Sunday 17 October 2021

राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेनं सीमोल्लंघन...!

"एका राज्यस्तरीय वृत्तपत्रातून दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकारानं आपल्या साप्ताहिक सदरातून उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून दोन वर्षातली वाटचाल ही देशाचं नेतृत्व करण्यासाठी कसं योग्य ठरतंय याचं विश्लेषण केलंय. त्यामुळं शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष होतं. उद्धव यांनी शिवसैनिकांनी हवं असलेलं जसं भाषण केलं अगदी तसंच सहकारी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर भाजप विरोधकांना अपेक्षित असं घणाघाती, आक्रमक आणि तुफानी भाषण केलं. राज्यातले प्रश्न, राष्ट्रीय प्रश्न, हिंदुत्व, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप या साऱ्याचा त्यांनी समाचार घेतला. मेळाव्यातील भाषणाच्या माध्यमातून थेट भाजपच्या विरोधात एल्गार पुकारला. भाजपनं कोणत्याही पद्धतीनं हल्ले करण्याचा प्रयत्न केला तरी त्याची पर्वा न करता, अंगावर येणाऱ्याला सोडणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळालं! शिवाय त्यांचं हे भाषण राष्ट्रीय नेतृत्वाच्या दिशेनं केलेलं सीमोल्लंघन ठरणारं ठरलंय!"
-----------------------------------------

*शि* वसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भाषणाच्या माध्यमातून भाजपवर हल्ला करताना, हिंदुत्व, केंद्राचा हस्तक्षेप, केंद्रीय संस्थांचा गैरवार अशा अनेक मुद्द्यांना हात घालत अत्यंत परखडपणे मुद्दे मांडले. राज्यात प्राप्तीकर विभागाच्या कारवाया आणि गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहाता उद्धव ठाकरे नेमके काय बोलणार याकडं सगळ्याचंच लक्ष लागलं होतं. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या निमित्तानं यावेळी केलेलं भाषण हे अत्यंत आक्रमक होतं. उद्धव ठाकरे यांचं भाषण हे सर्व समावेशक आणि सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेलं होतं. चिरडून टाकू, जागेवर ठेचू अशी शिवसेनेची किंवा ठाकरी भाषा वापरून त्यांनी, अत्यंत थेटपणे मुद्दे मांडले. तर, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आजवर न दिसलेला आत्मविश्वास दिसून आला. सरकारला दोन वर्ष झाल्यानंतर हा आत्मविश्वास मुख्यमंत्र्यांमध्ये पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी चिपी विमानतळ उद्घाटनाच्या भाषणात असा आत्मविश्वास होता आणि तो दसरा मेळाव्याच्या भाषणात पुन्हा दिसला. सत्ता आणि सत्तेला धोका नसल्याच्या निश्चिंततेमधून हा आत्मविश्वास दिसून येत आहे. राज्यातल्या छापेमारीच्या सत्रानंतर उद्धव ठाकरे दबावात येणार का? अशा चर्चा सुरू होत्या. पण कितीही दबाव आला तरी उद्धव ठाकरे आता भाजपबरोबर जाणार नाही हे आजच्या त्यांच्या भाषणावरून दिसून आलं. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून, शिवसेनेवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आरोप झाले आहेत. मात्र उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही, हे जाणीवपूर्वक ठसवण्याचा प्रयत्न या भाषणाद्वारे केला. झुंडबळी आणि इतर घटनांचे दाखले देत अशा प्रकारचं 'नवहिंदुत्व' आमचं नसून, सर्वांना सामावून घेणारं असं शिवसेनेचं हिंदुत्व आहे. तर, भाजपसारखं हिंदुत्वाचं राजकारण करणार नाही, हे उद्धव ठाकरेंनी भाषणातून ठासून सांगितलं. शिवसेना आता पूर्वीसारखं काही करत नाही. उलटं कोरोनाच्या काळात विरोध पत्करुन ठाकरे यांनी मंदिरं बंद ठेवली. पण तसं असलं, तरी हेच सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं हिंदुत्व असल्याचं ठाकरे यांनी भाषणातून मांडलं. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप देशभरात मुस्लीम विरुद्ध हिंदु असं वातावरण करुन ध्रुवीकरणाचा प्रयत्न करत आहे. मात्र हिंदुत्व म्हणजे मुस्लीम विरोध नाही. तर भाजपचं हिंदुत्व आणि आपलं हिंदुत्व वेगळं असल्याचं सांगण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे यांनी भाषणातून भाजपला थेट आव्हान दिलं असलं तरी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक यांच्याशी संबंध चांगले राहतील याचा प्रयत्नही त्यांनी केला. शिवसेनेला बरोबर घ्यावं अशी संघाची सुरुवातीपासूनची इच्छा होती. त्यामुळं संघाची सहानुभूती कायम राहावी, यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाषणातून प्रयत्न केल्याचं दिसून आलं. मोहन भागवत, संघ, सावरकर हे त्यांना भाजपशी जोडणारे मुद्दे आहेत. भविष्यात कधीही ते पुन्हा याद्वारे एकत्र जोडू शकतात, त्यामुळं त्यांना हा पूल कायम ठेवायचा आहे. केंद्रानं कितीही धमक्या दिल्या तरी आम्ही अजिबात वाकणार नाही. पश्चिम बंगालचं उदाहरण समोर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला करायचं आहे, असं सांगत उद्धव ठाकरेंनी स्पष्ट संदेश दिला. सीबीआय, ईडीकडून होणारा त्रास, त्यात कुटुंबीयांना गोवणं अशा प्रकारांना भीक घालणार नसल्याचे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच हर्षवर्धन पाटलांचा उल्लेख करत त्यांनी, अशा प्रकारांनी झुकणार नसल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं. भारतीय जनता पार्टीकडून स्थानिक आणि केंद्रीय अशा दोन्ही पातळ्यांवर होणाऱ्या उपद्रवाला उद्धव ठाकरे यांनी थेट आव्हान दिलं आहे. आजवर एवढं थेट आव्हान त्यांनी दिलं नव्हतं. मात्र आता कोणत्याही लढ्याला तयार असल्याची भूमिका उद्धव यांनी मांडली. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात ठामपणे लढायचं
 आहे, असा संदेशच या मेळाव्याच्या माध्यमातून दिला. संजय राऊत हे त्यांच्या वक्तव्यांमध्ये सातत्यानं उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतील असं म्हणत आहेत. शरद पवार सध्या केंद्रीय स्तरावर स्पर्धेत नाहीत. ममता बॅनर्जी, राहुल गांधी यांच्याबरोबर शरद पवार हे कदाचित उद्धव ठाकरेंना विरोधी आघाडीमध्ये चेहरा बनवण्याचा प्रयत्न करतील. त्यादृष्टीनं उद्धव ठाकरे यांची तयारी भाषणातही दिसून आली. ठाकरे यांनी भाषणात अनेक राष्ट्रीय राजकारणात मुद्द्यांचा उल्लेख केला. उत्तर प्रदेश, शेतकरी आंदोलन यांचा समावेश होता. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या भाषणाचा त्यादृष्टीनंही विचार करणं गरजेचं मांडलं. राज्यांमध्ये केंद्राकडून दुजाभाव केला जात आहे. केवळ गुजरातला महत्त्व दिलं जात आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय मुद्देही जोरकसपणे मांडले. राष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवण्यासाठी किंवा तसं महत्त्वं वाढण्यासाठी शिवसेनेची शक्ती उभी करावी लागेल. लोकसभेमध्ये शिवसेनेला स्वतंत्र लढल्यास मोठ्या प्रमाणावर जागा मिळणं कठीण आहे. राष्ट्रीय पातळीवर स्थान मिळवण्यासाठी ममता बॅनर्जींसारखी ताकद जागांच्या रुपात शिवसेनेकडं जिंकाव्या लागतील. ममता बॅनर्जी ज्या आक्रमकतेनं भाजपच्या विरोधात उभ्या राहिल्या, तीच भूमिका घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचं या भाषणातून जाणवलं आहे. ज्या पद्धतीनं केंद्रीय तपास संस्थांच्या कारवाईला ममतांनी राज्यातील संस्थांच्या माध्यमातून कारवाई करत उत्तर दिलं. तसा राज्यातील संस्थाचा वापर महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या विरोधात होणार का? हा प्रश्न आहे, आजच्या भाषणातून तसे संकेत मिळाले आहेत. या सर्वाचा विचार करता, आगामी काळात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा भाजप विरुद्धचा संघर्ष अधिक तीव्र असेल हे स्पष्ट आहे. फक्त जे पश्चिम बंगालमध्ये घडलं तसं इथं होणार का, हे यातून पाहावं लागेल.

