Monday 13 March 2017

*दारुअड्ड्यावरील धाडी अन पोलिसांची कर्तव्य कसूरता!*

*दारुअड्ड्यावरील धाडी अन पोलिसांची कर्तव्य कसूरता!*


नगर जिल्ह्यात पांगरमल गावात दारु पिऊन आठ जण मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. त्याची दखल फारशी घेतली गेली नाही. होळीला कुठल्याशा गावात दारूच्या बाटल्या पेटवून होळी केल्याचे दुरचित्रवाहिनीवर दाखविले गेले आहे. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी पुर्वांचलातल्या कुठल्यातरी गावातल्या काही झुंझार बायकांची गोष्ट दूरदर्शनवर दाखविली होती. अंमली पदार्थाच्या, दारूच्या तडाख्यात सापडलेल्या आपल्या मुलांची, पुरुषांची सुटका करण्यासाठी अंमली पदार्थ, दारू विकणाऱ्यांविरुद्ध ह्या बायका कशा जिद्दीने झुंजतात, हे दुरदर्शनने दाखविले होते. रात्री-बेरात्री हातात मशाली घेऊन, जंगलात घुसून अंमली पदार्थाचे अड्डे उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम करणाऱ्या या बायका बघितल्यावर हे इथे का घडू नये, असं मला सारखं वाटत राहिलं. 

दारु ही आता सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाच्या घरातलीच झालीय. तिला घरंदाजपणा आलाय. दारु घेण्यात आणि देण्यात प्रतिष्ठा आहे. दारुचे घोट घेत दोन घटका बसणं हा आनंद मानला जाण्याइतपत दारु आता जवळची झालीय पैसा मुबलक असलेल्या मुलांना आता 'दारुभत्ता' सुद्धा दिला जातो. त्याला 'एन्जॉयमेन्ट मनी' म्हटलं जातं आणि 'हार्ड घेऊ नको रे' असा प्रेमाचा सल्लाही त्यासोबत देतात. काही घरांना दारु अशी घरंदाज झाली असली तरी काही घरातून आजही बरबादीचा डाव मांडूनच बसते आहे. त्या घरातला पैसा, आनंद, प्रेम संपवण्याचं काम दारु यथासांग पार पाडत आहे. विशेषतः ज्यांचे हातावर पोट आहे, अशा कष्टकऱ्यांचे संसार बघता बघता उद्ध्वस्त करण्याचे काम दारू इमाने इतबारे पूर्वीच्याच क्रूरपणे आजही उरकत आहे. 

गरीब वस्तीत दारुचे अड्डे चालतातच कसे, असा प्रश्न पडतो. माणसं कष्ट, दुःख, निराशा, अपमान विसरण्यासाठी दारू घेतात. दोन घोट घेऊन घरी गेलं की झालं. दुसऱ्या दिवशी बाहेर पडेपर्यंत सगळं ठीकठाक होतं, असं घेणारे सांगतात पण हे खोटं असतं. दारू ठाकठीक करणारी नाहीच. ती थेंबाथेंबानं तुम्हाला संपवित असते. तुमच्या जीवनातला आनंद संपवत असते, नासवत असते. कुठल्याही गरीब वस्तीत सहजपणे दारू मिळते, ताडीमाडीच्या स्वरूपात हवी तशी, हवी तेवढी ही दारू आपल्या संसारात विष कालवते हे दिसत असून बायका ही दारूची दुकाने कशी चालू देतात? नवऱ्याचं कुणाशी भांडण झालं आणि नवऱ्यावर भांडणाऱ्याची मात होतेय असं दिसताच त्या रणरागिणी बनत त्या भांडणात शिरणारी आणि नवऱ्याशी भांडणाऱ्याला उभा आडवा करणारी स्त्री ही सर्वविनाशी दारू कशी खपवून घेते? तिच्या विरोधात ती थैमान का घालत नाही? असं नेहमीच वाटत आलंय. 

काही वर्षांपूर्वी पुण्यातल्या सांगवडे गावात भेसळीच्या दारूने काहीजण मेले; पण जनक्षोभ उसळला नाही. दारुचे सर्व गुत्ते राजरोसपणे धंदा करीत होते. तिथे पिणाऱ्यांची गर्दी होतीच. शहरातून शंभर पावलावर परमिटरूम, देशी दारूचं दुकान, ताडीमाडीचं दुकान, चोरट्या दारूचा गुत्ता व घरगुती पिणाऱ्यांची सोय, निदानपक्षी बीअर तरी आहेच. आता दारूच्या जाहिराती राजरोसपणे करण्याचे धूर्त तंत्रही सरकारने 'मान्य'केले असल्याने जागोजाग दारूच्या मोहात पडा, असं सुचविणाऱ्या मोठमोठया जाहिराती दिसू लागल्या आहेत. त्या सोड्याच्या, ग्लासच्या असल्याच्या पळवाटा आहेत. पण ज्यांना खुणवायचे, मोहावयाचे, जाळ्यात आणायचे आहे त्यांच्यापर्यंत 'योग्य' संदेश देण्याचं काम त्या प्रभावीपणे करतात, हेही आपण बघत आहोत. दारुशी जमवून घ्या, असेच जणू आम्हाला सांगितले जात आहे. असे हे झिंगलेले वातावरण! 

