Monday 27 February 2017

*शेकाप आता मूळ ध्येयाकडे जायला हवा!*

*शेकाप आता मूळ ध्येयाकडे जायला हवा!*

शनिवारवाड्याच्या साक्षीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये नुकताच प्रवेश झाला. प्रवीण गायकवाड यासारख्या पुरोगामी विचाराच्या अभ्यासू कार्यकर्त्याला योग्य असे व्यासपीठ मिळाले. त्यांची जडणघडण ही मराठा सेवा संघ वा संभाजी बिग्रेड सारख्या जातीवादी विचारांची आहे असं प्रथम दर्शनी वाटतं पण ते फारसं खरं नाही. त्यांच्यावर खरे वैचारिक संस्कार झाले आहेत ते बामसेफच्या वामन मेश्राम यांचे. गायकवाडांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला तो साम्यवादी विचाराशी जवळीक असलेल्या शेतकरी कामगार पक्षातून! देशभर भाजपमध्ये जाण्याला वेग आला असताना त्यांनी सत्तेचे राजकारण करण्याऐवजी वैचारिक राजकारण करण्याचा जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद म्हणायला हवा. शेकाप हा कधी सत्तेत येईल ही शक्यता नाही त्यामुळे गायकवाड यांच्या या वैचारिक भूमिकेचं स्वागतच करायला हवे.
पुण्याचे केशवराव जेधे यांनी ह्या पक्षाची स्थापना केली असली तरी पुण्यात तो पक्ष काही रुजला नाही.  पण पुण्यातल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी शेकापला जवळ केले ही त्यापक्षांच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी आनंददायक गोष्ट आहे. या पक्षाला इतिहास असल्याने त्याला वर्तमान आहे आणि भवितव्यही आहे, असा या कार्यकत्यांना विश्वास वाटला असावा. पण वैचारिक कसोटीवर शेकापचा विचार केला तर तो ही अन्य पक्षांसारखा नाटकी आणि ढोंगी बनल्याचे दिसून येईल. अर्थात आजच ढोंग काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर पूर्वीचं सत्य जाणून घ्यावं लागेल.
शेकापची स्थापना स्वातंत्र्याच्या स्थापनेनंतर लगेचच झाली. नाशिक जिल्ह्यातल्या दाभाडीत भरलेल्या अधिवेशनात पक्षाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. हिंदी कम्युनिस्ट पक्षाची कथित चुकीची धोरणं, समाजवाद्यांच्या मर्यादा लक्षात घेत ग्रामीण आधार असणारा शेतकरी आणि शहरी आधार असणारा कामगार यांचा खराखुरा पक्ष अशी गर्जना या पक्षाने केली. दाभाडी प्रबंधांद्वारे आपली बांधीलकी साम्यवादी तत्वज्ञानाशी असल्याचं स्पष्ट केलं. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, काकासाहेब वाघ, दाजीबा देसाई, भाऊसाहेब राऊत, उद्धवराव पाटील आणि त्यांच्याच उंचीचे आणखी काही नेते या पक्षाला लाभले. त्यातल्या बहुतेकांनी पूर्वी काँग्रेस पक्षात काम केलेलं. त्यामुळे काँग्रेसपक्षासमोर शेकापने मोठं आव्हान उभं केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार काँग्रेसचे उमेदवार होण्याआधी शेकापचे समर्थक होते, त्यांच्या मातोश्री शारदाबाई या शेकापच्या कार्यकर्त्या होत्या.
शेकापच्या स्थापणेनंतरच्या दहा वर्षाने महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र त्यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकात शेकापने काँग्रेससमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं. स्थापनेनंतर लगेचच या पक्षाला फुटीला सामोरं जावं लागलं. मात्र १९५७ च्या निवडणुकीत शेकापच्या वाढीला संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न उपयोगी पडला. या निवडणुकीत शेकापची आमदार संख्या ३१ एवढी होती. यशवंतराव चव्हाण यांचाही १९५७ च्या निवडणुकीत पराभव झाला असता. पण काँग्रेसी तंत्र कामी आल्यानं ते १६०० मतांनी वाचले. पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याचं जवळजवळ निश्चित झालं. यशवंतराव चव्हाण तो पर्यंत मुत्सदी झाले होते. आपल्यापुढचं खरं आव्हान शेकापचच असल्याचं त्यांनी जाणलं होतं. त्यांने काँग्रेस आता 'देव-देवगिरीकरांची राहिली नसून ती बहुजनांची आहे. पक्षात या आणि तुम्हीच नेतृत्व करा. पक्ष तुमचाच आहे' या आशयाच आवतण शेकापचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिलं. यालाच म्हटलं जातं बेराजेचं राजकारण. मग काय शेकापचे संस्थापकच चव्हाणांच्या गळाला लागले. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव यांनीच पक्षाला लाल सलाम ठोकल्याने त्यांचे समर्थक असणारे अनेकजण शेकापतून काँग्रेसमध्ये गेले. शंकरराव मोहिते-पाटील, यशवंतराव मोहित, पृथ्वीराज चव्हाणांचे वडील आनंदराव चव्हाण हेही त्यांच्यामागून काँग्रेसमध्ये आले. कुणी साखर कारखाना, तर कुणी तहहयात , पिढ्यानपिढ्या सत्तेची हमी मिळविली.
नेते आणि प्रमुख कार्यकर्तेच वर्गमित्र बनण्याऐवजी वर्गशत्रू झाल्याने शेकापच्या उभारणी, विस्ताराला मोठा तडा गेला. मात्र विचारांची बांधिलकी मानणारा मोठा घटक पक्षातच राहिल्याने पक्षाचं अस्तित्व राहिलं. त्यानंतरच्या काळात रायगडात जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागू पाटील, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात माधवराव बागल, दाजीबा देसाई, उस्मानाबादेत उद्धवराव पाटील, परभणीत अण्णासाहेब गव्हाणे, नाशिकात विठ्ठलराव हांडे, नांदेडात केशवराव धोंडगे, सांगलीत जी. जी लाड, हे पक्षाचे चेहरे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शेतकरी कामगारांचे प्रश्न आणि काँग्रेसविरोधी राजकारण एवढ्या मर्यादेतच शेकाप कार्यरत राहिला. जमीनदार मराठयांचा पक्ष अशी सुरुवातीच्या काळात होणारी पक्षावरची टीका या नव्या दशेने पुसून काढली. व्यापक सामाजिक ओळख हे या पक्षाचं वैशिष्ठ्य होते. सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीची पार्श्वभूमी असणारे नेते आणि गांधी हत्येनंतर जाळपोळीत सहभागी असणारे बहुसंख्य कार्यकर्ते, अशी पक्षाची ओळख असतानाही या पक्षात सर्व जातींच्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरसारख्या मतदारसंघातून पक्षाने त्र्यंबक कारखानीस यांना निवडून आणलं. पुण्याच्या शिवाजीनगरातून बंडोपंत किल्लेदार निवडून आले होते. तसेच कुंडलिक घोडके हे कळंब, ज्ञानोबा हरी गायकवाड हे गंगाखेड, यांच्यासारख्या दलित कार्यकर्त्यांना पक्षाने आमदार म्हणून निवडून आणलं. भाऊसाहेब राऊत हे कोळी समाजाचे कार्यकर्ते आणि गणपतराव देशमुख हे धनगर समाजातून पुढं आलेलं नेतृत्व शेकापचा व्यापक आधार स्पष्ट करीत होतं.
भाऊसाहेब राऊत यांचा अपवाद सोडला ता संस्थापक नेतेच पक्ष सोडून गेले तरी, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्ष जगवला, वाढवला. मात्र ही वाढ द्रमुकसारखी व्यापक आणि बंगाली कम्युनिस्ट पक्षासारखी शिस्तबद्ध नव्हती. उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, दत्ता पाटील, विठ्ठलराव हांडे, यासारखे काही मोजके नेते सोडले, तर इतरांना आपल्या कार्यक्रमाशी बांधिलकी आणि वैचारिक आग्रह याच वावडं होतं. सार्वजनिक उद्दिष्टांपेक्षा व्यक्तिगत उद्दिष्ट,  सामाजिक सुरक्षिततेपेक्षा सर्वार्थच व्यक्तिगत संरक्षण याबाबी पक्षाच्या वाढविस्ताराची नसबंदी करून टाकणाऱ्या ठरल्या. नेते सोडून गेले तरी, कार्यकर्त्याच्या जोरावर १९५७ मध्ये शेेकाप प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र तेव्हाची ३१ ही आमदारसंख्या शेकापला पुढे कधीही गाठता आली नाही. २००४ साल तर या पक्षासाठी एवढ्या वाईट पद्धतीने उजाडलं की, विवेक पाटील आणि गणपतराव देशमुख हे दोनच आमदार निवडून आले. कोणत्याही पक्षाचा प्रभाव किती हे संसदीय यशापयशात मोजल जात असलं तरी विचाराचं महत्व आणि प्रभाव संख्येपेक्षा मोठा असतो. लाल निशाण गट सध्या कोणतीही निवडणूक लढवीत नाही मात्र १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाने काँग्रेसला शिवसेना - भाजपच्या विरीधात इतर पक्षाशी आघाडी करायला लावली होती. शेकाप प्रमुख विरोधीपक्ष राहू शकला नसेलही, मात्र त्याने आपली वैचारिक ओळख हरवली, हेच त्या पक्षाच्या ओहोटीच्या कारण आहे. गायकवाड यांचासारख्या विचारांशी बांधिलकी असलेला नेता ही परिस्थिती बदलू शकतो का हे एक आव्हान आहे.
१९८० च्या दशकात २१व्या शतकाच्या समाजकारणाची अनेक बीज रोवली गेली. या बदलत्या परिस्थितीच भान ज्या पक्षांना होतं, ज्यांनी आपल्या चाली बदलाला अनुसरून ठेवल्या, ते टिकले आणि वाढले. १९८० पर्यंत शेकाप आपला वैचारिक पिंड आणि बाणा टिकवून होता. पण कोणत्याही राजकीय पक्षाला वास्तवाचं जे भान या असावं लागतं ते शेकापकडं फार कमी होतं. मुख्य म्हणजे, नव्या पिढीशी आपलं नातं जोडण्यात या पक्षाला १९८५ नंतर काहीही करता आलेलं नाही. त्यानंतर या पक्षात नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून कोण आलं असतील तर उदा. जयंत पाटील अलिबाग, विजय देवणे कोल्हापूर. एका नेत्याचा पुतण्या दुसरा कार्यकात्याचा मुलगा. दोघांनाही आपण कोणत्या पक्षात आहोत, आपल्या पक्षाची ओळख ती कोणती? हे कधी उमगलं नसावं. आपले वर्गशत्रू असणारे काँग्रेस आणि शिवसेना भाजपसारखे पक्ष यात आणि आपल्यात कोणताच फरक नाही, अशीच त्यांची शैली आणि देहबोली राहिली. त्यामुळे जयंत पाटील यांना संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसेना भाजपशी उघडपणे युती करण्यात काही गैर वाटत नाही. तर विजय देवणेंना चक्क शिवसेनेतच जाण्यापासून शेकापच नेतृत्व रोखू शकलं नाही. मर्यादा नेर्तृत्वाच्याच होत्या; तत्त्वज्ञानाच्या नव्हत्या! त्यामुळे 'सत्ता कधीच येणार नाही, हे माहीत असतानाही आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर राहतात' हा प्रा.एन.डी.पाटील यांचा दावा टिकाऊ ठरला नाही. परिणामी शेषराव देशमुख, रामशेठ ठाकूर यांच्यासारखे माजी खासदार, जी डी. लाड, ज्ञानोबा हरी गायकवाड, चंद्रकांत निंबाळकर, जनार्दन तुपे, यांच्यासारखे माजी आमदार अन्य पक्षाच्या वळचणीला गेले. अशा परिस्थितीत पक्षाची वैचारिक बांधिलकी राखण्याचे काम प्रवीण गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्यावर आहे.त्यांना त्यांच्या या कामात यश मिळो हीच शुभेच्छा...!
- हरीश केंची.

