Saturday 2 October 2021

विस्कटलेले विरोधक, द्विचालुकानुवर्तीत सत्ता...!

"आज मोदी-शहा जे सर्वच बाबतीत वागतायत, ते देशाचं राजकारण नाही, तर ती केवळ त्यांची व्यापारी वृत्ती आहे. राजकारणाचा त्यांनी निखळ व्यापार करून ठेवलाय. त्यांचा प्रत्येक मुद्दा हा स्वार्थी धंदेवाईक आहे आणि केवळ स्वतःच्या लाभाचा आहे. याच्यात जनतेची अनेक प्रकारे होरपळ होतेय. अर्थात याची त्या दोघांना पर्वा नाही. म्हणजे एका अर्थानं काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे मोदी-शहाही सरंजामदार होऊन बसलेले आहेत. अशा राजकारणाचा शेवट काय होतो? तर जनता जागृत होत या राजकारणाला विरोध सुरू करते. तसा जनतेनं तो सुरू केलेला आहे. काँग्रेसच्या सरंजामदारांना जसं जनतेनं जमिनीवर आणलं, तसंच मोदी-शहाचंही जनता करेल. सरंजामदार नुसत्या जनतेच्या विरोधानं संपत नाही, तर स्वतःच्या विचित्र कर्तुकीनंही स्वतःला संपवत जातो, तसं मोदी-शहाचंही होणार आहे. आजवरचा जगातल्या कोणत्याही संघर्षाचा इतिहास बघा, प्रत्येक संघर्षाच्या शेवटी, मग तो लघू असो की दीर्घ, छोटा असो की मोठा शेवटी मानवी संवेदनशीलता आणि मानवी करुणाच जिंकलेली दिसते. याही वेळी वेळ लागला तरी तीच जिंकेल...!"
---------------------------------------------------

