Friday 30 June 2017

संतांची मांदियाळी

*संतांची मांदियाळी

...!*

"पंढरीची वारी ही ऐक्याची वारी आहे. मराठी-कानडी-तेलुगु या प्रादेशिक ऐक्याची, शैव-वैष्णव या पंथीय ऐक्याची , बौद्ध-जैन यांनाही आपले वाटायला लावणाऱ्या एका देवाची. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शिव आहे, तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ विष्णू आहे, पण हा अर्थ विसरून आम्ही पांडुरंगा.... विठ्ठला.....म्हणत आहोत. शिवयोगी वैष्णव भक्त, निर्गुणात्मकवादी, सगुणात्मकवादी, अद्वैती, द्वैती असे सर्व मताचे लोक प्रांतभेद, भाषाभेद, जातीभेद विसरून पंढरपुरात एकत्र येतात."
*पंढरीच्या वारी निमित्तचा हा विशेष लेख*

----------------------------------------------

'पालख्या पंढरपुराकडे निघाल्या...' अगदी लहानपणापासून हे तीन शब्द ऐकत आलो आहे आणि या शब्दांबरोबरच मनाची पालखी चंंद्रभागेतीरी पोहोचवत आलो आहे. पालखीचं दर्शन ही एक पर्वणी होती. आमचं तेव्हा छोटंसं दुकान लक्ष्मीरोडवर होतं. आताचं लक्ष्मीरोडच स्वरूप तेव्हा नव्हतं. त्यामुळे या पालख्या जणू आमच्या अंगणातूनच जायच्या. मुंग्या एका मागे एक जाव्यात तशी वारकऱ्यांची रांग रस्त्यावर लागलेली असायची. अंगावर धोतर-सदरा-गांधी टोपी अथवा मुंडासं. खांद्याला एक पडशी. कुणाच्या हाती भगवी पताका. त्यावेळी एकदम भगवे झेंडे दिसायचे ते फक्त पालख्यांबरोबरच. बायकांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन. हे वारकरी दोन तऱ्हेचे असायचे. एक बाजूच्या गर्दीवर डोळे लावून चाललेले, तर दुसरे पंढरीकडेच डोळे लागलेले. जमलेले भाविक आपल्या कुवतीप्रमाणे डाळ, चुरमुरे, लाडू, केळ, मुसुबं, अथवा पैसा, ढब्बू पैसा वारकऱ्यांना वाटायचे. ह्या वाटपाजवळ  झुंबड उडायची. मिळेल ते पडशीत टाकून पुढं कुठं कुणी काही वाटतंय का हे बघत गर्दीवर डोळे लावणारे पुढं धावत असायचे. पंढरीकडे डोळे लागलेल्यांना हा वाटपाचा मोह दिसायचा नाही. विठ्ठल...विठ्ठल या नामघोषाशी पायाची गती जुळवून ते चालत असायचे. मग केव्हातरी आली...आली.... अशी कुजबुज उठायची. पहिल्यांदा यायचा पालखीबरोबरचा घोडा. त्याला हात लावायची झुंबड उडायची. तो सारखा फुरफुरत नुसता नाचत असायचा. लाल वुलनचा शेरवानीवजा लांब कोट घातलेला मुंडासेधारी ह्या घोड्याला सांभाळत असायचा. एका हाताने तो घोडा धरायचा. दुसरा हात त्या घोड्याला म्हणून लोक जी दक्षिणा द्यायचे त्याने भरलेला असायचा. थोड्या थोड्या अंतराने हातावरची जमा लालकोटाच्या खिशात जायची. ह्या घोड्यामागे असायची पालखी. तिच्याभोवती तर नुसती रेटारेटीच व्हायची. लहान पोरांना पालखीत काय आहे ते दिसायचंच नाही. ज्यांना कुणाच्या खांद्यावर बसायचं भाग्य मिळायचं त्यांची गोष्ट वेगळी. तुळस-बुक्का यांचा मनाचा गाभारा बनवणारा सुवास पालखीबरोबर यायचा. पालखीसाठी हलवायांची दुकानं लागायची. गोडी शेव ज्याला कोकणात खाजे म्हणतात, बत्तासे, चणे, कुरमुरे, लाडू यांच्या टोपल्या भरभरून दुकानांतून मांडलेल्या असायच्या. त्यावर माशांची झुंबड असायची. उघडं-वाधडं खायचं नाही ही शिस्त घरात असल्यानं हातात पैसा कधी पडायचाच नाही, पण हलवायाच्या दुकानासमोरच्या गर्दीत घुसून निष्पाप चेहरा करून टोपलीच्या जवळ चिकाटीने उभं राहिलं तर अधूनमधून एखादी गोडी शेव, मूठभर शेंगदाणे वा चुरमुरे लंपास करायला मिळत. हे चोरून खाणं त्या सगळ्याची गोडी आणखी वाढवत असे. पालखी डोळ्यापुढून पाच मिनिटात जात असे, पण ती येऊन जाईपर्यंत दोन चार तास सहज जात आणि तिची आठवण करण्यात वर्षही सहजपणे जात असे. 'पालख्या पंढरपूराकडे निघाल्या' ही बातमी वाचली की, अजूनही तो तुळस-बुक्क्याचा सुगंध अवतीभवती दरवळतो. गोड्या शेवेची गोडी जिभेवर येते आणि विठ्ठल-विठ्ठल-ज्ञानोबा तुकारामाची धून मनातून उठते. पंढरपूरला ज्या ज्या वेळी मी गेलो आहे, त्यावेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाने स्वतःला हरवून गेल्याचा अनुभव मीही घेतला आहे. 'तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला'... अशी वेडी ओढ माझ्याही मनाला लागलीय. आज कितीतरी वर्ष मी ठरवतोय. पालखीबरोबर पंढरपूरला जायचं, तेवढं मात्र अजून जमलेलं नाही. पालख्या निघाल्या हे वाचलं की, आपण मात्र निघू शकत नाही ह्या जाणिवेनं मी अजून बेचैन होतो. यंदाही झालोय. खरोखरच ही पंढरपूरची वारी मराठी माणसाचा एक विशेष आहे.

पण विठ्ठल आणि वारी फक्त आपलीच असं मात्र म्हणता येणार नाही. पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ मराठी माणसाचा नाही, त्याची वारी काही केवळ मराठी माणसाचा विशेष नाही. पंढरपूरच्या वारीची प्रथा कर्नाटकातही प्रचलित आहे व ही वारी करण्याचं व्रत घेणारेही भरपूर आहेत. याची ऐतिहासिक साक्ष देणारा एक शिलालेख धारवाडपासून दहा मैलावर असलेल्या 'हेबबळळी' या गावी जंबुकेशवराच्या देवळाच्या परिसरात आहे. देवगिरीचा राजा कण्हर ऊर्फ कृष्ण यादव यांच्या काळातला हा लेख असून त्यावर पौष शुद्ध ९ शुक्रवार शके ११७० अशी नोंद आहे. ह्या शिलालेखात एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारीच्यावेळी करावयाच्या धर्मकृत्यांसाठी कलुवर सिंगगाबुंड यांनी एक वृत्ती दिल्याचे नोंदले आहे. या शिलालेखात पंढरपूरचे नांव 'श्रीपंडरंगे' असं आहे आणि विठ्ठलाचा उल्लेख 'श्रीविठ्ठलदेव' असा आहे. ज्ञानदेव म्हणजे वारकऱ्यांच्या जिभेवर सदैव असणारे ज्ञानोबा जन्मायच्या आधीचा हा शिलालेख आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे पंढरपूरची वारी केवढी जुनी आहे याची कल्पना येते आणि विठ्ठल केवळ मराठी माणसांचा नव्हे, हे ही स्पष्ट होतं.

पंढरीच्या वारीला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान हे येत हे चोखोबांनी आपल्या
विठ्ठल विठ्ठल गजरी।
अवघी दुमदुमली पंढरी।
होतो नामाचा गजर।
दिंड्या पताकांचा भार।
निवृत्ती ज्ञानदेव सोपान।
अपार वैष्णव ते जाण।
हरी कीर्तनाची दाटी।
तेथे चोखा घाली मिठी।।
या अभंगात सांगितलं आहे. म्हणजे वारीची कल्पना ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनचीच आहे. ज्ञानदेवांना विठ्ठल भक्ती गुरुपरंपरेने व गृहपरंपरेने प्राप्त झाली होती. ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबकपंत यांनी गोरक्षनाथांचा अनुग्रह घेतला होता, तर गहिनींनाथांनी ज्ञानदेवांच्या आज्याला गोविंदपंतांना आणि बंधू निवृत्तीनाथांना अनुग्रहित केले होते. ज्ञानदेवांच्या वडिलांचे नांव विठ्ठलपंतच होते आणि पंढरीची वारी त्यांच्या घरण्यातच होती.
जनासी तारक विठ्ठलची एक।
केलासे विवेक सनकादिकीं
ते रूप वोळले पंढरीसी देखा।।
द्वैताचि पै शाखा तोडियेली
उगवते बिंब अद्वैत स्वयंभ।
नाम हे सुलभ विठ्ठलराज।
निवृत्तीचे गूज विठ्ठल सहज।
गयनिराजे मज सांगितले।।
असं ज्ञानदेवांचे गुरू निवृत्तीनाथांनी सांगितले आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी ज्ञानोबा-तुकाराम म्हणत, पंढरीची वाट चालत असले तरी पंढरपूर, विठ्ठल आणि वारी या तिन्ही गोष्टी ज्ञानदेवांच्या कैकवर्षे आधीच्या आहेत. 'युगे अठ्ठावीस उभा हृषीकेशु। पुंडलिका सौरसु पुरवीतु।। असंही निवृत्तीनाथांनी म्हटलं आहे. म्हणजे पंढरपुरी चंद्रभागे तीरी उभा असलेला विठ्ठल हा ज्ञानेश्वरांच्या काळातही फार फार जुना आहे. हा वैकुंठीचा देव पुंडलिकाने पंढरीला आणला आणि विटेवर उभा करून ठेवला. आईवडिलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाने दारी आलेल्या परमेश्वराला वळूनही न बघता राहा जरा उभा सांगितलं. ही गोष्ट संतांनी आवर्जून सांगितली आहे. तुकाराम त्यांच्या सडेतोड शैलीत म्हणतात: 'का रे पुंडया मातलासी। उभे केले विठ्ठलासी' तर 'पुंडलिके भक्ते तारीले विश्वजनां । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर-पाटणा' अशी कृतज्ञतेची भावना अन्य संत व्यक्त करतात.

