Saturday 29 May 2021

मोदी सरकारची सात वर्षे

"देश एका भयानक संकटातून चालला आहे. कोरोनानं पाठोपाठ आलेल्या काळ्या बुरशीच्या रोगानं लोकांचं आरोग्य धोक्यात आणलंय. कामधाम, नोकरीधंदा सारं काही ठप्प झालंय. केवळ देशविदेशातील मीडियाच नव्हे तर न्यायालयेही आक्रमक झाली आहेत. राजकारणी मात्र आरोप-प्रत्यारोप, निंदानालस्ती, कुरघोडी करण्यात दंग आहेत. लोक हवालदिल बनलेत. सातवर्षाच्या राजवटीनंतर मोदींची विश्वासार्हता, लोकप्रियता घटू लागल्यानं तो सावरण्याचा प्रयत्न सुरू झालाय. या सात वर्षात अजेंड्यावरील अयोद्धेत राममंदिर, ३७० कलम, नागरिकत्व याचं यश मिळालं तरी त्याचा जल्लोष करता आलेला नाही. दरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी विरोधकांना सामावून घेण्याची जो प्रयत्न तामिळनाडूत केलाय तो या पार्श्वभूमीवर उल्लेखनीय वाटतो!"
---------------------------------------------------------

*आ* ज रविवार ३० मे मोदी सरकारला केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत येऊन दोन वर्षे आणि एकूण सात वर्षे पूर्ण होतील. पहिल्या टर्मपेक्षा अधिक मोठा नेत्रदीपक विजय मिळवून केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून मोदी सरकारला सलग दुसऱ्यावर्षी यशाचा वार्षिक जल्लोष करता आलेला नाही. काही ऐतिहासिक निर्णय, जम्मू-कश्मीरचं विभाजन, अयोद्धेतील राम मंदिराचा जटील प्रश्न या सगळ्या घटनांबाबत आनंद आणि समाधान लाभण्याऐवजी मोदी सरकारच्या वाट्याला केवळ प्रतिकूलताच आलेली नाही तर आता विश्वासार्हतेवरही प्रश्न उभा ठाकलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक मुद्द्यांवरून केंद्र सरकारची पीछेहाट झालीय. केवळ सत्ताधारी भाजपेयींचीच नव्हे तर भाजपेयींचं एकमेव आशास्थान ठरलेल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरणीला लागलीय. त्यांचे सगळे राजकीय डावपेच अंगाशी आलेत. सत्ता आणि सर्व शक्तिमान असतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांची एकही कृती सत्कारणी लागलेली नाही. कोरोना संकटावर उपाययोजना करण्याऐवजी ते निवडणूक प्रचारात व्यग्र होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना केलेल्या फोननं मोदींच्या वलयाला धक्का बसला. तर केजरीवाल यांनी उघडपणे त्यांची कोंडी केली. हेमंत सोरेन यांनी प्रधानमंत्र्यांच्या एकतर्फी चर्चेवर टीका केली. बंगालमध्ये मिळालेल्या विजयानं ममता बॅनर्जींनी जाहीर तोंडसुख घेऊन मोदींच्या लोकप्रियतेला ग्रहण लावले. कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या शिगेला पोहोचली असतानाही देशवासियांसमोर येत नव्हते. पण आल्यानंतर ते रडतील, अश्रू ढाळतील अशाप्रकारची भाकीतं संजयसिंह यांच्यासह अनेकांनी व्यक्त केली होती. तो खरा ठरला. मोदी रडले पण त्यांच्या अश्रूंनी अपेक्षित परिणामकरता साधली नाही. 'रडत राहण्याचा काही लोकांचा स्वभावच असतो' अशी विरोधकांवर टीका करणाऱ्या मोदींची कोंडी झाली. जनतेची सहानुभूती मिळवायची असलं की, ते आसवांना वाट करून देतात, हे गेल्या सात वर्षात आठ वेळा दिसून आलंय! कोरोनाची लाट ओसरत असतानाच म्युकरमायकोसीस हा साथीचा रोग अनेक राज्यात फैलावल्यानं सरकारसमोर दुहेरी आव्हान उभं राहिलं. त्याला सामोरं जाताना राजकीय कुरघोडीत गुंतण्याऐवजी सर्व केंद्रीय मंत्र्यांना कामाला लावलं तरच मोदी सरकारची निसटणारी विश्वासार्हता परत मिळवला येईल. समाजमाध्यमांवरील आभासी सक्रियतेचा कुचकामी शॉर्टकट उपयुक्त ठरणार नाही. कोलमडलेली आरोग्यव्यवस्था नीट कशी करता येते ते नितीन गडकरींनी विदर्भात दाखवून दिलंय. त्याचं श्रेय घेण्याचा राज्यातील भाजपेयीं नेते घेण्याचा प्रयत्न करताहेत, पण हे यश केवळ गडकरी याचंच आहे हे लक्षांत घेतलं पाहिजे!

*मोदी राजवटीचे ते २ हजार५५५ दिवस*
गेल्या सात वर्षात नोटाबंदी झाली. जीएसटी लावण्यात आलं. सर्जिकल स्ट्राईक झालं. ट्रिपल तलाक रद्द केलं गेलं. कश्मीरचं ३७० कलम रद्द करण्यात आलं. सीएए लागू करण्यात आलं. बँकांचं विलिनीकरण केलं. पण कोरोनासारखी महामारी हाताळता आली नाही. लोकांचे हाल झाले. बेरोजगारी वाढली. लोकं जीव गमावत आहेत. तरीही भक्त मंडळी भाजपेयीं सरकारची ७ वर्षपूर्ती साजरी करणार होते. दरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना उत्सव साजरा करु नका असा आदेश काढावा लागला. नरेंद्र मोदींचा प्रधानमंत्री म्हणून आजच्या दिवशी ३० मे रोजी शपथविधी झाला आणि मोदी सरकारचा कारभार तेव्हापासून सुरू झाला. ते 'मोदी सरकार' म्हणून ओळखलं जातंय. सध्या देशात कोरोनानं मोठा कहर माजवलाय. या वाढत्या संकटामुळं प्रत्येक दिवस सेलिब्रेशनचा समजणाऱ्या मोदी सरकारला आपल्या कारभाराची सात वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद कदाचितच वाटत नसेल. कारण आज देशात ज्याप्रमाणे परिस्थिती बनलीय, त्यावरुन गल्ली ते दिल्ली आणि दिल्ली ते अमेरिका व इतर राष्ट्रांतून सर्वत्र मोदी सरकार टीकेचा धनी ठरलेय. ज्या चहाच्या टपरीवर मोदीच्या नेतृत्वाची स्तुती केली जात होती, आता त्याच कट्ट्यावर आज खिल्ली उडवली जातेय. त्यांनी जे काही निर्णय घेतलेत त्याचा थेट परिणाम लोकांवर झालाय. आज या सातवर्षाच्या कार्यकाळात तुम्हाला भारतीय संघराज्याची चौकट ढासळली जात असताना पाहावं लागलंय. शिवाय देशातल्या संवैधानिक संस्थांना कसं अस्तित्वहीन बनवून टाकलंय. हेही आपण अनुभवलं असेल. पण अनेक गोष्टी दिसत नाहीत. या कालखंडात २०० हून अधिक नव्या योजनांची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केल्या आहेत. या योजनांच्या घोषणांची चर्चा होते पण या योजनांतील सत्यता आपल्याला ठाऊक नाहीये. देशाला ७० वर्षांत पहिल्यांदा असा प्रधानमंत्री मिळाला ज्यानं प्रत्येक क्षेत्रात नवे रेकॉर्ड प्रस्थापित केलं आहे. जे कधीच विसरता येणार नाही. हे हवं तर कुणी सुवर्णाक्षरात लिहू द्यात. पण तुम्हाला तो एखादा डाग लागल्यासारखा दिसेल. हा असा एक प्रवास आहे, महागाईचा, बेरोजगारीचा, नोटबंदीचा, बँकांच्या विलिनीकरणाचा, जीएसटी, तीन तलाक, सीएए, कोरोनाच्या महामारीतील उपाययोजनेत आलेलं अपयश, देशात प्रचार प्रसिद्धीसाठी होणारा खर्च, महामारीतील मृत्यूंचं तांडव, लसीकरण, प्रवासी मजदूरांची स्थिती हा कसला प्रवास आहे? अशा अनेक बाबी आहेत. गेल्या सातवर्षातले २ हजार ५५५ दिवस! हे भाजपेयीं सरकारचं सेलिब्रेशन सुरूच आहे.

*सर्वांनीच प्रायश्चित घेण्याची गरज आहे*
स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधी हे देशाचे सर्वात मोठे नेते होते. नेहरू घराणं स्वातंत्र्याच्या लढाईत अग्रभागी होतं. पंडित मोतीलाल नेहरू पासून जवाहरलाल नेहरू देखील अनेक वर्षे जेलमध्ये होते. नेहरू-गांधींना बदनाम करणारे बहुतेक लोक इंग्रज धार्जिणे किंवा त्यांचे वैचारिक वारस आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्यातले अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन हे लोक जरा वेगळे होते. ते असे कारस्थानी नव्हते. हिंसक नव्हते. अडवाणी मात्र मोदींची पहिली आवृत्ती होती. आता स्वतःच्या कर्माची फळं भोगताहेत. आज गांधीही नाहीत, नेहरुही नाहीत, बाबासाहेबही नाहीत ! पण सरकार नत्थुराम गोडसे यांच्या विचारांचं आहे ! त्यांच्या भक्तांचं आहे. आणि शिवाजी महाराज, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जप करणारं, त्यांचा वारसा सांगणारं या सरकारमध्ये सहभागी आहेत. देशाचं दुर्दैव असं, की गांधीचा, नेहरूंचा विरोध करणाऱ्यांना मोदींच्या काळात चांगले दिवस आलेत. कळत नकळत संघाच्या सुरात सूर मिसळून गांधींचा विरोध करणारांची मोठी गर्दी झालीय. वैचारिक मतभेद वेगळे, त्याचं स्वागत केलंच पाहिजे. पण द्वेष वेगळा हेही समजून घेतलं पाहिजे. मात्र गांधींचा द्वेष हाच काही लोकांच्या पोटापाण्याचा मुख्य धंदा आहे. काहीही असलं तरी, देशाला पुन्हा एकदा गांधींची गरज आहे. कोरोना आणि मोदी सरकार यांची सारखीच दहशत आहे. दोन्हीकडे नुसती लूट सुरू आहे. देशाचा एकेक अवयव विकणं सुरू आहेत. एवढ्या वर्षांच्या त्यागातून, नियोजनातून, समर्पणातून हा देश उभा राहिलाय. इथवर आलाय. तो पुन्हा मातीत घालण्यासाठी हे प्राणपणानं कामाला लागलेले आहेत. आपण काय करत आहोत, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. एकजात सारे वैचारिक दिवाळखोर आहेत. त्यांच्या माकडचेष्टा बघून सारं जग थुंकत आहे यांच्यावर! मोदी कुणाचंही ऐकत नाहीत. मोदी-शहा यांचा इतिहास माहीत असल्यामुळं भाजपा आणि संघामधले मोठे मोठे लोक कोमात गेलेले आहेत. त्यांची जुनी पापं आता त्यांच्याच बोकांडी बसली आहेत. न्यायालये देखील व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांनाही ऑक्सीजन हवाय आणि सारे ऑक्सीजन सिलेंडर मोदी आपल्या खिशात घेवून फिरताहेत. सध्यातरी त्यांचं मॅनेजमेंट शहा बघत असावेत, असं वाटतं. किंवा मोदी यांनी पर्यायी शहा देखील तयार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देश भयंकर संकटात आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारखानदार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, छोटे दुकानदार, मोजके आणि इमानदार पत्रकार सारे सारे दहशतीत आहेत. सात वर्षातील तुघलकी कारभारामुळे लोक बर्बाद झाले आहेत. कर्जामुळं आता व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर, प्राध्यापक या सारखे लोक सुद्धा सहकुटुंब आत्महत्या करायला लागले आहेत. कोरोनाच्या महामारीचा फायदा घेवून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात देशाला लुटतेय. सारा पैसा देशाबाहेर जातोय. मागोमाग मोठमोठे उद्योगपती सहकुटुंब देशाबाहेर जाताहेत. ते पुन्हा परत येतील की नाही अशी शंका आहे. भाजपचे सारे खासदार, नेते शेपट्या टाकून नव्हे, तर शेपट्या कापून बसले आहेत. मिळेल ते बिस्कीट खाऊन दिवस काढताहेत. या देशाला मंत्रिमंडळ आहे याच्या खुणाही कुठं दिसत नाहीत. प्रधानमंत्री रडण्याचे राष्ट्रीय कार्यक्रम करण्यात व्यस्त आहेत. काहीही करून निवडणुका जिंकणे, हा त्यांचा धर्म आहे. एकमेव अजेंडा आहे. त्याशिवाय मोदी-शहा यांना पर्याय देखील नाही. त्यांचे पराक्रम एवढे आहेत, की जर त्यांच्या हातातून सरकार गेलं, तर आपलं काय होईल, या भीतीनं त्यांना झोप येत नसावी. अशा परिस्थितीत मानसिक संतुलन राखणे अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तोच त्यांचा प्रॉब्लेम आहे. अर्थात, संघाला, भाजपेयींना याची आता पूर्ण कल्पना आलेली आहे. ते बोलत नसले तरी आतून हादरले आहेत. २०१४ नंतर त्यांनी आणि अंधभक्तांनी देशात जो धुमाकूळ घातला, त्यामुळं आता त्यांना आपली भूमिका कशी बदलायची ही अडचण आहे. आंधळे भक्त असोत की भक्तिनी, साऱ्यांनी मर्यादा ओलांडून टाकल्या होत्या. आता त्यांची गोची झालीय. कुणाला सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही. मात्र ही कोंडी फोडावी लागेल. झालेल्या चुका विसरून एकमेकांना समजून घ्यावं लागेल. प्रमाण कमी जास्त असू शकतं, पण अतिरेक दोन्ही बाजूंनी झालाय. दोन्ही बाजूंनी चुका झाल्यात. त्याची फळं आपण सारेच भोगत आहोत. सर्वांनीच प्रायश्चित घेण्याची गरज आहे. यावेळी संघ आणि भाजपेयींची भूमिका ऐतिहासिक महत्वाची आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील गांभीर्यानं एक आलं पाहिजे. काही लोकांनी आपलं उठवळ राजकारण अशावेळी बाजूला ठेवलं पाहिजे. देश अस्वस्थ आहे. आधी देश वाचवला पाहिजे. संघ आणि भाजपमध्ये तशा हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. अलीकडंच गडकरी ॲक्टिव झालेले दिसतात. आणखीही काही लोक नजीकच्या काळात बोलायला लागतील. न्यायालयं नव्या जोमानं हिम्मत करायला लागलीत. काँग्रेस देखील ॲक्शन मोडमध्ये आलीय. शेतकरी आंदोलन तर देशात सुरू आहेच. परवा लोकांनी फडणवीस यांना हुसकावून लावलं आहे. त्याचे व्हिडिओ गाजत आहेत.

*स्टॅलिन यांचा उपक्रम अनुकरणीय आहे*
कोरोनातून सावरल्याचं भासताच भाजपेयीं आणि त्यांचं सरकार अस्तित्वहीन बनलेल्या काँग्रेसवर शिरसंधान करण्याच्या आवडत्या कामात गुंतले. हे गेले सातवर्षं सुरूच आहे. राष्ट्रीय आपत्ती काळात काँग्रेसचं नामस्मरण नाईलाजानं थांबवावं लागलं होतं. आता मोदींच्या बदनामीसाठी काँग्रेसनं 'टूलकिट'चं कारस्थान रचल्याचा आरोप करून संबित पात्रा आणि काही मंत्री काँग्रेसवर तुटून पडले. पण ते बनावट असल्याचं ठपका ट्विटरनं पात्रा यांच्यावर ठेवला. ज्या ट्विटरच्या माध्यमातून भाजपेयींनी विरोधकांना नेस्तनाबूत केलं तेच ट्विटर आता भाजपेयींना देशद्रोही, पक्षपाती, वामपंथी वाटायला लागलेय. हे प्रकरण न्यायालयात गेलंय. हे कमी होतं म्हणून की काय रामदेवबाबांनी अलोपथीच्या विरोधात वक्तव्य करून सरकारला अडचणीत आणलंय. देशभरातल्या अलोपथीच्या डॉक्टरांनी मोदी सरकारलाच आव्हान दिलंय. पोलिसी कारवाई, न्यायालयीन वाद उभा ठाकलाय. ट्विटर आणि रामदेवबाबांच्या प्रकरणात न्यायालयाकडे लक्ष लागून राहिलंय. थोबडे यांच्यानंतर सरन्यायाधीश बनलेले रमन्ना हे कार्यरत होताच न्यायालयांची सरकारबद्धलची भूमिका बदललेली दिसते. देशभरातील उच्च न्यायालये प्रसंगी सर्वोच्च न्यायालय मोदी सरकारवर टीकेची झोड उठविण्यात मागेपुढं पहात नाहीत. लष्कराचे अधिकारी कोरोनाच्या उपचारासाठी खासगी व्यक्तींना मदत मागून सरकारच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह लावत आहेत. उत्तरप्रदेश गुजरात, मध्यप्रदेश आणि कर्नाटक या भाजपेयीं राज्यांतील कोरोना रुग्णांचे आणि मृतांचे आकडे आणि वास्तव यातील तफावत प्रादेशिक प्रसिद्धीमाध्यमांमुळे उघड झाली. सरकारनं याबाबत मौन बाळगून अप्रत्यक्ष मान्य केलंय. वस्तुस्थितीला सामोरं न जाण्याचा मानसिकतेमुळे आणि पारदर्शकतेच्या अभावातून ही स्थिती उदभवलीय. मात्र सरकार गांभीर्यानं याकडं पाहत नाही हीच मोठी समस्या आहे. आणखी एक महत्वाचं, तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी एक अभिनव प्रयोग केलाय. आपल्या राज्यात कोरोनाच्या संकटातून लोकांना वाचविण्यासाठी त्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर एक सर्वपक्षीय समिती स्थापन केलीय. सरकारी मदत, औषधं, उपचार, लसीकरण याचं नियोजन आणि सरकारी यंत्रणांवर देखरेख करण्याची जबाबदारी टाकलीय. त्यातून एक दिसून आलंय की, इथं राजकारण झालेलं नाही. आरोप-प्रत्यारोप झालेलं नाही. इथल्या जनतेला योग्य ती सेवा मिळालीय. अशाच प्रकारची यंत्रणा राज्य आणि देशपातळीवर करायला काय हरकत आहे. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी देशाचं एक 'राष्ट्रीय सरकार' स्थापन केलं होतं. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी होते. तशाच प्रकारची ही कल्पना! देशातल्या विरोधकांवर केवळ टीका करण्याऐवजी त्यांना सामावून घेता येऊ शकेल. भाजपेयींनी याचा अवश्य विचार करावा. असो.
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 22 May 2021

पिंजरे के पंच्छी रे.....!

"कोरोनानं त्राहीमाम करून सोडलंय. कोरोनाचं कमी होतं म्हणून की काय आता 'म्युकरमायकोसिस-ब्लॅक फंगस' या नव्या आजारानं आपलं घोडं पुढं दामटलंय! देशाच्या पश्चिमेला-पूर्वेला वादळ घोंघावलंय, पावसानं झोडपलंय. या 'अस्मानी' संकटांबरोबरच 'सुलतानी' संकटांनीही वेठीला धरलंय. जीवरक्षक असलेली कोव्हीशिल्ड-कोव्हक्सीन लस पुरवण्यात दिरंगाई, हलगर्जीपणा, बेपर्वाई, बेफिकिरी झालीय. जो-तो लशीसाठी रांगा लावतोय. लॉकडाऊननं शारीरिक तसंच आर्थिक कंबरडं मोडलंय. ज्याला-त्याला घरातच कोंडून घ्यावं लागलंय. या 'पिंजरे के पंच्छी'ला आज कुणी वाली राहिलेला नाही. मदतीचा हात देणारं कुणी नाही. उलट औषधांच्या दलाल-गिधाडांनी लचके तोडण्यात धन्यता मानलीय! पिंजरे के पंच्छी रे, तेरा दर्द ना जाने कोई....!"
----------------------------------------------------------

*पिं* जरे के पंछी रे, l तेरा दर्द ना जाने कोई,
तेरा दर्द ना जाने कोई ॥
कह ना सके तू, l अपनी कहानी,
तेरी भी पंछी, l क्या जिंदगानी  रे,
विधि ने तेरी कथा लिखी है, l आँसू में कलम डुबोय,
तेरा दर्द ना जाने कोई ॥
चुपके चुपके, l रोने वाले,
छुपाके रखना, l दिल के छाले रे,
ये पत्थर का देश हैं पगले, l यहाँ कोई ना तेरा होय,
तेरा दर्द ना जाने कोई ॥
पिंजरे के पंछी रे, l तेरा दर्द ना जाने कोई,
तेरा दर्द ना जाने कोई ॥
राष्ट्रकवी प्रदीप यांची काही गाणी ऐकत असताना 'नागमणी' चित्रपटातलं त्यांनीच म्हटलेलं हे गीत आजच्या स्थितीत सर्वसामान्यांच्या व्यथा मांडणाऱ्या असल्याचं जाणवलं. मनाला भिडलं. माणूस कोविड महामारीच्या पिंजऱ्यात अडकलाय. कोविडशिवाय आता 'म्युकरमायकोसिस-ब्लॅक फंगस' या नव्या आजारानं गाठलंय. बेड, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स नाहीयेत. मरणानं तांडव आरंभलंय. या व्यथा, दर्द आहेतच पण त्याचं हे दर्द जाणणारं कुणी नाहीत. मीडिया त्याच्या 'आंसू' त कलम बुडवून लिहिताहेत. हा देश 'पत्थर' बनलाय. अरे, मनातल्या मनात स्फुंदून स्फुंदून रडणाऱ्या वेड्या, आज इथं तुझं दर्द जाणणारं कुणी नाहीये...! तू तुझीच कहाणी सांगू शकत नाहीस. नियंत्यानं तुझं जीवन कसं लिहिलंय हे तू जाणत नाहीयेस. तू पिंजऱ्यातला पंच्छी आहेस त्यामुळं तुझं दुःख समजणारं, समजून घेणारं कुणी नाहीये....! तेरा दर्द ना जाने कोई....! या गीतानं मन हेलावून गेलं. प्रसिद्धीमाध्यमातून व्यक्त होणाऱ्या दृश्यातून अस्वस्थ व्हायला होतंय. कुणी, कुणाला दोष द्यायचा! कुणी कुणाचे अश्रू पुसायचे? असो.