असंच पांडवनगरातल्या महिलांनी आपण काय करू शकतो, हे दाखवून दिलंय. एक दिवस या बायका उठल्या आणि वस्तीतल्या दारुगुत्त्यावर कोसळल्या. काही कळायच्या आत बायकांनी दारूगुत्ते फोडले आणि वस्तीत दारू विकायची नाही, असं गुत्तेवाल्याला सांगितलं. पांडवनगर दारूपासून मुक्त झालं. नवरे, तरुण पोरं बिथरली. बायको, बहिणीला आईला जाब विचारू लागली. पण त्यांचा सारा जोर बायकांनी ओळखला होता. काही नवरोबांनी मारहाण करून, शिवीगाळ करून बायकांना नमवण्याचा प्रयत्न केला. पण वस्तीत दारू विकू देणार नाही, घराच्या माणसाला दारू प्यालेल्या अवस्थेत घरात येऊ देणार नाही, हा निर्धार बायकांनी केला. निग्रहाने पुढे रेटला आणि वस्तीचं रंगरूपच बदललं. 

दारू गुत्ताविरुद्ध ही लढाई या बायकांना घरातही लढावी लागत होती. पोलिसांकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रथम बायकांना दामटावण्याचा प्रयत्न केला. धंदेवाले असतील त्यांना पकडून हजर करा, असं बायकांनाच त्यांनी फर्मावलं. 'हे काम आम्ही करायचं तर तुमचं काय काम? कशासाठी तुम्ही इथं बसलात?' बायकांनी हा सवाल करताच हप्ते खाऊन निर्ढावलेल्या मंडळींच्या तुमानी खाली घसरताच त्यांनी निमूटपणे कारवाई करून गुत्तेवाल्यांचा बंदोबस्त केला.  इतर ठिकाणच्या महिलाही जागृत झाल्यानंतर मात्र या मोहिमा थंडावल्या. पोलिसांनी धाडी टाकून शंभराच्यावर दारुचे अड्डे उद्ध्वस्त केले. याचा अर्थ एवढे अड्डे होते, मग ते कुणाच्या हद्दीतले, कुठल्या अधिकाऱ्याच्या कार्यकक्षेत होते, याचा शोध घ्यायला पोलीस आयुक्तांना वेळ लागणार नव्हता. कायद्याच्या भाषेत 'ज्याच्या हातात ग्लास आणि बाटली तो आरोपी' त्यानुसार ज्याच्या हद्दीत हे अड्डे ते आरोपी ठरविले गेले पाहिजे, पण ते होणे नाही, पांगरमल इथल्या या घटनेतून केवळ दिखाऊ कारवाई नको. मनुष्यवधाचा गुन्हा आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर का नको? गृहराज्य मंत्री राम शिंदे यांचा हा जिल्हा ते इथे अशा प्रकारची कारवाई करण्याचे धाडस दाखवतील काय?
-हरीश केंची,

*प्रक्षोभाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!*

*प्रक्षोभाची धुरी पेटवा, दडलेल्यांना बाहेर खेचा...!*


इन्ट्रो
"दूरचित्रवाहिन्यांच्या विविध वाहिन्यांवरून गुन्हेगारविषयक कार्यक्रम सादर केले जातात. या साऱ्याच कार्यक्रमातून एखादी दुसरी घटना सोडली तर, व्याभिचाराच्या, वासनाकांडाच्या आणि बलात्काराच्या बातम्यांच प्रामुख्याने आढळून येतात. देशात आणि राज्यात अशा अनैतिक, व्याभिचार, लैंगिक अत्याचाराचे प्रमाण वाढत असताना नांदेड इथल्या केला महिलेवर अत्याचार करुन तिच्या देहाची विटंबना करीत गटारीत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला. या प्रकाराने उभा मराठवाडा हादरून गेला. यापूर्वी घडलेल्या कोपर्डी वा इतर घटनांपेक्षा अत्यंत भयानक अशी ही घटना आहे. नांदेडच्या जनतेने बंद पुकारुन आपल्या भावना किती तीव्र आहेत हे दाखवून दिलं आहे. अद्याप सरकार मात्र ढिम्म आहे. ते नराधम अद्यापही उजळ माथ्याने फिरताहेत."

