Saturday 16 April 2022

मनसे नव्हे जणू प्रतिशिवसेनाच...!

"महाराष्ट्र धर्माचा जागर करीत मराठी भाषा, संस्कृती, आणि मराठी माणसासाठी महाराष्ट्र! असं डांगोरा पिटत आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता आपल्यात आमूलाग्र बदल केलाय. झेंड्यातले विविध रंग ही मनसेची ओळख होती ती त्यांनी पुसून टाकलीय. सारे रंग त्यातून हरवलेत. उरलाय केवळ भगवा रंग. विचार, धोरणं, आंदोलनं, कार्यपद्धती बदलत; प्रबोधनकार आणि डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा हटवत आज त्यांनी पूर्णत्वानं शिवसेनेचा अवतार स्वीकारलाय. तो तसा पूर्वी होताच पण ती एक सावली, पडछाया वा कॉपी अशी होती. आता मात्र शिवसेनाप्रमुखांची शाल आणि शैली राजनं परिधान केलीय. काँग्रेसी सत्तासाथीमुळं शिवसेनेला काही मर्यादा आल्यात हे हेरून मनसेनं त्या स्वतःमध्ये अंगिकारल्यात. भोंग्याला विरोध त्यातूनच आलाय. आता ती मनसे नव्हे जणू प्रतिशिवसेना झालीय. मनसैनिकांबरोबरच शिवसैनिकांनाही आपल्याकडं आकृष्ट करण्याचा हा राज ठाकरे यांचा प्रयत्न दिसतोय!"
-----------------------------------------------------------

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात केलेल्या भाषणानंतर कधीकाळी त्यांच्या समर्थनात असणाऱ्या राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टीका सुरू झालीय. राज ठाकरे यांनी नव्यानं घेतलेल्या राजकीय भूमिकेमुळं इतर पक्षांचाही गोंधळ होत असल्याचं दिसून येतंय. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राज यांच्या भूमिकेचं काँग्रेस, राष्ट्रवादीकडून स्वागत करण्यात येत होतं. तर, भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात आलं होतं. राज यांनी नव्यानं घेतलेल्या भूमिकेवर आता उलट चित्र आहे. भाजपकडून राज यांच्या भूमिकेचं स्वागत होत असताना महाविकास आघाडीकडून आणि त्यांच्या समर्थकांकडून राज यांच्यावर टीका होतेय. राज यांनी मशिदीवरच्या भोंग्याचा वाद काढण्याऐवजी महागाई, इंधन दरावरून केंद्रावर टीका करायला हवी होती, असं मविआच्या गोटातून बोललं जातंय. राज यांनी केलेल्या भाषणात एकही शब्द भाजपविरोधात नव्हता. तीन वर्षापूर्वी राज यांच्या प्रेमात असणारे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते सध्या त्यांच्या विरोधात उभे दिसताहेत. मनसेच्या स्थापनेवेळी मराठी माणूस, मराठी अस्मिता, भूमीपुत्रांना न्याय आदी भूमिका राज यांनी मांडल्या होत्या. सुरुवातीच्या काळात पक्षाची लक्षणीय कामगिरी दिसून आली. मनसे स्थापनेनंतर झालेल्या २००९ च्या लोकसभा  निवडणुकीत मनसेनं लक्षणीय मतं घेतली होती. परिणामी मुंबईत शिवसेनेला मोठा फटका बसला होता. तर, विधानसभा निवडणुकीत मनसेचे १३ आमदार निवडून आले. आणि मुंबई महापालिकेत २७ नगरसेवक तर पुण्यात २९ नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये बहुमत मिळवत सत्ता ताब्यात घेतली. या दरम्यानच्या काळात राज यांच्या निशाण्यावर शिवसेना-भाजप युती, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस होती. मात्र, त्यानंतरच्या काळात मनसेला धक्का बसला. नाशिकची सत्ता गेली. नाशिकबरोबरच मुंबई, ठाणे, पुणे इथल्या नगरसेवकांची संख्या घटली. केवळ १ आमदार निवडून आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले. त्यावेळी त्यांनी मनसेचे खासदार नरेंद्र मोदीना पाठींबा देतील असं म्हटलं होतं. मात्र, पाच वर्षानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी प्रधानमंत्री मोदींच्या सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज यांनी एकही उमेदवार उभा न करता भाजपविरोधात प्रचार सभा घेतल्या. प्रधानमंत्री मोदी यांची आश्वासनं आणि त्यातली तफावत दाखवत भाजपविरोधात प्रचाराची राळ उडवली होती. याच दरम्यान त्यांनी व्यंगचित्राची मालिकाही सुरू केली होती. राज यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सल्लामसलत करत या प्रचारसभा घेतल्याचा आरोप भाजपच्या गोटातून करण्यात आला होता. राज यांनी भाजपविरोधाची सुपारी घेतलीय, त्यांच्या भाषणाची स्क्रिप्ट बारामतीतून लिहिली गेली असल्याच्या आशयाचं वक्तव्य तत्कालीन मुख्यमंत्री फडवणीस यांनी केली होती. शिवसेनेनं भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेनं हिंदुत्व सोडल्याची टीका भाजपकडून करण्यात येऊ लागली. त्यानंतर राज यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमा राज यांनी हायजॅक केली. ही भूमिका भाजपपूरक असल्याची टीका राजवर होऊ लागलीय. 

महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सज्ज झालीय. पूर्वी शिवसेनेलाही मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाचा मुलामा चढवला तेव्हाच त्यांना यशाचा गड सर करता आला होता. अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवत मनसेनं आज हिंदुत्व स्वीकारलंय. हा केवळ योगायोग नव्हे तर त्यामागं व्यूहरचना दिसतेय. बाळासाहेबांचा वारसा मानली जाणारी शिवसेना त्यांच्याच विचारापासून कशी दूर गेलीय, हे सांगतानाच मनसे हीच खरी त्यांच्या विचारांची वारसदार आहे, हे या यानिमित्तानं राज ठाकरे यांना अधोरेखित करायचंय. बाळासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उभी केली, अगदी त्याप्रमाणेच शिवछत्रपतींना अभिप्रेत हिंदुत्व हीच राज ठाकरे यांची संकल्पना आहे. सर्व जातीधर्माच्या शिलेदारांना सोबत घेऊन 'हिंदवी स्वराज्या'ची भगवी पताका फडकावण्याचा त्यांचा इरादा दिसतोय. कधीकाळी सावरकरांच्या नावावर राजकारण करणारी शिवसेना सत्तेत आल्यानंतर या मुद्द्यावर त्यांनी घेतलेली भूमिका सर्वांनाच धक्का देणारी होती. नागरिकत्व सुधारणा कायदा-सीएए आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदवही-एनआरसी यावरही शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सुरात सूर मिळवलेत. बांगलादेशी मुस्लिमांना या देशातून हाकललं पाहिजे, ही शिवसेनेची कधीकाळची मागणी आज इतिहासजमा झाल्याचं पाहायला मिळतेय. सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात शिवसेनेला आपल्या हिंदुत्वाच्या मूळ मुद्द्यालाच बगल द्यावी लागतेय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा त्यासाठी त्यांच्यावर दबाव दिसतोय. त्यातून हिंदुत्वाचं आक्रमकपणे प्रतिनिधित्व करणारी संघटना ही स्वत:ची ओळखच शिवसेना गमावून बसेल, हे राज ठाकरे यांनी पुरतं ओळखलंय. पण केवळ हिंदुत्व पक्षाला नवी उभारी देऊ शकेल का? हा खरा प्रश्न आहे! मनसेला हिंदुत्वाची कास धरल्यानं भोंग्यांना विरोध आणि भाजपची भलामण या मुद्द्यांवर समर्थनाची भूमिका घ्यावी लागलीय. यातून भाजप आणि मनसे नैसर्गिकरीत्या जवळ येतीलही. मनसेला नसली तरी भाजपला महाराष्ट्रात मित्रपक्षाची गरज आहे. भाजपची 'हिंदुत्व विचारसरणी' असली तरी त्यात आक्रमकपणा नाही. आतापर्यंत शिवसेनेला पुढं करीत त्यांनी आपला आक्रमक हिंदुत्वाचा अजेंडा राबवलाय. मनसे कदाचित आता त्यांची ती अपेक्षा पूर्ण करू शकेल, असं त्यांना वाटतं. हिंदुत्व अंगिकारल्यास मनसेला जवळ घेण्याचा भाजपचा निश्चितच प्रयत्न राहील. राज ठाकरे एक फायरब्रॅण्ड नेते आहेत. जीव ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी त्यांच्याकडं आहे. तरुणाईत 'हिंदवी स्वराज्या'चं स्फुलिंग फुलवणाऱ्या नेत्याची भाजपला गरज आहे. विरोधकांना त्याच भाषेत उत्तर देणारी आक्रमक संघटना भाजपला मित्र म्हणून हवीय. त्यामुळं भाजप मनसेसाठी पायघड्या घालील. राज यांना भाजपसोबतची आपली भूमिका ठरवताना मात्र तारेवरची कसरत करावी लागणार आहे. गेली काही वर्षे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या धोरणांना 'लाव रे तो व्हिडीओ'नं टोकाचा विरोध केलाय, व्यंगचित्रं रेखाटलीत. त्यावर लोकांचं समाधान करण्याचं मोठं आव्हान त्यांच्यासमोर