Saturday 25 September 2021

गांधी आणि नेहरू...!

"गांधी, नेहरूंनी देशातल्या लोकांना काय दिलं? तर "सामुदायिक नीतीमत्तेचं महत्त्व, सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, राजकारण व आदर्शवाद यांचा परस्परसंबंध या तीन तत्वांना स्वीकृती. बुद्धीनिष्ठ, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा, पश्चिमात्य मापदंडानं मोजता येईल असा आधुनिक औद्योगिक भारत. गोरगरिबांबद्धल एक सामाजिक कणव, तसंच समाजानं गरीबांच्या उन्नतीसाठी झटावं ही श्रद्धा. भारतासारख्या गरीब देशात संपत्तीच्या ओंगळ प्रदर्शनावर प्रतिबंध आणि असं प्रदर्शन हीन अभिरुचीचं द्योतक ही भावना. स्वावलंबन या ध्येयाचा स्वीकार. भारताच्या अंगभूत आर्थिक शक्तीबद्धल आशावाद. देशबाह्य दडपणापासून बचाव करण्याची राजकीय निवड. देशातल्या धार्मिक दुफळीवर मात करणारी धर्मनिरपेक्ष राजवट...!" जगात एक बलशाली, सर्वसंपन्न राष्ट्र व्हावं म्हणून गांधी नेहरूंनी ध्यास घेतला होता. आज मात्र भारतीयांच्या मनातून त्यांना पुसून टाकण्याचा प्रयत्न होतोय. पण पुन्हा गांधी शेतातून, गावागावातून अंकुरतांना दिसतोय ! निदान शेतकऱ्यांची पोरं तरी आता चूप बसणार नाहीत! दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पुन्हा गांधी परतून येतोय..!"
------------------------------------------------------------

*तु*म्ही जर मराठी असाल तर तुमच्या आयुष्यात अत्रे आणि पु. ल. कधी आले, हे कळतसुद्धा नाही आणि भारतीय असाल तर गांधी कधी आले हे लक्षातही राहत नाही. मला अंधुकपणे पु. ल. कधी आले हे आठवतंय. शि. द. फडणीसांचं पुस्तक खूप लहानपणी चाळलं. काहीच कळत नव्हतं तेव्हा. त्याच सुमारास महाबलीवेताळ वगेरे कॉमिक्स वाचायचो तेव्हा एक कॉमिक्स चक्क गांधींचं होतं. सद्गुरू हितवर्धक कमिटी नामक संस्था होती. तिथं आम्ही कायम पडीक असायचो. तिथं एका घरात त्याच्यासमोर बसून एका संध्याकाळी मी ते कॉमिक्स वाचलं. गांधीजींनी घरातील सोन्याचं कडं विकल्याची गोष्टच तेवढी त्यातली आठवतेय. गांधीजींचा एक धडा अभ्यासक्रमात होता ज्यामध्ये त्यांना कोणीतरी जॉन रस्किनच ‘अन टू द लास्ट’ हे पुस्तक वाचायला दिलं आणि त्यांनी ते वाचलं, असा उल्लेख होता. ‘माझे सत्याचे प्रयोग’ मधील तो भाग असावा. अर्थात त्यानंतर गांधींविषयक कितीतरी पुस्तकं वाचली. पण अलीकडंच माझ्या हातात ‘गांधी ऑन नेहरू’ नावाचं एक लठ्ठ पुस्तक पडलं. त्याबद्धल लिहायलाच हवंय. गांधीजीनी विपुल लेखन केलंय. ’यंग इंडीया’, ‘ओपिनियन’ ,’हरिजन’, यातून ते नियमित लिहित. शिवाय त्यांनी हजारोंनी पत्रं लिहिलीत. शेकडो भाषणं केलीत. या साऱ्याचं नीट दस्तावेजीकरण करण्याचं श्रेय १९२० पासून त्यांचे सहायक म्हणून काम पाहणारे महादेवभाई देसाई आणि त्यांचे सहकारी प्यारेलाल यांना जातं. १९४२ साली महादेवभाईंचं निधन झाल्यावर गांधीजीच्या निधनापर्यंत ही जबाबदारी प्यारेलाल यांनी सांभाळली. यातूनच पुढं इंग्लिश आणि हिंदीमधून आणि मग मराठीतून त्यांची भाषणं, पत्रं, लेख इतकंच काय प्रसंगी केलं तर यांचं संकलन सुरु झालंय. या संकलनाच्या आधारे अनेकांनी गांधी विचारांचा परामर्श घेतला किंवा चरित्रासाठी उपयोग केला. 