मीना नक्का ही गरीब घरातील सुस्वरूप तरुणी, पोटाची खळगी भरण्यासाठी विड्या वळण्याचे काम करीत होती.नांदेडातल्या नल्लागुट्टा चाळ येथे राहणारी ही तरुणी २४ जानेवारी रोजी तयार केलेल्या विड्या कारखान्यात देऊन परतत असताना भरदुपारी दीड वाजता तिचे अपहरण करण्यात आले. तिला मिळालेल्या मजुरीचे पैसे, अंगावरचे दागिने लुटण्यात आले, तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. एवढंच करून ते नराधम थांबले नाहीत, तर तिचा खून केला आणि तिला विवस्त्र करून तिचा मृतदेह पक्कीचाळ परिसरातील गटारात फेकून दिला. घरी न परतल्याने तिच्या पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला अखेर ती हरविल्याची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली. प्रजासत्ताकदिनी तिचा मृतदेह आढळून आला. लोकांनी संताप व्यक्त केला. प्रक्षोभ उसळला. पोलीस तपास करतील अशी आशा होती पण ती फोल ठरली, अखेर नांदेडमधील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी १२फेब्रुवारीला कडकडीत बंद पुकारला. पण आज अखेर कुणालाच अटक झालेली नाही.

जे हरामखोर या वासनाकांडात गुंतले आहेत, त्यांना जगणे हराम व्हावे, एव्हढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज पुढे यायला हवा. स्त्रियांच्या असहायतेचा गैरफायदा उठवणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणेच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजाने का घेऊ नये, जे कोणी पोलीसांच्या हातात न सापडता  सोज्वळता मिरवत बसले आहेत त्यांना महिलांनी, समाजाने गुपचूप चढाई करून 'बडवून' काढले तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, तर भेकडपणे या अशा प्रकरणी आपले सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांनाही आनंद होईल.

बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरचीच्या पेटवून धुरी दिली जाते. जनप्रक्षोभाची धुरी धगधगत ठेऊन बिळात दडलेल्या बलात्काऱ्याना, अत्याचार करणाऱ्याना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर आल्या तर अशांची पळता भुई थोडी होईल. नांदेड प्रकरणात निकराने धक्का देण्याइतपत ताकद निश्चित आहे पण जनतेची सुरक्षा ज्यांच्या हातात आहे त्यांची मानसिकता काय आहे. देशाला कडक शिस्तीचे धडे देणाऱ्या शंकरराव चव्हाण यांचे हे नांदेड शहर एवढ्या अधोगतीला जावं ही चिंताजनक बाब आहे. ही घटना काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे.


दिल्ली, मुंबई इथे अशी प्रकरणे घडली की, प्रसिद्धीमाध्यमे अशा बाबी रवंथ करीत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागला आहे. सर्वच ठिकाणी महिलांनी असा संताप दाखवायला हवाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहिरपणे बोबं ठोकून अत्याचाराला अद्दल घडविण्याची हिंमत मुलींनी, महिलांनी दाखवायला हवी. अशा दुर्दैवी अत्याचाराला बळी पडलेल्या मुलीला मनाची उदारता दाखवून आपली म्हणणारे तरुण पुढे यायला हवेत. आईबापांनीही अशा कामात दिलदारपणे मुलांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवे. गुंड सरकार आणि पोलीस यांची हातमिळवणी असल्यामुळेच असले प्रकार घडतात. महिलांना बरबाद करणाऱ्या विरुद्धही संतापाने खदखदत हजारो लोक रस्त्यावर आले तर पोलीस त्यांच्यावरच लाठी उगारणार मग या महिलेला न्याय देणार कोण? हा नीच प्रकार करणाऱ्याच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, आमचे कोण वाकडे करणार? आम्ही सगळे दडपू शकतो अशी खात्री असल्यानेच हे सारे नराधम बेफाम बनले आहेत.कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो, लोकांना धमकावू शकतो, आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरून घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारेच वापरायचे असते असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासावणाऱ्या, लांच्छनास्पद प्रकाराबाबत सत्ताधारी आणि सत्ताकांक्षी राजकीय पक्ष मात्र मूग गिळून गप्प आहेत. मोठा गाजावाजा  करीत महिलांच्या विकासाचं धोरण, उद्धाराचा वसा घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना या प्रकारणाचं काही सोयर सुतक दिसत नाही.

