"महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं आंबेडकरी चळवळीतल्या काही जुन्या नेत्यांच्या भेटी झाल्या. सगळ्यांनाच आंबेडकरी चळवळीची चिंता लागून राहिलीय. चळवळीची आत्ताची परिस्थिती अस्वस्थ करणारी आहे; पण फ्रस्टेट होऊन स्वस्थ बसावं अशी निश्चितच नाही! अस्वस्थता तरी का आहे? कारण सर्वच समाजघटक क्रमाक्रमानं जागे होताहेत, आपापला वाटा मागू लागताहेत, आपापलं उपद्रवमूल्यही वसूल करताहेत, त्यातूनच सगळा गदारोळ निर्माण होतोय. खऱ्या अर्थाने गरीब दीन, दलित असलेल्या आंबेडकरी जनतेकडे कुणाचंच लक्ष नाही. आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी विचारांचे राजकिय पक्ष सत्तासाथीदार होण्यातच मश्गुल आहेत. तरुणांना मार्गदर्शन करणारा नेताच सत्तेसाठी तडजोडी करू लागला तर तरुणांनी जायचं कुणाकडं? चळवळ आणि पक्ष हे सारं एकाच हाती गेल्यानं दोन्हीची वैचारिक फरफट होताना दिसतेय. संघ आणि भाजप यांनी समन्वय ठेवत जी मजल गाठलीय ते आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना शक्य होतं पण चळवळ आणि पक्ष यांची सरमिसळ केल्यानं ही अवस्था ओढवलीय!"
------------------------------------------------
*रा* जनीतीतलं एक सूत्र सांगतं की, ‘एखाद्या चळवळीमध्ये अधिकाराच्या जागा आणि मानाची पदं, बिरूदं जितक्या मोठ्या प्रमाणात वाटण्यात येतात, तितक्या प्रमाणात त्या चळवळीकडं निकृष्ठ दर्जाचे लोक आकर्षित होऊ लागतात. शेवटी तर असले बुभूक्षित इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी पक्षामध्ये गर्दी करतात, की पूर्वीच्या काळातील झुंजार प्रामाणिक कार्यकर्त्याला हाच तो आपला पक्ष हे ओळखू देखील येईनासं होतं. जेव्हा असं घडतं तेव्हा त्या पक्षाचं जिवीत कार्य संपुष्टात आलं असं खुशाल समजावं...!’ योगायोगानं त्याला भारतातल्या एका सामान्य कार्यकर्त्यानंही चळवळीच्या काळात दुजोरा दिलेला होता. त्याचं नाव आर.जी. रुके असं आहे. रुके हे आंबेडकरवादी कार्यकर्ते. आरंभीच्या रिपब्लिकन पक्षातले धडाडीचे कार्यकर्ता होते. मुंबई रिपब्लिकन पक्षाचे चिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. १९६७ सालात सत्ताधारी काँग्रेस पक्षासोबत आंबेडकरी पक्ष वा चळवळीनं राजकीय युती करावी, असा प्रस्ताव आला होता. तेव्हा रुके यांनी दिलेला इशारा मान्य झाला असता, तर ती चळवळ आणि पक्ष इतका विस्कटून गेलाच नसता. त्या युती करण्याच्या निमित्तानं झालेल्या बैठकीत रुके म्हणाले होते, ‘आज आपला पक्ष स्वाभिमान आणि आंबेडकर निष्ठा बाळगून आहे. कारण कार्यकर्त्यासमोर कुठल्याही प्रकारचं आमिष नाही. ते सत्तेपासून दूर आहेत म्हणूनच ते ताठ आहेत. काँग्रेसच्या आहारी आपण गेलो तर कार्यकर्त्यांना स्वार्थाची लागण लागेल. त्याच्या स्वार्थापुढं पक्षहित नगण्य ठरेल. त्यांना एकदा सत्तेच्या सावलीत बसायची सवय लागली की मग त्यांची आपण सुटका करू शकत नाही. सत्तेसाठी स्पर्धा नाही म्हणून कार्यकर्त्यांमध्ये बंधूभाव आहे. उद्या सत्तेसाठी स्पर्धा सुरू झाली, तर एकमेकांचे गळे कापायला हेच कार्यकर्ते मागेपुढे पहाणार नाहीत. बाबासाहेबांच्या विचारप्रणालीची जागा काँग्रेस घेईल आणि मग आपल्या पक्षात बजबजपुरी माजेल. हे नाकारायचे असेल तर येत्या निवडणूकीत काँग्रेस बरोबर युती करू नये. युती केली तर तो आपल्याच पायावर आपण धोंडा मारून घेतला असं होईल आणि आत्मनिर्भर आंबेडकरी चळवळ संपुष्टात येईल....!’
