Saturday 19 December 2020

सडक्या राजकारणातली 'सुंदोपसुंदी'...!

"पुराणात एका सुंदरीसाठी सुंद आणि उपसुंद या दोघा शक्तिमान मित्रांमध्ये युद्ध होतं आणि ते दोघेही घायाळ होतात. त्याप्रमाणं राज्यातही सत्तासुंदरीसाठी पूर्वाश्रमीचे मित्र असलेल्या भाजपेयीं आणि शिवसेना यांच्यात जुंपली आहे. खरंतर हे राजकारण सडल्याचं लक्षण आहे.
सरकारं बदलली की, एक मूलभूत व्यवस्था आणि निर्णयप्रक्रिया कायम असते. पण आधी घेतलेले सारे निर्णय पुसून टाकून, तुघलकी कारभार करायचा नसतो. अशी कारभाराची सलगता हीच लोकहिताची असते. हे पथ्य न पाळल्यानं विकासाचे प्रश्न चिघळू लागतात. राज्यातील धुरीणांनी पक्षीय मतभेद किती ताणायाचं आणि श्रेयासाठी किती लढायचं याचा विचार केला पाहिजे. अलीकडं राज्यातले राजकारणी राज्यहितासाठी एकत्र येत नाहीत. राज्यातली सत्ता विरोधकांकडे आहे आणि केंद्रातली सत्तासुत्रे भाजपच्या हाती आहेत म्हणून प्रकल्प हाणून पाडणं हे कितपत योग्य आहे. पायाभूत सोयीसुविधांच्या प्रकल्पात राजकारण असू नये. सध्या असंच सुरू आहे. पूर्वी घेतलेल्या प्रकल्पांना स्थगिती दिली जातेय आणि त्या प्रकल्पांकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं तर त्याला आपल्या सत्तेच्या आधारे विरोध वा अडवणूक केली जातेय. हे सारं जनतेसाठी म्हणत जनतेलाच वेठीला धरून केलं जातंय. हा सडलेल्या राजकारणातला सत्ता संघर्ष आहे. एवढंच म्हणावं लागेल!"
---------------------------------------------------------

*रा* जकारणात काही घडू शकते इतकी अस्थिरता आहे आणि दाखवलं जातंय तेवढं वैचारिक मतभेद आता राहिलेले नाहीत. मुळात कुणीही कुठल्याही विचारांशी निष्ठेनं बांधलेला नाही. अगदी भाजपचे कार्यकर्ते, नेते धरून हे म्हणता येईल. आज सर्वत्र चलती भुरट्या राजकारण्यांची आहे. सत्तेसाठी शक्य होईल ते सारं करण्याचा पक्का इरादा करूनच आता लोक राजकारणात पडतात. सारं काही करतात आणि आव मात्र तत्व-निष्ठेचा, नि:स्वार्थी जनसेवेचा आणतात. जो मिळेल तिथं मिळेल तेव्हा हात धुवून घेतो तोच वारंवार माझे हात स्वच्छ आहेत अशी ग्वाही देतो, हे आता सगळेच जाणतात. लोक बोलत नाहीत त्याची कारणंही आता सगळ्यांना ठाऊक आहेत. कोण कुठं होते नी कुठं पोहोचले ही काय लोकांना दिसत नाही? महिना ओलांडताना खिशाचा तळ पुनः पुन्हा चाचपून भोकं पडलेल्या विजारी घालणारे आपण, म्हणजे कंडक्टरनं बसचं तिकीट देताना साडेतीन रुपयांऐवजी तीन रुपये घेतले तरी लॉटरी लागल्याचा आनंद होणारे! ज्यांना खरोखरच लॉटरीच लागलीय त्यांच्याकडं बघत 'देवा दया तुझीही, ही शुद्ध दैव लीला, लागो न दृष्ट आमची, त्यांच्याच वैभवाला!' असं म्हणत बसण्याखेरीज आणखी काय करणार! मुद्दा आहे सत्तेसाठी सारं काही करायला तयार असणाऱ्या सत्तानिष्ठ राजकारण्यांचा. हिंदुत्व आता राजकारणातून बाद झालंय. राजकारण्यांनी ते बाद केलं की, लोकांनीच बाद ठरवलं होतं ह्यावर चर्चासत्र ठेवायचं ते ठेवतील. ते बाद झालंय हे आपण बघितलंय. कुणी अजूनही हिंदुत्व सांगत असेल तर ते हातात फिरणाऱ्या रुद्राक्ष माळेइतपतच, छाप पाडण्याएवढंच असणार. अर्थकारणात समाजवादी विचारांचं तर कधीच रुद्राक्ष झालंय. राजकारणात समाजवाद्यांचं जे काही झालंय त्यासाठी दोन मिनिटं शांत उभं राहून श्रद्धांजली देण्याला कुणीही नकार देणार नाही. तेव्हा कुठलंही 'कॉम्बिनेशन' आता होऊ शकतं. ते होण्याइतपत 'सामंजस्य' आपसात राखायला काय हरकत आहे? एकदा सगळ्यांचा पॉट एकच आहे हे कळल्यावर आडवं कुणाला घालायचं आणि उभं कुणाला करायचं हे ठरवायला विशेष अडचण पडू नये. उभे आडवे धागे विणले की, वस्त्र तयार होतं. उगाच अटीतटी आणून आणि भरमसाठ बोलून काही साधत नाही. नेते वाट्टेल ते बोललेलं विसरून, वाट्टेल ते करतात. कुणाशीही त्यांना सहज जमवून घेता येतं आणि न जमवून घेतलं तरी चालतं. त्यांना संरक्षण कवच असतं. कार्यकर्ते या अटीतटीनं बरबाद होतात. निष्कारण भांडणं, वैर वाढतं हाणामाऱ्या कराव्या लागतात. कार्यकर्त्यांना ह्याची जाणीव झालीय. या निवडणुकीनंतर आक्रस्ताळे अटीतटीचं राजकारण बाजूला पडेल असं वाटत होतं आणि घडलंही तसंच.

*सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित*
कुठलंही जनकल्याणाचं काम जिद्दीनं, इर्षेनं करणारे कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचा मान राखून त्याला विश्वास देऊन धडाक्यानं विकासाची कामं करणारे कल्पक, विवेकी, विधायक वृत्तीचे नेतृत्व ही युती महाराष्ट्राला स्थैर्य, सामर्थ्य, ऐश्वर्य देऊ शकेल. ग्रामीण भागात शिकलेली, नवी दृष्टी लाभलेली, आपल्या भागाचा विकास, कायापालट करण्याची ईर्षा असलेली, त्यासाठी गावातच पाय रोवून गावातच राहायची तयारी असणारी आणि शहरातल्या लोकांचे रीतभात, हुशारी, चलाखपणा याला तोडीस तोड ठरणारी तरुणांची संख्या लक्षणीय आहे. त्याबरोबर ईर्षा, चुरस, डावपेच यांचीही ग्रामीण भागातली तीव्रता वाढलीय. या तरुणांना एकमेकांना शह, काटशह देत, एकमेकांना संपवण्याचा कार्यक्रम राबवू न देता त्यांना विविध पातळ्यांवर विविध क्षेत्रात विविध सत्तास्थानावर एकमेकाला पूरक असं काम करण्याची गोडी लावायला हवीय. शरद पवारांनी तरुणांना विधायक कामांसाठी प्रेरणा देऊन ग्रामीण भागात नव्या जोमदार तरुणांची एक फौजच उभी केली होती. साखर कारखानदारांना कितीही नावं ठेवा, त्यांनी आपल्या भागातील लोकांचं जीवन बदलून टाकलंय. शिक्षणाची कोंडी फोडलीय. त्यांची दादागिरी दंडेली याबद्धल तक्रारी आहेत पण त्यांनी कितीतरी लोकांना विकासाच्या वाटेवर चालायची संधी दिलीय. याच लोकांनी काँग्रेसला बळ दिलं होतं आता ते नेमकं कुणाच्या मागं आहेत याचा शोध घ्यावा लागेल. लाखाच्या सभेत तास, अर्धातास दे दणादण भाषण ठोकलं की विचार रुजतात हा भ्रम दूर करून तात्यासाहेब कोरे, विखे पाटील, मोहिते पाटील, रत्नाप्पाण्णा, पी.के.अण्णा पाटील या सगळ्या साखर कारखान्यामागील कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा, त्यांनी उभ्या केलेल्या संघटित शक्तीचा, त्यांनी दाखवलेल्या व्यापारी दृष्टीचा विचार, नेते होऊ बघणाऱ्या सगळ्यांनीच विशेषतः शहर भागातील मंडळींनी करायला हवाय!
राजकारण बदलतं आहे. आता जंगी सभा आणि फरडे वक्तृत्व, हंशा, टाळ्या आणि आवाज कुणाचा या आरोळ्यानी लोक आता बधत नाहीत. सभांचा प्रभाव आता दिवसेंदिवस मर्यादित होणार. आता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कामाचा जमाना येतो आहे. ज्यांच्याबद्धल लोकांना हा माणूस काम करतोय असा विश्वास आहे तो कसा आहे, कुठल्या पक्षाचा आहे हे न बघता लोक मतदान करतील. आता मतदान करून आपण आपल्याला हवा असलेला प्रतिनिधी पाठवण्यात यशस्वी होऊ असा विश्वास लोकांमध्ये आलाय. भरमसाठ भाषणबाजी करणाऱ्या नेत्यांना आपले भाग्यविधाते बनवायला लोक तयार नाहीत.