विजयादशमीच्या दसरा मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, "मी मुख्यमंत्री आहे असं वाटू नये तर कुटुंबातील सदस्य आहे. पदं येतील सत्ता येईल आणि जाईल. अहमपणा डोक्यात जाऊ देऊ नकोस हा माझ्यावर संस्कार आहे. आपला आशिर्वाद हीच माझी ताकद. माझं भाषण संपण्याची काही जण वाट बघताहेत. त्याची चिरकायची सवय ही राजकारणात अलिकडं आलेली विकृती आहे. त्यांना ती रोजगार हमी वाटते. हर्षवर्धन पाटील बोललेत भाजपात का गेलो? आमच्यामागचा चौकशीचा ससेमिरा सुटला.अशी लोक भाजपाची ब्रँड अँबेसेडर व्हायला हवीत. आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही मात्र आले तर सोडत नाही. आमच्यावर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून येऊ नका. समोरासमोर या. हे मर्दाचे हिंदुत्वाचे लक्षण नाही. शिवसैनिकांनी बंगालसारखं लढण्याची तयारी ठेवायला हवी. हिंदुत्व आता धोक्यात आलीय. इंग्रजांची निती वापरून भेद केला जातोय. शिवसेनाप्रमुखांचा मराठी माणूस म्हणून एकत्र या. मराठी-अमराठी असा भेद होऊ देऊ नका. मराठा तितुका मेळवावा, हिंदुत्व वाढवावा. आपले आणि संघाचे विचार एकच मार्ग वेगळे आहेत. 'अजूनही मला मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतंय' असं म्हणणाऱ्या विरोधीपक्षनेत्याला टोलवताना त्यांनी म्हटलं की, शिवसेनेला दिलेले वचन मोडलं नसतं तर तुम्ही पण मुख्यमंत्री राहिला असता. शिवसेनाप्रमुखांचे वचन म्हणून जबाबदारी घेतली. शिवसैनिकाला मुख्यमंत्री पदावर बसवेलच. हे माझे क्षेत्र नाही. झोळी वगैरे कर्मदरिद्री विचार आपले नाही. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीय आहे. घराबाहेर देश प्रथम मग बाकी सगळं. भागवत भाषणांचे २०२० व २०२१ चे संदर्भ त्यांनी दिले. आपले पूर्वज एक होते हे जर मान्य असेल तर विरोधी पक्ष, आंदोलन करणारे शेतकऱ्यांचे पूर्वज परग्रहावरुन आलेत का? हे मोहनजींना, जनतेला मान्य आहे का? सत्तेसाठी संघर्ष नको असं भागवत म्हणतात मग सध्या जे काही सुरू आहे? तुमच्या लोकांची शिकवणी लावा. सत्तेचं व्यसन हा अंमली पदार्थ आहे. अनेक प्रयत्न करूनही सरकार पाडण्याचं झालं नाही. दोन वर्ष झाले आता. छापा टाकून काटा काढायचा हे प्रकार जास्त चालू शकणार नाही. देशाचा अमृत महोत्सव. महाराष्ट्र, पंजाब, बंगाल त्यावेळी समोर. ममतांचे आजच्या संघर्षासाठी अभिनंदन. ९२-९३ साली शिवसेना होती म्हणून आजतुम्ही आहात असा टोला त्यांनी भाजपला लगावला. केंद्रिय गृहमंत्रालयाने सांगितले हिंदुत्वाला धोका नाही. आजच्या सत्ताधीशांमुळे हिंदुत्व धोक्यात आहे. सावरकर-गांधी कधी वाचलेत का? जर हिंदुत्वाला धोका होतो तेव्हा फक्त एकमेव हिंदुह्दयसम्राट उभे होते. शिवसेनाप्रमुखांनी बाबरी पाडल्यावर सुध्दा गर्व से कहो हम हिंदू है म्हणाले. बाकीचे थरथरत होते. दंगलीत एका महिलेचा दंगलखोरांनी केलेले हाल कथन शिवसैनिकांनी मदत केली. तुमची पालखी वाहत नाही म्हणून आरोप करता