Saturday 29 April 2023

वक्तका मिजाज कुछ और होता हैं"l...!

"विरोधकांच्या ऐक्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी नितीशकुमार, पवारांची भेट घेतलीय. परंतु नागपुरात पवारांनी नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेतलीय. निमित्त वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं असलं तरी, त्यामागं काही वेगळंच राजकारण शिजत असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त झालाय. त्यामुळं मोदी-शहा, आणि त्यांचे मंत्रीगण त्वेषानं बाहेर पडलेत. पुन्हा सत्ता आणायचीच यासाठी फासे फेकताहेत. प्रचारातले फंडे वापरायला सुरुवात झालीय. तपासयंत्रणांचा फास वेगानं आवळला जातोय. संघानं मात्र सावधतेनं मोदींना पर्याय शोधण्याला आरंभ केलाय. इकडं मोदी भावनिक आवाहन करत, 'मेरी कबर खोदी जा रही हैं...l' 'मुझे खतम करनेकी सुपारी दी गयी हैं...l' असं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' करताहेत. भाजपनेते, कार्यकर्ते मात्र दिगमूढ अवस्थेत आहेत. पण वक्त कुणासाठी थांबत नाही. 'वक्तका मिजाज कुछ और होता हैं l...!'  अदानी प्रकरणानंतर काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींच्या कारभाराचं वस्त्रहरण केलंय...!
------------------------------------------------

स्थापनादिनापासून भाजपची घोषणा बदललीय. २०१४ नंतर ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर केला जात होता. 'अबकी बार मोदी सरकार...!' अशी घोषणा दिली जात असायची. आता मात्र ती बदललीय. मोदींचं नांव वगळून 'फिर एक बार भाजप सरकार...!' अशी केलीय. ही घोषणा कार्यकर्त्यांना लोकांमध्ये बिंबवायचंय असा आदेश दिला गेलाय. याचाच अर्थ अदानी प्रकरणात मोदींच्या प्रतिमा डागळलीय, हे जणू भाजपनं एकप्रकारे मान्य केलंय. हे कमी होतं म्हणून की काय भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारला पूर्ण नागडं-उघडं केलंय. सत्ताधाऱ्यांना सत्तेची गुर्मी असेल, डोक्यात हवा गेली असेल, सत्तेतल्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांसोबत वाटचालीची त्यांच्यात कुवत नसेल, तर सत्ताधारी फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत. लोकशाहीत सत्ताधारी जर हुकुमशहाप्रमाणे वागतील, तानाशाही राबवतील, तर काही काळापर्यंत लोक तानाशाहीला घाबरतील, उघडपणे काही बोलणार नाहीत. अशावेळी सत्ताधाऱ्यांना वाटेल की, सर्व शक्ती, सत्ता आपल्याच हाती एकवटलीय! अशा वातावरणात कुणी विरोधात काही बोललं तर त्यांचं करिअर बरबाद होईल, त्याची राजकीय कारकीर्द उध्वस्त होईल. ही भीती त्याला वाटत असते. त्यामुळं तानाशाहीच्या विरोधात कुणी काही बोलणार नाही. पण लक्षांत ठेवा सत्ताधाऱ्यांच्या हातातले पत्ते थोडेसे जरी हलले, ढिले पडले वा राजकीय स्थिती जरा जरी घसरली, तर सत्ताधाऱ्यांच्या सभोवताली असलेले तानाशहाचे सहकारी शड्डू ठोकून बदला घेण्यासाठी तानाशहाच्या विरोधात सरसावतील. काळ आणि वेळ ही सगळ्यांची सारखी असतेच असं काही नाही. रंकाचा राव होतो तर रावाचा रंक कधी होतो...! हे लक्षातही येत नाही. हा काळाचा महिमा असतो. 'वक्त' या हिंदी सिनेमातलं ते गाणं आहे ना,
'वक़्त से दिन और रात, वक़्त से कल और आज l
वक़्त की हर शह ग़ुलाम, वक़्त का हर शह पे राज l
वक़्त की गर्दिश से हे, चाँद तारो का मिज़ाज l
वक़्त की ठोकर में है, क्या हुकूमत क्या समाज l
वक़्त की पाबन्द हैं, आति जाति रौनके l
वक़्त है फूलों की सेज, वक़्त है काँटों का ताज l
आदमी को चाहिये, वक़्त से डर कर रहे l
कौन जाने किस घड़ी, वक़्त का बदले मिजाज़...ll'
देशावर हुकूमत गाजवणारे शहा आणि मोदी हे दोघंच भारतीय राजकारणाच्या पटलावर आज चमकताहेत. पण आजकाल मोदींची वेळ, वक्त थोडाशी गडबडलीय असं दिसतं! आपण पाहिलं असेल, तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. तेव्हा मोदी अस्वस्थ होते. शेती उत्पादनाच्या हमीभावासाठी समिती नेमण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, त्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं. पण हमीभावाची समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. त्याचा निर्णय झालेला नाही. मोदींनी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन दिलं होतं. पण तेही प्रत्यक्षात आलेलं नाही. शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्लीय, त्यांनी आंदोलनाची जुळवाजुळव सुरू केलीय. एका पाठोपाठ एक अशा काही घटना घडताहेत की, ज्या मोदी-शहांसाठी त्रासदायक ठरताहेत. पक्षीय, राजकीय, प्रशासकीय, कार्यपलिका, न्यायपालिका अशा सर्वच स्तरावर अडचणी उभ्या राहताहेत. अदानीबरोबरच्या मोदींच्या संबंधांमुळे त्यांच्यावर थेट आरोप होताहेत, पण त्याबाबत मोदी वा त्यांच्या सहकाऱ्यांकडून ब्र उच्चारला जात नाही. त्यामुळं संशयाचं वादळ मोदींभोवती घोंघावतंय! त्यातच सत्यपाल मालिकांनी पुलवामा हल्ला, ४० जवानांचं वीरमरण, गोवा सरकारचा भ्रष्टाचार, रिलायन्सची ३०० कोटींची लाच, काश्मीरमधलं कलम ३७० हटवणं, विशेष दर्जा रद्द करणं, मोदींना भ्रष्टाचाराबाबत गांभीर्य नसणं यावरून वाभाडे काढलेत. यात मोदींनाच नाही तर, राजनाथसिंह, अजित डोवाल, जितेंद्रसिंग, राम माधव यांचं पुरतं वस्त्रहरण केलंय. त्याला अद्याप कुणीही प्रतिवाद केलेला नाही. हे सारं भाजपच्या अंगलट येणारं आहे.

संघानं सुरू केलेला नव्या नेतृत्वाचा शोध यात मोदींसमोर मोठं आव्हान उभं आहे ते 'नितीन गडकरी' यांचं! ते शक्तिशाली नेते, प्रभावशाली मंत्री आहेत; त्यांचं कर्तृत्व, मंत्री म्हणून काम, व्यक्तिमत्व स्वभाव, व्यवहार याचं कौतुक विरोधकही करतात. त्यामुळं आजकाल गडकरी जिथं जातात तिथं चर्चेत असतातच! 'विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसनं मजबूत व्हावं...!' असं आपलं मत गडकरी मांडत असताना त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र 'काँग्रेसमुक्त' भारत व्हावा यासाठी धडपडतात. गडकरी हे लोकशाही मानणारे नेते आहेत. ते जेव्हा लोकशाही, संविधान मजबूत होण्यासाठी 'विरोधीपक्ष सक्षम असायला हवा!' असं मतप्रदर्शन करतात. तेव्हा पक्षाध्यक्ष ओमप्रकाश नड्डा हे प्रादेशिक पक्षाचं अस्तित्वही संपवण्याच्या वलग्ना करतात. गडकरी सध्याच्या राजकारणाचा घसरलेला स्तर पाहून चिंता व्यक्त करतात. 'राजकारणातून आता सेवाभाव संपुष्टात आलाय...!' असं निराशेनं म्हणत 'आजचं राजकारण हे केवळ सत्तेसाठीच उरलंय, त्यात समाजकारणाचा, समाजसेवेचा लवलेशही उरलेला नाही; त्यामुळं राजकारण सोडून द्यावंसं वाटतंय...!' अशी निराशा व्यक्त करतात. अन वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतात. पण त्याची ते पर्वा करत नाहीत. संसदीय राजकारणात ५६ वर्षे कार्यरत वरिष्ठ नेते राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी नुकतंच दोनदा गडकरींची भेट घेतलीय. पवार-गडकरी भेटीमागं काहीतरी मोठं घडतंय, असा संशय व्यक्त होतोय. पवारांनी महाराष्ट्रातले आपले पत्ते आजतरी मिटलेत. आपल्या पक्षाच्या आमदारांवर भाजपत येण्याबाबत दबाव आणला जातोय. अशी तक्रार त्यांनी केलीय. राज्यात एकनाथ शिंदे हे भाजपसाठी 'गलेकी हड्डी' बनलेत. अजित पवारांवर भाजपनं फासे टाकलेत. त्यामुळं राज्यातलं वातावरण अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झालीय. राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी-शहांना विधानसभा नाही तर लोकसभा महत्वाची असल्यानं त्यासाठी शिंदेंची सेना सोबत आहेच पण त्यांचा राज्यात प्रभाव नाही. तेव्हा ग्रामीण भागात जाण्यासाठी भाजपला राष्ट्रवादी सोबत हवीय. कारण ग्रामीण भागात,सहकारी चळवळीत राष्ट्रवादीचं प्राबल्य आहे. २०१९ मध्ये शिवसेनेच्या साथीनं ४८ पैकी ४२ लोकसभेच्या जागा युतीनं जिंकल्या होत्या. आजमितीला ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत नाही. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुहेरी संख्याही गाठता येणार नाही, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त झालाय. जर असं घडलं तर भाजपच्या, मोदींच्या सत्तेला धक्का बसू शकतो. त्यामुळं संघ आणि भाजप आगामी निवडणुकीचं गांभीर्यानं नियोजन करत आहेत.

देशातल्या प्रसिद्धीमाध्यमात शहा आणि मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी असता कामा नये असा जणू दंडक ठरलाय. आपण पाहिलं असेल की, नुकतंच मोदींनी नव्यानं साकारणाऱ्या संसदभवनाला भेट दिली. तेव्हा तिथं त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीच फोटोत आढळत नाहीत. त्या भव्य सभागृहात मोदी एकटेच दिसतात. अयोध्येत राममंदिराच्या पूजेला आले तेव्हाही केवळ मोदीच दिसले. ते जेव्हा बनारस, काशीला आले, गंगेत डुबकी मारली, पूजेसाठी मंदिरात प्रवेश करताना, पूजेनंतर प्रदक्षिणा घालताना फक्त आणि फक्त मोदीच दिसले. त्या फोटोंच्या फ्रेममध्ये इतर दुसरं कुणी येणं हे कदाचित मोदींना सहन होत नसावं! मात्र आता मोदींचे दिवस फारसे चांगले दिसत नाहीत. आरोपांच्या फैरी झडताहेत. म्हणून अमित शहांनीही दूरचित्रवाणीवरच्या मुलाखतीत मोदींना त्यांची हैसियत दाखविण्याची संधी सोडली नाही. अमित शहांनी इथपर्यंत सांगितलं की, सीबीआयनं एका एन्काऊंटर प्रकरणात मोदींचं नाव घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. 'तुम्ही जर या प्रकरणात मोदींचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ...!' अशी लालूच दाखवली होती. स्वतःला सोडवून घेण्यासाठीची संधी होती, माझ्यावर दबाव आणला होता, पण मी दबावाखाली आलो नाही. मोदींचं नाव घेतलं नाही. जर मी मोदींचं नाव घेतलं असतं तर मोदी हे अडचणीत आले असते...!' अमित शहांचं हे स्पष्टीकरण ही एक मोठी धक्कादायक गोष्ट आहे. कदाचित शहा हे मोदींनाच याची जाणीव करून देत असतील की, जर 'मी सीबीआयच्या दबावाखाली येऊन तुमचं नांव घेतलं असतं तर तुम्ही तुमचेही राहिले नसता, मग तुमचं काही खरं नव्हतं! तुम्ही आज जे आहात ते केवळ नि केवळ माझ्याच त्यागामुळं...!' अमित शहांचं म्हणणं हे मी वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचे दिवस फिरायला लागतात तेव्हा असं काहीसं घडतं. सर्वात विश्वासू कमांडरही तुम्हाला तुमची लायकी दाखवायची संधी सोडत नाही. आजचा जमाना असा काही राहिलेला नाही की आपल्या वफादारीसाठी ते प्राण कुर्बान करतील. आज लोकांचा मूलमंत्र हा सलमान खानच्या 'वॉन्टेड' सिनेमातल्या डायलॉगसारखा राहिलाय. 'ना हनीभाईके लिये, ना गनीभाईके लिये, बंदा काम करता हैं तो सिर्फ मनीभाईके लिये...!' अशात मग विश्वासार्ह माणसाचं वागणं, बोलणं बदललं तर, साथसंगत करणारे नेते कुठवर त्यांची साथसंगत करणार?

गडकरींना दूर राखण्यासाठी शहा-नरेंद्र मोदी यांनी ज्या काही कुरघोड्या केल्यात ते विसरणं शक्य नाही. एकेकाळी पांच पांच महत्वाची खाती असलेल्या नितिन गडकरींकडून एक एक करत चार खाती काढून घेतली. पाठोपाठ पक्षाच्या संसदीय समितीतून त्यांना दूर केलं. निवडणूक आणि उमेदवारी देण्यासाठीची पक्षाची जी महत्वाची समिती असते त्यातूनही त्यांना हटवलं गेलंय. निर्णयप्रक्रियेतूनच त्यांना हद्दपार केलं गेलंय. कदाचित त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न देता त्यांचं संसदीय राजकारणात येणारे मार्ग बंद केले जातील. त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न चालवला आहेच. आजमितीला केवळ गडकरी हेच नरेंद्र मोदींना पर्याय आहेत. अशा परिस्थितीत राजकारणात विश्वासार्ह नेते कशाप्रकारे बदलतात याचं एक छोटंसं उदाहरण! प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा प्रधानमंत्री असतानाची गोष्ट. ते राज्यसभा सदस्य होते. लोकसभेत ते रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या शेजारी ते बसत. देवेगौडा सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारची लगाम खेचली. संयुक्त मोर्चाला आपला नेता बदलायला सांगितलं, संयुक्त मोर्चानं नवा नेता निवडीला विरोध केला. देवेगौडांनी संयुक्त मोर्चातल्या सहकाऱ्यांच्या भरोशावर सरकारच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरं जायचं ठरवलं. त्यावेळी संयुक्त मोर्चातले देवेगौडांचे सहकारी मंत्र्यांनी राणा भीमदेवी थाटाची भाषणं करत देवेगौडांच्या पाठीशी ठाम असल्याच्या शपथा घेतल्या. रामविलास पासवान यांनी तर काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. पण जेव्हा मतदान झालं त्यात देवेगौडा पराभूत झाले.  देवेगौडा विश्वासदर्शक प्रस्ताव हरले तेव्हा संयुक्त मोर्चातल्या नेत्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलला. त्यांनी लगेचच देवेगौडा यांच्याऐवजी इंद्रकुमार गुजराल यांना नेता निवडला! याशिवाय २००९ मध्ये मनमोहनसिंग विरुद्ध लालकृष्ण अडवाणी लढतीत अडवाणी यांचा वाईट पद्धतीनं पराभव झाला. मग संघ आणि भाजपतले सगळे नेते अडवाणींना टाळू लागले, ज्यांनी भाजपला जमिनीवरून उंच आकाशात नेलं होतं. त्या अडवाणींची तुलना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर सडलेल्या लोणच्याशी केली होती. अंतत: अडवाणींना पक्षानं राजकारणातलं अंदमान भोगण्यासाठी पृथ्वीराज रोडवर एकाकी सोडून दिलं. उगवत्या सुर्याप्रमाणे येणाऱ्या नेत्याचं स्वागत आणि मावळत्याला ठोकर ही नीती भाजपनं अवलंबिली. त्यानंतर सगळे नेते 'मोदी चालीसा' गायला लागले. जे लोक अडवाणींच्या नजरेत असावं म्हणून त्यांच्या घरी पाणी भरत, ती सारी मंडळी अडवाणींना बघून रस्ता बदलू लागले, अडवाणींच्या नजरेला पडलो तर त्यांना नमस्कार करावा लागेल! इतकी अवहेलना त्यांची केली गेलीय. १९७७ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींकडून सत्ता हिसकावून घेतली होती. तेव्हा काँग्रेसीही इंदिरा गांधींना अशाचप्रकारे टाळू लागले होते. मात्र इंदिरा गांधी या एकट्या संसदेत येत आणि माजी खासदारांच्या गॅलरीत बसून संसदेचं कामकाज पाहात आणि परतत असत. या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२४ समोर येऊन ठाकलंय! देशाचं मत, मन आणि कल संघ भाजपलाही आताशी समजून चुकलंय की, २०२४ ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. व्यक्त झालेल्या अंदाजानुसार १८० ते २०० जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळं निवडून येणाऱ्या भाजपच्या सदस्यांचा वजीर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. दुसरीकडं आपल्याला पर्याय ठरू शकतील अशा संभावित नेत्यांना हेरून त्यांना उमेदवारीपासूनच वंचित ठेवण्याची खेळी खेळली जातेय. जेणेकरून त्यांचा वजीर बनण्याचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न शहा आणि मोदींनी आरंभलाय. मोदींच्या शब्दातला 'ईन्साफका ब्रँड' असलेले सीबीआय, आयटी आणि ईडी ह्या संस्थादेखील भाजपच्या १८०-२०० सदस्यांच्या अवस्थेत मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणार नाहीत. मोदी-शहांच्या सभोवताली असलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनाही याची चाहूल लागलीय, पण सीबीआय, आयटी, ईडी याची भीती असल्यानं ते उघडपणे व्यक्त होत नाहीत. नितीन गडकरी यांचं नाव वजीर म्हणून पुढं आलं तर त्यांना अशा हुजऱ्यांची गरजच भासणार नाही. कारण त्यांचा थेट संपर्क तळातल्या कार्यकर्त्यांशी आहे. ते माजी पक्षाध्यक्ष असल्यानं भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून विरोधीपक्षातल्या नेत्यांपर्यंत त्याचं वेगळं नातं आहे. त्यांना भाजपच्या समित्यांतून हटवलं गेलं, त्यानंतर उमेदवारीपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच पवारांसारखे ज्येष्ठ नेते नागपुरात जाऊन गडकरींना भेटतात, तेव्हा लक्षांत येतं की, नक्की काहीतरी गडबड दिसतेय. भाजपला कमी जागा मिळाल्या तर विरोधीपक्षातल्या काहींची मदत घ्यावी लागेल, तेव्हा गडकरी यांची लॉटरी लागू शकते. या नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाला विरोधक मदत करणार नाहीत. राजकारणात अशाच नेत्यांना यश मिळतं, ज्याचं सर्व पक्षांशी मधुर संबंध असतील. दुर्दैवानं आजच्या मोदी-शहा या भाजप नेतृत्वाचं विरोधकांशी मैत्रीचे नाहीत तर ते शत्रुत्वाचं, वैराचं संबंध आहेत. लोकशाहीत विरोधीपक्षाचं अनन्यसाधारण महत्व असतानाही त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आता भाजपत आजवर कोंडलेली वाफ बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर आणि व्यक्तिशः मोदींवरचा हल्ला हा जुन्या भाजपच्या निष्ठावान नेत्यांचा असल्याची चर्चा आहे. त्यामुळं पक्षांतर्गत या आरोपांना विरोध झालेला नाही. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे जर शहा आणि मोदींनी वाफ आणखी कोंडली तर त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
*अदानीच्या भेटी अन पवारांचं घुमजाव*
अदानी प्रकरणानं, सत्यपाल मलिक यांच्या आरोपांनी मोदी-शहा सरकारला घेरलं असताना पवारांनी अदानींच्या एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत 'अदानी समूहाला ठरवून लक्ष्य केलं जातंय!' असं म्हटलं. पवारांचा 'घुमजाव' हा विरोधकांच्या एकत्र येण्याला धक्का समजला जातोय. चौकशीसाठी जेपीसी नेमावी म्हणून संसद बंद पडणाऱ्या विरोधकांमध्ये राष्ट्रवादीही होती हे विशेष! आता जेपीसी मागणीलाही पवारांनी विरोध दर्शवलाय. पवारांनी भाजपच्या सुरात सूर मिळवलाय. विरोधकांना हा मोठा धक्का आहे. नेहमीप्रमाणे पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. संसदेत आणि बाहेर विरोधीपक्ष अदानी विरोधात एकजूट दाखवत असताना पवारांची ही भूमिका अवसानघातकी आहे. अदानीनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून जो बेहिशेबी पैसा गुंतवलाय याच्या चौकशीसाठी विरोधक आग्रही आहेत. नुकतंच अदानींनी पवारांच्या घरी दोन तास चर्चा केलीय. त्यातली चर्चा मात्र गुलदस्त्यात आहे!

