Sunday, 3 February 2019

जॉर्जचं राजकीय अल्झायमर...!

"जॉर्ज दहावर्षांहून अधिक काळ अल्झायमरने ग्रस्त होते. एकेकाळी रस्त्यावरची लढाई लढलेला, सतत माणसांच्या गराड्यात वावरणारा,  तल्लख बुद्धिमत्ता लाभलेला हा लढवय्या! जनता पक्षाच्या राजवटीनंतर संघाचा राजकीय चेहरा असलेल्या जनसंघासोबत पाट लावण्याच्या समाजवाद्यांच्या निर्णयाला कडाडून विरोध असणाऱ्यांचा जॉर्ज हीरो होते, जनता राजवटीत दुहेरी सदस्यत्वाच्या भूमिकेवर सडेतोड टीका करत त्यांनी घेतलेल्या खणखणीत भूमिकेमुळेते आपलेसे झाले! पण त्यानंतर जनसंघाचा नवा चेहरा भाजप जॉर्जनं आपलासा झाला. ते भाजपेयींच्या मांडीला मांडी लावून बसू लागले. आज संघपरिवार मुख्य प्रवाहातच नव्हे, तर सत्तासिंहासनावर विराजमान आहे, त्यामागे जॉर्जचं नेतृत्व कारणीभूत आहे असे म्हटल्याशिवाय गत्यंतर नाही. नेहरू घराण्याचा पराकोटीचा द्वेष करताना देश सनातनी हिंदुत्ववाद्यांच्या तावडीत नेऊन सोडला. त्यांचा राजकीय अल्झायमर इतका जालीम होता, की ते आयुष्याच्या उत्तरार्धात स्वत:चीही ओळख विसरले. खरंतर त्यांचा सैद्धांतिक मृत्यू राजकीय अल्झायमरमुळे तीस वर्षांपूर्वीच झाला होता. समाजवादी हा शब्द हास्यास्पद होण्यास, विश्वासार्हता संपण्यात जॉर्ज यांचा मोठाच वाटा आहे!"
-----------------------------------------------------

कुणालाही श्रद्धांजली तटस्थपणे वाहायची म्हटलं तर ज्या व्यक्तीचे गुण आणि अवगुण दोन्हीही लोकांसमोर मांडणं... ज्यात त्याच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करतानाच त्याच्या दोषांकडे अंगुलीनिर्देश करायला हवा. त्याच्यातील प्लस आणि मायनस बाबी ह्या झूम करून दाखवायला हव्यात. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावरच्या या लेखात तसाच काहीसा प्रयत्न केलाय. यापूर्वीच्या दोन लेखातून त्यांचं जीवनकर्म हे जनप्रिय विद्रोहीपासून कमजोर केंद्रीय मंत्रीपर्यंत विस्तारलेलं कसं आहे हे मांडण्याचा प्रयत्न. राजकारणातले त्यांचे कच्चे दुवे, नैतिक मूल्यांपासून ते कसे दुरावले, लाल साथी जॉर्ज फर्नांडिस हे कसे केसरी बनले हे सांगण्याचा केलेला हा प्रयत्न.

*टॅक्सी चालकांची संघटना बांधली*
त्यांचा जन्म मंगलोर इथं १९३० मध्ये झाला होता. आईला ब्रिटनचा राजा पंचम जॉर्ज खूप आवडायचा म्हणून आईनं मुलाचं नाव आवडीनं जॉर्ज असं ठेवलं. त्यांचा पाद्री बनण्याचा विचार होता, पण त्यासाठीच धार्मिक शिक्षण घेताना इतर पाद्री यांची कथनी आणि करणी यात खूप मोठी तफावत त्यांना आढळली. त्यांनी तो विचार सोडून दिला आणि वयाच्या १९ व्या वर्षी नोकरीच्या शोधात थेट मुंबई गाठली. राहण्याचा ठिकाणा नव्हता रस्त्याच्या कडेला झोपायचं. पोलिसांनी मध्यरात्री उठवलं की, पुन्हा दुसरीकडं जाऊन झोपायचं. अखेर त्यांना एकेठिकाणी प्रूफरीडरची नोकरी मिळाली, पाठोपाठ राहण्यासाठी छप्परदेखील! त्याकाळी मुंबई राजकीयदृष्ट्या खूपच सजग होती, सक्रिय होती. जॉर्ज हे राम मनोहर लोहियांच्या भाषणांनी खूपच प्रभावित झालेले होते. त्यामुळं मुंबईतल्या समाजवादी आंदोलनात ते अग्रभागी राहात. त्यांच्याकडे सर्वप्रथम बॉम्बे टॅक्सी चालकांच्या युनियनची जबाबदारी आली.

