Saturday 11 May 2024

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा भाजप आज व्यक्तिनिष्ठ बनलाय. 'मोदी सरकार', 'मोदी गॅरंटी' असं म्हटलं जातंय. 'अब की बार ४०० पार!' या सारख्या घोषणा देताना संविधान बदलाची भीती व्यक्त होतेय. मात्र मोदी, शहा ते नाकारताहेत, पण भाजपचेच अनंत हेगडे, लल्लूसिंग, अरुण गोविल, पंकजा मुंडे, ज्योती मिर्धा, दिया कुमारी, धर्मपुरी अरविंद असे काही भाजप उमेदवार मागणी करताहेत. जर असे नसेल तर त्यांच्यावर कारवाई का नाही? असो. लोकशाही आडून हुकूमशाही, फॅसिझम अनुभवताहोत. मूल्याधिष्ठित राजकारणाऐवजी व्यक्तिनिष्ठ राजकारणाला प्रारंभ झालाय. त्यामुळं संविधान बदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर लोकशाही संसदीय असावी की अध्यक्षीय...? याबाबत चर्चा व्हायला हवीय!"
--------------------------------------
*घ*टना कोणत्याही प्रकारची असली तरी तिचं यश हे राबवणार्‍यांवर अवलंबून असतं. त्यांची राज्य पध्दतीवरची निष्ठा आणि जनतेचं कल्याण करण्याची वृत्ती, यावर सर्व ठरतं. असं खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं. राजेशाही हा हुकूमशाहीचाच प्रकार आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे लोकांना हवंहवंसं वाटणारं राज्य होतं. बडोद्याला सयाजीराव गायकवाडांची राजवट जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारी होती. आजही अनेक राजांची नांवं इतिहासात आदरानं नोंदली गेलीत. नेतृत्व जर भ्रष्ट असेल तर कितीही उत्तम राज्यव्यवस्था असली, तरी तिची वाटच लागणार. भारतातल्या सर्व मतदारांना आणि लोकशाहीलाही आता ही सवय झालीय. यापुढं देशात राजकीय पेचप्रसंगही उभा राहील. देशात आज अनेक राज्यांत विविध पक्ष सत्तेवर आहेत. १९६७ मध्ये नऊ राज्यांत कॉंग्रेस हरली, तेव्हा या आघाडीच्या राजकारणाला प्रारंभ झाला. संयुक्त विधायक दल इत्यादि स्वरूपात आघाडी सरकारं अस्तित्वात आली. परंतु आघाडी सरकारांचं बस्तान ना कधी राज्यात बसलं, ना केंद्रात. प्रत्येकवेळी घटक पक्षांमध्ये मतभेद होऊन सगळी सरकारं कोसळली. याला गेल्या कांही वर्षात अपवादही सिध्द झालाय. राज्यातलं आघाडी सरकार कोसळलं आणि कोणीही सरकार बनवू शकत नसेल तर राष्ट्रपती राजवट जारी करता येते. राज्यपालांमार्फत कारभार सुरू होतो. परिस्थिती स्थिरस्थावर झाली की, निवडणुका घेता येतात. असं वारंवार घडलं तरी राज्याची सूत्रं राज्यपाल सांभाळू शकतात. देशातल्या अनेक राज्यांत आजवर अनेकदा राष्ट्रपती राजवट आली आहे. परंतु, केंद्र सरकारबाबत अशी काही सोय नाही. राज्य घटनानिर्मिती झाली त्यावेळी घटनाकारांना वाटलं असेल की, ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीची पाळंमुळं खोलवर रूजतील, चांगल्या प्रथा निर्माण होतील आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ असलेली संसदीय लोकशाही वाढीला लागेल.
ब्रिटनची घटना अलिखित आहे. आजवरच्या वर्षानुवर्षाच्या अनुभवातून त्यांची आजची राज्यपध्दती विकसित झालीय. काळाच्या ओघात त्यात आणखीही बदल होतील. या पध्दतीचा मूलाधार आहे, संसदेत कोणत्यातरी एका पक्षाचं पूर्ण बहुमत. आतापर्यंत ब्रिटनमध्ये हुजूर, मजूर किंवा उदारमतवादी पक्षांचीच सरकारं आली आहेत. जगात अनेक मतमतांतरं असलेले लोक असतात. आपापल्या तत्त्वज्ञानानुसार ते पक्ष-पंथ काढतात. रचनात्मक तत्त्वज्ञानापासून गोंधळवादावर विश्वास असलेल्यांपर्यंत अनेक गट जगभर पसरले आहेत. त्यांना प्रत्येकाला वाटतं की, सत्तासुकाणू आपल्या हाती असावं. त्या अनुषंगानं त्यांचे पक्ष बनतात. विश्‍व शांततावादीपक्ष, पर्यावरणाची काळजी घेणार पक्ष, मुक्त जीवनाचा पुरस्कार करणारा पक्ष, आदि राज्यशकटाच्या दोन चाकासारख्या असलेल्या दोन पक्षांवर आधारित ब्रिटिश लोकशाहीसुध्दा या नवनव्या विचारांमुळे डळमळू लागलीय. राजकारणात अनेक तत्त्वं येतात. तेव्हा त्यांना दोनच पक्षांत सामावणं कठिण असतं. उदा.- मजूरपक्षाचे काही लोक आणि हुुजूरपक्षाचे कांही लोक पर्यावरणवाद न मानण्याच्या मुद्द्यावर एकत्र येऊ शकतात. त्यामुळे विविध पक्षोपपक्षांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालाय. नवनवे पक्ष निर्माण होताहेत. इंग्लंडमध्ये हुजूरपक्ष आणि उदारमतवादी पक्ष यांच्या तत्त्वज्ञानातला थोडाथोडा भाग घेऊन लिबरल डेमोक्रॅट पक्ष उदयाला आला. लोकशाहीत दोनच पक्ष आमने-सामने खडे असतील तर बहुमत कुणाला, हे ठरवणं सोपं जातं. परंतु तीन किंवा अधिक पक्ष असले की, कुणालाही स्पष्ट बहुमत मिळणं अशक्य होतं. एखादा पक्ष फारच मजबूत असेपर्यंत बहुमताचा प्रश्‍न येत नाही. भारतात अनेक पक्ष असूनसुध्दा कॉंग्रेसनं सतत बहुमत मिळवून संसदीय लोकशाही पध्दतीनं सरकार बनवलं, हा अपवाद आहे. सतत पंचेचाळीस पन्नास वर्षं एकच पक्ष अशा पध्दतीत सत्तेवर राहणं हे कॉंग्रेसनं करून दाखवलं. पण आता याच चमत्काराला ओहोटी लागलीय. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना यावर मत व्यक्त करताना एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘ब्रिटनची राज्यपध्दती त्यांच्यासाठी योग्य आहे. कारण तिथे दोनच पक्ष आहेत; परंतु आपल्याकडे अनेकपक्ष असल्याने ती पध्दत आपल्याला उपयुक्त नाही...!’ त्यांचा रोख कॉंग्रेसच्या राजकीय परिस्थितीवर होता. नरसिंह राव सरकार रोखे घोटाळा, साखर घोटाळा, खासदार खरेदी अशा अनेक गडबडीमुळे राव यांना न्यायालयीन आरोपी म्हणून उभं रहावं लागलं होतं. त्यानंतरही आलेल्या कॉंग्रेस आघाडी सरकारच्या कारभाराच्या दिशेने होतं. अटलजींनी राज्यातल्या निवडणुकांबाबतही म्हटलंय, वेगवेगळ्या राज्यात अनेक पक्ष सत्तेवर आल्याने देशात आता एकाच पक्षाचं राज्य राहील याची शक्यता नाही. राज्यात विविध पक्ष सत्तेवर आले तर ठीक, पण लोकसभेचे काय ? केंद्र सरकारचं काय? ५४० जागा असलेल्या लोकसभेत चार मोठे आणि कांही लहान पक्ष आले तर एकाच पक्षाच्या स्पष्ट बहुमताची शक्यता नाही. त्यातून सध्याची संसदीय पध्दत अशक्य होईल. इंग्लंडमध्येही तसंच होतंय. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये दोनच प्रमुख पक्ष असल्याने अजून तरी ब्रिटिश पध्दतीची लोकशाही तिथे राबविली जात आहे. कारण अटलजींनी आघाडी सरकारचा हा अनुभव घेतलाय. तेरा दिवसांचे पंतप्रधान पद, त्यानंतर तेरा महिन्यांचे पंतप्रधान पद त्यांच्याकडून आल्यानंतर त्यांनी त्यांचंच म्हणणं खोटं ठरवित पांच वर्षांची टर्म पुरी केलीय. मनमोहनसिंग सरकार प्राप्तपरिस्थितीत आपली टर्म पूर्ण केलीय. एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढविल्यानंतर सत्तेसाठी एकत्र येणं अनेकांना क्रमप्राप्त झालं. निवडणुकानंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही तर आघाडी सरकार येणं प्रत्येकवेळा सोपं असेल, असं नाही. कारण, अनेक पक्ष परस्परांच्या वार्‍यालाही उभे राहात नाहीत. अनेकांना यासंदर्भात चिंता वाटते. सर्वांनाच धास्ती आहे. अशा राजकीय रोगावरचा इलाजही आपल्याकडे नाही. गलिच्छ राजकारणाने कळस गाठला आहे. जर पुन्हा एकाच पक्षाला बहुमत मिळाले नाही तर... या परिस्थितीत ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीचा त्याग करावा काय? सध्याच्या पद्धतीमध्ये लोकसभेत बहुमत असलेल्या पक्षाचा नेता पंतप्रधान होतो आणि सर्व सत्ता त्याच्याच हाती असते. राष्ट्रपती आणि सरसेनापती असले तरी ते नामधारी पद आहे. ब्रिटनमध्ये ते राणीचं स्थान आहे. आणि तिथेही संसद पंतप्रधानांमार्फत राज्य करते. आपल्याकडे प्रौढ मताधिकारातून लोकप्रतिनिधी निवडून येतात. केंद्रसरकार लोकांनी निवडून दिलेलंच असलं पाहिजे आणि ते स्थिर असणंही जरुरीचं आहे. 
ब्रिटिश पध्दतीच्या संसदीय लोकशाहीला पर्याय म्हणजे अमेरिकन धर्तीची अध्यक्षीय लोकशाही. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी आदि देशांत ही पध्दत यशस्वीरित्या कार्यरत आहे. आपल्याकडे भरमसाठ पक्ष निर्माण होत असतात. अनेकपक्षांचे तुकडे पडतात. नेत्याच्या नांवावरून हे गट ओळखले जातात. राजकीय स्वातंत्र्याचा हा तोटा म्हणा हवा तर, पण त्याला पायबंद घालता येत नाही. म्हणूनच आजच्या परिस्थितीत पर्याय म्हणजे अध्यक्षीय पध्दत. अमेरिकेत अध्यक्षीय पध्दत असली, तरी तिथेही ब्रिटनसारखेच दोन पक्ष आहेत. डेमोक्रेट आणि रिपब्लिकन. आपल्याकडे अनेक पक्ष असल्याने अध्यक्षीय पध्दतीला फ्रेंच, इटालियन किंवा जर्मन पध्दतीची जोड द्यावी लागेल. आपल्याकडे एकमत अधिक मिळविणाराही निवडून येऊ शकतो. त्यामुळे पक्षाला मिळालेली मतं आणि जागा यांचा काही ताळमेळ नसतो. केवळ ३५ टक्के मतं मिळविणार्‍या पक्षाला सत्तर टक्के जागा मिळाल्याचं उदाहरण आहे. अलीकडेच महापालिका निवडणुकांतूनही हे कांही प्रमाणात सिध्द झालंय. वाटेल तेवढे पक्ष आणि मतांची टक्केवारी व जागा यातला विसंवाद दूर करण्यासाठी मतांच्या प्रमाणात प्रतिनिधीत्व ही पध्दत योग्य ठरेल. ज्या पक्षाला जेवढी मतं मिळतील, त्या प्रमाणात लोकसभेतील जागा त्या पक्षाच्या वाट्याला येतील. त्यामुळे एखादा छोटा पक्ष मोठ्या पक्षाच्या साठमारीत नामशेष होतो. तसं न घडता त्या पक्षालादेखील एखादं-दोन जागा पदरात पाडता येतील. अध्यक्षाच्या हाती सत्ता असलेली लोकशाही आणण्यासाठी सध्याची ब्रिटिश धर्तीची पध्दत पूर्णपणे रद्द करावी लागेल. अध्यक्षीय पध्दतीत राष्ट्रप्रमुखाची निवडणूक सबंध देशभरात मतदान घेऊन होते. संसदेत मात्र विविध पक्षांचे निवडून आलेले प्रतिनिधी बसवतात आणि अध्यक्ष त्यावर लक्ष ठेवतात. अनेक पक्षांमुळे आघाडीची सरकारं बनतात-पडतात. अशावेळी अध्यक्ष कारभार पाहतात. अध्यक्षांनी बेदरकारपणा दाखवला तर सर्वोच्च न्यायालय त्याची दखल घेतं. आपल्याकडे खरी सत्ता पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या हाती असते. राष्ट्रपती नामधारी राष्ट्रप्रमुख. पंतप्रधान व मंत्रिमंडळ नसेल तर राष्ट्रपती राज्य चालवू शकत नाहीत. चरणसिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल आणि वाजपेयी यांच्याकाळात अल्पमतातील सरकारं होती. तरीही नांवापुरते का होईना पण ते पंतप्रधान होते. त्यांना काळजीवाहू पंतप्रधान ठेवून राष्ट्रपतींनी निवडणुका घेतल्या. असं केव्हातरी घडतं. राष्ट्रपतींनी असं पाऊल उचलण्याची तरतूद घटनेत नसली, तरी त्याला विरोधही नाही. अडचणीतून पार होण्याचा तो एक मार्ग. पण आता बहुमत नसण्याचा पेचप्रसंग सारखाच उद्भवू लागला तर त्यासाठी कायमी उपाय शोधावा लागेल. अध्यक्षीय पध्दत आणि प्रमाणात प्रतिनिधीत्व अशी सुधारणा करण्यासाठी घटना बदलावी लागेल. त्यासाठी नवी घटनासमिती किंवा खासदारांच्या दोन तृतियांश बहुमताची आवश्यकता आहे. अर्थात, घटनेत तशी तरतूद नाही. तीही सर्वानुमते करावी लागेल. असा घटनाबदल आणि अध्यक्षीय पध्दती शक्य आहे का? ते शक्य झालं आणि अध्यक्षीय लोकशाही अवतरली तरी देशाची सर्व सत्ता सांभाळू शकणारा अध्यक्ष सतत मिळू शकेल कां? सर्वंकष सत्तेची चटक लागलेला एखादा नेता घटना गुंडाळून स्वत:च सरमुखत्यार बनला तर?
चौकट.
फॅसिझमबाबत ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी आपल्या 'अन्वय' या लेखसंग्रहात म्हटलंय की, 'फॅसिझमला फक्त टाळ्या वाजवणारे हात हवे असतात. शंका घेणारी मूठभर डोकी केंव्हाही समाजात अल्पसंख्यच असतात. ह्या अल्पसंख्येनं बहुसंख्येच्या प्रतिनिधी असणाऱ्या शासनाला त्रास द्यावा हे फॅसिस्टांना पटतच नाही. म्हणून वेळोवेळी सर्वांनी आपल्या नेत्यावर विश्वास व्यक्त करावा अशी फॅसिझममध्ये प्रथा आहे. आमचा एकमेव नेता..., आमचा अलौकिक नेता... -फक्त तोच, एक राष्ट्र तारू शकतो..., 'आमचा नेता म्हणजेच राष्ट्र'..., 'गेल्या हजार वर्षांतला आमचा सर्वश्रेष्ठ नेता...' अशी सगळी वाक्ये ठरलेली असतात. जनतेच्या नावे नाममात्र सुधारणांचे कार्यक्रम चालू असतात; आणि हे कार्यक्रम यशस्वी झाल्याच्या घोषणाही चालू असतात. जर्मनीसारख्या सहा-सात कोटी लोकसंख्येच्या देशात तीन -साडेतीन कोटी मतदान होतं. हिटलरला मिळालेली सव्वाकोटी मते ही बहुसंख्या नव्हे, तरी ह्या सव्वाकोट श्रद्धावान अनुयायांच्या ताकदीवर हिटलर उभा असतो. म्हणून फॅसिझमला दारिद्र्य आणि दास्यांचे जतन करण्यासाठी अशा श्रद्धावानांची गरज असते. कैद्यांनी बेड्यांच्या संरक्षणार्थ प्राणपणानं लढावं अशी प्रेरणा कैद्यांमध्ये निर्माण करण्यात फॅसिझमचे खरं यश असतं. एकदा फॅसिस्टांच्या हाती सत्ता आली म्हणजे ती सत्ता हातातून जाऊ नये ह्यासाठी विरोधकांचे खून पाडणं, भयाचे वातावरण निर्माण करणं, पक्षांवर बंद्या घालणं, माणसांना तुरुंगात लोटणं हे सर्व उद्योग फॅसिस्ट करतात. ह्यानंतर संसदेत नेत्यांनी बोलावं आणि इतरांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं, हा एकच खेळ सुरू होतो! काही निष्प्रभ विरोधक आपल्यावर टीका करण्यासाठी संसदेत जिवंत ठेवणं फॅसिस्टांच्या सोयीच असतं. म्हणून फॅसिस्ट निवडणुका घेतात. राष्ट्राची गरज म्हणून स्वतःच्या सोयीची घटना दुरुस्ती करतात. जनतेकडून मान्यता मिळवण्यासाठी संसदेत ठराव पास करून घेतात. असा सगळा खेळ फॅसिस्ट करतच असतात. ज्यांनी लोकशाहीचा बाह्यात्कार सांभाळला ते फॅसिस्ट नव्हते असं मानणं हा एक भ्रम ठरेल. फॅसिस्ट हाती आलेली सत्ता कधीही सोडत नाहीत. सत्ता टिकवण्यासाठी सगळे मार्ग ते वापरतात. सोपे मार्ग परवडतात तोवर अवघड मार्ग वापरत नाहीत. गरज पडेल त्या वेळेला कोणताही मार्ग वापरतात. विरोधी पक्ष खच्ची करणं हा त्यांचा पहिला कार्यक्रम असतो आणि निष्प्रभ विरोधी पक्षांकडे पाहून ह्यांना जनतेची साथ नाही असं म्हणणं हा त्यांचा दुसरा कार्यक्रम असतो. फॅसिस्टसुद्धा स्वतःला जनतेचे प्रतिनिधीच मानतात. जोपर्यंत सत्तेचे प्रलोभन दाखवून विरोधी पक्षातले कार्यकर्ते फोडून लाचार करता येतात तोपर्यंत गोळ्या घालून मारण्याची गरज नसते. जोपर्यंत कोणत्याही पक्षाशी सोयीस्कर सोयरिकी करता येतात तोपर्यंत चिंताच नसते. जोपर्यंत जाती, धर्म आणि पैसा यशस्वीरीतीनं हाताळता येतो आणि विरोधी पक्षात फूट पाडता येते तोपर्यंत अडचण नसते. ज्यावेळी हे मार्ग अपुरे ठरतात त्यावेळी बंदी घालून पक्ष मोडता येतात, माणसं तुरुंगात पाठवता येतात. बोलणारी सर्व तोंडं बंद करता येतात...!'
हरीष केंची
९४२२३१०६०९

