Monday 25 April 2022

अखंड-हिंदुस्तानच्या बाता आणि वास्तव!

‘अखंड-हिंदुस्तान’वाल्यांच्या राजकारणाचा आधार द्वेष हाच असल्यानं, या दोन समाजांत मनोमिलन घडवण्याचं, बांधिलकी निर्माण करण्याचं कौशल्य तर त्यांच्याकडं नाही. हा ‘अखंड-हिंदुस्तान’ नावाचा प्रकार हा अगदी लहानपणापासून ऐकत आलेला विनोद वा बागुलबुवा आहे. मुळात ‘देशाची फाळणी कुणाच्या तरी लहरीखातर वा मूर्खपणामुळं झाली, एरवी तो आमचा भागच आहे’ हा दावाच खरंतर मूर्खपणाचा असतो. देश म्हणजे जमिनीचा तुकडा नव्हे. देश म्हणजे त्यातली माणसं, समाज, वारसा, इतिहास यांचा समुच्चय! ‘पाकिस्तानही आमचाच आहे आणि तो परत आमच्या देशात सामील व्हावा’ म्हणताना त्यावर राहणार्‍या, आपल्याला नकोशा वाटणार्‍या माणसांचं काय करायचं? असा प्रश्न ‘अखंड-हिंदुस्तान’वाल्या मुखंडांनी स्वत:ला विचारायला हवा. हा अवघड प्रश्न ते स्वत:ला विचारत नसतात, कारण उत्तर आपल्या सोयीचं येणार नाही, हे निदान त्यातल्या विचारशील व्यक्तींना पक्कं ठाऊक असतं. कुण्या एकाचा वा कुण्या सत्तेच्या लहरीखातर फाळणी होत नसते. जमिनीवरची परिस्थिती, सामाजिक बदलांतून ती घडत असतं. देश एकसंघ असेल, तर नकाशावर कृत्रिमरित्या अशी रेघ ओढल्यानं दोनही तुकड्यांवरच्या लोकांची बांधिलकी फारशी बदलत नसते. फाळणीमुळं दुभंगलेल्या कुटुंबांच्या दुराव्यातल्या वेदनेच्या कहाण्या आपण ऐकल्या आहेत. पण त्या दुर्दैवी असल्या, तरी प्रातिनिधिक नसतात हे आपण विसरत असतो. आज बहुसंख्य भारतीय नि पाकिस्तान वा बांगलादेशात असलेल्या बहुसंख्येची परस्परांप्रती बांधिलकी असती, तर जनमताच्या रेट्यापुढं ती फाळणी टिकली नसती हे जर्मनीच्या उदाहरणावरून म्हणता येईल.

या उलट या दोन देशांतल्या एखाद्या खेळाच्या सामन्याप्रसंगी दोनही बाजूंच्या खेळप्रेमी नागरिकांतही उसळणारा जो द्वेष दिसतो, त्यातून हे देश एका छत्राखाली आले तरी त्यातला समाज मनानं वेगळंच राहणार हे उघड आहे. कारण भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतल्या समाजामध्ये धर्माधारित असलेली दरी, त्या त्या देशातल्या राजकारण्यांनी ‘बाहेरील बागुलबुवा’ दाखवून घर सांधावं या हेतूनं अधिकाधिक रुंद करत नेलेली आहे. परस्परांविषयीच्या द्वेषानं संपृक्त असं हे दोन समाज एका छत्राखाली राहूच शकणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे. ‘अखंड-हिंदुस्तान’वाल्यांच्या राजकारणाचा आधार द्वेष हाच असल्यानं, या दोन समाजांत मनोमिलन घडवण्याचं, बांधिलकी निर्माण करण्याचं कौशल्य तर त्यांच्याकडं नाही. एवढंच नव्हे तर, त्यांचं सत्ताकारण हिंदू-मुस्लिम परस्परद्वेषाची पेरणी करण्यावर आधारलेलं असल्यानं, या एका देशात हिंदू नि मुस्लिम ही दोन राष्ट्रं सतत युद्धसंमुख स्थितीतच असणार आहेत हे उघड आहे. त्यामुळं ‘अखंड-हिंदुस्तान’ वगैरे बाता कुण्या संघटनेच्या वा राजकीय पक्षाच्या राजकारणातला एक पत्ता म्हणून वापरला जात असला, तरी ते वास्तवात येण्याची सुतराम शक्यता नाही. उलट अशा अखंड भारतात या ‘अखंड-हिंदुस्तान’वाल्या पोपटवीरांसमोरचं प्रश्न अधिक जटिल होतील, हे त्यांच्याच ध्यानात येत नाही. किंवा येत असलं तरी अखंड-भारतच्या केवळ बाताच मारायच्या आहेत हे त्यांनाही पक्कं ठाऊक आहे. त्यांच्या बातांची पोपटपंची करणार्‍या त्यांच्या समाजमाध्यमी अनुचरांसाठी थोडं विस्तारानं आकडेवारीनिशी मांडू या. आज भारताची लोकसंख्या आहे अंदाजे १३८ कोटी पैकी सुमारे ८० टक्के, म्हणजे ११० कोटी हिंदू आणि १४ टक्के, म्हणजे अंदाजे १९ कोटी मुस्लिम लोकसंख्या आहे. त्याच वेळी पाकिस्तानची लोकसंख्या आहे सुमारे २२ कोटी. यात सुमारे ९७ टक्के, म्हणजे २१ कोटी मुस्लिम आहेत. हिंदू नगण्य म्हणजे २ टक्के किंवा सुमारे ४४ लाख. पाकिस्तान भारतात विलीन करून घेतला गेला तर भारताची एकूण लोकसंख्या होईल अंदाजे १६० कोटी आणि त्यात मुस्लिम लोकसंख्या असेल ४१ कोटी… म्हणजे सुमारे २५%! बरं त्या ’आसिंधुसिंधु हिंदुस्तान’मध्ये पूर्व-पाकिस्तानपण आहे म्हणे. तर तो बांग्लादेशही यात घेऊ. तिथं १६.५ कोटी लोकसंख्येपैकी जवळजवळ १५ कोटी मुस्लिम आहेत आणि अंदाजे दीड कोटी हिंदू आहेत. आता हे जमेस धरलं, तर भारताची लोकसंख्या होईल सुमारे १७६ कोटी, मुस्लिम लोकसंख्या सुमारे ५५ कोटी म्हणजे सुमारे ३१ टक्के !! आजच्या भारतातही अमुक सालानंतर मुस्लिम बहुसंख्य होतील नि हिंदू अल्पसंख्य होतील अशी ओरड हेच ‘अखंड-हिंदुस्तान’वाले करत असतात. पाकिस्तान आणि बांग्लादेश पोटात घेतल्यानं हे आणखी वेगानं घडून येणार आहे हे अखंड-हिंदुस्तानवाल्यांना ध्यानात येतंय का? येत असणारच.

एका बाजूनं हिंदू आणि मुस्लिम ही दोन राष्ट्रं आहेत असा दावा करणारे नि त्याचवेळी दुसरीकडं 'अखंड-हिंदुस्तान'चा पुरस्कार करणार्‍या नेत्याचा वारसा आपण चालवत असल्याचा दावा निदान महाराष्ट्रातल्या ‘अखंड-हिंदुस्तान’वाली मंडळी करत असतात. यातला अंतर्विरोध त्यांच्या लक्षात येत नसतो असं नाही. पण राजकारणाच्या सोयीसाठी हा दांभिकपणा ते हेतुत: स्वीकारत असतात. सध्या भारतात ८० टक्के हिंदू लोकसंख्येच्या उबेत राहून ‘अखंड-हिंदुस्तान’च्या बाता या फक्त राजकारणाच्या सोयीसाठीच मारायच्या आहेत हे त्यांनाही समजत असतंच. एरवी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जनतेला ‘मदत’ जमा करण्यास सरसावणारे यांचे स्वयंसेवक ‘हिंदू-मुस्लिम’ दंगली होतात तेव्हा किती सफाईनं पसार होतात हा आमच्या अनुभवाचा भाग आहे. फार कशाला हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा चरमबिंदू गाठण्यासाठी उभ्या केलेल्या राममंदिर आंदोलनाच्यावेळी ‘बाबरी मशीद पाडणार्‍यांवर आमचं नियंत्रण राहिलं नाही हो’ असा गळा यांच्या नेत्यांनी न्यायालयात काढला होता. महत्त्वाच्या संघर्षाच्या प्रसंगी शेपूट घालणं हा यांचा वारसा आहे. त्याला धूर्तपणाचं रूप हे देत असतात. गंजक्या शस्त्रांचं शस्त्रपूजन करून शौर्याचा आव आणणार्‍या वीरांची ही स्थिती ८०% हिंदू लोकसंख्येच्या उबेत राहतानाची आहे हे लक्षात घ्या. आता निवडणुकांच्या राजकारणाकडं वळू. वर म्हटल्याप्रमाणे अखंड-हिंदुस्तानात आता ११२ कोटी हिंदू विरुद्ध ५२ कोटी मुस्लिम अशी स्थिती निर्माण होणार आहे. मुळात सुमारे ३५ टक्के अन्य-धर्मीय असलेला देश हिंदुस्तान म्हणावा का? पण ते असो. ‘अखंड-हिंदुस्तान’वाल्यांच्या दाव्यानुसार मुस्लिम हे एकगठ्ठा मतदान तर करतातच, आणि ते मतदान यांच्या पक्षाला अजिबात होत नाही. म्हणजे अखंड हिंदुस्तानात जवळजवळ ३३ टक्के मतदान यांना होणारच नाही हे यांचंच गृहितक असेल. आजच्या भारतात २०१९च्या लोकसभा निवडणुकांत हिंदुत्ववादी भाजपला सुमारे ३८ टक्के मत मिळाली आहेत. अखंड-हिंदुस्तानचा विचार केला तर हे प्रमाण २९ टक्के इतकं खाली येतं. यात प्रतिनिधित्वाच्या दृष्टिनं पाहिलं तर, संपूर्ण मध्यभारत आजच ‘शत-प्रतिशत भाजप’ आहे. हे ध्यानात घेतलं, तर तिथं केवळ उतरणच शक्य आहे. वाढीची शक्यता फक्त बंगाल नि ओदिशा या दोन पूर्वेकडल्या राज्यातच उरतंय. याचा अर्थ आजची ताकद राखली तरी भाजप, हिंदुत्ववादी राजकारण हे जेमतेम निम्म्या जागांवर प्रभाव राखून असेल. उलट ५२ कोटी मुस्लिम लोकसंख्येतल्या मतदार, म्हणजे तब्बल ३३ टक्क्यांच्या आसपास मतदार हे विरोधी मतांमध्ये समाविष्ट होतील.

पण तरीही क्षणभर मान्य करू की असा अखंड-हिंदुस्तान तरीही यांना खरोखरच हवा आहे. केवळ अनुयायांसमोर, कार्यकर्त्यांसमोर मारलेली ती बढाई नाही आणि देशासाठी सत्तेचा त्याग वगैरे करण्याची यांची तयारी आहे. जेव्हा फाळणी झाली त्या काळात हिंसाचार झाला, अत्याचार झाले. दोन्ही बाजूंच्या अनेक जणांचे संसार उध्वस्त झाले, लोक देशोधडीला लागले, जगभरातल्या संघर्षात होतं तसं स्त्रियाच अधिक बळी पडल्या. तर मग प्रश्न असा आहे की जिथं हे अखंड-हिंदुस्तानवाले आता रशियानं युक्रेनवर केला तसा पाकिस्तानवर हल्ला करून तो जिंकून घ्यावा असं म्हणत आहेत, त्या युद्धकाळात हेच पुन्हा होणार नाही का? त्यातून नव्यानं निर्माण झालेली, जुनी धूसर होत चाललेली पण नव्यानं उगाळलेली कटुता घेऊन जगणारा हिंदुस्तान किती काळ अखंड राहू शकेल. शस्त्रानं जिंकलेले भूभाग जर चिरकाल ताब्यात ठेवता आलं असतं, तर अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला आपल्या सीमेपासून कैक मैल दूर असणार्‍या, जे देश आपल्या मुख्य भूमीला कोणतंही नुकसान पोहोचवू न शकणार्‍या व्हिएतनामपासून अफ़गाणिस्तानपर्यंत सार्‍या देशांतून माघार का घ्यावी लागली असती? सोव्हिएत युनियनची शकले का झाली असती? एका युगोस्लावाकियातून आठ राष्ट्रं वेगळी का झाली असती? आणि ज्या देशातल्या लोकसंख्येचं भारतातल्या लोकसंख्येशी मनोमिलन आता जवळजवळ अशक्य आहे त्या देशांचं असं सामिलीकरण तात्कालिकच राहणार वा दीर्घकालीन यादवीचं बीज रोवणारंच असणार हे समजून घ्यायला हवंय.

पण ही ‘अखंड हिंदुस्तान’वाली मंडळी ओठात एक पोटात एक तंत्रात फारच वाकबगार असतात. विशेषत: अडचणीचे प्रश्न टोलवण्यासाठी ‘तुम्ही म्हणता तसं घडणारच नाही, अशी समस्या येणारच नाही.’ असं ठाम विधान करून ते शेपूट सोडवून घेतात. त्यांच्यासाठी पुढचा प्रश्न विचारू. ‘अशी समस्या उद्भवणारच नाही असं का म्हणता? म्हणजे अखंड-हिंदुस्तानात हिंदू-मुस्लिम गुण्यागोविंदानं राहतील असं तुम्हाला म्हणायचंय का? असा बदल घडवून आणणारी जादूची छडी जर तुमच्याकडं असेल, तर ती फिरवून निदान आजच्या हिंदुस्तानात राबवून या १३८ कोटींचं भलं करण्यापासून तुम्ही सुरुवात का करीत नाही?’ थोडक्यात हे दोन मुस्लिम देश भारतात विलीन केल्यानंतर त्यातल्या ‘त्यांच्या’ लोकसंख्येचं काय करायचं? त्यांचं प्रबोधन करून गुण्यागोविंदानं सहजीवन जगायचं की त्यांना हिंदू धर्मात सामील करून घ्यायचं? त्यासाठी त्यांचं मन वळवायचं की जबरदस्तीनं हे घडवून आणायचं? या दोन्ही उपायांमध्ये लागणारे मनुष्यबळ नि आर्थिक बळ कसं उभारायचं? आपण तब्बल ३१ टक्के लोकसंख्येत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत याचं भान ठेवून याचं उत्तर द्यावं. पुढचा प्रश्न असा की यांना जात कोणती द्यावी? कारण जातीविहीन हिंदू ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. अगदी जात त्यागलेले ’अजात’ अशी नोंद केलेल्या अनेकांना पुढं आलेल्या अडचणींमुळं नाईलाजानं पुन्हा आपली मूळ जात लावावी लागण्याचं उदाहरण महाराष्ट्रातच आहे. जातिविहीन माणसाला हिंदू समाज मुस्लिमांपेक्षा अधिक वाळीत टाकत असतो. की मुस्लिमांना त्यांची अशी वेगळी जात द्यायची? आणि शिया, सुन्नी, अहमदिया, सूफी हे ढोबळ अधिक त्यांचे उपपंथ असलेले मुस्लिम सरसकट एका जातीचा स्वीकार करतील? की त्यांच्या उपजाती वा पोटजाती तयार होतील? पुढं या जाती आणि पोटजातींचं गरीबीच्या आधारावर आज जसं होतं तसं आरक्षणाची मागणी पुढं येऊ लागली तर हे 'अखंड-हिंदुस्तान'वाले तिला पाठिंबा देतील, की सध्या जसं ‘गंगा गए गंगादास, जमना गए जमनादास’ अशी दुटप्पी भूमिका घेतात तशी पळवाट काढतील?

