Friday 25 September 2020

भीती वर्गलढ्याची...!


"देशात दोन स्तरावर अर्थव्यवस्था राहिलीय. मोठे उत्पादक, कार्पोरेट उद्योग, बँका, आर्थिक संस्था यांची संघटित अर्थव्यवस्था तर शेतकरी, नोकरदार, छोटे, किरकोळ व्यापारी यांची मोठ्या संख्येनं असलेली असंघटित अर्थव्यवस्था! जगात कितीही आर्थिक मंदी आलीतरी आजवर आपल्या असंघटित अर्थव्यवस्थेमुळे भारतात फारसा फरक पडला नाही. पण या असंघटित अर्थव्यवस्थेवर नोटबंदी, जीएसटीनं गेल्या काही दिवसांपासून घाला घातला गेलाय. त्यामुळं ती कमकुवत झालीय, अडचणीत आलीय. ती सावरण्यासाठीच्या सरकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. सर्व स्तरावरच्या नोकऱ्या संपुष्टात आल्यात. खासगी वा सरकारी स्तरावरच्या रिक्त जागा भरण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. त्यामुळं दिवसेंदिवस बेकारी वाढतेय. शेतकरी, कामकरी, नोकरदार, कष्टकरी यांच्यासमोर नव्या विधेयकामुळे अडचणी उभ्या राहिल्यात. तर रेल्वे, एलआयसी व इतर सरकारी उद्योग कार्पोरेटकडं सोपविले जाताहेत यामुळं देशात 'आहे रे - नाही रे' असा वर्गलढा तर उभा राहणार नाही ना! अशी भीती निर्माण होतेय. राज्यकर्त्यांनी याबाबत दक्ष राहायला हवं नाहीतर देशासमोर भयंकर संकट उभं राहील!" 
--------------------------------------------------------
*लो*कशाहीच्या ज्या अनेक व्याख्या केल्या जातात त्यापैकी एक अशी आहे..."बहुसंख्य लोकांनी केलेली हुकूमशाही ती लोकशाही!" त्याची सत्यता पटावी अशी स्थिती देशात निर्माण झालीय. घेत असलेले निर्णय, नव्यानं आणली जाणारी धोरणं ही लोकोपयोगी आहेत की लोकविरोधी? हे समजून घेतलं जातं नाहीये. संसद ही लोकशाहीचं मंदिर समजलं जातं, पण आज ही स्थिती बदललीय. लोकशाही ही या संसदेची गुलाम बनलीय आणि संसदेत बसलेले खासदार हे त्याचे भाग्यविधाते बनलेत. त्यांनी घेतलेले निर्णय हेच देशवासियांचं भाग्य घडवताहेत! विधेयकं का, कशी आणि कशासाठी आणली जाताहेत? विरोधी खासदार त्यासाठी का गोंधळ घालताहेत? सत्ताधारी का आग्रही आहेत? हे सारं जनता समजून आहे. शेतकरी विधेयकावरून राज्यसभेत जो काही गोंधळ झाला; यानं काय साध्य झालं? विधेयकं मंजूर व्हायची ती झालीत. पण देशातल्या शेतकऱ्यांना 'आम्ही तुमच्यासाठी हे सारं काही करतोय!' हे दाखविण्यासाठीचा तो प्रयत्न होता. अशाचप्रकारे गेल्या १० वर्षात जवळपास १६ विधेयकं गोंधळात मंजूर केली गेलीत. खरंतर लोकांचा आवाज संसदेत उमटला पाहिजे पण इथल्या खासदारांना लोकशाहीनं जे काही बहाल केलंय ज्यामुळं त्यांच्यातही शैथिल्य आलंय. मिळणाऱ्या मानधन, भत्ते, सेवासुविधा यातच सारे मश्गुल आहेत. केवळ विद्यमान खासदार, आमदारांना मानधन, भत्ते मिळतात असं नाही तर निवृत्त, पराभूत अशा माजींना देखील हे सारं काही मिळतं. एक देश ,एक बाजार, एक टॅक्स, एक झेंडा, एक निशाण अशी मानसिकता असलेल्या सत्ताधाऱ्यांना ही व्यवस्था बदलण्याचं धाडस होत नाही, यांतच सारं आलं. लोकसभेच्या खासदारांना ५ लाख रुपयांचं मानधन-वेतन दिलं जातं याशिवाय डेली अलाऊन्स, ट्रॅव्हल, मेडिकल, लाईट, पाणी याची बिलं, विमान-रेल्वेचा प्रवास अशा अनेक सुविधा दिल्या जातात. संसदेत ५४३ खासदार आहेत. प्रधानमंत्री वगळता लोकसभेतील ५४२ खासदारांना ५ लाख मानधन म्हणजे दरमहा २७ कोटी १० लाख रुपये तर वर्षाला ३२५ कोटी रुपये अदा केले जातात. राज्यसभेतील २४५ खासदारांना दरमहा ४ लाख रुपये प्रमाणे महिन्याला ९ कोटी ८० लाख तर वर्षाला ११७ कोटी रुपये अदा केले जातात. एकूण ७८७ खासदारांना ४४२ कोटी रुपये दरवर्षी वेतन दिलं जातं. देशातील एकूण आमदारांची संख्या ४ हजार २४५ त्यांना सरासरी दरमहा १ लाख ६७ हजार म्हणजे दरमहा ७० कोटी वर्षाला ८८४ कोटी रुपये अदा केले जातात. खासदार आणि आमदार यांची एकूण संख्या लोकसभा खासदार ५४३+ राज्यसभा खासदार २४५ + आमदार ४,२४५ अशी ५ हजार इतकी होते. या ५ हजार लोकप्रतिनिधींना दरमहा १ हजार २८६ कोटी वेतन दिलं जातं इतर भत्ते जे दिलं जातं ते सारं पकडलं तर दरमहा जवळपास जवळपास २ हजार ५०० कोटी रुपये खर्ची पडतात. आमदारांना त्या त्या राज्याच्या क्षमतेनुसार वेतन दिलं जातं. तेलंगणात २ लाख ५० हजार, दिल्ली आणि मध्यप्रदेशात २ लाख १० हजार, बिहारात १.६५ लाख महाराष्ट्रात १.६४ लाख, छत्तीसगड १.३४ लाख, गुजरात १.२४ लाख, बंगाल ६२ हजार, केरळ ४३ हजार, उत्तराखंड ३५ हजार, असं वेतन आमदारांना दिलं जातं. माजी आमदारांना ३५ ते ६० हजार वेतन दिलं जातं याशिवाय इतर भत्तेही दिले जातात. नोकऱ्यांसाठी ज्या काही संस्था आहेत त्यात स्टाफ सिलेक्शन बोर्ड, यूपीएससी, बिहार, उत्तरप्रदेश सर्व्हिस कमिशन, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, एफसीआय, बीपीएससी, मेट्रो रेल्वे कार्पोरेशन, डिफेन्स रिचर्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन, हायकोर्ट, सर्व राज्यातील पब्लिक सर्व्हिस कमिशन व इतर या सगळ्या आस्थापनेवर ७०० कोटींचा खर्च होतो पण प्रत्यक्षात २ लाख नोकऱ्याही या संस्थाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. केंद्रसरकारच्या सीएमआई या संस्थेनं दिलेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी ते मार्च दरम्यान ९० लाख, मार्च ते सप्टेंबर दरम्यान २ कोटी १० लाख नोकऱ्या गेल्या आहेत. याच काळात सॅलरी जॉब म्हणजे व्हाईट कॉलर दीड कोटी नोकऱ्या संपुष्टात आल्यात. *शिक्षक, वकील, पत्रकार पहिल्यांदा अडचणींत* देशातली आर्थिक स्थिती नाजूक झालीय. सारी व्यवस्थाच सडलीय. फ्रॉड झालीय. व्यवस्था आणि इकॉनॉमी यांच्यातल्या मिलीभगतला सांभाळण्यासाठी राजनीती आणि लोकतंत्र प्रयत्नशील होतेय असं वाटावं असं राजकारण सध्या खेळलं जातंय. फ्रॉड सिस्टीम आणि इकॉनोमी यांना एकत्र आणत इथल्या राजकारण्यांनी देशाला लुटलंय. ती रोखण्याची अशी कोणतीही दूरदृष्टी नाही कि ज्यानं इकॉनॉमी रुळावर येईल आणि सिस्टीमला ठीकठाक करण्याचं काम आताचे राजकारणी करतील असं वाटत असतानाच तो फोल ठरलाय. तरुण नोकर्‍या मिळतील या आशेनं सरकारकडं बघतोय पण नोकऱ्या कशा उपलब्ध होतील? इथं तर इकॉनोमिकच कोसळलीय. पण जेव्हा कधी इकॉनॉमी चांगली होती तेव्हाही नोकर भरती झालेली नाही. रिक्त जागा भरण्याची शिफारस विविध प्रशासनानं केली होती; मंत्रालयातल्या काही जागाही भरल्या गेल्या नाहीत. नव्या जागा निर्माण करायच्या असं तरुणांचं म्हणणं नाहीये, पण ज्या जागा मान्य आहेत तिथं भरती करायला काय हरकत आहे? पण तीही केली जात नाही. लाखो पदे रिक्त आहेत. एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयपीएस या परीक्षा केवळ दिखावाच ठरत तर नाहीत ना! सध्या सीबीआयची मोठी चर्चा आहे, राजकारणी, विरोधी पक्ष किंवा कार्पोरेट त्यांचं नाव ऐकूनच गुडघे टेकतात. व्यापारी, उद्योजक नतमस्तक होतात. एवढेच नाही तर मीडिया देखील त्यांचे नाव ऐकताच घाबरून जाते. अशा या सीबीआयमध्येही २२% पदं रिक्त आहेत. दुसरं ईडीचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यात केवळ ३६% च लोक काम करतात. ६४% जागा रिक्त आहेत. केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या खात्यात किती जागा रिक्त आहेत त्याची माहिती संसदेत दिली गेलीय त्यानुसार केंद्र सरकारच्या अखत्यारीत ४ लाख २० हजार ५४१ पदं रिक्त आहेत. यात ५४ मंत्रालये येतात. राज्यांची स्थिती तर अधिकच वाईट आहे. तिथं प्राथमिक शिक्षकांच्या १० लाख जागा रिक्त आहेत. मध्यवर्ती विद्यापीठं जी केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतात तिथं ६ हजार ३८१ तर राज्यस्तरावरच्या विद्यापीठांमध्ये ६३ हजार शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत. पोलिसांची दीड लाख पदे रिक्त आहेत. एकट्या उत्तरप्रदेशात ५ लाख ४९ हजार रिक्त आहेत. एवढेच नाही तर इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये दीड लाख प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आयआयटीसारख्या मोठ्या संस्थेत जिथे फॅकल्टीच्या २६ हजार जागा रिकाम्या आहेत. सरकारी रुग्णालयात दोन लाखाहून अधिक जागा रिक्त आहेत. आयआयटीमध्ये ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. तिथं खरंतर ५ हजार ८८७ फॅकल्टी हवे आहेत पण प्रत्यक्षात केवळ ३ हजार ४८७ शिक्षक आहेत तर २ हजार ४६१ जागा म्हणजे जवळपास ४१% जागा रिक्त आहेत. विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या महाविद्यालयांमध्ये साडेसहा लाख जागा रिक्त आहेत. २०१४ मध्ये साडेदहा लाख, २०१५ मध्ये साडेबारा लाख तर २०१९ मध्ये अठरा लाख जागा रिक्त झालेल्या आहेत. यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्र हे जर्जर बनलंय. देशात कधी नव्हे ते पहिल्यांदा शिक्षक, पत्रकार आणि वकील यांचं उत्पन्न घटलंय. वकिलांसोबत असलेले लेखनिक आहेत किंवा न्यायालयात काम करणारे इतर आहेत, त्यांच्यावरही अशीच वेळ आलेली आहे. शिक्षकांच्या वेतनावर गदा आलेली आहे. आगामी काळात वेतन कपात केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रीम कोर्ट वर्षांत लाखाहून अधिक दावे निकाली काढते परंतु त्याहून अधिक दावे नव्यानं दाखल होत असतात. न्यायालय बंद असल्यानं वकिलांचा, तिथल्या लेखनिकांचं उत्पन्न ठप्प झालेलं आहे. न्यायपालिकेचं काम सगळीकडं ठप्प झालेलंय. सुप्रीम कोर्टात ५९ हजार तर हायकोर्टात ४४ लाख हजार दावे पडून आहेत. त्यावर अवलंबून असलेल्या लोकांचे कसं व्हायचं याचा विचार होत नाही. देशात अशा पद्धतीनं सिस्टीम केली गेलीय की प्रत्येक बाबीसाठी तुम्हाला वकिलाकडं, सीएकडं जावं लागतं. त्याच्याशिवाय तुमची कागदपत्रं पुढं सरकू शकत नाही. सुप्रीम कोर्टात २००७ मध्ये ९ लाख ५५ हजार वकील काम करत होते. २०११-१२ त त्यांची संख्या १२ लाख झाली, २०१७ मध्ये २० लाखापर्यंत गेलीय. आज सुप्रीम कोर्टात ६४ लाख वकील काम करताहेत. त्यात उत्तरप्रदेशात सर्वाधिक साडेतीन लाख, बिहार मध्ये दीड लाख, महाराष्ट्रात सव्वालाख, आंध्रप्रदेश, गुजरातमध्ये ७० हजार, दिल्लीमध्ये ६३ हजार इतके वकील आहेत. *वकील, पत्रकार, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट* आता माध्यमांचा विचार केला तर देशभरात माध्यमांमध्ये पंधरा लाखाहून अधिक पत्रकार कार्यरत आहेत. त्यांचंही उत्पन्न घटलेलं आहे. जाहिराती थांबल्या आहेत. सरकारी जाहीरातीचे पैसे माध्यमांना मिळत नाहीत. वृत्तपत्रांची सिस्टीमच उद्ध्वस्त झालीय. माध्यमांच्या या सगळ्या गोष्टींकडं सरकार काही दूरदृष्टीनं पाहतेय असं वाटत नाही. प्रिंट मीडिया अडचणीत आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाची स्थिती फारशी चांगली आहे असं नाही. अनेक माध्यमकर्मींच्या नोकऱ्या गेल्यात. त्याचंही उत्पन्न घटलंय. माध्यमांची भूमिका काय आहे आणि कशी आहे, यावरच सरकारची मेहरबानी अवलंबून आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मीडिया स्वतंत्र राहिलेला नाही, त्याचा श्वास गुदमरतोय. सरकारचंही उत्पन्न खुंटलं आहे. देशातल्या करदात्यांची संख्या लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे. सध्या देश अशा पद्धतीनं घडवला जातोय की, एका बाजूला पैसेवाल्यांसाठीच्या योजना, सुविधा, सेवा, खाजगी व्यवस्थापन तर दुसरीकडं सव्वादोनशे कोटी खर्चाची, ८० कोटी गरिबांना ५ किलो धान्य द्यायचं ठरवलंय. याशिवाय गरिबांसाठी म्हणून ज्या काही योजना जाहीर झाल्यात त्या घोषणाच राहिल्यात. प्रत्यक्षात अवतरल्याच नाहीत. ज्या योजना, प्रकल्प, सुविधांसाठी लक्ष्य ठरण्यात आलं होतं ते पूर्ण होऊच शकत नाही अशी स्थिती आहे. जनधन योजनेत पाचशे रुपये, पाच किलो धान्य अशा योजना राबवून ८० कोटी जनतेला याचकाच्या भूमिकेत उभं केलं जातंय. कारण देशातली लोकशाही याचं लोकांवर अवलंबून आहे, ज्यांना दोन वेळा खायची भ्रांत आहे. लोकशाहीचा अर्थ केवळ मतदान करणं एवढंच त्यांच्यासाठी उरलंय. सरकारच्या ज्या योजना आहेत त्या देशातल्या ८०-१०० कोटी लोकांसाठीच आहेत असं भासवलं जातंय. ३५ -४० कोटी करदाते मध्यमवर्गीय आहेत; त्यांच्या करातून सरकार चालतंय. यातूनच ८० कोटी लोकांना ५ किलो धान्य दिलं जातंय. याशिवाय मनरेगात काम करणाऱ्या २५ कोटी लोकांसाठी सरकारचं एक लाख कोटीचं बजेट आहे. ११ कोटी मुलांना दुपारचं जेवण - मिडडे मिल्स दिलं जातं त्याचा बजेट १० हजार कोटीचं आहे. पण सर्वसामान्य माणसाची क्रयशक्ती वाढावी, त्याचं उत्पन्न वाढावं यासाठी काहीही प्रयत्न होत नाहीत. उलट शेतकरी, कामगार विधेयकं आणून त्याचं खच्चीकरण केलं जातंय. आतातर खाजगीकरणाचा घाट घातला गेलाय सरकारच्या मालकीचे २८ उद्योग, एलआयसी, विमानतळ, रेल्वे याचं खासगीकरण होतंय. रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आहे, त्यातून रोज सव्वा दोन कोटी लोक प्रवास करतात. रेल्वेच्या खासगीकरणासाठी दिल्ली, मुंबई, चंदिगड, हावडा, अलाहाबाद, सिकंदराबाद, पाटणा, चेन्नई, बंगलोर ही सात शहरं निवडण्यात आली आहेत. तिथंल्या १५० हून अधिक रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणासाठी सरकारनं निविदा काढल्यात. या निविदा अदानी यांची 'पोर्ट अँड लोजेस्टिक कंपनी', टाटाची 'रिऍलिटी कंपनी' आणि 'एसेल ग्रुप' या भारतीय कंपन्यांशिवाय 'बांबोर्डर' आणि 'मिएसीव्हेल' नावाच्या दोन विदेशी कंपन्यांनीही भरल्या आहेत. डिसेंबरमध्ये याचा पहिला राऊंड पूर्ण होईल. नेहरूंच्या काळापासून रेल्वेसाठी खास बोर्ड अस्तित्वात आहे. त्याच्यावतीनं कारभार चालत होता. यात घेतले जाणारे निर्णय हे जनतेशी निगडित असायचे. आता जे सव्वाशे ते दीडशे ट्रेन खाजगीकरण केले जाणार आहेत. रेल्वेनं आता जुन्या काळातलं हे रेल्वे बोर्ड बंद करून टाकलंय. त्याजागी नव्यानं एक कार्पोरेट कंपनी सुरू केलीय. ज्या कंपनीत मंत्रीदेखील हस्तक्षेप करू शकणार नाहीत. खासगीकरण केलेल्या रेल्वेतून पैसेवाल्यांसाठी वेगळी व्यवस्था, सोयी, सवलती, सुविधा दिल्या जाणार आहेत. सरकारनं यापूर्वीच शैक्षणिक, वैद्यकीय स्तरावर अशी आहेरे-नाहीरे साठींची दुहेरी वर्गव्यवस्था यापूर्वीच केलेली आहे. आता त्यात रेल्वेची भर पडलीय. *सरकारची जबाबदारी संकुचित बनलीय* जनतेच्या सुविधा दोन स्तरावर दिल्या जाताहेत. सरकारनं जी आश्वासनं दिलीत, ज्या घोषणा केल्यात त्याची अंमलबजावणी करायला हवी. ते मात्र होत नाही. सरकारी उत्पन्नातून केवळ कर्मचाऱ्यांचं वेतन देणं एवढंच काम होतेय. एवढं केलं तर सारं भागलं अशी सरकारची भावना बनलीय. भारतात आयकरदात्यांची संख्या ६ कोटी ३५ लाख आहे. त्यापैकी प्रत्यक्ष १ कोटी ४६ लाख लोकच आयकर भरतात. जीएसटी भरणाऱ्यांची संख्या १ कोटी ३५ लाख आहे त्यापैकी प्रत्यक्ष करदाते ६५ लाखच आहेत. हे उत्पन्नाचे प्रमुख मार्ग आहेत. देशात दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत. एक आहे ते मोठे व्यापारी, कार्पोरेट उद्योग यांची 'संघटीत अर्थव्यवस्था' तर शेतकरी, नोकरदार, किरकोळ व्यापाऱ्यांची दुसरी असंघटित अर्थव्यवस्था! आपल्याकडं असंघटित अर्थव्यवस्था ही फार मोठी असल्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक मंदी आली तरी, आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र ही असंघटित अर्थव्यवस्था सावरण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत. नोटबंदीची कुऱ्हाड चालविल्यानंतर जीएसटी लादल्यानं या असंघटित अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलंय. त्यामुळं ही असंघटित अर्थशक्ती कमकुवत बनलीय. देशांत एका बाजूला संघटित अर्थव्यवस्था असलेल्या कार्पोरेट जगताचं कोसळलेल्या अर्थसंकटानं मान टाकलीय; तर दुसऱ्या बाजूला असंघटित अर्थव्यवस्थेतले व्यापारी क्षेत्र, नोकरदार आणि शेतकरी यांच्यासाठीच्या विधेयकांनी त्यांच्यासमोर अडचणी उभ्या केल्यात. त्यामुळे देशात उच्चवर्गीय आणि निम्न किंवा खालच्या वर्गातले लोक अशा प्रकारचा वर्गलढा उभा राहतो की काय अशी भीती निर्माण झालीय! सरकारनं खरंतर या दोन अर्थव्यवस्थेतला निर्माण झालेला दुरावा कमी करून त्यावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे पण तसा प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे एकाबाजूला 'आहे रे' वर्ग आणि दुसरीकडे 'नाही रे' वर्ग यांच्यातला वर्गलढा आगामी काळात जर उभा राहिला तर आश्चर्य वाटायला नको! पण भारतीय संविधानात अशी काही उपाययोजना केलेलीय की, या संघर्षावर सहज नियंत्रण मिळवता येऊ शकेल! हरीश केंची ९४२२३१०६०९

