Sunday 28 May 2023

लोकशाहीच्या मंदिरात राजेशाहीची प्रतिष्ठापना!

"दिल्लीत आज नवं संसद भवन साकारलंय. त्याचं उदघाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नको तर ते लोकशाहीत संवैधानिकदृष्ट्या वरिष्ठ असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते व्हायला हवं! असा आग्रह विरोधकांनी धरला. ते योग्य असलं तरी, कधीही, कोणत्याही विरोधाला न जुमानणारे मोदी सारा विरोध धुडकावून स्वतःच उदघाटन करणार आहेत. त्यामुळं विरोधकांनी बहिष्काराचं अस्त्र उपसलंय. जी व्यक्ती एक साध्या ट्रेनचं उदघाटन इतर कुणाला करू देत नाही, मग ती संसद भवन सारख्या लोकशाहीच्या मंदिराचं उदघाटन दुसऱ्या कुणाच्या हस्ते करू देईल काय? भारत 'मदर ऑफ डेमोक्रॅसी' लोकशाहीची माता आहे असं जगात ठणकावून सांगणारे, देशात मात्र लोकशाहीला 'म्युझियम'मध्ये ठेवून 'म्युझियम'मधला राजेशाही प्रतीत करणारा 'राजदंड' नव्या संसद भवनात ठेवताहेत. यातून कोणता संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देशवासियांना देताहेत?"
----------------------------------------

भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षं साजरी करत असताना नवं 'संसद भवन' पूर्ण झालेलं आहे. पण 'मोदी सरकार' फक्त संसद भवनच नाही, तर संपूर्ण 'राजपथ' परिसरच 'सेंट्रल व्हिस्टा रिडेव्हल्पमेंट प्रोजेक्ट' अंतर्गत नव्यानं बांधायला घेतलेला आहे. या परिसरात नवी दिल्लीतल्या 'राष्ट्रपती भवना'पासून 'इंडिया गेट'पर्यंतचा भाग येतो. हेच देशाचं सर्वोच्च सत्ताकेंद्र आहे. या परिसरात 'संसद भवन' तर आहेच, पण सेक्रेटेरियट बिल्डिंगही आहे. ही इमारत 'नॉर्थ' आणि 'साऊथ ब्लॉक' या नावानंच जास्त ओळखली जाते. त्यात प्रधानमंत्र्यांचं ऑफिस आहे. गृह, संरक्षण, अर्थ, परराष्ट्र ही महत्त्वाची खाती, महत्त्वाचे कॅबिनेट सचिव, राष्ट्रीय सुरक्षा परिषद आणि अर्थखात्याची काही महत्त्वाची मंडळं यांची ऑफिसेस आहेत. हा सगळा परिसर डेरेदार झाडं, स्वच्छ हिरवळ, कालवे आणि कारंजी यातून वाहणारं पाणी यांनी सजलेला आहे. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला होणाऱ्या परेडमुळं हा भाग देशाला ओळखीचा आहे. राजधानीतला राजप्रासाद किंवा संसदेचा परिसर अत्यंत सुनियोजितपणे विकसित केलेल्या निवडक दहा राष्ट्रांच्या देखण्या राजधानींमध्ये नवी दिल्लीचा समावेश होतो. राजपथावर राष्ट्रपतींच्या वाहनांप्रमाणे पादचाऱ्यांच्या सुविधांचाही विचार केला आहे. इथल्या इमारती भारदस्त आणि बागबगिचे देखणे आहेत. मात्र आता या परिसरात तोडफोड सुरू झालीय ती पाहता हा सारा परिसर विद्रूप होईल, अशी भीती वाटतेय.
'केंद्र सरकार'च्या सार्वजनिक बांधकाम विभागानं संसद भवनासह 'नवीन सेंट्रल व्हिस्टा'साठी 'टेक्निकल अँड फायनान्शियल' स्वरूपाच्या निविदा मागवल्या. तेव्हाच या प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली. त्यात 'हाफिज कॉन्ट्रॅक्टर', 'सीपी कुकरेजा', 'सिक्का असोसिएट', 'आयएनआय डिझाईन स्टुडियो', 'स्टुडियो आरकॉम' आणि 'एचसीपी डिझाईन प्लानिंग अँड मॅनेजमेंट' आदि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या आर्किटेक्ट कंपन्यांनी भाग घेतला होता. त्यात अहमदाबादच्या 'एचसीपी डिझाईन'ची निवड झाली. त्यांच्या रचनेनुसार, या प्रोजेक्टचं प्रत्यक्ष बांधकाम 'टाटा'नं केलंय. राष्ट्रपती भवनापासून इंडिया गेटपर्यंत तिनेक किलोमीटरच्या राजपथावर बनलेल्या नव्या 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट'मध्ये राष्ट्रपती भवन, संसद भवन, एक्झिक्युटिव एन्क्लेव्ह, प्राईम मिनिस्टर ऑफिस, सचिवालय वगैरे, प्रधानमंत्री निवास, उपराष्ट्रपती निवास, ५१ खात्यांसाठी दहा इमारतींचं केंद्रीय सचिवालय या इमारतींचा समावेश आहे. 'राष्ट्रपती भवन', इंडिया गेट मात्र आहे, तसंच राहील. संसद भवन, केंद्रीय सचिवालय या इमारती नव्यानं बनल्या आहेत आणि जुनं संसद भवन योग्य ती दुरुस्ती करून 'हेरिटेज बिल्डिंग' म्हणून तिथं म्युझियम बनवण्यात येणार आहे.'एचसीपी डिझाईन'चे चेअरमन आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट टाऊन प्लानर डॉ. बिमल पटेल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत की, 'नव्या सेंट्रल व्हिस्टा'ची डिझाईन बनवण्याची संधी मिळणं हे आमचं सौभाग्यच आहे. शिवाय खूप मोठी जबाबदारी खांद्यावर आली होती. अभिमानास्पद तरीही अत्याधुनिक सुविधांनी सज्ज अशी रचना बनवणं आव्हानात्मक काम होतं. त्याची डिझाईन बनवायला एक वर्ष लागलं. त्यात अनेकदा बदल, सुधारणा केल्या. शेवटी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मार्गदर्शन केलं. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं की, सामान्य माणसांपासून लोकसभाध्यक्षांपर्यंत सगळ्यांच्या गरजा पूर्ण होतील, तरीही भपकेदार वाटणार नाही, असं भवन बनवा...!' डॉ. विमल पटेल हे 'पद्मश्री' सहित देशविदेशातल्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. अहमदाबादच्या 'सेप्ट युनिव्हर्सिटी'चे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी अहमदाबादमधल्या 'साबरमती रिव्हरफ्रंट', 'कांकरिया लेक फ्रंट', 'गुजरात हायकोर्ट', 'गांधीनगर स्वर्णिम संकुल' यांची रचना केलीय. सध्या ते 'अहमदाबाद इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'-आयआयएमचं नवीन कॅम्पस, साबरमती आश्रमाचा पुनर्विकास, वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराचा पुनर्विकास आणि 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'चा पुनर्विकास अशा प्रोजेक्टवर काम करत आहेत. यातले बहुतांश प्रोजेक्ट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'ड्रीम प्रोजेक्ट' आहेत. त्यात आता देशाच्या राजधानीची शान असणाऱ्या 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट' ची भर पडलीय.

नवं संसदभवन साडेदहा एकरच्या प्लॉटमध्ये ६४ हजार ५०० स्क्वेअर मीटर परिसरात हजारो कोटींच्या खर्चात त्रिकोणी आकाराचं नवं भव्य आणि अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आणि भूकंप प्रतिरोधक असणारं दोन मजली संसदभवन बनलंय. सर्वांत उंचावर आपलं अशोक स्तंभावरच्या चार सिंहांचं 'राष्ट्रीय चिन्ह' आहे. भवनामध्येच लोकसभा सचिवालय, राज्यसभा सचिवालय आणि इतर कार्यालयंही असतील. लोकसभेच्या सदनात ८८८ तर राज्यसभेच्या सदनात ३८४ आसनांची व्यवस्था आहे. तसंच संसदेच्या संयुक्त सत्राच्या वेळेला लोकसभेच्याच सदनात एकत्र १,२७२ खासदार बसू शकतील! एवढं भव्य सभागृह बांधण्यात आलंय. राष्ट्रपती, लोकसभाध्यक्ष, राज्यसभा सभापती, प्रधानमंत्री, इतर मंत्रीगण, खासदार, विविध खात्यांचे सचिव, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यासाठी स्वतंत्र असे सहा दरवाजे या संसद भवनाला आहेत. शिवाय संसद ऑफिस, संविधान हॉल, कॉन्फरन्स रूम, पब्लिक गॅलरी, लायब्ररी, डायनिंग लाऊंज अशा सुविधा असणारं हे 'इकोफ्रेंडली कॅम्पस' आहे. त्यामुळं विजेची बचत होईल. या सगळ्या सुविधा तयार करण्यासाठी स्ट्रक्चरल डिझाईनर, इंटिरियर डिझाईनर, फर्निचर डिझाईनर शिवाय ऑडियो व्हिडियो, प्लम्बिंग, इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, पर्यावरण, लँडस्केप, हॉर्टिकल्चर अशा सुविधांसाठी विशेष तज्ज्ञ सल्लागारांकडून मार्गदर्शन घेण्यात आलंय. शिवाय दिल्ली पोलीस, 'स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप' म्हणजे 'एसपीजी' यांच्या मार्गदर्शनानुसार सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आलाय. पांढऱ्या  आणि लाल दगडानी बनलेल्या नवीन संसद भवनाच्या भिंती, छत, जमीन, फर्निचर यांच्यामध्ये भारतीय संस्कृतीनुसार चित्र, शिल्प, नक्षीकाम, पडदे वगैरे गोष्टी आहेत. लोकसभा सदनात राष्ट्रीय पक्षी 'मोर' आणि राज्यसभा सदनात राष्ट्रीय फूल 'कमळ' यांची थीम वापरण्यात आलीय. पण मुळात या सगळ्याची खरंच गरज होती का? भारतीय लोकशाहीच्या इतिहासातल्या सगळ्या प्रमुख घडामोडींचं साक्षीदार असणारं सध्याचं 'संसद भवन' त्याच्या वास्तुरचनेसाठी जगभरात नावाजलं जातं. ५६० फूट व्यास असणारी ही गोलाकार वास्तु ६ एकरात पसरलीय. या इमारतीच्या मध्यभागी भव्य सभागृह आहे. त्याला 'सेंट्रल हॉल' म्हणतात. या सभागृहाला गोलाकार, रेखीव कळस आहे. इतिहासातल्या अनेक ऐतिहासिक घटनांचं हे सभागृह साक्षीदार आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा सत्तेचं हस्तांतरण या 'सेंट्रल हॉल'मध्येच झालं होतं. १४ ऑगस्टच्या रात्री प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी 'ट्रिस्ट विथ डेस्टिनी' हे आपलं जगप्रसिद्ध भाषणही याच हॉलमध्ये दिलं होतं. सगळ्या 'संविधान सभा' या हॉलमध्येच भरवण्यात आल्या होत्या. म्हणजे आपलं 'संविधान'ही इथंच आकाराला आलंय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'भारतीय संविधान' तयार होताना केलेली भाषणंही या हॉलनं ऐकलीत. लोकसभा आणि राज्यसभेच्या सगळ्या संयुक्त बैठकाही 'सेंट्रल हॉल'मध्ये होतात. या सभागृहाच्या भोवती अर्ध गोलाकार आकारात तीन सभागृहं आहेत. पहिलं सभागृह लोकसभेचं आहे. या अर्धगोलाकार दालनाचा आकार आहे ४ हजार ८०० स्केअर फूट! यात खासदारांना बसण्यासाठी ऐसपैस बैठका आहेत. या बैठकांची व्यवस्था ६ भागात विभागली आहे. प्रत्येक भागात ११ ओळी आहेत. सभागृहाच्या बरोबर मधोमध  लोकसभा अध्यक्षांची खुर्ची उंचावर बसवण्यात आलीय. त्याखाली संसद सचिवांना बसण्याची जागा दिसते. एकावेळी या सभागृहात ५५० जण बसू शकतात. अध्यक्षांच्या उजव्या बाजूला सत्ताधारी पक्षातले खासदार बसतात, तर डाव्या बाजूला विरोधी पक्ष असतो. दुसरं तुलनेनं छोटं सभागृह राज्यसभेसाठी आहे. त्याची रचना लोकसभेसारखीच आहे. तिसरं सभागृह हे 'चेम्बर ऑफ प्रिन्स' म्हणून ओळखलं जात होतं. त्याला आता 'लायब्ररी हॉल' म्हणतात. स्वातंत्र्यानंतर याच 'चेम्बर ऑफ प्रिन्स'मध्ये काही काळ 'सुप्रीम कोर्ट' काम करत होतं. या तिन्ही सभागृहाला पहिल्या मजल्यावरच्या ओसरीनं जोडलंय. त्यासाठी पांढऱ्या रंगाचे २७ फूट उंचीचे १४४ खांब वापरण्यात आलेत. हा सगळा परिसर सुंदर बागांनी सजवलाय. शिवाय संपूर्ण इमारतीला छान गोलाकार दगडी कुंपणही आहे. मूळ वास्तू एवढीच बांधली गेली असली तरी जागा कमी पडत होती म्हणून १९५६ मध्ये या वास्तूवर आणखी दोन मजले चढवले गेले. शिवाय २००६ ला लायब्ररीच्या शेजारी एक छोटंसं म्युझियमही उभारण्यात आलंय. संपूर्ण संसद भवनाला एकूण १२ दरवाजे आहेत. त्यातला संसद रोडवरचा दरवाजा हे मुख्य प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जातं. हे 'संसद भवन' आणि राजपथावरच्या  इतर इमारतींना 'जागतिक वारसा' म्हणून घोषित करावं, असा अर्ज 'भारत सरकार'नं 'युनेस्को'ला २०१३ मध्ये केला होता. त्यावर प्रक्रियाही सुरू झाली होती. पण सत्तेत येताच मोदींनी हा अर्ज मागे घेतला. त्यामागे असणारी हा वसाहतकालीन वारसा नाकारण्याची भूमिका 'भाजप' आणि 'रा.स्व.संघा'च्या नेत्यांनी वेळोवेळी व्यक्त केलीय. पण त्याला आधुनिक ग्लोबल जगात खरंच काही अर्थ आहे का? मग विविधतेनं नटलेल्या परंपरांचा सन्मान करणाऱ्या प्रार्थनेला काय अर्थ राहतो ?
नव्या संसद भवनाची गरज काय आहे, याचं स्पष्टीकरण करणारं एक निवेदन लोकसभा सचिवालयानं प्रसिद्ध केलं होतं. ते तसंच लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर 'भाजप' नेत्यांची वक्तव्यं यात नव्या संसदेच्या इमारतीची गरज सांगणारे पुढील मुद्दे येतात.
काळानुसार वाढणाऱ्या गरजा लक्षात घेता सध्याच्या संसदेच्या इमारतीत अधिक जागा, सोयीसुविधा, सुरक्षा यंत्रणा आणि तंत्रज्ञान यांना समावून घेणं अवघड जातंय. काळाचे आघात सोसल्यानं संसद भवनाच्या इमारतीला काही ठिकाणी तडे गेले आहेत. आताच खासदारांसाठी जागा पुरत नाही. दोन्ही सदनांचं संयुक्त सत्र होतं तेव्हा बसण्यासाठी पुरेशा बैठका नसतात. तात्पुरत्या स्वरूपाच्या खुर्च्याची व्यवस्था करावी लागते. ही 'हेरिटेज बिल्डिंग' आहे. यात आगप्रतिबंधक यंत्रणा बसवण्यात अडचणी येतात. तसंच इलेक्ट्रिसिटी प्लम्बिंग, एअर कंडिशनिंग यंत्रणा बसवणं आणि त्याची दुरुस्ती करणं खूप खर्चिक ठरतं. दिल्ली शहर भूकंपासाठी संवेदनशील आहे. त्यानुसार सध्याची इमारत सुरक्षित नाही. दोन्ही सदनांचे पीठासीन अधिकारी आणि सर्वपक्षीय खासदार असणाऱ्या समितीने नव्या इमारतीचा प्रकल्प मंजूर केलाय. त्यामुळे यात घाई किंवा लपवाछपवी केलेली नाही. लोकसंख्या वाढीला अनुसरून, मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर लोकसभा सदस्यांची संख्या वाढणार आहे. त्यांना बसण्यासाठी जास्त जागांची व्यवस्था करावीच लागेल. सध्याच्या इमारतीत गरजेनुसार बदल करतच राहावे लागतात. पूर्वीही एकदा त्यात दोन मजले वाढवले आहेतच. आता अधिक बदल करण्याऐवजी नवी परिपूर्ण इमारत बांधणं सोयीचं आहे. 'काँग्रेस'च्या सत्ताकाळात लोकसभा अध्यक्ष असणाऱ्या मीरा कुमार यांनीही संसदेसाठी नव्या इमारतीची गरज असल्याचं सांगितलं होतंच. त्या म्हणाल्या होत्या की, 'ही इमारत वाढत्या ओझ्यामुळे रडते आहे!' सध्याच्या इमारतीत दुरुस्ती करायची ठरवली तरी किमान १८ ते २४ महिने इमारत बंद ठेवावी लागेल. अशावेळेस संसदेचं कामकाज कुठून चालवायचं? नव्या भारताच्या आकांक्षांचं प्रतिबिंब दिसेल अशी भारतीय संस्कृतीला अनुरूप संसद भवनाची इमारत असायला हवी. जुन्या इमारतीची जागा नवी इमारत घेते, हे सर्वमान्य असलं तरी यातले बहुसंख्य मुद्दे नव्या प्रकल्पाच्या विरोधकांना मान्य नाहीत. माजी पर्यावरणमंत्री आणि 'काँग्रेस' नेते जयराम रमेश यांनी तर या प्रकल्पावर 'मोदी महल' म्हणून टीकाही केलीय. देशात 'कोरोना- लॉकडाऊन'नंतर आर्थिक मंदीसारखी परिस्थिती आहे. लोकांना दोन वेळ जेवणाची भ्रांत असताना, इतका महागडा प्रकल्प तातडीनं सुरू करण्याची खरंच गरज होती का? या प्रोजेक्टचे २० हजार कोटी रुपये लोकांच्या मदतीसाठी वापरायचे की, प्रधानमंत्रींचा अहंकार कुरवाळायला वापरायचे?"

