Sunday 31 March 2024

देश वेगळ्या वळणावर....!

"ये बंद कराने आये थे, तवायफों के कोठे, मगर....
सिक्को की खनक सुनकर खुदही मुजरा करने बैठे l 
हा मिर्झा गालिब यांचा शेर सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्याची 'ईलेक्टोरल बॉण्ड्स' च्या निमित्ताने आठवण झाली. लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलंय. महाशक्ती असलेल्या भाजपनं आपली सारी शक्ती त्यासाठी लावलीय. रा.स्व. संघाच्या सर्व संघटना त्यासाठी सज्ज झाल्यात. अनेक विरोधक त्यांच्या वळचणीला जाताहेत. विरोधकांची आर्थिक कोंडी करण्यासाठी भाजप व साऱ्या तपास यंत्रणा सरसावल्या आहेत. कधी नव्हे एवढं खुनशी वातावरण सध्या बनलंय. काँग्रेसचं बँकेतलं खातं गोठवून टाकलंय. प्रादेशिक पक्षांना तर 'दे माय धरणी ठाय...!' करून सोडलंय. अशा वातावरणात जनमानसातल्या सरकारबाबतच्या रोषाला कशाप्रकारे वळण लागणार आहे यावरच सारं अवलंबून आहे. नाहीतर भाजपनं आखलेल्या कुटील खेळीनं देशातल्या राजकारणाला वेगळं वळण लागण्याची भीती व्यक्त केली जातेय..!"
-----------------------
नुकतंच अटक झालेल्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा प्रसंग पाहून मिर्झा गालिब यांचा एक शेर आठवल्याचा किस्सा आज सर्वत्र फिरतो आहे. तो शेर असा...
ये बंद कराने आये थे, तवायफों के कोठे, मगर....
सिक्को की खनक सुनकर खुदही मुजरा करने बैठे l 
झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली त्यापूर्वी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना अटक झाली होती. आतातर खुद्द मुख्यमंत्र्यांना गजाआड जावं लागलंय. १०० कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवलाय. त्यांनी मद्य धोरणातून १०० कोटी घेतले आणि त्याचा वापर त्यांनी निवडणुकीसाठी केलाय असं त्यांच्या आरोपपत्रात म्हटलंय. मुख्यमंत्र्यांसह चार मंत्री, अनेक अधिकारी, व्यापारी, दलाल हे तुरुंगात गेलेत. १०० कोटी साठी ही मंडळी वेठीला धरलेत हे योग्यच झालंय. पण ईलेक्टोरल बॉण्ड्सच्या माध्यमातून हजारो कोटी रुपयांची वसुली लाभार्थ्यांकडून सर्वच पक्षांना झालीय मग अशांची साधी चौकशीही केली जात नाही. कारवाई तर लांबच राहिली. भारतीयांच्या सुदैवानं सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हे ईलेक्टोरल बॉण्ड्स प्रकरण उघडकीला आलंय. त्यावर सुप्रीम कोर्टानंच बंदी घालून आवर घातलाय हे बरं झालं! पण याचा मूळ हेतू जो होता तो  उध्वस्त झालाय. ज्यांनी भ्रष्टाचार मुळापासून उपटून काढू अशा वल्गना केल्या त्या भाजपच्या नेत्यांनी मागील दारानं भ्रष्टाचाराला आवतन दिलं होतं. एडीआरसारख्या जागरूक संस्थांच्या माध्यमातून हे लोकांसमोर आणलं गेलंय. पण या मिळालेल्या ईलेक्टोरल बॉण्ड्सच्या पैशातून सर्वशक्तिमान बनलेल्या भाजपनं विरोधकांची आर्थिक कोंडी करत त्यांना निवडणुक लढवणं अशक्य करून सोडलंय. हे एकाबाजूला सुरू असताना दुसरीकडे जी नेतेमंडळी भाजपत डेरेदाखल होतात त्यांना इडी चौकशीपासून संरक्षण मिळतेय. तर काही भाजपवासी झालेल्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपातून मुक्ती मिळतेय. नुकतंच प्रफुल्ल पटेल यांना ८४७ कोटींच्या भ्रष्टाचारापासून मुक्त करण्यात आलंय. 
भारतीय राजकारण टोकाचं खुनशी बनत चाललंय. सत्ताधीश बनल्यानंतर मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणारा जनसंघ-भाजप अंतर्बाह्य बदलला. भाजपची सारी सूत्रं सेवाभावी ऐवजी व्यापारीवृत्तीच्या नेत्यांच्या हाती गेली. पक्षाची भरभराट झाली, सर्वसत्ताधीश बनला. 'सदृढ लोकशाहीत विरोधीपक्षाची गरज' असतानाही राक्षसी महत्वाकांक्षेच्या हव्यासापायी विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या खेळी खेळल्या जाताहेत. पक्ष संघटना आणि निवडणुकीचं राजकारण यासाठी 'पैसा' आवश्यक आहे; हे लक्षांत आल्यानं या नेत्यांनी विरोधकांना मिळणारी आर्थिक रसद तोडून टाकण्याचा निर्धार केला. स्वायत्त संवैधानिक संस्था, तपासयंत्रणा ताब्यात घेऊन विरोधकांची आर्थिक कोंडी करायला सुरुवात केलीय. पक्षाच्या फोडाफोडी पासून नेत्यांवर छापे, धाडी टाकल्या जाऊ लागल्या. आर्थिक राजधानी मुंबई-महाराष्ट्र त्यासाठी हाती हवीय. त्यासाठी हरेक प्रयत्न झाले. आता देशभरातल्या विरोधकांना आर्थिक देणग्या देणाऱ्या उद्योजक, व्यापारी, ठेकेदार, सटोडिये यांच्यावर धाडी टाकल्या जाताहेत. जेणेकरून विरोधीपक्ष निवडणूक लढविण्यासाठी उभाच राहू शकणार नाही, त्यांची कंबर मोडली जाईल अशी स्थिती केली जातेय! शिवाय अशांकडून ईलेक्टोरल बॉण्ड्स घेतलं गेल्याचं निष्पन्न झालंय. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका या केवळ निवडणुका राहिल्या नाहीत. ती भारतीय राजकारणाला, संविधानाच्या अस्तित्वाला एक वेगळं वळण देणारं ठरणारी आहे. संवैधानिक संस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, शासकीय व्यवस्था, प्रशासन या साऱ्याचा हिशेब यानिमित्तानं होणारं आहे. अशी राजकीय स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विरोधीपक्षाचं अस्तित्व कमकुवत का असेना दिसत होतं. पण यापुढच्या काळात विरोधीपक्ष असेल पण तो सक्षमपणे उभा राहू शकणार नाही अशी त्याची स्थिती असेल. त्यांचे संभाव्य उमेदवार जे निवडणुका लढवतील असं वाटतं ते त्या स्थितीत राहणार नाहीत. कारण त्यांच्यामागे कुठे ईडी असेल, कुठे आयकर तर कुठे सीबीआय असेल. हे एकाबाजूला तर दुसरीकडं निवडणूक आयोगाचे नियम-कायदे तेज धार लावून समोर येतील. असं सांगितलं जाईल की, जे भ्रष्टाचारी असतील त्यांनाच घेरलं जाईल पण काही नसेल त्यांना घाबरायचं कारण नाही. परंतु केवळ योगायोग असा की, आज या तपास यंत्रणांच्या कचाट्यात केवळ विरोधी पक्षाचे नेतेच दिसताहेत जे निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी १० लाख कोटी रुपयांचा खेळखंडोबा शेअरबाजाराच्या माध्यमातून झाला. जगभरानं पाहिलं की, कशाप्रकारे मनीलोंडरिंग, हवाला आणि काळा पैसा इथं काम करतोय, तेही शेअरबाजाराच्या माध्यमातून! इलेक्टोरोल बॉण्ड्सच्या माध्यमातून काळया पैशाचं उदात्तीकरण केलं गेलं होतं. सुप्रीम कोर्टानं ते हाणून पाडलंय. पण ईडीचं त्याकडं लक्षच गेलेलं नाही. इलेक्टोरोल बॉण्ड्स खरेदी करून राजकीय पक्षांना देणाऱ्या कंपन्यांचा पैसा त्यांनी आपल्या अर्थव्यवहार दाखवला की नाही हे इन्कमटॅक्स खात्याचं काम आहे. मात्र त्यावर बोलायला कुणीच तयार नाही. सामान्य करदात्यांना वेठीला धरणारे हे खाते मौन धारण करून बसलंय. मात्र लक्ष्य बनवलं जातंय ते विरोधीपक्षांच्या नेत्यांना! यामुळं एक लक्षांत येतंय की, ज्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता असेल तर तो पक्ष आणि तिथला मुख्यमंत्री हा तिथल्या उद्योजकांना 'एटीएम'च्या स्वरूपात पाहतो. जे राजकीय पक्ष विरोधकांची भूमिका बजावू इच्छितात अशा नेत्यांसमोर ईडी, सीबीआय, आयकर येऊन उभे ठाकतात. न्यायालयीन कारवाया केल्या जातात. बिचारे हे नेते या त्रासाला, जाचाला कंटाळून भाजपला शरण तरी जातात वा राजकारणातून बाहेर पडतात. अशांना वाचविण्यासाठी, धीर देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. महाराष्ट्रात हे आपण अनुभवलंय!
मध्यंतरी सुप्रीम कोर्टानं इडीकडून ज्यांच्यावर कारवाई होणार आहे अशांनी यादी मागवली होती. ईडीकडं ज्या १२५ राजकीय नेत्यांची यादी आहे, त्यातले १०९ जण हे विरोधीपक्षाची नेतेमंडळी आहेत. आयकर खात्यानं ज्या ४ हजाराहून अधिक लोकांना नोटिसा पाठविल्यात त्यापैकी ३ हजार ९४५ जण हे विरोधीपक्षाचे आहेत. सीबीआयनं जवळपास ६७९ जणांना नोटिसा जारी केल्यात त्यापैकी ६२९ जण विरोधीपक्षाचे आहेत. भाजपची नेतेमंडळी अभावानेच इथं आढळतात. राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, ही सारी मंडळी जिथं विरोधी पक्षांची सरकारं आहेत तिथली आहेत. २०२४ ची लोकसभेची निवडणूक ही सत्ताधाऱ्यांसाठी महत्वाची ठरणारी आहे. जगातल्या वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय औद्योगिक आणि गुंतवणूक क्षेत्रात भारतातलं सरकार आणि कार्पोरेट कशाप्रकारे काम करताहेत, बँकांकडून पैसे उचलले जाताहेत, कार्पोरेट मित्रांसाठी नियम-कायदे कसे बदलले जाताहेत. हे पाहून हात आखडता घेताहेत. शिवाय हे सारं झाल्यावर सरकारी पक्षाला कार्पोरेट फंडिंग कसं केलं जातंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रोल बॉंड दिले-घेतले जातात, त्यावरचं कवच कशाप्रकारे हटवलं गेलंय. हे पाहिलं जातेय. या साऱ्या पैशाच्या राशींवर सत्ताधारी पहुडले आहेत. विरोधकांना मिळणारी आर्थिक रसद कशी मिळणार नाही अशी खेळी केली जातेय. एवढंच नाही तर विरोधीपक्ष कसा कंगाल होईल याकडं लक्ष पुरवलं जातेय. काँग्रेसचं बँकाचं खातं गोठवून टाकलंय, त्यामुळं निवडणुका लढावणं अवघड होऊन बसलंय. सीबीआयकडं ६२ राजकारण्यांची नावं आहेत. ईडीनं महाराष्ट्रात १५ प्रकरणं नोंदवलीत. यात राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे नेते आहेत. आयकर खात्यानं ४१५ जणांना नोटिसा बजावल्यात. ९८ राजकारणी सीबीआयच्या रडारवर आहेत. यानंतर भाजपला सामोरं जाणाऱ्या तृणमूल काँग्रेस म्हणजेच विरोधकांचं दुसरं राज्य येतं पश्चिम बंगाल! इथले २७ तृणमूल काँग्रेसचे नेते ईडीच्या कारवाईत आहेत. आयकर खात्याच्या ७१५ जणांना नोटिसा बजावल्यात. सीबीआयच्या रडारवर ११५ राजकारणी आहेत. आणखीन एक विरोधकांचं राज्य बिहार; तिथल्या राजदच्या ५ नेत्यांवर ईडीच्या कारवाई सुरु आहे. २९० जणांवर आयकराच्या नोटिसा बजावल्यात. ४८ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. उत्तरप्रदेशात १७ समाजवादी आणि बसपच्या नेते ईडीच्या कक्षेत आहेत. ४९० जणांना आयकर खात्याच्या नोटिसा देण्यात आल्यात. ३७ जणांना सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्यात. मोदींना आणि भाजपला ज्या पक्षानं आव्हान दिलंय आणि ज्यांच्याविरोधात भाजपनं तीव्र आंदोलन सुरू केलंय त्या तेलंगणात जिथं तेलंगणा राष्ट्र समितीच्या के.चंद्रशेखर राव यांची सत्ता होती तिथं १९ जणांवर ईडीनं कारवाई केलीय. ९४० नेत्यांना आयकर खात्यानं नोटिसा बजावल्या आहेत तर २९ जणांविरुद्ध सीबीआयनं गुन्हे नोंदवलेत. केसीआर यांची कन्या के. कविता यांना इडीनं तुरुंगात डांबलंय. राजस्थानातल्या १६ नेत्यांविरोधात ईडीनं कारवाई केलीय. त्यात अशोक गेहलोत यांचे बंधू आहेत. १ हजार ११२ जणांवर आयकर खात्यानं नोटिसा बजावल्यात. ८६ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये २१ नेत्यांवर ईडीच्या कारवाई सुरू आहे. आयकर खात्यानं तिथं ९०८ जणांना नोटिसा पाठवल्यात. ५१ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. विरोधकांच्या या राज्यात राजकीय नेत्यांशिवाय इथल्या सरकारांना आर्थिक मदत करणारे इथले उद्योजक, दलाल, ठेकेदार, सहानुभूतीदार अशा ५ हजार ६९६ जणांना सरकारी तपास यंत्रणानी विविध मार्गानं लक्ष्य केलेलंय. जर या मंडळींनी विरोधकांना आर्थिक मदत केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे संकेत त्यांना दिलेत. विरोधकांची आर्थिक स्थितीची कोंडी केली जातेय. त्यांच्याकडं अशी ताकदही राहू नये की, पैशाच्या आधारावर ते निवडणुकीत उभे ठाकतील. ही परिस्थिती जिथं विरोधकांची सत्ता आहे अशा ठिकाणी घडतंय तर विचार करा जिथं सत्ता नाही अशा राज्यात विरोधकांची कशी दयनीय अवस्था असेल!
महत्वाची बाब म्हणजे, २०१४ पासून भाजपच्या विरोधात असलेल्या काँग्रेसवर २४ वेळा, राष्ट्रवादी काँग्रेसवर ११ वेळा, तृणमूल काँग्रेसवर १९ वेळा, शिवसेनेवर ८, द्रमुकवर ६. राष्ट्रीय जनता दलवर ५, बसपावर ५ वेळा तर इतर काही पक्षांवर कमीत कमी दोन ते तीन वेळा छापा टाकला गेलाय. ही अशी नवी राजकीय परिस्थिती २०२४ च्या निवडणुकांच्या निमित्तानं देशात निर्माण झालीय. दुसरी अशी माहिती गोळा केली गेलीय की, २०१४ मध्ये भाजप सत्तेवर येण्यापूर्वी किती भाजप नेत्यावर ईडीनं कारवाई केलीय. तर त्या यादीत भाजपचे १०२ आमदार, खासदार होते ज्यांची ईडी, आयकर आणि सीबीआयकडं प्रकरणं होती. त्यावर तत्कालीन सरकारनं कारवाई केली नाही ती एक मोठी चूक त्यावेळची असू शकते ही बाब अलाहिदा! आज मात्र राजकारणाचं एक वेगळं रूप समोर येऊ लागलंय. जिथं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्या साऱ्या आर्थिक हालचाली तपास यंत्रणांच्या कक्षेत कधीही आणू शकतील. पण तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांची रसद गोठवून त्यांना गलितगात्र करून टाकणं. याशिवाय निवडणूक आयोगाच्या मदतीनं त्या पक्षांची कोंडी करून टाकायची जशी महाराष्ट्रातल्या शिवसेनेची, राष्ट्रवादीची करून टाकलीय. असं धोरण भाजपनं स्वीकारलेलं दिसतंय. 
एकनाथ शिंदेंना हाती धरून शिवसेनाच फोडली. ठाकरेंना बाजूला करून त्यांची शिवसेना आणि त्यांचं निवडणूक चिन्ह शिंदेंना महाशक्ती भाजपनं मिळवून दिलं. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचं असंच केलंय. तो पक्ष आणि चिन्हं अजित पवारांकडे सोपवलाय. या फुटीरांचा वापर २०२४ च्या निवडणुकीत केला जातोय. कायदेशीर कज्जेबाजी सुरू आहे. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण आजवर हे सिद्ध झालेलं नाही की, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे मतदार कुणाबरोबर आहेत ते पक्षाचं नांव आणि चिन्हासोबत आहेत की, ठाकरे, पवार यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी ही शिवसेना-भाजप युती समोर २०१४ आणि २०१९ मध्ये टिकू शकलेली नाही. ४८ पैकी ४२ जागांवर सपाटून मार खावा लागलाय. पण शिवसेना हे नांव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन शिंदेंसोबत आणि राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्हं घेऊन अजित पवारांसोबत भाजपनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवतेय आणि ८-१० टक्के मतं जरी अधिक घेतली तरी भाजप अशा स्थितीत येईल की, तिथं फारसं नुकसान होणार नाही असा भाजपचा होरा आहे. शिवाय या निमित्तानं हेही स्पष्ट होईल की, उद्धव ठाकरे, शरद पवार यांचं केवळ पक्षांचं नांव आणि चिन्हांच्या जोरावर राजकारण होतं, की आपल्या व्यक्तिमत्वावर, ठाकरे, पवार या नावाच्या वलयावर आहे,  हे येणाऱ्या काळात दिसून येईल! राष्ट्रीय राजकारणात सारे विरोधक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील असं काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. नितीशकुमार भाजपच्या वळचणीला गेलेत. ममता बॅनर्जी ह्या स्वतंत्र लढताहेत. तेलुगु देशम् आणि जनसेना भाजपच्या दावणीला बांधले गेलेत. नवीन पटनाईक यांनी असंच काहीसं म्हटलंय. तेलंगणात केसीआर त्यांनी स्वतंत्र लढण्याचा विचार करताच त्यांच्या मुलीला के. कविता यांना तुरुंगात डांबलं गेलं. विरोधक एकत्र येताहेत असं दिसेल तेव्हा सरकारी तपास यंत्रणांचा आसूड तीव्र प्रमाणात अशांवर ओढला जाईल. बिहारमध्ये नितीशकुमार यांची एकट्याची विशेष अशी ताकद नाही ते भाजपसोबत असतील तरच त्यांचं महत्व आहे. त्यामुळं तेजस्वी लालूप्रसाद यादव यांना नितीशकुमार यांच्यापासून दूर काढण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्यावर आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांवर ईडी, सीबीआय, आयकर यांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. विरोधकांना आर्थिक रसद पुरविणाऱ्यांची गठडी वळवली जाईल. जेणेकरून विरोधकांना निवडणूक लढविण्यासाठीही पैशाअभावी उभं राहणं अशक्य होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या देणगीदारांची आतापासूनच कोंडी केली जातेय. हे एकाबाजूला सुरू असलेली भाजपची भूमिका पाहून काँग्रेसनं त्यातही राहुल गांधींनी असा प्रयत्न चालवलाय की, जनआंदोलन उभं राहायला हवंय. जसं आणीबाणीनंतर उभं राहिलं होतं. आता सर्वसामान्य जनता याविरोधात उभी राहिली तरच ही कोंडी फुटू शकते ह्या निर्णयाप्रत ते आले आहेत. त्यासाठी भारत जोडोतून त्यांनी आपला संपर्क वाढवलाय. आगामी काळात खरंच काँग्रेस प्रसंगी झुकत माप घेऊन विरोधकांना एकत्र करणार आहे का? काँग्रेसनं वडिलकीच्या नात्यानं प्रादेशिक पक्षांना झुकतं माप द्यायला हवंय. राज्यात २०१९ ला केवळ १ जागा जिंकली होती याचं भान ठेवायला हवं. सांगलीतल्या जागेवरून जो घोळ घातला जातोय तसं इतरत्र घडणार आहे का? जनमानसातल्या सरकारबाबतच्या रोषाला कशाप्रकारे वळण देणार यावरच सारं अवलंबून राहणार आहे. नाहीतर भाजपनं आखलेल्या कुटील खेळीनं देशातल्या राजकारणाला वेगळं वळण लागेल. देखीये आगे आगे होता हैं क्या...!
हरीश केंची
९४२२३१०६