पुढचा प्रश्न हा की जे तरीही हिंदू होण्यास नकार देतील त्यांचं काय करायचं? त्यांचं शिरकाण करून ही समस्या सोडवायची की त्यांच्या नागरिकत्वाचं हक्क काढून घेऊन त्यांना जेमतेम जनावराचं आयुष्य जगण्यास भाग पाडायचं? आणि याचा अर्थ त्यांना स्वत:चे प्रतिनिधी निवडण्याचा, मतदानाचा हक्क न देणं असेल तर पूर्वाश्रमीच्या पाकिस्तान आणि बांगलादेशातल्या भूभागावरच्या मतदारसंघात अक्षरश: मूठभर असणारे हिंदू वा अन्यधर्मीय त्या संपूर्ण समाजाचा प्रतिनिधी निवडणार का? उरलेल्या ऐंशी-नव्वद टक्क्यांचा तो प्रतिनिधी कसा समजायचा? आणि तो तरी या मतदार नसलेल्यांच्या भल्याचा का विचार करेल? की हे टाळण्यासाठी ते प्रदेश सरळ केंद्रशासित करून टाकायचं? म्हणजे देशाचा सुमारे ३३ टक्के भूभाग हा केंद्रशासित करायचा? तसंही 'अखंड-हिंदुस्तान'वाल्यांना सर्व हिंदुस्तानच केंद्रशासित हवा आहे आणि केंद्रातल्या नेतृत्वाला उद्धारक मानून लोकांनी त्यासमोर नतमस्तक व्हावं असं वाटत असल्यानं त्यांना हा पर्याय अधिक स्वीकारार्ह वाटेल. पण त्यातून जे देशांतर्गत संघर्ष उभे राहतील त्यातून मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान किती होईल याचा काही अंदाज बांधता येईल का? की ‘कुठल्यातरी तथाकथित भविष्यवेत्त्यानं कुठल्याशा अगम्य भाषेत केलेली, आमच्या देशाला लागू पडते अशी बतावणी केली गेलेली तथाकथित भविष्यवाणी सत्य होऊन, कुणीतरी देदिप्यमान कामगिरी करणारा, बलवान असा नेता ह्या असल्या समस्या चुटकीसरशी सोडवील’ या गृहीतकावर भक्तिभावानं रोज दोन फुलं वाहणारे भाबडे जीव त्या भरवशावर जगत आहेत? सीमेवरील चकमकी आणि दहशतवादी हल्ले वगळता १९७१ नंतर भारताला सर्वंकष असं युद्ध लढावं लागलेलं नाही. कारगिल भागात झालेलं युद्ध न म्हणता लढाई म्हणावी लागेल. दोनही देशांच्या राजकीय नेतृत्वानं तिला व्यापक युद्धात रूपांतरित होऊ देण्याचं शहाणपण दाखवलं. त्यामुळं युद्धाची झळ बसणं म्हणजे काय याचा अनुभव आज बहुसंख्येकडं नाही. त्या युद्धानंतर जन्मलेलेही आज पन्नाशीला पोहोचले आहेत, हे ध्यानात घेतलं तर तरुण पिढी ही त्याबाबत सर्वस्वी अनभिज्ञच आहे. त्यांच्या युद्धाबद्धलच्या कल्पना या घरबसल्या आवेशानं युद्धकथा लिहिणार्‍या लेखकांची पुस्तकं वाचूनच तयार झालेल्या आहेत. बहुधा त्यामुळंच स्वातंत्र्यलढाही न लढलेल्यांच्या पुढच्या पिढ्या घरबसल्या किंवा ट्विटबुक-बसल्या म्हणू, युद्धाच्या कथांनी आणि बातम्यांनी रोमांचित होत असतात. आपणही पाकिस्तानवर हल्ला करून अखंड-हिंदुस्तान वगैरे निर्माण करावा असं शाळकरी वयातलं स्वप्न नव्यानं व्यक्त करून आपली बौद्धिक वाढ त्याच वयात थांबली असल्याचे दाखवून देत असतात. खेळांतून बांधिलकी निर्माण होणं अपेक्षित असतं, त्यातूनच ’खिलाडू वृत्ती’ अशी संज्ञा निर्माण झालीय. म्हणून तर इतिहासातून हिटलर आणि वर्तमानातले पुतीन हे यांचे आदर्श आहेत!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

राष्ट्रऐक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची वेळ!


"भोंग्याच्या निमित्तानं देशातलं वातावरण बिघडतंय. त्यातच अखंड हिंदुस्तानचा नारा दिला जातोय. कडवी राष्ट्रनिष्ठा आणि परधर्मियांचा आदरपूर्वक स्वीकार करण्याइतपत उदारता भारतीयांनी दाखवायला हवीय. पक्षीय झेंड्यापेक्षा, व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्र मोठं आहे हे ओळखून आपले नेते वागले तर राजकारणाला वेगळं चांगलं वळण लागणं शक्य आहे. भारतीय हिंदूंचा संघटित कोप आपला सर्वनाश घडवून आणेल हे सत्यही भारतीय मुसलमानांना कळून आलंय. भारत उद्ध्वस्त झाला तर आपणही उद्ध्वस्त होऊ याची जाणीव झालेले मुसलमान राष्ट्रघातक्यांना साथ देणार नाहीत, आपल्या हातानं आपला विनाश ओढवून घेणार नाहीत, असं म्हणण्याइतपत परिस्थिती बदललीय. सर्वसामान्य हिंदूला राष्ट्रऐक्याचे डोस पाजायचे, तो राजकारणात धर्म आणतो, असं म्हणून त्याला हिणवायचं हा सारा एकांगीपणा कशासाठी? हीच वेळ राष्ट्रऐक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ह्यावेळी धर्मांधतेची झापडं दूर करून उदार मनानं समंजस हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही यांना समर्थ करण्यासाठी पुढं यायला हवं!"
-------------------------------------------------------------

*रा*जकारणी आणि गुन्हेगार यांचं साटंलोटं काँग्रेस पक्षापुरतंच आहे असा साजुक आव भाजपनं तरी आणू नये. भाजप ही भगवी कॉंग्रेस आहे आणि भ्रष्टाचार भाजपलाही पचतो, रुचतो हे लोकांना आता कळून चुकलंय. फडणवीस यांच्या राजवटीत हेमामालिनीसह संघ स्वयंसेवकांच्या विविध संस्थांना कवडीमोलानं भूखंड देण्याचा प्रकार झालाच ना! विश्व हिंदू परिषद आणि भाजप यांचा व्यवहार हा दोन चोपड्या ठेवणाऱ्या काळ्या बाजारी बनियाला शोभणारा व्यवहारच आहे. लोकांच्या श्रद्धांचा व्यापार करून भांडवल जमवायचं आणि ते सत्ता मिळवण्यासाठी राजकारणात वापरायचं, हे तंत्र अवलंबून भाजपनं जो डाव मांडलाय तो काँग्रेसनं मागे उभ्या केलेल्या 'गरिबी हटाव' मायाजालाला साजेसाच आहे. भाजप लोकांच्या भावनांशी खेळतोय, भाजप लोकांच्या श्रद्धेशी खेळतोय आणि याचा पुरेपूर फायदा गुन्हेगार प्रवृत्तीच्या मंडळींनी उठवलाय. पैसा आणि प्रतिष्ठा सुलभतेनं प्राप्त होण्यासाठी राजकारण हातात असणं वा राजकारणात हात असणं आवश्यक आहे हे ओळखून अनेक मंडळींनी विविध मार्गानं आपले संबंध प्रस्थापित केले आहेत. त्यातले सारेच काही दाऊद इब्राहिम वा इतरांसारखे उडवाउडवी करणारे गँगस्टर्स नाहीत. तर कुणी पत्रमहर्षी आहेत, कुणी शिक्षणमहर्षी आहेत, कुणी चित्रमहर्षी आहेत. प्रतिष्ठित गुन्हेगारांची एक महत्त्वाकांक्षी टोळीच आज राजकारणात आहे. आपले हेतू साधण्यासाठी वृत्तपत्रं, चित्रपट, दूरदर्शन, रेडिओ, शिक्षणसंस्था, अर्थसंस्था प्रभावीपणे वापरून लोकमत बिघडवण्याचं वा हवं तसं घडवण्याचं कामही हे लोक करीत आहेत. पंचायतीपासून पार्लमेंटपर्यंत ह्यांचं एक जाळं पसरलंय आणि हे जाळं तोडण्याची हिम्मत दाखवील असा एकही राजकीय पक्ष आज भारतात आहे, असं दिसत नाही. राजकारणी लोकांमध्ये हे जाळं तोडण्याची शक्तीच उरलेली नाही. महात्मा गांधींनी स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर काँग्रेसचं विसर्जन करण्याची कल्पना मांडली होती. लोकांनी ती मानली नाही. इंदिरा गांधींच्या उदयापासून काँग्रेसमधल्याच नव्हे, राजकारणातल्या सत्प्रवृत्तींचा अंत झाला असा एक लाडका सिद्धान्त साधनशुचितेत घोळलेली वा पोळलेली माणसं नेहमी सांगतात. कारण तसं सांगणं त्यांना सोयीचं वाटतं. पण १९४९ साली बंगलोरला काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर वल्लभभाई पटेल यांनी म्हटलं होतं, 'स्वातंत्र्यापूर्वी आपण म्हणजे काँग्रेस पक्षाचे लोक ध्येयवादी होतो. त्यागी होतो. पण आता आपली नीती फारच खालावलेली आहे. इतरांप्रमाणेच काँग्रेसजनही भ्रष्ट झाले आहेत. त्याच वर्षी मद्रासला काँग्रेसजनांपुढं बोलताना वल्लभभाईंनी म्हटलं, 'आपल्याला आता बाहेरून संकट येणार नाही. आले तर ते आतूनच येणार आहे. आपण इतके चारित्र्यभ्रष्ट झालो आहोत की, लवकरच याचे आपल्याला भयंकर परिणाम भोगावे लागतील...!' वल्लभभाई जे म्हणाले होते ते अधिक अक्राळविक्राळ स्वरूपात आज आपल्यापुढं उभं झालंय. चारित्र्यधनाचा अभाव हे राजकारणातलं नव्हे, तर सर्वच क्षेत्रातल्या गुन्हेगारीचं प्रमुख कारण आहे. डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे यांनी, 'आपल्या लोकशाहीवरील नवे संकट' ह्या लेखात साठवर्षांपूर्वी इशारा दिला होता, 'चारित्र्यधन जर आपण प्राप्त करून घेतले नाही, तर अमेरिकेप्रमाणे येथे ठग पेंढारशाही सुरू होईल आणि तिने केलेला रक्तशोष सोसण्याचे सामर्थ्य आपल्या ठायी मुळीच नाही...!' चारित्र्यधन हे स्वायत्त आहे, मदायत्त आहे. कोणत्याही परिस्थितीत ते अंतरात्म्याला आवाहन करून प्राप्त करून घेता येतं. मनोनिग्रह संयम हा स्वतःच स्वतःला शिकवता येतो. असंही डॉ. पु. ग. सहस्रबुद्ध्यांनी सांगितलंय. राजकारणात असलेल्या मंडळींच्या कृतीतून संयम, मनोनिग्रह दिसतो का? देश रसातळाला गेला तरी चालेल, पण सत्ता मिळायलाच हवी ह्या अट्टाहासानं होणारा अविवेक तेवढा आज दिसतोय. कुणी पैशासाठी राजकारण नासवतोय, कुणी प्रतिष्ठेसाठी राजकारण नासवतोय, कुणी अजाणता राजकारण नासवतोय, कुणी हेतूपूर्वक राजकारण नासवतोय.

*लोकांचं सामर्थ्य दाखवायला हवं*
ह्या सगळ्या परिस्थितीतून मार्ग काय, असा प्रश्न जेव्हा पडतो तेव्हा लोकशाही यशस्वी व्हायची असेल तर सरकारला भय वाटेल एवढी लोकांची जागृत ताकद उभी करणं हा मार्गच समोर येतो. जागृत जनताच सरकारला योग्य मार्गानं चालायला भाग पाडेल. जयप्रकाशांनी असा प्रयत्न केला होता. त्यांना स्वतःला सत्ता नको होती अथवा कुणाला सत्ता मिळवून देण्याचाही विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. सत्तेवर असणाऱ्या आणि सत्ता काबीज करण्यासाठी कंबरा कसलेल्या पक्षांना लोकांचं सामर्थ्य दाखवावं एवढाच जयप्रकाशांचा हेतू होता. जनतेला जागृत करण्याचा, लोकशाही समृद्ध करण्याचा हा उपाय सर्वच हितसंबंधींना धक्का देणारा होता. लोकशक्ती जागृतीचा जयप्रकाशांचा तो प्रयत्न ह्या हितसंबंधीयांनीच वाया घालवला. त्यांना ह्या मार्गानं सत्ता मिळाली, पण लोकांना हवा होता तो कुठलाच बदल मिळू शकला नाही. आज पुन्हा तशाच नव्हे, त्यापेक्षाही अधिक विकृत वातावरणात भारतीय लोकशाही सापडली आहे. भारताला पुरतं बदलून टाकण्याचा निर्धार करून सत्ता हातात घेण्यासाठी नवे नवे डावपेच टाकले जात आहेत. त्यासाठी तत्वशून्य तडजोडी होण्याची शक्यता दिसतेय. लोकांच्या मनात नाना भ्रामक गोष्टी भरवल्या जाताहेत आणि त्यासाठी घातपातांचाही वापर केला जातोय. निवडणुका अथवा सत्ता यांची हाव न धरता देशाला या परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा. त्यासाठी जनतेला संघटित करण्याचं काम विचारी, विवेकी, पक्षनिरपेक्ष, देशभक्त तरुणांनी हातात घ्यायला हवंय. राज्य कुणाचं आहे? तुमचं का त्यांचं? असं म्हणणारी भाजप आणि कंपनी संधी मिळताच त्यांची होईल म्हणून हे राज्य आमचं. हा देश आमचा, आम्हीच त्याची देखभाल करणार असं व्रत घेऊन काही वर्षे वागण्याची तयारी तरुणांनी करावी. राजकारणाला नवं वळण द्यावं. सावध राहू या. छपलेल्या गुन्हेगारांना उघड्यावर यायला लावू या. राष्ट्रघातक्यांची साथ करणाऱ्यांना राष्ट्रप्रेम शिकवू या. निदान राष्ट्रद्रोहाला किती जबर किंमत मोजावी लागते हे समजावून देऊ या. अखेर ज्याला जी भाषा कळते त्याच भाषेत त्याला शिकवणंच राष्ट्रहिताचं असतं ना! राष्ट्रघातकी वृत्ती आवरण्याचं महत्त्व सर्वत्र सर्वांनाच पटलं आहे. हिंदू समाजाच्या ह्या राष्ट्राच्या भवितव्यावर काय परिणाम होईल, केवढे तांडव उठेल, किती संताप उसळेल, अविचार, अत्याचार यांचा पगडा असलेल्या धर्मांधांना कसं निमित्त मिळेल ह्याचा विचार न करता बाबरी मशीद तोडण्याचा उपद्व्याप केलेल्या मंडळींनाही ह्या भीषणतेनं परिस्थिती हाताबाहेर जातेय हे जाणवू लागलंय. कुणाच्या स्वाभिमानाला धक्का न लावता या देशात एकमेकाचा आदर करीत सहजीवन कसं शक्य आहे, त्यासाठी काय करायला हवं याचा विचार करण्याइतपत शहाणपणा अनेक कडव्या मंडळींनाही सुचलाय. भारतीय मुसलमानांचा विश्वास मिळवला तरच पाकिस्तानी आणि इस्लामच्या नावाखाली केल्या जाणाऱ्या कारवाया थोपवता येतील, भारतात शांतता राखता येईल, अतिरेकी शक्तींना आवरता येईल हे सत्य आता अधिकच स्पष्टपणे प्रगटलं आहे. त्याचबरोबर भारतीय हिंदूंचा संघटित कोप आपला सर्वनाश घडवून आणेल हे सत्यही भारतीय मुसलमानांना कळून आलंय. भारत उद्ध्वस्त झाला तर आपणही उद्ध्वस्त होऊ याची जाणीव झालेले मुसलमान राष्ट्रघातक्यांना साथ देणार नाहीत, आपल्या हातानं आपला विनाश ओढवून घेणार नाहीत, असं म्हणण्याइतपत परिस्थिती बदललीय. हीच वेळ राष्ट्रऐक्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. ह्यावेळी धर्मांधतेची झापडं दूर करून उदार मनानं समंजस हिंदूंनी सर्वधर्मसमभाव आणि लोकशाही यांना समर्थ करण्यासाठी पुढं यायला हवं. देशावर झालेल्या आघाताचा सडतोड जबाब देण्याइतपत कडवी राष्ट्रनिष्ठा आणि परधर्मियांचा आदरपूर्वक स्वीकार करण्याइतपत उदारता साऱ्याच भारतीयांनी आज दाखवलायला हवीय. पक्षीय झेंड्यापेक्षा, व्यक्तीगत महत्त्वाकांक्षेपेक्षा राष्ट्र मोठे आहे हे ओळखून आपले नेते वागले तर भारतीय राजकारणाला वेगळं चांगलं वळण लागणं शक्य आहे.