समाज दिवसेंदिवस विकृत होतोय काय असं वाटतंय. संवेदनाच साऱ्या संपल्या आहेत असे चित्र आहे. संस्कारी समाज कुठे हरवलाय? अनेक गुन्ह्यात सिनेमांपासून प्रेरणा घेतल्याचं तपासात आढळून येतंय. हिंदी सिनेमासृष्टी जणू समाज विध्वंसक लोकांच्या स्वाधीन झालाय. तस्करांचा, गुंडांचा, लबाडांचा पैसा आणि त्यांना विविधप्रकारे मदत करणाऱ्यानाच दिला जाणारा वाव याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. या चित्रपटातून जे काही दिसते ते समाजात कुठे आहे असा प्रश्न इतके दिवस पडत होता. कोपर्डी, नांदेड इथल्या या घटना, ही वासनाकांडे काही दिवसात धगधगली वा धगधगताहेत ती बघितल्यावर हिंदी चित्रपटांनी समाजमनांना किती विकृत वळण दिलंय हे दिसून येतंय. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली आणि त्या मुलींना पळवून नेऊन त्याच्यावर बलात्कार करण्याची शक्कल खलनायकांनी दिली. तरुण तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी अशी झटका झटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत काय दडलंय हे तपासत आहेत. आपल्या खटिया जवळ सरकावत आहेत. ओले ओले, कोरडे कोरडे किंचाळत आहेत. हे सारे आपण मिटक्या मारत बघत आलो, घरातील टिव्हीपुढे आई, बाप, मुलं ह्या सगळ्यात रंगू लागली, तर घराचा सिनेमा कां नाही होणार? आपल्या मुलीला रस्त्यात गाठून लॉजवर मजा मारायला नेण्याचा प्रकार कां नाही घडणार? गुंड, सरकार आणि पोलीस यांच्याइतकेच आपणही या परिस्थितीला जबाबदार आहोत , हे का दडवायचं?
-हरीश केंची

*शिमगा, शिवी आणि ओवी...!*

 *शिमगा, शिवी आणि ओवी...!*

इन्ट्रो........

"सोनोपंत दांडेकर, साखरे महाराज, म. शं. गोडबोले अशा माऊलींच्या अभ्यासकांनाही ज्ञानेश्वरीत शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातुरमातुर अर्थ लावला असं म.वा.धोंड यांचे म्हणणे आहे. शिव्या देणाऱ्यांना 'तुझ्या आईला' या शब्दापासून सुरु होणाऱ्या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. 'तुझ्या आईला' ही सुरुवात आणि तीन शब्दांचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरं पतिखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांची फैरी झाडली जाते. धोंड याला 'कुमार क्रोध क्षोभण' मंत्र म्हणतात. कुमार म्हणजे पुत्र आणि बीजाक्षरे म्हणजे 'तुझ्या आईला' या शब्दापासून सुरु होणाऱ्या शिव्या! असे धोंडांच विवेचन आहे. ते प्रत्यक्षात वाचल्याशिवाय शिव्या आणि त्याचा दर्जा याचे ज्ञान प्राप्त होणार नाही.अशिष्ट भाषा न वापरता शिष्ट मंडळी एखाद्याचा कसा आणि किती उद्धार करतात हे ह्या शिमग्याच्या मुहूर्तावर समजून घ्यायला काय हरकत आहे?"




*होळी रे होळी, पुरणाची पोळी।*
*साहेबाच्या xx वर बंदुकीची गोळी।*
*साहेब मेला संध्याकाळी...*
यासारखी आणि
*होळीच्या गौऱ्या पांच पाच,*
*चल ग पोरी नाच नाच...*
अशी कवनं होळीच्या दिवशी घुमायची, गळ्यात ढुमकं बांधून जाम धांगडधिंगा व्हायचा. आता काळाच्या ओघात हे वातावरण फारसं दिसत नाही.गाण्याच्या भेंड्या जशा लावल्या जातात, तशा शिव्यांचा भेंड्या लावल्या जात होत्या. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. होळीच्या काळात शिव्यादेखील 'बुरा न मानो होली है' असं म्हणत म्हटल्या जात. शिवी आणि ओवी या दोघात एका अक्षराचा काय तो फरक! ओवी संतांची म्हणजे सज्जनांची आणि शिवी दुर्जनांची, असा सर्वसाधारण समज आहे.