कसोटी मोदींची आणि काँग्रेसची...!

"भाजपनं 'गुजरात फार्म्युला' कर्नाटकातही राबवलाय. इथल्या विद्यमान ७३ प्रस्थापितांना उमेदवारी नाकारून नवे चेहरे देत नव्या पिढीकडं पक्षाचं नेतृत्व सोपवण्याची तयारी केलीय. भाजपच्या पाठीशी सतत असणारा लिंगायत समाज वगळून इथं नवी जातीय समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केलाय. अँटी इनकम्बन्सीचाही सामना करणाऱ्या भाजपचं आता येडीयुरप्पा नंतरचं युग सुरु करायचंय. प्रत्येक जिल्ह्यातली जातीय, सामाजिक समीकरणांचा बारकाईनं अभ्यास केला गेलाय. प्रस्थापित नेतृत्वाला फाटा देऊन नवं नेतृत्व देण्याचा प्रयत्न भाजप करतेय. मतदार नव्याकोऱ्या, कोणताही आरोप नसलेल्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास मोदी-शहांना आहे. त्यांची ही खेळी कितपत यशस्वी होतेय हे लवकरच दिसेल. भाजपनं हिजाब, मुस्लिमांचं आरक्षण काढून ते लिंगायत, वक्कलिंगांना देऊन हिंदुत्वाची खेळी खेळलीय. इथं मोदींचा करिष्मा चालेल की, राहुल गांधींना मिळालेला 'भारत जोडो' यात्रेतला प्रतिसाद मतांमध्ये परिवर्तित होईल काय? याशिवाय कर्नाटकच्या निकालातून देशातल्या राजकारणाची दिशाही स्पष्ट होणार असल्यानं ही महत्वाची निवडणूक आहे!
---------------------------------------------------

कर्नाटकात पहिल्यांदा १९५२ मध्ये सर्वप्रथम विधानसभांच्या निवडणुका झाल्या आहेत. आजवर इथं १५ विधानसभेच्या निवडणुका झाल्यात. आता होणारी निवडणूक ही १६ व्या विधानसभेसाठीची असेल. कर्नाटक म्हणून ओळखला जाणारा प्रदेश हा भाषावार प्रांतरचना होण्यापूर्वी म्हैसूर स्टेट म्हणून ओळखला जात होता. १९५२ मध्ये इथं ९९ सदस्यांची विधानसभा होती. त्यानंतर १९५७ मध्ये सदस्य संख्या वाढून ती २०८ झाली. १९६७ साली २१६ सदस्य संख्या झाली. अखेर १९६८ साली २२४ सदस्यांची विधानसभा झाली. तेव्हापासून आजतागायत ती तेवढीच म्हणजे २२४ इतकीच राहिलीय. स्वातंत्र्यलढ्यामुळं प्रारंभापासून इथं कॉंग्रेसी वातावरण होतं. त्यामुळं सतत काँग्रेसचीच सत्ता येत असे. १९७७ मध्ये देशातली आणीबाणी दूर झाली आणि 'अँटी इंदिरा गांधीं वेव्ह' निर्माण झाली असतानाही इथं १९७८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं १४९ जागा जिंकून स्पष्ट बहुमत प्राप्त केलं. जनता पक्षानं ५९ जागा जिंकल्या होत्या. जोवर रामकृष्ण हेगडे कार्यरत होते तोवर इथं जनता पक्ष आणि नंतर जनता दल यांचा बोलबाला राहिला. जनता पक्षाला यश मिळालं ते १९९४ मध्ये! त्यावेळी त्याचं नेतृत्व केलं होतं, जनता दलाचे नेते एच.डी. देवेगौडा यांनी! त्यांनी त्यावेळी जनता दल-एस असा नवा पक्ष काढला होता. इथं एक लक्षांत घेतलं पाहिजे की, १५ पैकी १३ निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक मतं मिळालीत. १९९९, २००४, २००९, २०१३, २०१८ मध्ये काँग्रेसला क्रमांक एक नंबरची मतं मिळलीत. फक्त दोनदा १९८५ मध्ये जनता पक्षाला ४४ टक्के मतं मिळाली होती. त्यानंतर १९९४ मध्ये जनता दलाला ११५ जागा मिळाल्या आणि ३४ टक्के मतं मिळाली. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीत भाजपला १०४ तर काँग्रेसला ८० जागा मिळाल्या. मात्र मतांच्या तुलनेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेसनं ३८ टक्के मतं मिळवली होती. हे इथं सांगण्याचं कारण की, निवडणुकांचं अंकगणित काहीसं वेगळं असतं. मतं कशाप्रकारे दिलं जातात, ती कशाप्रकारे परिवर्तित होतात याचं वेगळं गणित राहीलंय. आता होणाऱ्या निवडणुकीत मोदींचं अस्त्र कितपत चालेल हे पाहावं लागेल. मोदींचे समर्थक इथं आजही ' मोदी हैं तो मुमकीन हैं l' असं म्हणताहेत. पण एकूण माहौल पाहता मोदींमध्ये पूर्वीचा तो उत्साह काही दिसत नाही. सतत 'निवडणूक मोड'मध्ये असलेले मोदी सध्या त्रासलेले दिसतात. निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ते अनेकदा कर्नाटकात आलेत. कर्नाटकातल्या ३० पैकी १९ जिल्ह्यातून २१ सभा त्यांनी २०१८ मध्ये केल्या होत्या. या १९ जिल्ह्यात १६४ मतदारसंघ येतात, २०१८ मध्ये या १६४ मतदारसंघांपैकी ८० ठिकाणी भाजपला यश मिळालं होतं. उरलेल्या ६० पैकी २४ जागा भाजपला मिळाल्या होत्या. आता प्रधानमंत्री मोदी २८ एप्रिलपासून ८ मे पर्यंतच्या या ११ दिवसात १९ जिल्ह्यात २५ सभा घेताहेत. मोदी इथल्या मतदारांच्या पाठींब्याबाबत साशंक दिसतात, तर दुसरीकडं राहुल गांधी हे निश्चिंत दिसतात. ते राजकारणाला गांभीर्यानं घेत असल्याचं जाणवतंय. त्यांनी प्रचाराचा प्रारंभ कोलारमधून केलाय. २०१८ मध्ये त्यांनी इथं केलेल्या भाषणामुळंच नुकतीच त्यांची लोकसभा सदस्यता रद्द झालीय. कोलारमध्ये ते दोन दिवस राहिलेत आणि आता कर्नाटकात फिरताहेत. मोदी आणि राहुल यांच्यात एक फरक आहे की, राहुल पत्रकार परिषद घेतात, वैचारिक स्पष्टता असल्यानं बोलताना कुठंही अडखळत नाहीत. त्यामुळं ते थेट भिडतात. मोदी मात्र पत्रकारांशी बोलतच नाही. गेल्या ९ वर्षात एकाही पत्रकार परिषदेला ते सामोरं गेलेले नाहीत. इथल्या प्रचाराची धुरा सांभाळलीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी. शहांची इथली भाषणं पाहिली तर त्यात त्यांचा एरोगन्स दिसून येतो. ते गृहमंत्री असतानाही 'जर काँग्रेसची सत्ता आली तर इथं दंगली घडतील...!' असं विचित्र वक्तव्य करताहेत. ते माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी आणि इतरांशी अवमानकारक वागलेत. काँग्रेसकडून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे जे कर्नाटकातले आहेत, त्यांच्याशिवाय सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे प्रचाराची धुरा वाहताहेत. प्रचारात स्थानिक मुद्द्यांबरोबर राष्ट्रीय मुद्देही चर्चिले जाताहेत. काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा प्रकरणात प्रधानमंत्र्यांना लक्ष्य केलंय. विमानाऐवजी बसमधून २७०० सैनिक नेण्यात आले, त्यावेळी झालेल्या स्फोटात ४० जवान मारले गेले. विमानं मागितली असतानाही ती दिली गेली नाहीत. ही गृहखात्याच्या चूक आहे. गृहखात्याच्या गलथानपणामुळं ही जीवित हानी झालीय असं सांगितल्यावर प्रधानमंत्र्यांनी त्यांना गप्प बसायला सांगितलं. यामुळं इथं भाजपला 'राष्ट्रवाद' हा मुद्दा प्रचारात वापरता येत नाहीये. याशिवाय भ्रष्टाचाराबाबत मोदी फारसे गंभीर नाहीत. ह्या मालिकांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर इथले '४० टक्के भ्रष्टाचार' फेम मंत्री ईश्वरप्पा यांना मोदींनी थेट फोन करून भ्रष्टाचाराबाबत आपण गंभीर नसल्याचं दाखवून दिलंय. अदाणी प्रकरणातलं त्यांचं मौन हे भ्रष्टाचाराला सिद्ध करतंय. अदाणीना सरकारी मालकीच्या कंपन्या, विमानतळ, पोर्ट, वीज कंपन्या बहाल केल्या गेल्यात याचाही मुद्दा प्रचारात येतोय. स्थानिक मुद्द्यांत पेटीएमच्या धर्तीवर 'पेसीएम' हा भ्रष्टाचाराचा आणि अँटी इनकम्बन्सीचाही मुद्दा प्रचारात आहे. भाजपनं मुस्लिमांचं ४ टक्के आरक्षण काढून ते लिंगायत आणि वक्कलिंग समाजाला दिलं हा मुद्दा प्रचारात आहेच. यावर राहुल जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करताहेत. शिवाय आरक्षण मर्यादा ५० टक्क्यांच्या वर नेण्याची चर्चा राहुल इथं करताहेत. मोदी 'रेवडी'ची टीका करतात, पण तेही अशाच बाबीचा अवलंब करताना दिसतात. काँग्रेसनं महिलांना अनुदान, २०० युनिटपर्यंत वीज मोफत, बेरोजगारांना भत्ता अशी आश्वासनं दिलीत. हे निर्णय पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतच घेतले जातील, असं स्पष्ट आश्वासनही काँग्रेसनं दिलंय, शिवाय हा भाजपसारखा 'चुनावी जुमला' नसेल हे सांगायला मात्र ते विसरले नाहीत. दुसरं महत्वाचं की, भाजपनं दिलेल्या वागणुकीमुळं लिंगायत नेते जगदीश शेट्टर, लक्ष्मण सावदी यांनी काँग्रेसला जवळ केलंय. याचाही फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. आम आदमी पार्टीनं इथं पूर्वी घेतलेला निवडणूक लढविण्याचा निर्णय रद्द केल्यानं त्याचाही फायदा काँग्रेसला होऊ शकतो. निवडणुकीपूर्वी ओवेसीचा एआयएएम पक्ष आणि जनता दल यांची युती होणार असं म्हटलं गेलं होतं, मात्र ती युती झालेली नाही. जेडीएस आणि काँग्रेसचीही आघाडी झालेली नाही. या आघाडीमुळं काँग्रेसचं यापूर्वी नुकसान झालेलं होतं. हेही काँग्रेसच्या पथ्यावर पडलंय. शिवाय इतर राज्यांसारखे प्रादेशिक पक्ष कर्नाटकात नाहीत. आजवर झालेल्या सर्वच निवडणूकपूर्व सर्व्हेतून काँग्रेसला बहुमत दाखवलं गेलंय पण आता असे सर्व्हे येणं बंद झालंय हे इथं नोंदवलं पाहिजे!

प्रस्थापितांऐवजी नव्या पिढीकडं सत्तेच्या चाव्या सोपावण्याचा भाजपचा प्रयत्न हा पक्षांतर्गत प्रश्न असला तरी त्याचा परिणाम देशाच्या संसदीय राजकारणावर होणार असल्यानं त्याची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी रोडमॅप ठरणाऱ्या या विधानसभा निवडणुकीत भाजपनं पक्षाचे वरिष्ठ नेते, ज्यांनी आजवर पक्षाला सत्ता मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचललेला आहे, अशा दिग्गज बी.एस.येडीयुरप्पा यांना जाणीवपूर्वक महत्व न देता त्यांना राजकीय पटलावरून अलगद दूर केलंय. काँग्रेसचं आव्हान असताना येडीयुरप्पाचं महत्व कमी केल्यानं नव्यांना पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतील. पूर्वी संघटना पातळीवर भाजपकडं वजनदार चेहरे होते. खरंतर या चेहऱ्यांनीच पक्षाला सर्वसामावेेशक केलं आणि जनतेत स्थान मिळवून दिलंय. वाजपेयी-अडवाणी यांचं पक्षविस्तारात जेवढं स्थान होतं, तेवढंच किंबहुना काकणभर अधिक एडीयुरप्पाचं इथं होतं. पण एडीयुरप्पा यांच्यासारखं देशभरातल्या अनेकांचं पक्षातलं स्थान मोदी-शहांनी मर्यादीत करून टाकलंय. यात त्यांना यश मिळालं असं दिसताच त्याचीच अंमलबजावणी प्रामुख्यानं सर्व राज्यातून केली आणि तोच त्यांचा सत्तेसाठीचा राजमार्ग ठरला! देशातले भाजपचे सर्वोच्च नेते वाजपेयी-लालकृष्ण अडवाणी यांच्या करिष्म्याला २०१२ नंतर ओहोटी लागली आणि नरेंद्र मोदी हे भाजपचा मुख्य चेहरा म्हणून समोर आला. त्यानंतर प्रादेशिक नेतृत्वाची समीकरणंही बदलत गेली. २०१४ मध्ये हाती सत्ता येताच मोदी-शहांनी पक्षांतर्गत आपली स्वतःची टीम उभी करायला सुरुवात केली. आपल्या समकक्ष आणि वरिष्ठ असलेल्या नेत्यांना हळूहळू बाजूला सारायला सुरुवात केली. कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे अशांना राजकारणातून संपवलं. आपल्या मार्गातले काटे दूर केले. प्रस्थापितांऐवजी प्रत्येक राज्यात दुसऱ्या-तिसऱ्या फळीतल्या नेत्यांना ताकद दिली. महाराष्ट्रात गडकरी, खडसे यांना जशी वागणूक दिली तशीच आता ऐन निवडणुकीत मोदी-शहांनी माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर, लक्ष्मण सावदी, येडीयुरप्पा आणि इतरांना वागणूक दिलीय. ही खेळी धोक्याची असतानाही मोदी-शहांनी ही चाल खेळलीय आणि प्रस्थापितांना दूर ठेवलं. आज भाजपकडं कर्नाटकातली सत्ता कायम राखण्यासाठी प्रभावशाली, लोकप्रिय नेत्याचा अभाव हाच मुख्य अडथळा असला तरी, मोदींच्या चेहऱ्यावर मतं मिळतात हे गृहितक-नेरेटिव्ह साकारण्याचा, तसं भासवण्याचा प्रयत्न चालवलाय. मागील अनुभवावरून पक्षाच्या नव्या धोरणात पक्षात दुसऱ्या फळीतल्या नेत्यांना आताशी फार स्थान उरलेलं नाही. कधीकाळी भाजपकडं प्रत्येक पातळीवर सर्वसमावेशक असा महत्त्वाचा चेहरा होता. अडवाणी १९८६-१९९१, १९९३-१९९८ आणि २००४-२००५ याकाळात अध्यक्ष होते. त्यांच्याच काळात पक्षाच्या दमदार तरुण नेत्यांची फौज उभी राहिली, त्यांना महत्वाचं स्थान मिळालं. २००० मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात यातले अनेक नेते संसदेची दोन्ही सभागृहे गाजवत होते. यात उत्तरप्रदेशातले राजनाथसिंह, महाराष्ट्रातले प्रमोद महाजन, बिहारचे अरुण जेटली, दिल्लीतल्या महिला नेत्या सुषमा स्वराज, मध्यप्रदेशातल्या प्रभावी वक्त्या आणि ओबीसी नेत्या उमा भारती, पक्षाचा अल्पसंख्यांक चेहरा शहानवाज हुसेन, अब्बास नखवी, पक्षाचा दक्षिणेतला चेहरा एम. व्यंकय्या नायडू आदींचा त्यात समावेश होता. अडवाणी यांच्या नेतृत्वातल्या भाजपनं राजस्थानात वसुंधराराजे, मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान, छत्तीसगढमध्ये रमणसिंह, कर्नाटकात येडीयुरप्पा, गोव्यात मनोहर पर्रीकर, महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे आणि गुजरातमध्ये नरेंद्र मोदी या नेत्यांना विकसित केले, त्यांना संधी दिली. त्यांच्या राज्यात ते पक्षाचा चेहरा बनले.

