Saturday 28 April 2018

विचार आणि विकास...!

एकाच निश्चयासाठी जीवनाचे समर्पण करणाऱ्याला कालांतरानं अनेक सिद्धी प्राप्त होतात. आचाराशिवाय विचार कितीही सुंदरसा असला तरी तो माणसांवर अत्याचार करतो आणि परिणामी त्याची कार्यशक्ती मारून टाकतो. त्यामुळं कृतिशील विचारधारणाच जगाला तारू शकते. कृतिशीलतेनचं माणसाचा वैचारिक, भौतिक, आणि लौकिक विकास होऊ शकतो. याच दिशेनं गौतम बुद्धानं वाटचाल करीत माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माणूस आपल्या स्वार्थापुरतंच आणि फायद्यापुरतंच स्वीकारत असल्यानं हा विचारांचा विकास आणि विकासाचा विचार हा माणसापासून दूर जाऊ लागला. भगवान बुद्धानं आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून हा विचार मांडला. पण याचा विसर आताशी पडू लागलाय. म्हणून आचारामध्ये फरक पडू लागलाय. कोणतीही बाब ऐकण्याऐवजी ऐकविण्याचीच संवय त्याला लागलीय. सकारात्मक विचार हीच विकासाचीच जननी आहे. आश्वासन देणाऱ्यांना याची जाणीव कधी आणि कशी होणार? हाच खरा प्रश्न आहे. उद्या बुद्धजयंती! या महामानवाच्या अमोल विचारांवरून खरी तर वाटचाल व्हायला हवी आहे. मात्र तसं होताना दिसत नाही. याचेच वाईट वाटते. बुद्धजयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचं आणि आचारांचं मनन-चिंतन आणि आचरण व्हावं ही अपेक्षा! त्या महामानवाला विनम्र अभिवादन...!"
-----------------------------------------------
*स* ध्या सगळीकडे आश्वासनाचाच जमाना आहे. आश्वासन देण्याची भूमिका आजवर नेहमीच राजकारण्यांची ही संवय आता सगळ्याच स्तरांवरील लोकांना लागलीय. प्रत्येकाचं जगणं हे वेगळ्या कारणासाठी असतं. पुष्कळ माणसं ही केवळ मनोरथावर जगत असतात. तर त्यापैकी काही स्वप्नावर जगत असतात. आज अमुक अमुक करायचं, अमुक वेळात ही गोष्ट पार पाडायची. अशा विचारांचं भरतकाम चालूच असतं. पण या दुरंगी दुनियेत राहणाऱ्या माणसांत एक खास खुबी असते. निश्चय केल्यावर काम करण्यासाठी जे बळ लागतं, ते त्यांच्यापाशी नसते आणि एकच काम घेऊन त्यात आरपार शिरण्याची ताकद नाही. मनोरथाला रचनात्मक शक्तीची चाकं असावी लागतात. ती नसली तर रथ पुढं जात नाही. मनाच्या रेशमी पडद्यावर भले अनेक प्रकारची चित्रं आकार घेतात पण जोवर चित्रकार हातात कुंचला घेऊन प्रत्यक्ष काम करत नाही, तोवर त्याची कोणी किंमत करत नाही. अंतरातील तारांमधून काव्याचा झणत्कार निघतो आहे. पण कवी जोवर शब्दांची सुरावट जमवत नाही तोवर ओठ त्याला ओळखू शकत नाहीत. प्रेरणेतून परसेवेचं पाणी बरसले नाही, तर त्या प्रेरणेचं वाळवंट व्हायला वेळ लागत नाही. बरीच माणसं असा बहाणा करतात की, आमच्या योजना महान आहेत. आमचे विचार जग उजळून टाकतील असे आहेत. पण काय करणार? संधी नाही. अनुकूल वातावरण नाही नि आम्हाला प्रोत्साहन द्यायला कोणी नाही. बुद्धिमान आहेत ते काही करू इच्छित नाहीत, अगर करायला भितात. तेच सत्वहीन शब्द उच्चारतात आणि हात जोडून एका कोपऱ्यात बसतात. खरी गोष्ट अशी आहे की, महान कार्य करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही. तशी परिस्थिती कधीच मिळत नाही. उलट सृजनशीलता नेहमी प्रतिकूल परिस्थितीत उफाळून येत असते. जेव्हा जेव्हा आपत्तीचे डोंगर कोसळतात तेव्हा तेव्हा सृजनशील माणसांची शक्ती प्रचंड रूप धारण करून कार्यसिद्धीसाठी झुंजते.

*प्रतिकूल परिस्थिती नमवू शकत नाही*
पर्वतावरून नदी निघते तेव्हा ती कधी म्हणत नाही की, माझ्या वाटेत दगड आहेत, मी पुढं कशी जाऊ? ती तर वाटेतल्या दगडांशी टकरा देत हैराण होते. आपला वेग वाढवते आणि अखेर वाटेतल्या खडकांना भेदून सागराची भेट घ्यायला जाते. किनाऱ्यावर काळाकभिन्न कडा उभा आहे. हे पाहून समुद्राच्या लाटा परत गेल्याचं कधी ऐकलं नाही. आकाशात चौफेर घनघोर वादळ घोंघावत आहे आणि त्यातून आपला प्रकाश पृथ्वीवर पोहोचणार नाही. या भीतीनं सूर्य काही तोंड लपवत नाही. आपण फुललो तर, माळी आपल्याला खुडून नेईल या भयानं गुलाब कळी बनून राहत नाही. ज्याला काही करून दाखवायचं आहे. प्रकाशित व्हायचं आहे, उमलायचं आहे, पुढं जायचं आहे. त्याला प्रतिकूल परिस्थिती कधी नमवू शकत नाही. ते जय पराजयाची पर्वा न करता आपली प्रचंड शक्ती पणाला लावतात.

*विचार कृतीत आणणं हा कल्याणाचा मार्ग*
 इतिहासाच्या पानावर नोंदलेल्या किती पुरुषांच्या मार्गात गुलाबांच्या मुलायम पायघड्या घातलेल्या होत्या, हे कुणी सांगेल? गौतम बुद्ध मध्यरात्री संसाराचा त्याग करून बाहेर पडले त्यावेळी त्यांनी असा विचार केला नव्हता की, बाहेर पौर्णिमेचं शुभ्र चांदणं पसरलेलं असेल तर बरं! जीझस ख्राईस्ट, महंमद पैगंबर, महावीर प्रभू यांनी प्रथमपासूनची परिस्थिती अनुकूल होती, असं कोण म्हणू शकेल? असं केलं तर लोक हसतील, तसं केलं तर आणखी कुणी शिव्याशाप देतील, असा विचार करणारा कधीच कल्याणयात्रा सुरू करू शकत नाही. जीवनाच्या प्रत्येक कार्यामध्ये पावलोपावली अडचणी उभ्या राहायच्याच. संकटांनी गडबडून जाणारा कितीही बुद्धिमान असो, त्याचे विचार कितीही सुंदर असोत, तर तो निकामीच समजला पाहिजे. त्याचे विचार अगदी कागदी फुलांसारखे. त्यात सौंदर्य असते पण सुगंध नसतो. विचारांमध्ये थोडी कृती घातल्याशिवाय त्यांना सुगंध येत नाही. बियाणे कितीही चांगलं असलं तरी त्याची मशागत केली नाही, तर त्यातला अंकुर कधी प्रकाश पाहू शकत नाही. अनेक प्रकारचे विचार करीत नुसतं बसण्यापेक्षा एकच विचार कृतीत आणण्याचा प्रयत्न करणं हा कल्याणाचा मार्ग होय!

*कृतिशील विचारधारणाच तारू शकेल*
 एकाच निश्चयासाठी जीवनाचे समर्पण करणाऱ्याला कालांतरानं अनेक सिद्धी प्राप्त होतात. आचाराशिवाय विचार कितीही सुंदरसा असला तरी तो माणसांवर अत्याचार करतो आणि परिणामी त्याची कार्यशक्ती मारून टाकतो. त्यामुळं कृतिशील विचारधारणाच जगाला तारू शकते. कृतिशीलतेनचं माणसाचा वैचारिक, भौतिक, आणि लौकिक विकास होऊ शकतो. याच दिशेनं गौतम बुद्धानं वाटचाल करीत माणसांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु माणूस आपल्या स्वार्थापुरतंच आणि फायद्यापुरतंच स्वीकारत असल्यानं हा विचारांचा विकास आणि विकासाचा विचार हा माणसापासून दूर जाऊ लागला. भगवान बुद्धानं आपल्या सकारात्मक दृष्टिकोनातून हा विचार मांडला. पण याचा विसर आताशी पडू लागलाय. म्हणून आचारामध्ये फरक पडू लागलाय. कोणतीही बाब ऐकण्याऐवजी ऐकविण्याचीच संवय त्याला लागलीय. सकारात्मक विचार हीच विकासाचीच जननी आहे. आश्वासन देणाऱ्यांना याची जाणीव कधी आणि कशी होणार? हाच खरा प्रश्न आहे.

