Saturday 24 June 2023

सत्तासंघर्षाचं मंथन....!

"तिकडं अमेरिकेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा डंका पिटला जात असतानाच, इकडं पाटण्यात देशातल्या विरोधकांनी एकत्र येत भाजपच्या विरोधात लोकसभेसाठी बिगुल वाजवलाय. भाजपविरोधात एकास एक उमेदवार देऊन आगामी लोकसभा निवडणुका लढवायच्या यासाठीची मोर्चेबांधणी चालवलीय. १०-१२ जुलैला सिमल्यात होणाऱ्या विरोधकांच्या दुसऱ्या बैठकीत त्याला मूर्त स्वरूप येईल असं सांगितलं गेलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोधकांच्या एकजुटीची चाहूल लागताच भाजपला मार्गदर्शन करण्यासाठी दिल्लीत गेल्या आठवड्यात तीन दिवस विचारमंथन केलंय. कर्नाटक, हिमाचल प्रदेश, दिल्लीत झालेला पराभव, जनमानसातल्या भावना, पक्षात आणि सरकारात करावयाचे बदल यावर खल केलाय. मोदी परतल्यावर मोठ्याप्रमाणात बदल होतील असं सांगण्यात आलंय. एकूण काय देशातल्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करून सत्ताधारी आणि विरोधक दोघेही निवडणुकीच्या तयारीला लागलेत!"
-------------------------------------------------

*पा* वसानं घेतलेली ओढ, पिण्याच्या पाण्याची, अन्नधान्यासाठी चाललेली जनतेची कुतरओढ, महागाईचा, बेकारीचा उसळलेला आगडोंब, देशात ठिकठिकाणी उसळलेल्या दंगली, पेटलेलं मणिपूर, हे सारं जनता भोगत असताना सत्ताधारी आणि विरोधक दोघेही मात्र राजकारणात मश्गुल आहेत. तर प्रधानमंत्री परदेश दौऱ्यात व्यग्र आहेत. गृहमंत्री तर देशभर निवडणूकपूर्व प्रचारात दंग झालेत. विरोधकांना सत्तेवर येण्याची घाई झालीय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं भाजपला सत्तेचं सोपान पुन्हा गाठण्यासाठी मार्गदर्शन नुकतंच केलंय. संघाशी संबंधित असलेल्या 'द ऑर्गनायझर'नं आपल्या अंकातून भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा केलीय. भाजपनं काय करावं याचं विवेचन केलंय. भाजप आक्रमक बनलाय. तर विरोधक जुळवाजुळव करण्यासाठी सरसावलेत. पाटण्यातल्या बैठकीत सहभागी न झालेल्या ओरिसातले बिजू जनता दल, आंध्रप्रदेशातली वायएसआर काँग्रेस, तेलंगणातल्या भारतीय राष्ट्र समिती यांना गोंजारण्याचा प्रयत्न चालवलाय. ही मंडळी कुंपणावर बसून आहेत. भाजपनं मित्रपक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवलाय. त्यासाठी तेलुगु देशम, जनसेना, अकाली दल, मांझी यांचा हिंदुस्थान पक्ष, पासवान यांचा पक्ष यांना जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय. विरोधक बैठकीत उपस्थित राहिलेल्या पण पत्रकार परिषदेत उपस्थित न राहता आपली काँग्रेसच्या विरोधात नाराजी व्यक्त करून बाहेर पडलेले केजरीवाल यांची समजूत काढली जातेय. संघ-भाजप नेत्यांची भाजपच्या नव्या विस्तारित कक्षात गेल्या आठवड्यात तीन दिवस बैठक झाली, देशातली सद्यस्थिती, भाजपचा सतत होणारा पराभव, त्याची कारणमीमांसा आणि २०२४ ची 'युद्धनीती' यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीला पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा, संघटन सचिव बी.एल.संतोष आणि गृहमंत्री अमित शहा तर संघाच्यावतीनं सह सरकार्यवाह अरुणकुमार सहभागी झाले होते. संघ स्वयंसेवकांकडून आलेल्या माहितीच्या आधारे भाजपच्या नेत्यांना असं सुचवलं की, आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षसंघटनेत आणि सरकारांमध्ये मोठ्याप्रमाणात बदल करण्याची गरज आहे. काहींची नावं घेऊन त्यांनी सांगितलं की, काँग्रेसनं जी चूक केली ती भाजपनं करू नये. जी काही मंडळी आहेत त्यांना फार मोठं केलं जाऊ नये; जे पुढं जाऊन पक्षासाठी अडचणीचे ठरतील. अशांना बदलून नव्यांना समोर आणायला हवंय. संघ आणि भाजपत होणाऱ्या अशाप्रकारच्या बैठका, विचारमंथन, चर्चा होणं ही तशी सामान्य घटना आहे. पण माध्यमांनी त्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्यानं त्यावर चर्चा होऊ लागलीय. संघ ही भाजपची मातृसंस्था असली तरी संघ-भाजप ह्या एकाच स्तरावरच्या संस्था आहेत. मात्र गेल्या २० वर्षात यात महत्वाचा बदल झालाय. पूर्वी संघाला भाजपचा 'रिमोट कंट्रोल' म्हटलं जायचं; संघ पूर्वी थोरल्या भावाच्या भूमिकेत होता, आता ते जुळ्या भावाच्या स्वरूपात आलेत. प्रामुख्यानं मोहन भागवत संघाचे प्रमुख आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री बनले तेव्हापासून! सह सरकार्यवाह अरुणकुमार हे संघ आणि भाजप यांच्यातले समन्वयक आहेत. पूर्वी कृष्ण गोपालजी, आणखी काहीजण हे काम करत होते. अरुणकुमार प्रचारक प्रमुख होते, ते आता सह सरकार्यवाह आहेत. त्यांनी ३७० कलम रद्द करण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत, त्यासाठी गेली अनेकवर्षं त्यावर एक अभियान म्हणून काम करत होते. त्यामुळं त्यांनी सांगितलेल्या बाबी या भाजपनं गांभीर्यानं घेतल्या आहेत. अरुणकुमार यांनी जे काही सांगितलंय ते समजावणीच्या सुरात, कुटुंबात जशी चर्चा होते, सल्ले दिले जातात, त्याच धर्तीवर सांगितलंय की, परिवारातलं, वातावरण कशाप्रकारचं आहे. कारण परिवाराला २०२४ च्या निवडणुकांना सामोरं जायचंय तेव्हा परिवारातली सद्यस्थिती सांगण्याची जबाबदारी संघ पार पाडतोय. पक्षात कोणत्या सुधारणा करायला हव्यात, कोणते बदल करायला हवेत, कोणते निर्णय घ्यायला हवेत. ह्या सूचना संघानं नेहमीप्रमाणे केल्यात. मोदी अमेरिकेहून परतल्यानंतर त्यानुसार पक्षसंघटनेत आणि सरकारात मोठे बदल संभवतात.
आजचा भाजप तेव्हाचा जनसंघ १९८० साली 'जनता पार्टी'त होता, तेव्हा दुहेरी सदस्यत्वाच्या प्रश्नावर त्यांनी आपली सत्ता पणाला लावली होती. जनता पक्षाचे एक वरिष्ठ नेते मधु लिमये यांनी 'जनसंघातून आलेल्यांनी  संघाचं सदस्यता सोडायला हवी..!' असा आग्रह धरला होता. जनता पक्षातल्या जनसंघाच्या मंडळींनी 'आम्ही संघाची सदस्यता सोडणार नाही. भले मग आम्हाला सत्तेतून बाहेर पडायला लागलं तरी! कारण आमची प्रथम सदस्यता ही संघाची आहे. आम्ही प्रथम संघ स्वयंसेवक आहोत...!' या भूमिकेमुळं तेव्हाच सरकार पडलं. एवढं महत्व भाजपची नेतेमंडळी संघाला देतात. ते संघाला गुरू मानतात. पण शिष्यानं गुरूची प्रत्येक म्हणणं ऐकलं पाहिजे असं काही नाही. पण गुरू आहे तो दम भरू शकतो, रागावू शकतो. पण मोदी, शहा, गडकरी वा इतर नेते जे संघाला सन्मान देतात ते अशाच भावनेनं सन्मान देतात. पक्ष वा संघटनेत मूल्याधिष्ठित धोरण महत्वाचं असतं न की, व्यक्तिमहात्म्य. संघाला असं जाणवलंय की, पक्ष व्यक्तीसाक्षेप होतोय, शिवाय काहींना असा एकप्रकारचा रोग जडू लागलायकी, 'आम्ही काम करो वा ना करो, मग तो मंत्री, आमदार असो वा खासदार, आम्हाला मतं मिळतात ती मोदींच्या नावानं, ते येतील अन मग आम्ही विजयी होऊ...!' असं त्यांना वाटतंय, हे अत्यंत धोकादायक असल्याची जाणीव संघानं करून दिलीय. संघ स्वयंसेवकं तळागाळात पोहोचलेले आहेत. संघात तसा भ्रष्टाचार होत नाही पण राजकीय पक्ष म्हणून भाजपत जमलेल्यांकडून मात्र तो होतोय. यांची माहितीही संघानं भाजपला दिलीय. त्यामुळं संघाकडून ग्राऊंड रिपोर्ट मिळावा अशी अपेक्षा भाजपनं सतत बाळगलीय. संघाच्या सूचनेनुसार आजवर तसे बदल पक्षात, सरकारात केलेत. जसं संघाचं सर्व्हेक्षण असतं, तसंच भाजपचं स्वतःचंही सर्व्हेक्षण असतं. या दोन्ही सर्वेक्षणावर वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय. आज संघानं जे काही सांगितलंय ते महत्वाचं आहे, 'व्यक्तिमहात्म्य वाढू देता कामा नये. ज्यांची गरज आहे त्यांनाच पदं द्यायला हवीत. विशेष करून मध्यप्रदेश जो भाजपचा कायम गड समजला गेलाय, त्याला गेल्यावेळी धक्का लागला होता. तो गड वाचवणं हे एक आव्हान आहे. त्यासाठी संघ-भाजप यांच्यात गेल्या सहा महिन्यांपासून मंथन सुरू आहे. नेतृत्वाचीही चर्चा सुरू आहे. सरकारातले चेहरे चमकदार दिसत नाहीत. त्यांचा प्रशासनावर प्रभाव आहे ना कार्यकर्त्यांवर ना जनतेवर! मंत्र्यांची कामं लोकांसमोर येतच नाहीयेत. हे संघानं भाजप आणि सरकारच्या नेतृत्वाला सांगितलंय. भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या वरिष्ठांना हे सांगण्याचं धाडस नसेल, पण संघ कुणाचीच तमा बाळगत नाही, स्पष्टपणे सांगण्यात मागेपुढे पहात नाहीत. संघ कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतो.
संघानं आणि भाजपनं आपल्या जाहीरनाम्यातल्या तीन गोष्टींपैकी अयोद्धेत राम जन्मभूमीवर मंदिर, घटनेतलं कलम ३७० रद्द करणं आणि समान नागरी कायदा यांपैकी दोन मुद्द्यांची कार्यवाही झालीय. आता राहिलाय तो समान नागरी कायदा! केंद्र सरकारच्या लॉ कमिशननं एक नोटिफिकेशन जारी करून त्याबाबत सूचना मागवल्यात. समान नागरी कायदा २०२४ पूर्वी लागू होईल हे आताच काही सांगता येत नाही. पण लोकसभेच्या निवडणुकांनंतरच समान नागरी कायदा होण्याची शक्यता आहे. असं वातावरण तयार करण्यात भाजप यशस्वी झालाय. संघाचं भाजपला सांगणं म्हणजे आपण लहानपणी ऐकलेल्या गोष्टीतल्या 'राजा नागडा आहे...!' या प्रकारातलं असतं. केंद्र सरकारात ७५ मंत्री आहेत. या ७५ मंत्र्यांची नावं सामान्य लोक सोडा भाजपचे नेते तरी सांगू शकतील का? या सरकारातले ८-१० मंत्री असे आहेत की, वाटतं हे काम करताहेत. इतर मंत्र्यांचं काय? ते मोदींच्या नावावरच जिंकणार असं त्यांना वाटतं. ज्यांना असं वाटतं त्यांची सफाई व्हायला हवीय! आज संघ स्वयंसेवकांची संख्या१ ते २ कोटींच्या दरम्यान आहे. संघ कधी आपली सदस्य संख्या जाहीर करत नाही. तर भाजपचे सदस्य अधिकृपणे १८ कोटीहून अधिक आहे. १८ कोटी सदस्य जेव्हा २ कोटी संघ स्वयंसेवकांचं म्हणणं ऐकतात, तेव्हा समजून जायला हवं की, तो संघाचा सन्मान करतोय. संघ एक आर्किटेक्ट आहे तर भाजप बिल्डर. आर्किटेक्ट इमारतीचं रेखाटन करतो तर बिल्डर त्याचं बांधकाम करतो, त्यानुसार इमारत उभी करतो. अगदी त्याच धर्तीवर संघ आणि भाजप यांचं देशभरात काम चालतं.
कर्नाटकच्या निवडणुकांनंतर देशाचं राजकारण एका निर्णायक टप्प्यावर पोहोचलंय आणि त्याच टप्प्यावर पारडं आपल्या बाजूला झुकवण्यासाठी भाजप आणि विरोधी पक्ष आपापली रणनीति आखताहेत. विरोधी पक्षांच्या रणनीतिमधला सर्वात महत्वाचा भाग हा आहे की, अशी नवी आघाडी तयार करणं किंवा अस्तित्वात असलेल्या 'यूपीए'ला मोठं आणि कार्यरत करणं. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बाधण्याचा प्रयत्नात एक नाव गेल्या काही दिवसांमध्ये सतत पुढं दिसतंय ते म्हणजे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांचं. नितीश कुमार गेले काही दिवस सतत देशभर फिरुन विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत होते. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री आणि 'राजद'चे नेते तेजस्वी यादव हे सुद्धा कायम असत. गेल्या दोन महिन्यांच्या काळात ते दोनदा काँग्रेसच्या राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गेंना भेटलेत. दिल्लीत अरविंद केजरीवालांचीही भेट घेतली. महाराष्ट्राच्या सत्तांतराचा निकाल ११ मे रोजी आला, तेव्हा नितीश कुमार आणि तेजस्वी यादव हे मुंबईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आले होते. त्याअगोदर ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला गेले होते. नितीश कुमार हे पूर्वीही आघाड्यांच्या राजकारणात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत होते. त्यांचे सगळ्या पक्षांशी संबंध आहेत. त्यांचं नाव प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत कायम असतं. आता ते भाजपशी फारकत घेतल्यानंतर विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची जबाबदारी घेऊन पुढं येताहेत. देशभर भाजपसमोर एकास एक अशी निवडणूक करायची आहे. १९७४ चं बिहार मधलं जयप्रकाश नारायणांच्या चळवळीचं मॉडेल सगळीकडं न्यायचंय. तेव्हा सगळे पक्ष एकत्र येऊन १९७७ मध्ये जनता पक्ष स्थापन झाला होता. शिवाय १९८९ मध्ये व्ही. पी. सिंगांनी जे सगळ्यांना एकत्र आणण्याचं मॉडेल यशस्वी करुन दाखवलं होतं तेही महत्वाचं आहे. देशभरात अशा ४७५ लोकसभेच्या जागा त्यांनी शोधल्या आहेत जिथं भाजपसोबत एकासमोर एक अशी सरळ लढत होईल. जे सहयोगी पक्ष आहेत, ते ज्या भागात ताकदवान आहेत, तिथं त्यांनी भाजपशी दोन हात करावेत. जर हे होऊ शकलं तर भाजपची संख्या घटेल. अर्थात यासाठी एकत्र येऊन आघाडी होणं आणि त्यानंतर जागावाटप होणं हे सगळं महत्वाचं आहे. त्यासाठीच नितीश कुमार यांनी पाटण्यात सगळ्या विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. पाटणा यासाठी की तिथून जयप्रकाश नारायणांचं आंदोलन सुरु झालं होतं आणि त्याची परिणिती आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचं सरकार जाण्यात झालं. अर्थात विरोधकांच्या या एकजुटीमधली सगळ्यात मोठी बाब आहे, ती म्हणजे कॉंग्रेसची भूमिका!
कॉंग्रेस भाजपसारखा देशभरात सगळीकडं अस्तित्व असलेला एकमेव पक्ष आहे. कॉंग्रेसची मतंही महत्वाची आहेत आणि कॉंग्रेसच्या जागाही. पण स्थानिक पक्षांसोबतच्या कॉंग्रेसच्या स्पर्धेवर मार्ग काय हा खरा प्रश्न आहे. पण कॉंग्रेसला वगळून काही पक्षांनी तिसरी आघाडी करण्याचा प्रयत्न यापूर्वीही तेलुगु देशमच्या चंद्राबाबू नायडू, त्यानंतर तेलंगणाच्या के.चंद्रशेखर राव यांच्याकडून झाला होता पण शरद पवार, नितीश कुमार यांच्यासारख्या दिल्लीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या नेत्यांनी कॉंग्रेसला वगळून विरोधक ऐक्य शक्य नाही असं स्पष्ट म्हटलं. त्यामुळं सध्याचे प्रयत्न कॉंग्रेसला घेऊनच होताना दिसताहेत. पण प्रश्न तिथं बिकट बनेल जिथं स्थानिक पक्षांशी जागावाटपावर चर्चा काँग्रेसशी करावी लागेल. कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान अशा राज्यांमध्ये कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत असेल. तिथं प्रश्न येणार नाही. पण बाकी बहुतांशी राज्यांमध्ये स्थानिक पक्ष प्रबळ आहेत किंवा सत्तेत आहेत. पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांमध्ये तर सत्ता कॉंग्रेसकडून स्थानिक पक्षांकडं गेलीय. त्यामुळं तिथं कॉंग्रेस पडती बाजू घेईल का आणि जागा स्थानिक पक्षाला सोडेल का, यावर बरंच काही अवलंबून असेल. ममता बॅनर्जी यांनी तर कॉंग्रेसनं आमच्यविरोधात लढू नये असं जाहीरपणेच म्हटलं होतं, पण आता त्या मवाळ झालेल्या दिसल्या. पण अशा राज्यांमध्ये कॉंग्रेसची संघटना पहिल्यापासून आहे. आता तिथं जागा सोडणं म्हणजे भविष्यातही त्या जागा हातून कायमच्याच जातील का ह्याबाबत कॉंग्रेसला गांभीर्यानं विचार करावा लागेल. प्रश्न केवळ जागांचाच नाही तर राज्यांचा आहे. म्हणूनच विरोधी ऐक्य प्रत्यक्षात येण्यासाठी 'कॉंग्रेसला काय' हा प्रश्न सुटला तरच पुढच्या घडामोडी होऊ शकतात. कॉंग्रेसनं हा विचारसरणीचाही संघर्ष केला आहे. राहुल गांधी निवडणूक व्यवस्थापनापेक्षा विचारसरणीच्या लढाईविषयी अधिक बोलताहेत. त्यामुळं कॉंग्रेसला विरोधकांची आघाडी करतांना विचारसरणीच्या मुद्द्यावरही सगळ्यांना एकत्र आणावं लागेल. कॉंग्रेसनं गेल्या काही काळात शिवसेनेसारख्या पक्षाबरोबर आघाडी करुन लवचिकता दाखवलीय आणि उद्धव ठाकरेंनी जाहीर ऐकवल्यावर सावरकरांसारख्या मुद्द्यावर समजूतदारपणाही दाखवलाय. प्रश्न हा आहे की कॉंग्रेस ते पुढेही करेल का? १०-१२जुलैला सिमल्यात काँग्रेसच्या पुढाकारानं बैठक होतेय, त्यात हे अधिक स्पष्ट होईल. मल्लिकार्जुन खर्गे अध्यक्ष झाल्यावर ते सगळ्यांना भेटताहेत. त्यांना आघाड्यांच्या राजकारणाचा अनुभवही आहे. ते कायम या चर्चांमध्ये राहुल गांधीनादेखील सोबत घेताहेत. कर्नाटकच्या विजयानंतर कॉंग्रेसमध्ये उत्साह आहे. देशातल्या बहुतांशी विरोधी पक्षाच्या नेत्यांना सिद्धरामय्यांच्या शपथविधीला आमंत्रित करुन त्यांनी पक्षाचा हेतूही स्पष्ट केलाय. केसीआर, जगन रेड्डी, नवीन पटनायक ही मंडळी यात सहभागी झालेले नाहीत. ते भाजपशीही संलग्न नाहीत. ते कुंपणावर बसून आहेत. राष्ट्रीय स्तरावर विरोधकांच्या एकीमधला सगळ्याच कळीचा प्रश्न म्हणजे प्रधानमंत्रीपदाचा चेहरा कोणाचा? यावर सगळेच थोडं सांभाळून बोलताहेत किंवा पूर्णपणे गप्प आहेत. अनेकांना महत्वाकांक्षा आहे हे स्पष्ट आहे. पण तरीही उत्तर अवघड आहे. यावर पवारांनी अजून प्रधानमंत्री कोण वगैरे अशी काही चर्चा झाली नाही. पण आता महत्वाचं इतकंच आहे की राष्ट्रहितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन चर्चा केली पाहिजे. ती थांबाईला नकोय. अजून मूळ चर्चा सुरु झाली नाही पण चिंता करु नका. पण ती नक्की होईल! असं म्हटलंय. पूर्वी निवडणुकीनंतर प्रधानमंत्रीपदाचा चेहरा आघाड्यांमध्ये निवडला गेलाय. पण सध्याच्या भारतीय राजकारणात ते शक्य आहे का? मोदींच्या चेहऱ्यावर भाजप ही तिसरी निवडणूक लढवेल. 'मोदींसमोर कोणीच नाही' या नरेटिव्हचा भाजपला फायदा झालाय. त्यामुळं त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उभा करणं हा रणनीतिचा आवश्यक भाग असू शकतो. पण ते विरोधी पक्ष करु शकतील का? एकट्या राहुल गांधींचाच चेहरा आजवर प्रोजेक्ट झालाय. 'भारत जोडो यात्रे'मुळं राहुल यांचा पूर्णपणे इमेज मेकओव्हर झालाय आणि त्यांची लोकप्रियता वाढलीय असा दावा कॉंग्रेसकडून केला जातोय. पण राहुल यांच्या चेहऱ्याला सगळे पक्ष मान्यता देतील का, हा प्रश्न आहेच. शिवाय सध्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरलेल्या राहुल यांचा पुढचा न्यायालयीन लढा सुरु आहे. तोवर त्यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह आहे. अशा स्थितीत पर्याय काय याचा विचारही विरोधी ऐक्याची चर्चा करणाऱ्यांना करावा लागेल.  दलित मतांसाठी खर्गे यांचं नांव पुढं आल्यास आश्चर्य वाटायला नको.पण तूर्तास तरी विरोधी ऐक्य दिसतंय. त्यांचाकडं वेळ मर्यादित आहे. पुढच्या १०-१२ जुलैमध्ये होणाऱ्या बैठकीत काही महत्वाच्या घडामोडी होतील हे नक्की.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