*स.का.पाटलांच्या पराभवानं जायंट किलर बनले*
त्याकाळी काँग्रेसचे स.का.पाटील याचं मुंबईवर राज्य होतं. आजच्या शिवसेनाप्रमुखांसारखे मुंबईचे बेताज बादशहा होते. ते तीनदा मुंबईचे महापौर होते. नेहरू आणि शास्त्रीजींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रीही होते. १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होत्या, त्यावेळी जॉर्ज हे केवळ मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांना स.का.पाटील यांच्याविरोधात लोकसभेसाठी उभं केलं गेलं. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांना एका पत्रकारानं सांगितलं की, नगरसेवक जॉर्ज फर्नांडिस हे आपल्या विरोधात निवडणूक लढवताहेत. त्यावेळी पाटील यांनी 'कोण जॉर्ज फर्नांडिस?' असा प्रतिप्रश्न केला. यावर त्या पत्रकारानं म्हटलं, 'तुम्हाला कुणी हरवू शकत नाही, हे जरी खरं असलं तरीपण जर तुमचा पराभव झाला तर?' त्यानंतर पाटलांनी जी दरपोक्ती केली तिथंच त्यांचा पराभव निश्चित झाला. पाटील म्हणाले, 'माझ्या विरोधात प्रत्यक्ष देव जरी उभा ठाकला तरी मला तो निवडणुकीत पराभूत करू शकत नाही!' दुसऱ्या दिवशी त्यांचं हे 'भ्रमवाक्य' मुंबईतल्या तमाम वृत्तपत्रांची हेडलाईन बनली होती. फर्नांडिस यांनी त्या त्यांच्या विधानाचे पोस्टर छापलं. पाटील म्हणतात....प्रत्यक्ष देवही त्यांना पराभूत करू शकत नाही....पण तुम्ही... होय तुम्हीच त्यांना पराभूत करू शकता...! त्यानंतर जॉर्ज त्या निवडणुकीत ४२ हजार मतांनी विजयी झाले. पाटलांचा पराभव झाला. एका दिग्गज राजकारण्यांचा पराभव करून जॉर्ज लोकसभेत गेल्यानं त्यांना नवं नांव मिळालं 'जॉर्ज द जायंट'.

*रेल्वे आंदोलनानं राष्ट्रीय स्तरावर नेता झाले*
स्वातंत्र्यानंतर तीन वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्या होत्या, पण रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यात फारसा फायदा झालेला नव्हता. महागाईचा आगडोंब उसळला होता. १९७३ला फर्नांडिस ऑल इंडिया रेल्वे मेन्स फेडरेशनचे प्रमुख बनले. ८ मे १९७४ ला त्यांनी मुंबईत संप सुरू केला. बघता बघता टॅक्सी युनियन, ट्रान्सपोर्ट युनियन, इलेक्ट्रिसिटी युनियन हे सारे कर्मचारी संपात उतरले. संपाला मद्रास कोच फॅक्टरीतील दहा हजार मजूरांनी हरताळ करून सहभाग घेतला. तर उत्तरेकडे अनेक मजूर आपल्या कुटुंबासह रेल्वे रुळावर उतरले. देशात वातावरण बिघडतंय हे पाहून इंदिरा गांधी सरकारनं कडक धोरण स्वीकारलं. ३० हजाराहून अधिक आंदोलनकर्त्यांना तुरुंगात डांबलं. रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांच्या राहत्या घरातून, हुसकावून लावलं. इंदिराजींनी १३ मे रोजी पोखरणला परमाणु स्फोट घडवून आणला, त्यामुळं देशातील वातावरण बदललं. देशभरात इंदिराजींना संपामुळं विरोध होण्याऐवजी जयजयकार होऊ लागला. आंदोलनाची धग कमी झाली. २८ मे रोजी संप बिनशर्त मागे घेतला गेला. यानं दोन गोष्टी सिद्ध झाल्या. १) देशाला एक शक्तिशाली मजूर नेता मिळाला. २) त्यानंतर कधीही सरकारी कर्मचाऱ्यांचं मत इंदिराजींना मिळालं नाही. इंदिराजी त्यानंतर १९७५ मध्ये लादलेल्या आणीबाणीला योग्य ठरविण्यासाठी नेहमी रेल्वे आंदोलनाचं उदाहरण देत.