सेना-मनसेचे द्वंद्व...!

शिवसेना-मनसेचे द्वंद्व...!

२००९ सालात चौदाव्या लोकसभेची निवडणूक झाली होती आणि त्यात शिवसेना भाजपाला मुंबई परिसरात जबरदस्त मार खावा लागला होता. त्यात कॉग्रेसचा मोठा विजय झाला होता. तरीही त्याचे खरे श्रेय त्या पक्षाला अजिबात नव्हते. खरा मानकरी एकही लोकसभेची जागा जिंकू शकला नव्हता. मात्र आपण त्या निकालाचे खरे मानकरी आहोत हे सांगायला तोच पराभूत पक्षाचा नेता हिरीरीने पुढे आला होता. एकही खासदार निवडून आला नसतानानिकालानंतरची पहिली पत्रकार परिषद तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली होती. आज त्यांनाही त्याचे स्मरण उरलेले नसेल. कारण आज त्यांचा पक्ष राजकीय खिजगणतीत राहिलेला नाही. तेव्हा लोकसभा निकालाचा अर्थ स्पष्ट करतानाआपण काय केले ते अतिशय खोचक भाषेत राज ठाकरे यांनी सांगितले होते. अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या अंथोनी गोन्सालविस भूमिकेचा डायलॉग राजने पत्रकारांना ऐकवला आणि समोरचे पत्रकारही खिदळले होते. तुमने हमको बहूत मारा. हमने तुमको एकही मारा. लेकीन सॉलिड माराहै के नही?’ असे राजचे शब्द होते. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद वा खुशी लपून राहिलेली नव्हती. कारण मनसेने जी मते फ़ोडलीत्याचा फ़टका शिवसेना व भाजपा युतीला बसला होता आणि त्यातले खोचक शब्द शिवसेनेला बोचावेतम्हणूनच राजनी उच्चारलेले होते. आपल्या यशापेक्षा दुसर्‍याच्या अपयश वा दु:खामध्ये जेव्हा आनंद शोधला जातोतेव्हा असेच होते. पण ते बोचरे शब्द ऐकून शिवसेनेचे तेव्हाचे कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कुठलीही प्रतिक्रीया दिली नव्हती. कारण ती उत्तर देण्याची वेळ नव्हती. त्यापेक्षा जी स्थिती आली आहेती परतवून लावण्याला अर्थ व प्राधान्य होते. ती स्थिती पुढल्या अडीच वर्षांनी मुंबई पालिकेच्या निकालानंतर आमुलाग्र बदलून गेली होती. उद्धवनी तेव्हा तोंड उघडले होते. त्याला चोख उत्तर म्हणतात.
पण विषय चोख उत्तर वा उद्धव ठाकरे असाही नाही. सवाल आहे तो राज ठाकरे यांच्या नंतरच्या वाटचालीचा! मतदाराने उद्धव किंवा सेनेच्या विरोधात तेव्हा राज ठाकरे व मनसेला साथ दिलेली होती. त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त करणारा मतदार मनसेचा गुलाम वा हुकूमाचा ताबेदार नव्हता. तो फ़क्त सेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेल्या राज ठाकरे यांचा सहानुभूतीदार होता. पण ते समजून घेण्याचा काडीमात्र विचार राज ठाकरे यांच्या मनाला शिवला नाही. लौकरच आलेल्या राज्य विधानसभेच्या मतदानातही तीच सहानुभूती कायम राहिली आणि तिथेही युतीला व प्रामुख्याने शिवसेनेला मोठा फ़टका बसला होता. मुंबईत तर सेनेपेक्षा एक आमदार जादा निवडून आणण्यातही राजना यश मिळाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला राजनी शह दिलाअसेच मानले जात होते. पण नंतर दोन वर्षात महापालिका निवडणूकीत उद्धवनी हेटाळणीबोचरी भाषा वा टिंगलीसह सर्व गोष्टींची सव्याज परतफ़ेड केली होती. पण दरम्यानच्या दोन अडीच वर्षातउद्धव ठाकरे यांनी कमालीचा संयम दाखवला होता. उलट राज ठाकरे त्या यशाने इतके हुरळून गेले होतेकी बाळासाहेबांच्या थाटात वागण्या बोलण्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली होती. सतत सेनेला डिवचणारी भाषा व वक्तव्ये करूनराज नित्यनेमाने माध्यमांच्या गळ्यातले ताईत बनून गेलेले होते. उलट उद्धव हा अपेशी वारस,अशीच प्रतिमा निर्माण झालेली होती. तरीही डिवचणार्‍या भाषेला उत्तर देण्याची घाई उद्धवनी कधीच केली नाही. सार्वजनिक पाताळीवर त्यांनी मौनव्रत घेतल्यासारखी अशा टिकेकडे साफ़ पाठ फ़िरवलेली होती. दुसरीकडे राज मात्र देशातील कुठल्याही लहानसहान घटनेविषयी मतप्रदर्शनाची संधी सोडत नव्हते. आज तेच राज ठाकरे किती शांत झाले आहेत नाकारण त्यांच्यामागच्या सहानुभूती व राजकीय शक्तीचा प्रभाव अस्तंगत झाला आहे.
सतत बोलत राहिले आणि दुसर्‍याच्या अपयशाला आपले यश समजण्याचा आततायीपणा केलामग यापेक्षा दुसरे काही होत नाही. आपले स्पर्धक वा शत्रू त्यांच्या कृतीने व चुकांमुळे अपयशी ठरणारच असतात. त्यांच्या त्या चुकांमुळे निर्माण होणारी पोकळी भरून काढण्याची संधी शोधत रहाणे आणि तीच पोकळी व्यापण्यासाठी आपली सज्जता करण्याची गरज असते. २००९ ते २०१२ या कालखंडामध्ये उद्धव ठाकरे नेमकी तीच गोष्ट अतिशय शांत राहून करीत होते आणि कृतीतून यशातून उत्तर देण्याची जमवाजमव करीत होते. त्याची पहिली प्रचिती मुंबई महापालिकेच्या यशातून त्यांनी लोकांना घडवली. नंतर त्या यशाचे वर्णन करतानात्यांना मनसे किंवा राज ठाकरे यांच्याविषयी अवाक्षरही बोलावे लागलेले नव्हते. कारण मुंबई पालिकेच्या त्या निकालांनीच राजला किंवा टिकाकारांना उत्तर दिले होते. तिथून मग उद्धवचा जमाना सुरू झाला आणि राज ठाकरे यांची घसरगुंडी सुरू झालेली होती. नंतरच्या आपल्या प्रत्येक वक्तव्यातून किंवा अतिशयोक्त विधानातून राज ठाकरे आपला सहानुभूतीदार गमावत गेले. कारण नुसते बोलणे वा अखंड बोलत रहाणेउपयोगाचे नसते. बाळासाहेब यांची आवडती उक्ती होती. सौ सुनार की एक लोहारकी! याचा अर्थ आपल्या विरोधकांनी हवी तितकी बडबड करावी. आपण केवळ घणाचा एक घाव घालून विषय संपवतो. त्यांचीच तंतोतंत नक्कल करणार्‍या राजना साहेबांचा तो संयम वा प्रसंगावधान ओळखण्याचे भान राखता आले नाही. उद्धवनी तेव्हा तरी ते भान राखले होते आणि वेळ आलीतेव्हा घणाचा घाव कृतीने घालून विवाद संपवला होता. राजच्या चुकांनी त्यांना राजकारणात निष्प्रभ केले. त्यांना लागलेली ठेच इतरांना शहाणी करणारी ठरली काय?मराठीत पुढल्यास ठेच म्हणतात. त्याचा अर्थ मागून येणारा सावध होऊन तीच चुक करत नाही. आज तसा काही अनुभव येतो आहे काय?
२००९ चे मोठे पराभव पचवून संयम दाखवत आपली शक्ती जमवणारे उद्धव ठाकरेआज आपलाच तो गुण विसरून गेले आहेत कायअशी कधीकधी शंका येते. कारण युती तुटल्यानंतर त्यांनी त्याच आपल्या संयमाची फ़ारशी साक्ष दिलेली नाही. कृतीने घणाचा घाव घालण्याची आपलीच काही वर्षापुर्वीची रणनिती,हा माणूस विसरून गेला काय अशी हल्ली शंका येते. राज यांनी २००९ नंतर सातत्याने प्रत्येक गोष्टी बोलून काय मिळवले आणि किती गमावलेत्याची यादी इथे सादर करण्याची गरज नाही. त्याचप्रमाणे त्या काळात जाहिर वाच्यता न करता उद्धवनी काय साधलेतेही तपशीलाने कथन करण्याची गरज नाही. लोकसभेपुर्वी बीकेसी येथे हिरेव्यापार्‍यांनी नरेंद्र मोदींचा सत्कार केलेला होता. तिथे सिंहासनासारख्या खुर्चीवर मोदी आणि साध्या कोचावर उद्धवना बसवले गेलेम्हणून माध्यमातून कितीतरी डिवचणार्‍या बातम्या झळकवल्या होत्या. त्याला साधा प्रतिसादही देण्याइतकी दखल उद्धवनी घेतली नव्हती. तेच उदधव आज नित्यनेमाने जी वक्तव्ये करीत आहेतती मनसे अध्यक्षांच्या तेव्हाच्या वक्तव्यांचे स्मरण करून देणारी आहेत. पण त्याचवेळी राज ठाकरेंना कुठे व कसली ठेच लागलीत्याचेही विस्मरण होत असल्याची साक्ष देणारी आहेत. आज त्यांच्या अशा वक्तव्यांनी भोवतालचे अनुयायी सुखावतही असतील. पण तसेच राजचेही अनुयायी गुदगुल्या झाल्यासारखे तेव्हा हसत नव्हते कायतो आनंद तात्कालीन असतो. आज कोणाला राजचा तो डायलॉग आठवत नाहीकिंवा राजच्या शब्दातली ती जरब राहिलेली नाही. ती कशाला संपलीते ओळखणारा सावध झाला असे म्हणता येते. पण जेव्हा राज बोलत होतेतेव्हा त्यांना कोणी संयम राखण्याचा दिलेला सल्ला आवडला असता कायतेव्हा टाळ्या पिटणारे आवडतात आणि नंतर परिणाम भोगायची वेळ आल्यावरतेच सर्वात आधी फ़रारी होत असतात.

