्या इतिहासात धर्मसत्ता नि राजसत्ता ह्यांचा तीव्र संघर्ष प्रदीर्घ काळ चालला होता आणि त्यातून अखेर 'सेक्युलॅरिझम'चं नवनीत प्रकट झालं! धर्मसत्तेचं जोखड राजसत्तेनं झुगारलं आणि राज्यकर्ता कोणत्याही धर्माचा असो, त्यानं कोणत्याही विशिष्ट धर्माची कुरघोडी राज्यकारभारावर होऊ देऊ नये, धार्मिक बाबतीत प्रजाजनांना पूर्ण स्वातंत्र्य द्यावं, पक्षपात न करता सर्व धर्मपंथांकडं समानतेनं पाहावं हे तत्व सर्वधर्मसमभावाचं - सेक्युलॅरिझमचं तत्त्व अंगिकारलं गेलं! धर्मगुरूची अरेरावी नि असहिष्णुता ह्यांच्या आगीत दीर्घकाळ होरपळलेल्या युरोपात सर्वधर्मसमभावाचा यशोदुन्दूभी विशेष निनादला. ह्यात नवल नाही. पण भारतात, धर्मसत्ता नि राजसता ह्यांचं सर्प-मुंगसासारखं वैर कधीच निर्माण झालं नसल्यामुळं इथं 'सेक्युलॅरिझम'चे स्पेशल नगारे बडवण्याचं कारणच नव्हतं! 'साधनानां अनेकता' हे तत्त्व देशाच्या हाडी-मांसी हजारो वर्षापासून भिनलेलं!
'आकाशात पतितं तोयं, यथा गच्छती सागर:...!'
या सुभाषिताप्रमाणे 'तुम्ही कोणत्याही देवाला कसंही वंदन करा, ते अखेर या जगताच्या मुखाशी असलेल्या परमेश्वरालाच पोहोचतं,' अशी दिलदार धारणा असलेला हा देश! रेव्हरंड टिळकांच्या शब्दांत सांगावयाचं झालं तर.
भित्र दिशांनी सरिता नाले l
जरी कितीही वाहत असले ll
एक नदीपति त्यांच्या पुढती l
का मग बोंबाबोंब ?ll
असा स्पष्ट सवाल संकुचित धर्मांधांना सदैव विचारीत आला! पण तरीही जेव्हा या भूमीवर धर्माधर्माचं आणि जातीजातीचा तीव्र संघर्ष सुरू झाला तेव्हा
महजब नहीं सिखाता, आपसमें बैर रखनाl
हे सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली धर्मांध वा जात्यंध माथेफिरुना ताळ्यावर आणण्यासाठी इथल्या मूलभूत सेक्युलर संस्कृतीला 'सर्वधर्मसमभाव'चा पुरस्कार करावा लागला!
*हिंदू संस्कृतीत सर्वधर्मसमभाव मुरलेला!*
हा पुरस्कार ज्यानं केला नाही. सर्व धर्म हे अखेर मानवता धर्माचंच भिन्न भिन्न आविष्कार होत, असं ज्यानं मानलं नाही, असा एक तरी थोर पुरुष इथं आपल्या देशात दाखवून देता येईल काय? या देशातल्या प्रत्येक युगपुरुषानं, प्रत्येक साधुसंतानं सर्वधर्मसमभावाचं तत्व मानलंय. यथाशक्ती पाळलंय. सेक्युलारीझम ही काही आजच शोधून काढलेली चीज नव्हे! आज राजकारणात विशेषत: निवडणूकीच्या राजकारणात धार्मिक वा जातीय भावनांना खतपाणी घालणाऱ्या नि तोंडानं मात्र सर्वधर्मसमभावाचा जप करणाऱ्या राजकारणी लोकांनी हे लक्षात ठेवावं की, इथली सर्वसामान्य जनता इथली सत्ता राजकारणाहून अधिक सर्वधर्मसमभावी आहे! कारण, इथल्या सर्वसामान्य साधुसंतांच्या मानवताधर्म शिकवणीचा संस्कार तिच्या मनावर झालेला आहे. एकाच महान दर्यावर लाटा उठतात, तरंग उठतात भोवरे निर्माण होतात, बुडबुडे उद्भवतात, पण अखेर ते सारं पाणीच, तद्वत एकाच मानवता धर्माचे हिंदू धर्म, इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म इत्यादी भिन्न भिन्न आविष्कार म्हणजे मूलत: मानव्य धर्मच होय, हीच या देशातल्या महापुरुषांची नि महात्म्यांची शिकवण! म्हणूनच
'एक सद् विप्राः बहुधा वदन्ति'
असं म्हणणाऱ्या प्राचीन ऋषींचा वैचारिक हुंकार
'ईश्वर अल्ला तेरे नाम'
ह्या महात्मा गांधींच्या शब्दांतून ऐन जातीय संघर्षाच्या धुमाळीतही बाहेर पडला! हा विचार सामान्य जनतेत रुजविण्यासाठी जुन्या जमान्यातल्या भारतीय विभूतींना केवढे प्रयास पडले, ह्याची कल्पना आजच्या वाचावीरांना नाही! ती कल्पना करून देण्यासाठी जुन्या काळातल्या भारताच्या सेक्युलर प्रवासाचं संशोधन होणं आणि ते आधुनिक पिढीपर्यंत येणं हे अत्यंत जरुरीचं आहे.
*सर्वधर्मसमभावावर संशोधन व्हावं*
म्हणूनच सर्वधर्मसमभावावरच्या संशोधनाला सरकारनं रोख रकमेचं पारितोषिक देण्याची घोषणा करायला हवीय. छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख तत्त्वप्रणाली सर्वधर्मसमभाव! तिच्या प्रसाराला उत्तेजन मिळावं. ह्या उद्देशानं शिवरायांच्या सर्वधर्मसमभावावर संशोधनात्मक लिखाण करणाऱ्यांसाठी पारितोषिक योजना शासनानं कार्यान्वित करावी! या योजनेचा तपशीलवार, नियोजनबद्ध आराखडा तयार करायला हवा. तरी ही सहेतुमूलक योजना निःसंशय प्रशंसनीय ठरणार आहे यात शंका नाही. पण शिवशाहीचं नि सर्वधर्मसमभावाच्या डोळस अभ्यासकांनी काही वेगळं मतप्रदर्शन वेळीच व्यक्त करून आपली भूमिका स्पष्ट करावी. मागेच म्हटल्याप्रमाणे देशातल्या सर्वच युगपुरुष 'सर्वधर्मसमभावा'चं तत्व मानणारे होते. तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा त्यात अंतर्भाव होतोच पण 'सर्वधर्मसमभावा'ची संस्थापना हेच शिवरायांचं प्रमुख जीवित-ध्येय होतं, असं मानणं इतिहासशुद्ध ठरणार नाही. प्रत्येक गोष्ट शिवाजी महाराजांच्या नावाला जोडण्याची जी टूम महाराष्ट्रात आजकाल निर्माण झालीय. तिला अनुसरूनच इथं शिव-नामाचा वापर करावयाचा असेल तर गोष्ट निराळी! पण असं केल्यामुळं शिवरायांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला सीमित केल्यागत होतं. शिवाय ह्या महत्वाच्या विषयाला 'अव्याप्ती'चा दोष जडतो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या संदर्भात
'प्राधान्येन व्यपदेशा भवन्ति'
हा सिद्धान्त डोळ्यांपुढं ठेवून महापुरुषांचा विचार केला पाहिजे. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळकांनी नाट्यकलेला, गणित-विद्येला, ज्योतिर्गणिताला उत्तेजन दिलं. तेही सर्वधर्मसमभावाचेच उपासक होते. पण तरीही उपयुक्त विषय हे त्याचं प्रधान क्षेत्र नव्हे, प्रधान जीवित कार्य नव्हे. स्वामी विवेकानंद संगीत शास्त्रातही प्रवीण होते. पण म्हणून सरकारनं 'विवेकानंदाचं संगीत' या विषयावरच्या संशोधनासाठी निधी मुक्रर करणं, संयुक्तिक ठरणार नाही! हाच न्याय शिवाजी महाराजांच्या सर्व-धर्म-समभावालाही लागू आहे. शिवाय असं पहा की, शिव-चरित्राचं सर्व बाजूनं भरपूर संशोधन आधीच झालंय. त्यांच्या 'सेक्युलरिझम'ची विस्तृत नोंद त्यांच्या अनेक विद्वान चरित्रकारांनी केलेलीच आहे. मग ह्या विषयात आणखी नवं संशोधन कोण कितीसं करणार? म्हणूनच आम्ही उपर्युक्त स्तुत्य योजनेला अशी दुरुस्ती सुचवू इच्छितो की विषयाची व्याप्ती वाढवावी, म्हणजे 'सर्वधर्मसमभावाची वाटचाल' अथवा 'भारतीय संतांनी पुरस्कारलेला सर्वधर्मसमभाव' अशा प्रकारचा विषय तरुण संशोधकांपुढे ठेवावा.
*‘दाराशुकोह-शिष्यवृत्ती' ठेवण्यात यावी*
'दारा शुकोह, द मैन हू वुड बी किंग' या पुस्तकाचे लेखक अवीक चंदा यांनी दारा शुकोह याच्या जीवनावर आधारित पुस्तकात म्हणतात, 'सर्वधर्मसमभावाचा प्रसार हेच ज्यांचं मुख्य जीवितध्येय होय, अशा पुरुषांत शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र दाराशुकोह अग्रगण्य ठरेल तो राजकारणात कच्चा होता, रणांगणात शूर असला तरी कसलेला नव्हता. पण शहाजहानचा हा लाडका पुत्र सर्वधर्मसमभावात मजबूत होता इस्लामधर्मीय पंडितांप्रमाणेच हिंदूधर्मीय पंडितांचाही गराडा त्याच्याभोवती पडलेला असे. त्यांच्याबरोबर धर्मचर्चा करण्यात त्याचा बहुतांश वेळ निघून जाई!' तो 'शाहीयत' नामक ग्रंथात म्हणतो, 'सत्य ही कोणत्याही एकट्या धर्माची मक्तेदारी नाही!' तो पर्शियन भाषेप्रमाणेच संस्कृतमध्येही प्रवीण होता कुराण नि वेद ह्यांच्यात फरक नाही हे सांगताना तो म्हणतो,
'अपौरुषेय ग्रंथोऽस्माकं कुराणं सिद्धानां वेद इत्युच्यते l'
त्याच्या 'मज्मा-उल्-बहरीन' ह्या ग्रंथाचं 'समुद्र संगम' नामक संस्कृत रूपांतर झालंय. त्यानं 'योग वसिष्ठ्य' इत्यादी संस्कृत ग्रंथांची फारसी रूपांतरं करवून घेतली आहेत. त्याच्या ह्या संस्कृत प्रेमावर नि धर्मातीत वृत्तीवर खूष होऊन हिंदू पंडितांनी त्याला 'विगत-शोकसंदेहः' अशी किताबत बहाल केली होती! अशा या थोर मोगल राजपुत्राचं सर्व चरित्र सांगण्याचं हे स्थळ नव्हे. पण इतकं सांगितलं तरी पुरे की धर्माध कर्मठांच्या रोषासच तो अखेर बळी पडला राजधानीत त्याची धिंड काढण्यात येऊन त्याचा शिरच्छेद करण्यात आला! आज सर्वधर्मसमभावाचे डिमडिम दशदिशांत घुमत असताना तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वी जो उमदा युवराज स्वतःच्या आंधळ्या धर्मबांधवांच्या क्रूर क्रोधाची शिकार बनला; हिंदू-मुस्लीम ऐक्यासाठी दोन सागरांच्या संगमासाठी! ज्यानं अक्षरशः स्वजनांचे शिव्याशाप खाल्ले नि अखेर मरण पत्करलं, त्याची साधी आठवणही कोणाला होत नाही! आज पोटात जातीयता ठेवून ओठांत सर्वधर्मसमभाव बाळगणारे कैक महाभाग मानमान्यता मिळवीत असताना, दारा शुकोहसारखा सच्चा सेक्यूलर शहीद प्रायः विस्मृतीच्या गर्तेत पडावा हे केवढं दुर्भाग्य! म्हणूनच सर्वधर्मसमभावाचं संशोधन करणाऱ्या तरुणांना शिष्यवृत्ती द्यावी आणि तिचं नाव ‘दाराशुकोह-शिष्यवृत्ती' असं ठेवण्यात यावं, अशी वाटतं.
*दाराचं बालपण बुऱ्हाणपूरला गेलं!*
दारा शुकोहचा जन्म २० मार्च १६१५ तर मृत्यू ३० ऑगस्ट १६५९ झाला. दिल्लीचा पाचवा मोगल बादशाह खुर्रम उर्फ शहाजहान जन्म १५९२ मृत्यू १६६६. याचा मुलगा आणि चौथा बादशाह जहांगीर याची कारकिर्द १६०५-२७ अशी होती, याचा हा नातू. शहाजहानची द्वितीय पत्नी अर्जुमंद बानो बेगमपासून अजमेर इथं हा जन्मला. त्याचं नाव जहांगीरनं प्राचीन इराणी राजा दारियसच्या नावावरून ‘दारियसप्रमाणे राजबिंडाʼ अशा अर्थी ठेवलं. दाराला जहांआरा, हूरुन्निसा या बहिणी, तर शाह शुजा, औरंगजेब आणि मुरादबक्ष हे भाऊ होते. प्रथेप्रमाणे दारा चार वर्षे, चार महिने आणि चार दिवसांचा झाल्यावर त्याची सुंता करण्यात आली आणि त्याचा मोठा समारंभ आयोजित केला गेला. त्याचं बालपण अधिकतर बुरहानपूरमध्ये गेलं. शहाजहाननं बापाविरुद्ध बंड पुकारल्यानंतरच्या स्वाऱ्यांत त्याचा कुटुंबकबिलाही सोबत असे. त्यातच दारानंही देशभर प्रवास केला. अखेरीस १६२६ साली शहाजहाननं शरणागती पत्करल्यावर दारासह अन्य राजपुत्रांनी जहांगीरच्या आदेशावरून राजधानी आग्र्याचा रस्ता धरला. शाहजहाननं पुढं बंड करू नये, यासाठी त्याच्या पुत्रांना ओलीस ठेवून घेतलं गेलं. तेथून जहांगीरसोबतच दारानं लाहोर आणि काश्मीरचाही प्रवास केला. जहांगीरनंतर शहाजहान आणि त्याच्या भावांमध्ये युद्धे झाली. त्यांत शहाजहान विजयी ठरला आणि तो मोगल बादशाह झाला. शहाजहाननं १६३० मध्ये आपला दरबार बुरहानपूरला हलवला मार्च. तिथंच दारानं चित्रकारांकडून काही चित्रे तयार करून घेतली आणि त्यांना प्रस्तावना लिहून एक चित्रसंग्रह अल्बम तयार केला. सुलेखनकला आणि एकूणच साहित्यनिर्मितीचा हा त्याचा पहिला प्रयत्न होता. जहांगीरचा दिवंगत भाऊ परवेझ याची मुलगी नादिरा बानू हिच्याशी दाराचं १६३३ मध्ये लग्न झालं. या लग्नाला तत्कालीन तब्बल ३२ लाख रुपये खर्च आला. १६३४ सालच्या जानेवारी महिन्यात दारा आणि नादिरा बानू यांना एक मुलगी झाली, पण ती अल्पवयीन ठरली. लाहोरमध्ये दाराची मियां मीर या कादिरीपंथीय सूफी संत आणि त्यांचा शिष्य मुल्ला शाह यांच्याशी परिचय झाला. पुढं मुल्ला शाहनं इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याच्या आरोपाखाली त्याला मारण्याचा फतवा काही मौलवींनी काढला, तेव्हा दाराच्याच मध्यस्थीनं तो फतवा शहाजहाननं रद्द केला. दाराला १६३५ ला सुलेमान आणि १६३८ मध्ये मेहेर अशी मुलं झाली. दारानं सफिनात-उल-औलिया  हा ग्रंथ १६४० मध्ये रचला. सूफी पंथातल्या कादिरी, चिश्ती, कुब्रावी, सुहरावर्दी या चार महत्त्वाच्या शाखांमधल्या चारशे संतांची चरित्रं हा या ग्रंथाचा विषय होता. तसंच त्यानं आध्यात्मिक विषयांवर ‘कादिरी’ या नावाखाली काव्यरचना केली. इराणी सफावी सत्तेशी लढण्याकरिता १६४२ मध्ये दारा कंदाहारच्या मोहिमेवर निघाला. लाहोरपर्यंत पोहोचल्यावर तत्कालीन सफावी बादशहा शाह शफी मरण पावल्याचं समजल्यावर मोहिमेची गरज संपल्यानं तो पुन्हा आग्र्यात परतला. त्यानंतर त्यानं १६४३ मध्ये सकिनात-उल-औलिया हा ग्रंथ पूर्ण केला. यात संतांच्या आठवणी आणि दाराची अध्यात्म साधना याबद्धलचं विवेचन आहे.