Sunday 24 March 2024

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अवस्था राज ठाकरे यांची झालीय. बाळासाहेब ठाकरेंची ही 'सावली' थेट अमित शहांना भेटायला दिल्ली दरबारी गेली! कधीकाळी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सरसावलेले राज ठाकरे, हेच मोदींना देशाच्या राजकीय पटलावरून दूर सारायलाही निघाले होते. राज यांची राजकीय जडणघडण, कारकीर्द आणि वाटचाल ही शिवसेनाप्रमुखांच्या वैचारिक संस्कारात झाली. पण त्यांच्या आजच्या राजकीय हालचाली पाहता, बाळासाहेबांच्या विचारांच अनुकरण थांबल्याचं जाणवतंय. नाही तर सतत महाराष्ट्र, मराठी माणसांचा उपमर्द करणाऱ्यांची विचारसरणी राज यांना प्रातःस्मरणीय झाली नसती. त्यांचं हे वैचारिक 'लवंडणं' मराठी माणसांना 'अनाकलनीय' आहे!"
------------------------------------------------
*म*हाराष्ट्राच्या राजकारणात, सत्ताकारणात नवा भिडू सहभागी होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना...! राज ठाकरे यांनी आपल्याला एकट्याने अमित शाह यांना भेटायचं आहे अशी विनंती तीनवेळा भाजपकडे केली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे चाणक्य अमित शाह यांना हा 'राजहट्ट' कळवला आणि शहांनी भेटण्याला संमती दिल्यानं त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं गेलं मग राज आपले पुत्र अमित यांच्यासोबत दिल्ली दरबारी गेले. पण तब्बल १४ तासांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडेंचा मध्यस्तीने अमित शहांनी भेट संपन्न झाली. राज यांच्या या बदलत्या भूमिकांचं मराठी माणसांना आश्चर्य कधीच वाटलं नाही, पण इलेक्ट्रॉनिक्स प्रसिद्धिमाध्यमांचे लाडके राज अमित शहांच्या भेटीची बातमी दिवसभर चालवली होती. इथं एक वैगुण्य दिसून येतंय की, राज हे एकाददुसऱ्या खासदाराच्या तुकड्याच्या बदल्यात महाराष्ट्र लुटणाऱ्या भाजपच्या दावणीला बांधले गेलेत का? मोदी आणि शहा यांना राजकीय पटलावरून कायमचे बाजूला करा, असं कधी कोण म्हणालं होतं, ते त्यांना आठवतंय ना? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ' लाव रे तो व्हिडिओ...!' हा त्यांनी केलेला डिजिटल प्रचार भाजपला धडकी भरवणारा होता. मात्र भाजपच्या विजयानंतर तो टिंगलीचा विषय केला गेला. त्यावेळी त्यांनी मोदी शहा यांच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली होती. 'पहिलं स्वातंत्र्य १९४७ ला मिळालं होतं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ ला मिळालं आता मोदी शहा या दोघांना राजकीय क्षितिजावर दूर सारून तिसरं स्वातंत्र्य मिळायला हवं...!' असं आवाहन आपल्या घणाघाती भाषणात केलं होतं! त्यावेळी त्यांनी एकही उमेदवार उभा न करता भाजप विरोधात प्रचाराचा धडाका उडवला होता. पण त्यांच्या या वागण्यातून असं दिसून येतं की, त्यांची भूमिका ही नेहमी उद्धव ठाकरे विरुद्ध राहिलीय. जेव्हा उद्धव भाजपसोबत होते तेव्हा राज काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. आता उद्धव काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहेत तर राज हे भाजप सोबत गेलेत. उद्धव ठाकरेंना विरोध हेच जणू राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व असावं असं जाणवतं. याच २०१९ च्या राज यांच्या भाजपविरोधी प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे ४० जवान शहीद झालेल्या 'पुलवामा हल्ल्या'पूर्वी पाकिस्तानचे त्यांचे समकक्ष आणि हिंदुस्थानचे ‘जेम्स बॉण्ड’ असलेले अजित डोवाल यांच्यातल्या दिवाळी दरम्यान गुप्त भेटीचे रहस्य काय? असा राष्ट्रहिताचा, राष्ट्रीय सुरक्षेचा सवाल त्यांनी तेव्हा विचारला होता. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांच्या बातम्या फडकावल्या होत्या. या टोकदार प्रश्नाचे खरं उत्तर दिल्लीत अमित शहा भेटीत राजना मिळालं असेल का? भारतीय प्रजासत्ताक, स्वातंत्र्य मोदी-शहा हे फासावर लटकवत असल्याची खंत देखील राज यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून तेव्हा व्यक्त केली होती. जे चित्र आजही  सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. व्यंगचित्रात तो जो फासाचा दोर राज यांनी दाखवलाय तो अमित शहा यांच्या कार्यालयातून जप्त करून राज यांनी महाराष्ट्रात आणला असेल का? असं विचारलं जातंय. २०१९ ला भाजप विरोधातल्या प्रचाराचा धडाका उडवल्यानंतरही सेना भाजप युतीने ४१ जागा जिंकल्या. राज यांच्या प्रचाराचा कोणताच परिणाम मराठी मनांवर झाला नव्हता. राज आता भाजपचा प्रचार करण्यासाठी सरसावलेत २०२४ च्या निवडणुकीत ते परिणाम साधतील का? पण राज यांचं महायुतीत येण्यानं एक धडाडणारी तोफ भाजपला मिळालीय जी महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या ठिकऱ्या उडविल, हे मात्र निश्चित. कारण शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या तेवढ्या गाजत नाहीत, किंबहुना लोकच येत नाहीत, राज मात्र गर्दी खेचण्यात यशस्वी होतील!
भाजप विरोधी प्रचार करूनही लोकसभेच्या २०१९ ला जे लक्षणीय यश भाजप सेनेला मिळालं तेव्हा राज यांनी निकालावर 'अनाकलनीय' असा शेरा मारत आपलं ट्विटर-मौन सोडलं होतं. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना ज्या विचारसरणीची कास धरली होती. ती शिवसेनेची, मराठी माणसांची, मराठी वैभवतेची, स्वाभिमानाची, अस्मितेची, बाळासाहेबांच्या विचारसरणीची होती. प्रारंभीची वाटचालही त्याच मार्गावर झाली. खुद्द बाळासाहेबांनी आपला फोटो वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतर त्यांची छबी वापरणं त्यांनी थांबवलं. पण शिवसेनेची तीच ' खळ्ळखटाक...!' संस्कृती सुरूच ठेवली होती. राज्यात सेना-भाजपचा वाढता प्रभाव पाहता आपल्याला त्याच विचारसरणीवर मतं मिळणार नाही. अस्सल उपलब्ध असताना नक्कलला कोण विचारणार? असं लक्षांत येताच त्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं. नव्यानं वाटचाल सुरू झाली. शिवसेनाप्रमुख प्रारंभीच्या काळात समाजवादी विचारांशी जवळीक साधणारे होते. त्यातूनच त्यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. त्यामुळं शिवसेनेची विचारसरणी प्रबोधनकारांची दिसत होती. पण शिवसेनेला मिळालेला मोठा जनाधार लक्षांत येताच बाळासाहेबांना ग.वा.बेहेरे, दि.वा.गोखले, विद्याधर गोखले यासारख्या संघ विचारांच्या कावेबाज पत्रकारांनी घेरलं. सततच्या सानिध्यानं बाळासाहेब प्रबोधनी विचारांपासून दूर जात 'हिंदुत्ववादी' बनले. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती अशी! इथं नेमकं उलटं घडलं; राज ठाकरे यांना जसे पुरोगामी शरद पवार भेटले तसेच डाव्या विचाराचे 'मैत्री' या मेळघाटात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अनिल शिदोरे भेटले. त्यांनी मनसेत वैचारिक बदल घडवला. शिवाय त्यांच्या सततच्या सानिध्यानं कदाचित राज यांना शिदोरेंची ती डावी विचारसरणी भावली असावी. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना विरोध करायला सुरुवात केली. त्यातूनच शरद पवारांच्यानंतर थेट सोनियांची भेट घेते झाले होते! अटलजींचा काळ आणि मोदींची राजवट यात खूप फरक त्यांना जाणवला असावा. त्यांच्यातही बदल झाल्याचं प्रसिद्धीमाध्यमांना जाणवलं. निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी विनंती करायला आल्याचं राज यांनी तेव्हा सांगितलं होतं. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही असं लक्षांत आल्यावर 'न्यूजसेन्स' असलेल्या राज यांनी थेट युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींचं घर गाठलं. त्यांचा काय संवाद झाला ते समजलं नाही, पण राज यांच्या सोनिया भेटीनं राज्यातले काँग्रेसजन पार गोंधळून गेले. कदाचित त्यांचा आघाडीत जाण्याचा मार्ग सुकर व्हावा हा राज यांचा मानस असावा. असं तेव्हा वाटलं! पण २०१९ नंतर शरद पवारांनी राज ऐवजी उद्धव यांना जवळ केल्यानं त्यांची गोची झाली. त्यामुळं राज यांनी भाजपची महायुती जवळ केलीय. आज राज यांचं वय ५६ वर्षाचं आहे. आपल्या धरसोड वृत्तीने आपला जनाधार संपत आलाय, हे कदाचित लक्षांत आलं असावं. आपल्या मुलाला अमितला राजकारणात स्थिरस्थावर करायचं असल्यानं त्यांना काहीतरी भूमिका घेणं भाग आहे. शिवाय होत असलेली कार्यकर्त्यांची ओहोटी थांबवायची असेल तर सत्तेच्या जवळ जाऊन काही लाभ मिळवायला हवा असं वाटणं साहजिकच आहे. त्यामुळंच त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला असावा.
या लेखाचा मथळा देताना लवंडले असा शब्दप्रयोग केलाय याचं कारण ठाकरी भाषेत एखाद्यानं पक्ष बदलला, विचार बदलला तर त्यासाठी ' लवंडा ' ते हा शब्द वापरतात. म्हणून मुद्दाम हाच शब्द वापरलाय. कधी इकडे कधी तिकडे हीच मनसेची भूमिका असल्याचं आजवर दिसून आलंय. २०१४ चा निवडणुक काळात भाजपने सोबत घ्यावं म्हणून मोदींचं खूप गुणगान गायलं, मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली. मात्र भाजपने त्यांना जवळ केलं नाही उलट लाथाडलं असंच म्हणावं लागेल. मनसेच्या मागील १० वर्षात ह्या अश्या भूमिकेमुळेच बरेच नेते भाजपच्या दावणीला बांधले गेलेत. राहिली गोष्ट मनसेच्या मतदारांची तर त्यांना ही बाब माहिती आहे की मागील १० वर्षात भाजपने देशाचे आणि छोट्या छोट्या राजकीय पक्षांचे जे नुकसान केले आहे ते कधीही भरून निघणारे नाही. खुद्द राज बोलले होते की भाजपचा नोटबंदी आणि जीएसटी बाबतचा निर्णय देशाला १० वर्षे मागे घेवून जाणारा आहे. हे सर्व मतदार कसे विसरतील? 'अब की पार ४०० पार...!' म्हणणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात राज ठाकरे यांची गरज का पडावी? मात्र राज यांना महाराष्ट्रात सोबत घेतल्यास उत्तरप्रदेश, बिहारमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय मुंबईतही परप्रांतातून आलेले मतदार भय्ये भाजपपासून दुरावण्याचीही शक्यता आहे. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्याचं एक कारण शिंदेचे पंख छाटणे असा सुद्धा असू शकतो. कारण ज्या लोकसभेच्या जागांवर मनसेचे उमेदवार उभे राहताहेत त्यांनी धनुष्यबाण हे चिन्हं घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळं मागच्या दाराने शिवसेना ताब्यात घेण्याचं डाव देखील असू शकतो. अमित शहांनी तसं आश्वासन दिलं असावं. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुत्रं ही आपल्याला द्यावीत अशी राज यांची इच्छा असतानाही ती उद्धव यांच्याकडे सोपवल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले. प्रारंभीच यश वगळता त्यांना गळती लागत गेलीय. आता भाजपच्या माध्यमातून पुन्हा शिवसेनेवर ताबा मिळविण्याची त्यांची मनिषा दिसतेय. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे. कारण राज हे एकनाथ शिंदेच काय इतर कुणाच्याही नेतृत्वात काम करू शकणार नाही. 
राज ठाकरे आणि अठरा वर्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं समीकरण मांडलं तर, येणाऱ्या निवडणुकीतून लागणाऱ्या निकालातून राज यांच्या इंजिनला नवीन दिशा मिळेल किंवा इंजिन कारशेडमध्ये दिसेल. कारण त्यांनी शिवधनुष्य हाती घ्यायचं ठरवलंय. महाराष्ट्रात आघाडीच्या जागा कमी झाल्या तर, त्याचे सारे श्रेय राज यांना मिळणार आहे. ही निवडणूक राज यांच्यासाठी फार महत्वाची आहे. जर यावेळी त्यांची गणितं जुळून नाही आली तर मात्र पुन्हा संधी मिळणं कठीणच आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ बदलेले असतील. सातत्यानं त्यांचे निवडून आलेले आमदार-नगरसेवक फोडले जाताहेत. पण काही वर्षांपूर्वी वाशी येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले होते, की "एक कार्यकर्ता जरी राहिला तरी मी त्यातून लाख निर्माण करेन." त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातून असं नक्की होऊ शकेल हे जाणवतंय. राज ठाकरे यांना आपलं शक्तिस्थळ माहितीय. राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, पॉलिटिकल टायमिंगमध्ये त्यांचा देशात मोजक्या लोकांत गणना होतेय. मग आज त्यांना यश मिळेल का? हा प्रश्न उरतोच. याबाबत एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर, शरद पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं! असा टोमणा मारला होता. एका अर्थानं त्यांना असं म्हणायचं होते की, पक्ष चालविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण राज ठाकरे यांनी हा वडीलकीचा सल्ला त्यावेळी फारसा गांभीर्याने घेतला नाही. नंतर मात्र त्यांच्याच सल्ल्यानं त्यांची वाटचाल सुरु झाली असे त्यांचे विरोधक आरोप करताहेत. त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं, पण नंतर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्यासाठी अनेक कारणं असतील पण राज यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज हेसुद्धा एक उत्तम कलाकार आहेत. कलाकार कोणाचा गुलाम होत नाही. अगदी कोणा व्यक्तीचा, वेळेचा आणि वेळापत्रकाचाही नाही. पण यावर सुद्धा मात करता आली असती. त्यांची दुसरी फळी अगदीच सुमार होती. याबाबतीत शिवसेनाप्रमुख मात्र नशीबवान होते. त्यांच्याकडे सक्षम व निष्ठावंत वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी इ. नेते होते. ते फर्डे वक्ते होते. पण राज ठाकरे यांची आजही हीच मोठी समस्या आहे. त्यावर मात केलीच पाहिजे आता तशी संधी सुद्धा येणार आहे. गेल्या अठरा वर्षात राज यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांना टोल नाका आंदोलन, मराठी पाट्या अशा काही गोष्टी वगळता, नवीन सकारात्मक उपक्रम देऊन राज्यपातळीवर ३६५ दिवस गुंतवून ठेवता आलेलं नाही. तसंच सगळ्याच शहरात आणि गावात कुठल्याच पक्षात जागा नसलेले अनेक टुकार कायम नवीन पक्षाच्या प्रतिक्षेत असतात. अशा अनेक प्रवृतींनी त्याकाळात मनसेचा ताबा घेतलाय. त्यांनी मनसेच्या नावानं दुकानदारी सुरु केलीय. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे राज यांच्या 'ब्लु प्रिंट'नुसार नवनिर्माण करायला आलेले कार्यकर्ते पुन्हा माघारी फिरलेत. जे उरलेत ते आता कुठेच जागा नाही, म्हणून थांबलेत. तर हेच काय वाईट आहे. अशा प्रवृत्तीना शोधून, त्यांच्या जागा रिकाम्या करणं हे मोठे आव्हान असणारंय. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय पोकळीत, राज ठाकरे यांना स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आता नवीन कार्यकर्त्यांचे रोप लावून त्याची वाट बघणं, आत्मघातकी ठरेलं. त्यासाठी युती होणार आहे या आशेनं अनेक सेना -भाजपच्या मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यांची शोध मोहीम घेऊन योग्य त्यांना मनसेनं उमेदवार केलं पाहिजे.  सेना-भाजपच्या जागावाटपात दोन्ही पक्षाचे उमेदवार वैचारिक जवळकीनं मनसेसोबत येऊ शकतात. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे छगन भुजबळ, गणेश नाईक इ.नेते आपल्या पक्षात सामावून घेतलं, त्यांना टिकवून ठेवलं. तशी कला राज ठाकरे यांनी आता अवगत करायला हवीय. सेना -भाजपनं जशी मनसेची फोडाफोडी केली त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलीय.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
दिल्लीत राज आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआडची चर्चा म्हटले की महाराष्ट्र सावध होतो. अशाच बंद दाराआडच्या चर्चेने भाजपने थोरले ठाकरे गमावले आणि आता धाकले ठाकरे सोबत आणण्यासाठी पुन्हा बंद दाराआड चर्चा! अशा चर्चेत काय ठरले हे कळण्यास मार्ग नसतो. जे कळते त्याला आधार नसतो. बंद दाराआडच्या चर्चेतील मुख्यमंत्रीपदाने महाराष्ट्रात महाभारत घडवले. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरले होते, हे उद्धव ठाकरे शपथेवर सांगतात. परवा त्यांनी तुळजाभवानीचीही शपथ घेतली. भाजप अशा शपथा घेत नाही आणि उद्भव यांचा दावा मान्यही करत नाही. ज्या देवाला आम्हीच मंदिर बांधून देतो, त्या देवाची शपथ आम्हाला सांगू नका! मुख्यमंत्रीपदाची कोणतीही वाटणी ठरली नव्हती, यावर भाजप ठाम आहे. आता मनसेला महायुतीचे दरवाजे खुले करताना पुन्हा बंद दाराआडच्या चर्चेचा खेळ खेळला गेलाय. राज आणि शहांच्या चर्चेला भाजपचा कुणीही नेता नव्हता. शहा बंद खोलीतले बाहेर बोलत नसतात आणि काय ठरले ते राज ठाकरे हे पक्ष प्रवक्त्यांच्या बैठकीतही सांगत नाहीत. सारेच आपापल्या ठिकाणी बरोबर म्हणायचे. राज यांनी आपला स्वतंत्र बाणा महाशक्तीच्या चरणी अर्पण करू नये असे महाराष्ट्राला वाटते. आता भाजपच्या बंद दाराआडून राज यांच्याही पदरी आणखी नवी कोरी वेदना पडू नये, एवढंच!


