Saturday 23 December 2023

विरोधकमुक्त 'अमृतकाळ...!'

"राजकारण टोकाचं खुनशी बनलंय. मूल्याधिष्ठित राजकारण करणारा जनसंघ-भाजप बदललाय, सर्वसत्ताधीश बनला. 'सदृढ लोकशाहीत विरोधीपक्षाची गरज' असतानाही राक्षसी महत्वाकांक्षेच्या, सत्तेच्या हव्यासापायी विरोधकांना नेस्तनाबूत करण्याच्या खेळी खेळल्या जाताहेत! नव्या संसदभवनातल्या हल्लेनंतर संसद आणि खासदारांच्या सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी भूमिका मांडावी अशी आग्रह धरणाऱ्या तब्बल १४६ खासदारांना निलंबित केलं गेलं. देशाला लोकशाहीची जननी संबोधणाऱ्या सत्ताधाऱ्यांनीच हुकूमशाहीचं दर्शन घडवलं. हे एकाबाजूला तर दुसरीकडे इलेक्टरोल बाँड च्या माध्यमातून मिळालेल्या माहितीतून विरोधकांना देणग्या देणाऱ्यांवर धाडी टाकल्या जाताहेत. जेणेकरून विरोधकांना निवडणुक लढविण्यासाठी लागणारा पैसा मिळणारच नाही अशी व्यूहरचना आखली जातेय. जणू स्वातंत्र्याचा अमृतकाळ विरोधकमुक्त करायचाय...!"
-----------------------------------------
*नु* कतंच संपलेलं संसदेचं अधिवेशन हे कदाचित अखेरचं असेल! अयोद्धेतल्या रामजन्मभूमीवरच्या मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना केल्यानंतर मोदी सरकार लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यासाठी धार्मिक वातावरण निर्माण करून लोकांच्या भावना हिंदुत्वाकडे वळविण्याचे हरेक प्रयत्न केले जाणार आहेत. आताच 'मोदी की गॅरंटी ' चे ढोल बडवले जाताहेत. यापुढं ते अधिक जोमानं वाजवलं जातील. सर्वत्र 'मोदी चालीसा ' गायिली जाईल. 'मोदी हैं तो मुमकिन हैं l' याचा घोषा लावला जाईल. सर्व वातावरण मग 'मोदीमय ' होऊन जाईल...! निवडणुका जिंकण्याचे सारे फंडे अवलंबले जातील. त्यासाठी निवडणुक आयोगापासून साऱ्या यंत्रणा राबविल्या जातील. त्यामुळं २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका या केवळ निवडणुका राहिल्या नाहीत. ती भारतीय राजकारणाला, संविधानाच्या अस्तित्वाला एक वेगळं वळण देणारं ठरणारी आहे. संवैधानिक संस्था, निवडणूक आयोग, तपास यंत्रणा, शासकीय व्यवस्था, प्रशासन या साऱ्याचा हिशेब यानिमित्तानं होणारंय. अशी स्थिती यापूर्वी कधीच नव्हती. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत विरोधीपक्षाचं अस्तित्व कमकुवत का असेना दिसत होतं. पण यापुढच्या काळात विरोधीपक्ष असेल पण तो सक्षमपणे उभा राहू शकणार नाही अशी त्याची स्थिती करून टाकलेली असेल. त्यांचे संभाव्य उमेदवार जे निवडणुका लढवतील, असं वाटतं ते आता यापुढच्या काळात त्या स्थितीत, मानसिकतेत राहणार नाहीत. कारण त्यांच्यामागे कुठे ईडी असेल, कुठे आयकर तर कुठे सीबीआय असेल. दुसरीकडं निवडणूक आयोगाचे नियम-कायदे तेज धार लावून समोर येतील. असं सांगितलं जाईल की, जे भ्रष्टाचारी असतील त्यांनाच घेरलं जाईल पण ते तसे नसतील त्यांना घाबरायचं काही कारण नाही. परंतु केवळ योगायोग असा की, आज या तपास यंत्रणांच्या कचाट्यात केवळ विरोधी पक्षाचे नेतेच दिसताहेत जे निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. 
१० लाख कोटी रुपयांचा खेळखंडोबा शेअरबाजाराच्या माध्यमातून झाला. जगभरानं पाहिलं की, कशाप्रकारे मनीलोंडरिंग, हवाला आणि काळा पैसा इथं काम करतोय, तेही शेअरबाजाराच्या माध्यमातून! पण ईडीचं त्याकडं लक्षच गेलेलं नाही. मात्र लक्ष्य बनवलं जातंय ते विरोधीपक्षांच्या नेत्यांना! मुंबईतले चित्रपटक्षेत्र, अंमली व्यापार, क्रिकेट यांच्यावर तपास यंत्रणांच्या माध्यमातून वचक बसवल्यानंतर आता शिवसेनेला, राष्ट्रवादीला लक्ष्य बनवलं गेलंय. यामुळं एक लक्षांत येतंय की, ज्या राज्यात ज्या पक्षाची सत्ता असेल तर तो पक्ष आणि तिथला मुख्यमंत्री हा तिथल्या उद्योजकांना 'एटीएम' च्या स्वरूपात पाहतो. उत्तराखंडमध्ये काँग्रेसनं तत्कालीन मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग बघेल यांना एटीएम म्हणून पाहिलं गेलं होतं. झारखंडमध्ये निवडणुका असताना बघेलांना प्रभारी बनवलं, तेव्हा तिथल्या देणगीदारांवर धाडी टाकल्या गेल्या. याच बघेलांना आसामचे प्रभारी काँग्रेसनं बनवलं तेव्हाही असेच छापे तिथं टाकले गेले. उत्तरप्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये निवडणुका असतानाही छापे टाकले गेले होते. राजकीय स्थितीचा हा एक खुनशी नमुना होता. पण यापुढची स्थिती आणखी नाजूक आहे. जे राजकीय पक्ष विरोधकांची भूमिका बजावू इच्छितात अशा नेत्यांसमोर ईडी, सीबीआय, आयकर येऊन उभे ठाकतात. न्यायालयीन कारवाया केल्या जातात. बिचारे हे नेते या त्रासाला, जाचाला कंटाळून एकतर भाजपला शरण तरी जातात वा राजकारणातून बाहेर पडतात. अशांना वाचविण्यासाठी, धीर देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. महाराष्ट्रात हे आपण आजवर अनुभवलंय! ईडीकडं ज्या १२५ राजकीय नेत्यांची यादी आहे त्यातले १०९ जण हे विरोधीपक्षाची नेतेमंडळी आहेत. आयकर खात्यानं ज्या ४ हजाराहून अधिक लोकांना नोटिसा पाठविल्यात त्यापैकी ३ हजार ९४५ जण हे विरोधीपक्षाचे नेते आहेत. सीबीआयनं जवळपास ६७९ जणांना नोटिसा जारी केल्यात त्यापैकी ६२९ जण विरोधीपक्षाचे नेते आहेत. भाजपची नेतेमंडळी अभावानंच इथं आढळतात. राज्यनिहाय आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, ही सारी मंडळी जिथं विरोधी पक्षांची सरकारं आहेत तिथली आहेत. 
२०२४ ची निवडणूक सत्ताधाऱ्यांसाठीही महत्वाची ठरणारी आहे. जगभरातल्या वित्तीय संस्था आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय औद्योगिक आणि गुंतवणूक क्षेत्रात भारतातलं सरकार आणि कार्पोरेट कशाप्रकारे काम करताहेत, बँकांकडून पैसे उचलले जाताहेत, कार्पोरेट मित्रांसाठी नियम-कायदे कसे बदलले जाताहेत. हे पाहून हात आखडता घेताहेत. शिवाय हे सारं झाल्यावर सरकारी पक्षाला कार्पोरेट फंडिंग कसं केलं जातंय. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर इलेक्ट्रोल बॉंड दिले-घेतले जातात, त्यावरचं कवच कशाप्रकारे हटवलं गेलंय. हे पाहिलं जातेय. या साऱ्या पैशाच्या राशींवर सत्ताधारी पहुडले आहेत. विरोधकांना मिळणारी आर्थिक रसद कशी मिळणार नाही अशी खेळी केली जातेय. एवढंच नाही तर विरोधीपक्ष कसा कंगाल होईल याकडं लक्ष पुरवलं जातेय. काँग्रेसला आर्थिक रसद पुरवणाऱ्या उद्योजकांवर छापे टाकले गेले आहेत. दहा हजार कोटींचा दारूचा व्यापार असलेल्या काँग्रेस खासदार साहू यांच्याकडे साडे तीनशे कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. पण साहू यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. तर दुसरीकडे याचं दरम्यान कानपूरमध्ये एका अत्तर व्यापाऱ्यांकडे अडीचशे कोटी रुपये सांपडलेत. तो व्यापारी भाजपशी संबंधित असल्याचं सांगितलं जात होतं. असो. इथं ३९२ काँग्रेसच्या नेत्यांवर आयकर खात्यानं नोटीसा बजावल्यात. सीबीआयकडं ६२ राजकारण्यांची नावं आहेत. ईडीनं महाराष्ट्रात १५ प्रकरणं नोंदवलीत. यात राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, काँग्रेसचे नेते आहेत. आयकर खात्यानं ४१५ जणांना नोटिसा बजावल्यात. ९८ राजकारणी सीबीआयच्या रडारवर आहेत. यानंतर भाजपला सामोरं जाणाऱ्या तृणमूल काँग्रेस म्हणजेच विरोधकांचं दुसरं राज्य येतं पश्चिम बंगाल! इथले २७ तृणमूल काँग्रेसचे नेते ईडीच्या कारवाईत आहेत. आयकर खात्याच्या ७१५ जणांना नोटिसा बजावल्यात. सीबीआयच्या रडारवर ११५ राजकारणी आहेत. आणखीन एक विरोधकांचं राज्य बिहार; तिथल्या राजदच्या ५ नेत्यांवर ईडीच्या कारवाई सुरु आहे. २९० जणांवर आयकराच्या नोटिसा बजावल्यात. ४८ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. उत्तरप्रदेशात १७ समाजवादी आणि बसपच्या नेते ईडीच्या कक्षेत आहेत. ४९० जणांना आयकर खात्याच्या नोटिसा देण्यात आल्यात. ३७ जणांना सीबीआयच्या नोटिसा दिल्या गेल्यात. मोदींना आणि भाजपला ज्या पक्षानं आव्हान दिलंय आणि ज्यांच्याविरोधात भाजपनं तीव्र आंदोलन सुरू केलं होतं त्या तेलंगणात जिथं तेलंगणा राष्ट्र समितीच्या के.