'सेंट्रल व्हिस्टा'च्या विरोधात देशभरातले विशेषतः दिल्लीतले आर्किटेक्ट आणि नगररचनाकार एकत्र आले. त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यातले एक मुख्य याचिकाकर्ते, आर्किटेक्ट निवृत्त ले.कर्नल अनुज श्रीवास्तव हे 'लोकपथ' या संस्थेशी संबंधित आहेत. त्यांनी आणि इतरांनी मांडलेले 'सेंट्रल व्हिस्टा'च्या विरोधातले मुद्दे असे होते- संसद भवनाची इमारत फक्त ९३ वर्षांची आहे. जगभरात त्यापेक्षा जुन्या संसदेच्या इमारती असून त्याचा वारसा लक्षात घेऊन  जपल्या आणि वापरल्या जातात. जागा पुरत नाही म्हणून नवी इमारत बांधतोय असं म्हणून चालत नाही. त्यासाठी सध्याच्या इमारतीत नव्यानं रचना केल्यास किती जण बसू शकतील, याचा रीतसर अभ्यास व्हायला हवा होता. त्या अहवालावर चर्चा व्हायला हवी होती आणि त्यानंतर गरज असल्यास नव्या इमारतीचा पर्याय पुढं आणायला हवा होता. पण जगभर वापरली जाणारी ही पद्धत नाकारून नव्या संसद इमारतीचा निर्णय रेटण्यात आलाय. सध्या असणाऱ्या खासदारांच्या संख्येला सध्याच्या सभागृहांचा आकार पुरेसा आहे. काही बदल करून त्यात अधिक जागांची व्यवस्थाही करता येऊ शकेल. 'मतदारसंघ पुनर्रचना' कधी होईल, त्यात खासदारांची संख्या वाढेल का आणि ती किती असेल, याबद्दल अद्याप काहीच ठरलेलं नाही. २००१ ला होणारी पुनर्रचना २५ वर्षांसाठी पुढं ढकलण्यात आलीय. राजकीय विरोध लक्षात घेता पुनर्रचना करणं कठीण आहे. त्यामुळं पुनर्रचनेत सदस्यसंख्या वाढीचा निर्णय घेतल्यानंतर नव्या इमारतीचा विचार करायला हवा होता. 'केंद्र सरकार'च्याच आर्थिक पाहणीनुसार, २०६१ नंतर भारतात लोकसंख्या कमी होत जाईल. त्याचाही विचार करावा. 'संसद भवन' इतक्याच जुन्या 'राष्ट्रपती भवन'सारख्या इमारती भूकंप आणि इतर दृष्टीनं सुरक्षित ठरतात. फक्त 'संसद भवन'च असुरक्षित कसं ठरतं? २० हजार कोटींचा हा भव्य प्रकल्प नागरिकांना विश्वासात घेऊन आणि संसदेत चर्चा घडवून करायला हवा होता. तसं काहीच झालं नाही. या प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी 'सेंट्रल व्हिस्टा कमिटी' बनवण्यात आली होती. तिची अंतिम मान्यता देणारी बैठक 'कोरोना' महामारी असताना २३ एप्रिल २०२० रोजी घेण्यात आली. त्याला फक्त सरकारी सदस्यच हजर होते.  तज्ज्ञांना ह्या बैठकीला उपस्थित राहता आलं नाही. त्यांच्या गैरहजेरीत परवानगी देण्यात आली. या प्रकल्पासाठी ४०० हून अधिक झाडं उखडण्यात आलीत. एकंदर 'सेंट्रल व्हिस्टा' प्रकल्पाच्या पर्यावरणचा कोणताही अहवाल आलेला नाही. फक्त 'संसद भवन'साठी अहवाल बनवण्यात आला. त्यावर तज्ज्ञांचे आक्षेप दुर्लक्षिण्यात आले.१०० वर्षांपूर्वी हर्बर्ट बेकर या ब्रिटिश आर्किटेक्टनं आताच्या संसद भवनासाठी त्रिकोणी रचना आखली होती. ती नाकारून मध्यप्रदेशातल्या 'चौसष्ठ योगिनी' मंदिरासारखी गोलाकार करण्यात आली. आता पुन्हा बेकरच्या रचनेशी साधर्म्य असणारी इमारत उभारून भारतीय स्वाभिमान  कसा जपला जाणार? या परिसरात दिल्लीकर आणि पर्यटकांना फिरण्यासाठी भरपूर जागा उपलब्ध आहे. पण ही सर्वसामान्यांच्या हक्काची जागा नव्या 'संसद भवन'साठी हिरावून घेतली गेलीय.

प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते. 'राजपथ' ही देखील दिल्लीसोबत देशाचीही ओळख आहे. त्याला धक्का देण्याची गरज नव्हती. मोदी सरकारला नेमकी  कसली घाई होती, ते कळत नाही. त्यांच्याकडं २०२४ पर्यंत चालणारं भक्कम पाठींब्याचं सरकार आहे. इतक्या अडचणीच्या काळात 'नवीन संसद भवन' उभारणं ही केवळ पैशाची नासाडी आणि राजपथाचं विद्रुपीकरण आहे. सध्याची इमारत अत्यंत भक्कम आहे, तरीही तिला धोकादायक ठरवून केवळ स्वतःच्या पाऊलखुणा उमटवण्यासाठी मोदींनी हा निर्णय घेतलाय. यावर्षीची प्रजासत्ताक दिनाची 'परेड' दरवर्षीच्या दिमाखात होणार नाहीच, पण 'सेंट्रल व्हिस्टा'मुळं पुढच्या परेड तरी दिमाखात होतील की नाही, याची शंका वाटते. देशाच्या सत्ताकेंद्राचा 'ब्रिटिश चेहरा' नष्ट करून त्याजागी अस्सल भारतीय म्हणून हिंदू प्रतीकांची उभारणी करायची, हा सांस्कृतिक अजेंडा घेऊन नव्या संसद भवनाची रचना केली गेलीय. ते करून नरेंद्र मोदी यांना इतिहासात आपलं नाव नोंदवायचंय. ही मध्ययुगीन मानसिकता राबवताना लोकशाहीची मूल्यं वारंवार नेस्तनाबूत केली जाताहेत. जवळपास १०० वर्षांपूर्वी सुरू झालेली आताच्या संसद भवनाची उभारणी ही स्वातंत्र्याच्या दिशेनं भारताच्या वाटचालीची खरी सुरुवात होती. हे इतिहास पाहिल्यास सहज कळतं. मात्र आता नव्या इमारतीची उभारणी ही नेमक्या कोणत्या वाटचालीचा भाग आहे, हे समजून घेण्यास वर्तमान डोळे उघडे ठेवून पाहावं लागणार आहे. लोकशाहीला 'म्युझियम'मध्ये ठेवून  आणि 'म्युझियम'मधून राजेशाहीची मुद्रा प्रतीत करणारा 'राजदंड-सेंगोल' नव्या संसद भवनात ठेवला जाणार आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी कोणते प्रजासत्ताक आणू पाहत आहेत, याचा विचार केला नाही तर यंदाची २६ जानेवारी वाया जाईल हे नक्की!
हरीश केंची,
९४२२३१०६०९


चौकट.
सेंगोल अर्थात राजदंडाचा पहिला ज्ञात वापर मौर्य साम्राज्यानं केला होता. मौर्य सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावरच्या अधिकाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी राजदंडाचा वापर केला. त्यानंतर सेंगोल-राजदंडचा वापर गुप्त साम्राज्य, चोल साम्राज्य, चेर साम्राज्य, पांड्य साम्राज्य आणि विजयनगर साम्राज्यानं देखील केला होता. सेंगोल-राजदंड मुघल साम्राज्यानं देखील वापरला होता. मुघल सम्राटांनी त्यांच्या विशाल साम्राज्यावरील त्यांच्या अधिकाराचं प्रतिनिधित्व करण्यासाठी सेंगोल-राजदंडचा वापर केला. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीनं भारतावरच्या अधिकाराचं प्रतीक म्हणून देखील सेंगोल-राजदंड वापरला होता. परंपरेनुसार, सेंगोलला राजदंड म्हणतात. जे राजपुरोहित राजाला देत असत. वैदिक परंपरेत अधिकाराचे दोन प्रकार आहेत. राजेशाहीसाठी राजदंड आणि धार्मिक अधिकारासाठी धर्मदंड. राजदंड राजाकडं होता आणि धर्मदंड राजपुरोहिताकडं असे. सेंगोल हा सर्वकालीन अत्यंत आदरणीय राहिलाय आणि त्याला सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. हे वारसा आणि परंपरेचं प्रतीक म्हणून आदरणीय आहे, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, उत्सव आणि महत्त्वपूर्ण उत्सवांचा अविभाज्य भाग म्हणून सेंगोल वापरला जात असे. भारतीय प्रथा, परंपरा पाहता, राज्यसत्तेचे हस्तांतरण होताना 'राजदंड'ही नव्या सत्ताधाऱ्यांकडं जातो. राजदंडाचे रूप म्हणजे सेंगोल. हे सेंगोल तामिळनाडूतून मागवून घेतलं होतं. ब्रिटिशांकडून सत्तेचं हस्तांतरण होताना लॉर्ड माउंटबॅटन यांनी पंडित नेहरूंना हा राजदंड प्रतीक म्हणून देण्यात आला होता. तो राजदंड नेहरूंनी मग भारतात राजेशाही नाही तर लोकशाही आहे म्हणून राजेशाहीचं प्रतीक असलेला तो राजदंड म्युझियममध्ये ठेवला होता. नव्या संसद भवनात ठेवण्याचं ठरवण्यात आलं आहे. यामागे युगानुयुगे जोडलेली परंपरा आहे. सेंगोलनं आपल्या इतिहासात महत्त्वाची भूमिका बजावली होती. हे सेंगोल राजसत्तेच्या हस्तांतरणाचे प्रतीक बनलं. याबाबतची माहिती मोदींना मिळताच त्याची चौकशी करण्यात आली. मग ते नव्या संसद भवनात ठेवायचं ठरलं.
-----–--------


सेंट्रल विस्टा म्हणून साकारल्या गेलेल्या नव्या संसद भवनाच्या भूमीपूजनानंतर महिन्याभरानं सुप्रीम कोर्टात त्याविरोधात जो दावा दाखल करण्यात आला होता त्याचा अंतिम निकाल आला. पण तो निकाल म्हणजे 'आम्ही मारल्यासारखं करतो, तुम्ही रडल्यासारखं करा'...!, असं सुप्रीम कोर्टाच्या ताशेऱ्यांविषयी वाटावं, असा तो निकाल होता. मोदींच्या या 'ड्रीम प्रोजेक्ट' ला रोखण्याची हिंमत सुप्रीम कोर्टानंही दाखवली नाही. सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या बेंचनं दिलेल्या २ विरुद्ध १ अशा बहुमताच्या निकालात या 'सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट'ला हिरवा कंदील दाखवला होता. न्या.अजय खानविलकर आणि न्या.दिनेश माहेश्वरी यांनी हा प्रकल्प लोकांच्या हिताच्या विरोधी नसल्याचा निर्वाळा दिला. तसंच सरकारनं कोणता निधी कोणत्या प्रकल्पासाठी खर्च करावा, याचे निर्देश कोर्ट देऊ शकत नाही, या तर्कानं प्रकल्पाचं समर्थन केलं होतं. पण तिसरे न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी वेगळं निकालपत्र देताना प्रकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया लोकाभिमुख करण्याची गरज असल्याचं म्हटलं होतं. 'आपल्या लोकशाहीच्या महान वास्तू प्रतीकांशी जोडलं जाण्याची आणि प्रेरणा घेण्याची जागाच हा प्रकल्प हिरावून घेत आहे...!' असा वेगळा मुद्दा त्यांनी आपल्या निकालपत्रात मांडला. या निकालामुळं मोदींच्या 'ड्रीम प्रोजेक्ट' मध्ये कोणताही अडथळा आला नाही. सर्वकाही यथासांग पार पडलं. 

Saturday 20 May 2023

सिद्धरामय्यांचा राज्याभिषेक....!

"काल सिद्धरामय्यांचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा राज्याभिषेक झालाय. ज्या मल्लिकार्जुन खर्गेना बाजूला सारत सिद्धरामय्या पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले, त्याच पक्षाध्यक्ष खर्गेच्या मदतीनं डी.के.शिवकुमार यांच्या ते वरचढ ठरलेत. आधी लोकदल, मग जनता पक्ष, जनता दल, जनता दल-सेक्युलर त्यानंतर काँग्रेस असा त्यांचा राजकीय पक्ष प्रवास घडलाय. दहा वर्षांपूर्वी ज्या अवस्थेत होते त्याच स्थितीत आज ते आलेत. तेव्हा समोर आव्हानं कमी होती आज ती वाढलीत. मजबूत विरोधीपक्ष सर्व आयुधं घेऊन उभा आहे. प्रशासन भ्रष्टाचारानं पोखरलेलंय. पक्षानं लोकांना भरमसाठ आश्वासनं दिलीत. त्याच्या पुर्ततेची गॅरंटीही दिलीय. केंद्राची वक्रदृष्टि असताना सत्ता सांभाळणं ही तारेवरची कसरत आहे. जनतेनं आणि पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवलाय. त्यात ते खरे उतरतात की नाही हे पाहावं लागेल!"
--------------------------------------------