पुंडलिक कोण? आणि हा विठ्ठल तरी कोण? ह्या पुंडलिकाचा शोध इतिहासात लागत नाही. एवढंच कशाला, विष्णूचा अवतार म्हणून जो विठ्ठल गाजतो आहे त्याचाही शोध इतिहासात पुराणात लागत नाही. विठ्ठलाचा उल्लेख 'चोविसां वेगळा' असा केला जातो. ज्ञानदेव म्हणतात 'बाप रखुमादेवी वरु पंचविसावा। चोविसां मुर्ती वेगळा।।' हे चोविसा प्रकरण काय आहे?  विष्णू पुराणात जे अवतार सांगितले आहेत ते आहेत चोवीस. भागवताच्या दुसऱ्या स्कंधात ते आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, आणि कल्की हे दहा अवतार आपल्याला ठावूक आहेत. याशिवाय सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, नर नारायण, वेनपुत्र, ऋषभ, हयग्रीव, आणि हंस असे चौदा अवतार भागवतकारांनी सांगितले आहेत. या चोविसात विठ्ठल नाही. ह्या विठ्ठलाला आपण मराठी माणसांनी  आपल्या काळजात जागा दिलीय. तो कानडा विठ्ठल आहे हे ठाऊक असतानाही दिलीय, ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल.
ज्ञानेश्वर म्हणतात,
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु।
येणे मज लाविले वेधी।।
नामदेव म्हणतात,
कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी।।
नामदेवांनी पुंडलिकाला या विठ्ठलाची भाषा समजत नाही हेही सांगितलंय-
विठ्ठल कानडे बोलू जाणे।
त्याची भाषा पुंडलिक नेणे।।
'कानडा म्हणजे अगम्य, कर्नाटकु म्हणजे मनमोहवणाऱ्या विविध लीला करणारा वगैरे युक्तिवाद केले जातात, पण त्यामध्ये प्राधान्याने असते प्रादेशिक अस्मिता. विठ्ठलाचे कानडीकरणं हे मान्य करावेच लागते.
हसस पंढरपूरचा विठ्ठल जैनांचा देव आहे. असाही दावा बऱ्याच काळापासून केला जातो. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या घराण्यात जन्मलेल्या नाथपंथीय गोविंदनाथ या विठ्ठल भक्ताने 'विठ्ठल विजय' हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये विठ्ठल हा विष्णूचाच अवतार, कृष्ण दिंडीर वनात आला आणि विठ्ठल झाला. असे प्रतिपादिले आहे. विठ्ठल हा जैनांचा देव म्हणणाऱ्यावर तुटून पडताना हा गोविंदनाथ म्हणतो:
पंढरीचा देव म्हणती जैनांचा।
तया गाढवांचा जन्म वृथा।।

मराठी संत विठ्ठलाला 'बुद्ध' म्हणतात. पण कधीही जिन म्हणत नाहीत. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती जैन नेमिनाथ तीर्थांकराची आहे असे काही जैनांचे म्हणणे आहे. मराठी संतांनी विठ्ठलाला मौनस्थ आणि बुद्ध असंही अनेकदा म्हटलं आहे. जनाबाई दशावताराचे वर्णन करताना म्हणते-
होऊनिया कृष्ण कंस वधीयेला।
आता बुद्ध झाला सखा माझा।।
एकनाथही एका गोंधळात म्हणतात.
बौद्ध अवतार घेऊन ।
विटे समचरण ठेवून।
पुंडलिक दिवटा पाहून।
तयाचे दारी गोंधळ मांडियला।
बया दार लाव।
बौद्धाई बया दार लाव।।
नामदेव देखील विष्णूचा नववा अवतार म्हणून उल्लेख करतात-
गोकुळीं अवतारु सोळा सहस्रवरु।
आपण योगेश्वरू बौद्धरूपी।।
तुकारामांनीही-
बौद्ध अवतार माझिया अदृष्टा।
मौन्यमुखे निष्ठा धारियेली।।
अशा शब्दात विठ्ठलाचं वर्णन केलं आहे.

विठ्ठल आणि बुद्ध हे नातं मराठी संतांनी कसं जोडलं? ज्ञानदेव-नामदेव यांचा आधीचा काळ हा बौद्धाचा काळ मानावा लागेल. महाराष्ट्रात हजार-दीड हजार वर्षे तरी बुद्धाच्या विचारांचा प्रभाव होता. निरनिराळ्या भागात, पर्वतात दिसणाऱ्या गुंफा याची साक्ष देतात. अहिंसा आणि करुणा यांच्या प्रभावाने त्याकाळातील माणसांची मनं भारली गेली होती. ज्ञानदेव-नामदेव यांचाही बुद्धाच्या असीम करुणेशी संबंध कशावरून आला नसेल? पंढरपूरचा पांडुरंग हा करुणामय बुद्ध, असं मानण्याचा विचार त्या काळात केला गेला असावा. समर्थशिष्य दिनकरस्वामी यांनी'स्वानुभव दिनकर' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात 'पांडुरंग महात्म्य' आठस पुंडलिक चरित्र सांगताना पुंडलिक देवाला नवव्या अवतारात करुणरस ध्यान स्वीकारण्याची गळ घालतो असं दाखवलं आहे. बुद्धाचा विष्णूच्या दशावतारात समावेश करण्याची ही प्रक्रिया मात्र खूप आधीची दिसते. शके १०५२ मध्ये म्हणजे इसवीसन ११३१ मध्ये कल्याणीचा चालुक्य नृपती सोमेश्वर याने जो 'मानसोल्लास' नांवाचा संस्कृत श्लोकबद्ध ग्रंथ लिहिला आहे त्यात बुद्धावताराला वंदन केलं असून ते मराठीत आहे-
बुद्धरूपे जो दाणवसुरा वंचउणी।
वेददूषण बोल्लउणी।
मायमोहिया तो देऊ माझि पासाऊ करू।।
'ज्याने बुद्धरूपाने दानवांना अन सुरांना वंचित केले अन वेदांना दूषण दिले तो मायामोहिया देव मला पसायदान करो.'

विठ्ठल ही जोडणारी देवता आहे. शैव आणि वैष्णव या दोन्हीचा समन्वय विठ्ठलात झाला आहे. पंढरपूर म्हणजे पांडुरंगपूर हे शैव क्षेत्र तिथे विष्णूचा अवतार विठ्ठल शैव असलेल्या पुंडलिकाने आणला हाच मुळात एक मोठा चमत्कार अथवा क्रान्ती म्हणायला हवी.
पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी।
नाही चराचरी ऐसा कोणी।
विष्णुसहित शिव आणिला पंढरी।।
केले भीमातीरी पेखणे जेणे।
निवृत्ती सांगे मातु विठ्ठल उच्चार।
वैकुंठ उतरे एक्या नामे।।
निवृत्तीनाथांच्या या अभंगात पुंडलिकाने विष्णूसहित शिव पंढरपूरला आणला आणि त्यालाच विठ्ठल म्हणतात. या विठ्ठलाच्या नामोच्चारणाने विष्णू प्रसन्न होतो हे सांगितलं आहे. विठ्ठल हा विष्णूचा अवतार! त्यामुळे विठ्ठलाचे भक्त स्वतःला वैष्णव म्हणतात. पण गंमत अशी आहे की, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, विसोबा खेचर, नामदेव, हे सगळे वैष्णव मुळात नाथपंथाचा अनुग्रह घेतलेले शैव आहेत. आलंदी पंढरपूर ही मूळची शैवक्षेत्रे आहेत. भीमाशंकरपासून निघणाऱ्या चंद्रभागेच्या काठावरचं पंढरपूर हे शैवक्षेत्र वैकुंठ बनलं. माथ्यावर शिवलिंग धारण करणारा विष्णू तिथे उभा ठाकला. शैव वैष्णव वाद संपून समनव्याचं एक वातावरण भागवतधर्माद्वारे मराठी संतांच्या अथक प्रयत्नाने निर्माण झालं.
पंढरीची वारी ही ऐक्याची वारी आहे. मराठी-कानडी-तेलुगु या प्रादेशिक ऐक्याची, शैव-वैष्णव या पंथीय ऐक्याची , बौद्ध-जैन यांनाही आपले वाटायला लावणाऱ्या एका देवाची. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शिव आहे, तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ विष्णू आहे, पण हा अर्थ विसरून आम्ही पांडुरंगा.... विठ्ठला.....म्हणत आहोत. शिवयोगी वैष्णव भक्त, निर्गुणात्मकवादी, सगुणात्मकवादी, अद्वैती, द्वैती असे सर्व मताचे लोक प्रांतभेद, भाषाभेद, जातीभेद विसरून पंढरपुरात एकत्र येतात.

पंढरपूर हे एका दृष्टीनं फार मोठं सामाजिक सुधारणेचं क्षेत्र आहे. मराठी संतांनी पंढरपुराचे आणि विठ्ठलाचे अपरंपार कौतुक गायले आहे. ' तू माऊली मी वो तुझा तान्हा। पाजी प्रेम -पान्हा पांडुरंगे।।' असं नामदेव देवाला आळवतात. ज्ञानेश्वर विठोबा माझे माहेर असं सांगून 'जाईन गे माये तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।।' अशी जवळीक दाखवतात. जनी तर 'माय गेली बाप गेला' असा आक्रोश करून 'आता सांभाळी विठ्ठला' असं म्हणत त्यांच्या गळ्यातच पडते. 'ये ग ये ग विठाबाई। माझे पंढरीचे आई' हा जनीचा लडिवाळपणा सगळ्यांच संतांनी स्वीकारलाय.मराठी संतांनी विठ्ठलाशी जोडलेलं हे नातं विलक्षण आहे. मात्र मराठी संतांनी देवाशी ही जवळीक साधतानाही 'काया ही पंढरी' हे भान ठेवलं आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. तीर्थक्षेत्र ही आपल्या जीवनातील देवत्व जागवण्यासाठीच आहेत. या तीर्थांमुळे मनाचं मालिन्य जाणार नसेल, उदारता येणार नसेल तर 'तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जन।' असं तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवलंय. हे सारं 'पंढरी पुराण-विठ्ठल पुराण' मी केवळ हमालासारखं आपल्यापर्यंत आणलंय. डॉ.शं. दा.पेंडसे, गुं.फ.आजगावकर, डॉ.पंडित आवळीकर, डॉ.शोभना गोखले, डॉ.शं.गो.तुळपुळे, रा.चिं. ढेरे, ग.ह.खरे, डॉ. दलरी या विद्वानांनी केलेलं संशोधन लेखन यांचा आधार मी हे सांगताना घेतला आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्राचं धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्र आहे.
काया ही पंढरी,आत्मा हा विठ्ठल।
नांदो केवळ पांडुरंग।।
भावभक्ती भीमा उदक ते वाहे।
बरवा शोभताहे पांडुरंग।।
दया क्षमा शांती हेचि वाळवंटू,
मिळालासे थाट वैष्णवांचा।।
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद,
हाचि नेमुनाद शोभतसे।।
दश इंद्रियांचा एक मेळ केला, ऐसा गोपाळकाला होतसे।।
देखीली पंढरी देही जनी वनीं,
एका जनार्दनीं वारकरी।।
देहीं-वनीं-जनीं पंढरी पाहणारा, ज्ञान-ध्यान-पूजा-विवेक यात रमणारा विठ्ठल हाच आत्मा म्हणणारा वारकरी महाराष्ट्रात दिसावा, असं एकनाथांना वाटत होतं. व्याकुळलेल्या गाढवाला गंगा पाजणारा आणि अस्पृश्याना कवटाळणारा हा 'खरा ब्राह्मण' ही पंढरपूरच्या विठ्ठलाने दिलेली संस्कृती, भक्ती, शक्ती आहे. सालोसाल पंढरीच्या वाटेनं लक्षावधी वारकरी जात आहेत. विठ्ठलाचा, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करीत आहेत, पण समतेच्या, सामाजिक प्रगतीच्या वाटेवर आम्ही चाललोय अस जाणवत नाही. पंढरपूरची वारी हा आमचा मोठा वारसा आहे. पण आम्ही तो कसा चालवतो आहो? गावातून वारी गेली की, मागे उरतो नुसता नरक, असं लोक म्हणतात. या साऱ्या वाटेवर अजूनही बायाबापड्यांना सारी लाज गुंडाळून उघड्यावरच आपले विधी उरकावे लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी तळमळाव लागतं. डोकं टेकायला आसरा मिळवण्यासाठी झगडावं लागतं. भागवत धर्माची पताका मिरवली तरी वारकरी जाती -पातीचे गोट सांभाळतात. जेवणाखाणाची जातनिहाय स्वतंत्र व्यवस्था गुपचूप होते. दरवर्षी लोक हजारो रुपये जमा करून कुठेकुठे जेवण्याची, अथवा इतर कसली व्यवस्था करतात. पण ती अपुरीच असते. परंपरेचे घोडे नाचविणारे दुढ्ढाचार्य साऱ्या आधुनिक सोयीचा यथासांग लाभ उठवतात मात्र परंपरेच्या नावाखाली सर्वसामान्य वारकऱ्याला हाल भोगायला लावतात. 'विसरली जाती वर्णाभिमान' हे फक्त अभंगात, प्रत्यक्षात ते खपवून न घेण्याचाच हट्ट !

