Saturday 26 December 2020

बस्स झालं नेहरू-गांधींचं नाव घेणं *आता नवा नायक हवाय....!*


"काँग्रेसच्या भवितव्यावर आज मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. एकीकडं भाजपची वाटचाल 'शतप्रतिशत' च्या दिशेनं वाटचाल सुरू आहे. तर काँग्रेसची वाटचाल 'भारत मुक्त'च्या दिशेनं होत असल्याचं दिसतंय. अर्थात काँग्रेसच्या या अवस्थेला काँग्रेस शीर्षस्थ नेत्यांपासून नेते, कार्यकर्ते सगळेच जबाबदार आहेत. हे नाकारून चालणार नाही. समोर भाजप आणि मोदी-शहा यांचं मोठं आव्हान उभं ठाकलं असताना काँग्रेसमध्ये मात्र गटबाजी, इतर नेते आपापले नातेवाईक, सुभेदारी, गोतावळा सांभाळण्यातच धन्यता मानताना दिसताहेत. सध्यस्थितीत जनमानसावर छाप पाडून पक्षात नवचैतन्य निर्माण करील, पक्षसंघटना मजबूत करील असं नेतृत्व आजतरी काँग्रेसकडं दिसत नाही. काँग्रेसला काँग्रेसच हरवते, हा आजवरचा इतिहास आहे. आता राहुल गांधींना पुरेसा वेळ दिला गेलाय. त्यांनी एकदा काय तो निर्णय घेऊन काय ते ठरवावं. काँग्रेसनं नवतरुणांमध्ये काम करण्याची गरज आहे. पक्षवाढीसाठी सामूहिक प्रयत्न हवेत. आज देशाला एक मजबूत विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. एकाधिकारशाही, छुपी आणीबाणी देशाला परवडणारी नाही. कोणी काहीही म्हटलं तरी, देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसकडंच आशेनं पाहिलं जातंय हेही तेवढंच सत्य आहे!"
-----------------------------------------------------

*ए* खाद्या राजघराण्याप्रमाणं वंशपरंपरागत नेतृत्व आपल्याकडंच राखून ठेवणं आणि वर लोकशाहीच्या नावानं ढोल बडवणं ही संकुचितवृत्ती आजच्या काँग्रेसच्या अधःपतनाला जबाबदार आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधील खडाजंगी पक्षात दुफळी निर्माण करतेय. वरिष्ठांना राहुल गांधी यांचं नेतृत्व तकलादू वाटतंय; तर राहुल यांच्याकरिता पक्षातली वरिष्ठ मंडळी अडथळे ठरताहेत. काँग्रेसच्या उतरत्या काळात गांधी कुटुंबियांवर स्वकीयांकडून होणारी टीका जिव्हारी लागणारी असली, तरीही ती रास्त आहे. कपिल सिब्बल यांच्या बरोबरीनंच काँग्रेसमधील शीर्षस्थ नेते पक्षाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करताना दिसतात. लोकशाही राष्ट्रात घराणेशाही कितीकाळ तग धरणार याचं आत्मपरीक्षण गांधी कुटुंबीयांनीच करायला हवं. महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ही काँग्रेस नक्कीच नाही. सर्वांना संधी मिळायला हवी यासाठी गांधीजी नेहमीच आग्रही असत. काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्यासाठी सक्षम, कणखर नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांचं कुचकामी नेतृत्व, पक्षश्रेष्ठींची चापलूसी करण्यात व्यग्र असलेला एक गट आणि ज्येष्ठांचा ढासळत चाललेला संयम यामुळं काँग्रेस दिशाहीन ठरतेय. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची तसदी काँग्रेस नेतृत्वानं कधी घेतलेलीच नाही. त्याहीपलीकडं जाऊन पाहिल्यास, त्यांना तिथपर्यंत पोहोचू न देण्याचं गलिच्छ राजकारण स्थानिक पातळीवरील नेत्यांनी केल्याचं दिसून येतं. त्याचा परिणाम आज काँग्रेस भोगतेय. आज ना उद्या काँग्रेसला गांधी परिवार सोडून नेतृत्वाचा विचार करावाच लागणार आहे. आपल्या परिघाबाहेर जाऊन विचार न केल्यास काँग्रेसचे अधःपतन अटळ आहे.

कॉंग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांनी गांधी-नेहरु कुटुंबातील व्यक्तींना आग्रह करुन कॉंग्रेसचं नेतृत्व करायला प्रेमाची सक्ती करु नये. कॉंग्रेसनं अशी संस्कृती नव्यानं तयार करावी की, जे सामुदायिक नेतृत्व मान्य होईल. कॉंग्रेस पक्ष हा खरंतर जमीनदार आणि सरंजामदार यांनी चालवलेला पक्ष झालाय. स्वातंत्र्यापूर्वीची राष्ट्रीय सभा ही कॉंग्रेस नव्हती. ते एक सर्व विचारांचं व्यासपीठ होतं, अगदी हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट, समाजवादी, अमीर-उमराव असे सगळे त्यात होते. नंतरच्या काळात ही राष्ट्रीय सभा-काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर आणि दीर्घकाळ सत्ता उपभोगली पण पक्षबांधणी केली नाही. सभोवती जमा झालेला मेळा तसाच कॉंग्रेस नेतृत्वाला मायबाप सरकार म्हणत राहीला आणि नेतृत्व नेहरु-गांधी घराण्याकडं असं म्हणत राहीलं होतं. त्याची संवयच पडून गेलीय. मतदार विचारत आहेत की, स्वातंत्र्याची किंमत पक्षानं कधीच वसूल केलीय. आणखी किती काळ त्याची कमाई खायची? नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील नवीन नेतृत्व केव्हा आणणार? कॉंग्रेसचा हिंदुत्ववाद हा वैदिक धर्माचा कट्टरतावाद नाही. हेच काय ते वेगळेपण आहे. म्हणूनच अल्पसंख्याक आणि दलित-आदिवासी त्यांचा आजही मतदार आहे. पण आता त्यांनाच मतदार म्हणून अपात्र करण्याचं कारस्थान सुरु झालंय. राहुल गांधी, सोनियाजी, प्रियंका गांधी या व्यतिरिक्त नवीन चेहरा तयार केला गेला नाही. राहुल गांधी साडेसहा वर्षे काय करीत होते? २०१४ च्या पराभवानं कॉंग्रेसचं घर वाहून गेलंय. ते सावरायचं सोडून सत्तावादी घटक उरलेले वासे-बांबू घेऊन पळत सुटले होते. सर्वच धर्मनिरपेक्ष संघटनांनी अजूनही आपापले अहंकार, सोडलेले नाहीत. लोकशाहीवादी असावं पण कुठवर? सर्वांना एकत्र ठेवण्यासाठीची किमान शिस्तही पाळू शकत नाही? प्रत्येकाला असं वाटतं. मला स्वतंत्र वलय आहे. ते काही प्रमाणात खरंही आहे. पक्षाची धुरा किमान दोन हजार दिवस आणि अठ्ठेचाळीस हजार तास राहुल गांधींकडं होती. ते पार्ट टाईम राजकारणी आहेत अशी टीका त्यांच्यावर होतेय. त्याचं उत्तर कॉंग्रेसकडं नाही. हाथरससारखा प्रकार घडल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही काॽ हिंदी भाषिक पट्टयात हिंदुत्ववादी आणि दक्षिण पट्टयात भाषिक प्रादेशिक पक्ष आपापलं साम्राज्य सांभाळून आहेत. हिंदी पट्ट्यातील अखिलेश यादव, मायावती यांची सद्दी संपली कायॽ तेजस्वी यादव यांनी बऱ्यापैकी बाजी मारली. पण नापासाचे गुण कोणीही पाहात नाहीत. वरच्या इयत्तेत प्रवेश मिळाला नाही. हेच समजलं जातं. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ही एकाच बापाची अपत्ये आहेत. पण तरीही त्यांची एकत्रित क्षमता किती? आता अशी वेळ आलीय की, सोनिया, राहुल, प्रियंका यांनी जाहीर करावं की, आमच्यापैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही. आम्ही देशासाठी, राज्यघटनेच्या रक्षणासाठी देशभर फिरून जनजागृती करु. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, ममता, तेजस्वी यादव, अखिलेश यांना राहुल गांधींनी विश्वासात घेऊन देशाचा दौरा करावा. एवीतेवी अशीही सत्ता नाहीच तर निदान आपल्याकडं आशेनं पाहणाऱ्या जनतेला पुढं दिलासा मिळेल असं काम तरी होईल. पण या साऱ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच अनेक संस्थाही त्यांच्याच हातात आहेत त्यावर त्यांचा कब्जा आहे म्हणून त्यांना हा असा त्याग करता येत नाहीये.

बहुतेकजण कॉंग्रेसचं वय १८८५ पासून मोजतात. खरंतर ते चुकीचं आहे. सर अॅलन ह्यूम यांनी जी राष्ट्रीय सभा स्थापन केली होती. तिचा आणि १९४७ नंतरच्या कॉंग्रेसचा राजकीय पक्ष म्हणून काहीही संबंध नव्हता. १८८५ साली सांस्कृतिकदृष्ट्या व्यापक असा मंच तयार झाला होता. कॉंग्रेसला फारच मागं न्यायचं झालं तर १९२५ नंतर कॉंग्रेस खऱ्या अर्थानं गांधीजींच्या मार्गानं चालू लागली होती. त्याचवेळी संघाचीही स्थापना झाली. हिंदुत्ववादी तर टिळकांच्या निधनानंतर लगेचच काँग्रेसमधून बाहेर पडले होते. कम्युनिस्ट पक्षाची स्थापनाही त्याचवेळी झाली होती. नंतरची उरलेली कॉंग्रेस ही गांधी कॉंग्रेस म्हणून ओळखली जात होती. १९३४ नंतर कॉंग्रेस अंतर्गत समाजवादी चूल निर्माण झाली. त्यांना कॉंग्रेसची पोरं म्हणूनच ओळखलं जातं होतं. परंतु त्या पंधरा वर्षांत या पोरांनीच कॉंग्रेस पक्ष चालविला होता. जयप्रकाश नारायण असोत की, डॉ राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन असो की अशोक मेहता, ना.ग.गोरे, एसेम जोशी, साने गुरुजी, आचार्य नरेंद्र देव. असा जबरदस्त समाजवादी गट कॉंग्रेस पक्षांतर्गत काम करीत होता. कॉंग्रेस जरी गांधींच्या नेतृत्वाखाली काम करीत होती तरी कॉंग्रेस अंतर्गत जसे समाजवादी विचारांचा गट होता तसाच उरलेल्यांमध्ये एक गट हिंदुत्ववादी विचारांचा होता. त्यांचे म्होरके प्रामुख्यानं सरदार पटेल आणि डॉ. राजेंद्रप्रसाद होते. त्यांचा समाजवादी गटाला विरोध होता; इतकंच नव्हे तर, आचार्य नरेंद्र देव यांना कॉंग्रेसचं अध्यक्ष होऊ दिलं नाही. अन्यथा त्यावेळी समाजवादी गटानं कॉंग्रेस सोडली नसती तर आज चित्र वेगळं दिसलं असतं. पंडित नेहरुंही सरदार पटेल गटापुढं हतबल होते. १९५० नंतर सत्तेत मश्गूल असलेल्या कॉंग्रेसनं संघटना बांधणीकडं लक्षच दिलं नाही. त्याआधी तर संघटना अशी स्थितीच नव्हती. जो स्वातंत्र्याच्या बाजूनं तो कॉंग्रेसवाला असा सरळ हिशोब होता. १९५२ साली भरभरुन मतं मिळवून कॉंग्रेस सत्तेवर आली. काँग्रेसनं स्वातंत्र्याच्या कष्टाची कमाई १९७७ पर्यंत खाल्ली. ज्या समाजवाद्यांनी खस्ता खाल्ल्या त्यांची अवस्था आणखीन बिकट झाली होती. त्यांची ओळख कॉंग्रेस म्हणून होती. समाजवादी म्हणून त्यांना वेगळी ओळख नव्हती. सगळेच विद्वान होते. पण सतरा आचारी एकत्र आले की, स्वयंपाकाची नासाडी तर होणारच. तशी अवस्था समाजवाद्यांची झाली. १९७७ नंतर कॉंग्रेसला धक्का देऊ शकतो हे सर्वच विरोधकांना समजलं होतं. पण त्यांच्या गुणांपेक्षा कॉंग्रेसच्या चुकांनी ते सत्तेवर आले होते. इंदिरा गांधी या शेवटच्या कॉंग्रेस नेत्या ठरल्या की ज्यांना जनसमुदायात देशभर स्थान होतं. इतकंच नव्हे तर, त्यांच्या मृत्यूनंही कॉंग्रेसला तारलं होतं. राजीव गांधी लोकनेते नव्हते तर 'सज्जन राजपुत्र' म्हणून त्यांना मान मिळाला. त्यांनाही कॉंग्रेसचं नेतृत्व करता आलं नव्हतं. ते राजकारणात स्थिरावयाच्या आतच घात झाला. तशी कॉंग्रेसची सद्दी इंदिरा गांधीनंतर संपली होती. राजीव गांधींना निर्माण झालेल्या तत्कालीन परिस्थितीनं पंतप्रधान बनविलं होतं. लोकमतांचा गठ्ठा त्यांना मिळाला होता. परंतु त्यांची चवही मतदारांनी चाखली होती. इंदिरा पुत्र म्हणूनच त्यांची ओळख होती. कॉंग्रेसला ओहोटी याच काळात लागली होती. जहाज बुडणार तेवढ्यात राजीव गांधींची हत्त्या कामी आली. त्यानंतरची काँग्रेसची परिस्थिती आपण पाहतो आहेच. 'भाकरी का करपली?' याचं उत्तर बिरबलानं पाचशे वर्षांपूर्वी दिलं होतं. ४०-५० वर्षाचा काळ उलटलाय, नेहरू-गांधींचा महिमा नव्या पिढीवर आता राहिलेला नाही त्यामुळं काँग्रेसनं आता नव्यानं सुरुवात करायची गरज आहे.

देशाची राजकीय प्रकृती ती नेहमीच तोळा मासा राहिलेली. आता तर सत्ताधारी लोकशाही तिरडीवर ठेवायच्या तयारीला लागलेत कायॽ असं वाटावं अशी स्थिती निर्माण झालीय. या अवस्थांचं केंद्र नेहमी दिल्ली राहिलेलं आहे. पूर्वी डॉ. राममनोहर लोहियांनी दिल्लीला 'छैलछबेली, रंगरंगीली' असं म्हटलं होतं. अशा दिल्लीतल्या सत्ताधारी असलेल्या इंदिरा गांधी पंचेचाळीस वर्षांपूर्वी विरोधकांना देशद्रोही म्हणत असत आणि बिगर राजकीय आंदोलन असेल तर यामध्ये विदेशीशक्तीचा हात होता असं म्हणत असत. अशाच प्रकारच्या आंदोलनांना पंतप्रधान बनलेल्या अटलबिहारी वाजपेयींनी देशातलं वातावरण 'हुकूमशाहीकडं आगेकूच' असल्याचं म्हटलं होतं. आता दररोज वाजपेयींच्या तसबिरीपुढं झुकून नमस्कार करणारे मंत्री शेतकऱ्यांना खलिस्तान समर्थक म्हणताहेत. तर कोणाला पाकिस्तानचं आणि चीनचं पाठबळ आंदोलनामागं उभं असल्याचं दिसतंय. सगळे राजकारणी चहाटळ आणि हरामखोर असतात. त्यांना सर्वच घटनात्मक संस्था दावणीला बांधायच्या असतात. १९७५ साली जे आणीबाणीत भोगलं त्याची आता याद कॉंग्रेसवाल्यांनाही नको आहे. इतका भयानक अपमान लोकशाहीचा इंदिरा गांधींनी केला होता. आताही शेतकऱ्यांना खलिस्तानी म्हटलं जातंय. त्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला प्रतिसाद देऊन सरकारनं त्यांचं म्हणणं ऐकायचं सोडून त्यांच्या आंदोलनाला पैसा कोठून आलाय? असे प्रश्न करुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहातेय. १९७५ सालची भयानक आणीबाणी राजकीय होती. सामाजिक नव्हती. त्यामुळं राजकारण्यांमध्ये लाथाळ्या होत होत्या. मात्र आजची परिस्थिती राजकीय कमी आणि समाजासमाजामध्ये फूट पाडणारी अधिक आहे. जेव्हा एखादा समाज दुभंगला जाऊन त्याच्यात मानसिक फाळणी होती, तेव्हा एकाच सीमेच्या आत अनेक देश तयार होतात. त्याची झळ देशानं १९४७ साली सोसलीय आणि त्याची फळं आपण अजून भोगतोय. पण आज शांतता राखायला इथं गांधीजी नाहीत. शासनात पंडित नेहरू नाहीत आणि विरोधकांत जयप्रकाश नाहीत. आता समाज पुरुषानंच गांधी बनावं, नेहरु व्हावं आणि लोकनायकत्व स्विकारावं!

