Monday 29 April 2019

राजकारणाचे तीन तेरा...!

"भारतासारख्या खंडप्राय देशातील लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा चौथा टप्पा उद्या पार पडतोय. या दरम्यान राजकीय पक्षांचा प्रचार हा एक देशाच्यादृष्टीने चिंतेचा विषय बनलाय. गेली अनेकवर्षं राजकारणातलं सौजन्य, साधनसुचिता, सहिष्णुता, आदरभाव संपुष्टात आल्याचं दिसून येतंय. राजकीयदृष्ट्या विरोधक असं त्याचं स्वरूप न राहता, विरोधक म्हणजे शत्रूच ही भावना वाढीला लागलीय. पक्षांची ध्येयधोरणे संपली. सगळ्याच पक्षांचं लक्ष्य हे सत्ता हेच झालंय. पक्षांची तत्व, ध्येय, धोरणं काही राहिलंच नाही, ज्यांच्यासाठी म्हणून मतं मागितली जावीत. मग नेत्यांच्या छबीचा वापर करून मतं मागितली जाताहेत. ती मतं मिळू नयेत म्हणून त्या नेत्याचं चारित्रहनन केलं जाऊ लागलं. त्याच्यावरच टीकाटिपण्णी केली जाऊ लागलं. अशांमुळे प्रचाराचा स्तर घसरला गेला. आतातर सोशल मीडियानं नुसता उच्छाद मांडलाय. हा घसरलेला प्रचाराचा स्तर चिंता करण्यासारखा झालाय. याची खंत कुण्या नेत्याला वाटत नाही हे देशाचं दुर्दैव आहे!"
--------------------------------------------------

*सो* लापुरातलं मतदान संपलं. प्रचाराचा धुरळा खाली बसलाय. मतदानात कुणाला किती दान पडलंय हे २३ मे ला समजेल. पण या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान जे काही झल्ट सोलापूरकरांचं मान खाली घालणारं ठरावं अशी स्थिती झाली होती. सौजन्य, साधनसुचिता, आदरभाव राहिला नसल्याचं चित्र निर्माण झालं होतं. प्रकाश आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांची अचानक आणि सहजपणे झालेल्या हॉटेलतल्या भेटीत या दोघांनी आपपरभाव दूर ठेवत एकमेकांचा सन्मान राखत वास्तपुस्त केली. साहजिकच काही उतावळ्या कार्यकर्त्यानं त्याचे फोटो वायलर केले. मग त्याबाबत उलटसुलट चर्चा, टीका, टिपण्णी, मतं, प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. त्या दोन्ही नेत्यांनी भेटीतलं सहजपण लक्षांत घेऊन या प्रतिक्रियांना प्रतिसाद दिला नाही. पण या प्रकारानं केवळ प्रचाराचाच नव्हे तर राजकारणाचा स्तर किती खालावलाय हे दिसून आलं. साधनशुचिता, सौजन्य हे शब्द तर राजकारणातून केव्हाच हद्दपार झालेत; पण निवडणुकीत प्रचार करताना भाषेचा दर्जा सांभाळण्याचीही गरज अलीकडे काही राजकीय नेत्यांना वाटेनाशी झालीय.

*लोकशाही मूल्यांचा अनादर केला जातोय*
प्रचार करताना आपल्या पक्षाची ध्येयधोरणे मतदारांना समजावून सांगण्याऐवजी अनेकदा धमक्या देण्याचे काम ही मंडळी करताना दिसताहेत. यात केवळ सत्ताधारी भाजपचीच नेतेमंडळी असं करताहेत असं नाही! काँग्रेसची मंडळीही त्यामध्ये मागे नाहीत. सर्वच पक्षांचे ज्येष्ठ नेतेही मतांसाठी लोकशाही मूल्यांना खुंटीवर टांगून ठेवत अश्लाघ्य वक्तव्ये करताना दिसतात, तेव्हा यापुढच्या काळात लोकशाहीचे काय होईल, हा प्रश्न डोकावल्याशिवाय राहत नाही. जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातली ही अवस्था फारशी चांगली राहिलेली नाही असं दुर्दैवानं म्हणावं लागतं. कधी एखादा मंत्री विरोधी पक्षाच्या नेत्याच्या प्रकृतीची वास्तपुस्त करण्यासाठी अनपेक्षितपणे रुग्णालयात पोहचते, तर कधी प्रचारासाठी निघालेले दोन उमेदवार अचानक समोरासमोर येतात अन् राजकीय विरोध बाजूला सारून अल्पोपहार, चहा घेत गप्पा मारतात!जसे सोलापुरात प्रकाश आंबेडकर, सुशीलकुमार शिंदे यांच्यात घडलं असे क्षण वाऱ्याच्या सुखद झुळकीसारखे सुखावून जातात; पण हल्लीच्या  राजकारणात असे क्षण खूप दुर्मीळ झाले आहेत. राजकीय विरोधक म्हणजे जणू काही शत्रू असल्यासारखं हल्लीचे राजकीय नेते वागू लागलेत. साधनशुचिता हा शब्द तर  राजकारणातून केव्हाच हद्दपार झाला होता; पण निवडणुकीत प्रचार करताना भाषेचा दर्जा देखील  सांभाळण्याची गरज अलीकडे राजकीय नेत्यांना वाटेनाशी झालीय.

*मतदानचा 'एबीसीडी' फार्म्युला!*
मतदाराला 'राजा' संबोधलं जातं; पण हल्ली मतदार केवळ नावापुरताच राजा उरलाय. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत तर उमेदवार चक्क मतदारांना धमकवित असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलंय. एखाद्या नवख्या उमेदवारानं असं केलं तर त्याकडं डोळेझाक करता येईलही; पण अनेक वर्षांपासून संसदेत प्रतिनिधीत्व करीत असलेले, जबाबदारीची पदे भुषविलेले ज्येष्ठ नेतेही मतांसाठी लोकशाही मूल्यांना खुंटीवर टांगून ठेवत अश्लाघ्य वक्तव्य करतात, तेव्हा लोकशाहीचे काय होईल, हा प्रश्न कोणत्याही सुज्ञ नागरिकाच्या मनात डोकावल्याशिवाय राहात नाही. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्यामागे खूप मोठा वारसा आहे, त्या भूतदयेसाठी ओळखल्या जातात. कोणत्याही मुक्या प्राण्याला थोडा जरी त्रास झाला तरी त्यांना अतीव दु:ख होतं; मात्र आपल्याला मतदान न केल्यास कामं घेऊन याल, तेव्हा मी लक्षात ठेवेन, असा धमकीवजा इशारा मुस्लिम मतदारांना देताना त्यांना काहीच वाटत नाही! त्यामुळे झालेल्या टीकेनंतर त्यांनी पक्षाच्या सोशल मीडिया सेलवर त्या वक्तव्याचं खापर फोडलं; पण स्वत: काही धडा घेतल्याचं दिसलं नाही. त्यानंतर काही दिवसातच त्यांनी ‘एबीसीडी फॉर्म्युला’ आणला. या ‘फॉर्म्युला’नुसार, मतदारसंघातील सर्व गावांची मनेका गांधींना मिळालेल्या मतांनुसार ‘ए’, ‘बी’, ‘सी’ आणि ‘डी’ अशी वर्गवारी करण्यात येईल आणि संबंधित गाव कोणत्या श्रेणीत मोडते हे बघून तिथं विकासकामं केली जातील! असं जाहीररीत्या सांगितलं. स्वत:ला पशू हक्क कार्यकर्ती, पर्यावरणवादी म्हणविणाऱ्या व्यक्तीनं लोकशाही मूल्यांचा एवढा अनादर करावा हे खचितच गैर आहे.

*पाप लागेल! अशी धमकी दिली गेली*
भारतीय जनता पक्षाचेच संन्यासी खासदार साक्षी महाराज यांनी तर त्यांना मतदान न करणाऱ्या मतदारांना चक्क पाप लागेल, अशी धमकीच देऊन टाकली! ‘‘एक संन्यासी तुमच्या दरवाजात आलाय. संन्यासी तुमच्या दरवाजात येतो, तुम्हाला भिक्षा मागतो आणि जर त्याला भिक्षा मिळाली नाही तर तो कुटुंबवत्सल व्यक्तीचं पुण्य घेऊन जातो आणि आपले पाप त्या व्यक्तीला देऊन जातो,’’ अशी मुक्ताफळं त्यांनी प्रचारादरम्यान उधळली. त्यानंतर हे आपलं म्हणणं नाही, तर शास्त्रांमध्येच तसं नमूद केलेलं आहे, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

*मतदान यंत्राचाही धमकीसाठी वापर*
भाजपचेच गुजरातमधील आमदार रमेश कटारा यांनी तर मतदारांना धाक दाखविण्यासाठी नवीनच शक्कल लढवली. एका प्रचारसभेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘‘मतदान यंत्रावरील कमळाचे चिन्ह असलेली कळच दाबा. यावेळी मोदीसाहेबांनी मतदान केंद्रांमध्ये कॅमेरे बसविले आहेत. कुणी भाजपला मत दिलं अन् कुणी काँग्रेसला मत दिलं, हे त्यांना तिथे बसल्या बसल्याच दिसणार आहे. जर तुमच्या मतदान केंद्रात भाजपला कमी मते पडली तर तुम्हाला कमी कामे दिली जातील. मोदीसाहेबांना तिथे बसल्या बसल्याच हे कळेल, की तुम्ही काही तरी चुकीचं केलं आहे. तुमच्या मतदार ओळखपत्रावर, आधारकार्डवर आणि शिधापत्रिकेवरही तुमचे छायाचित्र आहे, हे लक्षात ठेवा!’’ मतदारांना अशा धमक्या देण्याचे काम केवळ भाजपचीच नेतेमंडळी करीत आहेत असं नाही! काँग्रेसची मंडळीही त्यामध्ये मागे नाहीत. काँग्रेस सोडून इतर कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढील कळ दाबल्यास विजेचा धक्का लागेल, अशी अफलातून धमकी छत्तीसगढमधील एका मंत्र्याने मतदारांना दिलीय. ज्या मतदारसंघात मंत्री महोदय प्रचारासाठी गेले होते, त्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराचं नाव मतदान यंत्रात प्रथम क्रमांकावर आहे. त्याचा लाभ घेत मंत्री महोदयांनी मतदारांना असं सांगितलं, की पहिल्या क्रमांकाची कळ दाबल्यास तुम्हाला काहीही होणार नाही; मात्र दुसऱ्या, तिसऱ्या किंवा अन्य कोणत्या क्रमांकाची कळ दाबल्यास तुम्हाला विजेचा जोरदार धक्का लागेल. आम्ही मतदान यंत्रांमध्ये तशी व्यवस्थाच केलीय, असं हे मंत्री महोदय म्हणाले.

*क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी नेत्याचं अवमूल्यन*
जगातील सर्वात मोठी लोकशाही असा भारताचा जगभर उल्लेख केला जातो. तमाम भारतीयांना त्याचा सार्थ अभिमानही आहे; मात्र स्वातंत्र्य, समता आणि न्याय या लोकशाही मूल्यांप्रती आम्ही प्रामाणिक आहोत का? क्षुद्र राजकीय स्वार्थासाठी मतदारांना धमकावण्यापर्यंत मजल गाठणाऱ्या सर्वच पक्षाच्या नेत्यांना तरी त्या मूल्यांची चाड असल्यासारखे वाटत नाही. सरकारं येतील अन् जातील, नेते येतील अन् जातील; पण हा देश आणि देशाने स्वीकारलेली लोकशाही प्रणाली टिकली पाहिजे! त्यासाठी लोकशाहीच्या मूल्यांचे जतन कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे. राजकीय नेत्यांना ती समज नसेल तर सर्वसामान्य जनतेनं ते उत्तरदायित्व निभावलं पाहिजे आणि लोकशाहीचे सर्व लाभ उपटताना लोकशाही मूल्यांचाच अनादर करणाऱ्या तमाम नेत्यांना त्यांची लायकी अन् जागा दाखवून दिली पाहिजे!

*मतदारांवर उधळण लोकशाहीसाठी घातक*
आपल्या लोकशाहीचे भवितव्य काय? लोकांचे प्रतिनिधित्व करीत सत्तेवर येणारे जनप्रतिनिधी लोकांना फुकटात वस्तू देत मतदारांवर उधळण लोकशाहीसाठी घातक ठरणारं आहे याची जाणीव राजकीय नेत्यांना राहिलेली नाही. आपल्या लोकशाहीचं भवितव्य काय? लोकांचं प्रतिनिधित्व करीत सत्तेवर येणारे लोकप्रतिनिधी लोकांना फुकटात वस्तू देतच राहणार का? लोकांचा पैसा लोकांकडे परत जायलाच हवा. पण तो त्यांनी स्वत: कमावून मिळवायला नको का? काही जणांनी कमवायचं आणि काहींनी ती कमाई अमर्यादितपणे खर्च करायची, असं किती काळ चालू राहणार?
वस्तूंचं फुकटात वाटप करणं आपल्या अर्थकारणाला परवडेल का? फुकटात भोजन असा काही प्रकार नसतोच. त्या फुकटातल्या अन्नाचा भार कुणाला ना कुणाला सोसावा लागतच असतो. कोणतीही वस्तू जेव्हा फुकटात मिळत असते तेव्हा तिला काहीतरी मूल्य असतेच. सरकार लोकांना फुकटात वस्तू देते तेव्हा ती कुणाच्या तरी पैशानं विकत घेतलेली असते. कधी कधी तर ती वस्तू ज्या व्यक्तीला भेट म्हणून मिळते तिच्याकडूनच त्या वस्तूची किंमत वसूल केलेली असते. ही हातचलाखी म्हणायची की राजकीय चलाखी म्हणायची? निवडणुका आल्या की प्रत्येक राजकीय पक्ष मतदारांना या चलाखीनं भुलवीत असतो; पण हे कृत्य आपल्या लोकशाहीचा घात करणारं आहे, हे कुणीच लक्षात घेत नाही. आपली लोकशाही व्यवस्थासुद्धा हा प्रकार खपवून घेते! अनेक बाबी मतदारांना फुकट पुरवल्या जातात. यात कॉलेज शिक्षण, विनामूल्य आरोग्य व्यवस्था, कर्मचाऱ्यांना पगारी सुट्या, फुकटात घरं आणि गृहोपयोगी वस्तू, खात्यात पैसे जमा करणं यांचा समावेश असतो. वास्तविक वस्तू फुकटात केव्हा वाटायच्या असतात? जेव्हा त्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. मग सरकारजवळ सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत का? पैसा मिळवावा लागतो, तेव्हा कुठे तो देण्यासाठी उपलब्ध असतो. पण फुकटात वस्तू मिळत गेल्यानं समाजात आर्थिक विसंगती निर्माण होते. दर्जा खालावत गेल्यानं आपल्या लोकशाहीचा केव्हाही अंतर्गत विस्फोट होऊ शकतो.

आपले राजकारणी मतांचे भुकेलेले असतात. मतं मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. सत्ता मिळविण्यासाठी लोकांना वस्तू फुकटात दिल्याच पाहिजे, या हेतूनं ते अधिकाधिक फुकट देऊ लागतात. पण एडिनबर्ग विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक अलेक्झांडर टायलर यांनी फार पूर्वी १७८० मध्ये म्हटले होते की, ‘लोकशाही व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची असते. सरकारी तिजोरीतून फुकट वस्तू मिळतात तोपर्यंत लोक मतदान करतात आणि तोपर्यंतच लोकशाही व्यवस्था टिकून असते.’ पण अखेरीस सैल आर्थिक धोरणाने लोकशाही कोलमडून पडते आणि त्यानंतर येते ती हुकूमशाही असते!
प्राचीन काळी किंवा मध्ययुगीन काळातही प्रत्येक सत्ताधारी व्यक्ती मग ती मोगल वा ब्रिटिश असो, साधारण दोनशे वर्षे सत्तेत राहते आणि त्या काळात राष्ट्राने प्रगती केल्याचं दिसून येतं. ही प्रगती बंधनातून आध्यात्मिकतेकडे, अध्यात्मातून धाडसाकडे, धाडसाकडून स्वातंत्र्याकडे, स्वातंत्र्यातून मुबलकतेकडे, मुबलकतेतून समाधानाकडे, समाधानातून जडत्वाकडे, जडत्वातून पराधीनतेकडे आणि पराधीनतेतून पुन्हा बंधनाकडे, अशीच सुरू असते.