चंद्रशेखर राव यांची सत्ता होती तिथं १९ जणांवर ईडीनं कारवाई केलीय. ९४० नेत्यांना आयकर खात्यानं नोटिसा बजावल्या आहेत तर २९ जणांविरुद्ध सीबीआयनं गुन्हे नोंदवलेत. काँग्रेसची सत्ता होती त्या राजस्थानात १६ नेत्यांविरोधात ईडीनं कारवाई केलीय. त्यात खुद्द अशोक गेहलोत यांचे बंधू आहेत. १ हजार ११२ जणांवर आयकर खात्यानं नोटिसा बजावल्यात. ८६ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. आम आदमी पक्षाची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये २१ नेत्यांवर ईडीच्या कारवाई सुरू आहे. आयकर खात्यानं तिथं ९०८ जणांना नोटिसा पाठवल्यात. ५१ जण सीबीआयच्या रडारवर आहेत. विरोधकांच्या या राज्यात राजकीय नेत्यांशिवाय इथल्या सरकारांना आर्थिक मदत करणारे उद्योजक, दलाल, ठेकेदार, सहानुभूतीदार अशा ५ हजार ६९६ जणांना सरकारी तपास यंत्रणानी विविध मार्गानं लक्ष्य केलेलं आहे. जर या मंडळींनी विरोधकांना आर्थिक मदत केली तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे संकेत त्यांना दिले आहेत. विरोधकांची आर्थिक स्थितीची कोंडी केली जातेय. त्यांच्याकडं अशी ताकदही राहू नये की, पैशाच्या आधारावर ते निवडणुकीत उभे ठाकतील. ही परिस्थिती जिथं विरोधकांची सत्ता आहे अशा ठिकाणी घडतंय तर विचार करा जिथं सत्ता नाही अशा राज्यात विरोधकांची कशी दयनीय अवस्था असेल! 
महत्वाची बाब म्हणजे, २०१४ पासून भाजपच्या विरोधात असलेल्या काँग्रेसवर २४ वेळा, राष्ट्रवादी काँग्रेसवर ११ वेळा, तृणमूल काँग्रेसवर १९ वेळा, शिवसेनेवर ८, द्रमुकवर ६. राष्ट्रीय जनता दलवर ५, बसपावर ५ वेळा तर इतर काही पक्षांवर कमीत कमी दोन ते तीन वेळा छापा टाकला गेलाय. ही अशी नवी राजकीय परिस्थिती २०२४ च्या निवडणुकांच्या निमित्तानं देशात निर्माण झालीय. दुसरी अशी माहिती गोळा केली गेलीय की, २०१४ मध्ये भाजप सत्तेवर येण्यापूर्वी किती भाजप नेत्यावर ईडीनं कारवाई केलीय. तर त्या यादीत भाजपचे १०२ आमदार, खासदार होते ज्यांची ईडी, आयकर आणि सीबीआयकडं प्रकरणं होती. त्यावर तत्कालीन सरकारनं कारवाई केली नाही ती एक मोठी चूक त्यावेळची असू शकते ही बाब अलाहिदा! 
आज मात्र राजकारणाचं एक वेगळं रूप समोर येऊ लागलंय. जिथं भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आपल्या साऱ्या आर्थिक हालचाली तपास यंत्रणांच्या कक्षेत कधीही आणू शकतील. पण तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणजे राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी त्यांची रसद गोठवून त्यांना गलितगात्र करून टाकणं. याशिवाय निवडणूक आयोगाच्या मदतीनं त्या पक्षांची कोंडी करून टाकायची जशी महाराष्ट्रातल्या शिवसेनेची दिल्लीत आम आदमी पक्षाची करून टाकलीय. असं धोरण भाजपनं स्वीकारलेलं दिसतंय. भाजपनं काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात लोकसभेच्या संदर्भात जो सर्व्हे केलाय त्यात त्यांना असं स्पष्ट केलं आहे की, शिवसेना आणि भाजप एकत्र आले तरच २०१९ ची स्थिती कायम राहील. दोघे एकत्रित लढले तर लोकसभेच्या ४८ पैकी ४२ जागा जिंकू शकतात. पण सोबत शिवसेना असायला हवीय. मात्र शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी सारे बंध मोडून टाकलेत. २०१९ ला मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची मनधरणी करणं अमित शहांना शक्य झालं पण आजमितीला ते शक्य नाही. मग त्यासाठी खेळी खेळली गेली. एकनाथ शिंदेंना हाती धरून शिवसेनाच फोडली. ठाकरेंना बाजूला करून त्यांची शिवसेना आणि त्यांचं निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदेंना महाशक्ती भाजपनं मिळवून दिलं. त्या फुटीरांचा वापर २०२४ च्या निवडणुकीत केला जाणार आहे. सध्या कायदेशीर कज्जेबाजी सुरू आहे. त्याचा निकाल लागेल तेव्हा लागेल पण आजवर हे सिद्ध झालेलं नाही की, शिवसेनेचे मतदार कुणाबरोबर आहेत ते पक्षाचं नांव आणि चिन्हासोबत आहेत की, ठाकरे परिवारासोबत आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सिद्ध होऊ शकतं. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी ही शिवसेना-भाजप युती समोर २०१४ आणि २०१९ मध्ये टिकू शकलेली नाही. त्यांना ४८ पैकी ४२ जागांवर सपाटून मार खावा लागलाय. पण शिवसेना हे नांव आणि धनुष्यबाण हे चिन्ह घेऊन शिंदेंसोबत भाजपनं २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली आणि ३ टक्के मतं जरी अधिक घेतली तरी भाजप अशा स्थितीत येईल की, तिथं त्यांचं फारसं नुकसान होणार नाही असा भाजपचा होरा आहे. शिवाय या निमित्तानं हेही स्पष्ट होईल की, उद्धव ठाकरे यांचं केवळ शिवसेना हे नांव आणि धनुष्यबाण या चिन्हांच्या जोरावर राजकारण होतं, आपल्या व्यक्तिमत्वावर, ठाकरे या नावाच्या वलयावर आहे, हे येणाऱ्या काळात दिसून येईल! 
राष्ट्रीय राजकारणात सारे विरोधक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येतील असं काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय. त्यांना विरोधकांच्या इंडिया आघाडीनं पंतप्रधान पदाचे संभाव्य उमेदवार म्हणून जाहीर केलंय. नितीशकुमारांनीही विरोधकांच्या एकजुटीबाबत असंच म्हटलंय. उद्धव ठाकरेंनीही असंच काहीसं म्हटलंय. विरोधक एकत्र येताहेत असं दिसेल तेव्हा सरकारी तपास यंत्रणांचा आसूड तीव्र प्रमाणात अशांवर ओढला जाईल. बिहारमध्ये नितीशकुमार यांची एकट्याची विशेष अशी ताकद नाही ते लालूप्रसाद यादव यांच्यासोबत वा भाजपसोबत असतील तरच त्यांचं महत्व आहे. त्यामुळं तेजस्वी लालूप्रसाद यादव यांना नितीशकुमार यांच्यापासून दूर काढण्याचे प्रयत्न भाजपचे सुरू आहेत. त्यांच्यावर आणि त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांवर ईडी, सीबीआय, आयकर यांच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातलं सख्य भाजप जाणून आहे. गेहलोत यांच्या भावासह तिथल्या मार्बलच्या खाणी असलेले उद्योजक, व्यापारी, ठेकेदार, दलाल जे काँग्रेसला आर्थिक मदत करतात त्यांच्यावर धाडी टाकल्या जाताहेत. पण गेहलोत कमकुवत झाले असले आणि पायलट यांचा भ्रमनिरास झाला असला तरी तेभाजपकडं येत नाहीत हे वास्तव आहे. त्यामुळं तिथं पुन्हा तपासयंत्रणाच्या कारवाया सुरू झाल्यात. असं प्रत्येक राज्यात जिथं भाजपला आव्हान दिलं जातंय. जिथं विरोधकांची सत्ता आहे त्या राज्यात आगामी काळात असंच घडणार आहे. विरोधकांना आर्थिक रसद पुरविणाऱ्यांची गठडी वळवली जाईल. जेणेकरून विरोधकांना निवडणूक लढविण्यासाठीही पैशाअभावी उभं राहणं अशक्य होईल. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या देणगीदारांची आतापासूनच कोंडी केली जातेय. हे एकाबाजूला सुरू असलेली भाजपची भूमिका पाहून काँग्रेसनं त्यातही राहुल गांधींनी असा प्रयत्न चालवलाय की, जनआंदोलन उभं राहायला हवंय. जसं आणीबाणीनंतर उभं राहिलं होतं. आता सर्वसामान्य जनता याविरोधात उभी राहिली तरच ही कोंडी फुटू शकते ह्या निर्णयाप्रत ते आले आहेत. त्यासाठी भारत जोडोतून त्यांनी आपला संपर्क वाढवलाय. पण तेव्हाची राजकीय परिस्थिती वेगळी होती. आज वेगळी आहे. त्यामुळं जनता पक्षाचा प्रयत्न यशस्वी होणार नाही. पण आगामी काळात खरंच काँग्रेस प्रसंगी झुकत माप घेऊन विरोधकांना एकत्र करणार आहे का? तसं घडणार नाही. मग काँग्रेस जनमानसातल्या सरकारबाबतच्या रोषाला कशाप्रकारे वळण देणार यावरच सारं अवलंबून राहणार आहे. नाहीतर भाजपनं आखलेल्या कुटील खेळीनं देशातल्या राजकारणाला वेगळं वळण लागेल. देखीये आगे आगे होता हैं क्या...!
- हरीश केंची
९४२२३१०६०९