माऊली म्हणजे ज्ञानेश्वर महाराज! अमृताशी पैजा जिंकणारी स्पर्धा करेल अशी शब्दकळा त्यांना अवगत होती. ज्ञानेश्वरांच्या या शब्दकळेत शिव्या होत्या का? याचा शोध मात्र घेतला गेलाय. या माऊलीनं कुणाला दुखविण्याचा प्रश्नच नव्हता. पण ज्ञानेश्वरांनी विषयलंपटांना आपल्या शैलीतून शिव्या दिल्या आहेत. असं काही विद्वानांनी शोधून काढलंय. स्व.डॉ. रा.चिं ढेरे यांनी 'शिवी आणि समाजेतिहास' या त्यांच्या लेखात अगदी शिवीच्या उगमापासूनचा इतिहास सांगितलाय. मराठीतल्या अनेक शिलालेखात गाढवांचा उपयोग करुन शिव्या दिल्याचे दिसते. याला गधेगाळ असे नाव असून , हे गधेगाळ शब्द आणि शिल्प दोन्ही रुपात शिलालेखातून साकारलेले दिसते. आई, बहिणींचा आणि गाढवांचा संबंध शब्दरूपात आणि शिल्परूपात व्यक्त करण्याची ही परंपरा केवळ प्राकृत नाही. सुसंस्कृत आहे. वसईतल्या एका शिलालेखात गाढवांवरोबर घोड्यांचाही वापर करण्यात आलेला आहे. रा.चिं ढेरे यांनी आपल्या लेखात ज्ञानदेवांनी 'खर' या दृष्टांताच्या परिच्छेदात जे सांगितलंय त्यातला काही भाग हा असा आहे. शिमग्याच्या काळात उगाच अटक मटक फास्टफूड वळणाच्या शिव्या खूप ऐकायला मिळतात. पण माऊलींची शैली ती माऊलींची शैली. ज्ञानदेवांच्या 'खर' या दृष्टांतात  ढेरे म्हणतात, 'साच आणि मवाळ, तसेच मितले आणि रसाळ' असे अमृताकल्लोळासारखे शब्द त्यांच्या मुखातून स्रवत होते ते ज्ञानदेव, ऋजुता आणि मधुरता यांचा प्रकर्ष ज्यांच्या वाणीत आहे ते ज्ञानदेव, आपल्या रसनेला शिव्यांचा स्पर्श होऊ देणार नाही, असे आपणास वाटणे साहजिक आणि स्वाभाविक आहे. विशेषतः ज्यांनी सात्विक संतापही कधी जवळ केला नाही, खळाची खळाळता सांडावी याचसाठी ज्यांनी करुणेची शिंपण केली, ते कुणाला शिव्या देतील अशी कल्पनाही करवत नाही. परंतु आपल्या या अपेक्षेला ज्ञानदेवांच्या मृदू, मधुर वाणीनेही एक सौम्यसा धक्का एकदा दिलेला आहे. तेराव्या अध्यायात अज्ञान विवरणप्रसंगी विषयासक्तीचे वर्णन करताना ज्ञानदेवांनी म्हटले आहे.
खरी टेंको नेंदी उडे।
लातौनी फोडे नाकाडे।
तऱ्हा जैसा न काढे। माघौता खरु।।
तैसा जो विषयांलागीं।
उडी घाली जळातीये आगी।
व्यसनाची अंगी। लेणी मिरवी     
(गाढवीन गाढवाला स्पर्श करू न देता , उसळून मागील लाथेने त्याचे नाकाड फोडते. तरीही, ज्याप्रमाणे गाढव मागे सरत नाही, त्याप्रमाणे विषयासक्त पुरुष जळत्या आगीसारख्या स्त्री देहाचा उपभोग घेण्यासाठी झेपावतो आणि त्या भोगातून प्राप्त होणारी संकटेही शरीरावरील अलंकारासारखी मिरवतो...)

