Sunday 24 March 2024

अखेर राज 'लवंड'ले.....!

"परिस्थिती माणसाला शहाणं बनवतं, पण कधी कधी  आपली बुद्धी, शहाणपण, विचार, आचार आणि स्वाभिमान गहाण टाकायलाही भाग पाडतं. अशीच अवस्था राज ठाकरे यांची झालीय. बाळासाहेब ठाकरेंची ही 'सावली' थेट अमित शहांना भेटायला दिल्ली दरबारी गेली! कधीकाळी मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी सरसावलेले राज ठाकरे, हेच मोदींना देशाच्या राजकीय पटलावरून दूर सारायलाही निघाले होते. राज यांची राजकीय जडणघडण, कारकीर्द आणि वाटचाल ही शिवसेनाप्रमुखांच्या वैचारिक संस्कारात झाली. पण त्यांच्या आजच्या राजकीय हालचाली पाहता, बाळासाहेबांच्या विचारांच अनुकरण थांबल्याचं जाणवतंय. नाही तर सतत महाराष्ट्र, मराठी माणसांचा उपमर्द करणाऱ्यांची विचारसरणी राज यांना प्रातःस्मरणीय झाली नसती. त्यांचं हे वैचारिक 'लवंडणं' मराठी माणसांना 'अनाकलनीय' आहे!"
------------------------------------------------
*म*हाराष्ट्राच्या राजकारणात, सत्ताकारणात नवा भिडू सहभागी होतोय, महाराष्ट्र नवनिर्माण सेना...! राज ठाकरे यांनी आपल्याला एकट्याने अमित शाह यांना भेटायचं आहे अशी विनंती तीनवेळा भाजपकडे केली होती. अखेर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे चाणक्य अमित शाह यांना हा 'राजहट्ट' कळवला आणि शहांनी भेटण्याला संमती दिल्यानं त्यांच्यासाठी खास विमान पाठवलं गेलं मग राज आपले पुत्र अमित यांच्यासोबत दिल्ली दरबारी गेले. पण तब्बल १४ तासांच्या प्रतीक्षेनंतर विनोद तावडेंचा मध्यस्तीने अमित शहांनी भेट संपन्न झाली. राज यांच्या या बदलत्या भूमिकांचं मराठी माणसांना आश्चर्य कधीच वाटलं नाही, पण इलेक्ट्रॉनिक्स प्रसिद्धिमाध्यमांचे लाडके राज अमित शहांच्या भेटीची बातमी दिवसभर चालवली होती. इथं एक वैगुण्य दिसून येतंय की, राज हे एकाददुसऱ्या खासदाराच्या तुकड्याच्या बदल्यात महाराष्ट्र लुटणाऱ्या भाजपच्या दावणीला बांधले गेलेत का? मोदी आणि शहा यांना राजकीय पटलावरून कायमचे बाजूला करा, असं कधी कोण म्हणालं होतं, ते त्यांना आठवतंय ना? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ' लाव रे तो व्हिडिओ...!' हा त्यांनी केलेला डिजिटल प्रचार भाजपला धडकी भरवणारा होता. मात्र भाजपच्या विजयानंतर तो टिंगलीचा विषय केला गेला. त्यावेळी त्यांनी मोदी शहा यांच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली होती. 'पहिलं स्वातंत्र्य १९४७ ला मिळालं होतं, दुसरं स्वातंत्र्य १९७७ ला मिळालं आता मोदी शहा या दोघांना राजकीय क्षितिजावर दूर सारून तिसरं स्वातंत्र्य मिळायला हवं...!' असं आवाहन आपल्या घणाघाती भाषणात केलं होतं! त्यावेळी त्यांनी एकही उमेदवार उभा न करता भाजप विरोधात प्रचाराचा धडाका उडवला होता. पण त्यांच्या या वागण्यातून असं दिसून येतं की, त्यांची भूमिका ही नेहमी उद्धव ठाकरे विरुद्ध राहिलीय. जेव्हा उद्धव भाजपसोबत होते तेव्हा राज काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. आता उद्धव काँग्रेस राष्ट्रवादीसोबत आहेत तर राज हे भाजप सोबत गेलेत. उद्धव ठाकरेंना विरोध हेच जणू राज ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व असावं असं जाणवतं. याच २०१९ च्या राज यांच्या भाजपविरोधी प्रचाराच्या