या साऱ्या नेत्यांच्या फळीत सोशल इंजिनिअरिंगही साधलं गेलं. वरिष्ठ जाती, ओबीसी, मागासवर्गीय, कट्टर हिंदुत्ववादी, आणि आधुनिकतेचा चेहरा असणाऱ्यांची मोट बांधली होती. त्यातलेच हे एक येडीयुरप्पा! त्यांनी २००८ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकात भाजपची सत्ता आणली. दक्षिणेत भाजपकडं आलेलं हे पहिलं राज्य. २०१२ मध्ये अडवाणी-वाजपेयी युगाचा अस्त झाला आणि मुख्य चेहरा म्हणून मोदी पुढे आले, त्यावेळी येडीयुरप्पा यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला. आपला स्वतंत्र पक्ष काढला. त्यामुळं भाजपचा तिथं पराभव झाल्याचं मानलं गेलं. मोदी-शहांनी पक्षाची सूत्रं हाती घेतल्यावर काँग्रेसप्रमाणे प्रादेशिक नेतृत्वाचं खच्चीकरण सुरु केलं. त्याचाच एक भाग म्हणून २०२१ मध्ये येडीयुरप्पा यांची इच्छा नसतानाही त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. त्यामुळं प्रचाराची जबाबदारी आज जरी त्यांच्यावर असली तरी पक्षाला विजयी करण्याची जबाबदारी मोदी-शहा यांच्यावर आलीय.२०१४ नंतर मोदी-शहा यांनी प्रस्थापितांना दूर करत नवं नेतृत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्यांनी समाजाशी नाळ असलेल्या नेत्यांचे पंख कापून त्यांना खुजं करत इतरांना मोठं केलं. ताकदवान नेतृत्वाला पद्धतशीर बाजूला केलं. उदाहरण द्यायचं झालं तर बिगर आदिवासी रघुवीर दास झारखंडचे मुख्यमंत्री झाले. जाट नसलेले मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री बनले. तर मराठा नसणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवलं होतं. हा एक जुगार होता. हे तिघेही राज्यपुरते सीमित राहिले. मात्र, उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ, आसामचे हिमांत बिस्वा शर्मा हे राष्ट्रीय स्तरावर आज चमकलेत. केंद्राची सत्ता हाती घेतल्यानंतर केंद्रात फक्त 'मोदी-शहा' यांचंच नाव मंत्रिमंडळातून प्रकर्षानं घेतलं जातं. इतर मंत्र्यांची नावं माहितीच नाहीत वा कुणालाच त्यांची ओळख राहिलेली नाहीत. एकूण खुजी माणसंच सभोवताली गोळा केलीत. त्याच्याच जोरावर सत्तेवर आणि पक्षावरही मोदी-शहांनी ताबा मिळवलाय. आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही इथं फारसं चालत नाही. संघाशी संबंधित इतर संस्था तर खूप दूर राहिल्यात. काँग्रेसमध्येही कधीकाळी अशी नेतृत्वाची फळी होती. पण शरद पवार, ममता बॅनर्जी, जगनमोहन रेड्डी, के.चंद्रशेखर राव आणि अन्य नेत्यांनी स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवत आपलं मार्गक्रमण केलं. काँग्रेसचा विजय हा प्रादेशिक नेत्यांमुळं होतो, असा विश्वास कार्यकर्त्यांना वाटतो, त्यामुळं राजस्थानात गेहलोत, उत्तराखंडात भुपेश बघेल यासारख्या नेत्यांना स्थान दिलंय. आता कर्नाटकात सिद्धरामय्या डी.के.शिवकुमार हे काँग्रेसचे मुख्य अस्त्र बनलेत. काँग्रेस पक्षाध्यक्ष झाल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांची त्यांच्याच होमपीचवर होणारी ही पहिली निवडणूक आहे. त्याच्या निकालावरच पक्षाचं आणि खर्गे यांचं भवितव्य अवलंबून आहे. १४ मे ला सगळं चित्र स्पष्ट होईल!

कर्नाटकात भाजप विरोधी लाट आहे असं विविध सर्वेक्षणांनी म्हटलंय. यासंबंधातला सविस्तर अहवाल 'द वायर'नं प्रसिद्ध केलाय. बोम्मई यांचं सरकार आजवरचं सर्वाधिक भ्रष्ट सरकार असं बहुसंख्य मतदारांचं म्हणणं आहे. काही उच्चवर्णीय जाती आणि लिंगायत वगळता बहुसंख्य जातिसमूह बोम्मई सरकारच्या विरोधात आहेत असं ही सर्वेक्षणं सांगतात. मुंबई राज्य, हैदराबाद स्टेट, मद्रास राज्य यांच्यातले काही भाग म्हैसूर संस्थानाला जोडून कर्नाटक राज्य निर्माण करण्यात आलं. किनारपट्टीचा भाग मद्रास राज्यात होता, उत्तर कर्नाटकाचा बराचसा प्रदेश मुंबई राज्यात आणि हैदराबाद स्टेटमध्ये होता. कर्नाटकच्या राजकारणावर लिंगायत आणि वक्कलिंग या दोन जातसमूहांचं वर्चस्व राह्यलंय. आजवर सर्वाधिक मुख्यमंत्री या दोन जातीतूनच आलेले आहेत. असं मानलं जातं की कर्नाटकात लिंगायतांची संख्या १७ टक्के आहे तर वक्कलिंग १५ टक्के आहेत. मात्र सिद्धरामय्या यांच्या सरकारनं २०१५ मध्ये केलेल्या जातनिहाय जनगणनेनुसार, लिंगायतांचं लोकसंख्येतलं प्रमाण ९.८ टक्के आहे तर वक्कलिंगांचं प्रमाण ८.२ टक्के आहे. कर्नाटकात सर्वाधिक संख्या सुमारे २४ टक्के अनुसूचित जातींची आहे. त्यानंतर मुस्लिम सुमारे १२ टक्के आहेत. सिद्धरामय्या हे काँग्रेसचे नेते अतिशय अभ्यासू आणि चतुर आहेत. त्यांनी कल्पकतेनं काँग्रेसची रणनीती बनवलीय. जातनिहाय जनगणना झाली तर महाराष्ट्रातल्या निवडणुकीची गणितंही आरपार बदलून जातील.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 22 April 2023

ए गोली मार भेजेमें....!

"राजकारण नासलंय. उत्तरप्रदेशात अतिक अहमद आणि अश्रफ या दोघा राजकारणातल्या माफियांची हत्या झालीय. आधी राजनीतीचं अपराधीकरण झालं, मग अपराधाचं  राजनीतीकरण झालंय! राजकारणी गुन्हेगारांची मदत घेत. मग या गुन्हेगारांना राजकारणाचं ग्लॅमर खुणावू लागलं. नंतर गुन्हेगारच राजकारणी बनले. राजकारणात गेलेल्यांमध्ये झालेला बदल लगेच लोकांना जाणवू लागतो. सदाचारी लोकसेवकाला अधिकारी जुमानत नाहीत. तीच मंडळी भ्रष्टाचारी, गुंड, गुन्हेगार लोकसेवकांची कामं झपाट्यानं करतात. मग लोकही अशांच्याकडं वळतात. ही मंडळी हळूहळू माफिया बनतात. राजकीय पक्षही 'निवडून येण्याची क्षमता' एवढ्या गुणवत्तेवर अशांचीच निवड करतात. मग गुन्हेगार, गुंड साकारला जातो तो 'लोकसेवक' म्हणून! आपणही त्यालाच गोंजारतो, वाढवतो. मग ह्या माफियाचा आग्यावेताळ बनतो अन ग्रासू लागतो. त्यातूनच सुरू होतं 'माफियाराज..!' तो केवळ भ्रष्टाचार करतो असं नाही तर वसुली, अपहरण, खंडणी, खून, मारामाऱ्या करत दहशत माजवतो. मग त्यांच्यातलाच एक सरसावतो अन त्याचा खात्मा करून त्याचं माफियाराज संपवतो. इथं दोन गुंड मारले गेलेत, पण तीन तयार झालेत. यापुढं असंच होत राहील! कालाय तस्मै नम: ...!"
----------------------------------------------

'तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा l
इन्सानकी औलाद हैं, इन्सान बनेगा ll

अशा गाण्यांतून भारताच्या खुल्या स्वप्नांना उभारी मिळाली. ती आता पार धुळीला मिळालीत आणि ती स्वप्नं पोहोचलीत
'ए गोली मार भेजेमें l
के भेजा शोर करता हैं ll
भेजे की सुनेगा तो मरेगा कल्लू l
अरे तू करेगा दूसरा भरेगा कल्लू ll

इथंवर जाऊन पोहोचलीत! एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणजे कायदेशीर हत्या, खून करणाऱ्यांना आपण हिरो बनवलंय, हे सारं पाहात आम्हीं टाळ्या वाजवल्या. त्याबाबत प्रश्न विचारणाऱ्यांना आपण 'ओल्ड फॅशनड' म्हणू लागलो. शांत चित्तानं विचार करा... चूक कुण्या एकाची नाही आपल्या सगळ्यांचीच आहे. ज्या फुलपूर मतदारसंघातून पंडित जवाहरलाल नेहरू निवडून येत, त्याच मतदारसंघातल्या मतदारांनी अतिक अहमद या माफियाला निवडून दिलंय. ज्या घरांच्या भिंतींवर महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, राममनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण, मौलाना आझाद, बाबासाहेब आंबेडकर यांच्या तसबीरींनी सजल्या जात होत्या, आता तिथं काय आहे? हे सगळं आपण जाणतो. आधी राजनीतीचं अपराधीकरण झालं, मग अपराधाचं  राजनीतीकरण झालंय! आपल्या धर्म, जातीचे गुंड हिरो बनलेत. हे कुणी बनवलं, विचार करा. शिक्षकांपुढं, गुरूंपुढं नतमस्तक होणारा समाज पैशाच्या मोहाला कसा बळी पडलाय. त्यातून आत्मसन्मानाची जागा कधी पॅकेजनं घेतली ते कळलंच नाही. विचार करा, मला काही सुचतंय, तुम्हालाही काही सुचेल. पण हे कुठंतरी पोहोचलं पाहिजे... नाहीतर एक गुंड मरेल, तर उद्या दुसरा पैदा होईल... आणि पुढं होतंच राहतील. यात सिनेमाच्या १९७० च्या दशकात यंग अँग्री मॅन च्या भूमिकांचा तपास झाला पाहिजे. कित्येकांनी गोळ्या कशा घालायच्या हे दाखवून दिलं. मारामारीला चढवलेला ग्लॅमर त्यांनी तिथं पहिल्यांदाच अनुभवला. ते सारे हिरो हे मनानं खूप चांगले असल्याचं दाखवलं गेलं. ९० च्या दशकात हिरो हॉकी स्टिकनं मारामारी करताना दाखवलं गेलं. मग घरंदाज घरातली मुलं हॉकी स्टिक घेऊन बाहेर पडले. हे असं म्हटलं तर लोक नाराज होतात! जेव्हापासून मंडल-कमंडल राजकारण सुरू झालं, तेव्हापासून संपूर्ण हिंदी भाषक पट्टा हा जात आणि धर्माच्या वातावरणात जखडला गेला. उत्तरप्रदेश-बिहार हे यातून बाहेर पडले नाहीत. कधीकाळी हा भाग साहित्य, लेखक, कलाकार, क्रांती आणि शिक्षण यासाठी ख्यातिप्राप्त होता. आज मात्र बाहुबली आणि हिंसेची ओळख करून दिली गेलीय. प्रयागराज इथल्या अतिक अहमदच्या प्रकरणानं इथल्या 'अपना दल'बाबत विस्तारानं लिहायला हवंय. अतिकला समाजवादी पक्षापेक्षा अपना दलनं संरक्षण दिलं होतं. पण मीडिया यावर चर्चाच करत नाही. कारण अपना दल हा सत्तेतल्या भारतीय जनता पक्षाचा सहकारी पक्ष आहे. त्यांची युती आहे. निवडणुकीचं नातं आहे. अतिक अहमद अपना दलचे संस्थापक होते. सोनेलाल पटेल आणि अतिक यांनी एकत्रित येत अपना दलाची स्थापना केली होती. हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचाच जोरावर ही कृष्णकृत्य होत होती!

न्यायालयीन कोठडीत असलेल्या अतिक आणि अश्रफ या दोघा माफिया बनलेल्या लोकसेवकांवर वैद्यकीय तपासासाठी रुग्णालयात नेत असताना, पोलिसांच्या कडक संरक्षणाखाली गोळ्यांचा वर्षाव झाला. एक आमदार तर दुसरा पाचवेळा आमदार आणि खासदार! आता या खुनामागं राजकारण चिकटवून आणखी राजकारण खेळलं जाईल. 'खून का बदला खूनसे...!' अशा गर्जना त्यांचा प्रभाव असलेल्या भागात होताहेत. सुपाऱ्या देऊन हे खून झालेत असं पोलीस सांगत नाहीत, पण लोक तसं म्हणताहेत. एका माहितीनुसार सुपारीची रक्कमही लाखात नाही, कोटी रुपयात असल्याचं बोललं जातंय. असे कोट कोट रुपये देऊन ह्यांना उडवण्याची गरज कुणाला वाटावी? का वाटावी? याचा शांत डोक्यानं राजकारण्यांखेरीज इतरांनी विचार करायला काय हरकत आहे? अतिक आणि अश्रफ हे दोघे आता गेलेत. त्यांचा राजकीय क्षेत्रातला प्रवेश, त्यांनी याकाळात केलेलं 'समाजकार्य', त्यांच्या सांपत्तिक स्थितीतला या काळातला बदल, त्याच्याबद्धल व्यक्त केल्या जाणाऱ्या सामान्य माणसांच्या भावना, त्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्ती, त्यांचे धंदे, त्यांचं चारित्र्य याचा अभ्यास म्हणून विचार का होऊ नये? सर्वसामान्य माणूस आणि काही समाजकार्य करावं ह्या भावनेनं भारलेले कार्यकर्ते यांच्यामध्ये प्रारंभी सतत वावरणारे लोकसेवक हळुहळू या कार्यकर्त्यांपासून, सर्वसामान्य माणसांपासून अलग होतात आणि आंगठ्या झळकवणाऱ्या, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, मनगटावर भारी घड्याळे घालणाऱ्या, डोळ्यातला पैशाचा- कुणालाही विकत घेऊ या मिजाशीचा मद रेबॉन गॉगलआड दडवणाऱ्या मोटारीतूनच वावरणाऱ्या 'बड्या' मंडळीत अल्लद विरघळून जातात. त्यांच्याशी दबक्या आवाजात बोलतात. त्यांच्या कामातच गुंतून पडतात. हा संपर्क लोकसेवकाचं रंगरूप बदलवतो. एक दिवस लोकसेवक लोकांची अधिक सेवा करता यावी म्हणून मोटार घेतो. बायकामुलांच्या आग्रहानं जुनं घर बदलून नव्या प्रशस्त घरात जातो. अर्थात तिथं तो जाण्यापूर्वीच घरामध्ये सर्व सुखसोयी मौजुद होतात. मुलाबाळांचा नूर बदलतो. बायकांना नवजीवन जगण्याची संधी मिळते आणि एक दिवस हे सगळं विचित्रपणे अंगावर उतरते. त्यांच्या मृत्यूनंतर त्याचं राजकारण केलं जाऊ नये. त्या हत्येमागची सर्व कारणं प्रामाणिकपणे तपासली जावीत. लोकसेवक खरोखरच कुणाची सेवा करतात, हे आपल्याला कळू शकणार नाही. त्यांच्यातले परिवर्तन कसं, केव्हा आणि कशानं झालं हेही कळू शकणार नाही. राजकीय पक्ष आपल्या डोळ्यासमोर कुठून कुठं गेलेत हे बघितलंय. गांधींपासून गुन्हेगारांपर्यंतचा त्यांचा प्रवास आपण गप्प बसलो म्हणून झाला, असं का म्हणून नये? सर्वांना सर्वकाळ फसवता येत असेल, पण फसलेले सर्व, सदासर्वकाळ आपल्या दैवाला दोष देत गप्प बसत नाहीत. त्यातले काही प्राणावरही उठतात. असा नवा विचार करण्याची गरज निर्माण करणाऱ्या घटना आता वारंवार घडताहेत. अतिक आणि अश्रफ या दोघांच्या खूनामुळं आणखी काहींचे धाबे दणाणले आहेत. 'हम उनको मिट्टीमें मिला देगे....!' असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. लोकसेवकांना वापरून घेणारे वा वापरू बघणारे कोण आहेत ही गोष्ट गोपनीय आहे असा आव कुणी आणू नये. उघडपणे आज सर्व गोष्टी चालतात तेव्हा जर लोकसेवकांचे रक्षण करायचं असेल तर त्यांच्या सहाय्यानं कायदा, नीती आणि शिष्टाचार याच उल्लंघन करू बघणाऱ्यांना चाप लावण्याचं धोरण अवलंबावं लागेल.

