Saturday 22 August 2015

इंदिराजी ते नरेंद्र मोदी

इंदिराजी ते नरेंद्र मोदी 


        खुप कोवळ्या वयात म्हणजे संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा काळ असेल, तेव्हा आसपासची वडीलधारी माणसे राजकारणाविषयी जे काही बोलत, त्यातून मला राजकीय घडामोडीबद्दल स्वारस्य निर्माण झाले. अर्थात ही वडीलधारी माणसे म्हणजे कोणी राजकीय अभ्यासक किंवा जाणकार नव्हते. अगदी ज्यांना सुशिक्षित म्हणता येतील असेही लोक नव्हते. ते सामान्य कष्टकरी, कर्मचारी होते. त्यातले जे कोणी कुठल्या संस्था संघटनेत फ़ावल्या वेळेत काम करीत असत असे; अधिक वर्तमानपत्र नित्यनेमाने वाचणारे लोक, म्हणजेच माझ्या कोवळ्या वयातील वडीलधारे लोक होते. सुरक्षित अंतरावर बसून वा थांबून मी त्यांच्या गप्पा ऐकत असे. त्यातले कोणी समाजवादी, कम्युनिस्ट वा कॉग्रेस पक्षाच्या बाजूने बोलणारे असत. त्यामुळेच त्या त्या पक्षाच्या नेत्यांबद्दल वा भूमिकांबद्दल कानावर काहीबाही पडायचे. त्याच दरम्यान मग अशा पालकांच्या हातातून निसटलेला रिकामटेकडा पेपर हाती लागला; तर त्यातल्या बातम्या मी वाचत असे. पण त्यातले लेख वाचायचा मला कंटाळा असायचा. कारण लेखांची लांबी अधिक व मुद्दे डोक्यावरून जाणारे असत. अशा काळातही जिद्दीने लेख वाचण्याचा मात्र प्रयास चालू असे. मग त्या वडीलधार्‍यापैकी कोणाला तरी वाचनातून उभ्या राहिलेल्या शंकाही विचारत असे. पण त्यातले बहुतेकजण खेळायला जा, नसत्या भानगडी हव्यात कशाला; म्हणून पिटाळूनच लावायचे. सहाजिकच त्यांची नजर चुकवून त्यांच्यातल्या गप्पा ऐकणे, हाच राजकारण शिकण्याचा समजण्याचा एकमेव मार्ग होता. तशा काळात म्हणजे १९६० पुर्वी देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू होते आणि त्यांच्या संबंधाने ऐकलेली एक चर्चा अजून आठवते.
        पंडितजी देशाचे पहिले व लोकप्रिय पंतप्रधान होते आणि त्यांच्यानंतर कोण पंतप्रधान होऊ शकतो, अशी चर्चा सगळीकडे व्हायची. वर्तनामपत्रातून व्हायचीच, पण लालबागच्या आमच्या गिरणगावातही सामान्य कष्टकर्‍यांमध्ये ती चर्चा अधुनमधून कानावर यायची. खरेच देशात ती राष्ट्रीय नेतृत्वाची जबाबदारी पेलू शकेल, असा कुणी दुसरा नेताच नाही; अशी एक सर्वसाधारण भावना होती. अगदी कॉग्रेसच्या विरोधात अटीतटीने बोलणार्‍या कार्यकर्त्यांपासून मोठमोठ्या विरोधी नेत्यांनाही नेहरूंना पर्याय नाही; असेच वाटत असे. त्याला म्हणे एक पर्याय होता तो जयप्रकाश नारायण यांचा. पण स्वातंत्र्य चळवळ संपताच जयप्रकाशांनी राजकारणातून अंग काढून घेतले व ते सर्वोदय आंदोलनात सहभागी झाले. त्यामुळे विरोधी पक्षातर्फ़े नेहरूंना असलेले आव्हान संपल्यासारखेच होते. तरीही नेहरूंनंतर कोण अशी चर्चा चालायची. त्यासंबंधाने कानावर पडलेला एक संवाद अजून आठवतो. कॉग्रेस कार्यकारिणीच्या एका बैठकीत म्हणे असा मुद्दा खुद्द नेहरूच बोलले; तर कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता असलेले रफ़ी अहमद किडवाई तात्काळ उत्तरले, ‘पंडितजी सत्तापदावरून उतरून बघा. नेहरूंनंतर कोण तो हयातीतच बघू शकाल.’ अर्थात ते विनोदाने तसे बोलले असे म्हटले जात होते. त्यातले किती खरे किती खोटे मला माहित नाही. अजाण वयात सामान्य कार्यकर्ते वा नागरिकांच्या तोंडून ऐकलेली ही गोष्ट आहे. पण तेवढा भाग सोडला, तर आपल्या देशात कधी पंतप्रधान कोण होईल; अशी चर्चा सहसा व्हायची नाही किंवा ऐकायला मिळालेली नाही. त्यामुळेच भावी पंतप्रधान म्हणून पुढल्या काळात नाव आले, ते अटलबिहारी वाजपेयी यांचे.

   पंतप्रधान पदावर दावा सांगणारा किंवा देशात बिगर कॉग्रेसी पर्यायी सत्ता प्रस्थापित करण्याचा मनसुबा उघडपणे व्यक्त करणारा १९६० नंतरचा पहिला पक्ष होता जनसंघ. या पक्षाची स्थापनाच मुळात स्वातंत्र्योत्तर काळात झालेली. त्यामुळे नेहरू असेपर्यंत जनसंघ सत्तेच्या जवळ जाण्याची कुठली शक्यता दूरदूर दिसत नव्हती. पण त्या पक्षाचे विचारवंत नेते दीनदयाल उपाध्याय यांच्या मृत्यूनंतर पक्षाची धुरा राष्ट्रीय नेता म्हणून वाजपेयी यांच्याकडे आली. तेव्हापासून भावी तरूण पंतप्रधान अशीच जनसंघीयांनी त्यांची प्रतिमा उभी करण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र तरीही त्या पक्षाला एका राज्यात आपला मुख्यमंत्रीही सत्तेवर बसवणे शक्य झालेले नव्हते. त्यामुळे नुसत्या प्रचारकी घोषणा यापेक्षा वाजपेयींच्या नावाला फ़ारसा अर्थ नव्हता. पुढे चीनी आक्रमणात भारताचा दारूण पराभव झाल्यावर नेहरू मनाने खचले होते आणि दोनच वर्षात त्यांचा देहांत झाला. तेव्हा कॉग्रेसने लालबहादूर शास्त्री यांची पंतप्रधानपदी निवड केली. पण शास्त्रीजींचे नाव त्यापुर्वी कधी पंतप्रधान म्हणून घेतले गेले नव्हते. त्यानंतर पाकिस्तानला पाणी पाजून चिनी पराभवाचा कलंक धुवून काढणार्‍या शास्त्रीजींचेही आकस्मिक निधन झाले आणि नव्या पंतप्रधानांच्या निवडीचे राजकारण कॉग्रेसमध्ये रंगले. त्यात मोरारजी देसाई यांनी त्यासाठी दावा केलेला होता. पण ऐनवेळी त्यांना शह देण्यासाठी त्यांच्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्यांनी नेहरू कन्या इंदिरा गांधी यांना पुढे केले. पण तत्पुर्वी शास्त्री सरकारमधल्या नभोवाणीमंत्री इंदिराजींकडे कोणी कधी भविष्यातल्या पंतप्रधान म्हणून बघितले नव्हते, की तत्पुर्वी त्यांच्या नावाची चर्चाही झालेली नव्हती. घडला तो बराचसा आकस्मिक प्रकार होता. त्यानंतरच्या काळात देशाच्या राजकारणावरची कॉग्रेसची पकड ढिली होत गेली तरी कॉग्रेस बाहेरचा वा आतला अन्य कोणी पंतप्रधान होऊ शकतो किंवा व्हावा; अशी चर्चा सहसा होत नसे. अपवाद दोनच होते. मोरारजी देसाई पंतप्रधान व्हायला उत्सुक होते, पण त्यांचे नाव कोणीच पुढे आणत नव्हता. आणि देशव्यापी पर्यायी पक्ष होऊन सत्ता मिळवण्याची स्वप्ने बघणारा जनसंघ वाजपेयींचे नाव पंतप्रधान पदासाठी घेत असे. पण अशा दोन्ही नावांकडे कोणी कशी गंभीरपणे बघितले नाही. मुद्दा इतकाच, की मला राजकारणाच्या अभ्यासाची तोंडओळख होऊ लागल्यापासून कधी आपल्या देशात गंभीरपणे कुठल्या व्यक्ती वा नावाची भावी पंतप्रधान म्हणून चर्चा झाल्याचे आठवत नाही.
        १९६६साली इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या व देशाची सत्तासुत्रे त्यांच्या हाती गेल्यावर कॉग्रेसमधील दोन प्रवाह उघडपणे समोर येऊ लागले. जेव्हा इंदिरा गांधींची निवड झाली, तेव्हा समाजवादी विचारवंत नेते डॉ. राममनोहर लोहियांनी तर कॉग्रेस मुखंडांच्या हातातली कठपुतळी; अशीच त्यांची संभावना केली होती. दोनतीन वर्षात म्हणजे १९६७ च्या निवडणूका नऊ राज्यात कॉग्रेसने गमावल्या आणि लोकसभेत काठावरचे बहूमत येऊन सत्ता टिकवली त्यानंतर ही गुंगी गुडीया स्वत:च राजकारण खेळू लागली. पक्षाबाहेरचे विरोधक व पक्षातले विरोधक यांच्या कोंडीत सापडलेल्या इंदिरा गांधींनी अत्यंत प्रतिकुल स्थितीत देशासमोर आपली अशी एक स्वतंत्र प्रतिमा उभी केली. तिथून पक्षिय व विचारधारांच्या राजकारणाचा जमाना क्रमाक्रमाने अस्तंगत झाला. अवघे राजकारण इंदिरावादी वा इंदिराविरोधी अशी घुसळण घेत पुढे सरकू लागले. त्यांच्या तुलनेत पंतप्रधान पदावर दावा करणारा लोकप्रिय नेता वा तितके संघटनात्मक पाठबळ असलेला अन्य कोणीच नेता देशात नव्हता. ती पोकळी भरून काढण्यासाठीच पुढल्या काळात वाजपेयी यांचे व्यक्तिमत्व उभारण्याचा प्रयास जनसंघ करीत होता. ते वास्तवात यायला पुढली तीन दशके लागली. असो, सांगायचा मुद्दा इतकाच, की नेहरूंच्या काळात जसे राजकारण त्याच्याच लोकप्रिय व्यक्तिमत्वाच्या भोवती घुटमळत होते, त्याच्याही पुढली पायरी इंदिराजींनी गाठली होती. नेहरू कितीही मोठे नेते असले, तरी नेहरू म्हणजेच कॉग्रेस अशी स्थिती कधीच नव्हती. इंदिराजींच्या कारकिर्दीत ती वेळ आली. इंदिरा म्हणजेच कॉग्रेस, असे चित्र त्यांनी पद्धतशीरपणे निर्माण केले आणि आजही त्यातून त्या पक्षाला बाहेर पडता आलेले नाही. तशी स्थिती वाजपेयी यांची कधीच नव्हती. आणि नेहरू वा इंदिरा गांधी इतक्या लोकप्रियतेचे दुसरे नाव कधी समोर आलेच नाही. ज्या नावे किंवा व्यक्तिममत्वाच्या भोवती देशाचे राजकारण वा चर्चा घुटमळत रहाव्या, असा नेता पुन्हा झालाच नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. इंदिराजींच्या निर्वाणानंतर त्यांच्या वारसांना त्याच निष्ठेने पूजण्याची प्रथा कॉग्रेसमध्ये पडलेली असली, तरी त्या वारसांना इंदिराजींची गुणवत्ता वा कौशल्याची प्रचिती घडवता आलेली नाही. (अपुर्ण)
 इंदिराजींच्या हत्येमुळे १९८४ अखेरीस झालेल्या निवडणुकीत नेहरू वा इंदिराजींपेक्षा मोठे यश राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसने मिळवले तरी  देशाचे राजकारण त्यांच्याच भोवती घुटमळत राहिल; असे कर्तृत्व राजीव कधीच दाखवू शकले नाहीत. त्यामुळेच इंदिराजींच्या हत्येनंतर पुन्हा देशाचे एकूणच राजकारण विविध पक्ष, त्यांच्या विचारधारा व प्रभावक्षेत्र यात विभागले गेले. त्या राजकारणाला आपल्या भोवती फ़िरवण्याची वा त्याचे धृवीकरण करण्याची क्षमता; राजीव गांधींमध्ये नव्हती आणि अन्य कुणाही पक्षाच्या नेत्यापाशी नव्हती. त्यामुळेच नेहरू-इंदिराजी यांच्यानंतर विकेंद्रीत झालेले व्यक्तीकेंद्री राजकारण तीन दशकांपुर्वीच अंतर्धान पावत गेले. पुढल्याच म्हणजे १९८९ च्या निवडणुकीत त्याची साक्ष मिळाली. राजीवनी बहूमत व सत्ता गमावली आणि अगदी त्यांचीच ऐन निवडणुकीत हत्या होऊनही कॉग्रेसला त्या हौतात्म्याच्या भांडवलावर पुन्हा बहूमत मिळवणे शक्य झाले नाही. कॉग्रेस इतकी पांगळी होऊन गेली होती, की नेहरू वारसाशिवाय आपल्या पायावर चालायचेही तो पक्ष विसरून गेला आहे. त्यामुळेच १९९१ ते १९९८ या कालखंडात नरसिंहराव पंतप्रधान व पक्षाध्यक्ष झाले, तरी राजकारणापासून अलिप्त असलेल्या सोनियांची मान्यता वेळोवेळी मिळवायला धडपडत होते. राव यांनी १९९६ सालात बाजूला होऊन सीताराम केसरी यांना पक्षाशी सुत्रे सोपवली. त्यांनाही पक्ष सावरता आला नाही आणि शेवटी १९९८ सालात सोनिया गांधींना कॉग्रेसची सुत्रे सोपवण्यात आली. तेव्हापासून पुन्हा देशाचे राजकारण त्यांच्या व्यक्तिमत्वाभोवती घुमवण्याचा खुप प्रयास सर्वच साधने व माध्यमे वापरून झाला; तरी त्यातून काहीच साधलेले नाही. गेली पाचसात वर्षे त्यांच्याऐवजी राहुलभोवती राजकारणाचे धृवीकरण करण्याचे प्रयास फ़सले आहेत.