भुरट्यांची तेजी अन् कार्यकर्त्यांची मंदी...!

"सोलापुरातल्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली असली तरी अद्यापि राज्यातल्या इतर ठिकाणी मतदानांच्या फेऱ्या अद्यापि बाकी आहेत. नेते उदंड झालेले दिसताहेत मात्र कार्यकर्ते हरवलेत; याचा कटू अनुभव साऱ्यांनाच येतोय. तो पक्षीय अभिनिवेश दाखवत असला तरी त्याला व्यावसायिकता खुणावत असते. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या जागी ' इव्हेंट मॅनेजमेंट ' नावाची नवी जमात अस्तित्वात आलीय. तिलाच राजकीय पक्ष महत्व देत असल्यानं त्याचा हिरमोड होतोय, त्याची समर्पणवृत्ती लोप पावलीय. सटोडीयांना मानाचं पान दिलं जातं तर कार्यकर्त्यांच्या तोंडाला पानं पुसली जाताहेत. ध्येय-धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, मूल्याधिष्ठित राजकारण, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेलेत. त्यामुळं निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय! तो पुन्हा ठामपणे उभा राहणं ही केवळ पक्षांचीच नव्हे तर समाजाचीही गरज आहे!"
------------------------------------------------
*लो*कसभेच्या निवडणूकांचा उत्सव सुरू आहे. त्यानंतर विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका होतील असं वातावरण आहे. पण आजच्या राजकारणाचा जो काही विचका झालाय त्यानं तरुणांचा कोणत्याच राजकीय पक्षांवर विश्वास राहिलेला नाही; तो राजकीयदृष्ट्या भांबावल्यासारखा, दिशाहीन बनलाय. कुणाचा तरी आदर्श आपल्या जीवनात घ्यावा असं नेतृत्वही त्याला डोळ्यासमोर दिसत नाही. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या आंदोलनात हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, त्यांना अण्णांसारखा साधासुधा माणूस आकर्षित करू शकला होता. इतका स्वच्छ, निस्वार्थी माणूस असू शकतो याचं आश्चर्य आणि कुतूहल त्यावेळी त्यांना वाटलं होतं. आज मात्र त्याचा भ्रमनिरास झालाय. पण कधीकाळी आपल्याकडं अशी निस्वार्थी, सेवाभावी माणसं शेकड्यांनीच नव्हे तर हजारोंनी होती; त्यावेळी त्यांनाच कार्यकर्ते म्हणून संबोधलं जाई. त्यांच्याकडं कोणी त्यागी, निस्वार्थी म्हणून आदरार्थी बघत असला तरी त्यांना कोणी साधुसंत समजत नव्हतं. आपण प्रामाणिक असावं, ही भावना समाजात त्यावेळी सर्वत्रच रूढ होती. अशी निस्वार्थी माणसंही तेव्हा 'कार्यकर्ते' म्हटली जायची. आज अशी माणसं दुर्मिळ होताहेत. किंबहुना दिसतच नाहीत. पूर्वीच्या काळी होते तसे आदर्श आजच्या पिढीसमोर नाहीत. त्यांना कार्यकर्ता म्हणजे काय, कसं समजावं असा प्रयत्न राजकीय पक्षांकडून, नेत्यांकडून होताना दिसत नाही. पूर्वी सर्वच पक्षात असे निष्ठावान कार्यकर्ते होते. *गांधी टोपी डोक्यावर घालण्यापूर्वी त्यावर कपाळ टेकवून वंदन करणारे काँग्रेस कार्यकर्ते होते, नेहरू सदर्‍याला ठिगळ लावून खांद्यावर शबनम बॅग लटकवून देशात समाजवाद आणण्याच्या निश्चयानं वठलेले साथी समाजवादी होते. उच्चविद्याविभूषित पदवीधर द्विपदवीधर झालेले अनेक जण राष्ट्रवादाच्या विचारानं भारून देशाच्या कानाकोपर्‍यात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार पोचवणारे स्वयंसेवक होते. शिवसेनाप्रमुखांचा आदेश येताच जीवाचीही पर्वा न करता दे धडक बेधडक भिडणारे शिवसैनिक होते...!* आता अशा कार्यकर्त्यांची सर्वत्र वानवाच दिसून येतेय. सगळ्याच पक्षनेतृत्वाला हे जाणवत असावं; याचं कारण, आजचं पक्षीय राजकारण लोकांच्या सुखदुःखाशी निगडीत राहीलेलंच नाही. ते कोणत्याही राजकीय विचारांशी वाहिलेलं नाही. केवळ सत्तेसाठी, खुर्चीसाठी आणि निवडणुकीसाठीच राजकीय पक्ष उरलेत! असं ह्या पक्षांचं स्वरूप राहिलेलंय. सार्‍यांच्या निष्ठा या सत्तेला आणि खुर्चीला वाहिलेल्या असल्यानं सारे नेते हे सत्ताधारी पुढारी होण्यासाठीच सज्ज झालेले आहेत. कार्यकर्ता व्हायला कोणीच तयार नाही. याचं कारण राजकारण हा आताशी त्यांचा व्यवसाय बनलाय आणि नेते, कार्यकर्ते हे व्यावसायिक झालेत. पूर्वीचा तो निरलस, निरपेक्ष, निस्वार्थी कार्यकर्ता आज गायब झालाय, हरवलाय...! 
कार्यकर्त्यांच्या समर्पणवृत्तीचा संस्कार आता हरवलाय. कार्यकर्ते जिथं, तिथं कामाचा उरक झपाट्यानं होणारच, हा मंत्र आताशी खोटा ठरू लागलाय. मात्र गणेशोत्सव, नवरात्र उत्सवांशिवाय नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, यांच्या मिरवणुकीत नाचणार्‍यांची संख्या काही कमी झालेली नाही, ती अफाट बनलीय. आरतीला, महाप्रसादालाही रांगाच्या रांगा फुललेल्या दिसतात, परंतु कार्यक्रमाच्या ठिकाणी सतरंज्या घालायला कार्यकर्ते मिळण्याचे दिवस संपुष्टात आलेत. अंग मोडून काम करणारी कार्यकर्त्यांची पिढीही आताशी हायटेक झालीय. अधिकाधिक सोयी, सवलती मिळाव्यात म्हणून 'इव्हेंट मॅनेजमेंट' नावाची एक नवी जमात अस्तित्वात आलीय. त्यांच्या आयोजनामुळं कार्यक्रम देखणा, आखीव-रेखीव आणि व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण ठरतं! मोठमोठ्या नेत्यांच्या सभा सध्या आपण पाहतो यात त्याचं दर्शन होतं. परंतु अशा बदलत्या व्यावसायिक रूपानं मात्र पक्षाचा कार्यकर्ता हरवतोय हे कुणी राजकीय नेते लक्षांतच घेत नाहीत. पूर्वी मी कम्युनिस्ट, मी पुरोगामी, मी नवमतवादी, आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही अहिंसावादी, आम्ही अमुक विचारांचे...! असं सांगताना सांगणाऱ्याच्या मनात काहीही किंतू नसायचा; तो ते अभिमानानं सांगायचा. मी ऐकणार नाही, उलट दोन्ही बाजूंना त्यांच्या त्यांच्या परीनं त्या त्या विचारांचा आणि चळवळीचा आदर केला जात होता; विरुद्ध मतवादी विचारसरणी डावी-उजवी करत कार्यपद्धतीबाबत फारकत मानत, परंतु परस्परांच्या कार्यकर्तावृत्तीबाबत आदरभाव होता. मी या विचारसरणीचा असल्यानं जे माझं वैचारिक नुकसान होईल, ते माझ्या विचारांची होईल, मला त्याची मोजावी लागणारी ती किंमत आहे. असाच त्यामागे अभिमानी विचार असायचा. मात्र या किमतीची मोजणी ज्या काळापासून राजकारण्यांनी अर्थकारणात, पैशात केली त्या क्षणापासून कार्यकर्ता वृत्तीचा ऱ्हास होत गेला. 
आताशी नव्यानं कार्यकर्ते म्हणून नेत्यांभोवती घुटमळणारे तरुण हे कार्यक्रमानंतर मिळणाऱ्या पाकिटांबरोबरच 'मटणासह ओल्या पार्टी'ची वाट पाहू लागलेत. विविध चळवळीत भक्तिभावानं झोकून देणं तर आता दूर झालंय. स्वातंत्र्यलढा न पाहिलेल्या पण आणीबाणी सोसत दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यातल्या प्रसंगी भूमिगत राहून ध्येयासाठी लढणाऱ्यांना तुरुंगवासाची भीती नव्हती की, पोटापाण्याची चिंता वाटत नव्हती. समाजरचनेसाठी आवश्यक त्या यज्ञात अशा कार्यकर्त्यांच्या हजारो समिधा होऊन लढल्या. आजही विविध मोर्चे, सभा, संमेलन, मेळाव्याला गर्दी होते. पण तळहातावर ठेवलेल्या नोटांच्या हिशोबानं...! टाळ्या वाजतात त्याही त्याच हिशेबानं! कार्यक्रमानंतर पाण्याचा पाऊच, पोळीभाजीची पाकीटं हजारोंनी अंगावर फेकली जातात. ठरलेल्या वेळात आणलेल्या माणसाच्या लोंढी त्यांची बिदागी अदा केल्यानंतर पुन्हा ट्रकमध्ये चढविल्या जातात. आजच्या एखाद्या पक्षाची सभा संपल्यानंतर उद्या कोणत्या पक्षाच्या सभेला माणसं न्यायची, यावर चर्चा झडतात. हे आपण अनुभवतोय. कोणत्यातरी विषयावर भाळून संपूर्ण जीवन कारणी लावण्याचा वेड गेल्या दोन दशकापर्यंतच्या पिढीत होतं. परंतु या दरम्यान घडलेल्या नेत्यांनी अशा भावनिक कार्यकर्त्यांचा गैरवापर करून घेतला. हा कार्यकर्ता वर्ग केवळ चपला सांभाळणाराच ठरला. चळवळीच्या ताई, भाऊ, दादा, अण्णा, अप्पा यांना स्टेशनवर उतरून घेतल्यापासून त्यांच्या बॅगा उचलण्यापर्यंत आणि स्टेजवर चढताना त्यांनी काढलेल्या चपला सांभाळण्यापर्यंतची सारी जबाबदारी या कार्यकर्त्याकडं बहाल करण्यात आली. कार्यकर्त्याला सुरवातीला अत्यंत सन्मानाचं वाटणारं हे काम थोड्याकाळानंतर रामागड्याचं होऊन जातं आणि त्याच्यातली ती कार्यकर्ता वृत्ती हरवून जाते. हे जेव्हा कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो. सुरुवातीला आग्रहानं सामाजिक, राजकीय कार्यात गेलेल्यांची फरफट कधी होतेय हे त्याचं त्यालाच कळत नाही. मग कालांतरानं त्याला त्याचा प्रचंड मनस्ताप होतो. मग त्याचं खाण्याचं, पिण्याचं, राहण्याचं वांदे होतात. त्याच्या जीवनातला एक एक आदर्श ढासळताना त्याच्या कार्यकर्तावृत्तीला दिसतात आणि त्यावेळी त्याला जे नैराश्य येतं, त्यानं त्याचं जीवनच बदलून जातं. यातून बाहेर पडावं आणि कुटुंबात रमावं तर, आजवरच्या आपल्या ह्या राजकारणापायी कुटुंबाची हेळसांड झालेली असते. त्यामुळं घरदार ही त्रासलेलं असतं. अशावेळी नाराजी व्यक्त करण्याची एकही संधी कुटुंबीय सोडत नाहीत. राजकारणाच्या भुताटकीतून भानावर आलेल्यांना ही सजा मिळालेली असते! पोटच्या पोराच्या तोंडाचा घास ओढून घेऊन चळवळीतल्या कार्यकर्त्यांना भरवलेला असल्यानं  कुटुंबप्रमुख याविषयी खदखदणारा त्याचा राग बायको-पोरांवर काढतात. कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या मागे फिरावं तर फिरताना, मिरवताना, त्यांच्या चपला सांभाळताना घरात आलेलं उघडेपण यानं तो आतल्या आत खचत असतो. आदर्श म्हणून ज्या नेत्याकडं तो पाहत असतो, त्यांच्याशी बोलावं तर ही व्यक्तिगत बाब आहे नंतर बोलू असं म्हणून त्याला गप्पगार बसवलं जातं!
अशाप्रकारे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचं तिळातिळानं होणारं मरण मात्र नवी पिढी हेरतेय. त्यांच्यासारखं निष्काम काम करून काही साधणार नाही, हेही तो ओळखतो, मग चळवळीतून स्वतःला घडवायचं एक नवं चक्र तयार होतं. पद, अधिकार याचा गैरवापर सर्रास होतो. जुन्या कार्यकर्त्यांना अलगद बाजूला सारलं जातं आणि सुरू होतो नव्या पिढीच्या हिशोबी कार्यकर्त्यांचा खेळ! यात तत्त्व, विचार, निष्ठा, आदर्श, ध्येयं, वैचारिकमूल्य याला थारा नसतो की तत्त्वासाठी, निष्ठेसाठी, सत्यासाठी, प्राणांची आहुती देण्याची भूकही नसते. अशा व्यावसायिक, हिशेबी मनोवृत्तीचा आताशी शिरकाव झालाय तो 'इव्हेंट मॅनेजमेंट'चा! त्याचबरोबर स्वयंसेवी संस्थांचा! समाजसेवेच्या नावाखाली देशी, परदेशी निधी घेऊन उपक्रम चालवण्याचा! हे एका बाजूला सुरू असताना 'व्हाईट कॉलर' जनतेची मुलं तर कधीच कार्यकर्ता होत नाही. एक तर ती होतात पक्षाचे पदाधिकारी वा एकदम नेते, मंत्री म्हणूनच! हे जमणं शक्य नसेल तर राजकारणात त्याला रस नाही असं मोठ्या दिमाखानं त्याचे मायबाप सांगतात. आता आपल्या पूर्वजांनी जपलेला कार्यकर्तावृत्तीचा संस्कारी ठेवा नव्या पिढीकडं हस्तांतरित करण्याची वेळ आलीय! जनता पक्षाच्या उदय आणि अस्तानंतर हळूहळू क्षीण झालेल्या कार्यकर्त्यावृत्तीनं आताशी माणूसकी राखली आहे. ही अशी स्थिती का झालीय? याचा विचार करण्याची सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी अशा सर्वच पक्षांची जबाबदारी आहे. गरज आहे ती पूर्वीप्रमाणे कार्यकर्तावृत्ती जोपासण्याची, तसं वातावरण निर्माण करण्याची. पण हे होईल का? आज सारे राजकीय पक्ष व्यक्तिसाक्षेप बनले आहेत. पूर्वी पक्षाचे नेते असत, आता नेत्यांचे पक्ष बनले आहेत! ध्येय, धोरण, विचार-आचार, तत्व-निष्ठा, लोकांप्रती बांधिलकी ह्यासारखे मुद्दे टांगले गेले आहेत! सामूहिक नेतृत्वाचा डंका पिटणाऱ्या पक्षानं देखील व्यक्ती महात्म्याच्या गवगवा करत तो म्हणजेच पक्ष, तो म्हणजेच सर्व काही अशी भूमिका स्वीकारलीय. त्यामुळं नेत्यांचं अस्तित्वच राहिलं नाही. नेत्यांप्रमाणेच आता पक्षांचे कार्यकर्तेही उरले नाहीत तर ते नेत्यांचे कार्यकर्ते बनले आहेत! मूल्याधिष्ठित राजकारणाला तिलांजली दिली गेलीय, त्यामुळं कार्यकर्ता धुळीला मिळालाय. तो पुन्हा उभा राहणं ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे तर आपल्या समाजाचीही गरज आहे!
सध्या राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविलं जातंय तेवढे वैचारिक मतभेद राहिलेले नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजप नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. त्यामुळं आज सर्वत्र चलती आहे ती भुरट्या राजकारण्यांची!. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे काही करण्याचा इरादा करूनच लोक आता राजकारणात येतात. सारं काही करून ते आव मात्र तत्व-निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. राजकारणात येण्यापूर्वी कोण कुठं होते नि ते आज कुठं पोहीचलेत, हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुन्हा पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेपांच रुपयाऐवजी पांच रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरी लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आपण आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा!सध्या राजकीय क्षेत्र हे भंगाराचं दुकान झालेलंय. कोणीही लोकप्रतिनिधी येतो आणि तागड्यात बसून स्वतःला भंगारच्या भावात स्वतःला विकतो. मतदारांना स्वतःची लाज वाटते की नाही ठाऊक नाही. पण प्रतिनिधी मात्र बेशरम आहेत. ऊरुसाच्या आधी तमासगीर मैदानात छावण्या टाकून रंगीत तालमी करतात. कोणाला कोणती भूमिका द्यायची हे ठरवतात. बाहेरुन कलाकार पळवून आणतात. प्रत्यक्ष तमाशाच्या आधीचा तमाशा त्या मैदानावरच होतो. आधी आदर करणाऱ्याची नंतर निंदा होते. ऊरुस संपला की सगळे थकून भागून गारेगार होतात. आपसात लग्नही जुळवून आणतात. पुढच्या ऊरुसापर्यंत छान संसार करतात. पटलं नाहीतर शेजारच्या छावणीत जातात. त्याला व्याभिचार नाही म्हणत. घरवापसी म्हणतात. सध्या राजकीय फडावर ह्याच भंगार मालाचा लिलाव सुरु आहे. मतदारांचं या दलालांना काही घेणं देणं नाही. त्याला गृहीत धरुन सगळा नासवा-नासवीचा धंदा राजरोसपणे सुरु आहे. 
आज मतदार मात्र या साऱ्या घटनांकडे थिएटरमध्ये बसल्यासारखं हे बघतोय अन टाळ्या पिटतोय. कपट कारस्थानाला हुशारी समजतोय. त्यालाच चाणक्यनीती समजू लागलेत. तो कोणाला तरी शिव्या घालतो. कोणाला तरी मत देतो. पुन्हा पुढच्या खेळाचं तिकीट काढतो. आपल्या समाजाची मनोदशाच समजत नाही. सकाळी उठून पोटाची खळगी भरण्यासाठी त्याची रोजगार यात्रा सुरु होते. तो मजूर अड्डयावर स्वतःला भाकरीच्या भावात भाड्याने देतो. आणि राजकारणी तिकडं तारांकित हॉटेलात जनतेच्या पैशावर डुकरासारखे चरतात, गाढवासारखे लोळतात. समाज हताशपणे कोणातरी सद् विचारी नेत्याची वाट पाहात बसतो. दररोज साने गुरुजी पैदा होत नसतात. समाज पुरुषानंच गांधी बनायचं असतं. पण आपला समाज पराभूत मनोवृत्तीचा आहे, तो लढाईच्या आधीच हत्यार खाली ठेवणारा. कितीही दुर्धर प्रसंग आला तरी कोपऱ्यातल्या कोपऱ्यात जागा करून राहणारा. पण मानेवरचं जोखड भिरकावून देत नाही. 'ठेविले अनंते तैसेचि राहावे चित्ती असू द्यावे समाधान...! परिस्थिती शरण समाजाचा निस्तेज चेहरा पाहावत नाही. गलितगात्र लोळागोळा झालेल्या समाजात दंगली घडविण्यासाठी प्राण कोण फुंकतो कोण जाणे. पण तो नक्कीच देशाचा हितचिंतक नाही. सामान्य नागरिकाला जोपर्यंत लोकशाहीतल्या मतांचं मूल्य समजत नाही. तो घटना साक्षर होत नाही. तोपर्यंत फडावर तमाशाची रंगीत तालीम होतच राहणार, दलाली आणि लिलावही होत राहतील. कोणीही शहाजोग नाही. सगळे एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यांची संस्कृतीही एकच आहे. हे आम्ही नेहमीच म्हणतो आणि मतदाराला जोपर्यंत हे समजत नाही तोपर्यंत म्हणत राहणार. राजकीय पक्षाची विचारधारा ह्या त्यावर चढवलेले पोषाख असतात. जात आणि पैसा याचं वास्तव राजकीय नेते कधीही दुर्लक्षित करत नाहीत. ते अधिक जोमानं त्याकडं पाहतात. मात्र पत्रकार आणि राजकीय विश्लेषक ते ठळकपणे मांडत नाहीत. राजकीय पक्षांच्या विचारधारेनुसार त्यांची धोरणं आणि कार्यक्रम असतात. हे इथं विसरलं जातं. मूल्याधिष्ठित राजकारणाचे तीनतेरा वाजवले जातात. 'निवडून येण्याची क्षमता' या गोंडस नावाखाली तमाम ध्येय, तत्व, निष्ठा, मूल्य ह्या पायदळी तुडविल्या जातात. पक्षविचारांशी बांधिलकी, कार्यकर्त्यानं तळागाळापासून केलेलं पक्षाचं काम मातीमोल ठरवलं जातं. पैसा खर्च करण्याची क्षमता, निवडणूक जिंकण्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही आयुधं वापरण्याची ताकद असेल तर मग पक्षनिष्ठा हवी कशाला? आयुष्यभर अपमान, निंदा, टिंगलटवाळी प्रसंगी मार खाऊन काम केलेल्या संघ स्वयंसेवकांना, जनसंघ, भाजपच्या कार्यकर्त्यांना पक्षाची झालेली ही अधोगती पाहून काय वाटत असेल? पक्षांत झालेल्या या भाऊगर्दीनं ती सुखावली असतील का? ज्या काँग्रेसी मार्गाला कार्यकर्त्यांनी आयुष्यभर विरोध केला त्याच मार्गावर आता पक्षाची सुरू असलेली ही वाटचाल आत्मक्लेश करणारी आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६