*मनसेचं पानिपत अन भाजपचा परकायाप्रवेश!*

*मनसेचं पानिपत अन भाजपचा परकायाप्रवेश!*

महापालिका निवडणुकीत मतांचं दान कुणाच्या पदरात पडलं हे आता समजलयं. यात भाजपनं आपलं वर्चस्व दाखवलं. २००९ आणि २०१२ मधल्या सार्वत्रिक निवडणुकीत आपलं उपद्रवमुल्य आणि अस्तित्व अधोरेखित करणाऱ्या मनसेचं २०१४ आणि२०१७ च्या निवडणुकीत मात्र पानिपत झालं. यांचं विश्लेषण करताना अनेकांनी राज ठाकरे यांना जबाबदार धरलं. पण संघ आणि भाजपच्या कुटनीतिकडे दुर्लक्ष केलं. आज मात्र भाजपला यश मिळवून दिलं असलं तरी त्यांची ती कुटनीती मात्र यशस्वी झाली नाही शिवसेना संपली नाही उलट मजबूत झाली आणि मनसेही त्या त्यांच्या कामी यशस्वी ठरली नाही, असंच म्हणावं लागेल.

मनसेची स्थापना झाली ती शिवसेनेच्या वारसदारासाठीच्या झगड्यातून! त्यांच्यामागे त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटणारे जसे उभे राहिले. तसेच राम कदम, अवधूत वाघ यासारखे भाजपेयींदेखील.  पक्षस्थापनेनंतर झालेल्या २००९च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला लाख लाख मते मिळाली अन शिवसेनेला मार खावा लागला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तब्बल १३ आमदार निवडून आले. शिवसेनेला धक्का दिला गेला, महापालिका निवडणुकीत तर कमालच झाली. मनसेला नाशिकची सत्ता मिळतानाच कल्याण-डोंबिवली, मुंबई, ठाणे, पुणे इथे मजबूत असे संख्याबळ मिळाले. त्यामुळे एक नवी राजकीय शक्ती उभी राहिली असं चित्र निर्माण झालं. या यशाने ते पार हुरळून गेले. आपणच सेनाप्रमुखांचे खरे राजकीय वारसदार असं चित्र उभं करण्यात ते आणि त्याचे समर्थक यशस्वी ठरले.पण ती क्षणभंगुरता ठरली. त्यानंतरच्या लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकात मनसेचं अक्षरश: पानिपत झालं.

या मागचं राजकारण काही वेगळंच होतं हे त्यांच्या लक्षातही आलं नाही. शिवसेना आणि भाजप यांची युती ही प्रमोद महाजनांनी पुढाकार घेऊन केली होती. त्यांना शिवसेनाप्रमुख नव्हे तर शिवसैनिक हवे होते.  भाजपतल्या अनेकांना त्यातही केवळ बहुजन समाजाचे आहेत म्हणून नेते बनले होते अशांना ही युती मान्य नव्हती. वामनराव परब, सूर्यभान वहाडणे, ना.स.फरांदे यांच्यापासून अगदी मधू चव्हाण व इतरांपर्यंत अनेकांनी याला विरोधही केला पण महाजनांच्या पुढे कुणाचे काही चालले नाही. अशा युती विरोधकांची झालेली कोंडी मनसेच्या आगमनानेे दूर झाली. शिवसेनेला घरातूनच उभं ठाकलेलं आव्हान,पडलेली फूट यामुळे शिवसेना संपविण्याचा विचार करणाऱ्या संघ आणि भाजपेयींनी शिवसेनेला पर्याय मनसेला जवळ केलं. राज यांचे सहानुभूतीदार आणि शिवसेना विरोधक संघ स्वयंसेवक, भाजपेयी यांनी २००९आणि त्यानंतरच्या सर्व निवडणुकीत जिथे शिवसेनेचे उमेदवार होते तिथे उच्चवर्णीय भाजपेयी, संघ स्वयंसेवक यांनी मनसेच्या पारड्यात आपली मते टाकली. त्यामुळे मनसेला जिथे मोठे यश मिळाले हे लक्षपूर्वक पाहिले की ही कुटनीती लक्षात येते. 

राज ठाकरे आणि मनसैनिकांना भाजपेयींची कुटनीती लक्षात जशी आली नाही तशीच ती हे बाळसं नसून सूज आहे हे ही लक्षात आलं नाही, पाठोपाठ गडकरी, फडणवीस, तावडे,यांच्यापासून अनेक भाजपेयी नेत्यांच्या राज यांच्या कृष्णकुंजवर राबता सुरु झाला. हे अनपेक्षित घडत गेल्याने राज व इतर आपल्याच तोऱ्यात वावरू लागले. त्यामुळे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाले.

