Saturday 24 June 2017

मिशन २०१९ इज बिकमिंग थ्रिलर

*मिशन २०१९ इज बिकमिंग थ्रिलर*

" भाजपकडे नसतील एवढे तरुण चेहरे काँग्रेसकडे आहेत. पण गेल्या ५-६ वर्षांपासून हे सक्षम तरुण नेते हताश झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, मनजीतसिंग बिट्टा असे अनेक चेहरे आहेत.पण त्यांची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एक जोरकस, तडाखेबाज नेतृत्वाची फळी काँग्रेस उभी करू शकली नाही. काँग्रेसची इतकी घसरण झाली तरी राष्ट्रीय स्तरावर इतर कुठल्याही नेत्याला काँग्रेस आणू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात कार्यरत राहा असे सांगितले गेल्याने ह्या नेत्यांमध्ये निराशा आणि नकारात्मकता निर्माण झालीय. जोपर्यंत राहुल पक्षाची धुरा वाहताहेत तोपर्यंत मतदारांकडे मतांसाठी जाणं व्यर्थ आहे असं ते समजतात. तरीदेखील ते राहुल गांधींच्या विरोधात बोलू शकत नाहीत. जर काँग्रेसपक्षानं किती जणांना राहुल गांधी नेते म्हणून हवेत अन किती जणांना नकोत यावर जर गुप्त मतदान घेतलं तर राहुल यांचं डिपॉझिट जप्त होईल की त्यांचं नेतृत्व लादलं गेलंय हे जाणून घेणं मजेशीर ठरणार आहे"
---------------------------------------------

'भारतात आज तरी समाजातील सर्व स्तरातील मतदारांना आकर्षित करील असा नेता दिसत नाही. जो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी वा भाजपशी सामना करील; हे पाहता आता आपल्याला २०२४ च्या निवडणुकीसाठी आशादायकरित्या तयारी करावी लागेल.' ......जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लाने केलेल्या या गंभीर वक्तव्याने कित्येक काँग्रेसी नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना आनंद झाला असेल, कार्यकर्ते ओमर अब्दूल्लांना धन्यवाद देत म्हणत असतील की,.... वाह, जनाब..... क्या खूब फर्माया आपने.... हमारे दिलकी बात आपने छिन ली...!'

सोशल मीडियावर राहुल गांधींवर सांता-बांतापेक्षाही अधिक विनोद फिरत असतात. यात भाजपेयी मोठ्या संख्येने असतात. भाजपची अशीच इच्छा दिसते की, काँग्रेसने विधानसभेच्या आणि लोकसभेची निवडणूक राहुल गांधी यांच्याच नेतृत्वाखाली लढवाव्यात. काँग्रेसच्या नशिबानं राहुल गांधींचा ग्राफ दिवसेंदिवस असा काही घसरतो आहे की, भारतासारख्या खंडप्राय देशाचं नेतृत्व राहुल करतील असं भारतीयांना वाटतंच नाही. मोदी आपल्या वाग्छटा दाखवीत, व्यंगात्मक वाणीने राहुल गांधींना व्यूहात्मकरित्या 'विदूषक' म्हणून रंगविण्यात सफल ठरले आहेत. राहुल याच कारणानं त्यांचा आत्मविश्वास गमावून बसले आहेत. ६६वर्षीय नरेंद्र मोदी देशातल्या ६५ टक्के युवकांशी आपल्या अमोघ वक्तृत्वाने ही 'व्होटबॅंक' आपलीशी केली आहे. पण ४७ वर्षीय राहुल गांधीतरुणांसोबत 'व्हेव लेंग्थ' जमवू शकलेले नाहीत. काँग्रेसी मोदींची अवहेलना करताना त्यांना 'फेकू' असं संबोधतात तर भाजपेयी राहुलना 'पप्पू' म्हणतात. पप्पू गेल्या काही वर्षांत अनेकदा परीक्षेला बसलाय पण उत्तीर्ण काही झाला नाही. काँग्रेस ज्याला फेकू म्हणतात तो मात्र 'डिस्टिंशन' मिळवीत उत्तीर्ण होतोय!

