Friday 24 May 2024

आता मथुरा वर स्वारी...!


श्री रामाचे बंधू शत्रुघ्नने लवण या राक्षसाचा वध करून मधुरा नावाचं नगर वसवलं. कालांतरानं मधुराला मथुरा असं संबोधलं जाऊ लागलं. रामजन्मभूमीवरचा शतकानुशतके चाललेला वाद आता मिटलाय. त्यामुळं रामभक्त सुखावलाय. इतकंच नाही तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राम मंदिर बांधून तयार झालंय. येत्या २२ जानेवारीला, नवीन, भव्य, दिव्य अशा राममंदिरात राम लल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे ते २४ जानेवारीपासून दर्शनासाठी अयोध्येत भाविकांची गर्दी उसळणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीवरून वाद सुरू होता तेव्हापासूनच काशी-मथुरा इथल्या मुद्द्यावरूनही वाद सुरू  असल्याचं अनेकांना आठवत असेल. 
----------------------------------
विश्व हिंदू परिषद मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीला 'मुक्त' करण्याबाबत अनेक दिवसांपासून बोलतेय. अलाहाबाद उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडच्या निर्णयवृत्तीनं कृष्णप्रेमींच्या बाजूनं तराजू झुकल्याचं स्पष्ट दिसतेय. अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मयंककुमार जैन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं एएसआयला ज्ञानवापीप्रमाणे मथुरा मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिलीय. या दोन्ही मशिदी हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर बांधल्या गेल्याचा दावा केला जातोय. या दाव्याचं समर्थन करण्यासाठी तपशील सादर करताना याचिकेत म्हटलंय की त्यात हिंदू मंदिरांमध्ये दिसणारे पिवळे खांब आहेत. त्याशिवाय त्यात शेषनागाची आकृती कोरलेली आहे. हिंदू पुराणानुसार, शेषनागनं यमुना नदी पार करताना भगवान कृष्णाचं रक्षण केलं होतं. याशिवाय त्या खांबांच्या खालच्या भागात असलेल्या मशिदीच्या खांबांवर हिंदू धर्माची चिन्हं आणि वचनं कोरलेली आहेत. याचिकेनुसार, आता ज्या ठिकाणी मशीद बांधलीय ती जागा मथुरेत शतकांपूर्वी कंसाच्या कैदेत होती. त्या कैदेतच श्रीकृष्ण जन्मला, त्याचं दर्शन साऱ्यांना झालं. त्यामुळं कारागृह हे श्रीकृष्ण जन्माचं मूळ ठिकाण मानलं जात असेल तर त्या जागेची मालकी मंदिराला द्यावी, अशी मागणी पुढं आलीय.
कथित शाही इदगाह मशीद ही हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आलाय. याचिकाकर्त्यानं सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद केलाय की, वादग्रस्त जमिनीबाबत कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि मशीद समितीनं केलेल्या दाव्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी वैज्ञानिक सर्वेक्षण आवश्यक आहे. याला शाही मशीद आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं विरोध केला होता, पण सर्वोच्च न्यायालयानं अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवलाय. औरंगजेबानं मंदिर पाडून १३.३७ एकर जागेवर ईदगाह तयार केल्याचा दावाही कोर्टासमोर दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आलाय. त्यांनी श्रीकृष्णाच्या जन्माचा आणि मंदिराच्या बांधकामाचा इतिहास सुध्दा कोर्टात मांडला. इतकंच नाही तर ईदगाह मशिदीच्या बदल्यात आम्ही तिप्पट जमीन देण्यास तयार आहोत, असं हिंदू पक्षानं न्यायालयाला सांगितलंय. हिंदू पक्षाच्या प्रतिक्रियेनंतर आता शाही मस्जिद इदगाह समितीचे अध्यक्ष जेद हसन यांनी हा वाद न्यायालयाबाहेर सोडवण्याऐवजी आम्ही मशिदीचे मालक नाही, तर आम्ही फक्त त्यावर देखरेख करत आहोत, असं सांगितलं. खरी मालकी ही जनतेची आहे आणि हा वाद कसा सोडवायचा तेच ठरवतील! अयोध्येतल्या राममंदिराचा मुद्दा जितका जिवंत आणि स्फोटक होता तितकाच मथुरेच्या कृष्णजन्मभूमीचा मुद्दा कदाचित वादग्रस्त वाटणार नाही, पण इथंही मतांच्या राजकारणानं कधीही घोटाळ्याचं रूप धारण केलं तर इथं अराजक माजेल. त्यामुळं मथुरा शहरात एकंदरीत शांतता नांदते. मात्र इथल्या कृष्णजन्मभूमीचे मंदिर ईदगाहच्या सावलीतून मुक्त करण्यासाठी हिंदू नेत्यांनी वर्षांपूर्वी श्रीकृष्ण जन्मस्थान विकास समितीची स्थापना केली. ही समिती अयोध्येतल्या रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनासारखीच मोहीम राबवतेय. एका बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तरुण आहेत. दुसरीकडे, दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामच्या तरुण मुलानं मथुरेत आदमसेना नावानं विरोधी पक्ष स्थापन केलाय.