लोकसभा निवडणुकीत भाजपला 'नरेंद्रशक्ती' प्राप्त झाली. ज्या मोदींचा स्वीकार आणि प्रचार राज ठाकरे यांनी केला त्यांची मग कोंडी झाली. मोदी लाटेत ती सारी मते वाहून गेली. परिस्थितीचं गांभीर्य त्यांना ओळखता आलंच नाही. विधानसभा निवडणुकीत २५ वर्षांची सेना भाजप युती तुटली. युती नको, शिवसेना नको म्हणून मनसेला जवळ करणाऱ्या संघ स्वयंसेवकांना, त्यामुळे भाजपला मते देण्याचा मार्ग मोकळा झाला.  ती मते पुन्हा भाजपकडे वळली. त्यामुळे विधानसभेत मनसेचा दारुण पराभव झाला. या पराभवातूनही मनसे काही शिकली नाही. सावरण्याची संधी मिळाली होती, पण आत्मघातकीपणाने ती घालविली. याचीच पुनरावृत्ती नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत झाली.मनसेचा सुपडासाफ झाला. ह्या पानिपतात जे काही मोहरे निवडून आले  आहेत तीच खरी मनसेची ताकद आहे हे ओळखून पुन्हा नव्याने पक्षबांधणी, मतपेढी तयार करायला हवी.

*भाजपचा परकायाप्रवेश*

मोदींच्या आणि अमित शहा यांच्या व्यूहरचनेनुसार भाजप आमूलाग्र बदलला. आपली शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी, साधनसुचिता असणारा पक्ष अशी असलेली प्रतिमा त्याने झटकून टाकली. 'शेठजी-भटजी' यांचा पक्ष म्हणून जी संभावना केली जात होती ती जाणीवपूर्वक बदलण्याचा त्यांनी प्रयत्न सुरु केला. काँग्रेसवाल्यानी हाताळलेले सर्व 'व्यवहारवादी' राजकारण त्यांनी अंगिकारले. त्यानुसार सत्तेच्या माध्यमातून कोणताही विधिनिषेध न बाळगता सर्व पक्षातल्या गणंगांना त्यांनी भाजपची झुल चढविली. 'निवडून येण्याची क्षमता' ह्या  एकमेव निकषांच्या आधारे आपल्या कार्यकर्त्याशिवाय इतर पक्षातील अनेकांना उमेदवारी दिली आणि आपली पक्की मतपेढी तयार करण्यासाठी विधानसभेपासून सुरुवात केली. नगरपालिका आणि महानगरपालिका यात हेच धोरण त्यांनी स्वीकारलं.

आजवर पक्षाच्या प्रचार यंत्रणेसाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत असे. असे हे परावलंबित्व  झटकून टाकलं. आपल्या कार्यकर्त्याचीच प्रचार यंत्रणा, संपर्काप्रणाली सज्ज केली. सत्तेबरोबरच साम,दाम,दंड,भेद याचा वापर करीत ग्रामीण भागात पक्षविस्तार आणि ग्रामीण सत्ता हस्तगत करण्यासाठी ते सरसावले. अरे ला कारे म्हणण्यासाठी गुंडांनाही पक्षप्रवेश दिला. जेणेकरून आजवर पक्षाचा जो चेहरा होता तो बदलण्याचा प्रयत्न सुरु केला त्यात त्यांना विधानसभा, नगरपालिका,आणि आता महानगरपालिका निवडणुकीत फार मोठे यश लाभले हे आपण जाणतो. आजवर सामूहिक नेतृत्व ही संकल्पना भाजपत राबविली जात असे पण आता मोदींप्रमाणेच प्रत्येक राज्यात एक एक चेहरा तयार केला गेला आहे. तो मतदारांसमोर आणला.

आता भाजपचे रूप बदलू लागले आहे. सर्व सत्ताधीश बनल्याने आता त्यांच्याकडे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पैशाला तोटा राहिला नाही. पक्षाचे निष्ठावंत अजूनही प्रत्यक्ष राजकारणात येण्याऐवजी मागे राहूनच काम करण्यात धन्यता म्हणताहेत. सत्ताचाटण एकदा लाभलेलं असताना ते पुन्हा दूर जाणार नाही याची खबरदारी घेतली जातेय, त्यासाठी विकासाचा आभास निर्माण केला जातोय, त्याचं गारुड उभं करताहेत. अगदी थेट काँग्रेसच्या पावलावर पावलं टाकून वाटचाल सुरु झालीय जणू परकायाप्रवेश केल्याप्रमाणे...!

- हरीश केंची,

*भाजपची भगवी काँग्रेस झालीय!*

*भाजपची भगवी काँग्रेस झालीय!*

महाराष्ट्राच्या महापालिका राजकारणात आता रंग भरू लागलाय. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सत्तासुंदरीसाठी सुंदोपसुंदी सुरु झालीय. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडताहेत. यात कोण अधिक भ्रष्टाचारी, कोण अधिक दुराचारी यावर एकमेकांवर चिखलफेक सुरु आहे. या दोघांच्या तुलनेत इतर पक्षाचे अस्तित्वच दिसत नाही. पण मतदार शांतपणे सारे काही न्याहाळतो आहे. 
काँग्रेस हा लुटारूंचा पक्ष तर आमचा समाज सुधारकांचा. असा टेंभा भाजप नेहमीच मिरवत आलीय. त्याच स्टाईलीत काँग्रेसमध्ये बेशिस्त, बेजबाबदार, बदमाश भरलेत. आमच्या पक्षात मात्र निष्ठावान, शिस्तप्रिय, सेवाभावी कार्यकर्ते असा दावाही केला जातोय. काँग्रेसमधला गाढवांचा गोंधळ आणि लाथांचा सुकाळ हा नेहमी रंगणारा खेळ! हे चालायचंच असं लोकांनी मानलं होतं. एकंदरीने काँग्रेसपक्ष, त्यातले वाद,त्यातले गोंधळ, त्यातली गटबाजी, त्यातली घराणेशाही सगळं काही आपल्याला सुपरिचित आहे. पण शिस्तबद्ध, निष्ठावान, सेवाभावी कार्यकर्त्यांचं संघटन असं ज्यांच्याबद्धल गोड गोड स्वप्न रंगवलं जात होतं, त्यांनी आता काँग्रेसला प्रभावी पर्याय देण्याचा चंग बांधला आहे. 
राजकीय पक्षाला एक चेहरा असतो, भाजपचा चेहरा हा सच्च्या कार्यकर्त्यांचा पक्ष! भाजपचा आमदार नगरसेवक कधी फुटणार नाही, कार्यकर्ता पदासाठी कधी भांडणार नाही, असा एक नावलौकिक होता. व्यंग्यचित्रकारांनी शेंडीवाला भटजी वा  ढेरपोट्या शेठजी असं भाजपचं प्रतीक ठरवलं होतं. त्यातही पवित्रता आणि सुसंस्कृतता व्यक्त व्हायची. सर्वच क्षेत्रातली भल्यांची मंदी आणि बुऱ्याची तेजी राजकारणात येणारच. एकेकाळी काँग्रेसवाल्यांनी हाताळलेले 'व्यवहारवादी' यशवंत राजकारण आता भाजप मोठ्या ताकदीने हाताळत आहे.

त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडे सध्या इन्कमिंग जोरात सुरु आहे. कसलाही विचार न करता, विधिनिषेध न बाळगता आपलं साधनसुचितेचं धोरण बाजूला सारून इतर पक्षातल्या सत्ताकांक्षी मंडळींना त्यात गुन्हेगारही आले, त्यांचं स्वागत करण्यासाठी भाजपेयी मुख्यमंत्री सरसावले आहेत. हे असं का घडतंय, कोण घडवतयं हे आपण जर पाहिलं तर एक लक्षात येईल की, भाजपातील वरिष्ठ नेत्यांनी 'पक्षविस्तार' या गोंडस नावाखाली दुकान मांडलंय. त्यांनी ती 'भगव्या काँग्रेस' च्या दिशेने वाटचाल सुरु केलीय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हे पक्के राजकारणी, त्यांनी त्यांचं गल्ल्यावरचं डोकं इथं वापरलंय. अगदी व्यापारी हिशेबाने पक्षाची वाटचाल सुरु ठेवलीय. आजवर राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर भाजप हा इतर सर्व राजकीय पक्षांच्या तुलनेत तसा अस्पृश्य गणला जात होता. ते संपविण्यासाठी त्यांनी प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी नगरपालिका, महापालिका स्तरावर जी 'शेठजी भटजी' यांचा पक्ष अशी जी प्रतिमा निर्माण केली गेलीय ती संपविण्याचा चंग बांधलाय. सर्वच पक्षातील सर्व तऱ्हेची मंडळी गोळा केली जाताहेत. त्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.

