Sunday 16 September 2018

मूल्याधिष्ठित की, 'मूल्य'अधिष्ठित...!

भाजप आता आंतरबाह्य बदलला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसपक्ष जे काही करायचा ते सारं काही भाजपेयींनी अंगीकारलं आहे. आपण स्वीकारलेला 'केशरी' रंग त्यांनी कधीच टाकून दिला. शिवसेनेच्या संगतीनं केशरीचा रंग 'भगवा' करून टाकला हा बाह्यरंग शिवसेनेचा घेतला तसा अंतरंग काँग्रेसकडून घेतलाय. त्यामुळं भाजप आता 'भगवी काँग्रेस' बनलीय. जे जे काँग्रेस करीत होती ते ते भाजपेयी करताहेत. आपली मूल्याधिष्ठतेची भरजरी वस्त्र, कवचकुंडल भाजपेयींनी  उतरवली आहेत आणि बलाधिष्ठतेची वस्त्र परिधान केली आहेत. याचा अनुभव देशात सर्वत्र होतोय. देशाला दिशादर्शन करणारे राजकीय धुरंधर जनसंघी नेत्यांकडून पूर्वी_'मूल्याधिष्ठित राजकारणा'_ ची आस धरली जात होती. पण तेव्हाच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची जागा आता _'मूल्य'अधिष्ठित_ समाजसेवेनं घेतलीय, त्याच्या सोबतीला 'बाहुबली' देखील सज्ज झाले आहेत. त्यामुळं आजच्या राजकारणाची दिशाच बदलून गेलीय. वैचारिक तत्व, निष्ठा, जीवनमूल्य याला कोणतीच किंमत राहिलेली नाही. केवळ 'निवडून येण्याची क्षमता' एवढाच काय तो निकष उरलाय. त्यामुळं धनदांडगे, बाहुबली यांचीच चलती भाजपत निर्माण झालीय. हे सारं रोखायला हवंय. हिरवा देठ अद्यापी आहे म्हणणाऱ्या मंत्र्याला, प्रेमाला नकार देणाऱ्या मुलींना पळवून आणणारा आमदार, लिंग सरकलेला खासदार, शिवरायांचा उपमर्द करणारा नगरसेवक अशांना आवरायला हवंय, सावरायला हवंय...!"
------------------------------------------------
*दे* शात सार्वत्रिक निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सर्व राजकीय पक्षांनी भारतीयांना आपल्याकडं वळविण्याचे प्रयत्न चालविले आहेत. राष्ट्रीय राजकारणात समरसतेनं वावरणारे अटलबिहारी वाजपेयी यांचं नुकतंच निधन झालंय. त्यांचा वापर आता भाजपेयी निवडणुकीसाठी करताहेत. 'अटल विश्वास' अशी घोषणा झालीय. संघ-जनसंघ-भाजप या माध्यमातून मूल्याधिष्ठित राजकारण करणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भाजपचं _भगव्या काँग्रेस_ मध्ये झालेलं आजचं रूपांतर सुदैवानं पाहावं लागलं नाही. कारण त्याआधीच त्यांचा स्मृतिभ्रंश झाला! दुसऱ्याची मुलं कडेवर घेऊन सत्तेचा सोपान गाठण्याचा सत्ताकांक्षी भाजपेयींचं आजचं रूप त्यांना पाहावं लागलं नाही! मात्र त्यांचे सहकारी लालकृष्ण अडवाणी यांची जी अवस्था आताच्या भाजपेयींनी केलीय ती  समजलं नाही हे एका अर्थानं बरंच झालं म्हणावं लागेल. असं असलं तरी प्राप्त परिस्थितीत एकसंघ भाजपेयींशिवाय मतदारांकडे पर्याय नाही. सुदृढ, सशक्त आणि सक्षम विरोधीपक्षच उरलेला नाही. हे देशातल्या लोकांचं दुर्दैव म्हणावं लागेल! आज भारताला समर्थ-स्थिर अशा केंद्रीय सत्तेची आवश्यकता आहे. गलितगात्र, कुणाच्यातरी आधारानं, कसंबसं चालणारं सरकार केंद्रात आलं तर भारताला उध्वस्त करण्यासाठी टपून बसलेल्या पाकिस्तान-चीनला आणखी उन्माद चढेल!

*भारताला स्थिर-समर्थ-स्वाभिमानी सरकारची गरज*
आता सारं लक्ष २०१९ च्या निवडणुकांकडे लागलेलं आहे. प्रसिद्धीमाध्यमांची सर्व आयुधं वापरण्याच्या प्रयत्नांना प्रारंभ झालाय. भाजपेयींच्या हातात पुन्हा सत्ता जाणार नाही यासाठी विखुरलेल्या विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न चालवलाय. पण त्यांचे ते प्रयत्न राज्यसभेच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उघडे पडले. त्यामुळं भाजपेयींनी पुन्हा दिल्ली जिंकण्यासाठी कंबर कसलीय. आजतरी भाजप व्यतिरिक्त इतर कुठल्या पक्षाला एकहाती देशाची सत्ता मिळेल अशी स्थिती नाही. पण केंद्रात कुठल्याही एका पक्षाला सरकार बनविण्याएवढं यश मिळालं तर भारताच्या आणि भारतीयांच्या दृष्टीनं तो भाग्ययोगच म्हणायला हवा. भाजपनं बहुमत मिळवून केंद्रात सरकार बनवलं तर मी ती आनंदाची गोष्ट मानेन. कारण आज भारताला समर्थ-स्थिर अशा केंद्रीय सत्तेची आवश्यकता आहे. गलितगात्र, कुणाच्यातरी आधारानं, कसंबस चालणारं सरकार केंद्रात आलं तर भारताला उध्वस्त करण्यासाठी टपून बसलेल्या पाकिस्तान-चीनला आणखी उन्माद चढेल. अमेरिकेतल्या भारतद्वेष्ट्यांना भारताची अवहेलना करण्याचं आणखी अवसान चढलं. खतरनाक अतिरेकी चहुकडून उठाव करून भारतात हैदोस घालतील आणि भारताची एकात्मताचं नव्हे, स्वातंत्र्यही धोक्यात येईल. भारताला स्थिर-समर्थ-स्वाभिमानी सरकार हवं आहे. कडबोळी सरकार असं नेतृत्व देऊ शकेल असा विश्वास धरावा अशी परिस्थिती नाही.

*राष्ट्रधर्माच्या काही तत्वांचा पाठपुरावा आवश्यक*
भारतीय जनता पक्षाला असं सरकार देता येईल, जर सर्व भारतीयांना हा पक्ष आपली धोरणं पटवू शकेल. हा विश्वास धरावा अशी स्थिती नाही. दुर्दैवानं भाजप सत्तेच्या आकांक्षेपायी, या धांदल-गडबडीत लोकांपासून दूर जातो आहे. आपल्या विश्वासार्हतेला आपल्याच हातानं तोडुनफोडून फेकतो आहे. ज्यांना वर्गवादाच्या नावाखाली इथं धंगेधोपे पेटवून समाजाला कायमचं पंगू बनवायचं आहे, त्यांच्या हातात सत्तेचं शस्त्र देण्याचं पाप भाजपनं केलं आहे. भारताच्या अनेक राज्यात भाजपेयींनी सत्ता मिळवलीय. यातली अनेक मंडळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात मुरलेली, व्यक्तीपेक्षा संघटना मानणारी, जातीजमातीच्या कोंडाळ्यात न गुंतता हिंदुत्व-बंधुत्व मानणारी, समरसतेनं रसरसलेली असावीत अशी भारतीयांची अपेक्षा आहे. पण काँग्रेसवाल्यांपेक्षाही घाणेरडा लोभ या मंडळींनी अगदी चव्हाट्यावर येऊन मांडला. इथं पैसे उदंड प्रभावी ठरला.  'शिस्तबद्ध'त्वाची नांगी द्वेषाचा विखार नाचवत आजही दिमाखानं मिरवते आहे. महाराष्ट्रात शिवसेनेशी केलेली युती हाही एक सत्तेचा सौदा आहे. आज भाजप हा एक राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि शिवसेना ह्या राष्ट्रव्यापी पक्षाला अनेक प्रश्नावर आपल्यामागे फरफटत यायला लावलं आहे. शिवसेनेच्यासाथीनं मतं मिळतात म्हणून त्यांनी मारलेले कोरडेही सहन करण्याची सहनशीलता कांहींजणात दिसली तरी राष्ट्रीय प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना आणि राष्ट्रधर्म म्हणून काही तत्वांचा आग्रह धरणाऱ्या स्वयंसेवकांना ही गोष्ट शोभादायक वाटत नाही. आज तरी महाराष्ट्रातली ही युती लोढण्यासारखीच त्रासदायक ठरली आहे. 'सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही' अशी स्थिती झालीय.

*भाजपच्या युत्या आणि युक्त्या राष्ट्रीय ऐक्यासाठी नव्हत्या*
सत्तेसाठी काहीही करण्याची तयारी दाखविल्यानेच भाजपला लाभ झालाय. पण केंद्रीय सत्ता प्राप्त करून घेण्याच्या मार्गात त्यामुळं अडथळे वाढले आहेत. देश जोडण्याच्या, एक राष्ट्रीयत्वाची भावना जनमानसात समर्थ करण्याच्या, अखंड भारत घडवण्याच्या कामापेक्षा सत्ता, साऱ्या देशाबरोबरच काही राज्यांची सत्ता, भाजपेयींना अधिक मोलाची वाटतेय असे जाणवण्याइतपत भाजपतल्या काहींना सत्तेचा लोभ सुटलाय. घड्याळाचे काटेही त्यासाठी फिरवण्याचा प्रकार केला जातोय. भाजपनं केलेल्या युत्या आणि युक्त्या राष्ट्रीय ऐक्य वाढवणाऱ्या-राष्ट्रीयतेचे सामर्थ्य वाढवणाऱ्या नव्हत्या, फक्त कांहीं लोकांचे साधणाऱ्याच होत्या, असं भाजपमधल्याच अनेकांचं मत झालं आहे. त्यांनी उघड बंडाळी केलेली नाही, पण जे बोलू पाहताहेत त्यांना सहानुभती दाखवण्याचे, त्यांचा आवाज नेत्यांनी दुर्लक्षून चालणार नाही, असं बजावण्याचं काम त्यांनी निश्चित केलं आहे.

*धर्मसंघर्षाचं वातावरण निर्माण केलं जातंय*
अतिउत्साही, उद्धट अशा भाजपेयींनी देशांत गोहत्या, लवजिहाद या धर्तीवर पुढं जाऊन आणखी काही ज्या गर्जना होत आहेत, त्या भाजपला राष्ट्रीय पातळीवरून हटवणाऱ्या, भाजप हा सर्व भारतीयांना न्याय देऊ शकेल हा विश्वास संपवणाऱ्या आहेत. अखंड हिंदुस्थान करण्याचा मानस असणाऱ्यांना मुसलमानांशी या ना त्या कारणाने अखंड भांडण करून चालणार नाही. त्यांना मुसलमान नेत्यांनी जो विश्वास दिला त्याहून अधिक देण्याएवढे दिलदार, उदार व्हावं लागेल. याचा अर्थ लांगुलचालन करावं लागेल असा नाही. धर्म राजकारणात न आणण्याचे, धर्मसंघर्षाचे वातावरण निर्माण होईल असा हट्टाग्रह न धरण्याचे आणि वादाचे जे काही प्रश्न असतील त्यावर विवेकाने, विचाराने राष्ट्रीय हिताची दृष्टी ठेऊन तोडगा काढण्याचं काम अखंड हिंदुस्थान करू बघणाऱ्यांनाच करावं लागेल.

*भारतीय एकतेच्या घोषणा व्हायला हव्यात*
एकीकडं जागतिक राजकारणाच्या पटावर भारताला एकाकी पाडण्याचा आणि हतबल करण्याचा डाव मांडून धूर्त शेजारी राष्ट्र भारतीय नेतृत्वाला खेळवत आहे. सारी इस्लामी राष्ट्रे भारताच्या विरोधात जावीत आणि पश्चिमी राष्ट्रांनी भारताला आर्थिकदृष्ट्या उध्वस्त करावं असेही डावपेच आखले जाताहेत. अशावेळी अंतर्गत ऐक्याची, परस्पर विश्वासाची आणि सामंजस्याची भावना प्रबळ करणारे धोरण राष्ट्रीय म्हणवणाऱ्या पक्षाने निर्धारानं राबवलं पाहिजे. घोषणा केवळ हिंदू एकतेच्या नकोत. त्या भारतीय एकतेच्या हव्यात. केवळ संघर्ष करीत बसलो तर हा समाज एकत्र कसा येणार? सरकारनं सर्वांना बोलावून, समजावून सामंजस्याने रस्ता काढला पाहिजे. दररोज भांडणं, दंगे करून सामंजस्य वाढणार आहे का? आज ज्या तऱ्हेनं काही भाजपेयींची वाटचाल सुरू आहे, ती तऱ्हा आणखी विघटन करण्यास फूस देणारी आहे. आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणारी आहे.