रणधुमाळीत मोदी सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे ४० जवान शहीद झालेल्या 'पुलवामा हल्ल्या'पूर्वी पाकिस्तानचे त्यांचे समकक्ष आणि हिंदुस्थानचे ‘जेम्स बॉण्ड’ असलेले अजित डोवाल यांच्यातल्या दिवाळी दरम्यान गुप्त भेटीचे रहस्य काय? असा राष्ट्रहिताचा, राष्ट्रीय सुरक्षेचा सवाल त्यांनी तेव्हा विचारला होता. त्यासाठी त्यांनी वृत्तपत्रांच्या बातम्या फडकावल्या होत्या. या टोकदार प्रश्नाचे खरं उत्तर दिल्लीत अमित शहा भेटीत राजना मिळालं असेल का? भारतीय प्रजासत्ताक, स्वातंत्र्य मोदी-शहा हे फासावर लटकवत असल्याची खंत देखील राज यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून तेव्हा व्यक्त केली होती. जे चित्र आजही  सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. व्यंगचित्रात तो जो फासाचा दोर राज यांनी दाखवलाय तो अमित शहा यांच्या कार्यालयातून जप्त करून राज यांनी महाराष्ट्रात आणला असेल का? असं विचारलं जातंय. २०१९ ला भाजप विरोधातल्या प्रचाराचा धडाका उडवल्यानंतरही सेना भाजप युतीने ४१ जागा जिंकल्या. राज यांच्या प्रचाराचा कोणताच परिणाम मराठी मनांवर झाला नव्हता. राज आता भाजपचा प्रचार करण्यासाठी सरसावलेत २०२४ च्या निवडणुकीत ते परिणाम साधतील का? पण राज यांचं महायुतीत येण्यानं एक धडाडणारी तोफ भाजपला मिळालीय जी महाविकास आघाडीच्या प्रचाराच्या ठिकऱ्या उडविल, हे मात्र निश्चित. कारण शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या तेवढ्या गाजत नाहीत, किंबहुना लोकच येत नाहीत, राज मात्र गर्दी खेचण्यात यशस्वी होतील!
भाजप विरोधी प्रचार करूनही लोकसभेच्या २०१९ ला जे लक्षणीय यश भाजप सेनेला मिळालं तेव्हा राज यांनी निकालावर 'अनाकलनीय' असा शेरा मारत आपलं ट्विटर-मौन सोडलं होतं. राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना करताना ज्या विचारसरणीची कास धरली होती. ती शिवसेनेची, मराठी माणसांची, मराठी वैभवतेची, स्वाभिमानाची, अस्मितेची, बाळासाहेबांच्या विचारसरणीची होती. प्रारंभीची वाटचालही त्याच मार्गावर झाली. खुद्द बाळासाहेबांनी आपला फोटो वापरू नये अशी ताकीद दिल्यानंतर त्यांची छबी वापरणं त्यांनी थांबवलं. पण शिवसेनेची तीच ' खळ्ळखटाक...!' संस्कृती सुरूच ठेवली होती. राज्यात सेना-भाजपचा वाढता प्रभाव पाहता आपल्याला त्याच विचारसरणीवर मतं मिळणार नाही. अस्सल उपलब्ध असताना नक्कलला कोण विचारणार? असं लक्षांत येताच त्यांनी त्यांच्याविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं. नव्यानं वाटचाल सुरू झाली. शिवसेनाप्रमुख प्रारंभीच्या काळात समाजवादी विचारांशी जवळीक साधणारे होते. त्यातूनच त्यांनी प्रारंभीच्या काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत प्रजा समाजवादी पक्षाशी युती केली होती. त्यामुळं शिवसेनेची विचारसरणी प्रबोधनकारांची दिसत होती. पण शिवसेनेला मिळालेला मोठा जनाधार लक्षांत येताच बाळासाहेबांना ग.वा.बेहेरे, दि.वा.गोखले, विद्याधर गोखले यासारख्या संघ विचारांच्या कावेबाज पत्रकारांनी घेरलं. सततच्या सानिध्यानं बाळासाहेब प्रबोधनी विचारांपासून दूर जात 'हिंदुत्ववादी' बनले. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणतात ती अशी! इथं नेमकं उलटं घडलं; राज ठाकरे यांना जसे पुरोगामी शरद पवार भेटले तसेच डाव्या विचाराचे 'मैत्री' या मेळघाटात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे अनिल शिदोरे भेटले. त्यांनी मनसेत वैचारिक बदल घडवला. शिवाय त्यांच्या सततच्या सानिध्यानं कदाचित राज यांना शिदोरेंची ती डावी विचारसरणी भावली असावी. त्यामुळेच त्यांनी हिंदुत्ववादी विचारांना विरोध करायला सुरुवात केली. त्यातूनच शरद पवारांच्यानंतर थेट सोनियांची भेट घेते झाले होते! अटलजींचा काळ आणि मोदींची राजवट यात खूप फरक त्यांना जाणवला असावा. त्यांच्यातही बदल झाल्याचं प्रसिद्धीमाध्यमांना जाणवलं. निवडणूक आयोगाची भेट घेऊन आगामी निवडणूक ही मतपत्रिकेवर घेण्यात यावी, अशी विनंती करायला आल्याचं राज यांनी तेव्हा सांगितलं होतं. पण त्याला फारशी प्रसिद्धी मिळणार नाही असं लक्षांत आल्यावर 'न्यूजसेन्स' असलेल्या राज यांनी थेट युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींचं घर गाठलं. त्यांचा काय संवाद झाला ते समजलं नाही, पण राज यांच्या सोनिया भेटीनं राज्यातले काँग्रेसजन पार गोंधळून गेले. कदाचित त्यांचा आघाडीत जाण्याचा मार्ग सुकर व्हावा हा राज यांचा मानस असावा. असं तेव्हा वाटलं! पण २०१९ नंतर शरद पवारांनी राज ऐवजी उद्धव यांना जवळ केल्यानं त्यांची गोची झाली. त्यामुळं राज यांनी भाजपची महायुती जवळ केलीय. आज राज यांचं वय ५६ वर्षाचं आहे. आपल्या धरसोड वृत्तीने आपला जनाधार संपत आलाय, हे कदाचित लक्षांत आलं असावं. आपल्या मुलाला अमितला राजकारणात स्थिरस्थावर करायचं असल्यानं त्यांना काहीतरी भूमिका घेणं भाग आहे. शिवाय होत असलेली कार्यकर्त्यांची ओहोटी थांबवायची असेल तर सत्तेच्या जवळ जाऊन काही लाभ मिळवायला हवा असं वाटणं साहजिकच आहे. त्यामुळंच त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला असावा.
या लेखाचा मथळा देताना लवंडले असा शब्दप्रयोग केलाय याचं कारण ठाकरी भाषेत एखाद्यानं पक्ष बदलला, विचार बदलला तर त्यासाठी ' लवंडा ' ते हा शब्द वापरतात. म्हणून मुद्दाम हाच शब्द वापरलाय. कधी इकडे कधी तिकडे हीच मनसेची भूमिका असल्याचं आजवर दिसून आलंय. २०१४ चा निवडणुक काळात भाजपने सोबत घ्यावं म्हणून मोदींचं खूप गुणगान गायलं, मोदी देशाचे पंतप्रधान व्हावेत अशी अपेक्षाही व्यक्त केली. मात्र भाजपने त्यांना जवळ केलं नाही उलट लाथाडलं असंच म्हणावं लागेल. मनसेच्या मागील १० वर्षात ह्या अश्या भूमिकेमुळेच बरेच नेते भाजपच्या दावणीला बांधले गेलेत. राहिली गोष्ट मनसेच्या मतदारांची तर त्यांना ही बाब माहिती आहे की मागील १० वर्षात भाजपने देशाचे आणि छोट्या छोट्या राजकीय पक्षांचे जे नुकसान केले आहे ते कधीही भरून निघणारे नाही. खुद्द राज बोलले होते की भाजपचा नोटबंदी आणि जीएसटी बाबतचा निर्णय देशाला १० वर्षे मागे घेवून जाणारा आहे. हे सर्व मतदार कसे विसरतील? 