Saturday, 15 July 2017

नितीश यांची बिहारी राजनीती

नीतिश यांची 'बिहारी' राजनीती...!

"एक मान्य करावं लागेल की, भाजपेयींचं नशीब फळफळतंय! प्रमुख विरोधीपक्ष म्हणून काँग्रेसचं नेतृत्व विश्वसनीयता, दिशा, नीती,धोरण, राजकीय चाली आणि त्याची अंमलबजावणी यात सपशेल अपयशी ठरलं आहे. मायावती, ममता, लालू, मुलायम यासारखे प्रादेशिक सेनापती यापूर्वीच आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर नाकाम झाले आहेत. भारतीय सुशिक्षितांच्या मनांत थोडीशी आशा पल्लवित करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या केजरीवाल यांच्या वाचाळपणाने त्यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या, त्यामुळे त्यांना महापालिका निवडणुकीत सपाटून मारही खावा लागला त्यामुळे त्यांची बोलती बंद झाली, अशा वातावरणात उरलेला तसा मोठा आणि परिणामकारक म्हणू असा विरोधी पक्ष जनता दल युनायटेड होता, अखेर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत तोही भाजपेयींच्या साथीला गेला. त्यामुळे आता विरोधीपक्षांच्या पंखात एकजुटीने लढण्याचं बळच नाहीस झालंय."
--------------------------------------------
एकेकाळी नरेंद्र मोदी यांचा कट्टर विरोधक म्हणून नितीशकुमार ओळखले जाई. एनडीएमध्ये असताना, अटलजींच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी असताना ते गुजरात दंगलीच्यावेळी एनडीएतुन बाहेर पडून मोदींवर टीकास्त्र उगारले होते, बिहार राज्याच्या निवडणुकांच्यावेळी ती अधिक धारदार झाली. त्यामुळे बिहारमध्ये भाजपेयींना हार खावी लागली. या निवडणुकीत भाजपेयींसमोर विरोधी पक्षाचं 'महागठबंधन' निर्माण झालं आणि त्याचं नेतृत्व नितीशकुमार यांच्याकडे होतं. साहजिकच या विजयानंतर नितीशकुमारांकडे मोदींसाठीचा पर्याय म्हणून पाहिलं गेलं. मात्र कालांतरानं यात बदल झाला, गेल्या काही दिवसात त्यांनी मोदी सरकारच्या ध्येयधोरणांना, नीती आणि निर्णयांना सतत पाठींबा दिला तेव्हा सर्वांच्याच भुवयां उंचावल्या. नोटबंदीच्या निर्णयाला समस्त विरोधीपक्ष विरोधात असताना नितीशकुमारांनी मोदींना उघडपणे पाठींबा दिला. पाठोपाठ देशभरात खळबळ माजविणारा गोहत्याबंदी कायदाही त्यांनी स्वीकारला. जीएसटी साठी मोदींसरकारने बोलावलेल्या मध्यरात्रीच्या संसदच्या अधिवेशनाला सर्व विरोधकांनी बहिष्कार घातला असताना तेव्हाही नितीशकुमारांनी आपला प्रतिनिधी म्हणून आपल्या अर्थमंत्र्याना पाठविले होते.

या साऱ्या पार्श्वभूमी लक्षात घेता, राष्ट्रपतीपदाची निवडणूक जसजशी जवळ येतेय तसतशी बिहारमधल्या या तथाकथित महागठबंधनाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो आहे. त्यातच या महागठबंधनातील लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबियांवर पडलेले छापे आणि त्याबाबत नितीशकुमार यांनी बाळगलेले मौन यानंतरही, बिहारमधल्या या मोठ्या आणि सक्षम अशा जनता दल युनायटेड या पक्षाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न महागठबंधनातील पक्षांनी केला. भाजपेयींच्या रामनाथ कोविंद यांच्यासमोर त्यांच्याचप्रमाणे दलित कार्ड असलेल्या मीराकुमार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून आणले. 'बिहारकी बेटी' असेल त्यातही ती दलित आणि महिला असेल तर नितीशकुमार पाठींबा देतील असा कयास होता मात्र तो उधळत नितीशकुमार भाजपेयींबरोबर जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिले.