Friday 10 May 2024

बदसूरत ’पॅटर्न'

‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा यांच्या गृहराज्यातून या घोषणेच्या पूर्ततेचा एक ‘बदसूरत पॅटर्न’ भाजपनं जन्माला घातलाय. चंदीगड महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपनं आपच्यां उमेदवाराविरुद्धच्या मतपत्रिकाच बाद करण्याचा प्रयोग दाखविला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या कठोर भूमिकेनं तो फसला. कदाचित त्या प्रयोगातल्या चुकांपासून धडा घेत आता भाजपनं सुधारित प्रयोग राबविण्याच मनावर घेतल्याच दिसतंय. त्यामुळं सुरत मतदारसंघातून भाजप उमेदवाराच्या बिनविरोध निवडीसाठी आता चक्क काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या विरोधी उमेदवारांना निवडणूक रिंगणातून ‘बाद’ करून टाकण्याचा ‘बदसूरत पॅटर्न’ भाजपनं जन्माला घातलाय. खरं तर एखादा उमेदवार बिनविरोध निवडून आला तर त्याच स्वागतच व्हायला पाहिजे. त्यातून त्या उमेदवाराच मोठेपण आणि कार्यकर्तृत्व सिद्ध होतं. देशात आजवर २८ खासदार आणि २९८ आमदार निवडणुकीत बिनविरोध निवडून गेलेत आणि त्याचे स्वागतही जनतेनं केलेलंय. 
----------------------------------
चिनी आक्रमणानंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळातल्या यशवंतराव चव्हाण यांनाही नाशिक मतदारसंघातून महाराष्ट्रानं बिनविरोध निवडून दिलं होतं. मात्र, सुरतचा बिनविरोध निवडीचा ‘बदसूरत पॅटर्न’ हा जरा निराळाच आहे. म्हणजे कागदोपत्री यात कुठलीही खोट नाही. मात्र, हा उमेदवार बिनविरोध निवडला जाताना जे अगम्य योगायोग एकाचवेळी घडलेत ते मात्र या पॅटर्नची ‘बदसूरती’ अधोरेखित करणारी आहेत आणि म्हणूनच त्यावर आता वाद रंगलाय. अर्थात हा वाद राजकीय असल्यानं त्यात आरोप-प्रत्यारोप आणि एकमेकांवर चिखलफेक हे सध्याच्या राजकीय शिरस्त्याप्रमाणे साहजिकच आहे! त्यातून काही हाती लागणं अशक्यच! त्यामुळं हे वाद चिवडण्यात लोकशाही व्यवस्थेवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या मतदारांना काही स्वारस्य असण्याच कारण नाहीच! मात्र, हे अघटित घडलं कसं? हे समजावून घेण्यासाठी या सगळ्या घटनेचा बारकाईनं अभ्यास करणं आणि त्यासाठी ही घटना सविस्तर समजून घेणं आवश्यक ठरतं.
सुरत लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभानी यांच्या अर्जावर ज्या चार सूचक, अनुमोदकांची नावे होती त्यापैकी तिघांना ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर हजर ठेवू शकले नाहीत. या तिघांच्या सह्या बनावट असल्याचा आक्षेप विरोधी उमेदवार म्हणजे भाजपचे मुकेश दलाल यांनी घेतला होता. त्यामुळं नियमाप्रमाणे निलेश कुंभानी यांनी आपल्या अनुमोदक आणि सूचकांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासमोर हजर करून आक्षेप असत्य असल्याच सिद्ध करायला हवं होतं पण ते हे करू शकले नाहीत म्हणून त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. भाजपनं आपल्या अनुमोदक आणि सूचकांना फितुर केल्याचा आरोप कुंभानी यांनी केलाय. तो सत्य मानला तरी अर्ज बाद झाल्यावर काँग्रेसचा उमेदवारच रहस्यमयरीत्या गायब होणं, त्यांच्या चारही अनुमोदकांनी अर्जावरच्या सह्या आपल्या असल्याच नाकारणं अशा वेगवान घडामोडी घडल्या. बरं ज्यांच्यावर काँग्रेस उमेदवारानं फितूर झाल्याचा आरोप केला ते तिघे कोण तर पहिला काँग्रेस उमेदवाराचाच मेव्हणा, दुसरा त्यांचाच पुतण्या आणि तिसरा त्यांचाच व्यवसायातला भागीदार! एवढ्यावर हे नाट्य संपत नाही. पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज भरणाऱ्या दुसऱ्या काँग्रेस उमेदवाराचा अर्ज अगोदरच बाद होतो आणि हा निर्णय येण्यापूर्वी हा पर्यायी उमेदवार ‘नॉट रिचेबल’ झालेला असतो. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यावर खरं तर उर्वरित पक्षांच्या उमेदवारांना आपल्याला संधी मिळाल्याच स्फुरण चढायला हवं. मात्र, घडलं उलटंच! बहुजन समाज पक्षाचा उमेदवार मागच्या दारानं गुपचूप जिल्हाधिकारी कार्यालयात येतो आणि अर्ज माघारी घेऊन मागच्याच दारानं गुपचूप निघून जातो. बहुधा बसपच्या उमेदवाराची प्रेरणा मिळाल्यानं उर्वरित चार अपक्ष उमेदवारही आपले उमेदवारी अर्ज मागे घेऊन टाकतात आणि मग निवडणूक रिंगणात एकटाच उरल्यानं भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडला गेल्याच जाहीर होतं! बिनविरोध निवडून आलेला हा उमेदवार मोदींच्या चरणी आपण ‘पहिले कमळ’अर्पण केल्याची प्रतिक्रिया देतो. आता एवढं सगळं नाट्यमय योगायोग एकाचवेळी घडलं तर ते घडवलं गेल्याचा आरोप होणारच आणि तो चुकीचाही नाही. मात्र, हा खेळ दडपशाहीनं रंगविला गेलाय की सर्वसंमतीनं हा प्रश्न घटनेनंतर उत्तरार्धात घडलेल्या घडामोडींनी निर्माण होतो.
त्याच उत्तर मात्र जनतेला या गदारोळात मिळत नाही! अर्ज माघारीच्या दिवशी आठ उमेदवारांनी घेतलेली माघार हा लोकशाहीतला अफलातून योगायोग नाही काय? त्यामुळं सर्व गोष्टी लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्याच्या भाजपच्या दाव्यावर कोण विश्वास ठेवेल? काँग्रेसचे उमेदवार भाजपवर आरोप करतात. मात्र, त्या आरोपांची तड लावून भाजपचा खेळ जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी रहस्यमरीत्या गायब होतात. मग हा प्रकार राज्यघटनेसमोरील संकट आहे हा विरोधकांचा आरोप पूर्णपणे सत्य असला तरी या संकटाला कोण-कोण जबाबदार हा संशय मतदारांच्या मनात निर्माण होणं देखील साहजिकच! ज्या गुजरातनं मागच्या निवडणुकांमध्ये भाजपच्या या जोडीला ‘शतप्रतिशत’ समर्थन देताना राज्यातल्या सर्व जागा भाजपच्या ‘झोळी’त टाकल्या त्या गुजरातमध्ये भाजपनं असा प्रयोग घडविण्याची गरज काय? हा ही प्रश्नच! ‘ अब की बार ४०० पार’च्या घोषणेची पूर्तता करण्यासाठीचा भाजपच्या या जोडीचा हा ‘बदसूरत पॅटर्न’ आहे काय? हा प्रश्न या घटनाक्रमानं मतदारांच्या मनात नक्कीच निर्माण झालाय. भाजपनं जे घडलं ते प्रक्रियेप्रमाणेच! असा दावा करत असेल तर मग मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांच उत्तर देणं, शंका-कुशंकांच निराकरण करण्यासाठी या घटनाक्रमाची तड लावून सत्य जनतेसमोर आणणं हे सत्ताधारी म्हणून भाजपच कर्तव्यच! मात्र हे कर्तव्य भाजप पार पाडणार आहे का? हा प्रश्नच! त्यामुळं विरोधकांचे आरोप बिनबुडाचे नक्कीच ठरवता येणार नाहीत. या सगळ्या ‘बदसूरत पॅटर्न’कडं मतदार नक्कीच संशयानं पाहतायत, हे नक्की. त्याचा लोकसभा निवडणूक निकालांवर काय परिणाम दिसेल याची चार जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तोवर मतदारांच्या मनातला संशय कायमच राहणार आहे आणि तो दूर करण्याचा प्रयत्न सध्याच्या राजकीय भवतालात होण्याची शक्यता नाहीच, हे मात्र देशातल्या लोकशाही व्यवस्थेवर नितांत श्रद्धा ठेवणाऱ्या मतदारांचे दुर्दैवच, हे मात्र निश्चित!