*संघ राजकारणात नको तेवढा शिरल्याने प्रदूषण*
आज काही जुन्या जाणत्या संघीय, भाजपेयी नेत्यांना बाजूला केलं जातंय. भाजपची स्थापना होण्यापूर्वी नानाजी देशमुख यांनी राजकारण्यांनी ६० व्या वर्षीच राजकारणातून अंग काढून घ्यावं असं म्हटलं होतं. 'मरते दम तक संघका रहुंगा' अशी निष्ठा असलेल्या पण संघाच्या कार्यपद्धतीशी न पटल्यानं दूर झालेली, पण संघानं जो राष्ट्रवाद रुजवला तो राष्ट्रवाद साकारावा म्हणून निष्ठेनं व निर्धारानं स्वतःला एखाद्या राष्ट्रकार्यात अखंड गुंतवून घेणारी माणसं मी बघितली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नको एवढा राजकारणात आल्यानं संघातही अनेक प्रकारचे प्रदूषण शिरलं आहे. म्हणूनच संघाचं नाव घेत राजकीय स्वार्थ उपटण्याचा प्रकार घडतो आहे.

*नेत्यांची सुरक्षा यंत्रणा काढून घ्यायला हवीय*
देशातल्या आजच्या स्थितीला सत्ता राबवण्याची कुवत नसणाऱ्या नेतेच जबाबदार आहेत. त्यांनी लोकांच्या नको त्या भावना नको तशा चाळवल्या आणि आपली सातत्यानं फसवणूक, अडवणूक होत आहे हे बघून अतिरेकी मार्ग पत्करण्याची लोकांवर वेळ आली. स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहून उन्माद वाढवणारी वक्तव्य करायची, लोकांचा प्रक्षोभ वाढवायचा, भयाची लाट उठवायची हा प्रकार देशात वाढतो आहे. सर्वसामान्य माणूस नानाप्रकारच्या अत्याचारांनी भरडला जातोय. स्त्रियांवर बलात्कार होताहेत. छोट्या बाल्कनाही विकृत वासनांना बळी पडावं लागत आहे. ज्याचा व्यापारधंदा आहे, ज्याच्याजवळ अब्रू आणि प्रतिष्ठा आहे, ज्याच्याजवळ थोडाफार पैसा आहे अशांना नाडून-धमकावून-दहशतीनं दडपून आपलं साधणाऱ्यांच्या टोळ्या समाजात वाढल्या आहेत. त्याचा वापर सत्ता राबवू बघणारे आणि मिळवू बघणारे दोघेही करत आहेत. लोकांना लांडग्यांच्या पुढ्यात टाकून स्वतः कडेकोट सुरक्षेत राहणाऱ्या नेत्यांना-राजकारण्यांना-लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्यांना खरं तर शरम वाटायला हवी. आज जेवढी मोठी सुरक्षा यंत्रणा तेवढी नेत्यांची प्रतिष्ठा असं समीकरण बनलंय. ही सुरक्षायंत्रणा पूर्णपणे काढून घेतली पाहिजे.

*भाजपेयींची बलाब्धिष्ठतेकडे वाटचाल!*
भाजप आता आंतरबाह्य बदलला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसपक्ष जे काही करायचा ते सारं काही भाजपेयींनी अंगीकारलं आहे. आपण स्वीकारलेला 'केशरी' रंग त्यांनी कधीच टाकून दिला. शिवसेनेच्या संगतीनं केशरीचा रंग 'भगवा' करून टाकला हा बाह्यरंग शिवसेनेचा घेतला तसा अंतरंग काँग्रेसकडून घेतलाय. त्यामुळं भाजप आता 'भगवी काँग्रेस' बनलीय. जे जे काँग्रेस करीत होती ते ते भाजपेयी करताहेत. आपली मूल्याधिष्ठतेची भरजरी वस्त्र, कवचकुंडल भाजपेयींनी  उतरवली आहेत आणि बलाधिष्ठतेची वस्त्र परिधान केली आहेत. याचा अनुभव देशात सर्वत्र होतोय. देशाला दिशादर्शन करणारे राजकीय धुरंधर जनसंघी नेत्यांकडून पूर्वी_'मूल्याधिष्ठित राजकारणा'_ ची आस धरली जात होती. पण तेव्हाच्या मूल्याधिष्ठित राजकारणाची जागा आता _'मूल्य'अधिष्ठित_ समाजसेवेनं घेतलीय, त्याच्या सोबतीला 'बाहुबली' देखील सज्ज झाले आहेत. त्यामुळं आजच्या राजकारणाची दिशाच बदलून गेलीय. वैचारिक तत्व, निष्ठा, जीवनमूल्य याला कोणतीच किंमत राहिलेली नाही. केवळ 'निवडून येण्याची क्षमता' एवढाच काय तो निकष उरलाय. त्यामुळं धनदांडगे, बाहुबली यांचीच चलती भाजपत निर्माण झालीय. हे सारं रोखायला हवंय. हिरवा देठ अद्यापी आहे म्हणणाऱ्या मंत्र्याला, प्रेमाला नकार देणाऱ्या मुलींना पळवून आणणारा आमदार, लिंग सरकलेला खासदार, शिवरायांचा उपमर्द करणारा नगरसेवक अशांना आवरायला हवंय, सावरायला हवंय...!

-हरीश केंची
९४२२३१०६०९।

Sunday 2 September 2018

महिला आरक्षणात पुरुषी अहंकार...!

*स्था* निक स्वराज्य संस्थांप्रमाणेच राज्यातील विधिमंडळात आणि संसदेत ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव ठेवणाऱ्या विधेयकावर राजकीय पक्षांची संमती घडवून आणण्याचा प्रयत्न झाला. एच.डी. देवेगौडा प्रधानमंत्री असताना हे विधेयक संसदेत विधेयक सादर झालं होतं. त्यानंतर मनोहर जोशी लोकसभेचे अध्यक्ष असताना प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयींनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून संसदेत संमत करण्याचा प्रयत्न केला होता पण तो संसदेतल्या गोंधळात आलाच नाही. प्रत्येक वेळी हे विधेयक संमत होईल असं वाटायचं. हे महिला आरक्षण विधेयक या आरक्षणात अनुसूचित जातीजमाती, अल्पसंख्यांक, महिलांना आरक्षण द्या, या मुद्द्यावर अडलं आहे. या मुद्द्याला मान्यता मिळाल्यानंतर ते आरक्षण किती टक्के असावं, यावर अडवणूक केली गेली. या विधेयकाला मुलायमसिंग यांच्या समाजवादी पक्षानं आणि लालूप्रसाद यादव यांच्या पक्षानं यांनी या विधेयकाला विरोध केलाय. खरं तर हे विधेयक मंजूर करणाऱ्या खासदारांपैकी ३३ टक्के खासदारांच्या मुळावर उठणारं असल्यामुळं नाना मुद्दे पुढे करून अडवणूक केली गेलीय.

*नाविन्याचं जगात अनुकरण होईल*
आज मुस्लिम धर्मातल्या महिलांच्या तिहेरी तलाकच्या संदर्भातील विधेयक मंजूर करा याबाबत सत्ताधारी भाजपेयीनं आवाहन केल्यानंतर त्याला बगल देण्यासाठी काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी 'महिला आरक्षण'बाबत निर्णय घ्या असं पत्र सरकारला दिलं. खरंच तशी मानसिकता असेल तर त्यांनी या आपल्या दहा वर्षांच्या कारकीर्दीतच मंजूर केलं असतं, पण आपल्याच जागा महिलांना द्याव्या लागणार याने ही चालढकल सुरू आहे. जम्मू काश्मीरच्या विधानसभेत आणि बांगलादेशच्या कायदे मंडळात स्त्रियांसाठी राखीव जागा आहेत. पण त्या नियुक्तीनं भरण्यात येतात. विधानसभा-लोकसभासारख्या कायदे मंडळाच्या निवडणुकीत एकतृतीयांश मतदारसंघ महिलांसाठी _राखीव_ करण्याचा प्रकार जगात कुठेही नाही. पण जे जगात नाही ते आपण करायचं नाही, हे योग्य नाही. नवीन काही करण्यास घाबरू नये. कारण नाविन्याचं अनुकरण होतं. तटस्थ व स्वायत्त निवडणूक आयोग आणि 'निवडणूक निशाणी' देण्याबाबत नाविन्यपूर्ण धोरणाचं जगातील बहुतेक राष्ट्रांनी अनुकरण केलं हे भारतासाठी गौरवास्पद आहे. भारताच्या लोकसंख्येत स्त्रियांची संख्या निम्म्याहून अधिक आहे. तेव्हा लोकप्रतिनिधींत्वात  ३३ टक्के आरक्षण म्हणजे स्त्रियांना खूप काही दिलं, अशातला भाग नाही

*तो सामाजिक न्यायचा जाहीरनामा आहे*
जगभरच्या लोकशाही राष्ट्रात महिलांच्या लोकप्रतिनिधींत्वाचे सरासरी प्रमाण १५ टक्के आहे. भारतात ते ८.८ टक्के आहे. महिला आरक्षण विधेयक मंजूर झाल्यास हे प्रमाण ३३ टक्के होईल. आणि भारताची जगभरात सर्वोच्च लोकशाहीवादी राष्ट्र अशी ओळख होईल. ही ओळख होईल.  ही ओळख करणाऱ्या महिला आरक्षणही जगभरातील लोकशाही राष्ट्र अनुकरण करतील. महिला आरक्षण विधेयकाला हा उपकाराचा उपचार नाही. तो सामाजिक न्यायचा जाहीरनामा आहे. आदि-अनादी कालापासून जगातील प्रत्येक समाज, सामाजिक, आर्थिक, शिक्षणाच्या बाबतीत स्त्रियांना अन्याय करीत आला आहे. भारतात हा अत्याचाराचा बुक्का धार्मिकतेनं स्त्रियांचं नाक दाबून केला गेला आणि जातोय. यासाठी स्त्रीला पापाची खाण, नरकाचं द्वार ठरवण्यात आलं. शूद्रांप्रमाणे स्त्रीलाही जनावरांच्या लायकीचं केलं. घरच्या स्त्रीला 'लक्ष्मी' म्हणत आणि झाडूचीही 'लक्ष्मी' करत स्त्रीची सफाई करण्यात आली. हे चित्र बदलण्यासाठी अनेक स्त्रियांनी संघर्ष केले. त्यांना पुरुषांनीही साथ दिली. त्यांचा दुर्गा, रणरागिणी, वीरांगना, पंडिता, विदुषी असा गौरव करण्यात आला. पण त्यामुळं स्त्रियांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी बदलली असं झालं नाही. इंदिरा गांधींनी १७ वर्षं भारताचं नेतृत्व खंबीरपणे करूनही भारतातील स्त्रियांकडे आजही माणूस म्हणून पाहिलं जातं नाही. भावनिक नातं वगळता  स्त्रीकडे पाहण्यासारखी, उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं जातं. असं पाहिलं जाणं गैर नाही; आपण आपलं सांभाळलं पाहिजे, कारण सौंदर्य हे स्त्रीचं नैसर्गिक धन आहे. असा संस्कार केला जातो हा सामाजिक निर्लज्जपणा आहे.

*नटव्या समाजसुधारकांची फसवी चळवळ*
आधुनिक जगतात स्त्रियांवरील अन्याय निवारणासाठी  आणि त्यांना माणूस म्हणून बुद्धी-बळाचा वापर करण्याची संधी उपलब्ध असावी. यासाठी ज्ञानाची-कष्टाची-कमाईची, त्यांना नाव मिळवून देणारी सर्व क्षेत्र प्रवेशमुक्त करण्यात आली. काही क्षेत्रात स्त्रियांना जाणीवपूर्वक संधी आणि बढावा देण्यात आला. यामुळे स्त्री-पुरुष समानता सार्वजनिक क्षेत्रापुरती मर्यादित न राहता; ती लोकांची-समाजाची मानसिकता बदलवणारी, स्त्रीचा माणूस म्हणून स्वीकार करायला लावणारी ठरली. आपल्या इथं असा बदल, भारतातील समाजसुधारणेच्या चळवळीचा इतिहास पाहता, स्वातंत्र्याबरोबरच व्हायला हवा होता. परंतु स्वातंत्र्याच्या प्रारंभीच 'हिंदू कोड बिला'च्या विरोधातून नटव्या समाजसुधारकांची फसवी चळवळ उघडी पडली. निधर्मीवाद्यांनी आपली धार्मिकता दाखवली, तर विज्ञाननिष्ठ जातीवर गेले. 'हिंदू कोड बिला'सही तेव्हा संसदेत तीनदा चालढकल करण्यात देण्यात आली होती. त्याने चिडलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या दणक्याने 'हिंदू कीड बिल' मंजूर झालं. समस्त भारतीय महिलांना संपत्ती-मालमत्तेतील वाट्याचा हक्क मिळाला. त्यांच्या शोषणाला फसवणुकीला रोखणारे कायदे झाले. स्त्रियांच्या प्रगतीची वाट मोकळी झाली.