चौकट
काही मोजके इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मिडिया सोडले तर सगळेच हरामखोर उघडे पडले आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालविलाय. सरकारनं शेतकरी विधेयक हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनविलाय. सरकार बहुमतांचा अहंकार दाखवित आहे. या देशात विरोधी पक्ष शिल्लक राहिलेला नाही. सरकार आपल्या चुकांनी स्वत:ला बदनाम करुन घेतंय. शेतकरी आंदोलन झालं नसतं तर विरोधी पक्षाला संजीवनी मिळाली नसती. नालायक विरोधक राज्यसभेत बिल मंजुरीसाठी आलं तेव्हा काय करीत होते? शेतकऱ्यांच्या उद्रेकाचा फायदा लांबून विरोधी पक्ष घेत आहेत. सरकारनं अब्रु वाचवायची असेल तर विधेयकच परत घ्यावं. नाहक प्रतिष्ठेचा प्रश्न करु नये. जगभर आंदोलनाच्या झळांची धग पोचलीय. आपल्या विरोधी वातावरणाचा लाभ विरोधी पक्षाला मिळेल अशी भीती सरकारला वाटतेय. या भीतीपोटी सरकारमधील बेअक्कल मंत्री शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवत असतील तर त्या मंत्र्यांना पदावरुन हाकलून द्यावं. सत्ता टिकविण्यासाठी एकात्मता पणाला लावू नका. शिखांचा इतिहास राष्ट्रासाठी बलिदानाचा आहे. दळभद्री मंत्री युध्दाच्यावेळी घुबडासारखं घरात दडून बसतात. सीमेवर जवान प्राणाची बाजी लावतात. त्यात शिखांचा वाटाही मोलाचा असतो आणि त्यांच्याच निष्ठेवर शंका घेऊन त्यांना तुकडे गॅंग म्हणता? इतक्या खालच्या थराला जाता? विरोधी राजकीय पक्षांना म्हणता इतपत नागरिकांनी सहन केलं. कारण सगळे राजकारणी नाव बदलून तोच रोल अदा करतात. पण किसानांना आणि त्यांच्या सीमेवरच्या जवान पुत्रांना तुम्ही तुकडे गॅंग म्हणता? खलिस्तानची मदत मिळते म्हणता? पाकिस्तान आणि चीनचा हात आहे म्हणता? नागरिक कसं सहन करतील. सरकारची विधेयकावर काही बाजू असेल तर तीही शेतकऱ्यांनी ऐकून घेतली असती पण आधी शेतकऱ्यांना दादच द्यायची नाही. आंदोलनाचं स्वरुप उग्र झालं की, विधेयकात सुधारणा करु असा बचावात्मक पवित्रा घ्यायचा. मग आधीच ही नमती भाषा का वापरली नाही. बहुमताची मस्ती आणि प्रतिष्ठेचा प्रश्न केला म्हणून हा उद्योग वाढला. सुरुवातीलाच हा पवित्रा घेतला असता तर शेतकऱ्यांनीही कदाचित सरकारचं ऐकलं असतं. पण सत्तेच्या गुर्मीत विरोधकांवरचा राग शेतकऱ्यांवर काढला. एवढेच नव्हे तर काही शेंदाडांनी शेतकऱ्यांच्या निष्ठेला आव्हान दिल ते कसे विश्वास ठेवतील? सरकारनं आणि प्रधानमंत्र्यानी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसमोर देशातल्या इतर राज्यातल्या शेतकऱ्यांना उभं केलंय. आता दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सन्माननीय तोडगा काढावा. यात सर्वांचंच भलं आहे. विरोधकांनीही आपल्याला चळवळीच्या गाडीत उभी राहण्यापुरती का होईना जागा मिळाली म्हणून चेकाळू नये. स्फोटक परिस्थिती निवळेल असा प्रयत्न करायला हवाय.
हरीश केंची
९४२३१०६०९

आता हवाय समाजवादी विचार!

"समाजवादी चळवळीला ना राजकीय यश मिळाले, ना सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात फारसा प्रभाव टाकता आला. असे का झालं, याचं आत्मपरीक्षण करणं ही काळाची गरज आहे. समाजवादी नेत्यांना राजकारणात पडण्याची पूर्वी घाई झाली होती. विचारानं कार्यकर्ता पुढे जावा, असं ठरविण्याऐवजी समाजवादी विचारांची टोपी आणि नारा निवडून येणाऱ्या माणसाच्या हाती दिला. ती चूक होती. इतिहासात अनेक मोठ्या चुका चळवळीनं केल्या आहेत. नव्या पिढीत अनेकांना त्या माहीत नसतील. पण जुनीजाणती माणसं प्रश्न विचारतील. त्यामुळं आत्मपरीक्षणाची गरज आहे. किमान स्वल्पविराम आणि शब्दरचनेवरून होणारे मतभेद टाळता आले तरी बरेच काही होऊ शकेल. समाजात समाजवादी चळवळीविषयी आस्था बाळगून असणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांना जोडून घेण्यासाठीचा कार्यक्रम आपल्याकडं नाही. तो करता आला तरी पुरेसं होईल. सध्या लोकशाहीच्या शिखर संस्थांवर आपल्याच विचाराचे कार्यकर्ते बसविण्याचे काम चालू आहे. समाजवादी नेत्यांनी त्यांचं सरकार होते तेव्हा असं काही न करता विचारानं वागणाऱ्या कार्यकर्त्यांला लाभ दिला नाही, हा काय आपलाच आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच महत्त्व दिलं गेलं, त्यामुळं आपले कार्यकर्ते नेत्यांनी कुजविले!"
--------------------------------

*आ* ज देशात निर्माण झालेल्या वातावरणात आठवण आली ती जनता राजवटीची! देशात आणीबाणी लादली गेली, लोकशाहीवर घाला घातला गेला, त्यावेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा लोकजागृती केली होती. लोकशाही पुनर्स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नवनिर्माणाच्या संकल्पनेला सुरुवात केली. देशात असलेल्या सगळ्या पक्षांची त्यांनी मोट बांधली आणि जनता दलाची स्थापना केली. काँग्रेसला समर्थ पर्याय लाभला म्हणून देशवासियांनीही जनता दलाला भरभरून मतं दिली आणि सत्तेवर बसवलं. समाजवाद्यांच्या हातात देशाच्या सत्तेची सारी सूत्रं सोपविली. पण त्यांना ते काही झेपलं नाही. त्या जनता दलातल्या समाजवाद्यांच्या आता अक्षरशः चोथा झालाय. त्यातील काही धूर्त, व्यवहारी राजकारण्यांनी बुडता बुडता समाजवाद्यांच्या माथ्यावर पाय देऊन उभं राहण्याचा व्यवहार केला. भाईंसारखी काही मंडळी ही निष्ठावान, लढवय्ये, साधनसुचिता पाळणारे, त्यांनी साधायचे ठरविले असते, तर खूप काही साधून घेतलं असतं. व्ही.पी.सिंग यांच्या न्यायासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या निष्ठेचे वारेमाप कौतुक करणाऱ्या समाजवाद्यांना व्ही.पी.सिंगच भोवले! राजकीय विचारसरणीत त्यावेळी समाजवादीचं वर्चस्व होतं. देशात सक्षम विरोधीपक्ष म्हणून समाजवादी पक्षांकडेच पाहिलं जातं होतं. त्यानंतरच्या काळात समाजवाद्यांचं हे पानिपत कशामुळे घडलं. याचा विचार या मंडळींनी करायला हवा होता. जनता पक्षात जाऊन समाजवाद्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं, याचा हिशेब करण्यात आजतरी काहीच अर्थ नाही. पण व्यक्तिदोषामुळे  'समाजवाद' वाऱ्यावर पडला! हे मान्यच करावं लागेल. सध्या 'समाजवादा'ची काँग्रेसनं सोडचिठ्ठी दिल्यासारखीच परिस्थिती करून टाकली आहे. आज सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला तर समाजवादाचे सोयरसुतकच नाही. अशावेळी समतेचा, बंधुतेचा आग्रह धरून सगळ्या दबलेल्यांना, आजवर उपेक्षाच सहन केलेल्यांना एकत्र आणून, त्यांच्यात विश्वास जागवून त्यांना समाजवादी ताकद म्हणून उभं होण्याची हिंमत देऊन समाजवादी पक्ष पुन्हा उभा करण्याचा विचार समाजवाद्यांनी का करू नये? तिसरा पर्याय का उभा करू नये. लोकांच्या भावना आजतरी अशाच भाषेत त्यांना काँग्रेसी राजवट नकोय त्याहून अधिक भाजपेयी नकोत पण पर्याय नसल्यानं त्यांची घुसमट होतेय याला मार्ग मिळेल. 

*समाजवादी नेते आपसातच झुंजले*
उत्तरप्रदेशात कांशीराम-मायावती हे महाराष्ट्रातला फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार घेऊन तुफान उठवू शकतात. मग संघर्ष करण्याची इच्छा आणि ईर्षा असलेले समाजवादी आपसात झुंजण्याचा, आपलेच कपडे फाडण्याचा उद्योग सोडून एकत्र का येत नाहीत. भाईंनी असा प्रयत्न केला होता. ते स्वतः, किसन पटनाईक, केशवराव जाधव यांनी हैद्राबादेत समाजवादी दल निर्माण समितीच्यावतीने एक बैठक घेऊन समाजवादावर निष्ठा असणाऱ्या काहींना एकत्र आणलं होतं. 'सोशालिस्ट जन परिषद' अशा नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला होता. या प्रयत्नपासून दूर राहण्याचे व कुण्या नवागताकडून अपमानित व्हायचं कारणच काय? संधीसाधू राजकारणाच्या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी एकटे भाई वैद्य पुण्यातून समाजवादी जण परिषदेची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असत. पूर्वी काकाकुवा मॅनशन येथे होणाऱ्या बैठका, चर्चा, परिषदा, सभा आज नवीपेठेतल्या एस.एम.जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होतात एवढाच काय तो बदल झालाय. समाजवादी विचारांची मंडळी सध्या चाचपडताहेत. कुणी शरद पवारांना जवळ केलंय तर कुणी काँग्रेसवासी झालेत. आम आदमी पक्षाच्या निर्मितीनंतर उरले सुरलेले समाजवादी त्यांच्यामागे गेले. पण इकडे तिकडे गेलेल्या साऱ्या समाजवाद्यांचा भ्रमनिरास झालाय. पक्षाबंदलाच्या जाणिवेनं निष्ठावान समाजवाद्यांची घुसमट होते आहे. भाईंच्या जिवंतपणी जे होऊ शकलं नाही ते त्यांच्या मृत्यूनंतर का होईना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुन्हा एकदा समाजवाद्यांची भक्कम एकजूट झाली, तर समाजवादी राजकीय विचारांनी प्रेरित झालेल्यांना एक दिलासा मिळेल. आणि समाजवाद्यांनी भाई वैद्यांना आदरांजली वाहिल्याचे समाधानही त्यांना लाभेल!

*ही घसट आणि घुसमट तेवढी सरळ नाही!*
देशातली सध्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही किंबहुना ती अस्वस्थ करणारी आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपेयींनी आपल्या वागण्याने केवळ विरोधी पक्षांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दुखावलं आहे. सुरुवातीपासून बरोबर असलेले शिवसेना, अकाली दल, तेलुगू देशम,यासारखे मित्र दूर जाताहेत. महाराष्ट्रातील लोकनेते म्हणून समजले जाणारे शरद पवार भाजपच्या पाठीशी उभे राहता राहता अचानक भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेत. एकीकडे शरद पवारांची लोकांना दहशत वाटावी अशी विकृत प्रतिमा उभी करायची दुसरीकडं त्यांच्याशी जमवून घेऊन नवी राजकीय समीकरणं बनविण्याचे प्रयत्न करायचे. असा सध्या प्रकार सुरू आहे. कळपापासून फोडायचा, एकाकी पाडायचा आणि चट्टामट्टा करून संपवायचा 'लांडगे डाव' सध्या राजकारणात रंगविला जातोय. शरद पवार डाव्यांच्या तावडीत सापडताहेत की, डाव्यांना पवार आपल्या राजकारणासाठी खेळवत आहेत, हे अजून ठरवायचंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार यांची ताकद काय असेल, कशी असेल यावर सारे अवलंबून राहील. कारण ही घसट आणि घुसमट दिसते तेवढी सरळ नाही. पुराणातली कथा आहे. महाभारतातली, भीम-जरासंघाची कुस्ती चालली होती. भीम पुन्हा पुन्हा जरासंघाला फाडत होता. पण जरासंघ पुन्हा पुन्हा साधला जात होता. भीमाची ताकद पुरेशी नव्हती. अशावेळी आखाड्यात नसलेल्या कृष्णाने भीमाला डाव सुचविला. जो पुन्हा पुन्हा जोडला जातो, त्याला न जोडण्यासाठी काय करायला हवं हे भीमाला कृष्णाने सुचविले आणि जरासंघ कायमचा भंगला! पवार, ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काहीही झाले तरी त्याचा निकाल ह्या तिघांना हवा तसाच लागेल असं धरून चालणार नाही. काहीही घडू शकते, एवढं अशाश्वत राजकारण सध्याचं बनले आहे.

*भाजपची भगवी काँग्रेस बनलीय*
सर्वसत्ताधारी बनलेल्या भाजपेयींना काँग्रेससारखं सर्वसमावेशक बनण्याचा विचार दिसतो आहे. सध्याच्या त्यांच्या सर्व हालचाली या बाबी स्पष्ट करतात. जणू भगवी काँग्रेस असावी असं त्याचं रूप झालंय. काँग्रेस समाजवादापासून केव्हाच दूर झालीय. खासगीकरण, निर्गुणवणूक हे त्यांनीच सुरू केलं. ज्याचा परिणाम आज दिसून येतोय. समाजवादासाठी कंबर कसून उभं व्हावं आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी आजही समाजवाद प्रभावीपणे उपयोगी पडतो हे आव्हानपूर्वक दाखवावं अशी इच्छा असणारा काँग्रेसमध्ये कुणी नेता नसल्यानं सध्या ज्याच्या हातात पक्षाची सूत्रं आहेत, त्यांना टोचणीपुरतीच समाजवादी निष्ठा काही जण दाखवीत आहेत. समाजवादाचा ठेका घेतलेल्या साथीनी एकमेकांचे पाय ओढण्यातच आपला शक्तिपात करून घेतल्याने आणि मार्क्सवादाचे ठेकेदारही मर्यादीत क्षेत्रातली आपली मक्तेदारी शाबूत ठेवण्यातच गुंतून पडल्याने 'आई मेली, बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला!' अशी समाजवाद्यांची अवस्था झालीय! समाजवाद समाजाने नाकारलेलाच नाही तर समाजाचे ज्यांनी कधी सोयरसुतक ठेवलं नाही, अशा समाजवादी नेत्यांना समाजाने नाकारले आहे. या नेत्यांचे प्रताप लोकांना परवडत नाहीत. जर समाजवादी नेते तात्त्विक काथ्याकूटात न हरवत व्यवहाराशी सांगड घालून वागले असते तर ही अशी अवकळा त्यांना, त्यांच्या पक्षाला प्राप्त झाली नसती. हा व्यवहार काँग्रेसवाल्यांना चांगला जमतो. त्या भांडवलावर तर भल्या भल्या समाजवादी नेत्यांना पटवून शरद पवारांचा पुलोद प्रयोग महाराष्ट्रात झाला. आजही समाजवादात पवार नई रोशनी आणतील असा भाबडा विश्वास बाळगणारे बालबैरागी बरेच आहेत. आजवर मनाची नाही तर जनाची लाज बाळगून राजकारणात वावरण्याची काळजी नेते, कार्यकर्ते घेत असत. आता सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय. आज समाजवाद पराभूत झालाही असेल; पण सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी सामर्थ्य समाजवादानेच प्राप्त झालं आहे, हे विसरून चालणार नाही.  समतेसाठी झुंजणाऱ्या मराठी माणसाला एवढ्या सहजपणे सोडचिठ्ठी देता येणार नाही. समाजवादी सामर्थ्यशाली फळी कशी कोसळली, का कोसळली, याचा शोध घेऊन जरूर ते बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचा मार्ग आपल्याला शोधावाच लागेल!

चौकट........
समाजवादी का संपले!*
महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असे आजवर मानले जात होते. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणले. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागवा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच  जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली.लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपले भाग्य आपण घडवू या निर्धाराने गावोगाव नव जोमाने तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसाने स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचे वर्तन सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर व सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळे मर्यादितच राहिला. भारतामध्ये लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पुढे १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर या समाजवाद्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली; मात्र त्यात पुढे एकजुट राहिली नाही आणि १९७७ मध्ये समाजवादी पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर त्यांना फारसे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणे, हे काँगेसचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. कम्यूनिस्ट पक्ष शासित साम्यवादी राजवटी, पश्चिम यूरोपातील कल्याणकारी राज्याची उत्तम प्रकारे अंमलात आणून जनतेला मोठया प्रमाणात सामाजिक सुरक्षा पुरविणाऱ्या लोकशाही समाजवादी राजवटी, भारतातील गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, राज्य समाजवादास नकार देत जनतेच्या सहभागावर व विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण समाजवादाने विविध देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचे स्वप्न दिले आहे.
-हरीश केंची
९४२२३१०६०९


Saturday 19 December 2020

बँका ध्वस्त, सरकार सुस्त, नोकरदार मस्त, लोक ग्रस्त...!

