Sunday, 9 July 2017

भाजपेयींची किंकर्तव्यमूढता...!

*भाजपेयींची किंकर्तव्यमूढता...!*

"भाजपच्या आयुष्याचं हे ३७ व वर्ष आहे. एवढ्या कालावधीत हा पक्ष शून्यातून २८२ संसदसदस्यांपर्यंत पोहोचलाय. अर्थात, ही वाटचाल केवळ एक नवा पक्ष जन्माला आला आणि त्यानं यश मिळवलं, अशी झालेली नाही. या पक्षाच्या मागे भारतीय समाजातील सनातन विचार करणारा वर्ग, त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा ९२ वर्ष वयाचा 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' भक्कमपणे उभा आहे. संघाच्या पाठींब्याने पूर्वी जनसंघ संसदीय राजकारणात दखलपात्र होता. तर बऱ्याच काळानंतर तो 'भाजप' अवतारात सत्ताधीश झाला. आता सारंच साध्य केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडल्यानंतरही जे त्याचं उत्तर शोधत नाहीत, अशांच्या हातातील  सारंच साध्य मानलेलं गेल्यानंतर जी अवस्था होते, ती भाजपची झालेली आहे."
---------------------------------------------

भारतीय जनता पक्षानं आपलं बहुमत दिसताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाला 'राष्ट्रपती'पदावर बसविण्याची तयारी चालविली आहे. यापूर्वी अटलबिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असताना डॉ. अब्दुल कलाम यांना राष्ट्रपतीपदावर बसविले होते पण ते संघाशी संबंधित नव्हते. आता प्रथमच एक संघ स्वयंसेवक राष्ट्रपती होतो आहे. रामनाथ कोविंद हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे 'फाईंड' आहेत. वरिष्ठ भाजपेयी राष्ट्रपती होण्याची चिन्हे असतानाही मोदींनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यासारख्या नेत्यांना जाणीवपूर्वक बाजूला ठेवलं. ही निवड करताना मोदींनी संघालाही विश्वासात घेतलं नाही, किंबहुना संघाशी विचार विनिमय करायचंही टाळलं. मात्र याबाबत कुणी ब्र काढताना दिसलं नाही. मोदींच्या दबंगगिरीपुढे कुणाचं काही चालत नाही. मोदींच्या या दबंगगिरीमुळे केवळ भाजपेयींच नाही तर रा.स्व.संघ सुद्धा हतबल झालाय.

राजकारणातील जेव्हा शिस्तीची चर्चा होते, तेव्हा रा.स्व.संघ आणि भाजप यांचा उल्लेख केला जायचा. अर्थात हे कधीपर्यंत? तर भाजपला केंद्रात सत्ता मिळाली नव्हती तोपर्यंत, केंद्रात सत्ता मिळाली आणि सत्तेच्या कुरणात जे होतं, तेच भाजपच्या नेत्यांचं झालंय. सारं चित्रच बदललं आहे. भाजप म्हणजे 'जातीयवादी काँग्रेस' आहे आणि काँग्रेस म्हणजे 'सेक्युलर भाजप' बनलेत. असं असलं तरी पूर्वी भाजपच्या नेतृत्वावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा 'रिमोट' चालायचा, त्यामुळे किमान वचक तरी असायचा. परिस्थिती फारच हाताबाहेर जातेय, असं वाटायचं, तेव्हा नागपूरच्या रेशीमबागेत हालचाल व्हायची आणि सरसंघचालक हंटर घेऊन बाहेर पडायचे. त्याबरोबर सगळे चिडीचूप व्हायचे. नाठाळाना त्यांची जगा दाखवून दिली जायची. आगाऊपणा करणाऱ्यांचे कान टोचले जायचे आणि आपल्या मर्जीतील कुणाकडे तरी सूत्रं देऊन 'शिस्तीत राहा' अशी तंबी दिली जायची. संघाच्या या हंटरबाजीत अगदी बलराज मधोक यांच्यापासून अगदी अण्णा डांगे, अण्णा जोशी, गोपीनाथ मुंढे यांच्यासारखे 'संघनिष्ठ' भाजपेयी राजकारणातून कायमचे गारद झाले. परंतु गेल्या काही दिवसांपासून रा.स्व.संघाचा हा 'रिमोट' बिघडला असावा किंवा त्यातील पॉवर संपली असावी किंवा संघच हतबल झाला असावा की काय? यापैकी कशाचाच अंदाज येत नाही. अशी परिस्थिती निर्माण झालीय. भाजपमध्ये एवढी अनागोंदी यापूर्वी कधीच पाहायला मिळाली नव्हती. कुणालाच कुणाला ताळमेळ नाही. संघाच्या निष्ठावंतांवरही कचरा होण्याची वेळ आली आहे. सत्ता प्रबळ बनली असून संघटनेला कस्पटासमान वागणूक मिळत असल्याचं चित्र दिसत आहे, जे यापूर्वी कधीच पाहायला मिळालं नव्हतं. मोदींच्या दबावापुढे संघ एवढा हतबल झाला की, आपल्या सच्च्या कार्यकर्त्यांसाठी काही करण्यास कुणीही पुढे येत नाही. संघातून वा भाजपमधून रिटायर झालेले नेते  'व्यक्तीपेक्षा संघटना मोठी' असे सुविचार टीव्हीसमोर सांगू लागतात तेव्हा ते हास्यास्पद वाटू लागते.