*मिर्जाराजे जयसिंग यांची नात दाराची सून*
काश्मीरच्या वास्तव्यात दारानं 'रिसाला-इ-हकनुमा ' नामक अध्यात्म साधनाविषयक १६४५ मध्ये ग्रंथ लिहिणं सुरू केलं. त्याच वर्षी जून महिन्यात त्याला चुनार आणि रोहतास या महत्त्वाच्या किल्ल्यांसह अलाहाबाद प्रांताची सुभेदारी देण्यात आली. शहाजहाननं दाराच्या मुलांचा शिक्षक बाकी बेग याला तिकडं पाठवून दाराला दरबारातच ठेवलं. या दरम्यान दारानं शेख मुहिब्बुल्लाह मुबारिझ नामक एका प्रसिद्ध चिश्तीपंथीय सूफी संताशी पत्रव्यवहार सुरू केला. १६४६ ला बाल्खच्या मोहिमेत भाग घेण्याकरता दारा लाहोरपर्यंत गेला आणि त्याची पत्नी नादिरा आजारी असल्यावरून तिथं तो काही महिने थांबला. यावेळी त्यानं तिला एक चित्रसंग्रह भेट दिला आणि '…हकनुमा ' ग्रंथही पूर्ण केला. या ग्रंथात त्यानं त्रिमूर्ती, योगचक्रे इ. हिंदू संकल्पनांचं वर्णन केलेलं आहे. या सुमारास एक तत्त्वज्ञ म्हणून दाराची प्रसिद्धी झाल्यानं 'इलाजात-इ-दाराशुकोही ' या वैद्यकीय कोशाला त्याचं नाव देण्यात येऊन त्यात त्याची स्तुती केलेली आढळते. शहाजहाननं दाराला मार्च १६४७ ला अलाहाबादसोबतच पंजाबचाही सुभेदार नेमलं. दारानं काश्मीरमध्ये परिमहालासारखी इमारत बांधली. काश्मीरमध्ये असतानाच त्यानं १६५१ मध्ये थोरला मुलगा सुलेमानचं लग्न ख्वाजा अब्दुल अझीझ नख्शबंदीच्या नातीशी लावलं. १६५२ ला सफावी सत्तेकडून कंदाहार हस्तगत करण्यासाठी शहाजहाननं दाराला पाठवलं. मोठे सैन्य, एक कोटी रुपये आणि मोठ्या तोफांसह दारा तिथं १६५३ मध्ये पोहोचला. १५ मे १६५३ रोजी प्रत्यक्ष स्वारी सुरू झाली. या आधीच्या कंदाहार मोहिमांत भाग घेतलेल्या अनुभवी सरदारांऐवजी दारानं जाफर नामक अननुभवी तोफखाना प्रमुखावर भिस्त टाकली. जाफर दिलेल्या आश्वासनांना प्रत्यक्षात आणू शकला नाही. यांशिवाय जाफर आणि मीरबक्षी मिर्झा अब्दुल्ला, दारा आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्यात भांडणं झाली. अखेरीस निकराच्या प्रयत्नानं किल्ल्याची तटबंदी भेदूनही जाफर आणि अन्य अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळं सफावी सत्तेनं मोगल सैनिकांना परतवून लावलं. मोहीम अयशस्वी झाल्यानं जानेवारी १६५४ मध्ये दारा दिल्लीत परतला. या दरम्यान दारानं 'हसानत-उल-आरिफिन ' हा १६५४ मध्ये सूफी संतवचनसंग्रहावरचा ग्रंथ पूर्ण केला. दिल्लीतल्या वास्तव्यात दारानं ऑक्टोबर १६५४ ला मिर्झाराजे जयसिंगाशी संधान बांधलं आणि त्याचा पुतण्या अमरसिंगच्या मुलीशी स्वत:चा मुलगा सुलेमानचं लग्न लावलं. मेवाडचा असंतुष्ट राणा करणसिंग आणि मोगलांत दारानं यशस्वी वाटाघाटी घडवून आणल्या. दारानं हिंदू धर्माचा अभ्यास सुरू केला. यासाठी त्याला कवींद्राचार्य सरस्वती, ब्रह्मेंद्र सरस्वती, जगन्नाथ इ. पंडितांचं साहाय्य लाभले. रजपूत राजांशी येणाऱ्या वाढत्या संपर्काचा हा परिणाम असल्याचं काही संशोधकांचं मत आहे. या खेरीज दारानं जेझुईटपंथीय ख्रिश्चन पाद्र्यांकरवी ख्रिस्ती धर्माचा आणि सरमद नामक पूर्वाश्रमीच्या ज्यू करवी ज्यू धर्माचाही अभ्यास सुरू केला. शहाजहाननं आपल्या साठाव्या वाढदिवशी दाराला आपला वारस आणि भावी बादशाह घोषित केलं आणि ‘शाह बुलंद इकबालʼ हा किताब देऊन दरबारात सिंहासनाजवळ एका खुर्चीत बसण्याचा बहुमानही दिला. याच वर्षी दारानं 'मजमू-अल-बहरिन ' हा ग्रंथ लिहिला. इस्लाम आणि हिंदू धर्मांमधील आंतरिक आध्यात्मिक सत्य एकच असल्याचं प्रतिपादन त्यानं या ग्रंथात केलेले आहे. १६५५ मध्ये याचं संस्कृतभाषांतरही 'समुद्रसंगम ' या नावं पूर्ण झालं. याशिवाय त्यानं लघुयोगवासिष्ठाचंही 'जोग बसिश्त' नामक फार्सी भाषांतर करवून घेतलं.

*दारा तेथून निसटून लाहोरला गेला*
दारानं उपनिषदांचे फार्सी भाषांतर १६५७ मध्ये करवून घेणं सुरू केलं. एकूण पन्नास उपनिषदं यासाठी संस्कृत पंडितांकडून निवडण्यात आली. पंडितांकडून हिंदी सारांश ऐकून फार्सीप्रवीण मुल्ला-मौलवींनी त्याचं भाषांतर केलं. याला 'सिर्र-इ-अकबर ' असं नाव देण्यात आलं. हे काम सहा महिन्यांत पूर्ण झालं. कुराणात उल्लेखिलेलं ‘किताब मक्नुन’ अर्थात गुप्त पुस्तक म्हणजे उपनिषदेच होत, असं प्रतिपादन यात दारानं केलं. याशिवाय इतरही अनेकप्रकारे उदाहरणे देऊन इस्लामी परंपरेत वेद आणि उपनिषदांना बसवण्याचा त्याचा प्रयत्न दिसतो. यानंतर शहाजहान आजारी पडला आणि दारा त्याची काळजी घेऊ लागला. काही काळानं शहाजहानला बरे वाटल्यावर तो हवापालटासाठी आग्र्याला गेला. या दरम्यान शहाजहानच्या मृत्यूच्या अफवा उठल्यानं बंगालचा सुभेदार आणि दाराचा सख्खा भाऊ शुजा यानं स्वत:ला बादशाह घोषित केलं. त्याचा सामना करण्यासाठी दारानं त्याचा मुलगा सुलेमानला फेब्रुवारी १६५८ मध्ये मिर्झाराजे जयसिंगासोबत पाठवलं. दोहोंत काशीजवळ बहादुरपूर इथं लढाई झाली आणि शुजाचा पराभव झाला; परंतु तो यशस्वीरीत्या निसटला. पाठोपाठ दाराचा दुसरा भाऊ मुरादनंही स्वत:ला बादशाह घोषित केलं आणि वऱ्हाडात बदलीचं फर्मान धुडकावलं. औरंगजेबानं शहाजहानची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न केला. शुजा आणि मुरादशीही संधान बांधलं. यानंतर अनेक लढाया झाल्या. धर्माट इथं औरंगजेब आणि मुरादच्या संयुक्त सैन्यानं शाही सैन्याचा पराभव केला. सुलेमान शुकोह आणि मिर्झाराजे जयसिंग यांनी बंगालमध्ये शहाजहानच्या आज्ञेवरून शुजाशी तह केला; परंतु परतण्यास मात्र जयसिंगानं बराच उशीर केला. यानंतरच्या शामूगढच्या लढाईत औरंगजेबानं दाराचा पराभव केला. दारा तेथून निसटून लाहोरला गेला. शहाजहान आणि दारा दोघांनीही मुराद आणि शुजाला औरंगजेबाविरुद्ध फितवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. दारानं लाहोरमध्ये सैन्य उभं करण्याचा प्रयत्न केला. तो फसल्यावर दारा औरंगजेबाच्या पाठलागाला तोंड देत पंजाब, सिंध आणि अखेरीस गुजरातमध्ये पोहोचला. यावेळी दारासोबत कुटुंबाखेरीज फक्त दोन हजार सैनिक होते. तिथून पुन्हा मुलतानमार्गे कंदाहारला जाताना वाटेत बोलन खिंडीजवळ दाराची पत्नी नादिरा आजारपणामुळं मरण पावली. तिथलेच मलिक जीवन नामक एका जमीनदारानं दाराला पकडून औरंगजेबाच्या हवाली केलं. औरंगजेबानं दाराला ठार मारलं. दाराला सुलेमान, मेहेर, सिपिहर हे मुलगे आणि पाकनिहाद बानो आणि जहांझेब बानो या मुली होत्या. पैकी सुलेमानलाही नंतर मारण्यात आलं; मात्र उर्वरित मुलामुलींची लग्ने औरंगजेबानं स्वत:च्या आणि शुजा व मुरादच्या मुलांशी लावली. कोणत्याही मोगल बादशाहपेक्षा दाराचं ग्रंथप्रेम आणि हिंदू धर्माबद्दलची उत्सुकता अनेकपटींनी जास्त होती. त्याला प्रशासनाचाही प्रत्यक्ष अनुभव तुलनेनं उशिरा का होईना आलाच होता; तथापि लढाई आणि एकूण राजकारणात तो त्याच्या भावांपुढे अयशस्वी ठरला.

*दारा शुकोहवर ५ विद्यापीठांत रिसर्च पॅनल*
'दारा शिकोह हा खरा हिंदुस्तानी आणि भारतीयत्वाचा प्रतीक होता!' मुघलसम्राट शाहजहानचं ज्येष्ठ सुपुत्र दारा शुकोह यांच्याबद्धलचं हे मत ३ वर्षांपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी व्यक्त केलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून संघ औरंगजेबाचा मोठा भाऊ दारा शुकोह याचा 'खरा मुस्लिम' असं वर्णन करून त्यांचं जीवन आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे. अलीकडंच संघानं दारावर संशोधन प्रकल्पही सुरू केलाय. आगामी काळात दारा यांच्या विचारांना पुढं नेण्यासाठी संघ आणखी नवीन प्रकल्प सुरू करणार आहे. 'मीडिया रिपोर्ट्स'मध्ये याचा उल्लेख करण्यात आलाय. २०१७ मध्ये संघ प्रचारक चमललाल यांच्या स्मरणार्थ आयोजित एका कार्यक्रमात दारा शुकोह याच्याबाबत चर्चा झाली होती. यानंतर २०१९ मध्ये दारा शुकोह प्रकल्पाचं काम संघाचे सहकारी कृष्ण गोपाल यांच्याकडं सोपवण्यात आलं. गोपाल यांनी यासंदर्भात अनेक बैठका आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. आता संघानं दारा शुकोह याच्या जीवनाचा आणि शिकवणुकीचा प्रचार करण्याचा प्रकल्प सुरू केलाय. या प्रकल्पांतर्गत दारा शिकोह याच्या कलाकृतींवर संशोधन केलं जाणार असून त्याच्या पुस्तकांचं विविध भाषांमध्ये भाषांतर केलं जाणार आहे. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीनं अलीकडंच दारा शुकोह सेंटर अंतर्गत परस्पर संवादासाठी एक पॅनेल तयार करण्याची घोषणा केलीय. या पॅनेलमध्ये हिंदूंबरोबरच मुस्लिम, ख्रिश्चन विद्वान हिंदू इतिहास आणि श्रद्धा यावर संशोधन करणाऱ्या अभ्यासकांचा समावेश आहे. लवकरच जामिया मिलिया इस्लामिया, मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटी, दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी हे देखील असंच एक पॅनल तयार करणार आहेत. राष्ट्रीय उर्दू भाषा संवर्धन परिषद, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ आणि मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठ यांना दारा शुकोह यांच्यावरच्या संशोधनात संघाला मदत करण्यासाठी सामील करण्यात आलंय. यासोबतच, इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरला या विषयावर मुस्लिम विचारवंतांशी संपर्क वाढवण्याचं काम सोपवण्यात आलंय.

*दारा शुकोह यांची कबर शोधण्यासाठी समिती स्थापन*
२०२० मध्ये, दारा शिकोह यांच्या कबरेचा शोध घेण्यासाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयानं पुरातत्व शास्त्रज्ञांची ७ सदस्यीय समिती स्थापन केली होती. १६५९ मध्ये दारा शुकोह यांच्या हत्येनंतर त्यांना औरंगजेबानं दिल्लीतल्या हुमायूनच्या मकबऱ्यात दफन केलं होतं. हुमायूनच्या मकबऱ्यात जवळपास दीडशे कबरी आहेत आणि तिथं मकबऱ्याच्या मध्यभागी असलेल्या हुमायूनच्या कबरेशिवाय इतर कोणतीही कबर ओळखणं कठीण आहे. दिल्लीतल्या हुमायूनचा मकबरा, जिथं दारा शुकोह याला अज्ञात कबरमध्ये दफन करण्यात आलं होतं. याच कबरीची ओळख पटवण्याची जबाबदारी आता केंद्र सरकारनं पुरातत्व विभागावर सोपवलीय. शहाजहानचा राजेशाही इतिहासकार मोहम्मद सालेह कंबोह लाहोरी यांनी त्यांच्या 'शहाजहाँनामा' या पुस्तकात लिहिलं आहे की, जेव्हा दारा शुकोहला अटक करून दिल्लीत आणण्यात आलं तेव्हा त्याच्या अंगावर घाणेरडे कपडे होते. काही दिवसांनी औरंगजेबानं त्यांना ठार मारलं. त्याच घाणेरड्या आणि रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्ये त्याचा मृतदेह हुमायूनच्या मकबऱ्यात पुरण्यात आला.

*संघ दारा शुकोह यांच्या प्रचारात का व्यस्त आहे*
गेल्या काही वर्षात सरकारनं दारा शुकोह यांच्या प्रचारावर जोर दिलाय. २०१६ मध्ये दिल्लीतल्या औरंगजेब रोडचं नाव बदलून दारा शुकोह रोड असं करण्यात आलं. २०१७ मध्ये, राष्ट्रपती भवनाजवळच्या डलहौसी रोडचं नाव बदलून दारा शुकोह रोड असं करण्यात आलं. दारा शुकोह यांच्या प्रचाराचं कारण काय? किंबहुना, अनेक इतिहासकार औरंगजेबला कट्टरवादी आणि इतर धर्मांबद्दल भेदभाव करणारा मुस्लिम म्हणून पाहतात. औरंगजेबानं काशी, मथुरेसह अनेक शहरांतली प्रसिद्ध हिंदू मंदिरं नष्ट केली होती. २०१९ मध्ये संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल म्हणाले होते की, जर औरंगजेबाच्या जागी दारा शुकोह मुघल सम्राट असते तर देशाची परिस्थिती पूर्णपणे वेगळी असती आणि हिंदू आणि मुस्लिम संबंध सुधारले असते! या विधानावरून संघ दारा यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न का करत आहेत हे कळतं. औरंगजेबाची प्रतिमा हिंदूविरोधी असल्याचं जाणकारांचं मत आहे, तर दारा शुकोह हिंदूंप्रती उदारमतवादी होते आणि त्यांनी हिंदू उपनिषदांचं भाषांतर करून हिंदू धर्माचा प्रसार करण्याचं काम केलं. या कारणास्तव संघ दारांचा प्रचार करण्यात व्यस्त आहे. संघ दारा यांना उदारमतवादी मुस्लिम चेहरा मानतो, म्हणून मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून पुढं आणायचा आहे. दारा शुकोहचा प्रचार करून संघाला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेशही द्यायचा आहे, असं जाणकारांचं मत आहे. गेली अनेक वर्षे संघ मुस्लीम समाजाला त्यांच्याशी जोडण्यासाठी आपली पोहोच वाढवण्यात ताकद लावत आहे. दारा शुकोह याचा प्रचार हा त्या योजनेचा एक भाग आहे. आजच्या काळात संघ दोन धर्मांमधल्या समन्वयाची एक आशेचा किरण शोधत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नुकत्याच केलेल्या विधानातही त्याचा प्रत्यय येतो. काशी विश्वनाथ मंदिर-ज्ञानवापी मशीद वादावर मोहन भागवत यांनी हिंदूंना प्रत्येक मशिदीत शिवलिंगाचा शोध न घेण्याचं आवाहन केलंय. न्यायालयानं मात्र आता त्याला संमती दिलीय. संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी दारा शुकोह याच्याबद्धल चुकीचं वर्णन केल्यामुळं इतिहासकारांवर टीका केली होती. दारा शुकोह यांनी इस्लाम आणि हिंदू धर्मात ऐक्य साधण्यासाठी प्रयत्न केला असं संघाचं म्हणणं आहे.