*'लस' कधी मिळणार याचीच 'सल'*
कोविडची लस देण्यात अक्षम्य दिरंगाई झालीय. लस पुरवठ्याबाबत झालेली सरकारची बेफिकिरी, दिरंगाई, धरसोडपणा, लस खरेदीची जबाबदारी कधी केंद्राकडं तर कधी राज्यांकडं देण्यात झालेली घिसाडघाई. लसीकरण नियोजनातला गोंधळ यानं लोक हवालदिल झालेत. लस मिळणार की नाही? आपण कोरोनापासून सुरक्षित राहू की नाही? या भीतीनं लोक गोंधळून गेलेत. केंद्रसरकार राज्यांकडं तर राज्यसरकार केंद्राकडं बोट दाखवून आपली जबाबदारी झटकताहेत. राजकारणी मंडळी आरोप-प्रत्यारोप, द्वेष-विद्वेष, टीका-टिपण्णी करण्यातच धन्यता मानताहेत. महामारीच्या या भयाण काळात एकत्र येऊन लोकांना दिलासा देण्याऐवजी राजकारण करण्यातच व्यस्त आहेत. लोक लस कधी मिळणार याची वाट पाहताहेत. सरकारनं डिसेंबरअखेरीपर्यंत मिळेल अशी आशा दाखवलीय. पण भारतमातेच्या सर्व वयाच्या सुपुत्रांना 'लस' कधी मिळणार याचीच 'सल' आहे! आधी सरकारनं ६० वर्षावरील लोकांना लस द्यायचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुरू झाली. दरम्यान कोरोनाचा कहर सुरू झाला. १८ वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा सरकारनं केली. मात्र लस उपलब्ध करण्यात सरकारला अपयश आलं. त्यांनी राज्य सरकारांना जागतिक बाजारातून लस खरेदी करण्याची परवानगी दिली. पण साथीच्या रोगांची जबाबदारी ही आरोग्यकायद्यानुसार केंद्र सरकारची असते. ती त्यांनी झटकली. राज्य सरकार, महापालिका ग्लोबल टेंडर काढणार कसं? काढली तर त्याला प्रतिसाद मिळायला हवा ना! अपेक्षेप्रमाणे तसंच घडलं. लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी मग बाजार मांडला. सीरम इन्स्टिट्यूटनं केंद्र सरकारला १५० रुपयात, राज्य सरकारांना ३५० रुपयांना तर खुल्या विक्रीसाठी ७०० रुपये किंमत ठरवली. भारत बायोटेकनं तर ७०० आणि १ हजार अशी किंमत ठरवली. सारा गोंधळ माजला. राज्यांनी पुन्हा केंद्राकडं मागायला सुरुवात केली. केंद्रानं मग कुठे खरेदी आरंभली. तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वास्तविक केंद्रसरकारनं १ फेब्रुवारी २०२० रोजी जो अर्थसंकल्प संसदेत सादर केला त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार एकूण लोकसंख्येला किती लस लागणार याचा अंदाज घेऊन लस नोंदणी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडे नोंदवायला हवी होती. मात्र तशी नोंदवली नाही. त्यामुळं आज लशीची जी कमतरता झालीय ती झाली नसती. लोक हवालदिल झाले नसते.

*लशीच्या समान वितरणासाठी 'कोव्हॅक्स' ग्रुप*
कोरोनानं आपलेच सगे सोयरे मृत्युमुखी पडताहेत. संक्रमण प्रक्रिया वेगानं होतेय. जगानं कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची चाहूल लागताच उपाययोजना करायला प्रारंभ केला. त्यांना आपल्या प्रियजनांचे जीव प्यारे होते. त्यांनी लस संशोधन केलं, चाचणी घेतली, त्यात यशस्वी होताच वेगानं उत्पादन सुरू केलं. जागतिक आरोग्य संघटनेला याची माहिती दिली. त्यांनीही याची दखल घेऊन चाचणी केली. त्या निर्मित लसीचा फायदा केवळ त्याच देशांना न होता, जगातल्या गरीब राष्ट्रांनाही व्हावा यासाठीचा प्रयत्न केला. त्यासाठी 'गावी' म्हणजे 'ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्युनायझेशन!' ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून गरीब देशातल्या बालकांना विविध रोग प्रतिबंधक व्हॅक्सीन-लस उपलब्ध करून देण्याचं काम ही संस्था करते. गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या महामारीच्याकाळात दीडशेहून अधिक देशांनी कोविडच्या लसीचे समान वितरण व्हावे यासाठी 'कोव्हॅक्स' ग्रुप बनवला. यात 'गावी' ही सहभागी झालीय. आपणही त्यात आहोत. या ग्रुपनं घेतलेले निर्णय आपल्यालाही बंधनकारक आहेत. हे इथं लक्षात घ्यायला हवं. म्हणून आपल्याला लस निर्यात करावी लागलीय. हे लपवलं जातंय. दुसरीकडं प्रधानमंत्र्यांनी सर्व राज्यांना बजावलंय की, मृतांची संख्या लपवणं, टेस्ट कमी करणं, अशा खोट्या गोष्टी करून आपली इमेज सांभाळायचा प्रयत्न करू नका. पण असा सल्ला त्यांचे भक्त 'फेकॉलॉजी फॉरवर्ड फोल्डर फॅक्टरी -एफएफएफएफ...! मानायला तयार नाहीत. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं उच्छाद मांडला पण त्यांच्या उपाययोजनात, नियोजनात सरकार गाफील राहीलं. पण 'असं काही घडलंच नाही, हे शक्यच नाही..!' असं कोरसगाणं भक्त गात बसले. तर कंगनाछाप स्टाईलमध्ये कोरोनासंदर्भात एक बचावात्मक मॅसेजमध्ये सांगण्यात आलं होतं की, आपण परदेशांना उदारहस्ते लस दान केलंय. त्यावर टीका करू नका हे तर गावीनं 'कोविक्स'मध्ये बिल गेट्स सारख्यांनी सीरम इन्स्टिट्यूटला निधी दिलाय म्हणून ते देणं लागत होतं! हे जर वैश्विक करारानुसार द्यावं लागतं होतं तर मोठ्या दातृत्व केल्याच्या अविर्भावात 'व्हॅक्सीन मैत्री' चा गाजावाजा का केला गेला? जानेवारी-फेब्रुवारीत आपण करारबद्ध असल्यानं हे पुरवावं लागलं हे का सांगितलं नाही. कारण त्यांना निवडणूकीपूर्वी आपली प्रतिमा चमकवायची होती. त्याच्या या लपवाछपवीचा परिणाम लोकांच्या जीवांशी खेळला गेलाय. जग एकीकडं लस देऊन आपल्या नागरिकांना वाचवण्याचा, सुरक्षित करण्याचा प्रयत्न करत होतं. आपण मात्र वेगळ्याच धुंदीत, सत्ता संपादनाच्या कैफात होतो. न्यायालयानं फटकारलं तेव्हा कुठं आपल्याला जाग आली आणि काही करायचा प्रयत्न करायला लागलो.

*लस मागणीत दिरंगाई झाल्याने तुटवडा*
लसींचा तुटवडा होण्याची चार महत्त्वाची कारणं आहेत. त्यानुसार १) सरकारकडून लसींचा पुरवठा आणि मागणी यात दिरंगाई झाली. २) गरज आणि आवश्यकता लक्षांत घेऊन लसींच्या उत्पादनातील गुंतवणूक वेगानं वाढविण्यासाठी उत्पादक कंपन्यांकडं मागणी नोंदवायला हवी होती, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवं होतं ते झालं नाही, ३) लस तयार करण्यासाठी परदेशातून कच्च्या मालाचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी सरकारनं मदत करायला हवी होती, ती झाली नाही. ४) कोरोना किती वेगानं वाढू शकतो याचा अंदाज घेण्यात अपयश आल्यानं लस उत्पादकांकडे मागणी नोंदविण्यात उशीर झाल्यानं त्याचा तुटवडा झाला. सीरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीकडून २ अब्ज कोव्हीशिल्ड लसींचं उत्पादन होणार असून ती गरीब देशांना पाठवण्यात येणार आहे. हे सर्व उत्पादन २०२१ च्या अखेरीस होणे अपेक्षित आहे. पण या संस्थेवर ब्रिटन, कॅनडा आणि सौदी अरब यांच्याकडून मागणीचा दबाव वाढतोय. दरम्यान अमेरिकेकडून येणारा कच्चा माल आणि महत्त्वाची उपकरणं वेळेत न पोहोचल्यानं सीरम इन्स्टिट्यूटच्या लस निर्मितीला एका महिन्याचा उशीर झाला. त्यामुळं सीरमचं उत्पादन जे महिन्याला १० कोटींचं होतं ते ७ कोटींवर आलं. दरम्यान आपण आपल्याला किती लस लागणार, याची ऑर्डर दिली नव्हती. सरकारनं लसीची किंमत किती असावी या चर्चेत महिना घालावला आणि नंतर अस्ट्राझेनेकाच्या लसीला परवानगी दिल्यानंतर दोन आठवड्यानं लसींची मागणी केली. एक वेळ अशी आली होती की, सीरमकडं लसी ठेवण्यासाठी गोदामं नव्हती. जानेवारीत सीरमचे प्रमुख अदर पुनावाला 'रॉयटर्स'ला सांगितलं होतं की, '५ कोटी लसीच्या उत्पादनावर २ अब्ज रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण लसींच्या साठवणीची क्षमता कमी असल्याचं लक्षात आल्यानंतर आम्ही ५ कोटी लसींचंच उत्पादन केलं. जर आम्ही उत्पादन वाढवलं असतं तर त्या घरातच पॅकबंद अवस्थेत ठेवाव्या लागल्या असत्या!' तरीही आपलं सरकार सीरमकडून प्रदीर्घ काळासाठी लस खरेदीचा करार करण्यास उत्सुक दिसलं नाही. लसीचं उत्पादन अधिक वाढवण्यासाठी सीरमला सरकारकडून ४ हजार कोटी रुपये आगाऊ रक्कम हवी होती, पण सरकारकडून पावलं उचलण्यात आली नाहीत. सीरमकडून किती लस हवीय याबाबत कोवॅक्स मोहिमेत सामील झालेल्या देशांकडून मागणी आली नाही. त्यामुळं ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात तयार झालेल्या लसीचं योग्य तऱ्हेनं वाटप झालं नाही. यासंदर्भात गावीनं आपल्या निर्णयाचं समर्थन केलंय. त्यांच्या मते जोपर्यंत परवानगी, मंजुऱ्या मिळत नाहीत तोपर्यंत लस खरेदी करणं अशक्य आहे. कोवॅक्समध्ये मिळणाऱ्या एकूण लसींमधील ६० टक्के पुरवठादार हा भारत आहे. त्यामुळं भारतावर पुढे काही अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर मे अखेरपर्यंत सीरमकडून लस पुरवठा सुरळीत होईल असं गावीला वाटतं. पण त्यामुळं भारतातील लसीकरणात अडथळे येतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. त्याची अनुभुती आपल्याला आता येतेय.

*लसीचं दान करणारेच आता याचक बनलेत*
दिल्लीत 'मोदीजी, हमारे बच्चोंकी व्हॅक्सिन विदेश क्यो भेजी गयी!' अशा आशयाची पोस्टर्स लागली. ही पोस्टर्स लावणाऱ्या २५ जणांवर कारवाई झालीय. त्यांना तुरुंगात डांबलंय! ह्यामुळं दिल्लीतलं वातावरण बिघडलंय. एक गोष्ट इथं लक्षांत घ्यायला हवीय की, असं का घडलं? ही वेळ का आली? लस वितरणाचा जो घोळ सरकारनं घातलाय त्याला तोड नाही. भारतातल्या १४० कोटी लोकांना लस देण्याची गरज असताना आपण मात्र या लसी निर्यात करत होतो. काही विकत तर काही दान करत होतो. दातृत्व दाखवणारे आपण आज मात्र याचकाच्या भूमिकेत आहोत. विश्वगुरु बनण्याच्या तोऱ्यात मिरवणारे आपण लोकांकडं मदतीची याचना करतो आहोत. काही काळापूर्वी लस निर्यातदार आपण आता आयातदार बनलो आहोत. जगात सर्वाधिक लसनिर्मिती करण्याची क्षमता आपली आहे. पण व्यवहारशून्य नियोजनानं सरकारची पर्यायानं देशाची अब्रू वेशीवर टांगली गेलीय. आपण जानेवारी, फेब्रुवारी, मार्च अगदी १६ एप्रिलपर्यंत लस निर्यात केलीय. परराष्ट्र मंत्रालयानं वेबसाईटवर 'कोविड-१९' नावानं एक पेज तयार केलंय. त्यात कोणत्या देशाला किती लस पाठवलीय याची नोंद आहे. त्यावर शेवटची नोंद १६ एप्रिलची आहे त्यानुसार गुणिया, पपुवाव्ही गोमा, सीरिया, झंबिया, कॅमरून, अल्वानिया या देशांना २ लाख ५६ हजार ८०० लशी पाठविल्या आहेत. इतकंच नाही तर त्यापूर्वी बांगला देशाला १ कोटी ३ लाख लशी, म्यानमारला ३७ लाख, नेपाळला २४ लाख ३८ हजार, श्रीलंकाला १२ लाख ६४ हजार, ब्राझीलला ४० लाख, मोरोक्कोला ७० लाख, मालदीवला ३ लाख १२ हजार, दक्षिण आफ्रिकेला १० लाख, अँटिगोवा अँड बर्म्युडाला ४० हजार, कांगोला १७ लाख ७६ हजार, नायझेरियाला ४० लाख, सौदी अरबला ४० लाख ३६ हजार, अशी एकूण ६ कोटी, ६३ लाख ६९ हजार ८०० लसीचे डोस परदेशात पाठविण्यात आल्या. इकडं देशात लशीसाठी रांगा लागल्या आहेत. पण लस शिल्लक नाही. १८ वर्षावरील सर्वांना लस द्यायची आहे. जगात सर्वाधिक तरुणांची संख्या असलेल्या आपल्या देशातला तरुण नोकरीसाठी वणवण भटकतोय. बेकारी वाढलीय. कोरोनानं बेरोजगारांची वाढवलीय. तसंच तिनं या तरूणांना लस घेण्यासाठी रांगेत उभं केलंय. ती कधी मिळणार याची वाट पाहतोय. सरकारनं नोकरी नाही तर नाही; किमान लस तरी द्यावी याच्या परीक्षेत सारे आहेत.
- हरीश केंची
९४२२३१०६०९

Friday 14 May 2021

'इंडिया'त हाहाःकार अन 'भारत' लाचार...!

"देशभरात कोरोनानं उच्छाद मांडलाय. सरकारी आरोग्य व्यवस्थेच्या चिंधड्या उडल्यात. उत्तरेकडं तर मृत्यूनं तांडव आरंभलंय. मीडियात याचं जे भेसूर चित्रण केलं जातंय ते भारतातल्या 'इंडिया'चं, जिथं साऱ्या आरोग्यसुविधा आहेत. पण 'भारता'तल्या गावागावात जिथं ना हॉस्पिटल आहे, ना ऑक्सिमीटर, बेड, रेमडीसीविर सारखी औषधं, ना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन ना ऍम्ब्युलन्स! आहेत फक्त मोडकळीला आलेली प्राथमिक आरोग्य केंद्रं! परिचारिका, वॉर्डबॉय आहेत. मात्र साधी पॅरासिटामॉलसारखी औषधंही नाहीत. एखादा मेला तर 'ताप आला अन गेला' असं सांगितलं जातं. मन विदीर्ण करणारी ही अवस्था. मात्र इकडं मीडिया ढुंकूनही पाहात नाही. सुविधा असतानाही 'इंडिया'तल्या बोंबा मारणाऱ्यांच्या व्यथा मांडण्यात आम्ही मिडियावाले मग्न असतो. ते मांडायला हवंच पण 'भारता'कडं कोण पाहणार? गावाकऱ्यांना आरोग्यसुविधा मिळाव्यात हे कोण सांगणार? कोण झगडणार? कोरोनामुळं 'इंडिया'त हाहाःकार माजलाय; तर तिकडं 'भारत' मात्र लाचार बनलाय...!"
----------------------------------------------------------------


*मा* फ करा मित्रांनो, गेले महिनाभर कोरोनाचा संक्रमण काळ, संकटकाळ, आपादकाल यावरच लिहितोय. कोरोना फैलावतोय. रोज आकडे जाहीर होताहेत. रोज चार लाखाहून अधिक लोकांना लागण होतेय. चार हजाराहून अधिक लोक मृत्युमुखी पडताहेत. पण मलाच खेद वाटतोय की, आम्ही मीडियाकर्मी फक्त 'इंडिया'तल्या महानगराच्या, शहराच्या व्यथा मांडतोय. त्या तर मांडायलाच हव्यात. बेड, औषधं, व्हॅटिलेटर, ऑक्सिजन, एम्ब्युलन्ससाठी सामान्य माणूस त्राही त्राही होतोय. विव्हळतोय, आक्रोश करतोय, त्याला उपचार मिळत नाही. पण देशातलं आणखी एक वास्तव आपण मान्य केलं पाहिजे. हा देश दोन भागात विभागला गेलाय. एक आहे 'इंडिया' ज्याची माझ्यासारखे पत्रकार सतत व्यथा-वेदना मांडत असतात. 'इंडिया'तल्या या शहरात सर्व आरोग्य सुविधा आहेत. पण त्याचंही पितळ उघडं पडलंय. सरकारी-खासगी हॉस्पिटल्स आहेत, औषधं आहेत, सारी व्यवस्था आहे. त्यांचे कर्ते-धर्तेही इथं आहेत, जागरूक, सुशिक्षित, आपल्या हक्कासाठी लढणं ते जाणतात. तर दुसरीकडं आहे 'भारत'...! इथं देशातले दोनतृतीयांश लोक राहतात. गाव, वाडी-वस्तीवरचा अस्सल 'भारत'...! इथं रुग्णालय नाही. आरोग्य सुविधा नाहीत. पंचतारांकित सोडा साध्या सोयीही नाहीत. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजन प्लाझ्मा अशा काही वैद्यकीय सोयी-सुविधा असतात हे गावकऱ्यांना फक्त टीव्हीवरुनच समजतं. प्रत्यक्षात पाहायलाही मिळत नाही. आम्ही 'इझी जर्नालिझम' सहजसाध्य पत्रकारिता करतो आहोत. महानगरातल्या बाबी आम्ही पोटतिडकीनं मांडतो. त्यातच धन्यता मानतो. त्या तर मांडल्याच पाहिजेत; पण ग्रामीण भागातल्या आरोग्य दुरावस्थेकडं आम्ही ढुंकूनही पाहात नाही. त्यांच्या व्यथा-वेदना वेशीवर टांगत नाही. यांच्याकडं आजवर कुणीच ना प्रिंट मीडिया ना इलेक्ट्रॉनिक मिडियानंही पाहिलेलं नाही. दैवावर भरोसा ठेऊन ही मंडळी जगताहेत! साऱ्या सरकारी सुविधा तोकड्या पडताहेत पण मंत्रीगण सारं काही आलबेल असल्याचं सांगून स्वतःचीच पाठ थोपटताहेत!

देशाचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाबाबतच्या पत्रकार परिषदेत जी काही माहिती दिली ती वस्तुस्थितीच्या विपर्यस्त होती. देशातले १७६ जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. तो रोखण्यात सरकारला यश आलंय. असं रेटून सांगण्यात आलं. मात्र वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. देशातल्या एकूण ७३८ जिल्ह्यांपैकी २७२ जिल्हे मुळातच अत्यंत मागासलेले आहेत. ज्यांना केंद्राचा 'बॅकवर्ड रिजन ग्रांट फंड' दिला जातो. हे जिल्हे अतिमागासलेले, दुर्गमभागातले जिथं मूलभूत सुविधाही नाहीत असे हे जिल्हे आहेत. जिथं तीन-चार गावाला मिळून सांगण्यासाठी म्हणून एखादी टपरीवजा प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. ताप-खोकल्याची औषधं मिळतील एवढंच काय ते केंद्र. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तर दूरच पण इथं साधी रुग्णशय्याही नसते. ५ मेच्या आकडेवारीनुसार या २७२ जिल्ह्यांपैकी २४३ जिल्ह्यात ३९ लाख १६ हजार लोकांना कोरोनाची लागण झालीय. आठ महिन्यांपूर्वी १६ सप्टेंबर २०२० ला कोरोनाच्या पहिल्या लाटेत ९ लाख ५० हजार लोकांना लागण झालेली होती. आज त्याची संख्या चौपट झालीय. पण त्याबाबत कुठंच दखल घेतली गेली नाही. १६ सप्टेंबरला ९ हजार ५५५ लोक मृत्युमुखी पडले होते. ५ मे २०२१ ला ह्याच संख्येत वाढ होऊन ती ३६ हजार ६२३ एवढी झालीय. मृत्यूची संख्याही चौपट झालीय. इथल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक जीवांची किंमत आहे मग तो शहरी असो नाही तर ग्रामीण भागातल्या असोत. २४३ जिल्हे जे सांगितले आहेत त्या ५ राज्यातील ही संख्या ५४ टक्के एवढी आहे. बिहार मधले सर्वच्या सर्व ३८ जिल्हे, उत्तरप्रदेश ३५ जिल्हे, मध्यप्रदेश ३३ जिल्हे, झारखंडचे २३ जिल्हे, ओरिसाचे २० जिल्हे आहेत. आजवर कोरोनाच्या या महामारीचे अनेक सर्व्हे झालेत पण त्यात शहरी आणि ग्रामीण असा स्वतंत्र आढावा कधी घेतलाच गेला नाही. शहरांचा सगळेच आढावा घेताहेत, तो घेतलाच गेला पाहिजे; पण ग्रामीण भागात किती संक्रमण झालंय, किती बरे झाले, किती कामी आले? हे ही पाहायला हवंय ना! शहर आणि ग्रामीण भागाचा तौलनिक आढावा घ्यायला हवाय; पण तोही कुणी घेतलेला नाही. ज्या जिल्ह्यांची आकडेवारी मी दिलीय त्या जिल्ह्यात मूलभूत सुविधादेखील नाहीत. उत्तरभारतात अशी हजारो गावं आहेत तिथं दररोज अनेकांचा मृत्यू होतोय पण त्याची कुठं नोंदच होत नाही कारण तिथं 'त्याला ताप आला अन तो गेला...!' असं सांगण्यात येतं. आपण इथं रेमडीसीविर, टॅमिफ्लू, प्लाझ्मा अशा औषधांवर चर्चा करतो; त्यासाठी दारोदार भटकतो आहोत तिथं साधं पॅरासिटीमॉल मिळत नाही. तरीही तिथलं कुणीच तक्रार करत नाहीयेत. आम्ही आमच्याच धुंदीत आहोत. पण जो एक 'भारत' आहे तो लाचार बनलाय. त्याचा आक्रोश कुणालाच कळत नाहीये. पाच राज्याच्या निवडणुकांसोबत उत्तरप्रदेशच्या पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्यात. ४ एप्रिलपर्यंत कारण ५ एप्रिलला मतदान झालं त्याआधी वर्षभरात संपूर्ण उत्तरप्रदेशात ६ लाख ३० हजार लोक संक्रमीत झाले होते. ५ एप्रिलपासून ५ मे या महिन्याभरात हाच आकडा १४ लाख झालाय. कुणाला याचा पत्ताच लागला नाही. गाईंसाठी थर्मल मीटर, ऑक्सि मीटर यांची व्यवस्था केली गेली पण माणसांसाठी केली नाही. या निवडणुकांसाठी जो कर्मचारी वापरला गेला, यापैकी दोन हजाराहून अधिकांचा मृत्यू झालाय; ज्यात सातशे शिक्षक होते. १३७ पोलिसही मृत्युमुखी पडलेत. तर ४ हजार ११७ संक्रमीत झालेत! असं सरकारी कर्मचारी संघटनेचं म्हणणं आहे.

देशात जितके व्हेंटिलेटर्स नाहीत, त्याहून अधिक लोक व्हेंटिलेटरवर कसे कायअसू शकतात? जितके आयसीयू बेड नाहीत त्याहून कितीतरी पटीनं रुग्ण कसे त्यावर असतील? ज्या संख्येने ऑक्सिजन सिलिंडर नाहीत त्याहून अधिक विविध रुग्णालयात असलेले वेगवेगळे रुग्ण कसा काय वापर करू शकतात? हे जे आकडे डॉ.हर्षवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिले आहेत. यांचं आश्चर्य वाटतं. सरकार या कोरोनाच्या रुग्णसेवेची वस्तुस्थिती देण्याच्या मानसिकतेत आहे का? देशात किती आयसीयू बेड आहेत, व्हेंटिलेटर्स आहेत, ऑक्सिजन सिलिंडर आहेत, रुग्णांनी घरांत लावले आहेत वा रुग्णालयात वापरात आहेत. होणाऱ्या मृतांचे आकडे लपविणं, रुग्णाची माहिती न देणं, संक्रमीत झालेल्यांची माहिती लपवणं, रुग्ण तपासणीचा वेग कमी करणं, हे देशात सातत्यानं होत आलंय. याची माहिती लोकांनी घेणं गरजेचं आहे कारण असे प्रकार दिवसेंदिवस वाढताहेत. हर्षवर्धन यांनी जी आकडेवारीची माहिती दिली आणि विविध सरकारी, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमांकडून संकलित केलेली माहिती पाहता त्यात खूप मोठी तफावत आढळून येतेय. पण सरकारकडून अशी चुकीची माहिती का दिली जातेय? माध्यमं याबाबत काही धांडोळा घेत नाहीत, लोकांसमोर माहिती ठेवत नाहीत. दिवसेंदिवस राज्यातले आकडे कमी होत असले तरी देशातले हेच आकडे वाढताहेत. आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी जी माहिती दिली त्यानुसार ४ लाख ८८ हजार ८६१ रुग्ण आयसीयू मध्ये दाखल आहेत. व्हेंटिलेटरवर १ लाख ७० हजार ८४१ रुग्ण आहेत. ९ लाख २ हजार २९१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. आम्ही या आकडेवारीचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. आरोग्यमंत्र्यांनी जी आकडेवारी सांगितलीय तेवढी ही संसाधने देशात उपलब्ध आहेत की नाहीत! 'नॅशनल हेल्थ प्रोफाईल' या संस्थेनं जो २०१९ मध्ये अहवाल सादर केलाय, 'नॅशनल सॅम्पल सर्व्हे' केलाय त्याला आधारभूत धरलंय. शिवाय 'पब्लिक टीचिंग हॉस्पिटल'च्या क्रिटिकल केअर बेडशी संबंधित 'आयसीयू केअर अँड सॅटिस्टिक' नावाचं जे एक नियतकालिक निघतं त्यातील 'आयसीयू केअर इन इंडिया स्टेटस अँड चॅलेंजेस', आणखी एक 'जर्नल ऑफ फिजिशियनऑफ इंडिया' याबरोबरच 'सेंटर फॉर डिसीझ डायनॉमिक, इकॉनॉमिक पॉलिसी-cddep' ही संस्था दिल्लीत आणि वाशिंग्टन इथं कार्यरत आहे. या आणि इतर ठिकाणाहून माहिती संकलित केली तेव्हा समजलं की, २०१९ मध्ये म्हणजे कोविडच्या आधी २०२०च्या प्रारंभी वा एप्रिल महिन्यातली स्थिती लक्षांत घ्या. देशातले सरकारी, निमसरकारी आणि खासगी हॉस्पिटल जी आहेत या सगळ्यांची गोळाबेरीज केली तर एक लाखाहून कमी आयसीयू बेड आहेत आणि आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय की, देशात ४लाख ८८हजार ८६१ रुग्ण आयसीयू बेडवर आहेत. देशात ४८ हजार व्हेंटिलेटर्स आहेत. पीएम केअर फंडातून ५८ हजार व्हॅटिलेटर्सची ऑर्डर दिली गेली होती जेणेकरून आयसीयूमध्ये जितके बेड आहेत तितके व्हेंटिलेटर्स असायला हवेत. कारण केवळ ५०% आयसीयू बेडशी निगडित व्हेंटिलेटर्स होती. पीएम केअर फंडातून ५८ हजार व्हेंटिलेटर्सची जी ऑर्डर दिली गेली होती त्यापैकी ३० हजार व्हेंटिलेटर्स प्राप्त झाली. ती देशभरात पाठवली पण त्यापैकी काही अनेक ठिकाणी कार्यरत झाली नाहीत, ८० टक्क्यांहून अधिक व्हेंटिलेटर्स नादुरुस्त असल्यानं पडून राहिली. त्यानंतर पुन्हा पीएम केअर फंडातून ४९ हजार ३५० व्हेंटिलेटर्सची ऑर्डर दिली गेली. याची किंमत होती १ हजार ७१० कोटी रुपये. यातूनही ३० हजार व्हेंटिलेटर्स उपलब्ध झालेत. निरनिराळ्या जिल्ह्यात पाठवलेले आणि तिथं उपलब्ध असलेले व्हेंटिलेटर्सची संख्या पाहिली तरी ती लाखात भरत नाहीत. पण आरोग्यमंत्र्यांनी सांगितलंय की, १ लाख ७० हजार ८४१ व्हेंटिलेटर्सवर रुग्ण आहेत. देशात लहान मोठ्या सिलिंडर्सची मोजणी केली तरी त्याची संख्या ५ लाख पार करत नाही. पण आरोग्यमंत्र्यांनी ठासून सांगितलंय की, ९ लाख २ हजार २९१ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. इथून असं वाटायला लागतं की, सरकार काही बाबी लपविण्यावर विश्वास ठेवतेय का? का जी काम करताहेत त्याची जाहिरातबाजी करण्यातच धन्यता मानतेय. सरकार ह्या आरोग्यसेवेच्या सुविधांवर श्वेतपत्रिका काढायला तयार आहे का? ज्यामुळं वस्तुस्थिती समोर येईल. देशात असलेली आरोग्यसुविधा आणि परदेशातून आलेली मदत ह्या सर्वबाबी एकत्र केल्या तरीदेखील रुग्णांची संख्या अधिक आढळतेय.
सुप्रीम कोर्टानं सरकारची कार्यपद्धती पाहून कोरोनाच्या या लढ्यासाठी स्वतः 'टास्कफोर्स' ची निर्मिती केलीय. १२ जणांच्या या फोर्समध्ये एक आरोग्य खात्याचा सचिव असेल आणि आणखी एक केंद्र सरकारचे मुख्यसचिव नेमतील तर दहा जण कोर्टाने नेमले आहेत. देशात पहिल्यांदा मासलेव्हलवर इलाज करण्याची गरज आहे. या टास्कफोर्समध्ये दोन वगळता सारे सदस्य हे खासगी हॉस्पिटलशी संबंधित आहेत. खासगी हॉस्पिटल्स ही प्रॉफिटबेस पद्धतीनं चालविली जातात आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न प्रतिबेड ४० लाखापासून १ कोटी ४० लाखापर्यंत आहे. इथं गरज आहे ती आरोग्याच्या मूलभूत सुविधा-इन्फ्रास्ट्रक्चर आणि उपचाराची! तीच मुळात नसल्यानं हॉस्पिटल्सपासून स्मशानांपर्यंत सर्वत्र लूट चालविली जातेय. आरोग्यसेवा, शिक्षण, पाणी याकडं सरकारांनी लक्षच दिलेलं नाही. निवडणुकांसाठी उत्साही असलेल्या देशाच्या नेतृत्वानं आजवर प्रत्येक राज्याच्या निवडणुकीत ज्या पॅकेजेस जी घोषणा केलीय, शिवाय गेल्यावर्षी कोरोना काळात २० लाख कोटींची घोषणा केली ती कुठं कशी गेली हे समजलं नाही. जम्मू काश्मीरच्या निवडणूकीत ८० हजार कोटी, बिहारला सव्वालाख कोटी, इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली लाल किल्ल्यावरच्या भाषणातून २ लाख कोटी, शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी २लाख कोटी, ही पॅकेजेस दिली गेलीत का तर त्याचं उत्तर नाही असंच आहे. फुटकळ रक्कम दिली गेलीय एवढंच नाही तर आपादस्थितीतही घोषित रक्कम दिली गेली नाही ही वस्तुस्थिती आहे. सरकारनं जर घोषित रक्कम इथल्या आरोग्यसेवेसाठी वापरली असती तर ही स्थिती उद्भवलीच नसती.

ग्रामीण भागात पसरलेला कोरोना आटोक्यात आणणं हे एक दिव्य आहे. तिथं चाचण्याच होत नसल्यानं आकडेवारी तरी कशी येणार? आणि त्यांच्यावर उपचार तरी कसे होणार? 'खेड्याकडं चला...!' हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश कोरोनानं किती गांभीर्यानं घेतलं हे अक्राळविक्राळ पसरलेली शहरं आणि भकास बनलेली खेडी पाहिल्यावर आढळून येतं पण कोरोनानं मात्र राष्ट्रपित्यांचा संदेश घेऊन ग्रामीण भागात मुसंडी मारलीय. देशातल्या २४ राज्यांपैकी १३ राज्यातल्या ग्रामीण भागात अधिक शिरकाव केल्याचं दिसतंय. शहरात ३५ तर ग्रामीण भागात ६५ टक्के असं कोरोनाचं प्रमाण उत्तरेकडील राज्यात आढळून आलंय. अशा परिस्थितीत इथला बकालपणा आणि वैद्यकीय सुविधांची वानवा असल्यानं कोरोनाचा प्रसार असाच होत राहिला तर काय होईल हे बिहारच्या गंगा-यमुनेच्या पात्रात तरंगत्या शंभराहून अधिक प्रेतांनी दाखवून दिलंय. न्युज२४ या वाहिनीनं उत्तरेकडच्या ग्रामीण भागातल्या कोरोनाचं भयाण वास्तव दाखवलंय. इथली अंधश्रद्धाही दाखवलीय. कोरोना जाण्यासाठी कुठं हवन केलं जातंय. कुठं गावच्या वेशीवर कोंबड्याबकऱ्यांचा बळी देऊन त्यांचे रक्त गावच्या सीमांवर शिंपडून कोरोनाचा फेरा परतवण्याचा अक्कलशुन्य प्रयत्न होताना दिसतंय. हे सारं शहरी लोकांना अजब वाटतं. त्यावर ते हसतील पण कितींनी किती उत्साहात टाळ्याथाळ्या बडवल्या, दिवे पेटवले याची आठवण करावी त्या बिचारी गावकऱ्यांना का दोष द्यायचा! सरकारनं आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडलेलं नाही. 'मुकी बिचारी कुणीही हाका...!' अशा अवस्थेत लोकांना वाऱ्यावर सोडलंय. गावची स्मशानं कमी पडताहेत. जाळायला लाकडं नाहीत म्हणून प्रेत नदीच्या पात्रात टाकली जाताहेत हे आणखी भयंकर आहे. जर पाणी संक्रमीत झालं हे हाहाःकार माजेल. वेळीच पावलं उचलायला हवीत. न्यायालयानं हस्तक्षेप करून सरकारला आदेश द्यावेत हे सरकारला कमीपणा आणणारा किंबहुना सरकार प्रशासन चालवायला जनतेचा जीव वाचवायला सक्षम नाही, लायक नाही हे दाखवून देतंय. 'सरकारच्या कुणाला तरी खुनी ठरवणं,' 'कुणाला तरी फासावर लटकवणं', 'तुम्ही डोळे मिटले असतील पण आम्ही नाही' असं न्यायालयांनी म्हणावं यातच सरकारची अकार्यक्षमता दिसून येतंय. आतातरी या भयानक परिस्थितीला सामोरं जाऊन लोकांना दिलासा द्या. त्यांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न करा एवढीच विनंती...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 8 May 2021

पोलीस एन्काऊंटर....

मुंबई पोलिसांच्या इतिहासाचा विचार केल्यास एकेकाळी एन्काउंटरसाठी परिचित असलेल्या मुंबईची आठवण निघणं सहाजिक आहे. मुंबईतल्या टोळ्या आणि त्यांच्यातले द्वंद्व संपवण्यासाठी पोलिसांनी कसे मोठमोठ्या म्होरक्यांना कंठस्नान घातले, यावर तर अनेक सिनेमेही बनले आहेत. ते किती सत्य, हा विषय दुसराच, मात्र हो, एकेकाळी मुंबईत एन्काऊंटर हा शब्द तितकाच सर्रास उच्चारला जायचा, जितका आजही तो चर्चिला जातोय. इतिहासातील त्या पानांवर जाण्याआधी हैदराबादच्या घटनेच्या जवळ जाणारी एक घटना २८ वर्षांपूर्वी मुंबईत घडली होती, तिचा उल्लेख आवश्यक वाटतो. त्या घटनेचाही शेवट एन्काउंटरनं झाला होता.

२८ वर्षांपूर्वी पोलिसांनी केला होता एन्काउंटर
तारीख ७ एप्रिल १९९१. मुंबईतल्या आग्रिपाड्यात १३ वर्षीय मुलीवर बलात्काराची घटना घडली होती. बाली नांदिवडेकर -वय २७ वर्षं आणि बाबा परमेश्वर -वय २८ वर्षं असे दोन आरोपी तेव्हा 'बाबा-बाली' नावानं ओळखले जायचे. या प्रकरणातील आरोपींचा खात्मा करणाऱ्या अंबादास पोटे आणि सुधीर निरगुडकर या पोलीस अधिकाऱ्यांनी द एशियन एजच्या पत्रकार वृषाली पुरंदरे यांना तेव्हाचा घटनाक्रम सांगितला होता. नांदिवडेकर आणि परमेश्वर यांनी घरापर्यंत मुलीचा पाठलाग केला. त्यानंतर मुलीच्या वडिलांना पकडून ठेवलं. दोघांनाही मारून टाकण्याची धमकी दिली आणि मुलीला दारू, गांजा पाजून तिच्यावर आळीपाळीनं बलात्कार केला. या घटनेनं मुंबई हादरली होती. तत्कालीन डीसीपी अरूप पटनाईक यांनी दोन्ही आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार केलं. त्यात अंबादास पोटे आणि सुधीर निरगुडकर होते. नांदिवडेकर आणि परमेश्वर कलिन्यात आणखी एका गुन्ह्यासाठी येणार आहेत, अशी माहिती या पोटेंना मिळाली होती. त्यानुसार दोघेही कलिन्यात आरोपींची वाट पाहत लपून बसले. पोटेंना मिळालेली माहिती खरी ठरली होती. दोन्ही आरोपी तिथं आले. मात्र दोघंही कलिन्यातल्या अरूंद भागात घुसले. एका क्षणी आरोपींना कळलं की पोलीस आपला पाठलाग करतायत, कारण निरगुडकर पोलीस वर्दीतच होते. दोघेही पळू लागले. आम्ही त्यांना थांबण्याचं आवाहन केलं. आम्ही तिथं कुठलीच कारवाई करू शकत नव्हतो, कारण तो गर्दीचा परिसर होता, असं पोटेंनी पुरंदरेशी बोलताना सांगितलं होतं. त्याचवेळी पोटेंसोबत असलेले पोलीस कॉन्स्टेबल बाबा राणे हे दोन्ही आरोपींचा वेगवान पाठलाग करत होते. त्याचवेळी नांदिवडेकरनं बाबा राणेंच्या छातीवर चॉपरनं हल्ला केला आणि ते रक्तानं माखले. इतर पोलिसांनी त्यांना जवळील हॉस्पिटलला हलवलं. काही वेळानं परमेश्वरनं निरगुडकरांवर चॉपरनं हल्ला केला. तेही त्यात जखमी झाले. बाबा-बालीच्या या प्राणघातक पाठलागावेळी निरगुडकर आणि पोटेंनी त्यांच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या आणि त्यात दोन्ही आरोपी जमिनीवर कोसळले.