*दुःखाचं मूळ गौतम बुद्धांना सापडलं*
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.

*तृष्णा हेच साऱ्या दुःखाच मूळ आहे*
दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले. ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले. यालाच आर्य अष्टांगिक मार्ग म्हणतात.

*प्रतीत्य आणि समुत्पाद याचं ज्ञान झालं*
हिंदू धर्मीयांचा आहे तसा बौद्धांचा कर्मावर व पुनर्जन्मावरविश्वास नाहीे. तेव्हा हे जन्ममरणाचे रहाटगाडगे कसे चालते, याचे स्पष्टीकरण करणारा प्रतीत्य-समुत्पादही त्यांना समजला. प्रतीत्य-समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होते ती स्वयंभू नसून काही तरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून असते. तेव्हा जन्ममृत्यू कसे होतात, याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारणपरंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्मांशी कार्यकारणपरंपरेने कसा संबंध पोहोचतो, हे प्रतीत्य-समुत्पादात सांगितले आहे.
बुद्ध पौर्णिमेला विशेष ठिकाणी  सामूहिक प्रार्थनाकरण्याची प्रथा आहे.

- हरीश केंची,
९४२२३१०६०९

चौकट......

*मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म!*

बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मियांचा प्रमुख सण आहे. हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्‍ती आणि महापरिनिर्वाण या तीनही घटना घडल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वांत महान महापुरुष होते, असे मानलं जातं. आज बौद्ध धर्माला मानणारे, प्रामुख्यानं भारत, चीन, नेपाळ, सिंगापूर, व्हिएतनाम, थायलंड, जपान, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार, इंडोनेशिया, पाकिस्तान इत्यादी देशांतील दोनशे कोटींहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. गृहत्यागानंतर सिद्धार्थांनी सत्याच्या शोधासाठी तिथं सात वर्ष कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यानंतर त्यांना एकाबोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्‍ती झाली. ही घटना वैशाख पौर्णिमेला झाली. तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो.बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर इथं महापरिनिर्वाण विहार एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते. हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातीला हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात. येथील बौद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यास येतात. या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणाशी जोडले गेले आहे. या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारासारखे आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्युशय्येवर पडलेल्या अवस्थेतील म्हणजेच भू-स्पर्श मुद्रा ६.१ मीटर लांब अशी मूर्ती आहे. ही मूर्ती लाल मातीपासून बनवलेली आहे. जिथून मूर्तीसाठी माती काढली आहे तिथंच हे विहार तयार केलं आहे.विहाराच्या पूर्व भागात एक स्तूप आहे. तेथे गौतम बुद्धांवर अंतिम संस्कार झाले. असं मानलं जातं.
श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस 'वेसाक' उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा 'वैशाख' शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी तिकडं बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात. घरे फुलांनी सजवतात. जगभरातून या दिवशी अनुयायी बोधगया इथं येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथांचे वाचन, पठण केलं जातं. विहार तसंच घरातील बुद्धाच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते. बोधिवृक्षाचीही पूजा केली जाते आणि त्याच्या फांद्यांना पताकांनी सुशोभित केले जाते.वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांमुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दिल्ली येथील संग्रहालयातील बुद्धाच्या अस्थी सर्वांना दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना करतात.

Saturday 21 April 2018

कामासुरांच्या उरावर थयाथया नाचायला हवं!

बिळात दडलेल्या जनावराला बाहेर काढण्यासाठी मिरच्या पेटवून त्याची धुरी दिली जाते. तशाप्रकारे जनक्षोभाची धुरी धगधगत ठेवून बिळात दडलेल्या बलात्काऱ्यांना, अत्याचार करणाऱ्यांना बाहेर खेचण्यासाठी महिला रणरागिणी बनून रस्त्यावर यायला हव्यात. लेकीबाळींना बरबाद करणाऱ्यांविरुद्ध संतापाने खदखदत हजारोंच्या संख्येनं पुन:पुन: रस्त्यावर येऊन त्यांना हुडकून काढून चेचून सरळ करायला हवंय. खरं तर कालीमातेचा अवतार बनून या कामासुरांना, दामासुरांना पालथं पाडून त्यांच्या उरावर थयाथया नाचायला हवंय! अक्षरशः पांच सहा वर्षाच्या मुलींवर अत्याचार होतो, थिजलेल्या नजरांनी आणि शुष्क भावनांनी संवेदना संपलेला आपला हा समाज बातम्या वाचतो आणि विसरून जातो. त्या बिचाऱ्या अजाण मुलींना त्यांचा देह ही भोगाची खाण आहे ह्याचीच काय, पण आपण स्त्रीलिंगी आहोत म्हणजे काय आहोत, याचीही कल्पना नसते, एवढ्या छोट्या वयात अत्याचार होतो. दुसऱ्याच्या विकृत वासनेपायी आपलं सारं बालपण-जीवन उद्ध्वस्त करून घ्यावं लागावं यासारखी लांच्छनास्पद गोष्ट दुसरी नसेल. पण दुर्दैवानं ह्या लांच्छनालासुद्धा जणू मोहोर फुटलाय, त्यामुळं अशा पाशवी घटना जागोजागी घडताहेत. आमच्या मुलीबाळींना नासवणारे हे साप ठेचून काढण्यासाठी जागरूकता, ऐक्य दाखवू शकलो तरच सत्ता आणि मत्ता यांचा कैफ चढलेली बेधुंद बेफाम  झालेली कारटी ताळ्यावर येतील!"
---------------------------------------------
*ब* लात्काराच्या घटनांनी सारा देश हादरून गेलाय. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जीवनाचा आनंद घेऊ पाहण्याऱ्या कळ्यांना कुस्करून टाकलं जातंय. या कळ्यांचे विकृत वासनेच्यापोटी क्रूरपणे बळी घेतले जाताहेत. जम्मू काश्मीरमध्ये कठुआ जिल्ह्यातल्या एका खेडेगावात असिफा या ८ वर्षाच्या मुलीवर सात दिवस बलात्कार करून तिला मारून देवळाच्या मागे टाकलं. या कुकर्माचं धिक्कार करायचं सोडून तिथले भाजपच्या दोन मंत्र्यांसह अनेक नेतेमंडळी धार्मिक आधारावर त्यांचं समर्थन करत होते. उत्तरप्रदेशातल्या उन्नावमध्ये झालेल्या बलात्कारात भाजपचाच आमदार भावासह दोषी सापडला. गुजरातच्या सुरतमध्ये असाच प्रकार उघडकीला आलाय. एकापाठोपाठ एक अशा घटना उघडकीस येताहेत. लहान मुलींवरील अत्याचाराच्या घटनांचा बातम्या आल्या. देशभरात फक्त सोशल मीडियातच नाही तर प्रत्यक्ष रस्त्यावर आक्रोश उमटतोय. डोकं सुन्न करणारी अशी प्रकरणं दररोज उघडकीस येताहेत.

*जागोजागी अशा घटना घडताहेत*
दूरचित्रवाणीवरील विविध वाहिन्यांवरून गुन्हेगारी विषयक कार्यक्रम सादर केले जातात. या साऱ्याच कार्यक्रमातून एखादं दुसरी घटना सोडली तर व्याभिचाराच्या, वासनाकांडाच्या, लैंगिक अत्याचाराच्या, बलात्कारासारख्या बातम्यांच प्रामुख्यानं आढळून येतात. देशात आणि राज्यात दिवसेंदिवस अनैतिक, व्याभिचार, लैंगिक विकृती, अत्याचार याचे प्रमाण वाढताना दिसताहेत. लहान मुलींवर बलात्काराच्या घटना सध्या वाढल्याने त्याची मोठी चर्चा प्रसिद्धीमाध्यमात सुरू आहे. जागोजागी वासनाकांडे उभी राहताहेत. वाट्टेल ते करून सत्ता मिळवायची, ती टिकविण्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी असणाऱ्या आणि अब्रूपेक्षा अन्य गोष्टी सांभाळण्याचीच संवय लागलेल्या महाभागांची कारटी या अशा घटनांत प्रामुख्यानं असलेली दिसतात.अशा घाणेरड्या प्रकरणात गुंतलेल्या, आपलं सारं आयुष्य उध्वस्त करून टाकण्याएवढा नीच गुन्हा सहजपणे करणाऱ्यांच्या पालकांना आज अश्रू ढाळण्याची वेळ आलीय. निलाजरेपणाने लोकांपुढं येत असतील आणि अशा घटनांमागे व्यक्तिदोष राजकारण आहे, असे खुलासे करत असतील, पण रात्री अंथरुणावर पडल्यावर अथवा एकाकी असल्यावर ही सगळी आपल्याच पापाची, आपल्याच बेजबाबदारीची, आपल्याच गैरगोष्टीत सहभागी होण्याची फळं आहेत. हे त्यांना जाणवत असणार!

