Saturday 26 May 2018

सत्तेचं खूळ आणि लोकशाहीचा खुळखुळा!

"सत्तेचं खूळ जसं सुरीही न हाताळणाऱ्याला तलवारी फिरवण्याची नाटकं करायला लावतं, तसंच शरीराची ऐशी की तैशी झालेल्यांना देखील 'स्टार'ही बनवतं. कर्नाटकातील 'सत्तामिठी'च्या निमित्तानं हे पुन्हा एकदा दिसून आलं. सत्तातुरांना भय आणि लज्जा नसते, असं सुभाषित आहे. हे सुभाषित बहुतेक राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या बाबतीत खरं ठरत आलंय. अलीकडे भाजपनं हे सुभाषित जणू सुविचारासारखं जपलंय. पूर्वानुभव असताना देखील भाजपनं बहुमत नसताना कर्नाटकात येड्डीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली आणि लोकशाहीचा पार खुळखुळा करून टाकला! आम्ही सर्वत्र सत्ता स्थापन करू शकतो, हा संदेश देण्यासाठी त्यांनी लावलेला पाट अपेक्षेप्रमाणे औटघटकेचा ठरला. पूर्वी सत्तेच्या गाढवावर बसून त्यांना ब्रह्मचर्य जपायचं होतं, तथापि आता सत्तेचे गाढव  हुसकून गेले आणि तत्वांचं ब्रह्मचर्यही रस्त्यात सांडलं आहे!"
-----------------------------------------------

*भा* जपला या पतनातून दक्षिण भारतात पुन्हा कमळ फुलण्याची आशा वाटतेय. उत्तरपंथी विचारांचा तो एका टप्प्यावरचा विजय वाटतोय. मात्र अशा आत्मसमाधानातून वास्तव बदलेलच असं नाही. कारण भारताची राजकीय, सामाजिक धाटणी प्रदेशनिहाय वेगवेगळी आहे. उत्तर आणि दक्षिण भारताचा राजकीय बाज पूर्णपणे वेगळा आहे. उत्तरेत जे पिकतं, ते दक्षिणेत विकलं जात नाही. मात्र बऱ्याचदा दक्षिणेत जे पिकतं, ते मात्र उत्तरेत विकलं जातं. कर्नाटकात ज्यावेळी जनता दल वा जनता पक्ष यांचं सरकार येतं, त्यानंतर तशीच प्रक्रिया बिहार, उत्तरप्रदेश, हरियाणा अशा उत्तरेकडील राज्यात आणि इतरत्र घडू शकतं. केरळात कम्युनिस्टांचं सरकार आल्यानंतर तसंच राजकीय चित्र पश्चिम बंगालमध्ये प्रत्यक्षात अस्तित्वात आलं. तथापि, मध्यप्रदेशात भाजपचा मुख्यमंत्री झाला म्हणून त्याची पुनरावृत्ती दक्षिणेतल्या चार राज्यांत झालेली नाही. हा इतिहास आहे हे मुळातून पाहावं लागेल.

*सांस्कृतिक भिन्नता, भेदाचं मुख्य कारण*
उत्तरेत पिकलेलं दक्षिणेत विकलं न जाण्यास अनेक कारणं आहेत. मुख्य कारण सामाजिक स्वरूपाचं आहे. दक्षिण भारतातील बहुसंख्य जाती अगदी ब्राह्मणसुद्धा, स्वतःला आर्यावर्ताचं गुलाम होणं मान्य करीत नाहीत. आर्यावर्ताला दक्षिण भारतानं प्राचीन काळापासून विरोध केला आहे. उत्तर आणि दक्षिण भारतात सांस्कृतिक भिन्नता, भेदाचं मुख्य कारण आहे. या संबंधात तामिळनाडूत द्रविडांनी मोठी सांस्कृतिक चळवळ उभी केली होती. तिची परिणती उत्तर भारताच्या टोकाच्या विरोधात झाली आहे. परिणामी, हिंदी भाषेच्या विरोधात दक्षिणेकडील राज्यात मोठं आणि हिंसक आंदोलन झालं. ज्या पक्षाची म्हणजे भाजपची हिंदी हीच लोकांशी संवाद साधण्याची भाषा आहे. ज्यांची सांस्कृतीकता आर्यधर्माचं अनुकरण करणारी आहे. तो पक्ष दक्षिण भारतीयांच्या दृष्टीनं निव्वळ त्याज्य नाही तर अस्पृश्यही मानला जाणं स्वाभाविक आहे. कथित भाजपची सांस्कृतिक आणि भाषिक अडचण नेमकी हीच होती. आज त्यांनी 'दक्षिणायणा'चा प्रयत्न चालवलाय, हाती केंद्राची सत्ता असल्यानं त्यांनी काही प्रयोग आरंभलेत. त्यांचा परिणाम किती साधला जातोय हे आगामी काळात महत्वाचं ठरणार आहे.

*उद्भवलेल्या दंगली पक्षवाढीला पूरक ठरल्या*
भाजपला सर्व भारताचं सत्ताधीश व्हायचं आहे. त्यामुळेच नागालँडपासून पॉंडेचरीपर्यंत हा पक्ष दखलपात्र नसला तरी, त्यांच्या राज्य शाखा अस्तित्वात आहेत. एकेकाळी भाजपच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ आणि तामिळनाडू या राज्यशाखा तशा गोवा शाखेच्या तोडीच्याच होत्या. पक्षानं ही कोंडी फोडण्याचं ठरवलं. अयोध्येत 'मंदिर वही बनाऐंगे'ची चळवळ त्या पक्षाला दक्षिण भारतात वाढण्यासाठी उपयुक्त ठरली नाही. मात्र त्यानंतर उद्भवलेल्या दंगली या पक्षाच्या वाढीसाठी निश्चितच उपयुक्त ठरल्या. हुबळीच्या ईदगाह मैदानाचा प्रश्न आणि कोईमतूरच्या बॉम्बस्फोटानंतरच्या दंगली पक्षवाढीला पूरक ठरल्या. त्यानंतर या पक्षानं दक्षिणेतील चारही राज्यांच्या विधानसभेत खातं उघडलं. दक्षिण भारतीय ब्राह्मण समाजाला 'राष्ट्रवादी' बनवलं. कर्नाटकातील लिंगायत आणि तामिळनाडूतील द्रविडी, त्याचबरोबर आंध्रातील मागास जातींना आपल्या प्रभावाखाली आणलं. ठिकठिकाणी मिनी नरेंद्र मोदी, अमित शहा, कल्याणसिंह तयार केले. पूर्वी दक्षिण भारतात भाजप नगण्य होता. म्हणजे महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानात कम्युनिस्टांची जी अवस्था होती, दक्षिणेत भाजपची स्थिती तशीच होती ती हळूहळू बदलत गेली. रा.स्व.संघाचे नेटाने प्रयत्न आणि भाजपने बहुसंख्य जातीचा अनुनय यातून कर्नाटकात लिंगायत समाजातील बी.एस.येड्डीयुरप्पा, जगदीश शेट्टीर निर्माण झाले. आंध्रप्रदेशात बंगारु लक्ष्मण, बंडारू दत्तात्रय, व्यंकय्या नायडू तयार केले. भाजपच्या संघटनात्मक प्रयत्नांच्या बरोबरीनं कर्नाटकात जनता दल-काँग्रेस आपल्या वर्तनामुळे एकसारखेच असल्याचं चित्र निर्माण होत होतं. तामिळनाडूतील  द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्या नालायकीपुढं भाजप लायक असल्याचं काही लोक मानू लागले. केरळातील डाव्यांच्या आणि काँग्रेसच्या जातीय राजकारणाच्या अनुनयाने भाजप हिंदूंचा पक्ष असल्याचं चित्र काही काळापुरतं निर्माण झालं. परिणामी दक्षिण भारतात भाजपला राजकीय आधार मिळाला. दक्षिणेतल्या चार राज्यांपैकी कर्नाटकात आपलं बियाणं लवकर उगवेल असं भाजपला नेहमीच वाटत आलंय. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यामुळं भाजपला तिथल्या संसदीय राजकारणात यश येण्यास सुरुवात झाली. १९९८ ते २००४ या काळात आणि त्यानंतर आता केंद्रसत्तेच्या आधारानं भाजपनं कर्नाटकात पक्ष वाढविण्यासाठी सरकारचा आणि पक्षाचा खजिना खुला केला. भाजपच्या केंद्रातील सत्तेला कर्नाटकात प्रभाव असणाऱ्या कोणत्याही पक्षाचा पाठींबा नसल्यानं त्यांना तिथं मोकळं रान मिळालं!

*वातावरणाचा लाभ भाजप घेत गेला*
कर्नाटकातला राजकीय इतिहास मोठा गंमतीशीर आहे. तसं पाहिलं तर भाजप त्याच्या तत्वज्ञानाच्या दृष्टीनं प्रतिकूल असणाऱ्या भूमीत पीक घेण्याचा प्रयत्न घ्यायला गेला. त्यावेळी कर्नाटकातील त्यापूर्वीचे वहिवाटदार नालायक ठरत होते. काँग्रेसच्या निजलींगप्पा, वीरेंद्र पाटील, जनार्दन पुजारी, यांची पिढी राजकीयदृष्ट्या संपत आली होती. रामकृष्ण हेगडेंचा राजकीय अंत अत्यंत शोचनीय पद्धतीनं झाला होता. एस. बंगारप्पा आणि त्यांच्यासारखे अनेकजण बाद झाले होते. हेगडे-बोम्मईंचा जनता पक्ष, जनता दल नावाचा ब्रँड भूमिपुत्र म्हणवणाऱ्या एच.डी.देवेगौडांच्या मालकीचा झाला होता. अशा वातावरणात भाजप हा 'डिफ्रंट' असल्याचं कन्नडीगांना वाटू लागलं. आणि १९९९ च्या निवडणुकीत या पक्षाची आमदार संख्या ३२ झाली. १९९९ ते २००४ या राज्यात काँग्रेसची सत्ता होती. पांच वर्षे एस.एम.कृष्णा यांचं राज्य होतं. दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश नंतर काँग्रेसनं मुख्यमंत्री न बदललेलं हे आणखी एक राज्य. कृष्णा यांचं राज्य वरकरणी स्थिर होतं. पक्षात बंडखोरी माजली नव्हती. तथापि काँग्रेसचा जनाधार कमकुवत झाला होता. देवेगौडांचा निधर्मी जनता दल हा पक्ष सत्ताविरोधी लाट निर्माण करीत होता. त्या वातावरणाचा लाभ भाजपसारखा पक्ष अपेक्षेपेक्षा जास्त घेत गेला. परिणामी, २००४ च्या निवडणुकीत काँग्रेसला सत्ता गमवावी लागली.

*देवेगौडांभोवती कर्नाटकाचं राजकारण फिरतेय*
निवडणुकीचे निकाल कोणत्याही एका पक्षाच्या बाजूनं नव्हते. आजच्या सारखीच त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे ७९ जागा मिळाल्या. काँग्रेसला ६५ आणि देवेगौडांच्या जनता दलाला ५८ जागा मिळाल्या होत्या. सत्तेची चावी तेव्हाही देवेगौडांच्या हाती राहिली. तोपर्यंत देवेगौडांना काँग्रेस आणि भाजप हे समान अंतरावरचे पक्ष वाटत होते. चर्चेअंती त्यांनी काँग्रेसशी युती करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी एस.एम.कृष्णा यांच्या ऐवजी अन्य नेता हवा होता. ती मागणी त्यांनी मंजूर करून घेतली. काँग्रेसचे धरमसिंह मुख्यमंत्री झाले. देवेगौडांचे त्यावेळचे विश्वासू सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री झाले. तथापि देवेगौडा आणि त्यांच्या पुत्रांना हे सत्तेचं वाटप पचनी पडलं नाही. देवेगौडांच्या पुत्रांनी वेळ येताच धरमसिंह यांचं सरकार पाडलं. त्यानंतर राज्यात प्रथमच भाजपला सत्तेचे भागीदार करीत देवेगौडापुत्र कुमारस्वामींनी मुख्यमंत्रीपद मिळवलं. भाजप आणि जनता दल यांची संयुक्त सत्ता म्हणजे दोन ऍसिडचं मिश्रण होतं. दोघांचे गुणधर्म वेगळे होते. ते एकजिनसी होणं शक्यच नव्हतं. दोघांत प्रत्येकी २० महिने मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचा करार झाला होता, पण पहिले वीस महिने पूर्ण होताच मुख्यमंत्री कुमारस्वामींनी सत्ता हस्तांतरण करण्यास नकार दिला. त्यामुळं भाजपनं त्यांचा पाठींबा काढून घेतला. पुन्हा फेरनिवडणुका घेण्याचा प्रसंग उदभवला. सर्वच पक्षाचे आमदार निवडणुकांना तयार नसल्याने आणि अत्यंत बेरकीपणे देवेगौडांनी पुन्हा भाजपशी तडजोड केली. बी.एस.येड्डीयुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ दिली. मुख्यमंत्रीपद सांभाळताच देवेगौडांनी आपलं खरं रूप दाखवून भाजपला तोंडावर आपटलं. देवेगौडा वेगवेगळ्या अटी मागण्या करीत राहिले. देवेगौडांच्या काही मागण्या मान्य करणं येड्डीयुरप्पाच काय कुणालाही शक्य नव्हतं. परिणामी हे सरकार विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्याआधीच आठवड्यात कोसळलं. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सिद्धरामय्या देवेगौडांच्या पुत्रप्रेमावर टीका करीत काँग्रेसमध्ये सामील झाले.

