Thursday 28 October 2021

बेदरकार बॅरिस्टर अंतुले!

इंदिरा व संजय गांधी यांच्यावरील निष्ठेमुळे मुख्यमंत्रिपद मिळवणारे बॅ. अ. र. अंतुले तडफदार होते आणि प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. समस्या ही की धडाडी आणि धरबंध यातील संतुलन कोठे संपते याचे त्यांना भान नव्हतं, त्यामुळेच ते अडचणीत आहे आणि मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं!

इंदिरा व संजय गांधी यांच्यावरील निष्ठेमुळे मुख्यमंत्रिपद मिळवणारे     बॅ. अ. र. अंतुले तडफदार होते आणि प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. समस्या ही की धडाडी आणि धरबंध यातील संतुलन कोठे संपते याचे त्यांना भान राहत नसे. वागण्यातील तडफेस नियंत्रित करण्यासाठी जो संयतपणा लागतो, तो त्यांच्या ठायी कधी नव्हता..

महाराष्ट्राचे पहिले मुसलमान मुख्यमंत्री ही अब्दुल रहेमान अंतुले यांची खरी आणि पूर्ण ओळख ठरणार नाही. किंबहुना तशी ती करणे हे त्यांच्यावर अन्यायकारक आहे. त्यांच्या मुख्यमंत्रिपदातील पहिलेपण धर्मापेक्षा अन्य एका वास्तवाने महत्त्वाचे ठरते. ते म्हणजे कोकणातून आलेला, साखर कारखानदार वा सहकारसम्राट यांचा पाठिंबा नसलेला पहिला मुख्यमंत्री असे म्हटल्यास अंतुले यांचे मोठेपण लक्षात यावे. अंतुले यांच्यामागे ना सहकारी बँक ना कोणती संस्था. तरीही त्यांना या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाले. हे जसे त्यांचे मोठेपण तसेच अशक्तपणदेखील ठरते. याचे कारण या राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी कोण लायक ठरते, किंवा खरे तर कोण नालायक ठरते, याचे काही अलिखित नियम तग धरून आहेत. त्यानुसार मराठा जातीतील नेत्यांस प्राधान्य मिळते. मराठा आणि तो परत त्यात पश्चिम महाराष्ट्रातील असेल तर ते सोन्याहून पिवळे. हे नसेल तर गेलाबाजार त्याच्यामागे काही सहकारी साखर कारखाने तरी हवेत. अंतुले हे या सर्वच नियमांना अपवाद होते. ते मराठा नव्हते, पश्चिम महाराष्ट्राशी त्यांचा थेट संबंध नव्हता आणि मागे एखादी सहकारी संस्था असण्याचीदेखील सुतराम शक्यता नव्हती. तरीही ते १९८० साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मागे अनेक गोष्टी नसलेल्या अंतुले यांच्याकडे काँग्रेसमधील सत्ताकारणासाठी जीवनावश्यक असे दोन घटक होते. एक गांधी घराण्यावर निष्ठा आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्रातील असूनही प्रसंगी मराठा आणि सहकार दबाव गटांशी दोन हात करण्याची तयारी.
हे दोन्ही घटक अंतुले यांच्या मुख्यमंत्रिपदी निवडीत निर्णायक ठरले. याचे कारण तत्कालीन राजकीय परिस्थिती. १९७८ साली शरद पवार यांनी पुरोगामी लोकशाही दलाचा प्रयोग करून काँग्रेसला चांगलेच संकटात आणले होते. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडल्यानंतर डावे, उजवे, समाजवादी अशा सर्वच आवळ्याभोपळ्यांना घेऊन पवार यांनी राज्य सरकारची मोट बांधली होती. त्याआधी आणीबाणीनंतरच्या निवडणुकांनी इंदिरा गांधी यांना धूळ चारली होती. एके काळचे काँग्रेसचे मोरारजी देसाई ते जनसंघाचे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, साथी जॉर्ज फर्नाडिस यांचे असेच सरकार केंद्रात सत्तेवर आले होते. परिणामी इंदिरा गांधी यांना आपण कसे संपवले असे म्हणत एकमेकांना टाळय़ा देत या ढुढ्ढाचार्याचे राजकारण सुरू होते. त्यापासूनच प्रेरणा घेत शरद पवार यांनी महाराष्ट्रात पुलोदचा घाट घातला. तो चांगलाच रंगेल अशी चिन्हे असताना घात झाला. तो म्हणजे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेवर आल्या. जी बाई संपली असे मानून ज्यांचे राजकारण सुरू होते त्या सर्वानाच इंदिरा गांधी यांच्या धडाडीच्या पुनरागमनाने धक्का बसला. बाईंनी पहिले काय केले तर महाराष्ट्रात शरद पवार यांचे पुलोद सरकार विसर्जित केले. परिणामी पवार जसे राजकीयदृष्टय़ा निर्वासित झाले तसेच महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेतृत्वही. या टप्प्यावर इंदिराबाईंचे अब्दुल रहेमान अंतुले यांच्याकडे लक्ष गेले. मुख्यमंत्रिपदी निवड होण्याआधी अंतुले चांगले दशकभर विधानसभेत होते, वेगवेगळय़ा खात्यांचे मंत्रीही होते. या काळात त्यांचा एक गुण काँग्रेसश्रेष्ठींच्या नजरेत भरला असावा. तो म्हणजे बेधडकपणा. हा काळ संजय गांधी यांच्या दिव्य लीलांचा. आणीबाणीच्या आधी या संजयलीलांनी आणि त्याच्या गणंगांनी राजकारण ग्रासलेले होते. काँग्रेसच्या दरबारी राजकारणात संजय म्हणेल ती पूर्व दिशा मानण्याचा प्रघात होता. त्यामुळे जेव्हा आई इंदिरेने शरद पवार सरकार बुडवले तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी संजय गांधी यांच्याकडून अंतुले यांचेच नाव पुढे ढकलले गेले. गांधी मायलेकांना अंतुले यांच्याविषयी ममत्व असण्याची प्रमुख कारणे तीन. एक म्हणजे या मायलेकांच्या पडत्या काळातही अंतुले यांनी त्यांची साथ सोडली नाही, दुसरे म्हणजे यशवंतराव चव्हाण ते शरद पवार व्हाया वसंतदादा पाटील या राज्याच्या मराठा राजकारणास आव्हान देऊ शकेल अशी अंतुले यांची मनोभूमी आणि तिसरे म्हणजे अर्थातच त्यांचा धर्म. तेव्हा या सर्व कसोटय़ांवर उत्तम गुणांनी उतरणाऱ्या अंतुले यांची निवड महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी होणे हे साहजिक होते.
मुख्यमंत्रिपदी आसनस्थ होताच अंतुले यांच्यातील मूळ बेधडक स्वभावास वैधतेची जोड मिळाली. अंतुले तडफदार होते आणि प्रश्न समजून घेण्याची त्यांची हातोटी वाखाणण्याजोगी होती. राज्याच्या सेवेत राहून गेलेले अनेक ज्येष्ठ सनदी अधिकारी अद्यापही अंतुले यांच्याविषयी आदराने बोलतात ते यामुळेच. एकदा का निर्णय घेतला की अंतुले ठामपणे अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आणि कोणत्याही प्रसंगाने डगमगून जात नसत. याचा सर्वात मोठा दाखला म्हणजे रिझव्‍‌र्ह बँकेच्या विरोधात जात त्यांनी जाहीर केलेली कर्जमाफी. आर्थिकदृष्टय़ा अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची कर्जे माफ व्हावीत असा निर्णय त्यांनी घेतला. तोपर्यंत राज्य सरकारनेच कर्जे माफ करण्याची प्रथा नव्हती. परिणामी त्यांच्या निर्णयाचे अनेक पडसाद उमटणार होते. तसे ते उमटले आणि त्याची दखल घेत थेट रिझव्‍‌र्ह बँकेनेच राज्य सरकारला तंबी दिली. प्रश्न अवघा ५० कोटी रुपयांचा होता आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार होता. तोपर्यंत असे कधीही झालेले नसल्यामुळे नानी पालखीवाला यांच्यासह अनेकांनी त्या विरोधात काहूर उठवले. परंतु अंतुले जराही डगमगले नाहीत आणि रिझव्‍‌र्ह बँकेला महासरकार होऊ देणार नाही, असे सांगत त्यांनी ती योजना जशीच्या तशी राबवली. जे झाले ते आर्थिकदृष्टय़ा योग्य की अयोग्य असा प्रश्न यावर उपस्थित होऊ शकतो. तसा तो झाला तरी त्यामुळे अंतुले यांची प्रशासनातील धडाडी मात्र दिसून येते. त्यांच्या आयुष्यातील दुर्दैवी योगायोग म्हणजे संजय गांधी यांचे निधन. संजय गांधी यांच्यामुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपद मिळाले. परंतु ते मिळाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत संजय गांधी यांचे निधन झाले. तेव्हा आपल्या या राजकीय पाठीराख्याच्या स्मरणार्थ अंतुले यांनी संजय गांधी निराधार योजना सुरू केली. राज्यातील निराधारांना दरमहा ६० रुपये इतके तरी निवृत्तिवेतन मिळावे, अशी ती योजना. आजही ही योजना देशभर वेगवेगळय़ा राज्यांतून राबवली जाते. फरक इतकाच की, आज हे निवृत्तिवेतन ५०० रुपयांच्या घरात गेले आहे.
परंतु अंतुले यांच्या स्वभावातील समस्या ही की धडाडी आणि धरबंध यातील संतुलन कोठे संपते याचे त्यांना भान राहत नसे. इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान हे प्रकरण घडले ते यामुळेच. ज्या वेळी सिमेंटसारख्या घटकासाठी बिल्डरांना सरकारवर अवलंबून राहावे लागत असे त्या वेळी अंतुले राज्य सरकारच्या वतीने बिल्डरांना धडाधड असे परवाने देत असत. अट अशी की त्या बदल्यात या बिल्डरांना अंतुलेचलित न्यासांना देणगी द्यावी लागत असे. वास्तवात ही देणगी अंतुले हे धनादेशाद्वारेच घेत असत. परंतु तरीही अंतुले यांचे राजकीय विरोधक असलेल्या वसंतदादा पाटील आदींनी अंतुले रोखीने देणग्या घेत असा प्रचार पद्धतशीरपणे केला आणि तो इंदिरा गांधी यांच्यापर्यंत जाईल अशी व्यवस्था केली. माध्यमांतूनही हे प्रकरण चिघळले आणि बघता बघता अंतुले यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे वादळ उभे राहिले. अंतुले यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद मिळू नये यासाठी त्या वेळी वसंतदादा पाटील यांनी जंग जंग पछाडले होते. त्यांच्या विरोधास डावलून मुख्यमंत्रिपदी अंतुले यांची वर्णी लागल्याने दादा आणि मराठा नेतेमंडळींशी संबंधित अनेक जण अंतुले यांना खिंडीत पकडण्यासाठी टपूनच होते. त्यांना अंतुले यांनी स्वहस्ते संधी दिली आणि अखेर स्वत: संकटात सापडले. वास्तविक काँग्रेसचे तत्कालीन नेते अंतुले यांच्या तुलनेत काही संतसज्जन होते असे नाही. तरीही त्यांच्या तुलनेत अंतुले भ्रष्ट ठरले.
याचे कारण बेधडकपणा कोठे संपतो आणि बेधुंद बेमुर्वतपणा कोठे सुरू होतो, याकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. कपाळावर मध्ये मध्ये येणारी केसांची बट, बोलता बोलताच ती मागे करण्याची बेफिकिरीची लकब, वागण्यात एक प्रकारचा जोश आणि ऊर्जा असे अंतुले आपल्या वागण्यातूनच एक सकारात्मक संदेश देत. बघू, पाहू, करू अशा शब्दांना त्यांच्याकडे स्थान नव्हते. परंतु वागण्यातील तडफेस नियंत्रित ठेवण्यासाठी जो प्रकारचा संयतपणा लागतो, तो त्यांच्या ठायी कधी नव्हता. त्यामुळेच पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांची कारकीर्द भरकटत गेली आणि एका चांगल्या प्रशासकाचा दुर्लक्षित शेवट झाला.

आणीबाणीनंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत परतल्या. इंदिरा गांधीच्या आधी सत्तेत असलेल्या जनता पक्षाच्या सरकारने ज्या प्रकारे कॉंग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील राज्य सरकारे बरखास्त केली. त्याच प्रकारे इंदिरा गांधी यांनीही तेव्हाची बिगर-कॉंग्रेसी राज्य सरकारे बरखास्त करण्याचा धडाका लावला. बर्‍याच राज्यांची राज्य सरकारे बरखास्त झाली. महाराष्ट्रही त्यापैकी एक होता. महाराष्ट्रात तेव्हा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही आघाडीचे (पुलोद) सरकार होते. पुलोदचे सरकार बरखास्त झाल्यानंतर राज्यात निवडणुका झाल्या. ज्यामध्ये कॉंग्रेसचा विजय झाला.
राज्यात दीर्घकाळ सत्तेत असलेल्या शक्तिशाली मराठा लॉबी नष्ट करण्यासाठी इंदिरा गांधींनी बॅरिस्टर अंतुले यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून नेमले.
अंतुले यांच्या निवडीमागे अजून एक महत्वाचे कारण होते ते म्हणजे अंतुले हे तेव्हाच्या कॉंग्रेसमध्ये सर्वाधिक ताकदवान असलेल्या संजय गांधी स्टाईलचे समर्थक होते. कोणत्याही घटनेवर पटकन निर्णय घेणे आणि पटकन तो निर्णय पूर्ण करणे हि त्यांची खासियत होती. असं म्हणतात कि, अंतुले यांच्या याच स्टाईलमुळे नोकरशाही त्याच्याबरोबर थरथर कापत असे. मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक मोठे जिल्हे तोडले आणि त्यांना लहान केले. जेणेकरून प्रशासन सुरळीत चालु शकेल.

मुख्यमंत्री असताना आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक योजना सुरू केल्या.
यामध्ये ‘संजय गांधी निराधार योजना’ आणि गरीब लोकांच्या आर्थिक मदतीसाठी आमदार आणि मीडिया कर्मचार्‍यांसाठी गृहनिर्माण योजना यांचा समावेश आहे. याबरोबर त्यांनी ट्रस्टची स्थापना केली. यामागे त्यांचा हेतू होता, सामाजिक कामांसाठी निधी उभारण्याचा होता. पण ही त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक असल्याचे सिद्ध झाले. महाराष्ट्रातील राज्य सरकार बरखास्त झाल्यानंतर राज्यात पुन्हा निवडणुका लागल्या. कॉंग्रेस सत्तेत आली आणि अब्दुल रहमान अंतुले यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचे राज्यात सरकार अस्तित्वात आले. अंतुले यांची काम करण्याची पद्धत पाहता त्यांची मोठी चर्चा होवू लागली. पण लवकरच त्यालाही जोरदार धक्का बसला.

इंडियन एक्स्प्रेसचे तत्कालीन संपादक असलेल्या अरुण शौरी यांनी राज्यातील सिमेंट वाटप घोटाळ्याचा पर्दाफाश केला. यामुळे राज्य सरकारच नाही तर थेट इंदिरा गांधी पंतप्रधान असलेल्या केंद्र सरकारला देखील मोठा धक्का बसला होता. अरुण शौरी यांनी सिमेंट घोटाळ्याचा पर्दापाश केला. त्यांच्या त्या बातमीची हेडिंग होती. ‘अंतुले: तुले या नही तुले’. वर्तमानपत्रात छापून आलेल्या या प्रकरणानंतर सर्वत्र मोठा दबाव निर्माण झाला. त्यामुळे इंदिरा गांधी यांना अंतुलेंना मुख्यमंत्री पदावरून हटवावे लागले. अंतुले यांचा हा सिमेंट घोटाळा ‘वॉटरगेट घोटाळा’ नंतर बराच काळ चर्चेत राहिला. पेशाने अर्थशास्त्रज्ञ असलेले अरुण शौरी जागतिक बँकेची नोकरी सोडून भारतात आले. काही काळ योजना आयोगात काम केले आणि त्यानंतर ते १९७९ मध्ये इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रात दाखल झाले. इंडियन एक्सप्रेसच्या रामनाथ गोएंका यांनी शौरी यांना कामासाठी पूर्ण मोकळीक दिली. आणीबाणीच्या काळात गोएंका यांनी सरकारचा तीव्र विरोध केला होता.

३१ ऑगस्ट १९८१चा दिवस.
त्या दिवशीच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये ७५०० शब्दांचा एक अहवाल प्रकाशित झाला. यात अरुण शौरी यांनी मुख्यमंत्री अंतुले यांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून विविध ट्रस्टच्या माध्यमातून निधी कसा गोळा केला ? याचा काही उद्योजकांच्या लॉबीचा कसा फायदा झाला. याचा संपूर्ण तपशील प्रकाशित केला. असे सांगितले जाते की अंतुले यांनी एकूण सात ट्रस्टची स्थापना केली होती. अरुण शौरी यांनी आपल्या लेखात सांगितले होते की यापैकी ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’ या ट्रस्टच्या नावावर कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे कसे घेतले आणि सिमेंट देताना त्यांचा कसा फायदा घेण्यात आला.

शौरी यांनी आपल्या लेखात देणगी देणाऱ्या आणि त्याचा फायदा घेणार्‍या बिल्डरांची नावेही उघड केली.
या मागचे मुख्य कारण म्हणजे त्या काळी सरकारचे सिमेंटवर नियंत्रण होते. मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू होते. त्यामुळे कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांना सिमेंटची मोठी आवश्यकता होती. अंतुले यांनी सिमेंटची मागणी आणि पुरवठा यातील अंतर लक्षात घेण्याचा प्रयत्न केला.
याचाच विचार करून ‘इंदिरा गांधी प्रतिभा प्रतिष्ठान’मध्ये ५.२ कोटी रुपये जमा केले. एकूण सात ट्रस्टमध्ये सुमारे 30 कोटी रुपये जमा झाले होते.
तसं पाहिलं गेल तर सर्व ट्रस्ट सार्वजनिक होत्या आणि रक्कम फक्त चेक आणि ड्राफ्टद्वारे जमा केली होती. पण यावर असा आरोप केला गेला की हे सर्व पैसे अंतुले यांचेच आहेत. कारण या ट्रस्टवर जे ट्रस्टी आहेत, ते सर्व अंतुले यांच्या कुटुंबातील लोक किंवा मित्र होते.
अंतुले यांच्यावर ट्रस्टच्या देणगीदारास विहित कोट्यापेक्षा जास्त सिमेंट पुरवणे, सिमेंट वितरण व्यवस्था बदलणे, मुंबईतील विविध प्रकल्पांना मान्यता न देवून त्याच्या किंमती वाढविणे असे अनेक आरोप झाले. केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही विशिष्ट कारवाई केली नाही.

दरम्यान, हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी यांनी अंतुले यांच्याविरूद्ध केस लढली. यासाठी त्याने कोणतीही फी घेतली नाही. न्यायाधीश बख्तावार लेन्टिन यांना अंतुले दोषी मानले.
अंतुले यांनी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेले. बराच काळ केस चालल्यानंतर न्यायालयाने अंतुले यांना पुरेसे पुरावे नसल्यामुळे सर्व आरोपातून निर्दोष मुक्त केले. पण तोपर्यंत अंतुले यांची राजकीय कारकीर्द संपली होती.

हिंदुत्व : प्रबोधनकारांचं आणि बाळासाहेबांचं..!

