Friday 30 June 2017

संतांची मांदियाळी

*संतांची मांदियाळी

...!*

"पंढरीची वारी ही ऐक्याची वारी आहे. मराठी-कानडी-तेलुगु या प्रादेशिक ऐक्याची, शैव-वैष्णव या पंथीय ऐक्याची , बौद्ध-जैन यांनाही आपले वाटायला लावणाऱ्या एका देवाची. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शिव आहे, तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ विष्णू आहे, पण हा अर्थ विसरून आम्ही पांडुरंगा.... विठ्ठला.....म्हणत आहोत. शिवयोगी वैष्णव भक्त, निर्गुणात्मकवादी, सगुणात्मकवादी, अद्वैती, द्वैती असे सर्व मताचे लोक प्रांतभेद, भाषाभेद, जातीभेद विसरून पंढरपुरात एकत्र येतात."
*पंढरीच्या वारी निमित्तचा हा विशेष लेख*

----------------------------------------------

'पालख्या पंढरपुराकडे निघाल्या...' अगदी लहानपणापासून हे तीन शब्द ऐकत आलो आहे आणि या शब्दांबरोबरच मनाची पालखी चंंद्रभागेतीरी पोहोचवत आलो आहे. पालखीचं दर्शन ही एक पर्वणी होती. आमचं तेव्हा छोटंसं दुकान लक्ष्मीरोडवर होतं. आताचं लक्ष्मीरोडच स्वरूप तेव्हा नव्हतं. त्यामुळे या पालख्या जणू आमच्या अंगणातूनच जायच्या. मुंग्या एका मागे एक जाव्यात तशी वारकऱ्यांची रांग रस्त्यावर लागलेली असायची. अंगावर धोतर-सदरा-गांधी टोपी अथवा मुंडासं. खांद्याला एक पडशी. कुणाच्या हाती भगवी पताका. त्यावेळी एकदम भगवे झेंडे दिसायचे ते फक्त पालख्यांबरोबरच. बायकांच्या डोक्यावर तुळशीवृंदावन. हे वारकरी दोन तऱ्हेचे असायचे. एक बाजूच्या गर्दीवर डोळे लावून चाललेले, तर दुसरे पंढरीकडेच डोळे लागलेले. जमलेले भाविक आपल्या कुवतीप्रमाणे डाळ, चुरमुरे, लाडू, केळ, मुसुबं, अथवा पैसा, ढब्बू पैसा वारकऱ्यांना वाटायचे. ह्या वाटपाजवळ  झुंबड उडायची. मिळेल ते पडशीत टाकून पुढं कुठं कुणी काही वाटतंय का हे बघत गर्दीवर डोळे लावणारे पुढं धावत असायचे. पंढरीकडे डोळे लागलेल्यांना हा वाटपाचा मोह दिसायचा नाही. विठ्ठल...विठ्ठल या नामघोषाशी पायाची गती जुळवून ते चालत असायचे. मग केव्हातरी आली...आली.... अशी कुजबुज उठायची. पहिल्यांदा यायचा पालखीबरोबरचा घोडा. त्याला हात लावायची झुंबड उडायची. तो सारखा फुरफुरत नुसता नाचत असायचा. लाल वुलनचा शेरवानीवजा लांब कोट घातलेला मुंडासेधारी ह्या घोड्याला सांभाळत असायचा. एका हाताने तो घोडा धरायचा. दुसरा हात त्या घोड्याला म्हणून लोक जी दक्षिणा द्यायचे त्याने भरलेला असायचा. थोड्या थोड्या अंतराने हातावरची जमा लालकोटाच्या खिशात जायची. ह्या घोड्यामागे असायची पालखी. तिच्याभोवती तर नुसती रेटारेटीच व्हायची. लहान पोरांना पालखीत काय आहे ते दिसायचंच नाही. ज्यांना कुणाच्या खांद्यावर बसायचं भाग्य मिळायचं त्यांची गोष्ट वेगळी. तुळस-बुक्का यांचा मनाचा गाभारा बनवणारा सुवास पालखीबरोबर यायचा. पालखीसाठी हलवायांची दुकानं लागायची. गोडी शेव ज्याला कोकणात खाजे म्हणतात, बत्तासे, चणे, कुरमुरे, लाडू यांच्या टोपल्या भरभरून दुकानांतून मांडलेल्या असायच्या. त्यावर माशांची झुंबड असायची. उघडं-वाधडं खायचं नाही ही शिस्त घरात असल्यानं हातात पैसा कधी पडायचाच नाही, पण हलवायाच्या दुकानासमोरच्या गर्दीत घुसून निष्पाप चेहरा करून टोपलीच्या जवळ चिकाटीने उभं राहिलं तर अधूनमधून एखादी गोडी शेव, मूठभर शेंगदाणे वा चुरमुरे लंपास करायला मिळत. हे चोरून खाणं त्या सगळ्याची गोडी आणखी वाढवत असे. पालखी डोळ्यापुढून पाच मिनिटात जात असे, पण ती येऊन जाईपर्यंत दोन चार तास सहज जात आणि तिची आठवण करण्यात वर्षही सहजपणे जात असे. 'पालख्या पंढरपूराकडे निघाल्या' ही बातमी वाचली की, अजूनही तो तुळस-बुक्क्याचा सुगंध अवतीभवती दरवळतो. गोड्या शेवेची गोडी जिभेवर येते आणि विठ्ठल-विठ्ठल-ज्ञानोबा तुकारामाची धून मनातून उठते. पंढरपूरला ज्या ज्या वेळी मी गेलो आहे, त्यावेळी श्री विठ्ठलाच्या दर्शनाने स्वतःला हरवून गेल्याचा अनुभव मीही घेतला आहे. 'तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला'... अशी वेडी ओढ माझ्याही मनाला लागलीय. आज कितीतरी वर्ष मी ठरवतोय. पालखीबरोबर पंढरपूरला जायचं, तेवढं मात्र अजून जमलेलं नाही. पालख्या निघाल्या हे वाचलं की, आपण मात्र निघू शकत नाही ह्या जाणिवेनं मी अजून बेचैन होतो. यंदाही झालोय. खरोखरच ही पंढरपूरची वारी मराठी माणसाचा एक विशेष आहे.