आरक्षण आणि सरकारी धोरण

"भाजपेयींनी सत्तेची पाळंमुळं घट्ट रोवलीत. त्यामुळं संघाच्या पोतडीत असलेले मुद्दे कोर्टाच्या माध्यमातून मार्गी लावत त्यांनी ३७० कलम हटवलं, अयोध्येतल्या राममंदिराचा प्रश्न मार्गी लावला. आता लक्ष आहे ते समान नागरी कायद्यावर आणि संविधानातलं आरक्षण हटविण्यावर! त्यासाठी मागासजातींना कार्यपालिका आणि न्यायपालिका या दोन्ही स्तरावरुन वेठीला धरलंय. आधी मराठा समाजाच्या आरक्षणाला मोडता घातला, नंतर विशेष मागासवर्गीयांचं आरक्षण हटवलं आणि आता इतर मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेतलंय. मात्र उच्चवर्णीयांतल्या गरिबांना १० टक्के आरक्षण दिलंय. आज आर्थिक संसाधनं आणि राजकीय सत्ता ही संख्येनं अत्यल्प असलेल्या उच्चवर्णीयांकडं केंद्रित आहे. सत्ताधाऱ्यांना याची जाणीव आहे. जातवार जणगणनेतून वस्तुस्थिती पुढं आल्यास सत्ता आणि संपत्तीच्या वाटपासाठी ती उपयुक्त ठरु शकते. सत्ताधारी लब्धप्रतिष्ठितांना हे नकोय. म्हणून जातीय आरक्षण मोडीत काढण्याचा प्रयत्न होतोय! हे सारं घडतंय ते संघाच्या विचारधारेतून....!"
------------------------------------------------*दे*शात जनगणनेला १८७१ साली सुरुवात झाली. १९३१ पर्यंत सर्व जातींची नोंद या जनगणनेत केली जात असे. १९३१ नंतर मात्र देशामध्ये जातीविरोधी चळवळ प्रखर झाली आणि मागासजातीतले नेते राजकीय सत्तेत वाटा मागू लागल्यानं उच्चवर्णीयांनी केली जाणारी जातवार जनगणना बंद पाडली. एससी, एसटींचं आरक्षण हे 'घटनात्मक' आहे, तर ओबीसींचं राजकीय आरक्षण हे विधिमंडळानं दिलेलं 'वैधानिक' आरक्षण आहे. १ मे १९६२ रोजी 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१' हा कायदा अस्तित्वात आला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी त्रिस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात आली. पंचायत राजची अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं नववं राज्य ठरलं. १९९२ साली मंडल आयोग लागू झाला. त्यानंतर १९९४ साली 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१' मध्ये ही दुरुस्ती करण्यात आली आणि कलम १२ (२) (सी) समाविष्ट करून ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची तरतूद केली. म्हणजेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत २७ टक्के उमेदवार हे ओबीसीतून असणं बंधनकारक करण्यात आलं. आता ओबीसी आरक्षणाचा खटला सुरू होता, तो याच कलम १२ (२) (सी) संदर्भात होता. या कलमानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षणाची तरतूद तर आहे, पण पाच जिल्ह्यांमध्ये ओबीसींनी २७ टक्के आरक्षण दिल्यानं आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा राखली जात नव्हती. याचिकाकर्ते गवळी यांनी यावरच आक्षेप घेत कोर्टाचं दार ठोठावलं. ओबीसींच्या आरक्षणाबाबत 'हा मूलभूत हक्क नसल्याचं' सांगत, कोर्टानं जनहित याचिका फेटाळलीय. केंद्रानं ओबीसींचा डेटाच नसल्याचं सांगितल्यानं, स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या ओबीसी जागांवरच्या निवडणुका न घेण्याचा दिलेला निर्णय बदलून, या जागांवर खुल्या प्रवर्गात निवडणुका घेण्यास कोर्टानं सांगितल्यानं, राजकारणाचा गुंता वाढला. काही जिल्ह्यांमध्ये राजकीय आरक्षण ५० टक्क्यांच्या पुढं जात असल्याबाबत कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच निकाल आल्यावर, पुन्हा काही मुद्द्यांवर जनहित याचिका करण्यात आली. त्याचा निर्णयही ओबीसी आरक्षणाच्या बाजूनं न लागल्यानं, 'भाजपेयीं विरुद्ध महाविकास आघाडी' असा जंगी सामना रंगलाय. नरसिंहराव प्रधानमंत्री असताना ७३ व्यां आणि ७४ व्या घटनादुरुस्तीत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचीत जाती आणि जमातींना लोकसंख्येनुसार आरक्षण देणं अनिवार्य केलं गेलं. ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय राज्यांनी घ्यावा, असंही त्यात सांगितलं गेलं. या घटनादुरुस्तीबाबत कृष्णमूर्ती खटल्यात, 'ओबीसी हे मागासवर्गीय असून त्यांना आरक्षण मिळणं गरजेचं आहे; मात्र त्यासाठी इम्पिरिकल डेटा असायला हवा,' असं कोर्टानं म्हटलं होतं. कोर्टानंच, इंद्रा सहानी खटल्यात आरक्षणाबाबत ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडता येणार नाही, असंही नमूद केलं. राज्यातल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेली; कारण १९९३ मध्ये तिथं ओबीसींना सरसकट २७ टक्के आरक्षण देण्यात आलं. काही आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये, घटनेनुसार आदिवासींना अधिक आरक्षण द्यावं लागत असल्यानं ओबीसींचं आरक्षण कमी करणं गरजेचं होतं. ते केलं गेलं नाही; त्यासाठी आवश्यक आकडेवारी जमा करण्याची तोशीस कोणालाच नको होती. कोर्टानं याबाबत संकेत दिल्यानंतरही, देवेंद्र फडणवीस यांनी, भविष्यात निकाल विरोधात गेल्यास तो मान्य करण्याचं शपथपत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं; मात्र आकडेवारी गोळा करण्याचं काम तेव्हा त्यांच्या सरकारनंही केलं नाही. २०११ च्या जनगणनेत ओबीसींची आकडेवारी गोळा केली; त्यात काही त्रुटी असल्यानं आणि जनगणना कायद्यानुसार नसल्यानं ती महाराष्ट्राला देता येणार नाही, असं केंद्राचं म्हणणं होतं. आता तर, अशी आकडेवारीच आमच्याकडं नाही, असं केंद्र सरकार सांगतेय. तसं असेल, तर गोपिनाथ मुंडेंपासून फडणवीसांपर्यंतचे नेते कोणती आकडेवारी मागत होते, याचा खुलासा केंद्रानं करायला हवा. या सगळ्या गोंधळात राज्यानं अध्यादेश जारी करून, कुठल्याही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकूण आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त होणार नाही, असा तोडगा काढला. याच आधारावर इतर काही राज्यांतही निवडणुका होत आहेत. कोर्टानं या विषयात शिरण्यास नकार देत, महाराष्ट्रापुरता निर्णय दिलाय. यामुळं निवडणूक जाहीर झालेल्या १०५ नगरपंचायती, १५ पंचायत समिती व भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये ओबीसी राखीव प्रभागात खुला प्रवर्ग म्हणून निवडणूक घ्यावी लागेल. त्यात खुल्या प्रवर्गातल्या लोकांना अर्ज न भरता आल्यानं त्यांचं काय करायचं, हा प्रश्न निर्माण झालाय. या निकालानं देशाच्या लोकसंख्येतल्या अर्ध्यापेक्षा अधिक हिस्सा व्यापणाऱ्या ओबीसींच्या राजकीय भवितव्यापुढं प्रश्नचिन्ह लागलं आहे.आज भाजपेयींचं संसदेत बहुमत आहे. त्यामुळं मागासजातींना वेठीला धरलं जातेय. ते कार्यपालिका आणि न्यायपालिका या दोन्ही स्तरावर! आधी मराठा समाजाच्या आरक्षणाला मोडता घातला गेला, नंतर विशेष मागासवर्गीयांचं आरक्षण हटवलं गेलं आणि आता इतर मागासवर्गीयांचं आरक्षण काढून घेतलंय. हे संघाच्या विचारधारेला साजेसं निर्णय घेतले जाताहेत. आता राज्याला स्वत: डेटा गोळा करावा लागणार आहे. जोपर्यंत आकडेवारी नाही तोपर्यंत ओबीसींना राजकीय आरक्षण देता येणार नाही. आता ओबीसी आरक्षणासाठी तीन गोष्टी कराव्या लागणार आहे. एक मागास आयोगाची स्थापना करणं, दुसरं इम्पिरिकल डेटा उपलब्ध करणं आणि तिसरं आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण जाणार नाही याची दक्षता घेणं. ओबीसी आरक्षणाच्या विषयात इंपिरिकल डेटाच्या माध्यमातून माहिती गोळा करणं अवघड आहे, कारण सँपल साईझचा प्रश्न आहे. त्यासाठी सर्वोत्तम स्रोत हा जनगणनेची माहितीच ठरू शकेल. पण येणाऱ्या जनगणनेत जातिनिहाय जनगणना केली जाणार नाही, असं केंद्र सरकारनं यापूर्वीच स्पष्ट केलं असल्यानं तो मार्ग सध्या तरी बंद झालाय. त्यामुळं गोची झालीय. ही सारी संघाची खेळी आहे. त्याला अनुसरून सारं घडतंय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी २०१५ मध्ये बिहारच्या निवडणुकांवेळी असं विधान केलं होतं की, 'आरक्षणाच्या धोरणाचा फेरविचार झाला पाहिजे. त्यासाठी राजकारणाशी संबंधित नसलेल्या लोकांची एक समिती नेमून कोणाला व किती काळ आरक्षणाची गरज आहे, याचा तपास केला पाहिजे. लोकशाहीत हितसंबंधितांचे गट तयार होऊ शकतात. मात्र एका गटाच्या आकांक्षांची पूर्ती दुसऱ्या गटाच्या आकांक्षांची किंमत देऊन होता कामा नये!’ या विधानानंतर त्यावेळी गदारोळ झाला होता. भागवतांच्या विधानाचा संबंध असो वा नसो, मात्र त्यावेळी तिथं भाजपचा धुव्वा उडाला. मोदींपासून तमाम भाजपची प्रमुख मंडळी ही संघाचे स्वयंसेवक आहेत, सरसंघचालक निवडणुका तोंडावर असताना केवळ सौहार्दपूर्ण चर्चेची रीत अधोरेखित करण्यासाठी असं विधान करतील, हे पटायला थोडं अवघड जातं. त्यांचं विधान असं ‘आरक्षणाच्या बाजूचे लोक आरक्षण विरोधकांचा विचार करून काही बोलतील, करतील तसंच आरक्षणाचे विरोधक आरक्षणाच्या बाजूच्या लोकांचा विचार करून काही बोलतील, करतील त्यावेळी या प्रश्नाचा एका मिनिटात निकाल लागेल! सद्भावना समाजात तयार होत नाही तोवर या प्रश्नाचा निकाल लागणार नाही. ती सद्भावना तयार करण्याचे काम संघ करतो आहे...!’ प्रथमदर्शनी हे विधान आक्षेपार्ह वाटणार नाही. कोणताही प्रश्न सौहार्दपूर्ण वातावरणात चर्चेनं सुटावा, हे चांगलंच आहे. उलट विरोधक वा पुरोगामी विनाकारण भागवतांवर दोषारोप करत आहेत, असंच त्याच्या मनात येणार. म्हणूनच संघ, त्यांचे सरसंघचालक आणि त्यांच्या परिवारातल्या संघटना आणि व्यक्ती यांचा इतिहास आणि व्यवहार संदर्भात तपासावा लागतो. तरच त्यांच्या कथनी आणि करनीचा अर्थ लागू शकतो. सौहार्दानं चर्चा हे आनुषंगिक आहे; आरक्षणाचा फेरविचार हा प्रमुख मुद्दा आहे. अनेक तळाच्या म्हणजेच एससी, एसटी, मागासवर्गीय आणि मधल्या जातींचा म्हणजे इतर मागासवर्गीय यांचा विविध मार्गांनी पाठिंबा आपल्या शिडात भाजपेयीं भरून घेत आहेत. अशावेळी थोडंफार साशंक होणाऱ्या संघाच्या मुख्य पाठिराख्या उच्चवर्ण, वर्गीयस्तराला म्हणजे ब्राह्मणवर्गाला सरसंघचालकांचं वक्तव्य हे एकप्रकारे आश्वस्त करणारं आहे. ज्यात आरक्षण, सामाजिक न्याय, समाजवाद, धर्मनिरपेक्षता वगैरेंचा लवलेशही नसेल, अन्य म्हणजे हिंदूंशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन व इतर धर्मीय हे दुय्यम नागरिक असतील, विविध जाती आपापल्या स्तरावरून एकात्म हिंदू समाजात समरस झालेल्या असतील अशा हिंदू राष्ट्राची प्रस्थापना या आपल्या मूळ लक्ष्यापासून आम्ही विचलित झालेलो नाही, याचं ते सूचन आहे. ते मधून मधून करत राहणं ही संघाची गरज आहे.
प्रधानमंत्री मोदींनी उच्चवर्णियांतल्याना ‘वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपये असणाऱ्या गरिबांसाठी’ १० टक्के आर्थिक आरक्षण आणलेच की! अनेक घटनातज्ज्ञांच्या मते आर्थिक आरक्षण आणि ५० टक्के आरक्षणाची मर्यादा उठवणं हा संविधानाच्या मूळ पायावर केलेला आघातच आहे. सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण आणि पुरेसं प्रतिनिधीत्व नसणं हे आरक्षणाचं मूळ सूत्रंच यामुळं नष्ट होतं. मोदी दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर त्यांनी केलेलं भाषण आठवा. त्यात ‘आम्ही गरीब आणि गरिबांना गरिबीतून बाहेर पडायला मदत करणारे असे दोनच वर्ग आम्ही मानतो’ असं त्यांनी नमूद केलं होतं. ज्या व्यवस्थेनं गरीब वा दलित, मागास जाती जन्माला घातल्या ती व्यवस्था बदलण्याच्या संघर्षाला इथं पूर्ण नकार आहे. आपापल्या पायरीवर समरस होऊन जगावं हाच त्यातील खरा संदेश आहे. भागवतांना राखीव जागांच्या विरोधात बोलायचंच नव्हतं किंवा मोदींना उगाच यात खेचू नका, असं वाटणाऱ्यांनी संघ वा संघ आणि भाजप दोहोंत असलेली प्रमुख मंडळी काय बोलतात, किंवा बोलली आहेत तेही पाहावं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक प्रमुख नेते मनमोहन वैद्य २०१७ साली एका कार्यक्रमात म्हणतात ‘आपल्या देशात आरक्षणाची गरज नाही. त्यामुळे अलगतावाद वाढीस लागतो. …नोकऱ्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातले जातिआधारित आरक्षण लवकर संपुष्टात यायला हवे. पात्रता असलेल्या सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे...!' * संघाच्या स्वयंसेवक आणि माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन रांची इथं ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संस्थे’ची पूरक संस्था असलेल्या ‘प्रज्ञा प्रवाह’ या संघटनेच्या चार दिवसीय संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात २०१८ साली आपली भूमिका मांडताना म्हणतात- ‘डॉ. आंबेडकरांनी म्हटलं होतं, आपल्याला आरक्षण केवळ १० वर्षांसाठी हवं आहे. १० वर्षांत समाजाची सामूहिक उन्नती करण्याची त्यांची कल्पना होती. वास्तवात सामाजिक समरसतेची कल्पना डॉ. आंबेडकरांनी मांडली होती. पण आपण काय केलं? आपण आत्मचिंतनामध्ये कुठेतरी कमी पडलो. संसदेत बसलेले लोकप्रतिनिधी स्वत:चं अपयश लपवण्यासाठी दर १० वर्षांनी आरक्षण वाढवत राहिले. एकावेळी तर २० वर्षांनी ते वाढवण्यात आलं. हे काय होतंय...?’  बाबासाहेबांनी नोकरी आणि शिक्षणातल्या आरक्षणाला अशी कालमर्यादा घातलेली नाही. महाजन चुकीचं बोलल्या. १० वर्षांची मुदत राजकीय आरक्षणाला आहे. पण समरसतेची कल्पना बाबासाहेबांची नक्कीच नाही. बाबासाहेबांना समता अपेक्षित आहे. समाजातली उतरंड तशीच ठेवणारी समरसता नव्हे, तर ही उतरंड मोडून सगळ्यांचा दर्जा एक करणारी समता ते मानत होते. समतेचं हे मूल्य त्यांनी घटनेतच नोंदवलंय. भागवतांच्या म्हणण्याचा अर्थ आरक्षणाच्या विरोधात घेऊ नये असं वाटणाऱ्यांचं मत पुरेसं स्पष्ट बोलणाऱ्या वैद्य किंवा महाजन यांच्याबद्दलही तेच असू शकतं. संघाची मूळ भूमिकाच वैद्य वा महाजन मांडतात. आडवळणानं तेच भागवत मांडताहेत. वरच्या जातींना हजारो वर्षे विशेष दर्जा, हक्क आणि सवलती देणारी आणि तळाच्या जातींना त्यापासून धर्माज्ञा म्हणून वंचित ठेवणारी, गुलाम करणारी चातुर्वर्ण्यव्यवस्था हा गोळवलकर गुरुजींच्या अभिमानाचा भाग होता. 'ती रुढी नसून तो धर्म आहे. ती ईश्वर निर्मित आहे. त्यामुळे मानवाने तिची कितीही मोडतोड केली तरी आम्ही काळजी करत नाही. ती पुन्हा प्रस्थापित होणारच...!’  हा विश्वास गोळवलकरांनी व्यक्त केलाय. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी ‘झोत’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत याचं विवेचन केलंय. ‘चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागशः की जन्माधिष्ठित?’ या प्रश्नाला गोळवलकरांनी दिलेले उत्तर ते पुढं नमूद करतात 'चातुर्वर्ण्य गुणकर्मविभागशः’ होतं हे खरं. पण ‘गुण’ म्हणजे पात्रता आणि ‘कर्म’ म्हणजे आवडीनुसार स्वीकारलेलं कर्म, हा अर्थ चुकीचा आहे. गुण म्हणजे सत्त्व, रज आणि तम हे होत आणि कर्म म्हणजे पूर्वजन्मात केलेले कर्म होय. पूर्वजन्मीच्या कर्मानुसार पुढच्या जन्मी वर्ण मिळतो...!' जातिव्यव्यवस्था ईश्वर निर्मित, ईश्वर संचालित आणि त्यातल्या मनुष्याचं स्थान पूर्वजन्मीच्या कर्मावर अवलंबून आहे हे एकदा मानलं की ती नष्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. मग तिथं समता कशी आणणार? फार तर समरसताच संभवते. संघाच्या विचारसरणीचा हा पाया आहे. तो लक्षात घेतला तरच त्याचे नेते, प्रवक्ते, सरसंघचालक आणि स्वयंसेवक जे बोलतात त्याचा अर्थ कळू शकतो. वसंतराव भागवत यांनी भाजपची 'शेटजी-भटजींचा पक्ष' ही प्रतिमा बदलण्यासाठी, ओबीसीतल्या अनेकांना नेतृत्वाची संधी दिली. त्यातूनच मुंडे आणि खडसेंसारखे नेते तयार झाले. फडणवीसांच्या काळात भाजपचा ओबीसी चेहरा मागे पडला. भुजबळांमागे लागलेल्या शुक्लकाष्ठानंतर तेही पक्षात मागच्या बाकावर फेकले गेले. या घोळाचं पाप आघाडीच्या माथी मारून, भाजप राजकीय रणांगणात उतरेल. दुसरीकडं भुजबळांच्या बाहूंना बळ देण्याशिवाय राष्ट्रवादीला पर्याय नाही. ओबीसींना राजकारणात सर्वाधिक वाव देणाऱ्या शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या तिढ्यातून कसा मार्ग काढतात, हे पाहण्यासारखं असेल!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