*प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला*
भाषणांनी लाटा उठत नाहीत. आणि एखाद्याला बदनाम करून उठवण्याचा अतिरेकही उलटतो. शरद पवार यांच्या विरोधात सुरू असलेल्या अतिरेकामुळं लोकांत शरद पवारांबद्धल आपुलकी वाढतेय. भ्रष्टाचार-गुन्हेगारी यावर सोवळेपणानं बोलणाऱ्यांच्या बुडाखाली केवढं डबोलं आणि केवढी घाण आहे याची कल्पना सर्वांना आहे. सोवळ्यात पावित्र्यच असतं असं मी मानत नाही. सोवळे पावित्र्यासाठी वापरले जात असावं, पण पावित्र्याचा आणि सोवळ्याचा संबंध दाखवण्यापूरताच उरलाय याचं प्रत्यंतर देणारे महाभाग भेटल्यानंतर, अशी सोवळी मिरवणाऱ्यांपासून दूर राहणंच बरं असं लोक मानू लागले तर तो लोकांचा दोष नाही. भारतीय जनता पक्ष असा सोवळं मिरवणाऱ्यांचा गड्डा किंवा अड्डा आहे. राष्ट्रनिष्ठा, बंधुभाव, सचोटी, सभ्यता, सहजीवन कुठं असेल तर इथंच असाही टेंभा मिरवणारे आहेत. पण सगळ्या सोवळ्याआड जे आहे ते काँग्रेसपेक्षा काही वेगळं नाही. असं स्पष्ट करणाऱ्या घटना पुनःपुन्हा घडताहेत. त्यावर बोलायचं नाही? लिहायचं नाही? भाजपमध्ये भरपूर भ्रष्ट आहेत, भरपूर तत्वशून्य आहेत, भरपूर गुंड प्रवृत्तीचे आहेत. भरपूर संधीसाधू आहेत आणि जातीयतेची कीड वळवळणारेही आहेतच आहेत. सत्ताधाऱ्यांमधली घाण काढायचा, तिच्याबद्धल नाकानं कांदे सोलायचा तुम्हाला अधिकार आहे. तुमच्या बुडाखालील घाण दाखवली तर मग कळवळता का? वाईट माणसं, गुन्हेगार काँग्रेसमध्ये आहेत, सत्ताधाऱ्यांकडं आहेत हा कांगावा पुष्कळ झाला. जरा आपल्या सोवळ्यातून येणाऱ्या दुर्गंधीचाही तपास घ्या असं कुणी म्हटलं तर रागावता का? राजकारण सर्वबाजूनं नासतंय; ते सुधारायचं, निदान आहे त्यापेक्षा अधिक नासू द्यायचं नसेल तर भाकड विश्वास बाळगू नका. फक्त आरोप आणि अफवा उठवून हेतुपूर्वक किटाळ रचलं गेलं, प्रतिमा डागळण्याचा उद्योग झाला त्याचं काय? राजकीय शास्त्री सध्या अशी काही कोडी सोडविण्याच्या आणि मांडण्याच्या कामात गुंतले आहेत.

*ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत*
गळ्यात गळा घालून उभे राहणारे गळा कसा कापायचा, किती कापायचा, कुणाचा कापायचा याची खलबतं सतत चाललेली असतात. गोरगरिबांना सेवासुविधा देण्यात एकमत आहे झेंड्याचे रंगसुद्धा तसे फार वेगळे कुठे आहेत? सेनेचा भगवा तिरंग्यात वर आहे तर भाजपत तो आडवा घातलाय. काँग्रेसनं त्यांना वरखाली ठेऊन मध्ये पांढरा आणलाय. तिघात भगवा कॉमन! उडीदामाजी गोरे काळे प्रमाणे सारेच एका माळेचे मणी आहेत. नेत्यांना आपले सारे उद्योग बिनबोभाट पार पाडण्यासाठी नंदीबैलांचा एक कळप हवा असतो. काही चलाख धूर्त, काही विरोधी गटातले उपद्रव देण्याचे सामर्थ्य असणारे आणि बाकी माना हलवणारे नंदीबैल घेऊनच राज्य चालविण्याचा परिपाठ सुरू आहे. मी समर्थ आहे हा आत्मविश्वास नेत्यांत असायला हवा, पण लोकशाही समर्थ व्हायची असेल समर्थ आत्मविश्वास असलेल्यांची एक फळीच असावी लागते. पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी निष्ठावान, कर्तृत्ववान, सुशिक्षित, लोकसेवा करण्यात आघाडीवर असणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर ठेवून आयारामांना पायघड्या घालून कार्यकर्त्यांचा बळी दिला जातोय. अशावेळी निष्ठावंत मिळणार कुठे? सारेच सत्तेचे लोभी! आजकाल सत्तेसाठीच इकडून तिकडे उड्या मारणाऱ्यांना ज्या पक्षात होते त्यांनाच लक्ष्य करण्यासाठी पुढं केलं जातं. 'बाटग्याची बांग मोठी..!' या म्हणीप्रमाणे त्यांना वापरलं जातं. आज हीच मंडळी सत्ताधाऱ्यांवर सतत टीकास्त्र सोडत असतात. यातच सारं आलं! ही मंडळी शेणगोळा ब्रँड आहेत. ह्या शेणगोळ्यांचे साहेब त्यांना सारवण्यासाठीच वापरणार, नाही का...?
- हरीश केंची
९४२२३१०६०९

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...