Sunday 5 May 2024

लिंगपिसाट, कामासुर प्रज्ज्वल रेवन्ना...!


"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्बल २ हजार ९७६ लैंगिक शोषणाच्या व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या आहेत. यातल्या अनेकींवर त्यानं बलात्कार केलाय. हे त्याच्या ड्रायव्हर आणि मोलकरणीनं उघड केलंय. प्रज्ज्वल हे मोठं प्रस्थ, त्याच्या प्रचारासाठी खुद्द प्रधानमंत्री मोदींनी सभा घेतल्यात. देवराज गौडा नावाच्या भाजपच्या लोकसभा उमेदवाराने ती क्लिप पोलिसांकडे सोपवलीय. त्यानं पक्षाच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांना य नराधमाच्या दुष्कर्माची माहिती दिली. पण तिथं दखल घेतली नाही. राज्य सरकारनं एसआयटी बसवलीय पण तो नराधम जर्मनीला पळून गेलाय. त्यासाठी लूक आऊट नोटीस जारी केलीय. माजी प्रधानमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी मंत्री यांच्याशी नातं असलेला हा लोकप्रतिनिधी त्यालाच नाही तर साऱ्या संबंधितांना सजा व्हायला हवीय!"

---------------------------------
द्रौपदियों के चीर हरण पर
धृतराष्ट्र सहित सबकी आँखें अंधी,
जुबां खामोश अभी तक है
दुशासन-दुर्योधन क्रूर अभी तक हैं...
जागो लोकतंत्र के रखवालों जागो ll
कर्नाटकातला एक खासदार, ज्याचे आजोबा देशाचे माजी प्रधानमंत्री, वडील राज्यातले माजी मंत्री, काका माजी मुख्यमंत्री आहेत अशा प्रज्ज्वल रेवण्णा या लिंगपिसाट कामासुर खासदारानं २ हजार ९७६ महिलांचं लैंगिक शोषण, अत्याचार करत त्याचं व्हिडिओ चित्रण केल्याचं उघड झालंय. याबाबत त्याच्याच मोटारीवरच्या ड्रायव्हरनं आणि त्याच्याच घरातल्या पीडित महिलेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे विकृत कर्म लोकांसमोर आलंय. पोलिसात तक्रार झालीय हे लक्षांत येताच ह्या नराधमानं आपल्याकडं असलेल्या 'राजनैतिक व्हिसा'चा वापर करत जर्मनीला पळून गेलाय. आता पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केलीय. ही जवळपास तीन हजार दुष्कृत्य, ती काही एकदोन दिवसात झालेली नाहीत. याला बराच कालावधी लोटला असेल. त्याकाळात सत्ता यांच्याच घरात नांदत होती. सत्तेचा राजकीय वरदहस्त असल्यानं ह्या घटना समोर येऊ दिल्या गेल्या नसाव्यात. आता सत्ताबदल झाल्यानं हे सारं उघड झालंय का? याचा शोध घेण्याची गरज आहे. खासदाराच्या, माजी मंत्र्याच्या, माजी मुख्यमंत्र्याच्या, माजी प्रधानमंत्र्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या इथल्या पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं पाहिजे. कारण ही सारी दुष्कृत्य ही त्यांच्याच बंगल्यात घडलीत. त्याची खबरबात तिथं तैनात पोलिसांना नसेल, असं नाही. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलंय असं जाणवतंय. त्यामुळं हा नराधम जितका दोषी आहे, तितकेच दोषी तिथले तैनात पोलिस, त्यांचे अधिकारी, वडील, काका, आजोबा देखील दोषी आहेत. कारण इतके दिवस आपल्या बंगल्यातच ही दुष्कृत्य होत असताना त्यांना काहीच कसं जाणवलं नाही? या कामासुरानं जे व्हिडिओ तयार केलेत त्याचा वापर त्यानं कसा केलाय याचाही तपास व्हायला हवाय. आपल्या विकृततेला कमर्शिअल रंग तर दिला नाही ना! ड्रायव्हर आणि मोलकरणीनं हे प्रकरण उघडकीस आणलं नसतं तर कदाचित या महिलांना न्याय मिळालाच नसता, ही घटना दाबली होती, मात्र भाजपच्या एका नेत्यामुळे या घटनेला वाचा फुटली. काय दोष असेल त्या महिलांचा, की त्यांना इतकी गंभीर शिक्षा या नराधमानं दिली. बलात्कार करून विटंबना केली, अत्याचार केला, लैंगिक दृश्यांची, विवस्त्र देहाची चित्रणं केली. किती ही विकृती, अमानवीयपणा. मात्र सगळ्यांनी चुप्पी साधत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय, त्यामुळं घरातले सगळेच दोषी ठरतात! होलनरसीपुरातले भाजपाचे उमेदवार देवराज गौडा यांनी राज्य भाजपचे अध्यक्ष बी.वाय.विजयेंद्र यांना एक पत्र लिहिलं होतं. ज्या पत्रात खासदार प्रज्ज्वल रेवण्णा आणि एच.