भाजपमुक्त देश

मोदींना यावर कधी बोलताना पाहिलंय का? मणिपूर वर, महागाईवर, काळा पैशावर, डॉलर रुपयाच्या किंमतीवर, बेरोजगारीवर, महिला अत्याचारांवर, स्मार्ट सिटीवर, गॅस, पेट्रोल, डिझेलवर, ब्रिजभूषणवर, चीनवर, आतंकवादावर, नोटबंदीवर, अच्छे दिनवर, बुलेट ट्रेनवर, भारतावर वाढणाऱ्या कर्जावर, धार्मिक द्वेषवर, अदानीवर, उद्योग धंद्यांवर, आपला पंतप्रधान देशाच्या नागरिकांच्या महत्वाच्या मुद्द्यावर बोलायलाच हवा पण नसेल तर काय उपयोग असल्या माणसाचा? यावर विचार प्रत्येकानं करावा.
----------------------------------
 २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं महत्त्व पूर्वीपेक्षा वाढवलंय. लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. त्यानंतर प्रत्येक पाच वर्षांनं निवडणुका झाल्या असत्या तर, आपण १५ व्या लोकसभेच्या कार्यकाळात असतो. परंतु १९७१ च्या लोकसभा निवडणुकानंतर पाचवेळा लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका हा काही देशापुढचा मुख्य प्रश्न नाहीच. प्रश्न, देशातल्या लोकशाहीच्या अडणीवर भुजंगासारखे वेटोळे घालून वाढत असलेल्या जाती-धर्मवादी कर्मठतेचा आणि ढोंगी लोकशाही प्रेमाचा आहे. १९६७ पासून हे कर्मठपण आणि ढोंग धुमाकूळ घालतेय. ते १९६७ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या रूपानं अवतरलं. १९७५ ला जयप्रकाश नारायण त्या कर्मठतेचं आणि ढोंगाचे नायक बनले. ते कातडे १९८७ मध्ये व्ही.पी. सिंह यांनी पांघरलं. त्या भूमिकेत १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी गेले. त्यानंतर १० ते १२ वर्षांचा अवकाश गेला आणि २०१४ नरेंद्र मोदी अवतरले. त्यांचा अवतार असा की, जणू त्यांच्या पूर्वसुरींची सारी प्रभावळच झाकोळली जावी! गुजरात विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीनंतर त्यांचा भारताच्या राजकीय पटलावर जाणीवपूर्वक उदय करण्यात आला. त्यांच्या रा.स्व.संघासारख्या मातृसंघटनेला असं काही प्रॉडक्ट जन्माला घालण्यावाचून दुसरा इलाजच नसावा. गुजरातच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर देशाचं अवघं कॉर्पोरेट विश्व, अभिजन वर्ग, बाजारपेठ आणि ग्राहक आपलं तोंड नरेंद्र मोदी यांच्याकडं करून बसला. मग सिकंदर भारताकडं यावा, अशा वेगात आणि अविर्भावात नरेंद्र मोदी कर्णावतीकडून इंद्रप्रस्थाकडं चालू लागले. २०१९ मध्ये १६ व्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली. मतदान झालं. पण प्रस्थापित विश्व आणि मुख्यतः माध्यमांनी असा काही आव आणला की, देशात पहिल्यांदाच अशी काही निवडणूक होतेय. या निवडणुका २०१९ च्या मे महिन्यात झाल्या. भाजपनं ५४५ पैकी ३०२ म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकल्या. पण या ३०२ जागांनी सत्तेच्या माजाचा असा काही बुरखा मोदी आणि पक्षाला दिला की, देशातल्या एकाही पत्रकाराला गेल्या ९ वर्षांत त्याचं स्पष्टीकरण मागण्याची खुली संधी मिळू शकलेली नाही. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी प्रधानमंत्री राजीव गांधी होते. पण त्यांनी सत्ता कारभारात भाजपच्या 'त्या' दोन खासदारांना गृहीत धरलं होतं. याउलट, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ४४ जागा आणि २०१९ ला ५४  जिंकलेल्या कॉंग्रेस पक्षाचा नरेंद्र मोदी यांनी करता येईल, तेवढा आणि तितक्यांदा अपमान केलाय. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ५४५ पैकी ४१५ जागा जिंकल्या होत्या. पण सत्ता कारभारात त्यांनी मोदींएवढा उन्माद कधीच केला नाही. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ३६४, ३७५ जागा जिंकल्या. इंदिरा गांधी यांनीही चारवेळा अनुक्रमे २८३, ३५२, १५४, ३५३ जागा जिंकल्या. पण त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मोदींसारखं सवंग, अहंकारी, ढोंगी प्रदर्शन कधीच केलं नव्हतं. महात्मा गांधीजी यांच्यानंतर, संघ परिवाराची एक मेहेरबानीच म्हणायची! भारतात एकमेव असा महापुरुष म्हणजे नरेंद्र मोदीच, अशा आविर्भावात गुजरातच्या २०१२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जिंकली. त्यानंतर राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या, तामीळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांचा अपवाद वगळता जवळपास १५ राज्यांत भाजपचं सरकार आलं. केंद्रातही भाजप सरकार आणि राज्यातही भाजप अशा दुटांगी धोतरात संघाची चड्डी पँट लपून गेली आणि काँग्रेसमुक्त भारताची घोषणा फिरली. हा दर्प आणि माज साध्या बहुमतानं आला होता. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला १९८४ मध्ये मिळाल्या तशा, ४१५ जागा भाजपला मिळाल्या असत्या, तर विज्ञानाचे सारे सिद्धान्त उलटे फिरले असते. देशाचा सारा कारभार कॅलेंडराऐवजी पंचागावरच चालवावा लागला असता. पण भारत हा देश फार मोठं शहाणपण आपल्या मनी मानसी बाळगून आहे. या देशानं बुद्ध पाहिला; तसा पुष्यमित्र शुंगही पाहिलाय. बळी अनुभवलाय आणि वामनही वाचलाय. कर्झन वायली, रॉलेट या क्रूरकर्मी ब्रिटिश राज्यकर्त्यांची सत्ता सोसलीय आणि महात्मा गांधीही स्वीकारलेत. या देशानं गरुडाचा विहार पाहिला आणि चिलटांची गुणगुणही सहन केलीय. जिथं चौदा चौकड्यांची राज्यही कडकडा मोडली; तिथं लवचिक घटना असलेल्या आणि बऱ्यापैकी लोकशाही रुजलेल्या देशात अशी व्यक्तिवादी संस्कृती फार दिवस कशी बरं टिकणार? अशा वातावरणात कर्नाटक हातून गेलं. पाठोपाठ तेलंगणात पराभव झालाय. 'मी आलो, मी पाहाणार आणि मी जिंकणार...!' असा पायंडा पाडून राज्य करणाऱ्या किंवा तशी सवय लागलेल्या मोदींना या निवडणुकाही आपल्या डाव्या हाताचा मळ वाटत असणार. मोदी फक्त दिल्लीतच नव्हते. तसंच मोदी काही फक्त एकच आणि एकमेव नव्हते. ते दिल्लीतल्या सत्तेत होते. पक्षात होते. प्रत्येक राज्याच्या राजधानीत होते. म्हणजे नागपुरात होतेच होते. पण मुंबईत होते. कोल्हापुरात होते. धुळ्यात होते. यत्र-तत्र सर्वत्र होते. त्यांना जिंकण्याचा नादच नव्हे, रोग जडला किंवा तसा संसर्ग त्यांनी करून घेतला. हुकूमशहाला जसा सर्वकष सत्तेचा हव्यास जडतो आणि त्या नादात तो विरोधीच काय आपल्या विचारधारेचंही किंवा आपल्याच माणसांचं निर्दालन करताना, सारे विधिनिषेध गुंडाळून ठेवतो; तसंच सर्व काही भाजपत चाललं होते. म्हणूनच अडवाणी, जोशी, सिन्हा ज्याप्रमाणे मोडीत निघालेली भांडी ठरली; तशाच व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेला अडसर ठरण्याऱ्या योजना आयोग, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय यासारख्या घटनात्मक व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सुरू आहे. अशा वातावरणात लोकसभेच्या निवडणुका होताहेत. काही राज्यं भाजपच्या ताब्यात आहेत किंवा त्यांच्याच अनुयायांच्या एकछत्री अंमलाखाली आहेत. त्यात उडदामाजी काळे- गोरेही आहेत. पण त्यांच्या एकूण कामकाजाच्या शैलीचा निष्कर्ष लोकहिताला अपायकारकच आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतर प्रथमच भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोर मोठाच अडथळा निर्माण झालाय. याची सुरुवात नोटाबंदीच्या निर्णयानं झाली. त्यानंतर किंवा मोदी, मल्ल्या, चोक्सी, संदेसरा, अशी फडतूस माणसं अब्जो रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या लेखणीचा हात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाबून धरला जातोय. देशाची बाह्य सुरक्षा असो की आंतरिक सुरक्षा, त्याचाही खेळखंडोबा होतोय. प्रधानमंत्री महापालिकेची निवडणूक असो की,  विधानसभेची; राम मंदिर, दक्षिणेतली मंदिरं असो की,  पुतळ्याचं अनावरण असो; मोबाईल फोनच्या भाषेत बोलायचं तर ते सतत इवेक्शन मोडमध्ये असतात. भाषण- भाषण- भाषण ! एकतर्फी बोलणंच. दुसऱ्याचं कधी आणि काहीच ऐकायचं नाही, असा सारा व्यवहार! असं खूप काही संपूर्ण देश सोसतोय. मध्यप्रदेश ही अनेक वर्षांची संघ भूमी. भगवान बुद्धाच्या विशाल तत्त्वज्ञानाची आणि रा.स्व. संघाची. इथंच रा.स्व.संघाच्या विचारांचं पहिलं आणि टिकाऊ राज्य सरकार आस्तित्वात आलं. तिथं नव्या संदर्भात सांगायचं तर, वैदिक संघाचं पतन होऊन लोकशाही मूल्यांच्या बाजूनं जो कौल मिळाला, तो स्वागतार्ह होता. तो भाजपमुक्त देश, हा संदेश देणारा आहे. काँग्रेस पक्ष हा निमित्तमात्र !
हरीश केंची,
९४२२३१०६०९
चौकट


'मोदी की गॅरंटी' अन् 'इंडिया शायनिंग'!