*काँ*ग्रेसच्या विरोधात आपला राजकीय प्रवास सुरु करणारे ७५ वर्षीय सिद्धरामय्या कर्नाटकातले काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा लोकांसमोर येताहेत. काँग्रेसनं जमिनीवरचे नेते म्हणून त्यांच्यावर राज्याची जबाबदारी सोपवलीय. सिद्धरामय्या यांचा राजकीय प्रवास अधिक रोमांचक आहे. १९८३ दरम्यान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तत्कालीन काँग्रेस मुख्यमंत्री गुंडूराव यांनी जनतेचा विश्वास गमावला होता. 'जनता पक्षाची उमेदवारी म्हणजे विजयाची खात्री' असं त्यावेळी वातावरण होतं. त्यामुळं जनता पक्षाकडं उमेदवारीसाठी इच्छुकांची झुंबड उडालेली होती. त्यात सिद्धरामय्याही होते. त्यांनी वरिष्ठांकडं प्रयत्नही चालवला होता. पक्षात त्यांची बाजूनं ज्येष्ठ नेते अब्दुल नजीर होते. अध्यक्ष असलेल्या एच.डी.देवेगौडा यांनी मात्र सिद्धरामय्यांना विरोध केला. ते डाव्या विचारसरणीचे आणि मागासवर्गीय असल्यानं देवेगौडा त्यांना महत्व देऊ इच्छित नव्हते. कारण सिद्धरामय्यांनी कधीच देवेगौडांच्या दरबारात हजेरी लावलेली नव्हती. सिद्धरामय्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. नाराज सिद्धरामय्या आपले राजकीय गुरू अब्दुल नझीर यांच्याकडं आले. त्यांच्या सांगण्यावरून सिद्धरामय्यांनी मग म्हैसूरच्या चामुंडेश्वरी इथून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. सिद्धरामय्यांनी 'शेतकऱ्यांचे वकील' म्हणून तेव्हा नावलौकिक मिळवलेला होता. त्यांनी काँग्रेसचे जयदेव राजेंचा ३ हजार मतांनी पराभव केला. १९८३ ला त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. ९५ आमदारांचा जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष बनला. त्यांना बहुमतासाठी १८ आमदारांची गरज होती. सीपीआय आणि सीपीएमच्या तीन तीन आमदारांनी जनता पक्षाला पाठिंबा दिला. सिद्धरामय्यासह २२ अपक्ष निवडून आले होते. त्यातल्या अनेकांनी जनता पक्षाला पाठींबा दिल्यानं रामकृष्ण हेगडे हे मुख्यमंत्री बनले. हेगडेंनी सिद्धरामय्यांना कन्नड भाषा समितीचे अध्यक्ष बनवलं. सत्तेच्या राजकारणातलं हे त्यांचं पहिलं पाऊल ठरलं.
सिद्धरामय्यांच्या राजकीय वाटचाल समजून घेण्यापूर्वी देवेगौडा यांनी त्यांच्याबद्धल काय म्हटलं होतं ते पाहू या. देवेगौडा प्रचंड चिडलेले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, श्रवणबेळगोळा इथं झालेल्या महाअभिषेक दरम्यान आपल्याला त्यांनी बोलू दिलं नाही. सिद्धरामय्यांची विचारसरणी संकुचित आहे. त्यांना राजकारणात पुढं आणून आपण खूप मोठी चूक केलीय! अशी टीका केली. इंग्रजी वृत्तपत्रांनी याला मोठी प्रसिद्धी दिली. नंतर बंगळुरुत प्रेसक्लबमध्ये बोलताना देवेगौडांच्या त्या वक्तव्याचा जोरदार प्रतिवाद केला. सिद्धरामय्या म्हणाले, एस.आर.बोम्मई, रामकृष्ण हेगडे, एम.पी.प्रकाश यांच्या सामूहिक नेतृत्वाखाली जनतापक्षानं निवडणूका जिंकल्यात. केवळ देवेगौडा यांच्यामुळं हे यश मिळालेलं नाही. आमच्या सर्वांच्या मेहनतीनंच सत्ता आली, त्यानंतरच ते मुख्यमंत्री बनले नंतर प्रधानमंत्री देखील झाले. मला राजकारणात पुढं आणण्यात देवेगौडा यांचा कोणताही हातभार लागलेला नाही. रामकृष्ण हेगडे यांनी माझ्यातल्या कार्यकर्त्याला जाणलं आणि सत्तेत संधी दिली. १९८३ मध्ये सिद्धरामय्यांनी अपक्ष निवडणूक लढविली, १९८५ च्या निवडणूक दरम्यान ते जनता पक्षात आले. या निवडणुकीत रामकृष्ण हेगडेंच्या नेतृत्वाखाली जनता पक्षानं १३५ जागा जिंकल्या. हेगडेंनी दुसऱ्यांदा निवडून आलेल्या सिद्धरामय्यांना आपल्या मंत्रिमंडळात कृषिमंत्री बनवलं. त्यानंतरच्या एस.आर. बोम्मई सरकार मध्येही ते मंत्री राहिले. इथं सिद्धरामय्या यांचं म्हणणं खरं ठरतं. पण ही झाली नाण्याची एक बाजू. १९९४ मध्ये देवेगौडा जनता दलाची धुरा सांभाळत होते. त्यावेळी जनता दलात दोन गट पडले. एक गट देवेगौडा यांचा तर दुसरा रामकृष्ण हेगडेंचा! तोवर सिद्धरामय्या देवेगौडांच्या गटात सामील झाले होते. १९९४ च्या निवडणुकीत जनता दलाला ११५ जागा मिळाल्या. स्पष्ट बहुमत मिळाल्यानं मुख्यमंत्रीसाठी रस्सीखेच सुरू झाली. शेवटी हरकिसनसिंग सुरजित आणि बिजू पटनाईक यांच्या मध्यस्थीनं देवेगौडा मुख्यमंत्री बनले. इथूनच  हेगडेंच्या राजकारणाच्या अस्ताला प्रारंभ झाला. देवेगौडांच्या मंत्रिमंडळात सिद्धरामय्या अर्थमंत्री बनले. ते तेव्हा देवेगौडांच्या अत्यंत जवळचे समजले जाऊ लागले.
१९९६ दरम्यान एक नाटकीय घटना घडली आणि देवेगौडा यांचं नशीब फळफळलं. ज्योती बसुंचे पाय खेचल्यानंतर देवेगौडा प्रधानमंत्री बनले. देवेगौडा दिल्लीत गेल्यानं कर्नाटकात मुख्यमंत्री कोण होणार याचा संघर्ष सुरू झाला. देवेगौडांना वाटत होतं की, त्यांच्या विश्वासातल्या नेत्याकडं मुख्यमंत्रीपद जायला हवं. कारण त्यांना मिळालेलं प्रधानमंत्रीपद हे फार दिवस टिकणार नाही ते अळवावरचं पाणी आहे, म्हणून त्यांना परतल्यानंतर कर्नाटकातले दरवाजे उघडे हवे होते. इकडं हेगडेंचं म्हणणं होतं की, प्रधानमंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपदाचं बलिदान देवेगौडांना करायला हवं. मे १९९६ च्या अखेरीस जनता दल आणि संयुक्त मोर्चा यांच्यात तणाव झाला. १ जूनला वाजपेयीना बहुमत सिद्ध करायचं होतं. देवेगौडा संयुक्त मोर्चाचे नेते होते. वाजपेयी पायउतार कधी होतात याची प्रतिक्षा देवेगौडा करत होते. कर्नाटकात त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यावरून संघर्ष सुरू झाला. जनता दलात फूट पडणं परवडण्यासारखं नव्हतं. त्यावेळी विधानसभेत ३४ लिंगायत आमदार जनता दलात होते. त्यांच्या मते वक्कलिंग समाजाचे देवेगौडा लिंगायत समाज आणि त्यांच्या आमदारांशी दुजाभाव करतात. जे.एच पटेल यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी हेगडे गट हेच म्हणत होता. इकडं देवेगौडा सिद्धरामय्या यांच्या नावाचा आग्रह धरत होते. सिद्धरामय्या हे कुरुबा म्हणजे आपल्या धनगर समाजाचे होते. सामाजिक न्यायासाठी देवेगौडा सिद्धरामय्या यांचं नाव पुढं रेटत होते. जे.एच.पटेल, सिद्धरामय्या यांच्याशिवाय पी.जी.आर. सिंधिया, सी. बैरागौडा, आर.व्ही.देशपांडे हेही शर्यतीत होते. ११५ पैकी ८० आमदार सिद्धरामय्यांच्या पाठीशी होते. २९ मे १९९६ ला नेता निवड शांततेत व्हावं यासाठी दिल्लीतून शरद यादव यांना पाचारण केलं. विधिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली. देवेगौडा, सिद्धरामय्या निश्चित होतें. त्यांनी व्यवस्थित मोर्चेबांधणी केली होती. मात्र बैठकीत मोठा संघर्ष झाला; देवेगौडा मतदानासाठी आग्रही होते. हेगडेंचा गट मात्र तयार नव्हता. हा वाद सोडविण्यासाठी पाच सदस्यांची समिती नेमण्याचं ठरलं. देवेगौडा,  हेगडे, बोम्मई, प्रदेशाध्यक्ष इब्राहिम आणि शरद यादव यांचा त्यात समावेश होता. हेगडेंनी पक्षात फूट पाडण्याची धमकी दिली. हेगडे ३४ लिंगायत आमदारांना घेऊन बाहेर पडले असते तर देवेगौडा प्रधानमंत्री पदापासूनही दुरावले असते शिवाय मुख्यमंत्री पदावरही पाणी सोडावं लागलं असतं. सिद्धरामय्यासाठी सारं काही पणाला लावायला देवेगौडा तयार नव्हते. अखेर त्यांना जे.एच. पटेल यांच्या नावाला संमती द्यावी लागली. इथं सिद्धरामय्या यांचा पत्ता कापला गेला. ८० आमदारांचा आपल्याला पाठिंबा आहे, त्यामुळं मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळेल अशा खुशीत सिद्धरामय्या बैठकीला गेले. तिथं देवेगौडांचा सूर बदललेला होता. हेगडेंनी सिद्धरामय्यांची समजूत काढली. त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं गेलं. सिद्धरामय्या शांत राहिले.
१९९९ ला जनता दलात फूट पडली. जे.एच.पटेल, शरद यादव, नितीशकुमार जनता दल युनायटेड-जेडीयुत दाखल होऊन त्यांनी भाजपशी युती केली. भाजपच्या विरोधात उभं ठाकलेल्या देवेगौडांनी आपल्या पक्षाचं नाव ठेवलं जनता दल सेक्युलर-जेडीएस. अशा नाजूक अवस्थेत सिद्धरामय्या देवेगौडांच्या पाठीशी उभे राहिले. २००४ च्या निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा निर्माण झाली  भाजप ७९ आणि काँग्रेसनं ६५ जागा मिळवल्या आणि ५८ जागा मिळवलेल्या जेडीएसच्या हाती सत्तेच्या किल्ल्या आल्या. जेडीएस आणि काँग्रेस यांची युती झाली, महाराष्ट्रातल्या फार्म्युल्याप्रमाणे काँग्रेसला मुख्यमंत्रीपद आणि जेडीएसला उपमुख्यमंत्रीपद द्यायचं निश्चित झालं. काँग्रेसचे धरमसिंग मुख्यमंत्री तर सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री बनले. देवेगौडांच्या परिवाराचा सत्तेत सहभाग असावा यासाठी देवेगौडांचे पुत्र जे.डी.रेवण्णा यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. आमदार असलेले दुसरे पुत्र कुमारस्वामी यांच्याकडं पक्षाची सूत्रं सोपवली. वर्षभरात त्यांनी पक्षावर पकड बसवली. मात्र त्यांचं लक्ष उपमुख्यमंत्रीपदावर होतं. त्यांनी सिद्धरामय्या यांना लक्ष्य केलं. त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. कुमारस्वामी पक्ष कार्यालयात बसून परस्पर निर्णय घेत आणि सिद्धरामय्यांच्याकडं त्याच्या अंमलबजावणीचे आदेश देत. सिद्धरामय्या यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. दोघांमधला वाद वाढत गेला. थोरले देवेगौडा यात लक्ष घालतील, मुलाला समजावतील असं सिद्धरामय्यांना वाटत होतं. मात्र त्यांनी कुमारस्वामीच्या कारवायांना मुकसंमती दर्शवली. अखेर सिद्धरामय्यांनी बंड पुकारलं. २५ जुलैला हुबळीत अहिंदा रॅली काढली. मागासवर्गीय, दलित यांच्या एकजुटीला कानडीत 'अहिंदा' म्हटलं जातं. या रॅलीतल्या पिवळ्या झेंड्यावर लिहिलं होतं. 'अंडू देवराज अर्स, इंडू सिद्धरामय्या!' याचं मराठी अनुवाद होतं, 'तेव्हा देवराज अर्स आणि आता सिद्धरामय्या!' २००५ ला सिद्धरामय्यांना विधिमंडळ नेते पदावरून हटवलं गेलं. त्यांच्या जागी एम.पी.प्रकाश आले. पक्षविरोधी कारवाया करतात म्हणून सिद्धरामय्यांना पक्षातून काढून टाकलं. समर्थकांचं 'अहिंदा आंदोलन' म्हैसूरमध्ये हिंसक बनलं २० हून अधिक बसेसना आगी लावल्या गेल्या. अनेक ठिकाणी पोलिसांनी गोळीबार केला. इकडं सिद्धरामय्या देवेगौडांवर टीकेच्या फैरी झाडत होते. केवळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपासून आपल्याला दूर ठेवण्यासाठीच देवेगौडा काँग्रेससोबत गेलेत. कुमारस्वामीना पुढं आणण्यासाठी आपल्याला दूर करताहेत. असा आरोप केला.

२००५ मध्ये जेडीएस विरोधात दुसरं बंड सिद्धरामय्यांनी केलं. त्यांनी सी.के.इब्राहिम, बी.के पाटील, सी.नरसिंहप्पा यांना आपल्याकडं वळवलं. नवा पक्ष काढला, 'अखिल भारतीय प्रगतिशील जनता दल...!' कर्नाटकाला हे नांव तसं परिचित होतं, कारण २००२ मध्ये रामकृष्ण हेगडें आणि एस.आर.बोम्मई यांनी याच नावानं पक्ष काढला होता. नंतर त्यांनी जेडीएसमध्ये तो विलीन केला. इकडं कुमारस्वामीचा प्रशासनात हस्तक्षेप वाढला, त्यांच्या कारवायांनी मुख्यमंत्री धरमसिंगही त्रासले. २००५ मध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकीत त्यांनी संधी साधली आणि सिद्धरामय्यांच्या पक्षाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. त्यानंतर दोन महिन्यांतच कुमारस्वामीनं काँग्रेसला दिलेला पाठिंबा काढून घेतला आणि भाजपशी युती करून स्वतः मुख्यमंत्री बनले. जेडीएस-भाजप युती ही सिद्धरामय्यांसाठी संधी होती. ते समजून चुकले होते की, आपल्या पक्षाला समर्थन मिळणार. पक्ष विसर्जित केला आणि २१ जुलै २००६ ला दिल्लीला प्रयाण केलं. इथं कर्नाटकात वावड्या उठू लागल्या. २२ जुलैला सिद्धरामय्या काँग्रेस मुख्यालयात पोहोचले, त्यांनी काँग्रेस सदस्यता स्वीकारली. त्यासाठी खुद्द सोनिया गांधी, मनमोहनसिंग हजर होते. काँग्रेसप्रवेशानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, 'आपण कोणत्याही पदासाठी काँग्रेसप्रवेश केलेला नाही. मला कर्नाटकात चाललेल्या जेडीएस आणि भाजपच्या अनैतिक कारभाराला संपवायचं आहे. पण मला कोणतीच राजकीय महत्वाकांक्षा नाही असं नाही! राजकारणात येणारा प्रत्येकजण काही ना काही बनण्यासाठी येतो. आम्ही संन्यासी नाही...!' हे सांगत असताना त्यांच्यामागे उभे होते मल्लिकार्जुन खर्गे, एच.के.पटेल, धरमसिंग व इतर नेते. सिद्धरामय्यांनी काँग्रेसविरोधात आपलं राजकीय जीवन सुरू केलं होतं. २० वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेसला विरोध केला. २००८ मध्ये कर्नाटकात धरमसिंग हे जरी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष असले तरी पक्षाची धुरा सिद्धरामय्यांच्याकडं होती. दोन्ही युत्या तोडलेली जेडीएस संकटात होती. सिद्धरामय्यांनी जेडीएसच्या बालेकिल्ल्यात जाऊन जेडीएसला आव्हान दिलं. धरमसिंग हैद्राबाद कर्नाटकातले मोठे नेते होते. ते तिथं काँग्रेसला मजबूत करत होते. २००८ मध्ये तिरंगी लढतील भाजपला ११० जागा मिळाल्या, तर काँग्रेसनंही ८० जागा जिंकल्या. मात्र  २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं. २८ पैकी केवळ ६ जागा मिळाल्या. सिद्धरामय्या या निकालांनी खुश होते. या सहापैकी दोघे त्यांना राज्यात आव्हान देत होते. एक होते धरमसिंग ते बिदरमधून लोकसभेवर निवडून गेले. दुसरे मल्लिकार्जुन खर्गे जे गुलबर्गातून निवडून आले. एस.एम.कृष्णा २००८ मध्ये राज्यसभेत गेले होते. आता सिद्धरामय्यांच्या समोर एकमेव आव्हान होतं ते डी.के.शिवकुमार यांचं! पक्षानं त्यांना कार्यकारी अध्यक्ष बनवलं.

२०१३ ची निवडणुक ही सिद्धरामय्यासाठी एक सुवर्णसंधी होती. भाजपनं २००८ ते २०१३ तीन मुख्यमंत्री दिले. दरम्यान यडीयुरप्पानी भाजपपासून अलग होत नवा पक्ष काढला. त्या निवडणुकीत १२२ जागा मिळवून काँग्रेसनं स्पष्ट बहुमत मिळवलं. पक्षानं निवडणुकीपूर्वीच सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलं होतं. तरीही २०१३ मध्ये मल्लिकार्जुन खर्गे काँग्रेसचे मुख्यमंत्री होणार होते. सात वर्षांपूर्वी देवेगौडांच्या पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या सिद्धरामय्या यांनी खर्गे यांच्यावर मात करत मुख्यमंत्री बनले. तेव्हाही अशीच स्थिती होती जशी आज आहे. तेव्हाही दोघे शर्यतीत होते. एक मल्लिकार्जुन खर्गे जे केंद्रात मंत्री होते आणि दुसरे होते सिद्धरामय्या, केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली, जी.परमेश्वर यांचीही नावं चर्चेत होती. एकमत न झाल्यानं पक्षानं ए.के.अँटनी, मधूसुदन मिस्त्री, व्हीलिरीओ आणि जितेंद्रसिंग यांना पर्यवेक्षक म्हणून पाठवलं. आमदारांच्या मतांमुळं सिद्धरामय्या मुख्यमंत्री बनले. जे खर्गे पक्षात नव्यानं आलेल्या सिद्धरामय्यांकडून पराभूत झाले होते. ते आज अशा भूमिकेत आहेत की, ते सिद्धरामय्यांचं राजकीय आयुष्य संपवू शकत होते. पण त्यांनी सिद्धरामय्यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं. पूर्वी १३ मे २०१३ रोजी त्यांनी मुख्यमंत्रीपदाची पहिल्यांदा शपथ घेतली. पाचवर्षाचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला. तब्बल ४० वर्षांनंतर असं घडलं होतं. देवराज अर्स यांच्यानंतर ते दुसरे मुख्यमंत्री बनले ज्यांनी ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षानंतर २०१८ मध्ये काँग्रेस-जेडीएसच्या युतीत पुन्हा सत्तेत आली. मुख्यमंत्री कुमारस्वामी बनले. वर्षभरानंतर भाजपनं सत्ता हिसकावून घेतली आणि सिद्धरामय्या विरोधीपक्षनेते बनले. सिद्धरामय्या हे एक मास लीडर आहेत  केवळ आपल्याच नाही तर सर्व जातीतल्या मतदारांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. असं असूनही त्यांनी मागच्यावेळी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. त्यांच्या पारंपरिक चामुंडेश्वरीमधून त्यांचा पराभव झाला होता. पण बादामधून ते विजयी झाले होते. आता ते वरुणातून निवडणुक लढवली आणि यश संपादन केलंय. काल दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. त्यांना शुभेच्छा...!!
हरीश केंची,
९४२२३१०६०९




Thursday 18 May 2023

दे धडक...बेधडक...बिनधास्त...बेफाम...! अजित पवार!!!

अजित अनंतराव पवार हे महाराष्ट्र राज्यातले एक महत्वाचे राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी नगर जिल्ह्यातल्या देवळाली प्रवरा इथं त्यांच्या आजोळी झाला. त्यांचं बालपण बारामतीला गेलं. त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण देवळाली, प्रवरा, नगर इथं पूर्ण केलं. ते पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातल्या काटेवाडी या गावाचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. अजितदादा पवार हे शरद पवारसाहेब यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत. अनंतरावांनी प्रारंभीच्या काळात प्रख्यात चित्रपट निर्माते, व्ही. शांताराम यांच्या मुंबईतल्या राजकमल स्टुडिओसाठी काम केलं होतं. अजितदादा पवार यांचे आजोबा गोविंदराव पवार हे बारामती सहकारी सोसायटीत नोकरी करत होते आणि त्यांच्या आजी शारदाबाई पवार ह्या कौटुंबिक शेतीची देखभाल करीत होत्या. त्याचबरोबर त्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याही होत्या. त्यामुळं त्यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार झालेले आहेत. अजितदादांचे महाराष्ट्रातले माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या भगिनी सुनेत्रा निंबाळकर पाटील यांच्याशी विवाह झालाय. त्यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजितदादांनी पहिल्यांदा १९८२ साली जेव्हा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवड झाली तेव्हापासून अजितदादांच्या सक्रिय राजकारणाला प्रारंभ झाला. १९९१ मध्ये ते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हापासून जिल्ह्याच्या राजकारणात वावरू लागले. तब्बल १६ वर्षे ते या पदावर कार्यरत राहिले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विकास कामे केली. या काळात ते बारामतीतून लोकसभेचे खासदार म्हणूनही निवडले गेले. पण दिल्लीतलं राजकारण त्यांना भावलं नाही. मग त्यांनी देशाचे संरक्षणमंत्री बनलेले आपले काका शरद पवार यांच्यासाठी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राज्यस्तरावरच राजकारण करायचं असा निर्धार केला आणि राज्य हेच आपलं कार्यक्षेत्र म्हणून निवडलं. सन १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४आणि २०१९ मध्ये बारामतीतून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून सतत निवडून आले आहेत. २०१९ मध्ये त्यांनी भाजपसह सर्व विरोधी उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करून निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहीलंय. अजित पवार हे एका राजकीय प्रतिथयश कुटुंबाचे सदस्य आहेत. शरद पवार यांच्यासारख्या राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे आज तब्बल ६० वर्षे सक्रियपणे देशाच्या राजकारणातले प्रमुख सन्माननीय नेते राहिले आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून कॉमर्स पदवी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतलं. त्यांनी राज्य सरकारतल्या अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे. पवार त्यांच्याकडं असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा प्रशासनावर जबरदस्त पकड आहे. राज्यातले वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचं श्रेय त्यांना जातं. पण जलसंपदामंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते २३ ते २६ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ८० तासांपेक्षा कमी काळ महाराष्ट्र राज्याचे  उपमुख्यमंत्री  होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात सर्वात कमी कालावधीचे  ते उपमुख्यमंत्री झाले. त्यांच्या या निर्णयानं सारे आश्चर्यचकित झाले होते. पुढे चार दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीनं सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले.  कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. उपमुख्यमंत्रीपदासह त्यांना जलसंपदामंत्री, वित्त आणि नियोजन मंत्री अशा अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम करण्याचा अनुभव आहे. अजित पवार त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीत अनेकदा वादात सापडले. २०१३ मध्ये महाराष्ट्र राज्य सिंचन प्रकल्पांचे कंत्राट देण्याच्या संदर्भात पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पुढे महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांना या आरोपांतून मुक्त केलं. अजित पवार हे त्यांच्याकडं असणारी हुशारी आणि राजकीय कुशाग्र बुद्धीसाठी लोकप्रिय आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सर्वांचा पाठिंबा मिळवून देण्याची त्यांच्याकडं क्षमता आहे. वादग्रस्त विधानांमुळं ते नेहमी चर्चेत असतात. भ्रष्टाचाराचे आरोप आणि अन्य बेकायदेशीर कामांमध्ये असलेल्या कथित सहभागावरुन त्यांच्यावर टिका होत असते. असं असूनही ते महाराष्ट्राच्या राजकारणातले एक महत्त्वपूर्ण लक्षवेधी नेते आहेत. राज्यामध्ये त्यांचे खूप समर्थक आहेत. त्यांच्याकडं एक सक्षम नेतृत्व आहे. त्या बळावरच ते मुख्यमंत्री होण्याची क्षमता राखून आहेत.