Friday 18 September 2020

मीडियाला झालंय तरी काय?

"


जगात भारतातल्या मीडियाची नेहमीच वाखाणणी झालीय; ती अप्रस्तुत ठरतेय राजकीय अशी स्थिती आहे. देशातला प्रत्येक घटक आज अस्वस्थ आहे. कार्पोरेटपासून कामगार, शेतमजूर सारेच त्रासले आहेत. सीबीआय, न्यायपालिकेतला गैरव्यवहार तिथल्याच अधिकारी-न्यायाधीशांनी समोर आणलाय. कार्यपालिकांची आर्थिक कोंडी झालीय. नोटबंदी, जीएसटीनं व्यापारउद्योगाचं कंबरडं मोडलंय. रेल्वे, एलआयसीपासून अनेक सरकारी उद्योग विक्रीला काढलेत. शेतकऱ्यांबाबत अन्यायकारक विधेयक संमत केली जाताहेत म्हणून मंत्रीच राजीनामा देताहेत. ह्या सारख्या घटनांनी सारा देश अस्वस्थ आहे. अशावेळी मीडियाची मोठी जबाबदारी असताना मात्र ते आभासी दुनियेत रममाण आहेत. लोकभावना मांडल्याच जात नाहीत. या लढाऊ मीडियाला झालंय तरी काय?"