हा दृष्टांत म्हणजे ज्ञानदेवांनी विषयलंपटांना दिलेली एक तिखट शिवीच आहे. 'लोकसाहित्याचा शोध आणि समीक्षा' या ढेरे यांच्या या पुस्तकातला लेख त्यासाठी महत्वाचा वाटतो. शिव्या देण्यासाठी त्या याव्या लागतात. आणि त्या नुसत्या याव्या लागत नाही, तर त्या कळाव्याही लागतात. त्याशिवाय त्यात ठसका आणि झटका येत नाही. मोठमोठ्या विद्वानांनासुद्धा शिवी कळत नाही. ज्ञानदेवासारखे शब्दप्रभु जेव्हा शिवी देतात वा कुणी दिलेली शिवी सांगतात, तेव्हा तर, ज्ञानेश्वरीची वर्षानुवर्षे पारायणे करणारे, ज्ञानेश्वरीवर प्रवचन ठोकणारे आणि समीक्षक म्हणून सदासर्वदा काहीतरी खरडणारेसुद्धा साफ चकतात. त्यांना त्या शिवीतले xx सुद्धा कळत नाही. तुम्हाला गंमत वाटेल, पण ज्ञानेश्वरीत एक महान शिवी असल्याचं ज्येष्ठ समीक्षक म.वा.धोंड यांनी शोधून काढलंय. ही महान शिवी स्पष्ट करून सांगण्यासाठी त्यांनी एक लेखच लिहिलाय. 'ज्ञानेश्वरीतील लौकिकसृष्टी' या पुस्तकात या लेखाचा समावेश आहे. ज्ञानदेवांची महान शिवी सांगताना त्यांनी ज्ञानदेवांच्या काही लहान शिव्यांचे दाखलेही 'ज्ञानेश्वरी' मधून शोधून काढलेत. त्यात ढेरे यांनी शोधलेला 'खर' दृष्टांत नाही. पण राजा धृतराष्ट्राला ज्ञानेश्वरांनी म्हैस म्हटलंय; ही एक शिवीच असं धोंड म्हणतात.असूर चुकूनही खरं बोलणार नाहीत. हे सांगताना 'ज्ञानदेवांनी त्यांच्या तोंडाला चक्क गांड म्हटलं आहे'. असं धोंड म्हणतात. आणि मग ज्ञानदेव तो अशिष्ट शब्द न उच्चारता नागरूपात तसं सांगतात, असा खुलासाही करतात. धर्मकृत्य हे ईहपरलोकी हितकारक असले तरी त्याचा डांगोरा पिटल्याने ते सत्कृत्य अहितकारी ठरते, हे स्पष्ट करताना त्या डांगोऱ्याला ज्ञानदेव स्वतःच्या जननीस चव्हाट्यावर नागवे करण्याची उपमा देतात....

'जैसी आपुली जननी।
नग्न दाविलीय जनी।।'
ही गोष्ट धोंड नोंदवितात आणि मग या सर्वांहून भारी म्हणजे महान शिवी कोणती, याकडे वळतात.
तेवीं कुमारु क्रोधु भरे।
तैसेंयां मंत्राची बीजाक्षरे।
तिथे निमित्ये ही अपारे। भिनलिया।।
परिधाता ही पाया पडता।
नुढी गतायू पांडुसुता।
तैसे नुपजे उपजीविता क्रोधोर्मी तो ।। (१२०/८)
या दोन ओव्यात ही महान शिवी दडलीयं. सोनोपंत दांडेकर, साखरे महाराज, म. शं गोडबोले अशा माऊलींच्या अभ्यासकांनाही ही शिवी गवसली नाही. त्यांनी त्याचा थातूरमातूर अर्थ केला. असे धोंड यांचे म्हणणे आहे. शिव्या देणाऱ्यांना 'तुझ्या आईला' या शब्दापासून सुरु होणाऱ्या शिव्या कशा झटपट तोंडातून निघतात, हे सांगायला नको. 'तुझ्या आईला' ही सुरुवात आणि तीन शब्दाचा शेवट या आठ अक्षरात निरनिराळी जनावरे, पतीखेरीज दुसरा पुरुष अथवा जे सुचेल, वाटेल ते घालून शिव्यांच्या फैरी झाडल्या जातात. राजकारणात वापरल्या जाणाऱ्या शिव्या म्हणजे पोरखेळ आहे. अस्सल शिव्या कशा द्यायच्या याचं शास्त्र आणि शस्त्र या किरकोळ मंडळींना पेलणार नाही. महात्मा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक, आगरकर, अच्युतराव कोल्हटकर, भालाकार भोपटकर, दिनकरराव जवळकर, प्रबोधनकार ठाकरे, आदी खानदानी घराणी या क्षेत्रात मराठदेशी होऊन गेले आहेत. प्रत्येक गोष्ट संस्कृती, परंपरेच्या अभ्यासासाठीच असते. असे भासवणाऱ्या चमनगोट्यांना स्मरून सांगतो. शिवीगाळीसारखा निंद्य सामाजिक आचारही सांस्कृतिक परंपरेचा वेध घेण्यासाठी कसा अभ्यासनिय आहे हे यावरून लक्षात यावे म्हणून शिमग्याच्या निमित्ताने हे कवित्व...!
- हरीश केंची.

Friday 3 March 2017

मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे!