*स्तोम माजवण्याचा हव्यास नको*
ह्या साऱ्याची दखल घेतली जायला हवी, समाजसेवेच्या ह्या उस्फूर्ततेतून काही करायचं निर्माण व्हायला हवं. पोलीस चकाट्या पिटत बसतात, त्यांना कायदा सुव्यवस्था यांची काहीच तमा नसते, ह्या तक्रारी करून खापर फोडण्यासाठी सदैव काही शोधण्यापेक्षा कायदा आणि सुव्यवस्था यासाठी आपण काय करू शकतो, निदानपक्षी साध्या गोष्टी पाळण्यावर कसं लक्ष देतो याचा विचार प्रत्येकजणानं केला तर निष्कारण अडकून पडणाऱ्या बऱ्याच पोलिसांना काही आवश्यक कामासाठी मोकळं करता येईल. अडचणीच्या काळात स्वयंशासन करून लोकांनी वाहतूक चालू ठेवण्यात खूपच सहाय्य केलं. पुण्यात एका नाल्यावर एक छोटा पूल आहे. मुख्य रस्ते बंद पाहून वाहनचालकांना ही आडवाट आठवली. स्वाभाविकच ह्या पुलाला महत्त्व आले. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांची गर्दी झाली. पोलीस नव्हते. मग तिथल्या तरुणांनी वाहतुकीचे नियंत्रण केले. ह्या आडवाटेनं अनेकांना त्यादिवशी खूपच जलद बाहेर पडता आलं. हे असं स्वयंशासन प्रारंभी तरुणांनी खूप ठिकाणी दाखवलं होतं. ह्याच स्वयंशासनानं फेरीवाल्यांना आवरता येईल, पण सध्या फेरीवाले हप्ताशासनानं मुक्त झाले आहेत. हप्ता दिला की, फूटपाथ आपल्या बापाचा. नागरिक बेजार झाले तरी निमूट रस्त्यानं फुटणार! लोखंडी सांगाडे फुटपाथवर उभे करून त्यावर कपडे टांगून पुरता फुटपाथ फुकटात दुकान म्हणून रोजच्या अल्पशा हत्यानं मिळत असेल तर कोणाला नकोय आणि रोज हातातल्या हातात दहा हजार नुसत्या दमबाजीनं गोळा होत असतील तर हवी कशाला समाजसेवा, असा परस्पर पूरक व्यवहार सध्या चाललाय. एकप्रकारे गुन्हेगारीवृत्ती सगळ्यांमध्येच मुरते आहे. राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालंय म्हणून अलीकडं जरा जोरात बोललं, लिहिलं जातं. फुटपाथवरच्या विक्रेत्यांकडून रोजच्या रोज दोन रुपयांपासून खंडणी घेणारे आणि त्या पैशाच्या बळावर त्या भागातले राजकारण दामटणारे उद्याचे नेते मात्र अजून कुणाला खटकलेले नाहीत. कायदा डावलून हवं ते करण्याचं शिक्षण आता सगळ्यांना विना फी मिळू लागलंय, नव्हे, कायद्यानं वागण्यात काही अर्थ नाही हे लोकांना अनुभवानं पटू लागलंय, 'बघता येईल' ही बेपर्वा वृत्ती लोकांत वाढतेय. कुठल्याही चांगल्या गोष्टीत वाईट शोधण्याची विचित्र मानसिकता लोकात मूळ धरतेय. अविश्वासानं लोकांची विचारशक्ती पोखरलीय. आदर वाटावा, अनुकरण करावं असा कुणी उरलेला नाही आणि आज जे काही चाललंय ते कधी सुधारण्याची शक्यता नाही, असं लोक मनोमनी मानू लागलेत. दुनिया हा चोरबाजार आहे, तुम्ही चोर व्हाल तरच या बाजारात टिकू शकाल असा लोकांचा ठाम समज झालाय. माणसं एकंदरीनं सैरभैर झालीत. मनोमनी ह्या राष्ट्राचा, इथल्या समाजाचा, इथल्या संस्कृतीचा द्वेष करीत जगणारे आणि प्रत्येक उपकाराची फेड डंख मारून करणारे साप इथं वावरताहेत. परकी राष्ट्रांकडून पैसा घातपाती सामग्री घेऊन इथं हजारोंचे जीवन बरबाद करीताहेत. आमच्या सौजन्याचा लाभ घेऊन कायमचे परदेशी पळून जाताहेत. पुन्हा इथं येऊन कशी नवी कारस्थानं करायची यासाठी इथल्या बाकी हस्तकांशी संपर्क ठेवताहेत. अशा हरामखोरांना सद्भावनेच्या आणि प्रेमाच्या पाकात किती बुडवलेत तरी ते आपल्या जातीवरच जाणार हे का नाकारता? ह्या देशात सदैव अशांतता असावी म्हणून झटणाऱ्यांचे दलाल बनून राहणाऱ्या इथल्या घातक्यांना हुडकून ठेचून काढण्यासाठी जोवर राष्ट्रवादी पुढे येत नाहीत तोवर त्यांच्याबद्धल कुणाच्या मनात संशय दाटला तर तो दोष कुणाचा? हिंदूंचे भय बाळगू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुमच्यामधल्याच वृत्तीच्या, उपद्रवी शक्ती-व्यक्तींचे भय बाळगा, त्यांच्या दडून राहण्याला सहाय्य करू नका. सीमेबाहेरील प्रश्नाशी उगाच स्वतःला जोडून घेऊ नका. इथल्या समाजाला हिणवू, डिवचू नका असं कधी सर्वसामान्याना शांतीदूतांनी समजावून सांगितलंय? सर्वसामान्य हिंदूला राष्ट्रऐक्याचे डोस पाजायचे, तो राजकारणात धर्म आणतो, असं म्हणून त्याला हिणवायचं हा सारा एकांगीपणा कशासाठी? नवजीवन देण्यासाठी आयुष्य फेकून देण्याची तयारी दाखवणाऱ्यांनी राष्ट्रघातकीपणा फैलावणाऱ्या प्रवृत्तींचं आव्हान स्वीकारायला हवं. त्यांना सुधारायला काय करणं शक्य आहे ते करायला हवं!
हरीश केंची,
९४२२३१०६०९


Saturday 16 April 2022

मनसे नव्हे जणू प्रतिशिवसेनाच...!

"महाराष्ट्र धर्माचा जागर करीत मराठी भाषा, संस्कृती, आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्र! असं डांगोरा पिटत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आपल्यात आमूलाग्र बदल केलाय. झेंड्यातले विविध रंग ही मनसेची ओळख होती ती त्यांनी पुसून टाकलीय. सारे रंग त्यातून हरवलेत. उरलाय केवळ भगवा रंग. विचार, धोरणं, आंदोलनं, कार्यपद्धती बदलत; प्रबोधनकार आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा हटवत आज त्यांनी पूर्णत्वानं शिवसेनेचा अवतार स्वीकारलाय. तो तसा पूर्वी होताच पण ती एक सावली, पडछाया वा कॉपी अशी होती. आता मात्र शिवसेनाप्रमुखांची शाल आणि शैली राजनं परिधान केलीय. काँग्रेसी सत्तासाथीमुळं शिवसेनेला काही मर्यादा आल्यात हे हेरून मनसेनं त्या स्वतःमध्ये अंगिकारल्यात. भोंग्याला विरोध त्यातूनच आलाय. आता ती मनसे नव्हे जणू प्रतिशिवसेना झालीय. मनसैनिकांबरोबरच शिवसैनिकांनाही आपल्याकडं आकृष्ट करण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसतोय!"
-----------------------------------------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर कधीकाळी त्यांच्या समर्थनात असणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका सुरू झालीय. राज ठाकरे यांनी नव्यानं घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळं इतर पक्षांचाही गोंधळ होत असल्याचं दिसून येतंय. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज यांच्या भूमिकेचं काँग्रेस, राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात येत होतं. तर, भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. राज यांनी नव्यानं घेतलेल्या भूमिकेवर आता उलट चित्र आहे. भाजपकडून राज यांच्या भूमिकेचं स्वागत होत असताना महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून राज यांच्यावर टीका होतेय. राज यांनी मशिदीवरच्या भोंग्याचा वाद काढण्याऐवजी महागाई, इंधन दरावरून केंद्रावर टीका करायला हवी होती, असं मविआच्या गोटातून बोललं जातंय. राज यांनी केलेल्या भाषणात एकही शब्द भाजपविरोधात नव्हता. तीन वर्षापूर्वी राज यांच्या प्रेमात असणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सध्या त्यांच्या विरोधात उभे दिसताहेत. मनसेच्या स्थापनेवेळी मराठी माणूस, मराठी अस्मिता, भूमीपुत्रांना न्याय आदी भूमिका राज यांनी मांडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात पक्षाची लक्षणीय कामगिरी दिसून आली. मनसे स्थापनेनंतर झालेल्या २००९ च्या लोकसभा  निवडणुकीत मनसेनं लक्षणीय मतं घेतली होती. परिणामी मुंबईत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. तर, विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. आणि मुंबई महापालिकेत २७ नगरसेवक तर पुण्यात २९ नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये बहुमत मिळवत सत्ता ताब्यात घेतली. या दरम्यानच्या काळात राज यांच्या निशाण्यावर शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस होती. मात्र, त्यानंतरच्या काळात मनसेला धक्का बसला. नाशिकची सत्ता गेली. नाशिकबरोबरच मुंबई, ठाणे, पुणे इथल्या नगरसेवकांची संख्या घटली. केवळ १ आमदार निवडून आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यावेळी त्यांनी मनसेचे खासदार नरेंद्र मोदीना पाठींबा देतील असं म्हटलं होतं. मात्र, पाच वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदींच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज यांनी एकही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात प्रचार सभा घेतल्या. प्रधानमंत्री मोदी यांची आश्वासनं आणि त्यातली तफावत दाखवत भाजपविरोधात प्रचाराची राळ उडवली होती. याच दरम्यान त्यांनी व्यंगचित्राची मालिकाही सुरू केली होती. राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सल्लामसलत करत या प्रचारसभा घेतल्याचा आरोप भाजपच्या गोटातून करण्यात आला होता. राज यांनी भाजपविरोधाची सुपारी घेतलीय, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीतून लिहिली गेली असल्याच्या आशयाचं वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री फडवणीस यांनी केली होती. शिवसेनेनं भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात येऊ लागली. त्यानंतर राज यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमा राज यांनी हायजॅक केली. ही भूमिका भाजपपूरक असल्याची टीका राजवर होऊ लागलीय. 

महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झालीय. पूर्वी शिवसेनेलाही मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाचा मुलामा चढवला तेव्हाच त्यांना यशाचा गड सर करता आला होता. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत मनसेनं आज हिंदुत्व स्वीकारलंय. हा केवळ योगायोग नव्हे तर त्यामागं व्यूहरचना दिसतेय. बाळासाहेबांचा वारसा मानली जाणारी शिवसेना त्यांच्याच विचारापासून कशी दूर गेलीय, हे सांगतानाच मनसे हीच खरी त्यांच्या विचारांची वारसदार आहे, हे या यानिमित्तानं राज ठाकरे यांना अधोरेखित करायचंय. बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उभी केली, अगदी त्याप्रमाणेच शिवछत्रपतींना अभिप्रेत हिंदुत्व हीच राज ठाकरे यांची संकल्पना आहे. सर्व जातीधर्माच्या शिलेदारांना सोबत घेऊन 'हिंदवी स्वराज्या'ची भगवी पताका फडकावण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. कधीकाळी सावरकरांच्या नावावर राजकारण करणारी शिवसेना सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच धक्का देणारी होती. नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदवही-एनआरसी यावरही शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिळवलेत. बांगलादेशी मुस्लिमांना या देशातून हाकललं पाहिजे, ही शिवसेनेची कधीकाळची मागणी आज इतिहासजमा झाल्याचं पाहायला मिळतेय. सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यालाच बगल द्यावी लागतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यासाठी त्यांच्यावर दबाव दिसतोय. त्यातून हिंदुत्वाचं आक्रमकपणे प्रतिनिधित्व करणारी संघटना ही स्वत:ची ओळखच शिवसेना गमावून बसेल, हे राज ठाकरे यांनी पुरतं ओळखलंय. पण केवळ हिंदुत्व पक्षाला नवी उभारी देऊ शकेल का? हा खरा प्रश्न आहे! मनसेला हिंदुत्वाची कास धरल्यानं भोंग्यांना विरोध आणि भाजपची भलामण या मुद्द्यांवर समर्थनाची भूमिका घ्यावी लागलीय. यातून भाजप आणि मनसे नैसर्गिकरीत्या जवळ येतीलही. मनसेला नसली तरी भाजपला महाराष्ट्रात मित्रपक्षाची गरज आहे. भाजपची 'हिंदुत्व विचारसरणी' असली तरी त्यात आक्रमकपणा नाही. आतापर्यंत शिवसेनेला पुढं करीत त्यांनी आपला आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा राबवलाय. मनसे कदाचित आता त्यांची ती अपेक्षा पूर्ण करू शकेल, असं त्यांना वाटतं. हिंदुत्व अंगिकारल्यास मनसेला जवळ घेण्याचा भाजपचा निश्चितच प्रयत्न राहील. राज ठाकरे एक फायरब्रॅण्ड नेते आहेत. जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडं आहे. तरुणाईत 'हिंदवी स्वराज्या'चं स्फुलिंग फुलवणाऱ्या नेत्याची भाजपला गरज आहे. विरोधकांना त्याच भाषेत उत्तर देणारी आक्रमक संघटना भाजपला मित्र म्हणून हवीय. त्यामुळं भाजप मनसेसाठी पायघड्या घालील. राज यांना भाजपसोबतची आपली भूमिका ठरवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली काही वर्षे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या धोरणांना 'लाव रे तो व्हिडीओ'नं टोकाचा विरोध केलाय, व्यंगचित्रं रेखाटलीत. त्यावर लोकांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणारंय. राज ठाकरे या सर्वातून कसा सुवर्णमध्य साधतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या १६ वर्षांत अनेक स्थित्यंतरं अनुभवली. यशापयशाचा अनुभव घेतलाय. प्रारंभी मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिळालेलं यश राजकीय पक्षांना हेवा वाटावं असंच होतं. आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. अर्थात या यशाचे मानकरी एकटे राज ठाकरे होते. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात त्यांच्या निमित्तानं एका सक्षम नेतृवाचं पदार्पण झालं होतं. राज यांच्या झंझावाती नेतृत्वानं मुंबई, ठाणं, पुणं, नाशिक इथं अक्षरश: वादळ निर्माण केलं होतं. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वानं तरुणाईला वेडं केलं होतं. 'मराठी हृदयसम्राट' अशी उपाधी दिली गेली. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनंही लक्षवेधक ठरली. टोल आंदोलन त्यापैकीच एक, पण मनसेचं हे यश औटघटकेचं ठरलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्हीवेळेला मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मनसेचीही वाताहत झाली. एकटी शिवसेना आपलं अस्तित्व दाखवू शकली. नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशभर हिंदुत्वाचा माहोल पसरला होता. त्यात राज यांचा मराठीचा-प्रादेशिकवादाचा मुद्दा नकळत मागं पडला. शिवसेना त्यावेळी भाजपाविरोधात लढली खरी, पण त्यांना हिंदुत्वानंच तारलं हे नाकारता येणार नाही. याच मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेनं नंतर एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मनसे मात्र या पराभवानंतर दिशाहीन झाली. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच गेला, त्यांची एकाधिकारशाही वाढत गेली. नोटबंदीच्या निर्णयानंतर तर कधी काळी मोदींचे प्रशंसक असणारे राज ठाकरे त्यांचे कट्टर विरोधक बनले. राज यांनी संधी मिळेल तिथं मोदींवर तोंडसुख घेतलं. पुढं तर राज यांचं राजकारण मोदी विरोधावर केंद्रित झालं. मोदींच्या निर्णयाचे राज यांनी जाहीररीत्या वाभाडेही काढले. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींविरोधात प्रचाराचं रान उठवलं, पण मोदींच्या लोकप्रियतेवर ओरखडादेखील उमटला नाही. मोदींविरोधी मतांचं ध्रुवीकरण होईल, असं वाटलं होतं. लोकसभेत मनसेनं उमेदवार उभे केले नव्हते, मात्र विधानसभेत त्यांना एका आमदाराच्या पुढे यश मिळालं नाही. मोदींविरोधी राज यांची चाल अयशस्वी ठरली. हे खरं असलं तरी राज यांच्या नेतृत्वाची जादू तसूभरही कमी झाली नाही. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम आहे. एका हाकेनं लाखोंचा जनसमुदाय एकत्र आणण्याची किमया, ताकद त्यांच्यात आहे. परंतु पक्ष म्हणून मनसेच्या मागील १६ वर्षाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर सत्तेच्या सारीपाटावर त्यांच्या पक्षाचे अस्तित्व शून्य आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. आपल्या पक्षाला उभारी देत त्याचं नव्यानं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आज एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या विचारांना नवी दिशा देत पक्षाची कक्षा रुंदावत आहेत. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या नव्या समीकरणानं त्यांना ही संधी दिलीय. भाजपची साथ सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीला सामील झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकमेकांवर उभा असलेला हा सत्तेचा डोलारा टिकवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या विचारांशी ठाम आहेत. शिवसेनेलाच आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एक ना अनेक मुद्दे शिवसेनेला बासनात गुंडाळून ठेवावं लागताहेत. शिवसेनेची ही राजकीय अगतिकता एक संधी असल्याचं जाणवल्यानं राज यांनी शिवसेनेचेच ध्येय धोरण स्वीकारून आवेशानं पुढं सरसावलेत! आणि मशिदीवरील भोंग्यांना विरोध केलाय. भाजपनं त्याचं स्वागत केलंय.

