Tuesday 30 October 2018

पुन्हा एकदा वंदे मातरम...!

"ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा 'वंदे मातरम' चा वाद उकरून काढलाय. जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आले! हा इतिहास असताना वंदे मातरमची गरजच काय म्हणणं हे राष्ट्रधर्मालाच आव्हान देण्यासारखं आहे. पण मुस्लिमांच्या मतांसाठी चाललेला हा भावनांचा खेळ त्यांच्याच अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही!"
---------------------------------------------

देशात आणि राज्यात सार्वत्रिक निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेत. पूर्वी सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सारे पक्ष एक येत. आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्यासाठी साद घातली जातेय. अशा वातावरणात भारतीय रिपब्लिकन पक्षाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे ओवेसी यांनी एकत्र येण्याची घोषणा करून टाकलीय. तसा हा प्रयोग काही पहिल्यांदाच होतोय असं नाही. मागे एकदा प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुस्लिम लीग यांच्याशी युती केली होती, त्यात त्यांना यश आलंच नाही. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी समझौता केला. रामदास आठवले यांनी देखील अशाच प्रयोग केला होता. मुस्लिमांचं प्रतिनिधित्व करतोय अशा वलग्ना करणाऱ्या समाजवादी पक्षाशी आघाडी केली होती. 'रिडालोस'चा प्रयोग त्यांनी केला होता. पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढविली होती त्यावेळी त्यांना ना दलित मतदारांनी स्वीकारलं ना मुस्लिमांनी! त्यानंतर त्यांनी 'रिडलोस' गुंडाळली आणि आपला रिपाई पक्ष शिवसेनेनं घातलेल्या हाळीला साद घालत सेना-भाजप युतीशी जोडला. आता प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा हा प्रयोग आरंभलाय!

*राष्ट्रधर्माचा अवमान करणारी भूमिका*
इस देशमें रहना होगा तो 'वंदे मातरम' कहना होगा......! अशा घोषणा एका बाजूने सुरू असतानाच...'गळ्यावर सूरी ठेवली तरी म्हणणार नाही.....!' अशी दरपोक्ती करणारे आपले प्रतिनिधी आपण पाहिले तेव्हा आम्हालाच आमची लाज वाटली...! स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षात आजही  'वंदे मातरम'ला विरोध केला जातोय. शाळेतून ते म्हणावं, त्यातून देशप्रेमाची शिकवण विद्यार्थ्याना मिळावी म्हणून आग्रह धरला जातोय. उत्तरप्रदेशात मदारसातून ते म्हटलं जावं असं फर्मान मध्यंतरी काढलं गेल होतं. महाराष्ट्रातल्या विधिमंडळातील सदस्य एकमेकांच्या अंगावर धावून जातानाचा प्रकार आपण पाहिला होता.  'वंदे मातरम'ची सक्ती केली तरी आम्ही ते म्हणणार नाही असे बेमुर्वतपणे आमदार म्हणतात तेव्हा त्यांच्या अल्पबुद्धीची कीव येते.  'वंदे मातरम' चा इतिहास आणि परंपरा याची माहिती त्यांना नसावी, गळ्याभोवती फास घेताना  'वंदे मातरम'चा जयघोष करणारी ती क्रान्तीकारी पिढी कुठे अन त्या राष्ट्रीय गीताचा उपमर्द करणारे आजचे हे उपटसुंभ नेते कुठे..! संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह धरणारे आणि राष्ट्रगीत म्हणून केवळ पहिलं कडवं म्हणण्यासही विरोध करणारे हे दोघेही राष्ट्रधर्माचा अवमान करणारे आहेत. प्रकाश आंबेडकरांनी या साऱ्या घटनांना पुन्हा उजाळा दिलाय.