२८ वर्षांपूर्वी मुंबईत या दोन्ही आरोपींना ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर अंबादास पोटे पुढे डीसीपी म्हणून निवृत्त झाले, तर सुधीर निरगुडकर सध्या मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. ही एक घटना झाली. मात्र, मुंबई शहरानं याआधीही एन्काउंटरचा अनुभव घेतला होता आणि तोही एक-दोन नव्हे तर शेकडोवेळा. गँगवॉर, गँगस्टर, डॉन, माफिया, मर्डर, स्मगलिंग हे शब्द मुंबई शहरात तेव्हा नेहमीचे झाले होते, असा तो क्रूर काळ होता. मात्र, यातल्या फक्त एन्काउंटरशी संबंधित बोलायचं झाल्यास, त्याची सुरुवात होते मन्या सुर्वेपासून.

मुंबईतलं पहिलं एन्काउंटर
मनोहर अर्जुन सर्वे उर्फ मुंबईतला एकेकाळचा कुख्यात गुंड मन्या सुर्वे. दादरमधील कीर्ती कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलेल्या मन्या सुर्वेनं १९७०-८० दशकात मुंबईतल्या गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला होता. दाऊद इब्राहिमला आव्हान देणारा डॉन म्हणून मन्या सुर्वेची ओळख निर्माण झाली होती. १० जानेवारी १९८० रोजी मुंबईतल्या आंबेडकर कॉलेजबाहेरच्या ब्युटी पार्लरजवळ मन्या त्याच्या गर्लफ्रेण्डसोबत आला होता. "आम्हाला मन्याला मारायचं नव्हतं. त्याला अटक करून न्यायापर्यंत पोहोचवायचं होतं. पण तिथल्या परिस्थितीनं स्वसंरक्षणासाठी आम्हाला बंदूक चालवावी लागली," असं मन्या सुर्वेचा एन्काउंटर करणारे माजी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांनी हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सांगितलं होतं. मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा मुंबईसह देशातला पहिला एन्काउंटर मानला जातो.

१९८३ ची बॅच
मुंबईच्या या एन्काउंटर हिस्ट्रीतली मैलाची दगड ठरली ते १९८३ ची बॅच. वरिष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी हिंदुस्तान टाइम्समधील लेखात १९८३ च्या बॅचला 'किलर बॅच' म्हटलंय. या बॅचनं मुंबईतील गुन्हेगारी विश्वात धडकी भरवली होती. प्रदीप शर्मा, प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर, रवींद्र आंग्रे, अस्लम मोमीन या अधिकाऱ्यांना नाशिक पोलीस ट्रेनिंग स्कूलमधूये विशेष प्रशिक्षण देण्यात आलं होतं. ही बॅच १९८४ साली सेवेत दाखल झाली. प्रदीप शर्मा हे यंदाच्या विधानसभा निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा (१८ ऑक्टोबर रोजी) बीबीसी मराठीनं निवृत्त पोलीस महासंचालक अरविंद इनामदार यांच्याशी बातचीत केली होती. त्यावेळी १९८३ च्या बॅचबद्दल बोलताना अरविंद इनामदार म्हणाले होते, "१९९०च्या दशकात मुंबईतील गँगवॉर खूप वाढलं होतं. त्यावेळी खास पथकं तयार केली. दाऊद इब्राहिमवर पहिल्यांदा धाड टाकून, तीन-साडेतीन कोटींचं सोनं जप्त केलं. नंतर अरुण गवळी, छोटा शकीलला अटक केली. त्यावेळी हे सर्व अधिकारी उत्तम काम करत होते. हे सर्व ग्रेट फायटर्स होते. त्यांना प्रशिक्षणच तसं दिलं होतं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती. असंही इनामदार म्हणाले होते. अरविंद इनामदार यांचं नुकतंच ८ नोव्हेंबर २०१९ रोजी निधन झालं.

धगधगतं ऐंशीचं दशक
१९८३ ची बॅच सेवेत आली, त्याचवेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देश सोडून पळून गेला होता. मुंबई मात्र गँगस्टर आणि माफियांशी झुंज देत होतीच. त्यामुळं १९८३ ची बॅच दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या गँगशी लढा देत होती. "ऐशींच्या दशकात अंडरवर्ल्ड मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे, दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या मोठ्या टोळ्या होत्या. आर्थिक गोष्टींवरून हे गँगवार सुरू होतं. त्यामुळं ज्यांना आपण एन्काउंटर म्हणतो, ते याच काळात अधिक सुरू झालं. ऐंशीच्या दशकात गोदीमधून स्मगलिंग चालायचं. त्यावेळी दुबईच्या कपड्यांना प्रचंड मागणी असायची. त्यावेळी हे कंटेनरच्या कंटेनर पळवायचे. त्यातून या टोळ्या तयार झाल्या. त्यातून मग आर्थिक व्यवहारातून गँगवार सुरू झाला. मात्र, हुसैन झैदी हे मुंबईतल्या एन्काउंटरच्या काळाची नव्वदीआधी आणि नव्वदीनंतर, अशी विभागणी करतात. नव्वदीच्या आधी एन्काउंटर तुरळक प्रमाणात व्हायचे. म्हणजे १९८२ साली इशाक बागवान यांनी मन्या सुर्वेला ठार केलं, १९८७ साली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला ठार केलं, १९८७ साली पोलीस उपनिरीक्षक इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना ठार केलं. मात्र, नव्वदीनंतर आणि विशेषत: १९९३ च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे नेहमीचे झाले. त्यानंतर १९९५ साली पोलीस अधिकारी आर. डी. त्यागींनी गुन्हे शाखा आणि विभागीय उपायुक्तांना आदेश देऊन प्रत्येक विभागातील १० वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करायला सांगितली.

दुसरीकडे, तत्कालीन डीसीपी सत्यपाल सिंग आणि तत्कालीन डीसीपी परमबीर सिंग यांनी एन्काउंटर स्क्वॉड तयार केले, ज्यात १९८३ च्या बॅचचे अनेक अधिकारी होते. प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा अशांकडे या स्क्वॉडचं नेतृत्त्व देण्यात आलं. या अधिकाऱ्यांना ताकद देण्यात आली आणि या तिन्ही अधिकाऱ्यांनी मुंबईतल्या माफियांविरोधात लढा सुरू केला. १९९३ नंतर मुंबईतली गँगवर संपवण्यासाठी पोलीस विभाग आणि तत्कालीन राजकीय नेतृत्त्वांनी केलेल्या प्रयत्नांमुळं हे संपुष्टात येण्यास सुरुवात झाली १९९८ नंतर गँगवार कमीच झालं, कारण तोपर्यंत काही गँगस्टरना पोलिसांनी ठार केलं होतं, तर दाऊद, छोटा राजनसारखे अनेकजण परदेशात पळून गेले होते. मात्र, परदेशातही या टोळ्याचं गँगवर कुठे ना कुठे सुरूच राहिलं. छोटा राजनवरील लंडनमधील हल्ला हा त्याचाच प्रकार होता.
'एन्काउंटर स्पेशालिस्ट'
पुढे हे अधिकारी 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' म्हणून नावाजले. मात्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्यानुसार "पोलीस विभागात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अशी काहीच गोष्ट नसते. सगळ्यांना सारखंच प्रशिक्षण दिलं जातं. एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी काही गोष्ट नसली तरी या अधिकाऱ्यांचं खबऱ्यांचं नेटवर्क मोठं होतं. त्याचा फायदा यांना कारवाईत व्हायचा. असं नेटवर्क सगळ्यांकडेच नसायचं. पोलीस विभागात 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' अशी पदवी किंवा विशिष्ट गोष्ट नसली तरी त्यांच्या धाडसामुळं बाहेर त्यांची तशी ओळख निर्माण होते. अशा गोष्टींसाठी मनोबल कणखर असायला हवं तरच अशा कारवाया केल्या जातात. प्रत्येक एन्काउंटरची चौकशी होत असते, त्यावेळी पुरावे सादर करावे लागतात, आपली बाजू मांडावी लागते. त्यामुळे धाडस आणि मनोबल असल्याशिवाय कुणीही हे करू शकत नाही. अन्यथा, मुंबईत इतके पोलीस होते, सगळ्यांनीच हे का केले नाही. नेमक्याच जणांनी पुढाकार घेतला आणि अशा कारवाया केल्या, मुंबईतल्या गँगवॉरला संपवण्यासाठी प्रदीप शर्मा, दया नायक, सचिन वाझे, रवींद्र आंग्रे, विजय साळसकर यांच्यासारख्या अनेक मोठ्या अधिकाऱ्यांची नावं अग्रक्रमाने पुढे येतात.

पोलीस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद
मुंबईतल्या एन्काउंटरची जशी चर्चा झाली तशी एन्काउंटर स्पेशालिस्टमधील वादांचीही झाली. त्यातला गाजलेला वाद म्हणजे प्रदीप शर्मा विरुद्ध विजय साळसकर यांचा. काही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना साळसकर आणि माझ्यात जमत नाही, हे माध्यमांनी जे पसरवलं होतं, असं सांगितलं होतं. तसं खरंतर काहीच नव्हतं. आमची भांडणं फक्त खबऱ्यांवरून व्हायची. त्याचा खबरी असेल तर मी त्याला ट्रॅप करायचो, माझ्या बाजूला वळवायचा प्रयत्न करायचो. माझे खबरी तो वळवायचा. अबोला असं काही नव्हतं, ते म्हणाले
शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. पोलीस प्रशिक्षणात आडनावाच्या पहिल्या अक्षरापासून स्क्वॉड तयार केले जातात. त्यांचं साळसकर आणि माझं शर्मा आडनाव, त्यामुळं १९८३ मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही एकाच स्क्वॉडमध्ये होतो. वर्षभर एकत्र राहिलो, मुंबईत आल्यानंतरही बरीच वर्षं एकत्र होतो. क्राईम ब्रांचलाही आम्ही एकत्र काम केलंय. काही मोठमोठे ऑपरेशनही आम्ही एकत्र केलेत. विजय साळसकरांसोबत केलेली कामं आजही आठवतात. सगळ्यांत जास्त इन्फर्मेशन नेटवर्क असणारा अधिकारी म्हणून आजही विजय साळसकरांना मी मानतो. माझ्यापेक्षा शंभर पटीनं जास्त नेटवर्क त्यांचं होतं, असं शर्मा यांनी त्या मुलाखतीत बोलले होते.

वादातला एन्काउंटर
मात्र जिथे एन्काउंटर हा शब्द आला, तिथे वाद येणारच. मुंबईतलेही बरेच एन्काउंटर वादग्रस्त ठरले. त्यातील लखन भैय्या एन्काउंटरची सर्वाधिक चर्चा झाली. २००९ साली रामनारायण गुप्ता उर्फ लखन भैय्या यांच्या हत्येप्रकरणी प्रदीप शर्मा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह एकूण १३ पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, चार वर्षं ठाणे मध्यवर्ती कारागृहात काढल्यानंतर ३०१३ साली प्रदीप शर्मांची सुटका झाली.

महाराष्ट्रातील पहिला एन्काउंटर अहमदनगरमध्ये!
मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा महाराष्ट्रातील पहिला एन्काउंटर मानला जात असला तरी काहींच्या मते तसं नाहीय. मन्या सुर्वेचा एन्काउंटर हा मुंबईत नोंद झालेला पहिला एन्काउंटर आहे. मात्र महाराष्ट्रात याआधीही एन्काउंटर झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे गावगुंड असलेल्या किसन सावजी याचा एन्काउंटर करण्यात आला होता. पीएसआय वसतं गिरीधर ढुमणे यांनी सावजीचा खात्मा केला होता.

राजकारण: सोयीचे, सुडाचे!


नियुक्ती, बढती आणि बदली या तिन्ही गोष्टी सरकारच्या हातात असल्याने सत्ताधीशांशी शक्यतोवर अनुकूल वागणाऱ्या नोकरशाहीचे असंख्य किस्से आहेत, चांगल्या-वाईट बाबी आहेत. काहीजण नेमून दिलेले काम मान खाली घालून करणारे आहेत, तर काहीजण विलक्षण गतीने दोन जास्तीची कामे उरकणारे आहेत. लोकांच्या मनात सरकारबद्दल निर्माण झालेली प्रतिमा, शासन आणि प्रशासन यांच्या परस्परपुरक भूमिका याबद्दल बरीवाईट चर्चा करताना  नोकरशाहीच्या वर्तुळात गंमतीने म्हटलं जातं की, एखाद्या वरिष्ठाने आपल्या कनिष्ठ सहकाऱ्याला दोऱ्याचा एक रीळ आणायला सांगितल्यानंतर तो कनिष्ठ जर सर्व प्रकारच्या रंगांच्या रिळांचं खोकंच घेऊन आला तर वरिष्ठाचे डोळे चमकतात. त्यांना याचं फार अप्रूप वाटतं आणि हा माणूस आपल्या भयंकर कामाचा आहे, असे त्या वरिष्ठाला वाटू लागते. बहुतेकवेळा असे वरिष्ठ आपल्या कनिष्ठांना मग महावस्त्रच विणायची जबाबदारी देतात. अशा लोकांची मोठी चलती असते.


गेल्या पंचविसेक वर्षांचा इतिहास पाहिला तर लोकशाही व्यवस्थेत सत्तापक्ष आणि प्रतिपक्ष बदलला तरी आरोप, भानगडींचे किस्से थोड्याफार फरकाने सारखेच असतात. काही गोष्टींची चर्चा काही काळ होते, काहींची होतही नाही. काही गोष्टी जनतेलाही समजत असतात. पण त्या सातत्य राखून व्यवस्थित मांडणारा पक्ष किंवा संघटना का पुढे येत नाही, याचे त्याला वैषम्य वाटत असते. सध्या राज्यभर चर्चा सुरू असलेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेले परमबीर सिंग यांची सुमारे ३२ वर्षांची सेवा झालेली आहे. त्यांच्याकडे गमावण्यासारखे फारसे काही शिल्लक नाही. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या शहराचे आयुक्तपद भूषविल्यानंतर इतर पदांचे कोणाला फारसे अप्रुप वाटत नाही. बहुतेक त्यामुळे त्यांनी आपल्या भविष्यातील उर्वरित सेवेवर काय परिणाम होईल किंवा निवृत्तीनंतर एखाद्या प्राधिकरणावर नियुक्ती मिळेल की नाही याचा फारसा विचार न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिशय खळबळजनक पत्र लिहिले आणि त्याची प्रत आवर्जून राजभवनवर पाठविली. त्यातील मजकूर पुढे कसा निवडक एक-दोन वाहिन्यांकडे व पुढे सर्वांकडे कसा आला हा त्यांच्या विभागाकडून होणाऱ्या तपासासारखा रंजक भाग आहे. एकूणच या प्रकरणाबाबत काही वेगळे मुद्दे उपस्थित होतात, त्याची चर्चा पुढे मुद्द्यांद्वारे करण्यापूर्वी सत्तेतील लोक आणि ‘विशेष जबाबदारी’ असलेले लोक यांच्याविषयीच्या काही किश्श्यांची चर्चा करावी लागते.

श्री. सिंग हे ठाणे येथे आयुक्तपदी असतानाच्या काळात पेट्रोलजन्य पदार्थांतील भेसळीचे रॅकेट उघडकीस आले होते. बनावट टेलिफोन एक्सचेंजचे प्रकरणही त्याच काळात पुढे आले आणि बरेच चर्चीले गेले. या प्रकरणांची व्याप्तीही मोठी होती. ते पूर्वी मुंबईत गुन्हे शाखेत असताना अंमली पदार्थांच्या व्यापाराचे रॅकेट उघडकीला आले होते. तयार शर्ट बनवणाऱ्या एका नामवंत कंपनीचा मालक व पेज थ्री पार्ट्यात चमकणारी काही बडी मंडळी त्यात आढळल्याने ते प्रकरणसुद्धा बरेच चर्चीले गेले. काही उलट-सुलट गोष्टींचीही चर्चा झाली. ठाण्याच्या आयुक्तपदी असताना मागील भाजपा नेतृत्वाखालील सरकारचे ते खूप आवडते होते असे म्हटले जात असे. मुंबई आयुक्तपदासाठी त्यांचे नाव हमखास घेतले जाई. पण त्यांच्या मार्गात एक-दोन वरिष्ठांचे अडथळे होते. आयुक्तपदासाठी त्यांचे नाव मागे पडून राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख म्हणून ते नियुक्त झाले. तेव्हा त्यांची आयुक्तपदाची संधी हुकली की काय अशी चर्चा होती. पण राज्यातील भाजपाचे सरकार गेले. पहाटेचा शपथविधी होऊन आलेले सरकारही अल्पायुषी ठरले. मात्र दरम्यानच्या काळात बहुचर्चित सिंचन घोटाळ्यात प्रतिज्ञापत्र सादर करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतलेली भूमिका चकित करून गेली. कारण या विभागाचे आधीचे प्रमुख डॉ. संजय बर्वे यांच्या काळात सादर झालेल्या प्रतिज्ञापत्रापेक्षा ही भूमिका अतिशय विसंगत होती. घोटाळा कालावधीतील सत्तेवर असणारांना ती पूरक ठरणारी होती.

पोलीस दलात असे म्हटले जाते की डॉ. बर्वे यांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात विशेष प्राविण्य आहे. त्यात त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. सिंचन घोटाळ्यात मंत्रालय आणि राजकीय नेतृत्वाच्या सहभागाविषयी त्यांनी निश्चित अशी भूमिका मांडली होती. मात्र त्याच्याशी विसंगत भूमिका मांडणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर झाले. त्याचा फायदा अर्थातच सिंचन खाते ज्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते त्या पक्षाला होत होता. असे का बरे झाले असावे, यावर चर्चा सुरू असतानाच पुढे मुंबई पोलीस आयुक्तपदाची खूर्ची रिकामी झाली आणि तिथे परमबीर सिंग विराजमान झाले. कालांतराने सचिन वाझे हे ही मुंबई पोलीस दलात रुजू झाले आणि थेट गुन्हे शाखेत दाखल झाले. हा घटनाक्रम पुरेसा बोलका होता. सरकारच्या दृष्टीने सर्व गोष्टी व्यवस्थित घडत होत्या. भाजपाला बेजार करण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू झाली होती. मागील सरकारच्या काळातील अनेक योजनांचा आढावा घेतला जात होता. त्यातच पुण्यात एका तरुणीची आत्महत्या वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संबंधित प्रकरणातून झाली आहे अशी चर्चा झाली आणि भाजपाने सरकारची कोंडी केली. राठोड यांचा राजीनामा झाला. भाजपाचा आत्मविश्वास दुणावला. अधिवेशन काळातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकदा बोलून गेले की खंडणीखोरांना राम मंदिरासाठीच्या देणगीतील समर्पणभाव काय कळणार. हे वाक्य महत्त्वाचे होते. कारण यात त्यांनी खंडणी हा शब्द वापरला होता. सेनेसोबत पाच वर्षे सरकार चालविलेला नेता असे टोकाचे का बोलत असावा, असा प्रश्न उपस्थित झाला. खरे तर खंडणी हा शब्द सेनेला बेजार करण्यासाठी छगन भुजबळ यांनी १९९५ ते ९९ या दरम्यान वापरला होता. त्यावेळी सेनेचे ते कट्टर राजकीय शत्रू होते. त्यानंतर प्रथमच हा शब्द वापरला गेला. मात्र हळूहळू पुढे त्याचा उलगडा होत गेला. 