खरोखरीच ही वारी हा महाराष्ट्राचा फार मोठा वारसा आहे, तर ह्या वारीत सहभागी होण्याऱ्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राने कायम स्वरूपाच्या आवश्यक सुविधा का निर्माण करू नयेत? सुलभ शौचालयासारखी स्वच्छ शेकडो शौचालये वारीच्या मार्गावर उभारून ती व्यवस्थित राखण्याची व एकही वारकरी उघड्यावर घाण करणार नाही याची सक्त काळजी घेण्याची व्यवस्था का केली जाऊ नये? 'पंढरपूरला येता येता पंधरा दिवस जागोजागी घाण करीत ये' असा काही दंडक विठ्ठलाने घातलेला नाही ना? कुठल्याही दिंडीत स्वतःचा वेगळा स्वैंपाक करू न देता सर्व वारकऱ्यांसाठी वाटेवर मुक्कामावर स्वैंपाकाची एकच व्यवस्था करून तिथेच वारकऱ्यांना जेवण घेण्याची व जरूर तर विश्रांती घेण्याचीही सोय का केली जाऊ नये? वारीबरोबर जाणाऱ्यांनी वाटेवर जे काही घडते त्याची उबग यावी अशी सत्यकथा केवळ श्रद्धेपोटी अजून दडवली आहे. विठ्ठलाची शपथ आहे, वारीबद्धल काहीही वाईट लिहू नका, अशी गळ भलेभले 'हभप' घालतात असं काही लेखकांनी लिहिलं आहे. असं का व्हावं? सगळी घाण सोवळ्यात दडवण्याची युक्ती कशासाठी? हल्ली वर्तमानपत्रात फोटो येण्यापुरते बडे लोक ह्या वारीला कुठेकुठे सामोरं जातात, पण हे सारं तेवढ्यापुरतीचं असतं.

पंढरपूरची वारी हा प्रत्येक मराठी माणसाने घ्यायला हवा असा अनुभव आहे. ह्या वारीनेच एककाळ महाराष्ट्राने फार मोठं सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणलं आहे. या वारीचा उपयोग करून आपल्या धर्माचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पद्धतशीरपणे करून बघितला आहे. रेव्हरंड जे.मरे मिचेल याने 'पंढरपूरची यात्रा' नावाचं एक पुस्तकही १८५५ मध्ये काढलं होतं. १८७३ सालात पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या एका वैराग्याने पांडुरंगाच्या पायावर धोंडा मारला. पायाला थोडी नुकसानी पोहोचली. मागे आधार देऊन हा पाय पक्का करण्यात आला व तेव्हापासून पाय कवळण्याची पद्धत थांबवून नुसतं पायावर डोकं टेकवण्याची पद्धत सुरू झाली. या घटनेचाही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी वापर केला व 'जो देव आपले रक्षण करू शकला नाही त्याची पूजा करण्यातली निरर्थकता हिंदूंना आता तरी समजेल' असं म्हटलं होतं. या कुत्सितपणाला हिंदूंनी ठणठणीत जबाब दिला आणि 'पंढरपूरचं महात्म्य कमी होणार नाही.' असंही ठामपणे सांगून टाकलं.

आजही पंढरपूरच्या वारीत घुसून वारकऱ्यांची सेवा करण्याचा आव आणत अन्य गोष्टी करणारी परधर्मीय मंडळी आहेत. ह्या वारीचा जनजागृतीसाठी, सामाजिक जागृतीसाठी आणि एकंदरीनेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता जरूर वापर करता येईल. पण हा विचार प्रत्यक्षात यावा म्हणून उमेदीच्या तरुणांनीच प्रयत्न करायला हवेत. ही वारी करून करून भागलेल्यांची, लागले रे पैलतीरी डोळे म्हणणाऱ्यांची, काही करायला न उरलेल्या तद्दन निष्क्रियांची असता कामा नये. ही महाराष्ट्राची धमनी आहे. मराठी तरुणांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काही करून दाखविण्यासाठी उपलब्ध असलेली ही जागृत शक्ती वापरली जायला हवी. 'यंदाच्या पालख्या गेल्या, पुढच्या वर्षी येणार का मंडळी पालखीबरोबर काही करून दाखवायच्या उमेदीसह' असं म्हणत तरुणांच्या संघटना पुढे यायला हव्यात.

*-हरीश केंची*

राष्ट्रपतींसाठीही कास्ट फॅक्टर

*राष्ट्रपतींसाठीही 'कास्ट फेक्टर'!*

"भाजपेयींचे हायकमांड 'मोदी-शहा' हेच आहेत.ते ठरवतील ते धोरण, ते ठरवतील ती तत्व आणि निर्णय...! अशी स्थिती आज आहे. यापूर्वी याच मोदीशहांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, हरियाणासाठी खट्टर, आसामसाठी सोनोवाल यांची निवड केली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी 'सुपर स्पाय' म्हणून ओळखल्या गेलेल्या पण आपल्या कामात अद्यापि फारशी चमक न दाखविलेल्या अजित डोबाल यांची नियुक्ती केली. या नेमणुका 'मेरीट'वर आधारित होत्या, त्यामुळे पक्षानं जशी मुकसंमती दिली तशीच विरोधी पक्षांनीही फारसा विरोध केला नाही. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी मोदी शहांनी दिली. तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. फारसं परिचित नसलेलं नांव, कोणत्याही क्षेत्रात फारसे कर्तृत्व नसलेलं नाव सुचविलं गेलं या मोदी शहांच्या निर्णयाने हे स्पष्ट झालं की, राजकारणात केवळ प्रतिभा आणि कर्तृत्व असायला हवे असे नाही तर आपल्या प्रत्येक बाबीला त्याने संमती द्यायला हवी असं त्याच्यावर नैतिक बंधन आलं पाहिजे. या सगळ्याहून निवडीमागे एकच कारण नेमकं ठरलं ते म्हणजे 'कास्ट फेक्टर'....!

---------------------------------------------

मोठ्या सस्पेन्सनंतर सत्ताधारी म्हणून एनडीएने रामनाथ कोविंद यांचं नांव राष्ट्रपतीपदासाठी जाहीर केलं. त्यानंतर सारेच आश्चर्यचकित झाले.'हे महाशय कोण?' असा सवाल सगळ्यांपुढे उभा राहिला. गुगल सर्च इंजिनवर शोधताना रामनाथ कोविंद कीवर्ड बरोबरच दुसरा पर्याय देत होत ते 'रामनाथ कोविंद कास्ट?' .... गुगल सर्च करताना जो शब्द जास्तवेळा विचारला जातो तो शब्द गुगल दाखवितो, याचा अर्थ असा की, नवा राष्ट्रपती बनण्याची शक्यता ज्यांची सर्वात जास्त होती त्यांची जात शोधण्यात लोकांची उत्सुकता हाती हेच दर्शवित होतं. यावरूनच देशातल्या राजकारणाचं खरं चित्र समोर येत.

गेल्या दोन महिन्यापासून, प्रणव मुखर्जी यांची पुन्हा निवड होणार नाही हे स्पष्ट होताच 'ही भाग्यवान व्यक्ती कोण?' याबाबत निरनिराळे अंदाज व्यक्त होत होते. अनेकांची नावं घेतली जात होती. या चर्चेत जातीची, प्रांतवादाची गणितं मांडली जात होती. मोदी शहांनी जाहीर केलेला उमेदवार या चर्चेला अनुसरून 'कास्ट फेक्टर' बाबत महत्वाचा ठरला. रामनाथ कोविंद हे बिहारचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते तरी ते राजकीय वर्तुळात तसे अपरिचत असेच होते. भाजपेयींच्या नेत्यांत ते परिचित असले तरी सर्वसामान्यांना ते अनभिज्ञ असेच आहेत. राजकीय वर्तुळात अडवाणी आणि मुरलीमोहन जोशी यांची नावे राष्ट्रपतीपदासाठी घेतले जात होते. या ज्येष्ठ नेत्यांना लोकसभेत बहुमत मिळाल्यानंतर मोदी शहांनी त्यांना सत्तेपासून दूर ठेवलं. किंबहुना दूर सारलं, आता तर ते जवळपास विस्मृतीत गेले होते. आज भाजपेयींच्या सत्तेचं जे मंदिर उभं आहे, त्याचा पाया घालण्यात यांचं मोठं योगदान आहे. त्यांचे विरोधकही हे मान्य करतील. त्यामुळे या नव्या राजकीय वातावरणात वर्तमान 'हायकमांड' म्हणजे मोदी शहा या दोघांपैकी एकाची निवड करतील त्यातही अडवाणी यांची शक्यता वाटत होती, मात्र त्याचवेळी अचानकपणे 'बाबरी मशिदी'चा न्यायालयीन वाद उभा ठाकला. कुणी म्हणतं की यांची नावं घेतली जाऊ नयेत म्हणून हा वाद उकरला गेला. बाबरीच्या प्रकरणी सीबीआयच्या चार्जशीटमध्ये अडवाणी जोशी यांची नावं आरोपी म्हणून असल्याने त्यांची नावे आपोआपच गाळली गेली. सुषमा स्वराज, द्रूपदी मुर्मु ही नावे आली अन गेलीही...! त्यानंतर उरली ती हायकमांड मोदी शहांची इच्छा...!

दक्षिण भारतात भाजपेयीचे अस्तित्व फारसे कुठे दिसत नाही, मग त्या भागातील उमेदवार असेल अशी अटकळ बांधली गेली . दाक्षिणात्यांची सहानुभूती मिळावी यासाठी विप्रोच्या अझीम प्रेमजी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती, कोकण रेल्वेचे ई. श्रीधरन, फिल्मस्टार रजनीकांत अशी नावे पुढं आली. यांच्या कर्तृत्वापेक्षा मोदी शहांना 'कास्ट फेक्टर' महत्वाचा वाटत होता. भाजप दलितांच्या विरोधात आहे असं चित्र उभं करण्यात विरोधक यशस्वी झाले होते, रोहित वेमुला, सहरानपूर दंगल, या साऱ्या प्रकरणात तशी छबी तयार झाली.  ती पुसण्यासाठी, अपरिचित, चेहरा नसलेले, फारसे कर्तृत्व नसले तरी केवळ ते दलित आणि संघ स्वयंसेवक असल्यानेच कोविंद यांचे नांव जाहीर केले गेले.

कोविंद हे उत्तरप्रदेश मधील दलित कोळी समाजाचे आहेत. २०१२ च्या तिथल्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप अध्यक्ष राजनाथसिंह यांनी त्यांचा दलित मतांसाठी वापर केला होता. ते ही मर्यादित स्वरूपातच! भाजपेयींनी कोविंद यांचे नाव जाहीर करुन एका दगडात अनेक पक्षी मारले. कोविंद यांच्या नांवाची घोषणा होताच विरोधक सैरभैर झाले. राष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या मतसंख्येत सत्ताधारी अन विरोधी पक्ष हे तुल्यबळ होते. विरोधकांना सर्वाधिक आशा ज्यांच्यावर होती ते नितीशकुमार यांनी तर उघडपणे कोविंद यांना पाठींबा जाहीर केला. भाजपेयी आपल्या राजकीय कौशल्याने 'कोविंद यांना विरोध करण म्हणजे दलितांना विरोध' असं चित्र निर्माण करील त्यामुळे आपल्या दलित वोटबॅंकेला धक्का लागेल हे ओळ्खल्याने मायावती आणि मुलायमसिंग यांनीही कोविंद यांना पाठींबा जाहीर केला. प्रमुख विरोधीपक्ष काँग्रेसवरही यामुळे दबाव वाढला. भाजपेयींनी राष्ट्रपतीपदासाठी सर्व पक्षाशी चर्चा करू असं सांगितलं असतानाही तशी कोणतीच चर्चा न करता परस्पर उमेदवार जाहीर केला अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली. काँग्रेसने कोविंद यांच्या समोर तेवढाच ताकदवान चेहरा उमेदवार म्हणून उतरविण्याच्या हालचाली सुरू केल्या. तसं झालं नसतं तर निवडणूक एकतर्फीच होण्याची शक्यता होती. काँग्रेसनं सतरा विरोधीपक्षांच्या सहाय्याने सुशीलकुमार शिंदे, भालचंद्र मुणगेकर, प्रकाश आंबेडकर अशा विविध नावांची चर्चा करून मिराकुमार यांचं नाव निश्चित केलं. सर्वपरिचित, दलित समाजाच्या नेत्या मिराकुमार यांच्या नावामुळे लढत तुल्यबळ अवस्थेत आली. या साऱ्या घडामोडीत सोनिया गांधी यांनीच विरोधकांचं नेतृत्व करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसून आलं. मीराकुमार यांच्यापासून अनेक पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी त्यांनी आपली तब्येत बरी नसतानाही घेतल्या. यावरून केवळ विरोधकांनाच नाही तर काँग्रेस पक्षासाठी देखील किती महत्वाची आहे हे दाखवून दिलं. या सर्व घटनांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा वाहण्याची जबाबदारी असलेले राहुल गांधी कुठेच दिसले नाहीत.