'गांधी ऑन नेहरू' हे असंच एक पुस्तक आहे. गांधीजींचं नेहरूंवर विलक्षण प्रेम होतं आणि नेहरुंनीही गांधीजींच्या सहवासात आल्यावर आपली संपत्ती आणि करियरचा त्याग करून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली. हा इतिहास सर्वांना माहिती आहे. हे नातं केवळ पस्पर कौतुकाचं नव्हतं तर वेळप्रसंगी विरोधाचं आणि मतभेदाचंही होतं. जवळपास ७०९ पानात दोघांचंही एकमेकांबद्धलचं उदगार किंवा त्यांच्या संदर्भातील गोष्टी संपादक आनंद हिंगोरानी यांनी केलंय. नेहरू वयाच्या २२व्या वर्षी गांधीजींच्या प्रभावाखाली आले. लाहोर इथं भरलेल्या काँग्रेस अधिवेशनापासून त्यांनी गांधीजींचं शिष्यत्व पत्करलं आणि १९३० पासून ते साबरमती आश्रमात राहू लागले. काही काळ त्यांनी गांधीजींचे सहाय्यक म्हणूनही काम केलं. त्यांनी सतत गांधींविषयक कागदपत्रं जमवायचा ध्यास घेतला होता. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच गांधीजींचं हे उदगार नमूद केले आहेत की, “जवाहर हा खरंच माणसांमधला हिरा आहे. ज्या मातीत तो जन्माला आला ती भाग्यवानच!” आणि नेहरू गांधींबद्धल काय म्हणतात हे ही दिलंय, ‘गांधीजींची जी लोकशाही कल्पना आहे त्याचा संबंध आकड्यांशी किंवा बहुमताशी नाही. प्रतिनिधित्वचा जो नेहमीचा अर्थ अभिप्रेत आहे, त्याच्याशीही नाही. त्यांची लोकशाही ही सेवा, त्याग आणि नैतिक दडपण यावर आधारलेली आहे. ते सांगतात की, ‘मी लोकशाही तत्त्वाला म्हणूनच जन्मलो. त्यांचं म्हणणं असं आहे की, मी दावा करू शकतो की, मी गरीबातल्या गरीब माणसाशी तद्रूप होऊ शकतो. आणि तो जसा जगतो, त्यापेक्षा वेगळं मला जगायचं नाही आणि त्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी माझी जी काही क्षमता आहे ती मी सगळी पणाला लावतो! ‘

गांधीजी लोकशाहीवादी असोत किंवा नसोत. मात्र ते या देशातल्या गरीब समूहाचं प्रतिनिधित्व करतात, हे मानावंच लागेल. कोट्यवधी लोकांच्या इच्छा, आकांक्षा आणि मन याच्याशी ते एकरूप झालेले आहेत. आणि हे काहीतरी प्रतिनिधित्वापेक्षा खूप वेगळं आहे. या कोट्यवधी लोकांच्या इच्छा-आकांक्षेला त्यांच्या रुपात शरीर मिळालेलं आहे. अर्थातच ते काही सामान्य माणूस नाहीत. तीव्र बुद्धिमत्ता, विलक्षण दृष्टी, प्रत्येक गोष्टीत रस, कायम उच्च तत्वानं सगळ्यांशी पाहणं आणि मानवीवृत्ती हे सारं त्यांच्यात एकवटलेलं आहे. हा असा ऋषी आहे की, ज्यानं आपल्या इच्छा, आकांक्षा, भावना दाबून टाकल्या आणि त्यांचा अध्यात्मिक दृष्टीनं चँनेलाइज केल्या. एक विलक्षण व्यक्तिमत्व जे चुंबकाप्रमाणं लोकांना खेचून घेतं आणि त्यांना स्वत:शी जोडायला लावतं आणि त्याच्या साऱ्या निष्ठा आपल्यावर एकवटायला लावतो. हे सारं काही