Saturday 27 January 2024

राम आले, रामराज्य कधी...?

"रामराज्याची कल्पना महात्मा गांधींनी मांडली होती. केवळ प्रधानमंत्री मोदीच नाही ते देशातले अनेक राजकीय नेते आपल्या भाषणातून रामराज्य आणण्याचा उल्लेख करतात. पण त्यांच्याकडून ते कधीच झालेलं नाही. दहा वर्षापूर्वी भारतीयांनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्यावेळी अनेक आशा दाखवल्या गेल्या होत्या. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. सत्ता हेच एकमेव साध्य आणि साधन बनल्यानं त्याच मार्गावर साऱ्यांचीच वाटचाल सुरू झालीय. मग रामराज्याचा विचार डोक्यात येणार तरी कधी? रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांपासून तर स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुका लढविणाऱ्या नेत्यांपर्यंत प्रत्येकानं राजकारण केलंय. मात्र रामराज्य हे मृगजळ ठरत आलंय. आता अयोध्येत राममंदिर साकारलंय राम तर आलेत पण रामराज्य कधी येणार?"
--------------------------------------
राम भारत की आस्था हैं, राम भारत का आधार हैं,
राम भारत का विचार हैं, राम भारत का विधान हैं,
राम भारत की चेतना हैं, राम भारत का चिंतन है,
राम भारत की प्रतिष्ठा है राम भारत का प्रताप है ।
राम प्रवाह है, प्रभाव है, राम नेति भी है, नीति भी है ।
'रामनीती ही राष्ट्रनीती...!' असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनाच्यावेळी म्हटलंय. अर्थातच रामराज्य असावं ही अपेक्षा सर्वच भारतीयांनी व्यक्त करतात. पण तसं रामराज्य आपल्याकडं नाही हे वास्तव आहे. रामराज्य आणि महात्मा गांधी हा शब्द एक ठरलाय. या देशात रामाचा अर्थ रामराज्य असा गांधींना प्रेरित होता. इंग्रज जेव्हा हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी गांधीजींनी भजन गायलं होत. 'रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम... ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको सन्मती दे भगवान...!' जिथं जिथं गांधींचं भाषण व्हायचं तिथं तिथं हे भजन गायलं जायचं.. याचाच अर्थ राम आणि अल्लाह एक आहे असाच होता. गांधीजींच्या मते, रामराज्याची राजकीय व्याख्या, 'धर्म, शांतता, सौहार्द आणि लहान-मोठे, उच्च-नीच, सर्व प्राणिमात्र आणि पृथ्वीच्यासुद्धा आनंदाचा विचार करून वैश्विक जाणिवेवर आधारलेले राज्य' अशी करता येईल. पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास’ची घोषणा केलीय. आता रामराज्य यायला हवं. रामराज्याचा कोणत्याही विशिष्ट धर्माशी किंवा रामाच्या पूजा-आराधनेशी संबंध नाही. रामराज्याचा अर्थ आहे, श्रीरामांप्रमाणे आदर्श शासनव्यवस्था स्थापन करणं, ज्यात कोणी भुकेला असू नये, कोणाचाही छळ होऊ नये, सर्वजण निडर असतील, भयमुक्त जीवन जगता यावं आणि समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सुखसमृद्धी झिरपणं. सर्वांना रोजगार मिळावा. असाही रामराज्याचा आहे. पंतप्रधानांना याकडेही खास लक्ष द्यावं लागेल. सर्वसामान्य नागरिक दु:खी असतील आणि ते कष्टप्रद आयुष्य जगत असतील, तर रामराज्य कधी साकार होणार नाही आणि त्यानं प्रभू रामचंद्रही खूश होणार नाहीत. 
आता अयोध्येतल्या राममंदिर सोहळ्याचे उद्घाटन झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ आदी मान्यवर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होते. दरम्यान, प्रभू रामाचा उल्लेख करत देशात रामराज्य असावं, असं हमखास म्हटलं जातं. आम्ही सत्तेत आल्यास देशात रामराज्य निर्माण करू, असं आश्वासनही अनेक नेते देतात. महात्मा गांधी यांनीदेखील रामराज्याची संकल्पना मांडली होती. याच पार्श्वभूमीवर महात्मा गांधी यांना अभिप्रेत असलेले रामराज्य कसं आणि काय आहे? महात्मा गांधींचे रामराज्य काय होतं? हे जाणून घेऊ…
१९ सप्टेंबर, १९२९ च्या 'यंग इंडिया'मध्ये गांधी लिहितात, 'मी रामराज्याचा अर्थ हिंदू राज्य असा समजत नाही. रामराज्य हे देवाचे राज्य आहे, असे मी मानतो. माझ्यासाठी राम आणि रहीम हे दोन्हीही एक आणि सारखेच आहेत; सत्य आणि सद्गुणांव्यतिरिक्त मी दुसऱ्या कुठल्याही देवाला मानत नाही. माझ्या कल्पनेतील राम या पृथ्वीतलावर खरोखरच होऊन गेला का, हे मला माहिती नाही. परंतु, रामायण हे खऱ्या लोकशाहीचे असे उदाहरण आहे, जिथे लांबलचक आणि महागड्या प्रक्रियांना सामोरे न जातासुद्धा समाजातील शेवटच्या नागरिकाला न्याय मिळू शकतो...!' 
२० मार्च १९३० च्या 'नवजीवन पत्रिके'त त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं. 'रामराज्य म्हणजे लोकांचं राज्य, दुसऱ्या शब्दात धर्मराज्य, ज्यात दुसरी बाब होती. गरिबांच कल्याण झालं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की, त्यात लोकमताचा आदर झाला पाहिजे...! या तीनही गोष्टींचा ताळमेळ कुठे आज दिसतो का? 
२ ऑगस्ट, १९३४ च्या 'आनंद बाजार पत्रिका'मध्ये गांधीजी लिहितात, 'माझ्या स्वप्नातील रामायणात राजपुत्र आणि रंक या दोघांनाही समान अधिकारांची खात्री दिली जाते...!' 
२ जानेवारी, १९३७ च्या 'हरिजन'मध्ये ते म्हणतात, 'राजकीय स्वातंत्र्य मिळवणे याचा अर्थ आपण ब्रिटिशांचे हाऊस ऑफ कॉमन्स, रशियन राज्यव्यवस्था, इटलीतील फॅसिस्ट अथवा जर्मनीतील नाझी शासन व्यवस्थेचे अनुकरण करावे, असा नाही. आपल्याला आपले, आपले वाटणारे राज्य हवे... मी त्याला रामराज्य म्हणतो, म्हणजेच नागरिकांच्या नैतिकतेवर आधारलेले राज्य...!' 
 स्वातंत्र्य मिळण्याच्या दोन महिने आधी, १ जून १९४७ रोजी गांधीजींनी 'हरिजन'मध्ये लिहिलं, 'ऐश्वर्यात लोळणारे काही लोक आणि पुरेसे अन्नही न मिळणारे सामान्य नागरिक अशा अन्यायकारक असमानतेच्या काळात रामराज्य अस्तित्वात येणे शक्य नाही...!'
देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद आणि फाळणीच्या काळात उफाळलेला अनपेक्षित हिंसाचार यामुळं देशातल्या राजकीय नेत्यांचा भर रशियन विचारधारेवर आधारित धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी भारत निर्माण करण्याकडे राहिला. पुढच्या काही दशकांत अतिउत्साही धर्मनिरपेक्ष राजकीय नेत्यांनी अध्यात्मिक आणि धार्मिक संदर्भाकडे दुर्लक्ष करत रामराज्य ही संकल्पना प्रतीकात्मक रूपानं वापरली. राम भारतीय संस्कृतीचं प्रतीक आहे. मग देशात रामराज्य का नको? त्या दिशेनं आपला प्रवास सुरू झालाय का?. याचा विचार करायला नको? अयोध्येतल्या बाबरी मशिदीच्या पतनानंतर सत्तेत आलेल्या विशिष्ट राजकीय विचारसरणीच्या नेत्यांमुळे अयोध्येत राममंदिराचे पुनर्निर्माण या मुद्द्याला अचानक अधिक आलं. राममंदिराची निर्मिती आणि देशात रामराज्याची स्थापना करण्याची शपथ नागरिकांना देण्यासाठी फेब्रुवारी, २०१८ मध्ये विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतून ४१ दिवसांची यात्रा काढली होती, याची आठवण झाली. रामायणाला इतिहास समजायचं की पुराणकथा, हा वादाचा विषय असला तरी 'रामराज्य' ही संकल्पना आपल्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य घटक आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. रामराज्याची स्थापना हा आदर्श पुढे ठेवूनच महात्मा गांधींच्या नेतृत्वात स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या नेत्यांपासून तर स्वातंत्र्योत्तर काळात निवडणुका लढविणाऱ्या नेत्यांपर्यंत प्रत्येकानं राजकारण केलंय. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राममंदिर निर्मितीनं देशातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. राममंदिर निर्मितीची आकांक्षा बाळगण्यात काहीही गैर नसले तरी केवळ एक मंदिर बांधल्यानं किंवा एका मूर्तीमुळे गांधीजींच्या स्वप्नातलं रामराज्य खरोखरच अस्तित्वात येऊ शकेल का, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारला पाहिजे! राममंदिर हा नि:संदेह करोडो भारतीयांच्या आस्थेचा विषय आहे. राममंदिर झाल्यावर आता देशातले इतर सर्व प्रश्न, समस्या संपणार आहेत, देशात रामराज्य अवतरणार आहे, असा गैरसमज करून घेण्याचं कोणतंच कारण नाही. न्यायालयातल्या रामजन्मभूमी मंदिराचा प्रश्न निकाली निघाल्यानंतरच राममंदिर निर्माणाची प्रक्रिया सुरु झाली. यात कोणत्याच राजकीय पक्षाला दोष अथवा श्रेय देता येणार नाही. हा पक्षीय कार्यक्रम होणार नाही अशी सार्थ अपेक्षा भारतीयांची आहे. रामजन्मभूमीमंदिराचा इतिहास जर पाहिला तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी मूर्ती बसवली, त्यावेळी गोविंद वल्लभ पंत उपस्थित होते. इंदिरा गांधींनी मंदिराला लागलेलं टाळं खोललं, तर राजीव गांधींनी १९८९ ला रामजन्मभूमीमंदिराचा शिलान्यास करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेला अनुमती दिली होती शिवाय यात सहभागी होण्यासाठी गृहमंत्री बुटासिंग यांनाही अयोध्येत पाठवलं होतं. हे इथं नोंदवावं लागेल. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी मंदिराचं लोकार्पण करणं यात गैर काहीच नाही. कोणाला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित करणं हा सर्वस्वी रामजन्मभूमीमंदिर न्यासाचा अधिकार आहे. पण म्हणून राममंदिर मोदीजींमुळं झालं असं म्हणणं त्या न्यायाधीशांवर अन्याय करणारं आहे.
काँग्रेसच्या संपूर्ण राजवटीत रामजन्मभूमीमंदिराचा वाद न्यायालयात प्रलंबित होता. काँग्रेसनं स्वातंत्र्य संग्रामात कधीही रामजन्मभूमी मंदिराचा मुद्दा उपस्थित करून मते मागितली नाहीत. ७५०+१५० = ९०० वर्षाच्या जुलमी हुकूमशाही राजवटीनंतर लोकशाही मार्गानं निवडून आल्यानंतर काँग्रेसला भारतीयांच्या प्राथमिक गरजांची जी निकड होती त्याची पूर्तता करायची जबाबदारी होती. देशातल्या आर्थिक, राजकीय, सामाजिक प्रश्नांची प्राधान्यानं उकल करून त्याला मार्गावर आणायची होती. त्यात रामजन्मभूमी मंदिराचा हा विषयच नव्हता. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ३० कोटी लोकसंख्या असलेला भारत देश २०१४ पर्यंत १४० कोटीवर पोहोचला. तरीही भारतीय गणराज्य अबाधित राखलं. आपल्या बरोबरीनं किंबहुना आपल्यानंतर स्वातंत्र्य मिळालेल्या आजूबाजूलाच असणाऱ्या देशांची राजकीय, सामाजिक, आर्थिक अवस्था आज किती बिकट आहे हे तुम्ही आम्ही सारे जाणतोच. १९४७ नंतर स्वातंत्र्योत्तर काळात हिन्दुस्तानाला चार युद्धाला सामोरं जाव लागलं. यापैकी १९६२ सालातले चीनच्या आक्रमणात नामुष्की पदरी आली. मात्र १९४८, १९६५ आणि १९७१ चे पाकिस्तान विरुद्ध झालेल्या तीनही युद्धात आपल्या देशानं शत्रुला धूळ चारली. एका युद्धात देश आर्थिक दृष्ट्या किती दुर्बल होतो हे जगजाहीर आहे. आपण पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री आणि इंदिरा गांधी यांनी या चार आक्रमणाला यशस्वी तोंड दिलं. यांचे दूरगामी आर्थिक परिणाम झाले. देशांतर्गत अनेक प्रांतात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. अनेक संघर्ष उभे राहिले. राममंदिर हा विषय हिंदु मुस्लिम असा कधीही नव्हता न्यायालयातला वाद हा दोन न्यासामधला वाद होता. दोन्ही ट्रस्ट मार्फत वादग्रस्त जागेवर मालकी हक्क सांगितला जात होता. त्याचा न्यायालयीन निर्णय झाल्यानंतर रामजन्मभूमी मंदिराचं निर्माण न्यासातर्फे करण्यात येत आहे. कपिल सिब्बल किंवा मनु सिंघवी हे व्यावसायिक वकील आहेत. पक्षकारांच्या सूचना आणि हितांचं रक्षण करणं हा व्यावसायिक विषय वेगळा आणि राजकीय पक्षाशी असणारी बांधीलकी वेगळी. काँग्रेस पक्ष न्यायालयातल्या वादात कधीही पक्षकार नव्हता. हे इथं आवर्जून नमूद केले पाहिजे. काँग्रेसनं न्यायालयातल्या कामकाजात कधीही आणि कसलीही ढवळाढवळ केली नाही. उलट पंतप्रधान राजीव गांधीनी १९८५ साली रामलल्लांची स्थापना केली हा इतिहास असूनदेखील फक्त काँग्रेस पक्षावर दोष ठेवण्यात सध्याचे राज्यकर्ते आणि त्यांचे समर्थक हे धन्यता मानतात. खरंतर व्यवसाय आणि राजकारण या दोन्हीची गल्लत करता कामा नये. मात्र रामजन्मभूमी मंदिराच्या वादग्रस्त जागेचा निकाल दिल्यानंतर त्याच निवृत्त सरन्यायाधीशापुढे राज्यसभेच्या सदस्यत्वाचा तुकडा टाकणं म्हणजे काय हे न समजण्या इतपत कोणीही खुळे नाहीत. असो. शेवटी राम आपल्या सर्वांचे आहेत. कारण ज्या अयोध्येला सोन्याचं रूप दिलं गेलंय, पण ती तर रामाची अयोध्या कधी नव्हतीच, सोन्याची तर लंका होती, पण लंका जिंकल्यावर जेव्हा लक्ष्मणानं रामाला म्हटलं, तुम्ही इथले राजा बना तर रामानं सभ्यपणे उत्तर दिलं. 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी...!' आता वाट बघूया! आज मंदिर साकारलंय आणि रामलल्लाची मूर्ती मंदिरात विराजमान झालीय. दोन चार वर्षात उरलेलं राममंदिराचं काम पूर्ण होईल, पण रामराज्य येईल का?
हरीश केंची,
९४२२३१०६०९