*ही भारतीय स्त्रीशक्तीभक्तीची शोकांतिका*
आज भाजप सरकारला महिला आरक्षणाबाबत पत्र देणाऱ्या काँग्रेसच्या सरकारची सारी सूत्रे सोनिया गांधी म्हणजेच एका महिलेकडे होती. त्यांनी तसा कधीच प्रयत्न केला नाही. आजही भाजपच्या मंत्रिमंडळात सुषमा स्वराज, निर्मला सीतारामन या सारखे वजनदार मंत्री आहेत. लोकसभाध्यक्ष पदावरही सुमित्रा महाजन या देखील महिला आहेत. पण यापैकी कुणीही 'महिला आरक्षण विधेयक' मंजूर करून घेण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्यासारखं अधिकारपद पणाला लावत नाहीत. ही भारतीय स्त्रीशक्ती-मुक्तीची शोकांतिका आहे. याला सामाजिक नीती-व्यवस्था कारणीभूत आहे. भारतीय स्त्रीला प्रगतीची वेगवेगळी दालनं खुली करण्यात आली असली तरी या खुलेपणाभोवती _लक्ष्मणरेषा_ आहे. ही रेषा शील, चारित्र्य, मातृत्व यांनी ठळक केली आहे. विशेष म्हणजे या लक्ष्मणरेषेच्या मर्यादेत आपली सुरक्षितता जपण्याचा आटापिटा स्वतः ऍडव्हान्स समजणाऱ्या स्त्रियाच अधिक दिसतात. त्यामुळंच अंगावर धडुतं असणारी स्त्री गावापासून दूर असणाऱ्या शेतात बिनधास्तपणे एकटी राबताना दिसते; तर 'मल्टिनॅशनल कंपनी'त उच्चपदावर असलेली महिला थिएटरात नवरा बाजूला असतानाही दुसऱ्या खुर्चीवरील पुरुषाचा स्पर्श होऊ नये म्हणून अंग चोरून बसलेली दिसते. हा विचित्रपणा पुरुषसत्ताक मायाजालाचा परिणाम आहे.

*नादानीला पुरुषांएवढे स्त्रियांही जबाबदार*
'महिला आरक्षणा'च्या निमित्तानं आपल्या राष्ट्राचं-समाजाचं मागासलेपण पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलंय. या नादानीला पुरुषांएवढेच स्त्रियाही जबाबदार आहे. त्यांना आपल्या हक्कासाठी चार पावलं चालण्याऐवजी सात जन्म स्त्रीत्वात जखडवणारे वडाचे फेरे महत्वाचे वाटतात. या गुलामीच्या आगाऊ बुकिंगमध्ये सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित आणि सुसंस्कृत घरातल्या स्त्रिया आघाडीवर आहेत. सावित्री व्रताचे त्या आजच्या परिस्थितीशी जुळणारे अर्थ काढून ते व्रत टिकवण्याचा, नव्या पिढीवर थापण्याचा प्रयत्न करीत असतात. ही हरामखोरी आहे. कारण भारतीय स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची दारं पुराणातल्या सावित्रीनं नव्हे. तर सावित्रीबाई फुलेंनी दगडांचा-शेणाचा मारा सोसून करून दिली आहे. त्यामुळं स्त्रियांना आपली शक्ती आणि बुद्धी दाखवता आली, याची जाणीव सावित्री व्रत करणाऱ्या आणि थापणाऱ्या कितीजणांना आहे? ती असती तर त्यांनी सावित्री व्रत कसं मूर्खपणाचं आहे. आपल्या गुलामीचं कसं प्रतीक आहे. याचा विचार केला असता आणि सावित्रीबाई फुलेंची 'क्रांतीज्योत' तेवत ठेवली असती. त्याने उद्धार करणारीला विसरणारी नालायली संपली असती.

*घराणेशाहीनेच आरक्षणाचा लाभ लाटला*
आरक्षणाचं ठामपणे समर्थन करतांना वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. गेली पन्नास वर्षे दलित-आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आरक्षित जागांचा प्रयोग भारतात सुरू आहे. या वर्गांना शिक्षण आणि नोकरी -धंद्यातील आरक्षणाच्या धोरणाचा मोठा लाभ झाल्याचं; त्यायोगे त्यांचा विकास झपाट्यानं होत असल्याचं एव्हाना स्पष्ट झालंय. अर्थात, अजून आरक्षणाची आवश्यकता संपलेली नाही. तशी परिस्थिती निर्माण व्हायला आणखी बराच काळ जावा लागेल. तो पर्यंत आरक्षण आवश्यक राहील. 'महिला आरक्षण विधेयका'त दलित, आदिवासी, अन्य मागास व अल्पसंख्यांक महिलांचं आरक्षण आवश्यक आहे.  असं आरक्षण ठेवूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ३३ टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या होत्या त्या ५० टक्क्यांनी वाढविण्यात आलीय. तथापि, त्याचा अधिकाधिक लाभ घराणेशाहीने रिचवला आहे. तोच प्रकार लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत ३३ टक्के महिला आरक्षणाचा अंमल सुरू झाल्यानंतर होणार. परिणामी, महिला आरक्षणाचं उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. तसंच निवडणुकीत आदिवासी-दलित ज्या विभागात बहुसंख्य मतदार आहेत. ते मतदारसंघ राखीव ठेवणं शक्य नाही. कारण महिला सर्वत्र आहेत. त्यांच्या आरक्षणासाठी दर पांच वर्षांनी रोटेशन पद्धतीनं मतदारसंघ बदलला जातो. हा कालावधी राजकीय अनुभवासाठी आणि कार्यक्षमता दाखविण्यासाठी पुरेसा नाही. तसंच मतदारसंघाच्या आरक्षणाच्या फेरबदलामुळे लोकप्रतिनिधींच्या जनसंपर्कसाठी आपोआप मर्यादा येतात. आताही आमदार-खासदार मतदारांच्या फार संपर्कात असतात. अशातला भाग नाही. परंतु महिला आरक्षणाचा कायदा झाल्यानंतर होणाऱ्या मतदारसंघाच्या फेरबदलामुळे खासदार-आमदार यांचा जनसंपर्क शून्यवत होईल. आणि सामाजिक कर्तबगारीऐवजी खोट्या आश्वासनात वाढ होईल.

*...तर आरक्षणाची गरजच भासणार नाही*
राजकारणात लिंग अथवा जात यापेक्षा सामाजिक तळमळ, विचारशुद्धता, आणि बदलाचा आग्रह यांचं मूल्य महत्वाचं असायला हवं. लोकशाहीने या बाबींनाच महत्व दिलंय. राजकारण्यांनी त्याकडे सोयीनं दुर्लक्ष केलं. याला कारण मतदारच आहेत. तेच भाषावाद, लिंगभेद, जातिभेद, प्रांतभेदातून सामाजिक उच्चनीचता पोसत असतात. त्याची फळं राजकारणी खात असतात. लोकांनी, समाजानं आपली नियत बदलली; लिंग-जात-धर्म–प्रांत-भाषा यांचा अहंकार सोडला आणि निव्वळ कर्तृत्व-कार्यक्षमता-योग्यता महत्वाची मानली तर कुठल्याच प्रकारच्या आरक्षणाची गरज उरणार नाही. कारण अशा विचारांमुळे जात-लिंग-धर्मभेदातून माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कुठल्याच कृतीचं रक्षण होणार नाही!

चौकट....

*वाघ अन शेळीचं सहभोजन!*
आचार्य दादा धर्माधिकारी यांची बोधकथा आठवते. एका शहरात सर्कस आलेली असते. या सर्कशीत वाघ आणि शेळी एकाच ताटात भोजन करतात, अशी जाहिरात होत असते. त्याने सर्कस पाहायला गर्दी होते. सर्कस संपल्यावर प्रेक्षक हसत हसत बाहेर पडत असतात. 'वाघ शेळीच्या सहभोजनाचा आयटम पाहण्यासाठी जरूर सर्कसला जा' असं इतरांना सांगत असतात. रिंगमास्टर वाघोबांच्या खवय्येपणाची तारीफ करत असतो. थोड्या वेळाने प्रेक्षक चुळबुळ करू लागतात. त्यातील एकजण उठतो आणि तिरीमिरीत रिंगमास्टरला सुनवतो. 'तुझी बकवास थांबव, हा वाघोबा एकटाच खातोय. सहभोजनाच्या जाहिरातीमधली शेळी कुठंय?' रिंगमास्टर त्याला विचारतो, 'तुम्हाला शेळी दिसत नाही?' सगळे प्रेक्षक 'नाही!नाही!'चा घोष करतात. त्यावर रिंगमास्टर म्हणतो, 'कमाल आहे बुवा!,ती वाघाच्या पोटात आहे. मला ती दिसते  शेळी सुरक्षित राहावी म्हणून वाघाने तिला आधीच पोटात ढकललं आहे. त्यामुळं वाघाने खाल्लं की, पोटातल्या शेळीला ते आपोआप पोहोचतं!'
खरं तर हे समाजातल्या फसवं दातृत्वाचं भेदक चित्रण आहे. पण त्यात फसलेली माणसंच या भेदक चित्रणाने अस्वस्थ अंर्तमुख होण्याऐवजी ते फिदीफिदी हसत एन्जॉय करणार असतील; तर समाज कालौघात प्रगत झालेलं दिसेल. पण त्यांची मानसिक उन्नती झालेली दिसणार नाही. 'महिला आरक्षण विधेयका'च्या निमित्तानं आपल्या राष्ट्राचं-समाजाचं मागासलेपण पुन्हा एकदा ठळकपणे समोर आलंय. हिंमत दाखवल्याशिवाय स्त्रियांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, असा इतिहास आहे. पुराणातल्या भाकड कथांना सामाजिक नीती- व्यवस्थांचा आत्मा समजणाऱ्या समाजाला भानावर आणण्यासाठी इतिहासाची पुनरावृत्ती अटळ असते.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

हिंदुत्ववादी तालिबानीच्या दिशेने...!

अखेर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्यात. त्यांचं नेटवर्क महाराष्ट्रभर होतं हे आता उघड झालंय. या साऱ्या घटनांमध्ये साधक असल्याचं स्पष्ट झालंय. याला आपण काय म्हणणार? हा हिंदू आतंकवाद आहे, हे हिंदू तालिबानी आहेत.... अशी काँग्रेसीजनांनी टीका केली होती त्यावर गदारोळ माजला. पण आताच्या या घटना त्याला पुष्टी देणाऱ्या ठरताहेत. मध्यंतरी जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर मुस्लिमांच्या नावानं होणारी दहशतवादावरील चर्चा जोरात होती. तेव्हा एक एसएमएस बिगर मुस्लिम लोकांना  भावत होता. तो असा _हर मुस्लिम आतंकवादी नहीं होता. लेकीन पकडे जानेवाला हर आतंकवादी मुस्लिमही क्यो होता हैं।_ हा संदेश अनेकांनी अनेकांना फॉरवर्ड केला आहे. तो एसएमएस काहीं तथ्यांवर व तत्कालीन परिस्थितीवर आधारित होता. मात्र त्यातला संपूर्ण तपशील खरा नव्हता. ठाण्यातल्या गडकरी रंगायतन मध्ये स्फोट घडवून हिंदू म्हणविणाऱ्यांनी तो एसएमएस खोटा ठरवला आहे. ते जयंत आठवलेंच्या 'सनातन' या स्वतःला कडव्या हिंदू म्हणवणाऱ्या संस्थेशी संबंधित होते, आणि आजही दाभोलकर प्रकरणात अटकेत असलेले सारे सनातनचे साधक आहेत. खरं वास्तव हे आहे की, अतिरेकी हिंदू नसतात ना इस्लामी, ज्यू नसतात ना शीख! तो ऱ्यांच्या विकृतीपोटीचा धंदा असतो. या साऱ्या प्रकरणात तेच दाखवून दिलं आहे. जे तथाकथित ब्राह्मणी आजी-माजी क्रांतीकारकांना करायचं असतं!