"अवघं वातावरण राममय बनलं होतं, रामाचा धावा गल्लीबोळातून केला गेला. गुढी पाडव्याचं निमित्त साधून हिंदुत्वाचा जागर झालाय. या मंगलध्वनीत लोकसभा निवडणुकांचं डिमडिम वाजू लागलेत. अस्वस्थ, हतोत्साही, अस्ताव्यस्त, पराभूत मनोवृत्तीच्या विरोधकांपुढं सत्ताधाऱ्याचं मजबूत आव्हान उभं आहे. अशावेळी काँग्रेसनं प्रसंगी कमीपणा घेऊन छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना, विविध प्रश्नासाठी लढा देणाऱ्यांना पोटाशी धरून सामोरं जायला हवंय! सत्ताधाऱ्यांचे ३७० कलम, रामजन्मभूमी हे भाजपचे जिव्हाळ्याचे प्रश्न निकाली निघालेत. त्याच औत्सुक्य फारसं राहिलेलं नाही. हे समजल्यानं, जुन्या भाजपनं जसा 'इंडिया शायनिंग' चा खेळ खेळला होता, तेव्हा तो त्यांच्या अंगाशी आला होता. तसा आता व्यक्तिसाक्षेप पक्ष बनलेल्या नव्या भाजपनं 'मोदी की गॅरंटी' चा नारा दिलाय. शिवाय अब की बार ४०० पार करणारच...! असा निर्धार व्यक्त केलाय. पण भारतातला मतदार नेमकं काय करणार याचं औत्सुक्य आहे!"
------------------------------------------------
*वि*रोधकांचं पराभूत राजकारण आपण पाहतोय. या पार्श्वभूमीवर २०२४ चा डाव जिंकला जाऊ शकतो का? पराभुतांच्या रांगेत केवळ राजकीय पक्षच नाहीत तर संसद, सुप्रीम कोर्ट, विरोधक, नोकरशाही, संसदीय लोकशाही, मिडियाही आहे. लोकशाहीतल्या चारही स्तंभांनी सत्तेपुढे शरणागती घेतलीय, असं वाटावं असं वातावरण आहे. यापुढच्या काळात रोजच्यारोज लोकांच्या मनातले प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी विरोधक सज्ज असतील काय? तेवढ्या सक्षमतेनं साऱ्या स्वायत्त संस्था,सरकारी यंत्रणा उभ्या ठाकतील का? कारण सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं निवडणुक २०२४ मध्ये नव्हे तर ती २०२३ मध्येच झालीय. कारण ज्या ताकदीनं २०२३ च्या निवडणुका सत्ताधाऱ्यांनी खेळल्या, तेव्हाच  विरोधकांचा पराभव होताना दिसू लागला, आणि तसा तो झाला देखील! अशा स्थितीत २०२४ च्या लोकसभा निवडणुका विरोधक जिंकतील का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली जी दरी वाढलीय यासाठी तीन लोकांचं राजकारण आपल्या मूळ स्वरूपातून मूळ भूमिकेतून सामोरे आलं तरच ते सत्ताधाऱ्यांच्या समोर टिकू शकतील. ते म्हणजे उद्धव ठाकरे, मायावती आणि राहुल गांधी...! 
राजकारणात शिवसेनेची ओळख ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून आहे. जेव्हा अयोध्याकांड सुरू झालं तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे छाती ठोकून न डगमगता ठामपणे सांगितलं होतं, 'अयोध्येतला ढाचा पाडण्यात माझी संघटना आणि माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे...!' अयोध्येत जे घडलं, बाबरी मशिदीचा विध्वंस झाला तेव्हा कुणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुंदरलाल भंडारी यांनी हात झटकले आणि त्याची जबाबदारी शिवसेनेवर टाकली. त्यावेळी कोणत्याही भाजप नेत्यांनी काही म्हटलं नाही. जे काही म्हटलं ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनीच...! पण आज अयोध्येच्या माध्यमातून देशाचं राजकारण आपल्याला अनुकूल करायला कोण निघालेत! जे निघालेत त्यांचं अयोध्येत आणि अयोध्याकांडमध्ये अतितच्या रुपात काय योगदान आहे? राम सर्वांचे आहेत. पण मंदिर निर्मितीसाठी झालेल्या एका मोठ्या आंदोलनानंतर प्रतिष्ठापनेसाठी सत्ताधाऱ्यांकडून आमंत्रित अशा लोकांना आमंत्रित केलं गेलं, जे केवळ भक्तीरसात आकंठ बुडालेले होते. धर्माच्या नावावर राजकारणाचं ध्रुवीकरण हे आजच नाही ते स्वातंत्र्यानंतर सतत अवलंबलं गेलंय, खेळलं गेलंय मग तो हिंदू महासभेचा कालखंड असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असो, जनसंघाचा काळ असो वा आजचा भाजपचा असो. धर्माच्या आधारे राजकारण खेळण्याचा प्रयत्न वारंवार झालाय. 
धर्माच्या आधारे आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण उभं राहत असेल तर मग, उद्धव ठाकरे, त्यांची शिवसेना कुठे आहे? शिवसैनिक कुठे आहेत? शिवसेनाप्रमुखांनी जो विचार रुजवला, जोपासला, वाढवला त्यांचीच ही ताकद होती की, भाजप असो वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो यांना हिंदुत्वासाठी उभं राहायचं होतं, देशभरात ते शक्य होत नव्हतं, महाराष्ट्रात ९९ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असतानाही त्यांना तिथं शिरकाव करता येत नव्हता, तेव्हा इतर कुठं नाही तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीच्या दारात जावं लागलं होतं. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी....! मग आज ते सगळं राजकारण संपविण्यासाठीच सत्ताधारी सरसावले असतील तर त्या कृतघ्न राजकारणाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आजच्या या स्थितीत हिंदुत्व आपल्या खांद्यावर उचलून घेत मार्गक्रमण करतील तर काय होईल? राजकारणातलं ते एक मोठं परिवर्तन असेल! पण आज शिवसेना, शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे खामोश आहेत, गप्प आहेत. हे सारं बदललं तर काय होईल? याबरोबरच दुसरा प्रश्न जातीच्या राजकारणाचा येतो. आज जसे हिंदुत्ववादी  राजकारण करणारे शिवसेनाप्रमुख नाहीत तसेच जातीवादी राजकारण करू पाहणारे कांशीरामही नाहीत. पण त्यांची बहुजन समाज पार्टी अस्तित्वात आहे. राष्ट्रीय राजकारणात कांशीराम यांनीच नेमलेल्या मायावती यांच्याकडे त्याची धुरा आहे. त्यांच्याकडे जातीय राजकारणात ध्रुवीकरण करण्याची क्षमता आहे. कोणी काही म्हटलं तरी त्यांची जिद्द पणाला लागते. आपला पराभव विसरून त्या खंबीरपणे उभ्या ठाकल्या तर वातावरण बदलू शकतं. कारण त्या २०१४ ला एकट्या लढल्या तेव्हा त्यांना एकही जागा मिळाली नव्हती. मात्र सपाच्या अखिलेश यादवसोबत युती केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांना १० जागा मिळाल्यात. हे पाहता त्या एकट्या २०२४ ला सामोरं जातील असं आज तरी वाटतं नाही. याच रांगेत तिसरं नाव येतं ते राहुल गांधी यांचं. राहुल गांधी हे काही इंदिरा गांधी नाहीत, पण काँग्रेस पक्ष आहे ना. देशभरात काँग्रेसचं नेटवर्क तसंच आहे जसं भाजपचं आहे. त्याचं ताकदीनं काँग्रेस उभी आहे प्रत्येक शहरात, गावात त्यांचं संघटन आहे. त्यांची विचारधारा देखील त्यासोबत उभी आहे. सत्तेची ताकद ही एका माध्यमातून आहे. ज्याला भाजपचं केडर म्हटलं जातं. त्याला आव्हान देण्यासाठी काँग्रेसचं केडर देशभरात जर सक्रिय झालं, राहुलच्या पहिल्या भारत जोडो यात्रेत सक्रिय झाला होता तसाच तो आता जिथून ही यात्रा चाललीय त्या राज्यांतून केडर सक्रिय झालं तर तिथलं वातावरण बदलू शकतं. दुसरी स्थिती जी भाजपची ताकद आहे, जाती समीकरणाच्या आधारे राजकारण करण्याची...! त्याला खुलं आव्हान मायावतींना द्यायचंय. तिसरी बाब धर्माच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण...! हिंदुत्ववादी भूमिका घेण्याची भूमिका भाजपनं मांडलीय, तेव्हा त्यासाठी उद्धव ठाकरेंना उभं राहावं लागेल. जेव्हा पूर्वीच्या काळी ओबीसी ब्राह्मणाच्या साथीला नव्हते. पण शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या जागरणानं साथसंगतीनं ओबीसी भाजपला मिळाला. उद्धव ठाकरे हे विसरून गेले की, आपलं राजकीय मैदान कोणतं आहे. मायावतीही विसरून गेल्यात की, त्या कोणतं राजकारण खेळू शकतात. काँग्रेसही विसरत गेलीय की, आपली ताकद काय आणि कशात आहे!
विरोधकांचा मोठा पराभव २०२३ मध्येच झालाय. हा असा पराभव आहे की, संसदेत विरोधकांना उभं राहू दिलं नाही. लोकशाहीचा पराभव होताना संसदेनं या डिसेंबर महिन्यातच पाहिलंय, विरोधकांना संसदेबाहेर काढून अनेक विधेयक मंजूर केली गेली. इथंच लोकशाही पराभूत झाली. बेकार तरुणांनी संसदेत उडी घेतली. संसदेची सुरक्षा धोक्यात आली पण उत्तर द्यायला गृहमंत्री संसदेत आलेच नाहीत. याच संसदेत एका राज्यात जाळपोळ होत राहिली, हिंसा होत राहिली, महिलांच्या बीभत्स घटना घडल्या, त्याचे फोटो प्रसिद्ध झाले पण संसदेत त्यावर ब्र उच्चारला गेला नाही प्रधानमंत्री गप्प राहिले. ते काही बोलत नाहीत म्हटल्यावर संसदही मौन बनली. चर्चाच झाली नाही. इथं विरोधक पराभूत होताना दिसले. विरोधकांच्या वतीनं राहुल गांधींनी अदानी यांचं नाव घेऊन संसदेत सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आणि सवाल केला की, सत्ताधाऱ्यांचं अदानी यांच्याशी काय संबंध आहे? ही कोणती युती आहे? संसदेनं राहुल गांधींनी विचारलेले सारे प्रश्न, त्यातले हे सारे शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले. राजकारणाचा खेळखंडोबा यापूर्वी असा कधी झालाच नव्हता. अदानीकांड वरून संसदेत गोंधळ झाला. राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेली. एक झटका इतर कुणी नाही तर नोकरशाहीनं दिला. त्यांची समज, परीक्षा, ज्ञान हे काही महत्वाचं नाही. ते सारे सत्तानुकूल बनलेत. नोकरशाही सत्तेकडे रांगताना दिसली. अशा या वातावरणात न्यायालयेही जागी झालीत असं दिसलं नाही. गुजरातच्या न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षाची सजा सुनावली. सुप्रीम कोर्टानं दिलासा देऊन दाखवून दिलं की, अद्याप देशात संविधान शिल्लक आहे. इलेक्टोरल बाँड संदर्भात सुप्रीम कोर्टानं दरबार भरवला पण निकाल दिला पण त्याची अंमलबजावणी करताना दिसलं नाही. नाही म्हणायला चंदीगड महापौर निवडणुकीत झालेल्या सत्ताधाऱ्यांच्या कृत्याचा पर्दाफाश केला गेला. आपच्या महापौराची पुनर्स्थापना केली. मात्र महाराष्ट्रातल्या सत्तेच्या समरप्रसंगात तशी कार्यवाही झाली नाही. हे वास्तव नाकारता येत नाही. सत्ताधाऱ्यांच्या या काळात मिडियादेखील पराभूत झाली, नतमस्तक झाली. या नतमस्तकानं एक नवी परिभाषा मांडली गेली. सत्ता आहे तर देश आहे आणि देश आहे तर सत्ता आहे!
या साऱ्या राजकीय पार्श्वभूमीवर, मायावती, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याकडे संघटना आहे, कार्यकर्ते आहेत. जातीय राजकारणात आव्हान देण्यासाठी मायावती आहेत. धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्याच्या विचाराच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे ठाकलेत. त्यांना उभं राहावंच लागेल, डगमगून चालणार नाही. आणखी खूप सारे प्रश्न आहेत, मिडिया असो, सोशल मीडियाचा आयटी सेन्सरचा असो, बेकारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, जुनी पेन्शन, कार्पोरेट, निवडणुक आयोगाची नियुक्ती, ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरोधकांवरच्या कारवाया, महिला कुस्तीगीरांचा उपमर्द, महिला आरक्षण गुंडाळून ठेवण्याचा प्रश्न हे आहेतच याशिवाय सीएए, एनआरसीची मोहीम सुरू होणार आहे. या प्रश्नांच्या यादीत शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यांचीही अवस्था दयनीय बनलीय. शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशांना जवळ करताहेत. देशाची वैद्यकीय परिस्थितीही अतिशय नाजूक बनलीय.
या अशा वातावरणात सत्ताधाऱ्यांकडून आता रेवडी वाटली जाईल. आपल्या आवडत्या कार्पोरेटस् वर आर्थिक उधळण केली जाईल. हिंदू, हिंदुत्व आणि सत्ता यांच्यात एक लक्ष्मण रेषा असायला हवी. इथं संविधानानं धर्मनिरपेक्षता स्विकारलेलीय. राष्ट्रीय राजकारण एका वेगळ्या पद्धतीनं चाललंय. सारे विरोधक आणि काही सत्ताधारी नव्या खेळीसमोर नतमस्तक झालेत अशा वातावरणात सवाल प्रत्येकजण विचारू शकतो. आजच्या सर्वच पक्षातल्या राजकारण्यांवर लोकांचं भरोसा राहिलेला नाही. हे सारे तिकडमी लोक आहेत? सत्तेत येण्यासाठी कधी इंडिया आघाडीचा आग्रह धरतात ते कधी युती आघाडी करतात कधी जागांची तडजोड करतात. मग का नाही जे पराभूत झालेत त्यांना एकत्रित का करू नये? २०२४ ला नवं आव्हान उभं केलं तर. हे शक्य आहे. सत्तेच्या विरोधातले मुद्दे घेऊन संघर्ष करणारे लोक एकत्रित येतील? आज एकत्रित आलेल्या इंडिया आघाडीनं ठरवलंय की, कोणत्या पक्षानं किती जागा लढवणार आहेत. तर मग एक नव्या राजकीय दिशेनं ही इंडिया आघाडी आगेकूच का करत नाही. हा राजकीय प्रयोग अत्यंत साफ आहे. जे मीडियाची स्वतंत्रता हवीय म्हणून लढताहेत. त्यांच्यासाठी लोकसभेच्या पाच जागा इंडिया आघाडी सोडू शकेल. सोशल मीडियातल्या नव्या कायद्याबाबत संघर्ष करताहेत अशांना तीन जागा दिल्या जाऊ शकतात का? दिल्लीत, मुंबईत मिडिया सेंटर्स आहेत, देशात सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत. अशा ठिकाणातून पाच जागा देऊ शकतात. मिडियाकर्मी उभे ठाकलेत, ते निवडणुक लढवताहेत आणि त्यांच्यामागे इंडिया आघाडी उभी आहे हे चित्र भारतीय मतदारांसमोर येऊ शकतं. बेकार तरुणांचा ज्वलंत प्रश्न देशात उभा आहे. त्यावर  दिल्ली आणि पाटण्यात उग्र आंदोलनं झालीत. अशातून पाच जागा लढवल्या जाऊ शकतात. त्यांच्यामागे इंडिया आघाडीची ताकद असेल. सीए, एनआरसीच्या विरोधात ज्यांनी आंदोलनं केली अशांना काही जागा द्यायला हव्यात. कार्पोरेटस् वर्ल्डच्या विरोधात सत्ताधारी आणि कार्पोरेटस् यांच्या विरोधात लढणाऱ्या, शेअर बाजारातल्या घडामोडीच्या विरोधात लढणाऱ्यांना का उभं केलं जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी तीन काळया कायद्याच्या विरोधात जो महत्वपूर्ण लढा दिला, सरकारला जिथं माघार घ्यावी लागली अशा लढाऊ शेतकरी नेत्यांसाठी काही जागा सोडायला नकोत का? निवडणुक आयोगातला आणि ईव्हीएम मधला घपला उघड करणाऱ्यांना सामावून का घेतलं जाऊ नये? महिला आरक्षणासाठी सतत लढा देणाऱ्यांना काही जागा सोडायला हव्यात. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यासाठी कार्यरत असलेल्या आणि सरकारच्या धोरणाविरोधात उभ्या ठाकणाऱ्यांना काही जागा सोडायला हव्यात. देशातली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार कसे महागडे ठरताहेत अशांना सामावून घ्यायला हवंय. देशात ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना काही जागा देऊन त्यांच्यामागे इंडिया आघाडीनं ताकद उभी केली तर ते सारे प्रश्न सोडवायला त्यांची मदतच होईल. त्यांनी मांडलेले प्रश्न हे जाहीरनाम्यात मांडता येईल. तो एक राष्ट्रीय जाहीरनामा असेल. अशी मंडळी जी निवडून येतील ते राजकारणी असणार नाहीत. त्या त्या विषयातले तज्ञ असतील. राष्ट्रीय धोरण ठरवायला त्यांची मदत होईल. अशांच्या साथीनं इंडिया आघाडी उभी आहे हे देशाच्या मतदारांसमोर येऊ शकेल. पण एवढी इमानदारी राजकीय नेत्यांमध्ये आहे मग ते विरोधात का असेना. असे सकारात्मक राजकारण करण्यासाठी इंडिया आघाडीतल्या साऱ्या पक्षांना आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल. हेकेखोरपणा सोडावा लागेल. उम्मीद आणि भरोसा द्यावा लागेल. तेव्हाच हे शक्य आहे, ज्यांच्या ज्यांच्या नरडीला मोदी सरकारचं नख लागलंय त्यांना जवळ घ्यावं लागेल. तेव्हा असं मानायला हवं की, आपली लढाई सुधारणेसाठी, चांगल्या गोष्टींसाठी, सुशासनासाठी, प्रशासन ठीक करण्यासाठी आहे. भारताच्या भवितव्यासाठी आहे. हे केवळ २०२४ साठीच नाहीये. मावळते वर्ष आणि आगामी वर्ष यामध्ये उभं राहून विचार करा. तारीखा बदलत राहतील. आताच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ चं लक्ष ठेवलेलं आहे. जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल. प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न एवढं वाढलेलं असेल की, जगातल्या विकसित देशांच्या तुलनेत भारत सर्वात पुढे उभा असलेला दिसेल. २०४७...! तुमचं आमचं अस्तित्व असेल का? आपली मुलं देश चालविण्याच्या प्रक्रियेत असतील. स्वप्न पाहिली जात नाहीत, पण आजची जी वस्तुस्थिती आहे, ती जगाच्या गरीब देशाच्या रांगेत आपण उभं असल्याचं दिसतं. देशाची आर्थिक स्थिती चौथ्या पाचव्या जागेवर रेंगाळत आहेत. तिसरी अर्थव्यवस्था होण्याची स्वप्न पाहिली जाताहेत. पण असमानता इतकी आहे की बोटावर मोजण्या इतकेच श्रीमंत जगाच्या श्रीमंतांच्या यादीत आहेत. भारतातल्या गरिबांची संख्या जगातल्या गरीब देशापेक्षा अधिक गरीब आहे. हे सत्य असताना कोणती रचना भारतासाठी केली जातेय? २०२४ साठी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, बाबतीत दाखवून द्यावं लागेल की, हिंदुत्वाचा अर्थ काय आहे? राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जात असताना कोण मोठा भक्त आहे, पुजारी आहे. आमंत्रित करण्यासाठी त्याच्या श्रद्धेचं आकलन नाहीये. त्याचं नेटवर्थ, त्याची लोकप्रियता आणि त्याची आपली ओळख देशभरात आहे, तोच व्हीव्हीआयपी आहे. हे उद्धव ठाकरेंना समजायला हवंय, मायावतींना  समजलं पाहिजे लढाई तर लढावीच लागेल. राहुल गांधीनाही समजलं पाहिजे.हा प्रश्न केवळ काँग्रेसचा नाहीये, तर तो देशाचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा आहे....!
हरीश केंची, 
९४२२३१०६०९.