अशिक्षित सामान्य माणसाला आढळून येणारं नाहीत. पण तरीही ते सामान्यातले सामान्य आहेत. आणि त्यांच्याकडं पाहिल्यावर या देशातील एका सामान्य खेडूताला पाहतोय असंच वाटतं. हा खेड्यातला माणूस जसा अनेक गोष्टींकडं दुर्लक्ष करतो तसंच तेही करतात. पण भारत हा खेड्यात राहणाऱ्यांचा देश आहे. त्यामुळंच ते या देशाला चांगलंच ओळखतात. त्याचे छोटेसेही आघात त्याच्या परिस्थितीशी वळणं ही सारी त्यांना अंतर्ज्ञानानं जणू माहित होतात. त्यांची कृती ही मानसशास्त्रीयदृष्ट्या चालायला योग्य प्रतिसाद देणारी असते. तर दुसरीकडं ते म्हणतात, ‘या छोट्या चणीच्या माणसात काहीतरी पोलादाचं तत्व आहे. काहीतरी कठीण खडकासारखं, त्यामुळंच कुठल्याही शारीरिक ताकदीपुढं तो झुकत नाही. मग ती ताकद कितीही मोठी असो. जरी शरीर सामान्य वाटलं, किंवा त्याचं साधे कपडे आणि उघडं शरीर तरीही त्यामध्ये एक राजेशाही थाट आहे. एखाद्या सम्राटासारखी ताकद आहे. त्यामुळंच त्यांच्या इच्छेखातर इतरेजन पाहिजे ते करायला तयार होतात. जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक ते साधं आणि हंबल राहतात. पण त्यांच्यामध्ये ताकद आणि अधिकार पूर्णपणे एकवटलेलं आहे आणि त्यांना याची जाणीव आहे. अनेकदा ते जी आज्ञा देतात त्या पाळणं इतरांना भागच असतं. त्यांचे शांत, अर्थगर्भ डोळे आपल्या समोरच्याचाच वेध घेतात. त्याच्यात खोलवर शिरतात. त्यांचा आवाज स्पष्ट आणि जुनाट वाटला तरी तो तुमच्या हृदयात शिरतो. गांधी नेहरूंनी मध्यमवर्गाला काय दिले? "सामुदायिक नीतीमत्तेचं महत्त्व, सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा, राजकारण आणि आदर्शवाद यांचा परस्परसंबंध या तीन तत्वांना स्वीकृती. बुद्धीनिष्ठ, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगणारा आणि पश्चिमात्य मापदंडानं मोजता येईल असा आधुनिक औद्योगिक भारत. गोरगरिबांबद्धल एक सामाजिक कणव, तसंच समाजानं आणि देशानं गरीबांच्या उन्नतीसाठी झटावं ही श्रद्धा. भारतासारख्या गरीब देशात संपत्तीच्या ओंगळ प्रदर्शनावर प्रतिबंध आणि असं प्रदर्शन हीन अभिरुचीचं द्योतक ही भावना. स्वावलंबन या ध्येयाचा स्वीकार. भारताच्या अंगभूत आर्थिक शक्तीबद्धल आशावाद. देशबाह्य दडपणापासून स्वत:चा बचाव करण्याची राजकीय निवड. देशातील धार्मिक दुफळीवर मात करणारी धर्मनिरपेक्ष राजवट...!" गांधीजी नेहमीच नेहरू कुटुंबियांच्या संपर्कात असत. ही अर्थातच खूप श्रीमंतीत वाढलेली मंडळी होती. आपल्या लहानपणीच्या आठवणीत दंड न भरल्यानं ब्रिटीशांनी कसं घरातलं फर्निचर नेलं ते इंदिराजींच्या आठवणींच्या छोटेखानी पुस्तकात आढळतं. अलाहाबादला ‘आनंदभवन’ या अलिशान घरात ते राहत. ते घरही मोतीलाल नेहरूंनी राष्ट्राला देऊन टाकलं. तेव्हा त्यांनी देशाला खूप काही दिलंय. त्यात विटा, सिमेंट कशाला? असं, गांधीजींनी म्हटलंच. पण आपण मोतीलालजींच्या त्यागाला आश्वासक असं वागुयात, असं देशवासियांना आवाहन केलंय.