*इतिहासाची पुनरावृत्ती घडली!*
दरम्यान येड्डीयुरप्पा यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या अल्पकाळात केलेल्या त्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठली. भ्रष्टाचाराचे त्यांच्यावर आरोप झाले. ते सिद्धही झाले. त्यावेळी नितीन गडकरी हे भाजपचे पक्षाध्यक्ष होते, त्यांनी येड्डीयुरप्पा यांना पक्षातून काढून टाकलं. त्यानंतर येड्डीयुरप्पा यांनी आपली लिंगायत मोट बांधण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक जनता पार्टी नावाचा वेगळा प्रादेशिक पक्ष स्थापन केला. त्यानंतरच्या निवडणुकीत त्याचा फटका भाजपला बसला. सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या भाजपला केवळ चाळीस जागांवर समाधान मानावं लागलं. कर्नाटक जनता पार्टीचं भवितव्य काही नाही हे लक्षात येताच येड्डीयुरप्पा यांनी वेळीच आपला गाशा गुंडाळला. गडकरी यांच्यानंतर पक्षाध्यक्ष बनलेल्या राजनाथसिंग यांनी येड्डीयुरप्पा यांना भाजपत प्रवेश दिला. त्यानंतर २०१४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत येड्डीयुरप्पा खासदार बनले आणि मंत्री देखील! २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी कर्नाटकातल्या निवडणुका भाजपसाठी महत्वाच्या होत्या. त्यासाठी त्यांनी कर्नाटकातली पक्षाची सूत्र येड्डीयुरप्पा यांच्याकडं सोपविली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपला सत्ता जरी हाती लागली नाही तरी अपेक्षित यश मिळालं आहे. राज्यात सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष म्हणून निवडून येऊन देखील राजकीय खेळी खेळली गेली आणि भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागलं. याची सल मतदारांमध्ये आहे. हे ओळखून नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आता नवी पावलं टाकायला सुरुवात केलीय!

*मंजप्पा कडीकाळ हा आदर्श हवा!*
कर्नाटकच्या पूर्वीच्या म्हणजे जुन्या म्हैसूर राज्यात कडिडाळ मंजप्पा नावाचे मुख्यमंत्री होऊन गेले तेही फक्त दोन महिनेच मुख्यमंत्री होते. त्यांना स्वतःचं घरही नव्हतं. म्हैसूर राजाने त्यांना लाभार्थी-मिंधे बनविण्यासाठी एक एकर जागा देऊ केली होती. मात्र ती घेण्यास त्यांनी नकार दिला. राजकीय कटुता, दबाव वाढण्याआधीच पदाचा राजीनामा देऊ केला होता. त्यांच्याही पेक्षा कमी काळ विना बहुमत मुख्यमंत्रीपदावर राहिलेले येड्डीयुरप्पा तेवढ्या पात्रतेचे नक्कीच नाहीत. सत्तेच्या बाबतीत ते आणि त्यांचा पक्ष बेमुर्वत, निर्लज्ज आणि कोडगा आहे. त्यामुळंच असं घडलं.

चौकट....!

*आता मुख्यमंत्री येड्डीयुरप्पा नाही तर अनंतकुमार!*

कर्नाटकातील यशापयश हे भाजपेयींना, मोदी-शहा यांना अपेक्षित असंच होतं. ते हेच इच्छित होते. कर्नाटकातल्या निवडणुकांचा निकाल हाती येताच त्यांनी निश्चित करून टाकलं की, यापुढं 'येड्डीयुरप्पा यांना विश्रांती द्यायची!' कारण येड्डीयुरप्पा हे मोदी-शहा यांच्या मर्जीविरुद्ध मजबुरीनं कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनले होते. कुणाला आपल्या डावपेचांची शंका येऊ नये यासाठी त्यांना पुढं करण्यात आलं होतं. बहुमत नसतानाही त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावली. खरं तर राज्यपालांना सांगून ते शपथविधी  रोखू शकले असते. पण त्यांनी तसं केलं नाही. या प्रकारात मोदी-शहांची आणि राज्यपालांची फसगत झाली. पक्षाची बदनामी झाली. त्यानंतर या नाट्याचा परमोच्च बिंदू गाठला गेला. देशाच्या संविधानाची साक्ष काढत येड्डीयुरप्पा यांचा तिथं बळी दिला गेला. आता येड्डीयुरप्पा मैदानातून बाहेर फेकले गेलेत आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतूनही! मोदी-शहांच्या राजकीय  मांडणीनुसार सहा महिन्यानंतर सोबत असलेल्या काँग्रेसच्या पांच आमदारांशिवाय आणखी पांच-सहा आमदार खरेदी केले जातील. मोदींच्या धोरणानुसार वयाची पंचाहत्तरी गाठलेल्या अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना राजकारणातून बाद करीत विश्रांती दिली गेलीय. येड्डीयुरप्पा यांच्या वयानेही आता पंचाहत्तरी ओलांडलीय. या धोरणानुसार तशाचप्रकारे येड्डीयुरप्पा यांना सत्तेच्या पदांपासून दूर केलं जाईल आणि मोदींच्या विश्वासातले केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांची मुख्यमंत्रीपदावर वर्णी लावली जाईल. अनंतकुमार हे मागासवर्गीय आहेत. राज्यातील मतदारांनी काँग्रेसचा 'लिंगायतांना स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा निर्णय' असो वा 'कन्नड अस्मिता' जागविण्यासाठी वेगळा ध्वज प्रकाशित करणं असो त्याला साथ दिलेली नाही. त्यांनी भाजपलाच मतं दिली आहेत. तेव्हा आता  मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हे प्यादं कर्नाटकच्या राजकीय  पटलावर आणलं जाईल. हे सारं घडेल ते लोकसभा निवडणुकीपूर्वी! आज जशी वक्तव्य केली जाताहेत तशीच वक्तव्य यापुढंही केली जातील. राज्यपालही मोदींचेच 'व्हालाभाई' असतील. मग काय घोडं मैदान जवळच आलं म्हणून समजा! मोदींच्या पंतप्रधान काळात जी जी राज्ये हाती आली ती ती राज्ये त्यांनी आपल्या तरुण समर्थकांकडे सोपविली. मोदी पंतप्रधान होण्यापूर्वीपासून राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड इथे असलेले मुख्यमंत्री हे लालकृष्ण अडवाणी यांच्या मर्जीतले आहेत. त्यांनाही तिथल्या निवडणुकांनंतर बदलले जाईल. मोदी-शहा यांना पक्षात आणि या राज्यांमध्ये आपली स्वतःची टीम उभी करून २०१९ च्या लोकसभा निवडणुकांना सामोरं जायचं आहे. त्या जिंकण्यासाठीची व्युहरचना सध्या आखली जात आहे. हे लक्षांत घेतलं पाहिजे.

-हरीश केंची,
९४२२३१०६०९


Saturday 19 May 2018

भाजपेयींसाठी ही 'धोक्याची घंटा!'

"पंतप्रधान नरेंद्र मोदी दिग्दर्शित, राज्यपाल वजुभाई वाला अभिनित 'कर नाटका'त येडीयुरप्पा यांच्या डोक्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजमुकुट चढविण्याचा प्रयोग संपन्न झाला. कर्नाटकातल्या निवडणुकांनी भाजपच्या या यशाचं 'दक्षिणेचं प्रवेशद्वार' उघडलं गेलंय असा कितीही डंका भाजपेयींनी बडवला तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. तिथं त्यांना रोखलं गेलंय. हे लक्षांत घ्यावं लागेल. यापूर्वी झालेल्या बिहार, उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये झालेल्या पोटनिवडणूकांमध्ये भाजपला पराभव पत्करावा लागलाय हे विसरून कसं चालेल? ही सारी निर्माण झालेली परिस्थिती भाजपेयींना 'धोक्याची सूचना' ठरणारी आहे. मित्रपक्षांची सुटत चाललेली साथसंगत भाजपला अधिक घट्ट करण्याची गरज आहे, तसं झालं नाही तर देशात कडबोळी सरकार येईल आणि त्यानंतर अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही! याला जबाबदार भाजपेयींच असतील!"
----------------------------------------------

*भा* जपची सत्ता असलेल्या पांच प्रमुख राज्यात लोकसभेच्या २०० च्या जवळपास जागा आहेत. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत या राज्यातून एकट्या भाजपने यापैकी १७० जागा जिंकल्या होत्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह कितीही वल्गना करत असतील की, देशात २२ राज्यात भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाची सत्ता आहे. पण या पांच राज्यात पायाखालची वाळू सरकायला लागली तर इतर १७ छोट्या राज्यातील सत्ता काहीच कामाला येणार नाही. याशिवाय चंद्राबाबू नायडूंच्या तेलुगू देशमने सरकारमधून काढता पाय घेतलाय. ते कुठल्याही क्षणी एनडीएतूनही बाहेर पडू शकतात. दुसरीकडं महाराष्ट्रात २५ वर्षांहून अधिककाळ युतीत असलेली शिवसेना भाजपच्या वागण्यावर नाराज आहे. तिनं स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलाय. आज शिवसेनेच्या टेकूनं भाजपची सत्ता महाराष्ट्रात आहे. एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जर शिवसेनेनं घेतला तर भाजपच्या समोर मोठ्या अडचणी उभ्या राहू शकतात. अशीच परिस्थिती पंजाबात अकाली दलाची आहे. बिहारात मांझी एनडीएतून यापूर्वीच बाहेर पडलेत. आगामी काळ हा भाजपेयींसाठी कसोटीचा काळ आहे, असंच म्हणावं लागेल!देशातील पोटनिवडणुकांचा आणि आताच्या कर्नाटक राज्याचा निकाल आणि त्यानंतर तिथं घडलेलं नाट्य ही भाजपेयींसाठी 'वार्निंग बेल'च म्हणावी लागेल!

*कर्नाटकातल्या पोटनिवडणूतिकडे लक्ष!*
कर्नाटकच्या निवडणुकीने भाजपच्या नेत्यांची धुंदी पार उतरवलीय. त्रिपुराच्या विजयाचा जल्लोष याने कुठल्याकुठे पळालाय. त्याआधी उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारमध्ये झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपेयींच्या जागा विरोधकांनी जिंकल्या. उत्तरप्रदेशातील एक जागा ही खुद्द मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची होती तर एक उपमुख्यमंत्री कैलासप्रसाद मौर्य यांची होती. या निवडणुकांच्या निकालानंतर फार काही नाही तर एक मात्र निश्चित की, भाजपेयींचं पराभव करण्यासाठी निवडणुकीपूर्वी एकत्र आलेले सारे विरोधीपक्ष यांचं हे 'महागठबंधन' आता अधिक दृढ होईल. आपण एकत्र आलो तर भाजपचा पराभव होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झालाय. त्यामुळे यापुढे भाजपेयींचा मार्ग अडथळ्यांचा ठरणार आहे. २०१९ च्या निवडणुका या खडतर ठरणार आहेत. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेस हे एकत्र येऊन आगामी लोकसभा निवडणूक लढतील. बिहारात लालू यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाजप, जदयु यांच्याशी अलग झालेले छोटे छोटे पक्ष यांची आघाडी होऊ शकते अशाच प्रकारे ज्या राज्यात प्रादेशिक पक्षांचा जोर असेल तिथंही अशाच प्रकारे आघाडी होईल. असं जर घडलं तर भाजपेयींना जड जाणार आहे. भाजपेयींसाठीची सत्तेची सारी समीकरणं बदलणारी आहेत.कर्नाटकात तीन खासदारांनी विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. त्याठिकाणी लवकरच पोटनिवडणूका होतील. तिथं काय घडतं यावर पुढचं भवितव्य ठरणार आहे!

*पुन्हा महागठबंधनाचा प्रयोग*
२०१४ साली लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात भाजपला अभूतपूर्व असा विजय मिळाला. विरोधकांना हा एक जबरदस्त धक्का होता. त्यानंतर अनेकदा विरोधकांचं एक महागठबंधन असावं अशी चर्चा होत होती. २०१५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी महागठबंधनांचा प्रयोग झाला. त्यावेळी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल, नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन भाजपेयींचा जबरदस्त पराभव केला होता. भाजपेयींची सत्ता मिळविण्याची स्वप्न धुळीला तिथं मिळवली होती. आज नितीशकुमार भाजपसोबत आहेत. कुण्याकाळी ते विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. आज पुन्हा नव्यानं विरोधकांची मोट बांधली जाण्याची चिन्हे दिसताहेत. आपल्याला बहुमत मिळत नाही असं दिसताच काँग्रेसनं कर्नाटकात जेडीएसला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयोग केलाय. या निकालानं काँग्रेस सावरलीय असं दिसून आलं. तिनं लगेचंच गोव्यात आणि मिझोराममध्ये सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे केलाय, हे विशेष!