'द ऑर्गनायझर' की नसीहत, निर्देश या प्रेरणा...?

"२०२४ समोर येऊन ठाकलंय! देशाचं मत, मन आणि कल संघ आणि भाजपलाही समजून चुकलंय की, २०२४ ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. एका अंदाजानुसार १८० ते २०० जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळं निवडून येणाऱ्या भाजपच्या सदस्यांच्या वजीरासाठी प्रयत्न सुरू झालेत. दुसरीकडं आपल्याला पर्याय ठरू शकतील अशांना हेरून त्यांना उमेदवारीपासूनच वंचित ठेवण्याची शक्यता आहे. जेणेकरून त्यांचा वजीर बनण्याचा मार्ग रोखला जाईल. २०१४ मध्ये मोदींच्या तोडीचे वा त्याहून कांकणभर सरस नेते ज्यांच्याकडं उत्कृष्ट वक्तृत्वशैली होती, प्रशासनावर मजबूत पकड होती असे २३ मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात होते  दुर्दैवानं आज त्यापैकी केवळ दोघेच गडकरी आणि राजनाथसिंह उरलेत. इतरांना हटविण्यात मोदी-शहा यशस्वी झालेत. गडकरींना संघाचा वरदहस्त आहे तर राजनाथसिंह यांनी अडवाणी यांच्याऐवजी मोदींची प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं असल्यानं या दोघांना मोदी-शहांनी हात लावलेला नाही!"
-------------------------------------------

*रा* ष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित 'द ऑर्गनायझर' या नियतकालिकानं भाजपच्या होणाऱ्या पराभवाचं विश्लेषण केलंय. आगामी काळात पांच राज्याच्या निवडणुका आहेत, त्यात पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी भाजपनं काय करावं याचं मार्गदर्शन केलंय. संघानं भाजपला दिलेली प्रेरणा, सल्ला आणि निर्देश याचं अनुकरण केलं तरच निभाव लागेल! स्थानिक नेतृत्वाला दूर सारून केवळ राष्ट्रीय नेतृत्वाची छबी मिरवल्यानं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. त्यातून अडचणी निर्माण झाल्यात. भाजप, संघ कधीच व्यक्तीसाक्षेप नाही तर मूल्याधिष्ठित कार्यरत असतो. मात्र मोदी-शहांचं महिमामंडन करत तसं व्यक्तीसाक्षेप रूप यायला लागलंय. संघाच्या सदस्य संख्येपेक्षा दहापट भाजपची सदस्य संख्या आहे, त्यामुळं पक्षाला संघाची फारशी गरज नाही, असं मत भाजपचं बनलंय. पण पक्षाचा आत्मा हा संघात असल्यानं तसं घडू शकत नाही! आगामी काळ पक्षासाठी कठीण असल्यानं मित्रपक्षांसह पक्षातून दूर सारलेल्या नेत्यांना गोंजारायला हवंय. स्थानिक नेत्यांचा सन्मान करायला हवाय. असा सल्लाही यात दिलाय! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि हिंदूत्व एवढंच भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी यापुढच्या काळात पुरेसं नाही. त्याला स्थानिक पातळीवरचे खंदे नेतृत्व आणि सुशासनाची जोड असायला हवी, असं परखड विवेचन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या ‘द ऑर्गनायझर’ या नियतकालिकानं केलंय. कर्नाटकातला भाजपचा पराभव हा धक्कादायक नसला तरी अनेकांना आश्चर्यचकित करणारा होता. या पराभवाचं विश्लेषण करताना वेगवेगळी मतं व्यक्त झालीत. मोदींचं नेतृत्व, करिष्मा आणि हिंदुत्व हा भाजपची विचारधारा सांगणारा मुख्य मुद्दा किंवा जमेची बाजू खचितच आहे. पण, त्याला स्थानिक पातळीवरच्या उमद्या नेतृत्वाची आणि जनतेपर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोचविणाऱ्या सुशासन देणाऱ्या नेतृत्वाची जोड असली पाहिजे. मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर कर्नाटकातली ही पहिलीच विधानसभा निवडणूक असेल, की ज्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्याला जनतेपुढं उत्तर देण्याची वेळ भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वावर आली. भाजपनं आपली विचारधारा, केंद्रीय योजनांचे लाभ आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर ही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला खरा, पण काँग्रेसनं ही निवडणूक स्थानिक मुद्द्यांवरच केंद्रित ठेवली आणि विजय संपादन केला, असं यात म्हटलंय. कर्नाटकात मतदान वाढलं, पण भाजपच्या मतांमध्ये आधीच्या निवडणुकांपेक्षा वाढ झालेली नाही. त्यामुळं अधिक जागा मिळू शकल्या नाहीत. नव्या संसद भवनात ‘सेन्गोल’ प्रतिमा, मणिपूर हिंसाचार आणि अन्य मुद्दे हिंदू गटांकडून आणि इतरांकडून निवडणुकीआधी  प्रचारात उपस्थित झाले. मंत्र्यांच्या कारभाराविरोधात जनतेची नाराजी ही भाजपच्या दृष्टीनं चिंतेची बाब होती.

काँग्रेसला कर्नाटक निवडणुकीत अपेक्षेहून अधिक यश मिळाल्यानं २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांचं मनोधैर्य उंचावलंय. मात्र, भाजपला पराभवाचं आणि प्रचाराचं योग्य विश्लेषण आणि चिंतन करण्याची ही वेळ आहे. भविष्यातल्या निवडणुकांमध्ये चुकांची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे, असं लेखात म्हटलंय. 'द ऑर्गनायझरनं' आपल्या लेखात जे काही म्हटलंय त्यातून भाजपनं प्रेरणा, निर्देश आणि सल्ला घेतला तर काही बदल होईल, असं म्हणावं लागेल. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात एक समानता आहे. भाजपचा पराभव झाला हे तर आहेच, शिवाय तिथं भाजपकडं मजबूत स्थानिक नेतृत्वाचा अभाव दिसून आला. या तीनही ठिकाणी राष्ट्रीय नेतृत्व आणि राष्ट्रीय प्रश्नावरच निवडणुका लढवल्या गेल्या; हिंदुत्व हाच मुद्दा तिथं होता. येडीयुरप्पांना बदलून तिथं एस.आर.बोम्मई यांना मुख्यमंत्री म्हणून आणलं. पण ते फारसे चालले नाहीत. हिमाचल प्रदेशातही तशीच स्थिती होती. दिल्ली, ती तर देशाची राजधानी, शिवाय जिथं प्रधानमंत्री असतात, पक्षाचं मध्यवर्ती कार्यालय आहे. सगळी आयुधं वापरण्याच्या सुविधा आहेत. तिथंही भाजपचा पराभव झालाय. या तीनही ठिकाणी स्थानिक नेतृत्वाचा अभाव होता. हा भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. आता पाच राज्याच्या मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड इथल्या निवडणुका आहेत. या सर्व राज्यांत भाजपला याच समस्येशी झुंजावं लागेल. राजस्थानात ते वसुंधरा राजे यांच्यासोबत जाऊ इच्छित नसतील तर, भाजपकडं पर्यायी नेतृत्व तिथं नाहीये, जरी मेघवालांना कायदामंत्री केलं वा धनखडांना उपराष्ट्रपती केलं तरी त्यांचा तेवढा प्रभाव तिथं नाहीये. छत्तीसगडमध्येही स्थानिक नेतृत्व दिसत नाही. मध्यप्रदेशात शिवराजसिंह आहेत, पण ते तिथं २० वर्षाहून अधिक काळ मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं अँटीइन्कमबन्सी निर्माण झालीय ते कितपत चालतील हा ही एक प्रश्नच आहे. तेलंगणात पक्षांकडं मजबूत नेतृत्व नाहीये. मिझोराममध्येही कुणी नाहीये. ह्या सगळ्या ठिकाणी भाजपला काम करावं लागणार आहे. सतत नरेंद्र मोदींना 'इन कॅश' करतानाही एक मर्यादा येते. एक मात्र निश्चित की, यशासाठी स्थानिक नेतृत्व हवंच! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं धोरण पाहता तिथं आधीपासूनच 'व्यक्तिवादी' व्यक्तिसाक्षेप व्यवस्था नाही; तिथं मूल्याधिष्ठित विचारसरणीनं काम चालतं. मात्र ही पहिलीच वेळ आहे की, संघानं गेल्या नऊ वर्षात नरेंद्र मोदींचं व्यक्तीसाक्षेप राजकारण सुरू आहे त्याला कधी आक्षेप नोंदवला नाही. कधीच टीका टिपण्णी केली नाही की, नाराजी दाखवली नाही. कारण संघ-भाजपला तोवर यशाचा फायदेशीर रिझल्ट मिळत होता. आता थोडंसं नुकसान होतंय तर, संघ सांभाळून घेतोय. पण इथं लक्षात घेतलं पाहिजे की, २०१४ मधला संघ आणि २०२३ मधला संघ यात खूप मोठा फरक झालाय. संघाची जी सदस्य संख्या आहे त्याहून दहा पट अधिक भाजपची सदस्य संख्या आहे. त्यामुळं पूर्वीप्रमाणे भाजप संघावर अवलंबून नाहीये. पण भाजपचा आत्मा संघात असल्यानं भाजप संघाला टाळू शकत नाही.
प्रमोद महाजन हे भाजपचे मोठे नेते होते, ते जेव्हा सामनाच्या कार्यालयात आले होते, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की, भाजपमध्ये सर्वोच्च नेते कोण आहेत? अटलबिहारी वाजपेयी की लालकृष्ण अडवाणी? त्यावर त्यांचं उत्तर होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांना नेता मानेल तो भाजपचा सर्वोच्च नेता! त्यामुळं संघानं आजवर मोदींना सर्वोच्च नेता मानलंय. आता मात्र ती स्थिती बदलली जातेय असं दिसतंय. त्यामुळंच नव्या नेतृत्वाचा शोध सुरू झालाय असं म्हटलं जातंय. सध्याचे भाजपचे वरिष्ठ नेते हे स्थानिक नेतृत्वाला जाणूनबुजून दूर ठेवताहेत. पर्यायी नेतृत्व तयार होऊ देत नाहीत. हे संघाच्या लक्षांत आलं नसेल असं नाही. कारण साऱ्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. सतत विश्लेषण करत असतात, कदाचित पक्षनेतृत्वाला याची जाणीवही करून देत असतीलही! पण बाजारात जी बाब चालत असते त्यात सहसा बदल केला जात नाही. समजा स्थानिक नेतृत्वाला दूर ठेऊन एक मध्यवर्ती नेतृत्वाच्या म्हणजेच नरेंद्र मोदींच्या नेतृत्वानं यश मिळत असेल, ताकद वाढत असेल तर, पक्षावर दबाव आणण्यात काय हशील आहे? असं कदाचित संघाला वाटत असावं. संघ देखील सतत आपल्या धोरणात बदल करत असतो. संघाची, भाजपची परिस्थितीनुरूप धोरण, स्टेटर्जी बदलत असते. कर्नाटकच्या निवडणुकीत स्टेटर्जी अलग होती, पूर्वेकडील राज्यांसाठी वेगळी स्टेटर्जी असते. गोवध विरोधात उत्तरप्रदेशात निवडणुका लढतात, पूर्वेकडं, गोव्यात बीफ खाण्याशी धर्माशी जोडत नाहीत. असं असलं तरी संघ आणि भाजपसमोर हा प्रश्न आहेच की, त्यांच्या दुसऱ्या फळीतलं नेतृत्व केवळ कमजोर, कमकुवत बनलंय असं नाही तर ती फळीच गायब होत चाललीय! जोवर सत्तेत आहात तोवर त्याची फारशी जाणीव होत नाही, पण सरकारमधून दूर होत जाताना वा पराभव होऊ लागतो, तेव्हा हे प्रकर्षानं जाणवतं. आज राजस्थानात कुणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या हे त्यांना समजत नाहीये. छत्तीसगडमध्ये त्यांच्याकडं चेहरा नाहीये. हा सतावणारा प्रश्न संघ-भाजप समोर केवळ आताच नाहीये तर २०२४ मध्येही ज्या पाच राज्याच्या निवडणुका होणार आहेत त्यावेळीही हाच प्रश्न उभा ठाकलेला असेल. संघाला ज्याची जाणीव आता झालीय. त्यासाठी संघानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यावर 'देर आये, दुरुस्त आये...!' असंच म्हणावं लागेल. संघानं भाजपला दिलेली प्रेरणा, सल्ला आणि निर्देश यावर भाजप लक्ष देईल तरच त्यांचा निभाव लागेल!