देश स्वतंत्र झाल्याझाल्याच गांधीजींचा खून झाला तेव्हा नेहरू म्हणाले, आपल्या साऱ्यांच्या आयुष्यातून उजेड निघून गेला आहे.’ पण सावरून नंतर या खंडप्राय देशाचं नेतृत्व करताना शांत, निधर्मवाद, गरिबांच्या हिताचा समाजवाद अशा गोष्टींची कास धरली. जागतिक राजकारणात कुठल्याही एका महासत्तेकडं झुकण्याचं त्यांनी टाळलं. विज्ञान, प्रगती, आधुनिकता, अहिंसा या गोष्टींचा कायम आग्रह राखला. गांधींजींचं सारं काही त्यांना मान्य नव्हतं. पण जे मान्य होतं त्याची कास ते धरून राहिले. गांधीच्या राजकारणाचा तेव्हा फार बोलबाला होता. पण त्याबद्धल नेहरूंना काही शंका होत्या. याबाबत ते आपल्या आत्मचरित्रात लिहितात, ’’फार वर्षापासून मी या गोष्टीवर विचार करतोय की, ज्या गरिबांबद्धल गांधीना एवढा कळवळा आहे, त्यांना चिरडणाऱ्या, अन्याय्य अशा समाजव्यवस्थेला गांधी का बरं टिकवू इच्छितात? गांधींना अहिंसा प्यारी आहे ना? मग सध्याची समाजव्यवस्था ही केवढ्या घोर हिंसेवर आणि पाशवी बळावर उभी आहे हे त्यांना दिसू नये? गांधीना ही अन्याय्य व्यवस्था टिकवून ठेवायची आहे असं म्हणता येणार नाही ... कदाचित ... पण त्यांनी ती व्यवस्था मुकाट्यानं स्वीकारली मात्र आहे.’’ या अन्याय्य व्यवस्थेबद्धल १९३५ च्या सुमारास नेहरू स्पष्टपणे म्हणाले, ’गेल्या सतरा वर्षात कॉंग्रेसला ज्या नेतृत्वानं दिशा दिली, ते सगळेच्या सगळे मध्यमवर्गीय पार्श्वभुमीतून वर आले होते. काँग्रेसवाले काय किंवा स्वत:ला उदारमतवादी म्हणवून घेणारे काय, दोघांची सांस्कृतिक पार्श्वभूमी, सामाजिक जीवन, लोकसंपर्क, मैत्री इ. चे. जग एकमेकांपासून फार भिन्न नव्हतं. वरवर बघता या दोन गटांच्या राजकीय आदर्शांमध्ये तफावत दिसत असली, तरी तो आदर्श मूलत: ‘बूर्झ्वा’च होता. कॉंग्रेसकडं कनिष्ठ मध्यमवर्गाचा पण ओढा होता, हे नेहरू मान्य करतात. पण याबाबतीत आपला अंतिम निष्कर्ष देताना ते म्हणतात, ‘’असं जरी असलं तरी कॉंग्रेसमध्ये उच्च मध्यमवर्गाचेच प्राबल्य होतं. हे निर्विवाद. काँग्रेस संघटनेत संख्येनं भलेही कनिष्ठ मध्यमवर्गाचं प्राबल्य असो, पण या संघटनेचं नेतृत्व उच्च मध्यम वर्गाच्याच हाती होतं. ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही! स्वातंत्र्य मिळालं तेव्हा गांधी हे देशाचे सर्वात मोठे नेते होते. नेहरू घराणं स्वातंत्र्याच्या लढाईत अग्रभागी होतं. पंडित मोतीलाल नेहरू पासून जवाहरलाल नेहरू देखील अनेक वर्षे जेलमध्ये होते. स्वतःची संपत्ती नेहरू घराण्यानं देशासाठी दान केली होती. संघ मात्र नेहरूंना बदनाम करण्यात अग्रेसर