Saturday 17 June 2023

सावरकर, गांधी आणि गोडसे.. !

"विदेशात गांधींच्या प्रतिमेपुढं झुकणारे नेते, देशात गांधी-नेहरुंची निर्भत्सना तर गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करतात. खासदार प्रज्ञासिंग, सुधांशु रॉय, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी गोडसेला भारताचा 'सुपुत्र' म्हटलंय. तर पुरीच्या शंकराचार्यांनी गोडसेला आदरार्थी  संबोधलंय. मुंबईत यांच्याच वकीलानं गोडसेची तसबीर महापुरुषांसोबत ठेवून त्याला त्यांच्या रांगेत बसवलं. राष्ट्रपिता गांधींची हत्या करणाऱ्यांचं महिमामंडन सुरू असतानाच तिकडं केंद्र सरकारनं इतिहासाच्या नव्या पाठ्यपुस्तकातून मोगलांसोबत गांधींनाही हटवलंय. पण मोगलांशिवाय महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचं गुणगान होणार तरी कसं? गांधींशिवाय भारत ही कल्पनाच आपण करू शकत नाही. इतिहास, स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. गांधींना हटवू पाहणारे स्वतः संपून जातील. मात्र जगभरातल्या लोकांच्या मनातल्या गांधींच्या प्रतिमेला कुठंच धक्का लागणार नाही!"
------------------------------------

*नु* कतंच एनसीआरटी या शैक्षणिक अभ्यासक्रम ठरवण्याच्या सरकारी मंडळानं इतिहास आणि राज्यशास्त्राचा जो नवा अभ्यासक्रम तयार केलाय त्यातून मोगलांचा इतिहास काढून टाकलाय; तसाच गांधीहत्येचा इतिहासही हटवलाय, मिटवलाय. त्याच्याविरोधात या मंडळावरील सदस्य सुहास पळशीकर, योगेंद्र यादव आणि इतर काहींनी आपलं नांव या पुस्तकांच्या श्रेयनामावलीतून काढून टाकावं असं नुकतंच कळवलंय. 'आम्ही जो अभ्यासक्रम तयार केला होता तो आता बदलला गेलाय त्यामुळं त्यात आमचं नांव असू नये!' असं त्यांचं म्हणणं आहे. यावर देशभरात चर्चा सुरू असताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातले एक मंत्री गिरीराज सिंह यांनी गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला 'भारताचा सुपुत्र' असं गौरवलंय. त्यावरून वादंग निर्माण झालाय. त्यांच्या राजीनाम्याची मागणी झालीय. पण मला वाटतं अशाप्रकारचं वक्तव्य करून त्यांनी मोदींच्या 'गुडफेथ'मध्ये खास मर्जीत जाण्याचा प्रयत्न केलाय. मोदींच्या दृष्टीमध्ये ते आणखी वरच्या पातळीवर गेले आहेत. यांच्याशिवाय यापुर्वी अनेकांनी गांधींची निर्भत्सना आणि गोडसेचं कौतुक केलंय. भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग खरं तर त्यांना साध्वी म्हणणं उचित होणार नाही. त्या, गिरीराज सिंह, सुधांशु त्रिवेदी, पुरी पीठाधिश्वर शंकराचार्य निश्चलयानंद सरस्वती यांनीही गोडसेचं वाखाणणी केलीय. शंकराचार्यांनी म्हटलंय की, 'गोडसे व्यथित होते...!' त्यांनी गोडसेला होता असं म्हटलं नाही तर 'होते' असं आदरार्थी संबोधलंय, या अत्यंत सन्मानजनक संबोधनाबरोबरच त्यांनी म्हटलंय की, 'गोडसे हे व्यथित होते, त्यांच्यामते गांधी जिवंत राहणं हे देशासाठी घातक ठरलं असतं म्हणून त्यांनी गांधींना संपवलं...! शंकराचार्य यांच्यासारख्या धर्मपीठावरचे लोक एका खुन्याची, हत्याऱ्याची बाजू घेताहेत. त्याबाबत असाही तर्क देताहेत की, ते खूप व्यथित होते म्हणून त्यांनी हत्या केली गेली. नुकतंच मुंबईत सदावर्ते नामक वकीलानं जो स्वतःला एसटी कामगारांचा नेता म्हणवतो, त्यानं महापुरुषांच्या शेजारी गोडसेची तसबीर लावून त्याची पूजा केली होती. त्यावेळी त्यानंही गांधींवर, त्यांच्या विचारांवर टीका केलीय. थोडंसं मागं वळून पाहिलं तर लक्षांत येईल की, संघ परिवार, त्यांच्याशी संबंधित विविध संस्था, लोक, सत्ताधारी, पदाधिकारी त्यांचं सोशल मीडिया अकौंटन्स, त्यांचा आयटी सेल, त्यांचं व्हाट्सएप विश्वविद्यालय हे सारे सतत विविध माध्यमातून असं