*लांच्छनास्पद कृत्यानं मान खाली*
भारतात अतिरेकी व आतंकवादी हा शब्द शिखांच्या प्रश्नापासून प्रचलित झाला. जगात या शब्दाला प्रसिद्धी कडव्या ज्यूंनी मिळवून दिली. मात्र जगाच्या वा भारताच्या इतिहासात जेवढं हिंसक हे कृत्य जुनं आहे. तेवढाच दहशतवाद जुना आहे. जिथं शब्द संपतात. शब्दांच्या मर्यादा संपतात. मौखिक, लिखित संवाद संपतो. तिथं जे काही प्रकट होतं. ते सर्व दहशतवाद म्हणायच्या लायकीचं असतं. महात्मा गांधी म्हणायचे 'जर डोळ्यांसाठी डोळाच घ्यायचा, तर सर्व जगच आंधळं होईल!' त्यांचाही अंत असाच बदल्याच्या भावनेनं आणि अतिरेकी मानसिकतेतून झाला. जेव्हा सर्व मर्यादा संपतात, तेव्हा नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी बळाचा वापर आवश्यक असतो. असं कायद्याच्या तत्वात सांगितलं आहे. मात्र दहशतवादाच्या तंत्रात बळाशिवाय काहीच चालत नाही. नथुराम गोडसेची हिंसाही त्याच दर्जाची होती. आज नथुराम नाटकातून जिवंत आहे. तसाच तो कार्यरत आज. त्याला कार्यरत ठेवण्याचं काम पूर्वी गोळवलकर आदींनी केलं. आता हे काम तोगडिया- आठवले करीत आहेत. _हिंदू धर्माला लांच्छणास्पद आणि हिंदूंचं तालिबानीकरण करण्याच्या दृष्टीने भूषणावह गोष्ट आज अचानकपणे समोर आली असली, तरी ती अचानकपणे घडलेंली नाही._  तिची पाळंमुळं इतिहास व वर्तमानाच्या जमिनीत आहेत.

*धर्मसत्ता आणि राजसत्तेत गल्लत*
जगात अन्यत्र कदाचित वेगळी स्थिती असेल. भारतात धर्मसत्ता आणि राज्यसत्ता या एकाच नाण्याच्या फोन बाजू आहेत. धर्मावर नियंत्रण असेल, तरच राजसत्तेवर नियंत्रण राहतं. हे या देशातले सनातनी केव्हापासूनच ओळखून आहेत. बहुदा त्यामुळं जयंत बाळाजींच्या संघटनेच्या नावात सनातन आहे. त्यांचं शेकडोवर्षं धर्मावर राज्य होतं. त्यामुळेच राजसत्ताही त्यांच्याच नियंत्रणाखाली होती. त्यांचं धर्मावरचं राज्य वर्षानुवर्षं उगाच राहत नाही. त्यासाठीची काही तंत्र व साधनं त्यांनी विकसित केली आहेत. म्हणजे, आपलाच धर्म जिथं बहुसंख्य आहे तिथं ते आपसातील भेदाभेदांचा आधार घेतात आणि जिथं दुसरा धर्म आहे, त्याला प्रतिस्पर्धी म्हणवून त्याची भीती घालतात. मुस्लिमांची कथित दहशतवादाची भीती त्यामुळंच लोकांना खरी वाटते. एकदा ही भीती खरी वाटली की, मग लोकांच्या मनांत आत्मरक्षेचा भाव तयार होतो. ' तुमचा दाऊद तर आमचा गवळी' हे अत्यंत असह्य असं वाक्यही मग टाळ्यांच्या प्रचंड कडकडाट करतं.

*सुप्तावस्थेतील कट्टरतेचा व्हायरस*
जगातला आणि भारतातला दहशतवाद मुस्लिमांचाच आहे, असं तत्व जर प्रस्थापितच झालं; की मग हिंदूंना त्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज केलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्याशी संबंधित संघटना या हिंसेला म्हणजेच दहशतवादाला अधिष्ठान देणारे मोठे स्रोत आहेत. सावरकरांच्या हिंदू महासभेचा नारा शांततेचं राज्य स्थापन करण्याचा कधीच नव्हता. जयंत बाळाजीचंही तसंच आहे. त्यांना ईश्वरी राज्य स्थापन करायचं आहे. ईश्वराच्या या राज्यात सर्व काही आबादीआबाद असणार आहे. ते राज्य स्थापन करण्यात अडथळा कोणाचा? त्यांची मतं न पटणाऱ्या हिंदूंचा आणि अर्थातच मुस्लिम अन ख्रिश्चनांचा! मग त्यांच्या मनात दहशत निर्माण होईल, अशी कृत्य करा आणि त्यानंही भागलं नाही, तर दहशतीच्या अन्य मार्गाचा अवलंब करा. संघ परिवाराच्या अनेक पोटसंघटना आणि जयंत बाळाजी यांनी हे पद्धतशीरपणे बिंबवत आणलं आहे. अरेबिक भाषेतील काहीबाही वाचून ज्याप्रकारे तालिबान तयार झाले, तसंच त्यांनी हिंदू धर्मातही केलं आहे. त्यांचे जिहाद अल्लातालाच्या नावानं, यांचं सर्व काही ईश्वराचं नाव घेऊन. महात्मा गांधीजींची हत्या केल्यानंतर त्याची समाजतून जबरदस्त प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर हिंदूंचा दहशतवाद अनेक वर्षे सुप्तावस्थेत होता. तो मग कधी कधी मुंडकं वर काढायचा. मात्र एखाद्या व्हायरससारखा तो सर्वव्यापी दिसून येत नव्हता. बाबरी मशीद पडल्यानंतर मात्र त्याचा सर्वत्र संसर्ग झालाय. त्यापूर्वी त्यानं श्रीलंकेत थैमान घातलं होतंच. मात्र संघ परिवाराला व त्यांच्या पिलावळींला मुस्लिम दहशतवादाचा दर्जा दिला नव्हता. त्यांच्या लेखी तोही स्वातंत्र्यलढाच होता.

*काठी-लाठीचं दर्शन हिंसेसाठीच!*
ख्रिश्चन असो वा मुस्लिम बौद्ध असो वा जैन. या धर्मांनी हिंसेच्या आधारे काही साध्य करण्याचा धर्मादेश दिलेला नाही. त्यांच्या धार्मिक कार्यक्रमात शस्त्राला काही स्थान नाही. ते त्यांचं साधन नाही. मात्र त्यातल्या काही धर्माच्या नावानं फोफावलेल्या संघटना मात्र शस्त्राचं प्रदर्शन ज्या पद्धतीनं करतात, त्यातूनच दहशतवादी मानसिकता तयार होते. रा.स्व.संघाच्या संचलनात काठी असते. ही काठी काही टेकत टेकत चालण्यासाठी नसते. हिंसेसाठीच योजलेली असते. त्यांच्या बजरंग दल या पोटसंघटनेनं मध्यंतरी मोठ्याप्रमाणावर 'त्रिशूलां'चं वाटप केलं. हे कोणत्या संस्कृतीचं-मानसिकतेचं निदर्शक आहे? गुजरातसाठी आवश्यक ती मानसिकता अशा कार्यक्रम साधनांद्वारेच करण्यात आली. ओरिसात दारासिंहने ख्रिश्चन मिशनरी ग्रॅहम स्टेंस आणि त्यांच्या दोन मुलांना त्या अतिरेकी मानसिकतेतून जिवंत जाळलं. असे लहानमोठे प्रकार देशभर होत आहेत. महाराष्ट्रात ही विषारी झुडूपं कशी उगवली ते पाहू.

*नांदेडमध्ये बॉम्ब बनवायला सुरुवात झाली होती*
'दोन धर्मात तेढ असेल, तरच लोकांना धर्माच्या नावानं संघटित करता येतं. ते संघटित झाले, की त्यांच्याकरवी राजसत्ता हस्तगत करता येते. बाबरीच्या पतनानंतर दंगली होतात आणि मगच बाबरी पाडणाऱ्यांचं राज्य येत असतं. विहिंप, सनातन वाल्यांचं तेच लक्ष्य आहे.' गेल्या चार-पांच वर्षात महाराष्ट्रात ठिकठिकाणी त्यासंबंधीचे छोटे प्रयोग केले होते.त्यातूनच हिंसेचं तत्वज्ञान सर्वत्र पसरलं आहे. त्यामुळं नांदेडच्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याला वाराणसीच्या मंदिरात झालेल्या मंदिरात बॉम्बस्फोटाचा राग आला. काश्मिरात होणाऱ्या हत्यांमुळे तो आणि त्यांच्यासारखे काहीजण संतप्त झाले. त्यांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी त्याच धर्तीचं आक्रमण आवश्यक आहे असं म्हणून त्याने बॉम्ब बनविण्याची कला आत्मसात केली. गोव्यात आणि विदर्भातल्या काही जंगलात भगवे लोक या कामाचं ट्रेनिंग देत असतात. सरवाअंती त्यांनी परभणी, पूर्णा, जालना इथं या बॉम्बचे प्रयोग झाले. हे बॉम्बस्फोट घडविल्यानंतर ते नांदेडात मोठ्या तयारीला लागले. पण तिथंच बॉम्ब बनवत असताना अपघात झाला तो फुटला आणि हे सारं कारस्थान बाहेर आलं. त्यात दोघे ठार झाले. त्यानंतर दोनवर्षानी तिथंच नांदेडात असाच प्रकार घडला त्या स्फोटात दोन जण ठार झाले. रत्नागिरीत ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या दारात बॉम्ब फेकून पळताना दोघे पकडले गेले ते सनातनचे साधक होते . त्यातले दोघे हे ठाण्यातल्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत.

*साऱ्यांचा दहशतवाद सारखाच असतो*
इतर धर्माच्या नावाच्या म्हटल्या जाणाऱ्या अतिरेकी संघटनांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचं म्हणून हे बॉम्ब जन्माला आले होते. ज्याप्रमाणे पाकिस्तानात काही मुसलमान अन्य मुसलमानांना बॉम्ब फेकून मारतात तसंच इथल्या हिंदू म्हणवणाऱ्यांनी करायचं ठरवलं आहे की काय अशी शंका येते. नक्षलवादी जे करतात आणि श्रीलंकेत तामिळ लोक जे काही करत होते तो ही दहशतवादच आहे. मुस्लिमांच्या दहशतवादाबद्धल बोलणारे लोक या कृत्याबद्धल  तशी विशेषणं, दूषणं, देत नाहीत. उल्फा, गोरखा परिषद जे काही करतं तेही याच धाटणीचं आहे. मात्र त्याबद्धल त्या संघटना त्यांच्या कृतीला हिंदूंचे ते तथाकथित पुरस्कर्ते दहशतवादी म्हणत नाहीत. ते त्यांच्यासाठी वापरलाच तर 'राष्ट्रद्रोही' हा शब्द वापरतात. गुजरातमध्ये गोध्राकांडानंतर जे काही घडलं, ही त्यांच्या लेखी 'प्रतिक्रिया' असते. अमेरिका जे काही करते हा सुपर दहशतवाद आहे. आखाती देशात मोसाद ही संघटना जी काही करते, ती अमेरिकन संस्कृतीच आहे. संघ परिवाराने कधीही त्यांच्या या कृत्यांना दहशतवाद म्हटलेलं नाही. ते त्यांच्यावर टीकाच करायची तर, त्यांना पोलीस म्हणतात. अफझल गुरुसारख्या गुन्हेगाराला फाशी द्यायलाच हवी. अस म्हणताना कृत्य एकच असेल तर त्यांचा न्याय व्यक्तिनिहाय असतो. अनेक बाबतीत मुस्लिमांना दोष दिला जातो. ,'त्यांची' आणि 'आपली' या भाषेत सतत तुलना केली जाते. मात्र ती करताना वास्तवाकडे डोळेझाक केली जाते. इस्लाममध्ये दहशतवादाला थारा नसल्याचं पुन्हा पुनः सांगितलं जातं. हिंदू म्हणवून घेणारे बुवा, बाबा, महंत,महाराज आता या ही बाबतीत त्यांच्याशी तुलना करणार काय?

-हरीश केंची
९४२२३१०६०९

संघ स्वयंसेवकाचं समर्पण...!