आहात. आम्ही हिंदुत्वाचे, भारतमातेचे भोई आहोत. वाईट काळात तुम्हाला शिवसेना चालली आता हर्षवर्धन पाटील चालतात. कुटुंबावर, सदस्यांवर टीका हे हिंदुत्व नाही तर षंढपणा आहे. दोन्ही पोटनिवडणुकीत जगातल्या मोठा पक्षाकडे उपरे उमेदवार. शिवसेनेचे काम दाखवणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. एकनाथ शिंदेंना धन्यवाद दिले, कारण ठाणेकरांनी ९ दिवस रक्तदान केले ही समाजसेवा इतर कुठल्याच पक्षाकडे नाही. रक्तदानात भेदभाव नाही. विक्रमी शिबीर ठाण्यात झालंय. विधिमंडळाचे अधिवेशन बोलवा या राज्यपालांच्या पत्राचा समाचार त्यांनी घेतला. आम्हाला माता भगिनींचा सन्मान करायला शिकवावं लागत माजी ते तर आमच्या रक्तात आहे. बलात्कार करणाऱ्याला फासावर लटकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. राज्यपालांना दिलेल्या उत्तराचे समर्थन केलं. कायदा कडक शासन सगळं करतोहोत. मात्र देशात घडू नये यासाठी काय करणार मोदींना अधिवेशन घ्यायला सांगितले आहे का असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्रात काही घडले की गळे काढायचे. उत्तर प्रदेशात काय सुरु आहे. २६ नोव्हेंबर ज्यांनी बलिदान केले त्या खात्याला माफीया म्हणणे चूक. काहींच्या घरी २४ तास शिमगा. उत्तरप्रदेशातचे पोलीस काय भारतरत्न आहेत. महाराष्ट्र सत्तेला नव्हे सत्याला जगणारा आहे. सावरकर-गांधी चिरकुट वाद घालणाऱ्यांनी देशासाठी काय केलं? स्वातंत्र्य काळात यांचं योगदान नाही. तुम्ही ७५ वर्षात देशात काय केलं. नुसती रोषणाई करायची? या वर्षी काही बाबतीत उघडपणे चर्चा होणे गरजेचे आहे. महिला अत्याचार, संघराज्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी केंद्र व राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले आहेत. आणीबाणी, परकीय आक्रमण व विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभारात केंद्राची लुडबूड होता कामा नये. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी हे प्रयत्न बंद करावे. भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी आहे. परंतु समानतेच्या हिंदुत्वाची शिवसैनिकांना शिकवण. सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे. केंद्रिय मंत्री सोनवालचा निधी गुजरातला वळवण्याचा फतवा. माहिती अधिकारात अनेक गैरप्रकार उघड. जणू काही संपूर्ण जगात महाराष्ट्रात गांजा चरसचा व्यापार सुरु आहे असे एक चित्र उभे करायचे. मुंद्रा अदानी बंदर कुठे येते? दहा ग्रॅम शोधणारे यांनी लक्षात घ्यावे.