   सोनिया गांधी कॉग्रेस अध्यक्ष झाल्यावर त्या परदेशी नागरिक आहेत, त्यांचा जन्म भारतातला नाही; असा खेळ भाजपाने करून खरे तर त्याच जुन्या व्यक्तीकेंद्री राजकारणाला खतपाणी घालण्यात कॉग्रेसला मोठीच मदत केली होती. काही प्रमाणात त्याचा लाभही सोनिया व कॉग्रेसला मिळाला. पण सोनिया व राहुल यांच्यापाशी नेहरू व इंदिराजी यांच्यातली गुणवत्ता वा मुत्सद्देगिरी नसल्याने; त्या संधीचा त्यांना कुठलाच लाभ उठवता आला नाही. म्हणूनच सत्ता कॉग्रेसच्या हाती आणण्यात यशस्वी झाल्या, तरी सोनियांना व्यक्तीकेंद्री राजकारणाचे पुनरूज्जीवन करता आले नाही, की कॉग्रेसचा जिर्णोद्धार करता आलेला नाही. उलट याच काळात देशाचे राजकारण अधिकाधिक विस्कळीत होत गेले आणि विविध पक्ष व प्रादेशिक नेत्यांमध्ये विकेंद्रीत होत गेले. त्यातूनच देशाचा कोणी असा खंबीर राष्ट्रीय नेताच उरला नाही. अर्थात मोठा पक्ष असून कॉगेसमध्ये असा नेता निपजण्याची अपेक्षाच करता येत नाही. नेहरू वारसाशिवायची कॉग्रेस ही कल्पनाच कॉग्रेसजनांना भयभीत करणारी असल्यावर दुसरे काय व्हायचे? दुसरीकडे अन्य पक्षातही तशी महत्वाकांक्षा व राष्ट्रीय दृष्टीकोन असलेला कोणी नेता नसल्यामुळे, आज मनमोहन सिंग यांच्यासारखा कठपुतळी माणूस देशाचा पंतप्रधान होऊन बसला आहे आणि त्याचे दुष्परिणाम आपण बघत आहोत. आपल्या मंत्रीमंडळात कोण असावे, कोणाला काढावे, अमुक बाबतीत कोणता निर्णय घ्यावा, तेही स्वत: ठरवू न शकणार्‍या व्यक्तीच्या हाती आज देशाचा संपुर्ण कारभार आहे. त्याचा कोणीही कितीही इन्कार केला, तरी सामान्य जनतेला ते दिसते आहे व कळते आहे. त्यातूनच मग पर्याय शोधण्याची प्रक्रिया सुरू होत असते. ज्या कारणास्तव स्वातंत्र्योत्तर काळात नेहरू वा पुढल्या काळात इंदिराजींच्या रूपात लोकांनी पक्षिय भूमिका झिडकारून व्यक्तीवादी राजकारणाची कास धरली होती; त्याच अनुभवातून आजचा भारतीय समाज जातो आहे, आणि त्यातूनच मग कोणा तरी खंबीर व ठोस निर्णय घेणार्‍या नेत्याचा शोध गेली काही वर्षे लोक करीत आहेत. सामान्य लोक विद्वानांप्रमाणे तात्विक निर्णय घेत नाहीत, त्याची व्यवहार्यता तपासून बघत असतात. चांगले हवेच, पण ते उपलब्ध नसेल, तर त्याच्या नजीकचा पर्याय लोक स्विकारत असतात. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे नाव तसेच लोकांच्या कल्पनाविश्वात घुसले आहे.
       गेल्या तीनचार वर्षापासून सगळीकडे हळुहळू नरेंद्र मोदी हा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली. गंमतीची गोष्ट म्हणजे त्यांचे नाव भाजपाने म्हणजे त्यांच्या पक्षाने पुढे आणलेले नाही. आधी त्यांचे नाव भलत्याच राजकारणबाह्य लोकांकडून पुढे आणले गेलेले आहे. आणि त्याची टर उडवणार्‍या त्याच भाजपाच्या नेत्यांना आता त्याचा इन्कारही करणे अशक्य झालेले आहे. कशी गंमत आहे बघा. १९७० नंतर सतत ‘अबकी बारी अटलविहारी’ असा प्रचार करणार्‍यांनाच आज आपल्या लोकप्रिय नेत्याचे नाव बाकीचे लोक घेत असताना मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब करणे अवघड जाते आहे. पण म्हणून मोदींचे नाव मागे पडायला तयार नाही. दिवसेदिवस विविध व्यासपीठावरून किंवा चाचण्यांमधून ते अधिकच पुढे येते आहे. मात्र विरोधी पक्षांना, भाजपासह अनेक राजकीय अभ्यासकांना, ते वास्तव स्विकारणे अवघड जाते आहे. याचे काय कारण असेल? तर गेल्या तीस वर्षात लोक व्यक्तीकेंद्री राजकारण, त्यातून मतांचे होऊ शकणारे धृवीकरण व व्यक्तीकेंद्री निवडणुकांचे जुने वास्तव पुरते विसरून गेले आहेत. लागोपाठच्या सात लोकसभा निवडणुकांमध्ये कुठल्याच पक्षाला बहूमत मिळू न शकल्याने, आता एकपक्षिय बहूमताचा जमाना संपला हे आजच्या राजकीय अभ्यासक, विश्लेषकाचे गृहीत आहे. एकदा ते गृहीत पायाभूत मानले; मग त्यानुसारच तर्क सुरू होतो. मग आघाडीच्या राजकारणाचे युग, अशी भाषा सुरू होते आणि ती भाषा सुरू झाली, की व्यक्तीकेंद्री राजकारणाचा विचारही मनाला शिवत नाही. जे इंदिरा गांधी व नेहरूंच्या बाबतीत होते, त्या पातळीचा नेता व नेतृत्व देशात पुन्हा पैदाच होणार नाही; हे गृहीत असेल तर तसा नेता समोर उभा असला तरी दिसायचा कसा व बघायचा कोणी? आज देशात सर्वच क्षेत्रात मोदी या नावाची चर्चा चालू आहे, तर ती कशाला चालली आहे? त्याचे विश्लेषण करायचे तर तशी चर्चा कोणाची व्हायची, तो इतिहास अभ्यासूनच नवे विश्लेषण करावे लागेल. तुलना वाजपेयी यांच्याशी करून त्याचे उत्तर मिळणार नाही, की निष्कर्ष काढता येणार नाहीत. आणि काढलेले निष्कर्ष बिनबुडाचे व फ़सवेच असणार.
        बारा वर्षापुर्वी गुजरातच्या दंगलीनंतर ज्याची अखंड बदनामी करण्यात आली व ज्याचे नाव घेण्य़ाची भाजपालाही लाज वाटू लागली; तोच माणुस आता देशाचा पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा अनेक विश्लेषकांना सतावणारा प्रश्न आहे. कारण विश्लेषक व अभ्यासक पत्रकारांनी मोदींच्या विरोधात ज्या अपप्रचार व बदनामीच्या आघाड्या उघडल्या; त्याचा प्रभाव जनमानसावर पडला होता हे नक्की. पण असा प्रभाव कायमचा नसतो. हा माणुस खरेच इतका धर्मांध व हिंसाचारी असेल, तर पुन्हा कसा निवडून येतो, असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. त्या प्रश्नाचे पटणारे उत्तर देता आले पाहिजे. ते उत्तर विश्लेषकांना अजून सापडलेले नाही वा सामान्य भारतीयापा पटवता आलेले नाही. पण दुसरीकडे सामान्य माणसाने अन्य मार्गाने जी उत्तरे शोधली आहेत, ती समजून घेण्यात विश्लेषकच तोकडे पडले आहेत. त्यामुळेच मतचाचण्या घेऊन मोदींच्या लोकप्रियतेचे जे आकडे समोर येतात, ते सामान्य माणसाला पटणारे असले; तरी तेच आकडे जमवणार्‍यांना मात्र समजून घेता येत नाहीत. मग आपणच शोधलेल्या आकड्यांना खोटे पाडण्यापर्यंत अशा विश्लेषक, अभ्यासकांची मजल जाते. दोन वाहिन्यांनी अलिकडेच चाचण्या घेऊन मोदीच देशव्यापी सर्वाधिक लोकप्रिय नेता असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. मात्र त्यानुसार मोदी पंतप्रधान व्हायला किती अडचणी आहेत, त्याचेच विवेचन त्या वाहिन्यांच्या कार्यक्रमात बघताना हसू आले. असेच असेल तर त्या चाचण्या घ्यायच्या कशाला? लोकमत कसे बनते व कसे झुकते वा बदलते; त्याचा अभ्यास करून मगच विश्लेषण करणे शक्य असते. त्यात पक्ष व लोकप्रिय नेता अशी गल्लत करून चालत नाही. म्हणून भाजपाचे आजवरचे लोकप्रिय नेता मानले गेलेले वाजपेयी यांच्याशी मोदींची तुलना चुकीची आहे. कारण पंतप्रधान होईपर्यंत वाजपेयी यांची सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रीय नेता अशी प्रतिमा कधीच नव्हती. उलट आज मोदींची नेमकी तशी प्रतिमा आहे. १९९८ वा २००४ सालातील वाजपेयींची लोकप्रियता ते पंतप्रधान असतानाची आहे. पण त्याआधी म्हणजे १९९१ किंवा १९९६च्या निवडणुकीपुर्वी वाजपेयींची लोकप्रियता सर्वाधिक होती का? त्याचे उत्तर नकारार्थी आहे. त्यामुळेच मोदी व वाजपेयी ही तुलनाच चुकीची आहे.  (अपुर्ण)
 या लोकप्रियतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. गेल्या दहा बारा वर्षात नरेंद्र मोदी या माणसाविषयी माध्यमातून लोकांसमोर मांडलेली प्रतिमा अत्यंत क्रुर व नालायक अशीच आहे. ती खरी असेल तर लोकांमध्ये मोदीविषयक अत्यंत कटूता व प्रतिकुल मत असायला हवे. पण गेल्या दोनतीन वर्षात क्रमाक्रमाने जितके मोदींच्या विरोधात बोलले व लिहिले जाते आहे; त्याची उलटीच प्रतिक्रिया उमटते आहे. गुजरातबाहेर अजून कुठलेही कार्य वा कर्तृत्व गाजवलेले नसून देखिल देशाच्या अन्य भागात मोदीविषयक आकर्षण वाढतच चालले आहे. अशावेळी आपल्या मताशी व विश्लेषणाशी सुसंगत मतचाचण्यांचे निष्कर्ष येत नसतील; तर मग आपले विश्लेषण व त्याचे निकष जाणकारांनी नव्याने तपासून बघण्याची गरज असते. पण सत्य तपासण्यापेक्षा आपल्याच गृहीत व समजुतींना चिकटून बसले; मग विरोधाभास अपरिहार्य असतो. मोदींच्या बाबतीत बहुतांश माध्यमे, पत्रकार व अभ्यासकांची तीच दुविधा होऊन गेली आहे. सहाजिकच एका बाजूला हे विश्लेषक चाचण्या घेऊन मोदींच्या वाढत्या लोकप्रियतेचे हवाले देतात आणि दुसरीकडे त्यामुळे पंतप्रधान होणे सोपे नाही, असाही अजब निष्कर्ष पेश करतात. त्याचे प्रमुख कारण यातले बहुतांश पत्रकार व विश्लेषक १९९० नंतरच्या काळात राजकीय जाण आलेले वा अभ्यासाला लागलेले आहेत. त्यातल्या बहुतांश लोकांना लोकमताची लाट किंव त्सुनामी कशी येते व राजकीय आडाखे व समजुती कशा उध्वस्त करते, त्याचा अनुभवच नाही. त्यांनी तो जुना इतिहास तपासलेला नाही. त्यांना व्यक्तीकेंद्री राजकारणाचा वा निवडणुकांचा अंदाजही नसावा, असे माझे ठाम मत आहे. किंबहूना १९८९ पुर्वीच्या चार लोकसभा निवडणुका अभ्यासल्या, तरच त्यांना मोदींच लोकप्रियता समजून घेता येईल, उमगू शकेल, याची मला खात्री आहे.

   मोदींविषयी आज मतचाचण्यांमध्ये जे आकडे दिसतात, ती त्यांना मिळणारी मते असतील असे नाही तो नुसता लोकांचा कल आहे. राष्ट्रीय पातळीवर नसलेल्या कुणा नेत्याला कशाला लोक असा कौल देत असतील का? ज्या पक्षाचा हा नेता आहे, त्याच पक्षाचे आज व दिर्घकाळ संसदेतले काही ज्येष्ठ नेते उपलब्ध आहेत, त्यांना असा कौल मतदार का दाखवत नाहीत? अशी कुठली परिस्थिती उदभवली आहे, की लोक एका राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देशाचा भावी नेता म्हणून उत्सुकतेने बघू लागले आहेत? आपल्या देशात पक्षाची निवड होते आणि मगच त्यातून पंतप्रधानाची निवड केली जाते. कारण भारतात संसदीय लोकशाही आहे आणि लोकांचे निवडून आलेले प्रतिनिधी आपला नेता निवडतात. लोक थेट देशाचा नेता निवडून त्याच्या हाती कारभार सोपवत नाहीत. मग लोकांनी असे एका कुणा नेत्याला झुकते माप दिल्याने, त्याचा मतदानावर प्रभाव पडू शकतो काय? अशा अनेक प्रश्नांची त्यासाठी उत्तरे शोधावी लागतील. हे सगळे कागदोपत्री खरे आहे. पण तशी सुविधा लोकांना उपलब्ध नसली; म्हणून त्यावर पर्याय शोधून लोक तशीच देशाच्या नेत्याची निवड करणार नाहीत, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. ज्याला पंतप्रधान वा देशाचा नेता म्हणून लोकांना निवड करायची असेल त्यालाच बहूमताने पाठींबा देतील, असे प्रतिनिधी निवडण्याचा लोकांना पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे असे, की लोकसभेत वा विधानसभेचे बहुसंख्य सदस्य ज्याला नेता म्हणून निवडतात, तोच शेवटी पंतप्रधान वा मुख्यमंत्री होतो ना संसदीय लोकशाहीत? मग जे थेटमार्गाने शक्य नसेल, त्यावर लोक तसा पर्याय शोधून काढत असतात. ज्यावेळी पक्षाचे श्रेष्ठी वा प्रतिनिधी लोकांना हवा असलेला पंतप्रधान वा मुख्यमंत्री निवडून सत्तेवर बसवणार नाहीत; तेव्हा लोकांसमोर दुसरा पर्याय असतो, तो नेत्याला समर्थन देतील असेच प्रतिनिधी निवडून आणायचा. मग त्यासाठी ज्यांना असा लोकप्रिय नेता उमेदवारी देतो, त्याला लोक निवडून देतात. थोडक्यात लोकप्रिय नेत्याने शेंदूर फ़ासलेल्या दगडाला लोक मते देतात, असा अनुभव आहे, तसा इतिहास आहे. आणि अशी स्थिती येते, तेव्हा मग नेता महत्वाचा होतो आणि पक्ष दुय्यम होऊन जातो. मग आज मोदी हे भाजपाचे नेता आहेत. म्हणून ते पंतप्रधान होऊ शकतात काय?
         हा प्रश्नच मुळात फ़सवा आहे. प्रश्न अशासाठी फ़सवा आहे, की मोदी यांना भाजपाने कधीच पंतप्रधान पदाचा उमेदवार मानलेले नाही. जेव्हा सगळीकडून तो विषय विचारला जातो आहे, तेव्हा मोदी पक्षाचे सर्वाधिक लोकप्रिय नेता आहेत; असे गुळमुळीत उत्तर दिले जाते. याचा अर्थच असा, की पक्षातच मोदींना पुरेसा एकमुखी पाठींबा नाही. म्हणून मोदींची अडचण होणार आहे काय? लोकांना मोदी पंतप्रधान व्हावे असे वाटत असेल, तर भाजपा त्यांना अड्वू शकतो काय? भाजपामध्ये सत्तांतराची राजकीय क्षमता असती, तर मागल्याच निवडणूकीमध्ये कॉग्रेसला इतके मोठे यश मिळाले नसते. ते मिळू शकले, कारण भाजपा पर्याय देण्यात अपेशी ठरला होता. युपीए वा कॉग्रेसचे सरकार मोठे यशस्वी नव्हते. पण त्यांच्यासमोर भाजपाने संघटनात्मक वा नेतृत्व पातळीवर प्रभावी पर्याय सादर केला नव्हता. त्यामुळेच लोकांनी कठपुतळी असलेल्या मनमोहन सिंग यांनाच पुन्हा सत्ता बहाल केली होती. अगदी लालकृष्ण अडवाणी सतत सिंग यांना सर्वात दुबळा पंतप्रधान म्हणून हिणवत होते. ते लोकांनाही मान्य होते. पण त्यापेक्षा समर्थ नेता वा सरकार देण्याची क्षमता अडवाणींना दाखवता आलेली नव्हती. देशाचा वा लोकांचा जो नेता असतो, त्याच्यात व्यक्तीगत आत्मविश्वास असावा लागतो. तिथेच अडवणींचे पारडे हलके होते आणि मोदींचे पारडे जड आहे. आज बाकीच्या भाजपा नेत्यांचे पारडे हलके आहे. मोदींवरचे अनेक आक्षेप लोकांना मान्य आहेत. पण त्याचवेळी त्या दोषांच्या पलिकडे या माणसामध्ये अतिशय उपयुक्त असा नेतृत्वाचा गुण आहे. तो गुण म्हणजे त्याच्यामध्ये कमालीचा आत्मविश्वास आहे. गेल्या दहा बारा वर्षामध्ये माध्यमांनी व तमाम विरोधी पक्षांनी मोदी विरोधात जी अपप्रचाराची आघाडी उघडली, त्याच्या समोर टिकून रहाणेच अवघड होते. अगदी स्वपक्षातलेही बहुतांश नेते मोदींच्या समर्थनाला कधी पुढे आले नाहीत. तो प्रतिकुल कालखंड मोदींना एकट्याने संघर्ष करीत आपले नेतृत्व आणि खंबीरपणा एकाकीपणे सिद्ध करावा लागला आहे. त्यामुळेच त्यांची तुलना अन्य कुठले मुख्यमंत्री, स्वपक्षातले नेते वा अन्य राष्ट्रीय पक्षाचे नेते इत्यादींशी करता येणार नाही. आज नुसत्या घोटाळ्यांच्या गर्तेत सापडल्यावर कॉग्रेसच्या नेतृत्वासह पंतप्रधानांची उडालेली तारांबळ बघितली; तरी मोदी कोणत्या अग्नीदिव्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेत, त्याचा अंदाज येऊ शकतो. ज्याचा स्वत:वर विश्वास आहे, त्याला इतकी मजल मारणे शक्य आहे. त्याच हिंमतीमुळे मोदी लोकांच्या कल्पनाशक्तीवर स्वार होऊ शकले आहेत.
        आपली प्रतिमा बदनाम करून डागाळण्याच्या मागेच तमाम माध्यमे व पत्रकार लागलेले आहेत, हे लक्षात आल्यावर मोदी यांनी त्यांचे समाधान करण्यात वेळ दवडला नाही. त्यांनी आपल्याविषयी चांगले लोकमत निर्माण होण्यासाठी अन्य मार्ग चोखाळले. त्यांनी लोकांच्या नजरेत भरेल असे उत्तम काम, कारभार, विकास व पर्याय उभे करण्यावर लक्ष केंद्रित केले. प्रसिद्धीअभावी त्यांच्या त्या यश व गुणांचा प्रचार होऊ शकला नाही. पण जसजसे त्यांच्या त्या प्रयत्नांना यश येत गेले; तसतसे मोदींचे कर्तृत्व लपवणे माध्यमांच्याही आवाक्यातले राहिले नाही. उत्तम कारभार, विकास, प्रगती, जनहित, अशा नागरिकांना सुखावणार्‍या गोष्टी गुजरात बाहेर येत गेल्या व मोदीविषयी देशभर लोकमत बदलत गेले. पाच वर्षापुर्वी ज्याच्याकडे माध्यमांच्या अपप्रचारामुळे दंगलखोर वा धर्मांध म्हणून बघितले जात होते; त्याच्याकडे लोक विकासाचा नवा प्रेषित म्हणून बघू लागले. एका बाजूला मोदींच्या विकास-प्रगतीच्या कहाण्या गुजरातबाहेर येऊ लागल्या होत्या; त्याच काळात नेमक्या युपीए कॉग्रेस सरकारच्या कारभाराच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली जाऊ लागली होती. त्याचवेळी युपीए सरकार नालायक असले तरी विरोधातल्या भाजपामध्ये परिवर्तन करण्याची कुवत नाही, असाही घोषा लावला जात होता. सहाजिकच लोकांना भाजपाच्याही पलिकडे जाऊन पर्याय शोधण्याखेरीज पर्याय नव्हता. कॉग्रेस नको आणि भाजपा पांगळा असेल, तर लोकांनी पाचपन्नास लहानमोठ्या पक्षांचा सावळागोंधळ सत्तेवर आणायचा काय? काय करावे लोकांनी? जो पक्षातील वा सत्तेतील बेदिली भ्रष्टाचार मोडून काढू शकतो व खंबीरपणे सरकार चालवून राजकीय स्थैर्य देऊ शकतो, असाच नेता लोक शोधणार ना? (अपुर्ण)
        मोदी मुख्यमंत्री होईपर्यंत गुजरात भाजपामध्येही गटबाजीचा धुमाकुळ होता. सत्तास्पर्धेत गुंतलेले भाजपाचे नेते आपसात लढत होते. त्या सर्वांना लगाम लावून व निष्प्रभ करून मोदी यांनी पक्ष व सरकार यांच्यात मेळ घातला, उत्तम कारभार केला, विकास व प्रगती करून दाखवली. त्यातून त्यांनी लोकांच्या अपेक्षांना साकार करण्याची आपली कुवतच लोकांसमोर पेश केली. आज देशात सर्वात उत्तम कारभार असलेले व जनतेच्या तक्रारी कमी असलेले, गुजरात हेच एक राज्य मानले जाते. निदान तशी लोकांची समजूत आहे. आणि त्याच समजूतीने लोकांना मोदी नावाची भुरळ पडली आहे. ती समजूत किती खरी वा खोटी, हा भाग नंतरचा. पण तशी भुरळ पडली आहे व त्यातूनच पंतप्रधान पदासाठी दिल्ली बाहेरचे मोदी हे नाव अकस्मात समोर आलेले आहे. तर ते का येऊ शकले, त्याची कारणे शोधावी लागतील आणि त्याच्याच अनुषंगाने पुढील निवडणूकीत मोदी नावाची जादू चालेल की फ़सेल; त्याचा पडताळा घ्यावा लागेल. भाजपा आज देशातल्या किती राज्यात प्रभावी आहे, किंवा त्याची लोकप्रियता किती आहे, अशा गणितावर मोदींच्या पंतप्रधान होण्याचे समिकरण मांडता येणार नाही. मोदींच्या नेतृत्वाखालचा भाजपा व नुसताच भाजपा; यात खुप मोठी तफ़ावत आहे. ती आधी समजून घ्यायची असेल तर म्हणूनच चार दशकेमागे जावे लागेल. इंदिराजी समजून घ्याव्या लागतील. तेव्हाची राजकीय समिकरणे लक्षात घ्यावी लागतील. तेव्हाची राजकीय परिस्थिती, व निवडणुकातील मतदान; इत्यादी इतिहासाचे योग्य आकलन करावे लागेल. 