*दारा शुकोह हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रवर्तक*
दारा शुकोह यांचा जन्म २० मार्च १६१५ रोजी राजस्थानमधल्या अजमेर इथं झाला. शुकोह हे मुघल सम्राट शहाजहान आणि त्यांची दुसरी पत्नी मुमतज महल यांचे पुत्र होते. शहाजहाननं त्यांचं नाव दारा ठेवलं, ज्याचा पर्शियन भाषेत याचा अर्थ खजिना किंवा ताऱ्यांचा मालक असा आहे. दारा शुकोह यांना १३ भावंडं होती, त्यापैकी फक्त ६ जगली; ती अशी, जहाँआरा, शाह शुजा, रोशनआरा, औरंगजेब, मुराद बक्श आणि गौहारा बेगम. दारा शुकोह यांनी १६३३ मध्ये नादिरा बानोशी विवाह केला. दारा शुकोह हे अतिशय उदारमतवादी होते. ऑर्थोडॉक्स-पुरातत्ववादी विचार नसलेले मुस्लिम मानले जातात. दारा यांना इस्लाम आणि विशेषतः हिंदू धर्मात रस होता. दारा यांनी केवळ इस्लामचाच नव्हे तर हिंदू, बौद्ध, जैन इत्यादी धर्मांचाही आदर केला. त्यांनी सर्व धर्मांकडं समान नजरेनं पाहिलं. दारानं अनेक हिंदू मंदिरांनाही दान दिल्याचं सांगितलं जातं. किंबहुना, दारा शुकोह यांच्याकडून उपनिषदांचं फारसी भाषेत भाषांतर करून घेण्याचा फायदा असा झाला की ते युरोपपर्यंत पोहोचले आणि तिथून त्याचं लॅटिन भाषेतही भाषांतर झालं, ज्यामुळं उपनिषद आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध होण्यास मदत झाली.  दारा शुकोह यांचं सर्वात प्रसिद्ध पुस्तक, मजमा-उल-बहारिन - 'द कॉन्फ्लुएंस ऑफ द टू सीज' म्हणजेच 'दोन समुद्रांचा संगम'. या पुस्तकात वेदांत आणि सूफीवाद यांचा तौलनिक अभ्यास आहे. दारा शुकोह यांचा नादिराशी झालेला विवाह मुघल इतिहासातल्या सर्वात महागड्या विवाहांमध्ये मानला जातो. त्यावेळी भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लंडच्या पीटर मॅंडी यानं त्या लग्नात ३२ लाख रुपये खर्च झाल्याचं लिहिलं आहे. एकट्या वधूच्या वस्त्रांची किंमत ८ लाख रुपये होती. एक छायाचित्र दारा शुकोह यांच्या लग्नसोहळ्यातलं आहे. यामध्ये घोड्यावर बसलेल्या दारांच्या मागे त्यांचे भाऊ शाह शुजा आणि औरंगजेब आहेत.

*शाहजहानने आपला उत्तराधिकारी घोषित केला*
दारा शुकोह यांनी आपला उत्तराधिकारी व्हावं अशी शहाजहानची नेहमीच इच्छा होती, परंतु असं कधीच होऊ शकलं नाही. १६५२ मध्ये शहाजहाननं दरबारात एक विशेष कार्यक्रम आयोजित करून दारांना गादीवर बसवलं आणि त्यांना बादशहाचा उत्तराधिकारी 'शाह-ए-बुलंद इक्बाल' घोषित केलं. दारा शुकोह यांना युद्धापेक्षा तत्त्वज्ञान आणि सूफीवादात जास्त रस होता असं इतिहासकारांचं मत आहे. इतिहासकार अविक चंदा यांनी आपल्या पुस्तकात म्हणजे 'दारा शुकोह: द मैन हू वुड बी किंग' मध्ये लिहिलं आहे की, 'दारा शहाजहान यांचे अत्यंत प्रिय पुत्र होते. लष्करी मोहिमेवर न पाठवता शहाजहान दारांना दरबारातच ठेऊन घेत असे. त्याच वेळी शहाजहानं औरंगजेबाला वयाच्या १६ वर्षी लष्करी मोहिमेसाठी दक्षिण भारतात पाठवलं. १६५७ मध्ये शहाजहान आजारी पडल्यानंतर मुघल साम्राज्यात उत्तराधिकाराचं युद्ध सुरू झालं. दारा यांच्यासमोर धाकटा भाऊ औरंगजेब याचं सर्वात मोठं आव्हान होतं. ३० मे १६५८ रोजी दारा शिकोह आणि त्यांचे दोन धाकटे भाऊ औरंगजेब आणि मुराद बक्श यांच्यात आग्रापासून १३ किमी अंतरावर 'समुगडची लढाई' झाली. या युद्धात दारांचा पराभव झाला. विजयानंतर औरंगरजेबानं आग्राचा किल्ला ताब्यात घेतला आणि ८ जून १६५८ रोजी वडील शाहजहान यांना गादीवरून काढून आग्रा इथं कैद केलं. मार्च १६५९ मध्ये दारा शुकोह आणि औरंगजेब यांच्यात दुसरं युद्ध झालं. आमजेरजवळच्या देवराईच्या युद्धात दारांचा पुन्हा पराभव झाला. इतिहासकार जदुनाथ सरकार आपल्या 'औरंगजेबाचा इतिहास' या पुस्तकात लिहितात, 'दारा काही घोडेस्वारांसह आग्रा किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर पोहोचले. संपूर्ण शहरात शांतता पसरली होती, जणू काही शहर शोक व्यक्त करत होतं. दारा शुकोह मुघल साम्राज्याच्या लढाईत हरले होते!'

*औरंगजेबाने दारा शुकोह यांना केले कैद*
युद्धातल्या पराभवानंतर औरंगजेबानं दारांना कैद करून दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवलं. इतिहासकारांचं म्हणणं आहे की, दारा शुकोह लोकांमध्ये खूप लोकप्रिय होते आणि औरंगजेबाला हे दाखवून द्यायचं होतं की केवळ लोकांमध्ये लोकप्रिय होऊन भारताचा सम्राट होऊ शकत नाही. औरंजेबानं दारा यांच्यासोबत जो क्रूरपण केला त्याचा उल्लेख अनेक इतिहासकारांनी केला आहे. फ्रेंच इतिहासकार François Bernier यांनी त्यांच्या 'Travels in the Mughal Empire' या पुस्तकात लिहिलंय की, 'दारा यांना साखळदंडानं बांधून हत्तीवर बसवून दिल्लीच्या रस्त्यांवर फिरवण्यात आलं. जगातल्या सर्वात श्रीमंत राजघराण्याचा वारस फाटक्या कपड्यांमध्ये आपल्याच लोकांसमोर अपमानित होत होता. त्यांची ही अवस्था पाहून तिथं उभ्या असलेल्या लोकांचे डोळे भरून आले. इतिहासकार अविक चंदा लिहितात की, 'औरंगजेबाचे सैनिक जेव्हा दारा यांना दिल्लीच्या रस्त्यांवरून नेत होते तेव्हा एक भिकारी त्यांना ओरडून म्हणाला, एकेकाळी तू राजा होतास, तेव्हा तू मला दान देत होतास. आज तुमच्याकडं देण्यासारखं काही नाही!' हे ऐकलं अन दारा यांनी खांद्यावरची शाल काढली आणि भिकाऱ्याच्या दिशेनं फेकली. काही दिवसांनी ३० ऑगस्ट १६५९ रोजी औरंगजेबानं दारांची हत्या केली. औरंगजेबानं दारांचं शिर ताटात सजवून आग्रा इथं कैदेत असलेल्या शहाजहानला अनमोल भेट म्हणून पाठवलं होतं. शहाजहाननं जेव्हा ते पाहिलं तेव्हा त्यानं हंबरडा फोडला. काही इतिहासकारांच्या मते, दारांचं शरीर दिल्लीतल्या हुमायूनच्या मकबऱ्याजवळ दफन करण्यात आलं होतं, तर त्यांचं शिर आग्रा इथल्या ताजमहालाजवळ औरंगजेबानं दफन केलं होतं. त्यामुळं आता दारा शुकोह यांची कबर नेमकी कोणती आणि तीच खरी कशावरून हे सिद्ध करणं या समितीपुढं एक आव्हान आहे! त्याचा शोध लागेल तेव्हा लागेल पण सरकारनं 'दारा शुकोह यांच्या नावानं शिष्यवृत्ती आणि पुरस्कार जाहीर करायला काय हरकत आहे?

*दाराची कबर शोधण हे जटील व अवघड काम*
मुघल बादशाह शहाजहानच्या काळातल्या इतिहासकारांचं लेखन आणि काह कागदपत्रांवरून दारा शुकोहला दिल्लीत हुमायून मकबऱ्याशेजारीच दफन केलं असावं, असा अंदाज आहे. दारा शुकोहची कबर शोधण्यासाठी मोदी सरकारनं पुरातत्त्व शास्त्रज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती साहित्य, कला आणि वास्तुकला यांच्या आधारे दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करतेय. दारा शुकोह बादशाह शहाजहान यांचे थोरले चिरंजीव होते. मुघल परंपरेनुसार वडिलांनंतर खरंतर तेच उत्तराधिकारी होते. मात्र, शहाजहान आजारी पडल्यानंतर त्यांचे तिसऱ्या क्रमांकाचे चिरंजीव औरंगजेबनं त्यांना सिंहासनावरून पायउतार करत आग्र्यात कैद केलं. त्यानंतर औरंगजेबनं स्वतःला बादशाह घोषित केलं आणि सिंहासनाच्या लढाईल थोरला भाऊ दारा शिकोहला हरवून त्यालाही कैद केलं. शहाजहान यांचे शाही इतिहासकार मोहम्मद सालेह कम्बोह लाहोरी 'शहाजहाननामा' या आपल्या पुस्तकात लिहितात, "शहजादा दारा शुकोहला अटक करून दिल्लीला आणण्यात आलं. त्यावेळी त्यांच्या अंगावर मळलेले कपडे होते. इथून त्यांना अत्यंत वाईट पद्धतीनं एखाद्या बंडखोराप्रमाणे हत्तीवर बसवून खिजराबादला नेण्यात आलं. काही काळ त्यांना एका छोट्याशा आणि अंधाऱ्या जागी ठेवण्यात आलं. यानंतर काही दिवसातच त्यांच्या मृत्यूचा आदेश काढण्यात आला." ते लिहितात, "काही जल्लाद त्यांचा खून करण्यासाठी कारागृहात गेले आणि क्षणात त्यांच्या गळ्यावर वार करत त्यांचा खून केला. त्यानंतर त्याच मळक्या आणि रक्तानं माखलेल्या कपड्यांमध्ये त्यांचं पार्थिव हुमायूनच्या मकबऱ्याशेजारी दफन करण्यात आलं." त्याच काळातले आणखी एक इतिहासकार मोहम्मद काजिम इब्ने मोहम्मद अमीन मुंशी यांनीही आपल्या 'आलमगीरनामा' या पुस्तकात दारा शुकोहच्या कबरीचा उल्लेख केला आहे. ते लिहितात, "हुमायूनच्या मकबऱ्यात बादशहा अकबरचे चिरंजीव दानियाल आणि मुराद यांचं पार्थिव ज्या घुमटाखाली दफन करण्यात आलं होतं त्याच ठिकाणी दाराचं पार्थिवही दफन करण्यात आलं. पुढे तैमूर वंशाचे शहजादे आणि शहजाद्यांनाही याच ठिकणी दफन करण्यात आलं होतं." अहमद नबी खान या पाकिस्तानी स्कॉलरनं १९६९ साली लाहोरमध्ये 'दिवान-ए-दारा दारा शुकोह' या त्यांच्या शोधनिबंधात दाराच्या कबरीचा एक फोटो प्रकाशित केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार वायव्येकडच्या कक्षातल्या तीन कबरी पुरुषांच्या आहेत. त्यातली दरवाज्याकडं असणारी कबर दारा शुकोहची आहे. हुमायून यांच्या विशाल मकबऱ्यात हुमायून व्यतिरिक्त अनेकांच्या कबरी आहेत. यापैकी मकबऱ्याच्या मध्यभागी स्थित कबर हुमायूनची असल्याची खात्रीशीर माहिती आहे. अलिगढ मुस्लीम विद्यापीठातले इतिहासकार प्राध्यापिका शिरीन मौसवी म्हणतात, "हुमायून यांच्या मकबऱ्यातील कुठल्याच कबरीवर शिलालेख नाही. त्यामुळं कोणती कबर कुणाची याची माहिती मिळू शकत नाही."दाराच्या कबरीचा शोध घेण्यासाठी सरकारनं पुरातत्त्व शास्त्रज्ञांची जी समिती स्थापन केली आहे त्यात पुरातत्त्व विभागाचे माजी प्रमुख डॉ. सय्यद जमाल हसन यांचाही समावेश आहे. ते म्हणतात, "इथं जवळपास दीडशे कबरी आहेत. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. त्यासाठीचा हा पहिला प्रयत्न आहे." ते म्हणतात, "आम्ही हुमायून यांच्या मकबऱ्याच्या मुख्य घुमटाखालच्या खोलीतल्या कबरींचं निरीक्षण करू. त्या कबरींचं डिझाईन्स तपासू कुठे काही लिहिलं आहे का, तेही बघू कला आणि वास्तुकलेच्या दृष्टीकोनातून दाराची कबर शोधण्याचा प्रयत्न करू!" मात्र, हे काम अवघड असल्याचं ते म्हणतात.

*सरकारला कबरीचा शोध घेण्याचं कारण काय?*
दारा शुकोह शहाजहान यांचे उत्तराधिकारी होते. साम्राज्यासोबतच तत्त्वज्ञान, सुफी विचारधारा आणि अध्यात्मावरही ज्याची पकड असेल, असा बादशहा होण्याची त्यांची इच्छा होती. त्यांच्याविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते त्याकाळातल्या प्रमुख हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि मुस्लिम सुफी धार्मिक नेत्यांशी चर्चा करत. इस्लामसोबतच हिंदू धर्मातही त्यांना बराच रस होता. ते सर्वच धर्मांना समान वागणूक द्यायचे. त्यांनी वाराणसीहून धर्मपंडितांना बोलावून त्यांच्या मदतीनं 'उपनिषदांचं' फारसी भाषांतर करवून घेतलं. उपनिषदांचं हे फारसी भाषांतर युरोपपर्यंत पोहोचलं. तिथं लॅटिन भाषेत त्यांचं भाषांतर करण्यात आलं. लॅटिनमध्ये भाषांतरीत झाल्यानं भारतीय उपनिषदांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. भारतात 'उदार शहजादा' अशी दारा शुकोहची ख्याती आहे. औरंगजेबऐवजी दारा शुकोह मुघल सल्तनतीचा बादशाह झाला असता तर देशाची परिस्थिती आज खूप वेगळी राहिली असती, असं काही इतिहासकार आणि विचारवंतांना वाटतं. या इतिहासकारांना औरंगजेब 'कठोर, कट्टरपंथी आणि भेदभाव करणारा मुस्लीम बादशाह' वाटतो. त्यांच्या मते औरंगजेब हिंदूंचा द्वेष करायचा आणि त्यानं अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली. हा समज आजच्या राजकीय परिस्थितीत अधिक बळकट होताना दिसतोय. आम्ही ज्या इतिहासकारांशी बातचीत केली त्यांच्या मते औरंगजेब यांच्या उलट दारा शुकोहवर हिंदू धर्माचा प्रभाव होता आणि तो हिंदूंच्या धार्मिक श्रद्धेचा आदर करायचा. हिंदुत्त्ववादी संघटना असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपनं भारतावर मुस्लिम शासकांनी जवळपास सात शतकं केलेलं साम्राज्य म्हणजे 'हिंदुंच्या गुलामगिरीचा काळ होता', असं म्हटलं आहे. आधुनिक काळात मुस्लिम शासकांच्या काळाचा विशेषतः मुघल शासकांचा आणि तत्कालीन घटनांचा कायमच भारतातल्या मुस्लिमांविरोधात द्वेष निर्माण करण्यासाठी वापर केला जातो. आता एक असं गृहितक तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे की, आजच्या मुस्लिमांच्या तुलनेत दारा शुकोह भारतीय मातीशी अधिक एकरुप होता.