पण विठ्ठल आणि वारी फक्त आपलीच असं मात्र म्हणता येणार नाही. पंढरपूरचा विठ्ठल हा केवळ मराठी माणसाचा नाही, त्याची वारी काही केवळ मराठी माणसाचा विशेष नाही. पंढरपूरच्या वारीची प्रथा कर्नाटकातही प्रचलित आहे व ही वारी करण्याचं व्रत घेणारेही भरपूर आहेत. याची ऐतिहासिक साक्ष देणारा एक शिलालेख धारवाडपासून दहा मैलावर असलेल्या 'हेबबळळी' या गावी जंबुकेशवराच्या देवळाच्या परिसरात आहे. देवगिरीचा राजा कण्हर ऊर्फ कृष्ण यादव यांच्या काळातला हा लेख असून त्यावर पौष शुद्ध ९ शुक्रवार शके ११७० अशी नोंद आहे. ह्या शिलालेखात एकादशीच्या दिवशी पंढरपूरच्या वारीच्यावेळी करावयाच्या धर्मकृत्यांसाठी कलुवर सिंगगाबुंड यांनी एक वृत्ती दिल्याचे नोंदले आहे. या शिलालेखात पंढरपूरचे नांव 'श्रीपंडरंगे' असं आहे आणि विठ्ठलाचा उल्लेख 'श्रीविठ्ठलदेव' असा आहे. ज्ञानदेव म्हणजे वारकऱ्यांच्या जिभेवर सदैव असणारे ज्ञानोबा जन्मायच्या आधीचा हा शिलालेख आहे. हे लक्षात घेतलं म्हणजे पंढरपूरची वारी केवढी जुनी आहे याची कल्पना येते आणि विठ्ठल केवळ मराठी माणसांचा नव्हे, हे ही स्पष्ट होतं.