*सत्ता आणि मत्ता यानेच अशा घटना घडताहेत*
सत्ता आणि मत्ता म्हणजे अधिकार आणि पैसे पचवायलाही माणूस समर्थ असायला लागतो. आपल्या प्रत्येक गोष्टीकडे समाजाचे लक्ष आहे, याची जाणीव त्याला असावीच लागते. लोकांची पर्वा नसेल त्यातल्या एखाद्याला वाटतं, पण तो सर्वज्ञानी, सर्वसाक्षी, निर्मिक परमेश्वर, जगतचालक माझ्यावर लक्ष ठेवतोय त्याची पर्वा करायला हवी, असं त्या एखाद्याला वाटायलाच हवं. हे जेव्हा वाटेनासं होतं तेव्हा घसरण सुरू होतं. मुलं बेफाम बनतात. स्वतःच्याच नव्हे सगळ्या खानदानाच्या तोंडाला काळ करावं लागेल. हे सगळं नक्की कशामुळे घडलं याचा खोल अभ्यास करून मगच निष्कर्ष काढले गेले पाहिजेत. जेव्हा समाजाचेच नैतिक अधःपतन होतं तेव्हा असं घडणारच! याबाबत समाजानेच आत्मचिंतन करायला हवंय. वाढती लैंगिकता फक्त राजकारणाशी, सत्तेशी गुरफटलेली नाही. तिनं नानाप्रकारे तुमच्या मुलाबाळांना घेरलंय. इंग्रजीच नव्हे तर आपल्याकडच्या हिंदी चित्रपटातून किंवा दाक्षिणात्य चित्रपटातून तर गाणी आणि नृत्य यांच्या साह्यानं मैथुनच पडद्यावर दाखवलं जातं. नट्याचं अंग हलवणं, असासे, उसासे टाकणं हे तरुणांचीच नव्हे, म्हाताऱ्यांचीही विकृत वासना चाळवण्यासाठीच असते. असाच अनुभव येतोय, याबाबत कुणीच काही बोलत नाही. अशी दृश्ये देणाऱ्या नट्या आज निषेधाचे फलक घेऊन पोज देताहेत, हा दांभिकपणा आहे.

*समाजमनाला विकृत वळण दिलं जातंय*
कायद्याचे रक्षक पोलीस, वकील, न्यायाधीश आणि ज्यांच्याबद्धल परंपरेनं आदरभाव जोपासला जातो, अशा शिक्षक, प्राध्यापक, मार्गदर्शक व्यक्ती यांचे अत्यंत गैरचित्रण पद्धतशीरपणे हिंदी चित्रपटातून, साहित्यातून होत असते आणि त्याबद्धल कुणीही, कधीही संताप व्यक्त केलेला नाही. जी वासनाकांडे गेल्या काही दिवसात धगधगली वा आज जी धगधगताहेत ती बघितल्यावर हिंदी चित्रपटांनी समाजमनाला किती विकृत वळण दिलंय, हे दिसून येतं. रस्त्यात जाणाऱ्या अनोळखी मुलीला अडवून तिला पटविण्याची हिंमत या चित्रपटातल्या नायकांनी दिली आणि त्या मुलींना रांडबाजी करायला लावून त्यांच्या साह्यानं मौजमजा करण्याइतपत पैसा कमावण्याची शक्कल या चित्रपटातल्या खलनायकांनी दिली. तरुण-तरुणींचे अर्धनग्न तांडे कामक्रीडांची आठवण व्हावी, अशी झटकाझटकी करत नाचताहेत आणि चोळीच्या आंत काय दडलंय हे तपासताहेत. आपल्या खटियाजवळ सरकावत आहेत. ओले-ओले कोरडे-कोरडे किंचाळताहेत. हे सारे आपण मिटक्या मारीत बघत आलो. घरातल्या दुरदर्शनपुढे आई-बाप-मुलं या सगळ्यांत रंगू लागली, तर आपल्या घराच्या सिनेमा का होणार नाही? आपल्या मुलीला रस्त्यात गाठून लॉजवर मजा मारायला नेण्याचा प्रकार का नाही घडणार? हे हरामखोर अशा वासनकांडात गुंतले आहेत. त्यांना जगणं हराम व्हावं, एवढा उग्र संताप खदखदत ठेवण्यासाठी समाज का पुढाकार घेत नाही? स्त्रियांच्या, मुलीबाळींच्या असहायतेचा गैरफायदा उठविणाऱ्याला स्त्रियांच्या धगधगत्या संतापाची तीव्रता अनुभवायला लावणेच योग्य ठरेल. बलात्कार करणाऱ्याचा कुठलाही अवयव कधीच फुरफुरत उठू नये एवढा चोप त्या बलात्काऱ्याला देण्याची संधी समाजाने का घेऊ नये, जे कुणी पोलिसांच्या हाती न सापडता सोज्वळता मिरवत बसले आहेत त्यांना महिलांनी, समाजाने गुपचूप चढाई करून 'बडवून' काढलं तर समस्त महिला वर्गालाच नव्हे, भेकडपणे या अशा प्रकरणी आपलं सौजन्य सांभाळत बसलेल्या महाभागांना आनंद होईल.

*अत्याचाराच्या अशाही घटना घडताहेत*
प्रसिद्धी माध्यमं अशा बाबी रवंथ करीत बसतात. समाजही थंड संवेदनाहीन बनू लागलाय. काही गैर घडलं तर गुपचूप न बसता जाहीरपणे बोंब ठोकून अत्याचाऱ्याला अद्दल घडविण्याची हिंमत मुली महिलांनी दाखवायला हवी. अशा दुर्दैवी व अत्याचाराला बळी पडलेल्या मुलींना मनाची उदारता दाखवून आपलं म्हणणारे तरुण पुढं यायला हवेत. आईबापांनी अशा कामात दिलदारपणे मुलांना सर्वप्रकारे प्रोत्साहन द्यायला हवं. आपलीच मुलं आपल्यापैकी कुणाच्यातरी मुली फसवतात, नासवतात, धंद्याला बसवतात, ब्लॅकमेल करण्यासाठी या दुर्दैवी मुलीसोबत केलेल्या संभोगाच्या चित्रफिती बनवतात, ही गोष्ट काळजात दुःखाचा वणवा उठवणारी आहे. मस्तकात आग पेटवणारी आहे. आपल्या मुलांना आपणच या अशा प्रकरणात सडवत घालणार आहोत का?

*उन्माद मस्तकात भिनलाय*
असले नीच प्रकार करणाऱ्यांच्या पाठीशी सुप्त असो वा प्रच्छन्न असो, सत्तेचं आणि मत्तेचं पाठबळ आहेच. आमचं कोण काय वाकडं करणार? आम्ही सगळं दडपू शकतो, अशी खात्री असल्यानेच हे सारे बेफाम बनले आहेत. आमच्या हाती सत्ता आहे. कायद्याच्या रक्षकांना आम्ही आमच्या तालावर नाचवू शकतो. लोकांना धमकावू शकतो आणि जरूर तर पैसा फेकून आमच्या पापावर पांघरूण घालू शकतो असा उन्माद त्यांच्या मस्तकात भिनलाय आणि स्त्रीला अशाप्रकारे वापरायचे असते असा विकृत विचारही त्यांच्या मस्तकात रुजत असतो. अशा या समाज नासवणाऱ्या प्रकाराबद्धल राजकीय पक्ष मूग गिळून गप्प आहेत. राजकीय व्यासपीठावरून राणा भीमदेवी थाटाची भाषणं करणारे लोक लैंगिक शोषणाबाबत काहीच बोलत नाहीत. स्त्रियांच्या समान अधिकारासाठी भांडणारे डावेही शांतच आहेत. मोठा गाजावाजा करत महिलांच्या विकासाचे धोरण जाहीर करणाऱ्या पक्षालाही याचं तर जणू सोयरसुतकच नाही अशी परिस्थिती आहे.