   थोडक्यात मोदींकडे बघण्याचा चष्मा गुजरात दंगल, हिंदूत्ववादी, संघाचा स्वयंसेवक, भाजपा यापैकी कुठलाही असून चालणार नाही. आजची राजकीय स्थिती, जनतेची मनस्थिती व अपेक्षा आणि लोकांसमोर उपलब्ध पर्याय; अशा नजरेने सर्वकाही बघावे लागेल. तरच त्यातले काही समजू शकेल व अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडता येतील. आपण सेक्युलर भुलभुलैया निर्माण करून मोदींना मुख्यमंत्री पदावरून हटवायचा आटापिटा केलेला असताना, तो माणूस तिथेच कायम राहून थेट देशाचा पंतप्रधान पदाचा उमेदवार का होऊ शकला; त्याचा विरोधकांना विचार करावा लागेल, त्यासाठीही आधी मोदी समजुन घ्यावा लागेल, त्याचे वस्तुनिष्ठ आकलन करावे लागेल. अगदी मोदींना पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून पराभूत करायचे असेल, तरी मुळात त्या माणसाला समजून घेणे अगत्याचे आहे. तुम्ही ज्याला शत्रू मानता व हरवण्याची आकांक्षा बाळगता; त्याची बलस्थाने व दुबळेपणातर जाणून घ्यायला हवा ना? इथेच मोदीविरोधक पुरते फ़सले आहेत. ते खर्‍या मोदीला मोकाट सोडून, आपल्या कल्पनेतील भ्रामक मोदीशीच लढत असतात व मोदी बाजूला बसून हा खेळ मजेत बघत असतात. त्यामुळेच गेल्या पाच सहा वर्षात मोदी त्यांच्या प्रत्येक विरोधकावर सहजगत्या मात करून मुसंडी मारून राष्ट्रीय राजकारणात सर्वात महत्वाचा मोहरा बनून गेले आहेत. आणि अजून त्यांचे विरोधक भ्रमातून बाहेरही पडायच्या मनस्थितीत नाहीत. मोदींनी लोकमानसात इतके स्थान कसे मिळवले, त्याचाही पत्ता अनेकांना लागलेला नाही.
        पक्षातील व पक्षाबाहेरील आपल्या विरोधकांना कोणता शह मोदींनी दिला? मुख्यमंत्री पदाची पहिली चारपाच वर्षे मोदींना सत्तेचे राजकारण समजून घेण्यातच गेली. पण एकदा त्याचा आवाका आल्यावर त्यांनी आपल्यावरच्या हल्ल्यांना परतून लावताना जे धडे घेतले; त्यातूनच त्यांनी पुढले राजकारण धुर्तपणे खेळत गुजरातचे राजकारण व्यक्तीकेंद्री होईल असे डाव जाणिवपुर्वक योजले. गुजरातच्या जनतेच्या आशाआकांक्षा आपल्या व्यक्तीमत्वाभोवती फ़िरतील, असे डावपेच खेळले. आपल्यावरच्या टिकेला त्यांनी गुजरातवरची टिका बनवण्यात यश मिळवले. आणि एक मान्य करावे लागेल, की गेल्या दहा वर्षात लोक ‘गांधीनू गुजरात’ विसरून गेले आहेत. आज ‘मोदीनु गुजरात’ अशी त्या राज्याची ओळख बनून गेली आहे. कोणी मान्य करावे किंवा अमान्य करावे, म्हणून फ़रक पडत नाही. त्यातूनच त्यांनी २००७ च्या निवडणुका सहजगत्या जिंकल्या. त्यानंतर मात्र त्यांनी आपली देशव्यापी प्रतिमा बनवण्याचा पद्धतशीर खेळ सुरू केला व त्यात आपल्या विरोधी सेक्युलर माध्यमांचा मोठ्या खुबीने वापर करून घेतला. त्यामुळेच जे मुर्ख मोदींची बदनामी करण्यात धन्यता मानत होते; तेच एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या कानाकोपर्‍यात बिनबोभाट घेऊन जात होते, गुजरात बाहेरच्या जनतेसमोर पेश करत होते. त्याच सेक्युलर माध्यमांनी गुजरातचा मोदी तमाम भारतीय जनतेसमोर नेऊन त्याच्याविषयीचे औत्सुक्य निर्माण केले. पण जेव्हा उत्सुकतेपोटी लोक मोदीविषयी माहिती मिळवू लागले वा गुजरातच्या विकासाची माहिती अन्य प्रकारे लोकांना मिळू लागली; तेव्हा त्यांच्या मनात मोदींची एक वेगळी उजळ प्रतिमा उभी रहात गेली. त्यातून मोदी यांनी काय साध्य केले? पुर्वाश्रमीच्या जनसंघ किंवा आज भाजपाच्या कुठल्याही नेत्याला जे शक्य झाले नव्हते; तसे राष्ट्रीय औत्सुक्याचे व्यक्तीमत्व म्हणून मोदींनी स्वत:ला भारतीय जनतेसमोर आणले. कुंभमेळ्याच्या कालखंडात त्याची पहिली वाच्यता हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी केली होती. पण त्यांच्या विधानातले तथ्य वा सत्य समजून घेण्य़ापेक्षा सेक्युलर माध्यमांनी त्यांची टवाळीच केली. सिंघल म्हणाले होते, मोदी हे नेहरूंसारखे आज लोकप्रिय आहेत. त्यांच्या त्या विधानाचा नेमका अर्थ काय? खरेच मोदींची लोकप्रियता इंदिरा गांधी वा पंडित नेहरू यांच्या इतकी वा त्यांच्यासारखी आहे काय? तशी लोकप्रियता म्हणजे तरी काय?  (अपुर्ण)  
 नेता ही काय भानगड असते? पंडित नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सरदार वल्लभभाई पटेल अशी नावे खुपच मोठी असतात. त्यांना राष्ट्रीय नेता मानले जाते. आपण नेहमी बघतो किंवा विविध नेत्यांची नावे ऐकत असतो. अगदी गाव गल्ली पातळीपासून थेट राष्ट्रीय स्तरापर्यंत हजारो, लाखो व्यक्तींचा नेता असा उल्लेख नित्यनेमाने आपल्या समोर होत असतो. त्यांना नेता कशाला म्हटले जाते? नेता होण्यासाठी अंगी कुठले गुण लागतात वा कौशल्य असावे लागते? मग तो एखाद्या देशाचा नेता असो किंवा अगदी छोट्या समाज घटकाचा नेता असो, किंवा एखाद्या गावाचे नेतृत्व करणारा असो. अशी काय वेगळी बाब त्या माणसामध्ये असते, की तुमच्याआमच्या सारखा सामान्य दिसणारा तो माणूस, नेता म्हटला जातो? साध्या भाषेत त्याला पुढारी असे संबोधले जाते. त्याच शब्दात त्याचे वर्णन आलेले आहे. जो पुढाकार घेतो, तो पुढारी म्हणजे नेता. जो आपल्या सभोवतालच्या लोकांच्या समान इच्छा आकांक्षा वा अपेक्षा पुर्तीसाठी पुढाकार घेतो व इतरांना आपल्या मागून स्वेच्छेने यायला भाग पाडतो, तोच असतो नेता. मग किती मोठ्या लोकसंख्या वा समाजाच्या गळी तो त्याचे नेतृत्व उतरवू शकतो; त्यानुसार त्याला गाव गल्लीतला किंवा देशाचा नेता म्हटले जात असते. त्याची मूळ गुणवत्ता किंवा कौशल्य असे असते, की त्याचे शब्द व भूमिका ही अनुयायांना त्यांची स्वत:ची इच्छा व आकांक्षा वाटत असते. तो बोलतो वा सांगतो, ते आपल्याच मनातले आहे, आपल्याला नेमके तेच करायचे आहे, असे मोठ्या लोकसंख्येला वाटते; असा माणूस त्या लोकसंख्येचा नेता असतो. मोजक्या शब्दात सांगायचे तर लोकांच्या अपेक्षा, आकांक्षा व संकल्पना काबीज करून; त्यावर स्वार होण्याची व मांड ठोकण्याची ज्याच्यामध्ये क्षमता असते, तोच माणूस नेता वा पुढारी होऊ शकतो. जितक्या अधिक लोकसंख्येच्या कल्पनाशक्तीवर त्याला स्वार होता येते; तितके त्याचे नेतृत्व मोठे वा निर्णायक स्वरूपाचे असते. एकदा असा नेता लोकांनी मनापासून स्विकारला, मग पुढे त्याला त्यांच्या इच्छाआकांक्षांनुसार बोलायची गरज उरत नाही. तो सांगेल वा बोलेल त्याच लोकांना त्यांच्या आशाअपेक्षा वाटू लागतात. चटकन असे विधान कोणाला पटणार नाही, पण एक उदाहरण दिले तर सहज लक्षात येऊ शकेल. 
        पंडित नेहरु यांच्या निधनाला आता पाच दशकांचा काळ उलटून गेला आहे. महात्मा गांधींचा निर्वाणालाही सहा दशकांचा कालावधी उलटला आहे. जवळपास तितकाच कालखंड डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महानिर्वाणाला झालेला आहे. पण आजही आपण त्यांच्या स्वप्नातला भारत अशी भाषा ऐकत असतो की नाही? त्यांच्या स्वप्नातला भारत म्हणजे काय? तर त्यांनी देशाचे जे स्वप्नील चित्र रंगवले, तेच आपल्या संपुर्ण भारतीय जनतेचे स्वप्न असते, असेच त्यामागचे गृहीत आहे. पन्नास साठ वर्षे उलटून गेल्यावरही आपण त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्याची भाषा कशाला बोलत असतो? तर आपल्या वतीने त्यांनी स्वप्ने बघितली आणि तीच आपली सर्वांची स्वप्ने आहेत; असे त्यामागचे गृहीत आहे. या नेत्यांनी कधी प्रत्येक भारतीयाला त्याच्या अपेक्षा आकांक्षा विचारून, त्याची चाचणी घेऊन कुठला विचार व संकल्पना मांडल्या नव्हत्या. आपल्या बुद्धी व विचारांच्या आधारावर तार्किक अभ्यास करून समस्त समाजाच्या कल्याणाच्या व सुखीसमाधानी जीवनाच्या कल्पना मांडल्या होत्या. त्या कल्पना वा स्वप्ने विविधांगी व अफ़ाट आकाराची होती. पण त्यांच्याच विचारात व त्यांनी दाखवलेल्या मार्गाने त्यांचा पाठपुरावा होऊ शकतो, यावर मोठ्या लोकसंख्येने विश्वास व निष्ठा दाखवली. म्हणून त्यांची स्वप्नेच लोकांची होऊन गेली. लहानमोठ्या पातळीवर असेच नेते होऊन गेले वा आजही हयात आहेत. त्यांनी मांडलेले विचार, भूमिका व कार्यक्रम योजना यातून लोकांच्या सुखसमाधानाच्या संकल्पनांवर या नेत्यांनी प्रभाव पाडलेला असतो. व्यक्तीगत स्वप्नांचा व अपेक्षांचा सहभाग सामुहिक स्वप्नात दाखवण्याची त्यांची क्षमताच, मग त्यांना नेता बनवत असते. इंदिराजी ह्या अशाच लोकप्रिय नेता होत्या. पंतप्रधान झाल्यावर राजकारण करताना, आपल्या पायात पक्षाच्या संघटनात्मक बेड्या आहेत व आपण सत्तेच्या समिकरणासाठी निवडून येणार्‍या विविध प्रांतातील प्रभावी नेत्यांवर विसंबून आहोत, याची त्यांना जाणिव झाली. त्यामुळेच त्या बेड्यांमधून मुक्त व्हायचे. तर आपल्याला प्रांत, भाषा व पक्षाच्यापलिकडे थेट जनतेचा पाठींबा मिळवावा लागणार, याची जाणिव त्यांना झालेली होती. जर आपल्या कल्पना व स्वप्ने साकार करायची; ती लोकांच्या कल्याणाची असली तरी त्यासाठी जे सत्तेचे पाठबळ आवश्यक आहे, ते सहकारी नेत्यांकडून मिळतेच असे नाही. मिळणार नसेल तर ते थेट सामान्य भारतीय जनतेकडून गोळा करावे लागेल; हे इंदिराजींच्या लक्षात आले. तेव्हाच त्यांनी थेट जनमानसात आपला व्यक्तीगत प्रभाव पाडायचा पवित्रा घेतला. त्यांनी पक्षाचे जोखड झुगारण्याचा जुगार खेळताना ‘गरीबी हटाव’ नावाचे स्वप्न लोकांना दाखवले. लोक त्याच्या आहारी गेले. कारण तेव्हा देश आजच्या इतका प्रगत नव्हता, की सुखवस्तू झालेला नव्हता. दोन वेळच्या अन्नाला दाही दिशा वाडगा घेऊन फ़िरावे लागणारी मोठी लोकसंख्या देशात होती. तिच्यासाठी स्वातंत्र्यापेक्षाही गरीबी हटवणे हे सर्वात मोठे स्वप्न होते. इंदिराजींनी अवघ्या दोन शब्दात लोकांच्या मनाला गवसणी घातली आणि मग ते साध्य करण्यासाठी इंदिराजींना हवे असलेले अधिकार, त्यांच्या डोक्यातील कल्पना, योजना हेच लोकांचेही सामुदायिक स्वप्न होऊन गेले. थोडक्यात त्या दोन शब्दातून इंदिराजी जनमानसाच्या इच्छाआकांक्षांवर स्वार होऊन गेल्या. अल्पावधीत कॉग्रेस पक्षाच्या बहूमतावर चालणार्‍या पंतप्रधान राहिल्या नाहीत. त्या राष्ट्रीय नेता होऊन गेल्या. 