तिकडे अतिप्रेमातून अवज्ञेचे गंभीर प्रकार घडले. असे म्हणतात की रात्रीच्या मुंबईला सचिन वाझे स्वॉड हे नवे पथक काय आहे असा प्रश्न पडला होता. हे काय प्रकरण आहे की थेट या पथकाच्या संपर्कात रहा असे निरोप रात्रीच्या मुंबईत रंग भरणाऱ्या व्यवसायिकांना येऊ लागल्याची चर्चा सुरू झाली. त्यातूनच उद्योगपती मुकेश अंबानी हे राहत असलेल्या अँटिलिया या इमारतीच्या जवळच स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली तेव्हा या पथकाच्या उपद्व्यापाचा जणू घडाच भरला. या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडताच सारा खेळच उलटा-पालटा झाला. भाजपाने मग गेले वर्ष-सव्वावर्ष सहन केलेल्या कुचंबनेचे उट्टे फेडण्याचे काम सुरू केले. सरकार चालवणारे पक्ष थेट आता बचावात्मक भुमिकेत नाही तर दिग्मुढ अवस्थेत गेले असल्याचे चित्र दिसते आहे. जर ती गाडी सापडली नसती आणि हिरेन यांचा मृतदेह सापडला नसता तर बऱ्याच गोष्टी चर्चेत आल्याही नसत्या. कारण अशी पथके, त्यांचे कारनामे किंवा त्या सदृष्य गोष्टी आपल्याकडे घडतच नाहीत, यावर राजकीय वर्तुळात वावरणारी माणसे विश्वास ठेवणार नाहीत. वाझे नेमके का सेवेत आले, ते गुन्हे शाखेतच का आले, परमबीर सिंग व त्यांचे काय संबंध आहेत, याची चर्चा कदाचित झालीही नसती. पण जबाबदारीचे रुपांतर बेफिकीरीत झाले की काय होते, हे अवघा महाराष्ट्रच नव्हे तर देश पाहतो आहे. या प्रकरणातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांची गच्छंती झाली आहे. ती झाली नसती तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस आली आहे, याबाबतच्या फाईलमध्ये एक जोरदार प्रकरण समाविष्ट झाले असते. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा किंवा सरकार बरखास्त करा, अशा मागण्या किंवा चर्चेचे पिल्लू काही उगाच सोडून दिले गेलेले नाही. विधानसभा निवडणुकांच्या काळात सत्तेचा घास ओठापर्यंत आला आहे, असे समजून चालणाऱ्या भाजपाचे तोंड सत्तेच्या नव्या समिकरणामुळे अतिशय कडवट पडले होते. त्यामुळे हे समीकरण विस्कळीत करण्याची संधी हा पक्ष कधीही सोडणार नाही. मुळ मुद्दा हा आहे की, प्रत्येक सरकारांना काही खास जबाबदारी पार पाडणारे लोक हवे असतात. अशा उचापतखोर लोकांचीही काही कमतरता नाही आणि त्यांच्या सेवा वापरणारांचीही काही उणीव नाही. सरकारे बदलली, पक्ष बदलले तरी वर्षानुवर्षे काही प्रकार सुरू असल्याचे कानावर येत असते. बातम्या येतात पण नंतर अचानक त्यांचा पाठपुरावाही थांबतो. जरासे आठवण्याचा प्रयत्न केला तर काही वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागाचे एक बनावट पथक तपासणीसाठी आल्यानंतर रंगेहात पकडले गेले होते. ते पकडण्यात भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचा हात होता. या पथकाची नियुक्ती व जबाबदारी मुंबईतून ठरविली गेली होती. भाजपाने याचा पाठपुरावा केला असता तर खूप काही गोष्टी बाहेर आल्या असत्या. तो का केला नाही हे त्या पक्षाचे वरिष्ठ नेतेच जाणोत.

त्यानंतर नाशिक जिल्ह्यात लाल दिव्याच्या गाडीतून पेट्रोल पंपाच्या तपासणीसाठी काही लोक फिरत असल्याचे आढळून आले. याचेही धागेदोरे मुंबईत होते. मोठा गहजब होऊनही हे प्रकरण थंडावले. नंतर गृह खात्याच्या राज्यमंत्र्याच्या गाडीतून मुंबईतील परमीट रूम आणि बारमालकांकडून खंडणी गोळा केली जात असल्याचे उघडकीला आले. त्यावेळी विचारणा केली असता काँग्रेसचे ते राज्यमंत्री महाशय म्हणाले होते की, जी रक्कम गोळा केली जाते म्हणून तुम्ही पत्रकार मंडळी सांगताय तेवढ्या रकमेचे पान माझा मुनीम खातो. आता बोला! एका राज्यमंत्र्यांनी तर आपल्या एका मित्राची नियुक्ती कार्यालयात केली आणि त्याला खासगी सचिवाच्या कामांची जबाबदारी दिली. मंत्री कार्यालयात खासगी सचिव हे पद खूप महत्त्वाचे असते. त्या कार्यालयाचा तो प्रशासकीय प्रमुख असतो आणि मंत्री सांभाळत असलेल्या विभागाशी दैनंदिन संपर्क ठेवणे, प्रत्येक फाईल स्वतः पाहून मंत्र्यांना माहिती देणे, त्यावर स्वाक्षरी घेणे ही जबाबदारी खासगी सचिवावर असते. या पदावर शासनाबाहेरील व्यक्ती नियुक्त करता येत नाही. पण असा प्रकार घडला आणि काही काळाने त्यांना दूर करण्याचे आदेश दिले गेले होते. मंत्री एखादा स्वीय सहाय्यक (पीए) वा विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) बाहेरून घेऊ शकतात पण खासगी सचिव बाहेरचा नसतो. ही झाली काही वानगीदाखल उदाहरणे. पण अशा सर्व प्रकरणांमध्ये त्यावेळी विरोधी बाकांवर बसणाऱ्या भाजपा आणि सेनेची भूमिका काय होती तेच जाणोत. आज जनसामान्यांमध्ये फारशी चर्चा होत नसली तरी काही महत्त्वाच्या शासकीय  कार्यालयांमध्ये खासगी स्टाफ नावाचे एक प्रकरण आहे. हे खासगी लोक कोण असतात, ते कार्यालयात उच्चपदस्थांकडे सतत का असतात, त्यांची जबाबदारी काय याची चर्चा बाहेर होत नाही. पोलीस दलात अशा लोकांना वॉलेंटिअर्स (स्वयंसेवक) म्हणून ओळखले जाते. सरकारी कार्यालयाच्या रेकॉर्डवर नसलेले हे खासगी लोक विशेष मोहिमेवर असतात आणि सरकारी नियम धाब्यावर बसवून उद्योगधंदे करणाऱ्यांच्या ते संपर्कात असतात अशी चर्चा असते. मंत्रालयातसुद्धा अशा लोकांचा वावर असतो. मंत्री कार्यालयात अधिकृत कर्मचाऱ्यांसोबतच उधार-उसणावर तत्त्वावरील लोक आणि काही खासगी लोक  दिसतात. त्यापैकी काही लोक त्या कार्यालयाच्या रेकॉर्डवर मात्र आढळून येत नाहीत आणि त्यांची चर्चाही कोणी करत नाही. जर काही गडबड झालीच तर संबंधित व्यक्ती कुठे या कार्यालयाच्या आस्थापनेवर आहे, अशी भूमिका घेणे सोपे जाते. तसेच कामासाठी येणारांना आपले काम होतेय का आणि ते काय केले तर नक्की होऊ शकते याची चिंता असते. काम झाले की परतीची गाडी पकडायची असते. तेव्हा आपल्याला भेटलेला माणूस खरेच सरकारमान्य सेवेतील आहे का याच्या भानगडीत कोण कशाला पडेल? काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात एका महत्त्वाच्या कार्यालयात काही खासगी लोक नियुक्तीविनाच कार्यरत असल्याची बाब बरीच चर्चीली गेली होती. या लोकांसाठी केबीनसुद्धा बनविल्या गेल्या होत्या. सरकार बदलल्यानंतर नव्या मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही बाब गेली तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले असे म्हटले गेले होते. पण आपल्याच पक्षाच्या सरकारच्या काळात असा प्रकार घडल्याने ते काही करू शकले नव्हते. इथे एक बाब स्पष्ट होणे आवश्यक आहे की, काही विशिष्ट प्रयोजनासाठी खासगी लोक शासनाच्या नियमानुसार मंत्री, मुख्यमंत्री कार्यालयात घेता येतात. त्यांना रितसर नियुक्तीपत्रे दिली जातात. ही जुनी सर्वमान्य पद्धत आहे. मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्त करण्यात आलेल्या अशा लोकांना सरकारी कर्मचाऱ्यांसाठीचे सर्व नियम लागू करण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्यावर बंधनेही होती. खरे तर असे कर्मचारी मर्यादित प्रमाणात असायला हवेत. उदाहरणार्थ मंत्री कार्यालयात फक्त दोन लोक बाहेरील उमेदवार म्हणून घेता येतात. मुख्यमंत्री कार्यालयाचा व्याप मोठा असल्याने तिथे असा नियम नसला तरी ही संख्या शक्य तेवढी मर्यादित असावी, अशी अपेक्षा असते.

मागील सरकारच्या काळात असे खूप विशेष कार्य अधिकारी नियुक्त केले गेले आणि ते एका विशिष्ट संघटनेशी संबंधित असल्याचा आरोप केला गेला. राजकारणासाठी असे आरोप केले जाणे समजू शकते. पण वस्तुस्थिती काही वेगळीही असू शकते. खरे तर एवढ्या मोठ्या संख्येने बाहेरचे लोक तिथे घेतले जाणार आहेत, असे आधीच समजले असते तर कदाचित त्यापैकी एखाद-दुसरा तिथे रुजूही झाला नसता. कारण असे लोक त्यांच्या मूळ नोकरी-व्यवसायात त्यांच्या गुणवत्तेवर व्यवस्थित स्थिरावलेले होते. काहीही करा पण मला मुख्यमंत्री कार्यालयात रुजू करून घ्या, अशी विनवणी करत ते हातात बायो-डेटा घेऊन कोणाच्या मागे लागलेले नव्हते. किंवा त्यांच्या आई-वडिलांनी माझ्या अपत्याला मुख्यमंत्री कार्यालयात नोकरी करण्याची संधी दे देवा, असा नवस बोललेला नव्हता. अशांना तिथे रुजू करून घेण्यामागचा उद्देशही अतिशय मनोज्ञ होता असे ठामपणे म्हणता येत नाही. पण रुजू होण्यासाठी बराच पाठपुरावा झाला होता. असो.

वाझे, स्फोटकांची गाडी. परमबीर सिंग आणि भाजपा
स्फोटके असलेली गाडी सापडण्यापासून पुढे घटनाक्रम बारकाईने पाहिला तर भाजपा नेत्यांकडून घडामोडींपूर्वी अथवा दरम्यान आलेली विधाने अतिशय महत्त्वाची दिसून येतात. अलिकडेच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आणि आधी राम मंदिरासाठी देणग्या गोळा करण्याच्या मोहिमेवरून भाजपाला लक्ष्य केले जात होते. त्याला प्रत्युत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, खंडणीखोरांना राम मंदिराच्या देणगीतील समर्पणभाव काय कळणार. ज्या पक्षासोबत पाच वर्षे सोबत सरकार चालविले त्यांच्याबाबत खंडणी हा शब्द उगाच उच्चारला गेला नव्हता हे नंतर उघड झाले. याचा अर्थ सेनेचा काहीतरी खंडणीउद्योग सुरू आहे हे त्यांनी सूचित करून टाकले. स्फोटकांची गाडी, त्याचे मालक मनसुख हिरेन यांचा शोध, नंतर त्यांचा मृतदेह सापडणे या सर्व बाबी फडणवीस यांना तातडीने समजत होत्या. त्या त्यांनी वेळोवेळी उघडही केल्या. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात बोलताना तीन-चार महिने थांबा... राष्ट्रपती राजवट... हे शब्द काही वेळा उच्चारले असल्याचे दिसून आले. हे ते उगाच बोलत नव्हते हे आता स्पष्ट होते. माजी मुख्यमंत्री व भाजपाचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनीही राष्ट्रपती राजवटीचा पुनरुच्चार पुढे केला. वाझे यांना एनआयएकडून अटक झाल्यानंतर त्यांचा राजकीय हँडलर कोण, तो बाहेर आला पाहिजे, अशी मागणी भाजपाकडून सातत्याने लावून धरली गेली. त्यावर सरकारकडून उत्तर येणे अर्थातच अपेक्षित नव्हते.  यानंतरचा भाग दोन अधिक धक्कादायक असेल, हे ही विधान फडणवीस यांच्याकडून केले गेले. मग आले परमबीर सिंग यांचे पत्र व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागणीचा तपशील. परमबीर सिंग यांचे पत्र मुख्यमंत्र्यांकडून बाहेर येणे शक्यच नव्हते. ते फक्त दोन वृत्तवाहिन्या- इंग्रजी आणि मराठी यांना मिळाले. नंतर ते सर्वांकडे पोहोचले. राजभवनकडे हे पत्र मिळाल्याला दुजोरा लगेच आला. पत्रावर सही नाही, यावरून गदारोळ होताच रात्री पुन्हा वृत्तवाहिनीकडे सहीच्या पत्राची प्रत पोहोचली. राज्याच्या इतिहासात महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याकडून आपल्याच सरकारबद्दल एवढे खळबळजनक पत्र लिहिल्याचे बाहेर आले. या पत्राची भाषा व तपशीलाची मांडणी पाहिली तर ती अतिशय काळजीपूर्वक व कायदेशीर कसोटीवर पारखून केली गेल्याचे दिसते. सरकारसाठी हा भूकंपच आहे. तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, गृहमंत्री ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य करणे आणि सरकारमधील नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा आग्रह भाजपाकडून धरला गेलेला नाही, हे विशेष!

याउलट भाजपाचे नेते फक्त गृहमंत्र्यांवरील कारवाईसाठी आणि न्यायालयीन वा केंद्रीय संस्थेकडून चौकशीसाठी आग्रही दिसून आले, हे लक्षात घेण्यासारखी बाब आहे. याउलट डिसेंबर १९९३ मध्ये नागपूर येथे गोवारी समाजाचे शंभराहून अधिक लोक पोलीस लाठीमारात चेंगराचेंगरी होऊन मृत्यू पावल्यानंतर तेव्हांचे गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांना लक्ष्य करून तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे थांबले नव्हते. त्यांनी त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली. पवार यांना सातत्याने लक्ष्य केले होते. या संपूर्ण प्रकरणात काही सूचक विधाने आधीच केली गेली असल्याचे दिसते. बदल्यांमधील घोटाळ्याबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला आणि तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्या अहवाल आणि पत्रांचा उल्लेख प्रथमच फडणवीस यांनी केला आहे. पुढे हा अहवाल वा त्यातील तपशीलच त्यांच्याकडून अथवा काही निवडक वृत्तवाहिन्यांकडून जाहीर केला गेला तर आश्चर्य वाटायला नको. परमबीर सिंग आपल्याला भेटल्याचे शरद पवार यांनी मान्य केले आहे. त्यांना गेल्या काही दिवसांत मुंबईचे सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील एक-दोन वेळा भेटल्याचे वृत्त आले. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे समजणे कठीण आहे पण परमबीर सिंग, सचिन वाझे यांच्याशी संबंधित विषय चर्चेत आले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा विषय वरचेवर तापतोय याची कल्पना त्यांना असू शकते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात उल्लेख केलेला असूनही उपमुख्यमंत्री अजित पवार मौन बाळगून आहेत. राज्यातील राजकीय वातावरण बरेच दिवस अतिशय एकतर्फी होते. सरकारच्या वतीने अनेकांनी भाजपाला टोमणे मारावेत आणि समाज माध्यमांवर यथेच्छ टिंगल करावी, असे सुरू होते. मागील सरकारमध्ये शिवसेना सहभागी असतानाही ते सरकार कसे चुकीचे निर्णय घेत होते, यावर विद्यमान मंत्र्यांकडूनच टिका-टिप्पणी होत होती. पण त्यावर बचावात्मक भूमिका मांडण्याची जबाबदारी एकट्या भाजपावर येऊन पडली होती. हे सुरू असतानाच अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचे प्रकरण घडले आणि यात सरकारमधील लोकांचा सहभाग असल्याची कुजबुज सुरू झाली. सरकारला घेरण्याची हीच उत्तम संधी आहे असे म्हणून भाजपाकडून काम सुरू झाले. प्रकरण सीबीआयकडे गेले. राज्य सरकार गोंधळून गेले. मात्र अभिनेत्री कंगना राणावतने केलेल्या काही विधानांचा फायदा सत्ताधारी पक्षांनी उचलला. त्यातच रिपब्लिक टिव्ही या वृत्तवाहिनीने सरकारविरोधात मोहीमच उघडली. या वाहिनीचे सर्वेसर्वा अर्णब गोस्वामी यांनी सरकारला, विशेषतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्यामुळे सत्ताधारी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस संतापाने धुमसत होते. त्यातून सुरू झाली गोस्वामी व त्यांच्या वाहिनीविरोधात कारवाई. मुंबई पोलिसांनी शिताफीने केलेल्या कारवाईबद्धल या वाहिनीने सरकारबरोबरच पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांना लक्ष्य केले. मुंबई पोलिसांच्यावतीने कारवाईचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे करत होते. हे रामायण काही महिने सुरू असताना भाजपा प्रतिक्रिया व्यक्त करण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नव्हता. प्रतिक्रिया दिली तरी अमराठी व्यक्तींची बाजू घेऊन महाराष्ट्राला बदमान का करता अशी टीका या पक्षाला सहन करावी लागत होती. मूळ विषय पाहिला तर एका अधिकाऱ्याच्या भूमिकेवरील चर्चा करताना अन्य काही महत्त्वाचे विषय राहून जातात की काय असेही दिसते. विद्यमान सत्ताधारी मागील सरकारच्या काळात विरोधात असताना त्यांनीच उचलून धरलेले किंवा प्रकाशात आलेले काही महत्त्वाचे विषय सत्तेवर आल्यानंतर विस्मरणात गेले आहेत.  सद्यस्थितीतही अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. करोनामुळे राज्याचा आर्थिक डोलारा डळमळीत झाला असून त्याचे गंभीर परिणाम विकास योजनांवर झाले आहेत, टोल वसुलीबाबत जनमत अनुकूल नाही, दोन विद्यापीठांच्या कुलगुरूंनी मंत्रालयातून येणाऱ्या दबावाला कंटाळून राजीनामे दिल्याचे म्हटले जात आहे, वीज कंपन्यांची सध्याची भूमिका, पेट्रोलजन्य पदार्थांची दरवाढ, अनधिकृत बांधकामांवरून सुरू असलेले न्यायालयीन प्रकरण, शाळांच्या फी वाढीने त्रस्त झालेले पालक असे अनेक विषय सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी उपस्थित केले जाऊ शकतात. पण एक हाय-प्रोफाईल प्रकरण जनसामान्यांना भेडसावणाऱ्या अनेक महत्त्वाच्या समस्यांना कसे काय बाजूला सारू शकते, हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. सरकार बदलते, सत्तेतील, विरोधातील पक्ष बदलतात पण थोड्या फार फरकाने आरोप-प्रत्यारोप तेच का राहतात, हा ही प्रश्न उरतो. हा विचार केला तर आताचे राजकारण सर्वसामान्यांचा समावेश असलेल्या समाजाच्याच सेवेचे साधन आहे का, हा प्रश्न निर्माण होतो. आजवर कधीही सत्तापदी न बसलेल्या कुटुंबातील दोन सदस्य महत्त्वाच्या पदांवर आहेत. यापूर्वी ठाकरे कुटुंबीय मातोश्रीवरून सरकारला आदेश देत असत. सत्तेतील लोक त्यांचे आदेश शिरसावंद्य मानत असत. सत्ता चालवताना होणारी दमछाक, सरकारकडून अपेक्षा ठेवून असलेल्यांच्या मागण्या पूर्ण करताना होणारी कसरत, लोक आणि लोकप्रतिनिधी यांच्या भेटासाठी कधीही उपलब्ध राहण्याची आवश्यकता त्यांच्या अंगवळणी नव्हती. एक नक्की की सरकारचा हनीमून कालावधी आता संपला. पुढील राजकीय पक्षांच्या कसोटीचा असेल वा नसेल पण एकूणच राज्याच्या कसोटीचा आहे हे नक्की!

डर्टी पोलिटिक्सचं प्रदर्शन...!

रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ सापडल्याच्या घटनेला आता साधारण एक महिना होत आला आहे. ही घटना घडली त्यानंतरच्या या २७-२८ दिवसांत महाराष्ट्रात प्रचंड मोठा राजकीय गदारोळ घडला. आता तर राज्य प्रशासनातील नोकरशहांनी राज्याच्या मंत्र्यांवर मोठे खळबळजनक आरोप करून संपूर्ण राज्याला धक्का दिला आहे. एकीकडे राज्यात कोविड-१९च्या केसेस वाढत चालल्या आहेत, दुसरीकडे एका मुलीच्या आत्महत्येवरून राज्याच्या एका मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे, राज्यात अवकाळी पाऊस पडून शेतीचं नुकसान झालं आहे, शाळा-कॉलेजमधल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न टांगणीला लागलाय आणि दुसरीकडं अंबानींच्या घरासमोर जिलेटिन असलेली गाडी सापडल्यापासून सुरू झालेलं प्रकरण पेटत पेटत एकूणच सरकार अस्थिर झालंय का या मुद्द्यापर्यंत येऊन थांबलंय. विरोधी पक्षानं एकूणच हे प्रकरण लावून धरलंय आणि त्यावरून रान पेटवलंय. शिवाय प्रसारमाध्यमांमध्ये येणाऱ्या उलटसुलट बातम्यांमुळं लोकांच्या मनात एकूणच संभ्रम निर्माण झाल्याचं दिसतं. या प्रकरणाला आता नेमकं काय वळण मिळणार हे पुढच्या काही दिवसांत ठरेल असं दिसतंय.