*देवाधर्मापेक्षा राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म!*
'वंदे मातरम' या गीताच्या वादाचं भूत पुन्हा उठवलं जातंय. प्रकाश आंबेडकरांनी ते मतांसाठी उठवलंय. एमएमआयएम या मुस्लिमांच्या हिताचा ठेका घेतलेल्या पक्षानं शाळांमधून वंदे मातरम म्हणण्याची सक्ती करणे घटनाबाह्य आहे. घटनेच्या कलम २५ नुसार आम्हाला पूर्ण धार्मिक स्वातंत्र्य देण्यात आलं असल्यानं आमच्यावर 'वंदे मातरम' म्हणण्याची सक्ती करता कामा नये. 'वंदे मातरम' विरोध करणाऱ्यांच्या या दाव्यात तथ्य असले तरी तो तद्दन पाजीपणा आहे.  'वंदे मातरम' म्हणजे मातृभूमीला वंदन! 'जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरियसी' या समर्पक शब्दात श्री रामचंद्रांनी माता आणि मातृभूमीच्या समभावाचं वर्णन केलंय. पालन-पोषण करणं, धारण करणं, सर्वकाही सहन करणं, क्षमाशील असणं, अशा अनेक गुणांतून माता आणि भूमी यांच्यातील साम्य स्पष्ट होतं. म्हणूनच भूमीला भू माता असं म्हणतात. अथर्ववेदातील भक्तीसूक्तात 'माता भूमी: पुत्रो अहं पृथीव्या:' असा भूमातेचा गौरव केल्यानंतर तिच्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली आहे. हे सारं हिंदूंच्या धर्मग्रंथात आहे म्हणून झटकायची गरज नाही. राष्ट्रभक्ती दाखविणाऱ्या या नोंदी आहेत. मातेसमान असणाऱ्या मातृभूमीला वंदन केल्याने मुसलमानांच्या धार्मिक स्वातंत्र्याचा कसा काय खातमा होतो? जो देश तुम्हाला जगण्याचं बळ देतो, ज्या देशाच्या भूमीवर तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा मिळतो, त्याभूमीला भक्तिभावे वंदन करणं हे मुस्लिमांच्या ठेकेदारांना सक्तीचं का वाटतं? मातृभूमीला वंदन करणं, राष्ट्रध्वजाचा-राष्ट्रगीताचा मान राखणं, राष्ट्रवीर-वीरांगणांबद्धल आणि राष्ट्रीय स्थलांबद्धल आदर राखणं हा राष्ट्रधर्म आहे. त्याचं पालन भारतातल्या सर्वधर्मीयांनी आपल्या देव-धर्म-जातीबद्धलच्या भावभावनांना दुय्यम लेखून केलेच पाहिजे. कारण कुठल्याही देव-धर्मापेक्षा राष्ट्रधर्म हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे! परंतु  'वंदे मातरम' म्हटल्याने 'अल्ला हो अकबर' म्हणजे परमेश्वर महान आहे या घोषणेचा अपमान होतो, अशी भूमिका  'वंदे मातरम'ला विरोध करणाऱ्यांकडून मांडली जाते.