*भारत सरकार दाराच्या कबरीचं काय करणार?*
दारा शुकोह एक आदर्श आणि उदार व्यक्तिमत्त्व होतं, असं मोदी सरकारला वाटतं. त्यामुळं दाराला मुस्लिमांचा आदर्श बनवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी दारा शुकोहच्या कबरीचा शोध लागल्यानंतर धार्मिक सद्भावनेचा एखादा वार्षिक उत्सव किंवा कार्यक्रम आखला जाण्याचीही शक्यता आहे. सत्ताधारी भाजपचे नेते सैय्यद जफर इस्लाम म्हणतात, "दारा शुकोह असं व्यक्तिमत्त्व होतं ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि एक शांतता मोहीम राबवली. सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना याची किंमतही चुकवावी लागली. आजच्या मुस्लीम समाजातही दारांसारखे विचार आणि आकलनक्षमतेची गरज आहे. "दारा शुकोहला मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून सादर करण्याचा विचार भारतातल्या मुस्लिमांना इथले धर्म आणि इथल्या चालीरिती यांच्यात पूर्णपणे मिसळता आलं नाही आणि ते त्यांचा स्वीकारही करू शकलेले नाहीत, या समजावर आधारित आहे. मात्र, काही टीकाकार दारा शुकोहला त्यांची उदारता आणि धार्मिक सलोख्याच्या विचारांसाठी केवळ मुस्लिमांचा नव्हे तर संपूर्ण देशाचा रोल मॉडेल का करू नये, असा सवालही विचारतात. कबरीचा शोध घेण्याबरोबरच केंद्र सरकारनं दाराच्या साहित्यसंपदेचं पुनर्मुद्रण करावं. त्याशिवाय त्यांच्या त्या साहित्य संपदेचं वेगवेगळ्या भाषेत भाषांतरित करून वाचकांना उपलब्ध करून द्यावीत याशिवाय शालेय आणि महाविद्यालयातल्या अभ्यासक्रमातून दारा शुकोह यांच्याबाबत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी. वर म्हटल्याप्रमाणे दारा शुकोह यांच्या नावे पुरस्कार आणि विविध पारितोषिकं ठेवावीत. लोकांमध्ये सर्वधर्मसमभाव निर्माण होण्यात दारा शुकोहची लेखनसंपदा सहाय्यभूत ठरेल!
-हरीश केंची,
९४२२३१०६०९

पटेल, गांधी आणि आता नेताजी...!

"गांधी हत्येनंतर संघावर बंदी घालणाऱ्या सरदार पटेलांचा जगात उंचीनं सर्वोच्च ठरेल, असा पुतळा भाजपनं उभारलाय. पटेल यांना नेहरू विरोधक म्हणून उभं करण्याचा प्रयत्न केलाय. हेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत केलं जातंय. गांधीजींनी बोसांना डावलून नेहरूंना बढ़ावा दिला, अशी मांडणी संघ-भाजपनं यापूर्वीही केलीय. स्वंतंत्र्यलढ्यातल्या प्रतीकांचं अपहरण भाजपनं केलंय. गांधीजींना, पटेलांना बोसांना जवळ करण्यात कुणाचीही हरकत नाही. पण गांधीजींना स्वीकारायचं तर नथुरामला सोडावं लागेल, सुभाषचंद्रांचा अंगीकार करायचा तर नेहरूंचा स्वीकार करावा लागेल. यामुळंच त्यांचं पटेल, बोस, गांधी यांचं प्रेम बेगडी ठरतं. इथं नथुरामला डोक्यावरून मिरवता येत नाही, पण गांधीजींना, बोसांना, पटेलांना मिरवता येतं आणि या निमित्तानं स्वतःला मिरवून घेता येतं म्हणून गांधीजीं, वल्लभभाई, सुभाषचंद्र यांना मिरवायचंय. असा हिशेब! त्यासाठी वल्लभभाईंच्या पुतळ्यानंतर आता सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा घाट घातलाय!"
-----------------------------------------------------

*ने* ताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर त्यांचा पुतळा बसवण्यात येईल, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली. त्याशिवाय प्रजासत्ताक दिनानिमित्तचे कार्यक्रम यापुढं आता २३ जानेवारी या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जन्मदिनापासून सुरू होतील, तर ३० जानेवारीला महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी संपतील, असा निर्णयही सरकारनं घेतलाय. आज काल भाजप नेत्यांना नेताजी सुभाषचंद्र बोसांची फारच आठवण येऊ लागलीय! आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी ज्या ज्या नेत्यांनी बलिदान दिलं त्यांच्याविषयी आज उशिरानं का होईना, यांना आदर व्यक्त करावासा वाटत असेल तर, आपण कशाला विरोध करायचा? अर्थात, आदर म्हणजे केवळ नेताजींची टोपी घालणं नव्हे, त्यांच्या तसबिरीला फुलं वाहणं नव्हे किंवा 'आयटी सेल'नं तयार केलेले मेसेजेस फॉरवर्ड करणं नव्हे! नेताजींच्या विचारांचा शोध घेणं आणि त्यांच्या विचारांना समजून घेणं, याचा समावेश जर त्यांच्याविषयी आदर व्यक्त करताना असेल; तरच, त्याला आपण प्रामाणिक श्रद्धांजली म्हणू शकतो. तर मग, असं पाहू की, नेताजी सुभाषबाबुंचे हिंदुत्ववाद्यांबद्दल नक्की काय विचार होते, हे ही अत्यंत गरजेचं आहे. १९३८ मध्ये सुभाषचंद्र बोस, हे काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यावर त्यांनी संघटनेच्या घटनेत एक दुरुस्ती प्रस्ताव आणला होता. सुभाषबाबुंच्या या प्रस्तावाद्वारा हिंदू महासभा अथवा मुस्लिम लीग, अशा दोन जातीय संघटनांचे सदस्यत्व असलेल्या कुणाही व्यक्तीला, काँग्रेस संघटनेच्या कोणत्याही निर्वाचित समितीचं सदस्यत्व देण्यापासून प्रथमच रोखण्यात आलं. कलकत्ता कॉर्पोरेशनच्या निवडणुकी संदर्भातल्या १ मार्च १९४० च्या ‘फॉरवर्ड’ या नियतकालिकेमधल्या आपल्या संपादकीय लेखात सुभाषबाबूंनी हिंदू महासभा आणि इंग्रजांच्या संगनमताबद्धल स्पष्टपणे लिहिलं आहे. ते लिहितात, 'हिंदू महासभेच्या नेत्यांनी केलेल्या कट-कारस्थानांनी मी व्यथित आणि दुःखी झालो आहे. त्यांची ही खेळी स्वच्छ आणि शुद्धपणाची नव्हती! इंग्रज आणि त्यांचे भाडोत्री उमेदवार यांच्याशी साटंलोटं करुन संयुक्त आघाडी तयार करण्यामध्ये त्यांनी शक्ती पणाला लावली! हिंदू महासभेनं हे पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, इंग्रजांना कॉर्पोरेशनपासून दूर ठेवण्यापेक्षा त्यांना अधिक रस, हा काँग्रेसला पाडण्यामध्ये आहे....!' १९४२ मध्ये गांधीजींनी ब्रिटिशांविरुद्धचं अखेरचं आणि निर्णायक 'भारत छोडो' आंदोलन छेडलं. सारा देश ढवळून निघत होता. नेताजी त्यावेळी परदेशात होते आणि ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढण्याची तयारी करीत होते. गांधीजींशी मतभेद असूनही आणि काँग्रेसपासून दूर जाऊनही, नेताजी १९४२ मध्ये भारतीय जनतेला 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत होते. त्यांनी 'आझाद हिंद रेडिओ'द्वारा भारतीय जनतेला उद्देशून दिलेली सारी भाषणं आज इंटरनेटवर उपलब्ध आहेत. हिंदू महासभेनं मात्र, या आंदोलनावर बहिष्कार टाकत मुस्लिम लीगची साथ दिली. हे पाहून ऑगस्ट १९४२ च्या रेडीओवरील भाषणात नेताजी म्हणाले, '...श्री जिन्ना आणि श्री सावरकरांना, जे आजही ब्रिटिशांबरोबर तडजोड करू पाहताहेत, त्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, भविष्यातल्या उद्याच्या जगामध्ये ब्रिटिश साम्राज्याचा लवलेशही नसेल, हे लक्षात घ्या! व्यक्ती, समूह किंवा दल, जे जे म्हणून भारतीय स्वातंत्र्याच्या या लढ्यात सहभागी होतील, त्यांना उद्याच्या त्या भारतात मानाचं स्थान असेल! पण, ब्रिटिश साम्राज्याच्या पाठराख्यांना मात्र, त्या स्वतंत्र भारतात काहीही किंमत नसेल....!' आज स्वातंत्र्याला ७० वर्ष उलटून गेल्यावर धर्मांध शक्ती प्रबळ झालेल्या पाहून सुभाषबाबू काय म्हणाले असते? मला वाटतं, १२ मे १९४० रोजी बंगालच्या झारग्रामला त्यांनी निवडणुक सभेमध्ये लोकांना जे सांगितलं तेच नेमकं म्हणाले असते! ते म्हणाले होते, 'हिंदू महासभेनं मतांची भीक मागण्यासाठी हातात त्रिशूळ घेऊन साधू आणि साध्वींना तैनात केलं आहे. त्रिशूळ आणि भगवी-वस्त्र पाहताच सामान्य हिंदू नतमस्तक होतात. अशाप्रकारे धर्माचा गैरवापर करीत हिंदू महासभेनं राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश केला आहे. ही कृति, धर्माला अपवित्र करणारी आहे. म्हणूनच, याचा विरोध करणं प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे! या गद्दारांना राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करा. त्यांचं अजिबात ऐकू नका...!' हे नेताजींचे तेव्हाचे विचार आजही लागू होताहेत!

भारतीय जनता पक्ष किंवा आधीचा जनसंघ किंवा त्यांची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचे महात्मा गांधीजींशी तसे काहीच संबंध नाहीत. तरीही देशाचा सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांच्यावर गांधीजींची १५० वी जयंती साजरी करण्याची वेळ आली होती. या भूमिकेत ते नसते तर त्यांनी पक्षीय आणि संघटनात्मक पातळीवर मोठ्या प्रमाणात गांधीजींची १५० वी जयंती साजरी केली नसती, कारण आजवर त्यांची गांधींजींचे आणि गांधीविचारांचे द्वेष्टे म्हणूनच ओळख आहे. रा. स्व. संघानं गांधींजींचं नाव प्रातः स्मरणीय लोकांच्या यादीत समाविष्ट केलं असलं, तरी ते तेवढ्यापुरतंच आहे. प्रत्यक्षात, सगळी नीती ही 'मुंह में गांधी, बगल में नथुराम..!' अशीच असल्याचं वेळोवेळी दिसूनही आलंय. संघ परिवाराशी संबंधित अनेक नेते खोड असल्यागत नथुरामचा उदोउदो करीत असतात. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये नथुरामचे पुतळे आणि मंदिर उभारण्यापर्यंत या प्रवृत्तींचं धाडस वाढलं आहे. संघाच्या आदराच्या नावांत समाजवाद्यांच्या सानेगुरुजींचाही सध्या समावेश आहे. कम्युनिस्टांचे भाई डांगे, ज्योति बसू यांचाही समावेश कदाचित एव्हाना झाला असेल. परंतु, संघ-भाजप परिवारासाठी डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी हीच पूज्यनीय नावं आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदी सरकार कुठल्याही सरकारी योजनांना नावं देताना आपल्या खास पूज्यनीयांचीच नावं देतात. तिथं त्यांना गांधीजी, सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल आठवत नाहीत. तथापि, त्यांना रोज नाव मात्र गांधीजींचंच घ्यावं लागतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेसात वर्षात शंभरहून अधिक परदेश दौरे केले आहेत. त्यांनी प्रत्येक दौऱ्यात भाषणांचा रतीब घातलाय. त्यात त्यांनी गांधीजींचा आवर्जून उल्लेख केला. कधी बुद्धाचा उल्लेख केला. तो करताना त्यांना किती त्रास होत असेल, परंतु, त्यांचाही नाइलाज आहे. कारण त्यांच्या पक्ष आणि संघाचे आयडॉल असलेल्या दीनदयाळ उपाध्याय किंवा श्यामाप्रसाद मुखर्जी यांना किंवा हेडगेवार, गोळवलकर यांना भाजप, संघ परिवाराबाहेर कुणी ओळखत नाही. दीनदयाळ किंवा श्यामाप्रसाद यांच्या कर्तृत्वाबाबत शंका घेण्याचं किंवा त्यांना कमी लेखण्याचं कारण नाही. भारतीय राजकारणात त्यांचं म्हणून योगदान मोठं आहे; ते त्यांनी समरसून दिलंय. विचारधारा वेगळी आहे. म्हणून मोदी ज्याप्रमाणे उठता बसता नेहरूंचा द्वेष करतात, तसा कुणाचा अनादर करण्याचं कारण नाही. तथापि, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय यांचं भारतीय राजकारणातलं योगदान त्यांच्या पक्षाच्या जनसंघाच्या उभारणी पुरतंच आणि हेडगेवार, गोळवलकर यांचं संघ उभारणी पुरतंच मर्यादित राहिलं आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या उभारणीतल्या त्यांच्या कर्तृत्वाविषयी काहीही सांगण्यासारखं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या संदर्भानं त्यांना कुणी ओळखतही नाही. त्यामुळं स्वाभाविकपणे मोदी जेव्हा जेव्हा परदेशात जातात, तेव्हा त्यांना गांधीजींचा उदोउदो करण्यावाचून पर्याय नसतो. मोदींच्या 'अच्छे दिन'च्या भुलावणीनं भाजपची सत्ता देशात आली. मोदी प्रधानमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जे देशव्यापी स्वच्छता अभियान सुरू केलं, त्याची सुरुवात २०१४ च्या गांधी जयंतीपासून केली. आता तर, मोदी सरकारनं गांधीजींची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती भव्यदिव्य प्रमाणावर साजरी केली. याचाच दुसरा अर्थ असा की, आपल्याशी संबंधित नसलेल्या अनेक प्रतीकांचे अपहरण करण्याचा प्रयत्न भाजपनं सत्तेवर आल्यापासून केला, तो जारी आहे. ज्या सरदार वल्लभभाई पटेल यांनी महात्मा गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती, त्याच सरदार पटेल यांचा जगात उंचीनं सर्वोच्च ठरेल, असा पुतळा भाजप सरकारनं गुजरातेत उभारला आहे. सरदार पटेल यांना नेहरू आणि काँग्रेसचे विरोधक म्हणून उभं करण्याचा प्रयत्न संघ-भाजपनं कायमच केलाय. हेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बाबत केलं जातंय. गांधीजींनी बोस यांना डावलून नेहरूंच्या नेतृत्वाला बढ़ावा दिला, अशी मांडणी संघ-भाजपच्या लेखनकामाठ्यांनी यापूर्वीही केलीय. त्या बळावर पश्चिम बंगालमध्ये हातपाय पसरण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला भाजपनं उमेदवारी दिली होती. त्याआधी कम्युनिस्ट विचाराचे असलेल्या शहीद भगतसिंग यांच्या परिवारातल्या सदस्यालाही आपल्या परिवारात ओढण्याचा प्रयत्न भाजपनं केला होता. अशाचप्रकारे 'डॉ. हेडगेवार, डॉ. आंबेडकर' जोडी लावून समरसता पिळून काढण्यात आली. ‘शिवाजी म्हणतो' हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवरचा फार जुना 'हुकमी' खेळ. त्यानुसारच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत छत्रपती शिवाजीराजांच्या आशीर्वादाचा खेळ खेळून शिवसेनेचं नाक कापण्यात आलं. आता मुंबई समुद्रातल्या शिवस्मारकाचा खेळ रखडून ठेवलाय. राजर्षी शाहूंच्या वंशजांना राज्यसभेच्या खासदारकी देऊन शाहूविचार सोयीनुसार नाचवण्याचाही उद्योग करून झाला. वल्लभभाई पटेल, गांधीजीं आणि सुभाषचंद्र बोस यांचे अपहरण ही त्यापुढची पायरी म्हणता येईल. भाजपनं किंवा आणखी कुणीही गांधीजींना, सुभाषचंद्र बोस यांना जवळ करण्यात कुणाचीही हरकत असण्याचं कारण नाही. आक्षेप एवढाच आहे की, गांधीजींना स्वीकारायचं तर त्यांची हत्या करणाऱ्या नथुरामला सोडावं लागेल परंतु तेही करायचं नाही. म्हणजे, नथुरामला खेळवत, वाढवत गांधीजींचा स्वीकार करायचा, सुभाषचंद्र बोसांचा अंगीकार करायचा तर नेहरूंचाही स्वीकार करावा लागेल. पण खोटा उद्योग संघ-भाजप करीत आहे. यामुळंच त्यांचं वल्लभभाई, सुभाषचंद्र, गांधीप्रेम बेगडी ठरतं. इथं नथुरामला डोक्यावरून मिरवता येत नाही, पण गांधीजींना, बोसांना, पटेलांना मिरवता येतं आणि या निमित्तानं स्वतःला मिरवून घेता येत म्हणून गांधीजीं, वल्लभभाई, सुभाषचंद्र यांना मिरवायचं आहे. असा मोदी सरकारचा हिशेब असल्यानं १५० वी गांधी जयंती हा सरकारी मेगा इव्हेंट केला. वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्यानंतर आता सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याचा घाट घातलाय!