*मतलबी राजकारण्यांची पलटणच उभी आहे*

"कर्मकांडाच्या, पुरोहितशाहीच्या, जन्माधिष्ठित उच्च नीचतेच्या, विषमतेच्या चक्रव्यूहात राष्ट्रीय पुनरुत्थानाच्या नावाने कुणी समाजाला गुंतवू बघत असेल तर त्याचा प्राणपणाने मुकाबला करण्याची तयारी पुरीगामी विचारांवर श्रद्धा ठेवणाऱ्यांना करावीच लागेल. उत्तर पेशवाईचा उल्लेख कुणी केला की काही मंडळींना कळमळायला होतं. रयतेच्या रक्षणाची, उदरनिर्वाहाची जबाबदारी न पाळण्याचा, फुकटखाऊ, भिक्षुक, उनाड बाया यांचे तांडे पोसण्याचा प्रकार करणारे राज्यकर्ते होऊन गेले याची आठवण काढण्याने जर कुणाला दुःख होत असेल तर अशी वेळ समाजावर पुन्हा येऊ नये याची खबरदारी या मंडळींनीच घ्यायला हवी."

          लोकसभेनंतर झालेल्या सर्व निवडणुकीत केवळ काँग्रेसचाच नव्हे तर सर्व समाजवादी विचारांच्या पक्षांचा दारुण पराभव झाला आहे. विचारसामर्थ्य शक्तिशाली असले तरी व्यक्तिदोषामुळे हा पराजय झाला आहे. आपसातले संघर्ष, ते मिटवण्याच्या नावाखाली चाललेली अटीतटी, दिलजमाईचे प्रदर्शन आणि कुजकी टोमणेबाजी यामधून काँग्रेसवाल्यांना बाजूला काढून पुरोगामी विचारापर्यंत आणण्याचे काम आज व्हायला हवे. सत्ता जिंकण्यासाठी देवाधर्माचा वापर करण्याचा, तो करता यावा म्हणून वेगवेगळ्या संघटना उभारण्याचा, त्यांच्याद्वारा श्रद्धावान भाबड्या जनसामान्यांना खोट्यानाट्या गोष्टी ऐकवून फितवण्याचा, विशिष्ट राजकीय पक्षासाठी त्यांना वापरण्याचा उद्योग या देशात पद्धतशीरपणे केला जातो आहे. जन्मजात उच्च-नीचतेविरुद्ध, विषमतेविरुद्ध, अंधश्रद्धा आणि अन्याय यांच्याविरुद्ध लढणाऱयांना आपसात लढायला लावण्याचा अथवा निष्क्रिय बनवून निरुपयोगी करून टाकण्याचा जोडधंदाही याच मंडळींनी प्रभावीपणे चालवला आहे. याला रोखण्याचे सामर्थ्य फक्त पुरोगामी विचारातच आहे. राजकारणात मतलब सांभाळणे ही बाब आता अनिवार्यच झाली आहे. एखाद्या व्यक्तीने आपल्या मतलबासाठी एका पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दुसरा घरोबा केला की, ती व्यक्ती उठवळ! पण एकमेकाला संपविणे हेच ध्येयधोरण असलेले दोन पक्ष जेव्हा मतलबासाठी एकत्र येतात तेव्हा? मतलबासाठी पक्षबदल करणाऱ्यात आदर्श म्हणवले जाणारे राजकारणीही आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल.