भाजपच्या आयुष्याचं हे ३७ व वर्ष आहे. एवढ्या कालावधीत हा पक्ष शून्यातून २८२ पर्यंत पोहोचला आहे. अर्थात, ही वाटचाल एक नवा पक्ष जन्माला आला आणि त्यानं लगेच यश मिळवलं, अशी झालेली नाही. या पक्षाच्या मागे भारतीय समाजातील सनातन विचार करणारा वर्ग, त्या विचारांचं प्रतिनिधित्व करणारा ९२ वर्ष वयाचा 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' भक्कमपणे उभा आहे. संघाच्या पाठींब्याने पूर्वी जनसंघ संसदीय राजकारणात दखलपात्र होता. तर बऱ्याच काळानंतर तो 'भाजप' अवतारात सत्ताधीश झाला. सारंच साध्य केल्यानंतर पुढे काय? असा प्रश्न पडल्यानंतरही जे त्याचं उत्तर शोधत नाहीत, अशांच्या हातातील  सारंच साध्य मानलेलं गेल्यानंतर जी अवस्था होते, ती भाजपची झालेली आहे.

भाजपच्या बाबतीतली पूर्वीची सारी गृहीतकं संघ का पुसत आहे? तसं करताना संघ नेमकं काय करायला निघालं आहे? संघाला यातून काय साध्य करायचं आहे? ते बघितलं पाहिजे. संघाचं या देशावर सांस्कृतिक अधिसत्ता आणण्याचं उद्दिष्ट स्पष्ट आहे. अर्थात, ते ही बाब सांगतात वेगळ्या शब्दात. मात्र मतितार्थ तोच. थोडं विषयांतर, मुद्दा समजून घेण्यासाठी!.... भारतीय समाजाच्या जीवनाला जी जी क्षेत्र स्पर्श करतात, त्यात आपल्या विचारांचे गट कार्यरत असावेत, असा विचार मानून 'संघ परिवारा'च्या इतर शाखा सुरू झाल्या. दीनदयाळ उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी हे संघाच्या राजकीय शाखेचे; जनसंघाचे निर्माते बनले. जनसंघ-भाजपची स्थापना १९५२ मधली., पण त्याला राजकीय यश मिळायला १९६७ साल उजाडावं लागलं. त्यावेळी उपाध्याय, मुखर्जींसारखे बडे नेते होते. प्रेमचंद डोग्रा, पितांबर दास, मौळीचंद शर्मा, ए. रामाराव हे ही होतेच. बलराज मधोक त्यावेळी लोकांना पेटवणारी भाषणं करायचे. सर्व तऱ्हेची व्हरायटी संघाच्या या राजकीय शाखेकडे होती. मात्र विस्तार होत नव्हताच.

संघाच्या दृष्टिकोनातून त्यांचं उद्दिष्ट महत्वाचं. संघटनेचं नांव, माणसं आणि त्या माणसाचं व्यक्तिगत कर्तृत्व दुय्यम असतं. त्यामुळेच आणीबाणीनंतर निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीचा लाभ उठविण्यासाठी संघानं पंचवीस वर्षं मेहनत घेऊन वाढवलेला भारतीय जनसंघ हा पक्ष जनता पक्षात विलीन करताना फारशी खळखळ केली नाही. आपल्या अस्तित्वाचा आग्रह धरला नाही. मात्र पुढच्याच दहा वर्षांत राजीव गांधींच्या विरोधात असंच वातावरण तयार होत असताना आधी जनमोर्चा आणि त्यानंतर जनता दलात विलीन व्हायला नकारही दिला अर्थात, हा नकार नावासाठी नव्हता; तर अस्तित्वासाठीच होता. जनता पक्षात स्वतंत्र अस्तित्वाची खात्री होती, जी पुढे सिध्द झाली. जनता दलात घुसून दुसऱ्यांदा फसवणूक करणं आणि करुन घेणं शक्य नव्हतं. असो.