पंढरीच्या वारीला निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान हे येत हे चोखोबांनी आपल्या
विठ्ठल विठ्ठल गजरी।
अवघी दुमदुमली पंढरी।
होतो नामाचा गजर।
दिंड्या पताकांचा भार।
निवृत्ती ज्ञानदेव सोपान।
अपार वैष्णव ते जाण।
हरी कीर्तनाची दाटी।
तेथे चोखा घाली मिठी।।
या अभंगात सांगितलं आहे. म्हणजे वारीची कल्पना ज्ञानेश्वरांच्या आधीपासूनचीच आहे. ज्ञानदेवांना विठ्ठल भक्ती गुरुपरंपरेने व गृहपरंपरेने प्राप्त झाली होती. ज्ञानदेवांचे पणजे त्र्यंबकपंत यांनी गोरक्षनाथांचा अनुग्रह घेतला होता, तर गहिनींनाथांनी ज्ञानदेवांच्या आज्याला गोविंदपंतांना आणि बंधू निवृत्तीनाथांना अनुग्रहित केले होते. ज्ञानदेवांच्या वडिलांचे नांव विठ्ठलपंतच होते आणि पंढरीची वारी त्यांच्या घरण्यातच होती.
जनासी तारक विठ्ठलची एक।
केलासे विवेक सनकादिकीं
ते रूप वोळले पंढरीसी देखा।।
द्वैताचि पै शाखा तोडियेली
उगवते बिंब अद्वैत स्वयंभ।
नाम हे सुलभ विठ्ठलराज।
निवृत्तीचे गूज विठ्ठल सहज।
गयनिराजे मज सांगितले।।
असं ज्ञानदेवांचे गुरू निवृत्तीनाथांनी सांगितले आहे.

विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकरी ज्ञानोबा-तुकाराम म्हणत, पंढरीची वाट चालत असले तरी पंढरपूर, विठ्ठल आणि वारी या तिन्ही गोष्टी ज्ञानदेवांच्या कैकवर्षे आधीच्या आहेत. 'युगे अठ्ठावीस उभा हृषीकेशु। पुंडलिका सौरसु पुरवीतु।। असंही निवृत्तीनाथांनी म्हटलं आहे. म्हणजे पंढरपुरी चंद्रभागे तीरी उभा असलेला विठ्ठल हा ज्ञानेश्वरांच्या काळातही फार फार जुना आहे. हा वैकुंठीचा देव पुंडलिकाने पंढरीला आणला आणि विटेवर उभा करून ठेवला. आईवडिलांच्या सेवेत गुंतलेल्या पुंडलिकाने दारी आलेल्या परमेश्वराला वळूनही न बघता राहा जरा उभा सांगितलं. ही गोष्ट संतांनी आवर्जून सांगितली आहे. तुकाराम त्यांच्या सडेतोड शैलीत म्हणतात: 'का रे पुंडया मातलासी। उभे केले विठ्ठलासी' तर 'पुंडलिके भक्ते तारीले विश्वजनां । वैकुंठीची मूर्ति आणिली पंढरपूर-पाटणा' अशी कृतज्ञतेची भावना अन्य संत व्यक्त करतात.

पुंडलिक कोण? आणि हा विठ्ठल तरी कोण? ह्या पुंडलिकाचा शोध इतिहासात लागत नाही. एवढंच कशाला, विष्णूचा अवतार म्हणून जो विठ्ठल गाजतो आहे त्याचाही शोध इतिहासात पुराणात लागत नाही. विठ्ठलाचा उल्लेख 'चोविसां वेगळा' असा केला जातो. ज्ञानदेव म्हणतात 'बाप रखुमादेवी वरु पंचविसावा। चोविसां मुर्ती वेगळा।।' हे चोविसा प्रकरण काय आहे?  विष्णू पुराणात जे अवतार सांगितले आहेत ते आहेत चोवीस. भागवताच्या दुसऱ्या स्कंधात ते आहेत. मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, आणि कल्की हे दहा अवतार आपल्याला ठावूक आहेत. याशिवाय सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनतकुमार, नर नारायण, वेनपुत्र, ऋषभ, हयग्रीव, आणि हंस असे चौदा अवतार भागवतकारांनी सांगितले आहेत. या चोविसात विठ्ठल नाही. ह्या विठ्ठलाला आपण मराठी माणसांनी  आपल्या काळजात जागा दिलीय. तो कानडा विठ्ठल आहे हे ठाऊक असतानाही दिलीय, ही गोष्ट विशेष म्हणावी लागेल.
ज्ञानेश्वर म्हणतात,
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु।
येणे मज लाविले वेधी।।
नामदेव म्हणतात,
कानडा विठ्ठल वो उभा भीवरेतीरी।।
नामदेवांनी पुंडलिकाला या विठ्ठलाची भाषा समजत नाही हेही सांगितलंय-
विठ्ठल कानडे बोलू जाणे।
त्याची भाषा पुंडलिक नेणे।।
'कानडा म्हणजे अगम्य, कर्नाटकु म्हणजे मनमोहवणाऱ्या विविध लीला करणारा वगैरे युक्तिवाद केले जातात, पण त्यामध्ये प्राधान्याने असते प्रादेशिक अस्मिता. विठ्ठलाचे कानडीकरणं हे मान्य करावेच लागते.
हसस पंढरपूरचा विठ्ठल जैनांचा देव आहे. असाही दावा बऱ्याच काळापासून केला जातो. चिंचवडच्या मोरया गोसाव्यांच्या घराण्यात जन्मलेल्या नाथपंथीय गोविंदनाथ या विठ्ठल भक्ताने 'विठ्ठल विजय' हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्ये विठ्ठल हा विष्णूचाच अवतार, कृष्ण दिंडीर वनात आला आणि विठ्ठल झाला. असे प्रतिपादिले आहे. विठ्ठल हा जैनांचा देव म्हणणाऱ्यावर तुटून पडताना हा गोविंदनाथ म्हणतो:
पंढरीचा देव म्हणती जैनांचा।
तया गाढवांचा जन्म वृथा।।