*लोकशाहीचं वळण सरंजामशाहीकडे*
ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका या प्रस्थापित लोकशाही राष्ट्रांप्रमाणेच भारताला देखील अभूतपूर्व असा आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. समाजातील विभाजनाला तोंड देणं राजकीय नेतृत्वाला शक्य होताना दिसत नाही. डिजिटल क्रांतीमुळे मूलभूत परिवर्तन घडून येत आहे. त्यामुळे अनेक परंपरागत व्यवसाय बंद पडलेत. तसेच राजकारणही त्यानं प्रभावित झालं आहे. त्यातून नव्या संकल्पना आणि संस्था उदयास येतील; पण आपल्या समाजात खोलवर होणाऱ्या विभाजनाकडे दुर्लक्ष करीत आपण कुणाला मतदान करायचं, यावरच अखंड चर्चा करीत असतो. समाजातील दुही मिटविण्याचं काम करणं नेत्यांना शक्य होईल का? आजच्या राजकारणाविषयी आणि समाजाविषयी लोकांच्या मनात संतापाची भावना नाही का? काहींना नॅशनल रजिस्टरबद्दल संताप आहे तर काहींना धर्म मध्यवर्ती भूमिका घेत आहे, याचा राग आहे. ब्रिटनमध्ये ब्रेक्झिटवरून संताप आहे, तर अमेरिकेत मेक्सिकोच्या भिंतीविषयी संताप आहे. अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनादेखील सामान्य लोकांच्या निषेधाचा सामना करावा लागत आहे. समाजात टोकाचं ध्रुवीकरण सुरू झाल्यानं लोकशाही राष्ट्रातील प्रचारात विखार जाणवू लागलाय. ब्रिटिशांनी सत्तर वर्षांपूर्वी हा देश सोडला, पण त्यांनी मागे सोडलेल्या लोकशाहीचं स्वरूप सरंजामशाही वळणाचं आहे, असं दिसून येतंय. त्यात आपल्या देशातील जात, धर्म आणि भाषिक विसंगतीची भर पडलीय. नेत्यांच्या सत्तेविषयीच्या लालसेमुळे त्यांना एकदम यश हवं असतं. त्यामुळे ते लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. डिजिटल क्रांतीमुळे विनाशाकडे जाण्याचा वेग वाढलाय. त्यासाठी फेक न्यूज, फेक अकाउंट्स, द्वेषमूलक भाषणं, बदनामीकारक प्रचार मोहिमा राबवून लोकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा कलुषित वातावरणात लोकशाही तग धरू शकेल का? आपली लोकशाही ही आजवर सर्वात चांगली संकल्पना होती. तिने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी खासगी क्षेत्रावरच अवलंबून राहायला हवं. त्यातूनच रोजगार निर्मिती आणि समृद्धी साध्य होऊ शकेल. फेसबुक आणि ट्विटरमध्ये साठवून ठेवलेल्या माहितीचा उपयोग सामाजिक हेतूनं व्हायला हवा, तसा तो झाला असता तर लोकांना फुकट वस्तूंचे प्रलोभन दाखविण्याची गरजच पडली नसती!

आजची भारतातल्या लोकशाहीची स्थिती चिंता करावी अशी झालीय. त्याचे संरक्षक असलेले राजकीय पक्ष आणि राजकीय नेते हेच भक्षक झाले आहेत. 'सत्तेसाठी काहीही' एवढंच ध्येय राहिल्यानं सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्यात. नीती-अनीती, चांगलं-वाईट असं काहीच वाटेनासं झालंय. देशातल्या या स्थितीची चिंता वाटते!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

प्रचाराचं नवं तंत्र-मंत्र!

वीस वर्षांपूर्वी निवडणुकांच्या काळात छापलेल्या पत्रिका, पोस्टर्स, लाऊडस्पीकर आणि सभा हीच काय ती प्रचाराची साधनं होती. झेंडा आणि पोस्टर्स लावलेल्या टांगा, रिक्षा, मोटारी फिरायच्या आणि त्यातून मतं देण्याबाबत आवाहन केलं जाई. जोरदार घोषणाबाजी होत असे. अगदी लहान मुलांच्या प्रचारफेऱ्याही निघत. सध्या ही दृश्य बदलली आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी ६ इंचाचा मोबाईल सक्रिय झालाय! प्रामुख्यानं गेल्या दशकापासून 'सोशल मीडिया' हा निवडणूक प्रचाराचं रक सशक्त माध्यम बनलं आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे ज्यात सोशल मीडियाचं जाळं असतं. शहरी असो वा ग्रामीण सगळीकडं सोशल मीडियाचं सगळ्यात साधं, सोपं, शक्तिशाली  आणि परिणामकारक माध्यम राहिलं आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही नेत्याला आणि पक्षाला प्रत्येक मतदारांशी संपर्क साधणं हे अवघडच नाही तर केवळ अशक्य आहे, पण हे काम सोशल मीडियानं सरळ, सोपं करून टाकलंय. आताच्या या लोकसभा निवडणुकीत हेच साधन महत्वाचं ठरतंय!"
-----------------------------------------------

येऊन, येऊन येणार कोण......!
कौन आवे भाई कौन आवे......!
या आणि अशा घोषणा या आता जवळपास कालबाह्य झाल्यात, भिंती रंगवून, रिक्षा-टांगा फिरवून,लहान मुलांच्या फेऱ्या काढून केला जाणारा प्रचार आजकाल दिसेनासा झालाय. मतदारांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून थेट त्याच्याशी संपर्क साधला जातोय. या मोबाईलमध्ये असलेल्या 'सोशल मीडिया' हा मतदारांच्या मनापर्यंत जाणारा साधा, सोपा, सहज आणि सरळ मार्ग बनलाय. गेल्या दशकापासून 'सायबर वॉर' नांवाचा शब्द निवडणुकांच्या काळात ऐकायला येतोय. सायबर वॉर म्हणजे उमेदवाराच्या प्रचारासाठी आरंभलेलं ऑनलाईन युद्ध! भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील होणाऱ्या निवडणूकीतील सायबर वॉर सध्या चरमसीमेवर पोहोचलाय. नेत्यांच्या सभा आणि प्रचार यंत्रणेबरोबरच त्याला समांतर असा सोशल मीडियावर निवडणूक प्रचार सुरू झालाय. आरोप, प्रत्यारोप, एकमेकांवर प्रहार करणारे आडियो-व्हिडिओ, खऱ्या-खोट्या बातम्या, या सगळ्याचा मारा सोशल मीडियावर निवडणुकांच्या काळात सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या सायबर वॉरसाठी 'आय टी सेल'ची स्थापना करून स्वतःची वॉर रुम उभी केलीय. ज्यात आयटी क्षेत्रातील तज्ञांच्या टीमसोबतच इतरही काहीजण सहभागी झालेत. ते पक्ष आसनी उमेदवारांचे फोटो, कार्टून्स, ग्राफिक्सच्या माध्यमातून पक्ष आणि संबंधित नेत्याचा राजकीय माहोल मतदारांनी मतदान करावं यासाठी उभं करण्याचा प्रयत्न करीत असतात.

*लाव रे तो व्हिडीओ....! नवं प्रचार तंत्र*
सोशल मीडियाचा वापर वाढत असतानाच नव्या तंत्रज्ञाचाही वापर वाढलाय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांनी यंदा निवडणूक प्रचारात दृक्श्राव्य माध्यमाचा वापर करीत धुमाकूळ घातलाय. नेत्यांची दूरचित्रवाणी वरच्या वाहिन्यातील बातम्या, भाषणं वक्तव्य, मुलाखती याचा वापर करीत या नेत्यांची पोलखोल करताहेत. याला आधार आहे तो नव्या विज्ञानाचा, इंटरनेटचा आणि सोशल मीडियाचा! तो किती आणि कसा प्रभावशाली आहे हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळंच पारंपरिक प्रचाराची साधनं टाळून नव्या साधनांचा वापर वाढलाय, अर्थात सोशल मीडियाचा!

*तरुणांची मानसिकता निर्णायक ठरतेय!*
या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या खूप मोठी आहे आणि या तरुण मतदारांच्या संख्येपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या माहितीचा प्राथमिक स्रोत असतो. भारतीय जनता पार्टीनं खासकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या याच तरुणांना लक्ष्य बनवलेलं आहे. अशा तरुण मतदारांची संख्या जवळपास ८ कोटीहून अधिक आहे तर काँग्रेसपक्षानं दुसऱ्यांदा मतदान करणाऱ्या सक्षम आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनलेल्या युवकांना लक्ष बनवलेलं आहे, अशांची संख्या जवळपास ११.६ कोटी एवढी आहे. या तरुणांना टीव्ही पाहण्यात फारसा रस नसतो पण ते मोबाईलवर व्हिडिओ पाहतात, युट्युब चॅनेलवर जातात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत पण ऑनलाइन बातम्या आणि जी काही माहिती मिळते ना तीच माहिती त्याच्यासाठी बातम्या असते. सध्या या तरुणांनी बातम्या मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. ऑनलाईन वृत्तपत्रे वाचली जाताहेत.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मोहन पै यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया या निवडणुकीत चार ते पाच टक्के मतं बदलू शकतात आणि याचा परिणाम निवडणुकीचा निकाल फिरवण्यात सक्षम, परिणामकारक ठरू शकतो. तर निवृत्त टेलिकॉम सेक्रेटरी चंद्रशेखर यांच्या म्हणण्याप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत संपूर्णपणे नवी टेक्नॉलॉजी विकसित झालीय आणि ती या प्रचारामध्ये केंद्रित बनलीय. ज्याचा प्रचारापासून निवडणुकीतील मतदानापर्यंत ह्या साऱ्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेले आहेत. या बदललेल्या परिस्थितीत तरुणांची मते ही निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

*स्मार्टफोन आणि इंटरनेटचा पसारा*
देशात२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुक काळात सर्वप्रथम स्मार्टफोन वापरण्यात आले. अशाप्रकारचे स्मार्टफोनची असलेल्यांची संख्या त्यावेळी जवळपास १२.३ कोटी होती आणि त्यापैकी २५.२ टक्के लोक इंटरनेटचा वापर करत होती. आता २०१९ च्या या निवडणूक काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून ती जवळपास २७.९ कोटीवर गेली आहे तर ५६ कोटी लोक इंटरनेटसोबत जोडले गेले आहेत. ज्यांच्याजवळ स्मार्टफोन आहे असे ९५ टक्के लोक इंटरनेट आणि सोशल मीडिया याचा ते सहजपणे वापर करत आहेत, असं एका पाहणीत आढळून आलंय. देशात आज ९० कोटी मतदार आहेत. यातील ५९ टक्क्यांहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करताहेत. तेव्हा राजकीय पक्षांसाठी सोशल मीडिया हा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांकडे पोहोचणं आवश्यक ठरला आहे. यामुळे यावेळी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला जातोय. खासकरून तरुणांचा सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालविला जातो आहे, हे लक्षांत घेऊन राजकीय पक्षांनी त्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यातही पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या फार मोठी आहे. त्यांना भाजपेयींनी लक्ष्य केलं आहे. पण हे सांगणं कठीण आहे की सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किती लोकांवर या प्रचाराचा नेमका हवा तो परिणाम होतोय की, नाही. पण यात शंका नाही की त्यापैकी अमुक एक टक्के मत ही नक्कीच सोशल मीडियानं फिरू शकतात, हे निश्चित!

*फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर*
भारत सोशल मीडिया कंपन्यांसाठी एक सर्वात मोठी बाजारपेठ बनलीय, व्यासपीठ आणि प्रचारासाठीचं एक मोठं असं प्लॅटफॉर्म तयार झालाय. देशातील जवळपास ३० कोटीहून अधिक लोक सोशल मीडिया म्हणून फेसबुकचा वापर करतात. म्हणजे ९० कोटी मतदारांपैकी जवळपास तीस टक्क्यांहून अधिक मतदार फेसबुकचा वापर करतात. ही लक्षणीय संख्या पाहता, हे माध्यम राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, सहाय्यकारी आणि आवश्यक सिद्ध झालं आहे. हे ते राजकीय पक्ष जाणून आहेत. गेल्या काही दिवसांपासून फेसबूक हेच प्रचाराचे माध्यम म्हणून समोर आलं आहे. फेसबुकवर दिली जाणारी थेट प्रक्षेपणाची सुविधा ही नेत्यांच्या सभा आणि मुलाखतीसाठी अत्यंत श्रेयस्कर ठरतेय. राजकीय पक्षांना ते थेट लोकांपर्यंत प्रसारण करून पोचवता येणं सहजशक्य बनलं आहे. तर दुसरीकडं असं म्हटलं गेलं आहे की, २०१९ ची ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने 'व्हाट्सअप इलेक्शन' बनलीय! त्यामुळे व्हाट्सअप वापरणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक बनली आहे.भारतातील २० कोटीहून अधिक लोक केवळ व्हाट्सअप चा वापर करताहेत. ब्राझीलची निवडणूक झाल्यानंतर थोड्या दिवसातच तिथली विधानसभेचीही निवडणूक झाली त्यावेळीही व्हाट्सअपनं तिथं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलीय. त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की व्हाट्सअपवर खूप सहजपणे हवी ती खरी, खोटी माहिती वा अफवा पसरवून मोठ्या प्रमाणात लोकांना दिशाभूल करण्यासाठी वापरू येऊ शकतं हे सिद्ध झालंय. गेल्यावर्षी भारतात ज्या 'मोब लिंचींग' च्या घटना घडल्या त्यात फेसबुकचा वापर हे एक मोठं उदाहरण आहे. देशात अनेक ठिकाणी ज्या दंगली झाल्यात त्या भडकण्यात याच सोशल मीडियाचा वापर झालाय. हे स्पष्ट झाल्यानं अशावेळी इंटरनेटची सेवा बंद केली जाते. सोशल मीडियावरील फेसबुक व्यतिरिक्त ट्विटर संदर्भात बोलावं तर भारतात केवळ ३ कोटी लोकच ट्विटरचा वापर करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांची पक्ष कार्यालये ही ट्विटर वर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत.  २०१४ मध्ये भाजपेयींना आणि नरेंद्र मोदी यांना सोशल मीडिया कशाप्रकारे फायदेशीर ठरलंय हे त्यांनी भारतातल्या इतर राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना दाखवून दिलंय. हे पाहून २०१५ मध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधीं हेही ट्विटर वर दाखल झालेत. त्यानंतर सगळ्याच नेत्यांनी आणि पक्षांनी ट्विटरवर सक्रिय होऊन यात सहभागी होण्यात धन्यता मानलीय. नव्यानं राजकारणात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी फेब्रुवारीत ट्विटर जॉईन केलं. मात्र २४ तासाच्या आत १ लाख ६० हजार फॉलोवर्स त्यांनी मिळवलेत. पण केवळ नेते व पक्ष नाही ही तर आता सरकारचे सगळीच खाती आणि त्याचे खातेप्रमुख आणि विभागप्रमुख हे ट्विटरवर येऊन दाखल झालेले आहेत. ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सहजपणे ते जोडले जाऊ शकतात. आणि लोकांनाही स्वतःची स्वतःचं म्हणणं वा तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतात.

*८७ हजार व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार होतोय*
सध्या देशामध्ये ८७ हजाराहून अधिक व्हाट्सअप ग्रुप आहेत. त्यातून प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा प्रचार केला जातो आहे. या ग्रुप मधून कोट्यावधी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधीपासूनच सुनियोजितरित्या विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेली सामग्रीही म्हणजेच पोस्ट लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. नेते, पक्ष प्रत्येक मतदारांचा त्यांचा पूर्वीचं राजकीय मत आणि कल बदलण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. व्हाट्सअप हे एक असे माध्यम आहे यातून खोटी माहिती आणि खोट्या बातम्या सहजपणे सर्वत्र पसरविल्या जाऊ शकतात. लोक कोणत्याही राजकीय पक्षाशी, मतांशी संबंधित असतील तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही मेसेज आला तर ते ताबडतोब इतरत्र फॉरवर्ड करतात. जी माहिती आपल्याला आलेली आहे फेसबुकवरून पोस्ट आपल्याकडे पोहोचली आहे, त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जात नाही चौकशी केली जात नाही की, त्याचा शहानिशा केला जात नाही. त्यामुळे अशा लोकांच्यामध्ये खोट्या माहितीच्या आधारे आपली विचारधारा उभी करण्याचा राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. काही प्रमाणात तो सफल ही झालेला दिसून येतोय.

*सोशल मीडियासाठी मोठा खर्च केला जातोय*
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार निवडणूक लढविणारे राजकीय पक्ष सोशल मीडियासाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत २०१९ साठी १५० टक्क्याहून अधिक खर्च करताना दिसताहेत. कित्येक जाहिरात तज्ञांच्या दृष्टिकोनातून असे दिसून आलंय की फक्त सोशल मीडियावर जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत यात सर्वाधिक भागीदारी फेसबुकची आहे. १० हजार कोटी रुपये फेसबूक तर  केवळ २ हजार कोटी अन्य सोशल मीडियासाठी वापरले गेलेत. दुसऱ्या एका संशोधन अहवालानुसार भाजप फेसबुकवर असलेल्या त्यांच्या प्रत्येक पेजमागे दोन आठवड्यात २.५ कोटी रुपये खर्च करते. फेसबुकवर सर्वाधिक पेज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालवण्यात येतात. भाजपच्या जवळपास २० हून अधिक अधिकृत फेसबुक पेजेस सुरू आहेत. भाजपनं प्रत्येक बुथनिहाय 'सोशल कॉर्डिनेटर' ची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे असं लक्षात येईल की ही मंडळी मोठ्या प्रमाणात केवळ सोशल मीडियाचा वापर पक्षाचा प्रचार करण्यासाठीच करताना दिसतात.