"देशाची आर्थिक वाटचाल दिवाळखोरीकडं तर चाललेली नाही ना? अशी भीती निर्माण झालीय. लोकांची क्रयशक्ती कमी झालीय त्यामुळं आर्थिक, औद्योगिक, रोजगार, व्यापार चक्र मंदावलंय. एकापाठोपाठ एक बँका बुडताहेत. सहकारी चळवळ उध्वस्त झालीय. लोक हवालदिल झालेत. सर्वच बँकांतून होणाऱ्या बेधुंद कारभारानं दिवसेंदिवस थकबाकीदार आणि त्यांची थकबाकी वाढतेय. रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेल्या आकडेवारीनं सर्वच बँका पोकळ वासा ठरताहेत. त्यावर कुणाचंच नियंत्रण राहिलेलं नाही. उलट त्यांना वाचविण्यासाठी सरकार सरसावलेय, असं दिसतंय. रिझर्व्ह बँक तर धायकुतीला आलीय. खासदार-आमदार मात्र मिळणारे सारे लाभ उपटण्यात मश्गुल आहेत. ज्यांना रोजगार निर्माण करण्याची जबाबदारी दिलीय त्यांना त्याची फिकीर नाही. ते मदमस्त बनलेत. या साऱ्या स्थितीचा आकडेवारीनं घेतलेला हा आढावा!"
-----------------------------------------------

*दे* शातली आर्थिक स्थिती नाजूक झालीय. सारी व्यवस्थाच सडलीय. फ्रॉड झालीय. व्यवस्था आणि इकॉनॉमी यांच्यातल्या मिलीभगतला सांभाळण्यासाठी राजनीती आणि लोकतंत्र प्रयत्नशील होतेय असं वाटावं असं राजकारण सध्या खेळलं जातंय. फ्रॉड सिस्टीम आणि इकॉनोमी यांना एकत्र आणत इथल्या राजकारण्यांनी देशाला लुटलंय. ती रोखण्याची अशी कोणतीही दूरदृष्टी नाही कि ज्यानं इकॉनॉमी रुळावर येईल आणि सिस्टीमला ठीकठाक करण्याचं काम आताचे राजकारणी करतील असं वाटत असतानाच तो फोल ठरलाय. आज लोकांचे पैसे बँकांतून सुरक्षित राहणार आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय. एकापाठोपाठ एक बँका डबघाईला येताहेत. त्यांचा तोटा वाढतोय. म्हणून नवनवीन क्लुप्त्या काढून दिल्या जाणाऱ्या सेवेतून खातेदारांकडून पैसे उकळले जाताहेत. निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाच्या व्याजावर जगणाऱ्या वृद्धांच्या व्याजाला नरडीला नख लावलं जातंय. पुण्यात गेल्या पाचसहा वर्षात पाचसहा बँका बुडाल्या आहेत. तर सोलापुरातही याहून वेगळी स्थिती नाही. पूर्वभागातील उद्योग बँक, नागरी बँक, महिला बँक या संपल्या. पूर्वी सहकारी बँकांवर दुहेरी नियंत्रण होतं. राज्याचं सहकारी खातं आणि केंद्र सरकारची रिझर्व्ह बँक. आता राज्यांचं नियंत्रण काढून रिझर्व्ह बँकेनं सर्व ताबा आपल्याकडं घेतलाय. रिझर्व्ह बँकेच्या पैशावर सरकारचा डोळा आहे. सरकारनं आपल्या मर्जीतल्या सरकारी, खासगी, पब्लिक सेक्टर, कमर्शियल बँकांना पैसे देण्याची गळ रिझर्व्ह बँकेला टाकलीय. त्याला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची गळचेपी गेली जातेय. त्यामुळं रिझर्व्ह बॅंकेतील उच्चपदस्थ अधिकारी मंडळी राजीनामा देऊन बाहेर पडताहेत. ही स्थिती देशाच्या आर्थिकदृष्ट्या फारशी चांगली नाही. पण लक्षांत कोण घेतो? देशातील आणखी एका बँकेनं दिवाळखोरीच्या दिशेनं पाऊल टाकलंय. मात्र या पावलामुळे देशातील तब्बल ५४ बँकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनुत्पादक कर्जांमुळे (एनपीए) आधीच गोत्यात आलेल्या या बँकांना हुडहुडी भरली आहे. ही दिवाळखोरी बँकांच्या दृष्टीनं दुष्काळात तेरावा ठरणार आहे.

*सर्वच बँका एनपीए ग्रस्त बनल्या आहेत*
गेल्या सहा-सात वर्षात देशातली आर्थिक स्थिती अधिक गंभीर झालीय. एकापाठोपाठ एक बँका का बुडताहेत. कुणाला कर्जे दिली जाताहेत कुणाच्या सांगण्यावरून कर्ज दिली गेलीत. याचा ताळमेळ राहिलेला नाही. काही दिवसांपूर्वी पंजाब-महाराष्ट्र बँकेनंतर आता लक्ष्मीविलास बँक बुडलीय. तिथं काम करणाऱ्या ३ हजार ५६५ कर्मचाऱ्यांच्या गळ्याला फास लागलंय. भागधारक, ठेवीदार हवालदिल झालेत. आता सिंगापूरच्या डीबीएस बँकेनं ही बँक आपल्या हातात घेतलीय. देशातल्या ५ लाखाहून अधिक खातेदार पंजाब महाराष्ट्र बँक, येस बँक आणि लक्ष्मीविलास बँकेत आहेत. इथं काम करणारे २३ हजाराहून अधिक कर्मचारी आहेत. ते देशोधडीला लागताहेत. स्टेटबँकेत ज्या बँकांचं विलीनीकरण झालंय. त्या स्टेट बँक ऑफ बिकानेर, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर त्या ह्या सहयोगी बँका. २०१३-१४ मध्ये म्हणजे सध्याचं सरकार अस्तित्वात येण्यापूर्वी या सर्व बँकांचं एकत्रित एनपीए होता ६२ हजार ७७८ कोटी रुपये. हाच एनपीए २०१९ मध्ये वाढून तो १ लाख ७२ हजार कोटी रुपयांवर गेलाय. २०२० चे आकडे अद्याप आलेले नाहीत. त्यात वाढ झालेलीच असेल. आता इतर काही बँकांचं पाहू या. अलाहाबाद बँकेचा २०१४ मध्ये एनपीए ५ हजार १३७ कोटी रुपये होता. तो वाढत जाऊन २०१९ मध्ये २८ हजार ५०७ झालाय. पंजाब नॅशनल बँकेत २०१४ मध्ये असलेला एनपीए १३ हजार ५६४ कोटी आता वाढून ७८ हजार ४७२ कोटी इतका झालाय. अर्थात पीएनबीचं नाव येताच आपल्याला नीरव मोदी आठवत असेल. कॅनरा बँकेला २०१४ मध्ये ६ हजार २६० कोटी एनपीए होता, तो आता २०१९ मध्ये ३९ हजार २४२ झालाय. दिवाळखोरीत निघालेल्या लक्ष्मीविलास बँकेचा २०१४ मध्ये एनपीए होता ४५९ कोटी रुपये, तो वाढत २०१९ मध्ये तब्बल १ लाख १८ हजार ९२३ कोटी रुपयांवर पोहोचलाय. पब्लिक सेक्टर मधील बँकेत २०१३-१४ त एकत्रित एनपीए १ लाख ६४ हजार होता तो आता वाढून २०१९ मध्ये ५ लाख३९ हजार ५३१ इतका झालाय. प्रायव्हेट सेक्टर मधील बँकांतून २०१३-१४ त एकत्रित एनपीए २० हजार ७६२ कोटी रुपये होता. तो आता २०१९ मध्ये तब्बल १ लाख ८३ हजार ६०४ कोटी इतका वाढलाय. कमर्शिअल बँकांचा २०१४ मध्ये म्हणजे मनमोहनसिंग यांच्या शेवटच्या काळात १ लाख ९३ हजार १९४ कोटी इतका एकत्रित एनपीए होता. तो आज २०१९ मध्ये तो ९ लाख ३६ हजार ९७३ कोटी इतका झालाय. २००७-०८ मध्ये मनमोहनसिंग यांच्या पहिल्या टर्ममध्ये सर्व बँकांचा मिळून एकत्रित एनपीए ४० हजार ४५२ कोटी रुपये होता. तो वाढून २०१४ मध्ये २ लाख २७ हजार कोटी इतका वाढला होता. २०१९ मध्ये ८ लाख कोटीहून अधिक आहे. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट अगदी सरळ भाषेत सांगायचं म्हणजे थकबाकी ज्याची परतफेड होणार नाही अशी ती रक्कम! शेतीवर ११ लाख ९४ हजार कोटी रुपये एनपीए आहे. आरबीआयने सप्टेंबर २०२०मध्ये जे आकडे जाहीर केले आहेत त्यानुसार एकूण थकबाकी-एनपीए ९१ लाख ४२ हजार कोटीहून अधिक इतकं होतं. औद्योगिक क्षेत्रात २९ लाख ३५ हजार कोटी, सर्व्हिस सेक्टर मध्ये २४ लाख ९८ हजार कोटी, पर्सनल लोन सेक्टरमध्ये २४ हजार ९० कोटी इतकी आहे. आता बँकेतल्या कर्मचाऱ्यांचा विचार करू २०१३-१४ मध्ये मनमोहनसिंग यांच्या काळात सरकारी बँकेतून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १२ लाख ९१ हजार ५४२ इतकी होती. तीच संख्या २०१९ मध्ये १३ लाख १६ हजार ५०८ इतकी झाली. म्हणजे मोदींच्या कार्यकाळात ७१ हजार ९७६ इतकी वाढलीय. सरकारनं विविध बँकांचं विलीनीकरण केल्यानंतर ४५ हजार जणांची नोकरी गेलीय. आज मितीला कर्मचाऱ्यांची संख्या २६ हजार १६० इतकी रोडावली आहे. दरवर्षी ५ हजार नोकऱ्या देण्याऐवजी त्या कमी झाल्याचं दिसतंय. सर्व बँकांची स्थिती रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलीय, ती पहिली तर त्यातली भयानकता दिसून येईल. ही स्थिती का आणि कोणामुळे आली ह्याचा शोध घेण्याऐवजी सरकार रिझर्व्ह बँकेला वेठीला धरतेय. कर्जबुडव्यांना ज्यात अंबानी पासून पिरामल पर्यंतचे ६७ असे उद्योजक आहेत ज्यांच्याकडं हजारो कोटींची थकबाकी आहे. त्याची वसुली होत नाही. पण रिझर्व्ह बँकेच्या गंगाजळीतून बँकांना वाचविण्यासाठी पैसे काढले जाताहेत. हे सारे सर्वसामान्यांच्या कष्टाचे, घामाचे पैसे आहेत. त्याचं संरक्षण करण्याऐवजी सरकार थकबाकीदार उद्योजक आणि दिवाळखोर बँका वाचविण्यासाठी सरसावले आहे.

*लोकप्रतिनिधी लाभ लाटण्यात मश्गूल*
लोकशाहीच्या ज्या अनेक व्याख्या केल्या जातात त्यापैकी एक अशी आहे..."बहुसंख्य लोकांनी केलेली हुकूमशाही ती लोकशाही!" त्याची सत्यता पटावी अशी स्थिती आज देशात निर्माण झालीय. आपण घेत असलेले निर्णय, नव्यानं आणली जाणारी धोरणं ही लोकोपयोगी आहेत की लोकविरोधी? हे समजून घेतलं जातं नाहीये. संसद ही लोकशाहीचं मंदिर समजलं जातं, पण आज ही स्थिती बदललीय. लोकशाही ही या संसदेची गुलाम बनलीय आणि संसदेत बसलेले खासदार हे त्याचे भाग्यविधाते बनलेत. त्यांनी घेतलेले निर्णय हेच देशवासियांचं भाग्य घडवताहेत! विधेयकं का, कशी आणि कशासाठी आणली जाताहेत? विरोधी खासदार त्यासाठी का गोंधळ घालताहेत? सत्ताधारी का आग्रही आहे हे सारं जनता समजून आहे. शेतकरी विधेयकावरून राज्यसभेत जो काही गोंधळ झाला; यानं काय साध्य झालं? विधेयकं मंजूर व्हायची ती झालीत. पण देशातल्या शेतकऱ्यांना 'आम्ही तुमच्यासाठी हे सारं काही करतोय हे दाखविण्यासाठीचा प्रयत्न होता. अशाचप्रकारे गेल्या १० वर्षात जवळपास १६ विधेयकं आणली गेली ज्यात गोंधळ घातले गेलेत. खरंतर लोकांचा आवाज संसदेत उमटला पाहिजे तो कसा उमटेल अशी व्यवस्था करायला आग्रह धरायला हवाय. पण इथल्या खासदारांना लोकशाहीनं जे काही बहाल केलंय ज्यामुळं त्यांच्यातही शैथिल्य आलंय. मिळणाऱ्या मानधन, भत्ते, सेवासुविधा यातच सारे मश्गुल आहेत. केवळ विद्यमान खासदार, आमदारांना मानधन, भत्ते मिळतात असं नाही तर निवृत्त, पराभूत अशा माजींना देखील हे सारं काही मिळतं. एक देश, एक बाजार, एक टॅक्स, एक झेंडा, एक निशाण अशी मानसिकता असलेल्या सत्ताधाऱ्यांना ही व्यवस्था बदलण्याचं धाडस होत नाही, यांतच सार आलं. लोकसभेच्या खासदारांना ५ लाख रुपयांचं मानधन-वेतन दिलं जातं याशिवाय डेली अलाऊन्स, ट्रॅव्हल, मेडिकल, लाईट, पाणी याची बिलं, विमान-रेल्वेचा प्रवास अशा अनेक सुविधा दिल्या जातात. संसदेत ५४३ खासदार आहेत. प्रधानमंत्री वगळता लोकसभेतील ५४२ खासदारांना ५ लाख मानधन म्हणजे दरमहा २७ कोटी १० लाख रुपये तर वर्षाला ३२५ कोटी रुपये अदा केले जातात. ते राज्यसभेतील २४५ खासदारांना दरमहा ४ लाख रुपये प्रमाणे मानधन दिलं जातं म्हणजे महिन्याला ९ कोटी ८० लाख तर वर्षाला ११७ कोटी रुपये अदा केले जातात. एकूण ७८७ खासदारांना ४४२ कोटी रुपये दरवर्षी वेतन दिलं जातं. देशातील एकूण आमदारांची संख्या ४ हजार २४५ त्यांना सरासरी दरमहा १ लाख ६७ हजार म्हणजे दरमहा ७० कोटी वर्षाला ८८४ कोटी रुपये अदा केले जातात. खासदार आणि आमदार यांची एकूण संख्या लोकसभा खासदार ५४३+ राज्यसभा खासदार २४५ + आमदार ४,२४५अशी ५ हजार इतकी होते. या ५ हजार लोकप्रतिनिधींना दरमहा १ हजार २८६ कोटी वेतन दिलं जातं. इतर भत्ते जे दिलं जातात ते सारं पकडलं तर दरमहा जवळपास जवळपास २ हजार ५०० कोटी रुपये खर्ची पडतात. आमदारांना त्या त्या राज्याच्या क्षमतेनुसार वेतन दिलं जातं. तेलंगणात २ लाख ५० हजार, दिल्ली आणि मध्यप्रदेशात २ लाख १० हजार, बिहारात १ लाख.६५ हजार, महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार, छत्तीसगड १ लाख ३४ हजार, गुजरात १ लाख २४ हजार, बंगाल ६२ हजार, केरळ ४३ हजार, उत्तराखंड ३५ हजार रूपये असं वेतन आमदारांना दिलं जातं. माजी आमदारांना ३५ ते ६० हजार वेतन दिलं जातं याशिवाय इतर भत्तेही दिले जातात.

**नोकऱ्या देणारे झालेत सुस्त*
नोकऱ्यांसाठी ज्या काही संस्था आहेत त्यात स्टाफ सिलेक्शन बोर्ड, यूपीएससी, बिहार, उत्तरप्रदेश सर्व्हिस कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, एफसीआय, बीपीएससी, मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, डिफेन्स रिचर्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन, हायकोर्ट, सर्व राज्यातील पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि इतर या सगळ्या आस्थापनेवर सातशे कोटींहून अधिकचा खर्च होतो पण प्रत्यक्षात २ लाख नोकऱ्याही या संस्थाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. केंद्र सरकारच्या सीएमआई या संस्थेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी ते मार्च दरम्यान ९० लाख, मार्च ते सप्टेंबर दरम्यान २ कोटी १० लाख नोकऱ्या संपुष्टात आल्या आहेत. याच काळात सॅलरी जॉब म्हणजे व्हाईट कॉलर अशा दीड कोटी नोकऱ्या संपुष्टात आल्यात. आज देशात १० लाख ६० हजाराहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. बिहारमध्ये शिक्षकांच्या ६ लाख ८८ हजार मान्य जागांपैकी २ लाख ७५ हजार जागा रिक्त आहेत. उत्तरप्रदेशात ७ लाख ५२ हजार मान्य जागांपैकी २ लाख १७ हजार जागा रिक्त आहेत. झारखंडमध्ये २ लाख ३८ हजारापैकी ९५ हजार जागा रिक्त आहेत. छत्तीसगडमध्ये २ लाख ३६ हजारापैकी ५१ हजार जागा, राजस्थानात ४ लाखापैकी ४७ हजार, पश्चिम बंगालमध्ये ६ लाख ३७ हजारापैकी ७२ हजार, मध्यप्रदेशातील ४ लाख ७० हजारापैकी ९१ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. इतर राज्यातील आकडेवारी उपलब्ध झाली नाही. यावर कोणी काहीच बोलत नाहीत सारे सत्तेत मश्गुल आहेत. विरोधीपक्ष औषधलासुद्धा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळं सत्ता चौखूर उधळलीय. सरकार मूलभूत प्रश्नाऐवजी भावनात्मक गोष्टीतच रममाण आहे. मग सर्वसामान्यांकडं कोण लक्ष देणार त्यांना सगळ्यांनीच वाऱ्यावर सोडलंय...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

एक देश-एक निवडणूक प्रादेशिक पक्षांसाठी आव्हान!

'एक देश-एक निवडणूक' यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. संविधान दिनाच्या निमित्तानं नुकतंच त्यांनी जे भाषण केलं त्यात त्यांनी याचा पुनरुच्चार केलाय. गेल्या पाच वर्षांत राष्ट्रवाद आणि कट्‌टर हिंदूत्ववाद या मुद्द्यांवर भाजपेयीं विरोधी पक्षांना लढवत आहे. अशा मुद्द्यांमुळे बहुसंख्याक एकत्र होतात याची खात्री भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील विजयानं झालीय. त्यामुळं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या तर शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ, बेरोजगारी, नोटबंदीमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था, शहरी-ग्रामीण समस्या, सरकारी यंत्रणांचं खासगीकरण, कृषी धोरण या सारखे मुद्दे दुर्लक्षित होतील ही खरी भीती आहे. प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला मर्यादा असतात, त्यांचे राजकीय मुद्दे संबंधित राज्याच्या समस्यांशी निगडित असतात. हे पक्ष राष्ट्रीय प्रश्नांवर स्वत:ची भूमिका ठामपणे मांडू शकत नाहीत, या पक्षांना राष्ट्रीय प्रश्न सोडवण्याचा अनुभव नसल्याने ते राष्ट्रीय स्तरावरील पक्षाच्या प्रचारापुढे थिटे पडतील. एकदा प्रादेशिक पक्षांच्या मर्यादा अशा एकत्रित निवडणुकींमुळे पुढे आल्यास त्याचा फायदा निश्चित भाजपसारख्या पक्षांना होईल. एकूणात प्रादेशिक पक्ष राजकारणातून फेकले जातील. त्यांचं अस्तित्व संपेल!"
--------------------------------------------------------
*ए*क देश, एक निवडणूक’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सुपीक डोक्यातून आलेली कल्पना. २०१४ चा लोकसभेतील नेत्रदीपक विजय आणि त्यानंतर अनेक राज्यात भाजपने मारलेली घोडदौड पाहून भाजपला हा देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची घाई झालेली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात अमित शहा यांनी कायदा आयोगाला एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात देशभरात एकाचवेळी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका घेण्याविषयी कायदा आयोगाचं काय म्हणणे आहे, असा या पत्रातील मुख्य मुद्दा होता. नंतर भाजपचं शिष्टमंडळ आयोगाला जाऊन भेटलेही होते. याच महिन्यात तत्कालिन निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ओ. पी. रावत यांनी देशात एकाचवेळी विधानसभा-लोकसभा निवडणुका घेतल्यास त्यासाठी घटनात्मक दुरुस्त्या कराव्या लागतील, मतदानयंत्रांची संख्या वाढवावी लागेल. केंद्रीय सुरक्षा दल, पोलिसांची संख्या वाढवावी लागेल व अन्य प्रशासकीय बाबी पाहिल्या पाहिजेत असे विधान केले होते. पण राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर हा मुद्दा भाजपने बाजूला ठेवला होता. अगदी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात, भाजपच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा नव्हता. देशात विविध राज्यात विविध कालावधीत विधानसभा निवडणुका होतात. या निवडणुकांमध्ये होणारा खर्च व श्रमशक्ती वाया जाऊ नये म्हणून लोकसभा निवडणुकीसोबत या निवडणुका घ्याव्यात असा हा सर्वसाधारण प्रस्ताव आहे. आता नव्या प्रस्तावात भाजपने ‘संसदेची कार्यक्षमता’ वाढावी व महात्मा गांधी यांची १५० वी जयंती आणि भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष या प्रस्तावावर सहमत झाले तर ‘एक नवा भारत’ उदयास येईल अशी भाजपची नवी टूम आहे.