----------------------------------------------------------
*आ* ज सरकारच्या घोषणा ह्या वलग्ना ठरताहेत. पोकळ आश्वासनांचा भडिमार केला जातोय. पण आज याबद्धल आम्ही काही लिहिणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाच्या आर्थिकस्थितीबाबतीत चिंता व्यक्त केली जातेय. भारताच्या पायाभूत सुविधा किती उध्वस्त झाल्यात याबाबतही काही सांगणार नाही. याबाबत सत्यता काय आहे हे सरकारच्या संकेतस्थळावर दिसून येईल. पण आम्ही आमच्या तोंडाला कुलूप लावून टाकू, आमच्या लेखण्या त्या लिहू शकणार नाहीत, आमचे कॅमेरे ते दाखवू शकणार नाहीत; जे या देशातलं सत्य असेल.....! अशाप्रकारचा मीडिया यापूर्वी होता का? भारतीय मीडिया सतत सत्ताधाऱ्यांशी आजवर संघर्ष करीत आलाय. भारतीयांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी जगभरातले रिपोर्ट्स त्यानं प्रसिद्ध केलेत. मीडियाच्या माध्यमातून जगाला भारतातल्या या प्रतिष्ठित चौथ्या स्तंभाची ओळख झालेलीय. आणीबाणीचा काळ कोण कसा विसरेल? त्यावेळी मीडियावर सेन्सॉरशीप होती. मीडियाचा आवाज बंद केला होता. मीडिया अडखळला खरा पण त्यानं गुडघे टेकवले नाहीत. तो निद्रिस्त बनला तरीही त्याच्याकडून काही सत्य गोष्टी बाहेर येत होत्या. तो एक संघर्ष होता. त्या संघर्षाची निकड आज पुन्हा भासू लागलीय. तेव्हा जी बंदी होती, दबाव होता तो आज नाही. पण थोड्याफार प्रमाणात तो होतोय, त्यामुळं मीडिया लटपटतोय. तो वेगळाच तमाशा उभा करतोय. जनतेनं त्यात सहभागी व्हावं अशी मनीषा बाळगून आहे. सत्तेला बेधुंदपणे वागायचंय. त्याला कुणाचा बोल नकोय. एखाद्या मीडियाच्या खांद्यावर हात ठेवायचा अन म्हणायचं 'खूप चांगलं काम करताय!' पण वस्तुस्थिती वेगळी आहे. देशातल्या दोन-तीन वृत्तसंस्था ज्यांच्याकडं इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट अशी दोन्ही माध्यमं आहेत. अशा एकानं जरी वास्तव रिपोर्टिंग केलं तरी सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणतील! आज टीव्ही लावला वा वृत्तपत्र उघडलं तर आपल्याला मिळणारी बातमी खरीच असेल असं कुणी खात्रीनं सांगू शकणार नाही!
*राजनीतीचा, मीडियाचा स्तर खालावलाय*
प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जी घरं मध्यप्रदेशात वाटली गेली तो एक फार्स ठरतोय. २०२२ पर्यंत 'प्रत्येकाला घर' ही २०१४ त घोषणा होती. आज त्यापैकी केवळ २२ टक्केच घरं पूर्ण झालीत. अद्यापि ८० टक्के शिल्लक राहिलीत. आता केवळ दोनवर्षाचा कालावधी शिल्लक राहिलाय; ती कशी पूर्ण करणार? देशातलं औद्योगिक उत्पादन यंदा उणे -१०.४ टक्के झालंय. ते अधिक खालावतंय. याबाबत कुणी काहीच बोलत नाही. 'ग्लोबल इकॉनॉमिक्स फ्रीडम' या संस्थेचा एक अहवाल आलाय. ही संस्था आंतरराष्ट्रीय बाजारात स्वातंत्र्य मिळतेय की नाही, सरकार कितीपत मदत करतेय. ह्याची पाहणी करते. या अहवालानुसार गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाची स्थिती खूपच नाजुक बनलीय. गेल्यावर्षी जगातल्या १६२ देशापैकी ७९ क्रमांकांवर भारत होता तर यंदा तो १०५ क्रमांकावर स्थिरावलाय. हा अहवाल २०१८ ची स्थिती दर्शवतोय. म्हणजे नोटबंदी, जीएसटी लागू होण्याच्या पूर्वीची! इथला उद्योजक, व्यापारी, नोकरदार, सामान्य माणूस त्रासलाय, त्याची आर्थिकस्थिती खालावलीय याचं प्रतिबिंब मात्र मीडियातून दिसत नाही. हे सारं लपविण्याचा प्रयत्न होतोय. त्यासाठी फुटकळ गोष्टींचा गवगवा केला जातोय. आजवरच्या घटना पाहिल्या तर असं दिसून येतंय की, राज्यकर्ते जी काही नाटकं करताहेत तेच वास्तव आहे असं भासवलं जातंय. मीडिया ते अंगीकरत लोकांसमोर आणतेय. मीडियानं तो कालावधी अनुभवला नाही का? ज्या काळात दबाव होत होता, बंदी होती. इतिहासावर कटाक्ष टाकला तर या बाबी अधिक स्पष्ट होतील. यापूर्वीचे राज्यकर्ते अशाप्रकारची नाटकं करीत नसत, चुकीची माहिती देत नसत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही असं काही सांगितलं जातं नव्हतं. प्रपोगंडा केला जात नव्हता. आज जसा राज्यकर्त्यांच्या राजनीतीचा स्तर खालावलाय तसाच तो मिडियाचासुद्धा!
*मीडियाच्या मागे लोक कसे उभे राहतील?*
इंदिरा गांधींच्या आणीबाणीला आपण थोडंस बाजूला ठेऊ, तर लक्षांत येईल की, पंजाबमधील ऑपरेशन ब्लुस्टार, गरीबी हटावची घोषणा, भ्रष्टाचाराचा उसळलेला आगडोंब, क्रोनिक कॅपिटलीझमची होत असलेली चर्चा. यावर मीडियानं टीकेची झोड उडवली होती. आणीबाणी येण्यापूर्वी कुलदीप नय्यर यांनी रामनाथ गोयंका यांच्या सांगण्यावरून जानेवारीत इंडियन एक्स्प्रेसमध्ये एक लेख लिहिला होता. त्यात म्हटलं होतं, 'भारतात कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू शकते...!' त्यानंतर इंदिरा गांधींनी इंडियन एक्स्प्रेस नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला होता. इंडियन एक्स्प्रेस ६ कोटीला विकायची बोली लावण्यात आली होती. एक्स्प्रेस वृत्तसंस्था काँग्रेसला द्या असा आग्रह धरण्यात आला होता. एवढंच नाही तर त्यांच्या संपादक मंडळात ए.के.अँटनी आणि कमलनाथ यांना नेमलं होतं. इन्कम टॅक्सचा छापा टाकला गेला होता. वेगवेगळ्या तऱ्हेनं दबाव आणला होता. आता वाटतं ना सरकारच्या विरोधात गेलो तर इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय आपल्या मागे लागतील तसं तेव्हाही घडलं होतं. पण त्यावेळी मीडिया ठामपणे उभा राहिला होता. सध्या तीन मीडिया संस्था मजबूत आहेत. टाईम्स ग्रुप, त्यांचं न्यूज चॅनेलही आहे आणि वृत्तपत्रेही आहेत. दुसरा इंडिया टुडे ग्रुप त्यांचं इंग्रजी-हिंदी चॅनेल आहे, साप्ताहिकं आहेत. तिसरा आनंदबझार पत्रिका ग्रुप आहे. न्यूज चॅनेल्स बरोबरच टेलिग्राफ दैनिकही आहे. या मीडिया संस्थानी जाहिरातीच्या माध्यमातून तीनशे ते सातशे कोटीचं उत्पन्न प्रतिवर्षी मिळवलंय. निवडणूकीसाठी दोन वर्षे राहिलीत. दोन कशाला एक वर्ष जरी यातली एखादी मीडिया संस्था जनतेच्या पाठीशी उभी राहिली, त्यांच्या हालअपेष्टा, अस्वस्थता दाखवली तरी सारं चित्र बदलून जाईल. जेव्हा जेव्हा मीडिया उभा राहिला तेव्हा देशातले उद्योगपती, व्यापारी, व्यावसायिक त्यांच्यामागे उभे राहिलेत. तरुणांची साथ मिळालीय, वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्था उभ्या राहिल्यात. आजची औद्योगिक स्थिती पाहिली तर कार्पोरेटस, उद्योजक त्रासलाय, व्यापारी अडचणीत आलाय, व्यावसायिक मेटाकुटीला आलेत. राज्यकर्त्यांच्या जवळ असलेल्या काही मोजक्याच उद्योगपतींना सरकारचे लाभ-फायदे मिळताहेत. अशावेळी उद्योजक, जीएसटीनं वैतागलेला व्यापारी, शेतकरी, कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी मीडियाच्या मागे उभे राहणार नाहीत का? पण त्यांचे प्रश्न, समस्या याला मीडियानं स्थानच देत नसेल तर कसे उभे राहणार? त्यांना बातम्यांमध्ये जागाच मिळत नाहीये. परवा हरियानात शेतकऱ्यांवर बेछूट लाठीचार्ज झाला, अनेक शेतकरी जखमी झाले. त्याचा वृत्तांत कुठेच आला नाही. त्याच्या पाठीशी मीडिया उभाच राहिला नाही. तर मग ते कसे मिडियाच्या पाठीशी येतील?
*मीडियाकडं लोक आशेनं पाहताहेत!*
इंदिरा गांधींच्या नंतर राजीव गांधींच्या काळात इंटरनेट, टेक्नॉलॉजी साकारत होती, संगणकाचं युग येऊ घातलं होतं. बोफोर्सचा भ्रष्टाचार झाला होता. यात मीडियाची महत्वाची भूमिका राहिलंय. नरसिंहरावांच्या काळात इकॉनॉमिक्स रिफॉर्म होत होतं त्याचबरोबर झारखंड मुक्ती मोर्चाचा भ्रष्टाचार, सीबीआय, सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवणं, ज्यामुळं नरसिंहरावांची खुर्ची पांच वर्षे टिकली. त्याचंही रिपोर्टिंग झालं होतं. अटलजींच्या काळात स्वदेशीवर घाला घातला गेला. संघाशी पंगा घेतला गेला; ३७० कलम, राममंदिर हे मुद्दे गुंडाळून ठेवलं गेलं. मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात तर टुजी, कोळसा घोटाळा, एवढंच नाही तर न्यूक्लिअर करार, विश्वमंदी आली होती त्यांचं रिपोर्टिंग झालं नव्हतं का? मग मीडिया आताच का लटपटतोय? जानेवारी २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टातल्या चार न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशांच्या भूमिकेचं वस्त्रहरण पत्रकार परिषदेत केलं होतं. इतिहासात पहिल्यांदाच घडलं होतं, पण मीडियानं एकदिवसात त्या बातम्या गुंडाळल्या. त्यावर चर्चा नाही की, डिबेट! सीबीआयच्या अधिकारावरून, नेमणुकीवरून आलोक वर्मा आणि अस्थाना यांच्यात जे द्वंद्व घडलं त्यात अजित डोवलांना हस्तक्षेप करावा लागला. सर्वोच्च तपास यंत्रणेचे धिंडवडे निघाले असताना मीडियानं तासाभराच्या बातम्यांनंतर त्याबाबत मौन पाळलं. अशा हजारो घटना घडल्यात पण मीडियानं आवाज उठवला नाही. ही स्थिती समजून घ्यायचं असेल तर इतिहासात डोकावावं लागेल. मीडियाची कोंडी केली जात असताना संघर्षासाठी मीडियानं कंबर कसली होती. आज विरोधीपक्षच शिल्लक नाही. काँग्रेसचं राजकारणआक्रसून गेलंय. डाव्यांचं अस्तित्व संपुष्टात आलंय. दुसरे जे छोटे पक्ष आहेत ते मूग गिळून गप्प आहेत. जर आपण काही हालचाल केली तर सीबीआय, ईडी येऊन आपल्या मुसक्या आवळतील या भीतीनं ते सत्ताधाऱ्यांना साष्टांग दंडवत घालताहेत. अशावेळी मीडियानं काही भूमिका घेणं गरजेचं आहे. राजकीय पक्षांना मार्गदर्शन करायलाच हवं, पण ही ताकद, हिंमत कुठून येणार? मीडिया आपल्यात स्पर्धेत मग्न आहे. टीआरपी, पैसा हेच जणू सारं काही नाही. संपादकांनीही याकडं सोयीस्कर डोळेझाक केलीय. या संघर्षात देशहिताचा दृष्टिकोन ठेऊन वाटचाल करायला ते तयार नाहीत. देशातलं वास्तव लोकांसमोर आणलं तर लोक ते नक्कीच पाहतील. हे काही नवं नाही यानंही टीआरपी मिळणार आहे. मात्र सरकारची वक्रदृष्टी मात्र होईल. ते रागावतील, खुलासे पाठवतील. पण जर का मीडिया राज्यकर्त्यांच्या साथीला उभा राहिला तर मात्र लोकशाही उध्वस्त झालीच म्हणून समजा. अशावेळी जनता काय करील? जनतेला लढायला एक हत्यार हवंय ती आशेनं मिडियाकडं पाहतेय. इतिहासाची पानं चाळली तर लक्षात येईल की, २५ जून १९७५ ला आणीबाणी लादली गेली होती. त्यानंतर सलग तीन दिवस वृत्तपत्रांच्या वीज पुरवठा खंडीत करण्यात आला त्यामुळं वृत्तपत्र निघाली नाहीत. माहिती व प्रसारण मंत्री असलेल्या इंद्रकुमार गुजराल यांना तडकाफडकी बदलून विद्याचरण शुक्ल यांना नेमण्यात आलं. त्यांनी दुपारी २ वाजता सूत्रं स्वीकारली अन लगेचच चार वाजता त्यांनी संपादकांची बैठक बोलावली. त्यात इंडियन एक्स्प्रेसच्या वतीनं मुळगावकर होते, हिंदुस्थान टाइम्सचे जॉर्ज वर्गीस, टाईम्स ऑफ इंडियाकडून गिरीलाल जैन. स्टेटमनकडून सुहेल निहालसिंह, पेट्रीएटकडून विश्वनाथ होते. त्यांना बजावण्यात आलं की, सरकारच्या विरोधात काही लिहायचं नाही. सेन्सरशीप लावण्यात आलीय. बैठकीत जॉर्ज वर्गीस यांनी वीजपुरवठा खंडीत केल्यानं वृत्तपत्र निघाली नाहीत अशी तक्रार करताच मंत्री महोदय उद्गारले की, 'आम्ही सेन्सॉरशिप कशी असावी याबाबत विचारविनिमय करीत होतो!' त्यावेळी एका संपादकांनी मंत्र्याना सांगितलं, 'हमे ऐसी तानाशाही मंजूर नहीं!' त्यावर 'हम आपको देख लेंगे, कैसे पेपर चलाते हो।' अशी धमकी दिली गेली. ही एक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई होती, वेगळ्याप्रकारचा संघर्षही होता. काही संपादकांना मीसा लावला गेला. एक वेगळं वातावरण देशात होतं. त्यावेळी काँग्रेसचे एक नेते कामराज यांनी तामिळ वृत्तपत्र 'दीनामणी'चे संपादक शिवरमण यांना बोलावून विचारलं की, काय तामिळनाडूतली जनता आणीबाणीच्या विरोधात लढायला तयार आहे? सशस्त्र क्रांती करेल का? असं घडलं तर देशातून याला प्रतिसाद मिळेल का? या संघर्षात उद्योगपती आणि कार्पोरेटची काय भूमिका राहील? संघर्षासाठी पुढे येतील? आणि आणीबाणीच्या विरोधात देशात उद्रेक होईल का? अशी चौकशी केली. यावरून देशातली परिस्थिती कशी होती हे लक्षांत येईल.
*वास्तव रिपोर्टिंग होतच नाही*
नेहरूंपासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंतच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांचं विशिष्ट अशी कामगिरी सांगता येईल. तत्कालीन प्रधानमंत्र्यांच्या कामकाजाचं मूल्यमापन करणारे संपादक तेव्हा होते. पत्रकार होते. त्या मूल्यमापनात भारत-चीन संबंध, सार्क, युनोच्या भूमिका, अमेरिका आणि चीन यांच्यात ताळमेळ कसा बसवता येईल, रशियाला सोबत का घ्यावं लागतंय, यासारख्या प्रश्नांचा, घटनांचा उहापोह केला जात होता. मुळगावकर, राजेंद्र माथूर, प्रभांश जोशी, एस.पी.सिंग यांचं नाव उगाचच घेतलं जात नाही. राजनैतिक घडामोडींचा अभ्यास असलेली, त्याचं देशाच्या दृष्टीनं मूल्यमापन करणारी ही आणि अशासारखी अनेक मंडळी होती. राजकारणाचा स्तर जसा खालावला गेलाय तसाच तो पत्रकारितेचा झालाय का? असं वाटण्याची स्थिती निर्माण झालीय. सर्व प्रधानमंत्र्यांहून अधिक जगभराचा प्रवास करणाऱ्या आजच्या प्रधानमंत्र्यांना आपल्या अडचणीच्या काळात सोबत आणण्यात अपयश आलेलं आहे. वेळोवेळी जाहीर केलेल्या १६४ योजना प्रत्यक्षात आल्याच नाहीत. ज्याचं जे लक्ष्य, कालावधी सांगितला गेला होता तो गाठता येत नाहीये. याबाबत मीडिया गप्पगार आहे. तो का घाबरतोय? त्याचा काय परिणाम होईल? तीन गोष्टी होतील, उद्योजकांकडून मीडियाला दिल्या जाणाऱ्या जाहिराती रोखल्या जातील, त्यासाठी त्यांच्यावर सरकार दबाव आणतील. दुसरं, चॅनेल ब्लॅकआऊट केलं जाईल, प्रक्षेपित करण्यावर बंधनं आणली जातील. पण याबाबी ते कुठवर करतील? यापूर्वी मीडियानं हे अनुभवलं नाहीये का? इंदिरा गांधींनंतर सत्तेवर कार्पोरेट क्षेत्राचं वर्चस्व वाढत गेलं. आता तर एकीकडं या कार्पोरेट क्षेत्रातल्या सत्तेच्या जवळ असलेल्यांचं जागतिक स्तरावरचं मानांकन दिवसेंदिवस वाढत चाललंय, तर दुसरीकडं इतर कार्पोरेट उद्योग बंद होताहेत. रोजगार जातोय. उत्पन्न घटतंय पण मीडियाला त्याची जाणीवच राहिलेली नाही. देशातली ही भयाण अवस्था मांडलीच जात नाही. राज्यकर्त्यांचा उदो उदो करण्यातच धन्यता मानली जातेय. एका अभिनेत्याच्या मृत्यूवरून ५०-६० दिवस धिंगाणा घातला गेला तो कमी होता म्हणून की काय अभिनेत्रीच्या उद्धट-उर्मट व्यक्तव्यावर कोण तमाशा मांडला गेला. या मीडियाला लागतं काय? टीआरपीसाठी ते जनतेला दूर लोटताहेत. एखादा जरी राष्ट्रीय मीडिया उभा राहिला तर त्याच्या मागे लोक उभं राहतील, मग सरकारला लोकांचं ऐकावंच लागेल. मीडियाला गेल्या सहा वर्षात ज्या सरकारी जाहिराती मिळल्यात त्याची काही बिलं अद्याप मिळालेली नाहीत. त्यासाठी तगादा लावला जातोय. मग याविरोधात मीडिया का उभा राहात नाही. मीडिया सरकार, राज्यकर्त्यांसाठी आहे की, लोकांसाठी? मग का घाबरताहात? सगळ्या योजना आकुंचन पावताहेत. एक एक सरकारी उद्योग विक्रीला काढला जातोय. आजवर देशाची आर्थिकस्थिती सांभाळणारी एलआयसी, रेल्वे विकताहेत. कर्मचाऱ्यांना पगार द्यायला पैसे नाहीत अशा स्थितीचं वास्तव रिपोर्टिंग का होत नाही? आयकर, जीएसटी गोळा केला जातोय पण त्याचा परतावा राज्यांना दिला जात नाही, त्यामुळं राज्ये महापालिका, नगरपालिकांना देऊ शकत नाही. पर्यायानं सगळ्यांचीच गोची केली जातेय पण मीडिया रममाण आहे आभासी दुनियेत! मीडियालाच जनतेचं काही घेणंदेणं नसेल तर राज्यकर्त्यांना कसं असेल? देशात टेक्नॉलॉजी, राजकारणाचा, पत्रकारितेचा प्रसार वाढलाय अन त्यातच सारं काही गुरफटून गेलंय. आज ही सत्ता आहे हे प्रधानमंत्री आहेत उद्या दुसरे येतील-जातील पण मीडिया तिथंच राहणार आहे आणि मीडियाचं अस्तित्व दाखवून द्यावं लागेल. त्यासाठी लढावं लागेल!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Saturday 12 September 2020