नगरपालिकेच्या निवडणुकीत 'नगराध्यक्ष' थेट लोकांतून निवडून आणणे तर महानगरपालिकेच्या निवडणुकीत चार सदस्यांचा एक प्रभाग या माध्यमातून निवडणूक. हा सारा प्रकार म्हणजे विधानसभा मतदारसंघनिहाय भाजपची स्थिर आणि कायमची अशी मतपेढी निर्माण करणे. याशिवाय नव्याने आलेली आणि सत्तेमुळे भारावलेली अशी वय वर्ष ४० ते ५० या मध्यमवयीन मतदारांच्या दुसऱ्या पिढीसाठी सुरक्षित असे वातावरण तयार करणे. त्याचबरोबर तिसऱ्या पिढीतले म्हणजे ३० ते ४५  या वयोगटातील तरुणांसाठी सत्तेबाबत पोषक अशी स्पर्धा निर्माण करणे. याचबरोबर मोदी आणि शहा यांना पक्ष स्वयंपूर्ण करायचा आहे. पूर्वीचा जनसंघ वा आत्ताचा भारतीय जनता पक्ष ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघांची राजकीय शाखा वा अंग म्हणून ओळखली जातेय. त्यामुळे पक्षाला मतदारांच्या थेट संपर्कासाठी संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहावे लागत आहे. पक्षाचं हे परावलंबित्व झुगारुन यापुढे स्वतः ची अशी स्वतंत्र संपर्क प्रणाली उभी करणे, ज्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क राहील आणि पक्ष संघ स्वयंसेवकांवर अवलंबून राहणार नाही अशी दक्षता घेतली जाते आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. ग्रामीण भागात सत्तेचा वापर, साम,दाम,दंड,भेद अशी सर्व आयुधे वापरून ग्रामीण नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी लक्ष घातलंय, सर्वप्रथम जसे जमेल तसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या मधली सत्तास्थान बळकावणे. आजवर भाजपपासून दूर राहिलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांमध्ये भाजपच्या नेतृत्वाबाबत आकर्षण निर्माण व्हावं म्हणून पक्षाला आणि पक्षाची उमेदवारी देताना संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांना दूर ठेवून, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखून वाटचाल करणे. जिथे अरे का का रे करावे लागणार आहे तिथे 'साधनसुचिता' गुंडाळून ठेवून तिथे तशाच प्रकारच्या गुंडाला उमेदवारी देणे, यापूर्वी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी ज्या प्रादेशिक पक्षाशी युती, आघाडी केली आहे, तिथे त्या पक्षाची ताकद ठरविण्याचा अधिकार अबाधित ठेवणे. याचा अर्थ ज्या प्रादेशिक पक्षाची युती करायची त्यांचे गुण अवगुण आपल्यात भिनवायचे प्रसंगी त्या पक्षाप्रमाणेच रूप धारण करून मतदारांसमोर जायचे. आणि पक्षविस्तार करताना सत्तेसाठी म्हणून काँग्रेसच्या वाट्यावर वाटचाल करणे. ही धोरणं ठरलेली दिसतात.

पैशाचा भाजपला आता तोटा नाही, त्यांचे कट्टर घडवलेले कार्यकर्ते अजूनही प्रत्यक्ष पटावर येण्याचा हट्ट न धरता मागे राहूनच कार्य करीत आहेत. खरं तर सत्तानाश घडवण्याचा कटू अनुभव 'जनता प्रयोगा'त एकदा झालाय भाजप तो पुन्हा करणार नाही. स्वतःचं वर्चस्व राखण्यासाठी प्रसंगी 'भगवी काँग्रेस' होण्यासाठी त्यांची चाललेली ही वाटचाल आपण पाहतोच आहोत.
- हरीश केंची

*राजकारण गरजेचे अन बेरजेचे...!*

*राजकारण गरजेचे अन बेरजेचे...!*

भारतातल्या कोट्यवधी माणसांचे दैनंदिन जीवनही सर्वंकष राजकारणाशी निगडित झाले आहे. कारण असे एकही क्षेत्र नाही की, ज्यांच्याशी राज्यकर्त्या शासनाशी संबंध नाही. पण तरीही अष्टौप्रहर पोटापाण्याच्या विवंचनेत असलेल्या सामान्य रयतेला 'राजकारण कसे असते, वा कसे असावे?' ह्या परिसंवादाशी कर्तव्य नाही. त्यात रस घ्यायला फुरसतही नाही. सामान्य माणूस काकुळतीने इतकंच म्हणेल, की....'बाप हो, राजकारण करा, बेरजेचे करा अथवा वजाबाकीचे करा, त्रैराशिकाचे करा अथवा पंचराशिकाचे करा म्हणजे झाले!' परंतु सामान्यजनांप्रमाणे राजकारणाची अथवा कोणत्या 'कारणा'ची उपेक्षा करुन बुद्धिमंतांचे- इंटेलेक्च्युअल्सचे कसे चालेल? अतिशहाणपणामुळे त्यांचा स्वतःचा राजकारणाचा बैल रिकामा राहिला तरी त्यांना स्वतः ला क्रियाशील राजकारण फारसे जमले नाही; तरी राजकारण चर्चा हा त्यांचा खास प्रांत आहे. प्रत्यक्ष राजकारण आणि राज्यकारण करणाऱ्या मंडळींना 'गाईडलाईन्स' पुराविणाऱ्या यथार्थदीपिका उजळणे हे त्यांचे 'मिशन' आणि कधीकधी कमिशनही आहे. कोणत्यातरी शिवबाचे गागाभट्ट वा रामदास होण्याची अथवा कोण्या चंद्रगुप्तांचे आर्य चाणक्य बनण्याची तमन्ना त्यांच्या दिलाच्या दिवाणखान्यात थैमान घालीत असते. त्या बुद्धिमंतांतील एक पोटवर्ग आहे आम्हा पत्रकारांचा. आम्हास जीवनातील सर्व विषयात रस घ्यावाच लागतो. विशेषत: राजकारणात!  राज्यकर्त्यांची आणि राजकारणाची संगत नको रे बाबा असे आम्हास म्हणताच येत नाही. शासनकर्त्यांना ऐकविणे आणि त्यांचे ऐकणे, त्यांच्या मुलाखती घेणे, त्यांच्याशी प्रश्नोत्तरी करणे हा आमच्या व्यवसायाचाच एक भाग! 

राजकारण गरजेचे असते हे राजकारण्यांचे म्हणणे फार महत्वाचे असते, हे सहज लक्षात येईल. राजकारणात कधी कृष्णशिष्टाई, तडजोड, तर कधी कुरुक्षेत्रावरील झोडाझोडी, कधी समझौता, कधी निव्वळ दमबाजीने बाजी मारणे! असे राजकारणाचे स्वरुप गरजेनुसार म्हणजेच देशकाल परिस्थितीप्रमाणे पालटत राहते. 'गरजेचे राजकारण' हे एकदा मान्य केले म्हणजे ते सदैव बेरजेचेच असेल, असं सांगवत नाही. ते जेवढे बेरजेचे तेवढेच वजाबाकीचे; जेवढे गुणाकाराचे तेवढेच भागाकाराचे! राजकारण किंबहुना कोणतेही काम, कार्य एकंदरीत बेरजेने, लोकमान्य टिळकांच्या शब्दात सांगायचे झाल्यास 'लोकसंग्रहा'ने साध्य होते हे खरे; पण कधी कधी वजाबाकीनेही कार्यभाग उत्तमपणे साधतो. बारा भिन्नभिन्न वाटांनी जाणाऱ्या बारभाईंच्या बेरजेपेक्षा, सुसूत्रता साधणारी वजाबाकी कधीकधी वाजवी वाटते, वाजवी ठरते! 'राखावी बहुतांशी अंतरे' हा समर्थ संदेश बहुश: फलदायी असला तरी बहुतांना विशिष्ट अंतरावर ठेवणे देखील राजकारणात काहीवेळा क्रमप्राप्त ठरते. समर्थ रामदासांनी राखावी बहुतांशी अंतरे या आशयाचा उपदेश अनेकदा जेला असला तरी, 'दासबोधा'तील 'राजकारण' नामक निरुपण नामक समासात ह्याच उपदेशाला पुस्ती जोडली आहे. 'जो बहुतांचे सोसेना। त्यास बहुत लोक मिळेना।।' एवढं सांगून ते थांबले नाहीत तर, 'अवघेचि सोसिता उरेना। महत्व आपुले।।' अशी जोडही दिली आहे. पुष्कळांना आपलेसे करावे हे सांगतानाच ' हिरवटाशी दूरी धरावे। युद्ध कार्यास ढकलावे। नष्टासी नष्ट योजावे। राजकारणामध्ये।।' असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सारांश, जीवणाप्रमाणेच राजकारणाचे धेय्य निश्चित ठरविता येईल; पण त्या धेय्याच्या गरजेनुसार उपाय योजावे लागतील. वेगवेगळ्याप्रकारे गणित मांडावे लागेल. पुष्कळदा बेरजेचे, गुणाकाराचे पण वेळप्रसंगी वजाबाकीचे आणि भागाकाराचे देखील! राजकारण धुरंधर इंदिरा गांधीची कारकीर्द डोळ्यासमोर आणली तरी हे सहजच पटेल की, ज्यांनी बेरजेप्रमाणेच वजाबाकीचे पाठही अनेकदा गिरवले आहेत. छत्रपती शिवरायांच्या चरित्रात निरपवाद बेरीज आणि निरपवाद वजाबाकी आढळत नाही. कधी शरणागती तर कधी रणनीती, कधी माघत्तर तर कधी पुढाकार, कधी तह कधी तलवार, कधी संधी कधी विग्रह, कधी बेराजेचं सामर्थ्य तर कधी वजाबाकीचं चातुर्य अशी विविधपरींची वळणे घेत  त्यांच्या राजनीतीचा अश्व प्रगतीपथावरून ध्येय मंदिराकडे गेला! राजकारणाची ही क्षणाक्षणाला बदलणारी वळणे...वळणेच ती! तेव्हा ती वक्रीच असणार. राजकारणाची मुशाफिरी सरळसोट धोपट मार्गाने सहसा होतच नाही. राजकारण म्हणजे एक वक्री शनी! त्याच्या साडेसातीच्या फेऱ्याला तोंड देणे फार मुष्कीलच. पण त्याचा तोंडवळा नुसता न्याहाळणेच सोपे नाही. राजकारणाचे गणित कळायला आणि यशस्वीपणे सोडवायला विशिष्ट पिंड प्रकृतीची गरज असते. तत्वज्ञ, साहित्यिक, कलावंत ह्यांच्या पिंडप्रकृतीला सहसा ते मानवात नाही. म्हणूनच या वर्गातील शहाणी माणसं राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकत नाहीत.इतकंच काय त्यावर भाष्य करणंच टाळतात. लोकशाहीच्या दृष्टीने आणि राष्ट्राचाही दृष्टीने हे कितपत योग्य आहे. याचा विचार शहाणी मंडळी कधी करणार? 