महाराष्ट्रात दीडशे कोटी पोलीसांनी जप्त. केला. कॅगचे ताशेरे गुजरात निधी बाबत. दहा हजार कोटी अतिवृष्टी साठी दिले. कोविडसाठी निधी यांचा केंद्राकडे. केवळ टीका म्हणून नाही. आपल्या देशात युवा शक्ती मोठी. त्यांच्या रिकाम्या हाताला काम नाही. तरुण गुन्ह्याकडे का वळतोय? व्यवस्थित ही शक्ती घडवावी लागेल नुसत सत्ता हवी म्हणून होणार नाही अगोदर चूल पेटवा. चीन मधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न करणार. महाराष्ट्रची प्रतिमा मलिन करु नका. मराठी भाषा भवन उभे राहणार. संभाजीनगरला संतपीठ. मराठी नाटकाचा इतिहास सांगणारे रंगभूमी दालन, मत्सालय, लष्कराचे संग्राहलय उभे करणार. लढाई न बघितल्याने स्वातंत्र्याबाबत विस्मरण. सैनिक विपरित हवामानात पहारे देतात. दालनात सैनिक पहारा देतात ते वातावरण अनुभवायला मिळेल. लढ्यात सहभागी नव्हता निदान संग्राहलयात तरी सहभागी व्हा. हिंदुत्व आता खरे धोक्यात. म्हणून बंगाल प्रमाणे तुमची तयारी आहे? ( त्याला श्रोत्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. मराठी म्हणून एक व्हा मराठा तितुका मेळवावा प्रमाणे हिंदुत्व सुध्दा वाढवा! असं ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे शिवसेनेचा जुना बाज बदलून वेगळा पेहराव देत सुरु झालेली वाटचाल आणि मग येणारी सत्ता. सत्तेतील तीन पायांची शर्यत. नेटाने तोल साधत सुरु असलेला प्रवास. मुख्यमंत्रीपदानंतर सुरु झालेल्या असंख्य आरोपांना, विरोधकांना सतत जबाब देणं नाही. स्लेजींग होत असतानाही पीचवर शांततेत आपली खेळी सुरु ठेवण्याचे कसब. सौम्य प्रकृती आणि टायमिंग ला क्वचित ठाकरी टोला. लगेच व्यक्त न होणे हा राजकारणात दुर्लभ होत जाणारा गुण! त्यात राजकीय नेत्याला न शोभणारी कार्यशैली, वहिवाट नसलेली शैली म्हणून न शोभणारी म्हटलंय, हे सगळं घेत गांभीर्याने मार्ग काढणारे नेतृत्व, कोरोना, येऊन गेलेले 'निसर्ग' आणि 'तौक्ते ' वादळ, सध्याची पूरस्थिती आणि रोज राजकीय पटलावर उठणाऱ्या सर्व वादळांचा तेवढ्याच खंबीरतेने राज्याचे प्रमुख म्हणून सामोरं जाणं. राज्याच्या राजकारणात गंभीर पक्ष आणि प्रगल्भ नेतृत्त्व म्हणून ठाकरे पुढे आले, महाराष्ट्राच्या मनातही जो विचार येऊ शकला नाही, असा राजकीय पट मांडून वेगळा डाव रंगवला. उध्दव ठाकरे पूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी आणि काही जवळचे स्नेही सोडले तर इतरांच्या संपर्कात कधीच आले नाहीत. त्यामुळं अनेकांना त्यांचं नेमकं व्यक्तिमत्व ठाऊक नाही. म्हणून अनेक पत्रकार संपादक राजकीय विश्लेषक त्यांना कमी लेखतात. ते यापूर्वी कधी मंत्रालय किंवा विधिमंडळात न आल्याने इतर पक्षातल्या नेत्यांशी सुद्धा त्यांचे फारसे संबंध नव्हते त्यामुळं इतर राजकारणी देखील त्यांना कमी लेखायचे. राज ठाकरे त्या उलट आहेत. इतर पक्षातले मित्र देखील आहेत आणि अधून मधून विविध पत्रकार संपादक विश्लेषक वरिष्ठ पोलिस अधिकारी यांना पार्ट्या देऊन त्यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारत या सगळ्यांना मर्जीत ठेवतात. त्यामुळं राज वर लिहिलेल्या अनेकांचे लाडके आहेत. त्यामुळं राज यांच्या आक्रमक स्वभावा समोर उध्दव यांचा शांत मृदू स्वभाव ठेऊन राज कसे भारी आहेत हे बिंबवण्याचा आटोकाट प्रयत्न ही मंडळी करत असतात. खांडेकर त्यातलाच आहे. उध्दव ठाकरे नी तर त्याला फाट्यावर