सत्ता पक्ष-संस्था-संघटना कोणतीही असो; केवळ इव्हेंट करून पटेल, बोस गांधीजींचं स्मरण करता येणार नाही. कारण ह्या व्यक्ती नव्हत्या, तो एक विचार होता. ती एक जीवनशैली होती. गांधीजी गोरक्षाचे पुरस्कर्ते होते. परंतु गोरक्षेसाठी जमाव करून निरपराधांची हत्या करणं, गांधीजींच्या विचारात बसत नाही. गांधीजी शाकाहारी होते. पण, कुणी काय खावं, यासाठी बलप्रयोगाचा वापर करण्याच्या बाजूचे कधीच नव्हते. गांधीजी अहिंसेचे पुजारी होते. राम रहिम एकच मानणारे होते. मंदिर-मशीद असा भेद करून दहशतवादाला चालना देणारे नव्हते. या विपरित संघ-भाजपचा विचार, व्यवहार आहे. गांधीजी स्वच्छतेचे पुरस्कर्ते होते, परंतु तेवढाच उद्योग करीत नव्हते. मोदी सरकारनं मात्र जे सोपं आणि दिखाऊ असेल, तेवढं घेण्याच्या वृत्तीमुळं स्वच्छता अभियान घेतलं. सफाई कामगारांनी स्वच्छ केलेल्या ठिकाणी झाडू मारण्याचं प्रदर्शन करून स्वच्छता अभियान राबवलं जातं आणि गांधीजींना केवळ स्वच्छता अभियानात बंदिस्त करून टाकलं जातं. गांधीजीचे विचार संपवण्याचाच हा उद्योग आहे. स्वच्छता अभियानमुळं गेल्या साडेसात वर्षांत देशातल्या हागनदारीमुक्त गावांची संख्या ३८ वरून ९४ टक्क्यांपर्यंत वाढल्याचं प्रधानमंत्री मोदी सांगतात. हे खरं असेल तरच चांगलंच आहे. परंतु, ही प्रगती सरकारची महती सांगणारी नाही, हे मोदींना कोण सांगणार? गांधीजीनी राज्यकर्त्यांसाठी एक मार्गदर्शक सूत्र सांगितलंय ते असे 'कोणताही निर्णय घेताना तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहिलेला सर्वाधिक दीनवाणा चेहरा समोर आणा. तुमच्या निर्णयामुळे त्या चेहऱ्यावरची एखादी तरी रेषा बदलणार आहे. का, याचा विचार करा...!' या सूत्राचा विचार केला, तर सद्यस्थिती अगदीच उलटी दिसते. कारण मोदी सरकारच्या अजेंड्यावरून असा दीनवाणा माणूस, गरीब माणूस गायब झाला आहे. देशातले जे मूठभर धनिक आहेत, जे निवडणुकीसाठी पैसा पुरवणारे आहेत त्यांच्या हितसंबंधांसाठीचेच निर्णय प्राधान्यानं घेतले जातात. श्रीमंत उद्योजकांची थकवलेली लाखो कोटी रुपयांची कर्जे माफ केली जातात. आणि नोटाबंदीच्या तुघलकी निर्णयात करोडो रुपयांच्या किमतीचा शेतमाल सडवून शेतकरी कर्जबाजारी केला जातो. लघुउद्योग बंद पडतात. लाखो नोकऱ्या घालवल्या जातात. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना मोडीत काढणारा हा उद्योग आहे. आपल्या हितसंबंधितांचे कल्याण, हेच सूत्र बनलं आहे. भाजपनं एकेका राष्ट्रीय व्यक्तिमत्त्वाचं अपहरण सुरु ठेवलं असताना कितीही प्रयत्न केले, तरी गांधीजी त्यांच्या सापळ्यात अडकत नाहीत. नेताजी सुभाषचंद्र बोस त्यांना सापडत नाहीत. सरदार वल्लभभाई पटेल हाताशी लागत नाहीत. ही भाजप विरोधात असलेल्या काँग्रेससाठी एक सुवर्णसंधी आहे. काँग्रेसनं या संधीचा लाभ घेतला नसता, तर त्यासारखा करंटेपणा दुसरा कुठला ठरला नसता. देशभरात सपाटून मार खाल्ल्यानंतर अलीकडं काँग्रेस बदलायला लागलीय. काँग्रेसमध्ये आक्रमकता आणून भाजप आणि संघ परिवारविरोधात खंबीर आवाज दिलाय. त्यांच्या आक्रमकपणामुळंच सरसंघचालकाना बचावात्मक पवित्रा घेऊन स्वातंत्र्यसंग्रामातल्या काँग्रेसच्या योगदानाबद्धलच गौरवोद्गार काढावं लागलं. देशातली सध्याची स्थिती, राज्यकर्त्यांची जनविरोधी धोरणं, आजच्या राजकीय परिस्थितीतली काँग्रेसची भूमिका आणि सेवाग्रामचा इतिहास या सगळ्यांचा विचार करता यापुढची प्रत्येक निवडणूक गांधी विरुद्ध गोडसे अशी होणार आहे. गोडसे नाकारायची हीच अखेरची संधी आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


गांधीजींना मरणच नाही....!


"आज महात्मा गांधी यांची पुण्यतिथी...! स्वातंत्र्यानंतर लगेचच ७४ वर्षांपूर्वी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. पण गांधीजी संपले नाहीत. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांत हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण करत त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेला 'देशभक्त' म्हटलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी शंभरहून अधिक परदेश दौरे केले आहेत. त्यात त्यांनी गांधीजींचा आवर्जून उल्लेख केलाय. कधी बुद्धाचा उल्लेख केलाय. तो करताना प्रधानमंत्र्यांना किती त्रास होत असेल, परंतु, त्यांचाही नाइलाज आहे!"
---------------------------------------------------------

*३०* जानेवारी १९४८....! दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये संध्याकाळी ५.१० वाजता महात्मा गांधी त्यांच्या खोली बाहेर पडले. महात्म्याला पाहायला, भेटायला, गाऱ्हाणं मांडायला, चर्चा करायला त्या दिवशी जरा जास्तच लोक आले होते. काही वेळातच पिस्तुलातून सुटलेल्या गोळ्यांचा आवाज आला आणि सगळेच काही क्षण थबकले. कानठळ्या बसवणारी ती शांतता संपल्यावर लोक भानावर आले. महात्मा गांधी खाली कोसळले होते आणि नथुरामच्या पिस्तुलातून अजूनही धूर येतच होता...! नथुरामला तात्काळ पकडण्यात आलं आणि लोकक्षोभापासून दूर ठेवण्यासाठी एका बाजूला नेण्यात आलं. नथुराम विनायक गोडसेनं भारताचे सर्वांत आदरणीय नेते असणाऱ्या मोहनदास करमचंद गांधी यांच्यावर आजच्या दिवशी ३० जानेवारी १९४८ रोजी काही फुटांच्या अंतरावरून गोळ्या झाडल्या. दिल्लीत प्रार्थनासभेवेळी झालेल्या या हल्ल्यात गांधींजींचा मृत्यू झाला. गांधींजींच्या हत्येच्या १० दिवस आधीही म्हणजे २० जानेवारीला नथुराम आणि त्याच्या साथीदारांनी गांधींजींवर हल्ला केला होता. २० जानेवारीच्या त्या घटनेनंतर जर पुरेशी दक्षता घेतली असती तर आजचा इतिहास काही वेगळा असता. २० जानेवारी रोजी ते बिर्ला हाऊसच्या बागेत प्रार्थनेसाठी पोहचले. प्रार्थनेसाठी शेकडो लोक जमा झाले होते. इथं गांधींजींसाठी एक छोटंसं व्यासपीठ तयार करण्यात आलं होतं. त्या व्यासपीठावरुन ते बोलू लागले पण माइक खराब होता. तरी देखील त्यांनी आपलं भाषण सुरू ठेवलं, 'जे मुस्लिमांचे शत्रू आहेत ते भारताचेही शत्रू आहेत' असं ते म्हणाले. तितक्यात एक स्फोट झाला. इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोजिव्ह डिव्हाइसनं-ईआयडीनं हा स्फोट घडवून आणला होता. व्यासपीठापासून काही अंतरावरच हा स्फोट झाला होता!' अशी माहिती तुषार गांधी यांनी 'लेट्स किल गांधी' हे पुस्तकात दिली आहे. नथुराम गोडसेचा सहकारी दिगंबर बडगे सर्व्हंट क्वार्टरमध्ये लपला होता. तिथून त्यानं गोळीबार करायचा, असा कट होता. पण त्याचं धाडस झालं नाही आणि सर्वांनी तिथून पळ काढला. हा कट नथुराम गोडसेनं रचला होता. नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे आणि नारायण आपटे यावेळी इथं उपस्थित होते. हॅंडग्रेनेड टाकणाऱ्या मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. पण त्याचे सर्व साथीदार मात्र पळून गेले. या घटनेच्या १० दिवसांनंतर म्हणजे ३० जानेवारी १९४८ ला बिर्ला हाऊसमध्येच नथुराम गोडसेनं प्रार्थनेच्या वेळीच गांधींजींवर गोळ्या झाडल्या.

त्यापूर्वी गांधीजींच्या हत्येचा ४ वेळा प्रयत्न झाला होता आणि सर्वांत धक्कादायक गोष्ट म्हणजे हे प्रयत्न नथुराम गोडसे आणि त्याच्या साथीदारांनीच केले होते. पुण्यात टाऊन हॉलजवळ गांधींजींच्या ताफ्यातल्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकण्यात आलं होतं. १९३४ मध्ये गांधी हरिजन यात्रेनिमित्त पुण्यात आले होते. दोन कारमधून गांधी आणि त्यांचे सहकारी येत होते. गांधींची कार टाऊन हॉलला उशिरा पोहचली. पण हल्लेखोरांना वाटलं की पहिल्याच कारमध्ये गांधी आहेत. त्यांनी त्यांच्या गाडीवर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती. दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. १९४४ मध्ये गांधींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणीत नेण्यात आलं होतं. दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. गांधींजींचे रक्षक भिलारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळं त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिलारे गुरूजींनी म्हटलं होतं. गांधींजींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. १९४४ मध्ये गांधी वर्धा स्टेशनहून रेल्वेनं जाणार होते. त्यावेळी एक युवक गांधींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं गांधींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे. चौथा प्रयत्न पुढच्याच वर्षी म्हणजे १९४५ मध्ये गांधींजी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेनं येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्यानं करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला.
गांधीजी पुण्याला आले आणि म्हणाले ज्या लोकांना मला मारावयाचं आहे त्यांनी मला खुशाल मारावं. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.
अडतीस वर्षांचा नथुराम हिंदू महासभेचा सदस्य होता. गांधी मुस्लिमांचा अनुनय करत असून पाकिस्तानला झुकतं माप देत आहेत आणि त्यांनी हिंदूंचा विश्वासघात केला आहे, असा आरोप हिंदू महासभेनं केला होता. हिंदू महासभेनं फाळणीमधल्या रक्तपातासाठीसुद्धा गांधींना दोषी ठरवलं. गांधीहत्येनंतर वर्षभरानं न्यायचौकशी न्यायालयात गोडसेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. उच्च न्यायालयानं हा निकाल कायम ठेवल्यानंतर नोव्हेंबर १९४९ मध्ये त्याला देहदंडाची शिक्षा झाली. या गुन्ह्यातला त्याचा साथीदार नारायण आपटे यालाही देहदंड झाला आणि इतर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली. हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता. सध्या केंद्रात सत्ता गाजवणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवार ९५ वर्षं हिंदू राष्ट्रवादाची पताका घेऊन चालतो आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी स्वतः संघप्रचारक राहिले आहेत, आणि त्यांच्या सरकारमध्ये आणि सरकारच्या बाहेरही संघाचा खोलवर प्रभाव आहे. 'राष्ट्रपित्या'ची हत्या करणाऱ्या गोडसेशी आपला काहीही संबंध नाही, अशी भूमिका संघानं अनेक दशकं घेतली होती परंतु अलीकडच्या काही वर्षांमध्ये उजव्या हिंदू गटांनी गोडसेचं गौरवीकरण त्याच्या कृत्याचं उदात्तीकरण सुरू केलंय आणि गांधीहत्येचीही ते उघडपणे प्रशंसा करताहेत. गेल्यावर्षी, भडक भाषणं करणाऱ्या भाजपच्या एका खासदारानं गोडसेचं वर्णन 'देशभक्त' असं केलं होतं. बहुतांश भारतीयांनी याबाबत रोष व्यक्त केला असला, तरी संघानं आपली भूमिका सोडलेली नाही. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी गोडसेनं संघाला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु, संघाचं हे म्हणणं वस्तुस्थितीला धरून नसल्याचा दावा एका पुस्तकात करण्यात आला आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून काही महिनेच झाले होते. आणि देशात ठिकठिकाणी धार्मिक तणावाचं वातावरण होतं. 'हिंदू, शीख आणि मुस्लिमांमध्ये एकेकाळी बंधुभाव होता. आता तो राहिला नाही, हे पाहून माझ्या मनाला यातना होत आहेत!' असं गांधीजींनी म्हटलं होतं असं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसनं प्रकाशित केलेल्या आणि स्टॅनेले वॉलपर्ट यांनी लिहिलेल्या 'गांधीज मिशन' या पुस्तकात म्हटलंय. 'सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी आमरण उपोषण करणार आहे!' अशी घोषणा गांधींजींनी १२ जानेवारीला केली होती आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी उपोषण सुरू केलं. 'तुम्ही तुमचं उपोषण सोडा,' अशी विनंती करण्यासाठी देशभरातून लोक येत असत. या लोकांसमवेत महात्मा गांधी नित्यनेमानं प्रार्थना करत. पण त्यांनी आपलं उपोषण काही सोडलं नाही. 'जेव्हा मला खात्री होईल की सर्व धर्मांच्या लोकांमध्ये सलोखा निर्माण झालाय, तेव्हाच मी माझं उपोषण सोडणार आहे!' असं त्यांनी निग्रहानं सांगितलं, अशी नोंद वॉलपर्ट यांच्या या पुस्तकात आहे. 'जर माझ्या अकार्यक्षमतेमुळं या देशातला हिंसाचार नियंत्रणात येत नाही, असं बापूंना वाटत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देतो!' असं गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं. पण गांधींजींनी त्याही गोष्टीला नकार दिला. १०० हून अधिक नेत्यांनी महात्मा गांधींना उपोषण सोडण्यासाठी विनंती केली होती. आम्ही शपथ घेऊन सांगतो की आम्ही धार्मिक सलोखा ठेऊ, असं आश्वासन त्यांनी वारंवार दिलं. त्यानंतर १८ जानेवारीला त्यांनी आपलं उपोषण सोडलं. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद असे प्रमुख नेते उपस्थित होते. 'आम्ही या पुढं बंधुभावानं राहू, असं सात कलमी आश्वासन सर्व गटांच्या नेत्यांनी लिहून दिलं. कोणत्याही स्थितीत आम्ही ही प्रतिज्ञा मोडणार नाही, असं ही त्यात म्हटलं होतं!' अशी नोंद या पुस्तकात आहे.