असणारंय. राज ठाकरे या सर्वातून कसा सुवर्णमध्य साधतात हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं गेल्या १६ वर्षांत अनेक स्थित्यंतरं अनुभवली. यशापयशाचा अनुभव घेतलाय. प्रारंभी मराठीच्या मुद्द्यावर त्यांना मिळालेलं यश राजकीय पक्षांना हेवा वाटावं असंच होतं. आपल्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत २००९ मध्ये १३ आमदार निवडून आणण्याची किमया त्यांनी साधली होती. अर्थात या यशाचे मानकरी एकटे राज ठाकरे होते. महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात त्यांच्या निमित्तानं एका सक्षम नेतृवाचं पदार्पण झालं होतं. राज यांच्या झंझावाती नेतृत्वानं मुंबई, ठाणं, पुणं, नाशिक इथं अक्षरश: वादळ निर्माण केलं होतं. कुणाचाही मुलाहिजा न ठेवणाऱ्या त्यांच्या वक्तृत्वानं तरुणाईला वेडं केलं होतं. 'मराठी हृदयसम्राट' अशी उपाधी दिली गेली. त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर केलेली आंदोलनंही लक्षवेधक ठरली. टोल आंदोलन त्यापैकीच एक, पण मनसेचं हे यश औटघटकेचं ठरलं. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत २०१४ आणि २०१९ मध्ये दोन्हीवेळेला मनसेचा अवघा एक आमदार निवडून आला. नरेंद्र मोदी यांच्या लाटेत काँग्रेस, राष्ट्रवादीप्रमाणे मनसेचीही वाताहत झाली. एकटी शिवसेना आपलं अस्तित्व दाखवू शकली. नरेंद्र मोदी यांच्या रूपानं देशभर हिंदुत्वाचा माहोल पसरला होता. त्यात राज यांचा मराठीचा-प्रादेशिकवादाचा मुद्दा नकळत मागं पडला. शिवसेना त्यावेळी भाजपाविरोधात लढली खरी, पण त्यांना हिंदुत्वानंच तारलं हे नाकारता येणार नाही. याच मुद्द्यावर भाजपा आणि शिवसेनेनं नंतर एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. मनसे मात्र या पराभवानंतर दिशाहीन झाली. मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख वाढतच गेला, त्यांची एकाधिकारशाही वाढत गेली. नोटबंदीच्या निर्णयानंतर तर कधी काळी मोदींचे प्रशंसक असणारे राज ठाकरे त्यांचे कट्टर विरोधक बनले. राज यांनी संधी मिळेल तिथं मोदींवर तोंडसुख घेतलं. पुढं तर राज यांचं राजकारण मोदी विरोधावर केंद्रित झालं. मोदींच्या निर्णयाचे राज यांनी जाहीररीत्या वाभाडेही काढले. लोकसभा निवडणुकीत तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मोदींविरोधात प्रचाराचं रान उठवलं, पण मोदींच्या लोकप्रियतेवर ओरखडादेखील उमटला नाही. मोदींविरोधी मतांचं ध्रुवीकरण होईल, असं वाटलं होतं. लोकसभेत मनसेनं उमेदवार उभे केले नव्हते, मात्र विधानसभेत त्यांना एका आमदाराच्या पुढे यश मिळालं नाही. मोदींविरोधी राज यांची चाल अयशस्वी ठरली. हे खरं असलं तरी राज यांच्या नेतृत्वाची जादू तसूभरही कमी झाली नाही. आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा दबदबा कायम आहे. एका हाकेनं लाखोंचा जनसमुदाय एकत्र आणण्याची किमया, ताकद त्यांच्यात आहे. परंतु पक्ष म्हणून मनसेच्या मागील १६ वर्षाच्या वाटचालीवर दृष्टिक्षेप टाकला तर सत्तेच्या सारीपाटावर त्यांच्या पक्षाचे अस्तित्व शून्य आहे, हे त्यांनाही मान्य करावं लागेल. आपल्या पक्षाला उभारी देत त्याचं नव्यानं अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आज एक पाऊल पुढे टाकलं आहे. आपल्या विचारांना नवी दिशा देत पक्षाची कक्षा रुंदावत आहेत. अर्थात महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या नव्या समीकरणानं त्यांना ही संधी दिलीय. भाजपची साथ सोडून शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसारख्या धर्मनिरपेक्ष पक्षांच्या साथीला सामील झालीय. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असा एकमेकांवर उभा असलेला हा सत्तेचा डोलारा टिकवण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आपल्या विचारांशी ठाम आहेत. शिवसेनेलाच आपल्या तत्त्वांना मुरड घालावी लागत आहे. हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे एक ना अनेक मुद्दे शिवसेनेला बासनात गुंडाळून ठेवावं लागताहेत. शिवसेनेची ही राजकीय अगतिकता एक संधी असल्याचं जाणवल्यानं राज यांनी शिवसेनेचेच ध्येय धोरण स्वीकारून आवेशानं पुढं सरसावलेत! आणि मशिदीवरील भोंग्यांना विरोध केलाय. भाजपनं त्याचं स्वागत केलंय.

राज ठाकरे यांच्या हातात हात घालून महाराष्ट्रातलं सामाजिक स्वास्थ्य जेवढं म्हणून बिघडवता येईल तेवढं बिघडवण्याचा विडा फडणवीस यांनी उचललेला आहे असं दिसतं. हातातला सत्तेचा घास हिरावल्यामुळं आलेलं नैराश्य अडीच वर्षांनंतरही फडणवीस झटकू शकलेले नाहीत. जे फडणवीस यांचं तेच राज ठाकरे यांचं आहे. राज यांना ज्यांच्याशी स्पर्धा वाटते ते उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचं व्यक्तिमत्त्व राज यांच्यासारखे करारी, आक्रमक आणि लोकांना आकर्षित करणारं नसलं तरीही त्यांच्या पक्षाचे अनेक आमदार, खासदार निवडून येतात. आपल्या सभांना हजारोंची गर्दी जमते, टीआरपी असलेले आपण एकटेच नेते असल्यामुळे माध्यमे लाईव्ह कव्हरेज देतात तरीसुद्धा दुस-यांच्या सुपा-या वाजवाव्या लागतात, ही खंत राज ठाकरे यांना असावी. असे हे दोन वैफल्यग्रस्त नेते एकत्र येऊन महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवायला निघालेत. त्याचबरोबर त्यांना माहीत आहे की, शरद पवार हा या सरकारचा आधार आहे. सरकार खिळखिळे करायचं असेल तर शरद पवार यांच्यावर आघात करायला पाहिजे. त्याचमुळं एका निश्चित रणनीतीनुसार दोघांनीही शरद पवार यांना लक्ष्य केलंय. राज ठाकरे यांचं समजू शकतं, त्यांची समज मर्यादितच आहे. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद पाच वर्षे भूषवलेला माणूस एवढा धर्मवेडा आणि अल्पसंख्यांकांचा द्वेष करणारा असू शकतो, यासारखं महाराष्ट्राचं दुर्दैव असू शकत नाही. खरंतर सत्तेवाचून बेचैन झालेले फडणवीस सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा आटोकाट प्रयत्न करताहेत. पहिल्या टप्प्यात त्यांनी ओबीसी समाजघटकांना शिवसेना आणि पवार यांच्याविरोधात सोडून पाहिलं. त्यानं काही फरक पडत नाही म्हटल्यावर राज ठाकरे यांना हाताशी धरलंय. यानंतरच्या टप्यात ते असदुद्दीन ओवेसींना सोबत घेतील आणि महाराष्ट्रात धार्मिक सलोखा बिघडवण्याचा डर्टी गेम खेळू शकतील. मुंबई आणि इतर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सुरू आहे. राज यांना काही मिळविण्यासाठी तर फडणवीस यांना शिवसेनेला खेचण्यासाठी हा सारा डर्टी गेमचा खेळ उभा केला गेलाय!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...