Sunday 7 May 2023

रंगलेले राजीनामा नाट्य...!

"अखेर शरद पवारांचं राजीनामा नाट्य संपलं! या राजीनाम्यानं 'पक्ष हा आमदार-खासदार यांच्यावर नसतो तर तो कार्यकर्त्यांचा असतो!' हे दाखवून दिलं. भाजपच्या प्रेमात पडलेल्यांना त्यांनी चपराक लगावली. पक्षावर अद्याप आपलीच पकड आहे हेही स्पष्ट केलं. सत्ता हाच राष्ट्रवादीचा प्राणवायू असल्यानं त्याभोवती सत्ताकांक्षी जमा झाले. पवारांनीही त्यांच्या आकांक्षा पूर्ण केल्या. पण सत्ता गेल्यानं सारे सैरभर झाले. सावरण्याऐवजी काही नेते त्याला खतपाणी घालत होते. हे सारं रोखण्यासाठी हे धक्कातंत्र अवलंबलं! पवारांनी कधीच मूल्याधिष्ठित राजकारण केलेलं नाही. त्यांनी सतत ज्यांच्याविरोधात राजकारण केलं त्यांच्याच सावलीला ते गेले. सत्तेसाठी आधी जनता पक्ष, मग राजीव गांधी, सोनिया गांधी, भाजप यांच्याशी साथसंगत केलीय. हे विसरता येत नाही. ते शून्यातून सत्ता आणू शकतात, क्षणार्धात शक्तीशाली नेत्याला जमीनदोस्त करू शकतात, राजकारणातलं टायमिंग, धक्कातंत्र तर त्यांच्यापेक्षा कोणीच अधिक प्रभावीपणे राबवू शकत नाही. बाळासाहेबांनी याच तंत्राचा शिवसेनेत दोनदा वापर करून संघटनेला झटका आणि धक्का दिला होता. आयुष्याच्या या पर्वात पवार भावनिक राजकारण करताहेत असं वाटतं, राजकारणात काहीच अशक्य आणि अनावश्यक नसतं!"
---------------------------------------------------

दि. २ मे २०२३....
दुपारी १२ वाजून ४५ मिनिटं....
स्थळ : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई...
'लोक माझे सांगाती' या पुस्तकाचं अनावरण....
या समारंभात  झालेल्या एका घोषणेनं महाराष्ट्राच्या राजकिय क्षेत्रात गोंधळ उडाला....! ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचं अनावरण समारंभात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी "मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतो आहे. सार्वजनिक जीवनातल्या सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावं, अशी माझी भूमिका आहे...!" असं वक्तव्य करताच सभागृहात एकच गोंधळ उडाला. नेते दिगमूढ, व्याकुळ, भावुक बनले, अनेकांना अश्रू अनावर झाले. कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केलं. अखेर एक समिती स्थापन करण्यात आली. दोन दिवसानंतर झालेल्या समितीच्या बैठकीत पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा रद्द केला आणि तीन दिवसांच्या नाट्यानंतर पवारांनी आपला राजीनामा मागे घेतला...! राष्ट्रीय राजकारणात महाराष्ट्राचे महत्वाचे नेते असलेल्या पवारांच्या राजीनाम्यानं देशातल्या विरोधकांमध्ये
गोंधळ उडाला. २०२४ च्या निवडणुकीत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पवारांच्या या निर्णयानं आश्चर्य व्यक्त झालं. शरद पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांत अतिशय प्रेमाचं, आदराचं आणि हक्काचं स्थान आहे. त्यांची प्रतिक्रिया बघता पवारांनी पक्षप्रमुखपद सोडणं पक्षाला किती मोठा धक्का आहे याची कल्पना येते. हे अनपेक्षित असं नाहीच. भाकरी फिरवण्याच्या गोष्टी सुरू आहेतच. जशी आपली राजकीय आकांक्षा पवारांनी कधी लपवून ठेवली नाही तसंच कधी अजित पवारांनीही त्यांच्या आकांक्षाही लपवलेल्या नाहीत. अजित पवारांनी एका मुलाखतीत 'आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल, तेही आताच...!' असं सांगून धमाल उडवून दिली. पण त्या आधीपासूनच अजित पवार भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला या मुलाखतीनं बळकटीच मिळाली. त्यानंतर कुंपणावर असलेल्या काही आमदारांनी अजित पवारांच्या पाठीशी जाण्याचा निर्णय घेतला. पक्षातली ही हालचाल पवारांना अस्वस्थ करणारी होती. काही आमदारांनी तर खुद्द पवारांची भेट घेऊन भाजपशी सलगी करावी अशी इच्छा व्यक्त केली होती. शिवाय कुटुंबातूनही अजितना मुख्यमंत्री होण्यास पवार का विरोध करताहेत असा दबाव वाढत चालला होता. त्यांनी ती खंत व्यक्त केली होती. शरद पवारांनी फार तरूणपणी बंड करून मुख्यमंत्रीपद मिळवलं होतं. मात्र अजित पवारांनी असं बंड केलं पण ते उपमुख्यमंत्रीपदासाठी झालं होतं, नंतर ते फसलं आणि अजित हे स्वगृही परतले!
