Saturday, 17 June 2017

पालख्या पंढरपुरा निघाल्या...!

पालख्या पंढरपूरा निघाल्या

"ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच समाजात भेदाची प्रतिष्ठा वाढली होती. मनुष्याचा लोभ वाढत जाऊन धर्म-अधर्म, नीती-अनीती, शुभ-अशुभ कसलाच विवेक राहिला नव्हता स्वार्थाखातर धर्मही सोडण्यास माणसे तयार होती. अशावेळी समाजाला संघटित राखण्याचा, त्यांच्यात बंधुभाव जागवण्याचा आणि समाजाच्या रोजच्या कारभारात लुडबुड करून विषमता-वैर वाढवणाऱ्या भेदभावांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न संतांनी केला. भागवतधर्म वारकरी संप्रदायामार्फत केला. ध्येयासाठी, भेदशून्य एकजूट करण्यासाठी संत राबले."
-------------------------------------------

*वा*रकरी सांप्रदायाचा पाया ज्ञानदेवांनी रचिला असं सांगणारा संत बहिणाबाईंचा 'ज्ञानदेवे रचिला पाया' अभंग आहे. ज्ञानदेवांनी पाया रचला म्हटले जाते. कारण विखुरलेल्या वारकरी मंडळींना त्यांनी एकत्र आणले. 'मेळविली मांदि वैष्णवांची' ज्ञानदेवांच्या ज्ञानेश्वरीने हे ऐक्य आणखी दृढ झाले. वारकरी जे प्रमाण ग्रंथ मानतात, त्यात वेद, गीता, भागवत हे संस्कृत ग्रंथ आहेत, आणि ज्ञानेश्वरी, नामदेव गाथा, तुकाराम गाथा, एकनाथ गाथा, ज्ञानेश्वरांचा आणि एकनाथांचा हरिपाठ यांनाही स्थान आहे. प्रत्येक वारकऱ्याने ज्ञानेश्वरांची पोथी जवळ बाळगावी. नित्यनेमाने ज्ञानेश्वरीतल्या थोड्यातरी ओव्या रोज वाचाव्यात असा दंडकच आहे. पण असे असले तरी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वरांपासून सुरू केले तो पुंडलिक वारकरी सांप्रदायाचा जनक ठरू शकेल.

*पंढरपूरचे मंदिर*

पंढरपूरचे विठ्ठलाचे मंदिर किती जुने याबद्धलचा पुरावा असं अनेक वर्ष निर्विवाद मानलं जात होतं. हा शके ११५९ मधला लेख असून, त्यामध्ये होयसळच्या यादव राजा सोमेश्वराने विठ्ठलाच्या सेवेसाठी म्हैसूर राज्यातील हिरियरगंज दान दिल्याची नोंद आहे, आणि या लेखात पुंडलीकमुनींचाही उल्लेख आहे. पण या आधीचा एक पुरावा डॉ. शं. गो. तुळपुळे यांनी २५-३० वर्षांपूर्वी शोधून काढला आहे. हा पुरावा शके ११११ म्हणजे पंढरपुरातील देवळात मिळालेल्या तुळईवरील लेखाच्या ८४ वर्षे आधीचा आहे. भिल्लम यादव राज्य करीत असताना समस्त चक्रवर्ती नामक या सर्वांनी 'लान मडू' - लहानसे देऊळ बांधले असे या शिलालेखात म्हटले आहे. शके ११११ मध्ये पंढरपुरात बांधलेले लहानसे का होईना देऊळ होते. म्हणजे त्यापूर्वी केव्हातरी पुंडलिक होऊन गेला. 'युगे अठ्ठावीस विटेवर उभा' असे नामदेव म्हणतात. पण निदान सहाव्या शतकापासून पंढरपुरात विठ्ठल आहे, असे म्हणता येईल. पुंडलिकाने या देवाला गोकुळातून खेचून आणले. पुंडलिक हा थोर मातृ-पितृ भक्त, त्याची ख्याती गोकुळात गोविंदांपर्यंत गेली आणि या पुंडलिकाच्या 'भावो पाहो' वाटून देवराये पंढरीची वाट धरली. नामदेवांनी त्याचे वर्णन असे केले आहे
पित्याची भक्ती पुंडलिके केली।
मात्र हे ऐकिले देवरावे।
नवलक्ष गोधने पांचस सवंगडे।
रामकृष्ण पुढे चालताती।।
उभा, जावो पुंडलिक पाहो।
देव म्हणे भावो पाहे त्याचा
गोकुळीहूनी देव पंढरपुरी पातला।
त्वरित पावला वेणुनादे।
तेथूनी परतला वाळवंटी आला।
तव देव देखिला पुंडलिके।।
चतुर्भुज मूर्ति देखविली दृष्टी।
पुंडलिक इट टाकियली।।
इटेवरी उभा राहिला विठ्ठल।
ठसा मिरविला त्रिभुवनी।।