*स्वातंत्र्यलढ्याचं 'प्रेरणा गीत' बनले होते*
ही भूमिका प्रथम मौलाना महंमदअली जीना यांनी मांडली. डिसेंबर १९२३ मध्ये आंध्रप्रदेशातील काकीनाडा येथे काँग्रेसचं वार्षिक अधिवेशन होतं. खुद्द जीनाच त्याचे अध्यक्ष होते. अधिवेशनाची सुरुवात प्रथेप्रमाणे  'वंदे मातरम'ने व्हायची होती. कारण  'वंदे मातरम' हे काँग्रेसच्या झेंड्याखाली स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे प्रेरणास्त्रोत होते. फासावर जाणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे ते अखेरचे शब्द होते. १८७६ मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय यांच्या लेखणीतून  'वंदे मातरम' गीताचा जन्म झाला. पण त्याचा १८८२ मध्ये प्रकाशित झालेल्या 'आनंदमठ' कादंबरीत समावेश झाल्यानंतरच ते लोकप्रियतेच्या शिखरावर गेले. बंकिमचंद्रांनी 'वंगभूमी'साठी बंगालीत लिहिलेलं हे गीत स्वातंत्र्य लढ्याचं प्रेरणागीत होण्यासाठी त्यात अनेक बदल करण्यात आले.  'वंदे मातरम' गीतातील 'सप्त कोटी कंठ' चा 'कोटी कोटी कंठ निनाद कराले' हा झालेला बदल ही याची साक्ष आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्या 'जन-गण-मन' या गीताच्या पुढे राष्ट्रगीत म्हणून स्वीकार करण्यात आला त्या रवींद्रनाथ टागोर यांनी १८९६ मध्ये कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात  'वंदे मातरम'चे रवींद्रसंगीतासह गायन केले.  'वंदे मातरम'ला सर्वमुखी केलं. परंतु खिलाफत चळवळीने  'वंदे मातरम'ला वादात टाकले  महंमद अली आणि शौकत अली हे अलीबंधु चळवळीचे नेते होते. १९२० च्या दरम्यान सुरू झालेली ही चळवळ कालबाह्य धर्मवेडाने पछाडलेली होती. खिलाफत म्हणजे खलिफाची राजवट, खलिफा म्हणजे मुसलमानांचा धर्मगुरु. त्यांची सत्ता जीनांना आणायची होती. या खिलाफत चळवळीला असहकार आणि कायदेभंगाची चळवळ चालविणाऱ्या महात्मा गांधींचा पूर्ण पाठींबा होता. वर्षभरात स्वराज्य मिळविण्यासाठी सुरू होणाऱ्या आंदोलनात गांधीजींच्या दृष्टीनं खिलाफत चळवळीला अव्वल दर्जाचं महत्व होतं. त्यांच्या दृष्टीने स्वराज्य आणि खिलाफत या दोन्ही चळवळी एकच होत्या. त्यामुळेच हिंदू-मुस्लिम एकजूट होणार होती . गांधीजींच्या आतल्या आवाजातून निर्माण झालेला हा अजब दोस्ताना गांधीजींप्रमाणेच हिंदुस्तानलाही नडला. खिलाफत चळवळीतून हिंदू-मुस्लिम जातीयवाद निर्माण झाला आणि त्याची परिणती शेवटी पाकिस्तान निर्मितीत झाली.

*पलुस्कर यांनी दिले होते बाणेदार उत्तर*
खिलाफत चळवळीमुळेच गांधीजींचे 'रामराज्य' मानवेनासे झाले. आतल्या आत धुसफूसणाऱ्या तणावाचे जाहीर प्रदर्शन होऊ लागले. त्यात काही उत्साही मंडळींचा संपूर्ण  'वंदे मातरम' म्हणण्याचा आग्रह असायचा. त्याला मुसलमान आक्षेप घेऊ लागले. कारण त्यातले दुर्गा, कमला, लक्ष्मी, विद्या, सरस्वती या हिंदू देवतांचे आणि धर्मकल्पनांचे उल्लेख त्यांना खटकू लागले. या सार्याचा स्फोट जीना यांनी काकींनाडा अधिवेशनात पंडित दिगंबर विष्णू पलुस्कर यांनी  'वंदे मातरम' गायनाने प्रारंभ करताच त्यांना रोखून केला. त्यावर पंडितजींनी त्यांना कारण विचारताच 'संगीताला आणि मूर्तिपूजेला इस्लामचा विरोध आहे' असं ते रागात म्हणाले. त्याला पंडित पलुस्कारांनी चोख उत्तर देत ' हे इस्लामचे व्यासपीठ नाही, हे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन आहे' असे म्हटले नि रितीप्रमाणे  'वंदे मातरम' पूर्ण केले. जीनांनी घेतलेला आक्षेप चुकीचा नव्हता. शिवाय 'आनंदमठ'मध्ये  'वंदे मातरम' ज्या संदर्भात आले होते, त्यामुळे ते गीत केवळ हिंदुगीतच ठरत नव्हते तर ते इस्लाम-मुस्लिमविरोधी गीतही ठरत होतं. परंतु हा साधार आक्षेप घेण्यासाठी जीनांसारख्या बुद्धिवाद्याला पंचवीस वर्षे खर्चाव लागली. कारण फाळणीची बीज त्यांच्या डोक्यात रुजायला तेवढी वर्षे जावी लागली.