दलित आणि महिला उमेदवार म्हणून त्या विरोधीपक्षांना आकर्षित करू शकतील असं यावेळी सांगण्यात आलं. लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमार यांना भावनिक आवाहन करताना म्हटलं आहे की, ' त्यांनी बिहारच्या जनतेचं सन्मान करीत बिहारकी बेटी मीराकुमार यांना पाठींबा द्यायला हवाय. भाजपला पाठींबा देण्याची चूक त्यांनी पुन्हा एकदा करु नये.' नितीशकुमार यांची द्विधा अवस्था झाली होती, 'बिहारकी बेटी वा बिहारका राज्यपाल?' तरी देखील नितीशकुमार यांनी आपल्या कारभारात मदतरुप ठरलेल्या राज्यपाल कोविंदांना पाठींबा जाहीर केला. मायावती, मुलायमसिंग यांची अवस्थाही विचित्र झालीय. दलित आणि महिला उमेदवार मीराकुमार यांना विरोध करणं अवघड झालंय. इतर विरोधकांचीही अशीच अवस्था झालीय. जातीच्या राजकारणात सध्यातरी भाजपेयी वरचढ ठरलेत.

मीराकुमार ह्या कोविंदांना आव्हान देतील काय? सत्ताधारी आणि विरोधीपक्ष यांच्या मतसंख्येत तसा फरक राहिलेला नाही. कोविंदांना इतरांनी पाठींबा देण्यापूर्वी भाजपकडे १७-१८ हजार मते कमीच होती. शिवसेना, बिजू जनता दल यांची भूमिका संधीग्ध होती. नितीशकुमार यांच्या पाठींब्याने भाजपचं बळ वाढलं. भाजपच्या 'दलित कार्ड' समोर विरोधकांनी दलित कार्डाबरोबरच महिला कार्ड वापरलं आहे. याचा अर्थ सगळेच पक्ष आता राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक माध्यमातून दलित मते आपल्याकडे खेचण्यासाठी सरसावले आहेत. राष्ट्रपतीसाठीच्या निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच जातीची समीकरणे उभी ठाकली आहेत. दलितांसमोर दलित लढतोय. ही निवडणूक आगामी२०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाची ठरतेय. त्यापूर्वी शक्तीप्रदर्शनाचा हा शेवटचा प्रयत्न असल्याने विरोधीपक्षानेही जोर लावलाय.

भाजपेयींचे हायकमांड 'मोदी-शहा' हेच आहेत.ते ठरवतील ते धोरण, ते ठरवतील ती तत्व आणि निर्णय...! अशी स्थिती आज आहे. यापूर्वी याच मोदीशहांनी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस, हरियाणासाठी खट्टर, आसामसाठी सोनोवाल यांची निवड केली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी 'सुपर स्पाय' म्हणून ओळखल्या गेलेल्या पण आपल्या कामात अद्यापि फारशी चमक न दाखविलेल्या अजित डोबाल यांची नियुक्ती केली. या नेमणुका 'मेरीट'वर आधारित होत्या, त्यामुळे पक्षानं जशी मुकसंमती दिली तशीच विरोधी पक्षांनीही फारसा विरोध केला नाही. राष्ट्रपतीपदासाठी रामनाथ कोविंद यांना उमेदवारी मोदी शहांनी दिली. तेव्हा साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. फारसं परिचित नसलेलं नांव, कोणत्याही क्षेत्रात फारसे कर्तृत्व नसलेलं नाव सुचविलं गेलं या मोदी शहांच्या निर्णयाने हे स्पष्ट झालं की, राजकारणात केवळ प्रतिभा आणि कर्तृत्व असायला हवे असे नाही तर आपल्या प्रत्येक बाबीला त्याने संमती द्यायला हवी असं त्याच्यावर नैतिक बंधन आलं पाहिजे. या सगळ्याहून निवडीमागे एकच कारण नेमकं ठरलं ते म्हणजे 'कास्ट फेक्टर'....!

स्वातंत्र्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसमोर नेहरूंनी बाबू जगजीवनराम यांना पुढं केलं होतं, बिहार आणि त्या पट्ट्यातील हिंदी भाषिक प्रदेशात  बाबू जगजीवनराम यांचा प्रभाव वाढला तर ते काँग्रेसच्या हिताचेच आहे. डॉ. आंबेडकरांच्या गैरहजेरीत दलितांकडून जगजीवनराम यांना स्वीकारले जावे यासाठी सत्तेच्या माध्यमातून  प्रयत्न त्याकाळी केले गेले होते. त्यामुळे जगजीवनराम यांनी तब्बल तीस वर्षे मंत्रिपदे उपभोगली, उपपंतप्रधानही ते झाले. तो एक दीर्घकाळ लांबलचक राजकीय खेळी खेळण्याचा विक्रमच! नेहरूंनी दलित मतांसाठी जी खेळी खेळली आणि काँग्रेसला यश मिळवून दिले. आताच्या या सोनिया-राहुल काँग्रेसला मिळेल काय? नितीशकुमार, नवीन पटनाईक, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल ह्या सारख्या नेत्यांनी आपली भाजपविरोधी भूमिका कायम ठेवली असती आणि आता काँग्रेससोबत असलेल्या सतरा पक्षाबरोबर असते तर लढत चुरशीची झाली असती.

चौकट
राष्ट्रपती निवडणुकीसाठी एकूण मते १०लक्ष९८हजार९०३ आहेत. त्यातील ५लक्ष४९हजार४०८ मते खासदारांची आणि ५लक्ष४९हजार४९५ मते आमदारांची आहेत.
प्रत्येक राज्य विधान सभेतील सदस्यांच्या प्रत्येक एका मताला मूल्य दिले आहे. राज्याच्या लोकसंख्येला राज्य विधानासभांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्यने भागायचे आणि आलेल्या उत्तराला पुन्हा एक हजाराने भागायचे त्यातून जे येईल ते त्या त्या राज्यातील एका मताचे मूल्य.
मतांचा मूल्यासह प्रमुख पक्षाकडे असलेली पक्षनिहाय मते अशी आहेत. भाजप- ४लक्ष४२हजार११७, काँग्रेस-१लक्ष६१हजार४७८, शिवसेना-२५हजार८९३, टीएमसी-६३हजार८४७, तेलगू देशम-३१हजार११६, समाजवादी पक्ष-२६हजार०६०, सीपीएम-२७हजार०६९, बीएसपी-८हजार२००, जेडीयु-२०हजार९३५, आरजेडी-१८हजार७९६, डीएमके-१८हजार३५२, आणि राष्ट्रवादी काँग्रेस-१५हजार८५७.

- हरीश केंची.

Saturday 24 June 2017

मिशन २०१९ इज बिकमिंग थ्रिलर

*मिशन २०१९ इज बिकमिंग थ्रिलर*

" भाजपकडे नसतील एवढे तरुण चेहरे काँग्रेसकडे आहेत. पण गेल्या ५-६ वर्षांपासून हे सक्षम तरुण नेते हताश झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, मनजीतसिंग बिट्टा असे अनेक चेहरे आहेत.पण त्यांची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एक जोरकस, तडाखेबाज नेतृत्वाची फळी काँग्रेस उभी करू शकली नाही. काँग्रेसची इतकी घसरण झाली तरी राष्ट्रीय स्तरावर इतर कुठल्याही नेत्याला काँग्रेस आणू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात कार्यरत राहा असे सांगितले गेल्याने ह्या नेत्यांमध्ये निराशा आणि नकारात्मकता निर्माण झालीय. जोपर्यंत राहुल पक्षाची धुरा वाहताहेत तोपर्यंत मतदारांकडे मतांसाठी जाणं व्यर्थ आहे असं ते समजतात. तरीदेखील ते राहुल गांधींच्या विरोधात बोलू शकत नाहीत. जर काँग्रेसपक्षानं किती जणांना राहुल गांधी नेते म्हणून हवेत अन किती जणांना नकोत यावर जर गुप्त मतदान घेतलं तर राहुल यांचं डिपॉझिट जप्त होईल की त्यांचं नेतृत्व लादलं गेलंय हे जाणून घेणं मजेशीर ठरणार आहे"
---------------------------------------------

'भारतात आज तरी समाजातील सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करील असा नेता दिसत नाही. जो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वा भाजपशी सामना करील; हे पाहता आता आपल्याला २०२४ च्या निवडणुकीसाठी आशादायकरित्या तयारी करावी लागेल.' ......जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाने केलेल्या या गंभीर वक्तव्याने कित्येक काँग्रेसी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना आनंद झाला असेल, कार्यकर्ते ओमर अब्दूल्लांना धन्यवाद देत म्हणत असतील की,.... वाह, जनाब..... क्या खूब फर्माया आपने.... हमारे दिलकी बात आपने छिन ली...!'

सोशल मीडियावर राहुल गांधींवर सांता-बांतापेक्षाही अधिक विनोद फिरत असतात. यात भाजपेयी मोठ्या संख्येने असतात. भाजपची अशीच इच्छा दिसते की, काँग्रेसने विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढवाव्यात. काँग्रेसच्या नशिबानं राहुल गांधींचा ग्राफ दिवसेंदिवस असा काही घसरतो आहे की, भारतासारख्या खंडप्राय देशाचं नेतृत्व राहुल करतील असं भारतीयांना वाटतंच नाही. मोदी आपल्या वाग्छटा दाखवीत, व्यंगात्मक वाणीने राहुल गांधींना व्यूहात्मकरित्या 'विदूषक' म्हणून रंगविण्यात सफल ठरले आहेत. राहुल याच कारणानं त्यांचा आत्मविश्वास गमावून बसले आहेत. ६६वर्षीय नरेंद्र मोदी देशातल्या ६५ टक्के युवकांशी आपल्या अमोघ वक्तृत्वाने ही 'व्होटबॅंक' आपलीशी केली आहे. पण ४७ वर्षीय राहुल गांधीतरुणांसोबत 'व्हेव लेंग्थ' जमवू शकलेले नाहीत. काँग्रेसी मोदींची अवहेलना करताना त्यांना 'फेकू' असं संबोधतात तर भाजपेयी राहुलना 'पप्पू' म्हणतात. पप्पू गेल्या काही वर्षांत अनेकदा परीक्षेला बसलाय पण उत्तीर्ण काही झाला नाही. काँग्रेस ज्याला फेकू म्हणतात तो मात्र 'डिस्टिंशन' मिळवीत उत्तीर्ण होतोय!