*आणीबाणीत वेषांतर करून पसार झाले*
२५ जून १९७५ रोजी ओरिसातील गोपालपूर इथं पत्नी लैला कबीर यांच्याबरोबर सुट्टी घालवीत होते. जेव्हा त्यांना कळलं की, देशात आणीबाणी लागू केलीय, त्यांनी वेषांतर केलं तिथून ते फरार झाले. कालांतरानं दाढी, केस वाढल्यानं त्यांनी शिखांसारखं वेष परिधान केला.  कुणी विचारलं तर ते स्वतःचं नाव प्रसिद्ध लेखक खुशवंतसिंग असं सांगत. ते बंगलोरला हॉटेलमध्ये  असताना तिथं पोलिसांची धाड पडली. तेव्हा ते तिथं नाश्ता करीत होते, पण त्यांनी त्याकडं दुर्लक्ष आहे असं दाखवत शांतपणे नाश्ता केला अन तिथून ते निसटले. सगळ्या घटनांकडे ते बेफिकीरपणे पाहत होते. तिथून ते बडोदा इथं आपल्या मित्राकडे गेले, त्यांना त्या अवस्थेत पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यानं जॉर्जला या वेषांतराबाबत विचारलं तेव्हा त्याला ते म्हणाले, 'मी माझ्याच देशात मी शरणार्थी म्हणून  हिंडतोय..!'

*परदेशी हस्तक्षेपानं एन्काऊंटर रोखला गेला*
त्यांच्या जीवनात त्यांनी अनेक चुका केल्या. त्यापैकी एक असं की, त्यांना असं वाटू लागलं होतं की, आणीबाणी हटविण्यासाठी शांततामय, अहिंसक आंदोलन परिणामकारक ठरणार नाही त्यासाठी हिंसात्मक आंदोलनाचा मार्ग अवलंबायला हवा. मग बडोदातल्या अनेक मित्रांना त्यांनी एकत्र केलं. डायनामाईट मिळवलं. कुणालाही इजा होणार नाही याची दक्षता घेत त्यांनी सरकारी इमारतीच्या टॉयलेटमध्ये स्फोट करायचं ठरवलं. बिहारमध्ये नॉनगझटेड कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रेवतीकांत सिन्हा यांच्या घरात डायनामाईट लपवलं होतं. पोलिसांनी रेवतीकांत यांच्या घरी छापा टाकला. तिथं जॉर्ज सापडले नाहीत, पण डायनामाईटचा साठा सापडला. फर्नांडिस यांच्यासह २८ जणांवर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. १० जून १९७६ रोजी जॉर्जना कलकत्त्यातल्या चर्चमधून धरपकड करण्यात आली. त्यांना कलकत्त्याहून दिल्लीला नेण्यात आलं. त्यावेळी इंदिराजी रशियात होत्या. जॉर्ज फर्नांडिस यांचं एन्काऊंटर केलं जाईल अशी सर्वत्र चर्चा सुरू होती. ब्रिटनचे तत्कालीन प्रधानमंत्री जॉर्ज केलगहन, जर्मन चान्सलर विली ब्रँड, आणि ऑस्ट्रियाचे चान्सलर ब्रुनो काएस्की यांनी इंदिराजींना मास्कोत फोन करून  बजावलं की, जॉर्ज फर्नांडिस यांचं एन्काऊंटर झालं तर भारताबरोबर असलेले संबंध बिघडतील.