राज ठाकरे यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य जेवढं म्हणून बिघडवता येईल तेवढं बिघडवण्याचा विडा फडणवीस यांनी उचललेला आहे असं दिसतं. हातातला सत्तेचा घास हिरावल्यामुळं आलेलं नैराश्य अडीच वर्षांनंतरही फडणवीस झटकू शकलेले नाहीत. जे फडणवीस यांचं तेच राज ठाकरे यांचं आहे. राज यांना ज्यांच्याशी स्पर्धा वाटते ते उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व राज यांच्यासारखे करारी, आक्रमक आणि लोकांना आकर्षित करणारं नसलं तरीही त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार, खासदार निवडून येतात. आपल्या सभांना हजारोंची गर्दी जमते, टीआरपी असलेले आपण एकटेच नेते असल्यामुळे माध्यमे लाईव्ह कव्हरेज देतात तरीसुद्धा दुस-यांच्या सुपा-या वाजवाव्या लागतात, ही खंत राज ठाकरे यांना असावी. असे हे दोन वैफल्यग्रस्त नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवायला निघालेत. त्याचबरोबर त्यांना माहीत आहे की, शरद पवार हा या सरकारचा आधार आहे. सरकार खिळखिळे करायचं असेल तर शरद पवार यांच्यावर आघात करायला पाहिजे. त्याचमुळं एका निश्चित रणनीतीनुसार दोघांनीही शरद पवार यांना लक्ष्य केलंय. राज ठाकरे यांचं समजू शकतं, त्यांची समज मर्यादितच आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे भूषवलेला माणूस एवढा धर्मवेडा आणि अल्पसंख्यांकांचा द्वेष करणारा असू शकतो, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव असू शकत नाही. खरंतर सत्तेवाचून बेचैन झालेले फडणवीस सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी ओबीसी समाजघटकांना शिवसेना आणि पवार यांच्याविरोधात सोडून पाहिलं. त्यानं काही फरक पडत नाही म्हटल्यावर राज ठाकरे यांना हाताशी धरलंय. यानंतरच्या टप्यात ते असदुद्दीन ओवेसींना सोबत घेतील आणि महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा डर्टी गेम खेळू शकतील. मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सुरू आहे. राज यांना काही मिळविण्यासाठी तर फडणवीस यांना शिवसेनेला खेचण्यासाठी हा सारा डर्टी गेमचा खेळ उभा केला गेलाय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

नाहीतर राजकीय यादवी माजेल...!

"वयाची ८० उलटलीय, असाध्य रोगानं त्रस्त केलंय, असं असतानाही हा नेता सतत महाराष्ट्रभर फिरतोय, दिल्ली दरबारी गाऱ्हाणं मांडतोय. अशा नेत्याचा 'इरा' संपलाय असं म्हटलं तरी तो नं संपता आणखी जोमानं कामाला लागतो. हे सहन न झाल्यानं त्यांना टार्गेट केलं जातंय. एकाबाजूनं राज ठाकरेंना पवारांशी झुंजायला पाठवलंय. राजच्या हाती 'अजान'च्या विरोधात 'हनुमान चालीसा'चा भोंगा दिलाय. दुसरीकडं मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्या गुणरत्न वकिलाच्या दावणीला एसटी कामगारांना बांधलं. त्यांच्या हाती दगड-धोंडे, चपला दिल्या अन पवारांच्या घरावर भिरकवण्यासाठी धाडलं. सत्तेसाठी तडफडणाऱ्यांनी महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे धिंडवडे काढलेत. हा घसरलेला राजकीय स्तर सावरण्यासाठी आता ज्येष्ठांनी, सुष्टांनी पुढं यायला हवंय. नाहीतर राज्यात राजकीय यादवी माजेल!"
---------------------------------------------------

*म*हाराष्ट्रात सध्या राजकारण्यांचा जो काही थिल्लरपणा, टवाळखोरी चालू आहे. ती इथल्या नागरिकांना लाज आणणारी आहे. महापालिका निवडणुकाजवळ आल्यानं शिवराळ भाषणांना ऊत आलाय. मतदारांनी या साऱ्यांना लाथा घालून हाकलून द्यायला हवंय. करदात्यांच्या कराचा पैसा घेऊन त्यातून विकासाची कामं करण्याऐवजी आपल्या कुटुंबाचं 'विकास मिशन' चालू आहे. यांना लाजही वाटत नाही. ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात. त्यांना खिजगणतीतही धरत नाहीत. चोरांनीच चोरांची लफडी बाहेर काढत, एकमेकांचे बुरखे फाडून अब्रुची लक्तरं वेशीवर टांगणार. पुन्हा हेही गृहीत धरताहेत की, मतदारांसमोर जाऊन आम्ही मतं मागणार! राजकारणी जणू कमिशन एजंटच असतात पण आता ते भक्षकही बनलेत. बेशरमासारखं पुन्हा आम्हा मतदारांसमोर हजर होऊन मतं मागताना जात, धर्म, नातं-गोतं याची बेगमी चालू असते. राजकारणी किमान एका पातळीवर सभ्य असतात, असा आजवरचा समज होता. पण गेल्या दोन-अडीच वर्षांपासून एकमेकांची मढी उकरण्याचं जे काम चालू झालंय. ते पाहता भिंग घेऊन आता सभ्य राजकारणी शोधावं लागतील. या हरामखोरीला कोणताही पक्ष अपवाद नाही. रोज गवत, कडबा, पेंड खाऊन एकमेकांवर शेण फेक सुरू आहे. गुन्हेगार राजकारणी हात उंचावून, मुठी आवळून स्वातंत्र्य सैनिकांसारखं रुबाबात तुरुंगात जाताहेत. ते जेलबाहेर आले की बेंडबाजा-ढोलीबाजा लावून त्यांची मिरवणूक काढली जातेय. जणू काही त्यांनी देशाला लुटलं नाही तर देशासाठी पराकोटीचा त्याग केलाय. लहानपणी शालेय अभ्यासक्रमात 'थोरांची ओळख' हे पाठ्यपुस्तक होतं. त्यात फुले, टिळक, गांधी, नेहरु, नेताजी बोस, डॉ.लोहिया, अशा देशभक्तांच्या कार्याची माहिती त्यातून वाचायला, अभ्यासायला मिळायची. आता थोरांची ओळख याऐवजी 'चोरांची ओळख' हे पुस्तक अभ्यासक्रमात ठेऊन यांची ओळख यांच्या दरोड्याच्या यादीसह दिली जावी. अशी अपेक्षा व्यक्त झाली तर त्याला काय म्हणणार? सोमय्या, राऊत, मलिक, भुजबळ, देशमुख, राणे, दरेकर, लाड, वाघ, कदम ही मंडळी कोण आहेत? हे देशसेवक आहेत की, स्वातंत्र्यसैनिक? यांच्यातल्या काहींच्या अटकेचा कधी निषेध होतोय, तर कधी जोरदार स्वागत होतंय. मोठमोठाल्या फ्लेक्स बोर्डनं गौरविण्यात येतंय. राजकारणातली ही विकृत लाट आगामी काळात येणाऱ्या गुन्हेगारी संस्कृतीची नांदी आहे. गुन्हेगार तुरुंगातून सुटले की, त्याची मिरवणूक निघतेय. हल्लीचे राजकारणी ईडी किंवा सीबीआय कोठडीतून बाहेर पडल्यानंतर त्यांचं होणारं स्वागत पाहून ते स्वातंत्र्यसैनिकांहून मोठे असल्याचं जाणवतं. या सामाजिक विकृतीचं उदात्तीकरण, सोनिया गांधी, शरद पवार, मनोहर जोशी आणि राम नाईक या जुन्या जाणत्या बुजुर्गांनी थांबवावं. त्यांनी निदान सुसंस्कृत राजकारणाचा अनुभव घेतलेला आहे. हे विकृतीकरण आता घराघरात पोहोचलंय. वादग्रस्त नेत्यांवरून तरुण एकमेकांची डोकी फोडताहेत. सध्या सर्व पक्ष एका आळीत आणि एकाच चाळीत राहतात. त्यामुळं त्यांची संस्कृतीही एकच आहे. पूर्वी इंग्रजांच्या राजवटीत पाकिटमारांची स्वतंत्र वसाहत गावाबाहेर होती. ती आता गावातच आलीय. त्यामुळं अशांना ओळखणं कठीण जातंय. आजही काही नेते खरोखरच चांगले आहेत पण त्यांना बाजूला सारून किरकिरं म्हणून सांदीकोपऱ्यात ठेवलं जातंय. त्यांच्या म्हणण्याला दुर्लक्षित केलं जातंय.

केंद्रीय सरकारी तपास यंत्रणा करत असलेली निवडक राजकीय विरोधकांवरची कारवाई, भेदभाव, पक्षपात तसंच काही सत्ताधारी नेत्यांच्या गुन्ह्यांकडं होत असलेला काणाडोळा हे सर्व अगदी ‘पारदर्शी’च आहे. नागरिकांची सद्सदविवेकबुद्धी कुठं गेलीय हाही प्रश्न पडायचं कारण नाही. कारण रामाचा राजकारणासाठी कितीही वापर झाला तरी, आता बऱ्याच लोकांना यात ‘कृष्णनीती’ दिसतेय! पक्षस्थापनेला सोळा वर्षे उलटून गेली तरी बाळसं धरू न शकलेल्या मनसेला भाजपच्याच वळचणीला जाऊन उभं राहायची पाळी आलीय. प्रबोधनकारांच्या वारसा सांगत हे सारं व्यक्त केलं जातंय हे ऐकून प्रबोधनकारांनाही वेदना झाल्या असतील. मनसे भले सत्तेत नसेल. पण मनसे आहे हा इथल्या मराठी माणसाला एक आधार आणि उपऱ्यांना धाक होता. द्रमुक, अण्णाद्रमुक, अकाली दल, शिवसेना, तेलुगू देसम्, बिजू जनता, टीआरएस, आरजेडी, बसपा, तृणमूलसारखे प्रादेशिक पक्ष हिंदूत्वाचं लोढणं गळ्यात अडकवून न घेता वा हिंदूत्वाची झूल न पांघरताही आपापल्या राज्यात स्वबळावर सत्तेवर आलेत. त्यांनी आपल्या अटींवर राष्ट्रीय पक्षांशी समझोता केला आणि वेळ येताच या राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिलीय. दुर्दैवानं महाराष्ट्रातले शिवसेना, शेकाप, मनसे मात्र स्वबळावर वाढू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर, मनसेनं भाजपबरोबर जाणं आणि भाजपचं बळ वाढवणं महाराष्ट्राच्या हिताचं नाही. भाषावार प्रांतरचना मान्य नसलेला रा. स्व. संघ भाजपला मातृस्थानी आहे. सत्तेवर आल्यापासून संविधानानं दिलेली संघराज्य व्यवस्था हळूहळू मोडीत काढण्याचा भाजपचा छुपा अजेंडा दिसून येतोय. त्यामुळं केंद्रात आणि महाराष्ट्रात एकाच वेळी भाजप सत्तेत असेल तर त्यासारखं दुसरं दुर्दैव नसेल. कारण ती महाराष्ट्राच्या विघटनाची नांदी असेल. असो! राज ठाकरेंनी इशारा दिलाय की, 'अजानसाठीचा भोंगा बंद व्हायला हवाय, नाहीतर त्यासमोर मोठ्या आवाजात 'हनुमान चालीसा' लावलं जाईल!' हे आपण आत्ताच नव्हे तर, २०१८ पासून बोलतोय. मग त्यांच्याकडून अशी अपेक्षा होतेय की, २०१८ ला सत्तेतल्या भाजप आणि तत्कालीन गृहमंत्री फडणवीस यांच्या नाकर्तेपणावरही टीका करायला हवी होती, परंतु त्याबाबत चकार शब्दही त्यांनी काढला नाही. हे स्वाभाविकच आहे म्हणा. कारण सध्या राज ठाकरेंच्या घरी भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राज्यातल्या नेत्यांचा राबता वाढलाय, हे कशाचं द्योतक आहे. तेव्हा राज यांनी भाजपवर टीका करणं केवळ अशक्यच! दुसरं म्हणजे त्यांचा आविर्भाव असा होता की देशापुढं आता मशिदींवरील भोंग्याशिवाय दुसरा कोणताच ज्वलंत प्रश्न उरलेला नाही. देश समृद्ध झालाय, स्वस्ताईमुळं समस्त जनता मोदी सरकारवर खूश असून त्यांचे गोडवे गातेय. जोपर्यंत सामान्यांच्या प्रश्नांवर, महागाई, बेकारी यावर पोटतिडकीनं बोलत नाही, तोपर्यंत मनसेला साथ मिळणार नाही.