मुंबईका किंग कौन...?


"मुंबई....सोन्याचं अंड देणारी कोंबडी! संपूर्ण देशात आपली सत्ता असली तरी आर्थिक राजधानी मुंबई आपल्या हातात नाही याचं शल्य केंद्र सरकारला नेहमीच सलत आलंय. देशाची आर्थिक स्थिती नाजूक असताना अवैध धंद्यांनी अक्राळविक्राळ पाय पसरलेत. उद्योगधंदे भुईसपाट होताहेत मात्र बॉलीवूड, आयपीएल, मादक ड्रगव्यवसाय आणि राजकारण्यांच्या आर्थिक स्थितीत भरभराट होतेय. यामागचं गौडबंगाल काय आहे? या साऱ्यांच्या नाकदूऱ्या काढण्यासाठी, सत्ताधारी शिवसेनेच्या मुसक्या आवळण्यासाठी केंद्र सरकारच्या पोलीस, सीबीआय, ईडी, एनसीबी, एनआयए, कस्टम, एक्साईज एवढंच नाही तर इकॉनॉमिक्स ओफेन्स ब्युरो अशा तमाम तपास यंत्रणा इथं मुंबईत तळ ठोकून बसल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या निमित्तानं न्याय शोधला जातोय, असं आपल्याला वाटत असेल तर सारं विसरून जा...! इथं संघर्ष पेटलाय तो मुंबईवरच्या वर्चस्वाचा! त्यासाठी तमाम तपास यंत्रणांना कामाला लावलंय आणि अर्णब, कंगनासारख्या काही प्यादांना पुढं करून व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न होतोय....! अभी देखते रहो आगे आगे होता हैं क्या....!"