शाळा सोडलेला, भिडस्त स्वभावाचा नथुराम काही काळ टेलर म्हणून काम करत होता, त्यानंतर त्यानं फळं विकण्याचाही व्यवसाय केला, मग तो हिंदू महासभेत दाखल झाला. तिथं तो संघटनेच्या वर्तमानपत्राचं संपादन करत असे. गांधीहत्येवरच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान त्यानं पाच तासांहून अधिक वेळ घेत १५० परिच्छेदांचं निवेदन वाचून दाखवलं होतं. गांधींना मारण्याचा 'कोणताही कट झालेला नव्हता', असं तिथं तो म्हणाला. आपल्या सर्व साथीदारांवरचा ठपका पुसण्याचा प्रयत्न त्यानं केला. हिंदुत्व या संकल्पनेचे प्रणेते आणि आपले नेते विनायक दामोदर सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे कृत्य केल्याचा आरोपही त्यानं नाकारला. या खटल्यात सावरकरांची सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्तता करण्यात आली असली, तरी गांधींजींचे कट्टर विरोधक असणारे जहाल उजव्या विचारांचे सावरकर या हत्येशी संबंधित होते, असं त्यांचे टीकाकार मानतात. गांधींजींची हत्या करण्याच्या कितीतरी आधी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले संबंध तोडले होते, असं गोडसेनं न्यायालयाला सांगितलं. 'गांधीज् असॅसिन' या पुस्तकाचे लेखक धीरेंद्र झा लिहितात की, गोडसेचे वडील टपाल कार्यालयात कर्मचारी होते, तर आई गृहिणी होती. गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक 'महत्त्वाचा स्वयंसेवक' होता. त्याला संघातून काढून टाकल्याचा कोणताही 'पुरावा' नाही. सुनावणीपूर्वी नोंदवण्यात आलेल्या जबानीत त्यानं 'हिंदू महासभेत दाखल होण्यापूर्वी संघापासून फारकत घेतल्याचा कुठेही उल्लेख केला नव्हता.' 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडल्यानंतर आपण हिंदू महासभेचे सभासद झालो' असं त्यानं न्यायालयातल्या निवेदनात म्हटलं असलं, तरी 'हे त्यानं नक्की कधी केलं याबद्धल तो काही बोलत नाही! हा दावा गोडसेच्या आयुष्यातला सर्वांत वादग्रस्त पैलूंपैकी एक आहे,' असं झा लिहितात. संघस्नेही लेखकांनी या दाव्याचा वापर करून गुपचूप असा समज पसरवला की, गोडसेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सोडचिठ्ठी दिली होती आणि गांधींची हत्या करण्याच्या जवळपास दशकभर आधी तो हिंदू महासभेत दाखल झाला होता! गोडसे १९३० साली संघात आला आणि चार वर्षांनी त्यानं संघ सोडला, असा दावा अमेरिकी संशोधक जे.ए. कुर्रन ज्युनियर यांनी केला आहे. पण या प्रतिपादनासाठी त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. सुनावणी सुरू होण्यापूर्वी पोलिसांसमोर दिलेल्या जबानीत गोडसेनं दोन्ही संघटनांसोबत एकाच वेळी काम करत असल्याचं कबूल केलं होतं, असं झा लिहितात. या संदर्भातल्या वादात गोडसे कुटुंबियांनीही पूर्वी मतं मांडलेली आहेत. नथुरामचे बंधू जे २००५ साली मरण पावले, ते गोपाळ गोडसे मृत्यूपूर्वी म्हणाले होते की, त्यांच्या भावानं 'संघापासून फारकत घेतलेली नव्हती!' याशिवाय, नथुराम गोडसेच्या चुलत नातवानं २०१५ साली एका पत्रकाराला सांगितल्यानुसार, नथुराम गोडसे १९३२ साली संघात दाखल झाला आणि त्याला 'कधीही संघातून काढून टाकण्यात आलं नव्हतं आणि त्यानं कधीही संघापासून फारकतही घेतलेली नव्हती!' झा यांनी अभिलेखागारं पालथी घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा या दोन संघटनांमधल्या संबंधांचाही शोध घेतला आहे. हिंदू महासभा आणि रा. स्व. संघ यांच्यातले संबंध 'परस्परव्याप्त आणि प्रवाही' स्वरूपाचं होतं आणि त्यांची विचारसरणी जवळपास सारखी होती, असं झा लिहितात. या दोन संघटनांचं 'कायमच जवळचे संबंध होते आणि काही वेळा त्यांचे सभासदही सारखे असत!', गांधीहत्येपर्यंत ही स्थिती टिकून होती, असं झा नमूद करतात. गांधीहत्येनंतर वर्षभराहून अधिक काळ रा. स्व. संघावर बंदी घालण्यात आली. आपण १९३० च्या दशकात संघापासून फारकत घेतली होती, हे गोडसेचं न्यायालयातलं विधान संघ कायम उर्द्धृत करत आला आहे आणि संघाचा या हत्येशी काहीच संबंध नसल्याचं न्यायालयीन निकालातही म्हटलं होतं.

गांधींजींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नंतर कपूर आयोगाची स्थापना झाली होती. १० दिवस आधी एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला हवं होतं, असं न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं होतं. याची नोंद कपूर आयोगाच्या अहवालात आहे. या देशाला एकत्र ठेवण्यासाठी, या देशाची शांतता अबाधित राखण्यासाठी गांधींजी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करत होते. ऊर्वरित आयुष्यातही त्यांनी हेच कार्य सुरू ठेवलं असतं! असं सामाजिक कार्यकर्त्या तीस्ता सेटलवाड यांनी गांधींच्या हत्येची पार्श्वभूमी कशी होती, या विषयावर एक पुस्तक 'बियाँड डाउट- ए डॉसिएर ऑन गांधीज असासिनेशन' हे पुस्तक संपादित केलंय त्यात त्यांनी म्हटलंय. या पुस्तकात विविध लेखकांनी लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. ३० जानेवारी १९४८ रोजी गांधीजींची हत्या झाल्यानंतर २ फेब्रुवारी रोजी नारायण आपटे आणि विष्णू करकरे मुंबईला पोहोचले, त्यांना १३ फेब्रुवारी रोजी पकडण्यात आले. ५ फेब्रुवारी रोजी नथुरामचा भाऊ गोपाळ गोडसेलाही पकडण्यात आलं. २२ जून रोजी लाल किल्ल्यातल्या विशेष न्यायालयात न्यायाधीश आत्माचरण यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. १० फेब्रुवारी १९४९ रोजी न्यायालयानं निकाल दिला. यामध्ये नथुराम गोडसे आणि नारायण आपटेला फाशी सुनावली गेली. तर विष्णू करकरे, मदनलाल पहावा, गोपाळ गोडसे, दत्तात्रय परचुरे, शंकर किष्टय्या यांना जन्मठेप ठोठावली गेली. २ मे १९४९ रोजी न्यायाधीश जे. डी. खोसला यांच्या न्यायालयात अपिलावर सुनावणी सुरू झाली. २ जून रोजी इथंही फाशीची शिक्षा कायम ठेवली गेली आणि १५ नोव्हेंबर रोजी गोडसे, आपटेला फाशी देण्यात आली.
हरीश केंची
९४२२३१०६०९

शिवसेनाप्रमुख आणि पुलंची 'ती' भेट...!

"सध्याचं राजकारण गढूळ बनलंय. सत्ता हेच अखेरचं साध्यसाधन बनल्यानं कोणत्याच पक्षांकडं वैचारिक अधिष्ठान राहिलेलं नाही. सत्ताकारणातून मूल्याधिष्ठित राजकारण नाहीसं झालंय. सारेच पक्ष व्यक्तीसाक्षेप बनल्यानं पक्षाच्या ध्येयधोरणाऐवजी त्या व्यक्तींचं चारित्र्यहनन करणं सुरू झालंय. त्यामुळं विरोधाचा, प्रचाराचा, टीकेचा स्तर खालावलाय. जणू शत्रूत्व, वैमनस्य असल्यासारखी जहरी टीका होतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका संयत वाटते. परवा शिवसेनाप्रमुखांची जयंती होती. त्यानिमित्तानं त्यांच्यात आणि पु.ल.देशपांडे यांच्यात झालेल्या झगड्याची आणि दिलजमाईची आठवण झाली. असं निकोप वातावरण आता पुन्हा निर्माण व्हायला काय हरकत आहे? त्याचा हा किस्सा...!"
-----------------------------------------

*शि* वसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं भाषण केलं. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच ते जाहीरपणे बोलत होते. शिवसैनिकांकडून, नेत्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला बोल सुनावले. त्यांची ' काळजीवाहू विरोधीपक्ष' अशी संभावना केली. एकूण त्यांचं वक्तव्य हे त्यांच्या स्वभावानुसार संयत असंच होतं. जबाबदारीची जाणीव असणारं होतं. हे असं म्हणण्याचं कारण सध्या राजकारणात अत्यंत खालच्या पातळीवरून टीकाटिप्पणी केली जातेय. देवेंद्र फडणवीस हे सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर ते अधिकच बिथरल्याचं दिसून आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले फडणवीस इतके तडफडणीस वा फडफडणीस झाल्याचं आश्चर्य वाटतं. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी नव्हे केवळ भुंकण्यासाठी इतर पक्षातून आलेल्यांची एक 'शाऊटिंग ब्रिगेड' उभी केलीय. माधव भांडारी, केशव उपाध्ये, गणेश हाके, मधु चव्हाण या आक्रमक पण सुसंस्कृतपणे टीका करणारे प्रवक्ते आता दिसत नाहीत, तर दिसते ही राणे पिटा-पुत्र, प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ आणि विकृत मनोवृत्तीचे गोपीनाथ पडळकर यांच्यासारखी शाऊटिंग ब्रिगेडमधली मंडळी. नाही म्हणायला चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर हे त्यांच्या दिमतीला असतातच. यांची सारी टीका ही व्यक्तिदोषातून चारित्र्यहनन करणारी असते. कारण यावरच यांचं दुकान भाजपत सुरू राहणार असल्यानं ते असे वागताना दिसतात. पूर्वी केवळ भाजपतच नव्हे तर साऱ्यापक्षांमध्ये शब्दसौष्ठव लाभलेली नेतेमंडळी होती. रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, जयवंतीबेन मेहता, वामनराव परब यासारखी मंडळी त्याद्वारे विरोधीपक्षावर तुटून पडत. पण त्यांनी कधी चारित्र्यहनन वा टिंगल टवाळी केली नाही. वैमनस्य निर्माण व्हावं असं कधीच वागले नव्हते पण आज सारंच बदललंय! विरोधपक्षातला नेता म्हणजे जणू आपला शत्रूच अशा अविर्भावातच ही मंडळी बोलत असतात.

इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा! त्यांनी रंग, रेषा, शब्द, वाणी यांनं विरोधकांना सोलून काढलं होतं. अत्रे-ठाकरे वाद सर्वश्रुत आहे. शरद पवार यांच्यावर तर घणाघाती टीका त्यांनी केलीय. साहित्यिकांनाही त्यांनी सोडलं नव्हतं. पत्रकारांवर तर त्यांचं 'विशेष प्रेम' होतं साहित्य संमेलनाला बैलबाजार म्हटलं होतं. वसंत बापटांशी त्यांचं वाजलं होतं. त्याआधी सोबतकार ग.वा.बेहरे यांच्याशीही वाद झाला होता. अशी कितीतरी नावं आठवतात. पण नंतर ते सारे त्यांचे मित्र बनले. त्यातूनच त्यांनी प्रीतीश नंदी, विद्याधर गोखले, नारायण आठवले, संजय निरुपम, संजय राऊत या पत्रकारांना संसदेत पाठवलं होतं. राज्यात युतीची सत्ता असताना असाच एक वाद उदभवला होता. मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तर सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर होते. मंत्रिमंडळानं ख्यातनाम साहित्यिक पु.ल. देशपांडे म्हणजेच पुलंना महाराष्ट्र शासनाच्यावतीनं 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर केला होता. त्यावर पुलंनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यात त्यांनी शासनावर आपल्या पद्धतीनं टीका केली होती. पुलंची राजकीय मतं आणि भूमिका उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणीबाणीच्या काळातली त्यांची वक्तव्य गाजली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संजय गांधी यांचे जोडे उचलले होते तेव्हा, आणि इंदिरा गांधींच्या दहा कलमी कार्यक्रमा चव्हाणांनी भगवद्गीता म्हटलं होतं, तेव्हा ज्याप्रकारे त्यांनी भाषणं केली, कडाडून टीका केली त्यानं अवघा महाराष्ट्र अचंबित झाला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना ' महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अशीच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सरकारच्या ध्येयधोरणांवर कडाडून हल्ला चढवला होता. साहजिक सरकारातली मंडळी नाराज झाली होती. पुलंनी त्यावेळी म्हटलं होतं,
"वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते! अलीकडं राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचं वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळानं दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात.....!"
साहजिकच पुलंच्या या वक्तव्याला प्रसिद्धीमाध्यमानी मोठी प्रसिद्धी दिली होती. सरकार नाराज झाले तसेच शिवसेनाप्रमुखही या पुलंच्या मतप्रदर्शनानं व्यथित झाले होते. त्यावर वादंग झाला होता. पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही. मग दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पुलंवर आगपाखड केली. ठाकरी शैलीत समाचार घेतला होता.
"झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला...! आम्ही ठोकशाहीवाले तर मग आमचा पुरस्कार कशाला तुम्ही का स्वीकारता?"
असं बाळासाहेब म्हणाले आणि त्यांनी त्याच भाषणात त्यांनी पुलंची 'मोडका पूल' अशी संभावनाही केली होती.
प्रसिद्धीमाध्यमांनी यावर उलटसुलट बातम्या दिल्या होत्या. वादंग झाला. त्यामुळं बाळासाहेब आणि पुलं यांच्यात दुरावा निर्माण झालाय असं लोकांना वाटत होतं. किंबहूना ते व्हावं असंच वातावरण तयार झालं होतं. या घटनेच्या काही दिवसानंतर नाट्यनिर्माते मोहन वाघ आणि राज ठाकरे यांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे पुलंना म्हणाले,
"काकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना आपल्याकडं घेऊन येऊ का?"
त्यावर पुलं दिलखुलासपणे उत्तरादाखल म्हणाले,
"अरे.., कोण बाळ ना....! तो माझ्याकडं कधीही येऊ शकतो. अरे..., तो माझा विद्यार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल, मुंबईचा...!
काही दिवसांनी राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख आणि पुलंची भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलंच्या घरी साडेचार वाजता येणार होते. मात्र ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा, कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो हे माहीत असल्यानं ते काही त्यांच्यासोबत असणार नाही. याची दक्षता घ्यायला पुलंनी राज ठाकरेंना सांगितलं. बाळासाहेब आणि पुलंच्या त्या विलक्षण ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. वृत्तांकनासाठी मी आणि माझ्यासोबत छायाचित्रकार म्हणून मनोज बिडकरही हजर राहणार होता.
.....आणि तो दिवस उजाडला, पुण्याच्या भांडारकर रोडवरच्या 'मालती माधव' या पुलंच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. सोबत फक्त रवि म्हात्रे होता. या भेटीची कुणालाच कल्पना दिली नव्हती त्यामुळं कोणीही बाळासाहेबांसोबत नव्हतं. पोलिसांचा तुरळक बंदोबस्त रस्त्यावर होता. महाराष्ट्रातल्या दोन दिग्गजांची भेट होणार होती. मला उत्सुकता लागून राहिली होती. पुलं वयोमानानुसार व्हीलचेअरवर होते. राज ठाकरे पुढे झाले, त्यांनी बाळासाहेब आल्याचं पुलंना सांगितलं. सुनीताबाई बाळासाहेबांना सामोरं गेल्या. बाळासाहेबांनी घरात प्रवेश करताच सुनीताबाईंनी
"या, बाळासाहेब...!"
या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहऱ्यावर नम्र भाव असलेले बाळासाहेब उत्तरले,
"मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता आहे; या घरात मी बाळंच आहे....!"
पुलं व्हीलचेअरवर जखडून बसले होते. अंग कंपवातामुळं थरथरत होतं. बाळासाहेब त्यांच्यासमोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि डोकं झुकवून पुलंच्या पायांवर ठेवलं. पुलं गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले,
"बाळ, मला तुझा अभिमान वाटतो...!"
बाळासाहेबांनी झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुलंनी दिलखुलासपणे हसत जणू काही घडलंच नव्हतं, असं व्यक्त झाले. त्या क्षणाचं शब्दचित्र मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून तर छायाचित्र बिडकर यानं टिपलं होतं. ते ऐतिहासिक दृश्य होतं. मनातली सारी किल्मिश, जळमटं दूर झाली होती. दृश्य होतं ते एक शिक्षक आणि विद्यार्थी यांचं...!
त्यानंतर तासभर पुलं, सुनीताबाई, बाळासाहेब, राज ठाकरे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. ती खासगी भेट असल्यानं मी आणि मनोज आम्ही तिथून बाहेर येऊन खाली येऊन थांबलो. मालती माधव मधून बाहेर पडताना बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. याची बातमी वा फोटो प्रसिद्ध करायचं नाही, असं बजावलं. ती वैयक्तिक खाजगी भेट असल्यानं त्याची प्रसिद्धी संयुक्तिक नव्हती. बाळासाहेबांचं पुलंच्या घरी येणं हे बाळासाहेबांच्या मोठ्यापणाची, मनाची प्रचिती देऊन गेलं. महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात बाळासाहेब आणि पुलं यांच्यात निर्माण झालेला वाद हा पेल्यातलं वादळ ठरलं होतं...! दोन उत्तुंग, महनीय व्यक्तिमत्वांची एकमेकांवरची टीका, त्यानंतरचं त्यांचं वागणं, एकमेकांना सन्मान देणं अनोखं होतं. अशी राजकीय सहृदयता, मनोमिलन आगामी काळात व्हायला काय हरकत आहे.
हरीश केंची
९४२३१०६०९

Tuesday 18 January 2022

साधूंच्या वेषातले सैतान...!