मराठा संघशक्तिचा विजय

"मराठा आरक्षणाच्या निमित्तानं उठलेलं वादळ शमलं. आंदोलकांना मुंबईत शिरण्यापासून रोखण्यात सरकारला यश आलं. आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्या असं दिसत असलं तरी त्यातून नेमका काय अर्थ काढायचा. प्रत्यक्षात कुणाला कितपत फायदा होणार याबाबत मराठा समाजाचे नेते साशंक आहेत. जरांगे यांचं नेतृत्व समाजापुढं आलंय. त्यांच्यावर विश्वास दिसून आला. हा त्या लढाऊ नेतृत्वाचा विजय आहे. आता परीक्षा आहे ती सरकारची. दिलेली आश्वासनं आणि अधिसूचनांच कायद्यात रूपांतर करण्याचं! सरकार ओबीसींवर अन्याय करतंय की, मराठ्यांना फसवतंय! अशी शंका व्यक्त झालीय, याचाही गंभीरपणे विचार करायला हवा. पुरोगामी महाराष्ट्रात असलेली सामाजिक वीण विस्कटली तर जाणार नाही ना? याची काळजी घ्यावी लागेल!"
--------------------------------------
*म* हाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन संपलं. मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत उपोषण सोडलं; सरकारनं सर्व मागण्या मान्य केल्या. शुक्रवारी रात्री केलेल्या भाषणात त्यांनी सकाळी ११ वाजेपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश काढला नाही तर १२ वाजता मुंबईतल्या आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन करू, असं ते म्हणाले होते. यानंतर शिंदे सरकारनं रात्री उशिरा अध्यादेशाचा मसुदा जरांगे यांच्याकडे पाठवला. त्यात जरांगे यांच्या मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेनी २० जानेवारीला जालना ते मुंबई असा मोर्चा काढला. २६ जानेवारी रोजी जरांगे आणि त्यांचे समर्थक लाखोंच्या संख्येने नवी मुंबईतल्या वाशी इथं पोहोचले होते. आतापर्यंत ५४ लाख लोक कुणबी असल्याचं सिद्ध झालंय. त्या सर्व लोकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिले जाईल. 
जरांगे यांनी ४ दिवसांत प्रमाणपत्र देण्याची मागणी सरकारकडे केली. वंशावळ जुळण्यासाठी समिती नेमण्यात आल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. यानंतर जात प्रमाणपत्रांचं वाटप केले जाईल. मराठा आंदोलकांना दाखले देण्यात आलेल्या ३७ लाख लोकांची माहिती दिली जाणार आहे. ही आकडेवारी काही दिवसांत दिली जाईल, असं राज्य सरकारनं म्हटलंय. शिंदे समितीचा कार्यकाळ दोन महिन्यांनी वाढवण्यात आलाय. त्यात एक वर्ष वाढ करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती. समितीनं मराठ्यांच्या कुणबी नोंदींचा शोध सुरू ठेवावा, अशी आंदोलकांची इच्छा होती. समितीचा कार्यकाळ टप्प्याटप्प्यानं वाढविण्यात येणार असल्याचं राज्य सरकारनं म्हटलंय. नोंदणी केलेल्यांच्या जवळच्या सगेसोयरे, नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल. यासंदर्भात सरकार अध्यादेश काढण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी मराठा आंदोलना दरम्यान आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील. विहित प्रक्रियेनंतर खटले मागे घेतले जातील, असे गृह विभागानं म्हटलंय. मराठ्यांची मागणी होती की त्यांच्या मुलांना आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण द्यावं. तसंच आरक्षण मिळेपर्यंत शासकीय भरती थांबवावी किंवा जागा राखीव ठेवाव्यात. सरकारनं मागणीचा पहिला भाग मान्य केलेला नाही. राज्य सरकार केवळ मराठा मुलींना पदव्युत्तर शिक्षणापर्यंत मोफत शिक्षण देणार आहे. मात्र, त्यासाठी कोणतेही शासन निर्देश जारी करण्यात आलेले नाहीत. त्यानंतर सरकारनं राज्यातल्या मराठा समाजाला शिक्षणात, तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्यासंबंधीची अधिसूचना महाराष्ट्र सरकारने शनिवारी जारी केली असून, त्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गात या समाजाला हे आरक्षण तत्काळ लागू झाले आहे.शिक्षणातील आरक्षण हे सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये लागू असेल. त्यात अनुदानित, विनाअनुदानित, खासगीसह सर्व संस्थांचा समावेश आहे. नोकºयांमधील आरक्षण सरकारी व निमसरकारी कार्यालये, महामंडळे, महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्याखाली स्थापन केलेल्या आणि ज्यात राज्य सरकार भागधारक आहे, अशा सर्व सहकारी संस्था, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा आदी स्थानिक स्वराज्य संस्था यासह सर्व सरकारी नोकºयांत तत्काळ लागू झाले आहे.मराठा समाजाला हे आरक्षण देताना अस्तित्वात असलेल्या अन्य प्रवर्गांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लावला जाणार नाही, असे राज्य सरकारच्या अधिसूचनेतही स्पष्ट करण्यात आले आहे.वैद्यकीय, तंत्र व शिक्षण क्षेत्रातील अतिविशेषीकृत पदे, बदलीद्वारे किंवा प्रतिनियुक्तीद्वारे भरावयाची पदे, ४५ दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या तात्पुरत्या नियुक्त्या आणि कोणत्याही संवर्गातील किंवा श्रेणीतील एकमेव पद यांना मात्र आरक्षण लागू नसेल. राज्याच्या अनुसूचित क्षेत्रात अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या पदांना वरील आरक्षण लागू राहणार नाही.शिक्षण आणि नोकºयांमध्ये खुल्या प्रवर्गातही मराठा समाजातील विद्यार्थी, तसेच उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारे संधी मिळू शकेल, असे ही अधिसूचना सांगते. त्यांना खुल्या प्रवर्गात संधी मिळाल्याच्या कारणास्तव या समाजासाठी असलेले १६ टक्के आरक्षण कमी करण्यात येणार नाही. या समाजाच्या म्हणजेच एसईबीसी प्रवर्गाच्या व्यक्तींसाठी राखीव असलेली कोणतीही जागा रिक्त राहिल्यास, पाच वर्षे त्या पदावर अन्य प्रवर्गातील व्यक्तीची निवड केली जाणार नाही.केंद्रीय किंवा राज्य कायद्यांद्वारे निर्माण केलेली राज्याच्या मालकीची मंडळे व महामंडळांमध्ये आरक्षण लागू असेल, पण आयएएस, आयपीएससह केंद्र सरकारच्या कोणत्याही नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण लागू होणार नाही. अधिसूचनेवरून हे स्पष्ट होते की शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या जातींसाठी हे आरक्षण आहे. त्यामुळे काळाच्या ओघात व योग्य प्रक्रियेद्वारे ज्या समाजांचे मागासलेपण सिद्ध होईल, अशा मराठा समाजाखेरीजच्या अन्य जातींनाही या आरक्षणाचा भविष्यात फायदा मिळू शकतो, असा अर्थ लावण्यात येत आहे.।क्रिमीलेअरची असेल अटमराठा समाजाला नोकºया, तसेच शिक्षणाच्या आरक्षणासाठी क्रिमीलेअरची मर्यादा असेल. म्हणजेच क्रिमीलेअरमधील उमेदवार वा विद्यार्थ्यांनाच या आरक्षणाचा फायदा दिला जाईल.

ओबीसी समाज मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात आहे. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं रद्दबातल ठरवला. यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्यासह अनेकजण मराठा समाज मूळचा कुणबी जातीचा असल्याचा दावा करत आहेत. म्हणजेच मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिल्यास आरक्षण मिळाल्यास ओबीसी कोट्याचा लाभ मिळेल. सध्या राज्यात ओबीसी कोट्यातून १९ टक्के आरक्षण आहे. त्यात मराठा समाजाचाही समावेश केल्यास आरक्षणाचा लाभ नवोदितांना मिळेल, असा विश्वास ओबीसी समाजाच्या संघटनांनी व्यक्त केलाय. आमचा विरोध हा मराठा आरक्षणाविरोधात नसून त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आहे. सरकारनं आरक्षण दिलंय, पण जर का उधळलेल्या मराठ्यांच्या गुलालाला धोका दिला गेला. काढलेल्या अध्यादेशाला धोका झाला तर मात्र आपण आझाद मैदानावर येऊन पुन्हा उपोषण आंदोलन करू. असा इशारा जरंगे यांनी सरकारला दिला. तर कुणबींना प्रमाणपत्र देतानाच आरक्षणाची अंमलबजावणीही केली जाईल, सरकारनं कुणबी प्रमाणपत्रासाठी नेमलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ दिली जाईल. सगेसोयरे, नातेवाईक यांना आरक्षण दिलं जाईल, असं आश्वासन देतानाच मराठ्यांना कायद्यात टिकणारं आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना ओबीसींच्या सवलती दिल्या जातील. असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. दरम्यान झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. यापुढे मराठ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षण मिळणार नाही. १७ टक्क्यात त्यांना आणखी काय मिळणार? पोलिसी केसेस ज्या जाळपोळीच्या, पोलिसांना मारहाणीच्या, गुन्हेगारी स्वरूपाच्या आहेत त्या मागे कशा घेणार? ज्या अधिसूचना काढल्या आहेत त्यावर हरकती, सूचना मागवाव्या लागतील मगच अध्यादेश काढता येईल. सग्यासोयऱ्याना शपथपत्रावर आरक्षण दिलं गेलं तर गहजब होईल. फक्त एका समाजातल्या सर्वाँना मोफत शिक्षण कसं काय देता येईल. जे काही अध्यादेश काढले असं सांगितलं जातंय ते अध्यादेश नाहीत तर ते नॉटिफिकेशन, अधिसूचना आहेत. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी, सरकारनं ओबीसींवर अन्याय केलाय की, मराठ्यांना फसवलं गेलंय हे लवकरच समजून येईल. असं ओबीसी नेते छगन भुजबळ यानी म्हटलंय. त्यांनी लवकरच सर्व ओबीसी समाजातल्या नेत्यांची बैठक घेऊन पुढची वाटचाल ठरवू असं सांगितलं.