*आक्षेपार्ह कडवी कधीच रद्द केलीत*
'वंदे मातरम' गीतासंदर्भातली माहिती देणारी कॉम्रेड प्रभाकर वैद्य, हिंदुत्ववादी अमरेंद्र गाडगीळ, आणि विक्रम सावरकर यांची पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातला लेखकांचा वैचारिक अभिनिवेश वजा करून ती पुस्तकं आवर्जून वाचावीत.  'वंदे मातरम'बाबतचे आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. भारतात राहायचे तर राष्ट्रधर्माचे पालन सर्वांनी केलेच पाहिजे. मुंबई महापालिकेच्या इमारतींमध्ये विविध भाषिकांच्या शाळा भरतात. त्यात उर्दू शाळाही असते. इतर शाळांतील मुलं सामुदायिकरित्या  'वंदे मातरम' म्हणत असताना उर्दू शाळेतली मुलं वर्गात उंडारत असतात. स्वतंत्र उर्दू शाळेत  'वंदे मातरम' म्हणत नसल्याने त्याचा अपमान तरी टळतो. परंतु घटमात्मक धार्मिक स्वातंत्र्याच्या नावाखाली माजलेली ही वृत्ती राष्ट्रधर्म पाळणाऱ्या मुस्लिमेतर भारतीयांनी का सहन करायची? पंडित पलुस्करांच्या केलेल्या कृतीतून हिंमत घेऊन 'शाळा म्हणजे मशिदी नाहीत. इतर शाळांप्रमाणे उर्दू शाळातही  'वंदे मातरम' म्हटलेच पाहिजे.' असं ठणकावून बोलायला राजकारण्यांना मुहूर्ताची गरज लागू नये. कारण ज्यावर मुस्लिमांचा आक्षेप आहे, ती सारी कडवी घटनेनुसारच बाद करण्यात आली आहेत.  'वंदे मातरम'चं पहिलं कडवं मातृभूमीबद्धलचा कृतज्ञताभाव व्यक्त करण्यास पुरेसे आहे. तेवढं बोललेच पाहिजे हा आग्रह शासनानं धरलाच पाहिजे. त्यासाठी जनतेनेही केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करायला हवा. 'वंदे मातरम' हे स्वातंत्र्यलढ्याला बळ देणारं गीत आहे. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही गेली ७०वर्षे  'वंदे मातरम'चा मुसलमानांप्रमाणे हिंदुधर्मवाद्यांनीही हत्यारासारखा वापर केला आहे. संपूर्ण  'वंदे मातरम'मधील केवळ हिंदुधर्म संकल्पनाच्या उल्लेखामुळे ते स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत होऊ शकले नाही.राष्ट्रगीताचा मान रवींद्रनाथ टागोरांच्या 'जन-गण-मन'ला मिळाला. हा निर्णय घटना समितीनं सर्व विचारांच्या पक्षीय आणि सर्वमान्य नेत्यांशी चर्चा करून घेतला.

*वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत*
'जन-गण-मन'चा जन्म १९११ च्या डिसेंबरात झाला. त्यानंतर ३१ डिसेंबर १९११ रोजी कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनाच्या अखेरीस खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सादर केलं. त्यानंतर  'वंदे मातरम'च्या जोडीने 'जन-गण-मन'ही गायले जाऊ लागले. त्याचाही बोलबाला झाला. बंगाली भाषेतील हे गीत सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सरकारने नवभारताचे राष्ट्रगीत म्हणून स्विकारले होते. सर्व धर्म आणि प्रांतीय अस्मितेच्या उल्लेखांतून राष्ट्रीय एकात्मतेचा जयजयकार, हे या गीताचं मुख्य सूत्र होतं; म्हणूनच पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉ.राजेंद्रप्रसाद, मौलाना आझाद, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि घटना समितीतील विविध विचारांच्या नेत्यांनी प्रदीर्घ चर्चा करून, जाहीर वाद टाळून 'राष्ट्रीय ऐक्यमत्य' (नॅशनल कॉन्सेसस) निर्माण केले आणि 'जन-गण-मन'ला स्वतंत्र भारताच्या अधिकृत राष्ट्रगीताचा (नॅशनल अंथेम) मान देण्यात आला. त्याचवेळी या गीताच्या सामूहिक गायन वादनाचे नियमही करण्यात आले. तसेच  'वंदे मातरम'ची स्वातंत्र्य संग्रामातील थोर परंपरा लक्षात घेऊन त्याच्या केवळ पहिल्या कडव्याला 'राष्ट्रीय गीत' (नॅशनल सॉंग) म्हणून मान्यता देण्यात आली. तसेच हे गीत निश्चित स्वर तालात गंभीरपणे गाण्याचे आणि त्याचा योग्य आदर राखण्याचे आदेशही देण्यात आला