Sunday 17 December 2023

वरून दोस्ती, आतून कुस्ती....!

"महाराष्ट्राची परंपरा सुसंस्कृत राजकारणाची आहे. आम्ही ही परंपरा निष्ठेनं जपत आलो आहोत. राज्याची संस्कृती ही ओव्यांची आहे, शिव्यांची नाही. खालच्या पातळीचं राजकारण हा आमचा कधीच विषय नाही आणि नव्हता देखील. राजकीय जीवनातली संस्कृती, मर्यादा आणि सभ्यता याचाच आम्ही पुरस्कार करीत आलो आहोत. त्यालाच आम्ही महाराष्ट्र धर्म म्हणत होतो, त्याला आता ओहोटी लागलीय! आजचं राजकीय वातावरण बदललंय. सहानुभूतीची जागी सुडानं घेतलीय. सामाजिक सौहार्द संपत चाललंय अशा वातावरणात आगामी वर्ष हे निवडणुकांचं असणार आहे. देशात उत्तर विरुद्ध दक्षिण असं वातावरण निर्माण होण्याची भीतीही दिसतेय. राज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून चिरफळ्या झालेल्या सर्वांच्याच राजकारणाच्या मर्यादा स्पष्ट होणार आहेत. त्याचा हा धांडोळा!"
-------------------------------------
*दे* शातल्या चार महत्त्वाच्या राज्यांचे विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतंच स्पष्ट झालेत. या निकालानंतर महाराष्ट्रातही राजकीय वारे वाहू लागलेत. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये अशा तीन राज्यात भाजपला घवघवीत यश मिळालं तर तेलंगणामध्ये काँग्रेसला विजय मिळवता आलाय. या निकालांचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर किती होईल? या निकालांनंतर महाराष्ट्रातली राजकीय समीकरणं बदलतील का? असे काही प्रश्न उपस्थित होताहेत. भाजपला कर्नाटकमधला पराभव जिव्हारी लागल्यानंतर आता मात्र हिंदी पट्ट्यातल्या तीन राज्यात आपली सत्ता काबीज करण्यात यश आलंय. यामुळं महाराष्ट्रातही भाजपचा आत्मविश्वास वाढलाय. तर दुसरीकडे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांच्यासमोरील आव्हानंही वाढलंय. महाराष्ट्रात महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू असतानाच भाजपला तीन राज्यात मिळालेल्या स्पष्ट बहुमतामुळे आता जागा वाटपात भाजपची ताकद वाढणार. यामुळं एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचं आणि त्यांच्या पक्षांचं महायुतीतलं महत्त्व कमी होणार का? हा सुद्धा प्रश्न आहेच. त्यात आगामी वर्ष हे निवडणुकांचं असणार आहे. अवघ्या चार महिन्यात लोकसभा आणि त्यापाठोपाठ विधानसभा निवडणूक. त्यामुळं आताच्या या निकालांमुळे नेमकं काय बदलेल? अविश्वासाचं वातावरणात काय घडेल हे जाणून घेऊ या!
खरं तर गेल्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अनेकदा ढवळून निघालंय. शिवसेना-भाजपची युती तुटली, शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली, त्यानंतर अडीच वर्षात शिवसेनेत आजपर्यंतचं सर्वात मोठं बंड झालं. या बंडानंतर राज्यातलं महाआघाडीचं ठाकरे सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे गटानं भाजपसोबत सत्ता स्थापन केली. यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेस फुटली. अजित पवार काही आमदारांसह बाहेर पडले आणि ते युती सरकारमध्ये सामील झाले. हा सारा घटनाक्रम आतापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला तोंडपाठ झालेलाय. आता महाराष्ट्राची जनता वाट पाहतेय ती निवडणुकांची! राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकाही प्रलंबित आहेत. लोकसभेची मुदत २४ जूनपर्यंत आहे. तर २२ जानेवारीला अयोध्येत राम जन्म भूमी मंदिराचा सोहळा संपन्न होतो आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या घोषणेनंतर कदाचित मार्च महिन्यात लोकसभा निवडणूक होईल. त्यानंतर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आता राज्यात महायुतीचं सरकार आहे. यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असला तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांच्या सहाय्यानंच भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर येऊ शकलीय. त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या आमदारांनीही एकनाथ शिंदेंच्या सरकारमध्ये सामील होऊन पाठिंबा दिला. यामुळं लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत महाराष्ट्रात दोन मित्र पक्ष आहेत. परंतु आता तीन राज्यांच्या निकालानंतर भाजपचा वाढलेला आत्मविश्वास हा इतर दोन मित्र पक्षांच्या अस्तित्त्वाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. काही दिवसांपूर्वीच एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप ४८ पैकी २६ जागांवर उमेदवार उभे करण्याचं नियोजन असल्याचं म्हटलं होतं. म्हणजेच उर्वरित २२ जागांचं एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात कसं वाटप होणार हे अद्याप निश्चित नाही. पण एकनाथ शिंदे यांच्यासोबत आताच्या घडीला १३ विद्यमान खासदार आहेत. तर अजित पवार यांच्यासोबत सध्या एकच खासदार आहेत. अजित पवार आणि एकनाथ शिंदे लोकसभेच्या किती जागांची मागणी करतात की यावरून दोन्ही गटात रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. महायुतीच्या दृष्टीनं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो म्हणजे भाजप आपल्यासोबतच्या दोन मित्र पक्षांसाठी किती जागा सोडणार हा?
लोकसभेला जागा वाटप महायुतीला अवघड जाणार आहे. कारण इथं तीन पक्षांची युती आहे. दोन मित्रपक्षांना भाजपला जागा द्याव्या लागणार आहेत. बहुधा भाजपला असं वाटत असेल की हे मित्र सोबत आले नसते तर बरं झालं असतं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राजकीय अस्तित्वाचा फार काही दूरगामी विचार केलेला दिसत नाही. पण भाजपचं हे गेल्या २०- २५ वर्षांपासूनचं राजकारण आहे. राज्य पातळीवरचे पक्ष दुबळे करायचे, त्यांना आपलंसं करायचं आणि मग सोयीस्कररित्या बाजूला करायचं. पण राजकारणात तुम्हाला पुढच्या १०-१२ वर्षांचा विचार करावा लागतो. आता या पट्ट्यात भाजपचा बोलबाला आहे हे भाजपला कळलेलं आहे. त्यामुळे यांच्यासोबतचे मित्र पक्ष आणि भाजपचे संबंध हे तणावाचे आणि एकतर्फी राहतील. कारण भाजप आता त्यांना असं सांगेल की आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा. काही स्थानिक फायदे आम्ही तुम्हाला देऊ. त्यात एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांवर आणि त्यांच्या पक्षातल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहेच. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्षांतल्या दोन्ही गटांची सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आणि विधानसभेत कायेदशीर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयानं १० जानेवारीपर्यंत त्यासाठीची मुदत दिलीय. भाजपला वातावरण निर्मिती व्हायला निश्चितच या निकालांची मदत होईल. आताचा काळ असा आहे की कोणाला विरोधी पक्षात रहायचं नाहीये. भाजपला लोकसभेला अधिक मोठं बहुमत मिळालं तर उरले सुरले सुद्धा सत्ताधाऱ्यांकडे जातील अशी स्थिती आहे. कारण आपल्याला राजकीय भवितव्यच उरणार नाही असं त्यांना वाटायला लागलंय. ही लोकशाहीची शोकांतिका म्हणावी लागेल! एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पाठिंब्याची गरज भाजपला फारशी नाही हे महत्त्वाचं सत्य इथं नमूद करायला हवंय. किंबहुना भाजपची त्यांना गरज आहे. त्यांच्या अस्तित्वासाठी त्यांना भाजपचा आधार लागणार आहे. भाजपची पक्षीय यंत्रणा अतिशय मजबूत असल्यानं भाजपला त्या दोघांची फारशी गरज नाही. आपली गरज नसताना त्यांना तिथं जावं लागतंय, हे भाजपचं यश आहे आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं अपयश आहे. असं असलं तरी महाराष्ट्रात भाजपला मित्र पक्षांची आवश्यकताच नाही असंही चित्र नाही. यापूर्वीही भाजपला शिवसेनेची गरज होती आणि त्यानंतर आता शिवसेनेचा एक गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट भाजपसोबत आहे. नुकत्याच लागलेल्या निकालामुळे भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांचा आत्मविश्वास निश्चित वाढलाय. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या विद्यमान खासदारांच्या जागा त्यांना मिळतील. शिवाय, अजित पवार सुद्धा भाजपसोबत येण्यापूर्वी त्यांच्यात वाटाघाटी ठरल्याच असतीलच. त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांनाही जागा मिळतील. तर काही ठिकाणी मित्र पक्षांतील काही उमेदवार कमळ या चिन्हावरही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. असं काहींनी आत्ताच जाहीर करून टाकलंय.
महाराष्ट्रात दोन मोठ्या पक्षात उभी फूट पडली आणि दोन पक्षांचे आता चार पक्ष किंवा चार गट झालेत. यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या संघटनात्मक बांधणीला मोठा धक्का तर बसलाच पण जनतेमध्ये त्यांच्यासाठी सहानुभूतीची एक लाट तयार झाली होती. ती लाट परतविण्यासाठी राज्यात मराठा आणि ओबीसी असा वाद निर्माण केलाय. सामाजिक सौहार्द धोक्यात आणलंय. सहानुभूतीचं वातावरणाचा फायदा प्रत्यक्षात मतांमध्ये होणार नाही याची दक्षता भाजपनं घेतलीय. विरोधकांकडून भाजपविषयीची नकारात्मक प्रतिमा देशभरात तयार होत असल्याचा प्रचार सुरू असूनही तीन राज्यात भाजपनं यश मिळवलंय. यामुळे निश्चितच महाराष्ट्रातही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोरील आव्हान वाढलंय. पुढचे काही महिने विरोधकांना जमिनीवर उतरून काम करावं लागेल. केवळ भाजप अनैतिक आहे असा प्रचार करून उपयोग होणार नाही तर निवडणुकीची रणनीती, त्याची अंमलबजावणी आणि शेवटपर्यंत लढावं लागेल ही मानसिकता ठेवावी लागेल. मोदी ब्रँड वापरून निवडणूक आजही जिंकता येते हे भाजपसाठी स्पष्ट झाल्यानं त्यांचा आत्मविश्वास आणि ताकद वाढलीय. यामुळे आता विरोधकांना केवळ सहानुभूतीवर अवलंबून राहता येणार नाही. ती सहानुभूती आता जवळपास संपलेली दिसतेय. त्यामुळं ठाकरे आणि पवारांना भावनिकतेच्या आधारावर आपल्याला आपोआप मते मिळतील असं वाटत असेल तर तसं होणार नाही. यात महाविकास आघाडी किती एकत्रित काम करते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार शेवटपर्यंत एकत्र राहतात का? जागा वाटप करताना कुरघोडीचं राजकारण न करता प्रत्यक्षात आकडा वाढवण्याच्यादृष्टीनं रणनिती आखली जाणार का? हे निर्णय सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहेत. उद्धव ठाकरे यांचा लढा ते कायम ठेवतील का, अजित पवार आणि शरद पवार यांच्याविषयी शंका होती त्या सर्व शंका दूर होतील का, आरक्षण, शेतकरी, बेरोजगारी, महागाई अशा अनेक मुद्यांवर विरोधक कसं काम करतील, असे अनेक मुद्दे महत्त्वाचे आहेत. केवळ चार राज्यांच्या निकालामुळे महाराष्ट्रात काही मोठे परिणाम होतील असंही नाही. जानेवारीत राम जन्मभूमी मंदिराचं उद्घाटन आहे. त्यानंतर भाजप काही मोठे निर्णय घेतील असं सांगितलं जातंय. यामुळे या परिस्थितीत आपलं कोणतंही शस्त्र, राजकीय व्यूहरचना यादरम्यान हरवणार नाही ना याची काळजी मात्र विरोधकांना घ्यावी लागणार आहे. यात सातत्य राखणं आणि शेवटपर्यंत आपल्या पक्ष कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवून ठेवणं हे सुद्धा एक मोठं आव्हान विरोधकांसमोर आहे.
महाविकास आघाडीतल्या तीन पक्षांपैकी दोन पक्षात बंड झालं आणि दोन्ही पक्ष संघटनात्मक दृष्टीनं ढासळलेत. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांना सध्या आपल्या पक्षबांधणीकडे विशेष लक्ष द्यावं लागतेय. यात काँग्रेसमध्ये फूट न पडल्यानं आतापर्यंत काँग्रेसचा याबाबतचा आत्मविश्वास तुलनेनं इतर दोन मित्रपक्षांपेक्षा अधिक असल्याचं दिसतंय. या कारणामुळे कदाचित जागा वाटपातही काँग्रेस अधिक आग्रही राहील असं चित्र होतं. पण तीन राज्यात झालेल्या पराभवानं त्यांना जमिनीवर आणलंय. यश मिळालं असतं तर त्यांनी मित्रपक्षांना जुमानलं नसतं, हे आपण मध्यप्रदेशात पाहिलंय. तिथं समाजवादी पक्षाला २-३ जागा सोडल्या नाहीत. उलट अखिलेश यादव यांचा उपमर्द केला. परंतु आता मात्र काँग्रेसला महाराष्ट्रात मित्र पक्षांसोबतच जुळवून घ्यावं लागणार आहे. या निकालांमध्ये काँग्रेसचं वोटींग पर्सेंटेज कमी झालेलं नाही ही त्यातल्या त्यात त्यांच्यासाठी जमेची बाजू असली तरी तीन राज्यात पराभव झाल्यानं काँग्रेसची बार्गेनींग पावर मात्र कमी झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. तेलंगणातून महाराष्ट्रात झालेल्या बीआरएसच्या एन्ट्रीमुळे त्यांनी महाराष्ट्रात दोन-तीन टक्के मतं खाल्ली असती, पण आता तेलंगणात त्यांचा पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रात ते फार काही करू शकणार नाहीत. दुसरं म्हणजे कर्नाटकमध्ये विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता पण आता काँग्रेसच्या लक्षात येईल की आपल्याला आघाडीची अधिक गरज आहे. यामुळे इंडिया आघाडी असो वा महाविकास आघाडी त्यांना संवाद सुरू करावाच लागेल. पुढच्या चार पाच महिन्यात काँग्रेससमोर अधिक ते एक मोठं आव्हान असेल. मध्यप्रदेशवरून महाविकास आघाडीनं धडा घ्यायला हवा की कोणीही एक नेता अगदी कमलनाथांसारखा नेता सुद्धा निवडणूक पुढे नेऊ शकत नाही. महाराष्ट्राचं आताचं राजकारण पाहिलं तर महाविकास आघाडीनं एकमेकांशी जुळवून घ्यायला हवंय. पण राज्यांच्या राजकारणाचा विचार केला तर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशचं राजकारण वेगळं राहिलेलं आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरक्षणाच्या मागण्यांनी डोकं वर काढलंय. जातीच्या अस्मिता अधिक तीव्र आणि टोकदार होताहेत. यामुळं याबाबत राजकीय पक्ष काय भूमिका घेतात आणि काय धोरण ठरवतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कारण सत्ताधारी पक्षांसमोर यावर तोडगा काढण्याचं आव्हान कायम आहे. आता जातीच्या मुद्यावर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी काय भूमिका घेते हे महत्त्वाचं आहे. भाजप काय निर्णय घेते हे पहावं लागेल. यामुळं काँग्रेसला या मुद्याशी जास्त सुसंगत आणि दीर्घकालीन भूमिका घ्यावी लागणार आहे. भाजपसमोरील आव्हान वाढणार आहे. महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न केला तर इतर राज्यातले आरक्षणाचे प्रश्न पुन्हा उभे राहतील. हा जांगडगुत्ता आहेच.
राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निकालानंतर देशभरात पुन्हा एकदा उत्तरभारत आणि दक्षिणभारत यामध्ये परस्परविरोधी विचारधारेचे कल दिसून येत असल्याची चर्चा सुरू झालीय. यात महाराष्ट्राचा कल कोणत्या दिशेकडे हे अधिक महत्वाचं आहे? मला वाटतं महाराष्ट्रातलं पुरोगामी राजकारण, राजकारणाचा पोत आणि स्वभाव उत्तर भारतासारखा होऊ लागलाय. पूर्वी महाराष्ट्राचं स्वत:चं वेगळेपण जे होतं ते आता राहिलेलं नाही. त्यामुळं मला असं दिसतंय की आपण दक्षिण-उत्तर असं मानलं तर हिंदू धर्माबाबत उत्तरेकडे ज्या कल्पना आहेत त्या तशा महाराष्ट्रात प्रचलित होऊ लागल्यात. उत्तरेकडचा धार्मिक आक्रमकपणा महाराष्ट्रात जास्तीत जास्त येताना दिसतोय. त्यामुळं दक्षिण-उत्तर अशी विभागणी मानली तर महाराष्ट्र हा बहुतेक उत्तरेसारखा व्हायला लागलाय. २०१४ पासून महाराष्ट्रात भाजपची सत्ता आहे. यामुळे कौल महाराष्ट्रात २०१४ पासून तसाच मिळतोय. आता असा कौल न मिळणं हे आघाड्यांच्या राजकारणावर अवलंबून आहे. महाराष्ट्राचा स्वभाव आता उत्तर भारतासारखा बनतोय आणि आपण दक्षिणेपासून बाजूला होतोय असं चित्र आहे. मराठी माणसाची ही 'उत्तरपूजा ' कशासाठी?
हरीश केंची
९४२२३१०६०९