आपल्यासमोर उभं ठाकलेल्या व्यक्तीशी मुकाबला करीत त्याला मागं टाकायचं असेल तर त्याच्या यशाचं गमक काय आहे याचा बारकाईनं आणि मुळापासून अभ्यास करायला हवाय. त्यातही त्याला पराभूत करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी. 'शेरास सव्वाशेर' भूमिका घेऊन सज्ज राहायला हवं. प्रश्न असा पडतो की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर राहुल गांधी एक राष्ट्रीय नेता म्हणून भारतीयांवर प्रभाव पाडू शकले आहेत काय? पक्ष म्हणून अधिक संघटित, लढाऊ वृत्ती, आणि व्युहात्मकता अंगिकारीत काँग्रेस काही करीत आहे असं कधी दिसलं काय? मोदींच्या जवळ अमित शहांसारखा कुशल संघटक आहे. तसा काँग्रेसकडे संघटक, 'किलर इंस्टींक्ट' असलेला कुणी नेता दिसतच नाही. प्रसिद्धी माध्यमाच्या साथीनं राष्ट्रीय स्तरावर एखादा नेता असेल, पण गावपातळी पासून राज्यस्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि 'वुई शेल ओव्हरकम' म्हणत धडपडणारा लढाऊ नेता हवाय. भाजपने उत्तरप्रदेशातला नेत्रदीपक विजय दूर सारून आतापासूनच 'मिशन २०१९' चा प्रारंभ केलाय. मुंबईत झालेल्या नेत्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांसाठी जो संदेश दिलाय तो पाहता त्यांना लोकसभेच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळवायच्या आहेत, अशी व्युहरचना ते करताहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या पट्ट्यात भाजपचं अस्तित्व जाणवत नाही. त्याजागी आपला प्रभाव पाडण्यासाठीच भाजपनं 'दिल, दिमाग और जुनुन' सह कंबर कसली आहे. मोदी तर निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जबरदस्त स्फूर्तीनं सभा घेतात. पण त्यासाठी आवश्यक ग्रासरुट आणि ग्राऊंड वर्क आणि बूथ कमिटी पासून हायकमांडपर्यंतची आश्चर्यकारक असे कम्युनिकेशन यंत्रणा उभी केली आहे.

जरा विचार करा, काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करावा तरी भय कायमच आहे. नांव जाहीर केलं तर त्या नावाला पक्षातूनच छेद मिळण्याची विरोध होण्याची शक्यता मोठी. भाजप मात्र असे नाव जाहीर करतच नाही. भाजपच्या प्रमुखाच्या इच्छेनुसार आमदारांची बैठक बोलावून मुख्यमंत्री जाहीर केला जातो. याला मुलामा देताना भाजपेयी मात्र असं भासवतात की, पक्षाचं केडर हे पक्षाप्रती समर्पित भावनेनं ओथंबलेले आहे. पक्ष सत्तेसाठी नव्हे तर राज्य आणि राष्ट्रकारणासाठी राजकारण करतो. असं वातावरण आणि लोकांप्रति मानस तयार करण्यात भाजप यशस्वी ठरतोय.

राहुल गांधींना भाजपेयीं आणि देशातील नागरिक राजकीय पटलावर 'बच्चा'च मानतात. पण काँग्रेस पक्ष त्यांना 'सिंह'च वाटतात. ते जेव्हा जे काही बोलतील त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवत नाहीत. हिंमत सोडा, मोठ्या संख्येने काँग्रेसजन त्यांची तरफदारी आणि खुशामत करण्यातच धन्यता मानतात....'राहुलजी, या साऱ्या परिणामांना आपण दोषी नाहीत, खरं तर आम्हीच लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. प्रत्येक पराभवानंतर प्रसिद्धीमाध्यमातील राजकीय विश्लेषकांना त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडण्याची जणू फॅशनच अस्तित्वात आलीय. काँग्रेस केवळ आपल्यामुळेच एकसंघ राहिलाय, पक्षाच्या हारातील मण्यांना एकत्र आणणार सूत्र-दोरा आपण आहात....'

भाजपकडे नसतील एवढे तरुण चेहरे काँग्रेसकडे आहेत. पण गेल्या ५-६ वर्षांपासून हे सक्षम तरुण नेते हताश झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, मनजीतसिंग बिट्टा असे अनेक चेहरे आहेत.पण त्यांची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एक जोरकस, तडाखेबाज नेतृत्वाची फळी काँग्रेस उभी करू शकली नाही. काँग्रेसची इतकी घसरण झाली तरी राष्ट्रीय स्तरावर इतर कुठल्याही नेत्याला काँग्रेस आणू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात कार्यरत राहा असे सांगितले गेल्याने ह्या नेत्यांमध्ये निराशा आणि नकारात्मकता निर्माण झालीय. जोपर्यंत राहुल पक्षाची धुरा वाहताहेत तोपर्यंत मतदारांकडे मतांसाठी जाणं व्यर्थ आहे असं ते समजतात. तरीदेखील ते राहुल गांधींच्या विरोधात बोलू शकत नाहीत. जर काँग्रेसपक्षानं किती जणांना राहुल गांधी नेते म्हणून हवेत अन किती जणांना नकोत यावर जर गुप्त मतदान घेतलं तर राहुल यांचं डिपॉझिट जप्त होईल की त्यांचं नेतृत्व लादलं गेलंय हे जाणून घेणं मजेशीर ठरणार आहे.

ओमर अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य आजच्या राजकीय परिस्थितीत खूप महत्वाचे ठरतं आहे. आज मोदी वा भाजपसमोर सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाणारा नेता दिसत नाही. राहुल यांच्या जागी कोण? मोदींना पर्याय कीं असतील? मोदी हे स्वतः मजबूत आणि लोकप्रिय आहेत त्यांनी प्रशासन आणि पक्ष या दोन्हीवर एकहाती मजबूत पकड मिळविली आहे. पण इकडे सोनिया आणि राहुल सलगरित्या दुबळे बनत चाललेले दिसताहेत. पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर वैश्विक जनमानस आणि टेक्नॉलॉजीच्या युगात भारतीयांना सुख आणि समृद्धीची स्वप्ने दाखविणारा नेता आता हवाय.

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसपक्षांच्या नेतृत्वावर, राहुल गांधींवर टीका करीत पुन्हा जुना विचार नव्याने मांडलाय. तो असा की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षांनी एक 'महागठबंधन' करावं. भूतकाळात अशा प्रकारे 'महागंठबंधना'चा विचार कोण्यातरी सिनिअर नेत्याच्या प्रधानमंत्री बनण्याच्या म्हत्वाकांक्षेने, इच्छेने होई. आता सर्वच बिगर भाजपेयी आणि त्यांचे नेते हे मोदींना टक्कर देण्याची शेवटची आशा ही लाचारीच्या फार्मूल्याकडे पाहात आहेत. राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव, मुलायमसिंह, ममता बेनर्जी, शरद पवार, लालू यादव, ओमर अब्दुल्ला आणि डाव्यांच्यासह महागठबंधन अस्तित्वात आलं तरी त्यात प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण? हा प्रश्न उभा राहताच ती तुटण्याचीच शक्यता मोठी आहे.

आता होणारी राष्ट्रपतींची निवडणूक ही आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालीमच म्हणायला हवी. रामनाथ कोविंद यांच्या समोर विरोधकांनी मीराकुमारी या मागासवर्गीय नेत्यांमध्ये झगडा उभा झालाय. हळूहळू देशातील एकापाठोपाठ एक अशा राजकीय पक्षाचे पत्ते आता उघड होताहेत. मोदींबरोबर असलेलं जनमानस ओळखून काहींनी भाजपशी जवळीक साधलीय तर काहीजण सावध भूमिका घेताहेत. म्हणून मिशन२०१९ हे बिकमिंग थ्रिलर...!

*चौकट*

*इंडियन पॉलिटिकल लीग*

भाजपेयींची २०१९ साठीची तयारी सुरू झालीय हे वर सांगितलंय. आगामी दोन वर्षात त्यातील कंगोरे समोर येतील. पण या लोकसभेच्या फायनलपूर्वी विधानसभेच्या निवडणुकांची सेमिफायनल 'इंडियन पॉलिटिकल लीग'च्या थाटात होणार आहे. त्या अधिक लक्षवेधी असतील. यावेळी कित्येक मॅच फिक्सिंग, खेळाडूंची पळवापळवी, यासाठी उथलपुथल आणि त्याचबरोबर सट्टाबाजार याला तेजी येईल. भाजपने कप्तान आणि प्रशिक्षक नेमून नेट प्रॅक्टिस सुरू केलीय. मात्र इतर संघांना अजून ग्राऊंड, खेळाडू, खेळाचं साहित्य मिळालेलं नाही, ते हॉटेलातच मजा मारत प्रतिक्षा करताहेत.


*-हरीश केंची*

Saturday 17 June 2017

शिक्षणाच्या आईचा घो...!

*शिक्षणाच्या आयचा घो...!*

"महाराष्ट्राच्या ज्ञानपरंपरेला आग लावून त्या आगीवर आपल्या स्वार्थाचे परोठे भाजणारे हे शिक्षणसम्राट ऐश्वर्य भोगताहेत. याचे दुःख नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात चोर बाजार सुरू झाले आहेत याचे मात्र दुःख निश्चित आहे. या शिक्षणसंस्था जकातनाक्यासारख्या बनल्या आहेत. शिशु वर्गात प्रवेश घ्यायलासुद्धा हजारो रुपयांची देणगी द्यावी लागते. आत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत संस्थाचालक कोपऱ्याकोपऱ्यावर हात पुढे करून विद्यार्थ्याला अडवीत असतात. त्या हातावर काही ठेवल्याखेरीज पुढे जाणे विद्यार्थ्याला अशक्य झाले आहे.  हे सारे गुन्हेगारीत जमा होत नाही? घर बांधणाऱ्यांकडून खंडण्या वसूल करणारे गेंगस्टर आणि जीवन घडविण्यासाठी शिक्षण घेणाऱ्यांना वाटेवाटेवर अडवून पैसा उकळणारे शिक्षणक्षेत्रातील 'वंदनीय' यांच्यात आज काय फरक उरलाय? का या शिक्षण क्षेत्रातल्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध लोक पेटून का उठत नाहीत?"
------------------------------------------

सध्या राज्याचे शिक्षण खाते भलतेच चर्चेत आलं आहे. शिक्षणमंत्र्यांना तर कडेकोट बंदोबस्तात वावरावं लागतं आहे. यावरूनच खात्याचं महत्व दिसून येतंय. फीवाढीकडे जाणीवपूर्वक होणारं दुर्लक्ष, सतत बदलती ध्येय धोरणं, शिकविण्याऐवजी शिक्षकांकडे सोपविली जाणारी कामे, विनाअनुदानित संस्थांना अनुदानाची घोषणा, ऑनलाईन प्रशासकीयबाबींचा उडालेला गोंधळ, एक अनेक शिक्षणखात्याच्या भंपक गोष्टी लोकांसमोर दररोज येत आहे. विध्यार्थ्याची रोडावणारी संख्या, त्यापाठोपाठ येणारा अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांचा प्रश्न हे सारे शालेय शिक्षणाचे एका बाजूला तर दुसरीकडे उच्च शिक्षणातील विनाअनुदानित संस्थानीं मांडलेला उच्छाद अधिक चिंताजनक बनला जातो आहे. त्याकडे सोयिस्करदृष्ट्या कानाडोळा केला जातोय या साऱ्या उच्छादाने सार्वत्रिक शिक्षणक्षेत्राची उध्वस्त होण्याकडे वाटचाल सुरू झालीय याचं भान मात्र राहिलेलं दिसत नाही.

राज्यात आणि विशेषतः शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात सुरू असलेला 'शिक्षण धंदा' दिवसेंदिवस चिंताजनक बनतो आहे. महाराष्ट्राच्या ज्ञानपरंपरेला आग लावून त्या आगीवर आपल्या स्वार्थाचे परोठे भाजणारे ऐश्वर्य उपभोगताहेत याचं फारसं दुःख नाही पण शिक्षणाच्या क्षेत्रात जो चोरबाजार राजरोसपणे सुरू आहे त्याचे मात्र निश्चित दुःख आहे. विनाअनुदानामुळे जनसामान्यांना उच्च शिक्षणाची सोय झालीय का? या शिक्षणसंस्थातून कुणाची गर्दी आहे? कसलं शिक्षण इथं मिळतं? कुठली नीतिमत्ता इथं घडविली जाते?