काँग्रेसपक्षाला या निवडणुकांतून फार मोठे अपयश आले. पण हे अपयश एकदम काँग्रेसच्या माथ्यावर कोसळलेले नाही. ते गेली दहा-पंधरा वर्षे एक एक पावलाने येतच होते. काँग्रेसने गरिबांशी, दलितांशी, उपेक्षितांशी, अल्पसंख्य समाजघटकांशी, समाजातल्या परिवर्तनाला सदैव निष्ठेने साथ देणाऱ्या मध्यमवर्गीयांशी प्रतारणा केली त्यामुळेच अपयश काँग्रेसला झोम्बु लागले. काँग्रेस धनिकांच्या दावणीला बांधली गेली आणि सदासर्वदा स्वार्थाचा रवंथ करणाऱ्या बैलांनी फक्त आपल्या गोतावळ्यापुरतीच काँग्रेस आहे असे वर्तन करुन काँग्रेसबद्दल जनमानसात अप्रिती वाढविली. काँग्रेस अशीच राहावी असा प्रयत्न करणारे महाभाग आजही आहेत. काँग्रेसला बदलावे लागेल. काँग्रेस पुन्हा लोकांची झाली नाही तर काँग्रेस नक्कीच संपेल. शाहू, फुले, आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या आचार-विचारातच काँग्रेसला पुन्हा सामर्थ्य देण्याची शक्ती आहे. काँग्रेसवाल्यांना या निकालांनी आपण पुरे झोपलो नाही हे दाखवून देण्याची संधी प्राप्त झाली. प्रचारादरम्यान मतलबासाठी चालवलेल्या आरोप प्रत्यारोपांनी आपले कापलेले नाक मिरवत वावरण्याचा उद्योग काँग्रेसवाल्यांनी चालविला होता. आपल्याच हाताने आपला गळा कापून घेण्याचे प्रयोगही केले गेले, अशावेळी आपल्या बगलबच्यांना टाळ्या वाजवायला लावले जात होते याकडे गांभीर्याने पाहिलेच गेले नाही. उत्तरकाळात पेशव्यांच्या नालायकीने मराठी सत्ता ग्रासली हे खरे; पण ह्या नालायक पेशव्यांना त्यांच्या तोडीस तोड नालायकी करणारे मराठे सरदारही आपल्या सर्व दुर्गुणासह पुरेपूर साथ देत होते. हा इतिहास झाकून ठेवता येणार नाही. आज उत्तर पेशवाईतल्या प्रमाणे सत्ताधारी रंगढंग दाखवत असतील तर त्याला कारण नांदेड, लातूर, सांगली, पुणे, सातारा, सोलापूर, नगर, बारामतीचे आपसात लढण्यात दंग असलेले काँग्रेसवालेच आहेत. या सगळ्यांनी लोकहितासाठी लढण्याचे, गोतावळ्यात गुंतून न पडण्याचे आणि सामाजिक समता, सहकार, समृद्धी यासाठी सर्वशक्ती वेचण्याचे ठरवले तर लोकही त्यांना साथ देतील.

पराभवानंतर झालेल्या आत्मचिंतनात 'आपण सगळे सध्याच्या परिस्थितीत जागरूक आणि संघटित राहिल्यास राज्यातील सत्तेत फसगतीने झालेला तात्पुरता बदल दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाही'. असे म्हटले गेले. यातल्या 'आपण सगळे' याची व्याप्ती केवढी? 'आपण सगळे' ही भावना घेऊन काँग्रेस खरोखरच उभी राहणार आहे? दिलजमाई पर्व सुरु असताना कळवळून 'निदान भांडणासाठी तरी काँग्रेस शिल्लक ठेवा' असं विलासरावांनी म्हटलं होतं याची आठवण झाली. लोकांना झुळविण्यासाठी देवाधर्माचा उपयोग करण्याचे तंत्र साधलेली मंडळी भावनांचा प्रक्षोभ घडविणारे नाना विषय स्वतः नामानिराळे राहून उपस्थित करणार आहेत. काशी-विश्वेश्वर आणि मथुरेच्या श्रीकृष्णापासून गल्लीतल्या मारुती गणपतीपर्यंत देवांचा वापर करून लोकांच्या भाबड्या श्रद्धांना हात घातला जाईल. नको ते घडविले जाईल. हा देश, समाज आपल्या महत्वाकांक्षेपायी भरडून टाकण्याची टोकाची भूमिका घेतली जाईल. हे तुफान रोखण्यासाठी दिलजमाई व्हायलाच हवी. हातात हात गुंफून दृढ विश्वासाने उभे राहण्यासाठी लोक पुढे यायला हवेत. माणसे जोडली जायला हवीत. महात्मा गांधींनी देशाच्या कानाकोपऱ्यात 'करेंगे या करेंगे' ही जिद्द जागवली तशी जिद्द जागवायला हवी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण गमावलेल्या माणसात जो आत्मविश्वास, स्वाभिमान जागवला तसा आत्मविश्वास, स्वाभिमान पुन्हा जागवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न व्हायला हवेत. महात्मा फुले यांनी ज्या त्वेषाने अन्यायाला टकरावर टकरा देऊन समानतेचे वारे समाजात खेळते ठेवले ती तडफ लोकांत निर्माण होईल असे वातावरण जाणीवपूर्वक ठेवण्याचे भान आपण दाखवले पाहिजे. काँग्रेसवाल्यांच्या वृत्तीत बदल घडला तर सत्तेत बदल घडणे कठीण नाही. पुरोगामी विचारात जनआंदोलन उभे करण्याची ताकद आहे. रामकृष्णांना रथात घालून भाजपेयींनी दौड केली. शिवाजी महाराजांना शिवसेनेच्या मावळ्यांनी कडेकोट किल्ल्यात ठेवलंय. आंबेडकरांना दलित दुसऱ्या कुणाच्या हाती लागू देत नाहीत. महात्मा गांधींना आपण कधीच 'हे राम' म्हणायला लावलंय. आता काँग्रेसला आधार केवळ या विचारांचाच आहे.
- हरीश केंची,

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...