नितीशकुमारांची ही राजकीय चाल म्हणा नाहीतर व्युहरचना म्हणा ती त्यांच्या परिपकवतेचं दर्शन घडवतं. भाजपेयींशी जवळीक साधतानाच त्यांनी एकत्र आलेल्या विरोधीपक्षांना आपलं अस्तित्व दाखवून दिलं. नितीशकुमारांची ओळख एक सक्षम प्रशासक म्हणून आहे. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. ते जेव्हा पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा बिहारची राजकीय, सामाजीकच नव्हे तर कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. त्यातच राज्याच्या तिजोरीत खडखडाट होता. अशावेळी त्यांनी सुधारणावादी, सकारात्मक आणि विकासाचं राजकारण करीत बिहारला प्रगतीपथाकडे नेलं. कायदा आणि सुव्यवस्था आपल्या खिशात आहे असं समजणाऱ्या बाहुबली नेत्यांच्या मुसक्या आवळून त्यांना वठणीवर आणलं. आणि सत्तेवर जबरदस्त मांड ठोकली. याचे सारेच कौतुक करतात अगदी भाजपेयींही!

मोदींचं राजकारण हे विकासाचं राजकारण आहे. मोदी म्हणजे विकास, मोदी म्हणजे आक्रमक राष्ट्रवाद, मोदी म्हणजे आक्रमक गतिशीलता, मोदी म्हणजे पारदर्शकता, यासारख्या प्रचारपुढे टिकायचं असेल तर आपली राजकीय आणि प्रशासकीय प्रतिमादेखील तेवढीच उजळ हवी हे अन्य विरोधीपक्षांच्या नेत्यांपेक्षा नितीशकुमारांना अधिक कळतं. लालूप्रसाद यादव, मुलायमसिंग, ममता बॅनर्जी, मायावतीसहित तमाम नेत्यांच्या तुलनेत नितीशकुमारांनी आपली प्रतिमा स्वच्छ आणि प्रतिभाशाली ठेवलीय.

आज देशातल्या इतर मुख्यमंत्र्याच्या तुलनेत नितीशकुमार यांची कारकीर्द अधिक चमकदार आहे. नितीशकुमार चार वेळा, नवीन पटनाईक तीनवेळा मुख्यमंत्री बनलेत. इतर मुख्यमंत्री हे प्रथमच वा दुसऱ्यांदा बनलेत. शिवराजसिंह हे सिनिअर मुख्यमंत्री आहेत पण ते व्यापम घोटाळ्यात अडकलेत. आता तिथंही महाराष्ट्राप्रमाणे शेतकऱ्यांचं आंदोलन उभं झालंय. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे या ललित मोदी प्रकरणात अडकलेत. ममता बॅनर्जी या सिनिअर मुख्यमंत्री आहेत पण नारदा, शारदा, रोजव्हॅलीसहित अनेक घोटाळ्यात त्यांचे नाव गोवलं गेलं आहे. नितीशकुमार आणि नवीन पटनाईक हे अशा आरोपांपासून दूर राहिलेले आहेत. हे सारं पाहता, नितीशकुमार यांना मोदींना आव्हान देणारा वा पर्याय म्हणून जर राहायचं असेल तर त्यांना आपली प्रतिमा डागाळू नये याची खबरदारी घ्यावी लागेल. पण नितीशकुमार यांच्या नशिबानं त्यांना लालूप्रसाद यादवांबरोबर महागठबंधन करावं लागलं आहे. शहाबुद्दीन सारख्या बाहुबली नेत्यांशी लालूंचे असलेले संबंध, केवळ लालूच नव्हेतर त्याच्या कुटुंबियांवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप, त्यांच्या घरावर पडलेले छापे, या साऱ्या बाबींमुळे नितीशकुमार यांना स्वच्छ राहण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय.

