Monday 18 February 2019

देशाची जनता सरकारला विचारतेय *हाऊ इज द जोश...!*

देश हादरून टाकणारा हल्ला काश्मीरमध्ये झालाय. ५६ इंच छातीचं सरकार आता काय करणार आहे याकडं भारतीयांचं लक्ष लागलेलं आहे. जगातल्या अनेक राष्ट्रांनी सहानुभूती दाखवत आतंकवाद संपविण्यासाठी मदत करण्यासाठी हात पुढं केलाय. आता सरकारची कसोटी लागणार आहे. पाकिस्तानातल्या आतंकवादी संघटनांच्या नापाक हरकतीवर लगाम लावायला हवाय. आतंकवादी ठिकाणांवर व्यापक हल्ला करून त्यांचा मुळासकट सफाया केल्याशिवाय सुटका नाही. यासाठी देशातली जनता सरकारला विचारतेय...हाऊ इज द जोश!

*अत्यंत नियोजनबद्ध अभ्यासपूर्व हल्ला*
 भारताबरोबर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मध्ये प्रत्येक वेळी पाकिस्ताननं  पहिलं टार्गेट हे जम्मूहून श्रीनगरला जोडणाऱ्या महामार्गावर राहिलेला आहे.आताही त्याच महामार्गावर हा हल्ला झालाय. इंप्रोवाईज एक्स्प्लोझिव्ह डिवाइस म्हणजेच आईडी या नावाचा विस्फोटक अमेरिकनं अतिरेक्यांच्या विरोधात लढण्यासाठी बनवलेलं होतं. अतिरेक्यांनी त्याच्याच या हत्यारांच्या साथीने अमेरिका व इतर सर्व देशांवर प्रहार केला आहे. काश्मीरमध्ये काही काळ शांतता प्रस्थापित झाली होती हे जरी खरं असलं तरी आजवरच्या इतिहासात कधी झालं नाही असा मोठा आणि घातकी अतिरेकी हल्ला जम्मू-श्रीनगर महामार्गावर झालाय. यापूर्वी कधीच एवढ्या मोठ्या संख्येने आपले लष्करी जवान अतिरेक्यांच्या हल्ल्याला कामी आलेले नाहीत, मृत्युमुखी पडलेले नाहीत, सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स सीआरपीएफच्या जवानांना असू द्या नाहीतर भारतीय लष्करातील जवान भारताची सुरक्षा करण्याबरोबरच इतर संरक्षणात्मक कामकाज जम्मू-काश्मीरमध्ये करतात आजवर अतिरेक्यांच्या हल्ल्यात जेवढे जवान मृत्युमुखी पडले आहेत तेवढे आजवरच्या युद्धातही पडलेले नाहीत. १९८० च्या दशकापासून काश्मीरमध्ये आतंकी हल्ले होतात हे आता नाविन्याची गोष्ट राहिलेली नाही. कधी लष्करी कॅम्पवर, कधी शहरी लोकवस्तीमध्ये, कधी लष्कराच्या गाड्यांवर, कधी सरहद्दीवर पहारा देणाऱ्या जवानांवर आतंकवाद्यांनी कायरतापूर्वक हल्ले केले आहेत.पण हा हल्ला अत्यंत बारकाईने आणि अभ्यासपूर्ण दिसून येत आहे

*यापूर्वीही अनेक हल्ले*
जम्मू-काश्मीरमध्ये अठरा वर्षानंतर पुन्हा एकदा अतिरेकी हल्ला झाला आहे २००१ मध्ये श्रीनगर विधानसभा परिसरात एका विस्फोटक भरलेल्या टाटा सुमो या मोटारीतुन एका आत्मघातकी अतिरेक्यानं हल्ला केला होता. त्यावेळी तो दुसऱ्यांदा स्थानीय मानवी झाला होता. यापूर्वीही तीनदा मानवी बॉम्ब वापरण्याचा प्रयत्न झाला होता. पण सुरक्षारक्षकांनी त्यावेळी तो हाणून पाडला १ ऑक्टोबर २००१ रोजी जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेच्या तीन आत्मघाती आतंकवाद्यांनी विस्फोटक भरलेल्या टाटा सुमो मोटारीतुन लक्ष बनवलेले होते यात ते तिघे मारले गेले आणि ३८ जणांची त्यावेळी हत्या झाली. या हल्ल्यानंतर एक पाकिस्तानी वजाहत हुसेन अतिरेकी याचं नाव पुढे आल्याने केंद्र सरकारने पाकिस्तानकडं मोठा आक्षेप आणि निषेध नोंदवला होता. सांगितलं जातं की, १९९९ मध्ये श्रीनगरच्या १५ कोर या लष्करी मुख्यालयावर एका आत्मघाती अतिरेक्यांनं मोटारीतून येऊन गेटला धडक देऊन ते गेट तोडून उडवलं होत. पण सुरक्षा रक्षाकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. अशा प्रकारच्या घटना २००३ आणि २००५ मध्येही असे प्रकार घडले होते. पुलवामाच्या पोरा भागात एसआरपीएफच्या कॅम्प वर जानेवारी २०१८ मध्ये दोन स्थानिक आत्मघातकी अतिरेक्यांनी हल्ला केला होता अशा प्रकारच्या पहिलाच आला होता. त्यात स्थानिक तरुणांचा वापर करून सुरक्षा दलाच्या कार्यालयमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता तो सफल झाला होता. यात ४ जवान शहीद झाले. फरदीन आणि मंजूर बाबा अशा या दोन अतिरेक्यांना त्रालमध्ये प्रशिक्षण दिलं होतं.अशाप्रकारचा खुलासा केलेला आहे. त्यांनी व्हिडीओ शूटिंग करून ते  सोशल मीडियावर टाकलं होतं. अगदी त्याचप्रकारे या हल्ल्याच्या आधीदेखील व्हिडिओ सोशल मीडियावर आदिलने हल्ला करण्यापूर्वी सोशल मीडियावर टाकला होता. जो नंतर व्हायरल झाला. दीड दशकानंतर या अतिरेकी हल्ल्यापासून सुरक्षा व्हावी म्हणून नवे प्रकार जे सुरक्षा एजन्सीने आणले त्यामुळे हल्ला करणे अतिरेक्यांना कठीण झालं होतं. पण व्हीआयपी हालचाल आणि सुरक्षा दलाच्या काफिल्यावर हा हल्ला झाला

*आधी हल्ला मग गोळीबार*
अतिरेकी हल्ला झाला ते स्थळ पोराजवळ आहे. पुलवामा शहरानजीक पोरा आहे. परंतु सीआरपीएफ वाहन जम्मू - श्रीनगर रस्त्यावर जात असताना हा हल्ला झाला तीन एक वर्षापासून कश्मीरमध्ये अशा प्रकारचा मोठा हल्ला झालेलं नाही. सीआरपीएफ च्या गाड्या या रस्त्यावरून जात असताना अतिरेक्यांनी विस्फोटक भरलेल्या वाहनांनी तिला धडक दिली आणि स्फोट झाला त्यानंतर त्या परिसरात आजूबाजूला डोंगरात लपलेल्या इतर अतिरेक्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. हा हल्ला काश्मीरच्या प्रमुख रस्त्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या जम्मू ते श्रीनगर यांना जोडणाऱ्या हायवेवर झाला आहे. हा रस्ता २८५.९५ किलोमीटर लांबीचा आहे पूर्वी तो नंबर१ म्हणून ओळखला जात होता आता तो हायवे नंबर ४४ म्हणून ओळखला जातो. कश्मीर घाटीचा हा परिसर पहाडी आहे. त्याचा पृष्ठभाग ओबडधोबड आहे. इथं हायवे होईल असं कधी कुणाला वाटलं नव्हतं. पण इथं जे दोन-चार महामार्ग तिथे आहेत त्यात श्रीनगर-जम्मू हायवे एक महत्त्वाचा समजला जातो. सीआरपीएफ अडीच हजार जवानांना घेऊन ७२ वाहनांनी निघालेला होता. जम्मूपासून उत्तरेकडे असलेल्या श्रीनगरकडे जात होता तेव्हा जम्मु सोडल्यानंतर लगेच त्यावर हा हल्ला झाला. श्रीनगर, जम्मु ही महत्त्वाची शहरे आहेत. जम्मू हे वहिवाटीच्या दृष्टीने सोयीचे आहे, तर श्रीनगर हे जगविख्यात पर्यटन स्थळ आहे. या दोन्ही शहरांना जोडणारे एकूण दोनच रस्ते आहेत. त्यातही अत्यंत महत्त्वाचा असा हा महामार्ग ४४आहे. कारण हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असताना देखील हा रस्ता कधीच बंद होत नाही. म्हणून त्याला 'ऑल वेदर रोड' म्हटलं जातं. पण अनेक ठिकाणी हा रस्ता निमुळता असल्यानं तिथं बॉटल नेकसारखं तयार होतं. तिथं जर का वाहन अडकलं तर त्याला पुढं जाणं शक्य होत नाही. इथं कोंडीत अडकलेल्या वाहनांवर आजूबाजूच्या डोंगरावरून गोळीबार करतात. आजवर या रस्त्याने जाणाऱ्या नागरी वाहनांवर हल्ले झालेले नाहीत, तर लष्करी वाहनांवर यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. त्यामुळं हा महामार्ग जवानांसाठी अत्यंत घातक समजायला हवा.

*हा पाकिस्तानीहल्लाच आहे*
 दुसरा जो जम्मू-श्रीनगर रस्ता आहे त्याला मुगल रोड असं संबोधलं जातं. कारण मोगलांच्या काळातील जहांगीर यांच्या काळात हा रस्ता तयार झालेला आहे. स्वातंत्र्यानंतर हा रस्ता पुन्हा नव्यानं केला गेलाय. पण या रस्त्याचा हवा तसा विकास झालेला नाही. हिवाळ्यात बर्फवृष्टी होत असताना हा मार्ग बंद होतो. त्यामुळं पाकिस्तान जेव्हाकधी हल्ला करायचा प्रयत्न करतो, त्यावेळी त्यांचं लक्ष्य मुगल महामार्गावर असतं नाहीतर हायवे नं.४४ वर असतं. पण हा आतंकवादी हल्ला आहे, पाकिस्तानचा हल्ला नाही .परंतु या आतंकवादी हल्ल्यामागे पाकिस्तानी शक्ती आहे. त्यामुळं त्याला पाकिस्तानी हल्ला समजायला हरकत नाही. १९४७ ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९४८, १९६५, १९७१, आणि १९९९या प्रत्येक हल्ल्याच्यावेळी पाकिस्ताननं ह्या महामार्गावर ताबा मिळविण्यासाठी प्रयास केलाय. युद्धाच्या काळात पाकिस्तानकडून आणि युद्ध नसेल तेव्हा आतंकवादी द्वारा या महामार्गावर हल्ले झाले आहेत. एकदा जर का हा महामार्ग पाकिस्तान वा अतिरेक्यांच्या हाती आला तर काश्मीरचा उत्तरेकडील भाग तुटलाच म्हणून समजा. म्हणून या महामार्गावर सतत लष्कराचं पेट्रोलिंग होत असतं. असं असतानाही आतंकवादी हल्ला झाला हे देशाची सुरक्षा व्यवस्था, गुप्तहेर संस्था, तथा गृह मंत्रालयाची निष्फळता दर्शवितेय!

*रक्षणाचा डिव्हाईस अतिरेक्यांचं हत्यार बनलं*
 अमेरिकेनं जे हत्यार विकसित केलं तेच आता सर्वांना भारी पडू लागलंय. एका अफगाणिस्तानात अमेरिकन सैनिक मृत्युमुखी पडले त्यातील निम्म्याहून अधिक सैनिक या आईईडीने मृत्यू पावले आहेत. जगातल्या एखाद्या राष्ट्रानं आतंकवादी विरोधात एखादं अस्त्र विकसित केलं तर त्याचा वैश्विक वापर व्हायला अनेक वर्षे होतात. पण आतंकवादींना हे सहजसाध्य झालं आहे. त्यामुळं काश्मीरमध्ये आतंकवादी आणि नक्षलवादी त्याचा भरपूर वापर केलाय आणि करताहेत. पठाणकोट हल्ला, मुंबईत २०११ मध्ये झालेले सिरीयल बॉम्बस्फोट, २०१३ ला हैद्राबाद ब्लास्ट आणि काश्मीरमध्ये तर अनेक हल्ल्यात आईईडीचा वापर झालाय. त्यामुळे हे साधन मानवाच्या संरक्षणासाठी नाहीतर विध्वंसक ठरलं आहे. नुकसानकारक ठरलं आहे. अशाप्रकारचा हल्ला करण्यासाठी आतंकवादींचा अत्यंत आवडतं साधन इंप्रोवाईज एक्सप्लोझिव्ह डिव्हाईस! संपूर्ण जगातील आतंकवादी, उग्रवादी, आंदोलनकर्ते, चळवळी करणारे जेव्हा हल्ला करू इच्छितात, ते प्रामुख्याने याचाच वापर करतात. कारण त्याची निर्मिती सहजसाध्य आहे. मात्र त्याचा प्रहार जबरदस्त असतो.  तो किती जबरदस्त असतो हे काश्मीरच्या या हल्ल्यात दिसून आलंय. एका दुसऱ्याची हत्या करायची असेल तर या साधनांचा वापर केला जात नाही. पण मोठा काफ़िला, वाहन वा आर्मी कॅम्पवर हल्ला करायचा असेल तर आईईडी व्यतिरिक्त कोणी प्रभावशाली नाही. १९८३ मध्ये बैरुतमध्ये अमेरिका-फ्रान्सच्या सेनेनं हल्ला केला होता तोच या साधनाचा, विस्फोटकाचा सर्वप्रथम वापर केला होता. त्यानंतर सैन्यांकडे नवी हत्यारे आली, पण आतंवाद्यांकडून याचा वापर होऊ लागला. त्यांच्या हाती नवं हत्यार आलं. जे सरकारलाच भारी पडायला लागलय.

*इथं रोजगाराच्या संधी तरुणांना हव्यात*
 सरकारनं भले काश्मिरात विकासाची कामं केली असतील, त्यामुळं आतंकवादी कारवाया काही प्रमाणात घटल्या असतील. आतंकवाद नाहीतर नक्षलवाद याचं एक मुख्य कारण बेकारी हे मुख्यत्वे आहे. या तुलनेत काश्मीरचा पूर्णतः अलग आहे. तो वाजपेयी नंतरच्या सरकारला समजलाच नाही. भाजपनं तर आतंकवादाचं समर्थन करणाऱ्या पीडीपी बरोबर सरकार बनवलं आणि चालवलं देखील. बऱ्याच काळानंतर स्मृतिभ्रंश झालेल्या भाजपेयींना आपल्या धोरणांची आठवण झाली. मेहबुबा मुफ्ती बरोबरचं गठबंधन तोडुन टाकलं. या सगळ्या सत्तेच्या हेराफेरीत काश्मीरचा प्रश्न सोडविण्याचा कोणताच प्रयास नव्हता.  युवापिढीला खरंतर विकास करण्यात रस, पण काश्मीर मधल्या युवापिढीला विकासापेक्षा विनाशकारी कृत्यात रस दिसतो. अशा युवकांना 'ब्रेन वोशिंग' करून त्यांना आतंकवादी बनवलं जातंय. कारण तिथलं सरकार त्यांना रोजगार देऊ शकत नाही. केंद्र सरकारनंही जी काही रोजगाराची आश्वासनं दिली ती पुरी झाली नाहीत. त्यामुळं दगडफेक करणाऱ्या युवकांची संख्या वाढली. त्याचबरोबर त्यांना समर्थन देणाऱ्या युवकांचीही संख्या वाढत आहे. सरकारनं याकडं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवंय.

*लष्करी घोषणा सरकारची घोषणाबाजी*
 युरी चित्रपट पाहून आपण देशप्रेमी आहोत हे दाखविण्यासाठी  सगळेच 'हाऊ इज जोश' ,म्हणू लागलेत. हा चित्रपट पाहिल्याने देशभक्तीचा डोस मिळतोय अशा गप्पा सोशल मीडियावर करू लागले. या चित्रपटातलं  बहुचर्चित डायलॉग 'हाऊ इज द जोश' सरकारच्या प्रचाराचं उपयोगात आणलं जाऊ लागलं होतं. भूदल, नौदल आणि हवाईदल यांच्यातल्या अनेक बाबी अशा घोषणांतून होत असतात. गेली अनेकवर्षे लष्करात ते वापरलं जातंय.  जेव्हा केव्हा लष्कराला मैदानावर वा कोणत्या कामगिरी नेलं जातं. तेव्हा अधिकारी विचारतात, 'हाऊ इज द जोश' तेव्हा जवान त्याला उत्तर देतात, 'हाय सर...!' जवानांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी अशा घोषणा नेहमीच दिल्या जातात. चित्रपटात त्याचा कमालीचा वापर झालाय. एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर आतंकवादीनी थोडासा धसका घेतला. आतंकवादी कारवाया, हल्ले काहीप्रमाणात थांबले. आतंकवाद्यांची स्प्रिंग बराच काळापर्यंत दबलेली राहिली होती ती आता पुन्हा उसळून वर आलीय.  देशातील जनता ५६इंची छाती असलेल्या सरकारला विचारतेय...'हाऊ इ द जोश?..' सरकारला आपला जोश दाखविण्याची ही संधी मिळालीय.