 *डोक्याला मुंग्या आणणारी घटना*
मध्यंतरी टाईम्स नाऊ चॅनेलवर एक मेंदूला मुंग्या आणणाऱ्या घटनेवर चर्चा सुरू होती. 'बंगळुरू शहरात पुन्हा एकदा 'निर्भया' सारखं प्रकरण घडलं होतं, भर दिवसा एका तरुणीवर मद्यधुंद झालेल्या सहा तरुणांनी पाशवी बलात्कार केला. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर तिला विवस्त्र केलं, तिचे ते अंगावरचे कपडे जाळून टाकले. तिचे हात-पाय दगडाने ठेचुन तिला जखमी केलं. या साऱ्या घटनेचा व्हिडीओ चित्रणही त्या नराधमांनी केलं आणि त्या मुलीला त्याच असहाय अवस्थेत तिथंच टाकून ते पळाले. ती तरुणी त्या जखमी अवस्थेत सरकत सरकत जवळच असलेल्या कचरा पेटीत गॅरेजवाल्यांनी टाकलेले ऑईलचे गलिच्छ कापड आपल्या लज्जारक्षणासाठी वापरले. तिथल्या बसस्टॉपवर जाऊन ती मृतवत अवस्थेत पडून राहिली. तब्बल ४८ तास ती तरुणी तिथं होती जाणारे येणारे पाहात होते पण कुणीही तिला मदतीचा हात दिला नाही. संवेदनाहीन समाज, थिजलेली मनं याचं दर्शन इथं घडत होतं. एका समाजसेवी संस्थेच्या अनोळखी महिलेनं तिला रुग्णालयात दाखल केलं, तेव्हा ही दुर्दैवी घटना उघडकीला आली

*घराचं थिएटर झालंय*
विजापूरच्या विजयानगर परिसरात अशाच एका शालेय मुलीवर चार जणांनी पाशवी बलात्कार तर केलाच शिवाय तिची निघृण हत्याही केलीय.
पुण्यातही पिंपरी चिंचवडला सहा मद्यधुंद तरुणांनी दोघा अल्पवयीन बहिणींना सामूहिक बलात्कार केलाय. अशा दुर्दैवी घटना दररोज दुरचित्रवाणीवर आणि वृत्तपत्रातून पाहतो वाचतो. सामाजिक संवेदना तर केव्हाच मेल्यात. अशा प्रकारानंतर प्रतिक्रिया उमटायला हव्या होत्या पण तसं झालंच नाही. घराचं थिएटर आणि टीव्हीवरच्या नंगानाच सहकुटुंब सहपरिवार पाहणाऱ्या समाजाला त्यातली बीभत्सता कशी जाणवणार? त्या निरागस मुलीवर झालेला अत्याचार हा माणुसकीला काळिमा फासणारा आहे. स्त्रियांवर अत्याचार करणारा स्त्रीला माणूस मानतच नाही. सामुहिक बलात्कार, फसवणुकीनं बलात्कार, चंदेरी दुनियेतील झगमटावर भाळलेल्यांचा घेतलेला गैरफायदा या सगळ्या गोष्टी पुरुषात पशुत्व असल्याचं दर्शवतात. अशावेळी तो स्त्रीशरीराची, मनाची पर्वाच करीत नाही. स्त्री शुद्धीवर आहे की मेलीय याचाही तो विचार करत नाही. बंगळुरातला सामूहिक बलात्कार या गोष्टी समाज किती सडलाय, रसातळाला गेलाय हे दर्शवतात. एका तरुणीवर सहा सहा जण अत्याचार करतात, तिच्या देहाचा चोळामोळा करतात, तिची तडफड त्यांना दिसत नाही, त्यांचं मन द्रवत नाही. एकाकी असहाय स्त्रीवर ते झडप घालतात. सत्ता, पैसा आणि ताकद या तिन्हींचा या दुष्कार्मासाठी वापर केला जातो. सारं करून साळसूदपणे मिरवायला पुरुषपशु मोकळे सुटतात याविरुद्ध संघटित आक्रदन व्हायला हवं!


 चौकट....

*पौरुष्यच कापायला हवंय!*
बलात्कारासारखा नीच प्रकार करण्याचं धाडस... धाडस कसलं ते कुकर्म करताना पोलीस, कायदा, समाज यांची कसलीच भीती त्यांना वाटत नाही? या साऱ्या नीच प्रकाराविरुद्ध स्त्रियांनी, त्यांच्या संघटनांनी, विविध पक्षात काम करणाऱ्या स्त्रियांनी एकत्र यायला हवं. अत्याचारी पुरुषांच्या छाताडावर काली होऊन स्त्रीशक्ती थयथया नाचू शकते. जोवर आपल्या अब्रूच्या अंगाराने ज्वाला ओकत स्त्री उभी राहत नाही तोवर अशाना भीती वाटणार नाही. अब्रू लुटली गेली की, स्त्री असहाय होते, मन मारून जगते. इंद्र भोगून जातो आणि अहिल्या दगड होऊन पडते. ही नुसती पुराणकथा नाही तर वर्तमानकथाही आहे. स्त्री जोवर हिंमत दाखवणार नाही तोवर असंच होणार. माझी अब्रू तू लुटलीस तुझी अब्रू मी चव्हाट्यावर लुटणार म्हणून स्त्री बेडरपणे उभी राहिली, तर भल्याभल्याची पाचावर धारण बसेल. आज ना उद्या हे होणारच! त्यासाठी डॉ. राममनोहर लोहिया जे सांगत ते प्रत्येकीने लक्षात घ्यायला हवं. ' पावित्र्य हे केवळ कौमार्याशी संबंधित नाही बलात्कार करणाऱ्याला बरबाद करण्याची जिद्द धरायला हवी.' अत्याचारी पुरुषाचे पौरुष्य कापून टाकण्याचा प्रकार घडल्याचे अधूनमधून वृत्तपत्रातून वाचनात येतं. डिंपल कपाडिया-नाना पाटेकर असलेल्या कुठल्यातरी हिंदी सिनेमात हे प्रकर्षानं दाखवलं होतं. जयवंत दळवींच्या 'पुरुष' नाटकात हे केव्हाच सांगितलं आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 14 April 2018

माईसाहेब आंबेडकरांचे अस्वस्थ जीवन!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अखेरच्या काळात त्यांची  सावली म्हणून वावरलेल्या डॉ.सविता आंबेडकर उर्फ माईंसाहेब यांचं इंग्रजीवरचं प्रभुत्व कमालीचं थक्क करणारं होतं. ते त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमावलेलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर माईंना डॉक्टरी व्यवसाय करणं कठीण नव्हतं. तो केला असता तर त्यांनी करोडो रुपये कमावले असते. आणि वृद्धत्वातली झालेली फरफटही त्यामुळं टळली असती. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन वैभवावर ओरखडाही उमटणार नाही, असं आयुष्य माईसाहेबांनी स्वीकारलं. वयाची नव्वदी त्यांनी पार केली होती. त्यातली शेवटची ४५ वर्षं तर त्यांचा जीवन प्रवास हा एकटीचाच होता. तो त्यांनी पतीनं दाखवलेल्या बौद्धधर्माच्या वाटेवरून पार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातला जिवाभावाचा अखेरचा दुवा म्हणजे माईसाहेब आंबेडकर! त्यांचं जीवन हे अस्वस्थ करणारं होतं. काल डॉ. बाबासाहेबांची जयंती होती त्यानिमित्तानं या माऊलींचीही आठवण करणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच!"
------------------------------------------------

*डॉ.* सविता उर्फ माईसाहेब आंबेडकर यांचं अवघं आयुष्य चक्रावून टाकणारं आहे. माईंचा डॉ. आंबेडकर यांच्याशी परिचय वैद्यकीय उपचाराच्या निमित्तानं मुंबईच्या गिरगाव चौपाटीजवळील डॉ. मालवणकर यांच्या रुग्णालयात झाला. तेव्हा बाबासाहेबांनी वयाची पन्नाशी गाठली होती. तर माई तिशीपार झाल्या होत्या. दिसायला देखण्या असलेल्या माई सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील होत्या. स्वभाव बंडखोर होता. त्यामुळं त्यांनी घेतलेला लग्नाचा विचार तसा दुय्यम ठरला. पण उपचाराच्या निमित्तानं बाबासाहेबांशी झालेल्या बोलचालीनं माईंच्या हृदयात प्रेमकमळ फुलू लागलं. ते वैचारिक ओढीचं होतं. प्रथम पत्नी रमाबाईंच्या निधनानंतर बाबासाहेबांचं सांसारिक जीवन संपलं होतं. तथापि विचारांचं आदान-प्रदान करणाऱ्या 'पार्टनर'ची उणीव बाबासाहेबांसाठी जुनीच होती. ती उणीव उपचारानंतर माईंशी होणाऱ्या भेटीगाठीतून भरून निघतेय, याची जाणीव बाबासाहेबांना होऊ लागली. बाबासाहेब उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले होते. तेव्हा तिथल्या तरुणांत मनगटाभोवती सोन्याची चेन आणि त्याला पदक लटकविण्याची फॅशन होती. बाबासाहेबही तेव्हा पदकावर नांगर कोरलेलं ब्रेसलेट वापरीत. एकेदिवशी ते त्यांनी माईंच्या हातावर ठेवलं आणि त्या पदकावरील नांगरावर बोट ठेवीत म्हणाले, 'समुद्रात नांगर टाकल्यावर जहाज स्थिरावतं, तसं तुझ्या साथीनं माझं जीवन स्थिरावेल.' त्यानंतर दोघांनी पूर्ण विचार करून विवाहाचा निश्चय केला.