अस्वस्थ विरोधक, उध्वस्त विरोधक...!

"लोकशाहीत विरोधीपक्षांचं स्थान अनन्यसाधारण आहे. ती सशक्त करायची असेल तर विरोधीपक्षही मजबूत असायला हवा, मात्र दुर्दैवानं तसं दिसत नाही. किंबहुना सत्ताधारी विरोधकांना संपविण्यासाठीच कार्यरत दिसताहेत. पण त्याविरोधात विरोधक घट्ट पाय रोवून एकत्रितपणे उभा ठाकलाय असं दिसत नाही. कधी नव्हे इतके सत्तेच्या विरोधातले मुद्दे हाती असतानाही विरोधक आंदोलनं करत नाहीत. लोकांना संघटित करत नाहीत. त्यांच्या पराभूत मानसिकतेनं त्यांना विस्कळीत, कमकुवत, विकलांग बनवलंय. सत्तेच्या विरोधात लढण्याची जिद्दच संपलीय. एकीकडे शक्तिशाली, बलाढ्य असा सत्ताधारी तर दुसरीकडं गलितगात्र, शक्तीहीन, विखुरलेला, कृश असा विरोधीपक्ष हे चित्र लोकशाहीच्या अस्तित्वासाठी घातक आहे. खिळखिळीत होऊ लागलेल्या लोकशाहीतल्या चारही स्तंभांनी निडर होऊन कार्यरत होण्याची नितांत गरज आहे!"
------------------------------------------
*भा*रतात विरोधी पक्ष आजच्या इतका विस्कळीत, कमकुवत, विकलांग कधीच नव्हता. तशीच सत्ताधारीही कधी नव्हे इतके ताकदवान, शक्तिशाली बनलेत. सत्तेच्या विरोधातल्या आरोपांची चळत आजच्या एवढी कधीच मोठी नव्हती. संसदेपासून सर्वोच्च न्यायालय आणि रस्त्यावरच्या प्रश्नांबरोबर लोकशाहीच्या चारही स्तंभाचे प्रश्न उभे ठाकलेत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. शिवाय प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, सनदी नोकरशाही, संवैधानिक संस्था, रिझर्व्ह बँक, निवडणूक आयोग, इन्कमटॅक्स वेगवेगळ्या ईडी, सीबीआय, एनआयए, या तपास यंत्रणा, हिंदुत्वाचा हट्ट, धर्माचं राजकारण, या साऱ्या बाबींचं निरीक्षण केलं तर दिसून येईल की, असे प्रश्न कधीच एकत्रितरीत्या उभ्या ठाकल्या नव्हत्या! प्रश्न असतानाही सत्ताधारी सदैव निवडणूक जिंकण्याच्या मोडमध्येच असतात. इथं केवळ निवडणुका जिंकण्याचा प्रश्न नाही. निवडणुका तर त्या तशाही  मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तराखंड इथंही जिंकल्या आहेत. पण या जिंकलेल्या निवडणुकांतून विरोधकांना हटवून आपल्या सत्ता कशी आणायची याचे कुटील डाव यापूर्वी दिसून आलेत. विरोधीपक्षांकडून सध्या जे राजकारण खेळलं जातंय ती नरेंद्र मोदींना ताकद देणारीच ठरतेय! विरोधीपक्ष लोकतांत्रिक पद्धतीनं असंवैधानीक बाबींवर आंदोलनासाठी, संघर्षासाठी उभा झाला तरी त्याचा लाभ सरकारला मिळतोय असं दिसून आलंय. विरोधकांचा परिणामकारक विरोध फारसा दिसतच नाही. ही वस्तुस्थिती आहे. देशातल्या काही घडामोडी पाहिल्या तर असं दिसून येईल की, जासुसी करणारं इस्रायली सॉफ्टवेअर पॅगसेसेच्या प्रकरणात काय घडलं? लढाऊ फ्रान्सची राफेल विमान खरेदी प्रकरणात न्यायालयानं काय भूमिका घेतली? राजकीय पक्षांना निधी संदर्भातल्या इलेक्शन बॉण्ड प्रकरणात निवडणूक आयोगाला सोयीस्कररित्या कसं दूर लोटलं गेलं. याबाबत संसदच काय ते ठरवील, निवडणूक आयोगानं यात लक्ष घालू नये! असं न्यायालयानं सांगितलं. विविध राज्यात नेमलेल्या राज्यपालांकडं जे घटनात्मक अधिकार आहेत, त्याचा वापर सकारात्मक होतोय असं दिसतं नाही. त्यांच्याकडं संवैधानिक जबाबदारी असतानाही विरोधकांचं  मर्दन करण्यातच धन्यता मानताना दिसताहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे राज्यपाल वागताना दिसताहेत. त्यासाठी त्यांना सत्ताधाऱ्यांकडून रिवार्डस दिली जाताहेत!
या सर्व गोष्टींकडं आपण अधिक गांभीर्यानं पाहू लागलो तर देशातला विरोधक ज्या काही भूमिका घेताहेत त्यानं राजकीयदृष्ट्या सरकारला मदतच होतेय! शिवाय विरोधीपक्षांमधला अंतर्विरोध हाही याला कारणीभूत ठरतोय. विरोधक एकत्र येण्याऐवजी एकमेकाविरोधात भिडताहेत. आपण आपल्या कार्यकाळात केलेल्या गैरगोष्टी, व्यवहार भविष्यात उघड झाल्या तर आपल्यावर कारवाई होईल अशी भीती वाटत असल्यानं ते सारं लपविण्यासाठी विरोधक चूप बसताहेत. ईडीकडं विरोधकातल्या १२२ जणांची यादी असल्याचं सांगण्यात येतं. या १२२ जणांनी एकत्र येऊन 'करा आम्हाला अटक, टाका तुरुंगात!' असं म्हणत सामोरं का जात नाहीत? म्हणजे ईडीच्या कारवाया तरी थांबतील. कारवाईची टांगती तलवार उरणार नाही. ससेमिरा तरी संपेल! संसद, न्यायपालिका, कार्यपालिका, तपासयंत्रणा, हिंदुत्वाच्या नावावर उठवलेलं वादळ, लोकप्रतिनिधींना सत्तेसाठी फोडणं, राष्ट्रवादाचं गुणगान करणं, हे सारं सत्ताधारी खुलेआमपणे करत असताना त्याविरोधात उभं राहण्याऐवजी विरोधकांची नजर असते ती एकाच व्यक्तीवर ते म्हणजे प्रधानमंत्री मोदी यांच्यावर! त्यामुळं त्यांची प्रतिमाखंडन होण्याऐवजी ती अधिक उजळून लोकांसमोर येते. सरकारचा गैरकारभार, त्यांनी घेतलेले काही वादग्रस्त निर्णय, जाहीर केलेल्या धोरणांतला फोलपणा लोकांसमोर आणून मुद्द्यांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणं, लोकांना आपल्याशी जोडणं हे सारं विरोधक करू शकतात, पण त्यांची पराभूत मानसिकता त्या आड येते. त्यांना केवळ राजकारणातला विजय आणि सत्ता हवी असते. ते केवळ राज्यसभा, विधानपरिषदेच्या सदस्यत्वासाठी झगडताना दिसताहेत. त्यांना संघर्ष करायला नकोय. रस्त्यावर उतरून लोकांच्या साथीनं लढा द्यायचा नाहीये. आज राजकीय विजयाच्या पारंपरिक पध्दती बदलल्या आहेत, सोशलमीडिया नावाचा भस्मासुर त्यात उतरलाय. त्याच्या माध्यमातून सामोरं जाण्यातही विरोधीपक्ष अपयशी ठरताहेत. वाढलेल्या महागाईचा मुद्दा ज्वलंत आहे, लोक त्रस्त झालेत, दिवसेंदिवस कराचा बोजा वाढतोय. बेरोजगारीनं अक्राळविक्राळ रूप धारण केलंय. तरुण वैफल्यग्रस्त बनू लागलेत. 'अग्निपथ आणि अग्निवीर' विरोधातल्या धगधगत्या आंदोलनातून त्याची प्रचिती आलीय. तरीही लोक भाजपला मतदान करताहेत. त्याची मानसिकता शोधण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. तिथंही विरोधीपक्षाचं अस्तित्व दिसलंच नाही!
करवसुली सध्या ज्याप्रकारे होतेय त्यानं देशभरातले व्यापारी-उद्योजक कमालीचे वैतागलेत. जीएसटी, आयकर, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कर, कार्पोरेट करातली माफी, बँकांची बिघडलेली आर्थिक स्थिती, सर्वच बँकांतून एनपीएचं वाढलेलं प्रमाण, उद्योग-व्यापारातला दिवसेंदिवस वाढत चाललेला तोटा, इंपोर्ट-एक्स्पोर्टमध्ये होणारी वध-घट, खनिज उत्खनन त्यातही कोळशाचं उत्खनन कमी झालेलं दाखवून कोळसा आयातीचं धोरण, सरकारनं औद्योगिक धोरणात एनसीएलटी, आयबीसीची निर्मिती का आणि कशासाठी केली, ज्यामुळं हजारो उद्योगधंदे दिवाळखोरीत निघाताहेत, त्या कंपन्या कोण खरेदी करतोय, त्यातून कुणाला फायदा होतोय, यासाठी विरोधीपक्षांनी पुढं यायला हवंय. दरम्यान देशात डिसइनव्हेसमेंट, प्रायव्हेटायझेशन, मोनोटायझेशन होतेय. अंबानी, अदाणी यांचे व्यवहार जोमानं सुरू आहेत, हे सारं येऊन पोहोचतं ते चलनावर, करन्सीवर! आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाच्या किंमतीवर! दिवसेंदिवस डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होतेय. आज ती ८० रुपये