   सामान्य माणुस गांजलेला असतो. दोन वेळच्या पोटाच्या आगीला विझवताना त्याचे आयुष्य पणाला लागलेले असते. अशावेळी त्यात दिलासा देणारे शब्द कोणी बोलला, तरी त्याला अर्धे कष्ट कमी झाले असे उगाच वाटत असते. इंदिराजींच्या त्या घोषणेने व पुढल्या राजकारणाने गरीबी खरेच किती हटली वा लोकांचे जीवन किती सुसह्य होऊ शकले; हा संशोधनाचा विषय होऊ शकेल. पण नुसती आशा वा स्वप्न दाखवणाराही लोकांना आवडत असतो. राजकारणात असा अशक्यप्राय स्वप्ने दाखवणारा माणूस म्हणूनच लोकांना खुप आवडतो. आणि राजकारणातच कशाला, अगदी व्यवहारी जीवनातही फ़सव्या योजना कल्पना लोकांना हव्याच असतात. अलिकडेच बंगालच्या खेड्यापाड्य़ात रक्कम दुप्पट चौपट करून देणार्‍या चिटफ़ंडाचे प्रकरण चव्हाट्यावर आलेले आहे. देशातले तसे ते पहिलेच प्रकरण नाही. कित्येक वर्षे व विविध राज्यात नेहमीच अशी बनवेगिरीची प्रकरणे उघड होत असतात. पण त्यात फ़सणार्‍यांची संख्या कमी झाली आहे काय? नवा कोणी स्वप्ने दाखवणारा पुढे येतो आणि आपली घाम गाळून केलेली कष्टाची कमाई लोक जुगारासारखी त्याच्या घशात टाकून मोकळे होतात. ते लोक मुर्ख नसतात. ते सुखापेक्षा सुखाच्या कल्पनेवर भारावणारे व भुलणारे असतात. नुसती सुसह्य जीवनाची, सुखाची भ्रामक कल्पनाही लोकांना जीव ओवाळून टाकावा इतकी आवडत असते. हवीहवीशी वाटत असते. राजकीय नेत्यांच्या योजना, आश्वासने, स्वप्ने वा कल्पना त्यापेक्षा अधिक वास्तववादी असतातच असे नाही. त्या कल्पना योजना स्वप्नवत असतात. तरी व्यवहारी जरूर असतात. पण जितक्या अल्पावधीत त्या पुर्ण होण्याचे स्वप्न दाखवले जात असते; तितक्या लौकर त्या स्वप्नांची पुर्तता अशक्यच असते. पण निदान कोणी स्वप्न दाखवतो, तेच लोकांना हवे असते. वयात आलेली मुलगी जशी प्रेमात पडायला उतावळी झालेली असते, तशीच काहीशी, रंजली गांजलेली सामान्य जनता नेहमी स्वप्ने दाखवणार्‍याच्या शोधात असते. त्यात पुन्हा आधीच कोणी तिची फ़सगत केलेली असेल, तर तीच जनता नव्या स्वप्नांच्या सौदागराची अधिक उतावळेपणाने प्रतिक्षा करीत असते. त्यालाच जनतेच्या, लोकांच्या आशाआकांक्षा म्हणतात. ते जनमानस ओळखून व्यवहार्य वाटतील असे विचार, भूमिका, योजना वा कल्पना लोकांसमोर माडू शकणारा व त्यांचा विश्वास संपादन करू शकणाराच नेता होऊ शकत असतो. (अपुर्ण)
 आज सुद्धा आपण त्याचा पडताळा घेऊ शकतो. लाचलुचपत विरोधी कायदा अस्तित्वात आहे. त्याखेरीज लोकायुक्त आहेत. विविध भ्रष्टाचार विरोधी कायदे कार्यरत आहेत. त्याखेरीज सरकारच्या आवाक्यात नसलेली कॅग नावाची स्वतंत्र यंत्रणा व न्यायालये आहेत. त्यातून किती काय साध्य झाले? नुसत्याच कायद्याने भ्रष्टाचार रोखला जाऊ शकत नाही, हाच सहा दशकांचा तीन पिढ्यांचा अनुभव आहे. पण लोकपाल कायद्यासाठी झालेल्या आंदोलनाला कसा जबरदस्त प्रतिसाद मिळाला? हा कायदा झाला, तर आपल्याला भ्रष्ट प्रशासन व कारभारातून मुक्ती मिळेल अशी आशा देशातल्या करोडो लोकांना भुलवू शकली ना? तो कायदा होईल वा नाही, याविषयी लोक साशंकच होते. पण निदान कोणी ते ठासून सांगतोय व त्याच्या आवाजाने सरकारला घाम फ़ुटला; हे बघूनच लोक किती सुखावले होते? वास्तवाचा आणि स्वप्नांचा किमान संबंध असतो. पण गांजलेल्या लोकांना तो कल्पनेतला दिलासाही खुप हवाहवासा वाटत असतो. कल्पना जितक्या मोठ्या लोकसंख्येच्या मनाला भुरळ घालू शकेल; तेवढे अधिक व्यापक लोकसंख्येचे नेतृत्व उदयास येत असते. मात्र त्याचीही एक अट असते. त्या लोकांचा स्वप्नाविषयी भ्रमनिरास होऊ दिला जात नाही, तोवरच असे नेतृत्व टिकाव धरू शकते. लोकांचा भ्रमनिरास होणारे वास्तव लोकांना अजिबात आवडत नाही. म्हणूनच नेत्यांना नेहमी वास्तव आणि स्वप्न यांच्या मध्यंतरी लोकांना झुलवत ठेवायला जमले पाहिजे. स्वप्नपुर्तीच्या जवळ जाऊन पोहोचण्याची गरज नसते, पण आपण जवळ पोहोचत आहोत, अशा आशेवर ठेवण्याची कला नेत्याला साधली पाहिजे. तितके त्याचे नेतृत्व शाश्वत असू शकते, दिर्घकालीन टिकू शकते. जनमानसावर हुकूमत गाजवू शकते. हे जनमानस अत्यंत चंचल गोष्ट असते. विद्वान, बुद्धीमान लोकांची संख्या कुठेही कधीही अत्यल्प असते. त्यामुळेच असे लोक नेहमी सर्व नेत्यांच्या कल्पना वा योजनांमधले दोष दाखवत असतात. त्यांनी दाखवलेले दोष जनतेला पटण्यापेक्षाही नेत्याच्या स्वप्नांत जनतेला वास्तव दाखवण्याची व पटवण्याची कुवत ही नेत्याची सर्वात मोठी ताकद असते. त्यावरच त्याच्या नेतृत्वाची व्याप्ती अवलंबून असते. थोडक्यात नेता होणार्‍याला जनमानसाच्या कल्पनाशक्तीवर स्वार होता येणे; ही नेतृत्वाची पहिली अट असते.
        पंडित नेहरू वा इंदिरा गांधी यांनी देशातल्या बहूसंख्य जनतेला तशी स्वप्ने दाखवली आणि दिर्घकाळ जनमानसावर निरंकुश राज्य केले. त्याचाच परिणाम म्हणून मग त्यांना देशावर दिर्घकाळ सत्ता गाजवता आली. त्याचा दिर्घकालीन परिणाम असा, की आज एक नेहरूनिष्ठ विचारवंतांची पिढीच तयार झाली आहे आणि नेहरू व इंदिराजी यांचे वारसही त्याच पुण्याईवर सत्ता उपभोगू शकत आहेत. पण हे त्यांनी कसे साधले? नेहरू खरेच स्वप्नाळू होते. इतके स्वप्नाळू होते, की त्यांचा वास्तवाशी बहुतांशी संबंध नव्हता. त्यामुळेच त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात योजलेल्या कल्पना व धोरणांना वास्तवाचा आधार कमीच होता. पाश्चात्य देशांच्या औद्योगिक क्रांतीने भारावलेले व त्याच औद्योगिक क्रांतीतून उदयास आलेल्या समाजवादाच्या विचारसरणीत आकंठ बुडालेल्या नेहरूंना; आपला देश शेतीप्रधान असल्याचे अजिबात भान नव्हते. त्यामुळेच त्यांच्या कारकिर्दीत अपुरी औद्योगिक प्रगती व आबाळ झालेली शेती यातून उपासमारी व दुष्काळाच्या गर्तेत भारताला कोसळावे लागले. त्यामुळे त्यांचा जनमानसावरील प्रभाव अंतर्धान पावत गेला होता. त्यातच चिनी आक्रमणात भारताचा दारूण पराभव झाल्याचे नेहरू व्यक्तीश: खचून गेले होते. अशा स्थितीत त्यांच्यानंतर आलेल्या लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कर्तृत्वाचा जनमानसावर चांगला ठसा उमटवला होता. तेव्हा कॉग्रेस पक्षाला नेहरू घराण्याच्या वारसावरच विसंबून रहाण्याची रोगबाधा झालेली नव्हती. म्हणूनच शास्त्रींच्या सरकारमध्ये इंदिरा गांधी नमोवाणीमंत्री म्हणून सहभागी झाल्या. त्यातून त्यांना प्रशासकीय कामाचा अनुभव घेता आला. त्यात त्यांना कमीपणा वाटला नव्हता. आज राहुल गांधी थेट पंतप्रधान व्हायला निघाले आहेत. त्यांना मनमोहन सिंग सरकारमध्ये सहभागी होणे कमीपणाचे वाटते, असाच त्याचा अर्थ आहे. कदाचित त्यांच्या पक्षातल्या नेत्यांनाही तेच मंजूर असावे. सांगायचा मुद्दा इतकाच, की कॉग्रेसमध्ये नेहरूंच्या विचारांचा प्रभाव असला तरी सामुहिक नेतृत्वाचा प्रभाव होता. पुढे इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या, तरी त्या नेहरूकन्या म्हणून त्या पदावर पोहोचल्या. पण पित्याच्या पुण्याईवर त्यांनी पक्षाला आपले नेतृत्व स्विकारायला भाग पाडलेले नव्हते. पक्षात त्यांनाही आव्हान देणारे अनेक नेते होते. कारण इंदिराजींनी आपले सार्वभौम नेतृत्व सिद्ध केलेले नव्हते.
         अर्थात सरकारमध्ये सहभागी होण्यापुर्वी किंवा पंतप्रधान होण्यापुर्वीही इंदिराजी पक्षात महत्वपुर्ण भूमिका बजावत होत्या. त्यांनी कॉग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते आणि काही महत्वपुर्ण निर्णय पक्षाच्या वतीने घेतले होते. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन त्याच काळातले होते. त्यात इंदिराजी कॉग्रेसच्या अध्यक्षा म्हणून मराठी मागणीच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. त्यामुळेच नेहरूंना महाराष्ट्र राज्य द्यावे लागले; ही वस्तुस्थिती आहे. पण तितकाच मोठा धाडसी राजकीय जुगार इंदिरा गांधी पक्षाध्यक्ष म्हणून खेळल्याचे फ़ार थोड्या लोकांना आठवत असेल. केरळमध्ये तेव्हा जगातले पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले कम्युनिस्ट सरकार सत्तेवर होते. इ. एम. एस नंबुद्रीपाद हे जगातले पहिले कम्युनिस्ट मुख्यमंत्री असे होते, की जे निवडणुकीच्या मार्गाने सत्ताधीश झाले होते. कॉग्रेसला स्वातंत्र्योत्तर काळात पहिला दणका देणार्‍यात, त्या सरकारचा व राज्याचा समावेश होतो. तर तिथे राज्यपालाच्या अधिकाराचा वापर करून सत्तापालट घडवण्याचा जुगार इंदिराजी खेळल्या होत्या. राज्यपालांना वापरून तेव्हा नंबुद्रीपाद सरकार बडतर्फ़ करण्यात आले

मोदी सरकार याला अपवाद नाहीत

 मोदी सरकार त्याला अपवाद नाही. 

         मोदी सरकारला शनिवारी वर्ष झाले, ते लोकसभा निवडणूकीच्या निकालांचे. गेल्या वर्षी रविवारी भल्या सकाळपासून मतमोजणीला आरंभ झाला होता आणि सूर्य दुपारी माध्यान्हीला येईपर्यंत देशात सत्तांतर झाल्याची बातमी खेड्यापाड्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. तसे बघितल्यास सकाळची कोवळी उभे तापू लागण्यापुर्वीच युपीएचे कॉग्रेसप्रणित सरकार संपले, याची खात्री लोकांना पटलेली होती. विषय इतकाच शिल्लक होता, की मोदी व भाजपाप्रणित एनडीए नामक आघाडीला आपल्या बळावर सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा पल्ला गाठता येईल किंवा नाही. पण सूर्य जसा डोक्यावर येत गेला, तसतसे चित्र स्पष्ट होत गेले आणि मोदींना मित्रपक्षांसह बहुमताची मजल मारणे शक्य असल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. पण सूर्य मावळला, तोपर्यंत देशातला तीन दशकातला मोठा चमत्कार घडला होता. इंदिरा हत्येनंतर प्रथमच लोकसभा मतदानाने देशात एकाच पक्षाला बहुमतापर्यंत नेऊन ठेवले होते आणि त्यापेक्षाही मोठा चमत्कार म्हणजे एकाच विचाराचा बिगर कॉग्रेस पक्ष देशात बहुमतापर्यंत जाऊन पोहोचला होता. अर्थात तशी कुठल्या राजकीय अभ्यासक विचारवंताचीही अपेक्षा नव्हती. म्हणूनच ते निकाल धक्कादायक होते. त्याचप्रमाणे मोदी प्रचारात बोलत होते, तोही चमत्कार घडून गेला होता. मतदाराने खरेच कॉग्रेसमुक्त भारताचा पाया निकालातून घातला होता. कॉग्रेस पक्षाने फ़क्त सत्ता गमावलेली नव्हती, तर विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळावी इतक्याही जागा त्या पक्षाला मतदाराने दिलेल्या नव्हत्या. इतिहासात कधी नव्हे इतकी कॉग्रेस पक्षाची नामुष्की या निकालांनी घडवून आणली होती. म्हणूनच मग प्रत्यक्ष नवे सरकार आलेले नसले, तरी सत्तांतर झाले असेच मानले गेले आणि एक वर्षानंतरही त्या १६ मे रोजी मोदी सरकारला वर्ष पुर्ण झाल्यासारखी चर्चा सुरू झाली आहे.

वास्तविक जेव्हा लोकसभा निकाल लागले, तेव्हा नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि मतमोजणी संपून निकाल समोर येईपर्यंत ते गुजरातमध्येच होते. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत हा सत्तांतर घडवणारा नेता नव्हताच. त्यांनी विजयाचा पहिला उत्सवही गुजरातमध्ये अहमदाबादेत साजरा केला. मग निकालाच्या दुसर्‍या दिवशी मोदी विजयीवीराच्या थाटात राजधानी दिल्लीत पोहोचले. इतिहासात एखादे नवे राज्य पादाक्रांत करणारा विजयीवीर जसा राजधानीत प्रवेश करतो, तसे सोमवारी नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीत आले होते आणि विमानतळापासून पक्षाच्या मुख्यालयात येणार्‍या त्यांच्या लव्याजम्याच्या स्वागताला दुतर्फ़ा लोकांची गर्दी झालेली होती. तिथे त्यांच्या पक्षाच्या बैठकी होऊन पुढे नव्या पंतप्रधानाची निवड करण्यापर्यंत बर्‍याच औपचारिक गोष्टी बाकी होत्या. त्या उरकल्यानंतर मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजिनामा देऊन नव्या जबाबदारीसाठी मोकळे व्हायचे होते. त्याखेरीज देशातले सत्तांतर पार पडणार नव्हते. म्हणूनच लोकसभेचे निकाल लागल्यापासून पुढले दहा दिवस सत्तांतराला लागले. २६ मे २०१४ रोजी मावळत्या सूर्याच्या साक्षीने राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तो सत्तांतराचा सोहळा पार पडला होता. थोडक्यात व्यवहारी पातळीवर अजून मोदी सरकारला एक वर्ष पुर्ण झालेले नाही. पण इतक्यातच एका वर्षात काय झाले, याचा ताळेबंद तपासणे सुरू झाले आहे. समाजातल्या बोलघेवड्या लोकांकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा नसते. मग ते मोदींचे समर्थक असोत किंवा विरोधक असोत. त्यांना मोदींच्या कामाची वा कारभाराशी कर्तव्य नसते. आपण ज्याला पाठींबा दिलाय किंवा विरोध केला, त्या आपल्या भूमिकेशी त्यांचे खरे नाते असते. म्हणुनच मोदींच्या यशापयशाचे गणित वास्तवाशी जुळणारे नसते, तर समर्थक विरोधकांच्या आपापल्या समजूतींशी निगडीत असते.

आताही वर्ष पुर्ण होण्याआधीच यशाचे पोवाडे किंवा आरोपांचा भडीमार सुरू झालेला आहे. काही महिन्यातच त्याची सुरूवात झालेली होती. ती पुढली पाच वर्षे थांबण्याची शक्यता नाही. त्याकडे सामान्य जनता फ़ारशी गंभीरपणे बघतही नाही. पण राजकीय अभ्यासक, विश्लेषक वा माध्यमातले जाणते यांना आपापल्या बुद्धीचे प्रदर्शन मांडण्याची खाज असते. तेव्हा कुठल्याही विषयावर आपले पांडित्य मांडण्याचा त्यांचा सोस कोणी आवरू शकत नाही. पण यांच्याखेरीज अन्य काही लोक तसेच उतावळे असतात. त्यांनाही अतिशयोक्त विरोध वा समर्थन केल्याखेरीज चैन पडत नाही. सहाजिकच मागल्या महिनाभरात ज्याप्रकारचे दावे प्रतिदावे आणि आरोप प्रत्यारोप पुढे आलेत, त्याकडे गंभीरपणे बघण्याची गरज नाही. एका खंडप्राय देशाच्या बाबतीत मोदी असोत किंवा आणखी महात्मा गांधी असोत, कुणालाही इतक्या अल्पावधीत कुठला चमत्कार घडवणे शक्य नसते. पण त्यांचे भक्त वा विरोधक यांना आपापली बाजू सरस दाखवण्यासाठी कसलेही दावे प्रतिदावे करणे भागच असते. मोदी समर्थक वा विरोधक त्याला अपवाद नाहीत. कारण त्यांना आपण लोकशाही शासनप्रणालीत जगत आहोत याचे भान नसते. म्हणूनच पाकिस्तान वा इजिप्त इथल्या बदलासारखे चमत्कार घडावेत, अशा अपेक्षा बाळगल्या जातात आणि त्या पुर्ण झाल्याचेही दावे केले जातात. इजिप्त वा पाकिस्तान या देशात सत्तांतर होते, तेव्हा प्रसंगी बेधाडक राज्यघटनाही गुंडाळून ठेवली जाते. उलट भारतात प्रत्येक बाब राज्यघटनेच्या चौकटीत कायद्याच्या कसोटीवर तपासूनच पुढले पाऊल उचलले जात असते. सहाजिकच राज्यकर्ता बदलला तरी आधीच्या सरकारचे अनेक निर्णय वा धोरणे रातोरात कचर्‍याच्या टोपलीत फ़ेकून देता येत नाहीत. सोडून देता येत नाहीत, की निकालात काढता येत नाहीत. त्याचे दुरगामी परिणाम बघून काम करावे लागते.