पंढरपूर हे महाराष्ट्राचं धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्र आहे.
काया ही पंढरी,आत्मा हा विठ्ठल।
नांदो केवळ पांडुरंग।।
भावभक्ती भीमा उदक ते वाहे।
बरवा शोभताहे पांडुरंग।।
दया क्षमा शांती हेचि वाळवंटू,
मिळालासे थाट वैष्णवांचा।।
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद,
हाचि नेमुनाद शोभतसे।।
दश इंद्रियांचा एक मेळ केला, ऐसा गोपाळकाला होतसे।।
देखीली पंढरी देही जनी वनीं,
एका जनार्दनीं वारकरी।।
देहीं-वनीं-जनीं पंढरी पाहणारा, ज्ञान-ध्यान-पूजा-विवेक यात रमणारा विठ्ठल हाच आत्मा म्हणणारा वारकरी महाराष्ट्रात दिसावा, असं एकनाथांना वाटत होतं. व्याकुळलेल्या गाढवाला गंगा पाजणारा आणि अस्पृश्याना कवटाळणारा हा 'खरा ब्राह्मण' ही पंढरपूरच्या विठ्ठलाने दिलेली संस्कृती, भक्ती, शक्ती आहे. सालोसाल पंढरीच्या वाटेनं लक्षावधी वारकरी जात आहेत. विठ्ठलाचा, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करीत आहेत, पण समतेच्या, सामाजिक प्रगतीच्या वाटेवर आम्ही चाललोय अस जाणवत नाही. पंढरपूरची वारी हा आमचा मोठा वारसा आहे. 'वारी' शब्दाचा अर्थ येरझार.पंढरपुराची वारी करावयाची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपूरला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी परतायचे. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे. त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न घ्यायचे. परस्त्रीला मातेसमान मानायचे .कोणत्याही जीवाचा मत्सर करावयाचा नाही. वारीची प्रथा ही फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्लपंत हे देखील वारीला जात होते असे सांगितले जाते. त्यामुळे ही प्रथा किती जुनी आहे त्याचा अंदाज करता येत नाही. परंतु ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारच्या पदरी सेनाधिकारी असलेल्या हैबतराव बाबा आरफळकर यांनी या वारी दिंडयांमध्ये सुसूत्रता आणली. ते ज्ञानेश्वरांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जात असत. तुकाराम महाराजही पंढरपूरची वारी करीत असत. त्यांच्या चिरंजीवांनी,नारायण महाराजांनी स.न.१६८५ साली श्रीतुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूराला घेऊन जाण्याची प्रथा सुरु केली. वारी वा दिंडी सोहळा हे आजच्या युगातील आश्चर्य आहे. दररोज सुमारे पंधरा कि.मी.चालत सर्व दिंडया पंढरपूराच्या वेशीवर वाखरी या गावी एकत्र होतात. एकादशीला भगवंताचे दर्शन घेतात. प्रचंड गर्दी असल्यामुळे प्रत्येकाला काही क्षणांपुरतेच दर्शन मिळते. सर्व श्रमाचे सार्थक होते.


*सर्वात्मकाची कर्मयुक्त भक्ती*

एकनाथांनीही हीच कथा मांडलीय. फक्त गोकुळाऐवजी द्वारकेहून हा जगजेठी गायी-गोप, सवंगडे यांच्यासंगे आला आहे.
द्वारकेहूनी जगजेठी।
आला पुंडलिकाच्या भेटी।।
पाऊले सरळ गोमटी।
बाळ सुर्यापरी।।
धन्य धन्य पांडुरंग।
बाळ रूप सवेग।।
गाई गोप सवंगडे लाग।
मिळोनि सकलांसाहित।।
पाहता पुंडलिकाचे वदन।
वेडावले भक्तीचे भूषण।।
केलेसे खेवण।
समचरणी विटेवरी।।
न बैसे अद्यापि खाली।
ऐशी कृपेची माऊली।।
एका जनार्दनीं आली।
भक्तीकाजा विठ्ठल।।
वारकरी सांप्रदायाचे म्हणजेच भागवताधर्माचे कळस झालेले तुकाराममहाराजही गोकुळातला गोविंदू हाच पंढरीचा परमानंदु असल्याचं मानतात आणि पुंडलिकाच्या सांगण्याने गायी-गोपालांसह तो पंढरपुरी आला, असंच म्हणतात.
नागर गोडे बालरूप
ते स्वरूप काळीचे।
गाई गोपालांच्या संगे
आले लागे पुंडलिका।
ते हे ज्ञान दिगंबर
भक्ति लोभे राहिले।
नेणें वरदळाचा मान
विटे चरण सम उभे।
सहज कटीवर हात
दहीभात शिदोरी।
मोहरी पावा गांजीवा पाठी
धरिली काठी ज्या काळे।
रम्य स्थळ चंद्रभागा
पांडुरंगा क्रीडेसी।
भीमा दक्षिणमुख वाहे
दृष्टी पाहे समोर।
तारावेसे मूढ लोके
दिली भाक पुंडलिका।
तुका म्हणे वैकुंठवासी
भक्तांपासी राहिला।।
ज्ञानदेवांना श्रीकृष्ण फार प्रिय होता. सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखाशी समरस होणारा हा समतेचा पुरस्कर्ता. त्याच्या वागण्यानेच ईश्वरावतार झाला.सर्वात्मकाची कर्मयुक्त भक्ती सांगणारी श्रीकृष्णाची भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.