"सत्तांतराचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय होऊ शकत नाही. असं संघमित्र म्हणतात. कारण सत्तांतर होऊन खरोखरच नैतिकतेचा मापदंड मानणाऱ्यांच्या हातात सत्ता आली तर सर्वात मोठं नुकसान  भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात सहभागी होणाऱ्या, त्यांचा पुरेपूर फायदा उठवणाऱ्या संघ विचाराच्या मंडळींचे होणार आहे. भ्रष्ट काँग्रेसचे खरेखुरे आधार हे विविध क्षेत्रात विविध अधिकारपदे भूषवणारे संघमित्रच आहेत. मला काँग्रेसकडून काही घ्यायचे नाही, संघ परिवाराकडूनही काही घ्यायचं नाही. तेव्हा जे बुद्धीला पटेल ते मी लिहिणार. मला फोन करून व्हॉट्सअप करून माझ्या लिखाणाबद्धल आपलं मत कळवणाऱ्या सर्वांचाच मी ऋणी आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मला मी चुकलो तर नाही हे पुन्हा तपासून बघण्याची बुद्धी होते. मी भाजपला भगवी काँग्रेस म्हटलं म्हणून काही मित्र नाराज झाले. काँग्रेसवाल्यांवर ताण करणारे भाजपचे राजकारणी मला ठाऊक आहेत. त्यांची संख्याही थोडीथोडकी नाही. पत्रकारांतही बरेच संघमित्र आहेत. नाकाने कांदे सोलण्याची सोज्वळता कुणी न दाखवलेली बरी!"
-------------------------------------------------------------


*मा* झे एक मित्र आहेत. 'मी संघाचा निर्लज्ज प्रचारक आहे' असं ते सांगतात. आणि ते खरोखरच संघाचे निष्ठावान कार्यकर्ते-प्रचारक आहेत. 'संघ कार्य' म्हणूनच ते काही जनसेवाही करतात. ही जनसेवा संघप्रचारासाठीच असल्याचे ते दडवत नाहीत. सकल हिंदूंत बंधुत्वाची भावना असावी असंही ते म्हणतात. तसं ते वागतात असं मात्र नाही! सामाजिक जीवनात उदारता दाखवावी लागते म्हणूनच ते काही उदार वर्तन करताना दिसतात. पण वैयक्तिक जीवनात ते चक्क कर्मठच आहेत. स्त्रियांना कुठलं शिक्षण द्यावं, किती स्वातंत्र्य द्यावं, नोकरी करू द्यावी का याबद्धलचा त्यांचे विचार चक्क बुरसटलेले आहेत. तरी ते माझे मित्र आहेत. माझ्या भवितव्याची त्यांना चिंता वगैरे वाटते असं ते म्हणतात. मी संघपरिवार-भाजप आदींबद्धल जे लिहितो हा माझ्या बुद्धीचा अपव्यय आहे असं त्यांचं मत असून मला सुधारण्याचा त्यांचा प्रयत्न गेली काही वर्षे सुरू आहे.

*त्यांचेच दात घशात गेले!*
खरं तर त्यांच्या म्हणण्यानुसार चाळीस वर्षांपूर्वी भारतात संघ परिवाराचं राज्य यायचं होतं. त्यावेळी अडवाणीजी, मुरली मनोहरजी, सिंघलजी ही मंडळी तितकी जोशात नव्हती, पण अटलजी पंतप्रधानपदासाठी जवळजवळ नक्की होते आणि सुब्रह्मण्यम स्वामींकडे अर्थ व परराष्ट्र खातं जाण्याची शक्यता होती. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्या मुंबईतल्या निवडणूक काळात हे माझे मित्र सुब्रह्मण्यम स्वामींची एवढी तारीफ करायचे की, एवढा शिस्तीचा, एवढा निष्ठेचा, एवढा विद्वत्तेचा अन्य कुणी नाहीच. ही गोष्ट आपल्याला मान्य करायला लागायचं. माझं त्यावेळी म्हणणं होतं की, सुब्रह्मण्यम स्वामी आणि राम जेठमलानी हे दोन कली आहेत त्यांचा पराभव करायला हवाय.  या दोघांचे परराष्ट्राशी संबंध आहेत. त्यांची राष्ट्रनिष्ठा संशयास्पद आहे, असंही मी त्यावेळी म्हणत होतो. दुर्दैवानं त्यावेळी त्या दोघांचा विजय झाला. महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले आणि भारतीय राजकारणात त्यांनी कसा धिंगाणा घातला हे सगळं मराठी माणसाला सांगायला हवं असं नाही. मी स्वामी या स्वच्छ, सरळ, निष्ठावंत राष्ट्रभक्ताला निष्कारण नावं ठेवतोय असं माझ्या या 'संघ'मित्राचं म्हणणं होतं. मी नव्हे, सुब्रह्मण्यम स्वामींनीच ते त्यांच्या घशात घातले. मी संघ परिवाराबद्धल  जे काही लिहितो आहे, बोलतो आहे त्याबद्धल माझे मित्र नाराज आहेत. मी हे सगळं काँग्रेसची चमचेगिरी करण्यासाठी करतोय आणि ते स्पष्ट म्हणत नसले तरी, त्यात माझा काही स्वार्थ आहे असंच त्याचं मत होतं.

*समर्पण फक्त संघासाठीच का?*
आजवर मी कुणा काँग्रेसवाल्याकडून, संघ-भाजप-शिवसेना विरोधात लिहिण्यासाठी दमडा घेतलेला नाही. जेव्हा मी दमडे घेऊन लिहीन तेव्हा माझ्या लिखाणाला दमडीचीही किंमत उरणार नाही, एवढा समज मला आहे. आणि तेवढे पत्रकारितेशी माझं इमानही आहे. पण या स्वार्थानं बुजबुजलेल्या, द्रोहाने डबडबलेल्या समाजात इमानाने, शिस्तीने विशिष्ट समर्पणाच्या भावनेनं काम करणारे फक्त आम्हीच असा अहंगंड बाळगणारे संघ परिवाराचे लोक सातत्यानं इतरांना हिणवत आणि स्वतःचा खोटा बडेजाव मिरवत आले आहेत.  केवळ संघाजवळच समर्पणवृत्तीनं काम करणाऱ्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांचं संच आहे आणि इतरांकडे काय स्वार्थ साधणाऱ्या चोरांच्या टोळ्या आहेत? प्रत्येक संघटनेतच चांगले-वाईट कार्यकर्ते असतात. त्यांचे भलेबुरे परिणाम त्या संघटनांना भोगावेच लागतात. संघजवळ समर्पणबुद्धीने काम करणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असतीलही, पण हे समर्पण कशासाठी? फक्त संघ करण्यासाठीच!

*स्वयंसेवक त्यावेळी गप्प का?*
आज साठ वर्षे संघ हिंदू समाजात चारित्र्यवान, नीतिवान, समाजहितदक्ष, देशहिताचाच करणारी कार्यकर्त्यांनी संघटित शक्ती उभी करण्याचं काम करतो आहे. ह्या शक्तीचं संघटित दर्शन कुठल्या भ्रष्टाचार, गैरव्यवहार, वशिलेबाजी, संघटित स्वार्थासाठी केली जाणारी आम जनतेची पिळवणूक, फसवणूक या नेहमीच समोर येणाऱ्या सामाजिक प्रश्नात घडले आहे? बँकांमध्ये मोठ्याप्रमाणात संघाचे कार्यकते आहेत. बँकांमध्ये जो महाभयंकर असा भ्रष्टाचार घडला, या भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी संघातून तयार झालेले चारित्र्यवान, नीतीवान, समाजहितदक्ष, देशप्रेमी का पुढं आले नाहीत? ठीक आहे, हा भ्रष्टाचार उघड झाला नव्हता तेव्हा तो उघड होईल की नाही याचे भय वाटून हे लोक गप्प बसले असतील. पण तो भ्रष्टाचार हुडकण्यासाठी आज प्रयत्न होत आहस्त. बँकेतल्या ह्या भ्रष्टाचारावर प्रकाश टाकण्यासाठी बँकातून काम करणाऱ्या सर्व संघ-स्वयंसेवकांनी संघटितपणे कसे प्रयत्न करावे याचा विचार संघ का करू शकला नाही? ह्या वेगवेगळ्या औद्योगिक, शैक्षणिक, सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराबद्दलही उपस्थित होईल. कुठल्या क्षेत्रात भ्रष्टाचार, अन्याय, लाचखोरी, वशिलेबाजीला विरोध करण्याचा संघानं संघटितपणे प्रयत्न केलाय?

*नैतिकतेचे सोवळं नेसून वावर*
हा प्रश्न संघालाच विचारायचा, कारण संघ हिंदू समाजाचे एका आदर्श समर्थ संघटित समाजात परिवर्तन करण्याचं व्रत घेऊन उभा आहे. संघाला अन्य संघटनांसारखे सत्ताकारण करायचे नाही. संघ तत्वचर्चेपेक्षा आचरणावर अधिक भर देतो असं संघ प्रचारक सतत सांगतात. नैतिकतेचा टेंभाही ते सतत मिरवतात. संघ संस्थापक डॉ. हेडगेवार, द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस आणि सध्याचे सरसंघचालक मोहनराव भागवत या सर्वांनी नैतिकतेचा मापदंड समाजापुढे ठेवला आहे. 'समाज जीवनात कितीही भ्रष्टाचार असला तरीही सर्वसामान्यपणे संघ स्वयंसेवक, संघ संचालित संस्था भ्रष्टाचारापासून दूरच आहेत' असेही संघ प्रचारक, संघ पुरस्कर्ते म्हणतात. ज्याप्रमाणे राममंदिराच्या प्रश्नावर संघाचे स्वयंसेवक जिथं जिथं असतील तिथं तिथं प्रत्यक्ष कार्यासाठी उभे झाले तर समाजाची आंतरिक शक्ती जागविण्यासाठी, सर्वसामान्य माणसांमध्ये नैतिक बळ वाढविण्यासाठी, देशाला पोखरणारा भ्रष्टाचार संपविण्यासाठी, निदान तो उघड्यावर आणण्यासाठी जिथं जिथं संघ स्वयंसेवक आहे तिथं तिथं तो कार्यक्षम का झाला नाही? सरकारी नोकरातही संघ स्वयंसेवक मोठ्या संख्येने आहेत. सरकारी कचेऱ्यातली उदंड दप्तरदिरंगाई, भ्रष्टाचार, गैरव्यवहार थांबविण्यासाठी शक्य नसेल, पण उघड्यावर आणण्यासाठी संघ स्वयंसेवक संघटितपणे काही करू शकले नसते?

*मापदंड फाट्यावर मारला*
आजही परस्पर सहकार्याने परस्पर स्वार्थाचा गोष्टी बिनबोभाटपणे करण्याचा उद्योग यातले अनेक करतात. सरकारी योजनांचे फायदे लाटण्यातही त्यांचा सिंहाचा वाटा असतो. हे स्वार्थ साधताना सामाजिक हिताची आणि नैतिकतेची चाड ही मंडळी दाखवतात असं मात्र  दिसत नाही.  संघ स्वयंसेवकांनी नैतिकतेचा संघ चालकांचा मापदंड फाट्यावर मारून स्वार्थ साधण्याचा, भ्रष्टाचारात सहभागी होण्याचा, भ्रष्टाचार पोसण्याचा, भ्रष्टाचाराने प्राप्त होणाऱ्या पैशाचा स्वतःच्या सुखासाठी कुठलाही संकोच न ठेवता वापर करण्याचा उद्योग चालविला आहे. ही गोष्ट नैतिकतेच्या गप्पा दुसऱ्यांना ऐकवणारे-शिकवणारे संघमित्र अमान्य करतील? 'राजकारण करण्यासाठी संघ नाही, संघाला समाजाची आंतरिक शक्ती जागी करायची आहे. सत्तांतरणाचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय बनू शकत नाही. व्यक्ती ही समाजाची सेवक आहे. समाजच्या हितासाठी धडपडणारा समाजाचा एक घटक अशा स्वरूपात व्यक्ती समाजाशी संबंधित असावी. राष्ट्राला संजीवन देणारे, वैभवसंपन्न करणारे नाते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जोडू शकतो', असंही संघमित्र सांगतात. संघ परिवारात असणाऱ्या कामगार संघटनांनी तरी कधी संघटितपणे भ्रष्टाचार विरोधात काही केलंय? संघ तत्वज्ञान मानणाऱ्यांच्या समर्थ संघटना बँकांत आहेत. आयुर्विमा आणि अन्य महामंडळातही आहेत. तिथं भ्रष्टाचार नाही?