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या मनांत असलेली 'एक देश एक निवडणूक' ही आकर्षक पण फसवी घोषणा सध्या गाजतेय. ती फसवी अशासाठी आहे की सार्‍या देशासाठी म्हणून सध्याही एकच निवडणूक प्रामुख्यानं असते. ती म्हणजे लोकसभेची! पण निवडणुकीवर आधारित लोकशाही स्वीकारून सहा दशके उलटून गेली तरी निवडणूक या प्रकाराबद्धल मनात आशंका असणारा एक वर्ग अजूनही आहेच आणि त्याला संभावितपणे निवडणुकांबद्धल तक्रार करायला अधूनमधून काही तरी निमित्त मिळत असतं; तसं या घोषणेनं मिळवून दिलं आहे. नरेंद्र मोदींनी २०१४ पासून सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मांडलीय. तेव्हापासून निवडणुका कशा खर्चिक असतात, त्यांच्यामुळं सरकारच्या धोरणांना कशी खीळ बसते, अशा तक्रारींचं पतंग उडवणं चालू आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची योजना असं या प्रस्तावचं स्वरूप आहे. त्याला काही प्रतिभावान मुख्यमंत्री आणखी शेपूट जोडून ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळे मतदान एकाच दिवशी घेण्याच्या महाकाव्यापर्यंत नेऊन ठेवत आहेत. देश स्वतंत्र झाला तेव्हा सार्वत्रिक प्रौढ मताधिकाराच्या आधारावर राज्यांमध्ये आणि केंद्रात नवीन कायदेमंडळं निवडणं आवश्यक होतं. त्यानुसार १९५१- ५२ मध्ये देशातली पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तिच्या बरोबरच सर्व राज्यांमध्ये त्यांच्या कायदेमंडळाच्या निवडणुका झाल्या. आपल्या संविधानाप्रमाणे कायदेमंडळाची मुदत पाच वर्षांची असते. पण राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात पंतप्रधान मुदतीपूर्वी कायदेमंडळ बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. मुदतीपूर्वी अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि दुसरे सरकार बनू शकले नाही तरी कायदेमंडळ मुदतीपूर्वी बरखास्त होते आणि नव्या निवडणुका होतात. कायदेमंडळ मुदतीपूर्वी बरखास्त होण्याचे असे प्रसंग १९५२ नंतर खूपच कमी वेळा आले. त्यामुळे १९६७ च्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत केंद्राच्या आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. मात्र केंद्राच्या आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळेस झाल्या पाहिजेत अशी काही संविधानात तरतूद नाही; निव्वळ योगायोगानं तसं १९६७ पर्यंत होत राहिलं. केंद्रात १९६७ मध्ये काँग्रेस बहुमतानं विजयी झाली खरी, पण अनेक राज्यांमध्ये तिचा पराभव झाला. मात्र एकच एक प्रतिस्पर्धी पक्ष नसल्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोणत्याच पक्षाला सरकार स्थापण्यासाठी बहुमत मिळालं नाही. मग ठिकठिकाणी आघाड्यांचे प्रयोग सुरू झाले आणि अस्थिर सरकारे आली. काही राज्यांमध्ये पाच वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्याव्या लागल्या. अशा रीतीनं दर पाच वर्षांनी 'सगळ्या' निवडणुका एकत्र होण्याचा प्रघात मोडला गेला.

त्यातच १९७२ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक इंदिरा गांधींनी १९७१ मध्येच घेतली आणि लोकसभेचं पंचवार्षिक चक्र मोडलं. ते पुढं पुन्हा मोडलं कारण आणीबाणीत संविधानाची आणि परंपरांची जी मोडतोड करण्यात आली तिच्यामुळं निवडणूक १९७७ मध्ये झाली. तेव्हाही केंद्रातील निवडणूक आणि राज्यांची निवडणूक यांचा सांधा मोडलेलाच राहिला. पुढे १९९० च्या दशकात अनेकवेळा लोकसभेची मुदत पूर्ण होऊ शकली नाही आणि मुदतपूर्व निवडणुका झाल्या. हेच काही राज्यांमध्येही झालं. त्यामुळे आता सध्या गेल्या काही लोकसभा निवडणुकांच्या वेळी, योगायोगानं, आंध्रप्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडीशा या राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असतात आणि बाकी इतर राज्यांच्या निवडणुका साधारणपणे दर वर्षी तीनचार राज्यांच्या निवडणुका होत राहतात. कारण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचं वेळापत्रक वेगवेगळं आहे. तेव्हा 'एक देश एक निवडणूक' मागणार्‍यांची तक्रार दुहेरी आहे. त्यांचं एक म्हणणं असं आहे की, मुदतपूर्व निवडणूक हे नसतं लोढणे आहे. निवडणुका ह्या पाच वर्षानीच व्हायला हव्यात. दुसरं म्हणणं असं की, लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या पाहिजेत. या दुहेरी मागण्यांच्या समर्थनासाठी जी कारणं दिली जातात ती आधी तपासून पाहू. वेगवेगळ्या निवडणुका आणि अर्थातच मुदतपूर्व निवडणुका सुद्धा फार खर्चिक ठरतात आणि म्हणून एकाच ठराविक वेळी निवडणुका व्हाव्यात असा युक्तिवाद केला जातो. इथे अर्थातच, खर्चिक कशाला म्हणायचं हा प्रश्न आहे. म्हणजे मुळात जर आपण असं मानत असलो की निवडणुकांवर म्हणजे निवडणुका घेण्यावर होणारा खर्च चुकीचा आहे आणि नाईलाज म्हणून आपण तो करतो, तर मग कितीही कमी खर्च असला तरी तो तक्रार करायला पुरेसा ठरेल! खर्चाचा मुद्दा एकदा मान्य केला की शक्यतो निवडणुका नकोतच किंवा त्या कमीत कमी व्हाव्यात या निष्कर्षाला आपण येऊन पोहोचतो. सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीवर प्राथमिक अंदाजानुसार ३ हजार ४२६ कोटी रुपये खर्च झाले. हा आकडा कोणी आपल्या तोंडावर फेकला की आपण नक्कीच घाबरून जाऊ, पण असे भले मोठे आकडे पाहताना जर आपण दर मतदारामागे किती खर्च होतो असं पाहू लागलो तर काय दिसतं? २०१४ मध्ये नोंदलेल्या एकूण मतदारांचा विचार केला, तर दर मतदारामागे जवळपास ४२ रुपये खर्च झाला आणि तोही एकूण पाच वर्षांनी. तर, २०१४ च्या अर्थसंकल्पात एकूण १७ लक्ष ८४ हजार ८९२ कोटी रुपये खर्चाची तरतूद होती. एका वर्षासाठी. त्या पार्श्वभूमीवर पाच वर्षांनी होणार्‍या निवडणुकीच्या आणि लवकर झाली तरी खर्चाची किती चर्चा करायची खेरीज, केंद्रात आणि राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक झाली तरी मतपत्रिका, पेपर ट्रेल यासाठीचा खर्च तर वेगवेगळा करावा लागणारच. फक्त सुरक्षा दलांवरचा आणि प्रत्यक्ष निवडणूक कर्मचार्‍यांवरचा खर्च वाचेल. तेव्हा खर्चाचा मुद्दा हा दात कोरून पोट भरण्याच्या आविर्भावातला मुद्दा आहे. एकाच वेळी निवडणुका घेण्याचं दुसरं समर्थन असं केलं जातं की, वेगवेगळ्या निवडणुकांमुळं लोककल्याणाची धोरणं ठरवण्यात अडथळा येतो, कारण आचारसंहिता लागू होते. या आचारसंहितेचा बराच बागुलबुवा नेहमी उभा केला जातो.

आदर्श मानल्या जाणार्‍या आचारसंहितेनुसार निवडणुका घोषित झाल्यानंतर मोठे आणि लोकांवर प्रभाव पडतील असे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. पण मुद्दलात एकदा अंदाजपत्रक मांडल्यानंतर सामान्य परिस्थितीत केंद्र सरकारला वर्षाच्या अधेमध्ये मोठ्या घोषणा कशासाठी कराव्या लागतात? निवडणुका साधारणपणे केव्हा होणार हे माहीत असल्यामुळे आचारसंहितेत न अडकता घोषणा कशा करायच्या हे तर सर्वच पक्षांनी चांगल्यापैकी शिकून घेतलं आहे, त्यामुळे ही अडचण काही खरी नाही. खरा मुद्दा असा आहे की, कोणत्याही सरकारनं सत्तेवर असल्याचा गैरवापर करू नये, यासाठी जास्त प्रभावी आणि सर्वसंमत नियमावली करण्याची जबाबदारी सरकार आणि सगळे पक्ष यांची आहे. त्यांना ते जमत नाही म्हणून निवडणुकीचं वेळापत्रकच बदलूयात असं म्हणणं हे डास मारण्यासाठी तोफगोळे वापरण्यासारखं आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी आणखी एक युक्तिवाद असा केला जातो की पंतप्रधान, मंत्री किंवा राजकीय पक्षांचे उच्च नेते अशा सगळ्यांवरच सतत प्रचाराचा भार पडतो आणि राज्यकारभार, नियमित राजकीय कार्य, सरकारच्या कामाचं मूल्यमापन, संसदीय कामकाज यात अडथळा येतो. हा युक्तिवाद प्रभावी आहे. पण यात गफलत आहे. एक तर राज्यात निवडणूक होत असेल तर पंतप्रधानांनी किंवा पक्षाध्यक्षांनी अतोनात वेळ घालवणं हे अतिकेंद्रित पक्षाचं लक्षण आहे. पण तो मुद्दा सोडून देऊ. आपण थेट एखादं उदाहरण घेऊ. आता लवकरच बंगालमध्ये निवडणूक होणार आहे. आणि नुकतीच बिहारमध्ये झाली. या लागोपाठच्या निवडणुकांमुळे शिवसेना, डीएमके या पक्षावर काय ताण येणार आहे? ताण येणार तो भाजप किंवा काँग्रेसवर! म्हणजे हा प्रश्न 'राष्ट्रीय' पक्षांच्या सोयी-गैरसोयीचा आहे, बाकीच्यांच्या नाही. आज भारतात खर्‍या अर्थाने फक्त काँग्रेस आणि भाजपा हे देशभर सगळीकडे निवडणुका लढवणारे पक्ष आहेत, बाकीचे पक्ष ठराविक राज्यांमध्येच लढतात. त्या त्या राज्याच्या निवडणुकीचं वेगवेगळं वेळापत्रक असल्यामुळं दमछाक होते ती या दोन पक्षांची. त्यांना प्रादेशिक पक्षांशी जोमानं लढता यावं म्हणून तर एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात नाहीये ना? असं वाटण्याची स्थिती दिसून येते.

ज्या प्रस्तावामागे खरोखरी गंभीरपणे काही घ्यावं असं काही समर्थनाचे मुद्दे नाहीत असा हा प्रस्ताव अंमलात आणायचा तर किती उपद्व्याप करावे लागतील? एक तर लोकसभा आणि विधानसभा यांची मुदत काही झालं तरी पाच वर्षे राहीलच अशी तरतूद करावी लागेल. काँग्रेसनं एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. याचा अर्थ, अविश्वासाच्या ठरावाचा आणि कायदेमंडळ मुदतीपूर्वी बरखास्त होऊ शकण्याचा प्रघात बंद करावा लागेल. आणि तरीही सरकार बनू शकलं नाहीच तर काय करायचं हे ठरवावं लागेल. नीति आयोगानं याविषयी एक आराखडा तयार केला आहे. त्यातील प्रस्तावाप्रमाणे सुचवण्यात आलेल्या गोष्टी अशा आहेत. १) अविश्वास ठराव मांडतानाच त्याच्या बरोबर नव्या सरकारसाठीचा विश्वास प्रस्ताव मांडला पाहिजे अशी तरतूद करावी. याचा अर्थ अविश्वास ठराव मांडण्याच्या अधिकारावर आपोआपच मर्यादा येणार.२) काही कारणानं राज्यात सरकार स्थापन होऊ शकत नाही, अशी स्थिती आली तर उर्वरित काळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी. याचा अर्थ  आपलं सरकार आणि आपले प्रतिनिधी निवडण्याच्या राज्यातील जनतेच्या अधिकारावर गदा येणार. ३) राज्यात जर फारच लवकर सरकार कोसळलं तर निवडणूक घ्यावी, पण नव्या कायदेमंडळाची मुदत पूर्ण पाच वर्षे न ठेवता पाचातल्या उरलेल्या वर्षांच्या एवढीच ठेवावी. याचा अर्थ म्हणजे कायदेमंडळ पाच वर्षासाठी निवडण्याची घटनात्मक तरतूद मोडीत निघणार. हा सगळा अट्टाहास का? तर एकदम निवडणुका झाल्या पाहिजेत म्हणून. यामागे केवळ राजकीय खेळी आहे दुसरं काही नाही.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मुद्दे हे भिन्न असतात. या मुद्द्यांची सरमिसळ होऊन देशासमोरच्या प्रश्नांना अधिक महत्त्व येत असते. भाजपच्या सोशल मीडिया यंत्रणेनं नोटबंदीचा निर्णय थेट दहशतवाद, नक्षलवादाशी जोडून निवडणुकांमध्ये यश मिळवलं होतं. पुलवामा प्रकरणाचं राजकारण विरोधी पक्ष सोडून सत्ताधारी भाजपनं सफाईनं केलं हा इतिहास आहे. ‘एक देश एक निवडणूक’ व्यवस्था एकदा स्वीकारली तर दर पाच वर्षांनी निवडणुका होण्याची वाट पाहावी लागणार आहे. या कालावधीत एखाद्या राज्यातलं सरकार अल्प मतात आल्यास, सत्ताधाऱ्यांमध्ये फुट पडल्यास, त्या परिस्थितीवर नेमका तोडगा काय असावा याबाबत सरकारच मौन बाळगून आहे. देशातील सर्व राज्ये आणि देश यामध्ये एकत्रित निवडणूक घ्यायची झाल्यास तेवढी मतदान यंत्रे निवडणूक आयोगाकडे असण्याची गरज आहे. ही मतदान यंत्रे तयार करता येतील पण घटनाकारांनी जो संघराज्य ढाचा तयार केला आहे, त्याबद्दल काय? भारत हा अनेक राज्यांचे मिळून संघराज्य झाले आहे आणि प्रत्येक राज्याची स्वत:ची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक राजकारण, अस्मिता आहे. समजा केंद्राचा एखादा निर्णय राज्याच्या अस्मितेला, सामाजिक राजकारणाला, भाषेला आव्हान देणारा असेल तर त्यावेळी निर्माण होणारा असंतोष व्यक्त करण्याची संधी जनतेला राहणार नाही. जनतेला पाच वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची वाट पाहावी लागेल. २०१४ मध्ये सत्तेत आल्यावर लगेचच भाजपनं गोरक्षणाचा मुद्दा राजकारणात आणला आणि त्याबद्धलचे कायदे आपली राज्ये जिथे आहेत तिथं राबवण्यास सुरवात केली. त्याचे त्यावेळी उमटलेले पडसाद दिसले होते. आज लवजिहादचे कायदे केले जाताहेत. भाजपचा सांस्कृतिक दहशतवाद, उदारमतवाद्यांची गळचेपी हाही महत्त्वाचा विषय आहे. याविषयी जनतेचा जो काही रोष उत्पन्न होईल त्यासाठी पाच वर्षे थांबायचे का प्रश्न आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये एखाद्या महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्द्यावर जनमताचा कौल घेतला जातो. जसा ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटवेळी घेण्यात आला होता. हा निर्णय त्यावेळी खासदारांवर सोडण्यात आला नव्हता. आपल्याकडं वादग्रस्त निर्णय हे खासदारांवर सोडले जातात. जनतेला काय हवं असतं ते विचारण्यात येत नाही. त्यामुळं पैसे आणि वेळ वाचवणे हा ‘एक देश, एक निवडणुकां’मागचा उद्देश नसून भाजपला त्या आधारे बहुसंख्याकवादाचे, हिंदुत्वाचे, राष्ट्रवादाचे राजकारण पुढं रेटायचं आहे, हे स्पष्ट आहे. यानं पैसा आणि वेळ वाचेल पण लोकशाही मूल्ये, सामान्य जनतेचा आवाज दबला जाईल. त्याची किंमत पैशात करता येणार नाही.

