Friday 28 January 2022

शिवसेनाप्रमुख आणि पुलंची 'ती' भेट...!

"सध्याचं राजकारण गढूळ बनलंय. सत्ता हेच अखेरचं साध्यसाधन बनल्यानं कोणत्याच पक्षांकडं वैचारिक अधिष्ठान राहिलेलं नाही. सत्ताकारणातून मूल्याधिष्ठित राजकारण नाहीसं झालंय. सारेच पक्ष व्यक्तीसाक्षेप बनल्यानं पक्षाच्या ध्येयधोरणाऐवजी त्या व्यक्तींचं चारित्र्यहनन करणं सुरू झालंय. त्यामुळं विरोधाचा, प्रचाराचा, टीकेचा स्तर खालावलाय. जणू शत्रूत्व, वैमनस्य असल्यासारखी जहरी टीका होतेय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका संयत वाटते. परवा शिवसेनाप्रमुखांची जयंती होती. त्यानिमित्तानं त्यांच्यात आणि पु.ल.देशपांडे यांच्यात झालेल्या झगड्याची आणि दिलजमाईची आठवण झाली. असं निकोप वातावरण आता पुन्हा निर्माण व्हायला काय हरकत आहे? त्याचा हा किस्सा...!"
-----------------------------------------

*शि* वसेनाप्रमुखांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारं भाषण केलं. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर प्रथमच ते जाहीरपणे बोलत होते. शिवसैनिकांकडून, नेत्यांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला बोल सुनावले. त्यांची ' काळजीवाहू विरोधीपक्ष' अशी संभावना केली. एकूण त्यांचं वक्तव्य हे त्यांच्या स्वभावानुसार संयत असंच होतं. जबाबदारीची जाणीव असणारं होतं. हे असं म्हणण्याचं कारण सध्या राजकारणात अत्यंत खालच्या पातळीवरून टीकाटिप्पणी केली जातेय. देवेंद्र फडणवीस हे सत्ताभ्रष्ट झाल्यानंतर ते अधिकच बिथरल्याचं दिसून आलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेले फडणवीस इतके तडफडणीस वा फडफडणीस झाल्याचं आश्चर्य वाटतं. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यासाठी नव्हे केवळ भुंकण्यासाठी इतर पक्षातून आलेल्यांची एक 'शाऊटिंग ब्रिगेड' उभी केलीय. माधव भांडारी, केशव उपाध्ये, गणेश हाके, मधु चव्हाण या आक्रमक पण सुसंस्कृतपणे टीका करणारे प्रवक्ते आता दिसत नाहीत, तर दिसते ही राणे पिटा-पुत्र, प्रवीण दरेकर, राम कदम, प्रसाद लाड, सदाभाऊ खोत, चित्रा वाघ आणि विकृत मनोवृत्तीचे गोपीनाथ पडळकर यांच्यासारखी शाऊटिंग ब्रिगेडमधली मंडळी. नाही म्हणायला चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, अतुल भातखळकर हे त्यांच्या दिमतीला असतातच. यांची सारी टीका ही व्यक्तिदोषातून चारित्र्यहनन करणारी असते. कारण यावरच यांचं दुकान भाजपत सुरू राहणार असल्यानं ते असे वागताना दिसतात. पूर्वी केवळ भाजपतच नव्हे तर साऱ्यापक्षांमध्ये शब्दसौष्ठव लाभलेली नेतेमंडळी होती. रामभाऊ म्हाळगी, उत्तमराव पाटील, हशू अडवाणी, जयवंतीबेन मेहता, वामनराव परब यासारखी मंडळी त्याद्वारे विरोधीपक्षावर तुटून पडत. पण त्यांनी कधी चारित्र्यहनन वा टिंगल टवाळी केली नाही. वैमनस्य निर्माण व्हावं असं कधीच वागले नव्हते पण आज सारंच बदललंय! विरोधपक्षातला नेता म्हणजे जणू आपला शत्रूच अशा अविर्भावातच ही मंडळी बोलत असतात.