इतकी कमी झालीय. त्यामुळं महागाई वाढतेय. हे सारे विषय लोकांसमोर आणणारा प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र सत्ताधाऱ्यांसमोर नतमस्तक झालाय. पब्लिक सेक्टरच्या कंपन्यांच्या समस्या वाढल्यात. असे एक ना अनेक मुद्दे असताना विरोधक सरकारला लक्ष्य करण्यात का कचरताहेत. सरकारला केलेला विरोध मीडिया हे दाखवणार नाही म्हणून विरोधक मुद्दे हाती असतानाही लढा उभारत नाहीत. ज्या देशात कॅबिनेट मंत्री, राज्यपालांची भूमिका, राज्यसभेत कोणते सदस्य निवडून आणायचं, कुणाला हटवायचं, कुणाचं वय कधी होईल, कुणाकडून कोणतं काम करून घ्यायचं, हे देखील पीएमओमध्ये केंद्रीत झालंय, या सगळ्यांत देशातल्या ज्या संवैधानिक संस्था आहेत त्यांच्या प्रमुखांच्या नेमणुकाही एकाच 'दरबारा'तून होताहेत, जे घटनात्मकदृष्ट्या पूर्वी लोकांच्या समित्यातून घेतलेल्या निर्णयानुसार होत असे, तेही आता संपुष्टात येतेय. सीव्हीसी कोण असेल, सीएजी कोण असतील, सीबीआयचे प्रमुख कोण असतील, ईडीचे प्रमुख कोण असतील, सेबीचे प्रमुख कोण असतील, नीती आयोग कुणाच्या हाती असेल, इलेक्शन कमिशनमध्ये सर्वात वरिष्ठ स्थानावर कोण असेल, न्यायाधीशांची नियुक्ती कशी होईल, कोण करील, एका फटक्यात कुणालाही का अन कसं हटवलं जाईल, या साऱ्याचा आढावा घेतला तर लक्षांत येईल की पूर्वी या साऱ्या नेमणुका, नियुक्त्या या संवैधानिक पद्धतीनं बनवलेल्या समित्यांमार्फत होत होत्या. हे सारं आता बदललंय. एवढंच नाही तर याला समांतर पाहिलं तर लक्षांत येईल की, भाजपची सत्ता असतानाही त्यांची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंकित असलेल्या चार संस्था ज्यांची नाळ भाजपशी जुळलेली आहे. भारतीय मजदूर संघ, स्वदेशी जागरण मंच, विश्व हिंदू परिषद, भारतीय किसान संघ या संस्था ज्या विषयासाठी निर्माण करण्यात आल्या होत्या ते सारे विषय सत्तेशी निगडित असतानाही ते कार्पोरेटायझेशनशी जोडलं. त्यामुळं या विषयांचं अस्तित्वच शिल्लक राहिलं नसल्यानं या संस्थांही संघाला, भाजपला नकोशा झाल्या आहेत. प्रचारकाच्या हाती सत्तेची सारी सूत्रं असतानाही याबाबतचा जाब विचारण्याची हिंमत, धाडस संघालाही झालेलं नाही! हे आता कुठंवर जाणार आहे? प्रश्न केवळ अमर्याद सत्तेचा, असंसदीय परिस्थितीचा, देशातल्या संवैधानिक संस्थांच्या अस्तित्वाचा नाही तर, सामाजिक स्तरावरही दबाव संपवून टाकलाय. नव्या प्रकारची राजकीय संस्कृतीची निर्मिती करायची कला या सत्तेनं मिळवलीय. या राजनैतिक परिपेक्षात विरोधकांना संसदेच्या दोन्ही सभागृहात जशाप्रकारे किंमत दिली जातेय, याची जाणीव त्यांना होतेय असं दिसतं नाही. संसदेचं कामकाज कशा पद्धतीनं चालवली जातेय, संसदेच्या दोन्ही सभागृहात कशापद्धतीनं विधेयकं येतात ती कशी संमत केली जातात हे पाहिलंय. विधेयकं चर्चा घडवून वा चर्चा होऊ न देताही संमत केले जाताहेत. मग त्यासाठी संसदेचं कामकाज चालेलं काय, नाही काय, याची सरकारला फिकीरच नसते. संसदेची दोन्ही सभागृहं राजकीय सत्तेच्या हातातलं खेळणं बनलंय आणि विरोधक तिथं आपल्याला अपंग, विकलांग, गलितगात्र समजू लागलेत. जणू आक्रसले गेलेत! या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण होतोय. विरोधकांचं अस्तित्व यापूर्वीच्या राजकारणात अत्यंत महत्वाचं राहीलेलं आहे. पण आजच्या स्थितीत ते राहिलेलं नाही, नगण्य बनलंय. 
लोकप्रतिनिधीच्या केल्या जाणाऱ्या खरेदी-विक्रीबाबत विरोधक नाराजी व्यक्त करतात पण त्यावर परिणामकारक उपाय ते शोधू शकत नाहीत. त्यांच्याकडं कसल्याही प्रकारची आंदोलनं नाहीत, आपल्यावर होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या आरोपातून पुन्हा नव्यानं उभारण्याची ताकद त्यांच्याकडं नाही. सगळ्या स्वायत्त तपासयंत्रणा या कायदेशीर, नियमानुसार स्वतंत्रपणे काम करण्याऐवजी सत्ताधाऱ्यांच्या दबावानं करताहेत. असं आढळूनही त्या विरोधात कोणताच विरोधीपक्ष का उभा राहात नाही? घटनात्मक संस्था ईडी, सीबीआय, आयकर एवढंच नाही तर कॅगचा अहवालही संसदेत सादर केला जात नाही. यावर विरोधक काहीच बोलत नाहीत! लोकशाही आणि संवैधानिकदृष्ट्या देश कमजोर होत असेल तर विरोधकांची भूमिका किती सक्षम असायला हवीय. हे त्यांना कुणी सांगायला हवंय का? त्यासाठी कशाप्रकारे आंदोलन करावं यांचं मार्गदर्शन करावं काय? एवढंच नाही तर सत्ताधाऱ्यांकडून हिंदुत्वाचं वादळ उभं केलं जातं असताना विरोधकांना कोणत्या बाजूला उभं राहायचं हेच मुळी कळत नाही. विरोध केला तर मुस्लिमांचं तुष्टीकरण केलं जात असल्याचा आरोप होण्याची भीती त्यांना वाटतेय. संघर्ष कसा करावा, विरोधासाठी काय करायला हवं या विचारापासून विरोधक दूर जाताहेत. ते आपसातल्या अंतर्विरोधानं अशा ताकतीला बळ पुरवतात की, जे विरोधकांना पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करताहेत. असाच प्रकार राष्ट्रवादाच्या निमित्तानं होतोय. देशातली कोण व्यक्ती राष्ट्रवादी नाही? सारेच स्वतःला राष्ट्रवादी समजतात पण राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राजद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. अखेर सर्वोच्च न्यायालयाला यात हस्तक्षेप करावा लागतो. हा इंग्रजांच्या काळातला कायदा. जो महात्मा गांधींवरही गुदरला होता. पण यावर सत्ताधाऱ्यांनी काहीच मत प्रदर्शन केलं नाही कारण त्यांच्या हाती युएपीए हा आणखी एक कायदाही आहे त्याचा दुरूपयोग सत्ताधारी करतांना दिसतात. यात जामीन मिळण्यात मोठी अडचण असते. आजवर ह्या कायद्यानुसार चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावरच कारवाया झाल्यात. एकाही राजकीय पक्षाच्या अगदी विरोधीपक्षांच्या नेत्यावरही कारवाई झालेली नाही. पॅगसेसे सोफ्टवेअरच्या माध्यमातून केवळ विरोधकांचीच नाही तर न्यायाधीशांचीही माहिती सरकार गोळा केलीय, राज्य सरकारं पाडापाडीसाठी त्याचा वापर केला जात होता, असं उघडं झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यावर काहीही म्हटलं नाही, कारण सरकारनं सांगितलं की, हे सॉफ्टवेअर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाचं आणि गोपनीय असल्यानं काही माहिती देता येत नाही. यावर सर्वोच्च न्यायालय गप्प झालं! घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं, "भारतात संसदीय सरकार नाही, तर संसदीय लोकशाही आहे. प्रतिनिधित्व ही लोकशाहीची मूळ कल्पना आहे. संसदीय लोकशाहीत आपण कधीही बहुमताने शासन करू शकत नाही. बहुमताचा नियम सैद्धांतिकदृष्ट्या असमर्थनीय आणि व्यावहारीकदृष्ट्या अन्यायकारक आहे. अशा लोकशाहीत अल्पसंख्यांकांची मतं बहुसंख्यांक धुडकावू शकत नाहीत!" आज नेमकं त्याच्या विरोधात सरकारची ध्येयधोरणं आखली जाताहेत, तशी पावलं पडताहेत. मात्र याला विरोध करण्याची ताकद आणि मानसिकता विकलांग झालेल्या विरोधीपक्षांची राहिलेली नाही. हे देशाच्या आणि भारतीय मतदारांच्या दृष्टीने दुर्दैव आहे!
हरीश केंची
९४२२३१०६०९

Sunday 10 December 2023

तेलंगणाच्या अंगणात....!