चौकट....
*नॅशनल इंटेलिजन्स ग्रीडची गरज होती*
हे सर्व टाळण्यासाठी नॅशनल इंटेलिजन्स ग्रीड या संकल्पनेचा जन्म झाला, या संकल्पनेचे जनक होते तेव्हाचे गृहमंत्री पी. चिदंबरम, पोलिसांचा इंटेलिजन्स वेगळा, आर्मीचा वेगळा, नेव्ही, बिएसेफ, इंटेलिजन्स ब्युरो, NIA, CBI या सर्व संस्थांचे इंटेलिजन्स फीड वेगवेगळे ठेवण्यापेक्षा या सर्वच संस्थांनी आपापले इंटेलिजन्स शेअर करावेत, म्हणजे सुरक्षा दलांना कारवाई करणे सोपे जाईल, सोबतच एअरलाईन्स, बँका, आरटीओ यांचाही डाटा या ग्रीडला मिळावा असा विचार या इंटेलिजन्स ग्रीड मागे होता, मात्र त्याला देशभरातून विरोध झाला, विशेषतः तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदि यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता, पुढे भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर तर हा प्रकल्प थंडबस्त्यातच पडलेला आहे. आज जर NatGrid अस्तित्वात असती तर कालच्या हल्ल्याबद्दल गुप्तचर यंत्रणांनी दिलेला इशारा हा जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ व डिफेन्स सिक्युरिटी कोरला पोहचला असता, त्या पैकी कुणीही स्फोटकांनी भरलेली ती गाडी अडवली असती तर कदाचित इतकी जीवहानी झाली नसती, कालच्या हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याने जर ती गाडी चोरली असेल तर त्या तक्रारीशी संबंधित इनपुट्स हे जम्मू काश्मीर पोलीस व आरटीओच्या माध्यमातून सैन्यादलांपर्यंत पोहोचले असते.

-हरीश केंची ९४२२३१०६०९

मुंबईतला मराठी टक्का घसरला!



"मुंबईत मराठी माणूस उरेल का, हा काही आता चिंतेचा विषय राहिलेला नाही. रामदास फुटाणे म्हणतात तसं, "यहां पर मुंबई का अंतिम मराठा बटाटावडा खाते खाते अल्ला को प्यार हुआ"... अशी पाटी गिरगावच्या एखाद्या चौकात लागण्याची वेळ काही दूर नाही. मूळ मुंबईत म्हणजे माहीम-शीवपर्यंतच्या भागात आज मराठी माणूस उरलाय किती? जेमतेम असेल २० ते २५ टक्के! हा जसा सरकारच्या धेयधोरणाचा जसा परिणाम आहे, तसाच तो औद्योगिकतेत जलदगतीने होत असलेल्या आधुनिकतेचा परिणाम देखील आहे. त्याचबरोबर या पीछेहाटीला मराठी माणसाची मनोवृत्तीही तेवढीच जबाबदार आहे."
--------------------------------------------------

*मुं* बईतून मराठी माणूस हद्दपार झाला व हिंदी भाषकांचा टक्का वाढला, असा एक ताजा अहवाल जाहीर होताच चर्चेला प्रारंभ झालाय. मराठीमाणसांच्या हक्काकरिता लढणारे शिवसेना, मनसे यासारखे पक्ष असताना हे कसे घडले, अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झालीय. एकेकाळी मुंबई ही बहुसंख्य मराठी माणसांची होती, हे खरे आहे. मात्र, त्यामधील मोठ्या संख्येने वर्ग हा कष्टकरी, नोकरदार होता. त्यावेळीही मलबार हिल, पाली हिल, जुहू, खार वगैरे भागांत धनाढ्य मंडळी राहत होती व ती बहुतांश अमराठी होती. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की, मुंबईच्या आर्थिक नाड्या या नेहमीच अमराठी माणसांच्या हाती राहिल्या आहेत. जोपर्यंत या अमराठी धनिक लोकांना त्यांच्या कापड गिरण्या, केमिकल कंपन्या, इंजिनीअरिंग कंपन्यांमध्ये काम करण्याकरिता मराठी माणूस हवा होता, तोपर्यंत त्यांनी मराठी माणूस मुंबईत राहील, याची काळजी केली. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ मराठी माणसाच्या हिताचे राजकारण करणाऱ्या शिवसेनेने स्थापनेपासून मराठी माणसांच्या नोकऱ्यांची चिंता वाहिली. मराठी माणूस नोकरी देणारा होईल, याकरिता प्रयत्न केले नाहीत.  आपल्यालाही नोकरीवर ठेवणारा 'मालक' होण्याचे स्वप्न ना शिवसेनेने मराठी माणसाला दाखवले, ना मराठी माणसाने पाहिले. किंबहुना, शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांनी कधीही मुंबईतील आर्थिक सत्ताकेंद्राशी संघर्ष केला नाही. हे देखील खरं आहे.

*घाम गाळणाऱ्याला बाहेर काढलं जातंय*
वाढत्या कुटुंबाच्या जागेला उत्तर म्हणून मराठी माणूस बोरिवली-ठाणे ही मुंबईची उपनगरं ओलांडत विरार-बदलापूरपर्यंत हटत गेला. तसा तो आपल्या कष्टकऱ्याच्या, नोकरदाराच्या भूमिकेपासून हटला नाही. याउलट उद्योगधंद्यासाठीच मुंबईत आलेले अमराठी मात्र उपनगरात सुस्थितीत स्थिरावलेले दिसतात आणि हळूहळू दादर-वरळी-वाळकेश्वर असं सरकताना पाहायलाही मिळतात. औद्योगिकता ही सोयीनं येते. तिच्यावर हक्क सांगितला तर स्थानिकांना तिचा प्रथम लाभ मिळतो. परंतु स्थिरावलेल्या औद्योगिकतेत आधुनिकीकरण येऊ लागलं, की त्याचा पहिला तडाखा खावा लागतो तो नोकरदारांना! मुंबईतल्या कापड गिरण्या-कारखान्यातील आधुनिकीकरण मुंबईतून मराठी माणूस कमी होण्याचं कारण आहे. तसंच काही बाबतीतील महाराष्ट्र शासनाचं धोरणही त्याच हातभार लावणारं ठरलं आहे. दिवसाला करोडोंची उलाढाल करणारा शेअरबाजार मुंबई स्थिरावला. लवकरच काही मिनिटात इकडचे अब्ज रुपये तिकडे करणारा हिराबाजार ही झाला. तर मराठी माणसाच्या ताब्यात असलेला फळबाजार, भाजीबाजार हे मुंबई बाहेर काढण्यास सरकार यशस्वी झालं! पैशात खेळणाऱ्यांना मुंबईत खेचलं जातंय आणि घामानं डबडबणाऱ्यांना मुंबईबाहेर लोटलं जातंय असंच मुंबईत आजचं चित्र आहे

*सगळ्या औद्योगिक शहरातला हाच प्रश्न*
औद्योगिक श्रमिकनगरी ही मुंबईची ओळख पुसट होत चाललीय. अर्थनगरी अशी ख्याती असलेली मुंबई हळूहळू श्रीमंतनगरी होत आहे. केवळ श्रीमंतच मुंबईचा खराखुरा उपभोग घेऊ शकतात. बाकीचे फक्त लोकलच्या घुसमटून टाकणाऱ्या गर्दीचा, खिसा फाडणाऱ्या महागाईचा, पडक्या-गळक्या-आजूबाजूला तुंबलेली गटार वाहणाऱ्या घरांचाच भोग भोगू शकतात. सामान्य मुंबईकरांच्या या जीवनदर्शनाने हळळण्याची काही गरज नाही;  कारण हा भोगवटा दूर करण्याचा दिलासा देत आपलं राजकारण यशस्वीरित्या पुढे रेटणारे मुंबईकरांच्या भाग्यरेषेत आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठीजनांनी मुंबईकरांच्या या होलपटीपासून वेळीच बोध घेण्याची जरुरी आहे. काही वर्षापूर्वीपर्यंत मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर हीच शहरं औद्योगिकरणात पुढारलेली होती. आज औद्योगिकीकरणाच्या विकेंद्रीकरणामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील शहरं मुंबई-ठाण्यासारख्याच समस्या घेऊन वाढत असताना तिथला मराठी माणूस मात्र तिथल्या कारखानदारीत नोकरी मिळण्यासाठी धडपडताना दिसत आहे. त्या अद्योगिकतेच्या अनुषंगानं उभ्या राहू राहू शकणार्‍या छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायात शिरण्याचे मराठी तरुण टाळताना दिसत आहे. कोकणात रेल्वे आली. परंतु तिथल्या रेल्वे स्थानकावर मात्र चहाचा ठेला अग्रवाल नावाच्या माणसाचा! आर्थिक उलाढाली सुपरफास्ट व्हाव्यात यासाठी सरकारनं  छोटी मोठी शहरे जोडणारी विमानसेवा सुरू केली आहे. या उलाढालींचा लाभ घेण्याइतपत मराठी माणूस उद्योगधंद्यात आहे का? मग या हवाई सेवेचा फायदा कोणाला?

*मराठी माणूस भव्य, दिव्य स्वप्न पाहत नाही*
मराठी माणूस आर्थिक सुबत्तेचा विचार करून त्याची उत्तरे शोधू लागला तरच महाराष्ट्रात होऊ घातलेल्या बदलाचा तो लाभ घेऊ शकेल. परंतु मराठी मनोवृत्तीतच नव्हे तर मराठी भाषेतही अशा आर्थिक सुबत्तेचा विचार केलेला दिसत नाही. मराठी माणसाची ही मानसिकता बदलण्यासाठी शालेय शिक्षणापासून उद्योजकतेकडे आकर्षित करणारे संस्कार करावे, यासाठी बी. जी. शिर्के, निलकंठराव कल्याणी, शंतनूराव किर्लोस्कर यांच्यासारख्या यशस्वी मराठी उद्योजकांच्या जीवनावरील धड्यांचा क्रमिक पुस्तकात समावेश करावा अशा प्रकारच्या सूचना मराठी परिषद सदस्यांच्या एका चर्चासत्रात करण्यात आली. त्या सूचनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होणे जरुरीचे आहे. परंतु त्यापूर्वी 'आलिया भोगासी...!' 'मोडेन पण वाकणार नाही...!' ही वृत्ती मराठी मनातून हद्दपार केली पाहिजे. हे काम मराठी साहित्यनिर्मितीतून होऊ शकतं. परंतु आपलं अधिकाधिक लेखन साहित्य हे वास्तव आणि लालित्य याच्या आधाराने केलेली रड आणि ओरड असते.  'हे कळकीचे जीर्ण मोडके दार, करकर वाजे फार,...खडबड हे उंदीर करीत, कण शोधायाचे फिरती...., लवकर तेही सोडतील सदनाला, गणगोत जसे आपणाला'.... अशा आपल्या कविता! त्या वास्तवदर्शन घडवतात म्हणून क्रमिक पुस्तकात टाकायच्या! ज्या वयात मुलांनी त्या शिकायच्या त्या वयात हे दारिद्रदर्शन कशासाठी? आपलं प्रेमकाव्यही असंच! काय तर, 'त्या तिथे पलीकडे तिकडे....माझिया प्रियेचे झोपडे....' त्याऐवजी आपल्याला 'त्या तिथे पलीकडे चांगला, माझिया प्रिया बंगला...' असं का नाही सुचत? प्रत्यक्षात जे आपल्याला अनुभवता येत नाही ते भव्यपणे आपण स्वप्नात तरी का नाही पाहत? कल्पना, स्वप्न भव्य असावीत म्हणजे तसा विचार तयार होतो. अन्यथा समाज कायम दचलकेलाच राहतो. आज मराठी माणसाची अवस्था यापेक्षा वेगळी आहे? 

*कल्पनेचं दारिद्र्य घालावलं पाहिजे*
मराठी माणूस उद्योग-व्यवसाय पडतो म्हणजे किती पडतो? ट्रॅव्हल एजन्सी, टेलिफोन बूथ, वडापावची गाडी नाहीतर कोणाच्या तरी आधाराने मिळवलेली सब काँट्रॅक्ट्स याच्यापुढे तो मोठ्या मुश्किलीने जातो. 'वचने किं दरिद्रता' असं म्हटलं जातं. कल्पनेचं दारिद्र आधी घालवलं पाहिजे. समृद्धीचा उगम हा मनातून होत असतो. समृद्धी म्हणजे केवळ पैसा नव्हे; तर आर्थिक, सामाजिक, राजकीय सर्वप्रकारचं बळ म्हणजे समृद्ध! तशी बळकटी मिळवायची सोडून मराठी भाषेची गळचेपी होते'  म्हणून बोंब ठोक; नाहीतर 'मातृभाषा बचाओ' आंदोलन पुकार अशी वाया जाणारी शक्तिप्रदर्शन करणारे अधूनमधून उगवत असतात. परंतु अशा शक्तिप्रदर्शनातून मराठी भाषेच्याच शक्तीहीनतेचं दर्शन आपण घडवत आहोत याची कल्पना या मराठीप्रेमींना आहे का? मराठी माणूस टिकला तरच मराठी भाषा टिकेल! आणि मराठी भाषेला आज 'अर्थ' लाभला तरच मराठी माणूस उद्या टिकेल. असा अर्थ 'शेठजीं'नी आपल्या भाषेला दिला म्हणून ते जगात कुठे गेले तरी सन्मानानेच राहतात. कुठेही त्यांची गळचेपी होत नाही. आपल्याला असं करता येतंच नसावं म्हणून आपल्या व्यापार-उद्योगाच्या चाव्या अमराठी माणसाकडे सुपूर्द कराव्या लागतात!

*अमराठी लोकांकडे सत्तेची सूत्र आहेत*
राष्ट्रीयच नव्हे तर जगभर भारताची 'आर्थिक राजधानी' अशीच मुंबईची ओळख आहे. मुंबईला हे आंतरराष्ट्रीय महत्त्व गुजराती-पारशी यांच्या उद्योजकतेमुळं  मिळालंय हे विसरून चालणार नाही. प्रचंड कर्तृत्वाच्या मराठी माणसांनी मुंबईची सांस्कृतिकता, ऐतिहासिकता वाढवली-जोपासली असली तरी मुंबईला किमती बनवली, अर्थनगरी बनवली ती मराठी माणसांनीच! त्यांनाच मुंबईतील 'माया' कळली. आजही अमराठी माणसं झुंडीने मुंबईत येतात ते कमाईसाठीच!  याउलट तमाम मराठी माणसं मुंबई आपली करतात ते कष्टासाठी आणि खाणं, पिणं, झोपणं यासाठीच! शिवसेनेच्या रूपानं मराठी माणसाच्या हाती मुंबई सत्ता असली तरी तो केवळ साफसुफ करण्याचा म्युनिसिपालिटी अधिकार आहे. मुंबईची जी खरी ओळख आहे त्या सत्तेचा कब्जा अमराठीच्या ताब्यात आहे. मुंबईतल्या बड्या कारखानदारी पासून ते छोट्या-मोठ्या उद्योगधंद्याची मालकी अधिकाधिक अमराठींकडे आहे. त्यांना 'आम्ही तुमच्यासाठी आहोत' हे दाखविण्यासाठी काँग्रेसनं वर्षानुवर्ष आपली सूत्रं मुरली देवरा, गुरुदास कामत यांच्यापासून निरुपम पर्यंत यांच्याकडं ठेवली. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विचार केला तर मुंबईतल्या एखाद्या मराठी माणसाला मंत्रिमंडळात घेतले जाते मग ते काँग्रेस सरकार असो नाहीतर भारतीय जनता पक्ष यांचे सरकार असो!  भाजपा हा देखील काँग्रेस सारखाच राष्ट्रीय पक्ष आहे मग भाजपनं व्यापक विचार करून मराठी मुंबईकरांची पाठराखण केली तर मराठी माणसांनी का बरं दुःखी व्हावं?  याबाबत भाजपनं आपल्याला महाराष्ट्रात काँग्रेसच्याच वाटेने जायचे हे ठरवून टाकलेलं आहे त्यामुळेच मंत्रीपदही अशाच मराठी लोकांकडे सोपवली आहेत.