*इतर देशातही सोशल मीडियाची डोकेदुखी*
२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीनंतर सोशल मीडियावर सतत निवडणुकीसंदर्भात स्वतःच्या भूमिका व्यक्त केल्या गेल्या. त्याबाबत संबंधितांना तपास आणि त्यावरील आक्षेप याला सामोरे जावे लागलंय. खासकरून फेसबुकवर डेटा चोरीचा गंभीर आरोप लावलेला आहे. रशियन अकाउंट्‍स फेसबुकवरून मदतीच्या नावाखाली म्हणून खूप मोठ्याप्रमाणात मतदारांवर नजर ठेवून त्यांचा डेटा आणि माहिती मिळवली गेलीय. आता असं समोर आलंय की, गेल्या वर्षी मेक्सिको आणि ब्राझील तर यावर्षी नायजेरियातील निवडणुकांमध्ये देखील असाच डेटा चोरीचा आक्षेप नोंदवला गेलाय. या सगळ्या निवडणूकामध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या संख्या पाहता तर हा सगळा प्रकार भारतीयांच्या दृष्टिकोन अत्यंत गंभीर ठरलेला आहे, त्यांची माहितीचा गैरवापर होण्याची शक्यता ती मंडळी व्यक्त करताना दिसतात.

चौकट......
 *असे आहेत सोशल मीडिया स्टार*
२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे सोशल मीडियाचं यश आहे. हे लक्षात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्याचा आधार सध्या घेतलेला दिसतोय. त्यासाठी खास माणसं नेमली आहेत. राजकीय नेत्यांचे सोशल मीडियावर किती फालोअर आहेत हे जरा पाहू या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक अकौंटवर ४.३५ कोटी, तर ट्विटरवर ४.६६ कोटी फालोअर आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या फेसबुकवर १.४३ कोटी तर ट्विटरवर १.३० कोटी, आपचे अरविंद केजरीवाल यांच्या फेसबुकवर ७१ लाख तर ट्विटरवर १.४७ कोटी, भाजपचे  राजनाथ सिंग यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर १.२६ कोटी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर ९३ लाख, भाजपचे योगी आदित्यनाथ ५६ लाख तर ट्विटरवर ३७ लाख, भाजपच्या स्मृती इराणी फेसबुकवर ५१ लाख तर ट्विटरवर ८९ लाख, भाजपच्या सुषमा स्वराज फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर १.२४ कोटी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर ३२ लाख, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी फेसबुकवर २५ लाख ट्विटरवर ४९ लाख, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी फेसबुकवर २४ लाख ट्विटरवर ९० लाख, तेलुगु देशम चंद्रबाबू नायडू फेसबुकवर १८ लाख ट्विटरवर ४१ लाख, भाजपच्या नितीन गडकरी फेसबुकवर १२ लाख ट्विटरवर ४७ लाख, काँग्रेसच्या शशी थरूर फेसबुकवर ११ लाख ट्विटरवर ६८ लाख, काँग्रेसच्या प्रियांका गांधी फेसबुकवर ४.८ लाख ट्विटरवर ३.२१ लाख अशी या नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या आहे इतर राजकीय नेत्यांनी मात्र विशेष दखलपात्र असे जाणवत नाहीत. 

*हरीश केंची*
९४२२३१०६०९

Saturday 20 April 2019

लोकशाहीतली रणदुन्दूभी...!


"भारतीय लोकशाहीची अवस्था महाभारतातल्या द्रौपदीसारखी झाली आहे. द्रौपदी पांडवांच्या ताब्यात असताना तिला जुगाराला लावलं गेलं, तर कौरवांच्या कब्जात जाताना तिचं वस्त्रहरण झालं. द्रौपदीच्या अब्रू रक्षणासाठी भगवान कृष्ण तरी धावून आला; भारतीय लोकशाही मात्र द्रौपदी एवढी भाग्यवान नाही. गेल्या दहा-बारा वर्षांत भारतीय राजकारणात बरीच उलथापालथ झाली आहे. त्याचे परिणाम खेड्यांपर्यंत उमटले जवळपास सर्वच राजकीय पक्षांना सत्ताधारी होण्याचा लाभ मिळाला, परंतु सर्वच पक्षांच्या शासनाचा व्यवहार हा दुर्व्यवहारासारखा झाला आहे. भारतीय राजकारणाची ही अवस्था भयानक आहे. आणखी बदल झाल्याने त्यात काहीही बदल होणार नाही. कारण सरकार बनवणाऱ्या आणि सरकारात जाणाऱ्या कुठल्याच पक्षाला, नेत्याला आपलं सत्त्व, तत्व विकल्याशिवाय, संपवल्याशिवाय सत्ताधारी होता येत नाही. स्वार्थासाठी नसलेल्या लोकशाहीचे हे फळ आहे!"
-------------------------------------------------

*प्र* त्येक राज्यव्यवस्थेत दोष असतातच परंतु त्यातील दोषांचा फायदा उठवण्याचा मोह टाळून ते दोष दूर करण्याचा प्रामाणिकपणा त्या व्यवस्थेचा लाभ घेणाऱ्यात असायला पाहिजे. आज तो कुठल्याही राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये नाही. असा प्रामाणिकपणा राजकारणात आणण्यासाठी भ्रष्ट खेळात असलेल्यांनी त्या भ्रष्ट खेळाकडे हताशपणे पाहण्याऐवजी लोकशाही निर्दोष करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे! भ्रष्टाचार, घोटाळे आणि राजकीय अस्थिरता यामुळे देश आज नेतृत्वहीन बनतो आहे. शासक म्हणून प्रशासनावर कोणाची जरब नाही की, नेत्यांच्या मनात, जनतेच्या मनात कुण्या नेत्याबद्दल आस्था नाही. भारतात आकाशात अग्निबाण उडवले आणि पाताळात अनुबॉम्ब फोडले तरी, भारतीयांत क्रांतिकारी चैतन्य उसळलेलं नाही. सरकार ठप्प, जनता गप्प आणि भ्रष्टाचाराचा हैदोस अशी विचित्र अवस्था भारतात आहे. ही दुस्थिती लोकांनीच हिमतीने बदलली पाहिजे. सत्तास्वार्थात सरकारं पडली तरी राष्ट्र जगलं पाहिजे ही भारतभूमीची हाक आहे. सर्वांच्याच अडाणी झोपण्यामुळं बिछान्याचा नाश झालाय. सत्यानाश टाळण्यासाठी तरी जागे होऊ या, कृष्ण बनून लोकशाहीचं, राष्ट्राचे रक्षण करू या!

*राज्यकारणासाठी सज्ज झालं पाहिजे*
लोकशाहीत देश घडविण्याचे काम सर्वांचं आहे. पण काही राजकारणी तो ठेका आपलाच असल्याचा आव आणत असतात. परंतु सत्तेच्या साठमारीत ते देश बिघडवण्याचे काम अगदी बिनधास्तपणे करत असतात. तर स्वतःला सुज्ञ, सुसंस्कृत म्हणवणारे मात्र बसल्या जागी त्यावर 'कसं होणार देशाचं'ची जपमाळ ओढत तावातावानं चर्चा करीत असतात. याउलट चित्र कृतीतुन पाहायला मिळतं. देश विकासाच्या नाड्या आपल्या हाती घेत नाहीत. त्यामुळे राष्ट्र बिघडवणाऱ्याचं फावतं.  हे जे चाललंय ते चुकीचं आहे, असं त्याला वाटतं, त्यानं प्रकाशामागे धावण्याऐवजी आता स्वतःच पेटलं पाहिजे. त्यानं किमान स्वतःभोवतीचा अंध:कार तरी दूर होईल. असे प्रकाश देणारे दिवे आजही आहेत म्हणूनच भारत राष्ट्र म्हणून उरला आहे. परंतु त्यांनी आता आपला प्रकाश उघड्यावर येऊन पाडला पाहिजे. चांगल्या लोकांनी भूमिगत राहून राष्ट्रकार्य करायचं आणि चोरांनी 'थोर'पणाची लेबलं लावून देशाला लुटायचं, लोकशाहीचे वस्त्रहरण करायचं, हा न्याय नाही. हा देखील देशाशी एका प्रकारे केलेल्या विश्वासघातच आहे. दुष्ट नष्ट करायचे तर सुष्टांनीही स्वतःला बदललं पाहिजे. राजकारणाच्या नव्हे तर राज्यकारणासाठी सज्ज झालं पाहिजे!

*भाजपा-कॉंग्रेस यांचं मायाजाल*
आज कालबाह्य झालेल्या चौकटी वापरून भाजपेयीं आणि काँग्रेस हे दोघेही सारखेच आहेत अशी भूमिका घेतळी जात आहे. हे वरकरणी मोठ्या निःपक्षपातीपणाचं वाटलं तरी, प्रत्यक्षात त्यात राजकीय विश्लेषणाची वानवा तर दिसतेच पण लोकशाहीला वेढणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याचा साहसवाद सुद्धा डोकावत असतो. भारतातल्या राजकीय पक्षाचं मूल्यमापन कसं करायचं आणि त्यांची वर्गवारी कशी करायची हा राजकीय अभ्यासक, निरीक्षक, पत्रकार, अशा सगळ्यांना नेहेमीच भेडसावणारा मुद्दा राहिला आहे. खास करून पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी वगैरे लोकांना हा प्रश्न नेहेमीच अवघड वाटत आला आहे. निवडणुका आल्यावर तो मुद्दा आणखीनच ऐरणीवर येतो यात काही नवल नाही.
खुद्द राजकीय पक्षांनाही स्वतःची आणि इतरांची ओळख कशी समजून घ्यायची हा प्रश्न पडतो आणि तो केवळ सैद्धांतिक प्रश्न नसतो. कारण त्या आकलनाच्या आधारे एकमेकांशी कसा व्यवहार करायचा याचे आडाखे ठरवणे, अगदी तात्कालिक व्यूहरचना ठरवण्यापासून ते जास्त व्यापक धोरणं ठरवण्यापर्यंत अनेक निर्णय, त्यावर अवलंबून असतात.
त्याचप्रमाणे अभ्यासक, निरीक्षक यांच्यासाठी राजकीय पक्षाचं मूल्यमापन करणं गुंतागुंतीचं असतं, कारण त्यांच्या मूल्यमापनात कदाचित काही शिफारशीची शक्यता दडलेली असते. शिवाय, आपल्या मूल्यमापनाला केवळ समकालीन तुलनेची परिमाणे असून पुरेशी नाहीत, तर, ते मूल्यमापन काही तत्त्वांच्या आधारावर केलेलं असावं असंही त्यांना वाटत असतं.

*राजकीय वास्तवाचं मूल्यमापन अवघड*
गेल्या निदान दोन दशकांमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्याबद्दल केल्या जात असलेल्या मूल्यमापनांवर आणि राजकीय पक्षांच्या आपसातल्या व्यवहारांवर या गुंत्याची सावली पडलेली दिसते. भाजपाने काँग्रेसला विरोध करणारे राज्या-राज्यातले पक्ष गोळा करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी उभी केली आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून, स्वतःची ताकद घालवून बसल्यामुळे नाईलाजाने, काँग्रेसला देखील एक पर्यायी आघाडी उभी करावी लागली. अर्थातच त्या दोन्ही आघाड्यांमध्ये पक्षांची ये-जा होत राहिली. शिवाय या दोन्ही आघाड्या बाजूला ठेवून आपलं तिसरं राजकारण करू पाहणारे पक्ष नेहेमीच राहिले आहेत. या राजकीय वास्तवाचं मूल्यमापन कसं करायचं हे आव्हान म्हणता येईल. दीर्घ काळ काँग्रेस पक्षाचा वरचष्मा राहिल्यामुळे टीकाकार आणि इतर राजकीय पक्ष यांच्यात नेहेमीच एक काँग्रेस-विरोधी प्रवाह राहिला आहे. दुसरीकडे गेल्या तीन दशकांमध्ये भाजपाचा बोलबाला वाढत गेला, त्या पक्षाने अगदी छोटा एक कालखंड वगळला तर कायमच हिंदुत्वावर आधारित राष्ट्रवादाचा पाठपुरावा केला आहे आणि त्यामुळे दुसरा एक मूल्यमापनाचा आणि राजकीय निवडीचा प्रवाह हा भाजपा-विरोधी राहिला आहे.

*छोट्या छोट्या स्वार्थानं अवकळा*
साहजिकच मग कॉंग्रेस आणि भाजपा दोघेही नकोत,  कारण दोघेही लोकशाहीला मारक आहेत अशी एक भूमिका या काळात प्रचलित झालेली आहे. खास करून खानदानी पुरोगामी, अव्वल क्रांतिकारक पण जनाधार मिळवू न शकणाऱ्या गटांमध्ये ही चतुर-चमकदार भूमिका विशेष प्रिय आहे. नव्वदच्या दशकात प्रादेशिक पक्ष हे लोकशाहीचे तारणहार आहेत आणि संघराज्यपद्धतीची खंदे समर्थक आहेत अशी विश्लेषणे प्रचलित झाली. त्यामुळे बिगर-काँग्रेस आणि बिगर-भाजपा राजकारणाचं आकर्षण काही प्रमाणात तरी निर्माण झालंच. म्हणूनच, काँग्रेस आणि भाजपा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत किंवा ते एकमेकांना पूरक असेच पक्ष आहेत, दोघांनाही फक्त उच्चवर्णीय समूहांचा कळवळा आहे, दोघेही भांडवलशाहीचे वाहक आहेत, असे युक्तिवाद वारंवार केले जातात. गांधींची कॉंग्रेस असो की नेहरूंची, इंदिरा गांधीची असो की नंतरची वाताहातीला तोंड देत शिल्लक राहिलेली गेल्या तीनेक दशकांमधली काँग्रेस असो, तिची मध्यममार्गी भूमिका, भांडवलशाहीचं नियंत्रण करण्यात अंगचोरपणा करण्याची काँग्रेसची सवय, राज्यसंस्था अधिकाधिक लोकशाहीसन्मुख करण्यात त्या पक्षाने केलेली कुचराई, राजकारणाला व्यापक सार्वजनिक हितापेक्षा छोट्या-छोट्या स्वार्थांची अवकळा आणण्याचं काँग्रेसच्या धुरिणांचं कसब, या सगळ्या गोष्टी साहजिकच कोणाही लोकशाहीवादी माणसाला अस्वस्थ करतात. सारांश, बोट दाखवायचं  म्हटलं तर काँग्रेसच्या अवगुणांचा पाढा कितीही वाढवता येईल.

*प्रादेशिक पक्षांचा वाढता प्रभाव*
तेव्हा काँग्रेसवर टीका होणारच, तिला विरोध करणारे अनेकजण असणार. काँग्रेस हा काही लोकशाहीचा पुतळा आणि की तो सर्वगुणसंपन्न पक्ष नाही. त्याला पुरोगामी म्हणायचं ते सुद्धा का असा प्रश्न कोणाला पडला तर तोही वावगा नाही. प्रश्न काँग्रेसच्या चुकांचा नाही. त्या जगजाहीर आहेत. भारताच्या लोकशाहीच्या वाटचालीत सर्वात मोठा पक्ष म्हणून आणि दीर्घ काळ राज्यकर्ता राहिलेला पक्ष म्हणून लोकशाहीमधले अनेक विपर्यास चालू ठेवण्यात काँग्रेसचा मोठा हातभार लागलेला आहे. शिवाय, निखळ लोकशाही भूमिकेतून पाहायचं झालं तर प्रत्येक पक्षात काही तरी खोट दिसणारच कारण आदर्श लोकशाही भूमिकेतून पाहिलं तर सत्तेच्या व्यवहारात बुडालेल्या राजकीय पक्षांच्या वागण्याचं समर्थन करणं अवघडच असतं. तरीही, म्हणजे काँग्रेसशी स्पष्ट मतभेद असले तरीही काँग्रेसच्या चुकांमुळे काँग्रेस आणि भाजपा यांना एकाच तागड्यात मोजण्याच्या पुरोगामी आकलनाचा प्रश्न शिल्लक राहतोच. भाजपा आणि काँग्रेस दोघेही समान अंतरावर ठेवले की आपलं पुरोगामी, बहुजनवादी सोवळेपण सिद्ध होतं आणि शाबूत राहातं अशा समजुतीमुळे भाजपामध्ये असणारे सगळे दोष काँग्रेसमध्ये शोधले जातात. अशा भूमिकेमुळे प्रत्यक्षात मात्र समकालीन राजकारणाचं आकलन विपर्यस्त बनतं. सध्याच्या निवडणुकीत तेलुगु देसम किंवा तृणमूल काँग्रेस किंवा ओडीशात बिजू जनता दल यांचं काँग्रेसबरोबर सूत जुळलं नाही तर ते समजण्यासारखं आहे कारण त्या-त्या राज्यांमध्ये त्या पक्षांची मुख्य स्पर्धा आतापावेतो काँग्रेसबरोबर राहिली आहे. पण तेवढ्याने काँग्रेस आणि भाजपा यांना एकसारखे मानण्याचं समर्थन करता येईल का हा खरा प्रश्न आहे. हा मुद्दा मांडला की अनेक जणांना काँग्रेसच्या छुप्या समर्थनाचा वास येतो.