"हिंदी पट्ट्यात पराभूत झालेल्या काँग्रेसला तेलंगणानं हात दिला. भारत जोडोची पार्श्वभूमी, रेवंत रेड्डीचा झंझावात हा जसा काँग्रेसच्या यशाला कारणीभूत ठरला. तशीच भाजपची अवसानघातकी भूमिकाही सहाय्यभूत ठरलीय. बीआरएस विरोधात भाजपनं  उठवलेल्या आरोपांचा धुराळा, केसीआर, केटीआर, कविता आणि हरीश राव यांना केलेलं लक्ष्य यामुळं वातावरण भाजपला पोषक होतंय असं वाटत  असतानाच पक्षानं आक्रमक संजयकुमार बंडी आणि श्रीनिवास मंत्री यांची उचलबांगडी केली, शिवाय भाजपच्या दिल्लीतल्या वरिष्ठांनी केसीआर यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न, यामुळं कार्यकर्ते सैरभैर झाले. अनेकांनी मग काँग्रेसला जवळ केलं. त्यातच तेलुगु देशमनंही रेवंत यांना साथ दिली. त्यामुळं काँग्रेसला यशाचं शिखर गाठणं सहज साध्य झालं!"
---------------------------------------------
*लो* कसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजल्या गेलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत राजस्थान, उत्तराखंड आणि आधी काँग्रेस मग भाजपकडे गेलेला मध्यप्रदेश ही भाजपला मिळालीत तर बीआरएसकडे असलेला तेलंगणा मात्र काँग्रेसला मिळाला. मिझोरम स्थानिक आघाडीला मिळाला. प्रसिद्धी माध्यमातून भाजपच्या यशाचं महिमामंडन केलं गेलं, मात्र तेलंगणातल्या काँग्रेसच्या यशाची फारशी चर्चाच झाली नाही. राजस्थानात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातलं वितुष्ट, यामुळं गुज्जर समाजाची मतं काँग्रेसला मिळाली नाहीत. गेहलोत यांचा अती आत्मविश्वास, चुकीचे उमेदवार निवडले, समर्थकांना उमेदवारी देण्याचा आग्रह, पायलट समर्थकांना वगळण्याची चाल यामुळं त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं. तर मध्यप्रदेशात संजय गांधीचे वर्गमित्र असलेल्या कमलनाथ यांचा उन्मत्तपणा, त्यांनी पक्षानं पाठवलेल्या प्रत्येक प्रभारींचा सतत केलेला उपमर्द, अवहेलना, प्रचार रणनितीकार सुनील कानाबोलू यांचा केलेला तिरस्कार हा काँग्रेसला नडला. सुनील यांनी कर्नाटक आणि तेलंगणा इथं रणनीती आखली होती. यश मिळवलं होतं. तिकडे उत्तराखंडमध्ये बघेल यांच्या उरावर उपमुख्यमंत्री म्हणून वयोवृद्ध राजा सिंगदेव यांना काँग्रेसनं बसवलं. सिंगदेवांना मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळं त्यांनी बघेलांच्या समर्थकांना पाडण्याचा केलेला प्रयत्न काँग्रेसच्या अंगाशी आला. सगळ्या सर्वेक्षणात इथं काँग्रेसच येणार असं सांगितलं जातं होतं, पण सिंगदेवाच्या वागणं अंगलट आलं. मात्र तेलंगणात कर्नाटकातल्या डी.शिवकुमार यांच्याप्रमाणे रेवंत रेड्डी यांना काँग्रेसच्या हायकमांडनं एकहाती स्वातंत्र्य दिलं त्यामुळं काँग्रेसला यश मिळू शकलं.
गेल्या वर्षभराहून अधिक काळ भाजपनं तेलंगणा ढवळून काढला होता. बीआरएसमधल्या अनेकांना जवळ केलं होतं. पक्षविस्तारासाठी भाजप प्रांताध्यक्ष खासदार बंडी संजयकुमार यांनी पक्षाचे प्रभारी श्रीनिवास मंत्री यांच्यासाथीनं राज्यात मोर्चेबांधणी केली. दरम्यान इथं झालेल्या चार पोटनिवडणुकीत तीन ठिकाणी यश मिळवलं. हैद्राबाद महापालिकेतही लक्षणीय यश मिळवलं. या घडामोडीनं तेलंगणाचं लक्ष भाजपकडे वेधलं गेलं. मग संजयकुमार बंडी यांनी केसीआर यांच्या कारभाराचे वाभाडे काढत त्यांच्या कुटुंबावर जबरदस्त प्रहार केले. त्यातच केसीआर यांच्या मंत्रिमंडळातले वरिष्ठ मंत्री आणि मागासवर्गीय समाजातले प्रभावी नेते राजेंद्र इटल यांना भाजपत सामील करून घेतलं. बंडी आणि इटल यांनी के. चंद्रशेखर राव-केसीआर, त्यांचे पुत्र के.तारक रामाराव-केटीआर, कन्या कविता आणि भाचे हरीश राव यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे वेशीवर टांगली. दरम्यान दिल्लीत 'शराब घोटाळा' झाला. तिथल्या केजरीवाल सरकारमधले तीन मंत्री तुरुंगात गेले. या शराब घोटाळ्यात केसीआर कन्या कविता यांचंही नाव पुढं आलं. त्यांची इडीनं चौकशी केली. कवितांच्या काही समर्थकांची धरपकडही झाली. त्यानंतर भाजपनं कविता, केसीआर यांच्यावरची टीका अधिक टोकदार केली. शराब घोटाळ्यातला सारा व्यवहार हा कवितांना फारसा माहीत असणं शक्य नाही. तर तो व्यवहार केसीआर यांनीच केलाय, त्यामुळं या दिल्लीतल्या शराब घोटाळ्यामागचा मास्टरमाईंड हा केसीआरच आहेत. असा आरोप केला गेला. लवकरच कविता आणि केसीआर यांच्यावर इडी कारवाई करील त्यांना तुरुंगात डांबतील अशी अपेक्षा तेलंगणावासियांची आणि भाजपची होती. तसं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. कविता यांच्याशी संबधित काहीना तुरुंगात टाकलं गेलं पण कविता वा केसीआर यांना हात लावला गेला नाही. भाजप नेत्यांच्या या अवसानघातकी भूमिकेमुळे कार्यकर्त्यांचाही नेत्यांवर विश्वास उडाला. दरम्यान केसीआर यांच्यावर घणाघाती टीका करणाऱ्या बंडी संजयकुमार यांच्या पाठीशी ताकद उभी करण्याऐवजी त्यांनाच प्रांताध्यक्षपदावरून हटवलं गेलं. प्रभारी श्रीनिवास मंत्री यांना चंदीगडला पाठवलं गेलं. बंडी यांच्याजागी केंद्रीयमंत्री जी.किशन रेड्डी यांच्याकडे पक्षाची सूत्रे सोपविली गेली. साहजिकच तेलंगणातलं  केसीआर यांच्या विरोधात वातावरण तापवणारे बंडी संजयकुमार आणि त्यांचे सहकारी नाराज झाले. शिवाय त्यांनी बीआरएसमधून भाजपत आणलेले राजेंद्र इटल यांच्यासारखे प्रभावी नेतेही दुखावले गेले. त्याचा जो परिणाम व्हायचा तो झाला.
गल्लीत कुस्ती, दिल्लीत दोस्ती यानुसार दिल्लीतल्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केसीआर यांच्याकडे दुर्लक्ष केलं. किंबहुना त्यांना मदत करण्याचीच भूमिका घेतली. बीआरएसला आर्थिक मदत करणारे मोठे ठेकेदार माय्युर रामेश्वर राव यांनी २-४ एकर खाणीची खोदाई करण्याची परवानगी घेऊन शेकडो एकरची खोदाई केली. याबाबत आणि पाटबंधारे खात्याचे ठेकेदार मेगा कृष्णा रेड्डी यांच्या भ्रष्टाचारचे अनेक पुरावे दिल्लीतल्या वरिष्ठांकडे बंडींनी सोपवले असतानाही त्यावर केंद्र सरकारनं कोणतीच कारवाई केली नाही. मिशन भगीरथ, फिनिक्स, प्रगती भवन, नवीन सेक्रेटरीएटचं बांधकाम अशा काही योजना, केसीआर मंत्रिमंडळातल्या अनेक मंत्र्यांच्या गैरव्यवहाराची, भ्रष्टाचाराची प्रकरणे ही गोपनीय कागदपत्रांच्या पुराव्यांसह दिली. कालेश्र्वरम प्रकल्प, खाणी वाटप, दलित बंधू, रयतू बंधू या योजनातला भ्रष्टाचार प्रभावीपणे पक्षाच्या नेत्यांसमोर आणि लोकांसमोर मांडला. परंतु दिल्लीनं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं गेलं. त्यामुळं बीआरएस-भारतीय राष्ट्र समिती ही भाजपची बी टीम असल्याचं इथल्या लोकांची भावना झाली. तशी उघड चर्चा माध्यमांतून आणि लोकांमध्ये होऊ लागली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, आंध्रप्रदेश आणि तेलंगणातल्या लोकसभेच्या ४५ जागा या २०२४ च्या सत्तेसाठी महत्वाच्या आहेत. त्यासाठी केसीआर, जगनमोहन रेड्डी, चंद्राबाबू नायडू ही भाजपची बी टीम असल्यानं त्यांना दुखवायचं नाही अशी भाजपची भूमिका असल्यानं केसीआर यांच्यावर कारवाई झाली नाही. त्याचा फायदा काँग्रेसला मिळाला. भाजपनं इतर राज्यातल्या घोषणाच इथं वापरल्या. तेलंगणाच्या मनोभावना, आकांक्षा याचा त्यात कुठे लवलेश नव्हता. त्याचाही परिणाम झाला. भाजपला दारुण आणि अपमानजनक अशा पराभवाला सामोरं जावं लागलं.
इकडे रेवंत रेड्डी यांनी पराभूत मनोवृत्तीच्या काँग्रेसमध्ये प्राण फुंकला. राहुल गांधींच्या भारत जोडोमुळे लोकजागृती झालीच होती. दुरावलेल्या काँग्रेसी नेत्यांना रेवंत रेड्डी यांनी गोंजारलं, आत्मविश्वास निर्माण केला. केसीआर यांचा पराभव होऊ शकतो हे दाखवून दिलं. तेलुगु देसम पक्षाच्या नेत्यांनाही जवळ केलं. नाराज झालेल्या भाजपच्या, संघाच्या आणि  कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना त्यांनी आशेचा किरण दाखवला. केसीआर-बीआरएस यांच्याविरोधातलं वातावरण तापलेलं होतंच, त्यावर रेवंत रेड्डी यांनी अखेरचा घाव घातला. अन् के.चंद्रशेखर राव, भारत राष्ट्र समितीचा वटवृक्ष उन्मळून पडला! भारत राष्ट्र समिती-बीआरएसचा पराभव करून काँग्रेसनं विजय मिळवलाय. ११९ सदस्यीय विधानसभेत ६० जागांचा जादुई आकडा पार केला अन् सरकार स्थापन केलंय. २०१४ ला आंध्रप्रदेशातून वेगळं झाल्यानंतर नव्या तेलंगणात बीआरएसनं सरकार स्थापन केलं. २०१८ लाही त्यांना प्रचंड बहुमत मिळालं. दोन्ही वेळा 'स्वर्णीम तेलंगणा' च्या आश्वासनावर पक्ष सत्तेवर आला. पण शेतकरी, तरुण, दलित आणि मागासवर्गीयांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानं, बीआरएसची पकड कमकुवत होत गेली. जनतेतल्या असंतोषाचा फायदा काँग्रेसनं घेतला. बेरोजगारी, कृषी संकट, भ्रष्टाचार, घराणेशाही आणि विकासाचा अभाव हे मुद्दे काँग्रेसनं मांडले. बेरोजगारी, पेपरफुटीसारखे मुद्दे उपस्थित केले. नोकरभरतीवरून बेरोजगारांकडून आंदोलनं होत होती. भरतीला होणारा विलंब, इंटर, पीएससी परीक्षांची गळती आणि गट परीक्षा पुढे ढकलण्यानं तरुणांनी बीआरएसला दूर ठेवलं. बीआरएस सरकारनं दिलेल्या 'बेरोजगारांना भत्ता ' या आश्वासनाचीही अंमलबजावणी न झाल्यानं तरुणांमध्ये नाराजी होती. त्यासाठी बीआरएसनं निवडणुकी आधी 'विद्यार्थी आणि युवजन' सारखे कार्यक्रम सुरू केले. सरकारनं ‘धारणी’ हे पोर्टल तयार केलं, या पोर्टलमुळे भाडेकरू शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप झाला. याचा फायदा जमीनदारांनाच होत असल्याची तक्रार होती. अनेक ठिकाणी लोकांना वाटण्यात आलेल्या जमिनी प्रत्यक्षात जमीनदारांच्याच नावावर झाल्या. केसीआर सरकारनं दलितबंधू योजना सुरू केली. याचा लाभ केवळ सत्ताधारी पक्षाशी संबंधित लोकांना विशेषत: आमदारांना मिळाला, त्यात कट-कमिशनचे आरोप झाले. गरीब आणि वंचित घटकांना घोषित केलेली 'डबल बेडरूमची घरे' देण्यात सरकारला अपयश आलं. महत्त्वाकांक्षी कालेश्वरम प्रकल्पातल्या मेडिगड्डा बॅरेजमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले. यात गुणवत्तेशी संबंधित त्रुटीही निदर्शनाला आल्या. कर्नाटकपाठोपाठ तेलंगणातही काँग्रेसला 'हमीभाव ' कामी आला. महिला, आदिवासी आणि शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नही गाजले. सत्तेत आल्यावर समाजातल्या सर्व घटकांसाठी काम करण्याचं आश्वासनही काँग्रेसनं दिलं. महिलांसाठी महालक्ष्मी, इंदिराम्मा, गृहज्योती या योजना सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिलं.
रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनलेत. काँग्रेस पक्षानं तिथं ११९ पैकी ६४ जागा जिंकल्यात आणि केसीआर-के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस -भारत राष्ट्र समितीला सत्तेतून बाहेर हुसकावलं. ५४ वर्षीय रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास हा अभाविपचा सक्रिय नेता म्हणून झाला. २००१ ला त्यांनी राजकारणात प्रवेश केला. प्रारंभी रेवंत यांनी काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकल्या. त्यानंतर चंद्राबाबू नायडू यांनी त्यांची क्षमता ओळखून त्यांचा पक्षात समावेश केला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत कोडंगलमधून उमेदवारी दिली. पाच वेळा काँग्रेसचे आमदार असलेले गुरुनाथ रेड्डी यांचा त्यांनी पराभव केला. रेवंत यांची वचनबद्धता पाहून त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. नायडूंनी त्यांना विधानसभेत पक्षाचे नेतेही केले. २०१४ मध्ये जेव्हा आंध्रप्रदेशचं विभाजन झालं आणि तेलंगणा वेगळं राज्य बनलं, तेव्हा रेवंत यांना तेलंगणातल्या पक्षाची जबाबदारी दिली. पण, तेलुगु देशम तेलंगणा निर्मिती विरोधात असल्यानं त्यांना फारसा पाठिंबा मिळाला नाही. दरम्यान, २०१५ साली संपूर्ण तेलंगणात रेवंत यांनी खळबळ उडवून दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत पैसे देऊन मतं विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. रेवंतना तुरुंगात जावं लागलं. त्याच दरम्यान मुलीच्या लग्नात काही काळ ते जामिनावर बाहेर आले, नंतर पुन्हा तुरुंगात परतावं लागलं. केसीआर सरकारवर जोरदार टीका, आंदोलनं आणि निदर्शनं केल्याबद्दल रेवंत यांच्यावर दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झालेत. तेलंगणात केसीआर यांना जर कोणी पराभूत करू शकत असेल तर ते फक्त रेवंत रेड्डीच, हे जनतेला पटवून देण्यात ते यशस्वी झाले. ते माजी केंद्रीय मंत्री जयपाल रेड्डी यांची भाची गीता यांच्या प्रेमात पडले. गीताचे कुटुंबीय या नात्यासाठी तयार नव्हते. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या, पण त्यांचं प्रेम अतूट राहिलं. शेवटी, दोघेही त्यांच्या कुटुंबियांना पटवण्यात यशस्वी झाले आणि १९९२ मध्ये त्यांच्या प्रेमाचा विजय झाला ते विवाहबध्द झाले. रेड्डी यांनी प्रचारात, २००४ ते २०१४ पर्यंत दिलेली पेन्शन ही आमची योजना होती. कर्जमाफी, इंदिरा आवास योजना, बेरोजगारांना पैसे देण्याची योजना आमची होती. आम्ही एका वर्षात दोन लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. सोबतच तेलंगणाची स्थापना काँग्रेसनंच केली, हेही मतदारांना पटवून दिलं. रेवंत रेड्डी कोडंगल आणि कामारेड्डी या दोन जागांवर निवडणूक लढवत होते. कोडंगल ही त्यांची पारंपारिक जागा आहे तर कामारेड्डीमध्ये त्यांची थेट मुख्यमंत्री केसीआर यांच्याशी लढत होती. कामारेड्डीत त्यांचा पराभव झाला. त्यावर ते म्हणाले, "इंदिराजींचा पराभव झाला, एनटीआर हरले, आणि आता केसीआर यांचा नंबर आहे, त्यांचाही पराभव होऊ शकतो...!"  हे त्यांनी सत्यात उतरवलं!
हरीश केंची
९४२२३१०६०९