*निष्ठेचे प्रकार...!*

ज्ञानयोगनिष्ठा आणि कर्मयोगनिष्ठा हे निष्ठेचे दोन प्रकार गीतेने सांगितले आहे. कर्मयोग हास संसार न सोडताही आचारता येतो. निष्काम कर्म ही एक भक्तीच आहे आणि ती सर्व गोष्टी ईश्वरार्पण करायला शिकवत असल्याने वैयक्तिक आणि सामाजिक हिताची आहे. भागवतधर्माद्वारा ऐहिक ऐश्वर्य आणि पारमार्थिक वैभव दोन्ही साधता येते. सर्वाविषयी विवेक हा भागवतधर्माचा गाभा आहे. ऐहिकाकडे आणि पारलौकिकाकडे सारखेच साथ देणारे सर्वांना सर्वात्मक ईश्वराची कर्मप्रधान भक्ती शिकवणारे विवेकयुक्त तत्वज्ञान ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला दिले.

*विश्वात्मककडे भाकणी..!*

सकल मंगलाचा वर्षाव करीत ईश्वरनिष्ठा सत्पुरुषांचा समुदाय सर्वांना नेहमी भेटावा. दुष्टांचा दुष्टपणा जाऊन त्यांनाही सत्कर्माची आवड निर्माण होऊन, सर्वांमध्ये परस्परांविषयी जीवाभावाची मैत्री जडावी आणि स्वतःचे कर्तव्य कर्म काय ते लोकांना समजावे, अशी मागणी विश्वात्मक देवाकडे ज्ञानेश्वरांनी केली आणि ती पूर्ण झाली असे म्हणता येईल. एवढी संत परंपरा इथे झाली. ज्ञानेश्वरांनी जे जे म्हटले तंटे त्यानंतरच्या साऱ्याच संतांनी स्वीकारले. वारकरी संप्रदाय जणू चैतन्य देणारा नवा धर्मच झाला. ज्ञानेश्वरांच्या काळापासूनच समाजात भेदाची प्रतिष्ठा वाढली होती. मनुष्याचा लोभ वाढत जाऊन धर्म-अधर्म, नीती-अनीती, शुभ-अशुभ कसलाच विवेक राहिला नव्हता स्वार्थाखातर धर्मही सोडण्यास माणसे तयार होती. अशावेळी समाजाला संघटित राखण्याचा, त्यांच्यात बंधुभाव जागवण्याचा आणि समाजाच्या रोजच्या कारभारात लुडबुड करून विषमता-वैर वाढवणाऱ्या भेदभावांची हकालपट्टी करण्याचा प्रयत्न संतांनी केला. भागवतधर्म वारकरी संप्रदायामार्फत केला. ध्येयासाठी, भेदशून्य एकजूट करण्यासाठी संत राबले.

*महाराष्ट्र नावाला सार्थकता*

धर्माची वाट मोड
अधर्माची शीग चढे।
तै आम्हा येणे घडे
संसार स्थिती।
नानामते पाखंड
कर्मठता अति बंड।
तयाचे ठेचणे तोंडा हरिभजने।।
असे म्हणणाऱ्या एकनाथांनी तर लोकोद्धरासाठी जणू सर्वंकष संघर्षच चालविला. 'जनता हाच ईश्वर' हे तत्व नाथांनी 'जनी जनार्दनीं' उदघोष करीत मांडले. लोकमानसांत बिंबवले. वैदिकांच्या सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेले आणि जोर धरत असलेले जैन-बौद्ध तत्वज्ञान रोखून धरण्याची आणि विषमतेची धार कमी करून समानतेचे सामर्थ्य वाढविण्याची कामगिरी भागवतधर्माने केली. समाज एकसंघ करण्यासाठी सर्वसामान्य माणसाच्या मनाची मशागत केली. संतांनी समाजाला दुर्बल केले नाही, तर परिस्थितीने दुर्बल होणाऱ्या समाजाला संतांनी सावरले. 'विठ्ठल विसावा सकळिका' हा विश्वास मनामनात जागविला. त्या बळावर माणसं टिकली. जागोजाग हा दिलासा देणारे, लोकांना जागवणारे, त्यांनी पंढरीच्या वाटे चालावे, अशी उमेद देणारे आणि आपण एकटे नाही, सर्व आहोत आणि आपल्या पाठीशी परमेश्वर आहे, असे आत्मविश्वासपूर्वक सांगणारे संत महाराष्ट्रात झाले म्हणूनच महाराष्ट्र या नावाला सार्थकता लाभली.

*- हरीश केंची*

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...