नेमकं घडलं तरी काय?
या प्रकरणाला सुरूवात झाली १७ फेब्रुवारी २०२१ रोजी.
१७ फेब्रुवारी २०२१- ठाण्यातले कार डेकोरचा व्यवसाय असलेल्या मनसुख हिरेन यांची कार विक्रोळीमधून चोरीला गेली. १८ फेब्रुवारी २०२१- मनसुख हिरेन यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यात कार चोरीला गेल्याबद्दल तक्रार दाखल केली. २५ फेब्रुवारी २०२१- मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर अडीच किलो जिलेटीनच्या २० काड्या आणि धमकीचे पत्र असलेली एक कार सापडली. २६ फेब्रुवारी २०२१- ही कार मनसुख हिरेन यांचीच स्कॉर्पिओ असल्याचं आढळून आलं. हिरेन यांना एटीएसने चौकशीसाठी ताब्यात घेतलं. दुसऱ्या दिवशी त्यांना एनआयएसमोर सादर होण्यास सांगितलं गेलं. २७ फेब्रुवारी २०२१- मनसुख हिरेन पांढऱ्या लँड क्रूझरमध्ये एपीआय सचिन वाझे याच्यासोबत पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात जाताना दिसून आले. २७ फेब्रुवारी २०२१- सचिन वाझेंचे सहकारी एपीआय रियाझ काझी ठाण्यातील साकेत सोसायटीतील सचिन वाझेंच्या इमारतीत गेले. त्यांनी पत्र लिहून १७ ते २४ फेब्रुवारी दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज घेतले. २ मार्च- मनसुख हिरेन यांनी काही पोलिस आणि प्रसारमाध्यमे आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार नोंदवली. ४ मार्च- हिरेन बेपत्ता झाले. ५ मार्च- हिरेन यांचा मृतदेह सापडला. त्याच दिवशी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जोरदार सरबत्ती करून सचिन वाझेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे आरोप केले. ६ मार्च- सचिन वाझेंचे निलंबन. हिरेन यांचा पोस्टमार्टम अहवाल अनिर्णित. त्याच दिवशी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण, चोरलेले स्कॉर्पिओ प्रकरण आणि अंबानी यांच्या घरासमोरील बॉम्बचे प्रकरण ही तिन्ही प्रकरणे महाराष्ट्र एटीएसकडे सोपवली गेली. ८ मार्च- एनआयएने एटीएसकडून अंबानींचे बॉम्ब प्रकरण ताब्यात घेतले. १३ मार्च- एनआयएने सचिन वाझेंची १२ तास चौकशी केली आणि त्यानंतर अटक केली. १४ मार्च- वाझेंना पोलिस कोठडीत पाठवण्यात आले. १६ मार्च- मुख्यमंत्री, गृहमंत्री, मुंबई पोलिस आयुक्त, पोलिस महासंचालक यांची उच्चस्तरीय बैठक. १७ मार्च – मुंबई पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली. हेमंत नागराळे यांची नेमणूक. २० मार्च- परमबीरसिंग यांचे मुख्यमंत्र्यांना उद्देशून गृहमंत्र्यांवर १०० कोटी रु. हप्ता मागणारे आरोप करणारे पत्र.

एखाद्या थरारक चित्रपटात शोभाव्या अशा एका मागोमाग एक घटना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर घडताना दिसताहेत. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि एकूणच विरोधीपक्षानं सरकारला विविध मुद्द्यांवर घेरलंय आणि प्रत्येक प्रकरणानंतर आता सरकार पडणार की काय अशाप्रकारे चर्चा जनतेमध्ये सुरू झालेली दिसतेय. महाराष्ट्राची ही राजकीय पटलावरची अस्थिरता सर्वच पातळीवर पुढच्या काळात घातक ठरेल अशीही भीती व्यक्त केली जातेय. त्यात आता सरकारमधील मंत्र्यांचं प्रशासनातील नोकरशहांवर नियंत्रण नाही असं चित्र लोकांसमोर उभं केलं जातंय. परमबीरसिंग यांच्या पत्रामुळं ही गोष्ट आणखी ठळकपणे समोर आणली गेलीय. त्याचबरोबर प्रशासनातले आणि सत्तेतले इतर कंगोरे, भ्रष्टाचार याही मुद्द्यांना सिंग यांच्या पत्रानं वाचा फुटलीय. हॉटेल्स, बार आणि इतर अनेक ठिकाणी अनधिकृत गोष्टी लपवण्यासाठी हप्ते दिले जातात ही गोष्ट तर सर्वज्ञात आहे. पण आम्हाला महिन्याला १०० कोटी रूपये गृहमंत्र्यांनी गोळा करायला सांगितलंय ही गोष्ट पोलिस आयुक्तपदी राहिलेली व्यक्ती सांगत असेल तर पोलिसांकडून हप्ते नियमित घेतले जातात का आणि त्यांनी आतापर्यंत किती पैसे कुणाला दिले हेही जाहीर करावं अशी मागणी केली जातेय. या एकूणच गुंतागुंतीच्या होत चाललेल्या प्रकरणाला अनेक कंगोरे आहेत आणि याचे धागेदोरे अगदी धुरिणांपर्यंत जातील अशीही चर्चा सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबरोबर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा आम्ही मागत आहोत असं प्रसारमाध्यमांना सांगितलंय. त्याचबरोबर त्यांनी कुणी कलम ३५६ लावून राष्ट्रपती राजवटीची मागणी केली तर आम्ही त्याचा आग्रह धरू असंही सांगितलंय. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभा अधिवेशन सुरू असताना आपल्या भाषणात हे सरकार फक्त तीन महिने टिकेल असं सांगितलं होतं. यावरून विरोधी पक्षानं या मुद्द्यावर रान उठवण्याची किती तयारी केली आहे हे दिसतं. पण त्याचवेळी सरकार म्हणून या विरोधी पक्षाकडून होणाऱ्या वारंवारच्या हल्ल्याला तोंड देण्याची फारशी तयारी नाही असंही चित्र समोर येऊ लागलंय.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातला संघर्ष
प्रशासन आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांच्यातला संघर्ष आपल्याला काही नवीन नाही. परंतु प्रशासकीय अधिकारी हे सामान्यतः आपल्या राजकीय बॉसेसच्या म्हणण्यापलीकडं जात नाहीत आणि आपलं राजकीय मत काहीही असलं तरी कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत नाहीत. तशी कुरघोडी होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असतात. राज्यात दोन किंवा अधिक आघाडीचं सरकार असतं तेव्हा विसंवादाला संधी असते आणि त्याचा फायदा नोकरशहा घेतात. २०१४ मध्ये केंद्रात मोदींचं सरकार आलं तेव्हापासून मोदींच्या बाजूचं आणि विरोधात अशी समाजात उभी विभागणी झालेली दिसतेय. तशीच परिस्थिती आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमध्येही आहे. काही अधिकाऱ्यांनी आपल्या काही लोकांनी आपल्यापदाच्या मर्यादेपलीकडं जाऊन भाजपला पाठिंबा देण्याची उघड भूमिका घेतलीय. तसं होऊ नये खरंतर! अनेकदा त्यांना असं वाटतं की, केंद्रात सत्ता आहे आणि मला काही मिळवायचं आहे तर या विचारांच्या लोकांबरोबर राहिलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. नोकरशहांनी तटस्थ असलं पाहिजे. त्यांची विचासरणी काहीही असली तरी त्यांनी आलेल्या सत्ताधाऱ्यांसोबत जुळवून घेऊन काम करणं गरजेचं असतं. मोदींच्या बाजूचे आणि विरोधातले अशी! विभागणी अधिकाऱ्यांमध्ये होऊ लागलीय हे खूप धोकादायक आहे. प्रशासकीय आणि पोलिस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामधल्या या चव्हाट्यावर आलेल्या संघर्षाबाबत असं वाटतं की, राजकारण हा प्रतिमेचा खेळ आहे. आतापर्यंत विविध प्रकरणांमध्ये सरकारवर हल्ले झाले. पण त्यांना त्यात बचावाचा मार्ग मिळाला. पण आता प्रशासनातलेच अधिकारी विरोधकांना मदत करत असतील तर हे प्रचंड घातक आहे. महाराष्ट्रात कर्नाटकसारखी परिस्थिती नाही, कारण इथं पोटनिवडणुकीत फोडलेला आमदार निवडून आणणं खूप कठीण आहे. त्यामुळं सरकारची प्रतिमाच लोकांच्या मनातून उतरली तर निवडणूक घेणं सोपं जाईल, असा विचार भाजपाकडून केला जात असावा. त्यासाठी आपल्या विचारसरणीच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या अधिकाऱ्यांचा वापर करून घेतला जातोय. परमबीरसिंग यांची नेमणूक एक वर्षापूर्वी झाली. त्यांना पदावरून बदली केली तेव्हाही त्यांच्याशी चर्चा करूनच ती केली गेली होती. त्यामुळं तुम्हीच नेमलेला अधिकारी तुमच्याविरूद्ध आरोप करतो हे फार वाईट आहे तसंच गंभीर आहे. माजी पोलिसआयुक्त सत्यपालसिंग हे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या गळ्यातला ताईत होते. पण नंतर त्यांनी भाजपची वाट धरली. हे असे अधिकारी ओळखणं आणि वेळीच त्यांच्यावर लक्ष ठेवणं खूप गरजेचं असतं, नाहीतर हे हल्ले होतच राहतात. प्रशासनातही अनेक अधिकारी भाजपाशी संबंधित होते आणि आहेतही! पण ते सारे छुपे होते. फडणवीस सरकारच्या काळात अनेक अधिकारी वैचारिक भूमिकेतून बोलके झाले. या बोलक्या झालेल्या आणि कल दिसून आलेल्या अधिकाऱ्यांचा कामासाठी वापर करून घेणं आणि मोक्याच्या ठिकाणी नेमणं ही वेगळी गोष्ट. पण त्यांच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. सध्याच्या सत्तेतल्या सरकारमधील मंत्री खूप गाफील आहेत आणि ही गोष्ट फडणवीस यांनी नेमकी हेरलेली आहे. त्यानुसार हा सापळा रचला गेला आणि सत्ताधारी पक्ष त्यात अलगद अडकलाय.

राज ठाकरे काय म्हणतात?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर एक पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह केला. ते म्हणाले की, एखाद्या पोलिस आयुक्तांनी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचे आरोप करण्याची घटना महाराष्ट्राच्या काय देशाच्याच इतिहासात पहिल्यांदाच घडलीय. परमबीरसिंग यांना नेमून एक वर्ष झालंय तर त्यांनी आतापर्यंत १२०० कोटी रूपये देणं अपेक्षित होतं. महाराष्ट्रातल्या एका आयुक्तांना १०० कोटी रूपये सांगितले असतील तर राज्यात शहरं किती आणि तिथे पोलिस आयुक्त किती आणि त्यांना किती रूपये सांगितले हेही बाहेर यायला हवं. त्यासाठी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांमधल्या लॉबीज, गटबाजी, भांडणं समोर येतायत. त्यात मूळ मुद्दा बाजूलाच राहतो. सुशांतसिंग विषयातही सुशांतसिंग राहिला बाजूलाच. भलतीकडंच विषय गेला. निदान या प्रकरणात तरी तसं होऊ नये. “अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवण्यात आली. बॉम्ब हे अतिरेकी ठेवतात हे ऐकलं होतं. पण बॉम्ब पोलिस ठेवतात हे आजपर्यंत कधी ऐकलेलं नव्हतं. वाझेंना अटक झाली. त्यांची चौकशी सुरू आहे. परमबीरसिंग यांना पदावरून काढण्याऐवजी त्यांची बदली का केली हे सरकारनं अजून सांगितलं नाही. त्यांचा सहभाग होता तर त्यांची चौकशी का केली नाही?” असा सवालही राज ठाकरे यांनी केलाय. अंबानींच्या घराखाली गाडी ठेवली गेली होती. त्यात जिलेटिन कुठून आलं. त्याचा स्त्रोत ग्वालियरजवळ सापडतो. मग ते आलं कुठून. या प्रकरणात इतक्या गाड्यांचा उल्लेख झालाय की वाझेंची गाडी नेमकी कुठली हेच कळत नाहीये, असं राज ठाकरे म्हणतात. ख्वाजा युनिस प्रकरणात वाझे १७ वर्षं निलंबित आणि ५८ दिवस तुरूंगात होते. मग त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वाझेला शिवसेनेत घेऊन कोण गेलं होतं. पुन्हा पोलिस खात्यात परत आणावं म्हणून खुद्द मुख्यमंत्री मागे लागले होते असं विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले. मग शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्र्यांच्या इतक्या जवळचा माणूस असेल तर त्याला मुकेश अंबानी आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध माहीत नाहीत का? मग वाझे स्वतःहून अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवेल? असाही प्रश्न त्यांनी विचारला. पोलिस आयुक्त आणि साधे पोलिस अशा कुणाच्या घराखाली बॉम्ब ठेवण्याची हिंमत कोणाच्यातरी सूचना असल्याशिवाय कसं करू शकतात. त्यामुळं फक्त वाझे आणि परमबीरसिंग यांची चौकशी करून चालणार नाही, असं सांगताना केंद्रानं याची नीट चौकशी करावी अशीही मागणी केली. नीट चौकशी झाली तर महाराष्ट्रात फटाक्यांची माळ लागेल. कोण कोण तुरूंगात जातील याची कल्पनाही आपण करू शकत नाही, असं राज ठाकरेंनी सांगितलंय. ज्या अंबानींकडे सिक्युरीटीत अत्यंत कडवट इस्रायली लोक आहेत. ते खूप कडवट असतात. इतर पोलिस सुरक्षा ही मध्यप्रदेश सरकारची आहे. अशा एखाद्या रोडवर एक गाडी २४ तास उभी राहते, हे स्वप्नात तरी शक्य आहे का? त्यातलं पत्र वाचलं तर "तुमच्या घराखाली बॉम्ब फोडायचा आहे नीताभाभी आणि मुकेशभैय्या!” असं लिहिलंय. ज्याच्या घराखाली बॉम्ब फोडायचा आहे त्याला आदर कोण देतं? अंबानींकडून खंडणी कोण मागू शकतं? पोलिसांची इतकी हिंमत आहे का? ही गाडी कशी ठेवली गेली, कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली हे सगळंच बाहेर येणं गरजेचं आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय. प्रसारमाध्यमांनाही त्यांनी या विषयाला फाटे फोडू नका असं आवाहन केलंय.

राज ठाकरें म्हणतात तसं, स्फोटकं ठेवण्यामागचं मूळ कारण काय हे उघड होत नाही तोपर्यंत याच्या कुठल्याच गोष्टीची लिंक लागणार नाही. या विषयाला इतके फाटे फुटतायत की स्फोटकं ठेवण्याच्या प्रकरणाची चौकशी पुढे हवेत विरून जाईल की काय? अशी शंका वाटते. या स्फोटकांमागे अंबानींच्या उद्योग घराण्याशी संबंधित कुणाचा संबंध आहे का, उद्योग विश्वातल्या लोकांचा काय संबंध आहे का? हे प्रकरण वाझेंच्या चौकशीपुढं जाऊ नये म्हणून हे प्रकरण एनआयएकडं देण्यात आलं आहे का? वाझेंना नेमकं कुणी सांगितलं? या सगळ्यात अंबानीशी संबंधित माणसं आहेत का? त्यांना वाचवण्यासाठी एनआयएमध्ये उतरली आहे का? असे सगळे प्रश्न या निमित्ताने उभे राहतात! या सगळ्या विषयात मीडियानं स्वतः नरेटिव्ह तयार केलंय आणि तेच पुढं रेटलं जातंय. या सगळ्या मागचा उद्देश नेमका काय होता याची चर्चा कोणीच केलेली नाही. याचं कारण काय असू शकतं याबाबत कुठल्याही चॅनेलने चर्चा केलेली नाही. मीडियाला सतत एक आरोपी लागतोय आणि त्यांना सार्वजनिक सुनावणी करण्यात अत्यंत स्वारस्य आहे. मीडियानं अत्यंत बेजबाबदापणानं हे प्रकरण हाताळलंय! महाराष्ट्रात या प्रकरणाचा तपास एनआयएनं घेतलाय याचं कारण त्यांच्या नियमांत कलम ८ अंतर्गत हा स्फोटकांशी संबंधित तपास एनआयएला थेट घेता येतो. मनसुख हिरेनच्या मृत्यूचा तपास त्यांनी आधी घेतला नव्हता. पण तो जिलेटिन प्रकरणाशी संबंधित असल्यामुळं त्यांनी ताब्यात घेतलाय. आता १०० कोटींच्या वरची प्रकरणं ईडीला थेट ताब्यात घेता येतात. त्यामुळे यात ईडीही सहभागी होऊ शकते. कदाचित सीबीआयही सहभागी होईल. पण पूर्वी सीबीआयला थेट प्रकरणात चौकशी करायची असलेली परवानगी राज्य सरकारनं आता काढून घेतलीय. त्यामुळं त्याबद्दल निश्चित सांगता येणार नाही.

परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बमागे नक्की कारण काय?
हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा परमबीरसिंग हे मुंबईचे पोलिस आयुक्त होते. काही दिवसांपूर्वी सिंग यांची बदली करून त्यांच्या जागेवर हेमंत नागराळे यांना आणण्यात आलंय. त्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत परमबीरसिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र समोर आल्यामुळं खळबळ उडालीय. हे त्यांनी केंद्राच्या भरवशावर आणि स्वतःच्या बचावासाठी केलं असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. अंबानींच्या घरासमोर गाडी पोलिसांनीच नेली हे दोनच दिवसांत स्पष्ट झालं होतं. हे सगळे धागे परमबीरसिंग यांच्यापर्यंत येतात कारण वाझे त्यांना थेट रिपोर्टिंग करत होते. हा सगळा घटनाक्रम सुरू असताना परमबीरसिंग एक शब्दही बोलले नाहीत. हा सगळा राजकीय प्लॅन होता आणि त्यांनी सुपारी घेऊन हे सगळं केलंय असंही म्हणायला वाव आहे. एनआयएकडे तपास गेल्यावर या चौकशीतून सुटण्यासाठी त्यांना पर्याय दिलेला असू शकतो. मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्याप्रमाणेच परमबीरसिंग हेही मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले होते. त्यांच्याशी अनिल देशमुख अशा प्रकारे दबाव आणून वागतील हे पचणं जरा कठीण आहे! सचिन वाझेनंतर आपलाही नंबर लागू शकतो हे परमबीरसिंग यांच्या लक्षात आलं असणार. त्यामुळं त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आरोप केल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांनी आपल्या हाताखालच्या एसीपींसोबतचे चॅट प्रसिद्ध केले. पद्धतशीरपणे केस तयार केली आणि एनआयएच्या बाजूनं आपण आहोत असं दाखवायचा प्रयत्न त्यांनी केलाय! इथं असंही वाटतं की, परमबीरसिंग यांचा अहंकार दुखावला गेल्यामुळं त्यांनी अशाप्रकारे मंत्र्यांवर थेट आरोप केल्याची शक्यता असू शकते. त्यांचा कार्यकाल शिल्लक आहे. त्या आधीच ठपका ठेवून त्यांना हटवण्यात आलं. त्यामुळं त्यांचा अहंकार दुखावला गेला असावा. म्हणून ‘हम तो डूबेंगे सनम, तुम को भी साथ लेंगे’, या उक्तीप्रमाणे त्यांनी असं केलेलं असू शकतं! मुंबईत अनेक हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट आहेत. त्यांच्याकडून अनेक नियमांचं उल्लंघन सर्रास केलं जातं. त्याच्याकडं दुर्लक्ष केलं जावं म्हणून वर्षानुवर्षे हप्ता दिला जातोय, ही गोष्ट सर्वज्ञात आहे. आधीच्या सरकारमध्ये हे होत नव्हतं असं कुणी छातीठोकपणे म्हणणार नाही. त्यामुळं परमबीरसिंगांच्या आरोपावरून असं दिसतं की स्थानिक पोलिस ठाण्यातून हे सगळे व्यवहार होत होते. त्याला बगल देऊन वाझेंच्या माध्यमातून थेट वसुली करण्याचा प्रयत्न केला गेला असावा. अनेकदा अमुक एका पोलिस ठाण्यात खूप डान्स बार असतील तर तिथं नियुक्ती पाहिजे असेल तर अधिकारी जास्त रेट देतात असं आपण ऐकलंय. पण नवीन रचनेतून वाझेंच्या नियुक्तीतून थेट वसुली होत असेल तर आपण नेमणुकीसाठी खर्च केलेले पैसे कसे वसूल होणार, या प्रश्नामुळं पोलिस खात्यात वाझेंविरोधात एखादी मोहीम सुरू असल्याचीही शक्यता नाकारता येत नाही!