          २००७ सालात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणूकीत बराक ओबामा यांनी इराक युद्ध व तिथे तैनात असलेल्या अमेरिकन सेनेचा मुद्दा कळीचा बनवला होता. त्याचाच आधार घेऊन रिपब्लिकन पक्षाच्या विरोधात प्रचाराची आघाडी उघडली होती. मग ऐन रंगात प्रचार आलेला असताना ओबामा यांनी इराकमधून विनाविलंब सेना माघारी आणायची घोषणा करून टाकली होती. त्याचा लाभ त्यांना मिळाला आणि तेव्हाच नव्हेतर पुढल्याही निवडणूकीत ओबामा अध्यक्षपदी निवडून आले. त्याला आता सात वर्षाचा कालावधी उलटला असून पुढल्या वर्षी ओबामा यांची अध्यक्षपदाची आठ वर्ष संपतील. या कालावधीत इराक व अफ़गाणिस्तानातून किती अमेरिकन सेना माघारी परत गेली? त्या युद्धातून अमेरिका कितीसे अंग काढून घेऊ शकली? आजही पश्चिम आशियातून अमेरिकेला लष्करी अंग काढून घेण्याचे धोरण यशस्वी करता आलेले आहे काय? मग ओबामा खोटारडे म्हणायचे काय? पहिल्या चार वर्षात आपल्या सैनिकांना माघारी आणण्यात अपेशी ठरलेल्या ओबामांना अमेरिकन मतदाराने पुन्हा अध्यक्षपदी कशाला निवडले होते? २००७-८ सालात ओबामांनी अमेरिकन मतदाराची फ़सवणूक केली होती? सत्त्य इतकेच असते, की अशा बाबतीत रातोरात निर्णय घेता येत नाहीत वा बदलता येत नाहीत. तशी घाई केल्यास त्याचे दिर्घकालीन परिणाम भोगावे लागतात. भले आधीच्या सरकारने घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य नसतील. पण ते अंमलात आणल्याने निर्माण झालेली परिस्थिती ते निर्णय घाईगर्दीने फ़िरवल्यास त्याचे अधिकच विपरीत परिणाम देण्याची शक्यता असते. म्हणुनच अधिक नुकसान टाळण्याचा व परिणामांचा अभ्यास करून बदल योजावे लागतात. मोदी सरकार त्याला अपवाद नाही. हा निकष वापरूनच मोदी सत्तेत आल्यापासून काय झाले व किती झाले ,त्याचा ताळेबंद मांडावा लागेल. तो उतावळे विरोधक वा समर्थक मांडू शकत नाहीत. तो ताळेबंद काय आहे? 

राष्ट्रवादीचा चेहरा बदलला नाही.

    राष्ट्रवादीचा चेहरा किंचितही बदलला नाही.

 कॉग्रेस वा भाजपा यांचा प्रदेशाध्यक्ष राज्यातला पक्ष संभाळतो, तशी राष्ट्रवादी पक्षाची स्थिती नाही. अन्य पक्षात जितके अधिकार प्रदेशाध्यक्षाला असतात, तितके राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षाला असत नाहीत. शरद पवार यांना राज्याचा प्रादेशिक नेता म्हणवून घ्यायचे नाही, म्हणून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतात. सहाजिकच कोणाला तरी नामधारी म्हणून प्रदेशाध्यक्ष नेमावा लागतो. तटकरे यांचे स्थान त्यपेक्षा मोठे वा निर्णायक नाही. शिवाय माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आहेतच. त्यांच्या इच्छेशिवाय राज्यातील पक्षाला कुठले निर्णय घेता येत नाहीत. त्यांची इच्छा प्रमाण मानूनच राष्ट्रवादी पक्ष चालत असतो. ही वास्तविकता असताना तटकरे यांनी नवी नेमणूक वा फ़ेरनिवड झाल्यावर जी घोषणा केली आहे, ती बुचकळ्यात टाकणारी आहे. येत्या काळात राज्यातील राष्ट्रवादीचा चेहरामोहरा बदलणार असल्याची भाषा त्यांनी केलेली आहे. त्याचा अर्थ त्यांना तरी कितपत उमगला आहे, अशी शंका येते. कारण मागल्या सोळा वर्षात पक्षाचा चेहरा कायम शरद पवार हाच राहिला आहे आणि त्याखेरीज अन्य दोन चेहरे कधीच अस्तंगत झाले आहेत. १९९९ सालात सोनिया गांधींना परकीय ठरवून पवार साहेब कॉग्रेसमधून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्यासोबत तारिक अन्वर आणि पुर्णो संगमा असे दोन चेहरे होते. आता अधूनमधून तारीक अन्वर दिल्लीत पवारांच्या सोबत दिसतात आणि महाराष्ट्रात तर अजितदादा व सुप्रिया सुळे वगळता पक्षाचा दुसरा चेहरा कोणी मागल्या दिड दशकात बघितलेलाच नाही. मग चेहरामोहरा बदलणार म्हणजे काय?

       अर्थात पक्ष म्हणजे नेता नसून संघटना असते, असे खुलासा म्हणून सांगितले जाईल. पण राष्ट्रवादी कॉग्रेस म्हणून जो पक्ष ओळखला जातो, त्यात कार्यकर्ते कधी व कोणते होते? तिथे व्यक्तीनिष्ठेला पक्षनिष्ठा मानले व समजले गेले आहे. ज्यांची पवार साहेबांवर निष्ठा असेल, त्यालाच राष्ट्रवादीमध्ये स्थान असते. कारण शरद पवार हाच पक्षाचा चेहरा राहिलेला आहे. बाकीचे सोयीनुसार वापरायचे मोहरे असतात, हे आजवरच्या पवारनितीने सिद्धच केलेले आहे. मग तटकरे म्हणतात, त्यातला चेहरा बद्लणार आहेत, की मोहरा बदलणार आहेत? गेल्याच लोकसभा विधानसभा निवडणूकीचा काळ घ्या. किती मोहरे इथून तिथे गेले? कोकणातले उदय सामंत किंवा केसरकर हे मोहरे शिवसेनेत गेले आणि कितीजण भाजपातही गेले? पण त्यामुळे राष्ट्रवादीचा चेहरा किंचितही बदलला नाही. पण जसजसे राजकारण उलगडत गेले, तसा खुद्द पवार साहेबांचा ‘मोहरा’ बदलत गेलेला महाराष्ट्राने बघितला. लोकसभेपासून विधानसभेच्या प्रचारात पवारसाहेब सातत्याने भाजपाची अर्धी चड्डीवाले म्हणून टवाळी करीत राहिले आणि अर्ध्या चड्डीकडे राज्याचा कारभार सोपवणार काय, असा सवाल मतदाराला विचारीत राहिले. पण अखेरच्या क्षणी मतमोजणीतून निकाल स्पष्ट होताना त्यांनीच घाईगर्दीने राज्याचा कारभार अर्ध्या चड्डीकडे सोपवण्याचा उतावळेपणा केला. मात्र त्याचा फ़ारसा उपयोग झाला नाही. कारण राष्ट्रवादीची बाहेरून पाठींबा देण्याची ‘अर्धवट चड्डी’ परिधान करण्यातून अब्रु झाकली जात नाही, हे विनाविलंब मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्या लक्षात आले. त्यांनी ‘आवाजी’ घोषणेनेच तो पाठींबा नाकारला. म्हणजेच पवारांचा तो मोहरा वाया गेला. मात्र काहीही व कसेही घडले तरी राष्ट्रवादीचा चेहरा कायम राहिला आहे. मोहरे सातत्याने बदलत राहिले आहेत. म्हणूनच चेहरामोहरा बदलणार म्हणजे काय ते लक्षात येत नाही.

अर्थात या शंका विचारल्या जाणार याची तटकरेंना कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी शंकेपुर्वीच खुलासाही केला आहे. चेहरामोहरा म्हणजे पवारांचा चेहरा काढून दुसरा चेहरा आणायचा त्यांचा मानस नाही. तर केडरबेस्ड पक्ष बनवण्याचा त्यांचा विचार आहे. केडरबेस्ड म्हणजे कार्यकर्ता अधिष्ठीत संघटनेचा पक्ष असा अर्थ होतो. म्हणजे आजवर जो काही पक्ष म्हणून निवडणुका लढवत होता किंवा सत्ता उपभोगत होता, तो राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ताविहीन होता, याची कबुली तटकरे यांनी दिली आहे काय? असा सवाल विचारण्याचेही कारण आहे. दिडदोन महिन्यापुर्वीच एका मेळाव्यात खुद्द पवारसाहेबांनीच शिवसेनेसारखे संघटन असायला हवे, अशी ग्वाही दिलेली होती. त्यात शिवसैनिक पोलिस ठाण्यात गेल्यास अधिकारी तात्काळ त्याची दखल घेतात. उलट आपला कोणी गेल्यास ढूंकून बघितले जात नाही, असेही सांगितले होते. तेव्हा साहेबांनी पक्षात आक्रमक, लढावू वा तळमळीच्या कार्यकर्त्यांची वानवा असल्याचीच कबुली दिलेली होती. मग प्रश्न असा उरतो, की पंधरासोळा वर्षे जो पक्ष चालला होता, त्यात होते कोण? ते काय करत होते? निवडणूकीचे इच्छुक व ठेकेदारीचे आशाळभूत एकत्र येऊन जमाव तयार झाला, त्यालाच राष्ट्रवादी पक्ष असे लेबल लावून कारभार चालू होता काय? पंधरा वर्षे सत्ता भोगताना कुणाला कार्यकर्त्याची गरज भासली नाही आणि निवडणूकीत दारूण पराभव वाट्याला आल्यावर केडरबेस्ड पक्षाची गरज वाटू लागली काय? त्यासाठी चेहरामोहरा बदलण्याची इच्छा झाली आहे काय? तटकरे यांना अशा प्रश्नांची उत्तरे गंभीरपणे शोधणे आवश्यक आहे. लोकसभा आणि विधानसभेतच नव्हेतर साखर कारखान्याच्या सहकारी राजकारणातही मतदार दुरावत गेला. त्यामागच्या गंभीर कारणाची मिमांसा करावी लागेल. कारण ह्या पराभवाला मुख्यत: तोच कार्यकर्ता कारणीभूत झाला, जो पक्षापासून दुरावत गेला होता.

       चेहरामोहरा बदलायचा तर खेड्यापाड्यापर्यंत राष्ट्रवादी म्हणून जी गर्दी जमा झाली आहे व कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मिरवते आहे, त्यांचीच झाडाझडती घ्यावी लागेल. कारण खर्‍या कष्टाळू व निष्ठावान कार्यकर्त्याला पक्षात येण्याचे मार्ग अशा मतलबी लोकांनी अडवून धरलेले असतात. मागल्या पंधरा वर्षात सत्तालोभी लोकांनी राष्ट्रवादी पक्षात इतकी गर्दी केली, की खर्‍या कार्यकर्त्याला तिथे स्थानच राहिले नव्हते. पक्षाचे चेहरे म्हणून जे कोणी मोजके नेते असायचे, त्यांच्या भोवती अशाच लोभी मतलबी लोकांचा गराडा पडलेला असायचा. सहाजिकच खर्‍या सामान्य कार्यकर्त्याला नेतृत्वापर्यंत जाण्याची सोयच उरलेली नव्हती. खेड्यापाड्यातल्या किरकोळ कामाचे वा मोठ्या टेंडर्सचे ठेकदार व त्यांचे बगलबच्चे दलाल, शुभ्र वस्त्रे परिधान करून कार्यकर्ता स्थानिक नेता म्हणून मिरवू लागले. त्यांच्या पैसा व दहशतीखाली गरीब सामान्य जनतेची मुस्कटदाबी होत राहिली. त्यांनीच मग राष्ट्रवादीला लागोपाठच्या मतदानात आपला हिसका दाखवलेला आहे. खरा कार्यकर्ता निराश व वैफ़ल्यग्रस्त होतो, तेव्हा ही स्थिती येते. एकेकाळी सामान्य कार्यकर्त्याला नावाने ओळखणारे व हाका मारून जवळ घेणारे राज्याचे संवेदनशील नेते, म्हणून पवारांचा उदय झाला होता. पण गेल्या काही वर्षात त्यालाच तडा गेला. चंद्रकांत तावरे यासारखे बुरूज संभाळणारेच दुरावत गेले. चेहरा कायम राहिला आणि मोहरे मात्र उध्वस्त होत गेल्याने ही दयनीय अवस्था झालेली आहे. तटकरे यांना ते ठाऊक नसेल असे अजिबात नाही. म्हणूनच त्यांनी चेहरामोहरा बदलण्याची भाषा वापरली असेल, तर त्यासाठी ठाम पावले उचलावी लागतील आणि चेहरे बाजूला ठेवून मोहर्‍यांची जोपासना नव्याने करावी लागेल. तरच केडरबेस्ड पक्षाची उभारणी शक्य आहे. पवारसाहेबांच्या चेहर्‍याचे मोठे फ़लक झळकवित फ़्लेक्सवरची मोहरे बनून बसलेली प्यादी कठोरपणे बाजूला करावी लागतील.

Friday 21 August 2015

काँग्रेस मवाळ हिंदुत्वाच्या वाटेवर...!