बिंबवण्याचा प्रयत्न करतात की, गोडसेला वाटत होतं, गांधीजी हेच देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत; म्हणून त्यानं गांधींची हत्या केली. पण ते हे विसरतात की, गोडसे ज्याचा शिष्य होता, त्या सावरकरांनीच द्विराष्ट्रवादाची संकल्पना सर्वप्रथम मांडली होती. १९३७ मध्ये हिंदू महासभेच्या अहमदाबाद इथल्या राष्ट्रीय अधिवेशनात याबाबतचा प्रस्ताव संमत केला होता. त्यावेळी सावरकरांनी म्हटलं होतं की, 'भारतात दोन राष्ट्रं राहतात. हिंदू आणि मुस्लिम! ते दोघे कधीच एकत्र राहू शकत नाहीत!' त्याही आधी १९२३ मध्ये आपल्या 'हिंदुत्व' या पुस्तकात सावरकरांनी हेच म्हटलं होतं. त्यानंतर १९३८ ला हिंदू महासभेच्या नागपूर अधिवेशनात पुन्हा हेच प्रतिपादन करण्यात आलं. जेव्हा देश स्वातंत्र्यासाठीचा लढा देत होता, तेव्हा महात्मा गांधी लोकांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी व्हावं यासाठी आवाहन करत होते.  त्याचवेळी सावरकर, जे गोडसेचे आदर्श होते, ते सावरकर हिंदू युवकांना १९४१-४२ मध्ये सैन्यात भरती होण्याचं आवाहन करत होते. 'एक मिनिटही वाया न घालवता तरुणांनी ब्रिटिश सेनेत भरती व्हायला हवंय...!' हे सावरकरांचे शब्द आहेत. इंग्रजांना मदत करण्यासाठी सावरकरांनी देशभर एक अभियान चालवलं होतं. त्यांनी ठिकठिकाणी 'सैन्य परिषद' भरवली होती,
१९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं, तसंच हिंदू महासभेचं स्वातंत्र्य लढ्यात काहीही योगदान नाहीये. सावरकर अंदमानातून परतल्यानंतर एक साधा दगड देखील ब्रिटिशांच्या दिशेनं भिरकवलेला नाही. कोणत्याही इंग्रजावर त्यांनी कसलंही आक्रमण केलेलं नाही. ब्रिटिशाविरोधात कोणतंही आंदोलन उभं केलेलं नाही. गोडसेनं गांधींची हत्या करताना फाळणीला गांधींना जबाबदार धरून केली, असं  म्हटलंय;  मग त्या फाळणीला उत्तरदायी असलेल्या बॅरिस्टर जीनांची हत्या गोडसेनं का नाही केली? त्यांच्यावर गोळ्या का झाडल्या नाहीत? संघ परिवार हा असा प्रश्न कधी विचारत नाही. गोडसेनं त्या गांधींवर गोळ्या झाडल्या जे हिंदू-मुस्लिम एकतेचे पुरस्कर्ते होते. जे भारतातल्या आणि पाकिस्तानातल्या दोन्ही देशातल्या अल्पसंख्याकांच्या पाठीशी उभे होते. पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्याक होते, तिथं त्यांच्यावर अत्याचार होत होते म्हणून त्यांच्या बाजूनं गांधी उभे होते. तर भारतात मुस्लिमांवर अन्याय होत होता, म्हणून गांधी त्यांच्या बाजूनं उभे होते. संघ परिवार, कालांतरानं राजकीय पक्ष म्हणून पुढं आलेल्या जनसंघ, जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी, हिंदू महासभा, विश्व हिंदू परिषद आणि संघाशी संबंधित इतर संस्था-संघटना या सर्वांची हीच मोठी अडचण आहे की, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातला यांच्याकडं आपला कुणी असा नेता, नायक नाहीये. म्हणून सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस वा गांधी या महानायकांवर आपला शिक्का उमटवू पाहात आहेत. गांधींच्या प्रतिमेसमोर ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबरला प्रधानमंत्री ९० अंशात झुकून गांधींना प्रणाम करतात. हिरोशिमात गेले तेव्हा मानवतेच्या इतिहासात, सर्वाधिक संहाराचं स्मारक असलेल्या हिरोशिमात अहिंसेचे पुजारी असलेल्या गांधींच्या पुतळ्याचं अनावरण तिथं प्रधानमंत्री मोदी करतात. परतल्यानंतर मात्र त्यांचं तंत्र गांधींच्या हत्याऱ्याच्या बाजूचं असतं, गांधींच्या विचारांची हत्या करण्याऱ्याच्या पाठीशी असतं. त्यांचा सारा समुदाय, त्यांच्या विचारांशी निगडित असलेला भक्तगण गांधींच्या प्रतिमेची, विचारांची हत्या करतोय. यावर मात्र ते मौन बाळगून असतात.