अजित पवारांच्या राजकिय जीवनातल्या काही घडामोडी या प्रामुख्यानं सांगाव्याच लागतील, त्याशिवाय त्यांच्या व्यक्तिमत्वाचं योग्य मूल्यमापन होणार नाही. म्हणून हे काही दाखले देतो आहे. अजित पवार यांनी १४ एप्रिल २०१३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी कराड इथं यशवंतरावांच्या समाधीस्थळी आत्मक्लेश उपोषण केलं होतं. ते त्यांनी केलेल्या धरणातल्या वक्तव्याबाबत! त्यांनी जे म्हटलं होतं, त्यातून प्रसिद्धीमाध्यमातून आणि जनतेतून प्रचंड रोष प्रकट झाला होता. त्यासाठीचा हा आत्मक्लेश होता. त्या आत्मक्लेशाबरोबरच त्यांनी यशवंतराव चव्हाणसाहेब समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता, त्यांचं जीवनचरित्र अभ्यासायला हवं होतं, त्यांचं राजकीय आणि प्रशासकीय कार्यकुशलता समजून घ्यायला हवी होती, दुर्दैवानं त्यांचा अभ्यास करण्याची वृत्ती असतानादेखील त्यांनी तो केला नसावा असं वाटतं. त्याचमुळं दहा वर्षांनंतरही पुन्हा त्यांना शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा प्रसारमाध्यमांच्या समोर येऊन कार्यकर्त्यांची जाहीर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली. त्यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका ही योग्य जरी असली तरी, कार्यकर्त्यांच्या दृष्टीनं ते उद्धट, उर्मटपणाचं वागणं होतं. शरद पवारांच्या राजीनाम्यानं कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या, ते हळवे बनले होते. अशावेळी त्यांना समजावून, त्यांची समजूत काढणं गरजेचं असताना अजितदादांचं दरडावणं अनेकांना रुचलं नव्हतं. अनेकांनी खासगीत तसं बोलूनही दाखवलं होतं. त्यांनी याबाबत दिलगिरी मागितली पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, कारण जे निसटायचं ते निसटून गेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचं व्हायचं ते नुकसानही होऊन गेलं. ते सावरणं एवढंच हाती राहिलं. अजित पवार यांच्या राजकारणाचा एकूण अभ्यास करताना थेट त्यांच्या नांदेडच्या सभेपाशी जावं लागतं. जिथं भर सभेत त्यांना जाहीरपणे प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराकडं जेव्हा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे कॅमेरे वळले, तेव्हा त्यांनी माध्यमांवर तोंडसुख घेतलं होतं. माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी दंडुक्याची भाषाही वापरली आणि त्यांचा शब्द प्रमाण मानून तिथं उपस्थित पोलिस अधिकाऱ्यानं संबंधित पत्रकाराला सभेतून बाहेर काढलं. त्यानंतर पत्रकार संघटनांनी अजित पवार यांच्यावर बहिष्काराचं अस्त्र उपसलं. त्याचवेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही बहिष्कार घालण्याचा आततायीपणा पत्रकारांनी केला. दोघांनीही या बहिष्काराला किंमत दिली नाही. शेवटी शरद पवार यांनी दिलगिरी व्यक्त करून प्रकरणावर पडदा टाकला होता. त्यानंतर इस्लामपूरजवळच्या एका सभेत चौदा वर्षांपूर्वी अजित पवार यांनी तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील यांना तंबाखू खाण्यावरून जाहीरपणे बरंच झापलं होतं आणि त्यानंतर चार दिवस प्रसारमाध्यमांनी नुसता गोंधळ घातला होता. त्यावर ‘अजित पवार हे आपले बंधुतुल्य मित्र आहेत आणि त्यांना तसं बोलण्याचा अधिकार आहे...!’, असं आर.आर.पाटील यांनी जाहीरपणे सांगितलं आणि त्या विषयावर पडदा टाकला. त्याचवेळी आर.आर.पाटील यांनी, ‘चौकटीच्या बातमीची हेडलाइन होऊ लागल्यामुळं गोंधळ वाढतोय..!’, अशी टिपण्णीही केली होती आणि ती प्रसारमाध्यमांच्या बदलत्या स्वरुपावर बोट ठेवणारी होती. त्याचीच पुनरावृत्ती दहा वर्षांपूर्वी झाली. तासगाव अर्बन बँकेच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमात तासगाव इथं बोलताना अजित पवारांनी गाव आणि तालुका पातळीवरच्या राजकारणासंदर्भात बोलताना 'टगेगिरी'चा उल्लेख केला होता. ‘एकवेळ आमदार-खासदार म्हणून निवडून येणं सोपं असतं; मात्र, तालुका पातळीवर निवडून येण्यासाठी खूप काही करावं लागतं. त्यासाठी गावानं ओवाळून टाकलेले टगे किंवा अर्कच कामी येतात. मी तालुका पातळीवर निवडून आलो आहे... त्याअर्थी मीही टग्याच आहे...!’ असं ते मिश्कीलपणे म्हणाले होते. ग्रामीण भागातल्या समारंभात गमतीनं केलेल्या या विधानावर कॅमेरे लावून बसलेल्यांनी गहजब केला आणि त्यानंतर तमाम इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी अजित पवारांच्या कोणत्याही कृतीसाठी ‘टगेगिरी’ हे विशेषण कायमचं जोडून टाकलं होतं.

त्यानंतर इंदापूर तालुक्यातल्या निंबोळीच्या सभेतल्या धरणासंदर्भातल्या वक्तव्याचंही तसंच झालं. गावाकडच्या सभेत विनोद करण्याच्या भरात तिथं अजित पवारांची जीभ घसरली. ग्रामीण ढंगात बोलताना भलतंच बोलून गेले. तिथं प्रसिद्धीमाध्यमातले कुणीच नव्हतं. पण इंदापूरच्या त्यांच्या परममित्रांनी त्या भाषणाची व्हिडीओ क्लिप वेगानं मुंबईत वृत्तवाहिन्यांना पोहोचवल्याचा इतिहासही सर्वज्ञात आहे. अजित पवाराचं ते वक्तव्य राज्यकर्त्याला शोभा देणारं नव्हतं, परंतु चूक लक्षात आल्यानंतर तीनदा माफी मागूनही अनेकांचं समाधान झालं नाही. पंचवीस वर्षे सार्वजनिक जीवनात असलेल्या एका नेत्याची संपूर्ण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलल्यासारखी प्रसारमाध्यमं कामाला लागली होती. प्रसारमाध्यमांतल्या शहरी मानसिकतेच्या विशिष्ट वर्गातल्या मंडळींनी कोंडीत पकडून अजित पवारांना जेरीला आणलं होतं. अजित पवारांनीच नव्हे, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या तमाम नेत्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, ‘टवाळा आवडे विनोद’ अशी धारणा असलेले रामदासांचे अनुयायी नैतिकतेचे संरक्षक बनून सगळीकडं लक्ष ठेवून आहेत, तेव्हा बोलताना, उदाहरणं देताना किंवा विनोद करताना खूप काळजी घ्यायला हवी! मात्र एवढं सारं घडूनही अजितदादा त्याबाबत खबरदारी घेत नाही, बेधडकपणे बोलण्याचा त्यांचा स्वभाव त्या आड येतो. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे! अजित पवारांच्या राजकीय कारकीर्दीतला ऐतिहासिक निर्णय म्हणजे पुण्याच्या लाल महालातल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याचा! अजित पवार होते म्हणूनच हा पुतळा हटवण्याचा निर्णय अंमलात येऊ शकला, दुसऱ्या कुठल्या नेत्याकडून ते शक्यच नव्हतं. या कृतीमुळं त्यांनी छत्रपती शिवरायांच्या इतिहासातलं एक प्रदूषित पान कायमचं फाडून टाकलं. शिवरायांच्या जीवनातल्या बदनामीची कुजबूज संपवून टाकली. परंतु हाच निर्णय अनेकाच्या जिव्हारी लागला आणि अजित पवार प्रसारमाध्यमांच्या हिटलिस्टवर आले. दुर्दैव म्हणजे ज्यांच्या आग्रहाखातर अजित पवार यांनी हे धाडसी पाऊल उचललं होतं ती सगळी मंडळी मात्र अडचणीच्या काळात अजित पवारांच्या मागं उभे राहिले नाहीत. त्यांनी त्या प्रकरणातून काढता पाय घेतला!

अजितदादांचे नुकतंच न झालेलं तथाकथित बंड हे भाजपत जाण्यासाठी नाही तर पक्ष पुढे कोणाच्या नेतृत्वात चालेल, यासाठी होतं! विरोधीपक्षनेते अजित पवार हे प्रफुल्ल पटेल यांच्यासह अमित शहांना दिल्लीत भेटले, त्यांनी ४० आमदारांच्या सह्या घेतल्या या बातम्या एका विशिष्ट उद्देशानं पेरल्याचं एव्हाना अजित पवार आणि पक्षातल्या त्यांच्या निकटवर्तीयांच्या चांगलंच लक्षात आलं असावं. प्रत्यक्षात तसं काहीही घडलेलं नव्हतं. या अफवा पसरवण्याचा रस्ता भुलाभाई देसाई मार्गावरून ठाण्यापर्यंत जातो. 'जिवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच राहणार...!' असं अजितदादांनी स्पष्ट केल्यानंतर ते पक्षातल्या तीन मोठ्या नेत्यांसह ताजमध्ये गेले. ते चहा प्यायला, खलबतं करायला गेले ही बातमी खरीच होती; पण त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या राष्ट्रवादीच्याच एका नेत्यानं ही बातमी पद्धतशीरपणे माध्यमांपर्यंत पोहोचवली. तो नेता कोण होता हे शोधलं तर बरीच उकल होईल. स्पष्टीकरण दिल्यानंतरही अजितदादांबद्धल संशयाचं वातावरण कायम राहावं हा त्यामागचा उद्देश होता. अजित पवारांनी जे केलं ते बंड होतं; पण भाजपसोबत जाण्यासाठी नव्हतं. पक्ष पुढं कोणाच्या नेतृत्वात चालणार, अजित पवारांच्या की सुप्रिया सुळेंच्या?  हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. २०१९ च्या बंडाच्या वेळी अजित पवारांच्यासोबत थेट नसलेले प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे हे बड़े नेते यावेळी सोबत होते. किंबहुना बंडापेक्षा यावेळी राष्ट्रवादीचे नेते, आमदार अधिक संख्येनं त्यांच्याभोवती एकवटलेले दिसताहेत. याचा अर्थ पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी सुप्रिया यांच्यापेक्षा अजितदादांना अधिक पसंती आहे हा मेसेज पवार साहेबांना देण्याचा उद्देश चार पाच दिवसांतल्या त्या घडामोडींमागे होता. पक्षाच्या भावी नेतृत्वाबाबत आमची पसंती अजित पवार यांना असेल असा इशाराच यानिमित्तानं पक्षातल्या नेत्यांनी थोरल्या साहेबांना दिला. सुप्रियाताईंचा आदर करू, पण नेतृत्व अजितदादांचं हवंय...!' असे संकेत दिले गेले. हे सगळं बघता अजितदादांच्या हालचालींकडं पक्षाचा उत्तराधिकारी होण्यासाठीची लढाई म्हणून बघता येईल. पुण्यातून अचानक नॉट रिचेबल होणं, कार्यक्रम रद्द करून मुंबईतल्या देवगिरी बंगल्यात थांबणं, तिथं काही नेत्यांशी चर्चा करणं, यातून त्यांनी वातावरण तापवलं ते मुळात पक्षनेतृत्वाला इशारा देण्यासाठी! राष्ट्रवादीचा जीव विधानसभा निवडणुकीत आहे आणि नेतृवाच्य या दोन पर्यायांपैकी अजित पवार हे त्यात पक्षाला अधिक चांगलं यश मिळवून देऊ शकतात, असं वाटणारे नेते त्यांच्याभोवती एकवटले असल्याचं दिसतं. त्यांच्यावर पक्षाच्या एकाही नेत्यानं नाराजी व्यक्त केलेली नाही, हेही महत्त्वाचं आहे. भविष्यात पक्ष अजितदादाकडं जाईल की सुप्रियाताईंच्या हातात? हे कळेलच!

'आपण मुख्यमंत्री होऊ शकलो नाही...!', याची खंत अजित पवारांनी सर्वप्रथम जाहीरपणे व्यक्त केली ती, दोन महिन्यांपूर्वी! एका दैनिकाच्या व्यासपीठावरच्या मुलाखतीत. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दोन गंभीर विधानं जाहीरपणे एकाचवेळी केलीत. माध्यमांनी तिकडं जरा दुर्लक्षच केलं. पहिलं विधान होतं, 'एकनाथ शिंदे लवकरच मुख्यमंत्रीपदावरून जाणार...!' दुसरं होतं, '२०२४ कशाला? अगदी आताच मुख्यमंत्री होणे मला आवडणार आहे...!' हे जे आहे, ते उगाच नाही! अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे दोन महिन्यांपूर्वी लागावेत आणि आता तर उद्याही आपण मुख्यमंत्री होऊ, असं त्यांनी म्हणावं, हे एवढं साधं सोपं नव्हतं. लवकरच काही तरी घडणार असं त्यांना वाटत होतं, पण तसं घडलंच नाही. त्यानंतर 'मरेपर्यंत अजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असतील...!' असं त्यांनी म्हटलंय. तसं असेलही, पण तोवर राष्ट्रवादी कॉंग्रेस कोणासोबत असेल? की, स्वतंत्ररित्या सत्तेवर येईल, हा खरा प्रश्न आहे! आज जी चर्चा सुरू आहे, ती साधारणत: तसंच २०१९ च्या निवडणूक निकालानंतर ठरलं होतं. आताचे मध्यस्थ प्रफुल्ल पटेल हेच तेव्हा त्याचे सूत्रधार होते. पण, पावसात भिजलेल्या शरद पवारांना तेव्हा लगेच तसं करणं गैरसोईचं होतं. त्यामुळं कॉंग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेचं गुऱ्हाळ चालू ठेवायचं. शिवसेना-कॉंग्रेसला खलनायक करायचं आणि बराच काळ जाऊ द्यायचा. 'राज्याला इतक्या दिवसांपासून सरकारच नाही...!', हाच मुद्दा तीव्रपणे मांडत राहायचा. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि बांधापर्यंतही! त्यानंतर महाराष्ट्राच्या हितासाठी कोणतं का असेना, पण सरकार स्थापन झालं पाहिजे, असं म्हणत भाजपला पाठिंबा द्यायचा. देवेंद्र मुख्यमंत्री नसतील, एवढी अट असेल आणि राज्यात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार असेल. केंद्रातही सत्तेत वाटा मिळेल. असं तेव्हाच सगळं ठरलं होतं. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं या त्यांच्या मनसुब्यावर आता पाणी फेरलं गेलंय!
२०१९ ला जेव्हा 'उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील...!' अशी घोषणा शरद पवारांनी केली, तेव्हा काहीही अंतिम झालेलं नव्हतं. उलट ज्या बैठकीनंतर ही घोषणा पवारांनी केली, त्या बैठकीत नाराजी व्यक्त करत मल्लिकार्जुन खर्गे पवारांवर बरसले होते. सरकार स्थापन होणार नाही, हेच तेव्हा अधोरेखित झालं होतं. पण, कात्रजचा घाट दाखवण्यासाठी पवारांनी पत्रकारांना हेडलाइन देऊन टाकली. वेळकाढूपणा करायचा आणि मग साळसूदपणे भाजपला पाठिंबा द्यायचा, हे नक्की होतं. २०१४ मध्ये निकाल पूर्ण लागण्यापूर्वी शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हाही हे जाहीर करणारे प्रफुल्ल पटेलच होते. भाजपसोबत जायचं हे तेव्हाच ठरलं होतं. २०१९च्या निवडणुकीनंतर ते पक्कं झालं होतं. पण, काकांच्या या वेळकाढूपणालाच बापडे अजित पवार कंटाळले. ही खेळी आहे, हे लक्षात न आल्यानं ते फसले. आणि, पहाटेच.....! पण त्यांना आता पहाट म्हटलेलं आवडत नाही! राजभवनात पोहोचले. तेही काकांना न सांगता. काकांना भाजपसोबत जायचं होतंच. पण, त्यांची प्रक्रिया वेगळी होती. तिथंच सगळं फसलं. मग घड्याळाचे काटे उलटे फिरले. पवारांनी मांडलेला डाव अजित पवारांनी उधळून लावला. पुन्हा 'खंजीर खुपसला' सुरू झालं. शरद पवारच 'व्हिलन' झाले. ज्या खंजीरानं पवारांची पाठ चार दशकं सोडली नव्हती. ज्या खंजीरानं पवारांची पाठ चार दशकं सोडली नव्हती, तो खंजीर पुन्हा अवतरला. पावसात भिजून सगळे डाग धुतले गेलेले शरद पवार मग मात्र उभे राहिले आणि सरकार उभं करूनच स्वस्थ बसले. अर्थातच नायक ठरले! नंतर हे शिवसेनेच्या दुहीतून सरकार पडलं. पवार हेच गृहमंत्री असूनही, मंत्री आणि आमदार गुवाहाटीला चालल्याचं कोणाला समजलं नाही. जे व्हायचं ते झालं. गौतम अदानी पवारांना बारामतीत भेटले आणि नेमकं त्यानंतर दोन दिवसांत सरकार पडलं! शरद पवारांनी सरकार बनवलं. वाचवलं मात्र नाही. महाविकास आघाडी सरकार अखेर पडलं. अजित दादांनी भाजपसोबत सरकार बनवलं असतं तर, राज्यात घडलेलं हे सत्तासंघर्षातलं नाट्य रंगलं नसतं! आणि राष्ट्रवादी सत्तेत राहिली असती. हे त्यांच्या सहकाऱ्यांना राहून राहून वाटतं.

शिवसेनेतली एकनाथ शिंदेंची फितुरी,भाजपसोबत सत्तास्थापन, उद्धव ठाकरेंचा राजीनामा, न्यायालयात उभा राहिलेला झगडा, या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात हे शिंदे सरकार टिकणार नाही. असं सांगितलं जात होतं. न्यायालयीन निकालानंतर सरकार तरलं तरी ती मोठी नामुष्की असणार. न्यायालयाचा निकाल भाजपच्या मनासारखा लागेलाही, पण या सरकारबद्धल महाराष्ट्रात सहानुभूती नाही, असा निष्कर्ष भाजपनंच केलेल्या सर्वेक्षणातून त्यांना मिळालाय. महाविकास आघाडीनं उभं केलेलं आव्हान मोठं आहे. उद्धव ठाकरेंची प्रचंड प्रतिमा भाजपला छळते आहेच, पण पवारांनाही त्याचा आनंद नक्कीच नाही. उद्धव यांच्यावर खापर फोडून सरकार पडल्यानं, उद्धव अपयशाचे धनी होतील आणि सरकार स्थापन केल्याचं श्रेय मात्र आपल्याकडंच राहील. हा होता पवारांचा होरा. झालं मात्र उलटंच. सगळं राहिलं बाजूला, उद्धवच हीरो झाले. आज उद्धव हाच महाविकास आघाडीचा चेहरा आहे. तो कोणत्याही पवारांपेक्षा अथवा पटोले-थोरात-चव्हाणांपेक्षा मोठा झालाय.