Saturday 16 March 2024

चंदा द्या... अन् धंदा घ्या.....!

"सत्ताधारी पक्षाला कायदेशीर भ्रष्टाचार करता यावा त्याला राजमान्यता मिळावी, यासाठी भाजपने एक शक्कल लढवली. चंदा द्या अन् धंदा घ्या...! असं धोरण राबवलं. हा अंदरचा मामला उघडकीस येऊ नये म्हणून याला माहिती अधिकाराला बंदी घातली गेली. संसदेत इलेक्टोरल बॉंड संदर्भात पारदर्शकता ठेवली नाही. त्यामुळं संशयाचं भूत उभं राहिलं. दोन स्वयंसेवी संस्थांनी या विरोधात २०१८ मध्ये न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पण तब्बल सहा वर्षानंतर त्याचा निकाल लागलाय. हे इलेक्टोरल बॉंड बेकायदेशीर ठरवत ते रद्द केलं. यातल्या तपासातून जे उद्योग आणि त्यांनी दिलेल्या देणग्या, त्यांना मिळालेली कामं यातून सत्ताधाधाऱ्यांचे वस्त्रहरण झालंय. आता कसोटी आहे ती इन्कमटॅक्स खात्याची! भाजपचे धाबे दणाणले आहे. मात्र विश्वगुरू, महानायक, प्रवक्ते, अंधभक्त सारेच मौन धारण करून आहेत!"
-----------------------------------
*१* फेब्रुवारी २०१७ मध्ये सरकारनं इलेक्टोरल बॉंड आणले आणि २०१८ पासून ते विक्रीला आले. २०१८ मध्ये १०५६ . ७३ कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले गेले. २०१९ ला लोकसभेच्या निवडणुका होत्या. पुढच्याच वर्षी सगळे उद्योजक दानशूर कर्णासारखे उदार झाले त्यांनी पाचपट बाँड खरेदी केले. ५ हजार ७१.९९ कोटीचे बाँड खरेदी केले गेले. २०२० मध्ये केवळ ३६३ कोटीचे बाँड खरेदी केले गेले. २०२१ मध्ये १५०२.२९ कोटीची खरेदी झाली. जवळपास १० हजार कोटी चे बाँड खरेदी केले गेले. आता निवडणुका येऊ घातल्यात त्यावेळी २० हजार कोटींचे बाँड खरेदी होतील. एटीआरनं केलेल्या माहिती अधिकारात अशी माहिती उघड झाली आहे की, या इलेक्टोरल बाँड मधून जमा झालेल्या निधीपैकी ९५ टक्के निधी हा भाजपकडे जमा झालाय. ही जी मंडळी बाँड खरेदी करताहेत त्यांना मोदींची औद्योगिक ध्येय धोरणं आवडताहेत असं नाही तर त्यामागे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आहेत.अशा वेळी सरकारच्या विरोधात जाऊन विरोधकांना इलेक्टोरल बाँडची मदत करण्याची हिंमत कोण करणार? संसदेत मंजुरी घेताना अरुण जेटली यांनी यात पारदर्शकता असेल असं जे म्हटलं होतं.  पण याची माहिती केवळ सरकारलाच मिळतेय इतरांना नाही. कोरोना काळात उद्योग मंदावले म्हणून वेगवेगळी पॅकेजेस सरकारनं दिल्यात. आणखी महत्वाचं हे की, हे बॉण्ड्स एक कोटी रुपयांचे एक असे आहेत. नाही म्हणायला १ हजारांपासून १० लाखापर्यंत असे बॉण्ड्स आहेत. पण कार्पोरेट कंपन्यांना कमीतकमी १ कोटींचे बॉण्ड्स घ्यायला लावले आहेत. बॉण्ड्स साठी सरकारनं यासाठी ५ - ६ कायद्यात बदल केले. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं विचारलं होतं की, हे आर्थिक विधेयक होते का? तर ते आर्थिक विधेयक नव्हते. त्यामुळं हे सर्वसाधारण विधेयक म्हणून सुनावणी झाली. बॉण्ड्स संदर्भात रिझर्व्ह बँक, निवडणुक आयोग यांचा पत्रव्यवहार, संसदेतील चर्चा या साऱ्यांचा विचार केला पाहिजे. कारण या संस्थांनी जी भीती व्यक्त केली होती तसंच घडतंय. पीएम्ओ, अर्थखाते यांनी या संस्थांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत विशिष्ट हेतूनं हे बॉण्ड्स आणले आहेत अडाणी शेल कंपन्यांच्या माध्यमातून कशाप्रकारे ब्लॅक मनी शेअर बाजारात आणताहेत हे सारं आपण पाहिलंय. याची जर चौकशी केली गेली तर भारतीय अर्थव्यवहार पोखरणारी ही बॉण्ड्स व्यवस्था देशासाठी किती धोकादायक आहे हे लक्षात येईल.
२०१६-१७ आणि २०२१-२२ दरम्यान ७ राष्ट्रीय आणि २४ प्रादेशिक पक्षांसह देशातल्या एकूण ३१ राजकीय पक्षांना २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणग्या मिळाल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे यातल्या बहुतांश देणग्या, म्हणजे ६० टक्के किंवा त्याहून अधिक, इलेक्टोरल बाँड्सद्वारे प्राप्त झाल्या होत्या. या कालावधीत, २०१७ च्या कंपनी कायद्यातल्या तरतुदी देखील काढून टाकण्यात आल्या, ज्यामुळे कंपन्यांना मागील तीन वर्षांतल्या त्यांच्या सरासरी निव्वळ नफ्याच्या ७.५ टक्क्यांपर्यंत राजकीय देणग्या देण्याची परवानगी होती. ही अंतिम मुदत महत्त्वाची आहे कारण निवडणूक रोखे आले. २०१८ मध्ये अस्तित्वात आहे. इलेक्टोरल बॉण्ड योजनेची खास गोष्ट म्हणजे या योजनेमुळे देणगीदारांची नावे गोपनीय ठेवता येतात. त्यामुळे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना योगदान देण्यास स्वारस्य असलेल्या कंपन्या त्यांच्या खात्यांमध्ये त्यांची नावे किंवा तपशील जाहीर न करता असे करू शकतात. भारतात नोंदणीकृत विदेशी कंपन्या आयकर कायदा, कंपनी कायदा, भारतीय रिझर्व्ह बँक कायदा आणि परदेशी योगदानाद्वारे नियंत्रित केल्या जातात. कायदा. राजकीय पक्ष (नियमन) अधिनियम २०१० (नंतरच्या सुधारणांसह) मध्ये सरकारच्या सुधारणांच्या दृष्टीने योगदान देऊ शकतात. या कालावधीत, २०१९ मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, तसेच ४५ राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या. विश्लेषणातून एडीआरच्या संशोधनातून काही मनोरंजक तपशील समोर आले. २०१७-१८ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांमध्ये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणग्या ७४३ टक्क्यांनी वाढल्या आहेत. देणगीदाराच्या नावाच्या गोपनीयतेमुळे इलेक्टोरल बाँडद्वारे देणगी देण्याच्या पद्धतीला प्राधान्य दिले जाते. भाजपला सर्व राष्ट्रीय पक्षांमध्ये सर्वाधिक देणग्या मिळाल्या आणि इतर पक्षांना मोठ्या फरकाने मागे टाकले. 
राजकीय पक्षांनी कायदेशीर त्रुटींचा फायदा घेऊ नये यासाठी काय केले पाहिजे? त्यांना मिळालेल्या देणग्यांच्या तपशिलाबाबत त्यांनी पूर्ण पारदर्शकता राखली पाहिजे यात शंका नाही. कोणतीही तफावत टाळण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाने अनेक उपाययोजना सुरू केल्या आहेत जसे की, १३ सप्टेंबर २०१३ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल जारी केला की उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्राचा कोणताही भाग रिक्त ठेवू नये. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांना २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणग्या मिळाल्यास, त्यांनी कोणताही विभाग रिक्त न ठेवता सबमिट केलेल्या फॉर्म २४ए मध्ये तपशील द्यावा. अनेक प्रसंगी २० हजार रुपये किंवा त्याहून अधिक देणगी देणाऱ्या सर्व देणगीदारांनी त्यांचे पॅन तपशील उघड करावेत. २० हजार रुपयांपेक्षा कमी देणगी जाहीर करणे देखील आवश्यक आहे. ज्या तारखेला देणगी दिली गेली ती तारीख फॉर्म २४ए मध्ये नोंदवली गेली पाहिजे आणि कोणतीही चूक न करता सबमिट केली पाहिजे. राजकीय निधीमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कॉर्पोरेट्सनी त्यांच्या राजकीय योगदानाचे तपशील त्यांच्या वेबसाइटवर वार्षिक अहवाल किंवा समर्पित पृष्ठांवर प्रकाशित केले पाहिजेत. राष्ट्रीय आणि प्रादेशिक राजकीय पक्षांना देणग्यांचे सीबीडीटी - सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस च्या समर्पित विभागाद्वारे वार्षिक लेखापरीक्षण केले जावे आणि शेल कंपन्या किंवा गैर-अनुपालन संस्थांना देणग्या प्राप्त करण्याची परवानगी दिली जाऊ नये. राजकीय पक्षांनी नियमांनुसार मिळालेल्या देणग्यांचा संपूर्ण तपशील न दिल्यास, भारतीय निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी. आवश्यक माहिती प्रदान करण्यात वारंवार अपयशी ठरणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्याचा अधिकार आयोगाला असला पाहिजे. माहितीचा अधिकार कायदा राष्ट्रीय आणि प्रादेशिक दोन्ही राजकीय पक्षांकडून माहिती मिळविण्यासाठी वापरला जावा. राजकीय पक्षांनी केंद्रीय माहिती आयोगाने दिलेल्या आदेशांचे पालन करावे. देणगीदाराची संपूर्ण माहिती आरटीआय कायद्यांतर्गत उपलब्ध करून द्यावी. ही प्रथा भूतान, नेपाळ, जर्मनी, फ्रान्स, इटली, ब्राझील, बल्गेरिया, अमेरिका आणि जपान यांसारख्या अनेक देशांमध्ये पाळली जाते. तथापि, ज्या देशांमध्ये निनावीपणा प्रचलित आहे, तेथे सुमारे ५० टक्के निधी