---------------------------------------------------------------

*स* ध्या राज्यातल्या संघर्षाला 'मुंबईवर वर्चस्व कुणाचं?' 'कुणाचा कब्जा राहणार?' याची किनार आहे. राजकारणी, बॉलिवूड, आयपीएल आणि ड्रगच्या अवैध धंद्याच्या चौकडीकडून होणाऱ्या कमाईशी सारं निगडित आहे, त्यावर कुणाचा कब्जा राहणार याची ही लढाई आहे. यासाठी सुशांतच्या मृत्यूचं कारण शोधलं गेलंय. कुणी हत्या म्हणताहेत तर कुणी आत्महत्या! कुणाला दोषी धरलं जातंय तर कुणाला निर्दोष! पण राजकीय पटलावर मात्र काही वेगळंच दिसतंय. जे काही दिसतंय वा दाखवलं जातंय ते सारे या खेळातले प्यादे आहेत. गेल्या चार-पांच वर्षात देशाची आर्थिकस्थिती डबघाईला आलीय. औद्योगिक क्षेत्र उभं राहू शकलेलं नाही. बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय. कार्पोरेट जगत हळूहळू ढासळू लागलंय. गुंतवणूक ठप्प झालीय. एकीकडं ही उतरण सुरू असताना मात्र बॉलिवूड, आयपीएल, ड्रगबाजाराची भरभराट होतेय. इतकंच नाही तर राजकारणीही गब्बर होताहेत. यातून हा संघर्ष उभा ठाकलाय. ह्या साऱ्या बाबी मुंबईत केंद्रित झालेल्या आहेत, तेव्हा या मुंबईवर कुणाचा कब्जा असावा, मुंबईचा किंग कोण? याचा हा झगडा आहे. हे सारं समजून घेण्यासाठी आपण सत्तांतराचं वर्ष म्हणजे २०१४ पासूनचा विचार करू या. कारण भारतीय राजकारणाला इथं वेगळं वळण लागलं. या सत्तांतरानंतरच मुंबई, महाराष्ट्र, शिवसेना, शरद पवार, त्यांचं प्रांतीय राजकारण, त्यांचं केंद्रीय सत्ताधाऱ्यांना असलेलं आव्हान, गुजराती-मराठी वाद, उद्योग जगतावर असलेलं गुजरातींचं वर्चस्व, याच्या माध्यमातून या सुप्त संघर्षाला सुरुवात झालीय. इथं लक्षांत घ्यायला हवं की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरात राज्याच्या राजकारणातून थेट देशात सत्तेवर आलेत. आता सत्तेची सारी सूत्रं त्यांच्या हाती आहेत. त्यामुळं हा संघर्ष गुजराती व्यापारी, उद्योगपती यांना सोबत घेऊन महाराष्ट्रातल्या सत्तेला आव्हान देण्यासाठी उभा ठाकलाय! केवळ सत्तेसाठी नाही तर वर उल्लेखलेल्या मुंबईतल्या बॉलिवूड, आयपीएल आणि ड्रग उद्योगावर जम बसविण्यासाठी, त्याचबरोबर गुरगुरणाऱ्या शिवसेनेला संपविण्यासाठी हे सगळं केंद्रीय सत्तेनं आरंभलंय! सुशांतच्या मृत्यूचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून सीबीआयकडं सोपवला गेला. तो तपास ड्रगपासून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडं हा वळलाय, मध्येच ईडीनं उडी घेतलीय. नॅशनल इन्व्हेस्टगेटिंग एजन्सी, इकॉनॉमिक्स ऑफेन्स ब्युरोही आता यात जोडला गेलाय. हे सारं घडताना यामागचा सूत्रधार कोण आहे हे आपल्याला दिसणार नाही अशी खबरदारी मात्र घेतली गेलीय. यात दिसतील ते अगदी छोटेसे प्यादे अर्णब, कंगणासारखे ज्याच्या भोवतीच बातम्यांचं जग फिरत राहील. हे सारं आपण अनुभवत असालच!

*बॉलीवूड आणि आयपीएलची मुसंडी*
बॉलिवूड २०१४ मध्ये भारतीय फिल्म उद्योगाची एकूण संपत्ती होती १३ हजार ८०० कोटी रुपयांची. ती २०१९ मध्ये १९ हजार ९०० कोटी इतकी झालीय. एवढा मोठा नफा सामान्यतः कोणत्याही धंद्यात होत नाही मात्र तो बॉलिवूडमध्ये झालाय! आयपीएल जी क्रिकेटस्पर्धा भरवते त्याची एकूण संपत्ती, ब्रँड व्हॅल्यू २०१४ मध्ये २३ हजार ४३८ होती. ती २०१९ मध्ये ४९ हजार ८६० कोटी इतकी झालीय. ड्रगचा बाजार जो नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अंतर्गत येतो. त्याची उलाढाल २०१४ मध्ये ३५ हजार कोटी रुपयांची असल्याचं सांगितलं गेलं होतं. हा अधिकृत आकडा असला तरी त्याच्या कितीतरी अधिक पटीत उलाढाल होतेय. २०१९ मध्ये हीच उलाढाल ९० हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं गेलंय. राजकारण्यांच्या संपत्तीतही अशीच वाढ झालीय. राज्याच्या २८८ आमदारांची एकूण संपत्ती २०१४ मध्ये ३ हजार ११० कोटी रुपये होती. २०१९ मध्ये ती तब्बल ६ हजार ६५६ कोटी रुपये इतकी झालीय. म्हणजे २०१४ त आमदारांची सरासरी संपत्ती प्रत्येकी १० कोटी ८७ लाख इतकी होती. २०१९ मध्ये ती २२ कोटी ४२ लाख इतकी झालीय. उत्पन्नाचा वाढता वेग हा केवळ या चार धंद्यातच राहिलाय. राजकारणासाठी पैसा लागतो हे काही नवं नाही. फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या उद्योगासाठीचे करार झाले ते प्रत्यक्षात आलेच नाहीत. त्यामुळं नोकऱ्या उपलब्ध झाल्या नाहीत तर अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. या साऱ्या स्थितीचा मागोवा घेत याकडं पाहायला हवं. या सगळ्या घडामोडीत प्रसिद्धीमाध्यमांचं एका व्यक्तीकडं मात्र दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतं त्या व्यक्तीचं नांव आहे बंटी सचदेव! ते 'कॉर्नर स्पोर्ट अँड इन्टरटेन्मेंट' ही कंपनी चालवतात. २००८ मध्ये त्यांनी आपली ही कंपनी स्थापन केली, त्यापूर्वी ते 'वर्ल्डवाईड इन्टरटेन्मेंट कंपनी'त काम करीत होते. ही अभिनेते सोहेल खान यांची कंपनी होती. त्यानंतर ते युवराजसिंह यांच्याकडे गेले. ते तिथं काम करीत. एकाअर्थी बॉलिवूड आणि आयपीएल या दोन्हींशी ते संबंधित आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट, ब्रँड व्हॅल्यू वाढविण्यासाठी त्यांची कंपनी काम करते. भारताचा क्रिकेट कप्तान विराट कोहली याचा ब्रँड व्हॅल्यू वाढविण्याचं काम बंटी २००९ पासून करतात. याशिवाय पांच मोठे खेळाडूंसाठी देखील हे काम करतात. त्यात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, मुरली विजय, उमेश यादव, हे आहेत. बंटीच्या दोन चुलत बहिणींपैकी एकीचा विवाह सोहेल खान याच्याशी तर दुसरीचा रोहित शर्मा याच्याशी झालाय. त्यामुळं त्यांची दोन्ही क्षेत्रावर पकड होती. बंटीना ईडीनं का बोलावलं? सीबीआयनं आणि एनसीबीनं त्यांच्याकडं काय चौकशी केलीय? हे रियाच्या गदारोळात झाकोळलं गेलंय. पण हळूहळू एकेक करत फिल्म आणि क्रीडा जगतातले अनेक दिगग्ज या चौकशीच्या फेऱ्यात अडकतील. इथं एक अजब घटना घडतेय की, १०० कोटींचा व्यवसाय करणारे चित्रपट अचानकपणे ६०० कोटीचा व्यवसाय करताना दिसताहेत. थिएटर्स तेवढीच आहेत, मल्टिफ्लेक्स तेवढेच आहेत. प्रेक्षक तेवढेच आहेत. महागाई वाढलीय. थिएटरमध्ये जाऊन सिनेमा पाहणारा प्रेक्षक त्यामुळं कमी झालाय. कुणी 'बुक माय तिकीट' वरून तिकिटं बुक करतो कुणी थिएटरवर जाऊन खरेदी करतो. या साऱ्याचं निरीक्षण करण्यासाठी भारत सरकारच्यावतीनं खास कंपनी स्थापन केलीय. ती पाहणी करत असते. त्यातून असं आढळलंय की चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ही मंडळी कोट्यवधी रुपये खर्च करतात. तिकिटंही परस्पर खरेदी केली जाताहेत हा सारा एक वेगळाच खेळ त्यांनी मांडलेलाय. आपण बोलत होतो ते बंटी सचदेव यांच्याबद्धल. त्या पांच खेळाडूंशिवाय श्रेयस अय्यर, मन्नान व्होरा, मयांक डागर, विजय गोयल या नवोदित खेळाडूंसाठीही बंटी काम करताहेत. ह्या साऱ्या व्यावसायिक बाबीचं मूळ पैशाशी येऊन थांबतात. आयपीएल वा बॉलिवूड शिवाय इतर कोणतंही क्षेत्र नाही की, जिथं खात्रीशीर नफा मिळवून देईल. बॉलिवूडपूर्वी आपण आयपीएलकडं पाहू. इथं दिवसेंदिवस त्याची ब्रँड व्हॅल्यू कशी वाढलीय. २०१४ मध्ये त्याचं बाजार मूल्य ३.२ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत १३ हजार ८०० कोटी इतकं होतं. २०१५ मध्ये ती ३.५ बिलियन डॉलर झाली. त्यानंतर २०१९ मध्ये ६.८ बिलियन डॉलर त्यानंतर हळूहळू ती वाढ जाऊन आज ४९ हजार ८०७ कोटी इतकी त्याची ब्रँड व्हॅल्यू झालीय. यात सर्वाधिक व्हॅल्यू आहे मुंबई इंडियनची ८१० कोटी रुपये, त्यानंतर चेन्नई ७३२ कोटी यात सर्वात कमी व्हॅल्यू आहे राजस्थानची २७१ कोटी! हे सारे आकडे आहेत २०१९चे आता २०२० मध्ये आयपीएलचे सामने होताहेत त्याचे आकडे उपलब्ध नसले तरी मागची उलाढाल पाहता त्यात निश्चितच वाढ झालेली असेल. इथंही तपास यंत्रणांचं लक्ष आहे.