'अब की पार ४०० पार...!' म्हणणाऱ्या भाजपला महाराष्ट्रात राज ठाकरे यांची गरज का पडावी? मात्र राज यांना महाराष्ट्रात सोबत घेतल्यास उत्तरप्रदेश, बिहारमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय मुंबईतही परप्रांतातून आलेले मतदार भय्ये भाजपपासून दुरावण्याचीही शक्यता आहे. राज ठाकरे यांना महायुतीमध्ये घेण्याचं एक कारण शिंदेचे पंख छाटणे असा सुद्धा असू शकतो. कारण ज्या लोकसभेच्या जागांवर मनसेचे उमेदवार उभे राहताहेत त्यांनी धनुष्यबाण हे चिन्हं घ्यायचं ठरवलेलं दिसतंय. त्यामुळं मागच्या दाराने शिवसेना ताब्यात घेण्याचं डाव देखील असू शकतो. अमित शहांनी तसं आश्वासन दिलं असावं. बाळासाहेबांनी शिवसेनेची सुत्रं ही आपल्याला द्यावीत अशी राज यांची इच्छा असतानाही ती उद्धव यांच्याकडे सोपवल्याने ते शिवसेनेतून बाहेर पडले. प्रारंभीच यश वगळता त्यांना गळती लागत गेलीय. आता भाजपच्या माध्यमातून पुन्हा शिवसेनेवर ताबा मिळविण्याची त्यांची मनिषा दिसतेय. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता आहे. कारण राज हे एकनाथ शिंदेच काय इतर कुणाच्याही नेतृत्वात काम करू शकणार नाही. 
राज ठाकरे आणि अठरा वर्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं समीकरण मांडलं तर, येणाऱ्या निवडणुकीतून लागणाऱ्या निकालातून राज यांच्या इंजिनला नवीन दिशा मिळेल किंवा इंजिन कारशेडमध्ये दिसेल. कारण त्यांनी शिवधनुष्य हाती घ्यायचं ठरवलंय. महाराष्ट्रात आघाडीच्या जागा कमी झाल्या तर, त्याचे सारे श्रेय राज यांना मिळणार आहे. ही निवडणूक राज यांच्यासाठी फार महत्वाची आहे. जर यावेळी त्यांची गणितं जुळून नाही आली तर मात्र पुन्हा संधी मिळणं कठीणच आहे. कारण त्यानंतर येणाऱ्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ बदलेले असतील. सातत्यानं त्यांचे निवडून आलेले आमदार-नगरसेवक फोडले जाताहेत. पण काही वर्षांपूर्वी वाशी येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले होते, की "एक कार्यकर्ता जरी राहिला तरी मी त्यातून लाख निर्माण करेन." त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातून असं नक्की होऊ शकेल हे जाणवतंय. राज ठाकरे यांना आपलं शक्तिस्थळ माहितीय. राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, पॉलिटिकल टायमिंगमध्ये त्यांचा देशात मोजक्या लोकांत गणना होतेय. मग आज त्यांना यश मिळेल का? हा प्रश्न उरतोच. याबाबत एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यानंतर, शरद पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालविण्यासाठी सकाळी लवकर उठावं लागतं! असा टोमणा मारला होता. एका अर्थानं त्यांना असं म्हणायचं होते की, पक्ष चालविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. पण राज ठाकरे यांनी हा वडीलकीचा सल्ला त्यावेळी फारसा गांभीर्याने घेतला नाही. नंतर मात्र त्यांच्याच सल्ल्यानं त्यांची वाटचाल सुरु झाली असे त्यांचे विरोधक आरोप करताहेत. त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं, पण नंतर ते टिकवून ठेवता आलं नाही. त्यासाठी अनेक कारणं असतील पण राज यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज हेसुद्धा एक उत्तम कलाकार आहेत. कलाकार कोणाचा गुलाम होत नाही. अगदी कोणा व्यक्तीचा, वेळेचा आणि वेळापत्रकाचाही नाही. पण यावर सुद्धा मात करता आली असती. त्यांची दुसरी फळी अगदीच सुमार होती. याबाबतीत शिवसेनाप्रमुख मात्र नशीबवान होते. त्यांच्याकडे सक्षम व निष्ठावंत वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी, सुधीर जोशी इ. नेते होते. ते फर्डे वक्ते होते. पण राज ठाकरे यांची आजही हीच मोठी समस्या