Saturday 9 October 2021

मुंद्रा बंदर आणि अदानी...!

"शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी अटक झाल्याची ब्रेकिंग न्यूज चालवणाऱ्या मीडियाला मुंद्रा अदानी पोर्टवर सापडलेल्या ३ हजार किलो ड्रग्ज प्रकरण गंभीर वाटत नाही का? आर्यन खान कुणाचाही मुलगा असला तरी त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. मुळात देशात ड्रग्ज येते कुठून यावर चर्चा का होत नाही, ड्रग्जची तस्करी रोखण्यात सरकार कमी पडतंय का असा सवाल मीडिया का विचारत नाहीत? देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा सुरक्षित नाहीत का? छोट्या माश्यांवर कारवाई करणारी एनसीबी मुंद्रा अदानी पोर्टमध्ये सापडलेल्या २१ हजार कोटींच्या ड्रग्जबद्धल चकार शब्दही का काढत नाही? इम्पोर्ट एक्सपोर्ट होणाऱ्या मुख्य ठिकाणावर अशी एकाधिकारशाही चुकीची आहे हा विषय साधा सोपा सरळ नाही. हा देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर विषय आहे. गेल्या वर्षी सुशांत सिंह प्रकरणात रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ यांचे ड्रग कनेक्शन समोर आले होते तेव्हा मीडियाचा उत्साह पाहण्यासारखा होता. एक मनोरुग्ण टीव्ही अँकर तर "मुझे ड्रग दो,मुझे ड्रग दो" असे बोंबलत होता. आता या सर्वांचे तोंड बंद आहे. हे असेच चालू राहिले तरी याची मोठी किंमत देशाला चुकवावी लागेल. रक्तात फक्त व्यापार असण देशासाठी फार धोकादायक असतं!"
---------------------------------------------------------

१३ सप्टेंबर रोजी 'मुंद्रा अदानी पोर्ट' वर विजयवाडा इथल्या 'आशी ट्रेडिंग कंपनी'च्या नावे 'सेमी प्रोसेस्ड स्टोन टाल्कम पावडर'चे म्हणजेच मॅग्नेशियम सिलिकेट पावडर चे कंटेनर आले होते. २ कंटेनरमधून ३ हजार किलो हेरॉईन सापडलं. इराणच्या अब्बास बंदरातून 'टाल्कम पावडर'च्या इतर कनसाईनमेंट सोबत हे हेरॉईन 'इंटर सिडनी' नावाच्या जहाजातून मुंद्रा पोर्ट इथं पाठवण्यात आलं होतं. हे हेरॉईन मागवणाऱ्या माच्छावरम सुधाकर आणि त्याची पत्नी गोविंदराजू दुर्गापूर्ण वैशाली या चेन्नईच्या दाम्पत्याची धरपकड करण्यात आलीय. हा साठा अफगाणिस्तानमधल्या कंदहार इथल्या हसन हुसेन लिमिटेड कंपनीकडून पाठवण्यात आलं होतं. या प्रकरणाशी पाकिस्तानी आयएसआय आणि तालिबान यांचंही कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलंय. यापूर्वीही हसन हुसेन लिमिटेडनं जुनमध्येही असंच एक कँसाईनमेंट पाठवलं होतं आणि त्याची डिलिव्हरीही झाली होती. तो साठाही विजयवाडातल्या आशी ट्रेडिंग कंपनीनेच मागवला होता. या प्रकरणात ४ अफगाणी नागरिक, उझबेकिस्तानचा एक, चेन्नईतल्या या दाम्पत्यासह तीन असे आठजणांची धरपकड करण्यात आलीय. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील 'मुंद्रा पोर्ट' हे एक खासगी पोर्ट-बंदर असून ते एक स्पेशल 'इकॉनॉमिक झोन' आहे. सध्या ते भारतातलं सगळ्यात मोठं 'कंटेनर बंदर' असून त्याची 'कार्गो' क्षमता १४५० लाख टन इतकी आहे. तर कंटेनर व्हॅल्यूम ५६ लाख ५० हजार इतकी आहे. १९९८ मध्ये सुरू झालेल्या या बंदरात १० टर्मिनल आणि २४ बर्थ आहेत. पूर्वी 'गुजरात अदानी मुंद्रा पोर्ट' या अदानी समूहाच्याच 'सबसिडियरी कंपनी'कडे या बंदराचं व्यवस्थापन होतं. २०१२ मध्ये 'अदानी पोर्टस अँड एसईझेड लिमिटेड' ही कंपनी स्थापन करून बंदराचं व्यवस्थापन तिच्याकडं सोपवण्यात आलं. सध्या गौतमी अदानी यांचे पुत्र करण अदानी हे या कंपनीचे 'सीईओ' आहेत. मुंद्रा 'स्पेशल इकॉनॉमिक झोन' मध्ये 'कोल फायर पॉवर स्टेशन' आणि 'अदानी विलमर पाम ऑईल रिफायनरी' सारखे प्रकल्प आहेत. या बंदराचा बांधकामाच्या वेळी कांदळवन नष्ट करणं, खाडीच्या मार्गात अडथळा आणणं आणि मोठ्या प्रमाणावर पर्यावरण नियमांचं उल्लंघन यासारखे अनेक दोषारोप Apsez कंपनीवर केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने तयार केलेल्या समितीने केले होते. Apsez कंपनीकडं सध्या मुंद्रा, टूना, दाहेज, आणि हाजीरा ही सर्व गुजरातमधली, मडगाव- गोवा, विंझिजम-केरळ, कातूपल्ली आणि एंनोर हे तामिळनाडूतलं, विझग-आंध्रप्रदेश, धामरा-ओडीसा, दिघी-महाराष्ट्र, कृष्णपट्टणम अशी बारा बंदरं आहेत. १५ हजार एकर इंडस्ट्रीय जमीन आणि ४ लाख चौरस फूट वेअरहाऊस जागा कंपनीकडे आहे.

अंमली पदार्थांचा एवढा मोठा साठा मुंद्रा बंदरात उतरुनही बंदराच्या अधिकाऱ्यांना त्याचा सुगावा कसा लागला नाही? मुंद्रा बंदराचं व्यवस्थापन अदानी समूहाकडं आहे. खूप टीका झाल्यावर Apsez नं खुलासा केलाय की, कंटेनर तपासण्याचं काम आमचं नाही ते काम कस्टमचं आहे. अदानी समूहानं हात झटकले असतील तरी न्यायालयानं जाब विचारलाय. यात संशयास्पद बाब ही की, टाल्कम स्टोन पावडर चे हे कंटेनर अफगाणिस्तानमधून आलं होतं. पण जगात सर्वात मोठे टाल्कम स्टोन पावडरचे निर्यातदार चीन आणि ब्राझील आहेत, शिवाय विजयवाडाच्या सत्यनारायणपुरम इथं ऑफिस असलेल्या कंपनीनं मागावलेला हा माल गुजरातच्या बंदरात उतरवण्याचं कारण काय? आंध्रप्रदेशतल्या विशाखापट्टणम किंवा तामिळनाडूच्या चेन्नईला का नाही मागवलं?
एवढ्या मोठ्या किंमतीचे ड्रग्ज एकाचवेळी पाठवण्याची हिंमत केली जाते याचा अर्थ यामागे मोठे नियोजन आणि पोर्टमधील कुणाची तरी मदत असल्याशिवाय ते शक्य नाही. दुसरीकडे गुजरातमधील कोर्टानेही या ड्रग्ज प्रकरणात मुंद्रा अदानी पोर्टच्या व्यवस्थापनाला यामध्ये काही फायदा मिळाला का याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एवढे सगळे असूनही मीडियाने सुमारे २१ हजार कोटींच्या ३ हजार किलो ड्रग्जच्या तस्करी प्रकरणाकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते.
एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या जप्तीच्या कारवाईवर ना पंतप्रधानांनी गुप्तचर यंत्रणेचे कौतुके केले ना केंद्रीय गृहमंत्र्यांनी कौतुक केले. सुमारे तीन हजार किलो ड्रग्ज जप्त झाले आहे. हे तीन हजार किलो ड्रग्ज सुमारे ७५ लाख ते १ कोटी लोकांनी सेवन केले असते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. याचाच अर्थ एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक ड्रग्जच्या आहारी गेले आहेत. पण यावर ना मोदी सरकार काही बोलतंय; ना भाजपचे नेते काही बोलतायत; ना मीडिया! अंमली पदार्थांची तस्करी भारतासाठी नवी नाही त्यात भारत अमली पदार्थांच्या तस्करीच्या दोन मोठ्या मार्गांच्या मधोमध आहे. एका बाजूला इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दुसऱ्या बाजूला थायलंड, म्यानमार आणि लाओस नेमका मध्यभागी भारत आहे. गोल्डन क्रेसेंट आणि गोल्डन ट्रँगल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भागातून भारतात ड्रग चा मोठा साठा येतो आणि तिथून तो आफ्रिका युरोप आणि अमेरिकेतील देशात पाठवला जातो त्यामुळे भारत हा जागतिक ट्रक बिजनेस चा ट्रान्झिट पॉईंट बनलाय आपल्या सुरक्षा एजन्सिजकडून खूप प्रयत्न करूनही अमली पदार्थांचा मोठा साठा भारतात घुसवण्यात येतो आपल्याकडील फॅक्टरीजमधून त्यावर प्रोसेसिंग केलं जातं नंतर हा साठा देशाबाहेर पाठवला जातो हे सगळं अनेक वर्षापासून अत्यंत सुनियोजितपणे चालू आहे.

गुजरातच्या कच्छमधल्या मुंद्रा बंदरामध्ये हेरॉईनची आतापर्यंतची सर्वात मोठी तस्करी जप्त करण्यात आली. अफगाणिस्तानमधून आयात करण्यात आलेलं तब्बल ३ टन हेरॉईन हे जवळपास २१ हजार कोटी रुपयांचं आहे. आणि विशेष म्हणजे या बंदराचे संपूर्ण व्यवस्थापन अदानी समूहाकडं आहे. तेव्हापासूनच हे औद्योगिक बंदर चांगलचं चर्चेत आलं आहे. या गोष्टीची सुरूवात होते ८० च्या दशकामधील. वडिलांना बिझनेसमध्ये मदत न करता शिक्षण अर्ध्यात सोडून गौतम अदानी यांनी मुंबई गाठली. यावेळी त्यांचे वय १८ वर्षे होते. याकाळात ते लोकलमध्ये काही छोट्या वस्तूंची विक्री करायचे. पुढे हिर्‍याच्या व्यवसायात उतरले. वयाच्या अवघ्या २० वर्षी अदानींनी मुंबईत स्वत:चा डायमंड ब्रोकरेजचा बिझनेस सुरु केला होता. पण पुढे आपल्या मोठ्या भावाच्या आग्रहावरून गौतम अदानी पुन्हा गांधीधामला परत आले. तिथे त्यांनी प्लास्टिक फॅक्टरीत काम करायला सुरुवात केली. पण त्या व्यवसायावर खूप मर्यादा होत्या. त्यावेळी अदानींना महिन्याला २० टन पीव्हीसीची गरज होती. पण त्यावेळी भारताचं पेट्रोकेमिकल महामंडळ हे पीव्हीसीचं एकमेव निर्यातदार होते आणि ते एकावेळी केवळ २ टनापर्यंतच निर्यात करत होते. अदानी यांनी इथली संधी ओळखली आणि १९८८ मध्ये कांडलामार्गे स्वतः प्लॅस्टिकच्या आयातीला सुरूवात केली. ‘कुछ नया करते हैं’ असं सातत्यानं म्हणत गौतम अदानी आव्हान स्विकारायचे आणि यशस्वी पण करायचे. अदानी यांच्या या उद्योगामुळे ते अल्पावधीतच प्रसिद्ध झाले. नेते मंडळी, राजकारणी लोकांच्यासोबत उठ-बसं सुरु झाली. विशेषतः त्यावेळी ते काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज नेते चिमणभाई पटेल आणि केशूभाई पटेल यांच्याशी जवळीक वाढली. याकाळात गौतम अदानी यांना पायाभूत सुविधा उभारणी उद्योगात पडण्याची महत्त्वाकांक्षा तयार झाली. त्यांनी बंदर उभारणीचा बराचं अभ्यास केला. योगायोगाने त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल होते आणि त्यांच्याकडे बंदर हे खातं होते. अदानी यांनी त्यावेळी चिमणभाईंकडे गुजरातमधलं मुंद्रा बंदर विकसित करण्याचा प्रस्ताव ठेवला. मुंद्रा वाळवंटी भागातलं बंदर आहे. तिथून पाकिस्तानची बॉर्डर जवळ आहे. या वस्तुस्थितीची जाणीव चिमणभाईंनी गौतम अदानी यांना करून दिली. मात्र त्यानंतर देखील अदानी या बंदराच्या विकासावर ठाम होते. चिमणभाई यांनी देखील गुजरातचा विकास डोळ्यासमोर ठेऊन अदानी यांच्या प्रस्तावाचा विचार केला. अखेरीस १९९१-९२ साली चिमणभाई पटेल सरकारने कच्छ किनारपट्टी जवळील ३ हजार एकर जमीन अदानी आणि शेती उद्योग करत असलेल्या कारगिल समूह यांना संयुक्तरित्या मिठाच्या उत्पादनासाठी देऊ केली. मात्र त्याच वेळी तिथं कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस यांचा एक संप झाला आणि या प्रकल्पामधून कारगिलने माघार घेतली. अदानी मात्र प्रकल्पावर कायम राहिले. ते आधीच मुंबई आणि कांडला या बंदरामध्ये होत असलेल्या विलंबामुळे काहीसे वैतागले होते. परिणामी त्यांना ८ ते १० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. पण तरीही ते या प्रकल्पासाठी ठाम होते. मात्र ७ ते ८ वर्ष झाली तरी काहीच मार्ग निघत नव्हता. अखेरीस अदानी यांनी मुंद्रा बंदराला खाजगी बंदर म्हणून विकसित करण्याचा विचार केला. बंदराच्या खाजगीकरणाला सुरुवात झाली आणि १९९८ ला मुंद्रा बंदरावरून पाहिलं जहाज रवाना झाला. पहिले ३ वर्ष तर या बंदराला विशेष प्रतिसाद मिळाला नाही. याच दरम्यानच्या काळात अंबानी देखील या उद्योगात उतरले. पुढे २००० नंतर मात्र या बंदराने विकासाची गती पकडली. पुढच्या १० वर्षांमध्ये म्हणजे २००९-१० मध्ये बंदरावरून मालाची आवक-जावक तब्बल १७३ कोटी रुपयांवर पोहोचली होती. २०११-१२ मध्ये हा आकडा २२४ कोटी रुपयांचा होता. थोडक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गौतम अदानी यांनी शिवधनुष्य पेललं. आज २३ वर्षानंतर हजारो एकरावरचं जमिनीवरचं हे बंदर देशातलं सर्वांत मोठं आणि अद्ययावत बंदर आहे.