*मुंबई ड्रग व्यवसायाचं केंद्र बनलंय*
इथं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी जोडलं गेलं म्हणजे सुशांतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग, मादक द्रव्य आलेलं असेल. इथं लक्षांत घ्या, की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जो १९८६ मध्ये अस्तित्वात आलाय. त्याचे जे सध्याचे डीजी आहेत ते सिव्हिल एव्हिएशन अँड सेक्युरिटी ब्युरोचेही प्रमुख आहेत. हे आहेत राजेश अस्थाना! ही ती व्यक्ती आहे जी सीबीआयचे स्पेशल डायरेक्टर होती. सीबीआयचे डायरेक्टर आलोक वर्मा यांनी या अस्थाना यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यानंतर अजित डोवलांना तिथं बोलावलं गेलं. त्यांनी या दोघांत समेट घडवून आणला. त्यानंतर अस्थाना यांना सिव्हिल एव्हीएशन अँड सेक्युरिटी ब्युरोचं प्रमुखपद दिलं. जोडीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोही त्यांच्याकडं सोपवला गेला. हे सारे विभाग गृहखात्याच्या अखत्यारीत म्हणजेच अमित शहांच्या नियंत्रणात येतात. ह्या सगळ्या विभागांची मुख्य कार्यालये दिल्लीत आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हा कस्टम, सेंट्रल एक्साईज, सीबीआय, पोलिस, सेंट्रल इकॉनॉमिक्स अँड इंटेलिजन्स ब्युरोलाही हे सोबत घेऊन काम करतो. सुशांतच्या प्रकरणात ड्रगच्या निमित्तानं ह्या साऱ्या तपास यंत्रणा सध्या मुंबईत येऊन तळ ठोकून आहेत. या ड्रग व्यवहारात कोट्यवधीची उलाढाल आहे, हे लक्षांत येतं. १० ऑगस्टला एक हजार कोटीची हिरॉईन मुंबईजवळच्या न्हावाशिवा बंदरात जप्त केली होती. इथं नेहमीच ड्रग मोठ्याप्रमाणात जप्त होतात. 'मुंबई हे ब्रुसेल्स आणि बेल्जियम इथल्या अवैध ड्रग उद्योगाचं मध्यवर्ती केंद्र आहे!' अशी माहिती युनोच्या 'इंटरनॅशनल नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डा'नं जो आंतरराष्ट्रीय अहवाल दिलाय त्यात हे नमूद केलंय. त्यानुसार मुंबई ड्रग उद्योगाचं जागतिक केंद्र बनलंय, मुंबईत अवैध ड्रगचा मोठा कारभार आहे. एनसीबीकडून वेळोवेळी जप्त होणारा माल हा केवळ १ टक्का इतकाच दाखवला जातो, प्रत्यक्षात त्याच्या शंभर पटीनं ड्रग इथल्या बाजारात येतो. या अवैध धंद्यातला पैसा जातोय कुठं? आज गुंतवणूक येत नाही आणि बाहेर गुंतवणूक होत नाहीये. अशी स्थिती असल्यानं हा ड्रगचा पैसा इथंच घुटमळतोय. इथला बॉलिवूड, आयपीएल, ड्रग उद्योग जिवंत आहे. तो मात्र खचलेला नाही. त्यांच्या मुसक्या आवळायच्या आहेत. या तिघांची एकत्रित आर्थिक उलाढाल, परस्पर संबंध पाहिलं तर खरं काय ते लक्षांत येईल. बॉलिवूडवर ईडीनं लक्ष केंद्रित केलंय. चित्रपटांचा व्यवसाय अचानक शेकडो कोटींमध्ये कसा काय वाढलाय याचा तपास केला जातोय. देशात सिंगल स्क्रीन थिएटर्स ६ हजार ७८० आहेत. मल्टिफ्लेक्स २ हजार १०० आहेत. या सगळ्या स्क्रीनवर जर एकच चित्रपट प्रदर्शित झाला अन दोन आठवडे तो चालला तर त्याचं उत्पन्न ६०० कोटी होईल. पण असं कधीच होतं नाही. कारण देशभरात विविध प्रादेशिक भाषेतले चित्रपट प्रदर्शित होतात. त्यात एखादं दुसरा बॉलीवूडचा असतो. बॉलीवूड चित्रपट प्रदर्शित झाल्यावर तो फारसा चालतही नाही तरी देखील तो तीनशे कोटींचा व्यवसाय कसा काय करतो हे चक्रावून टाकणारं आहे. चित्रपट निर्मितीसाठी जो काही पैसा प्रत्येक स्तरावर खर्च केला जातो त्यात हवालाचा वापर होतोय असं दिसून आलंय. या निर्मितीत असलेल्या कलाकारांपासून तंत्रज्ञापर्यंत जी काही रक्कम दिली जाते त्यापेक्षा अधिक रक्कम संबंधितांकडं आढळून येते. हे कुठून अन कसे येतात हे तपासलं जातंय. बॉलिवूड अशा बेहिशेबी पैशावर बसलेलं आहे काय? बॉलिवूडला संपवायचं नाहीये तर त्यावर त्यांना अंमल बसवायचा आहे. असं समजलं जातं की अशा घडामोडींवर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व असतं. आज शिवसेना सत्तेवर आहे. या बॉलीवूडची शिवसेनेला मदत होतेय असं केंद्रातल्या सत्तेला वाटतंय. हे त्यांनी या पूर्वी बोलूनही दाखवलंय. पूर्वी शिवसेना सत्तेत नसतानाही त्यांचं बॉलिवूडवर वर्चस्व होतं, आतातर सत्तेत आहेत. हे केंद्रातल्या नेतृत्वाला सहन होणारं नाहीये. हा एक संघर्ष बॉलिवूडच्या व्यवसायाच्या माध्यमातून सुरू झालाय. त्याला निमित्त झालंय सुशांतचा मृत्यू आणि त्या माध्यमातून कंगनाची अरेरावी! बॉलिवूड व्यवसायात पूर्वी हिऱ्यांचे व्यापारी, बिल्डर्स गुंतवणूक करत त्यांचाही व्यवसाय एव्हाना गटांगळ्या खाऊ लागल्यानं यात ड्रग व्यावसायिकांची एन्ट्री झालीय. आता चित्रपट निर्मात्यांना आयकराच्या नोटिसा बजावल्या जाऊ लागल्यात. ड्रग व्यापाऱ्यांबरोबरच गँगवार मधील गुंड आणि काही राजकारणी यात गुंतले आहेत. यांना लक्ष्य केलं जातंय. त्यांना जखडण्याची मोहीम उघडली गेलीय. लौकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जातील.

*समझौते झाले पण उद्योग आलेच नाहीत*
महाराष्ट्रातल्या या सगळ्या व्यवसायांवर राजकारण्यांचा वरदहस्त आहे त्यामुळं केंद्र सरकारनं आपल्या सगळ्या तपास यंत्रणांच्या साथीनं बॉलिवूड, आयपीएल, ड्रग व्यावसायिक याबरोबरच राजकारण्यांना घेरण्याचा डाव टाकलाय. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विचार करता इथं सहकारी चळवळीतून आलेली, ग्रामीण भागातली मंडळी आहेत. त्यांचं शिक्षण त्यामानानं मर्यादितच असतं. तरी देखील त्यांचा दबदबा असतो. त्यांची आर्थिक स्थितीही चांगली असते. पण आताशी ही स्थिती बदललेली आहे. प्राप्त स्थितीत सारेच आमदार करोडपती आहेत. २८८ आमदारांपैकी पैकी १७६ जणांवर गुन्हे आहेत. हे त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जात नोंदवलेलं आहे यापैकी ११३ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. राजकारणातून पैसा आणि पैशातून राजकारण होत असल्यानं राजकारणी पैशाच्या मागे धावताहेत. त्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखळताना दिसतात. सत्तेत नसताना मुंबईच्या पोलिसांबाबत कुणाचंच मत चांगलं नसतं. भाजपला सत्तेत असताना मुंबई पोलीस चांगले असतात. सत्तेतून पायउतार होताच त्यांनी त्यांना बोल लावायला सुरुवात केलीय. शिवसेनेचंही तसंच आहे. आता सत्तेत असल्यानं त्यांची बाजू घेताहेत अन्यथा त्यांनीही टीकाच केलीय. हे सारे सत्तेचे खेळ आहेत. हेच गुन्हेगारांना सांभाळतात, भांडवलदारांना सांभाळतात आणि त्यासाठी सोयीचं राजकारण करतात. फडणवीस सरकार असताना त्यांनी 'मेक इन इंडिया'त ८ लाख कोटी रुपयांचे औद्योगिक समझौते केले. त्यातून ३० लाख नोकऱ्या उपलब्ध होतील असं सांगण्यात आलं. पण प्रत्यक्षात कोणतेच उद्योग इथं आले नाहीत. पुन्हा २०१८ मध्ये 'महाराष्ट्र मॅग्नेटिक कन्व्हर्जन' या नावाखाली १२ लाख कोटींचे समझौते झाले. प्रत्यक्षात मात्र 'मेक इन इंडिया'त केवळ काही हजार कोटींचे तर 'महाराष्ट्र मॅग्नेटिक कन्व्हर्जन'मध्ये १ लाख १२ हजार कोटींचीच गुंतवणूक झालीय. पहिल्या टप्प्यात २५६ समझौते रद्द झाले. तर ३८६ समझौते दुसऱ्या टप्प्यात रद्द झाले. उद्योग येण्याचं थांबलंय. आर्थिक गुंतवणूक रोखली गेलीय. असो. सुशांतच्या निमित्तानं मुंबईत पोलीस, सीबीआय पाठोपाठ ईडी, एनसीबी यांचा तपास सुरू आहेच आता गृहखात्यातील नॅशनल इन्व्हेस्टगेटिंग ब्युरो, इकॉनॉमिक्स ओफेन्स ब्युरो यात उतरणार आहे. या देशातल्या साऱ्याच्या साऱ्या तपास यंत्रणा इथल्या सत्तेला, व्यवस्थेला घेरण्यासाठी सज्ज झाल्यात ते मुंबईवर वर्चस्व गाजविणाऱ्यांची कोंडी करण्यासाठी! मुंबईतल्या या साम्राज्यावर आज राज्यातल्या सत्ताधारी शिवसेनेचं वर्चस्व आहे, पकड आहे. इथल्या अवैध व्यवसायाची आर्थिक उलाढाल ५० लाख कोटींहून अधिक आहे. यावर आपलं वर्चस्व असावं असं केंद्राला वाटणं साहाजिक आहे. इथं सुशांतच्या मृत्यूच्या निमित्तानं न्याय शोधला जातोय, खून की आत्महत्या शोधलं जातंय, आरोपी शोधला जातोय, दोषी शोधला जातोय असं आपल्याला वाटत असेल तर सारं विसरून जा...! इथं संघर्ष पेटलाय तो मुंबईवरच्या वर्चस्वाचा! त्यासाठी साऱ्या तपास यंत्रणांना कामाला लावलंय आणि काही प्यादांना पुढं करून व्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्नही होतोय....! दुसरं असं की, सोनियाजींनी बोलावलेल्या विरोधी पक्षातल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले होते, "हमे तय करना होगा की, लढना हैं या डरना हैं।" त्यामुळं अभी देखते रहो आगे आगे होता हैं क्या....!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Friday 4 September 2020

दुभत्या गायी कत्तलखान्याकडे...!