*पोटनिवडणुकीत सप बसप एकत्र*
पोटनिवडणूकां पाठोपाठ कर्नाटकातल्या यशानंतर उत्साहित झालेल्या काँग्रेसनं एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या समाजवादी आणि बहुजन समाज पक्ष यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न चालवलाय. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या या प्रयत्नांना प्रतिसादच दिला नव्हता. त्याचा त्यांना नंतर पश्चाताप करावा लागला. भाजपला मोठं आणि घवघवीत यश इथं मिळालं कधीकाळी उत्तरप्रदेशात सत्ताधारी असलेले सप आणि बसप ज्यांच्यात विस्तव जात नाही असं इथलं वातावरण असताना काळाची पावलं ओळखून गोरखपूर आणि फुलपूर इथल्या पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाचे अखिलेश 'बबूआ'आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती'बुआ' हे दोघे आपलं शत्रुत्व विसरून एकत्र आले. त्याचा त्यांना फायदा झाला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मजबूत असा फेव्हीकोल जोड बनेल असं इथलं वातावरण आहे.

*काँग्रेससोबत जेडीएस हवी होती!*
उत्तरप्रदेशातील पोटनिवडणुका ह्या समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्ष यांच्यासाठी 'लिटमस टेस्ट' होती. ती त्यांनी जिंकली. कर्नाटकात काँग्रेसनं जर देवेगौडा यांना बरोबर घेतलं असतं तर त्याचा निकाल वेगळा लागला असता. पण मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा देवेगौडांना असलेला विरोध, स्वतःबद्धलचा चुकीचा आत्मविश्वास आणि लिंगायतांना वेगळ्या धर्माचं दिलेलं आश्वासन यामुळं काँग्रेसवर ही नामुष्की ओढवलीय. काँग्रेस आणि जेडीएस यांच्या मतांची जुळणी केली वा भाजपच्या विजयी उमेदवारांच्या ठिकाणची मतं पाहिली तर हे सहज लक्षात येईल की सत्तेसाठी द्राविडी प्राणायाम करायची गरजच पडली नसती. कर्नाटकातल्या निवडणूक निकालानं देशात लोकसभा निवडणुकीसाठी महागठबंधन करण्याचा काँग्रेसचा उत्साह दुणावलाय!

*उत्तरप्रदेशकडे सर्वांचेच लक्ष*
योगी आदित्यनाथ यांनी कर्नाटकात लिंगायतांना अलग धर्माचा दर्जा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाविरोधात धार्मिक प्रचारासाठी मोठा दौरा केला होता. त्यांची उत्तरप्रदेशातली गोरखपूरची जागा अशी होती की, जिथं भाजप गेली २५ वर्षे आपल्याकडे राखली होती. तिथला हा पराभव भाजपेयींसाठी धक्कादायक होता. राज्यात कोणतीही लाट असो या मतदारसंघातून गोरखपूरपीठाचे प्रमुखच इथून निवडून येत असत. मग ते महंत अवैद्यनाथ असो नाही तर योगी आदित्यनाथ! ही परंपरा आज इथं खंडित झालीय.  त्याचा परिणाम असा झाला की, केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता असताना त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलाय. हे शल्य मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खूपच लागलं!
गोरखपूरच्या नेमकी उलटी स्थिती फुलपूरची आहे. ही जागा काही पारंपरिकरित्या भाजपची नव्हती. २०१४ मध्ये पहिल्यांदाच भाजपच्या केशवप्रसाद मौर्य यांना इथं विजय मिळाला होता. त्यावेळी त्यांना ५२.४३ टक्के मतं मिळाली होती. असं असतानाही इथं भाजपचा पराभव झालाय. समाजवादी पक्ष ही जागा मिळविण्यात यशस्वी झाला. याचा अर्थ असा की, दोन्ही ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या वातावरणात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे एकत्र आले तर त्यांची आघाडी यशस्वी ठरु शकते.

*...तर ७३ नव्हे ३५ जागा मिळाल्या असत्या*
लोकसभेच्या २०१४ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष या दोन पक्षाला मिळालेल्या मतांची गोळाबेरीज केली तर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना ७३ नव्हे तर ३५ जागा मिळाल्या असत्या. त्यांचे ते निरीक्षण आता खरं ठरलंय. सप आणि बसप यांच्या आघाडीची ताकद पोटनिवडणुकीने दाखवून दिलीय. या दोन पक्षाच्या आधाडीत काँग्रेस पक्ष आणि उत्तरप्रदेशच्या पश्चिम भागात वर्चस्व असलेल्या अजितसिंह यांच्या लोकदलाने सामील व्हायचं ठरवलं तर ते एक 'महागठबंधन' परिणामकारक ठरू शकेल. जेवढ्या जागा २०१४ ला भाजपला मिळाल्यात त्या २०१९ ला मिळणे केवळ अशक्य आहे.

*'डिनर डिप्लोमसी' आता वेग घेईल*
पोटनिवडणुकीच्यावेळी सोनिया गांधी यांनी 'डिनर डिप्लोमसी' दाखविली. सर्व विरोधीपक्षांच्या नेत्यांना आपल्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं. या डिनरला सप, बसप तसेच लोकदलाचे नेते उपस्थित होते. त्याच बरोबर इतर  २० पक्षांचे नेतेही हजर होते. याचाच अर्थ असा की, आगामी काळात 'महागठबंधना'ची प्रक्रिया वेग घेईल. या डिनरला अखिलेश यादव, मायावती, ममता बॅनर्जी सारखे वजनदार नेते उपस्थित नव्हते. राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांची अनुपस्थिती ही काँग्रेसचा 'महागठबंधन'  बनविण्याच्या प्रयत्नाला खीळ बसवू शकते. उत्तरप्रदेशात भाजपसोबत छोटे छोटे पक्ष आहेत. महागठबंधन साकारलं तर हे पक्षही यात सहभागी होतील! हे महागठबंधन मजबूत उभं राहिलं तर वेगवेगळ्या पक्षातून भाजपात दाखल झालेले नेतेही पुन्हा या महागठबंधनात दाखल होतील. याशिवाय काँग्रेस आणि भाजप वगळून इतर पक्षांना एकत्र करून तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न ममता बॅनर्जी यांनी आंध्रचे चंद्राबाबू, तेलंगणाचे केआरएस, शिवसेना यांना सोबत घेऊन चालवलाय.

*निकालांनी भाजप चिंतातुर*
दुसरीकडे पोटनिवडणुकीच्या आणि नुकत्याच लागलेल्या कर्नाटकाच्या निकालांनी भाजपला चिंतातुर करून सोडलंय. ईशान्य भारतात मिळालेली सफलता यानं भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या एकूण राज्यांच्या संख्येत वाढ निश्चित झालीय. पण भाजपेयींची सत्ता असलेल्या पक्षांच्या राज्यात झालेला पराभव ही शुभचिन्हे नाहीत तर ती धोक्याची घंटा आहे! गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला अत्यंत काठावरचं बहुमत मिळालं, त्यासाठी पण भाजपेयींचा घाम निघाला. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना जागा मिळाल्या नाहीत. राजस्थान आणि मध्यप्रदेश यासारख्या त्यांच्या बालेकिल्ल्यात त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आता कर्नाटक राज्यात निवडणुका झाल्या आहेत. तिथं भाजपेयींनी सत्ता हाती घेण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली. पण या मिळालेल्या यशापयशाने भाजपचा लोकसभेचा मार्ग कठीण करून टाकलाय, हे मात्र निश्चित!

*'भाजपमुक्त भारत' घोषणा येऊ शकते!*
भले आज विरोधीपक्षांकडे मोदींच्यासमोर उभा ठाकणारा कुणी दिसत नसेल, परंतु देवेगौडा, गुजराल यासारखी मंडळी प्रधानमंत्री झाले तेव्हा भाजपला सत्तेतून हटविण्यासाठी मायावती, मुलायमसिंह, ममता बॅनर्जी की राहुल गांधी यापैकी कुणीही महागठबंधनांच्या नेतृत्वात 'रबरस्टॅम्प प्रधानमंत्री' बनू शकेल! यासाठी कर्नाटकातल्या निवडणुका या भाजपसाठी अक्कल शिकविणाऱ्या ठरल्या आहेत. नव्या राज्यातील सत्ता मिळविण्याच्या प्रयत्नाप्रमाणेच जुन्या आपल्या हाती असलेली राज्ये सांभाळण्याची शिकस्त करण्याची गरज आहे. २०१४ पेक्षा २०१९ ची निवडणूक ही भाजपसाठी अग्निपरीक्षा ठरणार आहे. याहून वेगळी गोष्ट ही असेल की, जुने सहकारी पक्ष यावेळी असतील का ? हे देखील तेवढेच महत्वाचं आहे. भाजपनं एक लक्षात घ्यावं की, त्यांनी काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा दिली होती. भारतीय जनतेनं काँग्रेसला पर्याय म्हणून भाजपला पाहिलंय. लोकांच्या अपेक्षांची पूर्ती झाली नाही तर लोक काँग्रेसला भाजपला पर्याय म्हणून पाहू लागतील आणि ते  स्वीकारतीलही!  अगदी आगामी काळात भाजपमुक्त भारत अशी घोषणाही येऊ शकते, तेव्हा सावधान!

चौकट....
*प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं सूचक मौन*
ईशान्य भारतात मिळालेल्या यशानंतर भाजपेयींचा उन्माद दिसून आला होता. त्या विजयाचा कैफ कर्नाटकातल्या निवडणुकीत मतदारांनी उतरविलाय. भारतीय मतदारांची बदलती मानसिकता, एकापाठोपाठ एक सत्तासाथीदार भाजपची सोडत असलेली साथ, मातृसंस्था असलेल्या संघाच्या चाललेल्या घडामोडी या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मौन खूप काही सांगून जाते. राज्यसभेत भाजपच्या संख्याबळात वाढ होते आहे. हे शुभचिन्ह असलं तरी कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुका ह्या महत्वाच्या ठरल्या आहेत. भाजपेयींना असंच वाटतंय की, जेव्हा सार्वत्रिक निवडणुका येतील तेव्हा लोक भाजपला साथ देतील. लोकांना कडबोळी सरकार नकोय. देशात झालेल्या २००४ नंतरच्या सर्वच निवडणुकात लोकांनी एकाच पक्षाला मतदान केलं आणि एकाकडेच सत्ता सोपवलीय. त्यामुळे आघाडी वा गठबंधन सरकारे आता लोकांना नकोच आहेत त्यामुळे त्यांच्यासमोर भाजपशिवाय पर्यायच राहिलेला नाही. हा भ्रम आहे की वस्तुस्थिती हे कर्नाटकच्या निवडणुकीने सिद्ध झाली आहे.श्रद्धा, सबुरी आणि महत्वाकांक्षा हे सारं नेहमीचे सहप्रवासी असत नाहीत. याचा काय अनुभव येईल ते काळच ठरवील!
-हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 12 May 2018

जीना : सेक्युलर की धर्माध?

जीनांना सेक्युलर ठरविण्यासाठी त्यांच्या पाकिस्तान निर्मितीनंतरच्या नव्या पाकिस्तानात हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन अशा सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म स्वातंत्र्याची मुभा आहे, या विधानाचा आधार दिला जातो. जीनांचं हे व्हिजन पाकिस्तानने कधीच मान्य केलं नव्हतं. त्यांचं ते प्रसिद्ध भाषणही पाकिस्तानच्या रेडिओवरून प्रसारित होताना सर्वधर्मीयांना समान स्वातंत्र्याचा उल्लेख वगळण्यात आला होता. नंतर झिया-उल-हक यांच्या काळात तर जीनांना पुसून टाकण्याचा किंवा विकृत रूपात पुढे ठेवण्याचा प्रयत्न झाला. जीनांनी 'ब्रिटिश इंडिया'त हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत; त्यांचा इतिहास, संस्कृती, आदर्श सारेच भिन्न आहेत; त्यामुळं हे दोन समाज एकत्र राहू शकत नाहीत, अशी भूमिका घेऊन पाकिस्तानची मागणी केली. आणि ती तडीस नेली. मात्र, त्यांनी त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना अनेकदा 'पाकिस्तान हे आधुनिक राष्ट्र बनवायचं आहे, धार्मिक नव्हे,' असं बजावलं होतं. तथापि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्रच झालं आणि जीनांचं स्वागत मौलाना महंमद अली झिंदाबाद, असं होऊ लागलं!"
-----------------------------------------------
*दे* शाच्या राजकारणात मधून मधून बॅरिस्टर जीना यांचा विषय डोकं वर काढत असतो. आज अलिगढ मुस्लिम विद्यापीठात जीनांचा फोटो लावावा यासाठी आंदोलन केलं गेलं. भाजपच्या सावित्रीबाई फुले नामक खासदार महिलेनं 'जीना हे थोर नेते होते, त्यांचे फोटो सर्वत्र लावायला हवेत असं म्हटलं आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या पाकिस्तान दौऱ्यात जीनांच्या कबरीवर डोकं टेकवून जीना हे 'हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अँबॅसिडर' असं म्हटलं आणि केवढं काहूर माजलं. अखेर त्यांना जाहीर माफी मागावी लागली होती. त्यानंतर जसवंतसिंह यांच्या 'जीना:इंडिया-पार्टिशन इंडिपेंडन्स' या पुस्तकानं पुन्हा जीना नावाचं भूत बाटलीतून बाहेर काढलं. ज्या जीनांना पाकिस्तानातही विस्मरणात ढकललं जात आहे; त्यांचा विचार, वारसा गुंडाळल्याखेरीज राज्य करणं शक्य नाही, अशी स्थिती पाकिस्तानात आहे. ते जीना भारतीय राजकारणात अधून मधून धुमाकूळ घालत असतात.