*नाकाने कांदे सोलू नयेत*
माझं म्हणणं असं आहे की, सत्तांतराचा विषय हा व्यापक ध्येयवादाचा विषय होऊ शकत नाही. असं संघमित्र म्हणतात. कारण सत्तांतर होऊन खरोखरच नैतिकतेचा मापदंड मानणाऱ्यांच्या हातात सत्ता आली तर सर्वात मोठं नुकसान  भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारात सहभागी होणाऱ्या, त्यांचा पुरेपूर फायदा उठवणाऱ्या संघ विचाराच्या मंडळींचे होणार आहे. भ्रष्ट काँग्रेसचे खरेखुरे आधार हे विविध क्षेत्रात विविध अधिकारपदे भूषवणारे संघमित्रच आहेत. मला काँग्रेसकडून काही घ्यायचे नाही, संघ परिवाराकडूनही काही घ्यायचं नाही. तेव्हा जे बुद्धीला पटेल ते मी लिहिणार. मला फोन करून व्हॉट्सअप करून माझ्या लिखाणाबद्धल आपलं मत कळवणाऱ्या सर्वांचाच मी ऋणी आहे. त्यांच्या प्रतिक्रियेमुळे मला मी चुकलो तर नाही हे पुन्हा तपासून बघण्याची बुद्धी होते. मी भाजपला भगवी काँग्रेस म्हटलं म्हणून काही मित्र नाराज झाले. काँग्रेसवाल्यांवर ताण करणारे भाजपचे राजकारणी मला ठाऊक आहेत. त्यांची संख्याही थोडीथोडकी नाही. पत्रकारांतही बरेच संघमित्र आहेत. नाकाने कांदे सोलण्याची सोज्वळता कुणी न दाखवलेली बरी!

-हरीश केंची,
९४२२३१०६०९

शिवसैनिक हा 'आधार' वाटायला हवा...!

 *शिवसैनिक आधार वाटायला हवा!*
"आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या एकत्रितरित्या एकाचवेळी त्याही डिसेंबर महिन्यात होतील अशी शक्यता निर्माण झालीय. निवडणूक आयोगानं तसं सूतोवाच केलं आहे. ह्या साऱ्या घडामोडी लक्षांत घेऊन सारे राजकीय पक्ष तयारीला लागलेत. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख चार पक्षांबरोबर इतर पक्षदेखील सज्ज झाले आहेत. २०१४ च्या निवडणुकांचा अनुभव पाहता आणि भाजपेयींनी केलेली गोची लक्षांत घेता शिवसेनेनं मोर्चेबांधणी सुरू केलीय. पक्ष संघटनेत साफसफाई सुरू केलीय. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी बैठका, दौरे सुरू केलेत. जुन्या-नव्यांचा मेळ साधत जुळवाजुळव केली जातेय. हे सारं करताना पक्षसंघटनेला विळखा घालून बसलेल्यांना कसे आवरणार? कधीकाळी सत्तेची ऊब आपल्याला मिळेल, निष्ठेचा, कामाचा, श्रमाचा मोबदला मिळेल, असं स्वप्नातही वाटत नव्हतं त्यावेळी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांप्रमाणे बाहेर पडायला हवंय. शिवसेनेला चैतन्य द्यायचं की केवळ खुर्च्या उबवत बसायचं याचा निर्णय ज्येष्ठांनी घ्यायला हवाय. तरच अंतिम ध्येय गाठता येईल! सोलापुरात पदाधिकाऱ्यांमध्ये केलेला बदल हा त्यासाठीच आहे. हे लक्षात घ्यायला हवंय! "
----------------–----------------------------
 *शिवसैनिक हा आधार वाटायला हवा*
शिवसेनेच्या वेगवेगळ्या शिबिराने शिवसैनिक पुन्हा पूर्वीच्या जिद्दीनं आणि ईर्षेनं उभा होतोय हे दाखवून दिलंय. गटप्रमुख हा प्रचाराचा महत्वाचा घटक आहे. एक हजार मतदारांशी तो संपर्क ठेवतो. मतदार म्हणून नोंद झालेल्यांपैकी प्रत्यक्षात आज किती आहेत, कोण इतरत्र राहायला गेले आहेत. किती जणांची मतदार म्हणून नोंद झालेली नाही या सगळ्याची माहिती गटप्रमुख घेतो. मतदारांकडे फक्त मत मागण्यापुरताच तो जात नाही. त्यांच्याशी त्याचे जिव्हाळ्याचे संबंध असतात. त्यांच्या अडीअडचणींची तो दखल घेतो. हे सगळं शिवसेनेतर्फे अनेकवर्षे व्यवस्थित होत होतं. शाखा या सेवा केंद्रासारख्या होत्या. आणि शिवसैनिक हा वर्दी नसलेल्या पोलिसांसारखा होता. त्याचा लोकांना आधार होता, धाकही होता. सत्ता आल्यावर हेच चित्र कायम राहायला हवं होतं. काही ठिकाणी ते तसं आहेही. मात्र काही ठिकाणी ढिलाई आली, काही ठिकाणी मस्तीमिजास आली, असं लोकांचं मत झालं आहे. कदाचित हे मत बरोबरही नसेल, पण असं वाटणारे लोक आहेत हे ओळखून शिवसैनिकांनी, नेते होण्याची इच्छा असणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हरकत नसावी. 'शिवसैनिक हा आधार आहे असं लोकांना वाटलं पाहिजे' हे शिवसेनाप्रमुख प्रथमपासून सांगत होते. आज पुन्हा हे सांगायला लागावं ह्याचा अर्थ काय?

*नव्या दमाच्यांना संधी द्या*
बाळासाहेब स्वतःवर झालेले दुर्दैवी आघात आणि खुनशी मंडळींकडून होणाऱ्या घाणेरड्या अपप्रचाराचे दुःख पचवून शिवशाहीला यश देण्यासाठी सरसावले होते. तानाजी मालुसरे लढता लढता पडला म्हणून वृद्ध शेलारमामांना तलवार परजत रणांगणावर उतरावं लागलं. हा इतिहास झाला. वर्तमानात उद्धव ठाकरे हेच लढताहेत असं दिसतंय. जुन्या जाणत्या नेत्यांनी आता थांबावं. त्यांनी रणांगणावर उतरू नये, आम्ही विजयश्री खेचून आणायला, लोकशत्रूंचे निर्दालन करायला समर्थ आहोत, अशी ललकार तरुण मंडळींनी का देऊ नये? उद्धव-आदित्य लढाऊ वारसा घेऊन पुढे झाले आहेत.  येती निवडणूक ही नव्या पिढीची, तरुण रक्ताची, नव्या दमाची व्हायला हवी. थकल्याभागल्यांनी मध्ये लुडबुड न करता आशीर्वाद देण्याची दानत दाखवायला हवी.
शिवसेनेला सामर्थ्य देण्यासाठी लोकांत जाऊन, येत्या निवडणुकीत विजयश्री मिळविण्यासाठी स्वतःहून पक्षकार्य करण्याचा निर्णय मंत्रीपद सांभाळणाऱ्यांनी, विधानपरिषद, राज्यसभेत गेलेल्या अशा ज्येष्ठांनी का घेऊ नये? आम्ही सत्तास्थानावर चिकटून बसणारे नाही हे दाखविण्याची हिम्मत यांनी करायला काय हरकत आहे? असपन होऊन पक्षकार्यासाठी ही ज्येष्ठ मंडळी पद सोडून आम कार्यकर्त्यांबरोबर विभागवार फिरू लागली तर कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य येईल. कर्तृत्व दाखविण्याची संधी नव्या लोकांना मिळेल. आणि लोकमानसांवर त्याचा चांगला परिणाम होईल. मंत्रिपद गेल्यामुळे रुसून वेगळी शक्ती उभारु बघणाऱ्यांनासुद्धा स्वेच्छा मंत्रिपद त्यागून पक्षकार्य करण्यासाठी सज्ज झालेल्या या निष्ठावंत ज्येष्ठांमुळे काही उपरती होईल.

*मंत्र्यांनी आग्रह धरायला हवा*
:शिवसेना पक्षप्रमुख सांगतील तर तत्काळ पद सोडून पक्षकार्य करू!' असं यावर म्हटलं जाईल. पण पक्षप्रमुखांकडे याच लोकांनी आम्हाला पक्षकार्यासाठी मोकळं करा, असा आग्रह धरायला हवा. शिवसेनेचे मंत्री महाराष्ट्रभर पक्षकार्यासाठी हिंडत नाहीत अशा तक्रारी होत्या. मंत्री मंडळी शिवसेनेच्या भल्यासाठी सरकारमध्ये रात्रंदिवस राबत होती असं समजू या! आता स्वतःच पक्ष कार्यासाठी विभाग वाटून हे नेते वर्षभर कार्यमग्न राहीले तर कार्यकर्त्यांच्या मनातले संशयाचे जाळे निश्चितच दूर होईल. शिवसैनिकांनी आपल्या निष्ठेचा, कामाचा, श्रमाचा कधी मोबदला मागितलेल्या नाही. भगवा नाचवत तो सदैव आपल्या मस्तीत राहिला. शिवसेनेला पुन्हा विजयी करण्यासाठी बाळासाहेबांच्या इच्छेनुसार तो निश्चितपणे जिवाचे रान करणार. मंत्रिपदे सोडून पक्षकार्य करणारे ज्येष्ठ बघून तर तो उत्साहाने अशा जोमात लोकांत शिरेल की शिवसेनेला धूळ चारण्याची स्वप्न बघणाऱ्यांना घराबाहेर पडणं मुश्किल होईल. शिवसेनेला चैतन्य द्यायचे का आणखी वर्षभर खुर्च्या उबवत बसायचे याचा निर्णय त्या खुर्चीवर बसणाऱ्या ज्येष्ठांनीच घ्यावा. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव-आदित्य सारे धोके विसरून रान उठवायला सर्वत्र जातातच ना! मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकविण्यासाठी ज्येष्ठ मंत्र्यांनी खुर्ची त्याग करून महाराष्ट्र जागवायला सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर प्रयत्न करायला हवेत.

*...तर बळ संचारेल!*
पक्षप्रमुख शिवसैनिकांना कंबर कसायला सांगतात आपल्याला नाही, असा सोयीस्कर समज मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक आणि अन्य विविध पदावरच्या महाभागांनी करून घेऊ नये. मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, अन्य महाभाग आपल्या बरोबरच कंबर कसून शिवसेनेला विजयी करण्यासाठी झटताहेत हे दिसलं की, शिवसैनिकांच्या अंगात दहा जणांचं बळ संचारेल. शिवसेनाप्रमुखांच्या शब्दासाठी शिवसैनिक सर्वस्वपणाला लावतो ही गोष्ट खरी आहे. येणाऱ्या निवडणुकीतही पक्षप्रमुखाच्या शब्दासाठी निवडणुकीत शिवसैनिक शर्थीने काम करील. नेमकं काय करायचं याबद्धल शिवसेनाप्रमुख यांनी मार्गदर्शन केलंय....' जागतेपणे काम करा, नम्र वर्तन ठेवा, शाबासकीसाठी थांबू नका, स्वाभिमान कमवा, मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकविल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ घेऊनच बाहेर पडा.' शिवसैनिकांनी एकदा नाहीतर दोनदा हे करून दाखवलंय.

*सावधगिरी बाळगावी*
मतदार शिवसैनिकचा हात धरूनच मतदानकेंद्रावर यायचा. गेल्या निवडणुकीत मात्र मतदाराने भाजपेयीचा हात धरला. युतीचं शासन असताना शिवसेनेच्या विरोधात सुविहित अपप्रचाराने मतदारांमध्ये चलबिचल झाली. बहुतेक वृत्तपत्रांनी शिवसेना विरोधात भूमिका घेतली. भाजपच्या मायाजालात पत्रकार अडकले. अल्पसंख्याकांना पद्धतशीरपणे बिथरवण्यात आले. सर्वधर्मसमभावाचा गजर करीत जातीय भावना चेतविल्या गेल्या. केवलं राजकीय विचारप्रणाली वा विकास, आर्थिक धोरण याबद्धल खोडसाळ प्रचार झाला नाही तर अत्यंत घाणेरडे, खुनशी आरोप करून भाजपेयींनी ठाकरे कुटुंबियांना आयुष्यातून उठवून लावण्याचे प्रयत्नही काहींनी वृत्तपत्रातून केले गेले. त्याला पोषक वृत्ते देण्याची, मल्लिनाथी करण्याची साथ देऊन लोकमानसात संशय पेरण्याचे काम काहींनी केले. वडाची साल पिंपळाला लावण्याचे हे कौशल्य यावेळीही दाखवले जाईल. त्याविरोधात शिवसैनिक पिसाळून उठले तर आविष्कार स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याचे मातम करून लोकांची मन कलुषित केले जातील म्हणून अपप्रचाराला विचारपूर्वक, मुद्देसूद तत्काळ उत्तर देण्याची तयारी शिवसैनिकांना ठेवावीच लागेल. उत्तर देण्याचे अनेक मार्ग आहेत. अपप्रचार करणारे अज्ञानाने अपप्रचार करत नसून जाणूनबुजून, हेतुपूर्वक प्रत्येकबाब त्यांना हवी तशी फिरवून अपप्रचार करत आहेत. त्यांच्याशी वाद घालण्याने काही साधणार नाही. त्यांना शक्ती दाखविली तर त्यांना जे हवे आहे तेच घडेल. आविष्कार स्वातंत्र्याचे बोंबले असे काही घडावं याचीच वाट बघत आहेत. शिवसेना, शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख, पक्षप्रमुख यांची कुठलीच गोष्ट चांगली म्हणायची नाही, अशीच ज्यांची हट्टाग्रही भूमिका आहे. त्यांना सुधारण्यासाठी वेळ घालविण्यात काही अर्थ नाही.