शरद  पवारांनी १० जून १९९९ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली, तेव्हा 'शरद पवार' या चेहऱ्याशिवाय या पक्षाकडं दुसरं काही नव्हतं. नाही म्हणायला संगमा आणि तारिक अन्वर होते. सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावरून कॉंग्रेस सोडणाऱ्या पवारांचे मनसुबे काही वेगळे होते. त्यावेळी कॉंग्रेस सत्तेत नव्हती. देशात आघाडी सरकारांचं पर्व सुरू होतं. नव्यानं राजकारणात आलेल्या विदेशी सोनियांना राजकारणात फार काही जमेल, असं पवारांना वाटत नव्हतं. त्यामुळं नवा पक्ष स्थापन करून स्वतःचं स्थान मजबूत करत न्यायचं, असा पवारांचा मानस होता. काँग्रेसचे नेते असलेल्या पवार तेव्हा लोकसभेत विरोधी पक्षनेते होते. खरंतर त्यांचा प्रधानमंत्रपदावर दावा होता, पण सोनियांनी तो दावा केल्यानं पवार अस्वस्थ बनले. आगामी काळात आपण काँग्रेसमधून प्रधानमंत्री होणार नाही हे चित्र स्पष्ट झाल्यानं पवार काँग्रेसबाहेर पडले. व्यक्तिगत महत्त्वाकांक्षेपायी पवारांनी पक्ष स्थापन केल्यानंतर अनेकजण त्यांना सामील झाले. कॉंग्रेसनं सत्ता गमावलेली होती. पुन्हा येण्याची काही शक्यता नव्हती. 'शरद पवार' या नावाचा दबदबा दिल्लीत आणि राज्यात मोठा होता. स्थानिक हितसंबंध आणि अस्तित्वाचा प्रश्न असल्यानं ठिकठिकाणचे सहकारी चळवळीतले सरदार एकवटले. त्यातून हा पक्ष उभा राहिला. पवारांचा अंदाज खोटा ठरला आणि २००४ मध्ये सोनियांनी पुन्हा कॉंग्रेसला जिंकून दिलं. केंद्रात कॉंग्रेसची आघाडी सत्तेत आली. त्यामुळं पवारांना आपल्या सोनियाविरोधाला मोडता घालत सोनियांच्या नेतृत्वाखालीच केंद्रात दहा वर्षे काम करावं लागलं.  त्यापूर्वी १९९९ च्या विधानसभा निवडणुकीनंतरच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस राज्यात एकत्र आले. सत्तेतला हा पक्ष वाढत राज्यातला अत्यंत महत्त्वाचा पक्ष झाला. २००४ ला राष्ट्रवादी राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरला. तरीही पवारांनी काँग्रेसच्या जागा कमी असतानाही विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं. अजित पवारांना डावलून छगन भुजबळ, विजयसिंह मोहितेपाटील, आर. आर. पाटलांना उपमुख्यमंत्री बनवलं. क्षमता असतानाही अजितना दूर ठेवलं. हे कर्तृत्व शरद पवारांचं! प्रतिमा आणि राजकीय मुत्सद्देगिरीच्या बळावर पवारांनी राज्यभर हा पक्ष पोहोचवला. शरद पवार नावाची जादू उत्तरोत्तर वाढत गेली. तरूणांसोबतच महिलाही पक्षासोबत जोडल्या गेल्या. पक्षाचं एक केडर तयार झालं. २०१४ पर्यंत सगळं काही ठीक चाललं होतं. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनं सगळी राजकीय समीकरणं बदलून टाकली. जन्मापासून सत्तेवर असलेली राष्ट्रवादी कॉंग्रेस सत्तेच्या बाहेर फेकली गेली. देशात, राज्यात कॉंग्रेसची वाताहत झाली.  