शिवसेना फोडल्याचा भाजपलाही फार काही फायदा झालेला नाही. उलटपक्षी ते भाजपसाठी एक ओझं होऊन बसलंय. हा गोंधळ वेळीच संपवला नाही तर राज्यात भाजपची स्थिती भयंकर वाईट होईल. या स्थितीत नवी समीकरणं आकार घेत आहेत. एनडीटीव्हीवरील शरद पवारांची मुलाखत बोलकी होती.
दिल्लीतल्या विरोधकांच्या एकजूट बैठकीतही पवार नव्हते.
मध्येच उद्धव ठाकरेंसोबत त्यांची अचानक बैठक झाली.
'कुटुंबातील सदस्यांकडून भाजपसोबत यावं', असा दबाव येत असल्याचं शरद पवार उद्धव ठाकरेंना म्हणाले. संजय राऊत यांनी 'सामना'त तसं जाहीरपणे म्हटलंय. कुटुंबातले सदस्य म्हणजे सुप्रिया अथवा रोहित नक्कीच नाहीत. ते अर्थातच अजित पवार! अजित पवार ज्या दिवशी गायब होते, त्यानंतर त्यांची देहबोलीच बदललीय. यापूर्वीही विधिमंडळात ते जाणवत होतंच. अचानकपणे अजित पवारांचा 'टीआरपी' सध्या वाढलेलाय. आता अजित पवारांनी भाजपसोबत जावं. पहाटे फसलेला प्रयोग पुन्हा दिवसाढवळ्या करावा, अशी कल्पना होती. न्यायालयाचा निकाल येण्यापूर्वीच हे सरकार बरखास्त करावं. नवं सरकार स्थापन व्हावं. यावेळी अजित पवार स्वतः मुख्यमंत्री असतील! अशी शक्यता वर्तवली जात होती. मुख्यमंत्री होण्याचं त्यांचं अपुरं स्वप्न अजित पवारांनाही त्रास देतेय. २००४ मध्ये कॉंग्रेसपेक्षा अधिक जागा मिळूनही केवळ अजित मुख्यमंत्री नको म्हणून काकांनी राष्ट्रवादीकडं उपमुख्यमंत्रीपद घेतल्याची त्यांची तक्रार आहे. अजित पवारांची जी एक मुलाखत प्रसिद्ध झाली, त्यात अजित पवार पहिल्यांदाच तसं स्पष्टपणे म्हणालेत. अजित पवारांना इतक्या दिवसांनंतर कंठ फुटावा, हा योगायोग नाही. हे तेव्हापासूनच शिजतंय. आता अजित पवारांचं ते अपुरं स्वप्न पूर्ण होईल तेंव्हा होईल. शिंदेच्या सेनेला बरोबर घेऊन भाजपला लोकसभेच्या निवडणुका लढवताना अडचणी येणार आहेत. पूर्वी शिवसेनेला सोबत घेऊन ४२ जागा जिंकल्या आहेत. त्या २०२४ मध्ये कमी झाल्या तर केंद्राची सत्ता हातातून जाण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी, ग्रामीण भागात वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीला सोबत घेतलं तर अपेक्षित यश २०१४ मध्ये मिळेल म्हणूनच भाजपनं अजित पवारांवर मुख्यमंत्रीपदाचं जाळं टाकलं होतं. पण शरद पवारांच्या राजीनाम्यानं या सगळ्या प्रयत्नावर पाणी फेरलं गेलंय. अजित दादांना आता आपली इच्छापूर्तीसाठी आपली उपद्रवमूल्य अधिक जोमानं पुन्हा सुरू करावी लागतील!

चौकटीत उल्लेख केलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा कुणी जपला असेल तर तो त्यांचे मानसपुत्र असलेल्या शरद पवारांनी! यशवंतरावांचे हे वाक्य काना, मात्रा, वेलांटी, उकार आणि विरामचिन्हेसुद्धा न बदलता आज जसंच्या तसं शरद पवार यांच्याही तोंडी शोभू शकेल. परंतु अजित पवार यांच्या तोंडी ते शोभणार नाहीत. कारण शरद पवार यांच्या सहा दशकांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार आहेत. त्यांनी स्वकर्तृत्वावर अनेक संस्था उभ्या केल्या आहेत, अनेकांना बळ दिलंय. कठिणातल्या कठीण परिस्थितीवर अनेकदा मात केलीय, अगदी मृत्युवरही! शून्यातून पुन्हा सगळं उभं केलंय. अजित पवार यांच्या कारकीर्दीत उत्कर्ष आहे तो सत्तेत असताना मिळत गेलेल्या पदांचा. बाकी सगळा उतारच आहे. सत्ता होती, तोवर त्यांचं कर्तृत्व दिसून येत होतं, सत्ता गेल्यानंतर ते निष्प्रभ झाले. गेलेली सत्ता मिळवण्यासाठी आपलं कौशल्य, ताकद पणाला लावतानाही ते कधी दिसले नाहीत. स्वत:वरच्या आरोपांचा प्रतिवादही आक्रमकपणे करू शकले नाहीत. नेता दबंग असला तरच कार्यकर्ते त्याच्यामागं उभे राहातात, परंतु अजित पवार यांची दबंगगिरी सत्तेच्या बळावर चालली होती. विरोधात ते नेहमी सत्तेच्या दहशतीखाली राहिलेत. सत्ताधाऱ्यांनीही त्याचा फायदा उचलून आपली मुळं घट्ट रोवताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या अनेक फांद्या छाटून टाकल्या. अजित पवारांनी थोडं दक्षिणेकडं, आंध्रप्रदेशकडं वळून जगनमोहन रेड्डीकडं पाहिलं असतं तरी जनमताच्या जोरावर सत्तेला कसं भिडायचं असतं, हे त्यांना कळलं असतं. परंतु ते मैदानात उतरलेच नाहीत, त्यामुळं पाठीमागची गर्दी ओसरत गेली. निवडणुकीच्या तोंडावर ती पुन्हा गोळा करण्यासाठी शरद पवार यांना मैदानात उतरावं लागलंय, तेही राजीनाम्याच्या माध्यमातून! शरद पवार यांच्या वयाचा विचार करता पुढच्या निवडणुकीत ते आतासारखे सक्रीयपणे प्रचारात फिरू शकतील की नाही याबाबत शंका वाटल्यावाचून राहात नाही. अशा काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडं खंबीर नेतृत्वाचा पर्याय असायला हवा होता. तो पर्याय अजित पवार हेच असतील असं सात-आठ वर्षांपूर्वीपासून वाटत होतं, परंतु त्यांच्या राजकारणाची घसरण पाहता आज तसं म्हणणं धाडसाचं ठरेल. अजित पवार यांना खरोखर भविष्यात पक्षाचं नेतृत्व करायचं असेल तर स्वकर्तृत्वानं ते सिद्ध करावं लागेल आणि हे सिद्ध करण्यासाठी संघटना बांधणी आणि निवडणुकीतलं यश याव्यतिरिक्त तिसरा कुठलाही पर्याय नाही. रुसवे फुगवे करून हट्ट पुरवून घेता येतात, मात्र नेता बनता येत नाही! शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीतच उद्धव यांच्याकडं पक्षाची सूत्रं दिली. ती त्यांनी सक्षमपणे पार पाडल्याचं दिसून आलंय. थोरल्या पवारांनीही असंच आपल्या हयातीत अजित पवारांकडं पक्षाची सूत्रं सोपवून त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. शरद पवारांनी पक्षाची वाटचाल आपल्या नेतृत्वाशिवाय सक्षमपणे होते आहे हे सिद्ध करण्यासाठी अजित पवारांकडे द्यायला हवीत. आणि आपल्या समोरच अजित पवार मुख्यमंत्री होतील असं पाहावं!

चौकट १
राजकारण करताना नेमकं काय करावं लागतं यावर महाराष्ट्राचे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी म्हटलं होतं "राजकारणाचा प्रपंच करताना केवळ आपल्याच लोकांचं नाही तर दुसऱ्याचंही अंतःकरण जाणून घ्यावं लागतं. आपण आणि आपले सहकारी अडचणीत तर येणार नाहीत ना याची खबरदारी घ्यावी लागते. येणारा काळ समय योग्य आहे की अयोग्य हे ओळखावं लागतं. सतत फटकळ राहून चालत नाही, प्रसंगी नम्रपणानं वागावं लागतं. योग्य लोकांची पारख करावी लागते. राजकारणात वावरणाऱ्या लोकांमध्ये प्रामाणिक आणि फितूर अशा दोन्ही व्यक्तिमत्वाची माणसं गृहीत धरावी लागतात. कुणा सहकाऱ्यांमध्ये दोष आढळला, तर तो त्याचा अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडं आणि त्याच्या कृत्याकडं काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी लढताना त्यांच्याच शस्त्रानं लढावं लागतं आणि तसं करणं कित्येकदा आवश्यकही असतं. व्यक्तिगत राजकारण, पक्ष, सामाजिक, राजकीय घडामोडी याबाबत दूरदर्शीपणानं काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढं जावं लागतं!’ आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांनी मांडलेलं हे चिंतन आहे.


चौकट २
यशवंतराव चव्हाण यांनी वेळोवेळी विविध घटकांसाठी काही ना काही सांगितलंय. राजकारणासंबंधी त्यांनी म्हटलंय, ‘राजकारणात यशस्वी होणं एक कष्टसाध्य काम आहे. संघटनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये स्नेहाचं जाळं विणावं लागतं, माणसं सांभाळावी लागतात, वाढवावी लागतात आणि त्यासाठी असंख्यांच्या मनाची जपणूक वर्षानुवर्ष करावी लागते. पण त्यांतले काही थोडे, पण मोठे लोक त्यांच्या महत्त्वाकांक्षेला किंचितसा ओरखडा जाताच वैरभावाचा फणा उभारतात. (चिंतन - माझ्या आयुष्यातील आशा-निराशेचे क्षण) नेता आणि नेतृत्वासंदर्भात यशवंतरावांनी म्हटलंय, ‘नेता असणाऱ्याला, नेतृत्व करणाऱ्याला सर्वांच्या अग्रभागी, शिरोभागी राहावं लागतं, पण ते श्रेणीनं, सर्वांच्या शिरोभागी म्हणजे प्रत्यक्ष डोक्यावर नव्हे. तसा तो डोक्यावर बसून राहिला, तर त्याला ज्यांचं नेतृत्व करावयाचंय, त्यांच्या भावना, आशा-आकांक्षा स्वभावातःच तो पायदळी तुडवू लागतो. असं घडलं, म्हणजे त्या नेत्याबद्धलचा, नेतृत्वाबद्धलचा आदर संपुष्टात येतो. इतकंच नव्हे, तर ते नेतृत्वही संपुष्टात येतं. ज्याला नेतृत्व करावयाचंय, त्यानं अशी काही पथ्यं पाळली पाहिजेत...! (चिंतन – जीवनाचे पंचामृत) यशवंतरावही माणूसच होते. त्यांच्याकडंही राग, लोभ, संताप वगैरे भावना होत्या. आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी केलेल्या यशवंतरावांनाही आयुष्यात खूप अवहेलना सहन करावी लागलीय. तशा भावना त्यांनी अपवादानंच व्यक्त केल्यात. मात्र एकदा एका जाहीर समारंभात ते म्हणाले होते, ‘महाराष्ट्रात मी माकडांची माणसं बनवली, माणसांचे सरदार बनवले, त्यांच्या हातात सहकार, पंचायतराज व्यवस्था या साधनांच्या तलवारी दिल्या आणि त्याच तलवारी घेऊन ते माझ्यावर वार करायला निघाले आहेत....!’

हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 14 May 2023

न्यायाचा 'चंद्र' अन निकालाची 'चूड'...!

"शिवसेनेत पडलेली फूट अवैध. बहुमत सिद्ध करायला सांगण्याचा राज्यपालांचा निर्णय अवैध. शिंदे गटाचा व्हिप अवैध. त्यांचा पक्ष अवैध. त्यांचा प्रतोद अवैध, शिंदेंचं पक्षनेतेपद अवैध, निवडणूक आयोगाचा निर्णय अवैध. फुटीर आमदार अवैध. तरीही, सरकार मात्र वैध! सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा मुद्दा नव्हता. त्यांनी ज्या परिस्थितीमुळं राजीनामा दिला, ती परिस्थिती निर्माण करणं बेकायदेशीर होतं, हे सुप्रीम कोर्टानंच म्हटलंय. 'उद्धव यांनी राजीनामा दिला नसता, तर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता आले असतं', याचा अर्थ असा की, उद्धव हेच मुख्यमंत्री म्हणून वैध! नव्या सरकारनं केलेल्या सर्व कृती अवैध, मग हे सरकारही बेकायदेशीर! हे सर्व रद्द करायला हवं होतं. उद्धव यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यावर बोलण्यापेक्षा या सरकारच्या वैधतेवर बोलायला हवं होतं. विधानसभेच्या त्याच अध्यक्षांकडं आता सर्वाधिकार दिले गेलेत, जे या सर्व अवैध घटनांचे साक्षीदार आणि शिल्पकारही होते. सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीनं जे आमदार अवैध ठरतात त्यांनीच मतं दिलेल्या अध्यक्षांकडं अपात्रतेचे सर्वाधिकार देणं ही चूकच, कारण त्यांचीही निवड ही बेकायदेशीर ठरतेय. दिलेल्या कालमर्यादेतून पळवाटा निघणार आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. देशाच्या इतिहासात या अभूतपूर्व निकालाची नोंद होणार आहे!"
--------------------------------------------------

राज्यपाल, विधानसभाध्यक्ष आणि निवडणूक आयोग या तीन महत्त्वाच्या घटनात्मक संस्थानी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं 'नागडं सत्य' सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालपत्रात म्हटलंय. या तीनही संस्थावरच्या व्यक्तींचं वर्तन राजकारण-निरपेक्ष असायला हवं असे संकेत आहेत. पण सांप्रत परिस्थितीत या संस्थावरच्या व्यक्ती अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणेच मनुष्य स्वभावानुसार चांगल्या-वाईट असू शकतात, हे सुप्रीम कोर्टानं नमूद केलंय. सध्या गेल्या काही वर्षांपासून सत्ताधारी पक्ष राज्यपालपदावर आपल्या पक्षातल्या रिटायर्ड व्यक्तींना बसवून त्यांच्याच माध्यमातून सत्तेचं राजकारण करण्याची प्रथा अलीकडं रूढ केलीय. माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे अशापैकीच एक! आपण केलेल्या बेकायदेशीर कृत्यांचं वस्त्रहरण सुप्रीम कोर्टात होणार आहे याची जाणीव झाल्यानं त्यांनी राजीनामा देऊन हरियाणा गाठलंय! सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं सत्तासंघर्षाचा निकाल देताना त्या साऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर शिक्कामोर्तब केलंय. इथं ‘नसलेल्या अधिकारांचा वापर’ राज्यपालांनी केलाय असं कोर्टानं म्हटलंय. पक्षीय फुटीची शहानिशा करण्यासाठी विधानसभा हे व्यासपीठ असू शकत नाही, असं म्हणत सुप्रीम कोर्टानं या महामहिमांचं वाभाडे काढलेत. त्यासंदर्भातले सर्व निर्णय हे अर्थातच महामहिमांनी स्वतःच्या बुद्धीनं घेतलेत असं मानणं हे दूधखुळेपणाचं आहे. कारण राज्यपालांच्या या नियुक्त्या गृहमंत्रालयाकडून होत असतात. प्रामुख्यानं महाराष्ट्र, तमिळनाडू आणि पश्चिम बंगालचे हे सर्व महामहीम राज्यपाल हे गृहमंत्रालयाच्या तालावर नाचतात हेही या निर्णयातून सूचित झालंय. ‘राजकीय मैदानात उतरण्याचा अधिकार राज्यपालांना नाही!’ असं जेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं तेव्हा त्याचा अर्थ या महामहिमांनी तसा उद्योग केलाय आणि गृहमंत्रालयानं त्याबाबत आक्षेप घेतलेला नाही, हाच असतो! सुप्रीम कोर्टानं विधानसभाध्यक्षांनी जाणीवपूर्वक केलेल्या चुकांवरही तितक्याच कठोरपणे भाष्य केलंय. विद्यमान विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वपक्ष पारंगत आहेत. त्यांची त्रिदंडी यात्रा झालेलीय. राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास करून ते सध्या भाजपत आहेत. त्यांच्या चातुर्यामुळंच भाजपनं सत्तेच्या या समरप्रसंगी त्यांच्याकडं विधानसभाध्यक्षपदाची धुरा सोपवलीय. नार्वेकरांनी भाजपच्या अपेक्षांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यांची त्यासाठीची पहिली कृती होती ती शिंदे गटाच्या आमदाराला अधिकृत प्रतोदाचा दर्जा देणं! कारण प्रतोदांनी काढलेल्या व्हीपचा भंग केला तर ते संबंधित आमदार हे अपात्र ठरतात. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि शिंदे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यावर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यासाठीचा आदेश ठाकरे गटानं नेमलेल्या प्रतोदानं देणं अशक्य होतं, म्हणून मग शिंदे गटाला स्वत:चा स्वतंत्र असा प्रतोद हवा होता. ती उणीव नार्वेकरांच्या सहकार्यानं भरून काढण्यात आली! प्रतोदपदाची नियुक्ती ही पक्षाच्या विधिमंडळातल्या पक्षनेत्यांकडून होत नाही. ती पक्षामार्फतच होते. कायद्यातल्या या सत्याकडं पूर्ण डोळेझाक करीत विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदाराला प्रतोदपदी मान्यता दिली. पण हा निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. इतकंच नाही तर यामुळं आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्यांनी ‘रास्त वेळेत’ घ्यावा असंही सरन्यायाधीशांनी विधानसभाध्यक्षांना बजावतात. त्यांनी मारलेली यातली पाचर अशी की हा निर्णय विधानसभाध्यक्षांना ठाकरे गटाच्या प्रतोदानुसार म्हणजेच सुनील प्रभूंच्या व्हीपनंच घ्यावा लागेल. कारण शिंदे गटाच्या प्रतोदाची नियुक्तीच सुप्रीम कोर्टानं बेकायदा ठरवलीय. अध्यक्षांच्या यापुढच्या वाटचालीवर सुप्रीम कोर्टाचं लक्ष असल्यानं आपल्या आकांना हवा तसा निर्णय घेणं त्यांना वाटतं तितकं सोपं नाही.