मथुरेच्या कृष्ण मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलाय. ज्यामध्ये इथली चार हिंदू मंदिरे कशी बांधली गेली आणि ती नंतर कशी उध्वस्त झाली याच्या कथा आहेत. चौथे मंदिर हे आधुनिक वादाचं कारण आहे. जो ओरछा इथल्या वीर सिंहदेव बुंदेला यानं मुघल सम्राट जहांगीरच्या काळात तो बांधला होता. रामायणात अशी कथा आहे की रामाचा धाकटा भाऊ शत्रुघ्न यानं लवण या राक्षसाचा वध करून उत्तर भारतात मधुरा नावाचं शहर वसवलं. कालांतरानं मधुराला मथुरा असं संबोधलं जाऊ लागलं. इथं औरंगजेबानं कटरा केशवदेव नावाच्या १३ एकर जागेतलं  तिथं असलेलं मंदिर उध्वस्त करून ईदगाह बांधली. फ्रेंच प्रवासी टेव्हरनियर भारतभ्रमण करत असताना त्यानं त्याच्या मथुरा भेटीच्या अहवालात, १६५० मध्ये इथं एका मंदिर असल्याचा उल्लेख केलाय. परंतु औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर उध्वस्त करून ते नष्ट करण्याचा आदेश दिला आणि सध्याची ईदगाह केशवदेवाच्या मंदिराच्या खांबांवर बांधली गेली. सध्या कृष्ण मंदिर बघायला गेलं तर त्याच्या बाजूलाच एक उंच मशीद दिसते. लाल दगडानं बनलेली मशीद मंदिरापेक्षा उंच आहे. त्यामुळं हे मंदिर मशिदीच्या सावलीत उभं असल्याचं दिसतं. मशिदीचा मोठा हिरवा, पांढरा घुमट पूर्वी मंदिरावर वर्चस्व गाजवत होता. परंतु काही वर्षांपूर्वी मंदिराचे स्पायर उभारल्यानंतर दोन्ही देवस्थानांमधली उंची समान असल्याचं दिसतं. हे मंदिर-मशीद संकुल पूजास्थान कायदा १९९१ अंतर्गत समाविष्ट करण्यात आलंय. या  कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी असलेल्या स्थितीतच या संकुलाचं धार्मिक स्वरूप कायम ठेवावं लागतं. काशी इथलं ज्ञानव्यापी मशीद आणि मथुरा इथली शाही इदगाह मशीद कोणत्याही परिस्थितीत पाडू नये, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयानं राज्य आणि केंद्र सरकारांना दिले आहेत. तथापि, मथुराचे स्थानिक इमाम आणि इथले हिंदू संन्यासी यांच्यात सौहार्द आणि सद्भावना आहे. या कृष्णजन्मभूमी आणि मशिदीवरून काही राजकारणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  मथुरेत आजवर क्वचितच जातीय दंगली झाल्यात. आता काही माथेफिरू लोक इथं गदारोळ माजवायला लागले आहेत, असा त्यांचा आरोप आहे.