*आ* जवर काँग्रेसचं एक वैशिष्ट्य आहे. काँग्रेसमध्ये माणसं मोठी व्हायला येतात, होतातही, पण काँग्रेसला मोठं करायचं विसरतात. काँग्रेस वाढवण्याची जबाबदारी त्यांनी गांधी, नेहरू, गांधी यांच्यावर सोपवलेली असते. माणूस काँग्रेसमध्ये गेला की, तो नेता होतो, कार्यकर्ता राहत नाही. पक्षाची सर्वत्र लागण करणं, पक्षाचा प्रचार-प्रसार करणं, नवी नवी माणसं काँग्रेसशी जोडून घेणं, ही जबाबदारी आपली आहे, असं तो समजतच नाही. महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि मग गांधी घराणं पक्ष वाढवील आणि आपण आयतं सरंजामदार होऊन सत्ता अनुभवायला जाऊ, अशी वाईट सवय काँग्रेसच्या प्रत्येक माणसाला लागलेली आहे. माणूस एकदा काँग्रेसमध्ये गेला आणि कुठल्या पदावर बसला की, त्याची जनतेशी नाळ तुटते. तो पक्षाशी नवी नवी माणसं जोडायचं काम करायचं विसरतो आणि आपण राज्यकर्ते आहोत, अशा थाटात वावरू लागतो. खरंतर याच लोकांनी काँग्रेस बुडवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे-आरएसएसचे लोक पूर्वी वेगवेगळ्या पक्षांत असायचे, तसे आजही आहेत. त्यांचा स्वतःचा जनसंघ नावाचा पक्षही होता. १९७० साली रा.स्व.संघानं ठरवलं, आपला स्वतःचा पक्ष मोठा करूया. त्यांनी एकाच वेळी त्यासाठी पक्ष वाढविण्याचे अनेक मार्ग अनुसरले. १९८० येता येता त्यांनी भारतीय जनता पक्ष उभा केला. मुख्यतः त्यांनी कार्यकर्ते उभे करायला सुरुवात केली. त्यांना वेगवेगळी कामं आणि कार्यक्रम दिले. राममंदिर-बाबरी मशीद, शहाबानो तलाक केस, पाकिस्तान, मुसलमान, कश्मीरचं ३७० कलम अशी मांडणी दिली. काँग्रेसच्या जातीय राजकारणात मागं पडलेला इतर मागासवर्गीय लोकगट भाजपेयींनी हाताशी धरला. व्यापारी हाताशी धरले. मुस्लिम गठ्ठामतं या देशात कधीच नव्हती. त्याचा पुरावा १९५२ पासून भारतात झालेल्या केंद्र आणि सर्व राज्य निवडणुका देतील. पण त्यांनी मुस्लिम गठ्ठामतं हा मुद्दा कायम प्रचारात ठेवून तापत ठेवला आणि हिंदू गठ्ठामतं तयार केली. पक्ष वाढवण्याचे अनेक प्रयोग केले. साम, दाम, दंड, भेद हे सर्व प्रकार समान लक्ष देऊन अंमलात आणले. नेते, कार्यकर्ते आणि जनता या तिघांना तयार केलं आणि कायम ताब्यात ठेवलं. आज ते कसं का होईना, यशस्वी आहेत. आज काँग्रेसकडं नेते आहेत, पण कार्यकर्तेच नाहीत. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांच्या खांद्यावर पक्ष वाढवण्याची जबाबदारी आहे. पण ते सर्व लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि ते शक्यही नाही. महात्मा गांधींना जसा स्वातंत्र्य मिळवण्याचा कार्यक्रम उपलब्ध होता, तसा एखादा व्यापक कार्यक्रमही त्यांच्याकडं नाही. आता त्यांना तो मिळालाय, मोदी-शहा यांना हटवण्याचा! पण मुळात त्यांनी तो सुरू केलेला नाही, तर सोशल मिडियावर असलेल्या आणि कोणत्याही पक्षाच्या नसलेल्या लोकांनी सुरू केलाय. या कार्यक्रमात त्यांच्या पक्षाचे चारदोन लोक सोडले तर इतर नेतेही धड सामील नाहीत. काँग्रेसच्या युतीत असलेले जे प्रादेशिक पक्ष आहेत, तेही या कार्यक्रमात सामील नाहीत. प्रादेशिक पक्ष हे सत्तेचा धंदा करायला आलेले लोक आहेत आणि ते भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही डगरींवर पाय देऊन उभे आहेत. जिकडं घुगऱ्या तिकडं उदे उदे असा त्यांचा खेळ आहे.