काही राजकीय पक्षांची हिंसेवर श्रध्दा आहे. हे शरद पवारांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यानंतर अधोरेखित झालंय. कोर्टाच्या निर्णयानंतर गुलाल उधळणारे पवारांच्या निवासस्थानावर जाऊन दगडफेक करतात, चपला फेकतात, हे एकाएकी घडलेलं नाही. याला पार्श्वभूमी आहे ती पाच महिन्यांपूर्वी संपकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर कर्मचारी कामावर रुजूही झाले होते. पण दोन दिवसांनी अचानक विलिनीकरणाची मागणी पुढं करून संप पुकारला होता. त्याचवेळी हे ध्यानात आलं होतं की, या कर्मचाऱ्यांना कामगारद्रोही राजकीय पक्ष फितवतोय. मागण्या मान्य करूनही अचानक पुकारलेला संप हा घातकी डाव होता. सरकारनं कर्मचाऱ्यांना ऐतिहासिक वेतनवाढ दिली होती. अचानक पुकारलेला संप कोर्टानं बेकायदेशीर ठरवून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं होतं. महामंडळानं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं होतं की, जनतेला वेठीस धरलं जातंय. त्यानंतर काही राजकीय उंदीर आणि काही घुशी बिळातून बाहेर पडले. त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उचकवलं. जेव्हा संप उच्च तापमानाला पोहचला तेव्हा त्या उंदरांनी पलायन करून एका विकृत मनोवृत्तीच्या वकिलाच्या म्हणजेच गुणरत्नच्या यांच्या ताब्यात बहकलेल्या कर्मचाऱ्यांना दिलं. गुणरत्ननं आपल्या आरडा-ओरडा करत केलेल्या भाषणात संपकऱ्यांच्या मागण्यांपेक्षा शरद पवार, अजित पवार, अनिल परब यांना लक्ष्य करून कर्मचाऱ्यांचं मन त्यांच्याबद्धल कलुषित करुन ठेवलं. काही प्रमुख एसटी कर्मचारी संघटनेच्या नेत्यांशी भेटून त्यांची भूमिका समजावून घेतली. तेंव्हा त्यांच्या हातातून हे आंदोलन निसटलं होतं. गेल्या पाच महिन्यांतल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा घटनाक्रम पाहीला तर, सरळसरळ राजकीय अजेंडा राबविला गेला होता, असंच दिसून येईल. कर्मचाऱ्यांची एसटी महामंडळ सरकारमध्ये विलिनीकरणाची मागणी आणि कोर्टातली सुनावणी हे एक नाटक होतं. मागण्या मान्य झाल्या काय न झाल्या काय वकिलाला त्याचं काहीही घेणंदेणं नव्हतं. कोर्टाचा निर्णय काय लागणार हेही त्या वकिलाला ठाऊक होतं. त्या निर्णयानंतर कोणाला भेटायचं काय करायचं हा दारुगोळा तयारच होता. पडद्याआडून सूत्रं हलविणाऱ्या मंडळींचा हिंसा आणि खुनाखुनीवर विश्वास आहे, त्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केला गेला होता. ज्या कर्मचाऱ्यांना वारंवार सांगूनही ते पाच महिने ऐकायला राजी नव्हते. कोर्टाच्या निर्णयानंतर ते धुंदीतून बाहेर आले. त्यांना दोष देणार नाही. पण त्यांनी आता तरी भानावर येऊन कामावर हजर व्हावं. भाऊ फाटक, पन्नालाल, राम नाईक, जॉर्ज फर्नांडिस, गुलाबराव पाटील, अय्यर, डोके अशा नेत्यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवलं होतं. मुळात एसटी महामंडळ ना नफा ना तोटा या पायावर प्रवाशांच्या सेवेसाठी उभारलं होतं. नोकरीवर रुजू होताना आपण कोणत्या संस्थेत नोकरी करायला निघालो आहोत हे कर्मचाऱ्यांना माहिती असतं. तेव्हा इतर उद्योगातल्या वेतनाची तुलना करायची होती, तर एसटीच्या नोकरीतच यायला नको होतं. गेली ३१ वर्षे एसटी जागतिक उदारीकरणामुळं डबघाईस आलीय. खाजगी वाहतूकदारांना मुक्त परवाने वाटप करून त्यांना मोकळं रान दिलंय. त्याचवेळी सगळे नियम, कायदे, बंधनं एसटीला लागू करून करकचून बांधून ठेवलं. आणि आता एसटीला म्हणतात स्पर्धेत उतरा! पाय बांधून धावण्याच्या शर्यतीत उतरायला सांगितल्यावर एसटी भुईसपाटच होणार. अशा पार्श्वभूमीवर पाच महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना एक्केचाळीस टक्के वेतनवाढ दिली. त्याआधीही दोन वर्षांच्या कोरोना काळात एसटीचं उत्पन्न बुडालं होतं. सरकारच्या खजिन्यातून वेतन आणि देणी भागविली होती. आता पाच महिन्यांच्या संप काळात दोन हजार कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावं लागलंय. विलिनीकरण अशक्य आहे हे या वकीलासहीत सर्व २८८ आमदारांनाही माहित आहे. तरीही विलिनीकरणावर कामगारांना पाच महिने फरफटत नेलंय. एसटी महामंडळाच्या पाठोपाठ २९ महामंडळं विलिनीकरणाच्या रांगेत उभी आहेत. केंद्रानं खाजगीकरणाचा बकासूर आणलाय तो रोज एक उद्योग गिळतोय. दुसरीकडं त्यांचे महाराष्ट्रातले भाट राज्यात विलिनीकरणाचे पोवाडे गाताहेत. ही दुटप्पी भूमिका कर्मचाऱ्यांच्या ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न सगळ्या बाजूंनी केला होता, पण कर्मचाऱ्यांना बरबाद होण्याची नशा चढली होती. ती आजतरी उतरली असेल.

एसटी कर्मचाऱ्यांनी खासदार शरद पवार यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी हल्ला केल्यानंतर भाजपच्या चित्रा वाघ आणि प्रविण दरेकर यांनी जे वक्तव्य केलंय. ते हल्ल्याचं समर्थन करणारं होतं. सत्ता न मिळाल्यानं कुठल्याही थराला जाण्याचं धोरण ठरवलेलं दिसतंय. शासनाला जेरीस आणण्यासाठी साम-दाम-दंड-भेद यांचा वापर होतोय. पवारांच्या घरावरचा हल्ला पूर्वनियोजित होता. वकील महाशय म्हणतात की, एसटी कर्मचारी हल्ला करणार नाहीत त्याचवेळी ते असंही म्हणतात की, तो कर्मचाऱ्यांचा उद्रेक होता. कोर्टावर आमचा विश्वास आहे ते जो निकाल देतील तो मान्य असेल असं कर्मचारी म्हणत होते. कोर्टाच्या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांनी गुलालही उधळला. मग आता कोर्टाचा निर्णय मान्य नसेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन त्याला आव्हान द्यावं. पण विलिनीकरण हा एक बहाणा आहे. कर्मचाऱ्यांना वेठीस धरून त्याआडून सरकारवर निशाणा साधला होता. यात कर्मचाऱ्यांचं नुकसान होणार आहेच पण त्याचबरोबर एसटी महामंडळाचं खाजगीकरण करण्यासाठीचं निमित्त मिळालंय.जर कोर्टाचा निर्णय मान्य नव्हता तर गुलाल उधळणं कोणत्या कारणासाठी होतं? वकील संप मागं घेण्याबाबत माध्यमांशी बोलण्यास तयार नव्हते. त्याचं कारण आता समजलं असेलच. रात्री त्यांनी पडद्याआडच्या नेत्यांशी योजना आखून हल्ला करायचा बेत पक्का केला होता काय? असा प्रश्न उपस्थित होतो. एका बाजूला हल्ल्याचं समर्थन करीत नाही असं म्हणायचं. मुंबई पोलीस यंत्रणा आणि स्थानिक गुप्तचर यंत्रणा झोपा काढीत होत्या काय? एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल नंतर कोर्ट उभं करणार नाही. कोर्टावर विश्वास नसेल तर कोर्टाचा वेळ का घेता? आता कर्मचारी आणि त्यांचे नेते आम्ही म्हणू तेच झालं पाहिजे. अशी भूमिका घेत असतील तर त्यांना घरी बसावं लागेल. स्थानिक लेबर ट्रॅब्युनलनं कामगार निलंबनाच्या बाजूनं निकाल दिला होता. एसटी महामंडळाचं विलिनीकरण कशाच्या आधारावर करायचं? शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सारे लाभ पदरात पाडून घेतले आहेत. तरी विलिनीकरणच पाहिजे हा आडमुठेपणा आहे. आंदोलनाचे प्रायोजक कोण आहेत? कर्मचाऱ्यांना माहितीय. त्यांनी त्यांची धुलाई करायचं सोडून पवारांच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचं कारण असं आहे की, महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आहेत. त्यांना दोष देऊन बदनाम करून सरकार खिळखिळं करण्याचे मनसुबे रचले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी एसटीतल्या कर्मचाऱ्यांनीच करावी. कारण त्यांना ठाऊक असेल की फितूर आणि दगाबाज कर्मचारी कोण आहेत?
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Saturday 9 April 2022

'महाराष्ट्र फाईल्स'...!

"मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या सत्तेसाठी झपाटलेल्या दिल्लीनं आपली सारी आयुधं सरसावलीत. देशातले सारे टरकत असताना महाराष्ट्र आपल्याला भीक घालत नाही. याचा दिल्लीला त्रास होतोय. सारी कार्पोरेट कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईतच गुजरातींचा एक मोठा अड्डा आहे. दिल्लीवर गुजरातींचा कब्जा असताना मुंबई दिल्लीच्या ताब्यात नाहीये. यांचं त्यांना शल्य आहे. सत्तेच्या ह्या पेचात राज्याचं राजकारण अडकलंय. सत्तेची झिंगच अशी असते की, संस्कारी पक्षालाही आपलं सत्व सोडून द्यावं लागतं, याचा अनुभव येतोय. राजकारणाच्या सारीपटावर कधी काय घडेल हे सांगता येत नाही, एवढी अनिश्चितता निर्माण झालीय!"
---------------------------------------------------

*रा* जकारणाचा बाज असाही असतो की, जे दिसतंय ते खरं नसतं. राज्यात असंच काहीसं घडतंय. ईडीनं डझनभर नेत्यांना कायद्याच्या चौकटीत अडकवलंय. काही तुरुंगात गेलेत काही जाण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतात याचा अर्थ काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा म्हणतात, 'मला जेलमध्ये टाका, पण नातेवाईकांवर हात टाकू नका!', संजय राऊत म्हणतात, माझी हत्या करा, मला जेलमध्ये टाका, काय करायचं ते करा, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत, आम्ही झुकणार नाही. याचा अर्थ काय? नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय. इथली अर्थव्यवस्था इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. मग ते कर्जाचं असो वा परकीय गुंतवणूकीचं असो. हे शल्य केंद्रसरकारला सलतंय. मुंबई हातात नाहीये. देशातली सगळी राज्ये केंद्र सरकारला टरकून असतात. पण महाराष्ट्र त्यांना भीक घालत नाही. याचा त्यांना त्रास होतोय. आगामी काळातही हेच सरकार राहिलं तर भाजपसमोर अडचणी उभ्या राहतील. देशातल्या साऱ्या उद्योजकांची कार्पोरेट कार्यालये मुंबईत आहेत. मुंबईतच गुजरातींचा एक मोठा अड्डा आहे. दिल्लीवर गुजरातींचा कब्जा असताना मुंबई दिल्लीच्या ताब्यात नाहीये. सत्तेच्या ह्या पेचात महाराष्ट्राचं राजकारण अडकलंय. याचं शेवट सत्तापालट होण्यात तर नसेल? यासाठी इथलं वातावरण समजून घेतलं पाहिजे. इथं डझनभर नेत्यांवर ईडीची कारवाई झालीय. आणखी काहींना नोटिसा जातील, चौकशी, कारवाई आणि अटक होईल. नेत्यांना सळोकीपळो करून सोडलं जाईल. ईडीशिवाय दिल्लीकडं सत्तेच्या या खेळीत आणखी एक क्षेत्र आहे ते सहकाराचं! सहकारातला पैसा इथल्या राजकारण्यांना पोसतो. सत्तापरिवर्तनासाठी त्यांची ती रसद तोडण्याची तयारी सुरू झालीय. सारा देश आपल्या ताब्यात आहे, पण महाराष्ट्रावर आपला कब्जा नाहीये याचंच शल्य भाजपला आहे. ज्यात आपल्या मातृसंस्थेचं नागपुर अन पैशाची खाण असलेली मुंबईही आहे.

फडणवीसांनी १२५ तासाचं रेकॉर्डिंग असलेला पेनड्राईव्ह देऊन त्याची सीबीआय चौकशीची मागणी केलीय. त्यातला आवाज आणि जे संकेत आहेत, ते थेट शरद पवारांकडं अंगुलीनिर्देश करणारे आहेत. पवार राजकारणातले एक दिग्गज मानले जातात. असं म्हटलं जातं की, खेळी खेळताना जेवढे पत्ते हातात असतात त्याहून अधिक त्यांच्याजवळ असतात. या पेनड्राईव्हची अद्याप चौकशी सुरू झालेली नाही. पण दिल्ली त्या पेनड्राईव्हची फाईल उघडू इच्छितेय. पवार प्रधानमंत्र्यांना भेटले तेव्हा ते काय संजय राऊत व इतरांच्या ईडीच्या कारवायाबाबत बोलले असतील का? की आणखी काही? तुम्हाला जे हवंय ते करा आम्ही तुमच्यासोबत आहोत असं काही त्यांनी सुचवलं तर नाही ना! तुरुंगात गेलेल्या मंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक आहेत. अजित पवारांची काय स्थिती आहे, जरंडेश्वर कारखान्याची फाईल उघडली गेलीय. त्यांच्या बहिणींवरही कारवाई झालीय. फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी झाल्यानंतर पुन्हा इकडं येऊन उपमुख्यमंत्री बनलेत त्यामुळं त्यांची कोंडी झालीय का? कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला महाराष्ट्र हवाय, मुंबई हवीय त्यासाठीचा हे सारं चाललंय! विधानसभा, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि शिवसेना एकमेकांसमोर असतात. त्यामुळं इथं शिवसेनेचं राजकारण अडचणीत आलंय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी हे जाणलं होतं की, शिवसेना सत्ता खेचून आणू शकते. सत्ता हाती आल्यानंतरही त्यांनी स्वीकारली नाही कारण, सत्ता हाती घेतल्यावर कायद्यांपुढं झुकावं लागतं, कायद्याच्या चौकटीत राहून कामं करावी लागतात. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं हे रहस्य जाणलं नाही. उद्धव शरद पवारांच्या इच्छेला बळी पडले आणि तिथंच उद्धव फसले! हळूहळू या चक्रव्यूहात ते अडकत गेले, अन आता त्यांना संकटांना सामोरं जावं लागतंय. राज्याची सारी सूत्रं पवार आपल्या हाती ठेऊ इच्छितात. ती सूत्रं आपल्याकडं घेण्यासाठी दिल्ली पवारांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवू पाहतेय. सुप्रीम कोर्टात ईडीनं जी फाईल दाखल केलीय त्यात १२२ लोकप्रतिनिधींवर कारवाई करणार असल्याचे म्हटलंय, त्यापैकी आणखी डझनभर महाराष्ट्रतले आणि बंगालचे आहेत. आंतरराष्ट्रीय महत्व आणि आर्थिक राजधानी असलेली मुंबई-महाराष्ट्र ही ईडीच्या कचाट्यातल्यांच्या ताब्यात कशी राहू द्यायची असं दिल्लीला वाटतंय. आणखी दोन प्रकार आहेत. एक शरद पवारांनी उद्धवना ढाल बनवलीय का? उद्धव वजीर असताना ते पवारांचे प्यादे बनलेत का? प्यादेच्या या स्थितीला दिल्लीकडं सोपवायला पवार दिल्लीत आले तर नाही ना? हे सारं पाहता संजय राऊत, त्यांचे कुटुंबीय, उद्धव यांचे मेहुणे पाटणकर, अजित पवार आणि इतर नेत्यांचं ईडीच्या फेऱ्यात येणं ही छोटी चाल आहे. आता तर खुद्द शरद पवारांना यात गोवलं जाण्याची शक्यता वर्तविली जातेय. पवार ७० च्या दशकापासून सहकारी चळवळीचं नेतृत्व करतात. त्या माध्यमातून त्यांना जे राजकीय वजन प्राप्त केलंय त्याला छेद देण्याचा केंद्राचा प्रयत्न दिसतोय. त्यासाठी केंद्रानं सहकार खात्याची निर्मिती केली आणि ते खातं गृहमंत्री अमित शहा यांच्याकडं सोपवलंय. दिल्लीतल्या गुजरातींना मुंबईत सत्ता हवीय. इथल्या कार्पोरेट जगताशी त्यांचा संपर्क कमी झालाय. यातच किरीट सोमय्या यांची फाईल शिवसेनेनं उघडलीय, १९७३ मध्ये आयएनएस विक्रांत ही युद्धनौका मोडकळीला आली तेव्हा तिला भंगारात काढण्याचा निर्णय झाला. ती वाचविण्यासाठी सोमय्या यांनी 'विक्रांत बचाव' मोहिमेतून ५७ कोटींचा निधी उभा केला. तो राज्यपालांकडे दिल्याचं म्हटलं होतं. पण माहिती अधिकारात तो निधी राजभवनात दिला गेला नसल्याचं उघड झालं. त्यानंतर एका माजी सैनिकानं ट्रोम्बे पोलीस ठाण्यात किरीट आणि त्याचा मुलगा नील या दोघां विरोधात कलम ४२०, ४०६, ३४ व इतर कलमाखाली गुन्हा दाखल केलाय.