तरीही नव्या राजकारणात पवार सक्रिय राहिले. यशवंतराव चव्हाण यांच्या अखेरच्या दुर्दैवी कालखंडानं पवारांना बरंच काही शिकवलं होतं. ज्या इंदिरा गांधींना यशवंतरावांनी विरोध केला, त्या इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि त्यांनी यशवंतरावांचं राजकीय करीअरच संपवलं. सोनियांना विरोध करणाऱ्या शरद पवारांचं असं झालं नाही, सोनियांकडं असलेलं कमी राजकीय भांडवल आणि सोनियांचा अंगभूत  चांगुलपणा ही कारणं आहेतच. समीकरणं कितीही बदलोत, आपण सक्रिय राहायचं, हे पवारांना कळलेलं आहे. कॉंग्रेसला आव्हान देऊन पक्ष स्थापन केल्यानंतर कर्करोगासारख्या असाध्य आजारानं गाठूनही उभे राहिलेले पवार हे रसायन काही वेगळं आहे हे लोकांना दिसून आलं. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनं राजकारणातलं चित्र बदललं. शरद पवार संपल्याच्या चर्चांना उधाण आलं. देवेंद्र फडणवीसांनी तसं जाहीरपणे म्हटलं होतं. पवारांना सोडून लोक भाजपत जाऊ लागले. त्याही स्थितीत पवार डगमगले नाहीत. ते बाहेर पडले. 'इडी'वर चालून गेले. पावसात भिजले. अशक्य ते पवारांनी शक्य करून दाखवलं. भाजपला दूर सारून सरकार बनवलं. शरद पवार हे महाराष्ट्राचेच काय, देशातले शक्तिमान नेते ठरले. राष्ट्रवादीला पुन्हा बळ मिळालं. तरूण मोठ्या संख्येनं पक्षात आले. देशातले वातावरण बदललं होतं. राजकारणाची परिभाषा बदलली होती. नामोहरम झालेल्या कॉंग्रेसकडं परिणामकारक असा नेता नव्हता. संविधान वाचवण्यासाठी महाराष्ट्रात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही, अशी सर्वांची खात्री होती. महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर शरद पवारांचा प्रभाव विलक्षण वाढलेला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तरी शरद पवारच सरकारचे पालक होते. हळूहळू चित्र बदलत गेलं. उद्धव ठाकरे यांची वेगळी अशी प्रतिमा तयार होत गेली. ते स्वतःच सरकार चालवत राहिले. महाविकास आघाडी सरकार पुढे अपेक्षेप्रमाणे कोसळलं. पवारांनी सरकार बनवलं, पण ठाकऱ्यांना वाचवता आलं नाही, अशी प्रतिमा व्हायला हवी होती. मात्र झालं उलटच. उद्धव ठाकरे यांच्याबद्धलच्या सहानुभूतीची प्रचंड लाट तयार झाली. उद्धव यांना असा सर्वस्तरीय जनाधार मिळू लागला, दलित, मुस्लिम यांचाही पाठिंबा मिळू लागला, जो शिवसेनाप्रमुखानाही कधी मिळाला नव्हता. वज्रमूठ सभांचाही चेहरा उद्धव ठाकरे हाच बनला. बाकी सगळे नेते मागे पडले आणि उद्धव नायक झाले. एकटे उद्धवच नाही, आदित्यसुद्धा! त्या तुलनेचा कोणीही नेता आज राज्यात विरोधकांकडं नाही. हे स्पष्ट झालं. महाविकास आघाडी सरकार पडलं खरं, पण शिवसेनेतल्या फुटीनंतर आलेलं नवं सरकार लोकांनी ना स्वीकारलं, ना ठाकरेंविषयी असणारी सहानुभूती कमी झाली! उलट शरद पवारांविषयी संशयाचे धुकं तयार झालं. अदानी संदर्भातली 'एनडीटीव्ही'ला त्यांनी दिलेली मुलाखत, नागालॅंडात भाजपला दिलेला पाठिंबा, गौतम अदानींसोबत झालेल्या भेटीगाठी, विरोधकांच्या बैठकीला गैरहजेरी, अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, अशी उठलेली वावडी. त्याहीपूर्वी क्रिकेटच्या राजकारणासाठी विरोधकांशी साथसंगत. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी सगळ्यांना अंगावर घेत असताना, पवार मात्र फक्त 'राजकारण' करताहेत, अशी चर्चा होऊ लागली. याला प्रतिवाद करणं भाग होतं. आपल्या प्रतिमेचं वलय वाढवायचं कसं, हे शरद पवारांना बरोबर समजतं. उद्धव ठाकरेंनी  मुख्यमंत्रीपद सोडलं. राहुल गांधींनी खासदारकी सोडली. तर शरद पवारांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडलं! पवारांनी राजीनाम्यानं स्वतःला पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणलं. पवारांविषयीच्या प्रेमाची लाट पुन्हा उसळली. या पक्षावर हुकुमत माझीच आहे, यासाठीही खुंटी हलवून बघता आली. उद्या भलता-सलता निर्णय घेण्याची अपरिहार्यता आलीच, ती येऊ शकते! तर त्या पापातून मुक्तीची वाट मिळाली. पवारांनी निवृत्तीची घोषणा करताना सुप्रियांचं मौन जेवढं बोलकं होतं, जयंत पाटलांचे अश्रू दिसत होते, तेवढाच अजित पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा पुढाकार सूचक होता. त्यामुळं, हे वाटतं तेवढं सहज घडलेलं नाही. नक्की कारणं काय आहेत, ते पुढे येईलच. अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चा कधी सुरू झाल्या, तेव्हा शरद पवारांनी संजय राऊतांच्या मार्फत तो प्लान 'लीक' केला. त्यानंतर एकदम शांतता पसरली. अजित पवारांनी संजय राऊतांवर टीका केली. कित्येकांचे डाव उधळले गेले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करतानाही पवारांनी अनेकांना चकमा दिला होता. जे जे शक्य ते पवार प्राणपणानं करत राहिले. पवार मूल्यांशी तडजोड करतात, असं वाटत असलं आणि त्यांच्या राजकारणाचा बाज 'करीअर'चा असला, तरीही निर्णायक क्षणी पवार विरोधकांच्या नाकी नऊ आणतात. थेटपणे ते बाह्या सरसावून हुतात्मा होत नाहीत. अनेकदा काठावर असतात. अधिक सावध असतात. पण, सक्रिय राहून शांतपणे अखेर तेच करतात, जे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. म्हणूनच, ८३ वर्षांचा हा नेता पक्षाचं अध्यक्षपद सोडतो म्हटल्यावर महाराष्ट्रभर असा हलकल्लोळ होतो. पक्ष आता 'राष्ट्रीय' नसला, तरी देशभर बातमी होते. अजित पवारांची बंडखोर वृत्ती दिसते. पण अजितना शरद पवारांएवढा खडतर मार्ग अजून चालावा लागलेला नाही. पहिल्या खेळीनंतर पवारांनी नवा पक्ष काढला, तो मजबूत केला, जेंव्हा मोदी लाटेत पक्ष संपला असं वाटलं तेंव्हा पुन्हा बळकट करायला तेच पुढं आले. त्यांनी ईडीलाच आव्हान दिलं. एका अत्यंत मनस्वी, हुशार, चतुरस्त्र, व्यासंगी माणसानं सहा दशकं राजकारणात वाटचाल केलीय. आताही ते राजकारणात असतील. पवार सोनियांसारखे नाहीत त्यामुळं पद सोडलं तरी फुटकळ नेत्यांना पुढं करून कारभार चालवला नसता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही तसं होऊ दिलं नसतं. या सगळ्या चर्चेत सुप्रिया केंद्रस्थानी असल्या तरी राज्याच्या राजकारणात यायला फारशा उत्सूक वाटत नाहीत त्यामुळं वारस कोण वगैरे चर्चांना अर्थ नाही. आता हा राजीनामा मागे घेतला गेलाय. त्यांनी मनात पूर्ण विचार करूनच राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलंय. राजीनामा म्हणजे राजकारण संन्यास नाही. येत्या निवडणुकीत एकत्र लढल्यास मविआला उत्तम संधी असताना कोणताच आत्मघातकी निर्णय घेतला जाईल असं वाटत नाही. पवार