'मराठा संघ शक्ती' ही काय चीज आहे, ही एव्हाना देशाला कळली असेल, असं समजायला हरकत नाही. आता मराठा मोर्चा हा या नंतरच्या आंदोलनांचे `रोल मॉडेल` बनल्यास आश्चर्य वाटू नये. अर्थात आरक्षण मिळालं तरी त्यानं समाजाचे सर्व प्रश्न संपले, मिटले असं होणार नाही. खरं तर ग्रामीण जनतेबरोबरच लक्षावधी समाजबांधवांचा मूलभूत प्रश्न आहे तो आर्थिक सक्षमीकरणाचा. शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक, नोकरदार अशा समाजातल्या सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसं करता येईल अन् रंजले गांजलेल्यांना समाज म्हणून मदत कशी करणार याचा विचार व्हायला हवा. अभूतपूर्व, अद्‍भूत, अविस्मरणीय अशा `अ`च्या बाराखडीत बसेल असाच मराठा मोर्चाचा माहोल होता. मराठा समाजानं या मोर्चांला जशी रेकॉर्डब्रेक हजेरी लावली तशीच किंवा कांकणभर सरसच अशी मराठवाड्याची स्थिती होती. महिला व तरुणींचा लक्षणीय सहभाग हा या मोर्चाचा कळसाध्याय म्हणावा लागेल. महाविद्यालयीन तरुणांनी सुध्दा स्वभावाच्या विपरीत कमालीच्या सयंतपणे लावलेली हजेरी आणि तथाकथित मराठा पुढाऱ्यांनी देखील प्रथमच बॅकबेंचर्स राहणं पसंत केलं  होतं. ही मोर्चाची मोठीच उपलब्धी मानावी लागेल. खेड्यापाड्यातून बायकापोरांसह आलेला समस्त कष्टकरी, शेतमजूर मराठा समाज हा खरा या मोर्चाचा हुंकार होता. सततच्या अन्यायाला एवढ्या शांतपणे सामोरे जाण्याचे मिळालेलं बळ ही गांधीजींच्या अहिंसक आंदोलनाची पुढची पायरी म्हटली तर वावगं ठरू नये. महात्मा गांधींनी इंग्रजांविरोधात अहिंसक मार्गानं एल्गार पुकारला होता. इथं तर आपल्याच लोकांविरुध्द लढायचं असल्यानं कदाचित उपोषण, मोर्चा हेच मोठे शस्त्र बनलेलं दिसतं. समाजाची ताकद प्रथमच जगासमोर आलीय. अध्यात्मातल्या  संघटन शक्तीचं महत्व, एकीमुळं मिळणारी ऊर्जा, मिळणारं आत्मिक समाधान याचा एक इव्हेंट आपण अनुभवलाय. काही जणांना त्याचा लाभही झालेला असेल. पण मुळात आक्रमक समाज म्हणून ज्यांची इतिहासापासून ते विद्यमान काळातही गणना केली जाते त्या मराठा समाजाने अशा पध्दतीनं शांततेतून केवळ राज्यालाच नव्हे तर संपूर्ण देशालाच अचंबित करायला लावलंय. ही ऊर्जा या मंडळीत कोठून आली, एकमेकांचे पाय खेचण्यातच आयुष्याची इतिश्री मानणाऱ्यांना सहकार्याची बुध्दी एकाएकी कशी सूचली, राजकारणाच्या पलिकडे विचारही न करणारे या मोर्चात नेतृत्वाची फुशारकी न मारता साध्या कार्यकर्त्याच्या भूमिकेत कसे वावरले, मोर्चाला अजाण निरागस नेता नव्हता तर मग एवढी लाखा-लाखांची गर्दी जमते कशी, कोण आहे यामागे, या मोर्चासाठी पैसा येतो कोठून, कोणालाही दोष न देता, कमालीच्या शांततेत लक्षावधी लोक चालतात यामागचे रहस्य काय, अशा असंख्य प्रश्नांच्या भेंडोळ्यांनी सोशल मीडियाचा सारा आसमंत तर चक्रावला आहेच; शिवाय समाजशास्त्रज्ञ, विचारवंत अशा सर्वांचीच मती गुंग झालीय. या मोर्चामागचे हेतू, उद्देश राजकारणाच्या पलिकडले आहेत, यावर विश्वास ठेवायला तयार नसलेल्यांनी प्रारंभी खिल्ली उडवून पाहिली, नंतर चेष्टा केली, पुढे सोशल मीडियातून अनेक वार करुन पाहिले पण या सर्वांवर मोर्चांनी मात केली. राज्याच्या जवळपास निम्म्याहून अधिक जिल्ह्यांतून आजपावेतो मोर्चे उपोषण संपन्न झाले आहेत. सर्वत्र लाखाच्या पुढेच गर्दीचा अंदाज आहे. असं असतांना कोठेही गडबड नाही, कोणाला त्रास नाही, घोषणा नाही, अस्वच्छता नाही, सार्वजनिक वाहनांची नासधूस नाही. कोणाला दूषणं देणं नाही अशा या आक्रंदनानं आता मात्र सर्वांनाच विचार करायला भाग पाडलंय. मराठ्यांना आरक्षण कशाला पाहिजे, सत्तेत तर हाच समाज कायम राहिलाय, सहकार, शैक्षणिक संस्था यांच्याच ताब्यात आहेत, अॅट्रॉसिटीचा गैरफायदा हाच समाज एकमेकांचा सूड घेण्यासाठी करतो वगैरे अशा असंख्य सवालांनी गेले काही दिवस सर्वच माध्यमं अक्षरशः घुसळून निघाले. मराठा समाजाच्या काही मंडळींनी या आक्षेपांना आपापल्या परीनं उत्तरंही देण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण बहुसंख्य समाजबांधवांनी मात्र या कशाचीच फिकीर न करता केवळ आपले रुदन या आगळ्यावेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न चालविला होता. त्यामुळंच हळूहळू तो अनेकांच्या पचनीही पडायला लागलाय किमान त्यातल्या काही मुद्यांबद्दल विचार तरी करायला सुरुवात झालीय. प्रारंभी या मोर्चांना प्रत्युत्तर देण्याची भाषा छगन भुजबळ यांच्याकडून केली गेली, या मोर्चांत गडबड करुन राज्य पेटवून देण्याचा काहींचा डाव असल्याच्या अफवाही पसरल्या तरीही मराठा समाजानं त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. सुरुवातीपासूनच हा मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीभोवती ठाम होता. कोणीही आगलावेपणा वा चिथावणीखोर भाषणे केली नाहीत, कुठेही जमावाला भडकावणारी पोस्टर्स किंवा वक्तव्य झालं नाही. या मोर्चाचं राजकारण करण्याचाही प्रयत्न काही प्रमाणात निश्चितच झाला किंवा उद्या होईलही. पण तरीदेखील सामान्य मराठा माणसाला आता त्यात काहीही स्वारस्य नाही, एवढं तरी गेल्या काही दिवसांतल्या मोर्चांच्या अनुभवावरुन कळायला हरकत नाही. मराठा समाजाच्याच हातात सत्ता होती आणि विविध संस्था या त्यांच्याच पुढाऱ्यांच्या हातात असतांना ही ओरड का, असा सवाल अनेक जण करीत होते. त्यात काही प्रमाणात तथ्य असलं तरी मुळात प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची कोणालाही आवश्यकता वाटत नाही. त्यामुळंच उचलली जीभ लावली टाळूला असं घडलंय. ज्या लोकांना हे प्रश्न पडलेत, त्यांनी मराठवाडा, खान्देश, विदर्भ अशा भागांबरोबरच इतरही कोणत्याही भागातील ग्रामीण भागात, खेड्यापाड्यात किमान एकदा तरी जाऊन यावं. तिथल्या मराठा शेतकऱ्यांची स्थिती पहावी अन् नंतरच बोलावं. शैक्षणिक वा सहकारी संस्थांमध्ये तिथं शक्य तेवढ्या प्रमाणात समाजाला प्राधान्य दिलेलंच आढळेल. समजा या पुढाऱ्यांनी समस्त मराठ्यांनाच त्या संस्थांमध्ये नोकऱ्या वा मराठा विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं असतं तर तेव्हाही जातीवादावरुन ओरड झाली असती. एवढंच कशाला सगळीकडे रोस्टर पध्दतीमुळे हे शक्यही नाही. काही ठिकाणी अन्याय झालाही असेल. पण मुळात एक गोष्ट विसरता कामा नये, की मराठा समाज हा महाराष्ट्रात एकूण लोकसंख्येच्या ३५ ते ४० टक्क्यांच्या आसपास आहे, अशा स्थितीत किती जणांना सामावून घेणार यालाही मर्यादा आहेच. काही पुढाऱ्यांनी मस्ती केली यात काही शंका नाही. त्यामुळंच तर या मोर्चात पुढाऱ्यांना स्थान नव्हतं, हे लक्षांत घ्यायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाही पुढाऱ्याला चमकोगिरी करण्याची सोय समाजानं ठेवलेली नाही. एखादा समाज एवढ्या शहाणपणानं हे निर्णय घेतो, त्याची अंमलबजावणीही तेवढ्याच काटेकोरपणे करतो तरी सवाल उपस्थित करणाऱ्या शंकेखोरांना काळच उत्तर देईल. मुळात समाजाला गृहित धरणाऱ्यांनाही हा मोर्चा म्हणजे एक सणसणीत चपराक असतांना त्याच्या एकूणच आयोजन, उद्देश वा हेतूविषयी शंका घेणं त्यांच्यावर अन्यायकारक आहे. आतापावेतो औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, अकोला, अमरावती, नगर, रायगड-नवी मुंबई, फलटण आदी ठिकाणांहून मोर्चेकरी आले. सर्वपक्षीय नेत्यांनी सुरुवातीपासूनच आपसातील हेवेदावे, मतभेद आणि राजकारण विसरुन एकत्रपणे काम केलं. कुठेतरी समाज केंद्रस्थानी आल्याचं आणि त्यांना आता गृहित धरुन आपल्याला राजकारण करता येणार नाही असं जाणवलं असणार. त्यामुळं सर्वच ठिकाणी मराठा पॉवर दिसली. परदेशी वृत्तवाहिन्यांनाही दखल घ्यावी लागली अशी ही संघ शक्त आहे. प्रारंभी राज्यातल्या माध्यमांनीही याकडे दुर्लक्ष केलं होतं, पण नंतर सगळ्यांच्याच अजेंड्यावर मराठा मोर्चा आला. मोर्चा त्यातली शिस्त, महिला-युवतींचा लक्षणीय सहभाग, नेत्यांना दुय्यम स्थान या गुणविशेषांचे कौतुक होऊ लागलं. तसतसा नंतरच्या मोर्चेकरांनाही हुरुप येऊ लागला. आता मुंबईत विश्वविक्रम करण्याचीही तयारी चालू झाली होती. पण त्याची यशस्वी इतिश्री मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत झाली.
मराठा संघ शक्ती ही काय चीज आहे ही एव्हाना देशाला कळली असेल, असे समजायला हरकत नाही. पटेल, जाट, गुज्जरांच्या हिंसक आंदोलानापेक्षा मराठा आंदोलन गुणात्मकरित्या कसं चांगलं आहे, याची आता केस स्टडी बनेल. कदाचित मराठा मोर्चा हा या नंतरच्या आंदोलनांचे `रोल मॉडेल` बनल्यास आश्चर्य वाटू नये. एवढी किमया तर या मोर्चाने नक्कीच साधलीय. पण आता पुढं काय हे भलेमोठे प्रश्नचिन्ह तेवढ्याच तीव्रतेनं पिंगा घालू लागलेत. समजा आता आरक्षण मिळालं असलं तरी त्यानं समाजाचे सर्व प्रश्न मिटलेत असं होणार नाही. उद्या विविध संस्थांच्या निवडणुका लागल्या की पुन्हा मराठे एकमेकाला गाडण्यासाठी तयार, असं चित्र दिसलं तर ही कमावलेली संघ शक्ती क्षणार्धात लुप्त होईल. राजकारण हे चालणारच. त्याला विरोध नाही. पण घरादारावर नांगर फिरवून राजकारण करणं म्हणजे या मोर्चातून आपण काहीही बोध घेतला नाही असं होईल. खरं तर ग्रामीण जनतेबरोबरच लक्षावधी समाजबांधवांचा मूलभूत प्रश्न आहे तो आर्थिक सक्षमीकरणाचा. शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यावसायिक, नोकरदार अशा समाजातल्या सर्वच घटकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसं करता येईल अन् रंजले गांजलेल्यांना समाज म्हणून मदत कशी करणार याचा विचार व्हायला हवा. आज या मोर्चांमुळे क्रांतीची बीजे रुजल्यासारखी वाटत असली तरी त्याला समंजस, व्यापक समाजहिताची दृष्टी असणारं नेतृत्व लाभलं नाही तर ही ताकद भरकटू शकते. आजपर्यंत जे झालं ते झालं. पुढं तरी किमान काही व्यापक विषयांवर विचार मंथन व्हायला हवं. मूक मोर्चाच्या रुपानं हे जे वादळ घोंघावू लागलंय त्याचे राजकीय परिणाम काय होतील त्याच्याशी तूर्तास काही देणंघेणं नाही; पण हे वादळ भरकटणार नाही अन् त्यानं समाजाचीच हानी तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागेल. मोर्चानंतर काय करायचं, कोणत्या विषयांवर काम करावयाचं, समाजातल्या दीनदुबळ्यांना मदतीची काय योजना असावी, उच्चभ्रू, श्रीमंत, उद्योजक, व्यावसायिक, बडे शेतकरी यांनी एकत्र येऊन समाजासाठी आपण काय करु याची घोषणा करायला सुरुवात केली तरी या क्रांतीला योग्य फळे येऊ लागलीत असं म्हणता येईल. मोर्चाच्या आयोजनासाठी काही मिनिटांत दोन कोटींची रक्कम देणाऱ्यांनी हीच भावना पुढंही ठेवली तर समाजही अशांप्रती ऋणी तर राहिलच; पण या बदलाला तो तेवढ्याच सकारात्मकरित्या सामोरा जाईल. त्यामुळंच आता खरा प्रश्न आहे तो ताकद तर दाखविली, आरक्षण मिळालं पण पुढे काय? हाताला काम मिळायला हवं नाहीतर हे शाब्दिक बुडबुडेच ठरतील.
हरीश केंची,
९४२२३१०६०९