'प्रबोधन' पाक्षिकाच्या शताब्दीनिमित्तानं राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीनं 'प्रबोधनमधील प्रबोधनकार' या प्रबोधन पाक्षिकातल्या अग्रलेखाच्या तीन खंडाचं प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नुकतंच झालं. त्यावेळी आणि त्यापूर्वीही सत्ता होती घेतल्यानंतर वेळोवेळी त्यांनी 'आमचं हिंदुत्व हे प्रबोधनकारांचं आहे!' असं म्हणतानाच त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आपल्या मूळ ध्वजाचा रंग बदलून भगवा केला आणिहिंदुत्व स्वीकारलंय हे दाखवून दिलं त्यावर टीका करताना त्यांनी 'नवंहिंदुत्व' स्वीकारल्याचे म्हटलं. उद्धव ठाकरे यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर 'शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं!' अशी टीका होत होती. उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याच्या निमित्तानं हिंदुत्वाचं दोन मार्ग दिसून आलं. एक प्रबोधनकारांचं जे उध्दव यांनी स्वीकारलंय तर दुसरं बाळासाहेबांचं जे राज ठाकरे यांनी स्वीकारलंय! आगामी काळात याच हिंदुत्वाची चर्चा सुरू राहील असं दिसतंय!
---------------------------------------------

उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि ‘शेंडी-जानव्याचं’ हिंदुत्व
प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांच्या संग्रहाचं प्रकाशन करतांना उद्धव ठाकरे यांनी त्यांना अभिप्रेत असणारं हिंदुत्व काय आहे याचा पुनरुच्चार केला आणि त्यांच्या हिंदुत्वाचं मूळ 'प्रबोधनकारां'शी कसं जोडलेलं आहे हेही सांगितलं. प्रबोधनकार ठाकरे हे नास्तिक नव्हते, पण धर्माच्या नावावर चालणारी भोंदूगिरी त्यांना मान्य नव्हती असं सांगत सध्याचे इतर हिंदुत्ववादी आणि त्यांच्यात फरक कसा आहे हेही उद्धव यांनी सांगितलं. "हिंदुत्वाचा विचार एक असला तरी धारा वेगळ्या आहेत. म्हणजे आम्ही आणि दुसरे जे हिंदुत्ववादी आहेत. आमचं हिंदुत्व जे आहे ते नुसतं शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नाही. नुसती घंटा वाजवली म्हणजे हिंदू झालो असं नाही," असं उद्धव ठाकरे म्हणाले. दुसरीकडं, उद्धव यांच्या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य या उत्तरेतून आलेल्या महंतांनी मुंबईत येऊन 'मनसे'प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जुना आखाड्याशी संबंधित असणाऱ्या या महंतांची हिंदुराष्ट्राबद्धलची मतं जाहीर आहेत. 'राज हे हृदयातून हिंदू आहेत' असं कौतुक करतांनाच कांचनगिरी यांनी राज यांना अयोध्येत येण्याचं आमंत्रण दिलं आणि त्यानुसार गेल्या काही काळापासून हिंदुत्वाच्या राजकारणाकडं वळलेले राज काहीच दिवसांत अयोध्येचा दौरा करणार असल्याचंही वृत्त आहे. दोन ठाकरे बंधू आणि त्यांच्याशी संबंधित लागोपाठ घडलेल्या या दोन घटना. पण या दोन घटनांमधून, जसं उद्धव म्हणतात तसं, हिंदुत्वाच्या दोघांच्या धारा वेगवेगळ्या होत आहेत, असं दिसतंय का? प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसासोबतच त्यांचे विचार आणि राजकारण यांच्यावरही दावा या दोघांकडूनही होत आला आहे. पण सध्याच्या देशातल्या हिंदुत्वाच्या राजकारणाच्या वाहत्या वाऱ्यांमध्ये या दोन नेत्यांच्या धारा बदलताहेत का?

बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेपेक्षा आताची शिवसेना मवाळ झालीय अशी टीका गेल्या काही काळात सतत उद्धव ठाकरेंना झेलावी लागलीय. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यावर तर शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं अशी टीका भाजप आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांकडून सतत होत असते. प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब या दोघांचाही पिंड आक्रमक होता. पण प्रबोधनकारांची भूमिका ही समाज सुधारकाची होती. हिंदू धर्मातल्या अनिष्ट परंपरा, चालीरिती, जातीय निष्ठा यांच्यावर कठोर शब्दांत टीका करणाऱ्या विचारवंताची होती. जिथं ढोंग वा विरोधाभास दिसला तिथं प्रबोधनकारांनी प्रहार केला. बाळासाहेबांची भूमिका ही तशी राजकीय होती, आक्रमक हिंदुत्वाची होती. त्यांची भूमिका ही जहाल भाषेची, कधी वादग्रस्त, इतर धर्मियांविरुद्ध आक्रमक अशीही होती. आक्रमक हिंदुत्वाच्या याच भूमिकेनं त्यांना भाजपचा मित्र केलं. शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका सोडली या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी सातत्यानं प्रतिवाद केलाय. 'हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे' असंही सातत्यानं सांगितलंय. पण आता नव्या राजकीय रचनेच्या पार्श्वभूमीवर ते त्यांच्या हिंदुत्वाचीही नव्यानं मांडणी करतांना दिसताहेत. ती मांडणी प्रबोधनकार ठाकरेंच्या भूमिकेच्या अधिक जवळ जाणारी आहे असं निरिक्षण आहे. भाजपच्या हिंदुत्वापेक्षा ते वेगळं आहे हे दाखवण्याचाही तो प्रयत्न आहे. 'देश हाच माझा धर्म' असं दसरा मेळाव्याच्या आणि प्रबोधनकारांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमातही उद्धव म्हणाले. 'हिंदुराष्ट्रवादा'ची जी चर्चा सध्या देशभरामध्ये घडून येतेय तिच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य महत्वाचं आहे. 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' ही शिवसेनेनं आधीपासून घेतलेली भूमिका होती. मुस्लिमविरोधी किंवा द्वेषावर आधारित राजकारण करण्यापेक्षा सर्वांना जोडणारी वा सॉफ्ट हिंदुत्वाची भूमिका उद्धव घेतांना दिसत आहेत. इथं त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या उदारमतवादी, सुधारणावादी विचारांचा आजच्या राजकारणात त्यांना उपयोग होतोय. जेव्हा कॉंग्रेसशी राजकीय आघाडी करण्याची वेळ आली तेव्हाही या विचारांची पूर्वपीठिका अगोदर तात्विक पातळीवर एकत्र येण्यासाठी कामी आली. हिंदुत्वाच्या धाग्यावरच दोन दशकांपेक्षा अधिक काळ मैत्री असलेल्या भाजपविरुद्ध आता राजकीय युद्ध लढतांना उद्धव ठाकरे विरोधकांसाठी 'नवहिंदू' अशी नवी व्याख्या करत आहेत. ही व्याख्या करत ते मूळ हिंदुत्वावर त्यांचाच दावा सांगताहेत. "मी दसरा मेळाव्याच्या भाषणात एक नवा शब्द उच्चारला, 'नवहिंदू' हा जो नवा प्रकार येतो आहे, तो खरा हिंदुत्वाला घातक आहे. प्रत्येक वेळेला मी म्हणेन तेच खरं, तेच बरोबर असं असेल तर ठीक आहे, पण ते पहिलं तुला ते कळलं आहे का? ते हत्ती आणि आंधळ्यांच्या कथेसारखं आहे. हत्तीचा कोणता भाग तुमच्या हाताला लागतो तसा तुम्हाला तो आहे असा वाटतो. पण ते तुमचं दुर्दैवं आहे, हत्तीचं नाही," असं उद्धव पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात म्हणाले. पण अशा हिंदुत्वाच्या धारेकडं जातांना "त्याच वेळेस 'दुसऱ्या धर्माचा कोणी मस्ती घेऊन माझ्यासमोर उभा राहिला तर देशाभिमानी कडवट हिंदू म्हणून त्याच्यासमोर उभं राहण्याशिवाय मला पर्याय नाही" असं म्हणत उद्धव ठाकरे आक्रमकता कमी झाली नाही हेही सांगण्याच्या प्रयत्न करताहेत. मुंबईतल्या दंगलींच्या काळात शिवसेनेनं काय भूमिका घेतली होती याची आठवणही करुन देतात.

हिंदुत्वाची अशी मांडणी आणि नवी राजकीय भूमिका त्यांना बाळासाहेबांपेक्षा प्रबोधनकारांच्या जवळ नेते आहे असं म्हटलं जातंय याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. पण बाळासाहेबांपासून ती दूर नेणारी नाही हेही ते सांगताहेत. "अनेक जण असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी आता प्रबोधनकारांचं हिंदुत्व घेतलं आहे. पण तसं नाही आहे. जो मधला मोठा काळ बाळासाहेबांचा आहे, ते विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत," उद्धव म्हणाले. उद्धव यांची नवी भूमिका सध्याच्या राजकीय स्थितीत उपयोगाची ठरते आहे असं राजकीय निरीक्षकांना वाटतं. जेव्हा महाविकास आघाडी बनत होती, तेव्हा कॉंग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना सोनिया गांधींनी भिंतीवरचे नेहरु, गांधी यांचे फोटो दाखवून विचारलं होतं की शिवसेनेबरोबर गेलो तर यांना मी काय उत्तरं देऊ? तेव्हा बाळासाहेब थोरातांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरेंबद्धल सांगितलं होतं आणि त्यांचा वारसा उद्धव पुढे नेऊ शकतील असं म्हटलं होतं. आपण आजची उद्धव यांची भाषणं आणि वक्तव्यं पाहिली, तर तोच धागा आपल्याला दिसेल, आपल्या वडिलांच्या भूमिकेपासून फारकत घेऊन नवी मांडणी ते करताहेत. प्रसंगी रा. स्व. संघावरही टीका करताहेत. असं अगोदर त्यांनी केलं नव्हतं. एका प्रकारे ते स्वत: उत्क्रांत करताहेत. महाराष्ट्राबरोबर भारतातही त्यांना महत्त्व येतं आहे. भाजपविरोधी जे पक्ष आहेत, त्यांना वाटतं की भाजपच्या हिंदुत्वाला उत्तर देण्यासाठी उद्धव योग्य आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं दोन वारसे आहेत. एक प्रबोधनकारांचा, आणि एक बाळासाहेबांचा! आवश्यक राजकीय स्थितीनुसार उद्धव त्याचा वापर करताहेत.

राज यांचं हिंदुत्व; शिवसेनेच्या जवळचं की भाजपच्या?
उद्धव ठाकरेंनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्यावर आक्रमक हिंदुत्वाची जी शिवसेनेची पॉलिटिकल स्पेस होती ती राज ठाकरे आणि त्यांची 'मनसे' घेऊ शकते असं म्हटलं जाऊ शकतं. राज ठाकरेंनी पावलंही त्या दिशेनं टाकली आहेत. पक्षाचा झेंडा बदलण्यापासून भाजपशी बोलणी करण्यापर्यंत हालचाली मनसेच्या गोटात सुरू झाल्यात. आक्रमक राजकीय हिंदुत्वाकडं मनसे झुकू लागलीय हे दिसू लागलंय. म्हणजेच, जी हिंदुत्वाची दुसरी धारा आहे, त्याकडं राज ठाकरे चालले आहेत! राज ठाकरेंनी वर्षभरापूर्वी त्यांच्या पक्षाचा झेंडा पूर्णपणे भगवा रंगाचा करुन हिंदुत्वाच्या राजकारणाकडं जाण्याअगोदरही काही त्याला पूरक आक्रमक भूमिका घेतल्या होत्या. मुंबईतल्या अवैध बांगलादेशी नागरिकांबद्धल ते सातत्यानं बोलत होते, मोहिमा राबवत होते. त्याअगोदर जेव्हा रझा अकादमीबाबत मुंबईत जी घटना घडली होती, तेव्हा राज यांनी आक्रमक आंदोलन केलं होतं, मोर्चाही काढला होता. पण तेव्हा त्यांच्या राजकारणाकडं हिंदुत्वाकडं झुकलेलं राजकारण असं म्हटलं गेलं नव्हतं. पण २०२० च्या सुरुवातीला ध्वजबदलापासून राज यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. त्यांच्या भाषणांमध्येही तशी भूमिका दिसली. जेव्हा कोरोनाच्या काळात लॉकडाऊननंतर एकेक गोष्टी खुल्या होऊ लागल्या, पण मंदिरं बंद ठेवली गेली, तेव्हा मनसेनं सरकारविरुद्ध भूमिका घेतली. आंदोलनं केली. गेल्या काही काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या नेत्यांनीही राज ठाकरे यांच्या भेटी घेतल्या आहेत. आता साध्वी कांचनगिरी आणि महंत सूर्याचार्य हेही त्यांना भेटायला आले. राज ठाकरे यांना अयोध्येचंही आमंत्रण आहे. पण राज यांचं हे हिंदुत्वाच्या दिशेनं जाणं हे भाजपच्या जवळ जाण्यासाठी आहे असं म्हटलं जातं आहे. भाजप नेते आणि मनसे यांच्यात युती होण्याबद्धल सध्या सतत चर्चा सुरु आहेत. महापालिका निवडणुकांपूर्वी ही युती होऊ शकते असं म्हटलं जातंय. त्यामुळं हिंदुत्वाची एक धारा जशी उद्धव यांना कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या जवळ नेते आहे, तशी दुसरी धारा राज यांना भाजपच्या जवळ नेते आहे, असं चित्रं आहे. पण हे हिंदुत्व राज यांना बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या अधिक जवळ नेईल का? बाळासाहेबांच्या भाषणातली आक्रमकता राज यांच्याकडं आहे, पण हिंदुत्वाबद्धल बोलतांना, काही अल्पसंख्याक समुदायांबद्धल बोलतांना जसं बाळासाहेब बोलले, तसं अद्याप राज बोलले नाहीत. आक्रमक राजकीय हिंदुत्वाची पॉलिटिकल स्पेस जी राज घेऊ शकतील असं म्हटलं जातं आहे, ती भाजपा सोडेल का, असेही प्रश्न आहेत.

राज त्यांचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी काही प्रयोग करताहेत. लोकसभा निवडणुकीच्यावेळी त्यांनी भाजप आणि मोदींवर कडाडून टीका केली होती. त्यांच्या योजनांचे वाभाडे काढले होते. त्यावेळी असं वाटत होतं की, ते कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जवळ जाताहेत, आता पुन्हा भाजपाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताहेत. त्यासाठी आता ते हिंदुत्वाचे बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करताहेत. पण एक आहे की घराण्याचा आणि पक्षाचा वारसदार म्हणून उद्धव यांना लोकांनी स्वीकारलं आहे. त्यामुळं आता राज यांचा हा हिंदुत्वाचा प्रयत्न किती यशस्वी होतो ते पहावं लागेल. इथं एक गोष्ट स्पष्ट आहे की जोपर्यंत मनसेचं इंजिन हिंदुत्वाच्या ब्रॉडगेजवर जात नाही तोपर्यंत भाजप काही युती करणार नाही. त्यामुळं राज ठाकरेंकडून ते प्रयत्न आता होतांना पहायला मिळताहेत. पण बाळासाहेबांचा करिश्मा, मुख्य म्हणजे त्याकाळाची राजकीय परिस्थिती पाहता, त्यांना जे जमलं ते आज राज यांना जमेल का हा प्रश्न आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हिंदुत्वापुर्वी बाळासाहेबांनी दक्षिण भारतीयांविरुद्ध आंदोलन केलं होतं. त्या काळात भाजपाचं दक्षिणेतलं अस्तित्व जवळपास नव्हतं. त्यामुळं तेव्हा शिवसेनेबरोबर युती करतांना भाजपाला दक्षिण भारतीयांच्या नाराजीची अडचण नव्हती. पण राज यांचं आंदोलन उत्तर भारतीयांविरोधात होतं आणि आज भाजपला उत्तर भारतात कुठलीही नाराजी परवडणारी नाही. त्यामुळं हिंदुत्वापेक्षा या मुद्द्यावर राज यांच्याशी युती करतांना त्यांना खूप विचार करावा लागेल. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा वारसा आणि विचारधारांचा असला तरीही सध्याच्या वर्तमान राजकीय स्थितीचा अधिक आहे. त्या स्थितीनुसारच त्यांची भूमिका आणि निर्णय तोलला जाणार आहे. उद्धव यांच्याकडं प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा तर राज ठाकरे यांच्याकडं बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा येतोय असं दिसतंय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

ना विद्वत्ता, ना धोरण...!

नरेंद्र मोदी न्यू यॉर्कच्या विमानतळावर उतरले तेव्हां त्यांच्या स्वागताला अमेरिकन सरकारचं किंवा सत्ताधारी डेमॉक्रॅटिक पक्षाचं एकही माणूस नव्हतं. दोन भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रेसिडेंट जो बायडन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून मोदींचं कोमट स्वागत केलं, त्यात उत्साह नव्हता, मोदींची स्तुती नव्हती. अमेरिका गांधी आणि नेहरूंच्या आदर्शांवर वाटचाल करणार आहे अशी कानपिचकी बायडन यांनी दिली. उपाध्यक्ष कमला हॅरिस यांनी काढलेल्या पत्रकात मोदींचं स्वागत तर नव्हतंच पण लोकशाही संकटात आहे, लोकशाही बळकट करण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे असे टोमणे होते.

या घटनांमधून काही अर्थ काढायचा?
ट्रंप यांना मोदीनी मिठ्या घातल्या होत्या. त्यात पोरकटपणा होता, आगाऊपणा होता, जवळीक दाखवण्याची एक अत्यंत सवंग रीत होती. त्यावरून बायडन यानी मोदींचं पाणी जोखलं काय? ट्रंप यांचे उद्योग उलटे फिरवण्याचा चंग बायडन यानी बांधला आहे, धडाधड ते ट्रंपची धोरणं उलटी फिरवत आहेत. मोदींशी जवळीक आपल्याला नकोय असं बायडन याना दाखवायचं आहे काय? मोदींचा हा दौरा धावता होता. युनोसमोर भाषण हा एक उद्देश होता. अमेरिका, ऑस्ट्रेलिया,जपान आणि भारत यांची मोट बांधणारा चौकोनी करार पक्का करणं, त्याचे तपशील ठरवणं यासाठी होणाऱ्या बैठकीला मोदी हजर रहाणार होते. पैकी युनोसमोरचं भाषण हा एक उपचार असतो, चमकोगिरी करण्याची संधी या निमित्तानं देशप्रमुख घेत असतात. कधी कधी या भाषणाच्या अलीकडं पलीकडं महत्वाच्या विषयावर अनौपचारीक खलबतंही केली जातात. खलबतं झालेली दिसत नाहीत, भाषण मात्र झालं. युनोसमोरचं भाषण जगासाठी नव्हतंच, ते भारतातल्या भक्तगणांसाठीच होतं. चहा विकणारा एक माणूस भारतात पंतप्रधान होऊ शकतो, भारत ही लोकशाहीची जननी आहे असली नाटकी विधानं त्यानी भाषणात केली. त्या दोन्ही विधानांची चर्चाही करण्याची आवश्यकता नाही इतकी ती विधानं तकलादू आणि खोटी आहेत. मोदींच्या कुठल्याही भाषणात ना विद्वत्ता असते, ना धोरण. त्यामुळं मोदींची भाषणं गंभीरपणानं घ्यायची नसतात.

मोदींना जागतीक राजकारणात स्टेटस नाही, एक झपाट्यानं विकसित होत असलेल्या देशाचा एक पंतप्रधान असं त्यांच्याकडं पहातात. त्यामुळं बाहेरचे देश मोदींच्या भाषणाची, त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत नसतात. अमेरिकेतल्या पेपरांत मोदींचा उल्लेख नाही. चौकोनी करार, क्वाड, या मुद्द्यावर ऑस्ट्रेलिया, जपान यांच्या प्रमुखांबरोबर बायडन यांच्याशी मोदींची चर्चा झाली. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत अशा चार देशांत परस्पर सहकार्याचा एक करार २००५ साली झाला होता. चीनचा भारतीय-पॅसिफिक महासागरातला घातक वावर हा या करारातला अलिखित मुख्य मुद्दा होता. चीन आणि अमेरिका यांच्यातली स्पर्धा आणि मारामारी हा या कराराला गती देणारा घटक होता. चीनला वेसण घालायची तर त्या विभागातल्या देशांशी संबंध वाढवले पाहिजेत असा विचार अमेरिका करत होती. त्याच काळात ऑस्ट्रेलिया आणि चीन यांच्यातले संबंध लवचीक होते, चीन ऑस्ट्रेलियातला माल खरेदी करताना खळखळ करत होता. त्यामुळं चीनशी संबंध बिघडवू नयेत असा विचार ऑस्ट्रेलियानं केला आणि चौकोनी करारातून ऑस्ट्रेलिया बाहेर पडला. पण नंतर बदलत्या परिस्थितीत पुन्हा करारात शिरलाय, कारण ऑस्ट्रेलियाला अमेरिकन मदतीची जरूर भासतेय.

चीन आणि अमेरिका यातून आपल्याला कोणाचा जास्त उपयोग आहे त्यावर ऑस्ट्रेलिया आपले संबंध ठरवते. चीनला वेसण घालणाऱ्या करारात भाग घेणं याचा अर्थ चीनशी पंगा घेणं असा होतो. भारताला ठरवावं लागणार आहे की असा पंगा घ्यायचा कां? सध्यापर्यंत तरी भारतानं चीनशी सलोख्याचे संबंध ठेवायचा प्रयत्न केला आहे. भारताच्या जमिनीवर चीन हक्क सांगतंय, आक्रमण करतंय, माणसंही मारतंय. तरी भारतानं सर्वंकष शत्रुत्व न पत्करता वाटाघाटी करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न चालवलाय. कारण चीनशी संबंध ठेवण्याचे काही फायदे भारताला मिळत आहेत. चीनचं बरंच भांडवल भारतात आहे. चीनकडून येणाऱ्या कित्येक वस्तूंच्या आधारे भारतात वस्तू तयार होत असतात. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेत चीनचा वाटा महत्वाचा आहे. खुद्द नरेंद्र मोदी सहा वेळा चीनमधे जाऊन आलेत. शी जिन पिंग तीन वेळा भारतात आले होते, नरेंद्र मोदींनी त्याना प्रेमानं झोपाळ्यावर बसवून ढोकळा खायला घातला होता. आता तो ढोकळा खाणाऱ्या माणसाची मानगूट धरायची तर पन्नास वेळा विचार करावा लागणार आहे. अमेरिकेनं भारताला आतापर्यंत १५ अब्ज डॉलरची शस्त्र सामग्री दिलीय. भारताला जुनाट झालेलं लष्कर आणि हवाई दल आधुनिक आणि प्रभावी करण्यासाठी शस्त्रं लागतील. चीन काही ती शस्त्रं देणार नाही. रशिया किंवा अमेरिका अशा कोणाकडून तरी शस्त्रं घ्यावी लागणार. रशियाकडून घेतली की अमेरिका डोळे वटारते. तेव्हां शस्त्रांसाठी अमेरिकेशी संबंध ठेवणं भाग आहे. अमेरिकेची मदत घेतली तर चीन खवळणार. चीनची मदत घेतली तर अमेरिका खवळणार. मधल्या मधे आपल्याला त्रास.