देशावर हुकूमत गाजवणारे शहा आणि मोदी हे दोघंच भाजपच्या राजकीय पटलावर चमकताहेत. पण आजकाल मोदींची वेळ, वक्त थोडाशी गडबडलीय असं दिसतंय! आपण पाहिलं असेल, तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर अपमानास्पदरित्या मोदी सरकारला माघार घ्यावी लागली होती. तेव्हा प्रधानमंत्री मोदी अस्वस्थ होते. शेतीमालाच्या हमीभावासाठी समिती नेमण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यानं दिलं, त्यानंतरच शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागं घेतलं. पण शेतीमालाच्या हमीभावासंदर्भातली समिती अद्याप अस्तित्वात आलेली नाही. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू असं आश्वासन मोदींनी वारंवार दिलं. पण तेही प्रत्यक्षात आलेलं नाही. शेतकरी संघटनांनी पुन्हा एकदा उचल खाल्लीय, त्यांनी आंदोलनाची जुळवाजुळव सुरू केलीय. एका पाठोपाठ एक अशा काही घटना घडताहेत की, ज्या मोदी-शहांसाठी त्रासदायक ठरताहेत. पक्षीय, राजकीय, प्रशासकीय, कार्यपलिका, न्यायपालिका अशा सर्वच स्तरावर अडचणी उभ्या राहताहेत. वादग्रस्त उद्योगपती अदानीबरोबरच्या संबंधांमुळं प्रधानमंत्र्यावर थेट आरोप होताहेत. अदानींच्या उद्योगात शेल कंपन्यांच्या माध्यमातून गुंतवलेले २० हजार कोटी रुपये कुणाचे आहेत? या राहुल गांधींच्या प्रश्नाला अद्याप मोदींनी उत्तर दिलेलं नाही. त्याबाबत मोदी, भाजप वा त्यांच्या सहकाऱ्यांकडून 'ब्र' देखील उच्चारला जात नाही. त्यामुळं संशयाचं वादळ प्रधानमंत्री मोदींभोवती अधिकच घोंघावतंय! अदानी प्रकरण पेटलं असतानाच, काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मालिकांनी पुलवामा हल्ला, ४० जवानांचं वीरमरण, गोवा सरकारचा भ्रष्टाचार, रिलायन्सची ३०० कोटींची लाच, काश्मीरमधलं कलम ३७० हटवणं, विशेष दर्जा रद्द करणं, याला मोदी आणि भाजप सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला होता, तेव्हाही संरक्षणमंत्री राजनाथसिंह, गृहमंत्री अमित शहा, प्रधानमंत्री मोदींनी मौन बाळगलं. मोदींना भ्रष्टाचाराबाबत गांभीर्य नसणं यावरून मालिकांनी वाभाडे काढलेत. यात मोदींनाच नाही तर, राजनाथसिंह, अजित डोवाल, जितेंद्रसिंग, राम माधव यांचं पुरतं वस्त्रहरण त्यांनी केलंय. त्याला अद्याप कुणीही प्रतिवाद केलेला नाही. हे सारं भाजपच्या अंगलट येणारं आहे. अदानी प्रकरणाचा तपास सेबी करतेय त्याला सर्वोच्च न्यायालयानं ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिलीय. हेही प्रकरण मोदी आणि भाजपवर शेकणारं आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर २०२४ समोर येऊन ठाकलंय! देशाचं मत, मन आणि कल संघ आणि भाजपलाही आताशी समजून चुकलंय की, २०२४ ला भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं अवघड आहे. व्यक्त झालेल्या अंदाजानुसार १८० ते २०० जागा निवडून येऊ शकतात. त्यामुळं निवडून येणाऱ्या भाजपच्या सदस्यांचा वजीर शोधण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत. दुसरीकडं आपल्याला पर्याय ठरू शकतील अशा संभावित नेत्यांना हेरून त्यांना उमेदवारीपासूनच वंचित ठेवण्याची खेळी खेळली जातेय. जेणेकरून त्यांचा वजीर बनण्याचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी आरंभलाय. २०१४ मध्ये मोदींच्या तोडीचे वा त्यांच्यातून कांकणभर सरस नेते ज्यांच्याकडं उत्कृष्ट वक्तृत्वशैली होती, शिवाय प्रशासनावर ज्यांची मजबूत पकड होती अशा २३ वरिष्ठ मंत्री मोदींच्या मंत्रिमंडळात होते  दुर्दैवानं आज त्यापैकी केवळ दोघेच नितीन गडकरी आणि राजनाथसिंह उरलेत. इतरांना हटविण्यात मोदी-शहा यशस्वी झालेत. गडकरींना संघाचा वरदहस्त आहे तर राजनाथसिंह यांनी पक्षाध्यक्ष असतांना अडवाणी यांच्याऐवजी नरेंद्र मोदींची प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं असल्यानं या दोघांना मोदी-शहांनी हात लावलेला नाही. मोदींच्या शब्दातला 'ईन्साफका ब्रँड' असलेले सीबीआय, आयटी आणि ईडी ह्या संस्थादेखील भाजपच्या १८०-२०० सदस्यांच्या अवस्थेत मोदींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवणार नाहीत. असं संघाचं जसं मत बनलंय तसंच मोदी-शहांच्या सभोवताली असलेल्या त्यांच्या हुजऱ्यांनाही याची चाहूल लागलीय, पण सीबीआय, आयटी, ईडी याची भीती असल्यानं ते उघडपणे व्यक्त होत नाहीत. नितीन गडकरी यांचं नाव मोदींना पर्याय आणि संघाच्या भाषेत वजीर म्हणून पुढं आलं तर त्यांना अशा हुजऱ्यांची गरजच भासणार नाही. कारण त्यांचा थेट संपर्क तळातल्या कार्यकर्त्यांशी आहे. ते माजी पक्षाध्यक्ष असल्यानं देशभरातल्या भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांपासून विरोधीपक्षातल्या नेत्यांपर्यंत त्याचं वेगळं नातं आहे. त्यांना भाजपच्या समित्यांतून हटवलं गेलं, त्यानंतर उमेदवारीपासून त्यांना वंचित ठेवलं जाईल अशी चर्चा सुरू असतानाच पवारांसारखे ज्येष्ठ नेते गडकरींना भेटतात, तेव्हा लक्षांत येतं की, नक्की काहीतरी गडबड दिसतेय. भाजपला कमी जागा मिळाल्या तर विरोधीपक्षातल्या काहींची मदत घ्यावी लागेल, तेव्हा गडकरी यांची लॉटरी लागू शकते. या नावाव्यतिरिक्त इतर कोणत्याही नावाला विरोधक तशी मदत करणार नाहीत. कधीकाळी राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत देणारे गडकरी आता उत्साहानं सरसावलेत त्यांच्यातली राजकारणातली निराशा दूर झालेली दिसतेय, त्यामुळंच त्यांनी आपला वाढदिवस मोठ्या जोशात साजरा केला. राजकारणात अशाच नेत्यांना यश मिळतं, ज्याचं सर्व पक्षांशी मधुर संबंध असतील. दुर्दैवानं आजच्या मोदी-शहा या भाजप नेतृत्वाचं विरोधकांशी मैत्रीचे नाहीत तर ते शत्रुत्वाचं, वैराचं संबंध आहेत. लोकशाहीत विरोधीपक्षाचं अनन्यसाधारण महत्व असतानाही त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता भाजपत आजवर कोंडलेली वाफ बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झालीय. सत्यपाल मलिक यांचा मोदी सरकारवर आणि व्यक्तिशः मोदींवरचा हल्ला हा जुन्या भाजपच्या निष्ठावान नेत्यांचा आवाज असल्याची चर्चा आहे. त्यामुळं पक्षांतर्गत या आरोपांना विरोध झालेला नाही. किंबहुना त्याचं स्वागतच झालंय. न्यूटनच्या सिद्धांतानुसार जर शहा आणि मोदींनी पक्षातल्या नाराजीची वाफ आणखी कोंडली तर त्याचा स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मात्र निश्चित...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट
राष्ट्रीय स्वयंसेवक ग्लोबल संघ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ३९ देशात नेटवर्क कार्यरत आहे, भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून कार्यरत असलं तरी विदेशात त्याचं 'हिंदू स्वयंसेवक संघ' म्हणून संचालन होतं. त्यासाठी अमेरिका, इंग्लंड आणि मीडल ईस्ट इथं सेंटर्स आहेत.  रमेश सुब्रमण्यम हे या हिंदू स्वयंसेवक संघप्रमुख म्हणून काम पाहतात. १९९६ मध्ये मॉरिशसमधून  संघाच्या विदेशातल्या कामाला प्रारंभ केला गेला. विदेशातल्या संघ स्वयंसेवकांचा गणवेश वेगळा ठेवण्यात आलाय, तो काळी पॅन्ट पांढरा शर्ट असा गणवेश ठरवण्यात आलाय. नेपाळमध्ये दुसऱ्या सर्वाधिक शाखा आहेत, अमेरिकेत १५० तर इंग्लंडमध्ये ९० शाखा कार्यरत आहेत. केनियात जहांजावर शाखा चालविल्या जातात,  विदेशात संघाची घोषणा 'विश्व धर्म की जय हो!' ही आहे.
२०२४ च्या निवडणुकीसाठीच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आलीय, निवडणूकीतल्या यंत्रणा, व्युहरचना कशाप्रकारे असायला हवीय यावर चर्चा झाली. गेल्या ९ वर्षातलं भाजपचं रिपोर्ट कार्ड दाखवलं गेलं, संघाच्या मार्गदर्शनानुसार .२० जून पासून जनसंपर्क सुरू केलीय. अर्धवट अजेंडापूर्ती,
२०१४ साली ६६ मंत्र्यांपैकी ४१ संघ ६२ टक्के,
२०१९ साली ५३ पैकी ३८  ७१ टक्के













Thursday 22 June 2023

भाजपमुक्त देश...!

छत्तीसगड, राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निकालांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचं महत्त्व पूर्वीपेक्षा वाढवलंय. लोकसभेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ मध्ये झाल्या. त्यानंतर प्रत्येक पाच वर्षांन निवडणुका झाल्या असत्या तर, आपण १५ व्या लोकसभेच्या कार्यकाळात असतो. परंतु १९७१ च्या लोकसभा निवडणुकानंतर पाचवेळा लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका झाल्या. लोकसभेच्या निवडणुका हा काही देशापुढचा मुख्य प्रश्न नाहीच. प्रश्न, देशातल्या लोकशाहीच्या अडणीवर भुजंगासारखे वेटोळे घालून वाढत असलेल्या जाती-धर्मवादी कर्मठतेचा आणि ढोंगी लोकशाही प्रेमाचा आहे. १९६७ पासून हे कर्मठपण आणि ढोंग धुमाकूळ घालतेय. ते १९६७ मध्ये डॉ.राम मनोहर लोहिया यांच्या रूपानं अवतरलं. १९७५ ला जयप्रकाश नारायण त्या कर्मठतेचे आणि ढोंगाचे नायक बनले. ते कातडे १९८७ मध्ये व्ही.पी. सिंह यांनी पांघरलं. त्या भूमिकेत १९९६ मध्ये अटलबिहारी वाजपेयी गेले. त्यानंतर १० ते १२ वर्षांचा अवकाश गेला आणि २०१४ नरेंद्र मोदी अवतरले. त्यांचा अवतार असा की, जणू त्यांच्या पूर्वसुरींची सारी प्रभावळच झाकोळली जावी! गुजरात विधानसभेच्या २०१२ च्या निवडणुकीनंतर त्यांचा भारताच्या राजकीय पटलावर जाणीवपूर्वक उदय करण्यात आला. त्यांच्या रा.स्व.संघासारख्या मातृसंघटनेला असं काही प्रॉडक्ट जन्माला घालण्यावाचून दुसरा इलाजच नसावा. गुजरातच्या २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर देशाचं अवघं कॉर्पोरेट विश्व, अभिजन वर्ग, बाजारपेठ आणि ग्राहक आपलं तोंड नरेंद्र मोदी यांच्याकडं करून बसला. मग सिकंदर भारताकडं यावा, अशा वेगात आणि अविर्भावात नरेंद्र मोदी कर्णावतीकडून इंद्रप्रस्थाकडं चालू लागले. २०१९ मध्ये १६ व्या लोकसभेसाठी निवडणूक जाहीर झाली. मतदान झाले. पण प्रस्थापित विश्व आणि मुख्यतः सर्व प्रकारच्या माध्यमांनी असा काही आव आणला की, देशात पहिल्यांदाच अशी काही निवडणूक होतेय. या निवडणुका २०१९ च्या मे महिन्यात झाल्या. भाजपनं ५४५ पैकी ३०२ म्हणजे स्पष्ट बहुमतापेक्षाही जास्त जागा जिंकल्या. पण या ३०२ जागांनी सत्तेच्या माजाचा असा काही बुरखा मोदी आणि पक्षाला दिला की, देशातल्या एकाही पत्रकाराला गेल्या ९ वर्षांत त्याचं स्पष्टीकरण मागण्याची खुली संधी मिळू शकलेली नाही. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला फक्त दोन जागा जिंकता आल्या होत्या. त्यावेळी प्रधानमंत्री राजीव गांधी होते. पण त्यांनी सत्ता कारभारात भाजपच्या 'त्या' दोन खासदारांना गृहीत धरलं होतं. याउलट, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर ४४ जागा आणि २०१९ ला ५४  जिंकलेल्या कॉंग्रेस पक्षाचा नरेंद्र मोदी यांनी करता येईल, तेवढा आणि तितक्यांदा अपमान केलाय. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षानं ५४५ पैकी ४१५ जागा जिंकल्या होत्या. पण सत्ता कारभारात त्यांनी मोदींएवढा उन्माद कधीच केला नाही. पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने ३६४, ३७५ जागा जिंकल्या. इंदिरा गांधी यांनीही चारवेळा अनुक्रमे २८३, ३५२, १५४, ३५३ जागा जिंकल्या. पण त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचं मोदींसारखं सवंग, अहंकारी, ढोंगी प्रदर्शन कधीच केलं नव्हतं. महात्मा गांधीजी यांच्यानंतर, ही संघ परिवाराची एक मेहेरबानीच म्हणायची! भारतात एकमेव असा महापुरुष म्हणजे नरेंद्र मोदीच, अशा आविर्भावात गुजरातच्या २०१२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपनं लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जिंकली. त्यानंतर राज्यांच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या, तामीळनाडू, ओरिसा, पश्चिम बंगाल, केरळ या राज्यांचा अपवाद वगळता जवळपास १५ राज्यांत भाजपचं सरकार आलं. केंद्रातही भाजप सरकार आणि राज्यातही भाजप अशा दुटांगी धोतरात रा.स्व. संघाची चड्डी पँट लपून गेली आणि काँग्रेसमुक्त भारताची घोषणा फिरली. हा दर्प आणि माज साध्या बहुमतानं आला होता. राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला १९८४ मध्ये मिळाल्या तशा, ४१५ जागा भाजपला मिळाल्या असत्या, तर विज्ञानाचे सारे सिद्धान्त उलटे फिरले असते. देशाचा कारभार कॅलेंडराऐवजी पंचागावरच चालवावा लागला असता. पण भारत हा देश फार मोठं शहाणपण आपल्या मनी मानसी बाळगून आहे. या देशानं बुद्ध पाहिला; तसा पुष्यमित्र शुंगही पाहिलाय. बळी अनुभवलाय आणि वामनही वाचलाय. कर्झन वायली, रॉलेट या क्रूरकर्मी ब्रिटिश राज्यकर्त्यांची सत्ता सोसलीय आणि महात्मा गांधीही स्वीकारलेत. या देशानं गरुडाचा विहार पाहिला आणि चिलटांची गुणगुणही सहन केलीय. जिथं चौदा चौकड्यांची राज्यही कडकडा मोडली; तिथं लवचिक घटना असलेल्या आणि बऱ्यापैकी लोकशाही रुजलेल्या देशात अशी व्यक्तिवादी संस्कृती फार दिवस कशी बरं टिकणार ? अशा वातावरणात कर्नाटक हातून गेलं आणि आता पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होताहेत. मी आलो, मी पाहाणार आणि मी जिंकणार असा पायंडा पाडून राज्य करणाऱ्या किंवा तशी सवय लागलेल्या नरेंद्र मोदी यांना या निवडणुकाही आपल्या डाव्या हाताचा मळ वाटत असणार. नरेंद्र मोदी फक्त दिल्लीतच नव्हते. तसंच नरेंद्र मोदी काही फक्त एकच आणि एकमेव नव्हते. ते दिल्लीतल्या सत्तेत होते. पक्षात होते. प्रत्येक राज्याच्या राजधानीत होते. म्हणजे नागपुरात होतेच होते. पण मुंबईत होते. कोल्हापुरात होते. धुळ्यात होते. यत्र-तत्र सर्वत्र होते. त्यांना जिंकण्याचा नादच नव्हे, रोग जडला होता किंवा तसा संसर्ग त्यांनी करून घेतला होता. एखाद्या हुकूमशहाला जसा सर्वकष सत्तेचा हव्यास जडतो आणि त्या नादात तो विरोधीच काय आपल्या विचारधारेचेही किंवा आपल्याच माणसांचे निर्दालन करताना, सारे विधिनिषेध गुंडाळून ठेवतो; तसंच सर्व काही भाजपत चाललं होते. म्हणूनच अडवाणी, जोशी, सिन्हा ज्याप्रमाणे मोडीत निघालेली भांडी ठरली; तशाच व्यक्तिकेंद्रित व्यवस्थेला अडसर ठरण्याऱ्या योजना आयोग, निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, सर्वोच्च न्यायालय यासारख्या घटनात्मक व्यवस्था मोडीत काढण्याचं काम सुरू होतं. अशा वातावरणात पाच राज्यातल्या निवडणुका होताहेत. या पाचपैकी तीन राज्यं भाजपच्या ताब्यात होती किंवा त्यांच्याच अनुयायांच्या एकछत्री अंमलाखाली होती. त्यात उडदामाजी काळे- गोरेही होते. पण त्यांच्या एकूण कामकाजाच्या शैलीचा निष्कर्ष लोकहिताला अपायकारकच होता. स्वातंत्र्यप्राप्तीच्या ७५ वर्षांनंतर प्रथमच भारतीय लोकशाही व्यवस्थेसमोर मोठाच अडथळा निर्माण झाला होता. याची सुरुवात ७ वर्षांपूर्वीच्या नोटाबंदीच्या निर्णयानं झाली. त्यानंतर किंवा मोदी, मल्ल्या, चोक्सी, संदेसरा, अशी फडतूस माणसं अब्जो रुपयांचा चुना लावून विदेशात पळून गेली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीच्या लेखणीचा हात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दाबून धरला जात होता. देशाची बाह्य सुरक्षा असो की आंतरिक सुरक्षा, त्याचाही खेळखंडोबा केला जात होता. देशाचे प्रधानमंत्री मुंबई महापालिकेची निवडणूक असो की, त्रिपुराच्या विधानसभेची; शबरीमाला मंदिर असो की, सरदार पटेलांचा पुतळा; मोबाईल फोनच्या भाषेत बोलायचे तर सतत इवेक्शन मोडमध्ये असायचे. भाषण- भाषण- भाषण ! एकतर्फी बोलणंच. दुसऱ्याचं कधी आणि काहीच ऐकायचं नाही, असा सारा व्यवहार! असं खूप काही संपूर्ण देश सोसत होता. सोसणार होता, सोसतोय. मध्यप्रदेश ही अनेक वर्षांची संघ भूमी. भगवान बुद्धाच्या विशाल तत्त्वज्ञानाची आणि रा.स्व. संघाची. इथंच रा.स्व.संघाच्या विचारांचं पहिलं आणि टिकाऊ राज्य सरकार आस्तित्वात आलं. तिथं नव्या संदर्भात सांगायचं तर, वैदिक संघाचं पतन होऊन लोकशाही मूल्यांच्या बाजूनं जो कौल मिळाला, तो स्वागतार्ह होता. तो भाजपमुक्त देश, हा संदेश देणारा आहे. काँग्रेस पक्ष हा निमित्तमात्र !
हरीश केंची,
९४२२३१०६०९

नितीशकुमारांच्या फार्म्युल्याला संघाची पावती

येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांची तयारी सुरू झालीय. एकूण जागा ५४३ आहेत. आणि हाती अवधी जेमतेम काही महिन्यांचा आहे! 'काँग्रेस' पार्टी आपल्या दुसऱ्या 'भारत जोडो' यात्रेवर निघणार आहे. त्यामुळं ती पुढील काही दिवस रस्त्यावरच राहणार आहे. अरविंद केजरीवाल पंजाबनंतर गुजरात जिंकून 'आम आदमी पार्टी'ला 'राष्ट्रीय' करण्याच्या तयारीला लागले होते, पण त्यात त्यांना यश मिळालं नाही. बाकी प्रादेशिक पक्षही आपआपल्या प्रदेशात सक्रीय झालेत. 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रमुख शरद पवार आणि 'जनता दल युनायटेड'चे प्रमुख आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे मात्र विरोधी पक्षांचं ऐक्य साधण्याच्या प्रयत्नाला लागलेत. पवार यांनी त्यांचा ऐक्याचा 'फॉर्म्युला' अद्याप मांडला नसला तरी नितीशकुमार मात्र आपला 'फॉर्म्युला' घेऊनच बाहेर पडलेत. त्यासाठी ते सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. विशेष म्हणजे, शरद पवार काय किंवा नितीशकुमार काय यांनी आगामी प्रधानमंत्री पदावर किंचितही दावा केलेला नाही. या उभय नेत्यांना केवळ आज 'भाजप' तथा मोदी-शहा ह्यांचं राजकारण पराभूत करून देशात सत्ताबदल घडवून आणायचाय. नितीशकुमार यांचं विरोधी पक्ष ऐक्य आघाडीच 'प्लान' निश्चितपणे वेगळं आहे. त्यांना 'कॉंग्रेस' पक्ष हा राहुल गांधी यांच्याकडं देशाचं नेतृत्व सोपवू इच्छितेय, हे ठाऊक आहे. 'आप'चे केजरीवाल तर देशात 'अश्वमेध' करायला निघालेत प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि 'तृणमूल कॉंग्रेस'च्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी 'खेला होबे'चा आवाज दिलाय ! त्याच वेळी 'आपण कम्युनिस्टांशी कदापि समझोता करणार नाही' असंही जाहीर केलंय. त्या एकीकडं विरोधी पक्षांचा कैवार घेत असल्या तरी अधूनमधून 'संघ-भाजप'ची तळीही उचलताना दिसतात. असंच 'बहुजन समाज पार्टी' च्या मायावतींचं आहे. त्या सातत्यानं मौन पाळून आहेत.