*राज्यसंस्थेवर नियंत्रणाचा धोका निर्माण*
पण खरा प्रश्न असा आहे की वेगवेगळ्या पक्षांमध्ये आढळणाऱ्या मर्यादा किंवा त्रुटीदाखवून देणं आणि भारतीय जनता पक्षाची चिकित्सा करणं यात फरक करता येण्याइतपत आपलं राजकीय भान प्रगल्भ आहे की नाही? काही आठवडे ज्या पातळीवर प्रचार केला जाईल त्याची चुणूक त्या भाषणामुळे मिळाली. पण हा फक्त प्रचाराचा मुद्दा नाही, गेली पाच वर्षं भारतातल्या मुसलमान समाजाला सतत आरोपीच्या पिंजऱ्यात किंवा संशयाच्या जाळ्यात उभं केलं जाताना आपण पाहिलं आहे. आणि फक्त मुसलमानांनाच कोंडीत पकडलं जातंय अशातला भाग नाही. जो कोणी भाजपाला विरोध करील तो पाकिस्तानचा धार्जिणा आहे असं गेली चारपाच वर्षं सतत म्हटलं जात आहे. हिंदूंच्या चालीरीती आणि त्यांचे श्रद्धाविचार हेच भारतात अंतिमतः स्वीकारार्ह असतील असा ठाम आग्रह भाजपाच्या प्रचारात कधी थेटपणे तर कधी आडून आडून सूचित केलं जातं. भाजपा आणि त्याचे अनेक समर्थक खरोखरीच हिंदू आणि बिगर-हिंदू यांच्यात एक अनुल्लंघनीय सांस्कृतिक दरी असल्याचे मानून चालतात आणि त्या दरीमुळे फक्त हिंदू हेच खरेखुरे भारतीय राष्ट्राचे जनक, रक्षक आणि लाभार्थी आहेत असंही मानतात. ही भूमिका चुकीचा, एकांतिक आणि आक्रमक राष्ट्रवाद जोपासते एवढीच तिच्यात खोट आहे असं नाही तर देशातील राजकीय स्पर्धा, लोकमत, सामाजिक संबंध आणि एकूण लोकशाही व्यवहार ह्या सर्व क्षेत्रांना दूषित करण्याची शक्यता भाजपाच्या भूमिकेत आहे. १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धापासून भाजपाने उभ्या केलेल्या या धोक्याचा अनुभव देशाने घेतला आहे. तो काही केवळ रथयात्रा, बाबरी मशिदीची बेकायदेशीर मोडतोड, किंवा वेळोवेळी झालेल्या दंगली आणि गुजरातमधील मुस्लिमविरोधी हिंसाचार अशा काही बहुचर्चित प्रसंगांमधून घेतला आहे असं नाही, तर गेल्या तीन दशकांमध्ये देशातील लोकमत आणिलोकशाहीचा पोत ज्या प्रकारे बदलला आहे त्यामधून देखील या धोक्याचा प्रत्यय येतो. आता अगदी दैनंदिन जीवनात आणि सामाजिक संबंधांमध्ये हा बदल आढळून यायला लागला आहे. लोकशाहीला धोका उत्पन्न करणाऱ्या शक्ती जेव्हा राज्यसंस्थेवर नियंत्रण मिळवतात तेव्हा सर्व संस्थात्मक प्रक्रिया कशा वाकवल्या जातात याचा अनुभव गेल्या पाच वर्षांत आलेला आहे.

*राजकीय विश्लेषणाची वानवा आहे*
लोकशाही पोखरणारे गट लोकशाहीमध्ये उपलब्ध होणारे अवकाश वापरून बस्तान बसवतात ते सत्तेबाहेर असताना आक्रमक आणि झटपट लोकप्रियता मिळवणाऱ्या भूमिका घेतात आणि सत्तेवर आल्यावर नव्या संस्थात्मक आणि वैचारिक मानदंडांची प्रतिष्ठापना करतात. मग सत्तातुर बुद्धीजीवी, सत्ताकांक्षी नव-अभिजन आणि सत्ता जाणार म्हणून चिंताक्रांत झालेले अनेक जुने अभिजन अशा अनेकांना आपल्याकडे आकर्षित करून आपण म्हणतो तीच लोकशाहीची खरीखुरी संकल्पना आहे असा आभास हे लोकशाही-विरोधी प्रचलित करू शकतात. सध्या भारत नेमक्या अशाच टप्प्यावर आहे. अशा वेळी, कालबाह्य झालेल्या चौकटी वापरून भाजपा आणि कॉंग्रेस हे दोघेही सारखेच आहेत अशी भूमिका घेणं हे वरकरणी मोठ्या निःपक्षपातीपणाचं वाटलं तरी प्रत्यक्षात त्यात राजकीय विश्लेषणाची वानवा तर दिसतेच पण लोकशाहीला वेढणाऱ्या धोक्याकडे दुर्लक्ष करण्याचा साहसवादसुद्धा डोकावत असतो. गेली पाच वर्षं कोंडी होऊनसुद्धा अनेक पुरोगामी गट आणि विचारवंत आपली दीर्घकालीन विश्लेषण चौकट आणि समकालीन व्यूहरचना बदलायला तयार नसल्याचं दिसतं आहे. अनेक पक्ष काँग्रेस आणि भाजपा यांना एकाच मापाने मोजून आपण कसे अस्सल लोकशाहीवादी आहोत ते सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसवर टीका करायला हवीच; तिच्या वागण्या बोलण्यातील लोकशाही-विरोधी भूमिकेचा प्रतिवाद करायला हवा हेही खरं; इतकंच काय पण नवे पक्ष उभे करताना काँग्रेसशी स्पर्धा देखील करायला हवीच; पण काँग्रेसला विरोध करताना, काँग्रेस पुरेशी पुरोगामी नाही हे सांगताना, किंवा अधिक लोकशाहीवादी पर्याय उभे करण्याची स्वप्नं पाहताना भाजपा आणि काँग्रेस हे एकसारखेच आहेत या ढिसाळ आणि सोयीस्कर दिशाभूल करणाऱ्या भूमिकेपासून सावध राहावं.

*-हरीश केंची*
९४२२३१०६०९

निवडणुकीत सोशल मीडिया....!

"वीस वर्षांपूर्वी निवडणुकांच्यावेळी छापलेल्या पत्रिका, पोस्टर्स, लाऊडस्पीकर आणि सभा हीच प्रचाराची साधनं होती. झेंडा आणि पोस्टर्स लावलेली रिक्षा-मोटार फिरायच्या आणि मतं देण्याबाबत आवाहन करीत. जोरदार घोषणाबाजी होत असे. अगदी लहान मुलांच्या फेऱ्याही निघत. सध्या ही दृश्य बदलली आहेत. या सगळ्यांच्या ठिकाणी ६ इंचाचा मोबाईल सक्रिय झालाय! प्रामुख्यानं गेल्या दशकापासून 'सोशल मीडिया' हा निवडणूक प्रचाराचं रक सशक्त माध्यम बनलं आहे. आता प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे ज्यात सोशल मीडियाचं जाळं असतं. शहरी असो वा ग्रामीण सगळीकडं सोशल मीडियाचं सगळ्यात साधं, सोपं, शक्तिशाली  आणि परिणामकारक माध्यम राहिलं आहे. कोणताही नेता आणि पक्षाला प्रत्येक मतदारांशी संपर्क साधणं हे अवघड आणि अशक्य आहे, पण हे काम सोशल मीडियानं सरळ, सोपं करून टाकलय. आताच्या या लोकसभा निवडणुकीत हेच साधन महत्वाचं ठरतंय!"
-----------------------------------------------

येऊन, येऊन येणार कोण......!
कौन आवे भाई कौन आवे......!
या आणि अशा घोषणा या आता जवळपास कालबाह्य झाल्यात, भिंती रंगवून, रिक्षा-टांगा फिरवून,लहान मुलांच्या फेऱ्या काढून करला जाणारा प्रचार आजकाल दिसेनासा झालाय. मतदारांच्या हातात असलेल्या मोबाईलमधून थेट त्याच्याशी संपर्क साधला जातोय. या मोबाईलमध्ये असलेल्या 'सोशल मीडिया' हा मतदारांच्या मनापर्यंत जाणारा साधा, सोपा, सहज आणि सरळ मार्ग बनलाय. गेल्या दशकापासून 'सायबर वॉर' नांवाचा शब्द निवडणुकांच्या काळात ऐकायला येतोय. सायबर वॉर म्हणजे उमेदवाराच्या प्रचारासाठी आरंभलेलं ऑनलाईन युद्ध! भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही देशातील होणाऱ्या निवडणूकीतील सायबर वॉर सध्या चरमसीमेवर पोहोचलाय. नेत्यांच्या सभा आणि प्रचार यंत्रणेबरोबरच त्याला समांतर असा सोशल मीडियावर निवडणूक प्रचार सुरू झालाय. आरोप, प्रत्यारोप, एकमेकांवर प्रहार करणारे आडियो-व्हिडिओ, खऱ्या-खोट्या बातम्या, या सगळ्याचा मारा सोशल मीडियावर निवडणुकांच्या काळात सुरू आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी या सायबर वॉरसाठी 'आय टी सेल'ची स्थापना करून स्वतःची वॉर रुम उभी केलीय. ज्यात आयटी क्षेत्रातील तज्ञांच्या टीमसोबतच इतरही काहीजण सहभागी झालेत. ते पक्ष आसनी उमेदवारांचे फोटो, कार्टून्स, ग्राफिक्सच्या माध्यमातून पक्ष आणि संबंधित नेत्याचा राजकीय माहोल मतदारांनी मतदान करावं यासाठी उभं करण्याचा प्रयत्न करीत असतात.

*तरुणांची मानसिकता निर्णायक ठरतेय!*
या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुण मतदारांची संख्या खूप मोठी आहे आणि या तरुण मतदारांच्या संख्येपैकी पन्नास टक्क्यांहून अधिक तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या माहितीचा प्राथमिक स्रोत असतो. भारतीय जनता पार्टीनं खासकरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांना लक्ष्य बनवलेलं आहे. अशा तरुण मतदारांची संख्या जवळपास ८ कोटी आहे तर काँग्रेसपक्षाने दुसऱ्यांना मतदान करणाऱ्या सक्षम आणि वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनलेल्या युवकांना लक्ष बनवलेलं आहे, अशांची संख्या ११.६ कोटी एवढी आहे. या तरुणांना टीव्ही पाहण्यात फारसा रस नसतो पण ते मोबाईलवर व्हिडिओ पाहतात, युट्युब चॅनेलवर जातात. ते वृत्तपत्र वाचत नाहीत पण ऑनलाइन बातम्या आणि जी काही माहिती मिळते ना तीच माहिती त्याच्यासाठी बातम्या असते. सध्या या तरुणांनी बातम्या मिळवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केलाय. ऑनलाईन वृत्तपत्रे वाचली जाताहेत.  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञ मोहन पै यांनी सांगितल्याप्रमाणे सोशल मीडिया या निवडणुकीत चार ते पाच टक्के मतं बदलू शकतात आणि याचा परिणाम निवडणुकीचा निकाल फिरवण्यात सक्षम, परिणामकारक ठरू शकतो. तर निवृत्त टेलिकॉम सेक्रेटरी चंद्रशेखर यांच्या म्हणण्याप्रमाणे या लोकसभा निवडणुकीत संपूर्णपणे नवी टेक्नॉलॉजी विकसित झाली आहे आणि ती या प्रचारामध्ये केंद्रित बनली आहे. ज्याचा प्रचारापासून निवडणुकीतील मतदानापर्यंत ह्या साऱ्या प्रक्रियेत बदल करण्यात आलेले आहेत. या बदललेल्या परिस्थितीत तरुणांची मते ही निर्णायक ठरतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे.

*स्मार्टफोन आणि इंटरनेटचा व्याप*
२०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुक काळात देशात सर्वप्रथम स्मार्टफोन वापरण्यात आले. अशाप्रकारचे स्मार्टफोनची असलेल्यांची संख्या जवळपास १२.३ कोटी होती आणि २५.२ टक्के लोक इंटरनेटचा वापर करत होती. आता २०१९ च्या निवडणूक काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या वाढली असून ती जवळपास २७.९ कोटीवर गेली आहे तर ५६ कोटी लोक इंटरनेटसोबत जोडले गेले आहेत. ज्यांच्याजवळ स्मार्टफोन आहे असे ९५ टक्के लोक इंटरनेट आणि सोशल मीडिया याचा सहजपणे वापर करत आहेत, असं एका पाहणीत आढळून आलं आहे. देशात आज ९० कोटी मतदार आहेत. यातील ५९ टक्क्यांहून अधिक लोक इंटरनेटचा वापर करताहेत. तेव्हा राजकीय पक्षांसाठी सोशल मीडिया हा एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांकडे पोहोचणं आवश्यक ठरला आहे. यामुळे यावेळी सोशल मीडियाचा भरपूर वापर केला जातो आहे. खासकरून तरुणांना सोशल मीडियावर सर्वाधिक वेळ घालविला जातो आहे, हे लक्षांत घेऊन राजकीय पक्षांनी त्यावरच आपलं लक्ष केंद्रित केलंय. त्यातही पहिल्यांदा मतदान करणाऱ्या तरुणांची संख्या फार मोठी आहे. त्यांना भाजपेयींनी लक्ष्य केलं आहे. पण हे सांगणं कठीण आहे की सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या किती लोकांवर या प्रचाराचा नेमका हवा तो परिणाम होतो आहे की, नाही. पण यात शंका नाही की त्यापैकी अमुक एक टक्के मत ही नक्कीच फिरू शकतात, हे निश्चित!

*फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटर*
भारत हा सोशल मीडिया कंपन्यांसाठी एक सर्वात मोठी बाजारपेठ, व्यासपीठ आणि प्रचारासाठीच एक मोठा प्लॅटफॉर्म तयार झाला आहे. देशातील जवळपास ३० कोटीहून अधिक लोक सोशल मीडिया म्हणून फेसबुकचा वापर करतात. म्हणजे ९० कोटी मतदारांपैकी जवळपास तीस टक्क्यांहून अधिक मतदार फेसबुकचा वापर करतात. ही लक्षणीय संख्या पाहता, हे माध्यम राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण, सहाय्यकारी आणि आवश्यक सिद्ध झालं आहे. हे ते राजकीय पक्ष जाणून आहेत. गेल्या काही दिवसांपासून फेसबूक हेच प्रचाराचे माध्यम म्हणून समोर आलं आहे. फेसबुकवर दिली जाणारी थेट प्रक्षेपणाची सुविधा ही नेत्यांच्या सभा आणि मुलाखतीसाठी अत्यंत श्रेयस्कर ठरतेय. राजकीय पक्षांना ते थेट लोकांपर्यंत प्रसारण करून पोचवता येणं सहजशक्य बनलं आहे. तर दुसरीकडं असं म्हटलं गेलं आहे की, २०१९ ची ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने 'व्हाट्सअप इलेक्शन' बनलीय! त्यामुळे व्हाट्सअप वापरणाऱ्या भारतीयांची संख्या जगात सर्वाधिक बनली आहे.भारतातील २० कोटीहून अधिक लोक केवळ व्हाट्सअप चा वापर करताहेत. ब्राझीलची निवडणूक झाल्यानंतर थोड्या दिवसातच तिथली विधानसभेचीही निवडणूक झाली त्यावेळीही व्हाट्सअपनं तिथं महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडलीय. त्याचा सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की व्हाट्सअपवर खूप सहजपणे हवी ती खरी, खोटी माहिती वा अफवा पसरवून मोठ्या प्रमाणात लोकांना दिशाभूल करण्यासाठी वापरू येऊ शकतं हे सिद्ध झालंय. गेल्यावर्षी भारतात ज्या 'मोब लिंचींग' च्या घटना घडल्या त्यात फेसबुकचा वापर हे एक मोठं उदाहरण आहे. देशात अनेक ठिकाणी ज्या दंगली झाल्यात त्या भडकण्यात याच सोशल मीडियाचा वापर झालाय. हे स्पष्ट झाल्यानं अशावेळी इंटरनेटची सेवा बंद केली जाते. सोशल मीडियावरील फेसबुक व्यतिरिक्त ट्विटर संदर्भात बोलावं तर भारतात केवळ ३ कोटी लोकच ट्विटरचा वापर करतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पक्षांचे नेते आणि त्यांची पक्ष कार्यालये ही ट्विटर वर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाली आहेत.  २०१४ मध्ये भाजपेयींना आणि नरेंद्र मोदी यांना सोशल मीडिया कशाप्रकारे फायदेशीर ठरलं आहे हे त्यांनी भारतातल्या इतर राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना दाखवून दिलंय. हे पाहून २०१५ मध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष राहुल गांधींही ट्विटर वर दाखल झालेत. त्यानंतर सगळ्याच नेत्यांनी आणि पक्षांनी ट्विटरवर सक्रिय होऊन यात सहभागी होण्यात धन्यता मानलीय. नव्यानं राजकारणात आलेल्या काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी फेब्रुवारीत ट्विटर जॉईन केलं. मात्र २४ तासाच्या आत १ लाख ६० हजार फॉलोवर्स त्यांनी मिळवलेत. पण केवळ नेते व पक्ष नाही ही तर आता सरकारचे सगळीच खाती आणि त्याचे खातेप्रमुख आणि विभागप्रमुख हे ट्विटरवर येऊन दाखल झालेले आहेत. ज्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत सहजपणे ते जोडले जाऊ शकतात. आणि लोकांनाही स्वतःची स्वतःचं म्हणणं वा तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ शकतात.