टीव्हीवरच्या एका वाहिनीशी लँडनमधून बोलताना नार्वेकरांनी जे काही तारे तोडलेत, त्यावरून त्यांचा निर्णय काय असेल हे स्पष्ट होतं. त्यांच्या मते सुप्रीम कोर्टानं आमदारांचा अपात्रतेबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी माझ्याकडे सोपवलीय, त्याबद्धल त्यांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानलेत. ते पुढं म्हणतात की, 'या आमदारांचा अपात्रतेबाबतच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी लागेल, यातील वादी आणि प्रतिवादी यांच्या साक्षी काढाव्या लागतील. संबंधित कागदपत्रे तपासावी लागतील. हा दिशादर्शक निकाल असल्यानं काळजीपूर्वक निकाल द्यावा लागेल. त्यात घाई करता कामा नये. कोर्टानं सोपवलेल्या कामासाठी किती कालावधी लागणार हे आत्ताच काही सांगता येत नसल्यानं आपण याचा निकाल कधीपर्यंत देऊ हे आजच सांगता येत नाही. त्यामुळंच सुप्रीम कोर्टानंही आदेश देताना आपल्याला कालावधीची चौकट आखून दिलेलं नाही...!' नार्वेकरांनी घेतलेला शिंदे गटाचे भरत गोगावले यांना प्रतोद नेमण्याचा घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवला आहे. त्यामुळं त्यांच्या व्हीपनं झालेला विश्वासदर्शक प्रस्तावाचा निर्णय हा बेकायदा ठरतो आणि आपली कृतीही बेकायदेशीर ठरते असं वाटत नाही का? यावर ते म्हणतात, 'विधिमंडळाला उत्तुंग अशी परंपरा आहे. यापूर्वीच्या अध्यक्षांनी विधिमंडळ नेत्यांच्या पत्रावरच प्रतोद नेमलेले आहेत. त्यानुसार आपण तो निर्णय घेतला होता. त्यात गैर काही घडलेलं नाही. तरीही जे काही घडलं याचा पुनर्विचार केला जाईल, सारं काही तपासलं जाईल...!' विधिमंडळात शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करताना नेहमीची पद्धत नाकारून प्रत्येक सदस्याला, ज्याप्रमाणे शाळेत मुलांची हजेरी घेतली जाते त्यानुसार आमदारांची संख्या मोजली गेली होती. त्याचं थेट प्रक्षेपण सर्व वाहिन्यांवर प्रसारित झालेलं होतं. शिवाय त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, त्यावरून अपात्रतेचा निकाल देणं सहजशक्य आहे. असं असताना वादी-प्रतिवादी आणि इतरांच्या साक्षी काढण्याचं कारण काय? पण त्यांच्या मतांनुसार ह्या अपात्रतेबाबतचा निर्णय कदाचित त्यांना शिंदे गटाच्या बाजूनं द्यायचा असावा असं त्यांच्या त्या बोलण्यावरून वाटतं. त्यात वेळकाढूपणा दिसून येतोय. त्यामुळं पुन्हा एकदा ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावे लागणार असं दिसतंय. सत्तासंघर्षाचं हे प्रकरण लवकर संपेल असं काही दिसत नाही. कदाचित तोवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपतील!

सुप्रीम कोर्टानं या निकालात निवडणूक आयोग या घटनात्मक संस्थेच्या निर्णयावरही सणसणीत ताशेरे ओढलेत. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देताना अन्य तपशिलांचा विचार करायला हवा होता. या सुप्रीम कोर्टाच्या विधानानं या सगळय़ा विषयाला आता नव्यानं तोंड फुटणार आहे. त्याचा निर्णय लागेल तेव्हा लागेल. पण तोपर्यंत सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाच्या मर्यादा दाखवून दिल्यात. त्यामुळं या घटनात्मक आणि निष्पक्षपाती समजल्या जाणाऱ्या संस्थेला यापुढची पावलं सावधपणे टाकावी लागतील. विशेषत: आगामी वर्ष निवडणुकांचं आहे हे लक्षात घेता सुप्रीम कोर्टानं केलेली ही टिप्पणी राजकीय पक्षांच्या दृष्टीनं आश्वासक वाटते. सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागल्यानंतर शिंदे गटानं आणि भाजपनं जल्लोष केलाय. पण सुप्रीम कोर्टाचा निकाल हा शिंदे-फडणवीस सरकारला जीवदान देणारा भासत असला तरी हे खरं जीवदान नाही. कारण मूळ पक्षांतराचा निर्णय सुप्रीम कोर्टानं सात सदस्यांच्या घटनापीठाकडं वर्ग केलाय. ही मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची होती आणि शिंदे गटाचा त्याला विरोध होता. त्याच वेळी ‘उद्धव ठाकरे यांनी विधानसभेतल्या बहुमत चाचणीआधी राजीनामा दिला नसता तर त्यांच्या पुनर्नियुक्तीच्या मागणीचा विचार करता आला असता’, हे न्यायाधीशांचे विधान बरंच काही सांगून जाणारं आहे. त्यांची नियुक्ती ही वैध समजली होती. इथंच सारी गोम आहे! राज्यपाल, विधानसभाध्यक्ष आणि निवडणूक आयोग यांच्या वर्तनावर न्यायालयानं ओढलेले कडकडीत ताशेरे आगामी राजकारणात निर्णायक ठरतील, यात शंका नाही. म्हणून सुप्रीम कोर्टानं विद्यमान सरकारला जीवदान दिलं असलं तरी ते देताना उद्याच्या राजकीय लढाईसाठी विरोधकांच्या हाती अधिक शक्तिशाली शस्त्रं दिलीत. हे इथं नोंदवलं पाहिजे!

सत्तासंघर्षाचा सारा निकाल हा सुप्रीम कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या आणि निवडणूक आयोगाच्या हाती सोपवून आपली सुटका करून घेतलीय. आगामी काळात कोणत्याही पक्षाला सत्ता संपादनासाठी, तसंच पक्ष फोडून सत्ता मिळवण्यासाठी कोर्टाच्या ताशेऱ्यांमुळं संबंधितांनी नेमकं काय टाळायचं आणि काय साधायचं याचं दिशादर्शनही या निमित्तानं झालंय. हे अधिक धोकादायक आहे. याचा विचार सात सदस्यांच्या बेंचनं करायला हवाय. सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय आणि मार्गदर्शक तत्व बाजूला ठेऊन तत्कालीन परिस्थिती लक्षांत न घेता आज जी स्थिती आहे त्यानुसार विधानसभा अध्यक्ष निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबत दक्ष राहायला हवंय. कारण आज निवडणूक आयोगानं शिंदे यांची शिवसेना हाच मूळ राजकीय पक्ष असल्याचं याआधीच म्हटलंय. विधानसभाध्यक्ष याची पुन्हा नव्यानं खातरजमा आयोगाकडून करतील किंवा आयोग हवं तर पुन्हा कायदेशीर गोष्टी तपासून पाहील. ते होण्यापूर्वीही शिंदे शिवसेना पुन्हा एकदा ठरावाद्वारे प्रतोद म्हणून नेमू शकते. विधानसभा अध्यक्ष आपल्या सोयीनं, पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार ठरवलेल्या वेळी घेतील. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांकडून जो काही निर्णय घेतला जाईल त्यात कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झालं तर ठाकरे गटाला पुन्हा कोर्टाचा दरवाजा ठोठावता येईल. पण त्यात जो काही कालावधी निघून जाईल तोवर आगामी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपतील. मग त्यातलं गांभीर्य उरणारच नाही!

सुप्रीम कोर्टानं उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणं चूकीचं आहे. ती सुप्रीम कोर्टानं शोधलेली पळवाट आहे. जर राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणं चूक होतं तर त्या अवैध बहुमत चाचणीला उद्धव सामोरे गेले नाहीत, ही चूक कशी? एकनाथ शिंदे फडणवीस यांनी घेतलेली बहुमत चाचणी अवैध होती, असं आता सुप्रीम कोर्टाला वाटतंय; पण सुरुवातीला सुप्रीम कोर्टानंच बहुमत चाचणी घ्या, असं सांगितलं, त्याचं काय? नेमकं योग्य काय? आता विधानसभाध्यक्षच निर्णय देणार असतील तर तेव्हाच्या उपसभापतींना निर्णय घेण्यापासून सुप्रीम कोर्टानं का रोखलं? जर शिंदेंनी नेमलेला व्हीप चुकीचा आहे तर सरकार अवैध आहे, असं सुप्रीम कोर्ट का म्हणत नाही? असं अनेक अंतर्विरोध या निकालात आहेत. असं यातून दिसतंय. या अंतर्विरोधानं यापुढील काळात न्यायव्यवस्थेवर लोकांचा विश्वास उरणार नाही, अशी अवस्था या निकालामुळं तयार झालीय, हे ह्या निकालापेक्षा अधिक गंभीर आहे. याचाही याच दृष्टीनं विचार करायला हवंय हे निश्चित ! एकूणच महाराष्ट्रातल्या राजकीय संस्कृतीत नैतिकतेचं अधिष्ठान राहणार की नाही हा यापुढच्या काळात कळीचा मुद्दा राहणार आहे.

इथं शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर. पण, चुकले ते मात्र उद्धव ठाकरे! चोर सोडून उद्धव यांना 'व्हिलन' करण्याचा डाव यशस्वी होतोय ! अनेक असंवैधनिक घडामोडींची दखल घेऊन कुणाचं चुकलं याची व्यवस्थित दखल घेऊनही संविधानिक मार्गावर घेऊन न जाणारा हा निर्णय आहे. बेकायदेशीरतेच्या मार्गानं आरूढ झालेलं सरकार सुप्रीम कोर्टानंच कलम १४२ चा अधिकार वापरून हे सरकार घटनाबाह्य असल्याचं जाहीर करायला हवं होतं तरच 'संपूर्ण न्याय' झाला असता. हा निर्णय खरोखर संवैधानिक चौकटीत देण्याचा प्रयत्न झाला असता तर एकमुखी निर्णय झालाच नसता. प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवडच बेकायदा होती तर त्या प्रतोदांनी जो मतदान करण्याचा व्हीप काढला तो बेकायदेशीर नव्हता का? आणि तो बेकायदेशीर असेल तर चाचणीत मिळालेलं बहुमत कायदेशीर कसं हा प्रश्न न्यायालयानं लक्षात घ्यायला हवा होता. व्हीप पक्षप्रमुख काढू शकतात, संसदीय गटाचा नेता काढू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं मग उद्धव ठाकरेंनी काढलेला व्हीप खरा असा त्याचा अर्थ आहे कारण तोपर्यंत शिंदे गटाला निवडणूक आयोगाची तथाकथित मान्यताही मिळालेली नव्हती. याचा अर्थ ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या व्हीपला न जुमानता मतं दिली ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत फुटीर ठरतात आणि म्हणून ते पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी अपात्र ठरतात. राज्यपालांनी ज्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांना कायदेशीर चौकटीतली कोणतीच ओळख नव्हती त्यांच्या पत्रानुसार बहुमत चाचणी घेतली असं न्यायालयाचं मत आहे मग ती चाचणीच अवैध असेल तर त्या बहुमत चाचणीचा निर्णय वैध कसा? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून निर्माण झालेलाय. विधिमंडळाला स्वायत्तता आहेत पण 'सातत्यानं गुन्हेगारी खोडसाळपणा' करीत सत्ता बळकावणाऱ्या समूहानं केलेलं विधानसभाध्यक्ष घटनेनुसार वागतील असं न्यायालयानं कशाच्या आधारे गृहीत धरलंय? सुप्रीम कोर्टानं ही केस केवळ निकालात काढलीय. संविधानाच्या चौकटीत बसणारा 'न्याय' केलेला नाही असं स्पष्ट मत ज्येष्ठ वकिलांचं आहे. देवेंद्र फडणवीसांनी राज्यपालांना पत्र न देता विधानसभेत अविश्वास ठराव आणायला हवा होता अश्या  स्वरूपाचं वक्तव्य एकीकडं सर्वोच्च न्यायालय करतं आणि पुढं त्या पत्रावर राज्यपालांनी कारवाई करणं चूक होतं असंही नमूद केलंय तर मग या घटनाबाह्य कृतींचा काहीच हिशोब न करता बेकायदेशीररीत्या स्थापन सरकार सुरू ठेवण्याची मुभाच देणारा हा निर्णय अयोग्य आहे. सगळ्यांनी केलेल्या चुका निरीक्षण म्हणून लिहायच्या आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्या तक्रारदारालाच जणू शिक्षा करणारा हा निर्णय न्यायतर्क निकामी करणारा आहे असं  वाटतं. केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून बेकायदा सरकार आपोआप कायदेशीर आहे असं समजायचं हा न्यायालयाचा तर्क अनाकलनीय आहे. राजीनामा देण्याआधी झालेल्या बेकायदेशीर आणि घटनाबाह्य पक्षविरोधी कारवायांचा आणि दहाव्या परिशिष्टातील परिच्छेद २ (१) (अ) यांचा काहीच अनव्यार्थ न काढणारं न्यायालय न्यायिक शहाणपण 'जुडीशिअल विजडम' वापरायला विसरल्यानं हा निर्णय गोंधळात टाकणारा आहे. कायदेशीर पळवाटांचा पायंडा पडणं, संख्याबळावर सत्ताकारणात लोकशाहीच्या तीन स्तंभांत स्पर्धा होणं, वर्चस्वासाठी वाद होणं, हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी धोकादायकच! चौथा स्तंभ माध्यमं तर हतबलच!आता इतर राज्यात जर या निकालाचा रेफरन्स देऊन असंच केलं गेलं, तर काय? आम्ही 'सेपरेशन ऑफ पॉवर' चे तत्व पाळतो असं म्हणून त्या संकल्पनेचा वापर स्वतःवरची न्यायिक जबादारी टाळण्यासाठी करण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? 'सेपरेशन ऑफ पॉवर' तत्वाचा वापर न्यायालयानं 'ढाल' म्हणून करण्याचा पायंडा संवैधानिक-गुन्हेगारी करणाऱ्यांना फावतोय.

सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सोशल मीडियावर खूप मीम्स प्रसारित झालेत. त्यावरून लोकभावना समजून येतात. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षांत घ्यायला हवंय! त्या मीम्सपैकी एक...! द्यूत खेळले- ती चूक, फासे गंडलेले- ती चूक, डावावर सर्वस्व लावलं- तीही चूकच, द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला-ती महाचूकच, भीष्मपितामहांना सर्व काही चुकलं हे मान्य आहे. पण राज्य दुर्योधनालाच दिलं आणि वनवास मात्र पांडवांनाच! मी काही करू शकत नाही म्हणत भीष्म न्यायालयातून बाहेर पडले. महाभारताचे चंद्र पुजारी! न्यायाला मात्र चूड!! दुसरं मीम्स...अपेक्षेप्रमाणे 'महाशक्ती' जिंकली. लोकशाही तडफडून मेली. तिसरं मीम्स... शिंदे-फडणवीस सरकार कसं बचावलं!
जस्टीस इज डिलेड अँड डेड !
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 13 May 2023

*काँग्रेसला संजीवनी.....!*

*बजरंगासह सिद्ध'रामय्या' कर्नाटकात सज्ज...!*
'भीम'रुपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती l
वनारी अंजनीसुता रामदूता 'प्रभंजना'... ll
प्रभंजन...म्हणजे वादळ...! बजरंग बलीनं कर्नाटकात बदलाचं वादळ निर्माण केलंय. संकटमोचक बजरंग बलीचा जागर मोदींनी केला, त्यांनी मतदान करताना 'जय बजरंग बली' म्हणा आणि बटन दाबा असं म्हटलं होतं. तर मल्लिकार्जुन खर्गे यांनी 'जय बजरंग बली तोड दे भ्रष्टाचारकी नली...!' म्हणत पलटवार केला होता. आज शनिवार बजरंग बलीचा वार, भाजपनं श्रीरामाला एकाकी सोडून बजरंग बलीचा स्वीकार केला, पण बजरंग बलीनं आपला कृपाशीर्वाद काँग्रेसला दिल्याचं कर्नाटकच्या निकालात दिसून आलंय! इथल्या मतदारांनी धर्म-देव यांच्यापेक्षा गॅस सिलिंडरची वाढलेली किंमत, महागाईचा उसळलेला आगडोंब, अक्राळविक्राळ बेकारी, स्थानिक प्रश्न महत्वाचं मानलं. या निकालानं भाजप, मोदी-शहा यांच्या राजकारणाला सणसणीत चपराक लगावलीय. आगामी पांच राज्यांच्या आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपसमोर प्रश्नचिन्ह उभं केलंय. हा निकाल म्हणजे भाजपच्या उतरत्या काळाची नांदीच म्हणावी लागेल!
-----------------------------------------