या सर्व वादांमध्ये भाजप खासदार हेमामालिनी यांनीही अयोध्या आणि काशीनंतर त्यांचं मतदारसंघ असलेल्या मथुरेतही भव्य मंदिर बांधलं जाईल, अशी आशा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखं इथंही भव्य कॉरिडॉर बांधलं जाईल. हेमामालिनी म्हणाल्या की, रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर आता मथुरा हे हिंदूंच्या आस्थेनुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. मथुरेचा खासदार या नात्यानं मी म्हणेन की तिथं जगाला हेवा वाटेल असं भव्य मंदिर व्हायला हवंय! १९६२ मध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे प्रमुख रामनाथ गोएंका यांनी जुन्या कृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. कारी यांनी नवीन मंदिर बांधलंय. पण ते मंदिर कृष्णजन्मभूमीच्या मूळ जागेवर बांधलं गेलं नाही. मूळ मंदिरावर मशीद बांधण्यात आलीय. एखाद्या परदेशी माणसानं हे मंदिर आणि मशीद जवळून पाहिल्यास भारतात हिंदू-मुस्लिम यांच्यात किती संघर्ष आहे, याची कल्पना येईल. पण दुसऱ्याच क्षणी सत्य जाणून त्याचा हा भ्रम तुटतो.  मंदिराच्या आवारात प्रवेश करताच विविध पोस्टर्स, बॅनर वाचायला मिळतात. जसं हिंदूधर्माचं हिंदुत्त्वाचं रक्षण करा, उर्दू हटवा अशा आशयाचा मजकूर त्यावर आढळतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, अयोध्देच्या तुलनेत मथुरेमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या खूपच कमी आहे. इथले मुस्लिम शांतताप्रिय आहेत. अनेक मुस्लिम तरुण मथुरेला येणाऱ्या यात्रेकरूंना जेवणावळी घालून, विविध सेवा उपलब्ध करून देऊन आपला उदरनिर्वाह करतात. काही मुस्लिम मुले आणि मुली भगवान श्रीकृष्णाची आवडती बासरी किंवा मोर विकून उत्पन्न मिळवतात. अयोध्या आणि मथुरा यांच्यातला वाद पूर्णपणे असंबंधित असल्याचं वर्णन करणार्‍या एका माहितीदाराचं असं मत आहे की, अयोध्येप्रमाणेच, मथुरा इथं कृष्णाच्या जन्मस्थानावर आणि शाही इदगाह मशिदीवर मालकी किंवा इतर कायदेशीर वाद नाहीत. ही मंदिरे आणि मशिदी एकमेकांच्या शेजारी असली तरी त्यांचं अस्तित्व पूर्णपणे भिन्न आहे, दोन्हीची प्रवेशद्वारं ही वेगळे आहेत. तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या मोठ्या भागावर बाबरी मशीद बांधण्यात आली होती. यावरून वाद विकोपाला गेला. तसंच इथल्या इदगाहमध्ये नमाज अदा केली जाते. विशेषत: शुक्रवारी इथं मुस्लिम भाविकांची गर्दी असते. १९६८ मध्ये, कृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही इदगाह मस्जिद ट्रस्ट यांच्यात झालेल्या करारानुसार कॉम्प्लेक्समधल्या मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे हे स्पष्ट केलंय. यापूर्वी परिक्रमेचा कार्यक्रम जाहीर करून विहिंपनं मंदिर परिसराच्या चौथ्या भिंतीसारखी मशीदही परिक्रमेच्या मार्गात येईल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे १९६८ च्या कराराचं उल्लंघन होण्याच्या भीतीनं कृष्ण जन्मस्थानाची प्रदक्षिणा केली जात नाही आणि त्यासाठी परवानगीही दिली जात नाही. दुसरीकडे, प्रत्येक ईदच्या दिवशी अधिकारी मशिदीचं प्रवेशद्वार स्वच्छ करतात आणि मुस्लिमांच्या आगमनासाठी सुरक्षा व्यवस्था करतात.