Sunday 5 May 2024

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिवसेनाप्रमुखांनी तो रोखला त्यामुळं प्रधानमंत्रीपदाचा मार्ग सहज साध्य झाला. पण त्याची जाणीव न ठेवता शिवसेनेची शकलं केली. ठाकरेंची सत्ता उलथून टाकली. आता मोदींनी बाळासाहेब, उद्धव, ठाकरे कुटुंबाबद्दल प्रेम, आदर, जिव्हाळा, बेरजेच्या राजकारणासाठी दाखवलाय. यावेळी शिवसेनेची बाळासाहेबांची विचारधारा सोडली अशी टीकाही केली. पण शिवसेनाप्रमुखांनी केवळ भाजपशी नव्हे तर काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी, रिपब्लिकन, अगदी मुस्लिम लीगशी देखील युती केली होती. त्यावेळी हिंदुत्व कुठं आडवं आलं नव्हतं. हे कदाचित मोदींना माहीत नसावं. शिवसेनेनं मराठी माणूस आणि महाराष्ट्रधर्म पाळत आजवरचे राजकारण केलंय. ते कसं केलं, याचा घेतलेला हा धांडोळा...!"
--------------------------------
*गो*ध्रा हत्याकांडानंतर गुजरातेत दंगल उसळली. तेव्हा मोदींचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलं, त्यांना बदलण्याच्या हालचाली वाजपेयी, अडवाणी यांनी सुरू केल्या; तेव्हा मोदींच्या मागे शिवसेनाप्रमुख ठामपणे उभे राहिले. त्यानंतरच मोदींची प्रधानमंत्रीपदापर्यंतची वाटचाल सुकर झाली. पण कृतघ्नतेच्या जीन्स असलेल्या भाजपनं आणि सत्तेच्या राक्षसी महत्वाकांक्षेपायी मोदींनी शिवसेनेची शकलं केली, उद्धवची सत्ता उलथवून टाकली, त्यांना पदच्युत केलं. कधीकाळी ज्यांचं बोट धरून भाजपनं महाराष्ट्रात आपला विस्तार केला होता. याचा विसर पडला. पण महाराष्ट्र धर्म जागविणारी शिवसेना अडचणीत आलीय हे लक्षांत येताच कधीकाळी शिवसेनेनं मदत केलेली वा ज्यांची मदत शिवसेनेनं घेतलेली अशी मराठी माणसं शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यात काँग्रेसी आहेत तसे शरद पवार आहेत, समाजवादी आहेत तसे संभाजी ब्रिगेड, डाव्या विचारांचे आहेत. रिपब्लिकन आहेत तसे आंबेडकरी विचारांचे आहेत. मुस्लिम आहेत तसे ख्रिश्चनही आहेत. हे बदललेलं वातावरण पाहून मोदींना कदाचित उपरती झाली असावी म्हणूनच त्यांनी ठाकरेंवरच बेगडी प्रेम, मुलाखतीतून दाखवलंय. आपल्या मनांत अद्यापही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रेम, आदर आणि श्रद्धा असल्याचं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की, 'शिवसेना फुटल्यानंतर शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं ते बाळासाहेबांप्रती आदर व्यक्त करण्यासाठीच..!' ठाकरे कुटुंबांशी आपलं प्रेमाच नातं आजही कायम आहे. उद्धव आजारी असताना आपण रश्मी वहिनींना फोन करून चौकशी करत होतो, जर काही मदत लागली तर त्यांना मदत करणारा मीच पहिला असेन...!' असं सांगताना 'उद्धव यांनी बाळासाहेबांचा विचार सोडून दिलाय..!' अशी टिपण्णीही त्यांनी केली. पण शिवसेनेचं अस्तित्व संपविण्यासाठी भाजपनं जो खेळ केला होता, हे उद्धवना आणि मराठी माणसांना  माहीत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात कमी झालेलं मतदान, आपल्या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्रातली मिळालेली राजकीय स्थितीची माहिती, सर्व कंपन्यांनी, वृत्तपत्रांनी केलेल्या पाहणीत उद्धव आणि शिवसेनेला मिळत असलेला पाठींबा, शिंदेंच्या शिवसेनेसोबत होणारी भाजपची फरफट, मतदारांमध्ये उद्धवना मिळणारी सहानुभूती यानं व्यथित झालेल्या मोदींनी उद्धवना गोंजरण्याचा प्रयत्न चालवलाय, असं जाणवतंय. जाहीरपणे 'नकली शिवसेना', 'वसूली सेना' अशा शेलक्या शिव्या देणाऱ्या भाजप नेत्यांना ही उपरती झाली असावी. बाळासाहेबांच्या निधनानंतर २०१४ विधानसभा निवडणुकीत खडसे यांनी ऐनवेळी युती तोडली. पण उद्धवांनी ६२ जागा जिंकल्या. त्यानंतर अमित शहा २०१९ मध्ये युतीसाठी मातोश्रीवर आले. आणाभाका घेतल्या, तशा त्या मोडल्या देखील. दरम्यान फडणवीसांनी अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधी उरकला. मग उद्धवांनी बहुमत सिद्ध करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. इथं जी ठिणगी पडली ती आजतागायत धगधगतेय? मग शिवसेना फोडली, शिंदेंना सोबत घेत आपलं सरकार भाजपनं मांडलं. पण आता लोकसभा निवडणुकीतून आलेल्या साऱ्या सर्व्हेतून उद्धवना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं. म्हणूनच ते उद्धवना 'आओ मारी साथे...!' म्हणत साद घालण्याचा प्रयत्न करताहेत, असं दिसतंय. म्हणूनच भाजपनं या लोकसभा निवडणुकीत एखाद दुसरा अपवाद वगळता थेट उद्धव सेनेशी पंगा घेण्याचं टाळलेलंय. उद्धवसेनेनं आज महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाची जागा घेतलीय. त्यामुळेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे नेते सतत उद्धवना लक्ष्य करतात. उद्धव यांनी बाळासाहेबांचा विचार, हिंदुत्व सोडल्याची टीका करतात. शिवसेनेचं हिंदुत्व कधीच आग्रही नव्हतं. ते लवचिक आणि प्रबोधनी होतं. शिवसेनेचा पूर्वेतिहास, वाटचाल पाहिली तर बाळासाहेबांनी सर्वच पक्षाशी युती केलेलीय. अगदी मुस्लिम लीग, रिपब्लिकन पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, भाजप अर्थात काँग्रेसशी देखील युती, आघाडी, तडजोडी केल्या आहेत. तिथं कधीच त्यांना हिंदुत्व आड आलेलं नाही. त्यामुळं भाजपशी युती तुटली म्हणजे हिंदुत्व सोडलं, विचार सोडला असं नाही. भाजपचं जीन्स कृतघ्नतेचं आहे असं जे वर म्हटलंय याचं कारण म्हणजे, जनसंघ, भाजपनं यांच्या जन्मापासूनच छोट्या छोट्या पक्षांना बलाढ्य काँग्रेसची भीती दाखवत युती केलीय. त्यानंतर त्यांच्यासारखंच रूप धारण करून त्यांना संपवलंय. रामराज्य पक्ष, हिंदू महासभा, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, अकाली दल, तेलुगु देशम् अशा पक्षांची काय अवस्था आहे हे आपण पाहतोच. शिवसेनेचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे असंच करायचं त्यांचा डाव आहे. पण मराठी माणसांनी उद्धव आणि शरद पवार यांच्यामागे आपली ताकद उभी केल्यानं भाजपला ते साध्य होत नाहीये. नव्यानं पत्रकारितेत आलेल्यांना भाजपचा हा घोषा खरा असल्याचं वाटतं म्हणून तो इतिहास मांडण्याचा हा प्रयत्न...!
शिवसेनेची स्थापना झाली, तेव्हा काँग्रेसचे रामराव आदिक उपस्थित होते. त्यापूर्वी १३ ऑगस्ट १९६० रोजी दादरच्या बालमोहन हायस्कूलमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या हस्तेच 'मार्मिक'चे प्रकाशन झालं होतं. तिथं हिंदुत्वाचा कोणताही विषय नव्हता. शिवसेनेची स्थापना मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी, हित रक्षणासाठी झाली होती. १९६७ मध्ये शिवसेनेनं ठाणे नगरपालिकेत ४० पैकी १७ जागा मिळवल्या, वसंतराव मराठे पहिले नगराध्यक्ष झाले. ठण्याच महापालिकेत रूपांतर झाल्यावर सतीश प्रधान पहिले महापौर झाले. ते मराठी माणसाचा अजेंडा ठेवूनच! तेव्हा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. ठाण्याच उदाहरण यासाठी दिलं की, एकनाथ शिंदे यांच्या पूर्वीही ठाणे अस्तित्वात होतं आणि त्यावर बाळासाहेबांचाच प्रभाव होता हे लक्षात यावं! १९६८ साली शिवसेनेनं मुंबई महापालिकेच्या निवडणुका लढवल्या आणि त्यावेळी १२१ पैकी ४२ जागा मिळवल्या. तेव्हा शिवसेनेनं प्रजा समाजवादी पक्ष-प्रसपशी युती केली. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्ष आणि जे.बी. कृपलानी यांचा किसान मजदूर प्रजा पक्ष यांच १९५२ ला विलीनीकरण होऊन प्रसपची स्थापना झाली होती. प्रसपचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता. १९७३ मध्ये शिवसेनेनं भारतीय रिपब्लिकन पक्षाशी रा.सू. गवई गटाशी युती करून मुंबई महापालिकेच्या ३९ जागा मिळवल्या. रिपब्लिकन पक्षाचा हिंदुत्वाशी सुतराम संबंध नव्हता! १९७४ च्या लोकसभा पोटनिवडणुकीत मध्य मुंबईतून रामराव आदिक काँग्रेस उमेदवार होते. त्यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला. कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवार डांगे कन्या रोझा देशपांडे यांनी आदिकांचा पराभव केला, परंतु तरीही १९७७ साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या मुरली देवरांना महापौरपदासाठी पाठिंबा दिला. तेव्हा 'हिंदुत्व संपलं' अशी बोंब कुणी मारली नव्हती. जनता पक्षात संघटना काँग्रेस, समाजवादी पक्ष, जनसंघही विलीन झाला होता, तेव्हा जनसंघानं आपलं हिंदुत्व जानव्यासकट खुंटीला बांधलं होतं का? १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं काँग्रेसला पाठिंबा दिला. तसंच १९७८ च्या विधानसभा निवडणुकीतही  काँग्रेसच समर्थन केलं होतं. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं भागच घेतला नाही. तर १९७८ मध्ये शिवसेनेनं उमेदवार उभे केले, पण त्यापैकी कोणीही निवडून आलं नाही. काँग्रेसची शिवसेनेची तेव्हापासूनची दोस्ती आहे..
१९८० च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं जाणीवपूर्वक आपले उमेदवार उभे केले नाहीत आणि काँग्रेसचा प्रचार केला. त्या बदल्यात शिवसेनेला विधान परिषदेवर तीन जागा मिळाल्या. १९८२ मध्ये गिरणी संप काँग्रेसनं व्यवस्थित हाताळला नाही. तेव्हा गिरणगावात काँग्रेसला पाठींबा देणं तोट्याच ठरेल, हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेनं काँग्रेसशी संबंध तोडले. याचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नव्हता! एकेकाळी शिवसेनेनं मुस्लिम लीगचा पाठिंबा घेतला, नंतर सुधीर जोशी मुंबईचे महापौर झाले. १९७९ मध्ये शिवसेना आणि मुस्लिम लीगचे नेते एकाच व्यासपीठावर दिसले. मुस्लिम लीगला हिंदुत्वाच काहीच देणंघेणं नव्हतं. शिवसेना आणि मुस्लिम लीगची संयुक्त सभा मुंबईच्या नागपाड्यातल्या मस्तान तलाव पटांगणात झाली, तेव्हा शिवसेना झिंदाबाद,  मुस्लिम लीग झिंदाबाद, बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद अशा घोषणा दिल्या गेल्या. व्यासपीठावर शिवसेनाप्रमुख आणि मुस्लिम लीगचे जी.एम. बनातवाला हे उपस्थित होते. तसंच वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सतीश प्रधान, दत्ताजी साळवी, जिलानी, झैदी, साबीर शेख, छगन भुजबळ, दत्ता नलावडेही हजर होते. शिवसेनेनं मुस्लिम लीगशी दोस्ती केली. शिवसेना आणि मुस्लिम लीग आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकसाथ लढा उभारतील, आमची ही दोस्ती कोणत्याही राजकीय हेतूनं आणि देवाणघेवाणीतून झाली नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. त्यावेळी या मंडळींना कोणीही 'देशद्रोही' संबोधण्याची हिम्मत केली नव्हती. 
१९६७ साली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष स.का.पाटील यांनी माजी सनदी अधिकारी  स.गो.बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी दिली, त्यावेळी शिवसेनेनं आपला 'महाराष्ट्रद्रोही' सदोबा पाटलांना असलेला विरोध बाजूला ठेवून, बर्वेंना पाठींबा दिला. १९७७ मध्ये शिवसेना आणि दलित पॅंथर यांची अशीच अल्पकाळ युती झाली. नामदेव ढसाळ यांना बाळासाहेबांनी जवळ केलं होतं. नामदेवचा 'सामना' मधला 'सर्व काही समिष्टीसाठी' हा कॉलम अत्यंत लोकप्रिय होता. आपलं हिंदुत्व शेंडी आणि जानव्याच नाही हे शिवसेनेनं दाखवून दिलं होतं. आजही अर्जुन डांगळे यांच्यासारखे नामवंत साहित्यिक शिवसेनेबरोबरच आहेत. डांगळेंसारखे तत्त्वांना धरून चालणारे नेते अजून सक्रिय आहेत. १९७५ मध्ये इंदिरा गांधींच्या आणीबाणीला शिवसेनेनं पाठिंबा दिला. १९८० मध्ये बाळासाहेबांनी आपले मित्र असलेल्या ए.आर. अंतुले यांना मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला. एवढंच नव्हे, तर श्रीवर्धनमध्ये त्यांचा प्रचारही केला. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची विशेष दोस्ती होती. त्यामुळं झुकतं माप शिवसेनेला मिळत होतं म्हणून मग शिवसेनेला तेव्हा वसंतसेना म्हटलं जातं असे. १९८५ मध्ये मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आणि मुंबई काँग्रेसचे मुरली देवरा यांचे संबंध बिघडलेले होते. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर 'मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याचा डाव' असल्याचा आरोप दादांनी केला आणि त्यानंतर मराठी माणसांनी शिवसेनेच्या हातात मुंबई महापालिकेची सत्ता दिली! म्हणजे ही सत्ता मिळण्याला तेव्हा काँग्रेसची मदतच झाली होती. १९८२ मध्ये शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडिस हे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित होते. त्यांचा हिंदुत्वाशी दूरूनही संबंध नव्हता. 
२००७ मध्ये प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेनं भाजपशी युती असतानाही पाठींबा दिला. २०१२ मध्ये प्रणव मुखर्जींनाही असाच पाठिंबा दिला. भाजपनं तेव्हा प्रणवबाबूंना नाही, तर पी. ए. संगमा यांना पाठिंबा दिला होता! आज शिंदे गटाला किंवा भाजपला बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना कुठल्याही मार्गानं सत्ता मिळवायची होती. आज बाळासाहेब हयात असते, तर त्यांनी महाशक्तीच्या दादागिरीला अजिबात जुमानलं नसतं. उलट लत्ताप्रहार करून ते बाहेर पडले असते. नाटकीपणे अहोरात्र बाळासाहेबांचा जप करणाऱ्यांना, 'उद्धव आणि आदित्यला सांभाळा...!' हे बाळासाहेबांच कळकळीच आवाहन मात्र सोयीस्करपणे आठवत नाही. परंतु त्या आवाहनाची आठवण आजदेखील लाखो शिवसैनिक तसंच शिवसेनाप्रेमींना आहेच आहे. हिंदुत्ववादाची झूल पांघरून शिंदे यांनी भाजपच्या साथीनं आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहेत. दोन गुजराथ्यांच्या तालावर आणि नागपुरी बँडवर 'आवो मारी साथे...!' करत त्यांनी कितीही फेर धरला, तरी या अट्टल बदमाषीला सामान्य जनता बिलकुल भुलणार नाही!
चौकट.    
 *हिंदुत्वासाठी बाळासाहेबांना शिक्षा...!*
१९८७ मधली विलेपार्लेची काँग्रेस आमदार हंसराज भुग्रा यांच्या निधनाने झालेली पोटनिवडणूक. काँग्रेसचे प्रभाकर कुंटे, धर्मनिरपेक्ष जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा आणि शिवसेनेचे डॉ. प्रभू अशी लढत झाली. व्होरा यांना भाजपनं शिवसेनेच्या विरोधात पाठींबा दिला होता. यात शिवसेनाप्रमुखांनी 'गर्वसे कहो हम हिंदू है...! अशी घोषणा दिली. शिवसेनेचे प्रभू विजयी झाले. मग काँग्रेसच्या प्रभाकर कुंटेंनी न्यायालयात धाव घेतली. धर्मावर मतं मागितली म्हणून डॉ. प्रभू यांची निवड रद्द केली. शिवाय निवडणूक आयोगानं शिवसेनाप्रमुखांचा ६ वर्षासाठी मतदानाचा अधिकार गोठवला. हिंदूत्वावर लोक मतं देतात हे दिसून आल्यानं प्रमोद महाजनांनी शिवसेनेशी युती करण्याबाबत गळ वरिष्ठ नेत्यांना घातली. तेव्हा भाजप 'गांधीवादी समाजवाद' कुरवाळून वाटचाल करीत होती. हरियाणातल्या पंचमढी इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात त्याला मान्यता घेण्यात आली. ही युती दोन तीनदा ब्रेक होत ती ३० वर्षे टिकली.... आज हिंदुत्व, बजरंग बली, धार्मिक ध्रुवीकरण याचा मतांसाठी जयघोष होत असताना मात्र निवडणूक आयोग डोळे झाकून शांत आहे, त्यावर कारवाई नाही.....!
हरीश केंची
९४२२३१०६०९