*८७ हजार व्हॉट्सअप ग्रुपवर प्रचार होतोय*

सध्या देशामध्ये ८७ हजाराहून अधिक व्हाट्सअप ग्रुप आहेत. त्यातून प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा प्रचार केला जातो आहे. या ग्रुप मधून कोट्यावधी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आधीपासूनच सुनियोजितरित्या विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेली सामग्रीही म्हणजेच पोस्ट लोकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. नेते, पक्ष प्रत्येक मतदारांचा त्यांचा पूर्वीचं राजकीय मत आणि कल बदलण्याचा प्रयत्न करताना दिसताहेत. व्हाट्सअप हे एक असे माध्यम आहे यातून खोटी माहिती आणि खोट्या बातम्या सहजपणे सर्वत्र पसरविल्या जाऊ शकतात. लोक कोणत्याही राजकीय पक्षाशी, मतांशी संबंधित असतील तर त्यांच्याकडे अशा प्रकारचा कोणताही मेसेज आला तर ते ताबडतोब इतरत्र फॉरवर्ड करतात. जी माहिती आपल्याला आलेली आहे फेसबुकवरून पोस्ट आपल्याकडे पोहोचली आहे, त्याच्या संदर्भात सविस्तर माहिती घेतली जात नाही चौकशी केली जात नाही की, त्याचा शहानिशा केला जात नाही. त्यामुळे अशा लोकांच्यामध्ये खोट्या माहितीच्या आधारे आपली विचारधारा उभी करण्याचा राजकीय पक्षांचा, नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा प्रयत्न असतो. काही प्रमाणात तो सफल ही झालेला दिसून येतोय.

*सोशल मीडियासाठी मोठा खर्च केला जातोय*

,नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार निवडणूक लढविणारे राजकीय पक्ष सोशल मीडियासाठी २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकांच्या तुलनेत २०१८ साठी १५० टक्क्याहून अधिक खर्च करताना दिसताहेत. कित्येक जाहिरात तज्ञांच्या दृष्टिकोनातून असे दिसून आले आहे की फक्त सोशल मीडियावर जवळपास १२ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत यात सर्वाधिक भागीदारी फेसबुकची आहे. १० हजार कोटी रुपये फेसबूक तर  केवळ २ हजार कोटी अन्य सोशल मीडियासाठी वापरले गेले आहेत. दुसऱ्या एका संशोधन अहवालानुसार भाजप फेसबुकवर असलेल्या त्यांच्या प्रत्येक पेजमागे दोन आठवड्यात २.५ कोटी रुपये खर्च करते. फेसबुकवर सर्वाधिक पेज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चालवण्यात येतात. भाजपच्या जवळपास २० हून अधिक अधिकृत फेसबुक पेजेस सुरू आहेत. भाजपनं प्रत्येक बुथनिहाय 'सोशल कॉर्डिनेटर' ची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे असे लक्षात येईल येईल की ही मंडळी मोठ्या प्रमाणात केवळ सोशल मीडियाचा वापर पक्षाचा प्रचार करण्यासाठीच करताना दिसतात.

*इतर देशातही सोशल मीडियाची डोकेदुखी*
२०१६ मध्ये झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीनंतर सोशल मीडियावर सतत निवडणुकीसंदर्भात स्वतःच्या भूमिका व्यक्त केल्या गेल्या. त्याबाबत संबंधितांना तपास आणि त्यावरील आक्षेप याला सामोरे जावे लागलं आहे. खासकरून फेसबुकवर डेटा चोरीचा गंभीर आरोप लावलेला आहे. रशियन अकाउंट्‍स फेसबुकवर मदतीच्या नावाखाली म्हणून खूप मोठ्याप्रमाणात मतदारांवर नजर ठेवून त्यांचा डेटा आणि माहिती मिळवली गेली आहे. आता असं समोर आलं आहे की, गेल्या वर्षी मेक्सिको आणि ब्राझील तर यावर्षी नायजेरियातील निवडणुकांमध्ये पण असाच डेटा चोरीचा आक्षेप नोंदवला गेला आहे. या सगळ्या निवडणकामध्ये सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. या देशात राहणाऱ्या भारतीयांच्या संख्या स्पष्टता तर हा सगळा प्रकार भारतीयांच्या दृष्टिकोन अत्यंत गंभीर ठरलेला आहे

चौकट......
 *असे आहेत सोशल मीडिया स्टार*
२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे सोशल मीडियाचं यश आहे. हे लक्षात आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी त्याचा आधार सध्या घेतलेला दिसतो आहे. त्यासाठी खास माणसं नेमली आहेत. राजकीय नेत्यांचे किती फालोअर आहेत हे जरा पाहू या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फेसबुक अकौंटवर ४.३५ कोटी, तर ट्विटरवर ४.६६ कोटी फालोअर आहेत. भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या फेसबुकवर १.४३ कोटी तर ट्विटरवर १.३० कोटी, आपचे अरविंद केजरीवाल यांच्या फेसबुकवर ७१ लाख तर ट्विटरवर १.४७ कोटी, भाजपचे  राजनाथ सिंग यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर १.२६ कोटी, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्या फेसबुकवर ६८ लाख तर ट्विटरवर ९३ लाख, भाजपचे योगी आदित्यनाथ ५६ लाख तर ट्विटरवर ३७ लाख, भाजपच्या स्मृती इराणी फेसबुकवर ५१ लाख तर ट्विटरवर ८९ लाख, भाजपच्या सुषमा स्वराज फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर १.२४ कोटी, तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी फेसबुकवर २९ लाख ट्विटरवर ३२ लाख, एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी फेसबुकवर २५ लाख ट्विटरवर ४९ लाख, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी फेसबुकवर २४ लाख ट्विटरवर ९० लाख, तेलुगु देशम चंद्रबाबू नायडू फेसबुकवर १८ लाख ट्विटरवर ४१ लाख, भाजपच्या नितीन गडकरी फेसबुकवर १२ लाख ट्विटरवर ४७ लाख, काँग्रेसच्या शशी थरूर फेसबुकवर ११ लाख ट्विटरवर ६८ लाख, काँग्रेसच्या प्रियांका गांधी फेसबुकवर ४.८ लाख ट्विटरवर ३.२१ लाख अशी या नेत्यांच्या फॉलोअर्सची संख्या आहे इतर राजकीय नेत्यांनी मात्र विशेष दखलपात्र असे जाणवत नाहीत.

*हरीश केंची*
९४२२३१०६०९

Saturday 13 April 2019

डॉ. आंबेडकर यांच्या निवडणुका : वाद-प्रवाद!

"सोलापूर लोकसभा मतदारसंघातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढवीत आहेत. डॉ. आंबेडकर यांनी देखील सोलापुरातून निवडणूक लढवावी असं कार्यकर्त्यांना वाटत होतं. पण त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच नकार दिला होता. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस  पां. ना. उर्फ बापूसाहेब राजभोज हे सोलापूर जिल्ह्यातून विजयी झाले होते. तो विजय हा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या युतीमुळे! बापूसाहेब राजभोज यांनी लोकसभेतील आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पोटनिवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग खुला करावा, असे डॉ. आंबेडकरांच्या निकटवर्तीयांपैकी काहींना वाटत होते, पण डॉ. आंबेडकरांना ही सूचना काही पसंत पडली नाही. म्हणून त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९५२ साली राज्यसभेच्या निवडणुका मुक्त वातावरणात होत. आजच्यासारखी ‘धनशक्ती’ तेव्हा नसे. त्यामुळं बाबासाहेब राज्यसभेवर निवडून गेले. पण स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील डॉ. आंबेडकर यांच्या निवडणुकांबाबत वाद आणि प्रवाद आहेत, त्याचा घेतलेला हा धांडोळा!"
-----------------------------------------------------
*गे* ल्या अनेकवर्षांपासून लोकांची अशी धारणा आहे, वाद आहेत, प्रवाद आहेत की, त्यांना पर्याय ठरू शकणाऱ्या नेत्यांना पंडित नेहरूंनी जाणीवपूर्वक दूर ठेवलं होतं. किंबहुना  अशा नेत्यांना पक्षापासून अलग करण्याबाबत ते उत्सुक होते. नेहरू हे एक असे राजकीय नेते होते की, ज्यांनी वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रपती बनविण्यापासून रोखलं होतं. एवढंच नाही तर त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचंही टाळलं होतं. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाल्यानंतर जवाहरलाल नेहरू प्रधानमंत्री बनले. त्यांनी विभिन्न समुदायातुन निवडल्या गेलेल्या सदस्यांना घेऊन मंत्रिमंडळ बनवलं. हा काळ म्हणजे ऑक्टोबर १९५१ आणि फेब्रुवारी १९५२ मधला होता. जेव्हा स्वतंत्र भारताच्या निवडणुका होणार होत्या. पण या सार्वत्रिक निवडणूक होण्यापूर्वी नेहरूंच्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्वतः मंत्रिमंडळातून दूर होत भारतीय जनसंघाची स्थापना केली. पाठोपाठ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही अनुसूचित जाती संघाची स्थापना केली. नंतर त्याचं रूपांतर भारतीय रिपब्लिकन पक्षात झालं. आणखी एक काँग्रेसचे नेते आचार्य कृपलानी यांनी किसान मजदूर प्रजा पार्टी तर राम मनोहर लोहिया आणि जे.पी.नारायण यांनी सोशालिस्ट पार्टीची स्थापना केली. जवाहरलाल नेहरू यांना प्रधानमंत्री म्हणून निवडलं गेलं होतं, लोकसभेचा कार्यकाळही अखंडित असाच होता. कारण त्यावेळी विरोधीपक्षाचा नेता कुणीच नव्हता.

*मुंबईत डॉ.आंबेडकरांचा पराभव झाला!*
स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात जवाहरलाल नेहरू हेच काँग्रेसपक्षाचे सर्वेसर्वा होते. पहिल्या लोकसभा निवडणुकीत डॉ.आंबेडकर यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळं आपलं कार्यक्षेत्र असलेल्या मुंबई मतदारसंघातून आपल्या पक्षांकडून अनुसूचित जाती संघ याच्यावतीनं निवडणूक लढवली. काँग्रेसनं डॉ.आंबेडकर यांच्याविरोधात नारायण काजरोळकर यांना इथं उमेदवारी दिली. ते त्यावेळी विजयी झाले. काँग्रेस पक्षातले बहुतांश दलित नेते, कार्यकर्ते हे जगजीवन राम यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय निराधार वर्ग लीग याच्याशी संबंधित होते. १९५२ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होण्यापूर्वी जुलै १९४६ मध्ये ब्रिटिशांनी प्रांतीय निवडणुका घेतल्या होत्या. त्यानंतर अस्तित्वात असलेल्या मंत्रिमंडळाचा प्रयत्न हा काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यातील सौद्याचा एक दुर्भाग्यपूर्ण प्रयत्न होता. तेव्हा त्या प्रतिनिधींनी संविधान सभेसाठी २९६ सदस्यांना निवडलं. १९४६ मध्ये प्रांतीय प्रतिनिधींतून निवडल्या गेलेल्या २९६ सदस्यांमध्ये डॉ. भीमराव आंबेडकर हे ही होते. 'हमारे संविधाना' च्या पहिल्या अंकात बी. शिव राव यांनी या सर्व सदस्यांच्या नांवाची यादी आहे. डॉ. आंबेडकर यांचं नांव बंगालचे प्रतिनिधी म्हणून नमूद केलं आहे. आंबेडकर यांना अविभाजित बंगालच्या सदस्यांनी, तिथल्या बहुसंख्य मुस्लिमांनी निवडून दिलं होतं. आंबेडकरांना काँग्रेसनं बंगालमधून निवडणूक लढविण्यासाठी मजबूर बनवलं गेलं  होतं. त्यांच्यामते आंबेडकर यांच्या आपल्या कार्यक्षेत्रातील मतदारसंघात, मुंबईत आवश्यक तेवढा पाठींबा नाही. १९४० च्या दशकात मागासवर्गीय जाती, अनुसूचित जाती यांचे अधिकार आणि प्रतिनिधित्व व इतर मुद्द्यावरून काँग्रेस पक्ष आणि डॉ. आंबेडकर यांच्यात मूळ सिद्धातांवरून, धोरणात्मक वाद होता. काँग्रेसची अनेक ध्येयधोरणे ही मागासवर्गीयांच्या, दलितांच्या हिताच्या नव्हत्या. डॉ. आंबेडकर यांचे अनेक मुद्द्यांवर काँग्रेसशी मतभेद असले तरी देखील ते काँग्रेसला सहकार्य करत देशाच्या घटना निर्मितीत आपलं अमूल्य असं योगदान दिलं हा इतिहास आहे!

*लॉर्ड माउंटबॅटन यांचा आंबेडकरांना विरोध होता*
देशाच्या विभाजनानंतर बंगालच्या ज्या मुस्लिमबहुल भागातून आंबेडकर निवडून आले होते हो भाग आताच्या बांगलादेशात गेला. आंबेडकरांचा मतदारसंघ न राहिल्यानं काँग्रेस हायकमांडला डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या विद्वानाची देशाला गरज आहे, याची जाणीव होती . म्हणून मुंबईतील एम.आर.जयकर यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या जागेवर जी.व्ही.मावळणंकर यांना उमेदवारी दिली जाणार होती. पण काँग्रेसनं आंबेडकरांना ही जागा देऊ केली. ३० जून १९४७ ला डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी मुंबईप्रांताचे तत्कालीन प्रमुख बी.जी.खेर यांना याबाबतच्या सूचना दिल्या की जयकरांच्या रिक्त जागेवर डॉ. आंबेडकर हे निवडणूक लढविताहेत. वल्लभभाई पटेलांनी जी.व्ही.मावळणंकर यांची समजूत काढली आणि 'देशाच्या राजकारणात आणि घटना निर्मितीत त्यांची आवश्यकता आहे शिवाय काँग्रेसबाबतची आंबेडकर यांची भूमिका बदलली आहे' असं स्पष्ट केलं.  पण लॉर्ड माउंटबॅटन ज्यांचा प्रभाव नेहरूंच्या प्रत्येक निर्णयात दिसून येत होता ते मात्र नाराज झाले होते. नेहरूंच्या मंत्रिमंडळात कुणाचा समावेश असावा वा कुणाला वगळावं याबाबत हस्तक्षेप करीत. त्याबाबत कुणी विचारलं तर केवळ त्यांचा सल्ला घेतलाय, निर्णय मीच घेतलाय असं नेहरू म्हणत.

*भंडाऱ्यातील पोटनिवडणुकीत पुन्हा पराभूत!*
डॉ. आंबेडकर यांचं चरित्र लिहिणाऱ्या धनंजय कीर यांच्या मते सरदार पटेल, स.का.पाटील आणि आचार्य दोंदे यांच्या सामूहिक प्रयत्नानंच आंबेडकरांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. पण १९५२ मध्ये नेहरूंनी  असा निर्णय घेतला होता की, आंबेडकर कोणत्याही परिस्थितीत संसदेत निवडून येता कामा नये. ज्यामुळं आंबेडकर यांना मंत्रिमंडळात घेण्याची नौबतच येणार नाही. नारायण काजरोळकर जे आंबेडकर यांचा पराभव करून निवडून आले होते. त्यांनी डॉ. राजेंद्रप्रसाद यांना असं सांगितलं होतं की, आंबेडकर यांचा पराभव समाजवाद्यांनी त्यांना मतं दिली नाहीत म्हणून झालाय! १९५२ मध्ये आंबेडकर राज्यसभेसाठी निवडले गेले. पण १९५४ मध्ये भंडारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवून संसदेत जाण्याचा आंबेडकर यांचा प्रयत्न फोल ठरला. तिथंही त्यांचा पराभव केला गेला. याबद्धल कुणाचंही दुमत नाही की, नेहरू आंबेडकर यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करत होते. कारण आपल्या बुद्धीकौशल्यावर आंबेडकर देशाच्या सर्व भागात लोकप्रिय होत होते.