डी. देवेगौडा यांच्या कुटुंबातल्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. देवराज यांचं म्हणणं आहे, की त्यांच्याकडे जो पेनड्राईव्ह आहे त्यात २ हजार ९७६ अश्लील व्हिडीओ आहेत. या व्हिडीओंमधल्या काही महिला सरकारी कर्मचारी असल्याचाही दावा करण्यात आलाय. महिलांचं लैंगिक शोषण सुरु ठेवण्यासाठी, ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडीओंचा वापर केला जातो असंही देवराज यांनी म्हटलंय. तसंच भाजपाचे नेते देवराज यांनी हे म्हटलं आहे की पेनड्राईव्ह मधले काही फोटो आणि व्हिडीओ असे आहेत जे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांकडेही गेलेत त्यानंतर एसआयटी नेमण्यात आलीय. त्यापूर्वी देवराज यांनी भाजपनं जनता दल युनायटेड म्हणजेच देवेगौडा कुटुंबाशी युती करू नये असा पत्रव्यवहार दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांशी केला होता. पण पक्षाच्या नेत्यांनी याची दखल घेतली नाही. त्यानंतरही या नराधम प्रज्ज्वल रेवण्णा याला लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्याचा प्रचार खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलाय. प्रज्ज्वलला निवडून द्या म्हणजे मला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होता येईल. ४०० सो पार करायला मदत होईल. अशी विनंतीही मोदींनी केली होती. आता हे सारं प्रकरण उघडकीस आल्यानंतर देखील साधा निषेधाचा शब्द उच्चारला गेलेला नाही.
कर्नाटकात महाभारतातल्या सभेतल्या द्रौपदी वस्त्रहरणाची परंपरा रस्त्यावर आणली गेलीय. टिकली, साडी, हिजाबवरुन व्याकूळ होणारे संस्कृतीरक्षकही गप्प राहतात. महाभारताच्या त्या सभेतही रथी महारथी गप्प होते. स्त्री देहाची विटंबना होताना गप्प बसण्याची परंपरा खूप जुनी आहेच. हाथरस, उन्नाव पासून मणिपूरच्या घटना, महिला कुस्तीगीर यांची झालेली विटंबना या साऱ्याबाबत सरकारं, प्रधानमंत्री, गृहमंत्री मौन धारण करूनच बसलेत. निषेधाचा शब्द त्यांच्याकडून निघालेला नाही. शत्रूपक्षाच्या, वेगळ्या धर्माच्या स्त्रीला सन्मानानं परत पाठवण्याची छत्रपती शिवरायांची कृती सदगुण विकृती ज्यांना वाटते आणि शत्रू पक्षाच्या स्त्रियांवर बलात्कार करायला हवेत, असे विचार जे मांडतात त्या विचारांच्या वारसदारांकडून कोणत्याही प्रतिक्रियेची, निषेधाची अपेक्षाच नाही. अर्थात आज लोकलाजेस्तव यातली काही मंडळी या घटनेचा निषेध करतीलही. पण तो एक नाईलाज असेल, सोपस्कार असेल, विसंगती असेल. गेली काही वर्ष वैचारिक विरोध करणाऱ्या स्त्रियांबाबत सातत्यानं जी आक्षेपार्ह, चिथावणीखोर भाषा वापरली जातेय, त्यातून हे असेच माथेफिरू तयार होणार आहेत. ही अशी चिथावणीखोर भाषा वापरली जात असताना सोयीस्कर मौन धारण केलं जातंय. त्या मौनाचेच हे परिणाम आहेत. कर्नाटकातली घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहेच, पण ती घडली याचं आपण आश्चर्य वाटून घेणार असू तर तो भाबडेपणा आहे. महिलांवरच्या अत्याचाराच्या क्लिप्स तयार केल्या गेल्यात. वाहन चालकानं आणि एका पीडित मोलकरणीनं हा प्रकार समोर आणल्यानंतरही गोदी मिडीयानं मौन धारण केलंय. राहुल गांधी यांनी त्यांच्या कर्नाटकातल्या प्रचारसभेत प्रज्ज्वलसाठी प्रचार करणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना या पीडित महिलांचीच नव्हे तर कर्णाटकातल्या समस्त महिलांची माफी मागावी अशी मागणी केलीय. देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या महिला असतानाही त्यांनी या महिलांवर झालेल्या अत्याचारावर मौन बाळगलंय. साधा निषेधही केलेला नाही. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा ती आपलं परकं काही पाहत नाही. सत्तातुराला भय आणि लज्जा काहीच शिल्लक राहत नाही. खासकरून समाज माध्यमांवर एक दिवस हळहळ व्यक्त केली जाईल. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की उद्या आपण ही जात्यात असू, त्यावेळेला इतरही लोकं अशीच हळहळ व्यक्त करतील. आपापल्या कुवतीप्रमाणे अशा गोष्टींचा निषेध आपण केला पाहिजे. मौन बाळगणं हे मेलेल्या माणसाचं लक्षण आहे. कदाचित उद्या तुम्ही ही एखाद्या व्यवस्थेचे पीडित व्हाल, तेव्हा तुमची साथ देणारे तुम्हालाच आरोपी बनवतील. सिस्टीम माणूस पाहत नाही, ओळखत नाही. सिस्टीम केवळ सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या आदेशाला बांधील आहे. त्यामुळं आपली विवेकबुद्धी जागृत ठेवा. नागरिकांनी आणि विरोधी पक्षातल्या नेत्यांनी सतत मागणी करूनही महिला सशक्तीकरण आणि मुलींच्या शिक्षणाबाबत सतत बोलणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कर्णाटकातल्या या लिंगपिसाट प्रवृत्तीवर प्रतिक्रियाही दिलेली नव्हती.  