*गिरणी संपातून मराठी माणूस हद्दपार*
मुंबईतील गिरण्यांमध्ये मराठी माणूस राबत होता व त्याच्या निथळणाऱ्या घामातून येथून सोन्याचा धूर निघत होता. जेव्हा गिरणीमालकांना मुंबईतील जमिनीला सोन्याचा भाव येणार, हे दिसू लागले, तेव्हा दत्ता सामंत यांच्या गिरणी कामगारांच्या संपामुळे त्यांच्या हाती कोलित मिळाले. सामंत हे विद्वान कामगार नेते होते. मात्र, मराठी माणसावरील हे संकट त्यांना ओळखता आले, ना शिवसेनेला. गिरण्यांच्या जमिनी निवासी, व्यापारी बांधकामाकरिता खुल्या करून देण्याचे व त्याकरिता विकास नियंत्रण नियमावलीत बदल करण्याचे निर्णय ज्या शरद पवार यांच्यापासून विलासराव देशमुख यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत झाले, ते सारे मराठी भाषक. मात्र, या निर्णयामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होईल, ही कल्पना ना त्यांच्या मनाला शिवली, ना त्यांनी हे संकट रोखण्याकरिता प्रयत्न केले. त्यामुळे गिरणी कामगारांच्या संपानंतर मराठी माणूस मुंबईतून हद्दपार होण्याची प्रक्रिया सुरूच झाली.

*गिरण्या गेल्या, टॉवर उभे राहिले*
गिरण्यांपाठोपाठ मुंबईतील व उपनगरांतील केमिकल व इंजिनीअरिंग कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या कामगार संघटनांमध्ये त्यावेळी वर्चस्वाची लढाई सुरू झाली होती. कामगार नेत्यांच्या संघटना सरसावल्या होत्या. बोनस, पगारवाढ या मुद्द्यांवरून! केमिकल व इंजिनीअरिंग कारखान्यांत टाळेबंदी, संप होऊ लागले. हाणामाऱ्या, रक्तपाताने कळस गाठला. या गोष्टी अमराठी कंपनीमालकांच्या पथ्यावरच पडल्या. त्यांनी आपले कारखाने गुंडाळले. काहींनी महाराष्ट्रातील अन्य शहरांत आपले कारखाने हलवले, तर काहींनी चक्क शेजारील गुजरात व अन्य राज्यांत पळ काढला. कारखाने बंद पडल्याने देशोधडीला लागलेला कामगार, कर्मचारी रोजगाराच्या शोधात एकतर मूळ गावी गेला किंवा अन्य राज्यांत गेला. काहींनी दूर उपनगरांत आसरा घेतला. बहुतांश बंद पडलेल्या कारखान्यांच्या जमिनीवर त्याच कारखानदारांच्या तरुण पिढीने मॉल, टॉवर उभे केले आणि कारखाने चालवून मिळत होते, त्याच्या शंभरपट पैसे कमावले.  सरकारनं हे रोखलं नाही. याकडं डोळेझाक करून चालणार नाही!
-हरीश केंची.
९४२२३१०६०९

Monday 11 February 2019

भारतीय लोकशाही : दशा आणि दिशा...!

(पूर्वार्ध) भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षाचा कालावधी लोटलाय.  स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक लहान मोठ्या संस्थांनानी बनलेला हा उभा-आडवा देश, स्वातंत्र्यानंतरच्या काही काळात एक अखंड देश म्हणून जगासमोर आला.  ब्रिटीशांकडून आपल्याला बऱ्याच गोष्टी वारशात मिळाल्या, त्यात ‘लोकशाही’ नांवाची अप्रुपाची एक गोष्टही मिळाली. विविध लहानमोठ्या आणि एकमेंकांमध्ये मैत्रीपेक्षा शत्रुत्वाच्याच सीमा जास्त असलेल्या राज्या-संस्थानांच्या या देशात, स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाही राज्यपद्धती सुरू झाली. एक देश, एक संविधान, एक ध्वज असलेला भारत एकच राष्ट्र म्हणून जगाला माहिती झाला! जगातली सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारताची आज ओळख आहे. भारत जगाच्या ज्या दक्षिण आशिया भागात येतो, त्या भागात असलेल्या इतर देशांच्या राजकीय परिस्थितीकडे पाहीलं, तरी त्यांच्या तुलनेत भारत लोकशाही टिकवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेला आहे असं दिसतं. पण खरंच तसं आहे का? इथे सर्वच आलबेल आहे का? की लोकशाहीच्या बुरख्याखाली काही वेगळंच सुरू आहे? मला पडलेल्या या प्रश्नाचं विश्लेषण आणि त्यावर उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न मी या दोन भागातल्या लेखांतून करणार आहे. या दोन भागांचं सामायिक शीर्षक एकच असलं तरी त्याची ‘भारतीय लोकशाही; दशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यस्थिती सांगणारा पूर्वार्ध आणि ‘भारतीय लोकशाही; दिशा’ हा आपल्या लोकशाहीची सद्यदशा सुधारण्यासाठी आपण मतदारांनी कोणत्या दिशेने विचार करायला हवा त्याची चर्चा करणारा उत्तरार्ध, अशी सोयीसाठी विभागणी केलेली आहे. 

या लेखनात काही त्रुटी राहील्या असण्याची शक्यता मी नाकारत नाही कारण मी काही राजकारणाचा तसा जाणकार नाही. तसंच या लेखांमधे एखाद्या मुद्द्याची पुनरावृत्ती असण्याची शक्यताही आहे, कारण अशा प्रकारच्या लेखात हे टाळता येण्यासारखं नसतं..

*स्वातंत्र्य प्राप्तीच्या आनंदात सारे*
हे खरंय, की स्वातंत्र्योत्तर काळात देशांतर्गत असलेल्या विविध संस्थानांच्या सीमा पुसल्या गेल्या, आणि देशाला चहुबाजूने असलेली एकच सीमा मिळाली. आपल्या देशाला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळख मिळाली. १५ ऑगस्ट १९४७च्या स्वातंत्र्य मिळालेल्या रात्री पं. नेहरुंनी “बहुत साल पहले हमने नियति से एक वादा किया था..” असं भावूक भाषण केलं होतं. हे भाषण भविष्यातल्या सोनेरी स्वप्नांचं असणं अगदी सहाजिक होतं. नव्याने मिळालेल्या स्वातंत्र्याच्या आनंदात, भविष्यात समोर उभ्या ठाकू शकणाऱ्या समस्यांची कल्पना त्यावेळच्या राजकारण्यांना होती की नाही याचं आकलन आता होत नाही. पुढे काही वर्षांनी संस्थानं विलीन होऊन आपापल्या भाषेची अस्मिता जागृत झालेले प्रांत निर्माण झाले. सुरुवातीला ताज्या मिळालेल्या स्वातंत्र्याच्या कैफात ही नव्याने निर्माण झालेली संस्थानच आहेत आणि त्यांच्यातला सीमा आणि भाषा प्रश्न पुढे जटील होणार आहे याची जाणीव झालेली नव्हती. मुसलमानांना त्याच्या मागणी प्रमाणे पाकिस्तान देऊन टाकल्यानंतरही आपल्या देशातल्या मुसलमानांची धार्मिक समस्या पुढे किती अवघड होणार आहे याचीही कुणाला कल्पना नसावी. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी खांद्याला खांदा लावून लढलेल्या जाती-जमाती-पंथ आणि त्यांच्यातली उच्च-निचतेची भावना अजून जागी झाली नव्हती. नुकतच मिळालेलं स्वातंत्र्य, त्यासाठी केल्या गेलेल्या कठोर संघर्षाच्या फळाचे गोडवे गाण्यात सर्वच मशगुल होते.

राजकीय स्तरावर सुरुवातीला देशात देशव्यापी म्हणता येतील असे काॅंग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे केवळ दोनच राजकीय पक्ष होते. तर, पश्चिम बंगालातला फॉरवर्ड ब्लॉक, तामिळनाडूतला द्रविड मुनेत्र कळघम, काश्मिरातला नॅशनल काॅन्फरन्स, केरळातली मुस्लिम लीग, पंजाबातला अकाली दल आणि काही दोन-चार राजकीय पक्ष त्या त्या राज्यात कार्यरत होते, पण त्यांची ताकद आणि प्रभाव मर्यादीत होता. देशात आणि राज्यांतही खऱ्या अर्थाने प्रभाव होता तो काॅंग्रेसचाच! देशाचा स्वातंत्र्य लढा मुख्यत: काॅंग्रेसच्याच नेतृत्वाखाली लढला गेल्याने आणि काँग्रेसमुळे स्वातंत्र्य मिळालं अशी लोकांची भावना तशीच कृतज्ञताही असल्याने असं होणं अगदी साहजिकच होत.
याचाच परिणाम म्हणून स्वातंत्र्यानंतर बराच काळ काॅंग्रेसने या देशावर अभिषिक्त राज्य केलं. पुढे आणखी काही वर्षांनी स्वातंत्र्य लढ्याचा कैफ उतरायला सुरुवात झाली आणि इतका काळ काॅंग्रेस सोबत असलेल्या राजकीय व्यक्तीमत्वांना, काॅग्रेस चाखत असलेली सत्तेची फळं लक्षात येऊन, इतर पक्षांतही सत्तेपर्यंत जायच्या आकांक्षांना धुमारे फुटू लागले. आता पर्यंत ब्रिटीश या सामायिक शत्रूविरुद्ध लढण्याचं लक्ष आतापर्यंत संपुष्टात येऊन काॅंग्रेस हा सामायिक राजकीय शत्रू ठरला आणि मग इथून पुढे भारतीय लोकशाहीची विटंबना व्हायला सुरुवात झाली.

*इथूनच लोकशाहीची विटंबना सुरू झालीय*
लोकशाही मार्गाने काॅंग्रेसला सत्तेवरुन खेचायचं म्हणजे काॅंग्रेसच्या मतपेटीला खिंडारं पाडायची हे ओघानेच येत. मग मतदारांमधे भाषा-प्रांत-धर्म-पंथ यावरून भेद निर्माण करायचा अपरिहार्य मार्ग दिसू लागला. आणि इथपासूनच आतापर्यंत सख्ख्या बहिणींप्रमाणे सुखाने नांदणाऱ्या देशांतर्गत भाषा आणि प्रान्त एकमेकाचे हे एकमेकांचे शत्रू म्हणून एकमेंकासमोर उभे ठाकले. धर्मावरून लढाया आणि दंगली आपल्याला काही नविन नव्हत्या, परंतू आता मात्र त्यात राजकारणाने प्रवेश केला. जाती-जमातींना आपापल्या उच्च-निचतेच्या जाणीवा खुणावू लागल्या. हे कमी की काय म्हणून आहेरे आणि नाहीरे अशीही दरी निर्माण झाली. आणि यातील प्रत्येक गोष्टीचं राजकारण केलं जाऊन त्या त्या गोष्टीचं रुपांतर मतपेटीत करण्याचा प्रयत्न होऊ लागला. जात-धर्म-भाषा-प्रांन्त-गरीब-श्रीमंत अशा प्रत्येकाची व्होटबॅंक तयार होऊ लागली आणि याचा अपरिहार्य परिणाम म्हणून, या सर्वांचा कैवार घेण्याचं नाटक वठवणाऱे अनेक राजकीय पक्ष या देशात निर्माण झाले. लक्षात घ्या, १९४७ च्या दरम्यान केवळ हाताच्या बोटांवर मोजता येतील येवढ्याच असलेल्या राजकीय पक्षांची संख्या जवळपास ५०-६० पटीने वाढली. सन २०१४ सावी झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीत देशभरात एकूण ४१८ राजकीय पक्षांनी भाग घेतला होता. यातील बहुसंख्य पक्ष जात, भाषा, धर्म, पंथ यांच्या पायावर उभे आहेत. राष्ट्रीयत्वाची भावना असलीच, तर ती लोकशाहीची तोंड देखल्या का होईना, पण लाज राखावी म्हणून असावी.

*लोकशाहीचे अर्थ बदलले गेले*
तिकडे बराच काळ सत्तेत राहिल्यामुळे सत्तेची ताकद आणि मधूर फळं काॅंग्रेसच्या लक्षात आली काॅंग्रेसनेही डिव्हाईड आणि रुलचं राजकारण सुरू केलं. हे असं करण्यात केवळ काॅंग्रेसच नव्हे, तर सर्वच राजकीय पक्ष हिरिरीने पुढे येऊ लागले. जात-पात-प्रान्त-धर्म आदी भावनेने विचारशक्ती गमावलेल्या लोकांचे कळपच्या कळप आपापल्या वाटणाऱ्या पक्षांच्या मागे उभे राहू लागले. ‘लोकांचं लोकांसाठी लोकांनी चालवलेलं सरकार’ हे लोकशाहीचं उदात्त वाटणारं तत्व मागे पडून ‘आपल्या लोकांचं आपल्या लोकांसाठी आणायचं आपल्या लोकांच सरकार’ अशी नविन विस्तारीत व्याख्या जन्म पावू लागली.  वरतून कल्याणकारी वैगेरे वाटणारं राज्य ही कल्पना मागे पडू लागली आणि राजकारण हे लोकांसाठी केल्याचा देखावा करत केवळ सत्तेसीठीच होऊ लागलं आणि सत्ता फक्त स्वत:च्या स्वार्थासाठीच हे मुख्य तत्व झालं. देशातली काॅंग्रेसची सत्ता आणि वर्चस्व हळहळू कमी होऊ लागलं होतं, तरी संपुष्टात आलं नव्हतं.. काॅंग्रेसच्या कमी होणाऱ्या जागांवर विविध विरोधी तत्वाचे राजकीय पक्ष निवडून येऊ लागले होते. सत्तेसाठी त्यांची अनैतिक शय्यासेबत होऊ लागली होती. देशात अशा अनैतिक शय्यासोबतींना ‘आघाडी सरकार’ असं गोंडस नांव देण्यात आलं होतं आणि मुलामा होता कधीच न होऊ शकलेल्या लोककल्याणाचा..!

*पुढे 'लेकशाही' सुरू झाली!*
एव्हाना राजकारणातले बाकी सर्व प्रश्न मागे पडून जात आणि धर्म, भाषा आणि प्रान्त हे प्रश्न महत्वाचे ठरू लागले होते. आपापल्या जाती-धर्म-भाषांचा आधार घेऊन उदयाला आलेल्या पक्षप्रमुखांची नवी पिढी राजकारणात येऊ घातली होती. त्या त्या प्रांताची, भाषेची, जातीची, धर्माची अस्मिता जपण्यासाठी निर्माण झालेल्या पक्षांनी कधीना कधी सत्तेची फळं चाखलेली होती आणि या देशातल्या लोकशाहीचा उपयोग स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी अनिर्बंधपणे आणि उत्तम प्रकारे करता येतो याची त्यांना सार्थ जाणीव झालेली होती आणि म्हणून विविध अस्मितांचा बागुलबुवा उभा करुन सत्तेसाठी आणि त्यातून येणाऱ्या काळ्या-पांढऱ्या संपत्तीचा ओघ फक्त आपल्या आणि आपल्याच घरीच कसा राहील याचा काळजी घेतली जाऊ लागली आणि भारताततल्या लेकशाहीत घराणेशाहीचा शिरकाव झाला. इथे भारतातील लोकशाहीने एक भयानक वळण घेतलं आणि जर का वेळीच आवरलं नाही, तर आता ती कुठे जाऊन आदळेल याची कुणालाही कल्पना नाही. आपली लोकशाही इथून पुढे ‘लेक’शाही झाली. पक्ष खाजगी पेढ्या झाले आणि आपण मतदार भांडवल..स्वहित मोठं झालं आणि ते साधण्यासाठी देशहीताचाही बळी द्यायला सर्वपक्षीय राजकारणी कमी करणार नाहीत, अशी भावना जनमानसात तयार होऊ लागली..

*स्वच्छ फसवणूक - क्लीन चिट*
सुरुवातीला ८ ते १० पर्यंत मर्यादीत असलेले राजकीय पक्ष गेल्या ७० वर्षात ६०- ७० पटीने वाढले आणि यातील बहुसंख्य पक्ष खाजगी कंपन्या आहेत. हे पक्ष वाढण्याचं वरवरचं कारण लोकसेवा हे असलं, तरी मुख्य कारण राजकारणात मिळणारा प्रचंड बेहिशोबी पैसा हे आहे. या पैशाचा हिशोब देण्याची गरज नसते. कुणी विचारायचं धाडस केलंच, तर मग ‘सिद्ध करून दाखवा’ हा परवलीचा मंत्र म्हणायचा. कारण सर्वसामान्यांच्या डोळ्यांना स्वच्छ दिसत असलेलं हे पुढाऱ्यांचं नागडं पाप, सिद्ध करताच येणार नसतं. सर्वच यंत्रणा भ्रष्चाचारात लडबडलेल्या, त्यामुळे कोण कोणासमोर काय सिद्ध करणार? सिद्ध करायला जातात आणि शुद्ध करुन घेतात असा सर्वांचा स्वार्थाचा नंगा नाच सर्वत्र चालू आहे. ‘क्लिन चिट’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ चारित्र्याचा दाखला असा घ्यायचा असला तर खुशाल घ्यावा, मी मात्र तो ‘स्वच्छ फसवणूक-क्लिन चीट’ असाच घेतो. स्वातंत्र्यानंतर कुणा पुढाऱ्याला, अलिकडचे लालू आणि भुजबळ सोडल्यास, अवैध संपत्ती बाळगली म्हणून आजन्म तुरुंगवास झाल्याचं आठवतंय का?