शहाणी सुशिक्षित मंडळी राजकारणापासून लांब जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ते असे का वागतात? याचाही त्यांनी विचार करावा. सज्जन माणसे दूर गेल्यानेच दुर्जन माणसांचा संचार राजकारणात होऊ लागला आहे. सभा समारंभात, खासगी बैठकीत किंवा अगदी सहज गप्पा मारतानाही राजकारणात वाईट माणसं कशी आहेत. याच रसभरीत वर्णन करुन त्यापासून आपण कसे लांब आहोत याची शेखी मिरवण्यातच ते धन्यता मानतात. वास्तविक, दुर्जनांना राजकारणातून दूर ठेवायचं असेल तर सज्जनांचा, सुशिक्षितांचा शहाण्या माणसांचा वावर वाढायला हवा. राजकारणातले शिंतोडे आपल्या अंगावर उडतील म्हणून त्यापासून दूर राहणं हे खरं तर स्वतः शी आणि राष्ट्राशीही प्रतारणा करण्यासारखे आहे. राजकारणाची गटारगंगा स्वच्छ करण्यासाठी आपण उतरणार असू, तर या गतारगंगेतील शिंतोडे आपल्या अंगावर उडणारच आहेत, याची जाणीव असायला हवी. शिंतोडे उडताहेत म्हणून लांब पळून जाणं हा पळपुटेपणा आहे. शहाणी, सुशिक्षित, सज्जन माणसं पापभिरू असतात. त्यांच्यासमोर आपण एखादा बागुलबुवा उभा केला , तर ते शांतपणे मान वळवून दुसरीकडे निघून जातील. अशी धारणा राजकारणातल्या दुर्जनांची असते म्हणूनच राजकारणातल्या दुर्जनांचा हा कावा ओळखून हिंमतीने आणि निर्धाराने राजकारणात उतरणं हे कर्तव्य ठरतं.
- हरीश केंची.

*नथुरामचे नाटक व्हायला हवे!*

*नथुरामचे नाटक व्हायला हवे!*

सध्या राज्यात निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे राजकारणाला उधाण आलं आहे. इतके दिवस नथुरामाचे प्रयोग सुरु असताना, त्याला दररोज फाशी दिली जात असताना फारशी कुणी दखल घेतली नाही. पण अचानकपणे कोल्हापुरापासून नागपुरापर्यंत सर्वत्र या नाटकाला विरोध होतो आहे. नथुरामाचे प्रयोग होऊ नयेत म्हणून आंदोलन होताहेत. परंतु नथुरामाचे प्रयोग होणं आणि ते अधिकाधिक लोकांनी पाहणं समाजहिताचेच आहे. सडक्या विचाराला धर्मकृत्याचा, देशहिताचा टिळा लावत बुद्धिवान माणूस नि:शस्त्र माणसाचा खून करण्यापर्यंतचे पशुत्व कसे अंगिकारतो याची साक्ष देणारं हे नाटक आहे. मुस्लिम अनुनयाला कडवा विरोध करणारे भाजपेयींचे आजवरचे राजकारण पाहता नाटक बचाव ची जबाबदारी त्यांनीच घ्यायला हवी होती, अशी नथुरामवाद्यांची इच्छा होती. पण नथुरामला त्यांनी झटकले. ते शिवसेनेने उचलले. 


निश्चय आणि निर्भयता म्हणजे गांधीजी! त्यांना महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याच बीज सापडलं. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे म्हणून गांधीजींनी गुजरातेतला साबरमतीचा आपला आश्रम बंद करून तो महाराष्ट्रात वर्ध्याला आणला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं. लोकमान्य टिळकांचा जयघोष करीत ते स्वातंत्र्याचा मंत्र देशाच्या खेड्यापाड्यात गेले , अशा नि:शस्त्र गांधींचा खून मराठी माणसाने करावा यासारखं अमानुष कृत्य अन्य नाही. हे भाकड विचाराने केलेलं भेकड कृत्य संतांची, वीरांची, बुद्धिमंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावरचा कलंक आहे या क्रूरकारम्याला आणि त्याच्या कृत्याची तरफदारी करणाऱ्यांना महाराष्ट्राने कधीच आपलं मानलं नाही.

न्यायदेवतेच्या दरबारात नथुरामला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. तिथे नथुराम खुनी ठरलेला असतानाही त्याने 'गांधी वध' केला असा शंख करणारे नथुरामाचं भूत पुन्हापुन्हा उठवून हिंदुत्ववादी म्हणवणारयांच्या निष्ठेचा कस जोखत असतात. मुसलमानांना खुश करण्यासाठी गांधीजींनी हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे तुकडे केले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारताला भाग पाडले. गांधींनी आपला जीव पणाला लावून स्वतःला देशापेक्षा मोठे केले. त्यामुळे फाळणी झाली. हिंदूंचे बळी गेले. हिंदूंवर अत्याचार झाले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले. या साऱ्याला गांघीच जबाबदार होते, म्हणून नथुरामाने त्यांना खतम केले, असा नथुरामवाद्यांचा युक्तिवाद असतो. नथुरामाचं हेच नाटक आहे. त्यात पाहणाऱ्याचा भावनिक उद्रेक होण्यासाठी गांधी द्वेषाचा मसाला मिसळला आहे. त्यातल्या काही भाकड संवादावर नथुरामभक्तांच्या टाळ्या पडतात. अर्थात या टाळीबाजांनी आजवर यापेक्षा कोणता पुरुषार्थ गाजवलाय?

महात्मा गांधींजींच्या राष्ट्रकर्तृत्वावर शिंतोडे उडविणारं नाटक आताच रंगभूमीवर आलेलं नाही, शिवसेना- भाजपची राजवट होती तेव्हाही १९९८ दरम्यान हे नाटक रंगभूमीवर आलं होतं. काँग्रेसने गांधींना खुंटीला लावून गांधीवादाला आपल्यापासून दूर लोटलं असलं तरी लोक गांधींची काँग्रेस म्हणत काँग्रेसला मतदान करतात, जीवदान देतात. नेत्यांना बदनाम करून काँग्रेस संपणार नाही, हे स्पष्ट झाल्याने गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची मापं काढण्याचा हा प्रकार सुरु असतो. ही विचारवादाची लढाई आहे. त्यात नेहमी गांधीवादाचाच विजय होतो, ही गांधीजींच्या देशत्यागाची किंमत आहे. ती काँग्रेसवाले वसूल करीत होते आता भाजपेयी करताहेत, तो त्यांचा नीचपणा आहे. गांधी बनिया होते , त्यांच्यामागे बहुजन समाज प्रचंड होता. त्यामुळे त्याचे राजकारण -समाजकारण प्रभावी होत होते. त्याचा सल बुद्धिबळावर राजसत्ता मिळवू पाहणाऱ्याच्या मनात होताच. कारण आपल्याच नादानीमुळे पेशवाई बुडाल्याने सत्तेचे चाटण मिळविण्याची त्यांना संधी हवी होती, परंतु गांधीजींनी राजकारणाचं सार्वत्रिकारण केल्याने सत्तेचे लगाम आपल्याहाती येणार नाहीत, याची खात्री पटल्याने त्यांनी गांधीद्वेषाचे विष पसरवायला सुरुवात केली.