 कॉंग्रेस मवाळ हिंदुत्ववादाच्या मार्गावर
     

 कॉंग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहूल गांधी यांनी पदयात्रा करत  केदारेश्‍वर मंदिरात दर्शन घेतले. अलीकडच्या काळात कॉंग्रेसची गलीतगात्र अवस्था झालेली आहे. या पार्श्‍वभुमीवर आजवर सहसा आपल्या धार्मिक भावनांचे प्रदर्शन करणार्‍या राहूल यांचा हा पवित्रा कुठे तरी कॉंग्रेसच्या गतकालीन चुकांना सुधारण्यासह आगामी वाटचालीशी जुळलेला वाटतोय. यातून कॉंग्रेस मवाळ हिंदुत्ववादाच्या मार्गावर तर नाही ना? हा प्रश्‍नदेखील उपस्थित होत आहे.
        इतिहासात अनेक घटनांची पुनरावृत्ती होत असते. या अनुषंगाने भारतीय राजकारणातील धर्माचे स्थान वेळोवेळी अधोरेखित झाले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हेदेखील अत्यंत श्रध्दाळू हिंदू होते. मात्र त्यांचे हिंदुत्व हे मवाळ आणि सर्वसमावेशक होते. यात अन्य धर्मियांच्या तिरस्काराला थारा नव्हता. याऊलट प्रथम पंतप्रधान नेहरू हे खासगी आणि सार्वजनिक आयुष्यात कट्टर निधर्मी होते. नेहरूंचे अनेक सहकारी उजव्या विचारधारेचे होते. यात प्रामुख्याने त्यांचे निकटचे सहकारी सरदार पटेल, प्रथम राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांचा खास उल्लेख करावा लागेल. मात्र नेहरूंनी आपल्या कार्यकाळात सेक्युलर विचारांचे पालन केले. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पटेलांच्या पुढाकाराने होणार्‍या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणात सरकारी पैसा आणि संसाधनांचा वापर करू नये असे निर्देश त्यांनी दिले होते. राजेंद्रप्रसाद यांनी याचे उदघाटन करण्यासही त्यांचा विरोध होता. अर्थात हा विरोध डावलून राजेंद्रप्रसाद यांनी सोमनाथ मंदिरात पुजा अर्चा केली. ‘‘भारत हे निधर्मी राष्ट्र असले तरी नास्तिक नाही’’ असे वक्तव्यदेखील त्यांनी याप्रसंगी केले होते. इंदिरा गांधी यांनी धार्मिक भावनांचा राजकारणात खुबीने उपयोग करण्यास प्रारंभ केला. आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसच्या पराभवामागे नसबंदीसारख्या योजनांमधील सक्ती कारणीभुत असल्याचे दिसून आले होते. परिणामी यानंतर इंदिरा गांधी यांच्या वर्तनात काही प्रमाणात तरी हिंदुत्व दिसू लागले होते. पंजाबच्या राजकारणातील अकाली दलाचे वर्चस्व संपविण्यासाठी त्यांनी भिंद्रनवाले नावाच्या भस्मासुराला खतपाणी घातले. अर्थात यातूनच ‘ऑपरेशन ब्ल्युस्टार’ घडले. यातून हिंदू विरूध्द शीख असा नवीन संघर्ष सुरू झाला. यातूनच इंदिराजींनी हत्या झाल्यानंतर याचा सर्व राग शिख समुदायावर निघाला. राजीव गांधी यांनीही या उन्मादाचे सुचक समर्थन केले होते. यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला विक्रमी यश मिळाले. यामागे ‘हिंदू’ इंदिराजींच्या शिखांकडून झालेल्या हत्येमुळे आलेली सहानुभुतीची किनार होती. याच निवडणुकीत अमेठी मतदारसंघात राजीव गांधी यांच्या विरोधात त्यांची भावजय अर्थात मनेका गांधी या उभ्या होत्या. यावेळी त्या शिख असण्यावरून विखारी घोषणा देण्यात आल्या होत्या. राजीवजींना विक्रमी बहुमत मिळाले तरी काही काळातच त्यांच्यासमोर आव्हाने उभी राहिली. यातून त्यांचे दोन निर्णय भारतीय राजकारणाला नवीन दिशा देणारे ठरले.
१९८५-८६ साली शाहबानो प्रकरण गाजले. शाहबानो ही इंदूर येथे राहणारी पाच मुलांची माता होती. तिच्या पतीने मुस्लीम धर्मानुसार १९७८ साली तिला तलाक दिला होता. यावेळी तिचे वय ६२ वर्षे होते. घटस्फोटानंतर उपजिविकेचे कोणतेही साधन नसल्याने या महिलेने आपल्याला पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात दाद मागितली. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जातांना सात वर्षांचा कालावधी उलटला होता. सुप्रीम कोर्टाने शाहबानोला पोटगी देण्याचा निकाल दिला. खरं पाहता कुणी दखल घेऊ नये असा हा सर्वसाधारण खटला होता. मात्र मुस्लीम समुदायासाठी स्वतंत्र कायदा असतांना सर्वोच्च न्यायालयास यात ढवळाढवळ करण्याचा निर्णय नसल्याचा आरोप या समुदायातून झाला. मुस्लीम धर्मगुरू यावरून संतप्त झाले. हे प्रकरण प्रचंड चिघळले. सरकारवर या समुदायातून दबाव आला. यातून राजीव सरकारने चक्क या कलमात पोटदुरूस्ती करण्यासाठी स्वतंत्र विधेयक मंजूर केले. परिणामी एखाद्या समुहासमोर सरकार झुकू शकते हे देशवासियांना दिसले. याची हिंदू समुहातून भयंकर प्रतिक्रिया उमटली. राजीव सरकार हे अल्पसंख्यांकांचे हितकर्ते असल्याचा आरोप करत हिंदू संघटना आक्रमक झाल्या. यातून समान नागरी कायद्याच्या मागणीलाही बळ मिळाले. शाहबानो प्रकरणाने सावध झालेल्या राजीव गांधी यांनी हिंदू धर्मियांचा क्रोध कमी करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचे कुलूप उघडण्याचा निर्णय घेतला. खर तर न्यायालयाने याबाबत निकाल दिला असला तरी यामागे तत्कालीन सरकारची अनुकुलता असल्याचे उघड होते. या माध्यमातून आपण हिंदू मतदारांना खुश करू असा राजीवजींचा समज होता. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी कॉंग्रेसचा प्रचार अयोध्येपासून जवळच असलेल्या फैजाबादमधून केला ही बाबही या दृष्टीने सुचक अशीच होती. अर्थात घडले भलतेच! कॉंग्रेसला याचा काडीचाही लाभ झाला नाही मात्र त्या कालखंडात जनाधारासाठी चाचपडत असणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या हाती ब्रह्मास्त्र लागले. भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेने देश ढवळून निघाला. १९९१ साली सत्तेवर आलेल्या नरसिंहा राव सरकारनेही हिंदुत्ववादाविषयी मवाळ भुमिका घेतली. बाबरी मशिदीच्या पतनात राव सरकारची अक्रियता कारणीभुत असल्याचा आरोप सातत्याने होतो तो उगीच नव्हे. हिंदुत्वाच्या राजकारणातून पुढे भाजपने पाच वर्षांची सत्ता उपभोगली. मात्र अतिआत्मविश्‍वासाने त्यांचा घात केला.
२००४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कॉंग्रेससह देशातील बरेचसे राजकीय पक्ष भाजप विरोध या मुद्यावर एकत्र आले आणि कॉंग्रेसला पुन्हा दोन पंचवार्षिकमध्ये सत्ता मिळाली. एव्हाना हिंदुत्वाची लाट ओसरल्याचे मानत कॉंग्रेसने अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचे दुसरे टोक गाठले. यातून खुद्द राहूल गांधी आणि त्यांचे बोलभांड सहकारी दिग्विजय सिंह यांनी ‘लष्करे-तोयबा’ पेक्षा भगवा दहशतवाद घातक असल्याची मुक्ताफळे उधळली. याचीच री अनेक नेत्यांनी ओढली. परिणामी सोनिया गांधी यांच्या इशार्‍यांवर चालणारे डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार हिंदुविरोधी असल्याचा छुपा संदेश देशभरात गेला. इकडे कॉंग्रेस नेते सावरायला तयार नव्हते. डॉ. सिंग यांनी ‘‘देशातील संसाधनांवर अल्पसंख्यांकांचाच पहिला हक्क’’ असल्याचे सांगितले. सोनियांच्या भोवती असणारी अहमद पटेल, गुलाम नबी आझाद, ए.के. अँथनी, ऑस्कर फर्नांडीस, मार्गरेट अल्वा आदी नेतेमंडळी तसेच पंतप्रधान व उपराष्ट्रपद भुषविणारे अल्पसंख्यांक मान्यवर आणि कॉंग्रेसची उघड हिंदुविरोधी भुमिका या सर्व बाबींचा ‘अंडरकरंट’ भाजप व संघ परिवाराने ओळखला. यातच ‘युपीए-२’ सरकार विविध घोटाळ्यांनी बदनाम झालेले होतेच. यामुळे प्रखर हिंदुत्ववादी म्हणून ओळखल्या जाणारे तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपने विकासाचा मुखवटा लावून मैदानात उतरवले आणि यानंतर काय झाले ते आपल्यासमोर आहेच.
       २०१४च्या लोकसभा निवडणुकीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या इलेक्शनने भारतातील जातीचे राजकारण हे धर्मावर आणून ठेवले. आजवर ‘व्होट बँक’ ही अल्पसंख्यांक समुहाचीच असते असा समज होता. मात्र इतिहासात प्रथमच हिंदू व्होटबँकची ताकद देशव्यापी पातळीवर दिसली आणि कॉंग्रेस पक्ष भुईसपाट झाला. लोकसभा निवडणुकीआधी भाजपने उत्तरप्रदेशातील धार्मिक तणावाचा पुरेपुर वापर करून घेतला. या राज्यातल्या मुजफ्फरपुरसह परिसरात झालेल्या भीषण दंगलींमुळे हिंदुंच्या एकगठ्ठा मतांचे ध्रुविकरण झाले. अर्थात याचा भाजपला लाभही झाला. यानंतरही भाजपचा विजयरथ दिल्लीचा अपवाद वगळता सुरूच आहे. दरम्यान कॉंग्रेसने महाराष्ट्र आणि हरियाणातील सत्ता गमावली आहे. चैतन्याचे वारे संचारलेला भाजप, दिल्लीतील विजयाने उत्साह दुणावलेला आम आदमी पक्ष तसेच जनता परिवाराचे होत असलेले एकीकरण या पार्श्‍वभुमीवर कॉंग्रेस पक्षात काही दिवसांपुर्वीपर्यंत मरगळ कायम होती. मोदी सरकारच्या भुमी अधिग्रहण विधेयकाने या पक्षाला नवीन मुद्दा दिला. यावरून संसदेत आणि संसदेबाहेर कॉंग्रेसने भाजपची कोंडी केली हे नाकारता येत नाही. विशेषत: आपल्या गुढ सुटीवरून परतलेले राहूल गांधी यांनी विविध मुद्यांवरून भाजपवर हल्लाबोल सुरू केला आहे. यामुळे राजकीय निरिक्षकांसह सर्वसामान्य लोक चकीत झालेले असतांनाच त्यांनी केदारनाथची यात्रा करून आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी आपण परमेश्‍वराजवळ काहीही मागितले नसले तरी यामुळे आपल्याला प्रचंड उर्जा मिळाल्याचे सांगितले. उत्तराखंडमध्ये आलेल्या जलप्रलयातील मृतांना श्रध्दांजली देण्यासही आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात एखाद्या दुर्घटनेनंतर दोन वर्षांनी श्रध्दांजली अर्पण करणे हा भंपकपणाच आहे. परिणामी त्यांची ही यात्रा कॉंग्रेसचा मेकओव्हर करण्यासाठी असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
       लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीतल्या मोजक्या नेत्यांच्या चिंतन बैठकीत पक्षाच्या अल्पसंख्यांकवादी अर्थात हिंदूविरोधी भुमिकेने घात केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. माजी संरक्षण मंत्री ए.के. अँथनी यांनी जाहीरपणे हे कबुलही केले होते. या पार्श्‍वभुमीवर ही प्रतिमा पुसुन काढण्यासाठी कॉंग्रेस जाणीवपुर्वक प्रयत्न करणार हे निश्‍चित होते. राहूल गांधी यांची केदारनाथ यात्रा हे यातील पहिले पाऊल असल्याचे मानले जात आहे. खरं तर कॉंग्रेस पक्ष नेतृत्वाने आजवर धार्मिक कार्यक्रमांपासून आपल्याला अलीप्त ठेवले होते. अर्थात पक्षातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन होत असले तरी हिंदू धर्माशी संबंधीत कोणत्याही कार्यक्रमाला पध्दतशीरपणे फाटा देण्यात आलेला होता. यामुळे राहूलजी पायी चालत केदारनाथला जातात यामागे मोठा अर्थ आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या घाटावर गंगा पुजन केले होते. यानंतर नेपाळ व मॉरिशससारख्या राष्ट्रांमध्ये गेल्यानंतर तेथील मंदिरांमध्ये पुजन करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. अलीकडेच कॅनडाच्या दौर्‍यातही त्यांनी मंदिर आणि गुरूद्वारा येथे भेट दिली होती. यामुळे मोदी हे देशातील सर्वात मोठ्या धार्मिक समुहाला ‘आपले’ वाटतात. इकडे कॉंग्रेस मात्र अद्यापही अल्पसंख्यांकवादी प्रतिमेतून बाहेर पडलेला नसल्याने राहूल यांनी हा पवित्रा घेतले असे म्हणणे वावगे ठरणार नाही. अर्थात याचा भारतीय राजकारणावर व्यापक परिणाम होण्याची शक्यता आहे. मोदी हे हिंदुत्वाचे तारणहार असल्याची प्रतिमा फिकी पडू लागली आहे. विशेषत: जम्मू-काश्मिरात सत्तेसाठी पीडीपीच्या गळ्यात गळे घातल्याची बाब अनेकांना रूचलेली नाही. यातच या सरकारची अनेक धोरणे ही उद्योगपतींच्या हिताची आणि गरिबांच्या मुळावर उठणारी असल्याची भावना प्रबळ होऊ लागली आहे. भाजपने स्वप्न दाखविलेले ‘अच्छे दिन’ अद्याप आलेले नसतांना राहूल गांधी जर नर्म हिंदुत्वाचा चेहरा धारण करतील तर तो कॉंग्रेसला लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मात्र याचे तोटेदेखील आहेत.

         वास्तविक पाहता मवाळ आणि कट्टर हिंदुत्वामध्ये अत्यंत पातळ सीमारेषा आहे. अजाणतेपणाने का होईना ही रेषा ओलांडली गेल्यास अल्पसंख्य समुह नाराज होण्याचा धोकादेखील आहेच. सर्वात महत्वाची बाब म्हणजे उघड मुस्लीम हितवादी भुमिका असणारा ओवेसी बंधूंचा ‘एआयएमआयएम’ हा पक्ष देशाच्या अनेक प्रांतांमध्ये पाळेमुळे घट्ट करण्याची चाचपणी करत आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम दिसू लागला आहे. अत्यंत कट्टर विचारसरणी असणारा हा पक्ष भविष्यात उत्तप्रदेशसह अन्य महत्वाच्या राज्यांमधील अल्पसंख्यांकबहुल भागात रूजण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावेळी कॉंग्रेसकडे मवाळ हिंदुत्ववादी चेहरा असला तरी तो अल्पसंख्यांकांचे एमआयएमकडे ध्रवीकरण करणारा ठरू शकतो. एका अर्थाने कॉंग्रेसने मवाळ वा छद्म हिंदुत्ववादी रूप घेतले तरी ते लाभदायक ठरेलच याची शाश्‍वती नाही. राहूलजींचे पणजोबा नेहरू यांनी हिंदुत्वाला थारा दिला नाही. त्यांच्या आजीने याचा वेळ पडल्यावर राजकीय लाभासाठी उपयोग करून घेतला. त्यांचे वडील राजीव गांधी यांना यातून लाभ होण्याऐवजी भाजपची पायाभरणी झाली. त्यांची आई सोनिया गांधी यांनी अल्पसंख्यांकवादाचा लाभ घेतला. यामुळे आता राहूलजींकडे कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे येण्याचे संकेत मिळाले असतांना ते केदारनाथची पदयात्रा करताहेत ही बाब लक्षणीय आहे. हा या पक्षाच्या दुरगामी रणनितीचा एक भाग आहे का? याचा कॉंग्रेस आणि एकंदरीतच भारतीय राजकारणावर होणारा परिणाम काय असेल? या प्रश्‍नांची उत्तरे मात्र काळाच्या उदरातच दडलेली आहे.

विचारांच्या वारसांची राजकीय लढाई

विचारांच्या वारसाची राजकीय लढाई !