*नेहरू-पटेलांना खलनायक ठरवलं*
भारतातील बुद्धीमंतांसाठी बॅरिस्टर महंमद अली जीना हा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिला आहे. जीनांना सेक्युलर म्हणावं की धर्माध? हा पेच या वर्गाला गेल्या सत्तर वर्षात सोडविता आलेला नाही. त्यामुळं जीनांविषयीची 'लव्ह अँड हेट' रिलेशनशिप कोणत्या ना कोणत्या कारणाने अधून मधून उफाळून येते. जसवंतसिंह यांनी आपल्या पुस्तकात 'जीनांना भारत अखंड ठेवायचा होता, त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्यांना फाळणीकडे ढकललं' असा थिसिस मांडला आहे. हे पहिल्यांदा लिहिलं गेलंय असं काही नाही. जिनांच्या अनेक चरित्रकारांनी त्यांची अशीच बाजू घेतलीय. जसवंतसिंह यांच्या पुस्तकात जीनांना नायक ठरविण्यापेक्षा; नेहरूंना किंबहुना त्याहून अधिक पटेलांना खलनायक ठरवणं, हे दिसतं.भारतीय जनता पक्षानं १९८९ पासून आपल्या पूजनीय व्यक्तींमध्ये सामील करून घेतलं आहे. नेहरू विरुद्ध पटेल असं इतिहासात नसलेलं द्वंद्व निर्माण करून 'पटेलांचा पोलादी वारसा चालविणारा पक्ष' अशी प्रतिमा भाजपला आणि त्यांचं नियंत्रण करणाऱ्या संघवाल्यांना हवीय अर्थात, यासाठी गांधीजींच्या हत्येनंतर याच पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पहिली बंदी आणली, याकडंही डोळेझाक केलं जातं.

*मुस्लिमांना आकर्षित करण्यासाठीच*
२००५ दरम्यान लालकृष्ण अडवणींना कराचीत जीनाच्या कबरीसमोर गेल्यानंतर जीनाप्रेमाचा झटका आला होता. पाकिस्ताननिर्मितीनंतरच्या जीनांच्या एका भाषणाचा आधार घेऊन 'ते सेक्युलर आणि महान नेते होते', असा साक्षात्कार तेव्हा अडवणींना झाला होता. अडवाणींनी अत्यंत खुबीनं जीनांच्या स्तुतीला भाजपकडे मुस्लिमांना आकर्षित करण्याचा डाव म्हणून वापर करायचं ठरवलं होतं. त्यात त्यांना यश आलं नाही, हा भाग वेगळा! नेहरु विरोधाची भूमिका हा मात्र जसवंतसिंह आणि अडवाणी  यांच्या जीनास्तुतीमधला समान धागा होता. मात्र जसवंतसिंह यांची हकालपट्टी, पाठोपाठ अडवाणी यांचे राजकीय सल्लागार सुधींद्र कुलकर्णीचा राजीनामा, तत्कालीन मंत्री अरुण शौरी यांनी केलेला हल्लाबोल, माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांना अचानक आलेला पुळका या सगळ्या घडामोडींचा परिणाम झालाच! पण जीनांच्या बाबतीत; ते खरंच धर्मनिरपेक्ष होते की धर्माध? त्यांना अखंड भारत हवा होता की, पाकिस्तानसह भारताचे आणखी तुकडे पाहिजे होते? या प्रश्नांची उत्तरं महत्वाची आहेत.

*जीना एक कॉम्प्लेक्स पर्सनालिटी*
जीना राजकीय नेते होते. बुद्धीमंत होते, धर्मद्वेषाला खतपाणी घालून एकहाती राष्ट्र निर्माण करणारे होते. या सगळ्यांपेक्षा ते कसलेले वकील होते, आणि त्यांच्या वकिली कौशल्याबद्धल पाकिस्तानचे निर्माते या प्रतिमेइतकेच ते प्रसिद्ध होते. वकील जसा प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे पाहतो आणि त्यापोटी अशिलाशी बाजू धडाक्यात मांडतो, तसं जीनांचं होतं. त्यांची सगळी राजकीय कारकीर्द त्या त्या वेळी त्यांना पटलेल्या मुद्द्यांची आक्रमकपणे वकिली करण्यात आणि त्याची तड लावण्यात खर्ची पडलीय. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिगत जीवनातल्या भूमिका त्यांनी उभं केलेलं राजकीय तत्वज्ञान याचा एकमेकांशी ताळमेळ लागत नाही. परिणामी जीना ही एक 'कॉम्प्लेक्स पर्सनॅलिटी' बनते. त्यामुळेच जीनांकडे जसे बघाल, तसे ते दिसतात. त्यांच्याविषयी हवा तसा निष्कर्ष काढणारे संदर्भ ढिगाने सापडतात.

*जीनांचा विचार सतत बदलला*
जीनांना सेक्युलर ठरविण्यासाठी त्यांच्या पाकिस्तान निर्मितीनंतरच्या नव्या पाकिस्तानात हिंदू, मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन अशा सर्वांना त्यांच्या इच्छेनुसार धर्म स्वातंत्र्याची मुभा आहे, या विधानाचा आधार दिला जातो. जीनांचं हे व्हिजन पाकिस्तानने कधीच मान्य केलं नव्हतं. त्यांचं ते प्रसिद्ध भाषणही पाकिस्तानच्या रेडिओवरून प्रसारित होताना सर्वधर्मीयांना समान स्वातंत्र्याचा उल्लेख वगळण्यात आला होता. नंतर झिया-उल-हक यांच्या काळात तर जीनांना पुसून टाकण्याचा किंवा विकृत रूपात पुढे ठेवण्याचा प्रयत्न झाला. जीनांनी 'ब्रिटिश इंडिया'त हिंदू आणि मुस्लिम ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत; त्यांचा इतिहास, संस्कृती, आदर्श सारेच भिन्न आहेत; त्यामुळं हे दोन समाज एकत्र राहू शकत नाहीत, अशी भूमिका घेऊन पाकिस्तानची मागणी केली. आणि ती तडीस नेली. मात्र, त्यांनी त्यांच्या निकटच्या सहकाऱ्यांना अनेकदा 'पाकिस्तान हे आधुनिक राष्ट्र बनवायचं आहे, धार्मिक नव्हे,' असं बजावलं होतं. तथापि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्रच झालं आणि जीनांचं स्वागत मौलाना महंमद अली झिंदाबाद, असं होऊ लागलं!

*जन्मतारीख बदलली, साहेबी वेशभूषा*
अव्वल इंग्रजी वातावरणात आणि पाश्चात्य विचारांच्या सहवासात पिंड पोसलेल्या जीनांनी मला मौलाना म्हणू नका, मिस्टर जिनाच म्हणा, असं बजावलं होतं. 'एक दिवस पुन्हा हिंदुस्तानात यायला आवडेल,' असंही जीना म्हणाले होते. जीनांची वाढ-विकास हा पूर्णतः आधुनिक पाश्चात्य कल्पनांवर झाला होता. त्यांचं शिक्षण इंग्रजी शाळेतून झालं होतं. त्यांचे आजोबा हिंदू असल्याचं सांगतात. जीनांवर इंग्रजी विचारांचा पगडा होता. इतका की, त्यांनी आपली जन्मतारीख २० आक्टोंबर ऐवजी २५ डिसेंबर अशी बदलून घेतली होती. ते स्वतःच नाव इंग्रजी पद्धतीनं एम.ए.जीना असंच लिहीत. त्याकाळातले उदारमतवादी मुस्लिम नेतेसुद्धा नावात अशी तडजोड करीत नसत.जीनांचा दुसरा विवाह पारशी मुलीशी झाला. तो ही त्याकाळात गाजला. मुस्लिम कट्टरपंथीयांमध्ये हे घडणं शक्य नव्हतं. जीनांची पाकिस्तान निर्मितीपर्यंतची वेशभूषा साहेबी थाटाचीच असायची!

*गांधीजींच्या विचारांचाही त्यांच्यावर पगडा*
सरोजिनी नायडू यांनी जीनांना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा अंबसिडर अशी पदवी दिली होती. मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीला जीना वेडगळपणा म्हणत होते. आणि सुरुवातीला पाकिस्तानच्या कल्पनेचेही 'मूर्खपणा' अशी खिल्ली उडवत होते. जीनांना मद्य आणि पोर्क-डुकराचं मटण वर्ज्य नव्हतं. या सगळ्या गोष्टी जीनांना सेक्युलर, उदारमतवादी ठरवण्यासारही आधार म्हणून सांगितल्या जातात. जीनांचे गांधीजींशी मतभेद होते, पण त्यांच्यावर गांधींचा पगडासुद्धा होता. त्यांनी लोकमान्य टिळकांची बाजू न्यायालयात मांडली होती, असे सारे दाखले दिल्यानंतर मुस्लिम लीगचा नेता म्हणून वाटाघाटीस पटेल-नेहरू यांच्यासोबत बसलेले जीना भारत तोडण्याच्या बाजूनं असतीलच कसे? त्यांना भारतातील मुसलमानांच्या हिताची काळजी होती आणि त्यासाठी ते पुढे ठेवत असलेल्या मागण्या सत्तेसाठी उतावीळ झालेल्या नेहरू-पटेलांनी अमान्य केल्या, यातून जीना पाकिस्तानानिर्मितीच्या मागणीकडे ढकलले गेले. असा तर्क मांडता येतो.

*माऊंटबॅटन यांनी जीनांचा वापर केला*
लॉर्ड माऊंटबॅटनने फाळणीची योजना आधीच तयार केली होती. योग्यवेळी त्यासाठी जीनांच्या महत्वाकांक्षेचा आणि एकदाचं स्वातंत्र्य मिळू दे, असं टेकीला आलेल्या काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेचा माऊंटबॅटनने वापर केला. यात जीनांचा दोष काय? असाही तर्क लढविला जाऊ शकतो. अशा तऱ्हेनं जीनांना नाईलाजानं फाळणी पत्करणारा, मनापासून अखंड हिंदुस्तानवादी असलेला नेता, अशा रंगात रंगविता येऊ शकतं. तसंच याच जीनांच्या आयुष्यात अनेक घटना आणि वक्तव्याने ते कडवे धर्माध होते, असंही दाखवून देता येतं. जीनांच्या मुलीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या मूळ पारशी तरुणांशी विवाह केला. तेव्हा जीना चवताळून उठले होते. इतके की आयुष्यभर जीनांनी आपल्या मुलीचा उल्लेख नेहमी 'मिसेस वाडिया' असाच करीत. तिचा नुकताच लंडन इथं निधन झालं.

*नंतर जीना कडवे मुस्लिम नेते बनले*
पाकिस्तानचा पाया हा मुस्लिम धर्मातल्या मुलतत्वात सापडतो असं सांगणारे जीनाच होते. पाकिस्तानची अर्थव्यवस्थाही त्यांना इस्लाममधील आर्थिक विचारांवर आधारित हवी होती. त्याविषयीचं त्यांचं भाषणही प्रसिद्ध आहे. १९४० पर्यंत बऱ्याच अंशी निधर्मी आणि अखंड भारतवादी असलेले जीना; त्यानंतर मात्र कडवे मुस्लिम बनलेले दिसतात. १९ जुलै १९४६ ला त्यांनी केलेलं भाषण प्रसिद्ध आहे. त्यात ते म्हणतात, ' मी इथं नैतिकतेची चर्चा करायला आलेलो नाही. आमच्या हातात पिस्तुल आहे आसनी ते वापरता येईल, अशा स्थितीत आम्ही आहोत! हे पिस्तुल म्हणजे स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी होती. आणि ते वापरताना त्यांनी दिलेला डायरेक्ट एक्शनचा आदेश जीनांसाठीची ऐतिहासिक कृती होती. सनदशीर मार्गाने लढण्यासाठी आयुष्य घालवणाऱ्या जीनांनी हा मार्ग आणि 'घटनेचा बडेजाव गुंडाळून ठेवत आहोत', असं सांगून हिंदू-मुस्लिम दंगलींना उत्तेजन दिलं. पाकिस्तानच्या निर्मितीसाठी झपाटलेल्या जीनांच्या या कृत्यामुळे हजारो हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चनांच्या कत्तली झाल्या, लाखो लोक निर्वासित झाले. पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर जीनांना पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे सध्याचा पाकिस्तान आणि बांगलादेश यांना जोडणारा एक हजार किलोमीटरचा पट्टा हवा होता. अशा जीनांची सेक्युलर म्हणून स्तुती कशासाठी करायची, असा प्रश्न पडू शकतो.