*घटना निर्मिती, धर्मांतरात मोलाची साथ*
भारत सरकारचे पहिले कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्या दिल्लीत राहू लागल्या. माईंची ही साथ बाबासाहेबांच्या 'राज्यघटना' निर्मितीच्या कामात आणि धर्मांतराच्या कार्यात मोलाची ठरली. या काळात माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली नसती तर बाबासाहेबांनी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणं अवघड होतं. यासाठी माईंनी बाबासाहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्याचा फटका माईंना बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बसला. उच्चविद्याविभूषित माईंनी अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीतील डॉ. आंबेडकरांशी केलेला विवाह ही त्या काळातली मोठी समाज क्रांती होती. तो आदर्श आंतरजातीय विवाह ठरला. परंतु त्यानं डॉ. आंबेडकरांचे आप्त-अनुयायी दुखावले होते. परिणामी बाबासाहेबांच्या निधनानंतर उपेक्षेचं जिणं माईंच्या नशिबी आलं. ज्यांना सूड घ्यायचा होता त्यांनी माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली. त्यामुळं बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांकडील पाहुणचार झोडण्यात, त्यांच्याबरोबर समारंभात जाण्यास प्रतिष्ठेचं मानत; तेच माईंच्या माहेरकडील लोक माईंवरील किटाळाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून माईंना टाळू लागले. इतकंच नव्हे तर त्या किटाळाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी पेरू लागले.

*आप्तांनी नातेवाईकांनी देखील टाळलं*
डॉ.आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी तर त्यांना कधीच आपलं मानलं नाही. १९७२पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन घालवत होत्या. त्यानंतर दलित पँथरच्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढालेंनी त्यांना मुंबईत आणलं. तिथं त्या भावाकडे दादरला राहत. त्यानंतरच्या काळात त्या बेस्ट बसेस मधून प्रवास करताना अनेकांना दिसल्या. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या बळकट होत्या, तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला साजेल अशा हिंमतीने त्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही हलाखीच्या फेऱ्यात जखडलेला नाही. बहिणींची घरं तर करोडपती उद्योगपती आहेत. पण माईंना दिल्लीत जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताची माहिती समजूनही कुणी दिल्लीला धडकलं नाही. त्यानंतर मुंबईत असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. बाबासाहेबांच्या विचारांमुळे माईंचं निकटवर्ती झालेल्यांनी त्यांना दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटल्स मध्ये दाखल केलं. त्याची माहिती आप्तांना दिली, पण कुणीही आलं नाही. त्यांची एक श्रीमंत  बहीण हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आली, पण प्रकृतीच्या अस्वास्थाचं कारण देऊन तिनं तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणाऱ्या माईंना भेटण्याचं टाळलं.

*बाबासाहेबानंतर अकारण माईंना बदनाम केलं गेलं*
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिगत जीवनातील अखेरचा दुवा म्हणजे सविता उर्फ माई आंबेडकर! डॉ.आंबेडकर हे अतिविशाल वृक्षांसारखे होते! ज्याप्रमाणे विशाल वृक्षाची छाया घनदाट असते, आश्रयाला येणाऱ्या प्रत्येकाला कोणताही भेदभाव न ठेवता विश्व, सावली देते, आपल्या अंगावर ऊन, पाऊस, वर सोसून इतरांना शीतल छाया देण्याचं काम आपल्या अवयवांच्या सिंचनातून करीत असतो.  त्याप्रमाणे बाबासाहेबांनी कोट्यवधी लोकांना आश्रय दिला, त्यांचा उद्धार केला. अनेक नेते कार्यकर्ते निर्माण केले. त्यासाठी त्यांनी मोठा त्याग केला. झीज सोसली, पण ज्यावेळी विशाल वृक्ष उन्मळून पडला त्यावेळी त्याच्या आश्रयाने संरक्षणासाठी वाढत चाललेली लहान लहान झुडपं डोकं वर काढतात आणि एकमेकांवर कुरघोडी करून आपला मोठेपणा दाखवतात, अगदी असाच प्रकार डॉ. आंबेडकरांच्या आश्रयाखाली निर्माण झालेल्या नेत्यांबाबत घडला. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर नेतृत्वाबाबत प्रत्येकालाच हवं सुटली होती, पण त्याआधी डॉ. आंबेडकरांच्या वारसांना समाजापासून दूर ठेवणं त्यांना अधिक गरजेचं वाटलं. म्हणून ज्या माई आंबेडकरांनी बाबासाहेबांवर मनापासून जीवापाड प्रेम केलं, त्या माईंना खोटे आरोप करून अकारण बदनाम केलं गेलं.

*त्यांच्या पत्रव्यवहारातून निस्सीम प्रेमाचं दर्शन*
बाबासाहेबांनी डॉ. शारदा कबीर - सविता आंबेडकर यांच्याशी लग्नापूर्वी २५ जानेवारी १९४८ ते ९ एप्रिल १९४८ या काळात आपल्या वाग्दत्त वधूशी पत्रव्यवहार केला या पत्रातून त्यांच्या मनाचा उमदेपणा, भव्य-दिव्य कल्पनाशक्ती आणि बाबासाहेब यांच्यातील लग्नाच्या पूर्वीचे आणि नंतरचे परस्पर संबंधही त्यावरून स्पष्ट होतात. बाबासाहेबांनी लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, 'जुन्या हिंदू कल्पनेनुसार विवाहानंतर स्त्री आणि पुरुष दोन व्यक्ती राहतच नाहीत. ते एकाच अस्तित्वात विसर्जित होत असतात. तो माझा विवाह म्हणजे काय याचा आदर्श आहे. एकमेकांत विसर्जित होण्याची ही कल्पना रूथ नावाच्या मुलीनं आपली आई नाओमी हिला फार अनुरूप शब्दात सांगितली आहे. जुन्या करारात त्यांची कथा आढळेल. ते म्हणत , 'मी तुला कधीही चिडून जाऊ नये, तुझे अनुसरण करण्यापासून परावृत्त होऊ नये, कारण तू जिथं जाशील तिथंही मी जाईन आणि जिथं तू राहशील तिथंच मीही राहीन. तुझी माणसं ही माझी माणसं असतील आणि तुझा ईश्वर तो माझाही ईश्वर असेल!'

*बाबासाहेबांनी लिहलेल्या पत्रात उत्कट प्रेमाची अनुभूती*
आणखी एका पत्रात बाबासाहेब म्हणतात, 'तू मला स्वीकारीत आहेस, असं लिहिलं होतं, त्याचा अर्थ मी काय घ्यावा? तू माझा स्वीकार करीत आहेस ते काय म्हणून? एक थोर माणूस म्हणून, विद्वान म्हणून की देखणा दिसणारा माणूस म्हणून? तुझी प्रेरक भावना काय आहे? एका कवीनं म्हटलं आहे त्याप्रमाणे, 'जे प्रेम सौंदर्यावर आधारित असेल ते सौंदर्य संपताच संपुष्टात येईल'. तेच थोरवी किंवा विद्वत्ता यावर उभारलेल्या प्रेमाबद्धलही म्हणता येईल. या गोष्टी कालांतरानं क्षीण होत असतात. त्या काही विवाहाचा पाया ठरू शकत नाहीत. विवाह फक्त प्रेमावरच आधारित असू शकतो आणि त्याचं वर्णन 'परस्परांचं होऊन राहण्याची कांक्षा!' असेच केले जाऊ शकते. तू अशा भावनेनं प्रेरित झालेली आहेस कांस्य? तू कुंकू सिनेमा पाहिला आहेस का?, किंवा 'वुमन दाऊ गेवेस्ट मी' ही टॉमस हार्डी यांची कादंबरी वाचली आहेस की नाही, मला माहित नाही, दोन्ही ठिकाणी विवाह ही एक औपचारिकता होती. त्यामुळं ते किती दुःखद आणि शोकपर्यवासी ठरले होते! ते शोकात होण्याचं मुख्य कारण त्यात परस्परांचे होऊन राहण्याची कांक्षा नव्हती. आपला विवाह तशा प्रकारचा व्हावा, असं मला वाटत नाही. तुझ्या ठिकाणी जर परस्परांचे होऊन जाण्याची कांक्षा नसेल तर आपण त्यासंदर्भात काहीही न बोललेलं बरं. आज आणि इथून पुढं मृत्यूपर्यंत, बऱ्यासाठी आणि वाईटासाठी, समृद्धतेचा आणि दारिद्र्यात, अनारोग्यात आणि निरोगीपणात, प्रेमासाठी आणि प्रतिपालनासाठी ईश्वराच्या पवित्र आज्ञेबरहुकूम आपणही एकत्र येत आहोत.

*प्रेमाच्या व्याख्येनं बाबासाहेबांची प्रेमानुभती*
आपल्या ९ एप्रिल १९४८ च्या पत्रात आंबेडकरांनी प्रेम आणि द्वेष यांची व्याख्या केली असून एकमेकांशी वागताना आणि एकमेकांना समजून घेताना ते परस्पराबद्धल कसं निर्माण होतात याचे सुंदर वर्णन केलेलं आहे. हे त्यांनी आपल्या नियोजित वधूला आपल्या दुसऱ्या लग्नाच्या फक्त पांच दिवस आधी लिहिलं होतं, हे लक्षात घेण्यासारखं आहे.' .....तू मला विचारतेस की, मी जर माझ्या मुलावर एवढं प्रेम करीत असेल तर तुझ्यासाठी माझ्याजवळ एवढं प्रेम कुठून असेल? या प्रश्नाला माझं उत्तर अगदी स्पष्ट आहे. माझ्या मुलावर प्रेम करणं आणि तुझ्यावर प्रेम करणं यात मुळीच अंतर्विरोध नाही. प्रेम ही जर अशी व्यावर्तक गोष्ट असती तर मग असा निष्कर्ष काढता आला असता की, एकावर प्रेम करायचं आणि इतर सर्वांचा द्वेष करायचा. तू तुझ्या वडिलांवर, भावांवर आणि बहिणींवर प्रेम करतेस म्हणून तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, असं मी म्हणू शकेन का? हे किती मूर्खपणाचं होईल? एखादी व्यक्ती सर्वांवर प्रेम करू शकते आसनी खरं तर तिनं ते करावंच! पण एक गोष्ट अशी आहे की, सर्वांशी प्रेम करणं याचा अर्थ आपल्याला जी माणसं प्रिय असतात त्या सर्वांमध्ये आपल्याला एकाच प्रकारचा वा समान असतोच असा आहे.'