केरळमध्ये 'काँग्रेस' आणि 'कम्युनिस्ट एकत्र येऊ शकत नाही. अशा स्थितीत नितीशकुमार एक वेगळा 'प्लान' घेऊन आलेत. त्याचं स्वागत किती आणि कसं होईल, हे लवकरच जनतेसमोर येईल.

सर्व विरोधी पक्षांना अगदी प्रादेशिक पक्षांसह सर्वांना प्रथमतः एकाच मुद्यावर एकत्र यायचं. तो मुद्दा म्हणजे, कुठल्याही एका पक्षाला धरून आघाडी करायची वा कुणा एकाला भावी प्रधानमंत्रीचा चेहरा म्हणून सादर करायचं हा नसून, 'भाजप'ला हरवणं, मोदी-शहा यांची सत्ता संपवणं हा आहे. या एका मुद्यावर सर्वांना एकत्र यायचंय! 'भाजप' विरोधी 'राष्ट्रीय' वा 'प्रादेशिक पक्ष यांना आपापल्या जागा जिंकायच्या आहेत आणि स्वतःची मतं 'भाजप' विरोधी पक्षात फुटून वाया घालवायची नाहीत.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकांत 'भाजप' विरोधी पक्षांना अनुक्रमे ६७ टक्के व ६३ टक्के अशी मते मिळाली आहेत. म्हणजे 'अच्छे दिन'चा जुमला प्रचार, 'भाजप'नं प्रचारार्थ ओतलेला गडगंज पक्ष निधी, सरकारी यंत्रणांचा यथेच्छ वापर आणि करोडो रुपयांच्या जाहिराती आणि तथाकथित 'राष्ट्रवाद' आदींचा वापर करूनही 'भाजप'ला मागील दोन लोकसभा निवडणुकांत अनुक्रमे ३३ टक्के आणि ३७ टक्के इतकंच मतदान मिळालंय. 'कोरोना' कालानंतर बेरोजगारी आणि महागाई ह्यात कमालीची वाढ झाल्यानं सध्या देशात 'भाजप'च्या 'मोदी सरकार' विरोधात जनमत अधिक तीव्र झालंय. परिणामी, विरोधी पक्षाला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०-७५ टक्क्यांहून अधिक मतं मिळणार आहेत. त्याचं नियोजन आणि विरोधी पक्षांचा समन्वय हे योग्य प्रकारे झाल्यास, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप'ला सत्तेवरून निश्चितपणे खेचता येईल, असं वातावरण देशात आहे.

सरकार स्थापनेची प्रक्रिया ही नंतर सर्वांच्या सहमतीनं आणि पक्षीय बलाबल लक्षात घेऊन ठरवता येऊ शकते. मात्र, 'भाजप'चं 'मोदी-शहा सरकार सत्तेवरून खेचायचं!' हे प्रत्येक पक्षानं आणि त्याच्या उमेदवारानं मनोमनी ठरविलं पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत 'भाजप'च्या प्रलोभनाला बळी पडायचं नाही आणि दहशतीला घाबरायचं नाही, असा त्यांचा निश्चय असला पाहिजे. कोणतीही गुंतागुंत, प्रतिष्ठा, मानपान याचा अडथळा न आल्यास हे ऐक्य साधता येण्यासारखं आहे. त्याचीच संपूर्ण जबाबदारी स्वतः नितीशकुमार घ्यायला सिद्धही झालेत. सर्व पक्ष आपआपल्या परीनं स्वतंत्रपणे आपल्या उमेदवारांची निवड करू शकतात. मात्र, 'भाजप'ला जिंकण्याची संधी द्यायची नाही. मतं फुटू द्यायची नाहीत. समझोता केवळ विरोधी पक्षात आणि त्यांच्यासमवेत करायचा. ५-५० जागांवर समझोता करून दुसऱ्या पक्षाचाच; पण विरोधी पक्षातलाच उमेदवार निवडून आणायचा; शिवाय त्या समझोता करणाऱ्या उमेदवाराला योग्य ते पद देऊन त्याचाही पुढं सन्मान राखायचा असा नितीशकुमार यांचा 'फॉर्म्युला' आहे.

आज 'भाजप' ची मोदी-शहा सत्ता त्यांना मिळालेल्या राक्षसी बहुमताच्या जोरावर त्यांना जे हवं ते करीत आहेत! अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री १९९८ ते ९९ आणि १९९९ ते २००४ दरम्यान असताना 'भाजप आघाडी'चं सरकार असल्यानं तेव्हा त्यांना सहयोगी पक्षांच्या कलानं घ्यावं लागत होतं. आज मात्र बहुमताच्या जोरावर 'भाजप'नं देशात अघोषित आणीबाणीच लागू केलीय. देश विकायलाही काढल्यासारखं; फायदेशीर सरकारी कंपन्या मातीमोल किमतीत उद्योगपती मित्रांना विकल्या जाताहेत आणि कॉर्पोरेट कंपन्यांची अब्जोवधी रुपयांची थकीत बँक कर्जे माफ केली जाताहेत. म्हणूनच देश वाचविण्यासाठी नितीशकुमार 'फॉर्म्युला' पद्धतीनं 'भाजप' विरोधी पक्षांनी एकत्र येणं, ही वर्तमानाची गरज आहे. हेच आता नितीशकुमार 'भाजप'विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा करून हे मुद्दे समजावून देत आहेत. देणार आहेत.

नितीशकुमार यांचा हा 'फॉर्म्युला' आणि त्यांचे प्रयत्न याची कुणकुण लागताच 'रा.स्व.संघानं नरेंद्र मोदी यांना वगळून आपला असा एक प्लान समोर आणलाय. नरेंद्र मोदी यांच्या एकाधिकारशाहीमुळे आज 'भाजप'च्या आघाडीतील बरेच पक्ष एनडीए मधून बाहेर पडलेत आणि ते 'भाजप' विरोधी झालेत. त्या सर्वांना पुन्हा एनडीए मध्ये तर आणायचेच आणि सोबत अन्य छोट्या पक्षांनाही सोबत घ्यायचं, असा प्लान 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' आखत आहे! प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून 'रा.स्व.संघ' आणि त्याची राजकीय शाखा असलेल्या 'भाजप'ला जी राजकीय उद्दिष्टे आणि फायदा साधायचा होता, तो मिळवून झालाय. मात्र मोदी-शहा या जोडगोळीनं रा.स्व.संघ' च्या विचारधारेचा जो विस्तार करायला हवा, त्यासाठी जे एक अनुकूल सामाजिक-सांस्कृतिक वातावरण निर्माण करायला हवं, ज्याची 'रा.स्व.संघा'ला आज नितांत गरज आहे. त्याबाबत फारसं काही केलं नाही.

उलट, 'रा.स्व.संघा'च्या ज्या ३५ संघटना विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यात मग्न होत्या, त्या आणि अन्य सर्वच स्वयंसेवकांना मोदी-शहा यांनी आपल्या निवडणूक कामाला जुंपलं या उलट, 'रा.स्व.संघा'ला 'भाजप'पेक्षा आपला सांस्कृतिक वाढ आणि विस्तार अगत्याचा आहे. त्यासाठी मोदी वजा 'भाजप' असा पूर्वीच्या एनडीए चं पुनर्गठन करून 'रा.स्व. संघा'चा विस्तार करायचा, असा संघ कारभाऱ्यांचा प्लान आहे. त्यामुळं आदित्य योगी, राजनाथ सिंग, नितीन गडकरी हे 'रा.स्व. संघा'नं 'भाजप'मध्ये नियुक्त केलेले नेते पूर्वीसारखे 'चार्ज' होतील.
प. बंगालच्या ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू, तेलंगणाचे के. चंद्रशेखर राव, पंजाबचे सुखवीर बादल, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे अशी एनडीए तून दुरावलेल्या नेत्यांची यादी फार मोठी आहे, ते आज 'भाजप' प्रमाणेच 'रा.स्व.संघा'च्याही विरोधात आहेत. हा दुरावा संघनेतृत्वाला नकोय.

हिजाब, मदरसा, दर्गा मशिदीतलं शिवलिंग, हनुमान चालिसा आदि वादांचं मोदी-शहा यांनी इश्यू करून आपलं राजकारण साधलं. पण त्यात 'रा.स्व.संघा'चं नाव चर्चेला येत, बदनाम होत राहिलं. ते संघ आणि संघपरिवाराला मोठा 'सेटबॅक' देणारं ठरलंय! २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप'चा विजय पक्का असेल तर त्यात रा.स्व.संघाचा विस्तार कुठंय? या प्रश्नानं आज मोदी-शहा सत्तेबाबत 'रा.स्व.संघ परिवारा'त प्रश्नचिन्ह निर्माण केलंय! आणि नसलं तरी ते भासविलं मात्र निश्चितच जाणारंय. कारण नितीशकुमार यांचा ऐक्याचा 'फॉर्म्युला' 'भाजप' विरोधी पक्षांमध्ये 'वर्क आऊट' झाल्यास २०२५ ला रा.स्व संघा' चे 'शताब्दी वर्ष' सरकारी इतमामात कसे साजरे होणार ? यासाठीच मोदी-शहा यांना बाजूला ठेवून 'रा.स्व.संघ' आता जमेल तेवढे विरोधी पक्ष गाठीला बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. ही नितीशकुमार यांच्या 'भाजप' विरोधी ऐक्याच्या विधायक प्रयत्नांना संघानं दिलेली, एक प्रकारे पावतीच म्हणायला हवी!
हरीश केंची
९४२२३१०६०९

मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेची वैधता.. !

शिवसेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं दोन मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या मेळाव्यात मोदी-शहा-फडणवीस-शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपला हवं असलेलं भाषण केलं. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यामुळं शिवसेनेचा वर्धापनदिन हा चिखलफेकीचा ठरला. शिंदे यांनी बंड केल्यानंतर मुख्यमंत्री बनलेल्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला; त्या  घटनेला आता वर्षभराचा कालावधी झाला असेल. त्यांच्या जागी महाराष्ट्राचा कारभार सांभाळायची जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली; त्यालाही आता वर्षभराचा काळ लोटलाय. सत्तेवर आलेलं 'शिंदे सरकार' वैध आहे की अवैध याचा जो काही निवाडा व्हायचा तो झालाय! सरकारचं जीवनमरण हे आता विधानसभा अध्यक्षांच्या हाती आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठी माणसांना न्यायाचा चंद्र दाखवला मात्र निकलाला चूड लावलीय! संजय राऊत यांनी वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात सांगितलं तसं, 'न्यायालयात न्याय दिला जातो पण त्याची अंमलबजावणी इतरांना करावी लागते. जसे न्यायालयानं फाशीची शिक्षा दिली पण त्याची अंमलबजावणी 'जल्लादा'ला करावी लागते!' अगदी तसंच या निकालाचं आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात हे सरकार किती दिवसांसाठी आहे, या प्रश्नाबरोबरच एकनाथ शिंदे या व्यक्तिमत्त्वाची वैधता किती दिवसांसाठी आहे, असा सवाल गांभीर्यानं चर्चिला जातोय. त्याला कारणंही तशीच आहेत. ती कारणं कधी न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान पुढे आलीत, तर कधी 'भाजप'च्या गोटातून किंवा शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार-खासदारांच्या गोटातून पुढं आलीत. चर्चेत असणाऱ्या काही कारणांचा ऊहापोह करण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या स्थानाचं आत्ताचं वास्तव काय आहे, ते समजून घेऊ. शिंदे स्वतः राज्याच्या शक्तिशाली सत्तास्थानावर आहेत. पण ते त्या स्थानावरून आपली शक्ती वापरू शकतात का, हा मोठा प्रश्न नाही. ते मुख्यमंत्री असले तरी 'खरे मुख्यमंत्री' हे त्यांचे सहकारी असणारे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, हे स्पष्ट दिसतंय. आता त्यांच्या राजकीय स्थानाबद्धल बोलू. त्यांनी गेल्यावर्षी जून महिन्यात बंड केलं. त्या दिवसांपासून ते म्हणत आहेत की 'आमचीच 'शिवसेना' खरी आहे!' हा दावा करताना पक्षप्रमुख पद, शिवसेना भवन, मातोश्री, दै. सामना आणि सा. मार्मिक, ठाकरे हे आडनाव या सहा गोष्टी वगळता 'शिवसेना'चं म्हणून जे जे आहे त्यावर दावा ठोकत होते. म्हणजे मुख्यमंत्रीपद घेतले, विधिमंडळ पक्ष ताब्यात घेतला, संसदेतला पक्ष घेतला, संघटनेतील काही पदाधिकारी घेतले आणि संपूर्ण 'शिवसेना' या पक्षावर निवडणूक आयोगाकडं दावा केला. तो त्यांनी मिळवला.
'शिवसेना'ची वार्षिक ऊर्जा असणारा 'दसरा मेळावा' आणि त्यासाठी 'शिवाजी पार्क' या मैदानावरही हक्क सांगितला. यामुळं राजकारणातलं आणि संघटनेतलं त्यांचं स्थान 'तेलगु देसम्' पक्षात बंड केलेल्या चंद्राबाबू नायडू यांच्यासारखंच झालं, असं भासविलं गेलं. पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, ते हळूहळू समोर येतेय. त्यामुळेच तर एकनाथ शिंदे यांच्या व्यक्तिमत्त्वाची, प्रतिमेची वैधता किती, हा प्रश्न चर्चेचा विषय झालाय, याबाबत त्याचं विवेचन महत्त्वाचं आहे किंवा ते आवश्यक आहे. त्यांची 'रिक्षावाला मुख्यमंत्री' झाला, ही सुरुवातीची प्रतिमा काही दिवसही टिकू शकली नाही. कारण रिक्षावाला ज्या परिस्थितीत आणि पद्धतीनं मुख्यमंत्री झाला, हा पहिल्या दिवसापासून वादाचा विषय झाला होता. विशेष म्हणजे, हे बंड करण्यापूर्वी ७ वर्षे ते मंत्री होते. तेव्हा त्यांचं वर्णन 'रिक्षावाला मंत्री झाला,' असं झालं नव्हतं. भाजीवाला, रिक्षावाला, पानपट्टीवाला, नर्स, वॉचमन, टॅक्सी ड्रायव्हर, मास्तर, प्रिन्सिपॉल, पिठाची चक्कीवाले यांना 'शिवसेना'नं नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री करणं हे काही विशेष नाहीच. कारण ती त्या संघटनेची ओळख आहे. "मुख्यमंत्री झाल्यावर करतो, बघतो किंवा 'अ' प्रमाणे कार्यवाही करा," असा अर्जावरचा शेरा मी बंद करणार आणि फोनवरच आदेश देणार, असं काहीतरी सांगणारे शिंदे यांचे 'व्हिडिओ' पुढे आले. पण त्यावर प्रचंड टीका झाल्यावर आणि असे फोनवरचे आदेश अधिकारी मंडळी फाट्यावर मारत असल्यानं तोही एक 'ड्रामा' ठरला! आणि एकनाथ शिंदे 'नायक' सिनेमातल्या अनिल कपूर होता होता राहिले. प्रशासनावर मांड ठोकणाऱ्याला जन्मतःच मुडदूस झाल्याचं चित्र अधिकाऱ्यांपुढं आलं. 'आमचीच खरी शिवसेना' असं सांगणाऱ्या शिंदे यांनी 'येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही २०० जागा जिंकू, असं जाहीर केलं. या '२०० जागा भाजपसहित' असं त्यांना म्हणायचं असावं. पण समजा, जेव्हा केव्हा विधानसभेच्या निवडणुका होतील आणि शिंदे यांचा गट 'भाजप' सोबत निवडणुकीला सामोरा जाईल; तेव्हा ते 'आमचीच खरी शिवसेना' म्हणतात त्या पक्षाला 'भाजप'  विधानसभेच्या १३५ जागा सोडणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर जसजशा निवडणुका येतील, तेव्हा 'नाही, नाही आणि नाही,' असंच येणार आहे. मध्यंतरी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केवळ ५० जागा मिळतील असं जाहीर केल्यानंतर गोंधळ उडाला होता. नंतर सारवासारव केली गेली. पण नुकतंच राज्यातल्या ४८ लोकसभेच्या जागा आणि विधानसभेच्या २८८ जागांवर भाजपनं आपले नेते नेमले आहेत. जवळपास तेच सारे भाजपचे उमेदवार असतील असं सांगितलं गेलंय. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे ज्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात, तिथंच 'भाजप'नं बैठकांचं सत्र सुरू केलंय. मुंबई महापालिकेची निवडणूक लढताना त्यांच्या खऱ्या शिवसेनेला युतीत निम्म्या जागा मिळणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तरही 'नाही' असंच आहे. कारण, 'शिंदे गट' आणि 'मनसे' यांनी युती करावी, असा बूट निघालाय. शिंदे गट जर 'मनसे' बरोबर गेला तर बाळासाहेबांना क्लेश देणारी 'शिवसेना' खरी कशी? त्यामुळं शिंदे यांची वैधता किती काळाची आणि कोणत्या दर्जाची, असा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. येत्या पंधरवड्यात त्यांच्या 'खऱ्या शिवसेना'चा अर्थात 'शिंदे गट, भाजप आणि मनसे' यांचा एकत्रित 'बैठक' होण्याची शक्यता आहे. त्याला सत्ता असल्यानं महत्व असेल. प्रोटोकॉल नुसार, शिंदे मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्याच पुढाकारानं ही बैठक असेल. पण ते प्रतिशिवसेनाप्रमुख'च्या भूमिकेत असणाऱ्या राज ठाकरे यांना रुचतील आणि पटतील का? अर्थातच राज ठाकरे हे असं व्यक्तिमत्त्व आहे की त्यांना जे पटेल आणि रुचेल तेच ते बोलतात, करतात. 'शिवसेना' फुटली याचा ते जरूर लाभ घेतील. पण म्हणून ते मुख्यमंत्रीपदी कोण आहे आणि उपमुख्यमंत्रीपदी कोण आहे, ह्याकडं दुर्लक्ष करून 'ठाकरे' नावाच्या स्वतंत्र आयडेंटिटीचं विघटन होऊ देतील, असं वाटत नाही. मग शिंदे यांची उपुक्ततता काय, असा प्रश्न विद्यमान परिस्थितीत पडतो. त्याचं उत्तर 'भाजप'नं अगोदरच धुंडाळून ठेवलंय. त्यांना 'शिवसेना' कमजोर करायची होती. तसा प्रयत्न त्यांनी सत्तेच्या समीकरणात करून दाखविलाय. वरवर संघटनाही कमजोर केलीय. पण ते करून त्यांना साध्याकडं जायचंय. म्हणजे काहीही करून देशाची सत्ता परत मिळवायचीय. 'भाजप'ला केंद्रात सत्ता देण्यात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्याचा वाटा मोठ्ठा होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत 'भाजप-शिवसेना युती' चे ४२ खासदार निवडून आले होते. त्यात 'भाजप'चे २३ खासदार होते. तोच आकडा २०२४ मध्ये गाठणं शक्य नसलं तरी जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. शिंदे गटात राज्यातले बारा खासदार आहेत. त्यांना पुन्हा निवडून आणण, हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यासाठी त्यांना आज शिंदे महत्त्वाचे आहेत, त्यासाठी राज ठाकरेही महत्त्वाचे आहेत. 'शिंदे-फडणवीस सरकार'च्या वैधतेचा सुप्रीम कोर्टात निकाल लागलाय, ते पडेल कधी हे लवकरच कळेल. तोपर्यंत 'भाजप'ला शिंदे हवेत. मुंबई महापालिका मिळविण्याच्या प्रयत्नातही शिंदे 'भाजप'ला हवेत. शिवसेनेला रस्त्यावरच्या लढाईत व्यग्र ठेवून उद्धव ठाकरे यांचा शक्तिपात करण्यासाठीही 'भाजप'ला शिंदे हवेत. 'शिवसेना'चे 'धनुष्यबाण' हिसकावून घेतलं त्यासाठी 'भाजप'ला शिंदे हवेत. थोडक्यात, 'भाजप'ला शिंदे त्यांच्या कथित खऱ्या शिवसेनेसोबत दीर्घ काळासाठी उपयोगाचे नाहीत, हे 'रा. स्व. संघ-भाजप' च्या 'थिंक टँक'ला माहीत आहेत. त्यांना शिंदेंचा उपयोग २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करून घ्यायचाय. मध्यंतरी शिंदे गटाशिवायसुद्धा आम्ही 'अपक्ष आणि भाजप' असं सरकार बनवू शकतो, असा दावा माजी मंत्री बच्चू कडू यांनी केला होता. त्यावरून शिंदे यांची 'वैधता' किती, या प्रश्नाचं उत्तर मिळतं. शिवाय अजित पवार आणि राष्ट्रवादीचा पर्याय भाजपकडं होता. पण ते सारं फिसकटलं. केवळ एक आमदार असणाऱ्या राज ठाकरे यांच्या घरी 'भाजप' नेत्यांच्या वाढत्या येरझारा शिंदेंच्या 'वैधते'च्या शंकेवर शिक्कामोर्तब करतं. उजव्या विचारसरणीच्या सत्तेत असणाऱ्या ज्यांनी ज्यांनी बंड केलं, त्या शंकरसिंह वाघेला, कल्याणसिंह, येडीयुरप्पा, उमा भारती यांचं पुढं काय झालं, ते आठवा. त्यांना त्याच प्रवाहात समाविष्ट व्हावं लागलं किंवा केशुभाई पटेल व्हावं लागलं. शिंदे यांचं काय होणार, हे सर्वोच्च न्यायालयानं ठरवंलच आहे! पण आजच्या घडीला एकनाथ शिंदे यांचा 'संघ-भाजप'ला काय उपयोग आहे आणि भावी काळात त्यांचं काय स्थान असणार आहे, हे स्पष्ट झालंय. हे शिंदे आणि त्यांच्या ४० आमदारांच्या लक्षात येईल तेव्हा येईल! तोपर्यंत चालू द्या दहीहंडी, अख्खे दहा दिवस गणपती दर्शन, प्रभादेवीसारखे राडे, बंडाचं उदात्तीकरण करणारी भाषणे! या सगळ्यात जर उद्धव ठाकरे यांना दिवसेंदिवस लोकांची सहानुभूती वाढत चालली तर शिंदे यांच्या 'वैधते'ची मर्यादा अगदी अलीकडंही येऊ शकते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ अगोदर घेतली  ? का देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेचे अंधारात आघाडीचा धर्म  सोडून शिवसेनेला अगदी एकनाथ शिंदे सहीत सर्वानाच आश्चर्याचा धक्का उर्फ टांग लावून मुख्यमंत्रीपदाची शपथ अगोदर घेतली ?  मग निश्चित समजेल की नक्की गद्दारी कोणी केली ? ठाकरेंनी खाल्लं तर शेण आणी फडणीसांनी खाल्लं तर श्रावणी !!! ऐसा कैसा चलेगा देवा ! १९८० साली भाजपाची स्थापना झाली त्या वर्षी विधानसभेचे निवडणूकीत बाळासाहेब ठाकरे यांनी केवळ काँग्रेसला पाठिंबाच दिला नव्हता तर काँग्रेस चे उमेदवारांचा प्रचारही केला होता  पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेस चे उमेदवार श्रीधर माडगूळकर यांचे कोथरूड येथील जाहीर सभेत आदरणीय बाळासाहेब ठाकरे प्रमुख वक्ते होते मी त्याचा साक्षीदार आहे त्यावर्षी देवा तुम्ही फक्त दहाच वर्षे वयाचे होतात राजकारण समजण्याचे आणी कळण्याचे तुमचे वयही नव्हते गंगाधरपंतांना कारावास भोगावा लागला त्या आणीबाणीला  बाळासाहेब ठाकरे यानी पाठींबा दिला होता तरीही सत्तेसाठी महाजन आणी मुंढे शिवसेनेबरोबर युती केली मा. प्रतिभाताई पाटील  यांना काँग्रेस चे उमेदवार असूनदेखील राष्ट्रपती पदा साठी मराठी म्हणून शिवसेनेने मतदान केले आहे तुमचे बरोबर युती असतानाही ! राष्ट्रवादीकडून सुप्रियाताई सुळे राज्यसभेतील निवडणूकीत उमेदवार असतांना बाळासाहेब ठाकरे यांनी कौटुंबिक संबंधाला अधिक महत्त्व देऊन राष्ट्रवादीला पाठींबा दिला होता ! आपण २०१४ मध्ये मुख्यमंत्रीपद मिळवले तेंव्हांही शिवसेना तुमचे बरोबर नव्हती राष्ट्रवादी कॉंग्रेस ने बाहेरून पाठींबा दिला होता तेंव्हा तुमचे प्रखर हिंदुत्व कोणत्या बासनात गुंडाळून ठेवले होते आजचे तुमचे पाठिंब्यामुळेच झालेले मुख्यमंत्री तेंव्हा विरोधीपक्षनेते होते राजकारणात भाष्य करतांना गृहपाठ करून विधाने करावीत पब्लिक मेमरी एवढी पण कमजोर नसते देवा !!!

Saturday 17 June 2023

सावरकर, गांधी आणि गोडसे.. !

"विदेशात गांधींच्या प्रतिमेपुढं झुकणारे नेते, देशात गांधी-नेहरुंची निर्भत्सना तर गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करतात. खासदार प्रज्ञासिंग, सुधांशु रॉय, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी गोडसेला भारताचा 'सुपुत्र' म्हटलंय. तर पुरीच्या शंकराचार्यांनी गोडसेला आदरार्थी  संबोधलंय. मुंबईत यांच्याच वकीलानं गोडसेची तसबीर महापुरुषांसोबत ठेवून त्याला त्यांच्या रांगेत बसवलं. राष्ट्रपिता गांधींची हत्या करणाऱ्यांचं महिमामंडन सुरू असतानाच तिकडं केंद्र सरकारनं इतिहासाच्या नव्या पाठ्यपुस्तकातून मोगलांसोबत गांधींनाही हटवलंय. पण मोगलांशिवाय महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं गुणगान होणार तरी कसं? गांधींशिवाय भारत ही कल्पनाच आपण करू शकत नाही. इतिहास, स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गांधींना हटवू पाहणारे स्वतः संपून जातील. मात्र जगभरातल्या लोकांच्या मनातल्या गांधींच्या प्रतिमेला कुठंच धक्का लागणार नाही!"
------------------------------------

*नु* कतंच एनसीआरटी या शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवण्याच्या सरकारी मंडळानं इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो नवा अभ्यासक्रम तयार केलाय त्यातून मोगलांचा इतिहास काढून टाकलाय; तसाच गांधीहत्येचा इतिहासही हटवलाय, मिटवलाय. त्याच्याविरोधात या मंडळावरील सदस्य सुहास पळशीकर, योगेंद्र यादव आणि इतर काहींनी आपलं नांव या पुस्तकांच्या श्रेयनामावलीतून काढून टाकावं असं नुकतंच कळवलंय. 'आम्ही जो अभ्यासक्रम तयार केला होता तो आता बदलला गेलाय त्यामुळं त्यात आमचं नांव असू नये!' असं त्यांचं म्हणणं आहे. यावर देशभरात चर्चा सुरू असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री गिरीराज सिंह यांनी गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला 'भारताचा सुपुत्र' असं गौरवलंय. त्यावरून वादंग निर्माण झालाय. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झालीय. पण मला वाटतं अशाप्रकारचं वक्तव्य करून त्यांनी मोदींच्या 'गुडफेथ'मध्ये खास मर्जीत जाण्याचा प्रयत्न केलाय. मोदींच्या दृष्टीमध्ये ते आणखी वरच्या पातळीवर गेले आहेत. यांच्याशिवाय यापुर्वी अनेकांनी गांधींची निर्भत्सना आणि गोडसेचं कौतुक केलंय. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग खरं तर त्यांना साध्वी म्हणणं उचित होणार नाही. त्या, गिरीराज सिंह, सुधांशु त्रिवेदी, पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य निश्चलयानंद सरस्वती यांनीही गोडसेचं वाखाणणी केलीय. शंकराचार्यांनी म्हटलंय की, 'गोडसे व्यथित होते...!' त्यांनी गोडसेला होता असं म्हटलं नाही तर 'होते' असं आदरार्थी संबोधलंय, या अत्यंत सन्मानजनक संबोधनाबरोबरच त्यांनी म्हटलंय की, 'गोडसे हे व्यथित होते, त्यांच्यामते गांधी जिवंत राहणं हे देशासाठी घातक ठरलं असतं म्हणून त्यांनी गांधींना संपवलं...! शंकराचार्य यांच्यासारख्या धर्मपीठावरचे लोक एका खुन्याची, हत्याऱ्याची बाजू घेताहेत. त्याबाबत असाही तर्क देताहेत की, ते खूप व्यथित होते म्हणून त्यांनी हत्या केली गेली. नुकतंच मुंबईत सदावर्ते नामक वकीलानं जो स्वतःला एसटी कामगारांचा नेता म्हणवतो, त्यानं महापुरुषांच्या शेजारी गोडसेची तसबीर लावून त्याची पूजा केली होती. त्यावेळी त्यानंही गांधींवर, त्यांच्या विचारांवर टीका केलीय. थोडंसं मागं वळून पाहिलं तर लक्षांत येईल की, संघ परिवार, त्यांच्याशी संबंधित विविध संस्था, लोक, सत्ताधारी, पदाधिकारी त्यांचं सोशल मीडिया अकौंटन्स, त्यांचा आयटी सेल, त्यांचं व्हाट्सएप विश्वविद्यालय हे सारे सतत विविध माध्यमातून असं बिंबवण्याचा प्रयत्न करतात की, गोडसेला वाटत होतं, गांधीजी हेच देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत; म्हणून त्यानं गांधींची हत्या केली. पण ते हे विसरतात की, गोडसे ज्याचा शिष्य होता, त्या सावरकरांनीच द्विराष्ट्रवादाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. १९३७ मध्ये हिंदू महासभेच्या अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. त्यावेळी सावरकरांनी म्हटलं होतं की, 'भारतात दोन राष्ट्रं राहतात. हिंदू आणि मुस्लिम! ते दोघे कधीच एकत्र राहू शकत नाहीत!' त्याही आधी १९२३ मध्ये आपल्या 'हिंदुत्व' या पुस्तकात सावरकरांनी हेच म्हटलं होतं. त्यानंतर १९३८ ला हिंदू महासभेच्या नागपूर अधिवेशनात पुन्हा हेच प्रतिपादन करण्यात आलं. जेव्हा देश स्वातंत्र्यासाठीचा लढा देत होता, तेव्हा महात्मा गांधी लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावं यासाठी आवाहन करत होते.  त्याचवेळी सावरकर, जे गोडसेचे आदर्श होते, ते सावरकर हिंदू युवकांना १९४१-४२ मध्ये सैन्यात भरती होण्याचं आवाहन करत होते. 'एक मिनिटही वाया न घालवता तरुणांनी ब्रिटिश सेनेत भरती व्हायला हवंय...!' हे सावरकरांचे शब्द आहेत. इंग्रजांना मदत करण्यासाठी सावरकरांनी देशभर एक अभियान चालवलं होतं. त्यांनी ठिकठिकाणी 'सैन्य परिषद' भरवली होती,
१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तसंच हिंदू महासभेचं स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान नाहीये. सावरकर अंदमानातून परतल्यानंतर एक साधा दगड देखील ब्रिटिशांच्या दिशेनं भिरकवलेला नाही. कोणत्याही इंग्रजावर त्यांनी कसलंही आक्रमण केलेलं नाही. ब्रिटिशाविरोधात कोणतंही आंदोलन उभं केलेलं नाही. गोडसेनं गांधींची हत्या करताना फाळणीला गांधींना जबाबदार धरून केली, असं  म्हटलंय;  मग त्या फाळणीला उत्तरदायी असलेल्या बॅरिस्टर जीनांची हत्या गोडसेनं का नाही केली? त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या नाहीत? संघ परिवार हा असा प्रश्न कधी विचारत नाही. गोडसेनं त्या गांधींवर गोळ्या झाडल्या जे हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते. जे भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या दोन्ही देशातल्या अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे होते. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक होते, तिथं त्यांच्यावर अत्याचार होत होते म्हणून त्यांच्या बाजूनं गांधी उभे होते. तर भारतात मुस्लिमांवर अन्याय होत होता, म्हणून गांधी त्यांच्या बाजूनं उभे होते. संघ परिवार, कालांतरानं राजकीय पक्ष म्हणून पुढं आलेल्या जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संबंधित इतर संस्था-संघटना या सर्वांची हीच मोठी अडचण आहे की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला यांच्याकडं आपला कुणी असा नेता, नायक नाहीये. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस वा गांधी या महानायकांवर आपला शिक्का उमटवू पाहात आहेत. गांधींच्या प्रतिमेसमोर ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबरला प्रधानमंत्री ९० अंशात झुकून गांधींना प्रणाम करतात. हिरोशिमात गेले तेव्हा मानवतेच्या इतिहासात, सर्वाधिक संहाराचं स्मारक असलेल्या हिरोशिमात अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींच्या पुतळ्याचं अनावरण तिथं प्रधानमंत्री मोदी करतात. परतल्यानंतर मात्र त्यांचं तंत्र गांधींच्या हत्याऱ्याच्या बाजूचं असतं, गांधींच्या विचारांची हत्या करण्याऱ्याच्या पाठीशी असतं. त्यांचा सारा समुदाय, त्यांच्या विचारांशी निगडित असलेला भक्तगण गांधींच्या प्रतिमेची, विचारांची हत्या करतोय. यावर मात्र ते मौन बाळगून असतात.

लेखक पी.सी.जैन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी जगातल्या ज्या ज्या देशानं गांधींच्या जीवनावर आधारित पोस्टाची तिकिटं, स्टॅम्पस, नाणी प्रसिद्ध केलीत, अशा सर्व देशांची नावं, ते स्टॅम्पस, ती तिकिटं, त्या नाणी त्या पुस्तकात आहेत. त्यात अशा देशांची नावं आहेत की, ज्यांची नावं आपण कधी ऐकलेली नाहीत. अगदी छोट्या छोट्या सीआरा, लेओन या सारख्या देशांनी आपल्या राष्ट्रपित्यावर हे स्टॅम्पस, पोस्टाची तिकिटं, नाणी जारी केली आहेत. गांधींचा विचार तिथपर्यंत पोहोचलाय. गांधी तर उभे ठाकलेत लंडनमध्ये थेट ब्रिटिश संसदेसमोर! मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर हे ९ वी, १०वी शिकत असताना त्यांनी गांधींवर निबंध लिहीत होते. त्यांनी जेव्हा वंशवादाच्या विरोधात पदयात्रा काढली, त्यावेळी त्यांचा आदर्श गांधी हेच होते. अशा गांधींना आपली ही मंडळी मिटवू पाहत असतील तर लक्षांत ठेवा, गांधींना संपवणारे ते सारे स्वतः संपतील पण गांधींचं नांव मात्र अमर राहील, त्याला कुणीच, कुठलीही सत्ता धक्का लावू शकणार नाही!