*पाकिस्तान धर्मानं नाही तर भाषेनं तोडलं*

जीनांच्या अटी मान्य केल्या असत्या तर अखंड हिंदुस्थान राहिला असता, हा तर्क मूर्खपणाचा आहे. यासाठी जीनांनी मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ, घटना समितीचे अध्यक्षपद आळीपाळीने मुस्लिमांना द्या; अशा भविष्यात नागरी युद्धालाच आमंत्रण देणाऱ्या अनेक अटी घातल्या होत्या. देशभर असले निखारे धगधगत ठेवण्यापेक्षा एकदाच पाकिस्तानचा तुकडा मोडावा, या निष्कर्षाप्रत नेहरू-पटेल आले होते. या वास्तवाकडे जीनांच्या प्रेमात पडून दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही. खरं तर, जीना ब्रिटिशांच्या धोरणांचे प्यादे बनले होते आणि नेतृत्व म्हणून आपण नेहमी सर्वोच्च ठिकाणीच असलो पाहिजे, या व्यक्तिगत अहंगंडानी पछाडलं होतं. यासाठीच त्यांना मुस्लिमांचा प्रतिनिधी म्हणून काँग्रेसमधील अन्य मुस्लिम नेते मान्य नव्हते. त्यामुळेच ते घटना समितीत गेले नाहीत. इतकंच काय भारत आणि पाकिस्तान स्वतंत्र होताना ते थेट पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल बनले. त्यांना दुय्यम भूमिका कुठेच मान्य नव्हती. अशा अट्टाहासामुळेच जीना ज्या दृष्टिकोनातून पाहावेत, तसे दिसतात. पण ते फाळणीचे खलनायक नाहीत, असं म्हणणं मात्र सत्याचा विपर्यास करणारं आहे. जीना १९३० ते ३३ भारतातील राजकारणाला वैतागून इंग्लंडमध्ये कायमचे स्थायिक होण्यासाठी गेले होते. तिथं त्यांनी ब्रिटिश नाटकं पाहायचा छंद लावून घेतला होता. जीनांना नट होऊन हॅम्लेट मध्ये काम करायचं होतं. असा बहुरूपी जीनांच्या मानसिकतेतच असावा . म्हणूनच १९०५ पासून मृत्यूपर्यंत दर पाच-सात वर्षांनी जीना बदललेले दिसतात. जीनांमधला हा बहुरूपी समजून घेतल्याशिवाय त्यांच्यावर कोणताही शिक्का मारणं इतिहासावर अन्याय करण्यासारखं आहे. शेवटी ते कसलेले वकील होते. म्हणून त्यांना कायदे-आझम म्हणत. त्यांनी अखंड हिंदुस्तानची कल्पना जितक्या तर्कशुद्धपणे मांडली, तितक्याच विद्वत्तापूर्ण शैलीने स्वतंत्र पाकिस्तानची अनिवार्यता पटवून दिली होती. अशा बहरूपी जीनांच्या ओळखीत भर घालायची असेल, तर पाकिस्तानी व भारतीयांप्रमाणेच बांगलादेशींच्या मते जीना कसे आहेत, ते समजून घेतलं पाहिजे. कारण पाकिस्तानच्या धर्माधिष्ठित राष्ट्र निर्मितीनंतर पंचवीस वर्षात पाकची फाळणी होऊन बांगलादेशची स्वतंत्र राष्ट्र म्हणून निर्मिती झाली आहे. हे काम बंगाली भाषेनं केलं, अतिरेकी धर्मावादाला छेडण्याचं काम भाषेनं केलं!

चौकट.......

*जीनांनी संधीसाधू राजकारणासाठी सतत भूमिका बदलल्या!*

महंमद अली जीना...पाकिस्तानचे जनक. मुसलमानातील अल्पसंख्य अशा एका खोजा कुटुंबात कराची जन्मले. उच्च शिक्षण मुंबई व इंग्‍लंडमध्ये झालं. धार्मिक रीतिरिवाजांचे त्यांना वावडेच होते. इंग्रजी ही जणू त्यांची मातृभाषाच होती. तरीही ७२ वर्षांनी भारतीय उपखंडातील सर्व मुसलमानांचे ते एकमेव पुढारी-कायदे आझम झाले. जन्मभर सिंधबाहेर राजकारण करून शेवटी कराचीत जन्मस्थानीच त्यांचा पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून शपथविधी झाला. १९१८ साली त्यांनी सामाजिक रूढी झुगारून एका पारशी स्त्रीशी विवाह केला. एक उदार मतवादी म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आणि शेवटी ते मुस्लिम लीगचे सर्वसत्ताधारी बनले. आरंभीला मुसलमान नेतृत्वाचा विरोध न जुमानता त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध केला; पण शेवटी मुसलमानांसाठी वेगळ्या राष्ट्राची त्यांनी मागणी केली.

इंग्‍लंडहून बॅरिस्टर होऊन परतल्यावर एक अव्वल दर्जाचे वकील म्हणून त्यांनी ख्याती मिळविली आणि त्याचबरोबर गोपाळ कृष्ण गोखले, सर फिरोजशहा मेहता यांचे सहकारी म्हणून काम करताना काँग्रेस नेते म्हणूनही ते चमकले. १९०९ साली केंद्रीय कायदेमंडळात निवडून गेल्यावर त्यांनी विभक्त मतदारसंघाला विरोध करून मुस्लिम लीगचा विरोध पत्करला. त्याच वर्षी जीना, आझाद, मझरूल हक यांसारख्या प्रागतिक नेत्यांच्या आग्रहास्तव लीगने आपल्या ध्येयधोरणात बदल केला. इतर जमातींशी सहकार्य करून क्रमशः राजकीय सुधारणा मिळविणे आणि शेवटी देशाला अनुरूप असे स्वराज्य प्राप्त करून घेणे, हे लीगचे नवे उद्दिष्ट झालं. जीनांच्या खटपटीमुळे काँग्रेस व लीग यांची अधिवेशने बरोबर होऊ लागली आणि १९१६ साली सुप्रसिद्ध लखनौ करार झाला. काही काळ जीना होमरूल चळवळीतही होते आणि अ‍ॅनी बेझंट यांना अटक झाल्यावर त्यांना होमरूल लीगचे अध्यक्षपद देण्यात आले.

जीनांचा पिंड नेमस्त राजकारणाचा होता. गांधीयुग सुरू झाल्यावर सामूहिक आंदोलनाचे शस्त्र पुढं आलं.  जीनांच्या आयुष्याला इथून कलाटणी मिळाली. १९२० साली खिलाफत चळवळीला उधाण आलं होतं. प्रथम लीगच्या आणि नंतर काँग्रेसच्या अधिवेशनात असहकार आंदोलनास पाठिंबा देणारे ठराव संमत झाले. लीग अधिवेशनातील आपल्या अध्यक्षीय भाषणात जीनांनी स्वतःचे मनोगत व्यक्त न करता प्रतिनिधींना विचारपूर्वक निर्णय घ्या, असा सल्ला दिला. काँग्रेस अधिवेशनात मात्र त्यांनी आंदोलनाला कडाडून विरोध केला. नंतर ते काँग्रेसच्या बाहेर पडले ते कायमचेच.

१९२३ साली मृतप्राय झालेल्या लीगचे जिनांनी पुनरुज्‍जीवन केले. १९३०–३१ साली गोलमेज परिषदा भरल्या. त्यासाठी जीनांना खास आमंत्रण मिळाले होते. मुस्लिम शिष्टमंडळाचे नेतृत्व आगाखानांकडे होते. जीनांनी आगाखानांच्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा दिला आणि मुस्लिम मागण्या मान्य झाल्याखेरीज मध्यवर्ती सरकारसाठी संघीय संविधान तयार करण्यास विरोध केला. परिषदा आटोपल्यावर जीनांनी इंग्‍लंडमध्ये स्थायिक होण्याचे ठरविले. पण पुढील दोन वर्षांत अनेक ज्येष्ठ मुस्लिम नेते निधन पावल्यामुळे उरलेल्यांनी एकत्र येऊन जीनांना मुस्लिम लीगचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. जीनांनी हे आमंत्रण स्वीकारून लीगची  धुरा उचलली. त्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत ते लीगचे सर्वाधिकारी म्हणून टिकून राहिले. १९३८ अखेरीस सिंध-मुस्लिम लीगने देशाच्या फाळणीची मागणी केली. जून १९४७ मध्ये नवे व्हाइसरॉय माउंटबॅटन यांनी  फाळणीची योजना मांडली. त्यात देऊ केलेले कुरतडलेले पाकिस्तान जीनांनी पत्करले व देशाची फाळणी झाली. १९४६ साली जिनांची प्रकृती एवढी खालावली होती, की आपण फार काळ जगणे अशक्य आहे, हे त्यांना कळून चुकले होते. त्यामुळे कॅबिनेट मिशन योजना राबवून कधी काळी मोठे पाकिस्तान निर्माण करण्याचे स्वप्‍न आपल्याला साकार करता येणार नाही, असे त्यांना दिसून आले असावे; म्हणून त्यांनी कुरतडलेले पाकिस्तान स्वीकारले असे दिसते ते कराची येथे मरण पावले. पाकिस्तान राष्ट्राचे जनक म्हणून आधुनिक इतिहासात जिनांना महत्त्व प्राप्त झाले. राजकीय जीवनातील विरोधाभास त्यांच्यामध्ये जेवढा आढळतो;  तेवढा इतर कोणत्याही राजकीय नेत्याच्या जीवनामध्ये दिसत नाही.
-हरीश केंची
९४२२३१०६०९


Sunday 6 May 2018

मोहन ते महात्मा @ १२५ वर्षे!

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या या साऱ्या घटनांतून मोहन... मोहनदासचं ... महात्मा बनण्याची प्रक्रिया होण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळंच अनेक वर्षांनी आफ्रिकेतील गांधीवादी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं, 'तुम्ही आम्हाला मोहनदास दिले होते, आम्ही त्यांना महात्मा बनवून परत दिलंय!' त्यांचं हे म्हणणं बऱ्याच अंशी खरं होतं.
आफ्रिकेत रंगभेद, वर्णभेद नीती आणि हिंदी भाषकांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात यश मिळवल्यानंतर गांधीजींनी नवा संघर्ष हिंदुस्तानात सुरू करायचा होता. त्यासाठी गांधीजी आफ्रिकेतून १९१५ च्या सुमारास परतले. भारतात यश मिळालं, त्याचा पाया त्यांनी आफ्रिकेत घातला होता. त्याची दिशा त्यांना आफ्रिकेत सांपडली होती. त्याचा आरंभ बरोबर १२५... सव्वाशे वर्षांपूर्वी पोरबंदर ते डरबन प्रवासादरम्यान जाणता-अजाणता झाला होता. हे मात्र खरे! वकील मोहनदास केवळ दादा अब्दुल्लाह यांच्या खासगी व्यापारी पेढीचा खटला लढण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. पुढे पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली की, आफ्रिकेतील सगळ्या भारतीयांच्या पिढीची केस लढवून ते महात्मा बनले!"
--------------------------------------------

*स* व्वाशे वर्षांपूर्वी १८९३ च्या २४ एप्रिलला जहाजात पाय ठेवून मोहनदासनं दक्षिण आफ्रिकेच्या प्रवासाला प्रारंभ केला, तेव्हा वकील असलेल्या मोहनला फक्त आपला वकिली व्यवसाय सेट करायचा होता. प्रापंचिक जबाबदारी पार पाडायची होती. परंतु तिथल्या २१ वर्षाच्या आपल्या वास्तव्यात एकापाठोपाठ एक अशा काही घटना घडत गेल्या की, बॅरिस्टर मोहनला महात्मा होण्याला भाग पडलं. सव्वाशे वर्षांनंतर त्या सगळ्या घटनांचा मागोवा घेताना महात्मा होण्याच्या त्या घटना ज्या भारताच्या स्वातंत्र्यापर्यंत पोहोचलाय...! १८९१ मध्ये लंडनहून बॅरिस्टर होऊन परतलेल्या मिस्टर मोहनकडे डिग्री तर होती पण मनाजोगतं काम मिळत नव्हतं. लग्नानंतर सांसारिक जबाबदारीही येऊन पडली होती. या दरम्यान मोहन राजकोट-मुंबई अशा फेऱ्या मारत होता. पण हाती फारसं काही लागत नव्हतं. या दरम्यान मूळचे पोरबंदरचे पण दक्षिण आफ्रिकेत व्यापार करणारे दादा अब्दुल्लाह यांच्या खटल्याची, वकील म्हणून केस चालविण्याची ऑफर आली. मोहननं ते स्वीकारलं. लंडनहून परतल्यावर दोनच वर्षात पुन्हा हिंद महासागर ओलांडून दक्षिण आफ्रिकाकडे जाण्याची तयारी त्यानं आरंभली. दादा अब्दुल्लाह या अशिलाशी झालेल्या बोलण्यानुसार वकिलाला अशिलाकडून १०५ पौंड फी शिवाय येण्याजाण्याचं प्रथम वर्गाचं स्टीमरचं तिकीट मिळणार होतं. पण स्टीमरचं आरक्षण फुल झालं होतं. त्या दिवशी मोझांम्बिकचे गव्हर्नरसुद्धा त्या स्टीमरमधून प्रवास करत होते. बॅरिस्टर मोहननं आपल्या गोड बोलण्यानं त्यांच्या केबिनमधून प्रवास करण्यासाठी जागा मिळवली. १८९३ च्या २४ एप्रिल रोजी हे जहाज दक्षिण आफ्रिकेकडे निघाले. आणि पाठोपाठ त्याअर्थाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचं मार्गक्रमण सुरू झालं. दक्षिण आफ्रिकेच्या या प्रवासात जागोजागी थांबा होता. इंधन आणि खाण्यापिण्याच्या गोष्टी जहाजात चढविण्यासाठी झांझिबार इथला थांबा खूपच मोठा होता. प्रवासादरम्यान जहाजाच्या कप्तानाशी मोहनची चांगलीच गट्टी जमली होती. त्यानं २४ वर्षाच्या तरुण मोहनला वेश्यागमन करण्यासाठी सोबत नेण्याचा निष्फळ प्रयत्न केला. पण मोहननं त्याला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यानंतरच्या मोठ्या प्रवासानंतर दक्षिण आफ्रिकेतील नाताल प्रांतातल्या डरबन बंदरात मोहन उतरला. दादा अब्दुल्लाह हे मोहनला घेण्यासाठी बंदरावर आले होते. इथूनच तिथल्या मोहनच्या संघर्षाला प्रारंभ झाला.