Saturday 2 December 2023

सरकारपुढे आरक्षणाचे आव्हान...!

"तिकडं निवडणुक निकालांचे फटाके फुटताहेत. इकडं आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्र पेटतोय काय अशी स्थिती आहे. सर्वांच्याच अस्मिता टोकदार झाल्यात. भाजपला ठाकरे-पवारांचं सहानुभूतीचं राजकारण संपविण्यासाठी याची गरज दिसतेय. पक्ष फोडून जी लाज गेली होती ती आता समाज फोडून भरून काढायचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी मराठा-ओबीसींना त्यांनी झुंजायला लावलंय. त्यांच्यात तेढ निर्माण होतेय. त्यातून सामाजिक सौहार्दाचा चिखल केला जातोय. त्यात सत्ताधाऱ्यांना आपलं कमळ फुलवायचंय. यामुळं राज्यात तणाव निर्माण झालाय. पण आरक्षणाचा मुद्दा मुळापासून समजून घेणं गरजेचंय. पुरोगामी महाराष्ट्रात असं होणं योग्य नाही!"
------------------------------------------
नोंदी शोध मोहिमेमुळं ‘कुणबी’ ही ‘जात’ नसून, शेती करणारा ‘व्यावसायिक’ हा ‘कुणबी’! असं कायद्यानं ठरवून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यात आणण्याचा प्रयत्न सरकारच्या पातळीवर सुरू असल्यास नवल वाटू नये. ओबीसी एल्गार सभेला उपस्थित राहू नका, अशी सूचना भाजपनं पंकजा मुंडे यांना केली. त्यामुळं पंकजाताई सभेला गेल्या नाहीत. गोपीचंद पडळकर आणि आशिष देशमुख यांना मात्र भाजपनं ओबीसी सभेला उपस्थित राहू दिलं. यामागे छगन भुजबळ यांना बळ देण्याची भाजपची योजना असावी. फडणवीसांनी भाजप ओबीसी समाजाच्या जीवावर सत्तेत असल्याचं सांगणं, हे मराठा समाजाला डिवचण्याचाच प्रकार होता. त्यानंतरच अचानक भुजबळांना बळ आलं. भुजबळांना भाजप आणि राष्ट्रवादी दोघेही बळ देताहेत. आरक्षणाचा हा खेळ भाजपनं घडवून आणला त्यात त्यांना यशही आलेलंय! सहानभूतीचं राजकारण आता जवळपास पूर्णपणे मागे पडलंय, उद्धव ठाकरे असो किंवा शरद पवार यांना सहानुभूतीचा आता तितकासा फायदा होणार 'नाही' असंच दिसतंय. कारण निर्माण झालेलं जातीचं राजकारण हे आता या सहानुभूतीच्या राजकारणाच्या खूप उंच झालंय! भाजपनं त्यांना जे हवं होतं, तसं ते त्यांनी घडवून आणलंय! अशी स्थिती आहे. जरांगे पाटलांच्या आडून मराठा समाजाला आणि मुख्यमंत्र्याना अडचणीत आणण्याचं  नियोजन भाजपचं असावं. मात्र भुजबळ चुकीच्या माणसाला भिडलेत, आता त्यांना स्वतःचं भविष्य अंधारात दिसू लागलंय त्यामुळं ओबीसी समाजाला ढाल बनवून लढू पाहताहेत. पक्ष फोडून जी लाज गेली होती ती आता समाज फोडून भरून काढायचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे. भुजबळांना फुले, शाहू, आंबेडकर यांची जातीअंताची विचारधारा मान्य असती तर 'समता परिषद' म्हणत स्वजातीची संघटना त्यांनी केलीच नसती. त्यांची काही विधानं ही मंत्रिपदावरून अजिबात योग्य नाहीत. कोणत्याही जातींच्या संघटना या दुसऱ्या जातीचा द्वेष केल्याशिवाय वाढत नाहीत. तेच धर्माबाबत घडतं. जाती, धर्माच्या संघटना या कुणाचा तरी द्वेष हाच आधार असतो. राज्यात मराठा आणि ओबीसीत तेढ निर्माण होऊन दंगली घडू शकतात. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा व्यक्तींवर कठोर कार्यवाही झालीच पाहिजे. 
मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटला असताना दोन्ही समाजांचे नेते त्या आगीत तेल ओतणारीच वक्तव्य करताहेत. काँग्रेस आणि भाजपचे नेते मात्र ओबीसी वोटबँकेकडे बारकाईनं लक्ष देताहेत. आज मतमोजणी असलेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारात ही बाब प्रकर्षानं जाणवली. पंतप्रधान मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, शिवराजसिंह, फडणवीस, योगी आदित्यनाथ ह्या सगळ्यांचा रोख हा ओबीसी व्होटबँकेवरच दिसून आलाय. मोदींनी विश्वकर्मा योजनेपासून ते विविध योजनांचा उल्लेख करून केंद्र सरकार ओबीसीसाठी किती वैविध्यपूर्ण योजना राबवतेय याचं वर्णन केलं मग त्याचीच री भाजप नेत्यांनी ओढली. मोदी आणि शाह हिंदुत्व आणि ओबीसी व्होटबँकेचा मिलाफ साधण्याचा प्रयत्न करताहेत. मात्र राहुल गांधींनी अत्यंत चलाखीनं ओबीसी जनगणनेचा मुद्दा समोर आणून त्यांना काटशह देण्याचा प्रयत्न चालवलाय. तेलंगणातल्या प्रचारसभेत त्यांनी ओबीसी आरक्षण २३ टक्क्यांवरून ४२ टक्क्यापर्यंत नेण्याची घोषणा केलीय. कोणत्याही राज्यात तिथल्या प्रमुख सवर्ण जातीची व्होटबँक गमावणं कोणत्याही पक्षाला परवडणारं नाही याची जाणीव काँग्रेस आणि भाजप नेत्यांना आहे. पण त्या पलीकडे जाऊन एकजातीय राजकारण करणं शक्य नाही. याचीही जाणीव दोन्ही पक्षांमधल्या 'थिंक टँक'ना आहे. त्यामुळं या नेत्यांनी आपापल्या पद्धतीनं जातीय समन्वय राखून मोठी व्होटबँक ओबीसीवरच लक्ष केंद्रित केलंय. प्रादेशिक पक्षाला एकजातीय आधारातून आपलं राजकारण तरून नेता येऊ शकतं. राष्ट्रवादीनं हे सिद्ध केलंय. तेलंगणात भारत राष्ट्र समितीनं त्याच मार्गानं आपलं राजकारण तरून नेलंय. पण काँग्रेस आणि भाजपला हे शक्य नाही. कारण जातीय समीकरणांचं परस्पर छेद गेलं, तर त्यातून जी वजाबाकी होईल, ती या दोन्ही पक्षांना खूप मोठा फटका देईल, हे या नेत्यांना नीट समजतं. त्यामुळंच ते एकजातीय राजकारणाच्या वाटेला फारसं जात नाहीत.
त्या उलट प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना त्यांच्या विशिष्ट प्रदेशापुरतं वर्चस्व टिकवून ठेवायचं आणि त्या आधारावर सत्तेचा वाटा मिळवायचा इतपतच मर्यादित कर्तृत्व परवडतं. पण भाजप वा काँग्रेसला ते परवडणारं नाही. त्यामुळंच मराठा आरक्षणासारखा मुद्दा पेटवून मराठ्यांना दुखवायचं तर नाही, पण त्याहीपेक्षा ओबीसीना दुखवून मराठ्यांना आरक्षणही द्यायचं नाही ही तारेवरची कसरत शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं चालवलीय. मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस-पवार हे नेते ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याच्या मन:स्थितीत आहेत. ओबीसींचा टक्का आणि मराठ्यांचा टक्का यातली नेमकी समीकरणं या नेत्यांना माहिती आहेत. त्यामुळं ते कोणतीही रिस्क घेणार नाहीत. त्याउलट जरांगे, भुजबळ असोत अथवा शरद पवार वा अजित पवार असोत, त्यांचा राजकीय उद्देश मर्यादित आहे. त्यामुळं त्यांना मराठा आरक्षणावर उघडपणे अथवा छुपी भूमिका घेणं शक्य आहे आणि ते ती घेतातही. उलट काँग्रेस आणि भाजपला वेगवेगळ्या समाज घटकांच्या मागण्यांचा, हितांचा समन्वय साधून आपली व्होटबँक मजबूत करणं ही कसरत करावी लागतेय. काँग्रेस ओबीसी जनगणनेची मागणी करून राजकीय आगीशी खेळतेय, कारण हे काँग्रेसच्या राजकीय प्रकृती आणि प्रवृत्तीच्या विरुद्ध असणारी बाब राहुल गांधी हेतूत: समोर आणताहेत. पण त्यातूनही त्यांचं लक्ष ओबीसी व्होटबँकेवरच आहे हे लपत नाही. ही ओबीसी व्होटबँक आपल्याकडे खेचण्यात ते यशस्वी होतात का हे निवडणुक निकालानंतरच लक्षात येईल.
सरकारनं मराठवाड्यातल्या मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा यांना पुराव्यांच्या तपासणीअंती कुणबी प्रमाणपत्र देण्याचं मान्य केलं. परंतु त्यासाठीची वंशावळीच्या पुराव्याची अट वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी होतेय. मराठ्यांना आरक्षण मिळावं ही मागणी खरंतर अनेक दशकांपूर्वीची आहे. परंतु हा प्रश्न अधिक तीव्र बनला तो २०१६ मध्ये, मराठा क्रांती मोर्चानं लाखोंच्या संख्येनं काढलेल्या मोर्चांच्या माध्यमातून. यानंतर सरकारनं मराठ्यांना शिक्षणात १२ टक्के आणि नोकरीसाठी १३ टक्के आरक्षण दिलं. पण केंद्र सरकारनं आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा अधिकार काढून घेतला, त्यानंतर ५ मे २०२१ ला सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण रद्द केलं. आता पुन्हा मराठा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलीय. ही मागणी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यास कायद्यानं मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकेल ही त्यामागची भूमिका. मात्र ओबीसी आणि कुणबी समाजानंही या मागणीला विरोध दर्शवलाय. सरसकट मराठा समाजाला कुणबी होणं हे मराठा क्रांती मोर्चाला मान्य नाहीये. सरकारनं ७ सप्टेंबर २०२३ ला मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा समाजाला जात प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. यानुसार, मराठवाड्यातल्या कुणबी प्रमाणपत्राची मागणी केलेल्या व्यक्तींना निझामकालीन महसूली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसंच काही अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख 'कुणबी' असा असेल तर सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करून त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचं जात प्रमाणपत्र प्रदान करण्याला शासनाची मान्यता देण्यात आलीय.