        महापुरूषांच्या विचारांना आपल्याला हव्या त्या साच्यात त्यांना ‘मोल्ड’ करण्याचे प्रकार भारतीय इतिहासात मोठ्या प्रमाणात घडले आहेत. आता याचाच पुढील अध्याय प्रतिकांच्या पळवा-पळवीच्या माध्यमातून समोर येत आहे. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार असल्याचा आव आणत आपापल्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम सध्या सुरू झाले आहे. आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी तर हे प्रकर्षाने अधोरेखित झाले आहे.
        आज देशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी होत आहे. खरं तर या जयंतीला आता वैश्‍विक परिमाण लाभत आहे. अगदी ‘गुगल’वरील ‘डुडल’सह जगाच्या विविध कोपर्‍यातील उत्सवाच्या वार्ता येत आहेत. मात्र याचसोबत व्हाटसऍपसह सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात ‘हिंदुंनो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपले आहेत‘च्या नावाने संदेश मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ झाला आहे. वास्तविक पाहता हा संदेश एका व्यापक प्रपोगंडाचाच एक भाग आहे. सोशल मीडियात याला भावनात्मक स्वरूप देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र बौध्दीक भ्रम निर्माण करत बाबासाहेबांचा वारसा ‘हायजॅक’ करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे दिसून येत आहे. यानुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणार्‍या ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायजर’ने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून विशेषांक प्रसिध्द केले आहेत. यातील पांचजन्यच्या विशेषंकाला ‘युगदृष्टा’ असे नाव देण्यात आले आहेत. यात संघाच्या अनेक विचारधारा या बाबासाहेबांच्या विचारांशी कशा सुसंगत आहेत याचीच पोपटपंची करण्यात आली आहे. संघाने बाबासाहेबांचे विचार हे आपल्या ‘सांस्कृतीक राष्ट्रवाद’ला लागू होत असल्याचा दावा केला आहे. या अंकाच्या ऑनलाईन आवृत्तीचे अवलोकन केले असता अनेक नाविन्यपुर्ण मुद्यांचा उहापोह करण्यात आला आहे. एका लेखात बाबासाहेब संस्कृतचे कसे समर्थक होते हे सांगण्यात आलेय. ते सामाजिक समरसतेचे समर्थक असल्याचेही विवेचन करण्यात आले आहे. गोळवलकर गुरूजींसारख्या संघ नेत्यांचे बाबासाहेबांबाबतचे गौरवोद्गार यात ठळकपणे देण्यात आले आहेत. सावरकरादींंसोबतच्या बाबासाहेबांच्या स्नेहाला यातून उजाळा देण्यात आलाय. काही दिवसांपुर्वी संघाने डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत असे जातीप्रथा निर्मुलन, ‘एक गाव एक विहीर’ अशा योजना हाती घेतल्या होत्या. याचसोबत इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या स्मारकाला मंजुरी देण्यात आली. यामुळे आता गोळवलकर, सावरकर, मदनमोहन मालविय, शामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय ते थेट मोहन भागवत यांचे विचार बाबासाहेबांच्या विचारांशी जुळवण्याचा हा प्रयत्न हास्यास्पद म्हणून सोडून देण्याइतका नक्कीच नाही. एका दीर्घकालीन रणनितीचा तो एक भाग असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाबासाहेबांच्या वारशासी नाते जोडण्याचा प्रयत्न केला असतांनाच कॉंग्रेसनेही त्यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीनिमित्त कार्यक्रमांच्या आयोजनाची घोषणा केली आहे. इकडे उत्तरप्रदेशात मायावती यांनीही रणशिंग फुंकले आहे. याचाच अर्थ आता बाबासाहेबांच्या विचारांबद्दल एकदम आत्मीयता दाखविण्याच्या आड त्यांचे विचार आणि त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याची मांडणी करण्यात आल्याचे अधोरेखित झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पर्यायाने भारतीय जनता पक्षाने आदिवासी समुदायांमध्ये आपली पकड घट्ट केली असली तरी अनुसुचित जातींमध्ये मात्र पक्षाचा पाया कच्चा आहे. भाजपचे विचार मनुवादी असल्याने दलित समूह भाजपपासून दोन हात दुरच राहिला असल्याचे आजवर स्पष्ट झाले आहे. म्हणायला पक्षाकडे अनेक दलित चेहरे आहेत. मात्र ते आपल्या समुदायाला प्रभावीत करतील इतके सक्षम नाहीत. अलीकडच्या काळात पक्षाला बिहारमध्ये रामविलास पासवान तर महाराष्ट्रात रामदास आठवले यांच्या रूपाने दोन मातब्बर नेत्यांची साथ मिळाली आहे. यातील पासवान हे आधीदेखील भाजपसोबत होते. ‘जिकडे सत्ता तिकडे पासवान’ असे समीकरण असल्याने भाजपला त्यांच्यावर फारसा भरवसा नाही. इकडे आठवले हेदेखील अधूनमधून भाजपला इशारे देत असल्याने पक्ष त्यांच्याबाबतही सावध आहे. यातच या दोन्ही नेत्यांना राष्ट्रीय पातळीवर मान्यतेचाही प्रश्‍न आहेच. या पार्श्‍वभुमीवर दलित नेत्यांसोबत राजकीय हातमिळवणी करत असतांना थेट या समुदायालाच आपलेसे करण्याचे जाणीवपुर्वक प्रयत्न भाजपतर्फे करण्यात येत आहेत. यानुसार बाबासाहेबांच्या विचारांशी सलगी दाखविण्याचा आटापिटा सुरू झाला आहे. आजपासूनच भाजपने बिहारमधील निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्यात ही बाब सुचक अशीच आहे.
      इकडे सध्या अत्यंत गलीतगात्र अवस्थेत असणार्‍या कॉंग्रेस पक्षानेही बाबासाहेबांच्या विचारांचे वारसदार आपणच असल्याचे दर्शविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. खरं तर या पक्षात आज नेतृत्वापासून ते तळागाळातील कार्यकर्त्यांमधील नैराश्याला दुर करण्याचे आव्हान आहे. कॉंग्रेसने पारंपरिकरित्या महात्मा गांधीजी यांच्यासह नेहरू-गांधी कुटुंबांच्या विचारांचे वारसदार म्हणून आजवर वाटचाल केली आहे. यात सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादुर शास्त्री, नरसिंहा राव आदींपासून ते डॉ. मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या कामगिरीला पक्षाच्या इतिहासात अल्प स्थान देण्यात आले आहे. राव यांच्या पार्थिवाला तर पक्ष कार्यालयात ठेवण्यासही नकार देण्यात आला होता. याचाच अर्थ असा की कॉंग्रेसने नेहरू-गांधी घराण्या पलीकडे विचार केला नाही. यामुळे लोकसभा निवडणुकीतील दणकेबाज विजयानंतर नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांचा वैचारिक वारसा पळविण्याचा प्रयत्न केल्यामुळे कॉंग्रेस नेते हैराण झाले. भाजपने जोरदार मार्केटींग करून या दोन्ही महापुरूषांचे वारसदार असल्याचा आव तर आणलाच पण पंतप्रधान मोदी यांनी दिल्लीत नरसिंहा राव यांचे स्मारक बांधण्याची घोषणा करून कॉंग्रेसची गोची केली. भाजप नेते अधूनमधून लालबहादुर शास्त्री यांच्या महत्तेकडे कॉंग्रेसने दुर्लक्ष केल्याचा आरोप करतात. यामुळे आता शास्त्रीजींचा वारसाही भाजप हिसकावणार की काय अशी शक्यता आहे. इकडे भगतसिंग यांनाही भाजपने आपलेसे केलेय तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वंशजांची नेहरू सरकारने हेरगिरी केल्याचे प्रकरण बाहेर काढले आहे. आता तर या प्रकरणाची कागदपत्रे जाहीर करण्याची मागणी होत असल्याने कॉंग्रेस पक्ष अस्वस्थ झाला आहे. यातच संघाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांकडे मोर्चा वळविल्यामुळे कॉंग्रेस नेतेदेखील खडबडून जागे झाले आहेत. यानुसार कॉंग्रेसने उत्तरप्रदेशात वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे.
खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गात प्रतिगाम्यांप्रमाणे कॉंग्रेस पक्षानही अनेकदा अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. यामुळे त्यांनी कॉंग्रेस पक्षावर अत्यंत जळजळीत टीका केली होती हा इतिहास आहे. मात्र असे असुनही स्वातंत्र्योत्तर कालखंडात दीर्घ काळापर्यंत दलित समुदाय कॉंग्रेससोबत होता यामागे अनेक कारणे होती. एक तर या पक्षाला सक्षम विरोधक नव्हता. नव्वदच्या दशकानंतर भाजपचा पर्याय आला तरी हा पक्ष उघडपणे सवर्णांचा पाठीराखा असल्याने हा समुदाय कॉंग्रेससोबत होता. मात्र एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रादेशिक पातळीवर अनेक पर्याय उपलब्ध झाले. विशेषत: उत्तरप्रदेशात मायावती यांच्यामागे हा समुदाय ठामपणे उभा राहिला. गेल्या वर्षीच्या मोदी लाटेत कॉंग्रेस आणि बसपची वाताहत झाली असली तरी आगामी उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी दलितांच्या मतपेढीवर या दोन्ही पक्षांचे लक्ष आहे. अर्थात याचमुळे कॉंग्रेससोबत बहुजन समाज पक्षही सावध झाला आहे.
        स्वतंत्र भारताच्या इतिहासात बसपने उत्तरप्रदेश सारख्या सरंजामी विचारधारेच्या राज्यात स्वबळावर मिळवलेल्या बहुमत हे अत्यंत आश्‍चर्यकारक मानले गेले. कांशिराम यांनी अत्यंत आक्रमकतेने आंबेडकरवादी विचार उत्तर भारतात पेरला तरी तो सत्तेपर्यंत पोहचवण्यासाठी पुरेसा नव्हता. यामुळे ‘तिलक, तराजू और तलवार…इनको मारो जुते चार!’ अशी गर्जना केल्यानंतर बसपाने ‘तिलक, तराजू और तलवार…सब हो गये हाथी पर सवार!’ अशी सर्वसमावेशक भुमिका घेतली. देशाच्या इतिहासात प्रथमच दलित आणि सर्वणांची एकत्र मोट आवळत मायावतींनी सत्ता स्थापन केली. मात्र त्यांचा एककल्ली कारभार आणि अनेक घोटाळ्यांनी त्या अलोकप्रिय झाल्या. चतुर मुलायमसिंग यांनी याचा लाभ उचलला. यादव आणि मुस्लीमांचे ध्रुविकरण करत त्यांनी सत्ता मिळवली. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने या राज्यातील जातीचे राजकारण थेट धर्मावर आणून ठेवले. मुजफ्फरपुर दंगलीसह वादग्रस्त मुद्यांमुळे भाजपला येथे अनपेक्षित यश मिळाले. आता २०१७ साली उत्तरप्रदेशची विधानसभा निवडणूक होत असून यात दलित समुहाची निर्यायक भुमिका राहील हे निश्‍चित. याचमुळे भाजप, कॉंग्रेस आणि बसपा या तिन्ही पक्षांनी बाबासाहेबांचा वारसदार आपणच असल्याचा पवित्रा घेतला आहे. आज मायावतींनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सभेत भाजप, कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षावर जोरदार तोंडसुख घेतले. बसपाच्या दबावामुळेच व्हि.पी. सिंग सरकारने बाबासाहेबांना ‘भारतत्न’ दिल्याचा दावा त्यांनी केला. इतिहासातील दाखले देत त्यांनी कॉंग्रेस-भाजपचे आंबेडकरप्रेम बेगडी असल्याचा दावा केला. आता यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द युपीचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आज मायावतींवर टीका करत त्यांनी बाबासाहेबांच्या नावे ‘पार्क’ उभारण्यापलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप केला. याचसोबत त्यांनी बाबासाहेबांचे महानिर्वाण अर्थात ६ डिसेंबर रोजी राज्यात शासकीय सुटीची घोषणा केली. म्हणजे त्यांनीही राजकीय हिताचा विचार केलेलाच आहे.
         महत्वाची बाब म्हणजे देशातील बहुतांश राजकीय पक्ष हे दलितांचे हितकर्ते असल्याचे सांगतात. मात्र या समुहाच्या खर्‍या अर्थाने उत्थानासाठी कुणी फारसे प्रयत्न केले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. देशाच्या कान्याकोपर्‍यात आजही दलितांवर अत्याचार होतात. मात्र स्थानिक पातळीवरून आवाज उठण्यापलीकडे काहीही होत नाही. याला एकमेव कारण म्हणजे अलीकडच्या काळात या समुदायातून अखील भारतीय पातळीवर सर्वमान्य होईल असे नेतृत्व उभे राहिले नाही. बहुतांश नेत्यांनी विविध राजकीय पक्षांशी हातमिळवणी करत आपापले सवतेसुभे उभे केलेत. महाराष्ट्रातील रिपब्लीकन पक्षाच्या विविध गटांचीही हीच शोकांतिका आहे. यामुळे आता दलित मतपेढीला डोळ्यासमोर ठेवून बाबासाहेबांच्या विचारांच्या वारसाची लढाई सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. डॉ. बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार हा काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. आज धर्म,भाषा, जाती, प्रांत, संस्कृती आदींवरून विभाजनाचे फुत्कार ऐकू येत असतांना ‘संविधान हेच सर्वश्रेष्ठ’ असल्याचा विचार देणारे बाबासाहेब हे भारताच्या इतिहासातील सर्वश्रेष्ठ विचारक, समाजसुधारक आणि मानवतावादी आहेत हे कुणी नाकारू शकणार नाही. यासाठी कॉंग्रेस, भाजप वा बसपा वा अन्य कोणत्याही नेत्यांच्या प्रशस्तीपत्रकांची त्यांना आवश्यकता नाही. मात्र बाबासाहेबांचे विचार ‘हायजॅक’ करण्यामागील कावा सुज्ञ भारतवासियांनी ओळखला पाहिजे. भारताच्या इतिहासात गौतम बुध्द यांनी प्रथम समतेचा विचार मांडला तेव्हा सनातन्यांचे पित्त खवळले होते. अर्थात प्रयत्न करूनही बुध्दाची महत्ता कमी न झाल्याने त्यांना ‘अवतार’ मानण्यात आले. याचप्रमाणे समाजाला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक मध्ययुगीन संतांचेही दैवतीकरण करण्यात आले. खुद्द बाबासाहेबांनी याला नाकारले आहे. आता मात्र त्यांचे विचार निव्वळ राजकीय स्वार्थापोटी हिसकावण्याचा जो खेळ सुरू झालाय तो त्यांच्या दैवतीकरणाकडे तर जाणार नाही ना? हा प्रश्‍नही यातून उपस्थित झाला आहे.

नामदेव नावाचा इसम...!

नामदेव नावाचा ‘इसम’



  १९७० च्या आसपासची गोष्ट असेल. प्लाझा सिनेमाच्या समोर खांडके बिल्डींगच्या परिसरात तेव्हा समर्थ विद्यामंदीर नावाची माध्यमिक शाळा होती. तिच्याच एका वर्गामध्ये एक छोटासा समारंभ होता. माझा रुपारेल कॉलेजमधला मित्र शशिकांत लोखंडे याने लिटल मॅगझिन चळवळीत उडी घेतली होती. त्याने काही मित्रांसमवेत छापलेले पुस्तिकावजा ‘गारुडी’ नामक अनियतकालिक तिथे प्रकाशित व्हायचे होते. महर्षी दयानंद कॉलेजातील मराठीचे प्राध्यापक केशव मेश्राम यांच्या हस्ते तो प्रकाशन समारंभ व्हायचा होता. मोजून अठरा वीस लोक तिथे उपस्थित होते. शाळकरी मुलांसाठी असलेल्या बाकावर आम्ही मंडळी कशीबशी सामावलो होतो. त्यात एक अजिबात वेगळा वाटणारा इसम होता. कारण तो बाकीच्या विद्यार्थी वा तरूणांपेक्षा भिन्न दिसणाराही होता. कुठल्या इराणी हॉटेलातला वेटर वा टॅक्सी ड्रायव्हर दिसणारा हा कोण, असा प्रश्न मला सतावत होता. पण लौकरच त्याची ओळख झाली, म्हणजे करून घ्यावी लागली. कारण प्रकाशनाच्या निमित्ताने मेश्राम बोलू लागले आणि याने त्यात अडथळे आणायला सुरूवात केली. मुद्दे काय होते, ते मला आज आठवत सुद्धा नाहीत. पण मेश्राम यांच्यासारख्या विद्वान प्राध्यापकाशी हुज्जत करू शकतो असा हा ‘आम आदमी’ मला तत्क्षणी भावला होता. मग कसाबसा त्याला गप्प करून समारंभ उरकला आणि आम्ही सगळेच पांगलो. ती माझी आणि नामदेव ढसाळ याच्याशी झालेली पहिली भेट. नुसती नावाची देवाणघेवाण यापेक्षा जास्त काहीच नाही.

   मग दोनचार महिन्यांनी ताडदेवच्या जनता केंद्रात एक कविसंमेलन योजलेले होते. तिथे मी पत्रकार म्हणून हजेरी लावली. त्यात राजा ढाले, सतीश काळसेकर, तुळशी परब, गुरूनाथ सामंत, चंद्रकांत खोत अशी त्या काळातली बंडखोर कवी मंडळी उपस्थित होती. त्यातही हा ‘इसम’ म्हणजे नामदेव ढसाळ होताच. किंबहूना त्या नवकवींच्या गोतावळ्यात तेवढाच एक माझ्या परिचयाचा चेहरा होता. तेव्हा मी ‘मराठा’ दैनिकात नव्याने उमेदवारी करीत होतो. त्या कवीसंमेलनाची बातमी दिली मग विषय संपला असता. पण त्याच विषयावर ‘मराठा’च्या रविवार पुरवणीचे संपादक आत्माराम सावंत यांच्याशी बातचित झाली. अधिक ज्येष्ठ सहकारी नारायण पेडणेकर याच्याशी हुज्जतही झाली. तेव्हा सावंतांच्या आग्रहाखातर मी त्याच कवीसंमेलनावर एक छोटेखानी लेख लिहिला होता. त्याचे शिर्षक आजही नेमके आठवते. ‘प्रस्थापिताविरुद्ध प्रस्थापित होण्यासाठी नवकवींनी पुकारलेल्या बंडाची एक रात्र’. या लेखाने अनेक नवकवींचे भाऊ तोरसेकर या व्यक्तीकडे लक्ष गेले. त्यापैकी उत्साहात मला भेटायला आलेला कवी म्हणजे नामदेव ढसाळ. नारायण पेडणेकरला माझ्या कामाची वेळ विचारून नामदेव ‘मराठा’ कार्यालयात भेटायला आला. आणि पहिल्या भेटीतच थेट अरेतुरे करून त्याने मैत्री पार जुनीपुराणी करून टाकली. आजही तो दिवस तितकाच आठवतो. कारण तो बेकार आणि मी तेव्हा नवशिका. त्यामुळे त्याने गळी पडून नारायण पेडणेकरला आमच्या भेटीसाठी हॉटेलचा भुर्दंड दिलेला होता. अंगावर व अंगभर कपडे घातलेला नामदेव कायम असाच पारदर्शक होता. साडेचार दशकात मग अधूनमधून आम्ही किती भेटलो वा नाही भेटलो. म्हणून कुठलाही फ़रक पडला नाही. त्याच्यातला नितळ माणूस कधी बदलला नाही.

   त्यानंतर नामदेवशी त्या तरूण वयात सतत संपर्क होत राहिला. कारण तो कायम अस्वस्थ आत्मा असल्यासारखाच जगत होता. दलित पॅन्थर ही संघटना त्याने स्थापन केली, तरी तो कधी संघटनात्मक बंधनात अडकून पडणारा नव्हता. संघटनेत एकांडी शिलेदारी चालत नाही. दहा पंधरा लोकांच्या सहमताने गोष्टी घडत असतात वा घडवल्या जात असतात. पण नामदेव कवीमनाचा नव्हता, तर तो साक्षात स्वत:चे एक काव्य होता. ते एक कल्पनारम्य व्यक्तीमत्व होते. त्यामुळेच त्याला शब्दात, धोरणात वा विचारात बंदिस्त होणेच शक्य नव्हते. त्यामुळेच राजकारण, समाजकारण वा साहित्य अशा प्रस्थापित चौकटीत अडकणे त्याला शक्यच नव्हते. ते त्यालाही ठाऊक होते. पण त्याला अशा बंधनात अडकण्याची हौस होती. पण अल्पावधीतच त्याचा त्यातून भ्रमनिरास व्हायचा. जितक्या गतीने जग बदलावे, असा त्याचा अट्टाहास असायचा, तेवढ्या वेगाने जग धावत नाही, ही वेदना त्याच्या बोलण्यातून प्रक्षोभातून नेहमी व्यक्त व्हायची. त्या काळात मला आठवते आम्ही विविध संघटनांनी व्हिएटनामवरील अमेरिकन बॉम्बहल्ल्याच्या निषेधार्थ एक मोर्चा काढला होता. त्यानंतर मोर्चा यशस्वी झाल्याने आमचे सगळे मित्र खुश होते. पण सगळे पांगले आणि आम्ही दोघेतिघेच म्हणजे नामदेव, कमलाकर सुभेदार आणि मी राहिलो. तेव्हा त्याचा वैताग उफ़ाळून आला. तो म्हणाला, ‘साला काय घंटा मिळाले? आपली खाज भागली मोर्चा काढायची. पुढे काय? भावड्या आपल्या देशात महात्मे खुप झाले रे, पण हो चि मिन्ह जन्माला आला नाही.’कमलाकर आणि मी; आम्ही दोघे त्याच्याकडे बघतच राहिलो.

   एका बाजूला कवी म्हणून अविष्कृत व्हायला उतावळा असलेला नामदेव राजकीय व्यवस्थाही उलथून पाडायला तितकाच उतावळा असायचा. नुसत्या शब्दापुरता तो जगावेगळा नव्हता. स्वभावानेही तो वेगळाच होता. त्याच्या कविता वा शब्दातून त्याला दलित कवी, साहित्यिक असे का म्हटले जाते; त्याचे मला नेहमी आश्चर्य वाटत राहिलेले आहे. त्याला जितके बाबासाहेबांचे आकर्षण होते, तितकेच जगभरच्या प्रत्येक क्रांतीकारकांचे अप्रुप होते. त्याच्या शब्द व अविष्कारातून वर्णवर्चस्ववाद, जातीभेदाविषयीचा संताप व्यक्त व्हायचा; त्यापलिकडे त्याचा आवेश विषमतेच्या विरोधातला असायचा. जन्माधिष्ठीत अन्यायाच्या विरोधातला त्याचा आवाज कुठल्याही अन्यायाच्या विरोधात तितकाच बुलंद असायचा. पण त्या राग प्रक्षोभात कुठलीही वैरभावना वा द्वेष नसायचा. कुठल्या व्यक्ती वा जातीपंथाच्या विरुद्ध त्याने कधीच शत्रूत्व केले नाही. त्याच्या वागण्यातून सतत जाणवायचे, की नामदेव कुणाही व्यक्ती वा संघटना पक्षाकडेही प्रवृत्ती म्हणूनच बघायचा. त्या व्यक्ती वा संघटनेला त्याचा विरोध त्या प्रवृत्तीपुरता असायचा. एकदा त्या भूमिका बाजूला ठेवल्या, मग तीच व्यक्ती नामदेवसाठी मित्र असू शकायची. त्यासाठी आपले आग्रह वा हट्ट नामदेवला सोडावे लागायचे नाहीत. क्रांती वा बंडखोरीचा चेहरा म्हणून जसे आपण नामदेवकडे बघू शकतो; तितकाच तो निष्पाप निरागसतेचा चेहराही होता. त्याची प्रचिती नामदेवच्या बोलण्यात, लिहिण्यात वा कवितेतल्या अपशब्दातून येते. अन्यथा जे शब्द आपण गैरलागू वा अपशब्द म्हणून टाळतो, तेच शब्द नामदेवने बोलावेत किंवा लिहावेत, त्यांचा नूर बदलून जातो. ज्या ओघात ते शब्द नामदेवच्या रचनेत वा मांडणीत यायचे, त्यांची जागा इतकी नेमकी व आशयपुर्ण असते, की त्यात तुम्ही काहीही गैर शोधूही शकत नाही.

   एकदा मी आक्रमक वा भडक बोलणार्‍या लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यात नामदेवचाही समावेश होता. त्यात त्याने दिलेले स्पष्टीकरण सर्वात अप्रतिम होते. जी भाषा माझ्या आईकडून शिकलो वा माझ्या गोतावळ्यात सहजगत्या वापरली जाते, ती अश्लिल कशी? त्याचा हा सवालच निरूत्तर करणारा होता. पण पुढे एकदा गहन बोलताना त्याने मला अपशब्द वा सभ्य शब्द यातला फ़रक उलगडून सांगितला, शब्द निर्जीव असतात, त्यांच्यातला आशय ओळखता आला नाही, तर शब्द व भाषाच निरूपयोगी होऊन जाते. शब्दांना हेतू नसेल, तर त्यांना अर्थच नसतो. शिवी वा अपशब्दामागचा हेतू इजा करण्याचा नसेल, तर त्यांना अपशब्द कोणी कशाला म्हणावे? माय पोराला लबाड म्हणते, तिच्या मायेकडे काणाडोळा केला, तर तिने वापरलेला शब्दच निरर्थक होतो. कारण त्या शब्दातली माया ती प्रकट करत असते. भावड्या जन्मदातीची माया बघायची नसेल, तर तिचे शब्द ऐकायचे तरी कशाला? 