*मुझफ्फरपूर येथून लोकसभेवर निवडून गेले*
त्यानंतर त्यांना कारागृहात डांबलं गेलं. आणीबाणीविरोधातील आंदोलनातील सर्वात मोठा नेता म्हणून जॉर्ज ओळखले जाऊ लागले. १९७७ मध्ये आणीबाणी हटविली गेली, निवडणुका आल्या. जॉर्जनं तुरुंगातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मुझफ्फरपूर इथून त्यांना उमेदवारी अर्ज दाखल केला. ते तर तुरुंगात होते. तिथं त्यांनी एकही सभा घेतली नाही की, एक रुपयाही खर्च केला नाही. लोकांनीच त्यांच्यासाठी निधी उभारला आणि प्रचार केला. बेड्या घातलेला हात वर करीत लोकांना अभिवादन करणारी त्यांची छबी त्यावेळी खूपच लोकप्रिय आणि परिणामकारक ठरली होती. आणीबाणीच्या विरोधातलं ते एक प्रतीक ठरलं होतं. ते सतत लोकांसमोर ठेवलं गेलं. फर्नांडिस यांच्या साथी मित्रांनी तुरुंगात लपवून रेडिओ आणला होता. निवडणूक निकालानंतरच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी व्हॉईस ऑफ अमेरिका हे स्टेशन लावलं, तिथून त्यांना समजलं की, इंदिरा गांधी रायबरेलीतून पराभूत झाल्या होत्या आणि मुझफ्फरपूर इथून जॉर्ज तीन लाखाहून अधिक मतांनी विजयी झाले.

*जॉर्जच्या 'घुमजाव' नं सरकार कोसळलं*
जॉर्ज तुरुंगातून बाहेर आले. मोरारजींच्या सरकारात उद्योगमंत्री बनले. त्यांच्यावर लावलेले सारे आरोप कोर्टानं रद्दबातल ठरवले. त्यांनी पुन्हा एकदा आयुष्यातली मोठी चूक केली. ती त्यांच्या जीवनातली सर्वात मोठी चूक होती. सव्वादोन वर्षाच्या जनता राजवटीतील मोरारजींच्या सरकारात फूट पडली. संसदेच्या मान्सुन अधिवेशनाची सुरुवातच अविश्वास प्रस्तावानं झाली. त्याविरोधात जॉर्जनं सव्वादोन तास भाषण केलं. ते त्यांच्या चांगल्या भाषणांपैकी एक होतं. त्याच्या दोन दिवसानंतर लगेचच जॉर्ज फर्नांडिस यांनी यु टर्न घेत घुमजाव केलं, पलटी खाल्ली. त्यामुळं मोरारजी सरकार कोसळलं. सारा देश या प्रकारानं आश्चर्यचकित झाला. ज्या जॉर्जनं अविश्वासाच्या विरोधात तब्बल दोन तासाहून अधिक काळ घणाघाती, ऐतिहासिक भाषण केलं आणि त्याच जॉर्जनं दोनच दिवसांत आपली अचानक कशी भूमिका बदलली? त्यांच्या राजकीय जीवनातील तो एक काळा डाग सिद्ध झाला!

*मधु लिमये यांच्यामुळे घुमजाव जॉर्जचं घुमजाव*
एका पत्रकारानं जॉर्जना याबाबत विचारलं तेव्हा जॉर्ज त्याला म्हणाले, '
मी भाषण करून घरी परतलो त्यानंतर मधू लिमये माझ्या घरी आले. दोघांनी रात्रभर आपआपल्या बाजू एकमेकांसमोर जोरकसपणे मांडल्या. आमच्यात वाद झाला पण जॉर्ज मधू लिमये यांच्याशी सहमत झाले नाहीत. सकाळी लिमये घराबाहेर पडताना जॉर्जचा निरोप घेताना लिमये यांनी त्यांना भूतकाळाची आठवण करून दिली. जॉर्ज, तुला आठवतंय, आपण ज्या वैचारिक आंदोलनात लढलो, आयुष्यभर झगडा केला, दिवसभर गोरगरिबांच्यासाठी झगडून थकून घरी येत आणि बदाम खाऊन झोपून जात! मधू भावूक बनले होते, त्यांनी त्यांना विनंती केली जॉर्ज त्यांना इन्कार करू शकले नाहीत. मोरारजी सरकार कोसळलं! चरणसिंग प्रधानमंत्री बनले. दरम्यान प्रसिद्धी माध्यमांनी जॉर्जच्या या बदलत्या घुमजाव भूमिकेवर टीकेची झोड उठवली. परिणामी जॉर्जचा चरणसिंग यांच्या मंत्रिमंडळात समावेशच केला गेला नाही. १९७६ मध्ये जेव्हा तीस हजारी कोर्टात जॉर्जना हजर करण्यात आलं तेव्हा तिथं जेएनयूचे विद्यार्थी हजर होते. त्यांनी तिथं जॉर्ज झिंदाबादच्या घोषणा दिल्या. 'कॉम्रेड जॉर्ज फर्नांडिस.. लाल सलाम.. लाल सलाम..!' पण त्यानंतर एक मोठी घटना घडली हा 'लाल सलाम' नंतर 'केसरी सलाम' बनला. जॉर्ज समाजवादी नेता होता. त्यांची विचारधारा डावीकडे झुकलेली होती. त्यांच्यासोबत निवडणूक लढवली पण तिथं डाळ शिजली नाही. शेवटी हा दक्षिणपंथी नेता भाजपशी हातमिळवणी करून वाजपेयी सरकारात संरक्षणमंत्री बनला.

