Friday 14 April 2023

राजधर्माची ऐशीच्या तैशी....!

यच्चयावत सगळ्याच शहरांमधल्या पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, नवी मुंबईत 'भ्रष्टाचारी जोडो पार्टी'- BJP आणि त्यांच्या मातृसंस्थेच्या प्रेरणेनं काढल्या गेलेल्या तमाम गुढीपाडव्याच्या, रामनवमीच्या शोभायात्रांचं, शिवाय लव्हजिहादच्या विरोधातला हिंदू जन आक्रोश मोर्चा यांचं खास वैशिष्ट्य हे की, नेहमीप्रमाणेच हिंदुत्वाचा छुपा; पण, अतिशय आक्रमक, विखारी प्रचार त्यात ठासून भरलेला होता. महाराष्ट्रात ५० हून अधिक शहरांत हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यांमध्ये देण्यात आलेल्या घोषणा, त्यात केलेली विखारी भाषणं यावरुन सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला खडसावलं. 'राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे; मौन बाळगायचं असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढलेत. एका बाजूला हिंसाचार माजेल अशी व्यवस्था करायची, मुस्लिमद्वेष्टी भडक भाषणं करणाऱ्यांना मोकाट सोडायचं आणि राजधर्माचा प्रश्न उपस्थित होताच ’मौनं सर्वार्थ साधनं’ असा जप करत बसायचं, एवढी आणि एवढीच या सरकारची कामगिरी आहे!
---------------------------------------------------