लवकरच होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर नितीशकुमार महागठबंधनशी निगडित राहतील काय असा सवाल राजकीय निरीक्षकांना पडलाय. बिहारमधील सत्तेसाठीच संख्यात्मक गणित नितीशकुमार यांच्याकडे आहे महागठबंधन जर तोडण्याचा प्रयत्न लालू वा काँग्रेसकडून झाला तर सरकार अस्थिर होणार नाही. राज्य विधानसभेत नितीशकुमार यांचे संख्याबळ ७१ आहे आणि भाजपचे ५३ सदस्यांचे आहे त्यामुळे राजद आणि काँग्रेस जरी दूर झाले तरी नितीशकुमार यांचं काही बिघडणार नाही.

पण इथलं राजकारण वेगळंच आहे. नितीशकुमार यांच्या व्होटबँकेत दलित, मुस्लिम, यांची संख्या लक्षणीय आहे. त्याशिवाय ओबीसी देखील मुख्यपणे आहेत. नितीशकुमार यांनी २००२च्या दरम्यान गुजरातमधील दंगलीच्या मुद्द्यावर मोदींना उघडपणे विरोध करायला सुरुवात केली. भाजपेयींनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करताच त्यांनी भाजप बरोबर असलेली तब्बल १७ वर्षांची युती तोडली होती, याला आता केवळ तीन वर्षे झालीत. तीन वर्षापूर्वी मोदी जसे त्याहून अधिक मजबूत आज झाले आहेत. आता कोणत्या मुद्द्यावर नितीशकुमार भाजपबरोबर जातील हे पाहणे लक्षणीय ठरणार आहे. देशात भाजपचं वादळ घोंघावत आहे, मोदी नावाच्या झंझावातात सगळेच पक्ष उडून गेले आहेत. तिथे मोदींशिवाय कुणाचीच छबी दिसत नाही. भाजपशी पूर्वीपासून आधाडी केलेले, शिवसेना वगळता सारे पक्ष थोडीशी कुरबुरी करीत मोदींचं गुणगान करताना दिसतात. अशा परिस्थितीत मोदी वा भाजप नितीशकुमार यांना एनडीएत घेतील अशी शक्यता दिसत नाही. त्यातही आपल्याला विरोध करणाऱ्यांना कधीही माफ न करण्याचा मोदींचा स्वभाव पाहता नितीशकुमार हे मोदींच्या जवळ जाणार नाहीत. आपण जर मोदीजवळ गेलो तर आपलं काही खरं नाही हे नितीशकुमार हे ओळखून आहेत. त्यामुळे नितीशकुमार जसे भाजपच्या जवळ जात असल्याचे दाखवताहेत तसाच विरोधही करताहेत. अगदी शिवसेनेसारखं! नितीशकुमार मोदी यांच्याशी थोडंसं अंतर राखूनच वागायचं असं ठरवताना दिसताहेत. मोदी यांच्याशी जवळीक साधतानाच त्यांनी काँग्रेस-लालूप्रसादांशीही संबंध ठेवले आहेत. कारण ते राहतील ते केवळ विरोधीपक्ष म्हणूनच. कारण मोदींचा प्रभाव वा झंझावात ओसरला तर त्यांच्यासमोर नितीशकुमार यांचीच प्रतिमा उजवी ठरणार आहे. मोदींच्या बरोबर गेले तर त्यांचे मांडलिकत्व स्वीकारावं लागेल हे पाहता नितीशकुमार एनडीए आणि महागठबंधन या दोघांशीही ठराविक अंतर राखूनच वावरताहेत. मात्र ही दोन्ही दगडावर पाय ठेवणारी कृती कोणतं वळण घेईल याची भीती त्यांना असावी.त्यामुळे त्यांना ही जोखीम उचलावीच लागेल. पाहू उआ आगे आगे होता है क्या....!

- हरीश केंची.


प्रभंजन साठी लेख.

No comments:

Post a Comment

दान पावलं....देवा दान पावलं...!

"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...