शरद पवारांना आपलं कुटुंब, संपत्ती आणि राजकीय ताकद महत्वाची आहे. या तीनही बाबींवर दिल्लीनं अंगुलीनिर्देश करत त्यावर हल्ला केलाय. त्यामुळं युपीएचं नेतृत्व करायचं की नाही या द्विधा मनस्थितीत पवार आहेत. तर दुसरीकडं उद्धव ठाकरेंनी सत्तेवर बसून चूक केलीय. पवारांना अशी स्थिती येईल याची कल्पनाही नव्हती. २०१४ मध्ये अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेवर थेट वसुली पार्टी म्हणत हल्ला चढविला होता. तो विरोध आता अधिक टोकदार झालाय. राज्यात असा कुणीही नेता नाही की, ज्याच्यावर कसलाही डाग नाही. अशा डागी नेत्यांवर कारवाई करत महाराष्ट्रात सत्तेच्या दिशेनं दिल्लीला आगेकूच करायचीय. या कारवायांनी जर सत्ताबदल झाला आणि फडणवीस यांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर मग काय नितीन गडकरींचे पंख कापले जातील काय? हाही एक प्रश्नच आहे. यातून आरएसएसलाही एक संदेश दिला जातोय की, सत्ता, सरकार आणि गव्हर्नन्स सोबत ठेवावी लागेल, यात मोठी जबाबदारी पैसा बजावते. तो सत्तेसाठी, राजकारणासाठी ऑक्सिजन पुरवतो. इथं उद्धव राज्यशकट चांगल्या पद्धतीनं हाकताहेत. त्यांनी महाराष्ट्राची आर्थिकस्थिती उत्तम राखलीय. इथला विकासाचा दर जवळपास १२ टक्के आहे. उद्योगांचा ११.९, सर्व्हिस सेक्टरचा १३.९, कृषी आणि त्याच्याशी संबंधित ४.४, कृषिविभागातही सुधारणा झालीय लाईव्ह स्टोक ६.९ , फॉरेस्ट ७.२, मत्स्यव्यवसाय १.९ टक्के आहे. इतकंच नाही तर इतर राज्यांच्या तुलनेत कर्जही कमी आहे. ते केवळ १९ टक्के आहे. देशातल्या इतर राज्यातलं प्रमाण ३१ टक्क्यांच्या वर आहे. महसुली उत्पन्न ३२ लाख कोटीहून अधिक आहे. इतर भाजपशासित राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची आर्थिकस्थिती उत्तम आहे, हेही केंद्राच्या डोळ्यात सलतंय. परकीय गुंतवणूकही इथं मोठ्याप्रमाणात झालीय. १ लाख १९ हजार कोटी इतकं आहे. त्यानंतर कर्नाटक आणि गुजरातकडं गुंतवणूक होतेय. त्यामुळं असं म्हणता येणार नाही की, उद्धव सरकार फेल ठरलंय. पण राजकारणातल्या अहमहमिकेनं राज्याची रसद कापण्याचा प्रयत्न होतोय. राज्यांत सहकार चळवळीचं जाळं विस्तारलेलं आहे. सहकारी अर्बन बँका सर्वाधिक ३६३ बँका आहेत. त्यातल्या ११९ चं मुख्यालय मुंबईत आहे. कर्नाटकात २६७ अर्बन बँका, गुजरातेत २११ बँका, तामिळनाडूत १२९ बँका तर तेलंगणा-आंध्रप्रदेशात केवळ ८५ सहकारी बँका आहेत. या सहकारी बँकेत ६ लाख कोटींच्या ठेवी आहेत. या पैशातून राजकारण तर होऊच शकतं. या सहकारावर राष्ट्रवादीचं वर्चस्व असल्यानंच ईडीनं त्यांना लक्ष्य बनवलंय. राज्यातल्या ३१ जिल्ह्यात पसरलेल्या राज्य सहकारी बँकेच्या ७० संचालकांवर ईडीनं नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय पंजाब-महाराष्ट्र सारख्या जवळपास १०-१२ बँकांचे संचालक हे ईडीचं लक्ष्य बनलेल्या आहेत. हे संचालक राजकारणाशी निगडित आहेत. इथल्या सहकारात भाजपचा फारसा सहभाग नाही. दूधसंघ, साखर कारखान्याचे संचालक हे प्रामुख्यानं राष्ट्रवादीशी निगडित असल्यानं ग्रामीण अर्थव्यवस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे, त्या माध्यमातून राष्ट्रवादीला आर्थिक रसद पुरविली जाते. ही रसद तोडण्यासाठी दिल्ली काही नियम, कायदे करत सज्ज झालीय.

इथं तीन प्रश्न उभे राहताहेत. महाराष्ट्रात सत्ताबदल होतोय का, त्यादिशेनं वाटचाल सुरू झालीय का? दुसरा प्रश्न राष्ट्रवादी अखेरच्या क्षणी काही दगाफटका तर करणार नाही ना? ज्यातून आपलं राजकारण शाबूत राहील, सरकार उलटपुलट होईल. दिल्लीची प्रतिक्षा आता संपत आलीय का? दिल्लीला गुजरातच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्रातल्याही निवडणुका व्हाव्यात असं वाटत असल्यानं या दिशेनं त्यांच्या हालचाली दिसून येताहेत. इथं तीन नेत्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. ठाकरे आणि शिवसेना यांचं राजकारण हे नेहमी रस्त्यावरचं, दबावाचं राहिलंय. त्यातून पक्षासाठी निधी मिळत होता, आता तर सत्ता हाती आलीय. पैसा बक्कळ मिळत असला तरी रस्त्यावर उतरून पक्षाचं अस्तित्व सतत जागं ठेवणारा शिवसैनिक थोडासा विसावलाय, मंदावलाय. हे राज ठाकरेंनी नेमकं हेरलं. त्यांनी शिवसेनेनं दूर लोटलेलं हिंदुत्व अंगिकारलं. मशिदीतलं लाऊडस्पीकरवरचं अजान थांबविण्यासाठी त्याच्यासमोरच मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावायला सांगितलं. याचा परिणाम असा झाला की, मुख्यमंत्र्यांना लाऊडस्पीकरचा आवाज ६० डेसीबलपेक्षा जास्त असणार नाही असा आदेश काढावा लागलाय. रस्त्यावरचं राजकारण करण्यासाठी राज ठाकरे आता सज्ज झालेत. मुंबईत, महाराष्ट्रात रस्त्यावरच्या राजकारणाला विशेष महत्व आहे. दरम्यान राज यांच्या भाजपशी जवळीक साधणाऱ्या भूमिकेला अनुसरून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी शिवतीर्थवर भेट घेतलीय. यातच सारं आलं. संबंध जुनेपुराने असले तरी संदर्भ नवीन आहेत. पवारांनी टीका करताना म्हटलंय की, राज सहा महिने झोपून असतात अन अचानक जागे होतात. त्यानंतर ते लगेचच प्रधानमंत्र्यांना भेटायला दिल्ली गाठतात. या समीकरणात उद्धव कुठं आहेत? त्यांचं नेतृत्व कुठाय. शिवसेनेची ती ताकद कुठाय? जर शिवसेनाप्रमुख असते तर ईडीनं शिवसेना नेत्यांच्या जुन्या केसेस काढून दरवाजे ठोठावले नसते. भ्रष्टाचार कुठं नाहीये? १९९३ साली व्होरा कमिटीनं अगदी खुलेपणानं सांगितलं होतं की, कसा भ्रष्टाचार होतो, कसं माफिया काम करतात, कसं अंडरवर्ल्ड काम करतात, कसं बॉलिवूड काम करतं, कशाप्रकारे रिअल इस्टेट काम करतं, कशाप्रकारे क्राईममधूनही पैसे उकळले जातात. खंडणी कशी वसूल केली जाते, कसा मटका चालविला जातो या सगळ्या गोष्टी उघड केल्या होत्या. आता काय देशाच्या राजकारणात पहिल्यांदाच दिल्ली इमानदार झालीय? इमानदारीनं ईडी काम करतेय. का राजकारण आणि सत्ता साधण्यासाठी उघडपणे हा खेळ, तमाशा सुरू झालाय. पण इथं दोन गोष्टी लक्षांत घ्यायला हव्यात. पवार कधी कुणाला, कुठं अन कसं भेटताहेत हे महत्त्वाचं आहे. ते जे सांगताहेत वा दिसतंय, त्याच्या नेमकं उलटं काहीतरी घडणार असं आजवरचा अनुभव पाहता गृहीत धरायला हवंय. ते आपल्या कुटूंबियांना धक्का लागू देऊ इच्छित नाहीत, आपल्या संपत्तीला टाच लागू इच्छित नाहीत. शिवाय राजकीय ताकद कमी होऊ नये याची दक्षता घेताहेत. दुसरीकडं शिवसेनेला दूर सारून राष्ट्रवादीला भाजपच्या साथीला उभं करताहेत का, दिल्लीनं ज्यासाठी कंबर कसलीय. काँग्रेस मात्र शालीनतेनं केवळ पाहातेय. अगदी शेवटची बाब जेव्हा सत्तेसाठी घड्याळाचे काटे उलटे फिरायला लागतात तेव्हा रस्त्यावरचं राजकारणच साथीला येतं, त्यात कायदे-नियम याला अर्थ नसतो. शिवसेनेसाठी हे काही अशक्य नाही, पण आज शिवसेना सत्तेत आहे. शिवसैनिकांना ताकद देण्याचं काम होतेय. पण सत्ता हाती ठेवण्यासाठी हेही पाहावं लागेल की, समोर कोण आहे. आव्हान देणारे अमित शहासारखे राजकारणी आहेत. साऱ्या तपास यंत्रणा त्यांच्या हाती आहेत. त्यांच्या कारवाया महाराष्ट्र सरकार जाणतेय, ते शांत राहू इच्छितेय. प्रतीक्षा करतेय. पण काहीतरी घडेल म्हणून काही घडत नाही! एवढंच सुचवावं वाटतं!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

हे तर टोळीयुद्धच म्हणायचं.. !

"सामान्य लोक लोकप्रतिनिधींचे टोलेजंग बंगले, जमीनजुमले बघत आलेत. एकेकाळचे अतिसामान्य लोक, सत्ता मिळाल्यावर संपत्ती गोळा करतात. स्वत:चं घर उभारण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च करावी लागणाऱ्या सामान्यजनांना हा मोठा प्रश्न पडतो की एवढी संपत्ती या लोकांनी कुठून गोळा केली? कोणता नोकरीधंदा केला? आणि कुठल्याही गैरमार्गानं केली असेल तर त्याला जाब विचारणारी काही यंत्रणा आहे की नाही? त्या सर्वाना या ईडीद्वारा केलेल्या कारवाईनं काही अंशी का होईना उत्तर मिळाले असेल. राजकीय सुडापोटी का होईना काही धनदांडग्यांना चाप बसेल असं म्हणायला वाव आहे. पुढेमागे सत्ता बदल झाल्यास सत्तारूढ पक्ष ईडीचा उलट वापर करून सध्याच्या सत्तारूढ पक्षाचा वचपा काढतील. हे एक प्रकारचे टोळीयुद्धच म्हणायचं. असाच ईडीचा ससेमिरा सत्तारूढ पक्षाने आयात केलेल्या भ्रष्ट लोकप्रतिनिधीवर लावला, तर येत्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून का होईना आणि स्वत:ची प्रतिमा सुधारण्यासाठी तर सोन्याहून पिवळे!"
---------------------------------------------------

*म* हाराष्ट्रात राजकीय आकडेवारी गाठण्याचं लक्ष्य! त्यासाठी आरंभलं युद्ध! एकमेकांना अडकविण्यासाठी नवनवे डावपेच गेल्या अडीच वर्षात वाढलेत. अनिल देशमुखांनंतर नवाब मलिक यांनी उचलून आत टाकलंय. उध्दव ठाकरेंच्या मंत्रिमंडळाला भाजपनं जणू ग्रासलंय. मलिक यांच्यावर दहशतवादी दाऊद इब्राहिमला मदत केल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यावर चालवायला घेतलेल्या ६५ कोटी रुपयांच्या साखर कारखान्याला सील ठोकलंय. शिवसेनेचे आमदार सरनाईक आणि त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आलीय. अजित पवारांच्या बहिणींच्या घरीही धाडी टाकण्यात आल्यात. आपल्या बबनदादा शिंदे आणि त्यांच्या बंधूंचीही ईडीनं चौकशी केलीय. आतातर शिवसेनेचे फायरब्रॅंड नेते, सामनाचे संपादक, खासदार संजय राऊत, त्यांच्या पत्नी वर्षा राऊत, जवळचे मित्र प्रवीण राऊत यांच्या ११ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आलीय. त्यामुळं शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडालीय. सत्तेसाठी तडफडणाऱ्या भाजप आणि सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या वैमनस्यानं आणि युद्धानं आक्रमक वळण घेतलंय. ईडीनं प्रिव्हेन्शन ऑफ मनी लोंडरिंग कायदेअंतर्गत गोरेगावच्या पत्राचाळ प्रकरणात ही कारवाई झालीय. प्रवीण राऊत यांनी कंपनी या चाळीच्या रिडेव्हलपिंगचं काम करते आहे. त्यातून गैरमार्गाने मिळवलेल्या १०० कोटी रुपयातून ८३ लाख रुपये वर्षा राऊत यांनी दिले गेले. वर्षा यांनी या रकमेतून दादरमध्ये एक फ्लॅट घेतलाय. ही बाब ईडीनं लक्षून वर्षा आणि प्रवीण यांनी आपल्या नातेवाईकांच्या मदतीनं मनी लोंडरिंग केल्याचं दिसून आल्याचं ईडीनं म्हटलं आहे. प्रवीण राऊत याला या प्रकरणात यापूर्वीच धरपकड करून त्याची कारागृहात रवानगी केलीय. ईडीची भूमिका पाहता वर्षा राऊत यांच्यावरही कारवाईची चिन्हे आहेत.

