Friday 15 November 2019

जितं मया... जितं मया...!


"महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून तीन आठवडे उलटलेत, राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू झालीय. नोकरशहांचं राज्य सुरू झालंय. मतदारांनी मोठ्या विश्वासानं महायुतीच्या हाती सत्ता सोपवली. पण घात झाला. महायुतीतला विश्वास संपला. आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे, सुरू झालं शब्द फिरविण्यात पटाईत असलेल्या भाजपनं इथं आपला डाव साधला. अहंकार जागा झाला. 'मी पुन्हा येईन' असा घोषा लावलेल्या मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नव्हती. इकडं तीन पायाच्या गाडीत सेना विराजमान झालीय. सत्तेच्या सारीपाटावर केवळ आमदारच नाहीत तर सर्वसामान्यही आहेत याचा भाजपेयींना विसर पडलाय. शिवाय केवळ आपणच हिंदुत्ववादी आहोत हे दाखविण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलाय. देशात रामराज्य पक्ष, हिंदू महासभा यासारख्या हिंदुत्ववादी पक्षांना संपवल्यानंतर आता त्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे."
--------------------------------------------------
*रा* ज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे १०५ आमदार निवडून आले आणि शिवसेनेचे ५६ आमदार विजयी झाले. महाराष्ट्रातील जनतेनं महायुतीला पुढील पाच वर्षे सरकार बनवण्याचा जनादेश दिला. पण दोन पक्षात जागा वाटप आणि सत्ता वाटप करण्यासाठी जो फॉर्म्युला ठरला होता, त्यापासून देेवेंद्र फडणवीस यांनी घुमजाव केल्यामुळं गेली पाच वर्षे आपल्याकडं असलेली सत्ता भाजपेयींना गमावावी लागली. ‘अब की बार २२० पार’ अशी घोषणा भाजपेयीं नेत्यांनी निवडणूक प्रचारात दिली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर युतीला अडीचशे जागा मिळतील अशी वल्गना केली होती. फडणवीस यांनी तर आपल्या धुवाधार प्रचारसभांतून 'मी पुन्हा येईन', अशी ठिकठिकाणी घोषणा केली. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांंनी सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भाजपला सर्वप्रथम सरकार बनवण्याची संधी दिली, पण भाजपनं शिवसेनेचं समर्थन मिळत नसल्यानं आपण सरकार बनवू शकत नाही, अशी राज्यपालांकडे कबुली दिली. केवळ अट्टाहास आणि अहंकार यातून भाजपची सत्ता गेली.
*राज्यात मोदींच्या कारभाराचं अनुकरण*
लोकसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळालं. राज्यातील जनता ही भाजपबरोबरच आहे, असं पक्षानं गृहित धरलं. मतदारांना देश पातळीवर मोदी-शहांशिवाय पर्याय नाही आणि राज्यात देवेंद्र फडणवीस हेच सर्वेसर्वा आहेत, अशा समजुतीत पक्षाचे नेते वावरत होते. देश पातळीवर मोदींना आणि राज्यात फडणवीस यांना आव्हान देणारा कोणी विरोधक नाही, अशा भ्रमात भाजपेयीं नेते आणि स्वतः फडणवीस होते. समोर विरोधकच नाही, मग लढायचे कोणाशी? निवडणुकीत मजाच येत नाही, असे वक्तव्य फडणवीस यांनी केलं होेतं. समोर कोणी पैलवानच लढायला नाही, असे वारंवार सांगून आपणच राज्याचे एकमेव 'बॉस' आहोत, अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. राज्याच्या सर्वोच्च पदावर असलेल्या भाजपेयीं नेत्याच्या वागण्या बोलण्यात सर्वत्र अहंभाव जाणवत होता. लोकांना