गेल्या काही वर्षांत या धोरणामुळे शिक्षणाचं खासगीकरण झपाट्यानं होऊ लागलं आहे.
 राजकारण्यांनी आपली ताकद वापरून शिक्षणाचे 'मॉल्स' खोलले आहेत. जादुई नगरीसारख्या विद्यानगऱ्या उभ्या झाल्यात. राजकारण्यांची मुलंच नव्हे तर चमचेसुद्धा आलिशान गाड्यातून फिरू लागले आहेत. सहजपणे पांचपन्नास हजार फेकून आपल्या तालावर बडे पत्रकारच नव्हे, तर साहित्यिक आणि विद्वानही नाचवता येऊ लागले. याची खंत नाही. उद्याचे इंजिनिअर्स, उद्याचे डॉक्टर्स, उद्याचे तंत्रज्ञ, उद्याचे शास्त्रज्ञ नव्हे उद्याचे भवितव्य .....! विचार केला तर वेड लागेल, अशा गोष्टी राजरोसपणे घडताहेत. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना त्यांनी हे विनाअनुदानित धोरण आणलं. धोरणाचा हेतू चांगला होता. अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण ही ठराविक लोकांची मक्तेदारी बनल्यामुळे तळागाळातल्या घटकांनाही ती संधी मिळावी. परंतु चांगल्या धोरणाची कबर कशी खणायची, हे कुणी आपल्याला शिकवावं लागत नाही. त्याप्रमाणे राज्यकर्त्यांच्याच आश्रयाखाली शिक्षणसंस्था काढणाऱ्यांनी त्या धोरणाची वाट लावून टाकली. आता तर हे  विनाअनुदानित धोरण महाराष्ट्राच्या भवितव्याला लागलेला महाभयंकर रोग ठरतोय अशी स्थिती निर्माण झालीय. सारे शिक्षणाचे क्षेत्रच राजकारण्यांनी लाचखाऊ बनविले आहे.

शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडणाऱ्या या सगळ्यांनी शिक्षण एवढं महाग करून टाकलं आहे की, बालवाडी प्रवेशापासूनच पालकांचा जीव मेटाकुटीला येतो हजारो रुपयांची देणगी द्यावी लागते आहे. शिक्षण संस्था या जणू जकातनाक्यासारख्या बनल्या आहेत. आत शिरल्यापासून पहिली, पाचवी, अकरावी पर्यंत बाहेर पडेपर्यंत संस्थाचालक हे कोपऱ्याकोपऱ्यावर हात पुढे करून विद्यार्थ्याला अडवित असतात. त्या हातावर काही ठेवल्याखेरीज पुढं जाणं विद्यार्थ्याला अशक्य झालं आहे. हे सारं गुन्हेगारीत जमा होत नाही काय? घर बांधणाऱ्या म्हणजेच बिल्डरांकडून खंडण्या वसूल करणारे गेंगस्टर आणि जीवन घडविण्यासाठी शिक्षण घेणाऱ्यांना वाटेवाटेवर अडवून पैसा उकळणारे शिक्षणक्षेत्रातील 'वंदनीय' यांच्यात आज फरक काय उरलाय? का या शिक्षणक्षेत्रातील गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध लोक पेटून का उठत नाहीत?

विद्यार्थी संघटना याबाबत उदासीन दिसतात. त्यांना शिक्षणक्षेत्रातील या कर्करोगाकडे पाहायला वेळच नाही. इथे वर्चस्व असलेल्या अभाविपच्या कार्यकर्त्यांचं काय?  भाजपच्या राजकारणात निष्कारण नको तेवढे गुंतून पडणारे तरुण आपल्या हातापायात बेड्या अडकवून घेत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी जोरदार आंदोलन केले पण त्यानंतर ते विझले. मनसेच्या विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले तर त्यांच्यावर या संस्थाचालकांनी दरोड्याचा गुन्हे दाखल केले. त्याला सरकारची साथ होती. स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाने देखील याप्रश्नी त्वेषाने आंदोलन केले पण त्यांचा तो आवाज दुर्लक्षिला गेला ते सरकारात बसलेल्या संस्थाचालकांच्या धुडकावून दिल्याने.

ज्यांच्यापर्यंत ज्ञानगंगा पोहोचलीच नाही त्यांच्यासाठी ही विनाअनुदान महाविद्यालये हवीत. ज्यांना पैसे देण्याची ऐपत आहे त्यांच्याकडून पैसा घेऊन ज्यांना शिक्षण घेण्याची ऐपत वा संधी नव्हती त्यांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयोग आम्ही करू. मोठ्या इमारतीची मिजास आम्हाला नको, झाडाखाली वर्ग भरवू, पण उच्च शिक्षणापासून वंचित राहिलेल्यांना उच्च शिक्षण देऊ अशी भारावून टाकणारी भाषा करून विना अनुदान महाविद्यालये मिळविलेल्यांनी चालवलेला नीच भ्रष्टाचार बघितला की, फुटपाथवर ताकद की दवा विकणाऱ्या भोंदूपेक्षा हे शिक्षणमहर्षी भोंदू असल्याचे सिद्ध होते. ग्रामीणभागात वैद्यकीय,अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक काढतो म्हणायचे आणि वर्षभरात बाडबिस्तरासह या महाविद्यालयाची मुंबई-पुण्यात म्हणजे शहर भागात 'बदली' करून घ्यायची हा धंदा इथल्या मातबरांनी केलाय. झाडाखाली वर्ग भरवू म्हणून त्यांनी बांधलेल्या विद्यानगऱ्या, मॉल्स पाहिल्या की, 'हात लावील तिथं सोनं' गोष्टीतला राजा मिडास आठवतो. शिक्षण क्षेत्रातले हे सफेद डाकू म्हणावं अशी स्थिती झालीय. त्यांनी सरकारला फसविले, गोरगरीबाला फसविले, पैसा देणाऱयांना फसविले, अध्यापक-प्राध्यापकांना फसविले. ज्यांना चांगल्या कॉलेजात नोकऱ्या मिळत नाहीत, ज्यांना शिकविण्याचा अनुभव नाही असे अर्धेकच्चे प्राध्यापक भरण्याकडे कटाक्ष अनेक संस्था ठेवतात. विद्यार्थ्याना परिक्षेआधी प्रश्नपत्रिका सांगण्याचा, उत्तरपत्रिका लिहिताना कॉपी करण्यास भरपूर मुभा देण्याचा, नंतर उत्तरपत्रिका बदलण्याचा अथवा गुण वाढवण्याचा हमखास यशदायी मार्गही अनेक संस्था राजरोस वापरतात. ह्या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे? उद्याचा डॉक्टर हा डॉक्टरी ज्ञान संपादन केलेला असेलच असेलच असे नाही. इंजिनअर जे काही निर्माण करेल ते कितपत टिकाऊ असेल याचा विश्वास धरता येणार नाही. विना अनुदान हा बनावट माल बनविण्याचा धंदा होती आहे.
विनाअनुदानातला विनापावतीचा धंदा उखडण्याइतकी हिम्मत पोलीस खात्यात केव्हा येणार? गुंडांच्या हातात महाभयंकर शस्त्रे तरी असतात, पण नुसत्या हातांनी पुढच्या पिढीला नेस्तनाबूद करू बघणारे शिक्षण क्षेत्रातले हे गेंगस्टर हे महाभयंकर आहेत. अधिक क्रूर आहेत, अधिक धोकादायक आहेत. आज डोळसपणे स्वतःच्या राक्षसी स्वार्थासाठी सारा समाज रसातळाला नेणारे धंदे शिक्षणाच्या क्षेत्रात करणारे 'शिक्षणमहर्षी' बघावे लागत आहेत.

-हरीश केंची


पालख्या पंढरपुरा निघाल्या...!

पालख्या पंढरपूरा निघाल्या

"ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच समाजात भेदाची प्रतिष्ठा वाढली होती. मनुष्याचा लोभ वाढत जाऊन धर्म-अधर्म, नीती-अनीती, शुभ-अशुभ कसलाच विवेक राहिला नव्हता स्वार्थाखातर धर्मही सोडण्यास माणसे तयार होती. अशावेळी समाजाला संघटित राखण्याचा, त्यांच्यात बंधुभाव जागवण्याचा आणि समाजाच्या रोजच्या कारभारात लुडबुड करून विषमता-वैर वाढवणाऱ्या भेदभावांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न संतांनी केला. भागवतधर्म वारकरी संप्रदायामार्फत केला. ध्येयासाठी, भेदशून्य एकजूट करण्यासाठी संत राबले."
-------------------------------------------

*वा*रकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचिला असं सांगणारा संत बहिणाबाईंचा 'ज्ञानदेवे रचिला पाया' अभंग आहे. ज्ञानदेवांनी पाया रचला म्हटले जाते. कारण विखुरलेल्या वारकरी मंडळींना त्यांनी एकत्र आणले. 'मेळविली मांदि वैष्णवांची' ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीने हे ऐक्य आणखी दृढ झाले. वारकरी जे प्रमाण ग्रंथ मानतात, त्यात वेद, गीता, भागवत हे संस्कृत ग्रंथ आहेत, आणि ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, तुकाराम गाथा, एकनाथ गाथा, ज्ञानेश्वरांचा आणि एकनाथांचा हरिपाठ यांनाही स्थान आहे. प्रत्येक वारकऱ्याने ज्ञानेश्वरांची पोथी जवळ बाळगावी. नित्यनेमाने ज्ञानेश्वरीतल्या थोड्यातरी ओव्या रोज वाचाव्यात असा दंडकच आहे. पण असे असले तरी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांपासून सुरू केले तो पुंडलिक वारकरी सांप्रदायाचा जनक ठरू शकेल.

*पंढरपूरचे मंदिर*

पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर किती जुने याबद्धलचा पुरावा असं अनेक वर्ष निर्विवाद मानलं जात होतं. हा शके ११५९ मधला लेख असून, त्यामध्ये होयसळच्या यादव राजा सोमेश्वराने विठ्ठलाच्या सेवेसाठी म्हैसूर राज्यातील हिरियरगंज दान दिल्याची नोंद आहे, आणि या लेखात पुंडलीकमुनींचाही उल्लेख आहे. पण या आधीचा एक पुरावा डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी २५-३० वर्षांपूर्वी शोधून काढला आहे. हा पुरावा शके ११११ म्हणजे पंढरपुरातील देवळात मिळालेल्या तुळईवरील लेखाच्या ८४ वर्षे आधीचा आहे. भिल्लम यादव राज्य करीत असताना समस्त चक्रवर्ती नामक या सर्वांनी 'लान मडू' - लहानसे देऊळ बांधले असे या शिलालेखात म्हटले आहे. शके ११११ मध्ये पंढरपुरात बांधलेले लहानसे का होईना देऊळ होते. म्हणजे त्यापूर्वी केव्हातरी पुंडलिक होऊन गेला. 'युगे अठ्ठावीस विटेवर उभा' असे नामदेव म्हणतात. पण निदान सहाव्या शतकापासून पंढरपुरात विठ्ठल आहे, असे म्हणता येईल. पुंडलिकाने या देवाला गोकुळातून खेचून आणले. पुंडलिक हा थोर मातृ-पितृ भक्त, त्याची ख्याती गोकुळात गोविंदांपर्यंत गेली आणि या पुंडलिकाच्या 'भावो पाहो' वाटून देवराये पंढरीची वाट धरली. नामदेवांनी त्याचे वर्णन असे केले आहे
पित्याची भक्ती पुंडलिके केली।
मात्र हे ऐकिले देवरावे।
नवलक्ष गोधने पांचस सवंगडे।
रामकृष्ण पुढे चालताती।।
उभा, जावो पुंडलिक पाहो।
देव म्हणे भावो पाहे त्याचा
गोकुळीहूनी देव पंढरपुरी पातला।
त्वरित पावला वेणुनादे।
तेथूनी परतला वाळवंटी आला।
तव देव देखिला पुंडलिके।।
चतुर्भुज मूर्ति देखविली दृष्टी।
पुंडलिक इट टाकियली।।
इटेवरी उभा राहिला विठ्ठल।
ठसा मिरविला त्रिभुवनी।।