'कोणत्या' लोकसेवकांना धोका आहे? तो का आहे? त्याचीही कसली भीडभाड न ठेवता चौकशी व्हायला हवी. गैरकृत्ये करण्यासाठी पैसा घेऊन ती कामे न करण्यानं धोका आहे. का गैरकृत्ये कितीही पैसा दिला तरी न करण्याचा दृढ निधार दाखवल्यानं धोका आहे याचा शोध व्हायला हवा. लोकसेवकाची भूमिका घेऊन राजकारणात शिरलेले गुन्हेगारीवृत्तीचे लोक आहेत. प्रतिष्ठा आणि पैसा यांच्या बळावर कुठलाही गुन्हा करण्याची आणि ती पचवण्याची तयारी ठेवूनच हे लोक राजकारणात वावरत आहेत. त्यामुळं त्यांची कृष्णकृत्य काही काळ दाबली जातात. एकाच पक्षात हे आहेत असं नाही. जिथं आपल्याला लवकर प्रतिष्ठा प्राप्त होईल असं त्यांना जाणवतं तिथं तिथं हे लोक शिरतात. आपल्या तंत्रानं लवकर मोठेही होतात. त्या राजकीय संघटनांची धोरणं देखील ते प्रसंगी बदलतात आणि राजकीय पक्षाची बंधनं गुंडाळून आपआपसात यांच्या आघाड्याही बनतात. लोकसभेला भाजपचा उमेदवार यशस्वी करा विधानसभेला काँग्रेसचा असं देवाण घेवाण तंत्र ह्या गुन्हेगार जगतात विनाविघ्न चालतं. 'जिकडं तिकडं मजला माझी भावंडं दिसतात' अशा मायाळू नजरेनं बघणारे असे मायावी निष्ठावंत राजकारणात आज थोडेथोडके नाहीत. ठार झालेल्या प्रत्येक लोकसेवकाबद्धलच भरपूर गुणगान केलं जातं. कारण सगळ्याच राजकीय नेत्यांमध्ये आणि पत्रकारांत 'ढोंगाला श्रद्धांजली नाही' म्हणण्याचा ढोंगी परखडपणा नसतो. पण अशी जाहीर पांघरूणं घालून झाल्यावरही निदान आपल्या संघटनेच्या आणि समाजाहितासाठी प्रामाणिकपणे अशा प्रकारामागची कारणं तपासण्याचं कष्ट घेतले जावेत. जे काही चाललंय त्यानं अनेक प्रश्न डोक्यात घोंघावणारा मी एक सर्वसामान्य नागरिक आहे. निवडणुकीच्या काळात अतिक अहमदबाबत जाहीरपणे जबाबदार व्यक्तीकडून आरोप केले गेले होते ही गोष्ट डोक्यात कुठे नोंदली गेलेले माझ्यासारखे हजारो सर्वसामान्य नागरिक प्रयागराजमध्ये नक्कीच असतील. लोकसेवा सुरू करताच काहींच्या घरी आपण होऊन येतो, हा मेवा खाताना लागतोही बरा, पण वेळ येताच तो पोट फाडून बाहेर पडतो. काही तोही पचवतात ही गोष्ट वेगळी. पण या सगळ्याची जाणीव आपण ठेवायला हवी. अशा मंडळीच्या हातात विरोधी पक्षांचं राजकारणही जावं ही फार मोठी शोकांतिका आहे. कॉंग्रेस गुन्हेगार, लुटारू, ठग, पेंढाऱ्यांची टोळी आहे असं म्हणायचं आणि आपली संघटनाही त्या टोळीच्या मुकाबल्यात भारी ठरावी म्हणून तसेच नग आपल्या संघटनेत असले तर बरं असं मानायचं हा प्रकार एखादवेळी पक्ष संघटनेला समर्थ बनवतही असेल, पण राजकारणाला अधिक घाण बनवणाराच आहे. राजकारण घाण करणारी सारीच घाण दूर व्हावी असा आग्रह धरणाऱ्यांचीच आता एखादी समर्थ संघटना बनवायला हवीय.

जे देवांना राजकारणासाठी जुंपतात अथवा दानवांच्या दयेवर राजकारणात टिकून असतात त्यांना लोककल्याणाची पर्वा असूच शकत नाही. प्रत्येक गोष्टीचा धूर्तपणे, मुसलमानांविरोधात आग पेटावी म्हणून वापर करणारे आणि सर्वधर्मसमभावाचे सोंग मिरवीत प्रत्येक अल्पसंख्याकाला राष्ट्रनिष्ठ ठरविण्यासाठी कुठलाही विचार न करता कसलाही आचरटपणा करणारे ह्या देशाला समाजाला पुन्हा अंधार युगात ढकलत आहेत. कॉंग्रेसचा अजागळपणे हाताळला जाणारा सर्वधर्मसमभाव आणि भाजपचा अविवेकीपणे रेटला जाणारा हिंदुत्ववाद दोन्ही या देशाचा विनाश करणारेच आहेत. एक नको त्या संबंधातून होणारा एड्स म्हटला तर दुसरा रक्त नासवणारा ब्लड कॅन्सरच म्हणावा लागेल! या दोन्हीपासून दूर राहण्याचा विवेक दाखवण्याचीच आज जरूर आहे. अतिक आणि अश्रफ यांचे खून होतात हा प्रकार ह्या राज्यातल्या कायदा आणि सुरक्षा व्यवस्थेपेक्षा गुन्हेगार अधिक समर्थ, अधिक मारक, अधिक धोरणी आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध करणाराच आहे. ह्या राज्यात अत्याधुनिक शस्त्रात्रे मोठया प्रमाणावर आली आहेत. दडवली गेली आहेत हे समजूनही पोलिसांनी ती शोधून काढण्यासाठी काही केल्याचं जाणवत नाही. पोलीस किती निष्क्रीय, किती लाचखाऊ आहेत याची कल्पना नसणाऱ्या आणि गुन्हेगार मंडळीइतक्या निर्ढावलेल्या नसलेल्या काहीजणांनी हे लचांड आपल्याकडे नकोच असं ठरवून आपल्याकडील शस्त्रसाठे, दारूगोळा पोलिसांच्या हातात पडेल अशी व्यवस्था केली पण जे असले गुन्हे करण्यात मुरले आहेत अथवा ज्यांना पोलिसांना चकवण्याची पटवण्याची हातोटी साधलीय. ही शस्त्रास्त्रे चालवण्याचे शिक्षण घेतलेली माणसे कोण हे ह्या गुन्हेगारांना ठाऊक आहे. ठरलेल्या सूत्रांकडून इशारा होताच ही शस्त्रे ह्या माणसांच्या हातात देऊन इथं हलकल्लोळ माजवला जाईल. तो अधिक माजावा आणि सर्वत्र अराजक निर्माण व्हावं म्हणून ह्यातली शस्त्रास्त्रे दारूगोळा आपल्या हस्तकांकरवी दुसऱ्या बाजूच्या अतिरेकी अविवेकी माणसांपर्यंतही पोहोचवली जातील. हिंदू-मुसलमान यांच्यातला अविश्वास वाढावा, शत्रुत्वाची भावना प्रबळ व्हावी, त्यांचा विवेक सुटावा यासाठी गुन्हेगार जगताच्या सहाय्यानं प्रत्यक्ष कृती घडवण्याचं तंत्र वापरायला सुरुवात झालीय. आवश्यक घबराट निर्माण करायला आणि तोल जाण्याइतपत सर्वसामान्य माणसांचा संताप उसळण्याला ह्या दोघांच्या खुनानं निश्चितच गती मिळेल याची हे गुन्हे योजणाऱ्यांना खात्री होती. त्यांनी त्यांचा डाव खेळला आणि त्यांना हवं ते घडलं. सत्तेवर असणाऱ्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करायला हवा होता, पण तो करण्याइतपत कुणाचं डोकं ठिकाणावर आहे? आपली खुर्ची आणि भवितव्य सांभाळण्यातच सत्ताधारी सर्वबुद्धी-सर्वशक्ती शिणावी एवढे गुंतलेत. विविध प्रकरणात आपणच केलेली घाण उघड्यावर येऊ नये म्हणून त्यांची धडपड चाललीय. ही वेळ अराजक माजवू इच्छिणाऱ्यांनी साधली नसती तरच नवल. खून होण्याच्या घटना नाटक सुरू होण्यापूर्वी वाजणाऱ्या घंटेसारख्या आहेत. दोन घंटा झाल्या आहेत, आता तिसरी झाली की, खेळ सादर होणार. तो काय आहे हे लोकांना तो बघितल्यावरच कळेल. अधिकारी आणि पोलीस या सगळ्या यंत्रणा नागरिकांचे हित बघण्यासाठी, देशाच्या भल्यासाठी. कायदा सुरक्षा शाबूत ठेवण्यासाठी आहेत. का ह्या सगळ्यांचा निकाल लावून, देशद्रोह्यांच्या हातात देश सोपवून आपले स्वार्थ साधण्यासाठी आहेत? या यंत्रणांना काम करणं अशक्य व्हावं अशी परिस्थिती राजकारणी मंडळीनीच निर्माण केलीय. व्यक्तीगत स्वार्थासाठी, पक्षीय स्वार्थासाठी ह्या यंत्रणामध्ये हस्तक्षेप करण्याची चटक राजकारण्यांना लागलीय. आपलं साधावं म्हणून विशिष्ट पदावर विशिष्ट माणूस आणण्याचा आग्रह केवळ काँग्रेसवालेच धरत होते असं नाही. सगळ्या राजकीय पक्षांचे आमदार मास्तरापासून मामलेदारापर्यंत, डॉक्टरापासून कलेक्टरपर्यंत कुठे कोण असावा ह्याचा आग्रह धरतात, तशा बदल्या-बढत्या घडवून आणतात. प्रसंगी त्यासाठी स्वपक्षाच्या धोरणांना सोडचिठ्ठी देऊन सौदेबाजींचं राजकारण करतात. शासन आणि प्रशासन सडण्याची-किडण्याची ही कारणं राजकारणी मंडळी नाकारतील? मरणाऱ्याबद्धल वाईट नं बोलण्याची सभ्यता आपण अजून पाळतो. राजकारणात भडवेगिरी कशी आणि किती भिनलीय हे जाणणाऱ्या नेत्यांनी तरी ह्याप्रकारे आपले अनुयायी अनावर होणार नाहीत याची काळजी घ्यायलाच हवी. दुर्दैवानं आज नेत्यांचेच नको ते आदर्श आहेत. वारेमाप आक्रस्ताळे, अविचारी आणि असभ्य वक्तव्य करण्याचा वसाच काही मंडळींनी घेतलाय. आपल्या या बोलण्याचे दुष्परिणाम कुणाला भोगावं लागतात ह्याची तमा नेते दाखवत नाहीत, पण ह्या सगळ्यांचा परिणाम होऊनच राजकारण असं नासलंय. समाजवाद्यांनी साधनशुचितेचा आग्रह धरला. त्यांची मनसोक्त टिंगल सर्वांनीची केली, पण आज ताल सोडून स्वार्थाचा नंगा नाच राजकारणात राजरोस चाललाय. ह्याचे खापर कुणाच्या माथ्यावर आपण फोडणार आहोत? आपले थोर थोर लोकनेतेच ह्याला कसे जबाबदार आहेत ह्याकडे लक्ष देणार आहोत काय?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
'त्या' तिघांचं काय होणार?
ते तिघेही गरीब घरातले आहेत. लिहिणं-वाचणं केवळ कामापुरतं झालेलं. करियरचं नावाची बाबच नाही. परिणाम? उद्देशहीन जीवन, नकारात्मक ऊर्जा ज्याची गरज 'नफरतच्या सौदागरां'ना असते. ते शेवटी तिथंच पोहोचतात. खोट्या विचारांना बंदूक लादलेले हात जगवतात. याचं शेवट कसा होईल? कारागृहात सडतील किंवा कुठल्यातरी एनकाउंटरमध्ये मारले जातील. नाहीतर, त्यांच्यासारखंच कुणीतरी एखादं दिवशी संपवून टाकतील. एवढंच सांगायचं आहे की, आपल्या मुलांना आशा वाममार्गावर जाण्यापासून रोखा, त्याला वाचवा. त्यांच्या अजाण, मासूम डोळ्यांत भली स्वप्नं पाहू द्या. ते चांगल्या मार्गावर मार्गक्रमण करतील असा प्रयत्न करा. अभिमान बाळगण्यासाठी धर्म, जात नाही, तर ज्ञान आणि कर्म याची जाणीव करून द्या. ही आपल्या सर्वांची नैतिक, सामाजिक, राजनैतिक, जबाबदारी आहे. 

Monday 17 April 2023

वक्तका मिजाज कुछ और होता हैं"l...!

"विरोधकांच्या ऐक्यासाठी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवारांची भेट घेतलीय. उद्धव ठाकरे यांचीही भेट घेताहेत. परंतु नागपुरात शरद पवार यांनी नितीन गडकरी यांची दोनदा भेट घेतलीय. निमित्त नागपुरात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं असलं तरी, त्यामागं काही वेगळंच राजकारण शिजत असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त झालाय. त्यामुळं मोदी-शहा, आणि मंत्रीगण त्वेषानं बाहेर पडलेत. पुन्हा सत्ता आणायचीच यासाठी फासे फेकले जाताहेत. प्रचारातले फंडे वापरायला सुरुवात झालीय. तपासयंत्रणांचा फास वेगानं आवळला जातोय. संघानं मात्र सावधतेनं मोदींना पर्याय शोधण्याची वाटचाल आरंभलीय. इकडं मोदी भावनिक आवाहन करत. 'मेरी कबर खोदी जा रही हैं...l' 'मुझे खतम करनेकी सुपारी दी गयी हैं...l' असं 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' करताहेत. भाजपनेते, कार्यकर्ते मात्र दिगमूढ अवस्थेत आहेत. पण वेळ, वक्त कुणासाठी थांबत नाही. 'वक्तका मिजाज कुछ और होता हैं l...!'  अदानी प्रकरणानंतर काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदींच्या कारभाराचं वस्त्रहरण केलंय...!
------------------------------------------------

स्थापनादिनापासून भारतीय जनता पक्षाची घोषणा बदललीय. २०१४ नंतर ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावाचा, छबीचा वापर सतत केला जातो. 'अबकी बार मोदी सरकार...!' अशी घोषणा दिली जात असायची. आता मात्र ती बदललीय. मोदींचं नांव वगळून 'फिर एक बार भाजप सरकार...!' अशी ती दिली जातेय. ती घोषणा कार्यकर्त्यांना लोकांमध्ये बिंबवायचंय असा आदेश दिला गेलाय. याचा अर्थ अदानी प्रकरणात मोदींच्या प्रतिमा डागळलीय, हे जणू भाजपनं एकप्रकारे मान्य केलंय. हे कमी होतं म्हणून की काय काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मोदी सरकारला पूर्ण नागडं केलंय. २०२४ च्या लोकसभा निवडणुका ह्या भाजपसाठी अवघड असतील, हे संघाला जाणवलंय. म्हणून मोदींचं नाव घोषणेतून वगळल्याचं सांगितलं जातंय! सत्ताधाऱ्यांना सत्तेची गुर्मी असेल, डोक्यात हवा गेली असेल, सत्तेतल्या मित्र पक्षांना, सहकाऱ्यांना सोबत घेऊन चालण्याची त्याच्यात कुवत नसेल, तर सत्ताधारी फारसे यशस्वी होऊ शकत नाहीत. लोकशाहीत सत्ताधारी हुकुमशहाप्रमाणे वागतील, लोकशाहीऐवजी तानाशाही राबवतील, तर काही काळापर्यंत लोक तानाशाहीला घाबरतील, उघडपणे काही बोलणार नाहीत. मतही व्यक्त करणार नाहीत. अशावेळी सत्ताधाऱ्यांना वाटेल की, सर्व शक्ती, सत्ता ही आपल्या हाती एकवटलीय! अशा वातावरणात कुणी विरोधात बोललं तर त्यांचं करिअर बरबाद होईल, त्याची राजकीय कारकीर्द उध्वस्त होईल. ही भीती त्याला वाटते. त्यामुळं तानाशाहीच्या विरोधात कुणी काही बोलणार नाही. पण लक्षांत ठेवा सत्ताधाऱ्यांच्या हातातले पत्ते थोडेसे जरी हलले, ढिले पडले वा राजकीय स्थिती जरा जरी घसरली, तर सत्ताधाऱ्यांच्या सभोवताली असलेले तानाशहाचे सहकारी शड्डू ठोकून बदला घेण्यासाठी सरसावतील. काळ आणि वेळ ही सगळ्यांची सारखी असतेच असं नाही. रंकाचा राव होतो तर रावाचा रंक कधी होतो...! हे लक्षातही येत नाही. 'वक्त' या हिंदी सिनेमातलं ते गाणं आहे ना,
'वक़्त से दिन और रात, वक़्त से कल और आज l
वक़्त की हर शह ग़ुलाम, वक़्त का हर शह पे राज l
वक़्त की गर्दिश से हे, चाँद तारो का मिज़ाज l
वक़्त की ठोकर में है, क्या हुकूमत क्या समाज l
वक़्त की पाबन्द हैं, आति जाति रौनके l
वक़्त है फूलों की सेज, वक़्त है काँटों का ताज l
आदमी को चाहिये, वक़्त से डर कर रहे l
कौन जाने किस घड़ी, वक़्त का बदले मिजाज़...ll'
देशावर हुकूमत गाजवणारे शहा आणि मोदी हे दोघंच भारतीय राजकारणाच्या पटलावर आज चमकताहेत. पण आजकाल मोदींची वेळ, वक्त थोडाशी गडबडलीय! आपण पाहिलं असेल, तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर मोदी सरकारला माघार घ्यावी लागली. त्यावेळीही मोदी अस्वस्थ होते. शेती उत्पादनाच्या हमीभावासाठी समिती नेमण्याचं आश्वासन त्यांनी दिलं, त्यानंतरच शेतकऱ्यांनी आंदोलन मागं घेतलं. हमीभावाची समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. त्यामुळं निर्णय झालेला नाही. मोदींनी कृषि उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन संसदेत दिलं होतं. पण तेही प्रत्यक्षात आलेलं नाही. त्यामुळं शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्लीय, त्यांनी आंदोलनाची जुळवाजुळव सुरू केलीय. एका पाठोपाठ एक अशा काही घटना घडताहेत की, ज्या मोदी-शहांसाठी त्रासदायक ठरताहेत. पक्षीय, राजकीय, प्रशासकीय, कार्यपलिका, न्यायपालिका अशा सर्वच स्तरावर अडचणी उभ्या राहताहेत. अदानीबरोबरच्या मोदींच्या संबंधांमुळे त्यांच्यावर आरोप होताहेत, पण त्याबाबत मोदी वा त्यांच्या सहकाऱ्यांकडून ब्र उच्चारला जात नाही. त्यामुळं संशयाचं मोहोळ मोदींभोवती घोंघावतंय! त्यातच सत्यपाल मालिकांनी पुलवामा, ४० जवानांचं वीरमरण, गोवा सरकारचा भ्रष्टाचार, रिलायन्सच्या ३०० कोटींची लाच, काश्मीरमधलं कलम ३७० हटवणं, विशेष दर्जा रद्द करणं, भ्रष्टाचाराबाबत गांभीर्य नसणं यावरून मोदी सरकारचे वाभाडे काढलेत. यात मोदींनाच नाही तर, राजनाथसिंह, अजित डोवाल, जितेंद्रसिंग, राम माधव यांचं पुरतं वस्त्रहरण केलंय. त्याला कुणीही प्रतिवाद केलेला नाही. हे सारं अंगावर येणारं आहे.
संघाची बदललेली भूमिका आणि त्यांनी सुरू केलेला नेतृत्वाचा शोध यात मोदींच्यासमोर मोठं आव्हान उभं राहतंय ते म्हणजे 'नितीन गडकरी' यांचं! ते भाजपचे शक्तिशाली नेते, प्रभावशाली मंत्री आहेत त्यांचं कर्तृत्व, मंत्री म्हणून काम, व्यक्तिमत्व,स्वभाव, व्यवहार याचं कोडकौतुक विरोधकही करतात. आजकाल गडकरी जिथं जातात तिथं चर्चेत असतातच! 'विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसनं मजबूत व्हावं...!' असं आपलं मत मांडत असताना त्यांच्याच पक्षाचे नेते मात्र 'काँग्रेसमुक्त' भारत व्हावा यासाठी धडपडतात. गडकरी हे लोकशाही मानणारे नेते आहेत. ते जेव्हा लोकशाही, संविधान मजबूत होण्यासाठी विरोधीपक्ष सक्षम असायला हवा, असं मतप्रदर्शन करतात. तर भाजपचे पक्षाध्यक्ष ओमप्रकाश नड्डा हे प्रादेशिक पक्षाचं अस्तित्वही संपवण्याची वलग्ना करतात. गडकरी सध्याच्या राजकारणाचा घसरलेला स्तर पाहून चिंता व्यक्त करतात. 'राजकारणातून आता सेवाभाव संपुष्टात आलाय...!' असं निराशेनं म्हणत 'आजचं राजकारण हे केवळ सत्तेसाठीच उरलंय, त्यात समाजकारणाचा, समाजसेवेचा लवलेशही उरलेला नाही; त्यामुळं राजकारण सोडून द्यावंसं वाटतंय...!' अशी खंत व्यक्त करतात. त्यावेळी पक्ष पातळीवर वरिष्ठांची नाराजी ओढवून घेतात. पण त्याची ते पर्वा करत नाहीत. सध्या त्यांच्याविषयी ज्या बातम्या येताहेत त्या महत्त्वाच्या आहेत. संसदीय राजकारणात गेल्या ५६ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेले वरिष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतंच दोनदा गडकरींची भेट घेतलीय. पवार- गडकरी भेटीमागं काहीतरी मोठं घडतंय, असा संशय व्यक्त होतोय. पवारांनी महाराष्ट्रातले आपले पत्ते आजतरी मिटलेत. आपल्या पक्षाच्या आमदारांवर भाजपत येण्याबाबत दबाव आणला जातोय. अशी तक्रार त्यांनी केलीय. राज्यात एकनाथ शिंदे हे भाजपसाठी 'गलेकी हड्डी' बनलेत. त्यामुळं अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर भाजपनं फासे टाकले आहेत. त्यामुळं राज्यातलं वातावरण अस्थिर होण्याची शक्यता निर्माण झालीय. राजकीय विश्लेषकांच्या मते, मोदी-शहांना विधानसभा नाही तर लोकसभा महत्वाची असल्यानं त्यासाठी शिंदेंची सेना आहेच शिवाय राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं आहे, त्यासाठी या हालचाली चालविल्या आहेत. शिवसेनेच्या साथीनं २०१९ मध्ये ४८ पैकी ४२ लोकसभेच्या जागा युतीनं जिंकल्या होत्या. आजमितीला उद्धव ठाकरेंची शिवसेना भाजपसोबत नाही. येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फारसा फायदा भाजपला होणार नाही, दुहेरी संख्याही गाठता येणार नाही, असा अंदाज सर्व्हेतून व्यक्त झालाय. जर असं घडलं तर भाजपच्या, मोदींच्या सत्तेला धक्का बसू शकतो. त्यामुळं संघ आणि भाजप आगामी निवडणुकीचं गांभीर्यानं नियोजन करत आहेत.