राजकीय पक्षांच्या झालेल्या अनिर्बंध वाढीमुळे सत्तेचं वाटलं जाणं सहाजिकच होतं. कुणा एकाच सरकार येणं अशक्य असल्याने मग एकमेकांबरोबर अनैतिक शय्यासंबंध सुरु झाले (या शय्यासोबतींना ‘घोडेबाजार’ असं नांव देऊन प्रामाणिकपणात पहिला क्रमांक असणाऱ्या घोड्यांना का बदनाम केलं जातं हे मला कळत नाही.). वर ‘राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो’ असं या शय्यासंबंधांचं उदात्तीकरणही सुरु झालं. गेल्या अनेक वर्षात असे अनेक निर्लज्ज संबंध आपल्या राजकारणात आपण पाहात आलो आहोत. सत्तेसाठी वाटेल ते करण्याचा हिडीस तमाशा आपण उघड्या डोळ्यांनी आणि हताशपणे पाहात आलो आहोत. भारतातील कोणत्याही माणसाला त्याचं आजच्या राजकारणाविषयी मत विचाराल, तर पहिलं राजकारण्यांच्या आया-बहिणींच्या गुह्य अवयवांचा उद्धार करून, ‘वीट आलाय या राकारणाचा आणि राजकारण्यांचा’ हेच उत्तर ऐकायला मिळेल. अपवाद फक्त नेत्यांच्या फेकल्या उष्ट्यावर जगणाऱ्या आणि कणा हरवलेल्या त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांच्या व्यक्तीपुजेने आंधळ्या झालेल्या फाॅलोअर्सचा..

(उत्तरार्ध)
*भारतीय लोकशाही; दिशा..*

आघाडी सरकारं, भ्रष्टाचार, बजबजपुरी, माजोरी झालेले सरकारी अधिकारी आणि गल्ली ते दिल्ली स्तरावरचे राजकारणी यांना कंटाळलेल्या जनतेने, सन २०१४ सालात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांमध्ये बहुमताने श्री. नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या झोळीत आपल्या मतांचं दान टाकलं आणि केंद्रात भाजपाचं एकट्याच्या बळावरचं  सरकार आलं. भारतीय राजकीय इतिहासात ही निवडणूक, धर्म-जात-पंथ-भाषा हे मुद्दे वगळून केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली. निवडणूकीत यशाचं दान भाजपाच्या झोळीत पडण्यामागे जसा विकासाचा मुद्दा, श्री. नरेन्द्र मोदींनी गुजरातेत केलेल्या यशस्वी आणि भ्रष्टाचाररहीत केलेल्या कारभार आणि भाजपाच नसलेली घराणेशाही लोकांच्या नजरेसमोर होता.
आपली लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे असे म्हटले जाते. कायद्याच्या मुद्द्यावर ते बरोबरही आहे. परंतु बारकाईने पाहिल्यास आपल्या देशात लोकशाही आहे का, हा प्रश्नच आहे. गेल्या काही वर्षात आपला देश राजकीय घराणेशाहीने ग्रासलेला दिसतो. काही मोजके पक्ष सोडण्यास, याला कुणीही अपवाद नाही. लोकशाहीत घराणेशाही वेगवेगळ्या मार्गांनी प्रवेश करते. उदा. काही वेळा लोकप्रिय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे नातेवाईक लोकप्रिय व्यक्तीच्या ब्रँड व्हॅल्यूचा व सहानूभूतीच्या लाटेचा फायदा घेत नेते होतात किंवा काही वेळा मोठा जनाधार असणार्या एखाद्या नेत्यास एखादे पद काही कारणांमुळे देणे शक्य नसल्यास, त्याची नाराजी टाळण्याकरता ते पद त्याच्या जवळच्या नातेवाईकास देऊ केले जाते. आपल्या सारख्या विचारांच्या आवर्तनापेक्षा भावनांच्या लाटांवर स्वार होण्यास धन्यता मानणाऱ्या तथाकथीत सुशिक्षितांच्या देशात, जनतेच्या या भावनांचा धुर्त राजकीय मंडळी फार हुशारीने उपयोग करून घेतात. लोकही त्याला बळी पडून मृत्यू पावलेल्या त्या लोकप्रिय नेत्याच्या त्यानेच निवडलेल्या राजकीय वारसाची पोच, त्याची पात्रता, त्याचं आपल्या देशातील समस्यांचं आकलन याचा काही एक विचार न करता त्याला निवडून देतात. प्रत्येक वेळी जे आडात असतं, ते पोहऱ्यात असतंच असं नाही. सत्ता आणि त्यातून प्राप्त होणारे अमर्याद फायदे आपल्याच घरात कसे राहतील याचीच काळजी घराणेशाही घेत असते. घराणेशाहीला देशातील समस्यांचं काही फार देणं घेणं नसतं. भविष्यात आपल्या लोकशाहीचं जे काही भलं कमी आणि बुरं जास्त होऊ शकतं, त्यासाठी घराणेशाही हे एक कारण आहे.

*लायकी नसलेलाही नेता होतोय*
केवळ कोणाचे तरी वारस आहेत म्हणून कोणतंही सामाजिक कार्य न केलेल्या व्यक्ती, समाजासाठी नि:स्वार्थ मेहनत करून कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या आकांक्षांना डावलून पुढे जातात, तेव्हा ते लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक बनतं. घराणेशाही एकाधिकारशाहीस, आर्थिक आणि इतर गैरव्यवहारास कारणीभूत होऊ शकते हे आपल्या देशात यापूर्वीच्या काही काळात वारंवार दिसून आलं आहे. समाजाची नाडी न ओळखता, समाजाच्या गरजा न जाणून घेता प्रसिद्धी माध्यमांपुढे फोटो काढण्या पुरती सामाजिक कृती केवळ कर्मकांडाचा भाग म्हणून पार पाडल्या जातात आणि त्यामुळे पुरेशी जबाबदारीची आणि सामाजिक गरजांची जाणीव झालेली नसताना, बापाच्या जीवावर मिळालेल्या लोकशाहीतील महत्वाच्या पदांचा समाजासाठी आवश्यक तो उपयोग होऊ शकत नाही. थोडक्यात घराणेशाहीत लायकी नसलेली व्यक्ती जनतेचा नेता होण्याची दाट शक्यता असते.

*खऱ्या अर्थानं दुर्दशा होते आहे!*
आपल्या लोकशाहीची जी काही सद्याची दशा आहे किंवा भविष्यात ती आणखी होऊ शकते, ती म्हणजे जात आणि धर्म यांच्या आपल्यावर असलेल्या अतोनात पगड्यामुळे. भलेभले लोक आपली बुद्धी गहाण ठेवून आपापल्या जातीच्या किंवा धर्माच्या उमेदवारांना, मग ते गुन्हेगार असोत किंवा आणखी काही, मतं देतांना आढळतात. हल्लीच्या कोणत्याही निवडणुकांत, निवडणुकांचा प्रचार विकासाच्या मुद्द्याने सुरु होतो आणि संपतो मात्र जात आणि धर्म या मुद्द्याने. शेवटी जात किंवा धर्म धोक्यात आल्याची हाळी देऊन निवडणुका जिंकण्याचे प्रयत्न होतात. लोकही वेड्यासारखे आपापले प्रश्न विसरून जात-धर्माच्या नांवाखाली मतदान करताना दिसतात. म्हणून तर इतकी वर्ष होऊनही प्रश्न तिथेच आहेत आणि जात-धर्म मात्र प्रबळ झालेत. या दोघांच्या जोडीला आता प्रान्त आणि भाषा हे दोन भिडू येऊन मिळालेत आणि आपली लोकशाही आता जात-धर्म-भाषा आणि प्रान्त या चार भिडूंची रमी किंवा मेंढीकोट खेळत बसलेली मला दिसतेय; आणि या खेळात जिंको कुणीही, हरते ती मात्र ‘लोक’शाही..!
काही कुटुंबाची घराणेशाही आणि जात-धर्म-प्रांत-भाषा ह्या दोन घातक गोष्टी आपल्या देशात बऱ्याचदा एकत्र काम करताना दिसतात. नव्हे, त्या वरवर वेगवेगळ्या दिसत असल्या तरी आतून एकच असतात. सत्तेतून मिळणारे फायदे विशिष्ट कुटुंबांपर्यंत मर्यादित राहील्यामुळे, ती कुटुंबे ज्या जाती समुदायातून आलेली असतात त्या जाती समुदायासही पुरेसा लाभ प्रत्यक्षात पोहोचू शकत नाही किंवा तसा लाभ पोहोचू दिला जात नाही, असा आपला अनुभव आहे. तरीही आपल्याला पुरेसा लाभ मिळावा किंवा मिळेल या आशेने अशा कुटुंबाना दूर न करताच त्यांचा पाठिराखा समाज अधिक सवलती पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत राहतो. अशावेळी बाकीच्या समाजाला सत्ता विशिष्ट जाती समुदायाच्या हाती एकवटल्याचे जाणवत रहाते आणि सामाजिक असंतोष निर्माण होतो. याचाच अर्थ सामाजिक असंतोषासाठी जाती-धर्माधारीत घराणेशाही जबाबदार ठरते. आपल्या महाराष्ट्र्त आणि देशातही हे होतं की नाही हे प्रत्येकानं तपासून पाहावं.
आपल्या दशेच्या दिशेने घेऊन जाणारा पुढचा मुद्दा म्हणजे निवडणूकांतला बेफाट पैसा. निवडणूक हा आता व्यवसाय झालेला आहे हे आता आपण अधिकृतरित्या मान्य करायला हवं; आणि व्यवसाय म्हटल, की मग गुंतवणूक आणि त्यावरचा भरभक्कम फायदा ह्या गोष्टी अपरिहार्यपणे येतात. व्यवसायात यशस्वी होण्याला महत्व असते, कोणत्या मार्गाने यश मिळाल याला फारसे महत्व नसते, हा बाजारचा नियम आता निवडणुकांतही अनुभवायला येऊ लागलाय. निवडणुका जिंकण्यासाठी आता प्रत्यक्ष काम करावं लागतच नाही. धंदेवाईक प्रसिद्धी माध्यमं विकत घ्यायची, काहीतरी फुटकळ कामं करुन  टिव्ही-पेपरात झळकायचं, चमच्यांकडून नाक्या-नाक्यांवर अंगावर येणारे बॅनर लावायचे आणि नेता बनायचं येवढं सोपं झालंय. आपल्या सोसायटीत लाद्या बसवून घेणे, इमारतीला रंग लावून घेणे, सोसायटीतील वृद्धाना तिर्थयात्रा घडवूण आणणे किंवा गांवातील एखाद्या देवळाचं भव्य बांधकाम करुन देण्याच्या बदल्यात मतं विकली आणि विकत घेतली जातात. अशा प्रकारे एकदा का मते विकली, की मग विकत घेणारा त्याचं काय करतो आणि पुढे तो ते आणखी किती फायदा मिळवून विकतो, ह्याचा हिशोब मागणं खरेदी-विक्रिच्या व्यवहारात बसत नाही, हे बाजाराचं तत्व इथेही लागू पडतं. लाजलज्जा सोडून, सर्व प्रकारच्या तत्वांना हरताळ फासून, दलालीच्या भ्रष्टाचारत बरबटलेल्या राजकीय नेत्यांकडे जाब मागायचा किंवा त्यांच्यावर टिका करण्याचा अधिकार मतं विकणारांना नसतो, याचं भान जोपर्यंत आपल्याला येत नाही, तो पर्यंत आली लोकशाही परिपक्व झाली असं म्हणता येणार नाही. कुटुंब, जात-धर्म-भाषा-प्रांत या वरच्या मुद्द्यासोबत आलेला पैसाही हातात हात घालून चालू लागलाय. लोकशाहीला मारक असे हे तिन घटक एकत्र आल्याचं दु:ख नाही, तर या तिन्ही घटकांच्या जालिम विषारी मिश्रणाला देशातील अशिक्षित ते सुशिक्षित आणि ग्रामिण ते शहरी अशा सर्वच थरातील मतदार ज्या आनंदानं आणि बेहोशीने पितायत, तिथे आपल्या लेकशाहीची खऱ्या अर्थाने दु’र्दशा’ होतेय आणि याची खंत कुणालाच नाही याचं मुख्य दु:ख आहे.

 *सज्जननांनी राजकारणात यायला हवंय*
हे बदलणं शक्य आहे का, तर याचं उत्तर होय असं आहे. वेळ लागेल, पण बदल नक्की घडू शकतो. मग काय करावं लागेल? तर, सर्वात पहिलं म्हणजे सर्वांनी मतदानाच्या दिवशी पिकनिकला न जाता सर्वांनी मतदान केलं पाहिजे. मतदार म्हणून विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून देऊ केलेली सर्व प्रकारची वैयक्तिक किंवा मर्यादीत प्रलोभनं निग्रहाने नाकारता आली पाहिजेत. कुणीतरी मतांसाठी पैसे देतोय, लॅपटाॅप देतोय, आरक्षण मिळवून देण्याचं आश्वासन देतोय किंवा देऊळ बांधून देतोय किंवा तिर्थाटनाला घेऊन जातोय किंवा काहीतरी फुकट देण्याचं आश्वासन देतोय म्हणून मतदान करायचं टाळलं पाहिजे. जात-धर्म-भाषा-प्रान्ताच्यापलिकडे जाऊन उपलब्ध उमेदवारांपैकी जी व्यकती स्वच्छ चारित्र्याची, आपल्या रोजच्या नजरेसमोरची आणि नैतिकता पाळणारी असेल, तिलाच मतदान करायला हवं. असं केल्याशिवाय नितिमत्ता आणि स्वच्छा चारित्र्याचे लोक राजकारणात येणार नाहीत. मतदान करताना फक्त स्वत:च्या समाजाचंच नव्हे, सर्वच समाजाचं भलं कोण होईल, समाजातील सर्व घटकांना एकत्र कोण घेऊन जाऊ शकेल, ज्याचं चारित्र्य स्वच्छ असेल, ज्याला समाजकारणाचा काही पूर्वानुभव अाहे अशाच उमेदवाराला मतदान करणं आवश्यक आहे. एखादा पक्ष सर्वांच आणि देशाचंही भलं करेल असं वाटत असेल आणि अशा पक्षाने जर कोणी बाहुबली किंवा गुंड किंवा भ्रष्टाचाराचे आरोप असलेला उमेदवार दिला, तरी अशा उमेदवाराला निग्रहाने नाकारलं पाहिजे. उमेदवार चांगला आहे, पण पक्ष योग्य नाही असं वाटल्यासही त्या ही पक्षाचा उमेदवार नाकारता आला पाहिजे. वरील सर्व परिस्थितीत कायद्यानेच आपल्याला उपलब्ध करुन दिलेला NOTA (None Of The Above) हा पर्याय सर्वांनी स्विकारायला हवा. असं केल्यानेच आपली लोकशाही जागृतीच्या दिशेने निघालीय असं म्हणता येईल. NOTA वापरण्याचं गेल्या काही निवडणूकांत वाढलेलं प्रमाण आपली लोकशाही प्रगल्भ होऊ पाहातेय याचं द्योतक आहे असं मी समजतो.
मला कळतंय, की असं केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल, पण ती एखाद दुसऱ्या निवडणूकीत. पुढच्या निवडणूकीत मात्र याचा धडा घेऊन सर्वच पक्ष चांगले उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील अशी आशा या नंतर निर्माण होऊ शकेल. भ्रष्टाचारी, गुंड, घराणेशाही यांचा आपल्या लोकशाहीला पडलेला विळखा सोडवण्याचा आपल्याला उपलब्ध असलेला हा सध्या तरी एकमेंव मार्ग दिसतो. दशा दशा झालेल्या जगातील आपल्या सर्वात मोठ्या लोकशाहीला प्रगल्भतेच्या दिशेने घेऊन जाणं आपण मतदारांच्याच हातात आहे.

जातीचं आरक्षण अन राजकारणाचं रक्षण...!

*रा* जर्षी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानात जुलै १९०२ मध्ये ५० टक्के आरक्षण लागू केलं होतं. त्यामध्ये कुणबी-मराठा समाजाचाही समावेश होता. मागासलेल्या जातींच्या विकासासाठी शाहूमहाराजांनी त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून संधी दिली होती. प्रत्येक क्षेत्रातील विषमता संपवून समता प्रस्थापित करण्यासाठीच घटनेत आरक्षणाची तरतूद अंतर्भूत केलेली आहे. राज्यघटनेनुसार देशात १९५२ पासून आरक्षण तरतूद लागू झाली. तथापि तेव्हापासून ते आतापर्यंत त्याचा एकदाही आढावा घेतला गेलेला नाही. परिणामी या आरक्षणाचा लाभ कोणी घेतला? विद्यार्थ्यांना त्याचा फायदा कसा झाला? कोणत्या समाजाची त्यातून उन्नती झाली? आणखी कोणत्या घटकाला आरक्षणाची गरज आहे? असे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. 