"सार्वजनिक जीवनात वावरताना काही माथेफिरू माणसं भेटतात, काही मध्ययुगीन मानसिकतेची माणसं भेटतात, ‘प्रतिगामी’ या शब्दालाही लाजवेल अशी माणसं भेटतात; तेव्हा त्यांच्याकडं दुर्लक्ष करणं हा बहुतांश वेळा योग्य पर्याय असतो. विशेषत: त्यांच्या तोंडून निघणारी मुक्ताफळं जोपर्यंत खासगी स्वरूपात आणि चारचौघात उधळली जातात तोपर्यंत तरी, त्यांना अदखलपात्र ठरवणंच योग्य असतं. मात्र ती माणसं संघटितपणे आणि जाहीर कार्यक्रमांतून अद्वातद्वा बोलू लागतात तेव्हा त्यांची दखल घ्यावी लागते, त्यांच्या वक्तव्यांमुळं समाजातलं वातावरण कलुषित होणार असेल तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईचा आग्रहही धरावा लागतो. आणि तशी कारवाई करण्यास शासनसंस्था कचरत असेल किंवा जाणीवपूर्वक टाळत असेल तर न्यायालयीन आणि अन्य सनदशीर मार्गांनी लढा द्यावा लागतो. अन्यथा, लोकशाही प्रक्रियेलाच बाधा निर्माण होत असते!"
-----------------------------------------------

हे आता सांगण्याचं कारण, तशा प्रकारची मुक्ताफळं उधळणारी माणसं पूर्वीपासून सर्वत्र आहेत; पण गेल्या काही वर्षांत या देशात त्यांचं प्रमाण वाढत चाललंय, आणि गेल्या महिन्याच्या अखेरीस त्या प्रकारानं सर्व सीमारेषा पार केल्या आहेत. दि. १७, १८,१९ डिसेंबर २०२१ हे तीन दिवस उत्तराखंड राज्यातल्या हरिद्वार इथं झालेल्या धर्मसंसदेत तसा प्रकार घडलाय. ‘इस्लामिक भारत में सनातन हिंदू धर्म का भविष्य’ अशी विचित्र थीम घेऊन ती धर्मसंसद झालीय. हिंदू रक्षा सेनेने ही धर्मसंसद आयोजित केली होती, तिच्यात हजारांहून अधिक तथाकथित संत-महंत आणि साधू-साध्वी सहभागी झाले होते. त्यात विश्व हिंदू परिषद, हिंदू महासभा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित माथेफिरूंचं प्रमाण जास्त होतं. डोकी ठिकाणावर आहेत अशी माणसं तिथं अपवादानंच असावीत, कारण तिथली भाषणं असह्य होऊन केवळ एका साधूनं ती धर्मसंसद सोडून निघून जाण्याचा विवेक दाखवलाय, ‘इथली भाषणं समाजविघातक आहेत, म्हणून ही सभा सोडून मी जात आहे’ असं म्हणण्याचं धैर्य दाखवलंय. तिथं जी विषारी भाषणं केली गेली त्यातल्या काही भाषणांचं निवडकच तुकडे आतापर्यंत बाहेर आले आहेत. सर्व भाषणांचे संपूर्ण व्हिडिओ मिळाले तर किती भयानक वातावरणनिर्मिती तिथं झाली असेल याची कल्पना येईल. वस्तुत: सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या व्हिडिओंच्या दोन-चार मिनिटांच्या तुकड्यांतली वक्तव्यं शब्दांकन करून देणं म्हणजे, त्या वक्तव्यांना आणखी सर्वदूर पोहोचवण्यास हातभार लावणंच ठरणार आहे. पण तरीही, फोफावत चाललेल्या विषवल्लीचा धोका लक्षात यावा म्हणून त्यांनी जी गरळ ओकली, त्यातली काही विधानं तरी माहीत करून घेतली पाहिजेत. रा.स्व.संघाचे पूर्वीचे प्रचारक आणि हिंदू रक्षा सेनेचे प्रमुख प्रबोधानंद गिरी यांनी उघडपणे असं सांगितलं की, ‘म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचं जसं शिरकाण करण्यात आलं तसं भारतातल्या मुस्लिमांबाबत करायला हवे.’ याला त्यांनी ‘सफाई अभियान’ असं संबोधलं आहे. हिंदू महासभेच्या सचिव अन्नपूर्णा भारती यांनी असं म्हटलं की, ‘आपल्यातले शंभर लोक असे तयार व्हायला हवेत, जे वीस लाख मुस्लिमांना ठार करू शकतील. स्वत: मरण्याची आणि तुरुंगात जाण्याची तयारी असणारे हिंदू लोक पुढं आल्याशिवाय हिंदू राष्ट्र अस्तित्वात येणार नाही.’ सांभवी धाम आखाड्याचे प्रमुख स्वामी आनंदस्वरूप म्हणाले, ‘हरिद्वारमध्ये ख्रिसमस साजरा करू देऊ नका आणि मुस्लिम विक्रेत्यांवर बहिष्कार टाका.’ ते पुढं असंही म्हणाले की, ‘धर्मसंसदेत बोलला गेलेला प्रत्येक शब्द ईश्वरी वाणी आहे, त्यामुळं सरकारनं ती ऐकलीच पाहिजे. अन्यथा १८५७ सारख्या युद्धाला तयार राहिले पाहिजे!’

या धर्मसंसदेचे आयोजक नरसिंहानंद सरस्वती यांनी म्हटलं आहे की, ‘हिंदूंनी भरपूर मुलं जन्माला घालावीत आणि चांगली शस्त्रं जवळ बाळगावीत. मुस्लिम व्यक्ती २०२९ मध्ये पंतप्रधान होण्यापासून रोखायचं असेल तर हे करायला हवं.’ ते आणखी एका व्हिडिओत म्हणतात, ‘हिंदूंचा प्रभाकरन होऊन एलटीटीईप्रमाणे काम करणाऱ्या हिंदू तरुणांना मी एक कोटी रुपये देईन आणि हे काम तो जर एक वर्षाहून अधिक काळ करणार असेल तर १०० कोटी रुपये उभे करीन.’ पाटणा इथले धर्मदास महाराज म्हणाले, ‘मी जर खासदार असतो तर मनमोहनसिंग पंतप्रधान होते त्याच काळात संसदेत जाऊन त्यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून सहा गोळ्या झाडल्या असत्या!’ भारताचं संविधान हटवलं पाहिजे आणि भगवे संविधान आणलं पाहिजे, असं म्हणण्यापर्यंतची मजल तिथल्या अनेकांनी मारलीय. या सर्व भाषणांना तिथं उपस्थित असलेल्या हजारोंनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. अलीकडंच वसिम रिझवी नावाच्या व्यक्तीनं उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचा प्रमुख राहिलेल्या मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आणि जितेंद्र नारायण त्यागी असं नाव धारण केलं आहे. धर्मसंसदेत सहभागी झालेल्या या व्यक्तीच्या मनातला मुस्लिमांबद्दलचा विखार तर आणखी अचंबित करणारा आहे. त्याचदरम्यान योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या हिंदू युवा वाहिनीचं संमेलन दिल्लीत झालं. तिथं नाझी पद्धतीनं सलामी देत एक प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात आली. ‘आम्ही आमच्या अंतिम श्वासापर्यंत लढत राहू. मुस्लिमांना मारू, स्वत: मरू, पण असे हिंदू राष्ट्र अस्तित्वात आणू, जिथे फक्त हिंदूंचेच वास्तव्य असेल!’ ही प्रतिज्ञा देणारी व्यक्ती म्हणजे ‘सुदर्शन न्यूज’ या टीव्ही वाहिनीचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके, नंतर त्यांनी ही प्रतिज्ञा ट्वीट करून त्यांच्या पाच लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचवली आहे. या धर्मसंसदेच्या दरम्यानच छत्तीसगढमध्ये एका संमेलनात कालीचरण दास या साधूनं नथूराम गोडसेंचा गौरव केला आहे. ‘मोहनदास गांधी यांची हत्या करून नथूरामनं खूपच मोठं काम केलं आहे, त्याला मी वंदन करतो.’ असं हे कालीचरण म्हणाले आहेत. आणखी विशेष हे आहे की, हे व्हिडिओ बाहेर आल्यावर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्या प्रत्येकानं ‘आम्ही जे बोललो त्यावर ठाम आहोत’ असं म्हटलं आहे. ‘आम्ही पोलिसांना घाबरणार नाही, आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही’ असं निर्लज्जपणे म्हटलं आहे. ती प्रतिज्ञा देऊन झाल्यावर सुरेश चव्हाणके तर लगेच म्हणाले की, ‘या प्रतिज्ञेतील काही शब्दांमुळं कोणाला वाईट वाटलं असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण तसं वाटावं अशीच आमची इच्छा आहे!’

वरील वक्तव्ये केवळ काही तुकडे आहेत, अशी शेकडो विधानं पुढे आली आहेत आणि आश्चर्य म्हणजे ही वक्तव्ये बाहेर येऊन व्हिडिओ प्रसारित होऊन आठवडा उलटला तरी एकाही व्यक्तीला अटक झालेली नाही. तीन-चार व्यक्तींच्या नावानं पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे एवढेच. वेगवेगळ्या काळात सुट्या सुट्या व्यक्तींनी किंवा एकाच कार्यक्रमात एखाद-दुसऱ्या व्यक्तीने अशी भाषणे करण्याची उदाहरणे खूप आहेत, पण अशा प्रकारची आणि इतकी विखारी वक्तव्ये एकाच कार्यक्रमात आणि एकाच काळात होण्याची स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ असावी. विशेष म्हणजे धर्मसंसद पार पडल्यावर हे व्हिडिओ तुकडे बाहेर आले आहेत आणि त्यानंतरच्या आठवड्यात जगभर पसरत चालले आहे. इंग्रजी आणि हिंदी प्रसारमाध्यमांनी त्यातही डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांची अधिक दखल घेतली आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि काही राजकीय पक्षांनीही निषेध केला आहे. भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल अरुण प्रकाश यांनी ‘हा सर्व प्रकार म्हणजे भारताच्या अंतर्गत सुरक्षिततेला आव्हान आहे’ असं म्हटलं आहे. त्यांच्याशी सहमती दाखवणारी प्रतिक्रिया भारताचे माजी लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक यांनी दिली आहे आणि ‘संबंधितांवर कठोर कारवाई तातडीनं केली पाहिेजे’ असंही म्हटलं आहे. याशिवाय देशातल्या ७५ नामवंत वकिलांनी आणि न्यायाधीशांनी देशाचे सरन्यायाधीश रमणा यांच्याकडं पत्र पाठवून ‘सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण स्वत:कडं घ्यावं’ असं म्हटलं आहे. त्यांनी असंही म्हटलं आहे की, ‘हा केवळ भारताच्या एकतेचा आणि एकात्मतेचा प्रश्न नसून, भारतातील कोट्यवधी मुस्लिमांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे.’ जगभरातल्या अनेक राष्ट्रांकडून या प्रकाराबद्दल आणि दहा दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतीच कारवाई केंद्र आणि राज्य सरकारनं न केल्याबद्दल कठोर टीका केली आहे.

उत्तरप्रदेशच्या निवडणुका तोंडावर असल्यानं भाजप, रा.स्व.संघ, उत्तर प्रदेश सरकार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या सर्वांनीच हा प्रकार घडवून आणला आहे किंवा पाठिंबा दिला आहे, किंवा मूकसंमती दिली आहे असं सर्वत्र बोललं जात आहे. तरीही औपचारिकता किंवा ढोंग म्हणूनही त्या घटनांचा निषेध करायला पंतप्रधान आणि गृहमंत्री तयार नाहीत. दाखवण्यापुरती कारवाई करायचंही नाव घेत नाहीत. याचा अर्थ उघड आहे, हिंदू राष्ट्र हे त्यांचं अंतिम स्वप्न आहे आणि उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक हे तत्कालीन उद्दिष्ट आहे. कोणत्या वेळी काय उपयुक्त ठरेल याबाबत त्यांचे आडाखे पक्के आहेत. म्हणजे तात्त्विक आणि व्यावहारिक या दोन्ही बाजूंनी त्यांना हे हवेच आहे! अन्यथा साधूंच्या वेषातील सैतान त्यांनी मैदानात उतरवलेच नसते. या पार्श्वभूमीवर कोणत्याही सुबुद्ध माणसाला प्रश्न पडेल, ‘मग आता करायचं काय? प्रसारमाध्यमं आवाज उठवतील, न्यायालयीन कारवाई संथ गतीनं होत राहील, विरोधी पक्ष आणि काही संघटना आंदोलनं करतील, जगभर मोदी सरकारची छी: थू होईल; पण निगरगट्ट आणि जनमताचा मोठा पाठिंबा असलेल्या मोदी सरकारवर त्याचा काय परिणाम होणार? विरोधी पक्ष दुर्बल आहेत, केंद्रिय सत्ता हटवता येणार नाही आणि हटवली तरी ही विषवल्ली नष्ट होणार नाही मग पुढे काय?’ या चिंतेवर ठोस असं उत्तर निश्चितच नाही, पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील या देशाच्या वाटचालीवर पुन्हा एकदा दृष्टिक्षेप टाकला आणि देशाची अवाढव्यता लक्षात घेतली तर पुढे येईल ते हेच की, असे अनेक समाजविघातक घटक या देशानं पचवले आहेत. हे समाजविघातक घटक एकूण लोकसंख्येचा विचार केला तर अत्यल्प आहेत. जसे सत्प्रवृत्त लोक अल्प एक टक्का आहेत, तसेच असत्‌ प्रवृत्तीचे लोकही अल्पच एक टक्का आहेत. उरलेला खूप मोठा समूह ९८ टक्के या दोहोंच्या सीमारेषेवर आहे. हा समूह इकडं तिकडं झुकत असतो. पण वेळ येते तेव्हा मोठी मोठी सिंहासनं उलथवून टाकू शकतो, त्यामुळं विद्यमान केंद्रिय राजवटीचेही शंभर दिवस भरणार आहेत हे निश्चित!