   अनेकांना प्रश्न पडतो, की असा हा नामदेव ढसाळ मस्त पैसे मिळवायचा, ऐष करायचा, चैनीचेही जीवन जगला, तर त्यावेळी त्याच्यातला क्रांतीकारक कसा बहकला? मलाही आरंभीच्या काळात तसेच वाटलेले आहे. काही लब्धप्रतिष्ठीतांच्या नादी लागलेला व ऐषोरामाच्या गुंत्यात अडकलेला नामदेव आपल्यातला बंडखोराचा गळा घोटून मोकळा झाला, असेच मलाही अनेकदा वाटलेले आहे. त्याने केलेल्या राजकीय कसरती वा तडजोडी, उलथापालथी सौदेबाजीसारख्या होत्या, हे कोणी नाकारू शकणार नाही. माझे असे प्रामाणिक मत आहे, की त्यासाठी नामदेवने स्वत:ला बदलण्याचा खुप कसोशीने प्रयासही केला. त्यानेही सुखवस्तू सुरक्षित जीवनाच्या वळचणीला जाण्य़ाचा प्रयास केला, यात शंका नाही. पण नामदेव त्यात कितीसा रमला? चार दशकांपुर्वी मला भेटलेला तो सामान्य ‘इसम’ वरवर बघता कुठल्या कुठे बेपत्ता झाला असेच वाटू शकते आणि मलाही अनेकदा तसेच वाटले सुद्धा. पण त्यानंतर जेव्हा केव्हा अकस्मात तो भेटायचा, तेव्हा आलीशान गाडीतून उतरणारा वा त्यात बसलेला नामदेव असा सामोरा यायचा, की तो तसूभरही बदललेला नाही, याची खात्री व्हायची. २००४ सालातली गोष्ट त्यातला शेवटचा अनुभव होता.

   शिवसेनेशी त्याची दोस्ती होती. त्या विधानसभा निवडणूकीत त्याला सेनेने दोन जागा सोडल्या होत्या. त्यापैकी नागपाडा मतदारसंघात नामदेव स्वत:च उभा रहाणार होता. मात्र दक्षीण कराडमध्ये त्याला कोणी उमेदवार सापडत नव्हता. अपरात्री त्याने मला फ़ोन केला. म्हणाला तिथे कोणी उमेदवार मिळेल काय? मी पण थक्क झालो. इतक्या दिर्घकाळानंतर याला माझी अशा अजब कामासाठी कुठून आठवण झाली? मग त्याला मी एका जुन्या मित्राचे नाव सुचवले. पण हा सेक्युलर मित्र मान्य करील काय, याबद्दल तो साशंक होता. पण ती समस्या मी निकालात काढून दिली. पण त्या उमेदवारीचे अधिकारपत्र घेण्य़ासाठी त्या उमेदावारासह नामदेव व मी मातोश्रीवर गेलेलो असताना; याला कुठून तरी खबर मिळाली जॉर्ज फ़र्नांडीस मुंबईत आलेले आहेत. तात्काळ मातोश्रीचे काम तसेच सोडून नामदेव म्हणाला ‘चला जॉर्जला भेटू.’ माहिमला येताना मी त्याला घरातली एक गोष्ट सांगितली. वाजपेयी सरकारच्या विश्वास प्रस्तावावर जॉर्जच्या जोरदार भाषणावर माझी मुलगी कशी बेहद्द खुश होती. अर्थात ती सहा वर्षे जुनी बाब होती. पण तिथे जॉर्जची भेट होताच. या महाभागाने विनाविलंब ती कहाणी जॉर्जच्या कानी घातली आणि त्या मुलीशी तुम्ही बोललेच पाहिजे असा आग्रहही धरला. वास्तविक ते व्हायला एक अडचण होती. कारण तेव्हा माझी मुलगी उच्चशिक्षण घ्यायला अमेरिकेत गेलेली होती. पण ह्या हट्टी माणसापुढे कोणाचे चालणार? त्याने मला पळता भूई थोडी करून मुलीचा तिथला नंबर काढायला लावला आणि आपल्या मोबाईलवरून थेट अमेरिकेत संपर्क साधून जॉर्जना तिच्याशी संवाद करायला भागच पाडले.

   वास्तविक माझी मुलगी सोडा, माझ्या पत्नीचीही नामदेवशी कधी ओळखपाळख झालेली नाही. तसा प्रसंगच कधी आला नाही. मुलीचेही तेच. नामदेवने तिला कधी काळीगोरी बघितली नाही. पण आपल्या पोराचे कौतुक करायला नको, अशा हट्टापायी त्याने त्या गडबडीत हा सगळा प्रकार घडवला होता. त्यात नवे असे काहीच नव्हते. पस्तीस वर्षापुर्वी नामदेव तसाच होता. तेव्हा कमलाकर सुभेदार विवाहित आणि आम्ही उपटसुंभ होतो. पण ताडदेवच्या रुसी मेहता हॉल या व्यायामशाळेचे नामदेवच्या गोलपिठा या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन व्हायचे होते. तर तिथे कमलाकरने आपल्या पत्नी मुलासह यायलाच हवे असा हट्ट नामदेवने पुर्ण करून घेतला होता. ती लेकुरवाळी स्त्री तिथे अवघडून बसली होती. पण वहिनी अगत्याने आली म्हणून नामदेव आनंदला होता. त्याच्यातले हे निष्पाप, निरागस मुल, निर्व्याज उत्साह आणि विशुद्ध माणुसकी क्वचितच बघायला मिळते. खरे सांगायचे तर कितीही सभ्य सुसंस्कृत माणसांकडे माणसातला माणूस शोधून त्याची गळाभेट करण्याची क्षमता नसेल, ती अपुर्व कुवत नामदेवपाशी उपजतच होती. समतेच्या गमजा व वल्गना आजवर अनेकांकडून ऐकल्या असतील. पण स्वत:च्या जीवनात समतेने वागण्याची कुवत फ़ार थोड्या लोकांपाशी असते. नुसते इतरांना समभावाने वागवणे नाही, तर आपणही इतरांशी समतेच्या धारणेने वागणे खुप अवघड काम आहे. अनेकदा आपल्याला आपल्या अहंगंडातून बाहेर पडणे अशक्य असते, तितकेच स्वत:च्या न्युनगंडातून बाहेर पडता येत नाही. या दोन्ही जोखडातून बाहेर पडलेली दोनच माणसे मला आयुष्यात भेटली त्यातला एक नामदेव ढसाळ होय, असे मी छातीठोकपणे सांगू शकतो. समोर शिवसेनाप्रमुख असो किंवा कोणी सामान्य पॅन्थर कार्यकर्ता असो, नामदेव दोघांशी समान पातळीवर बोलू वागू शकला. ही त्याची शक्ती, कुवत वा उपजत क्षमता त्याची एकमेव ओळख होती. त्या नामदेवला कितीजण ओळखतात, ते मला माहिती नाही. कोणी त्याला दलितकवी म्हणून, कोणी दलित नेता वा अन्य काही म्हणून ओळखत असतील. पण मला भेटलेला नामदेव हा असा होता. त्याचे जितके पैलू उलगडावे तितका तो अधिकच भारावून टाकत राहिल

भाजपला साक्षात्कार...!

युती तुटल्यामुळे भाजपाला वाढलेल्या शक्तीचा साक्षात्कार झाल्याची भाषा पहिल्या दिवशी वापरणार्‍या मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी, दुसर्‍या दिवशीच मुंबई पालिकेत मात्र युती करूनच सेना भाजपा लढतील अशी भाषा बदलली आहे. पुढारी मंडळी आपल्या बोलण्यातून लोकांना समजणारे काही कशाला बोलत नाहीत, याचे नेहमी नवल वाटते. जर शक्ती वाढली असेल, तर मग सेनेचे लोढणे भाजपाने कशाला गळ्यात घालून ठेवावे. अनायसे विधानसभा मतदानाच्या निमीत्ताने युती तुटली असेल, तर कायमची ब्याद गेली म्हणून आपली शक्ती वाढवण्याचाच वसा घेतला पाहिजे ना? म्हणजे असे, की निवडणूका आपापल्या लढवाव्यात आणि निकालानंतर सत्तेची गणिते जमवताना एकत्र यावे. युती किंवा आघाडी करावी. त्याचा एक लाभ असा होईल, की दोन्ही पक्षाच्या मतदार पाठीराख्यांना आपापल्या पक्षाचे बळ सिद्ध करण्याची संधी मिळत राहिल आणि स्थानिक पातळीवर काम करणार्‍या इच्छुक नेत्यांना गद्दारी वा बंडखोरी वा बेशिस्त करायची संधी उरणार नाही. शेवटी निवडणूका सत्तेसाठी असतात. त्यामुळे निकालानंतर सत्तेच्या गरजेनुसार तडजोडी केल्या जातातच. भाजपाने अधिक जागा मिळवून बळ सिद्ध केले आणि सेनेच्या दुप्पट जागा मिळवल्या, तेव्हा त्यांना कुठे सेनेच्या मदतीची गरज होती? त्यांना बहुमत सिद्ध करतानाही सेनेची गरज भासली नव्हती. राष्ट्रवादीने त्यांना ‘बिनमागे पाठींबा परोसला’ होता ना? मग पुन्हा शिवसेनेची ब्याद गळ्यात कशाला हवी? मुख्यमंत्र्यांचे हेच विधान घोळात टाकणारे आहे. नाहीतरी विधानसभा मतदानात मुंबईत भाजपानेच सेनेपेक्षा एक जागा का होईना, जास्त मिळवली आहे. त्यानंतर मुंबई पालिकेतही शत प्रतिशत भाजपा अशी गर्जना त्यांच्या अनेक स्थानिक नेत्यांनी केलेलीच होती. मग त्यांना नामोहरम करून शक्ती कशी वाढणार? युती भाजपाच्या वाढत्या बळाच्या मुळावर येईल ना?
       दिल्लीची सत्ता संपादन केल्यावर पक्षाचे नेतृत्व अमित शहांच्या हाती आले आणि त्यांनी भाजपाला जगातला सर्वात मोठा पक्ष बनवण्याचा चंग बांधला. त्यात ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. दहा कोटी सदस्य असलेला तो जगातला पहिला राजकीय पक्ष आहे. त्याच आकडेवारीनुसार महाराष्ट्रातही भाजपाचे एक कोटीहून अधिक सदस्य झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. त्यात तथ्य असेल, तर मग पुन्हा युतीच्या फ़ंदात हा पक्ष कशाला पडणार, तेच समजत नाही. राज्यात भाजपचे मागल्या विधानसभेत बळ वाढले, तेव्हा त्याला एक कोटी ४६ लाख मते मिळालेली आहेत. आता पक्षाने दोड कोटी सदस्य केले असतील, तर ते बळ आणखी सहा लाखांनी वाढले आहे. मग मित्रांची गरजच काय? दीड वर्षांनी व्हायच्या महापालिका निवडणूकीत भाजपाची सदस्य संख्या किमान दोन कोटीचा पल्ला ओलांडून जाण्याची खात्रीही देता येईल. अशा स्थितीत युती झाली तर अनेक वॉर्ड वा प्रभागात भाजपाच्या त्याच सदस्यांना आपल्या पक्षाचा उमेदवार मिळायला नको काय? त्यांच्यावर शिवसेनेला मत देण्याचा अन्याय करून काय साधले जाणार? अकारण आपले सदस्य व मतदार शिवसेनेच्या झोळीत टाकायचा हा कर्मदरिद्रीपणा कशासाठी? त्यापेक्षा मुंबईच नव्हे तर ठाण्यासह तमाम महापालिका भाजपाने स्वबळावर लढवायला हव्यात आणि त्यातून आणखी शक्तीवर्धन करायला हवे. आपोआपाच शिवसेनेला तिची औकात दाखवली जाऊ शकेल. विधानसभेच्या वेळी मोडलेल्या युतीचे दुष्परिणाम सेनेला भोगायला भाग पाडण्याची सुवर्णसंधी भाजपाच्या मुख्यमंत्र्यांना कशाला नको आहे? जे कोणी असली भाषा करत आहेत, त्यांना भाजपाच्या प्राथमिक सदस्यांची पंतप्रधान मोदींनी मांडलेली कल्पना तरी ठाऊक आहे काय? पक्षाध्यक्षांना तरी त्याची कल्पना उमगली आहे काय, याची शंका येते.

आपल्या अपुर्व विजयानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी दहा कोटी पीएम अशी कल्पना मांडली होती. ‘एक पीएमसे नही चलनेवाला, पार्टीको दस करोड पीएम चाहिये’, असे मोदी म्हणाले होते आणि त्यांनी पीएम म्हणजे प्रायमरी मेंबर असा खुलासा केलेला होता. अशा एका पीएमने प्रत्येकी पाच मतदार मिळवले तरी पक्षाला हक्काचे पन्नास कोटी मतदार मिळू शकतील असे समिकरण त्यांनी मांडले होते. पण तसे पीएम म्हणजे प्राथमिक सदस्य हे पक्षासाठी राबणारे असायला हवे. त्यांना पक्षाचे विचार व भूमिका यांच्याशी बांधिलकी असायला हवी. तरच ते आपल्या मतासोबत आणखी दोनतीन मते पक्षाला मिळवून देऊ शकतील. खरेच अशांचीच पक्ष सदस्य म्हणून नोंदणी झालेली आहे काय? नुसता मिसकॉल द्या आणि सदस्य व्हा, म्हणून जी नोंदणी झाली, त्यातून इतकी मते पक्षाला मिळू शकतील काय? एका फ़ोनकॉलची पदरमोड न करणारा पक्षासाठी मते मिळवून देऊ शकेल काय? सदस्य नोंदणीच्या ज्या मनोरंजक कहाण्या आतापर्यंत प्रकाशित झाल्या आहेत, त्याकडे बघता भाजपाच्या या सदस्यांपैकी दहा टक्के तरी खरेच पक्षाचे विचार व भूमिकेला बांधिल असतील किंवा नाही याची शंका आहे. मग त्यांनी आपल्याखेरीज तीनचार अधिक मते पक्षाला मिळवून देण्याचे उद्दीष्ट कसे साधले जायचे? याचे समिकरण मांडले, मगच दिल्लीत अवघ्या आठ महिन्यात भाजपाचे बळ केजरीवाल कसे घटवू शकले, त्याचे रहस्य उलगडते. नेमका असाच सदस्य नोंदणीचा पोरखेळ लोकसभेपुर्वी आम आदमी पक्षाने केलेला होता. त्याने महिन्याभरात एक कोटी सदस्य नोंदले. पण मतदाना एक कोटी मतेही मिळताना मारामार झालेली होती. मग विधानसभेपुर्वी त्यांनी सदस्यनोंदणीचा पोरखेळ सोडून दिला व लोकसंपर्काला प्राधान्य दिले आणि भाजपाचे दिल्लीत वाढले बळ हलके करून टाकले.
        आजही भाजपाची महाराष्ट्रातील सदस्यसंख्या बघितली तर तेही त्याला विधानसभेत मत द्यायला घराबाहेर पडले नाहीत असेच दिसते. दिड कोटी आज सदस्य झालेत. पण सहा महिन्यापुर्वी अटीतटीची लढत झाली, तेव्हा भाजपाला मिळालेल्या मतांची संख्या अवघी एक कोटी ४६ लाख आहे. म्हणजे़च आज सदस्य होणार्‍यांना अवघ्या सहा महिन्यापुर्वी भाजपाला मत देण्याचेही अगत्य नव्हते. दिल्लीत तर लोकसभेला ज्यांनी भाजपाला मते दिली, त्यापैकी अनेकांनी आठ महिन्यात पक्षाकडे पाठ कशाला फ़िरवली. ते बघायला नको का? महाराष्ट्रात जसे कोणीही उचलून पक्षात आणले आणि त्यांना शेंदुर फ़ासला गेला. त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत झाली आणि वाढलेले बळ पुर्वीपेक्षा घटले. सदस्य वाढले आणि मते घटली. निदान मोदींना असे ‘पीएम’ अपेक्षित नव्हते. म्हणूनच मुख्यमंत्री पुन्हा युती तुटल्याचे कौतुक सांगतात आणि तेव्हाच युती करणार असल्याचेही बजावतात, ते मनोरंजक वाटते. मुंबईत एक आमदार सेनेपेक्षा अधिक असताना युती कशाला हवी? वाढलेले आमदार व सदस्य यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही काय? एवढ्या बळावर खरे म्हणजे भाजपाला आता मुंबई पालिकेत स्वत:चे बहुमतही सिद्ध करायला हरकत नाही. शिवसेनेची घोंड गळ्यात कशाला घ्यायची? पण एकाच दमात युती तुटल्याचा लाभ फ़डणवीस सांगतात आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईत युती करण्याचा हवाला देतात, त्याचे रहस्य बांद्रा पुर्वेच्या पोटनिवडणूकीत दडलेले आहे. विधानसभेच्या वाढलेल्या बळाला लागलेली गळती एप्रिल महिन्यातल्या विविध मतदानातून समोर आलेली आहे. त्याविषयी भाजपाने जाहिर भाष्य करायची गरज नसली तरी त्यांच्या चाणक्यांनी खाजगीत त्याचा अभ्यास नक्की केलेला असेल. म्हणून वाढलेल्या बळानंतरही युतीचे हवाले देण्याची वेळ आली आहे. नवी मुंबई व बांद्रा निकाल काय इशारा देतात?

'राजा'ज्ञा : भ्रम आणि संभ्रम....!

"अपेक्षेप्रमाणे राज ठाकरे यांनी भाजप वा महायुतीला पाठिंब्याचा ब्रही न काढता 'कणखर नेतृत्वासाठी मोदींना बिनशर्त पाठिंबा....