काही वर्षांपूर्वी आचार्य गिरीराज किशोर म्हणाले होते की, 'आम्ही कोणत्याही कराराला बांधील नाही. आम्ही  जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरूच ठेवू कारण आम्हाला त्यावर मालकी हक्क हवा आहे....!'  कृष्णजन्मभूमीच्या जागेवर केशव देव यांच्या भूखंडावर मालकी हक्क सांगणारे श्री कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आमच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद उभी असल्याची भूमिका अनेक वर्षांपासून मांडत आहेत. या ट्रस्टचे प्रवक्ते विजय बहादूर सिंह सांगतात की, कटारा केशव देव यांच्या १३.३७ एकर जागेत कृष्ण मंदिराशिवाय मशीद आणि ५० मुस्लिम कुटुंबं आहेत. हे मुस्लिम नागरिक औरंगजेबाचे वारस मानले जातात. आजूबाजूच्या भागात परिस्थिती सामान्य आहे आणि रस्त्यावर दृश्यमानपणे गर्दी आहे, परंतु अनेक लष्करी तुकड्या, स्थानिक कॉन्स्टेब्युलर अधिकारी आणि निमलष्करी दलांची प्रचंड उपस्थिती लोकांना इथं असामान्य परिस्थितीबद्दल सावध करते. असं असलं तरी इथलं वातावरण कधी बदलेल हे सांगता येत नसल्यानं श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आणि शाही मशीद या दोन्ही प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी सशस्त्र सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत आणि मशिदीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या मंदिराच्या आवारात कुंपण घालण्यात आलंय. मथुरेच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफच्या तीन कंपन्या, सुमारे दीडशे पोलिस अधिकारी १३.७७ एकर परिसरात दोन्ही देवस्थानांना इजा करू इच्छिणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या घटकांच्या कोणत्याही प्रयत्नांपासून त्या सुरक्षित ठेवण्यासाठी सतत गस्त घालत आहेत.
 हा मोठा परिसर व्यापण्यासाठी ठिकठिकाणी टेहळणी बुरूज उभारण्यात आले असून कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरं जाण्यासाठी बॉम्ब निकामी पथकंही स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस खात्याशी संबंधित दोन्ही समुदायांचे लोक जवळपासच्या भागात शांततेनं राहतात. १९९२ च्या अयोध्या घटनेनंतर काही लोकांनी इथंही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक प्रशासनानं हे प्रयत्न हाणून पाडले होते. हु या चिघळलेल्या मंदिर-मशीद वादात मथुरेतल्या नेत्यांचा एक गट नवीन तत्त्वज्ञान मांडत आलाय. भारताच्या या पवित्र भूमीवर अनेक प्राचीन आणि नवीन मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च आहेत. अशा देशात एकमेकांच्या आवारात काही धार्मिक स्थळांवर कायमची भांडणे किंवा वाद होणं योग्य नाही. देशाच्या शांततेसाठी दोन्ही बाजूंना एक तडजोडीचा उपाय शोधावा लागेल की, ते एका बाजूला पूर्णपणे मान्य असो वा नसो! भूतकाळात, इस्माईल फारुकी १९९५ मध्ये दाखल केलेल्या दाव्यात हे निरीक्षण कायम ठेवत, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की मशीद हा इस्लाम धर्म पालन करण्याचा अत्यावश्यक भाग नाही. त्यानंतर न्यायालयानं हे शब्द निकालातून काढून टाकण्याची याचिका फेटाळून लावली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे २०१९ मध्ये अयोध्या वादावर घटनापीठानं निर्णय दिला आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं काशी-मथुरा वादावर निर्णय दिल्यास तो देशाच्या हिताचा आणि बंधुभावाच्या हिताचा असेल, त्यामुळं कोणीही भुवया उंचावू नयेत.


No comments:

Post a Comment

मोदींची आरती, चंद्रचूडांची गोची...!

"खुज्या माणसांची सावली संध्याकाळी मोठी होते. तशीच आता सुमार कुवतीच्या माणसांची सर्वत्र सरशी झालेली दिसतेय. राजकारणाप्रमाणेच...