मुझफ्फर रझमी यांचा हा शेर आहे,
इस राज को क्या जाने, साहिल की तमाशाई
हम डूब के समझे हैं, दरीयां तेरी गेहराई
ये जब्र भी देखा हैं, तारिख की नजरोंने
लम्हो ने खता की थी, सदीयो ने सजा पाई ll
ही जी 'साहिल की तमाशाई' आहे ना, ही स्वातंत्र्यलढ्यातही साहिलवर - काठांवर बसलेली होती. म्हणून त्यांना 'दरीयो की गेहराई' माहीत नाही. यांना ना स्वातंत्र्यलढ्यातला संघर्ष माहीत आहे, ना गांधींचं योगदान माहीतीये! यांचा संपूर्ण इतिहास खऱ्या महानायकांना नाकारण्याचाच आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा ही मंडळी इंग्रजांच्या बाजूनं उभे होते. देश स्वतंत्र झाला अन गांधींची हत्या केली गेली. आजही गांधींच्या विचारांची हत्या करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर हे मात्र त्याला अपवाद  आहेत. कोण आहेत ते लोक जे त्यादिवशी 'नथुराम गोडसे अमर रहे!' असा ट्रेंड ट्विटरवर चालवतात. त्यांचे ट्विटर हँडल, फेसबुक पेज प्रोफाइल पाहिलं तर लक्षांत येईल की, ही सारी मंडळी एकाच विचारधारेशी, विचारसमूहाशी जोडलेले दिसतील. जे या देशाला हिंदुराष्ट्र बनवू पाहताहेत. गांधी त्यावेळीही आणि आताही त्यांच्या त्या स्वप्नांच्या आड उभे आहेत. त्यांनी ना त्यावेळेला त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना आज होऊ देत नाहीत. त्यांचं अडचण हीच आहे की, त्यांच्याकडं लोकमान्य नेतृत्व, आदर्श नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लिहिला जातो तेव्हा यांचा कुणी महानायक यात असत नाही. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्माणाच्या ७० वर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा १९४७ पासून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, मनमोहनसिंग एवढंच नाही तर त्यांच्या आपल्या विचारधारेच्या अटलबिहारी वाजपेयींचं नांवही इतिहासातून काढून टाकतील. पण जेव्हा ह्या कालखंडाचा इतिहास लिहायला लागेल तेव्हा गांधींच्या रूपातले नेहरू जे १७ वर्षे प्रधानमंत्री होते. सर्वसमावेशक विचारांचे अटलबिहारी वाजपेयी यांचाही इतिहास पुसला जातोय. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातल्या इतिहासात येणाऱ्या पिढीला बरबाद करण्यासाठी पाठ्यक्रम बदलला जातोय. त्यातून गांधींना हद्दपार केलं जातंय. मिटवलं का जातंय तर, गांधी हे हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. त्यामुळं कट्टरपंथीयांनी गांधींची हत्या केली. यांना हे पुसून टाकायचं आहे, कारण यांना हिंदू-मुस्लिम एकता नकोय. मग पुस्तकातून हे का लिहायला हवंय की, गांधी हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. दुसरा उल्लेख काढून टाकण्यात आलाय की, गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. या सत्यतेला तुम्ही जगातल्या कोणकोणत्या पुस्तकातून हटवणार आहात? आज सोशल मीडियाच्या, इंटरनेटच्या जमान्यात हे तुम्ही कुठे कुठे इरेज करणार, डिलीट  करणार? ही सत्यता कशी हटवाल? गोडसे हा पुण्यातला एक ब्राह्मण होता हे हटवलं गेलंय. कारण यामागे ब्राह्मणवादी विचारसरणी आहे, हिंदुराष्ट्राचं मूळ केवळ जोशी, कुलकर्णी, शर्मा, पाठक, तिवारी नाही तर ब्राह्मणवादी व्यवस्थेतून हे प्रेरित झालेलं आहे. जो मार्ग मनुवादाकडं घेऊन जातो. मनुस्मृतीवादी व्यवस्थेला लागू करतो. संघाचा मूळ विचार जो होता त्यात त्यांनी संविधानाला स्वीकारलं नव्हतं. राष्ट्रध्वज तिरंग्याला स्वीकारलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता. याबाबतचे सारे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.

गांधीहत्येसंदर्भात गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं पुस्तक एक आहे 'लेटस किल गांधी', 'गांधीहत्या षडयंत्र और हत्यारे'! सत्ताधारी नेतेमंडळी ज्या व्यक्तीची गांधींच्या जागी प्रस्थापित करू इच्छितात ते आहेत विनायक दामोदर सावरकर! आपणच 'मराठा' या टोपण नावानं लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वतःला 'वीर' असं संबोधलंय. तुषार गांधीं त्यांच्या त्या पुस्तकातल्या पान क्र. ६५ वर लिहितात, 'मुंबईत दादर भागात हिंदू महासभेचे सर्वोच्च नेते विनायक दामोदर सावरकर यांचं घर होतं. ही व्यक्ती जिनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये गांधींविषयी घृणा भरवली होती. गांधींची हत्या करण्याची, त्यांना मारण्याचे अनेक असफल प्रयत्न जे पुण्याचे ब्राह्मण आपटे-गोडसे गटानं केले होते, ते सारे सावरकर द्वारा समर्थन दिलेले होते...!' गांधींची हत्या ज्या पिस्तूलानं केली होती ते ग्वाल्हेरमधून पुरवलं गेलं होतं. असाही उल्लेख त्या पुस्तकात आहे. गोडसे गांधींची हत्या करण्यापूर्वी सावरकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. अशोककुमार पांडे यांचं पुस्तक आहे, 'उसने गांधीको क्यों मारा?' यात 'कपूर आयोग और सावरकर' असं एक प्रकरण आहे. त्यात पांडे म्हणतात, १४ जानेवारीला आपटे आणि गोडसे सावरकरांना भेटण्यासाठी सावरकरांच्या निवासस्थानी गेले होते. जेव्हा खटला सुरू होता, तेव्हा सावरकरांनी म्हटलंय, ते लिहितात, 'मी त्या दोघांना ओळखतो, कदाचित १४ जानेवारीला आपटे-गोडसे सावरकर सदन इथं आले असतील, पण ते मला भेटले नाहीत. तळमजल्यावर इतर कुणी राहत होते त्यांना भेटून ते गेले असावेत..!' कपूर आयोगाचा तो अहवाल गांधीहत्येचा खटला संपल्यानंतर, गोडसेला फाशी दिल्यानंतर प्रकाशित झाला होता. यात गांधीहत्येच्या संशयाची सुई सावरकरांकडं दाखविलीय. आपल्या देशातच नाही तर जगभरात विविध भाषेत गांधींवर लिहिलेली शेकडो नव्हे हजारो पुस्तकं आहेत. लुई फिशर, व्हिन्सेंट सीन, आणि इतरांनी गांधींची चरित्रे लिहिली आहेत. तुम्ही हे सारं कुठं आणि कसं मिटवणार आहात? प्रभू येशू ख्रिस्तानंतर जगात मानवतेच्या इतिहासात जर कुणावर सर्वाधिक लिहिलं गेलं असेल तर त्यांचं नांव आहे, मोहनदास करमचंद गांधी! गांधींची हत्या करणारे इंग्रज नव्हते. गांधींची हत्या करणारे आमचेच आपले होते. या स्वतंत्र भारताचा एक नागरिक होता, नथुराम गोडसे! त्यामुळं लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीहत्येनंतर म्हटलं होतं, 'ब्रिटिशांची सत्ता असेपर्यंत हे असं घडलं नाही, त्या कलंकापासून आम्ही इंग्रज वाचलो. कारण गांधींची हत्या तुमच्याच भूमीत, तुमच्याच लोकांकडून, तुमच्याच राज्यात झालीय. कुणी इतकं कृतघ्न कसे काय होऊ शकतात की, आपल्या पितातुल्य मार्गदर्शकाची छाती गोळ्यांनी भेदून टाकतात. असं मानवभक्षी टोळ्यांमध्येही होत नाही...!' यावर आपण काय बोलणार? अशा गांधींना पाठ्यक्रमातून हटवण्याचा जर ते विचार करत असतील की, त्यात ते यशस्वी होतील हा त्यांचा गैरसमज आहे. गांधी विश्वमानव होते. ते जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात विसावलेले आहेत. एनसीआरटी चे प्रमुख, देशाचे प्रमुख जेव्हा जगात कुठं जातात तेव्हा तिथं गांधीजी काठी घेऊन शहराच्या प्रमुख चौकात अगदी लंडनच्या संसद भवनासमोरही उभे ठाकलेले त्यांना दिसतात. तिथं जाऊन ते चुकूनही सांगत नाहीत की, आम्ही गोळवलकरांच्या, हेडगेवारांच्या एवढंच नाही तर कधीच सांगत नाहीत की, ते सावरकरांच्या देशातून आलो आहोत. ते सांगतात आम्ही गांधींच्या देशातून आलोय. तिथं जाऊन गांधींच्या प्रतिमेपुढं ९० अंशात वाकून प्रणाम करतात आणि इथं येऊन पाठ्यपुस्तकातून गांधींचं नांव हटवू पाहतात! शेवटी एवढंच सांगतो की, जर्मन तत्वज्ञ डाशनिक हिगेल यांचं एक कोटेशन आहे की, 'इतिहासाची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की, इतिहासातून कुणी काहीच शिकत नाही...!' संघ परिवार आणि सत्तेत बसलेले लोक इतिहासातून काहीच शिकू इच्छित नाहीत. मोगलांना हटवूनही भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही  मोगलांशिवाय महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं गुणगान कसं करता येईल? हल्दीघाटीचा संग्राम कसा सांगाल? आपल्या गमिनीकाव्यानं मोगलांना पळताभुई थोडी केली होती, हे नव्या पिढीला कसं सांगाल? मोगलांशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. तर गांधींशिवाय भारताची कल्पनाच करू शकत नाही. इतिहासातच नाही तर, देशाचा स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मी निश्चिन्त आहे की, गांधींना हटविण्याचा, मिटवण्याचा, पुसून टाकण्याचा प्रयत्न जे करताहेत ते स्वतः संपून जातील. मात्र गांधींच्या प्रतिमेला कुठं काहीच धक्का लागणार नाही, हे निश्चित!
ज्या बंदुकीनं गांधीना मारलं,त्याच बंदुकीनं गांधी करण्याचं
सनातनी समीकरण घेऊन, नथुराम फिरतोय भारतभर
कि जिथं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
प्रत्येक गांधी मरतानाही पेरतोय, अहिंसेच तत्व
बंधुकधारी नथुरामच्या डोक्यात....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 10 June 2023

रेल्वे अपघाताचं रुदन.....!

"वंदेभारतचा बोलबाला करणाऱ्या रेल्वे प्रशासनाचा कारभार भोंगळ बनलाय. लाईफ लाईन असलेल्या रेल्वेतून दररोज २.५ कोटी लोक प्रवास करतात. १ लाख कि.मी.हून अधिक ट्रॅक, १८ हजारहून अधिक गाड्या, ८ हजाराहून अधिक स्टेशन्स आहेत. ट्रॅक, सिग्नलच्या देखभालीची अनास्था आहे. खिळखिळीत झालेल्या ट्रॅकवर ५०-६० वेगानं गाड्या धावू शकत नाहीत मग उगाचच बुलेट ट्रेनची स्वप्नं का दाखविली जाताहेत? इथं सेवकांच्या ३ लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. सुरक्षा कवचासाठी तरतुदीतला एक पैसाही खर्च झालेला नाही. तो इथं झाला असता तर दुर्घटना टळली असती. मीडिया मंत्री कसे तिथं लक्ष ठेवून आहेत, ते कसे राबताहेत हेच दाखवत होते. लोक आपल्या नातेवाईकांना शोधत होते, त्यांचं सामान अस्ताव्यस्त झालं होतं, रुग्णालयातलं जखमींचं कण्हणं हे त्यांना दिसतच नव्हतं. मंत्री वंदे मातरम, भारतमाता की जय घोषणा देताहेत. राष्ट्रवादाच्या आपलं मागे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. कोट्यवधी प्रवाशांच्या जीवांशी खेळणाऱ्या रेल्वे प्रशासनाला जाब कोण विचारणार? सामान्यांच्या जीवाला काहीच किंमत नाही का? सारंच रामभरोसे सुरू आहे.!"
---------------------------------------

*ओ* रिसातल्या बालासोरला रेल्वेचा एक विचित्र अपघात झालाय. दोन प्रवासी गाड्या अन एक मालगाडी अशा तीन गाड्यांची टक्कर झालीय. यात तीनशेहून अधिक प्रवासी मृत्युमुखी तर हजाराहून अधिक जखमी झालेत. रेल्वेमंत्र्यांनी गुन्हेगार सापडल्याचं सांगितलंय. प्रधानमंत्र्यानं जाहीर केलंय की, गुन्हेगारांची गय केली जाणार नाही. पण गुन्हेगार दुसरं तिसरं कुणीही नाही तर ते सरकारचं आहे. सरकारी धोरणं, सरकारचे निर्णय, सरकारचं दुर्लक्ष हेच या अपघातात कारणीभूत आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. एक नाही तर पाच पाच अहवाल रेल्वे सुरक्षा विभागानं सरकारला दिली असताना त्याकडं दुर्लक्ष केलं गेलं. अशावेळी सरकार जबाबदार नाही असं कसं म्हणता येईल. आज सांगितलं जातंय की, २८८ जण मृत्युमुखी पडलेत, पण तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार त्याहून कितीतरी अधिक लोक गेले असावेत. जखमींची तर गणना सांगितली जातेय तीही कमी आहे. हा केवळ एक अपघातच नाही तर मानवीय संवेदनाचाही घात आहे! आता रेल्वे रुळावर आलीय. ज्याचे नातेवाईक गायब झालेत त्यांचा ते शोध घेताहेत. अपंगांची सेवासुश्रुषा सुरू आहे. जखमी इस्पितळात उपचार घेताहेत. दुर्घटनेला आठवडा उलटलाय, आता विचारायला हवंय की, एवढी भयानक दुर्घटना कशी घडली? का घडली? याला कोण जबाबदार आहेत? काही दिवसांपूर्वीपर्यंत रेल्वेचा डंका वाजवला जात होता. गुणगान गाईलं जात होतं. पहा, आता रेल्वेचा प्रवास किती सुखदायी, किती आनंददायी जाणार आहे. दररोज वंदेभारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला जात होता. सांगितलं जात होतं की देशात सर्वत्र ती धावेल. मॉडर्न, वर्ल्डक्लास ट्रॅव्हल करण्याची संधी आम भारतीयांना मिळेल! अशावेळी हा अपघात झालाय. या दुर्घटनेत तीन तीन गाड्या एकमेकांवर थडकल्यात. चेन्नईला जाणारी कोरोमंडल ट्रेन मेन लाईनवर धावत होती. लूप लाईनवर एक मालगाडी उभी होती. इंटरलॉकिंग सिस्टीम, ज्याला पॉईंट मशीन म्हटलं जातं जी रेल्वेचा मार्ग बदलते. त्यात बदल केला गेला. हा कुणी केला? कसा, कशासाठी आणि का केला? हे समोर यायला हवंय. ती लुपलाईनमध्ये निघून गेली. जेव्हा मालगाडी आणि कोरोमंडल एक्सप्रेसची टक्कर झाली, तर दुसऱ्या बाजूनं बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट ट्रेन येत होती. मग जे काही घडलं याचा आपल्याला अंदाज येईलच. एक ट्रेन मालगाडीला धडकली, त्याचे डबे मेनलाईनवर आले. त्यावर येणारी ट्रेन १० मिनिटांनं उशीरा धावत होती. ती आली अन घडला सारा विनाश...! आता प्रश्न उभा राहतो की, या विनाशाची जबाबदारी कुणाची? प्रधानमंत्री पोहोचले, रेल्वेमंत्र्यांनी तिथं खूप वेळ काढला. साऱ्या घटनांची माहिती घेतली, बचाव कार्याचीही पाहणी केली. खूप घाम गाळला. मीडियाशी बोलताना अश्रूही तरळले. 'भारतमाता की जय!' 'वंदे मातरम!' च्या घोषणाही त्यांनी दिल्या. पण ह्या साऱ्या दुर्घटनेनंतरच्या बाबी आहेत. पण ही दुर्घटना का घडली? ती रोखता आली नसती का? टाळता आली नसती का? देशात काही काळापासून एक चर्चा सुरू आहे 'सुरक्षा कवच...!' ट्रेन कोलायजन अव्हायडन सिस्टीम - सुरक्षा कवच यामुळं आपसात रेल्वे धडकणारच नाहीत. हे सांगितलं जात होतं. देशात एकूण जे १३ हजार २१५ इंजिनं आहेत ह्याच रेल्वेगाड्या चालवतात. त्यापैकी फक्त ६५ इंजिनांमध्ये हे सुरक्षा कवच लावलं गेलंय. बाकी इतर सारंकाही भविष्यकालीन स्वप्नं आहेत. सुरक्षा कवच लावलेलंच नाहीत. पण ट्रेन कोलायजन अव्हायडन सिस्टीमचं परीक्षण २०१२ मध्ये झालं होतं. हे युपीए सरकार असताना केलं होतं आणि २०१४ नंतर याचं नांव सुरक्षा कवच ठेवलं गेलं.