हा तुघलकी प्रकार साधण्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे संविधानात अनेक महत्त्वाचे बदल करावे लागतील. त्या घटनादुरुस्त्या असतील आणि आणीबाणीच्या काळातील ४२ व्या दुरुस्तीप्रमाणे त्या दूरगामी परिणाम करणार्‍या असतील. अर्थातच, त्यांच्यामुळे संविधानाचा मूलभूत ढाचा बदलेल आणि त्यामुळे केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयानं घालून दिलेल्या संकेताचा भंग होईल. हे सगळं करून देशाचा काही फायदा होण्याची सुतराम शक्यता नाही. ना निवडणुका जास्त शुद्ध होतील ना जास्त लोकाभिमुख सरकारं येतील. उलट, त्याचे परिणाम देशातील लोकशाहीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारेच ठरतील. वर उल्लेख केल्याप्रमाणे फायदा झालाच तर राष्ट्रीय म्हणजे मोठ्या पक्षांचा होईल आणि वेळोवेळी जो पक्ष केंद्रात प्रभावी असेल, त्याला आपला फायदा करून घेऊन राज्यांमध्ये सुद्धा आपली सरकारं आणता येतील. ज्या राज्यांमध्ये १९८९ ते २०१४ या काळात लोकसभेच्या बरोबर निवडणुका झाल्या तिथे असं दिसतं की लोकसभेत जिंकणार्‍या पक्षाला राज्यामध्ये सुद्धा फायदा होतो. गेल्या २५ वर्षांत एकूण ३१ वेळा राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर झाल्या. त्यापैकी २४ वेळा मुख्य पक्षांना राज्यात आणि केंद्रात साधारण एकसारखीच मते मिळाली. याचा अर्थ, राज्यातील जनतेला राज्यपातळीवर वेगळा निर्णय घेण्याची मुभा एकत्र निवडणुका घेतल्यामुळे जवळपास नाहीशी होईल. ही गोष्ट संघराज्याच्या दृष्टीनं हानिकारक आहे हे सांगायला कोणा तज्ज्ञाची गरज नाही. भारताच्या पक्षीय राजकारणाचे १९८९ पासून संघराज्यीकरण झाले असा बहुतेक सगळ्याच अभ्यासकांचा दाखला आहे. ही प्रक्रिया रोखून राजकीय स्पर्धा अधिकाधिक केंद्रीभूत करण्याचा दुष्परिणाम एकत्र निवडणुका घेण्याच्या हट्टामुळे होईल. म्हणजे, छोटे पक्ष, प्रादेशिक पक्ष यांच्या विरोधात असणारा हा प्रस्ताव लोकशाहीची चक्रे उलटी फिरवणारा तर आहेच, पण संविधानाची मोडतोड करून संसदीय प्रणालीमध्ये फेरफार करणारा सुद्धा आहे. कदाचित हा प्रस्ताव अंमलात यायला अजून बराच काळ लागेल, पण त्याची चर्चा ज्या आग्रहानं सरकारनं चालवली आहे ते पाहता संविधानाच्या मूलभूत ढाच्याबद्धल आणि जबाबदार सरकार देणार्‍या संसदीय पद्धतीबद्दल पद्धतशीरपणे संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सर्व पातळ्यांवरून केले जात आहेत, असाच निष्कर्ष काढावा लागेल. सरकार आणि सरकारच्या भूमिकेशी सहमत असलेले लोक जरी याबाबत आग्रही असले तरी विरोधी पक्ष हे या प्रस्तावाच्या बरोबर नाहीत. एकाचवेळी निवडणुका होऊ नयेत यासाठी कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदी याबाबत चर्चा करताहेत. पण वस्तुस्थिती ही आहे की, सरकार अनेक आघाड्यांवर फारसे यशस्वी झालेले नाही, त्यामुळं आपलं अपयश टाळण्यासाठी सरकारनं हे 'एकत्रितपणे निवडणुका' याचा डाव तर मांडला नाही ना? अशी शंका विरोधक व्यक्त करताहेत. वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे आम्हाला अपेक्षित काम करता आलेलं नाही असा बागुलबुवा उभा केला जाईल, केवळ आपल्या फायद्यासाठीच हे सारं चाललंय अशी विरोधकांची भावना झालीय. ती दूर व्हायला हवीय.

हरीश केंची
९४२२३१०६०९

निकाल दोन, अर्थ अनेक...!

"काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपत सत्तेच्या लोभानं आलेल्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. अशा मंडळींना आपल्या माहेरची आठवण येतेय. पण तिथं परतून करायचे काय हा मोठा प्रश्न असल्यानं सध्या ही मंडळी तशी गप्प आहेत. तसे ते नाराजही आहेत. पण अशा नेत्यांना भाजपेयींनी पक्षात आणून वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणा-या निष्ठावंत मंडळींवर अलगद अन्याय केलाय. अशी निष्ठावंत मंडळी नको ते राजकारण असं म्हणून अन्य कामाला लागली आहेत. परिणाम असा झालाय की पक्ष वरवर मजबूत वाटला तरी नुसत्या खडाखडीतच पक्षाला घाम फुटलाय तर पुढे लढाई काय आणि कशी करणार? पक्षाला आलेली सूज कशी उतरणार? नेत्यांच्या अशा मनोवृत्तीमुळं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मांडीवर घेतलेल्या उमेदवारांचा पराभव झालाय. या यशामुळं माविआच्या आशा पल्लवित झाल्यात. यापुढील काळात एक नक्की की तीन पक्ष एकत्रितरित्या लढले तर भाजपेयींसाठी ते एक मोठं आव्हान असेल.."
-----------------------------------------------------

*रा* ज्यातल्या विधानपरिषदेच्या सहा जागांचे निकाल लागलेत. चार जागा महाविकास आघाडीच्या मिळाल्या आहेत. एक जागा अपक्षानं आणि एक भाजपनं मिळवलीय. पुणे आणि नागपूर या भाजपेयींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा पराभव झालाय ही महत्त्वाची बाब! त्याचबरोबर महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्ष एकत्र येऊन जर त्यांनी एकत्रित निवडणूक लढविली तर यश सहजसाध्य होतं असं या निकालावरून दिसून आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनपेक्षितपणे सत्तेवर आलेल्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर मविआला मिळालेलं हे यश त्यांना सुखावणारं आहे यात शंका नाही. पण त्यांना आपली जागा राखता आलेली नाही हे ही तेवढंच खरं आहे. महाआघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं ते त्यांचा आत्मविश्वास वाढला असल्याचं निदर्शक आहे. भाजपेयींच्या 'तीन चाकी सरकार' या टीकेला त्यांनी 'चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं!' अस म्हणत उत्तर दिलंय. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, दोन काँग्रेस पक्षांपैकी कोणी गडबड केली नाही तर सरकारला तूर्त अजिबात धोका नाही. सरकार पाच वर्षेही आरामात चालत राहील. असं त्यांनी आत्मविश्वासपूर्वक सांगितलंय. या निकालानंतर भाजपेयीं नेते मात्र गोंधळात पडलेत आणि त्यांना नेमकं काय करावं, कसं करावं हे लक्षांत येत नाही त्यामुळं पराभवानंतर उलटसुलट प्रतिक्रिया देताहेत. त्यांचा गोंधळ उडालाय. त्यासाठी दिल्लीहून नेतेमंडळी इथं येऊन दाखल झाली होती. राज्य विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी बहुमतासाठी १४५ जागा हव्यात. भाजपेयींकडं १०५ आमदार आहेत. सत्ता हाती घेण्यासाठी आणखी ४० आमदार हवेत. काही अपक्ष आहेत. पण त्यांचा भरवसा नसतो. त्याचं कधी तळ्यात तर कधी मळ्यात असतं. थोडक्यात भाजपेयींना सध्यातरी राज्यात सत्ताधारी होण्याची स्वप्नं पाहण्याची शक्यता नाही. आता राज्यपालांच्या माध्यमातून काहीतरी कारणं शोधून राज्यात राष्ट्रपती राजवट लादण्याचा पर्याय त्यांच्या समोर आहे. पण सत्तेवर आल्यापासून गेल्या सहा-साडेसहा वर्षात केंद्रातल्या मोदी सरकारनं हा मार्ग आजवर वापरलेला नाही.

याचा अर्थ या पुढच्या काळात 'वेट अँड वाँच' एवढंच राज्यातल्या भाजपेयींच्या हाती आहे. पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपत सत्तेच्या लोभानं निवडणुकीच्या काळात आलेल्या काही नेत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. अशा मंडळींना आपल्या जुन्या आठवण येतेय. पण तिथं परतून करायचे काय हा मोठा प्रश्न असल्यानं सध्या ही मंडळी तशी गप्प आहेत. तसे नाराजही आहेत. पण अशा नेत्यांना भाजपेयींनी पक्षात आणून वर्षानुवर्षे सतरंज्या उचलणा-या निष्ठावंत मंडळींवर अलगद अन्याय केलाय. अशी निष्ठावंत मंडळी नको ते राजकारण असं म्हणून अन्य कामाला लागली आहेत. परिणाम असा झालाय की पक्ष वरवर मजबूत वाटला तरी नुसत्या खडाखडीतच पक्षाला घाम फुटलाय तर पुढे लढाई काय करणार? पक्षाला आलेली सूज कशी उतरणार? नेत्यांच्या अशा मनोवृत्तीमुळं पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात मांडीवर घेतलेल्या उमेदवारांचा पराभव झालाय. मविआच्या या यशामुळं त्यांच्या आशा पल्लवित झाल्यात. यापुढील काळात एक नक्की की तीन पक्ष एकत्रितरित्या लढले तर भाजपेयींसाठी ते एक मोठं आव्हान असेल. परिस्थिती आणि लक्षणं तशी दिसताहेत. मंत्रीपदं, मोटारी, मानमरातब, सोयीसवलती, हे सुख सोडणार तरी कोण? हे सारं मिळालं आहे ते एकत्रित आल्यानं त्यासाठी हे एकत्र राहतील असं आतातरी दिसतंय. इथं पक्ष, विचारसरणी, निष्ठा वगैरे काही नसतं हे आता लोकांनासुद्धा कळायला लागलंय. तसं पाहिलं तर सत्तेत सहभागी झालेले तीनही पक्ष प्रादेशिकच आहेत असं म्हणावं लागतं. काँग्रेसला भाजप नको, इतर कोणीही चालेल. राज्यात क्षीण होत चाललेली ताकद टिकून ठेवण्यासाठी तरी सत्तेची संजीवनी त्यांना हवीय. राष्ट्रवादी काँग्रेस तर सत्तेसाठीच जन्मलेला पक्ष आहे. त्यामुळं महाराष्ट्रात आता बराच काळ अशीच परिस्थिती राहील असा अर्थ काढायला हरकत नाही. १९७८ मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस पक्ष फोडला होता तेंव्हा ४२ आमदार त्यांच्याबरोबर आले होते. त्यावेळी जनता पक्षाकडे ९९ आमदार होते. या आमदारांचा पाठिंबा पवारांना मिळवून देण्याचे काम तेव्हा एसेम जोशी यांनी केलं होतं. विशेष म्हणजे ९९ आमदार असूनही जनता पक्षाचा कोणी उपमुख्यमंत्री झाला नव्हता.

शिवसेनेच्या हाती सत्ता हे भाजपेयींना सतत सलत असतं. त्यांच्या प्रत्येक वाक्यातून व्यक्त होत असतं. भाजपेयींना शिवसेनेला धडा शिकवायचा असेल तर असा एखादा नेता शोधून त्याला मुख्यमंत्री करण्याचा पर्याय त्यांच्यासमोर आहे. पण त्यासाठी फडणवीस चालणार नाहीत, त्यांना दिल्लीत जावं लागेल. शिवाय ४० आमदार फोडून आणण्याचं शिवधनुष्य उचलण्याची ताकद कोण दाखवू शकेल? हे सध्यातरी शक्य दिसत नाही. पण 'कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी' शिवसेना आता हिंदुत्ववादी राहिली नाही हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आता फक्त आपणच हिंदुत्वाचे कैवारी आहोत असं मतदारांवर बिंबविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं ते सतत त्यासाठी शिवसेनेला खिजवत असतात. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या व्यासपीठावरून आपली भूमिका स्पष्ट केलीय. या सगळ्यात एक गोष्ट घडतेय, ते म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजकीय क्रिकेटच्या खेळपट्टीवर हळूहळू सेट होताहेत. संयमी, समंजस, वेळ पडली तर प्रसंगी करारी, कठोर झालेत. शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे ते अबोल आहेत पण चतुर मुख्यमंत्री आहेत. प्रारंभीचे नकारात्मक वातावरण असता बरेच निवळते आहे. शिवाय त्यांना असलेला ५६ आमदारांचा पाठिंबा कायम आहे. ही शक्ती मोठी आहे. शिवसेनेनं भाजपशी असलेली युती तोडल्याने काही प्रमाणात हिंदुत्ववाद्यांचा पाठिंबा गमावला हे खरं आहे, पण त्याची भरपाई करण्याची धडपड सुरू आहे. त्यासाठी दोन काँग्रेसना जवळ ठेवणं अपरिहार्य आहे. ती कला उद्धव ठाकरे यांनी नक्कीच आत्मसात केलेली दिसते. म्हणजे आता राज्यात पुन्हा नव्यानं शिवसेना- भाजप युतीचा पर्याय राहिलेला नाही.
असा या विधानपरिषद निवडणूक निकालाचा अर्थ लोक जाणून घेतील असं वाटतं.

चौकट
*भाजपच्या प्रचारी हल्ल्याने एमआयएम सुरक्षित*
हैदराबाद महापालिका निवडणुकीत भाजपेयीं यावेळी प्रचंड तयारी करून उतरला होता. इथल्या १५० पैकी फक्त चार जागा भाजपकडे होत्या. तेलंगणा राष्ट्र समिती- टीआरएसकडं ९९ आणि एमआयएमकडं ४४ जागा होत्या. सकाळी मतमोजणीचे जे कल आले होते त्यानुसार भाजपनं ९० जागांवर आघाडी घेतली होती. पण अपेक्षेप्रमाणे दुपारनंतर कल बदलून भाजप हा सुमारे ४० ते ४५ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहील असं दिसलं. टीआरएस ९९ वरुन ६५ वर आणि एम आय एम ३६ पर्यंत येईल असं चित्र होतं. भाजपनं निजामशाही संपवण्यासाठी लढा दिला, पण ओवेसी यांच्या पक्षाला केवळ एक जागांचाच फटका बसला. उलट तेलंगणा राष्ट्र समितीच्या जागा कमी झाल्यामुळे ओवेसी यांचं महत्त्व अधिक वाढलंय. भाजपला चांगलं यश मिळालं असलं तरी ते ओवेसी यांच्या पथ्यावर पडलंय. चंद्रशेखर राव यांची घराणेशाही मोडून काढणं आणि दक्षिणेतील राज्यात शिरकाव करणं हे भाजपचं लक्ष्य होतं. त्याचा एक भाग म्हणून भाजपनं मिशन हैदराबाद राबविलं. पण यातली दुसरी बाजू म्हणजे आता ओवेसी यांचं लक्ष्य प.बंगाल हे असेल. भाजपसाठी ते चांगले आहे. तसंच ते ओवेसींसाठीही! ओवेसींवर हल्ला चढविला तर हिंदू मत भाजपच्या पारड्यात पडतात हे दिसल्यानं बिहार, हैद्राबाद आणि आता बंगालमध्ये असाच प्रयोग भाजप करील. ममता बॅनर्जी यांना असलेला विशिष्ट वर्गाचा, मुस्लिमांचा पाठिंबा ओवेसी यांनी घटवला तर भाजपला ते लाभकारक ठरणार आहे. ओवेसी यांच्या विमानात भाजपचं इंधन असतं अशी टीका काँग्रेस पक्ष करीत असतोच. मात्र हैदराबादमध्ये काँग्रेस पक्षानं नेहमीप्रमाणे गंभीरतेने लढत दिली नाही. काँग्रेसनं आत्मविश्वास गमावलाय. तो आणखी कमी होईल.
हरीश केंची
९४२२३१०६०९

अन्नदात्याला हे हवंय...!

"शेतकरी आंदोलन संपूर्ण भारतात सुरू आहे. जोपर्यंत सरकार कायदा मागे घेत नाही तोपर्यंत आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. तसेच ८ डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिलीय. 'दुरुस्ती नको, कायदा मागे घ्या' अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी आंदोलन आता दहाव्या दिवसात पोहचलंय. आंदोलन दिल्लीच्या सीमेवर धडकल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यात कोण किती मागे सरकतंय आणि कोणता तोडगा दृष्टीपथात आहे का याची उत्तरं त्यानंतरच मिळतील. बैठकीत शेतकऱ्यांनी सरकारचं जेवणही नाकारलं. त्यांनी लंगरमधलं जेवणच खाणं पसंत केलं होतं. यावरुन सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमधली विश्वासाची दरी किती विस्तारलीय हे दिसतंय. दुसरीकडं प्रकाशसिंह बादल यांनी पद्मविभूषण पुरस्कार परत केला. इतरही अनेक खेळाडू उद्या अवॉर्ड वापसी करणार आहेत. हा वाढता दबाव सरकार कसा हाताळणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल. पण नेमकं कशासाठी हे आंदोलन होतंय? अन्नदात्याला काय हवंय याचं केलेलं हे विश्लेषण!"
--------------------------------------------------

आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले शेतकरी दिल्लीच्या सीमेजवळ आंदोलन करतायत. या आंदोलनाचा आजचा अकरावा दिवस आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातून दिल्लीकडं निघालेले हे शेतकरी केंद्रसरकारनं आणलेल्या तीन नवीन कृषी विधेयकांना विरोध करताहेत. शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्याची तयारी केंद्र सरकारनं दर्शवलीय. ती सुरूही आहे. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीनुसार त्यांच्या महत्त्वाच्या मागण्यांपैकी एक आहे, "सरकारने किमान आधारभूत किंमतीपेक्षा म्हणजेच एमएसपीपेक्षा कमी भावात माल खरेदी करणं हा अपराध घोषित करावा आणि सरकारी खरेदी ही हमीभावानंच करण्यात यावी. हमीभावाच्या संदर्भात प्रधानमंत्री मोदींनी ट्वीट केलं होतं, 'मी यापूर्वीही म्हटलं होतं आणि आता पुन्हा एकदा सांगतो, एमएसपीची पद्धत सुरू राहील, सरकारी खरेदी सुरू राहील. आम्ही इथं आमच्या शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. अन्नदात्याची मदत करण्याचे सगळे प्रयत्न आम्ही करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना चांगलं आयुष्य मिळेल, याची खात्री देऊ!' पण ही गोष्ट विधेयकात लेखी द्यायला सरकार तयार नाही. याआधीच्या कायद्यांमध्येही ही गोष्ट लिखित स्वरूपात नव्हती, म्हणूनच नवीन विधेयकातही याचा समावेश करण्यात आला नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण खरंच सांगण्यात येतेय, तितकी ही गोष्ट सोपी आहे का? हमीभावानुसार सरकारी खरेदी सुरू ठेवणं आणि हमीभावापेक्षा कमी दरानं शेतमाल विकत घेण्याला अपराध जाहीर करणं हे शेतकरी संघटनांना वाटतं तितकं सोपं नाही. असं करणं सरकारसाठी कठीण का आहे? हे समजून घेण्यासाठी पाहूयात की एमएसपी म्हणजे काय आणि हा हमीभाव कसा ठरवला जातो.

