Monday 25 November 2019

कट्यार काळजात घुसली



"राजकारण नेहमीच साधं, सरळ, सोपं नसतं तर ते वेळप्रसंगी क्रूर ही बनतं. सत्ता संपादनात तीव्र स्पर्धा, ईर्षा आणि महत्वाकांक्षा भरलेली असते. भाजपेयींनी किंबहुना देवेंद्र फडणवीस यांनी ती दाखवून दिलीय. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव करण्यासाठी सरसावल्या शरद पवार यांच्यासारख्या धुरंधर राजकारण्याच्या घरातच फूट पाडली. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर फोडलाच शिवाय आजवर ते ज्याचा आपला वारस सांगत होते अशा अजित पवारांनाही फोडून आपल्या बाजूला वळवलं. सत्ता हस्तगत केलीय. शरद पवारांनी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्ता मिळवली होती. इतिहासाची पुनरावृत्ती झाली ती अशी. शरद पवारांनी केवळ राजकारणासाठी खंजीर वापरला होता. अजित पवारांनी तर केवळ राजकारण, सत्ताच नव्हे तर कुटुंबातही व्यक्तिगत स्वार्थासाठी आपल्या काकांच्या काळजात कट्यार घुसवलीय! काका व्यथित झालेच त्याहून अधिक बहीण सुप्रिया सुळे अधिक घायाळ झाल्याचं दिसलं. महाराष्ट्राच्या राजकीय घराण्यांपैकी ठाकरे घराण्याच्यानंतर पवारांच्या घराण्यात पुतण्यानं काकांच्या काळजावर वार केलाय...! अगदी थेट खोलवर 'कट्यार काळजात घुसली'य....!"
-----------

*म* हाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे इतका सत्तेचा गोंधळ उडालाय. निवडणूक निकालानंतर सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपनं सत्तास्थापनेत असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर इतर पक्षांनी सत्तेसाठीची जुळवाजुळव केली आणि तसा दावा करण्यासाठी जाणार असं ठरत असतानाच भाजपेयींनी मध्यरात्री केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राष्ट्रपती राजवट हटविण्याचा निर्णय घेतला, मध्यरात्रीच राष्ट्रपतींनी त्यावर मोहोर उठविली. राज्यपालांनी लगेचच आपल्या कार्यालयाला जाग केलं. सर्व कर्मचारीवर्गाला भल्या पहाटे उठवून कामाला लावलं आणि सकाळीच गुपचुपपणे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी उरकला. राष्ट्रपती कार्यालय, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि त्यांचं कार्यालय, राज्यपालांचे कार्यालय या तिन्ही ठिकाणी लालफितीचा कारभार रेंगाळलेला असताना मात्र सत्तास्थापनेच्या कामात एवढी तत्परता दाखवतात. भाजपच्याप्रति आपल्या निष्ठा व्यक्त करतात. याला यंत्रणेचा गैरवापर म्हणावं की, सत्तेचा दुरुपयोग म्हणायचा! यामुळं राज्यात घटनात्मक पेच निर्माण झालाय. राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी सात दिवसाची मुदत दिलीय. या दरम्यान विधिमंडळाचं अधिवेशन बोलवावं लागेल. तात्पुरता विधानसभा अध्यक्ष नेमावा लागेल. निवडून आलेल्या आमदारांचा शपथविधी व्हायला हवा. त्यानंतर विधानसभा अध्यक्षाची निवड व्हायला हवी आणि मगच बहुमत सिद्ध करावं लागेल. पण सत्ताधाऱ्यांची खरी परीक्षा अध्यक्षपदाच्या निवडीतूनच सिद्ध होईल की, बहुमत आहे की नाही. तोपर्यंत राज्यात अस्थिरताच असणार आहे. या साऱ्या घडामोडीतून कौटिल्यालाही राजकारणाचा नवा धडा मिळाला असेल!*

अजित पवारांनी अद्यापि सिद्ध व्हायचीय*
यापूर्वी शरद पवार यांनीही सत्तेच्या ताकदीवर महाराष्ट्रातले अनेक पक्ष, गट-तट, घराणी, आघाड्या आजवर फोडल्या, एकमेका विरोधात झुंजवत ठेवल्या तर काही आपल्या अंकित केल्या. याचं कौतुक नेहमीच 'बेरजेचं राजकारण' असं केलं गेलं. राज ठाकरे यांच्या रुपानं बाळासाहेब ठाकरे यांच्या परिवारातील वाद जगजाहीर झाले. त्यांनी आपला वेगळा सवतासुभा उभा केला. अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानं शरद पवारांचंही घर फुटू शकतं, हे उभ्या महाराष्ट्रानं पहिल्यांदाच पाहिलं. 'राष्ट्रवादी'त आता उभी फुट अटळ आहे; पण ती किती यावर अजित पवारांची भविष्यातली 'दादागिरी' अवलंबून राहणार आहे. पवारांच्या घरातील दुहीमुळे आणि शरद पवारांच्या वार्धक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. या वळणाचे शिल्पकार अजित पवार ठरतील. अजित पवार मात्र त्यांचं राजकीय पाऊल नेमकेपणानं काकांच्या पावलावर टाकत आहेत. चालून आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर वापर करत येनकेनप्रकारे राजकारणातली आपली उपयुक्तता, मूल्य, उपद्रवता आणि प्रासंगिकता टिकवून ठेवणं म्हणजेच आजच्या भाषेत सोयीचं राहणं. हेच तर शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचं सूत्र राहिलेलं आहे. हे सूत्र जुळवून आणण्यासाठी मोठ्या हिकमती कराव्या लागतात. ती ताकद अजित पवारांकडे आहे का, हे बहुमत सिद्ध करताना आणि आगामी राजकारणात लवकरच सिद्ध होईल. आजवर त्यांनी केलेली 'दादागिरी' काकांच्या पुण्याईवर होती की खरी धमक त्यांच्यात आहे, हे आता दिसून येईल. पक्ष फोडण्यासाठी त्यांना 'राष्ट्रवादी'चे किमान ४० आमदार तरी अजित पवारांना सोबत घ्यावे लागतील. जनता पक्षाच्या काळात काँग्रेसीबरोबरच जनसंघ, समाजवादी, डावे वगैरे या सर्वांच्या पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांचं 'पुलोद' सरकार शक्तीशाली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बरखास्त केलं. त्यानंतरही १९८० मध्ये चाळीशीही न ओलांडलेल्या शरद पवारांनी ५०-५५ आमदार स्वबळावर निवडून आणले. ही धमक होती शरद पवारांची. आता साठीच्या घरातील अजित पवारांना आपलं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी अशीच कामगिरी करुन दाखवावी लागेल. अशावेळी नरेंद्र-देवेंद्राच्या केंद्र आणि राज्यातल्या सत्तेचं बळ त्यांच्या पाठीशी असेल. हेही इथं लक्षांत घ्यावं लागेल!

*राजकीय नव्हे तर कौटुंबिक कलह कारणीभूत*
अजित पवारांच्या बंडामागे एक प्रमुख कारण हे कौटुंबिक असल्याचं जाणवतं. पक्षात सुप्रिया सुळे यांचं वाढलेलं वर्चस्व, शरद पवारांचा वारस म्हणून रोहित पवारांचं केलं जाणारं प्रमोशन, पक्षात अजितदादांचं कमी होत चाललेलं महत्व, त्यांच्या हातून सुटत चाललेली सत्ताकेंद्र या साऱ्या प्रकारानं अजितदादांची कोंडी झाली होती त्याची परिणती ही आमदारकीच्या राजीनाम्यात झाल्याचं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. हे सारं जाणण्यासाठी थोडंस मागं जावं लागेल. अजित पवार यांनी जे बंड केलं त्याची चाहूल पक्षातल्या नेत्यांना देखील कल्पना लागू दिली नाही. मुलगा पार्थ याच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर त्याच्या राष्ट्रवादीतल्या भवितव्यावरून अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या नाराज होत्या, त्यामुळं ऐन विधानसभा निवडणुकीदरम्यान अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे शरद पवार यांच्याबरोबर दिसले नाहीत. किंबहुना त्यांना सोबत घेण्याचं टाळलं गेल्याचं दिसलं. त्याऐवजी रोहित पवार मात्र सावलीसारखे शरद पवारांबरोबर होते. हे प्रकर्षानं जाणवत होतं. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली, तेव्हापासूनच पवार कुटुंबीयांतले मतभेद उघड होत गेले. गेले काही दिवस अजित पवार निर्णय प्रक्रियेपासून दूर होते. मात्र तिथं सुप्रिया सुळे यांचा सहभाग वाढला होता. हे मतभेद आता स्पष्ट झालंय. सुप्रिया सुळे यांनी 'पक्षात आणि कुटुंबात फूट पडलीय' अशी व्हॉट्सअप पोस्ट केलीय! पार्थला विधानसभेचं तिकीट मिळावं यासाठीही सुनेत्रा पवार या आग्रही होत्या असं काही माध्यमांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांचं शरद पवारांच्या जवळ असणं आणि त्यांचं पक्षातलं वाढतं महत्त्व, माध्यमांमधून मिळणारी प्रसिद्धी हेही कारण या बंडामागे असल्याचं दिसतं. पक्षातल्या काही घडामोडींमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. शरद पवार यांनी जयंत पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात असं सूचक वक्तव्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. पार्थ पवार यांच्या उमेदवारी आणि पराभवातून हे मतभेद अधिक गडद झाल्याचं बोललं जातं. राणा जगजितसिंह आणि पद्मसिंह पाटील यांचा भाजप प्रवेश सुनेत्रा आणि अजित पवार यांच्या सल्ल्यानेच झाल्याचीही चर्चा आहे. 