देशात १९ रेल्वे झोन आहेत. त्यातल्या १८ झोनमध्ये सुरक्षा कवच लावण्याची प्रक्रियाच सुरू झालेली नाही. हे आश्चर्यचकित करणारं आहे. २०१४ मध्ये गोरखधाम एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. २०१८ मध्ये न्युफॅराक्काचाही अपघात झाला. रेल्वे सेफ्टी कमिशनर जे रेल्वे नाही तर विमान उड्डयन मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. ते रेल्वे अपघातांची चौकशी करतात. त्यांनी रेल्वेच्या, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत काही प्रश्न उभे केले होते. त्याची दखलच रेल्वेनं घेतलेली नाही. या बालासोर दुर्घटनेच्या आधी ९ फेब्रुवारी २०२३ ला साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या प्रिन्सिपल चीफ ऑपरेशन मॅनेजर हरिशंकर वर्मा यांनी एक चार पानी पत्र रेल्वे खात्याला पाठवलं होतं. हे पत्र त्यांनी का लिहिलं तर, ८ फेब्रुवारीला संपर्क क्रांती एक्स्प्रेसला होस रोड स्टेशनवर एक दुर्घटना होता होता राहिली होती. तिथं ऑटोमॅटिक इंटरलिकिंग होतं त्यात गडबड झाली होती. त्या गाडीच्या चालकाच्या जेव्हा हे लक्षांत आलं की, तेव्हा आपल्याला या मार्गावरून जायचंच नाहीये मग हा मार्ग का खोलला गेलाय? म्हणून त्यानं स्वतःहून गाडी थांबवली. त्यामुळं दुर्घटना टळली. याची खबरबात हरिशंकर वर्मा यांनी उच्चतम अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना दिली. त्यात ते लिहितात, व्यवस्थेत गंभीर त्रुटी आहेत, कमतरता आहेत.ऑटोमॅटिक इंटरलॉकिंग सिस्टीमकडं डोळेझाक केली जातेय. या इंटरलोकींग सिस्टीममध्ये छेडछाड तेव्हाच होईल जेव्हा कुणी त्या खोलीत जाईल जी कुलूपबंद असते. गाडी सुरू असताना ती उघडण्याची परवानगी नसते. असं सांगून त्यांनी यात काय कमतरता आहे याची भली मोठी यादी दिलीय, त्यावर तत्काळ पाऊल उचलण्याची गरज त्यांनी प्रतिपादली होती. करावयाच्या उपाययोजनांची नोंद त्यांनी त्या पत्रात केली होती. पण सरकार दरबारी त्याची दखलच घेतली गेली नाही. त्यावेळी सरकारमधले सारे निवडणुकांमध्ये मश्गुल होते. आता राजकीय द्वंद्व खेळले जातेय. रेल्वे सेफ्टी कमिशनर यांच्याकडं याची तांत्रिक चौकशी देण्याऐवजी ती सीबीआयकडं दिली गेलीय. यात षडयंत्र घडवल्याचा वास यायला लागलाय. चौकशीबाबत शंका उपस्थित झाल्यावर भाजपचे सुदेन्दू अधिकारी याबाबत असं म्हणतात की, ४ जूनला कुणाल घोष यांनी एक ट्विट केलं होतं की, दोन रेल्वे अधिकारी आपापसात बोलताहेत फोन टॅप केले जाताहेत, कोणाच्या इशाऱ्यावर हे होत होतं? हे टीएमसीनं घडवलंय. जर हे षडयंत्र रचलं गेलं असेलतर ही अधिक गंभीर बाब आहे. का हे केवळ राजकीय आरोप आहेत? कारण आता सरकारला विचारलं जातंय की, रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा का दिला नाहीये? अश्विनी वैष्णवजी, ही जबाबदारी कुणाची आहे? स्व. लालबहाद्दूर शास्त्री, नितीशकुमार, ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी राजीनामे दिलेत. मोदींच्या सरकारात २०१६ ला सुरेश प्रभूंनीही राजीनामा दिला होता. पण ही जी राजकीय प्रतिद्वंद्वता आहे, ती आता पुढं येताना दिसतेय. निवडणुका डोक्यावर आहेत. ही दुर्घटना कशी घडली हे लोकांसमोर येईल का? यापूर्वीच्या अपघाताचा तपास एनआयएकडं सोपवलं होतं. त्याचा अहवाल न येताच तपास दप्तरात बंद केला गेलाय. बालासोर प्रकरणी काँग्रेसनं प्रारंभी मौन पाळलं होतं आता ते आरोपांच्या फैरी झाडताहेत. राहुल गांधी रेल्वेमंत्र्यांचा राजीनामा मागताहेत. तर माजी प्रधानमंत्री देवेगौडा म्हणतात, 'वैष्णव कमालीचं काम करताहेत, त्यांचा राजीनामा मागणं चुकीचं आहे!' सीबीआयच्या चौकशीवर थिअरी येताहेत. कर्मचाऱ्यांच्या बेपर्वाईनं सिग्नल लोकेशन बॉक्सचं नुकसान झालंय. जाणूनबुजून इंटरलॉकिंग सिस्टीमशी छेडछाड केली गेलीय. इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये टेक्निकल खराबी झाली. मग तपास का लागला नाही? सिस्टीम ऑफ चेक्स अँड बॅलन्सिंग नाहीये का? २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ९ हजार ६०७ कोटी रुपयांची तरतूद रेल्वे रुळ टाकण्यासाठी केली होती. ती घटवून २०१९-२० मध्ये ७ हजार ४०७ एवढी कमी का केली? नवे रेल्वेमार्ग सुरू केल्या जाताहेत. पण ट्रॅक जुन्या असतील तर त्याचं काय हाल होतील? रेल्वे चिंतन शिबिरात प्रत्येक झोन प्रमुखाला बोलायला देण्याऐवजी एकाच झोन प्रमुखाला का बोलू दिलं? ह्या शिबीरात वंदेभारत ट्रेनवरच लक्ष्य केंद्रित केलं होतं. ईस्ट-वेस्ट रेल्वेत ट्रॅक परीक्षण का केलं नाही? राष्ट्रीय रेल संरक्षा कोषची फंडिंग ८९ टक्के कमी का झाली? जे या कोषसाठी २० हजार कोटींचा निधी द्यायचा होता तो का दिला नाही? रेल्वे विभागात ३ लाखाहून अधिक पदं रिक्त का आहेत? देशात सर्वाधिक नोकऱ्या देणारी रेल्वे ही एक संस्था आहे. एक बातमी अशीही येतेय की, त्या दुर्घटनाग्रस्त रेल्वेचा चालक १२ तासाहून अधिक काळ ड्युटीवर होता. हेही गैर आहे दररोज अडीच कोटी लोक दररोज रेल्वेतून प्रवास करताहेत, त्यांच्या जीवाची पर्वा सरकारला दिसत नाही.

दररोज रेल्वे रुळाची सुरक्षा करणाऱ्या, ज्यांना रेल्वेचे सैनिक मानलं जातं अशा गँगमनची मोठी कमतरता आहे. रेल्वे सुरक्षेसाठी महत्वाच्या अन जबाबदार असलेल्या स्टेशनमास्तरांना अधिक काम करावं लागतं. त्यांच्याकडून ओव्हरटाईम करून घेतला जातोय. आता त्यांची ड्युटी १२ तासांची केली जाणार आहे. त्यांना रेल्वेगाड्यांच्या कोणत्याही अनियमितता शोधण्यासाठी रुळांपासून गाडी निघून जाईपर्यंतच्या आवाजांचं निरीक्षण करावं लागतं. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार ३९ रेल्वे झोन आणि उत्पादन विभागात मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे. दळणवळण सहाय्यक, गुडस गार्ड, ज्युनिअर आणि सिनिअर टाईमकीपर, सिनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि स्टेशनमास्तर अशा १४ लाख ७५ हजार ६२३ या सी ग्रुपच्या नोकऱ्यांपैकी ३ लाख ११ हजाराहून अधिक पदं रिक्त आहेत. याशिवाय १८ हजार ८८१ राजपत्रित केडरच्या वरिष्ठांच्या पदांपैकी ३ हजार १८ पदं वेगवेगळ्या विभागात रिक्त आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं २०२२ मध्ये कॅगचा अहवाल प्रसिद्ध केलाय त्यात म्हटलंय की, २००८ ते २०१९ दरम्यान  २५ लाख कोटी खर्च करण्यात आलेत पण रेल्वेच्या वेळांमध्ये ०.१८ टक्के सुधारणा झालीय. तर गाड्यांच्या वेगात ०.६१ टक्के वाढ झालीय. लोकांची रेल्वेला प्रथम पसंती असते पण २०२२-२२ मध्ये २ कोटी ७० लाख लोक प्रतिक्षायादीत होते. आज वंदेभारतचा बोलबाला केला जातोय, पण आज एखाद्या गाडीचा वेग ताशी ५५ की.मी. असेल तर ती सुपरफास्ट ट्रेन समजली जातेय. दुर्घटनेच्या ४९ टक्के केसेसचा तपासच होत नाही. ३५० घटनांपैकी फक्त १८१ मध्ये ट्रॅक इंस्पेक्शन झालंय. २०१७ ते २०२१ दरम्यान २७५ दुर्घटनात ७५ टक्के या डिरेलमेंटनं झाल्यात तर २११ या सिग्नल फेल झाल्यानं झाल्यात. रेल्वेचे दोन रूप दिसताहेत जी रेल्वेचा बकालपणा दिसतोय. लोक लोंबकळत दाटीवाटीनं प्रवास करताहेत, दुसरीकडं वंदेभारत सारख्या गाड्यांचं कौतुक केलं जातंय. ट्रेन १८ या नावानं साकारलेल्या या ट्रेनचं नामकरण वंदेभारत केलं गेलंय. मोदी सरकारचं फोकस हाच होता की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात ७५ वंदेभारत ट्रेन धावायला हव्यात. मग कोच फॅक्टरीत ती तयार होवोत वा न होवोत. मग मार्ग कमी अंतराचा का असेना. सारं लक्ष त्यावर केंद्रित करण्याचे आदेश दिले जाते. या साऱ्या वंदेभारत ट्रेनना हिरवा झेंडा दाखवला तो रेल्वेमंत्र्यांनी नाही तर केवळ आणि केवळ प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी! त्याची जाहिरातही मोठ्याप्रमाणात केली जातेय. वंदेभारत बनवण्यासाठी सरकारला १२० कोटी रुपये लागतात. वेगानं धावणाऱ्या गाड्यांची गरज आहेच, पण आज अस्तित्वात असलेल्या मार्गावरील रूळ त्या क्षमतेचे आहेत का? जपानच्या रेल्वेशी स्पर्धा करतो पण तिथं रेल्वेला एक सेकंदाच्या उशीर होत नाही तर आपल्याकडं सारा आनंदीआनंद आहे. ज्या वेगाने वंदेभारत गाड्या सुरू केल्या आहेत त्या वेगानं सुरक्षा कवच कवच लावले गेले असते तर दुर्घटना टळल्या असत्या. त्याचं लॉन्चिंग केलं तेव्हा मोठ्या वलग्ना केल्या गेल्या. प्रत्येक वर्षी ४-५ हजार किलोमीटर अंतराच्या गाड्यांना सुरक्षा कवच लावले जातील. भारतात ६५ हजार किलोमीटर रेल्वे मार्ग आहे. कामाची गती पाहता याला कितीवर्षं लागतील ते सांगता येत नाही. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली गेलीय पण ती खर्ची पडलेली नाही. रेल्वेरुळांची अवस्था नाजूक बनलीय. तिला ५५-६० कि.मी. वेगाच्या धावणाऱ्या गाड्या सांभाळता येत नाहीत, मग सुपरफास्ट, बुलेट ट्रेनची स्वप्न दाखविणाऱ्याना काय म्हणावं? ऊन, पाऊस आणि थंडीत ह्या रुळांवर जे परिणाम होतात वा जिथं वेल्डिंग केलं जातं त्याचीही निगराणी होत नाही. त्याच्या दुरुस्तीकडं लक्षच दिलं जात नाही.

चौकट
अश्विनी वैष्णव हे मंत्री झाल्यापासून चर्चेत आहेत. त्यांनी आयआयटी कानपुर इथून एमटेक केलेलं आहे. इंजिनिअरिंगचे ते विद्यार्थी आहेत. त्यानंतर ते आयएएस उत्तीर्ण झाले. ओरिसा केडर स्वीकारल्यानंतर ते बालासोरचे कलेक्टर बनले. पण नोकरी करणं त्यांना फारसं आवडलं नसल्यानं ते शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. अमेरिकेतून परतल्यानंतर जीई-जनरल इलेक्ट्रीकल्स या अमेरिकन कंपनीत एमडी-व्यवस्थापकीय संचालक बनले. त्यानंतर सीमेन्स कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट बनले. या दोन्ही कंपन्या लोकोमोटीव्हशी म्हणजेच रेल्वेशी निगडित होत्या, त्या रेल्वेच्या ठेकेदार आहेत. त्यामुळं त्यांना रेल्वेमंत्री बनवलं तेव्हा पक्षांतर्गत विरोध झाला. नोकरी सोडून ते गुजरातेत परतले. तिथं ते मोदींच्या संपर्कात आले. त्यापूर्वी ते दिल्लीत अटलजींच्या जवळ होते, २००४ मध्ये ते अटलजींचे स्वीय सहाय्यक होते. मोदी जेव्हा प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांनी वैष्णव यांना बोलावून घेतलं. त्यावेळी ते नोकरी करत होते. मोदींनी २०१९ ला त्यांना राज्यसभा सदस्य बनवलं. मोदींच्या अनेक कामात वैष्णव मदत करतात, सल्ला देतात. राजकीय बाबींसाठी जसे अमित शहा तसे प्रशासकीय, टेक्निकल बाबींसाठी मोदींना वैष्णव हवे असतात. वैष्णवांसाठी मोदींनी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांचा बळी दिला. पीयूष गोयल यांच्याकडून रेल्वेखातं काढून घेतलं. वैष्णव यांना रेल्वेमंत्री बनवलं. शिवाय टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ही वजनदार खाती देण्यात आली. मोदींचे अत्यंत विश्वासू समजले जातात. कधी कधी तर ते अमित शहांनाही ओलांडून पुढं जातात. गुगल, फेसबुक, युट्युब, एपल यासारख्या कंपन्यांच्या संपर्कात ते  असतात. सरकार, प्रशासन यांच्यात जेव्हा टेक्नॉलॉजीचा विषय येतो, तेव्हा वैष्णव यांचा शब्द हा अंतिम असतो. रेल्वेमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना मोदींचं अपघातस्थळी जाणं हे वैष्णव यांच्या पाठीशी आपण आहोत, हे दाखवणं आहे. त्यामुळं वैष्णव यांचा आत्मविश्वास वाढलाय. या दशकातला सर्वात मोठी दुर्घटना ज्यात ३०० हून अधिक मृत्युमुखी पडलेत, हजाराहून अधिक अपंग-जखमी झालेत. पक्षात वा सरकारमध्ये अशी कुणाचीही हिंमत नाही की, वैष्णवांविरोधात आवाज उठवतील. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना अपघात झाला त्यात कुणीही मृत्युमुखी पडले नाहीत तरीही प्रभूंचा राजीनामा मोदींनी घेतला होता. वैष्णव यांच्याजागी इतर कुणी असता तर त्याचा राजीनामा मोदींनी कधीच घेतला असता!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 4 June 2023

लोकसभेचं विसर्जनं, मुदतपूर्व निवडणुका...!

"भाजपची सत्ता आल्यानंतर पक्षासाठी खस्ता खाल्लेल्या २३ तालेवार नेत्यांना मंत्री केलं होतं. त्यापैकी २१ मंत्र्यांना हळूहळू दूर करून खुज्यांना मंत्रिपदं दिली. जुन्यांपैकी केवळ नितीन गडकरी आणि राजनाथसिंह मंत्रिमंडळात उरलेत. सरकार आणि पक्ष दोन्हीवर मोदींचा कब्जा आहे. त्यामुळं पक्षात अस्वस्थता आहे. सत्यपाल मालिकांच्या माध्यमातून ती बाहेर पडलीय. मोदींनी हटवलेले नेते, मंत्री यांचा होणारा मोदींना पक्षांतर्गत विरोध, गुजरात वगळता इतरत्र झालेला पराभव, विरोधकांची होणारी एकजूट, राहुल गांधींची सदस्यता रद्द होणं, आपच्या विरोधात काढलेला अध्यादेश, मतदारांमधली नाराजी हे पाहता प्रधानमंत्री मोदी येत्या जून-जुलैत लोकसभा विसर्जित करून ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान मध्यावधी निवडणुका घेण्याच्या विचारात असून प्रशासनाला त्यांनी तसे आदेश दिल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीत विरोधात, तर लोकसभेत मोदींच्या बाजूनं मतं मिळतात म्हणून मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगडसह महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकाही लोकसभेबरोबरच होतील. असा अंदाज व्यक्त होतोय.!"
---------------------------------------------------