*सामुदायिकरित्या म्हणायला हवंय!*
तथापी, राष्ट्रीय एकोपा राखण्यासाठी राष्ट्रगीतासाठी आखलेल्या या सीमारेषा
आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरीती स्मृत: ।।
असा अखंड हिंदुस्तान निर्माणाच्या शपथा घेत हिंदुजागरण करणाऱ्यांना मान्य नाहीत. यासाठी संधी मिळेल तिथे रडक्या, चिरक्या सुरात संपूर्ण  'वंदे मातरम' एखाद्या गवयामार्फत समुदायाला ऐकविल जातं.  'वंदे मातरम' चा राष्ट्रीय मान राखायचा असेल तर ते सामुदायिकरित्याच म्हणायला हवं.  'वंदे मातरम' चा घोर अपमान करणारा हा प्रकार दिवसेंदिवस वाढतोय, त्याला वेळीच आळा घातला पाहिजे.

चौकट.....

*'राज्यघटना-संविधान' असताना 'शरीयत'चा आग्रह कशासाठी?*
भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी असे खळबळजनक वक्तव्ये यापूर्वीही केलेली आहेत. महाराष्ट्राचे तुकडे करण्यासाठी प्रकाश आंबेडकर, दत्ता मेघे आणि शेतकरी संघटनेचे शरद जोशी हे नेते स्वतंत्र विदर्भासाठी एकत्र आले होते. त्याचं काय झालं हे आपण बघतोच आहोत. प्रकाश आंबेडकर यांना समाजातल्या तळागाळातल्या लोकांचा पाठींबा आहे. त्यांच्याकडे आंबेडकरी जनता श्रद्धेनं पाहते. पण प्रकाश आंबेडकर यांना ही नेहमीची सवय आहे. काहीतरी सनसनाटी बोलायचं आणि प्रसिद्धी माध्यमात झळकायचं! पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अगदी विरुद्ध त्यांचं बोलणं आणि वागणं असतं. जसं मुस्लिमांचा ठेका आपल्याकडंच आहे अशा मिजाशीत वावरणाऱ्या एमआयएमच्या ओवेसी बंधूनी 'वंदे मातरम' बाबतची भूमिका घेतलीय तशीच भूमिका दलितांत बेकी माजवून आपली दुकानदारी चालवणाऱ्या स्वयंघोषित दलित नेत्यांनी त्यात प्रकाश आंबेडकरही आले, त्यांनीही वंदे मातरमच्या विरोधात उड्या मारायला सुरुवात केलीय. त्यांचं हे वर्तन दलितांचं भविष्यही नासवणारं आहे. त्यांच्या मते 'जन गण मन' हे राष्ट्रगीत असताना 'वंदे मातरम'ची गरजच काय? असा सवाल ते करताहेत. पण ओवेसी यांनी एका बाजूला शरीयतचा आग्रह धरलाय याचा विसर त्यांना पडलाय. अशावेळी त्यांनी ओवेसी बंधूंना 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेली 'राज्यघटना-संविधान' असताना 'शरीयत'ची गरजच काय? असा सवाल केला असता तर प्रकाश आंबेडकर यांचं म्हणणं संयुक्तिक ठरलं असतं. पण त्यांनी तसं वक्तव्य कधी केलंच नाही. यातच त्यांचा दांभिकपणा दिसून येतो. केवळ मतांच्या राजकारणासाठी अशी वक्तव्य केली जात असतात हे आंबेडकरी जनता आता चांगलीच ओळखतेय. त्यामुळेच कवाडे आणि आठवले यांनी मुस्लिम मतांसाठी मुस्लिम धार्जिण्या पक्षांशी केलेली आघाडी आंबेडकरी जनतेनं कधीच स्वीकारली नाही, तशीच प्रकाश आंबेडकर-ओवेसी ही आघाडी स्वीकारणार नाही. भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर बाळसं धरलेल्या भारिपला अशी आघाडी अडचणीची ठरेल असं दिसतंय! पण 'महाराष्ट्र बंद' बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर केवळ मीच करू शकलो. असं समजणाऱ्या प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांना आवरणार तरी कोण?

-हरीश केंची.
९४२२३१०६०९

Saturday 6 October 2018

नासकी लोकशाही...!