*दुय्यम वागणूक दिल्याची खंत*
प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, सर्व क्षेत्रातला अभ्यास, व्यासंग, काम करण्याची तळमळ, चिकाटी असे अनेक दुर्मिळ गुण अजित पवारांच्या ठायी आहेत. राज्याच्या राजकारणात अनेक प्यादी, उंट, हत्ती आले आणि गेलेही! पण पवार वजीर ते वजीरच राहिले! पवारांना वगऴून राज्याचे राजकारण आणि राज्यकारण कधी झालंच नाही किंवा करताच आलं नाही. सत्तापालट झाला तरी विरोधकांना पवारांना निस्तेज करता आलेलं नाही. हा इतिहास आहे! पक्षाची ही अवस्था असताना अजित पवारांसारखा तडफदार, कार्यक्षम आणि सडेतोड नेत्याला पक्षांत अशी वागणूक मिळत असेल तर त्यांच्या समर्थकांनी कुणाकडं पाहायचं? २००९ च्या विधानसभेत काँग्रेसहून अधिक जागा मिळाल्या असतानादेखील शरद पवारांनी दुय्यम भूमिका घेतली. त्यामुळं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळू शकलं नाही. अजित पवारांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. ही खंत त्यांनी वेळोवेळी बोलून दाखवली. ५२ आमदारांपैकी ५० जणांनी अजित पवारांना पाठींबा दिला असतानाही त्यांना डावलून शरद पवारांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केलं. त्यांच्या राजीनाम्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडं उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं दिली गेली. सतत अजित पवारांवर अन्याय होतोय ही भावना त्यांच्या मनांत निर्माण झाली, तेव्हा त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पृथ्वीराज चव्हाणांच्या मध्यस्तीनंतर शरद पवारांनी अजितदादा यांची समजूत काढली आणि त्यांनी पुन्हा मंत्रिपद स्वीकारलं. हे शल्य शरद पवारांना सतत सलत असणार त्यामुळं त्यांनी अप्रत्यक्षरीत्या अजितदादांना दूर ठेवलं. सध्याच्या सत्ताहीनतेच्या काळात, आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ता येण्याची चिन्हं नसताना. ईडी वा तत्सम चौकश्या होऊ शकतात ही भीती त्यांच्या मनांत असावी त्यातूनच भाजपशी सौदा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असावा. ते जेव्हा प्रकट होतील तेव्हाच काय ते लोकांसमोर येईल. तोपर्यंत आपण पाहात राहावं!

*फडणवीस यांची भेदनीती अडचणीची ठरली*
इकडं भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या १२२ वरून १०५ वर आली. शिवसेना ६३ आमदारांवरून ५६ वर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ४१ वरून ५४ वर गेली. दुर्बळ झालेली कॉंग्रेस कमी न होता, दोन जागांनी वाढून ४४ आमदारांची झाली. महाजनादेश, महाजनादेश अशी सारखी घोकंपट्टी लावलेल्या भाजपच्या जागा वाढायच्या ऐवजी १७ नं कमी झाल्या. पक्षाचे सात तालेवार मंत्री पराभूत झाले. गेली पाच वर्षं महाराष्ट्राच्या चेहर्‍यावरचा वर्ख खर्रकन उतरला. महाजनादेशाचं पानिपत आणि शिवस्वराज्याचा विजय झाला. महाराष्ट्र आपल्या मूळपदावर कायम आला. या निकालाचं कुणी काहीही निदान आणि विश्‍लेषण करत असलं, तरी निकालानंतरच्या काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटल्याप्रमाणे, ‘महाराष्ट्र हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांचे आहे. ते कुणापुढे झुकत नाही,’ हे महाराष्ट्रानं दाखवून दिलं. देशात काय झालं ? याची चर्चा अन्य प्रसंगी करता येईलही. मात्र महाराष्ट्र गेली पाच-सहा वर्षं भगव्या गुंगीनं पूर्ण मती गुंग झाल्यासारखा वागत होता. जनमताच्या कौलानं त्याला ताळ्यावर आणलंय. २०१४ मध्ये भाजपला १२२ एवढ्या जागा मिळाल्या, त्या देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून नव्हेच. चंद्रकांत पाटील यांचा तर नव्हेच नव्हे. त्यावेळी भाजपचा चेहरा एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचा होता. हे दोघेजण विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेता हाच त्या पक्षाचा चेहरा असतो. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याचं स्पष्ट होताच, सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ‘मुख्यमंत्री’ पदासाठी पुढं आलं. त्यांनी सरकार बनवलं. ‘साम’ तंत्रात फडणवीस यशस्वी झाले. ‘दाम’ तंत्राचा अवलंब करून शिवसेना फुटतेय का, हेही आजमावून पाहिलं. त्यानंतरच्या अनेक छोट्या-मोठ्या निवडणुकांत पैशाचा प्रचंड वापर करण्यात आला. २०१४ पासून अगदी कालपरवापर्यंत विरोधी पक्षाचे बडे नेते फोडून ते स्वपक्षात आणणाऱ्या ‘भेद’नितीचा त्यांनी सपाटाच लावला. एवढंच काय, मित्रपक्षही सोडले नाहीत. काहीही करून सत्ता मिळवली होती. आणखी काहीही आणि कितीही करून त्यांना ती सत्ता राखायची होती. त्यासाठीचाच हा सारा अट्टहास होता. यापेक्षा निवडणुकांपूर्वी वेगळं काय दिसून आलं ? भाजपनं जिंकलेल्या १०५ जागांपैकी ४० जागांवर राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या पक्षांतून घेतलेले आहेत. निवडणुकीनंतर आणखी एक वैचारिक द्रोह आणि व्यभिचार फडणवीस यांनी केला. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडून आलेल्यांनाच पाठिंब्यासाठी पंखाखाली घेतलं. ते कमी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या एकमेव आमदाराचा बुद्धीभेद करून त्याचा पाठिंबा मिळवला. आतातर ज्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधीपक्षात असताना सिंचन घोटाळ्यात ७० हजार कोटींची घोटाळा झालाय असा आरोप करीत धुरळा उठवला होता त्याच अजित पवारांच्या साथीनं ते सत्तारोहणासाठी सज्ज झाले आहेत. या घोटाळ्यात ईडीची चौकशी करू असं दरडावून अजित पवारांना आपल्या बाजूला वळवलंय अशी दबक्या आवाजातली चर्चा राजकीय निरीक्षक करताहेत. यातील सत्य काय ते लवकरच कळून येईल. त्यासाठी वाट पाहावी लागेल.

चौकट......
*ज्यात राजकीय समरप्रसंग*
२०१४ मध्ये असाच पेचप्रसंग निर्माण झाला असताना शरद पवारांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा देऊ केला होता. तो पाठींबा शिवसेनेला रोखण्यासाठी केला होता असं खुद्द पवारांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यामुळंच विधिमंडळाच्या पटलावर भाजपेयीं सरकार टिकलं होतं नंतर त्यांचा समझौता शिवसेनेशी झाला आणि युती सरकार टिकलं. आताही अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ नेता म्हणून आमदारांच्या सह्या असलेलं पत्र राज्यपालांना दिलं भाजपला पाठींबा दिला. त्यामुळं भाजपेयीं सरकार अस्तित्वात आलं. खरं तर काकांनी दाखवलेल्या मार्गावरून अजित पवार यांची वाटचाल झालीय. आता जरी अजित पवारांना पक्षातून काढलं, त्यांच्या नेतेपदावर अविश्वास व्यक्त झाला तरी राज्यपाळाकडं दिलं गेलेलं पत्र आज तरी ग्राह्य पकडायचं की नाही हा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार आहे. त्यामुळं आता जर अजित पवारांनी गटनेता म्हणून व्हीप बजावला आणि राष्ट्रवादींच्या आमदारांनी मतदान केलं नाही तर ते कायदेशीर ठरणार आहे किंवा नाही, हे घटणातज्ञाना पाहावं लागणार आहे. या निमित्तानं घटनात्मक पेच निर्माण झालाय हे खरं! मात्र बहुमत नसतानाही सत्तेवर बसण्याचा मान भाजपेयींना मात्र मिळालाय. सत्तेची सूत्र हाती आल्यानंतर मग केंदीय सत्तेच्या साथीनं बहुमत सिद्ध करायला कितीसा तो वेळ लागेल! त्यासाठी मग साम, दाम दंड, भेद हे मार्ग तर हाती आहेतच. पाहू या आगे आगे होता है क्या! महाविकासआघाडी असता काय करतेय तेही पाहणं महत्वाचं आहे. एकूण महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेसाठी मोठी राजकीय लढत होईल असं सध्या तरी दिसतंय.

हरीश केंची
९४२२३१०६०९

Friday 15 November 2019

जितं मया... जितं मया...!


"महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून तीन आठवडे उलटलेत, राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झालीय. नोकरशहांचं राज्य सुरू झालंय. मतदारांनी मोठ्या विश्वासानं महायुतीच्या हाती सत्ता सोपवली. पण घात झाला. महायुतीतला विश्वास संपला. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, सुरू झालं शब्द फिरविण्यात पटाईत असलेल्या भाजपनं इथं आपला डाव साधला. अहंकार जागा झाला. 'मी पुन्हा येईन' असा घोषा लावलेल्या मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नव्हती. इकडं तीन पायाच्या गाडीत सेना विराजमान झालीय. सत्तेच्या सारीपाटावर केवळ आमदारच नाहीत तर सर्वसामान्यही आहेत याचा भाजपेयींना विसर पडलाय. शिवाय केवळ आपणच हिंदुत्ववादी आहोत हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलाय. देशात रामराज्य पक्ष, हिंदू महासभा यासारख्या हिंदुत्ववादी पक्षांना संपवल्यानंतर आता त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे."
--------------------------------------------------
*रा* ज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले आणि शिवसेनेचे ५६ आमदार विजयी झाले. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला पुढील पाच वर्षे सरकार बनवण्याचा जनादेश दिला. पण दोन पक्षात जागा वाटप आणि सत्ता वाटप करण्यासाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यापासून देेवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्यामुळं गेली पाच वर्षे आपल्याकडं असलेली सत्ता भाजपेयींना गमावावी लागली. ‘अब की बार २२० पार’ अशी घोषणा भाजपेयीं नेत्यांनी निवडणूक प्रचारात दिली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर युतीला अडीचशे जागा मिळतील अशी वल्गना केली होती. फडणवीस यांनी तर आपल्या धुवाधार प्रचारसभांतून 'मी पुन्हा येईन', अशी ठिकठिकाणी घोषणा केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांंनी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वप्रथम सरकार बनवण्याची संधी दिली, पण भाजपनं शिवसेनेचं समर्थन मिळत नसल्यानं आपण सरकार बनवू शकत नाही, अशी राज्यपालांकडे कबुली दिली. केवळ अट्टाहास आणि अहंकार यातून भाजपची सत्ता गेली.
*राज्यात मोदींच्या कारभाराचं अनुकरण*
लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालं. राज्यातील जनता ही भाजपबरोबरच आहे, असं पक्षानं गृहित धरलं. मतदारांना देश पातळीवर मोदी-शहांशिवाय पर्याय नाही आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच सर्वेसर्वा आहेत, अशा समजुतीत पक्षाचे नेते वावरत होते. देश पातळीवर मोदींना आणि राज्यात फडणवीस यांना आव्हान देणारा कोणी विरोधक नाही, अशा भ्रमात भाजपेयीं नेते आणि स्वतः फडणवीस होते. समोर विरोधकच नाही, मग लढायचे कोणाशी? निवडणुकीत मजाच येत नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केलं होेतं. समोर कोणी पैलवानच लढायला नाही, असे वारंवार सांगून आपणच राज्याचे एकमेव 'बॉस' आहोत, अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेल्या भाजपेयीं नेत्याच्या वागण्या बोलण्यात सर्वत्र अहंभाव जाणवत होता. लोकांना तो मुळीच आवडला नाही. ‘मी पणा’चा एवढा अहंकार कशासाठी, अशी चर्चा पक्षातच ऐकायला मिळाली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही राज्यातील जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिलेलं नव्हतं. तेव्हा तर भाजपनं शिवसेनेशी पंचवीस वर्षांची युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपचे १२२ आमदार विधानसभेत निवडून आले आणि मोदींचा आशीर्वाद लाभून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक असलेल्या एकनाथ खडसे यांना फडणवीसांनी पाच वर्षांत त्यांची जागा दाखवून दिली. २०१४ मध्ये आलेले अल्पमतातील सरकार फडणवीस यांनी चालवून दाखवलं, म्हणून त्यांचं नेहमीच कौतुक झालं. शिवसेनेला तीन महिन्यानंतर सरकारमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं, पण सेनेला नेहमीच त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली ठेवलं. शिवसेनेला दुय्यम खाती दिली, सेनेच्या मंत्र्यांना सरकारी मान होता, पण अधिकार फारसे नव्हते. कोणत्याही मंत्र्याला फडणवीस यांनी निर्णय स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. गेल्या पाच वर्षांत भाजपनं महापालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, अशा निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद लक्षणीय वाढल्यामुळं फडणवीस यांचं महत्त्व वाढलं. फडणवीस म्हणजेच पक्ष संघटना, फडणवीस म्हणजे सरकार, असं समीकरण बनलं होतं. गेली पाच वर्षे राज्यात सर्व अलबेल आहे, राज्यावर फडणवीस यांची पूर्ण पकड आहे, असं चित्र रंगवलं गेलं. पक्षात फडणवीस यांच्या विरोधात मोठी धूसफूस होती, पण ती कधी मोदी-शहांपर्यंत पोहोचलीच नाही. निवडणूक प्रचारात मोदी-शहांनी राज्यात पुढचं सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणार, असं ठिक-ठिकाणी सांगितलं होतं. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशी सुपरहिट जोडी गेल्या पाच वर्षांत जनतेनं अनुभवली, असं स्वतः मोदींनीच जाहीर केल्यावर फडणवीसांच्या कार्यपध्दतीविषयी पक्षातून तक्रार करायला कोणाची हिम्मत होणार?
*सेनेला सत्तेचा वाटा देण्यात हात आखडता*
दिवाळीच्या पूर्वसंध्येला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि दिवाळी फराळ संमेलनाला बोलावलेल्या पत्रकारांपुढे बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असं काही ठरलेलं नाही, असं जाहीर करून भाजपच्या पायावर कुर्‍हाड मारली. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर जावं, असं त्यांना वाटलं नाही. पण मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आणखी कोणी वाटेकरी नको, याबाबत मात्र ते दक्ष राहिले. फिप्टी-फिप्टी असं काही ठरलेले नाही, असं फडणवीसांनी जाहीर केल्यामुळं उद्धव ठाकरे कमालीचे दुखावले गेले. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असं यावेळी ठरलेले नव्हते. असं ठरवलं तर दोन्ही पक्ष एकमेकांचे आमदार पाडण्याचा खेळ करण्याचा धोका असतो, म्हणून उद्धव यांनी लोकसभेला युती करताना विधानसभेला जागा वाटप आणि सत्ता वाटपात शिवसेनेला समसमान वाटा मिळाला पाहिजे, हे अमित शहा व फडणवीस यांच्याकडून कबूल करून घेतलं होतं. फडणवीस यांनीच घुमजाव केलं आणि अमित शहा या विषयावर काही ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. त्यामुळेच भाजपनं आपली फसवणूक केली, हे शिवसेनेच्या लक्षात आलं आणि त्यातून भाजपबरोबर सरकार स्थापनेसाठी जायचं नाही, असं सेनेनं ठरवलं. आपल्याला खोटं ठरवण्याचा फडणवीस यांनी प्रयत्न केला, म्हणून ठाकरे आणखी भडकले. आमचेच सरकार आणि आमचा मुख्यमंत्री असं शेवटपर्यंत सांगणार्‍या भाजप कोअर कमिटीचे नेते तोंडावर आपटले. हिंदुधर्मीयांमध्ये देशात फूट पडायला नको म्हणून स्वतः शिवसेनेनं त्याग केला आणि भाजपला देशभरात मोठं होऊ दिलं. जेव्हा केंद्रात मोदी सरकार आलं. तेव्हा सेनेला वाळीत टाकलं गेलं. अगदीच फरपट नको म्हणून केंद्रीय अवजड उद्योग हे बिनमहत्वाचं मंत्रिपद दिलं. पण एकही खासदार नसलेल्या रामदास आठवलेंना मात्र सामाजिक न्याय सारखं महत्वाचं खातं दिलं. ज्या नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अगदी टोकाची टीका केली त्यांना पुन्हा भाजपनं मित्र बनवून सात-सात मंत्रिपद दिली. देश पातळीवर जेव्हा अटलबिहारी यांना सरकार बनवण्यात अडथळा येत होता. तेव्हा आधी सरकार स्थापन करा, शिवसेनेला काहीही मिळाले नाही तरी चालेल हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. जेव्हा २०१४ साली महाराष्ट्रात भाजपेयींना १२२ सीट मिळाल्या तेव्हा चक्क शिवसेनेला टाळून राष्ट्रवादीच्या सोबत बस्तान बांधून सरकार स्थापन करण्याचा भाजपेयींनी प्रयत्न केला आणि नंतर सरकार स्थापन होतच नाही, तेव्हा शिवसेनेला सोबत घेतलं पण त्यानंतरही कोणतंही मोठं, महत्वाचं खातं, मंत्रिपद दिलं नाही. पाच वर्षे कोणतेही मोठे मंत्रिपद न घेता शिवसेनेनं भाजपाला पाच वर्षे सत्तेत मदत केली.
*सेनेनं समजून घेतलं, भाजपेयींची कुरघोडी*