"कोरोनाच्या अक्राळविक्राळ तांडवानं जगाचं कंबरडं मोडलंय. जगाबरोबरच भारताचं अर्थचक्र अडखडलंय, रुतलंय, थांबलंय. देशाचा जीडीपी -२३ एवढा खालावलाय. आधीच मंदीमुळं धायकुतीला आलेले उद्योगधंदे बंद पडताहेत. नोकऱ्या संपुष्टात येताहेत. बेकारी वाढतेय. यावर सकारात्मक उपाययोजना करण्याऐवजी सरकारी संपत्ती असलेल्या कंपन्याच विक्रीला काढल्या जाताहेत. एकीकडं धनदांडग्याचं वर्चस्व वाढतंय. दुसरीकडं कामगार देशोधडीला लागतोय. एकापाठोपाठ एक सरकारी कंपन्या खासगी उद्योगपतींच्या ताब्यात जाताहेत. एलआयसीत निर्गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर झालाय यापूर्वीच एअर इंडिया, भारत पेट्रोलियम विक्रीला काढण्याचा निर्णय झालाय. बीएसएनएलही त्याच मार्गावर आहे. विमानतळ विकली जाताहेत. संसदेत अर्थ राज्यमंत्र्यानी एका लेखी उत्तरात २८ कंपन्यात निर्गुंतवणूक करायला सरकारनं मान्यता दिल्याचं सांगितलंय. असंच घडत राहिलं, त्यावर उपाययोजना झाली नाही तर अराजकतेचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही! अशी भीती व्यक्त केली जातेय.
 -------------------------------------------------------------

*स्वा* तंत्र्य मिळाल्यानंतर पायाभूत क्षेत्र आणि अवजड उद्योगासाठी प्रगती साधण्यासाठी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरूंच्या सरकारनं मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली आणि या क्षेत्रासाठी सरकारी कंपन्या स्थापन झाल्या. एकेकाळी या सरकारी कंपन्यांची संख्या ३८० पर्यंत पोहोचली होती. या प्रयोगाचा परिणाम म्हणून भारताची अर्थव्यवस्था १९९० च्या दशकापर्यंत कधीही ३ टक्क्यांपेक्षा अधिक दरानं वाढली नाही. १९९१मध्ये अर्थमंत्री असलेल्या डॉ. मनमोहनसिंग यांनी खुल्या बाजार व्यवस्थेचा पुरस्कार केला. त्यामुळं सरकारी कंपन्या खासगी कंपन्यांच्या स्पर्धेत मागे पडू लागल्या. त्यांना स्पर्धाक्षम बनवण्याचे अनेक प्रयत्न फसल्यानंतर, या कंपन्या खासगी कंपन्यांना विकण्याचं म्हणजे निर्गुंतवणूक धोरण आलं. गेल्या पाच वर्षांत मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर निर्गुंतवणुकीतून मिळणारा निधी अर्थसंकल्पीय तूट भरून काढण्यासाठी वापरला जाऊ लागल्याचं दिसून येत आहे. सध्याच्या केंद्र सरकारजवळ कोणतेच निश्चित आर्थिक धोरण नसल्यानं, निर्गुंतवणुकीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी एका सरकारी कंपनीकडून दुसऱ्या सरकारी कंपनीचे अधिग्रहण करण्याचे प्रकारही सुरू झाले. मुळात कंपनीची मालकी सरकारकडंच शिल्लक राहत असल्यानं याला निर्गुंतवणूक म्हणावं की नाही, असा प्रश्न या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करीत आहेत. याचं उत्कृष्ट उदाहरण ऑईल अ‍ॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशननं (ओएनजीसी), हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन (एचपीसीएल) आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन (जीएसपीसी) या दोन कंपन्यांचं अधिग्रहण केलं आहे. ओएनजीसीनं एचपीसीएल तब्बल ३६,९१५ कोटीत खरेदी केली, तर जीएसपीसीसाठी चक्क १९,००० कोटी मोजले. याचा परिणाम म्हणून ओएनजीसीचा राखीव निधी ९,५०० कोटींवरून फक्त १६७ कोटी झाला, तर कर्ज १,३०० कोटींवरून २५,५९२ कोटींपर्यंत वाढलं. बाजारमूल्य ३.५० लाख कोटींवरून २.२० लाख कोटींपर्यंत घसरलं. २०१८-१९ या एका वर्षात हे घडलं आहे. १५ कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीतून मिळाले ७७,४१७ कोटी. २०१८ ते २०२० या दोन आर्थिक वर्षात सरकारला एकूण ४० सरकारी कंपन्यांची निर्गुंतवणूक करायची होती. यापैकी सन २०१८-१९मध्ये १५ कंपन्यांची निर्गुंतवणूक करण्यात आली आहे. यातून सरकारला ८४ हजार ९७२ कोटी रुपये येणे अपेक्षित होतं. पण ७७ हजार ४१७ कोटी रुपये मिळाले. निर्गुंतवणूक करण्यात आलेल्या १५ सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये प्रोजेक्ट अ‍ॅण्ड एएमपी डेव्हलपमेंट इंडिया लि., हिंदुस्थान प्रीफॅब लि., इंजिनीअरिंंग प्रोजेक्टस् (इं.) लि., ब्रीज अ‍ॅण्ड रुफ कंपनी इंडिया लि., पवनहंस लि., हिंदुस्थान न्यूजप्रिंट लि. (साहाय्यक कंपनी), स्कूटर्स इंडिया लि., भारत अर्थ मूव्हर्स लि., भारत पंप अ‍ॅण्ड एएमपी कॉम्प्रेसर्स लि., हिंदुस्थान फ्लुसो कार्बन लि. (साहाय्यक कंपनी), सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि., फेरो स्क्रॅप निगम लि. (साहाय्यक कंपनी), सिमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडिया लि., नग्मार स्टील प्लॅण्ट (एनएमडीसी), अलॉय स्टील प्लॅण्ट आदींचा समावेश आहे. या कंपन्यांचे निर्गुंतवणुकीकरण झाल्यानं सरकारची मालकी संपली आहे. *सरकारच्या निर्णयाला सरकारचा अडथळा* भारताच्या वीमा क्षेत्रात ६० वर्षं जुन्या एलआयसीचा आजवरचा प्रवास शानदार होता. भारतातल्या इन्शुरन्स मार्केटवर एलआयसीचा ७० टक्क्यातून अधिक ताबा आहे. दरवेळी सरकार अडचणीत असताना एलआयसीनं एखाद्या विश्वासू मित्राप्रमाणे सरकारला साथ दिलीय. यासाठी अनेकदा एलआयसीनं नुकसानही सोसलंय. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना निर्गुंतवणुकीचं २.१ लाख कोटींचं उद्दिष्टं ठेवलेलं आहे. हे आजवरचं सगळ्यांत मोठं उद्दिष्टं आहे असंच म्हणावं लागेल. एलआयसी आणि आयडीबीआय बँकेच्या माध्यमातून ९० हजार कोटी रुपये उभे करण्याचा सरकारचा मानस आहे. तर सरकारच्या अधिपत्याखालील भारत पेट्रोलियम आणि एअर इंडिया यांच्या विक्रीची घोषणा यापूर्वीच मोदी सरकारनं केलीय. भारतातल्या आयुर्विमा विषयक बाबींच्या व्यवहारांचं राष्ट्रीयीकरण करत सरकारकडून पूर्वी एलआयसी अॅक्ट आणण्यात आला. पण एक दिवस या कंपनीच्या विक्रीचा प्रस्ताव मांडताना याचाच अडथळा सरकारला निर्माण होईल असं त्यावेळी कोणालाही वाटलं नसावं. २०१५ मध्ये ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड- ओएनजीसीच्या समभागविक्री-आयपीओदरम्यान भारतीय आयुर्विमा महामंडळानं १.४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली होती. बुडित कर्जांमुळं अडचणीत आलेल्या आयडीबीआय बँकेला सावरण्यासाठीही चार वर्षांनी एलआयसीनंच त्यावेळी हात दिला होता. हे इथं लक्षांत घ्यायला हवं!

 *एलआयसीचा एनपीए दुपटीने वाढलंय* 
पण आता ही परिस्थिती बदललीय. एलआयसीमध्ये असलेला आपला १०० टक्के हिस्सा आता सरकारला कमी करायचाय. म्हणजे आतापर्यंत जी एलआयसी कंपनी इतर कंपन्या विकत घेत होती, तिचीच आता विक्री होणार आहे. पण सरकार नेमके किती टक्के शेअर्स समभागविक्री-आयपीओच्या माध्यमातून शेअर बाजारासाठी खुलं करणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही. जर सरकारनं एलआयसीचा ५० टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा स्वतःकडेच ठेवला तर भारतीय आयुर्विमा महामंडळाचं प्रशासन आणि मोठी भागीदारी सरकारकडंच राहील, अन्यथा खासगी व्यवस्थापनाच्या ताब्यात एलआयसी जाईल. एलआयसीमधला सरकारी हिस्सा विकण्याचा प्रस्ताव मांडताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं होतं, "स्टॉक मार्केटमध्ये एखाद्या कंपनीची नोंदणी झाल्यानं त्या कंपनीला एकप्रकारची शिस्त लागते आणि यामुळं कंपनी वित्तीय बाजारपेठांपर्यंत सहजरित्या पोहोचू शकते. सोबतच या कंपनीसमोरचे अनेक आर्थिक पर्याय खुले होतात. शिवाय लहान गुंतवणूकदारांनाही यामुळं होणाऱ्या कमाईमध्ये भागीदार होण्याची संधी मिळते." ३० नोव्हेंबर २०१९ पर्यंत वीमा बाजारपेठेत एलआयसीचा हिस्सा होता ७६.२८ टक्के. सन २०१९ च्या आर्थिक वर्षात ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रिमियमद्वारे एलआयसीला ३.३७ लाख कोटी रुपयांची कमाई झाली तर इतरत्र केलेल्या गुंतवणुकीच्या व्याजामुळे २.२ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं. २०१९ च्या आर्थिक वर्षात एलआयसीनं २८.३२ लाख कोटी रुपयांची इक्विटी शेअर बाजारात गुंतवणूक केली तर १.१७ लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं. २०२०-२१ साठीचं निर्गुंतवणूक उद्दिष्टं गाठण्यासाठी केंद्र सरकारला एलआयसीच्या समभागविक्री-आयपीओची मोठी मदत होईल असं म्हटलं जातं. चालू आर्थिक वर्षासाठीचं सरकारचं निर्गुंतवणुकीचं उद्दिष्टं होतं १.०५ लाख कोटी रुपयांचं. चालू अर्थिक वर्षासाठी हे उद्दिष्टं २.१ लाख कोटी रुपये करण्यात आलंय. एलआयसीच्या समभागविक्री-आयपीओद्वारे ७० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी मिळण्याची अपेक्षा असल्याचं वित्त सचिवांनी म्हटलं होतं. एलआयसीचा काही हिस्सा विकण्याच्या सरकारच्या निर्णयाचं उद्योग जगतानं स्वागत केलंय. असोसिएशन ऑफ नॅशनल एक्स्चेंज मेंबर्स ऑफ इंडिया - एएनएमआयचे अध्यक्ष म्हणतात, "एलआयसीमधल्या निर्गुंतवणुकीचा प्रस्ताव हे या बजेटच्या दृष्टीनं एक मोठं आकर्षण होतं. हे सौदी अरेबियाची सरकारी तेल कंपनी आरामकोच्या शेअर बाजारावर नोंदणी होण्यासारखं आहे. एलआयसीमधली निर्गुंतवणूक ही या दशकातली सर्वात मोठी, 'आयपीओ ऑफ द डिकेड' असेल.' एम्के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेसचे संचालक म्हणतात, "कंपनीचं कामकाज आणि पारदर्शकतेच्या दृष्टीनं पहायचं झालं तर एलआयसीचा समभागविक्री-आयपीओ हे एक सकारात्मक पाऊल आहे. यामुळे येणाऱ्या सरकारांना निधी उभे करण्याच्या जास्त संधी मिळतील." मेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजच्या सीईओच्या मते, "एलआयसीच्या समभागविक्री-आयपीओची गुंतवणूकदार मोठ्या उत्साहानं वाट पाहत आहेत. यामुळे प्रायमरी मार्केटमधून पैसे गोळा करण्याला प्रोत्साहन मिळेल. 'विश्वासाचं प्रतीक' मानली जाणारी सरकारी विमा कंपनी - भारतीय जीवन बीमा निगम - आयुर्विमा महामंडळची गेल्या पाच वर्षांतली आर्थिकदृष्ट्या आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाही. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजेच एनपीए दुप्पट वाढले आहेत. *निर्गुंतवणूकीबाबत उलटसुलट प्रतिक्रिया* कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार मार्च २०१९ पर्यंत एनपीएचा हा आकडा गुंतवणुकीच्या तुलनेत ६.१५ टक्के पर्यंत पोहोचेल. २०१४-१५ मध्ये हाच एनपीए ३.३० टक्क्यांवर होता. म्हणजे गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये एलआयसीच्या एनपीएमध्ये सुमारे १०० टक्के वाढ झालेली आहे. २०१८-१९ च्या एलआयसीच्या वार्षिक अहवालानुसार ३१ मार्च २०१९ पर्यंत कंपनीचा एकूण एनपीए २४, ७७७ कोटी रुपये होता. तर कंपनीवर एकूण ४ लाख कोटींपेक्षा जास्तचं कर्ज आहे. एलआयसीनं ज्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली होती, त्यांतल्या काहींची आर्थिक परिस्थिती ढासळली, तर काही दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आल्यानं एलआयसीवर ही परिस्थिती आलेली आहे. यामध्ये दिवाण हाऊसिंग, रिलायन्स कॅपिटल, इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, पिरामल कॅपिटल आणि येस बँक अशा प्रमुख उद्योगांचा समावेश आहे. एलआयसीच्या समभागविक्री-आयपीओ आणण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला एलआयसीच्या कर्मचारी संघटनांनी विरोध केलाय. ऑल इंडिया लाईफ इन्शुरन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे महासचिवांनी म्हटलंय की, "सार्वजनिक क्षेत्रातल्या इतर कंपन्यांना पैशांची गरज लागल्यानंतर एलआयसीनं नेहमीच त्यांना आधार दिलेला आहे. एलआयसीमधल्या आपल्या समभागांपैकी काही विकण्याच्या सरकारच्या निर्णयाचा आम्ही विरोध करतो. सरकारचं हे पाऊल लोकांच्या हिताचं नाही. कारण एलआयसीची प्रगती ही पॉलिसीधारक आणि एजंट्सच्या विश्वास आणि निष्ठेचा परिणाम आहे." १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या निर्मला सीतारामन यांचा अर्थसंकल्प २०२० असं त्यांनी अर्थसंकल्प मांडतांना म्हटलं होतं. "एलआयसीमधल्या सरकारी हिश्श्यात काही बदल करण्यात आलं तर पॉलिसीधारकांचा एलआयसी या संस्थेवरचा विश्वास कमी होईल. पण किती टक्के हिस्सा विकणार हे सरकारनं स्पष्ट केलेलं नाही वा कुणी प्रवक्त्यानंही म्हटलेलं नाही. गेल्या काही अनुभवांवरून असं वाटतं की एलआयसीतला मोठा हिस्सा सरकार विकेल. परिणामी एलआयसी आपला सार्वजनिक कंपनीचा दर्जा गमावून बसेल." 