मराठी संत विठ्ठलाला 'बुद्ध' म्हणतात. पण कधीही जिन म्हणत नाहीत. पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती जैन नेमिनाथ तीर्थांकराची आहे असे काही जैनांचे म्हणणे आहे. मराठी संतांनी विठ्ठलाला मौनस्थ आणि बुद्ध असंही अनेकदा म्हटलं आहे. जनाबाई दशावताराचे वर्णन करताना म्हणते-
होऊनिया कृष्ण कंस वधीयेला।
आता बुद्ध झाला सखा माझा।।
एकनाथही एका गोंधळात म्हणतात.
बौद्ध अवतार घेऊन ।
विटे समचरण ठेवून।
पुंडलिक दिवटा पाहून।
तयाचे दारी गोंधळ मांडियला।
बया दार लाव।
बौद्धाई बया दार लाव।।
नामदेव देखील विष्णूचा नववा अवतार म्हणून उल्लेख करतात-
गोकुळीं अवतारु सोळा सहस्रवरु।
आपण योगेश्वरू बौद्धरूपी।।
तुकारामांनीही-
बौद्ध अवतार माझिया अदृष्टा।
मौन्यमुखे निष्ठा धारियेली।।
अशा शब्दात विठ्ठलाचं वर्णन केलं आहे.

विठ्ठल आणि बुद्ध हे नातं मराठी संतांनी कसं जोडलं? ज्ञानदेव-नामदेव यांचा आधीचा काळ हा बौद्धाचा काळ मानावा लागेल. महाराष्ट्रात हजार-दीड हजार वर्षे तरी बुद्धाच्या विचारांचा प्रभाव होता. निरनिराळ्या भागात, पर्वतात दिसणाऱ्या गुंफा याची साक्ष देतात. अहिंसा आणि करुणा यांच्या प्रभावाने त्याकाळातील माणसांची मनं भारली गेली होती. ज्ञानदेव-नामदेव यांचाही बुद्धाच्या असीम करुणेशी संबंध कशावरून आला नसेल? पंढरपूरचा पांडुरंग हा करुणामय बुद्ध, असं मानण्याचा विचार त्या काळात केला गेला असावा. समर्थशिष्य दिनकरस्वामी यांनी'स्वानुभव दिनकर' नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात 'पांडुरंग महात्म्य' आठस पुंडलिक चरित्र सांगताना पुंडलिक देवाला नवव्या अवतारात करुणरस ध्यान स्वीकारण्याची गळ घालतो असं दाखवलं आहे. बुद्धाचा विष्णूच्या दशावतारात समावेश करण्याची ही प्रक्रिया मात्र खूप आधीची दिसते. शके १०५२ मध्ये म्हणजे इसवीसन ११३१ मध्ये कल्याणीचा चालुक्य नृपती सोमेश्वर याने जो 'मानसोल्लास' नांवाचा संस्कृत श्लोकबद्ध ग्रंथ लिहिला आहे त्यात बुद्धावताराला वंदन केलं असून ते मराठीत आहे-
बुद्धरूपे जो दाणवसुरा वंचउणी।
वेददूषण बोल्लउणी।
मायमोहिया तो देऊ माझि पासाऊ करू।।
'ज्याने बुद्धरूपाने दानवांना अन सुरांना वंचित केले अन वेदांना दूषण दिले तो मायामोहिया देव मला पसायदान करो.'