"जगामध्ये सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून गौरविल्या जाणाऱ्या भारतीय लोकसभेची गेल्या काही वर्षांत 'महाभारतीय राजसभा' झालीय. इथल्या लोकशाहीची अवस्था तर महाभारतातल्या द्रौपदीसारखी झालीय. द्रौपदीचा ताबा पांडवांकडे असताना तिला जुगारात लावण्यात आलं, तर कौरवांच्या ताब्यात जाताच तिचं वस्त्रहरण झालं. द्रौपदीच्या अब्रू रक्षणार्थ श्रीकृष्ण तरी धावून आला. भारतीय लोकशाही द्रौपदी एवढीशी भाग्यवान नाही. तिचं पदोपदी आणि पुन्हा पुन्हा वस्त्रहरण होत आहे. ते रोखण्यासाठी, लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी आपणच श्रीकृष्ण होण्याची गरज निर्माण झालीय!"
------------------------------–------------
'हम सब भारतीय बननेके पहले भारत बने...!' २६/११ च्या हल्ल्यात जखमी झालेला नेव्हीतील, मरणाच्या दाढेतून परतलेला, अपंग झालेला सैनिक ही अपेक्षा भारतीयांकडून व्यक्त करत होता त्यावेळी केवळ तिथं उपस्थित असलेलेच नव्हे तर दूरचित्रवाणीवर तो कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाला त्याची ती अपेक्षा अस्वस्थ करून गेली...!"
शुक्रवारी रात्री प्रसारित झालेल्या 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात संवादक असलेल्या अमिताभ बच्चन यांनी या सैनिकाला बोलत केलं, मग त्यानं जे काही सांगितलं ते अंगावर शहारे आणणारं होतं. त्यांनी अतिरेक्यांशी दिलेला लढा, प्राणावर बेतलेला प्रसंग आणि जीवन-मरणाचा रुग्णालयातला झगडा याचं वर्णन ऐकून सारेच व्यथित झाले तसेच भावुकही बनले. त्या सैनिकानं भारतीय मानसिकतेचं केलेलं मूल्यमापन सर्वांना आत्मचिंतन करायला भाग पाडलं! पण खरंच आपण असं आत्मचिंतन करणार आहोत काय? देशाच्या आत्मगौरवाचे निघत असलेले धिंडवडे आपण दररोजच सहन करत आलो आहोत. राजव्यवस्थेचं, लोकशाहीचं होत असलेलं अवमूल्यन, राजकारणाचा घसरलेला स्तर, हे सारं सुधारावं, योग्य दिशेनं चालावं, सर्वसामान्यांना हे माझं नाही तर आपलं राष्ट्र आहे असं वाटावं, अशी परिस्थिती निर्माण करण्यात आपण यशस्वी झालो आहोत असं म्हणता येईल का? देशाच्या राजव्यवस्थेचा होणारा सत्यानाश, लोकशाहीचं होणारं वस्त्रहरण आपण रोखणार आहोत का? लोकशाही रक्षणासाठी आपण सक्षम, सशक्त होण्याची कधी नव्हे इतकी आज गरज निर्माण झालीय.

*महानालायकपणा करण्याची गरज होती का?*
भ्रष्टाचारात बरबटलेल्या आणि जनतेनं सत्तेवरून फेकून दिलेल्यांना भाजपेयींनी सत्ता संपादनासाठी अवास्तव, अनावश्यक महत्व दिलं मोठं केलं. असंगाशी संग केल्यानं कमावलेल्या तत्वांचाही शक्तिपात होतो याचा अनुभव सध्या भारतीय जनता घेतेय. यामुळं अशा आयाराम पुढाऱ्यांना लायकीपेक्षा अधिक मोठेपणा मिळाला. परंतु ही मंडळी आपल्या लायकीनुसारच वागताहेत. आपल्या स्वार्थासाठी सत्तासाथीदाराला वेठीला धरून लोकशाहीची विटंबना करीत सुटले आहेत. त्यांच्यात हे कुकर्माचं बळ कुणी पेरलं? स्वातंत्र्यानंतर अधिकाधिक सत्तालाभ काँग्रेसनेच उपभोगलाय, आपला सत्ता स्वार्थ साधण्यासाठी काँग्रेसनं लोकशाहीला वेळोवेळी जुगाराला लावलं. तथापि काँग्रेसचा हा नालायकपणा खतम करण्यासाठी महानालायकपणा करण्याची काही गरज नव्हती. हे टाळता येणं शक्य होतं. पण तसं घडत नाही. ही वस्तुस्थिती आहे!