आहे. नेहरू-गांधींना बदनाम करणारे बहुतेक लोक इंग्रज धार्जिणे किंवा त्यांचे वैचारिक वारस आहेत, हे स्पष्ट आहे. त्यांच्यातले अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन हे लोक जरा वेगळे होते. ते असे कारस्थानी नव्हते. हिंसक नव्हते. अडवाणी मात्र मोदींची पहिली आवृत्ती होती. आता स्वतःच्या कर्माची फळं भोगताहेत. आज गांधीही नाहीत, नेहरुही नाहीत, डॉ. बाबासाहेबही नाहीत ! पण सरकार नत्थुराम गोडसे यांच्या विचारांचं आहे ! त्यांच्या भक्तांचं आहे आणि शिवाजीमहाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जप करणारं, त्यांचा वारसा सांगणारं या सरकारमध्ये सहभागी आहेत. देशाचं दुर्दैव असं, की गांधीचा, नेहरूंचा विरोध करणाऱ्यांना मोदींच्या काळात चांगले दिवस आलेत. कळत नकळत संघाच्या सुरात सूर मिसळून गांधींचा विरोध करणारांची मोठी गर्दी झालीय. वैचारिक मतभेद वेगळे, त्याचं स्वागत केलंच पाहिजे. पण द्वेष वेगळा हेही समजून घेतलं पाहिजे. मात्र गांधींचा द्वेष हाच काही लोकांच्या पोटापाण्याचा मुख्य धंदा आहे. काहीही असलं तरी, देशाला पुन्हा एकदा गांधींची गरज आहे.

कोरोना आणि मोदी सरकार यांची सारखीच दहशत आहे. दोन्हीकडे नुसती लूट सुरू आहे. एकेक अवयव विकणं सुरू आहेत. एवढ्या वर्षांच्या त्यागातून, नियोजनातून, समर्पणातून हा देश उभा राहिलाय. इथवर आलाय. तो पुन्हा मातीत घालण्यासाठी हे प्राणपणानं कामाला लागलेले आहेत. आपण काय करत आहोत, हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. एकजात सारे वैचारिक दिवाळखोर आहेत. मोदी कुणाचंही ऐकत नाहीत. मोदी-शहा यांचा इतिहास माहीत असल्यामुळं भाजपा आणि संघामधले मोठे मोठे लोक कोमात गेलेले आहेत. त्यांची जुनी पापं आता त्यांच्याच बोकांडी बसली आहेत. न्यायालयेदेखील व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांनाही ऑक्सीजन हवाय. देश भयंकर संकटात आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारखानदार, व्यापारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, छोटे दुकानदार, मोजके आणि इमानदार पत्रकार सारे सारे दहशतीत आहेत. सात वर्षातल्या तुघलकी कारभारामुळं लोक बर्बाद झाले आहेत. कर्जामुळं आता व्यापारी, उद्योगपती, डॉक्टर, प्राध्यापक यासारखे लोक सुद्धा सहकुटुंब आत्महत्या करायला लागले आहेत. कोरोनाच्या महामारीचा फायदा घेवून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणात देशाला लुटतेय. सारा पैसा देशाबाहेर जातोय. मागोमाग मोठमोठे उद्योगपती सहकुटुंब देशाबाहेर जाताहेत. ते