विठ्ठल ही जोडणारी देवता आहे. शैव आणि वैष्णव या दोन्हीचा समन्वय विठ्ठलात झाला आहे. पंढरपूर म्हणजे पांडुरंगपूर हे शैव क्षेत्र तिथे विष्णूचा अवतार विठ्ठल शैव असलेल्या पुंडलिकाने आणला हाच मुळात एक मोठा चमत्कार अथवा क्रान्ती म्हणायला हवी.
पुंडलिकाचे भाग्य वर्णावया अमरी।
नाही चराचरी ऐसा कोणी।
विष्णुसहित शिव आणिला पंढरी।।
केले भीमातीरी पेखणे जेणे।
निवृत्ती सांगे मातु विठ्ठल उच्चार।
वैकुंठ उतरे एक्या नामे।।
निवृत्तीनाथांच्या या अभंगात पुंडलिकाने विष्णूसहित शिव पंढरपूरला आणला आणि त्यालाच विठ्ठल म्हणतात. या विठ्ठलाच्या नामोच्चारणाने विष्णू प्रसन्न होतो हे सांगितलं आहे. विठ्ठल हा विष्णूचा अवतार! त्यामुळे विठ्ठलाचे भक्त स्वतःला वैष्णव म्हणतात. पण गंमत अशी आहे की, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, विसोबा खेचर, नामदेव, हे सगळे वैष्णव मुळात नाथपंथाचा अनुग्रह घेतलेले शैव आहेत. आलंदी पंढरपूर ही मूळची शैवक्षेत्रे आहेत. भीमाशंकरपासून निघणाऱ्या चंद्रभागेच्या काठावरचं पंढरपूर हे शैवक्षेत्र वैकुंठ बनलं. माथ्यावर शिवलिंग धारण करणारा विष्णू तिथे उभा ठाकला. शैव वैष्णव वाद संपून समनव्याचं एक वातावरण भागवतधर्माद्वारे मराठी संतांच्या अथक प्रयत्नाने निर्माण झालं.
पंढरीची वारी ही ऐक्याची वारी आहे. मराठी-कानडी-तेलुगु या प्रादेशिक ऐक्याची, शैव-वैष्णव या पंथीय ऐक्याची , बौद्ध-जैन यांनाही आपले वाटायला लावणाऱ्या एका देवाची. पांडुरंग या शब्दाचा अर्थ शिव आहे, तर विठ्ठल या शब्दाचा अर्थ विष्णू आहे, पण हा अर्थ विसरून आम्ही पांडुरंगा.... विठ्ठला.....म्हणत आहोत. शिवयोगी वैष्णव भक्त, निर्गुणात्मकवादी, सगुणात्मकवादी, अद्वैती, द्वैती असे सर्व मताचे लोक प्रांतभेद, भाषाभेद, जातीभेद विसरून पंढरपुरात एकत्र येतात.

पंढरपूर हे एका दृष्टीनं फार मोठं सामाजिक सुधारणेचं क्षेत्र आहे. मराठी संतांनी पंढरपुराचे आणि विठ्ठलाचे अपरंपार कौतुक गायले आहे. ' तू माऊली मी वो तुझा तान्हा। पाजी प्रेम -पान्हा पांडुरंगे।।' असं नामदेव देवाला आळवतात. ज्ञानेश्वर विठोबा माझे माहेर असं सांगून 'जाईन गे माये तया पंढरपूरा। भेटेन माहेरा आपुलिया।।' अशी जवळीक दाखवतात. जनी तर 'माय गेली बाप गेला' असा आक्रोश करून 'आता सांभाळी विठ्ठला' असं म्हणत त्यांच्या गळ्यातच पडते. 'ये ग ये ग विठाबाई। माझे पंढरीचे आई' हा जनीचा लडिवाळपणा सगळ्यांच संतांनी स्वीकारलाय.मराठी संतांनी विठ्ठलाशी जोडलेलं हे नातं विलक्षण आहे. मात्र मराठी संतांनी देवाशी ही जवळीक साधतानाही 'काया ही पंढरी' हे भान ठेवलं आहे हे दुर्लक्षून चालणार नाही. तीर्थक्षेत्र ही आपल्या जीवनातील देवत्व जागवण्यासाठीच आहेत. या तीर्थांमुळे मनाचं मालिन्य जाणार नसेल, उदारता येणार नसेल तर 'तीर्थी धोंडा पाणी। देव रोकडा सज्जन।' असं तुकाराम महाराजांनी म्हणूनच ठेवलंय. हे सारं 'पंढरी पुराण-विठ्ठल पुराण' मी केवळ हमालासारखं आपल्यापर्यंत आणलंय. डॉ.शं. दा.पेंडसे, गुं.फ.आजगावकर, डॉ.पंडित आवळीकर, डॉ.शोभना गोखले, डॉ.शं.गो.तुळपुळे, रा.चिं. ढेरे, ग.ह.खरे, डॉ. दलरी या विद्वानांनी केलेलं संशोधन लेखन यांचा आधार मी हे सांगताना घेतला आहे.