*भाजपेयींनी सत्ता व्यवहार आत्मसात केला*
लोकशाहीला हा मार प्रादेशिक पक्ष देत होते, अस्मितेच्या नावाखाली फुटीरतेला बढावा देत होते. त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. काँग्रेसच्या हातून अनेक राज्ये गेली. त्यातून प्रतिकूल परिणाम देश पातळीवर,  संसदीय लोकशाहीवर आणि आपल्या राजकारणावर झाला. काँग्रेसनं अनेक राज्यात प्रादेशिक पक्षांशी सोयीनुसार दोस्ती-युती केली. या दोस्तीत विधानसभांच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांना बढावा द्यायचा आणि लोकसभेच्या निवडणुकीत त्याची वसुली करायची असं धोरण काँग्रेसनं ठेवलं होतं. त्यामुळंच पंजाबात अकाली दल, तामिळनाडूत द्रमुक-अण्णा द्रमुक, काश्मिरात नॅशनल कॉन्फरन्स यासारख्या पक्षांना बढावा मिळाला. सत्तेसाठी काँग्रेसच्याच चालीनं चालणाऱ्या भाजपनं हा सत्ता व्यवहार आत्मसात केला. भाजपेयींनी सत्ताबळ कमविण्यासाठी जमेल त्या प्रादेशिक पक्षांशी दोस्ती केलीय. त्यामुळं भाजप कार्यकर्त्यात, मतदारात आणि लोकप्रतिनिधीत लक्षणीय वाढ झालीय.

*नासक्या लोकशाहीचं हे फळ*
काही राज्यात सत्ताधारी झाला परंतु प्रादेशिक पक्षांशी दोस्ताना जमविताना काँग्रेससारखा 'राज्य तुमचं, केंद्र सत्ता आमची' असा रोखीचा व्यवहार न केल्यानं भाजप जसा या प्रादेशिक पक्षांच्या आधारे वेगवेगळ्या राज्यात पसरला तसे प्रादेशिक पक्ष लोकसभेद्वारे राष्ट्रीय राजकारणात घुसले. ही भाजपेयी परिवाराची अगतिकता आहे. या सरकारच्या जागी दुसरं कोणतंही सरकार आलं तरी त्यात बदल होणार नाही. कारण सरकार आणणाऱ्याला आपलं सत्व, तत्व विकल्याशिवाय सत्ता मिळणार नाही आणि मिळाली तरी टिकवता येणार नाही. हे आपल्या नासक्या लोकशाहीचं फळ आहे.

*राजकीय अडाणीपणा आणि भावनिक भुलभुलैया*
भ्रष्ट झुंडशाहीलाही संख्याबळावर सत्ता देणारी ही लोकशाही ही एक भिकार व्यवस्था आहे. तथापि तिला पर्याय असणारी अन्य चांगली राजव्यवस्था नाही. प्रत्येक व्यवस्थेत दोष असतातच, परंतु त्यातील दोष दूर करण्याचा प्रामाणिकपणा त्या व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यात असायला पाहिजे. यासाठी सत्तेसाठी जनमत लाथाडून भ्रष्ट डावपेंच खेळणाऱ्या राजकारण्यांप्रमाणेच, त्यांच्या खेळाकडे हताशपणे पाहणाऱ्या जनतेनेही लोकशाही निर्दोष करण्याची आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. परंतु भारतीय जनतेचा राजकीय अडाणीपणा आणि भावनिक भुलभुलैयात फसण्याची वृत्ती पाहता भारतीय जनता लोकशाही निर्दोष करण्यास नालायक ठरते. अशा समाजाला लायक सत्ताधीश कसा मिळू शकेल? जनतेच्या बेजबाबदारपणातूनच त्यांना लोकशाहीतला मोठेपणा मिळाला आहे. फाटक्या दुधाला विरजण लावण्यानं दही होत नाही. तिथं लोण्याची अपेक्षा धरण्यात काहीही अर्थ नाही.