आपल्यासमोर उभं ठाकलेल्या व्यक्तीशी मुकाबला करीत त्याला मागं टाकायचं असेल तर त्याच्या यशाचं गमक काय आहे याचा बारकाईनं आणि मुळापासून अभ्यास करायला हवाय. त्यातही त्याला पराभूत करण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असायला हवी. 'शेरास सव्वाशेर' भूमिका घेऊन सज्ज राहायला हवं. प्रश्न असा पडतो की, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा जो दारुण पराभव झाला त्यानंतर राहुल गांधी एक राष्ट्रीय नेता म्हणून भारतीयांवर प्रभाव पाडू शकले आहेत काय? पक्ष म्हणून अधिक संघटित, लढाऊ वृत्ती, आणि व्युहात्मकता अंगिकारीत काँग्रेस काही करीत आहे असं कधी दिसलं काय? मोदींच्या जवळ अमित शहांसारखा कुशल संघटक आहे. तसा काँग्रेसकडे संघटक, 'किलर इंस्टींक्ट' असलेला कुणी नेता दिसतच नाही. प्रसिद्धी माध्यमाच्या साथीनं राष्ट्रीय स्तरावर एखादा नेता असेल, पण गावपातळी पासून राज्यस्तरावर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि 'वुई शेल ओव्हरकम' म्हणत धडपडणारा लढाऊ नेता हवाय. भाजपने उत्तरप्रदेशातला नेत्रदीपक विजय दूर सारून आतापासूनच 'मिशन २०१९' चा प्रारंभ केलाय. मुंबईत झालेल्या नेत्यांच्या बैठकीत अमित शहा यांनी कार्यकर्त्यांसाठी जो संदेश दिलाय तो पाहता त्यांना लोकसभेच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक जागा मिळवायच्या आहेत, अशी व्युहरचना ते करताहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, तामिळनाडू, आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या पट्ट्यात भाजपचं अस्तित्व जाणवत नाही. त्याजागी आपला प्रभाव पाडण्यासाठीच भाजपनं 'दिल, दिमाग और जुनुन' सह कंबर कसली आहे. मोदी तर निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात जबरदस्त स्फूर्तीनं सभा घेतात. पण त्यासाठी आवश्यक ग्रासरुट आणि ग्राऊंड वर्क आणि बूथ कमिटी पासून हायकमांडपर्यंतची आश्चर्यकारक असे कम्युनिकेशन यंत्रणा उभी केली आहे.

जरा विचार करा, काँग्रेसला विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार करावा तरी भय कायमच आहे. नांव जाहीर केलं तर त्या नावाला पक्षातूनच छेद मिळण्याची विरोध होण्याची शक्यता मोठी. भाजप मात्र असे नाव जाहीर करतच नाही. भाजपच्या प्रमुखाच्या इच्छेनुसार आमदारांची बैठक बोलावून मुख्यमंत्री जाहीर केला जातो. याला मुलामा देताना भाजपेयी मात्र असं भासवतात की, पक्षाचं केडर हे पक्षाप्रती समर्पित भावनेनं ओथंबलेले आहे. पक्ष सत्तेसाठी नव्हे तर राज्य आणि राष्ट्रकारणासाठी राजकारण करतो. असं वातावरण आणि लोकांप्रति मानस तयार करण्यात भाजप यशस्वी ठरतोय.

राहुल गांधींना भाजपेयीं आणि देशातील नागरिक राजकीय पटलावर 'बच्चा'च मानतात. पण काँग्रेस पक्ष त्यांना 'सिंह'च वाटतात. ते जेव्हा जे काही बोलतील त्याला विरोध करण्याची हिंमत दाखवत नाहीत. हिंमत सोडा, मोठ्या संख्येने काँग्रेसजन त्यांची तरफदारी आणि खुशामत करण्यातच धन्यता मानतात....'राहुलजी, या साऱ्या परिणामांना आपण दोषी नाहीत, खरं तर आम्हीच लोकांपर्यंत पोहोचू शकलो नाही. प्रत्येक पराभवानंतर प्रसिद्धीमाध्यमातील राजकीय विश्लेषकांना त्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडण्याची जणू फॅशनच अस्तित्वात आलीय. काँग्रेस केवळ आपल्यामुळेच एकसंघ राहिलाय, पक्षाच्या हारातील मण्यांना एकत्र आणणार सूत्र-दोरा आपण आहात....'

भाजपकडे नसतील एवढे तरुण चेहरे काँग्रेसकडे आहेत. पण गेल्या ५-६ वर्षांपासून हे सक्षम तरुण नेते हताश झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, नवीन जिंदाल, प्रिया दत्त, मिलिंद देवरा, मनजीतसिंग बिट्टा असे अनेक चेहरे आहेत.पण त्यांची लोकसभा-विधानसभा निवडणुकीत एक जोरकस, तडाखेबाज नेतृत्वाची फळी काँग्रेस उभी करू शकली नाही. काँग्रेसची इतकी घसरण झाली तरी राष्ट्रीय स्तरावर इतर कुठल्याही नेत्याला काँग्रेस आणू इच्छित नाही. तुम्ही तुमच्या मतदारसंघात कार्यरत राहा असे सांगितले गेल्याने ह्या नेत्यांमध्ये निराशा आणि नकारात्मकता निर्माण झालीय. जोपर्यंत राहुल पक्षाची धुरा वाहताहेत तोपर्यंत मतदारांकडे मतांसाठी जाणं व्यर्थ आहे असं ते समजतात. तरीदेखील ते राहुल गांधींच्या विरोधात बोलू शकत नाहीत. जर काँग्रेसपक्षानं किती जणांना राहुल गांधी नेते म्हणून हवेत अन किती जणांना नकोत यावर जर गुप्त मतदान घेतलं तर राहुल यांचं डिपॉझिट जप्त होईल की त्यांचं नेतृत्व लादलं गेलंय हे जाणून घेणं मजेशीर ठरणार आहे.