*मुंबईतील झालेला पराभव हा तांत्रिकदृष्ट्या झालेला*
मुंबईत आंबेडकरांचा पराभव झाला त्याला खरं तर तांत्रिक बाब कारणीभूत होती पण त्यावेळी राजकारण केलं गेलं. आज प्रत्येक मतदारसंघातून एकच उमेदवार निवडून दिला जातो. तशी पद्धत स्वातंत्र्योत्तर काळात आरंभीच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सरसकट अवलंबिण्यात येत नव्हती. मतदारसंघ द्विसदस्यीय असला तर त्यातील एक जागा सर्वसाधारण आणि एक जागा राखीव अशी विभागणी केलेली असे. द्विसदस्यीय मतदारसंघात प्रत्येक मतदाराला दोन मते देण्याचा अधिकार असे. मतदाराने दोन्ही मते विभागलीच पाहिजेत, असे कायदेशीर बंधन नव्हते, पण मतदाराला देण्यात येणाऱ्या दोन्ही मतपत्रिका त्याने एकाच उमेदवाराच्या बाजूने टाकल्या तर १९५१ च्या लोकप्रतिनिधी कायद्यातील ६३(१) विभागातील तरतुदीनुसार अशा मतपत्रिका मतमोजणी करताना बाद ठरवल्या जात असत. डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता हे दोघेही ‘शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन व समाजवादी पक्ष यांच्या युतीचे’ उमेदवार होते. यांच्याखेरीज १९५२ मध्ये तेव्हाच्या उत्तर मुंबई मतदारसंघात श्रीपाद अमृत डांगे, डॉ. गोपाळ विनायक देशमुख, विठ्ठल बाळकृष्ण गांधी, केशव बाळकृष्ण जोशी, नीलकंठ बाबुराव परुळेकर, द. रा. घारपुरे, नारायण सदोबा काजरोळकर, रामचंद्र सदोबा काजरोळकर आणि शांताराम सावळाराम मिरजकर या नऊ उमेदवारांची नामांकनपत्रे वैध ठरली होती. त्यापैकी द. रा. घारपुरे, रा. स. काजरोळकर हे काँग्रेसचे आणि शां. सा. मिरजकर कम्युनिस्ट पक्षाचे असे तीन ‘डमी’ उमेदवार होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे प्रत्यक्षत: एकूण ११ उमेदवारांपैकी ८ जणांनीच निवडणूक लढवली. 

*लक्षणीय बाद मतांनी झाला होता घात!*
त्यांपैकी वि. ना. गांधी, १ लाख ४९ हजार १३८ आणि नारायणराव काजरोळकर १ लाख ३८ हजार १३७ मते मिळवून विजयी झाले. पराभूत उमेदवारांपैकी डॉ. आंबेडकरांना १ लाख २३ हजार ५७६ मते मिळाली, तर अशोक मेहतांना १ लाख ३९ हजार ७४१ मते मिळाली. डांगे यांना ९६ हजार ७५५, डॉ. गोपाळराव देशमुख यांना ४० हजार ७८६, के. बा. जोशी यांना १५ हजार १९५ आणि नीलकंठ परुळेकर यांना १२ हजार ५६० मते मिळाली होती. संदर्भ: डॉ. आंबेडकर आणि अशोक मेहता यांनी निवडणूक आयोगाला केलेला निवडणुकीसंबंधीचा अर्ज, परिच्छेद ७ व ८. या मतदारसंघात सर्व उमेदवारांना पडलेल्या मतांची एकूण संख्या ७ लाख १५ हजार ८८८ इतकी होती. परंतु बाद मतांची संख्याही मोठी होती. प्रत्येक उमेदवाराच्या निरनिराळ्या मतपेटीतील मते मोजण्यात आली तेव्हा मतगणना अधिकाऱ्याने बाद ठरवलेल्या मतांचा उमेदवारनिहाय तपशील असा होता : डॉ. आंबेडकर २ हजार ९२१, अशोक मेहता ५ हजार ५९७, डांगे ३९ हजार १६५, डॉ. देशमुख ६ हजार ६३४, वि. बा. गांधी १० हजार ८८१, के. बा. जोशी १ हजार १६८, ना. स. काजरोळकर ६ हजार ८९२  आणि नी. बा. परुळेकर १ हजार ०२५.

*...तर डॉ. आंबेडकर निवडून आले असते!*
आता मनसेचं निवडणूक चिन्ह असलेले 'रेल्वे इंजिन' हे डांगे यांचे निवडणूक चिन्ह होते. हे चिन्ह असलेल्या उमेदवाराच्या मतपेटीत दोन्ही मतपत्रिका टाका, असे आवाहन डांगे यांनी तसेच त्यांच्या पाठीराख्यांनी निवडणूक मोहिमेतील प्रचारसभांमध्ये तसेच तेव्हा वितरित केलेल्या पत्रकांमध्ये केले होते. कम्युनिस्ट पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘युगांतर’ने तसेच आवाहन केले होते. तसे करणाऱ्या मतदारांची मते बाद होतात याची कल्पनाही मतदारांना देण्यात आली नव्हती. डॉ. गोपाळराव देशमुख यांनी, सवर्ण हिंदू मतदारांनी राखीव जागा लढवणाऱ्या डॉ. आंबेडकरांना दोहोंपैकी एकही मत न देता दोन्ही मतपत्रिका अन्य उमेदवाराच्या मतपेटीत टाकून आपले एक मत कुजवावे म्हणजे मत बाद होईल, अशी व्यवस्था करण्याची सूचना केली. ‘नाही तर दोन्ही अस्पृश्य उमेदवार निवडून येतील,’ असा डॉ. देशमुखांनी मतदारांना बागुलबोवा दाखवला. डॉ. आंबेडकरांना नारायणराव काजरोळकरांपेक्षा १४ हजार ५६१ मते कमी पडल्यामुळे ते पराभूत झाले. डांगे यांच्या बाद मतांची संख्या ३९ हजार १६५ इतकी होती. एक मत कुजवा असे त्यांनी मतदारांना आवाहन केले नसते तर डॉ. आंबेडकर निश्चितच निवडून आले असते हे उघड दिसते. केवळ काँग्रेसमुळे डॉ. आंबेडकरांचा पराभव झाला नाही. हा सर्व तपशील संदर्भासहित उपलब्ध आहे. समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांनाही डॉ. आंबेडकरांच्या पराभवाचे आश्चर्य वाटले. डॉ. आंबेडकरांच्या विरुद्ध नारायण काजरोळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यावर एका इंग्रजी दैनिकात एक अत्यंत बोलके व्यंगचित्र प्रकाशित झाले होते. ते असे की, डॉ. आंबेडकर उभे असून त्यांच्या भव्य पायापाशी बुटाच्या टाचेच्या उंचीइतकी उंची असलेले काजरोळकर दाखविले होते. यावरून आंबेडकरांची प्रतिमा लोकमानसात कशी होती हे स्पष्ट होतं. पहिल्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांनी मुंबईतील झालेली लोकसभेची निवडणूक रद्द करावी, असा निवडणूक आयोगापुढे अर्ज केला. त्यात त्यांनी म्हटले होते की, दुहेरी मतदारसंघातील एकाच उमेदवाराला दोन मते टाकण्याविषयी प्रचार झाल्यामुळे त्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून त्या निवडणुका रद्द ठरवाव्यात. त्या अर्जाविरुद्ध डांगे, देशमुख, डॉ. गांधी, नारायणराव काजरोळकर इत्यादी प्रतिपक्षी होते. १९५२ सालच्या ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक आयोगापुढे अर्जाची सुनावणी झाली. डॉ. आंबेडकर स्वत: आपली बाजू मांडताना म्हणाले, ‘मते कुजविण्यासाठी केलेला प्रचार अवैध होता. अशा तऱ्हेने मतदारांच्या मनामध्ये जातीय भावना चेतविणे हे कायद्याला विकृत स्वरूप दिल्यासारखे आहे.’ तथापि डॉ. आंबेडकर व अशोक मेहता यांचा अर्ज आयोगाने फेटाळला.

*मुंबईतून डॉ.आंबेडकर राज्यसभेवर निवडले गेले*
१९५२ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. आंबेडकर राज्यसभेवर निवडले गेले ते मुंबई विधानसभेतून. १९५२ च्या लोकसभा निवडणुकीत शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस पां. न. राजभोज यांना सोलापूर जिल्ह्य़ात विजय मिळाला, तो शे. का. फेडरेशन आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या युतीमुळे. बापूसाहेब राजभोज यांनी लोकसभेतील आपल्या जागेचा राजीनामा द्यावा आणि डॉ. आंबेडकरांना पोटनिवडणूक लढवून लोकसभेत जाण्याचा मार्ग खुला ठेवावा, असे डॉ. आंबेडकरांच्या निकटवर्तीयांपैकी काहींना वाटत होते, पण डॉ. आंबेडकरांना ही सूचना पसंत पडली नाही. म्हणून त्यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. १९५२ साली राज्यसभेच्या निवडणुका मुक्त वातावरणात होत. आजच्यासारखी ‘धनशक्ती’ तेव्हा नसे.मुंबई विधानसभेच्या आमदारांनी १९५२ च्या मार्चमध्ये राज्यसभेसाठी १७ खासदार निवडून दिले. त्या वेळी मुंबई प्रांताची विधानसभा ३१५ आमदारांची होती, त्यात काँग्रेसचे २७०, शेतकरी कामगार पक्षाचे १४, समाजवादी पक्षाचे ८, कामगार किसान पक्षाचे ३, तर गुजरातमधल्या ‘खेडूत लोकपक्षा’चा, कम्युनिस्ट पक्षाचा आणि डॉ. आंबेडकरांच्या शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनचा प्रत्येकी एक शे. का. फे.चे बी. सी. कांबळे निवडून आले होते. आणि अपक्ष १७ असे बलाबल होते. निवडून येण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीची १८ मते मिळविणे आवश्यक होते. समाजवादी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्याबरोबर शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशनने आधी निवडणूक समझोता केला होताच. कामगार किसान पक्षाचे दोन आमदार दत्ता देशमुख आणि बॅ. व्ही. एन. पाटील यांनीही डॉ. आंबेडकरांना मते दिल्यामुळे राज्यसभेची निवडणूक डॉ. आंबेडकरांना सहज जिंकता आली. दत्ता देशमुखांकडून २९ मार्चला आलेल्या अभिनंदन पत्राचे उत्तर पाठविताना डॉ. आंबेडकरांनी राज्यसभा निवडणुकीतील पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र तो पाठिंबा मिळविण्यासाठी किंवा तो दत्ता देशमुखांनी दिला म्हणून आधीच्या मतभेदास डॉ. आंबेडकरांनी मुरड घातली नाही. त्यांनी आपल्या मूल्याधिष्ठित राजकारणाला कुठेच तडजोड केली नाही!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

मनसेचं इंजिन रुळावर आलंया...!

"महाराष्ट्रातलं राजकारण हे नेहमी दोन युती-आघाडी यांचं राहिलंय. पण गेल्या काही वर्षांत मनसेनं त्यात स्थान निर्माण केलंय. काँग्रेसचं प्रतिरूप म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अस्तित्वात आली अगदी तसंच शिवसेनेचं प्रतिरूप म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना अस्तित्वात आली. मनसेनं आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशिवाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, प्रबोधनकार ठाकरे यांचा वैचारिक आदर्श असल्याचं स्पष्ट केलं होतं. पण नंतरच्या काळात त्यांचं रुप बदललं आणि ती शिवसेनेसारखीच झाली. अस्सल उपलब्ध असताना नक्कल कोण स्वीकारील? याची जाणीव उशिरा का होईना ती झाली. रुळावरून घसरलेलं मनसेचं इंजिन आताशी रुळावर आलंय! मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा मुंबईला झाला, पाठोपाठ नांदेडला प्रभावी सभा झालीय, आता राज ठाकरे यांनी  सोलापूरकडे आगेकूच केलीय. प्रबोधनकारांचा नातू त्यांच्या विचारांचा पाईक होतोय! मनसे निवडणूक लढवीत नसल्यानं त्यांना यशापयशाची चिंता नाही. पण त्यांचा प्रभाव यावेळी कितपत होतोय हे पाहणं औत्सुक्याचं असेल!"
----------------------------------------------------
*शि* वाजी पार्कच्या विशाल मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याचा मेळावा संपन्न झाला. निवडणूक न लढविताही राजकीय वातावरणात हलकल्लोळ माजविता येतो हे राज ठाकरे यांनी दाखवून दिलंय! गेल्या लोकसभेच्या निवडणूकीत नरेंद्र मोदींवर स्तुतीसुमने उधळणार्‍या राज ठाकरे यांनी अकस्मात मोदी विरोधाचा झेंडा कशाला खांद्यावर घेतला? पारंपारिक भाजपाविरोधी पक्षापेक्षाही कडव्या भाषेत राज ठाकरे कशाला बोलत असतात? वरकरणी बघितले तर राजवर होणारी टिका पटणारी आहे. मध्यंतरी दोन वर्षापुर्वी पवार राज ठाकरे दोस्तीची सुरूवात झाली. पुण्यातल्या एका भव्य कार्यक्रमात राजनी शरद पवार यांची जाहिर मुलाखत घेतली आणि ती अनेक वाहिन्यांनी थेट प्रक्षेपणाने महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवली होती. त्यानंतर हळुहळू दोघांमधल्या ‘आस्थेचे’ विविध पैलू समोर येत गेले. मनसेच्या आरंभ काळात सुचक शब्दात राजवर टिका करणारे पवारही अकस्मात खुप बदलून गेले आहेत. त्यांची आपुलकी लपून राहिलेली नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व मनसे जवळ येणार, अशाही बातम्या होत्या. मग कॉग्रेसला मनसे नको असल्याच्याही बातम्या आल्या आणि अखेरीस राजनी १९ मार्चला मुंबईत आपल्या अनुयायांची सभा घेऊन लोकसभा लढवणार नसल्याची घोषणा करून टाकली. तसे बघायला गेल्यास दोन वर्षापुर्वीही त्यांनी घरगुती कारणासाठी महापालिका निवडणूका उपचार म्हणून लढवल्या होत्या. त्यामुळे यावेळी लोकसभा निवडणूकांकडे पाठ फ़िरवण्यात फ़ारशी मोठी बाब बघण्याचे कारण नाही. पण उमेदवार उभे न करणे, ही एक गोष्ट आहे आणि निवडणूकीपासून अलिप्त रहाणे, ही वेगळी गोष्ट आहे. राज यांनी लढणार नाही म्हटले, याचा अर्थ पक्षातर्फ़े उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण ते आणि त्यांच्या अनुयायांनी प्रत्यक्ष निवडणूकीकडे पाठ फ़िरवलेली नाही. ते लढतीमध्ये नक्की आहेत. ते कोणाच्या बाजूने आहेत, ते त्यांनी सांगायची गरज नाही. पण ते कोणाच्या विरोधात आहेत, त्याचा स्पष्ट खुलासा वा घोषणा त्यांनी केलेली आहे. त्यामध्ये काही सुचक राजकारण सामावले आहे काय? हे कालांतरानं स्पष्ट होईल.

*निरपेक्षवृत्तीनं राज यांनी घेतलेला निर्णय*
राज ठाकरे हा एकमेव नेता व त्याचा मनसे हा एकमेव पक्ष असा आहे, ज्याने कुठलीही जागा मागण्यापेक्षा निरपेक्ष वृत्तीने भाजपाला पराभूत करण्याचा विडा उचलला आहे. आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी नाही तर भाजपाचा उमेदवार पाडण्यासाठी राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. त्यामुळे संपुर्ण देशातील हा एकच नेता खराखुरा मोदी-शहांचा कट्टर विरोधक असल्याचे कोणालाही मान्य करावं लागेल. सर्वांनी एकत्र येऊन मोदी-शहांना पराभूत करावं, असं त्यांचं आवाहन जुनं आहे. पण ते साधलं नाहीतर आपल्या परीनं विरुद्ध काम करण्याची त्यांची तयारी पक्षस्वार्थ म्हणून चुकीची वाटू शकते. आपल्याला वरकरणी चुक वाटणारी अशी कृती खरोखर चुकीचीच असते का? पक्षाला कुठला लाभ नसलेल्या कृती वा भूमिकेतून काहीच साधत नसते का? असंच राजकारण करायचे तर लोकशाहीत पक्ष असून उपयोग काय? राजची ही भूमिका चुकीची ठरवणार्‍यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १९८० सालच्या निर्णयाचेही असंच वाटलं असतं. तेव्हाही त्यांनी लागोपाठच्या पराभवानंतर असाच चमत्कारीक वाटावा असा निर्णय घेतला घेतला होता आणि तेव्हा त्यांच्यावर कॉग्रेसची बटीक असा आरोप करणारे आज कॉग्रेस वाचवण्यात गर्क असतात. हे इथं लक्षांत घेतलं पाहिजे.

*राज यांच्या डावपेचाकडं दुर्लक्ष करणे गैर*
१९८० सालात मुंबईतही विधानसभा लढवण्याचे टाळलेली शिवसेना, १९९० सालात राज्यात कॉग्रेस समोरचे सर्वात मोठं आव्हान झालेलं होतं. राज ठाकरे यांनी आज अचानक निवडणूका न लढवता मोदी-शहांना पराभूत करण्याचा घेतलेला पवित्रा, म्हणूनच तडकाफ़डकी चुकीचा वा मुर्खपणाचा ठरवणे मला तरी योग्य वाटत नाही. अजून त्यामागचे तर्कशास्त्र राजनी स्पष्ट केलेले नाही, किंवा त्याला पुढल्या काळात कुठले वळण लागणार; त्याचाही अंदाज बांधता येत नाही. राजकारणावर भाष्य करणारे व विरंगुळ्याच्या गप्पा छाटणारे आणि प्रत्यक्षात राजकारणात जगणार्‍यांचे निकष वेगवेगळे असतात. पराभवात किंवा माघारीतही अनेकदा डावपेच सामावलेले असतात. आपण ते बघू शकत नाही, म्हणून त्याला मुर्खपणा वा चुकीचे ठरवणे मला योग्य वाटत नाही. राज ठाकरे ‘मनसे’ मोदी-शहांच्या विरोधातल्या इतक्या आवेशात कुठले राजकीय डावपेच असतील? नजिकच्या काळात त्याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न करणे मला योग्य वाटते. अर्थात प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. आज राजच्या या आवेशाकडे बघून असेही वाटते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे गुढीपाडव्यादिवशी झालेले भाषण ऐकणाऱ्या पाहणाऱ्या लोकांना कौतुक वाटल्याशिवाय राहिलं नाही. शिवसेनेचा दसरा मेळावा, विचारांचं सोने लुटायला या असे आवाहन करतो. त्याच धर्तीवर ‘विचारांची गुढी उभारायला या’ म्हणून राज ठाकरे यांनी मनसेचा मेळावा सुरू केला. मराठी नववर्षप्रारंभी, गुढीपाडव्याइतका औचित्यपूर्ण दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारख्या पक्षाच्या वार्षिक मेळाव्यासाठी दुसरा कुठला असू शकत नाही!