देशातल्या प्रसिद्धीमाध्यमात शहा आणि मोदी यांच्या व्यतिरिक्त इतर कुणी असता कामा नये असा जणू दंडक ठरलाय. आपण पाहिलं असेल की, नुकतंच मोदींनी नव्यानं साकारणाऱ्या संसदभवनाला भेट देऊन तिथल्या कामाची पाहणी केली. पण तिथं त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुणीच फोटोत आढळत नाहीत त्या भव्य सभागृहात केवळ मोदीच एकटेच दिसतात. अयोध्येत राममंदिराच्या पूजेला आले तेव्हाही केवळ मोदीच दिसले. ते जेव्हा बनारस, काशीला आले, गंगेत डुबकी मारताना, पूजा करण्यासाठी मंदिरात प्रवेश करताना, पूजेनंतर प्रदक्षिणा घालताना फक्त आणि फक्त मोदीच दिसले. त्या फोटोंच्या फ्रेममध्ये इतर दुसरं कुणी येणं हे कदाचित मोदींना सहन होत नसावं! मात्र आता मोदींचे दिवस फारसे चांगले दिसत नाहीत. आरोपांच्या फैरी झडताहेत. म्हणून त्यांचे विश्वसल्लागार, चाणक्य अमित शहांनीही दूरचित्रवाणीच्या एका चॅनलच्या मुलाखतीत मोदींना त्यांची हैसियत दाखविण्याची संधी सोडली नाही. चाणक्य अमित शहा कशाप्रकारे मोदींना त्यांचा आरसा दाखवताहेत. त्यांनी इथपर्यंत सांगितलं की, सीबीआयनं एका एन्काऊंटर प्रकरणात मोदींचं नाव घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. 'तुम्ही जर या प्रकरणात मोदींचं नाव घेतलं तर आम्ही तुम्हाला सोडून देऊ...!' अशी लालूच दाखवली होती. स्वतःला सोडवून घेण्यासाठी संधी होती, माझ्यावर दबाव आणला होता, पण मी दबावाखाली आलो नाही. मोदींचं नाव घेतलं नाही. जर मी मोदींचं नाव घेतलं असतं तर मोदी हे अडचणीत आले असते...!' अमित शहांचं हे स्पष्टीकरण ही एक मोठी धक्कादायक गोष्ट आहे. कदाचित शहा हे मोदींनाच याची जाणीव करून देत असतील की, जर 'मी सीबीआयच्या दबावाखाली येऊन तुमचं नांव घेतलं असतं तर तुम्ही तुमचेही राहिले नसता, मग तुमचं काही खरं नव्हतं! तुम्ही आज जे आहात ते केवळ नि केवळ माझ्याच त्यागामुळं...!' अमित शहांचं म्हणणं हे मी वर म्हटल्याप्रमाणे जेव्हा एखाद्याचे दिवस फिरायला लागतात तेव्हा असं काहीसं घडतं. सर्वात विश्वासू कमांडरही तुम्हाला तुमची लायकी, हैसियत दाखवायची संधी सोडत नाही. आजचा जमाना असा काही राहिलेला नाही की आपल्या वफादारीसाठी ते प्राण कुर्बान करतील. आज लोकांचा मूलमंत्र हा सलमान खानच्या 'वॉन्टेड' सिनेमातल्या डॉयलॉगसारखा राहिलाय. 'ना हनीभाईके लिये, ना गनीभाईके लिये, बंदा काम करता हैं तो सिर्फ मनीभाईके लिये...!' अशात मग विश्वासार्ह माणसाचं वागणं, बोलणं बदललं तर, साथसंगत करणारे नेते कुठवर त्यांची साथसंगत करणार?

नितीन गडकरींना दूर राखण्यासाठी शहा-नरेंद्र मोदी यांनी ज्या कुरघोड्या केल्यात ते विसरणं शक्य नाही. एकेकाळी पांच पांच महत्वाची खाती असलेल्या गडकरींकडून एक एक करत चार खाती काढून घेतली. पाठोपाठ पक्षाच्या संसदीय समितीतून दूर केलं. निवडणूक आणि उमेदवारी देण्यासाठीची जी महत्वाची समिती असते त्यातूनही त्यांना हटवलं गेलं. पक्षाच्या निर्णयप्रक्रियेतूनच त्यांना हद्दपार केलं. कदाचित त्यांना २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न देता त्यांचे संसदीय राजकारणात येणारे मार्ग बंद केले जातील. त्यांचे पंख कापण्याचा प्रयत्न चालवलाय. आजमितीला केवळ गडकरी हेच नरेंद्र मोदींना पर्याय आहेत. अशा परिस्थितीत राजकारणात विश्वासार्ह समजले जाणारे नेते कशाप्रकारे बदलतात याचं एक छोटंसं उदाहरण! प्रधानमंत्री एच.डी. देवेगौडा प्रधानमंत्री असतानाची गोष्ट आहे. ते राज्यसभा सदस्य होते. लोकसभेतले नेते रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांच्या शेजारी ते बसत. त्यावेळी देवेगौडा सरकारला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांनी देवेगौडा सरकारची लगाम खेचली आणि संयुक्त मोर्चाला आपला नेता बदलायला सांगितलं, तेव्हा संयुक्त मोर्चानं नवा नेता निवडीला विरोध केला. देवेगौडांनी संयुक्त मोर्चातल्या आपल्या सहकाऱ्यांच्या भरोशावर सरकारवरच्या विश्वासदर्शक प्रस्तावाला सामोरं जायचं ठरवलं. त्यावेळी संयुक्त मोर्चातले देवेगौडांचे सहकारी मंत्र्यांनी राणा भीमदेवी थाटाची भाषणं करत देवेगौडांच्या पाठीशी ठाम असल्याच्या शपथा घेतल्या. रामविलास पासवान यांनी तर  काँग्रेसवर कडाडून हल्ला चढवला. पण मतदान झालं त्यात देवेगौडा पराभूत झाले. जसे देवेगौडा विश्वासदर्शक प्रस्ताव हरले; तेव्हा संयुक्त मोर्चातल्या नेत्यांनी सरड्याप्रमाणे रंग बदलला. त्यांनी लगेचच देवेगौडा यांच्याऐवजी इंद्रकुमार गुजराल यांना नेता निवडला! याशिवाय २००९ मध्ये मनमोहनसिंग विरुद्ध लालकृष्ण अडवाणी लढतीत अडवाणी यांचा वाईट पद्धतीनं पराभव झाला. मग संघ आणि भाजपतले सगळेच्या सगळे नेते अडवाणींना टाळू लागले, ज्यांनी भाजपला जमिनीवरून उंच आकाशात नेलं होतं. त्या अडवाणींची तुलना गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी तर सडलेल्या लोणच्याशी केली होती. अंतत: अडवाणींना राजकारणातलं अंदमान भोगण्यासाठी पृथ्वीराज रोडवर एकाकी सोडून दिलं. उगवत्या सुर्याप्रमाणे येणाऱ्या नेत्याचं स्वागत आणि मावळत्याला ठोकर ही नीती भाजप नेत्यांनी अवलंबिली. त्यानंतर सगळे नेते 'मोदी चालीसा' गायला लागले. जे लोक अडवाणींच्या नजरेत असावं म्हणून त्यांच्या घरी पाणी भरत, ती सारी मंडळी आता अडवाणींना बघून रस्ता बदलू लागले, अडवाणींच्या नजरेला पडलो तर त्यांना नमस्कार करावा लागेल! १९७७ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींकडून सत्ता हिसकावून घेतली होती. तेव्हा काँग्रेसीही इंदिरा गांधींना अशाचप्रकारे टाळू लागले होते. मात्र इंदिरा गांधी या एकट्या संसदेत येत आणि माजी खासदारांच्या गॅलरीत बसून संसदेचं कामकाज पाहात आणि परतत असत. या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२४ समोर येऊन ठाकलंय! देशाचं मत, मन आणि कल संघ भाजपलाही आताशी समजून चुकलंय की, २०२४ ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. व्यक्त झालेल्या अंदाजानुसार १८० ते २०० जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळं निवडून येणाऱ्या भाजपच्या १८० ते २०० सदस्यांचा वजीर शोधण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केलेत. दुसरीकडं आपल्याला पर्याय ठरू शकतील अशा संभावित नेत्यांना हेरून त्यांना उमेदवारीपासूनच वंचित ठेवण्याची खेळी खेळली जातेय. जेणेकरून त्यांचा वजीर बनण्याचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न शहा आणि मोदींनी चालवलाय. मोदींच्या शब्दातला 'इंसाफ़का ब्रँड' असलेले सीबीआय, आयटी आणि ईडी ह्या संस्थादेखील भाजपच्या १८०-२०० सदस्यांच्या अवस्थेत मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणार नाहीत. मोदी-शहांच्या सभोवताली असलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनाही याची चाहूल लागलीय, पण सीबीआय, आयटी, ईडी याची भीती त्यांनाही असल्यानं ते उघडपणे व्यक्त होत नाहीत. नितीन गडकरी यांचं नाव वजीर म्हणून पुढं आलं तर त्यांना अशा हुजऱ्यांची गरजच भासणार नाही. कारण त्यांचा थेट संपर्क तळातल्या कार्यकर्त्यांशी आहे. ते माजी पक्षाध्यक्ष असल्यानं भाजपच्या कार्यकर्त्यांपासून विरोधीपक्षातल्या नेत्यांपर्यंत त्याचं वेगळं नातं आहे. त्यांना भाजपच्या समित्यांतून हटवलं गेलं, त्यानंतर उमेदवारीपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते नागपुरात जाऊन गडकरींना भेटतात, तेव्हा लक्षांत येतं की, नक्की काहीतरी गडबड दिसतेय. भाजपला कमी जागा मिळाल्या तर विरोधीपक्षातल्या काहींची मदत घ्यावी लागेल, तेव्हा गडकरी वा राजनाथ सिंह यांची लॉटरी लागू शकते. या दोन नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाला विरोधक मदत करायला तयार असणार नाहीत. राजकारणात अशाच नेत्यांना यश मिळतं की, ज्याचे सर्व पक्षांशी मधुर संबंध असतील. दुर्दैवानं आजच्या मोदी-शहा या भाजप नेतृत्वाचं विरोधकांशी मैत्रीचे नाहीत तर ते शत्रुत्वाचं, वैराचं संबंध आहेत. लोकशाहीत विरोधीपक्षाचं अनन्यसाधारण महत्व असतानाही त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहेत. आता भाजपत आजवर कोंडलेली वाफ बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. न्यूटनच्या सिद्धांताप्रमाणे जर शहा आणि मोदींनी वाफ आणखीन कोंडली तर त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
*अदानीचा पुरस्कार अन पवारांचं घुमजाव*
अदानी प्रकरणानं, सत्यपाल मलिक यांच्या आरोपांनी मोदी-शहा सरकारला घेरलं असताना शरद पवार यांनी अदानी यांच्या मालकीच्या असलेल्या एनडीटीव्ही या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत 'अदानी समूहाला ठरवून लक्ष्य केलं जातंय!' असं म्हटलं. पवारांचा 'घुमजाव' हा विरोधकांच्या एकत्र येण्याला धक्का समजला जातोय. चौकशीसाठी जेपीसी नेमावी म्हणून संसद बंद पडणाऱ्या विरोधकांमध्ये राष्ट्रवादीही होती हे विशेष. आता त्या जेपीसी मागणीलाही पवारांनी विरोध दर्शवलाय. पूर्वी टाटा-बिर्ला यांची नावं घेतली जात आता अदानी-अंबानी यांना लक्ष्य केलं जातंय. असं म्हणत पवारांनी प्रधानमंत्री आणि भाजपच्या सुरात सूर मिळवल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. विरोधकांना हा एक मोठा धक्का समजला जातोय. यामुळं नेहमीप्रमाणे पवारांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. संसदेत आणि संसदेबाहेर वीस विरोधीपक्ष एकत्रितरित्या अदानी यांच्या विरोधात एकजूट दाखवत असताना पवारांची ही भूमिका अवसानघातकी आहे. अदानीनी शेल कंपन्यांच्या माध्यमातून जो बेहिशेबी पैसा गुंतवलाय याच्या चौकशीसाठी विरोधक आग्रही आहेत. अजित पवारांनी शरद पवारांना एक हिसका दिलाय. त्यामुळंच त्यांनी आमदार दबावाखाली काही वेगळा विचार करत असतील, पण पक्ष म्हणून मी विरोधकांच्या बरोबर आहे असं स्पष्ट करावं लागलं!

Friday 14 April 2023

'मिसळी'तून जातीअंताची लढाई...!