देशात, राज्यात भाजपला मोठं करण्यात शिवसेनेचा मोठा वाटा. पण जेव्हा भाजप देशात मोठा राजकीय पक्ष झाला तेव्हा चक्क शिवसेनेला संपविण्यासाठी, मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपेयींनी सर्वतोपरी प्रयत्न केलेत. ज्यावेळी मोदींविरोधात संपूर्ण जग असताना त्यावेळी फक्त शिवसेनाच मोदींजीच्या पाठीशी उभी राहिली. पण तेच मोदी पंतप्रधान असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी आले. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात भूसंपादन कायदा आणत होते तेव्हा शिवसेनेनं, ममता बॅनर्जी सोबत जाऊन विरोध केला ! प्रचंड अवहेलना झाल्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'ऐकला चलो रे' चा नारा दिला! मग स्वतः अमित शहा दोन वेळा मातोश्रीवर येऊन देशात शिवसेना-भाजप एकत्र असणं गरजेचं आहे हे समजावून सांगितलं. केंद्रातल्या मोदींच्या हिंदू सरकार धोका नको म्हणून अमित शहा यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन निव्वळ देश पातळीवर मोदी-भाजप सरकारला धोका नको म्हणून संयमी भूमिका घेतली आणि पुन्हा मोदी-भाजपेयीं सरकारला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर आणि भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती झाली असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जातील. विधानसभेत आमचीच सत्ता येणार असून त्यावेळी पद आणि जबाबदाऱ्या यांचे समसमान वाटप होईल, त्यात अडचणी आल्या तर पक्षाचे वरिष्ठ एकत्रित बसून तो सोडवतील हे जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. जर समसमान जागा ठरल्या असताना त्या अमित शहांच्या साक्षीनं, जाहीर केलं असताना देखील विधानसभा निवडणुकीत भाजपेयींनी जे नाटकतंत्र केलं ते आठवत असेलच. जागा वाटपावरून फडणवीस यांनी सांगितलं की, आम्ही मोठ्या प्रमाणात मेगा भरती केली असल्यानं आकडे जुळवा जुळव होत नाही. आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती शिवसेनेला केली, त्याला मान देऊन उद्धव ठाकरे यांनी माघार घेऊन, तडजोड केली आणि कमी जागा घेतल्या. तरीदेखील भाजपेयींनी बंडखोर उमेदवाराला मदत करून शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त जागा स्वतःहून पाडल्या. भाजपेयीं सत्तेसाठी पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन घरोबा करतात. नितीशकुमारना मित्र बनवते. भाजपेयींच्या १५६ जागा आणि मायावतीच्या ७४ जागा असताना मायावतीला मुख्यमंत्री बनवितात. मग शिवसेनेला ५०-५० ठरले असताना देखील काहीही देणार नसाल तर, राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेना घेत असेल तर मग त्यासाठी कांगावा का करायचा? शिवसेनेनं नेहमीच हिंदुत्वासाठी त्याग केला आहे. भाजपेयींसाठी तडजोड केलीय. अनेक वेळा माघार घेतलीय. पण आज अमित शहा लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वकाही ठरवून जातात, आणि विधानसभा निवडणुकीत राज्याचे निर्णय स्थानिक भाजपेयीं वरिष्ठांनी राज्यात घ्यावं, हे सांगतात हा दुटप्पी पणा नाही का?
*आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हटविण्यात धन्यता मानली*
मोदी लाटेत मिळालेलं सरकार देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाहीत. मतदारांना गृहित धरलं ही सर्वात मोठी त्यांची चूक ठरली. विरोधी पक्षातील दिग्गज नेते त्यांच्या परिवारासह भाजपत आणून त्याचं प्रदर्शन केलं, हे लोकांना पसंत पडलं नाही. ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून भाजपनं आरोप केले, त्या नेत्यांना भाजप प्रवेशासाठी पायघड्या घातल्या, यातून फडणवीस यांनी कोणता संदेश दिला? विरोधकांवर कारवाया, चौकशा, नोटीसा आदी मार्गाने त्रास देणं, हे त्यांच्या अंगलट आलं. पक्षातील विरोधकांना डावलणं, त्यांची उपेक्षा करणं आणि त्यांना गप्प करणं, हेही पक्षाला निवडणुकीत मारक ठरलं. आठ मंत्र्यांना उमेदवारी न देणं आणि आठ मंत्री पराभूत होणं, यानं फडणवीस सरकारची शोभा झाली. पक्ष विस्ताराच्या नावाखाली पक्षात एकाधिकारशाही सुरू झाली. पक्षात जे वरचढ आहेत, त्यांना बाजूला काढलं गेलं. स्पर्धक आहेत त्यांचे पंख कापले. खडसेंना चौकशीत अडकवून त्यांचा कायमचा वचपा काढला. शिवसेनेला नेहमीच आश्‍वासने देऊन झुलवत ठेवलं. आपल्यावर टीका केलेली फडणवीस यांना आवडत नव्हती. फडणवीस हे विरोधी पक्षात असताना भाजपचे प्रभावी व अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा होती. पण राज्याचे प्रमुख झाल्यावर ते झपाट्याने बदलले. वर्षा हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान काँग्रेस सरकारच्या काळात जनतेला खुलं असायचं. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंंत्री तिथं लोकांना भेटायचे. फडणवीसांनी वर्षाचा दरवाजा जनतेला बंद केला. सह्याद्री वा मंत्रालयात सामान्य जनता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचले तर नीट भेट होत नाही. फडणवीस यांचा गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य जनतेशी संबंध तुटला होता. मंत्रालयात खासगी ओएसडी म्हणून बाहेरील व्यक्तींची गेल्या पाच वर्षांत बरीच भरती झाली. जे सरकारी अधिकारी आहेत, त्यांना ओएसडीपुढे फारसे अधिकार नव्हते. फडणवीस यांनी आपल्या भोवती निवडक अधिकार्‍यांचं कडं निर्माण केलं. गेल्या पाच वर्षांत कारभारात भ्रष्टाचार कमालीचा वाढला. चांगल्या पोस्टींगसाठी बदल्यांमध्ये फार मोठी देवाण घेवाण व्हायची, याची उघड चर्चा ऐकायला मिळायची. कामे करण्यासाठी मध्यस्थांची संख्याही वाढली. महाराष्ट्र हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रावर आपली सत्ता राहावी, यासाठी भाजपनं आटोकाट प्रयत्न केला, पण विधानसभेत बहुमताचा आकडा गाठणं जमलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा एकही आमदार फुटला नाही. कर्नाटक पॅटर्न करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं आज तरी भाजपला शक्य झालेलं नाही. नीतिशकुमार, मायावती, मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपद देणार्‍या भाजपला तीस वर्षांची नैसर्गिक मैत्री असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रपद देणं जीवावर आलं, हाच अहंकार भाजपला नडला नि महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. फडणवीस पुन्हा येत नाहीत म्हणून भाजपातील अनेकांना हायसे वाटले.
*साम,दंड,भेदचा वापर तरीही सत्ताहीन*
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या १२२ वरून १०५ वर आली. शिवसेना ६३ आमदारांवरून ५६ वर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ४१ वरून ५४ वर गेली. दुर्बळ झालेली कॉंग्रेस कमी न होता, दोन जागांनी वाढून ४३ आमदारांची झाली. महाजनादेश, महाजनादेश अशी सारखी घोकंपट्टी लावलेल्या भाजपच्या जागा वाढायच्या ऐवजी १७ ने कमी झाल्या. पक्षाचे पाच तालेवार मंत्री पराभूत झाले. गेली पाच वर्षं महाराष्ट्राच्या चेहर्‍यावरचा वर्ख खर्रकन उतरला. महाजनादेशाचे पानिपत आणि शिवस्वराज्याचा विजय झाला. महाराष्ट्र आपल्या मूळपदावर कायम आला. या निकालाचे कुणी काहीही निदान आणि विश्‍लेषण करत असले, तरी निकालानंतरच्या काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटल्याप्रमाणे, ‘महाराष्ट्र हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांचे आहे. ते कुणापुढे झुकत नाही,’ हे महाराष्ट्राने दाखवून दिले. देशात काय झाले ? याची चर्चा अन्य प्रसंगी करता येईलही. मात्र महाराष्ट्र गेली पाच-सहा वर्षं भगव्या गुंगीने पूर्ण मती गुंग झाल्यासारखा वागत होता. जनमताच्या कौलाने त्याला ताळ्यावर आणलंय. २०१४ मध्ये भाजपला १२२ एवढ्या जागा मिळाल्या, त्या देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून नव्हेच. चंद्रकांत पाटील यांचा तर नव्हेच नव्हे. त्यावेळी भाजपचा चेहरा एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचा होता. हे दोघेजण विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेता हाच त्या पक्षाचा चेहरा असतो. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याचे स्पष्ट होताच, सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ‘मुख्यमंत्री’ पदासाठी पुढे आलं. त्यांनी सरकार बनवले. ‘साम’ तंत्रात फडणवीस यशस्वी झाले. ‘दाम’ तंत्राचा अवलंब करून शिवसेना फुटतेय का, हेही आजमावून पाहिले. त्यानंतरच्या अनेक छोट्या-मोठ्या निवडणुकांत पैशाचा प्रचंड वापर करण्यात आला. विरोधकांना तुरुंगाची भीती दाखवून ‘दंड’ हे सूत्र सार्वत्रिक केलं. छगन भुजबळ हे त्यातलं सर्वात मोठं उदाहरण. २०१४ पासून अगदी कालपरवापर्यंत विरोधी पक्षाचे बडे नेते फोडून ते स्वपक्षात आणणार्या ‘भेद’नितीचा त्यांनी सपाटाच लावला. एवढंच काय, मित्रपक्षही सोडले नाहीत. काहीही करून सत्ता मिळवली होती. आणखी काहीही आणि कितीही करून त्यांना ती सत्ता राखायची होती. त्यासाठीचाच हा सारा अट्टहास होता. यापेक्षा निवडणुकांपूर्वी वेगळं काय दिसून आलं ? भाजपने जिंकलेल्या १०५ जागांपैकी ४० जागांवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांतून घेतलेले आहेत. निवडणुकीनंतर आणखी एक वैचारिक द्रोह आणि व्यभिचार फडणवीस यांनी केला. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडून आलेल्यांनाच पाठिंब्यासाठी पंखाखाली घेतलं. ते कमी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या एकमेव आमदाराचा बुद्धीभेद करून त्याचा पाठिंबा मिळवला. एवढे करूनही भाजपला बिनघोर सत्ता स्थापन करता आलेली नाही. निकाल लागून महिना उलटतोय, तरी सत्तेच्या आत्म्याने कुठल्या पक्षाच्या देहात प्रवेश केलेला नव्हता.
*'हिंदुत्वाचा हक्कदार आपणच' ही चाल*
हिंदुत्वाचा वसा केवळ आपल्याकडेच राहावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारानं टाकलेला धूर्त डाव आहे याचा विचार केला पाहिजे. अर्थात ही गोष्ट संघ परिवारासाठी नवीन नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यासारख्या खंद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हिंदुमहासभेसारखा नावातच हिंदुत्व असणारा पक्ष असताना सुद्धा संघाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना केली. कारण सावरकरांचं गोहत्या आणि जातीविरहित हिंदू समाज यासारख्या विज्ञाननिष्ठ गोष्टी चातुर्वण्यावर विश्वास ठेवणाऱ्या तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना मानवणाऱ्या नव्हत्या. त्यामुळेच की काय संघ परिवारानं आपल्या हिंदुत्ववादी पक्षाची वेगळी चूल मांडली. केवळ अफवांच्या भरवशावर जगणारा हा संघ परिवार पक्ष स्थापन करून शांत बसला नाही तर, आपल्या यंत्रणेद्वारे सावरकर आणि हिंदुमहासभा यांच्या व्यक्तीगत आणि पक्षीय जीवनाविषयी अनेक कपोलकल्पित अफवा पसरवून हिंदुमहासभेचं खच्चीकरण केलं. आता त्यांचं शिवसेना हे लक्ष्य आहे, त्यासाठीचा हा सारा खेळ सुरू आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 9 November 2019