पुन्हा परत येतील की नाही अशी शंका आहे. भाजपचे सारे खासदार, नेते शेपट्या टाकून नव्हे, तर शेपट्या कापून बसले आहेत. मिळेल ते बिस्कीट खाऊन दिवस काढताहेत. या देशाला मंत्रिमंडळ आहे याच्या खुणाही कुठं दिसत नाहीत. मोदी-शहांचा काहीही करून निवडणुका जिंकणं, हा त्यांचा धर्म आहे. एकमेव अजेंडा आहे. त्याशिवाय मोदी-शहा यांना पर्यायदेखील नाही. त्यांचे पराक्रम एवढे आहेत, की जर त्यांच्या हातातून सरकार गेलं, तर आपलं काय होईल, या भीतीनं त्यांना झोप येत नसावी. अशा परिस्थितीत मानसिक संतुलन राखणं अशक्य कोटीतील गोष्ट आहे. तोच त्यांचा प्रॉब्लेम आहे. अर्थात, संघाला, भाजपेयींना याची आता पूर्ण कल्पना आलेली आहे. ते बोलत नसले तरी आतून हादरले आहेत. २०१४ नंतर त्यांनी आणि अंधभक्तांनी देशात जो धुमाकूळ घातला, त्यामुळं आता त्यांना आपली भूमिका कशी बदलायची ही अडचण आहे. आंधळे भक्त असोत की भक्तिनी, साऱ्यांनी मर्यादा ओलांडून टाकल्या होत्या. आता त्यांची गोची झालीय. कुणाला सांगताही येत नाही आणि सोसवतही नाही. मात्र ही कोंडी फोडावी लागेल. झालेल्या चुका विसरून एकमेकांना समजून घ्यावं लागेल. प्रमाण कमी जास्त असू शकतं, पण अतिरेक दोन्ही बाजूंनी झालाय. दोन्ही बाजूंनी चुका झाल्यात. त्याची फळं आपण सारेच भोगत आहोत. सर्वांनीच प्रायश्चित घेण्याची गरज आहे. यावेळी संघ आणि भाजपेयींची भूमिका ऐतिहासिक महत्वाची आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील गांभीर्यानं एक आलं पाहिजे. काही लोकांनी आपलं उठवळ राजकारण अशावेळी बाजूला ठेवलं पाहिजे. देश अस्वस्थ आहे. आधी देश वाचवला पाहिजे. संघ आणि भाजपमध्ये तशा हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत. अलीकडंच गडकरी ॲक्टिव झालेले दिसतात. आणखीही काही लोक नजीकच्या काळात बोलायला लागतील. न्यायालयं नव्या जोमानं हिम्मत करायला लागलीत. काँग्रेस देखील ॲक्शन मोडमध्ये आलीय. शेतकरी आंदोलन तर देशात सुरू आहेच. मात्र भाजपमधून एखादा स्वाभिमानी नेता पुढं आला तरच हे शक्य आहे. ज्याला कुणाला वाटत असेल त्यानं हिम्मत करायला हवी. सर्वांनी शहाणपणा दाखवून एकत्र यावं. खेड्यापाड्यातून असंतोष वाढतो आहे. पुन्हा गांधी शेतातून, गावातून अंकुरतांना दिसतो आहे ! निदान शेतकऱ्यांची पोरं तरी आता चूप बसणार नाहीत..! दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईसाठी पुन्हा गांधी परतून येतोय..!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

1 comment:

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...