तो मुळीच आवडला नाही. ‘मी पणा’चा एवढा अहंकार कशासाठी, अशी चर्चा पक्षातच ऐकायला मिळाली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाट असतानाही राज्यातील जनतेनं भाजपला स्पष्ट बहुमत दिलेलं नव्हतं. तेव्हा तर भाजपनं शिवसेनेशी पंचवीस वर्षांची युती तोडून स्वबळावर निवडणूक लढवली होती. तेव्हा भाजपचे १२२ आमदार विधानसभेत निवडून आले आणि मोदींचा आशीर्वाद लाभून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. तेव्हा मुख्यमंत्रीपदाचे स्पर्धक असलेल्या एकनाथ खडसे यांना फडणवीसांनी पाच वर्षांत त्यांची जागा दाखवून दिली. २०१४ मध्ये आलेले अल्पमतातील सरकार फडणवीस यांनी चालवून दाखवलं, म्हणून त्यांचं नेहमीच कौतुक झालं. शिवसेनेला तीन महिन्यानंतर सरकारमध्ये त्यांनी सहभागी करून घेतलं, पण सेनेला नेहमीच त्यांनी आपल्या नियंत्रणाखाली ठेवलं. शिवसेनेला दुय्यम खाती दिली, सेनेच्या मंत्र्यांना सरकारी मान होता, पण अधिकार फारसे नव्हते. कोणत्याही मंत्र्याला फडणवीस यांनी निर्णय स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं. गेल्या पाच वर्षांत भाजपनं महापालिका, नगरपरिषदा, जिल्हापरिषदा, पंचायत समित्या, अशा निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद लक्षणीय वाढल्यामुळं फडणवीस यांचं महत्त्व वाढलं. फडणवीस म्हणजेच पक्ष संघटना, फडणवीस म्हणजे सरकार, असं समीकरण बनलं होतं. गेली पाच वर्षे राज्यात सर्व अलबेल आहे, राज्यावर फडणवीस यांची पूर्ण पकड आहे, असं चित्र रंगवलं गेलं. पक्षात फडणवीस यांच्या विरोधात मोठी धूसफूस होती, पण ती कधी मोदी-शहांपर्यंत पोहोचलीच नाही. निवडणूक प्रचारात मोदी-शहांनी राज्यात पुढचं सरकार फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येणार, असं ठिक-ठिकाणी सांगितलं होतं. दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र अशी सुपरहिट जोडी गेल्या पाच वर्षांत जनतेनं अनुभवली, असं स्वतः मोदींनीच जाहीर केल्यावर फडणवीसांच्या कार्यपध्दतीविषयी पक्षातून तक्रार करायला कोणाची हिम्मत होणार?
*सेनेला सत्तेचा वाटा देण्यात हात आखडता*
दिवाळीच्या पूर्वसंध्येला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि दिवाळी फराळ संमेलनाला बोलावलेल्या पत्रकारांपुढे बोलताना फडणवीस यांनी शिवसेनेबरोबर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद असं काही ठरलेलं नाही, असं जाहीर करून भाजपच्या पायावर कुर्‍हाड मारली. दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला मातोश्रीवर जावं, असं त्यांना वाटलं नाही. पण मुख्यमंत्रीपदाच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आणखी कोणी वाटेकरी नको, याबाबत मात्र ते दक्ष राहिले. फिप्टी-फिप्टी असं काही ठरलेले नाही, असं फडणवीसांनी जाहीर केल्यामुळं उद्धव ठाकरे कमालीचे दुखावले गेले. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री, असं यावेळी ठरलेले नव्हते. असं ठरवलं तर दोन्ही पक्ष एकमेकांचे आमदार पाडण्याचा खेळ करण्याचा धोका असतो, म्हणून उद्धव यांनी लोकसभेला युती करताना विधानसभेला जागा वाटप आणि सत्ता वाटपात शिवसेनेला समसमान वाटा मिळाला पाहिजे, हे अमित शहा व फडणवीस यांच्याकडून कबूल करून घेतलं होतं. फडणवीस यांनीच घुमजाव केलं आणि अमित शहा या विषयावर काही ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. त्यामुळेच भाजपनं आपली फसवणूक केली, हे शिवसेनेच्या लक्षात आलं आणि त्यातून भाजपबरोबर सरकार स्थापनेसाठी जायचं नाही, असं सेनेनं ठरवलं. आपल्याला खोटं ठरवण्याचा फडणवीस यांनी प्रयत्न केला, म्हणून ठाकरे आणखी भडकले. आमचेच सरकार आणि आमचा मुख्यमंत्री असं शेवटपर्यंत सांगणार्‍या भाजप कोअर कमिटीचे नेते तोंडावर आपटले. हिंदुधर्मीयांमध्ये देशात फूट पडायला नको म्हणून स्वतः शिवसेनेनं त्याग केला आणि भाजपला देशभरात मोठं होऊ दिलं. जेव्हा केंद्रात मोदी सरकार आलं. तेव्हा सेनेला वाळीत टाकलं गेलं. अगदीच फरपट नको म्हणून केंद्रीय अवजड उद्योग हे बिनमहत्वाचं मंत्रिपद दिलं. पण एकही खासदार नसलेल्या रामदास आठवलेंना मात्र सामाजिक न्याय सारखं महत्वाचं खातं दिलं. ज्या नितीशकुमार यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर अगदी टोकाची टीका केली त्यांना पुन्हा भाजपनं मित्र बनवून सात-सात मंत्रिपद दिली. देश पातळीवर जेव्हा अटलबिहारी यांना सरकार बनवण्यात अडथळा येत होता. तेव्हा आधी सरकार स्थापन करा, शिवसेनेला काहीही मिळाले नाही तरी चालेल हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. जेव्हा २०१४ साली महाराष्ट्रात भाजपेयींना १२२ सीट मिळाल्या तेव्हा चक्क शिवसेनेला टाळून राष्ट्रवादीच्या सोबत बस्तान बांधून सरकार स्थापन करण्याचा भाजपेयींनी प्रयत्न केला आणि नंतर सरकार स्थापन होतच नाही, तेव्हा शिवसेनेला सोबत घेतलं पण त्यानंतरही कोणतंही मोठं, महत्वाचं खातं, मंत्रिपद दिलं नाही. पाच वर्षे कोणतेही मोठे मंत्रिपद न घेता शिवसेनेनं भाजपाला पाच वर्षे सत्तेत मदत केली.
*सेनेनं समजून घेतलं, भाजपेयींची कुरघोडी*
देशात, राज्यात भाजपला मोठं करण्यात शिवसेनेचा मोठा वाटा. पण जेव्हा भाजप देशात मोठा राजकीय पक्ष झाला तेव्हा चक्क शिवसेनेला संपविण्यासाठी, मुंबई महापालिका काबीज करण्यासाठी भाजपेयींनी सर्वतोपरी प्रयत्न केलेत. ज्यावेळी मोदींविरोधात संपूर्ण जग असताना त्यावेळी फक्त शिवसेनाच मोदींजीच्या पाठीशी उभी राहिली. पण तेच मोदी पंतप्रधान असताना मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेविरोधात प्रचारासाठी आले. सरकार शेतकऱ्याच्या विरोधात भूसंपादन कायदा आणत होते तेव्हा शिवसेनेनं, ममता बॅनर्जी सोबत जाऊन विरोध केला ! प्रचंड अवहेलना झाल्यानंतरही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'ऐकला चलो रे' चा नारा दिला! मग स्वतः अमित शहा दोन वेळा मातोश्रीवर येऊन देशात शिवसेना-भाजप एकत्र असणं गरजेचं आहे हे समजावून सांगितलं. केंद्रातल्या मोदींच्या हिंदू सरकार धोका नको म्हणून अमित शहा यांनी केलेल्या विनंतीला मान देऊन निव्वळ देश पातळीवर मोदी-भाजप सरकारला धोका नको म्हणून संयमी भूमिका घेतली आणि पुन्हा मोदी-भाजपेयीं सरकारला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवरील बैठकीनंतर आणि भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युती झाली असून दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जातील. विधानसभेत आमचीच सत्ता येणार असून त्यावेळी पद आणि जबाबदाऱ्या यांचे समसमान