 
 





 

Saturday 20 January 2024

रामोत्सव..!

देशात गेले काही दिवस राममय वातावरण झालं आहे. अयोध्येत राममूर्ती गर्भगृहात स्थानापन्न झालीय. उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अयोध्येत रामजन्मभूमीवर नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिराचं उद्घाटन होत आहे. केवळ देशातच नाही तर जगभरात जिथं जिथं म्हणून भारतीय राहताहेत तिथं तिथं दिवाळी साजरी होतेय, दीपोत्सव होतो आहे. केवळ अयोध्द्धेतल्याच नाही ते जगभरातल्या राम आणि इतर देवतांच्या मंदिरातून जागर होणार आहे. त्यासाठी सारा देश सज्ज झालाय. रामकथांनी जगाला मोहून टाकलं आहे. वेगवेगळ्या देशात, तिथल्या भाषेत रामायण साकारलं आहे. हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि स्टार वॉर्स सारख्या कथा आणि त्याचे नायक नुकत्याच सिनेमात आणि काल्पनिक जगामध्ये आल्या आहेत, त्यापूर्वीपासून अनेक शतकं रामायण अस्तित्वात होतं आणि आजही ते आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रामायण महाकाव्य चांगल्या-वाईटाच्या सर्व कथा सांगते. आजच्या या काल्पनिक कथा आणि व्हिडिओ गेममध्ये सुपर पॉवर असलेला राम हा नायक आहे.
----------------------------------------
गेल्या हजारो वर्षांपासून प्रतिक्षेत असलेलं अयोध्देतल्या रामजन्मभूमीवरच्या राम मंदिराचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्ताने देशात दिवाळी साजरी केली जातेय. मंदिर उद्घाटनाचा दिवस जसजसा जवळ येत गेला तसतसं संपूर्ण देशाचंच नव्हे तर अवघ्या जगाचं लक्ष अयोध्येकडे लागलं आहे. आता लोक राम मंदिरात रामलल्ला कधी एकदा विराजमान होणार आहेत याची आतुरतेने वाट पाहत आहेत. यासोबतच रामायण आणि प्रभू राम यांचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं भारतीय राहतात तिथं तिथं गुंजू लागलं आहे. अशा प्रकारे पाहिल्यास, हॅरी पॉटर, लॉर्ड ऑफ द रिंग्ज आणि स्टार वॉर्स सारख्या कथा आणि त्याचे नायक नुकत्याच सिनेमात आणि काल्पनिक जगामध्ये आल्या आहेत, त्यापूर्वीपासून अनेक शतकं रामायण अस्तित्वात होतं आणि आजही ते आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे रामायण महाकाव्य चांगल्या-वाईटाच्या सर्व कथा सांगते. आजच्या या काल्पनिक कथा आणि व्हिडिओ गेममध्ये सुपर पॉवर असलेला नायक आहे. प्राचीन महाकाव्य रामायणातही रामासारखे महानायक आहेत. असं म्हणतात की, जेव्हा वाल्मिकी ऋषींनी पहिल्यांदा राम हा शब्द उच्चारला, त्याचंच मग हे महान महाकाव्य लिहिलं गेलं आणि त्यानंतर राम प्रकट झाला. या महाकाव्याच्या गाथेमध्ये काल्पनिक कथेतले सर्व घटक असल्यानं जगभरातल्या लोकांना ते भावलंय. रामकथेचा पायाच शाश्वत आहे. राम चांगला असेल तर रावण वाईट ठरतो. या महाकाव्यातला महानायक हा आपली पत्नी सीतेला मुक्त करण्यासाठी रावणासारख्या वीर व्यक्तिमत्त्वाशी लढतो. कथानक स्वतःच खूप परिचित आहे. एक सुंदर राजकन्या आहे, तिची आई जी कवतरण चालवते आणि एक सुंदर, सुसंस्कृत राजपुत्र, जो त्याच्या दहा डोक्याच्या, दशानन प्रतिस्पर्ध्याचा पराभव करतो. कथेची अशी रचना जवळजवळ लोककथांमध्ये दिसते, परंतु या महाकाव्याच्या कथानकाचा खोलवर विचार केला असता असं समजतं की आपल्याकडे राम हा असा एक नायक आहे जो संस्कृतीच्या सर्व सांस्कृतिक मूल्यांना मूर्त रूप देतो, जो वळणं घेऊन देव बनतो.
 देव माणसापासून माणूस आणि देव
तो पुरुषांमध्ये सर्वोत्कृष्ट आहे. मर्यादेत राहणारा सर्वोत्कृष्ट पुरुष आणि पुरुषांमध्ये सर्वोत्तम आहे. म्हणूनच रामाला आपण 'मर्यादा पुरुषोत्तम' म्हणून ओळखतो. दिल्लीतल्या जवाहरलाल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक हिरामंद तिवारी म्हणतात, “त्याच्यामध्ये नायक, सैनिक आणि प्रेमी असे सर्व गुण आहेत. त्यांच्यातलं देवत्वही उत्क्रांतीवादी आहे, ते हळूहळू प्रकट होत आहे, असे जाणकार सांगतात. 'भारताचा सांस्कृतिक वारसा' च्या चौथ्या खंडात असं म्हटलं आहे, "वाल्मिकींच्या रामायणातील पहिला आणि शेवटचा हा भाग नंतरची जोडलेला आहे. रामायणातील कांड २ ते कांड ६ पर्यंतच्या भागांमध्ये, रामाला एक आदर्श नायक म्हणून सादर केले आहे, तर पहिल्या आणि शेवटच्या भागात त्याला विष्णूचा अवतार म्हटलं आहे. इसवी सनाच्या चौथ्या आणि पाचव्या शतकात अनेक पुराण लिहिली जाईपर्यंत, भक्तीनं एक कर्मकांड बनण्याच्या दिशेनं प्रगती केली होती आणि विष्णू आणि त्याचे अवतार देव म्हणून पूजले जाऊ लागले होते. इसवी सनाच्या सातव्या आणि आठव्या शतकात, रामायणासारखी चित्रं मंदिरांच्या भिंतींवर भित्तीचित्रं म्हणून दिसू लागली. तुलसीदासांच्या रामचरित मानसमध्ये या विलक्षण गोष्टीनं ठोस स्वरूप धारण केलं होतं, असं दिल्लीच्याच जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले इतिहासकार कुणाल चक्रवर्ती म्हणतात.
 रामायण निर्मितीचा काळ
रामानं जेव्हा जेव्हा बाण मारला तेव्हा त्यातून असंख्य बाण निघाले आणि प्रेम आणि युद्धाच्या या महाकथेत असंख्य बदल घडले. रामायणातल्या महर्षी वाल्मिकींचे कथन मौखिक गायनाची परंपरा दर्शवतं. ज्यामध्ये संत लव आणि कुशाला रामाच्या शौर्याचे गुणगान गाण्यास शिकवतात. रामायण ही मुख्यतः कथा सांगण्याची परंपरा आहे, परंतु त्याच्या रचनेची तारीख आणि वेळ याबद्दल भिन्न मतं आहेत. रामायणाचे विवेचन केलेल्या आवृत्तीत या महाकाव्याच्या निर्मितीचा काळ इसवी सनपूर्व नवव्या आणि सातव्या शतकादरम्यानचा आहे, तर संस्कृत विद्वान जे. एल. ब्रॉकिंग्टन यांनी 'द राइटियस राम'मध्ये असा युक्तिवाद केला आहे की, रामायण इसवी सनपूर्व पाचव्या शतकापासून इसवी सनाच्या पाचव्या शतकाच्या दरम्यान रचले गेले आहे. विद्वान एकमताने सहमत आहेत की रामाची कथा दक्षिण आशियातली एक अतिशय लोकप्रिय आणि चिरस्थायी अशी गाथा आहे. कथेचा गाभा सर्वत्र सारखाच आहे, परंतु वेगवेगळ्या भाषांमध्ये पुन्हा सांगितल्या जाणार्‍या गाथा प्रादेशिक परंपरेनुसार सुधारित आणि सुशोभित केल्या गेल्या आहेत. "दुसरं, रामायणाइतकी सर्वत्र पसरलेली अशी कोणतीही प्राचीन कथा नाही. ज्या देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे तिथं रामायणाने चित्रकार, कारागीर, संगीतकार, लेखक आणि कठपुतळी यांना खूप प्रेरणा दिली आहे”, इंटरनॅशनल रामायण इन्स्टिट्यूट ऑफ नॉर्थ अमेरिकेचे अध्यक्ष सुभाष पांडे म्हणतात. खरं तर, या ३०० मूळ प्रस्तुती आहेत रामायण! झाना यांच्या मते, "वाल्मिकींच्या रामायणासह एकट्या संस्कृतमध्ये २५ सादरीकरणं आहेत...!"
लिखित रामायणासोबतच संगीत, नाटक, गीत गायन, रामलीला आणि कठपुतळी अशा पारंपरिक प्रकारांमध्येही रामायण गायलं गेलंय. केवळ आशिया खंडातच नाही तर चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधूनही रामायण सादर केलं गेलंय आणि ते सादर केलं जातंय. लक्षात ठेवा, गेल्या दशकात, प्रत्येक रविवारी सकाळी दूरचित्रवाणीवर रामायण प्रसारित झाल्यामुळे जवळजवळ संपूर्ण देश ठप्प झाला होता. १९८७ मध्ये 'रामायण' मालिका करून रामानंद सागर यांनी नवा विक्रम प्रस्थापित केला. सागर आर्ट्सने दोन वर्षांपूर्वी पुन्हा तीच धार्मिक कथा मालिकेच्या स्वरूपात सादर केली होती. १९८७ मध्ये जेव्हा ही मालिका दूरचित्रवाणीवर प्रसारित झाली तेव्हा सर्व जाती-धर्माचे लोक त्याकडे आकर्षित झाले. 'नुक्कड' या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अजीज मिर्झा म्हणाला होता, 'मुंबईच्या महमद अली रोडसारख्या मुस्लिम बहुल भागातही ही मालिका लोकप्रिय झाली होती. आपल्या वचनपूर्तीसाठी रामाला आयुष्यात जो संघर्ष करावा लागला तो लोकांना आवडला. ‘रामायण’ मालिका सुरू होताच तो रस्त्यावर सामसूम होत असे. त्यामुळे या मालिकेच्या प्रसारणावेळी मंत्री शपथ घेण्यासही नकार देत असत. एकदा मेरठमध्ये जातीय दंगल सुरू असताना तिथल्या स्थानिक पोलिसांनी रविवारी संध्याकाळपर्यंत अतिरिक्त सैन्याची गरज नसल्याचं सांगितलं. कारण रविवारी सकाळी सर्वांनी रामायण पाहिलं तर आपोआपच शांतता नांदेल. असा खुलासा त्यांनी केला होता. रामानंद सागर यांचा मुलगा प्रेम सागर यानं सांगितलं की, गेल्या आठ वर्षांत सुमारे ७५ कोटी लोकांनी 'रामायण' मालिका पाहिलीय. हे तमिळ, तेलुगु, नेपाळी, भोजपुरी, कँटोनीज, थाई, मलय, इंग्रजी, जपानी यांसारख्या अनेक देशिविदेशी भाषांमध्ये डब केलं गेलंय, शिवाय ते जगातल्या बावन्न देशांमध्ये प्रसारित झालंय. सुरीनामपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत आणि कराचीपासून ब्रिटिश गयानापर्यंत अनेक देशांतल्या लोकांनी ते पाहिलंय. दुसरीकडे रात्रीच्या वेळी आजोबा-आजींनी सांगितलेल्या रामायणातल्या कथा आणि अमर चित्रकथेतून शिकवलं जाणारं रामायण कसं विसरता येईल? अशाप्रकारे गायल्या गेलेल्या रामायणाने माणसातल्या बालकाच्या कल्पनाशक्तीचा नेहमीच विस्तार केलाय.
रामाचे आधुनिक मूळ
आजच्या काळात या महाकाव्याच्या यशस्वी सादरीकरणाबाबत कोणाला शंका असेल तर काही वर्षांपूर्वी बनलेला 'वॉरियर प्रिन्स: द लिजेंड ऑफ प्रिन्स राम' हा १२ मिलियन डॉलरचा चित्रपट त्या शंका दूर करतो. भारताच्या तांत्रिक सहकार्याने जपानमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात जपानी मांगा, अमेरिकन डिस्ने आणि भारतीय रवि वर्मा यांच्या अॅनिमेशन शैलीतल्या तीन शैलीत ही पात्रं तयार करण्यात आली आहेत, तरीही एकही पात्र कोणत्याही टप्प्यावर हास्यास्पद किंवा विनोदी वाटत नाही. यामध्ये राम हे एक अशी जागा आहे की जिथे आपण विरघळू शकतो, तर मोठ्या मंगा टाईप डोळ्यांमध्ये सीता मोहक आणि मोहक दिसते, तर इतर पात्रे अगदी हुबेहुब दिसतात ज्यांच्याबद्दल आपण लहानपणापासून ऐकत मोठे झालो आहोत आणि आपल्याला देखील देतो. समान अनुभव. मात्र, रामायण कथेवर आधारित ३-डी अॅनिमेशन चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय. पण यातून एक गोष्ट सांगता येईल की, भारतात वाईटावर विजयाचा झेंडा फडकवणारे महानायक आणि त्यांची कहाणी आजही लोकांना आकर्षित करते.
 पाश्चात्य देशांमध्ये, व्हर्जिन कॉमिक्सनं 'रामायण ३३९२ ए.डी.' लाँच केलंय. या नावाची ही मालिका २००६ मध्ये तयार करण्यात आली होती. ही मालिका बनवण्यात शेखर कपूर आणि दीपक चोप्रा यांचा मोठा वाटा होता. शमिक दासगुप्ता लिखित आणि अभिषेक सिंग यांनी चित्रित केलेली ही नवीन मालिका पौराणिक कथेला अनोखा आकार देते. यातल्या प्रकटीकरणानंतर, मानवांच्या छोट्याशा राज्याला स्वतःला वाचवण्यासाठी राक्षसांशी लढावं लागतं. ते भांडत असल्याचं दाखवलंय. रामानंद सागर निर्मित 'रामायण'ची प्रचंड लोकप्रियता पाहून जपानी चित्रपट निर्माते युगी साको आणि भारतीय चित्रपट निर्माते राम मोहन यांनी रामायणाची कथा अॅनिमेटेड स्वरूपात सादर केली. आणि या चित्रपटाला समीक्षकांनीही भरभरून दाद दिली. आजही 'रामायण' हा ग्रंथ भारतात सर्वाधिक विकला जातो आणि त्यामुळेच ही पौराणिक कथा पुढील अनेक वर्षे वेगवेगळ्या प्रकारे सांगितली जाईल यात शंका नाही.
कथेत वेगवेगळ्या ठिकाणी मोड
थायलंडपासून कंबोडिया, मलेशिया आणि इंडोनेशियापर्यंत या महाकाव्याचा जैन रामायण शुध्दांत वेगवेगळ्या प्रकारे अर्थ लावला गेला आहे.
*लाओस:* बुद्धानं आपल्या तथागतांना रामाची कथा सांगून वाचवलं असं मानलं जातं. इथं त्याला जातक कथा म्हणतात आणि ही कथा बुद्धाच्या पुढच्या जन्माची असल्याचं मानलं जातं.  रामायणात 'फ्रा लक फ्रा लम' आणि 'ग्वाई दोराभी' अशी दोन प्रस्तुती आहेत.
*मलेशिया:* इथं रामायणाचे सादरीकरण इस्लामच्या आगमनापूर्वीच्या काळात पाहिलं जाऊ शकतं, म्हणून इस्लामच्या प्रवाहाच्या प्रकाशात त्याचा अर्थ लावला पाहिजे आणि त्यात अनेक नवीन गोष्टी लिहिल्या गेल्या आहेत. मलय रामायणात राम, सीता, रावण आणि हनुमान एकमेकांशी संबंधित आहेत.
*थायलंड:* थाई रामकिन मूळ कथा. रामकिनचा सर्वात जुना पुरावा १३ व्या शतकातला आहे. थायलंडमध्ये अशी काही ठिकाणे आहेत जिथं रामायणातल्या घटना सांगितल्या जातात आणि घडल्या आहेत असं मानलं जातं. उदाहरणार्थ, अयुथया म्हणजेच अयोध्या शहर हे साम्राज्याचे बंदर शहर म्हणून दाखवलंय.
*कंबोडिया :* इथल्या रामायणाच्या सादरीकरणाला रिमकर म्हणतात. याच्या निरूपणात, राम हा विष्णूचा अवतार आहे तर अकांगमेश किंवा देवाचा द्वारपाल रावणाच्या रूपात जन्माला आलाय. रीमार्क मात्र माकडांच्या कथेत महर्षी वाल्मिकींच्या रामायणाचे बारकाईनं पालन करतात. यातही रामाची माकडांच्या सरदाराशी मैत्री होते आणि माकडे पूल बांधतात.
इथं कथेत मोठा बदल झालाय. रेमकरमधल्या रेखाटनानुसार सीता आणि वाल्मिकी यांना रामलक्ष नावाचा मुलगा आहे. एके दिवशी वाल्मिकी मुनी ध्यानस्थ बसलेले असताना सीता आपल्या मुलासह नदीवर स्नान करण्यासाठी जाते. ध्यानातून बाहेर पडल्यावर पुत्र पाहण्याची इच्छा नसलेल्या ऋषींना आपल्या योगसामर्थ्याने जपलक्ष नावाचा दुसरा पुत्र होतो. 
अशाप्रकारे अनेक ठिकाणी रामायणाचे प्रारंभिक सादरीकरण झालेलं आहे, परंतु रामायण हे एकमेव असं महाकाव्य आहे ज्याचा इतका प्रसार झालाय आणि करोडो लोकांना त्यांच्या पद्धतीनं प्रेरणा मिळालीय. आता अयोध्येतल्या नव्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर राम आणि रामायण कथा नवे विक्रम करणार यात शंका नाही.
हरीश केंची
९४२२३१०६०९