महाराष्ट्रात २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. तीसवर्षांहून अधिककाळ सत्तासाथीदार असलेल्या भाजप-शिवसेनेनं आपल्यातली युती संपुष्टात आणली. शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं. तेव्हापासून महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात वैमनस्य, शत्रुत्व निर्माण झालं, प्रत्येकवेळी एकमेकासमोर उभे ठाकले आहेत. केंद्रातलं भाजप सरकार आणि राज्यातलं मविआ सरकार या दोघांनीही आपापल्या तपास यंत्रणांच्या माध्यमातून एकमेकांच्या नेत्यांना अडकविण्यासाठी नवनवीन खेळी करताहेत. तेव्हापासून गेली अडीचवर्षे दोघांमध्ये युद्ध आरंभलंय. आतातर उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादकांच्या संजय राऊत यांच्या पत्नी विरोधात कारवाई करत भाजपनं शिवसेना विरोध अधिक टोकदार केलाय. भाजप-सेनेमधलं हे द्वंद्व अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येच्या प्रकरणापासून सुरू झालाय. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणा सीबीआय, ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो - एनसीबी यांच्या मदतीनं उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना यात गुंतवण्यासाठी जंग जंग पछाडलं होतं, पण काही साध्य झालं नाही. दरम्यानच्या काळात अभिनेत्री कंगना राणावत यांनी मविआ सरकार आणि ठाकरे यांच्याविरोधात मुक्ताफळे उधळली. त्यानंतर मुंबई महापालिकेनं कंगणाच्या विरोधात बेकायदा बांधकाम केल्याची नोटीस बजावली. ते बांधकाम तातडीनं पाडलं. त्यावेळी हा विरोध आणखीनच वाढला गेला. तिथूनच खऱ्या अर्थानं हे राजकीय युद्ध सुरू झालं! गेल्यावर्षी मार्च महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाच्या बाहेर विस्फोटकानं भरलेली मोटार उभी करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पॉलिसीच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख सचिन वाझे यांना एआयएए यांनी ताब्यात घेऊन त्यांची तुरुंगात रवानगी केली. त्यानंतर रीतसर युद्ध सुरू झालं. या प्रकरणात ज्याची मोटार होती त्या ठाण्यातल्या व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचं उघड होताच वाझची हालत आणखीच बिघडली. वाझे शिवसेनेशी संबंधित होता. त्याला वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी बदली केली. 'वाझे म्हणजे काय लादेन आहे काय?' असं म्हणत त्याची पाठराखण केली. दरम्यान परमवीरसिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला, १०० कोटी रुपयांची खंडणी वसुलीचं टार्गेट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी डान्सबार मालकांकडून दरमहा खंडणी वसूल करण्याचं लक्ष्य दिलंय. देशमुख यांनी वाझेला घरी बोलावून आपले सेक्रेटरी पलांडे व इतर कर्मचारीवर्ग त्यावेळी झर होता. देशमुखांचा हिधेब असा जात की, मुंबईत हजाराहून अधिक डान्सबार-हॉटेल्स आहेत. प्रत्येकाकफून महिना दोन दोन लाख रुपये वसूल केले तर महिना ४० कोटी रुपये होतात, इतर रक्कम लहानमोठ्या धंदेवाल्याकडून वसूल करावेत असं गणित समजावून देशमुखांनी वाझेला खंडणीखोरी करायची जणू परवानगीच दिली होती. असा आक्षेप परमवीरसिंग यांनी त्या पत्रात नोंदवला होता. या लेटरबॉम्बनं मविआ सरकारमध्ये खळबळ उडाली. ह्या आक्षेपानुसार सीबीआय आणि ईडीनं देशमुखांना तुरुंगात पाठवलं. देशमुख वर्षभरापासून जेलची हवा खाताहेत. बाहेर येण्याचे खुपसारे, हरेक प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश येत नाही. महाराष्ट्र पोलिसांनी परमवीरसिंग यांच्यावर खंडणीची आरोप ठोकून त्यांना अडकविण्यासाठी प्रयत्न चालविले. परमवीरसिंग यांना यात जामीन मिळाला पण ते सध्या निलंबित आहेत.

देशमुख यांच्या या प्रकरणानंतर तर दोन्ही पक्षातलं युद्ध अधिक उग्र बनत गेलं. गेल्या वर्षभरात केंद्र आणि महाराष्ट्रातल्या तपासयंत्रणा यांनी ज्यांना आपल्या कचाट्यात अडकवलं त्या सगळ्यांची चर्चा करणं शक्य नाही. पण दोन्हीकडची मोठमोठाली नेतेमंडळी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेत नाही तर कोर्टाचे धक्के खाताहेत. देशमुखांच्या नंतर नवाब मलिक यांचीही जेलमध्ये रवानगी केल्यानं राज्य मंत्रिमंडळातले फोन मंत्री जेलची हवा खाताहेत. मलिक यांच्यावर तर कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम याला मदत करण्यासाठी मनी लोंदरिंग केल्याचा आरोप टाकण्यात आलाय. ईडीनं उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्या कंपनीला भाड्याने दिलेल्या ६५ कोटी किंमतीच्या साखर कारखान्याला सील ठोकलं आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची करोडोंची संपत्ती, ५ हजार ६०० कोटींच्या एनएसईएल घोटाळ्यात जप्त केलीय. देशमुख यांच्यासारख्या लाच प्रकरणात शिवसेनेचे आणखी एक नेते अनिल परब यांच्यावर आरोप ठेवण्यात आला असून त्यांचीही चौकशी सुरू आहे. ईडीनं मनी लोंदरिंग प्रकरणात उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची कोट्यवधींची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ठाण्यातल्या निलांबरी सोसायटीतल्या ६ कोटी ४५ लाख किमतीचे ११ फ्लॅट सील केले आहेत. ईडीनं यापूर्वी राष्ट्रवादीच्या शरद पवार, प्रफुल्ल पटेल, एकनाथ खडसे यांच्यावरही केसेस दाखल केला आहेत. अशाप्रकारे कारवाई करण्यात महाराष्ट्र सरकार देखील मागे नाही. केंद्रीय मंत्री नारायण राणे त्याचा आमदार पुत्र नितेश राणे यांना जेलची हवा खायला लावली आहे. राणेंनी मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लावली असती असे वाह्यात उदगार काढले होते. तर नितेशनं शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यावर हल्ला केल्याचा आरोप होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धरपकड झाली नसली तरी फोन टॅपिंग प्रकरणात स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटनं त्यांची चौकशी केलीय. भाजपचे दुसरे नेते प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई सहकारी बँकेत संचालक बनण्यासाठी बोगस सदस्यत्व स्वीकारल्याचं केस उभी केलीय. मुंबई महापालिकेनं भाजपच्या मनोज कंबोज यांच्यावर बेकायदेशीर बांधकाम केल्याची नोटीस बजावली आहे. हे मोठ्या नेत्यांच्या केसेस आहेत तर, छोट्या छोट्या नेत्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्यावर्षी मविआच्या ७ आमदारांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाई केलीय. महाराष्ट्र पोलिसांनीही भाजपच्या ७-८ नेत्यांवर कारवाई केलीय. एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय. भाजप आणि मविआ दोघेही या साऱ्या केसेस खोट्या असल्याचं म्हटलं आहे. मविआचे नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा तर भाजप महाराष्ट्र पोलीसांचा दुरुपयोग केल्याचा आक्षेप घेतलाय. राजकीय फायदा घेण्यासाठीच हे सारं घडवलं जातंय असा आरोप दोन्हीकडून केला जातोय. पण हे खरंच राजकारणासाठी केलं जातंय की नाही हे कोर्टात ठरणार आहे पण एक मात्र निश्चित की कोणताच नेता-पुढारी धुतल्या तांदळासारखे नाहीत. पोलीस वा केंद्रीय तपास यंत्रणा च्या बहाण्याने मिळेल तितक्या भ्रष्ट अधिकृत करण्याचा प्रयास होताना दिसतंय.

जेव्हा मनमोहनसिंग यांचं सरकार केंद्रात होतं तेव्हा भाजपचे नेतेमंडळी तपास यंत्रणाचा गैरवापर करत असल्याचा आक्षेप घेत असत. अमित शहांना सोहराबुद्दीन एन्काऊंटरमध्ये जेलमध्ये टाकलं होतं. तेव्हा भाजपनं ह्या आरोपांनी आकांडतांडव केलं होतं. गुजरातच्या दंगली संदर्भात मोदींच्या उलटतपासणी दरम्यानही भाजपनेते केंद्र सरकारवर तुटून पडले होते. काळाचा महिमा आणि विधिलिखित कसं असतं ते पहा. आता केंद्रात भाजपची सत्ता आहे आणि विरोधी काँग्रेससह सारेजण केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप गैरवापर करत असल्याचा आक्षेप घेताहेत. आदित्य ठाकरे याला सुशांत-दिशा प्रकरणात गुंतवण्याचा केला गेला होता. केंद्रीय तपास यंत्रणा अभिनेते सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा संबंध असल्याचा धिंडोरा पिटला जात होता. त्यापूर्वी सुशांतची सेक्रेटरी दिशा सालीयन हिच्या मृत्यू प्रकरणातही आदित्यचं नाव जोडण्याचा प्रयत्न झाला होता. सुशांतच्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी दिशाचं रहस्यमयरित्या मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूबाबत तेव्हा अशी चर्चा होती की, सूरज पंचोलीच्या पार्टीत दिशावर सामूहिक बलात्कार झाला होता आणि बलात्कार करणाऱ्या हैवानांनी तिला तसंच टाकून दिलं होतं. पण दिशानं सुशांतला फोनवरून ही घटना सांगितल्याचं या हैवानांना समजलं त्यानंतर ते दिशाच्या घरी गेले आणि तिला वरून फेकून देऊन सारं प्रकरण मिटवून टाकलं. त्या हैवांनानी सुशांतनं तोंड उघडू नये म्हणून त्याला त्रास देत सुरू केलं होतं. दिशा आणि सुशांतचं फोनवरील संभाषण टेप करण्यात आलं होतं म्हणून सुशांतलाही संपवलं होतं अशी चर्चा त्यावेळी होती. सुशांतच्या घरी झालेल्या पार्टीत आदित्य ठाकरे हजर होता अशीही चर्चा करण्यात येत होती. ह्या साऱ्या खोट्या चर्चा होत्या हे सिद्ध झाल्यानं आदित्य ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला नाही. भाजप आमदार नितेश राणे याने पुन्हा एकदा दिशाच्या मृत्यूच्या आदित्यचा संबंध असल्याचा पुन्हा आरोप जेल होता, पण दिशाच्या आईवडिलांनी हे सारं खोटं आहे. आमची बदनामी केली जातेय म्हणून राणे पितापुत्राच्या विरोधात पोलीस तक्रार केल्यानं हे सारं थांबलंय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

Friday 1 April 2022

सानेगुरुजींची साधना...!

"नवं हिंदूवर्ष सुरू झालंय. काल गुढ्या उभारून आपण त्याचं स्वागत केलंय. धर्म जागवणाऱ्या या बाबी आपण मनापासून श्रद्धेनं करतो. ते गरजेचंही आहे. पण आजही सर्वधर्मसमभाव वा धर्मनिरपेक्षता याचं अवडंबर माजवून 'परमेश्वराला रिटायर करा!' असं म्हणणारी माणसं आपल्याला आढळतात. ते एकीकडं आपण सानेगुरुजींचे अनुयायी असल्याचं सांगतात तर दुसरीकडं गुरुजींच्याच 'साधने'तल्या विचारांना हरताळ फासतात. प्रभू रामचंद्राशी मित्र-सखा म्हणून गप्पा मारणारे सानेगुरुजींचे विचार 'साधने'तूनच संपविले जाताहेत. ही आजची शोकांतिका आहे. देशातल्या आणि राज्यातल्या या विचित्र परिस्थितीत गुरुजींचा विचार हा किती मोलाचा आहे याची अनुभूती येईल. यासाठी पुन्हा नव्यानं सानेगुरुजी वाचायला हवेत, अनुभवायला हवेत. अनुकरण करायला हवंय. नववर्षाच्या निमित्तानं हा संकल्प करायला काय हरकत आहे!"
------------------------------------------------

सुचो रूचो ना तुजवीण काही। जड़ो जीव तुझ्याच पायी l
तुझाच लागो मज एक छंद । मुखात गोविंद हरे मुकुंद ll तुझाच लागो मज एक नाद । सरोत सारेच वितंडवाद l
तुझा असो प्रेमळ एक बंध । मुखात गोविंद हरे मुकुंद ll
किती छान आहे नाही हा श्लोक! 'मुखात गोविंद हरे मुकुंद!' हा तुकडा फक्त मी बदललाय. 'तूच माझा मुकुंद' असा बदल करून मी हा श्लोक सारखा घोळतो आहे. हा श्लोक कुणाचा मी शोधायला गेलोच नाही! विनोबांनी सगळ्या संतांच्या काव्यातल्या निवडक उताऱ्यांची पुस्तकं बनवलीत छोटी छोटी. त्यात एखादे वेळी मिळेलही हा श्लोक. पण मी त्या खटाटोपात शिरलोच नाही. एखादा संत वाङ्मयाचा अभ्यासक, आपल्या साळगावकरांसारखा अथवा इनामदारांसारखा हा श्लोक कुणाचा हे सांगू शकेल. पण मी म्हटलं, श्लोक कुणाचा हे कळायलाच हवं असं थोडंच आहे? माझ्या दृष्टीनं हा श्लोक आहे सानेगुरुजींचा! आज मी तुमच्याशी सध्याच्या राजकारणऐवजी थोडं गंभीर बोलायचं ठरवलंय. पुन्हा एकदा मी सानेगुरुजींचं लिखाण वाचतोय, त्यांच्या सार्वजनिक जीवनात डोकावतोय, त्यांना माझ्यापरीनं समजावून घेऊ बघतोय. आज थिल्लरपणा नको. त्यांच्या श्यामच्या आईमध्येच तो श्लोक मला गवसला. असे किती तरी सुंदर श्लोक, वचनं गुरुजींनी सहजपणे वापरली आहेत आपल्या लेखनात. साने गुरुजी ही सद्विचारांची, सद्भावनेची साक्षात मूर्ती होती. गुरुजींना जेव्हा जाणवलं, आपला विचार, आपली भावना आपल्या भोवतीच्या माणसांनासुद्धा उमजू शकत नाही तेव्हा गुरुजींनी आपल्या जीवनालाच पूर्णविराम दिला. गुरुजी गेले आणि मग गुरुजींच्या सद्भावनेवर, सद्विचारांवर आणि गुरुजींच्या स्मृतीवरही गिधाडवृत्तीच्या शहाजोगांचे थवे तुटून पडले असं मला वाटू लागलंय. महात्मा गांधींचा खून गांधीद्वेष्ट्यांनी केला आणि गांधीतत्त्वाचा खून गांधीभक्तांनी केला. त्याचप्रमाणे सानेगुरुजींचीही ससेहोलपट साधनशुचितेच्या गजरात केली जाते आहे. काही वर्षांपूर्वी गुरुजींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं 'मला उमजलेले सानेगुरुजी' दाखवण्याची हौस काही मंडळींना सुचली होती. एका महाविद्यालयात अशाच एका 'उमजलेल्या'चा एक प्रयोग मी बघितला आणि तेव्हा मात्र सानेगुरुजींचा असा छळ या अतिउत्साही रंगरावांनी का मांडलाय असा प्रश्न मला पडला होता. प्रश्न तसे खूपच पडलेत. सानेगुरुजींबद्धल लिहिताना पु. ल. देशपांडे यांनी जे लिहिलं आहे त्याचा प्रामाणिकपणे प्रत्येकानंच विचार करण्याची गरज आहे, असंही मला वाटतंय. सानेगुरुजींना ज्यांनी मानलंच नाही, त्यांची कुचेष्टा करण्यातच ज्यांना आनंद वाटत होता अशांना सोडून द्या, पण जे स्वतःला सानेगुरुजींचे चेले, चाहते वा अनुयायी म्हणवून घेतात त्यांनी तरी पु. ल. देशपांडे यांच्या म्हणण्याचा विचार करायला हवाय. पु. ल. म्हणतात, 'गुरुजींचा जर कोणता दोष असेल तर त्यांना घाऊक तिटकारा करता येत नाही. हा जर दोष मानायचा असेल तर माझं काही म्हणणं नाही. 'राजकारण' या नावाखाली आपल्या बुद्धीशी, संस्कृतीशी, संस्काराशी किंवा आपल्या विचारांशी व्यभिचार चालतात; त्यांना जर आपण गुण मानत असू तर गुरुजींना नाही मानलं तरी चालेल. ढोंगीपणानं गुरुजींना मानू नये. जर मानायचं असेल तर गुरुजींच्या ज्या काही श्रद्धा होत्या त्या मानाव्या लागतील. प्रेमात आणि राजकारणात सगळंच काही चालतं अशा प्रकारची पळवाट काढून जगणार असाल तर तिथं गुरुजींचं नाव घेण्याचा अधिकार आपण गमावला आहे असं स्वच्छ कबूल करा!' पण सानेगुरुजींचा ठेका आपल्याकडं आहे असा ठेका धरणारे अशी कबुली कशी देतील? साने गुरुजी देव मानणारा देवमाणूस होता. आपल्या 'साधना' साप्ताहिकातूनच गुरुजींनी लिहिलं आहे, 'मी माझ्या मनाच्या मित्राशी म्हणजे प्रभू रामचंद्राशी बोलू लागलो. त्याला सांगितलं, देवा, मला कीर्ती नको, पैसा नको, काही नको. Let me be good माझे हे क्षुद्र जीवन, ही अल्प जीवितवेली आपल्या कार्यक्षेत्रात चांगली होवो. ती निर्मळ राहो. ही एकच मनापासून माझी प्रार्थना आहे!' प्रभू रामचंद्राशी मित्र म्हणून संवाद साधणारे गुरुजी कुठे आणि परमेश्वराला रिटायर्ड करायला सांगणारे कुठे? गुरुजींची आई गेल्यानंतर हिंदू धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याबद्धल गुरुजींनीच 'श्यामची आई'मध्ये जे काही लिहिलं आहे ते अंधश्रद्धा निर्मूलनाची कुऱ्हाड चालवणाऱ्या उत्साही मंडळींनी तर अवश्य वाचायला हवं. गुरुजींनी श्यामच्या रुपात म्हटलंय, 'आईच्या पिंडदानाचा दिवस आला. आईच्या पिंडांना कावळा पटकन शिवेल की नाही, तिची काही इच्छा राहिली असेल का, असे विचार माझ्या मनात येत होते. पिंडाला कावळा शिवला नाही तर मृतात्म्याला शांती नाही असं म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काय काय करून कावळ्यांना आमंत्रण दिले... कावळे पिंडाजवळ बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरट्या घालत, स्पर्श करीत ना. मला वाईट वाटू लागले. मी म्हटले, 'आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी वैरागी होणार नाही!' पिंडदानाच्या प्रसंगी कसले रे हे विधी करता! ह्या अंधश्रद्धेनं फक्त भटांचं आणि कावळ्यांचं साधतं, असं म्हणून गुरुजींनी आपले परखड पुरोगामीत्व प्रदर्शित केलं नाही. गुरुजी म्हणत, 'मी माणसांच्या डोक्यात नाही रिघत, त्यांच्या मनात रिघतो!' माणसाचं मन ठोकरून डोकेफोड करणारे ते नव्हतेच! गुरुजींनी 'श्यामची आई'ला स्मृतिश्राद्ध म्हटलंय ही गोष्टही त्यांच्या वारसदारांनी लक्षात हवी.