अमेरिका-चीन मारामारीत कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्न येऊन ठेपला आहे. भारताचं परदेश धोरण आतापर्यंत तटस्थतेचं होतं, जगातल्या बलाढ्य देशांच्या गटांच्या भांडणात पडायचं नाही, दोन्ही गटांकडून मिळेल तेवढा फायदा घ्यायचा असं भारताचं धोरण होतं. हे धोरण नेहरुंनी आखलं होतं. स्वातंत्र्य चळवळीच्याच काळात कित्येक वर्ष परदेश धोरण विभागाचे ते प्रमुख होते, ते देशोदेशी फिरत असत, तिथल्या नेत्याना भेटून चर्चा करत असत. अनेक परदेशी नेत्यांशी नेहरूंचा व्यक्तिगत संवाद आणि संबंध होते. त्या विषयावरील जाणकारांशी नेहरू बोलत, नेहरू खूप वाचत. उत्तम इंग्रजी येत असल्यानं त्यांना मोठा पर्सपेक्टिव लाभला होता. मोदी विचारांसाठी प्रसिद्ध नाहीत ते तसे संघाच्या मुशीतले असल्यानं त्यांचाही बुद्धी वगैरेशी कमीच संबंध आहे. शिवाय जगात कुठंही गेले तरी आणि देशातही ते कायम ठासून सांगत असतात की ते चायवाला आहेत. चायवाला एखाद्या वेळेस चहा चांगला करत असेलही पण परदेश धोरण ही गोष्ट त्याच्या आवाक्यातली नसते. घर आणि चहाची टपरी या पलिकडं ज्याचं जग जात नाही त्याच्याकडून जागतीक दृष्टी आणि धोरण याची अपेक्षा बाळगणं योग्य नाही. भाजप या पक्षाचं किंवा तो पक्ष चालवणाऱ्या संघाचं एखादं परदेश धोरण आहे काय? शंका आहे. संघ आणि भाजपचा विचार मुसलमान याच मुद्द्याभोवती फिरत असतो. बस. त्या पलिकडं आर्थिक, सामाजिक, राजकीय इत्यादी कोणतंही धोरण भाजपजवळ नसतं. सत्ता काबीज करणं आणि टिकवणं हे एकच ध्येय ठेवून तो पक्ष निर्माण झाला आणि वाढला. शिवाय बुद्धी, तर्क इत्यादी गोष्टींपासून संघ दूर असतो. मागं एकदा त्यांचं राज्य होतं तेव्हां जॉर्ज फर्नांडिस त्यांचे संरक्षण मंत्री होते. ते एकदा बोलून गेले की चीन हा आपला एक नंबरचा शत्रू आहे. म्हणजे त्यांनी शत्रूच्या पहिल्या स्थानावरून पाकिस्तानला हलवलं आणि त्या जागी चीनला ठेवलं. त्यामुळं भाजप-संघात गडबड उडाली होती. खुद्द फर्नांडिस यांचाही लोक फार गंभीरपणानं विचार करत नसल्यानं ते वादळ चहाच्या कपापुरतंच राहिलं. पण भाजप जवळ परदेश धोरण नाही हे त्यावेळी लक्षात आलं. मोदी हा एक प्रॅक्टिकल राजकारणी माणूस आहे. व्यक्तीगत आणि त्यासाठी पक्षाची सत्ता टिकवण्यासाठी काय करावं लागेल याचा चलाख विचार ते करतात. त्या चलाखीमुळंच ते मुख्यमंत्री झाले, प्रधानमंत्री झाले. त्यांच्या पुरतं ते ठीक आहे, पण देशाच्या हिशोबात ते कितपत फायदेशीर ठरतात या बद्दल शंका आहे. धोरण अभावामुळंच ना गुजरात कधी एक नंबरवर होतं, ना आता भारत. पण थापा मारून विकासवगैरेचा ढोल बडवून लोकांची विचारशक्तीच ते गोठवून टाकतात. अशा स्थितीत चौकोनी कराराचं काय होणार आणि भारत त्यात कितपत गुंतलेला रहाणार ते कळायला मार्ग नाही.

पंचनामा व्हायलाच हवा !

जवळपास दीडशे वर्षापूर्वी म्हणजे ११ मे १८७८ रोजी पुण्यात न्यायमूर्ती रानडे आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी ग्रंथकारांच्या अडचणी दूर व्हाव्यात म्हणून 'ग्रंथकारांचं संमेलन' भरवलं होतं. हेच पहिलं मराठी साहित्य संमेलन! मराठी भाषकांचं राज्य अस्तित्वात आल्यानंतर 'मराठी भाषा सल्लागार समिती' स्थापन करण्यात आली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी, मराठी ही राजभाषा म्हणून प्रस्थापित झाल्यानंतरही होणारी मराठीची गळचेपी दूर करण्यासाठी कार्यरत करण्यात आली. प्रशासनाला जे करणं शक्य नाही, ते करण्यासाठी त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी मराठी भाषा साहित्य संस्कृती क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था-व्यक्तींना एकत्र करून 'मराठी साहित्य संस्कृती महामंडळा'ची स्थापना केली. सारे मिळून मराठीच्या विकासाचा ध्यास घेऊ, सारे मिळून विकासासाठी आवश्यक ते करू, असा या महामंडळाचा उद्देश होता. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर मराठी माणसानं घेतलेला हा एक अत्यंत आवश्यक असा निर्णय होता. मराठीचं समर्थन करण्यासाठी, मराठीचं वैभव वाढविण्यासाठी, मराठी माणसाची शक्ती एकवटण्याचा तो एक प्रयत्न होता. महामंडळाच्या माध्यमातून मराठी लोकेच्छांची तीव्रता शासनापर्यंत पोहोचणारी होती. प्रशासनातल्या मराठी विरोधकांना धाक दाखविण्याचं काम महामंडळामार्फत केलं जायला हवं होतं. नाना हुलकावण्या देऊन मराठीला तिच्या न्यायाचं, हक्काचं स्थान मिळू न देण्याऱ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांचा वापर करणाऱ्या प्रशासनबाह्य मराठी विरोधी शक्तींना मराठी माणसाचा प्रक्षोभ कसा असतो, हे दाखविण्याची जबाबदारीही या महामंडळावर होती. मराठी माणसाच्या स्वाभिमानानं आपलं तेज दाखविण्याचं काम सरळ झटकून सुरू केलं होतं. मुंबईत या तेजाची दाहकताही काही आडमुठ्यांना अनुभवायला लागली होती. महाराष्ट्रात मराठीला मानाचं स्थान असायलाच हवं, ही स्वाभाविकच गोष्ट होती. शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या मराठीच्या उपेक्षेचा प्रश्न महामंडळानं सर्व घटक आणि संलग्न संस्थांच्या सामर्थ्यासह लावून धरला असता, तर मराठी साहित्य महामंडळाच्या हातून संयुक्त महाराष्ट्र समितीला जे साधणं शक्य झालं नाही ते साधण्याची शक्यता होती, पण महामंडळ फक्त साहित्य संमेलनापुरतंच उरलं. संमेलनात मिरविण्यानं तुम झाले. साहित्य संमेलन जोवर मराठी साहित्य परिषद भरवत होती, तोवर त्याचा व्याप आणि स्वरूपही परिषदेच्या आटोपशीर आकारासारखंच होतं.

*संमेलन पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धीचा त्रिवेणी संगम झालाय*
मराठी साहित्य महामंडळ झाल्यापासून या संमेलनांना आजचं भव्य बाजारू दिखाऊ स्वरूप प्राप्त झालंय, साहित्यबाह्य व्यक्ती आणि शक्तीचा संमेलनावर वरचष्मा झालाय. 'सरबराई'ला महत्त्व आलंय. हे सगळं पेलण्यासाठी आवश्यक असलेला पैसा आणि हुकमी लोकसंग्रह जमवू शकणाऱ्यांना महत्व आलं. विविध मार्गानं यश संपादन केलेल्या आपल्या कर्तृत्वानं आपल्या क्षेत्रात आपलं वैभव आणि वर्चस्व निर्माण केलेल्या, आपल्या या वैभवशाली कर्तृत्वदर्शनानं अधिकाधिक लोकांपर्यंत जाता यावं, अशी इच्छा असलेल्या महत्त्वाकांक्षी व्यक्तींना आपल्या इच्छापूर्तीचा हा सहजसोपा मार्गच गवसला. साऱ्या नामवंत, विद्यावंत, प्रतिष्ठित सज्जनांचा मेळा जमविण्याचा आणि त्याचबरोबर परिसरातला सारा मराठमोठा गोळा करण्याचा हा हुकमी उपक्रम करताना पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी असा त्रिवेणी संगम साधणारा होता. महामंडळाला तर 'देईल खाटल्यावरी' असाच लाभ झाला. साहित्य संमेलनांनी महामंडळाला असं काही व्यापून टाकलं की, मराठीच्या केविलवाण्या अवस्थेकडं बघण्याचं भानच महामंडळातल्या कुणाला राहिलेलं नाही. १८७८ पासून किती साहित्य संमेलनं भरत आहेत, चर्चा होत आहेत. त्यातून निष्पन्न काय होईल आणि आजवर किती झालंय, याचा ऊहापोह आता नको. महाराष्ट्राचं राज्य होईपर्यंत जे काही घडलं, त्याचीही फक्त ऐतिहासिक आठवण ठेवू, पण महाराष्ट्र राज्य झाल्यावर १९६५ मध्ये राज्यभाषा विधेयक मंजूर झाल्यानंतर मराठी साहित्य महामंडळाच्या रूपानं मराठीच्या विकासासाठी लोकेच्छेला बळ लाभावं म्हणून मध्यवर्ती संस्था निर्माण झाल्यानंतर काय घडलं, कसं पडलं याचा तपास करायला काय हरकत आहे? मराठीच्या विकासासाठी महामंडळानं काही करण्याची गरज आहे. नाही तर मराठीची अवस्था 'सेंट झेविअरच्या शवासारखी होईल, मखमली वस्त्राआड मराठीचा नुसता सांगाडाच उरेल.....!'

*साहित्यिक राजकारण करत नाहीत काय?*
७२ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मुंबईत वसंत बापट यांच्या अध्यक्षपदाखाली झालं तेव्हा ते संमेलन 'आविष्कार स्वातंत्र्या'नं गाजलं. बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्यिकांबद्धल जे काही म्हटलं, त्यामुळं साहित्यिक जगतात आणि साहित्य जगतात खळबळ माजली होती. बाळासाहेबांच्या स्पष्ट, परखड बोलण्याचा वापर करून काहूर उठविलं होतं. बाळासाहेबांचं बोलणं गैर, औचित्यभंग करणार, असभ्य असल्याची खंत वाटणाऱ्यांनी शहाजोग अध्यक्षांचं आणि त्यांच्यासारखा शहाजोगपणा मिरवत अनेक गैर गोष्टी सहजपणे करणाऱ्यांचे व्यवहारही डोळसपणे तपासावेत. आणीबाणीच्या काळात झालेल्या त्या वेळच्या साहित्य संमेलनात दुर्गा भागवतांनी आविष्कार स्वातंत्र्याचा जयघोष करीत यशवंतराव चव्हाण आणि इतर राजकारण्यांवर तोफ डागली होती, याची आठवण होणं स्वाभाविक आहे. कारण ही चर्चा अनेक साहित्य संमेलनांतून अजूनही चघळली जाते. त्यानंतर मग बाळासाहेब ठाकरे आणि वसंत बापट यांची जुगलबंदी जुंपली गेली होती. त्याचेही पडसाद त्यानंतरच्या अनेक संमेलनातून उमटले आहेत. हे सारं पुन्हा सांगण्याचं कारण असं की, साहित्यिकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही राजकारण्यांना व्यासपीठावर बसू दिले जाणार नाही, असं नेहमी सांगितलं जातं. राजकारण्यांची अॅलर्जी असणाऱ्या या साहित्यिकांचा एकदा पंचनामा व्हायलाच हवाय, साहित्यिक राजकारण करीत नाहीत का? खरं तर राजकारण्यापेक्षा अधिक राजकारण हे साहित्यिक करीत असतात. अशा प्रकारची शेरेबाजी अनेक साहित्यिकच आपल्या भाषणांतून इतर समारंभात करीत असतात.

*गटबाजी,काटाकाटी,लाचारी,लाचखोरी थांबायला हवी*
साहित्य क्षेत्रात जे काही चाललंय, त्यामुळंच मराठी भाषा आणि मराठी समाज यांची प्रगती खुंटलीय. मराठीला रक्तक्षय झालेला नाही, तर मराठीचं रक्त पिणारे रक्तपिपासू डसले आहेत. या जळवा दूर करायला हव्यात. राजकारण्यांचा द्वेष करणारी ही साहित्यिक मंडळी शासकीय समित्यांवर स्थान मिळावं, साहित्यविषयक कमिट्यांमधून आपली वर्णी लागावी म्हणून इथल्या राजकारण्यांच्या पायाशी कशी लोळण घेतात, त्यासाठी काय काय करतात, याची माहिती लोकांसमोर यायला हवीय. नव्हे, राजकारण्यांनी सत्ताधाऱ्यांनी ती लोकांना सांगायला हवीय म्हणजेच राजकारण्यांचा सत्ताधाऱ्यांचा उपमर्द करणाऱ्या साहित्यिकांचे पितळ उघडं पडल्याशिवाय राहणार नाही. मराठी साहित्य जगतात चाललेली गटबाजी, काटाकाटी, लाचारी, लाचखोरी आणि अन्य अनेक गैर गोष्टींवर गंभीरपणे विचार करण्याची वेळ आलीय. ब्राह्मणी तोंडवळ्याविरुद्ध तोंडाळपणा करून काही जण समाधान मानतात. काही ताकद नसलेले राजकारणी साहित्याच्या या व्यासपीठावर राजकारण मांडून आपली हौस भागवून घेतात. साहित्य संमेलन आलं की, असं काही घडवायचं आणि मग जे चालतंय त्यात आपलं साधता येईल का. एवढंच बघायचं, असाही काहींचा उद्योग आहे.

*पंचनामा चव्हाट्यावर यायला हवा !*
गेल्या दहा वर्षांत या मराठी साहित्य संस्कृती मंडळाने काय काय केले, वेगवेगळ्या मराठी संस्थांमध्ये कोण कोण अन् किती वर्षे खुर्च्या उबवीत बसले आहेत, साहित्य संमेलनात मानधन घेऊन कोण किती वेळा मिरविलेत, शासकीय समित्यांवर कोणते साहित्यिक किती वेळा, किती वर्षे आहेत, शासकीय पुरस्काराची खिरापत कशी दिली जाते आणि कुणाला किती वेळा ती दिली गेली आहे? देणारे कोण आहेत? कुणाची पुस्तके सरकारी ग्रंथालयातून जातात? पाठ्यपुस्तकातून कुणाचं साहित्य घेतलं जातं? या आणि अशा प्रकारच्या अनेक गोष्टींचा पंचनामा अगदी चव्हाट्यावर करण्याची तयारी मराठी माणसानं ठेवायला हवी. मराठी साहित्य क्षेत्रात जे काही घडतंय, त्याची परखड चिकित्सा व्हायलाच हवी, असं लोकांना वाटतं. शासन साहित्य संमेलनासाठी ५० लाख रुपयांची उधळण करते. त्याच्या जोरावर मानमरातब आणि सरबराई केली जाते अन् वर 'माझी भूक भागविण्यासाठी नव्हे तर तुम्हाला दानाचं पुण्य लाभावं म्हणून जेवतोय' अशी मिजास यजमानाला दाखविण्याची हुक्की न आवरणारे या संमेलनाच्या वशिंडावर बसलेले आहेत. पसायदानी ज्ञानोबाबरोबरच 'भले तरी देऊ कासेची लंगोटी' अशी उदारता दाखवणारा आणि 'नाठाळाच्या माथी काठी हाणणारा' तुकोबाही मराठी माणसानं मनोमनी मानलाय. साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मराठी साहित्य विश्वातच नव्हे, सर्व मराठी समाजात जे काही घडतंय, त्यानं संमेलन भरवून मिरविण्याची हौस असणाऱ्यांना संमेलनात मिरविण्याचा आमचा हक्कच आहे, अशी मिजासखोरी करणाऱ्या मतलबी मंडळींना आणि आम्ही म्हणजेच मराठी साहित्यिक, असा दर्प बाळगणं, त्यांना खूप काही या पंचनाम्यातून शिकायला मिळेल. तेव्हा पंचनामा चव्हाट्यावर यायलाच हवा!

*महामंडळाला हे करणं सहज शक्य आहे*
मराठी भाषा, साहित्य यासाठी साहित्य महामंडळातून, अशा साहित्य संमेलनातून नेमकं काय साध्य होतं हा एक प्रश्नच आहे. मराठीचा प्रसार आणि प्रचार यासाठी काही केलं जातं का? याचं उत्तर नकारात्मक आहे. उत्सवी, वैभवी संमेलनं झाली म्हणजे ते यशस्वी झालं का? खरंतर अशी संमेलनं ही 'मांडववाल्यां'ची आणि 'खानावळवाल्यां'ची झडताना दिसून येताहेत! या संमेलनातून संमत होणारे ठराव हे अंमलबजावणीसाठी असतात हे महामंडळाच्या ध्यानीच नसतं असं दिसतं. त्याचा पाठपुरावा होतोच असंही नाही. भव्य, दिव्य, उत्सवी संमेलन करण्याची जणू चढाओढ दिसून येतेय. 'सरस्वतीच्या प्रांगणात लक्ष्मीला नाचवायलाच हवी' असं काही नाही. मराठी माणसाला ती अपेक्षाही नाही. तो खुल्या पारावरही संमेलन आयोजित झालं तर तो तिथंही मोठ्यासंख्येनं सहभागी होईल. साहित्यक्षेत्राचा मुख्याधार असलेल्या वाचकांसाठी महामंडळ, संमेलनातून काहीतरी करायला हवंय! पुस्तकांच्या वाढत्या किंमती कशा कमी करता येतील; जेणेकरून त्या सामान्य वाचकाला विकत घेता येईल. आज चढ्या किंमतीतही मराठी वाचक पुस्तकं खरेदी करतोय. पण मराठी पुस्तकं जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावीत यासाठी महामंडळानं प्रयत्न करायला हवा. जुन्या लेखकांची चांगल्या साहित्यमुल्यांची पुस्तकं 'पॉकेट बुक'च्या धर्तीवर काढता येणार नाही का? न्यूजप्रिंटच्या कागदाच्या, कव्हरच्या तीन पानांवर जाहिराती घेऊन एखाद्या साप्ताहिकाच्या किंमतीत ही पुस्तकं वाचकांपर्यंत रेल्वेस्थानक, बसस्थानक इथं शिवाय वृत्तपत्रविक्रेत्यांच्या माध्यमातून पोचवायला काय हरकत आहे. वाचकाला सहज पुस्तकं उपलब्ध झाली तर वाचकाला कसदार साहित्य वाचायला मिळेल, शिवाय त्याला वाचनाचीही आवड लागेल. पर्यायानं मराठी वाचक वाढेल आणि साहित्यक्षेत्रही बहरेल!

चौकट.....
*भाबडेपणा सोडून छडा लावायला हवा!*
मराठीच्या साहित्य संस्थांना समाजवादी पक्षासारखी अवकळा आलीय. शिवसेनेपेक्षा अधिक व्यक्तिस्तोम या संस्थांमधून माजलंय. रिपब्लिकन पक्षापेक्षा अधिक विकाऊ साहित्यिक अशा संस्थांतून आहेत. काँग्रेसी भ्रष्टाचारापेक्षा अधिक भ्रष्टाचाराला चटावलेले साहित्यिक अशा संस्थांतून अड्डे करून बसले आहेत. भारतीय जनता पक्षातल्या कर्मठ उर्मटापेक्षा अधिक कर्मठ उर्मट इथे आहेत आणि डाव्यांच्या प्रमाणेच बाह्यनिष्ठेच्या रोगाने पछाडलेलेही आहेत, असं म्हटलं तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. साहित्य क्षेत्रातल्या या साऱ्या संस्थांच्या कारभाराचा, जबाबदारीचा मराठी रसिकांनी, वाचकांनी, भाबडेपणा सोडून त्यातल्या अनेक गोष्टींचा छडा लावायला हवा!

हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 23 October 2021

देवाभाऊ, जरा दमानं घ्या.....!

"महाराष्ट्रात विरोधीपक्षनेत्यांची एक मोठी परंपरा आहे. भाजपतही रामभाऊ म्हाळगी ते एकनाथ खडसे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी तत्कालीन सरकारांना वेठीला धरलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार म्हणून चांगलं काम केलेलं आहे; पण जिंकूनही हरल्यानंतर आणि पहाटेचा शपथविधी फसल्यानंतर विरोधीपक्षनेता म्हणून ते अधिकच वैफल्यग्रस्त झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं आता आक्रस्ताळीपणा, आकांडतांडव आणि आततायीपणा हा त्यांचा जणू स्थायीभाव बनलाय. सत्तेसाठी ते आतुर बनलेत, आसुसलेत असं दिसून येतंय. गेल्या ४० वर्षात देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री होते ज्यांनी आपला पांच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केलाय. त्यानंतर हातातली राज्याची सत्ता गेली असली तरी त्यांनी राज्यातला भारतीय जनता पक्ष आपल्या ताब्यात ठेवलाय. त्यांचं राजकारण कसं आणि काय होतं. त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांना ते कसे सामोरं गेले. त्यांच्या स्वभावातली वैशिष्ठ्ये, त्यांच्या राजकीय चाली, मित्रपक्ष आणि विरोधीपक्षांशी त्यांचं असलेलं नातं, त्यांच्याशी संघर्ष आणि त्यावर केलेली मात ह्या साऱ्या बाबी आणि वास्तव लक्षांत घेऊन भाजपनं सक्षम विरोधीपक्ष म्हणून काम करावं. सरकार पाडण्याचा प्रयत्नानं तिन्ही पक्ष अधिकच जवळ येताहेत. घट्ट बनताहेत तेव्हा देवाभाऊ, जरा दमानं घ्या.....!"
-------------------------------------------------------

नशिबानं दिलं आणि कर्मानं नेलं अशी अवस्था देवेंद्र फडणवीस यांची झाली. कालपर्यंत एक अभ्यासू आमदार म्हणून नावाजले गेलेले फडणवीस सत्ता हाती येताच बावचळल्यासारखे वागू लागले. आपल्याच पक्षातल्या सहकाऱ्यांचं राजकीय कारकीर्द संपवायला लागले. इतर पक्षातल्या आयारामांना आणून सहकारी नेत्यांवर कुरघोडी करू लागले. साहजिकच पक्षांतर्गत नाराजी निर्माण झाली. खडसे, मुंडे, तावडे, शेलार यांना शह देण्याचा प्रयत्न होतोय, तर प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, चित्रा वाघ, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राम कदम अशा खुज्या नेत्यांना महत्व प्राप्त करून दिलं. 'बाटग्याची बांग....!' याप्रमाणे ही मंडळी उधळली आहेत. ताळतंत्र सोडून बोलू-वागू लागले आहेत. संस्कारक्षम, साधनसुचितेतल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना हे आवडत नसल्यानं ते फडणवीस यांच्यावर नाराज झाले आहेत. सत्तेच्या अमिषानं आलेल्यांची तर गोची झालीय. 'धरलं तर चावतंय अन सोडलं तर पळतंय' अशी अवस्था झालीय. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय! पक्षाच्या निष्ठावान कार्यकत्यांची अवस्था तर 'सहनही होत नाही अन सांगताही येत नाही अशी स्थिती बनलीय. एवढं सारं घडत असतानाही सत्तेसाठी फडणवीसांची तडफड काही कमी होत नाही. त्यामुळं लोकांच्या मनातली त्यांची प्रतिमा डागळतेय! लहानपणी विटी-दांडूचा खेळ खेळताना मुलांची हार-जीत होते. जिंकलेल्यांचा उत्साह अनावर असतो, तर हरलेले मात्र हिरमुसलेले असतात. त्यातील काहींना विजयी पक्षानं आपली फसवणूक करून विजय मिळवला असं वाटत असतं. त्यामुळंच झालेल्या पराभवाचा सूड उगवला पाहिजे म्हणून ते दात ओठ खात असतात. त्यातूनच मग ते विटी पळव, दांडू पळव अशा युक्त्या योजून विजयी पक्षाला जेरीस आणण्याचे प्रयत्न करीत असतात. यात काही फार नविन आहे असं नाही. शेवटी बालपणच ते. पराभव पचवण्याची क्षमता या वयात आलेली नसते. म्हणून मग कुठले तरी सुड घेऊ प्रयत्न सुरू होतात. २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालेलं असतांनाही शिवसेनेनं भाजपेयींना बाजूला ठेवीत कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या सहकार्यानं सरकार स्थापन केलं. या घटनेचा आपल्याला राग आला आणि आपण, पक्ष कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन केलं, असं फडणवीस यांचं म्हणणं. त्यांचं हे विधान थेट त्या विटी-दांडूच्या खेळासारखंच म्हणावं लागेल. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यातील राजकारण हे असं निवडक लोकाच्या राग- लोभावर चालणार असेल तर महाराष्ट्राचं यापुढं काही खरं नाही! त्यातल्या त्यात फडणवीस यांच्यासारखे लोक जर राजकीय आघाडी सांभाळणार असतील तर निश्चितच असंच म्हणावं लागेल. खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस हे नशिबवान नेते. राजकारणासारख्या निसरड्या क्षेत्रात एखाद्या तरूण माणसाला एखादं घबाड हाती लागावं, ज्याची आयुष्यात कधी अपेक्षा ठेवली नाही एवढं मोठं पद मिळावं, पक्षश्रेष्ठींचा संपूर्ण पाठिंबा मिळावा, पक्षांतर्गत कुठलीही स्पर्धाच असू नये आणि राजकारणाचे सारे मैदान मोकळं मिळावं असं त्यांचं नशिब थोर! स्वत:च्या बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावणाऱ्या पक्षाला पुरेसं बहुमत मिळालेलं नसलं तरी युती पक्षाच्या भरवशावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. दुसऱ्या कार्यकाळासाठी निवडणुकीला सामोरं गेले तेंव्हा येणारं पुढचं राजकारण आपली आतापर्यंतची राजकीय कारकीर्द झाकोळून टाकणार आहे, हे त्यांच्या गावीही नसावं. पण पाच वर्षे त्यांनी जो एक हाती कारभार केला आणि केवळ दिल्लीश्वरांच्या मर्जीनं राज्याचा गाडा हाकलला तोच एककल्ली कारभार फडणवीस यांच्या अंगलट आला. त्यांचा वारू चौफेर उधळला होता. महाराष्ट्रातील बडे बडे नेते मंत्रालयातील सत्तेचं तीव्र केंद्रीकरण उघड्या डोळ्यांनी पहात होते. या पाच वर्षांच्या कारकिर्दीत फडणवीस यांनी एककल्ली कारभार तर केलाच. पण, पक्षात त्यांच्यासमोर आव्हान देऊन उभं करण्याची क्षमता असणाऱ्या नाथाभाऊंना त्यांनी घरी बसवलं. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मधले जे कुणी गळाला लागू शकणार होते त्यांना येन केन प्रकारेण भाजपेयीं करून घेण्यात आलं. ही सारी स्पर्धाच संपुष्टात आल्यानंतर फडणवीस जणू हवेत उडायला लागले. शासन प्रशासन ठप्प झालं. गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील किंवा विनोद तावडे आणि मंत्रिमंडळातील इतर सारेच मंत्री जणू काही आपण सारे राजकारणामृत जन्मत:च कोळून प्यायलो आहोत, या पध्दतीनं राज्यभर संचार करू लागले. ज्यांची कधी आपल्या मतदार संघात निवडून येण्याची पात्रता नव्हती ते थेट सोनिया गांधी आणि राहुल गांधींवरही हल्ले बोलू लागले. हे सारं करत असतांना लोक आपल्या वर्तणुकीवर नजर ठेवून आहेत याचा विसर त्यांना पडला. राज्यातली ही एकहाती सत्ता केवळ आपली नसून शिवसेनेच्या जोरावर आहे हे धरातलावरचं पूर्ण सत्य ते विसरले!

महाराष्ट्रात शरद पवार नावाची एक राजकीय संस्था आहे हे तर जणू त्यांच्या ध्यानी मनीही नव्हतं. उलट लोक ज्यांना त्यांच्या जाणतेपणाकरिता ओळखतात, ज्यांना ' जाणता राजा' म्हणतात हे सत्य देखील ते खोडून काढायला निघाले. उलट ' शरद पवार यांचे राजकारण आता संपले आहे ' अशी दर्पोक्तीही मिरवली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाचं प्राबल्य मोठं आहे हे कोण जाणत नाही? कोण मानत नाही? सारेच मानतात. पण, रेशिमबागेला पवारांचा कायम दुस्वास. त्यांना हरविण्यासाठी इतर ओबीसींना संघटित करून आपण मराठ्यांचा कायम बंदोबस्त करू शकू असे हिशेब रंगले. बुध्दिबळाच्या पटावरून 'जाणता राजा' हटविण्याचा प्रयत्न झाला. राजकारणातली एक खेळी म्हणून एका जाणत्या राजाऐवजी थेट छत्रपतींच्या घराण्यातील दोन-दोन राजांसाठी पायघड्या अंथरण्यात आल्या. संभाजीराजे असोत, की उदयनराजे, छत्रपतींचे वंशज म्हणून त्यांचा सन्मान मोठा. पण, गडचिरोलीपासून गुहागरपर्यंतच्या महाराष्ट्रातल्या राजकारणात हे दोन्ही राजे कधीही नव्हते. छत्रपतींचा सन्मान वेगळा आणि गावकीचं, तळा-गाळातलं राजकारण वेगळं हे समीकरण बुध्दिबळाच्या पटावर न दिसणारं. सारं राजकारण मलमपट्टीचं. असं कुठं राजकारण होत असतं? मराठासमाज राजकीयदृष्ट्या जागरूक. हे फोडाफोडीचं राजकारण डोळ्यांदेखत पाहिलं जात होतं. पण सत्तेपुढं शहाणपण चालणारं नव्हतं. आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी नव्हे तो मराठा समाज संघटित झाल्याचं चित्र साऱ्या देशानं पाहिलं. फडणवीस मराठा आरक्षणाला आपला पाठिंबा असल्याचं रोज रोज सांगत होते. न्यायालयात ते कसं टिकेल असे प्रयत्न करणं आवश्यक होतं. पण ते झालं नाही. केंद्र सरकारची या कामी थेट मदत घ्यायला हवी होती. ते देखील झालं नाही. उलट, सेव्ह नेशन-सेव्ह मेरिटवाले न्यायालयात धडकले. साऱ्या आरक्षण प्रश्नाचा बोजवारा उडाला. मराठा समाजाची चुळबूळ वाढली होती. हे असंच होणार हे काय त्यांना माहित नव्हतं. नाशिक आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केलं. रस्तोरस्ती दूध वाहिलं. शेतकऱ्यांनी लॉंग मार्च काढला. आंदोलन पसरलं. हे न्याय्य मागण्यांसाठी चाललेले शेतकरी आंदोलन संपविण्यासाठी पुन्हा फूटपाडे धोरण आलं. रात्रीच्या अंधारात वर्षा बंगल्यावर शेतकरी नेत्यांपैकी दोघा-चौघांशी चर्चा करतांनाचे मुख्यमंत्र्यांचे व्हिडिओ झळकले. आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्याचं कुठं असं स्वरुप असतं ? रात्रीच्या अंधारात कुठं लोकआंदोलनं संपवली जात असतात का ?

मराठा समाजाच्या अवहेलनेची ही दोन ठळक उदाहरणे ! या पार्श्वभूमीवर २०१९ च्या निवडणुका आल्या. कॉंग्रेस जणू संपल्यागत होती. राष्ट्रवादी पोखरल्या गेली होती. आता शिवसेना संपवणं हेच जणू एकमेव लक्ष्य होतं. जागावाटप वादग्रस्त करण्यात साडेतीन शहाण्यांना यश मिळालं. संपूर्ण बहुमताची घोषणा आली. ती वल्गना होती हे तर नंतर सिध्दच झालं. निवडणुकीचे निकाल आले. कौल युतीच्या बाजूनं होता. पण, बालहट्टानं पेट घेतला. मुख्यमंत्रीपद देणार नाही ही नवीन घोषणा आसमंतात रंगली. पुढे पुढे संघर्ष अधिक टोकदार होत गेला. सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन मिळणार नाही, हा इतिहासदत्त अहंकार पुन्हा जागृत झाला. पण, शिवसेना यावेळी गाफील नव्हती. आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे उध्दव ठाकरे आता करारी भूमिका घेऊन होते. पण, संघी अहंकार मात्र कायम होतं. या राजकारणानं महाराष्ट्राला एक नविन घोषणा दिली. 'मी पुन्हा येईन' या घोषणेनं चहूबाजूंनी फेर धरला. राजकारण बहकलं. पण घोषणा अमर झाली. या घोषणेचा उध्दार गावागावातील चावड्यांवर आणि टपऱ्यांवर देखील होऊ लागला. मोठी माणसं उगीच मोठी होत नसतात. त्यांना मोठं करण्यात अशी घोषवाक्ये महत्वाची भूमिका बजावतात. 'तुम मुझे खून दो...!' या घोषणेत देखील 'तुम 'महत्वाचं' होतं. इथे 'तुम' ची जागा 'मी' नं घेतली होती. या 'मी' नंच घात केला. प्रदिर्घ काळपर्यंत सत्ता उपभोगण्याचे सारे प्रयत्न कोसळले. साऱ्या चालबाज्या फसल्या. तंत्र- मंत्र शक्तिहीन ठरले. येतो, येतो म्हणणारे फडणवीस तब्बल एकशे सहा साथीदारांसह रानोमाळ झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी २०१९ मध्ये जे जे काही केलं गेलं ते कधीच घडलं नव्हतं. वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, शरद पवार या महत्वाकांक्षी नेत्यांनीही मोठं राजकारण केलं. पण जे केले ते आब राखून. स्वत:ची आणि इतरांचीही प्रतिष्ठा जपून. फडणवीस यांनी मात्र सत्तेचा आणि मुख्यमंत्रीपदाचा पोरखेळ केला. एवढ्यावर ते थांबलं असतं, राजकारणातल्या व्यवहार्यता समजून घेतल्या असत्या, शांतपणे विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारीनं आपली भूमिका वठवली असती तर पुन्हा उभारी घेण्याची संधी त्यांना होती. पण, एकदा माणसाचा तोल गेला की तो सावरणे कठिण असतं असं म्हणतात. तसंच त्यांचंही झालं. कोविडसारख्या महामारीच्या काळातही त्यांनी राजकारण सोडलं नाही. रेमडिसिव्हीरचा साठा करण्यासाठी झालेलं भाजपेंयी प्रयत्न, त्यात खुद्द फडणवीस यांनी पोलिस ठाण्यात जाऊन केलेला हस्तक्षेप, कोविड स्थितीचं गांभीर्य लक्षात न घेता मंदिरं उघडण्यासाठी केलेले शंखनाद हे सारे प्रकार म्हणजे राजकारणातील बालिशपण! नंतर खुद्द गडकरी यांनी कोविड काळात राजकारण करू नका असा जाहीर सल्ला फडणवीसांना दिला. तेंव्हा कुठे ते थोडे वरमले. आजकाल त्यांनी बऱ्यापैकी शांतता ग्रहण केलेली दिसते. असो. या साऱ्या राजकारणात फडणवीस हे वैयक्तिकदृष्ट्या अपयशी तर ठरलेच. राजकारणात कुणी अपयशी ठरणे हे काही नविन नाही. पण गमावलेली पत आणि प्रतिष्ठा पुन्हा कमावणे सोपं नाही. फडणवीसांचं राजकारण तर फसलंच. पण, अलिकडच्या काळात त्यांना जी मानखंडना सहन करावी लागली ती त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही दीर्घ काळपर्यंत विसरता येणार नाही या प्रकारची! फडणवीस हे नाव आता जनमानसात पूर्वीसारखं आदरानं घेतलं जात नाही. त्यांचं नाव येताच खिल्ली उडविली जावी असं काहीसं आता झालेलं आहे. बरं, या सगळ्या राजकारणात फडणवीस यांचं वैयक्तिक नुकसान तर झालंच. पण त्याशिवाय त्यांच्या भाजपचंही कायमचं नुकसान झालं आहे. साऱ्या देशात भाजपाची लाट असतांना, अजिंक्य मानले जाणारे राजकीय पक्ष धराशायी झालेले असतांना देखील भाजपला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणं कधीही शक्य झालेलं नव्हतं. यापुढं ते कसं शक्य होईल? खरं म्हणजे, फडणवीस हे विदर्भाचे काय संपूर्ण नागपूराचेही नेते कधीच नव्हते. नागपूरचं महापौरपद एवढाच त्यांचा राजकीय, प्रशासकीय अनुभव. पश्चिम नागपूरसारख्या सुरक्षित मतदार संघामुळे विधीमंडळात सातत्यानं येणं त्यांना शक्य झालं. एक अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी लौकिकही मिळवला. पण हे जे काही त्यांनी मिळवलं, ते पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदानं त्यांच्याकडून अक्षरश: हिसकावून घेतलं. मोदी आणि अमित शहा यांनी गडकरी विरोधाखातर फडणवीस यांना हवा दिली आणि नेतृत्वाचा हा कृत्रिम फुगा हवेतच विरून गेला. ज्यांच्याकडं काल परवापर्यंत आशेनं, अपेक्षेनं पाहिलं जात होतं, ते फडणवीस यांचं नेतृत्व ऐन तरूणपणी राजकारणाच्या एका तडाख्यानं गारद केलं. त्यांचं राजकीय भविष्य फार चांगलं असेल असं आता कदाचित त्यांचे समर्थकही म्हणू शकणार नाहीत. एखाद्या उमद्या नेतृत्वाच्या नशिबी असे प्रसंग येऊ नयेत. पण, फडणवीस यांना अपयशाचं हे घोंगडं अंगावर घेऊनच आता पुढील हिवाळे-पावसाळे पचवावे लागणार आहेत, असंच म्हणावं लागेल!

कोरोना अचानक चीनमध्ये कसा काय उपटला? ह्या प्रश्नाचं उत्तर जसं जगात कुणालाही देता येणार नाही, तसंच अलीकडं फडणवीसांना नेमकं काय झालं ? याचंही उत्तर अख्ख्या ब्रम्हांडात कुणी देऊ शकणार नाही. फार काय, शुद्धीवर असताना फडणवीसांना देखील आपण नेमकं काय करतो आहोत, याचा नीट अर्थ लागत नसावा! आणि बहुधा गोमूत्राशिवाय ते दुसरं काही घेतही नसावेत! केवळ सत्ता गेल्यामुळं माणूस एवढा बेभान होऊ शकतो का? फडणवीसांचा कौटुंबिक वारसा, त्याचं महापौर ते विरोधी पक्षनेता इथपर्यंतच एकूण राजकारण, सामाजिक जीवनातला त्यांचा या आधीचा वावर हा निश्चितच इतका उद्वेग आणणारा कधीच नव्हता. एका राजकीय खेळीचा भाग म्हणून आणि लॉटरी लागावी तसं, मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या फुग्यात जास्तच हवा भरायला लागली होती. आणि तसंही त्यांच्या हातात होतं तरी काय? किती हवा भरायची आणि केव्हा काढून घ्यायची, हे सारं नियोजन तर दिल्लीच्या हातात होतं! ही सारी वस्तुस्थिती लक्षात घेतली तरीही अलीकडं त्यांची जी काय सर्कस सुरू असते ती बघता, फडणवीसांना हल्ली नेमकं काय चावलंय, असा प्रश्न कुणालाही पडेल! गेल्या ७/८ वर्षांच्या काळात भाजपाच्या राजकारणात ज्या उथळ आणि उठवळ संस्कृतीला उत आलाय, त्या पातळीचे नेते फडणवीस कधीच नव्हते. फार काय संपूर्ण विदर्भातील भाजपाच्या आजवरच्या इतिहासात इतक्या उथळ राजकारणाचं दुसरं उदाहरण शोधूनही सापडणार नाही. फडणवीसांच्या तुलनेत योगी आदित्यनाथ, साक्षी महाराज, हे देखील आता बऱ्यापैकी सभ्य वाटायला लागलेत. या पार्श्वभूमीवर विचार केल्यास फडणवीसांचा थयथयाट अनाकलनीय आहे. त्यांच्या कुटुंबातून ज्या प्रकारची प्रतिक्रिया सत्ता गेल्यानंतर आली, तशा प्रकारचा जळाल्याचा धूर आजवरच्या इतिहासात कुठल्याही मुख्यमंत्र्याच्या किचन मधून आला नसेल. त्या प्रतिक्रिया बघून अवघा महाराष्ट्र थक्क झाला! एकूण परिस्थिती काय! आपण बोलतो काय! कुणालाच भान उरलं नाही. वर्षा बंगल्याच्या भिंतीवर जे काही लिहून ठेवलेलं आढळलं, ते तर धक्कादायकच होतं. फडणवीस यांच्या हातात अनपेक्षित सत्ता आली, फुगा फुगला. अति आत्मविश्वासात स्वतःच्याच हातानं टाचणी लावली, फुगा फुटला. ह्यात कोणाचीही काहीही भूमिका नव्हती, हे स्पष्ट आहे. तरीही एवढा थयथयाट का? असं स्वतःचंच कपडे स्वतःच फाडून घेण्याची गरज का पडावी? त्यांचं संतुलन पूर्णतः बिघडलंय, याची जाणीव कुणीही त्यांना करून देत नसावेत का? मुळात आधीचे फडणवीस इतके अपरिपक्व आणि आक्रस्ताळे कधीही नव्हते! तरीही असं का व्हावं ? कोण होतास तू, काय झालास तू? ही कव्वाली जणू फडणवीस यांच्यासाठीच लिहून घेतली असावी, असं वाटतं. पण हे प्रकरण असं हसण्यावारी उडवून देण्यासारखं आहे का? फडणवीस यांना काय एवढाही कॉमन सेन्स नसेल का? मला मात्र तसं वाटत नाही! मग नेमकं काय झालं असेल? काय कारणं असतील, असा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राला सतावतोय !