स्रोत उघड करणे शक्य नाही, परंतु सध्या भारतात हे घडत आहे. निवडणूक बाँड योजना, २०१८ पूर्णपणे रद्द करण्यात यावी. इलेक्टोरल बाँड योजना, २०१८ मध्ये देणगीदारांची नावे गोपनीय ठेवण्याची तरतूद योजना सुरू ठेवण्यासाठी स्वीकारली जाऊ नये. निवडणूक आयोगानं वार्षिक अहवालात राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे तपशील जाहीर केले पाहिजेत, ज्यामध्ये प्रत्येक बाँडचे बॉण्ड मूल्य आणि विशिष्ट क्रेडिट तपशील समाविष्ट आहेत. विधी आयोगाच्या अहवाल २५५ नुसार, नियमांचे पालन न केल्याबद्दल राजकीय पक्षांना दंड करण्याऐवजी, राजकीय पक्षांना नफ्याच्या तोट्यासाठी स्पष्ट दंड आकारला जावा आणि ९० दिवसांच्या डिफॉल्ट कालावधीपेक्षा प्रत्येक दिवसासाठी दंड वाढवावा. दररोज २५ हजार रुपयांच्या दंडाचा समावेश असावा. पक्षाने चुकीची घोषणा केल्यास दंड ५० लाखांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जे राजकीय पक्ष दीर्घकाळ निष्क्रिय राहतात, ते कोणत्याही निवडणुकीत भाग घेत नाहीत आणि ज्यांना इलेक्टोरल बाँड्सद्वारे देणग्या मिळत राहिल्या आहेत त्यांना भारतीय निवडणूक आयोगाने यादीतून काढून टाकावे, ज्यामुळे निवडणूक रोख्यांचा फायदा अशा पक्षांसाठी गमावले जाईल. राजकीय पक्षांचे उत्पन्न, खर्च आणि योगदान विवरणे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक द्वारे ऑडिट केले जावेत. आयटी कायद्याचे कलम २७६ सीसी ज्याप्रमाणे व्यक्तींना त्यांचे इन्कमटॅक्स रिटर्न सादर करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल दंड लावते, त्याचप्रमाणे समान कायदेशीर जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी राजकीय पक्षांवर समान कायदेशीर तरतुदी लादल्या पाहिजेत.
३० डिसेंबरला शिर्डी इलेक्ट्रिकल लिमिटेडवर छापा टाकला गेला. त्यानंतर शिर्डी इलेक्ट्रिकलनं ४० कोटी रुपयांची देणगी दिली. १८ ऑगस्ट २२ ला सीरम इन्स्टिट्युटनं ५२ कोटी रुपयांची देणगी दिली. त्यानंतर २० ऑगस्ट २२ ला सीरम इन्स्टिट्युटला कोविड लसीची मक्तेदारी दिली. एप्रिल २३ मध्ये हैद्राबादच्या मेघा इंजिनिअरिंगनं ९८० कोटींची देणगी दिली. मे २३ मध्ये मेघा इंजिनिअरिंग १४ हजार ४४० कोटींचा प्रकल्प देण्यात आला. गाझियाबादच्या यशोदा हॉस्पिटलवर रुग्णांकडून जादा पैसे उकळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर यशोदा हॉस्पिटल्सवर छापा टाकला होता. त्यानंतर यशोदा हॉस्पिटल्सनं १६२ कोटी रुपयांचे रोखे विकत घेतले. २ एप्रिल २२ ला इडीनं फ्युचर गेमिंग अँड हॉटेल सर्व्हिसची ४०९ कोटींची मालमत्ता जप्त केली. ७ एप्रिल २२ ला १०० कोटींचे रोखे विकत घेतले. २-४ कोटींचा नफाही न मिळवणारी ही कंपनी १३०० कोटींची रोखे कशी काय विकत घेऊ शकते. यात नक्की कुणाचे पैसे आहेत? ह्या कंपनीचे ऑफिस एका छोट्याशा जागेत आहे. ज्यांनी १३०० कोटींचे दान केलेत. आता ही बोगस कंपनी कोणाची आहे? असं समजतं की, ही कंपनी लॉटरी चालवते. खाण उद्योग वेदांतनं ४०० कोटीहून अधिक रोखेंचं दान केलं. त्यानंतर सरकारी कंपनी बीपीसीएल कंपनी वेदांतकडे सोपवली. वेदांत कंपनीनं भाजपला १६ एप्रिल २०१९ निवडणूक रोख्यांद्वारे ३९.६६ कोटी रुपयांची देणगी दिली, आणि ९ दिवसातच म्हणजे २५ एप्रिल २०१९ ला राजस्थानमधला १२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प वेंदात कंपनीला दिला गेला. अतिशय धक्कादायक खुलासा असा की, मूळची पाकिस्तानी दिल्लीस्थित कंपनीनं पुलवामा हल्ल्याच्या ४ आठवड्यानंतर निवडणुक रोखे दान केले. ४० शूर जवान शहीद झाल्यानं संपूर्ण देश शोक व्यक्त करत असताना, पाकिस्तानकडून निधीचा आनंद कोण व्यक्त लुटत होता. पुलवामा हलल्याचा, त्या स्फोटकांचा तपासच झाला नाही. अद्यापि एकही गुन्हेगार पकडला गेला नाही. नवयुग इंजिनिअरिंग कंपनीनं ९० कोटी रुपयाचे रोखे खरेदी केले. ही कंपनी उत्तराखंडमध्ये बोगदा खोदत होती. ४१ दिवस १७ कामगार यात अडकले होते. या प्रकरणाची साधी चौकशीही झाली नाही. मित्तल ग्रुपनं कोट्यवधींचे रोखे खरेदी केल्यानंतर गुजरातमधील एक मोठा उद्योग भारत सरकारनं मित्तल ग्रुपला बहाल केला. ५०० कोटी टर्नओव्हर असणाऱ्या कंपनीनं ४१९ कोटी रोखे विकत घेतले. गंमत बघा, या कंपनीचा मालक रिलायन्समध्ये अकाउंट हेड आहे! 
निवडणूक रोखे एसबीआयनं म्हटलं होतं एकूण १६ हजार ५१८ रोखे विकले गेले, त्यापैकी १६ हजार ४९२ कोटी वटवले गेले. उरलेली रक्कम ही पीएमफंडात जमा झालीय. देशातल्या प्रसिद्ध कंपन्यांनी नफ्याच्या ६ पटीत निवडणूक देणगी दिलीय, असं उघडकीला आलंय. यात अनेक अज्ञात जवळपास तीन हजार कंपन्याही आघाडीवर आहेत. अॅपको इन्फ्राः देणगीच्या १४ दिवसांत ९ हजार कोटींचे टेंडर मिळालं. कंपनी हे ईडी, आयकर छापे पडताच देणगी देण्यास पोहोचली. कंपनी कारवाई केव्हा आणि कशी झाली २ एप्रिल २२ ला ईडीनं छापा टाकला. १० नोव्हेंबरला कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकला अटक करण्यात आली. मार्च २४ ला प्रोजेक्ट प्राप्त झालं पण त्यापूर्वी १३ नोव्हें. २३ रोजी छापा टाकला गेला होता. जसे फ्युचर गेमिंगनं १३६८ कोटींचे रोखे, मेघा इंजि. अँड इन्फा नं ९६६ कोटी, विचक सप्लाय चेन ४१० कोटी. निवडणूक रोख्यांची खरेदी आणि पूर्ततेच्या अर्धा नफा निवडणूक देणगीत दिला. सार्वजनिक आकडेवारीतून अनेक खुलासे होत आहेत. यात अशा अनेक कंपन्या निवडणूक देणग्या देण्यात पुढे आहेत, ज्यांचा नफा कमी, परंतु त्याच्या जवळपास ६ पट दान केले, यात फ्युचर गेमिंग हे मुख्य नाव आहे, ज्याचा ४ वर्षांत नफा २१५ कोटी रुपये आहे. मात्र देणगी १ हजार ३६८ कोटी रुपये दिली. तसेच अनेक बेनामी व्यक्ती, कंपन्यांनीही आहेत त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त देणगी दिलीय. जीनस पॉवरने ३८.५ कोटी रुपयांची देणगी दिली, तर उत्पन्न केवळ २०.९१ कोटी रुपये राहिलेत. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या की, निवडणूक रोख्यांवरील चर्चा अंदाजावरच आहे. ही एक परिपूर्ण प्रणाली नाही. तर काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले की, भाजपकडून बाँडच्या नावावर जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट चालवले जात आहे. मद्य कंपन्यांची 34 कोटींची देणगी मद्य कंपन्यांनी ५ वर्षांत ३४.५४ कोटींची देणगी दिली. कोलकात्याच्या कॅसल लिकरनं ७.५ कोटी रु., सोम ग्रुप भोपाळनं ३ कोटी, छत्तीसगड इथल्या डिस्टिलरीजने ३ कोटी, मध्य प्रदेश एव्हरेस्ट वेव्हरेजेसने १.९९१ कोटी आणि एसो अल्कोहोलने २ कोटी रुपये दिले. औषध कंपन्यांकडून ५३४ कोटींची देणगी मिळालीय. आरोग्य सेवा उपकरणे आणि औषधे बनवणाऱ्या १४ कंपन्यांनी ५३४ कोटींची देणगी दिलीय. ही रक्कम २० ते १०० कोटींपर्यंत आहे. यात डॉ. रेड्डीज लॅब, टोरेंट फार्मा, नॅटको फार्मा, डिव्हिस लंब, अरविंदो फार्मा, सिप्ला, सन फार्मा लॅब, हेटेरो ड्रग्ज, झायडस हेल्थकेअर, मॅनकाइंड फार्माचा समावेश आहे. एबीएनएल इन्व्हेस्ट लि. आदित्य बिर्ला ग्रुप कंपनीचा नफा २०१९ मध्ये ४.९ कोटी रुपये होता. तो २०२० मध्ये ४७ लाख रुपयांवर आला. तरीही त्यांनी १२ डिसेंबर २०२२ रोजी १० कोटी रुपये दान केले. अभिजित मित्रा ४.२५ कोटींचे रोखे खरेदी केले. कोलकाता इथं त्यांच्या नावावर सीरॉक इन्फ्रा प्रोजेक्ट नावाची कंपनी नोंदणीकृत आहे. त्याचे एकूण भागभांडवल फक्त ६.४० लाख रुपये आहे. बोर्डाची शेवटची बैठक २०२२ मध्ये झाली होती. दोन वर्षांपासून ती अपडेट नाही.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट 
*आता कसोटी इन्कमटॅक्स खात्याची!*
इलेक्टोरल बॉंडच्या अहवालात जे काही उघड झालंय ते अत्यंत धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाने बजावलेली भूमिका अत्यंत स्पृहणीय आहे. स्टेट बँकेने घेतलेली मात्र भाजपला वाचविण्याची भूमिका ही भारतीयांच्या विरोधात आहे. कदाचित ती देशद्रोही ठरू शकते याचं भान त्यांना राहिलेलं नाही. सगळा गोंधळ, चुथडा आता लोकांसमोर आलाय. हे एका बाजूला आहे तर यात आता खरी कसोटी आहे ती इन्कमटॅक्स खात्याची! या कंपन्या, त्यांचा आर्थिक व्यवहार याचा लेखाजोखा घेतला पाहिजे. आणि यानिमित्ताने भ्रष्टाचार उघड होईल...!

सशक्त विरुद्ध अशक्त अशी लढत...!