*मोदींच्या सभा, वक्तव्य आणि छबीचा उबग*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निवडणुकीच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांत जी दुर्दशा झाली आहे, ती सगळी गाठीशी बांधून राज ठाकरे यांचे राजकारण सुरू आहे. पाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करताना न थकणारे राज ठाकरे आता थेट नरेंद्र मोदी यांना राजकारणातून हद्दपार करण्याची भूमिका घेऊन मैदानात उतरले आहेत. स्वत:चा पक्ष लोकसभेची एकही जागा न लढवता ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत, आणि राज्यात आठ-दहा सभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांच्या सभांचा फायदा साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादीला होणार आहे. ज्या शहरी, महानगरी भागात काँग्रेस-राष्ट्रवादी कमकुवत आहे, तिथे नक्कीच राज ठाकरे यांच्या सभांचा त्यांना उपयोग होईल. मनसेचे जे समर्थक असतील त्यांच्यासह कुंपणावरच्या शहरी मतदारांना भाजप-शिवसेनेच्या विरोधात पर्यायाने काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे ढकलण्यास राज ठाकरे यांच्या सभा महत्त्वपूर्ण ठरू शकतील. आजच्या घडीला राज ठाकरे यांच्याइतका प्रभावी वक्ता महाराष्ट्रात दुसरा कुणी नाही, किंबहुना राजकीय वारे फिरवण्याची ताकदही कुणा नेत्याकडे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदर्भातील सभांचा अनुभव पाहता त्यांच्याबद्दलचे कुतूहल संपले आहे आणि टीव्हीवर, सिनेमाच्या आधी, रस्त्यावरच्या होर्डिंगमधून सतत त्यांचा चेहरा पाहून सामान्य माणसांना उबग आला आहे. त्यांच्या भाषणांमध्येही नाविन्य राहिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका सुरातील भाषणही ऐकायला त्रासदायक वाटते. एकूण काय तर राज ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव पुसून टाकील असा वक्ता भाजप-शिवसेना युतीकडे नाही. त्याचा निश्चित फायदा काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो.

*राज यांचं आजवरचं सर्वोत्तम भाषण*
मनसेच्या राज ठाकरे यांनी यापूर्वी अनेक भाषणे केली आहेत. गेल्या पंधरवड्यात झालेलं राज ठाकरे यांचं भाषण त्यांच्या खास शैलीतलं होतं. त्याअर्थानं ते एक सुपरहिट म्हणता येईल असं भाषण होतं. राज ठाकरे यांच्या चाहत्यांना हवा असलेला सगळा मसाला त्या भाषणात होता. त्या तुलनेत परवाच्या शिवाजी पार्क मैदानावरच्या भाषणानं राज यांच्या चाहत्यांची थोडी निराशा झालेली असू शकते. परंतु त्यापलीकडं जाऊन भाषणाचा जो कंटेंट होता, तो निवडणूक काळातल्या भाषणातला सर्वोत्तम म्हणता येईल असा होता. वैशिष्ट्य म्हणजे राज यांनी या संपूर्ण भाषणात विनोद, टवाळी, नकला हे सगळं टाळून भाषणाचं गांभीर्य वाढवलं. एखादी गंभीर गोष्ट लोकांच्या मनावर बिंबवायची तर ती सांगणाऱ्यानंही गांभीर्य पाळायला हवं, ते राज यांनी पाळलं. महाराष्ट्राच्या राजकीय पर्यावरणात गेल्या अनेक वर्षांत एवढं मुद्देसूद आणि प्रभावी भाषण ऐकण्यात आलेलं नाही. कोथळा काढू, वाघाचे दात मोजू, मर्दाची अवलाद असले शब्द वापरून भाषण प्रभावी होत नाही. किंवा विरोधकांवर पातळी सोडून टीका केली म्हणूनही भाषण संस्मरणीय ठरत नाही. त्यासाठी मूळ भाषणांचा आशय चांगला असावा लागतो. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये तो होता म्हणूनच एक गांभीर्यपूर्वक केलेल्या भाषणाची दखल घेतली गेलीय!

*काँग्रेसला सत्ता गेल्यानंतर वैराग्यावस्था*
केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या पाच वर्षांच्या कारभाराचा मोजक्या उदाहरणांसह पंचनामा राज ठाकरे यांनी केला. भाषणांसोबत सादरीकरण केल्यामुळं त्या केवळ वाऱ्यावरच्या बाता ठरल्या नाहीत. कामगिरीच्या संदर्भात सरकार किती थापा मारतंय, खोट्या जाहिराती करतंय आणि् लोकांची लुबाडणूक करतंय हे राज यांनी पुराव्यांसह मांडलं. खरंतर काँग्रेसच्या केंद्रीय प्रचार यंत्रणेनं हे सगळं करायला हवं होतं. नरेंद्र मोदींची सत्तेवर येण्याआधीची भाषणं आणि नंतरची भाषणं, सत्तेवर येण्यासाठी दिलेली आश्वासनं आणि त्यांची आजची वस्तुस्थिती, पाच वर्षांपूर्वीची वक्तव्यं आणि आजची वक्तव्यं हा सगळा आयता मसाला उपलब्ध आहे. फक्त तो नेमका शोधून योग्य रितीनं मांडला तरी लोकांना वस्तुस्थिती समजू शकते. परंतु काँग्रेसवाल्यांकडं तेवढी अक्कल असण्याचं कारण नाही. सत्तेचा माज आणि सत्ता गेल्यानंतरची वैराग्यावस्था याच्या मधे काही असतं हे काँग्रेसवाल्यांना ठाऊकच नाही. त्यामुळं राहुल गांधी येतील, प्रियांका गांधी चमत्कार करतील अशा भिकारी मानसिकतेतच अजूनही ते आहेत. राज ठाकरे यांच्या करिश्म्याचा लाभ घेण्याची क्षमता तरी त्यांच्याकडं आहे का, याची शंका वाटल्यावाचून राहात नाही. नांदेडला ते जाणवलं आता सोलापूरला काय होतंय हे पाहावं लागेल. काँग्रेस वा वंचित आघाडी कितपत त्याचा फायदा कसा घेतील हे महत्वाचं आहे.

*महागठबंधनातही अहंकाराची गाठोडी*
देशभरात निर्माण झालेल्या आजच्या काळात, म्हणजे मोदी-शहा यांचा कारभार पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवते, ती म्हणजे राज ठाकरे यांच्याइतकी पोलिटिकल करेक्ट भूमिका देशात अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्याने घेतलेली नाही. सहा महिन्यांपूर्वी एकमेकांच्या हातात हात घालून ऐक्याचा देखावा करणारे सगळे नेते आपापल्या अहंकाराची गाठोडी घेऊन पांगले. काँग्रेसला दिल्लीत 'आप'शी युती करता येत नाही. ममता बॅनर्जी, मायावती-अखिलेश यांच्याशी जुळवून घेता आलं नाही. आणि निघालेत मोदी-शहांशी लढायला. हमखास हरणाऱ्या जागांवरही तडजोड करायला तयार नाहीत एवढा मस्तवालपणा आहे यांच्या अंगी. ज्या मायावतींचा लोकसभेत एकही खासदार नाही त्यांच्या अहंकाराला जगात तुलना नाही. शहाणा मानला जाणारा अखिलेश यादवही बुआजींच्या नादाने बहकला. तिकडं पाच वर्षे समन्वयाची भाषा बोलणारा लालूपुत्र तेजस्वी यादव कन्हैय्याकुमारसाठी एक जागा सोडायला तयार नाही आणि राहुल गांधीही त्यासंदर्भात चकार शब्द काढत नाहीत. यावरून या सगळ्यांची सत्तापिपासा आणि लायकी कळते. यांना आणखी पाच वर्षे विरोधात बसवायला पाहिजे आणि यांच्यातल्या पाच-पन्नासांना मोदी-शहांनी तुरुंगात टाकायला पाहिजे, असे कधीकधी वाटते ते यांचा हाच मस्तवालपणा पाहूनच! पण लोकशाही राष्ट्रात शक्य नाही; तोपर्यंत लोकजागरण करायला काय हरकत आहे? असा विचार ठाकरे यांचा दिसतोय.

*देशाला भविष्यात खूप मोठी किंमत चुकवावी लागेल*
प्राप्त परिस्थितीत या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार केला तर राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका आजच्या घडीची सर्वात महत्त्वाची भूमिका आहे. मोदी-शहा या जोडगोळीला सत्तेपासून लांब ठेवायला पाहिजे. काँग्रेस भ्रष्ट आहे, परंतु मोदी-शहांचा भाजप क्रिमिनल आहे. या दोन्हीपैकी एक निवडण्याचा पर्याय आहे. म्हणूनच राज ठाकरे यांची भूमिका योग्य ठरते. सगळ्या घटनात्मक संस्था मोडीत काढणारे मोदी-शहा हे लोकशाहीपुढचा धोका आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची संधी यावेळी दवडली तर भविष्यात देशाला फार मोठी किंमत चुकवावी लागेल. हे मतदारांच्या लक्षांत आणून द्यायला हवंय!

*मनसेची ही विधानसभेची बांधणी असावी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत नक्की उतरेल. त्यासाठीची बांधणी म्हणून लोकसभा प्रचाराकडे पाहावे लागेल. लोकसभा निवडणुकीत वातावरण निर्मिती केल्यानंतर त्यांना विधानसभेसाठी पक्षबांधणी करावी लागेल. विधानसभेच्या आधी त्याअनुषंगाने पुरेशी तयारी करावी लागेल. याचा अर्थ पुढचे सहा महिने खूप राबावे लागेल. पदाधिकाऱ्यांना पळवावे लागेल. जबाबदार माणसे निवडून त्यांच्याकडे जबाबदाऱ्यांचे वाटप करावे लागेल. कारण ही  शेवटची संधी असेल. यावेळी त्यांनी ढिलाई दाखवली, वेळ वाया घालवला, संघटना बांधणीकडे दुर्लक्ष केले, वर्तनव्यवहारात गांभीर्य राखले नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांचे देव कायमचे उठतील. आज पक्षातला नेता त्यांना सोडून जातोय. मुंबईतील नगरसेवक, पाठोपाठ एकुलता एक आमदारही गेलाय. हे इथं नमूद करायला हवंय!

*प्रश्न बदलले, आता भूमिका बदलावी लागेल*
राजकीय विश्लेषकांच्या दृष्टीनं  राज ठाकरे यांच्या भूमिकेशी सहमत असण्याचा. त्यांनी लोकसभा निवडणुकीत घेतलेल्या भूमिकेशी कुणीही लोकशाहीप्रेमी माणूस सहमत होईल. परंतु व्यापक महत्त्वाचे विषय येतील तेव्हा त्यांची भूमिका तपासून घ्यावी लागेल. आरक्षणाचा प्रश्न, पपरप्रांतीय कष्टकऱ्यांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांचे प्रश्न, काश्मीरचा प्रश्न, अट्रोसिटीचा प्रश्न, दलित-आदिवासी-महिलांचे प्रश्न यासंदर्भातील पेच त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीचे जेवढे सुलभीकरण ते करतात तसे ते नसते. अर्थात राज ठाकरे यांनी ट्रॅक बदलला आहे. आताच्या घडीला ते योग्य ट्रॅकवर आहेत. अशाच प्रकारे  इतर प्रश्नांच्याबाबतही ते व्यापक भूमिका घेतील आणि त्यांचे रेल्वे इंजिन योग्य ट्रॅकवरून गतीने धावेल अन्यथा मागील पानावरून पुढं असं झालं तर मात्र मनसेला फारसं यश विधानसभेत मिळणं अवघड वाटतं.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

Monday 8 April 2019

•मताधिकाराचा 'अनसंग हिरो' सुकुमार सेन• *अशी झाली पहिली निवडणूक!*


"२५ ऑक्टोबर १९५१ रोजी जे पहिलं मत टाकलं गेलं ते हिमाचल प्रदेशच्या चिनी या तहसीलमध्ये. पहिले मतदार आजही हयात आहेत. ती भारताच्या नव्या युगाची सुरुवात ठरली! स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्तानं लोकांच्या मनांत काँग्रेस पक्षाचं गारुड होतं. त्यामुळं काँग्रेसनं ३६४ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवलं. त्या खालोखाल कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सोशालिस्ट पार्टीला १२, आचार्य जे.बी.कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीला ९, हिंदू महासभेला ४, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाला ३, रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टीला ३, आणि शेड्युल कास्ट फेडरेशनला २ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ४कोटी ७६ लाख ६५ हजार ९५१ म्हणजेच ४४.९९ टक्के मतं मिळाली. त्यावेळी एका मतदारसंघात एकाहून अधिक जागा असत. म्हणून ४८९ जागांसाठी ४०१ मतदारसंघात निवडणूक झाली. ही व्यवस्था १९६० मध्ये संपुष्टात आली. एक सदस्यीय ३१४ मतदारसंघ होते. ८६ मतदारसंघ द्विसदस्यीय तर १ मतदारसंघ ३ सदस्यांचा होता. दोन सदस्य अँग्लो इंडियनमधून नियुक्त केले गेले होते."
--------------------------------------------------
*सु* कुमार सेन....!
नांव तसं तुम्हाला ओळखीचं वाटेल, एखाद्या बंगाली चित्रपटातील अभिनेत्याचं वा राजकीय नेत्याचं आहे वाटेल. मी त्यांची काही माहिती तुम्हाला देतोय असं वाटलं ना! पण नाही...! स्वतंत्र भारताच्या जडणघडणीत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या दिग्गजांनी आपल्या प्रतिभेनं देशसेवा केली. अनेकांसाठी ती प्रेरणास्थानं होती! पण त्यांची अशी काही खास दखल घेतली गेली नाही, याची खंत वाटते. अशाच अनेक दिग्गजांमध्ये एक नांव आहे..….सुकुमार सेन! स्वातंत्र्यानंतरच्या काळात सार्वभौम देशातली पहिली निवडणूक घडविण्याचं शिवधनुष्य पेललं ते भारताचे पहिले निवडणूक आयुक्त 'अनसंग हिरो' सुकुमार सेन यांनी! सध्या देशभरात सार्वत्रिक निवडणुकांचा माहोल आहे. साहजिकच आपल्या मनांत प्रश्न उभा राहील की, पहिली निवडणूक कशी झाली असेल? त्याचं आयोजन, नियोजन, अंमलबजावणी कशी पार पडली असेल? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकच आहे ते म्हणजे...सुकुमार सेन यांच्या दूरदृष्टीचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपार मेहनतीचं !

*नेहरूंचं लक्ष सुकुमार सेन यांच्याकडं होतं*
सुविख्यात इतिहासतज्ज्ञ आणि राज्यशास्त्राचे तज्ज्ञ डॉ. रामचंद्र गुहा यांनी स्वतंत्र भारतातील पहिली निवडणूक कशी झाली याविषयी एक संशोधकात्मक लेख लिहिलाय; त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारताच्या इतिहासात कुण्या अधिकाऱ्यानं सुकुमार सेन इतकं परिश्रमपूर्वक यशस्वी कार्य सफलतापूर्वक सरकारी सेवा पार पाडली नसेल. स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे देशभरात लोकसभेच्या निवडणुका घेऊन प्रधानमंत्री बनण्यासाठी आतुर होते. आणि ते स्वाभाविकही होतं. त्यावेळी त्यांचं लक्ष सुकुमार सेन यांच्याकडं आकर्षिलं गेलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. स्वातंत्र्यापूर्वी १९४७ मध्येच ब्रिटिशांनी सुकुमार सेन यांची पश्चिम बंगालच्या चीफ सेक्रेटरीपदी नियुक्ती केली होती. इंडियन सिव्हिल सर्व्हिसमधील ते एकमात्र असे अधिकारी होते जे अशा अत्युच्च पदावर नेमले गेले होते. प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता आणि युनिव्हर्सिटी ऑफ लंडन इथं शिक्षण घेतलेल्या सुकुमार सेन यांच्याकडे नेहरूंनी ही जबाबदारी सोपविली की, तुमच्याच नजरेखाली देशाच्या पहिल्या  लोकसभेच्या निवडणुका होतील यासाठी कामाला सुरुवात करा! नेहरूंनी हा जो विश्वास सेन यांच्याविषयी व्यक्त केला होता तो पुढं जाऊन त्यांनी सार्थ ठरवला. पाकिस्तानशी युद्ध करताना फिल्डमार्शल माणेकशा यांना तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी जसा विश्वास व्यक्त केला होता अगदी तस्साच विश्वास नेहरूंनी सेन यांच्या कार्यकर्तृत्वावर दाखवला होता.