इथं आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा! त्यांनी रंग, रेषा, शब्द, वाणी यांनं विरोधकांना सोलून काढलं होतं. अत्रे-ठाकरे वाद सर्वश्रुत आहे. शरद पवार यांच्यावर तर घणाघाती टीका त्यांनी केलीय. साहित्यिकांनाही त्यांनी सोडलं नव्हतं. पत्रकारांवर तर त्यांचं 'विशेष प्रेम' होतं साहित्य संमेलनाला बैलबाजार म्हटलं होतं. वसंत बापटांशी त्यांचं वाजलं होतं. त्याआधी सोबतकार ग.वा.बेहरे यांच्याशीही वाद झाला होता. अशी कितीतरी नावं आठवतात. पण नंतर ते सारे त्यांचे मित्र बनले. त्यातूनच त्यांनी प्रीतीश नंदी, विद्याधर गोखले, नारायण आठवले, संजय निरुपम, संजय राऊत या पत्रकारांना संसदेत पाठवलं होतं. राज्यात युतीची सत्ता असताना असाच एक वाद उदभवला होता. मुख्यमंत्री मनोहर जोशी होते तर सांस्कृतिक कार्यमंत्री प्रमोद नवलकर होते. मंत्रिमंडळानं ख्यातनाम साहित्यिक पु.ल. देशपांडे म्हणजेच पुलंना महाराष्ट्र शासनाच्यावतीनं 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर केला होता. त्यावर पुलंनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यात त्यांनी शासनावर आपल्या पद्धतीनं टीका केली होती. पुलंची राजकीय मतं आणि भूमिका उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. आणीबाणीच्या काळातली त्यांची वक्तव्य गाजली होती. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी संजय गांधी यांचे जोडे उचलले होते तेव्हा, आणि इंदिरा गांधींच्या दहा कलमी कार्यक्रमा चव्हाणांनी भगवद्गीता म्हटलं होतं, तेव्हा ज्याप्रकारे त्यांनी भाषणं केली, कडाडून टीका केली त्यानं अवघा महाराष्ट्र अचंबित झाला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना ' महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांनी अशीच तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सरकारच्या ध्येयधोरणांवर कडाडून हल्ला चढवला होता. साहजिक सरकारातली मंडळी नाराज झाली होती. पुलंनी त्यावेळी म्हटलं होतं,
"वयाच्या अखेरच्या टप्प्यात मला सर्वांत अधिक अस्वस्थ करणारी कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे योग्य मुद्द्यांनी सिद्ध करण्याची घटना गुद्द्यांनी दडपून टाकण्याच्या प्रवृत्तीचा वाढता जोर ही आहे. विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा 'लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो' वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? 'निराशेचा गाव आंदण आम्हासी' ही संत तुकोबाची ओळ पुन्हा पुन्हा आठवायला लागते! अलीकडं राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे. उच्चार आणि आचार यांच्यात तफावत पडताना दिसली, की जीवनातल्या चांगलेपणावरचा विश्वासच उडत जातो. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाचा तर आनंदाचा अनुभव देणारी निर्मिती करण्यातला उत्साहच नाहीसा होतो. आपल्या मताला अनुसरून लिहिण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य हे मला फार महत्त्वाचं वाटते. लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलंच पाहिजे, असा आग्रह धरणारे विचारवंत निर्भय राहिले पाहिजेत. आपल्याला न पटलेला विचार सत्ताबळानं दडपून टाकणारे राज्यकर्ते साऱ्या सामाजिक प्रगतीला अगतिक करतात.....!"
साहजिकच पुलंच्या या वक्तव्याला प्रसिद्धीमाध्यमानी मोठी प्रसिद्धी दिली होती. सरकार नाराज झाले तसेच शिवसेनाप्रमुखही या पुलंच्या मतप्रदर्शनानं व्यथित झाले होते. त्यावर वादंग झाला होता. पुलंनी जाहीर कार्यक्रमात परखडपणे अशा चार गोष्टी सुनावणं, ही गोष्ट बाळासाहेबांना रुचली नाही. मग दोन दिवसांनंतर एका उड्डाणपुलाच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात मंचावरून बाळासाहेबांनी पुलंवर आगपाखड केली. ठाकरी शैलीत समाचार घेतला होता.
"झक मारली अन् पुलंना पुरस्कार दिला...! आम्ही ठोकशाहीवाले तर मग आमचा पुरस्कार कशाला तुम्ही का स्वीकारता?"
असं बाळासाहेब म्हणाले आणि त्यांनी त्याच भाषणात त्यांनी पुलंची 'मोडका पूल' अशी संभावनाही केली होती.
प्रसिद्धीमाध्यमांनी यावर उलटसुलट बातम्या दिल्या होत्या. वादंग झाला. त्यामुळं बाळासाहेब आणि पुलं यांच्यात दुरावा निर्माण झालाय असं लोकांना वाटत होतं. किंबहूना ते व्हावं असंच वातावरण तयार झालं होतं. या घटनेच्या काही दिवसानंतर नाट्यनिर्माते मोहन वाघ आणि राज ठाकरे यांनी पुण्यात पुलंच्या घरी जाऊन भेट घेतली. राज ठाकरे पुलंना म्हणाले,
"काकांना तुम्हाला भेटायचं आहे, त्यांना आपल्याकडं घेऊन येऊ का?"