युती की, महा'शिव'आघाडी....!

"महाराष्ट्राचं राजकारण एक वेगळं वळण घेतलंय. खऱ्या-खोट्याच्या वादात अमित शहांच्या साक्षीनं दिल्या गेलेल्या समसमान सत्ता आणि पदाच्या सत्याला असत्य ठरवलं गेलं. साहजिकच मतभेदात रूपांतर मनभेदात झालं. एकमेकांवरचा विश्वास उडाला आणि इगो जागृत झाला. इतरवेळी बंधुत्वाचं नातं सांगणाऱ्यामध्ये वितुष्ट निर्माण झालं! युती ही हिंदुत्वाची नव्हती तर ती सत्तेची होती हे पुन्हा सिद्ध झालं. दोघांचे मार्ग अलग झाले. भाजपेयींनी सत्तेचा दावा केलाय तर, शिवसेनेने पवारांच्या साथीनं मुख्यमंत्रीपदाची तयारी चालविलीय. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. हिंदुत्व वगळता इतर कोणत्याही धोरणाशी सुसंगत नसलेल्यांची युती टिकणं केवळ अशक्य होतं, ते आज घडतंय. खरं-खोटं, मानापमान, इगो, सत्ताकांक्षी मानसिकता दूर ठेवून युती होतेय की, राज्यात नवी 'महाशिवआघाडी' अस्तित्वात येतेय हे आगामी काळात दिसेल. पवार, शिवसेना आणि भाजपेयीं यांच्यातील परस्पर संबंधाचं केलेलं हे विश्लेषण!"
--------------------------------------------------------


*म* हाराष्ट्राचं राजकारण आगामी काळात कोणत्या दिशेनं जाणार आहे याचे काही संकेत मिळताहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचं वृत्त आहे त्यापूर्वी संजय राऊत यांनी मुंबईतल्या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतलीय. राज्यात भाजपेयींना सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेच्या प्रयत्नांना पवारांनी काँग्रेसलाही सोबत घेतलंय. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहता, भाजपेयींची सत्तासाथीदार असलेली शिवसेना ही आता पुन्हा भाजपेयींबरोबर जायला इच्छुक नसल्याचं दिसतंय. त्यामुळं आगामी काळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सख्य घडलं तर आश्चर्य वाटायला नको. शिवसेनेची तर प्राप्त परिस्थितीवर मात करण्यासाठी भाजपेयींची साथ सोडण्याची तयारी दिसतेय. पूर्वी भाजप हा शहरी पक्ष होता त्याला ग्रामीण भागात जाण्यासाठी शिवसेनेची साथ हवी होती. आज तशी स्थिती राहिलेली नाही. केंद्रात आणि राज्यात भाजपेयींची सत्ता आल्यानं सत्ताकारणातले सर्वच पक्षातले सटोडीये थेट भाजपात गेले अन त्यामुळं भाजपला ग्रामीण तोंडवळा आलाय. आता गरज संपली असल्यानं भाजपला शिवसेनेची साथ नकोशी झालीय. २०१४ला सत्ता स्थापनेच्यावेळी शिवसेनेनं विरोधीपक्षात बसण्याचा निर्णय घेतला होता. विरोधीपक्षनेतेपदही मिळविलं होतं. बहुमत सिद्ध करताना 'अदृश्य हाता'ची जी खेळी राष्ट्रवादीनं खेळली त्यानं भाजप खरं तर सत्ताधारी बनला. सत्ताधारी बनल्यानंतर ही युती टिकावी म्हणून केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि चंद्रकांतदादा पाटील यांनी 'मातोश्री' गाठली आणि शिवसेनेला सत्तासाथीदार बनविलं. तरीदेखील तांत्रिकदृष्टया अखेरपर्यंत शिवसेना विरोधीपक्षातच होती. काँग्रेस-राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्नात भाजपेयींनी शिवसेनेला वापरलं आणि झुलवत ठेवलं. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्तेतील या साथीदारांनी एकमेकांच्या अब्रूचे धिंडवडे काढले होते. त्यामुळे या दोघांच्यात पूर्वीसारखी मैत्री राहिलेली नाही. भाजपेयींशी युती न करण्याचा निर्णय जर शिवसेनेनं घेतला तर राष्ट्रवादीचा 'अदृश्य हात' पुन्हा भाजपच्या पाठीशी राहणार तर नाही ना? राष्ट्रवादीचा पूर्वानुभव लक्षात घेता अशी भीती शिवसेनेला वाटत असल्यानेच संजय राऊत यांनी पुन्हा पुन्हा शरद पवारांची भेट घेत :महाशिवआघाडी'चा खुट्टा हलवून बळकट केलाय. पवारांनी मात्र अद्याप प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या स्वभावानुसार 'ताकास तूर' लागू दिला नाही. काँग्रेसी नेत्यांनी हो नाही करत भाजपेयींना रोखण्यासाठी पवारांचं घर गाठलं!

*लोकनेत्यांना एकमेकाविरुद्ध झुंजवलं*
एकंदरीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही तसे राज्यस्तरावरचेच पक्ष आहेत. देशातल्या इतर राज्यात त्यांचं अस्तित्व फारसं नाहीच. तेव्हा महाराष्ट्रातला आपला गड मजबूत करण्याची गरज सध्यातरी दोघांनाही दिसतेय. तसं पाहिलं तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दोघेही महाराष्ट्राचे लोकनेतेच! आज शिवसेनाप्रमुख हयात नाहीत. पण महाराष्ट्राच्या राजकारणात दोघांचं जबरदस्त वजन होतं, चलनी नाणं होतं. चलनी नाण्यांच्या भाषेत बोलायचं झालं तर शिवसेनाप्रमुख हे 'काटा' काढून आपली 'छाप' पाडायचे तर शरद पवार आपली 'छाप' पाडून 'काटा' काढत! तसे दोघे सख्खे मित्र, ते त्यांनी कधी लपवलंही नाही. गिरणी कामगारांच्या आंदोलनाच्यावेळी दोघे मांडीला मांडी लावून बसले होते. त्यापूर्वी दोघांनी एकत्र येऊन एक साप्ताहिकही सुरू केलं होतं. पवार कन्या सुप्रिया सुळे जेव्हा राज्यसभेसाठी उभ्या राहिल्या तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी सुप्रिया ही माझीच मुलगी आहे असं म्हणत त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नाही. अशी त्यांची दोस्ती होती. याच नात्यानं उद्धव ठाकरे पवारांना भेटायला गेले असावेत. शिवसेनाप्रमुख आणि पवार यांच्या शब्दाला महाराष्ट्रात किंमत होती. या दोघांचा शब्द हा प्रमाण मानला जाई. महाराष्ट्रावर प्रभाव असणाऱ्या या दोघा मित्रांना मात्र भाजपेयींनी कुटील डाव खेळत एकमेकांच्या विरोधात अखेरपर्यंत त्यांना झुंजविलं होतं. महाराष्ट्रात अनेकवर्षे प्रयत्न करूनही स्वबळावर ग्रामीण भागात जाणं भाजपला जमत नव्हतं. याचा प्रत्यय येताच भाजपेयींनी शिवसेनेला पद्धतशीररित्या घेरलं. त्यासाठी संघ परिवारातले ग. वा. बेहेरे, विद्याधर गोखले, दि. वा गोखले अशा काही पत्रकार मंडळींना वापरलं. त्यानंतर 'महाजनी' साथीनं शिवसेनेच्या 'भगव्या'च्या कृपेनं महाराष्ट्राच्या सर्वदूर 'केशरी' भाजपेयी शिवसेनेचं बोट धरून शिरले. सर्वधर्मसमभाव, मानवी एकता-समता यासाठी हिंदू ऐक्य हे गणित मांडलं गेलं. महाराष्ट्राची सत्ता जिंकण्यासाठी सेना-भाजप उभी आहे आणि हे आव्हान परतवून लावण्याची हिंमत, ताकद फक्त शरद पवार यांच्यामध्येच आहे, याची पूर्ण कल्पना असल्यानंच भाजपेयींनी नाना मार्गानं शरद पवारांना बदनाम करण्याचा, त्यांची गुन्हेगारी राजकारणी अशी प्रतिमा जनमानसापुढं आणण्याचा पद्धतशीररीत्या प्रयत्न पूर्वी केला. त्यासाठी नोकरशाहीतल्या आपल्या काही पिलावळींना देखील वापरलं. त्याचबरोबर काँग्रेसमधल्या गटबाजीचाही त्यांनी चाणाक्षपणे वापर केला. सत्तेसाठीच सेनेशी भाजपेयींनी युती केली. उद्या आपल्याला बाजूला ठेऊन शिवसेना शरद पवारांबरोबर आघाडी करून सत्ता राबविल ही भीती तेव्हाही भाजपेयींच्या मनांत होती. तशी आजही आहे. यासाठी शिवसेनाप्रमुख यांच्या मनांत शरद पवारांबद्धल केवळ राजकीय विरोधच नव्हे तर द्वेष भरण्यातही भाजपेयी यशस्वी झाले. भाजपेयींनी या दोघा मित्रांना एकमेकांच्या समोरासमोर उभं करण्यात यश मिळवलं. या लढाईत कुणातरी एकाची सफाई होणार हे निश्चित होतं आणि अशी सफाई हीच भाजपची कमाई!  इकडे पवारांनी आपल्या मैत्रीपूर्ण राजकारणानं राज्यातली डावी चळवळ केव्हाच गलितगात्र करून टाकली होती. परंतु त्याचवेळी उजव्या विचाराच्या भाजपनं हिंदुत्वाचा अंगीकार करून बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वरूपात जबर आव्हान उभं केलं होतं. हे विसरता येणं शक्य नाही.

*मतभेदाचं रूपांतर मनभेदात झालंय*
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे मध्यममार्गी, प्रबोधनी विचारांची शिवसेना भाजपच्या दावणीला कशी बांधली गेली त्याचा हा इतिहास! आज बाळासाहेब हयात नाहीत, मात्र शिवसैनिकांनी त्याच हिंमतीनं, उद्धव ठाकरेंच्या साथीनं भाजपेयींना हिसका दाखवलाय. पन्नाशी पार केलेल्या शिवसेनेला आज कधी नव्हे ती राजकीय आधाराची गरज वाटू लागल्याचं सध्यातरी जाणवतंय. भाजपला ताकद देणाऱ्या शिवसेनेला भाजपवर विश्वास राहिला नसल्याचं सिद्ध झालंय; भाजपेयींनी ते आपल्या वागण्यानं दाखवूनही दिलंय. १९९९ मध्ये राज्यातली सेना-भाजपची सत्ता गेल्यानंतर औरंगाबाद महापालिका निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा 'शत प्रतिशत भाजप' असा नारा दिला होता. तेव्हापासून भाजपनं हा शिवसेनेच्या विरोधातला सवतासुभा उभा केलाय. त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या, अगदी अलीकडच्या मुंबईपासून सोलापूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, आशिष शेलार मंडळींनी पातळीसोडून शिवसेनेवर टीका तर केली होती. शिवाय 'शिवसेनेला गाडून टाका' असं जहरी वक्तव्य केल्यानं शिवसेना आणि शिवसैनिक त्वेषानं उभे ठाकले. राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी यावेळी शिवसेनेला खिंडीत गाठून कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. शिवसेनाप्रमुख यांच्याशिवाय होणारी ती निवडणूक होती. उद्धव, आदित्य, शिवसेनेतील परप्रकाशित नेते आणि शिवसैनिकांनी जिद्दीनं मुंबई, ठाणे महापालिका आपल्याकडं राखली, सोलापुरात आपली लक्षणीय वाढ केली. आज राणे भाजपच्या वळचणीला गेलेत, राज चाचपडतोय, काँग्रेस अद्यापि सावरलेली नाही. अशावेळी भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची साथ शिवसेनेनं घ्यायला हवीय. हा धूर्त विचार शिवसेनेनं करायला हवाय. कोकणातील माणसं ही शिवसेनेच्या मागे आहेत. तर देशावरची, घाटावरची माणसं राष्ट्रवादी बरोबर आहेत. हे खचितच उद्धव ठाकरे जाणत असतील. पवारांशी त्यांनी केलेली सलगी हे त्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल व्हावं!