ते होऊ देणार नाहीत. फक्त पक्षांतर्गत नाराजीला वेसण घालण्यासाठीच त्यांची ही खेळी असावी! कदाचित आऊटगोईंग रोखण्याची ही प्रभावी चाल असू शकते. ते शून्यातून सत्ता आणू शकतात, क्षणार्धात शक्तीशाली नेत्याला जमीनदोस्त करू शकतात, आणि राजकारणातलं टायमिंग, धक्कातंत्र तर त्यांच्यापेक्षा कोणीच अधिक प्रभावीपणे राबवू शकत नाही. बाळासाहेबांनी याच तंत्राचा शिवसेनेत दोनदा वापर करून संघटनेला झटका आणि धक्का दिला होता, आणि राजीनामा मागे घेतला होता. आयुष्याच्या या पर्वात पवार भावनिक राजकारण करताहेत असं वाटतं, राजकारणात काहीच अशक्य आणि अनावश्यक नसतं. शेवटी २०२४ च्या निवडणुकीत मविआ एकत्र सामोरी गेली नाही, तर सगळ्यांचीच धूळधाण नक्की आहे. पण एकास एक लढली, तर कोणाच्याही नाकी नऊ आणेल हे स्पष्टच! त्यामुळंच न्यायालयीन निकालानंतरही सरकार अस्थिर होईल असं मुळीच नाही. मुख्यमंत्री बदल होईल, सरकार टर्म पूर्ण करेल, किंवा नैतिकतेच्या मुद्यावर राजीनामे होऊन राष्ट्रपती राजवट लागेल किंवा मुदतपूर्व निवडणुका लागतील, पण अविवेकी पक्षांतरं लोकांना, मतदारांना आता अजिबात आवडणार नाहीत. अनैसर्गिक युत्यांना जनता कंटाळलीय, प्रक्षुब्ध झालीय. तिची नाराजी यापुढं परवडणारी नाही. त्यामुळंच कोणत्याहि परिस्थितीत लहानशा चुकीलाही क्षमा नाही! ते स्वतः तशी चूक करणार नाहीत, तशी परत कोणी केलीच तर क्षमा तर मुळीच करणार नाहीत!

चौकट
डोंगर म्हातारा झालाय...!
अनेक वादळ अंगावर घेऊन ऊन वारा पावसात तो उभा आहे. डोंगराआड आडोशाला असणारी लोकं आज सैरभैर झालीत. वटवृक्ष म्हटलं की, त्याच्या मुळाशी असणाऱ्या छोट्या वृक्षांना नेहमी वाटतं मी पण कधी होईल मोठा? आणि मग मुसळधार पावसाला सुरवात झाली की, वटवृक्ष आपसूकच त्या पालवी फुटलेल्या रोपांना आपल्या विशाल फांद्या खाली घेतो. आज राष्ट्रवादीचं तसंच झालं होतं. कोणी रडतंय, कोणी शांत झालंय, कोणी संभ्रमित झाला. कार्यकर्ते आणि नेत्यांनी आता नवीन नेतृत्वाखाली वाटचाल करायची वेळ आलीय. तुमचं जर शरद पवार या माणसावर प्रेम असेल तर तुम्ही ठरवा की, आता छोट्या छोट्या अडचणी करता मी सिल्व्हर ओक वर जाणार नाही. थोडं नाही ८० च्या पुढे पोहोचलेत साहेब. तरुणांना लाजवेल अशी कामं करतात असं म्हणून किती त्रास देताहात तुम्ही? शेवटी मर्यादा आहेतच प्रत्येकाला! दौरे, धावपळ, जागरण, प्रवास, उदघाटन, प्रकाशन, सामाजिक संस्थाची निमंत्रणं, त्यात वार्धक्यात वेळेवर घ्यावी लागणारी औषधं, त्यांचं पथ्य पाणी, हे थांबायला हवं! साहेबांच्या हयातीत जर दुसरं नेतृत्व उदयास येत असेल तर काय वाईट आहे? चुकलं माकलं तर साहेब आहेतच ना! अतिशय स्तुत्य आणि योग्य निर्णय घेतला होता साहेबांनी. खरं तर त्यांना आता मनासारखे जगू द्या. त्यांनी असाच आराम करावा. डोंगराचा मान ठेवा... डोंगर म्हातारा झालाय....!
हरीश केंची,
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

बदसूरत ’पॅटर्न'

‘ ‘अब की बार चारसौ पार’ ची घोषणा देऊन तिसऱ्यांदा सत्ताप्राप्तीसाठी लोकसभा निवडणुकीत शड्डू ठोकून उतरलेल्या भाजपची जोडी मोदी-शहा य...