'आकाश फाटलेलं असलं तरी, आपण जिथं राहतोय तेवढ्या भागाला ठिगळं लावायला काय हरकत आहे....?' असा विचार करत गेल्या आठवड्यात ११ एप्रिलला महात्मा जोतीराव फुले  जयंती आणि १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं जातीअंतासाठी वेगळा उपक्रम राबविला. समाजसुधारकांच्या या स्मृतिस्थळावर यंदा मात्र इथं वेगळं वातावरण होतं. दलितांना आपल्या घरातली पाण्याची विहीर महात्मा फुले यांनी खुली करून जातीअंताच्या लढ्याला प्रारंभ केला होता. डॉ.आंबेडकरांनीही महाडच्या चवदार तळ्यातलं पाणी देऊन जातीअंतासाठी सत्याग्रह केला. त्या दोन्ही घटनांची स्मृती जागवत सर्व जात, धर्म, पंथ, विचारांच्या लोकांनी एकत्र येत जातीयता नष्ट व्हावी अशा आणाभाका घेतल्या. आणि इथं १० हजार किलो 'एकता मिसळ'चा आस्वाद घेतला. मिसळीत जसं मटकीची उसळ, विविध मसाले, तेल, खोबरं, कांदा, लिंबू, कोथिंबीर असं सर्व पदार्थ एकजीव होतात, तशीच ही 'एकता मिसळ' कुण्या एकट्याची नव्हती तर ती सर्वजातीधर्माच्या, विचारांच्या, विविध पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन केलेली होती. जणू जातीअंताच्या लढ्याला पुन्हा एकदा सुरुवात झालीय!
--------------------------------------------------

राज्यात दिवसेंदिवस राजकारणात, जात, धर्म, पक्ष राजकारण यातून कटुता येईल असं वातावरण असताना, ती कटुता दूर व्हावी यासाठी लोकसेवा प्रतिष्ठानच्या दीपक पायगुडे यांनी पुढाकार घेतला होता. पण त्यांनी त्यांचं स्वतःचं नाव कुठं येऊ दिलं नाही. ही १० हजार किलो एकता मिसळ आणि १ लाख लोकांसाठीचं ताक जगविख्यात शेफ विष्णू मनोहर यांनी बनवलं होतं. लोकसहभागातून दहा हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी १ हजार किलो, कांदा ६०० किलो, आलं २०० किलो, लसूण २०० किलो, तेल ७०० किलो, मिसळ मसाला २६० किलो, लाल मिरची पावडर ५० किलो, हळद पावडर ५० किलो, मीठ ४० किलो, खोबरा कीस १४० किलो, तमाल पत्र १० किलो, फरसाण २४०० किलो, पाणी ८००० लिटर, कोथिंबीर १००० जुडी अशी साधनसामुग्री लागली तर वितरणासाठी १ लाख डिस्पोजेबल डिश, पाणी पिण्यासाठी डिस्पोजेबल ग्लास, हजारो स्लाइस ब्रेडस, २०० मिली पाणी लाखभर बॉटल्स लागल्या. हे सारं करताना ही समाजानं समाजासाठी केलेली समाजसेवा आहे, जातीअंतासाठी केलेली धडपड आहे, अशी भावना त्यामागे होती. म्हणूनच या उपक्रमाची माहिती मिळताच अनेकांनी आपला मदतीचा हात पुढं केला होता. अगदी लहान मुलानंही आपल्या बचतीचा मातीचा गल्ला फोडून केलेली मदत, रमजान असतानाही सहकार्याला आलेले मुस्लिम बांधव, लाखो लोकांची वर्दळ, पण कुठेच गोंधळ नाही की, गैरव्यवस्था! सारं काही सुरळीत, त्याग भावनेनं प्रत्येकजण सहभागी होत होता. अशा निर्मोही, सदभावी वातावरणात जातीअंताची लढाई पुन्हा एकदा आरंभली गेली होती! सामाजिक विषमता, धर्माधता यांच्या विरोधात रान पेटविण्यासाठी सिद्ध व्हायला हवंय अशी सध्याची स्थिती असताना त्यांच्या विचारांचे पाईक असणारे मात्र  निद्रिस्तावस्थेतच आहेत. त्यांना जागं करण्यासाठी सामाजिक समतेची लढाई ही नेहमीच समाजाची मानसिक उंची वाढविणारी ठरलीय. या समतेच्या लढाईत अस्पृश्यतेची खांडोळी झाली, वर्णाभिमान धुडकावला गेला. जातीयतेला चाप बसला, स्त्रिया स्वयंसिद्ध झाल्या, परंतु हे परिवर्तन हिंदुधर्माचा शक्तिपात करणाऱ्या जातीसंस्थेचा नायनाट करणारं ठरायला हवंय! कारण पूर्वी जातीअंताची लढाई ही स्वार्थसाधकांच्या हातात गेल्यानं ती जाती अहंकाराची झाली. विशेष म्हणजे ही लढाई सामाजिक समतेचा आग्रह धरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांची नावं घेत लढली गेली होती. ती आता नेत्यांप्रमाणे अनुयायांनी आत्मसात केलीय. त्या सोंगाढोंगावर तुटून पडण्याचं काम आता करायला हवंय. भारतीय घटनेनं जातीयता नष्ट करण्याचा आग्रह धरलेलाय. परंतु शासकांनी आणि राजकारण्यांनी त्याउलट व्यवहार करण्यासाठी त्यांनी जाती संघटनांचा आधार घेतलाय. सत्ता मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली जाती अहंकार माजविला जातोय. असत्य, अन्याय, भ्रष्टाचार, अपमार यांच्याविरोधासाठीच नव्हे, तर सत्याच्या आग्रहासाठी आणि हक्काच्या, मानाच्या पानासाठीही इथली माणसं एकत्र येऊ शकत नाहीत. इतकी जाती, प्रदेश, पक्ष अहंकारात तुटलेली, फुटलेली आहेत. या स्वार्थी तुटीफुटीवर प्रकाश टाकावा आणि अवघा समाज एकवटावा या अपेक्षेनं सामाजिक कार्य फुले आणि आंबेडकर यांना मानणाऱ्यांकडून व्हायला हवंय. त्याची ही नव्यानं एकता मिसळच्या माध्यमातून सुरुवात होती.

जातीयतेचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्रातल्या अनेक समाज सुधारकांनी आपल्या आयुष्याची राख केली. स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्यांनी ती विभूती मानली. पुरोगाम्यांकडं सामाजिक समतेचं चांगलं बियाणं होतं पण ते त्यांनी आपसातल्या भांडणात रुजण्यापूर्वीच सडवलं म्हणूनच जातीयवादी पक्ष-संघटनांचं निवडुंग महाराष्ट्रात फोफावलं. आत्मनाशी आणि कार्यनाशी यात फरक करणाऱ्यांची गरज नाही. जातीचा अहंकार आणि अस्मिता हुंडारत हुंदडणारे सगळेच मनुवादी आहेत. स्वार्थासाठी त्यांना मनुनं केलेली जातीय मांडणी हवीच असते. ब्राह्मणांचा बडेजाव, मराठापणाचा माज, बहुजनांची बनेल बलुतेदारी, आणि दलितत्वाची दळभद्री दडपणं या साऱ्याची निर्मिती मनुवादाच्या आधारात आहे. ज्यांना हा आधार नको त्यांना पांचवा वर्ण आहे. चारही वर्णांना धिक्कारणारा, गुणवंतांना योग्यवेळी संधी आणि गरजवंताला योग्यवेळी सहाय्य हेच लोकशाहीचं अर्थात स्वराज्याचं आद्य आणि अंतिम कर्तव्य आहे असं मानणारा पाचवा वर्ण आहे. तो अनुसरण्याचा निर्धार केला गेला. एखादी माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली किंवा देवाधर्माच्या नावानं कुणी नंगानाच सुरू केला की, पुरोगामी विचारवंत वा नेत्यांना इथल्या संस्कृतीची, प्रबोधनाच्या चळवळीची पार्श्वभूमी हमखास आठवते. मग त्यावर भाष्य करताना ते, 'या फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात...! अशी सुरुवात करून आपलं मत मांडतात. 'शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर' हा आज परवलीचा शब्द झालाय. डॉ.आंबेडकर यांनी, 'माझ्या वैचारिक जडण-घडणीसाठी बुद्ध, कबीर आणि फुले यांचा विचार प्रेरणादायी ठरला; त्यांना मी गुरू मानतो..!' असं जाहीरपणे सांगितलंय. हे तीनही महापुरुष त्यांच्या जातीचे नव्हते, तसंच, या तिघांना त्यांनी कधी पाहिलंही नव्हतं. म्हणजे, प्रत्यक्षपणे त्यांच्यात गुरु-शिष्य संबंध प्रस्थापित झाले नव्हते. तरीही त्यांनी या तीन महापुरुषांना गुरुस्थानी मानलं, यामागं डॉ.आंबेडकरांची जी भूमिका होती, ती समजून घेतली पाहिजे.
सत्य तोच धर्म करावा कायम।
मानावा आराम। सर्वाठायी।
मानवांचा धर्म, सत्य हीच नीती।
बाकीची कुनीती। जोती म्हणे।।
यासारख्या अखंडातून महात्मा फुलेंचं हे विचारवैभव लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. महात्मा फुलेंची आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं त्यांचे विचार स्वीकारणं, रुजवणं, वाढवणं आणि मानव्याला जे अनिष्ट ते नष्ट करण्यासाठी त्याचा वापर करणं हाच फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा सार्थ गौरव आहे. महात्मा फुले यांच्या निवासस्थानी गंजपेठेतल्या समताभूमीवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळच्या आंबेडकरांच्या स्मारक परिसरात जमलेली गर्दी हे स्पष्ट करणारीच असते. वैयक्तिक स्वार्थासाठी महात्मा फुलेंचा वापर करण्याला सरसावल्या मंडळींनी त्यांचा विचार कधीच गुंडाळून ठेवलाय. सध्याचा काळ मोठा विचित्र आहे. जे गाडण्यासारखं आहे ते मिरवलं जातंय आणि मिरवावं ते दडवलं जातंय. दिवसेंदिवस देवाला मानणाऱ्यांची संख्या, देवादिकांचे स्तोम कमी करण्याऐवजी वाढतंच चाललंय. आपण एका बाजूला सुधारणेचा आव आणतो आणि दुसऱ्या बाजूला देवाला नवस घालतो, हे ढोंग आहे. अशा ढोंगी व्यक्तींकडून सामाजिक सुधारणा होण्याची सुतराम शक्यता नाही. अशा समाजाला जोतिराव फुले कळलेच नाहीत आणि त्यांची बहुजन समाजाची चळवळही कळली नाही. कारण 'बहुजन' या शब्दाचा अर्थच आपल्याला कळलेला नाही. काहींनी 'बहुजन' म्हणजे मराठा असा सोयीस्कर अर्थ लावून महात्मा फुले-डॉ.आंबेडकरांचा आणि त्यांच्या चळवळींचा आपल्या सोयीसाठी, स्वार्थासाठी राजकारणात तरून जाण्यासाठी वापर करून घेतलाय. वास्तविक फुले-आंबेडकरांचा विचार केवळ तळाच्या माणसांनाच नव्हे तर, राष्ट्राला समर्थ बनवणारा आहे. भारतातल्या अनेक सामाजिक विकासाची बीजंही फुले-आंबेडकरांच्या सामाजिक क्रान्तीत आहेत. स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निवारण, आरोग्यविषयक सेवाकार्य, सामाजिक-आर्थिक समानता, श्रममूल्यांचा पुरस्कार यासारखे अनेक उत्क्रांतीकारक विषय फुले-आंबेडकर यांच्या विचारात सामावलेले आहेत. आजही सामाजिक सुधारणांचे निर्णय सरकार घेतं, तेव्हा त्यावेळी होणाऱ्या चर्चेचं दुसरं टोक हे फुले-आंबेडकर विचारांपर्यंत असतं. त्यांचे विचार पेलवण्याचं आणि समाजाच्या, सत्ताधीशांच्या गळी उतरवण्याचं सामर्थ्य केवळ छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवलं. जोतीराव फुले यांच्या निधनानंतर क्षीण झालेली सत्यशोधक समाजाची चळवळ छत्रपती शाहू महाराजांनी समर्थ केली. परंतु अतिरेकी शिवराळपणामुळं ही चळवळ ब्राह्मण्याकडून ब्राह्मणांकडं सरकली आणि ती चळवळ ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात फसली. या मोडीत निघालेल्या चळवळीला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःला जोतीराव फुले यांचे अनुयायी मानल्यामुळं जीवनदानाबरोबरच व्यापकता मिळाली. आज या चळवळीची आणि फुले-आंबेडकरांच्या विचारांची, खुद्द जोतिरावांनी ज्यांच्या उद्धारासाठी सपत्निक शेणधोंड्याचा मार खाल्ला. त्या बहुजनांनी तरी काय पत्रास ठेवलीय? आज महाराष्ट्रात जे घडतंय ते पाहिलं तरी याची जाणीव साऱ्यांनाच होईल. फुले-आंबेडकरांच्या विचारांनी अनेकजण घडले. ते स्वतः समाजसुधारकच नव्हते तर त्यांच्या कृतिशील विचारांनी असंख्य सुधारक घडवले. फुले यांच्या विचारांनी सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज यांच्यासारख्या अनेकांची सामाजिक परिवर्तनाच्या ऐतिहासीक कार्याची प्रेरणा जोतिबा फुलेंचे विचार हीच होती. या साऱ्यांनी फुले यांच्या विचाराचं ऋण जाहीरपणे मानलं होतं. शुद्रातिशूद्र माणसाच्या उन्नतीचा, त्यांच्या सन्मानाचा विचार फुले-आंबेडकरांनी सांगितला त्यासाठी समाजाला धर्मकर्मकांडात घोळवून फसवणाऱ्या पोटभरुवृत्तीचा त्यांनी तडाखेबंद समाचार घेतला. सामाजिक समानतेबरोबरच स्त्रीशिक्षणाचा पुरस्कारही केला. फुले यांनी तर हा विचार कृतीत आणण्यासाठी या व्यापात आपल्या कुटुंबियांनाही गुंतवलं. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या विचाराला कृतीत आणण्याचं काम अगदी मनापासून केलं. जीवघेणे हल्ले सोसले. पण हटल्या नाहीत. फुले यांच्या निधनानंतर इतकी वर्षे लोटली, पण तरीही सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात त्यांचे विचार आपलं सर्वश्रेष्ठत्व टिकवून आहेत. हा फुले-आंबेडकर यांच्या समर्थ विचारांचा गौरव असला तरी, सामाजिकदृष्ट्या ते लांच्छन आहे. कारण फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा आधार वाटू नये, अशी सामाजिक स्थिती अजून निर्माण झालेली नाही. किंबहुना यांच्याच विचारांची आवश्यकता तीव्रपणे जाणवतेय. देवळं वाढलीत, त्या पुढच्या रांगाही वाढल्या आहेत. लांबल्या आहेत. अफरातफर व्हावी इतका गल्ला देवळात जमू लागलाय. हे सारं चित्र पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात दिसतंय. तरीही फुले-आंबेडकर यांचं नांव घेऊन राजकारण करणाऱ्यांची संख्या कमी नाही. फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्यांनीही आपली वागणूक बदललीय. फुले-आंबेडकर नावाचा डिमडिम वाजवत आपला स्वार्थ साधण्यातच ते धन्यता मानू लागलेत. सदासर्वदा त्यांचेच नांव घेऊन, त्यांच्याच विचाराला हरताळ फासणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा पराभव केलाय. हे सारं बदलण्यासाठी त्यांचे विचारच समर्थ आहेत. यासाठी हवी केवळ जिद्द आणि इच्छा!

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषानं अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचं वारं समाजात खेळतं ठेवलं, ती तडफ लोकांत निर्माण होईल असं वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचं भान आपण दाखवलं पाहिजे. सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणं कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभं करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना तर आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या विचारांचाच आहे. कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावानं कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणानं मुकाबला करण्याची तयारी पुरोगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल.

समाजवादानं उन्नत आणि समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय. महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असं आजवर मानलं जात होतं. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी, परंपरा, कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणलं. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसामाणसात बंधुभाव जागावा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळंच महाराष्ट्रातल्या अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली. लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वरानं आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपलं भाग्य आपण घडवू, या निर्धारानं गावोगाव नव जोमानं तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसानं स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचं वर्तन सुरू झालं असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीनं आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळं मर्यादितच राहिला. भारतामध्ये फुलेंना अभिप्रेत असलेली लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणं, हे काँग्रेसचं उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद महात्मा फुले यांच्या विचारांशी होता तरी, तो इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. भारतातला गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, समाजवादाला नकार देत जनतेच्या सहभागावर आणि विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण फुले यांच्या विचारानं देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचं स्वप्न दिलं आहे, याची जाणीव राज्यकर्त्यांनी ठेवायला हवीय. आज ती अवस्था राहिलीय का? आदर्शवत समाजवादी विचार कुरतडला जाऊ लागलाय. जातीधर्माच्या नावानं चांगभलं म्हणणाऱ्यांची संख्या वाढतेय ते रोखायला हवंय! त्यासाठी पुण्यातल्या 'एकता मिसळ'च्या निमित्तानं केलेलं हे स्मरण...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

इतिहास बदल राष्ट्र घातक ठरण्याची भीती

शिक्षण राजकारणापासून आणि राजकारण धर्मवादापासून दूर राहिलं तर आणि तरच लोकशाहीला वैभवशाली करणारे नागरिक तयार होऊ शकतात. दुर्दैवानं भारतीय राजकारण धर्मवादात आणि शिक्षण धर्मवादग्रस्त राजकारणात फसलंय. हा सर्वपक्षीय नेत्यांचा करंटेपणा आहे. उत्तरप्रदेशातल्या योगी सरकारनं मोगलांचा इतिहास अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. याचा परिणाम होतील हे लवकरच दिसून येईल. हिंदुस्थानातले महान योद्धे ज्यांना मोगलांशी आयुष्यभर लढा दिला. मोगली साम्राज्य धुळीला मिळवलं अशा छत्रपती शिवाजी महाराज वा राणाप्रताप यांचा इतिहास, त्यांचा पराक्रम नव्या पिढीला शिकवायचं असेल तर मोगलांचा इतिहास शिकवावाच लागेल, त्याशिवाय हिंदुस्थानी स्वातंत्र्यसंग्राम विद्यार्थ्यांसमोर येणारच नाही! असा देदीप्यमान इतिहास नव्यापिढीकडं सुपूर्त करायचा नसेल तर मग याला पर्याय तरी काय देणार?