*शिवसेनेला मूळ विचाराप्रत परतू शकेल*
ज्या प्रबोधनकारांनी शिवसेनेला जन्माला घातलं त्या प्रबोधनकारांचे उद्धव ठाकरे हे नातू आहेत. त्यांचा प्रबोधनी विचार शिवसेनेनं स्वीकारायला हरकत नाही. शिवसेनेची मानसिकता ही पूर्वी कधीच भाजपेयी नव्हती, ती मराठी अस्मितेचीच होती. त्यामुळेच शिवसेनेनं प्रारंभीच्या काळात प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. हा मूळ विचारच विसरल्यानं शिवसेनेची आजची संभ्रमावस्था निर्माण झालीय. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाण्यात शिवसेना मूळ विचाराप्रत परतू शकेल. मराठी अस्मिता अंगीकारता येईल. यानं नव्या वाटचालीचा प्रारंभ होईल. पण शिवसेनेतल्या काहींना हे मानवणारं नाही. त्यांचे सारे मतदारसंघ शहरी असल्यानं त्यांना भाजपचाच मेणा उचलायचाय पण भाजपेयींना आता असले भोई नकोसे झाले आहेत. असं असलं तरी शेवटी पक्षप्रमुखांना आणि शिवसैनिकांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. कालपर्यंत शरद पवारांचा 'नेणता राजा' असं म्हणत अवहेलना करणाऱ्यांना आज त्यांनाच 'जाणता राजा' म्हणावं लागणार की भाजपेयींची पेशवाई झुल आपल्या अंगाखांद्यावर मिरवाचीय हा त्यांच्यापुढचा महत्वाचा प्रश्न आहे.

*इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे*
आज जशी स्थिती झालीय अगदी तशीच परिस्थिती १९९९ मध्ये झाली होती. तेव्हा झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुणालाच बहुमत न मिळाल्यानं कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होत नव्हतं. त्या निवडणुकीत सेना-भाजपची युती होती पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी नव्हती  हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते, त्यापूर्वी पवारांनी सोनिया गांधींचा 'विदेशी' म्हणून तिरस्कार केल्यानं दोन्ही काँग्रेस एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी शक्यताच नव्हती. सत्तेचा पेचप्रसंग निर्माण झाला असताना तेव्हा उपमुख्यमंत्री असलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी सत्ता आपल्याकडेच राहावी यासाठी भाजप-सेनेनं राष्ट्रवादीशी समझौता करावा असा पर्याय मांडला होता. वेळ पडलीच तर शिवसेनेनं बाहेरून पाठींबा द्यावा असाही विचार होता. राष्ट्रवादीच्या साथीनं मुंडे यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. मुंडे यांची ही चाल ओळखून शिवसेनेनं हे सारे पर्याय धुडकावून लावले. पवारांना सोनियांच्या विरोधात उभं ठेवण्याचा भाजपचा प्रयत्न देखील शिवसेनेमुळे फसला. यामुळं एक झालं, पवार पुन्हा काँग्रेसच्या जवळ गेले, सत्ता हाती घेतली आणि केंद्रात सत्ताधारीही बनले ते केवळ आणि केवळ शिवसेनेमुळेच! हे ही इथं समजून घेतलं पाहिजे. या साऱ्या घडामोडी पवार जाणतात, शिवसेना राष्ट्रवादीबरोबर गेल्यास भाजपवर अंकुश राहू शकतो. ते काम शिवसेना आपल्या पद्धतीनं करेल हे जाणूनच पवारांनी आता शिवसेनेला सकारात्मक प्रतिसाद दाखवलाय. आता शिवसेना काय करते हे पाहावं लागेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आणि त्यांचे 'चाणक्य' संजय राऊत आणि शिवसैनिक यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. पण मराठी माणसाच्या मनांत जसं बाळासाहेब-शरद पवार यांनी एकत्र यावं असं वाटतं होतं तसंच आता बाळासाहेबांची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र यावं अशी मनिषा आहे हे मात्र निश्चित! पाहू या आगामी काळात काय घडतंय ते!

*तीन पायाच्या लंगडीच्या खेळात काय होणार!*
सध्यस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या निकालानं एक गोष्ट स्पष्ट झालीय. भाजपेयींना सत्तेत यायला शिवसेनेची गरज लागणार आहे. त्याउलट, शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाण्याचा पर्याय खुला झालाय. लोकसभा निवडणुकीपुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषेदेत समसमान सत्तावाटपाबाबत केलेली घोषणा फडणवीस यांनीच नाकारल्यामुळं शिवसेना खवळली. शिवसेनेतला एक गट, जो नेहमीच भाजपेयींच्या विरोधात होता, त्याला नेमकं बळ मिळालं. या गटात भाजपेयींबाबत प्रचंड कटुता असणारे राज्यसभेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत हे पण होते. फडणवीसांच्या वक्तव्यानंतर चाकं फिरू लागली, ती एक नवीन राजकीय आणि सामाजिक समीकरण घडवण्यासाठी; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी करण्याची. जर शिवसेनेनं राष्ट्रवादीला सोबत घेऊन काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं तर शिवसेनेला पुन्हा आपल्या मराठी माणसाची अस्मिता या विषयावर लक्ष केंद्रित करता येईल. या वाटेवर खाच-खळे जरूर आहेत; शिवसेनेनं लढवलेल्या १२४ जागांपैकी ५७ ठिकाणी थेट लढत ही पवारांच्या राष्ट्रवादीशी होती. त्यामुळे अशापद्धतीनं स्थापन होणारं सरकार किती काळ टिकेल याबाबत शंका देखील आहे, पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना एकच भीती आहे, ती म्हणजे भाजप परत निवडून आली तर त्यांचे आमदार फोडून आपले सभागृहातले स्थान भक्कम करेल. त्यामुळे शत्रूचा शत्रू हा आपला मित्र… या उक्तीला साजेशी तीन पायांच्या लंगडीचा खेळ सुरु झाला आहे. या अंकाचा शेवट काय होईल हे लवकरच कळेल…

चौकट............
*भाजपनं शिवसेनाच आपल्यात रुजवली!*
जनसंघाचा भाजप झालेल्या या पक्षाचं ज्या पक्षाशी युती करायची त्यालाच खाऊन त्याच्यासारखं व्हायचं, हे वैशिष्ट्य आजवर राहिलंय. पुराणातली गोष्ट आहे. ती भाकडकथा असली तरी बोधप्रत आहे. त्या कथेत एक प्राणी होता. तो ज्याला खायचा त्याच्यासारखा तसाच आकार धारण करायचा. मुळात हा प्राणी शेळपट, पण बुद्धीचातुर्यानं त्यानं आपलं सामर्थ्य वाढवलं. तो आपल्यापेक्षा ताकदवान प्राण्याला त्याच्यापेक्षा मोठ्या प्राण्याचं भय दाखवायचा. आपण एकत्र आलो तर त्याला गारद करू, अशी खात्री त्याच्यात निर्माण करायचा. दोघांची युती व्हायची. मग संधी मिळताच हा पुराणोक्त प्राणी दोस्तालाच गिळायचा आणि त्याच्यासारखा आकार धारण करायचा. असं करीत करीत शेळीचा वाघोबा झाला. भाजपला अजून वाघ व्हायचंय. पण अनेक विचारवादी पक्षांना काँग्रेसचं भय दाखवत, त्यांच्याशी दोस्ती करीत, त्यांचे गुण आपल्यात भिनवत भाजपनं आपली ताकद वाढवलीय. या शक्तीवर्धनासाठी भाजप गांधीवादी झाला. समाजवादी झाला. सर्व राजकीय पक्षांचे गुणावगुण आपल्यात भिनवून भाजप आज अंतरबाह्य काँग्रेसचं झालाय. शिवसेनेच्या दोस्तीनं भाजपनं महाराष्ट्रात आपली संघटनशक्ती वाढवलीय. त्यासाठी भाजपनं आपल्यात शिवसेना रुजवली. बाळासाहेबांच्या दराऱ्यामुळे भाजप डरकाळी फोडत नव्हता. पण त्यांच्या निधनानंतर भाजपनं आपलं खरं रूप दाखवलंच!
------------------
- हरीश केंची
९४२२३१०६०९

Friday 1 November 2019

हवंय विरोधकांचं 'शडो कॅबिनेट'...!