शेतकऱ्याच्या हितासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत एमएसपीची प्रणाली लागू करण्यात आलेली आहे. बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानंच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतं. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान टळतं. एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो. कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस - सीएसीपी च्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय हमीभाव ठरवतं. यानुसार सध्या २३ शेतमालांची खरेदी सध्या सरकार करतं. यात गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा यात समावेश आहे. देशातल्या फक्त ६ टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो आणि यामध्ये पंजाब - हरियाणाच्या शेतकऱ्यांचं प्रमाण जास्त असल्याचा अंदाज आहे. याच कारणामुळे या नवीन विधेयकाला या भागांतूनच जास्त विरोध होतोय. हमीभावाबद्दल शेतकऱ्यांना काळजी वाटण्यामागे काही कारणं हे आहे की, शेतमालाची सरकारी खरेदी सुरू राहील अशी कोणतीही ऑर्डर सरकारनं अद्याप लिखित स्वरूपात काढलेली नाही. आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी या फक्त तोंडी आहेत आणि कृषी विधेयकामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढण्यामागचं हे एक कारण आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारी खरेदी सुरू राहण्यासाठीची ऑर्डर कृषी मंत्रालय काढणार नसून मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग म्हणजेच अन्न प्रक्रिया मंत्रालय ही ऑर्डर काढत असते. दुसरं कारण म्हणजे राज्य सरकारांना अद्याप रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड देण्यात आलेला नाही. दर वर्षी केंद्र सरकार तीन टक्क्यांनी हा निधी राज्य सरकारांना देत असतं. पण यावर्षी केंद्र सरकारनं हा निधी द्यायला नकार दिलाय. या निधाचा वापर ग्रामीण भागांतल्या पायाभूत सुविधांसाठी केला जातो. यामध्ये शेती विषयक सुविधांचाही समावेश केला जातो. नवीन कृषी विधेयकांनंतर झालेले हे दोन महत्त्वाचे बदल शेतकऱ्यांना दिसतायत.

हमीभावानं खरेदीची तरतूद जरी सरकारनं या विधेयकात घातली तरी शेवटी या नियमाचं पालन कसं होणार हा खरा प्रश्न आहे. हमीभाव हा कायम 'फेअर ॲव्हरेज क्वालिटी' साठी दिला जातो. म्हणजेच शेतमाल ठराविक दर्जाचा असल्यास त्याला किमान आधारभूत किंमत दिली जाईल. पण शेतमाल या योग्य दर्जाचा आहे वा नाही हे कसं ठरवणार? जो शेतमाल या मानकांच्या दर्जानुसार असणार नाही, त्याचं काय होणार? अशा परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांची ही मागणी विधेयकात समाविष्ट केली तरी ती अंमलात आणणं कठीण असेल! सरकारननं गहू आणि तांदळाची खरेदी कमी करायला हवी असा सल्ला सरकारच्या अनेक समित्यांनी दिलेला आहे. याविषयीच्या शांता कुमार समितीपासून ते नीती आयोगाच्या पाहणीपर्यंतचे अहवाल सरकारकडं आहेत. याच उद्देशानं सरकार कामही करतंय. येत्या काही दिवसांमध्ये खरेदीचं हे प्रमाण कमी होणार आहे. आणि हीच चिंता शेतकऱ्यांना सतावतेय. सरकार शेतमाल विकत घेणार की नाही, घेणार असल्यास किती घेणार आणि कधी घेणार? जर हेच ठरलं नसेल तर मग हमीभावाबद्दल लिखित स्वरूपात कायद्यामध्ये कसं देणार?

भविष्यात सरकार शेतमाल कमी घेणार असेल तर शेतकरी आपला माल खासगी कंपन्यांना विकतील हे उघड आहे. आपला नफा जास्त रहावा यासाठी एमएसपी पेक्षा कमी भावानं माल विकत घेण्याची खासगी कंपन्यांची इच्छा असेल. म्हणूनच सरकारला खासगी कंपन्यांवर ही अट लादायची नाही. यामध्ये सरकारचेही काही हेतू आहेत आणि खासगी कंपन्यांनाही याने अडचण होणार आहे. पण कॉर्पोरेट दबावामुळे सरकार असं करत नसल्याचं म्हणणं पटत नाही. एमएसपीच्या मुद्द्याबाबत सरकारनं भूमिका न घेणं अजून एका पद्धतीनं समजून घेता येऊ शकतं, यासाठी दोन शब्दांचे अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. पहिला शब्द - मोनॉपली
म्हणजे विकणारा एकच आहे आणि तो त्याला हवं ते करू शकतो. त्याच्या मनाला येईल ती किंमत तो वसूल करू शकतो. दुसरा शब्द - मोनॉप्सनी म्हणजे खरेदी करणारा एकच आहे आणि त्याचंच म्हणणं ऐकलं जातं. म्हणजे तो त्याला हव्या त्या किंमतीला सामान विकत घेऊ शकतो. सरकारनं मंजूर केलेल्या नवीन विधेयकांमुळं येणाऱ्या दिवसांत कृषी क्षेत्रात मोनॉप्सनी तयार होईलं. शेती क्षेत्रात काही ठराविक कंपन्या आपला गट म्हणजे कार्टेल तयार करतील. आणि मग या कंपन्या ठरवतील त्या किंमतीला शेतकऱ्यांना माल विकावा लागेल. जर कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद जोडण्यात आली तर त्यानं शेतकऱ्यांवरचं खासगी कंपन्यांचं वर्चस्व संपुष्टात येईल. याचा परिणाम म्हणून या कंपन्या शेतमाल कमी विकत घेण्याची शक्यता आहे. सरकार शेतकऱ्यांकडून कमी शेतमाल विकत घेण्याचा विचार एकीकडे करत असताना दुसरीकडं हमीभावानं संपूर्ण शेतमाल विकत घ्यावा लागेल यासाठी खासगी कंपन्यांना बांधिल करण्याचा सरकारकडं कोणताही मार्ग नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढू शकतात. ते आपला माल कोणाला विकणार. हमीभाव तर राहिलाच कदाचित त्यांनी पीक लावण्यासाठी केलेला खर्चही निघू शकणार नाही.

एमएसपीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव ठरवण्यासाठी एक किमान पातळी मिळते, एक रेफरन्स पॉईंट मिळतो. म्हणजे पिकाची किंमत त्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. एमएसपी त्यांना एक सोशल सिक्युरिटीही देतं. पण खासगी कंपन्या वस्तूंच्या किंमती मागणी आणि पुरवठा यावरून ठरवतात, असा त्यांचा अंदाज आहे. खरेदी करणाऱ्याकडून जास्त किंमत वसूल करण्यासाठी 'मोनॉपली' वा एकाधिकारशाहीनं कृत्रिमरित्या काही प्रमाणात धान्याचा तुटवडा निर्माण केला जाऊ शकतो. तर मोनॉप्सनीने खरेदी कमी करत मागणी कमी करून शेतकऱ्याला माल कमी किंमतीत विकायला भाग पाडता येऊ शकतं. म्हणूनच सरकारला दोन्ही बाजूंच्या वादामध्ये पडायचं नाही. ही गोष्ट या सरकारला या दोन्ही बाजूंपुरतीच ठेवायची आहे. कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद आणली तर मग याविषयीच्या प्रत्येक खटल्यात तीन पक्ष असतील. सरकार, शेतकरी आणि खासगी कंपनी. एका अंदाजनुसार भारतामधल्या ८५% शेतकऱ्यांकडं शेतीसाठी पाच एकरांपेक्षा कमी जमीन आहे. म्हणजेच हे शेतकरी अल्पभूधारक आहेत. हमीभावापेक्षा कमी किंमतीनं खरेदी करण्याला अपराध जाहीर करूनही हा वाद संपणार नाही. तीनही विधेयकं मागे घेणं हा एकच पर्याय असल्याचं दिसतं. पण सध्या तरी सरकार विधेयकं मागे घेण्यास तयार दिसत नाही. यावर एकच पर्याय म्हणजे सरकारनं शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत द्यावी जसं 'किसान सन्मान निधी' द्वारे केलं जातंय. दुसरा पर्याय म्हणजे शेतकऱ्यांनी इतर अशीही पिकं घ्यावीत ज्यांना बाजारपेठेत मागणी आहे. सध्या शेतकरी गहू - तांदळाच्या शेतीवर जास्त भर देतात आणि तेल बियाणं वा डाळींवर कमी भर दिला जातो. दुसरी पिकं घेतल्याने बाजारपेठेतली गतीशीलता कायम राहील.

हरीश केंची
९४२२३१०६०९

सडक्या राजकारणातली 'सुंदोपसुंदी'...!

"पुराणात एका सुंदरीसाठी सुंद आणि उपसुंद या दोघा शक्तिमान मित्रांमध्ये युद्ध होतं आणि ते दोघेही घायाळ होतात. त्याप्रमाणं राज्यातही सत्तासुंदरीसाठी पूर्वाश्रमीचे मित्र असलेल्या भाजपेयीं आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. खरंतर हे राजकारण सडल्याचं लक्षण आहे.
सरकारं बदलली की, एक मूलभूत व्यवस्था आणि निर्णयप्रक्रिया कायम असते. पण आधी घेतलेले सारे निर्णय पुसून टाकून, तुघलकी कारभार करायचा नसतो. अशी कारभाराची सलगता हीच लोकहिताची असते. हे पथ्य न पाळल्यानं विकासाचे प्रश्न चिघळू लागतात. राज्यातील धुरीणांनी पक्षीय मतभेद किती ताणायाचं आणि श्रेयासाठी किती लढायचं याचा विचार केला पाहिजे. अलीकडं राज्यातले राजकारणी राज्यहितासाठी एकत्र येत नाहीत. राज्यातली सत्ता विरोधकांकडे आहे आणि केंद्रातली सत्तासुत्रे भाजपच्या हाती आहेत म्हणून प्रकल्प हाणून पाडणं हे कितपत योग्य आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पात राजकारण असू नये. सध्या असंच सुरू आहे. पूर्वी घेतलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिली जातेय आणि त्या प्रकल्पांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला आपल्या सत्तेच्या आधारे विरोध वा अडवणूक केली जातेय. हे सारं जनतेसाठी म्हणत जनतेलाच वेठीला धरून केलं जातंय. हा सडलेल्या राजकारणातला सत्ता संघर्ष आहे. एवढंच म्हणावं लागेल!"
---------------------------------------------------------

*रा* जकारणात काही घडू शकते इतकी अस्थिरता आहे आणि दाखवलं जातंय तेवढं वैचारिक मतभेद आता राहिलेले नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचारांशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपचे कार्यकर्ते, नेते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारं करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात पडतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व-निष्ठेचा, नि:स्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो, हे आता सगळेच जाणतात. लोक बोलत नाहीत त्याची कारणंही आता सगळ्यांना ठाऊक आहेत. कोण कुठं होते नी कुठं पोहोचले ही काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुनः पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण, म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेतीन रुपयांऐवजी तीन रुपये घेतले तरी लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखरच लॉटरीच लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा. हिंदुत्व आता राजकारणातून बाद झालंय. राजकारण्यांनी ते बाद केलं की, लोकांनीच बाद ठरवलं होतं ह्यावर चर्चासत्र ठेवायचं ते ठेवतील. ते बाद झालंय हे आपण बघितलंय. कुणी अजूनही हिंदुत्व सांगत असेल तर ते हातात फिरणाऱ्या रुद्राक्ष माळेइतपतच, छाप पाडण्याएवढंच असणार. अर्थकारणात समाजवादी विचारांचं तर कधीच रुद्राक्ष झालंय. राजकारणात समाजवाद्यांचं जे काही झालंय त्यासाठी दोन मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली देण्याला कुणीही नकार देणार नाही. तेव्हा कुठलंही 'कॉम्बिनेशन' आता होऊ शकतं. ते होण्याइतपत 'सामंजस्य' आपसात राखायला काय हरकत आहे? एकदा सगळ्यांचा पॉट एकच आहे हे कळल्यावर आडवं कुणाला घालायचं आणि उभं कुणाला करायचं हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे विणले की, वस्त्र तयार होतं. उगाच अटीतटी आणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेलं विसरून, वाट्टेल ते करतात. कुणाशीही त्यांना सहज जमवून घेता येतं आणि न जमवून घेतलं तरी चालतं. त्यांना संरक्षण कवच असतं. कार्यकर्ते या अटीतटीनं बरबाद होतात. निष्कारण भांडणं, वैर वाढतं हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. या निवडणुकीनंतर आक्रस्ताळे अटीतटीचं राजकारण बाजूला पडेल असं वाटत होतं आणि घडलंही तसंच.

*सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित*
कुठलंही जनकल्याणाचं काम जिद्दीनं, इर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मान राखून त्याला विश्वास देऊन धडाक्यानं विकासाची कामं करणारे कल्पक, विवेकी, विधायक वृत्तीचे नेतृत्व ही युती महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा विकास, कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी गावातच पाय रोवून गावातच राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रीतभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्याबरोबर ईर्षा, चुरस, डावपेच यांचीही ग्रामीण भागातली तीव्रता वाढलीय. या तरुणांना एकमेकांना शह, काटशह देत, एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळ्यांवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानावर एकमेकाला पूरक असं काम करण्याची गोडी लावायला हवीय. शरद पवारांनी तरुणांना विधायक कामांसाठी प्रेरणा देऊन ग्रामीण भागात नव्या जोमदार तरुणांची एक फौजच उभी केली होती. साखर कारखानदारांना कितीही नावं ठेवा, त्यांनी आपल्या भागातील लोकांचं जीवन बदलून टाकलंय. शिक्षणाची कोंडी फोडलीय. त्यांची दादागिरी दंडेली याबद्धल तक्रारी आहेत पण त्यांनी कितीतरी लोकांना विकासाच्या वाटेवर चालायची संधी दिलीय. याच लोकांनी काँग्रेसला बळ दिलं होतं आता ते नेमकं कुणाच्या मागं आहेत याचा शोध घ्यावा लागेल. लाखाच्या सभेत तास, अर्धातास दे दणादण भाषण ठोकलं की विचार रुजतात हा भ्रम दूर करून तात्यासाहेब कोरे, विखे पाटील, मोहिते पाटील, रत्नाप्पाण्णा, पी.के.अण्णा पाटील या सगळ्या साखर कारखान्यामागील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा, त्यांनी उभ्या केलेल्या संघटित शक्तीचा, त्यांनी दाखवलेल्या व्यापारी दृष्टीचा विचार, नेते होऊ बघणाऱ्या सगळ्यांनीच विशेषतः शहर भागातील मंडळींनी करायला हवाय!
राजकारण बदलतं आहे. आता जंगी सभा आणि फरडे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि आवाज कुणाचा या आरोळ्यानी लोक आता बधत नाहीत. सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित होणार. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतो आहे. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतोय असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आता मतदान करून आपण आपल्याला हवा असलेला प्रतिनिधी पाठवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आलाय. भरमसाठ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला लोक तयार नाहीत.

*प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला*
भाषणांनी लाटा उठत नाहीत. आणि एखाद्याला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. शरद पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या अतिरेकामुळं लोकांत शरद पवारांबद्धल आपुलकी वाढतेय. भ्रष्टाचार-गुन्हेगारी यावर सोवळेपणानं बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढं डबोलं आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे. सोवळ्यात पावित्र्यच असतं असं मी मानत नाही. सोवळे पावित्र्यासाठी वापरले जात असावं, पण पावित्र्याचा आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवणाऱ्यांपासून दूर राहणंच बरं असं लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भारतीय जनता पक्ष असा सोवळं मिरवणाऱ्यांचा गड्डा किंवा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण सगळ्या सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा काही वेगळं नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुनःपुन्हा घडताहेत. त्यावर बोलायचं नाही? लिहायचं नाही? भाजपमध्ये भरपूर भ्रष्ट आहेत, भरपूर तत्वशून्य आहेत, भरपूर गुंड प्रवृत्तीचे आहेत. भरपूर संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारेही आहेतच आहेत. सत्ताधाऱ्यांमधली घाण काढायचा, तिच्याबद्धल नाकानं कांदे सोलायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालील घाण दाखवली तर मग कळवळता का? वाईट माणसं, गुन्हेगार काँग्रेसमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांकडं आहेत हा कांगावा पुष्कळ झाला. जरा आपल्या सोवळ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही तपास घ्या असं कुणी म्हटलं तर रागावता का? राजकारण सर्वबाजूनं नासतंय; ते सुधारायचं, निदान आहे त्यापेक्षा अधिक नासू द्यायचं नसेल तर भाकड विश्वास बाळगू नका. फक्त आरोप आणि अफवा उठवून हेतुपूर्वक किटाळ रचलं गेलं, प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला त्याचं काय? राजकीय शास्त्री सध्या अशी काही कोडी सोडविण्याच्या आणि मांडण्याच्या कामात गुंतले आहेत.

*ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत*
गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना सेवासुविधा देण्यात एकमत आहे झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहे तर भाजपत तो आडवा घातलाय. काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेऊन मध्ये पांढरा आणलाय. तिघात भगवा कॉमन! उडीदामाजी गोरे काळे प्रमाणे सारेच एका माळेचे मणी आहेत. नेत्यांना आपले सारे उद्योग बिनबोभाट पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचे सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊनच राज्य चालविण्याचा परिपाठ सुरू आहे. मी समर्थ आहे हा आत्मविश्वास नेत्यांत असायला हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल समर्थ आत्मविश्वास असलेल्यांची एक फळीच असावी लागते. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी निष्ठावान, कर्तृत्ववान, सुशिक्षित, लोकसेवा करण्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून आयारामांना पायघड्या घालून कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय. अशावेळी निष्ठावंत मिळणार कुठे? सारेच सत्तेचे लोभी! आजकाल सत्तेसाठीच इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना ज्या पक्षात होते त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी पुढं केलं जातं. 'बाटग्याची बांग मोठी..!' या म्हणीप्रमाणे त्यांना वापरलं जातं. आज हीच मंडळी सत्ताधाऱ्यांवर सतत टीकास्त्र सोडत असतात. यातच सारं आलं! ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत. ह्या शेणगोळ्यांचे साहेब त्यांना सारवण्यासाठीच वापरणार, नाही का...?
- हरीश केंची
९४२२३१०६०९

श्रेयवादासाठी मुंबईत मेट्रोचं रणांगण!

"मुंबईकर आतुरतेनं वाट पहात असलेल्या मेट्रोचे राजकारणामुळे रखडणे दिसते आहे. खरंतर केंद्र सरकारला आरे ऐवजी कांजूरमार्ग इथल्या नव्याने उभारण्यात येणाऱ्या कारशेड निर्मितीमध्ये हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नव्हती. स्थानिक प्रकल्प असल्यानं राज्य सरकारला अधिक अधिकार त्यासाठीचे आहेत. केंद्र सरकारनं याचं राजकारण करण्याची गरज नव्हती. राज्य सरकार चूक की बरोबर हा मुद्दाच नसून निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारलाच आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. केंद्रातील भाजपचं सरकारी पक्ष आणि राज्यातले विरोधी पक्ष एकमेकांशी चर्चेनं प्रश्न सोडवू शकत नाहीत का? राज्य सरकारविरोधात कोर्टात जाणं हे केंद्र सरकारला शोभतं का? इस्टेटीसाठी हे दोन भावांचं भांडण असल्यासारखा वाद सुरू आहे. भाजप आणि सत्ताधारी पक्षांचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण आहे. लोकांचं हित कुणीच ध्यानात घेत नाही. मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळं काम वेगानं व्हावं अशी सामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. पण कारशेडचा प्रश्न आजही अधांतरी आहे. केवळ पक्षीय श्रेयवादासाठी मुंबईकर वेठीला धरला गेला आहे."
-----------------------------------------

*कां* जूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं मेट्रो-३चं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिलंय. त्यामुळं आधीच रखडलेल्या मेट्रो-३ चं काम पूर्ण व्हायला आता आणखी विलंब होणार आहे. आपला प्रवास सुखकर होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईकरांना मेट्रो-३ कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे. पण सुरूवातीला आरेच्या जंगलात कारशेड उभी करण्यास विरोध असल्यानं आणि आता कांजूरमार्गच्या कारशेडवरही प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं मेट्रो-३ मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गची जागा मेट्रोसाठी हस्तांतरित केल्यानंतर महेश गरोडिया यांनी या जागेवर दावा सांगत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयानं काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

राज्य सरकारनं कांजूरमार्गमध्ये कारशेड हलवल्यानं २०२१ पर्यंत सुरू होणारी मेट्रो-३ तब्बल पाच वर्षं पुढं ढकलली जाईल असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मेट्रो-३ च्या कारशेडला ब्रेक लागला आणि आरे कारशेडचं काम थांबलं. या घटनेला जवळपास आता एक वर्ष उलटलं तरी मेट्रो-३ च्या कारशेडचा तिढा सुटलेला नाही. हा प्रकल्प मुंबईतील पहिला भुयारी मेट्रो प्रकल्प आहे. कुलाबा-वांद्रे-सिप्झ या मार्गावर मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनअंतर्गत एमएमआरसी मेट्रो-३ चं काम सुरू आहे. २०१४ पासून मेट्रो-३ च्या कामास सुरूवात झाली. या कामासाठी जवळपास ३ हजार कुटुंबांचं पुनर्वसन करावं लागलं. हा प्रकल्प २०२१ पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज सुरुवातीला एमएमआरसीनं व्यक्त केला. पण २०१५ आणि २०१६ मध्ये आरे आणि इतर ठिकाणी मेट्रोच्या कामासाठी झाडं तोडण्यावर पाच ते सहा महिने बंदी आली. गिरगाव आणि जवळपासच्या रहिवाशांनी आपली जागा सोडण्यासही नकार दिला. यासाठी मेट्रो विरोधात आंदोलनंही केली गेली. यानंतर जून २०२१ पर्यंत सिप्झ ते बीकेसी म्हणजेच मेट्रो-३ च्या फेज-१ चं काम पूर्ण होईल असं एमएमआरसीनं सांगितलं होतं. मेट्रो-३ मध्ये कुलाबा-वांद्रे-सिप्झ मार्गावर एकूण २६ स्थानकं असणार आहेत.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गासाठी मुंबईत ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळं मुंबईकर वाहतूक कोंडीला तोंड देतोय. आतापर्यंत मेट्रो-३ चं ८९ टक्के भुयारीकरण आणि ६१ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. तसंच मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचे ३५ टप्पे पूर्ण झाले आहेत. चर्चगेट-हुतात्मा चौकपर्यंत ६४८ मीटर लांबीच्या भुयारीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. तसंच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाचं ५२ टक्के काम पूर्ण झालं आहे. त्याचबरोबर दादर, सिद्धिविनायक, शितलादेवी, धारावी, वरळी या पॅकेज चारमधील आठ भुयारीकरणाचे टप्पे पूर्ण झाले आहेत. पॅकेज १ अंतर्गत चर्चगेट, कफ परेड आणि हुतात्मा चौक असं काम सुरू आहे. तर विधानभवन, मिठी नदी अशा अनेक ठिकाणी भुयारीमार्गाचं काम पूर्ण झालं आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून मेट्रो-३ च्या रूळजोडणी कामालाही सुरूवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वे स्थानकापासून रूळजोडणी काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी १० हजार ७४० टन हेडहाईन्ड रूळ लागणार आहेत. यापैकी ८ हजार ३६६ रूळ एमएमआरसीएलला मिळाले आहेत. केवळ दोन-अडीच हजार टन रूळ येणं शिल्लक आहे. फ्लॅश बट वेल्डिंग मशीनच्या सहाय्यानं १८ मीटर लांबीचे हेडहाईन्ड रूळांचं वेंडींग करून अखंड रूळ तयार केले जाणार आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पर्यावरणाच्यासाठी म्हणून आरेमधल्या कारशेडचं काम स्थगित केलं होतं. आणि त्याठिकाणी जंगल उभं करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत मेट्रोच्या कारशेडचं काम प्रलंबित आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून मेट्रो-३ कारशेडच्या कामाची सुरुवात होऊ शकलेली नाही. शहरातली काम सुरू असली तरी कारशेडमुळे ती खोळंबली जाणार हे स्पष्ट आहे.

आता कांजूरमार्गच्या जागेवर कारशेडचं काम करण्यास कोर्टानं तूर्तास स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारने ही जागा मिठागराची असल्यानं त्यावर हक्क सांगितलाय त्यामुळं यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालंय. मुंबई उच्च न्यायालयानं सरकारचा कांजूरमार्गमध्ये कारशेड वळवण्याचा निर्णय रद्द केलेला नाही. मात्र त्याठिकाणी सुरू होत असलेल्या कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. त्याची पुढची सुनावणी थेट फेब्रुवारी महिन्यात करण्याचे न्यायालयाने सांगितले आहे.त्यामुळे हा प्रकल्प न्यायालयीन झगड्यात आता किमान चार ते पाच वर्षं रखडणार असा अंदाज व्यक्त होतोय. कारशेड हलवल्यानं आरे ते कांजूरमार्ग प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या किती यशस्वी होईल याचा नव्यानं अभ्यास करावा लागणार आहे. मुळात आरेमध्ये सर्व पूर्वतयारी झाली होती. हा प्रल्पक अतिशय किचकट आणि तांत्रिक आहे. त्यासाठी संशोधन आणि योग्य नियोजन आवश्यक आहे. याचं राजकारण होत राहिलं तर आणखी किती काळ जाईल याबाबत काहीच शाश्वती नाही. मेट्रो-३ प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी कंपनी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच एमएमआरसी या संस्थेत केंद्र सरकारची ५०% आणि राज्य सरकारची ५०% भागीदारी आहे. केंद्रात भाजपचं सरकार आहे आणि राज्यात भाजपच्या विरोधी पक्षांचं सरकार आहे. भाजपला आव्हान देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं आहे. आरे आणि कांजूरमार्गवरून आरोप-प्रत्यारोपाच्या फेऱ्या सुरू आहेत. मेट्रो-३ या प्रकल्पाचं काम जपानची खासगी कंपनी झायका पाहते आहे. ही एक तिथली वित्तीय संस्था आहे. जपानच्या कंपनीशी करार झाल्यानं यात आंतरराष्ट्रीय संबंधही गुंतलेले असतात. केंद्र सरकारच्या विश्वासावर असे करार होत असतात. महत्त्वाचं म्हणजे कोणताही बदल या कंपनीला विश्वासात न घेता करता येत नाही. बदल केल्यास त्याचा भुर्दंड आपल्याला सोसावा लागणार आहे. मेट्रो-३ साठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या करारानुसार, राज्य सरकारनं प्रकल्पात कोणताही मोठा बदल केल्यास अतिरिक्त खर्च हा राज्य सरकारला द्यावा लागणार आहे. झायका कंपनीचाही नियम आहे. प्रकल्पाचा खर्च वाढणार असेल तर कंपनीचीही परवानगी आवश्यक आहे.

मेट्रो-६ साठी गोरेगावकडून येणाऱ्या मार्गाला कांजूर मार्गचं कारशेड जोडायचं आहे. ते कसं जोडणार आहात? गोरगावचं ट्रॅक वरून लावलं जात आहेत. मग कांजूरमार्ग इथं भुयारी मार्ग केला जाणार आहे का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहेत. केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील भाजपविरोधी सरकार या दोन सरकारांमधील भांडणांमुळं मेट्रो-३ चा प्रकल्प रखडणार आहे. मिठागरांचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळं केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. वास्तविक सुरुवातीला कांजूरमार्ग हा कारशेडसाठी पर्याय होता. तेव्हा मात्र केंद्र सरकारनं त्यावेळी हरकत घेतली नव्हती. कारण त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते; त्यामुळे त्याचे श्रेय भाजपला मिळणार हे स्पष्ट होतं. मेट्रो-३ चा खर्च दीड लाख कोटी रुपये आहे. जितका उशीर होणार तितका खर्च वाढत जाणार. हा खर्च कोण देणार आहे? त्यामुळं आर्थिकदृष्ट्याही वाद निर्माण होऊन मेट्रो रखडण्याची शक्यता मोठी आहे. दिल्ली मेट्रो टप्प्याटप्यानं सुरू करण्यात आली. पण मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी भुयारी मार्गाचं काम सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस मेट्रोवरून इथलं राजकारण अधिक पेटत चाललं आहे. म्हणून तांत्रिक अडचणींमुळं नव्हे तर केवळ राजकारणामुळं मेट्रो-३ प्रकल्पाला उशीर होतो आहे. कांजूर ही जागा सामान्य मुंबईकर प्रवाशांसाठी आरेपेक्षा अधिक सोयीस्कर आहे. पण आधीच्या सरकारनं केलेला खर्च आणि आता कांजूरमध्ये उपस्थित झालेले प्रश्न यावरून राजकारण केलं जात आहे. केवळ तांत्रिक मुद्दा सोडवायचा असल्यास त्यामुळं केवळ काही महिने उशीर होईल. पण कार शेडच्या नावाखाली राजकारण सुरू राहिलं तर इतर बाबी उदा. आर्थिक विषय लपून राहतील. आणि प्रकल्प रखडेल, केंद्रीय उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागानं मेट्रो कारशेडसाठी निवडलेल्या कांजूरच्या जागेवरून ठाकरे सरकारला पत्र लिहिलं होतं. या पत्रात सचिव डॉ. गुरूप्रसाद मोहपात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला कांजूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं काम थांबवण्याची सूचना केली होती. मुंबई महानगर विकास प्राधिकरण-एमएमआरडीए ला या ठिकाणी पुढे काम करण्यापासून मज्जाव करा आणि केंद्र सरकारचं हित जपण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश तात्काळ मागे घ्या. अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. त्यावर केंद्रातलं भाजप सरकार जाणीवपूर्वक कांजूरमार्ग कारशेडसाठी अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसनं त्यावेळी केला. खरंतर केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नव्हती. स्थानिक प्रकल्प असल्यानं राज्य सरकारला अधिक अधिकार त्यासाठीचे आहेत. केंद्र सरकारनं याचं राजकारण करण्याची गरज नव्हती. राज्य सरकार चूक की बरोबर हा मुद्दाच नसून निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारलाच आहे हे आपण लक्षात घ्यायला हवं. केंद्रातील भाजपचं सरकारी पक्ष आणि राज्यातले विरोधी पक्ष एकमेकांशी चर्चेनं प्रश्न सोडवू शकत नाहीत का? राज्य सरकारविरोधात कोर्टात जाणं हे केंद्र सरकारला शोभतं का? इस्टेटीसाठी हे दोन भावांचं भांडण असल्यासारखा वाद सुरू आहे. भाजप आणि सत्ताधारी पक्षांचं एकमेकांवर कुरघोडी करण्याचं राजकारण आहे. लोकांचं हित कुणीच ध्यानात घेत नाही. मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरू असल्यानं वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळं काम वेगानं व्हावं अशी सामान्य मुंबईकरांची अपेक्षा आहे. पण कारशेडचा प्रश्न आजही अधांतरी आहे.
हरीश केंची
९४२२३१०६०९

स्वार्थापुढं पक्षहित, चळवळ नगण्य...!

"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीतल्या काही जुन्या नेत्यांच्या भेटी झाल्या. सगळ्यांनाच आंबेडकरी चळवळीची चिंता लागून राहिलीय. चळवळीची आत्ताची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे; पण फ्रस्टेट होऊन स्वस्थ बसावं अशी  निश्चितच नाही! अस्वस्थता तरी का आहे? कारण सर्वच समाजघटक क्रमाक्रमानं जागे होताहेत, आपापला वाटा मागू लागताहेत, आपापलं उपद्रवमूल्यही वसूल करताहेत, त्यातूनच सगळा गदारोळ निर्माण होतोय. खऱ्या अर्थाने गरीब दीन, दलित असलेल्या आंबेडकरी जनतेकडे कुणाचंच लक्ष नाही. आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारांचे राजकिय पक्ष सत्तासाथीदार होण्यातच मश्गुल आहेत. तरुणांना मार्गदर्शन करणारा नेताच सत्तेसाठी तडजोडी करू लागला तर तरुणांनी जायचं कुणाकडं? चळवळ आणि पक्ष हे सारं एकाच हाती गेल्यानं दोन्हीची वैचारिक फरफट होताना दिसतेय. संघ आणि भाजप यांनी समन्वय ठेवत जी मजल गाठलीय ते आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना शक्य होतं पण चळवळ आणि पक्ष यांची सरमिसळ केल्यानं ही अवस्था ओढवलीय!"
------------------------------------------------

*रा* जनीतीतलं एक सूत्र सांगतं की, ‘एखाद्या चळवळीमध्ये अधिकाराच्या जागा आणि मानाची पदं, बिरूदं जितक्या मोठ्या प्रमाणात वाटण्यात येतात, तितक्या प्रमाणात त्या चळवळीकडं निकृष्ठ दर्जाचे लोक आकर्षित होऊ लागतात. शेवटी तर असले बुभूक्षित इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी पक्षामध्ये गर्दी करतात, की पूर्वीच्या काळातील झुंजार प्रामाणिक कार्यकर्त्याला हाच तो आपला पक्ष हे ओळखू देखील येईनासं होतं. जेव्हा असं घडतं तेव्हा त्या पक्षाचं जिवीत कार्य संपुष्टात आलं असं खुशाल समजावं...!’ योगायोगानं त्याला भारतातल्या एका सामान्य कार्यकर्त्यानंही चळवळीच्या काळात दुजोरा दिलेला होता. त्याचं नाव आर.जी. रुके असं आहे. रुके हे आंबेडकरवादी कार्यकर्ते. आरंभीच्या रिपब्लिकन पक्षातले धडाडीचे कार्यकर्ता होते. मुंबई रिपब्लिकन पक्षाचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. १९६७ सालात सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबत आंबेडकरी पक्ष वा चळवळीनं राजकीय युती करावी, असा प्रस्ताव आला होता. तेव्हा रुके यांनी दिलेला इशारा मान्य झाला असता, तर ती चळवळ आणि पक्ष इतका विस्कटून गेलाच नसता. त्या युती करण्याच्या निमित्तानं झालेल्या बैठकीत रुके म्हणाले होते, ‘आज आपला पक्ष स्वाभिमान आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यासमोर कुठल्याही प्रकारचं आमिष नाही. ते सत्तेपासून दूर आहेत म्हणूनच ते ताठ आहेत. काँग्रेसच्या आहारी आपण गेलो तर कार्यकर्त्यांना स्वार्थाची लागण लागेल. त्याच्या स्वार्थापुढं पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची जागा काँग्रेस घेईल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल. हे नाकारायचे असेल तर येत्या निवडणूकीत काँग्रेस बरोबर युती करू नये. युती केली तर तो आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला असं होईल आणि आत्मनिर्भर आंबेडकरी चळवळ संपुष्टात येईल....!’