सरकारला शिक्षणाऐवजी आपल्या विरोधकांवर कुरघोडी करणाऱ्या राजकारणाची चर्चा हवीय. यापूर्वी १९९९ मध्ये तेव्हाचे मनुष्यबळ विकासमंत्री मुरली मनोहर जोशी यांनी अशाच प्रकारची परिषद बोलावली होती. त्या परिषदेत अभ्यासक्रमात हिंदुत्ववादी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जावा या उद्देशानं इतिहासातल्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार होता. त्या परिषदेत सरकारचा उद्देश लक्षांत येताच काँग्रेस आणि डाव्या विचारवाद्यांच्या राज्य सरकारांच्या शिक्षणमंत्र्यांनी तिथं गोंधळ घातला आणि सरकारच्या या प्रस्तावाला कडाडून विरोध केला होता. त्याला प्रतिकार करताना भाजप आणि मित्रपक्षांच्या राज्य सरकारांच्या शिक्षणमंत्र्यांनीही सरकारच्या बाजून गोंधळ घातला. दोन्ही गोंधळाचं कारणही एकच आहे. वाजपेयी सरकारनं शालेय पुस्तकांतून हिंदुत्ववाद घुसवण्याचा प्रयत्न केला म्हणून तेव्हा कांग्रेस आणि डाव्या विचारवादी शिक्षणमंत्र्यांनी त्याविरोधात आवाज उठवला होता; तर हे भगवेकरण काँग्रेस पुसून काढत आहे. म्हणून भाजपच्या राज्य शिक्षणमंत्र्यांनी यावेळी आवाज उठवून गोंधळ घातला. विशेषकरून हा विरोध-गोंधळ इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांशी संबंधित आहे. भारताच्या इतिहास लेखनाला प्रदीर्घ परंपरा आहे. तथापि, ज्यांच्या हातात लेखणी होती, त्यांनी आपल्या जातीवर्चस्वाचा टेंभा जागता ठेवण्यासाठी सोयीचं लेखन केलं. चातुर्वण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यासाठी हिंदू राजवंशांना अधिक महत्त्व दिलं. इतर राजसत्तांना कायम शत्रूपक्षात ठेवलं. स्वातंत्र्यानंतर इतिहास लेखनात डाव्या विचारवाद्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. त्यामुळं दडपलेल्या इतिहासाला उजाळा मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य हे मुस्लीमविरोधी नव्हते; रामदास शिवरायांचे गुरू नव्हते आदि संशोधन यामुळंच पुढं आलं. आर्य बाहेरून आले की ते इथलेच होते. हा देखील वादाचा मुद्दा झाला. इतिहास हा गंभीर आणि संवेदनशील विषय आहे. त्यामुळंच इतिहासाच्या पाठ्यपुस्तकात केवळ विचार भिन्नतेमुळं होणारे बदल घातक ठरणारे असतात. ह्याचं भान तत्कालीन वाजपेयी सरकारनं ठेवलं नाही. शिक्षणमंत्री मुरली मनोहर जोशींनी आपल्या संघीय विचारानुसार बहुजनी इतिहासाला डावा ठरवून पाठ्यपुस्तकात बदल घडवून आणले. हा बिघाड दुरुस्त करण्याचं काम त्यानंतर आलेल्या कॉंग्रेसी सरकारातले मनुष्यबळ विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी सुरू केल्यामुळं गोंधळात वाढ झाली. मनमोहनसिंग सरकारनं नव्यानं तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांना गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड या राज्यातल्या तत्कालीन भाजप सरकारांनी तेव्हा आक्षेप घेतला. 'आमच्या राज्यात आमच्या शिक्षण खात्यानं तयार केलेली पुस्तकं वापरण्यात येतील!' असा आवाजही दिला. असा निर्णय घेण्याचा राज्य सरकारांना अधिकार आहे. कारण घटनेनुसार, शिक्षण हा राज्य सरकारच्या अधिकारातला विषय आहे. परंतु शिक्षणासाठी आवश्यक पैसा पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. त्यामुळंच 'भाजपची राज्य सरकारं आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास त्यांना शैक्षणिक बाबतीतले इतर लाभही मिळणार नाहीत,' अशी तंबी मनमोहनसिंग सरकारनं दिली. हा नाक दाबून हात जोडायला लावणारा प्रकार होता. वाजपेयी सरकारनंही अशीच नाकदाबी करून शिक्षणाला भगवा रंग फासण्याचा प्रयत्न केला. खरं तर, हा सगळाच अकलेचं दिवाळं वाजवणारा उद्योग होता. मुलांना शालेय पुस्तकांतून जे वाचण्या-शिकण्यासाठी दिलं जातं, त्यामागे चांगला माणूस घडवण्याचा प्रयत्न असतो, हे खरं आहे. परंतु आज मुलं टीव्ही चॅनल्स, चित्रपट पाहातात, इतर पुस्तकंही वाचत असतात. त्यांचाही मुलांच्या विचार प्रक्रियेवर प्रभाव पडत असतो. परिणामी, पाठ्यपुस्तकांची किंमत कमी झालीय. पुराणातील वांगी पुराणात या चालीवर शाळेतली पुस्तकं शाळेपुरतीच उरलीत. त्याचे परिणामही ठळकपणे दिसू लागलेत. वाजपेयी सरकार स्थापन होण्यापूर्वी तीन-चार वर्षांचा अपवाद वगळता देशात ४५ वर्ष काँग्रेसचीच सत्ता होती. या सत्तेच्या इशाऱ्यानुसार बनवलेल्या पाठ्यपुस्तकांमुळं काँग्रेसच्या समर्थकांत वाढ झाली, असा काही इतिहास नाही. उलट, ती पुस्तकं वाचूनही काँग्रेसविरोधी मतात वाढच झालीय. त्यामुळंच पाठ्यपुस्तकांतून हिंदुत्वाचा डोस घेणारे विद्यार्थी हिंदुत्ववादी होतील, हा भ्रम आहे. भ्रमात केलेलं राजकारण, समाजकारण, धर्मकारण लोकांत संभ्रम निर्माण करू शकतं. पण यशस्वी होऊ शकत नाही. हे लवकरच सरकारांना कळेल. पण विद्यार्थ्याचं, एका पिढीचं नुकसान होईल, त्याचं काय? त्याला जबाबदार कोण? राजकीय नेत्यांच्या विचारसरणीमुळं अभ्यासक्रमात सतत बदल होत असल्यानं सरकारी अभ्यासक्रमावर पालकांचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं पालक आपल्या पाल्याचं शिक्षण मातृभाषेत, सरकारी अभ्यासक्रमात घेण्यास फारसं इच्छुक नसतात. त्यामुळंच इंग्रजी माध्यमाची आणि वेगळ्या अभ्यासक्रमाची निवड करताना दिसतात. हे आणखीनच भयानक आहे. त्यामुळं नव्या पिढीचा आपल्या अभ्यासक्रमावर, पर्यायानं देश, धर्म यांच्याबद्धल आस्था उरत नाही. त्याचे दीर्घकालीन परिणाम अस्वस्थ करणारे आहेत!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आशेचा किरण : सर्वोच्च न्यायालय ...!

आता सुप्रीम कोर्टात इलेक्ट्रोल बॉण्डची, इन्फोर्समेंट डिपार्टमेंट-ईडी देशभरातल्या विरोधी पक्षांवर जी कारवाई करतेय त्याची सुनावणी सुरू होतेय. राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या देणग्या, देशात होणारं कार्पोरेट फंडिंग आणि कार्पोरेट लूट यावरही पीआयएल दाखल आहे, या साऱ्या दाव्यांचा निकाल काय येईल हे कुणी सांगू शकत नाही! सुप्रीम कोर्टाच्या येणाऱ्या निर्णयांवर आशा आणि विश्वास अवलंबून राहिलेलाय, घनघोर अंधारात एखादा मिणमिणता दिवा वा काजवा प्रकाशित व्हावा अशी आजची स्थिती आहे. कारण देशातल्या स्वायत्त संस्था एकापाठोपाठ धाराशाही होणं, मीडियाचं अस्तित्व कुंद होणं, संवैधानिक संस्थांच्या माध्यमातून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संविधानानं जी जबाबदारी दिलीय त्यांच्याकडून ती न होणं. अशामध्ये सरकारच्या गळ्यातला फास काय शेवटची संस्था म्हणून सुप्रीम कोर्ट उरलीय? 

संसद कशाप्रकारे चालते आणि कशाप्रकारे चालवली जातेय हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मीडियाची उपस्थिती केवळ विरोधकांना संपवण्यासाठीच सज्ज झालेलीय. त्यांचाही आवाज कशाप्रकारे घोटला जातोय. हे सांगण्याची काही गरज नाही. देशांतर्गत सगळ्या तपास यंत्रणा ज्याची नोंद प्रीमियम तपास यंत्रणा म्हणून नोंदवली गेलीय. ज्याची उपयोगिता लक्षांत घेऊन जेव्हा त्या नियमित केल्या गेल्या की, संविधानाच्या तरतुदीनुसार कारवाया होतील, पण त्याही गोष्टी आजमितीला धूसर झाल्या आहेत. मग अशा झाकोळलेल्या वातावरणात केवळ सुप्रीम कोर्ट हेच एक आशेची किरण ठरतेय! काय सगळ्या न्यायिक बाबी एकापाठोपाठ धाराशाही होताहेत? कारण एका जजचा निर्णय येतो काय, अन त्यानंतर लगेचच संसदेची कारवाई २४ तासात होतेय! 'स्लीप ऑफ टन्ग' म्हणत माफी मागीतल्यानंतरही काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांना विमानातून उतरवलं गेलं. पोलिसांनी त्यांना अटक केली. आणि दोन-तीन तासांच्या आत सुप्रीम कोर्टानं पोलिसांना स्पष्ट सांगितलं की, तुम्ही त्यांना अटक करू शकत नाही. जिथं तक्रारी झाल्या त्या उत्तरप्रदेश आणि आसाम सरकारला नोटीस बजावली की, जी तक्रार दाखल झालीय त्यावर खुलासा करा. हे प्रकरण संपलेलं नाहीये ते सुरूच राहणार आहे. जे सुप्रीम कोर्ट पूर्वी जामीन देत नव्हतं ते आता जामीन देऊ लागलेय. तासादोन तासात सुनावणी होऊ लागलीय. सुरतच्या मुख्य न्यायमुर्ती चीफ मेट्रोपोलीटीशीअन मॅजिस्ट्रेटनं जो फैसला दिला त्यावर अंमल करण्यात संसदेच्या कार्यालयानं वेळ लावला नाही. तिथं मानहानीचं फैसला होता.आडनावाबाबत वाद होता, आडनाव मोदी होतं! पवन खेरांच्या प्रकरणात आडनावाच्यापुर्वी लागणारं वडिलांच्या नांव होतं. दामोदरदास ऐवजी त्यांनी गौतम जे अदानी यांचं नाव आहे त्याचा चुकून वापर केला होता!

देशातल्या साऱ्या संवैधानिक संस्था एकेक करत संपवल्या जाताहेत, विरोधीपक्षाचं अस्तित्व आज दिसेनासं झालंय, अशावेळी केवळ सुप्रीम कोर्टाचाच आधार वाटू लागलाय. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या काही निर्णयांनी भारतीयांच्या आशा पल्लवित झाल्यात. गेल्या ८-१० दिवसाच्या अंतरावर त्यांनी वेगवेगळ्या चार ठिकाणी भाषणं केली आहेत. प्रत्येक ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांच्या स्वातंत्र्य आणि नागरिकांच्या हक्काचा उल्लेख होता, सरकारनं त्या हक्काचं हनन करू नये असं त्यांनी म्हटलं होतं. या साऱ्या प्रक्रियेत पारदर्शकतेचाही त्याचा आग्रह होता.ती पारदर्शकता आज संपुष्टात आलीय. जेव्हा सरन्यायाधीश रंजन गोगाई कार्यरत होते तेव्हा ते सरकारचं प्रत्येक म्हणणं हे बंद पाकिटातून स्वीकारत होते. मग ते राफेलचं प्रकरण असो वा इतर कुठलंही. पण आता सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी सरकारला सांगितलंय की, आम्हाला आमच्या कारभारात पारदर्शकता हवीय! सरकारचं म्हणणं हे उघडपणे मांडलं गेलं पाहिजे. त्यामुळं आम्ही बंद पाकिटातलं म्हणणं ऐकणार नाही! अशी कणखर भूमिका सरकारला सुनावणाऱ्या सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व लोकशाहीच्या इतर स्तंभांप्रमाणे संपुष्टात आलं तर, देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही. हा एक अदभुत योगायोग आहे. सुप्रीम कोर्ट हे केवळ राजकारणाशी निगडित प्रश्नांसाठी उरलेलं आहे का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे! आता सुप्रीम कोर्टात इकॉनॉमिक्स, कार्पोरेट, पॉलिटिकल फंडिंग, इलेक्ट्रोल बॉण्डशी  निगडित दावे दाखल आहेत. भ्रष्टाचाराबाबत कारवाया करण्याचे अधिकार सत्तेच्या हाती असणं हा देखील वादग्रस्त मुद्दा ठरतोय. सुप्रीम कोर्टात २०१५ मध्ये दोन महत्त्वाच्या केसेस आल्या होत्या. सरकारनं नॅशनल ज्यूडिशिअल अपॉईंटमेंट कमिटी ही कॉलेजियमच्या समांतर कमिटी बनवली होती. २०१५ मध्ये त्याला संसदेत मंजूरी घेण्यात आली, त्यावर राष्ट्रपतींनी मोहोर उठवून कायदा केला; पण सुप्रीम कोर्टानं याला आव्हान दिलं. त्यावेळी न्या. तेहर यांच्या कमिटीनं सांगितलं की कॉलेजियमहून अधिक प्रभावकारी काही नाहीये. इथूनच सरकार आणि सुप्रीम कोर्ट संघर्षाला सुरुवात झालीय. त्यानंतरच्या चार-पाच घटनांतून सर्वोच्च न्यायालयानं जर कच खाऊ धोरण स्वीकारलं तर समजून जा की, सुप्रीम कोर्टही सरकारच्या दबावाखाली त्यांच्या नियोजनानुसार आलं असतं. मग 'तानाशाही' हा शब्दही तिथं तोकडा पडू शकला असता. पण सुप्रीम कोर्टानं आपलं अस्तित्व अबाधित राखलं. कमकुवत बनलेल्या त्या सर्व संवैधानिक संस्थांसाठीही सुप्रीम कोर्ट हे एक आशेचा किरण ठरलंय. इथं वरिष्ठ-कनिष्ठचा प्रश्न नाही. निवडणूक आयोगाच्या आयुक्तांची नियुक्ती ही सरकारनं न करता एका समितीच्या माध्यमातून व्हायला हवी, जोपर्यंत ती समिती अस्तित्वात येत नाही तोवर सरकार, विरोधीपक्ष आणि मुख्य न्यायाधीश यांची समिती आयुक्त नियुक्तीचं काम करील. देशातली लोकशाही ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून राबवली जात असल्यानं केवळ सरकारच आयुक्तांची नियुक्ती का करतेय? ईडीनं राजकीय व्यक्तींच्या १२९ जणांची, तर सीबीआयनं १२४ जणांची यादी सोपवलीय यावर ५ एप्रिलला सुनावणी होणार आहे. त्यात सुप्रीम कोर्टाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. दुसरीकडं देशातल्या १४ राजकीय पक्षांनी याच मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावलाय. नव्या सरन्यायाधीशांची ९ नोव्हेंबर २२ ला नियुक्ती झाली. त्यानंतरच्या १०० दिवसात कॉलेजियम असताना हायकोर्टात न्यायाधीशांच्या ज्या नेमणुका झाल्या, जे रिफॉर्म झालेत त्याबद्धल प्रधानमंत्र्यांनी  सरन्यायाधीशांची पाठ थोपटलीय. २०१४ नंतरच्या कालखंडातल्या घडामोडीकडं पाहता लक्षांत येईल की, तत्कालीन सरन्यायाधीश शिवम यांची केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली. राफेलच्या प्रकरणात सरकारच्या बाजूनं निकाल दिला तेव्हा सरकारनं सरन्यायाधीश रंजन गोगाई यांना बंद पाकिटातून 'नॅशनल सेक्युरिटी' म्हणत त्याच्या किंमती लिहून दिल्या होत्या. पुढं निवृत्तीनंतर रंजन गोगाई यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती केली. नुकतेच निवृत्त झालेले न्यायाधीश काझी हे आंध्रप्रदेशचे राज्यपाल नियुक्त झालेत. सरन्यायाधीशांच्या १०० दिवसात रेकॉर्डचं डिजीटलायझेशन, वकिलांसाठी ऑनलाईन स्लिप एपिअरन्स, आरटीआय ऑनलाइन पोर्टल, डिजिटल कोर्ट डेस्कची निर्मिती केली गेली, त्यात १३ हजार ७६४ केसेस नोंदवल्या गेल्या आहेत, तर पूर्वीच्या १४ हजार २०९ केसेसचा निकाल लावला गेलाय. जजेसची कॉलेजियमच्या माध्यमातून १२ नांवं अपेक्स कोर्टाकडं पाठविण्यात आली. त्यापैकी ८ जणांच्या नियुक्त्या झाल्या. हायकोर्टासाठी ३५ नांव पाठवली गेली त्यातल्या ३० जणांच्या नियुक्त्या झाल्या. कॉलेजियमसाठी जी पारदर्शकता होती त्यात खुलेपणानं सांगितलं गेलं की, संबंधितांची नियुक्ती कोणत्या कारणानं झालीय वा नियुक्ती का केली गेली नाही. वा आयबी किंवा रॉच्या अहवालानुसार ज्यांना त्या पदावरून का कमी केलं, ते सारं आम्ही पब्लिक डोमेनमध्ये घेऊन जाऊ. आणि सांगू की, आम्ही त्यांना या कारणास्तव संबंधीतांना कमी केलंय. हा काही राष्ट्रीय सुरक्षिततेचा प्रश्न नाहीये. सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेनं सरकारच्या कपाळावर आठ्या पडल्या. संसदेत कायदे केले जातात, या ठिकाणी सत्तेनं कब्जा केला असेल, आणि तिथं विरोधकांचं काही अस्तित्वच राहिलेलं नसेल, तर देशातल्या स्वायत्त संस्था आणि संसद कोसळण्याची अवस्थेत येईल. अशा स्थितीत केवळ सुप्रीम कोर्टच आशेचा किरण म्हणून उरलेलंय!आता इथं जामीन देण्याची प्रक्रिया बरीच लिबरल झालीय. रंजन गोगाईंनी पाकिटातून सरकारचं म्हणणं ऐकणं हे नव्या  सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी थांबवलंय आणि हे यापुढं चालणार नाही असं सरकारला स्पष्ट बजावलंय. अदानी-हिंडनबर्ग प्रकरणातून उदभवलेल्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी सुप्रीम कोर्टानं शेअरबाजारासाठी कमिटी बनविलीय. जी सेबीची, शेअरबाजारातल्या घडामोडींची, गुंतवणूकदारांची झालेली फसगत झालीय याची चौकशी होणार आहे. सरकारनं  त्यासाठी बंद पाकिटातून चौकशी समितीसाठी नांवं पाठवली. ती न्यायालयानं स्वीकारली नाहीत. त्याला विरोध करत या विषयातल्या तज्ज्ञांची एक समिती नेमली. त्याच्या चौकशी अहवालासाठी दोन महिन्याचा अवधी दिला. त्याहून मोठी बाब ही आहे की, 'वन रँक वन पेन्शन ' प्रकरणातही जे शिल्डकव्हरचं प्रोसीजर सरकार करत होती. आणि अटर्नि जनरलच्या माध्यमातून जी नावं देत होती, की संरक्षण खात्यानं ही नावं दिली आहेत. 'संरक्षण खात्याचा शब्द' हा न्यायालयाला भीती दाखवणारा होता, राफेल प्रकरणात हे उघडकीला आलं होतं. संरक्षण खात्याचं नांव घेत पेगसेस प्रकरणातही ज्या बाबींचा घोळ घातला गेला. नॅशनल सेक्युरिटीच्या नावाखाली खेळ खेळला गेला. 'वन रँक वन पेन्शन' ही नॅशनल सेक्युरिटीची बाब नाही तर मग बंद पाकिटातून ही नावं का दिली जाताहेत? ही कोणती नावं आहेत हे जाणण्याचा अधिकार इतरांनाही आहे. असं म्हणत ही बंद पाकिटातली नांवं सुप्रीम कोर्टानं नाकारली. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती महत्वाची आहे की, आगामी काळात सुप्रीम कोर्ट कसं कामकाज करील याच प्रत्यंतर यात दिसून आलं. सरन्यायाधीश चंद्रचूड यांची निवृत्ती १० नोव्हेंबर २०२४ ला होणार आहे. आगामी लोकसभा निवडणुका ज्या 'लोकांच्या प्रतिक्रियेचा थर्मामिटर' ठरणार आहे, त्या एप्रिल मे महिन्यात होत आहेत. सत्तेची आणि लोकशाहीची स्थापना करण्यासाठी या निवडणुका असतात. सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयुक्तांची नेमणुक जर सरकार करणार असेल तर मग आयुक्त सरकारला कसे काय प्रश्न विचारणार? हे सरकारला अडचणीचं ठरणारं आहे. दरम्यान निवृत्त सरन्यायाधीश लोकूर यांनी म्हटलं होतं की, निवृत्त होणाऱ्या न्यायाधीशांनी नव्या जबाबदाऱ्या स्वीकारताना ज्यूडीशिअल क्षेत्रांतल्याच जबाबदाऱ्या स्वीकाराव्यात. इतर सरकारी पद स्वीकारू नयेत! हा त्यांचाआवाज काहीसा कुंद झालेलाय. जेव्हा सरन्यायाधीश दीपक मिश्रा होते, तेव्हा जानेवारी २०१८ मध्ये ज्या चार न्यायाधीशांनी एक पत्रकार परिषद घेऊन म्हटलं होतं की, 'डेमोक्रेसी इन डेंजर!' आज सर्व विरोधीपक्ष एका सुरात म्हणताहेत 'डेमोक्रॅसी इन डेंजर!' त्या चार जजेज पैकी एकजण  सरन्यायाधीश बनले. त्यांच्याच काळात सुप्रीम कोर्टाची गरिमा संपुष्टात आली. कायदेमंत्र्यांनी जे काही म्हटलंय त्याचा गांभीर्यानं विचार करायला हवाय. त्यांनी म्हटलं होतं की, 'जजेसना निवडणुका लढवायच्या नसतात, लोकांसमोर जावं लागत नाही!' तेव्हा असं वाटतं की, कायदेमंत्र्यांनी संविधानात सुप्रीम कोर्टाबाबत जे म्हटलंय ते वाचलेलं नसावं. संवैधानिक संस्था आणि स्वायत्त संस्था यांची भूमिका काय हवी आणि त्याबाबत लोकांमध्ये असं परसेप्शन असायला हवंय, की, कोणत्याही चौकात उभ्या असलेल्या पोलीस शिपायापर्यंतची ती असायला हवीय. त्याचं अस्तित्व त्याच्या प्रोफेशनबद्धलचा विश्वास निर्माण करायला हवंय. त्याच्याशी संवाद साधायला हवा, तो जोपर्यंत तिथं आहे तोपर्यंत कायद्याचं राज्य आहे. म्हणजेच 'रुल ऑफ लॉ' आहे! ही स्थिती कशी संपणार? काय ती संपतेय का? अशावेळी सगळ्या बाबी ध्वस्त होताना सुप्रीम कोर्टाचं अस्तित्व आणि चंद्रचूड यांचं सरन्यायाधीश बनणं, यानंतर परिस्थिती अनुकूल बनलीय. सर्वांना माहीत आहे की एका मोठ्या कालावधीसाठी ते सरन्यायाधीश असणार आहेत. ९ नोव्हेंबर २२ ते १० डिसेंबर २४ पर्यंत ते आहेत. सरकारच्या ज्या योजना या काळात आहेत, मग त्या राफेल असो वा पगसेस असो, हे राष्ट्रीय सुरक्षेचा विषय बनवला. चर्चा तर कलम ३७०, तीन तलाक आणि अयोद्धेच्या प्रश्नीही होती. सर्वोच्च न्यायालय जेव्हा एखादा निकाल देते तेव्हा संविधानातल्या तरतुदीनुसार देत असते, तेव्हा त्यावर लोकांचा विश्वास असतो. राजकीय सत्तेनं आपल्या सोयीसाठी सुप्रीम कोर्टाची ढाल तर बनवली नाही ना! आता जे मुद्दे सुप्रीम कोर्टात येणार आहेत, ते सरकारला पॉलिटिकल फंडिंग, पैसे-इकॉनॉमी आणि कार्पोरेट, इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून जो राजकीय खेळ खेळला जातोय याबाबत जाब विचारला जाणार आहे. हे पाहता नोटबंदीबाबत सुप्रीम कोर्टानं निकाल जरूर दिलाय, त्याला पुन्हा लागू करू शकत नाही. पण काय काळापैसा संपुष्टात आलाय? नकली नोटा कमी झाल्यात? रिझर्व्ह बँक हे मानते का? तर नाही. सरकारचं म्हणणं आहे की, आम्हाला जनतेनं निवडून दिलंय मग इतर संस्थांचं काय महत्व? या संस्थांचं महत्व सत्ता राखण्यासाठी आहे. ते जोवर सत्तेत आहेत तोवर त्यांना अनुकूल निर्णय, निकाल देण्याची कामं सर्व स्वायत्त संस्थांनी करायला हवीत. मिडियालाही हाच धडा शिकवला गेलाय. म्हणजे तुमचं अस्तित्व हे देशासाठी आहे ना! देश म्हणजे आम्हीच आहोत, लोकांनी आम्हालाच निवडून दिलंय ना! या परिपेक्षात सुप्रीम कोर्टानं एक आशेचा किरण दाखवलाय. अशी स्थिती असली तरी विचार करायला लागेल की, एनआरसी संदर्भात काय घडलं? राफेल प्रकरणात काय घडलं? शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या काळात सरन्यायाधीश शरद बोबडे होते. त्यांनी त्यासाठी एक कमिटी नेमली होती, त्याचं काय झालं? कायदे मागे घेतले गेले, प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली म्हणजे सारं संपलं का? सुप्रीम कोर्टाचं काही महत्व नाही का? वर्षभर आंदोलन झालं, सातशेहून अधिक शेतकरी मृत्युमुखी पडले; त्याची जबाबदारी कुणी घेणार की नाही? प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली, कायदे मागे घेतले, मग संविधान काय म्हणतं? सरकारच्या या 'सत्ता राबविण्याच्या' भूमिकेमुळं आज अशी स्थिती निर्माण झालीय की, सुप्रीम कोर्टाप्रती लोकांच्या आशा पल्लवित झाल्यात. त्यामुळं सरकार समोर प्रश्न निर्माण झालाय. यापूर्वी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती कमीजास्त होत होती. नव्या वातावरणात इकॉनॉमी म्हणजे पैशाच्या भोवती सारं घुटमळतेय. आणि तो पैसा राजकीय-इकॉनॉमीत बदलतोय. त्याचाच एक भाग हे 'अदानी कांड' आहे, अदानी आणि मोदींच्या नात्याचा उल्लेख जो राहुल गांधींनी वारंवार केलाय. अशावेळी इथं लक्षात येईल की, ही राजकिय-इकॉनॉमीतून ८० टक्के फंडिंग केवळ भाजपकडं जातेय. आणि त्यांना अनुकूल अशी पॉलिसी-धोरणं सरकार करतेय. हाच विकास-डेव्हलपमेंट आहे, हाच आधार आहे देशाचा! विदेशातून फंडिंग इलेक्ट्रोल बॉण्डच्या माध्यमातून राजकारण्यात होतेय. केवळ हा एक सवाल नाही की, सत्तेनं देशाची लोकशाही डेमेज केलीय, ज्या काही संस्था संविधानाच्या माध्यमातून काम करतात त्या करायच्या थांबल्यात, 'रुल ऑफ लॉ' गायब झालंय. कायद्याचं अस्तित्व देशात राहावं ह्या परसेप्शनला सुप्रीम कोर्टानं आज विकसित केलंय. का गरजेचं आहे स्वातंत्र्य? अभिव्यक्ती स्वातंत्र्य, माध्यमांचं स्वातंत्र्य, नागरिकांची स्वतंत्रता आणि अधिकार? हा आवाज सरकारच्या पचनी पडत नाहीये. त्यामुळं सरकारातले वरिष्ठ नाराज आहेत.
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