पंढरपूर हे महाराष्ट्राचं धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्र आहे.
काया ही पंढरी,आत्मा हा विठ्ठल।
नांदो केवळ पांडुरंग।।
भावभक्ती भीमा उदक ते वाहे।
बरवा शोभताहे पांडुरंग।।
दया क्षमा शांती हेचि वाळवंटू,
मिळालासे थाट वैष्णवांचा।।
ज्ञान ध्यान पूजा विवेक आनंद,
हाचि नेमुनाद शोभतसे।।
दश इंद्रियांचा एक मेळ केला, ऐसा गोपाळकाला होतसे।।
देखीली पंढरी देही जनी वनीं,
एका जनार्दनीं वारकरी।।
देहीं-वनीं-जनीं पंढरी पाहणारा, ज्ञान-ध्यान-पूजा-विवेक यात रमणारा विठ्ठल हाच आत्मा म्हणणारा वारकरी महाराष्ट्रात दिसावा, असं एकनाथांना वाटत होतं. व्याकुळलेल्या गाढवाला गंगा पाजणारा आणि अस्पृश्याना कवटाळणारा हा 'खरा ब्राह्मण' ही पंढरपूरच्या विठ्ठलाने दिलेली संस्कृती, भक्ती, शक्ती आहे. सालोसाल पंढरीच्या वाटेनं लक्षावधी वारकरी जात आहेत. विठ्ठलाचा, ज्ञानोबा, तुकोबांचा गजर करीत आहेत, पण समतेच्या, सामाजिक प्रगतीच्या वाटेवर आम्ही चाललोय अस जाणवत नाही. पंढरपूरची वारी हा आमचा मोठा वारसा आहे. पण आम्ही तो कसा चालवतो आहो? गावातून वारी गेली की, मागे उरतो नुसता नरक, असं लोक म्हणतात. या साऱ्या वाटेवर अजूनही बायाबापड्यांना सारी लाज गुंडाळून उघड्यावरच आपले विधी उरकावे लागतात. पिण्याच्या पाण्यासाठी तळमळाव लागतं. डोकं टेकायला आसरा मिळवण्यासाठी झगडावं लागतं. भागवत धर्माची पताका मिरवली तरी वारकरी जाती -पातीचे गोट सांभाळतात. जेवणाखाणाची जातनिहाय स्वतंत्र व्यवस्था गुपचूप होते. दरवर्षी लोक हजारो रुपये जमा करून कुठेकुठे जेवण्याची, अथवा इतर कसली व्यवस्था करतात. पण ती अपुरीच असते. परंपरेचे घोडे नाचविणारे दुढ्ढाचार्य साऱ्या आधुनिक सोयीचा यथासांग लाभ उठवतात मात्र परंपरेच्या नावाखाली सर्वसामान्य वारकऱ्याला हाल भोगायला लावतात. 'विसरली जाती वर्णाभिमान' हे फक्त अभंगात, प्रत्यक्षात ते खपवून न घेण्याचाच हट्ट !