लेखक पी.सी.जैन यांनी एक पुस्तक प्रसिद्ध केलंय. त्यात त्यांनी जगातल्या ज्या ज्या देशानं गांधींच्या जीवनावर आधारित पोस्टाची तिकिटं, स्टॅम्पस, नाणी प्रसिद्ध केलीत, अशा सर्व देशांची नावं, ते स्टॅम्पस, ती तिकिटं, त्या नाणी त्या पुस्तकात आहेत. त्यात अशा देशांची नावं आहेत की, ज्यांची नावं आपण कधी ऐकलेली नाहीत. अगदी छोट्या छोट्या सीआरा, लेओन या सारख्या देशांनी आपल्या राष्ट्रपित्यावर हे स्टॅम्पस, पोस्टाची तिकिटं, नाणी जारी केली आहेत. गांधींचा विचार तिथपर्यंत पोहोचलाय. गांधी तर उभे ठाकलेत लंडनमध्ये थेट ब्रिटिश संसदेसमोर! मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर हे ९ वी, १०वी शिकत असताना त्यांनी गांधींवर निबंध लिहीत होते. त्यांनी जेव्हा वंशवादाच्या विरोधात पदयात्रा काढली, त्यावेळी त्यांचा आदर्श गांधी हेच होते. अशा गांधींना आपली ही मंडळी मिटवू पाहत असतील तर लक्षांत ठेवा, गांधींना संपवणारे ते सारे स्वतः संपतील पण गांधींचं नांव मात्र अमर राहील, त्याला कुणीच, कुठलीही सत्ता धक्का लावू शकणार नाही!

मुझफ्फर रझमी यांचा हा शेर आहे,
इस राज को क्या जाने, साहिल की तमाशाई
हम डूब के समझे हैं, दरीयां तेरी गेहराई
ये जब्र भी देखा हैं, तारिख की नजरोंने
लम्हो ने खता की थी, सदीयो ने सजा पाई ll
ही जी 'साहिल की तमाशाई' आहे ना, ही स्वातंत्र्यलढ्यातही साहिलवर - काठांवर बसलेली होती. म्हणून त्यांना 'दरीयो की गेहराई' माहीत नाही. यांना ना स्वातंत्र्यलढ्यातला संघर्ष माहीत आहे, ना गांधींचं योगदान माहीतीये! यांचा संपूर्ण इतिहास खऱ्या महानायकांना नाकारण्याचाच आहे. जेव्हा देश आपल्या स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा ही मंडळी इंग्रजांच्या बाजूनं उभे होते. देश स्वतंत्र झाला अन गांधींची हत्या केली गेली. आजही गांधींच्या विचारांची हत्या करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. ३० जानेवारी आणि २ ऑक्टोबर हे मात्र त्याला अपवाद  आहेत. कोण आहेत ते लोक जे त्यादिवशी 'नथुराम गोडसे अमर रहे!' असा ट्रेंड ट्विटरवर चालवतात. त्यांचे ट्विटर हँडल, फेसबुक पेज प्रोफाइल पाहिलं तर लक्षांत येईल की, ही सारी मंडळी एकाच विचारधारेशी, विचारसमूहाशी जोडलेले दिसतील. जे या देशाला हिंदुराष्ट्र बनवू पाहताहेत. गांधी त्यावेळीही आणि आताही त्यांच्या त्या स्वप्नांच्या आड उभे आहेत. त्यांनी ना त्यावेळेला त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ दिलं नाही ना आज होऊ देत नाहीत. त्यांचं अडचण हीच आहे की, त्यांच्याकडं लोकमान्य नेतृत्व, आदर्श नाहीत. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहास लिहिला जातो तेव्हा यांचा कुणी महानायक यात असत नाही. स्वातंत्र्यानंतर राष्ट्रनिर्माणाच्या ७० वर्षाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा १९४७ पासून पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, मनमोहनसिंग एवढंच नाही तर त्यांच्या आपल्या विचारधारेच्या अटलबिहारी वाजपेयींचं नांवही इतिहासातून काढून टाकतील. पण जेव्हा ह्या कालखंडाचा इतिहास लिहायला लागेल तेव्हा गांधींच्या रूपातले नेहरू जे १७ वर्षे प्रधानमंत्री होते. सर्वसमावेशक विचारांचे अटलबिहारी वाजपेयी यांचाही इतिहास पुसला जातोय. मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातल्या