*बिळात बसू नका, बाहेर पडा*
गटप्रमुख त्यांचे प्रत्येकाचे किमान दहा कार्यकर्ते असे लाखो प्रचारक घरोघर जाऊन व्यक्तिव्यक्तीशी संपर्क साधून त्यांना शिवसेनेचं कार्य-अडचणी व सत्ताभ्रष्ट काँग्रेसी आणि सत्ताकांक्षी भाजपेयी नेत्यांचा अपप्रचार याबाबत समजावू शकले तर लोकमतावर वृत्तपत्री अपप्रचाराचा परिणाम होणार नाही. राजनीती, अर्थनीती, यांचे ज्ञान यासाठी मुळीच नको. परस्परातल्या जिव्हाळ्याने, आपुलकीनेही लोकांना जिंकता येतं. शिवसैनिकांना हे अशक्य नाही. अगदी सामान्य कार्यकर्ते के करू शकतात याकडे मी लक्ष वेधलं आहे. आपल्या चातुर्याने वेगवेगळी पदे मिळवणारे आणि सत्तेचा लाभ घेऊन मोठेपण प्राप्त झालेले यापेक्षा अधिक काम करू शकतील. मंत्र्यानी खुर्ची सोडून प्रचार संघटन कार्य करावे असं मी म्हणतोय ते सर्वसामान्यांपासून मंत्र्यांपर्यंत एका ईर्षेनं शिवसेना उभी ठाकलीय हे लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहचावे यासाठीच! शिवसेनेचा घराघरात पोहचवण्याचे काम आता प्रत्यक्ष संपर्काने करण्याचा निर्धार व्हायला हवा. शिवसेनाप्रमुख नेहमी सांगत ' बिळात बसू नका, बाहेर पडा, आत्मविश्वासाने लोकांमध्ये जा!' हाच विजयाचा मार्ग आहे. बाष्कळ आरोप करून जातिजातीत तेढ पेटविण्याचा आणि सतत शिवसेनेवर शेणगोळा ओतण्याचा पराक्रम काही नेत्यांनी चालवलाय. त्यांना प्रसिद्धीही भरपूर मिळते. पण लोक त्यांना किती किंमत द्यायची हे जाणतात. त्यांच्या हातात कोलीत देण्यासारखं काही न करण्याची काळजी तेवढी शिवसैनिकांनी घ्यायला हवी. मंत्रालयावर भगवा फडकविण्याचं संदेश महाराष्ट्रात घराघरापर्यंत पोहचायला हवा. मंत्रालयात खुर्च्या उबवत बसण्यापेक्षा हे काम करण्यासाठी साऱ्या शिवसैनिकांबरोबर जायची कुणाकुणाची तयारी आहे? असा सवाल प्रत्येक शिवसैनिकांच्या मनात आहे. 'आम्ही दुसऱ्या कामात होतो., काही ऐकलंच नाही' अशी बतावणी तरी निदान कुणी करू नये!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

चौकट.....

 *राष्ट्रीय ताणा मराठी बाणा!*

भारताचा स्वातंत्र्यलढा गतिमान होण्यापूर्वीच १८५७ च्या बंडाच्या काळात राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष यांची स्वतंत्र अशी ओळख आहे, आणि अस्मिता आहे. त्यानंतर काँग्रेस पक्षानं ही बहुविधता ओळखूनच भारतीय राजकारणाची सूत्रं जन्माला घातली. त्याच पायावर आजही भारताचं राजकारण उभं आहे. प्रादेशिकता आणि राष्ट्रीयता याचा उत्तम समन्वय असतानाच काँग्रेसपक्षाला या देशात चांगले दिवस होते. आजचं वास्तव सर्वांसमोर आहे. केंद्रात मोठं बहुमत मिळालेला भाजप जी मस्ती दाखवत आहे, ती काँग्रेसकडून खुर्चीवरच्या वहिवाटीनं मिळाली असावी. त्यामुळं प्रादेशिक पक्षांचा संकोच करण्याचं काम या पक्षाकडून ठिकठिकाणी होत आहे. त्यांना आपल्या शिडीचे पाय लक्षात राहिलेलं दिसत नाहीत. त्यामुळेच शिवसेनेला कधी एकदा कायमचं धाकटा भाऊ करतो, अशी घाई या पक्षाला लागली आहे. आज भाजपचा महाराष्ट्रात आणि देशात जो विस्तार झाला आहे तो शिवसेनेमुळेच! भाजपच्या पूर्वावतारी जनसंघाने १९७५-७७ च्या आणीबाणीच्या काळात जनता पक्षाच्या पोटात जाऊन पण मूळचे संघाचे सदस्यत्व कायम ठेवून केलेल्या दगलबाजीमुळे त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवत नव्हतं. एवढंच कशाला मुंबईत १९८६ मध्ये झालेल्या विलेपार्ले विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आडवं करण्यासाठी भाजपेयींनी जमेल तेवढं कष्ट घेतलं होतं. तरीही १९८९ मध्ये शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली. ही युती कांहीं किरकोळ अपवाद वगळता कायम राहिली.
शिवसेना १९९० पासून राज्य विधानसभेच्या १७१ जागा लढवीत आली आहे. भाजप ११७ जागा लढवत असे. २०१४ मध्ये शिवसेना १५३ पर्यंत खाली आली. भाजपला निम्म्या जागा हव्या होत्या. प्रत्यक्षात साऱ्याच जागा हव्या होत्या. भाजपची नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशात बहुमताने सत्ता आल्याने भाजपला शिवसेनेबरोबरची युती मोडायचीच होती. तसंच झालं. २५ वर्षाची युती मोडली. या खेळीत भाजपला बहुमत मिळालं नाही, तरी विधानसभेत सर्वाधिक जागा जिंकता आल्या.

समाजवादी विचारांची आज गरज...!

समाजवादी चळवळीला ना राजकीय यश मिळाले, ना सामाजिक अभिसरणाच्या क्षेत्रात फारसा प्रभाव टाकता आला. असे का झाले, याचे आत्मपरीक्षण करणे ही काळाची गरज आहे. समाजवादी नेत्यांना राजकारणात पडण्याची पूर्वी घाई झाली होती. विचाराने कार्यकर्ता पुढे जावा, असे ठरविण्याऐवजी समाजवादी विचारांची टोपी आणि नारा निवडून येणाऱ्या माणसाच्या हाती दिला. ती चूक होती. इतिहासात अनेक मोठय़ा चुका चळवळीने केल्या आहेत. नव्या पिढीत अनेकांना त्या माहीत नसतील. पण जुनीजाणती माणसे प्रश्न विचारतील. त्यामुळे आत्मपरीक्षणाची गरज आहे. किमान स्वल्पविराम आणि शब्दरचनेवरून होणारे मतभेद टाळता आले तरी बरेच काही होऊ शकेल. समाजात समाजवादी चळवळीविषयी आस्था बाळगून असणारा मोठा वर्ग आहे. पण त्यांना जोडून घेण्यासाठीचा कार्यक्रम आपल्याकडे नाही. तो करता आला तरी पुरेसे होईल. सध्या लोकशाहीच्या शिखर संस्थांवर आपल्याच विचाराचे कार्यकर्ते बसविण्याचे काम चालू आहे. समाजवादी नेत्यांनी त्यांचे सरकार होते तेव्हा असे काही न करता विचाराने वागणाऱ्या कार्यकर्त्यांला लाभ दिला नाही, हा काय आपलाच आहे, त्यामुळे दुसऱ्यांनाच महत्त्व दिले गेले, त्यामुळे आपले कार्यकर्ते नेत्यांनी कुजविले
--------------------------------



 आज देशात निर्माण झालेल्या वातावरणात आठवण आली ती जनता राजवटीची! देशात आणीबाणी लादली गेली,  लोकशाहीवर घाला घातला गेला, त्यावेळी लोकनेते जयप्रकाश नारायण यांनी स्वातंत्र्योत्तर काळात पुन्हा एकदा लोकजागृती केली होती. लोकशाही पुनर्स्थापनेसाठी पुढाकार घेतला. नवनिर्माणाच्या संकल्पनेला सुरुवात केली. देशात असलेल्या सगळ्या पक्षांची त्यांनी मोट बांधली आणि जनता दलाची स्थापना केली. काँग्रेसला समर्थ पर्याय लाभला म्हणून देशवासियांनीही जनता दलाला भरभरून मतं दिली आणि सत्तेवर बसवलं. समाजवाद्यांच्या हातात देशाच्या सत्तेची सारी सूत्रं सोपविली. पण त्यांना ते काही झेपलं नाही. त्या जनता दलातल्या समाजवाद्यांच्या आता अक्षरशः चोथा झालाय. त्यातील काही धूर्त, व्यवहारी राजकारण्यांनी बुडता बुडता समाजवाद्यांच्या माथ्यावर पाय देऊन उभं राहण्याचा व्यवहार केला. भाईंसारखी काही मंडळी ही निष्ठावान, लढवय्ये, साधनसुचिता पाळणारे, त्यांनी साधायचे ठरविले असते, तर खूप काही साधून घेतलं असतं. व्ही.पी.सिंग यांच्या न्यायासाठी सर्वस्व पणाला लावण्याच्या निष्ठेचे वारेमाप कौतुक करणाऱ्या समाजवाद्यांना व्ही.पी.सिंगच भोवले!

*समाजवादी विचारांची अपेक्षा!*
राजकीय विचारसरणीत त्यावेळी समाजवादीचं वर्चस्व होतं. देशात सक्षम विरोधीपक्ष म्हणून समाजवादी पक्षांकडेच पाहिलं जातं होतं. त्यानंतरच्या काळात समाजवाद्यांचं हे पानिपत कशामुळे घडलं. याचा विचार या मंडळींनी करायला हवा होता. जनता पक्षात जाऊन समाजवाद्यांनी काय कमावलं आणि काय गमावलं, याचा हिशेब करण्यात आजतरी काहीच अर्थ नाही. पण व्यक्तिदोषामुळे  'समाजवाद' वाऱ्यावर पडला! हे मान्यच करावं लागेल. सध्या 'समाजवादा'ची काँग्रेसनं सोडचिठ्ठी दिल्यासारखीच परिस्थिती करून टाकली आहे. आज सत्ताधारी बनलेल्या भारतीय जनता पक्षाला तर समाजवादाचे सोयरसुतकच नाही. अशावेळी समतेचा, बंधुतेचा आग्रह धरून सगळ्या दबलेल्यांना, आजवर उपेक्षाच सहन केलेल्यांना एकत्र आणून, त्यांच्यात विश्वास जागवून त्यांना समाजवादी ताकद म्हणून उभं होण्याची हिंमत देऊन समाजवादी पक्ष पुन्हा उभा करण्याचा विचार समाजवाद्यांनी का करू नये? तिसरा पर्याय का उभा करू नये. लोकांच्या भावना आजतरी अशाच भाषेत त्यांना काँग्रेसी राजवट नकोय त्याहून अधिक भाजपेयी नकोत पण पर्याय नसल्यानं त्यांची घुसमट होतेय याला मार्ग मिळेल. 

*समाजवादी नेते आपसातच झुंजले*
उत्तरप्रदेशात कांशीराम-मायावती हे महाराष्ट्रातला फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार घेऊन तुफान उठवू शकतात. मग संघर्ष करण्याची इच्छा आणि ईर्षा असलेले समाजवादी आपसात झुंजण्याचा, आपलेच कपडे फाडण्याचा उद्योग सोडून एकत्र का येत नाहीत. भाईंनी असा प्रयत्न केला होता. ते स्वतः, किसन पटनाईक, केशवराव जाधव यांनी हैद्राबादेत समाजवादी दल निर्माण समितीच्यावतीने एक बैठक घेऊन समाजवादावर निष्ठा असणाऱ्या काहींना एकत्र आणलं होतं. 'सोशालिस्ट जन परिषद' अशा नावाचा एक नवा पक्ष स्थापन केला होता. या प्रयत्नपासून दूर राहण्याचे व कुण्या नवागताकडून अपमानित व्हायचं कारणच काय? संधीसाधू राजकारणाच्या काळात मूल्याधिष्ठित राजकारण करण्यासाठी एकटे भाई वैद्य पुण्यातून समाजवादी जण परिषदेची आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असत. पूर्वी काकाकुवा मॅनशन येथे होणाऱ्या बैठका, चर्चा, परिषदा, सभा आज नवीपेठेतल्या एस.एम.जोशी फाउंडेशनच्या सभागृहात होतात एवढाच काय तो बदल झालाय.

