Monday 27 February 2017

*शेकाप आता मूळ ध्येयाकडे जायला हवा!*

*शेकाप आता मूळ ध्येयाकडे जायला हवा!*

शनिवारवाड्याच्या साक्षीने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये नुकताच प्रवेश झाला. प्रवीण गायकवाड यासारख्या पुरोगामी विचाराच्या अभ्यासू कार्यकर्त्याला योग्य असे व्यासपीठ मिळाले. त्यांची जडणघडण ही मराठा सेवा संघ वा संभाजी बिग्रेड सारख्या जातीवादी विचारांची आहे असं प्रथम दर्शनी वाटतं पण ते फारसं खरं नाही. त्यांच्यावर खरे वैचारिक संस्कार झाले आहेत ते बामसेफच्या वामन मेश्राम यांचे. गायकवाडांनी राजकीय जीवनाला प्रारंभ केला तो साम्यवादी विचाराशी जवळीक असलेल्या शेतकरी कामगार पक्षातून! देशभर भाजपमध्ये जाण्याला वेग आला असताना त्यांनी सत्तेचे राजकारण करण्याऐवजी वैचारिक राजकारण करण्याचा जो निर्णय घेतला तो कौतुकास्पद म्हणायला हवा. शेकाप हा कधी सत्तेत येईल ही शक्यता नाही त्यामुळे गायकवाड यांच्या या वैचारिक भूमिकेचं स्वागतच करायला हवे.
पुण्याचे केशवराव जेधे यांनी ह्या पक्षाची स्थापना केली असली तरी पुण्यात तो पक्ष काही रुजला नाही.  पण पुण्यातल्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी शेकापला जवळ केले ही त्यापक्षांच्या जुन्या कार्यकर्त्यांसाठी आनंददायक गोष्ट आहे. या पक्षाला इतिहास असल्याने त्याला वर्तमान आहे आणि भवितव्यही आहे, असा या कार्यकत्यांना विश्वास वाटला असावा. पण वैचारिक कसोटीवर शेकापचा विचार केला तर तो ही अन्य पक्षांसारखा नाटकी आणि ढोंगी बनल्याचे दिसून येईल. अर्थात आजच ढोंग काय आहे हे समजून घ्यायचे असेल तर पूर्वीचं सत्य जाणून घ्यावं लागेल.
शेकापची स्थापना स्वातंत्र्याच्या स्थापनेनंतर लगेचच झाली. नाशिक जिल्ह्यातल्या दाभाडीत भरलेल्या अधिवेशनात पक्षाने आपली भूमिका अधिक स्पष्ट केली. हिंदी कम्युनिस्ट पक्षाची कथित चुकीची धोरणं, समाजवाद्यांच्या मर्यादा लक्षात घेत ग्रामीण आधार असणारा शेतकरी आणि शहरी आधार असणारा कामगार यांचा खराखुरा पक्ष अशी गर्जना या पक्षाने केली. दाभाडी प्रबंधांद्वारे आपली बांधीलकी साम्यवादी तत्वज्ञानाशी असल्याचं स्पष्ट केलं. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, काकासाहेब वाघ, दाजीबा देसाई, भाऊसाहेब राऊत, उद्धवराव पाटील आणि त्यांच्याच उंचीचे आणखी काही नेते या पक्षाला लाभले. त्यातल्या बहुतेकांनी पूर्वी काँग्रेस पक्षात काम केलेलं. त्यामुळे काँग्रेसपक्षासमोर शेकापने मोठं आव्हान उभं केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार काँग्रेसचे उमेदवार होण्याआधी शेकापचे समर्थक होते, त्यांच्या मातोश्री शारदाबाई या शेकापच्या कार्यकर्त्या होत्या.