इतिहासात येणाऱ्या पिढीला बरबाद करण्यासाठी पाठ्यक्रम बदलला जातोय. त्यातून गांधींना हद्दपार केलं जातंय. मिटवलं का जातंय तर, गांधी हे हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. त्यामुळं कट्टरपंथीयांनी गांधींची हत्या केली. यांना हे पुसून टाकायचं आहे, कारण यांना हिंदू-मुस्लिम एकता नकोय. मग पुस्तकातून हे का लिहायला हवंय की, गांधी हिंदू-मुस्लिम एकतेचे आग्रही होते. दुसरा उल्लेख काढून टाकण्यात आलाय की, गांधींच्या हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली होती. या सत्यतेला तुम्ही जगातल्या कोणकोणत्या पुस्तकातून हटवणार आहात? आज सोशल मीडियाच्या, इंटरनेटच्या जमान्यात हे तुम्ही कुठे कुठे इरेज करणार, डिलीट  करणार? ही सत्यता कशी हटवाल? गोडसे हा पुण्यातला एक ब्राह्मण होता हे हटवलं गेलंय. कारण यामागे ब्राह्मणवादी विचारसरणी आहे, हिंदुराष्ट्राचं मूळ केवळ जोशी, कुलकर्णी, शर्मा, पाठक, तिवारी नाही तर ब्राह्मणवादी व्यवस्थेतून हे प्रेरित झालेलं आहे. जो मार्ग मनुवादाकडं घेऊन जातो. मनुस्मृतीवादी व्यवस्थेला लागू करतो. संघाचा मूळ विचार जो होता त्यात त्यांनी संविधानाला स्वीकारलं नव्हतं. राष्ट्रध्वज तिरंग्याला स्वीकारलं नव्हतं. त्यामुळं त्यांनी स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वज फडकवण्याचा प्रयत्न केला नव्हता. याबाबतचे सारे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहे.

गांधीहत्येसंदर्भात गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांचं पुस्तक एक आहे 'लेटस किल गांधी', 'गांधीहत्या षडयंत्र और हत्यारे'! सत्ताधारी नेतेमंडळी ज्या व्यक्तीची गांधींच्या जागी प्रस्थापित करू इच्छितात ते आहेत विनायक दामोदर सावरकर! आपणच 'मराठा' या टोपण नावानं लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी स्वतःला 'वीर' असं संबोधलंय. तुषार गांधीं त्यांच्या त्या पुस्तकातल्या पान क्र. ६५ वर लिहितात, 'मुंबईत दादर भागात हिंदू महासभेचे सर्वोच्च नेते विनायक दामोदर सावरकर यांचं घर होतं. ही व्यक्ती जिनं आपल्या कार्यकर्त्यांमध्ये गांधींविषयी घृणा भरवली होती. गांधींची हत्या करण्याची, त्यांना मारण्याचे अनेक असफल प्रयत्न जे पुण्याचे ब्राह्मण आपटे-गोडसे गटानं केले होते, ते सारे सावरकर द्वारा समर्थन दिलेले होते...!' गांधींची हत्या ज्या पिस्तूलानं केली होती ते ग्वाल्हेरमधून पुरवलं गेलं होतं. असाही उल्लेख त्या पुस्तकात आहे. गोडसे गांधींची हत्या करण्यापूर्वी सावरकरांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. अशोककुमार पांडे यांचं पुस्तक आहे, 'उसने गांधीको क्यों मारा?' यात 'कपूर आयोग और सावरकर' असं एक प्रकरण आहे. त्यात पांडे म्हणतात, १४ जानेवारीला आपटे आणि गोडसे सावरकरांना भेटण्यासाठी सावरकरांच्या निवासस्थानी गेले होते. जेव्हा खटला सुरू होता, तेव्हा सावरकरांनी म्हटलंय, ते लिहितात, 'मी त्या दोघांना ओळखतो, कदाचित १४ जानेवारीला आपटे-गोडसे सावरकर सदन इथं आले असतील, पण ते मला भेटले नाहीत. तळमजल्यावर इतर कुणी राहत होते त्यांना भेटून ते गेले असावेत..!' कपूर आयोगाचा तो अहवाल गांधीहत्येचा खटला संपल्यानंतर, गोडसेला फाशी दिल्यानंतर प्रकाशित झाला होता. यात गांधीहत्येच्या