*फेटा उतरवावा की नको?*
बंगाली घाटाचा फेटा बांधलेल्या मोहनला प्रश्न पडला की, हा फेटा तसाच राहू द्यावा की, तो उतरवून टोपी परिधान करावी? बोडकं डोकं राखणं हे तसं त्यावेळी अपमानजनक समजलं जात असे. फेटा उतरवला तर स्वतःची इज्जत उतरवली असं समजलं जाई. मग मोहननं फेटा परिधान करण्याचा निर्णय घेतला. फेट्याबाबत स्थानिक लोकांमध्ये चर्चा अर्थात कुजबूजीने लोक बोलू लागले. मोहननं स्थानिक वृत्तपत्रात या फेट्याबाबत लेख लिहून त्याचं समर्थन केलं होतं. त्याची कारणमीमांसाही स्पष्ट केली होती. अशाप्रकारे आफ्रिकेत आल्यानंतर पहिल्याच आठवड्यात मोहनच्या वैचारिक संघर्षाला प्रारंभ झाला होता. त्याकाळी दक्षिण आफ्रिकेवर ब्रिटिशांशिवाय नेदरलँड - डच यांचंही शासन होतं. नाताल म्हणजे जिथं डरबन बंदर आणि शहर होतं तो भाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. जवळचं असलेल्या प्रिटोरिया शहरात केस लढण्यासाठी मोहनला जायचं होतं. प्रिटोरिया ट्रान्सवाल प्रांतात होतं तो प्रांत डच लोकांच्या ताब्यात होता.

*डब्यातून बाहेर काढलंत, मी देशातून हुसकून लावीन*
डरबन बंदरात उतरल्यानंतर तिथं थोडी विश्रांती घेऊन मोहन प्रिटोरियाला जाण्यासाठी निघाला. दोन तासांच्या प्रवासानंतर पिटरमेरितझरबर्ग स्टेशन आलं. संध्याकाळ झाली होती. थेट अंटार्तिकातून हिंदी महासागरात पाण्याबरोबरच येणाऱ्या थंड वाऱ्याने संपूर्ण देश गारठलेला होता. तिकीट कलेक्टरांच्या प्रमुखाने मोहनला प्रथमवर्गाचं तिकीट असतानाही तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जायला फर्मावलं,  मोहनने ते ऐकलं नाही, म्हणून मोहनला डब्यातून उतरविण्यात आलं. आजही छोटंसं असलेलं ते स्टेशन त्याकाळी तर तिथं अजिबात वर्दळ नसायची. अशा वातावरणात कडाक्याच्या थंडीत मोहनला रात्र काढावी लागली. रात्रभर एकटे राहिलेल्या मोहनच्या डोक्यात विचारानं थैमान घातलं होतं. या विचारांपैकी एक विचार असाही असावा की, 'इंग्रजांनो, तुम्ही मला डब्यातून बाहेर काढलंत, आता मी तुम्हाला माझ्या देशातून हुसकावून लावीन!'

 *ट्रेन नंतर घोडागाडीतही अपमान!*
दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रेनमधून प्रवास करून मोहन पुढचं स्टेशन चार्ल्सटाऊनला पोहोचला, ते ट्रेनचं शेवटचं स्टेशन होतं. या पुढचा प्रवास घोडागाडीनं करायचा होता. घोडागाडीचा चालक हा गोरा होता, त्यानं मोहनला आंत घेतलं नाही. शेवटी रिक्षात ज्याप्रमाणे आपल्या इथं लोक लटकून जातात तसं मोहनला तिथं लटकत प्रवास करावा लागला. ट्रेननंतर चोवीस तासात दुसऱ्यांदा रंगभेदाचा, वर्णवादाचा अनुभव मोहनला आला.

 *घोडगाडीनंतर हॉटेलमध्येही अपमान*
मोहन जोहान्सबर्ग पोहोचला तेव्हा संध्याकाळ झाली होती. रात्रीच्या मुक्कामासाठी इथल्या ख्यातनाम 'हॉटेल ग्रँड नॅशनल' हॉटेलच्या रिसेप्शनजवळ मोहन पोचला, तिथंही रिसेप्शनिस्टनं सांगितलं की, इथं केवळ गोऱ्यांना जागा दिली जाते. हे हॉटेल गोऱ्यांसाठीच आहे. तुम्हाला इथं जागा नाही.इथंही मोहनचा अपमान झाला.

 *हॉटेल नंतर पुन्हा ट्रेनमध्ये अपमान*
प्रिटोरिया जाण्यासाठी दुसऱ्या दिवशी प्रथम वर्गाचं तिकीट घेऊन मोहन ट्रेनमध्ये बसला. तिकीट चेकर ट्रेनमध्ये आल्यानंतर त्यानं मोहनकडे तुच्छतेने कटाक्ष टाकला. 'गोऱ्या प्रवाशांमध्ये तुम्ही इथं शोभत नाही, थर्ड क्लासमध्ये निघून जा, भले तुमचं पहिल्यावर्गाचं तिकीट असो!' असं त्यानं म्हटलं. तिथं पुन्हा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. पण मोहन बरोबर प्रवास करणाऱ्या इतर गोऱ्या प्रवाशांनी चेकरला सांगितलं की, हा प्रवासी आमच्यासोबत या डब्यातून प्रवास करतोय, याबाबत आमचा काहीही आक्षेप नाही! तर तुम्ही का आक्षेप घेता?  त्यानंतर हे प्रकरण शांत झालं.

*मायदेशी परततांना वेगळं वळण*
१८९४ मध्ये त्या केसचा निकाल मोहनच्याबाजूनं लागला. मोहनचं आफ्रिकेला ज्या उद्देशानं येणं झालं होतं तो उद्देश आता पूर्ण झाला होता. ठरविल्याप्रमाणे मोहनला स्टीमर पकडून मायदेशी परतायचं होतं. पण या परतण्याचावेळी एक वेगळं वळण समोर उभं राहीलं. मोहनला निरोप देण्यासाठी काही मित्र, सहकारी जमले होते. त्यांच्यापैकी एकानं मोहनच्या हातात स्थानिक वर्तमानपत्र 'डरबन मर्क्युरी' चा अंक दिला. त्यात एक विस्तृत लेख होता. त्यात म्हटलं होतं, इथं राहणाऱ्या हिंदी भाषकांना जे काही थोडेफार अधिकार देण्यात आलेले आहेत तेही अधिकार काढून घेण्याबाबत आणि त्यातले काही गोठविण्याबाबत इथलं सरकार कायदा करणार आहे. मोहनला निरोप देण्यासाठी जमलेल्यांनी सरकारच्या या निर्णयाविरुद्ध लढा द्यावा अशी चर्चा सुरू केली. त्याचं नेतृत्व मोहन यानेच करावं असा आग्रह त्यांनी धरला. या आग्रहामुळे मोहनदास गांधी तिथं थांबायला तयार झाले. हजारो लोकांच्या सह्या असलेलं निवेदन लॉर्ड रिपन यांच्याकडं मोहनदासच्या माध्यमातून पाठविण्यात आलं.

*तुमच्याशिवाय आमचं कोण?*
लॉर्ड रिपन यांना निवेदन पाठविल्यानंतर मोहनदासला परतायचं होतं, पण स्थानिक हिंदी लोकांनी त्यांना तिथंच थांबण्यासाठी आग्रह धरला. 'तुम्ही आहात म्हणून आमच्यात लढण्याची हिंमत आली, तुम्हीच म्हणता ना कोणतीही समस्या असली तरी ती मुळापासून उखडून टाकायला हवी, मग आपण जाण्याची घाई का करताहात? जरा थांबा अन हा प्रश्न मार्गी लावा! 'दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रहाचा इतिहास' यांत गांधीजींनी लिहिलं आहे की, त्या आग्रहानंतर मी तिथं राहायला तयार झालो. हे काम सार्वजनिक असल्यानं त्यासाठी फी वा पैसे कसे घेणार? त्यामुळं मी पैसे घेण्यास नकार दिला. पण इथल्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या साऱ्या केसेस माझ्याकडं सोपविण्याचं त्यांनी नक्की केलं. इथल्या सगळ्याचं हितरक्षण आणि ब्रिटिशांविरुद्ध कायमस्वरूपी लढा देण्यासाठी जून १८९४ मध्ये 'नाताल इंडियन काँग्रेस' ची स्थापना करण्यात आली. आपलं गांव पोरबंदर पासून बारा-पंधरा हजार किलोमीटर दूर दक्षिण आफ्रिकेत अर्थाजनासाठी आलेला वकील मोहनच्या जीवनात परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला होता.

 *इकडं देशात पत्नी मुलं प्रतीक्षेत!*
इकडं पत्नी कस्तुरबा आणि मुलं मोहनदासची डोळ्यात प्राण आणून वाट पहात होती. एक वर्षात काम संपवून परत येईन असं सांगून गेले होते. पण दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी ते परतले नाहीत. १८९६ मध्ये सहा महिन्यासाठी भारतात आले पण भारतात सहा महिने पूर्ण होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेतून टेलिग्राम आला, 'ताबडतोब परत या!' यावेळी तिकडं जाताना एकटे जाण्याऐवजी त्यांनी पत्नी कस्तुरबा आणि हरीलाल मणिलाल या आपल्या मुलांना त्यांनी बरोबर घेतलं. गांव पोरबंदर ते जिल्ह्याचं ठिकाण राजकोट असा कधीतरी प्रवास केलेल्या कस्तुबांना थेट दक्षिण गोलार्धात आलेल्या दुसऱ्या खंडातल्या देशात जाण्यासाठी निघाल्या होत्या.

 *दक्षिण आफ्रिकेत पाऊल टाकताच*
भारतातील आपल्या वास्तव्यात मोहनदास जिथं जिथं गेले तिथं तिथं त्यांनी दक्षिण आफ्रिकेत सध्या काय चाललंय याचा प्रचार केला. वर्तमानपत्रातून लेख लिहून दक्षिण आफ्रिकेत हिंदी भाषकांची हालत किती वाईट आहे. याची चर्चा घडवून आणली. भारतात असलेल्या इंग्रज सरकारनं याची नोंद घेऊन नाताल प्रांतात टेलिग्राम करून मोहनदासनं इथं भारतात निर्माण केलेल्या वातावरणाची माहिती दिली! त्यामुळं तिथलं सरकार आणि गोरी प्रजा यांनी मोहनदासच्या 'स्वागताची' जय्यत तयारी आरंभली होती. 'क्रूरलँड' या स्टीमरमधून गांधी परिवार आफ्रिकेच्या किनारी लागले. इथल्या रागावलेल्या इंग्रज-गोऱ्या तरुणांना समजलं की मिस्टर गांधी येताहेत. या स्टीमर बरोबरच भारतीय प्रवाशांना घेऊन आणखी एक 'नादीर' नामक स्टीमर सुद्धा किनारी लागली होती. तेव्हा आफ्रिकेत असा प्रचार झाला होता की, भारतातून येणारे चळवळ करणारे वकील मोहनदास येताना आपल्यासोबत आठशे माणसाचा काफ़िला घेऊन येतोय! जणू आफ्रिकेवर चढाई करण्यासाठीच येताहेत असं वातावरण निर्माण इथं झालं होतं.

*नाताल राज्यात प्रवेशबंदी*
१८९६ च्या १९ डिसेंबरला डरबन बंदराला या स्टीमर पोहोचल्या. त्यावेळी तिथल्या सरकारनं असा आदेश दिला गेला होता की, इथं कोणत्याही भारतीय माणसाला जमिनीवर पाय ठेवू देऊ नका. कारण त्यावेळी भारतात साथीच्या रोगानं उच्छाद मांडला होता. या स्टीमरबरोबरच मिस्टर गांधी आणि भारतातल्या साथीचे रोगदेखील नाताल प्रांतात प्रवेश करताहेत अशी बातमी पसरवली गेली होती. २३ दिवस त्या स्टीमर बंदरातच रोखून ठेवल्या होत्या.शेवटी स्टीमरचे मालक असलेल्या दादा अब्दुल्लाहच्या दबावाखाली सरकारनं भारतीयांना डरबनच्या भूमीवर पाय ठेवण्यास परवानगी दिली.

 *मिस्टर गांधींशिवाय इतर सर्वांचं स्वागत*
त्यावेळी तिथल्या गोऱ्या इंग्रज तरूणांनी असा निश्चय केला होता की, भारतीय प्रवासी आले तर चालतील पण मिस्टर गांधीला या भूमीवर पाऊल ठेवू देणार नाही. पण त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या तंगड्या तोडल्या जातील. अशी धमकी दिली गेली होती. अशा वातावरणात मोहनदासला सल्ला दिला गेला की, अंधार पडल्यानंतर त्यांनी जहाजातून बाहेर पडावं. त्यानुसार मोहनदासनं आपल्या कुटुंबियांना मित्र जिवाजी रुस्तमजी यांच्या घरी जायला सांगितलं. कस्तुरबासाठी तर हे मोठं धर्मसंकट उभं राहिलं होतं. अनोळखी प्रदेश, बोलली जाणारी अजाण भाषा, वेगळ्या धर्माचं पालन करणारी माणसं अशा ठिकाणी आपल्या पतीला एकटे सोडून दोन लहान मुलांना घेऊन जायचं होतं.