"लोकशाही आपण नुसतीच सवंग केलेली नाही, तर ती पुरेपूर अपंग करण्याचा पराक्रम आपण करून दाखवलाय. यात बदल घडवण्यासाठी आता काही करता आलं तर करण्याची जरुरी आहे. सत्तेवर कोणीही येवो, विरोधीपक्ष म्हणून बसण्याची वेळ ज्यांच्यावर येईल त्यांनी विरोधीपक्ष म्हणूनही आम्ही सत्ताधारी पक्षाएवढेच, किंबहुना त्याहून अधिक जबाबदार आहोत हे लोकांना पटेल एवढी लोकाभिमुख प्रभावी कर्तबगारी दाखवण्याची तयारी करावी. सरकार जे करू शकत नाही ते करून दाखविण्याची कुवत आपल्यात आहे, त्याची नुसती चुणूक जरी विरोधी पक्षानं दाखवली तरी लोक त्यांची कदर करतात, हे लोकांनी वेळोवेळी दाखवून दिलं आहे. खरा रिमोट कंट्रोल लोकांच्याच हाती असतो हे राजकारण्यांना का कळत नाही?"
-------------------------------------------------------------------

*रा* ज्यात सत्ताधाऱ्यांना अद्याप सत्ता स्थापन करता आलेली नाही. सत्तासुंदरीसाठी सुंदीपसुंदी सुरू आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाकडं जणू महाराष्ट्रातील मराठी समाजाचं भवितव्य गुंतलंय असं वाटावं, अशा उत्साहात जिकडे-तिकडे या प्रश्नांचा विचार झाला. प्रसिद्धीमाध्यमांनी तर यात कहरच केला. राज्यातल्या ओल्या दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांकडं पाहायला त्यांना वेळ नाही. सवंगतेत ते मश्गुल झाले होते. सरकार अस्तित्वात आलं नाही तर आभाळ कोसळेल की काय असाच जणू अविर्भाव त्यांचा या काळात होतोय. असो. राज्यात सत्तेवर येणाऱ्या या मुख्यमंत्र्याला रिमोट कंट्रोलनं नाचवण्याचं कुणी ठरवलंय, कुणी आवळ्या-भोपळ्याची मोट बांधून हे पद कुणाला मिळावं, कुणाला मिळू नये, याचा निर्णय घेण्याइतपत बळ संपादन करण्यासाठी जी काही मंडळी झटत आहेत; अर्थात एकमेकांना ते मात्र लोकांसमोर आलेलं नाही! मुख्यमंत्री अमुक झाला तरच महाराष्ट्रात रामराज्य अवतरेल असं मानण्याजोगी परिस्थिती खरोखरच आहे का? महाराष्ट्रामध्ये 'दगडापेक्षा वीट मऊ' या नात्यानं अथवा ओंडका राजा नको, आपल्याला खाऊन टाकणारा बगळा सुद्धा चालेल, असं मांडणाऱ्या बेडूक बुद्धीनं असो, लोक मुख्यमंत्रीपदी कोण असावेत हे ठरवतात. मुख्यमंत्रीपदावर बसलेला माणूस सारं काही ओढून नेण्याची कुवत असणारा असावा, असंही लोकांना वाटत असावं. महाराष्ट्रानं गेल्या पन्नास-साठ वर्षात डझनभर मुख्यमंत्री सोसले आहेत. अगदी शिवाजीराव निलंगेकर, बाबासाहेब भोसले सुद्धा काही काळ आपण चालवून घेतलं. 'पालापाचोळा' मंत्रिमंडळे आली आणि गेली. मंत्रिपदाची कुणी कुणी हौस फेडून घेतली, हीसुद्धा माहिती मराठी माणसाच्या विनोदप्रियतेची साक्ष देऊन जाईल. असो. पण महाराष्ट्राच्या विरोधीपक्षाचा नेता कोण असावा, महाराष्ट्राचा विरोधीपक्ष कसा असावा यावर आपण गंभीरपणे विचार करत नाही? निवडणुका लढताना आपलीच सत्ता येणार असा भ्रम डोक्यात शिरल्यानं दगडगोट्यानाही आपल्याशिवाय या मराठी जनतेचा कुणी वाली नाही असं वाटलं तर हरकत नाही; पण निवडणुका झाल्या, सगळ्या पक्षांच्या पाण्यातल्या म्हशी एकदाच्या बाहेर पडल्या, कुणाचं बळ किती यावर अंदाज करण्याची जरूरी उरली नाही. एकदा आमदार म्हणून विधानसभेत कोण बसणार हे नक्की झालं की, मग शांत चित्तानं पाच वर्षे सत्ताधारी पक्षाशी कसा संघर्ष द्यायचा याचा विचार करून हा संघर्ष अधिक प्रखर आणि नेमका करण्यासाठी आपल्या सगळ्यांचे नेतृत्व कोणाकडे असावं याचा सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येऊन विचार करायला काय हरकत आहे? विधानसभेत विरोधीपक्षांनी आपला एकच गट मानून सत्ताधारीपक्षाला समाजहिताच्या गोष्टी करण्यासाठी अंकुश ठेवून सतत योग्य मार्गावर ठेवण्यासाठी का झुंजू नये? विधानसभा निश्चित झाली, मग कशासाठी पुंजकेपुंजके करून विरोधी पक्षांनं आपलं वेगळे अस्तित्व जपायचं? निवडणुकीत वेगवेगळे झेंडे नाचविण्याचा प्रकार होतो त्यानं काय साधतं? विरोधीपक्षाचं नेतेपद ही मानाची जागा आहे, पण ती जागा प्राप्त होणार्‍याला मंत्र्याप्रमाणेच अनेक लाभ प्राप्त होतात ही गोष्ट खरी आहे. त्यामुळेच ह्या जागेवर त्यासाठी हक्क सांगणारेही असणारच. पण लोकांनी सोपवलेल्या जबाबदारीची जाणीव त्यांना असायला हवीय.

*विरोधकांनी कार्यपद्धतीचा फेरविचार करावा*
राज्यकारणात विरोधीपक्षालाही सत्ताधारी पक्षाएवढंच लोकशाहीतलं महत्त्व आहे. विरोधीपक्ष जेवढा समर्थ, जेवढा जागरूक आणि एकसंघ असेल, तेवढा त्याचा प्रभाव अधिक, त्याचा धाकही अधिक! म्हणूनच सत्ता ज्यांच्या हातात असते ते सदैव विरोधी पक्षात 'आपली माणसं' धुंडतात, शोधत असतात. त्यांना महत्त्व प्राप्त होईल असं राजकारण लढवतात आणि आपला मार्ग साफ करून घेतात. विरोधीपक्षाचा नेताच आपल्या पक्षात सामावून घेणारे सत्ताधारी आपण पाहतो. प्राप्त परिस्थितीत विरोधीपक्षाच्या कार्यपद्धतीचाही काही फेरविचार होण्याची जरुरी आहे. विरोधीपक्षातल्या मंडळींनी विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार किती वेळ टाकायचा. सभात्याग किती वेळा करायचा. यालाही काही मर्यादा असावी. सभात्याग करण्यात विरोधीपक्षाचंच नव्हे तर सत्ताधारी पक्षाचे सदस्यही एवढे तरबेज झाले आहेत की, विधानसभेत अनेक वेळा कामकाजासाठी आवश्यक तेवढी गणसंख्या फक्त असते. बहुतेक सारे सदस्य न जाहीर केलेला सभात्याग करून इतर कामं करायला सटकलेले असतात. विधिमंडळात हजेरीची नोंद झाली की, आपण मोकळे झालो ही जी भावना आमदारांमध्ये आहे ती त्यांनी बदलायला हवी. आमदारांना विधानसभेत हजर राहण्याचं बंधन त्यांच्या पक्षानंच घालायला हवं. रिकाम्या बाकांपुढं कामकाज चालविण्याचा प्रकार शक्य तेवढा कमी व्हायला हवा. विरोधीपक्षांच्या आमदारांनीच खरं तर या दृष्टीनं स्वतःला बदलायला हवं. आपल्या आमदारांना त्यासाठी योग्य प्रकारंचं मार्गदर्शन करण्याची काही व्यवस्था यासाठी पक्षांनीच करायला हवी. पत्रकार, विधानसभेच्या कामात कर्तृत्व दाखवणारे माजी आमदार, निवृत्त सरकारी अधिकारी, काही ज्येष्ठ पत्रकार यांच्याकडून आमदारांना याबद्दल मार्गदर्शन घडू शकतं. विविध राजकीय विचार आणि त्या विचारानुसार येणारं वेगळेपण असणारच पण विधानसभेच्या कामकाजात त्याची अडचण येण्याची शक्यता नाही. विरोधीपक्ष म्हणून जबाबदारीनं काम करून दाखवण्याचे प्रयत्न गेल्या कित्येक वर्षात झालेलंच नाही. विरोध करायचा म्हणजे विधिमंडळाच्या कामकाजावर बहिष्कार घालायचा, सभात्याग करायचा किंवा बोंबाबोंब करून कामकाज अशक्य करून टाकायचं. पूर्वी लाल निशाण गट नावाचा एक छोटा कम्युनिस्ट विचारसरणी मानणारा पक्ष ज्या जिद्दीनं विधानसभेत आपलं काम करायचा ती जिद्द आज काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं स्वीकारायला हवी होती. दुर्दैवानं विसर्जित विधानसभेत असं चित्र निर्माण करण्यात विरोधीपक्ष दिसलाच नाही. विरोधात राहण्याऐवजी सत्तेत सहभागी होण्याची त्यांची मनीषा काही लपून राहिली नाही.