 *एलआयसीवरचा विश्वास कमी होण्याची शक्यता* 
सरकारला जेव्हा कधी पैशांची गरज लागली तेव्हा एलआयसीचा आधार घेण्यात आला. गेल्या काही काळात याची अनेक उदाहरणं आढळतात. अडचणीत सापडलेल्या आयडीबीआय बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी एलआयसीचे पैसे वापरण्यात आले. एलआयसीकडे आधीपासूनच आयडीबीआय बँकेचे ७ ते ७.५ टक्के शेअर्स होते. आयडीबीआयचे ५१ टक्के समभाग घेण्यासाठी एलआयसीला सुमारे १० ते १३ हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली. सार्वजनिक क्षेत्रातल्या एखाद्या कंपनीचा समभागविक्री-आयपीओ येत असतानाही एलआयसीनं त्यात आजवर मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये ऑईल अँड नॅचरल गॅस कंपनी- ओएनजीसी सारख्या नवरत्न कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी सिक्युरिटीज आणि शेअरबाजारात एलआयसीनं दरवर्षी सरासरी ५५ ते ६५ हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. वित्तीय तूट कमी करण्यासाठी २००९ पासून सरकारनं सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली. तेव्हा त्यातला हिस्सा घेणाऱ्यांत एलआयसी आघाडीवर होती. २००९ ते २०१२ पर्यंत सरकारनं निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून ९०० अब्ज डॉलर्स कमावले. यातला एक तृतीयांश पैसा एलआयसीकडून आला. ओएनजीसीमधली निर्गुंतवणूक अपयशी होण्याच्या बेतात असतानाच ती एलआयसीच्या गुंतवणूकीमुळं यशस्वी झाली. एलआयसीचा समभागविक्री-आयपीओ बाजारात आणण्याआधी सरकारला एलआयसी अॅक्टमध्ये बदल करावा लागेल. देशातल्या विमा उद्योगावर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी लक्ष ठेवत असली तरी एलआयसीच्या कामकाजासाठी संसदेन वेगळा कायदा बनवलेला आहे. त्याला मान्यताही घेतलीय. एलआयसी अॅक्टच्या कलम ३७ नुसार एलआयसी विम्याची रक्कम आणि बोनसबाबत आपल्या पॉलिसीधारकांना जे आश्वासन देते, त्यामागे केंद्र सरकारची गॅरंटी असते. खासगी क्षेत्रातल्या वीमा कंपन्यांना ही सुविधा मिळत नाही. कदाचित म्हणूनच देशातला सामान्य माणूस वीमा घेताना एलआयसीचाच विचार जरूर करतो. हा बिश्वास एलआयसीनं संपादन केला होता, तो आताशी संपुष्टात येण्याची भीती निर्माण झालीय! 

 *अराजकतेचं वातावरण निर्माण होण्याची भीती* 
एलआयसीची समभागांची विक्री-आयपीओ शेअरबाजारात आणायचे असेल तर सरकारला 'एलआयसी कायदा' बदलावा लागेल. १९५६ मध्ये एलआयसीच्या व्यापार विषयक बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आणला गेला. खरं तर वीमा विषयक उद्योगावर देखरेख करण्यासाठी इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ओथोरिटी निर्माण करण्यात आली होती, ती अस्तित्वात असतानाही केवळ एलआयसीसाठीच संसदेनं वेगळा कायदा केलाय. या एलआयसी कायदा कलम३७ नुसार एलआयसी कंपनी वीमाची रक्कम आणि बोनस देण्याबाबत जो काही वायदा करते त्यामागे सरकारची गॅरंटी असते. खासगी क्षेत्रातल्या अशा कोणत्याही वीमा कंपनीला सरकार गॅरंटी देत नाही. यामुळंच लोक वीमा उतरवताना फक्त एलआयसीलाच सर्वप्रथम प्राधान्य देतात. हे इथं लक्षणीय ठरतं. एलआयसीचे भागभांडवल विक्रीला काढण्यापूर्वी सरकारनं एअर इंडिया, भारत पेट्रोलियम यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांची विक्री करण्याबाबत घोषणा करून ठेवलीय. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलची अवस्थाही दयनीय झालीय. तिचीही वाटचाल याच दिशेनं सुरू झालाय. वस्तुतः खासगी कंपन्यांना अधिक लाभ मिळावा यादृष्टीनेच सरकारनं पावलं टाकल्यानं सरकारी कंपन्यांची ही हालत झालीय. सरकारची बेजबाबदार धोरणं आणि नीती याला कारणीभूत ठरली आहेत. भारतात निर्गुंतवणूकीकरणाची सुरुवात १९९१ मध्ये सुरू झालीय. त्यावेळीच सरकारनं या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्यांचा वीस टक्के हिस्सा विक्रीला काढण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी नेमलेल्या रंगराजन समितीनं सार्वजनिक क्षेत्रातल्या उद्योगातील ४९ टक्के भागभांडवल विक्रीला काढून निर्गुंतवणूक करण्याची शिफारस केलेली होती. त्यानंतर अनेकदा निर्गुंतवणूक करण्याला विरोध होत राहिला. त्यामुळं त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. निर्गुंतवणूकीचे जसे फायदे सांगितले जातात त्याहून अधिक या व्यवहारात अनेक तोटेही आहेत. सर्वात पहिलं हे की, कंपनीचा मालक इथं बदलला जाईल. व्यवस्थापनही सरकारी न राहता खासगी लोकांच्या ताब्यात जाईल. त्यामुळं नोकरीमध्ये असुरक्षितता निर्माण होईल. खासगी क्षेत्रातल्या व्यवस्थापनाला कर्मचाऱ्यांच्या हिताचं काही देणंघेणं नसतं. त्यांचं लक्ष केवळ धंद्यातील नफ्याकडं असतं. कर्मचाऱ्यांचा असंतोष दिवसेंदिवस वाढीला लागतो आहे. तो उग्र स्वरूप घसरण करण्याची शक्यता आहे. भारताची सरकारी संपत्ती एका पाठोपाठ एक अशाप्रकारे खासगी कंपनीच्या हातात जाऊ लागली तर एक दिवस देशात अराजकताचं वातावरण निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती व्यक्त केली जातेय.

 *या त्या कंपन्या ज्या विकायला काढल्यात*
 केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या लेखी उत्तरात २८ सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांतील सरकारची भागीदारी विकण्यासंदर्भात सरकारनं सैद्धांतिक मंजुरी मिळाली आहे. मंत्रिमंडळानं तसा निर्णय घेतलाय. त्या कंपन्या पुढीलप्रमाणे. १) स्कूटर्स इंडिया लि., २) ब्रिज अँड रूफ कंपनी इंडिया लि, ३) हिंदुस्तान न्यूज प्रिंट लि., ४)भारत पंप्स अँड कम्प्रेसर्स लि, ५) सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि., ६) सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि, ७) भारत अर्थमूव्हर्स लिमिटेड,८) फेरो स्क्रैप निगम ९) पवन हंस लिमिटेड, १०) एअर इंडिया आणि संलग्न पांच कंपन्या आणि एक संयुक्त उद्योग, ११) एचएलएल लाइफकेयर, १२) हिंदुस्तान अँटिबायोटिक्स लि., १३) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, १४) बंगाल केमिकल्स अँड फार्मास्यूटिकल्स लिमिटेड. १५) नीलांचल इस्पात निगम लिमिडेट १६) हिंदुस्तान प्रीफॅब लिमिटेड (HPL), १७) इंजिनिअरिंग प्रोजेक्टस इंडिया लिमिटेड, १८) भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन १९) कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CONCOR) २०) एनएमडीसीचं नागरनकर स्टील प्लांट, २१) दुर्गापुर अलॉय स्टील प्लांट, सलेम स्टील प्लांट आणि भद्रावती यूनिट. २२) टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDCIL) २३) इंडियन मेडिसीन अँड फार्मास्यूटिकल्स कॉरपोरेशन लिमिटेड (IMPCL), २४) कर्नाटक अँटिबायोटिक, २५) इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (ITDC) व त्यांच्याशी संलग्न कंपन्या २६) नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड (NEEPCO), २७) प्रोजेक्ट अँड डेव्हलपमेंट इंडिया लि. २८) कामरजार पोर्ट हरीश केंची ९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...