पंढरपूर हे महाराष्ट्राचं धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्र आहे.
काया ही पंढरी,आत्मा हा विठ्ठल।
नांदो केवळ पांडुरंग।।
भावभक्ती भीमा उदक ते वाहे।
बरवा शोभताहे पांडुरंग।।
दया क्षमा शांती हेचि वाळवंटू,
मिळालासे थाट वैष्णवांचा।।
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद,
हाचि नेमुनाद शोभतसे।।
दश इंद्रियांचा एक मेळ केला, ऐसा गोपाळकाला होतसे।।
देखीली पंढरी देही जनी वनीं,
एका जनार्दनीं वारकरी।।
देहीं-वनीं-जनीं पंढरी पाहणारा, ज्ञान-ध्यान-पूजा-विवेक यात रमणारा विठ्ठल हाच आत्मा म्हणणारा वारकरी महाराष्ट्रात दिसावा, असं एकनाथांना वाटत होतं. व्याकुळलेल्या गाढवाला गंगा पाजणारा आणि अस्पृश्याना कवटाळणारा हा 'खरा ब्राह्मण' ही पंढरपूरच्या विठ्ठलाने दिलेली संस्कृती, भक्ती, शक्ती आहे. सालोसाल पंढरीच्या वाटेनं लक्षावधी वारकरी जात आहेत. विठ्ठलाचा, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करीत आहेत, पण समतेच्या, सामाजिक प्रगतीच्या वाटेवर आम्ही चाललोय अस जाणवत नाही. पंढरपूरची वारी हा आमचा मोठा वारसा आहे. 'वारी' शब्दाचा अर्थ येरझार.पंढरपुराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी परतायचे. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे. त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न घ्यायचे. परस्त्रीला मातेसमान मानायचे .कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही. वारीची प्रथा ही फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्लपंत हे देखील वारीला जात होते असे सांगितले जाते. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे त्याचा अंदाज करता येत नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या वारी दिंडयांमध्ये सुसूत्रता आणली. ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करीत असत. त्यांच्या चिरंजीवांनी,नारायण महाराजांनी स.न.१६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. वारी वा दिंडी सोहळा हे आजच्या युगातील आश्चर्य आहे. दररोज सुमारे पंधरा कि.मी.चालत सर्व दिंडया पंढरपूराच्या वेशीवर वाखरी या गावी एकत्र होतात. एकादशीला भगवंताचे दर्शन घेतात. प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला काही क्षणांपुरतेच दर्शन मिळते. सर्व श्रमाचे सार्थक होते.


*सर्वात्मकाची कर्मयुक्त भक्ती*

एकनाथांनीही हीच कथा मांडलीय. फक्त गोकुळाऐवजी द्वारकेहून हा जगजेठी गायी-गोप, सवंगडे यांच्यासंगे आला आहे.
द्वारकेहूनी जगजेठी।
आला पुंडलिकाच्या भेटी।।
पाऊले सरळ गोमटी।
बाळ सुर्यापरी।।
धन्य धन्य पांडुरंग।
बाळ रूप सवेग।।
गाई गोप सवंगडे लाग।
मिळोनि सकलांसाहित।।
पाहता पुंडलिकाचे वदन।
वेडावले भक्तीचे भूषण।।
केलेसे खेवण।
समचरणी विटेवरी।।
न बैसे अद्यापि खाली।
ऐशी कृपेची माऊली।।
एका जनार्दनीं आली।
भक्तीकाजा विठ्ठल।।
वारकरी सांप्रदायाचे म्हणजेच भागवताधर्माचे कळस झालेले तुकाराममहाराजही गोकुळातला गोविंदू हाच पंढरीचा परमानंदु असल्याचं मानतात आणि पुंडलिकाच्या सांगण्याने गायी-गोपालांसह तो पंढरपुरी आला, असंच म्हणतात.
नागर गोडे बालरूप
ते स्वरूप काळीचे।
गाई गोपालांच्या संगे
आले लागे पुंडलिका।
ते हे ज्ञान दिगंबर
भक्ति लोभे राहिले।
नेणें वरदळाचा मान
विटे चरण सम उभे।
सहज कटीवर हात
दहीभात शिदोरी।
मोहरी पावा गांजीवा पाठी
धरिली काठी ज्या काळे।
रम्य स्थळ चंद्रभागा
पांडुरंगा क्रीडेसी।
भीमा दक्षिणमुख वाहे
दृष्टी पाहे समोर।
तारावेसे मूढ लोके
दिली भाक पुंडलिका।
तुका म्हणे वैकुंठवासी
भक्तांपासी राहिला।।
ज्ञानदेवांना श्रीकृष्ण फार प्रिय होता. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होणारा हा समतेचा पुरस्कर्ता. त्याच्या वागण्यानेच ईश्वरावतार झाला.सर्वात्मकाची कर्मयुक्त भक्ती सांगणारी श्रीकृष्णाची भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.

*निष्ठेचे प्रकार...!*

ज्ञानयोगनिष्ठा आणि कर्मयोगनिष्ठा हे निष्ठेचे दोन प्रकार गीतेने सांगितले आहे. कर्मयोग हास संसार न सोडताही आचारता येतो. निष्काम कर्म ही एक भक्तीच आहे आणि ती सर्व गोष्टी ईश्वरार्पण करायला शिकवत असल्याने वैयक्तिक आणि सामाजिक हिताची आहे. भागवतधर्माद्वारा ऐहिक ऐश्वर्य आणि पारमार्थिक वैभव दोन्ही साधता येते. सर्वाविषयी विवेक हा भागवतधर्माचा गाभा आहे. ऐहिकाकडे आणि पारलौकिकाकडे सारखेच साथ देणारे सर्वांना सर्वात्मक ईश्वराची कर्मप्रधान भक्ती शिकवणारे विवेकयुक्त तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला दिले.

*विश्वात्मककडे भाकणी..!*

सकल मंगलाचा वर्षाव करीत ईश्वरनिष्ठा सत्पुरुषांचा समुदाय सर्वांना नेहमी भेटावा. दुष्टांचा दुष्टपणा जाऊन त्यांनाही सत्कर्माची आवड निर्माण होऊन, सर्वांमध्ये परस्परांविषयी जीवाभावाची मैत्री जडावी आणि स्वतःचे कर्तव्य कर्म काय ते लोकांना समजावे, अशी मागणी विश्वात्मक देवाकडे ज्ञानेश्वरांनी केली आणि ती पूर्ण झाली असे म्हणता येईल. एवढी संत परंपरा इथे झाली. ज्ञानेश्वरांनी जे जे म्हटले तंटे त्यानंतरच्या साऱ्याच संतांनी स्वीकारले. वारकरी संप्रदाय जणू चैतन्य देणारा नवा धर्मच झाला. ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच समाजात भेदाची प्रतिष्ठा वाढली होती. मनुष्याचा लोभ वाढत जाऊन धर्म-अधर्म, नीती-अनीती, शुभ-अशुभ कसलाच विवेक राहिला नव्हता स्वार्थाखातर धर्मही सोडण्यास माणसे तयार होती. अशावेळी समाजाला संघटित राखण्याचा, त्यांच्यात बंधुभाव जागवण्याचा आणि समाजाच्या रोजच्या कारभारात लुडबुड करून विषमता-वैर वाढवणाऱ्या भेदभावांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न संतांनी केला. भागवतधर्म वारकरी संप्रदायामार्फत केला. ध्येयासाठी, भेदशून्य एकजूट करण्यासाठी संत राबले.

*महाराष्ट्र नावाला सार्थकता*

धर्माची वाट मोड
अधर्माची शीग चढे।
तै आम्हा येणे घडे
संसार स्थिती।
नानामते पाखंड
कर्मठता अति बंड।
तयाचे ठेचणे तोंडा हरिभजने।।
असे म्हणणाऱ्या एकनाथांनी तर लोकोद्धरासाठी जणू सर्वंकष संघर्षच चालविला. 'जनता हाच ईश्वर' हे तत्व नाथांनी 'जनी जनार्दनीं' उदघोष करीत मांडले. लोकमानसांत बिंबवले. वैदिकांच्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेले आणि जोर धरत असलेले जैन-बौद्ध तत्वज्ञान रोखून धरण्याची आणि विषमतेची धार कमी करून समानतेचे सामर्थ्य वाढविण्याची कामगिरी भागवतधर्माने केली. समाज एकसंघ करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या मनाची मशागत केली. संतांनी समाजाला दुर्बल केले नाही, तर परिस्थितीने दुर्बल होणाऱ्या समाजाला संतांनी सावरले. 'विठ्ठल विसावा सकळिका' हा विश्वास मनामनात जागविला. त्या बळावर माणसं टिकली. जागोजाग हा दिलासा देणारे, लोकांना जागवणारे, त्यांनी पंढरीच्या वाटे चालावे, अशी उमेद देणारे आणि आपण एकटे नाही, सर्व आहोत आणि आपल्या पाठीशी परमेश्वर आहे, असे आत्मविश्वासपूर्वक सांगणारे संत महाराष्ट्रात झाले म्हणूनच महाराष्ट्र या नावाला सार्थकता लाभली.

*- हरीश केंची*

Wednesday 7 June 2017

श्रद्धा आणि सबुरी

*श्रद्धा आणि सबुरी...!*

"सार्वजनिक जीवनात राहायचं, तर श्रद्धा नसली तरी चालेल; सबुरी महत्वाची. त्यामुळे एरवी मानाने दिल्लीला जाणारे राणे मिरझाराजे जयसिंग होऊन दिल्लीस गेले. दिल्लीत काहीच गरमाईने, घाईघाईने होत नाही. राणेंचंही प्रकरण दिल्लीकरांनी थंड करून खाल्लं आहे. राणेंची ताकद पक्षाने जोखली आहे. कोकणातला राणे फॅक्टर संपुष्टात आला आहे, मुंबईतही त्यांचा काही फायदा होईल असं पक्षाला वाटेनासे झालंय. त्यामुळे त्यांच्या अमित शहा भेटीची वा भाजप प्रवेशाच्या बातमीची दखल घेतली गेली नाही, राणेंनी दिल्ली गाठून काही सांगायचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची जाणीवच होऊ दिलेली नाही.  श्रद्धा आणि सबुरी नसली की काय होतं याचा अनुभव राणे घेत असतील. राणेंचं प्रकरण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती...!"

*श्रद्धा आणि सबुरी...!*

अपेक्षेप्रमाणे नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातला प्रवेश रोखला गेला. अहमदाबाद वारी, अमित शहांची गळाभेट, देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गाने होऊ घातलेला प्रवेश अखेर होऊ शकला नाही. राणेंचा काँग्रेस प्रवास तसा दुःखाचाच राहिलाय. राणेंच्या या प्रयत्नाला कोणी खो घातलाय हे समजणं शक्य नसलं तरी, प्रामुख्याने शिवसेनेने केलेला विरोध हेच प्रथम दर्शनी दिसून येतंय. राणेंचा हा प्रवास आता लपून राहिलेला नाही. आपण भाजपात जाणार नाही असं त्यांना जाहीर करावं लागलं. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत प्रवास का केला गेला याचा खुलासा पक्षश्रेष्ठींकडे द्यावा लागला. त्यासाठी दिल्लीला जाऊन माफीनामा द्यावा लागला हे राणे यांच्याबाबत पहिल्यांदाच घडतंय असं नाही यापूर्वीही असाच माफीनामा त्यांना द्यावा लागला होता. राणेंचा हा माफीनामा हा काँग्रेसमधल्या काहींना तो त्यांचा अपमान वाटतो तर काहींना तो प्रायश्चित्त वाटतं. मात्र काँग्रेसपक्षातल्या अनेक साक्षी काढल्या, तर काँग्रेसमध्ये हे असंच होतं. काळ बदलला काळातलं वास्तव बदललं, मात्र काँग्रेसपक्ष बदलला नाही. ज्यांना काँग्रेसपक्ष बदललेला नाही. ज्यांना काँग्रेसपक्ष कळला आहे त्यांच्यासाठी राणेंचं एकूणच हे प्रकरण स्वाभाविक आहे. ज्यांना आजपर्यंत राणेंचं व्यक्तिमत्व कळलं होतं, त्यांच्यासाठी घडला प्रकार नवीन आहे. परंतु, या प्रकरणाचं तात्पर्य असं सांगतं की, राणे आता खरोखरीच 'सच्चे काँग्रेसवाले' झालेत!