आपली ओळख आणि पुरेसा विस्तार झाल्यानंतर आपल्या राजकीय शाखेच्या जन्मावेळी नांव ठेवलं.... भारतीय जनता पक्ष. उद्दिष्ट होतं, एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी केंद्रात आपली सत्ता आणणं. त्यावेळी पहिल्या पिढीतले बहुतेक सारे जनसंघीय नेते बाद होत चालले होते. ही जबाबदारी वयाची पन्नाशी ओलांडलेल्या वाजपेयी, अडवाणी यांच्याकडे देण्यात आली. अडवाणींनी कडवेपणाने आणि वाजपेयींनी सौम्यपणे आपले मुद्दे मांडायचे. प्रसंगी दोघांनी परस्परविरोधी बोलायचं, पण ते अंतिमतः परस्परपूरक ठरलं पाहिजे. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या वर्गाला सनातन भाषा आवडते आणि जो वर्ग मध्यममार्गी आहे, तिथपर्यंत संघाची ही राजकीय शाखा पोहोचली. परिणामी २ खासदारांच्या पक्षाने १०० त्यानंतर १७५ तर आता २८२ पर्यंत मजल मारली. या प्रवासात ज्यांचा के.सी.सुदर्शन यांनी 'नापास विद्यार्थी' म्हणून ज्यांचा उल्लेख केला ते बंगारु लक्ष्मण, व्यंकय्या नायडू, कुशाभाऊ ठाकरे, जना कृष्णमूर्ती हे अध्यक्षपदी आले. हे लोक काही लोकनेते नव्हते, त्यांना राष्ट्रीय ओळखही नव्हती. मात्र पक्षाची अध्यक्षपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी ही माणसं त्या परिस्थितीत तेव्हा योग्य म्हणून गणली गेली होती.

गडकरी यांना अध्यक्षपद दिल्यानंतर राष्ट्रीय राजकारणातल्या साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. राष्ट्रीय पक्षात अशी प्रादेशिक नेतृत्वाची गरज पडल्यास प्रतिष्ठापना करायची असते. राष्ट्रीय नेते नव्हे; तर राष्ट्रीय उंची नसणाऱ्यांनाही अध्यक्षपद मिळाले आहे. त्याने राष्ट्रीय पक्ष संपतो किंवा वाढतो; असं होत नाही. पक्ष आपल्या पद्धतीनं चालतच असतो.भाजपचं तसंच आहे. आणि गडकरींना हे चांगल माहीत होतं की, भाजपचं नवनिर्माण होण्यासाठीची ही सुरुवात आहे. आपलं अस्तित्व ही त्या कामातली पहिली समिधा आहे.

गडकरी यांच्यानंतर पुन्हा पक्षाध्यक्षपदावर आलेल्या राजनाथसिंह यांना पंतप्रधानासाठी योग्य आणि सर्वसंमत असा नेता पक्षात दिसत नव्हता. तेव्हा मोदींनी जेटली यांच्या माध्यमातून आपलं नांव पुढं रेटले. पक्षाने त्यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी काही अटी घातल्या, सर्वप्रथम सुनील जोशी यांना कार्यकारिणीतून हटविण्याचा आग्रह धरला. तो साध्य होताच त्यांनी छोट्या छोट्या गोष्टी पुढे केल्या. गडकरी यांनाही त्यांचा विरोध होता, पण भय्यु महाराजांनी मध्यस्ती केली, त्यामुळे त्यांचा गडकरी-विरोध दूर झाला. त्यांची पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर होताच पक्षाची सूत्रे ताब्यात घेतली, गुजरातमधील आपले सहकारी अमित शहांना पक्षाध्यक्ष केले. त्यानंतरचा इतिहास आपल्या समोर आहेच. भाजप कधीच व्यक्ती साक्षेप पक्ष नाही तो विचारांवर आधारलेला पक्ष आहे असे सांगणाऱ्या भाजपची पिसे गळून पडली आहेत. पक्षावर विचारांचा नव्हे तर मोदी-शहांचा पगडा निर्माण झालाय, या 'मोदीशाही'ने मग सत्तेसाठी सर्वकाही असंच धोरण राबविले. सत्ता येताच त्यांनी केवळ सत्तेचीच नव्हे तर पाठोपाठ पक्षांचीही सूत्रे हाती घेतली, या घडामोडीत त्यांना रोखणारा कुणीच निपजला नाही. त्यामुळे अमर्याद सत्ता मोदी शहांच्या हाती आली. भाजपेयींना सत्तेचं चाटण मिळाल्यानंतर संघ आणि पक्ष दोघेही हतबल झालेत, असेच चित्र सध्या तरी दिसते आहे.

- हरीश केंची

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...