संशयाची सुई सावरकरांकडं दाखविलीय. आपल्या देशातच नाही तर जगभरात विविध भाषेत गांधींवर लिहिलेली शेकडो नव्हे हजारो पुस्तकं आहेत. लुई फिशर, व्हिन्सेंट सीन, आणि इतरांनी गांधींची चरित्रे लिहिली आहेत. तुम्ही हे सारं कुठं आणि कसं मिटवणार आहात? प्रभू येशू ख्रिस्तानंतर जगात मानवतेच्या इतिहासात जर कुणावर सर्वाधिक लिहिलं गेलं असेल तर त्यांचं नांव आहे, मोहनदास करमचंद गांधी! गांधींची हत्या करणारे इंग्रज नव्हते. गांधींची हत्या करणारे आमचेच आपले होते. या स्वतंत्र भारताचा एक नागरिक होता, नथुराम गोडसे! त्यामुळं लॉर्ड माउंटबॅटन यांनी गांधीहत्येनंतर म्हटलं होतं, 'ब्रिटिशांची सत्ता असेपर्यंत हे असं घडलं नाही, त्या कलंकापासून आम्ही इंग्रज वाचलो. कारण गांधींची हत्या तुमच्याच भूमीत, तुमच्याच लोकांकडून, तुमच्याच राज्यात झालीय. कुणी इतकं कृतघ्न कसे काय होऊ शकतात की, आपल्या पितातुल्य मार्गदर्शकाची छाती गोळ्यांनी भेदून टाकतात. असं मानवभक्षी टोळ्यांमध्येही होत नाही...!' यावर आपण काय बोलणार? अशा गांधींना पाठ्यक्रमातून हटवण्याचा जर ते विचार करत असतील की, त्यात ते यशस्वी होतील हा त्यांचा गैरसमज आहे. गांधी विश्वमानव होते. ते जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात विसावलेले आहेत. एनसीआरटी चे प्रमुख, देशाचे प्रमुख जेव्हा जगात कुठं जातात तेव्हा तिथं गांधीजी काठी घेऊन शहराच्या प्रमुख चौकात अगदी लंडनच्या संसद भवनासमोरही उभे ठाकलेले त्यांना दिसतात. तिथं जाऊन ते चुकूनही सांगत नाहीत की, आम्ही गोळवलकरांच्या, हेडगेवारांच्या एवढंच नाही तर कधीच सांगत नाहीत की, ते सावरकरांच्या देशातून आलो आहोत. ते सांगतात आम्ही गांधींच्या देशातून आलोय. तिथं जाऊन गांधींच्या प्रतिमेपुढं ९० अंशात वाकून प्रणाम करतात आणि इथं येऊन पाठ्यपुस्तकातून गांधींचं नांव हटवू पाहतात! शेवटी एवढंच सांगतो की, जर्मन तत्वज्ञ डाशनिक हिगेल यांचं एक कोटेशन आहे की, 'इतिहासाची सर्वात मोठी शिकवण हीच आहे की, इतिहासातून कुणी काहीच शिकत नाही...!' संघ परिवार आणि सत्तेत बसलेले लोक इतिहासातून काहीच शिकू इच्छित नाहीत. मोगलांना हटवूनही भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही  मोगलांशिवाय महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं गुणगान कसं करता येईल? हल्दीघाटीचा संग्राम कसा सांगाल? आपल्या गमिनीकाव्यानं मोगलांना पळताभुई थोडी केली होती, हे नव्या पिढीला कसं सांगाल? मोगलांशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही. तर गांधींशिवाय भारताची कल्पनाच करू शकत नाही. इतिहासातच नाही तर, देशाचा स्वातंत्र्यलढा, संविधान, पुस्तकं गांधींशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. मी निश्चिन्त आहे की, गांधींना हटविण्याचा, मिटवण्याचा, पुसून टाकण्याचा प्रयत्न जे करताहेत ते स्वतः संपून जातील. मात्र गांधींच्या प्रतिमेला कुठं काहीच धक्का लागणार नाही, हे निश्चित!
ज्या बंदुकीनं गांधीना मारलं,त्याच बंदुकीनं गांधी करण्याचं
सनातनी समीकरण घेऊन, नथुराम फिरतोय भारतभर
कि जिथं, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला
प्रत्येक गांधी मरतानाही पेरतोय, अहिंसेच तत्व
बंधुकधारी नथुरामच्या डोक्यात....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...