आहे. त्यावर मात केलीच पाहिजे आता तशी संधी सुद्धा येणार आहे. गेल्या अठरा वर्षात राज यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांना टोल नाका आंदोलन, मराठी पाट्या अशा काही गोष्टी वगळता, नवीन सकारात्मक उपक्रम देऊन राज्यपातळीवर ३६५ दिवस गुंतवून ठेवता आलेलं नाही. तसंच सगळ्याच शहरात आणि गावात कुठल्याच पक्षात जागा नसलेले अनेक टुकार कायम नवीन पक्षाच्या प्रतिक्षेत असतात. अशा अनेक प्रवृतींनी त्याकाळात मनसेचा ताबा घेतलाय. त्यांनी मनसेच्या नावानं दुकानदारी सुरु केलीय. त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे राज यांच्या 'ब्लु प्रिंट'नुसार नवनिर्माण करायला आलेले कार्यकर्ते पुन्हा माघारी फिरलेत. जे उरलेत ते आता कुठेच जागा नाही, म्हणून थांबलेत. तर हेच काय वाईट आहे. अशा प्रवृत्तीना शोधून, त्यांच्या जागा रिकाम्या करणं हे मोठे आव्हान असणारंय. सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय पोकळीत, राज ठाकरे यांना स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आता नवीन कार्यकर्त्यांचे रोप लावून त्याची वाट बघणं, आत्मघातकी ठरेलं. त्यासाठी युती होणार आहे या आशेनं अनेक सेना -भाजपच्या मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केलीय. त्यांची शोध मोहीम घेऊन योग्य त्यांना मनसेनं उमेदवार केलं पाहिजे.  सेना-भाजपच्या जागावाटपात दोन्ही पक्षाचे उमेदवार वैचारिक जवळकीनं मनसेसोबत येऊ शकतात. शरद पवार यांनी ज्याप्रमाणे छगन भुजबळ, गणेश नाईक इ.नेते आपल्या पक्षात सामावून घेतलं, त्यांना टिकवून ठेवलं. तशी कला राज ठाकरे यांनी आता अवगत करायला हवीय. सेना -भाजपनं जशी मनसेची फोडाफोडी केली त्याची परतफेड करण्याची ही वेळ आलीय.
हरीश केंची
९४२२३१०६०९
चौकट
दिल्लीत राज आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. बंद दाराआडची चर्चा म्हटले की महाराष्ट्र सावध होतो. अशाच बंद दाराआडच्या चर्चेने भाजपने थोरले ठाकरे गमावले आणि आता धाकले ठाकरे सोबत आणण्यासाठी पुन्हा बंद दाराआड चर्चा! अशा चर्चेत काय ठरले हे कळण्यास मार्ग नसतो. जे कळते त्याला आधार नसतो. बंद दाराआडच्या चर्चेतील मुख्यमंत्रीपदाने महाराष्ट्रात महाभारत घडवले. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरले होते, हे उद्धव ठाकरे शपथेवर सांगतात. परवा त्यांनी तुळजाभवानीचीही शपथ घेतली. भाजप अशा शपथा घेत नाही आणि उद्भव यांचा दावा मान्यही करत नाही. ज्या देवाला आम्हीच मंदिर बांधून देतो, त्या देवाची शपथ आम्हाला सांगू नका! मुख्यमंत्रीपदाची कोणतीही वाटणी ठरली नव्हती, यावर भाजप ठाम आहे. आता मनसेला महायुतीचे दरवाजे खुले करताना पुन्हा बंद दाराआडच्या चर्चेचा खेळ खेळला गेलाय. राज आणि शहांच्या चर्चेला भाजपचा कुणीही नेता नव्हता. शहा बंद खोलीतले बाहेर बोलत नसतात आणि काय ठरले ते राज ठाकरे हे पक्ष प्रवक्त्यांच्या बैठकीतही सांगत नाहीत. सारेच आपापल्या ठिकाणी बरोबर म्हणायचे. राज यांनी आपला स्वतंत्र बाणा महाशक्तीच्या चरणी अर्पण करू नये असे महाराष्ट्राला वाटते. आता भाजपच्या बंद दाराआडून राज यांच्याही पदरी आणखी नवी कोरी वेदना पडू नये, एवढंच!


No comments:

Post a Comment

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...