वाटप होईल, त्यात अडचणी आल्या तर पक्षाचे वरिष्ठ एकत्रित बसून तो सोडवतील हे जाहीरपणे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. जर समसमान जागा ठरल्या असताना त्या अमित शहांच्या साक्षीनं, जाहीर केलं असताना देखील विधानसभा निवडणुकीत भाजपेयींनी जे नाटकतंत्र केलं ते आठवत असेलच. जागा वाटपावरून फडणवीस यांनी सांगितलं की, आम्ही मोठ्या प्रमाणात मेगा भरती केली असल्यानं आकडे जुळवा जुळव होत नाही. आमची अडचण समजून घ्या, अशी विनंती शिवसेनेला केली, त्याला मान देऊन उद्धव ठाकरे यांनी माघार घेऊन, तडजोड केली आणि कमी जागा घेतल्या. तरीदेखील भाजपेयींनी बंडखोर उमेदवाराला मदत करून शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त जागा स्वतःहून पाडल्या. भाजपेयीं सत्तेसाठी पीडीपी, राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाऊन घरोबा करतात. नितीशकुमारना मित्र बनवते. भाजपेयींच्या १५६ जागा आणि मायावतीच्या ७४ जागा असताना मायावतीला मुख्यमंत्री बनवितात. मग शिवसेनेला ५०-५० ठरले असताना देखील काहीही देणार नसाल तर, राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेना घेत असेल तर मग त्यासाठी कांगावा का करायचा? शिवसेनेनं नेहमीच हिंदुत्वासाठी त्याग केला आहे. भाजपेयींसाठी तडजोड केलीय. अनेक वेळा माघार घेतलीय. पण आज अमित शहा लोकसभा निवडणुकीच्यावेळी सर्वकाही ठरवून जातात, आणि विधानसभा निवडणुकीत राज्याचे निर्णय स्थानिक भाजपेयीं वरिष्ठांनी राज्यात घ्यावं, हे सांगतात हा दुटप्पी पणा नाही का?
*आपल्या प्रतिस्पर्ध्यांना हटविण्यात धन्यता मानली*
मोदी लाटेत मिळालेलं सरकार देवेंद्र फडणवीस टिकवू शकले नाहीत. मतदारांना गृहित धरलं ही सर्वात मोठी त्यांची चूक ठरली. विरोधी पक्षातील दिग्गज नेते त्यांच्या परिवारासह भाजपत आणून त्याचं प्रदर्शन केलं, हे लोकांना पसंत पडलं नाही. ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून भाजपनं आरोप केले, त्या नेत्यांना भाजप प्रवेशासाठी पायघड्या घातल्या, यातून फडणवीस यांनी कोणता संदेश दिला? विरोधकांवर कारवाया, चौकशा, नोटीसा आदी मार्गाने त्रास देणं, हे त्यांच्या अंगलट आलं. पक्षातील विरोधकांना डावलणं, त्यांची उपेक्षा करणं आणि त्यांना गप्प करणं, हेही पक्षाला निवडणुकीत मारक ठरलं. आठ मंत्र्यांना उमेदवारी न देणं आणि आठ मंत्री पराभूत होणं, यानं फडणवीस सरकारची शोभा झाली. पक्ष विस्ताराच्या नावाखाली पक्षात एकाधिकारशाही सुरू झाली. पक्षात जे वरचढ आहेत, त्यांना बाजूला काढलं गेलं. स्पर्धक आहेत त्यांचे पंख कापले. खडसेंना चौकशीत अडकवून त्यांचा कायमचा वचपा काढला. शिवसेनेला नेहमीच आश्‍वासने देऊन झुलवत ठेवलं. आपल्यावर टीका केलेली फडणवीस यांना आवडत नव्हती. फडणवीस हे विरोधी पक्षात असताना भाजपचे प्रभावी व अभ्यासू लोकप्रतिनिधी अशी त्यांची प्रतिमा होती. पण राज्याचे प्रमुख झाल्यावर ते झपाट्याने बदलले. वर्षा हे मुख्यमंत्र्याचं निवासस्थान काँग्रेस सरकारच्या काळात जनतेला खुलं असायचं. रात्री उशीरापर्यंत मुख्यमंंत्री तिथं लोकांना भेटायचे. फडणवीसांनी वर्षाचा दरवाजा जनतेला बंद केला. सह्याद्री वा मंत्रालयात सामान्य जनता त्यांच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. पोहोचले