फाळणीच्या वेदनेने आपण गांधींना मारले हे नथुरामाचे म्हणणे खोटारडेपणाचे आहे. गांधींना ३० जानेवारी १९४८ ला नथुरामने संपविले. पण त्यापूर्वी १४ वर्षे त्यांना मारण्याची संधी नथुरामीवृत्ती शोधात होती. जून १९३४ मध्ये गांधींवर पुण्यात बॉम्बहल्ला झाला होता. जुलै १९४४ मध्ये गांधींच्या अंगावर सुरा घेऊन जाणाऱ्या नथुराम गोडसेला पाचगणीला पकडले होते. ऑगस्ट १९४४ मध्येही असाच प्रसंग सेवाग्राम आश्रमात घडला. त्यानंतर २९ जून १९४६ रोजी गांधींच्या मुंबई-पुणे प्रवासात नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी मोठमोठया दरडी टाकल्या होत्या. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. गांधी बचावले, ह्या साऱ्या घातपातात नथुराम संशयित आरोपी असल्याचं सिद्ध झालं आहे. या काळात हिंदुस्तानच्या फाळणीची चर्चा सुरु नव्हती. त्यामुळे गांधींना फाळणीसाठी दोषी ठरवून त्यांचा खून करणाऱ्याच्या  फाशीला हौतात्म्याचा टिळा लावण्यासाठी आटापिटा करणे ही देखील नथुरामी विकृतीच आहे. नथुराम जिवंत असताना कुणी ऐकलं नाही, त्याच्या मागं कुणी जमलं नाही. अशांच्या खुनाशीपणाची पुस्तकं वाचून, नाटकं पाहून कोण नथुराम बनणार? गांधीवादाचा स्वीकार केल्याशिवाय कुठल्याही राजकीय विचाराला सत्तास्थान लाभणार नाही , सत्य आणि अहिंसा ही गांधीवादाची मूलतत्त्व आहेत. त्याचा धिक्कार करून कुणी राजकारण , समाजकारण, सत्ताकारण, करू शकत नाहीत. हाच गांधींचा विजय आहे. गांधींचा हा मोठेपणा पचत नाही, असे वांतीकारक काय क्रान्ती करणार? नथुरामही त्यातलाच! तो नीट कळण्यासाठी 'नथुराम'चं नाटक व्हायला हवं. त्यामुळे देशहिताच्या बुरखा घालून सत्य, अहिंसेचा खून करण्याची संधी शोधणारे आजचे छुपे नथुराम तरी ओळखता येतील.

नथुरामाच्या खुनशीपणामुळं नि:शस्त्र महात्म्याचा खून झाला तसा हजारो निरपराधांच्या संसाराचा नाश झाला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची होरपळ झाली; वर महात्मा गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राष्ट्राने थोपलं. एका गोळीत इतके ऐतिहासिक क्रौर्य करणाऱ्या नथुरामला नाटकातही फासावर लटकलेलं दाखवलं आहे. म्हणजे या नाटकाचे जेवढे प्रयोग होतील तेवढ्यांदा 'नथुराम' फासावर लटकलेला पाहायला मिळेल. तेव्हा याचे प्रयोग व्हायला हवेत.

-हरीश केंची

*उद्भवजींच्या स्वयंतेजाची पुनर्परीक्षा*

*उद्भवजींच्या स्वयंतेजाची पुनर्परीक्षा*

गोरेगावच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णय घेतला. आगामी काळात स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार जाहीर केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी २५ वर्षांपूर्वी घेतलेला युतीचा निर्णय आज मोडून टाकला. शिवसेनाप्रमुखांच्या पश्चात घेतलेला हा धाडसी निर्धाराने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांचे 'शिवसेना पक्षप्रमुख' पण सिध्द झालं आहे. या सिद्धतेला विधानसभा निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. त्यांचे स्वयंतेज प्राप्त झालं होतं. महापालिकेच्या निवडणुकीत या स्वयंतेजाची पुनः परीक्षा होणार आहे.
शिवसेनेतच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरे यांची जागा कुणी घेऊ शकणार नाही. बाळासाहेबांच्या राजकारणाचा स्वतःचा असा ठाकरे टच होता, त्याची उणीव जाणवू न देता शिवसेनेची वाटचाल होणे अवघड काम होतं. ते आव्हान त्यांनी त्याच ताकदीने पेलेल्याचं आज दिसून आलं. प्रजासत्ताकदिनी उद्भवजींचं भाषण हे थेट बाळासाहेबांच्या भाषणाची आठवण करून देणारे होते. नेमके शब्द, ठोस निर्णय, घणाघाती टीका जे शिवसैनिकांना हवं अगदी तसं त्यांचं भाषण झालं.
विधानसभा निवडणुकीत यश मिळवलं, तथापि ते यशाने मस्तावले नाहीत; तर अधिक सावध झाले. म्हणूनच २५ वर्षांचा मित्रपक्ष असलेल्या भाजपने यशाच्या मस्तीत शिवसेनेला चेपण्याचा डाव टाकला. पण राजकीय अनुभवाने उध्दव ठाकरे यांनी तो शिवसैनिकांच्या आणि नेत्यांच्या सांघिक बळावर उधळून लावला. बाळासाहेब असते तर जसे वागले असते तसे उध्दव ठाकरे वागले. पक्षप्रमुखाचं तेज त्यांनी आपल्या निश्चयी वाणीने आणि राजकीय खेळीनं बावनकशी असल्याचं दाखवलं.
भाजप संधी मिळेल तेव्हा 'शत प्रती शत' चा नारा लावते. भाजपेयीत झालेला बदल अनपेक्षित नाही. कारण आपल्या विचारांची सत्ता निर्माण होण्यासाठी आपदधर्म म्हणत कुणाशीही दोस्ती करण्याची तयारी ठेवूनच भाजप मोठा झाला आहे. भाजप हा काही स्वतःच्या विचारावर विस्तारलेला पक्ष नाही. सत्तेपासून कटाक्षाने दूर राहून दीनदयाळ उपाध्याय यांच्या एकात्म मानवतावादाचा ध्यास जपणारा संघ ते सत्तेसाठी सुखराम बुटासिंग पासून00000 पर्यंत सारख्या भ्रष्टाचारी लोकांची साथ घेणारा असा भाजप असा प्रवास आहे. या प्रवासात शिवसेनेनं दिलेली साथ महत्वपूर्ण आहे. रा.स्व.संघ परिवाराचा विचार महाराष्ट्राच्या मातीत उगवला पण कधी फोफावला नाही, विस्तारला नाही. अशा संघ विचाराच्या शाखांना बाहेर आणण्याचं काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय हे विसरून चालणार नाही. ठाकरे यांचा ऋण भाजप आता आपल्या प्रकृती धर्मानुसार फेडतीय. भाजपच्या या प्रकृती धर्माचे मर्म सांगणारी बोधकथा कदाचित आपल्याला माहिती असेल ती आज आठवणीसाठी पुन्हा सांगतो. कारण ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं हे भाजपचं वैशिष्ठय झालंय. गोष्ट पुराणातली आहे. भाकड असली तरी बोधप्रद आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याचा आकार धारण करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झाली होती. मुळात हा प्राणी शेळपट पण बुद्धीचातुर्याने त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान असलेल्या प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठया प्राण्याचं भय दाखवायचा आणि आपण दोघे एकत्र आलो तर मोठ्या प्राण्याला गारद करु अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्या सारखा आकार धारण करायचा. असं खात खात शेळीच्या वाघोबा झाला. अशाप्रकारे प्रादेशिक पक्षांना काँग्रेसचे भय दाखवीत त्याच्याशी दिसती करीत, त्याचे गुण अवगुण आपल्यात भिनवीत भाजपने आपली ताकद वाढविलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला, समाजवादी झाला. सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेस झालाय. भगवी काँग्रेस बनलाय. शिवसेनेच्या दोस्तीने भाजपने आपली संघटनशक्ती वाढविली त्यासाठी भाजपने आपल्यात शिवसेना रुजविली.
कालपर्यंत शेळी असलेला भाजप आज डरकाळी फोडत आपण वाघ झाल्याचे साक्ष देतोय.
सत्तेचं चाटण मिळालेल्या भाजपने शत प्रति शत बरोबरच अब सब महाराष्ट्र अशा घोषणा द्यायला सुरुवात केलीय. भाजपने शिवसेनेला जी वागणूक दिली ते पाहता बाळासाहेब असते तर, त्यांनी हा कमळातला भुंगा भुणभुण सुरु करतानाच चेचला असता, तसा तडाखा उध्दव ठाकरे यांनाही देता आला असता, पण त्यातून फक्त शिवसेनेची ताकद दिसून आली असती. पण उध्दव ठाकरेंनी प्रचंड संयम दाखवला. शिवसेनेच्या कार्यपद्धती आणि विचारांबद्धल मतभेद असतील; पण त्यांच्या स्वतंत्र स्टाईल मुळेच गेली काही वर्षे शिवसेनेची ताकद वाढतेय. विधानसभेच्या निवडणुकीत जे यश मिळालं ते पाहता बाळासाहेबांच्या पश्चातही शिवसेनेची ताकद टिकून राहावी हा मतदारांचा अट्टाहास दिसून येतो. हे महाराष्ट्राचं जनमत उध्दव ठाकरे यांनी ओळखलं; म्हणूनच त्यांनी कशाचीही फिकीर न करता युती तोडण्याचा निर्धार केला. भाजपच्या स्वार्थीपणावर, विश्वासघाटाकीपणावर कठोर शब्दात टीका करु शकले. त्यांची ही भाजपवरची टीका मराठी, महाराष्ट्र आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान दाखवणारा ठरला. युतीला २५ वर्षे झाली तरी जिथे शिवसैनिकांनी स्वीकारली नाही तिथे मुंबईकर कशी स्वीकारणार? बाळासाहेब ठाकरे यांनी जिवंतपणी मिळवलेलं प्रेम आणि लोकांची साथ आपल्या नंतर अधिक वाढविली. ती वाढती राहणार आहे, या वाढीला प्रबोधनकार ठाकरे यांचा समाज सुधारणेचा वसा आणि वारसा आहे. शिवसेना नेतृत्वाने दणका भाजपला चांगलाच लागलाय, ते हा दणका विसरणार नाहीत महापालिका निवडणुकीत परतफेड करतील. त्यावेळी शिवसेना नेतृत्व त्याचा कसा बंदोबस्त करते यावर शिवसेनेची भाजपवरची सरशी अवलंबून आहे. सत्ता ही त्यापुढची गोष्ट आहे.
-हरीश केंची.