यासाठी आपल्याला २०१९ ची लोकसभा आणि तिचा निकाल लक्षात घ्यावा लागेल. आधीच्या एखाद वर्षांपासून देशात मोदी विरोधी वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. सरकार बहुधा सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरत होतं. मेक इन इंडियाचा फुगा फुटला होता. त्यामुळं भाजपेयींच्या जागा नक्कीच कमी होतील, अशी हवा राजकीय वर्तुळात पसरायला लागली होती. भाजपेयीं विविध राज्यातील विधानसभा एकापाठोपाठ हरतांना दिसत होते. गुजरातमध्ये थोडक्यात वाचली. गोव्यामध्ये हरली, पण सरकार बसवलं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ मध्ये सत्ता गेली होती. हरियाणा, मध्येही हरलीच होती पण जोडतोड करून सरकार बसवलं. कर्नाटकात पण शह बसलाच होता. अशा पार्श्वभूमीवर भाजपेयींच्या किमान ४०-५० जागा नक्कीच कमी होणार, असा अंदाज होता. मित्रपक्षांची मदत घेतल्याशिवाय सरकार बनूच शकत नाही, अशी अवस्था होती. खुद्द भाजपेयींसुद्धा २३०च्या आसपास आकडा जाईल, अशी गणितं मांडत होते. म्हणजेच तो आणखी कमी असण्याची शक्यता होती. आणि इथंच खरी मेख आहे. भाजपेयींना स्पष्ट बहुमत मिळणार नसलं, तरी विपक्ष कुठंही एकजूट दिसत नव्हता. उलट मायावती सारख्या नेत्यांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. सौदेबाजीची संधी शोधण्यात बरेच विरोधी पक्षातील नेते गुंतले होते. एकमेकांवर कुरघोडी करत होते. अशावेळी पुन्हा एकदा भाजपा सरकार केंद्रात येण्याची शक्यता जास्त होती. पण इतर मित्र पक्ष अशावेळी वरचढ झाले असते आणि मोदी यांच्या नावावर फुली मारल्याशिवाय समर्थन नाही, अशी अट त्यांनी घातली असती. अशावेळी जर सरकार बनवायचं असेल, तर नेता म्हणून भाजपेयींना नवं नाव पुढं करण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. हा अंदाज घेऊनच गडकरींनी मोदी सरकारच्या धोरणाबद्धल विरोधी सूर लावायला सुरूवात केली होती. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. ही परिस्थिती लक्षात घेऊनच मोदी-शहा यांनी मित्रपक्षांसमोर लोटांगण घालायला सुरुवात केली होती. बिहारमधल्या लोकसभा जागा वाटप करतांना शहा किती लाचार झाले होते, हा प्रसंग लक्षात घेतला तरी आपल्याला सारं गणित समजून येईल. महाराष्ट्रातही सेनेची पाठ खाजवून देण्याचा कार्यक्रम नियमितपणे फडणवीस नाईलाजानं आणि केविलवाण्या चेहऱ्यानं पार पाडत होते. सेनाही खाजवून घेण्यातली मजा लुटत होती. रोज ठोकत होती. आणि खाजगीत तिकडं 'नाच मेरी बुलबुल'ची फर्माईश पण करत होती. महाराष्ट्रातली बुलबुल मस्त नाचत होती!

मात्र लोकसभेच्या धक्कादायक निकालानं सारंच चित्र बदललं. भाजपच्या स्वतःच्या अंदाजापेक्षा त्यांना सुमारे शंभर जागा जास्त मिळाल्या. राक्षसी बहुमत मिळाले. इथूनच मग मोदी यांच्या रथाचे छोटे मोठे घोडे बेभान व्हायला सुरुवात झाली. सारेच सुसाट झालेत. नव्या मंत्रिमंडळात शहा थेट गृहमंत्री झाले आणि सारा देश, सारे विरोधीपक्ष त्यांना आईसक्रीम सारखं सॉफ्ट वाटायला लागलं. केव्हा कुणाला गटकायचं याचा टाईम टेबल फक्त भाजपेयींनी म्हणजेच मोदी-शहा यांनी ठरवायचा होता. तो त्यांचा विशेषाधिकार होता. देशात असा राजकीय प्रलय आला असतांनाच महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुका सहा महिन्यावर होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादीमधले भले भले लोक मोदी, शहा यांच्या नावाचा पट्टा, फडणवीस यांच्या हातानं आपल्या गळ्यात बांधून घेण्यासाठी रांगेत उभे होते. अगदी खानदानी लोकही त्यांचे पाय चाटायला लागले, पायावर लोळण घ्यायला उतावीळ झाले होते. सारे बिस्किटांचे कारखाने जणू काही फडणवीस यांच्याच मालकीचे झाले होते. विरोधी नेत्यांची ही लाचारी बघून मोदी-शहा नंतरच आपणच, अशी हवा फडणवीस यांच्या फुग्यात घुसली नसती, तरच नवल! तसंही एखाद्या महापंडीताच्या तोऱ्यात त्यांनी जाहीर करून टाकलंच होते, की 'लिहून ठेवा, महाराष्ट्राच्या राजकारणातून शरद पवार हे प्रकरण बाद झालेलं आहे.' त्यावेळचा त्यांचा आवेश आणि चेहरा कमालीचा मग्रूर दिसत होता. महाराष्ट्रात आता विरोधी पक्ष चटणीलाही उरणार नाहीत, अशा थाटात स्वतः फडणवीस आणि भाजपेयीं कार्यकर्ते वावरत होते. त्यांचं जाऊ द्या, पण त्याच सुमारास राष्ट्रवादीच्या सर्वोच्च वर्तुळातील एका महत्वाच्या व्यक्तीसोबत माझी चर्चा झाली होती. वरिष्ठ पातळीवर महाराष्ट्रात तुमचा अधिकृत काय अंदाज आहे, असा प्रश्न मी त्यांना विचारला. त्यावर त्यांनी फार फार तर ४०-४५ असं उत्तर दिलं. मी पुन्हा विचारलं, आणि काँग्रेसच्या किती येतील? ते म्हणाले, अहो काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा दोंघाच्या मिळूनच ४०-४५ येतील. यावरून स्वतः विरोधी पक्ष कसा हादरलेल्या अवस्थेत होता, याची आपल्याला सहज कल्पना येवू शकते. अर्थात त्यातून नेमकं काय चित्र तयार झालं होतं विधानसभेपूर्वी? तर.. देशात, नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्रात भाजपा - सेनेला किमान दोनशे जागा मिळणार! विरोधी पक्षाला सध्यातरी महाराष्ट्रात काहीही भवितव्य नाही. अर्थात यामुळं कोण कोणते राजकीय परिणाम झाले असतील, तर महाराष्ट्राच्या सात बारावर मोदी-शहा-फडणवीस ही तीन नावं अगदी फायनल आहेत, असा संदेश सर्वत्र गेला. त्यातूनच विशिष्ट भाजपेयीं नेत्यांची आधीची मुजोरी आणखी वाढली आणि मग त्यातून निवडणुकीपूर्वीच मोठमोठे व्यवहार आगावू पक्के झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते दिल्ली आणि मुंबई अशा दोन्ही पातळीवरून झालं असणं स्वाभाविक आहे. या निमित्तानं प्रचंड मोठी उलाढाल करण्यासाठी सहज संधी संबंधित लोकासमोर होती. अशावेळी आयती गंगाच जर घरी चालून आली, तर मग ती अर्थातच केवळ अँटीचेंबर पर्यंतच मर्यादित थोडीच राहणार आहे? म्हणजे थेट किचनपर्यंत देखील घुसली असणार ना? मग सगळ्यांनीच मनसोक्त आंघोळी अॅडव्हांसमध्येच आटोपून घेतल्या असणार! आणि सारे कसे उद्याच्या रंगी बेरंगी फेसांचे स्वप्न रंगवण्यात गुंग असतानाच अचानक गंगा आटली! सारे शॉकमध्ये गेलेत ! क्षणभर काय होतेय हेच कळले नसणार कुणाला! पण जेव्हा शुद्धीवर आले, तेव्हा मग सरळ दिल्लीवरून राजभवनात बांबू पोचला असणार आणि म्हणून एवढ्या सकाळी मग दिवाळी पहाट घाईघाईत उरकून घ्यावी लागली असेल, असं समजायला बरीच जागा आहे.

पण ती 'पहाट मैफल' शरद पवार यांनी पुन्हा एकदा उधळून लावली आणि मग फडणवीस यांच्यासह सारेच पिसाळून गेले असतील. राजभवनवर आपला खानदानी गडी असूनही बार फुसका निघाला, पाळणा काही हलत नाही, उलट दिवसेंदिवस महाविकास आघाडी भक्कम होते आहे, मंत्रिमंडळाचं खातेवाटप उशिरा जरी झालं असलं, तरी पक्कं झालं, हे बघून मग दिल्लीचे मालक आणि मुंबईचे दिवाणजी यांचा बीपी जोरात वाढला असणार. ज्यांच्यासोबत बागेचे वादे झाले असतील, तेही आता अस्वस्थ झाले असणार! त्यांनीही आपला हिशेब करायला सुरुवात केली असणार! आता बाग तर तुमच्या हातात राहिली नाही, तेव्हा आम्हाला मोकळे करा, असा तगादा संबंधित लोकांनी लावला असणार! त्यांना काय, आपला धंदा महत्वाचा! त्यांची सोयरिक फक्त सत्तेशी, व्यक्तीसोबत त्यांना काहीही देणंघेणं नसतं. अशावेळी, त्यांना काहीतरी दिलासा देणं गरजेचं आहे. त्यातून तर हे, सरकार पाडण्याचा आभास निर्माण करणारे पोरकट चाळे होत नसावेत ना? तशी शक्यता मला जास्त वाटते. अन्यथा जनतेत महाविकास आघाडीच्या बाजूनं जनमत आहे, हे काय फडणवीसांना कळत नसेल? उद्धव ठाकरे यांचा ग्राफ अचानक वाढलाय, याची काय त्यांना कल्पना आली नसेल? तिकडं मोदी यांनी नुसताच गोंधळ घालून ठेवलाय, नोटबंदीपेक्षाही जास्त भयंकर चुका मोदी करत आहेत, एवढं समजण्याएवढीही बुद्धी भाजपेयींकडं नसेल का? किमान संघातल्या लोकांना तरी फडणवीसांना तेवढी जाणीव करून द्यावी असं वाटत नसेल का? 'फडणवीस आणि सर्कस'चे अलीकडील माकडचाळे बघून जनतेला अक्षरशः किळस यायला लागलीय, हे सोशल मीडियावरून तर कुणाच्याही लक्षात येईल. मग फडणवीस यांना कळत नसेल का? तरीही ते असं वागताहेत, याचा अर्थ त्यांचं मानसिक संतुलन बिघडण्याची काहीतरी गंभीर कारणं नक्की आहेत. आणि ती बहुधा अशाच आगावू प्रसाद वितरणाबाबतची असणार. मुंबईचा बाजार केवढा मोठा आहे, याचा जरा विचार करून बघा. आणि त्यामुळेच ' थांबा, आपली खिचडी लौकरच तयार होते आहे,' असे संबंधित लोकांना भासाविण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी हा सारा खटाटोप सुरू असावा, असं समजायला मोठा आधार आहे. शिवाय भाजपेयींच्या तोंडाला आधीच रक्त लागलेलं आहे. त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. मोदी-शहा यांना तर महाराष्ट्र अशाप्रकारे हातातून जाणं, खूप जिव्हारी लागलं असेल. त्यांचा इगो भयंकर दुखावला असणार. आधीच त्यांचं राजकारण खुनशी स्वरूपाचं! शिवाय महाराष्ट्रातील या फाजितीचा दूरगामी परिणाम इतर राज्यांच्या राजकारणावरही होऊ शकतो, ही भीती त्यांना आता सतावत असणार. त्यामुळंही ते फडणवीस यांना चूप बसू देत नसावेत. अशावेळी फडणीस तरी काय करणार बिचारे? वास्तविक सत्ता येणं, जाणं ह्या गोष्टी चालतच असतात. पण मोदी शहा यांची संस्कृती मात्र वेगळी आहे..!

डाका घालणाऱ्या अनेक टोळ्या असतात. पण काहींना फक्त संपत्ती हवी असते, सोने, नाणे, पैसा हवा असतो. तर काहींना लुटीनंतर गावाचा विध्वंस करण्यात खरा आनंद मिळतो. भाजपेयीं ही दुसऱ्या प्रकारात आनंद मानणारी विचित्र जमात आहे. याच विकृतीमधून त्यांनी शरद पवारांवर अटॅक करण्यासाठी इडीचा वापर केला होता आणि तिथंच ते फसले. शरद पवार म्हणजे काही नितीशकुमार नव्हेत, हे भाजपेयीं नेतेमंडळी विसरले. शरद पवार चवताळले. कारण तसाही त्यांना पर्यायच उरला नव्हता. त्यांच्या तंबुतला एकेक पोटार्थी नेता सरळ अफजलखानाच्या चड्ड्या धुवायला धावत होता. राजभवनवरची राज्यपाल प्रायोजित 'पहाट मैफल' बघता, जर शरद पवार मैदानात बॅटिंगला स्वतः उतरले नसते, तर राष्ट्रवादीत आणखी काय काय अनर्थ घडू शकलं असतं, याचा सहज अंदाज करता येतो. शरद पवार म्हणजे अडवाणी नव्हेत, हे भाजपेयींच्या लक्षातच आलं नाही. काही का असेना, छोटं जरी असलं, तरी ते त्यांच्या स्वतंत्र साम्राज्याचे सम्राट होते. आणि सम्राटाचं बंड किती महाग पडू शकतं, हे उद्धव ठाकरे यांनी भाजपेयींना अशा तऱ्हेनं दाखवून दिलं, की फडणवीस आणि अख्खी महाराष्ट्रतले भाजपेयीं अजूनही बिचारे हळद तेल लावून शेकण्यात व्यस्त आहेत. सोसतही नाही आणि सांगताही येत नाही. त्यामुळं अंधारातच एकमेकांची शेकून घेवून समाधान मानत आहेत. ह्यात आणखी एक गम्मत आहे. आज मोदी आणि शहा देशातले सर्वात पॉवरफुल नेते आहेत, असे भक्तांना आणि विचारवंतांना देखील वाटतं. पण वस्तुस्थिती खरंच तशी आहे का? मला स्वतःला मात्र तसं काही वाटत नाही. हां! भाजपत आज ते निर्विवाद मोठे नेते आहेत. देशाच्या सत्तेतही ते सर्वोच्च आहेत, यात संशय नाही. अगदी काही वर्षांपूर्वी अडवाणी हे भाजपातले अत्यंत पावर फुल नेते वाटत होते. आज त्यांची हालत काय आहे? बाबरी मशीद पाडली तेव्हा कल्याणसिंह यांचाही ग्राफ एकदम आकाशाला भिडला होता. पक्षाचे भावी अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. आज त्यांची हालत काय आहे? फार काय मोदी यांच्या उदयापूर्वी गडकरीसुद्धा अतिशय पावरफुल आणि भावी प्रधानमंत्री वगैरे वाटत होतं. पण सध्या ते काय करतात? अर्थात ते अजूनही प्रधानमंत्री होऊ शकतात, पण २०२४ च्या आधी. नंतर मात्र कठीण वाटते. असो. या पार्श्वभूमीवर मोदी यांची परिस्थिती पवार यांच्या तुलनेत काय असेल? ते शरद पवार यांच्यापेक्षा किती पटीने मोठे नेते असतील? या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल, तर मोदी स्वतःचा पक्ष काढू शकतात का? आणि काढला तर त्यांना जनतेचं किती समर्थन मिळेल ? हा मुख्य प्रश्न आहे. मोदी यांची एकूणच कार्यपद्धती, अरेरावी, सूडबुद्धी, संवेदनहिन वृत्ती बघता त्यांना लोक फारसा पाठिंबा देतील, असे नाही वाटत. आणि सध्या भाजपाला जरी त्यांनी आपल्या चड्डीच्या नाड्याला बांधून ठेवली असली, तरी कुठल्या क्षणी नाडा निसटून जाईल आणि त्यांची फजिती होईल, हे सांगता येत नाही. सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रात कसं होत्याचं नव्हतं झालं आणि मी पुन्हा येईन! म्हणून किंचाळणाऱ्या फडणवीस यांच्यावर कसं सकाळ-संध्याकाळ राजभवन वर जाऊन ' 'दे माय.. दे माय ' करत भीक मागण्याचे दिवस आलेत, येवढेही लक्षात घेतले तरी भाजपा वाल्यांची भविष्यातील फजिती थांबू शकेल. 'पिसाळली गाय, काटे काय' अशी सध्या फडणवीस यांची अवस्था झालेली आहे. बहुधा त्यांना रात्रभर झोप येत नसावी. औरंगजेबाच्या डोळ्यात जसे शिवाजी महाराज खुपत होते, आणि मग त्यानं मोहिमेवर अफजलखानाला पाठवले, त्याहीपेक्षा जास्त उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद फडणवीस यांना खुपत असावं. बहुधा तोच अफजलखान फडणवीस यांना चावला असावा, असे परिस्थितीजन्य पुरावे आहेत. तोच अफजलखान, फडणवीस यांच्या नसानसातून ' शांताबाई.. ' च्या ठेक्यावर नाचत असल्याची मजा सारा महाराष्ट्र एन्जॉय करतो आहे. चंद्रकांत पाटील तर बिचारे फारच गोंधळलेले दिसतात! महाराष्ट्रातील अन्य भाजपेयीं नेत्यांचे चेहरे पाहिले, तर 'झाकू किती, झाकू कशी..!' अशी बिचाऱ्यांची अवस्था झालेली दिसते! समजा, पंकजा मुंडे यांना कुणी प्रश्न विचारला, की 'फडणवीस यांना अफजलखान चावला आहे, असं तुम्हाला वाटतं का?' तर प्रचंड गडगडाट करून हसणारा त्यांचा दिलखुलास चेहरा मला अगदी स्पष्टपणे समोर दिसतोय !