"निवडणुकीची तयारी चाललीय. सत्ताधारी त्यात अग्रेसर आहेत. गेले महिनाभर करदात्यांच्या पैशातून इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रिंट माध्यमातून जाहिरातींचा जो रतीब घातला जातोय त्यानं लोकांना उबग आलाय. त्यातच भ्रष्टाचाराची गंगोत्री ठरलेल्या ईलेक्टोरल बाँडनं सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण केलंय. या बाँडच्या माध्यमातून भाजपला घबाड मिळालंय. मात्र विरोधकांना तुटपुंजी मदत झालीय. आयकर खात्यानं तर काँग्रेसच बँकेतलं खातं गोठवून गोची केलीय. सर्व आर्थिक आयुधांनी सज्ज, सर्वशक्तिमान भाजप उभा ठाकलाय. तर  आर्थिक कोंडीनं त्रस्त, पैसा नसलेली काँग्रेस- मित्रपक्ष, कमकुवत, विखुरलेला, आत्मविश्वास हरवलेला, हतोत्साही विरोधक अशी सशक्त विरुद्ध अशक्त विषम लढत ही भारताच भवितव्य घडवणार आहे!
-----------------------------
*यं* दाची लोकसभेची निवडणुक ही अस्वस्थ राजकारणाच्या वातावरणात होतेय. सत्ताधारी भाजप आणि 'एनडीए ४०० पार..!' च्या निर्धारानं सरसावलीय तर काँग्रेस आणि इंडिया आघाडी लोकशाही वाचविण्यासाठी बचावात्मक लढतेय. त्यातही काही मित्रपक्ष स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेने इंडिया आघाडी विस्कळीत झालीय. भाजपनं प्रचारचं रणशिंग फुंकलंय. प्रधानमंत्री मोदींनी प्रचाराचा झंझावात आरंभलाय. ते दक्षिणेतल्या पक्षांशी युती करताहेत. अमित शहा जागांच्या वाटाघाटी करताहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना 'आम्ही देऊ तेवढ्या जागा लढवा. तुमचा विधानसभेला सन्मान राखू ,आता हट्ट नको, मोदींचा चेहरा, त्यांची गॅरंटी तुम्हाला यश मिळवून देईल!' असं समजावलंय. त्यांनी 'अब की बार ४०० पार!' चा नारा दिलाय, तो राजीव गांधींचा विक्रम मोडण्यासाठी! कर्नाटकातले भाजप खासदार अनंत हेगडे यांनी तर '४०० पार' ची घोषणा ही राज्य घटना बदलण्यासाठी आहे! असं म्हटलंय. मतांच्या दृष्टीनं वाळवंट असलेल्या दक्षिणेत, उत्तरेकडची होणारी तूट भरून काढण्यासाठी नव्या मित्रांना पायघड्या घातल्या जाताहेत! निवडणुकीच वातावरण तयार होताच प्रधानमंत्री मोदी हे करदात्यांच्या पैशातून राज्यांचे दौरे करत भाजपच्या प्रचारानं अवघा देश ढवळून काढताहेत. जिथं ज्या राज्यात भाजपला अडचणी दिसताहेत तिथं जाऊन लाखो करोडोंच्या योजनांच्या घोषणा करताहेत. सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार चालवलाय. ज्या राज्यांतून फारसा प्रतिसाद नाही अशा बारा राज्यात दोन दोनदा, तीनदा गेलेत. जिथं भाजपची सत्ता आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेची सर्व जबाबदारी दिलीय. सर्व योजना, घोरण, निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्याची शिकस्त करायला सांगितलंय. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी संघाच्या प्रचारकानाही नेमलंय. त्यामुळं भाजपच्या काही जागा वाढण्याची शक्यता त्यांना वाटतेय. खरंच अशी स्थिती आहे का की, इतर नेत्यांपेक्षा खुद्द प्रधानमंत्र्यांनाच निवडणुकीच्या प्रचारासाठी झोकून द्यावं लागतंय. त्यांना आपल्या उमेदवारांना, इच्छुकांना असा विश्वास द्यायचा आहे की, भाजपचं सरकार 'अब की बार ४०० पार' होणार आहे. पण '४०० पार' चं लक्ष्य आहे तरी कुणासाठी? कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आहे? की हे अशा भाजप नेत्यांसाठी आहे ज्यांची उमेदवारी कापली गेलीय, वा कापली जाणार आहे, अशांसाठी आहे? उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्षातल्या नेत्यांनी बंड करू नये. त्यांनी सरळ राजकीय संन्यास घ्यावा. पक्षांतर्गत कुणी विरोधात उभं ठाकायलाच नको म्हणून यासाठी एवढं मोठं लक्ष्य ठेवलं गेलंय का? तसं वातावरण निर्माण केलं जातंय का? पण '४०० पार' चा घोशा लावणाऱ्या मोदी, शहा, नड्डा यांची पक्षात एवढी दहशत आहे की, पक्षातले कुणीही त्यांना हे विचारणारच नाहीत की, आपण हे लक्ष्य का ठेवलंय? सत्तेसाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा तरी आपण जिंकू की नाही? मात्र असा सवाल करण्याचं तेवढं धाडस पक्षात कुणी करणार नाही. पण हा प्रश्न केवळ भाजपतून विचारला जाऊ शकतो असं नाही तो मित्रपक्षातूनही उठू शकतो. 
शिंदे किंवा अजित पवार ज्याप्रकारे महायुतीत सामील झालेत, त्यांना प्रधानमंत्री मोदींचं वलय, मुखवटा, गॅरंटी आपल्याला तारून नेईल, असा त्यांना वाटतं असावं. त्यामुळंच मोदींच्या मुखवट्यासमोर महायुतीतल्या नेत्यांनी लोटांगण घातल्याचं दिसून येतंय! ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ असं मिरवणाऱ्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांची अवस्था ‘दिल्ली दरबारी घालीन लोटांगण, पूजीन तव चरण...!’ अशी झालीय. विकासाच्या आणि स्वाभिमानाच्या बाता मारत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांतल्या नेत्यांनी आपल्या मूळ राजकीय पक्षांची वाताहत केलीय. 'आम्ही करू तेच सत्तेचे शहाणपण' असं म्हणत ‘डंके की चोट पर’ सत्तेत सामील झालेल्या या दोन पक्षांतल्या महत्वाकांक्षी नेत्यांनी त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी होत असलेली ससेहोलपट पाहता, विधानसभा निवडणूक या दोन पक्षांनी भाजपत विलीन होत कमळ चिन्हावर लढली, तरी मतदारांना आश्चर्य वाटणार नाही! दुसरीकडं घराणेशाही नको, असा नारा देत सातत्यानं घराणेशाहीवर यथेच्छ टीका करत जनमत तयार करणाऱ्या भाजपनं आता घराणेशाहीपेक्षा वेगळे उमेदवार दिलेत का? त्यांनीही घराणेशाही अवलंबलीय राजकीय घराणी वगळता किती नवे चेहरे उमेदवार असणार आहेत? हा संशोधनाचा आणि भाजपच्या राजकीय नीतीच्या कसरतीचा विषय आहे. 'मी आणि माझे घर' या पलीकडं हे नेते तिसऱ्या-चौथ्या पिढीतही जायला तयार नाहीत. मग एकट्या गांधी घराण्यावर सातत्यानं टिकेचा भडीमार करण्यात काय अर्थ आहे? एकीकडं प्रधानमंत्री मोदी यांच्या सुरात सूर मिसळून शिंदे, अजित पवार हे भाजपच्या वळचणीला गेलेले नेते, उद्धव ठाकरे-शरद पवारांवर घराणेशाहीचा आरोप करतात, तर दुसरीकडं आपला मुलगा, आपली बायको यांना लोकसभेचं तिकीट मिळालं तरी पुरे! सोबत असलेल्या इतरांचा पत्ता कट झाला तरी विचारतो कोण? अशा अविर्भात वावरताना ते दिसताहेत.
भाजप हा मूल्याधिष्ठित पक्ष आहे, इथं व्यक्तीसाक्षेप नेतृत्व नाही. व्यक्तिस्तोम नाही. असं स्वरूप असलेला भाजप संघाप्रमाने एकचालुकानुवर्तीत पक्ष झालाय. त्यामुळं केवळ मोदी...मोदी...! नारा लावला जातोय. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर निवडणुका जिंकण्याचा हा प्रयत्न आणि हट्टाहास मित्रपक्षांत अशी भीती आणि चिंता सतावतेय की, आपल्या पक्षांचं अस्तित्व टिकणार की, नाही? हीच भीती  शिंदे आणि अजित पवारांच्या डोक्यातही रुंजी घालतेय. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार भाजपसोबत नव्हते तेव्हा त्यांना जवळपास १५ टक्के मतं मिळाली होती आणि १९ ठिकाणी लढून ४ उमेदवारांना यश मिळालं होतं. अजित पवारांचं म्हणणंय की, तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक आहे. खासदार, आमदार आणि पक्ष माझ्यासोबत असताना आमची २-४ जागांवर बोळवण का केली जातेय? शिंदेंचा दावा मोठा आहे. ते म्हणतात, २०१९ ला आम्ही २२ जागा लढवल्या, २३ टक्के मतं मिळाली. ती भाजपच्या २७ टक्केच्या केवळ ३ टक्के कमी होती. त्यावेळी भाजपनं २३ जागा जिंकल्या. आम्ही १८ जिंकल्यात. भाजपला इथं आपलं वर्चस्व निर्माण व्हायला हवंय. तसं घडलं तर शिंदे आणि त्यांचे साथीदार स्वगृही परतले आणि महविकास आघाडीत २३ जागा लढविणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या साथीला गेले तर इथं चित्र वेगळं होईल ही भीती आहेच. पण असं घडण्याची शक्यता अजिबात नाही. याबाबत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलेलं विधान गांभीर्यानं घ्यायला हवं. इथं भाजपचा तर्क, शिंदेची मागणी आणि अजित पवारांची सौदेबाजी भाजपला अडचणीची ठरतेय हे खरं! भाजपला २०१९ मध्ये २७.८४, शिंदेना २३.२५ आणि पवार १५.६६ टक्के अशी एकूण ६६ टक्के मतं मिळालीत. त्यामुळे ही मतं एकसंघ राहिली तर इंडिया आघाडीचं अस्तित्व तरी राज्यात शिल्लक राहिलं का? दुसरं इथं भाजप मतांचा नाही तर जागांचा विचार करत मागणी करतेय. अशा स्थितीत भाजपनं '४०० पार'चं जे लक्ष्य ठेवलंय हे मित्रपक्षांना धमकावण्यासाठी, भिती दाखविण्यासाठी तर केलं नाही ना! अशी शंका येतेय. मित्रपक्षांची समजूत काढताना शहा म्हणताहेत, 'तुम्ही आमच्यासोबत आलात तर तुमचाच फायदा होणारंय. आता आम्ही '४०० पार'चा नारा दिलाय. यानुसार आम्ही यशस्वी होतो आहोत अशावेळी तुम्ही जागांचा हट्ट धरू नका. विधानसभेच्यावेळी तुमचा योग्य सन्मान राखू. तुम्ही तुमच्या राजकीय मैदानाची चिंता करू नका, तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला निवडून येण्यासाठी भाजपची, मोदींची, मोदींच्या चेहऱ्यांची आणि त्यांच्या गॅरंटीची गरज पडेल. तेव्हा जरा सबुरीने घ्या. आततायीपणा करू नका..! असा सल्ला दिला गेलाय.
शिवसेनेचे खासदार जिथून निवडून आले, तिथं संघ, भाजप आणि इतर खासगी संस्थानी जे सर्व्हेक्षण केलं त्यात त्या खासदारांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवलीय. त्यामुळं त्या जागा भाजप लढवू इच्छितेय. तिथं उमेदवार शिवसेनेचा पण चिन्हं कमळ असं सुचवलं गेलंय. शिवसेनेच्या जिंकलेल्या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेबरोबर आहेत. तेवढ्या १३ जागा तरी मिळाव्यात अशी मिनतवारी केल्यावरही भाजप शिंदेंची केवळ १० जागा देऊन बोळवण करू पाहतेय. शिंदेचे सहकारी रामदास कदम यांनी भाजपच्या या भूमिकेविरोधात दंड थोपटलेत. 'जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायलाच हवंय. ज्या अठरा जागा आम्ही जिंकल्या होत्या त्या मिळायलाच हव्यात. तसं घडलं नाहीत तर मोदींना पुन्हा प्रधानमंत्री होण्यात अडचणी येतील...!' असं त्यांनी एका मुलाखतीत ध्वनीत केलंय. दुसरीकडे अजित पवारही आक्रमक झालेत, ते माघार घ्यायला तयार नाहीत. त्यांनी म्हटलंय की, 'आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पिता-पुत्री सोडले तर पक्ष, चिन्हं पक्षाचे सारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे सारे माझ्यासोबत आहेत. कौटुंबिक फूट झालीय पण पक्ष फुटलेला नाही. असं असताना तुम्ही आम्हाला केवळ ३-४ जागा देऊन कसं काय वाटेला लावताय?  छगन भुजबळांनीही जेवढ्या जागा शिवसेनेला दिल्या जाणार आहेत तेवढ्या जागा राष्ट्रवादीलाही मिळायला हव्यात अशी मागणी केलीय. आपली ही आग्रही भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यासाठी शिंदे आणि अजित पवारांनी  दिल्ली गाठली होती, पण काही फरक पडला नाही. त्यामुळं राज्यात राजकीय अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. शिवसेना फुटीच्यावेळी जी आश्वासनं भाजपनं दिली होती, ती पाळली जात नाहीत अशी भावना झालीय. दुसरीकडे साऱ्या मित्रपक्षांना, भाजप नेत्यांना, संघाच्या स्वयंसेवकांना केवळ एकाच नावाचा जप करायला सांगितलं जातंय, मोदी..! मोदी..! केवळ त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणुका लढविल्या जाणार आहेत. मग राज्याच्या राजकारणात शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं महत्व राहणार आहे की नाही? या दोन्ही पक्षाचे २-४ खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आणि गॅरंटी भाजप देत असेल तर या दोघांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्यांचं काय अस्तित्व राहणार आहे? त्यांची भाजपनं केलेली कोंडी आणि होणारी घुसमट यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय. भाजप फसवतेय अशी भावना झालीय. लोकसभेनंतर येत्या चार पाच महिन्यानं विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तेव्हा काय स्थिती असेल? मित्रपक्षाच अस्तित्व तरी राहील काय? भाजपला हे परवडणारं आहे का?
असाच काही प्रकार बिहारमध्येही आहे. आरएलडीचे चिराग पासवान आणि जदयुचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मतं भाजपकडे वळतील का? कारण चिराग पासवान आणि नितीशकुमार यांच्यात विस्तव जात नाही. त्यामुळं अशी शंका उपस्थित होतेय की, खरंच चिराग आणि नितीशकुमारांची मतं भाजपला मिळतील का? दुसरीकडे राजदच्या तेजस्वी यादव यांच्या पाटण्यातल्या सभेनं जी कमाल दाखवलीय, त्यानं बिहारच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालंय. इथं बिहारमध्ये, २०१९ मध्ये एनडीएला १०० टक्के यश मिळालं होतं. ४० पैकी ३९ जागा भाजप, पासवान आणि नितीशकुमार यांनी जिंकल्या होत्या. केवळ किशनगंजच्या जागेवर पराभव झाला होता. तेव्हा  नितीशकुमार भाजपसोबत होते. नंतर मात्र त्यांनी तेजस्वी यादव यांच्या साथीनं सरकार बनवलं. आता पुन्हा फारकत घेत त्यांनी भाजपशी सत्ता सोयरिक केलीय. यानं एनडीएतले चिराग पासवान, जितनराम मांझी बिथरलेत. २०१९ प्रमाणे बिहारच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या उद्देशानं भाजपनं नितीशकुमारांशी समझौता केला खरा पण त्यातून फारसं काही निष्पन्न होईल असं वातावरण नाही! उत्तरप्रदेशात मित्रपक्ष अपना दल यांचे २०१९ मध्ये दोन खासदार निवडून आलेत त्यांना त्या जागा मिळतील. मात्र आरएलडीचा एकही खासदार निवडून आलेला नाही. मात्र एकही खासदार आरएलडीचा निवडून आलेला नाही. त्यांना मग जागा सोडणार? त्यांचा प्रभाव पाहता, ते आपलं प्रभावक्षेत्र सहजासहजी भाजपकडे सोपवतील कां? याची जाणीव झाल्यानं त्यांचेही कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळंच हे कार्यकर्ते राहुल गांधींच्या न्याय यात्रेत झेंड्यासह सहभागी झाले होते. इथं काँग्रेस, अखिलेश यादव आणि मायावती एकत्र येताहेत. इथलं जातीय राजकारण खेळलं गेलं तर मतांचं ध्रुवीकरण होईल. तेही भाजपच्या अडचणीचं आहे. हा केवळ या तीन राज्यांचा नाही. यासोबत इतर दोन राज्येही आहेत, जिथं २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता नव्हती. कर्नाटक आणि तेलंगणा! तेव्हा कर्नाटकात सर्वाधिक जागा भाजपनं जिंकल्या होत्या. आता तिथं काँग्रेसची सत्ता आहे, तिथंही धक्का बसण्याची स्थिती आहे. तेलंगणात काँग्रेसचं सरकार आलंय. केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाची मतं कुणाकडे जाणार ती भाजपकडे वळतील का? कारण विधानसभा निवडणुकांच्यावेळी भाजप आणि टीआरएसमध्ये काँग्रेसला विरोध करण्यासाठी गुप्त समझौता झाला होता अशी चर्चा होती. प्रारंभी आक्रमक असलेला भाजप नंतर मवाळ झाला. त्यामुळंच इथं काँग्रेसची सत्ता आली. मात्र इथं भाजपला एकट्यालाच लढावं लागेल. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, विशेषत: तेलंगणात एकापाठोपाठ मोठमोठ्या योजनांचा धडाका मोदींनी लावलाय. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्याशी युती केलीय. आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात एकेकाळी एनडीएत असलेल्या तेलुगु देशमचे चंद्राबाबू नायडू, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेशी भाजपने युती केलीय. ओरिसात बिजू जनता दलाशी युती केलीय तर तेलंगणात केसीआर यांच्या टीआरएसला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१९ मध्ये भाजपला चार जागा आणि १९-२० टक्के मतं इथं मिळाली होती. काँग्रेसला तीन जागा आणि २९-३० टक्के मतं तर टीआरएसला ९ जागा आणि तब्बल ४१ टक्के मतं मिळाली होती. आता तीच ४१ टक्के मतं आणि ९ जागा भाजपला खुणावताहेत. त्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्यात. केवळ दक्षिणेतच नाहीतर उभ्या देशात राजीव गांधीचा विक्रम मोडण्यासाठी, '४०० पार'च लक्ष्य ठेवलंय आणि ते गाठण्यासाठी भाजपनं साम, दाम, दंड, भेद ही नीतीही अवलंबलीय...!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Tuesday 12 March 2024

अमित शहांच धोबीपछाड...!