भ्रष्टाचारी, सरंजामशाहीवादी, दुबळे, निष्प्राण, नाउमेद, दुर्लक्षित, कंटाळा करणारे, आरंभशूर आणि सुरुवात करण्याची तसेच स्पर्धा करण्याची क्षमता नसणारे. सत्तारूढ भाजपेयींसमोर एकत्रितपणे उभ्या ठाकलेल्या विरोधीपक्षांना ही अशी अनेक विशेषणे लागू पडतात. भारतातल्या लोकशाही प्रक्रियेत काम करण्यास गांधी कुटुंबाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष वेगानं अप्रस्तुत ठरू लागलाय. देशात सर्वत्र अस्तित्वात असलेला पक्ष म्हणून काँग्रेस किमान स्वतःची ओळख तरी सांगू शकतो. भाजपेयींच्या विरोधातील अन्य पक्षांची ताकद तर केवळ त्या त्या राज्यापुरती मर्यादित आहे. कधी कधी तर केवळ काही सामाजिक गटांपुरतीच या विरोधीपक्षांची ताकद आहे. हे सारे छोटे पक्ष एक तर कोणत्या ना कोणत्या हुकूमशाही नेत्याच्या ताब्यात आहेत किंवा प्रचंड भ्रष्ट तरी आहेत. कधी कधी दोन्हीही एकत्र पहायला मिळतं. त्यामुळं येत्या काही वर्षांत तरी भाजपेयींपुढं तुल्यबळ आव्हान निर्माण होण्याची शक्यता कमी आहे. दयनीय विरोधक असणं याचा अर्थ पुढची निवडणूकदेखील भाजपेयीं सहज जिंकेल असाच होतो. पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपेयींचा प्रभाव फारसा वाढलेला नाही. कर्नाटकमध्ये भाजपेयींना पुन्हा सत्ता मिळण्याची पन्नास टक्के तरी संधी आहे. निवडणुकीचा विचार केल्यास देशाच्या बहुतांश भागात भाजपेयीं प्रभावी ठरतील आणि त्यांचा प्रभाव आणखी वाढतच जाणार आहे. पुढील काही दशकं भाजपेयीं अनेक राज्यांत आणि केंद्रात सत्ता मिळविल. त्यानंतर भारतीय समाज आणि राजकारणाला स्वतःच्या प्रतिमेभोवती वेढण्याचं भाजपेयींचं लक्ष्य असेल. सध्या भाजपला या स्थितीत पोहोचविण्याचं श्रेय दोन व्यक्ती म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना द्यावं लागतं. या नव्या प्रतिमाबांधणीत हे दोन नेतेच आघाडीवर असतील.भाजपेयींच्या राजकीय प्रभावाचा तसंच भाजपमधील मोदी-शहा यांच्या वैयक्तिक प्रभावाचा देशाच्या लोकशाहीवर काय परिणाम होईल हा खरा प्रश्न आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे, मोदी-शहा यांना निवडणुका जिंकण्यापलीकडं लोकशाहीविषयी फारशी आस्था नाही. त्यांनी हे प्रथम गुजरात आणि आता राष्ट्रीय पातळीवरही दाखवून दिलं आहे. कायदेमंडळ आणि प्रसारमाध्यमांचा ते तिरस्कार करतात. सरकार आणि राजकीय नेत्यांना उत्तरदायी ठरविणाऱ्या या दोन संस्था आहेत. मोदी-शहा यांनी संसदेचं अवमूल्यन करण्याबरोबरच लोकशाहीतल्या अन्य महत्त्वाच्या संस्थांच्या स्वायत्ततेलाही सातत्यानं कमी लेखलं आहे. आर्थिक नियमन राखणारी रिझर्व्ह बँकेसारखी संस्था असेल किंवा सीबीआयसारख्या गुन्हे तपास यंत्रणा, यांच्यावर नियंत्रण राखण्याची, तिचा गैरवापर करण्याची त्यांची इच्छा आहे. या संस्थांना सत्तारूढ पक्षाच्या हातातलं बाहुलं करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याचा अनुभव सध्या येतोच आहे.

लोकशाही आणि लोकशाही पद्धतीबाबत मोदी आणि शहा यांची वेगळीच धारणा आहे. धार्मिक बहुविधतेबाबतही त्यांची काही एक बांधिलकी नाही. आपला देश कोणत्याही एका धर्माच्या, भाषेच्या नावानं ओळखला जाऊ नये किंवा दावणीला बांधला जाऊ नये, याबाबत स्वातंत्र्यलढ्यातील नेत्यांमध्ये तसेच घटना तयार करणाऱ्यांमध्ये एकवाक्यता होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वाढलेले मोदी-शहा वेगळ्या पद्धतीनं विचार करतात. त्यांचा याबाबतचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या मते जे हिंदू नाहीत ते या भूमीत समान नागरिक नाहीत. विशेषतः मुस्लिमांनी कायम दुय्यम भूमिका स्वीकारायला हवी, असं शहा यांच्या कृतीतून सातत्यानं दिसतं भाजपेयीं उमेदवारांच्या यादीतून मुस्लिमांना ते पूर्णपणे वगळतात. मोदी आपला भूतकाळ विसरून पुढं गेले आहेत, असं समजून ज्यांनी त्यांना २०१४, २०१९ मध्ये पाठिंबा दिला, त्यांनी आता पुन्हा विचार केला पाहिजे. विरोधक पुरते गोंधळलेले आहेत, विस्कटलेले आहेत. लोकशाही पद्धती पक्षीय राजकारणापेक्षा फार वर असते. ज्यांनी कधी पंचायत निवडणूकही लढविली नाही, अशा सामान्य लोकांनी निवडून दिलेल्या मोदी-शहा यांची ही धोरणं आहेत. वृत्तपत्रं आणि विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमं मोठ्या प्रमाणात सत्तारूढ पक्षाची मतपत्रंच बनली आहेत. भाजपेयीं आणि त्यांच्या सरकारच्या गुन्ह्यांवर आणि चुकांवर वस्तुस्थितीवर आधारित निर्भीड लेखन करणारी मोजकीच वृत्तपत्रं, संपादक आणि पत्रकार राहिलेले आहेत. स्वतंत्र शैलीनं चालविली जाणारी काही संकेतस्थळे आहेत. दरम्यान ट्रोलिंगसाठी पगारी नेमलेल्या उजव्या विचारसरणीच्या लोकांबरोबर सध्या सोशल मीडियावर लोकशाही आणि उदारमतवादी विचारसरणी असलेले लोक चांगलेच सक्रीय झालेले आहेत. सोशल मीडियावरील त्यांचं स्थानही जाणवण्याइतपत उठून दिसतं.