आंबेडकरी चळवळीनं काँग्रेस वा सत्तेबरोबर जाणं कसं धोक्याचं आहे हे ज्यावेळी काँग्रेसकडून युतीचा प्रस्ताव आला त्यावेळी व्यक्त झालेलं मत आज पन्नास-साठ वर्षानंतर किती परिणामकारक ठरलंय याची साक्ष मिळतेय. रुके यांचे शब्द किती नेमकं आणि खरं ठरलंय, हे आपल्याला बघायला मिळतेय. रिपब्लिकन पक्ष गटातटात विभागला गेलाय आणि आंबेडकरी चळवळ तर जितके नेते तितके गट अशी विस्कटून गेली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासारखा नेता आज जिग्नेश मेवाणी या गुजराती तरूणाच्या वा नक्षली गटांच्या मागे जातो आहे. रामदास आठवले सत्तेच्या परिघात फिरत बसले आहेत आणि सामान्य आंबेडकरी जनता गोंधळलेली आहे. आपापल्या स्वार्थासाठी एकमेकांच्या उरावर बसायला असे नेते मागंपुढं बघत नाहीत, ही वस्तुस्थिती आपल्या समोर आहे. दुसरीकडं तशीच वाताहत चळवळकर्ते म्हणवून घेणार्या प्रत्येक विचारसरणीच्या गटांची आहे. शेकड्यांनी असे गट मग आपापली पोळी भाजून घेण्यासाठी संयुक्त आंदोलनं, परिषदा भरवतात. पण आपापले स्वार्थ साधून झाल्यावर हेतूला हरताळ फासून मोकळे होत असतात. त्याचा कार्यकारणभाव निकालात निघालेला होता. त्या आंदोलनातली भाषा, उर्जा, घोषणा आणि लोकप्रियतेला बाजारात विकायला काढलेलं होतं. त्याचं भान अशा जुन्यांना तेव्हाच आलं असतं, तर पक्ष वाचला असता. रुके यांनी पन्नास वर्षापुर्वी मांडलेली भूमिका कुणा नेत्याला घेता आली नाही आणि तो पक्ष आणि त्यामागचा हेतू कधीचाच लयाला गेलाय असं वाटण्याची स्थिती निर्माण झालीय.
सवाल एका संघटनेचा वा आंदोलनाचा नसतो. अशा आंदोलनातून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात आणि त्यांच्या आकांक्षा ही त्या चळवळीची खरी उर्जा असते. ती मावळली मग पुन्हा जागृत व्हायला दिर्घकाळ जावा लागत असतो. म्हणूनच त्यामागे असलेली जनभावना जपून हाताळण्याची गरज असते. त्याचे नेतृत्व करणार्या नेत्याला त्याचे प्रत्येक क्षणी भान राखावं लागतं. अन्यथा ती उर्जा आपल्या मतलबासाठी वापरून, मग तिलाच उकिरड्यात फेकून देणारे संधीसाधू तिथे गर्दी करीत असतात. आपल्या व्यावसायिक प्रभावापुढे सामान्य प्रामाणिक कार्यकर्त्याला नामोहरम करीत असतात. तिथेच चळवळीचा र्हास सुरू होत असतो. रुके यांनी जो इशारा दिला तो अमान्य झाला आणि पुढल्या काळात सत्तापदांसाठी एक एक रिपब्लिकन कार्यकर्ता नेता काँग्रेसच्या आहारी गेला. अगदी खुद्द रुकेही त्यातून वाचले नाहीत. आज म्हणून तर मेवाणी वा खालिद उमर यांच्यामागे फरफटण्यात आंबेडकरी चळवळ खुश आहे. कारण तिला कोणी विश्वासार्ह नेता राहिलेला नाही. नक्षली गटांनी त्यात शिरकाव करून घेतला आहे आणि आंबेडकरी विचारांचे व प्रतिकांचेही अपहरण केलेले आहे. हेच दलित पॅन्थरचे झाले होते आणि प्रत्येक ऐक्यानंतर रिपब्लिकन पक्षाचं झालं. जनता दल वा पक्ष म्हणून पुढे आलेल्या मुळच्या समाजवादी चळवळीचा र्हास तसाच होत गेलाय. त्यापासून कटाक्षानं अप्लित राहिलेल्या साम्यवादी वा कम्युनिस्ट पक्षाचीही त्यापासून सुटका झाली नाही. प्रकाश करात वा सीताराम येच्युरी अशा उथळ नेत्यांच्या मतलबामुळे डाव्या चळवळीला स्थान उरलं नाही. त्यातही मतलबी लोकांची वर्दळ वाढली. काँग्रेसची पाळंमुळं खुप खोल रुजली असल्यानं तिचा र्हास व्हायला दशकांचा कालावधी लागलाय. यापासून आपल्या संघटनेला काळजीपुर्वक बाजूला राखण्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र भरभराटला आहे. पाठोपाठ त्यांचा भारतीय जनता पक्ष.