*व्यक्तिगत चारित्र्याची चाड हवी!*

*व्यक्तिगत चारित्र्याची चाड हवी!*

राजकीय नेत्यांच्या चारित्र्याचा प्रश्न नेहमीच दबक्या आवाजात चर्चिला जातो दिल्लीतल्या राजकारण्यांपासून गल्लीतल्या पुढाऱ्यापर्यंत सगळ्यांच्याच चारित्र्याची उठाठेव सुरु असते. सध्या काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते एन.डी.तिवारी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय चारित्र्याची पुन्हा चर्चा सुरु झाली. त्यांनी आपल्या अनौरस पुत्राला नाकारणं, डीएनए टेस्टचं आव्हान, तिवारींची शरणागती, त्यानंतर पुत्राचा आणि पत्नीचा स्वीकार या सगळ्या घटना पुन्हा उजळल्या गेल्या. अशा चारित्र्यहीन माणसाची पार्टी विथ डिफरन्स असलेल्या भाजपला गरज का लागावी? सत्तेसाठी काहीही केले जाते आहे कोणताही विधिनिषेध राहिलेला नाही.

देशात आणि राज्यात संमिश्र सरकारे आली आणि सत्तेसाठी म्हणून सर्वच पक्षांना आपली धेय्य धोरणं गुंडाळून ठेवावी लागली आहेत. सत्ताधारी पक्षाला सत्तासाथीदार असलेल्या इतर पक्षांना सांभाळीत, कसरत करीत कारभार करावा लागल्याने त्यांना कोणत्याच पक्षावर, त्याच्या ध्येयधोरणावर टीका करता येत नाही. त्यामुळे लोकांसमोर जाताना कशा पद्धतीनं जावं ही एक समस्यांचं साऱ्या पक्षांसमोर होती. यावर तोडगा म्हणून आपली सत्ता आली तर हा आमचा 'सत्तासाईबाबा' असं सांगून आपल्या नेत्यांच्या छब्या लोकांसमोर धरल्या जाऊ लागल्या. मग विरोधी पक्षाकडे त्या सत्तासाईबाबाच्या विरोधात चारित्र्यहनन करण्या व्यतिरिक्त कोणताच पर्याय उरला नाही. चारित्र्यावर चिखलफेक ही नित्याचीच बाब झाली. वास्तविक चारित्र्य आणि भ्रष्टाचार या दोनही बाबी व्यक्तीकडून सार्वजनिकतेकडे जात असतात. चारित्र्य ही काही पेहरावासारखी किंवा प्रसाधनासारखी बाहेरून स्वीकारण्याची अथवा वापरायची चीज नव्हे. चारित्र्य हे माणसाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो म्हणून तो त्याच्या जीवनाचाही भाग असतो. माणसाच्या नीती-अनिताच्या कल्पना या साऱ्यातून माणसाचं चारित्र्य आकार घेत असतं. केवळ स्त्री पुरुष संबंधापुरती चारित्र्याची कल्पना अथवा व्याख्या सीमित असत नाही. आणि असूही नये. त्या साऱ्याला पुन्हा समाजाने ठरवलेल्या निकषांची परिमाणं आहेत. आणि ते निकष त्या समाजात वावरणाऱ्याला, त्या समाजाचा घटक असलेल्यांना मान्य असावे लागतात आणि सहसा ते सर्व असतातही. 

दोन व्यक्तिमधले विवाहबाह्य संबंध हा व्यक्तिगत चारित्र्यहीनतेचा भाग झाला. पण त्यासाठी सत्तास्थानाचा अथवा अधिकाराचा गैरवापर करणे,  हा सार्वजनिक चारित्र्यहीनतेला प्रवृत्त करतो. तीच गोष्ट सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करण्याबाबत. जी वस्तू माझी नाही, मी ती वापरू नये. जी दुसऱ्याची आहे, ती त्याच्या परवानगीनेच वापरायची, एवढी साधी सभ्यता ज्यांच्यापाशी नसेल तर तो माणूस सर्वत्र आपला हक्कच प्रस्थापिक करू पाहतो आणि हळूहळू सार्वजनिक जीवनात सुद्धा! त्याचा साऱ्या समाजावर अनिष्ट परिणाम घडत असतो. अढीतल्या आंब्याप्रमाणे हळूहळू समाज नासायला लागतो. चारित्र्यहीनतेकडे, भ्रष्टतेकडे वळू लागतो. या संदर्भात ज्येष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांच्या 'वाटा तुझ्या माझ्या' या पुस्तकातील एक विचार आठवतो. ते म्हणतात, " वैयक्तिक जीवनातील शील आणि चारित्र्य ही एक फार मोठी जबाबदारी आहे. समाजवादी संघटनेचा कार्यकर्ता जर विद्यार्थी असेल तर तो इतरांपेक्षा अधिक नियमित असला पाहिजे. शालेय अभ्यासात अधिक चोख असला पाहिजे.त्याचे स्वतःचे जीवनमान आणि वैयक्तिक खर्च उधळपट्टी नसलेला तसाच जबाबदारीचा असला पाहिजे. असा कार्यकर्ता समाजावर एक नैतिक दडपण असतो. म्हणजेच चारित्र्यसंपन्न व्यक्तीचा इतरांवर प्रभाव पडतो अथवा सार्वजनिक चारित्र्य चोख असण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्य स्वच्छ असणं आवश्यक आहे." आज समाजावर असं दडपण आणू शकणाऱ्या व्यक्ती आपल्या भोवतालच्या समाजातून आपल्याला शोधाव्या लागतील, कारण शील आणि चारित्र्य याबाबतच्या जबाबदारीची उणीवच कमी अधिक होऊ लागली आहे. इतरांपेक्षा अधिक नियमित, अधिक चोख असण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातून कमी कमी होऊ लागली आहे. याउलट याचं जसं पचलं तसं माझंही पचेल, तो करतो, हा करतो, ते करतात मग मी का नको? अशी एक निर्ढावलेली प्रवृत्ती सार्वजनिक जीवनात प्रतीत होत आहे आणि ही प्रवृत्ती त्यांचं पचलं मधला तो आणि माझंही पचेल मधला मी या दोन व्यक्तीकडूनच सार्वजनिक जीवनात उलटली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यक्तिगत चारित्र्याच्या शुद्धतेची चाड असणं अत्यंत आवश्यक आहे. व्यक्तिगत चारित्र्याची चाड जो समाज बाळगील, सार्वजनिक चारित्र्याच्या शुद्धतेची जोपासना जो समाज करील, त्या समाजाला भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाची गरजच भासणार नाही. मध्यंतरी राज्यात सार्वजनिक चारित्र्याबाबत आणि भ्रष्टाचार याबाबत आंदोलन झाली. अण्णा हजारे यांच्यासारखी चारित्र्यवान मंडळी या आंदोलनाच्या अग्रभागी होती. पण ही आंदोलने काही दिवसांनी थंडावली. कारण या आंदोलनात जे सहभागी झाले होत गेले, त्यांच्याबद्दल शंका उपस्थित केली गेली. पूर्वी श्रद्धेची जी ठिकाणं होती, टी आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसे अभावानेच आढळू लागली आहेत.आणि भ्रष्टाचारांचा सुळसुळाट झालाय. चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावी लागली आहे, आता तर ती नष्ट होते की काय अशी शंका येऊ लागलीय. त्यातच पुरोगामी आणि प्रतिगामी विचारसरणीची सरमिसळ झालीय, यात सर्व राजकीय पक्ष अडकले. विविध वैचारिक अधिष्ठान असलेली राजकीय नेते मंडळी एकाच पातळीवर आल्याने लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि या साशंकतेतून नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य धोरणे, वैचारिक बैठक, तत्व, निष्ठा, आचार विचार हे सारं साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी वाट्टेल टी तडजोड, लांगुलचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती, सार्वजनिक जीवनातला हा व्याभिचार थांबायला हवा. असं झालं तर चारित्र्यहीनता आपोआपच जाईल. देशाच्या दृष्टीने ते एक आशादायक चित्र असेल, त्याच प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे? 'नॉट द फेल्युअर बट लो एम इज क्राईम' यानुसार सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला हवाय. उत्तरप्रदेशातील निवडणुकांसाठी एन.डी.तिवारी सारख्या भ्रष्ट नेत्यांना भाजपेयींची गळा भेट सत्तेसाठी गळा घोटणारा ठरला तर आश्चर्य वाटायला नको.

-हरीश केंची

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...