बिझनेसचा दांडगा अनुभव घेतल्यानंतर अदानींनी १९९६ मध्ये अडानी ग्रुपची स्थापना केली. सुरुवातीला त्यांची कंपनी पॉवर आणि एग्रीकल्चर कमोडिटीजच्या क्षेत्रात काम करत होती. आज जवळपास प्रत्येक पायाभूत विकासाच्या क्षेत्रात अदानी ग्रुप कार्यरत आहे. एनडीटीव्हीची कामगिरी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट राहिली आहे हे सर्वच माध्यमे जाणून आहेत. त्याचा शेअर दुपारपर्यंत प्रति शेअर वरून दुप्पट झाला होता. एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये दिवसभरात जोरदार तेजी दिसून आली आहे. पण ते शेअर्स वधारण्यासाठी एक अफवा मात्र कारणीभूत ठरली आहे. मीडिया क्षेत्रात अदानी समूह उतरणार असल्याच्या बऱ्याच अफवा चालू होत्या त्यात एनडीटीव्ही विकत घेऊ शकतं असा कयास लावला जात होता. अदानी ग्रुपने एनडीटीव्ही विकत घेतल्याच्या अफवांमुळे कंपनीच्या शेअर्स वर गेले. टेलिव्हिजन लिमिटेडचे शेअर्स आज १०% ने उंचावले आहेत. कारण अदानी समूहाने मीडिया व्यवसायात प्रवेश करण्याची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी हे विकत घेतले अशी अफवा मार्केट पसरली आणि कंपनीच्या शेअर्सने एकच उच्चांक गाठला.
त्यात योगायोग ठरला तो म्हणजे, अदानी समूहाने अलीकडेच संजय पुंगलिया यांना मुख्य संपादक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली गेली.
पुंगलिया यापूर्वी क्विंट डिजिटल मीडियाचे अध्यक्ष आणि संपादकीय संचालक होते. यापूर्वी त्यांनी सीएनबीसी-आवाजचे नेतृत्व केले आहे. त्यांनी स्टार न्यूजची हिंदी चॅनल देखील आणले आहे. तसेच ते  झी न्यूजचे प्रमुख होते आणि आज तकच्या संस्थापक टीमचे सदस्य होते.
संजय पुंगलिया यांनी बिझनेस स्टँडर्ड आणि नवभारत टाइम्समध्ये प्रिंट पत्रकार म्हणून काम केले आहे. त्यांनी बीबीसी हिंदी रेडिओमधील देखील काम केले आहे.
अदानी आता माध्यम क्षेत्रातही पाऊल ठेवत आहेत संजय गलिया यांची अदानी समूहाच्या या नव्या प्रोजेक्टसाठी नियुक्ती झाली आहे दिल्लीतलं एक जुनं चॅनेल ते टेकओव्हर करणार अशी चर्चा होती.  पण नेमकं कुठलं चॅनेल हे अजून स्पष्ट नाही त्यामुळे एनडीटीव्ही बद्दलचे तर्क -वितर्क लावले जात आहेत. इटी मार्केटस मध्ये सुरू असलेल्या बातमीनुसार, अहवालात दावा करण्यात आला आहे की, अदानी ग्रुप दिल्ली स्थित मीडिया हाऊस घेणार आहे. मग व्यापाऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की अदानी विकत घेत असलेली कंपनी हि,  एनडीटीव्ही असू शकते. सगळ्यांना खरं वाटलं कि, खरंच अदानी एनडीटीव्ही विकत घेतलं असेल. त्यामुळे एनडीटीव्हीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाली. तथापि, ईटीने सांगितले की आम्ही अद्याप या बातमीची पडताळणी केलेली नाही. बीएसइ वर कंपनी ९.९४% वाढून ७९.६५ रुपयांवर व्यवहार करत आहे. पण एनडीटीव्हीने एक निवेदन जारी करून स्पष्ट केलं आहे हि अफवा आहे. गुजरातच्या कच्छ मध्ये मुंद्रा पोर्ट आहे. खाजगीकरणाच्या माध्यमाने या पोर्टचे चालविण्याचे अधिकार सध्या सन्माननीय अदानी साहेबांकडे आहेत
या पोर्टवर दोन हेरॉईन चे कंटेनर पकडले गेले ज्यामध्ये जवळपास तीन हजार किलो हेरॉईन जप्त केले गेले
याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात जवळपास नऊ हजार कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे या आधी देखील असेच काही कंटेनर तेथे उतरले असण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. जस्ट इमॅजिन करा......जर पोर्ट, विमानतळ, रेल्वे स्टेशन एकाच व्यक्तीच्या अधिपत्याखाली आले तर तो यातून कमिशन किंवा तत्सम स्वरूपात अशाप्रकारे किती कमाई करू शकेल!
हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...