स्वातंत्र्यलढ्याची बदनामी ही जुनी दुटप्पी खेळी

"स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान शून्य आहे ही सल डॉ.हेडगेवार, गोळवलकरांच्या अनुयायांना सतत बोचत राहते. आपण त्या लढ्यात नव्हतो म्हणून संपूर्ण स्वातंत्र्यलढाच बदनाम करायचा, पण आपल्या अंगाला धक्का लागू नये म्हणून या गोष्टी कंगनासारख्या अभिनेत्रीच्या तोंडून वदवून घ्यायच्या आणि मग एक एक करून ‘हो माझं त्याला समर्थन आहे!’, असं म्हणत आपलेच लोक उभे करायचे ही यांची जुनी नीती. पण, विक्रम गोखलेंना हा संपूर्ण इतिहास १००% माहित आहे. पण एखाद्या मोठ्या पदाच्या किंवा पुरस्काराच्या लोभापायी त्यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचली. पण ज्यांच्या सांगण्यावरुन हे लोक बोलत आहेत ते यांचे बोलवते धनी १९४७ मध्येच मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. म्हणजे एकीकडं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आणि त्याचवेळी स्वातंत्र्यलढा बदनाम करायचा ही यांची जुनी दुटप्पी खेळी. बरं याविरोधात एकही भाजप किंवा संघाचा नेता बोलत नाही, हे विशेष!"
------------------------------------------------

*कं* गना राणावतला पद्मश्री पुरस्कार मिळाला आणि त्याचा बदला की मोबदला म्हणून तिनं एकामागोमाग काही वक्तव्यं केली आहेत. 'देशाला २०१४ साली खरं स्वातंत्र्य मिळालं, १९४७ साली जे मिळालं ती भीक होती!' '१९४७ साली कोणती लढाई झाली होती की ज्यामुळं स्वातंत्र्य मिळालं? हे सांगा, मी माझा पुरस्कार परत करते!' लगेच दुसर्‍या दिवशी विक्रम गोखलेंनी कंगनाला समर्थन देत जे देशासाठी लढले त्यांना फाशीपासून वाचविण्याकरिता राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, असं म्हटलं. कंगनानं पुन्हा महात्मा गांधींची टिंगल टवाळी करत ‘दुसरा गाल पुढं करून भीक मिळते, स्वातंत्र्य मिळत नाही; भगतसिंगच्या फाशीला गांधींचा पाठिंबा होता, असे बरेच पुरावे आहेत!’ असंही तिनं म्हटलंय. या साऱ्या वक्तव्यांमागचं राजकारण आणि सत्य दोन्ही आपण पाहणं गरजेचं आहे. आपण एखाद्या भिकार्‍याला भीक देताना त्याच्याच कटोर्‍यातले पैसे लुटून त्याला भीक देतो का? तर याचं उत्तर नाही असं आहे! आपण आपल्या जवळचे, आपल्या कमाईचे पैसे त्याला भीक म्हणून देतो. मग इंग्रजांनी भिकेत स्वातंत्र्य दिलं म्हणजे काय, त्यांचा देश आपल्याला देऊन टाकला का? देश आपलाच होता, त्यांनी तो लुटला. त्यासाठी क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध प्राणपणानं लढत होते. फासावर जात होते. गांधी, नेहरू, पटेल, आझाद, सुभाषचंद्र बोस हे देश स्वतंत्र होण्यासाठी जीव तोडून लढत होते. अनेक आंदोलनं उभी करून इंग्रजांना हैराण करून सोडत होते. आयुष्याची १०-१० वर्षे यांनी तुरुंगात काढली. नेमकं याचवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा यासारख्या संघटना ब्रिटिशांना मदत करत स्वातंत्र्यलढ्याला विरोध करत होत्या. जे क्रांतिकारक आणि स्वातंत्र्यसेनानी देशासाठी लढत होते, त्यांच्याविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेचे लोक इंग्रजांच्या बाजूनं लढत होते. सावरकरांसारखे लोक माफी मागून स्वतःची सुटका करून घेऊन इंग्रजांकडून महिना ६० रुपये पेन्शन घेत होते. अनेक दशकं असंख्य क्रांतिवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेक महापुरुषांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यलढ्याला वाहून टाकलं तेव्हा कुठं हे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालंय. हिंदू महासभा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, डॉ. हेडगेवार, गोळवलकर गुरुजी यांच्याप्रमाणे इंग्रजांची चाकरी करून हे स्वातंत्र्य मिळालेलं नाही. आता हा इतिहास कंगनानं वाचल्याची शक्यता कमी आहे. स्वातंत्र्यलढ्यात आपलं योगदान शून्य आहे ही सल डॉ.हेडगेवार, गोळवलकरांच्या अनुयायांना सतत बोचत राहते. आपण त्या लढ्यात नव्हतो म्हणून संपूर्ण स्वातंत्र्यलढाच बदनाम करायचा, पण आपल्या अंगाला धक्का लागू नये म्हणून या गोष्टी कंगनासारख्या अभिनेत्रीच्या तोंडून वदवून घ्यायच्या आणि मग एक एक करून ‘हो माझं त्याला समर्थन आहे!’, असं म्हणत आपलेच लोक उभे करायचे ही यांची जुनी नीती. पण, विक्रम गोखलेंना हा संपूर्ण इतिहास १००% माहित आहे. पण एखाद्या मोठ्या पदाच्या किंवा पुरस्काराच्या लोभापायी त्यांनी त्यांना दिलेली स्क्रिप्ट वाचली. पण ज्यांच्या सांगण्यावरुन हे लोक बोलत आहेत ते यांचे बोलवते धनी १९४७ मध्येच मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहेत. म्हणजे एकीकडं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायचा आणि त्याचवेळी स्वातंत्र्यलढा बदनाम करायचा ही यांची जुनी दुटप्पी खेळी. बरं याविरोधात एकही भाजप किंवा संघाचा नेता बोलत नाही, हे विशेष.

१९४७ ला कोणतं युद्ध झालं? असं विचारणारी कंगना २०१४ साली कोणतं युद्ध झालं? हे सांगत नाही. कंगनाला २०१४ साली कोणते खरे स्वातंत्र्य मिळाले हा प्रचंड संशोधनाचा विषय आहे. कारण २०१४ सालापासून स्वातंत्र्य मिळणं तर दूरच, जे स्वातंत्र्य, हक्क, अधिकार होते तेसुद्धा कमी झाले आहेत. देशातली महागाई, बेरोजगारीनं उच्चांक गाठलाय, अर्थव्यवस्था ढासळलीय, परराष्ट्र धोरण सपशेल फेल झालंय. विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर होतोय. माध्यमं तर सरकारपुरस्कृत झालेली आहेत. मोठे नेते, मंत्री, पोलीस अधिकारी, न्यायाधीश जिथं सरकारच्या विरोधात बोलायला घाबरतात तिथं सामान्य माणसाची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. शेतकरी-मजुर, नोकरदार, व्यावसायिक सर्वांची परिस्थिती वाईट आहे. यात कंगनाला खरं स्वातंत्र्य कोणतं दिसलं हे कळायला मार्ग नाही. पण जिथं स्वतःचं काहीच कर्तृत्व नसलं की ज्यांनी कर्तृत्व गाजवलं त्यांना बदनाम करायचं हेच संघाने आजपर्यंत केलेलं आहे. त्रिपुरामधल्या हिंसेमुळं देशात काही ठिकाणी दंगेधोपे, जाळपोळ झाली. अशाचवेळी विक्रम गोखले देशात अगदी मुगलांचं राज्य असल्याच्या आवेशात बोलले की, हा भारत हिरवा होऊ देणार नाही. अहो, ६०० वर्षे संपूर्ण देश मोगलांच्या ताब्यात असताना हा देश हिरवा झाला नाही, मग आज तर हिंदू धर्माचा ठेका घेतलेल्यांचेच राज्य आहे. पण गोखलेंवर त्यांच्या स्वामींनी सोपविलेली जबाबदारी त्यांनी चोख पार पाडलीय. भाजपेयींचा देशात आणि राज्यात सध्या कठीण काळ सुरू झालाय. सर्वच आघाड्यांवर सपशेल आपटलेलं केंद्र सरकार आणि राज्यात नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांची केलेली पोलखोल यातून कंगना आणि गोखले यांनी विरोधकांना गुंतवून भाजपला सावरण्यासाठी, नवीन डावपेच आखण्यासाठी वेळ दिलाय. आता सर्व मुद्यांवर फेल झाल्यानंतर त्यांच्याकडं देशात दंगली घडविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. ते येणाऱ्या काळात आपल्या सर्वांना दिसेलच.

कंगना आणि गोखले या दोघांचंही म्हणणं आहे की, भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी गांधी आणि नेहरूंनी काहीच केलं नाही, मग भगतसिंगांची फाशी थांबावी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आणि हिंदू महासभेनं काय केलं? नेहरूंप्रमाणे किती संघाचे लोक भगतसिंगांना भेटण्यासाठी लाहोर जेलमध्ये गेले होते? केशव हेडगेवार, माधव गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भगतसिंगांची फाशी थांबावी म्हणून इंग्रजांना किती पत्रं लिहिलीत? उलट इंग्रजांच्या ब्लॅक लिस्टमध्ये आपण नको म्हणून फक्त भगतसिंगच नाही तर प्रत्येकच क्रांतिकारकांपासून कायम चार हात हे लोक दूरच राहिलेत. हेडगेवारांनी तर दोन वेळा स्वतः सुभाषबाबू भेटायला उत्सुक असल्यानंतर सुद्धा इंग्रजांच्या भीतीनं त्यांची भेट टाळली. ह्या कट्टरवाद्यांनी स्वतः स्वातंत्र्यासाठी काही करणं सोडा, पण जे युवक स्वतःला स्वातंत्र्यलढ्यात झोकून द्यायला तयार होते त्यांनाही संघानं परावृत्त केलं. इंग्रजांशी लढू नका सांगितलं. इंग्रजांविरोधात कुणीच लढलं नसतं तर स्वातंत्र्य कसं मिळालं असतं? असा प्रश्न त्याकाळी इंग्रजांची चाकरी करणार्‍यांना आणि त्यांच्या समर्थकांना विचारण्याची हिंमत आहे का तुमच्यात श्रीमान गोखले? गांधींनी भगतसिंगांची फाशी टळावी म्हणून व्हॉईसरॉय इर्विन यांच्यासोबत पूर्ण ताकदीनिशी चर्चा तर केलीच सोबतच इर्विन यांना गांधीजींनी पाच पत्रेसुद्धा लिहिलीत. ती आजही गांधी वाङ्ममयात उपलब्ध आहेत. गांधींच्या तगाद्यानं शेवटी इर्विन यांनी वैतागून गांधींना विचारलं की हिंसक कृत्यांमध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्यांची बाजू तुम्ही घेता तरी कसं? त्यावर गांधी बोलले, इथं हिंसा, अहिंसेचा मुद्दा येतो कुठं? देशासाठी प्राण देण्याची तयारी असलेल्या हिंमतवान, बहादूर लोकांसाठी मी प्रयत्न करतोय. गांधींना इतकेच अधिकार असते तर त्यांच्या पत्नी कस्तुरबा आणि त्यांचे मानसपुत्र महादेव देसाई दोघांचाही तुरुंगात मृत्यू झाला नसता हे सुद्धा लक्षात घ्या.
पंजाब आणि आजूबाजूच्या प्रांतातील जे इंग्रज आयसीएस अधिकारी होते त्यांनी ब्रिटिश सरकारला स्पष्ट शब्दात कळवलं की, ‘वरील लोकांची फाशी आपण टाळली तर आम्ही सामूहिक राजीनामे देऊ.’ त्यामुळं फाशी टाळणं हे ब्रिटिश सरकारसाठी कठीण झालं होतं. हा निर्णय ब्रिटिश सरकारचा असल्यानं लॉर्ड इर्विन काहीच करू शकले नाहीत. लॉर्ड इर्विन आपल्या आत्मचरित्रात स्वतः कबूल करतात की, "There was one man who want to save Bhagatsing, Sukhdev and Rajguru but I could not do anything because of my Administration and that man was Gandhi!". म्हणजेच भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांची फाशी टळावी म्हणून भारतातल्या एकाच माणसानं प्रयत्न केला आणि तो माणूस म्हणजे महात्मा गांधी होते. पण मी काही करू शकलो नाही, माझे हात प्रशासनानं बांधलेले होते. भगतसिंगांना वाचविण्याकरिता गांधींनी जिवापाड तर प्रयत्न केलेच सोबत जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांनीसुद्धा त्यांच्या कोर्ट केसमध्ये त्यांना मदत केली. जवाहरलाल नेहरू स्वतः भगतसिंग, बटुकेश्वर दत्त यांना भेटण्यासाठी लाहोर जेलमध्ये गेले होते. भगतसिंगांनी आपल्या शेवटच्या क्षणांमध्ये आपले कायदेविषयक सल्लागार प्राणनाथ मेहतांना सांगितलं होतं की, माझ्या खटल्यात जातीनं लक्ष घालण्याकरिता जवाहरलाल नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना माझ्याकडून धन्यवाद सांगा.

डॉ. हेडगेवार, गोळवलकरांना धन्यवाद सांगा असं भगतसिंगांनी का म्हटलं नाही? कारण डॉ. हेडगेवार आणि गोळवलकरांची भगतसिंगांच्या फाशीला मूक संमती होती. छुपा पाठिंबा होता तो नसता तर ह्या लोकांनी भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी एकतरी प्रयत्न केला असता. पण प्रयत्न सोडा यांनी साधं आंदोलन केलं नाही किंवा साधं निवेदनसुद्धा दिलं नाही. भगतसिंगांची फाशी थांबविण्यासाठी सोडा, पण त्यांना फाशी दिल्यानंतरसुद्धा यांनी त्याचा साधा निषेध केला नाही. फक्त भगतसिंगांच्या फाशीचाच नाही तर जालियनवाला बाग हत्याकांडात शेकडो भारतीय शहीद झाल्यानंतर सुद्धा ह्या लोकांनी त्या घटनेचा इंग्रजांच्या भीतीनं साधा निषेध केलेला नाही. भगतसिंगांचे सहकारी प्रसिद्ध बंगाली क्रांतिकारक जतींद्रनाथ संन्याल यांंनी भगतसिंगांची फाशी रोखण्यासाठी गांधीजींनी केलेल्या प्रयत्नांची माहिती देशाला झाली नाही याबद्धल आपल्या चरित्रात खंत व्यक्त केली आहे आणि गांधींनी केलेल्या प्रयत्नांची हकीकत सविस्तरपणे नोंदविलीय. १९२१ ते १९४२ हा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास ‘अ‍ॅन इंडियन स्ट्रगल’ या पुस्तकात लिहिल्या गेलाय. त्यात सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘इट मस्ट बी अ‍ॅडमिटेड दॅट गांधीजी डिड ट्राय हिज बेस्ट टू सेव्ह भगतसिंग’. स्वतः सुभाषबाबू सांगत आहेत. अजून कुठला पुरावा हवाय? भगतसिंगांसाठी फक्त गांधी आणि काँग्रेसनंच प्रयत्न केलेत. बाकी हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या संस्था, संघटना इंग्रजांच्या भीतीनं मूग गिळून गप्प होत्या. त्या फक्त गप्प असत्या तरी हरकत नव्हती, परंतु त्या इंग्रजांना अनुकूल वातावरण निर्मिती देशात करत होत्या. इंग्रजांना मदत करत होत्या आणि त्यावेळी जे इंग्रजांविरोधात लढले त्यांना बदनाम करण्याकरिता सतत प्रयत्नशील होत्या आणि आहेत. शेवटी कंगनाला सुद्धा प्रश्न विचारला पाहिजे की १९४७ ला जर खरं स्वातंत्र्य मिळालं नसतं तर आज तुला पुरस्कार आणि झेड सिक्युरिटी देणारं सरकार अस्तित्वात आलं असतं? आणि ओबीसी समाजातून आलेले मोदी पंतप्रधान बनू शकले असते? विचार करा खा.ओवेसी म्हणतात तसं हेच वक्तव्य स्वातंत्र्यसेनानींसाठी जर कुण्या मुस्लिमानं केलं असतं तर? यांनी संपूर्ण देश भडकवून टाकला असता. मग कंगना, गोखले आता सांगा की स्वातंत्र्य इंग्रजांना कायम मदत करणार्‍या डॉ.हेडगेवार, गोळवलकरांमुळं मिळालं की इंग्रजांविरोधात लढणार्‍या गांधी, सुभाषबाबू, पटेल-नेहरू आणि भगतसिंगांसारख्या क्रांतीकारकांमुळं?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...