फलद्रूप काय? सरकार पडणार का?
या मुद्द्यावरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय आणि त्यामुळं सरकार पडणार का, राज्यात राष्ट्रपती राजवट आणणार का, असेही प्रश्न विचारले जात आहेत. त्या सर्वांना राजकीय विश्लेषकांनी जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंत सरकार पडणार नाही, असं उत्तर दिलंय. सरकारची प्रतिमा नक्कीच मलीन झालीय. ती सावरायला आता त्यांना प्रयत्न करावे लागतील. सचिन वाझे शिवसेनेत होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. त्यामुळं आतापर्यंत शिवसेनेला लक्ष्य केलं जात होतं. पण आयुक्तांच्या पत्रानं हा रोख बदलून थेट राष्ट्रवादीवर निशाणा साधला गेलाय. आतापर्यंत सुशांतसिंग, कंगना राणावत या प्रकरणांमध्ये शिवसेनेचा संबंध होता म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काहीही चर्चा केली नव्हती. पण आता हे थेट त्यांच्यावर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात राष्ट्रवादी आणि शरद पवार हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काहीही असलं तरी हा हल्ला संपूर्ण सरकारवर झाला आहे. सरकार म्हणून यातून एकजुटीनं मार्ग काढला तरच यातून सावरता येईल. फक्त पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी एकेकटे प्रयत्न केले तर मात्र कठीण होईल! त्याचवेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या दोन महिन्यांत विरोधी पक्षनेता कसा असावा हे दाखवून दिलंय. त्यांची मुद्देसूद मांडणी, अभ्यास आणि विषय लावून धरण्याची पद्धत यांच्यामुळं मागच्या वर्षभरात त्यांच्या प्रतिमेचं झालेलं नुकसान त्यांनी भरून काढलंय, असं वाटतं! संजय राठोड आणि आता हे नवीन प्रकरण यांच्यामुळे सरकारच्या प्रतिमेवर मोठा परिणाम झालाय पण सरकारला धोका नाही. भाजपानं आतापर्यंत सरकार पाडायचा प्रयत्न फारशा गांभीर्यानं केला नव्हता. कारण आमदार फुटून आले तरी त्यांना मध्यप्रदेश किंवा कर्नाटकसारखं पोटनिवडणुकीत निवडून आणणं कठीण आहे. चंद्रकांत पाटील यांनी अनिल देशमुख आणि अनिल परब यांच्यावर रोख धरलाय. त्यामुळं हे प्रकरण इथंच थांबेल अशी शक्यता दिसत नाही. सरकार अस्थिर लगेच करायचं की बंगालच्या निवडणुका झाल्यावर करायचं यावर कदाचित निर्णय होत असावा, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. त्यात वाझेंची बाजू घेताना शिवसेनेनं डेलकर प्रकरण लावून धरलं होतं. केंद्रात एकहाती सत्ता असलेला पक्ष त्याला बळी पडेल असं वाटत असेल तर हे फार वाईट आहे. १७ वर्षांनी निलंबनातून नेमणूक केलेल्या वाझेंना लगेच महत्त्वाच्या विभागात घेऊन हाय प्रोफाइल केसेसे देणं हेही वाईट आहे. सरकारवरचा हा हल्ला ते आता वाढवत नेणार. भाजपाचं सरकार नसलेल्या इतर राज्यांमध्ये जे काही चाललंय ते पाहता इथंही हेच होणार हे अपेक्षितच होतं. मात्र बहुमत असेपर्यंत हे सरकार पडणार नाही. वर्षानुवर्षं अनेक सरकारांवर आरोप झाले. गोपीनाथ मुंडे, शरद पवार यांच्यावर आरोप झाले. पण कालांतरानं ते विसरले गेले. एखाद्या व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. पण म्हणून आमदारांचं संख्याबळ कमी होऊ शकत नाही. सरकारची बदनामी होणार. मागच्या सरकारमध्ये कोणाकोणावर काय आरोप झाले होते ते आपल्याला आज आठवत नाही. काळ पुढे जातो तसं हे बदलतं. संजय राठोडांचा राजीनामा झाल्याबरोबर पूजा चव्हाणचा विषय मागे पडला. हे असंच घडत राहतं. अर्थात, राजकीय निर्णयच घ्यायचा असेल तर राज्यपालांना आणि केंद्र सरकारला कुठलीही पार्श्वभूमी पुरेशी आहे. पण तरीही खूप मोठ्या प्रमाणावर दंगे झाले आहेत, अशांतता झाली आहे तर अशाच प्रकरणात राष्ट्रपती राजवट लागू होते. शिवाय सत्तेची गरज तिन्ही पक्षांना आहे. निवडणुका वरचेवर होणं हे कुणालाही परवडणारं नाही. अगदी भाजपालाही नाही. म्हणूनच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, राष्ट्रपती राजवटीची कुणी मागणी केली तर आम्ही आग्रह धरू. इथं प्रसार माध्यमांनी तरी निदान विरोधी पक्ष किंवा राष्ट्रपती राजवटीच्या मागणीला सपोर्ट करू नये. कारण राज्यात लोकनियुक्त सरकारच असायला हवं आणि कारभार लोकप्रतिनिधींच्याच ताब्यात असायला हवा. राष्ट्रपती राजवट म्हणजे नोकरशाहीच्या हातात सत्ता जाणार. सत्ता कधीही नोकरशाहीच्या हातात असणं कुणाच्याही भल्याचं नाही. माध्यमांनी विरोधी पक्षाला जे हवंय त्याचा डंका पिटण्याची काही गरज नाही. त्यांनी निष्पक्षपणे आणि डोळसपणे आपलं काम करत राहणं गरजेचं आहे.

अनिल देशमुखांच्या ऐवजी कोण?
गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेऊन गृहमंत्रीपद द्यायचंच झालं तर कोणाला दिलं जाऊ शकतं याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. याबाबत असं म्हटलं जातंय की, अजित पवारांनी आतापर्यंत गृहखातं घेतलेलं नाही. कारण ते घेणं म्हणजे मानसिक स्वास्थ्य गमावणं. ते उपद्रवकारक करणारं आहे. जयंत पाटलांकडे प्रदेशाध्यक्ष पद आहे. त्यामुळे शरद पवार यांना ते दुसऱ्या नवीन व्यक्तीला द्यायचं होतं. कोरोनाच्या काळात अनिल देशमुखांनी गृहमंत्री म्हणून उत्तमरित्या काम केलेलं आहे. अगदी रस्त्यावर उभं राहून काम केलं. पण प्रशासनाबाबत ते थोडे मवाळ आहेत. त्यात आता त्यांच्या विभागाच्या झालेल्या प्रतिमा हननामुळं त्यांच्या जागी अशीच व्यक्ती यायला हवी जिला प्रशासनाची उत्तम जाण आहे आणि ते कठोरपणे निर्णय घेऊ शकतील. या एकूणच प्रकरणाचे पडसाद पुढचे बरेच दिवस उमटत राहतील. राजकीय उलथापालथी होतील. काहीएक घडामोडी होतील. काही लोक तुरूंगात जातील, काही नवीन नावं या प्रकरणात कट कारस्थानं केल्याबद्धल उघडही होतील. काही बडे मासेही गळाला लागले तर आश्चर्य वाटण्यासारखी स्थिती नाही. एनआयएच्या हाताला नेमकं काय लागतंय. एटीएसने रविवारी हिरेन मृत्यूप्रकरणात अजून दोघांना अटक केलीय. त्यातून नेमकं काय बाहेर पडतंय हे सगळं पाहणं खूप रंजक ठरेल. थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर एक नवीन नाट्य घडू लागलंय आणि ते चित्तचक्षुचमत्कारिक आणि तितकंच काळजी वाटायला लावणारं आहे.

मोदीजी, जरा हे ही लक्षांत घ्या...!

"बंगालच्या विधानसभा निवडणुकादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि इतर भाजपेयीं नेत्यांनी गेल्या सत्तर वर्षाच्या काळात काँग्रेसनं केवळ सत्ता उपभोगली, देशाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी काहीही केलं नाही. अशी भाषणं करताहेत. बंगालवासीयांना हे कदाचित नवीन वाटलं असावं; पण प्रधानमंत्री नरेंद्र दामोदरदास मोदी आणि मंडळी केवळ आत्ताच बोलताहेत असं नाही तर, ती मंडळी गेली सात वर्षे, सातत्यानं सभा-सेमिनार मधून, 'सत्तर वर्षात या देशात काहीच झालं नाही, काहीच घडलं नाही!' असा बकवास करत या खंडप्राय देशाचा सतत अपमान करत आलेत...! मी मोदींची ती चूक सुधारत, मोदींच्या वतीनं या देशाची माफी मागत, मोदींना आज देशात गेल्या सत्तर वर्षात काय घडलं, काय साकारलं याच्या काही गोष्टी सांगाव्यात म्हणतो...! भक्तांनीही हे जरूर वाचावं आणि आपली मतं बनवावीत...!"
---------------------------------------------------------


*प्रि* य मोदीजी, तुम्ही जन्माला आलात १७ सप्टेंबर १९५० रोजी, या दरम्यान देश स्वतंत्र होऊन या देशात एका सक्षम आणि अद्वितीय संविधानाची निर्मिती झाली होती आणि २६ जानेवारी १९५० रोजी हे अद्वितीय संविधान या देशात रुजू झालं होतं, अर्थातच, तुमचा तेव्हा जन्म ही झाला नव्हता...! तुम्ही जेव्हा पाळण्यात असाल बहुधा, कदाचित सहा महिन्यांचे, तेव्हा या देशांकडून, पहिल्या एशियन गेम्सचं अत्यंत देखणं आयोजन करुन झालं होतं, ते साल होतं १९५०...! तुम्ही असाल जेव्हा केवळ चार वर्षांचे, तेव्हा देशात भाभा अणुशक्ती केंद्र नावाचं एक सेंटर स्थापन होऊन ते कामाला सुद्धा लागलं होतं...ते १९५४ मध्ये...! तुम्ही ११ वर्षांचे झालात, पाचवीत वगैरे असाल तेव्हा, या देशात, डझनभर आयआयटी, आयआयएम केंद्र उघडली गेली होती, शेकडो विद्यापीठं उघडली गेली होती आणि याच संस्थांमधून जे टाॅप क्लास विद्यार्थी घडले, त्यातल्या काहींनी परदेशाचा रस्ता धरला, आता तुम्ही परदेशी गेल्यावर तुम्हाला जो "मोदी मोदी" जल्लोष ऐकायला येतो ना, तो याच नतद्रष्टांचा....! तर, या देशात पहिली आयआयटी सुरू झाली खरगपूरला १९५० साली आणि पहिली आयआयएम सुरु झाली १९६१ साली कलकत्त्यात...! याच वर्षी, १९६१ साली या देशानं, पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून गोवा या खंडप्राय देशात विलीन केला, तुम्ही तेव्हा केवळ अकरा वर्षांचे होता...! तुम्ही जेव्हा १३ वर्षांचे होता, तेव्हा या देशातलं भाक्रा नानगल नावाचं महाप्रचंड धरण पंजाबात बांधून झालं होतं ...!

१९६२-६३...! तुम्ही तेरा-चौदा वर्षांचे असताना, या देशात विमानांचं असेंब्लिंग आणि हेलीकाॅप्टर्सची निर्मिती सुरू झाली...१९६४...! तुम्ही पंधरा वर्षांचे होतात, तेव्हा या देशाच्या फौजांनी लाहोरपर्यंत धडक दिली होती...! लाहोर पाकिस्तान नावाच्या देशात आहे आणि आपले उपोषणसम्राट अण्णा हजारे तेव्हा भारतीय सैन्यात ड्राइव्हर होते...! तुम्ही १९ वर्षांचे असाल तेव्हा या देशात तारापूर न्युक्लिअर पाॅवर प्लांट सुरू झाला होता, इंडियन स्पेस रिसर्च आॅर्गनायझेशन याच वर्षी या देशात अस्तित्वात आलं होतं...१९६९ मध्ये...! तुम्ही २१ वर्षाचे झालात, या देशाचे कायदेशीर मतदार झालात, तेव्हा इंदिरा गांधी नावाच्या, या देशाच्या एका बुलंद प्रधानमंत्र्यानी पाकिस्तान नावाच्या देशाचे दोन तुकडे करून, बांगलादेश नावाचा एक नवा देश या भूतलावर जन्माला घातला...! धर्माधिष्ठित संकल्पनेच्या आधारावर निर्माण झालेला पाकिस्तान, त्याचे दोन तुकडे होत असताना धर्म बिलकुल आडवा आला नाही बरं का...! तुम्ही २४ वर्षांचे झालात तेव्हा या देशानं पहिलं परमाणू परिक्षण केलं बरं का...१९७४ मध्ये...! तुम्ही ३७ वर्षांचे झालात, म्हणजे साधारण १९८७ ला, या देशात राजीव गांधी नावाच्या प्रधानमंत्र्यानी, सुपर कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाची नभूतो अशी क्रांती आणली आणि या देशानं प्रगतिच्या क्षितीजावर एक बुलंद भरारी घेतली ...!

राजीवजींचा खून झाला, नरसिंहराव नावाचे गंभीर आणि विद्वान गृहस्थ या देशाचे पंतप्रधान झाले, देश एका महाभयंकर आर्थिक संकटात सापडला होता, या देशाचं सोनं जागतिक बँकेकडं गहाण ठेवावं लागलं होतं पण, डॉ. मनमोहनसिंग नावाचे एक जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्री, नरसिंहरावांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते, या अर्थमंत्र्यांनं आपल्या पंतप्रधानांच्या सहाय्यानं या देशात आर्थिक उदारीकरणाची सुरुवात करून देशाला त्या संकटातून अलगद बाहेर काढलं ...! हेच मनमोहनसिंग पुढे या देशाचे दहा वर्षे पंतप्रधान होते बरं का ...! याच दरम्यान या देशात, चंद्रयान, मंगळयान, जीएसएलव्ही, मेट्रो, मोनोरेल, इंटरनॅशनल एअरपोर्ट्स, पोर्ट्स, जहाजे, सबमरिन्स, पृथ्वी, अग्नी, पिनाक नावाची मिसाईलस्, तेजस, चेतक, धनुष, नावाची हेलिकॉप्टर्स, सुखोई, मिग नावाची फायटर विमानांची निर्मिती, काय आणि किती सांगू....! बरं असो मोदीजी आता थांबतो, थकलो... पण शेवटचा एक प्रश्न विचारतो...! मोदीजी देशात झालेली ही प्रगती खरच तुम्हाला ठाऊक नाही?
आणि असेल ठाऊक तर मग तोंड उचकटून, कशाला हो या देशाचा वारंवार अपमान करीत असता?

मित्र हो, २०१४ च्या मध्यावर खुद्द नरेंद्र दामोदरदास मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले आणि पुढचं सारं तुम्हाला ठाऊक आहे...! ७०वर्षात काय केलं? जे केलं तेच विकून विकून सुध्दा देश चालवता येईना, स्वतःची थापांशिवाय कोणतीच बोंब पडली नाही...! स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र व अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी पंतप्रधान नेहरूंच्या सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली अन या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८० पर्यंत पोहोचली होती. भारताच्या अर्थव्यवस्थेला आज मंदीची झळ लागलीय. नोकऱ्यांचं आश्वासन पाळता आलेलं नाही उलट लोक बेरोजगार होताहेत, बॅंकांना टाळे लागतायत, अनेक कंपन्या बंद पडतायत. सरकारकडं देश चालवायला पैसा पुरत नाही. पैसे नसले की ते मिळवण्याचे तीन मार्ग सरकार वापरतं. बेग, बॉरो आणि स्टील. म्हणजे मागायचं, उधार घ्यायचं किंवा चोरी करायची. अलिकडेच टॅक्स भरा अशी विनंती सरकार वारंवार करतंय म्हणजे लोकांकडून मागून पैसे जमवतंय. बॉरो म्हणजे उधार घेणं. जागतिक बाजारातून, वर्ल्ड बॅंकेतून सरकार पैशांची उचल करतंय. मध्यंतरी सरकारनं रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतलं होते. सरकार चोरी तर करू शकत नाही. मग काय करणार? तर सरकारनं चक्क घरातली भांडी विकायला काढलीयत. आता ही भांडी कोणती? तर सरकारच्या मालकीची जमीनी आणि पूर्वीच्या काँग्रेसी सरकारनं निर्माण केलेल्या १०० हून अधिक सरकारी कंपन्यांचं खासगीकरण किंवा निर्गुंतवणूक करायचं असं सरकारनं ठरवलंय. सरकारी मालकीच्या बँका विकायला काढल्यात. विकासाची कामं करण्यासाठी पैसा लागतो. रस्त्यांची कामं करायला, सरकारी दवाखाने, शाळा चालवायला पैशांची गरज असते. देशातल्या श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांकडून आणि भरपूर नफा कमवणाऱ्या कंपन्यांकडून सरकार कर घेतं. तसंच नागरिकही वेगवेगळ्या वस्तुंवर अप्रत्यक्ष कर देतात. त्यातून ही विकास कामं होतात. यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करायला हवंय पण नियोजनाअभावी ह्या टॅक्समधून मिळणार पैसा कमी पडू लागलाय. त्यामुळं सध्या अशी परिस्थिती सरकारवर ओढवलीय. पण त्याची जाणीव सरकारला नाही. सरकार दिवाळखोरीत निघणार तर नाही ना? अशी भीती वाटतेय. आर्थिक, औद्योगिक बाबीत लक्ष घालण्याऐवजी भावनात्मक गोष्टींचं अवडंबर माजवलं जातंय.
जबसे अमित शाह गृहमंत्री बने हैं तबसे -

◾CAA प्रदर्शन-हिंसा
◾दिल्ली दंगे
◾जामिया-JNU में छात्रों पर हमला
◾निजामुद्दीन मरकज को टारगेट किया गया
◾लालकिले पर हमला
◾किसानों का प्रदर्शन
◾जवानों पर नक्सली हमला

निवडणूक निकालाचा अन्वयार्थ...!

"देशात कोरोनानं लोकांचे जीव धोक्यात घातलं असतानाच निवडणुकांचा डाव खेळला गेलाय. मृतांचं तांडव सुरू असतानाच मतांचाही गोधळ घातला गेलाय. सतत 'निवडणुकांच्या मोड'मध्ये असलेल्या भाजपेयींवर केवळ विरोधी पक्षांनीच टीकेची झोड उठवली असं नाही तर न्यायालयेही सरकारच्या कारभाराची लक्तरं मांडण्यासाठी सरसावलीत. निवडणूक आयोगाला मर्डरर ठरवलंय, ऑक्सिजन अडविणाऱ्यावर फासावर टांगायच्या प्रतिक्रिया उमटल्यात. अशा काळात आसाम, बंगालसह पाच राज्याच्या निवडणुकांचे निकाल लागलेत. सत्ताधाऱ्यांना तिथं फारसं यश मिळालेलं नाही. त्या निकालांचा घेतलेला हा आढावा....!"
------------------------------------------

आसाममध्ये पुन्हा सत्ता आलीय. बंगालमध्ये अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही तर केरळ आणि तामिळनाडूत भाजपच्या जागा जास्त निवडून आलेल्या नाहीत. असं असलं तरी दक्षिणेकडं भाजपनं प्रभाव टाकलाय आणि येणाऱ्या दिवसात पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपच्या शक्तीत वाढ होईल, असं दिसतंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीत जनतेनं ममता बॅनर्जींऐवजी मोदींना मतं दिली. ४२ पैकी १८ जागा मिळवल्या. पण, त्यावेळीही मोदींना मतं देणाऱ्या मतदारांनी मुख्यमंत्री म्हणून आम्हाला ममता बॅनर्जीच हव्यात, हे सांगितलं होतं. भाजपला श्रेय द्यायचंच असेल तर ते याचं द्यावं लागेल की त्यांची मतं १० टक्क्यांवरून ३६ टक्क्यांपर्यंत गेलेत. राज्याच्या पातळीवर ममता बॅनर्जींच्या विरोधात जाण्यासारखं आणि थेट त्यांना नाकारण्यासारखं तिथल्या जनतेला अजून काही वाटलेलं नव्हतं. भ्रष्टाचार आहे का? तर तो सर्वत्र आहे. गैरकारभार होतो का? तर बरेचवेळा होतो आणि तरीसुद्धा आहे त्यातून निवड करण्यासाठी ममता बनर्जींची निवड करायला बंगालची जनता तयार होती. भाजप हा स्थानिक पातळीवरचा पर्याय म्हणून अजून उभा राहिलेला नव्हता. तो आता उभा राहतोय. निवडणुकीची रणनीती म्हणून विचार केला तर ममता बॅनर्जी मुस्लिमांचं तुष्टीकरण करतात, अशी टीका करून हिंदू विरुद्ध मुस्लीम असं वातावरण निर्माण करायचं आणि तसं वातावरण निर्माण झालं की हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊन आपल्याला १००-१२५ जागा सहज पार करता येतील, असा भाजपचा अंदाज असणार. त्यांची व्यूहनीती पाहिली तर असं वाटतं धार्मिक ध्रुवीकरण हे मध्यवर्ती सूत्र होतं. बंगालच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरणाला वाव होता. पण ते पूर्णपणे होऊ शकलं नाही. मात्र हिंदू मतांचं ध्रुवीकरण होण्यापेक्षा ममता बॅनर्जींच्या विरोधात जी मतं होती ती भाजपकडे गेली आणि भाजपला विरोधी पक्ष म्हणून मोठं यश मिळालं. त्यामुळं भाजपसाठी हा अत्यंत उत्साहवर्धक असा विजय आहे. काँग्रेस आणि डावे या दोन पक्षांचं तिथलं स्थानच नाहीसं झालेलंय आणि ही गोष्ट बंगालच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत मध्यवर्ती आहे. याचं कारण असं की आता तिथं ममता बॅनर्जीं यांच्या विरोधी ताकद म्हणून डावे किंवा काँग्रेस यांना उभं रहाणं अतोनात अवघड जाणार आहे आणि इथून पुढं विरोधी पक्ष म्हणून भाजपेयीं स्वतःकडं हे स्थान ठेवणार आहेत. भाजपपेक्षा ममता बॅनर्जी चांगल्या म्हणून काही ठिकाणी माघार घेतलीही असेल. पण, अंतिमतः तिथली डाव्यांची मतं ही ममता विरोधीच मतं होती. ती त्यांनी जर भाजपकडं वळवली असतील तर त्यांना तसं करण्याची गरज नव्हती आणि वळवली नसतील तर ती त्यांना मिळायला पाहिजे होती. त्यामुळं असं वाटतं की डावे नाहीसं होणं, हे ध्रुवीकरण हे मूलतः भाजपनं जो तिथं आक्रमक प्रचार केला, त्याचा परिणाम आहे. आजच्या घडीला कोणत्याही राज्यातला नेता जर राज्यपातळीवर यशस्वी झाला आणि ते ही ममता बॅनर्जी ज्या प्रमाणावर यशस्वी झाल्या त्या प्रमाणावर झाला तर त्याचा दावा अशा प्रकारच्या बिगर भाजप आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी वाढणार. ममता बॅनर्जी यांची मर्यादा ही आहे की त्यांचे या सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी अशा प्रकारचं जिव्हाळ्याचं आणि विश्वासाचं संबंध फारसे नाहीत आणि त्यामुळं हे सर्वजण आज त्यांच्याकडं जातील, त्यांना तुम्ही आमचं नेतृत्व करा, असं म्हणतील. हे जरा कठीणच आहे. त्यांच्याबरोबर हे सगळे कसं राहू शकतील, यासाठी ममता बॅनर्जींना यांना स्वतःच्या नेतृत्वाची शैली काही प्रमाणात का होईना बदलावी लागेल. त्यांना देवाण-घेवाणीची शैली ठेवावी लागेल. तो समझोता जर झाला तर आपण काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१५ साली नितीश कुमारांबद्धल जसं म्हणत होतो तसं मला वाटतं आजचा टप्पा आहे. मात्र, या सर्व गोष्टीला आता फार महत्त्व नाही. कारण ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला बाहेर कुठल्याच राज्यात स्थान नाही. त्यामुळं जोपर्यंत त्या-त्या राज्यातले पक्ष लोकसभा निवडणुकीत निवडून येत नाहीत तोपर्यंत या सगळ्या गप्पा आहेत. या आपापसातल्या समन्वयांच्या पातळीवर राहाणार.