सरकार लवकरच बदलणार. सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, मी बघून घेईन. अशी दर्पोक्ती करणारा पेहचान कौन? नही पेहचाना? आणखी कोण? मी परत येईन अशी दर्पोक्ती करणाराच! देवेंद्र फडणवीस...! गेली कित्येक वर्षे, एक अभ्यासू आमदार, एक तडफदार नेता अशी ज्याची ओळख होती, तो मुख्यमंत्री बनून त्यानं सत्तेची चव काय चाखली, हा माणूसच बदलून गेला. एक उमदं व्यक्तिमत्वाचं, एका हेकेखोर, रडीचा डाव खेळणारा, अत्यंत नकारात्मक विरोधी पक्षनेता असं परिवर्तन घडतांना महाराष्ट्राला बघायला मिळालं. गेल्या विधानसभा निवडणूक निकालानंतर आपल्या हातातून सत्ता निसटल्याची हुरहूर अजून ह्या माणसाला लागली आहे. जणू काही मुख्यमंत्रीपदाची गादी, मोदींसारखी ह्यांच्यासाठी १५ वर्षे राखून ठेवण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी आपला विश्वासघात केला अशी त्यांनी आपली समजूत करून घेतली आहे. पण भाजपाच्या जागा १०५ वर उतरल्या, ह्या गोष्टीकडं ते जाणून-बुजून दुर्लक्ष करत आहेत. म्हणून तर सत्तेची समीकरणं पटापट बदलली. बरं ह्यांच्या कारकिर्दीत सगळं काही आलबेल होतं असं आहे का? मुळीच नाही. बरखा पाटील प्रकरण, भीमा कोरेगाव प्रकरण, चिक्की घोटाळा, आरे कार शेड घोटाळा, एम.पी मिल एफ.एस.आय घोटाळा, आणि अशा अनेक घोटाळ्यात ते सर्वांना क्लीन चिट देऊन मोकळे झाले. ह्यांनी तरी घोट्याळ्याच्या बाबतीत भाष्य करणं शोभत नाही. आता तर राज्यातल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून सध्याच्या सरकारच्या बातम्या फोडून अराजक माजवण्याचा नवीन पायंडा ते पाडत आहेत. माजी गृहमंत्र्यांना गोपनीय कागदपत्र पुरवण्याची पद्धत ही येत्या काळात सगळ्यांनाच महागात पडणार आहे. कोरोना महामारीच्या ह्या भयानक परिस्थितीचं राजकारण कसं करावं हे फडणवीसांकडून शिकावं. व्यापाऱ्यांना भडकावणं, लॉकडाऊनला विरोध करणं ह्या सर्व गोष्टी भविष्यात त्यांना महागात पडणार आहेत. कदाचित नाही पडणार. अरे ह्या माणसानं महाराष्ट्राच्या मदतपेटीत आपले दान टाकायच्याऐवजी, मोदींच्या पेटीत दान टाकलं, ह्यापेक्षा महाराष्ट्राची चेष्टा कोणी केली नसेल. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनुपस्थित राहून, बायकोकडून शिकून रुसून कसे बसले त्यानंही त्यांच्या मनाची जडणघडण दिसून आली. फडणवीस तर तडफडत आहेतच, पण त्याही पेक्षा जास्त त्यांच्या पत्नी ह्यांना नवऱ्याचं मुख्यमंत्रीपद गेल्याचं अतोनात दुःख झाल्याचं दिसतं. साहजिक आहे. पण त्यानं इतकी खालची पातळी गाठावी, हे अनाकलनीय आहे. आताच्या त्यांच्या मुक्ताफळांवरून, वर्षा बंगला सोडतांना, बंगल्याच्या भिंतींवर जी काही भयानक ग्रॅफिटी काढण्यात आली, ते प्रताप कोणी केले असतील हे ताडायला कोणी ज्योतिषी नको. महाराष्ट्राच्या इतिहासात कुठच्याही मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं राजकारणात ढवळाढवळ केली नाही. मला समजत नाही, बँकेत असलेल्या आमच्या उच्चपदस्थ आप्तेष्टांना श्वास घ्यायला वेळ नसतो, आणि ह्या बाईंना गाणी गायला, अल्बमचं शूटिंग करायला कसा काय वेळ मिळतो? त्या बँकेत जातात कि नाही अशी पण शंका येते. त्यांनी तर एका गाण्यात स्वतःच्या नवऱ्याला, म्युनिसिपल कमिशनर आणि पोलीस कमिशनरलाही गायला लावलं. आता बोला. असो, फडणवीस दांपत्यानं वेळीच सावरावं. सत्तेच्या हव्यासापायी ते स्वतःची पातळी सोडून वागत आहेत, आणि लोकांच्या मनातून उतरत चालले आहेत. महाराष्ट्राची अस्मिता बाळगायची सोडून, केंद्राचे प्यादे बनण्यात ते धन्यता मानत आहेत. मी परत येईन ही गर्जना हवेत विरून गेली, तसंच मी बघून घेईन ही गर्जनाही विरून जाणार, कारण महाराष्ट्राशी तुम्ही करत असलेली गद्दारी उघड्या डोळ्यानं जनता बघत आहे आणि तीच तुम्हाला बघून घेणार आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९

प्रियांका : काँग्रेसची आशा...!

काँग्रेसच्या भवितव्यावर आज मोठंच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. काँग्रेसच्या या अवस्थेला काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांपासून नेते, कार्यकर्ते सगळेच जबाबदार आहेत. समोर भाजप आणि मोदी-शहा यांचं मोठं आव्हान उभं ठाकलं असताना काँग्रेसमध्ये मात्र गटबाजी, इतर नेते आपापले नातेवाईक, सुभेदारी, गोतावळा सांभाळण्यातच धन्यता मानताना दिसताहेत. सध्यस्थितीत जनमानसावर छाप पाडून पक्षात नवचैतन्य निर्माण करील, पक्षसंघटना मजबूत करील असं नेतृत्व आजवर काँग्रेसकडं दिसत नव्हतं. काँग्रेसला काँग्रेसच हरवते, हा आजवरचा इतिहास आहे. पण उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रियांका गांधींनी जी आक्रमक भूमिका घेतलीय, त्यानं तिथल्या लोकांना त्यांच्यात इंदिरा गांधी दिसताहेत! हे एक आशादायक चित्र आहे. भाजपेयींचा उधळलेला वारू रोखण्यासाठी आज देशाला मजबूत विरोधी पक्षाची नितांत गरज आहे. एकाधिकारशाही, छुपी आणीबाणी देशाला परवडणारी नाही. कोणी काहीही म्हटलं तरी, देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसकडंच आशेनं पाहिलं जातंय हेही तेवढंच सत्य आहे! प्रियकांचं उत्तरप्रदेशातलं आगमन हे त्यादृष्टीनं वैशिष्ट्यपूर्ण ठरणारं आहे!"
---------------------------------------------------

उत्तरप्रदेशातल्या निवडणुकांची सूत्रं प्रियांका गांधींनी हाती घेऊन जो झंझावाती दौरा सुरू केलाय त्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. त्यांनी भाजपेयींच्या कमतरतेवर हल्ला चढवलाय. भाजपच्या सत्तेत महिलांना स्थान दिलेलं नाही हे त्यांनी हेरलं, शिवाय इथल्या महिला अत्याचाराच्या घटनांचा प्रतिकार करतानाच त्यांनी महिलांच्या हाती राजकारणाची सूत्रं सोपवण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतलीय. पक्षाचं धोरण म्हणून त्यांनी उत्तरप्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत तब्बल ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्याची घोषणा केलीय. लोकसभेत महिलांना प्रतिनिधित्व देण्याबाबतचं विधेयक रखडलेलं असताना त्यांनी पक्षाचं धोरण म्हणून घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे. या निर्णयानं प्रियांका गांधी या देशभरात चर्चेत आल्या आहेत. शिवाय काँग्रेसपक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालंय! पंधरा-वीस वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात कुणी कट्टर काँग्रेस कार्यकर्त्यानं पोस्टर लावलं होतं. त्यावर लिहिलं होतं '
प्रियंका नही, आँधी है! दुसरी इंदिरा गांधी है!!' आता ह्याच घोषणेची पोस्टर्स उत्तरप्रदेशात अनेक ठिकाणी लागलीत. ज्यावेळी नेहरू-गांधी घराण्याच्या लोकप्रियतेला सर्व बाजूंनी कुरतडलं, ठेचलं जात होतं, तेव्हा ही घोषणा पोस्टरवर टाकली आणि मीडियानं ती जगजाहीर केली होती. तेव्हापासून त्यांच्या हालचालीकडं देशाचं लक्ष होतं. पण प्रियंका यांची आता उत्तरप्रदेशातल्या निवडणुकीच्या निमित्तानं दमदार एन्ट्री झालीय. त्वेषानं आणि तडफेनं त्या लखीमपूर-खिरीची घटना घडताच धावून गेल्या. गेल्या तीन वर्षांपासून त्या उत्तरप्रदेशात सक्रिय आहेत. त्यांचा सध्या मुक्काम लखनौ इथं 'कौल हाऊस'मध्ये असतो. तिथं नेहरूही राहत होते. 'लॉकडाऊन'च्या काळात प्रियंका यांनी राजस्थान, उत्तरप्रदेश अशी बससेवा सुरू ठेवली होती. सोनभद्र इथं आदिवासी अत्याचाराविरोधात आणि हाथरस इथल्या बलात्कार प्रकरणात त्यांनी आवाज उठवला होता. स्वतःला अटकही करून घेतली होती. आता विधानसभेची निवडणूक लक्षात ठेवून त्या उत्तरप्रदेश पिंजून काढत आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत ४० टक्के जागांवर त्या महिला उमेदवार उभ्या करणार आहेत. हा त्यांनी धाडसी निर्णय घेतलाय. सध्या त्यांचं वास्तव्य उत्तरप्रदेशात लखनौला असलं तरी, घटनास्थळी जाणं महत्त्वाचं होतं. त्यांनी नुकतीच वाराणशीत लोकांशी संवाद साधणारी सभा घेतली. ती लक्षणीय ठरलीय. अशाच सभा चाळीसएक वर्षांपूर्वी आणीबाणीनंतर काँग्रेसची केंद्रातली सत्ता गेल्यावर त्यांच्या आजीनं म्हणजेच इंदिरा गांधीनं घेतल्या होत्या. हेच राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षित होतं. पण त्यांना जमले नाही, ते प्रियंका करून दाखवत आहेत.

उत्तराखंड अस्तित्वात येण्यापूर्वी उत्तरप्रदेश हा काँग्रेसचा भक्कम गड होता. लोकसभेचे ८५ मतदार संघ ह्या राज्यात होते. त्यातून काँग्रेसचे ८० खासदार निवडून येत. आता तिथं फक्त सोनिया गांधी या एकमेव खासदार आहेत; तर उत्तरप्रदेश विधानसभेत काँग्रेसचे ३०० आमदार असायचे, तिथं आता केवळ ७ आमदार आहेत. हे वास्तव कार्यकर्त्यांत निराशा निर्माण करणारा होतं. पूर्वी काँग्रेसला सर्व जाती-धर्माचे लोक निवडून द्यायचे. आता फक्त राष्ट्रीय विचाराचे लोकच काँग्रेसला मतं देतात. त्यामुळं २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातल्या अमेठी मतदारसंघात भाजपेयीं स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला. अर्थात, असा पराभव १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांचाही झाला होता. पण त्यांनी तो पराभव १९८० च्या निवडणुकीत भरून काढला आणि उत्तरप्रदेशाला पुन्हा राष्ट्रीय विचाराच्या पंखाखाली आणलं होतं. दरम्यान जात आणि धर्माच्या राजकारणानं काँग्रेस पक्षाचे लचके तोडले गेले. १९९१ ते ९६ आणि २००४ ते २०१४ ह्या काळात काँग्रेस आघाडीची सत्ता देशात होती. तरीही सत्ता नेतृत्वाला पक्षाच्या जखमा भरून काढता आल्या नाहीत. उलट, नरसिंहराव, मनमोहनसिंह आणि स्वत: सोनिया गांधी यांचं नेतृत्व काँग्रेसची लचकेतोड हतबलपणे पाहात होते. हा सारा पटच बदलवून टाकायचं, हे प्रियंका यांनी ठरवलेलं दिसतं. वाराणशीच्या सभेत प्रियंकांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. या सभेला शेतकरी आणि शेतमजूर होते. दलित-सवर्ण होते. हिंदू होते आणि मुस्लीमसुद्धा होते. त्यातून उत्तर प्रदेशात काँग्रेस स्वत: मजबूत होत असल्याचं दिसतंय. अयोध्येतल्या मंदिर - मशीदवादाच्या आडून भाजपेयींनी जे सामाजिक आणि जातीय आधार नेले होते, ते काँग्रेसमध्ये परत आणलं जातंय. दरम्यान झालेल्या राष्ट्रीय नुकसानीबद्धल काँग्रेसचे अपरिचित कार्यकर्तेही ’भाजप-मोदी-शहा’ यांच्या विरोधात त्वेषानं बोलायला उभे राहिलेत. या सार्‍याची झलक प्रियंका यांच्या वाराणसीच्या सभेत पाहायला मिळाली. प्रियंका आई आणि भावापेक्षा अत्यंत सहजपणे लोकांना थेट भिडताहेत. ज्यांना या विषयातलं कळतं; त्यांना प्रियंका यांच्या वाराणसीतल्या भाषणाचं मर्म आणि फल एव्हाना समजलं असणार! सर्व समाजाला कवेत घेणारं भाषण त्यांनी केलंय. काँग्रेसवर मुस्लीम अनुनयाचा आरोप अनेक वर्षांपासून होतोय. तो आरोप प्रियंका यांच्या ’ओम त्र्यंबकम यजामहे’ ह्या महामृत्युंजयाच्या मंत्रोच्चारात विरघळून गेलाय. ह्याचा अर्थ, प्रियंका काँग्रेसला लगेचच पूर्वीचे दिवस दाखवतील, असं नाही. कारण उत्तरप्रदेशात काँग्रेसला नेता आहे पण संघटना नाही. तरीही प्रियंका यांनी सुरुवात उत्तम केलीय हे मान्य केलं पाहिजे! मोदी सरकारच्या विरोधातला रोष आणि त्याचा परिणाम आगामी काळात दिसणारच! ह्या लोकसंतापाची व्याप्ती अधिक करण्याचं काम प्रियंका यांच्या ताज्या कामगिरीनं केलंय. त्यानं उत्तरप्रदेशातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येणार नाही. पण भाजपची सत्ता घालवणार, असं दिसतंय!

एखाद्या राजघराण्याप्रमाणं वंशपरंपरागत नेतृत्व आपल्याकडंच राखून ठेवणं आणि वर लोकशाहीच्या नावानं ढोल बडवणं ही संकुचितवृत्ती आजच्या काँग्रेसच्या अधःपतनाला जशी जबाबदार आहे. तसंच त्याची धुरा वाहण्यासाठी कोणी पुढं येतांना दिसत नाही. हेही वास्तव आहे. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमधली खडाजंगी पक्षात दुफळी निर्माण करतेय. वरिष्ठांना राहुल गांधी यांचं नेतृत्व तकलादू वाटतंय; तर राहुल यांच्याकरिता पक्षातली वरिष्ठ मंडळी अडथळे ठरताहेत असं वाटतं. काँग्रेसच्या उतरत्या काळात गांधी कुटुंबियांवर स्वकीयांकडून होणारी टीका जिव्हारी लागणारी असली, तरीही ती रास्त आहे. कपिल सिब्बल यांच्या बरोबरीनंच काँग्रेसमधील शीर्षस्थ नेते पक्षाच्या नियोजनशून्य कारभारावर टीका करताना दिसतात. लोकशाही राष्ट्रात घराणेशाही कितीकाळ तग धरणार याचं आत्मपरीक्षण गांधी कुटुंबीयांनीच जसं करायला हवं. तसंच नेत्यांनीही! महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील ही काँग्रेस नक्कीच नाही. सर्वांना संधी मिळायला हवी यासाठी गांधीजी नेहमीच आग्रही असत. काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्यासाठी सक्षम, कणखर नेतृत्वाची गरज आहे. राहुल गांधी यांचं कुचकामी नेतृत्व, पक्षश्रेष्ठींची चापलूसी करण्यात व्यग्र असलेला एक गट आणि ज्येष्ठांचा ढासळत चाललेला संयम यामुळं काँग्रेस दिशाहीन ठरतेय. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याची तसदी काँग्रेस नेतृत्वानं कधी घेतलेलीच नाही. त्याहीपलीकडं जाऊन पाहिल्यास, त्यांना तिथपर्यंत पोहोचू न देण्याचं गलिच्छ राजकारण स्थानिक पातळीवरील नेत्यांनी केल्याचं दिसून येतं. त्याचा परिणाम आज काँग्रेस भोगतेय.आपल्या परिघाबाहेर जाऊन विचार न केल्यास काँग्रेसचं अधःपतन अटळ आहे. याची जाणीव होताच पक्ष सोडून जाणारे अधिक असतात. नेतृत्वावर टीका करणारे अनेक असतात, पण असं घडत असताना पक्षाची जबाबदारी घ्यायला कुणी तयार होताना दिसत नाही. मात्र उत्तरप्रदेशातल्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसला संजीवनी देण्याच्या उद्देशानं प्रियांका गांधी सरसावल्या दिसताहेत. त्यांनी जे दौरे तिथं आरंभलेत त्याला मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय तोही सर्व स्तरातून! त्यामुळं काँग्रेससाठी एक आशादायक चित्र निर्माण झालंय, असंच म्हणावं लागेल! १९८० मध्ये जे आजीनं केलं; ते आणि तसंच, त्या उत्तरप्रदेशच्या माध्यमातून आगामी काळात देशात घडवून नक्कीच आणतील! नेहरू-गांधी घराण्याची एक खासियत आहे. ते संघटना ज्या उंचीची आहे, तिच्या खांद्यावरून माध्यमांशिवाय भारतातल्या करोडो जनतेशी थेट भिडतात. १९६९ मध्ये बँकांचं राष्ट्रीयीकरण करताना; १९७२ ला पाकिस्तानचे दोन तुकडे करताना इंदिरा गांधी यांनी जनतेशी सहज संवाद साधला होता. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींसह काँग्रेसचा पराभव झाला. पण ३० महिन्यांतच काँग्रेस विरोधकांनी एकत्र येऊन बनवलेलं जनता पक्षाचं सरकार कोसळलं. तेव्हा १९८० च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सभा इंदिरा गांधींनी जनतेशी संवाद साधत १९७८ चा आपला निर्णय चुकला हे जनतेला स्वत:च कबूल करायला लावलं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत 'अच्छे दिन'च्या जुमल्यात फसून आपण चूक केली आणि २०१९ ला तर घोडचूक केली, हे आता समस्त भारतीय जनतेला कळून चुकलंय. प्रियंका आता लोकांची ही चूक लोकांकडूनच दुरुस्त करून घेऊ लागल्यात. सहज आणि नैसर्गिक संवाद हे त्यांचं वैशिष्ट्य दिसतंय. ते ज्या तडफेनं करतात, त्यानं ते एक राष्ट्रीय कार्य असल्यासारखं वातावरण निर्माण झालंय असं दिसतंय! ४०-५० वर्षाचा काळ उलटलाय, नेहरू-गांधींचा महिमा नव्या पिढीवर आता राहिलेला नाही त्यामुळं काँग्रेसनं आता नव्यानं सुरुवात करायची गरज आहे. राहुल गांधींनी केलेले प्रयत्न फारसे यशस्वी ठरत नाहीत हे लक्षांत येताच त्यांनी बाजूला होण्याचा निर्णय घेतला पण त्यांची जागा घेण्यास कुणी सरसावलं असं दिसलं नाही. त्यामुळं काँग्रेसचं नेतृत्व हेलखावे खाताना दिसत होतं. आता उत्तरप्रदेशच्या निमित्तानं प्रियंका पुढे आल्यात. त्यांना मिळणारा प्रतिसाद लक्षणीय ठरतोय. शिवाय कन्हैया कुमार, हार्दिक पटेल, जिग्नेश मेवानी, ह्यासारखी तरुण मंडळी काँग्रेसशी जोडली जाताहेत. तरुणांची फळी उभी राहताना दिसतेय. हे काँग्रेससाठी आशादायक चित्र म्हणावं लागेल!