शेकापच्या स्थापणेनंतरच्या दहा वर्षाने महाराष्ट्राची निर्मिती झाली. मात्र त्यापूर्वी झालेल्या दोन निवडणुकात शेकापने काँग्रेससमोर जबरदस्त आव्हान उभं केलं होतं. स्थापनेनंतर लगेचच या पक्षाला फुटीला सामोरं जावं लागलं. मात्र १९५७ च्या निवडणुकीत शेकापच्या वाढीला संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न उपयोगी पडला. या निवडणुकीत शेकापची आमदार संख्या ३१ एवढी होती. यशवंतराव चव्हाण यांचाही १९५७ च्या निवडणुकीत पराभव झाला असता. पण काँग्रेसी तंत्र कामी आल्यानं ते १६०० मतांनी वाचले. पुढे संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्याचं जवळजवळ निश्चित झालं. यशवंतराव चव्हाण तो पर्यंत मुत्सदी झाले होते. आपल्यापुढचं खरं आव्हान शेकापचच असल्याचं त्यांनी जाणलं होतं. त्यांने काँग्रेस आता 'देव-देवगिरीकरांची राहिली नसून ती बहुजनांची आहे. पक्षात या आणि तुम्हीच नेतृत्व करा. पक्ष तुमचाच आहे' या आशयाच आवतण शेकापचे नेते आणि कार्यकर्त्यांना दिलं. यालाच म्हटलं जातं बेराजेचं राजकारण. मग काय शेकापचे संस्थापकच चव्हाणांच्या गळाला लागले. केशवराव जेधे, शंकरराव मोरे, तुळशीदास जाधव यांनीच पक्षाला लाल सलाम ठोकल्याने त्यांचे समर्थक असणारे अनेकजण शेकापतून काँग्रेसमध्ये गेले. शंकरराव मोहिते-पाटील, यशवंतराव मोहित, पृथ्वीराज चव्हाणांचे वडील आनंदराव चव्हाण हेही त्यांच्यामागून काँग्रेसमध्ये आले. कुणी साखर कारखाना, तर कुणी तहहयात , पिढ्यानपिढ्या सत्तेची हमी मिळविली.
नेते आणि प्रमुख कार्यकर्तेच वर्गमित्र बनण्याऐवजी वर्गशत्रू झाल्याने शेकापच्या उभारणी, विस्ताराला मोठा तडा गेला. मात्र विचारांची बांधिलकी मानणारा मोठा घटक पक्षातच राहिल्याने पक्षाचं अस्तित्व राहिलं. त्यानंतरच्या काळात रायगडात जयंत पाटील यांचे आजोबा नारायण नागू पाटील, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्रात माधवराव बागल, दाजीबा देसाई, उस्मानाबादेत उद्धवराव पाटील, परभणीत अण्णासाहेब गव्हाणे, नाशिकात विठ्ठलराव हांडे, नांदेडात केशवराव धोंडगे, सांगलीत जी. जी लाड, हे पक्षाचे चेहरे राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर शेतकरी कामगारांचे प्रश्न आणि काँग्रेसविरोधी राजकारण एवढ्या मर्यादेतच शेकाप कार्यरत राहिला. जमीनदार मराठयांचा पक्ष अशी सुरुवातीच्या काळात होणारी पक्षावरची टीका या नव्या दशेने पुसून काढली. व्यापक सामाजिक ओळख हे या पक्षाचं वैशिष्ठ्य होते. सत्यशोधक-ब्राह्मणेतर चळवळीची पार्श्वभूमी असणारे नेते आणि गांधी हत्येनंतर जाळपोळीत सहभागी असणारे बहुसंख्य कार्यकर्ते, अशी पक्षाची ओळख असतानाही या पक्षात सर्व जातींच्या कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली. कोल्हापूरसारख्या मतदारसंघातून पक्षाने त्र्यंबक कारखानीस यांना निवडून आणलं. पुण्याच्या शिवाजीनगरातून बंडोपंत किल्लेदार निवडून आले होते. तसेच कुंडलिक घोडके हे कळंब, ज्ञानोबा हरी गायकवाड हे गंगाखेड, यांच्यासारख्या दलित कार्यकर्त्यांना पक्षाने आमदार म्हणून निवडून आणलं. भाऊसाहेब राऊत हे कोळी समाजाचे कार्यकर्ते आणि गणपतराव देशमुख हे धनगर समाजातून पुढं आलेलं नेतृत्व शेकापचा व्यापक आधार स्पष्ट करीत होतं.