*पुन्हा एकदा अपमान*
डरबनच्या गोऱ्या तरुणांनी मोहनदासला विरोध करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्यांना असं समजलं होतं की, मोहनदास अद्यापि जहाजातून उतरलाच नाही. म्हणून ती मंडळी बंदरावर फेऱ्या मारत होती. कस्तुरबा आणि मुलांना घेऊन घोडागाडी पुढं निघाली पाठोपाठ मोहनदास चालत निघाला. रस्त्यावर वाहतूक फारशी नव्हती. त्यामुळं फेटा बांधलेल्या भारतीय माणसाला लोकांनी ओळखलं आणि गांधी.....गांधी....अशी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मोहनदासला पकडलं आणि मारहाण करायला सुरुवात केली. कुणी फेटा ओढला, कुणी कपडे फाडले,सगळा गोंधळ सुरू असतानाच तिथून डरबनच्या पोलीस सुपरिटेंड अलेक्झांडर यांची पत्नी जात होत्या त्या मध्ये पडल्या, त्यांनी त्या मारहाण करणाऱ्या तरुणांना दम भरला, धमकावलं. वातावरण शांत झालं पण रंगभेदाचा, वर्णद्वेषाचा पुन्हा एकदा जबरदस्त अनुभव मोहनदासला मिळाला. या परिस्थितीतून सही सलामतरीत्या आपला पारशी मित्र रुस्तमजींच्या घरी पोचले. तिथंही गोऱ्या तरुणांचा एक गट पोहोचला होता, रुस्तमजीनं चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना रोखून धरलं होतं. वेषांतर करून मोहनदासला मागच्या दरवाज्यातून पोलिसांचा वेष घालून पोलीस स्टेशनमध्ये पोहोचविले. तिथं पोलीस सुपरिटेंड उपस्थित होते. त्यांनी तरुणांच्या गटाला समजावून रुस्तमजींच्या घरापासून दूर पांगवलं. हळूहळू वातावरण शांत झालं.

*युद्धाच्या काळात कुणासोबत?*
काही दशकापासून आफ्रिकेत राहणाऱ्या नेदरलँड आणि बुअर म्हणून ओळखले जाणारे लोक आणि ब्रिटिश यांच्यात वाद सुरू झाला. जोहान्सबर्गवर कब्जा मिळविण्याचा छुपी योजना इंग्रजांनी आखली होती. हे लक्षांत येताच बुअरांनी त्याचा प्रतिकार केला. यांच्यातली लढाई तीन वर्षे सुरू होती. यात जखमी झालेल्यांसाठी मोहनदासने 'इंडियन अम्बुलन्स कोअर' नामक स्वयंसेवकांची तुकडी उभी केली. लष्करी जवानांप्रमाणे कोट-पॅन्ट आणि विशेष टोपी परिधान करून या स्वयंसेवकांनी मोहनदास बरोबर सेवा केली. युद्ध संपुष्टात आल्यानंतर गांधीजींच्या लक्षांत आलं की आपण जे अपेक्षिलं होतं तशाप्रकारचा अपेक्षित बदल इंग्रजांमध्ये झालेला नाही. अस्वस्थ मोहनदास मग या साऱ्या समस्या तशाच टाकून १९०१मध्यें भारतात परतला. पण थोड्या दिवसानंतर टेलिग्राम आला 'आपण ताबडतोब निघून या, इथली परिस्थिती गंभीर बनलीय!'

*आणखी एक अपमान स्वागताला होतं!*
एक वेगळ्या प्रकारचा अपमान, तिसऱ्यांदा आफ्रिकेत येणाऱ्या मोहनदासच्या स्वागतासाठी वाट पहात तिष्ठत होतं. इंग्रजांनी ट्रान्सवाल प्रांतात हिंदी भाषकांना प्रवेश करण्यास बंदी घातली होती, याशिवाय अधिक कडक कायदे त्यासाठी त्यांनी तयार केले. जे लोक तिथं राहतात त्यांना परवाना आवश्यक केला होता. इंग्रज अंमलदार त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा घरात घुसून त्याची तपासणी करू शकेल, असा फतवा काढला गेला होता. याचा अर्थ इंग्रज लोक अत्याचार करण्यासाठी आणखी खालच्या स्तरावर जाऊ लागलेत याची जाणीव मोहनदासला झाली. यांच्याविरोधात त्यांनी यहूदींच्या एका नाट्यगृहात सभेचं आयोजन केलं आणि त्याविरोधात एल्गार केला.

 *'सत्याग्रहा' चा शब्द इथं जन्मला!*
आज सर्वत्र प्रचलित झालेल्या 'सत्याग्रह' हा शब्द पहिल्यांदा आफ्रिकेत सप्टेंबर १९०६मध्ये वापरला गेला. ट्रान्सवालमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती. मोहनदासने त्यात कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही, सत्याचा आग्रह धरत लढाई लढायची, अशाप्रकारच्या प्रतिज्ञा सर्वांना घ्यायला लावल्या. तो संघर्ष 'सत्याग्रह' म्हणून ओळखला गेला. या सत्याग्रहाच्या दरम्यान मोहनदासनं आपली भूमिका मांडण्यासाठी 'इंडियन ओपिनियन' या नावाचं नियतकालिक देखील सुरू केलं होतं.

*अखेर सत्याचाच विजय झाला*
हा संघर्ष खूप दिवस चालला. इंग्रजांना इथं अखेर माघार घ्यावी लागली. आफ्रिकेत भारतीय लोकांच्या विरोधात काढलेला काळा कायदा जवळपास रद्द केला गेला तर काही कायदे नरमाईत पडले. दोन दशकानंतर मोहनदासला आपल्या जीवनकार्याचं सूत्र सापडलं. त्यासाठी त्यांना अनेकदा कारागृहाच्या वाऱ्या कराव्या लागल्या होत्या. अनेक प्रकारच्या शिक्षा भोगाव्या लागल्या होत्या. कारागृहात असताना त्यांना टोपी घालण्याची सक्ती करण्यात आली होती. 'संकटातून संधी' या न्यायाने मोहनदासनं ती टोपी आपल्या डोक्यावर कायम ठेवली. त्यानंतर त्या टोपीला 'गांधी टोपी' म्हणून लोक ओळखू लागले. इंग्रजांना आणि इतरांना हे आश्चर्य वाटत होतं की, या छोट्या उंचीच्या, अशक्त अशा माणसामागे लोक कसे जातात? त्यांच्या सभेला हजेरी कसे लावतात? कारागृहात जाण्यासाठीही तयार कसे होतात? अशा निश्चयी आणि निर्धारी लोकांसमोर झुकण्यावाचून सरकारकडे कोणताच पर्याय उरला नव्हता. मारामारी, हिंसक लढाई यानं भरलेल्या इतिहासात हा संघर्ष अत्यंत अनोखा आणि वेगळ्या प्रकारचा होता. इंग्रज आधी आफ्रिकेत आणि नंतर भारतात मोहनदासला ओळखू शकले नाहीत. अखेर त्यांना मोहनदासप्रती शरण जाण्याव्यतिरिक्त कोणताच मार्ग राहिला नाही. आफ्रिकेतील या संघर्षाला जे यश मिळालं, त्यानं इथं भारतात असलेल्या व्हाईसरॉयला याची भीती आणि चिंता वाटू लागली. त्यानं इंग्लडच्या राजराणीला तसं कळवलं. त्यात त्यानं आफ्रिकेतल्या भारतीयांवर होत असलेल्या अन्यायाबाबत तिथल्या इंग्रज शासकावर टीकाही केली होती.

*मोहन ते महात्मा...!*
या साऱ्या घटनांतून मोहन... मोहनदासचं ... महात्मा बनण्याची प्रक्रिया होण्यास प्रारंभ झाला होता. त्यामुळंच अनेक वर्षांनी आफ्रिकेतील गांधीवादी राष्ट्रपती नेल्सन मंडेला यांनी म्हटलं होतं, 'तुम्ही आम्हाला मोहनदास दिले होते, आम्ही त्यांना महात्मा बनवून परत दिलंय!' त्यांचं हे म्हणणं बऱ्याच अंशी खरं होतं. आफ्रिकेत रंगभेद वर्णवाद, नीती आणि हिंदी भाषकांच्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या विरोधात यश मिळवल्यानंतर गांधीजींना नवा संघर्ष हिंदुस्तानात सुरू करायचा होता. त्यासाठी गांधीजी आफ्रिकेतून १९१५ च्या सुमारास परतले. भारतात यश मिळालं, त्याचा पाया त्यांनी आफ्रिकेत घातला होता. त्याचा आरंभ बरोबर १२५... सव्वाशे वर्षांपूर्वी पोरबंदर ते डरबन प्रवासादरम्यान जाणता-अजाणता झाला होता. हे मात्र खरे! वकील मोहनदास केवळ दादा अब्दुल्लाह यांच्या खासगी व्यापारी पेढीचा खटला लढण्यासाठी आफ्रिकेत गेले होते. पुढे पुढे अशी परिस्थिती निर्माण झाली की, आफ्रिकेतील सगळ्या भारतीयांच्या पिढीची केस लढवून ते महात्मा बनले!

*गांधीजींनी तुरुंगवास भोगला!*
 'एशियाटिक कायदा सुधारणा' या नव्या कायद्याप्रमाणे सगळ्या हिंदी भाषकांना रजिस्ट्रेशन करून त्याचं सर्टिफिकेट स्वतःजवळ ठेवणं बंधनकारक होतं. या कायदा करण्यामागे तिथं राहत असलेल्या भारतीयांना आणि चिनींना तिथून हुसकून लावण्याचं षडयंत्र होतं. ब्रिटिशांनी जिथं जिथं आपली वसाहत केली तिथं तिथं तिथल्या जनतेला गुलाम बनविण्याचा सतत प्रयत्न केला होता. त्यासाठीच गांधीजी आणि हिंदी भाषक विरोध करीत होते. सर्टिफिकेट पाठोपाठ अनेक अनिष्ट कायदे त्या पाठोपाठ येणार होत्या. बापू नातालप्रांतातून कस्तुरबांची प्रकृती तपासून परतत असताना वोलक्रस्ट स्टेशनवर अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सर्टिफिकेट मागितलं, त्यांच्याकडे ते नव्हतं म्हणून गांधीजींना सजा झाली. ३ महिन्याची कैद किंवा ३० पौंड रकमेचा दंड! कधीच दंड न भरणाऱ्या गांधीजींनी तुरुंगवास पत्करला.
एका खासगी पेढीची केस लढविण्यास गेलेले मोहनदास गांधी आफ्रिकेतील एका अख्ख्या पिढीची केस लढवून महात्मा गांधी बनले!

- हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 5 May 2018

भल्याची मंदी, बुऱ्याची तेजी...!

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाचे मुखपत्र फुटपाथवर विकत असताना लोक मारहाण करत, हातातले अंक फेकून देत, पण ती मारहाण सहन करून पुन्हा अंकाचे गठ्ठे उचलून आरोळ्या ठोकणारे चांगले सुशिक्षित कार्यकर्ते मी बघितलेत. संघासाठी घरदार सोडून कुठेतरी संघकार्य करायला जाणारे चांगले इंजिनिअर्स, पदवीधर, उच्चपदवीधर, असलेले कार्यकर्ते मी बघितलेत. बायका-मुलांना उपवास घडवत समाजवाद आणण्यासाठी फाटक्या पायजम्याने वणवण फिरून वठून मेलेले साथी मी बघितलेत. काँग्रेस माझी माय म्हणत गांधी टोपी डोक्यावर चढवण्यापूर्वी तिला नमस्कार करणारे सच्चे काँग्रेस कार्यकर्तेही मी बघितलेत. शिवसेनाप्रमुखांचा आदेश आला की, जीवाची पर्वा न करता बेधडक, दे धडक झोकून देणारे शिवसैनिक मी बघितलेत. आता असे कार्यकर्ते कुठल्याच विचारामागे नाहीत. विचार तरी कुठे आहे मागे झपाटून जावं असा? सर्व क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच,...!"
----------------------------------------------------
*म* हाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लवकरच होतील असं वातावरण आहे. राजकीय पक्षांनी तशी तयारी चालविलीय. मागच्यावेळेला विधानसभेत जाण्यासाठी पांच हजाराहून अधिक उमेदवार तयार होते, आताही तेवढी माणसं असणारच! सह्याद्रीची छाती असलेल्या या महाराष्ट्रात अशी उमेदीची माणसं असणारच. पांच हजार जसे मैदानात तसे पांच हजार मैदानाबाहेरही असणार. त्यांची उमेदसुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही. बाहेर राहून आतल्याला बाहेर काढण्याचं काम हे बाहेरवाले अशा हुशारीने करतात की, देखते रहो....!

*या युतीतून त्या युतीत...!*
उमेदवारातले फक्त २८८ विधानसभेत जायचेत. त्यातले भगवे किती, निळे किती, हिरवेतांबडे किती, तिरंगी किती यावर सट्टे लागू लागलेत. आपलाच झेंडा फडकणार अशा डेंगा मारत असले तरी आतून सगळेच नेते टरकलेत. गळ्यात गळा घालून उभे असणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा कापायचा याची खलबते आपापल्या गोटात करत आहेत. ह्या युतीतून सुटून त्या युतीत जाण्याचेही बेत होत आहेत. शेवटी गोरगरिबांना तांदूळ, ज्वारी, मीठ, मिरची,तेल, साखर शक्य तेवढ्या स्वस्तात देण्याच्या बाबतीत सगळ्यांचे एकमत आहे.