स्वातंत्र्यापूर्वीची राष्ट्रीय सभा ही कॉंग्रेस नव्हती. ते एक सर्व विचारांचं व्यासपीठ होतं, अगदी हिंदुत्ववादी, कम्युनिस्ट, समाजवादी, अमीर-उमराव असे सगळे त्यात होते. नंतरच्या काळात ही राष्ट्रीय सभा-काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर आणि दीर्घकाळ सत्ता उपभोगली पण पक्षबांधणी केली नाही. सभोवती जमा झालेला मेळा तसाच कॉंग्रेस नेतृत्वाला मायबाप सरकार म्हणत राहीला आणि नेतृत्व नेहरु-गांधी घराण्याकडं असं म्हणत राहीलं होतं. त्याची संवयच पडून गेलीय. मतदार विचारत आहेत की, स्वातंत्र्याची किंमत पक्षानं कधीच वसूल केलीय. आणखी किती काळ त्याची कमाई खायची? नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील नवीन नेतृत्व केव्हा आणणार? कॉंग्रेसचा हिंदुत्ववाद हा वैदिक धर्माचा कट्टरतावाद नाही. हेच काय ते वेगळेपण आहे. म्हणूनच अल्पसंख्याक आणि दलित-आदिवासी त्यांचा आजही मतदार आहे. पण आता त्यांनाच मतदार म्हणून अपात्र करण्याचं कारस्थान सुरु झालंय. राहुल गांधी, सोनियाजी, प्रियंका गांधी या व्यतिरिक्त नवीन चेहरा तयार केला गेला नाही. २०१४ च्या पराभवानं कॉंग्रेसचं घर वाहून गेलंय. ते सावरायचं सोडून सत्तावादी घटक उरलेले वासे-बांबू घेऊन पळत सुटले होते. सर्वच धर्मनिरपेक्ष संघटनांनी अजूनही आपापले अहंकार, सोडलेले नाहीत. लोकशाहीवादी असावं पण कुठवर? सर्वांना एकत्र ठेवण्यासाठीची किमान शिस्तही पाळू शकत नाही? प्रत्येकाला असं वाटतं. मला स्वतंत्र वलय आहे. ते काही प्रमाणात खरंही आहे. हाथरससारखा प्रकार घडल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही काॽ हिंदी भाषिक पट्टयात हिंदुत्ववादी आणि दक्षिण पट्टयात भाषिक प्रादेशिक पक्ष आपापलं साम्राज्य सांभाळून आहेत. हिंदी पट्ट्यातील अखिलेश यादव, मायावती यांची सद्दी संपली कायॽ तेजस्वी यादव यांनी बऱ्यापैकी बाजी मारली. पण नापासाचे गुण कोणीही पाहात नाहीत. वरच्या इयत्तेत प्रवेश मिळाला नाही. हेच समजलं जातं. कॉंग्रेस, तृणमूल, वायएसआर, राष्ट्रवादी काँग्रेस ही एकाच बापाची अपत्ये आहेत. पण तरीही त्यांची एकत्रित क्षमता किती? आता अशी वेळ आलीय की, सोनिया, राहुल, प्रियंका यांनी जाहीर करावं की, आमच्यापैकी कोणीही पंतप्रधान होणार नाही. आम्ही देशासाठी, राज्यघटनेच्या रक्षणासाठी देशभर फिरून जनजागृती करु. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, कम्युनिस्ट, ममता, तेजस्वी यादव, अखिलेश यांना राहुल गांधींनी विश्वासात घेऊन देशाचा दौरा करावा. एवीतेवी अशीही सत्ता नाहीच तर निदान आपल्याकडं आशेनं पाहणाऱ्या जनतेला पुढं दिलासा मिळेल असं काम तरी होईल. पण या साऱ्या जरतरच्या गोष्टी आहेत. पक्षाच्या नेतृत्वाबरोबरच अनेक संस्थाही त्यांच्याच हातात आहेत त्यावर त्यांचा कब्जा आहे म्हणून त्यांना हा असा त्याग करता येत नाहीये. असं असलं तरी काँग्रेसला पूर्वीचे दिवस यावेत यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. देशात लवकरच राजकीय उलथापालथ होणार, हे जाणवतंय. ती घडून येईपर्यंत थांबण्यापेक्षा, ती आपल्याला हवी तशी घडवून आणण्यासाठी प्रयत्न करण्यात निश्चितच आव्हान आहे. अशी आव्हानं स्वीकारणारे नेतेच लोकांना आवडतात. त्या दिशेनं प्रियंका यांची पावलं पडताहेत. काँग्रेस सावरण्यासाठी आणि नेतृत्त्वासाठी प्रियंका सरसावल्या असताना त्यांच्या पाठीशी देशभरातील अखिल काँग्रेसजन उभे राहतील काय हवं खरा सवाल आहे,।
हरीश केंची
९४२३१०६०९

Sunday 17 October 2021

कांशीरामजी एक सुस्वभावी नेता

बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांचा जन्म १५ मार्च १९३४ मध्ये पंजाबात झाला होता. त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. त्यांचे खरे बहीण-भाऊ आता कुठे आहेत?, काय करत आहेत?, त्यांनी राजकारणात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला का? यावर आपण नजर टाकणार आहोत. खूप वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबासोबत राहणं सोडलं होते. शेवटच्या दिवसांमध्ये ते खूप आजारी होते तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आपल्याकडे पाठवण्यासाठी न्यायालाकडे मदत मागितली होती. त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचे बहीण-भाऊ आज देखील पंजाबमध्येच राहतात. कांशीराम यांचे २००६ मध्ये निधन झालं. त्यांच्या निधनापूर्वी त्यांच्या कुटुंबीयांवरुन वाद झाला होता. कांशीराम आजारी असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांना आपल्यासोबत ठेवू इच्छित होते. मात्र न्यायालयाने त्यांनी केलेली याचिका फेटाळून लावत मायावती यांच्या देखरेखीखाली कांशीराम यांना ठेवण्यास मंजूरी दिली. कांशीराम यांच्या कुटुंबातील काही सदस्य आतासुद्धा पंजाबमधील आनंदपूर साहिब जिल्ह्यातील पृथ्वीपूर गावामध्ये राहतात. त्यांच्या एका भावाने मागच्या निवडणुकीत आपले समर्थन काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना दिले होते. पण कांशीराम याचे छोटेभाऊ हरबंससिंग त्याविरोधात उभे राहिले. त्यांनी निर्णय घेतला होता की, 'ते राजकारणी लोकांच्या हातातील निवडणूकीत कळसूत्री बाहुली होणार नाहीत.'

कांशीराम यांची बहीण स्वर्णकौर पृथ्वीपूर गावामध्येच राहतात. त्यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्यांनी सांगितले होते की, 'मी एका पक्षाच्या रुपाने बसपाला समर्थन देते. कारण त्यांनी माझ्या मोठ्या भावाला राजकारणात उच्चपद मिळवून दिलं. पण आता मी कोणत्याही इतर पक्षाचे समर्थन करत नाही. कारण जी लोकं बसपामध्ये आहेत त्यांना फक्त माझ्या भावाच्या नावानं मतं मिळवायची आहेत. २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी स्वर्ण कौर यांना संपर्क करत आपच्या तिकीटावर निवडणूक लढवा असं सांगितल होते पण स्वर्ण कौर यांनी नकार दिला. आनंदपूर साहिबमध्ये दलितांची मोठी लोकसंख्या आहे. त्यांच्यावर कांशीराम यांच्या कुटुंबीयांचा प्रभाव देखील आहे. त्यामुळे निवडणुकांच्या वेळी राजकीय पक्ष कांशीराम यांच्या कुटुंबियांना आपल्या सोबत ठेवू इच्छितात. २०१४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी अकाली दलाचे उमेदवार प्रेम सिंग चंदूमाजरा यांना पूर्ण समर्थन दिले होते आणि ते निवडणूक जिंकले होते. पण २०१९ मध्ये दरबार यांचे समर्थन काँग्रेसकडे गेले. कांशीराम यांचे छोटे भाऊ दरबारा सिंग यांनी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना सांगितलं होतं की, 'आमचं नातं मायावती यांच्याशी चांगलं नाही. आम्ही तोपर्यंत बसपाला समर्थन करणार नाही जोपर्यंत त्या स्वत:हून आमच्याकडे मदत मागत नाहीत.' कांशीराम यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे मायावती यांच्यासोबत नातं खूपच कडू झालं. दरबारा सिंग यांनी २००८ मध्ये आपल्या नवीन पक्षाची घोषणा केली. या पक्षाचे नाव बहुजन संघर्ष पार्टी असे ठेवण्यात आले होते. या पक्षाने उत्तर प्रदेशमध्येही उमेदवार उभे केले होते. पण हे सर्व लवकरच संपुष्टात आलं.

‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागेदारी’ ही घोषणा कांशीराम यांची. त्यांनी उत्तर प्रदेशसह देशभरातल्या राजकारणात दलितांना सत्तास्थानी पोहचवलं. या प्रवासात त्यांच्या समोर अनेक प्रस्ताव ठेवण्यात आले. त्यापैकी एक किस्सा जो आपल्यातल्या बऱ्याच जणांना माहिती नसेल. भाजप आणि बसप या परस्परविरोधी टोकाची विचारधारा असणारे पक्ष. भारतीय जनता पार्टीचे बडे नेते तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी बहूजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम यांना राष्ट्रपती पदाची ऑफर दिली होती. हा प्रस्ताव नाकारत ते म्हणाले होते की, “मला राष्ट्रपती नाही पंतप्रधान पद हवं आहे.” हा किस्सा बऱ्याचदा चर्चला गेला आहे. पण वाजपेयींना कांशीराम राष्ट्रपती म्हणून का हवे होते? याचा सवाल कुणी विचारत नाही. राजकारणात विरोधकाला प्रसन्न करणं हा त्याला कमजोर करण्याचा प्रयत्न असतो. वाजपेयी राजकारणाचा हा नियम शिताफिन वापरत असतील ही. परंतू जाणकारांच्या मते कांशीराम यांना पुर्णपणे समजण्यात वाजपेयींनी चुक केल होती. त्यांना कांशीरामांबद्दल पुर्ण परिकल्पना असती तर त्यांनी कधीच हा प्रस्ताव कांशीराम यांच्यासमोर ठेवला नसता वाजपेयींचा प्रस्ताव नाकारणाऱ्या कांशीराम यांची ही कृती त्यांच्या आयुष्याचे ध्येय अधोरेखित करते. वर्षानूवर्षे गुलामी करणाऱ्या दलित समुदायाला सत्तास्थानी पोहचवणं त्यांच ध्येय होतं. दलितांना ‘फर्स्ट अमंग्स द इक्वल्स’ बनवनं. मायवतींच्या माध्यमातून त्यांनी ही गोष्ट करुन दाखवली. त्यांच्यावर नेहमी आरोप करण्यात आले की कोणत्याच आघाडीशी ते प्रामाणिक राहीले नाहीत. त्यांनी कॉंग्रेस, भाजप आणि समाजवादी पार्टीसोबत आघाडी केली. स्वतःच्या ध्येय धोरणां पायी त्यांनी या आघाड्या घडवून आणल्या. याबद्दल टिकाकारांनी नेहमी त्यांच्यावर टीका केली. कांशीराम यांनी या आरोपांवर एका मुलाखतीत उत्तर देताना म्हणलं होतं, “मी त्यांना राजकीय पक्षांना खुश करण्यासाठी राजकारण करत नाहीये.’ राजकीय आणि सामाजिक संघर्षावेळी कांशीराम यांनी ब्राम्हणवादाशी संबंधीत प्रत्येक गोष्टीचा विरोध केला. मग ते महात्मा गांधी असतो की राजकीय पार्टी की माध्यमं की दलित नेते त्यांना कांशीराम ‘चमचा’ म्हणायचे. दलितांच्या स्वातंत्रता संघर्षाला किनार देऊन पहिल्यापासूनच भाजप आणि कॉंग्रेसचे मंडलीक झालेले नेते चमचे आहेत असे ते वारंवार सांगायचे.

कांशीराम मानायचे की जेव्हा जेव्हा दलित संघर्ष मनुवादाला अभुतपुर्ण आव्हान द्यायचा तेव्हा ब्राम्हण वर्चस्व असणारे राजकीय पक्ष, ज्यात कॉंग्रेसही सामील आहे, त्यांनी दलित नेत्यांना हाताशी धरुन आंदोलन कमजोर करण्यात धन्यता मानली. जेव्हा ही कोणती लढाई, संघर्ष, योद्धांकडून या पक्षांना धोका नसतो तेव्हा त्यांना चमच्यांची गरज भासत नाही. परंतू नंतर जेव्हा दलित वर्गाला खऱ्या सशक्त आणि प्रबळ नेतृत्त्व लाभत तेव्हा या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये चमच्यांची चलती असते.
१९५८ साली कांशीराम यांनी पुण्यातून पदवीचं शिक्षण घेत ‘डीआरडीओ’मधून सहाय्यक वैज्ञानिकाच काम केलं. या दरम्यान आंबेडकर जयंतीला सार्वजनिक सुट्टीच्या मुद्द्यावरुन झालेल्या संघर्षामुळं त्यांचं मन परिवर्तन झालं. पुढं संपूर्ण आयुष्य दलितांना राजकीय आणि सामाजिक स्थान देण्यासाठी त्यांनी खर्ची घातलं. त्यांचे सहयोगी डी.के. खरपडे यांच्यासोबत मिळून सरकारी नोकरीला लागलेल्या दलितांची मजबूत संघटना बांधली नाव दिलं ‘बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एंप्लोयीज फेडरेशन’ म्हणजेच बामसेफ. पुढं चालून सातत्याच्या संघर्षातून त्यांनी मायावतींना उत्तर प्रदेशच्या खुर्चीवर मुख्यमंत्री म्हणून बसवलं. या प्रवासात लाखो लोकांना त्यांनी एकत्रित केलं. शेकडो किलोमीटर त्यांनी सायकलवरुन प्रवास केला. त्यांच्या आयुष्यात असे ही संघर्ष आले की त्यांनी फाटके कपडे घालून दलितांचं नेतृत्त्व केलं परंतू माघार घेतली नाही. निळ्या किंवा पांढऱ्या शर्टा शिवाय इतर रंगाचे कापड त्यांनी संपूर्ण आयुष्यात क्वचितच परिधान केलं असेल. ९० च्या दशकात कांशीराम यांची अवस्था बिघडायला लागली. त्यांना मधूमेह आणि रक्तदाबासारख्या समस्या होऊ लागल्या. १९९४ ला त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला. २००३ ला ब्रेन स्ट्रोक आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. भारतातल्या दलित राजकारणाला त्यांनी सत्तेपर्यंत पोहवण्याच काम केलं.

भारतीय राजकारणात कांशीराम यांचं मोठंपण त्यांनी बहुजन समाजात निर्माण केलेल्या राजकीय जागृतीमुळं आहे. त्यासाठीच्या त्यांच्या स्वतःच्या कमालीच्या मिशनरी वृत्तीत आहे. कांशीराम यांना राजकारण काही स्वतःच्या "पिढीजात वारश्यातून" मिळालेलं नव्हतं. ते त्यांनी स्वतःची मेहनत, जनसंपर्क, भारतभर प्रवास, कार्यकर्त्यांच्या क्षमता ओळखून त्याचा चळवळीसाठी उपयोग करून त्यांच्याशी असणारा सततचा जैविक असा सकारात्मक संवाद यातून मिळवलं होतं. जैविक अशा कार्यकर्त्यांचं त्यांनी प्रयत्नपूर्वकरित्या बांधलेलं प्रचंड नेटवर्क यातून उभं केलं होतं.! हे सगळं करताना त्यांनी लॅडर्स-शिड्या निर्माण केल्या नाही तर हेतुपूर्वक उद्याची चळवळ चालवतील असे लीडर्स घडवले. मायावती, दाऊराम रत्नाकर, फुलसिंह बैरय्या, डॉ. सुरेश माने, सिद्धार्थ पाटील यासारखे अनेक लीडर्स घडवले. नंतरच्या काळात मायावतींनी या सर्व लीडर्सना ओव्हरकम करत बाकीचे लीडर्सना प्रयत्नपूर्वक संपवलं आणि सगळं काही स्वतःच्या कब्जात घेतलं, हा भाग वेगळा.!! कांशीराम यांनी राजकारणाला कुठलाच भपकेबाजपणा कधीही येऊ दिला नाही. अगदी त्यांनी कधीही इतर राजकारण्यांसारखा कुर्ता, पायजमा, जॅकेट असला भपकेबाज पेहरावही कधी केला नाही. कायम साधा हाफ शर्ट आणि पॅन्ट! अगदी पायातील चप्पलसुद्धा साध्या रबर टायरची असायची ! त्यांच्यात कमालीचा साधेपणा होता आणि हा साधेपणा कधीच दिखाऊ नव्हता आणि त्या साधेपणाचा त्यांना कधी "नैतिक अहंकार" ही नव्हता. त्यामुळेच त्यांना कधीच कोणाबद्धल "तुच्छता" वाटली नाही. आपलं राजकारण कोणताही आणि कोणाबद्धल ही तुच्छता न दाखवता ही यशस्वीपणे करता येतं हेच सिद्ध करून दाखवलं होतं!
लोकांच्या राजकीय इच्छा, आकांक्षेपासून जसे ते दूर राहिले नाहीत. तसेच लोकांच्या व्यक्तिगत सुखदुःखापासूनही कधी वेगळे झाले नाहीत. आपलं राजकीय जीवन आणि व्यक्तिगत जीवन यामध्ये त्यांनी कधी अंतर केलं नाही. "समाज म्हणून समाजाची ज्या भावभावना, आशा, अपेक्षा असतील, त्याच नेता म्हणून माझ्याही असतील! असच ते कायम जगले! त्यांनी कधीही आपल्या साध्या साध्या कार्यकर्त्यांपासून ही अंतर ठेवले नाही. कसलाच आणि कोणाबद्धलही तुच्छतावाद कधीही या माणसाच्या मनाला शिवला नाही. ते अगदी सहज त्यांच्यासोबत उठबस करीत असत. जेवण्यापासून झोपण्यापर्यंत बरोबरीचं वर्तन करीत असत! याबाबतच्या अनेक आठवणी त्यांच्या सोबत काम केलेली अगदी साधीसुधी माणसं सांगतात. गंगाखेडमध्ये "रायभोळे" नावाचे एक पेंटर आहेत. ते ९० च्या दशकात बसपासाठी वॉलपेंटिंगचे काम करत असत. बसपाच्या कुठल्या तरी दिल्लीत होणाऱ्या रॅलीसाठी त्यांना दिल्लीत वॉलपेंटिंग करण्यासाठी नेलं होतं. रात्रीच्यावेळी ते आणि त्यांचा एक सहकारी दिल्लीत काही भिंती रंगवत होते. तेंव्हा त्यांना असा एक स्पॉट दिसला की, तिथं पेंटिंग केलं तर खूप लोकांना दिसणार होतं. पण त्या उंचशा स्पॉटला नीटपणे पेंटींग करता येईल असा हात पुरेनासा झाला. ते एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून ते पेंटिंग पूर्ण करण्याचा प्रयत्न करू लागले परंतु त्यांच्या उंचीमुळे त्यांना ते नीटपणे करता येत नव्हतं. तेवढ्यात त्या ठिकाणी एक कार येऊन थांबली आणि त्या कारमधून सहा, साडेसहा फुटाचा भला मोठा माणूस हे उतरून आमची धडपड पाहू लागला आणि शेवटी जवळ येऊन मला म्हणाला, "मेरे खंदे पै चढ। तेरा काम हो जायेगा!" आणि पुढचा अर्धा तास मी त्यांच्या खांद्यावर उभा राहून पेंटिंग पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी सगळ्या देशभरातून आलेल्या पेंटिंग स्कॉडची मिटिंग होती आणि त्या मिटींगला कांशीराम उपस्थित राहिले तेंव्हा माझ्या लक्षात आलं की, रात्री ज्या माणसाच्या खांद्यावर उभे राहून आपण पेंटिंग केलं ते खुद्द कांशीरामच होते!
कांशीरामजी यांना विनम्र अभिवादन ..!!

शृंगारवेल 'कमला'

'कमला' हे वस्तुतः अंक खंडकाव्य. पण त्याला महाकाव्याची ऐट आहे. त्यातली काही वर्णनं सांकेतिक आणि भाषाही कृत्रिम वळणाची आहे. पण या काव्याला महाकाव्याचा डौल मात्र आला आहे. कल्पनेची विविधता आणि विशालता सुंदर आणि भव्य यांचं उत्कृष्ठ आकर्षण ही महाकाव्याची वैशिष्ट्ये 'कमला'त जाणवत राहतात. कमलेच्या मनःस्थितीशी कवी समरस झाला तर आहेच, पण पुन्हा अलिप्त राहून तो तिला कांही संदेशही देत आहे. कमला आणि मुकुंद यांच्या पहिल्या प्रेममीलनाची रोमांचक कथा कवीच्याच जीवनाचा जणू अविष्कार आहे. राधाकृष्णाच्या माध्यमातून जुन्या संत आणि पंतकवींनी ज्याप्रमाणे आपल्याच मनात पिंगा घालणारी प्रेमभावना प्रकट केली. त्याप्रमाणे 'कमला' म्हणजे सावरकरांच्या अतृप्त उद्दीप्त आणि प्रमत्त शृंगारभावनेचे सुंदर, धुंद पण उदात्त चित्रण आहे. रम्याद्भूत कल्पनांचा त्यांनी या काळात तर पाऊसच पाडला आहे. अपूर्व वस्तूंची निर्मिती करणारी प्रज्ञा म्हणजे प्रतिभा या व्याख्येचे येथे पूर्ण प्रत्यंतर येते. सावरकर हे प्रकृतीने कवी आहेत. कवीच्या विलक्षण रोमॅन्टीक दृष्टीने त्यांनी राष्ट्रीय स्वातंत्र्याचे स्वप्न रंगविले आणि उदात्त स्वप्नाचा पाठलाग करीत जन्मभर वणवणत राहीले. अंदमानच्या अजस्त्र तुरुंगात म्हणून त्यांची बंडखोर प्रतिभा जखडून राहीली नाही. काळाला आवश्यक असलेली भावात्मकता यांच्या साहित्यालाच काय, पण त्यांच्या साऱ्या आयुष्यालाही व्यापून उरली. या काव्यावर अस्वाभाविकतेचा आक्षेप काही टीकाकारांनी घेतला आहे. पण कवीच्या जीवनात एकप्रकारची अद्भूतता आहे. 'कमला' काव्यात सृष्टीचा बाह्य वर्णनात अतिशयोक्ती वि अद्‌भुतता असली, तरी कमला आणि मुकुंद यांच्या मन:सृष्टीतील परिवर्तने कवीने अगदी सहज टिपली आहेत. कमला आणि मुकुंद या दोन्ही भूमिका एकाच भोगलालस मनाने घेतल्या आहेत. असे म्हणण्यात अतिशयोक्ती नाही.