खरोखरीच ही वारी हा महाराष्ट्राचा फार मोठा वारसा आहे, तर ह्या वारीत सहभागी होण्याऱ्यांसाठी साऱ्या महाराष्ट्राने कायम स्वरूपाच्या आवश्यक सुविधा का निर्माण करू नयेत? सुलभ शौचालयासारखी स्वच्छ शेकडो शौचालये वारीच्या मार्गावर उभारून ती व्यवस्थित राखण्याची व एकही वारकरी उघड्यावर घाण करणार नाही याची सक्त काळजी घेण्याची व्यवस्था का केली जाऊ नये? 'पंढरपूरला येता येता पंधरा दिवस जागोजागी घाण करीत ये' असा काही दंडक विठ्ठलाने घातलेला नाही ना? कुठल्याही दिंडीत स्वतःचा वेगळा स्वैंपाक करू न देता सर्व वारकऱ्यांसाठी वाटेवर मुक्कामावर स्वैंपाकाची एकच व्यवस्था करून तिथेच वारकऱ्यांना जेवण घेण्याची व जरूर तर विश्रांती घेण्याचीही सोय का केली जाऊ नये? वारीबरोबर जाणाऱ्यांनी वाटेवर जे काही घडते त्याची उबग यावी अशी सत्यकथा केवळ श्रद्धेपोटी अजून दडवली आहे. विठ्ठलाची शपथ आहे, वारीबद्धल काहीही वाईट लिहू नका, अशी गळ भलेभले 'हभप' घालतात असं काही लेखकांनी लिहिलं आहे. असं का व्हावं? सगळी घाण सोवळ्यात दडवण्याची युक्ती कशासाठी? हल्ली वर्तमानपत्रात फोटो येण्यापुरते बडे लोक ह्या वारीला कुठेकुठे सामोरं जातात, पण हे सारं तेवढ्यापुरतीचं असतं.

पंढरपूरची वारी हा प्रत्येक मराठी माणसाने घ्यायला हवा असा अनुभव आहे. ह्या वारीनेच एककाळ महाराष्ट्राने फार मोठं सामाजिक, सांस्कृतिक परिवर्तन घडवून आणलं आहे. या वारीचा उपयोग करून आपल्या धर्माचे घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न ख्रिश्चन मिशनऱ्यांनी पद्धतशीरपणे करून बघितला आहे. रेव्हरंड जे.मरे मिचेल याने 'पंढरपूरची यात्रा' नावाचं एक पुस्तकही १८५५ मध्ये काढलं होतं. १८७३ सालात पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेल्या एका वैराग्याने पांडुरंगाच्या पायावर धोंडा मारला. पायाला थोडी नुकसानी पोहोचली. मागे आधार देऊन हा पाय पक्का करण्यात आला व तेव्हापासून पाय कवळण्याची पद्धत थांबवून नुसतं पायावर डोकं टेकवण्याची पद्धत सुरू झाली. या घटनेचाही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी वापर केला व 'जो देव आपले रक्षण करू शकला नाही त्याची पूजा करण्यातली निरर्थकता हिंदूंना आता तरी समजेल' असं म्हटलं होतं. या कुत्सितपणाला हिंदूंनी ठणठणीत जबाब दिला आणि 'पंढरपूरचं महात्म्य कमी होणार नाही.' असंही ठामपणे सांगून टाकलं.

आजही पंढरपूरच्या वारीत घुसून वारकऱ्यांची सेवा करण्याचा आव आणत अन्य गोष्टी करणारी परधर्मीय मंडळी आहेत. ह्या वारीचा जनजागृतीसाठी, सामाजिक जागृतीसाठी आणि एकंदरीनेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकांच्या श्रद्धेला धक्का न लावता जरूर वापर करता येईल. पण हा विचार प्रत्यक्षात यावा म्हणून उमेदीच्या तरुणांनीच प्रयत्न करायला हवेत. ही वारी करून करून भागलेल्यांची, लागले रे पैलतीरी डोळे म्हणणाऱ्यांची, काही करायला न उरलेल्या तद्दन निष्क्रियांची असता कामा नये. ही महाराष्ट्राची धमनी आहे. मराठी तरुणांना सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काही करून दाखविण्यासाठी उपलब्ध असलेली ही जागृत शक्ती वापरली जायला हवी. 'यंदाच्या पालख्या गेल्या, पुढच्या वर्षी येणार का मंडळी पालखीबरोबर काही करून दाखवायच्या उमेदीसह' असं म्हणत तरुणांच्या संघटना पुढे यायला हव्यात.

*-हरीश केंची*

No comments:

Post a Comment

मोदींचं ठाकरे प्रेम.....?

"गोध्रा हत्याकांड, दंगलीनंतर मोदींची गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी करायचं वाजपेयी अडवाणी यांनी ठरवलं होतं. पण शिव...