प्रसारमाध्यमं तसंच सोशल मीडियावर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळ, ऊर्जा आणि पैसा खर्च करूनदेखील भाजपेयीं अजूनही निपःक्षपातीपणे होणाऱ्या चर्चेला आणि विश्लेषणाला पूर्णपणे दाबून टाकू शकलेला नाही. आजही समाजातील बहुतांश लोकांचा राज्यघटनेवर दृढ विश्वास आहे. भारतीयांना आपला देश हिंदू-पाकिस्तान बनू नये असं मनापासून वाटतं. काय खावं, काय परिधान करावं, कोणावर प्रेम करावं, कोणाचा तिरस्कार करावा, हे आम्हाला कोणीही सांगू नये असंच त्यांना वाटतं. कोणत्याही पक्षाशी संबंधित नसलेल्या, पण भाजपेयींना विरोध करणाऱ्या या मतप्रवाहाचं एखाद्या पक्षात रूपांतर होईल का, जो भाजपेयींना २०२४ मध्ये पराभूत करू शकेल? निवडणुका जिंकणं किंवा हरणं यापुरती लोकशाही तोलू नका, खुजी करू नका. लोकशाही ही जगण्याची एक पद्धती आहे, मूल्यव्यवस्था आहे, ती रोजच्या जगण्यात, आचरणात आणावी लागते. केवळ पाच वर्षांतून एकदा ती वापरून चालत नाही. लोकशाहीची ही जाण अनेक भारतीयांमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यामुळंच राजकारणाच्या परिघात भाजप हा पक्ष इतका यशस्वी आणि ताकदवान झालेला असतानाही त्यांच्या धोरणांना तसंच नेत्यांना सार्वजनिकरित्या इतक्या मोठ्या टीकेला सामोरं जावं लागतंय. भाजपेयीं नेत्यांची सध्याची अरेरावीची भाषा, टीकाकारांना त्रास देण्यासाठी होत असलेला सत्तेचा गैरवापर, गाव-गुंडांकडून भररस्त्यात होणारी हत्या, यामुळं त्यांच्यावर फॅसिझमचा आरोप होतोय. भारतातल्या लोकशाही संस्थांची तसंच भारतीयांच्या लोकशाही मूल्यांची कुचंबणा आणि खच्चीकरण होत आहे. त्यामुळं विरोधी पक्षांची एकी झाली अथवा नाही झाली, आणि सध्या भाजपेयींना आव्हान देण्यात ते असमर्थ असले तरीही अन्य भारतीय नागरिक सत्तारूढ पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना आव्हान देतील, प्रश्न विचारतील, उत्तरदायी ठरवतील. म्हणजे मोदी-शहा कदाचित सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पराभूत करतील, पण त्यांची इच्छा देशाला लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्यपद्धती देणाऱ्या नेहरू आणि आंबेडकरांचा वारसा नष्ट करण्याची आहे. हिंदुत्ववादी कदाचित या बहुवादी प्रतिमेची हानी करतील, पण त्यांना ती कदापि नष्ट करता येणार नाही.