भाऊसाहेब राऊत यांचा अपवाद सोडला ता संस्थापक नेतेच पक्ष सोडून गेले तरी, दुसऱ्या फळीतील नेत्यांनी पक्ष जगवला, वाढवला. मात्र ही वाढ द्रमुकसारखी व्यापक आणि बंगाली कम्युनिस्ट पक्षासारखी शिस्तबद्ध नव्हती. उद्धवराव पाटील, प्रा. एन. डी. पाटील, दत्ता पाटील, विठ्ठलराव हांडे, यासारखे काही मोजके नेते सोडले, तर इतरांना आपल्या कार्यक्रमाशी बांधिलकी आणि वैचारिक आग्रह याच वावडं होतं. सार्वजनिक उद्दिष्टांपेक्षा व्यक्तिगत उद्दिष्ट,  सामाजिक सुरक्षिततेपेक्षा सर्वार्थच व्यक्तिगत संरक्षण याबाबी पक्षाच्या वाढविस्ताराची नसबंदी करून टाकणाऱ्या ठरल्या. नेते सोडून गेले तरी, कार्यकर्त्याच्या जोरावर १९५७ मध्ये शेेकाप प्रमुख विरोधी पक्ष बनला. मात्र तेव्हाची ३१ ही आमदारसंख्या शेकापला पुढे कधीही गाठता आली नाही. २००४ साल तर या पक्षासाठी एवढ्या वाईट पद्धतीने उजाडलं की, विवेक पाटील आणि गणपतराव देशमुख हे दोनच आमदार निवडून आले. कोणत्याही पक्षाचा प्रभाव किती हे संसदीय यशापयशात मोजल जात असलं तरी विचाराचं महत्व आणि प्रभाव संख्येपेक्षा मोठा असतो. लाल निशाण गट सध्या कोणतीही निवडणूक लढवीत नाही मात्र १९९८ च्या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षाने काँग्रेसला शिवसेना - भाजपच्या विरीधात इतर पक्षाशी आघाडी करायला लावली होती. शेकाप प्रमुख विरोधीपक्ष राहू शकला नसेलही, मात्र त्याने आपली वैचारिक ओळख हरवली, हेच त्या पक्षाच्या ओहोटीच्या कारण आहे. गायकवाड यांचासारख्या विचारांशी बांधिलकी असलेला नेता ही परिस्थिती बदलू शकतो का हे एक आव्हान आहे.
१९८० च्या दशकात २१व्या शतकाच्या समाजकारणाची अनेक बीज रोवली गेली. या बदलत्या परिस्थितीच भान ज्या पक्षांना होतं, ज्यांनी आपल्या चाली बदलाला अनुसरून ठेवल्या, ते टिकले आणि वाढले. १९८० पर्यंत शेकाप आपला वैचारिक पिंड आणि बाणा टिकवून होता. पण कोणत्याही राजकीय पक्षाला वास्तवाचं जे भान या असावं लागतं ते शेकापकडं फार कमी होतं. मुख्य म्हणजे, नव्या पिढीशी आपलं नातं जोडण्यात या पक्षाला १९८५ नंतर काहीही करता आलेलं नाही. त्यानंतर या पक्षात नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून कोण आलं असतील तर उदा. जयंत पाटील अलिबाग, विजय देवणे कोल्हापूर. एका नेत्याचा पुतण्या दुसरा कार्यकात्याचा मुलगा. दोघांनाही आपण कोणत्या पक्षात आहोत, आपल्या पक्षाची ओळख ती कोणती? हे कधी उमगलं नसावं. आपले वर्गशत्रू असणारे काँग्रेस आणि शिवसेना भाजपसारखे पक्ष यात आणि आपल्यात कोणताच फरक नाही, अशीच त्यांची शैली आणि देहबोली राहिली. त्यामुळे जयंत पाटील यांना संपूर्ण रायगड जिल्ह्यात शिवसेना भाजपशी उघडपणे युती करण्यात काही गैर वाटत नाही. तर विजय देवणेंना चक्क शिवसेनेतच जाण्यापासून शेकापच नेतृत्व रोखू शकलं नाही. मर्यादा नेर्तृत्वाच्याच होत्या; तत्त्वज्ञानाच्या नव्हत्या! त्यामुळे 'सत्ता कधीच येणार नाही, हे माहीत असतानाही आमचे कार्यकर्ते आमच्या बरोबर राहतात' हा प्रा.एन.डी.पाटील यांचा दावा टिकाऊ ठरला नाही. परिणामी शेषराव देशमुख, रामशेठ ठाकूर यांच्यासारखे माजी खासदार, जी डी. लाड, ज्ञानोबा हरी गायकवाड, चंद्रकांत निंबाळकर, जनार्दन तुपे, यांच्यासारखे माजी आमदार अन्य पक्षाच्या वळचणीला गेले. अशा परिस्थितीत पक्षाची वैचारिक बांधिलकी राखण्याचे काम प्रवीण गायकवाड आणि त्याच्या सहकाऱ्यावर आहे.त्यांना त्यांच्या या कामात यश मिळो हीच शुभेच्छा...!
- हरीश केंची.

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...