*जनतेनं आता आतून हाललं पाहिजे*
जनतेनंच स्वार्थ त्यागल्याशिवाय आणि राजकीय भान आपल्यात बाणवल्याशिवाय लोकशाहीची विटंबना थांबणार नाही. तिथं राष्ट्रीय प्रश्नांची, निर्णयांची चर्चा होते, अशा लोकसभेत जाणाऱ्या उमेदवारास आपण गावापर्यंत एस.टी. पाणी संडास व्यवस्था, चिठ्ठ्यांवर मिळालेल्या नोकऱ्या, खोटी कागदपत्रे बनवून दिलेली कर्जे, यासारख्या कर्तृत्वाचा अथवा आमिषाने हिशेब करून आपण मतं देतो आणि पुढच्या निवडणुकीतले क्षणाचे मतदार राजेपद मिळेपर्यंत लोकशाहीच्या बोंबा मारत बसतो. सामान्यातल्या सामन्याला सर्वोच्च पदापर्यंत नेणाऱ्या लोकशाहीची विटंबना टाळण्यासाठी तरी आता आतून हालले पाहिजे. तशी आपण मतांसारखी पावलं टाकीत असतो. पण आता निश्चयानं पावलं टाकायची वेळ आली आहे.

*लोकशाही रक्षणासाठी कृष्ण बनू या!*
सत्ताकारणासाठी सारा घोडेबाजार बनलाय. शासन म्हणून कुणाची प्रशासनावर जरब राहिलेली नाही की, जनतेच्या मनांत कुणाबद्धल आस्था नाही. भारतानं आकाशात अग्निबाण उडवले आणि पाताळात अणुबॉम्ब फोडले तरी भारतीय समाजात क्रांतिकारी चैतन्य उसळलेलं नाही. सरकार ठप्प जनता गप्प तरी भारताकडं वाकडा डोळा करून कुणी पाहत नाही. भारताचा जणू गोळा झालाय. सत्ता स्वार्थात सरकारे पडली, तरली तरी राष्ट्र जगलं पाहिजे. कुणाला जिंकावंस वाटावं असं राष्ट्र उभं असलं पाहिजे. भारत भूमीची ही हाक आपल्या कानी-मनी घुमतेय का? देशाचा होणारा हा सत्यानाश टाळण्यासाठी जागे होऊ या, कृष्ण बनून लोकशाहीचं रक्षण करू या...!

चौकट
*चारित्र्यहीनता हा देखील भ्रष्टाचारच!*
पूर्वी श्रद्धेची ठिकाणं होती, ती आता धूसर बनली आहेत. राजकारणात चारित्र्यवान माणसं अभावानेच आढळू लागली अन भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झालाय. त्यामुळं चारित्र्यवान नेत्यांची संख्या हळूहळू रोडावू लागली अन ती संख्या नष्ट होते की काय, अशी शंका निर्माण होऊ लागलीय. यातच काही काळ देशात संमिश्र सरकारांनी आपलं जाळं फेकलं, त्यात सर्वच राजकीय पक्ष अडकले. विचारसरणीनं भिन्न असलेली ही मंडळी एकाच पातळीवर आल्यानं लोकांसमोर नेतृत्वाबद्धल साशंकता निर्माण झाली आणि त्या साशंकतेतूनच नेतृत्वावरचा विश्वास उडाला. धेय्य-धोरणं, विचार-आचार साफ बुडाले, उरली फक्त खुर्चीची लालसा, महत्वाकांक्षा, त्यासाठी तडजोड, लांगूनचालन, खोट्याचं खरं आणि खऱ्याचं खोटं करण्याची प्रवृत्ती सार्वजनिक जीवनातला हा व्यभिचार चारित्र्यहीनतेचेच प्रतीक बनू लागली. चारित्र्यहीनता हा देखील भ्रष्टाचार आहे याचा सोयीस्कर विसर पडू लागलाय. सार्वजनिक जीवनातला हा व्यभिचार थांबायला हवाय. असं झालं तर देशाच्या दृष्टीनं ते एक आशादायक चित्र असेल. त्याच्या प्रतीक्षेत तुम्ही, आम्ही, आपण सारेच राहायला काय हरकत आहे...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अ...