"भाजपला अवघं आकाश कवेत घ्यायचंय. त्यासाठी ज्यांच्या खांद्यावर बसून त्यांना ध्येय गाठायचंय, त्यांनाच नेस्तनाबूत करून त्यांचं अवकाश मिळवायचं असल्याचं आजवर दिसून आलंय. रामराज्य पक्षापासून सुरू झालेली ही त्यांची भूमिका मगोपक्ष, अकाली दल यापासून अगदी थेट शिंदे, पवारांच्या पक्षांपर्यंत सुरूच आहे. याची अनुभूती येतेय. आम्ही देतो त्याचं आणि तेवढ्याच जागी लढा, आता आमचं ऐका विधानसभेत तुमचा सन्मान ठेवू...! असा निर्वाणीचा इशारा दिलाय. शिंदे आणि पवार मिनतवारी करताहेत पण भाजप ठाम आहे. अमित शहा दिलेला शब्द पाळत नाहीत. विश्वासघात करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय. याचा अनुभव उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता एकनाथ शिंदे, अजित पवारांना येतोय! शिरसाटांनी तर याची कबुलीच दिलीय! यामुळं जागा वाटपाची गुंतागुंत वाढतेय!"
---------------------------------
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झाल्याचं समजतं. परंतु जागावाटपावरून महायुतीतले मित्र पक्ष, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस मात्र समाधानी नाहीत. महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या ४८ जागांपैकी ३२ हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा भाजपचा निर्धार आहे. तर शिवसेना २२ जागांसाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस १० ते १२ जागांसाठी आग्रही होती. परंतु या दोन्ही मित्रपक्षांना आता एक अंकी जागांवर समाधान मानावं लागेल अशी स्थिती आहे. भाजप ३२ हून अधिक जागा, शिवसेनेला जवळपास ९-१० जागा तर राष्ट्रवादी काँग्रसच्या वाट्याला ३ ते ४ जागा मिळतील असं जागावाटपाचं सूत्र ठरतंय. याबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांची कोंडी झालीय. पक्षांतल्या नेत्यांनी आपल्या अपेक्षा उघडपणे बोलून दाखवण्याला सुरुवात केलीय. मात्र शिंदे अजित पवारांची मनधरणी करत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवरील नेते करताहेत. २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे २३ खासदार निवडून आले. शिवसेनेचे १८ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ खासदार निवडून आले. शिवसेना आणि  राष्ट्रवादीत फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत १८ पैकी १३ खासदार आहेत. तर अजित पवार यांच्याकडे चारपैकी एकच खासदार आहे. असं असलं तरी दोन्ही पक्षांना किमान आपल्या पक्षाच्या सर्वच विद्यमान खासदारांच्या जागा हव्या होत्या परंतु तसं होताना दिसत नाहीये. नुकतीच अमित शहा यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात जागा वाटपाबाबत चर्चा केली. यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर नेते यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी महायुतीचं जागा वाटप निश्चित झाल्याचं समजतं. शिवसेनेच्या जवळपास पाच जागा भाजपकडे जातील यात हिंगोली, कोल्हापूर, पालघर, उत्तर पश्चिम, यवतमाळ या जागांचा समावेश आहे. शिंदेंनी किमान १३ जागा मिळाव्यात अशी विनंती केलीय. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, संभाजीनगर, ठाणे अशा काही मतदारसंघावर शिंदे आणि भाजपनं दावा केलाय.
याशिवाय गजानन किर्तीकर यांच्या वायव्य मुंबईसह उद्धव ठाकरे यांच्याकडील पाच मतदारसंघ आणि आणखी काही मतदारसंघ भाजपला हवेत.
 शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आपली खंत माध्यमांसमोर बोलून दाखवली. ते म्हणाले, “आम्ही महाराष्ट्रात आम्ही मोदी आणि शाहांच्या कामावर, दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून सोबत आलो आहोत. पण आमचा विश्वासघात होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी. सध्याच्या आमच्या ज्या जागा आहेत, तिथंही भाजपचे उमेदवार जाऊन प्रचार करताहेत. मतदारसंघावर दावे करताहेत. प्रत्यक्षात विद्यमान खासदार असलेल्या ठिकाणीही बळजबरी केली जातेय!" रत्नागिरी, मावळ, रायगड, संभाजीनगर याठिकाणी भाजप घृणास्पद राजकारण करतेय. त्यामुळं मोदी आणि शहांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांचे कान उपटायला हवेत, असंही कदम म्हणाले. "प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचाच आहे. पण तुमच्यावर विश्वास ठेवून जे लोक सोबत आले त्यांचा केसानं गळा कापून तसं करायला नको. याद्वारे वेगळा संदेश जात असल्याचं भान भाजपच्या काही लोकांना असायला हवं...!" अशी टीका रामदास कदमांनी केली. "दापोलीत युती असताना भाजपनं माझ्या मुलाच्या विरोधात उघडपणे मतदान केलं. २००९ मध्ये युती असतानाच मला गुहागरमध्ये भाजपनंच पाडलं होतं," असा आरोपही त्यांनी केला. आताही माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भाजपचे मंत्री रविंद्र चव्हाण आणि भाजप कार्यकर्ते बजेटची कामं आणून भूमिपूजन आणि उद्घाटनं करताहेत. त्यात स्थानिक आमदाराला बाजूला सारलं जातेय, असं असेल तर भविष्यात भाजपवर कोणी विश्वास ठेवणार नाही, याची दखल भाजपच्या वरिष्ठांनी घ्यायला हवी. पुन्हा-पुन्हा आमचा विश्वासघात झाला तर माझं नावही रामदास कदम आहे. तिकिट जाहीर होईल तेव्हा पुन्हा या विषयावर बोलेन...!, असा इशारा त्यांनी दिला.
अमित शहा यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत युतीतल्या जागा वाटपाचे निकष स्पष्ट करण्यात आल्याचं समजतं. निवडून येण्याची क्षमता आणि संघ, भाजपच अंतर्गत सर्वेक्षण यावरच जागा वाटप आणि उमेदवार निश्चित होणार आहे. तसंच राज्यातली बदललेली राजकीय परिस्थिती, दोन पक्षातल्या फुटींनंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती, मराठा आरक्षणाच्या नुकत्याच झालेल्या आंदोलनांनंतर मराठा, ओबीसी, धनगर, अशी जातीय समीकरणं असे अनेक मुद्दे जागा वाटपाचं सूत्र ठरवण्यासाठी लक्षात घेतलं जाताहेत. परंतु यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उद्भवण्याची शक्यताही नाकारता येत नाही. अपेक्षित निर्णय न झाल्यास विद्यमान खासदार, इच्छुक उमेदवार आणि त्यांच्य कार्यकर्त्यांमधून रोष समोर येऊ शकतो. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपने २३ जागा लढवल्या होत्या. २०१९ मध्ये त्यांनी २५ जागा लढवल्या होत्या आणि २०२४ साठी भाजप जवळपास ३० ते ३२ जागा लढवत असल्याचं समजतं. याचा अर्थ त्यांची जागा लढवण्याची आकडेवारी आणि पक्षाची ताकद वाढतेय. शिवसेनेनेची आकडेवारी पाहिली तर २०१४ मध्ये २०, २०१९ मध्ये २३ आणि आता २०२४ मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला १०-१२ जागांवर समाधान मानावं लागेल. पण विद्यमान खासदार पाहता शिवसेनेला किमान २० जागा तरी मिळायला हव्या होत्यात. शिवसेना जर एक अंकी जागा लढवत असेल तर मुख्यमंत्रीपद मिळालं असलं तरी भविष्यात पक्षासाठी परिस्थिती अधिकाधिक कठीण होत जाईल. मग बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा विचार वाढवणार कसे? तसंच जागा वाटपात वाटाघाटी करत असताना पक्षाच्या जागा कमी होणार असतील तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वावरही पक्षात प्रश्न उपस्थित होऊ शकतो. यामुळे पक्षाचा केडर कमकुवत होऊ शकतो. शिवसेनेचं कॅडर विस्कळीत झालं तर युतीसाठी ते कसं काम करतील? हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसलाही लागू होते. अजित पवार यांना केवळ तीन ते पाच जागा मिळणार असतील आगामी विधानसभा निवडणुकीवरही याचा परिणाम दिसेल अशी शक्यता आहे. यातही दोन्ही मित्र पक्षांच्या जागा कमी आल्या तर विधानसभेतही जागा वाटप करताना भाजप याची दखल घेईल आणि या दोन्ही पक्षांच्या जागा कमी होऊ शकतात. त्यामुळं या मित्रपक्षांच्या जागा भाजप हिसकावून घेऊ शकते. ही भीती सुद्धा आहे, दुसऱ्या बाजूला भाजपसाठी केंद्रात आपली सत्ता कायम राहील याकडे प्राधान्य आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत येताना भाजपने काय कमिटमेंट केली होती काय शब्द दिला होता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जी आश्वासनं मिळाली ती पूर्ण होतील. आत्ता जे उघड बोललं जात आहे ते अपेक्षित नव्हतं हे दाखवण्याचा नेत्यांकडून प्रयत्न होईल पण अमित शहा यांनी स्पष्ट सांगितलं की केवळ निवडून येण्याची क्षमता आहे त्यानुसारच निर्णय होतील. काही ठिकाणी मित्र पक्षाच्या उमेदवाराला भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवता येऊ शकते. ही उघड नाराजी व्यक्त करण्याचं कारण म्हणजे उद्या विरोधकांनी टीका केल्यानंतर किमान त्यांच्यासमोर हा मुद्दा स्पष्ट करता येईल. सत्तेत समान वाटा दिला म्हणजे जागांचं वाटप समान होईल अशी अपेक्षा मित्र पक्षाच्या नेतृत्त्वालाही नाही. जशा शिंदे गटाच्या जागा आहेत तशा भाजपच्याही जागा आहे. विधानसभेत मात्र वेगळं चित्र दिसू शकतं. भाजपसाठी प्राधान्य आहे ते लोकसभा भाजपने कमिटमेंट नाही असं कोणीच म्हणत नाहीय. परंतु महायुतीत भाजपचच मोठा भावाच्या भूमिकेत असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मिळेल त्या जागांमध्ये समाधान मानावं लागण्याची शक्यता आहे. अजित पवार गटानं नऊपेक्षा अधिक जागांची मागणी केलीय. पण तटकरे यांची जागाही भाजपनं मागितलीय. शरद पवार गटाकडे असलेल्या अन्य जागाही भाजपला हव्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात चार खासदार आहेत. अमोल कोल्हे शिरूर, सुप्रिया सुळे बारामती, श्रीनिवास पाटील सातारा आणि सुनील तटकरे रायगड. यापैकी सुनील तटकरे अजित पवार यांच्यासोबत आहेत. पण तरीही या चार जागा तसंच मावळ, शिरुर असे आणखी काही मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी अजित पवार गट आग्रही होते. तसंच बारामती, रायगड, शिरुर या तीन जागांसाठीही राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळणार तेवढ्याच जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळायला हव्यात अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत बोलताना मित्रपक्षांना एक आकडी जागा ही पतंगबाजी असल्याचं म्हणत सहकाऱ्यांना योग्य सन्मानाप्रमाणे जागा मिळतील असं स्पष्ट केलं. रामदास कदमांच्या टीकेवर पत्रकारांनी फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर, "मी एवढे वर्ष रामदास कदमांना ओळखतो. त्यांना अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची किंवा टोकाचं बोलण्याची सवय आहे. कधी कधी रागानं ते बोलतात," असंफडणवीस म्हणाले. पुढं देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना मुख्यमंत्री करताना भाजपनं मोठं मन केल्याचा उल्लेख केला. "भाजपनं कायम शिवसेनेचा सन्मान केला आहे. आम्ही ११५ आहोत तरीही आमच्याबरोबर आलेल्या शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं," असं फडणवीस म्हणाले. खरी शिवसेना आमच्याबरोबर आली त्याचं आम्हाला समाधान आहे. तसंच आम्ही भक्कमपणे शिंदेंच्या पाठिशी आहोत. मुख्यमंत्री म्हणून त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे, असंही त्यांनी म्हटलं. "अनेक वेळा अनेक लोकं आमचं लक्ष वेधून घेण्यासाठी किंवा आपलं महत्त्वं पटवून देण्यासाठी अशाप्रकारचं टोकाचं बोलत असतात. पण आमच्यासारख्या मोठ्या आणि मॅच्युअर लोकांनी अशा प्रकारची वक्तव्यं गांभीर्यानं घेऊ नये," असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी रामदास कदमांवर प्रतिक्रिया दिली. कोणीही काहीही मागणी केली तरी जागावाटपाचा निर्णय वास्तविकतेवरच होईल. तसंच महायुतीत काहीही मतभेद नसल्याचंही फडणवीस म्हणाले. जागावाटपावरून आमच्यात काहीही गंभीर मतभेद नाहीत. दोन-तीन जागांवरून चर्चा सुरू आहे. पण त्यातही गंभीर काही नाही. त्यामुळं लवकरच जागावाटप पूर्ण करू, असं फडणवीसांनी सांगितलं. आमच्याबरोबरची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर मित्रपक्षांना सोबत घेऊनच आम्ही निवडणूक लढवणार आहोत.
पक्ष स्थापन केलेल्या ठाकरे आणि शरद पवार यांनी विश्वासाने जबाबदारी सोपवल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी पक्षच गिळंकृत केलाय. ठाकरे, शरद पवार हे पक्षाचे सदस्यच नाही असा कावा करून सारं काही मिळवलं पण ज्यांच्या तालावर हा खेळ हे दोघे खेळले त्यांना भाजपच्या कपटनीतीचा अनुभव येतो आहे. हिंदुत्ववादाची झूल पांघरून एकनाथ शिंदे यांनी आपला डाव साधला असला, तरी सर्वसामान्य जनता आणि सामान्य शिवसैनिक त्यांचा डाव आणि लबाडी पुरती ओळखून आहे. आपल्यावर आलेलं इडीच बालंट टाळण्यासाठी अजित पवार आणि पटेल, तटकरे यांनी भाजपच्या पायाशी लोळण घेतली असली तरी कार्यकर्ते सारं जाणून आहेत. दोन गुजराथ्यांच्या तालावर आणि नागपुरी बँडवर 'आवो मारी साथ' करत त्यांनी कितीही फेर धरला, तरी या अट्टल बदमाषीला सामान्य जनता बिलकुल भुलणार नाही! निवडणुकीत ते समृद्ध गटवाल्यांना चांगलीच अद्दल घडवतील. सत्ता आणि पैशाच्या बळावर आपण प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकतो, असे यांना वाटत असणार. परंतु शरद पवार यांच्यासमोर उभं राहण्याची हिंमत होणार नाही, याचा अनुभव शरद पवारांनी बारामतीत नमो रोजगार मेळाव्यात आणि लोणावळ्यात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दाखवून दिलंय. तेव्हा सबुरीने घ्या. दुसरीकडे शिवराय असोत किंवा बाळासाहेब असोत, त्यांच्या पुतळ्या वा स्मारकासमोरही उभे राहण्याची या फुटीर मंडळींची लायकी नाही. इतिहासकाळात शिवरायांनी गद्दारांची गय केली नव्हती. महाशक्तीच्या ४०-५० गुलामांनी हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे...!
हरीश केंची
९४२२३१०६०९


इथं मित्रांची कोंडी तर दक्षिणेत नव्यांशी दोस्ती!