मोदींनी सोलापूरकरांना जिंकलं...!

प्रधानमंत्री मोदी शुक्रवारी सोलापुरात आले. त्यांनी इथल्या पद्मशाली समाजाबरोबरच साऱ्यांना आपलंस केलं. ही त्यांची हातोटी आहे. अमित शहासारख्या सहकाऱ्याची साथसंगत आहे. त्यामुळं सध्या केवळ मोदी शहा यांचाच बोलबाला आहे. विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विखुरलेल्या सुट्या सुट्या व्यक्तींचा विरोध असला तरीही त्यातून राजकीय संभाषिताची धार निर्माण होत नाही. मोदी-शहांनी न्यायालयीन संस्थांना, साऱ्या तपास यंत्रणांना ज्या कुशलतेनं वापरलंय, वाकवलंय त्याला तोड नाही. ते केवळ अभूतपूर्वच म्हणायला हवंय. इंदिरा गांधींनी आणीबाणीत जे काही केलं ते मोदी-शहांच्या ‘बुलडोझरी-हिटलरी' वृत्तीपुढं फारच किरकोळ आहे! आजची प्रसार माध्यमं या जणू सरकारच्या इव्हेंट कंपन्या बनल्यात आणि पत्रकार त्याचे इव्हेंट मॅनेजर! इलेक्ट्रॉनिक माध्यमात तर IPL मध्ये नाचणाऱ्या चीअरगर्ल्सप्रमाणे ॲन्कर्स आणि त्यांचे वार्ताहर उन्मादात मस्त आहेत. मात्र सर्वांत मोठा विजय मोदी-शहांचा आहे तो जनतेवरचा!
---------------------------------------
*स्वा* तंत्र्य मिळालं. हिंदुस्तानची फाळणी झाली. स्वतंत्र भारतात मुस्लिमांना राहण्याची मुभा देण्यात आली. राज्यघटनेनं सर्वांना समान अधिकार बहाल केले. कालांतरानं 'धर्मनिरपेक्षते'चा समावेश त्यात करण्यात आला. निवडणुकांमधून मतांचं राजकारण उभं राहिलं. त्यासाठी मग जे मतदार आपल्याला मतं देतात त्यांना गोंजारण्याचा, अधिकचं देण्याचा प्रयत्न झाला. साहजिक लाभार्थी मंडळींचा वरचष्मा निर्माण झाला. इतरेजनांकडं दुर्लक्ष झालं. स्वातंत्र्योत्तर काळात सर्व भारतीयांसाठी जातीधर्मावर आधारित निर्णय न घेता, भारत भू च्या उन्नत्तीसाठी, प्रगतीसाठी कठोर निर्णय घेण्याची गरज होती, ती घेतली गेली नाही. इथल्या लोकांची ओळख ही जातीधर्मावर न राहता, भारतीय म्हणून व्हायला हवी होती, दुर्दैवानं तसं झालं नाही. इथल्या जनांचं 'भारतीयकरण' झालं नाही. ते त्यांच्या जातीधर्मापुरतच मर्यादित राहीलं, त्यामुळं देशात अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय! देशातल्या अनेक समस्यांचं मूळ हे भारतीयकरण न होण्यात आहे. पण लक्षांत कोण घेतोय...? बहुसंख्याकांमध्ये आपल्याकडून हिरावून घेतलं जातंय अशी भावना झालीय तर अल्पसंख्याकांमध्ये आपल्यावर अन्याय होतोय, आपल्याला आपल्या हक्क अधिकारापासून वंचित ठेवलं जातंय की काय अशी भीती निर्माण झालीय!
लोकशाहीच्या व्याख्या ज्या काही केल्या गेल्यात त्यात "बहुसंख्याकांनी केलेली हुकूमशाही ती लोकशाही!" अशी एक व्याख्या मानलीय, त्याची अनुभुती हळूहळू येऊ लागलीय. भारतीयकरणाचा प्रयोग राष्ट्रीयता व्यक्त करण्यासाठी होतो. भारतीयकरणाचं अनिवार्य तत्वं ही आहेत, - भारतीय भूमि, जन, संप्रभुता, भाषा आणि संस्कृति. या व्यतिरिक्त अंतःकरणाची शुचिता आणि सतत सात्विकता पूर्ण आनन्दमयता ही देखील भारतीयकरणाचे अनिवार्य तत्वं आहेत. भारतीय जीवनमूल्य निष्ठापूर्वक पाळणं, त्याची सतत रक्षा करणं हीच खऱ्या भारतीयकरणातली कसोटी आहे. संयम, अनाक्रमण, सहिष्णुता, त्याग, औदार्य, उदारता, रचनात्मकता, सह-अस्तित्व, बन्धुत्व ही भारतीयकरणाची प्रमुख जीवनमूल्यं आहेत. हे सारं भारतातल्या हिंदू, मुस्लिम आणि इतर धर्मीयांमध्ये रुजविण्यात, सर्वांचं भारतीयकरण करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आलेलं आहे. त्यामुळंच भारतात आता 'बहुसंख्यांकवाद' निर्माण झालाय. बहुसंख्यांकवादाचा अर्थ हा आपापल्या सोयीनं घेतला जातोय. हे भारताच्या धर्मनिरपेक्षता या तत्वांना हरताळ फासणारा ठरण्याची भीती निर्माण झालीय. आताच्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या पहिल्या टर्ममध्ये आपला अजेंडा फारसा राबविला नाही. गोहत्या, लवजिहाद, नोटबंदी असे काही निर्णय घेतले पण त्यानंतरच्या टर्ममध्ये कश्मीरबाबत असलेले ३७० कलम रद्द करणं, लेहला केंद्रशासित प्रदेश बनवणं याबरोबरच मुस्लिमांमध्ये अस्तित्वात असलेला तिहेरी तलाक रद्द केला. गेली अनेकवर्षं वादग्रस्त असलेल्या रामजन्मभूमी मंदिरही साकारलंय. आता त्या मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झालीय. उद्या त्या मंदिराचा उद्घाटन सोहळा होतोय. त्यानंतर आता नागरिकत्वाचा विषय येणार आहे. हे सारे निर्णय सत्ताधाऱ्यांच्या जाहीरनाम्यात नव्हते पण ते ऐनवेळी न्यायालयाच्या माध्यमातून आणून त्याची तड लावली गेलीय. सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेनं अल्पसंख्याकांच्या मनांत भीती निर्माण झालेलीय. भारतीय धर्मनिरपेक्ष भूमिकेला सत्ताधाऱ्यांचं वागणं हे त्याला छेद देणारं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही भारतीय असताना आमच्याकडं पुरावे मागण्याचं कारण काय असा प्रश्न उपस्थित करताहेत. सत्ताधाऱ्यांचं वागणं हे राज्यघटनेच्या चौकटीला धरून आहे; असं प्रथमदर्शनी दिसतं पण ते इतकं सहज नाही. 'तुम्हाला घटनेनं जे अधिकार, सोयीसुविधा, सवलती दिल्या आहेत त्याला कुठलाच धक्का लागणार नाही!' असा विश्वास सत्ताधारी देत असले तरी त्यांचं ते म्हणणं हे वेगळ्या भूमिकेत मांडताहेत. सत्ताधाऱ्यांनी जी चौकट घटनेच्या माध्यमातून तयार केलीय, त्याचप्रकारे तुम्हाला इथं राहावं लागेल अशी परिस्थिती निर्माण केली गेलीय. असा संशय अल्पसंख्याकांनी व्यक्त केलाय. त्यांना जे वाटतंय ते वाटण्यात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांना मतांसाठी दिलेलं अवास्तव महत्व हेच कारणीभूत आहे. जात, धर्म याचा बाऊ न करता सर्वांकडं भारतीय म्हणून पाहिलं असतं, सर्वांचं भारतीयकरण केलं असतं तर आज अल्पसंख्याकांमध्ये जी असुरक्षिततेची भावना निर्माण होतेय ती झाली नसती. 
विचारवतांकडून अशी भीती व्यक्त केली जातेय की, देशात मोदी-शहांनी जी काही पावलं आजवर उचललीत वा आगामी काळात उचलण्याचे जे संकेत दिले जाताहेत त्यानं देशातली धर्मनिरपेक्षता धोक्यात आलीय. काँग्रेसने आपल्या राजवटीत धर्मनिरपेक्षतेचा बाऊ करत मुस्लिम अनुनय केलाय हे दिसून आलंय. रामजन्मभूमी आंदोलनाच्या काळात तत्कालीन प्रधानमंत्री राजीव गांधी यांनी अयोद्धेतल्या वादग्रस्त जागेवरच्या राममंदिराचं कुलूप उघडलं आणि रामाची पूजा आरंभली. यामुळं आपल्या हक्काचे मुस्लिम मतदार दुरावतील अशी भीती वाटल्यानं राजीव गांधींनी शाहबानोला पोटगी देण्याबाबतचा न्यायालयाचा निकाल संसदेत बहुमताच्या जोरावर फेटाळला. पण त्यानंतर मुस्लिम समाज काँग्रेसकडून दुरावला. काँग्रेसची सत्ताही गेली. त्यानंतर देशात सत्तेचा खेळखंडोबा झाला जनता पक्षाच्या राजवटीत देशातली जनता वैतागली. ही संधी वाजपेयी-अडवाणी यांच्या भाजपनं घेतली. १३ दिवस त्यानंतर १३ महिने सत्ता स्वीकारली. जॉर्ज फर्नांडिस यांच्या मदतीनं २३ पक्षाची मोट बांधून वाजपेयींचं सरकार पाच वर्षे टिकलं पण 'इंडिया शायनिंग'चा घोळ झाला. काँग्रेसची सत्ता आली. मनमोहनसिंग यांच्या राजवटीत भ्रष्टाचार वाढला अशी टीका सुरू झाली. भाजपनं काँग्रेसच्या सत्तेविरोधात प्रचाराचं वादळ उठवलं. दरम्यान मोदींचं नेतृत्व भाजपनं जाहीर केलं. प्रचाराची नवी तंत्र-मंत्र स्वीकारली. २०१४ मध्ये सत्ता हाती घेतली. त्यानंतर सुरू झाली तो नरेंद्र मोदी आणि अमित शहांची कारकीर्द. आज जी आपण पाहतोय ती लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेली 'मोदी-शाही'...!
या साऱ्या पार्श्वभूमीवर रामजन्मभूमीवर मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या कार्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रारंभ झाला आणि उद्या त्यांच्याच हस्ते त्याची पूर्तता होतेय. राममंदिराबरोबर नरेंद्र मोदी-अमित शहांनी आपल्या निरंकुश राजकीय वर्चस्व दाखवून दिलंय. संघ, भाजपतले पक्षांतर्गत नेते, इतर राजकीय पक्ष, नागरी समाज, कार्यपालिका, न्यायपालिकेतल्या साऱ्या न्यायसंस्था, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं आणि सर्वसामान्य जनता या साऱ्यांना भेदून जाणारी मोदी-शहांची ही झेप आहे. हे या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं. त्या दोघांनी रा.स्व.संघाच्या केडरचा यथेच्छ ‘वापर’ त्यांनी करुन घेतलाय. ज्या लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली त्यांना पक्षाच्या सल्लागार मंडळात त्यांची जन्मठेप केव्हाच सुरु झालीय. मूल्याधिष्ठित राजकारण करू इच्छिणाऱ्या  वाजपेयीजींच्या भाजपचं विसर्जन केव्हाच झालंय. सध्या भाजपमधल्या जुन्या पिढीतला वा नव्या पिढीतला कोणताही नेता हा मोदी-शहांशी स्पर्धा करण्याचा विचारही करु शकत नाही! ज्यांनी असा प्रयत्न केला त्यांना अलगदपणे दूर केलंय. त्यांनी कितीही आरडाओरडा केला तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. एवढंच नाही तर त्यांना अनुल्लेखानं मारलं. ते आज चरफडत घरी बसलेत वा इतर पक्षात गेलेत! त्यामुळं आता सत्तेवर संघाचा म्हणावा तसा प्रभाव वा वर्चस्व राहिलेलं नसलं तरी त्या दोघांनी मात्र आपली संघाशी असलेली नाळ तोडलेली नाही. भाजपचं जुनं स्वरूप आता शिल्लक राहिलेलं नाही. पक्षांत सामूहिक नेतृत्व आहे असं म्हटलं जात असंल तरी पक्षाचा सारा ताबा, सारं नियंत्रण आता या दोघांकडंच आहे. मोदी आणि शहा! पक्षात या दोघांचा आकडा एक आहे. इतर सारे शून्य आहेत. हा एक असेल तरच इतर शुन्यांना किंमत असणार आहे. नाहीतर ते शून्यच राहतील! त्यामुळं सारे शून्य गुमानपणे उभे आहेत!
राष्ट्रीय स्तरावर काँग्रेसची, याशिवाय डाव्या विचारांच्या पक्षांची, आंबेडकरवादी पक्षांची आणि. समाजाची पूर्णपणे कोंडी करण्यात मोदी-शहा ही जोडगोळी  यशस्वी झालीय. काँग्रेसचे राहुल, सोनिया, खर्गे यासारखे नेते सैरभैर आहेत. त्यांना काय भूमिका घ्यावी हेच समजेनासं झालंय. नाही म्हणायला पुढाकार घेऊन देशातल्या विरोधकांना एकत्र करून इंडिया आघाडीचा प्रयत्न केलाय पण काही विरोधीपक्ष अद्याप काँग्रेस जवळ आलेले नाहीत. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत जोडो न्याय यात्रा नुकतीच सुरू केलीय. त्याला किती प्रतिसाद लाभतोय हे अद्याप दिसून आलेलं नाही. एकूणात देशातला प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समजला जाणारा काँग्रेसपक्ष आणि त्यासोबतचे विरोधक पूर्णतः गोंधळून गेलेले आहेत. काही डाव्या पक्षांनी रामजन्मभूमी मंदिराच्या पूजनाला विरोध केलेला असला तरी जनतेसोबतचा त्यांचा ‘कनेक्ट’ हरवलेलाय, हे त्यांना समजतच नाही. अशा या साऱ्या वातावरणात मोदी-शहा यांच्या वर्चस्वाला ना पक्षातून विरोध होतोय ना विरोधकांतून आवाज निघतोय. अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांनीही मोदी-शहा यांच्याशी जुळवून घेतलंय. तर दक्षिणेकडं तिथल्या प्रादेशिक पक्षांकडून थोडाफार विरोध होत असला तरी त्याच्याविरोधात उभं ठाकण्याच्या मनःस्थितीत ते नाहीत. स्वतःला आंबेडकरवादी म्हणवून घेणाऱ्या आणि कुण्या एकेकाळी उत्तरप्रदेशात सत्ताधारी असलेल्या मायावतींचा मोदी-शहांचा विरोधातला आवाज आताशी क्षीण झालाय. विरोधात न जाता त्यांनी 'एकला चलो' ची भूमिका घेतलीय. रामदास आठवलेंनी तर आपला रिपब्लिकन पक्ष भाजप सोबतच ठेवलाय. मुळात आंबेडकरवादी राजकीय पक्षांचीही आता एकवाक्यता राहिलेली नाही. इतर पक्ष तर कधी तळ्यात, कधी मळ्यात, अशा अवस्थेत असतात, त्यामुळं त्यांचा प्रश्नच नाही. मोदी-शहांचं वर्चस्व येत्या दहा-पंधरा वर्षे निश्चितपणे राहील अशी आजची स्थिती आहे. जोपर्यंत त्यांना पर्याय देणारा तरुण नेता पक्षांमध्ये वा विरोधकांमध्ये उभा राहात नाही तोपर्यंत दुसऱ्या कुणाला संधी दिसत नाही. एवढी भक्कम पकड मोदी-शहा यांनी भारतीय राजकारणावर जमवलीय!
 विचारवंतांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, विखुरलेल्या सुट्या सुट्या व्यक्तींनी विरोध केलेला असला तरीही त्यातून राजकीय संभाषिताची धार निर्माण होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी-शहांनी न्यायालयीन संस्थांना, सर्वप्रकारच्या तपास यंत्रणांना ज्या कुशलतेनं वापरलंय, वाकवलंय त्याला तोड नाही. ते केवळ अभूतपूर्वच म्हणायला हवंय. इंदिरा गांधींनी आणीबाणीत जे काही केलं ते मोदी-शहांच्या ‘बुलडोझरी-हिटलरी' वृत्तीपुढं फारच किरकोळ आहे ! आजची प्रसार माध्यमं या जणू सरकारच्या इव्हेंट कंपन्या आहेत आणि पत्रकार त्याचे इव्हेंट मॅनेजर आहेत असं चित्र निर्माण झालं आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमात तर IPL मध्ये नाचणाऱ्या चीअरगर्ल्सप्रमाणे ॲन्कर्स आणि त्यांचे वार्ताहर उन्मादात मस्त आहेत. त्यांना आपण जनतेशी बांधील आहोत याचं भान राहिलेलं नाही. सर्वांत मोठा विजय मोदी-शहांचा आहे तो जनतेवरचा! त्यांनी त्यांच्यावर अशी काही जादू केलीय की त्यांना जगण्याच्या प्रश्नांहून अस्मितांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतील, असं संभाषित रचण्यात, असं वातावरण निर्माण करण्यात त्यांना देदीप्यमान असं यश आलेलंय, हे नाकारता येणार नाही. तुम्हाला आवडो किंवा नावडो, हे वास्तव आहे. ते तुम्हाला स्वीकारल्याशिवाय त्या विरोधात लढताही येणार नाही. अशी स्थिती त्यांनी निर्माण केली आहे.
संघाला तर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. आपलीच भूमिका मोदी-शहा राबविताहेत, असं म्हणावं तर अनेक ठिकाणी त्यांना त्याची उत्तरं द्यावी लागताहेत. देशातल्या अनेक विरोधी पक्षांची तर अभूतपूर्व अशी गोची झालीय. त्यांना काय करावं हे सुचत नाही. सर्वसत्ताधीश मोदी-शहा यांना विरोध करावा तर साथीला कुणी येत नाही. विरोधकांची एकजूट होण्याची शक्यता दिसत असली तरी प्रत्येक पक्षाचा, त्याच्या नेत्यांचा इथं इगो नडतोय. तर कुंपणावर बसलेल्या इतरांनी सत्तेसोबत अनुकूलता साधलीय. थोडक्यात, रामजन्मभूमी मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या निमित्तानं प्रभू रामाचा वनवास आता संपलाय, आता वनवासात जाण्यासाठीची 'व्हॅकन्सी' तयार झालीय! त्यामुळं आता वनवासात कुणाला जावं लागतंय हे पाहावं लागेल. काँग्रेसमध्ये जुन्या-नव्याचा वाद आहेच. तरुणांची कोंडी होत असल्यानं जुन्या ढुढ्ढाचार्यांना विरोध होतोय. पक्ष सध्यातरी नेतृत्वहीन बनलाय. खर्गे, सोनिया की राहुल? हे कार्यकर्त्यांना समजेनासं झालंय. म्हणून तरुण कार्यकर्ते पक्षापासून दूर होताहेत. पक्ष विजनवासात तर जाणार नाही ना अशी भीती निष्ठावंतांना वाटतेय! ती रास्त देखील आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
*सोलापूरकरांना मोदींनी खिशात टाकलं!*
उद्या राममंदिराचा उद्घाटन सोहळा होतोय. देशभर रामोत्सव, दिवाळी साजरी होतेय. त्याची अनुभूती काल आपल्याला आली असेल. प्रधानमंत्री सोलापुरात आले होते. १५ हजार घरे त्यांच्या हस्ते कष्टकऱ्यांना देण्यात आले. त्यावेळी त्यांनी रामदीप प्रज्वलित करायचं आवाहन लोकांना केलंय. खरं तर ही घरं उभारण्याचं दिव्य नरसय्या आडम मास्तरांनी उचललं होतं. पण सारं श्रेय मोदी घेऊन गेले. 'मी भूमिपूजन केलं आणि मीच ती घरं वितरित करतोय!' असं सांगितलं. त्यांचं सारं भाषण हे निवडणुकीसाठीच होतं. त्यांनी त्यांच्या गॅरंटी ची जाहीर वाच्यता केली. पण त्यांनीच दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही हे वास्तव आडम मास्तरांनी आपल्या भाषणांतून दाखवून दिलं होतं. सोलापूरचे प्रश्न मांडले पण त्याची दखल ना प्रधानमंत्र्यांनी घेतली ना मुख्यमंत्र्यांनी! मुख्यमंत्री तर मोदी चालीसा वाचण्यातच मश्गूल होते. मग आडम मास्तरांनी मांडलेल्या व्यथा त्यांना कशा समजणार? मोदींनी मात्र आपल्या भाषणांनी नेहमीप्रमाणे मैदान मारलं. इथल्या पद्मशाली समाजानं मला उपाशी राहू दिलं नाही. त्यांनी जेवायला घालून मला जगवलं. असं म्हणत सोलापुरात मोठ्या संख्येनं असलेल्या पद्मशाली समाजाला इतकं गोंजारलं की, त्यांच्या वक्तव्याच्या व्हिडिओ क्लिप्स देशभर व्हायरल झाल्या. आपल्यालाही लहानपणी असं घर मिळालं असतं तर... असं म्हणत ते भावूक बनले, डोळ्यातून अश्रू काढले...अर्थातच त्या अश्रूमध्ये समोर बसलेला गरीब, साधाभोळा श्रोता वाहून गेला. त्या अश्रूत आडम मास्तरांनी मांडलेले प्रश्न, व्यथा आणि मागण्याही वाहून गेल्या. आपलं आणि सोलापूरचं खूप जुनं नातं आहे असं सांगायला ते विसरले नाहीत. त्यांना इथल्या बाळकृष्ण यज्जा यांच्याकडून मिळणाऱ्या जाकिटांचा त्यांनी उल्लेख केला तेव्हा सोलापूरकर भारावून गेले. मात्र देशाच्या सैनिकांचे गणवेशाचं काम इथल्या गारमेंट उद्योगाला देण्याच्या त्यांच्या आश्वासनाची आठवण आडम मास्तरांनी करून दिली असतानाही त्यांनी इतर मागण्यांप्रमाणेच त्यालाही वाटाण्याच्या अक्षता लावल्या. सोलापूरकरांच्या पदरात त्यांनी काही टाकलं नाही मात्र सोलापूरकरांना त्यांनी आपल्या खिशात टाकलं हे मात्र खास...!