*एकमेकांना तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं*
डॉ. बाबासाहेब आजारी पडल्यानंतर मुंबईत आले. १९३४ सालापासून ते या ना त्या आजाराने आजारी होते. पुढे न्यूरायटीस, डायबेटीस, संधिवात, श्वसनाचा त्रास, हृदयविकार आशा दुर्धर रोगानं त्यांना ग्रासलं होतं. डॉ. मावळणकर यांच्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. परंतु डॉ. आंबेडकर यांना भेटायला येणाऱ्या लोकांची गर्दी पाहता तिथं इतर रुग्णांना आणि रुग्णालयाला आणि व्यवस्थापनाला त्रास होत होता म्हणून त्यांना घरीच सुश्रुषेखाली ठेवण्याचे ठरविलं आणि देखभालीसाठी डॉ. शारदा कबीर यांची नेमणूक डॉ. माधव जी. मावळणकर यांनी केली. जातीनं सारस्वत ब्राह्मण असलेल्या डॉ. शारदा कबीर आंबेडकरांना भेटल्या. त्यांची देखभाल करण्यासाठी त्या तयार झाल्या. पुढं दिसणारं अंधःकारमय भवितव्य आणि पोक्तपणे विचार केल्यानंतर बाबासाहेबांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा मोडली आणि पुनर्विवाहाचा निर्णय घेतला. डॉ शारदा कबीर यांच्याशी दिल्लीच्या त्यांच्या १, हार्डीज अव्हेन्यू या त्यांच्या निवासस्थानी ५ एप्रिल १९४८ साली सिव्हिल मॅरेज कायदेनुसार अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांचा विवाह झाला. त्यानंतर डॉ. शारदा कबीर या डॉ. सविता आंबेडकर झाल्या. माई आंबेडकर यांचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्याच्या स.प. महाविद्यालयात झाले होते. वैद्यकीय शिक्षण जे.जे. मेडिकल कॉलेजमध्ये झाले. त्या सुविद्य आणि सुशिक्षित अशा परिवारातून आल्या होत्या. त्या दोघी पतीपत्नीतील पत्रव्यवहार पाहता बाबासाहेबांनी माईंना आणि माईंनी बाबासाहेबांना तळहातावरच्या फोडासारखं जपलं.

*जिवंत असतानाच दूरचित्रवाणीवर निधनाचे वृत्त*
बाबासाहेबांच्या निधनानंतर माईंना राज्यसभेवर घेण्याचा निर्णय पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी घेतला होता. परंतु काँग्रेसच्या पाठींब्यावर आपण राज्यसभेचे सदस्य होणं हे बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणारं ठरणार होतं, म्हणू  तीनही वेळा नम्रपणे त्यांनी त्याला नकार दिला. माईंना आंबेडकरांच्या निधनानंतर झालेल्या आरोपांमुळे जणू अज्ञातवासाचीच शिक्षा भोगावी लागली. या आरोपांची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी तज्ज्ञांची समिती नेमली समितीनं माईंना सर्व आरोपातून मुक्त केलं. बाबासाहेबांच्या सहकाऱ्यांनी आणि जवळच्या अनुयायांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली. आपले स्वार्थ त्यांनी साधले. पण माईंनी भोगलं, सोसलं ते अत्यंत कठीण होतं. पण दलित पँथरच्या चळवळीतल्या तरुण कार्यकर्त्यांनी माईंना आदरानं वागवलं, सन्मान दिला. रिडल्सप्रकरणी त्यांनी घेतलेली भूमिका ही तमाम दलितांना आपलंसं करणारी होती. त्यांची ती भूमिकाच त्यांना सन्मान देणारी ठरली. दलितांच्या मनातून पेरलेले विष दूर करणारी ठरली. बाबासाहेबांना विष देऊन मारल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता ते उघडे पडले. दलित समाजाच्या मनात याबद्धलची अपराधीपणाची भावना आजही आहे. जीवनाच्या अखेरच्या काळात त्यांच्यावर झालेले आरोप आणि झालेली बदनामी दूर झाली. यांतच माई धन्यता मानत गेले. अखेरच्या काळात रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना दूरचित्रवाणीवरच्या जीवघेण्या स्पर्धेत उतावीळ झालेल्या काही वाहिन्यांनी त्या गेल्याचं वृत्त दिलं होतं. जनतेत संतापाची लाट उसळली होती. त्या जाण्यापूर्वीच त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध करणं हे माईंबद्धल असलेला आदर आणि प्रेम यांची थट्टा करणारं होतं.


चौकट......

*बाबासाहेबांनंतर माईंच्या जीवनात अपमान उपेक्षा आणि अवहेलनाचं!*
भारत सरकारचे पहिले कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकरांबरोबर त्या दिल्लीत राहू लागल्या. माईंची ही साथ बाबासाहेबांच्या 'राज्यघटना' निर्मितीच्या कामात आणि धर्मांतराच्या कार्यात मोलाची ठरली. या काळात माईंनी बाबासाहेबांच्या तब्येतीची काळजी घेतली नसती तर बाबासाहेबांनी हाती घेतलेलं कार्य तडीस जाणं अवघड होतं. यासाठी माईंनी बाबासाहेबांच्या कट्टर कार्यकर्त्यांची नाराजीही ओढवून घेतली. त्याचा फटका माईंना बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर बसला.

उच्चविद्याविभूषित माईंनी अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीतील डॉ. आंबेडकरांशी केलेला विवाह ही त्या काळातली मोठी समाज क्रांती होती. तो आदर्श आंतरजातीय विवाह ठरला. परंतु त्यानं डॉ. आंबेडकरांचे आप्त-अनुयायी दुखावले होते. परिणामी बाबासाहेबांच्या निधनानंतर उपेक्षेचं जिणं माईंच्या नशिबी आलं. ज्यांना सूड घ्यायचा होता त्यांनी माईंनाच बाबासाहेबांच्या मृत्यूला जबाबदार धरणारी अफवा उठवली. त्यामुळं बाबासाहेब हयात असताना बाबासाहेबांकडील पाहुणचार झोडण्यात, त्यांच्याबरोबर समारंभात जाण्यास प्रतिष्ठेचं मानत; तेच माईंच्या माहेरकडील लोक माईंवरील किटाळाचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून माईंना टाळू लागले. इतकंच नव्हे तर त्या किटाळाला पूरक ठरणाऱ्या गोष्टी पेरू लागले.

डॉ.आंबेडकर यांच्या नातेवाईकांनी तर त्यांना कधीच आपलं मानलं नाही. १९७२पर्यंत माई दिल्लीतील नेहरोली भागात एकाकी जीवन घालवत होत्या. त्यानंतर दलित पँथरच्या चळवळीने जोर धरला तसं राजा ढालेंनी त्यांना मुंबईत आणलं. तिथं त्या भावाकडे दादरला राहत. त्यानंतरच्या काळात त्या बेस्ट बसेस मधून प्रवास करताना अनेकांना दिसल्या. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या त्या बळकट होत्या, तोपर्यंत बाबासाहेबांच्या स्वाभिमानाला साजेल अशा हिंमतीने त्या परिस्थितीला सामोऱ्या जात होत्या. त्यांच्या नातेवाईकांपैकी कुणीही हलाखीच्या फेऱ्यात जखडलेला नाही. बहिणींची घरं तर करोडपती उद्योगपती आहेत. पण माईंना दिल्लीत जेव्हा अपघात झाला तेव्हा अपघाताची माहिती समजूनही कुणी दिल्लीला धडकलं नाही. त्यानंतर मुंबईत असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला. बाबासाहेबांच्या विचारांमुळे माईंचं निकटवर्ती झालेल्यांनी त्यांना दादरच्या शुश्रूषा हॉस्पिटल्स मध्ये दाखल केलं. त्याची माहिती आप्तांना दिली, पण कुणीही आलं नाही. त्यांची एक श्रीमंत  बहीण हॉस्पिटलच्या तळमजल्यावर आली, पण प्रकृतीच्या अस्वास्थाचं कारण देऊन तिनं तिसऱ्या मजल्यावर उपचार घेणाऱ्या माईंना भेटण्याचं टाळलं.