मारलंय. मुख्य म्हणजे त्यांनी या सगळ्या चॅनल्स ना मुलाखती देणं बंद केलंय आणि संजय राऊत जी मुलाखत घेतात तीच प्रसारित करायला लावली जाते त्यामुळं बऱ्याच संपादकांची जळली आहे. मला वाटतं एबीपी ला शेवटची मुलाखत त्यांनी माझा कट्टा वर दिली होती जेव्हा ते फोटोग्राफी प्रदर्शनातून शेतकरी मदत निधी जमवणार होते. एका चांगल्या कामाचा प्रसार व्हावा म्हणून ती मुलाखत दिली नंतर त्यांनी एबीपी कडे ढुंकूनही बघितले नाही. नेहमी सेने बद्दल उद्धवजी आदित्य बद्दल उलट सुलट खोट्या बातम्यांच्या कंड्या पिकवत राहतात तरी यांच्यावर त्याचा परिणाम होत नाही. मग शेवटचा उपाय म्हणून अधून मधून ना
नारायण राणे, नीलेश, नितेश, संदीप देशपांडे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, त्यांची पिलावळ दरेकर, लाड, वाघ, शेलार, भातखळकर, पडळकर वगैरे लोकांचे गलिच्छ टीकात्मक बाईट्स किंवा मुलाखती प्रसारित करतात तरीही ठाकरे पिता पुत्रांचा संयम सुटत नाही. म्हणून यांची जास्त चरफड होत आहे. उध्दव ठाकरेंना समजून घेण्याची यांची लायकी नाही, तेवढी बौध्दिक पात्रता समज यांना नाही. आज राणे राज ची अवस्था सगळ्यांना माहीत आहे. गणेश नाईक ही त्याच अवस्थेत आहे. आणि फडणवीस यांची तशी अवस्था व्हायला सुरुवात झालेली आहे. फडणवीस यांनी केवळ सत्तेच्या जीवावर स्वतःचा कृत्रिम प्रभाव व दहशत निर्माण केली होती गेली पाच वर्ष. सत्ता जाताच त्यांचा खरा प्रभाव काय आहे ते दिसत आहे सगळ्यांना. निवडणुकीच्या निकाला पर्यंत उध्दव आदित्य यांच्यावर अतिशय शेलक्या भाषेत टीका करणारे काँग्रेस एनसीपी वाले कार्यकर्ते, काही तटस्थ सामाजिक कार्यकर्ते देखील आता फॅन झालेत त्यांचे, आणि त्यांचं कौतुक करताना थकत नाहीत इथेच ते जिंकलेत. जयंत पाटील, थोरात सारख्या वरिष्ठ मंत्र्यांनीही मान्य केलं की इतकी वर्ष त्यांच्याशी संपर्क नसल्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वा विषयी गैरसमज होते कारण माध्यमांमधून जी इमेज बनवली जायची त्या आधारे त्यांच्या विषयी मत बनवलं जायचं पण प्रत्यक्ष त्यांच्या सोबत काम करतानाचा अनुभव खूप चांगला आहे. हे मंत्री उद्धवजी बद्दल अनभिज्ञ होते या वरून आणखी एक खात्री पटते की यांच्या १५ वर्षांच्या काळात त्यांनी कधीही स्वतःच्या खासगी कामासाठी या मंत्र्यांना संपर्क केला नसावा. अयोध्या दौऱ्यात काँग्रेसचे सुनील केदार व राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ कधी प्रकट झाले ते देखील कळलं नाही आणि त्यामुळं भाजपच्या टीकेतली हवाच निघून गेली. मुख्य म्हणजे माय नेम इज खान च्या वेळी आणि राहुल च्या मुंबई दौऱ्यावेळी शिवसैनिकांना सत्तेचा माज दाखवत त्यांच्यावर पोलिस कारवाई करणारे अशोक चव्हाण आज सीएम साहेब सीएम साहेब म्हणत उद्धवजींच्या अवती भोवती दिसतात. आणि फडणवीसांना मित्र मित्र म्हणत रोज त्यांची मजा घेतली जाते.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...