परिवर्तनातल्या बेटांचा द्वीपसमूह व्हावा...!

आपण आता कुठं आहोत? याचा विचार परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी गंभीरपणानं करायला हवा. त्याचं कारण आपली चळवळ ठिसूळ पायावर उभी आहे. आपण कसोटीच्या क्षणी कचखाऊ धोरण स्विकारतो. हे अनेकदा सिद्ध झालेलं होतं. आज आपण परंपरावादी आणि सरंजामी शक्तिविरोधी सूर लावताना आपली वैचारिक बैठक किती पक्की आहे. याचं आत्मपरीक्षण करायला हवं. भारतातल्या परिवर्तनवादी चळवळींचा इतिहास हा चार्वाकापासून सुरु होतो. त्यांच्यापासून बहुतेक प्रबोधनकारांचे खून पाडले आहेत. राजेशाहीत त्या हत्या पचविल्या गेल्या होत्या. पण आधुनिक लोकशाही भारतातही परिवर्तनवाद्यांच्या हत्या होत आहेत? दाभोलकरांच्या हत्येनंतर धर्मांध शक्तींची धिटाई वाढलीय. याचा अर्थ परिस्थिती जैसे थे आहे काय? आपण धर्मवाद्यांचे वैरी नाही,की आपली स्पर्धा,कोणत्याही एका धर्माशी नाही. आपली चळवळ कोणाला शह देण्यासाठी नसून प्रबोधन आणि परिवर्तनासाठी आहे. समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, विवेकवाद आणि सहिष्णुता वाढावी यासाठी चळवळ काम करीत आहे. परंतु अलिकडच्या काळात राजकीय अभिनिवेश वाढीला लागला आहे. समाजमाध्यमांचा वापर लोकप्रबोधनासाठी होण्याऐवजी सूडाच्या भावनेतून लिखाण होत आहे. उथळपणा आणि प्रसिद्धी वाढीला लागलीय. ही अपेक्षा परिवर्तनवादी कार्यकर्त्यांकडून नाही. अनेक क्षेत्रं अशी आहेत, की जिथं समतेचे विचारच पोहचले नाहीत. लोक कर्मठपणाच्या पठडीतलं जीवन जगत आहेत. एकमेकांची उणीदुणी काढून मिथ्या धर्म फैलावत आहेत. आज कधी नव्हे, ती समाजनिष्ठ कार्यकर्त्यांची गरज निर्माण झालीय. भारत हा असा विचित्र देश आहे की, इथं लोकसंख्येचा प्रश्न आहे. समाज जाती-पोटजातींमध्ये विभागला गेलाय. शैक्षणिक किंवा आर्थिक प्रश्नांवर संघर्ष करायला गेलं तर, पुढारी जातींचे गठ्ठे एक करुन कोणत्याही प्रश्नावर,ऐक्य होऊ देत नाहीत. प्रश्न सुटला पाहिजे यावर एकमत झालं तरी, सत्तेतले आणि बाहेरचे जातीचे मुखंडे, समाजात ऐक्य होण्याच्या आतच आपापली जात वेगळी काढून सवतासुभा निर्माण करतात. त्यामुळं एकाच प्रश्नावर अनेक देशांची परिषद भरल्याचं दृश्य दिसतं. जरा कुठं आलबेल झाल्याची लक्षणं दिसू लागली की, जाती-धर्माची वात पेटवून,वणवा चेतवायचा. सध्या तेच सुरू आहे. कोणीही शहाजोग नाही.

हा समाज 'जेता' म्हणून कधीच ओळखला जात नव्हता. पराभूत मनोवृत्तीचा समाज म्हणूनच जाणला जात होता. एक विस्कळीत समाजरचना असलेला भूभाग म्हणून ओळखला जात होता. आर्य, हूण, कुशाण, पोर्तुगीज, फ्रेंच, मोगल इत्यादी आक्रमकांनी, ओळखलं होतं की, या परिस्थितीशरण लोकांवर, राज्य करणं अवघड नाही, कारण एक राष्ट्र ही भावना कधीच नव्हती. ब्रिटीशांच्या राजवटीत एक राष्ट्र भावना अंकुरीत झाली होती. या समाजाला पहिल्यांदा महात्मा गांधींनी घराबाहेर काढून निषेध व्यक्त करायला शिकवलं होतं. भारतीय समाजपुरुषाची प्रतिमा शोषिक आहे, सहनशील आहे. याचा अर्थ तो परिवर्तनशील नाही, असं नव्हे. तो जादा स्थितीवादी आहे. त्यामुळं वैज्ञानिक दृष्टिकोन स्विकारणं जड जातं. जातीपातीनं समाजाच्या खापा करुन ठेवल्या आहेत. त्यामुळं संकुचित धर्मवाद जोपासला गेलाय. धर्मवाद म्हणजेच राष्ट्रवाद असा संस्कार झालाय. ब्रिटीशांच्या राजवटीमुळं फ्रेंच राज्यक्रांतीची तत्वं आणि इंग्लंडच्या औद्योगिक क्रांतीमुळं यंत्रयुग अवतरलं. नाहीतर बैलगाडी आणि टांगा बराच काळ घेऊन प्रवास करावा लागला असता. पहिली आगगाडी ठाणे-मुंबई सुरु झाली, तेव्हा तर लोक घाबरून तिकडं फिरकत नव्हते. त्यांनी अफवा पसरवली होती की, गाडीत माणसं कोंबून खतम करतात. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी स्वतः गाडीतून प्रवास करुन लोकांचं प्रबोधन केलं होतं. आपल्याकडं प्रबोधनकारांची परंपरा जुनी आहे. आधुनिक काळाची सुरुवात राजाराम मोहन रॉय यांच्यापासून सुरु झाली होती. जोतीराव फुले, महादेव गोविंद रानडे, लोकहितवादी, बाळशास्त्री जांभेकर, नाना शंकरशेट, दादाभाई नौरोजी, आगरकर, केशवराव ठाकरे ते थेट डॉ दाभोलकरांपर्यत येऊन ठेपते.

समाज परिवर्तनाची गती कमी असली तरी, आशादायक आणि आश्वासक चित्र आहे. पण समाजपरिवर्तन म्हणजे केवळ भाषणबाजी किंवा शिबिरं घेणं नव्हे. त्याला सहलीचं स्वरुप येतं. मानवी मनाचं मनातल्या मनात स्थलांतर करणं एवढं सोपं नाही. बदल आणि परिवर्तन यामध्ये,जमीन-आस्मानचा फरक आहे. आपल्याला परिवर्तन हवंय, बदल नकोय. एक शर्ट काढून दुसरा घातल्यासारखा! मेघा पाटकर यांनी संघर्षातून सेवा केलीय. सेवेतून विश्वास निर्माण केलाय. विश्वासामुळं परिवर्तन होतेय. ही प्रक्रिया सोपी नक्कीच नाही.पण दुश्प्राप्यही नाही. बाबा आढावांनी कष्टकऱ्यांना ठामपणे बजावलं की, भाकरी महत्वाची आहे, जात नव्हे! सुरुवातीला कुरकुरणाऱ्या हमालांना प्रबोधनातून बाबांनी जातीतला फोलपणा उघड करुन दाखवला होता. आज हमाल, कष्टकऱ्यांचा एकच धर्म आणि जात आहे. सार्वजनिक सत्यधर्म बाबांनी साठ-पासष्ठ वर्षे खस्ता खाल्ल्या आहेत. त्यांना पत निर्माण करुन दिलीय. विश्वासार्हता प्राप्त केलीय. म्हणून प्रबोधन आणि परिवर्तन होतेय. ही न थांबणारी प्रक्रिया आहे. परिवर्तनवादी चळवळीपुढं मोठं आव्हान आहे. पण आम्ही जर वरवरचं तोंडी लावण्यापुरतं 'पार्टटाईम सोशलवर्कर' म्हणून स्वतःला मानत असू तर ती चळवळीशी धोकेबाजी आहे. आपण चळवळीला हर तऱ्हेनं मदत करु शकतो. आपला प्रपंच सांभाळून आपण प्रबोधन करु शकतो. सगळ्यात अवघड सुरुवात घरापासून होते. आपल्या कुटुंब सदस्याचं जो प्रबोधन करु शकत नाही. तो इतरांचं काय परिवर्तन करणार?

दुर्दैवानं दलित चळवळीतले काही गट महात्मा गांधींबद्धल मनात अढी धरुन आहेत. पण डॉ बाबा आढाव यांचं हे वैशिष्ट्य आहे की, त्यांनी आपल्या विचारमंचावर शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर आणि गांधी यांना बरोबरीचं स्थान दिलंय. समाजामध्ये कार्य करणाऱ्या अनेक संघटना आहेत. पण समाजाच्या अडचणी सोडवण्याच्या मोबदल्यात समाजामध्ये दुहीचे विचार थोपवित आहेत. नेमका हाच फरक परिवर्तनवादी चळवळीमध्ये आणि परंपरावादी संस्थांमध्ये आहे. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर भारतातही एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला राजा राममोहन रॉय या आधुनिक समाजसुधारकानं कायद्याच्या सहाय्यानं सतीच्या क्रूर प्रथेला आळा घातला होता. पण विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात राजस्थानमध्ये राजकुॅंवर नावाची महिला सती गेली होती. तीचं समर्थन शंकराचार्यांनी निर्लज्जपणे केलं होतं. कायदा करुन जरुर सहकार्य मिळतं, पण प्रबोधन होत नाही. त्यासाठी शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर-गांधी यांचा विचार मंचच हवा. पूर्वी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी विज्ञान शिबिरं होत असत. परिवर्तनवादी चळवळीला जोडून असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेची मूल्ये जोपासली जात होती. ती राज्यघटना साक्षरतेची सुरुवात होती. पण आता प्रक्रिया रेंगाळल्यासारखी झालीय. राष्ट्रीय एकात्मता परिषद, विषमता निर्मूलन शिबिरातून प्रबोधनवादी कार्यकर्ते शिदोरी घेऊन जात असत. पण आता गरज असताना शैथिल्य आल्यासारखं वाटतं. विद्रोही साहित्य संमेलनं, विद्रोही साहित्य सांस्कृतिक संमेलनं होत असतात, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. पण हे परिवर्तनाचे चिराग एकत्रित यावयास हवेत. यांची विभागणी, सवतासुभा न परवडणारा आहे. भटक्या विमुक्तांमध्ये, आदिवासींमध्ये, काही धार्मिक परंपरावादी घुसलेलेत. ते त्यांच्या मनाला काय खाद्य पुरवत आहेत? हल्ली दलित-आदिवासी लेखकांमध्येही साहित्य संमेलनाच्या नावाखाली परंपरावादी कातडं पांघरुन घुसलेत.हे परिवर्तनवादी चळवळीसाठी अवघड होऊन बसलंय.मानवी मनाचं शिल्प घडविण्यासाठी जी निष्ठा आणि कौशल्य लागतं त्याचा अभाव परिवर्तनवादी चळवळीमध्ये आहे. म्हणूनच सुरुवातीला म्हटलं होतं की, ठिसूळ पायावर उभी आहे. याचा गांभीर्यानं विचार करणं आवश्यक आहे. सर्व परिवर्तनाची बेटे, एकत्र येऊन द्वीपसमूह तयार होण्यास पर्याय नाही!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...