लिंगपिसाट, कामासुर प्रज्ज्वल रेवन्ना...!


"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्बल २ हजार ९७६ लैंगिक शोषणाच्या व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या आहेत. यातल्या अनेकींवर त्यानं बलात्कार केलाय. हे त्याच्या ड्रायव्हर आणि मोलकरणीनं उघड केलंय. प्रज्ज्वल हे मोठं प्रस्थ, त्याच्या प्रचारासाठी खुद्द प्रधानमंत्री मोदींनी सभा घेतल्यात. देवराज गौडा नावाच्या भाजपच्या लोकसभा उमेदवाराने ती क्लिप पोलिसांकडे सोपवलीय. त्यानं पक्षाच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना य नराधमाच्या दुष्कर्माची माहिती दिली. पण तिथं दखल घेतली नाही. राज्य सरकारनं एसआयटी बसवलीय पण तो नराधम जर्मनीला पळून गेलाय. त्यासाठी लूक आऊट नोटीस जारी केलीय. माजी प्रधानमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री यांच्याशी नातं असलेला हा लोकप्रतिनिधी त्यालाच नाही तर साऱ्या संबंधितांना सजा व्हायला हवीय!"

---------------------------------
द्रौपदियों के चीर हरण पर
धृतराष्ट्र सहित सबकी आँखें अंधी,
जुबां खामोश अभी तक है
दुशासन-दुर्योधन क्रूर अभी तक हैं...
जागो लोकतंत्र के रखवालों जागो ll
कर्नाटकातला एक खासदार, ज्याचे आजोबा देशाचे माजी प्रधानमंत्री, वडील राज्यातले माजी मंत्री, काका माजी मुख्यमंत्री आहेत अशा प्रज्ज्वल रेवण्णा या लिंगपिसाट कामासुर खासदारानं २ हजार ९७६ महिलांचं लैंगिक शोषण, अत्याचार करत त्याचं व्हिडिओ चित्रण केल्याचं उघड झालंय. याबाबत त्याच्याच मोटारीवरच्या ड्रायव्हरनं आणि त्याच्याच घरातल्या पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे विकृत कर्म लोकांसमोर आलंय. पोलिसात तक्रार झालीय हे लक्षांत येताच ह्या नराधमानं आपल्याकडं असलेल्या 'राजनैतिक व्हिसा'चा वापर करत जर्मनीला पळून गेलाय. आता पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीय. ही जवळपास तीन हजार दुष्कृत्य, ती काही एकदोन दिवसात झालेली नाहीत. याला बराच कालावधी लोटला असेल. त्याकाळात सत्ता यांच्याच घरात नांदत होती. सत्तेचा राजकीय वरदहस्त असल्यानं ह्या घटना समोर येऊ दिल्या गेल्या नसाव्यात. आता सत्ताबदल झाल्यानं हे सारं उघड झालंय का? याचा शोध घेण्याची गरज आहे. खासदाराच्या, माजी मंत्र्याच्या, माजी मुख्यमंत्र्याच्या, माजी प्रधानमंत्र्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या इथल्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे. कारण ही सारी दुष्कृत्य ही त्यांच्याच बंगल्यात घडलीत. त्याची खबरबात तिथं तैनात पोलिसांना नसेल, असं नाही. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलंय असं जाणवतंय. त्यामुळं हा नराधम जितका दोषी आहे, तितकेच दोषी तिथले तैनात पोलिस, त्यांचे अधिकारी, वडील, काका, आजोबा देखील दोषी आहेत. कारण इतके दिवस आपल्या बंगल्यातच ही दुष्कृत्य होत असताना त्यांना काहीच कसं जाणवलं नाही? या कामासुरानं जे व्हिडिओ तयार केलेत त्याचा वापर त्यानं कसा केलाय याचाही तपास व्हायला हवाय. आपल्या विकृततेला कमर्शिअल रंग तर दिला नाही ना! ड्रायव्हर आणि मोलकरणीनं हे प्रकरण उघडकीस आणलं नसतं तर कदाचित या महिलांना न्याय मिळालाच नसता, ही घटना दाबली होती, मात्र भाजपच्या एका नेत्यामुळे या घटनेला वाचा फुटली. काय दोष असेल त्या महिलांचा, की त्यांना इतकी गंभीर शिक्षा या नराधमानं दिली. बलात्कार करून विटंबना केली, अत्याचार केला, लैंगिक दृश्यांची, विवस्त्र देहाची चित्रणं केली. किती ही विकृती, अमानवीयपणा. मात्र सगळ्यांनी चुप्पी साधत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं घरातले सगळेच दोषी ठरतात! होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी राज्य भाजपचे अध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातल्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे, की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहे त्यात २ हजार ९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आलाय. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलंय. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेलेत त्यानंतर एसआयटी नेमण्यात आलीय. त्यापूर्वी देवराज यांनी भाजपनं जनता दल युनायटेड म्हणजेच देवेगौडा कुटुंबाशी युती करू नये असा पत्रव्यवहार दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी केला होता. पण पक्षाच्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतरही या नराधम प्रज्ज्वल रेवण्णा याला लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा प्रचार खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलाय. प्रज्ज्वलला निवडून द्या म्हणजे मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होता येईल. ४०० सो पार करायला मदत होईल. अशी विनंतीही मोदींनी केली होती. आता हे सारं प्रकरण उघडकीस आल्यानंतर देखील साधा निषेधाचा शब्द उच्चारला गेलेला नाही.
कर्नाटकात महाभारतातल्या सभेतल्या द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली गेलीय. टिकली, साडी, हिजाबवरुन व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षकही गप्प राहतात. महाभारताच्या त्या सभेतही रथी महारथी गप्प होते. स्त्री देहाची विटंबना होताना गप्प बसण्याची परंपरा खूप जुनी आहेच. हाथरस, उन्नाव पासून मणिपूरच्या घटना, महिला कुस्तीगीर यांची झालेली विटंबना या साऱ्याबाबत सरकारं, प्रधानमंत्री, गृहमंत्री मौन धारण करूनच बसलेत. निषेधाचा शब्द त्यांच्याकडून निघालेला नाही. शत्रूपक्षाच्या, वेगळ्या धर्माच्या स्त्रीला सन्मानानं परत पाठवण्याची छत्रपती शिवरायांची कृती सदगुण विकृती ज्यांना वाटते आणि शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करायला हवेत, असे विचार जे मांडतात त्या विचारांच्या वारसदारांकडून कोणत्याही प्रतिक्रियेची, निषेधाची अपेक्षाच नाही. अर्थात आज लोकलाजेस्तव यातली काही मंडळी या घटनेचा निषेध करतीलही. पण तो एक नाईलाज असेल, सोपस्कार असेल, विसंगती असेल. गेली काही वर्ष वैचारिक विरोध करणाऱ्या स्त्रियांबाबत सातत्यानं जी आक्षेपार्ह, चिथावणीखोर भाषा वापरली जातेय, त्यातून हे असेच माथेफिरू तयार होणार आहेत. ही अशी चिथावणीखोर भाषा वापरली जात असताना सोयीस्कर मौन धारण केलं जातंय. त्या मौनाचेच हे परिणाम आहेत. कर्नाटकातली घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहेच, पण ती घडली याचं आपण आश्चर्य वाटून घेणार असू तर तो भाबडेपणा आहे. महिलांवरच्या अत्याचाराच्या क्लिप्स तयार केल्या गेल्यात. वाहन चालकानं आणि एका पीडित मोलकरणीनं हा प्रकार समोर आणल्यानंतरही गोदी मिडीयानं मौन धारण केलंय. राहुल गांधी यांनी त्यांच्या कर्नाटकातल्या प्रचारसभेत प्रज्ज्वलसाठी प्रचार करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या पीडित महिलांचीच नव्हे तर कर्णाटकातल्या समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी केलीय. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या महिला असतानाही त्यांनी या महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय. साधा निषेधही केलेला नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं काही पाहत नाही. सत्तातुराला भय आणि लज्जा काहीच शिल्लक राहत नाही. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळेला इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या कुवतीप्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केला पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पीडित व्हाल, तेव्हा तुमची साथ देणारे तुम्हालाच आरोपी बनवतील. सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळं आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा. नागरिकांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सतत मागणी करूनही महिला सशक्तीकरण आणि मुलींच्या शिक्षणाबाबत सतत बोलणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कर्णाटकातल्या या लिंगपिसाट प्रवृत्तीवर प्रतिक्रियाही दिलेली नव्हती.  आता लोकांनाच विशेषतः महिलांना पुढाकार घ्यावा लागणार. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या नरपशूला, अत्याचार करणाऱ्या नराधमाला बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींची विटंबना करणाऱ्यां विरोधात संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः महिलांना निर्वस्त्र करून तिच्या छातीवर, गुप्तांगावर शेकडो हातांनी मुलीं, तरुणी, वृद्ध महिलेवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज व्हिडीओ पाहतो, बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे, आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणून अत्याचार होतोय हे भयाण वास्तव अनुभवायला येतं. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना वारंवार घडताहेत. आमच्या मुलीबाळींना नासवणाऱ्यांना ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम झालेली कारटी ताळ्यावर येतील! जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या इथल्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचं विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीला येताहेत. मुलींवरच्या अत्याचाराच्या बातम्या आल्यानंतर देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत. 
सत्ता म्हणजे अधिकार आणि मत्ता म्हणजे पैसे हे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडं समाजाचं लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल असं त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. हे सगळं नक्की कशामुळं घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचंच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. जी वासनाकांडं गेल्या काही दिवसात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. जो लिंगपिसाट हरामखोर अशा वासनकांडात गुंतलाय. त्याला जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यायला हवाय. स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये, जे कुणी देशाबाहेर पळून गेलेत वा पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसलेत त्यांना महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल. प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. जशी इथं या मोलकरणीनं दाखवलीय. असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानंच हे सारे बेफाम बनलेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचं असतं असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत 'बेटी बचाव बेटी पढाव!' म्हणत महिलांच्या विकासाचं धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे. व्हिडिओ चित्रण आणि बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एक कामासुर तरुणीवर अत्याचार करतो, तिच्या देहाचा चोळामोळा करतो, तिची तडफड दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रंदन व्हायला हवं!  बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं, त्याचं चित्रण करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्याला वाटली नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशा नराधमांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. अत्याचारी पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रातून येतात. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलंय!
हरीश केंची
९४२२३१०६०९



लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...