समाजाच्या विविध घटकांकडून आरक्षणाची मागणी सतत होत असते. राजकीय पक्ष, नेते आणि सत्तेवर असणारी सरकारं आरक्षणाच्या मागणीचा राजकारणासाठी वापर करून घेतात. हा आजवरचा अनुभव आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्या की, वेगवेगळ्या जाती समूहांकडून आरक्षणाची मागणी पुढे येते. यामध्ये जात संघटना, राजकारण आणि आरक्षण याचा संबंध घनिष्ठ आहे. राजकारणात संघटनांची उपयुक्तता मोठी आहे. निवडणूक काळात या संघटनांचा राजकीय पक्ष आपल्यासाठी खुबीनं वापर करून घेतात. राजकीय पक्षांची थेट जोडली जाणारी सामाजिक ताकद, जात संघटनांमार्फत पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न निवडणुकांच्या काळात मोठ्याप्रमाणात केला जातो. हा प्रयत्न कृत्रिम असतो. तरीही राजकीय पक्ष व मतदार यांना जोडणारा दुवा म्हणून जात संघटना काम करतात. आणि उमेदवारी, पाठिंबा, प्रचार आणि सत्तेतील वाटा मागतात. म्हणूनच जात संघटनांचे स्वप्न हे सामाजिकपेक्षा राजकीय असल्याचं जाणवतं. यासाठी आपण ओबीसींच्या राजकारणाची मांडणी पाहू. 


ओबीसींच्या आरक्षणामध्ये मराठा जातीचा समावेश करू नये; मराठा समाजाला राजकीय क्षेत्रात आरक्षण दिलं, तर ओबीसींवर अन्याय होईल, अशी एकीकडे भूमिका मांडली जाते; तर मराठा समाजाला नोकरी व शिक्षण क्षेत्रात राखीव जागा द्याव्यात, असा मुद्दा मराठा समाजातील जात संघटना पुढे रेटत होत्या. यातून महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा ओबीसी असं ध्रुवीकरण घडल्याचं आणि १९७८ पासून ओबीसी राजकारण घडवण्याचा प्रयत्न सुरू झाले. त्याला फार मोठा प्रतिसाद मिळाला नाही. तथापि मराठा आरक्षणाच्यामुळे ओबीसी राजकारण नव्याने आकार घेऊ लागलं. छगन भुजबळ यांनी याच कारणासाठी महाराष्ट्रासह अन्य राज्यातही अखिल भारतीय समता परिषदेचे मोठमोठाले मिळावे घेतले. 


त्यांचे हे ओबीसी राजकारण महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा या पक्ष-संघटनांवर अधिक परिणाम करणारा असल्यामुळे त्यांना आर्थिक कोट्यांच्या आकडेवारीत अडकवून ठेवण्यात आले. कारण त्यांच्या राजकारणाचा प्रभाव शिवसेना-भाजपवर अधिक पडणार असल्याने त्यांच्या नेतृत्वानं ओळखलं आणि आपल्याला नुकसान करणारं राजकारण रोखण्यासाठी भुजबळ यांना तुरुंगात टाकण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. त्यांची बदनामी झाली तरी राजकारणाची यशस्विता होती. त्यासाठी मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रभावीपणे वापरण्यात आला.

 मराठा समाजाला तालेवार सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या पुढारलेला असं म्हटलं जातं. परंतु ग्रामीण भागात हा समाज आर्थिक दृष्ट्या कमकुवत असल्याचे सर्वेक्षणात आढळून आलं आहे. मराठा समाजातील नेतृत्वाचा राजकीय अंगाने विचार करता राजकारणात मराठा नेतृत्वाची लॉबी मोठी आणि धष्टपुष्ट आहे. सहकार चळवळ, स्थानिक स्वराज्य संस्थांवर मराठा लॉबीचं वर्चस्व आहे. परिणामी सर्वच राजकीय पक्षांना या लॉबीची राजकीय साथ हवी असते. त्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या प्रमुख राजकीय पक्षांकडून मराठा समाजातील नेतृत्वांना चुचकारलं जातं. सध्याच्या घडीला मराठा नेते अधिक संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत. किंबहुना मराठा समाज हाच राष्ट्रवादीचा मुख्य बेस आहे. त्याच्या जोडीला छगन भुजबळ, गणेश नाईक, गावीत, माजिद मेमन, नबाब मलिक, अशा मंडळींना सामावून घेत बहुजन अल्पसंख्यांक समाजाला राष्ट्रवादीने नेतृत्वाची संधी दिली. जात संघटनांचा प्रभाव वाढू लागल्यानंतर या संघटनांचे काँग्रेस-राष्ट्रवादी, सेना-भाजप, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष असे विभाजन झालं. शिवसेना १९९५ पासून जात संघटनांबरोबर समझौते केले आहेत. म्हणजे मराठा महासंघाच्या एका गटाने एका पक्षाला पाठिंबा दिला की दुसरा गट दुसऱ्या पक्षाबरोबर जातो. कुणबी सेना, आगरी सेना, धनगर समाजाच्या संघटना; माळी, वंजारी, तेली, बारी, बंजारा त्या जात संघटनेच्या नेतृत्वांनी राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांना पाठिंबा दिला. राजकीय पक्षही या संघटनांच्या नेतृत्वाची राजकीय महत्त्वाकांक्षा फुलवतात आणि त्यांना आपल्या पक्षाकडे वळवून वोट बँक पक्की करतात. मराठा समाज वगळता अन्य जातींना पूर्वीच आरक्षण लागू झालं आहे. त्यांच्या आरक्षणाला धक्का लागेल म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न रखडत पडला होता. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असे मुद्दे अगदी दलित-ओबीसी संघटनेच्या नेत्यांनी जाहीरपणे मांडले. त्यातून त्यांनीही मराठा समाजाला चुचकारण्याचाच प्रयत्न केला. असे प्रलोभनीय निर्णय हे निवडणुकीच्या तोंडावरच होत असतात. या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर आला.  त्याची प्रक्रिया पूर्ण झाली,  आरक्षणाचा निर्णय जाहीर केला गेला.  काही ठिकाणी तसे सरकारी दाखले दिले गेले. सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांची मेगा भरती करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याला लगेचच न्यायालयाची स्थगिती आली. त्यामुळं नोकर भरतीचाकार्यक्रम लांबणीवर पडला आता निर्णय रखडला गेलाय. मराठा समाजाला आरक्षणाच्या घोड्यावर बसवायला आता विधानसभा निवडणुकांचा मुहूर्त काढला जाईल!

मराठा समाजाचा कैवार घेऊन महाराष्ट्रात अनेक संघटना उभ्या राहिल्या. त्यातील काही संघटनांचे नेते शक्तिप्रदर्शन करून राजकीय पक्षांच्या वळचणीला गेले. पद, प्रतिष्ठा मिळवून स्वतःची सोय करून घेतली. राजकीय पक्षांनीही आरक्षणाचे गाजर दाखवून त्यांना आपल्याकडे ओढून मतांची बेगमी केली. निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आणायचा आणि निवडणुकीनंतर टाकायचा असा प्रकार अनेकदा झाला होता. आरक्षणाचा लढा लढला गेला नाही आणि त्यात सातत्य नव्हतं तसंच आरक्षणासाठी लढा संघटनांमध्ये एकवाक्यता नव्हती परिणामी मराठा आरक्षणाचा निर्णय अखिल भारतीय मराठी महासंघ, शिवसंग्राम संघटना, संभाजी ब्रिगेड, मराठा युवा संघटना अशा वेगवेगळ्या संघटनांनी आरक्षणासाठी लढा उभारला तथापि आरक्षण कोणत्या क्षेत्रात किती टक्के असावा याबद्दल त्यांच्यात एकवाक्यता कधीच नव्हती. मराठा आरक्षणाच्या मागणीला जोर धरत ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका. समाजकारण आणि अडचणीत असलेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आरक्षणाचा मुद्दा घेऊन अडचणीत भर टाकून घेणे परवडणारे नव्हते. शिवाय पर्याय नव्हता म्हणूनच हा निर्णय लवकरात लवकर घेऊन टाकला हे सारे घडले. राणे समितीने दिलेला अहवाल तामिळनाडू सरकारने दिलेल्या आरक्षणाचा आधार घेतला. जातींच्या आरक्षणासंदर्भात सरकारने मागील लोकसभा निवडणुकीपूर्वी बापट आयोग नेमला होता या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज नाही अशी शिफारस केली होती. तो अहवाल आरक्षणाच्या विरोधात गेला म्हणून फेरआढावासाठी पाठवला गेला. ही प्रक्रिया वेळ काढू बनले, आणि सरकारने स्वतःच्या अधिकारात राणे समिती नेमली. लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्याची घाई सुरू होती. मराठा आरक्षणाचा निर्णय सामाजिक असला तरी त्याचा प्रभाव राजकीय अधिक आहे म्हणूनच आरक्षणाचा निर्णय जाहीर केला गेला होता. त्याचा प्रभाव लोकसभेपुरता मर्यादित राहीला या प्रभावाचा लाभ लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत व्हावा यासाठी मराठा आरक्षण अनुकूलता लोकसभा निवडणुकीनंतर प्रत्यक्ष योजकता सत्ताधारी भाजपा सरकारने आखली होती. त्यामुळे मराठा संघटना लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी वेगवेगळ्या लागणार आहे, अशा पार्श्वभूमीवर भाजप सरकारनं आरक्षण जाहीर केलं, विधिमंडळात कायदा केला. आता 'जल्लोष करा' म्हणत सरकारनं त्यासाठी राखून ठेवलेली नोकर भरती जाहीर केली. पण न्यायालयानं ती रोखली! जानेवारीच्या अखेरीस ही स्थगिती उठणार आहे. त्यानंतर नोकर भरती होईल आणि त्यात पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळेल!

चौकट....
राज्यात या 'मराठा आरक्षण' मुळे राखीव जागांची टक्केवारी ६८% इतकी झालीय. घटनेनं ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण असू नये असं म्हटलं आहे. तरी देखील गोवारी हत्याकांडानंतर 'विशेष मागास प्रवर्ग' नव्यानं निर्माण केला गेला. त्यात गोवारींबरोबर पद्मशाली व इतर जातींचा त्यात समावेश केला. त्यांना २ टक्के आरक्षण दिलं. पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या समाजाला त्याचे फायदे मिळत नाहीत. आता मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिल्यानं या २ टक्केवाल्या विशेष मागास प्रवर्गाला त्याचा फायदा त्याच्या आधी मिळायला हवा मग मराठा समाजाला!  अशी त्यांची मागणी आहे. सरकार याकडं कसं लक्ष देतेय हे महत्त्वाचं आहे.

हा महाराष्ट्रावरचा कलंक....!

निश्चय आणि निर्भयता म्हणजे गांधीजी! त्यांना महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्याचं बीज सापडलं. महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचं मोहोळ आहे म्हणून गांधीजींनी गुजरातेतला साबरमतीचा आपला आश्रम बंद करून तो महाराष्ट्रात वर्ध्याला आणला. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना गुरुस्थानी मानलं. लोकमान्य टिळकांचा जयघोष करीत ते स्वातंत्र्याचा मंत्र देशाच्या खेड्यापाड्यात गेले , अशा नि:शस्त्र गांधींचा खून मराठी माणसाने करावा यासारखं अमानुष कृत्य अन्य नाही. हे भाकड विचाराने केलेलं भेकड कृत्य संतांची, वीरांची, बुद्धिमंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रावरचा कलंक आहे या क्रूरकर्म्याला आणि त्याच्या कृत्याची तरफदारी करणाऱ्यांना महाराष्ट्राने कधीच आपलं मानलं नाही. पण दुर्दैवानं आज परिस्थिती बदललीय!

*भाकड संवादावर टाळ्या पडतात*
न्यायदेवतेच्या दरबारात नथुरामला त्यांची बाजू मांडण्याची संधी मिळाली होती. तिथे नथुराम खुनी ठरलेला असतानाही त्याने 'गांधी वध' केला असा शंख करणारे नथुरामाचं भूत पुन्हापुन्हा उठवून हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांच्या निष्ठेचा कस जोखत असतात. मुसलमानांना खुश करण्यासाठी गांधीजींनी हिंदुस्थानचे भारत आणि पाकिस्तान असे तुकडे केले. पाकिस्तानला ५५ कोटी रुपये द्यायला भारताला भाग पाडले. गांधींनी आपला जीव पणाला लावून स्वतःला देशापेक्षा मोठे केले. त्यामुळे फाळणी झाली. हिंदूंचे बळी गेले. हिंदूंवर अत्याचार झाले. हिंदू स्त्रियांवर अत्याचार झाले. या साऱ्याला गांधीच जबाबदार होते, म्हणून नथुरामाने त्यांना खतम केले, असा नथुरामवाद्यांचा युक्तिवाद असतो. नथुरामाचं हेच नाटक आहे. त्यात पाहणाऱ्याचा भावनिक उद्रेक होण्यासाठी गांधी द्वेषाचा मसाला मिसळला आहे. त्यातल्या काही भाकड संवादावर नथुरामभक्तांच्या टाळ्या पडतात. अर्थात या टाळीबाजांनी आजवर यापेक्षा कोणता पुरुषार्थ गाजवलाय?

*गांधीद्वेषाचं विष पसरवलं गेलं*
 गांधींना खुंटीला लावून गांधीवादाला आपल्यापासून दूर लोटलं असलं तरी लोक गांधींची काँग्रेस म्हणत काँग्रेसला मतदान करतात, जीवदान देतात. नेत्यांना बदनाम करून काँग्रेस संपणार नाही, हे स्पष्ट झाल्याने गांधीजींच्या कार्यकर्तृत्वाची मापं काढण्याचा हा प्रकार सुरु असतो. ही विचारवादाची लढाई आहे. त्यात नेहमी गांधीवादाचाच विजय होतो, ही गांधीजींच्या देशत्यागाची किंमत आहे. ती काँग्रेसवाले वसूल करीत होते आता भाजपेयी करताहेत, तो त्यांचा नीचपणा आहे. गांधी बनिया होते , त्यांच्यामागे बहुजन समाज प्रचंड होता. त्यामुळे त्याचे राजकारण -समाजकारण प्रभावी होत होते. त्याचा सल बुद्धिबळावर राजसत्ता मिळवू पाहणाऱ्याच्या मनात होताच. कारण आपल्याच नादानीमुळे पेशवाई बुडाल्यानं सत्तेचे चाटण मिळविण्याची त्यांना संधी हवी होती, परंतु गांधीजींनी राजकारणाचं सार्वत्रिकीकरण केल्यानं सत्तेचे लगाम आपल्याहाती येणार नाहीत, याची खात्री पटल्याने त्यांनी गांधीद्वेषाचे विष पसरवायला सुरुवात केली.

*गांधींना मारण्याचा अनेकदा प्रयत्न*
फाळणीच्या वेदनेने आपण गांधींना मारले हे नथुरामाचे म्हणणे खोटारडेपणाचे आहे. गांधींना ३० जानेवारी १९४८ ला नथुरामने संपविले. पण त्यापूर्वी १४ वर्षे त्यांना मारण्याची संधी नथुरामीवृत्ती शोधात होती. जून १९३४ मध्ये गांधींवर पुण्यात बॉम्बहल्ला झाला होता. जुलै १९४४ मध्ये गांधींच्या अंगावर सुरा घेऊन जाणाऱ्या नथुराम गोडसेला पाचगणीला पकडले होते. ऑगस्ट १९४४ मध्येही असाच प्रसंग सेवाग्राम आश्रमात घडला. त्यानंतर २९ जून १९४६ रोजी गांधींच्या मुंबई-पुणे प्रवासात नेरळ-कर्जत दरम्यान रेल्वे मार्गावर अपघात घडवून आणण्यासाठी मोठमोठया दरडी टाकल्या होत्या. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला. गांधी बचावले, ह्या साऱ्या घातपातात नथुराम संशयित आरोपी असल्याचं सिद्ध झालं आहे. या काळात हिंदुस्तानच्या फाळणीची चर्चा सुरु नव्हती. त्यामुळे गांधींना फाळणीसाठी दोषी ठरवून त्यांचा खून करणाऱ्याच्या  फाशीला हौतात्म्याचा टिळा लावण्यासाठी आटापिटा करणे ही देखील नथुरामी विकृतीच आहे. नथुराम जिवंत असताना कुणी ऐकलं नाही, त्याच्या मागं कुणी जमलं नाही. अशांच्या खुनाशीपणाची पुस्तकं वाचून, नाटकं पाहून कोण नथुराम बनणार? गांधीवादाचा स्वीकार केल्याशिवाय कुठल्याही राजकीय विचाराला सत्तास्थान लाभणार नाही , सत्य आणि अहिंसा ही गांधीवादाची मूलतत्त्व आहेत. त्याचा धिक्कार करून कुणी राजकारण , समाजकारण, सत्ताकारण, करू शकत नाहीत. हाच गांधींचा विजय आहे. गांधींचा हा मोठेपणा पचत नाही, असे वांतीकारक काय क्रान्ती करणार? नथुरामही त्यातलाच! तो नीट कळण्यासाठी 'नथुराम'चं नाटक व्हायला हवं. त्यामुळे देशहिताच्या बुरखा घालून सत्य, अहिंसेचा खून करण्याची संधी शोधणारे आजचे छुपे नथुराम तरी ओळखता येतील.

*गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्रावर थापलं*
नथुरामाच्या खुनशीपणामुळं नि:शस्त्र महात्म्याचा खून झाला तसा हजारो निरपराधांच्या संसाराचा नाश झाला. महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांची होरपळ झाली; वर महात्मा गांधींच्या खुनाचं पाप महाराष्ट्राच्या माथ्यावर राष्ट्राने थोपलं. एका गोळीत इतके ऐतिहासिक क्रौर्य करणाऱ्या नथुरामला नाटकातही फासावर लटकलेलं दाखवलं आहे. म्हणजे या नाटकाचे जेवढे प्रयोग होतील तेवढ्यांदा 'नथुराम' फासावर लटकलेला पाहायला मिळेल. तेव्हा याचे प्रयोग व्हायला हवेत.
हरीश केंची

सीबीआय......फर्ज आणि फर्जी!


"निवडणूका आल्या की, सीबीआयची चर्चा सुरू होते. देशातील राजकारणी, अधिकारी, उद्योगपती यांच्या भ्रष्टाचाराच्या केसेस उघड होतात. सत्ताधारी मंडळी सत्ताकांक्षी लोकांना सीबीआयच्या माध्यमातून वेठीला धरतात. सत्ताकांक्षी सत्ताधारी होताच त्या सगळ्या केसेस बंद होतात, असा आजवरचा इतिहास आहे. आताही तसंच घडलंय. ममता बॅनर्जींनी २३ पक्षांची मोट बांधून भाजपेयींना आव्हान दिलं. परिणामी २०१३ च्या चिटफंडच्या फायली उघड झाल्या. धरणं, न्यायालय, आरोप-प्रत्यारोप यांच्या फेरी झडल्या. देशाच्या सार्वभौमत्वाला इथं छेद दिला जातोय, राजकारणातला शिष्टाचार मोडीत निघतोय, प्रचाराचा स्तर घसरतोय याचं भान या सत्तापिपासू राजकारण्यांना राहिलं नाही. सीबीआयच्या कामाचा तमाशा कसा झाला, हल्ला प्रतिहल्ला आपण पाहिला. सीबीआय म्हणजे काय हे जरा पाहू या...!"
-----------------------------------------------------
*सीबीआय.....फर्ज आणि फर्जी!*
सीबीआय सरकारच्या मदतीला वारंवार का धावते.
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन अर्थात सीबीआय ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे. अब्जावधी रुपयांच्या गुंतागुंतीच्या भ्रष्टाचार प्रकरणांचा तपास करणारी ही संस्था सरकारसाठी  विघ्नहर्ता ठरला ठरली आहे. विरोधीपक्षाला नामोहरम करायचं असेल तर सरकारला लगेच सीबीआयची आठवण येते. थोडक्यात  संकट आलं की सरकार आणि कोर्ट या दोन्हींना सीबीआयची आठवण येते. देशातील या केंद्रीय तपास यंत्रणेविषयी लोकांना खूप कुतूहल आहे. देशात खळबळ माजवणाऱ्या कुठल्याही प्रकरणाचा नंतर सीबीआयशी संबंध येतो. त्यामुळं सीबीआयचा लोकांना धाक वाटतो. राजकारण्यांनी सीबीआयची पार दयनीय अवस्था केलीय ही गोष्ट वेगळी.

*'काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन'*
एकेकाळी सीबीआयचा धाक वाटायचा. छुपी मिळकत असोकिंवा जेमतेम पुरावा असला तरी सीबीआय पाताळ धुंडून दुष्कृत्य बाहेर काढायची. सीबीआयच्या नुसत्या नावानेच पापं करणाऱ्यांचा थरकाप व्हायचा. आता मात्र सीबीआयचा तपास बराचसा राजकीय नेते किंवा धनिकांच्या भानगडींचा शोध घेणारा असतो. यात आरोपी अनेकदा सुटतात. त्यामुळं गुन्ह्याचा तपास लागल्याचा दर ऐंशी टक्क्यांहून पन्नास टक्क्यांच्या जवळपास आलाय. सीबीआयचा राजकीय वापर करण्याचं श्रेय काँग्रेसकडं जातं. राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी गांधी परिवारानं सीबीआयचा वापर केला. इतका की, लोक चेष्टेनं सीबीआयला 'काँग्रेस ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन' असं म्हणत.

*सत्ताबदलनंतर राजकारण्यांना आठवण*
बिगर काँग्रेसी सत्ताधाऱ्यांनीही सीबीआयचा असाच वापर सुरू ठेवला. गेल्या तीस वर्षांत सीबीआयला एकाही राजकीय केसचा तपास करण्याची सूट मिळालेली नाही. निवडणूका आल्यावर, केंद्रात सत्ताबदल झाल्यावर राजकारण्यांना सीबीआयची आठवण येते. पोलीस दलातील एक वरिष्ठ अधिकारी काही काळ सीबीआयमध्येही होते. त्यांनी अनेक हाय-प्रोफाईल केसेसचा तपास केलाय. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, 'तसं पाहिलं तर मुंबई पोलीस आणि सीबीआयची तपासाची पद्धत जवळजवळ सारखीच आहे. फक्त सीबीआय परदेशातही तपास करू शकतं. तो अधिकार इथल्या पोलिसांना नाही.' ते पुढं म्हणतात, 'सीबीआय जेव्हा एखाद्या संवेदनशील किंवा हाय-प्रोफाईल केसचा तपास सुरू करते, तेव्हा त्या टीमच्या ऑफिसरना सुद्धा दुसरे कोणत्या अँगलने तपास करताय त्याची माहिती नसते. हे अधिकारी योग्यरितीने तपास करताहेत की नाही, ते पाहणारी एक तुकडी असते. ही तुकडीही तिच्या पद्धतीने तपास करतच असते. दोन्ही तपासाच्या अहवालात फरक आला तर तपास अधिकाऱ्यावर ठपका ठेवण्यात येतो.' सीबीआय तपासाचे तीन विभाग आहेत. जनरल ऑफेन्स विंग, आर्थिक गुन्हे शाखा, आणि भ्रष्टाचारविरोधी शाखा. काही वेळेला गुन्ह्यांच्या तपासासाठी वेगळं पथकही नेमण्यात येतं. केस दुबळी करण्यासाठी ती सीबीआयकडे सोपविली जाते? असं लोकांना वाटतं का? यावर हे माजी अधिकारी म्हणतात. 'काही वेळेला असं घडतं खरं!'

*स्वातंत्र्यकाळापूर्वी सीबीआयची स्थापना*
सीबीआय असो व पोलिसांची क्राईम ब्रँच. या यंत्रणा स्वतंत्रपणे तपास करू शकत नाहीत. स्वतंत्र तपास फक्त स्थानिक पोलीस स्टेशनच करू शकतं. सीबीआय आणि क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना तपासाची बारीकसारीक माहिती वरिष्ठांना कळवावी लागते. मग त्यांच्याकडून पुढील तपासाची दिशा ठरते. सीबीआयची स्थापना १९४१ मध्ये झाली. या संस्थेचं मूळ नांव 'स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट'-एसपीई असं होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात शस्त्रास्त्र खरेदीतील भ्रष्टाचार रोखण्याचं काम या संस्थेकडं होतं. युद्ध संपल्यानंतर संस्था बरखास्त करण्यात आली नाही. १९४६ मध्ये एक कायदा करून एसपीईला कायदेशीर दर्जा देण्यात आला. नावात दिल्ली हा शब्द घालण्यात आला. ही संस्था केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत आली. देशभर सरकारी खात्यात चाललेला भ्रष्टाचार रोखण्याचं काम या संस्थेकडं सोपविण्यात आलं. १९६३ मध्ये दिल्ली स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंटचे नाव बदलून 'सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन असं करण्यात आलं. १९६९ मध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण झाल्यावर बँकाही सीबीआयच्या तपास अखत्यारीत आल्या.

*नेहमीच पंतप्रधानांचा हस्तक्षेप होतो*
सीबीआयच्या कामगिरीबाबत या संस्थेचे माजी प्रमुख जोगिंदर सिंग यांनी 'इनसाईड सीबीआय' नावाचं एक पुस्तक लिहिलंय. ते प्रमुख असताना मागे दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले होते की, 'सीबीआय स्वायत्त संस्था आहे. पंतप्रधानही तिच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत. सीबीआयच्या डायरेक्टरनंतर केस कुणाकडेही जात नाही. पंतप्रधानांना काही विचारण्याची गरज भासल्याचा माझा अनुभव नाही.' जोगिंदर यांनी सरकारी हस्तक्षेपाचा इन्कार केला असला तरी इंदिरा गांधी यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंतच्या सर्वच पंतप्रधानांनी हस्तक्षेप केलाय वा त्यांना सल्ला दिलाय हे आपण अनुभवलं आहे.

*'इनसाईड सीबीआय' जोगिंदरसिंग यांचं पुस्तक*
'इनसाईड सीबीआय' या जोगिंदर यांच्या पुस्तकांत बराच तपशील आहे. सीबीआय अधिकारी वरिष्ठांना मस्का मारण्यात कसे तत्पर असतात, त्याची उदाहरणं आहेत. अनेक अधिकाऱ्यांच्या वर्षानुवर्षे बदल्या न होण्यामागची कारणंही जोगिंदर सिंग यांनी शोधली. काही अधिकाऱ्यांना स्वतःच्या पद्धतीने तपास करून निष्कर्षाबाबत वरिष्ठांना अंधारात ठेवण्याची संवय होती. एक असंतुष्ट अधिकारी तर पत्रकारांकडे माहिती 'लिक' करताना पकडला गेला. सीबीआयवर पुस्तक लिहिणारे जोगिंदर सिंग उर्फ टायगर हे पहिलेच अधिकारी. ते लिहितात की, सीबीआयमध्ये बेशिस्त अधिकारीही आहेत. मंत्री पैसे कसे खातात त्याच्या घटनाही त्यांनी वर्णन केल्या आहेत.

*मंत्र्यांनी पैशासाठी केला शब्दच्छल*
जोगिंदर सिंग देवेगौडा पंतप्रधान असताना व त्यानंतरच्या काळात सीबीआयचे प्रमुख होते. तत्कालीन अनुभव त्यात त्यांनी लिहिले आहेत. एका मंत्र्याला पैसे घेतल्याविना फाईल क्लिअर करायची संवयच नव्हती. एकदा एक फाईल त्यांच्यासमोर आली. ज्यांचा प्रोजेक्ट् होता त्यांनी दक्षिणा द्यायची तयारी दाखविली सौदा पक्का झाल्यावर मंत्रीमहोदयांनी   फायलीवर अप्रुव्हड असं लिहिलं. पण ठरलेले पैसे न मिळल्यानं त्यांनी फाईल परत मागवली आणि अप्रुव्हडचा आधी नॉट असं लिहिलं! त्या पार्टीला ही नामंजूरी कळताच त्यांनी विमानानं दिल्ली गाठली. मंत्र्यानी ठरलेले पैसे मागितले. ते मिळताच मंत्र्यांनी तीच फाईल मागवून नॉटचं नोट करून Note approved असा शेरा मारला.

*पोलीस खात्यातही भ्रष्टाचारासाठी शब्दखेळ*
काही वर्षांपूर्वी मुंबई पोलिसातील एका अधिकाऱ्यानंही आरोपीकडून पैसे उकळण्याचा वेगळाच मार्ग शोधला. रस्त्यावरील अपघाताच्या एका केसमध्ये पोलिसांनी वाहनमालकाला पकडलं. अपघात गंभीर नव्हता. पोलिसाने वाहनमालकाकडे पैसे मागितले. एफआयआर तयार झाला होता. त्यात लिहिलं होतं One injured. पण पोलीस अधिकाऱ्याला पैसे मिळताच त्यानं वनच्या स्पेलिंगमध्ये एनची भर टाकून Non injured असं म्हणताच आरोपी घरी गेला! अशी उदाहरणं त्यात दिलीत. सीबीआयच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप होत असल्याची टीका ही सततच होत असते. राजकारणी आणि अधिकारी व्यक्तिगत कारणासाठी सीबीआयचा वापर करतात. सरकारमधील काही उच्चपदस्थ बाबू लोकांविरुद्ध खटला दाखल करण्यापूर्वी सरकारची परवानगी लागते. कायद्यात बदल केला तर सर्व काही ठीक होईल. सीबीआयमध्ये काम केलेल्या काही माजी अधिकाऱ्यांचं म्हणणं असं की, 'सीबीआयला नावापुरती स्वायत्तता आहे. राजकीय हस्तक्षेप व्हायला नको असेल तर सीबीआयला निवडणूक आयोग, रिझर्व्ह बँक, किंवा सेंट्रल व्हिजिलन्स सारखा दर्जा दिला पाहिजे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांची निवडही या तीन संस्थांमध्ये होती तशीच झाली पाहिजे. सीबीआयचे प्रमुख पंतप्रधान वा गृहमंत्र्यांची कठपुतली होतील, असे नसावेत. राजकारणी सीबीआय तपासात कशी दखल देतात याची अनेक उदाहरणं स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला आढळतील. सध्याचं ममता बॅनर्जींनी सीबीआयला दिलेलं आव्हान ही त्याचीच परिणती म्हणायला हवी.

-हरीश केंची
९४२२३१०६०९

Sunday 10 February 2019

वंगविजयासाठीचं महामंथन...!

"बंगभूमीवर लढलं जाणारं युद्ध हे समुद्रमंथनाप्रमाणे आहे. ज्यातून अमृत आणि विष दोन्ही निघणारं आहे. हे समुद्रमंथन केवळ नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यासाठीच नव्हे तर भाजपेयींसाठी आणि तृणमुल काँग्रेससाठीही अस्तित्वाचा आहे. वंगभूमीतल्या यशपयशानं एकाला 'सत्तासंजीवनी'चं अमृत मिळणार आहे तर दुसऱ्याला सत्तास्वप्नभंगाचं विष! आज प्रधानमंत्री बनण्याच्या आवेशात ममतादीदीं रणांगणात उतरल्या आहेत! त्यासाठीची त्यांची चौफेर फटकेबाजी सुरु आहे, तर मोदी-शहा अभिमन्युच्या त्वेशानं ममतादीदींच्या महागठबंधन चक्रव्यूहात शिरलेत. आगामी काळात वंगभूमी ही सतासंपादनासाठीचे समरांगण बनेल. देशाची सत्तासुत्रे यापुढील काळात कुणाच्या हाती जाणार आहेत? मोदी, राहुल की ममतादीदी? हे ठरणारं असल्यानं देशभरातल्या राजकीय निरीक्षकांच लक्ष बंगालच्या घडामोडींकडे लागलेलं आहे!"
-----------------------------------------------------
*भा* जपेयींच्या मेळाव्यात अमित शहा यांनी भाषण करताना, 'ही अस्तित्वाची लढाई आहे. पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला अन देशावर दीडशे वर्ष इंग्रजांचं राज्य आलं, आज तशीच वेळ आलीय....तेंव्हा जागे व्हा,लढ्याला सिद्ध व्हा,' असं म्हटलं होतं. पण ती लढाई पंजाबात झाली होती. आज मात्र ती बंगालच्या रणभूमीत 'बंगभूमीत' खेळली जातेय.  २५० वर्षांपूर्वी प्लासीची लढाई हिंदुस्थानचा इतिहास बदलायला कारणीभूत ठरली होती. आता तीच बंगभूमी म्हणजेच बंगालमधील लोकसभेच्या निवडणुका ह्या नव्या लढाईचं, सत्तासंघर्षाचं कारण ठरलंय. प्लासीच्या त्या युद्धात एकेकाळी इथं सिराज उदौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह होते. आताच्या या सत्तासंघर्षाची ही लढाई मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री  यांच्यात आहे. तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात आहे. ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात आहे. फक्त नावं बदललीत. युद्धाचा प्रकार बदललाय. मैदानही तेच आहे अन हे युद्ध देखील त्यांच्या अस्तित्वासाठी निर्णायक असं आहे! पण या युद्धात, लोकसभा निवडणुकीतील यशापयश ठरविणाऱ्या युद्धाचा प्रारंभ झाला होता तो फक्त १५ पैशाच्या sms पासून!