Saturday 13 January 2024

गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री...!

"शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निकाल ऐकल्यावर कविवर्य सुरेश भट यांची कविता आठवली. 'गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री....!' अण्णाभाऊ साठे यांचं 'ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झालीl ही संसद देखील हिजड्यांची हवेली झालीl मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे? कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीेन झाली…! हे ही आठवलं! सत्तेपुढं शहाणपण टिकत नाही याची प्रचिती आली. मराठी माणसांची शिवसेना आणि ठाकरे यांचं अस्तित्वच ठेवायचंच नाही या निर्धारानं निक्काल लावला! ज्यांना ठोक पक्षांतर करायचं आहे त्यांच्यासाठी राजमार्ग तयार केला. लोकशाही, संविधान पायदळी तुडविली गेली. सत्तेसाठी पक्ष फोडला पण महाराष्ट्राच्या कणाकणात भिनलेला पाच पिढ्यांचा ठाकरेंचा शिवसेना नावाचा सह्याद्री कसा फोडाल? सगळ्या गुणदोषांसह शिवसेना हा मराठी माणसाचा पक्ष आहे, महाराष्ट्राचा विचार, अस्मिता आहे. प्रबोधकारांचा विचार, बाळासाहेबांचा त्याग शिवसेना आहे. ती संपवू म्हटलं तरी संपणार नाही!
-----------------------------------------
*पा* निपतची लढाई १७६१ साली संक्रांतीच्याच दिवशी झाली होती. त्यावेळी संक्रांत १० किंवा ११ जानेवारीला येत असे. या पराभवानं मराठी भाषेत 'पानिपत झालं' अशी म्हण रूढ झाली. तसंच ते मराठी साम्राज्यावरचं संकट होतं म्हणून मग कुठल्याही संकटाला संक्रांत आली असं म्हटलं जाऊ लागलं. आज मराठीसाठी निर्माण झालेल्या शिवसेनेवर संक्रांत आलीय. सुप्रीम कोर्टानं नोंदवलेले निरीक्षण, काढलेले निष्कर्ष आणि दिलेले निर्देश धुडकावून आपल्या आकांनी दिलेल्या आदेशानुसार विधानसभाध्यकांनी निकालाची वाट लावलीय! आगामी काळात पक्षांतरा साठीचा राजमार्ग आखून दिलाय. संविधनातल्या परिशिष्ट १० चे धिंडवडे काढले गेलेत. सुप्रीम कोर्टानं शिवसेना पक्षात पडलेली फूट ही अवैध ठरवली होती. राज्यपालांनी शहानिशा न करता फुटीर गटाला बहुमत सिद्ध करायला सांगण्याचा निर्णय हा बेकायदेशीर ठरवला होता. शिंदे गटानं नेमलेला भरत गोगावले यांचा व्हिप देखील अवैध, बेकायदेशीर ठरवला होता. एकनाथ शिंदे यांनी ' आम्ही म्हणजेच शिवसेना पक्ष' म्हणून जो दावा केला होता तो फेटाळून अवैध ठरवलं होतं. त्यांनी नेमलेला प्रतोदही अवैध आणि मुख्यमंत्री बनलेल्या एकनाथ शिंदेंचं पक्षनेतेपद देखील अवैध ठरवलं. दरम्यान शिवसेना पक्षाबाबत काही निर्णय निवडणूक आयोगानं घेतला तरी त्या निर्णयाचा दबाव घेऊ नये. असं  विधानसभाध्यक्षांना स्पष्टपणे सांगितलं होतं. इथं हेही नोंदवलं पाहिजे की, बहुमतासाठी मतदान झालं त्यादिवसापर्यंत आयोगानं शिवसेना पक्षाबाबत कोणताच निर्णय दिलेला नव्हता. त्यामुळं त्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख होते, त्यांनी सुनील प्रभू यांना शिवसेनेचे प्रतोद तर गटनेते म्हणून चौधरी यांना नेमलेलं होतं; त्यांना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मान्यताही दिली होती. दरम्यान नाना पटोले  यांनी राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणुकीसाठी मंजुरी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्यपालांनी या फुटीनंतर लगेचच अध्यक्ष निवडीला मान्यता दिली. शिवसेनेतला एक गट आपल्या बाजुला आलाय. हे पाहून भाजपनं विधानसभाध्यक्षसाठीचा उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर यांची उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेनं राजन साळवी यांना उभं केलं. शिवसेनेच्या फुटीर आमदारांनी सुनील प्रभू यांचा व्हिप झुगारला आणि त्यांनी साळवी यांच्या ऐवजी नार्वेकर यांना मतं टाकली साहजिकच या फुटीरांच्या मतांवर नार्वेकर निवडून आले. याच नार्वेकरांकडे सुप्रीम कोर्टानं आमदार अपात्रते संदर्भातला निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली. ज्या दिवशी शिंदेंना मुख्यमंत्रीपदासाठी मतदान झालं त्यावेळी शिवसेना पक्ष कुणाकडे होता याची तपासणी करावी. त्या अनुषंगानं नार्वेकर यांनी निकाल द्यायला हवा होता पण राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाची सारी निरक्षणं, त्यांनी काढलेले निष्कर्ष आणि केलेले सारे निर्देश धुडकावून शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवला. सुप्रीम कोर्टानं विधानसभेच्या त्याच अध्यक्षांकडं जबाबदारी दिली, जे या सर्व अवैध घटनांचे साक्षीदार आणि शिल्पकारही होते. सुप्रीम कोर्टाच्या दृष्टीनं जे आमदार अपात्र ठरतात त्यांच्याच मतांनी विधानसभाध्यक्ष बनलेल्याकडं अपात्रतेचे सर्वाधिकार देणं ही सुप्रीम कोर्टाची तांत्रिक चुकच म्हणायला हवं, कारण त्यांचीही निवड ही देखील बेकायदेशीर ठरतेय. त्यानंतरही त्यांना दिलेल्या कालमर्यादेतून पळवाटा निघाल्या. वेळकाढूपणा केला गेला. ठाकरे गटानं पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली. मग कोर्टानं बजावल्यानंतर आता नार्वेकरांनी निकाल दिलाय. राज्यपाल, विधानसभाध्यक्ष आणि निवडणूक आयोग या तीन महत्त्वाच्या घटनात्मक संस्थानी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचं 'नागडं सत्य' दिसून आलंय. सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालपत्रात हेच म्हटलं होतं. या तीनही संस्थावरच्या व्यक्तींचं वर्तन राजकारण-निरपेक्ष असायला हवं असे संकेत आहेत. पण सांप्रत परिस्थितीत या संस्थावरच्या व्यक्ती अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणेच मनुष्य स्वभावानुसार चांगल्या-वाईट असू शकतात. 
आपण केलेल्या बेकायदेशीर कृत्यांचं वस्त्रहरण सुप्रीम कोर्टात होणार आहे याची जाणीव नार्वेकरांना असावी. निकाल दिल्यानंतर त्यांनी मुलाखतीत जे काही वक्तव्य केलं त्यातून हे स्पष्ट जाणवतंय. सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं सत्तासंघर्षाचा निकाल देताना त्या साऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर शिक्कामोर्तब केलं. इथं अधिकारांचा गैरवापर विधानसभाध्यक्षांनी केलाय! पक्षीय फुटीची शहानिशा करण्यासाठी विधानसभा हे व्यासपीठ असू शकत नाही, असं सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात म्हटलं होतं. सर्व निर्णय हे अर्थातच स्वतःच्या बुद्धीनं घेतलेत असं मानणं हे दूधखुळेपणाचं आहे. सुप्रीम कोर्टात शिंदे यांचे वकील महेश जेठमलानी यांनी जो युक्तिवाद केला होता, अगदी तंतोतंत तसेच मुद्दे नार्वेकर यांनी आपल्या निकालात मांडलेत. नार्वेकरांनी आपल्या दिल्लीतल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार आधी निकालाची चौकट निश्चित केली. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध नाही हे दाखवायचं, त्यांचे पक्षप्रमुख म्हणून असलेलं अस्तित्व नाकारायचं आणि शिवसेना पक्ष हा शिंदेंकडे सोपवायचा हे वरिष्ठ पातळीवर ठरल्यानंतर तसे मुद्दे काढले गेले आणि निकाल लावला गेला. शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीत पक्षाची धुरा उद्धव यांच्याकडे सोपवली होती. २०१७ मध्ये त्यांच्या निधनानंतर २०१८ मध्ये शिवसेनाप्रमुख हे पद गोठवून नव्यानं पक्षप्रमुख हे पद घटनेत समाविष्ट करण्यात आलं. ती घटना दुरुस्ती निवडणुक आयोगाकडे दिली, त्याची पोच पावती आयोगानं दिलीय. पण त्या घटना दुरुस्तीबाबत शंका उपस्थित करून १९९९ शिवसेनाप्रमुख हयात असतानाची घटना मान्य केली. ज्यात उद्धव यांची नेमणूक असणं शक्यच नाही. त्यामुळं उद्धव हे पक्षप्रमुख नाहीत त्यामुळं त्यांना शिंदे यांना विधिमंडळ नेता म्हणून जे उद्धव यांनीच आपल्या सहीनं नेमलं होतं ते नाकारून उद्धव याना ते अधिकारच नाहीत. असं नार्वेकरांनी जाहीर करून उद्धव यांना शिवसेना पक्षपासून दूर केलं. पण शिंदे यांच्याकडे पक्ष का सोपवला त्याला घटनेत काय अधिकार आहेत ते त्यांनी सांगितलं नाही. २०१८ पासून आजतागायत झालेल्या सर्व निवडणुकांत उद्धव यांच्याच सहीचे ए आणि बी फॉर्म उमेदवारांना दिले होते. अगदी आता पात्र ठरलेल्या शिंदे आणि त्यांच्या साथीदारांना उद्धव यांच्याच सहीचे ए आणि बी फॉर्म आहेत. उद्धव यांनीच शिंदेंना विधीमंडळातला गटनेता म्हणून पत्र दिलं होतं मग त्या पत्राची वैधता काय? त्यांची निवड चालू शकते पण ते त्यांना काढू शकत नाहीत असा सोयीचा शोध नार्वेकरांनी लावला. सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट केलं होतं की, मूळ पक्ष यांचच अस्तित्व असतं. विधिमंडळ पक्ष हा ठरविक काल मर्यादेपुरता असल्यानं त्याला पक्ष म्हणून संसदीय राजकारणात अस्तित्व नाही. तरी देखील नार्वेकरांनी शिवसेना पक्ष विधिमंडळ पक्षाकडे मूळ पक्ष म्हणून सोपवला. हे सारं अजब आहे. पण आपल्या आकांचा आदेश प्रमाण मानून त्यांनी हा निर्णय दिलाय.
आमदार अपात्रतेचा सारा खेळ व्हिप बजावणाऱ्या प्रतोद आणि संविधानातल्या परिशिष्ट १० मध्ये नोंदल्याप्रमाणे अवलंबून होता म्हणुनच इथं सुप्रीम कोर्टानं अवैध, बेकायदेशीर ठरवलेल्या भरत गोगावले यांना प्रतोद आणि त्यांचा व्हिप हा कायदेशीर आणि ग्राह्य धरला, कारण त्यांची नेमणुकीला मान्यता ही त्यांनीच दिलेली होती. एकदा का गोगावले यांचा व्हिप ग्राह्य धरला तर मग शिंदे गटाला पात्र करणं शक्य होतं, ते त्यांनी केलं. पण इथं मुद्दा उपस्थित होतो की, गोगावले यांचा व्हिप धुडकावून उद्धव यांच्या आमदारांनी मतदान केलं होतं त्यांना अपात्र ठरवायला हवं होतं. पण ते त्यांनी केलं नाही, त्यांनाही पात्र ठरवलं. इथ परिशिष्ट १० चे धिंडवडे काढले गेले. त्यांनी ही चलाखी का केली तर उद्धव गटाचं इथं कोणतंच नुकसान झालं नसल्यानं त्यांना सुप्रीम कोर्टात स्थगिती मिळू नये, यासाठी केलेली ही खेळी आहे.  विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर हे सर्वपक्ष पारंगत आहेत. त्यांची त्रिदंडी यात्रा झालेलीय. राष्ट्रवादी, शिवसेना असा प्रवास करून ते सध्या भाजपत आहेत. त्यांच्या चातुर्यामुळंच भाजपनं सत्तेच्या या समरप्रसंगी त्यांच्याकडं विधानसभाध्यक्षपदाची धुरा सोपवलीय. नार्वेकरांनी भाजपच्या अपेक्षांना कुठेही तडा जाऊ दिलेला नाही. त्यांची त्यासाठीची पहिली कृती होती ती शिंदे गटाच्या आमदाराला अधिकृत प्रतोदाचा दर्जा देणं! कारण प्रतोदांनी काढलेल्या व्हीपचा भंग केला तर ते संबंधित आमदार हे अपात्र ठरतात. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आणि शिंदे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाल्यावर त्यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करणं आवश्यक होतं. त्यासाठीचा आदेश ठाकरे गटानं नेमलेल्या प्रतोदानं देणं अशक्य होतं, म्हणून मग शिंदे गटाला स्वत:चा स्वतंत्र असा प्रतोद हवा होता. ती उणीव नार्वेकरांच्या सहकार्यानं भरून काढण्यात आली! प्रतोदपदाची नियुक्ती ही पक्षाच्या विधिमंडळातल्या पक्षनेत्यांकडून होत नाही. ती पक्षामार्फतच होते. कायद्यातल्या या सत्याकडं पूर्ण डोळेझाक करत विधानसभाध्यक्षांनी शिंदे गटाच्या आमदाराला भरत गोगावले यांना प्रतोदपदी मान्यता दिली. पण हा निर्णय पूर्णपणे बेकायदा असल्याचं सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं. 
'नार्वेकरांनी घेतलेला शिंदे गटाचे भरत गोगावले यांना प्रतोद नेमण्याचा घेतलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टानं बेकायदेशीर ठरवला होता. त्यामुळं त्यांच्या व्हीपनं झालेला विश्वासदर्शक प्रस्तावाचा निर्णय हा बेकायदा ठरतो आणि आपली कृतीही बेकायदेशीर ठरते. विधिमंडळात शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक प्रस्ताव मंजूर करताना नेहमीची पद्धत नाकारून प्रत्येक सदस्याला, ज्याप्रमाणे शाळेत मुलांची हजेरी घेतली जाते त्यानुसार आमदारांची संख्या मोजली गेली होती. त्याचं थेट प्रक्षेपण सर्व वाहिन्यांवर प्रसारित झालेलं होतं. शिवाय त्याचं व्हिडीओ रेकॉर्डिंग उपलब्ध होतं, त्यावरून अपात्रतेचा निकाल देणं सहजशक्य होतं. असं असताना वादी-प्रतिवादी आणि इतरांच्या साक्षी काढण्याचं कारण नव्हतं. वेळकाढूपणा करण्यासाठीच त्यांनी हा घोळ घातला.
इथं शिंदे-फडणवीस सरकार बेकायदेशीर. पण, चुकले ते मात्र उद्धव ठाकरे! चोर सोडून उद्धव यांना 'व्हिलन' करण्याचा डाव यशस्वी झालाय! अनेक असंवैधनिक घडामोडींची दखल घेऊन कुणाचं चुकलं याची व्यवस्थित दखल घेऊनही संवैधानिक मार्गावर घेऊन न जाणारा हा निर्णय आहे. बेकायदेशीरतेच्या मार्गानं आरूढ झालेलं सरकार सुप्रीम कोर्टानंच कलम १४२ चा अधिकार वापरून हे सरकार घटनाबाह्य असल्याचं जाहीर करून बरखास्त करायला हवं होतं तरच 'संपूर्ण न्याय' झाला असता. प्रतोद म्हणून भरत गोगावलेंची निवडच बेकायदा होती तर त्या प्रतोदांनी जो मतदान करण्याचा व्हीप काढला तो बेकायदेशीर नव्हता का? आणि तो बेकायदेशीर असेल तर चाचणीत मिळालेलं बहुमत कायदेशीर कसं हा प्रश्न नार्वेकरांनी लक्षात घ्यायला हवा होता. व्हीप पक्षप्रमुख काढू शकतात, संसदीय वा विधिमंडळ गटाचा नेता काढू शकत नाही असं सुप्रीम कोर्ट म्हणतं मग उद्धव ठाकरेंनी काढलेला व्हीप खरा असा त्याचा अर्थ आहे. कारण तोपर्यंत शिंदे गटाला निवडणूक आयोगाची तथाकथित मान्यताही मिळालेली नव्हती. याचा अर्थ ज्यांनी उद्धव ठाकरेंच्या व्हीपला न जुमानता मतं दिली ते पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेत फुटीर ठरतात आणि म्हणून ते पक्षविरोधी कारवाया करण्यासाठी अपात्र ठरतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातून निर्माण झालेलाय. विधिमंडळाला स्वायत्तता आहेत पण 'सातत्यानं गुन्हेगारी खोडसाळपणा' करीत सत्ता बळकावणाऱ्या समूहानं केलेले विधानसभाध्यक्ष घटनेनुसार वागतील असं न्यायालयानं कशाच्या आधारे गृहीत धरलं होतं? विधानसभाध्यक्षांनी ही केस केवळ निकालात काढलीय. संविधानाच्या चौकटीत बसणारा 'न्याय' केलेला नाही. तक्रारदारालाच जणू शिक्षा करणारा हा निर्णय न्यायतर्क निकामी करणारा होता असं वाटतं. बेकायदेशीर आणि घटनाबाह्य पक्षविरोधी कारवायांचा आणि दहाव्या परिशिष्टातल्या परिच्छेद २ (१) (अ) यांचा काहीच अनव्यार्थ न काढणारे नार्वेकर न्यायिक शहाणपण 'जुडीशिअल विजडम' वापरायला विसरल्यानं हा निकाल झालाय पण न्याय झाला नाहीये. कायदेशीर पळवाटांचा पायंडा पडणं, संख्याबळावर सत्ताकारणात लोकशाहीच्या तीन स्तंभांत स्पर्धा होणं, वर्चस्वासाठी वाद होणं, हे लोकशाहीच्या भवितव्यासाठी धोकादायकच! चौथा स्तंभ माध्यमं तर हतबलच! आता इतर राज्यात जर या निकालाचा रेफरन्स देऊन असंच केलं गेलं, तर काय? आम्ही 'सेपरेशन ऑफ पॉवर' चं तत्व पाळतो असं म्हणून त्या संकल्पनेचा वापर स्वतःवरची न्यायिक जबादारी टाळण्यासाठी करण्याचा अधिकार आहे का? 'सेपरेशन ऑफ पॉवर' तत्वाचा वापर 'ढाल' म्हणून करण्याचा पायंडा संवैधानिक-गुन्हेगारी करणाऱ्यांना फावतोय. निकालानंतर सोशल मीडियावर खूप मीम्स प्रसारित झालेत. त्यावरून लोकभावना समजून येतात. हे सत्ताधाऱ्यांनी लक्षांत घ्यायला हवंय! त्या मीम्सपैकी एक...! द्यूत खेळले- ती चूक, फासे गंडलेले- ती चूक, डावावर सर्वस्व लावलं- तीही चूकच, द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला-ती महाचूकच, भीष्मपितामहांना सर्व काही चुकलं हे मान्य आहे. पण राज्य दुर्योधनालाच दिलं आणि वनवास मात्र पांडवांनाच! मी काही करू शकत नाही म्हणत भीष्म न्यायालयातून बाहेर पडले. महाभारताचे चंद्र पुजारी! न्यायाला मात्र चूड लावली गेलीय! दुसरं मीम्स...अपेक्षेप्रमाणे 'महाशक्ती' जिंकली. लोकशाही तडफडून मेली. तिसरं मीम्स... शिंदे-फडणवीस सरकार कसं बचावलं! शिवसेनाप्रमुखांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचं अस्तित्व संपलं... आता ही शिंदेंची शिवसेना!!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Sunday 7 January 2024

आता लक्ष्य मथुरा...!