*पक्ष बदललेल्यांचा भ्रमनिरास झालाय*
समाजवादी विचारांची मंडळी सध्या चाचपडताहेत. कुणी शरद पवारांना जवळ केलंय तर कुणी काँग्रेसवासी झालेत. आम आदमी पक्षाच्या निर्मितीनंतर उरले सुरलेले समाजवादी त्यांच्यामागे गेले. पण इकडे तिकडे गेलेल्या साऱ्या समाजवाद्यांचा भ्रमनिरास झालाय. पक्षाबंदलाच्या जाणिवेनं निष्ठावान समाजवाद्यांची घुसमट होते आहे. भाईंच्या जिवंतपणी जे होऊ शकलं नाही ते त्यांच्या मृत्यूनंतर का होईना त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पुन्हा एकदा समाजवाद्यांची भक्कम एकजूट झाली, तर समाजवादी राजकीय विचारांनी प्रेरित झालेल्यांना एक दिलासा मिळेल. आणि समाजवाद्यांनी भाई वैद्यांना आदरांजली वाहिल्याचे समाधानही त्यांना लाभेल!

*ही घसट आणि घुसमट तेवढी सरळ नाही!*
देशातली सध्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही किंबहुना ती अस्वस्थ करणारी आहे. स्पष्ट बहुमत असलेल्या भाजपेयींनी आपल्या वागण्याने केवळ विरोधी पक्षांनाच नाही तर मित्रपक्षांनाही दुखावलं आहे. सुरुवातीपासून बरोबर असलेले शिवसेना, अकाली दल, तेलुगू देशम,यासारखे मित्र दूर जाताहेत. महाराष्ट्रातील लोकनेते म्हणून समजले जाणारे शरद पवार भाजपच्या पाठीशी उभे राहता राहता अचानक भाजपविरोधी पक्षाच्या आघाडीत सामील झालेत. एकीकडे शरद पवारांची लोकांना दहशत वाटावी अशी विकृत प्रतिमा उभी करायची दुसरीकडं त्यांच्याशी जमवून घेऊन नवी राजकीय समीकरणं बनविण्याचे प्रयत्न करायचे. असा सध्या प्रकार सुरू आहे. कळपापासून फोडायचा, एकाकी पाडायचा आणि चट्टामट्टा करून संपवायचा 'लांडगे डाव' सध्या राजकारणात रंगविला जातोय. शरद पवार डाव्यांच्या तावडीत सापडताहेत की, डाव्यांना पवार आपल्या राजकारणासाठी खेळवत आहेत, हे अजून ठरवायचंय. लोकसभेच्या निवडणुकीनंतर पवार यांची ताकद काय असेल, कशी असेल यावर सारे अवलंबून राहील. कारण ही घसट आणि घुसमट दिसते तेवढी सरळ नाही.

*अशाश्वत राजकारण सध्या सुरू आहे*
पुराणातली कथा आहे. महाभारतातली, भीम-जरासंघाची कुस्ती चालली होती. भीम पुन्हा पुन्हा जरासंघाला फाडत होता. पण जरासंघ पुन्हा पुन्हा साधला जात होता.भीमाची ताकद पुरेशी नव्हती. अशावेळी आखाड्यात नसलेल्या कृष्णाने भीमाला डाव सुचविला. जो पुन्हा पुन्हा जोडला जातो, त्याला न जोडण्यासाठी काय करायला हवं हे भीमाला कृष्णाने सुचविले आणि जरासंघ कायमचा भंगला! पवार, ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात काहीही झाले तरी त्याचा निकाल ह्या तिघांना हवा तसाच लागेल असं धरून चालणार नाही. काहीही घडू शकते, एवढं अशाश्वत राजकारण सध्याचं बनले आहे.

*भाजपची भगवी काँग्रेस बनलीय*
सर्वसत्ताधारी बनलेल्या भाजपेयींना काँग्रेससारखं सर्वसमावेशक बनण्याचा विचार दिसतो आहे. सध्याच्या त्यांच्या सर्व हालचाली या बाबी स्पष्ट करतात. जणू भगवी काँग्रेस असावी असं त्याचं रूप झालंय. काँग्रेस समाजवादापासून केव्हाच दूर झालीय. खासगीकरण, निर्गुणवणूक हे त्यांनीच सुरू केलं. ज्याचा परिणाम आज दिसून येतोय. समाजवादासाठी कंबर कसून उभं व्हावं आणि सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी आजही समाजवाद प्रभावीपणे उपयोगी पडतो हे आव्हानपूर्वक दाखवावं अशी इच्छा असणारा काँग्रेसमध्ये कुणी नेता नसल्यानं सध्या ज्याच्या हातात पक्षाची सूत्रं आहेत, त्यांना टोचणीपुरतीच समाजवादी निष्ठा काही जण दाखवीत आहेत. समाजवादाचा ठेका घेतलेल्या साथीनी एकमेकांचे पाय ओढण्यातच आपला शक्तिपात करून घेतल्याने आणि मार्क्सवादाचे ठेकेदारही मर्यादीत क्षेत्रातली आपली मक्तेदारी शाबूत ठेवण्यातच गुंतून पडल्याने 'आई मेली, बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला!' अशी समाजवाद्यांची अवस्था झालीय!

*सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय!*
समाजवाद समाजाने नाकारलेलाच नाही तर समाजाचे ज्यांनी कधी सोयरसुतक ठेवलं नाही, अशा समाजवादी नेत्यांना समाजाने नाकारले आहे. या नेत्यांचे प्रताप लोकांना परवडत नाहीत. जर समाजवादी नेते तात्त्विक काथ्याकूटात न हरवत व्यवहाराशी सांगड घालून वागले असते तर ही अशी अवकळा त्यांना, त्यांच्या पक्षाला प्राप्त झाली नसती. हा व्यवहार काँग्रेसवाल्यांना चांगला जमतो. त्या भांडवलावर तर भल्या भल्या समाजवादी नेत्यांना पटवून शरद पवारांचा पुलोद प्रयोग महाराष्ट्रात झाला. आजही समाजवादात पवार नई रोशनी आणतील असा भाबडा विश्वास बाळगणारे बालबैरागी बरेच आहेत. आजवर मनाची नाही तर जनाची लाज बाळगून राजकारणात वावरण्याची काळजी नेते, कार्यकर्ते घेत असत. आता सगळाच व्यवहार बिनधास्त झालाय. आज समाजवाद पराभूत झालाही असेल; पण सर्वसामान्य माणसाला जगण्यासाठी सामर्थ्य समाजवादानेच प्राप्त झालं आहे, हे विसरून चालणार नाही.  समतेसाठी झुंजणाऱ्या मराठी माणसाला एवढ्या सहजपणे सोडचिठ्ठी देता येणार नाही. समाजवादी सामर्थ्यशाली फळी कशी कोसळली, का कोसळली, याचा शोध घेऊन जरूर ते बदल स्वीकारण्याची तयारी दर्शवून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद आणण्याचा मार्ग आपल्याला शोधावाच लागेल!

चौकट........

*उद्धाराचा ठेका आपल्यालाच दिलाय असे समजणारे समाजवादी संपले!*

महाराष्ट्र हा राष्ट्रवाद आणि मानवी समता या दोन्हीमध्ये या देशाला मार्गदर्शक ठरेल असे आजवर मानले जात होते. महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, सुधारकाचार्य गोपाळराव आगरकर,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सानेगुरुजी, आचार्य जावडेकर, या सगळ्यांनी मराठी माणसाला रूढी-परंपरा-कर्मकांड यांच्या फेऱ्यातून बाहेर आणले. जन्माधिष्ठित उच्चनीचतेचा अहंगंड सुटावा, माणसांमाणसात बंधुभाव जागवा म्हणून आयुष्यभर या सर्वांनी जे प्रयत्न केले त्यामुळेच महाराष्ट्रातील अठरापगड जातीतल्या शतकानुशतके मुकाट दबून आला दिवस ढकलत जगणाऱ्या लोकांना खरोखरच  जाग आली. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गावोगाव शिक्षणाची ज्योत नेली. महर्षी कर्वे यांनी स्त्रीला हिंमत दिली.लोकांच्या उद्धाराचा ठेका परमेश्वराने आपल्यालाच दिलाय अशा गुर्मीत जगणारे आणि वर्णवर्चस्वाचा प्रत्यय पावलोपावली देणारे एकाकी पडत गेले. आपली वाट आपण शोधू, आपले भाग्य आपण घडवू या निर्धाराने गावोगाव नव जोमाने तरुण उभे झाले. गांधी टोपीबरोबरच मानवी समता, बंधुभाव सर्वसामान्य माणसाने स्वीकारला. अर्थात सर्वत्र शिवाशिव संपली. रोटी व्यवहार सुरू झाला आणि एकमेकांशी माणुसकीचे वर्तन सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आपण माणूस आहोत, या समाजाच्या जडणघडणीत आपलाही काही वाटा आहे, आपले काही हक्क आहेत, आपण एकजुटीने आपले हक्क मिळवू शकतो, आपला विकास साधू शकतो, त्यासाठी कुणाची परवानगी त्यासाठी आवश्यक नाही, कुणाच्या कृपेचीही आवश्यकता नाही हा विश्वास काही प्रमाणात तरी सर्वत्र आला. महाराष्ट्राच्या राजकारणावर व सामाजिक व्यवहारावर याचा फार मोठा परिणाम झाला. इतिहास-पुराणांचा आधार घेऊन उभ्या झालेल्या नेत्यांचा प्रभाव यामुळे मर्यादितच राहिला. भारतामध्ये लोकशाही समाजवादी विचारसरणीची मूलतत्त्वे काँगेसांतर्गत स्थापन झालेल्या समाजवादी गटात आढळतात. १९३४ मध्ये जयप्रकाश नारायण, अशोक मेहता, आचार्य नरेंद्र देव प्रभृतींनी हा गट स्थापन केला. पुढे १९४८ मध्ये स्वातंत्र्यानंतर या समाजवाद्यांनी स्वतंत्र समाजवादी पक्षाची स्थापना केली; मात्र त्यात पुढे एकजुट राहिली नाही आणि १९७७ मध्ये समाजवादी पक्ष तत्कालीन जनता पक्षात विलीन झाला. त्यानंतर त्यांना फारसे स्वतंत्र अस्तित्व राहिले नाही. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या १९४७ -६४ या कार्यकाळात त्यांची लोकशाही समाजवादावर निष्ठा आणि विश्वास होता. समाजवादी समाज स्थापन करणे, हे काँगेसचे उद्दिष्ट आहे, अशी घोषणा त्यांनी केली. त्यांचा समाजवाद इंग्लंडमधील मजूर पक्षाच्या धाटणीचा होता. भारताच्या मूळ संविधानात समाजवाद या शब्दाचा उल्लेख नव्हता. तो पुढे १९७६ मध्ये झालेल्या बेचाळीसाव्या घटना दुरूस्तीव्दारा प्रथमच सरनाम्यात करण्यात आला. सरनाम्यातून भारतीय संविधानात अभिप्रेत असलेल्या लोकशाही समाजवादाचा आशय व्यक्त होतो. विसाव्या शतकात समाजवादी विचार लोकप्रिय झाले. कम्यूनिस्ट पक्ष शासित साम्यवादी राजवटी, पश्चिम यूरोपातील कल्याणकारी राज्याची उत्तम प्रकारे अंमलात आणून जनतेला मोठया प्रमाणात सामाजिक सुरक्षा पुरविणाऱ्या लोकशाही समाजवादी राजवटी, भारतातील गांधींच्या तत्त्वज्ञानाचा अंगीकार करीत केलेला कारभार, राज्य समाजवादास नकार देत जनतेच्या सहभागावर व विकेंद्रीकरणावर भर देणारे समाजवादी पक्ष, ही समाजवादाचीच वेगवेगळी रूपे आहेत; कारण समाजवादाने विविध देशांत कार्यरत असणाऱ्या लोकांना एका उन्नत आणि समृद्ध समाजाची स्थापना करण्याचे स्वप्न दिले आहे.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

आता लागणार साक्षमोक्ष...!

"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...