'मोदी हैं तो मुमकीन हैं...!' असं भाजपची मंडळी गर्वानं सांगत असतात. पण कर्नाटकच्या मतदारांनी त्यांच्या मागं न जाता काँग्रेसच्या पारड्यात मतं टाकलीत. त्याचं विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीनं केलं जाईल. पण कर्नाटकातल्या जनतेनं आपली सत्ता काँग्रेस पक्षांकड सोपवली. देशभरातल्या मतदारांचं ज्या निवडणुकीकडं लक्ष लागलेलं होतं, तिथं काँग्रेसनं यश मिळवलंय. निवडणुकीसंदर्भातले ओपिनियन पोल आणि मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोल मधून इथं काँग्रेसचीच सत्ता येणार असं सांगितलं जात होतं, ते खरं निघालंय. भाजपची मंडळी आमचंच सरकार येणार असं टिऱ्या बडवत सांगत होते. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी तर भाजप २०० जागा जिंकेल अशी वलग्ना केली होती. पण प्रत्यक्षात कर्नाटकातल्या मतदारांनी भाजपला नाकारलं! बोम्मई यांना आपल्या कामावर यश मिळेल असं वाटत होतं. पण भाजपनं इथल्या लोकांच्या जिवाभावाचे प्रश्न हाती नं घेता धार्मिक-जातीय मुद्दे प्रचारात आणले. भाजपला हा जबरदस्त झटका म्हणायला हवं. कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रचारासाठी इथं मुक्काम ठोकला होता. सारी प्रचार यंत्रणा स्थानिक भाजप नेत्यांवर विश्वास नं ठेवता त्यांनी आपल्या हाती घेतली होती. प्रधानमंत्री मोदी यांनीही २०१८ साली जिंकलेल्या १९ जिल्ह्यातल्या ८० मतदारसंघाशी संबंधित अशा १९ ठिकाणी जाहीर सभा घेतल्या होत्या. ३१ किलोमीटर रोड शो केला होता. या त्यांच्या प्रयासाचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. इथली भाजप विखुरलेली होती, एकसंघ नव्हती, शिवाय स्थानिक नेत्यांना दूर लोटलं होतं. माजी मुख्यमंत्री, लिंगायत नेते यडीयुरप्पा, जगदीश शेट्टर, लक्ष्मण सावदी अशा सारख्या जनाधार असलेल्या नेत्यांना भाजपनं नाकारलं, त्यामुळं इथं सत्ता खेचून आणू शकणारा, कायम भाजपसोबत राहणारा लिंगायत समाज दुरावला गेला. त्याचा फटका भाजपला बसला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विशेष महत्व दिलेल्या सी.टी. रवि यांनी यडीयुरप्पा यांच्याशी घातलेला वाद, उमेदवारी देताना दाखवलेला उर्मटपणा, शिवाय आगाऊपणानं टिपू सुलतानचा उकरून काढलेला विषय, वक्कलिंग समाजाला गोंजारण्याचा केलेला प्रयत्न अंगलट आला. विद्यमान ७३ आमदारांना नाकारलेली उमेदवारी, त्यामुळं उफाळलेला असंतोष. गुजरात पॅटर्न राबवण्याचा केलेला अपयशी प्रयत्न यानं मतदार दुरावला.
भाजप सरकारच्या कारभारावर मोठी नाराजी होती. '४० टक्के भ्रष्टाचार' ठेकेदारांची आत्महत्या, ठेकेदारांच्या संघटनेने घेतलेली भूमिका, भ्रष्टाचारी मंत्री ईश्वरप्पा यांच्याकडं मिळालेले कोट्यवधीची रोख रक्कम, त्यांच्या मुलाला लाच घेताना झालेली अटक, तरीही भ्रष्टाचार संपवण्याचा निर्धार केला असतानाही मोदींनी ईश्वरप्पा यांना आभार मानण्यासाठी केलेला फोन यामुळंही राज्यात भ्रष्टाचाराचा आरोप सरकारवर होत असतानाही भाजप आणि प्रधानमंत्र्यांनी गांभीर्य दाखवलं नाही  म्हणून मतदारांची नाराजी ओढवून घेतली. मुस्लिमांचं काढून घेतलेलं आरक्षण त्यामुळं अल्पसंख्याक समाज भाजपपासून दूर गेला.ज्यांना ते आरक्षण दिलं ते लिंगायत आणि वक्कलिंगही एकगठ्ठा सोबत राहिले नाहीत. भाजपत अंतर्कलह दिसून येत होता. दिल्लीहून आलेल्या नेत्यांमध्ये इथला स्थानिक बाज राहिला नव्हता. भाजपचे एकसाथ सारे नेते हे लोकांचे प्रश्न यावर न बोलता धार्मिक-जातीय, हिंदू-मुस्लिम विरोधाचा राग आळवीत होते. त्यामुळं ते मतदारांशी कनेक्ट होऊ शकले नाहीत. भाजपनं प्रचारात तेजस्वी सुर्या, हेगडे असे ब्राह्मणी चेहरे प्रचारात अजिबात उतरवले नाहीत.
या उलट काँग्रेसकडं वातावरण होतं. मोदींच्या समोर राहुल गांधींचा चेहरा होता. पण त्यांनी फारशा जाहीर सभा घेतल्या ना रोड शो केला. त्यांनी थेट मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. महिलांना, तरुणांना, तरुणींना भेटले. महिलांबरोबर बस प्रवास केला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सत्ता आली तर महिलांना मोफत बस प्रवास असेल हे आश्वासन द्यायला ते विसरले नाहीत. डिलीव्हरी बॉय सोबत स्कुटरवरून प्रवास केला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. भारत जोडो यात्रेत कर्नाटकातल्या प्रवासाचा त्यांना इथं मोठा लाभ झाला. प्रियांका गांधींच्या सभा, रोड शो याही गाजल्या. जुन्या पिढीतल्या मतदारांना त्यांच्यात इंदिराजी दिसायच्या. याशिवाय काँग्रेस पक्ष संघटना एकजीव दिसली. इथल्या प्रचाराची धुरा सारी स्थानिक नेत्यावरच राहिली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्यातलं सख्य जाणवण्या इतपत होतं. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे इथले भूमिपुत्र. त्यांनी आपण भूमिपुत्र असल्यानं मला मतदान करा असं भावनिक आवाहन केलं. शिवाय ते दलित समाजातून येत असल्यानं मागासवर्गीयांची मतं काँग्रेसच्या पारड्यात पडलीत. काँग्रेसनं बजरंग दलावर बंदी घालण्याचं जसं आश्वासन दिलं तसंच महिलांना रोख अनुदान, बेकारांना भत्ता, शेतकऱ्यांना अनुदान, वीज मोफत, १० किलो धान्य अशा लोकांशी निगडित पांच आश्वासनांची गॅरंटी दिली. यासाऱ्या बाबी लोकांना भावल्या त्यामुळं त्यांनी काँग्रेसला जवळ केलं! त्यामुळं काँग्रेसची मतं वाढली. २०१८ मध्ये ३८ टक्के मतं मिळाली होती ती आता ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचलीत. भाजपला मात्र तेवढ्याच मतांवर म्हणजे ३६ टक्क्यांवर समाधान मानावं लागलंय. जेडीएसची मतं मात्र घेतलीत.

ही निवडणूक तीनही पक्षांसाठी महत्वाची होती. भाजपसाठी हे अशासाठी महत्वाची होती की, इथं भाजपनं यापूर्वी सरकारं बनवली आहेत. याशिवाय दक्षिणेतल्या इतर कोणत्याच राज्यात भाजपचा अद्याप शिरकाव झालेला नाही. भाजपला आपली वैचारिक ताकद स्पष्ट करण्यासाठीही इथं निवडणूक जिंकणं महत्वाचं होतं. इथं आलेली सत्ता ही सहजगत्या आलेली सत्ता नव्हती वा एखाद्या नेत्याच्या प्रभावानं म्हणजेच यडीयुरप्पा यांच्यामुळं आलेली सत्ता नव्हती. असं भाजपचं म्हणणं होतं म्हणून यडीयुरप्पा यांना दूर लोटलं. काँग्रेससाठीही ही निवडणूक महत्वाची आहे. कारण देशभरात काँग्रेसच्या पुढ्यात भाजप हाच राष्ट्रीय पक्ष उभा आहे. इथं काँग्रेसचं संघटन मजबूत आहे. काँग्रेस इथं भाजप आणि जेडीएसला टक्कर देत आलीय. काँग्रेसला इथं सतत सर्वाधिक मतं मिळत आली आहेत, त्यामुळं त्यांना इथं मजबूत जनाधार असल्याचं दिसून येतं. काँग्रेसला हे सिद्ध करायचं आहे, मतदारांना दाखवून द्यायचं आहे की, भाजपशी एकट्याच्या ताकदीवर आपण लढत देऊ शकतो. कारण आजवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव भाजप करत आलीय. त्यामुळं निर्माण झालेलं गृहितक-नेरेटिव्ह दूर करण्याची स्ट्रॅटेजी इथं दिसून आली. इथं चांगलं यश मिळाल्यानं केवळ कर्नाटकातलेच नाहीतर देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झालाय. २०१४ च्या निवडणुकीसाठी इथलं हे यश काँग्रेससाठी महत्वाचं ठरणारं आहे. जेडीएससाठी तर ही सक्रीयतेची लढाई होती. काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष आहेत. कर्नाटकात हे दोन्ही पक्ष पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. दक्षिणेकडच्या इतर राज्यात तो तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर आहेत. आंध्रप्रदेशात तिसऱ्या-चौथ्या स्थानावर, तेलंगणात दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावर, तामिळनाडूत तिसऱ्या-चौथ्या स्थानावर, केरळात सीपीएम राज्यस्तरीय पक्ष असला तरी तिथंही दुसऱ्या-तिसऱ्या स्थानावरच आहेत. रिजनलिझम आणि सबनॅशनालिझमच्या माध्यमातून दक्षिण भारतात प्रादेशिक पक्षाचं केवळ विधानसभेतच नाही तर लोकसभेतही प्रभाव दिसून येतो. १९७७ साली काँग्रेसनं दक्षिण भारतात चांगल्या जागा जिंकून आपला करिश्मा दाखवला होता. जेडीएसलाही रिलिव्हन्सचा प्रश्न उभा होता. जर विधानसभेत यश मिळालं नाही तर मग लोकसभेत कोणत्या आधारावर यश मिळेल ही चिंता त्यांना आहे. देवेगौडा यांचा राजकीय वारसा त्यांच्या मुलांकडे कुमारस्वामी, रेवण्णा यांच्याकडं आलाय. आता त्यांचा नातू निखिल कुमारस्वामी निवडणुकीच्या रिंगणात आहे. जेडीएसचं अस्तित्व हे या निवडणुकीत ठरणारं होतं त्यासाठी त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जीवापाड मेहनत घेतलीय.

इथं सगळीकडं असतात तसेच मुद्दे होते. बेकारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न होते. उत्तर कर्नाटक हा इथला अत्यंत दुष्काळी भाग; त्यामुळं इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, एससी-एसटीचं वाढवलेलं आरक्षण, मुस्लिमांचं आरक्षण काढून ते लिंगायत-वक्कलिंग यांना दिलं जाणं याशिवाय अर्थातच मूलभूत सुविधा, विकासाचे हे सार्वत्रिक मुद्दे या निवडणुकीत होते. याशिवाय हिजाब, टिपू सुलतान, हिंदुत्व, बजरंग बली हेही मुद्दे इथं चर्चिले गेले. इथलं भाजप संघटन देशातल्या इतर राज्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे. भाजपचे जे आमदार आहेत ते यापूर्वी इतर कोणत्यातरी पक्षातून आलेले आहेत. २०१९ मध्ये १७ आमदार काँग्रेस आणि जेडीएसमधून आले तेव्हाच भाजपची सत्ता आली होती. २००८ मध्येही काँग्रेस-जेडीएस मधून सात आमदार आल्यानं भाजपची सत्ता आली होती. इथं एक वेगळं कल्चर आहे. सर्वच पक्षातले वरिष्ठ नेते हे सतत वेगवेगळ्या पक्षातून ये जा करत फिरत असतात. त्यांचा, त्यांच्या फॅमिलीचा इथल्या राजकारणावर दबदबा आहे. त्यामुळं इथला भाजप हा इतर राज्यातल्या प्रमाणे शिस्तबद्ध पक्ष राहिलेला नाही. इथली भाजपची सरकारं ही आयारामांच्या जीवावरच ठरलेली आहेत. पण इथं एक लक्षात घेतलं पाहीजे की, पक्षातून बाहेर पडलेले संघ प्रचारक म्हणून वावरलेले माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी हे मूळचे भाजपचेच आहेत. संघर्षातून त्यांनी नेतृत्व साकारलंय, पाच-सहा वेळा ते निवडून आलेत. वयाच्या ६७ वर्षी त्यांना भाजपकडून उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळं ते व्यथित झाले. त्यांनी वरिष्ठांना भेटून आपल्यावर कसा अन्याय झालाय हे सांगितलं पण वरिष्ठांना त्याला दाद दिली नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला जवळ केलं. मात्र इथले मतदार आणि कार्यकर्ते पक्षातला बदल हा फारसं गांभीर्यानं घेत नाहीत. हे वातावरण व्यक्तीसाक्षेप असतं. हे त्यांना आता सवयीचं बनलेलं आहे. एका पाहणीत असं आढळून आलंय की, इथले ५२ टक्के राजकीय नेते असे आहेत की, त्यांनी पक्षांतर केल्यानंतरही ते निवडून येतात. कर्नाटकचे प्रामुख्याने तीन भाग आहेत, उत्तर कर्नाटक जिथं मुंबईराज्य आणि हैद्राबादचा काही भाग, याशिवाय मध्य आणि दक्षिण कर्नाटकात किनारपट्टी, जुनं म्हैसूर आणि बंगळुरू. लिंगायत समाजाचा उत्तर कर्नाटकात मोठा प्रभाव आहे. जो भाजपचा मतदार राहिलाय. यडीयुरप्पा, बोम्मई, शेट्टर हे सारे या प्रभागातले मोठे लिंगायत नेते आहेत. दक्षिणेकडं जुन्या म्हैसूर, बंगळुरूमध्ये वक्कलिंगांचा प्रभाव आहे. इथं देवेगौडांचं वर्चस्व आहे. ते त्या समाजाचे नेते आहेत. २०१८ मध्ये भाजप बहुमत प्राप्त करू शकली नव्हती याचं मोठं कारण होतं, देशभरातल्या शहरी भागात भाजपचा प्रभाव राहिलाय मात्र बंगळुरूत भाजपला फारसं स्थान मिळालं नव्हतं. पण मोदींच्या रोड शो नंतर इथं त्यांना पाठिंबा मिळालाय. हैद्राबाद कर्नाटक समजल्या जाणाऱ्या भागातही भाजपपेक्षा काँग्रेसला मोठा पाठींबा मिळालाय. इथं कर्नाटकात गेल्या चारपैकी तीन निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आलीय. २००४ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष होता पण काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येत सरकार बनवलं, मात्र नंतर भाजप आणि जेडीएस यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं. मात्र कुमारस्वामी यांनी भाजपशी केलेल्या करारानुसार सत्ताबदलाचा शब्द न पाळल्यानं भाजपला सहानुभूती मिळाली. २००८ मध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष पुढे आला. पण बहुमतासाठी ११३ चं संख्याबल गाठता आलं नाही. २०१३ मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं.भाजप तेव्हा केवळ ४४ संख्येत सामावली गेली. याचं कारण भाजपच्या यडीयुरप्पा आणि रेड्डीबंधू यांनी आपापले पक्ष स्थापन करून निवडणुका लढवल्या होत्या. तेव्हा भाजपची मतं त्यांच्याकडं वळली होती. २०१८ मध्ये पुन्हा एकदा त्रिशंकू अवस्था निर्माण झाली. भाजप सर्वात मोठा पक्ष होता, पण सत्ता स्थापन करण्यासाठी ९ आमदार कमी पडले. बंगळुरू आणि दक्षिण कर्नाटकात अपेक्षित यश मिळालं नव्हतं. त्याचा हा परिणाम होता.

इथं विधानसभेत नेहमी त्रिशंकू अवस्था का निर्माण होते, याचं कारण इथं कोणत्याच पक्षाचा राज्यस्तरीय प्रभाव नाही. २२४ सदस्यांच्या विधानसभेत भाजप कधीच १७० जागांपैकी जास्त जागा लढवू शकलेली नाही. जेडीएस कधीच ९० पेक्षा जादा जागा लढलेली नाही. ज्यावेळी सर्वाधिक जागा लढवल्या होत्या त्याही ९० होत्या. १५० जागी जेडीएस निवडणूकच लढवत नाही. काँग्रेसही १९५ ते २०० जागीच निवडणूक लढवतेय. कोणताही पक्ष सर्वच्यासर्व २२४ जागा लढवतच नाहींत. त्यामुळं भाजपला ११३ जागा ह्या १७० जागा लढवून मिळवायला हव्यात, म्हणजे ६७ टक्के जागा जिंकायला हव्या होत्या, त्या त्यांना मिळाल्या नाहीत. काँग्रेसला २०० जागा लढवून ११३ हव्यात, म्हणजे ५५ टक्के जागा मिळवता आल्यात. जेडीएस अंकगणिताच्या दृष्टीनं बहुमताजवळ जाण्याएवढ्या जागाही लढवलेल्या नाहीत. पण कायम सत्तेत राहण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यामुळं कधी काँग्रेस तर कधी भाजप बरोबर जात असतात. इथं कोणताच पक्ष सर्वच्या सर्व जागा लढवत नसल्यानं इथं नेहमी त्रिशंकू अवस्था असते. पण यंदा काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजप हा इथं लिब्रा म्हणजे लिंगायत आणि ब्राह्मण समाजाचा पक्ष समजला जातो. विधानसभेच्या निवडणुकीत केवळ वक्कलिंग समाज हाच जेडीएसच्या मागे उभा राहतो. इतर कोणताही समाज त्यांच्या मागे जात नाही. लोकसभा निवडणुकीत तो भाजपच्या पाठीशी उभा राहतो. काँग्रेसच्या पुढं मोठा प्रश्न उभा असतो की, त्यांचा खास असा कोणताच मतांचा गठ्ठा नाहीये. लिंगायत, वक्कलिंग वगळता इतर ओबीसी, मुस्लिम, एसी-एसटी यांचा त्यांना पाठींबा मिळत आलाय. बोम्मई यांचा लिंगायत, कुमारस्वामी, शिवकुमार यांचा वक्कलिंग, सिद्धरामय्या यांचा कुरुवा हे जवळपास ३० टक्के आहेत, तर इतर ओबीसी हे २२ टक्के आहेत. लिंगायत आणि वक्कलिंग समाजात सुप्त असा संघर्ष आहे. वक्कलिंग कुमारस्वामीनं लिंगायत यडीयुरप्पांना सत्ता सोपवली नाही. लिंगायत नेते यडीयुरप्पा यांनी वक्कलिंग नेत्याकडं सत्ता सोपवली नाही. लोकसभा निवडणुकीत दोन्ही समाज लिंगायत आणि वक्कलिंग मात्र काहीसे भाजपच्या पाठीशी असतात. हे दोन्ही समाज सत्तेच्या गुडबुकमध्ये राहू इच्छितात. ही तशी सत्तेची लढाई असते. या दोन्ही समाजाची संख्या २५ टक्के आहे आणि २०१८ मध्ये आमदार निवडून आले होते शंभर. ५२ लिंगायत आणि ४८ वक्कलिंग. ही सत्तेची, वर्चस्वाची लढाई आहे. वक्कलिंग समाजाला वाटतं की, भाजप वक्कलिंग समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्री करणार नाही कारण आजवर त्यांचा चेहरा हा लिंगायत राहिलाय. काँग्रेस वक्कलिंग नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करत नाहीये. डी. के. शिवकुमार हे वक्कलिंग आहेत. पण ते मुख्यमंत्रीचा चेहरा नाहीत. वक्कलिंग समाजाचा मुख्यमंत्री बनवेल तो फक्त जेडीएसचा असेल. कारण इथं सतत त्रिशंकू अवस्था असते, त्यावेळी हे शक्य होतं. २०-२५ आमदारांच्या बळावर कुमारस्वामी दोनदा मुख्यमंत्री बनलेत. इथल्या ७५ जागांवर वक्कलिंग समाजाचं प्राबल्य आहे. जुन्या म्हैसूर आणि बंगलोर इथं ते दिसून येतं. त्यामुळं सतत जेडीएस मार्जिनल राहिलेला आहे.