देशातल्या विविध शहरात, राज्याच्या छत्रपती संभाजीनगर, जळगाव इथं झालेल्या हिंसाचारानं सारा महाराष्ट्र चिंताग्रस्त होणं साहजिक आहे. सर्व जनतेला सुखासमाधानात ठेवणारं, शांत जगायची हमी देणारं राज्य म्हणजे 'रामराज्य' असा सामान्यांचा समज होता. त्याला चूड लावायचं काम महाराष्ट्रातलं शिंदे-फडणवीस सरकारनं केलंय. रामनवमी हा सण जणू धर्मयुद्धाची रणभेरी पुकारण्यासाठीच निर्माण झालाय, असं रा.स्व. संघानं ठरवलंय. तो दिवस मुसलमानांना उचकावण्यासाठी जितका वापरता येईल, तितका वापरण्याची खास योजना रा.स्व. संघ आणि भाजप करत असतो. त्याला आता मनसे येऊन मिळालीय. धार्मिक मिरवणूक हे त्यासाठी शस्त्र म्हणून वापरण्याचं कौशल्य संघानं आत्मसात केलंय. बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी राममंदीर बांधण्याचा कट लालकृष्ण अडवानींनी रचल्यापासून रामनवमीला मिरवणुका काढायच्या, त्या मुद्दाम शहरांच्या मुस्लिमबहुल परिसरातून घेऊन जायच्या, मशिदीसमोर उभं राहून मुद्दाम तासन तास धिंगाणा घालायचा यालाच त्यांनी 'रामभक्ती' हे नाव दिलंय. त्यामुळं देशभर हिंसाचार उसळत राहिला. अगदी १९९१ मध्ये बाबरी मशीद पाडण्याआधी १९८९ मध्येही असाच हिंसाचार माजेल, याची व्यवस्था करण्यात आली होती. तेव्हापासून, राजकारणाची गरज भासेल तेव्हा आणि तितक्या प्रमाणात हिंदु-मुसलमानांत हिंसाचार पेटवण्याचं तंत्र विकसित करण्यात आलंय. त्यासाठी रामासारख्या देवालाही कामी ठेवण्यात रा.स्व. संघानं कमी केलेलं नाही. रा.स्व. संघानं एका बाजूला हिंदू पुरूषांमध्ये संस्कार पेरायची भाषा करत असतानाच मुस्लिमद्वेषाचं पीक काढण्यासाठी बजरंग दलासारख्या हिंसक संघटना स्थापन केल्या. बायकापोरांना मारझोड करणं, हाच त्या दलाचा पुरूषार्थ. तेव्हापासून रामाच्या जोडीला हनुमानाचा वापर सुरू झाला. हनुमान जयंतीचा वापर करत हिंसा माजवायचं हेच तंत्र, २०२२ मध्ये दिल्ली आणि इतरत्र वापरण्यात आलं. मुसलमानांना लक्ष्य करत भडक घोषणा द्यायच्या, पोलिसांनी परवानगी दिलेला मार्ग योजनापूर्वक सोडून मुसलमानांना चिडवण्यासाठी भलताच मार्ग घ्यायचा, हटकून मशिदीच्या समोरुनच वाद्ये वाजवत मिरवणूक नेण्याचा हट्ट करायचा हे, आजवर वापरलेलं तंत्र २०२२ मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेशात वापरलं होतं. ते जुनाट झाल्यानं रा.स्व संघाला त्यात काही राम आहे, असं वाटेना. मग त्या मिरवणुकांच्या पाठोपाठ प्रशासन बुलडोझर पाठवू लागले. जय श्रीरामच्या मंत्रानं भारीत झाल्यानं बुलडोझर आपोआप मुसलमानांच्या घरांवर, दुकानांवर चाल करून जाऊ लागले. भारतातले सगळेच मुसलमान बाहेरुन भारतात आल्याच्या अफवा रुजवल्यानं त्यांचं घर, त्यांच्या व्यवसायाचं ठिकाण हे अतिक्रमणच असणार हे सिद्ध करायची काहीच आवश्यकता नाही. बुलडोझरच्या घरघरीतून रा.स्व. संघाच्या सैनिकांना जय श्रीराम, जय श्रीराम हा मंत्र ऐकू येऊ लागला. रा.स्व. संघ आणि संबंधित संघटना मुसलमानांना ठोकून काढण्यासाठी धार्मिक मिरवणुकांचा कसा वापर करत आहेत, याचं सखोल विश्लेषण ’रूट्स ऑफ रॉथ’ Routes of Wrath नावाच्या एका अभ्यासात दिसून येतं. हा अभ्यास सर्वोच्च न्यायालयातले काही नामवंत वकील आणि तितकेच नामवंत नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश रोहिंग्टन नरिमन यांची प्रस्तावना असलेल्या या अहवालाचं संपादन सर्वोच्च न्यायालयातले ज्येष्ठ वकील चंदर उदयसिंग यांनी केलं असून, तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. देशावर प्रेम असलेल्या प्रत्येक नागरिकानं तो वाचला पाहिजे. तो सर्वसामान्य मराठी वाचकाला उपलब्ध करून देण्यासाठी ’जीवन मार्ग’ प्रयत्नशील राहील. पण, एरव्ही प्रतिकरुपानं ठळकपणे दिसणारा 'भ्रष्टाचाराचा विरोध' म्हणजे, भ्रष्टाचारी रावण किंवा असुरांचा विनाश चितारल्या स्वरुपात यावेळी बॅनर्स, स्पीकरवरुन घोषणा, प्लॅकार्ड्स् यामधून अभावानं देखील अजिबात दिसला नाही. कसा दिसणार? 'मोटा भाई'चा खराखुरा विद्रूप चेहरा, 'हिंडेंनबर्ग'च्या अहवालातून आणि कर्नाटकच्या 'PayCM' आणि '४०% सरकार'च्या कर्नाटकी जनतेमधूनच उठणाऱ्या घोषणांतून साफ उघडा पडलाय ना! हिंदू-मुस्लिम तेढ वाढवत आणि प्रसंगी पुलवामासारखा एखादा 'सर्जिकल-स्ट्राईक' किंवा 'करा अथवा मरा' अशा रौद्रभीषण अडचणीत सापडलेल्या पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांशी संधान बांधून, दोन्ही बाजुच्या सत्ताधाऱ्यांच्या फायद्याची अशी, सीमेवर एखादी चकमक घडवून आणणं वगैरेची EVMच्या आधार-सोबतीनंच, लोकसभा-निवडणुका जिंकण्यासाठीची ही रंगीत तालीमच होती!

जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर इथं विचारपूर्वक रितीनं चेतवण्यात आलेल्या ठिणगीचं राज्याला जाळणाऱ्या वणव्यात रुपांतर होणार नाही, याची खबरदारी प्रशासनानं आणि मुख्यतः जनतेनं घेतली पाहिजे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून भाजपनं सुकलेला पालापाचोळा गोळा करायला सुरवात केली होती. त्यासाठी मागच्या वर्षी मशिदीसमोरच हनुमान चालिसा वाचायची मोहीम घ्यायचं कंत्राट राज ठाकरेंना दिलं होतं. खाल्ल्या मिठाला जागत त्यांनी जनतेला वेठीला धरायचा केलेला कट महाविकास आघाडी सरकारच्या चातुर्यानं उधळला गेला. त्यानंतर सत्ताहरणाच्या तमाशाचा वग लावून महाराष्ट्राची अब्रू एकनाथ शिंद्यांना हाताशी धरून भाजपनं जगाच्या वेशीवर टांगली. आगा ना पिछा असलेल्या बिनबुडाच्या या शिंदे-फडणवीस सरकारला जनतेच्या पाठिंब्याची गरज भासू लागली. हे सरकार फक्त रा.स्व. संघ सर्टिफिकेट देईल, अशाच हिंदूंचं आहे, असं त्यानं ठरवत महाराष्ट्राच्या एकोप्याला चूड लावायला सुरवात केली. सत्तेवर येताच मुंबईत बेस्टच्या बसेसवर आता हिंदुंना सण साजरा करण्यातला अडथळा दूर झाला, अशा आशयाच्या जाहिराती सरकारी खर्चानं झळकू लागल्या. सण हे देवाचं नाव घेण्यासाठी, आनंदानं मुलाबाळांसोबत गोडधोड खाण्यासाठी नसून मुसलमानांचं शिरकाण करण्याच्या घोषणा देण्यासाठीच वापरलं जाणार, याचा तो संकेतच होता आणि श्रद्धा वालकरच्या हत्येचं निमित्त करून राज्यभर तथाकथित ’लव्ह जिहाद’च्या नावानं राज्य पेटवण्याची भाषा सुरू झाली. सुदर्शन टीव्हीचं सुरेश चव्हाणके, हैद्राबादचा भाजपनं काढून टाकायचं नाटक केलेला आमदार राजा सिंग अशी शिवराळ भाषणं करणाऱ्यांना रा.स्व. संघाच्या गळ्यातलं ताईत असल्यासारखं राज्यभर मिरवायला सुरवात केली. उघड उघड मुसलमानांचा निःपात करण्याची भाषा सुरू झाली. महाराष्ट्रात ५० हून अधिक शहरांत हजारोंचे मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यांमध्ये देण्यात आलेल्या घोषणा, त्यात केलेली विखारी भाषणं यावरुन सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला खडसावलं. 'राज्य सरकार नपुंसक, शक्तिहीन आहे; मौन बाळगायचं असेल तर मग राज्याची गरजच काय?’ अशा शब्दांत कोर्टानं सरकारवर ताशेरे ओढलेत. एका बाजूला हिंसाचार माजेल अशी व्यवस्था करायची, मुस्लिमद्वेष्टी भडक भाषणं करणाऱ्यांना मोकाट सोडायचं आणि राजधर्माचा प्रश्न उपस्थित होताच ’मौनं सर्वार्थ साधनं’ असा जप करत बसायचं, एवढी आणि एवढीच या सरकारची कामगिरी आहे. शेजारच्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक होतेय. त्या राज्यात भाजप राजवटीची लोकप्रियता रसातळाला गेलीय. त्या सरकारला मुक्ती द्यायला प्रभु रामचंद्रही येणार नाहीत, इतकी पापं त्या सरकारनं केलीत. उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकात भाजपनं हिजाबचा निरर्थक मुद्दा उकरून काढला होता. आता महाराष्ट्रात मुस्लिमविरोधी भावना भडकावत राज्यातला भाजप कर्नाटकी भावाच्या मदतीला धावून जातोय. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत गौतम अदानींचा गळ्यात बांधलेला धोंडा नरेंद्र मोदींना घेऊनच बुडणार आहे. ’हम तो डूबेंगे तुमको भी लेके सनम’ याचं गुजराती भाषांतर करत गौतमभाई नरेंद्रभाईंना दिवसरात्र ब्लॅकमेल करत राहणार. शेंगा कुणी खाल्ल्या, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे प्रधानमंत्र्यांनी मूठभर गिळलेले मूग. हा मूगाभिनय नरेंद्र मोदींच्या गळ्याशी आल्याशिवाय राहणार नाही, याची खात्री झाल्यानं आता पुन्हा मुसलमान एके मुसलमान हा मंत्र भाजप म्हणत राहणार!