काँग्रेस पक्षाचं आणि साईबाबांच्या भक्तांचं एक ब्रीदवाक्य समान आहे. ते आहे - 'श्रद्धा और सबुरी'. साईबाबांचे भक्त श्रद्धा कशी ठेवतात आणि सबुरी कशी राखतात, हा स्वतंत्र लेखाचा विषय होईल. या लेखात काँग्रेसवाल्यांची श्रद्धा कशी असते आणि सबुरी म्हणजेच एकूण कार्यपद्धतीचं सूत्र कसं असतं, यावर प्रकाश टाकण्याचा हेतू आहे. काँग्रेसमध्ये काम करायचं म्हणजे त्यांच्या राष्ट्रीय नेत्यांवर श्रद्धा ठेवायची असते. तशी ती नसेल तर त्या व्यक्तीची गत नेताजी सुभाषबाबू, यशवंतराव चव्हाण वा विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासारखी केली जाते. ही उदाहरणे मोठी आहेत आजच्या स्थितीत लागू होत नाहीत पण त्याची व्याप्ती लक्षात यावी म्हणून उल्लेखली आहेत हे लक्षात घ्यावं. म्हणजे या पक्षात फक्त श्रद्धा मनात ठेवून चालत नाही. ती श्रद्धा सतत प्रकट करायची असते. देवावर श्रद्धा ठेवली की, जसे प्रश्न विचारायचे नसतात तसेच काँग्रेसमध्ये राष्ट्रीय नेत्याबद्धल प्रश्न विचारायचे नसतात. असा प्रश्न विचारला की, एकतर पक्षातून बाहेर जायची वेळ येते. ती व्यक्ती जाणार नसेल; तर त्याच्याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही. तरीही त्या व्यक्तीची चुळबुळ सुरूच राहिली तर मात्र त्या व्यक्तीला काढून टाकलं जातं. इथे राष्ट्रीय नेत्यासारख्या कुळस्वामीप्रती श्रद्धा ठेवावीच लागते. शिवाय कुळस्वामीने स्थापन केलेले 'म्हसोबा'-महसूल देणारा, 'खंडोबा'-खंड देणारा यांना दुखवून चालत नाही. शिवाय गावोगावच्या बिरोबा, भैरोबा, रवळनाथांना धरून राहायचं असतं. म्हणजेच काँग्रेसमध्ये असायचं तर कुठल्यातरी नेत्याच्या गोटात, गटात असावं लागतं. काँग्रेसपक्षात संघटना नंतर असते. वर उल्लेखलेली स्थळं जास्त महत्वाची असतात. हा विषय झाला श्रद्धा कुणावर ठेवायची त्याचा. आता 'सबुरी' कशी बाळगायची ते पाहू.

काँग्रेसमध्ये सेवादल नावाची एक फ्रंट आहे. हे सेवादल पूर्वी समाजाच्या सेवेसाठी बांधील होतं. अजूनही हे सेवादल आहेच. मात्र या सेवादलापासून ते मदर काँग्रेस म्हणजेच अ. भा. राष्ट्रीय काँग्रेसपर्यंत सर्व ठिकाणी आता जो कोणी येतो तोच थेट सत्तेसाठी किंवा सत्तेच्या लाभासाठी! हे सर्व करताना सबुरी अत्यंत महत्वाची असते. म्हणजे कोणतंही पद मिळवायचं, तर इथं दंगाधोपा करून चालत नाही. म्हणजे समाजात आणि संघटनेतही माऱ्यामाऱ्या करणं, हे इथं क्वालिफिकेशन समजलं जात नाही. सारं करायचं ते धीरे-धीरे! म्हणजे शिवसेनेत नारायण राणे जसे दहा वर्षांत नगरसेवकपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचले; तसं फास्ट काही इथं होतंच नाही. तो अधिकार फक्त नेहरू घराण्यातल्या गांधी आडनावाच्या लोकांचा! पक्षातली ही वाटचाल प्रत्यक्षात धीरे धीरे म्हणजेच अत्यंत संथ गतीची असतेच असं कुणी समजू नये. या धीरे धीरेलाही गती असतेच. म्हणजे कुणी पक्षाचा पदाधिकारी झाला, की तो कोणत्या ना कोणत्या सत्तेच्या स्थानावर पोहोचतोच. कधी कधी ती व्यक्ती आमदार होण्याइतपत मोठी होते. ती व्यक्ती आमदार झाली की, त्याने आपल्या भोवतीची प्रभावळ वेगाने निर्माण करायची असते. ती आमदार व्यक्ती मंत्री झालीच, तर तिनं पक्षाचं संख्यात्मक बळ आणि काम कसं वाढेल, हे पाहायचं असतं. सत्तेची सारी साधनं वापरून आपला आणि पक्षाचा प्रभाव वाढतो आणि काँग्रेस ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत सत्तेचं वर्तुळ व्यवस्थित आखलं जातं. एवढं सारं घडतं; ते सबुरीनेच. म्हणजे संयम सर्वत्र पाळावाच लागतो. विरोधकाबद्धल कधी इथं स्पष्ट बोलायचं नसतं. 'आमचाच मुद्दा योग्य कसा? विरोधकांचा मुद्दा कसा चुकीचा' याबाबी लोकांना सांगायच्या असतात. मात्र त्या संयमी भाषेत. आक्रमकता आणि आक्रस्तालीपणाला इथं थारा नाही. कुणाबद्दल कितीही वैरभाव असला, कुणाशी काही पटत नसलं, कुणाच्या भानगडीचा दंभस्फोट करायचा म्हटलं, तर इथे कुणालाच गडबड नसते. काही करायचं यापेक्षा काय करायचं नाही, याकडेच अनेकांचा कटाक्ष असतो. काय करायचंच तर ते परस्पर. उदाहरणार्थ, विलासराव अशोकरावांना किती पाण्यात पाहात होते तरीही ते परस्परांना भेटले की, एकमेकांना मिठीच मारायची बाकी असतात. पतंगराव शंकरराव चव्हाणांना भेटायला जायचे तेव्हा अशोक क्रिकेट खेळून आलेला असायचा. त्याच पोराच्या हाताखाली मी मंत्री आहे, याच दुःख त्यांना होतं मात्र ते बोलायचं नाही.एकुणात काय, तर देहबोलीतली, प्रत्यक्ष कृतीतली सबुरी फार फार महत्वाची. कुणी त्याला सहनशीलता म्हणो अथवा उपेक्षा!

जे हे सहन करतात ते सांगत नाहीत. ज्यांना ते सहन होत नाही, त्यांची गत नारायण राणे यांच्यासारखी होते. अशीच गत पूर्वी बाळासाहेब देसाई यांची झाली होती. ते वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात अनेक वर्षे मंत्री होते. अनेक महत्वाची खाती त्यांनी सांभाळली. त्यांचा सतत मुख्यमंत्रीपदावर दावा असायचा. यशवंतराव चव्हाणसाहेब आज ना उद्या आपल्याकडे पाहतील, असं त्यांना वाटायचं, शेवटी ते दिल्लीला म्हणजे इंदिरा गांधींच्या खास गोटात गेले. अनेक प्रयत्न केले. राणेंसारखेच त्यांनी अनेक पर्याय दिले. मात्र त्यांची पक्षावरची, पक्षाच्या कुळस्वामी, भैरोबा, खंडोबावरील श्रद्धा काही फळाला आली नाही. श्रद्धा संपली आणि सबुरीही! त्यांनीही राजीनामा दिला. तोही दिला मुख्यमंत्र्याकडे आणि थेट कोल्हापूर गाठलं. त्यांना वाटलं, आपल्या राजीनाम्याला पक्षश्रेष्ठी घाबरतील, मुख्यमंत्रीपद देऊ करतील , राजीनामा मागे घ्या म्हणतील. पण कुठलं काय? बाळासाहेब देसाईंना, त्यांच्या शक्तीला पक्षाने केव्हाच पचवून टाकलं होतं. त्यांचाही असाच पूर्ण नारायण राणे केला गेला. पुढे बाळासाहेब देसाई जनता पक्षात गेले, परत काँग्रेसमध्ये आले. मात्र सबुरी संपली असल्याने त्यांचं नांव मुख्यमंत्र्याच्या चर्चेत आलं नाही. तशीच काहीशी अवस्था जयंत पाटील यांचे वडील राजारामबापू पाटील यांनीही झाली होती. तात्पर्य हेच की, सबुरी नसणाऱ्या व मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची क्षमता असणाऱ्या अनेक व्यक्तींना काँग्रेसने असेच पचवून टाकलं आहे.

आता वर्तमानावर येऊ, नारायण राणे काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांनी शिवसेनेला उद्देशून सांगितलं होतं की, 'मी पूर्वी सच्चा शिवसैनिक होतो, त्यामुळे शिवसेनाप्रमुखांवरील टीकेने पेटून उठायचो. आता मी सच्चा काँग्रेसवाला झालोय. माझ्या नेत्या सोनिया गांधींवर जर कुणी खालच्या पातळीची टीका केली, तर त्या टीकेचं उत्तर त्याच पद्धतीने देईन, जसं मी पूर्वी देत होतो' नारायणरावांच्या या उदगारातील साराच तपशील सत्यात आला नाही. महत्वाचं म्हणजे, त्यांना काँग्रेस किती कळली? हाच प्रश्न पुन्हापुन्हा प्रकट करण्यासारखी स्थिती निर्माण झाली. नारायण राणे यांनी अशोक चव्हाणांवर केलेली टीका, त्यानंतर दिलेला मंत्रिपदाचा राजीनामा आणि नेतृत्वावर केलेली आगपाखड याची तेव्हा मोठी चर्चाच झाली. काँग्रेसपक्षात असं काहीच चालत नाही. तुमची ताकद असो वा उपद्रवमूल्य; पक्षाच्या शिस्तीत उर्फ रिवाजात ते बसत नाही. आश्वासन देणं आणि ते न पाळणं, हा तर या पक्षात नेहमीचाच शिरस्ता आहे. म्हणजे हा पक्ष लोकांना जी आश्वासनं देतो, ती बऱ्याचदा पाळतो. मात्र संघटनेतल्या व्यक्तींना दिलेली आश्वासनं पाळली जातातच असं नाही. म्हणजे ती पाळणं बंधनकारक तर अजिबात नसतं. त्यामुळेच राणेंचा मूळ स्वभाव उफाळून आला. विलासरावानंतर मी नाही म्हटल्यावर ते जास्तच चिडले. त्यांना चिडवण्यातही आलं. मग राणे सोनिया गांधींपासून ते अशोक चव्हाण सर्वांवर घसरले. पत्रकार परिषद, जाहीर सभा यांच्या माध्यमातून त्यांनी सारी मळमळ व्यक्त केली होती. एकदाचे ते मोकळे झाले पण उपयोग काहीच झाला नाही. राग शांत झाल्यावर वास्तव ध्यानी आलं.

सार्वजनिक जीवनात राहायचं, तर श्रद्धा नसली तरी चालेल; सबुरी महत्वाची. त्यामुळे एरवी मानाने दिल्लीला जाणारे राणे मिरझाराजे जयसिंग होऊन दिल्लीस गेले. दिल्लीत काहीच गरमाईने, घाईघाईने होत नाही. राणेंचंही प्रकरण दिल्लीकरांनी थंड करून खाल्लं आहे. राणेंची ताकद पक्षाने जोखली आहे. कोकणातला राणे फॅक्टर संपुष्टात आला आहे, मुंबईतही त्यांचा काही फायदा होईल असं पक्षाला वाटेनासे झालंय. त्यामुळे त्यांच्या अमित शहा भेटीची वा भाजप प्रवेशाच्या बातमीची दखल घेतली गेली नाही, राणेंनी दिल्ली गाठून काही सांगायचा स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला मात्र त्याची जाणीवच होऊ दिलेली नाही.  श्रद्धा आणि सबुरी नसली की काय होतं याचा अनुभव राणे घेत असतील. राणेंचं प्रकरण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती...!

- हरीश केंची




'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...