भाजप हा संघाच्याच मुशीत तयार झालेल्यांचा राजकीय पक्ष असला तरी त्यालाही संघानं आपल्या व्यावहारीक कामकाजापासून दूर ठेवलेलं आहे. भाजपला संघामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. पण संघाला आवश्यक असेल तेव्हा संघाचे काही नेते भाजपत हस्तक्षेप करीत असतात. सत्तेच्या चक्रात फिरणार्या संघाच्या भाजपातील कुणाही नेता कार्यकर्त्याला संघाच्या धोरणात्मक व्यवहारात समावून घेतलं जात नाही. त्यामुळे़च संघ अजून टिकलाय आणि विस्तारतोय. भाजपच्या राजकीय दौडीला संघ मदत करतोय. पण सत्तेच्या कर्दमात रुतलेल्यांना संघ आपल्यात ये जा करू देत नाही. बाकीच्या चळवळी वा संघटनांची तिथेच गोची झालेलीय. सत्तेतच रमलेले लोक चळवळीचे निर्णय घेत असतात आणि आपल्या राजकीय गरजेनुसार चळवळीला वाकवत वा मोडतही असतात. रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर वा मेवाणी, कन्हैयाकुमार यांच्यात किंचीतही फरक नाही. चळवळ आणि राजकारण यांची गल्लत केली म्हणून त्यांना त्या दुष्टचक्रातून बाहेर पडणे शक्य झालेलं नाही. त्यांना म्हणूनच आमिष दाखवून वाटेल तसं वळवता येतं वा वाकवताही येतं. काँग्रेसनं या चळवळींना किती सहजगत्या आपल्या राजकीय हेतूसाठी वापरलं, ते वारंवार दिसलेलं आहे. आताही डाव्या संघटनांनी मेवाणी वा आंबेडकरी लोकांना बिनधास्त वापरून घेतलं. त्यात तात्पुरतं समाधान नक्कीच मिळतं. जोश चढतो आणि तो ओसरल्यावर आपण कुठे आहोत, त्याचाही थांगपत्ता लागत नाही. म्हणून चळवळीला सत्तास्पर्धेपासून कटाक्षानं दूर ठेवावं लागतं. पक्ष संघटना चालवताना त्यात मतलबी लोकांच्या हाती सुत्रे जाणार नाहीत, याची काळजी घ्यायची असते. ती न घेतली गेल्यानं आंबेडकरी चळवळीची आणि राजकीय पक्षाची ही अवस्था झालीय, हे नाकारता येत नाही.
हरीश केंची
९४२२३१०६०९
Subscribe to:
Post Comments (Atom)
दान पावलं....देवा दान पावलं...!
"विधानसभा निवडणुकीचा निक्काल लागलाय...! कुणाला किती मतांचं दान पावलंय, हे आता उघड झालंय. कोण सत्तेत अन् कोण विरोधात हेही स्...
-
"शी S...S... कर्नाटकातली ही घटना अत्यंत शरमेची, किळसवाणी आणि धक्कादायक आहे, जनता दलाच्या प्रज्ज्वल रेवण्णा या खासदारानं तब्...
-
"तुम्हाला ट्राफिक हवालदारनं पकडलंय का? तो पैसे डायरेक्ट घेत नाही, एक टपरी असते, तिथं तो पैसे द्यायला लावतो. भाजप हा ट्राफिक...
-
"आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करताना त्यांची वैविध्यपूर्ण वाटचाल डोळ...
No comments:
Post a Comment