*विरोधीपक्षानं 'शडो कॅबिनेट' राबवावं*
विधिमंडळात निश्चितपणे काही व्यक्ती अभ्यासू असतात. काही अत्यंत नेकीनं विधानसभेत वागतात. पण ज्यावेळी अशा वृत्तीचे आमदार एकत्र येतील तेव्हाच त्यांचा प्रभाव शतपटीनं वाढेल. 'शडो कॅबिनेट' म्हणजेच सावली मंत्रीमंडळ वा प्रति सरकार ही कल्पना विरोधीपक्षानं प्रत्यक्षात आणायला हरकत नाही. महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे ही गोष्ट करता येणे शक्य आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठांनी यात लक्ष घेतलं पाहिजे. कदाचित असा प्रयोग होऊन मुख्यमंत्री, अर्थमंत्री, सहकारमंत्री, कायदेमंत्री, गृहमंत्री अशी सावली मंत्रिमंडळाची पर्यायी योजना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकांकडे ठेवली तर पक्षातली होणारी फाटाफूट थांबेल, होणारी पक्षांतरही थांबू शकतील. नुसतं एका व्यक्तीला एक पद चिटकवलं की झालं सावली मंत्रिमंडळ-प्रति सरकार असा मात्र प्रकार होऊन चालणार नाही. ज्या व्यक्तीला जे पद मिळेल, त्यानं त्या खात्याचा कारभार जाणून घेऊन त्या खात्याबद्धल आपल्या ज्या कल्पना असतील त्याबद्दल तज्ञांचा, शासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन आपलं धोरण स्पष्ट करायला पाहिजे. सरकारचा जो मंत्री असेल त्या मंत्र्याच्या धोरणाला जरूर तेव्हा शह देऊन, जरूर तेव्हा दुरुस्त्या सुचवून, जरूर तेव्हा विरोध करून, आपलं व आपल्या पक्षाचं या विशिष्टखात्याबाबतचं धोरण कसं अधिक लोकहिताचं आहे, लोकाभिमुख आहे याची साक्ष लोकांपुढे ठेवायला हवी. या पर्यायी मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी पर्यायी राज्यमंत्री, एवढंच नव्हे आमदारांपैकी तीन-चार जणांची सहाय्यक तुकडी देण्याची व्यवस्था पक्षानं करायला हवी. सत्ता राबवण्यासाठी आम्हीसुद्धा तयार आहोत, हे अशा प्रकारे लोकमानसावर ठसवता आलं असतं. चांगले शासक होण्याची कुवत कुणात आहे याची परीक्षा यामधून घडली असती आणि मुख्य म्हणजे सत्ताधारी मंडळीना या सावली मंत्रिमंडळाचा वचक वाटला असता. मात्र विसर्जित विधानसभेत हे चित्र दिसलं नाही. बोबाबोंब करण्यात आणि दांडगाई करून कामकाज बंद पाडण्यात पटाईत असणारे आमदार विधानसभा सुरू झाली की दिसतात. विधानसभेत त्यांचा युक्तिवाद ऐकावा, भाषणं ऐकावित अशा आमदारांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी मागणाऱ्यांची झुंबड उडते. दोन शब्द नीट बोलता-लिहिता न येणारे आणि कुठलंही समाजकार्य न करणारे सुद्धा आमदार होण्यासाठी पुढे सरसावतात, याचं कारण या गोष्टीचंच भांडवल असणारे विधानसभेत दिसतात. लोकशाही नुसतीच आपण सवंग केलेली नाही, ती पुरेपूर अपंग करण्याचा पराक्रम आपण करून दाखवला आहे. यात बदल घडवण्यासाठी आता काही करता आलं तर काही करण्याची जरुरी आहे. सत्तेवर कोणीही येवो, विरोधी पक्ष म्हणून बसण्याची वेळ ज्यांच्यावर येईल त्यांनी विरोधी पक्ष म्हणूनही आम्ही सत्ताधारी पक्षाएवढेच किंबहुना अधिक जबाबदार आहोत हे लोकांना पटेल एवढी लोकाभिमुख प्रभावी कर्तबगारी दाखवण्याची तयारी करावी. सरकार जे करू शकत नाही ते करून दाखवू शकत नाही ते करून दाखविण्याची कुवत आपल्यात आहे त्याची नुसती चुणूक जरी विरोधी पक्षानं दाखवली तरी लोक कदर करतात, हे वेळोवेळी लोकांनी दाखवून दिलंय. खरा रिमोट कंट्रोल लोकांच्याच हाती असतो हे राजकारण्यांना का कळत नाही?

*मतदारांना गृहीत धरलं गेलं*
आताच्या या विधानसभा निवडणुकीत सगळ्याच पक्षांनी आपणच सरकार बनवू, सत्ताधारी होऊ असं म्हटलं होतं. तसं पाहिलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे चवली-पावलीचं झालंय. चार पक्ष आणि त्यांची युती-आघाडी यातच विभागलेल्या राजकारणात लोकांपुढं पर्याय राहिलेला नसतो. यावेळी 'नोटा'चा वापर मतदारांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं आढळून आलंय. युती-आघाडीच्या द्वंदात वेगळंपण जाणवलं ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं! पूर्वी ते 'माझ्या हाती सत्ता द्या, सगळ्यांना सुतासारखं सरळ करतो!' म्हणत. यंदा मात्र त्यांनी आपली क्षमता लक्षांत घेऊन आम्हाला सक्षम विरोधी पक्षासाठी मतं द्या असा प्रचार केला. हे सक्रीय आणि सत्तेच्या राज्यकारणासाठी नवं होतं. विरोधीपक्ष बनण्यासाठी मतं मागणं हेही अनोखं होतं. लोकसभा निवडणुकीत 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत सत्ताधाऱ्यांचं वस्त्रहरण केलं होतं. आता ते विरोधीपक्षासाठी मतं मागत होते, मात्र मतदारांनी पारंपरिक पद्धतीनं मतदान केलं, त्यामुळं सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करण्याची संधीही मतदारांनी त्यांना दिली नाही. परंतु राज्यात सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवणारा विरोधीपक्ष हवाय हे वास्तव आहे. शरद पवारांच्या महत्प्रयासानंतरही काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या आघाडीला विरोधकांत बसायला लागलंय. विसर्जित विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाचं काम हे विरोधीपक्ष म्हणून तेवढ्या क्षमतेनं झालं नाही. आज पुन्हा तीच जबाबदारी पार पाडण्याची संधी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे आलीय. ती त्यांनी क्षमतेनं पार पाडली आणि सत्ता राबविण्यासाठी आपणच कसे योग्य आहोत हे दाखवून दिलं तर सत्तेचा माज आलेल्यांचा तो माज उतरल्याशिवाय राहणार नाही. पूर्वीच्या काळात यथा राजा तथा प्रजा म्हटलं जाई पण आज यथा प्रजा तथा राजा अस म्हणण्याची वेळ आलीय. सत्ताधारी आपल्या सत्तेचा पुरेपूर वापर आणि गैरवापर करत असताना, चौखूर उधळत असताना त्यांना वेसण घालण्याची नैतिक आणि घटनात्मक जबाबदारी विरोधीपक्षाची आहे. ती त्यांनी कर्तव्यनिष्ठेनं पार पाडली पाहिजे, एवढीच जबाबदार मतदारांची अपेक्षा आहे!

चौकट..........
*सुमार कुवतीची माणसं कटीवर बसलीत*
विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. महाराष्ट्रानं कुणाला येत्या पाच वर्षासाठी आपले 'भाग्यविधाते' म्हणून निवडलं आहे हे स्पष्ट झालंय. पण खरोखरच महाराष्ट्राचे भाग्य या विधानसभेवर निवडून येणार्‍या २८८ लोकांच्या हातात आहे का? ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खरोखर महाराष्ट्राच्या कल्याणाच्या प्रश्नावर लक्ष दिलं जातं? निवडून गेलेले विधानसभेत किती वेळ असतात, काय बोलतात, कसं बोलतात याकडं कधी मराठी माणूस लक्ष देतो? आमदार म्हणून जे निवडून येतात ते करतात काय, याचा आढावा वर्षाच्या अखेरीस मतदार घेतात? काही आमदार आपल्या कामाचा हिशेब दरसाल आपल्या मतदारांना देतात ही गोष्ट खरी आहे. पण हा हिशोब सुद्धा द्यायची ही एक फॅशन झालीय, असा अनुभव अनेकांनी दिलेले हिशोब चाळल्यावर येतो. घडलेल्या कामाचं श्रेय उपटण्याचा आणि न झालेल्या गोष्टींची जबाबदारी झटकण्याचा प्रकार चतुराईनं या पत्रकात केलेला असतो आणि ह्या पत्रिका दिमाखदार छापून घेण्यासाठी त्यांना प्रायोजक देखील मिळालेले असतात. योजक आणि प्रायोजक मिळविण्याच्या खुब्या आत्मसात करणं हाही राजकीय हुशारीचा भाग आहे. अशा खुब्या हेरणारे हुशार महाराष्ट्रात खुप पसरलेत. मराठी भाषा, मराठी अर्थकारण, मराठी उद्योग, मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, मराठी पत्रकारिता या सर्व क्षेत्रातही मराठी राजकारणाप्रमाणेच यशस्वी होण्याच्या खुब्या गवसलेली सुमार कुवतीची माणसं कटीवर स्थापन झाली आहेत. ती गाजत आहेत, वाजत आहेत, पण महाराष्ट्राची मात्र सर्वच क्षेत्रात पिछेहाट होत आहे. शिखरापर्यंत पोहोचण्याचे दोनच मार्ग असतात, एक सरपटत सरपटत अडथळे टाळत वरपर्यंत जाण्याचा, दुसरा शिखराकडे झेपावून शिखरावर विराजमान होण्याचा. अशी झेप घेऊन शिखर गाठणाऱ्याची संख्या जेवढी अधिक तेवढा समाज जिवंत. तेवढे समाजात चैतन्य अधिक. कारंज्यात उडणारे पाण्याचे फवारे जसे सारखे वरवर जात असल्याचं भासतं, अशी उत्तुंग कर्तृत्वकडे झेपावणाऱ्या माणसांची कारंजी समाजात असावी लागतात. कारंजातला वर झेपणारा प्रत्येक थेंब काही क्षणातच खाली येत असतो, पण खालून वर उसळणारे दुसरे थेंब ह्या खाली येणाऱ्या थेंबाचे अस्तित्व जाणवूच देत नाहीत. ते त्याला वरचेवर झेलत ठेवतात. असा वर जाणाऱ्यांचा जोश खाली कोसळणाऱ्यांनाही सावरतो. निदान त्यांचे कोसळणे आपल्या पोटात सामावून टाकतो. अशी कारंजी आपोआप कुठे उसळतही असतील, पण ती घडवावी लागतात हेच खरं! हे घडवणारे असतात साहित्यिक-पत्रकार-विचारवंत-भाष्यकार-प्रत्यक्ष कृतीतून आदर्श घडवणारे कर्मवीर-महर्षी-महात्मे. महाराष्ट्र एककाळ अशा नररत्नांची खाण असल्यासारखा होता. आणि तो जेव्हा तसा होता तेव्हाच तो भारताचा आधार होता! थोडं मागं वळून बघितलं तर कितीतरी प्रेरणादायी माणसं आपल्याला दिसतात. सभोवताली असलेल्यात असे प्रेरणेची जितेजागतं उगमस्थानं मात्र दिसत नाहीत. याचं शल्य सर्वांनाच वाटलं पाहिजे!

हरीश केंची
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...