*परमाणू शस्त्रविरोधी तरीही स्फोट घडवला*
फर्नांडिस आपल्या कार्यालयात अणुबॉम्बनं उध्वस्त झालेल्या हिरोशिमाचं तसबीर लावत. हेच जॉर्ज वाजपेयी सरकारात संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांनी भारताचा दुसरा परमाणु विस्फोट केला. याला विरोधाभास म्हणायचं नाही तर मग काय म्हणायचं? वाजपेयी त्यांच्याहून हुशार होते. परमाणु विस्फोटाचं श्रेय त्यांनी स्वतः घेतलं. जॉर्ज परमाणु शस्त्रांच्या विरोधात असल्यानं ते काहीच बोलू शकले नाहीत.

*भ्रष्टाचाराचं स्टिंग ऑपरेशन झालं अन ते डागाळले*
ते घरातली स्वतःची सगळी कामं स्वतःच करीत. स्वतःचे कपडेदेखील ते स्वतः धूत. राजीव शुक्ला यांच्या टेलिव्हिजन शोमध्ये ते लुंगी बांधून कपडे धुवायला बसलेले लोकांना दिसले होते. १९९५ मध्ये कपडे धुण्यासाठी जात असताना जॉर्ज बाथरूममध्ये घसरून पडले. त्यांच्या डोक्याला इजा झाली. इथूनच त्यांच्या अल्झायमर आणि पार्किन्सन विकाराला सुरुवात झाली. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी २४ वेळा सियाचीनला भेट देण्याचा विक्रम केलाय. बराक मिसाईलच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. २००१ मध्ये तहलकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांच्या राजकीय करकीर्दीवर मोठा आघात झाला. त्यांची निकटवर्तीय साथी आणि समता पार्टीच्या अध्यक्षा जया जेटली त्या स्टिंगमध्ये दोन लाख रुपयांची लाच घेताना दिसल्या होत्या. भले त्यांना नंतरच्या काळात त्याबाबत क्लीन चिट मिळाली असेल पण त्यांच्यावर लागलेला कलंक काही पुसला गेला नाही.

*नऊ वेळा निवडून आलेल्या जॉर्जचा तिथंच पराभव*
बिहारचे वर्तमान मुख्यमंत्री नितीशकुमार हे त्यांचे पट्टशिष्य. अल्झायमर झालेल्या जॉर्जची तब्येत ढासळली जातेय या कारणांनी त्यांनी आपल्या गुरूला २००९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी द्यायला इन्कार केला. वैफल्यग्रस्त झालेल्या जॉर्ज यांनी मग अपक्ष म्हणून निवडणूक लढवली ज्या मतदारसंघातून नऊ वेळा निवडून आले त्या जॉर्जना तिथंच पराभवाला सामोरं जावं लागलं. जसा पराभव त्यांनी स.का.पाटील यांचा केला होता तसाच पराभव त्यांना इथं स्वीकारावा लागला. त्यानंतर त्यांनी राज्यसभेची उमेदवारी दाखल केली. नितीशकुमार यांनी उदारता दाखवीत त्यांच्याविरोधात उमेदवार उभा केला नाही, त्यांचा राज्यसभा सदस्य बनण्याचा मार्ग मोकळा केला. जॉर्जच्या खासगी जीवनातही विवाहबाह्य संबंधबाबत अनेक वदंता होत्या. त्यांच्या समग्र जीवनाचा आढावा याच सदरातून यापूर्वी दोन भागात काही दिवसांपूर्वीच घेतला होता. आता इथं त्यांच्या राजकीय जीवनातील घडामोडींचा परामर्ष घेतलाय. विद्रोही नेता म्हणून नोंदपात्र कामगिरी करणारा त्याचबरोबर सामाजिक राजनीतीचा वारसा ठेऊन जाणाऱ्या नेत्याला आदरांजली!

-हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...