त्याचाच भाग म्हणून भाजप ठिकठिकाणी बी टीमला मैदानात उतरवत राहील. एमआयएम ते काम इमानेइतबारे पार पाडत आहे. राज्यातल्या विविध ठिकाणच्या स्थानिक परिस्थितीचं  पाणी ढवळून त्यात गळ टाकायचं काम हे जत्रेत एकत्र आलेले भाऊ करत राहणार आहेत. त्यांच्यात सामील व्हायला काही चुलत भावंडे बाजूला उभी आहेतच. छत्रपती संभाजीनगरला होऊ घातलेल्या महाविकास आघाडीच्या सभेला अपशकुन करायची संधी भाजप शोधत होता. ए आणि बी या दोन्ही टीम्सनं संगनमतानं जनतेच्या एकजुटीत पाचर मारायचं काम केलंय. ही पाचर मारून घ्यायची नाही, असा निर्धार महाराष्ट्रातल्या जनतेनं केला पाहिजे. मराठी जनतेचे खरे शत्रू धार्मिक अल्पसंख्य नसून राज्यशकट चोरलेले शिंदे-फडणवीस आहेत, हे जनतेनं ओळखलं पाहिजे. हिंदीतील सुप्रसिद्ध कवी रामधारी सिंह ’दिनकर’ यांचे ’कुरूक्षेत्र’ नावाचे खंडकाव्य आहे. त्यात कवी म्हणतात,
अतिशय रगड़ करे जो कोई l
अनल प्रकट चन्दन से होई ll
खूप घासलं तर अखेरीस चंदनसुद्धा पेट घेईल. अंगाचा दाह थंड करणं हा चंदनाचा गुण आहे. त्याचा वापर जनतेला भाजणारा दाह कमी करण्यासाठी करायचा की तेच घासघासून जाळून टाकायचं, याचं सरकारकडून शहाणपण अपेक्षित असतं. शिंदे-फडणविसांना या शहाणपणाची बाधा झाल्याचा आरोप त्यांच्यावर कुणीही करणार नाही.

मराठीतली एक गोष्ट या सरकारला चपखलपणे लागू होते. शिंदेकाकूंनी सोन्याच्या नव्या पाटल्या घेतल्या. तरी शेजारीपाजारी बायांचे त्याकडं लक्ष जाईना. अचानक शिंदेकाकूंच्या घराला आग लागली. घराला आग कशी लागली म्हणून बाया विचारू लागताच सारखा घराकडं हात करत काकू ’अशी लागली, अशी लागली’ म्हणून सांगू लागल्या. पेटलेल्या जाळात पाटल्या चकाकल्या. त्यांच्याकडं लक्ष जाताच शेजारच्या आठवलेमावशींनी विचारलं, 'काकू, पाटल्या कवा घेतल्या?' शिंदेकाकू कडाडल्या, 'सकाळीच इचारलं आसतंस तर घर पेटवलं आसतं का? शिंदे-फडणवीस सरकारच्या कर्तृत्त्वाला कुणी पुसत नसल्यानं शेवटी त्याच्यावर पाटल्या दाखवण्यासाठी घर पेटवायची आफत आलीय. त्यांचं व्हायचं ते होऊ दे, आपलं घर शाबीत राहील, याची काळजी महाराष्ट्रातली जनता घेईलच घेईल...!!!

No comments:

Post a Comment

लोकशाही की एकाधिकारशाही...!

"देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, पण सत्ताधारी  लोकशाही संसदीय ऐवजी अध्यक्षीय असल्यासारखे वागताहेत. सामूहिक नेतृत्व सांगणारा...