"शेकडोवर्षाच्या लढ्यानंतर, अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीरामजन्मभूमी मुक्त झाली. तिथं भव्य मंदिर साकारलंय. येत्या २२ जानेवारीला रामलल्ला त्यात विराजमान होणार आहेत. अवघ्या जगाच्या दृष्टीनं हा महत्वाचा प्रसंग आहे. यात धार्मिक श्रद्धा, आस्था महत्वाची! मात्र मतांच्या ध्रुवीकरणासाठी या इव्हेंटचा वापर केला जातोय! रामजन्मभूमीवर मंदिर साकारलंय. आता द्वापारयुगात कृष्णजन्मापासून ते कृष्ण राधा यांच्या लीलांचा साक्षीदार असलेल्या मथुरात श्रीकृष्ण जन्मभूमीवर भव्य दिव्य असं मंदिर उभं राहणार आहे. इथंही अयोध्येसारखाच मंदिर मशीद वाद आहे. पण तो तितका तीव्र नाही. सर्वोच्च न्यायालयानं ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच सर्व्हेक्षण करण्याचा निकाल दिलाय. भाजपच्या अजेंड्यातला ३७० कलमं आणि रामजन्मभूमी मंदिर साकारलंय आता प्रतिक्षा आहे. कृष्ण जन्मभूमीतल्या मंदिराची!"
-------------------------------------------
*श्री* रामाचे बंधू शत्रुघ्न यानं लवण या राक्षसाचा वध करून मधुरा नगर वसवलं. कालौघात मधुराला मथुरा असं संबोधलं जाऊ लागलं. रामजन्मभूमीवरचा शतकानुशतके चाललेला वाद आता मिटलाय. त्यामुळं रामभक्त सुखावलाय. इतकंच नाही तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या जागेवर भव्य राममंदिर बांधून तयार झालंय. येत्या २२ जानेवारीला, नवीन, भव्य, दिव्य अशा राममंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे. अयोध्येत राममंदिराच्या उभारणीवरून वाद सुरू होता तेव्हापासूनच काशी-मथुरा इथल्या मुद्द्यावरूनही वाद सुरू असल्याचं अनेकांना आठवत असेल. विश्व हिंदू परिषद मथुरेतल्या कृष्ण जन्मभूमीला 'मुक्त' करण्याबाबत अनेक दिवसांपासून बोलतेय. अलाहाबाद हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांच्या अलीकडच्या निर्णयवृत्तीनं कृष्णप्रेमींच्या बाजूनं तराजू झुकल्याचं स्पष्ट दिसतेय. अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मयंककुमार जैन यांच्या खंडपीठानं एएसआयला ज्ञानवापीप्रमाणे मथुरा मशिदीचं सर्वेक्षण करण्याची परवानगी दिलीय. या दोन्ही मशिदी हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर बांधल्या गेल्याचा दावा केला जातोय. या दाव्याचं समर्थनासाठी केलेल्या याचिकेत म्हटलंय की त्यात हिंदू मंदिरांमध्ये दिसणारे पिवळे खांब आहेत. त्याशिवाय त्यात शेषनागाची आकृती कोरलेली आहे. हिंदू पुराणानुसार, शेषनागनं यमुना नदी पार करताना भगवान कृष्णाचं रक्षण केलं होतं. याशिवाय त्या खांबांच्या खालच्या भागात असलेल्या मशिदीच्या खांबांवर हिंदू धर्माची चिन्हं आणि वचनं कोरलेली आहेत. याचिकेनुसार, ज्या ठिकाणी मशीद बांधलीय ती जागा मथुरेत शतकांपूर्वी कंसाच्या कैदेत होती. त्या कैदेतच श्रीकृष्ण जन्मला, त्याचं दर्शन साऱ्यांना झालं. त्यामुळं कारागृह हे श्रीकृष्ण जन्माचं मूळ ठिकाण मानलं जात असेल तर त्याची मालकी मंदिराला द्यावी, अशी मागणी पुढं आलीय.
कथित शाही इदगाह मशीद ही हिंदू मंदिर पाडून बांधण्यात आल्याचा दावा श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्टनं दाखल केलेल्या याचिकेत म्हटलंय. याचिकाकर्त्यानं सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केलाय की, वादग्रस्त जमिनीबाबत कृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आणि मशीद समितीनं केलेल्या दाव्याची विश्वासार्हता तपासण्यासाठी वैज्ञानिक सर्वेक्षण आवश्यक आहे. याला शाही मशीद आणि उत्तरप्रदेश सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डानं विरोध केला होता, पण आता सुप्रीम कोर्टानं अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल कायम ठेवलाय. औरंगजेबानं मंदिर पाडून १३.३७ एकर जागेवर ईदगाह तयार केल्याचा दावाही कोर्टासमोरच्या याचिकेत म्हटलंय. त्यांनी श्रीकृष्णाच्या जन्माचा आणि मंदिराच्या बांधकामाचा इतिहास सुध्दा कोर्टात मांडलाय. इतकंच नाही तर ईदगाह मशिदीच्या बदल्यात आम्ही तिप्पट जमीन देण्यास तयार आहोत, असं हिंदू पक्षानं न्यायालयाला सांगितलंय. हिंदू पक्षाच्या प्रतिक्रियेनंतर आता शाही मस्जिद इदगाह समितीचे अध्यक्ष जेद हसन यांनी हा वाद न्यायालयात सोडवण्याऐवजी आम्ही मशिदीचे मालक नाही, तर आम्ही फक्त त्यावर देखरेख करत आहोत, असं सांगितलं. खरी मालकी ही जनतेची आहे आणि हा वाद कसा सोडवायचा हे तेच ठरवतील! अयोध्येतल्या राममंदिराचा मुद्दा जितका ज्वलंत आणि स्फोटक होता तितका मथुरेच्या कृष्णजन्मभूमीचा मुद्दा कदाचित वादग्रस्त वाटणार नाही, पण इथंही मतांच्या राजकारणानं कधीही आक्रमक रूप धारण केलं जाऊ शकतं, तेव्हा इथं अराजक माजेल. त्यामुळं मथुरेत एकंदरीत शांतता नांदते. मात्र इथल्या कृष्णजन्मभूमी मंदिर ईदगाहच्या सावलीतून मुक्त करण्यासाठी हिंदू नेत्यांनी वर्षांपूर्वी श्रीकृष्ण जन्मस्थान विकास समितीची स्थापना केली. ही समिती अयोध्येतल्या रामजन्मभूमी मुक्त करण्याच्या आंदोलनासारखीच मोहीम राबवतेय. एका बाजूला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे तरुण आहेत. तर दुसरीकडे, दिल्लीच्या जामा मशिदीच्या शाही इमामच्या तरुण मुलानं मथुरेत आदमसेना नावानं पक्ष स्थापन केलाय.
मथुरेच्या कृष्णमंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर एक फलक लावलाय. ज्यात इथली चार हिंदू मंदिरे कशी बांधली गेली आणि ती नंतर कशी उध्वस्त झाली याच्या कथा आहेत. चौथे मंदिर हे आधुनिक वादाचं कारण आहे. जो ओरछा इथल्या वीर सिंहदेव बुंदेला यानं मुघल सम्राट जहांगीरच्या काळात तो बांधला होता. इथं औरंगजेबानं कटरा केशवदेव नावाच्या १३ एकर जागेतलं तिथं असलेलं मंदिर उध्वस्त करून ईदगाह बांधली. फ्रेंच प्रवासी टेव्हरनियर भारतभ्रमण करत असताना त्यानं त्याच्या मथुरा भेटीत, १६५० मध्ये इथं एक मंदिर असल्याचा उल्लेख केलाय. परंतु औरंगजेबानं १६६९ मध्ये ते मंदिर उध्वस्त करून ते नष्ट करण्याचा आदेश दिला आणि सध्याची ईदगाह केशवदेवाच्या मंदिराच्या खांबांवर बांधली गेली. सध्या कृष्ण मंदिर बघायला गेलं तर त्याच्या बाजूलाच एक उंच मशीद दिसते. लाल दगडानं बनलेली ही मशीद मंदिरापेक्षा उंच आहे. त्यामुळं हे मंदिर मशिदीच्या सावलीत उभं असल्याचं दिसतं. मशिदीचा मोठा हिरवा, पांढरा घुमट पूर्वी मंदिरावर वर्चस्व गाजवत होता. परंतु काही वर्षांपूर्वी मंदिराचे स्पायर उभारल्यानंतर दोन्ही देवस्थानांमधली उंची समान असल्याचं दिसतं. हे मंदिर-मशीद संकुल पूजास्थान कायदा १९९१ अंतर्गत समाविष्ट करण्यात आलंय. या  कायद्यानुसार १५ ऑगस्ट १९४७ रोजी असलेल्या स्थितीतच या संकुलाचं धार्मिक स्वरूप कायम ठेवावं लागतं. काशी इथलं ज्ञानव्यापी मशीद आणि मथुरा इथली शाही इदगाह मशीद कोणत्याही परिस्थितीत पाडू नये, असे आदेशही सुप्रीम कोर्टानं राज्य आणि केंद्र सरकारांना दिलेत. तथापि, मथुराचे स्थानिक इमाम आणि इथले हिंदू संन्यासी यांच्यात सौहार्द आणि सद्भावना आहे. या कृष्णजन्मभूमी आणि मशिदीवरून काही राजकारणी जाणीवपूर्वक वाद निर्माण करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.  मथुरेत आजवर क्वचितच जातीय दंगली झाल्यात. आता काही माथेफिरू लोक इथं गदारोळ माजवायला लागलेत, असा त्यांचा आरोप आहे.
या सर्व वादांमध्ये भाजप खासदार हेमामालिनी यांनीही अयोध्या आणि काशीनंतर त्यांचं मतदारसंघ असलेल्या मथुरेतही भव्य मंदिर बांधलं जाईल...! अशी आशा व्यक्त केलीय. त्यासाठी त्यांनी काशी विश्वनाथ कॉरिडॉर सारखं इथंही भव्य कॉरिडॉर बांधलं जाईल. रामजन्मभूमी आणि काशीच्या पुनरुज्जीवनानंतर आता मथुरा हे हिंदूंच्या आस्थेनुसार अत्यंत महत्त्वाचं आहे. मथुरेचा खासदार या नात्यानं मी म्हणेन की तिथं जगाला हेवा वाटेल असं भव्य मंदिर व्हायला हवंय...! १९६२ मध्ये इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे प्रमुख रामनाथ गोएंका यांनी जुन्या कृष्ण मंदिराचा जीर्णोद्धार केलाय. कारी यांनी नवीन मंदिर बांधलंय. पण ते मंदिर कृष्णजन्मभूमीच्या मूळ जागेवर बांधलं गेलेलं नाही. मूळ मंदिरावर मशीद बांधण्यात आलीय. एखाद्या परदेशी माणसानं हे मंदिर आणि मशीद जवळून पाहिल्यास भारतात हिंदू-मुस्लिम यांच्यात किती संघर्ष आहे, याची कल्पना येईल. पण दुसऱ्याच क्षणी सत्य जाणून त्याचा हा भ्रम दूर होतो. मंदिराच्या आवारात प्रवेश करताच विविध पोस्टर्स, बॅनर इथं वाचायला मिळतात. जसं हिंदूधर्माचं हिंदुत्त्वाचं रक्षण करा, उर्दू हटवा अशा आशयाचा मजकूर त्यावर आढळतो. एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, अयोध्देच्या तुलनेत मथुरेमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या खूपच कमी आहे. तसे इथले मुस्लिम शांतताप्रिय आहेत. अनेक मुस्लिम तरुण मथुरेला येणाऱ्या यात्रेकरूंना जेवणावळी घालून, विविध सेवा उपलब्ध करून आपला उदरनिर्वाह करतात. काही मुस्लिम मुले आणि मुली भगवान श्रीकृष्णाची आवडती बासरी किंवा मोरपिसं विकून उत्पन्न मिळवतात. अयोध्या आणि मथुरा यांच्यातला वाद पूर्णपणे असंबंधित असल्याचं वर्णन करणार्‍या एका माहितीदाराचं केलंय. अयोध्येप्रमाणेच, मथुरेत कृष्ण जन्मस्थानावर आणि शाही इदगाह मशिदीवर मालकी किंवा इतर कायदेशीर वाद नाहीत. ही मंदिरे आणि मशिदी एकमेकांच्या शेजारी असली तरी त्यांचं अस्तित्व पूर्णपणे भिन्न आहे, दोन्हीची प्रवेशद्वारं ही वेगळी आहेत. तर अयोध्येतल्या रामजन्मभूमीच्या मोठ्या भागावर बाबरी मशीद बांधण्यात आली होती. यावरून वाद विकोपाला गेला होता. तसंच इथल्या इदगाहमध्ये नमाज अदा केली जाते. विशेषत: शुक्रवारी इथं मुस्लिम भाविकांची गर्दी असते. १९६८ मध्ये, कृष्ण जन्मस्थान सेवा संघ आणि शाही इदगाह मस्जिद ट्रस्ट यांच्यात झालेल्या करारानुसार कॉम्प्लेक्समधल्या मालमत्तेची मालकी कोणाकडे आहे हे स्पष्ट केलंय. यापूर्वी परिक्रमेचा कार्यक्रम जाहीर करून विहिंपनं मंदिर परिसराच्या चौथ्या भिंतीसारखी मशीदही परिक्रमेच्या मार्गात येईल, अशी परिस्थिती निर्माण केली होती. त्यामुळे १९६८ च्या कराराचं उल्लंघन होण्याच्या भीतीनं कृष्ण जन्मस्थानाची प्रदक्षिणा केली जात नाही आणि त्यासाठी परवानगीही दिली जात नाही. दुसरीकडे, प्रत्येक ईदच्या दिवशी अधिकारी मशिदीचं प्रवेशद्वार स्वच्छ करतात आणि मुस्लिमांच्या आगमनासाठी सुरक्षा व्यवस्था करतात.
काही वर्षांपूर्वी आचार्य गिरीराज किशोर म्हणाले होते की, 'आम्ही कोणत्याही कराराला बांधील नाही. आम्ही  जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुरूच ठेवू कारण आम्हाला त्यावर मालकी हक्क हवा आहे....!'  कृष्णजन्मभूमीच्या जागेवर केशव देव यांच्या भूखंडावर मालकी हक्क सांगणारे श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्ट आमच्या जमिनीवर शाही ईदगाह मशीद उभी असल्याची भूमिका अनेक वर्षांपासून मांडत आहेत. या ट्रस्टचे प्रवक्ते विजय बहादूर सिंह सांगतात की, कटारा केशव देव यांच्या १३.३७ एकर जागेत कृष्ण मंदिराशिवाय मशीद आणि ५० मुस्लिम कुटुंबं आहेत. हे मुस्लिम नागरिक औरंगजेबाचे वारस मानले जातात. आजूबाजूच्या भागात परिस्थिती सामान्य आहे आणि रस्त्यावर दृश्यमानपणे गर्दी आहे, परंतु अनेक लष्करी तुकड्या, स्थानिक कॉन्स्टेब्युलर अधिकारी आणि निमलष्करी दलांची प्रचंड उपस्थिती लोकांना इथं असामान्य परिस्थितीबद्दल सावध करते. असं असलं तरी इथलं वातावरण कधी बदलेल हे सांगता येत नसल्यानं श्रीकृष्ण जन्मस्थान मंदिर आणि शाही मशीद या दोन्ही प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर बसविण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी सशस्त्र सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत आणि मशिदीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या मंदिराच्या आवारात कुंपण घालण्यात आलंय. मथुरेच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, सीआरपीएफच्या तीन कंपन्या, सुमारे दीडशे पोलिस अधिकारी १३.७७ एकर परिसरात दोन्ही देवस्थानांना इजा करू इच्छिणाऱ्या, तोडफोड करणाऱ्या घटकांच्या कोणत्याही प्रयत्नांपासून त्या सुरक्षित ठेवण्यासाठी सतत गस्त घालत आहेत.
हा मोठा परिसर व्यापण्यासाठी ठिकठिकाणी टेहळणी बुरूज उभारण्यात आले असून कोणत्याही अनुचित प्रकाराला सामोरं जाण्यासाठी बॉम्ब निकामी पथकंही स्थापन करण्यात आली आहेत. पोलिस खात्याशी संबंधित दोन्ही समुदायांचे लोक जवळपासच्या भागात शांततेनं राहतात. १९९२ च्या अयोध्या घटनेनंतर काही लोकांनी इथंही दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र कडक प्रशासनानं हे प्रयत्न हाणून पाडले होते. हु या चिघळलेल्या मंदिर-मशीद वादात मथुरेतल्या नेत्यांचा एक गट नवीन तत्त्वज्ञान मांडत आलाय. भारताच्या या पवित्र भूमीवर अनेक प्राचीन आणि नवीन मंदिरे, मशिदी, गुरुद्वारा आणि चर्च आहेत. अशा देशात एकमेकांच्या आवारात काही धार्मिक स्थळांवर कायमची भांडणे किंवा वाद होणं योग्य नाही. देशाच्या शांततेसाठी दोन्ही बाजूंना एक तडजोडीचा उपाय शोधावा लागेल की, ते एका बाजूला पूर्णपणे मान्य असो वा नसो! भूतकाळात, इस्माईल फारुकी यांनी १९९५ मध्ये दाखल केलेल्या दाव्यात हे निरीक्षण कायम ठेवत, सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं की मशीद हा इस्लाम धर्म पालन करण्याचा अत्यावश्यक भाग नाही. त्यानंतर न्यायालयानं हे शब्द निकालातून काढून टाकण्याची याचिका फेटाळून लावली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे २०१९ मध्ये अयोध्या वादावर घटनापीठानं निर्णय दिलाय. सुप्रीम कोर्टानं काशी-मथुरा वादावर निर्णय दिल्यास तो देशाच्या हिताचा, बंधुभावाच्या असेल, त्यामुळं कोणीही भुवया उंचावू नयेत.
काही घटनांना उजाळा मिळाल्यानंतर समोर येतो तो इतिहास. असाच एक ज्वलंत इतिहास कृष्ण जन्माच्या वादानंतर पुढे आलाय. तो म्हणजे मराठ्यांनी मथुरेतून दिल्लीचं तख्त राखलं होतं. आणि याच मराठ्यांमधले महादजी शिंदे यांच्या कार्याला उजाळा मिळालाय. तो तो इतिहास जाणून घेणं गरजेचं आहे. मथुरेतल्या श्रीकृष्ण जन्मभूमीच्या वादानंतर मराठी शाहीच्या एका महान सरदाराचं थेट कनेक्शन समोर आलंय. मुगल सम्राट औरंगजेबानं श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर बांधलेले प्राचीन केशवनाथ मंदिर नष्ट केलं होतं. तर त्याच ठिकाणी १६६९-७० मध्ये शाही ईदगाह मशीद बांधली. यानंतर १७७० मध्ये गोवर्धन इथं झालेल्या युद्धात मराठ्यांचा विजय झाला. या विजयानंतर मराठ्यांनी पुन्हा मंदिर बांधलं. या विजयाचे शिल्पकार होते महादजी शिंदे...! मराठ्यांनी जय मिळवल्यानंतर मराठ्यांनी मथुरेत अनेक हिंदू मंदिरांची उभारणी केली. यामध्ये महादजी शिंदे हे आघाडीवर होते. मराठ्यांनी मुगलांना नमवत उत्तरेत मराठेशाहीचा भगवा झेंडा फडकवल्यानंतर महादजी शिंदे यांनी दिल्लीचा कारभार इथूनच हाकला. एवढेच नव्हे तर ते स्वतः कृष्णभक्त होते. त्यांची कृष्णभक्तीवरची कवनं देखील उपलब्ध आहेत. गौरवशाली इतिहास असलेले महादजी शिंदे यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० मध्ये झाला. मराठा साम्राज्यातला एक प्रमुख योद्धा म्हणून त्यांना ओळखलं जातं. कमी वयातच त्यांनी आपलं शौर्य दाखवण्यास सुरुवात केली होती. १७४५ ते १७६१ या मराठ्यांच्या राज्य विस्ताराच्या सुवर्णकाळात त्यांनी ५० लढायांचे नेतृत्व केल्याचं सांगितलं जातं. पानीपतच्या तिसऱ्या लढाईतही महादजी यांचा सहभाग होता. कृष्णजन्मभूमीच्या निमित्तानं त्यांचं केलेलं हे स्मरण!
हरीश केंची,
९४२२३१०६०९.


उद्धव, मायावती, राहुल समोरचं आव्हान!