पानिपतच्या युद्धापूर्वी मुकुंद आणि कमला यांचा बालपणीच विवाह झाला आहे. मुकुंद आणि त्याचा मित्र मुकुल दोघे सैनिक आहेत. पाडव्याच्या सणासाठी घरी आलेल्या मुकुंदाला आपली 'किशोरयौवना' पत्नी कमला दिसते. आणि तो तिला भेटण्यासाठी अत्यंत आतुर होतो. बागेत फुलं तोडण्यात गर्क झालेल्या कमलेचे तो पहिले चुंबन- चोरटे चुंबन घेतो. त्या विलक्षण उन्मादक अनुभवाने कमला अंर्तबाह्य रोमांचित होते. इनकी की ते चुंबन तिला जीवनाच्या आणि तारुण्याच्या यक्षसृष्टीत घेऊन जाते. भ्रमराच्या गोड दंशाने फुलत चाललेल्या कळीचे दर्शन रात्री तिला स्वप्नात सुद्धा घडत राहते. या अनुभवाने कमला ऋतूमती होते आणि यौवनाच्या कांतीने ती अधिकच मोहक दिसू लागते. तारुण्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या कमलेच्या मनातील ही अनोखी कंपने इतक्या हळूवारपणे, इतक्या रसिकतेने आणि इतक्या सचित्रपणे साकार केली आहेत की, क्रांतीचा अंगार ज्यावाणीने उधळला तीच वाणी हा सूक्ष्मतरल प्रणयानुभव कसा रेखाटित आहे याचे नवल वाटते. सावरकर म्हणाले,
प्रियेच्या पहिल्याची हे लज्जाचंचल चुंबना
कोण प्राणी जगी की जो विसरीन तुझ्या क्षणा!
असुनी पल जो पाजी चुंबना तुझिया रसा
शताब्दाहुनीही ही होई तरी अपल तो कसा
तुझ्यात दिव्य जी चोरी, गार जो चटकाही की
या आणि नंतरच्या ओळीतून त्यांनी पहिल्या चुंबनाची मादकता कोणत्याही मद्याहून कशी अधिक बेहोशी देऊ शकते याचे वर्णन केले आहे. त्यानंतर कवी म्हणतो.
स्नेहशून्य साहरा वाळवंटात काळखोलीत
प्रियेच्या पहिल्याची हे मुग्ध प्रेमल चुंबना !
तुझीच स्मृती जावो नि भेटवी विरही मना ।
पूर्वी अनुभवलेली आणि आता पारखी झालेली ही चंचल अनुभूती कवी आपल्या मनात जागी करीत आहे. आपल्या कल्पनेच्या राज्यात मुकुंदाच्या रूपाने तो कमलेच्या सहवासाचा आस्वाद घेत आहे. भीषण वास्तवता त्याच्याभोवती दगडी तुरुंगाच्या आणि अंधार कोठडीच्या माध्यमातून त्याला वेढा देऊन बसली आहे. पण कवीची प्रतिभा कारागृहाच्या उंच भिंतीवरून उड्डाण करू शकते. कारण ती स्वच्छंद आहे. मुक्त आहे. सावरकरांचे शरीर त्या अंधारलेल्या स्नेहशून्य भिंतीच्या आत जखडले असले तरी त्यांच्या मनाचा पक्षी केव्हाच जुन्या आठवणींच्या आभाळात भरारी घेत होता. व्यावहारिक सत्य आणि वाङमयीन सत्य यातील अंतर ज्यांच्या लक्षांत येत नाही त्यांना 'कमला' काव्य हा केवळ कल्पनेचा कृत्रिम खेळ वाटतो. पण ही 'कमला' मुकुंद होऊन या कवीने पुन्हा पुन्हा चुंबली आहे. सावरकरांच्या मानसिक स्थितीगतीचे हे एक अस्सल चित्र आहे. तपशील कल्पनेतला असेल पण काव्यातले तत्व पूर्णअंशाने वास्तव आहे यात वाद नाही.
कमला आणि मुकुंद यांच्या पहिल्या मीलनाचा शब्दाविष्कार सावरकर सहजतेने करतात.
ऋतुमती झालेली कमला
सुरम्य मखरामाजी रमणी मग जै बसे
श्लोकात कालीदासाच्या उपमा जशी दिसे
कालीदासाच्या श्लोकातल्या उपमेची अनुरूप उपमा कमलेला देण्यातले औचित्य रसिकांना सांगण्याचे कारण नाही. कालीदासाच्या शृंगारातली अभिजातता आपल्या काव्यात आणण्याचा प्रयत्न सावरकरांनी केला आहे. पुढील वर्णन काव्याच्या सौंदर्यात किती समृद्ध भर घालते हे पहिल्याशिवाय या काव्याची काव्यमयता लक्षांत येणार नाही
वेणी होताच दे सासू जी पाठीस तया दिशी
थाप जी आईच्या लागे चुंबनाहुनी गोडशी.....किंवा
न्हाता एकासनी ऐसे किती चोरियली तरी
अंगे स्वयेची अंगाशी लागताति परस्परी
मऊ मऊ असे काही मऊ ते सुख लागले.
घरीच वक्षी ते ती ते, झोक जाऊनिया बरे....
पडद्यात गुलालांच्या जळांच्या गळत्यामधी
घेववे न तिला दे ती संधी साधुन तो कधी
अशी परिचिता होता प्रियमूर्ती अनुक्रमे
दुरोनि नच ओठीही प्यावी चंद्रकला गमे
कल्पनेचे नवनवीन उन्मेष हे या काव्यांचे एक आगळे वैशिष्ट्य. फुलबागेच्या वर्णनात कवी रंगून गेला आहे. बागेतील भृंग हा मदनाचा दलाल आहे आणि निशिगंधाची फुले ही मदनाच्या सेनेची पुढे आलेली रौप्यशृंगे आहेत. कारंजाच्या उफाळणाऱ्या जलधारा म्हणजे इंद्रधनुष्याची पिल्ले आहेत. अशा कल्पनांची धुंदी अनुभवताना कवी त्या बागेत किती मनःपूर्वक रमला आहे याची जाणीव होते. नवनवीन शब्दांचे आणि
कल्पनांचे घुंगरु पायात बांधण्याचा प्रयत्न या काव्याने केला आहे. सावरकरांची काव्याभिरूची संस्कृतातील अभिजात काव्यावर आणि मराठीतील पंडिती प्रकृतीच्या कवितेवर पोसली गेल्यामुळे 'कमला' मधील प्रत्येक वर्णने संस्कृत वळणाची ठराविक पद्धतीची वाटतात. शब्दांची रचना कांही ठिकाणी अतिसंस्कृतनिष्ठ असल्यामुळे क्लिष्टता आणि दुर्बोधता जागवत राहते. पण अशा काही वैगुण्यांना बाजूला सारून सावरकरांची कविता प्रत्येक स्थळी काळजाला हात घालते. शृंगार आणि प्रेम यांच्या बेहोश अनुभवाची रसरसीव चित्रे अत्यंत तन्मयतेने रेखाटते. या खंडकाव्याचा आणखी एक भवितिय विशेष सांगीतलाच पाहिजे,

स्त्रीपुरुषाचा शृंगार अनेक कवींनी आजपर्यंन वर्णिला आहे. ह्याचे वर्णन पुढेही साहित्यात सदैव होत राहील. शृंगार हा जीवनाला रुची देणारा अत्यंत आकर्षक आणि गूढ विषय आहे. यात शंका नाही. कालीदासाने 'मेघदूता'त विप्रलंभ शृंगार रेखाटला आहे. 'कुमारसंभवा'त संभोगशृंगार रंगवला आहे. शृंगाराची प्रमत्त चित्रे जुन्या मराठी काव्यात पुष्कळ सोपडतात. . मुक्तेश्वर आणि वामन यांनी उघडा शृंगार कित्येक स्थळी वर्णिला आहे. राम जोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ, पठ्ठे बापुराव वगैरे शाहिरांच्या लावण्यांतून हा रस भरभरून वाहात आहे. भारतात पसरलेल्या अनेक प्राचीन मंदिरांच्या दगडी भिंतींवर कित्येक शृंगारचित्रे खोदलेली दिसतात. हा एक सनातन आणि अवीट मधूर असा विषय आहे. पण या विषयाच्या रेखाटनाला कलावंताची कलाशक्ती जिवंत आणि निकोप असेल आणि समरसता आणि तटस्थता यांचा कलात्मक तोल सांभाळता येत असेल तर हा विषय सुंदर रितीने मांडता येतो. कालीदासासारख्या महाकवीचे पाऊलसुद्धा अशा विषय चित्रणात कळत नकळत घसरते आणि काममीलनात त्याची प्रतिभा अतिरेकी विकृत रस घेऊ लागते. मुक्तेश्वराची अशीच अवस्था झाली आहे. शाहिरांबद्धल बोलण्याचे कारणच नाही. सर्व भावनांत रतिभावनेसारखी उन्मत आणि उत्कट भावना नाही दुसरी. दुःख आणि आनंद याची पेरणी करून मनुष्याला घडविणारी किंवा उध्वस्त करणारी ही विषय भावना साऱ्याच प्रतिभावंतांच्या लेखनाचा महत्वपूर्ण विषय बनला तर यात आश्चर्य नाही. कलात्मकतेने करणे हे एक मोठे आव्हान असते. कमला आणि मुकुंद यांचा प्रथम समागम घडल्यानंतर कमला झोपेत असतानाच तिला सोडून मुकुंदाला लढाईवर जावे लागते. कमलेच्या स्वप्नात काही भीतीदायक दृश्ये तिला दिसतात. येथे या काव्याचा शेवट झाला आहे. पण सावरकरांनी कमला आणि मुकुंद यांच्या संगमाच्या चित्रणाला उदात्त जाणीवेचा जो स्पर्श दिला आहे, त्यामुळे या कामाला एक नवीन आणि स्तिमित करणारे आहे. फुलांच्या शेजेवर भीत भीत बसणाऱ्या कमलेला उद्देशून सावरकरांमधल्या श्रेष्ठ कवीने आणि तत्वचिंतकाने जे भाष्य केले आहे ते केवळ अपूर्वच नाही तर नितांत माननीयही आहे. या तत्वचिंतनात तत्वजडता नाही, तत्वसुंदरता आहे. काव्याच्या चैतन्ययुक्त गाभ्याला या चिंतनाने अधिकच जिवंत आकर्षक बनविले आहे. जीवनाकडे रसिकतेने आणि शोधकतेने नीटपणे आणि धीटपणे पाहू शकणाऱ्या चिंतनप्रिय कवीलाच या प्रकारचे भाष्य करता येणे शक्य आहे. शृंगारात अडकलेला, लडबडलेला कवी असे 'चिंतन' कधीच करू शकणार नाही. शरीर पातळीवरचाा प्रमत्त भोग साकार करताना तात्विक पातळीवरील विवेक जेव्हा हा कवी प्रकट करतो तेव्हाच त्याच्या प्रतिभेचे रसायन साधे सोपे नसून त्यात अनेक रंग मिसळले आहेत व साऱ्या रंगांपेक्षा कवींच्या विशिष्ट व्यक्तिलाचा रंगच अधिक प्रभावी झाला आहे. याची जाणीव होऊ शकते. कवी सावरकरांनी म्हटलं आहे,
पुष्यमंचकशय्या ही बैस बैस शुभे, नभी;
चुंबिता का मधेचि तू राहती सुटूनी उभी !
बैस शेजेशी ये तू ये; स्वये जनककन्यका !
स्पर्शली जीस ती झाली रतिसेज न धन्यका !
देहधर्म कसासाची! पावने प्रकटी अजी
' ज्या रतिशेजेला तू स्पर्श करीत आहेस ती शेज सीतेनेही धन्य केली आहे. तिला तू टाळू शकत नाहीस. ही जीवनाची स्वर्गीय गंगा आहे. तो केवळ देहधर्म नाही. स्वतः परमेश्वरानेच ही जीवनगंगा तुझ्या ठायी निर्माण केली आहे म्हणून
अलिंगनामृती गोडी; पिऊनी तर तू पहा
अंगी अंगी समलिंगी, विलंब पल ना करी
की असामान्य गे देवी पल हा !
या शुद्ध नैसर्गिक क्रमप्राप्त ईश्वरी प्रेरणेतून मदन नवी पेरणी करीत असतो. हे केवळ दोन शरीराचे मीलन नव्हे. या मीलनामागे एक शक्ती उभी आहे. याच दिव्य मीलनातून उद्याचा रामचंद्र, गीतेचा कर्ता श्रीकृष्ण, एखादा बृहस्पती, एखादा महारथी भीष्म किंवा कोणी मुक्त मीरा, पार्वती जन्म घेण्याच्या क्षणाची वाट पाहात असेल. कोणी नवप्रतिभेचा नाटककार, शिल्पकार किंवा आसन्नमरण राष्ट्राला तारणारा कोणी चंद्रगुप्त, विक्रमादित्य या 'दिव्य पेरणीतून' प्रकट होण्याची वाट पाहात उभा असेल सावरकरांचे या संदर्भातले चिंतन त्यांच्याच शब्दातून वाचावे आणि रोमांचित व्हावे. ते म्हणतात.
'हिंदू छत्रपती श्रीमान शिव वीरवराग्रणी
गुरु गोविंद वा बंदा, धर्मवीर नवा कुणी
मंगलाची परा सीमा ! पेरणी तचि संभवा
घेणे असेल या दिव्या देवभूमी तुझ्यात या
जन्मजन्मांतरीचा यज्ञतप: सिद्धी फलोन्मुखा' सावरकरांच्या दृष्टीने स्त्री पुरुष संगमाचा केवढा व्यापक तात्विकअर्थ आहे हे संभोगशृंगाराचे काव्य राहात नाही. 'कमला' हे केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारणारे, अद्भूत वर्णनात रमलेले मनोरंजक, कृत्रिम काव्य वाटत नाही. अंदमानच्या अंधारलेल्या जगात स्वतःचे रंजन करून घेण्यासाठी कवीने केलेला हा काव्यमय खेळ राहात नाही. त्यात त्याने आपले स्वतःचे रस डोळसपण समर्पित, क्रांतिकारक आणि तत्वचिंतक व्यक्तिमत्व ओतले आहे. हे काव्य भोगाचे आहे. स्त्रीपुरुषाच्या मीलनाचे आहे. तारुण्याच्या आणि देहासक्तीच्या जयघोषाचे आहे यात शंकाच नाही. पण प्रेममीलनात शरीरभोगात जो एक चिरंतन महत्वाचा रस सामावला आहे यात शंकाच नाही. पण प्रेममीलनात, शरीरभोगात जो एक चिरंतन महत्वाचा रस सामावला आहे त्याचा विचार कवी अत्यंत सखलपणे करतो, भोगविचारांकडे एक सुसंस्कृत, उन्नत व सौंदर्यवादी दृष्टीने कसे पाहता येते आणि यातून नवा अधिक सुंदर अर्थ करता निर्माण करता येतो याचे हे अपवादात्मक उदाहरण आहे. सावरकरांच्या काव्याला कोठेही अश्लीलतेला थारा नाही. जे आहे ते सुभग आणि शुचिमान आहे. एका निकोप तरुण मनांत उचंबळून आलेली प्रतिभा येथे आविष्कृत झाली आहे. मराठी काव्य साहित्यात 'कमला' आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी रसिकांना सदैव प्रसन्न करीत राहील यात काय संशय?

वाड.मयाचे मूल्यमापन केवळ वाडमयीन निकषावर करण्यात अर्थ नाही. कारण वाङ्मय हे निव्वळ वाड्मय नसून त्यात समाजजीवनाचे अनेक प्रवाद मिसळलेले असतात. त्यामुळे साहित्यबाह्य करतो यांचाही विचार करावा लागतो. 'कमला' काव्यातल्या शरीरभोगाकडे अभिनव आणि रुचिर वृतीने कवी पाहू लागला म्हणून तर या काव्याला नवे परिमाण लाभले. साचेबंद प्रणयाची कथा उगाळणारी ही कविता नाही. तिच्या भोवती भोगातून निर्माण होणाऱ्या नव्या सृष्टीची जाण आहे. ही नवी निर्मिती सुद्धा कवीला आपल्या जीवन विचाराच्या संदर्भात व्हावी असे वाटते. अशी कविता स्फुरायला जीवनचिंतनाच्या खोल पाण्यात जाणीवपूर्वक बुडी मारण्याची क्षमता असावी लागते. वाङ्मयाला जीवनभाष्याची पदवी व प्रतिष्ठा यातूनच मिळते. सभोवताली अंधाराने आणि मरणाने वेढा घातला असतानाही प्रेम, तारुण्य, सौंदर्य, उपभोग, नवनिर्मिती आणि जीवन यांच्या जयजयकाराची प्रकाशमान, जिवंत कविता लिहिणारी जयिष्णू प्रतिभा मराठी सारस्वतात प्रकट झाली याचा आनंद आणिअभिमान रसिकांना सदैव वाटेल.

सावरकरांच्या हृदयातली प्रतिभा जागी झाली. तिची तार छेडली गेली. एक प्रेमधुंद लयकारी उमटली, फुलबागेतल्या फुलांचा सुगंध वाऱ्याबरोबर वाहत यावा, त्याप्रमाणे या कवीच्या जीवनासक्त मनात उत्कटपणे भोगलेल्या प्रीतीचा सुवास दरवळू लागला. त्या सुवासात अंक आगळी जादू होती. कारण आता यमयातना देणारी ती अंदमानाची राक्षसी कोठडी उरली नव्हती. पायातल्या साखददंडाचेही फुले झाली होती. आजूबाजूच्या रुक्ष वातावरणाला शृंगाराचे संगीत आठवु लागले. सावरकरांच्या ताज्या तरुण संगमोत्सुक हृदयाच्या सतारीवर उन्मत शृंगाराची सजावट, सुरावट उचंबळून येऊ लागली. सापडलेले हे सूर आणि शब्द कोठेतरी गुंफले पाहिजेत. शब्द कोठेतरी लिहिले पाहिजेत. कवी इकडे तिकडे पाहू लागला. त्या भयाण तुरुंगातली ती उदास कोठडी विषण्ण आणि जड झालेली वर्षानुवर्ष नैराश्याची ओझे घेऊन उभी होती. कोठडीच्या जाडजुड काळसर भिंती कशाने कुणास ठावूक काळवंडून गेल्या होत्या. उंचावरील एका लहानशा झरोक्यातून एकच चुकार किरण त्या धुरकट भिंतीवर रेंगाळत होता. सावरकरांच्या दृष्टीसमोर किशोरावस्था आणि यौवन यांच्या संधिप्रकाशात उभी असलेली 'कमला' दिसू लागली. त्या कोवळ्या तरुणांच्या अंगोपांगावर निसर्ग आपली मोहक जादू एका अदृष्य कुंचल्याने चितारीत होता. कोठडीत डांबला गेलेला हा कवी तिच्या फुलल्या देहसौंदर्यात प्रेमिकाच्या आणि कवीच्या धुंददृष्टीने पाहात होता. कमलेच्या नवतारुण्याचे चांदणे तिच्या गात्रागात्रात कसे खेळते आहे याचे चित्र आपण रेखाटले पाहिजे. सौंदर्याची आणि यौवनाची ही मूर्ती आपण आपल्या शब्दातून मूर्त केली पाहिजे. या तीव्र जाणीवेने नवे शब्द प्रकट होऊ लागले. शृंगार, प्रेम रसिकता यांनी रसरसलेली कविता आकार घेऊ लागली. प्रणयोन्मदाची मदिरा प्यालेले रसिक शब्द या भयाण अंधार कोठडीत गात गात अवतीर्ण झाले.

'कमला' खंडकाव्य वाचताना आपल्याभोवती एक धुंद वातावरण तयार होते. पण तुरुंगाच्या निर्देश, रुक्षकोठडीत लिहली गेलेली शृंगाररसाची ही सळसळती अक्षरे आहेत याची जाणीव मनाला होत राहते. ही पार्श्वभूमीही रोमांचक आहे. मराठीतील ही प्रेममदिर कविता एका जहाल क्रांतीकारकाने घायपाताच्या काट्याने बंदिखानातल्या अंधारकोठडीच्या भिंतीवर खरडून लिहली केवढी विलक्षण घटना आहे. 'कमला' विसरणे शक्यच नाही.

- हरीशकेंची.
'अक्षर' ४६, विणकर सोसायटी,
पद्मावती, पुणे ४११०४३
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...