या शासन निर्णयातल्या वंशावळीचे पुरावे या शब्दावर  आक्षेप घेतलाय. वंशावळ हा शब्द वगळून सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी पुढे आलीय. ज्यांच्याकडे वंशावळ असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या असं सरकार म्हणतेय पण आमच्याकडे ते नाहीत म्हणून वंशावळ हा शब्द जीआरमधून वगळा एवढाच बदल करायचाय! असं जरांगे म्हणतात. त्याला कुणबी आणि ओबीसी समाजानंही याला विरोध केलाय. ओबीसींना १७ टक्के आरक्षण असताना यात मराठ्यांना समाविष्ट केल्यास सगळ्यांचीच अडचण होणार, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलंय. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं तर कुणबी आणि पर्यायनं ओबीसी सहन करणार नाही. असं झालं तर सध्या जे आंदोलन सुरूय त्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आंदोलन उभं करू, असा इशारा त्यांनी दिलाय. मराठ्यांना आरक्षण देण्याला आमचा विरोध नाही पण ते ओबीसीतून आरक्षण देऊ नये. असं ओबीसीचं म्हणणं आहे.
सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रबाबत  मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांमध्ये मतमतांतरं आहेत. राज्यात अनेक भागात मराठा-कुणबी आहेत. पण मराठा समाजात यासाठीची स्वीकृती कमी आहे. कुणबी म्हणून आरक्षणासाठी काही लोकांची तयारी नाही. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात स्वीकृती दिसते. कोकणात स्वीकृती कमी दिसते. सध्या ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळतेय किंवा यामुळं ज्यांचा आरक्षणाचा प्रश्न सुटतोय त्यांनी ते स्वीकारावं. जे आधीपासून कुणबी आहेत त्यांना आरक्षण आहेच. सरसकट मराठा समाजाचा हा विषय नाही. कुणबी प्रमाणपत्राची मागणी आणि मराठ्यांना आरक्षण या दोन वेगळ्या मागण्या आहेत. ओबीसी आरक्षणात ५० टक्क्यांच्या आत आम्हाला मराठा म्हणून आरक्षण हवंय. या मागणीसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. मराठ्यांना सरसकट संमतीशिवाय कुणबी करू नका. पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाजाकडे ‘हिंदू-मराठा’ असं रेकॉर्डवर आहे. सरकारनं मागवलेल्या नोंदी निजाम राजवटीतल्या जिल्ह्यांपुरत्या आहेत. ते पश्चिम महाराष्ट्राला लागू होत नाही. सरकारनं आत्ता काढलेला जीआर ही समाजाची दिशाभूल आहे. ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तसंही आरक्षण मिळतेय. सरकारनं सरसकट बदल केला तर मात्र वेगळं आंदोलन उभं राहील. मराठा समाजात अंतर्गत वाद निर्माण करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं याला सुद्धा कोर्टात आव्हान दिलं जाईल. मराठा आरक्षणाची जी मूळ मागणी आहे ती कायम आहे. प्रमाणपत्र नव्यानं न देता ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्यावं ही मराठा समाजाची भूमिका आहे. 
सरकार पुरावे मागतेय. पण आता कुळाचे, वारशाचे पुरावे मिळणार नाहीत. जे कधी शाळेतच गेलेले नाहीत त्यांच्याकडे दाखले नाहीत. त्यांचं काय करायचं हा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी मराठा कुणबी आहेत. जो शेती कसायचा त्याला कुणबी म्हटलं जायचं. आताही जो शेतीवर अलंबून आहे. त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळं सरसकट सर्वांना प्रमाणपत्र हवीत. सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र हा विषय कोकणात थोडा वादाचा आहे. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्गाचा काही भाग इथं सरसकट लोक तयार होणार नाहीत. त्यांना मराठा म्हणून ओबीसीतून आरक्षण हवंय. त्यामुळं असं आरक्षण सर्वत्र मान्य होईल असं वाटत नाही. भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातल्या मोठ्या संख्येनं शेतीवर अवलंबून असलेल्या मराठा कुणबी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कुणबी समाजाच्या सामाजिक विकासासाठी घटनेत तरतूद करण्याची मागणी केली होती. १९६० च्या दशकांत मराठा शेतकरी हा मराठा कुणबी असल्याची मांडणी केली. या मागणीला घटनात्मकदृष्ट्या मंजूरी मिळाली होती. याला विदर्भातून मोठा प्रतिसादही मिळाला. आम्हाला कुणबी प्रमाणपत्र हवं असतं तर डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याकाळात करून घेतलं असतं. पण त्यावेळीही आणि आजही आमची भूमिका कायम आहे. पूर्वीपासूनची मागणी कायम आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यावं. ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर त्यांच्या आरक्षणातही वाढ झाली पाहिजे नाहीतर त्यांच्यावर अन्याय होईल. त्यांच्या हक्कावर गदा आणणं चुकीचं होईल. यामुळं सरकारनं मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, ते कसं द्यायचं याचं धोरण सरकारनं ठरवावं. १९६७ पूर्वीचे महसुली पुरावे कोणत्याही आरक्षणाला लागतात. निजाम सरकारमधून महाराष्ट्रात सामील झाले त्यावेळी पुरावे होते. पण कारकुनी चुकांमुळे ते पुसले गेले. या प्रकरणाचे दोन वेगळे मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे मराठा जातीची उपजात कुणबी आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. कारण तसे पुरावे इतिहासात आहेत. ब्रिटीश काळातले गॅझेट्स किंवा जातीनिहाय जनगणना असे पुरावे आहेत. यामुळं कुणबी आणि मराठा असा भेद करता येत नाही. राज्यात अनेक भागात मराठा समाजातल्या लोकांनी पूर्वजांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र काढलेली आहेत. परंतु यातला दुसरा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळापासून जी वेदोक्त प्रकरणं झाली, म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध झाला, प्रतापसिंह महाराजांचा इतिहास किंवा शाहु महाराजांना वेदोक्ताचा अधिकार नाकारल्यानंतर क्षत्रियत्वाची चळवळ पुढं सुरू झाली. यातूनच पुढं १९३१ मध्ये जातनिहाय जनगणना होण्यापूर्वी एक प्रवाह असा तयार झाला की आपल्या समाजाचं सामाजिक उत्थान करायचं असेल तर सर्व कुणबी समाजानंही मराठा लावावं अशी मोहीम राबवण्यात आली होती. त्यावेळच्या वर्तमानपत्रात अशी आवाहनं केलेले पुरावे सापडतात. आम्ही क्षत्रिय मराठा आहोत त्यामुळे कुणबी म्हणून नको तर मराठा म्हणून आरक्षण हवं अशी भूमिका मांडली जातेय यामागे सुद्धा इतिहासातली ही पार्श्वभूमी आहे. शाहु महाराजांचे अनुयायी काशिराव देशमुख यांचं ‘जातवार क्षत्रियांचा सचित्र इतिहास’ नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकात कुणबी आणि मराठा एकच आहेत असं त्यांनी म्हटलंय. मराठा आणि कुणबी दोन समाज एक मानणं हे समाजशास्त्रीयदृष्ट्या सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी राजकीय आहे. कुळानं काम करणारे जे शेतकरी होते ते म्हणजे कुणबी. परंतु मराठा समाजाला कोर्टानं आरक्षण नाकारल्यानंतर आता आरक्षणासाठी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली जातेय. ओबीसी विरुद्ध मराठा दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जमीनदारी गेल्यानंतर याच वर्गातले लोक शेती करू लागले. पण तत्कालीन जमीनदार वर्ग आणि कुणबी या दोन्ही वर्गात फरक होता. कुणबी म्हणजे प्रत्यक्ष शेती करणारा वर्ग तर ज्यांच्या मालकीच्या जमिनी होत्या तो वर्ग जमीनदार, वतनदार किंवा प्रशासकीय पद असणारा वर्ग होता. मराठा आरक्षणाचा तिढा आजही कायम आहे. त्यातच आता कुणबी आणि ओबीसी समाजाचा विरोधही तीव्र होताना दिसतोय. अशा परिस्थितीत आरक्षणाच्या मुद्यावर विरोधकांनीही सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यामुळं निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न सोडवण्याचं आव्हान राज्य सरकारसमोर आहे.
कमळ चिखल करतंय, कमळ चिखलातच फुलतंय...!
हरीश केंची
९४२२३१०६०९

'इंडिया शायनिंग' ते 'मोदी की गॅरंटी...!'

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...