*भा* रतीय जनता पक्षाच्या सत्तारोहणाला नऊ वर्षे पूर्ण झालीत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी अद्याप एक वर्षाचा कालावधी शिल्लक आहे. परंतु जणुकाही निवडणुका येऊन ठेपल्या आहेत अशा अविर्भावात भाजपनं आपल्या कार्यकर्तृत्वाची महती गायला सुरुवात केलीय. देशभरात महाजनसंपर्क मोहिमा आखल्या गेल्या आहेत. जागोजागी मेळावे आयोजित केले आहेत. त्याचबरोबर निर्णयांचा सपाटा लावला आहे. नव्या संसद भवनाचं आणि त्या अनुषंगानं इतर कामं अद्याप व्हायची असतानाच त्याच्या उदघाटनाचा घाट घातला गेलाय. नियोजित वेळेनुसार आगामी वर्षाच्या एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका प्रस्तावित आहेत. त्यावेळी उन्हाळा असल्यानं मतदान कमी होण्याची शक्यता वर्तवली जातेय. खासकरून जिथं हिंदीभाषक मतदार मोठ्यासंख्येनं आहेत. या भागांत नेहमी 'मोदी मॅजिक' चालतं. २०१४ मध्ये उन्हाळा असतानाही उसळलेल्या राजकीय वातावरणात मतदानाची टक्केवारी तब्बल १० ते १२ टक्क्यानं वाढून ती ६० टक्क्यांहून अधिक झाली होती. २०१४ आणि २०१९ मधल्या एप्रिल-मे महिन्यांत मोदींच्या नशिबानं उन्हाळा तेवढा तापदायक नव्हता. त्यामुळं मतदार मतदानाला बाहेर पडले आणि मोठ्याप्रमाणात मतदान भाजपला झालं. पण आता ती रिस्क भाजप घेऊ इच्छित नाही. मतदानात उन्हाळ्याचा प्रकोप होऊ नये यासाठी लोकसभा भंग करून लोकसभेच्या मुदतपूर्व सार्वत्रिक निवडणुका ह्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निवडणुका घेण्याचं ठरतेय. याकाळात ना जादा ऊन असतं ना थंडी, ना पाऊस असतो. पण लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका घेण्यासाठी केवळ हे एकमेव कारण आहे असं नाही. इतरही काही कारणं आहेत. सध्या देशातलं राजकीय वातावरण बदलत आहे. ते भाजपच्या विरोधात संघटित होतंय. झालेल्या सर्व निवडणुकांतून भाजपचा पराभव होत असल्यानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जरा चिंतीत आहेत. शिवाय नियोजित काळाप्रमाणे येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये तेलंगणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्याच्या विधानसभा निवडणुका व्हायच्या आहेत. त्याची तयारी निवडणूक आयोगानं आणि सर्वच राजकीय पक्षांनी चालवलीय. या राज्यांच्या निवडणुकांसोबतच लोकसभेच्या निवडणुकाही घेतल्या जाव्यात, अशी चर्चा सरकारमध्ये असलेल्यांकडून सुरू असल्याचं राजकीय, प्रशासकीय पातळीवर बोललं जातंय. इतर राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीसोबतच महाराष्ट्राच्याही पुढल्या वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळं केंद्र सरकारनं महाराष्ट्रातले काही निर्णय रोखून धरले आहेत. शिवाय इथल्या प्रत्येक मतदारसंघासाठी केंद्रातल्या मंत्र्यांकडं जबाबदारी सोपवली गेलीय. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर इथल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल असं सतत सांगितलं गेलं होतं, पण त्यालाही भाजपच्या वरिष्ठांनी हिरवा कंदील दाखवलेला नाही. त्यामुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. त्यामागेही मध्यावधी निवडणुकांचा विचार असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामांची लगबग वाढलीय. २८ मेला नव्या संसद भवनांचं उदघाटन विरोधकांच्या बहिष्कारात, सत्ताधाऱ्यांच्या जल्लोषात झालं. नेहमी जुलै महिन्यामध्ये संसदेचं मान्सून सत्र अधिवेशन होत असतं. त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहासमोर महामहिम राष्ट्रपतींचं अभिभाषण असत नाही. राष्ट्रपतींचं अभिभाषण हे वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच अर्थसंकल्पीय अधिवेशनात होत असतं. नव्या संसद भवनाचं उदघाटन संसदेच्या या मान्सून सत्राच्या प्रारंभी होऊ शकलं असतं आणि संसदेचं कामकाज सुरू झालं असतं, तेव्हा तिथं राष्ट्रपतीचं असणं आवश्यकही नव्हतं. तरीही संसद भवनाच्या उदघाटनाचा घाट घेतला गेलाय. आता अशी शक्यता व्यक्त केली जातेय की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संसदेच्या मान्सून सत्राच्या आधीच लोकसभा विसर्जित करतील. निवडणूक आयोगाच्या संवैधानिक तरतुदीनुसार लोकसभा विसर्जित केल्यानंतर सहा महिन्याच्या आत पुन्हा नव्यानं निवडणुका व्हायला हव्यात. समजा, येत्या २० जून दरम्यान लोकसभा विसर्जित केली गेली तर २० डिसेंबरपूर्वी नवी लोकसभा अस्तित्वात येऊन त्याची पहिली बैठक व्हायला हवी. तशा सरकारच्या हालचाली सुरू झाल्यात.

लोकसभा विसर्जित करण्याला दुसरा मुद्दा हा आहे की, सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीतल्या राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भात राज्यपालांचा अधिक्षेपाला विरोध करत दिल्ली राज्य सरकारकडं अधिकार बहाल केले होते. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीच्या नायब राज्यपालांना ताकद देण्यासाठी एक अध्यादेश जारी करून ते अधिकार पुन्हा राज्यपालांकडं दिलाय. यावरून आम आदमी पक्षाचं दिल्लीतलं सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात वाद निर्माण झालाय. केंद्र सरकारच्या या अधिक्षेपाच्या विरोधात  मुख्यमंत्री केजरीवाल यांनी देशभरातल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. मान्सून सत्रात या अध्यादेशाला कायद्याचं स्वरूप देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, त्याला विरोध करण्यासाठी केजरीवालांची ही जुळवाजुळव सुरू आहे. हा अध्यादेश जारी करण्याबरोबरच त्यासाठी जी वेळ भाजप सरकारनं साधलीय त्यातही एक झोल आहे. संविधानाच्या कलम १२३ मध्ये स्पष्ट म्हटलंय की, अध्यादेश तेव्हाच काढता येईल जेव्हा संसदेचं अधिवेशन बोलावता येत नाही. परंतु अशा अध्यादेशाचा कालावधी अधिकतम सहा महिन्यांचा असेल. त्याची मुदत दोनदा वाढवता येईल. पण त्याचाही अधिकतम अवधी सहा महिन्याचाच असेल. संविधानाच्या कलम १२३ मध्ये पुढं असंही म्हटलंय की, या दरम्यान संसदेचं अधिवेशन असेल तेव्हा त्याला कायद्याचं स्वरूप दिलं गेलं नाही तर जेव्हा अधिवेशनाची मुदत संपेल तेव्हा आपोआप तो अध्यादेश संपुष्टात येईल, त्याचा पुढे प्रभाव राहणार नाही. केंद्र सरकारनं अध्यादेश काढलाय अन मान्सून सत्रात म्हणजे येत्या दीड महिन्यात तो संमत होऊ शकत नाही. लोकसभेत आणि राज्यसभेत एक विरोध होईल. हे प्रधानमंत्र्यांना चांगलंच माहीत आहे. शिवाय लोकसभेत असलं तरी राज्यसभेत भाजपचं बहुमत नाही, तिथं त्याला मंजुरी मिळणार नाही. त्यामुळं दुसरं जर लोकसभाच विसर्जित केली तर अध्यादेश चर्चेसाठी संसदेत येणारच नाही. त्यामुळं 'ना बजेगा बाज ना बजेगी बासुरी...!' शिवाय नोव्हेंबरमध्ये या अध्यादेशाला आणखी मुदतवाढही ते देऊ शकतात.

आणखी एक महत्वाचा मुद्दा हा आहे की, देशभरातले भाजप विरोधक एकत्र येताहेत. हिंदीभाषक बिहारमधले नितीशकुमार यांनी त्यात पुढाकार घेतलाय. काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत. विरोधक संघटीत झाले अन एकास एक अशी निवडणूक झाली तर भाजपला लोकसभेत बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे; त्यामुळंही मोदी अस्वस्थ आहेत. देशात विरोधकांना एकजूट व्हायला वेळ मिळू नये यासाठीही लवकर निवडणूक घेणं गरजेचं आहे. एकीकडं एकापाठोपाठ एक राज्ये भाजपच्या हातातून जाताहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर, झारखंड हाती राहिला नाही, महाराष्ट्रात 'ना घरके रहे ना घाट के!' झालेत. हरियाणात मित्राच्या साथीनं सरकार आहे. हिमाचल आणि कर्नाटक ही राज्ये हातातून निसटलीत. बिहारात नितीशकुमारांनी साथसंगत सोडून भाजप विरोधात दंड ठोकलेत. दिल्लीतही आम आदमी पक्षानं भाजपचा पराभव करून महापालिकेतली सत्ता हिसकावून घेतलीय. आता मध्यप्रदेशातली सत्ता हातातून जाण्याची शक्यता निर्माण झालीय. कदाचित राजस्थान भाजपला मिळेलही. पण तिथली सत्ता हाती आली तरी भाजपला त्याचा तसा काहीच फायदा होणार नाही, कारण इथं भाजपची सत्ता नसतानाही इथल्या लोकसभेच्या सर्वच्या सर्व म्हणजे २५ च्या २५ जागा भाजपला मिळालेल्या आहेत. दुसरीकडं नितीशकुमारांनी सर्व विरोधकांची मोट बांधण्याची जबाबदारी आपल्या हाती घेतलीय. प्रधानमंत्र्यांना त्रासदायक ठरलेला बिहारला 'विशेष राजकीय दर्जा' देण्याचा मुद्दा त्यांनी उचललाय. हिंदीभाषक मतदारांमध्ये त्यांना पाठिंबा मिळेल अशी चिन्हे आहेत. उरलेल्या दलित मतांसाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सरसावलेत. राहुल गांधी महिला, विद्यार्थ्यांपासून बस-ट्रक चालकांपर्यंत पोहोचलेत. प्रशांत किशोर बिहारमध्ये पदयात्रा करताहेत. ते आता मोदींसाठी पुन्हा 'चाय पर चर्चा!' करतील असं काही नाही. एनडीएतून दुरावलेल्या अकाली दल सारख्या जुन्या मित्रपक्षांना गोंजारण्याचा भाजप प्रयत्न चालवलाय. विरोधकांचा बहिष्कार असतानाही संसद भवनाच्या उदघाटन समारंभाला उपस्थित राहिलेले ओरिसातला बिजू जनता दल, आंध्रप्रदेशातला वायएसआर हे भाजपसोबत येण्याची चिन्हे आहेत. तसा भाजप प्रयत्न करत आहे. भाजपमध्ये मोदींना पक्षांतर्गत विरोधाला सामोरं जावं लागतंय. सत्यपाल मालिकांनी पेटवलेल्या या आगीत अनेकजण हाती समिधा घेऊन सरसावले आहेत. मोदींनी केंद्रातल्याच नव्हे तर राज्यातल्या प्रस्थापित नेतृत्वाला बाजूला सारत आपल्या चेल्यांना जवळ केलं आहे, साहजिकच नाराजी मोदींनी ओढवून घेतलीय. केंद्रीय मंत्रिमंडळातून दूर सारलेले ज्येष्ठ नेते मंत्री यांच्याशिवाय गडकरी, राजनाथसिंहच नाही तर राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्यप्रदेशचे शिवराजसिंह, छत्तीसगडचे रमणसिंह, कर्नाटकचे यडीयुरप्पा, बिहारचे सुशील मोदी, यांच्यासारखे अनेक नेते, महाराष्ट्रातही पाहिलं तर भाजपच्या अभ्यासू, सुसंस्कृत आणि ज्येष्ठ प्रवक्त्या कांताताई नलावडे, तसंच अरुण साठे, रघुनाथ कुलकर्णी, मुकुंदराव कुलकर्णी ही मंडळी पूर्वीइतकी दिसत का नाहीत? जनसंघाच्या दिवसांपासून ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या, ती आणि आणखीही बरीच मंडळी आज कुठे आहेत? कदाचित देवेंद्रजींचे लाडके प्रवीण दरेकर, श्रेष्ठींचे मनापासून लाड पुरवणारे प्रसाद लाड, कोकणभूमीचे एक महान सुपुत्र नितेश राणे यासारख्या तेजस्वी नेत्यांची प्रभावळ पक्षात निर्माण झाल्यामुळं, जुन्याजाणत्या ज्येष्ठ नेत्यांची पूर्वीइतकी गरज भासत नसेल का? असा प्रश्न भाजपबद्धल आस्था असणारे असंख्य लोक सध्या विचारत आहेत. पण भाजपच्या नेतृत्वाला याची गरज वाटत नाही त्यामुळं पक्षात नाराजी वाढतेय. ती रोखण्यासाठीही मुदतपूर्व निवडणुका हा त्यावरचा उपाय असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटतेय.

लोकसभा विसर्जित करण्यासाठीचा चौथा मुद्दा म्हणजे देशात काँग्रेसची वाढत असलेली ताकद. आज चार राज्यात काँग्रेस सत्तेवर आहे. काँग्रेसला मध्यप्रदेशात सत्ता जिंकण्याचे संकेत मिळताहेत. मध्यप्रदेशात पूर्वीही काँग्रेसनं सत्ता मिळवली होती, पण भाजपनं त्यात जोडतोड करून सत्ता हस्तगत केली. जर मध्यप्रदेश हातातून गेलं तर फक्त उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि एफआयआर मास्टर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा या तिघांच्या सहाय्यानं भाजपला केंद्रात सत्ता मिळेलच असं काही सांगता येत नाही. त्यामुळं लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर कदाचित मध्यप्रदेशचा किल्ला राखता येईल. तसंच छत्तीसगडमध्येही काहीसा प्रभाव पडू शकेल, आणि उरलंसुरलं काम ईडी, सीबीआय, आयटी ही आयुधं करतील. जर मध्यप्रदेश काँग्रेसनं जिंकलं आणि तिथं होत असलेल्या मागणीनुसार आदिवासी मुख्यमंत्री केला तर मात्र भाजपच्या हाती असलेलं द्रौपदी मुर्मु कार्डही इथं चालणार नाही. हरियाणा आणि पश्चिमी उत्तरप्रदेशातल्या खाप पंचायती ह्या दिल्लीत आंदोलन करणाऱ्या महिला पहिलवानाच्या पाठीशी एकत्रित झाल्यात. नुकतीच त्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलीय. त्यामुळं तिथं निवडणूक जिंकणं अवघड जाईल. याशिवाय प्रधानमंत्री असा तर विचार करत नाहीत ना की, निवडणुकांना जेवढा उशीर होईल तेवढी परिस्थिती आणखी बिघडेल, विरोधातलं वातावरण आणखी चिघळेल. प्राप्य परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांना आश्चर्यचकित करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे लोकसभाच विसर्जित करतील. विरोधकांना बेसावध ठेवून प्रधानमंत्री मोदींनी खेळलेल्या या चालीनं विरोधक हैराण होतील. नितीशकुमार बिहारमधल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी तयारीला लागतील. विरोधकांची एकजूट बांधण्याची त्यांची मोहीम काहीशी मंदावेल. शिवाय उन्हाळ्यात मतदानाची टक्केवारी घटण्याची भीतीही राहणार नाही. आगामी ३-४ आठवडे हे देशाच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे आहेत, या काळात काहीही घडू शकतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातेत दंगली उसळल्यानंतर विधानसभा विसर्जित करून त्यांनी निवडणुका घेतल्या होत्या. हा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यावेळी त्यांनी प्रचंड बहुमत मिळालं होतं. असे प्रयोग भारतात इतरत्र अनेकदा झालेत. एकदा तेलंगणातही असंच घडलं होतं. मुख्यमंत्री के.चंद्रशेखरराव यांनी अचानकपणे विधानसभा विसर्जित केली होती. आता हा असा प्रयोग प्रधानमंत्री मोदी लोकसभेसाठी घेऊ शकतात. त्यामुळं प्रधानमंत्र्यांना लोकसभा विसर्जित करून देशात मुदतपूर्व निवडणुका व्हाव्यात असं वाटतंय, कारण दिवसेंदिवस मोदींच्या विरोधात वातावरण तयार होऊ लागलंय. मोदींच्या विदेश दौऱ्याची प्रसिद्धी गोदी मीडियानं मोठ्याप्रमाणात केलीय, त्याचा एक वेगळा माहोल देशात तयार झालाय. अशा सकारात्मक वातावरणात प्रधानमंत्री लोकसभा विसर्जित करून निवडणुका घेण्याची शक्यता आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही प्रमोद महाजन यांच्या 'इंडिया शायनिंग' म्हणण्यानुसार मुदतपूर्व निवडणुका घेतल्या होत्या, त्यात त्यांचा पराभव झाला, पुन्हा सत्ता आली नाही. आताही मुदतपूर्व निवडणुका घेतल्या तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल ही शक्यता नाकारता येत नाही.

चौकट
मी कोणत्याही प्रकारच्या भविष्य-ज्योतिष त्यांनी वर्तवलेल्या भविष्याचा पुरस्कार करत नाही पण, लोक उत्सुकतेनं भविष्य पाहात असतात. त्यासाठी ज्योतिष्याच्या दृष्टीनं चाचपणी केली असता लोकसभा विसर्जित करण्याला आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्याला दुजोरा मिळतोय. आजवर ज्यांची अनेक राजकीय भविष्यं खरी ठरलीत असे हरियानातले ख्यातनाम ज्योतिषी संजयजी चौधरी यांच्यामतेही लोकसभा मुदतपूर्व विसर्जित केली जाईल आणि मध्यावधी निवडणुका घेतल्या जातील! त्यांनी सांगितलं की, नवीन संवत २१ मार्चला सुरू झालं. तेव्हा नववर्षाचा आढावा घेतला असता त्यात असं स्पष्ट दिसून आलंय की, सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात मोठा संघर्ष होईल. त्यानुसार काँग्रेस, राहुल गांधींची सदस्यता, आप पक्षाच्या नेत्यांवर आरोप याशिवाय महिलांच्या छळवणूक याबाबी घडल्यात. त्यानंतर आता बुध बदललाय, चट्टाल योग आलाय, यात राजाची बुद्धी थोडी कुपीत होते. तरीही या दरम्यान खूपशा सोशल वेल्फेअर स्कीम्स केंद्र सरकारकडून लागू केल्या जातील. ज्यानं लोकांना दिलासा मिळेल. काहीं योजनांची स्वप्ने दाखविली जातील, काही म्हणजे पेट्रोल, गॅस याच्या किंमती कमी होऊ शकतात. मोदींनी ३० मे २०१९ ला ७ वाजून ४ मिनिटांनी शपथ घेतली होती. त्यानुसारही हे सरकार आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही. २०२४ च्या निवडणुका या सहा महिने आधी होतील. लोकसभा भंग करून येत्या जून महिन्याच्या मध्यापासून जुलैच्या मध्यापर्यंतच्या काळात या मध्यावधी निवडणुका घोषित होतील. भाजपच्या स्थापनेच्या वेळेनुसार पाहिलं असता एप्रिल २०१८ मध्ये चंद्रमाची महादशा सुरू झालेली आहे. सध्या एप्रिल २०२२ पासून चंद्रमामध्ये शनी मार्गक्रमण करतोय. शनीत चंद्रमा किंवा चंद्रमात शनी आला तर विषयोग सुरू होतो. विषयोगात माणसाला अहंकार येतो, तो चुकीची विधानं करतो, त्याच्याकडून चुकीचे निर्णय घेतले जातात. ही दशा मार्च २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळं याकाळात भाजप चुकीचे निर्णय घेईल. भाजपची आणि सरकारची ग्रहदशा पहिली असता मुदतपूर्व निवडणूक होतील. लोकसभेचं मान्सून सत्र जुलैच्या मध्यात असतं, त्यापूर्वी लोकसभा भंग केली जाईल. कारण संसदेच्या अधिवेशनात मोठा गोंधळ होईल, ते टाळण्यासाठी लोकसभा विसर्जित केली जाईल. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यावेळची ग्रहदशा पाहता भाजपपेक्षा काँग्रेस वरचढ राहील. असं असलं तरी, निवडणुका ज्यादिवशी जाहीर होतील त्यादिवशीची ग्रहदशा पाहून अधिक काही सांगता येईल, असं चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...