ओमर अब्दुल्ला यांचं हे वक्तव्य आजच्या राजकीय परिस्थितीत खूप महत्वाचे ठरतं आहे. आज मोदी वा भाजपसमोर सार्वत्रिक निवडणुकांना सामोरं जाणारा नेता दिसत नाही. राहुल यांच्या जागी कोण? मोदींना पर्याय कीं असतील? मोदी हे स्वतः मजबूत आणि लोकप्रिय आहेत त्यांनी प्रशासन आणि पक्ष या दोन्हीवर एकहाती मजबूत पकड मिळविली आहे. पण इकडे सोनिया आणि राहुल सलगरित्या दुबळे बनत चाललेले दिसताहेत. पक्षांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर वैश्विक जनमानस आणि टेक्नॉलॉजीच्या युगात भारतीयांना सुख आणि समृद्धीची स्वप्ने दाखविणारा नेता आता हवाय.

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी काँग्रेसपक्षांच्या नेतृत्वावर, राहुल गांधींवर टीका करीत पुन्हा जुना विचार नव्याने मांडलाय. तो असा की, लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षांनी एक 'महागठबंधन' करावं. भूतकाळात अशा प्रकारे 'महागंठबंधना'चा विचार कोण्यातरी सिनिअर नेत्याच्या प्रधानमंत्री बनण्याच्या म्हत्वाकांक्षेने, इच्छेने होई. आता सर्वच बिगर भाजपेयी आणि त्यांचे नेते हे मोदींना टक्कर देण्याची शेवटची आशा ही लाचारीच्या फार्मूल्याकडे पाहात आहेत. राहुल गांधी, मायावती, अखिलेश यादव, मुलायमसिंह, ममता बेनर्जी, शरद पवार, लालू यादव, ओमर अब्दुल्ला आणि डाव्यांच्यासह महागठबंधन अस्तित्वात आलं तरी त्यात प्रधानमंत्रीपदाचा उमेदवार कोण? हा प्रश्न उभा राहताच ती तुटण्याचीच शक्यता मोठी आहे.

आता होणारी राष्ट्रपतींची निवडणूक ही आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या रंगीत तालीमच म्हणायला हवी. रामनाथ कोविंद यांच्या समोर विरोधकांनी मीराकुमारी या मागासवर्गीय नेत्यांमध्ये झगडा उभा झालाय. हळूहळू देशातील एकापाठोपाठ एक अशा राजकीय पक्षाचे पत्ते आता उघड होताहेत. मोदींबरोबर असलेलं जनमानस ओळखून काहींनी भाजपशी जवळीक साधलीय तर काहीजण सावध भूमिका घेताहेत. म्हणून मिशन२०१९ हे बिकमिंग थ्रिलर...!

*चौकट*

*इंडियन पॉलिटिकल लीग*

भाजपेयींची २०१९ साठीची तयारी सुरू झालीय हे वर सांगितलंय. आगामी दोन वर्षात त्यातील कंगोरे समोर येतील. पण या लोकसभेच्या फायनलपूर्वी विधानसभेच्या निवडणुकांची सेमिफायनल 'इंडियन पॉलिटिकल लीग'च्या थाटात होणार आहे. त्या अधिक लक्षवेधी असतील. यावेळी कित्येक मॅच फिक्सिंग, खेळाडूंची पळवापळवी, यासाठी उथलपुथल आणि त्याचबरोबर सट्टाबाजार याला तेजी येईल. भाजपने कप्तान आणि प्रशिक्षक नेमून नेट प्रॅक्टिस सुरू केलीय. मात्र इतर संघांना अजून ग्राऊंड, खेळाडू, खेळाचं साहित्य मिळालेलं नाही, ते हॉटेलातच मजा मारत प्रतिक्षा करताहेत.


*-हरीश केंची*

2 comments:

  1. वरील विचार सुंदरपणे सादर केले आहेत. एक विचारावेसे वाटते की असे काय कारण आहे कि ज्या कारणासाठी सध्याच्या काळातील मोठी कॉंग्रेसी नेतेमंडळी अजूनही गांधी नावाचे नाणे खणखणीत आहे म्हणून त्या नेतृत्वाखाली निमूटपणे अपमानास्पद वागणूक सहन करत आहेत?

    ReplyDelete
  2. सद्य स्थिती नेमकेपणाने मांडणारे विश्लेषण,परंतु एक निरीक्षण थोडे चुकीचे वाटते ते म्हणजे भाजप कडे नाहीत एवढे तरुण काँग्रेस कडे आहेत आणि त्यासाठी एक हाताच्या बोटाएव्हढेच नावे तुम्ही दिली आहेत.एकुणात लेख हा काँग्रेस ची दिशा हिन ता त्यांचे व्यक्ती पूजकत्व स्पष्ट करतो

    ReplyDelete

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...