*सारे एकाच माळेचे मणी*
झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहेच की! भाजपमध्ये तो आडवा आहे. हिरवा सेनेच्या झेंड्यात नाही, नेते सत्तरीला आले तरी एव्हरग्रीन आहेतच! शिवाय येणारे नेतृत्वाचे दोन कोंब रसरशीत हिरवाईच म्हणायची ती! भाजपने भगवा हिरवा आडवा घातलाय. काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेवून मध्ये पांढरा आणलाय. तिघांत भगवा कॉमन. उद्या भाजपला, शिवसेनेला वा काँग्रेसला आमदार कमी पडले तर ते एकमेकांकडे धावले तर आश्चर्य वाटायला नको. खरं म्हणजे निवडणुकांनंतर होणाऱ्या युत्या ह्याच महत्वाच्या. वेगवेगळ्या आघाड्यांपेक्षा निकालात चमकणार अपक्ष, इकडले-तिकडले बंडखोर. 'निवडून आलो आई, आता म्हणून नको नाही' असं आळवत काँग्रेस आयला लगटणाऱ्याला आय दूर सारत नाय! तेव्हा निवडणुकांच्या निकालानंतर होणारे नाटक अधिक रंगतदार. काँग्रेस, भाजप वा शिवसेना असो यांनी सर्वाधिक जागा जिंकल्या म्हणजे झालं! 'शंभर जागा जिंकल्या तरी आम्हीच सरकार बनवू' असा विश्वास दाखवणारे आहेत. याचा अर्थ पन्नास आमदार पळण्याची म्हणजे पटविण्याची तयारी आहे.

*सर्वच करताहेत वांझोटी राजकारण*
काँग्रेसनं ही पटवापटवी केली की, देवेंद्रच्या कार्यकर्त्यांनी, युती निकालानंतर ठेवायची ठरली तर आदित्य-उद्धव या जोडीनं संघर्ष यात्रा, भ्रष्टाचारविरोधी अभियान, कुजबुज सभा, महामेळावे यांचा भरगच्च तुफानी कार्यक्रम आखायला काही हरकत नाही. भाजपचं सरकार आलं तर ह्या नव्या सरकारला त्या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असोत अथवा आणखी कोणी ढवळपवळा असो. लोकांना समाधानकारक राजवट देता येणं एकंदरीने अशक्यच आहे. निवडणुकीसाठी उभे केलेले उमेदवार बघितल्यावर लोककल्याण करण्याची तळमळ सोडा; इच्छा असलेले यातील किती, असा प्रश्न पडतो. फारच थोडे निवडून येण्याची शक्यता आहे. टकुऱ्यावर कुणीतरी वरिष्ठ नेत्याचा शिक्का असलेलेच उमेदवार अधिक आहेत. कर्तृत्वाचा भरघोस पाया असणारे फारच थोडे आहेत. कोकणात सर्वच पक्षांनी सदैव दगडगोटे लोकांच्या पदरात बांधण्याचाच उद्योग केलाय. अंतुले-राणे सोडले तर दुसऱ्या कुठल्याही कोकणच्या आमदाराने-मंत्र्याने कधीही कोकणी जनतेच्या कल्याणासाठी कंबर कसून नेत्याने काम केलेले नाही. केलं ते वांझोटी राजकारण!

*शेणगोळे...! सारवायला उपयोगी!*
हाच प्रकार पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ इथंही झालाय. तीन इंच टाचाचे बूट घातले की माणसं उंच वाटतात, त्यांची कुठलीच उंची वाढत नाही. ती मोठीही बनत नाहीत. उमेदवार निवडताना निश्चित उमेदवारांचे काय बघितलं? कुणाही फालतू शेणगोळ्याप्रमाणे इकडेतिकडे सारवायला उपयोगी पडणाऱ्या लोकांना केवळ उमेदवाऱ्यांच नव्हेत तर मंत्रीपदेही मिळतात. हे दिसल्यानेच सर्वच पक्षातील झुरळंसुद्धा उमेदवाऱ्या मागू लागलेत. आणि उमेदवारी मिळाली नाही तर बंडखोरीही करायला लागलीत. उमेदवाऱ्या देताना जर उमेदवारांची बौद्धिक कुवत, कामाची तडफ, निष्ठा, आणि निस्वार्थी बुद्धीने वागण्याची वृत्ती बघितली असती तर आपोआपच इतर पक्षांनाही आपले उमेदवार निवडताना ह्याच गोष्टीचा विचार करावा लागला असता.

*भ्रष्ट-बेपर्वा-कुचकामी राजवटीचा पाया*
उमेदवार ठरवताना तो कुठल्या गटाचा, कुठल्या नेत्याचा, याला फार महत्व दिले जाते. आणि मग बंडखोरांच्या पेव फुटते. या बंडखोरांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन उमेदवार ठरवणाऱ्या नेते मंडळीपैकी कुणीतरी दिले असणारच! निवडून या, पक्ष तूम्हाला स्वीकारेल, इतपत आश्वासन तरी नक्कीच मिळालं असणारच! ही बंडखोरी आणि कामचलाऊ मंडळींना उमेदवारी देण्याची नेतेमंडळीची कारवाई  हा भ्रष्ट-बेपर्वा-कुचकामी राजवटीचा पाया आहे. नेत्यांना आपले सर्व उद्योग पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचे सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊन राज्य चालविण्याचा परिपाठ काँग्रेसनेच सुरू केला. मी समर्थ आहे असा आत्मविश्वास नेत्यांत असायलाच हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल तर मी समर्थ आहे असा आत्मविश्वास असणाऱ्यांची एक चांगली फळीच असावी लागते. अशी हुशार, निःस्वार्थी, कुठलेही काम करण्याची क्षमता असणारी अधिकाधिक माणसं विधानसभेत असावीत असा दृष्टिकोन ठेवूनच सर्व पक्षांनी आपले उमेदवार निवडायला हवेत. जे झेंडा फडकवायला उतावीळ झालेत ते सुद्धा करत नाहीत.

*भुरट्या राजकारण्यांचीच चलती आहे*
राजकारणात काही घडू शकते इतकी अस्थिरता आहे. आणि दाखवले जात आहे तितके वैचारिक मतभेद आता नाहीत. आज सर्वत्र भुरट्या राजकारण्यांचीच चलती आहे. सगळ्यांचा पोत एकच आहे हे कळल्यावर आडवे कुणाला घालायचे, उभे कुणाला करायचे हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे गुंफले की वस्त्र होते. उगाच अटीतटी ताणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेले विसरून वाट्टेल ते करतात. कार्यकर्ते ता अटीतटीने बरबाद होतात. निष्कारण भांडणे वाढतात. हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. या निवडणुकीनंतर आक्रस्ताळे राजकारण बाजूला पडेल.

*शहरी आणि ग्रामीण यांचा समन्वय हवा*
कुठलेही जनकल्याणाचे काम  जिद्दीनं, ईर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मन राखून त्याला विश्वास देऊन धडाक्याने विकासाची कामे करणारे कल्पक, विवेकी, विधायक, सुशील वृत्तीचे नेतृत्व ही युती महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी पाय रोवून गावातच राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रितभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. या तरुणांना एकमेकांना शह-काटशह देत, एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळीवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानांवर एकमेकाला पूरक  असे काम करण्याची गोडी लावायला हवी.

*बोलघेवड्यांना लोक बधत नाहीत*
राजकारण बदलते आहे. आता जंगी सभा आणि फर्डे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि 'आवाज कुणाचा' या आरोळ्या यांनी लोक बधत नाहीत. सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित होणार. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतोय. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतो असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आता मतदान करून लोक आपल्याला हवा असलेला प्रतिनिधी पाठविण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आला आहे. भरमसाठ भाषणबाजी करणाऱ्या भाकड नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला तयार नाहीत. भाषणांनी लाटा उठत नाहीत. आणि एखाद्या व्यक्तीला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. भ्रष्टाचार, गुन्हेगारी  यावर सोवळेपणाने बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढे डबोले आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे.

*तुमच्याही बुडाखाली हे सारं*
सोवळ्यात पावित्र्य असते असं मी मानत नाही. सोवळं पावित्र्यासाठी वापरलं जातही असावं, पण पावित्र्याचा
आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवण्यापासून दूर राहणेच बरे असे लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भारतीय जनता पक्ष असा सोवळं मिरवणाऱ्यांचा गड्डा किंवा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर ते इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण या सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा वेगळे नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुन्हा पुन्हा  घडतात. त्यावर का बोलायचं नाही? लिहायचं नाही? भाजपमध्येही भरपूर भ्रष्ट आहेत. भरपूर तत्वशून्य आहेत. भरपूर गुंडप्रवृत्तीचे आहेत, भरपूर संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारे आहेतच आहेत. काँग्रेसमधली घाण काढायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालची घाण दाखवली तर मग कळवळता का?

*'बंडखोर तितुका मेळवावा!'*
जनता पक्ष जेव्हा आकाराला आला, तेव्हा 'ही परस्परविरोधी विचारांच्या पक्षांची खिचडी आहे, एकेकाळी पराभूत झालेल्या बड्या आघाडीची सुधारून वाढवलेली नवी आवृत्ती आहे, आणि 'इंदिरा हटाव, काँग्रेस बचाव', हेच तिचे नकारात्मक ध्येय आहे.' असा प्रचार सत्ताबाज काँग्रेसजन करीत होते. तथापि, सत्तेचे सिंहासन बळकविण्यासाठी कोणताही विधिनिषेध न बाळगता कोणत्याही पक्षाशी शय्यासोबत करणाऱ्या काँग्रेसवाल्यांच्या ह्या प्रचाराचा विशेष परिणाम जनमानसावर झाला नाही. जनता पक्ष हा हुकूमशाहीचा पाडाव करून लोकशाही नी स्वातंत्र्य ह्यांना प्रतिष्ठा आणणारा नि लोकशाही मार्गाने भारतात सर्वांगीण क्रांती करू इच्छिणारा पक्ष आहे.' हा जनता पक्षाचा दावा जनताजनार्दनाने मानला आणि त्याला भरघोस यश दिले. केवळ सत्ता संपादनार्थ काँग्रेसला विरोध एवढेच जनता पक्षाचे नकारार्थी ध्येयधोरण आहे, असे लोकांना वाटले असते तर एवढे देदिप्यमान यश जनता पक्षाला लाभले नसते. म्हणूनच, सत्ता संपादनाखेरीज अन्य कोणतेही उद्दिष्ट नसलेला, अतएव काँग्रेसचीच नवी कार्बन कॉपी बनलेला पक्ष अशी प्रतिमा होऊ न देण्याची खबरदारी जबाबदार भाजपेयी नेत्यांनी घेतली पाहिजे. केंद्राप्रमाणेच राज्या-राज्यांतही काँग्रेसला सत्ताभ्रष्ट करणं हे साधन आहे, साध्य नव्हे, ह्याची जाणीव जराही पुसट होऊ नये. अन्यथा लोकांचा अपेक्षाभंग ठरलेला!


चौकट.....!
*साध्य, साधन, विवेक लुप्त तर झाला नाही ना!*
तथापि कर्नाटकात त्यापूर्वी गुजरातेत, उत्तरभारतात विधानसभांच्या निवडणुकांच्या वेळी जे वर्तन काही भाजपेयींकडून घडलं त्यावरून आणि महाराष्ट्रात काँग्रेसी बंडखोरांच्या स्वागताचा जो उल्हास भारतीय जनता पक्षात ओसंडून चालला आहे त्यावरून उपर्युक्त साध्य-साधन-विवेक लुप्त तर झाला नाही ना असं चित्र उभं राहतेय. भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आणि ठिकठिकाणी केल्या जाणाऱ्या भाषणातून भाजपेयी धुरिणांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधील सत्तालंपट लोकांसाठी त्यांच्या स्वागतासाठी ज्या शब्दसुमनांच्या पायघड्या पसरल्या आहेत आणि होत्या ते अधिक चिंताजनक आहे. महाराष्ट्रात सत्ता टिकविण्यासाठी, एकहाती सत्ता घेण्यासाठी भाजपेयींनी सारं बळ एकवटू नये असं नाही. किंबहुना, जी सर्वांगीण लोकशाहीवादी क्रांती भाजपेयींच घडवू इच्छितात, तिच्या पूर्ततेसाठी आणि केंद्रीय भाजपच्या प्रगतीपथावरील अडथळे दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते याचा विसर पडत चाललाय! उत्तरभारताप्रमाणेच दक्षिण भारतातही विशेषतः कर्नाटकात, महाराष्ट्रात एकच पक्ष विधानसभेत यशस्वी होणं ही कालोचित क्रमप्राप्त निकड आहे. असंच सामान्य जनतेचं मत आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारे ह्यांत सुसंवाद निर्माण होण्यासाठी कोणत्यातरी एकाच पक्षाचं बळ वाढणे गरजेचं आहे. त्यांच्या यशाचे ध्वज डौलाने फडकले पाहिजेत! अन्यथा लोकांच्या नशिबी पुन्हा कडबोळी सरकारं आलेली पाहावी लागणार!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...