"अवघं वातावरण राममय बनलंय, रामाचा धावा गल्लीबोळातून केला जातोय. या साऱ्या मंगलध्वनीत लोकसभा निवडणुकांचे पडघमही वाजताहेत. अस्वस्थ हतोत्साही, अस्ताव्यस्त झालेल्या विरोधकांपुढे मजबूत आव्हान उभं आहे. राष्ट्रीय काँग्रेसनं प्रसंगी कमीपणा घेऊन छोट्या पक्षांना, प्रादेशिक पक्षांना, विविध प्रश्नासाठी लढा देणाऱ्यांना पोटाशी धरून सामोरं जायला हवंय! सत्ताधाऱ्यांचे ३७० कलम, रामजन्मभूमी हे जिव्हाळ्याचे प्रश्न निकाली निघालेत. त्याच औत्सुक्य फारसं राहिलेलं नाही. एखाद्या वसाहतीत पाण्यासाठी लोक नगरसेवकांना फोन करतात. त्यांना टँकरनं पाणी दिलं तर ते खुश असतात. पण जर त्यानं वसाहतीत प्रत्येकाला पाण्याचा नळ दिला तर ते नगरसेवकाला विचारतच नाहीत. त्याची उपयुक्तता संपलेली असते. अगदी तसंच इथं घडतंय!"
------------------------------------------------
*वि* रोधकांचं पराभूत राजकारण आपण पाहिलंय. या पार्श्वभूमीवर २०२४ चा डाव जिंकला जाऊ शकतो का? पराभुतांच्या रांगेत संसद, सुप्रीम कोर्ट, विरोधक, नोकरशाही आहे. मिडियाही आहे. रोजच्यारोज लोकांच्या मनातले प्रश्न सोडविण्यासाठी विरोधक सज्ज असतील काय? तेवढ्या सक्षमतेनं सारी यंत्रणा उभ्या ठाकतील का? कारण सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीनं निवडणुक २०२४ मध्ये नव्हे तर ती २०२३ मध्येच झालीय. कारण ज्या ताकदीनं २०२३ च्या निवडणुका खेळल्या गेल्या, विरोधकांचा पराभव होताना दिसू लागला तसा तो झाला अशा स्थितीत २०२४ च्या निवडणुका विरोधक जिंकतील का? सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली जी दरी वाढलीय यासाठी तीन लोकांचं राजकारण आपल्या मूळच्या भूमिकेतून सामोरे आलं तरच ते सत्ताधाऱ्यांना समोर टिकू शकतील.  उद्धव ठाकरे...! राजकारणात शिवसेनेची ओळख ही हिंदुत्ववादी संघटना म्हणून आहे. जेव्हा अयोध्दाकांड सुरू झालं तेव्हा बाळासाहेब ठाकरे छाती ठोकून सांगताना डगमगत नाहीत, अयोध्येतला ढाचा  पाडला तो मीच आहे आणि माझीच संघटना आहे, माझेच शिवसैनिक आहेत! जे अयोध्येत घडलं बाबरी मशिदीचा विध्वंस झाला तेव्हा कुणीही त्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हता. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, सुंदरलाल भंडारी  कुणी काही म्हटलं नाही. जे काही म्हटलं ते फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे यांनी...! पण आज अयोध्येच्या माध्यमातून देशाचं राजकारण आपल्याला अनुकूल करायला कोण निघालेत! जे निघालेत त्यांचं अयोध्येत आणि अयोध्याकांडमध्ये अतितच्या रुपात काय योगदान आहे? पहिला प्रश्न... उद्धव ठाकरे हे  अयोध्येत रामलल्ला मंदिरात प्राणप्रतिष्ठा असेल, तेव्हा मुंबईतच असतील. ते का अयोध्येला निघणार नाहीत? त्यांनी का अयोध्येकडे  निघू नये? हे म्हणणं सहजशक्य आहे की, राम सर्वांचे आहेत. पण मंदिर निर्मितीसाठी झालेल्या एका मोठ्या आंदोलनानंतर प्रतिष्ठापनेसाठी सत्ताधाऱ्यांकडून आमंत्रित अशा लोकांना आमंत्रित केलं जातंय, जे केवळ भक्तीरसात आकंठ बुडालेले आहेत. धर्माच्या नावावर राजकारनाचं ध्रुवीकरण आजचं नाही ते स्वातंत्र्यानंतर सतत अवलंबलं गेलंय, खेळलं गेलंय मग तो हिंदू महासभेचा कालखंड असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा असो, जनसंघाचा काळ असो वा आजचा भारतीय जनता पक्ष असो. धर्माच्या आधारे राजकारण खेळण्याचा प्रयत्न वारंवार झालाय. आज मंदिराच्या  निमित्तानं व्हीव्हीआयपी एकाबाजूला आणि दुसरीकडे सामान्य जनता या दोहोंत एक मोठी लकीर उभी केलीय. प्रतिष्ठापनेची निमंत्रण कोण देताहेत आणि त्यासाठी कोण परवानगी देताहेत. की, आपण यावं वा, येऊ नये! इथंहीं राजकारण घडलं, अगदी उघडपणे. उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळालं नाही आणि डाव्या विचाराचे सीताराम येचुरींना मिळालं, बंगालच्या ममता बॅनर्जींना मिळालं. निमंत्रण राहुल गांधींनादेखील मिळालं नाही.
धर्माच्या आधारे आंदोलनाच्या माध्यमातून राजकारण उभं राहतेय मग का नाही उद्धव ठाकरे अयोद्धेकडे कुच करायला तयार नाहीत? शिवसेना कुठे आहे? शिवसैनिक कुठे आहेत? शिवसेनाप्रमुखांनी जो विचार रुजवला, जोपासला, वाढवला त्यांचीच ही ताकद होती की, भाजप असो वा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो यांना हिंदुत्वासाठी उभं राहायचं होतं तेव्हा इतर कुठं नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या मातोश्रीच्या दारात जावं लागलं होतं. त्यांच्याकडे मदत मागण्यासाठी! मग आज ते सगळं राजकारण संपविण्यासाठीच सत्ताधारी सरसावले असतील तर त्या कृतघ्न राजकारणाला आव्हान देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आजच्या या स्थितीत हिंदुत्व आपल्या खांद्यावर उचलून घेत मार्गक्रमण करतील तर काय होईल? राजकारणातलं ते एक मोठं परिवर्तन असेल! पण आज शिवसेना, शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे खामोश आहेत, गप्प आहेत. हे सारं बदललं तर काय होईल? याबरोबरच दुसरा प्रश्न जातीच्या राजकारणाचा येतो. आज जसे बाळासाहेब नाहीत तसे कांशीरामही नाहीत. पण बहुजन समाज पार्टी अस्तित्वात आहे. कांशीराम यांनीच नेमलेल्या मायावती यांच्याकडे त्याची धुरा आहे. त्यांच्याकडे जातीय राजकारणात ध्रुवीकरण करण्याची क्षमता आहे. कोणी काही म्हटलं तरी त्यांची जिद्द पणाला लागते. आपला पराभव विसरून त्या खंबीरपणे उभ्या ठाकल्या तर वातावरण बदलू शकतं. कारण त्या २०१४ ला एकट्या लढल्या तेव्हा त्यांना एकही जागा मिळाली नाही. मात्र अखिलेश सोबत युती केल्यानंतर २०१९ मध्ये त्यांना १० जागा मिळाल्यात. हे पाहता त्या एकट्या २०२४ ला सामोरं जातील असं वाटतं नाही. याच रांगेत तिसरं नाव येतं ते राहुल गांधी यांचं. राहुल गांधी हे काही इंदिरा गांधी नाहीत, पण काँग्रेस पक्ष आहे ना. देशभरात काँग्रेसचं नेटवर्क तसंच आहे जसं भाजपचं आहे. त्याचं ताकदीनं उभी आहे प्रत्येक शहरात, गावात त्यांचं संघटन आहे. त्यांची विचारधारा देखील त्यासोबत उभी आहे. सत्तेची ताकद ही एका माध्यमातून आहे. ज्याला भाजपचं केडर म्हटलं जातं. त्याला आव्हान देण्यासाठी काँग्रेसचं केडर देशभरात जर सक्रिय झालं, राहुलच्या पहिल्या भारत जोडो यात्रेत सक्रिय झाला होता तसाच तो आता जिथून ही यात्रा जाणार आहे त्या राज्यांतून केडर सक्रिय झालं तर तिथलं वातावरण बदलू शकतं. दुसरी स्थिती जी भाजपची ताकद आहे जाती समीकरणाच्या आधारे राजकारण करण्याची त्याला खुलं आव्हान मायावतींना द्यायचंय. तिसरी बाब धर्माच्या आधारे मतांचं ध्रुवीकरण. हिंदुत्ववादी भूमिका घेण्याची भूमिका भाजपनं मांडलीय, तेव्हा त्यासाठी उद्धव ठाकरेंना उभं राहावं लागेल. जेव्हा पूर्वीच्या काळी ओबीसी ब्राह्मणाच्या साथीला नव्हते. पण शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या जागरणानं साथसंगतीनं ओबीसी भाजपला मिळाला. उद्धव ठाकरे हे विसरून गेले की, आपलं राजकीय मैदान कोणतं आहे. मायावतीही विसरून गेल्यात की, त्या कोणतं राजकारण खेळू शकतात. काँग्रेसही विसरत गेलीय की, आपली ताकद काय आहे!
सुरुवातीलाच म्हटलं होतं की, मोठा पराभव २०२३ मध्येच झालाय. हा असा पराभव आहे की, संसदेत कुणाला उभं राहू देत नाही. लोकशाहीचा पराभव होताना संसदेनं या डिसेंबर महिन्यातच पाहिलंय की, विरोधकांना संसदेबाहेर काढून बिलं मंजूर केली गेली. इथंच लोकशाही पराभूत झाली. संसदेची सुरक्षा धोक्यात आली पण उत्तर द्यायला गृहमंत्री संसदेत आलेच नाहीत. याच संसदेत एका राज्यात जाळपोळ होत राहिली, हिंसा होत राहिली, महिलांच्या बीभत्स घटना घडल्या, त्याचे फोटो प्रसिद्ध झाले पण संसदेत त्यावर ब्र उच्चारला गेला नाही प्रधानमंत्री गप्प राहिले. ते काही बोलत नाही म्हटल्यावर संसदही मौन बनली. चर्चाच झाली नाही. इथं विरोधक पराभूत होताना दिसले. विरोधकांच्या वतीनं राहुल गांधींनी अदानी यांचं नाव घेऊन संसदेत सत्ताधाऱ्यांना खुलं आव्हान दिलं आणि सवाल केला की, सत्ताधाऱ्यांचं अडाणीशी काय संबंध आहे? ही कोणती युती आहे? संसदेनं राहुल गांधींनी विचारलेले सारे प्रश्न, त्यातले हे सारे शब्द संसदेच्या कामकाजातून काढून टाकले. राजकारणाचा खेळखंडोबा यापूर्वी असा कधी झालाच नव्हता. अदानी कांड वरून संसदेत गोंधळ झाला. राहुल गांधींची खासदारकी रद्द केली गेली. एक झटका इतर कुणी नाही तर नोकरशाहीनं दिला. त्यांची समज, परीक्षा, ज्ञान हे काही महत्वाचं नाही. ते सारे सत्तानुकूल बनलेत. नोकरशाही सत्तेकडे रांगताना दिसली. अशा या वातावरणात न्यायालयेही जागी झालीत असं दिसलं नाही. गुजरातच्या न्यायालयानं राहुल गांधींना दोन वर्षाची सजा सुनावली. सुप्रीम कोर्टानं दिलासा देऊन दाखवून दिलं की, अद्याप देशात संविधान शिल्लक आहे. मात्र इलेक्टोरल बाँड संदर्भात सुप्रीम कोर्टानं दरबार भरवला पण निकाल राखून ठेवला. या काळात मिडियादेखील पराभूत झाली, नतमस्तक झाली. या नतमस्तकानं एक नवी परिभाषा मांडली गेली. सत्ता आहे तर देश आहे आणि देश आहे ते सत्ता आहे!
या साऱ्या राजकीय पार्श्वभूमीवर, मायावती, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्याकडे संघटना आहे, कार्यकर्ते आहेत. जातीय राजकारणात आव्हान देण्यासाठी मायावती आहेत. धर्माच्या आधारे ध्रुवीकरण करण्याच्या विचाराच्या विरोधात उद्धव ठाकरे उभे ठाकलेत. त्यांना उभं राहावं लागेल, डगमगून चालणार नाही. आणखी खूप सारे प्रश्न आहेत, मिडिया असो, सोशल मीडियाचा आयटी सेन्सरचा असो, बेकारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, जुनी पेन्शन, कार्पोरेट, निवडणुक आयोगाची नियुक्ती, ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरोधकांवरच्या कारवाया, कुस्तीगीरांचा उपमर्द, महिला आरक्षण गुंडाळून ठेवण्याचा प्रश्न हे आहेतच याशिवाय सीए, एनआरसीची मोहीम येत्या फेब्रुवारीत बंगालपासून सुरू होणार आहे. या प्रश्नांच्या यादी शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यांचीही अवस्था दयनीय बनलीय. शिक्षणासाठी विद्यार्थी परदेशांना जवळ करताहेत. देशाची वैद्यकीय परिस्थितीही नाजूक बनलीय.
या अशा वातावरणात रेवडी वाटली जाईल. आपल्या आवडत्या कार्पोरेटना आथिर्क उधळण केली जाईल. हिंदू, हिंदुत्व आणि सत्ता यांच्यात एक लक्ष्मण रेषा असायला हवी. संविधानाने धर्मनिरपेक्षता स्विकारलेली आहे. राष्ट्रीय राजकारण एका वेगळ्या पद्धतीनं चाललं आहे. सारे विरोधक आणि काही सत्ताधारी नव्या खेळी समोर नतमस्तक झालेत अशा वातावरणात सवाल प्रत्येकजण विचारू शकतो. आजच्या सर्वच पक्षातल्या राजकारण्यांवर लोकांचं भरोसा राहिलेला नाही. हे सारे तिकडमी लोक आहेत? सत्तेत येण्यासाठी कधी इंडियाचा आग्रह धरतात ते कधी युती आघाडी करतात कधी जागांची तडजोड करतात. मग का नाही जे पराभूत झालेत त्यांना एकत्रित का करू नये? २०२४ ला नवं आव्हान उभं केलं तर. हे शक्य आहे. सत्तेच्या विरोधातले मुद्दे आणि ते मुद्दे घेऊन संघर्ष करणारे लोक एकत्रित येतील? आज एकत्रित आलेल्या इंडिया आघाडीनं ठरवलंय की, कोणत्या पक्षानं किती जागा लढवणार आहेत. तर मग एक नव्या राजकीय दिशेनं ही इंडिया आघाडी आगेकूच का करत नाही. हा राजकीय प्रयोग अत्यंत साफ आहे. जे मीडियाची स्वतंत्रता हवीय म्हणून लढताहेत. त्यांच्यासाठी लोकसभेच्या पाच जागा इंडिया आघाडी सोडू शकेल. सोशल मीडियातल्या नव्या कायद्याबाबत संघर्ष करताहेत अशांना तीन जागा दिल्या जाऊ शकतात का? दिल्लीत, मुंबईत मिडिया सेंटर्स आहेत, देशात सर्वत्र वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत. अशा ठिकाणातून पाच जागा देऊ शकतात. मिडियाकर्मी उभे ठाकलेत, ते निवडणुक लढवताहेत आणि त्यांच्यामागे इंडिया आघाडी उभी आहे हे चित्र भारतीय मतदारांसमोर येऊ शकतं. बेकार तरुणांचा ज्वलंत प्रश्न देशात उभा आहे. त्यावर  दिल्ली आणि पाटण्यात उग्र आंदोलनं झालीत. अशातून पाच जागा लढवल्या जाऊ शकतात. त्यांच्यामागे इंडिया आघाडीची ताकद असेल. सीए, एनआरसीच्या विरोधात ज्यांनी आंदोलनं केली अशांना काही जागा द्यायला हव्यात. कार्पोरेटवर्ल्डच्या विरोधात सत्ताधारी आणि कार्पोरेट यांच्या विरोधात लढणाऱ्या, शेअर बाजारातल्या घडामोडीच्या विरोधात लढणाऱ्यांना का उभं केलं जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी तीन काळया कायद्याच्या विरोधात जो महत्वपूर्ण लढा दिला, सरकारला जिथं माघार घ्यावी लागली अशा लढाऊ शेतकरी नेत्यांसाठी काही जागा सोडायला नकोत का? निवडणुक आयोगातला आणि ईव्हीएम मधला घपला उघड करणाऱ्यांना सामावून का घेतलं जाऊ नये? महिला आरक्षणासाठी सतत लढा देणाऱ्यांना काही जागा सोडायला हव्यात. शालेय शिक्षण, उच्च शिक्षण यासाठी कार्यरत असलेल्या आणि सरकारच्या धोरणाविरोधात उभ्या ठाकणाऱ्यांना काही जागा सोडायला हव्यात. देशातली सार्वजनिक आरोग्य आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार कसे महागडे ठरताहेत अशांना सामावून घ्यायला हवंय. देशात ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत त्यांच्याशी संबंधित असलेल्यांना काही जागा देऊन त्यांच्यामागे इंडिया आघाडीनं ताकद उभी केली तर ते सारे प्रश्न सोडवायला त्यांची मदतच होईल. त्यांनी मांडलेले प्रश्न हे जाहीरनाम्यात मांडता येईल. तो राष्ट्रीय जाहीरनामा असेल. अशी मंडळी जी निवडून येतील ते राजकारणी असणार नाहीत. त्या त्या विषयातले तज्ञ असतील. राष्ट्रीय धोरण ठरवायला त्यांची मदत होईल. अशांच्या साथीनं इंडिया आघाडी उभी आहे हे देशाच्या मतदारांसमोर येऊ शकेल. पण एवढी इमानदारी राजकीय नेत्यांमध्ये आहे मग ते विरोधात का असेना. असे सकारात्मक राजकारण करण्यासाठी इंडिया आघाडीतल्या साऱ्या पक्षांना आपला अहंकार बाजूला ठेवावा लागेल. हेकेखोरपणा सोडावा लागेल. उम्मीद आणि भरोसा द्यावा लागेल. तेव्हाच हे शक्य आहे, ज्यांना ज्यांना मोदी सरकारचं नख लागलंय त्यांना जवळ घ्यावं लागेल. तेव्हा असं मानायला हवं की, आपली लढाई सुधारणेसाठी, चांगल्या गोष्टींसाठी, सुशासनासाठी, प्रशासन ठीक करण्यासाठी आहे. भारताच्या भवितव्यासाठी आहे. हे केवळ २०२४ साठीच नाहीये. मावळते वर्ष आणि आगामी वर्ष यामध्ये उभं राहून विचार करा. तारीखा बदलत राहतील. आताच देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७ चं लक्ष ठेवलेलं आहे. जेव्हा भारत विकसित राष्ट्र बनेल. प्रत्येक माणसाचं दरडोई उत्पन्न एवढं वाढलेलं असेल की, जगातल्या विकसित देशांच्या तुलनेत भारत सर्वात पुढे उभा असलेला दिसेल. २०४७...! तुमचं आमचं अस्तित्व असेल का? आपली मुलं देश चालविण्याच्या प्रक्रियेत असतील. स्वप्न पाहिली जात नाहीत, पण आजची जी वस्तुस्थिती आहे ती जगाच्या गरीब देशाच्या रांगेत आपण उभं असल्याचं दिसतं. देशाची आर्थिक स्थिती चौथ्या पाचव्या जागेवर रेंगाळत आहेत. तिसरी अर्थव्यवस्था होण्याची स्वप्न पाहिली जाताहेत. पण असमानता इतकी आहे की बोटावर मोजण्या इतकेच श्रीमंत जगाच्या श्रीमंतांच्या यादीत आहेत. भारतातल्या गरिबांची संख्या जगातल्या गरीब देशापेक्षा अधिक गरीब आहे. हे सत्य असताना कोणती रचना भारतासाठी केली जातेय? २०२४ साठी राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक, आर्थिक, बाबतीत दाखवून द्यावं लागेल की, हिंदुत्वाचा अर्थ काय आहे? राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा केली जात असताना कोण मोठा भक्त आहे, पुजारी आहे. आमंत्रित करण्यासाठी त्याच्या श्रद्धेचं आकलन नाहीये. त्याचं नेटवर्थ, त्याची लोकप्रियता आणि त्याची आपली ओळख देशभरात आहे, तोच व्हीव्हीआयपी आहे. हे उद्धव ठाकरेंना समजायला हवंय, मायावतींना  समजलं पाहिजे लढाई तर लढावीच लागेल. राहुल गांधीनाही समजलं पाहिजे. प्रश्न काँग्रेसचा नाहीये, तर तो देशाचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा आहे....!
हरीश केंची, 
९४२२३१०६०९.

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...