*वितुष्टता टाटांच्या नॅनो प्रकल्पातून*
वर्ष होत २००७.... फक्त एक लाख रुपयात मध्यमवर्गाला परवडेल अशी छोटी कार बनविण्यासाठी टाटा कंपनी बंगालच्या सिंगुर जिल्ह्यात प्रकल्प उभा करीत होती. राज्य सरकारकडून मजुरांचं वेतन आणि इतर मागण्यांसाठी वारंवार टाटांच्यासमोर अडचणी उभ्या केल्या, त्यासाठी कडक इशारे, धमक्या देण्यात आल्या. त्यासाठी उग्र आंदोलने झाली, जाळपोळ झाली. यामुळं त्रासलेल्या टाटांनी प्रकल्प सिंगुरमधून हलविण्याचा इरादा जाहीर केला. अगदी त्याच क्षणाला ही संधी साधून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी टाटांना एक साधा sms पाठवला होता. 'वेलकम तो गुजरात!' त्यानंतर लगेचच रतन टाटांनी नॅनो मोटर्सचा प्रकल्प गुजरातेत घेऊन जात असल्याची घोषणा केली. हा टाटांचा महत्वाकांक्षी आणि देशभरात प्रतिष्ठित समजला गेलेला हा प्रकल्प बंगालच्या हातातून गुजरातने हिसकावून घेतला. अशी चर्चा प्रसिद्धीमाध्यमातून झाली. याशिवाय बंगालमधील कामगारांचा रोजगार ममता बॅनर्जींनी घालवला अशी जहरी टीकादेखील झाली. तेव्हापासून नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात वितुष्ट, ईर्षा आणि शत्रुत्व याचं बीज रोवलं गेलं. ते आज फोफावलंय!

*मोदी आणि ममता यांच्यात साम्य आढळतं*
एकमेकांचे कट्टर शत्रुत्व निर्माण झालेल्या नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यात विलक्षण साम्य आढळतं. नरेंद्र मोदी हे सर्वसाधारण कुटुंबातून आले आहेत. त्यांचे वडील वडनगर रेल्वेस्थानकावर चहा विकत. तिथं नरेंद्र मोदीही चहा विकत असं सांगितलं जातं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्मठ प्रचारक म्हणून भाजपत ते सक्रिय बनले. महामंत्री म्हणून ख्यातकीर्त झाल्यानं त्यांना गुजरातच्या बाहेर जाणं भाग पडलं. पुन्हा त्यांनी आपल्या बळावर सत्तेच्या राजकारणात येऊन देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चित मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नेतृत्व त्यांनीसिद्ध केलं. स्वतः निर्माण केलेलं गुजरात मॉडेल देशातील लोकांपुढे ठेऊन प्रधानमंत्री होण्यापर्यंतची त्यांनी मजल मारलीय. तशाचप्रकारे ममता बॅनर्जी यांची पार्श्वभूमी देखील निम्नमध्यमवर्गीय अशीच आहे. वडील स्वातंत्र्यसैनिक होते. पण त्याचं निधन लवकर झाल्यानं  कुटुंबाची सारी जबाबदारी ममतांवर आली. त्यावेळी त्यांनी दूध विकण्याचा व्यवसाय केला. त्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर ममतांनी देखील मोदींप्रमाणे आपल्या परिवाराला,नातेवाईकांना आपल्यापासून, लाईटलाईमपासून दूर ठेवलंय. मोदींनी आपल्या पत्नीचा त्याग करून आपलं जीवन राजकारणाला समर्पित केलंय. ममता या देखील आजीवन अविवाहित राहिल्यात. काँग्रेसच्या नेत्या म्हणून त्या डाव्यांच्या विरोधात लढत होत्या. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळं त्यांना दोनदा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. शेवटी कंटाळून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन तृणमूल काँग्रेसची स्थापना केली. डाव्यांच्या विरोधात लढून त्या मुख्यमंत्री बनल्या. आज देशातील विविध २३ राजकीय पक्षांना एका व्यासपीठावर आणून प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत त्या उतरल्या आहेत.

*मोदी जसे जिद्दी तशाच ममता हट्टी!*
मोदी आणि ममतादीदीं यांच्यात खूप गोष्टी साम्य आढळतं. नरेंद्र मोदी जितके जिद्दी समजले जातात तितक्याच ममता बॅनर्जी यादेखील हट्टी असल्याचं दिसून आलंय. मोदी हे त्यांच्या विरोधकांना कधी माफ करत नाहीत. वेळ आली की, त्याचा काटा काढतात. तर ममता या देखील जुनी शत्रूता कायम लक्षांत ठेऊन वागतात. मोदी सत्ता अत्यंत कडक शिस्तीनं राबवतात. तर ममता हाती हंटर घेऊन सत्ता कशी चालवावी हे चांगलंच जाणतात. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पक्षांत पर्याय नाही, किंबहुना तो तयार होऊ नये म्हणून प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर ते दोघेही आपापल्या प्रांतात खूपच लोकप्रिय आहेत.

*भाजपेयींनी दीदीला अंगणातच घेरलंय*
२०१४ मध्ये भाजपेयींनी प्रधानमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून मोदींचं नाव जाहीर केलं, त्यानंतर देशात मोदींची लाट निर्माण झाली. तरीदेखील ज्या राज्यातून भाजपेयींना प्रतिसाद लाभला नाही अशा राज्यात बंगाल हे राज्य होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक असले तरी स्वातंत्र्यानंतरचा इतिहास असा आहे की, बंगालमध्ये कधीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ अन भाजप यांना समर्थन मिळालं नाही. तिथल्या लोकांनी तिथं त्यांना स्वीकारलंच नाही. लोकसभेच्या ४२ जागा असलेल्या बंगालमध्ये भाजपनं ममतांना हरवण्याचा प्राणपणाने प्रयत्न केला. मतांचं ध्रुवीकरण करण्यात माहीर असलेल्या अमित शहा यांनी मुरशिदाबाद, २४ परगणा इथं झालेल्या जातीय दंगलीचा राजकीय फायदा घेण्याची व्यूहरचना आखली होती. ममतांनी देखील भाजपचा अश्वमेघ रोखण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्यामुळं निवडणुकीचे निकाल ममतांच्या बाजूनं लागला आणि ४२ पैकी ३४ जागा जिंकल्या आणि भाजपला केवळ २ जागा मिळवत्या आल्या. पण भाजपेयींचं हे देखील यश खूप महत्वाचं होतं. जिथं एक तृण देखील हाती लागत नव्हतं तिथं नंदनवन फुलण्यासारखं हे यश असं भाजपेयीं समजतात त्यामुळं त्यांनी इथं लक्ष केंद्रीत केलंय. बंगालमधली ही फलद्रूपता पाहून भाजपेयींनी इथं गेली साडेचार वर्षे सतत आक्रमकता कायम ठेवली. त्यामुळं मोदी आणि ममता यांच्यातील वैमनस्य याकाळात  आणखीनच वाढीला लागलं.

*नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींसाठी अस्तित्वाचा सवाल!*
२०१९ मध्ये होणारी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूका ह्या दोघांसाठीही निर्णायक ठरणार अशाच आहेत. निवडणुकांनंतर केंद्रात सत्ता कुणाची येणार याचाही निर्णय बंगालमध्येच लागेल अशी स्थिती आहे. त्यामुळंच इथं स्फोटक परिस्थिती निर्माण झालीय. उत्तरप्रदेशसहित हिंदीभाषिक पट्ट्यात भाजपसाठी आजतरी परिस्थिती थोडी कठीण आहे. कारण मध्यप्रदेश, राजस्थान आणि उत्तराखंड इथली सत्ता भाजपेयींनी गमावली आहे. तर उत्तरप्रदेशात बसपाच्या मायावती आणि सपाच्या अखिलेश यादव यांनी युती करून भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलंय. भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुजरात आणि महाराष्ट्र इथं देखील थोडंफार नुकसान होण्याची शक्यता दिसून येतंय, याची जाणीव भाजपेयींना झालीय. यावेळी संसदेची सत्ता हाती घेण्यासाठी २७२ ही सदस्यसंख्या गाठणं गरजेचं आहे. त्यामुळं भाजपेयींनी ज्या राज्यांवर लक्ष केंद्रित केलं आहे, त्यात बंगालमधील लोकसभेच्या २५ जागा आणि ओरिसातील १५ जागा अशा ४० लोकसभेच्या जागा जिंकण्यासाठी भाजपेयींनी इथं लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे अन्य राज्यात होणारे नुकसान काही प्रमाणात इथं भरून निघेल, असा भाजपेयींचा होरा आहे. पण ते जर शक्य झाले नाही तर मात्र २०१९ मध्ये सरकार बनवण्यासाठी भाजपसमोर महामुश्कीली उभी राहील.

*पूर्वेकडील राज्ये भाजपेयींचं लक्ष्य!*
भाजपला अचानक काही बंगालमध्ये रस निर्माण झालेला नाही. सीबीआय-ममतांच्या पोलिसांचा झगडा हा एक बहाणा आहे. भाजपनं पूर्वेकडील राज्याच्या १२३ जागांसाठी मिशन आखलं आहे. त्यासाठी त्यांचे पाच विभाग नेमून त्याचे स्वतंत्र प्रभारी नेमलेत. १२३ पैकी बंगाल आणि ओरिसात ७७ जागा आहेत. २०१४ मध्ये या ७७ पैकी १० जागा भाजपला मिळाल्या होत्या. इथं झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपेयींनी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकत मुसंडी मारलीय. या यशानं भाजपेयीं उत्साहित झालेत तर ममतादीदीं बिथरल्या आहेत. भाजपचं अक्राळविक्राळ आणि विकट रूप त्यांच्यापुढं उभं ठाकलंय! त्यामुळं इथं तृणमूल काँग्रेसचा कस लागणार आहे.

*ममता प्रधानमंत्रीपदाच्या दावेदार ठरताहेत*
 ममतादीदींनी आपलं घर मजबूत करण्याचा प्रयत्न चालवलाय. बंगालमध्ये भाजपविरोधी वातावरण निर्माण करतानाच आपले सारे पत्ते त्या खेळताहेत. यावेळी तर स्वतःला महागठबंधनचं नेतेपद आणि प्रधानमंत्रीपद मिळविण्याच्या प्रयत्नात त्या आहेत. सध्याच्या राजकीय वातावरणात संसदेत त्रिशंकू अवस्था निर्माण होण्याची शक्यता प्रसिद्धी माध्यमातून वर्तविली जातेय. असं घडलं तर मात्र बिगरभाजप आणि बिगरकाँग्रेस तिसरी आघाडीच्या वतीनं  ममतांना प्रधानमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी ममतादीदींना आपल्या राज्यात बंगालमध्ये ४२पैकी कमीतकमी ३०-३५ जागा जिंकायला लागतील. बंगालमधील यापूर्वी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट हे दोन प्रमुख विरोधी पक्ष ममतादीदींसमोर होते पण आता भाजपेयींचं जबरदस्त आव्हान उभं ठाकलंय. भाजपेयीं आणि तृणमूल काँग्रेस दोन्हीही पक्ष प्रतिस्पर्धी अस्तित्वाची लढाई खेळताहेत. त्यांच्यातील हे युद्ध जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा झगडा अधिक तीव्र होत होईल.

चौकट...
*कहीपे निगाहे, कहीपे निशाणा!*

केंद्रातील सत्ता मिळवण्याचा मार्ग हा उत्तरप्रदेशातून जातो असं म्हटलं जातं. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. उत्तरप्रदेशातून जे लक्षणीय यश २०१४ मध्ये भाजपेयींना मिळालं होतं तसं यश मिळण्याची शक्यता आता दिसत नाही. ७२ खासदार मिळवलेल्या भाजपला सपा-बसपा युतीनं आव्हान उभं केलं आहे तर काँग्रेसनं प्रियांका गांधी वाद्रा  यांना इथं उतरवलंय. परिणामी इथं कमी जागा मिळतील असं लक्षात आल्याने पूर्वेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित केलंय. राष्ट्रीय स्तरावर असलेल्या काँग्रेस आणि राहुल-प्रियांका यांचा प्रभाव देशभर सर्वत्र आहे. तर ममतादीदींचा केवळ बंगाल पुरताच राहिलाय. भाजपेयींच्या समोर जर काँग्रेस हा प्रधानमंत्रीपदाचा दावेदार राहिला तर त्यांना देशभरातून प्रतिसाद लाभू शकतो, ते मोठं आव्हान भाजपेयींसमोर असेल. तीच मोठी अडचणदेखील ठरेल! पण ममतादीदी ह्या महागठबंधनाच्या माध्यमातून प्रधानमंत्रीपदाच्या दावेदार बनल्या तर त्यांचा प्रभाव हा केवळ बंगाल पुरताच सीमित राहील. देशातल्या अन्य राज्यात फारसा राहणार नाही. त्यामुळं भाजपेयींनी ममतादीदींना लक्ष्य बनवलं प्रधानमंत्रीपदाचा दावेदार बनावं यासाठी प्रयत्न चालविले आहेत. या पुढील काळात भाजपेयींच्यावतीने ज्या राजकीय घडामोडी घडतील त्या ममतादीदींना राष्ट्रीय नेतृत्व देणाऱ्या असतील. त्यामुळं ममतादीदींचा स्वभाव पाहता त्या अधिक आक्रमक होतील. चर्चेत राहतील. भाजपेयींना जे अपेक्षित आहे ते साध्य होईल. भारतीय मतदारांपुढे काँग्रेस-राहुल-प्रियांका नव्हे तर महागठबंधन-ममतादीदी ह्याच मोदींना प्रबळ विरोधक ठरतील. त्याच आव्हान देणाऱ्या नेत्या ठरतील. असं वातावरण निर्माण करतील. असं घडलं तर भाजपेयीं-मोदी-शहा यांचं फावणार आहे. भाजपेयींची ही राजकीय खेळी लवकरच दिसून येईल! म्हणतात ना ' कहीपे निगाहे... कहीपे निशाणा! ममतादीदींवर निशाणा असला तरी निगाहे मात्र राहुल-प्रियंकावर असणार आहे!

- हरीश केंची
९४२२३१०६०९

Sunday 3 February 2019

जॉर्जचं राजकीय अल्झायमर...!

"जॉर्ज दहावर्षांहून अधिक काळ अल्झायमरने ग्रस्त होते. एकेकाळी रस्त्यावरची लढाई लढलेला, सतत माणसांच्या गराड्यात वावरणारा,  तल्लख बुद्धिमत्ता लाभलेला हा लढवय्या! जनता पक्षाच्या राजवटीनंतर संघाचा राजकीय चेहरा असलेल्या जनसंघासोबत पाट लावण्याच्या समाजवाद्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध असणाऱ्यांचा जॉर्ज हीरो होते, जनता राजवटीत दुहेरी सदस्यत्वाच्या भूमिकेवर सडेतोड टीका करत त्यांनी घेतलेल्या खणखणीत भूमिकेमुळेते आपलेसे झाले! पण त्यानंतर जनसंघाचा नवा चेहरा भाजप जॉर्जनं आपलासा झाला. ते भाजपेयींच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. आज संघपरिवार मुख्य प्रवाहातच नव्हे, तर सत्तासिंहासनावर विराजमान आहे, त्यामागे जॉर्जचं नेतृत्व कारणीभूत आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. नेहरू घराण्याचा पराकोटीचा द्वेष करताना देश सनातनी हिंदुत्ववाद्यांच्या तावडीत नेऊन सोडला. त्यांचा राजकीय अल्झायमर इतका जालीम होता, की ते आयुष्याच्या उत्तरार्धात स्वत:चीही ओळख विसरले. खरंतर त्यांचा सैद्धांतिक मृत्यू राजकीय अल्झायमरमुळे तीस वर्षांपूर्वीच झाला होता. समाजवादी हा शब्द हास्यास्पद होण्यास, विश्वासार्हता संपण्यात जॉर्ज यांचा मोठाच वाटा आहे!"
-----------------------------------------------------

कुणालाही श्रद्धांजली तटस्थपणे वाहायची म्हटलं तर ज्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण दोन्हीही लोकांसमोर मांडणं... ज्यात त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच त्याच्या दोषांकडे अंगुलीनिर्देश करायला हवा. त्याच्यातील प्लस आणि मायनस बाबी ह्या झूम करून दाखवायला हव्यात. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरच्या या लेखात तसाच काहीसा प्रयत्न केलाय. यापूर्वीच्या दोन लेखातून त्यांचं जीवनकर्म हे जनप्रिय विद्रोहीपासून कमजोर केंद्रीय मंत्रीपर्यंत विस्तारलेलं कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न. राजकारणातले त्यांचे कच्चे दुवे, नैतिक मूल्यांपासून ते कसे दुरावले, लाल साथी जॉर्ज फर्नांडिस हे कसे केसरी बनले हे सांगण्याचा केलेला हा प्रयत्न.