इथं आणखी एक महत्वाचं आहे की, कर्नाटकात लिंगायत आणि वक्कलिंग समाजाचं प्राबल्य असलं तरी हे २५ टक्के मतदार असलेले दोन्ही समाज काँग्रेसच्या बाजूनं वळलेले दिसतात. इतर मागास, दलित, अल्पसंख्याकांची मतं ही काँग्रेसकडं वळलेली दिसतात. इथले भूमिपुत्र असलेले काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा चेहरा इथं काम करताना दिसून आलाय.  बंगळुरू सारख्या शहरी भागातून काँग्रेसला पाठींबा मिळत असतो तो यंदा भाजपकडं वळलाय. शहरी भागातला मतदार हा जातीय समीकरणं पाहत नाही. इथं पाणी, ट्रॅफिक या सारखे नागरी प्रश्न मोठ्याप्रमाणात आहेत. त्यामुळं इथं प्रस्थापितांच्या विरोधात मतदार राहतात. शहरी भागातील मतदारांना भाजपनं गृहीत पकडल्यानं त्यांनी भाजपला पाठ दाखवलीय. इथल्या ६० टक्के म्हणजे १४० जागांवर भाजप-काँग्रेस अशी सरळ लढत होती. १५ टक्के ठिकाणी तिरंगी लढत होती. त्यात आता काँग्रेसची सरशी झालीय. अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असलेल्या. विकलांग झालेल्या काँग्रेसला कर्नाटकात मिळालेल्या यशानं संजीवनी लाभलीय. राखेतून फिनिक्स पक्षी पुन्हा नव्याने झेप घेतो असं म्हटलं जातं. काँग्रेसनं आता तशी झेप घ्यायला हरकत नाही!
-हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 7 May 2023

रंगलेले राजीनामा नाट्य...!

"अखेर शरद पवारांचं राजीनामा नाट्य संपलं! या राजीनाम्यानं 'पक्ष हा आमदार-खासदार यांच्यावर नसतो तर तो कार्यकर्त्यांचा असतो!' हे दाखवून दिलं. भाजपच्या प्रेमात पडलेल्यांना त्यांनी चपराक लगावली. पक्षावर अद्याप आपलीच पकड आहे हेही स्पष्ट केलं. सत्ता हाच राष्ट्रवादीचा प्राणवायू असल्यानं त्याभोवती सत्ताकांक्षी जमा झाले. पवारांनीही त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या. पण सत्ता गेल्यानं सारे सैरभर झाले. सावरण्याऐवजी काही नेते त्याला खतपाणी घालत होते. हे सारं रोखण्यासाठी हे धक्कातंत्र अवलंबलं! पवारांनी कधीच मूल्याधिष्ठित राजकारण केलेलं नाही. त्यांनी सतत ज्यांच्याविरोधात राजकारण केलं त्यांच्याच सावलीला ते गेले. सत्तेसाठी आधी जनता पक्ष, मग राजीव गांधी, सोनिया गांधी, भाजप यांच्याशी साथसंगत केलीय. हे विसरता येत नाही. ते शून्यातून सत्ता आणू शकतात, क्षणार्धात शक्तीशाली नेत्याला जमीनदोस्त करू शकतात, राजकारणातलं टायमिंग, धक्कातंत्र तर त्यांच्यापेक्षा कोणीच अधिक प्रभावीपणे राबवू शकत नाही. बाळासाहेबांनी याच तंत्राचा शिवसेनेत दोनदा वापर करून संघटनेला झटका आणि धक्का दिला होता. आयुष्याच्या या पर्वात पवार भावनिक राजकारण करताहेत असं वाटतं, राजकारणात काहीच अशक्य आणि अनावश्यक नसतं!"
---------------------------------------------------

दि. २ मे २०२३....
दुपारी १२ वाजून ४५ मिनिटं....
स्थळ : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई...
'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचं अनावरण....
या समारंभात  झालेल्या एका घोषणेनं महाराष्ट्राच्या राजकिय क्षेत्रात गोंधळ उडाला....! ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचं अनावरण समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतो आहे. सार्वजनिक जीवनातल्या सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावं, अशी माझी भूमिका आहे...!" असं वक्तव्य करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. नेते दिगमूढ, व्याकुळ, भावुक बनले, अनेकांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर एक समिती स्थापन करण्यात आली. दोन दिवसानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा रद्द केला आणि तीन दिवसांच्या नाट्यानंतर पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला...! राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचे महत्वाचे नेते असलेल्या पवारांच्या राजीनाम्यानं देशातल्या विरोधकांमध्ये
गोंधळ उडाला. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पवारांच्या या निर्णयानं आश्चर्य व्यक्त झालं. शरद पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांत अतिशय प्रेमाचं, आदराचं आणि हक्काचं स्थान आहे. त्यांची प्रतिक्रिया बघता पवारांनी पक्षप्रमुखपद सोडणं पक्षाला किती मोठा धक्का आहे याची कल्पना येते. हे अनपेक्षित असं नाहीच. भाकरी फिरवण्याच्या गोष्टी सुरू आहेतच. जशी आपली राजकीय आकांक्षा पवारांनी कधी लपवून ठेवली नाही तसंच कधी अजित पवारांनीही त्यांच्या आकांक्षाही लपवलेल्या नाहीत. अजित पवारांनी एका मुलाखतीत 'आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, तेही आताच...!' असं सांगून धमाल उडवून दिली. पण त्या आधीपासूनच अजित पवार भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला या मुलाखतीनं बळकटीच मिळाली. त्यानंतर कुंपणावर असलेल्या काही आमदारांनी अजित पवारांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतला. पक्षातली ही हालचाल पवारांना अस्वस्थ करणारी होती. काही आमदारांनी तर खुद्द पवारांची भेट घेऊन भाजपशी सलगी करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. शिवाय कुटुंबातूनही अजितना मुख्यमंत्री होण्यास पवार का विरोध करताहेत असा दबाव वाढत चालला होता. त्यांनी ती खंत व्यक्त केली होती. शरद पवारांनी फार तरूणपणी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. मात्र अजित पवारांनी असं बंड केलं पण ते उपमुख्यमंत्रीपदासाठी झालं होतं, नंतर ते फसलं आणि अजित हे स्वगृही परतले!
शरद  पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली, तेव्हा 'शरद पवार' या चेहऱ्याशिवाय या पक्षाकडं दुसरं काही नव्हतं. नाही म्हणायला संगमा आणि तारिक अन्वर होते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणाऱ्या पवारांचे मनसुबे काही वेगळे होते. त्यावेळी कॉंग्रेस सत्तेत नव्हती. देशात आघाडी सरकारांचं पर्व सुरू होतं. नव्यानं राजकारणात आलेल्या विदेशी सोनियांना राजकारणात फार काही जमेल, असं पवारांना वाटत नव्हतं. त्यामुळं नवा पक्ष स्थापन करून स्वतःचं स्थान मजबूत करत न्यायचं, असा पवारांचा मानस होता. काँग्रेसचे नेते असलेल्या पवार तेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. खरंतर त्यांचा प्रधानमंत्रपदावर दावा होता, पण सोनियांनी तो दावा केल्यानं पवार अस्वस्थ बनले. आगामी काळात आपण काँग्रेसमधून प्रधानमंत्री होणार नाही हे चित्र स्पष्ट झाल्यानं पवार काँग्रेसबाहेर पडले. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी पवारांनी पक्ष स्थापन केल्यानंतर अनेकजण त्यांना सामील झाले. कॉंग्रेसनं सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची काही शक्यता नव्हती. 'शरद पवार' या नावाचा दबदबा दिल्लीत आणि राज्यात मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं ठिकठिकाणचे सहकारी चळवळीतले सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला. पवारांचा अंदाज खोटा ठरला आणि २००४ मध्ये सोनियांनी पुन्हा कॉंग्रेसला जिंकून दिलं. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळं पवारांना आपल्या सोनियाविरोधाला मोडता घालत सोनियांच्या नेतृत्वाखालीच केंद्रात दहा वर्षे काम करावं लागलं.  त्यापूर्वी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. सत्तेतला हा पक्ष वाढत राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४ ला राष्ट्रवादी राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. तरीही पवारांनी काँग्रेसच्या जागा कमी असतानाही विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं. अजित पवारांना डावलून छगन भुजबळ, विजयसिंह मोहितेपाटील, आर. आर. पाटलांना उपमुख्यमंत्री बनवलं. क्षमता असतानाही अजितना दूर ठेवलं. हे कर्तृत्व शरद पवारांचं! प्रतिमा आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर पवारांनी राज्यभर हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही पक्षासोबत जोडल्या गेल्या. पक्षाचं एक केडर तयार झालं. २०१४ पर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनं सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकली. जन्मापासून सत्तेवर असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली. देशात, राज्यात कॉंग्रेसची वाताहत झाली.  तरीही नव्या राजकारणात पवार सक्रिय राहिले. यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडानं पवारांना बरंच काही शिकवलं होतं. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि त्यांनी यशवंतरावांचं राजकीय करीअरच संपवलं. सोनियांना विरोध करणाऱ्या शरद पवारांचं असं झालं नाही, सोनियांकडं असलेलं कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा अंगभूत  चांगुलपणा ही कारणं आहेतच. समीकरणं कितीही बदलोत, आपण सक्रिय राहायचं, हे पवारांना कळलेलं आहे. कॉंग्रेसला आव्हान देऊन पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजारानं गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन काही वेगळं आहे हे लोकांना दिसून आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनं राजकारणातलं चित्र बदललं. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आलं. देवेंद्र फडणवीसांनी तसं जाहीरपणे म्हटलं होतं. पवारांना सोडून लोक भाजपत जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी शक्य करून दाखवलं. भाजपला दूर सारून सरकार बनवलं. शरद पवार हे महाराष्ट्राचेच काय, देशातले शक्तिमान नेते ठरले. राष्ट्रवादीला पुन्हा बळ मिळालं. तरूण मोठ्या संख्येनं पक्षात आले. देशातले वातावरण बदललं होतं. राजकारणाची परिभाषा बदलली होती. नामोहरम झालेल्या कॉंग्रेसकडं परिणामकारक असा नेता नव्हता. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, अशी सर्वांची खात्री होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शरद पवारांचा प्रभाव विलक्षण वाढलेला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी शरद पवारच सरकारचे पालक होते. हळूहळू चित्र बदलत गेलं. उद्धव ठाकरे यांची वेगळी अशी प्रतिमा तयार होत गेली. ते स्वतःच सरकार चालवत राहिले. महाविकास आघाडी सरकार पुढे अपेक्षेप्रमाणे कोसळलं. पवारांनी सरकार बनवलं, पण ठाकऱ्यांना वाचवता आलं नाही, अशी प्रतिमा व्हायला हवी होती. मात्र झालं उलटच. उद्धव ठाकरे यांच्याबद्धलच्या सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. उद्धव यांना असा सर्वस्तरीय जनाधार मिळू लागला, दलित, मुस्लिम यांचाही पाठिंबा मिळू लागला, जो शिवसेनाप्रमुखानाही कधी मिळाला नव्हता. वज्रमूठ सभांचाही चेहरा उद्धव ठाकरे हाच बनला. बाकी सगळे नेते मागे पडले आणि उद्धव नायक झाले. एकटे उद्धवच नाही, आदित्यसुद्धा! त्या तुलनेचा कोणीही नेता आज राज्यात विरोधकांकडं नाही. हे स्पष्ट झालं. महाविकास आघाडी सरकार पडलं खरं, पण शिवसेनेतल्या फुटीनंतर आलेलं नवं सरकार लोकांनी ना स्वीकारलं, ना ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती कमी झाली! उलट शरद पवारांविषयी संशयाचे धुकं तयार झालं. अदानी संदर्भातली 'एनडीटीव्ही'ला त्यांनी दिलेली मुलाखत, नागालॅंडात भाजपला दिलेला पाठिंबा, गौतम अदानींसोबत झालेल्या भेटीगाठी, विरोधकांच्या बैठकीला गैरहजेरी, अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी उठलेली वावडी. त्याहीपूर्वी क्रिकेटच्या राजकारणासाठी विरोधकांशी साथसंगत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सगळ्यांना अंगावर घेत असताना, पवार मात्र फक्त 'राजकारण' करताहेत, अशी चर्चा होऊ लागली. याला प्रतिवाद करणं भाग होतं. आपल्या प्रतिमेचं वलय वाढवायचं कसं, हे शरद पवारांना बरोबर समजतं. उद्धव ठाकरेंनी  मुख्यमंत्रीपद सोडलं. राहुल गांधींनी खासदारकी सोडली. तर शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं! पवारांनी राजीनाम्यानं स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच, ती येऊ शकते! तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचं मौन जेवढं बोलकं होतं, जयंत पाटलांचे अश्रू दिसत होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळं, हे वाटतं तेवढं सहज घडलेलं नाही. नक्की कारणं काय आहेत, ते पुढे येईलच. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा कधी सुरू झाल्या, तेव्हा शरद पवारांनी संजय राऊतांच्या मार्फत तो प्लान 'लीक' केला. त्यानंतर एकदम शांतता पसरली. अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली. कित्येकांचे डाव उधळले गेले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही पवारांनी अनेकांना चकमा दिला होता. जे जे शक्य ते पवार प्राणपणानं करत राहिले. पवार मूल्यांशी तडजोड करतात, असं वाटत असलं आणि त्यांच्या राजकारणाचा बाज 'करीअर'चा असला, तरीही निर्णायक क्षणी पवार विरोधकांच्या नाकी नऊ आणतात. थेटपणे ते बाह्या सरसावून हुतात्मा होत नाहीत. अनेकदा काठावर असतात. अधिक सावध असतात. पण, सक्रिय राहून शांतपणे अखेर तेच करतात, जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. म्हणूनच, ८३ वर्षांचा हा नेता पक्षाचं अध्यक्षपद सोडतो म्हटल्यावर महाराष्ट्रभर असा हलकल्लोळ होतो. पक्ष आता 'राष्ट्रीय' नसला, तरी देशभर बातमी होते. अजित पवारांची बंडखोर वृत्ती दिसते. पण अजितना शरद पवारांएवढा खडतर मार्ग अजून चालावा लागलेला नाही. पहिल्या खेळीनंतर पवारांनी नवा पक्ष काढला, तो मजबूत केला, जेंव्हा मोदी लाटेत पक्ष संपला असं वाटलं तेंव्हा पुन्हा बळकट करायला तेच पुढं आले. त्यांनी ईडीलाच आव्हान दिलं. एका अत्यंत मनस्वी, हुशार, चतुरस्त्र, व्यासंगी माणसानं सहा दशकं राजकारणात वाटचाल केलीय. आताही ते राजकारणात असतील. पवार सोनियांसारखे नाहीत त्यामुळं पद सोडलं तरी फुटकळ नेत्यांना पुढं करून कारभार चालवला नसता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तसं होऊ दिलं नसतं. या सगळ्या चर्चेत सुप्रिया केंद्रस्थानी असल्या तरी राज्याच्या राजकारणात यायला फारशा उत्सूक वाटत नाहीत त्यामुळं वारस कोण वगैरे चर्चांना अर्थ नाही. आता हा राजीनामा मागे घेतला गेलाय. त्यांनी मनात पूर्ण विचार करूनच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. राजीनामा म्हणजे राजकारण संन्यास नाही. येत्या निवडणुकीत एकत्र लढल्यास मविआला उत्तम संधी असताना कोणताच आत्मघातकी निर्णय घेतला जाईल असं वाटत नाही. पवार ते होऊ देणार नाहीत. फक्त पक्षांतर्गत नाराजीला वेसण घालण्यासाठीच त्यांची ही खेळी असावी! कदाचित आऊटगोईंग रोखण्याची ही प्रभावी चाल असू शकते. ते शून्यातून सत्ता आणू शकतात, क्षणार्धात शक्तीशाली नेत्याला जमीनदोस्त करू शकतात, आणि राजकारणातलं टायमिंग, धक्कातंत्र तर त्यांच्यापेक्षा कोणीच अधिक प्रभावीपणे राबवू शकत नाही. बाळासाहेबांनी याच तंत्राचा शिवसेनेत दोनदा वापर करून संघटनेला झटका आणि धक्का दिला होता, आणि राजीनामा मागे घेतला होता. आयुष्याच्या या पर्वात पवार भावनिक राजकारण करताहेत असं वाटतं, राजकारणात काहीच अशक्य आणि अनावश्यक नसतं. शेवटी २०२४ च्या निवडणुकीत मविआ एकत्र सामोरी गेली नाही, तर सगळ्यांचीच धूळधाण नक्की आहे. पण एकास एक लढली, तर कोणाच्याही नाकी नऊ आणेल हे स्पष्टच! त्यामुळंच न्यायालयीन निकालानंतरही सरकार अस्थिर होईल असं मुळीच नाही. मुख्यमंत्री बदल होईल, सरकार टर्म पूर्ण करेल, किंवा नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामे होऊन राष्ट्रपती राजवट लागेल किंवा मुदतपूर्व निवडणुका लागतील, पण अविवेकी पक्षांतरं लोकांना, मतदारांना आता अजिबात आवडणार नाहीत. अनैसर्गिक युत्यांना जनता कंटाळलीय, प्रक्षुब्ध झालीय. तिची नाराजी यापुढं परवडणारी नाही. त्यामुळंच कोणत्याहि परिस्थितीत लहानशा चुकीलाही क्षमा नाही! ते स्वतः तशी चूक करणार नाहीत, तशी परत कोणी केलीच तर क्षमा तर मुळीच करणार नाहीत!

चौकट
डोंगर म्हातारा झालाय...!
अनेक वादळ अंगावर घेऊन ऊन वारा पावसात तो उभा आहे. डोंगराआड आडोशाला असणारी लोकं आज सैरभैर झालीत. वटवृक्ष म्हटलं की, त्याच्या मुळाशी असणाऱ्या छोट्या वृक्षांना नेहमी वाटतं मी पण कधी होईल मोठा? आणि मग मुसळधार पावसाला सुरवात झाली की, वटवृक्ष आपसूकच त्या पालवी फुटलेल्या रोपांना आपल्या विशाल फांद्या खाली घेतो. आज राष्ट्रवादीचं तसंच झालं होतं. कोणी रडतंय, कोणी शांत झालंय, कोणी संभ्रमित झाला. कार्यकर्ते आणि नेत्यांनी आता नवीन नेतृत्वाखाली वाटचाल करायची वेळ आलीय. तुमचं जर शरद पवार या माणसावर प्रेम असेल तर तुम्ही ठरवा की, आता छोट्या छोट्या अडचणी करता मी सिल्व्हर ओक वर जाणार नाही. थोडं नाही ८० च्या पुढे पोहोचलेत साहेब. तरुणांना लाजवेल अशी कामं करतात असं म्हणून किती त्रास देताहात तुम्ही? शेवटी मर्यादा आहेतच प्रत्येकाला! दौरे, धावपळ, जागरण, प्रवास, उदघाटन, प्रकाशन, सामाजिक संस्थाची निमंत्रणं, त्यात वार्धक्यात वेळेवर घ्यावी लागणारी औषधं, त्यांचं पथ्य पाणी, हे थांबायला हवं! साहेबांच्या हयातीत जर दुसरं नेतृत्व उदयास येत असेल तर काय वाईट आहे? चुकलं माकलं तर साहेब आहेतच ना! अतिशय स्तुत्य आणि योग्य निर्णय घेतला होता साहेबांनी. खरं तर त्यांना आता मनासारखे जगू द्या. त्यांनी असाच आराम करावा. डोंगराचा मान ठेवा... डोंगर म्हातारा झालाय....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...