त्यावर पुलं दिलखुलासपणे उत्तरादाखल म्हणाले,
"अरे.., कोण बाळ ना....! तो माझ्याकडं कधीही येऊ शकतो. अरे..., तो माझा विद्यार्थी आहे ओरिएंटल हायस्कुल, मुंबईचा...!
काही दिवसांनी राज ठाकरेंनी शिवसेनाप्रमुख आणि पुलंची भेट ठरवली. ठरल्यादिवशी बाळासाहेब पुलंच्या घरी साडेचार वाजता येणार होते. मात्र ते येत असताना पोलिसांचा फौजफाटा, कार्यकर्त्यांचा लवाजमा असतो हे माहीत असल्यानं ते काही त्यांच्यासोबत असणार नाही. याची दक्षता घ्यायला पुलंनी राज ठाकरेंना सांगितलं. बाळासाहेब आणि पुलंच्या त्या विलक्षण ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं होतं. वृत्तांकनासाठी मी आणि माझ्यासोबत छायाचित्रकार म्हणून मनोज बिडकरही हजर राहणार होता.
.....आणि तो दिवस उजाडला, पुण्याच्या भांडारकर रोडवरच्या 'मालती माधव' या पुलंच्या निवासस्थानी राज ठाकरे यांच्यासह हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आले. सोबत फक्त रवि म्हात्रे होता. या भेटीची कुणालाच कल्पना दिली नव्हती त्यामुळं कोणीही बाळासाहेबांसोबत नव्हतं. पोलिसांचा तुरळक बंदोबस्त रस्त्यावर होता. महाराष्ट्रातल्या दोन दिग्गजांची भेट होणार होती. मला उत्सुकता लागून राहिली होती. पुलं वयोमानानुसार व्हीलचेअरवर होते. राज ठाकरे पुढे झाले, त्यांनी बाळासाहेब आल्याचं पुलंना सांगितलं. सुनीताबाई बाळासाहेबांना सामोरं गेल्या. बाळासाहेबांनी घरात प्रवेश करताच सुनीताबाईंनी
"या, बाळासाहेब...!"
या शब्दात त्यांचं स्वागत केलं. चेहऱ्यावर नम्र भाव असलेले बाळासाहेब उत्तरले,
"मी बाळासाहेब बाहेरच्यांकरता आहे; या घरात मी बाळंच आहे....!"
पुलं व्हीलचेअरवर जखडून बसले होते. अंग कंपवातामुळं थरथरत होतं. बाळासाहेब त्यांच्यासमोर गेले. खाली गुडघ्यावर बसले आणि डोकं झुकवून पुलंच्या पायांवर ठेवलं. पुलं गहिवरले. खोलीत असलेल्या सर्वांचेच डोळे पाणावले. पुलंनी आपला हात बाळासाहेबांच्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाले,
"बाळ, मला तुझा अभिमान वाटतो...!"
बाळासाहेबांनी झाल्याप्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त केली. पुलंनी दिलखुलासपणे हसत जणू काही घडलंच नव्हतं, असं व्यक्त झाले. त्या क्षणाचं शब्दचित्र मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून तर छायाचित्र बिडकर यानं टिपलं होतं. ते ऐतिहासिक दृश्य होतं. मनातली सारी किल्मिश, जळमटं दूर झाली होती. दृश्य होतं ते एक शिक्षक आणि विद्यार्थी यांचं...!
त्यानंतर तासभर पुलं, सुनीताबाई, बाळासाहेब, राज ठाकरे यांच्या दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या. ती खासगी भेट असल्यानं मी आणि मनोज आम्ही तिथून बाहेर येऊन खाली येऊन थांबलो. मालती माधव मधून बाहेर पडताना बाळासाहेबांनी मला बोलावून घेतलं. याची बातमी वा फोटो प्रसिद्ध करायचं नाही, असं बजावलं. ती वैयक्तिक खाजगी भेट असल्यानं त्याची प्रसिद्धी संयुक्तिक नव्हती. बाळासाहेबांचं पुलंच्या घरी येणं हे बाळासाहेबांच्या मोठ्यापणाची, मनाची प्रचिती देऊन गेलं. महाराष्ट्राच्या साहित्यविश्वात बाळासाहेब आणि पुलं यांच्यात निर्माण झालेला वाद हा पेल्यातलं वादळ ठरलं होतं...! दोन उत्तुंग, महनीय व्यक्तिमत्वांची एकमेकांवरची टीका, त्यानंतरचं त्यांचं वागणं, एकमेकांना सन्मान देणं अनोखं होतं. अशी राजकीय सहृदयता, मनोमिलन आगामी काळात व्हायला काय हरकत आहे.
हरीश केंची
९४२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...