*अतिदुर्गम, रानोमाळ भटकून यादी तयार केली*
खऱ्या अर्थानं भारतासारख्या खंडप्राय देशातल्या निवडणुका या जगाला आदर्शवत आणि मार्गदर्शक ठरतील अशा व्हायला हव्यात अशी नेहरूंची अपेक्षा होती. त्यांना त्यातून जगभरातून कौतुक व्हावं अशी अपेक्षा नव्हती. पण या निवडणूका लोकशाहीचा आदर्श निर्माण करणाऱ्या व्हायला हव्यात, असं त्यांचं म्हणणं होतं. नेहरूंनी सुकुमार सेन यांना बोलावून घेऊन देशातल्या या पहिल्या निवडणुकीबाबतचं गांभीर्य आणि महत्व स्पष्ट करून सूचना दिल्या. तुम्ही या सार्वत्रिक निवडणुका यशस्वीरीत्या पार पडतील यावर लक्ष केंद्रित करा. त्याकडं आम्हाला लक्ष घालायला लागू नये. म्हणजेच आम्ही देशाची राज्यघटना तयार करण्याच्या कामात झोकून देऊन त्याच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील राहू. त्यानंतर सुकुमार सेन यांनी या कामातलं गांभीर्य लक्षांत घेऊन दोन प्रादेशिक निवडणूक आयुक्त आणि प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयुक्त यांची नेमणूक करून एक स्वतंत्र टीम उभी केली. तब्बल तीन वर्षे स्वतः भारतभर फिरून प्रत्येक राज्यातील माहिती त्यांनी संकलित केली. या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एवढ्या मोठ्या देशातील लोकसंख्याप्रमाणे नोंदी करायचं महत्वपुर्ण आणि जोखमीचं काम आरंभलं. वयाची २१ वर्षे पूर्ण झालेल्या १७.६ कोटी मतदारांची यादी त्यांनी तयार केली. इथं ही बाब लक्षांत घ्यायला हवी की त्यापूर्वी किती मतदार असतील याची संख्या, नावं की यादी अशी काहीच माहिती उपलब्ध नव्हती. लोकशाहीचा अश्वमेघ यज्ञ आरंभलेल्या निवडणूक आयोगानं भारतातल्या अगदी दुर्गम, अतिदुर्गम भागाचा शोध घेऊन तिथं जाऊन तिथल्या मतदारांची नोंद करून त्यांच्या याद्या बनवल्या. जिथल्या लोकांना आपलं नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी ना तेव्हा टेलिफोनची सुविधा होती ना डिजिटल सिस्टिमची. गावोगाव, रानोमाळी फिरून हे अशक्यप्राय गोष्ट त्यावेळी त्यांनी यशस्वी करून दाखवली.

*२८लाख महिला मतदानापासून वंचित राहिल्या*
यातून एक गोष्ट बाहेर आली की, देशातील ८५ टक्के लोक निरक्षर होते.  त्यांना ना लिहायला येत होतं ना वाचायला. मोलमजुरी करण्याशिवाय महिला त्याकाळी बाहेरच पडत नव्हत्या. त्यामुळं २८ लाख महिला मतदारांनी मतदान करणं टाळलं होतं. त्याकाळी ग्रामीण भागात महिला तिचं स्वतःचं नाव सांगण्याऐवजी मुलाचं नाव सांगत त्याची आई वा पतीचं नाव सांगत त्यांची पत्नी असं सांगून आपली ओळख देत होती. पुरुषांनी आपल्या पत्नीला अशी कडक सूचना दिल्या होत्या की, निवडणूक अधिकाऱ्यांसमोर आपलं स्वतःचं नाव सांगायचं नाही. मग भले तुम्हाला मताधिकार मिळो वा न मिळो. सुकुमार सेन यांनी अशा परिस्थितीत त्यावेळी या विवादास्पद बाबीवर निर्णय घेऊन २८ लाख महिला मतदारांना मताधिकारापासून वंचित ठेवलं होतं. असा निर्णय घेण्यामागे सुकुमार सेन यांचा क्रांतिकारक दृष्टिकोन होता. त्यांनी सरकारसमोर आपली भूमिका स्पष्ट केली होती की, महिलांना मताधिकारापासून वंचित ठेवल्यानं देशात आणि समाजात याविरोधात चर्चा होईल, टीकाटिपण्णी होईल, आंदोलने होतील. महिलांमध्ये आपल्या मताधिकाराबाबत जागरूकता निर्माण होईल. मग महिलाच आपल्या मताधिकाराबाबत मागणी करतील, त्या मागण्या या त्यांच्या कर्तव्यासमान ठरतील. सुकुमार सेन यांचा हा दृष्टिकोन खरा ठरला. १९५७ च्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशातल्या महिला संघटनांनी हाच मुद्दा हाती घेतला, आंदोलन झालं. त्यानंतर देशातल्या दुर्गम, अतिदुर्गम भागातील, मागासवर्गीय, आदिवासी महिलांमध्ये मताधिकाराची जागृती झाली. त्यांनी निवडणूक कार्यालयासमोर रांगा लावून आपली नावं स्वतः उच्चारून ती नोंदवून घेतली. तो काळ असा होता की, जगातल्या अनेक सुशिक्षित, सुधारित देशांमधल्या महिलांना मताधिकारापासून वंचित ठेवण्यात आलं होतं. पण भारतात तो अधिकार महिलांना सेन यांनी मिळवून दिला होता. सामाजिक क्रांती करणाऱ्या नेत्यांमध्ये सेन यांचं नाव घ्यावं अशी ती कामगिरी सुकुमार सेन यांची आहे.

*जगातल्या मोठ्या लोकशाही राष्ट्राची निवडणूक*
आज हा भारताचा लोकशाहीचा उत्सव हा जगात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरलेला आहे, असं काही नाही तर १९५२ मध्ये झालेली १७.६ मतदारांची ती निवडणूक देखील जगासाठी अनोखी होती. जगातली ती सर्वात मोठी निवडणूक होती. अमेरिका आणि युरोपीय देशाची लोकसंख्या, मतदारसंख्या ही भारताच्या एक तृतीयांश होती. ते भारतापेक्षा शिक्षित आणि आर्थिक साधन-संपत्तीने परिपूर्ण होते. तर भारतातली ८५ टक्के लोक निरक्षर, अशिक्षित होते. त्यामुळं निवडणुकीसाठी शिक्षित कर्मचारी उपलब्ध होणं, त्यांना प्रशिक्षित करणं हे एक मोठं दिव्य होतं. ते भारतानं पार पाडलं. निवडणुकीसाठीचं त्याकाळी कोणतीही टेक्नॉलॉजी नव्हती. निवडणूक चिन्हे, जागृती साहित्य या साऱ्या बाबी हातानेच रेखाटाव्या लागत होत्या.

*लष्कराच्या मदतीनं मतदान घडवलं गेलं*
१७.६ कोटी मतदारांची नावं, वय आणि मतदान केंद्र याबाबतची स्लीप सुरुवातीला हातानेच लिहायला लागत.  त्यानंतर टाईपरायटरने त्या तयार केल्या जात. त्या स्लीपा मग १७.६ कोटी मतदारांना वितरित केल्या. मोठ्या प्रमाणात मतदान व्हावं यासाठी सेन आग्रही होते. भारतात अशी काही गावं होती की जिथं दळणवळणाची साधनं नव्हती. अशी अनेक गावं होती की, जी नदीच्या पलीकडे वसलेली होती, नाहीतर दोन डोंगराच्या मध्ये वसलेली गावं होती. या गावात जाण्यासाठी पूल नव्हते. अशाप्रकारची दहा लाख चौरस मैल विस्तारलेली भागात लष्कराच्या मदतीनं कामचलाऊ पूल बांधण्यात आली, तर काही ठिकाणी झुलता पूल बांधले. नदीचा प्रवाह मध्ये येत असेल तर नौसेना आणि स्वयंसेवी संघटनांच्या मदतीनं तराफा, होडी आणि बोटमध्ये बसवून आणून मतदान करायला लावलं होतं. ज्यांना दररोज नदी पोहून पार करावी लागत असे, त्यांना मगच इतरांशी त्यांचा संबंध येई. व्यवहार करता येई. अशी हजारो मतदार मतदानाच्या दिवशी अशाप्रकारे जाता येतं याचा अनुभव प्रथमच घेत होती. जरा डोळे बंद करून ते चित्र डोळ्यासमोर आणा.... रोमांच अनुभवाल!

*१५ एप्रिल १९५२ ला नेहरूंचा शपथविधी*
या पहिल्या मतदानावर देखरेख करण्यासाठी ५६ हजार प्रिसाईडिंग ऑफिसर्स आणि २ लाख ८० हजार कर्मचारी ड्युटीवर होते. एवढ्याच संख्येनं देशभरात पोलीस कर्मचाऱ्यांचा खडा पहारा होता. अमेरिकेहून खास या मतदान प्रक्रियेचं निरीक्षण करण्यासाठी आलेल्या टीनकर आणि वॉकर सारखे प्रवासी इतिहासकार देखील सुकुमार सेन यांच्या या कामगिरीनं आश्चर्यचकित झाले. सुकुमार सेन यांच्या टीमने यासाठी ब्रिटिश सिस्टीमचा आधार घेतला होता. भारतातील पहिली लोकसभेची निवडणूक २५ ऑक्टोबर १९५१ पासून २१ फेब्रुवारी १९५२ पर्यंत चालली होती. त्यावेळी भारताची लोकसंख्या ३६ कोटी होती. तर १७ कोटी ६० लाख मतदारांपैकी ४५.७ टक्के मतदान झालं होतं. नेहरूंना प्रथमच प्रधानमंत्री म्हणून लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी शपथ दिली होती. जेव्हा स्वतंत्र भारतातील पहिल्या निवडणुका झाल्या त्यानंतर पंडित नेहरूंनी १५ एप्रिल १९५२ रोजी राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद द्वारा प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतली.

*सेन यांचा पद्मभूषण पुरस्कारानं गौरव*
सुकुमार सेन यांनीच १९५७ साली दुसऱ्या लोकसभेच्या निवडणूक आयुक्त म्हणून काम केलं. २ जानेवारी १८९८ मध्ये जन्मलेल्या सुकुमार सेन वयाच्या ६३व्या वर्षी १९६१ मध्ये त्यांचं  निधन झालं. १९५६ मध्ये सुदान स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आल्यानंतर नेहरूंच्या विनंतीवरून सेन यांनी तिथं जाऊन तिथल्या निवडणुका पार पाडल्या. भारत सरकारनं जेव्हा पद्म पुरस्कार द्यायला सुरुवात केली त्यावेळी पहिल्या यादीत सेन यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. १५ ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर या सार्वभौम राष्ट्रातील निवडणुका कशा घेतली जातील? त्याची रचना कशी असेल? हे एक मोठं आव्हान होतं. ते स्वीकारलं भारतीय नागरी सेवेतील अधिकारी सुकुमार सेन यांनी! त्यांच्या प्रयत्नानं भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ते भारताचे पहिल्या निवडणूक आयोगाने आयुक्त होते. ज्यांच्यामुळे २५ ऑक्टोबर१९५१ ते २१ फेब्रुवारी १९५२ या दरम्यान तब्बल चार महिने ही निवडणूक प्रक्रिया सुरू होती. या प्रक्रियेनं भारताला एका वेगळ्या वळणावर आणून उभं केलं. भारत हा इंग्रजांकडून लुटला गेलेला पिचला गेलेला आणि अशिक्षित असा देश होता. पण निवडणुकीच्या माध्यमातून स्वतःला जगातल्या लोकशाही राष्ट्राच्या सोबत सन्मानानं उभं केलं होतं.

*तीन वर्षे तयारी, चार महिने मतदान!*
२५ ऑक्टोबर १९५१ रोजी जे पहिलं मत टाकलं गेलं ते हिमाचल प्रदेशच्या चिनी या तहसीलमध्ये. पहिले मतदार आजही हयात आहेत. ती भारताच्या नव्या युगाची सुरुवात ठरली! स्वातंत्र्यलढ्याच्या निमित्तानं लोकांच्या मनांत काँग्रेस पक्षाचं गारुड होतं. त्यामुळं काँग्रेसनं ३६४ जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळालं. त्या खालोखाल कम्युनिस्ट पक्षाला १६ जागा मिळाल्या होत्या. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया यांच्या सोशालिस्ट पार्टीला १२, आचार्य जे.बी.कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीला ९, हिंदू महासभेला ४, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाला ३, रिव्हॉल्युशनरी सोशालिस्ट पार्टीला ३, आणि शेड्युल कास्ट फेडरेशनला २ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसला ४कोटी ७६ लाख ६५ हजार ९५१ म्हणजेच ४४.९९ टक्के मतं मिळाली. त्यावेळी एका मतदारसंघात एकाहून अधिक जागा असत. म्हणून ४८९ जागांसाठी ४०१ मतदारसंघात निवडणूक झाली. ही व्यवस्था १९६० मध्ये संपुष्टात आली. एक सदस्यीय ३१४ मतदारसंघ होते. ८६ मतदारसंघ द्विसदस्यीय तर १ मतदारसंघ ३ सदस्यांचा होता. दोन सदस्य अँग्लो इंडियनमधून नियुक्त केले गेले होते.

*प्रत्येक पक्षाची स्वतंत्र मतपेटी*
आज पहिल्या मतदानाची कल्पना केली तर ते कसे दिव्य होतं हे लक्षात येईल. निरक्षर मतदारांची संख्या पाहता पक्ष आणि उमेदवाराच्या निवडीसाठी चिन्हांची सोय करण्यात आली होती. पण तेव्हा मतपत्रिकेवर नांव, चिन्ह नव्हतं तर प्रत्येक राजकीय पक्षासाठी अलग अलग मतपेटी ठेवण्यात आली होती. त्यावर चिन्हं रेखांकित करण्यात आलं होतं. यासाठी लोखंडच्या२ कोटी १२ लाख मतपेट्या तयार केल्या होत्या आणि ६२ कोटी मतपत्रिका छापल्या होत्या. सुकुमार सेन यांच्या नियंत्रणामुळे १९५७ साली झालेल्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी साडेचार कोटी रुपयांहून कमी खर्च झाला होता, हे इथं महत्वाचं! पहिली निवडणूक ४९७ लोकसभेच्या तर राज्य विधानसभेच्या ३ हजार २८३ जागांसाठी झाली.


चौकट.....
*शंभरी पार केलेला देशातला पहिला मतदार!*
देशातील १७व्या लोकसभा निवडणुक होते आहे. त्याचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. यंदा लोकशाहीचा उत्सवामध्ये ९० कोटी लोक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. परंतु १९५२ साली पहिल्या निवडणुकीत देशाच्या इतिहासामध्ये नोंद झालेल्या पहिल्या मतदाराचे नाव आहे 'श्याम शरण नेगी!' देशाच्या इतर भागांमध्ये फेब्रुवारी १९५२ ला मतदान झाले, परंतु हिमाचलमध्ये ऑक्टोबर १९५१ ला मतदान प्रक्रिया पार पडली होती. बर्फवृष्टी आणि खराब वातावरणामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये येथे पोहोचणे शक्य नव्हते म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता. स्वातंत्र्यानंतर लोकशाहीचा पहिलाच उत्सव असल्याने मतदानासाठी गर्दी झाली होती. मदतानाच्या दिवशी २५ ऑक्टोबर १९५१ रोजी किन्नौर जिल्ह्यातील आल्पा गावामध्ये पहिल्या मताची नोंद झाली. त्यावेळी ३३ वर्ष वयाचे श्याम शरण नेगी यांनी सकाळी सजूनधजून येत पहिले मत टाकले आणि त्यांची इतिहासामध्ये स्वतंत्र हिंदुस्थानातील ‘पहिला मतदार’ म्हणून नोंद झाली. आता श्याम शरम नेगी यांनी वयाची शंभरी पार केली आहे. १९१७ ला जन्मलेल्या नेगी यांनी नुकताच २ मार्चला त्यांनी आपला १०१ वा वाढदिवस साजरा केला. नेगी यांच्या नावावर सर्वात पहिले मतदार शिवाय सर्वात वयस्कर मतदार म्हणूनही नोंद झाली आहे. शंभरी पार केलेल्या नेगी यांनी आतापर्यंत १६ लोकसभा आणि १४ विधानसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. अशाप्रकारे त्यांनी एकूण ३० वेळा मतदान केले आहे. आता १०१ वय झालेले नेगी १७ व्या लोकसभा निवडणुकीमध्येही आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज आहेत. गेल्या वेळेस हिमाचलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी नेगी यांच्या स्वागतासाठी निवडणूक प्रशासनाने खास तयारी केली होती. यंदाही येथे काहीतरी वेगळे होण्याची शक्यताआहे.

- हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...