मोदी-शहाना जनतेनं विरोध सुरू केलेला आहे. आणि मोदी-शहाही आता त्यांच्या पक्षातही आणि देशातही विचित्रपणे सुटलेले आहेत. ते हुकूमशहाच्या भूमिकेत गेलेले आहेत. कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नाही ही जी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मांडणी होती, तिला त्यांनी छेद दिलेला आहे आणि द्विचालकानुवर्ती पक्ष आणि देश या मार्गाला ते लागलेले आहेत. जे स्वतः त्यांच्या पक्षाला, संघाला नको असणार आणि जनतेला तर नकोच आहेत. मोदी-शहा यांचा कारभार आता फक्त अतिरिक्त बळकवलेला पैसा, आयटी सेल आणि विकत घेतलेला मिडिया आणि अगदी अल्पसंख्य उरलेले भक्त यांच्यापुरता मर्यादित आहे. गेली काही वर्षं थोड्या थोड्या संख्येनं लोक मोदी-शहाला विरोध करत आलेले आहेत. आज ते असे लोक मोठ्या संख्येनं वाढलेले आहेत. त्या दोघांच्या विरोधाचा मुख्य नायक जनता आहे. आता काँग्रेसच्या बाजूनं या विरोधात राहुल, प्रियांका हे लोक उतरलेले आहेत. देशाचं नेमकं काय वाटोळं झालं, याचा साक्षात्कार आताशी राहुल-प्रियांका यांना झालेला आहे. आज मोदी-शहा जे सर्वच बाबतीत वागतायत, ते देशाचं राजकारण नाही, तर ती केवळ त्यांची व्यापारी वृत्ती आहे. राजकारणाचा त्यांनी निखळ, निर्लज्ज व्यापार करून ठेवलाय. त्यांचा प्रत्येक मुद्दा हा स्वार्थी धंदेवाईक आहे आणि केवळ स्वतःच्या लाभाचा आहे. याच्यात जनतेची अनेक प्रकारे होरपळ होत आहे. अर्थात याची त्या दोघांना पर्वा नाही. म्हणजे एका अर्थानं काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे मोदी-शहाही सरंजामदार होऊन बसलेले आहेत. अशा राजकारणाचा शेवट काय होतो? तर जनता जागृत होत या राजकारणाला विरोध सुरू करते. तसा जनतेनं तो सुरू केलेला आहे. काँग्रेसच्या सरंजामदारांना जसं जनतेनं जमिनीवर आणलं, तसंच मोदी-शहाचंही जनता करेल. सरंजामदार नुसत्या जनतेच्या विरोधानं संपत नाही, तर स्वतःच्या विचित्र कर्तुकीनंही स्वतःला संपवत जातो, तसं मोदी, शहाचंही होणार आहे. आजवरचा जगातल्या कोणत्याही संघर्षाचा इतिहास बघा, प्रत्येक संघर्षाच्या शेवटी, मग तो लघू असो की दीर्घ, छोटा असो की मोठा शेवटी मानवी संवेदनशीलता आणि मानवी करुणाच जिंकलेली दिसते. याही वेळी वेळ लागला तरी तीच जिंकेल...!
- हरीश केंची,
९४२२३१०६०९

1 comment:

  1. अंतिमतः वाईटाचा नाश होणारच,भारतीय विषमता ग्रस्त जनमानस,त्यातमुठभरांची मिजसखोरी याला आता विरोध सुरू झाला आहे. लोकशाहीत लोकचळवळ महत्वाची असते, धर्मधारीत चळवळी करून भाजपा सत्तेत आला.जनतेच्या खरे प्रश्न घेवून चळवळ करून यांना सत्तेतून घालवता येईल.

    ReplyDelete

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...