तर नीट भेट होत नाही. फडणवीस यांचा गेल्या पाच वर्षांत सर्वसामान्य जनतेशी संबंध तुटला होता. मंत्रालयात खासगी ओएसडी म्हणून बाहेरील व्यक्तींची गेल्या पाच वर्षांत बरीच भरती झाली. जे सरकारी अधिकारी आहेत, त्यांना ओएसडीपुढे फारसे अधिकार नव्हते. फडणवीस यांनी आपल्या भोवती निवडक अधिकार्‍यांचं कडं निर्माण केलं. गेल्या पाच वर्षांत कारभारात भ्रष्टाचार कमालीचा वाढला. चांगल्या पोस्टींगसाठी बदल्यांमध्ये फार मोठी देवाण घेवाण व्हायची, याची उघड चर्चा ऐकायला मिळायची. कामे करण्यासाठी मध्यस्थांची संख्याही वाढली. महाराष्ट्र हे देशातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्रावर आपली सत्ता राहावी, यासाठी भाजपनं आटोकाट प्रयत्न केला, पण विधानसभेत बहुमताचा आकडा गाठणं जमलं नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा एकही आमदार फुटला नाही. कर्नाटक पॅटर्न करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करणं आज तरी भाजपला शक्य झालेलं नाही. नीतिशकुमार, मायावती, मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपद देणार्‍या भाजपला तीस वर्षांची नैसर्गिक मैत्री असलेल्या शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रपद देणं जीवावर आलं, हाच अहंकार भाजपला नडला नि महाराष्ट्रातील सत्ता गमवावी लागली. फडणवीस पुन्हा येत नाहीत म्हणून भाजपातील अनेकांना हायसे वाटले.
*साम,दंड,भेदचा वापर तरीही सत्ताहीन*
भारतीय जनता पक्षाच्या आमदारांची संख्या १२२ वरून १०५ वर आली. शिवसेना ६३ आमदारांवरून ५६ वर आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस ४१ वरून ५४ वर गेली. दुर्बळ झालेली कॉंग्रेस कमी न होता, दोन जागांनी वाढून ४३ आमदारांची झाली. महाजनादेश, महाजनादेश अशी सारखी घोकंपट्टी लावलेल्या भाजपच्या जागा वाढायच्या ऐवजी १७ ने कमी झाल्या. पक्षाचे पाच तालेवार मंत्री पराभूत झाले. गेली पाच वर्षं महाराष्ट्राच्या चेहर्‍यावरचा वर्ख खर्रकन उतरला. महाजनादेशाचे पानिपत आणि शिवस्वराज्याचा विजय झाला. महाराष्ट्र आपल्या मूळपदावर कायम आला. या निकालाचे कुणी काहीही निदान आणि विश्‍लेषण करत असले, तरी निकालानंतरच्या काही तासांतच उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटल्याप्रमाणे, ‘महाराष्ट्र हे राज्य फुले-शाहू-आंबेडकरांचे आहे. ते कुणापुढे झुकत नाही,’ हे महाराष्ट्राने दाखवून दिले. देशात काय झाले ? याची चर्चा अन्य प्रसंगी करता येईलही. मात्र महाराष्ट्र गेली पाच-सहा वर्षं भगव्या गुंगीने पूर्ण मती गुंग झाल्यासारखा वागत होता. जनमताच्या कौलाने त्याला ताळ्यावर आणलंय. २०१४ मध्ये भाजपला १२२ एवढ्या जागा मिळाल्या, त्या देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा पुढे करून नव्हेच. चंद्रकांत पाटील यांचा तर नव्हेच नव्हे. त्यावेळी भाजपचा चेहरा एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांचा होता. हे दोघेजण विधानसभा आणि विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेता हाच त्या पक्षाचा चेहरा असतो. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजप सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष असल्याचे स्पष्ट होताच, सत्ता स्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव ‘मुख्यमंत्री’ पदासाठी पुढे आलं. त्यांनी सरकार बनवले. ‘साम’ तंत्रात फडणवीस यशस्वी झाले. ‘दाम’ तंत्राचा अवलंब करून शिवसेना फुटतेय का, हेही आजमावून पाहिले. त्यानंतरच्या अनेक छोट्या-मोठ्या निवडणुकांत पैशाचा प्रचंड वापर करण्यात आला. विरोधकांना तुरुंगाची भीती दाखवून ‘दंड’ हे सूत्र सार्वत्रिक केलं. छगन भुजबळ हे त्यातलं सर्वात मोठं उदाहरण. २०१४ पासून अगदी कालपरवापर्यंत विरोधी पक्षाचे बडे नेते फोडून ते स्वपक्षात आणणार्या ‘भेद’नितीचा त्यांनी सपाटाच लावला. एवढंच काय, मित्रपक्षही सोडले नाहीत. काहीही करून सत्ता मिळवली होती. आणखी काहीही आणि कितीही करून त्यांना ती सत्ता राखायची होती. त्यासाठीचाच हा सारा अट्टहास होता. यापेक्षा निवडणुकांपूर्वी वेगळं काय दिसून आलं ? भाजपने जिंकलेल्या १०५ जागांपैकी ४० जागांवर राष्ट्रवादी, कॉंग्रेस, शिवसेना या पक्षांतून घेतलेले आहेत. निवडणुकीनंतर आणखी एक वैचारिक द्रोह आणि व्यभिचार फडणवीस यांनी केला. भाजपच्या उमेदवाराविरुद्ध निवडून आलेल्यांनाच पाठिंब्यासाठी पंखाखाली घेतलं. ते कमी म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या एकमेव आमदाराचा बुद्धीभेद करून त्याचा पाठिंबा मिळवला. एवढे करूनही भाजपला बिनघोर सत्ता स्थापन करता आलेली नाही. निकाल लागून महिना उलटतोय, तरी सत्तेच्या आत्म्याने कुठल्या पक्षाच्या देहात प्रवेश केलेला नव्हता.
*'हिंदुत्वाचा हक्कदार आपणच' ही चाल*
हिंदुत्वाचा वसा केवळ आपल्याकडेच राहावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारानं टाकलेला धूर्त डाव आहे याचा विचार केला पाहिजे. अर्थात ही गोष्ट संघ परिवारासाठी नवीन नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यासारख्या खंद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली हिंदुमहासभेसारखा नावातच हिंदुत्व असणारा पक्ष असताना सुद्धा संघाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली जनसंघाची स्थापना केली. कारण सावरकरांचं गोहत्या आणि जातीविरहित हिंदू समाज यासारख्या विज्ञाननिष्ठ गोष्टी चातुर्वण्यावर विश्वास ठेवणाऱ्या तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजींना मानवणाऱ्या नव्हत्या. त्यामुळेच की काय संघ परिवारानं आपल्या हिंदुत्ववादी पक्षाची वेगळी चूल मांडली. केवळ अफवांच्या भरवशावर जगणारा हा संघ परिवार पक्ष स्थापन करून शांत बसला नाही तर, आपल्या यंत्रणेद्वारे सावरकर आणि हिंदुमहासभा यांच्या व्यक्तीगत आणि पक्षीय जीवनाविषयी अनेक कपोलकल्पित अफवा पसरवून हिंदुमहासभेचं खच्चीकरण केलं. आता त्यांचं शिवसेना हे लक्ष्य आहे, त्यासाठीचा हा सारा खेळ सुरू आहे!
-हरीश केंची
९४२२३१०६०९

1 comment:

  1. मूळात जे १०५ आहेत त्यात भाजपा च्या विचारसरणी चे किती आमदार आहेत?
    परंतु एक गोष्ट चांगली झालीये या निकला नंतर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांमध्ये जी मरगळ आली होती ती झटकन निघून गेली आहे आणि आता याना हरवू शकतो ही भावना मागील काही वर्षांत गेली होती ती पुन्हा जागृत झालीये सर.

    विक्रांत अमराळे

    ReplyDelete

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...