आंबेडकरी चळवळीनं काँग्रेस वा सत्तेबरोबर जाणं कसं धोक्याचं आहे हे ज्यावेळी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आला त्यावेळी व्यक्त झालेलं मत आज पन्नास-साठ वर्षानंतर किती परिणामकारक ठरलंय याची साक्ष मिळतेय. रुके यांचे शब्द किती नेमकं आणि खरं ठरलंय, हे आपल्याला बघायला मिळतेय. रिपब्लिकन पक्ष गटातटात विभागला गेलाय आणि आंबेडकरी चळवळ तर जितके नेते तितके गट अशी विस्कटून गेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नेता आज जिग्नेश मेवाणी या गुजराती तरूणाच्या वा नक्षली गटांच्या मागे जातो आहे. रामदास आठवले सत्तेच्या परिघात फिरत बसले आहेत आणि सामान्य आंबेडकरी जनता गोंधळलेली आहे. आपापल्या स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसायला असे नेते मागंपुढं बघत नाहीत, ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. दुसरीकडं तशीच वाताहत चळवळकर्ते म्हणवून घेणार्‍या प्रत्येक विचारसरणीच्या गटांची आहे. शेकड्यांनी असे गट मग आपापली पोळी भाजून घेण्यासाठी संयुक्त आंदोलनं, परिषदा भरवतात. पण आपापले स्वार्थ साधून झाल्यावर हेतूला हरताळ फासून मोकळे होत असतात. त्याचा कार्यकारणभाव निकालात निघालेला होता. त्या आंदोलनातली भाषा, उर्जा, घोषणा आणि लोकप्रियतेला बाजारात विकायला काढलेलं होतं. त्याचं भान अशा जुन्यांना तेव्हाच आलं असतं, तर पक्ष वाचला असता. रुके यांनी पन्नास वर्षापुर्वी मांडलेली भूमिका कुणा नेत्याला घेता आली नाही आणि तो पक्ष आणि त्यामागचा हेतू कधीचाच लयाला गेलाय असं वाटण्याची स्थिती निर्माण झालीय.

सवाल एका संघटनेचा वा आंदोलनाचा नसतो. अशा आंदोलनातून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यांच्या आकांक्षा ही त्या चळवळीची खरी उर्जा असते. ती मावळली मग पुन्हा जागृत व्हायला दिर्घकाळ जावा लागत असतो. म्हणूनच त्यामागे असलेली जनभावना जपून हाताळण्याची गरज असते. त्याचे नेतृत्व करणार्‍या नेत्याला त्याचे प्रत्येक क्षणी भान राखावं लागतं. अन्यथा ती उर्जा आपल्या मतलबासाठी वापरून, मग तिलाच उकिरड्यात फेकून देणारे संधीसाधू तिथे गर्दी करीत असतात. आपल्या व्यावसायिक प्रभावापुढे सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला नामोहरम करीत असतात. तिथेच चळवळीचा र्‍हास सुरू होत असतो. रुके यांनी जो इशारा दिला तो अमान्य झाला आणि पुढल्या काळात सत्तापदांसाठी एक एक रिपब्लिकन कार्यकर्ता नेता काँग्रेसच्या आहारी गेला. अगदी खुद्द रुकेही त्यातून वाचले नाहीत. आज म्हणून तर मेवाणी वा खालिद उमर यांच्यामागे फरफटण्यात आंबेडकरी चळवळ खुश आहे. कारण तिला कोणी विश्वासार्ह नेता राहिलेला नाही. नक्षली गटांनी त्यात शिरकाव करून घेतला आहे आणि आंबेडकरी विचारांचे व प्रतिकांचेही अपहरण केलेले आहे. हेच दलित पॅन्थरचे झाले होते आणि प्रत्येक ऐक्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं झालं. जनता दल वा पक्ष म्हणून पुढे आलेल्या मुळच्या समाजवादी चळवळीचा र्‍हास तसाच होत गेलाय. त्यापासून कटाक्षानं अप्लित राहिलेल्या साम्यवादी वा कम्युनिस्ट पक्षाचीही त्यापासून सुटका झाली नाही. प्रकाश करात वा सीताराम येच्युरी अशा उथळ नेत्यांच्या मतलबामुळे डाव्या चळवळीला स्थान उरलं नाही. त्यातही मतलबी लोकांची वर्दळ वाढली. काँग्रेसची पाळंमुळं खुप खोल रुजली असल्यानं तिचा र्‍हास व्हायला दशकांचा कालावधी लागलाय. यापासून आपल्या संघटनेला काळजीपुर्वक बाजूला राखण्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र भरभराटला आहे. पाठोपाठ त्यांचा भारतीय जनता पक्ष.

भाजप हा संघाच्याच मुशीत तयार झालेल्यांचा राजकीय पक्ष असला तरी त्यालाही संघानं आपल्या व्यावहारीक कामकाजापासून दूर ठेवलेलं आहे. भाजपला संघामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. पण संघाला आवश्यक असेल तेव्हा संघाचे काही नेते भाजपत हस्तक्षेप करीत असतात. सत्तेच्या चक्रात फिरणार्‍या संघाच्या भाजपातील कुणाही नेता कार्यकर्त्याला संघाच्या धोरणात्मक व्यवहारात समावून घेतलं जात नाही. त्यामुळे़च संघ अजून टिकलाय आणि विस्तारतोय. भाजपच्या राजकीय दौडीला संघ मदत करतोय. पण सत्तेच्या कर्दमात रुतलेल्यांना संघ आपल्यात ये जा करू देत नाही. बाकीच्या चळवळी वा संघटनांची तिथेच गोची झालेलीय. सत्तेतच रमलेले लोक चळवळीचे निर्णय घेत असतात आणि आपल्या राजकीय गरजेनुसार चळवळीला वाकवत वा मोडतही असतात. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर वा मेवाणी, कन्हैयाकुमार यांच्यात किंचीतही फरक नाही. चळवळ आणि राजकारण यांची गल्लत केली म्हणून त्यांना त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे शक्य झालेलं नाही. त्यांना म्हणूनच आमिष दाखवून वाटेल तसं वळवता येतं वा वाकवताही येतं. काँग्रेसनं या चळवळींना किती सहजगत्या आपल्या राजकीय हेतूसाठी वापरलं, ते वारंवार दिसलेलं आहे. आताही डाव्या संघटनांनी मेवाणी वा आंबेडकरी लोकांना बिनधास्त वापरून घेतलं. त्यात तात्पुरतं समाधान नक्कीच मिळतं. जोश चढतो आणि तो ओसरल्यावर आपण कुठे आहोत, त्याचाही थांगपत्ता लागत नाही. म्हणून चळवळीला सत्तास्पर्धेपासून कटाक्षानं दूर ठेवावं लागतं. पक्ष संघटना चालवताना त्यात मतलबी लोकांच्या हाती सुत्रे जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. ती न घेतली गेल्यानं आंबेडकरी चळवळीची आणि राजकीय पक्षाची ही अवस्था झालीय, हे नाकारता येत नाही.
हरीश केंची
९४२२३१०६०९

राजकीय उथळपणा...!

"देशातल्या शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधीपक्षातील काही नेते राष्ट्रपतींना भेटायला गेले. त्यातून देशातले विरोधीपक्ष एकत्र येताहेत असं चित्र निर्माण झालं. मीडियानं तर 'आता शरद पवार हे युपीए चे अध्यक्ष होतील' अशा बातम्या प्रसिद्ध केल्यात. पण ही शक्यताच पवारांनी फेटाळून लावलीय. पवार हे महाराष्ट्रातले निर्विवादपणे सर्वात मोठे आणि सर्वात प्रभावशाली नेते राहिलेले आहेत, याबद्धल दुमत असण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या क्षमतांच्याविषयी, व्हिजनविषयी, विकासाची दृष्टी किंवा राजकारणातली मुत्सद्देगिरी यांच्याबद्धल जे काही बोललं जातं ते बरोबर आहे. पवार यांच्या एकूण कार्यकर्तृत्वामुळं भारावून गेलेल्या लोकांचं प्रमाण बरंच आहे. अगदी मीडियातही! पण मोदींना आव्हान देण्याइतपत ते शारीरिकदृष्ट्या सक्षम राहतील का असं वाटणं साहजिकच आहे. ८० वा वाढदिवस कालच झालाय. देशातल्या सार्वत्रिक निवडणुकांना अद्यापि दोन अडीच वर्षे शिल्लक आहेत. त्यामुळं ते यूपीएचे अध्यक्ष झाले तरी राजकीय वातावरणात फारसा बदल होणार नाही. महाराष्ट्रात महाआघाडीची सत्ता असली तरी त्याचं नियंत्रण पवारच करतात तसं काहीसं होईल!"
-------------------------------------------------------

*रा* जकारणात प्रणब मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी हे वरिष्ठ नेते होते. त्यांच्यानंतर शरद पवार साहेब हे एकमेव अनुभवी आणि मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडं युपीएचं पद येऊ शकतं. मात्र, हा निर्णय दिल्लीमध्ये सर्वानुमते आणि कोणाचा विरोध न होता होणं अपेक्षित आहे. एकीकडे शरद पवार यांच्याबाबत या चर्चा सुरू झाल्या असताना, दुसरीकडं शरद पवार यांनी मात्र युपीएचे अध्यक्ष होण्याच्या शक्यता फेटाळल्या आहेत. मात्र, तरीही शरद पवार युपीएचे अध्यक्ष होऊ शकतात का, याची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळात सुरूच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी-युपीए ही एक राजकीय पक्षांची आघाडी आहे. २००४ लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेसाठी सोनिया गांधी यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नावाखाली विविध राजकीय पक्षांची मोट बांधली. या आघाडीचं नेतृत्व स्वत: सोनिया गांधी यांनीच केलं. २००४ ला काँग्रेसने सत्तेसाठी विविध पक्षांना सोबत घेऊन बनवलेल्या आघाडीनं दोनवेळा सलग केंद्रात सत्ता मिळवली. यातील २००४ च्या पहिल्या सरकारला युपीए-१, तर २००९ च्या म्हणजे दुसऱ्या सरकारला युपीए-२ चं सरकार असं संबोधण्यात येतं. युपीए ची स्थापना झाल्यापासून याचं नेतृत्व काँग्रेसकडंच आहे. आजतागायत सोनिया गांधी याच युपीएच्या अध्यक्षा आहेत. आता सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा असल्यातरी त्या वयोमानामुळं आणि तब्येतीमुळं राजकारणात पूर्वीइतक्या सक्रीय राहत नाहीत. काँग्रेसचं हंगामी अध्यक्षपदही त्यांनी पर्यायानं स्वीकारल्याचं बोललं जातं. त्यामुळे युपीएचं अध्यक्षपद दुसऱ्या व्यक्तीकडं जाण्याची शक्यता आहे. मात्र, आता विरोधी पक्षांमध्ये आणि विशेषत: युपीए-१ आणि युपीए-२ मधील सहभागी पक्षांमध्ये राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव पाहता तुलनेनं वजनदार नेता म्हणून शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. पण आता प्रश्न उपस्थित होतो की, काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आणि सुरुवातीपासूनच काँग्रेसचा वरचष्मा राहिलेल्या युपीएची धुरा शरद पवारांकडे दिली जाऊ शकते का?

शरद पवार यांचं राजकारणातील ज्येष्ठत्व, भाजपविरोधी किंवा विरोधी पक्षातील वेगवेगळ्या पक्षांशी असलेले सलोख्याचे संबंध आणि सर्व पक्षांमध्ये पवारांबाबत असलेली स्वीकाहार्यता हे गुण पवारांना युपीएचं अध्यक्षपद किंवा निमंत्रक म्हणून निवडीसाठी महत्त्वाचं आहेत. भाजपविरोधात मजबूत आघाडी बांधायची असल्यास युपीएची पुनर्बांधणी आवश्यक आहे आणि त्यासाठी पवारांसारखा विविध पक्षांशी समन्वय साधणाराच नेता लागेल. तसंच, राष्ट्रीय राजकारणातला अनुभवही इथे कामी येऊ शकत. शरद पवार यांना नेतृत्व देण्यात आल्यास त्याचा सर्वच विरोधी पक्षांना लाभ होऊ शकतो, शरद पवारांमध्ये विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी लागणारं कसब आहे. ते त्यांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. सध्या काँग्रेस पक्ष मरगळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळं शरद पवारांच्या नेतृत्वाचा लाभ काँग्रेससह इतर पक्षांना होऊ शकतो. सध्याच्या घडीला भाजपविरोधात संघर्ष करायचा असेल, तर सर्व घटक पक्षांनी एकत्र येणं आवश्यक आहे. महाराष्ट्रात त्यांनी ते विधानसभेला दाखवून दिलं. युपीएचा विस्तार वाढवणं गरजेचं आहे. शरद पवारांचं वैशिष्ट्य म्हणजे ते १९९१ पासून देशाच्या राजकारणात आहेत. सर्वच पक्षांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यामुळे सर्वांना एकत्रितपणे उभे करण्यात शरद पवारांचा अनुभव कामी येऊ शकतो. पवार युपीएचे अध्यक्ष झाल्यास महाराष्ट्र पॅटर्न देशात दिसू शकतो. आतापर्यंत नैसर्गिकरित्या काँग्रेसचा अध्यक्ष हा युपीएचा अध्यक्ष राहिला आहे. कारण काँग्रेस या आघाडीतील मोठा पक्ष आहे. मात्र, आता सोनिया गांधी या प्रकृतीमुळे काँग्रेसलाच पूर्ण न्याय देऊ शकत नाहीत. राहुल गांधी पुढे-मागे काँग्रेसचे अध्यक्ष होतील, मग त्यांना त्यांच्याच पक्षाला वेळ देणं आताची गरज आहे. त्यामुळे ते युपीएला वेळ देऊ शकत नाही. युपीए चं नेतृत्त्व दुसऱ्याकडे देणं ही गरज बनलीय. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल हे दोन्ही पक्ष पहिल्यापासून काँग्रेसचे निष्ठावंत राहिलेत. त्यामुळे पवारांकडे युपीएचं अध्यक्षपद गेल्यास काही अडचण असण्याचं कारण नाही,

युपीए अध्यक्षपद देण्याऐवजी 'निमंत्रक' म्हणूनही पवारांकडे जबाबदारी सोपवली जाऊ शकते आणि अशावेळी काँग्रेसलाही अडचण असण्याचं कारण राहणार नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जॉर्ज फर्नांडीस यांच्याकडं एनडीएचं निमंत्रकपद देण्यात आलं होतं. कारण फर्नांडीस यांचं सर्व पक्षांशी संबंध चांगले होते. ते एनडीएला फायद्याचं ठरलं. आता पवारांचं युपीएबाबत तसंच आहे. शरद पवार हे आपले मित्र आहेत की शत्रू आहेत, हे काँग्रेसला अजूनही कळलेलं नाहीय. पवारांचे भाजपसोबतचे संबंध कायमच काँग्रेसला संभ्रमात टाकतात. अशावेळी काँग्रेस युपीए अध्यक्षपदाबाबत विचार करण्याची शक्यता आहे. मात्र, पवारांना निमंत्रकपद देण्याबाबत आक्षेप नसेल. आता सर्वांत महत्त्वाच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर यदाकदाचित शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले, तर राहुल गांधी त्यांच्या नेतृत्त्वात काम करतील का?

राहुल गांधी आणि शरद पवार यांनी सोबत काम करण्यास काहीच अडचण येणार नाही. युपीए म्हणजे केवळ केंद्रातील सत्तेतील पक्षाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचं काम आहे. केवळ धोरणात्मक पातळीवर एक व्हायचं आहे. इतरवेळी ज्यानं-त्यानं आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळं या दोघांनी एकत्र येण्यात काहीच अडचण दिसत नाही. भाजपविरोधात किंवा केंद्र सरकारविरोधात व्यापक जनभावना निर्माण करण्याबरोबरच एकत्र राहण्यासाठी युपीए असल्यानं कुणाच्या नेतृत्त्वाची अडचण होण्याची शक्यता दिसत नाही. प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी युपीएला शरद पवार यांसारखाच नेता लागणार आहे. प्रादेशिक पक्षांना काँग्रेस तितका प्रभावी वाटत नाही. युपीएमध्ये पक्ष एकत्रित करणं हा उद्देश गृहित धरल्यास कुणाच्या नेतृत्त्वात काम करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. मात्र, शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील नेते असले, तरी आजच्या घडीला त्यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे केवळ ५ खासदार आहेत. मग या ५ खासदारांच्या बळावर ते युपीए चे अध्यक्ष होऊ शकतात का आणि हे इतर प्रादेशिक पक्षांना मान्य होऊ शकेल का? सध्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ५ खासदार आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे ५२ तर तामीळनाडूतील प्रादेशिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघमचे २४ खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे फक्त ५ खासदारांचा पक्ष युपीएचं नेतृत्व करू शकेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. पण, काँग्रेसची असं करण्याची खरंच यासाठीची तयारी आहे का, अध्यक्षपद इतर पक्षांच्या नेत्याकडं जाणं काँग्रेसला मान्य आहे का? यावर सगळं अवलंबून आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण पाहीलं तर त्यावेळी ४६ खासदारांच्या बळावर जनता दलाच्या एच.डी.देवेगौडा यांनी पंतप्रधानपद भूषवलं होतं. ही तर फक्त एक राजकीय पक्षांची आघाडी आहे, तीही विरोधातली. नेतृत्व ठरवताना त्याच्याकडं किती खासदार आहेत, हे पाहिलं जात नाही. तर नेत्याकडे नेतृत्व करण्याची क्षमता आहे का. तो पक्षाला उभारी देऊ शकतो का, या गोष्टी विचारात घेतल्या जातात. सध्या काँग्रेसकडं मोठे चेहरे नाहीत, सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातील संबंधही चांगले आहेत. त्यामुळे युपीए अध्यक्षपदी पवार यांची निवड होणार असेल तर इतर नेते ते मान्य करू शकतात. ही सारी चर्चा फक्त मिडियातच सुरू आहे, पवारांनी मात्र ही चर्चाच नाकारलीय. काहींच्या मते ते जेव्हा नाही म्हणतात तेव्हा त्याचं होय असंच असतं!
हरीश केंची
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...