माईंचं इंग्रजीवरचं प्रभुत्व कमालीचं थक्क करणारं होतं. ते त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात कमावलेलं होतं. डॉ. आंबेडकर यांच्या निधनानंतर माईंना डॉक्टरी व्यवसाय करणं कठीण नव्हतं. तो केला असता तर त्यांनी करोडो रुपये कमावले असते. वृद्धत्वातली फरफटही त्यामुळं टळली असती. पण बाबासाहेबांच्या जीवन वैभवावर ओरखडाही उमटणार नाही, असं आयुष्य त्यांनी स्वीकारलं. वयाची नव्वदी त्यांनी पार केली होती. त्यातली शेवटची ४५वर्षं तर त्यांचा प्रवास एकटीचाच होता. तो त्यांनी पतीनं दाखवलेल्या बौद्धधर्माच्या वाटेवरून पार केला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारकार्यातला जिवाभावाचा अखेरचा दुवा म्हणजे माईसाहेब आंबेडकर! त्यांचं जीवन हे अस्वस्थ करणारं होतं. काल डॉ. बाबासाहेबांची जयंती होती त्यानिमित्तानं या माऊलींचीही आठवण करणं गरजेचं वाटलं म्हणून हा लेखन प्रपंच!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 7 April 2018

मूल्याधिष्ठित राजकारण आणि समाजवादी विचारधारा!

*मूल्याधिष्ठित राजकारण आणि*
 *समाजवादी विचारधारा!*
"राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविले जात आहे तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठे होते नि कुठे पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुन्हा पुन्हा चाचपून भोके पडलेल्या विजारी घालणारे आपण म्हणजे कंडक्टरने बसचे तिकीट देताना साडेतीन रुपयाऐवजी तीन रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखर लॉटरी लागलीय त्यांच्याकडे बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा! अशावेळी प्रकर्षांनं आठवण येते ती मूल्याधिष्ठित राजकारण करणाऱ्या समाजवादी विचारांची आणि नेत्यांची!"
----------------------------------------------
 *ज्ये* ष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य गेले! त्यांच्या जाण्यानं मूल्याधिष्ठित आणि सकारात्मक राजकारणातील एक धुरंधर नेता हरपला. समाजवादी विचारसरणीत देश घडवू पाहणाऱ्या देशभक्तांपैकी ते एक होते. आज देश अडचणीत असताना ज्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे अशावेळी असे एक एक नेते कालवश होताहेत. भाईंच्या जाण्यानं आठवण आली ती जनता राजवटीची! देशात आणीबाणी लादली गेली,  लोकशाहीवर घाला घातला गेला, त्यावेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा लोकजागृती केली होती. लोकशाही पुनर्स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नवनिर्माणाच्या संकल्पनेला सुरुवात केली. देशात असलेल्या सगळ्या पक्षांची त्यांनी मोट बांधली आणि जनता दलाची स्थापना केली. काँग्रेसला समर्थ पर्याय लाभला म्हणून देशवासियांनीही जनता दलाला भरभरून मतं दिली आणि सत्तेवर बसवलं. समाजवाद्यांच्या हातात देशाच्या सत्तेची सारी सूत्रं सोपविली. पण त्यांना ते काही झेपलं नाही. त्या जनता दलातल्या समाजवाद्यांच्या आता अक्षरशः चोथा झालाय. त्यातील काही धूर्त, व्यवहारी राजकारण्यांनी बुडता बुडता समाजवाद्यांच्या माथ्यावर पाय देऊन उभं राहण्याचा व्यवहार केला. भाईं वैद्य यांच्यासारखी काही मंडळी ही निष्ठावान, लढवय्ये, साधनसुचिता पाळणारे, त्यांनी साधायचे ठरविले असते, तर खूप काही साधून घेतलं असतं. व्ही.पी.सिंग यांच्या न्यायासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या निष्ठेचे वारेमाप कौतुक करणाऱ्या समाजवाद्यांना अखेर व्ही.पी.सिंगच भोवले! समाजवाद अस्ताला नेण्याला त्यांनीच हातभार लावला.

*समाजवादी विचारांची अपेक्षा!*
राजकीय विचारसरणीत त्यावेळी समाजवादीचं वर्चस्व होतं. देशात सक्षम विरोधीपक्ष म्हणून समाजवादी पक्षांकडेच पाहिलं जातं होतं. त्यानंतरच्या काळात समाजवाद्यांचं हे पानिपत कशामुळे घडलं. याचा विचार या मंडळींनी करायला हवा होता. जनता पक्षात जाऊन समाजवाद्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं, याचा हिशेब करण्यात आजतरी काहीच अर्थ नाही. पण व्यक्तिदोषामुळे  'समाजवाद' वाऱ्यावर पडला! हे मान्यच करावं लागेल. सध्या 'समाजवादा'ची काँग्रेसनं सोडचिठ्ठी दिल्यासारखीच परिस्थिती करून टाकली आहे. आज सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला तर समाजवादाचे सोयरसुतकच नाही. अशावेळी समतेचा, बंधुतेचा आग्रह धरून सगळ्या दबलेल्यांना, आजवर उपेक्षाच सहन केलेल्यांना एकत्र आणून, त्यांच्यात विश्वास जागवून त्यांना समाजवादी ताकद म्हणून उभं होण्याची हिंमत देऊन समाजवादी पक्ष पुन्हा उभा करण्याचा विचार समाजवाद्यांनी का करू नये? तिसरा पर्याय का उभा करू नये. लोकांच्या भावना आजतरी अशाच आहेत, त्यांना काँग्रेसी राजवट नकोय त्याहून अधिक भाजपेयी नकोत पण पर्याय नसल्यानं त्यांची घुसमट होतेय याला मार्ग मिळेल. पर्याय मिळेल.

*समाजवादी नेते आपसातच झुंजले*
उत्तरप्रदेशात कांशीराम-मायावती हे महाराष्ट्रातला फुले-शाहू-आंबेडकर यांचा समाजवादी  विचार घेऊन तिकडे तुफान उठवू शकतात. मग संघर्ष करण्याची इच्छा आणि ईर्षा असलेले समाजवादी आपसात झुंजण्याचा, आपलेच कपडे फाडण्याचा उद्योग सोडून एकत्र का येत नाहीत. भाईंनी असा प्रयत्न केला होता. ते स्वतः, किसन पटनाईक, केशवराव जाधव यांनी हैद्राबादेत समाजवादी दल निर्माण समितीच्यावतीने एक बैठक घेऊन समाजवादावर निष्ठा असणाऱ्या काहींना एकत्र आणलं होतं. 'सोशालिस्ट जन परिषद' अशा नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला होता. त्यांच्या या प्रयत्नाला समाजवाद्यांची साथ लाभली नाही. त्यांना इतर पक्षाच्या वळचणीला जाणं योग्य वाटलं असावं. भाईंच्या या प्रयत्नापासून दूर राहण्याचे व कुण्या नवागताकडून अपमानित व्हायचं कारणच नव्हतं. संधीसाधू, सत्तानिष्ठ राजकारणाच्या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी एकटे भाई वैद्य पुण्यातून समाजवादी जण परिषदेची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असत. पूर्वी काकाकुवा मॅनशन येथे होणाऱ्या बैठका, चर्चा, परिषदा, सभा आज नवीपेठेतल्या एस.एम.जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होतात एवढाच काय तो समाजवाद्यांच्यात बदल झालाय.

*पक्ष बदललेल्यांचा भ्रमनिरास झालाय*
पक्ष सोडून गेलेल्या समाजवादी विचारांची मंडळी सध्या राजकारणात चाचपडताहेत. कुणी शरद पवारांना जवळ केलंय तर कुणी काँग्रेसवासी झालेत. आम आदमी पक्षाच्या निर्मितीनंतर तर उरले सुरलेले सारे समाजवादी त्यांच्यामागे गेले. पण इकडे तिकडे गेलेल्या साऱ्या समाजवाद्यांचा भ्रमनिरास झालाय. आप मध्ये गेलेल्यांची निराशाच झाली. अपेक्षाभंग झाला. पक्षाबदलाच्या अपराधीपणाच्या जाणिवेनं निष्ठावान समाजवाद्यांची घुसमट होते आहे. भाईंच्या जिवंतपणी जे होऊ शकलं नाही ते त्यांच्या मृत्यूनंतर का होईना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुन्हा एकदा समाजवाद्यांची भक्कम एकजूट झाली, तर समाजवादी राजकीय विचारांनी प्रेरित झालेल्यांना एक दिलासा मिळेल. आणि समाजवाद्यांनी भाई वैद्यांना आदरांजली वाहिल्याचे समाधानही त्यांना लाभेल! आणि लोकांना ज्यांना काँग्रेस नको आणि भाजपेयींही नकोत अशांना पर्याय मिळेल.