*मोदींचं दक्षिणायन आरंभलंय...!*
"लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपनं प्रचारचं रणशिंग फुंकलंय. प्रधानमंत्री मोदींनी प्रचाराचा झंझावात आरंभलाय. दक्षिणेतल्या पक्षांशी युती करताहेत. शहा जागांच्या वाटाघाटी करताहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना 'आम्ही देऊ तेवढ्या जागा लढवा. तुमचा विधानसभेला सन्मान राखू ,आता हट्ट नको, मोदींचा चेहरा, त्यांची गॅरंटी तुम्हाला यश मिळवून देईल!' असं समजावलंय. त्यांनी 'अब की बार ४०० पार!' चा नारा दिलाय, तो राजीव गांधींचा विक्रम मोडण्यासाठी! त्यासाठी इथं राज्यात मित्रपक्षांची कोंडी करत त्यांच्या जागा बळकावल्या जाताहेत तर मतांच्या दृष्टीनं वाळवंट असलेल्या दक्षिणेत उत्तरेकडची होणारी तूट भरून काढण्यासाठी नव्या मित्रांना पायघड्या घातल्या जाताहेत!"
------------------------------------
*लो*कसभेच्या निवडणुका घोषित होण्याला काही अवधीच शिल्लक राहिलाय. कदाचित १५ तारखेच्या दरम्यान त्या जाहीर होतील अशी शक्यता आहे. तोवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे करदात्यांच्या पैशातून अनेक राज्यांचे दौरे करून आपल्या पक्षाच्या प्रचारानं सारा देश ढवळून काढताहेत. जिथं ज्या राज्यात भाजपला अडचणी दिसताहेत तिथं जाऊन लाखो करोडोंच्या योजनांच्या घोषणा करताहेत तशा यापुढे आणखीही करतील. करदात्यांच्या पैशातून, सारी सरकारी यंत्रणा वापरून त्यांनी पक्षाचा प्रचार चालवलाय. ज्या राज्यांतून भाजपला फारसा प्रतिसाद नाही अशा बारा राज्यात दोन दोनदा, तीनदा जातील. जिथं भाजपची सत्ता आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांना लोकसभेची सर्व जबाबदारी दिलीय. सर्व योजना, निर्णय मतदारांपर्यंत पोहोचवण्याची शिकस्त करायला त्यांना सांगितलंय. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी संघाच्या प्रचारकानाही नेमलंय. त्यामुळं भाजपच्या काही जागा वाढण्याची शक्यता त्यांना वाटतेय. खरंच अशी स्थिती आहे का की, भाजपच्या इतर नेत्यांपेक्षा खुद्द प्रधानमंत्र्यांनाच निवडणुकीच्या प्रचारासाठी झोकून द्यावं लागतंय. त्यांना आपल्या उमेदवारांना, इच्छुकांना असा विश्वास द्यायचा आहे की, भाजपचं सरकार 'अब की बार ४०० पार' होणार आहे. पण '४०० पार' खासदारांचं लक्ष्य आहे तरी कुणासाठी? काय हे कार्यकर्त्यांसाठी आहे, त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी आहे? की हे अशा भाजप नेत्यांसाठी आहे ज्यांची उमेदवारी कापली गेलीय, वा कापली जाणार आहे, अशांसाठी आहे? मग उमेदवारी दिली नाही म्हणून पक्षातल्या नेत्यांनी बंड करू नये. त्यांनी राजकीय संन्यासाची वाट धरावी. निवडणुक काळात पक्षांतर्गत कुणी नेत्यानं विरोधात उभं ठाकायलाच नको म्हणून यासाठी एवढं मोठं लक्ष्य ठेवलं गेलंय. तसं वातावरण निर्माण केलं जातंय. पण '४०० पार' चा घोशा लावणाऱ्या मोदी, शहा, नड्डा यांची पक्षात एवढी दहशत आहे की, पक्षातले कुणीही त्यांना  विचारणारच नाहीत की, आपण हे लक्ष्य का ठेवलंय? सत्तेसाठी आवश्यक असलेल्या २७२ जागा तरी आपण जिंकू की नाही? मात्र असा सवाल करण्याचं तेवढं धाडस पक्षात कुणी करणार नाही. पण हा प्रश्न केवळ भाजपतून विचारला जाऊ शकतो असं नाही तर तो एनडीएतल्या मित्रपक्षातून उठू शकतो. कारण त्याचा अप्रत्यक्ष दबाव त्यांच्यावर येत असतो. 
भाजपला महाराष्ट्रात सत्तास्थानी नेणाऱ्या मित्रपक्षांच्या लोकसभेच्या त्यांना हव्या असलेल्या जागा मिळणार की नाहीत? त्यांचं राजकीय अस्तित्व टिकून राहणार आहे काय हा खरा सवाल भाजपच्या वळचणीला गेलेल्या मित्रपक्षांपुढे आहे. एकनाथ शिंदे हे शिवसेनेत फूट पाडून सत्तेत आले. त्यांच्यामुळेच भाजपलाही इथं सत्ता मिळालीय. नगरविकासमंत्री शिंदे बंडखोरी करून बाहेर पडले, त्यावेळी शिवसेना ही भाजपची साथसंगत सोडून भाजपच्याच विरोधात उभी ठाकली होती. आज शिवसेना शिंदे यांच्याकडे आहे. म्हणून शिंदे यांनी शिवसेनेनं २०१९ मध्ये लोकसभेच्या जेवढ्या जागा लढविल्या तेवढ्या त्या मागताहेत. पण भाजप त्या जागा द्यायला तयार नाही. शिवसेनेचे खासदार जिथून निवडून आले होते तिथं संघ, भाजप आणि इतर खासगी संस्थानी जे सर्व्हेक्षण केलं त्यात तिथं त्या खासदरांचा पराभव होईल अशी शक्यता वर्तवली गेलीय. त्यामुळं त्या जागा भाजप लढवू इच्छितेय. तिथं उमेदवार शिवसेनेचा पण चिन्हं कमळाच असं सुचवलं गेलंय. शिवसेनेच्या जिंकलेल्या १८ खासदारांपैकी १३ खासदार शिंदेबरोबर आहेत. तेवढ्या १३ जागा तरी मिळाव्यात अशी मिनतवारी केल्यावरही भाजप शिंदेंची केवळ ९ जागा देऊन बोळवण करू पाहतेय. शिंदेचे सहकारी रामदास कदम यांनी भाजपच्या या भूमिकेविरोधात दंड थोपटलेत. 'जे आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायलाच हवंय. ज्या अठरा जागा आम्ही जिंकल्या होत्या त्या मिळायलाच हव्यात. तसं घडलं नाहीत तर मोदींना पुन्हा प्रधानमंत्री होण्यात अडचणी येतील...!' असं त्यांनी एका मुलाखतीत ध्वनीत केलंय. दुसरीकडे अजित पवारही आक्रमक झालेत, ते माघार घ्यायला तयार नाहीत. त्यांनी म्हटलंय की, 'आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस आहोत. शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे पिता-पुत्री सोडले तर पक्ष, चिन्हं पक्षाचे सारे लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते हे सारे माझ्यासोबत आहेत. कौटुंबिक फूट झालीय पण पक्ष फुटलेला नाही. असं असताना तुम्ही आम्हाला केवळ ३-४ जागा देऊन कसं काय वाटेला लावताय?  छगन भुजबळांनीही जेवढ्या जागा शिवसेनेला दिल्या जाणार आहेत तेवढ्या जागा राष्ट्रवादीलाही मिळायला हव्यात अशी मागणी केलीय. आपली ही आग्रही भूमिका भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसमोर मांडण्यासाठी शिंदे आणि पवार यांनी दिल्ली गाठलाय. यामुळं राज्यात राजकीय अविश्वासाचं वातावरण निर्माण झालंय. शिवसेना फुटीच्यावेळी जी आश्वासनं भाजपनं  दिली होती, ती पाळली जात नाहीत अशी भावना मित्रपक्षांत झालीय. दुसरीकडे एनडीएतल्या साऱ्या मित्रपक्षांना, भाजप नेत्यांना, संघाच्या स्वयंसेवकांना केवळ एकाच नावाचा जप करायला सांगितलं जातंय, मोदी..! मोदी..! केवळ त्यांच्याच चेहऱ्यावर निवडणुका लढविल्या जाणार आहेत. मग राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांचं महत्व राहणार आहे की नाही? या दोन्ही पक्षाचे २-४ खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आणि गॅरंटी भाजप देत असेल तर या दोघांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्यांचं काय अस्तित्व राहणार आहे? त्यांची भाजपनं केलेली कोंडी आणि होणारी घुसमट यानं कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरलीय. भाजप फसवतेय अशी भावना झालीय. लोकसभेनंतर येत्या चार पाच महिन्यानं इथं विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तेव्हा काय स्थिती असेल? अस्तित्व तरी राहील काय? भाजपला हे परवडणारं आहे का?
भाजप हा मूल्याधिष्ठित पक्ष आहे, इथं व्यक्तीसाक्षेप नेतृत्व नाही. व्यक्तिस्तोम नाही. असं स्वरूप असलेला भाजप संघाप्रमाने एकचालुकानुवर्तीत पक्ष झालाय. त्यामुळं केवळ मोदी...मोदी...! नारा लावला जातोय. एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर निवडणुका जिंकण्याचा हा  प्रयत्न आणि हट्टाहास एनडीएतल्या मित्रपक्षांत भीती आणि चिंता सतावतेय की, आपल्या पक्षांचं अस्तित्व टिकणार की, नाही? हीच भीती एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या डोक्यातही रुंजी घालतेय. २०१९ च्या निवडणुकीत अजित पवार भाजपसोबत नव्हते तेव्हा त्यांना जवळपास १५ टक्के मतं मिळाली होती आणि १९ ठिकाणी लढून ४ उमेदवारांना यश मिळालं होतं. पवारांचं म्हणणं आहे की, तो काळ आणि आजचा काळ यात खूप फरक पडलाय. खासदार, आमदार आणि पक्ष माझ्यासोबत असताना आमची २-५ जागांवर बोळवण का केली जातेय? शिंदेंचा दावा मोठा आहे. ते म्हणतात २०१९ ला आम्ही २२ जागा लढवल्या, २३ टक्के मतं मिळाली. ती भाजपच्या २७ टक्केच्या केवळ ३ टक्के कमी होती. त्यावेळी भाजपनं २३ जागा जिंकल्या. भाजपला इथं आपलं वर्चस्व निर्माण व्हायला हवंय. तसं घडलं तर शिंदे आणि त्यांचे साथीदार स्वगृही परतले आणि महविकास आघाडीत २३ जागा लढविणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या साथीला गेले तर इथं चित्र वेगळं होईल ही भीती आहेच. पण असं घडण्याची शक्यता अजिबात नाही. याबाबत शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलेलं विधान गांभीर्यानं घ्यायला हवं. इथं  भाजपचा तर्क, एकनाथ शिंदेची मागणी आणि अजित पवारांची सौदेबाजी भाजपला अडचणीची ठरतेय हे खरं! भाजपला २०१९ मध्ये २७.८४, शिंदेना २३.२५ आणि पवार १५.६६ टक्के अशी एकूण ६६ टक्के मतं मिळाली होती. त्यामुळे ही मतं एकसंघ राहिली तर इंडिया आघाडीचं अस्तित्व राज्यात शिल्लक तरी राहिलं का? दुसरं इथं भाजपकडे मतांचा नाही तर जागांचा विचार करत मागणी केली जातेय. अशा स्थितीत भाजपनं '४०० पार'चं जे लक्ष्य ठेवलंय हे एनडीएतल्या मित्रपक्षांना धमकावण्यासाठी, भिती दाखविण्यासाठी तर केलं नाही ना! अशी शंका येतेय. मित्रपक्षांची समजूत काढताना शहा म्हणताहेत, 'तुम्ही आमच्यासोबत आलात तर तुमचाच फायदा होणारंय. आता आम्ही '४०० पार'चा नारा दिलाय. यानुसार आम्ही यशस्वी होतो आहोत अशावेळी तुम्ही जागांचा हट्ट धरू नका. विधानसभेच्यावेळी तुमचा योग्य सन्मान राखू. तुम्ही तुमच्या राजकीय मैदानाची चिंता करू नका, तुम्ही स्वतःच्या ताकदीवर निवडून येऊ शकत नाही. तुम्हाला निवडून येण्यासाठी भाजपची, मोदींची, मोदींच्या चेहऱ्यांची आणि त्यांच्या गॅरंटीची गरज पडेल. तेव्हा जरा सबुरीने घ्या. आततायीपणा करू नका..! असा सल्ला दिला गेलाय.
असाच काही प्रकार बिहारमध्येही आहे. आरएलडीचे चिराग पासवान आणि जदयुचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची मतं भाजपकडे वळतील का? कारण चिराग पासवान आणि नितीशकुमार यांच्यात विस्तव जात नाही. त्यामुळं तिथं अशी शंका उपस्थित होतेय की, खरंच नितीशकुमारांचे सहकारी भाजपच्या पाठीशी उभे राहतील का? दुसरीकडे राजदच्या तेजस्वी यादव यांच्या पाटण्यातल्या सभेनं जी कमाल दाखवलीय, त्यानं बिहारच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळालंय. इथं बिहारमध्ये, २०१९ मध्ये एनडीए ला १०० टक्के यश मिळालं होतं. ४० पैकी ३९ जागा भाजप, पासवान आणि नितीशकुमार यांनी जिंकल्या होत्या. केवळ किशनगंजच्या जागेवर पराभव झाला होता. नितीशकुमार भाजपच्या साथीला होते. नंतर मात्र त्यांनी राजदच्या तेजस्वी यादव यांच्या साथीनं सरकार बनवलं होतं. आता पुन्हा फारकत घेत  त्यांनी भाजपशी सत्ता सोयरिक केलीय. यानं एनडीएतले चिराग पासवान, जितनराम मांझी बिथरलेत. त्यामुळं त्यांच्या पक्षात अस्वस्थता निर्माण झालीय. २०१९ प्रमाणे बिहारच्या सर्वच्या सर्व जागा जिंकण्याच्या उद्देशानं भाजपनं नितीशकुमारांनी समझौता केला खरा पण त्यातून फारसं काही निष्पन्न होताना दिसत नाही! या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशात भाजपचा मित्रपक्ष अपना दल यांचे २०१९ मध्ये दोन खासदार निवडून आलेत. मात्र आरएलडीचा एकही खासदार निवडून आलेला नाही. अपना दलाला त्यांच्या दोन जागा मिळतील पण आरएलडीचा उत्तरप्रदेशातला प्रभाव पाहता, ते आपलं प्रभावक्षेत्र सहजासहजी भाजपकडे सोपवतील कां? त्यांचा खासदार नाही म्हटल्यावर भाजप त्यांना एकही जागा देणार नाही, असं समजल्यानं त्यांचेही कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. त्यामुळंच हे कार्यकर्ते राहुल गांधींच्या न्याय यात्रेत झेंड्यासह सहभागी झाले होते. इथं  काँग्रेस, अखिलेश यादव आणि मायावती एकत्र येताहेत. इथं जातीय राजकारण खेळलं गेलं तर मतांचं ध्रुवीकरण होईल. तेही भाजपच्या अडचणीचं आहे. हा केवळ या तीन राज्यांचा नाही. यासोबत इतर दोन राज्येही आहेत, जिथं २०१९ मध्ये काँग्रेसची सत्ता नव्हती. कर्नाटक आणि तेलंगणा! तेव्हा कर्नाटकात सर्वाधिक जागा भाजपनं जिंकल्या होत्या. आता तिथं काँग्रेसची सत्ता असल्यानं तिथंही भाजपला धक्का बसण्याची स्थिती आहे. तेलंगणात काँग्रेसचं सरकार आलंय. तिथल्या केसीआर यांच्या तेलंगणा राष्ट्र समिती पक्षाची मतं कुणाकडे जाणार ती भाजपकडे वळतील का? कारण विधानसभा निवडणुकांच्यावेळी भाजप आणि टीआरएसमध्ये काँग्रेसला विरोध करण्यासाठी गुप्त समझौता झाला होता अशी चर्चा त्यावेळी होती. प्रारंभी आक्रमक असलेला भाजप नंतर मवाळ झाला. त्यांनी जणू केसीआर यांचा पुरस्कार केला असं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळंच इथं काँग्रेसची सत्ता आली. पण भाजपचा फारसा फायदा इथं होईल असं दिसत नाही. तिथं भाजपला एकट्यालाच लढावं लागेल. म्हणूनच प्रधानमंत्री मोदींनी सध्या दक्षिणायन आरंभलंय. केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, विशेषत: तेलंगणात एकापाठोपाठ मोठमोठ्या योजनांचा धडाका लावलाय. कर्नाटकात जदयुच्या कुमारस्वामी यांच्याशी युती केलीय. आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसच्या मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या विरोधात एकेकाळी एनडीएत असलेल्या तेलुगु देशमचे चंद्राबाबू नायडू, अभिनेते पवन कल्याण यांच्या जनसेनेशी युती केलीय. ओरिसात बिजू जनता दलाशी युती केलीय तर तेलंगणात केसीआर यांच्या टीआरएसला गोंजारण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१९ मध्ये भाजपला चार जागा आणि १९-२० टक्के मतं मिळाली होती. काँग्रेसला तीन जागा आणि २९-३० टक्के मतं तर टीआरएसला ९ जागा आणि तब्बल ४१ टक्के मतं मिळाली होती. आता तीच ४१ टक्के मतं आणि ९ जागा भाजपला खुणावताहेत. त्यासाठी पडद्यामागे हालचाली सुरू झाल्यात. केवळ दक्षिणेतच नाहीतर उभ्या देशात राजीव गांधीचा विक्रम मोडण्यासाठी, '४०० पार'च लक्ष्य ठेवलंय आणि ते गाठण्यासाठी भाजपनं साम, दाम, दंड, भेद ही नीतीही अवलंबलीय...! 
हरीश केंची,
९४२२३१०६०९ 

Sunday 3 March 2024

चौखूर उधळलेले राजकारणी ...!