आता लोकांनाच विशेषतः महिलांना पुढाकार घ्यावा लागणार. बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या नरपशूला, अत्याचार करणाऱ्या नराधमाला बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींची विटंबना करणाऱ्यां विरोधात संतापानं खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः महिलांना निर्वस्त्र करून तिच्या छातीवर, गुप्तांगावर शेकडो हातांनी मुलीं, तरुणी, वृद्ध महिलेवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज व्हिडीओ पाहतो, बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे, आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणून अत्याचार होतोय हे भयाण वास्तव अनुभवायला येतं. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना वारंवार घडताहेत. आमच्या मुलीबाळींना नासवणाऱ्यांना ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम झालेली कारटी ताळ्यावर येतील! जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या इथल्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचं विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीला येताहेत. मुलींवरच्या अत्याचाराच्या बातम्या आल्यानंतर देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत. 
सत्ता म्हणजे अधिकार आणि मत्ता म्हणजे पैसे हे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडं समाजाचं लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल असं त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. हे सगळं नक्की कशामुळं घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचंच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानंच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. जी वासनाकांडं गेल्या काही दिवसात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. जो लिंगपिसाट हरामखोर अशा वासनकांडात गुंतलाय. त्याला जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाजानं पुढाकार घ्यायला हवाय. स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणंच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजानं का घेऊ नये, जे कुणी देशाबाहेर पळून गेलेत वा पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसलेत त्यांना महिलांनी, समाजानं गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल. प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली, महिलांनी दाखवायला हवी. जशी इथं या मोलकरणीनं दाखवलीय. असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानंच हे सारे बेफाम बनलेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचं असतं असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत 'बेटी बचाव बेटी पढाव!' म्हणत महिलांच्या विकासाचं धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे. व्हिडिओ चित्रण आणि बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एक कामासुर तरुणीवर अत्याचार करतो, तिच्या देहाचा चोळामोळा करतो, तिची तडफड दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रंदन व्हायला हवं!  बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं, त्याचं चित्रण करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्याला वाटली नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगारानं ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशा नराधमांना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. अत्याचारी पुरुषाचं पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याच्या बातम्या अधूनमधून वृत्तपत्रातून येतात. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलंय!
हरीश केंची
९४२२३१०६०९



1 comment:

  1. ह्या एकाच दुर्दैवी घटनाक्रमाचीच काय, मणिपूर अत्त्याचार, राष्ट्रीय महीला कुस्तीगीरांचा झालेला लैंगिक छळ, भाजपचा उत्तर प्रदेशातील माजी आमदार सेंगरने एका अल्पवयीन मुलीवर केलेले लैंगिक अत्याचार, भाजपचा महाराष्ट्रातील किरीट सोमय्या, भाजपचा सोलापूर येथील माजी जिल्हाध्यक्ष देशमुख ह्यांच्यावर झालेले आरोप... ! लिस्ट फारच मोठी आहे. संस्कृती जपणारा पक्ष खरंतर विकृती जपणारा पक्ष आहे !

    ReplyDelete

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...