*ही घसट आणि घुसमट तेवढी सरळ नाही!*
देशातली सध्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही किंबहुना ती अस्वस्थ करणारी आहे. केंद्रात स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपेयींनी आपल्या वागण्याने केवळ विरोधी पक्षांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दुखावलं आहे. सुरुवातीपासून बरोबर असलेले शिवसेना, अकाली दल, तेलुगू देशम,यासारखे मित्र दूर जाताहेत. महाराष्ट्रातील लोकनेते म्हणून समजले जाणारे शरद पवार भाजपच्या पाठीशी उभे राहता राहता अचानक भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेत. एकीकडे शरद पवारांची लोकांना दहशत वाटावी अशी विकृत प्रतिमा उभी करायची दुसरीकडं त्यांच्याशी जमवून घेऊन नवी राजकीय समीकरणं बनविण्याचे प्रयत्न करायचे. असा सध्या प्रकार भाजपेयींकडून सुरू आहे. एखाद्याला कळपापासून फोडायचा, एकाकी पाडायचा आणि चट्टामट्टा करून संपवायचा 'लांडगे डाव' सध्या राजकारणात रंगविला जातोय. शरद पवारांची आजची भूमिका पाहता, शरद पवार डाव्यांच्या तावडीत सापडताहेत की, डाव्यांना पवार आपल्या राजकारणासाठी खेळवत आहेत, हे अजून ठरवायचंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार यांची ताकद काय असेल, कशी असेल यावर सारे अवलंबून राहील. कारण ही घसट आणि घुसमट दिसते तेवढी सरळ नाही.

*अशाश्वत राजकारण सध्या सुरू आहे*
पुराणातली कथा आहे. महाभारतातली, भीम-जरासंघाची कुस्ती चालली होती. भीम पुन्हा पुन्हा जरासंघाला फाडत होता. पण जरासंघ पुन्हा पुन्हा साधला जात होता.भीमाची ताकद पुरेशी नव्हती. अशावेळी आखाड्यात नसलेल्या कृष्णाने भीमाला डाव सुचविला. जो पुन्हा पुन्हा जोडला जातो, त्याला न जोडण्यासाठी काय करायला हवं हे भीमाला कृष्णाने सुचविले आणि जरासंघ कायमचा भंगला! पवार, ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काहीही झाले तरी त्याचा निकाल ह्या तिघांना हवा तसाच लागेल असं धरून चालणार नाही. काहीही घडू शकते, एवढं अशाश्वत राजकारण सध्याचं बनले आहे.

*भाजपची भगवी काँग्रेस बनलीय*
सर्वसत्ताधीश बनलेल्या भाजपेयींना काँग्रेससारखं सर्वसमावेशक बनण्याचा विचार दिसतो आहे. सध्याच्या त्यांच्या सर्व हालचाली या बाबी स्पष्ट करतात. जणू भगवी काँग्रेस असावी असं त्याचं रूप झालंय. काँग्रेस समाजवादी विचारापासून केव्हाच दूर झालीय. खासगीकरण, निर्गुंतवणूक हे त्यांनीच सुरू केलं. ज्याचा परिणाम आज दिसून येतोय. समाजवादासाठी कंबर कसून उभं व्हावं आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी आजही समाजवाद प्रभावीपणे उपयोगी पडतो हे आव्हानपूर्वक दाखवावं अशी इच्छा असणारा काँग्रेसमध्ये कुणी नेता नसल्यानं सध्या ज्याच्या हातात पक्षाची सूत्रं आहेत, त्यांना टोचणीपुरतीच समाजवादी निष्ठा काही जण दाखवीत आहेत. समाजवादाचा ठेका घेतलेल्या साथीनी एकमेकांचे पाय ओढण्यातच आपला शक्तिपात करून घेतल्याने आणि मार्क्सवादाचे ठेकेदारही मर्यादीत क्षेत्रातली आपली मक्तेदारी शाबूत ठेवण्यातच गुंतून पडल्याने 'आई मेली, बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला!' अशी समाजवाद्यांची अवस्था झालीय!

*समाजवादी चळवळीला आत्मपरीक्षणाची गरज!*
समाजवादी चळवळीला ना राजकीय यश मिळाले, ना सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात फारसा प्रभाव टाकता आला. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करणे ही काळाची गरज आहे. समाजवादी नेत्यांना राजकारणात पडण्याची पूर्वी घाई झाली होती. विचाराने कार्यकर्ता पुढे जावा, असे ठरविण्याऐवजी समाजवादी विचारांची टोपी आणि नारा निवडून येणाऱ्या माणसाच्या हाती दिला. ती चूक होती. इतिहासात अनेक मोठय़ा चुका चळवळीने केल्या आहेत. नव्या पिढीत अनेकांना त्या माहीत नसतील. पण जुनीजाणती माणसे प्रश्न विचारतील. त्यामुळे आत्मपरीक्षणाची गरज आहे. किमान स्वल्पविराम आणि शब्दरचनेवरून होणारे मतभेद टाळता आले तरी बरेच काही होऊ शकेल. समाजात समाजवादी चळवळीविषयी आस्था बाळगून असणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांना जोडून घेण्यासाठीचा कार्यक्रम आपल्याकडे नाही. तो करता आला तरी पुरेसे होईल. सध्या लोकशाहीच्या शिखर संस्थांवर आपल्याच विचाराचे कार्यकर्ते बसविण्याचे काम चालू आहे. समाजवादी नेत्यांनी त्यांचे सरकार होते तेव्हा असे काही न करता विचाराने वागणाऱ्या कार्यकर्त्यांला लाभ दिला नाही, हा काय आपलाच आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच महत्त्व दिले गेले, त्यामुळे आपले कार्यकर्ते नेत्यांनी कुजविले!

*समाजवादाला 'हे राम' म्हणायला लागलंय!*
राजकारणात काहीही घडू शकतं इतकी अस्थिरता आहे आणि दाखविले जात आहे तेवढे वैचारिक मतभेद आता नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचाराशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपेयी नेते, कार्यकर्ते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारे करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात येतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व- निष्ठेचा, निस्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो, तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो. हे आता सगळेच जाणतात. कोण कुठे होते नि कुठे पोहीचले हे काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ चाचपणारे आपण म्हणजे कंडक्टरने बसचे तिकीट देताना साडेतीन रुपयाऐवजी तीन रुपये घेतले तर लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! तिथं त्यांचं काय? सत्तानिष्ठ राजकारण्यांच्या या वातावरणात समाजवादाला हे राम म्हणायला लागलंय!

*सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय!*
समाजवाद समाजाने नाकारलेलाच नाही तर समाजाचे ज्यांनी कधी सोयरसुतक ठेवलं नाही, अशा समाजवादी नेत्यांना समाजाने नाकारले आहे. या नेत्यांचे प्रताप लोकांना परवडत नाहीत. जर समाजवादी नेते तात्त्विक काथ्याकूटात न हरवत व्यवहाराशी सांगड घालून वागले असते तर ही अशी अवकळा त्यांना, त्यांच्या पक्षाला प्राप्त झाली नसती. हा व्यवहार काँग्रेसवाल्यांना चांगला जमतो. त्या भांडवलावर तर भल्या भल्या समाजवादी नेत्यांना पटवून शरद पवारांचा पुलोद प्रयोग महाराष्ट्रात झाला. आजही समाजवादात पवार नई रोशनी आणतील असा भाबडा विश्वास बाळगणारे बालबैरागी बरेच आहेत. आजवर मनाची नाही तर जनाची लाज बाळगून राजकारणात वावरण्याची काळजी नेते, कार्यकर्ते घेत असत. आता सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय. आज समाजवाद पराभूत झालाही असेल; पण सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी सामर्थ्य समाजवादानेच प्राप्त झालं आहे, हे विसरून चालणार नाही.  समतेसाठी झुंजणाऱ्या मराठी माणसाला एवढ्या सहजपणे सोडचिठ्ठी देता येणार नाही. समाजवादी सामर्थ्यशाली फळी कशी कोसळली, का कोसळली, याचा शोध घेऊन जरूर ते बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचा मार्ग आपल्याला शोधवाच लागेल!

चौकट........
*समाजवादानं उन्नत आणि समृद्ध समाजाचं स्वप्न दिलंय!*

महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असे आजवर मानले जात होते. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणले. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागवा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच  जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली.लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपले भाग्य आपण घडवू या निर्धाराने गावोगाव नव जोमाने तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसाने स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचे वर्तन सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर व सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळे मर्यादितच राहिला. भारतामध्ये लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पुढे १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर या समाजवाद्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली; मात्र त्यात पुढे एकजुट राहिली नाही आणि १९७७ मध्ये समाजवादी पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर त्यांना फारसे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणे, हे काँगेसचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. कम्यूनिस्ट पक्ष शासित साम्यवादी राजवटी, पश्चिम यूरोपातील कल्याणकारी राज्याची उत्तम प्रकारे अंमलात आणून जनतेला मोठया प्रमाणात सामाजिक सुरक्षा पुरविणाऱ्या लोकशाही समाजवादी राजवटी, भारतातील गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, राज्य समाजवादास नकार देत जनतेच्या सहभागावर व विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण समाजवादाने विविध देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचे स्वप्न दिले आहे.
.........................
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...