"आमदारच मंत्र्यांची गचांडी पकडतोय, धक्काबुक्की करतोय. वाचाळ मंत्री, प्रवक्ते यांनी सरकार, प्रशासन अडचणीत आणलंय! देशपातळीवर राज्यघटनेचा पाया पोखरला जातोय. डोलारा कोसळल्यावर नागरिकत्व भुईसपाट होईल. याला जबाबदार आपण सर्व आहोत. राजकारणी भुरटेच आहेत, कोणाला सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही, त्यांची संस्कृतीही एकच आहे. सत्ताबदलानं परिवर्तन घडलेलं नाही. change आणि transformation यातला हा फरक आहे. सत्तेच्या बाबतीतही असंच आहे, आपण परिवर्तन घडवून आणत नाही, तर बदल घडवून आणत आहोत. त्यामुळं लोकप्रतिनिधी चौखूर उधळलेत. त्यांना कुणाचाच धाक राहिलेला. नासक्या राजकारण्यांची महाराष्ट्र नासवलाय. मतदानाचं वेसण घालून अशा चौखूर उधळलेल्यांना आपल्यालाच आवरावं लागेल...!"
--------------------------------------
*वि*धिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्यादिनी सत्ताधारी आमदारानं मंत्र्यांची गचांडी धरत त्याला धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. जिथं कायदे बनवले जातात तिथंच कायदे बनवणारेच कायद्याचे धिंडवडे काढताहेत. मंत्री दादा भुसे आणि महेंद्र थोरवे यांच्यात धक्काबुक्की झाल्याचं समोर आले. मालेगावचे आमदार दादा भुसे आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये विधिमंडळाच्या लॉबीमध्ये बाचाबाची आणि धक्काबुक्की झाली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर दोन सत्ताधारी नेत्यांमध्येच वाद झाला. शिवसेनेतील आमदारांमुळे याआधीही एकनाथ शिंदे अडचणीत आलेत. दादा भुसे यांच्याआधी आठ आमदारांनीही वाद वाढवलाय. त्यामध्ये सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, अब्दुल सत्तार यांच्यासह गुलाबराव पाटील आणि संजय शिरसाट, तानाजी सावंत यांचा समावेश आहे. हे काही पहिल्यांदाच घडतंय असं नाही. अनेक आमदार लोकांना, विरोधकांना, अधिकाऱ्यांना दमबाजी, शिवीगाळ, धमक्या देत असतात. एका आमदाराने हवेत गोळीबार केला. हा त्यानेच केलाय हे उघडकीला आल्यानंतरही त्याला क्लिनचीट दिली गेली. त्यामुळं आपण काहीही केलं, कसंही वागलो तरी आपल्याला काही होणार नाही असा विश्वास त्यांच्यात निर्माण झाल्यानं ते अधिकच निर्ढावले. एकानं पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. दुसऱ्यानं भर कार्यक्रमात पोलिसाला श्रीमुखात लावली. असे अनेक किस्से आहेत. सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते म्हणवले जाणारे लोक संयमाने बोलतील असं वाटत असताना तेही चौखूर उधळल्याचं आपल्याला दिसून आलंय. ते इतके बेफाम झाले आहेत की, आपल्याला काही होणार नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय...! असं म्हणण्या इतपत त्यांचं धाडस झालं आहे. हा सागर बंगल्यात बसलेला त्याचा बॉस यावर काहीच बोलत नाही, त्यांना आवर घालत नाही की, समज देत नाही. अशावेळी हे प्रवक्ते अधिकच चेकाळतात. सुसंस्कृत, संयमी, पुरोगामी आणि प्रगतीशील समजला जाणारा महाराष्ट्र या अशा खुज्या नेत्यांमुळे अधोगतीकडे निघालाय. महाराष्ट्राची राजकीय, प्रशासकीय, सामाजिक सद्य:स्थिती पाहता सारेच नासके राजकारणी सतत आघाडीवर राहिलेला महाराष्ट्र नासवताहेत, असं म्हणावंस वाटतं. आज कोण सत्तारूढ आहेत आणि कोण विरोधक आहेत हेच समजतच नाही. राज्यातल्या प्रमुख चार राजकीय पक्षांचे सहा झालेत. सारेच सारखे बनलेत. उडीदामाजी काळे गोरे! त्यामुळं महाराष्ट्रात एकच पक्ष बहुमतानं सत्तेवर येण्याचं दिवास्वप्नच राहणार यावर शिक्कामोर्तब झालंय. सद्य:स्थितीत तरी भाजप सर्वांत मोठा राजकीय पक्ष म्हणून गेली दहा वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात वावरतोय. पण त्याचं जे रूप स्वरूप पूर्वी होतं ते पार बदलून गेलंय. जनसंघ, भाजप हा संस्कारक्षम, नीतीवान, मूल्याधिष्ठित राजकारण करू पाहणारा पक्ष होता, पण कालौघात त्यांच्या विचारसरणीची पार घसरण झालीय. त्यांना भगवी काँग्रेस म्हणावं तर मूळ काँग्रेस अधिक उजळ वाटू लागते. त्यामुळं ते सत्तेवर आले पण महाराष्ट्राची राजकीय, सामाजिक, प्रशासकीय घडी त्यांना काही पुन्हा बसवता आलेली नाही; त्यामुळं सत्ताचाटण लाभलेल्या आमदारांना कुणाचंच भय, धाक राहिलेला नाही.
महाराष्ट्रातल्या जनतेनं आता संपूर्ण फेरविचार आणि फेरनियोजन केलं पाहिजे. कारण विकास-विकास असा गोंडस शब्द वापरून आपल्या पक्षांतराला, लोकमतांच्या गद्दारीला मुलामा देण्याचा जो प्रयत्न चालवलाय ते थांबवलं पाहिजे. विधी मंडळाचा कारभार सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. राज्यातले, महाराष्ट्रातले सव्वीस जिल्हे अविकसित ठेवून मोठी झेप घेता येणार नाही. राज्यात सहकारी चळवळीचं योगदान चांगलं होतं, काँग्रेसनं त्याला बाळसं आणण्याचा प्रयत्न केला होता. पण या नासक्या राजकारण्यांनी ती सहकारी चळवळ, त्यातून उभं राहिलेले उद्योग, व्यवसाय सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला जाऊन खरेदी करायला सुरुवात केलीय. ग्रामीण भागात समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शेतकऱ्यांच्या त्यागातून, कष्टातून उभारलेली चळवळ मोडीत काढली जातेय. आगामी दहा वर्षांत महाराष्ट्रात एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीचा विकासात मोठा वाटा होता, असं सांगावं लागेल. महाराष्ट्राचा नियोजनबद्ध विकास करण्याची पद्धतच मागे पडत चाललीय. अर्थसंकल्पात त्याचं प्रतिबिंब दिसत नाही. दिवसागणिक अर्थसंकल्पाची मोडतोड सुरू असते, वर्गीकरण, पुरवणी खर्चाला संमती मागितली जाते. विधायक कामाचा, सूचनांचा, अंमलबजावणीचा अभाव दिसून येतो. याबाबत कोणत्याही पक्षाचा आमदार बोलताना दिसत नाही. उभ्या महाराष्ट्राचा विचार केला जातोय असं दिसत नाही. जो तो आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित झालाय. 'काय झाडी, काय हाटेल' ही भाषा...'! असं म्हणण्यात तो मश्गूल आहे. हा तर महाराष्ट्राचा हा घोर अपमान आहे. बाळासाहेब भारदे, वि. स. पागे, जयंतराव टिळक, रा. सु. गवई, ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख, शिवराज पाटील, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी यांच्यासारख्या संसदीय परंपरा पाळणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे सारथी म्हणून काम केलंय. ग्रामीण भागातल्या सुप्त बेरोजगारीला काम द्यावं म्हणून वि. स. पागे यांनी १९६७ मध्ये रोजगार हमी योजना सुरू केली. शरद पवार यांनी महाराष्ट्राला फळबाग योजना दिली. कोकण आज कोल्हापूर किंवा सांगलीपेक्षा दरडोई उत्पन्नात पुढे आहे. मुंबईसह कोकण विभागातले सातही जिल्हे सांगली सातारापेक्षा आघाडीवर फळबाग योजनेमुळे विकसित झाले. कोकण रेल्वेचा अफलातून नियोजन केलेला प्रकल्प महाराष्ट्राच्या भूमीवरच झाला, अशा योजना आर. आर. आबा यांचा अपवाद सोडला तर कोणीही राबविल्या नाहीत. आज अशी दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधी फारसे दिसत नाहीत.
सत्तेचा तमाशा मांडणाऱ्या या फुटिरांच्या विद्यमान मंत्रिमंडळातल्या एका तरी मंत्र्याला महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन आहे का? आज महाराष्ट्र सामाजिक प्रश्नांवर दुभंगतोय, कायदा-सुव्यवस्थेच्या नावांनी तर बोंब आहे. सत्ताधाऱ्यांच्या वाचाळवीरांनी कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसविण्याची धुराच सांभाळलीय. प्राथमिक तसंच उच्च शिक्षण क्षेत्र पूर्णत: उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण मंत्री बदलला की, धोरण बदलतं. इतिहासाची मोडतोड केली जाते. मानसशास्त्राचा विचार न करता मुलांवर नको ते लादलं जातंय. हे एका बाजूला सुरू असतानाच शिक्षण घेणं हे सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेर जातंय. शैक्षणिक धोरण हे जणू कामगार निर्माण करण्याचं धोरण ठरतेय. देशात महाराष्ट्राचं प्रशासन सर्वोत्तम मानलं जात होतं. त्याचेही धिंडवडे निघताहेत. रस्ते, पाणी, शेतीच्या सवलती, आदींबाबत कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, आदि राज्यांनी खूप मोठ्या सुधारणा केल्या आहेत. हे आपणाला मान्य करावंच लागेल. जिल्ह्याच्या नियोजन मंडळामार्फत संपूर्ण जिल्ह्याचं चित्र समोर मांडून विकासाचं नियोजन करावं, असं अपेक्षित असताना सत्तेतल्या आमदारांना ताकद देण्याची भाषा करत फक्त त्यांनाच निधी दिला जातोय. जणू त्या आमदाराच्या उत्पन्नातून निधी दिल्याप्रमाणे जनतेच्या पैशाचे वाटप होतंय. आमदाराला ताकद म्हणजे त्या निधीचा काही टक्के वाटा सरळसरळ काढून घेणं, सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्याचं विचित्र फॅड अलीकडे रुजू लागलंय!
महाराष्ट्राच्या जनतेनं सर्वच्यासर्व २८८ आमदार सत्ताधारी पक्षाचेच निवडून दिलं पाहिजेत. विरोधी पक्षाच्या मतदारसंघातली जनता सरकारला कर देत नाही का? असा प्रश्न विचारण्याइतका भोंगळ कारभार सध्या चालू आहे. पूर्वीच्या काळी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याचं धोरण यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचं जाळं उभारून कार्यकर्ते, नेते तयार करणारी समाजसेवेची कार्यशाळा निर्माण केली. जनतेच्या छोट्या-छोट्या समस्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोक भिडत होते. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आरक्षणाच्या प्रश्नावर घ्यायच्याच नाहीत, असा वेडा विचार सर्वच राजकीय पक्ष घेत असतील तर यांना नासकेच म्हणावं लागेल ना? त्यांनी एक स्थानिक स्वराज्य संस्था ही व्यवस्था पांगुळगाडा करून टाकलीय. त्यामुळं आमदारांना यातून अधिक अधिकार मिळत गेले. नोकरशाहीला सर्वाधिकार मिळत गेले, त्यांचा बेधुंद, विना अंकुश कारभार सुरू झाला. मात्र राजकीय कार्यकर्ते गल्लीतच राहिले. इतका भोंगळ कारभार महाराष्ट्राच्या पातळीवर होईल, असं कधी वाटलं नव्हतं! महाराष्ट्र आज तो अनुभवतोय. आता कार्यकर्त्यांनी प्रचारांच काम करण्यासाठी, हक्काचे कार्यकर्ते उपलब्ध व्हावेत यासाठी आधी लोकसभेच्या त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील. जणू कार्यकर्ते हे पक्षाचे वेठबिगारच!
महाराष्ट्राच्या कोरडवाहू शेतीवरचे आठ ते दहा शेतकरी दररोज आत्महत्या करताहेत, याची ना कोणाला खंत, ना खेद, ना लाज वाटतेय? नवं तंत्रज्ञान उपलब्ध झालंय, राज्य सरकारकडे भरपूर उत्पन्नाचे मार्ग आहेत. उत्तम पद्धतीनं सर्व कामं करता येऊ शकतात. आमदार अपात्रतेचा निर्णय घ्या म्हणून न्यायालयानं सांगावं, मग न्यायाचे धिंडवडे काढत मनमानी निर्णय घेण्याची मनोवृत्ती वाढलीय. विधानपरिषदेवरच्या बारा आमदारांच्या नियुक्त्या तीन-चार वर्षे रखडून राहाव्यात, महामंडळावर अनेक वर्षे नियुक्त्याच केल्या जात नाहीत, हा काय आदर्श राज्यकाभार आहे का? यशवंतराव, वसंतराव, वसंतदादा, शंकरराव, अंतुलेसाहेब, मनोहर जोशी तुम्ही असा महाराष्ट्र आम्हाला देऊन गेला नाहीत. तो टिकेल, पण वाकेल असं आता वाटू लागलंय. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. मतदार नागरिकांनी फेसबुक किंवा व्हॉट्स ॲप'चा विचार जरुर करावा पण तो तारतम्यानं. कितीही आकर्षक जाहिरात किंवा बातमी असली तरीही विवेकानं निर्णय घ्यावा. एक गोष्ट मात्र स्पष्ट करावीशी वाटते की, मतदारांनी निवडून दिलेला प्रतिनिधी जर दुसऱ्या कोणत्याही राजकीय पक्षात गेला असेल तर त्याला मतदान करु नका. तो पक्षांतराचं तत्वज्ञान सांगत बसेल, पण त्याला भीक घालू नका. त्याला हे विचारावं की, मतांची भीक मागताना जोगव्याची परडी घेऊन आला होतास, मग पक्षांतर करताना आम्हाला का विचारलं नव्हतं? प्रतिनिधी निवडताना जाती-धर्माचा विचार न करता प्रतिनिधी निवडावा, मग तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी तारतम्यानं मतदान करावं. एक गोष्ट ध्यानात ठेवा. राजकीय माणसं ही दलाल असतात. आपला खिसा कर लावून कापतात. रुपयातले फक्त पंधरा-वीस पैसे खर्च करून कल्याणकारी राज्याचा आव आणतात. बाकी पंच्याऐंशी पैसे संगनमतानं ढापले जातात. सर्व मिळून आपापला वाटा घेऊन जातात. मतदाराना नागवलं जातं. आम्ही नेहमी हे सांगत आलेलो आहोत की, सगळे राजकारणी एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात, त्यांची संस्कृतीही एकच आहे. प्रत्येक सरकार हे वाईटच असतं, काही अतिवाईट असतात. तेच पर्व सध्या चालू आहे काय? हे मतदारांनी विचार करून ठरवावं. पूर्वी गुन्हेगार, पाकीटमार यांची वस्ती गावाबाहेर गुन्हेगार कॅम्पात असायची. आता स्वतंत्र भारतात तीच वस्ती गावाच्या आत आलीय. हेच लफंगे बहुरुपी बहाणेबाजी करुन तुम्हाला संगनमतानं लुटतात. वाईट आणि अतिवाईट यातूनच तुम्हाला राज्यकर्ते निवडावे लागतात. सध्याचे राजकीय पक्ष अजिबात लोकाभिमुख राहिलेले नाहीत. पण एका टोणग्याला हाकलायचं असेल तर दुसऱ्या लफंग्याला जवळ करावं लागतं. पक्ष बदलला की, निष्ठा बदलतात, हा देश व्यक्तीपूजक आहे. बलात्कारी आसारामबापूं यांच्या शिष्यांमध्ये अनेक केंद्रीय मंत्री, खुद्द पंतप्रधान होते. विचार पसंत नसलेल्या माणसांचा खून करणाऱ्यांना पाठीशी घालणारे राजकीय प्रतिनिधी निवडून तर देत नाही ना? याचा विचार जरूर करावा.
देशात अभूतपूर्व राजकीय गलिच्छता निर्माण झाली आहे. त्याचं केंद्र महाराष्ट्र राज्य आहे. जसा भूकंपांचा एक केंद्रबिंदू असतो. तसा महाराष्ट्र राजकीय भूकंपाचं केंद्र बनलंय. निर्लज्ज आणि कोडग्या राजकारण्यांमध्ये हा साहसवाद आला कोठून? की सुरुवातीलाच लक्ष दिलं नाही म्हणून लोकशाहीला जडलेली बांडगुळं वाढली आणि झाडापेक्षा ती मोठी झालीत. कोणतेही राजकारणी याला अपवाद नाहीत. पण आतापर्यंत राजकारणातले चकवे आणि डावपेच नागरिक खपवून घेत होते. पण आता ही घाण राजकीय परिघाबाहेर वाहू लागलीय. एखादं ड्रेनेज तुंबून त्याची दुर्गंधी गावभर पसरावी, अशी घृणा राजकारण्यांबद्दल निर्माण झालीय. हे बदफैली राजकारण कोठून सुरु झालं याची चिवडाचिवड करण्याची ही वेळ नव्हे. हे थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वतःच पुढाकार घेऊन आपल्या कुवतीनुसार येत्या वर्षात काय करायचं ते ठरवावं. नीतीमूल्यांच्या शालीला छिनालपणाची झालर लावली गेलीय, त्यामुळं केवळ लोकशाहीचं वस्त्र मलीन झालं नाही, तर समाजच नासत चाललाय. गॅगरीन झाल्यावर शरीरभर पू साचतो. त्यावर उपचार आणि तो पसरू नये म्हणून सडलेला अवयव कापावा लागतो. निदान त्या अवयवाशिवाय का होईना उर्वरित जीवन जगता येईल. उत्खंच्छल राजकारण्यांनी एकही क्षेत्र सोडलेलं नाही सगळीकडं गटाराचे प्रवाह वळवलेत. दिवसाची सुरुवातच रक्ताळलेल्या बातमीनं होते. संध्याकाळपर्यंत बातमी येते, पार्टी बदलली. कब्बडीतले खेळाडू जसे एक डाव पूर्ण झाला, की पाटी बदलतात, तसं हे हरामखोर सत्ता भोगून ढेकर दिली की, पक्ष बदलतात. 'थोरांची ओळख' हे पुस्तक अभ्यासक्रमातून काढून टाकले पाहिजे आणि थोर कोणाला म्हणू नये, यासाठी 'चोरांची ओळख ' हे पुस्तक तयार करावं. हे इतके निर्लज्ज आहेत की, आपल्या कुकर्माची यादीही अभिमानानं देतील. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठी तरी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा. अशी अपेक्षा आहे. जास्त काही करायची आवश्यकता नाही, येत्या वर्षभरात झाडावरची बांडगुळं नष्ट करायची. म्हणजे झाडाचं पोषण होईल, नाहीतर ही मंडळी लोकशाहीचा वटवृक्षच खाऊन टाकतील.
हरीश केंची
९४२२३१०६०९


आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...