*टॅक्सी चालकांची संघटना बांधली*
त्यांचा जन्म मंगलोर इथं १९३० मध्ये झाला होता. आईला ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज खूप आवडायचा म्हणून आईनं मुलाचं नाव आवडीनं जॉर्ज असं ठेवलं. त्यांचा पाद्री बनण्याचा विचार होता, पण त्यासाठीच धार्मिक शिक्षण घेताना इतर पाद्री यांची कथनी आणि करणी यात खूप मोठी तफावत त्यांना आढळली. त्यांनी तो विचार सोडून दिला आणि वयाच्या १९ व्या वर्षी नोकरीच्या शोधात थेट मुंबई गाठली. राहण्याचा ठिकाणा नव्हता रस्त्याच्या कडेला झोपायचं. पोलिसांनी मध्यरात्री उठवलं की, पुन्हा दुसरीकडं जाऊन झोपायचं. अखेर त्यांना एकेठिकाणी प्रूफरीडरची नोकरी मिळाली, पाठोपाठ राहण्यासाठी छप्परदेखील! त्याकाळी मुंबई राजकीयदृष्ट्या खूपच सजग होती, सक्रिय होती. जॉर्ज हे राम मनोहर लोहियांच्या भाषणांनी खूपच प्रभावित झालेले होते. त्यामुळं मुंबईतल्या समाजवादी आंदोलनात ते अग्रभागी राहात. त्यांच्याकडे सर्वप्रथम बॉम्बे टॅक्सी चालकांच्या युनियनची जबाबदारी आली.

*स.का.पाटलांच्या पराभवानं जायंट किलर बनले*
त्याकाळी काँग्रेसचे स.का.पाटील याचं मुंबईवर राज्य होतं. आजच्या शिवसेनाप्रमुखांसारखे मुंबईचे बेताज बादशहा होते. ते तीनदा मुंबईचे महापौर होते. नेहरू आणि शास्त्रीजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीही होते. १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी जॉर्ज हे केवळ मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांना स.का.पाटील यांच्याविरोधात लोकसभेसाठी उभं केलं गेलं. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांना एका पत्रकारानं सांगितलं की, नगरसेवक जॉर्ज फर्नांडिस हे आपल्या विरोधात निवडणूक लढवताहेत. त्यावेळी पाटील यांनी 'कोण जॉर्ज फर्नांडिस?' असा प्रतिप्रश्न केला. यावर त्या पत्रकारानं म्हटलं, 'तुम्हाला कुणी हरवू शकत नाही, हे जरी खरं असलं तरीपण जर तुमचा पराभव झाला तर?' त्यानंतर पाटलांनी जी दरपोक्ती केली तिथंच त्यांचा पराभव निश्चित झाला. पाटील म्हणाले, 'माझ्या विरोधात प्रत्यक्ष देव जरी उभा ठाकला तरी मला तो निवडणुकीत पराभूत करू शकत नाही!' दुसऱ्या दिवशी त्यांचं हे 'भ्रमवाक्य' मुंबईतल्या तमाम वृत्तपत्रांची हेडलाईन बनली होती. फर्नांडिस यांनी त्या त्यांच्या विधानाचे पोस्टर छापलं. पाटील म्हणतात....प्रत्यक्ष देवही त्यांना पराभूत करू शकत नाही....पण तुम्ही... होय तुम्हीच त्यांना पराभूत करू शकता...! त्यानंतर जॉर्ज त्या निवडणुकीत ४२ हजार मतांनी विजयी झाले. पाटलांचा पराभव झाला. एका दिग्गज राजकारण्यांचा पराभव करून जॉर्ज लोकसभेत गेल्यानं त्यांना नवं नांव मिळालं 'जॉर्ज द जायंट'.

*रेल्वे आंदोलनानं राष्ट्रीय स्तरावर नेता झाले*
स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या होत्या, पण रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यात फारसा फायदा झालेला नव्हता. महागाईचा आगडोंब उसळला होता. १९७३ला फर्नांडिस ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे प्रमुख बनले. ८ मे १९७४ ला त्यांनी मुंबईत संप सुरू केला. बघता बघता टॅक्सी युनियन, ट्रान्सपोर्ट युनियन, इलेक्ट्रिसिटी युनियन हे सारे कर्मचारी संपात उतरले. संपाला मद्रास कोच फॅक्टरीतील दहा हजार मजूरांनी हरताळ करून सहभाग घेतला. तर उत्तरेकडे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह रेल्वे रुळावर उतरले. देशात वातावरण बिघडतंय हे पाहून इंदिरा गांधी सरकारनं कडक धोरण स्वीकारलं. ३० हजाराहून अधिक आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबलं. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहत्या घरातून, हुसकावून लावलं. इंदिराजींनी १३ मे रोजी पोखरणला परमाणु स्फोट घडवून आणला, त्यामुळं देशातील वातावरण बदललं. देशभरात इंदिराजींना संपामुळं विरोध होण्याऐवजी जयजयकार होऊ लागला. आंदोलनाची धग कमी झाली. २८ मे रोजी संप बिनशर्त मागे घेतला गेला. यानं दोन गोष्टी सिद्ध झाल्या. १) देशाला एक शक्तिशाली मजूर नेता मिळाला. २) त्यानंतर कधीही सरकारी कर्मचाऱ्यांचं मत इंदिराजींना मिळालं नाही. इंदिराजी त्यानंतर १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीला योग्य ठरविण्यासाठी नेहमी रेल्वे आंदोलनाचं उदाहरण देत.

*आणीबाणीत वेषांतर करून पसार झाले*
२५ जून १९७५ रोजी ओरिसातील गोपालपूर इथं पत्नी लैला कबीर यांच्याबरोबर सुट्टी घालवीत होते. जेव्हा त्यांना कळलं की, देशात आणीबाणी लागू केलीय, त्यांनी वेषांतर केलं तिथून ते फरार झाले. कालांतरानं दाढी, केस वाढल्यानं त्यांनी शिखांसारखं वेष परिधान केला.  कुणी विचारलं तर ते स्वतःचं नाव प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग असं सांगत. ते बंगलोरला हॉटेलमध्ये  असताना तिथं पोलिसांची धाड पडली. तेव्हा ते तिथं नाश्ता करीत होते, पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष आहे असं दाखवत शांतपणे नाश्ता केला अन तिथून ते निसटले. सगळ्या घटनांकडे ते बेफिकीरपणे पाहत होते. तिथून ते बडोदा इथं आपल्या मित्राकडे गेले, त्यांना त्या अवस्थेत पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यानं जॉर्जला या वेषांतराबाबत विचारलं तेव्हा त्याला ते म्हणाले, 'मी माझ्याच देशात मी शरणार्थी म्हणून  हिंडतोय..!'

*परदेशी हस्तक्षेपानं एन्काऊंटर रोखला गेला*
त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चुका केल्या. त्यापैकी एक असं की, त्यांना असं वाटू लागलं होतं की, आणीबाणी हटविण्यासाठी शांततामय, अहिंसक आंदोलन परिणामकारक ठरणार नाही त्यासाठी हिंसात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबायला हवा. मग बडोदातल्या अनेक मित्रांना त्यांनी एकत्र केलं. डायनामाईट मिळवलं. कुणालाही इजा होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी सरकारी इमारतीच्या टॉयलेटमध्ये स्फोट करायचं ठरवलं. बिहारमध्ये नॉनगझटेड कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रेवतीकांत सिन्हा यांच्या घरात डायनामाईट लपवलं होतं. पोलिसांनी रेवतीकांत यांच्या घरी छापा टाकला. तिथं जॉर्ज सापडले नाहीत, पण डायनामाईटचा साठा सापडला. फर्नांडिस यांच्यासह २८ जणांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. १० जून १९७६ रोजी जॉर्जना कलकत्त्यातल्या चर्चमधून धरपकड करण्यात आली. त्यांना कलकत्त्याहून दिल्लीला नेण्यात आलं. त्यावेळी इंदिराजी रशियात होत्या. जॉर्ज फर्नांडिस यांचं एन्काऊंटर केलं जाईल अशी सर्वत्र चर्चा सुरू होती. ब्रिटनचे तत्कालीन प्रधानमंत्री जॉर्ज केलगहन, जर्मन चान्सलर विली ब्रँड, आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर ब्रुनो काएस्की यांनी इंदिराजींना मास्कोत फोन करून  बजावलं की, जॉर्ज फर्नांडिस यांचं एन्काऊंटर झालं तर भारताबरोबर असलेले संबंध बिघडतील.

*मुझफ्फरपूर येथून लोकसभेवर निवडून गेले*
त्यानंतर त्यांना कारागृहात डांबलं गेलं. आणीबाणीविरोधातील आंदोलनातील सर्वात मोठा नेता म्हणून जॉर्ज ओळखले जाऊ लागले. १९७७ मध्ये आणीबाणी हटविली गेली, निवडणुका आल्या. जॉर्जनं तुरुंगातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुझफ्फरपूर इथून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. ते तर तुरुंगात होते. तिथं त्यांनी एकही सभा घेतली नाही की, एक रुपयाही खर्च केला नाही. लोकांनीच त्यांच्यासाठी निधी उभारला आणि प्रचार केला. बेड्या घातलेला हात वर करीत लोकांना अभिवादन करणारी त्यांची छबी त्यावेळी खूपच लोकप्रिय आणि परिणामकारक ठरली होती. आणीबाणीच्या विरोधातलं ते एक प्रतीक ठरलं होतं. ते सतत लोकांसमोर ठेवलं गेलं. फर्नांडिस यांच्या साथी मित्रांनी तुरुंगात लपवून रेडिओ आणला होता. निवडणूक निकालानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हॉईस ऑफ अमेरिका हे स्टेशन लावलं, तिथून त्यांना समजलं की, इंदिरा गांधी रायबरेलीतून पराभूत झाल्या होत्या आणि मुझफ्फरपूर इथून जॉर्ज तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले.

*जॉर्जच्या 'घुमजाव' नं सरकार कोसळलं*
जॉर्ज तुरुंगातून बाहेर आले. मोरारजींच्या सरकारात उद्योगमंत्री बनले. त्यांच्यावर लावलेले सारे आरोप कोर्टानं रद्दबातल ठरवले. त्यांनी पुन्हा एकदा आयुष्यातली मोठी चूक केली. ती त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी चूक होती. सव्वादोन वर्षाच्या जनता राजवटीतील मोरारजींच्या सरकारात फूट पडली. संसदेच्या मान्सुन अधिवेशनाची सुरुवातच अविश्वास प्रस्तावानं झाली. त्याविरोधात जॉर्जनं सव्वादोन तास भाषण केलं. ते त्यांच्या चांगल्या भाषणांपैकी एक होतं. त्याच्या दोन दिवसानंतर लगेचच जॉर्ज फर्नांडिस यांनी यु टर्न घेत घुमजाव केलं, पलटी खाल्ली. त्यामुळं मोरारजी सरकार कोसळलं. सारा देश या प्रकारानं आश्चर्यचकित झाला. ज्या जॉर्जनं अविश्वासाच्या विरोधात तब्बल दोन तासाहून अधिक काळ घणाघाती, ऐतिहासिक भाषण केलं आणि त्याच जॉर्जनं दोनच दिवसांत आपली अचानक कशी भूमिका बदलली? त्यांच्या राजकीय जीवनातील तो एक काळा डाग सिद्ध झाला!

*मधु लिमये यांच्यामुळे घुमजाव जॉर्जचं घुमजाव*
एका पत्रकारानं जॉर्जना याबाबत विचारलं तेव्हा जॉर्ज त्याला म्हणाले, '
मी भाषण करून घरी परतलो त्यानंतर मधू लिमये माझ्या घरी आले. दोघांनी रात्रभर आपआपल्या बाजू एकमेकांसमोर जोरकसपणे मांडल्या. आमच्यात वाद झाला पण जॉर्ज मधू लिमये यांच्याशी सहमत झाले नाहीत. सकाळी लिमये घराबाहेर पडताना जॉर्जचा निरोप घेताना लिमये यांनी त्यांना भूतकाळाची आठवण करून दिली. जॉर्ज, तुला आठवतंय, आपण ज्या वैचारिक आंदोलनात लढलो, आयुष्यभर झगडा केला, दिवसभर गोरगरिबांच्यासाठी झगडून थकून घरी येत आणि बदाम खाऊन झोपून जात! मधू भावूक बनले होते, त्यांनी त्यांना विनंती केली जॉर्ज त्यांना इन्कार करू शकले नाहीत. मोरारजी सरकार कोसळलं! चरणसिंग प्रधानमंत्री बनले. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांनी जॉर्जच्या या बदलत्या घुमजाव भूमिकेवर टीकेची झोड उठवली. परिणामी जॉर्जचा चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेशच केला गेला नाही. १९७६ मध्ये जेव्हा तीस हजारी कोर्टात जॉर्जना हजर करण्यात आलं तेव्हा तिथं जेएनयूचे विद्यार्थी हजर होते. त्यांनी तिथं जॉर्ज झिंदाबादच्या घोषणा दिल्या. 'कॉम्रेड जॉर्ज फर्नांडिस.. लाल सलाम.. लाल सलाम..!' पण त्यानंतर एक मोठी घटना घडली हा 'लाल सलाम' नंतर 'केसरी सलाम' बनला. जॉर्ज समाजवादी नेता होता. त्यांची विचारधारा डावीकडे झुकलेली होती. त्यांच्यासोबत निवडणूक लढवली पण तिथं डाळ शिजली नाही. शेवटी हा दक्षिणपंथी नेता भाजपशी हातमिळवणी करून वाजपेयी सरकारात संरक्षणमंत्री बनला.

*परमाणू शस्त्रविरोधी तरीही स्फोट घडवला*
फर्नांडिस आपल्या कार्यालयात अणुबॉम्बनं उध्वस्त झालेल्या हिरोशिमाचं तसबीर लावत. हेच जॉर्ज वाजपेयी सरकारात संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी भारताचा दुसरा परमाणु विस्फोट केला. याला विरोधाभास म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? वाजपेयी त्यांच्याहून हुशार होते. परमाणु विस्फोटाचं श्रेय त्यांनी स्वतः घेतलं. जॉर्ज परमाणु शस्त्रांच्या विरोधात असल्यानं ते काहीच बोलू शकले नाहीत.

*भ्रष्टाचाराचं स्टिंग ऑपरेशन झालं अन ते डागाळले*
ते घरातली स्वतःची सगळी कामं स्वतःच करीत. स्वतःचे कपडेदेखील ते स्वतः धूत. राजीव शुक्ला यांच्या टेलिव्हिजन शोमध्ये ते लुंगी बांधून कपडे धुवायला बसलेले लोकांना दिसले होते. १९९५ मध्ये कपडे धुण्यासाठी जात असताना जॉर्ज बाथरूममध्ये घसरून पडले. त्यांच्या डोक्याला इजा झाली. इथूनच त्यांच्या अल्झायमर आणि पार्किन्सन विकाराला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी २४ वेळा सियाचीनला भेट देण्याचा विक्रम केलाय. बराक मिसाईलच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. २००१ मध्ये तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांच्या राजकीय करकीर्दीवर मोठा आघात झाला. त्यांची निकटवर्तीय साथी आणि समता पार्टीच्या अध्यक्षा जया जेटली त्या स्टिंगमध्ये दोन लाख रुपयांची लाच घेताना दिसल्या होत्या. भले त्यांना नंतरच्या काळात त्याबाबत क्लीन चिट मिळाली असेल पण त्यांच्यावर लागलेला कलंक काही पुसला गेला नाही.

*नऊ वेळा निवडून आलेल्या जॉर्जचा तिथंच पराभव*
बिहारचे वर्तमान मुख्यमंत्री नितीशकुमार हे त्यांचे पट्टशिष्य. अल्झायमर झालेल्या जॉर्जची तब्येत ढासळली जातेय या कारणांनी त्यांनी आपल्या गुरूला २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी द्यायला इन्कार केला. वैफल्यग्रस्त झालेल्या जॉर्ज यांनी मग अपक्ष म्हणून निवडणूक लढवली ज्या मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले त्या जॉर्जना तिथंच पराभवाला सामोरं जावं लागलं. जसा पराभव त्यांनी स.का.पाटील यांचा केला होता तसाच पराभव त्यांना इथं स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दाखल केली. नितीशकुमार यांनी उदारता दाखवीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नाही, त्यांचा राज्यसभा सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा केला. जॉर्जच्या खासगी जीवनातही विवाहबाह्य संबंधबाबत अनेक वदंता होत्या. त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा याच सदरातून यापूर्वी दोन भागात काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता इथं त्यांच्या राजकीय जीवनातील घडामोडींचा परामर्ष घेतलाय. विद्रोही नेता म्हणून नोंदपात्र कामगिरी करणारा त्याचबरोबर सामाजिक राजनीतीचा वारसा ठेऊन जाणाऱ्या नेत्याला आदरांजली!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...