* इथं मुख्य पर्यायी पक्ष म्हणून भाजप उभा राहील*
केरळमध्ये एक ऐतिहासिक वास्तव मांडलं गेलं आहे की, बंगालमधले डावे आणि केरळमधले डावे हे वेगळे-वेगळे आहेत. कामाच्या पद्धती, धोरणं, याबाबतीत. मला असं वाटतं की, हा या सरकारचा विजय नक्की होता. कारण याच्या आधी आलेली नैसर्गिक संकटं आणि आता आलेलं साथीचं संकट या दोन्हीला हे सरकार ज्या पद्धतीनं सामोरं गेलं त्यामुळं या सरकारच्या बाजूनं सकारात्मक मत पडलं. दुसरी गोष्ट लक्षात घ्या की तिथं भाजपनं प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशामुळं केरळचं राजकारण उलटं-पालटं होणार, हे नक्की होतं. त्यामुळं असं वाटतं की जितकं श्रेय सरकारला द्यायला पाहिजे, तितकंच आहे तो पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा यातून यशस्वी झाली. आज डाव्यांचा विजय झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला, म्हणून काही जणांना आनंद होईल. पण, ही धोक्याची घंटा आहे. याचं कारण असं की आज नाही तर पुढच्या ५-१० वर्षांनी इथं मुख्य पर्यायी पक्ष म्हणून भाजप उभा राहील. हा या निवडणूक निकालांचा मुख्य अर्थ आहे. केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसला तरी केंद्रातलं राहुल गांधी हे सर्वांत मोठे नेते प्रचारात होते. ते त्यांचं नवं गृहराज्य आहे. त्यांनी तिथे बराच प्रचार केला. तरीही त्यांचा विजय झालेला नाही. उलट स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाही कमी जागा झालेल्या दिसत आहेत. केरळ आणि आसाम या ठिकाणी काँग्रेसला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. प. बंगालमध्ये तर काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत राहुल गांधी यांचं काय होणार याचा विचार केला तर, असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींना फारशा अनुकूल नसलेल्या गटाला यातून बळ मिळेल. त्यामुळं या घडामोडींच्यानंतर मधल्या काळात काँग्रेसमध्ये जो गोंधळ किंवा मतभेद किंवा वाटाघाटी हे जे काही चाललं होतं त्याला आता जास्त वेग येईल आणि ते चांगलं होईल, असं मला वाटतं. कारण हा पेच काँग्रेसला कधीतरी सोडवावाच लागेल. राहुल गांधींनाच नेता निवडायचं असेल तर निवडा, त्यांना बाजूला करायचं असेल तर करा. पण सध्या जी मधल्यामध्ये लटकलेली अवस्था झालेली आहे ती लवकर संपणं, हे काँग्रेसच्या हिताचं आहे. राहुल गांधींविषयी बोलायचं तर केरळमध्ये भाषेचा प्रश्न असल्यामुळं त्यांचा जनतेशी थेट संवाद होऊ शकत नव्हता. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाला तिथं मर्यादा येणं, स्वाभाविक होतं. मला वाटतं संघटनात्मक प्रश्न हा काँग्रेसचा मध्यवर्ती प्रश्न आहे. केरळ आणि आसाम या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसला चांगली कामगिरी करता न येण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.

*एनआरसीचा मुद्दा असतानाही भाजपला यश*
आसाममध्ये काँग्रेसने बदरुद्दीन अजमल, यांच्या पक्षासोबत युती केली होती. हा बंगाली भाषिक मुस्लिमांचा पक्ष मानला जातो. या पक्षाशी युती करणं, तिथे काँग्रेसला महागात पडलं नाही. पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. अजमलचा जो फायदा व्हायचा किंवा एयुडीएफचा जो फायदा व्हायचा तो झाला. पण, त्याबदल्यात इतर ठिकाणी काँग्रेसला जी मतं मिळायला हवी होती ती मिळाली नाहीत. त्याचं कारण तो सर्व मुस्लिमांचं नेतृत्व करणारा नेता किंवा पक्ष नाही. त्यामुळं आसाममध्ये जी गुंतागुंत होती त्यात हे सर्वांत सोपं समीकरण होतं की एक मुस्लिमांचा पक्ष बरोबर घेतला की प्रश्न मिटेल. तिथं काँग्रेसची फसगत झाली, हे खरं आहे. पण, आपण त्याकडं दुसऱ्या दृष्टीनं पहायला हवंय. ते म्हणजे वर्ष-दीड वर्षापासून तिथं एनआरसीमुळं भाजप विरोधी वातावरण असतानासुद्धा त्यावर मात करून आणि तो मुद्दा सफाईनं बाजूला ठेवून पुन्हा निवडून येणं, हे भाजपचं यश आहे. त्यासाठी लागणारी त्यांची चिकाटी हा मध्यवर्ती मुद्दा ठरतो. गोगोई नसणं, हेही काँग्रेसला अर्थातच महागात पडलं. पण एकूण व्यूहनीती आणि संघटना या दोन्ही बाबतीत काँग्रेस मागे पडली. शिवाय तिथं असलेल्या बोडोच्या प्रश्नावर काँग्रेसला पुरेशी तोड काढता आली नाही. त्यामुळं सगळे बोडो काँग्रेसबरोबर नव्हते. काँग्रेसच्या समाजात हे जे स्तर तयार झालेले आहेत त्यावर मात करण्याचं जे एक नॅरेटिव्ह भाजपकडे आहे ते काँग्रेसकडे नाही आणि भाजपनं ते आसामी अस्मिता आणि हिंदू अस्मिता हे एकत्र आणण्यात यश मिळवलंय. काँग्रेसला यातलं काही करता न आल्यामुळं तिथं काँग्रेसची काही प्रमाणात फसगत झाली. तरीपण तुलनेने त्यांची तिथे वाईट अवस्था नाहीय.

*भाजपेयींना इथं शिरकाव करणं जड जाईल*
तामिळनाडूमध्ये जयललिता आणि करुणानिधी हे दोन मोठे नेते होते आणि गेल्या दोन दशकांपासून त्यांच्याभोवती तिथलं राजकारण फिरत होतं. ते दोघांच्या मृत्यूनंतरची ही पहिली निवडणूक. सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाचे दोन तुकडे पडले होते. भाजपनं ते दोन्ही तुकडे धरून ठेवले आणि ढकलत-ढकलत पाच वर्ष सरकार चाललं. आता अशी अपेक्षा होती की तिथं द्रमुकला भरघोस यश मिळेल आणि अण्णा द्रमुकला फटका बसेल. पण, तसं झालेलं नाहीय. फूट पडूनही अण्णा द्रमुकला ठिकठाक जागा मिळणं, याचा अर्थ काय तर तिथलं राजकारण अजूनही प्रादेशिक चौकटीतच चालणार, हे आहे. म्हणजे काय तर ज्यांना द्रमुक मान्य नाही ते आत्ता इतर कुठलाही प्रयोग करणार नाहीत आणि ते अण्णा द्रमुकबरोबर जाणार. हे दोन पक्षामधलं विभाजन तामिळनाडूत तीव्र आहे. म्हणजे तुम्ही द्रमुकचे नसाल तर तुम्हाला द्रमुकचं काहीच आवडत नाही. त्यामुळं असं वाटतं की येत्या पाच वर्षांत तिथं शिरकाव करणं, भाजपला जरा अवघड जाईल. आता केवळ एकच राज्य उरतंय जिथं भाजपचा शिरकाव होऊ शकत नाहीय आणि ते म्हणजे तामिळनाडू. आणि एक छोटासा मुद्दा म्हणजे निवडणूक आयोगाच्या निष्पक्षपातीपणाबद्धल बोलणं म्हणजे जरा जोखमीचं आहे. पण, तरी असं वाटतं की निवडणूक जाहीर होणार, हे माहीत असण्याच्या एक दिवस आधी तिथला महत्त्वाचा जो मणियार समाज आहे त्याला खास आरक्षण देणारा कायदा मंजूर केला गेला. या छोट्या गोष्टी असतात. त्यानं थेट मोठा फरक पडत नसतो. पण, मणियारांच्या पट्ट्यात यामुळं नक्की फरक पडला असणार. अण्णा द्रमुकच्या जागा तिथे वाढल्या असणार.

*निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम!*
आता या निकालाचे राष्ट्रीय राजकारणावर होणाऱ्या परिणामांविषयी बोलूया. भाजपने एक राज्य राखलं - आसामचं. एका राज्यात बऱ्यापैकी जागा मिळवल्या - प. बंगालमध्ये आणि दोन राज्यात काही विशेष मिळालं नाही. दुसरीकडे काँग्रेस आहे. काँग्रेसनं केरळ आणि आसाम या दोन संधी हुकवल्या. त्यानंतर बंगालमध्ये त्यांची फार वाईट अवस्था झाली. तामिळनाडूमध्ये ते द्रमुकबरोबर सत्तेत आले. पण, तो विजय मुख्यतः द्रमुकचा आहे. तर एकीकडं भाजप आहे, दुसरीकडं काँग्रेस आहे आणि तिसरीकडं ममता बॅनर्जी आणि स्टॅलिन यांच्या रूपात प्रादेशिक पक्ष आहेत. या सर्व निकालांचा राष्ट्रीय राजकारणावर काही परिणाम होईल, का? तर तो परिणाम नक्की होईल. याचं कारण विधानसभा निवडणुकांमधून जे संदेश येत असतात, त्याचा राष्ट्रीय पातळीशी पटकन संबंध जोडता येतो. उदाहरणार्थ डबल इंजिन ही जी कल्पना होती तिला आसाम सोडलं तर कुठेच थारा मिळालेला नाही. याचा अर्थच असा झाला की मोदी आणि शहा यांच्या नेतृत्वाखाली सरसकट जिंकता येतंच असं नाही, हे सुद्धा आता विरोधी पक्षाच्या लक्षात आलं. त्यामुळं जो दरारा निर्माण झाला होता तो कमी व्हायला नक्की मदत होईल. आताचा क्षण देशाच्या दुर्दैवाने अत्यंत संकटाचा आहे आणि त्याचवेळी पंतप्रधान अदृश्य झालेले आहेत. संकटाच्यावेळी पंतप्रधान अदृश्य असण्याची घटना आणि निवडणुकीचे निकाल, या दोन्ही एकत्रपणे मांडणं, जर विरोधी पक्षांना शक्य झालं तर आजचा विधानसभा निवडणुकांचा हा निकाल जरी भाजपला प्रतिकूल नसला तरी राजकारणाला कलाटणी देणारा असू शकतो काँग्रेसनं आपण विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याची भूमिका सोडून द्यायला हवीय. ८९ साली जसं झालं होतं की प्रादेशिक पक्षांच्या पुढाकारानं जनता दलाचं सरकार येऊ शकलं. तो क्षण आता जवळ आलेला आहे आणि तसं जर झालं तर आता राजकारणात काही बदल होऊ शकतील. यात साशंकता आहे. याचं कारण ममता बॅनर्जींसह सगळे प्रादेशिक पक्ष या पद्धतीच्या राजकीय चौकटीचा फारसा विचारच करत नाहीयत. ही दृष्टी जोवर जात नाही तोवर विरोधी पक्षांना एकत्र येणं अवघड जाईल. यातला शेवटचा गमतीचा भाग म्हणजे या सगळ्याचा राष्ट्रीय राजकारणाशी संबंध आहे हे जे भान आहे ते ममतांपेक्षा कदाचित स्टॅलिनमध्ये जास्त आहे. याचं कारण असं की आर्टिकल ३७० पासून अनेक राष्ट्रीय मुद्द्यांवर स्टॅलिन यांनी थेट भूमिका घेतलेली दिसते.

महाराष्ट्राविषयी एक सतत चर्चा सुरू असते की जसं कर्नाटकात झालं, मध्य प्रदेशात झालं, जे राजस्थानात करण्याचे प्रयत्न झाले, तसे महाराष्ट्रातसुद्धा ऑपरेशन लोटस होईल. आता भाजप एका राज्यात वाढलंय, एका राज्यात सत्तेत आलंय, तेव्हा भाजपचा आत्मविश्वास वाढून ते महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस सुरू करतील का? दुसरं असं काँग्रेसची अवस्था आता आणखी बिकट झालीय. त्याचा परिणाम होऊन इथल्या काँग्रेस नेत्यांच्या मनात चलबिचल होईल का? तत्त्वतः म्हणाल तर स्पर्धात्मक राजकारण हे प्रत्येक राज्याचं स्वायत्त असतं. त्यामुळं बंगालमध्ये झालं म्हणून इथे काही होईल, असं नाहीये. बंगाल निकालानंतर भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा जो फुगलेला आत्मविश्वास होता तो आता थोडा खाली आला असल्यामुळं भाजप कुठलाही मोठा निर्णय घाईघाईनं करणार नाही. भाजप मोठा पक्ष असल्यामुळं त्यातही अंतर्गत हेवेदावे, स्पर्धा असणार. आता मोदी आणि शहा एका अर्थानं बंगालच्या बाबतीत बोलायचं झालं तर औपचारिकपणे हरले आहेत. त्यामुळं आता त्यांना क्षणभर का होईना थांबावं लागेल. एक मुद्दा महत्वाचा आहे की आज जर अशा प्रकारची पाडापाडी केली गेली तर ज्या प्रकारचं संकट देशावर आलेलं आहे त्यावेळी असं काही जर घडलं तर ते सहजासहजी यशस्वी होईल आणि पुढच्या राजकारणाला भाजपला त्याचा फायदा होईल, असं वाटत नाही. त्यामुळं महाराष्ट्रात आताच ऑपरेशन लोटस होईल, असं वाटत नाही. दुसरं म्हणजे काँग्रेसमध्ये चलबिचल नेहमीच असते. पण, ते फुटण्यासाठी जेवढा जोर लागतो तेवढा किती लोकांमध्ये आहे, याबाबत शंका आहे. राज्यातली महाविकास आघाडी फुटण्याचं एकच कारण घडू शकतं. ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसनेच जर ठरवलं तर शक्यता वाटते. नाही तर हे आता शक्य नाही. याचं कारण शरद पवारांचं ९९ सालापासून जे राजकारण आहे ते नेमकं प्रादेशिक पातळीवरचे सर्व पक्ष, नेते यांनी एकत्र आणायचं आणि मग त्यात आपलं महत्त्व जेवढं वाढवायचं तेवढं वाढवायचं, हे आहे. तशी संधी त्यांना पुन्हा एकदा आलेली असताना ते या भानगडीत पडणार नाहीत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता स्वतःच्या पायावर काही धोंडा पाडून घेतला नाही तर आतातरी महाराष्ट्रात फार मोठी खळबळ लगेच काही होईल, असं वाटत नाही. भाजपसुद्धा बॅकफुटवर असणार आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे
हरीश केंची
९४२२३१०६०९

चौकट.....!
पक्षाध्यक्ष अमित शहांची निवडणुकांपूर्वीची वक्तव्ये...! आणि प्रत्यक्षातली स्थिती...!
◆ २०१५ बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 'दोन तृतीयांश बहुमतानं एनडीएचं सरकार येईल....!' असं म्हटलं होतं; पण त्यावेळी लालूप्रसाद यादव यांचा राजद, नितीशकुमार यांच्या जेडीयु आणि काँग्रेस युतीचं सरकार तिथं आलं. विधानसभेच्या २४३ जागांपैकी भाजपच्या एनडीएला ९५ तर लालू-नितीश-काँग्रेस युतीला १३७ जागा मिळाल्या आणि आरजेडी-जेडीयु-काँग्रेस युतीच्या नितीशकुमार यांचं सरकार आलं
◆ २०१८ मध्ये मध्यप्रदेशात 'निश्चितपणे दोन तृतीयांश बहुमतानं भाजपचं सरकार येईल....!' असं म्हटलं गेलं; पण तिथं काँग्रेसच्या कमलनाथ यांचं सरकार आलं. विधानसभेच्या २३० पैकी काँग्रेसला ११६ तर भाजपला १०५ जागा मिळाल्या.
◆ २०१८ मध्ये छत्तीसगडमध्ये 'चौथ्यांदा ६५ जागा जिंकून आम्हीच भाजप सत्तेवर येऊ...!' असं म्हटलं गेलं; पण तिथं काँग्रेसचं भुपेश बघेल यांचं सरकार आलं. विधानसभेच्या ९० पैकी काँग्रेसला ६३ तर भाजपला १८ जागा मिळाल्या.
◆ २०१८ मध्ये 'मला निश्चित विश्वास आहे की, राजस्थानात पूर्ण बहुमतात आमचं भाजप सरकार पुन्हा येईल. पण तिथं काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांचं सरकार आलं. विधानसभेच्या २३० पैकी काँग्रेसला १०१ तर भाजपला ७२ जागा मिळाल्या.
◆ २०१८ मध्ये 'झारखंडमध्ये आमचंच भाजप सरकार येईल....!' पण तिथं विधानसभेच्या ८१ पैकी झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस युतीला ४३ मिळाल्या आणि युती सत्तारूढ झाली. तिथं हेमंत सोरेन यांचं सरकार आलं. तर भाजपला २६ जागा मिळाल्या
◆ २०१९ 'महाराष्ट्रात आम्हाला दोनतृतीयांश बहुमत मिळेल आणि आमचाच मुख्यमंत्री होईल....!' पण तसं झालं नाही. १०५ जागा मिळाल्या, पण सरकार स्थापन करता आलं नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचं सरकार स्थापन झालं.
◆ २०२० मध्ये 'दिल्ली विधानसभेत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार अस्तित्वात येईल....!' पण विधानसभेच्या ७२ पैकी ५८ आम आदमी पक्षाला तर भाजपला १२ जागा मिळाल्या. आपचे केजरीवाल मुख्यमंत्री झाले.
◆ २०२१ मध्ये 'बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा मिळवून भाजपचं सरकार येईल....!' पण विधानसभेच्या २९२ पैकी तृणमूल काँग्रेसला २१५ तर भाजपला ७७ जागा मिळाल्या. तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या.

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...