तुम्ही झोपलाबिपला नाहीत ना? झोपलात तरी चालेल. तुमचं करीन जागरण, झोपेचं घेऊन पहुडलेल्यांची साधना कोण आणि कशी भंगवणार? सानेगुरुजींनी स्वातंत्र मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच आपलं जीवन संपवून टाकलं. महात्मा गांधींच्या विचारावर निष्ठा ठेवून गुरुजींनी आपल्या जीवनाची वाटचाल केली. १९२१ सालापासूनच खादी वापरत, स्वहस्ते सूत कातत. १९३० साली शाळेतली नोकरी सोडून कॉंग्रेस कार्यकर्ते म्हणून सत्याग्रह आंदोलनाच्या प्रचारात सहभागी झाले. त्यांना अटक झाली. १९३६ साली काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनासाठी तर त्यांनी जिवापाड मेहनत केली. गाव गाव, घर घर फिरून त्यांनी काँग्रेस लोकांच्या हृदयात बसवली. त्यांनी 'काँग्रेस' नावाचं साप्ताहिकही काढलं होतं. महात्मा गांधीचे विचार लक्षात न घेता देशाची फाळणी झाली, स्वातंत्र्य आले, त्याबरोबरच दंगली आणि कत्तली यांचा हलकल्लोळ उठला. गुरुजींनी याच सुमारास काँग्रेस सोडली. ते समाजवादी पक्षाचे काम करू लागले. त्यासाठीच त्यांनी 'साधना' साप्ताहिक सुरू केलं. म्हणजे सानेगुरुजींनी व्यक्त केलेले राजकीय आणि सामाजिक विचार प्रामुख्यानं स्वातंत्र्यपूर्व काळातील वा स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या दोन-अडीच वर्षातील सामाजिक, राजकीय परिस्थितीच्या अवलोकनातून अभ्यासातून बनलेले आहेत ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. आज सर्वच पक्षाच्या बनेल राजकारण्यांनी आणि मतलबी मस्तवालांनी जो सर्वधर्मसमभावाचा आव आणला आहे तो गुरुजींनी मानला असता, असं मला वाटत नाही. अल्पसंख्याक म्हणून आज आपले वेगळे अस्तित्व पुढे रेटत प्रत्येक गोष्टीत जो आडमुठेपणा केला जातो आहे तोही गुरुजींनी कधी खपवून घेतला असता, असंही मला वाटत नाही. समाजाला शिकवण्यासाठी, प्रसंगी महात्मा गांधींच्या म्हणण्याचाही आदरपूर्वक अस्वीकार करून प्राण पणाला लावण्याएवढा कणखर निर्धार गुरुजींनी दाखवला होता. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली या देशातल्या बहुजनांवर कुरघोडी करण्याचे मतलबी राजकारण खेळणाऱ्यांना गुरुजींनी साथ दिली नसती. गुरुजींना भारतीय राष्ट्रीयतेला आकार देण्यासाठी जातीधर्म निरपेक्ष वातावरण या देशात हवं होतं. हा देश नाना भेदांनी खिळखिळा करण्यासाठी होत असलेला धर्मनिरपेक्षतेचा वापर गुरुजींनी धिक्कारलाच असता, नव्हे त्यासाठी संघर्षही मांडला असता. गुरुजींनी 'साधना'तूनच एका प्रसंगी म्हटलंय, 'मानवतेला घरून कायदे करताना कोणत्याही धर्माला आड येऊ देता कामा नये. भारतात स्त्रियांना स्वातंत्र्य हवे. हिंदू भगिनींचे आणि मुस्लिम भगिनींचे घुंगट जायला हवेत. मुसलमानांनीही एकापेक्षा अधिक बायका करू नयेत. ते म्हणतील, आमच्या धर्माला हात घालता? तर त्यांना नम्रपणे सांगावं की, कृपा करून पाकिस्तानात जा. अरबस्तानात स्त्रियांची संख्या अधिक होती म्हणून पैगंबरांनी तशी सूट दिली. हे कायदे त्रिकालाबाधित नसतात. मानव्याची विटंबना नाही होता कामा नये. भारतातली स्त्री, मग ती कोणत्याही धर्माची असो, तिला आपण मुक्त झालो असं वाटलं पाहिजे. हिंदू कोड बिल, मुस्लिम कोड बिल असं न करता, सर्वांना बंधनकारक असा मानवतेचा कायदा करा!' सर्वधर्मसमभावाचा गजर करत अल्पसंख्याक म्हणून आपली आडमुठी घोडी पुढे दामटणाऱ्यांना अलगपणाची भावना ठेवणं ही राष्ट्राशी, मानवतेशी प्रतारणा आहे असं गुरुजींनी बजावलं असतं. धर्मासंबंधात नाके मुरडण्याची सवय आमच्या सर्वधर्मसमभावींना लागलीय, पण धर्म हे कर्म सुधारण्याचं सर्वात प्रभावी हत्यार आहे. धर्मामुळेच माणसात माणूसपण जागवता येतं. गुरुजींना याची शिकवण त्यांच्या आईकडून मिळाली होती. कोकणात दापोलीला शाळेसाठी गुरुजी काही दिवस राहात होते. तिथं त्यांनी डोक्यावर केस वाढवले होते. त्या काळात मुलांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी असे केस राखणं वडीलधाऱ्यांना मान्य नव्हतं. गुरुजी सुट्टीत घरी आले. त्यांच्या डोक्यावरचे केस बघून वडील रागावले. त्यांनी डोकं तासडून घेण्याचा आदेश दिला. गुरुजी रागावले. आईनं त्यांना विचारलं, 'आई-बापाना बरं वाटावं म्हणून हजामत करण्यासही तू तयार नसावेस. आई-बापांच्या धर्मभावना दुखविल्या जाऊ नयेत म्हणून इतकंही तू करू नयेस का?' त्यावर गुरुजींनी म्हटलं, 'केसात कसला ग आहे धर्म?' आई म्हणाली, 'धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. काय खावं, काय प्यावं यातही धर्म आहे. केस तरी तू का रे ठेवतोस? मोहच तो. मोह सोडणं म्हणजे धर्म!' आणि मग गुरुजी श्यामच्या आईची कथा ऐकणाऱ्या आपल्या साथींना म्हणतात, 'मित्रानो! माझ्या आईला त्यावेळेस मला नीट पटवून सांगता आलं नसेल; परंतु आज मला सारं कळतं आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म आहे. प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करणं, सत्य, हित आणि मंगल यासाठी करणं म्हणजेच धर्म. बोलणं, चालणं, बसणं, उठणं, ऐकणं, देखणं, खाणं, पिणं, झोपणं, न्हाणं, धुणं, लेणं, सर्वात धर्म आहे. धर्म म्हणजे हवा, धर्म म्हणजे प्रकाश. आपल्या जीवासी धर्माची हवा कुठंही गेली तरी हवी!' मला वाटतं, गुरुजींचं 'श्यामची आई' या सगळ्या निधर्मी सज्जनांनी वाचायला हवी. अगदी रोजच्या रोज!

सानेगुरुजी पुन्हा नव्याने समजून घ्यावेत एवढे खरंच महत्वाचे आहेत का? राजकीय संघटना आणि राजकीय विचारप्रणाली यांच्या भूमिका आणि दृष्टीकोन यातला साचेबद्धपणा ओलांडून समाज समजून घेण्याची सानेगुरुजी आठवण आहेत. राजकीय संघटनेचा कार्यकर्ता होणे म्हणजे आपल्या सत्सदविवेकबुद्धीशी फारकत घेणं नव्हे, आपल्या प्रश्न विचारण्याच्या अधिकारावर पाणी सोडणं नव्हे, आपल्याला उमगलेल्या सत्याला बाजूला सारणं नव्हे ही आठवण सानेगुरुजींची राजकीय कारकीर्द करून देते. राजकीय निष्ठा किंवा बांधीलकी सर्वंकष असू शकत नाही, असता कामा नये याचा परिपाठ सानेगुरुजींच्या आयुष्यात दिसतो. सानेगुरुजी राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते, कॉंग्रेसचे सदस्य होते मात्र १९३६ मध्ये स्थापन झालेल्या प्रांतिक स्तरावरील कॉंग्रेस सरकारच्या शेतकरी आणि कामगारविषयक धोरणांची कठोर समीक्षा करताना त्यांनी कच खाल्ली नाही. राष्ट्रीय प्रश्नांवर एकमत व्हावं यासाठी सामाजिक समता आणि सामाजिक न्याय यांना दुय्यमत्व देणं त्यांना मान्य नव्हतं. शेतकरी कामगारांच्या लढ्यात ते कम्युनिस्टांच्या सोबत होते मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी पूरक भूमिकेपेक्षा रशियाधार्जिणी भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी भारतीय कम्युनिस्टांवर जोरदार टीका केली. ते समाजवाद्यांचे साथी होते मात्र धर्माविषयीच्या त्यांच्या जाणीवांवर रामकृष्ण परमहंस यांच्या दृष्टीचा प्रभाव होता. धर्म म्हणजे काय हे समजून न घेता तो नाकारणं त्यांना मान्य नव्हतं. ते भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्म यांच्या जीवनदृष्टीचे निस्सीम चाहते होते मात्र हिंदू म्हणून जन्माला आल्यानं आपोआप ती दृष्टी आत्मसात होते आणि आपोआप आपण महान होतो हा भ्रम ते नाकारत होते. हिंदू धर्मातली उदारता प्रकट करण्यासाठी आपल्याला आपला व्यवहार आमूलाग्र बदलावा लागेल याची ते वारंवार आठवण करून देत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल त्यांना आदर होता आणि त्याचवेळी या कार्याला पूरक आणि तरीही वेगळ्या भूमिका घेताना त्यांनी संकोच बाळगला नाही. महात्मा गांधींच्या विचारांचे ते पाईक होते मात्र महात्मा गांधींच्या राजकीय निर्णयांचे आज्ञापालन करण्याऐवजी स्वतःचा ‘आतला आवाज’ ऐकत गांधींच्या सूचनांचा आज्ञाभंग करणं त्यांनी अधिक रास्त मानलं. विचारप्रणालीनं आखून दिलेल्या शिस्तीच्या बाहेर विचार करण्याचं धारिष्ट्य सानेगुरुजींनी वारंवार दाखवलं. आजच्या भाषेत सांगायचं तर ‘आऊट ऑफ बॉक्स’ ‘इनोव्हेटिव्ह’ थिंकिंग करण्याची प्रचंड उर्जा सानेगुरुजींकडे होती. अशा प्रकारच्या चिंतनातून निर्माण होणारे प्रश्न विचारण्याची निर्भयताही त्यांच्याकडे होती. असे अडचणीचे प्रश्न विचारणारे सानेगुरुजी आणि त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न त्यांच्या समकालीनांना भाबडे वाटले. सानेगुरुजींना राजकारणातलं काही कळत नाही असं त्यांनी ठरवलं आणि सानेगुरुजींनीही ते मान्य केलं. त्यांच्या आयुष्याच्या शेवटी शेवटी त्यांनी लिहिलेल्या पत्रात ‘पॉलिसी, थिअरी, लाईन काय आहे माझ्याकडं?’ हा विषादाचा स्वर सातत्यानं उमटताना दिसतो. यातला दुःखाचा भाग असा की आजही आपल्याला सानेगुरुजींचे मूल्यमापन करताना आपण स्वीकारलेल्या चौकटीला तपासून पहावंसं वाटत नाही. आपली विचारांची चौकट, आपली राजकीय विचारधारा, आपल्याला समजलेलं सत्य परिपूर्ण आहे यावर आपल्या सर्वांचा आत्यंतिक आणि ठाम विश्वास आहे. त्यामुळे सानेगुरुजींच्या नेणीवेत आपल्याला ब्राह्मण्य दिसतं, त्यांच्या धर्मविषयक जाणिवांत आपल्याला छुपं हिंदुत्व दिसतात. सत्यापेक्षा विचारप्रणालीशी प्रामाणिक रहाण्याचा आपला अट्टाहास एवढा आहे की सानेगुरुजी किंवा त्यांच्यासारख्या ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करणाऱ्या व्यक्तीचे मुद्दे गांभीर्यानं घेण्यापेक्षा ‘तिचे वैचारिक गोंधळ आहेत’ असा निवाडा करणं आपल्याला अधिक प्रशस्त वाटतं. अशा प्रकारची शेरेबाजी न करता आणि त्याचवेळी स्वतःच्या भावना दुखावून न घेता चिकित्सकपणे सानेगुरुजींकडं आणि खरंतर आपल्या सगळ्याच भूतकाळाकडं बघण्याची गरज आहे.
हरीश केंची,
९४२२३१०६०९

आपलं ठेवायचं झाकून......!

"एकचालुकानुवर्तीत पक्ष आणि सत्ताधारी असं रूप 'लोकशाहीची जननी' म्हणवणाऱ्या देशात आकाराला येतंय. सामूहिक नेतृत्वाची प...